श्रीरामदासस्वामी

श्रीदासबोध

भीमरूपी स्तोत्रे

करुणा स्तोत्र

बारा ओव्याशते

आत्माराम

आत्माराम-विवरण

मनाचे श्लोक

मनाचे श्लोक - विवरण

अभंग मनोबोध


महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेतील प्रत्येक संत आपापल्या स्थानी आगळा वेगळा ठरावा इतक्या प्रकर्षाने प्रत्येकाचे वैशिष्ठ्य जाणवते. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी १३ व्या शतकात भागवत धर्माचा पाया रचल्यानंतर मराठी जनमानसावर सर्वांत मोठा प्रभाव पडला तो भागवतधर्मीय वारकरी संप्रदायाचा. तेथपासून १७ व्या शतकापर्यंत अभंगवाणीने वेदार्थ सांगणारे अनेक संत झाले. या काळात देशभरच भगवद्‍भक्ती रुजविण्याचे काम अनेक संतांकडून घडले. समाज जरा जास्तच सहिष्णु झाल्याचे चित्र बनले होते. क्षात्र वृत्ती, अन्यायाविरुद्ध दोन हात करण्यार्‍या शक्तीचा अभाव दिसू लागला. आणि याच काळात परकीयांनी देशभर अक्षरशः धूमाकूळ घातला होता. या संपन्न देशाला लुटण्यासाठी आक्रमकांच्या धाडीवर धाडी पडत होत्या. मंदिरांचा विध्वंस, देवमूर्तींची विटंबना, मंदिरे पाडून त्याजागी मशिदी बांधणे, धार्मिक जनतेच्या कत्तली, स्त्रियांची विटंबना, लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करणे इत्यादि सर्वप्रकारच्या छळामुळे जनमानस त्रासून गेला होता. काही राजांनी प्रतिकार केला पण सर्वसमावेशक राष्ट्रीय दृष्टीच्या अभावामुळे राजे एकमेकांना मदत करीत नव्हते. याचा फायदा घेऊन परकीयांनी याच देशवासीयांना वापरून याच देशातील इतर राज्यांवर, जनतेवर हल्ले करण्यासाठी वापर केला. याचे मुख्य कारण म्हणजे समाज आत्मकेंद्रित झाल्यामुळे स्वतःपुरते पाहाण्याची वृत्ती बळावली होती. स्वार्थामुळे संघटन नाही, संघटन नसल्यामुळे शक्ती नाही, शक्ती नाही म्हणून साहस नाही, साहस नसल्यामुळे प्रतिकार नाही, आणि प्रतिकाराअभावी अत्याचार सहन करणे याशिवाय गत्यंतर नाही. शत्रूला प्रतिकार करणार्‍या दृष्टीची, संघटनाची, पुरुषार्थाची आवश्यकता होती. अशा वेळी एक संत महात्मा समाजाला नितांत आवश्यक असणारी दिशा दाखविण्यासाठी गरजला "जय जय रघुवीर समर्थ". हा संत म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. रामदासस्वामींनी केलेले कार्य इतर संतांपेक्षा आगळे वेगळे आहेच. स्वामींनी खरेतर परब्रह्मस्वरूप असलेल्या भगवान रामचंद्रांना "समर्थ" म्हटले आहे; पण स्वामींच्या मुखाने ऐकून ऐकून भगवंतांचे 'समर्थ' हे विशेषण लोकांनी रामदासांनाच लावले व तेच पुढे रूढ झाले. चाफळ येथे श्रीराम मंदिराची स्थापना करून मोठ्या प्रमाणात रामरायाचा उत्सव साजरा करून श्रीरामचंद्रांचा स्फूर्तीदायक आदर्श जनासमोर उभा केला आणि श्रीरामाची डोळस उपासना दृढ केली.

