॥ आमृतनाद उपनिषद् ॥


ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


बहुतेक उपनिषदांतून असे दिसून येते की उपनिषद म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी कोणा साधकाने आपल्या गुरूला वा कोणी अधिकारी पुरुषाला मार्गदर्शनार्थ विचारलेल्या प्रश्नोत्तररूपी संवाद. जो अधिकारी असतो तो परमेश्वराचे 'शाब्दिक' ज्ञान (शास्त्र) ह्यात तर पारंगत असतोच पण तो 'ब्रह्म'धिष्ठितही असतोच. आणि शिष्य, साधकही बराच काळ तप केलेला असतो. बर्‍याच उपनिषदांतून शिष्य कोण आणि मार्गदर्शक ऋषि कोण ह्याचा उल्लेख आढळत नाही. ह्या उपनिषदांतही प्रस्तावना हा भाग नसून सरळ विषयाला हात घातलेला आढळतो. ह्या उपनिषदात ध्यान-धारणा, प्राणायाम इत्यादि अभ्यासाने ॐ काररूपी नाद ह्याला धरून ज्ञानप्राप्ति (मोक्ष) कशी साध्य करून घेता येईल ह्याचे मार्गदर्शन दिलेले आहे. म्हणून 'अमृत'नाद हे नांव पडले असावे.


शास्त्राण्यधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः ।
परमं ब्रह्म विज्ञाय उल्कावत्तान्यथोत्सृजेत् ॥ १ ॥


ह्या उपनिषदांत आलेले विवेचन कोणासाठी ? कारण स्वभाव वैशिष्ठ्य व प्रकृतिप्रमाणे प्रत्येक मनुष्यासाठी मोक्ष मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैली यत्नोभ्यास करू शकणार्‍या प्रकृतीच्या साधकासाठी हे उपनिषद आहे असे दिसते. पहिल्या मंत्रात 'शास्त्राभ्यासाचे' वर्णन आले आहे. कुणासाठी ? मेधावी, म्हणजे ज्याला संसाराचे मिथ्यत्व पटलेले आहे पण अजून ज्ञानप्राप्ती व्हायची आहे असा बुद्धिमान. [संसार मिथ्या नाही. संसार - दृष्य विश्व - हे परमेश्वराचे शरीर आहे. (पहा - विष्णुसहस्रनाम यांतील पहिले नाम 'विश्वं' ह्याची व्याख्या). पण ह्या शरीराचा 'शरीरी' ह्याची ज्ञानप्राप्ती म्हणजे मोक्ष. मग ह्या 'शरीरी'चे शरीर म्हणजेच सर्वकाही समजणे हेच संसाराचे मिथ्यत्व]. कैवल्य उपनिषदात ब्रह्मदेव म्हणतात 'त्यागेन एके अमृतत्वं आनशुः'. म्हणजे दृढ वैराग्य अंगी बाणल्याशिवाय ज्ञानप्राप्ति अशक्य. मग ज्याला ज्ञानप्राप्तिसाठी 'वैराग्य' ह्याचे महत्त्व समजले तो खरा मेधावी. त्याच्यासाठी शास्त्रांचे अध्ययन येथे सुचविण्यांत आले आहे. कसा करायचा हा अभ्यास ? अभ्यस्य च पुनः पुनः - सतत वारंवार - पातञ्जली म्हणतात तसे 'स तु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारसेवितो'. पण इतका आटापिटा करण्याचे कारण काय ? कारण एकतर आपले उर्वरीत आयुष्य किती आहे हे माहित नसते, आणि उपलब्ध असलेल्या वेळेतील बराच काळ आळस व प्रमाद ह्यांत व्यतीत होतो. म्हणुन 'यथा उल्कावत्' - जीवनाला इथे क्षणभर दिसणार्‍या विजेची उपमा देऊन हे जीवन - म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेला समय - फारच अल्प व मर्यादीत आहे, असे विद्वान म्हणतात. तान् उत्सृजेत् - तान् शब्दाने इथे आळस व प्रमाद सुचविलेला आहे. कारण अध्ययनांतील ही महान् विघ्ने आहेत. आधीच क्षणभंगुर म्हटलेल्या जीवनांत त्यांच्यासाठी जेवढे स्थान तेवढीचा साधनेत क्षती, म्हणून आळस, प्रमाद यांचे सर्वस्वी उच्चाटन करीत अध्ययनांत रत व्हावे. चला आता शास्त्रांचा अभ्यास केला, त्यात तो (परमेश्वर) गुणातीत आहे, त्याला नाम-रूप नाही, तो अवर्णनीय आहे इ. इ. कळले. आता पुढे काय ?


ओंकाररथमारुह्य विष्णुं कृत्वाथ सारथिम् ।
ब्रह्मलोकपदान्वेषी रुद्राराधनतत्परः ॥ २ ॥


विष्णु (अथवा आपले आराध्य दैवत) ह्याला आपल्या साधनेचा सारथी बनवून ब्रह्मलोकरुपी परमपदाचा शोध घेत म्हणचे त्याचे चिंतन करीत अथवा देवाधिदेव भगवान रुद्राच्या उपासनेत सदा सर्वदा तल्लिन होऊन असावे. इथे हे नमूद करणे आवश्यक आहे कीं, जरी विष्णु, ब्रह्म, रुद्र अशी नांवे ह्या मंत्रात आली असली तरी उपास्य देव एक अनंत आणि गुणरहित (निर्गुण) परमेश्वरच निर्देशित केलेला आहे. कोणत्याही वस्तु (पदार्थ)ला नाम रूपाची उपाधी लागली की त्याला सीमा आली. कारण नाम-रूप असलेले जे कांही आहे ते कितीही विस्तारीत असले तरी त्याला मनाच्या कल्पने इतकी परिसीमा आलीच. कारण हे मनाचे वैशिष्ठ्य व त्याचा स्वभाव आहे. परमेश्वर कल्पना करू शकणार्‍या कुठल्याही पदार्थाहून भिन्न आहे, आणि यथार्थरूपाने त्याला नाम-रूपाची उपाधी लावतांच येत नाही. पण परमेश्वर मनाच्याही पलिकडचा असला तरी त्याचे चिंतन नाम व रूप यांनी गुंथित व्यक्तित्वाच्या माध्यमांतूनच शक्य आहे. म्हणून विष्णु, रुद्र इत्यादि नांवे. वैष्णव साधक, शैव पंथ, शाक्त उपासक वा अशापैकी एखाद्या विशिष्ट 'पंथा'च्या भगवद् भक्तांसाठी हा उपदेश नसून तो कोणत्याही धर्मातल्या मुमुक्षुसाठी आहे हे समजून घेणे महत्त्वाचे.


