|
शुक्ल यजुर्वेद विनियोग - इध्म, वेदि व बर्हि यांचे 'कृष्णोसि' इत्यादि मंत्रानी प्रोक्षण करावे.
कृष्णो॑ऽस्याख॒रेष्ठोऽग्नये॑ त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑मि॒ वेदि॑रसि अर्थ - हे इध्म, तूं कठीण वृक्षावर राहणारा असून, कृष्णमृगरूपी यज्ञाचे साधन आहेस. म्हणून अग्नीला आवडणाऱ्या अशा तुझें मी जलानें सिंचन करतो. हे वेदी, तूं देवांनी असुराकडून प्राप्त केलेली अशी आहेस. म्हणून कुश धारण करणाराला उपयोगी आहेस म्हणून स्रुवांना प्रिय अशा तुझें मी सिंचन करतो. ॥ १ ॥ विनियोग - प्रोक्षणांतील अवशिष्ट जल 'अदित्यै व्युंदनम्' या मंत्रानें दर्भावर सिंचन करावें. 'विष्णोः' या मंत्रानें प्रस्तर ग्रहण करावें, 'ऊर्णम्रदसम्' या मंत्रानें वेदीवर दर्भ पसरावे.
अदि॑त्यै॒ व्युन्द॑नमसि॒ विष्णो॑ स्तु॒पोऽस्यूर्ण॑म्रदसं त्वा स्तृणामि स्वास॒स्थां अर्थ - हे प्रोक्षणावशिष्ट जला, तूं पृथ्विला भिजविणारे आहेस. हे दर्भमुष्टिरूपी प्रस्तरा, तूं यज्ञाच्या शिखेप्रमाणें आहेस. हे वेदे, ऊर्णावस्त्राप्रमाणें मऊ व देवांना सुखानें बसण्यास योग्य अशी तूं व्हावी म्हणून तुजवर मी दर्भ पसरतो. हविग्रहणांच्या वेळीं हविर्द्रव्याचा जो भाग परिधीच्या बाहेर पडतो तो अग्नीचे तीन भाऊ भुवपति, भुवनपति व भूतानां पति या तिघांना सुहुत होवो (ते तिघे अग्नीचे भाऊ परिधीरूपी झाले, त्यांवर पडलेला हविर्भाग त्या भावांना द्यावा अशी कथा वेदांत आहे) ॥ २ ॥ विनियोग - 'गंधर्वस्त्वा' इत्यादि प्रत्येक मंत्रानें मध्यम दक्षिण व उत्तर बाजूंनी परिधि ठेवावेत.
ग॒न्ध॒र्वस्त्वा॑ वि॒श्वाव॑सुः परि॑दधातु॒ विश्व॒स्यारि॑ष्ट्यैः॒ यज॒मानस्य परि॒धिरस्य॒ग्निरि॒डऽई॑डि॒तः । अर्थ - हे परिधे, विश्वावसु नांवाचा गंधर्व तुला आहवनीय अग्नीच्या पश्चात् सर्व बाजूंनी स्थापना करो. त्यायोगें जगाची हिंसा होणार नाहीं. तूं यजमानाचा परिधि आहेस आणि तूं आहवनीय असा भुवपति नांवाचा भाऊ आहेस म्हणून होता वगैरेंनी तुझी स्तुति केली. हे दक्षिण परिधे, तूं इंद्राचा उजवा हात आहेस. यजमानाचा परिधि आहेस आणि आहवनीयाचा भुवनपति नांवाचा दुसरा भाऊ आहेस. तुझी होत्यादिकांनी स्तुति केली आहे. विश्वाच्या अहिंसेकरितां तुला तो इंद्र दक्षिणेकडे स्थापना करो. हे उत्तर परिधे, मित्रावरुण (वायु आणि आदित्य) स्थिर अशा धारणानें विश्वाच्या अहिंसेकरितां तुला उत्तर दिशेकडे स्थापन करोत. तूं यजमानाचा परिधि आहेस व भूतानां पति या नांवाचा आहवनीयाचा जो तिसरा भाऊ तो तूं आहेस. तुझी होत्यादिकांनी स्तुति केली आहे. ॥ ३ ॥ विनियोग - प्रथम परिधिला समिधेने स्पर्श करून 'वीतिहोत्रम्' या मंत्रानें आहवनीयांत इध्मकाष्ठ स्थापन करावें. वीतिहोत्रन्त्वा कवे द्युमन्तँ॒समि॑धीमहि । अग्ने॑ बृहन्त॑मध्व॒रे ॥ ४ ॥ अर्थ - हे त्रिकालदर्शिन् अग्ने, समृद्धिकरितां ज्याचें हवन करतात असा प्रकाशक मोठा जो अग्नि त्या तुला आम्ही ह्या इध्मकाष्ठानें प्रकाशित करतों. ॥ ४ ॥ विनियोग - 'समिधसि' यांत्रानें परिधीला स्पर्श न करतांच द्वितीयकाष्ठ अग्नीमध्यें स्थापन करावें. आहवनीयाकडे पाहून 'सूर्यस्य' या मंत्राचा जप परावा. प्रस्तराकरितां दोन तृणें 'सवितुः' या मंत्रानें वांकडी ठेवावीं. त्या दोन तृणांवर 'ऊर्णम्रदसम्' या मंत्रनें प्रस्तर पसरावा. 'आ त्वा' या मंत्रानें प्रस्तरावर दोन्ही हात ठेवावे.
