॥ आपली उपनिषदे ॥
प्राचीन भारतीय आर्यांचे तत्वज्ञानविषयक ग्रंथ म्हणजे उपनिषदें हीं होत. या उपनिषदांमध्यें प्राचीन भारतवासी आर्यांच्या तात्त्विक विचारांची आत्यंतिक अवस्था आपल्या निदर्शनास येते. या उपनिषदांमध्यें सांठविलेल्या विचाररत्नांच्या भक्कम आधारावरच आर्यांच्या तत्वज्ञानशास्त्राची उभारणी झाली आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादि आचार्यांनीं उपनिषदांतील तत्त्वांच्या पायावर आपल्या अद्वैत, विशिष्टाद्वैत व द्वैत तत्वज्ञानाची मांडणी केली. या कारणामुळें उपनिषदांना भारतीय आर्यांच्या इतिहासांत अतिशय उच्च दर्जाचें स्थान प्राप्त झालें आहे व तें सर्वथैव योग्यच आहे.
‘उपनिषद्’ हा शब्द सद् या धातूला उप आणि नि हीं उपपदें लागून तयार झाला आहे. सद् याचा अर्थ बसणें. उपनिषद् याचा अर्थ जवळ बसणें असा होतो. अत्यंत भक्ति भावानें गुरूजवळ बसणें असा या ‘उपनिषद्’ शब्दाचा धात्वर्थ होतो. पण उपनिषद् या शब्दाचा रूढार्थ थोडासा निराळा झाला आहे. अत्यंत भक्तिभावानें गुरूजवळ बसून गुरूकडून जी पारमार्थिक विद्या शिष्य संपादन करतो त्या विद्येला उपनिषद् हा शब्द लावण्यांत येतो. कठोपनिषदावरील आपल्या भाष्याच्या आरंभी उपनिषद् या शब्दांचे निरनिराळे अर्थ शंकराचार्यांनीं दिलेले आहेत. आचार्य म्हणतात कीं, उपनिषद् या शब्दांतील सद् या धातूचे विशरण, गति व अवसादन असे तीन अर्थ होतात. विशरण म्हणजे विध्वंसन. जे मुमुक्षू लोक विषयापासून पराङ्मुख होऊन पारमार्थिक कल्याणाच्या प्राप्तीसाठीं उत्सुक असतात त्यांना ज्या विद्येमुळें अविद्येचा विध्वंस करतां येतो व पराविद्येची प्राप्ति होते त्या विद्येला उपनिषद् असें म्हणतात. अथवा सद् याचा दुसरा अर्थ‘गति’हा घेतला तर ज्या विद्येमुळें ब्रह्माचें ज्ञान होतें त्या विद्येला (ब्रह्मविद्येला) उपनिषद् असें म्हणतात. किंवा सद् धातूचा‘अवसादन’ हा अर्थ घेतल्यास जन्म, जरा, मृत्यु या तापापासून ज्या विद्येमुळें निवारण होतें त्या विद्येलाहि उपनिषद् म्हणता येईल. अशा रीतीनें शंकराचार्यानीं उपनिषद् या शब्दाचा अर्थ‘अविद्याविध्वंसिनी ब्रह्मविद्या’ असा केला आहे. हा अर्थ धात्वर्थापासून प्राप्त होत नसून तो‘उपनिषद्’ शब्दाचा तात्कालिक रूढ अर्थ आहे हें मात्र ध्यानांत ठेवणें जरूर आहे. अशा रीतीनें उपनिषदांचा अर्थ ब्रह्मविद्या असा झाल्यानंतर ज्या ग्रंथांमध्यें अगर ज्या मंत्रांमध्यें ही ब्रह्मविद्या सांगितली असेल त्या ग्रंथांनाहि उपनिषद असें नांव प्राप्त झालें. तात्पर्य, उपनिषद् या शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्याप्रतिपादक ग्रंथ असा केल्यास त्यांत मुळींच वावगें होणार नाहीं.