तावद्रथेन गन्तव्यं यावद्रथपथि स्थितः ।
स्थात्वा रथपतिस्थानं रथमुत्सृज्य गच्छति ॥ ३ ॥


रथपथि - ॐकाररूपी रथावर आरूढ असलेल्या साधकाला साधनेची आवश्यकता साध्य (ज्ञान) प्राप्तीपर्यंतच. सर्वव्यापी आत्मतत्त्वाचे ज्ञान झाल्यावर साधना ही टाकावी लागत नाही, ती आपोआपच गळूण पडते. कारण तो स्वतःच साध्य बनतो. आळंदीहून पंढरपूरसाठी निघालेल्या वारकरीसाठी पायी प्रवास ही साधना. पंढरपुरी पोहोचल्यावर प्रवासरूपी साधना गळणारच ना ? ह्या उपनिषदात जे साध्य आत्मतत्त्व, परब्रह्म इत्यादिचे वर्णनावर जास्त भर न देतां ते साध्य करण्यासाठी कितीतरी प्रकारें करता येणार्‍या साधनांचेच वर्णन मुख्यत्वें आढळते. विविध उपासनांपैकी प्राणायामाद्वारे होणार्‍या उपासनेचे विशेषत्वाने वर्णन आढळते.


मात्रालिङ्‍गपदं त्यक्त्वा शब्दव्यञ्जनवर्जितम् ।
अस्वरेण मकारेण पदं सूक्ष्मं च गच्छति ॥ ४ ॥


ॐ म्हणजे प्रणव, ह्यांतील अ, उ वगैरे प्रत्येक मात्रेचे इतर ठिकाणी कितीतरी अर्थ प्रतिपादीत केलेले आहेत. त्या प्रत्येक अर्थरूपी मात्रेवर आरोपीत असलेल्या संसारिक (दृष्य) पदार्थांचे चिंतन करून पुढे त्याचा त्याग करावा (त्यक्त्वा) असे सुचविले आहे. म्हणजेच चिंतन शेवटी तिथून हटवून त्याचे मूळ कारण अशा अव्यक्ताचे चिंतन करणे होय. कारण परमतत्त्व 'अ' वर्गातील स्वर, 'क' (च, ट, प) वर्गातील व्यञ्जने ह्याहून कितीतरी पलिकडचे आहे म्हणून 'व्यञ्जन वर्जितम्'. कांहीवेळ प्रणवाचा सावकाश ध्यानपूर्वक जप करीत असतां हळूहळू 'म'च्या नादांत साधकाला इतर संसारिक दृष्यें लोप पावल्याचे प्रत्ययास येते. पुढे त्याचा ('म'चा) वाचक जो ईश्वर त्याचेच ध्यान केंद्रित केल्यास साधकाचा अती सूक्ष्म अवस्थेत प्रवेश होतो - सूक्ष्मं पदं गच्छति.


शब्दादिविषयान्पञ्च मनश्चैवातिचञ्चलम् ।
चिन्तयेदात्मनो रश्मीन्प्रत्याहारः स उच्यते ॥ ५ ॥


सूर्याचे जसे किरण तद्वत् आत्म्याचे किरण म्हणजे त्याने व्याप्त असलेल्या शरीरस्थित ज्ञानेंद्रिये व मन. किरणांवर सूर्याची पूर्ण सत्ता असते तशीच किरणांनी प्रकाशित केलेल्या वस्तुमात्रांवरही त्याची सत्ता असतेच. पण सूर्य कधी किरणांमध्ये वा त्यांनी प्रकाशित होणार्‍या वस्तुंमध्ये रमत नाही. मनादि इंद्रियें ह्यांची नैसर्गिक धांव त्या त्या इंद्रियांच्या विषयाकडे असते. याला संप्रयोग म्हणतात (पा.योगसूत्र २.५४). पण चित्ताला ह्यांपासून अलिप्त राहणे हे प्रयत्नसाध्य आहे. म्हणजे जीवात्म्याला विषय व विषयसंग इथून चित्त काढून ते चित्त स्वतःमध्ये 'स्व'च्या शोधांत लाऊन चिंतन करणे. असे चिंतन करतां करतां पुढे इंद्रियेंही बाहेरच्या विषयांकडे न धांवता त्यांच्या विषयांशी असंप्रयोग व्हायला लागतो आणि इंद्रियेंही चित्तामध्ये केंद्रित व्हायला लागली कीं प्रत्याहार घडतो. इंद्रियांचा आपापल्या विषयाशी संबंध सुटून, त्या चित्ताच्या स्वरूपाचे अनुकरण करणे याला 'प्रत्याहार' म्हणतात. प्रत्यहारांत इंद्रिये चित्ताच्या स्वाधीन होतात. पण हे साधणे महाकठीणच. ज्ञानेश्वर माऊलीनी प्रत्याहाराला 'अधाडा' ( तुटलेल्या कड्यावर चढणे) ची उपमा दिली आहे. (ज्ञानेश्वरी. ६.५६).