स॒मिद॑सि॒ सूर्य्य॑स्त्वा पु॒रस्ता॑त् पातु॒ कस्या॑श्चिद॒भिश॑स्त्यै । अर्थ - हे इध्मकाष्ठा, तूं अग्निप्रदीपक आहेस. हे आहवनीय अग्ने, कोणत्याही पापापासून सूर्य पूर्वेकडे तुझें रक्षण करो. हे दोन तृणांनो, तुम्ही सवितेचे दोन हात आहांत, ऊर्णावस्त्राप्रमाणें मऊ अशा देवाचे सुखकारक आसन असा जो प्रस्तर त्याप्रत आम्ही पसरतों. सवनत्रयाच्या देवता, वसु, रुद्र आणि आदित्य ह्या तिघांनी तुला सर्व बाजूंनी पसरावें. ॥ ५ ॥ विनियोग - डावा हात प्रस्तरावर ठेवून उजव्या हातानें जुहु घ्यावी व 'घृताची या मंत्रानें प्रस्तरावर ठेवावी व दुसऱ्या दोन जुहु पुढील 'घृताची' इत्यादि दोन मंत्रांनी ठेवाव्या. नंतर 'प्रियेण धात्रा' या मंत्रानें वेदीवर एकेक हविर्द्रव्य ठेवावें. तदनंतर 'ध्रुवा असदन्' या मंत्रानें सर्वांना स्पर्श करावा व 'पाहि' या मंत्रानें आपल्याला स्पर्श करावा.
घृ॒ताच्य॑सि जु॒हूर्नाम्ना॒ सेदम्प्रि॒येण॒ धाम्ना॑ प्रि॒यँ सद॒ऽआसी॑द घृ॒ताच्य॑स्यूप॒भृन्नाम्ना॒ सेदम्प्रि॒येण॒ अर्थ - हे स्रुचे, तूं घृतपूर्ण आहेस. तुला जुहु असें म्हणतात. तूं देवांचे आवडतें गृह जें घृत त्यासहवर्तमान या प्रस्तारावर बैस. हे स्रुचे, तूं घृतपूर्ण आहेस. तुला उपभृत् असें म्हणातात. तूं देवांचें आवडते गृह जें घृत त्यासहवर्तमान या प्रस्तरांवर बैस. हे स्रुचे, तूं घृतपुर्ण आहेस. तुला ध्रुवा असें म्हणतात. देवांचे आवडतें गृह जें ध्रुवा तूं या प्रस्तरावर बैस. हे हविर्द्रव्य, देवांचे प्रिय गृह जे आज्य त्यासहवर्तमान तूं आपल्या प्रिय स्थानावर बैस. सर्व हविर्द्रव्यें इच्छितफलदायी यज्ञाच्या जागी ध्रुव रीतीनें स्थित झालीं. हे व्यापक यज्ञपुरुषा, त्या हविर्द्रव्याचें, यजमानाचें, यज्ञाचें आणि मज अध्वर्यूचें रक्षण कर. ॥ ६ ॥ विनियोग - 'अग्ने वाजजित्' या मंत्रानें अग्नीला तीन वेळां संमार्जन करावें, आहवनीयाच्या पश्चिमभागी 'नमो देवेभ्यः' या मंत्रानें हात जोडावेत. तदनंतर 'स्वधा पितृभ्यः' या मंत्रानें दक्षिणेकडे उत्तान अंजलि करावी (म्हणजे मिटलेल्या ओंजळी पुढे कराव्या). 'सुयमे मे' या मंत्रानें जुहु व उपभृत् पात्रांचे ग्रहण करावें.
अग्ने॑ वाजजि॒द् वाज॑न्त्वा सरि॒ष्यन्तं वा॒जजितँ॒ सम्मा॑र्ज्मि अर्थ - हे अन्नोत्पादक अग्ने, अन्नाच्या उद्देशानें गमन करण्याच्या व जय मिळविण्याऱ्या तुला मी जलानें शुद्ध करतो. कर्मावर अनुग्रह करणारे जे देव त्यांना नमस्कार. पालक जे पितर त्यांना हें हवि सुहुत असो. हे जुहु व उपभृत् पात्रांनो, मजकरितां तुम्ही स्थिर व्हा. म्हणजे तुमच्यांत असलेले घृत पडूं देऊं नका. ॥ ७ ॥ विनियोग - 'वसुमति' या मंत्रानें अग्नीच्या जवळ सेवेकरितां उभें रहावें 'इत इंद्रः' या मंत्रानें होम करावा.
