१ अथातो भक्तिं व्याख्यास्यामः ।

२ सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा ।

३ अमृतस्वरूपाच ।

४ यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति,

५ यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति

६ यज्ज्ञात्वा मत्तो भवति,

७ सा न कामायमाना

८ निरोधस्तु लोकवेद...

९ तस्मिन्ननन्यता

१० अन्याश्रयाणां त्यागोऽनन्यता ।

११ लोके वेदेषु तदनुकुलाचरणं..

१२ भवतु निश्चय...

१३ अन्यथा पातित्याशङ्‍क्या ।

१४ लोकोऽपि तावदेव किन्तु...

१५ तल्लक्षणानि वाच्यन्ते

१६ पूजादिष्वनुराग इति पाराशर्यः

१७ कथादिष्विति गर्गः ।

१८ आत्मरत्यविरोधेनेति...

१९ नारदस्तु तदर्पिताखिलाचारता

२० अस्त्येवमेवम् ।

२१ यथा व्रजगोपिकानाम् ।

२२ तत्रापि न माहात्म्यज्ञान...

२३ तद्विहीनं जाराणामिव ।

२४ नास्त्येव तस्मिंन्.....

२५ सा तु कर्मज्ञान...

२६ फलरूपत्वात् ।

२७ ईश्वरस्याप्यभिमानद्वेषित्वाद् ...

२८ तस्या ज्ञानमेव साधनमित्येके ।

२९ अन्योन्याश्रयत्वमित्यन्ये ।

३० स्वयं फलरूपतेति ब्रह्मकुमाराः

३१ राजगृह-भोजनादिषु...

३२ न तेन राजपरितोषः ...

३३ तस्मात्सैव ग्राह्या मुमुक्षुभिः ।

३४ तस्याः साधनानि.....

३५ ततु विषयत्यागात् ...

३६ अव्यावृत भजनात् ।

३७ लोकेऽपि भगवद्‌गुण...

३८ मुख्यतस्तु महत्कृपयैव,

३९ महत्सङ्‍गस्तु दुर्लभो..

४० लभ्यतेऽपि तत्कृपयैव ।

४१ तस्मिंस्तज्जने भेदाभावात् ।

४२ तदैव साध्यतां तदेव ...

४३ दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ।

४४ कामक्रोधमोहस्मृति.....

४५ तरंगायिता अपीमे ...

४६ कस्तरति कस्तरति मायाम् ?

४७ यो विविक्तस्थानं सेवते.....

४८ यः कर्मफलं त्यजति....

४९ यो वेदानपि सन्यस्यति.....

५० स तरति स तरति...

५१ अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम्

५२ मूकास्वादनवत्

५३ प्रकाशते क्वापि पात्रे

५४ गुणरहित कामनारहितं

५५ तत्प्राप्य तदेवावतोकयति

५६ गौणी त्रिधा गुणभेदाद्...

५७ उत्तरास्मादुत्तरस्मात्...

५८ अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ

५९ प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात्

६० शान्तिरूपात् ...

६१ लोकहानौ चिन्ता न कार्या

६२ न तदसिद्धौ लोकव्यवहारो..

६३ स्रीधननास्तिकवैरिचरित्रं

६४ अभिमानदम्भादिक त्याज्यम्

६५ तदर्पिताखिलाचारः सन्

६६ त्रिरूपभङ्गपूर्वकं .....

६७ भक्ता एकान्तिनो मुख्याः

६८ कण्ठावरोधरोमाञ्चाशृभिः

६९ तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि....

७० तन्मयाः

७१ मोदन्ते पितरो....

७२ नास्ति तेषु जाति

७३ यतस्तदीयः

७४ वादो नावलम्ब्यः

७५ बाहुल्यावकाशाद...

७६ भक्तिशास्त्राणि मननीयानि

७७ सुखदुःखेच्छालाभादित्यक्ते

७८ अहिंसासत्यशौचदया...

७९ सर्वदा सर्वभावेन ....

८० सः कीर्त्यमानः ...

८१ त्रिसत्यस्यभक्तिरेव...

८२ गुणमाहात्म्यासक्ति ...

८३ इत्येवं वदन्ति ...

८४ य इदं नारदप्रोक्तं...

नारद भक्तिसूत्रे

प्रस्तावना

अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्ति शाङ्‌र्गधन्वनः ।
गायन्माद्यन्निदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत् ॥

'अहो ! हे देवर्षी नारद धन्य आहेत. जे आपली वीणा वाजवीत भगवद-गुणगायनात तल्लीन होतात व संसारदुःखाने तप्त जीवांना सदा आनंदित करतात - श्रीमद्‌भागवत, स्कंध १-६-३९

धन्य धन्य तो नारदु, । ज्यासी सर्वा सर्वत्र गोविंदु ।
सर्वथा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदू सदोदित ॥
जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।
ज्याचेनि संगे तत्त्वतां । नित्यमुक्ततां जडजीवा ॥ - एकनाथी भागवत, २-३७,३८

भारतीय सर्व दर्शने व शास्त्रावर त्या त्या दर्शनप्रणेत्यांनी सूत्रे रचली तशीच भक्तिशास्त्रावर नारद महर्षींनी सूत्रे रचली आहेत. त्याची संख्या चौऱ्याशी आहे. यात भगवद्‌भक्ती-प्रेमाची व्याख्या, प्रकार, भक्तीस साहाय्यक कोणकोणती साधने आहेत, प्रतिकूल कोण असतात, भक्तिविषयक अन्य मते इत्यादी विषयांचा सुत्ररूपाने संक्षेपाने सर्व विचार केला आहे. या सूत्राचे प्रणेते देवर्षी श्रीनारद आहेत. यांचे चरित्रही मोठे आहे. नारदांच्या नावावर अनेक कथा, उपकथा पुराणादिकातून आढळतात, पण त्या एकाच ठिकाणी सापडत नाहीत म्हणून येथे प्रारंभी मिळेल तेवढी माहिती संग्रहित करून श्रीनारदांचे अल्पसे चरित्र दिले आहे.

नारदांचा अधिकार व चरित्र :

देवर्षी नारदांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक दिसून येते. चारही युगात, सर्व त्रिभुवनात, सर्व समाजात, लौकिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात नारदांचा संचार असे वैकुंठ, सत्यलोक, स्वर्ग, मृत्यूलोक, पाताळ, कैलासादि सर्व ज्लोकात त्यांचा अप्रतिहत प्रवेश होता. आपल्या योग्बलाने,संकल्पमात्राने ते कोठेही जात-येत असत. वेदोपनिषदे, स्मृती, पुराणे व आगमादि ग्रंथातून सर्वत्र त्यांचे वर्णन आढळून येते. नारदांचे चरित्र विशेषतः पुराणांतून अनेक प्रकारे वर्णिले आहे. नारदांच्या नावावर बृहन्नारदीय नावाचा पंचवीस हजार श्लोकाचा पुराण ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या उपलब्ध नारद पुराणामध्ये सनत्कुमार नारद संवादाच्या द्वारे अनेक कथा सांगितल्या आहेत, पण त्यात नारदांचे विस्तृत चरित्र आढळत नाही. ब्रह्मवैवर्त व भागवत पुराणात त्यांचे चरित्र थोडे विस्ताराने सापडते.

नारद हे नाव धारण करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या असाव्यात असे पुराणातून दिसून येते. त्यापैका काही असे :

१) कोणी एक ब्रह्मर्षी, त्याच्या स्त्रीचे नाव सत्यवती होते. यास अरुन्धती नामक भगिनी होती. ती त्याने मैत्रावरुणी वसिष्ठास दिली होती. २) कश्यपऋषीस मुनी या भार्येपासून झालेल्या सोळा देवगंधर्वांपैकी कली नामक देवगंधर्वाचा कनिष्ठ बंधू, 'गंधर्वौकलिनारदौ' ३) कुबेर सभेत राहणारा ऋषी. हा वरुण सभेतही असे ४) दाशरथी रामाच्या सभेतील आठ धर्मशास्त्र्यापैकी एक. ५) पर्वत मुनीचा मामा ६) विश्वामित्र ऋषिपुत्रांपैकी एक जनमेजय सर्पसत्रातील एक सदस्य. ७) देवर्षी ब्रह्मपुत्र नारद. भक्तश्रेष्ठ भक्ताचार्य व्यास, वाल्मीक, धुवप्रल्हादादिकांचे गुरू या स्वरूपाने ज्याची प्रसिद्धी आहे ते हेच होत.

देवर्षी नारद हे प्रस्तुत वाराहकल्पाच्या स्वयंभूव मन्वंतरात ब्रह्मदेवांनी जे दशमानसपुत्र उत्पन्न केले त्यांत दहावे असून पित्याच्या मांडीपासून उत्पन्न झाले. 'उत्सङ्‌गान्नारदोजज्ञे' असे भागवतस्कंध ३-१२-२३ मध्ये म्हटले आहे. श्रीमद्-भागवताच्या प्रथमस्कंध अध्याय तीनमध्ये तर नारदांना तिसरा अवतार मानले आहे.

तृतीय ऋषिसर्गंच देवर्षित्वमुपेत्य सः ।
तस्मै सात्वतमाचष्ट नैष्कर्म्यं कर्मणां यतः ॥ - भागवत १-३-८

'ऋषीच्या सृष्टीत त्या भगवंताने नारदरूपाने तिसरा अवतार ग्रहण केला आणि सात्वत तंत्र ज्याला पांचरात्रागम किंवा नारद पांचरात्र म्हणतात त्याचा उपदेश केला आहे. त्यात कर्म कशा प्रकारे कर्मबंधनापासून मुक्त करणारे होते याचे वर्णन केले आहे.'

महाभारतात शांतिपर्वात धर्मराजाने भीष्मास-
प्रियः सर्वस्य लोकस्य सर्वसत्वाभिनंदित ।
गुणैस्सर्वेरुपेतस्य कोन्वस्ति भुवि मानव ॥
'या भूमीवर सर्वांना प्रिय, सर्वांकडून पूजित, सर्व गुणांनी युक्त असा कोण मानव आहे ? असा प्रश्न केला असता भीष्मांनी नारदांचे उदाहरण देऊन परमेष्ठी स्थितीचे उत्कृष्ट विवेचन केले आहे. इतिहास पुराणादिकांतून नारदचरित्राकडे पाहिल्यास ते परमभागवतोत्तम, अज्ञानी जीवास उपदेश करणारे श्रेष्ठ सद्‌गुरू, दीन जनांना संकटकाली योग्य मार्गदर्शन करणारे, प्रसंग विशेषी कुबेरपुत्रासारख्या श्रीमदांधास तपःसामर्थ्याने शिक्षा करून त्यांना भक्तिमार्गास लावणारे, देवासुर, मनुष्य, गंधर्व, नागादिकांस सारखेच प्रिय, ब्रह्मांडातील यच्चयावत व्यवहार जाणणारे गुप्तवार्ता कळवून सुरासुर व मनुष्यांना उद्योगप्रवण करणारे, त्रिलोकातील अभिमानग्रस्त जीवांत कलह उत्पन्न करून त्यांचा अभिमान नष्ट करणारे, विश्वोद्धारार्थ क्षणभरही विश्रांती न घेता त्रैलोक्याचे परम कल्याण कसे साधता येईल याची रात्रंदिवस चिंता करून त्याकरिता सतत परिभ्रमण करणारे, असे दिसून येते. प्रस्तुत कल्पातील भगवद्‌विभूती जे नरनारायण ऋषी यांचीही उपासना करणारे ते होते असे श्रीमद्‌भागवत पचमस्कंधात सांगितले आहे, ते असे-

'या भरत खंडामध्येही ज्याचे स्वरूप लोकांना स्पष्टपणे कळत नाही असा भगवान, नरनारायणात्मक अशा दोन मूर्ती धारण करून, बदरिकाश्रमात कृपेने धैर्यवान पुरुषांवर अनुग्रह करण्याकरिता, कल्प संपेपर्यंत धर्मवृद्धी, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांती आणि विषयत्याग इत्यादी ज्या साधनांनी आत्म्याचा अनुभव मिळतो त्याचा आश्रय करून तप करीत राहिला आहे. त्या भगवंताची भगवत्प्रतिपादित सांख्यशास्त्र व योगशास्त्र यासहवर्तमान ज्यामध्ये भगवंताच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे अशा पंचरात्रागमाचा सावर्णी मनूला उपदेश करणारा भगवान नारद, वर्णाश्रमधर्माचे आचरण करणाऱ्या भरत खंडातील प्रजासहवर्तमान उपासना करतो' - भागवत ५-१९-९

ब्रह्मवैवर्त पुराणात नारदांचे चरित्र खालीलप्रमाणे आहे. पूर्वी नारद ब्रह्मदेवाच्या कंठापासून उत्पन्न झाल्यानंतर त्यांना पित्याने गृहस्थाश्रम स्वीकारून सृष्ट्युत्पत्ती करण्यास सांगितले. ते त्याने मान्य न केल्याने पित्याने शाप दिला.
भवति ज्ञानलोपस्ते मच्छापेन च नारद ।
क्रीडामृगश्च साध्यश्च योषिल्लुब्धश्च लंपटः ।
स्थिरयौवन युक्तानां रूपाढ्यानां मनोहरः ।
पंचाशत्कामिनीनां व भर्ताच प्राणवल्लभः ।
श्रृंगार शास्त्रवेत्ता च महाश्रृंगार लोलुपः ।
गंधर्वाणां च प्रवरः सुस्वरश्चसुगायनः ।
वीणावादन संदर्भ निष्णातः स्थिरयौवनः ।
भविथ्यसि न सन्देहो नामतश्चोपबर्हणः । -ब्रह्मवैवर्त, पु ८, श्लोक ४१ ते ४५