प्रत्याहारस्तथा ध्यानं प्राणायामोऽथ धारणा ।
तर्कश्चैव समाधिश्च षडङ्‍गो योग उच्यते ॥ ६ ॥


प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क, समाधि ह्या सहा अंगांनी युक्त साधनेला 'योग' म्हणतात. इथे आलेले 'तर्क' हे अंग पाताञ्जलयोगमध्ये वेगळे गणलेले नाही. तसेच ब्रह्मविद्येच्या प्राप्तीकडे वळणारा साधक अंतर्शुद्धीसाठी आवश्यक असणारे यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह), नियम (शरीर व मनाचे शौच, संतोष, तप, स्वाध्याय-शास्त्राभ्यास, ईश्वराप्रित्यर्थ कर्म करणे), आसन सिध्यता (स्थैर्य) ह्यांच्या अनुष्ठानानंतर इकडे वळतो हे बहुधा गृहीत धरलेले असावे असे दिसते.


यथा पर्वतधातूनां दह्यन्ते धमनान्मलाः ।
तथेन्द्रियकृता दोषा दह्यन्ते प्राणधारणात् ॥ ७ ॥


पर्वतधातु म्हणजे पृथ्वीतून प्राप्त होणारे खनिज धातु पदार्थ. व्यवहारीक उपयोगासाठी त्यावर अग्निसंस्कार केल्याने मल-दोषांचे भस्म झाले म्हणजे उरते ते शुद्ध धातु. तसेच प्राणायामरूपी तपाने इंद्रियांकडून केल्या गेलेल्या दोषांचे भस्म करावे. प्राणायामाने इंद्रियकृत पापांची क्षती कशी होईल ? इंद्रियांना सामर्थ्य मिळते प्राणामुळे. प्राणशक्ति इंद्रियांच्या द्वारे भोग प्राप्तीसाठी खर्च होत होत भोगांचा अतिरेक व्हायला लागला की पापे घडायला लागतात. कसे ? भोगांचा अतिरेक होऊन त्या भोग्य वस्तूंचें प्राप्तिमध्ये कधी अडथळे निर्माण झाले तर काम-क्रोध बळावतात जे पापकृत्ये करवितात. 'अथ केन प्रयुक्तोयं पापं चरति पुरुषः ?' भग. गीता ३.३५) ह्या प्रश्नाला भ. गीतेत श्रीकृष्णाने काम-क्रोधांना नुसते महाशनो, महापाप्मा एवढेच नव्हे तर 'वैरीणम्' म्हटले आहे. प्राणायामाने प्राणशक्ति नियंत्रित होते आणि रज-तम गुणांचा क्षय होऊन सत्त्वगुणाची आपोआप वृद्धी व्हायला लागते. ततः क्षीयते प्रकाशावरणम् - पा. योग. २-५२. मग सत्त्ववृद्धी झाल्यावर रज-तमामुळे इंद्रियांद्वारे घडणारी पापकर्मे आपोआप कमी होणारच ना ?


प्राणायामैर्दहेद्दोषान्धारणाभिश्च किल्बिषम् ।
प्रत्याहारेण संसर्गान् ध्यानेनानीश्वरान्गुणान् ॥ ८॥


मागील दोन मंत्रात प्राणायाम आणि प्रत्याहाराचा उपाय सुचविला आहे. ह्या मंत्रात परत प्राणायाम व प्रत्याहार ह्या अंगांचा पुनः उच्चार करून धारणा व ध्यान ह्या अंगाचा उपयोग करीत अन्-ईश्वरीय म्हणजे आसुरी वृत्तींचा क्षय करण्याचा उपदेश आहे. प्राणायाम, प्रत्याहाराच्या उत्तम अनुष्ठानानेच धारणा, ध्यान, समाधि ह्या अंगांमध्ये सुलभतेने प्रवेश होणे शक्य आहे हे पटविण्यासाठींच बहुधा पुनः उल्लेख केला गेला असावा. प्राणायामाने इंद्रिये पापकर्मांपासून निवृत्त करीत, प्रत्याहाराने इंद्रियांच्या संसर्गापासून वृत्तींची शुद्धि करीत, धारणा (म्हणजे चित्ताला एका विशिष्ठ ठिकाणी बांधून ठेवणे जे ह्याच्या पुढचे अंग 'ध्यान' ह्याची प्राथमिक अवस्था आहे) आणि ध्यानाद्वारे आसुरी गुणांचा नाश करावा. भ. गीतेच्या सतराव्या अध्यायांत दैवी गुण २४ तर आसुरी गुण फक्त सहाच सांगितले आहेत. पण हे सहा अन्-ईश्वरी गुण जीवाला चौर्‍यांशी लक्ष योनिंतून भटकायला लावतात.


किल्बिषं हि क्षयं नीत्वा रुचिरं चैव चिन्तयेत् ॥ ९ ॥


एवं दोषांचा क्षय करून - रुचिरं - आपल्याला इष्ट असणार्‍या, आपल्या आवडणार्‍या रूपाचे चिंतन करावे.


रुचिरं रेचकं चैव वायोराकर्षणं तथा ।
प्राणायामस्त्रयः प्रोक्ता रेचकपूरककुम्भकाः ॥ १० ॥


येथून पुढे प्राणायामाच्या प्रक्रियेचे वर्णन सुरू होते. पूरक, रेचक व कुंभक अशा तीन क्रिया केल्या जातात त्या कृतीला प्राणायाम असे म्हटले जाते. पूरक म्हणजे नासिकेद्वारे श्वासाबरोबर प्राणवायूस आंत ओढून घेणे, रेचक म्हणजे हृदयांतील (छातीतील) प्राणवायू आकाशात म्हणजे बाहेर फेकणे. कुम्भक म्हणजे पूरक रेचक रहित अवस्थेत राहणे. हा दोन प्रकारे होतो. पूरक केल्यावर श्वास रोखून धरणे हा झाला अंतःकुंभ आणि रेचक झाल्यावर परत श्वास आंत घ्यायच्या आधी थोडा वेळ थांबणे हा झाला बाह्य कुंभक. अशा प्रकारे प्राणायाम करतांना चित्त बाह्य विषयांत गुंतू नये ह्यासाठी परत - रुचिरं - पद देऊन इष्ट देवतेच्या मनोहारी रूपाचे ध्यान करावे असे सुचविले आहे. पुढील मंत्रात हे ध्यान प्रणव वा गायत्रीमंत्र ह्यावर लक्ष केंद्रित करीत प्राणायामाच्या प्रक्रियेचे वर्णन आले आहे. पण एकदम अव्यक्त निर्गुण स्वरूपाचे ध्यान करणे सोपे नव्हे म्हणून रुचिरं पद देऊन इष्ट देवता - म्हणजे विशेषकरून त्या देवतेसंबंधी आपल्याला प्रिय वाटणारे असे विशेष गुण - जसे गणपतीची बुद्धिमत्ता, हनुमंताची शक्ति, शिवाचे तपसामर्थ्य इ. यांचे सगुणरूपी ध्यान करण्याचे सुचविले आहे.