अशा प्रकारचीं ब्रह्मविद्याप्रतिपादक उपनिषदें किती आहेत त्यांचा नक्की आंकडा सांगतां येणें अशक्य आहे. कोणी उपनिषदांचीं संख्या २५० मानतात. ब्रह्मविद्याप्रतिपादक आणखीहि उपनिषदें झाल्यास ही संख्या केव्हांहि फुगतच जाईल यांत शंका नाहीं. या २५० उपनिषदांत अल्लोपनिषद्, खंडोपनिषद अशा अगदीं अर्वाचीन उपनिषदांचींहि गणना केली गेली आहे. पण अशा उपनिषदांची संख्या वगळल्यास उपनिषदांची संख्या फारच कमी भरेल यांत शंका नाहीं. त्यांतल्यात्यांत निरनिराळ्या आचार्यांनीं आपापल्या भाष्यामध्यें ज्या उपनिषदांचा वेळोवेळीं उल्लेख केला आहे तीं उपनिषदेंच महत्त्वांची, प्राचीन व अधिक विश्वसनीय मानणें जरूर आहे. अशा प्रकारचीं शंकराचार्यांच्या ग्रंथांत उल्लेख केलीं गेलेलीं उपनिषदें ११ आहेत. तीं म्हणजे छांदोग्य, केन, ऐतरेय, कौषीतकी, ईश, कठ, मुंडक, तैत्तिरीय, बृहदारण्यक, श्वेताश्वतर व प्रश्न हीं होत. याशिवाय, अमृतबिंदु, कैवल्य, गर्भ, गोपालतापनी, छुरिका, जाबालसंन्यास, ध्यानबिंदु, नारायणीय, नृसिंहोत्तरतापनीय, महानारायण, मांडूक्य, मैत्री, योगतत्व, रामपूर्व (तापनी), वज्रसूची, सर्व इत्यादि किरकोळ तीस, बत्तीस उपनिषदें आहेत.
उपनिषदांचा नक्की काळ ठरवितां येणें शक्य नाहीं. एवढें मात्र खरें कीं, ब्राह्मणग्रंथांनंतर उपनिषदें रचिलीं गेलीं. पण याच्या पलीकडे निश्चयात्मक असें विधान करतां येत नाहीं. प्रत्येक वेदाचीं निरनिराळीं उपनिषदें आहेत व तीं आरण्यकाच्या शेवटचे भाग या नात्यानें ब्राह्मण ग्रंथांत आले आहेत.
अथर्ववेदांगभूत उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. शिवाय, ॠग्वेद, यजुर्वेद अगर सामवेद यांतील उपनिषदांची नांवें ज्याप्रमाणें वेदांच्या निरनिराळ्या शाखांवरून पडलेलीं आहेत त्याप्रमाणें अथर्ववेदांतील उपनिषदांची स्थिति नाहीं. या वेदांतील उपनिषदांचीं नावें त्यांतील वस्तुविषयावरून पडलेलीं दिसतात. ॠक्, यजु व साम हे वेद विशेषतः ब्राह्मणवर्गाच्या मालकीचे होते. पण क्षत्रियांनीं ज्यावेळीं आत्मा व ब्रह्म या विषयांवर विचार करण्यास सुरवात केली त्यावेळीं, त्यांनीं जीं तत्त्वें पुढें मांडलीं त्यांनांच उपनिषद् हें नांव देण्यांत येऊन अशा प्रकारच्या पुष्कळ उपनिषदांची अथर्ववेदांत गणना होऊं लागली. ईशोपनिषद एवढेंच मात्र संहितांतर्भूत आहे. अथर्ववेदांतील उपनिषदांचें डॉयसनसाहेबांनीं पांच प्रकार पाडले आहेत. त्यापैकीं पहिला प्रकार म्हणजे ज्या उपनिषदांमध्यें वेदान्ताचें उद्घाटन केलेलें आहे अशीं उपनिषदें. उदा:- मुंडक, प्रश्न, मांडुक्य, गर्भ, गारुड इत्यादि. दुसरा प्रकार योगोपनिषदांचा होय. अमृतबिंदु, क्षुरिका, नादबिंदु, ब्रह्मबिंदु इत्यादि. तिसरा प्रकार, संन्यासपर उपनिषदांचा होय. उदा., ब्रह्म, सर्वसार संन्यास, आरुणेय, आश्रम वगैरे. चवथा प्रकार शिवोपासनापर उपनिषदांचा होय. उदा. कैवल्य नीलरुद्र, अथर्वशिरस इत्यादि. पांचवा प्रकार, विष्णुपर उपनिषदांचा होय. उदा. आत्मबोध, नारायण, रामपूर्वतापिनी, रामोत्तरतापिनी वगैरे.