पन्नास स्त्रियांचा पती, अत्यंत कामुक, गायनवादननिपुण असा 'उपबर्हण' नावाचा गंधर्वराज हो. असा शाप मिळाल्यानंतर त्याने कोणत्याही योनीत मला जन्म मिळाला तरी माझ्या ठिकाणी सतत हरिभक्ती राहावी असा वर मागून घेतला. पुढे गंधर्व राजाच्या स्त्रीच्या पोटी हे जन्मले. गंधर्वयोनीत त्यांनी चित्ररथ गंधर्वांच्या पन्नास कन्यांशी विवाह करून त्यांच्यासह ते गंधर्व राज्यातील दिव्य विषयांचा भोग घेऊ लागले. एकदा ते ब्रह्मसभेत गायन करण्यास गेले असता तेथे रंभेला नृत्य करताना पाहून त्यांना कामविकार उत्पन्न झाला व तिच्या अभिलाषेमुळे मूर्च्छा उत्पन्न झाली. ब्रह्मसभेचा हा अपमान पाहून ब्रह्मदेवाने यांना -

व्रजत्वं शूद्रयोनिञ्च गान्धर्वीं तनुमुत्सृज ।
काले वैष्णवसंसर्गान्मत्पुत्रस्त्वं भविष्यसि ॥ १०॥
विना विपत्तेर्महिमा पुंसां नैव भवेत्सुत ॥
सुखं दुःखं च सर्वेषां क्रमेण प्रभवेदिति ॥ ११ ॥ ब्रह्मवैवर्त, पु. ब्रह्मखंड अ. १३

'हे गंधर्व शरीर सोडून तू शूद्रयोनीत जा. तेथे तुला भगवद्‌भक्तांचा समागम झाल्यावर तू त्याच्या पुढील जन्मी आगामी कल्पात माझा पुत्र होशील. यापुढील कथा भागवतात आहे. [ भागवत सप्तमस्कंध अध्याय पंधरामध्ये श्रीनारदांनीच आपण पूर्वी उपबर्हण नामक गंधर्व होतो असे सांगून आपले चरित्र कथन केले आहे. ]

महापुरुषाचा क्रोधही जीवाच्या कल्याणाकरिताच असतो ब्रह्मदेवाने उपबर्हण गंधर्वावर कृपा करण्याकरिताच शाप दिला होता. त्या शापफलाने ते सदाचारी, संयमी, वेदवादी, ब्राह्मणाची सेवा करणाऱ्या दासीचे पुत्र झाले.

भागवत प्रथम स्कंध अध्याय पाचमध्ये स्वतः नारदांनी आपले चरित्र व्यासांना सांगितले आहे. नारद म्हणतात, 'हे महामुने ! मी पूर्वकाली एक दासीपुत्र होतो. एक वेळी वर्षाऋतूत चातुर्मासाच्या निमित्ताने आमच्या गावी बरेच योगी संतमहात्मे आले. त्यावेळी मी लहान बालक होतो. माझ्या मातेने मला त्या महापुरुषांच्या सेवेकडे सोपवून दिले. मी जरी लहान होतो तरी मी जितेंद्रिय होतो. त्या महात्म्यांपुढे मी मुळीच खोडकरपणा करीत नव्हतो. शांतीने, संयमाने मी त्यांच्याजवळ बसून राही व ते सांगतील ते काम करीत असे. यामुळे ते समदृष्टी होते तरी माझेवर विशेष प्रसन्न राहात होते, व कृपा करीत होते. त्या मुनींच्या आज्ञेने मी त्यांच्या पात्रातील उच्छिष्ट खात असे. त्या प्रभावाने माझे सर्व किल्मिष दूर झाले. असे करीत असता काही काळाने माझे चित्त शुद्ध झाले. ज्यामुळे त्यांनी कथन केलेल्या भागवत धर्मात मला गोडी निर्माण झाली. ते लोक नित्य श्रीकृष्णकथा गात होते व मी त्या संतांच्या अनुग्रहाने त्या मनोहर कथांचे श्रद्धेने श्रवण करीत होतो. यामुळे भगवंताचे ठिकाणी माझी बुद्धी जडली. त्या विशुद्ध व दृढ बुद्धिप्रभावाने मी मायारहित शुद्ध परब्रह्म स्वरूपात समस्त प्रपंच कल्पित आहे असे पाहू लागलो. अशा रीतीने वर्षा व शरद ऋतू संपेपावेतो ते महात्मागण प्रतिदिन भगवंताच्या निर्मळ यशाचे गायन करीत होते, ज्याच्या श्रवणाने माझ्या हृदयामध्ये रजोगुण-तमोगुणाचा नाश करणारी सात्त्विक भक्ती निर्माण झाली. मला अनुरागी, आश्रित, जितेंद्रिय, श्रद्धाळू, पापहीन बालक व दास समजून दीनांवर दया करणाऱ्या त्या महात्म्यांनी ते स्थान सोडून ते निघाले असतां माझ्यावर परम कृपा करून प्रत्यक्ष भगवंताच्याद्वारा सांगितले गेलेले गुह्यतम ज्ञान त्यांनी मला सांगितले. त्या ज्ञानाच्याद्वारा मी भगवान वासुदेवाच्या मायाप्रभावास जाणले.

यानंतर मला ज्ञानोपदेश करणारे महात्मागण दुसरीकडे निघून गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी भजन करीत राहिलो. माझ्या मातेला मी एकच पुत्र असल्यामुळे माझ्यावर तिचा फार स्नेह होता. एके दिवशी ती गोदोहन करीत असता एका कालसर्पाने तिला दंश केला, त्यामुळे तिला मृत्यू आला. सत्संगतीने मला ज्ञान प्राप्त झालेले असल्याने भक्ताचे हित करणाऱ्या प्रभूनेही माझ्यावर कृपाच केली असे समजून मी ते स्थान सोडून उत्तर दिशेला प्रयाण केले. अनेक स्थळी परिभ्रमण करीत मी एका घोर अरण्यात आलो. एका नदीतीरी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून चित्त एकाग्र करून भक्तिपूर्वक भगवंताच्या चरणकमलाचे ध्यान करू लागलो. त्या वेळी प्रेमावेशाने माझ्या नेत्रात आनंदाश्रू आले व मला वाटले माझ्या हृदयात श्रीभगवद्‌स्वरूप प्रकट झाले. भगद्दर्शन होताच प्रेमानंदाला पूर आल्यासारखा वाटला. माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मी आनंदसमुद्रात बुडून गेलो. मला सर्वांचाच पूर्ण विसर पडला.
प्रेमातिभर निर्भिन्न पुलकाङ्‌गोऽति निर्वृतः ।
आनंद संप्लवे लीनो नापश्यमुभयं मुने ॥ - भागवत, १-६-१८

या आनंदात भगवत्स्वरूपाचा अनुपम अनुभव घेत असताच ते सुंदर रूप माझ्या पुढून अंतर्धान पावले, तेव्हा मला फार दुःख झाले. मी पुन्हा ते स्वरूप दिसावे असा प्रयत्न करू लागलो. मला सतत त्याचाच ध्यास लागला, तेव्हा आकाशवाणीतून मी ऐकले, हे बालका, या जन्मात तुला माझे दर्शन होणार नाही. तुझ्या अंतःकरणात प्रेम वृद्धिंगत व्हावे म्हणून मी एक वेळ तुला दर्शन दिले आहे. अल्पकालीन सत्संगामुळे, हे नारदा ! तुझी माझे ठिकाणी दृढ भक्ती झाली आहे.

हन्तास्मिन्जन्मनि भवान् न मां दृष्टुमिहार्हसि ।
अविपक्वकषायाणां दुर्दशोऽहं कुयोगिनां ॥

'हे बालका ! खेद आहे की या जन्मात पुन्हा तुला माझे दर्शन होऊ शकणार नाही. ज्यांच्या वासना पूर्णतया शांत झाल्या नाहीत, ज्यांचे हृदय विशुद्ध नाही असा पुरुषांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे.'

'तू हे शरीर सोडून नंतर माझा निजजन होशील, माझ्या ठिकाणी तुझी निश्चल बुद्धी राहील व माझ्या कृपेने कल्पान्तातही तुला या जन्मातील गोष्टीचे स्मरण राहील.'

नारद व्यासांना म्हणाले, 'तेव्हापासून मी स्वतःला भगवत्कृपापात्र समजू लागलो. त्यानंतर मी लाज सोडून भगवंताच्या परमगुह्य कल्याणमय नामाचे व गुणांचे कीर्तन व स्मरण करीत अहंकार, ईर्ष्यादिकांचा त्याग करून संतोषपूर्वक निरपेक्ष असा या अवनीतलावर संचार करू लागलो. मी श्रीकृष्णस्वरूपी मन ठेवून संसाराची आसक्ती सोडली. यथाकाल माझे ते पूर्वशरीर नष्ट झाले व मला शुद्ध, दिव्य अशा भगवत्पार्षदस्वरूप अशा तऱ्हेची प्राप्ती झाली. तदनंतर कल्पाच्या अंती सर्व संसाराला स्वस्वरूपांत लीन करून प्रलयावस्थेत शयन करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या हृदयात श्वासाबरोबर मी प्रवेश केला. सहस्रयुगे गेल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेवाला प्राणिकर्मे फलोन्मुख झाली असता जगन्निर्माण करण्याची इच्छा झाली, तेव्हा मरीची आदि दहा ऋषींबरोबर ब्रह्मदेवापासून माझी उत्पत्ती झाली. तेव्हापासून अखंड ब्रह्मचर्यव्रत धारण करून मी तिन्ही लोकांत आंतबाहेर स्वेच्छेने संचार करीत असतो. भगवंताच्या कृपेने मला कोठेही जाण्यायेण्यास प्रतिबंध नाही. स्वतः भगवंताने दिलेली ही स्वरब्रह्मविभूषित वीणा वाजवीत हरिगुण गात मी सर्वत्र संचार करतो. भगवंताची माझ्यावर एवढी कृपा आहे की जेव्हा मी प्रेमगद्‌गद वाणीने भगवल्लीलांचे गायन करतो तेव्हा मंगलकीर्ती पूज्यचरण श्रीभगवान एखाद्याने बोलावल्याबरोबर जसे यावे त्याप्रमाणे येऊन दर्शन देतात. जे लोक भोगांच्या इच्छेने व्यग्र चित्त होऊन विषयभोगात आसक्त आहेत त्यांना या संसारसागरातून तरून जाण्यास केवळ हरिगुणानुवाद गायन हीच दृढ नौका आहे.

एतद्ध्यातुरचित्तानां मात्रा स्पर्शेच्छाया मुहु ।
भवसिंधुप्लवो दृष्टो हरिचर्यामुवर्णनं ॥ - भागवत, १-६-३५

भगवान श्रीहरीच्या भजनाने विषयी पुरुषांचे चित्त जितके लवकर स्थिर होते तितके योगादि साधनांच्या द्वारा होत नाही. म्हणून स्वतःच्या व लोकांच्या कल्याणाकरिता हेच सांगत मी सतत सर्वत्र भ्रमण करीत असतो.

ब्रह्मवैवर्त पुराण ब्रह्मखंड ८ मध्ये कटपभेदाने थोड्या वेगळ्या स्वरूपात नारदांची कथा आली आहे, ती अशी आहे-

ब्रह्मपुत्र झाल्यावरही पित्याच्या आज्ञेने यांनी शिवाचा उपदेश घेऊन पुढे नारायणाच्या आज्ञेने पित्याच्या इच्छेस अनुसरून विवाह केला. नंतर हे त्या भार्येच्या संगतीत अहर्निश रममाण होत असता त्यांना सनत्कुमारांनी बोध करून कृष्णमंत्रोपदेश केला. त्यानंतर सर्वसंगपरित्याग करून तपश्चर्या करण्यास गेले असता श्रीशंकराने यांना कृष्णध्यानोपदेश केला. पुढे हे भारतवर्षात तप करून कृतार्थ झाले व योगप्रभावाने त्यांनी कलेवराचा त्याग केला.

श्रीनारदांना 'देवर्षी' असे संबोधले जाते. ॠषींत देवर्षी, राजर्षी आणि ब्रह्मर्षी असे दोन तीन मुख्य प्रकार आहेत. या शिवाय महर्षी, परमर्षी, श्रुतर्षी आणि काडर्षी असे चार प्रकार कोणीकोणी मानले आहेत. ब्रह्मर्षी राजर्षी व देवर्षी यांची लक्षणे खाली लिहिल्याप्रमाणे आहेत.

कर्मज्ञानोभयपरा विप्रा ब्रह्मर्षयः स्मृताः ।
कर्मगौणा ज्ञानपरा देवर्षय स्मृताः ।
तपश्चर्यां पुरस्कृत्य यथाशास्त्र प्रजावनं ।
ये क्षत्रिया प्रकुर्वन्ति ते तू राजर्षयः स्मृताः । - पुराणवाक्य

कर्मज्ञान उभय मार्गांचे आचरण करणाऱ्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. कर्म गौण मानून ज्ञानप्राधान्य मानणारे ब्रह्मनिष्ठ नारद इत्यादी देवर्षी होत व तपश्चर्येचा पुरस्कार करून यथाशास्त्र प्रजेचे पालन करणारे जनक, अंबरीष इत्यादी राजर्षी होत.

प्रारंभी अनेक नारद होऊन गेले असे सांगितले असले तरी प्रस्तुत भक्तिसूत्रकार देवर्षी नारद हे ज्यांचे चरित्र वर दिले आहे तेच होत. श्रीविष्णूचे जे अवतार झाले त्यात प्रत्येक अवतारप्रसंगी नारदांचा संबंध कमी अधिक प्रमाणात आला होता असे पुराणांतून दिसून येते. तसेच अठराही पुराणांतून नारदांच्या अनेक प्रकारच्या रम्य कथा आढळून येतात. इतके अलौकिक सर्वकांष व्यापक व्यक्तिमत्व लाभलेली व्यक्ती नारदांविना अन्य दिसून येत नाही.