अस्क॑न्नम॒द्य दे॒वेभ्य॒ आज्यँ॒ संभ्रि॑यास॒मंघ्रि॑णा विष्णो॒ मा त्वाव॑क्रमिषं॒ वसु॑मतीमग्ने ते अर्थ - आज ह्या कर्माचें दिवशी देवाकरितां तुमच्यांत (जुहु, उपभृत पात्रामध्यें) असलेले जें घृत तें जमिनीवर सांडणार नाहीं असें मी धारण करतो. त्याला माझा पाय लागूं नयें. हे अग्ने, छायेप्रमाणें तुझ्या समीप असणाऱ्या पृथ्वीचें मी सेवन करतो. हे वसुमति, तूं यज्ञाचे स्थान आहेस. हे अग्ने, तुझ्या धन देणाऱ्या वसुमति नांवाच्या छायेचें मी सेवन करतो. इंद्र ह्या देवयजन स्थानांतून ऊर्ध्व होऊनच शत्रुवधरूपी कर्म करिता झाला. म्हणून यज्ञ उंच झाला आहे. ॥ ८ ॥ विनियोग - जुहूंतील घृत व ध्रुव्यांतील घृत 'संज्योतिषा' या मंत्रनें एकत्र करावें.
अग्ने॒ वेहो॒त्रं वेदू॒त्यमव॑ता॒न्त्वान्द्यावा॑पृथि॒वीऽअव॒ त्वं द्यावा॑पृथिवी॒ अर्थ - हे अग्ने, तूं होत्याचें व दूताचें कर्म जाणून घे. सूज्ञ अशा तुझें द्यावापृथिवीनें पालन करावें. हे अग्ने, तूंही द्यावापृथ्वीचें पालन कर. अशा तऱ्हेनें परस्परांनी परस्परांचे पालन केल्यावर इंद्रानें आज्यहवि देऊन देवांचा याग करावा. म्हणजे आम्ही जे यज्ञ करतो ते सर्व इंद्रानें परिपूर्ण करावें हें इंद्राला दिलेलें हवि सुहुत असो. ध्रुवापात्रांतील व जुहूंतील घृतरूपी ज्योति एकत्र होवो. ॥ ९ ॥ विनियोग - प्रधान यागानंतर होता आशिर्वाद देत असतां यजमानानें 'मयीदम्' या मंत्राचा जप करावा. 'उपहूता पृथिवी' या मंत्रानें पुरोडाशाचा एकेक भाग अग्नीध्रानें भक्षण करावा.
मयी॒दमिन्द्र॑ऽइन्द्रि॒यं द॑धात्व॒स्मान् रायो॑ म॒घवा॑नः सचन्ताम् । अर्थ - परमेश्वर मला अभीष्ट असलेले हे इंद्रियजन्य तेज माझे (यजमानाचें) ठायीं स्थापन करो. आणि दैव व मानुष अशा दोन्ही प्रकरचीं द्रव्यें आम्हां यजमानाकडे येवोत. आम्हीं पूर्वीं मागितलेले वर परिपूर्ण होवोत. जगाची आई जी पृथ्वी तिला मी अनुज्ञा दिली आहे. आम्हांला मातृसमान वाटणारी पृथ्वी मला हविःशेष भक्षणाची आज्ञा देवो. मी अग्नीध्राचें काम केलें म्हणून मी अग्नि होऊन हे हवि भक्ष्य करतो. हे जठराग्नीमध्यें सुहुत असो. ॥ १० ॥ विनियोग - 'ब्रह्म्यानें 'देवस्य त्वा' या मंत्रानें प्राशित्राचें ग्रहण करावें व 'अग्नेष्ट्वा' या मंत्रानें दांत न लावतां प्राशित्र भक्षण करावें.
उप॑हूतो॒ द्यौष्पि॒तोप॒ मां द्यौष्पि॒ता ह्व॑यताम॒ग्निराग्नी॑ध्रा॒त् स्वाहा॑ । अर्थ - मी द्युलोकाला बोलावले आहे. तो द्युलोकरूपी पिता मला बोलावून द्वितीय हविर्भक्षणाची आज्ञा देवो. मी हे अग्नीध्राचें काम केले म्हणून अग्निरूप होऊन हे हवि भक्षण करतो. ते जठराग्नीमध्यें सुहुत असो. हे प्रशित्रा, प्रेरक परमेश्वराच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या दोन बाहूंनी व पूषा देवतेच्या दोन हातांनी मी तुझें ग्रहण करतो व अग्नीच्या मुखानें मी तुझें भक्षण करतो. ॥ ११ ॥ विनियोग - समिधेच्या होमाची आज्ञा दे असें सांगितले गेलेल्या ब्रह्म्यानें 'एतं ते' पासून 'ॐ प्रतिष्ठ' पर्यंतच्या दोन मंत्रांनी तसें करण्याची आज्ञा द्यावी.