उपनिषदांचा नक्की काल ठरवितां येणें जरी अशक्य असलें, तरीं जीं जुनीं व महत्त्वाचीं अशीं उपनिषदें आहेत त्यांच्यामध्यें अगोदरचीं कोणतीं व नंतरचीं कोणतीं हें अंतर्गत पुराव्यावरून, ठरवितां येतें. या उपनिषदांचे डायसेननें चार विभाग पाडलेले आहेत, ते (१) प्राचीन गद्यात्मक उपनिषदें; बृहदारण्यक, छांदोग्य, तैत्तिरीय, ऐतेरेय, कौषीतकी, केन (२) पद्यात्मक; उपनिषदें, काठक, ईश, श्वेताश्वतर, मुंडक, महानारायण (३) नंतरचीं गद्योपनिषदें प्रश्न, मैत्रायणीय, मांडूक्य (४) नंतरचीं अथर्वोपनिषदें; गर्भ, पिंड, आत्मबोध इत्यादि. या चौथ्या प्रकारच्या उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे.
उपनिषदांच्या कर्त्याविषयींहि निश्चयात्मक सांगणें अवघड आहे. जीं उपनिषदें कोणत्या तरी आरण्यकाच्या अखेरीस आलेलीं आहेत, त्या उपनिषदांचे कर्ते, ज्यांनीं ब्राह्मण ग्रंथ रचिलें तेच होत असें म्हणतां येईल. पण या शिवाय इतर उपनिषदांच्या कर्त्यांचा निश्चय करतां येत नाहीं. उपनिषदांच्या कर्त्यांचें नांव मुद्दाम न देण्यांत एक दोन हेतूहि आढळून येतात. उपनिषदांत तत्त्वज्ञानाविषयींचे परमोच्च विचार प्रगट झाल्यानें ते विचार कोणा एका विशिष्ट व्यक्तीचे आहेत असें म्हटल्यास त्या विचारांविषयीं जितका आदर उत्पन्न होतो त्यापेक्षां शतपटीनें अधिक आदर, ते विचार, ईश्वरनिश्वास आहेत हें म्हटल्यानें होईल, हि गोष्ट प्राचीनांच्या मनांत आली असावी व त्यामुळें त्यांनीं अमक्या उपनिषदाचा कर्ता अमका ॠषि असें न म्हणतां, अखिलवेद हे ईश्वराचे निश्वास व अतएव अपौरुषेय आहेत अशा प्रकारची विचारसरणी त्यावेळच्या तत्त्वज्ञानी पंडितांनीं पत्करिली असावी असें दिसतें. याचा दुसरा एक फायदा असा झाला कीं वरील विचारसरणीमुळें उपनिषदांचें सांप्रदायिक, अगर वैयक्तिक स्वरूप जाऊन त्यांनां सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झालें. दुसरें कारण म्हणजे असें कीं कांहीं उपनिषदें निरनिराळ्या ब्राह्मणांतील व वेदांतील निरनिराळे महत्त्वाचे मंत्र एकत्र करून रचिलीं गेल्यामुळें अमक्या एका व्यक्तीचें नांव कर्ता या नात्यानें देतां येणें शक्य नसावेसें दिसतें.
उपनिषदांतील तत्त्वज्ञान. – सर्व उपनिषदें त्या त्या ब्राह्मणांतील ज्ञानकांडाचे प्रबंध होत या दृष्टीनें जरी त्यांचा ब्राह्मणांत अंतर्भाव केला आहे तथापि तीं कर्मकांडाशीं तत्त्वतः विरुद्ध अशा एका नवीन धर्मविचारांचीं द्योतक आहेत. देवांप्रीत्यर्थ यथासांग यज्ञकर्में करून ऐहिक सुख व मृत्यूनंतर यमलोकीं सुख मिळवावें असा त्यांचा मुळींच हेतु नसून यथार्थ ज्ञानाच्या योगानें जीवात्म्याचें परमात्म्याशीं ऐक्य होऊन या नश्वर देहांतून मुक्त व्हावें हेंच त्यांचें ध्येय आहे. म्हणून उपनिषदांत कर्मकांड निरुपयोगी होऊन ज्ञानकांडाला संपूर्ण महत्त्व प्राप्त झालें आहे.