सव्याहृतिं सप्रणवां गायत्रीं शिरसा सह ।
त्रिः पठेदायतप्राणः प्राणायामः स उच्यते ॥ ११ ॥


व्याहृतींसहित गायत्री महामंत्राचे अथवा प्रणवाचे मंत्राने पूरक, रेचक व कुंभक करतांना मानसिक आवर्तन करणे अशा प्रकारे एका आवर्तनाला एक प्राणायामाचे आवर्तन म्हटले जाते. व्याहृति म्हणजे काय ? थोडक्यात म्हणायचे झाले तर आपण ज्याला "लोक" म्हणतो (भूलोक, अंतरिक्ष, स्वर्ग लोक इ.) असे सप्त लोक म्हणजे सात व्याहृति. भूः (पृथ्वीलोक वा मृत्युलोक), भुवः (अंतरिक्ष - हा स्वर्ग व पृथ्वीच्या मध्ये आहे), स्वः वा सुवः (स्वर्गलोक), महः (महालोक), जनः (जनलोक), तपः (तपलोक) व सत्यम् (सत्यलोक). "लोक" ही नंतर प्राप्त झालेली संज्ञा, पण व्याहृति हे मूळ नामाभिधान. या सात पैकी जीवात्म्याचा प्रवास फक्त पहिल्या तीन लोकातच होतो. जीवात्म्यासाठी या पुढचे लोक फार दूरचे आहेत असे विद्वान म्हणतात. त्यातल्यात्यात 'महः' पर्यंतचे थोडे विस्तृत वर्णन तैत्तीरीय उप (वल्ली १) मध्ये पहायला मिळतो.


उत्क्षिप्य वायुमाकाशं शून्यं कृत्वा निरात्मकम् ।
शून्यभावे नियुञ्जीयाद्रेचकस्येति लक्षणम् ॥ १२ ॥


नाकाद्वारे हृदयांतीला वायु आकाशांत म्हणजे बाहेर फेकणे हे प्राणायाम प्रक्रियेंतील रेचक लक्षण होय. रेचक करतांना चित्त चिंतन रहित शून्य-भावात लावावे. रेचक करतांना आंतून कांहीतरी बाहेर फेकणे (त्याग करणे) ह्या क्रियेत इष्टाचे सगुण ध्यान यथावकाश निर्गुणाकडे वळविणे आवश्यक आहे. म्हणून इथे म्हणतात रेचकात चित्त शून्य भावात लावावे. आधी रुचिरं सांगून आता शून्यभावे सांगण्याचे कारण काय ? हे मंत्र जरी एका पाठोपाठ आले तरी एक लक्षात घ्यायला हवे की, उपनिषदे रचणे म्हणजे एखादे काव्य रचण्यासारखे नव्हे. अनुभव सिद्ध झाल्यावर एकेका मंत्राचे स्फुरण पावलेल्या ऋषींनी एका विषयाशी सुसंगत असलेले मंत्र एके ठिकाणी जोडल्यावर एक उपनिषद तयार होते. तेव्हां काही काळ रुचिरं पदाने प्राणायाम केल्यावर आणि इंद्रियांची इतर विषयांकडे धाव घेण्याची चंचल अशी अवस्था थोडीफार आटोक्यात आल्यावर मग ह्या मंत्रात 'शून्यभावे नियुञ्जीयात् ' म्हटल्याप्रमाणे चित्त शून्य भावात लावणे शक्य होऊ शकेल. अर्थात् ह्यासाठी किती काळ रुचिरं ध्यान करावे हे प्रत्येकाने आपापल्या स्वभावानुसार वा स्वशक्तिनुसार ठरवणे योग्य होईल. कारण अशा विषयात घाई अजिबात उपयोगी नाही, उलट कधी कधी घातकच. मागच्या मंत्रात तीन मानसिक आवर्तनांचा उल्लेख आहे. पूरक अंतःकुंभक रेचक व बहिः कुंभक आणि हे सर्व करीत असतांना एका गायत्रीचा जप म्हणजे एक आवर्तन झाले.


वक्त्रेणोत्पलनालेन तोयमाकर्षयेन्नरः ।
एवं वायुर्ग्रहीतव्यः पूरकस्येति लक्षणम् ॥ १३ ॥


पूरकाची व्याख्या : ज्याप्रमाणे कमळाच्या नालेने मनुष्य जसा हळू हळू पाणी पितो (कमळाच्या नाळेचा स्ट्रॉ सारखा उपयोग ?) तद्‌वत हळू हळू नासिकेद्वारे वायु ग्रहण करीत छातीत भरावा . इथे सावकाश सांगण्याचे तात्पर्य तीव्र गतीने उच्छ्वास आत घेऊ नये एवढाच असे गृहीत आहे. कारण किती काळ पूरक, किती काळ कुंभक व किती काळ रेचक याचे प्रमाण पुढें येणारच आहे.