नारद एक का अनेक या वादात पडण्याचे येथे कारण नाही. उपनिषदे, भारत, भागवतादि पुराणे व संतांच्या ग्रंथात ज्यांचे वर्णन केले आहे, भगवंताच्या अवतारकार्यांत वेळोवेळी ज्यांचे साहाय्य झाले आहे, ज्यांनी जगात सर्व युगांत वेळोवेळी भगवद्‌भक्तीचा प्रसार केला आहे, असे ब्रह्मपुत्र नारद हेच सर्वमान्य समजले जातात. नारद पुराणात त्यांचे वर्णन आहे -
गायन् नारायण कथां सदा पापभयापहाम् ।
नारदो नाशयन्नेति नूणामज्ञानजं भयम् ॥
'पापरूपी भय नष्ट करणाऱ्या नारायणाच्या कथांचे गायन करणारे मानवांचे अज्ञानजन्य संसारभय नष्ट करीत नारद संचार करतात.'

महाभारतात हरिवंशपर्वामध्ये नारदांचे खालीलप्रमाणे विस्तृत वर्णन केले आहे.

'ज्या नारदमुनींची अंगकाती जळत्या अग्नीप्रमाणे जाज्वल्य असून त्यांची दृष्टी बालसूर्याप्रमाणे तेजस्वी होती, मस्तकी डाव्या बाजूकडे वळविलेले असे विपुल जटांचे मंडळ होते, अंगावर चंद्रकिरणांप्रमाणे शुभ्र वस्त्रे असून एखाद्या प्रियसखीसारखी बगलेला चिकटून वीणा घेतली होती, उत्तरीय वस्त्राला जोडून एक कृष्णाजिन व सुवर्ण यज्ञोपवीत होते, तो चारही वेदांचा पाठ करीत असून आद्यऋत्विजांपैकी उद्‌गाता होता. त्याची महर्षींत गणना असून तो मोठा ज्ञाता व गायनकलेत निपुण होता. हा चिरंजीव असून याचा ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोकांत अप्रतिहत संचार आहे.' - हरिवंशपर्व, अ. ५४

छांदोग्य उपनिषदाच्या सातव्या अध्यायात नारदांना सनरकुमारांनी आत्मज्ञान दिले व त्यांना सांसारिक शोकातून मुक्त केले असा प्रसंग आहे.

पद्मपुराणांतर्गत भागवत माहात्म्यांत या देवर्षीस लोकविग्रहयुक्त अस्थिर, योगनिधी, योगभास्कर, मुनिसत्तम, विरक्तशिरोमणी, कृष्णदासाग्रणी, महात्मा, भगवत्प्रिय, वैष्णवोत्तम, इ. इ. महत्त्वपूर्ण विशेषणे दिली आहेत. भागवतातही देवर्षिवर्य, ब्रह्मवित्तम, महाभागवत, देवदर्शन, महामुनी, भागवतमुख्य, अमोघदर्शन इ. इ. विशेषणांनी गौरविले आहे. नारदांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली त्यात ईश्वराच्या अवतारांचेच विशेष चरित्र वर्णन केले आहे. तसेच सर्ग-प्रतिसर्ग, वंश-मन्वतरादिकांचे स्वरूप विस्ताराने सांगितले. ईश्वराविना अन्य कोणाच्या नावाने पुराणरचना दिसत नाही. त्याला अपवाद श्रीनारदांचा दिसून येतो. नारदांच्या नावाने बृहन्नारदीयपुराण रचलेले आहे याचे कारण बहुशः व्यासांना नारदोपदेशानेच शांती मिळाली हे असावे. श्रीभागवताच्या पहिल्या स्कंधातच व्यास व नारद यांचा यासंबंधी संवाद आहे.

व्यासांनी एका वेदाचे चार विभाग केले. अठरा पुराणे रचली. महाभारतासारखा सव्वालक्ष श्लोकात्मक अलौकिक इतिहासग्रंथ निर्माण केला, उपनिषद्‌तात्पर्य सांगणारी ब्रह्मसूत्रे रचली. त्यांच्या नावावर व्यासस्मृती प्रसिद्ध आहे. ' व्यासोच्छिष्ट जगत्रय ' म्हणावे एवढी वाङ्‌मयनिर्मिती त्यांनी केली. शुकाचार्यांसारखे महापुरुष त्यांच्या पोटी जन्मास आले. एवढे महत्त्वाचे कार्य, तसेच एवढी तपश्चर्या केली, अशा व्यासांना एवढे करूनही चित्तप्रसन्नता वाटली नाही. अशा खिन्नस्थितीत ते सरस्वती तीरावरील आपल्या शम्याप्रास नामक आश्रमात विषण्ण अवस्थेत बसले असता अकस्मात नारदऋषी तेथे ब्रह्मवीणा वाजवीत उपस्थित झाले. व्यासांनी त्यांचा आदर करून विधिपूर्वक पूजन केले. श्रीनारदही त्यावेळी शांततेने तेथे बसले व हसत हसत त्यांनी व्यासाना विचारले, 'हे व्यास महर्षी ! तुम्ही फार भाग्यवान आहात. तुमचे शरीर व मन आपल्या कर्माने व चिंतनाने संतुष्ट आहे ना ? तुम्ही जी महाभारताची रचना केली ती अद्‌भुत आहे त्यात सर्व काही आहे सनातन ब्रह्मतत्त्वाचाही तुम्ही ब्रह्मसूत्राच्याद्वारा पुष्कळ विचार केला आहे व ते जाणलेही आहे. असे असताही तुमच्याकडे पाहिले असता असे वाटते की, तुम्हाला जेवढी प्रसन्नता वाटावयास पाहिजे आहे तेवढी वाटत नाही. तुम्ही अकृतार्थ अशा संसारी मानवाप्रमाणे शोकग्रस्त दिसता हे आश्चर्य नव्हे काय ?' यावर व्यासमहर्षी म्हणाले, 'नारदां ! तुम्ही म्हणता ते खरे आहे. मी सर्व केले आहे पण माझे हदय संतुष्ट नाही. याचे काय कारण असावे मला कळत नाही. तुम्ही ब्रह्मदेवाचे साक्षात मानसपुत्र आहा तुमच्यापासून चोरून काय ठेवावयाचे आहे ?'
त्वं पर्यटन्नर्कइव त्रिलोकीमन्तश्चरो वायुरिवात्म साक्षी ।
परावरे ब्रह्मणिधर्मतो व्रते स्नातस्य मे न्यूनमलं विचक्ष्य ॥ - भागवत,१-५-७

'तुम्ही त्या पुराणपुरुष परमात्म्याची पूर्ण उपासना केली आहे. तुम्ही सूर्याप्रमाणे तिन्ही लोकात भ्रमण करीत असता व योगबलाने प्राणवायूसमान सर्वांच्या आत प्रवेश करून सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात.'

मी ब्रह्मज्ञानी व वेदज्ञ असूनही योगानुष्ठान व अनेक नियमद्वारा परत्र व शब्दब्रह्म दोघांची प्राप्ती करून घेतली असताही असमाधानी, अशांत का आहे ? माझ्यात कोणती न्यूनता आहे हे आपण कृपा करून सांगा. ' यावर नारद महर्षीनी उत्तर दिले, ' व्यासा ! तुम्ही सर्व काही केले, पण भगवंताच्या निर्मल यशोगुणाचे गायन फार कमी केले आहे. मी असे समजतो की, ज्या ज्ञानाने भगवान प्रसन्न होत नाही ते ज्ञान अपूर्ण आहे. तुम्ही धर्मादिकांचे जसे वर्णन केले आहे तसे भगवान श्रीकृष्णाच्या महात्म्याचे वर्णन केले नाही. जे निर्मळ ज्ञान मोक्षप्राप्तीचे साधन आहे ते भगवद्‌भक्तिविहीन असेल तर तेवढी शोभा देत नाही, मग जे साधन व सिद्धी या दोन्हीकरिता सदा अमंगळरूप आहे असे काम्य कर्म व जे भगवंतास समर्पण केले नाही असे अहेतुक कर्मही कसे शोभा देईल ? हे महाभाग्यवान व्यासा ! तुमची दृष्टी अमोघ आहे. तुम्ही पवित्र कीर्ती आहात. तुम्ही सत्यपरायण दृढव्रती आहात. आता तुम्ही मर्व मानवांना बन्धनातून मुक्त करण्याकरिता भगवंताच्या अचिंत्य लीलांचे समाधिद्वारा चिंतनस्मरण करून प्रेमाने त्याचे कीर्तन करा. तुम्ही जन्मादिधर्मरहित असूनही जगत्कल्याणाकरिता जन्म घेतला आहे, म्हणून तुम्ही विशेष रूपाने भगवत्‌ लीलांचे कीर्तन करा. कारण विद्वानांनी ही गोष्ट महत्त्वाची म्हणून सांगितली आहे की, मनुष्याची तपश्चर्या, वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान व दानाचे एकमात्र प्रयोजन हेच आहे. त्याची सफलता यातच आहे की, भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे, गुणाचे कीर्तन केले जावे.' असा उपदेश नारदांनी केल्यानंतर मग श्रीव्यास महर्षींनी श्रीभागवत-रचना केली व त्यामुळे त्यांना ममाधान प्राप्त झाले.

श्रीएकनाथमहाराजानी नारदांनी व्यासाला ब्रह्मदेवाने सांगितलेला चतुश्लोकी भागवताचा बोध दिला असे म्हटले आहे.
तो ब्रह्मवीणावाहतु । ब्रह्मपदे गीती गातू ।
तेणे ब्रह्मानदे नाचवू । विचरे डुल्लतू भूतळी ॥
तो आला सरस्वती तीरा । तंव देखिले व्याम ऋषीश्वरा ।
तो संशयाचिया पुरा । अतिदुर्धरामाजी पडिला ॥
वेदार्थ सकळ पुराण । व्यासे केलें निर्माण ।
परी तो न पवेचि आपण । निजसमाधान स्वहिताचे ॥
तो संशय मुद्रा आसू । पडोनि होता बुडतू ॥
तेथे पावला ब्रह्मसुतु । नाभी म्हणतु कृपाळू ॥
तेणे एकाती नेऊनि देख । व्यासासि केले एकमुख ।
मग दाविले चाची श्लोक । भवमोचक निर्दुष्ट ॥ - एकनाथी भागवत, अ १-१४९ ते ५३

श्रीमद्‌भागवतामध्ये नारदांचे उल्लेख स्कंधास्कंधातून आले आहेत. भागवत, स्कंध २ अ. ५ मध्ये नारद ब्रह्मदेव संवाद असून नारदांनी ब्रह्मदेवास महत्त्वाचे असे आध्यात्मिक विषयांत नऊ प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरेही ब्रह्मदेवाने सविस्तर दिली आहेत. यात सर्व ब्रह्माण्डाची उत्पत्ती कशी झाली, तसेच विराट स्वरूप व विभूतीचे वर्णन, भगवंताच्या लीलावतारांचे वर्णन इ. अनेक विषय आले आहेत. यावरून ब्रह्मदेवाच्या कृपेने नारदांना अलौकिक ज्ञान झाले होते असे दिसते. शेवटी ब्रह्मदेवाने नारदाला लोकांचा उद्धार करण्याकरिता मी सांगितलेले हे भागवत धर्माचे स्वरूप समाजात भक्ती वाढेल अशा स्वरूपाने विस्तार करून वर्णन कर असे सांगितले आहे.
इदं भागवत नाम यन्मे भगवतोदितम् ।
संग्रहायं विभूतीना त्वमेतद्विपुली कुरु ॥ ५१ ॥
यथाहरौ भगवति मृणा भक्तिर्भविष्यति ।
सर्वात्मन्यखिलाधारे इति संकल्प वर्णय ॥ ५२ ॥ - भागवत, २-७

भागवताच्या चतुर्थस्कंधामध्ये नारदांनी ध्रुवाला भगवत्स्वरूपाचे उत्कृष्ट वर्णन करून ध्यानप्रकार सांगितला व 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या महामंत्राचा जप करण्यास सांगितले आहे. त्याच्या प्रभावाने सहा महिन्यातच त्यास भगवद्प्राप्ती झाली तसेच त्याच स्कंधात पुढे प्राचीनबर्ही राजासही नारदांनी अध्यात्माचा उपदेश दिला आहे, त्यात विस्तृत रूपाने पुरंजन कथेच्या रूपकाने चारपाच अध्यायांत मानवी जीवनाचे संपूर्ण स्वरूप स्पष्टपणे सांगितले आहे. तो सर्व विचार अध्यात्म दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो प्राचीनबर्हि राजा प्रथम अतिकर्ममार्गी होता. अनेक यज्ञांत त्याने फार पशुहिंसा केली होती, ती परिणामी कशी घातक आहे हे नारदांनी त्यास पटवून दिले आहे. यानंतर याच प्राचीनबर्हि राजाचे शतद्रुतीपासून झालेले दहा पुत्र प्रचेता या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी अनंतकालपावेतो जलात उभे राहून तपश्चर्याही केली व त्यांना भगवान विष्णूचे दर्शनही झाले होते. त्या प्रचेत्यांना नारदांनी भक्तिमार्गाचा उत्कृष्ट उपदेश केला आहे. नारद म्हणतात, हे प्रचेतसांनो ! या लोकांत मानवाचे तेच कर्म सफल आहे, तोच जन्म, तीच वाणी व तेच मन सफल आहे की, ज्याच्याद्वारा सर्वांच्या सर्वेश्वर श्रीहरीची सेवा केली जाते. ज्यांच्याद्वारा श्रीहरीला प्राप्त करून घेतले जाणार नाही अशा शौक्ल (विशुद्ध मातापित्याच्या अंशापासून उत्पन्न होणाऱ्या) सावित्र ( उपनयन संस्कारजनित) आणि याज्ञिक (यज्ञदीक्षेने होणाऱ्या), तीन प्रकारच्या जन्मांचा, वेदोक्तकर्मांचा, देवतासमान दीर्घ आयुष्याचा, शास्त्रज्ञान, तप, वाणीचे चातूर्य, धारणशक्ती, तीव्रबुद्धी, बल, योग, सांख्य, संन्यास, वेदाध्ययन, व्रत, वैराग्यादि अन्य साधनांचा पुरुषास काय उपयोग आहे ? ज्या प्रकारे वृक्षाच्या मुळास पाणी घालण्याने शाखा-उपशाखा या सर्वांना ते पाणी पोहोचते, अथवा भोजनद्वारा प्राणांना तृप्त करण्याने सर्व इंद्रियांचे पोषण होते त्याप्रमाणे या भगवंताची आराधना करण्याने सर्व देवतांचे आराधन केल्यासारखे होते. कारण सृष्टिकाळी सर्व विश्व त्याच्यापासूनच उत्पन्न होते व त्याचेच ठिकाणी लीन होते. यास्तव सर्व प्राणिमात्रांचा आत्मा, जगाचे निमित्त व उपादानकारण, कर्ता, ब्रह्मादिकांचाही नियंता असा जो भगवान त्याचीच अखंड सेवा करा. ज्यांच्या सर्व कामनांचा निरास झाला आहे अशा साधूंच्या पवित्र अंतःकरणामध्ये निरंतर असणाऱ्या भक्तिभावाने स्थिर झालेला भगवान मी भक्तजनांच्या स्वाधीन आहे, असे म्हणतो व या साधूंच्या हृदयातून केव्हाही निघून जात नाही.' असा उपदेश प्रचेत्यांना केल्यानंतर ते नारद ब्रह्मलोकास गेले, व ते प्रचेतागणही भक्तिभावसंपन्न होऊन वैकुंठलोकास गेले. (भागवत स्कंध ४-३१)