विश्वात्म्याचें म्हणजे परब्रह्माचें स्वरूप हा उपनिषदांचा मुख्य विषय आहे. जगदुत्पादक सगुण प्रजापतीपासून सर्व चिदचिद्वस्तूंचें उद्भवकारण जें निर्गुणब्रह्म त्यापर्यंत झालेल्या वेदांत विचाराच्या विकासांतील शेवटली अवस्था उपनिषदांनीं व्यक्त होते. ॠग्वेदांत आत्मा हा शब्द केवळ ‘श्वास’ या अर्थी योजिलेला आहे. उदाहरणार्थ वरुणाच्या श्वासाला आत्मा अशी संज्ञा दिली आहे. ब्राह्मणग्रंथांत या शब्दाचा जीवात्मा अशा अर्थांत उपयोग होऊं लागला. पुढें उपनिषदांमध्यें आत्मा या शब्दाला‘सर्व विश्वाच्या चेतनेचें पवित्र कारण’ असा अर्थ प्राप्त झाला. उपनिषदांत आत्मा आणि ब्रह्म या दोन्ही कल्पना सामान्यपणें समानार्थक आहेत परंतु खरें पाहिलें तर ब्रह्म या प्राचीन शब्दानें मनुष्यामध्यें व्यक्त असणारी चिच्छक्ति या अर्थाचा बोध होतो आणि अशा रीतीनें अज्ञेयब्रह्माचें स्पष्टीकरण करण्यासाठीं ज्ञात आत्म्याची योजना केली आहे.
अधिक सगुण अशा प्रजापतीचें स्थान उपनिषदांत जगत्कारण असा जो आत्मा त्यास दिलें आहे. बृहदारण्यकांत म्हटलें आहे कीं, प्रारंभीं आत्मा किंवा ब्रह्म हेंच विश्व होतें. तो एकाकी असल्यामुळें त्याला भीति वाटूं लागली व आनंद वाटेना. आपण द्वितीय व्हावें अशी त्याला इच्छा झाली व तो पुरुष आणि स्त्री होऊन त्यापासून मानवजाति निर्माण झाली. याप्रमाणें त्यानें पुढें प्राण्यामध्यें नर व नारी या जाती निर्माण केल्या; शेवटीं त्यानें जल, अग्नि, देव वगैरे उत्पन्न केलीं. [ अ. १ ब्रा. ४. ]
‘सर्व जग माया आहे व ब्रह्म मायिन् असून त्यानें ती माया उत्पन्न केली आहे’ हा वेदान्त मतांतील प्रमुख सिद्धांत पहिल्याप्रथम श्वेताश्वतर नामक एका उत्तरकालीन उपनिषदांत आढळतो (श्वेताश्वतर अ. ४ मं. १०). तथापि हें मत मूळापासूनच प्राचीन उपनिषदांमध्यें अंगभूत झालें आहे. ‘दृश्य वस्तू खर्या सद्वस्तूंच्या केवळ छाया आहेत या ग्रीक तत्त्वांत प्लेटोच्या मताशीं तसेंच‘दृश्य वस्तू तदंतर्गत सद्भावाचे दृश्य चमत्कार होत’ या कांटनामक जर्मन तत्त्वज्ञान्याच्या मताशीं वरील उपनिषदांचें मत अगदीं सदृश दिसतें.’
‘जीवात्म्याचें परमात्म्याशीं ऐक्य आहे’ हा उपनिषदांचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. छांदोग्य उपनिषदांत पुनः पुनः त्याच मताची त्याच शब्दांत वारंवार पुनरावृत्ति केली आहे. ती अशी‘हें सर्व जग ब्रह्ममय आहे, हेंच ब्रह्म सत् आहे, तेंच आत्मा, हे श्वेतकेतू तेंच तूं आहेस.”तत्त्वमसि’ या वाक्यांत उपनिषदांच्या सर्व वेदांतमताचें सार आहे.‘अहंब्रह्मास्मि’ याहि वाक्यांत वरील मतच मांडलेलें आहे. या ब्रह्मात्मैक्याविषयीं बृहदारण्यक, मुंडक इत्यादि उपनिषदांत वारंवार उल्लेख आलेले आहेत.