नोच्छ्वसेन्न च निश्वसेनैव गात्राणि चालयेत् ।
एवं भावं नियुञ्जीयात् कुम्भकस्येति लक्षणम् ॥ १४ ॥


आता कुंभकाची व्याख्या करतात - उच्छ्वासही नाही वा निःश्वासही नाही म्हणजे पूरक रेचक रहित पण शरीराची हालचाल न करतां (अगदी स्तब्ध) अशा प्राणायामांतील या प्रक्रियेला कुंभक लक्षण म्हटले आहे. आद्य शंकराचार्यांच्या "योगतारावली" मधे कुंभकाला विशेष महत्त्व दिल्याचे दिसते.


अन्धवत्पश्य रूपाणि शब्दं बधिरवत् श्रृणु ।
काष्ठवत्पश्य वै देहं प्रशान्तस्येति लक्षणम् ॥ १५ ॥


आंधळ्याला दृष्याचा (म्हणजे रूपाचा) अभाव व बहिर्‍याला शब्द श्रवणाचा ( नाम ? ) अभाव असल्यामुळे त्यांची चक्षू व कर्ण ही इंद्रिये स्वभावतःच शांत असतात. त्याप्रमाणेच रूप व शब्द (नाम) इथून चित्त निवृत्ति करीत, ओंडका कसा स्वस्थ पडलेला असतो त्याप्रमाणे, कोठल्याही प्रकारच्या तणावारहित (stress free) शरीर स्तब्ध असावे. तात्पर्य दृष्टीद्वारे वा श्रवणाद्वारे ( चित्त 'कामांत' असल्यामुळे) व्यय होणारी प्राणशक्ति मनन करीत असलेल्या प्रणव व गायत्री आवर्तनाकडे वळून चित्त एकाग्रतेला बल प्राप्त होते. उपनिषदे आधीच फार संक्षिप्त असतात. त्यांतही मागच्या मंत्रात उल्लेख केलेली गोष्ट इथे परत आवर्जून सांगितली जाते ह्यावरून हे स्पष्ट होते की क्षुल्लक वाटणार्‍या ह्या सूचना अति महत्त्वाच्या आहेत. क्षुल्लक वाटल्या तरी नेटाने व आठवण ठेवून ह्या सूचनांचे पालन केल्यास प्राणायामाचे प्रभाव (results) फार लवकर जाणवायला लागतात. विशेषतः मनुष्यमात्र जसा भूतकाळातल्या घडून गेलेल्या गोष्टींचे स्मरणांत वा भविष्यात अजून न घडलेल्या गोष्टींच्या चिंतेत घालवतांना दिसतो, त्यात प्रगति होते. म्हणजे चालू क्षण (here and now) जगणे ह्याचा अनुभव यायला लागतो.


इथवर प्राणायामाच्या प्रक्रियेचे वर्णन झाले. येथून पुढे प्राणायाम कसा करावा व त्याचे फळ याचे वर्ण आहे.


ह्यापुढील चार मंत्रात पूर्वतयारीचे वर्णन :


मनः सङ्‍कल्पकं ध्यात्वा संक्षिप्यात्मनि बुद्धिमान् ।
धारयित्वा तथाऽऽत्मानं धारणा परिकीर्तिता ॥ १६ ॥


मनुष्याचे मन संकल्प, विकल्प, कल्पना, हें का तें, अशा प्रकारच्या विचारांनी सदा आंदोलीत असते. आंदोलीत असणारे ते मन, म्हणून ते कधी स्थीर नसते. पण बुद्धी द्वारे होणारे विचार हे सहसा निश्चयात्मक असतात (एखाद्या विषयासंबंधी 'अमुक अमुक करू की नको' हे न ठरवता निर्णय पुढे ढलणे procrastination हा निर्णयही बुद्धीच घेत असते). बुद्धिमान मनुष्याने मन संकल्परूपी आहे (असते) हे जाणून त्याला बुद्धीत लावावे. बुद्धीमधे देखील सतत विचारधारा चालूच असते पण विचार फक्त एका दिशेने चाललेले असतात. बुद्धीच्या साह्याने मनाला एका विशिष्ट ठिकाणी स्थिर करता येते. ह्याला 'धारणा' म्हणतात. धारणेचा काल वाढला कीं त्याला 'ध्यान' म्हणतात. मन-बुद्धी परमेश्वरी सत्तेच्या ध्यानांत लावावी हा या मंत्राचा सारांश आहे.


आगमस्याविरोधेन ऊहनं तर्क उच्यते ।
समं मन्येत यल्लब्ध्वा स समाधिः प्रकीर्तितः ॥ १७ ॥


ब्रह्म म्हणजे सद्‌वस्तु. ही तर वर्णनातीत आहे. तरी पण त्याचा निर्देश करणारे कितीतरी शास्त्रग्रंथ आहेत. त्या शास्त्रग्रंथांतील निर्देश वर्णने यांवर विचार करणे (ऊहा) याला तर्क करणे म्हणतात. अशा प्रकारच्या तर्काव्यतिरिक्त आणखी कोणत्याही विषय-वस्तू बद्दल विचार - तर्क करणे हे प्रपंचाच्या (पाच पाच - म्हणजे पंच महाभूते, पंच इंद्रिये व पंच विषय ) क्षेत्रांतील असल्यामुळे ते निकृष्ट मानले जाते. शास्त्रानुकूल तर्कामध्ये चित्त धारणा व ध्यानानें सूक्ष्म होता होता त्याची परिणती समधीमधे होते.


भूमौ दर्भासने रम्ये सर्वदोषविवर्जिते ।
कृत्वा मनोमयीं रक्षां जप्त्वा वै रथमण्डले ॥ १८ ॥


साधनेला बाधा होऊ शकणारे सर्व दोष वर्जित अशा रम्य स्थळी स्वच्छ व समतोल भूमीवर पवित्र आसन घालून व न्यास दिग्बंध इत्यादिनें मन व शरीराभोंवती एक रक्षाकवच बनवून ॐ काराचे (रथमंडल) ध्यान करावे. ध्यानासाठी उपयुक्त स्थळाचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी सहाव्या अध्यायांतील १६३ ते १८१ ह्या ओव्यांमधून फारच छान केले आहे.