भागवत स्कंध पाचच्या पहिल्या अध्यायात प्रियवत नावाच्या महान सामर्थ्यवान राजास नारदांनी बोध दिला, अशी कथा आहे.

भागवत षष्ठ स्कंधात दक्षप्रजापतीने ब्रह्मदेवाच्या आज्ञेने, जगात प्रजावृद्धी व्हावी म्हणून तपसामर्थ्याने दहा हजार पुत्र निर्माण केले होते. त्यांना नारदाने आपल्या उपदेशाने संसाराचे सर्व दोष पटवून देऊन अध्यात्माचा उपदेश केला व निवृत्तिमार्गी बनविले. ते संसारापासून परावृत्त झाले त्यांना हर्यश्व अशी संज्ञा होती. त्यानंतर दक्षप्रजापतीस फार क्रोध आला व शोकही झाला. ब्रह्मदेवाने त्याचे सांत्वन केले. नंतर त्या दक्षाने पुन्हा तप सामर्थ्याने शबलाश्व नावाचे सहा हजार पुत्र उत्पन्न केले. त्यांनाही नारदमुनीने तत्त्वज्ञानाचा उपदेश करून निवृत्तिमार्गी प्रपंच-पराङ्‌मुख बनविले. यावरून नारदांच्या वाणीत केवढे अद्‌भुत सामर्थ्य होते, ती किती प्रभावी होती, हे सिद्ध होते. तेही पुत्र परत आले नाहीत व ध्यानधारणा करीत बसले हे पाहून त्या दक्षाला फार क्रोध आला व त्याने नारदांस शाप दिला की, हे संतानछेदका ! ज्या अर्थी तू आमचे अकल्याण केले आहेस, त्या अर्थी लोकामध्ये भ्रमण करीत असता तुला एका ठिकाणी कोठेही निश्चल स्थान प्राप्त होणार नाही.
दक्ष शापू नारदांसी पाही । मुहूर्त राहू नये एके ठायीं ।
तो शापू हरिकीर्तनीं नाहीं । या लागी तो पाही कीर्तननिष्ठु ॥ नाथभागवत २-२६

या षष्ठ स्कंधातच अध्याय चौदा व पंधरामध्ये नारदांनी पुत्रमरणामुळे अत्यंत दुःखित झालेल्या चित्रकेतू राजाला आध्यात्मज्ञानाचा उपदेश करून शोकमुक्त केले, अशी विस्तृत कथा आहे.

भागवताच्या सातव्या स्कंधात युधिष्ठिर व नारद यांचा संवाद आहे. त्यात नारदांनी प्रल्हादाचे सर्व चरित्र सांगितले आहे. हिरण्यकश्यपू तपश्चर्येस गेला असता त्याची पत्नी कयाधू हिला इंद्र नेत असता, श्री नारदांनीच इंद्रापासून तिला सोडवून आपल्या आश्रमात आणून ठेवले. त्यावेळी प्रल्हाद तिच्या गर्भात होता. तेथे नारदांचे नित्य भजन-संकीर्तन व भक्तिमार्गाचा उपदेश सतत कानावर पडत असल्याने त्या गर्भावर त्याचे उत्तम संस्कार घडले व त्याचाच परिणाम पुढे प्रल्हादाचे जीवन भक्तिप्रेममय बनण्यात झाला. प्रल्हादाने आपल्या सर्व सहाध्यायी असुरबालकांस जो व्यापक असा भक्तितत्त्वाचा बोध केला त्यावेळी तो त्यांना म्हणाला की, हे ज्ञान मला नारदांनी दिले, ते त्यांना नरनारायण ऋषीपासून प्राप्त झाले होते.
ज्ञानंयदेतदमलं दुरवापमाह नारायणो नरसखः किल नारदाय ।
एकांतिनां भगवतस्तदकिंचनानां पादारविंदरजसाप्लुसदेहिनां स्यात् ॥ भाग-७-६-२७

याच स्कंधात धर्मराजाच्या प्रश्नाला अनुसरून नारदांनी वर्णधर्म तसेच प्रत्येक आश्रमाचे धर्म विस्तृत रूपाने सांगितले आहेत. यावरून धर्मशास्त्रातही नारदमहर्षींचा अधिकार फार मोठा होता हे सिद्ध होते. त्याच्या नावावर 'नारद-स्मृती' ही आहे व तिच्यातही सर्वच धार्मिक विषय व सदाचार, नीती, कर्तव्ये, इत्यादी विचार विस्तृतपणे केला आहे.

भागवत अष्टमस्कंधामध्ये देवांना अमृत प्राप्त झाले, पण असुराना यत्न करूनही ते मिळाले नाही तेव्हा सर्व असुर एक झाले व त्यांनी देवांबरोबर युद्ध आरंभिले. त्यात कित्येकवेळी देवांचा पराभव तर असुरांचा विजय होई, तर कित्येक वेळी असुरांचा पराभव तर देवांचा विजय होई. मात्र उभयपक्षाची फार हानी होऊ लागली असता नारद तेथे गेले व त्यांनी देवांना स्पष्टपणे उपदेश करून ते युद्ध बंद करविले, यावरून नारदांचे देवांवरही किती वर्चस्व होते, हे कळून येते. भागवत दशम स्कंधात आरंभीच नारद व कंस याची भेट झाली आहे व नारदांनीच कंसाला वसुदेवदेवकी, अन्य यादव, नंद-यशोदा इ. गोकुळवासी हे सर्व देवांश आहेत असे सांगितले. त्यामुळे कंसाने त्यांना फार त्रास देण्यास प्रारंभ केला. श्रीकृष्णाचाही फार द्वेष करू लागला. श्रीकृष्णाला मारण्याकरिता कंसाने अनेक राक्षस निरनिराळ्या वेषाने गोकुळात पाठविले, पण त्या सर्वांना श्रीकृष्णाने मोक्ष दिला, हे पाहून श्रीकृष्णाच्या अगाध शक्तीचे त्यास भय वाटू लागले व त्या भयाने त्याला श्रीकृष्णाचा ध्यास लागला. कोणत्याही निमित्ताने भगवद्‌ध्यास लागणे हे उद्धाराचे साधन होय. म्हणून ही कंसावर नारदांची कृपाच झाली !

कुबेरपुत्र नलकुबर व माणिग्रीव हे दोघे एकवेळी अप्सरांसहवर्तमान जलक्रीडा करीत असता अकस्मात नारदऋषी तेथून जात होते. त्यांना पाहून अप्सरांनी लज्जेने आपली वस्त्रे परिधान केली, पण हे दोघे मदिराप्राशनाने आणि धनमदाने अंध होऊन उन्मत्त झालेले तसेच वस्त्रहीन क्रीडा करू लागले. तेव्हा नारदांना क्रोध आला व त्यांनी तुम्ही असे नग्न व उन्मत्त आहा तर तुम्हास वृक्षयोनी प्राप्त होवो असा शाप दिला. पुढे ते जेव्हा पश्चात्तापाने शरण आले तेव्हा पुन्हा श्रीकृष्णावतारात तुमचा उद्धार होईल व तुम्ही पूर्वपदाला प्राप्त व्हाल असा आशीर्वाद दिला. यावरून नारदांचे निग्रहानुग्रह सामर्थ्य किती होते, हे लक्षात येईल.

श्रीकृष्णाच्या नाशाकरिता कंसाने निरनिराळ्या वेषाने अनेक राक्षस पाठविले, त्यात केशीनामक एक राक्षस महाभयंकर अश्वाचा वेष घेऊन आला. त्याचाही कृष्णाने वध केला. त्यावेळी नारद गोकुळात आले व त्यांनी श्रीकृष्णाचे आध्यात्मिक स्वरूपाने वर्णन केले व यापुढे तुम्ही अमुक अमुक लीला करणार आहा, असे श्रीकृष्णाचे भावी कार्य सांगून गेले. यानंतर कृष्णपुत्र प्रद्युम्न यास शंबरासुराने जन्मानंतर दहा दिवसांच्या आंत चोरून नेले व आपल्या मायावती नामक दासीस सांभाळण्यास दिले. ती पूर्वीची मदनाची स्त्री रती होती. शंकराने मदनास क्रोधाने जाळले. त्यानंतर तो कृष्णपुत्र म्हणून सर्वांग सुदर असा रुक्मिणीचे उदरी जन्मला तोच शंबरासुराने चोरून नेऊन समुद्रात टाकला. तेथेतो कोळ्याच्या जाळ्यात सापडला तेव्हा त्या कोळ्यांनी घाबरून राजा जो शंबरासुर त्यास नेऊन दिला. याने मायावतीस मसांभाळण्यास दिला. त्या बालकाचे ते अलौकिक लावण्य पाहून तिला फार आश्चर्य व आनंद झाला व विचार करू लागली की, हा बालक कोण असावा ? तितक्यात नारद तेथे आले व त्यांनी तिला सांगितले की, हा तुझा पती कामदेवच आहे. त्यामुळे तिचा संशय दूर झाला.

एकदा श्रीकृष्ण द्वारकेत आपल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया व पुत्र-पौत्रांसह आनंदाने राज्य करीत असता तेथे अकस्मात नारदऋषी आले तेव्हा श्रीकृष्ण भगवंताने आपल्या सिंहासनावरून उठून अतिनम्रतेने किरिटासहवर्तमान त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून अर्घ्य-पाद्यादिकांनी पूजा केली व त्याचे पुढे हात जोडून त्यांना आपल्या सिंहासनावर आदराने आणून बसविले. नारदांचे चरणतीर्थ श्रीकृष्णाने भक्तीने आपल्या मस्तकावर धारण केले. नारदांना यशश्री, औदार्य, ज्ञानवैराग्य, ऐश्वर्यादि षड्विध गुणांनी युक्त 'भगवान' असे विशेषण देऊन आणखीही अनेक स्तुत्यर्थक वचनांनी नारदांचे वर्णन श्रीकृष्ण भगवंताने केले आहे. भागवत स्कंध सहा अध्याय पंधरामध्ये अंगिरा ऋषींनी नारदांना 'भगवान' असे म्हटले आहे. एष ब्रह्मसुतः साक्षान्नारदो भगवान् ऋषिः ॥ ६-१५-१७.

श्रीकृष्णाचा मोठा प्रपंच-परिवार व त्यात सर्वत्र प्रतीत होणारे त्यांचे अस्तित्व व योगैश्वर्य नारदांनी अवलोकिले आहे. बाणासुराच्या येथे श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आहे व बाणासुर त्याचा वध करण्यास उद्युक्त झाला आहे, हे वृत्तही नारदांनेच द्वारकेत येऊन श्रीकृष्णास सांगितले. त्यानंतर श्रीकृष्णाने शोणितपुरास जाऊन बाणासुराचा पराभव करून अनिरुद्धास परत आणले. श्रीकृष्णाच्या बहुतेक लीलांतून नारद ऋषींचा संबंध आला आहे.