समर्थांचे बालपणीचे नाव नारायण. वडील सूर्याजीपंत ठोसर आणि आईचे नाव राणूबाई. जन्म चैत्र शुक्ल नवमी [म्हणजे श्रीरामनवमी चा दिवस] या दिवसी सन् १६०८ मधे मराठवाड्यातील जांब गावी झाला. नारायण यास सुंदर रूप, सुदृढ देहयष्टी, तेजस्वी बुद्धी आणि चपळ वृत्ती लाभली होती. घरांत अनेक पिढ्यांपासून श्रीरामाची व सूर्यनारायणाची उपासना चालू होती. वडील सूर्याजीपंत यांच्याकडे कुलकर्णीपद होते पण यवनांच्या जाचक दबावामुळे त्यांनी ते सोडून दिले होते. आणि इथूनच परक्यांच्या जाचाचा नारायणाला परिचय झाला. सभोवतालची अत्याचारग्रस्त समाजस्थिती पाहून स्वकीय समाजाचे परित्राण करायचा ठाम निश्चय झाला आणि याचकरिता बाराव्या वर्षी लग्नमंडपातून पळून जाऊन पुढील कार्याची तयारी सुरू झाली. नाशिकजवळ गोदावरीकाठी टाकळी परिसरात सूर्यनमस्कार, नदीपात्रात उभे राहून जपसाधना, गायत्री व त्रयोदशाक्षरी राममंत्राची पुरश्चरणे इत्यादि, अशी बारा वर्षे तपश्चर्या केली. या काळात शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक विकास साधून पुढील कार्याची पायाभरणी झाली. यापुढील बारा वर्षे तीर्थयात्रा करीत समाजजीवनाचे बारकाईने निरीक्षण करीत भावी कार्याची दिशा निश्चित केली. रामसेवेची सिद्धता झाली आणि नारायण आता ’रामदास’ बनला.

गावोगावी श्रीराम मंदिरे, हनुमान मंदिरे स्थापन करीत सुमारे ११०० मठांची स्थापना केली. या सर्व ठिकाणी भक्तिभावाच्या संस्कारासह पुरुषार्थ प्रेरणा, बलोपासनेला तेवढेच महत्त्व व प्राधान्य देण्याची व्यवस्था केली. समाजाचे मानसिक परिवर्तन घडवून प्रतिकाराची, विजयाची आकांक्षा जागृत करण्याचे कार्य समर्थांनी केले आणि त्यामुळे स्वराज्याची आशा निर्माण झाली. योगायोगाने याच काळी छत्रपती शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापनेच्या कार्यात गढलेले होते. दोघांचे कार्यक्षेत्र वेगळे असले तरी एकाच ध्येयासाठी आणि एकाच दिशेने असल्यामुळे परस्परपूरक होते. ब्रह्मतेजाची आणि क्षात्रतेजाची युती घडून आली. निखळ परमार्थाबरोबरच काळानुसार समाजाच्या हितासाठी व्यावहारिक उपदेशाची आवश्यकता होती आणि हेच समर्थांचे भूषण होते. "स्वये सदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकासि रे नीववावे ॥" अशी नम्रता अंगी बाणवावयास हवी हे सांगत असतां नम्रता म्हणजे कमजोरपणा नव्हे हेही समाजात रुजवावे लागते हे समर्थ जाणून होते. म्हणून नम्रता अंगी बाणवत असतां एखाद्या अधमाशी वा उद्धटाशी गाढ पडल्यास त्या ठिकाणी "धटासि आणावा धट । उद्धटासि उद्धट । खटनटासि खटनट । अगत्य करी ॥" एवढे सांगून न थांबता "हुब्यास हुब्या लावून द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लौंदापुढे उभा करावा । दुसरा लौंद ॥ " ही शिकवण केवळ समर्थांनीच द्यावी. समर्थांच्या वाङ्‍मयात भक्ति बरोबर पुरुषार्थ आणि प्रयत्‍नवाद याला तेवढेच महत्त्व दिलेले आढळते. "शेवटी परमेश्वराने आपल्यासाठी काय ठरविले आहे तेवढेच आपल्या वाट्यास येणार ना ?" असे म्हणणे अयथार्थ जरी नसले तरी समर्थांचे त्यांस सांगणे असे की - "आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाही तें निष्फळ" - आपण कष्ट केल्यावांचून परमेश्वर आपणांस जे पाहिजे आहे तें देणार नाही. कार्यसिद्धीसाठी आपले कष्ट (प्रयत्‍न) आणि परमेश्वर कृपा या दोन्हींची आवश्यकता आहे.

समर्थांची वाङ्‍मय संपदा विपुल आहे. या संकेतस्थळावर जेवढे शक्य होईल तेवढे उपलब्ध करण्याचा प्रयत्‍न राहीलच.