पद्मकं स्वस्तिकं वापि भद्रासनमथापि वा ।


पद्मासन, स्वस्तिकासन, भद्रासन वा इतर कोणत्याही सुलभ आसनावर आरूढ होऊन उत्तर दिशेला तोंड करून बसावे.


नासिकापुटमङ्‍गुल्या पिधायैकेन मारुतम् ।
आकृष्य धारयेदग्निं शब्दमेवाभिचिन्तयेत् ॥ २० ॥


बंद करून डाव्या नाकपुडीने वायु (श्वास) आंत म्हणजे छातीत भरावा. दोन्ही नाकपुड्या बोटांनी बंद करून प्राणवायु छातीत भरलेल्या (म्हणजेच अंतः कुंभक) अवस्थेत, ॐ काराच्या प्रकाशरूपाचे (तेजाचे) ध्यान करावे.


ओमित्येकाक्षरं ब्रह्म ओमित्येतन्न रेचयेत् ।
दिव्यमन्त्रेण बहुधा कुर्यादामलमुक्तये ॥ २१ ॥


ॐ म्हणजे शब्दांकित केलेला प्रणव हेच ब्रह्म होय. अशा एकाक्षरी ब्रह्माचे ध्यान करीत रेचक (म्हणजेच सावकाशपणे निःश्वास) क्रिया करावी. मागील मंत्राप्रमाणेच, पूरक कुंभक रेचक व कुंभक करतांना ॐ काराने प्रणवाचे (ब्रह्माचे) ध्यान करीत आपल्या शक्तिनुसार प्राणायाम करावा आणि यथावकाश चित्तातील प्रमाद आदि मळ क्षीण करावेत.


मनुष्यमात्राच्या मनात सतत ज्या गोष्टींबद्दल स्मरण असते (उदा - संसारिक, विषय भोगप्राप्ति, सत्ता, धनसंपदा, भगवंत इ.) तसल्याच प्रकारचे विचार बहुधा अंतकाळी देखील असतात. म्हणून भगवान भग. गीता ८.१३ मध्ये म्हणतात, " ॐ ह्या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत माझे (निर्गुण परब्रह्माचे) स्मरण ठेऊन जो देह सोडून जातो त्यालाच उत्तम गति मिळते ". सारांश सूरदासांचे (का आणि कोणा संताचे) पद " इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले..." ह्या भजनात वर्णन केल्याप्रमाणे मुक्ति साधण्यासाठी सतत भगवंतप्राप्ति, मुक्ति बद्दल विचार इ. स्मरणात ठेवीत जीवन व्यतीत करणे क्रमप्राप्त आहे.


पश्चाद्ध्यायीत पूर्वोक्तक्रमशो मन्त्रविद्‍बुधः ।
स्थूलातिस्थूलसूक्ष्मं च नाभेरूर्ध्वमुपक्रमः ॥ २२॥


मागील दोन मंत्रात कथन केलेल्या विधिनुसार हृदयांत प्रणवाचे ध्यान करीत पूरक कुंभक रेचक कुंभक अशा एका प्राणायामाची स्थूलाची मात्रा वाढवावी (स्थूल याचे तात्पर्य म्हणजे सुरुवातीला जर एका मिनिटात दहा प्राणायाम होत असतील तर साधारण दोन ते तीन आठवड्यांत ते मिनिटाला ८ ते ६ वर नेणे, दोन ते तीन महिन्यात ३ ते ४ वर नेणे असे - हे प्रमाण फक्त उदाहरणादाखल दिलेले आहेत. साधकांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अथवा स्वतःच्या कुवतीप्रमाणे ही मात्रा वाढवावी. प्राणायाम प्रक्रियेत एका श्वासांत ऐंशी प्रणव मंत्रांचा जप म्हणजे अती-स्थूल मात्रा म्हटली जाते.


तिर्यगूर्ध्वमधो दृष्टिं विहाय च महामतिः ।
स्थिरस्थायी विनिष्कम्पः सदा योगं समभ्यसेत् ॥ २३ ॥


प्राणायामांत प्रतिष्ठीत बुद्धीमान साधकाने आपली दृष्टी वर (जमीनीला समांतर अशी भ्रूमध्यांतून समोर रेघ काढल्यास त्या रेषेला साधारणपणें ३० अंश 30 degrees वरच्या बाजूला किंवा खाली, साधारण नाकाच्या शेंड्यावर येईल अशी, स्थीर करून तसेच आंतरिक म्हणजेच मानसिक स्थिती स्थीर करीत ध्यानयोगाचा अभ्यास करावा.


तालमात्राविनिष्कम्पो धारणायोजनं तथा ।
द्वादशमात्रो योगस्तु कालतो नियमः स्मृतः ॥ २४ ॥


प्रकारे नियमबद्धतेने ध्यान योगाभ्यास करीत राहिल्यास काही काळाने निश्चितपणे त्याची प्रचिती येते. नियमाप्रमाणे म्हणजे ठराविक वेळेला, ठराविक मात्रेत आणि ठराविक प्रमाणात इ. मात्रा (एका प्राणायामासाठी लागणारा अवकाश) आणि प्रमाण (प्राणायामाची आवर्तने) ही सुद्धा नियमबद्ध आणि आपापल्या बळाची मर्यादा लक्षांत घेऊनच करणे नितांत आवश्यक आहे. प्रचितीदेखील अनेकांना अनेक प्रकारे अनुभवाला येते. कोणाला शरीरस्वास्थ्यांत प्रगती जाणवते (शक्ति, जोम, कुवत, बराच वेळ न थकता बरीच कामे करायची शक्ति), तर कुणाला स्मृती-बुद्धि रूपे (चांगल्या प्रकारें स्मरण, योग्य वेळी योग्य गोष्टींची आठवण होणे, चटकन आकलन होणे इ. ) प्रचिती येते. कोणाला क्रोध, उतावीळपणा यांत कांही प्रमाणांत संयम आल्याचे जाणवते.