ए॒तं ते॑ देव सवितर्य॒ज्ञं प्राहु॒र्बृह॒स्पत॑ये ब्र॒ह्मणे॑ । अर्थ - हे दानगुणविशिष्ट प्रेरक परमेश्वरा, हा आतां केलेला यज्ञ तुजकरितां आहे असें यजमान म्हणतात व तुझ्या प्रेरणेनें देवांच्या यज्ञांत ब्रह्मा झालेला जो बृहस्पति त्या कारणें आहे असेंही यजमान म्हणतात. म्हणून तूं ह्या तुझ्या यज्ञाचें व यजमानाचें त्या ब्रह्मा झालेला अशा माझें रक्षण कर. ॥ १२ ॥
मनो॑ जू॒तिर्जु॑षता॒माज्य॑स्य॒ बृह॒स्पति॑र्य॒ज्ञमि॒मं त॑नो॒त्वरि॑ष्टं य॒ज्ञँ समि॒मं द॑धातु॒ । अर्थ - हे मना , तूं घृताचें सेवन कर. हे सवित्य, शीघ्रगामी असें तुझें मन यज्ञसंबंधी घृतांत स्थापन कर. आणि बृहस्पति या यज्ञाला वाढवो व हिंसारहित करून त्याचे धारण करो. सगळे देव यज्ञकर्मांत संतुष्ट होवोत. अशा तऱ्हेनें प्रार्थिलेला सूर्य (ओम् प्रतिष्ठ) "बरें आहे प्रयाण कर" अशी आज्ञा देवो. ॥ १३ ॥ विनियोग - होत्यानें 'एषा ते' हा मंत्र म्हणावा. पूर्वी 'अग्ने वाजजित्' या मंत्रानें जसे परिक्रमण करून तीन तीनदां अग्निसंमार्जन केलें तसेंच येथें परिक्रमणरहित 'प्रसृवांसम्' या मंत्रानें एकदां संमार्जन करावें.
ए॒षा ते॑ऽअग्ने स॒मित्तया॒ वर्ध॑स्व॒ चा च॑ प्यायस्व । व॒र्धि॒षी॒महि॑ च व॒यमा च॑ प्यासिषीमहि । अर्थ - हे अग्ने, ही तुला प्रदीप्त करणारी समिधा आहे. तिच्या योगानें तूं वाढ व आमची वृद्धी कर. तुझ्या अनुग्रहानें आम्ही वाढूं व आमच्या पुत्रपश्वादिकांना सर्व बाजूनें वृद्धिंगत करूं. हे अन्नोत्पादक अग्ने, अन्नाच्या उद्देशानें गमन करणाऱ्या व ते मिळविणाऱ्या अशा तुला मी जलानें शुद्ध करतों. ॥ १४ ॥ विनियोग - 'अग्निषोमयोः' या मंत्रानें जुहु आणि उपभृत् यांचे व्यूहन करावें. (व्यूहन परस्परविरुद्ध ढकलणें. यजमानानें उपभृतानें पूर्वेकडे ढलावें. व जुहूनें उपभृतला पश्चिमेकडे ढकलावें).
अ॒ग्नीषोम॑यो॒रुज्जि॑ति॒मनूज्जे॑षं॒ वाज॑स्य मा प्र॒स॒वेन॒ प्रोहा॑मि । अर्थ - अग्नीषोमरूपी पुरोडाश-देवतांच्या हविस्वीकाररूपी जयाप्रमाणें मीही उत्कृष्ट जय मिळविला. पुरोडाशाच्या आज्ञेनें जुहुरूपधारी यजमानाला मी उत्साहित करतो. जो आमचा द्वेष करतो व आम्ही ज्याचा द्वेष करतो अशा आलस्यादि शत्रूला अग्नीषोम दूर करोत. उपभृत्रूपी शत्रूला पुरोडाश देवतेच्या आज्ञेनें मी दूर करतो. इंद्राग्नीरूपी पुरोडाश देवतांच्या हविस्वीकाररूपी जयाप्रमाणें मीही उत्कृष्ट जय मिळविला. पुरोडाशरूपी अन्नाच्या आज्ञेनें मी उपभृत्धारी यजमानाला प्रोत्साहित करतो. जो आमचा द्वेष करतो व आम्ही ज्याचा द्वेष करतो अशा आलस्यादि शत्रूला इंद्राग्नी दूर करोत. जुहुरूपी शत्रूला पुरोडाश देवतेच्या आज्ञेनें मी दूर करतो. ॥ १५ ॥ विनियोग - पूर्वीप्रमाणें 'वसुभ्यः' इत्यादि प्रत्येक मंत्रांनी जुहुनें परिधीला घृत लावावें. 'संजाथाम्' या मंत्रानें प्रस्तर ग्रहण करावें. 'व्यन्तु वयः' या मंत्रानें जुहूंत प्रस्तराचे अग्र, उपभृतांत मध्य व ध्रुवेंत मूल घृतानें भिजवावें. 'मरुताम्' या मंत्रानें जुहूंत प्रस्तरांतील एक काडी खालच्या भागानें काढून घेऊन अग्नींत टाकावी. 'चक्षुष्पा' या मंत्रानें आत्म्याला स्पर्श करावा.