सत्यज्ञानाच्या योगानें ब्रह्माशीं जीवात्म्याचें तादात्म्य होऊन परमसुखाची प्राप्ति होते, या सिद्धांताबरोबरच संसार सिद्धांत (पुनर्जन्म अगर जन्मांतर) रूढ झाला. या सिद्धांताचा विकास अत्यंत प्राचीन उपनिषदांमध्यें झाला आहे. आणि तो बुद्धधर्माची संस्थापना झाली, त्यावेळीं पूर्णपणें संस्थापित झालेला असला पाहिजे. कारण तो गौतमबुद्धानें निर्विवाद मान्य केला होता. या सिद्धांताचें अगदीं प्रारंभींचें स्वरूप शतपथ ब्राह्मणांत आढळतें. इहलोकीं पुनर्जन्म होतो, असें मानून उपनिषदांत या वरील कल्पनेस संसारवादाचें स्वरूप दिलें आहे.‘कर्माच्या योगानें पुनर्जन्म प्राप्ति होते व मनुष्याच्या स्वतःच्या कर्मावर ती अवलंबून आहे’, या कर्मवादाचा प्रारंभ बृहदारण्यकांत झालेला आढळतो. वेदकालीन संसारवादाचें अत्यंत महत्त्वाचें व सविस्तर वर्णन छांदोग्योपनिषदांत आहे तें असें कीं, ज्ञानसंपन्न व श्रद्धावान वानप्रस्थ तपस्वी, मृत्यूनंतर देवयानांत प्रविष्ट होतो व तेणेंकरून ब्रह्मांत त्याचा लय होतो; परंतु यज्ञकर्म व सत्कर्म करणारा गृहस्थाश्रमवासी पितृयानानें चंद्रलोकास जातो व तेथें त्याचें कर्मफल संपेपर्यंत तो वास करतो. नंतर तो पृथ्वीवर पुनः परत येतो व प्रथम वनस्पतिरूपांत जन्म घेऊन नंतर तीन उच्च वर्णांपैकीं एका वर्णांत मानवरूपांत जन्म घेतो. यांत प्रथम परलोकीं व नंतर पुनर्जन्माच्या योगानें इहलोकीं याप्रमाणें दुहेरी कर्मफलप्राप्ति झालेली दिसते. अशाच प्रकारचें वर्णन बृहदारण्यकांत (अध्याय ७ ब्राह्मण २ मंत्र १५-१६) आहे.
सर्व उपनिषदें मिळून किंवा एकाच उपनिषदांत वेदांतमताचा न्यायशास्त्रानुसार पद्धतशीर विकास झालेला आहे व त्याचें सुसंगत व संपूर्ण ज्ञान आपणांस होऊं शकेल असें मात्र म्हणतां येत नाहीं. त्यामध्यें कांहीं अंशीं काव्यमय व कांहीं अंशीं आध्यात्मिक असे विचारसंवाद, चर्चा यांचें मिश्रण झालें असून त्यामध्यें तत्त्वविचार आनुषंगिक आहे. त्या तत्त्वविचाराला कालांतरानें पद्धतशीर वेदांतशास्त्राचें स्वरूप पुढें देण्यांत आलें.
नी ति त त्त्वें – उपनिषदामध्यें जरी ब्रह्म, आत्मा, जग यांच्या स्वरूपाविषयींचे परमोच्च विचार मुख्यत्वेंकरून प्रगट करण्यांत आले आहेत तरी त्यांत नैतिक तत्त्वांचा अगदींच उहापोह नाहीं असें मात्र नाहीं. आध्यात्मिक चर्चेंबरोबरच मधूनमधून नैतिक तत्त्वांची चर्चाहि बर्याच जागीं करण्यांत आलेली आहे. मोक्षप्राप्तीसाठीं जीं साधनें आहेत त्यांत चित्तशुद्धि हें एक प्रमुख साधन आहे व ती चित्तशुद्धि प्राप्त होण्यास मनुष्यानें दम, तप, सत्य, इत्यादि गुण अंगीं बाणून घेतले पाहिजेत अशा प्रकारचा उल्लेख केनोपनिषदांत आढळतो. ईशावास्यांत अशाच प्रकारचे विचार आढळतात. पण हें जग मायिक असून, या नश्वर देहापासून मनुष्यानें मुक्तता करून घेऊन ब्रह्मस्वरूपीं लीन झालें पाहिजे, हें मनुष्याचें वास्तविक ध्येय आहे, हें ठसविण्याचा उपनिषदांचा प्रधान हेतु आहे ही गोष्ट निर्विवाद आहे.
