॥ शुक्ल यजुर्वेदः ॥


वेद म्हणजे काय ? 'ऐहिक कर्मे' व 'पारलौकिन फल' यांचा संबंध दाखविणारे ज्ञान ज्या ग्रंथांतून प्राप्त होते त्या ग्रंथांचा प्रतिपाद्य विषय त्याला 'वेद' ही संज्ञा प्राप्त झाली. श्रीमद् भागवतात (९.१४.४९) मध्ये म्हटले आहे की "एक एव पुरा वेदः प्रणवः सर्ववाङ्‍मयः" - फार पूर्वी वेद (ग्रंथ) एकच होता. पुढे मनुष्याची बुद्धि थोटकी होत गेल्यामुळे कोणा एकाला संपूर्ण वेदांचे अध्ययन करणे दुरापास्त होऊ लागले. बादरायण श्रीव्यासांनी ही अडचण जाणून त्याचे चार भाग केले आणि एकेका शिष्याला एकेका वेदामध्ये पारंगत करण्याची व्यवस्था केली ती अशी - पैल ऋषिला ऋग्वेद, वैशंपायन यास यजुर्वेद, सुमंताला सामवेद व जैमिनीला अथर्ववेद शिकविला. यापैकी पहिले तीन म्हणजे ऋक्, यजु व साम हे मुख्यत्वे यज्ञप्रक्रियेशी संबंधीत असून अथर्ववेद यात विषय बाहुल्य असल्याचे आढळते. बहुधा त्याचा मुख्य विषय 'यज्ञ' संस्कृतीला धरून नसल्यामुळे त्याला इतर तीन वेदांच्या मानाने गौण स्थान प्राप्त दिले गेले आहे. श्रीमद् भगवद्‍गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी फक्त तीन वेदांचा उल्लेख केला आहे. ऋग्वेदांत प्राधान्येकरून गुण व गुणी यांचे विज्ञान याचे मुख्यत्वे वर्णन आढळते तर यजुर्वेदांत यज्ञकर्म (procedure) हा मुख्य विषय आढळतो. सामवेदांत 'उपासना' हा मुख्य विषय.

श्रीव्यासांनी वेदांचे चार विभाग केल्यानंतर पुढे शिष्यपरंपरेने प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा झाल्या. पण यजुर्वेदाचे दोन भेद झाले आणि दोन्ही भेदांच्याही अनेक शाखा झाल्या. ऋग्वेदाच्या २१ शाखा झाल्या असा उल्लेख बरेच ठिकाणी पहायला मिळतो पण त्यापैकी दोनच शाखा सध्या अस्तित्वात आहेत असे म्हणतात. यजुर्वेदाच्या दोन्ही भेदांचे शाखांबद्दल निरनिराळे उल्लेख आढळतात. मुक्तिकोपनिषदांत यजुर्वेदाच्या एकूण १०९ शाखा होत्या असा उल्लेख आहे. पण कूर्म, ब्रह्माण्ड व स्कंद पुराणात कृष्ण यजुर्वेदाच्या ८६ शाखा व शुक्ल यजुर्वेदाच्या १५ शाखा आहेत असे उल्लेख सापडतात.

श्रीव्यासांनी वेदांचे जे चार भाग केले त्याला 'ब्रह्मपरंपरा' म्हणतात. मूळ वेद ब्रह्मदेव निर्मित मानले जाते. त्यंच्यापासून वशिष्ठ, त्यांचे पुत्र शक्ति, मग पाराशर व त्यानंतर व्यास अशी ही परंपरा असल्यामुळे चारही वेदांचे वर्गीकरण ही 'ब्रह्मपरंपरा' मानली जाते.