वसु॑भ्यस्त्वा रु॒द्रेभ्य॑स्त्वादि॒त्येभ्य॑स्त्वा॒ संजा॑नाथां द्यावापृथिवी मि॒त्रावरु॑णौ त्वा॒ वृष्ट्या॒॑वताम् । अर्थ - हे मध्यम परिघे, वसुदेवतांच्या संतोषाकरितां हे दक्षिण परिघे, रुद्र देवतांच्या संतोषाकरितां हे उत्तर परिघे, आदित्य देवतांच्या संतोषाकरितां मी तुला अंजन करतो. द्यावापृथिवी देवतांनो, ह्या मी घेतलेल्या प्रस्तराचें तुम्ही ज्ञान करून घ्या. हे प्रस्तरा, मित्रावरुण देव जलवृष्टीनें तुझें रक्षण करोत. घृतलिप्त प्रस्तराला चाटणारे पक्षीरूप धारण करणारे गायत्री वगैरे छंद प्रस्तराला घेऊन जावोत. हे प्रस्तरा, तूं मरुत् नामक देवाचीं चित्रविचित्र वर्णाचीं जीं वाहनें त्यांना प्राप्त हो. म्हणजे त्यांना घेऊन अंतरिक्षांत जा. नंतर तेथून आमच्याकरितां वृष्टि कर. हे अग्ने, तूं नेत्रांचें रक्षण करणारा आहेस म्हणून माझ्या नेत्रांचे रक्षण कर. ॥ १६ ॥ विनियोग - 'यं परिधिम्' या मंत्रानें पहिल्या परिधीला अग्नींत टाकावें व 'अग्रेः प्रियम्' या मंत्रानें दक्षिण व उत्तर परिधीला एकदम अग्नींत टाकावें.
यं प॑रि॒धिं प॒र्य्यध॑त्था॒ऽअग्ने॑ देवप॒णिभि॑र्गु॒ह्यमा॑नः । अर्थ - हे आहवनीय अग्ने, पणिनामक असुरांनीं तुला सर्व बाजूंनी अडविल्यावर पश्चिम दिशेकडे ज्या परिधीचा तूं आश्रय केलास त्या तुझ्या आवडत्या परिधीला मी अग्नींत टाकतो. हा परिधी तुझ्यापासून दूर जाण्याची इच्छा कधींही न करो. हे दोन परिधींनो, तुम्ही अग्नीचें प्रिय असें अन्न व्हा. ॥ १७ ॥ विनियोग - 'सँस्रवभागाः' या मंत्राने संस्रवांचा होम करावा.
सँ॒स्र॒वभा॑गा स्थे॒षा बृ॒हन्तः॑ प्रस्तरेष्ठाः॒ प॑रि॒धैया॑श्च दे॒वाः । अर्थ - हे विश्वेदेवांनो, तुम्ही संस्रव भक्षण करणारे आहांत म्हणून पातळ अशा तुपाचे भक्षण करा. ह्या संस्रवरूपी अन्नानें तुम्ही मोठे व्हा. आणि प्रस्तरावर व परिधीवर राहणाऱ्या आणि ' हा यजमान चांगला याग करतो ' अशी माझी स्तुति करणाऱ्या अशा विश्वेदेवांनो, तुम्ही या यज्ञांत बसून तृप्त व्हा. हा हविर्भाग सर्व तऱ्हेनें तुम्हांला दिला आहे. ॥ १८ ॥ विनियोग - 'घृताची' या मंत्रानें जुहु व उपभृत् यांना गाड्याच्या जोकडावर ठेवावें. 'यज्ञ नमश्च' या मंत्रानें वेदीला स्पर्श करावा.
घृताची॑ स्थो॒ धुर्यौ पातँसु॒म्ने स्थः॑ सु॒म्ने मा॑ धत्तम् । अर्थ - हे जुहु उपभृत् पात्रांनो, तुम्ही घृतपूर्ण आहांत. ह्या गाडीच्या बैलाचें रक्षण करा. तसेंच तुम्ही सुखरूपी आहांत म्हणून मला सुख द्या. हे यज्ञा, तुला नमस्कार. तुझी वृद्धि असो. हे नमस्कारा, तूं यज्ञांतील न्यूनातिरिक्त दोष दूर कर व माझा याग उत्तम कर व त्या यागांत स्थित हो. ॥। १९ ॥ विनियोग - 'अग्ने अदब्धाया' या मन्त्रानें स्रुक् व स्रुवा यांचे ग्रहण करावें. 'अग्नये' व 'सरस्वत्यै' या मंत्रांनी दक्षिणाग्नींत होम करावा.