अघोषमव्यञ्जनमस्वरं च अतालुकण्ठोष्ठमनासिकं च यत् ।
अरेफजातमुभयोष्मवर्जितं यदक्षरं न क्षरते कदाचित् ॥ २५ ॥


प्रणवाचे शब्दांकित असलेले ॐ हे एक दिव्य अक्षर आहे. 'अ' वर्गांतील स्वर तसेंच क, च, ट, त, प इ. वर्गांतील व्यंजनेही जशी दन्त, ओष्ठ, टाळू, कण्ठ, नासिका यांच्या संयोगाने उच्चारली जातात, त्याप्रमाणे यांतील कोठल्याही अवयवाविना हा मंत्र उच्चारला जातो. प्राणायामरूपाने ॐ काराचा अभ्यास करीत त्यांतून निर्माण झालेल्या नादावर मन लावावे (एकाग्रतेचा अभ्यास करावा).


येनासौ पश्यते मार्गं प्राणस्तेनाभि गच्छति ।
अतस्तमभ्यसेन्नित्यं यन्मार्गगमनाय वै ॥ २६ ॥


योगी पुरुष ज्या कशाचे- देश, काल, विषय, ज्ञात-अज्ञात भूत भविष्यांतील घटना, कल्पना, दृष्यें, संकल्पक, इच्छित असे कांही म्हणजे अक्षरशः कशाचेही - चिंतन करेल, तिथे प्राण व मनासहित प्रवेश करतो, गमन करतो. प्राण मनाद्वारे होणारे असे चिंतन आपल्याला उन्नतीच्या दिशेनें श्रेष्ठत्वाकडे नेवो अशा हेतूने साधकाने सतत आणि नियमित अभ्यास करीत रहावा.


हृद्द्वारं वायुद्वारं च मूर्धद्वारमथापरम् ।
मोक्षद्वारं बिलं चैव सुषिरं मण्डलं विदुः ॥ २७ ॥


वायूच्या प्रवेशाचा मार्ग हृदय आहे. याच्या योगाने सुषुम्ना नाडीचा जो मार्ग (प्रदेश) आहे त्यांत प्राण प्रवेश करतो. इथें हें लक्षांत घेणे आवश्यक आहे कीं प्राण ही शक्ति आहे, आणि वायु हा त्या शक्तीचा वाहक आहे. आपण नासिकेद्वारे वायु आंत घेतो पण प्रत्यक्षांत पुढील सर्व कार्य घडते ते त्यायोगें त्याच्याबरोबर प्रवाहीत होणार्‍या प्राणशक्तिमुळें. सुषुम्नेचा मार्ग मुलाधारापासून सुरू होत वर ब्रह्मरंध्रापर्यंत (डोक्यावर कवटीच्या मध्यभागी - पहा ऐतरेय उप १.३.११ व १२) आहे. ब्रह्मरंध्र हे मोक्षप्राप्तीचे द्वार म्हटले जाते, ह्यालाच आनंदाचे स्थान म्हणतात , कारण परमेश्वर इथूनच शरीरात प्रवेश करतो. योगीजन ह्याला सूर्यमण्डळ रूपाने जाणतात. ह्या ब्रह्मरंध्राचा (किंवा सूर्यमण्डळाचा) वेध करून पुरुष जेव्हां प्राण त्यागतो (सामान्य माणसाचा प्राण डोळे, नाक इ. इतर छिद्रातून जातो असे म्हणतात), म्हणजेच जेव्हां ब्रह्मरंध्राद्वारे प्राणोत्क्रमण होऊन शारीरिक मृत्यु अवस्थेला प्राप्त होतो तेव्हां त्याला जन्म-मरण चक्रातून मुक्तीची प्राप्ती होते असे म्हणतात.


आता परत कांही नियमांचे वर्णन.


भयं क्रोधमथालस्यम् अतिस्वप्नातिजागरम् ।
अत्याहरमनाहरं नित्यं योगी विवर्जयेत् ॥ २८ ॥


योगात स्थित असलेल्या साधकाने भय, क्रोध, अती निद्रा, अती जागरण, अती आहार वा दीर्घ उपवास इ. टोकाला नेणार्‍या भूमिकांपासून स्वतःला सावध करीत कोणत्याच प्रकारच्या अतिशयोक्तीचा त्याग करावा. (भग. गीता ६.१६,१७)


अनेन विधिना सम्यङ्‍ नित्यमभ्यसते क्रमात् ।
स्वयमुत्पद्यते ज्ञानं त्रिभिर्मासैर्न संशयः ॥ २९ ॥


इतःपर कथीत विधीनुसार अभ्यास करीत जो साधक उत्तरोत्तर प्रगती करीत नियमीत अभ्यास करतो त्याला तीन महिन्यांतच उत्स्फूर्त ज्ञानाची प्राप्ति होते ह्यांत मुळीच संशय नाही.


चतुर्भिः पश्यते देवान्पञ्चभिस्तुल्यविक्रमः ।
इच्छयाप्नोति कैवल्यं षष्ठे मासि न संशयः ॥ ३० ॥


नियमीत अभ्यासाने चार महिन्यांतच देव-दर्शनाचें सामर्थ्य प्राप्त होते, तर पांच महिन्यांत देवगणांच्या सारखेंच शक्ति सामर्थ्य प्राप्त होते. सहा महिन्यांत तर साक्षात् मोक्षप्राप्तीचे सामर्थ्य प्राप्त होते.


निरनिराळ्या तपसामर्थ्याच्या स्तरांतील साधकांचे हे अनुभव येथे दिलेले आहेत असे वाटते. कारण मागे २१ ते २३ मंत्रात विदित केलेल्या क्रमानुसार अभ्यास परिपक्व होणें ह्यासच मुळांत किती काळ लागेल हेंच सांगणे कठीण. कारण अशा प्रकारची दृढता ही चिकाटी, स्थैर्य, नियमितता यायोगे साधणार्‍या परिपक्वतेवर अवलंबून आहे. तीन ते सहा महिन्यात ज्या प्रगतीचा इथे उल्लेख आहे ते बहुधा साधकाला प्रोत्साहीत करण्यासाठी असल्यास ह्या उपनिषदाची ज्या काळात रचले गेले तेव्हां ते शक्य असेलही. पण सद्य काळांत जर एवढी शीघ्र प्रगती शक्य असती तर कितीतरी आत्मज्ञान झालेले ज्ञानी पहायला मिळाले असते. पण तसे दिसत तर नाही.