पुढे तर नारद श्रीकृष्णाचे अखंड सान्निध्य प्राप्त व्हावे म्हणून नित्य द्वारकेत वास्तव्य करू लागले. तेथे मुहूर्तभर तू एके ठिकाणी राहणार नाहीस हा दक्षशापही चालत नव्हता 'दक्षशाप न बाधी कृष्णापाशी । म्हणोनि नारद वसे द्वारकेसी ॥ एकनाथी भागवत १-२८०) असेच श्रीनारद द्वारकेत असता एकदा वसुदेवाच्या गेले. वसुदेवाला फार आनंद झाला. त्याने आदराने नारदांची पूजा केली व पुष्कळ वर्णनही केले वसुदेव म्हणतो ' भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सर्व देहिनां । कृपणानां यथा पित्रोरुत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥' (भा. ११-२-४) - हे ऋषिवर्य, आपले भ्रमण सर्व जीवांच्या कल्याणार्थ असते. मातापिता जसे बालकाच्या कल्याणाची काळजी घेतात तसेच महाभागवत आपल्यासारखे संतसज्जन दीनांची काळजी घेऊन त्यांच्या कल्याणार्थ सतत झटत असतात.' या श्लोकावरील आपल्या टीकेत श्री. नाथमहाराज म्हणतात -
नारदां तूं भगवद्‌रूप । तुझी भेटी करी निष्पाप ।
तुवा कृपा केलिया अल्प । स्वये चित्स्वरूप ठसावे ॥ ४९ ॥
नारदा तूं देवा समान । हेही उपमा दिसे गौण ।
तेचि विषयी निरूपण । वसुदेव आपण निरूपी ॥ ५३ ॥
देवापासूनि भूतसृष्टी । सुखदुःखें शिणे पोटी ।
अतिवृष्टी कां अनावृष्टी । भूतकोटी आकांतू ॥ ५४ ॥
त्या देवा परिस साधू अधिक । हे साचचि मज मानले देख ।
देव चरिते उडी सुखदुःख । साधू निर्दोख सुखदाते ॥ ५५ ॥
त्याही माजी तुजसारखा । जोडल्या कृपाळू निजात्म सखा ।
तै पेठपिके परमार्थ सुखा । हा महिमा लोकां कदा न कळेचि ॥ ५६ ॥

यानंतर नारदांच्या समत्व स्थितीचे वसुदेव वर्णन करतो -
तूं देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपासीं ।
रावण ने‍ऊनि तुज एकांतासी । निजगुह्यासी स्वयें सांगे ॥ ६० ॥
देव रावणें घातलें बंदीं । तो रावण तुझे चरण वंदी ।
शेखी रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमधीं असेना ॥ ६१ ॥
जरासंधु कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं ।
आणि कृष्णाचे सभेमाझारीं । आप्तत्वें थोरी पैं तुझी ॥ ६२ ॥
नाम घेवों नेदी देवाचें । हें बिरुद हिरण्यकशिपूचें ।
त्यासी कीर्तन तुझें रुचे । विषमत्व साचें तुज नाहीं ॥ ६३ ॥
तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गुह्यज्ञान ।
ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥ ७२ ॥
प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हां ।
तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥ ७३ ॥
वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचें पाप ।
शेखीं सायुज्याचे दीप । दाविशी सद्‌रूप दयाळुवा ॥ ७६ ॥ - नाथभागवत २

एवढे नारदांचे वर्णन केल्यावर वसुदेवाने नारदांस भागवत धर्म विस्ताराने सांगण्याची विनंती केली. नारदांना अश्चर्य वाटले, प्रत्यक्ष परमात्मा याचे पोटी कृष्णरूपाने अवतरला असता मला हे विचारतात ? यावर वसुदेव म्हणाला, आम्ही पूर्वी देवाची पुष्कळ आराधना, तप इत्यादी केले. पण ते आमचे भजन ममतेमुळे वाया गेले. देव आमच्या तपाने प्रसन्न झाला असता त्या देवमायेने मोहित आम्ही त्याला तू आमचा पुत्र हो असे मागितले. त्याप्रमाणे तो पुत्ररूपाने आमच्या उदरी आला व तो नेहमी आम्हालाच मोठेपणा देतो.
तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान ।
तोचि वंदी माझे चरण । म्हणे बाळकपूर्ण मी तुझे ॥ --नाथभागवत २-८८
म्हणून आपण संतश्रेष्ठ आहा आपण मला भागवतधर्म मविस्तर सागा, असे वसुदेव वचन ऐकून नारदांस फार संतोष वाटला. श्रीनाथमहाराज म्हणतात :
यालागी मुक्त मुमुक्षु विषयीजन । भागवतधर्मे निवती संपूर्ण ।
तोचि वसुदेवे केला प्रश्न । तेणें नारद पूर्ण सुखावला ॥ २-१२८

नारदांनी एका पुरातन इतिहासाचा अवलंब करून विदेह नवयोगेश्वर यांच्या सवादाच्याद्वारे भागवतधर्माचे विस्तृत निरूपण केले. विशेषतः तोच भागवतधर्म या भक्तिसूत्रातून पटवून दिला आहे.

पद्यपुराणात एक कथा अशी आहे की श्रीशंकरानी भगवंताच्या गुणलीला रसिक देवर्षी नारदांला श्रीराधा-कृष्णाची उपासना, त्याचे स्वरूप व मंत्रादिकांच्या बाबतीत बऱ्याच रहस्यमय व महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. श्रीकृष्णाचे 'मंत्रचिंतामणी' नामक दोन अत्युत्तम मंत्र एक षोडशाक्षर व दुसरा दशाक्षर हे त्यांनी सांगितले. त्यापैकी षोडशाक्षर मंत्र म्हणजे "गोपी जनवल्लभ चरणान् शरण प्रपद्ये ।" हा व दशाक्षर "नमो गोपी जनवल्लभाभ्याम् ' हा होय, हे सांगून ब्रजमहात्म्य व श्रीकृष्ण-राधा ध्यान-उपासनाही सांगितली आहे.
स्कंद पुराण माहेश्वर खंड कुमारिका खंडात एका ठिकाणी श्रीसूर्यदेवतेने नारदांचे वर्णन 'देवर्षी नारद हे सर्व प्रकारे धन्य आहेत. ते त्रैलोक्याच्या यावत्स्वरूपाला पूर्णपणे जाणतात.' असे केले आहे.

नारदांचे एवढे महत्त्वपूर्ण वर्णन सर्वत्र केले असता नारद हे कळलावे आहेत, निष्कारण दोन पक्षात भांडणे लावतात, त्यामुळे अनेक युद्धे झाली आहेत, असे कोठे कोठे म्हटले जाते. या विषयात स्कंदपुराणात स्पष्ट उल्लेख सापडतो. तेथे प्रत्यक्ष अर्जुनानेच नारदांस प्रश्न केला आहे, 'हे देवर्षे, आपण सर्व प्राणिमात्रांविषयी समान भाव ठेवणारे, जितेंद्रिय, रागद्वेषरहित आहा तथापि तुमच्या ठिकाणी कलह लाव ण्याची जी प्रवृत्ती आहे तिच्यामुळे अनेक युद्धे झाली व अनेक देवता, गंधर्व राक्षस, मुनी नष्ट झाले. महाराज, अशी आपली लीला का होते ? माझ्या या संशयाचे निवारण आपण केले पाहिजे.' अर्जुनाच्या मुखातून हे ऐकल्यावर नारद हसले. तेथे बाभ्रव्य नावाचे एक हारीत कुलात ज्यांचा जन्म झाला असे मुनी होते, त्यांच्या मुखाकडे पाहून नारदांनी संकेत केला. नारदांचे अंतःकरण जाणून ते बाधव्य अर्जुनास म्हणाले, 'हे अर्जुना, तुम्ही नारदांना विचारले ते सर्व खरे आहे. या विषयात भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या त्या तुम्हास सांगतो. एकदा भगवान श्रीकृष्ण सर्व यादवांसमवेत महीसागरसङ्‌गम या क्षेत्री यात्रेकरिता आले होते. त्याचे समागमे वसुदेव, उग्रसेन, प्रद्युम्न, वधू हेही होते. तेथील तीर्थात स्नानदानादि विधी केल्यानंतर श्रीनारद महर्षी तेथे आले असता त्यांचीही श्रीकृष्णाने पूजा केली. सर्व यादवही तेथे उपस्थित होते. तेव्हा उग्रसेनाने श्रीकृष्णास म्हटले, 'हे जगदीश्वरा, मी एक संशय विचारतो, त्याचे आपण समाधान करावे. ज्याची आपण पूजा केली हे महाबुद्धिमान नारद आहेत व सर्व जगात यांची ख्याती आहे पण हे एवढे चंचल का ? वायूप्रमाणे सतत सर्व जगात भ्रमण करीत असतात' तसेच परस्परात भांडणे लावणे यांना का आवडते ? तसेच आपल्या ठिकाणी यांचे अत्यंत प्रेमही कसे आहे ?' यावर श्रीकृष्ण म्हणाले, 'तुम्ही विचारले ते खरे आहे. मी याचे कारण सांगतो. पूर्वी दक्षप्रजापतीने नारदांला दोन शाप दिले होते. त्याचे कारण दक्षपुत्रांना नारदांनी निवृत्तिमार्गाचा उपदेश केला होता. (ही कथा आरंभी आली आहे) त्यात पहिला शाप असा होता की तू सदा या जगात भ्रमण करीत राहशील, तुला एका ठिकाणी स्थान राहणार नाही व दुसरा शाप, तू इकडच्या चहाड्या तिकडे सांगत राहशील, म्हणजेच कलह लावीत राहशील. या दोन्ही शापांचा नारदांनी जशाचा तसा स्वीकार केला. कारण साधुत्व हेच आहे की स्वतः समर्थ असूनही दुसऱ्याच्या अपराधाची क्षमा करणे.' श्रीकृष्ण म्हणाले, 'नारदऋषी प्रथम हे पाहतात की अमूक दैत्यराक्षस याचा विनाशकाल प्राप्त झाला आहे, तेव्हा ते त्याची कलहभावना वाढवितात. चहाडी म्हणून खोटे न बोलता खरीच गोष्ट त्याला सांगतात. म्हणून हे त्या पापाने लिप्त होत नाहीत. सर्वत्र भ्रमण करीत असूनही यांचे मन यापासून विचलित होत नाही. म्हणून भ्रमणदोषाने हे भ्रांत होत नाहीत ? ' श्री एकनाथ महाराजही सांगतात :
पाहे पां देवर्षि नारदु । विनोदे न मोडे समाधिबोधू । - नाथभागवत २-४३०
' माझ्यावर त्याचे निरतिशय प्रेम असण्याचे कारण माझेही त्याच्यावर तसेच प्रेम आहे. अहो ! मी देवराज इंद्राने जे नारदांचे स्तोत्र केले आहे त्याच स्तोत्राने दिव्यदृष्टिसपन्न नारदांची सदास्तुती करीत असतो.'
अहं हि सर्वदास्तौमि नारद देवदर्शनम् ।
महेंद्रगवितेनैव स्तोत्रेण श्रृणुतन्नृप ॥

यानंतर नारदस्तुतीचे वीस श्लोक आलेले आहेत. प्रत्येक श्लोकाचे शेवटी 'नारदं प्रणमाम्यहम्' 'मी नारदांला प्रणाम करतो' असे श्रीकृष्णांनी म्हटले आहे व या वीस श्लोकातून नारदांचे पुष्कळच वर्णन केले आहे 'जे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले, जे अहंकाररहित आहेत, ज्याचे शास्त्रज्ञान व चरित्र कोणापासून झाकलेले नाही. उद्वेग, क्रोध, भय याचा ज्याच्या ठिकाणी सर्वथा अभाव आहे, जे धीर असूनही दीर्घसूत्री नाहीत. जे कामना वा लोभवश मिथ्याभाषण करीत नाहीत, समस्त भाविक ज्यांची उपासना करतात अशा नारदांला आम्ही नमस्कार करतो. जे अध्यात्म तत्त्वाला जाणणारे आहेत, जितेंद्रिय, ज्यांच्या ठिकाणी सरळता व्यापून आहे, जे यथार्थ भाषण करणारे आहेत जे तेज, बुद्धी, यश, नय-विनय, जन्म, तसेच तप इत्यादी सर्व गोष्टींनी महत्त्वाला प्राप्त झाले आहेत, ज्याचा स्वभाव सुखमय, वेष सुंदर, प्रकाशमय, पवित्र, शुभ दृष्टिसंपन्न, सुंदर भाषण करणारे, जे उत्साहपूर्वक सर्वांचे कल्याण करणारे असून ज्यांचे ठिकाणी पापाचा लेशही नाही, सतत परोपकारनिरत, महान पंडित, आलस्यरहित, भोगात लिप्त होत नाहीत असे असून ज्यांच्या मुखातून अनेक विचित्र अशा कथा ऐकावयास मिळतात.
नार्थे क्रोधे च कामे व भूतपूर्वोऽस्ति विभ्रमः ।
येते नाशिता दोषाः नारदं तं नमाम्यहम् ॥
म्हणजे लोभ-काम-क्रोधादिकामुळेही ज्यांना कधी श्रम झाला नव्हता, ज्यांनी या दोषांचा संपूर्ण नाश केला आहे, जे कल्याणस्वरूप, भगवान व भागवतधर्माचे ठिकाणी दृढ श्रद्धा ठेवणारे आहेत, जे सर्वसङ्‌गापासून तत्त्वतः दूर आहेत, पण संगात आहेत असे वाटतात, ज्यांच्या ठिकाणी कोणत्याही संशयाला जागा नाही, जे उत्कृष्ट वक्ते आहेत, जे कोणत्याही शास्त्राचे ठिकाणी दोषदृष्टी ठेवीत नाहीत, तपश्चर्या हेच ज्यांचे जीवन आहे, भगवतचिंतनाविना ज्यांचा काल जात नाही, जे आपल्या मनास ताब्यात ठेवतात, ज्यांना अर्थलाभ झाला असता हर्ष होत नाही, व न झाला तर खेदही होत नाही, ज्याची बुद्धी स्थिर व आत्मा अनासक्त आहे.
तं सर्वगुणसंपन्नं दक्षं शुचिभकातरम् ।
कालज्ञं ख नयज्ञं च शरणं यामि नारदम् ॥
स्कंदपुराण माहेश्वर कुमारिका खंड ५४-२७-४६
जे सर्वगुणसंपन्न, दक्ष, पवित्र, भयरहित व नितिज्ञ आहेत अशा नारदांना मी शरण जातो.' 'अशा प्रकारे नारदांवर माझी श्रद्धा आहे म्हणूनच त्यांचेही माझ्यावर निरतिशय प्रेम आहे इतकेच नव्हे, जे कोणी या स्तोत्राचा पाठ करून वरील गुण अंगी आणण्याचा प्रयत्न करतील तेही नारदांच्या कृपेस पात्र होतील'.