अग्ने॑ऽदब्धायोऽशीतम पा॒हि मा॑ दि॒द्योः पा॒हि प्रसि॑त्यै पा॒हि दुरि॑ष्ट्यै पा॒हि दु॑रद्मन्याऽअ॑वि॒षं नः॑ पि॒तुं कृ॑णु । अर्थ - हे उपासकाला अहिंसित आयुष्य देणाऱ्या व भोक्तृतम अशा गार्हपत्या, शत्रुप्रेरित वज्रापासून माझें रक्षण कर. तसेंच बंधनाला कारणीभूत असें जाल (फास) अशास्त्रीय याग व दुर्भोजन ह्यांपासून माझें रक्षण कर. माझें अन्न निर्विष कर व चांगल्या तऱ्हेने राहण्याला योग्य अशा घरांत माझी स्थापना कर. हें हवि सुहुत असो. (सभिलाष स्त्रीपुरुषांनी जें एकत्र शयन करणें त्याला संवेश म्हणतात). ह्या संवेशाचा अधिपति जो अग्नि व यज्ञाची भगिनी जी वाणीरूपी सरस्वती तिला हें हवि सुहुत असो. ॥ २० ॥ विनियोग - 'वेदोसि' या मंत्रानें यजमानपत्नीनें वेदकुशमुष्टि सोडावा. 'देव गातुविदः' या मंत्रानें ध्रुवेनें समिष्ट यजुःसंज्ञक होम करावा.
वे॒दो॒ऽसि॒ येन॒ त्वं दे॑व वेद दे॒वेभ्यो॑ वे॒दोऽभ॑व॒स्तेन॒ मह्यं॑ वे॒दो भूयाः॑ । अर्थ - हे कुशमुष्टिनिर्मित वेदपदार्था, तूं ऋग्वेदादिस्वरूपी आहेस. हे प्रकाशक वेदा, ज्या तऱ्हेनें तूं देवांचा बोधक झालास त्या तऱ्हेनें माझा बोधक हो. हे यज्ञवेत्त्या देवांनो, आमचा यज्ञ सुरूं झाला असें समजल्यावरोबर तुम्ही यज्ञाला यावे, व आमच्या यज्ञानें संतुष्ट झाल्यावर आपल्या मार्गानें जावें. हे मनाच्या अधिपते चंद्ररूपी देवा, मी केलेला हा यज्ञ तुझे स्वाधीन करतो. तूं तो वायुरूपी देवामध्यें स्थापन कर. ॥ २१ ॥ विनियोग - 'संबर्हि' या मंत्रानें बर्हीचा (दर्भांचा) होम करावा.
सं ब॒हिरं॑क्ताँ ह॒विषा॑ घृ॒तेन॒ समा॑दि॒त्यैवसु॑भिः॒ अर्थ - इंद्र संस्कारयुक्त घृतानें दर्भाला अंजन करो. तसेंच तो आदित्य, वसु, मरुत व विश्वेदेव यांस दर्भाला अंजन करो, व ह्यांनी अंजन केलेला तो दर्भ द्युलोकांतील आदित्यरूपी ज्योतीला प्राप्त होवो. हें हवि सुहुत असो. ॥ २२ ॥ विनियोग - आहवनीय अग्नीची प्रदक्षिणा करून वेदीवर 'कस्त्वा' या मंत्रानें प्रणीता पात्राचें स्थापन करावें. 'रक्षसां' या मंत्रानें पुरोडाश कपालावरील मृत्कण जमिनीवर टाकावेत. कस्त्वा॒ विमु॑ञ्चति॒ स त्वा॒ विमु॑ञ्चति॒ कस्मै॑ त्वा॒ विमु॑ञ्चति॒ तस्मै॑ त्वा॒ विमु॑ञ्चति॒ । पोषा॑य॒ रक्ष॑सां भा॒गो॒सि ॥ २३ ॥ अर्थ - हे प्रणीता पात्रा, तुला कोण सोडतो ? तो प्रजापति परमेश्वर तुला सोडतो. तो तुला कशाकरितां सोडतो ? तो आत्मसंतोषाकरितां तुला सोडतो. हे प्रणीतोदका, यजमानाला पुत्रादिक होवोत म्हणून मी तुला जमिनीवर् सांडतों. हे कणसमूहा, तूं राक्षसांचा भाग आहेस. ॥ २३ ॥ विनियोग - आहवनीयाला प्रदक्षिणा घालून पूर्णपात्राचें ग्रहण करावें. व 'संवर्चसा' या मंत्रानें मुखमार्जन करावें.
सं वर्च्च॑सा॒ पय॑सा॒ सं॑ त॒नुभि॒रग॑न्महि॒ मन॑सा॒ सँशि॒वेन॑ । अर्थ - आम्ही ब्रह्मवर्चस तेज, क्षीरादि रस, अनुष्ठानयोग्य शरीराचे अवयव आणि शांत मन ह्यांनी युक्त झालें आहोंत. उत्तम दान करणारा जो त्वष्टा तो मला संपत्ति देवो व माझ्या शरीरांतील जी न्यूनता ती दूर करून शरीराचें पोषण करो. ॥ २४ ॥ विनियोग - 'दिवि विष्णुः' इत्यादि प्रत्येक मंत्रांनी विष्णुक्रम करावें. विष्णुक्रम म्हणजे आपण पाय जमिनीवर ठेवतों ते विष्णूचे पाय आहेत असें समजणें 'अस्मादन्नात्' या मंत्रानें आपल्या अंशाचें अवलोकन करावें. व 'अस्यै' या मंत्रानें भूमीचें अवलोकन करावें. व पूर्वदिशेकडे 'अगन्म' या मंत्रानें सूर्याचें व 'संज्योतिषा' या मंत्रानें आहवनीयाचें अवलोकन करावें.