उपनिषदांतील तात्त्विक विचारांचा हिंदु लोकांवर किती पगडा बसला आहे हें या लेखाच्या प्रारंभीं सांगितलेंच आहे. हिंदूधर्माचे जे आचार्य व पुरस्कर्ते होऊन गेले त्यांनीं या उपनिषदांतील तत्त्वेंच मूलभूत मानून त्यांवर आपल्या तत्त्वज्ञानाची टोलेजंग व सनातन इमारत बांधली. निरनिराळ्या हिंदुधर्माच्या सांप्रदायिकांनीं, आपल्या संप्रदायाला वजन प्राप्त व्हावें म्हणून उपनिषदांचा आधार आपल्या संप्रदायाच्या तत्त्वांनां आहे असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला इतकें उपनिषदांना प्रामाण्य प्राप्त झालें आहे. पण या उपनिषदांचें महत्त्व केवळ हिंदू लोकांनाच पटलें आहे असा भाग नाहीं. ज्या ज्या भाषेंत उपनिषदांचें भाषांतर झालें आहे त्या त्या भाषेच्या लोकांनां उपनिषदांचें तत्त्वज्ञान वाचून उपनिषदांची योग्यता पटली आहे. शोपेनहार नामक पाश्चात्त्य पंडितानें उपनिषदांचें मोडकेंतोडकें भाषांतर ज्यावेळीं वाचलें त्यावेळीं त्याला उपनिषदांतील तत्त्वज्ञानाविषयीं इतका आदर उत्पन्न झाला कीं त्यानें ‘या उपनिषदांच्या अभ्यासानें माझ्या मनाला कायमची शांति प्राप्त झाली व तीच शांती माझ्या मृत्यूपर्यंत राहील’ असे उद्गार काढले. अशाच तर्हेचे उद्गार कित्येक पाश्चात्त्य पंडितांच्या मुखांतून बाहेर पडलेले आहेत.
इ. स. १६५६ त उपनिषदांचें उर्दू भाषांतर, शहाजहान बादशहाचा वडील मुलगा दारा यानें अनेक हिंदु पंडितांकडून करविले. १७७५ या उर्दू भाषेंतील उपनिषदांचे लॅटिनमध्यें आंकेतिल दुपेरां यानें भाषांतर केलें. हें १८०१ व १८०२ सालीं स्ट्रासबर्ग येथें दोन भागांत प्रसिद्ध झालें. नंतर शोपेनहारनें तें भाषांतर वाचलें व नंतर त्याचा प्रसार यूरोपमध्यें होऊन मॅक्समुल्लर, डॉयसन प्रभृति विद्वद्रत्नांनीं उपनिषदांचा अभ्यास सुरू केला.
संदर्भ - केतकर ज्ञानकोश
उपनिषदांची साधारण विभागणी आढळते ती अशी - (१) प्रमुख उपनिषदे - अर्थात् परतत्त्वदर्षी उपनिषदे - ह्यांना दशोपनिषदे असेंही म्हणतात. यांत प्रामुख्याने 'ब्रह्म' विषयक विवेचन आढळते.
व्यासांनी ब्रह्मसूत्रांमध्ये फक्त दश उपनिषदांचाच उल्लेख केलेला आढळतो तसेच आद्य शंकराचार्यांनी ह्या दहाही उपनिषदांवर भाष्य केलेले असल्यामुळे ह्या दश उपनिषदांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. उर्वरित ९८ उपनिषदांचे वर्गीकरण असे - (२) १४ वैष्णव उपनिषदे - राम, कृष्ण इ. विष्णू अवतारांशी संबंधीत (३) १५ शैव उपनिषदे (४) ८ शाक्त उपनिषदे (५) २४ सामान्य उपनिषदे. (६) १७ संन्यास उपनिषदे आणि (७) २० योगोपनिषदे वैष्णव-शैव-शाक्त या दैवोपनिषदांच्या नांवावरूनच कल्पना करूं शकतो कीं परमेश्वराच्या त्या त्या सगुणरूपासंबंधी ही उपनिषदें आहेत. सामान्य उपनिषदांमध्ये सर्व पंथ वा संप्रदायांसाठी उपयोगी विवेचन आढळते. संन्यास उपनिषदांमध्ये संन्यास ह्या चतुर्थ आश्रमाबद्दल विवेचन आढळते. योगोपनिषदे अर्थात् ’योग’ विषयक. उपलब्ध असलेल्या २२०-२२५ उपनिषदांपैकीं प्रभु रामचंद्रांनी हनुमंतास १०८ उपनिषदांचा अभ्यास करण्याचे सुचविले आहे, म्हणून प्रस्तुत १०८ उपनिषदांचाच विचार करायचा आणि जमेल तसा त्यांचा मराठी अनुवाद करायचा मानस आहे.