श्रीनारद महर्षींनीच दत्तात्रेयास ज्ञानोपदेश केला अशी कथा वायुपुराणात आहे. अत्री ऋषीच्या येथे तिन्ही देव श्रीदत्तात्रेयरूपाने अवतरले. पण जसे जसे ते मोठे होऊ लागले तशी तशी त्यांची संसाराविषयी अप्रीती होऊन ते उदास राहू लागले. बालोन्मत्त पिशाच्चवत् त्यांची वृत्ती होती. त्यावेळी अत्री ऋषी व अनुसूया दोघांनाही फार चिंता निर्माण झाली. अत्री हे ब्रह्मदेवाच्या आज्ञेने जगत्‌सर्जनाच्या कार्यास लागले. त्या कर्माचा त्यांना अभिनिवेश होता व पुत्रानेही ही कर्मपरंपरा चालवावी असे त्यांना वाटत होते. पण दत्तात्रेयाची वृत्ती प्रारंभापासूनच उदासीन होती. एके दिवशी अकस्मात देवर्षी नारद तेथे आले तेव्हा अत्री व अनुसूया या उभयतांनी आपली पुत्रविषयक चिंता त्यांना निवेदन केली. नारदाने दत्तात्रेयाची उदास वृत्ती पाहून त्यांना सांगितले की, हा पुत्र सृजन कार्य करू शकणार नाही, याची वृत्ती अध्यात्मप्रवण आहे तुम्ही याच्यापासून ती अपेक्षा करू नका. याच्या इच्छेप्रमाणे हा ब्रह्मज्ञानी होऊन जगदुद्धार करील व मी त्याला हे अध्यात्म ज्ञान शिकवीन. असे म्हणून त्यांनी श्रीदत्तात्रेयाला ब्रह्मज्ञान सांगितले. वायुपुराणातील वरील कथेचा उल्लेख भागवत दशम स्कंधावर ज्यांनी विस्तृत व प्रसादगर्भ 'हरि- वरदा' नामक टीका लिहिली, श्रीएकनाथमहाराजाच्या कृपेने ज्यांना आरोग्य, भक्तिज्ञान व कविताशक्ती प्राप्त झाली त्या कृष्णदयार्णवांनी आपल्या हरिवरदा ग्रंथात अध्याय शेहेचाळीसांत केला आहे.

एकदा श्रीनारद महर्षी हे हिमालयावर गेले असता हिमवानाने व त्यांच्या पत्नीने त्यांचा आदर करून पूजन केले. त्यावेळी पर्वतकन्या पार्वती तेथेच होती. ती वयात आली होती. उभयतांना तिच्या विवाहाची काळजी होती. त्यांनी नारदांना विचारले की, हिचा विवाह कोणाबरोबर होईल ? तेव्हा नारदांनी तिचे हस्तसामुद्रिक पाहून सांगितले की, हिला श्रीशंकर हे वर म्हणून लाभणार आहेत. हे ऐकून उभयतांना काही विशेष आनंद झाला नाही. कारण शंकर म्हणजे स्मशानात नग्न राहणारे. भूत, प्रेतगणांच्या सहवासात रमणारे असे आहेत. पण पार्वतीला मात्र फार आनंद झाला. नंतर नारदांच्या सांगण्यावरून पार्वतीने अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या केली व शंकरांना प्रसन्न करून घेतले. म्हणजे शंकर-पार्वतीच्या मीलनास नारद ऋषीच कारण झाले, ही कथा पुराणाच्या आधारे श्रीवाल्मीकी अवतारस्वरूप श्रीतुलसीदास यांनी आपल्या मानसरामायण बालकांडात विस्ताराने सांगितली आहे.

स्कंद पुराण माहेश्वर कुमारिका खंडात नारद व अर्जुन यांचा संवाद विस्तृत सांगितला आहे. अर्जुनाने नारद महर्षींना योगमार्गाच्या तात्त्विक स्वरूपाचा प्रश्न केला. त्यावर नारदांनी संपूर्ण योगमार्गाचे विवेचन केले आहे. योगमार्गातील यम-नियमांचे सर्व प्रकार, आसनाचे विविध प्रकार, प्राणायामाचे लघू, मध्यम, उत्तरीय असे तीन प्रकार व त्या तीन प्रकाराने म्हणजे लघुप्राणायामाने खेद, मध्यमाने कम्प व उत्तरीय ( उत्तम वा तृतीय) प्राणायामाने विषादाला जिंकले जाते. तसेच पूरकादी जे प्रकार योग-ग्रंथात सांगितले आहेत, त्याचाही विचार केला आहे व शेवटी या उत्तम प्राणायामाने शान्ती, प्रशान्ती, दीप्ती व प्रसाद हे क्रमशः दिव्य गुण प्राप्त होतात असे म्हटले आहे. स्वाभाविक तथा आगन्तुक पापाची निवृत्ती व पापवासनांचे शमन यास शांती हा गुण मानला आहे. मानवबुद्धीद्वारा लोभ व मोह या दोषांचा पूर्णपणे निरास होणे हे 'प्रशांती' चे लक्षण सांगितले आहे. भूत-भविष्य, दूरस्थ व अदृश्य पदार्थांचे ज्ञान होणे म्हणजे 'दीप्ती.' संपूर्ण इंद्रियांची प्रसन्नता, बुद्धी व प्राणांची शुद्धी म्हणजे 'प्रसाद' होय. ही प्राणायामाची चार फले सांगितली आहेत. अशा रीतीने प्राणायाम, प्रत्याहार, धारणा इत्यादी योगांचाच फार विस्तारपूर्वक विचार केला आहे. तसेच शरीरात षटचक्रस्थाने कोठे कोठे आहेत, त्या चक्रांचे स्वरूप, त्याची दले सांगून त्या प्रत्येकाचे ठिकाणी धारणा करून त्यांच्या द्वारा पदकाचे शोधन होऊन तो योगी अक्षरस्वरूपास प्राप्त कसा होतो, हे सांगून समाधिस्वरूपाचा विचार सांगितला आहे. यानंतर नारदांनी अर्जुनास या योगमार्गात प्रातिभ, श्रावण, दैव, भ्रम व आवर्त हे पाच उपसर्ग कसे येतात तेही सविस्तर प्रत्येकाच्या लक्षणासह सांगितले आहे. संपूर्ण शास्त्राची प्रतिभा (ज्ञान) होणे, हा प्रातिभ उपसर्ग आहे. कारण या योगाने अहंकार वाढतो, तो योगी योगमार्गापासून च्युत होतो. दुरून शब्दाचे श्रवण होणे श्रावण, हा जरी सात्त्विक असला तरी गर्वास कारण म्हणून उपसर्ग आहे. देवतांच्या अष्टयोनीचे ज्ञान होणे ही शक्ती प्राप्त होणे हा 'दैव' उपसर्ग होय. पाण्याच्या भोवऱ्यात सापडलेला माणूस जसा व्याकुळ होतो तसे सहसा प्रकट झालेल्या विविध विज्ञानाच्या आवर्तामध्ये सापडून जी चित्ताची व्याकुळता होते तो 'आवर्त' नामक उपसर्ग आहे; हा रजोगुण प्रधान आहे. यानंतर मृत्यू ओळखण्याची साधने ही पुष्कळच दाखविली आहेत. तसेच, पंचतत्त्वावर विजय मिळविण्याने सिद्धी कशा प्राप्त होतात व त्याचे चौसष्ट प्रकार कसे सिद्ध होतात तेही सविस्तर प्रतिपादिले आहे. शेवटी हा योगी ब्रह्मस्वरूपास कसा प्राप्त होतो याचाही विचार केला आहे. योगविषयक एवढा व्यापक विचार योगग्रंथातूनही सापडत नाही. त्याचे अनेक सूक्ष्मातिसूक्षम भेद नारदांनी अर्जुनास दाखविले. यावरून योगमार्गातही नारद महर्षींचा अधिकार किती श्रेष्ठ होता, हे कळून येते.

भविष्य पुराणातील श्रीराधाष्टमीव्रत कथनप्रसंगी श्रीकृष्णानी नारदांस श्रीराधादेवीचा व आपला अत्यंत प्रेमभाव कसा आहे व राधेची भक्ती किती श्रेष्ठ आहे, हा सविस्तर विचार सांगितला आहे तसेच सनत्कुमार संहितेमध्येही नारद महर्षींना सनत्कुमारांनी प्रेमभक्तीचा विशेष प्रकार सांगितला आहे.

पद्यपुराण भागवतमहात्म्याच्या प्रारंभी अशी कथा आहे की, श्रीनारद महर्षी एकदा कलियुगारंभी फिरत फिरत यमुनेच्या काठावर आले. तेथे त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले. तेथे एक तरुण स्त्री अत्यंत दुःखी मनाने विषण्ण स्थितीत उभी आहे, तिच्या पुढे दोन वृद्ध पुरुष निश्चेष्ट अवस्थेत पडलेले आहेत, त्यांची स्थिती अगदी अचेतनवत झाली आहे, ती त्यांची सेवा करीत आहे व त्यांना उठविण्याचा प्रयत्न करीत आहे. असहाय अवस्थेत कोणी आपले रक्षण करणारा भेटेल की काय म्हणून चहूकडे पाहत आहे, अशा स्थितीत नारद तेथे गेले. त्यांना पाहून ती स्त्री म्हणाली, 'हे साधो ! क्षणभर येथे थांबा. माझी चिंता दूर करा. तुमच्या संतांच्या कृपेने माझे दुःख दूर होईल, असे मला वाटते. जेव्हा भाग्य उदित होते तेव्हा आपल्यासारख्या साधूचे दर्शन होते.' नारदांनी त्या स्त्रीला विचारले, 'हे स्त्रिये तू कोण आहेस ? व हे निश्चेष्ट पडलेले दोन पुरुष कोण आहेत ? यांची अशी स्थिती का झाली व तू स्वतः अशी दुःखी का दिसतेस ?' हे ऐकून ती स्त्री म्हणाली, ' महाराज ! मी भक्ती या नावाने प्रसिद्ध आहे व हे दोघे माझे पुत्र आहेत व या कलिकालाच्या दोषामुळे हे वृद्धावस्थेने जर्जर झाले आहेत. मीही अशीच वृद्ध झाले होते, पण फिरत फिरत वृंदावनास आले, त्यामुळे मला पुन्हा पूर्ववत तारुण्य प्राप्त झाले. पण हे माझे पुत्र, तसेच वृद्ध व दुर्बल राहिले. कारण ज्ञानवैराग्याचा ग्राहक कोणी भेटला नाही.' यावर नारदांनी सध्या कलियुग आहे, त्याचा हा परिणाम आहे म्हणून कलियुगाचे विस्तृत स्वरूप व परिणाम समाजावर कसा अनिष्ट होत आहे, हे सांगून नंतर ते म्हणाले, असे जरी हे पापी युग आहे, तरी यातही एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की, येथे केवळ नामस्मरणभक्तीने मानवाचा उद्धार होतो, अशी पुष्कळ वचने आहेत. तुला घाबरण्याचे कारण नाही. कृतत्रेतादी युगामध्ये ज्ञानवैराग्य हे मोक्षाचे साधन मानले जात होते, ' कलौ तु केवला भक्तिर्वब्रह्मसायुज्यकारिणी ' (२-४) येथे केवळ भक्तीनेच ब्रह्मसायुज्य प्राप्त होते. म्हणून भगवंताने तुला एवढे सुंदर रूप देऊन निर्माण केले आहे. तू त्यावेळी त्या भगवंताला विचारलेस की, देवा ! मी आता काय करावे ? तेव्हा भगवान म्हणाले, माझ्या भक्तांचे तू पोषण कर. त्यांना विसंबू नकोस. ज्यावेळी तू त्यांच्या आज्ञेचा अंगीकार केलास तेव्हा तो श्रीहरी प्रसन्न झाला व तुझ्या सेवेकरिता मुक्ती ही दासी दिली व ज्ञान-वैराग्य पुत्रत्वाने दिले. पण या घोर कलियुगाच्या प्रभावामुळे त्यांची ही अवस्था झाली. पण तू चिंता करू नकोस. मी माझ्या सामर्थ्याने, हे भक्तिदेवी घरोघरी तुझी स्थापना करीन. '
तस्मिन्स्त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने ॥ २-१३,
'जर मी हे न करीन तर, मी हरिदास म्हणवून घेणार नाही. कारण कलियुगात भक्ती हेच साधन श्रेष्ठ आहे' आणखीही या भक्तियोगाचे महात्व्य सांगून व आपली प्रतिज्ञा व्यक्त करून नारदांनी त्या भक्तिदेवीला आश्वासन दिले. तेव्हा ती म्हणाली, ' हे नारदां ! तू धन्य आहेस तुझ्या ठिकाणी माझी निश्चल श्रद्धा राहील. तू कृपा करून माझी चिंता दूर केलीस. पण माझे हे ज्ञानवैराग पुत्र अद्यापी अचेतनच आहेत, त्यांना तू जागे कर.' तेव्हा नारदांनी आपल्या हाताने त्यांना हालवून जागे केले व कानांतही मोठ्याने ओरडून सांगितले, 'हे ज्ञाना, हे वैराग्या, लौकर जागे व्हा.' त्या बरोबर ते दोघे जाग्रत झाले. त्यावेळी नारदांना अकस्मात सनरकुमारांची भेट झाली. त्यांनीही नारदांचे वर्णन केले आहे. ते म्हणतात,
अहो नारद धन्योऽसि विरक्तानां शिरोमणिः ।
सदा श्रीकृष्णदासानमग्रणीर्योगभास्करः ॥ २-५४.
' हे नारदां ! तू धन्य आहेस, सर्व विरक्तांचा शिरोमणी आहेस, तसेच श्रीकृष्णभक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. योगाचा सूर्याप्रमाणे प्रकाशक आहेस ' -प. पु. भागवत महात्म्य, अ. २.