दि॒वि विष्णु॒र्व्य॒क्रँस्त॒ जागतेन॒ च्छन्द॑सा॒ ततो॒ निर्भ॑क्तो॒ अर्थ - यज्ञपुरुष द्युलोकाप्रत जगतीच्छंदानें, अंतरिक्षलोकाप्रत त्रिष्टुप् छंदानें, व पृथ्वीलोकाप्रत गायत्री छंदानें आक्रमण करता झाला. व त्या तिन्ही लोकांतून जो शत्रु आमचा द्वेष करतो त्या शत्रूला घालविता झाला. व त्यापुढें असलेल्या यजमान भागापासून व पुढें असलेल्या या यज्ञभूमीपासून आम्हीं त्या शत्रूचें निवारण केलें. यज्ञानुष्ठानें आम्ही स्वर्गलोकाला प्राप्त झालो. तसेंच आहवनीयरूपी तेजानें युक्त झालों. ॥ २५ ॥ विनियोग - 'स्वयंभु' या मंत्रानें सूर्याचे अवलोकन करावें व 'सूर्यस्य' या मंत्रानें प्रदक्षिणा करावी. स्व॒यं॒भूर॑सि॒ श्रेष्टो॑ र॒श्मिर्व॑र्चो॒दाऽअसि॒ वर्चो॑ मे देहि । सूर्य॑स्या॒वृत॒मन्वाव॑र्ते ॥ २६ ॥ अर्थ - हे सूर्या तूं स्वयंसिद्ध प्रशस्त व रश्मिमंडल शारीराभिमानी हिरण्यगर्भ नांवाचा आहेस. तूं तेज देणारा आहेस म्हणून मला ब्रह्मवर्चस तेज दे. सूर्याप्रमाणें मी प्रदक्षिणा करतो. ॥ २६ ॥ विनियोग - 'अग्ने गृहपते' या मंत्रानें गार्हपत्य अग्नीचें उपस्थान करावें. व 'सूर्यस्य' या मंत्रानें प्रदक्षिणा करावी.
अग्ने गृहपते सुगृहप॒तिस्त्वया॑ऽग्ने॒ऽहं गृ॒हप॑तिना भूयासँ सुगृहप॒तिस्त्वं मया॑ऽग्ने गृ॒हप॑तिना भूयाः । अर्थ - हे गृहपालका अग्ने, तुझ्या प्रसादानें मी चांगला गृहपालक होईन. व माझ्या सेवेनें तूंही गृहाचा पालक हो. अशा तऱ्हेनें आमची पतिपत्नीची कर्में शंभर वर्षेपर्यंत निरंतर सावधानतेनें होवोत. ज्याप्रमाणें दोन्ही बाजूंनी बैल जोडलेला गाडा निरंतर चालतो त्याप्रमाणें आमचीं कर्में प्रवृत्त होवोत. सूर्याप्रमाणें मी प्रदक्षिणा करतो. ॥ २७ ॥ विनियोग - व्रतग्रहणाचे वेळीं दोन मंत्र सांगितले आहेत. त्यांपैकीं यजमानानें ज्या मंत्रानें व्रतग्रहण केलें असेल त्याच मंत्रानें व्रतत्याग करावा. अग्ने॑ व्रतपते व्र॒तम॑चारिषं॒ तद॑शकं॒ तन्मे॑ऽराधी॒दम॒हं यऽए॒वाऽस्मि सो॒ऽस्मि ॥ २८ ॥ अर्थ - हे कर्मपालक अग्ने, मी सत्यभाषणादिव्रत केलें व तें करणें मला तुझा प्रसादानेंच शक्य झालें. तूं माझें व्रत सिद्ध केलेंस. हे अग्ने, हें व्रत मी संपविलें. जसा मी पूर्वीं मनुष्य होतो तसा आतांही आहें. म्हणजे व्रतसमाप्तीचें श्रेय तुजकडे आहे, मला नाही. ॥ २८ ॥ विनियोग - त्यानंतर सर्व तांदूळ अपूर्ण (अर्धवट) शिजवून त्यावर तूप घालून ते स्थालींत काढून घेऊन त्याच्या 'अमये' व 'सोमाय' अशा दोन आहुति विकंकत वृक्षाच्या मेक्षणानें द्याव्या व 'अपहृता' या मंत्रानें दक्षिणेकडे रेखाकरण करावें.