पुढील चार मंत्र गूढ आहेत. ह्यांचे पटणारे स्पष्टीकरण सांपडले नाही, एवंच नुसता शब्दार्थ दिला आहे.


पार्थिवः पञ्चमात्रस्तु चतुर्मात्रस्तु वारुणः ।
आग्नेयस्तु त्रिमात्रोऽसौ वायव्यस्तु द्विमात्रकः ॥ ३१ ॥


पृथ्वी तत्त्व धारण करतांना ॐ काररूपी प्रणवाच्या पांच ( ? ) मात्रांचे, जल तत्त्व धारण करतांना चार मात्रांचे, अग्नि तत्त्व धारण करतांना तीन मात्रांचे, वायु तत्त्व धारण करतांना दोन मात्रांच्या स्वरूपाचे ध्यान करावे.


एकमात्रस्तथाकाशो ह्यर्धमात्रं तु चिन्तयेत् ।
संधिं कृत्वा तु मनसा चिन्तयेदात्मनात्मनि ॥ ३२ ॥


तद्‌नंतर आकाश तत्त्वाचे धारण समयी प्रणवाच्या एका मात्रेचे तसेंच ॐ काररूपी प्रणवाचे धारण समयी त्याच्या अर्ध्या मात्रेचें चिंतन करावे. शरीरांत मनाच्या योगें पंचमहाभूतांवर विजय प्राप्त करीत त्यांचे ध्यान करावे. असे करतांना प्रणवाच्या धारणेद्वारें पंचमहाभूतांवर सर्वस्वी विजय प्राप्त होतो.


त्रिंशत्सार्धाङ्‍गुलः प्राणो यत्र प्राणैः प्रतिष्ठितः ।
एष प्राण इति ख्यातो बाह्यप्राणस्य गोचरः ॥ ३३॥


३०.५ अंगुळे लांबीचा (जवळ जवळ दोन फूट ) प्राण श्वासारूपें ज्यांत चांगल्या प्रकारें प्रतिष्ठीत आहे तिथे प्राणवायूचा आश्रय असतो. (??). वास्तविक त्यालाच प्राणाचे रूप समजले जाते. जो बाह्य प्राण आहे त्या नाम व रूप असलेल्या विषयांना इंद्रियांच्या योगे जाणले जाते.


अशीतिश्च शतं चैव सहस्राणि त्रयोदश ।
लक्षश्चैको विनिःश्वास अहोरात्रप्रमाणतः ॥ ३४॥


ह्या बाह्य प्राणामध्ये ११३६८० इतक्या श्वास-प्रश्वासांचे आवागमन २४ तासाच्या दिवसांत होते. ( २४ तासाचे ३६०० सेकंद होतात, त्या संख्येने भागाकार केल्यास साधारण ३०.१६ हा आकडा येतो. मग ह्या मंत्राचा आणि मागील मंत्रातील आकड्याचा संबंध वा प्रयोजन हा अन्वेषणाचा विषय आहे.


प्राण आद्यो हृदि स्थाने अपानस्तु पुनर्गुदे ।
समानो नाभिदेशे तु उदानः कण्ठमाश्रितः ॥ ३५ ॥


पंच प्राणांची स्थाने : - मुख्य प्राणाचे निवासस्थान म्हणजे हृदय ( प्रश्न उप. ३.५ मध्ये हे स्थान चक्षु- श्रोत्र- मुख - नासिका असे म्हटले आहे, तेहां या स्थानांच्या व्यतिरिक्त तो हृदय प्रदेशातही असतो ). गुदास्थानी अपान, नाभीस्थानी (म्हणजे शरीराचा मध्य) समान आणि कण्ठ प्रदेशांत उदान म्हटले आहे.


व्यानः सर्वेषु चाङ्‍गेषु व्याप्य तिष्ठति सर्वदा ।
अथ वर्णास्तु पञ्चानां प्राणादीनामनुक्रमात् ॥ ३६ ॥


व्यान वायु सर्व शरीरभर संचरित असतो. आता पुढे पंचप्राणांच्या वर्णांचे (रंगांचे) वर्णन आहे.


रक्तवर्णो मणिप्रख्यः प्राणवायुः प्रकीर्तितः ।
अपानस्तस्य मध्ये तु इन्द्रगोपसमप्रभः ॥ ३७ ॥


मुख्य प्राणाचा रंग मण्यासारखा लाल (maroon ?) भडक रंगाचा एक पावसाळी किडा असतो त्याप्रमाणें असतो.


समानस्तु द्वयोर्मध्ये गोक्षीरधवलप्रभः ।
आपाण्डर उदानश्च व्यानो ह्यर्चिःसमप्रभः ॥ ३८॥


नाभीक्षेत्री स्थित समान वायु गोदुग्धवत किंवा पांढराशुभ्र स्फटीकाप्रमाणे, उदान वायु धुरकट (grey ?) रंगाचा व व्यान वायु अग्निच्या ज्वाळेप्रमाणे प्रकाशमय असतो.


यस्येदं मण्डलं भित्वा मारुतो याति मूर्धनि ।
यत्र तत्र म्रियेद्वापि न स भूयोऽभिजायते ।
न स भूयोऽभिजायत इत्युपनिषत् ॥ ३९ ॥


श्रेष्ठ योग्याचा मृत्युसमयी प्राण सूर्यमण्डळांतून बाहेर पडतो आणि त्याची जन्म-मरणाच्या आवर्तनांतून सुटका होऊन त्याला मुक्तिची प्राप्ती होते.


॥ इति कृष्णयजुर्वेदीय अमृतनादोपनिषत्समाप्ता ॥



GO TOP