श्रीवाल्मीकी ऋषीचे गुरूही श्रीनारदच होते, ही कथा सर्वत्र प्रसिद्धच आहे. श्रीएकनाथमहाराज सांगतात,
केवळ वाट पाडा देख । भजनेवीण एकाएक ।
महाकवी केला वाल्मीक । अमर अवश्यक वंदिती त्यासी ॥ ७० ॥
देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी ।
ऐसा तू कृपाळ होसी । असाथासी कुवांसा ॥ ७१ ॥
वरिवरी दाविसी मिणधाकोप । कोपोनि सांडविशी त्याचे पाप ।
शेखी सायुज्याचे दीप । दाविसी सद्‌रूप दयावाळुचा ॥ ७२ ॥
-नाथभागवत, अ. २

अध्यात्म रामायणामध्ये स्वतः वाल्मीकी ऋषीनेच श्रीरामचंद्राजवळ नारद- कृपेनेच माझा उद्धार झाला, असे आपले विस्तृत चरित्र सांगितले आहे.

पाच पांडवांचा एकाच द्रौपदीशी विवाह झाला असता त्यांच्यात परस्पर वैमनस्य उत्पन्न होण्याचा संभव आहे, हे पाहून श्रीनारदमहर्षी तेथे गेले व त्यांना एकाच स्त्रीविषयी परस्परात द्वेष निर्माण झाल्याने सुंदउपसुंद या दोन भावांचा कसा नाश झाला, ही कथा विस्तृत रूपाने सांगून फार सावध राहण्याविषयी सर्वांना बोध केला. त्याला अनुसरूनच पांडवानी आपल्या वर्तनाचे नियम बनविले व एक बंधू द्रौपदीशी एकान्तात असला व त्या वेळी चुकून जरी दुसरा तेथे गेला-तर त्याने बारा वर्षे तीर्थयात्रेस गेले पाहिजे, अशा नियमाने स्वतःस बांधून घेतले. एका ब्राह्मणाच्या गाई चोराने रात्री पळवून नेल्या असता तो अर्जुनाकडे आला. तेव्हा अर्जुन शस्त्रे आणण्याकरिता धर्मराजाचे मंदिरात गेला. तेथे दोघे एकांतात असलेले त्याने पाहिले. शस्त्रे घेऊन ब्राह्मणाच्या गाई चोरापासून सोडवून आल्यावर त्याने पूर्वनियमाप्रमाणे बारा वर्षे तीर्थयात्रा केली. तेव्हा धर्मराजाने त्याला पुष्कळ सांगितले की, तू काही मुद्दाम आला नव्हतास. शस्त्राच्या निमित्ताने आला होतास तेव्हा हा नियम तू नाही पाळलास तरी हरकत नाही. पण अर्जुन म्हणाला, धर्माचरणात पर्याय नसतो. तो जसाच्या तसाच आचरला पाहिजे. यावरून पांडवांवरही नारदांचा किती प्रभाव होता. त्यांच्यात परस्पर प्रेम राहावे याची किती कळकळ त्यांना होती हे सिद्ध होते.

नारदांच्या नावावर सर्व पुराणांतून, तसेच महाभारतांतील पर्वापर्वातून अनेक कथा उपलब्ध आहेत. त्यांत व्यवहार, धर्मशास्त्र, नीतिबोध, राजकारण, अध्यात्म, सामाजिक न्याय हे सर्वच विषय जरी आले आहेत. तरी विशेषरूपाने त्यांनी अनेकांना भक्तिमार्गाला लावले. भक्तीचा भारतातच नव्हे तर सर्व ब्रह्माण्डात प्रचार ते करीत असत हे स्पष्टरूपाने सिद्ध होते. अठरा पुराणे व भारतादी ग्रंथांतून त्यांच्या संबंधी ज्या अनेक कथा दिसून येतात, त्या सर्वच संग्रहित करून लिहावयाच्या म्हणजे ते एक्क महापुराणच होईल !

भारतातील सर्व युगात झालेल्या ऋषिमुनींनी व साधुसंतांनी देखील नारदांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे हे त्याच्या वाङ्‌मयात आपणास आढळते. नारद नावाचा अर्थ सामान्यत. नारद चरित्राचा विचार केल्यानंतर 'नारद' शब्दाच्या अर्थाचा विचार करू. पुराणादिकांतून नारद शब्दाचे अनेक अर्थ केलेले आढळून येतात.

१. 'नरे परमेश्वरे सदा तिष्ठतीति नारं ज्ञानं तद्दपाति व्यासादिभ्य इति नारदः'
नर म्हणजे परमेश्वर त्याच्या ठिकाणी सदैव असणारे ते नार म्हणजे ज्ञान, ते व्यासादिकांना देतो म्हणून त्यास नारद म्हणतात.
२. ' यद्वा नरेषु जीवेषु तिष्ठतीति नारमज्ञानं द्यति खंडयति इति नारदः'
नर म्हणजे जीव त्यांचे ठिकाणी असणारे नार म्हणजे अज्ञान, त्याचे खंडण करतो म्हणून तो नारद होय.
३. 'अरदो दोषदो न भवतीति वा नारदः'
अर म्हणजे दोष देणारा होत नाही म्हणून नारद.
४. 'यद्वा ऽ ऽ रः शस्त्रभेदस्तद्वदायुः खंडको न भवति इति नारद.'
अर म्हणजे शस्त्र, ते जसे दुसऱ्याचा आयुष्याचा नाश करते तसा 'अरद' म्हणजे नाशक जो होत नाही म्हणजे सर्वांचा रक्षण करणारा होतो तो नारद. ५. नारं नरसमूहं दयते पालयति ज्ञानदानेनेति नारदः '
नार म्हणजे नरसमूह, त्याचे ज्ञानदानाने पालन करतो म्हणून नारद.
६. 'नार म्हणजे नरांच्या, मानवाच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्याची अथवा नराकृती परब्रह्म भगवान श्रीकृष्ण, त्याची जनमानसात सर्वांच्या हृदयात भक्तीच्या उपदेशाने स्थापना करतो तो नारद' म्हणजे येथे निर्गुण व सगुण स्वरूपांतील परमात्म्याच्या भक्तीचा ते प्रसार करतात हा अर्थ अपेक्षित आहे.
७. ब्रह्मवैवर्त पुराणात 'नारद' शब्दाची खालील प्रमाणे व्याख्या केली आहे.
ददाति नार ज्ञानंच बालकेभ्यश्च बालकः ।
जातिस्मरो महाज्ञानी तेनाऽयं नारदाभिधः ॥
'नार म्हणजे ज्ञान, ते जो ध्रुव प्रल्हाद इत्यादि बालकांना देतो व पूर्वजन्मातील स्मृती ज्याला असून जो महाज्ञानी आहे त्यास नारद ही संज्ञा आहे.'
तात्पर्य, नारद या नावावरूनही या पुरुषाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.

श्रीएकनाथमहाराज आपल्या भावार्थ रामायणनामक प्रासादिक ग्रंथात नारदांचे श्रेष्ठत्व सांगतात.
ब्रह्मपुत्र श्रीनारद । सर्वेंद्रियी ब्रह्मबोध ।
ब्रह्मवीणा सुस्वरनाद । नित्य आनंद ब्रह्मपदी ॥ ३ ॥
ब्रह्मानंदे डुल्लत । ब्रह्मसृष्टी विचरत ।
भुवने भुवन हिंडत । स्वेच्छा विचरत ब्रह्माण्ड ॥ ४ ॥ भावार्थ रामायण यु. का. ७५.

नारदांच्या नावावरील वाङ्‌मय

आतापावेतो आपण श्रीनारद ऋषींचा अधिकार केवढा थोर आहे हे पाहिले, सर्व युगांत, सर्व लोकांत, सर्व शास्त्रांत, सर्व समाजांत, व सर्व कार्यांत त्यांचा प्रवेश आहे. सत्ययुग, त्रेता, द्वापार किंबहुना या घोर कलिकालांतही अधिकारी भक्तांना त्यांचे दर्शन होत असते. गोलोक, वैकुंठ, सत्यलोकापासून पातालादि सर्व लोकांत मनांत येताच योगबलाने कोठेही अप्रतिहत संचार ते करू शकतात. वेद, स्मृती, पुराणसंहिता, ज्योतिष, संगीत, इत्यादी सर्वांत त्यांची गती असून अनेक शास्त्रांवर अधिकृत असे त्यांच्या नावावर वाङ्‌मयही आहे. त्यांचे चरित्र पाहिल्यास ते स्वतःकरिता काहीच करीत नव्हते. ज्या कार्यात एखाद्याचे कल्याण होत असेल अथवा भगवंताची काही अद्‌भुत लीला प्रकट होत असेल तेच कार्य करीत असत. त्यांचे कलह लावणे इत्यादी चेष्टादेखील लोकहितार्थ व भगवल्लीलासमाधानार्थ होत होत्या.

देवर्षी नारदांच्या नावावर 'नारदपांचरात्र' नामक मोठा आगम ग्रंथ प्रसिद्ध आहे. तो फार विस्तृत आहे. महाभारत शांतिपर्वात व्यासांनी या पांचरात्राविषयी 'इदं महोपनिषदं चतुर्वेदसमन्वितमम्' असे म्हटले आहे. श्रीशंकरांनी हे नारदांना सांगितले. तसेच ' यथानिपीय पीयूषं न स्पृहाचान्यवस्तुषु । पञ्चरात्रमभिज्ञाय नान्येषुच स्पृहा सताम् ॥' म्हणजे ' अमृतप्राशन केल्यानंतर अन्य वस्तूची इच्छा होत नाही त्याप्रमाणे पञ्चचरात्राचे ज्ञान झाल्यावर संताना दुसऱ्या वस्तूची स्पृहा होत नाही. ' येथे 'रात्र' शब्द ज्ञानवाचक आहे 'पंच' म्हणजे विस्तारपूर्वक, 'रात्र' म्हणजे ज्ञान ज्यात सांगितले आहे त्यास पाचरात्र म्हणतात. तत्त्व, मुक्ती, भक्ती, योग, विषय ही त्याची पाच अंगे आहेत. तसेच पांचरात्रे एकूण ब्राह्म, शैव, कौमार वशिष्ठ, कापिल, गौतमीय व नारदीय अशी सात आहेत. नारदांनी इतर सहा पांचरात्रे, वेद, पुराण, इतिहास, धर्मशास्त्रे इत्यादिकाचे मंथन करून ज्ञानामृतरूप हे नारदीय पंचरात्र प्रस्तुत केले आहे, असे नारदपंचरात्रातील खालील श्लोकांत सांगितले आहे.
षट्‌पञ्चरात्रं वेदांश्च पुराणानि च सर्वशः ।
इतिहासधर्मशास्त्रं शास्त्रं च सिद्धियोगजम् ॥
दृष्ट्या सर्व समालोक्य ज्ञानं संप्राप्य शंकरात् ।
ज्ञानामृतं पञ्चरात्रं चकार नारदो मुनिः ॥
सारभुतं च सर्वेषां वेदानां परमाद्‌भुतम् ।
नारदीय पंचरात्रं पुराणेषु सुदुर्लभम् ॥ - नारदपञ्चरात्र, १-१-५८

प्राचीनतम वैष्णवसाहित्याचे नारद पंचरात्रागम हे एक महत्त्वाचे अंग आहे. यात जन्म, मृत्यू, सुखदुःख, इह व पारलौकिक समस्यांवर विचार केला आहे. यात धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचाही सविस्तर विचार केलेला दिसून येतो. विशेषतः सविशेष मोक्ष म्हणजे वैकुंठलोकप्राप्ती यावर विशेष भर दिला आहे. उपासनामार्गांचा विस्तृत असा अनेक अंगोपांगांनी यात विचार केला आहे, तसेच राधाकृष्ण प्रेमाचे विस्तृत माहात्म्य वर्णिले आहे. नारदपंचरात्रात शुकाचार्यांजवळ व्यासमहर्षी म्हणतात, ' हे शुका ! प्राचीनकाली गोलोकांतर्गत शतशृंगपर्वतावर भगवती विरजेच्या तटावर पवित्र वटवृक्षातळी श्रीराधेच्या समक्ष ब्रह्मदेवास प्रत्यक्ष श्रीकृष्णाने नारदपंचरात्र सांगितले. ब्रह्मदेवाने ते ऐकून भगवती गंगेच्या तटावर शंकरापुढे याचे वर्णन केले. शंकराने ते सर्व नारदांला सांगितले व नारदाने सूर्य-ग्रहणाच्यावेळी पुष्कळ तीर्थांचे ठिकाणी माझे ममक्ष याची पुनरावृत्ती केली. (ना. पा. १-१-३८.)