अ॒ग्नये॑ कव्य॒वाह॑नाय॒ स्वाहा॒ सोमा॑य पितृ॒मते॒ स्वाहा॑ । अर्थ - (भूतकालीन कर्म पाहणारे जे पितृगण त्यांस कवि म्हणतात व त्यांस दिलेलें जें हविर्द्रव्य त्यास कव्य म्हणतात). कव्याचें धारण करणारा जो अग्नि त्याला हा हविर्भाग दिला आहे. पितृयुक्त सोमनामक जो देव त्याला हा हविर्भाग दिला आहे. वेदीवर राहणारे जे राक्षस व असुर ते वेदीपासून भ्रष्ट झाले. ॥ २९ ॥ विनियोग - 'ये रूपाणि' या मंत्रानें रेखेच्या पलीकडे उल्मूक ठेवावा.
ये रू॒पाणि॑ प्रतिमु॒ञ्चमा॑ना॒ऽअसु॑राः॒ सन्तः॑ स्व॒धया॒ चर॑न्ति । अर्थ - पैतृक अन्न भक्षण करण्याकरितां स्वतःचें रूप टाकून पितृरूप धारण करणारे जे असुर ह्या पितृयज्ञस्थानांत जे संचार करतात, तसेंच जे असुर आपलें राक्षसत्व झांकण्याकरितां स्थूल सूक्ष्म शरीर धारण करतात, त्या राक्षसांना हा उल्मूकरूपी अग्नि ह्या पितृयज्ञ स्थानापासून दूर करो. विनियोग - 'अत्र पितरः' या मंत्रानें श्वास रोखला जाईपर्यंत उत्तरेकडे तोंड करून बसावें व 'अमीमदंत' या मंत्राचा जप करावा.
अत्र॑ पितरो॑ मादयध्वं यथाभा॒गमावृ॑षायध्वम् । अर्थ - हे पितरांनो, तुम्ही या दर्भावर संतुष्ट होऊन बसा. नंतर दुसऱ्याच्या भागाचें अतिक्रमण न करितां आपापल्याच भागाचा स्वीकार करा. ज्याप्रमाणें एखादा बैल आवडतें तृण यथेच्छ भक्षण करतो त्याप्रमाणें तुम्ही आपला भाग यथेच्छ खा. पूर्वोक्त पितर संतुष्ट होऊन बैल तृण खातो त्याप्रमाणें दुसऱ्याचे भागाचें अतिक्रमण न करतां आपापल्या भागाचें यथेच्छ भक्षण करते झाले. ॥ ३१ ॥ विनियोग - 'नमो वः' या मंत्रानें सहा उत्तान अंजलीरूपी नमस्कार करावे. 'एतद्वः' या मंत्रानें प्रत्येक पिंडाला तीन सूत्रें किंवा ऊर्णा किंवा दशा समर्पण करावी व यजमानाचें वय पन्नास वर्षांच्या पुढें असेंल तर त्याचे लोम (छातीवरील केश) पिंडावर वहावे.
नमो॑ वः पितरो॒ रसा॑य॒ नमो॑ वः पितरः॒ शोषा॑य॒ नमो॑ वः पितरो जी॒वाय॒ अर्थ - हे पितरांनो, रसरूपी वसंत, शुष्कतारूपी ग्रीष्म, जीवनहेतुभूत जलरूपी वर्षा, पित्रन्नस्वधारूपी शरद, प्राण्यांना घोररूपी असणारा हेमंत आणि क्रोधरूपी शिशिर हीं तुमची स्वरूपें आहेत. अशा ऋतुस्वरूपी तुम्हाला सादर नमस्कार असो. हे पितरांनो तुम्ही आम्हाला भार्यापुत्रादिक द्या व आमच्याकडे असलेलें द्रव्य वगैरे आम्ही तुम्हाला देऊं. हे पितरांनो, हें वस्त्रसूत्र तुमचें परिधान असो. ॥ ३२ ॥ विनियोग - यजमानपत्नीला मुलगा व्हावा अशी इच्छा असल्यास तिनें 'आधत्त' या मंत्रानें मध्यम पिंड भक्षण करावा. आध॑त्त पितरो॒ गर्भं॑ कुमा॒रं पुष्क॑रस्रजम् । यथे॒ह पुरु॒षोऽस॑त् ॥ ३३ ॥ अर्थ - हे पितरांनो, तुम्ही ह्या ऋतूंच्या ठायीं देव, पितृ, व मनुष्य यांच्या इच्छा पूर्ण करील असा पद्ममालाधारी अश्विनीकुमारतुल्य मुलाचा गर्भ द्या. ॥ ३३ ॥ विनियोग - 'ऊर्जम्' या मंत्रानें पिंडाच्या मूलप्रदेशी जलसिंचन करावें.
ऊर्ज्जं॒ बह॑न्तीर॒मृतं॑ घृ॒तं पयः॑ की॒लालं॑ परि॒स्रु॑तम् । अर्थ - हे जलांनो, तुम्ही अन्न, घृत व पय या तीन शब्दांनी वाच्य असा फुलांतील सारभाग धारण करणारें आहांत. ऊर्ज, घृत आणि पय हीं मृत्युनाशक व बंधनिवारक आहेत. तुम्ही पितृहव्यस्वरूपी आहांत म्हणून माझ्या पितरांना संतुष्ट करा. ॥ ३४ ॥ ॥ इति द्वितीयोऽध्यायः ॥ |