वर म्हटल्याप्रमाणे श्रीव्यासांकडून ज्यांच्याकडे यजुर्वेद आला त्या वैशंपायन ऋषींचे एक शिष्य याज्ञवल्क्य होत. याज्ञवल्क्यांचा एकदा आपल्या गुरुशी विवाद झाल्यामुळे वैशंपायन ऋषींनी आपल्या शिष्याला सर्व वेद परत करून आपला आश्रम सोडून जाण्याची आज्ञा केली. याज्ञवल्क्यांनी आपले गुरु वैशंपायन यांच्याकडून घेतलेली सर्व विद्याच आपल्या स्मृतितून पुसून टाकली. मग पुढे बराच काळ तपश्चर्या करून याज्ञवल्क्यांनी सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतले. त्यांनी आदित्याला प्रार्थना केली की 'मला कोणा मानवाकडून विद्या नको, मला आपणच वेद शिकवावा'. तद्‍नुसार सूर्यनारायणाने त्यांना चारी वेद शिकविले. विष्णुपुराणांत म्हटले आहे की श्रीसूर्यनारायणाने याज्ञवल्क्यांना वेद शिकवितांना 'वाजिन्' (म्हणजे घोड्याचे) रूप घेतले होते. म्हणून वेदांची पुढे 'आदित्यपरंपरा' झाली असे मानले जाते. 'वाजिन्' रूपाने वेद शिकविल्यामुळे त्या वेद संहितेचे 'वाजसनेय' संहिता असे नामाभिधान झाले. वाजसनेय संहिता असा उल्लेख यजुर्वेदाच्याच संबंधी पहायला मिळतो. इतर वेदांच्या संबंधात (वाजसनेय) असे उल्लेख आढळत नाहीत. याज्ञवल्क्यांना जरी चरी वेद मिळाले तरी यज्ञवल्क्यांनी यजुर्वेदाचाच प्रसार केला असे दिसते. त्यांच्या ह्या आदित्यप्राप्त यजुर्वेदाच्या संहितेला 'शुक्ल यजुर्वेद' म्हटले जाऊ लागले आणि पूर्वापार यजुर्वेद संहितेला 'कृष्ण यजुर्वेद' म्हणतात. कृष्णवेदाचे दुसरे नांव 'तैत्तिरीय संहिता'. कशामुळे ?

याज्ञवल्क्यांच्या तेजस्वी बुद्धिमत्तेमुळे पूर्वी त्यांनी वैशंपायन ऋषिंकडून जो यजुर्वेद ग्रहण केला होता तशा प्रकारे वैशंपायनांच्या इतर कोणत्याही शिष्याने तसा आत्मसात केला नव्हता. म्हणून जेव्हां वैशंपायनांनी याज्ञवल्क्याला सर्व वेद ओकून टाक म्हणून सांगितले तेव्हां इतर शिष्यांनी आपल्या गुरुला विनंती करून याज्ञवल्क्याने जो वेद आत्मसात केला होता तो सर्व त्याच्याकडून जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. त्याप्रमाणे याज्ञवल्क्यांना गुरुंचा आश्रम सोडून जाण्यास आठ दिवसांची मुभा देण्यात आली आणि त्या आठ दिवसांत आपल्याकडे असलेले (यजुर्वेदाचे) सर्व ज्ञान त्यांनी इतर शिष्यांमध्ये वाटून टाकले. याज्ञवल्क्यांनी त्यागलेला यजुर्वेद तित्तिर पक्षी जसा दाणे वेचून घेतो त्याप्रमाणे इतर सर्व शिष्यांनी तो वेचून घेतला अशी आख्यायिका असल्यामुळे त्या आख्यायिकेच्या उपमेनुसार यजुर्वेदाच्या मूळ संहितेचे पुढे "तैत्तिरीय संहिता" असे नामांकरण झाले.

मागे म्हटले आहे की शुक्ल यजुर्वेदाच्या पुढे १५ शाखा झाल्या ( त्या अशा - जाबाल, बौधेय, काण्व, माध्यंदिन, शापेय, स्थापायनीय, कपोल, पांडरवत्स, आवटिक,, परमावटिक, पाराशर, वैणेय, वैधेय, वैतनेय, वैजव ). त्या पैकी माध्यंदिन आणि काण्व अशा दोनच शाखांचा सद्यकाळी अभ्यास केला जातो असे दिसते. त्यातही माध्यंदिन शाखेची संहिता अधिक प्रमाणांत प्रचलित असल्याचे दिसून येते. स्वाध्यायमण्डळ (औंध) चे श्री सातावळेकर, धुळेचे श्रीधरशास्त्री पाठक व आर्य समाजचे महर्षि दयानंद सरस्वति यांनी माध्यंदिन शाखेची संहीताच प्रसिद्ध केलेली आहे. प्रस्तुत महाजाळ (वेब) संस्करणासाठी आम्ही महामहोपाद्याय श्रीधरशास्त्री पाठक कृत मुद्रितप्रत (१९४२) याचाच आधार घेतलाय.



GO TOP