श्रीनारदऋषी स्वतःच याचे वर्णन करतात -
वेदेभ्यो दधिसिंधुभ्यश्चतुर्भ्य सुमनोहरम् ।
सज्ज्ञानमंथदण्डेन संनिमध्यं नवंनवम् ॥
नवनीतं समुद्धृत्य नत्वाशंभोः पदाम्बुजम् ।
विधिपुत्रो नारदोऽहं पंचरात्रं समारभे ॥ १-१-१०, ११
वेदरूपी दधिसिंधूचे हे नवनीत आहे, ज्ञानसिंधूचे हे अमृत आहे. भगवल्लीला विस्ताराकरिता शंकराज्ञेने नारदाने हे पाञ्चरात्रशास्त्र नारायणांश व्यासदेवांना दिले. असे आणखीही पुष्कळ वर्णन या ग्रंथात केले आहे. भागवतात दिग्दर्शिलेल्या सात्वतसंहितार्गत चतुर्व्यूहोपासनेचे मूळ या नारद पाञ्चरात्रागमातच आहे असे म्हटले जाते. यातच भागवतमत म्हणतात यात वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध अशा चार व्यूहांची कल्पना करून त्यांची उपासना सांगितली आहे. यात वासुदेव परमात्मापासून संकर्षण म्हणजे जीव उत्पन्न होतो असे म्हटले आहे. श्रीशंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावरील आपल्या भाष्यात अनेक द्वैतमतांच्या खंडणप्रसंगी याही मताचे खंडण केले आहे. कारण उपनिषदांत जीवाची उत्पत्ती मानली तर द्वैतापत्ती येते, ती शंकराचार्यांना मान्य नाही. पण या पाञ्चरात्रात जी उपासनेची अभिगमन, उपादान, ईज्या, स्वाध्याय, योग अशी पाच अंगे सांगितली आहेत. [ अभिगमन- उपास्याकडे श्रद्धेने जाणे, उपादान- पूजा-उपचार गोळा करणे, ईज्या - पूजा, स्वाध्याय - उपास्यविषयक स्तोत्रादिकांचे पठण, योग-ध्यान. ] त्यांचा निषेध आम्ही करीत नाही, असे शंकराचार्यांनी तेथे स्पष्ट म्हटले आहे. कारण नारद या व्यक्तीबद्दल त्यांच्या ठिकाणीही पूर्ण आदर होता.

नारदांच्या नावावर 'नारदस्मृती'ही उपलब्ध आहे. त्यात सर्व आचार धर्मांचा सांगोपांग विचार केला आहे. आणि सामान्य व विशेष नीतीही विस्ताराने सांगितली आहे. नारदपुराण, नारदस्मृती, नारदपाञ्चरात्रागम व सर्व पुराणांतून, महाभारत-रामायणादि ग्रंथांतून नारदांच्या नावावर अनेक आख्याने, उपआख्याने व चरित्रभाग सापडतो. यावरून नारद या व्यक्तीचे श्रेष्ठत्व मान्य करावे लागते. नारदांच्या नावावर एक उपनिषदही प्रसिद्ध आहे.

सूत्रग्रंथ :

नारद ही व्यक्ती धर्म, नीति, व्यवहार, राजकारण, तत्त्वज्ञान इत्यादी सर्व विषयांत प्रवीण होती असे जरी दिसून येते तरी विशेषतः नारदांचे श्रेष्ठत्व भक्ति- मार्गातच मानले जाते, हे मागील अनेक पुराणांतर्गत पुराव्यांवरून सिद्ध होते. अनेक अभक्त, भक्त, साधक, विषयी, पामर जनांना भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करण्याचे कार्य नारदांनी केले आहे. त्यानही त्यांनी 'भक्तिसूत्र' रचना केली, हे परमोपकारक असे त्यांचे कार्य मानावे लागते. एखादी व्यक्ती मूर्तस्वरूपाने या जगात नांदते तोपावेतो ती आपले अंगीकृत कार्य करीतच राहते पण ते कार्य तात्कालिक न राहता सर्वकालोपयोगी व्हावयाचे असेल तर ते वाङ्‌मय निर्मितीद्वारेच होऊ शकते. त्याचा उपयोग चिरकालिक स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ, व्यासांची पुराणे; वाल्मीकींचे रामायण, योगवासिष्ठ, श्री. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, श्रीएकनाथांचे भागवत हे ग्रंथ आजही साधक भक्तांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे आहेत. भिन्न भिन्न दर्शनकारही आपापली मते प्रतिपादन करणारे वाङ्‌मय निर्माण करीत असतात. त्यात दोन प्रकार दिसून येतात. एक विस्ताराने आपल्या मताचे प्रतिपादन करणारे, व दुसरे संक्षेपाने आपल्या मतातील सिद्धान्त पटवून देणारे. हा जो दुसरा प्रकार आहे यास सूत्रग्रंथ म्हटले जाते. सर्वशास्त्रावर त्या त्या शास्त्रकारांनी सूत्रे रचिली आहेत. वेदांच्या काही शाखांवर ही सूत्ररचना केलेली आहे. त्यास श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे, अशा संज्ञा आहेत. यांनाच कल्पसूत्रेही म्हटले जाते.

वेदांच्या पूर्वभागावर महर्षी जैमिनी यांनी सूत्ररचना केली आहे त्याचे बारा अध्यायआहेत. त्यास पूर्वमीमामांसाशास्त्र असेही संबोधले जाते. 'अथातोधर्मजिज्ञासा ' हे त्याचे पहिले सूत्र आहे, तर वेदांच्या उपनिषदभागास प्रमुख मानून महर्षी वेद व्यासांनी 'ब्रह्मसूत्रे' रचिली आहेत. ज्याचे समन्वयाध्याय, अविरोधाध्याय, साधनाध्याय व फलाध्याय असे चार अध्याय असून, पाचशे पंचावन्न सूत्रे आहेत. त्यावर अद्वैत, विशिष्टात, शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत, द्वैत इत्यादी मते प्रतिपादन करणाऱ्या सर्वच आचार्यांची भाष्ये, त्यावर टीका-उपटीका, विवरणे इत्यादी उपलब्ध आहेत. व्याकरणशास्त्रावर पाणिनी ऋषींची सूत्रे आहेत. योगशास्त्रप्रवर्तक पतञ्जली यांची योगशास्त्रावर सूत्रे प्रसिद्ध आहेत. कणाद-गौतम ऋषिप्रणीत न्यायशास्त्रावरील सूत्रेही प्रसिद्ध आहेत. सांख्यशास्त्रावरही सांख्यसूत्रे सापडतात. शैवागम मतात शिवसूत्रे आहेत. सारांश, सर्वच लहान-मोठ्या दर्शनकारांनी, शास्त्रकारांनी आपले मत सिद्ध करण्यास्तव सूत्ररचना केल्या आहेत. जसे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, योग, सांख्य, न्याय इत्यादी दर्शने आहेत, तसे भक्ती हेही एक महत्त्वाचे दर्शन-शास्त्र आहे. कारण नारदांनीच आपल्या सूत्रात पुढे 'भक्तिशास्त्राणि मननीयानि ।' असे स्पष्ट म्हटले आहे. भक्ती हे जर स्वतंत्र दर्शन आहे तर त्यावरही सूत्ररचना होणे अवश्य होते. ती करण्यास योग्य अधिकारी व्यक्तीच पाहिजे. वेदशास्त्रे-दर्शने यांत सर्व प्रमेयांचा फार विस्तार केला गेला आहे. तो सर्व पाठ करणे, ध्यानात ठेवणे कठीणच काय पण अशक्यच आहे. याकरिता त्यातील जी महत्त्वाची प्रमेये लक्षात राहणे, आवश्यक आहे तेवढी वेगळी काढून संक्षिप्तरूपाने पण कोणताही महत्त्वाचा आशय वगळू न देता सूत्रात मणी ओवावेत किंवा फुले ओवावीत त्याप्रमाणे ओवली जातात. 'वेदान्तवाक्य कुसुमग्रथनार्थत्वात् सूत्राणां ।' असे ब्रह्ममीमांसेत वेदान्तसूत्राबद्दल म्हटले आहे. या रीतीने भक्तिशास्त्रावरही सूत्रे रचण्याचे महत्त्वाचे कार्य नारद महर्षींनी केले आहे. या विषयात श्रीनारदांएवढा अधिकारी पुरुष अन्य सापडणे शक्य नाही. भक्तिप्रचार हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभावच होऊन बसला होता. भक्ती हे स्वतंत्र शास्त्र आहे, ते पुरुषार्थप्रयोजक आहे, ही भावना त्यांची होती म्हणूनच त्यांना ही सूत्ररचना करावी वाटली. सूत्र या शब्दाची पारिभाषिक व्याख्या खालील प्रमाणे आहे.
अल्पाक्षरमसंदिग्ध सारवद्‌विश्वतोमुख्यम् ।
अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः ॥
सूत्ररचनेत अक्षरे थोडी असतात. अक्षरे थोडी असली तरी अर्थामध्ये संशयही न राहिला पाहिजे म्हणून असंदिग्ध म्हटले आहे. विस्तृत ग्रंथात सांगितलेल्या सर्व विषयांचे सार या थोड्या शब्दांत आले पाहिजे. अल्पशब्दांतून अर्थही पुष्कळ निर्माण झाला पाहिजे. म्हणून विश्वतोमुखम् हे सूत्राचे विशेषण आहे. तसेच त्यातील कोणतेही अक्षर निरर्थक नसले पाहिजे. काही वाक्यात च, तु, वै, इत्यादी निरर्थक अक्षरांची योजना करण्यात येते. सूत्रात अशी निरर्थक अक्षरे नसतात व रचना निर्दोष असते. हे जे सूत्रांचे लक्षण पूर्वसुरींनी केले आहे ते संपूर्णपणे नारदांच्या या भक्तिसूत्रास लागू पडते.

इतर भक्तिसूत्रे :

श्रीनारदमहर्षीMच्या पूर्वीही भक्तिशास्त्रावर दोन सूत्रग्रंथ लिहिले गेले होते, असे दिसून येते. एक अंगिरस-मध्यमीमांसादर्शन (दैवीमीमांसादर्शन) होय. महर्षी अंगिरसाचे दैवीमीमांसा किंवा मध्यमीमांसादर्शन हे युक्तियुक्त आहे. त्यात अनेक युक्तींच्याद्वारे भक्ती हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे हे पटवून दिले आहे. पण ते दर्शन विशेष प्रचारात नाही. दुसरे, शांडिल्य यांचे भक्तिदर्शन हे सूत्रात्मक आहे. नारदभक्तिसूत्रांत शांडिल्यांचा 'आत्मरत्यविरोधेनेति शांडिल्यः' म्हणून निर्देश केला आहे. पण ती सूत्रे भक्तिसंप्रदायात विशेष रूढ झाली नाहीत. तसेच समजावयास क्लिष्टही वाटतात. भक्तियोगाच्या सर्वच विषयांची सांगोपांग चर्चा त्यात दिसून येत नाही. त्या सूत्रांची संख्या एकशे दोन आहे. त्याचे तीन अध्याय असून, प्रत्येक अध्यायात दोन दोन आन्हिके आहेत. त्या सूत्रांतही नारदांच्या नांवाचा उल्लेख पहिल्या अध्यायातील द्वितीयान्हिक, सूत्र अकरामध्ये केला आहे. या शाडिल्यांच्या भक्तिसूत्रावर श्रीस्वप्नेश्वरकृत भाष्य, श्रीभवदेव मिश्रकृत अभिनवभाष्य, नारायणतीर्थकृत भक्तिचंद्रिका टीका इत्यादी उपलब्ध आहेत. त्यात भक्तिचंद्रिका ही टीका विस्तृत व ग्रंथातरातील अनेक प्रमाणादिकांनी युक्त आहे. तीतही भक्तिशास्त्राचा विस्तृत ऊहापोह केला आहे.

'भक्तिमीमांसा' या नावाने काशीमध्ये प्रकाशित एक पुस्तक उपलब्ध आहे. तोही सूत्रग्रंथच आहे. शांडिल्य सूत्रांप्रमाणे ती एकशे दोन सूत्रे आहेत. मात्र त्याचे चार अध्याय असून प्रत्येक अध्यायाचे दोन पाद आहेत. बोपदेवकृत मुक्ताफल नावाचा जो भक्तिशास्त्रावर ग्रंथ आहे त्याच्या आधारे ह्या सूत्राची रचना झाली असावी असे वाटते. कारण मुक्ताफल ग्रंथाप्रमाणेच या सूत्रात भक्तिविषयक विचार आढळतात. इसवी सनाच्या तेराव्या शतकात बोपदेवाचा काल येतो. त्यानंतर कोणीतरी ही सूत्रे रचली असावीत असे मानावे लागते. सूत्रकर्त्याचे नाव प्रसिद्ध नाही. बहुतेक ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकर्त्याचे नाव असते, पण भक्तिमीमांसेच्या शेवटी तसा कोणाचा नामनिर्देश नाही, म्हणून वरील अनुमानाने ही सूत्रे अलीकडची असावीत असे वाटते. पण याही सूत्रातून भक्तिविषयक चांगला विचार केलेला दिसून येतो. भक्तीचे विहित-निषिद्ध असे भेद कल्पून निषिद्धातील व विहितातील अनेक प्रकार कल्पिले आहेत. भक्ती हा भाव नसून रस आहे असे स्पष्ट म्हटले आहे. भक्तिविषयक अभ्यासूंना हाही मूत्रग्रंथ चांगला उपयुक्त होणारा आहे.

तशीच 'परभक्तिसूत्राणि' या नावाने श्रीस्वामी हरिहरानंदारण्यप्रणीत भक्तिसूत्रे उपलब्ध आहेत. त्यांची संख्या अवघी सव्वीस एवढीच आहे. 'अथ भक्तितत्त्वानुशासनम् ।' हे प्रथम सूत्र आहे. शश्वच्छांती व कृतकृत्यता हे भक्तीचे फल शेवटच्या दोन सूत्रातून सांगितले आहे या सूत्रकाराची विशेष माहिती व निश्चित काल मिळत नाही. भक्तिमीमांसासूत्रे व ही परभक्तिसूत्रे नारदभक्ति- सूत्राहून अर्वाचीन आहेत असेच मानावे लागते.

नारदांची भक्ति सूत्रे :

नारदांना भक्तिसूत्रे रचण्याचे कारण काय घडले असावे याचा विचार केला तर असे वाटते की, जीव मनुष्यदेहात येतो तो स्वोद्धाराचा अधिकारी होऊन येतो. अनेकांना उद्धाराची आवश्यकताही वाटते व त्याकरिता शक्य ते प्रयत्नही केले जातात. पण उद्धार हा काही प्रत्यक्ष इंद्रियादिकांनी प्रतीत होणारी वस्तू नाही. ती शास्त्राप्रमाणेच अनुभवास येणारी अवस्था आहे. त्याकरिता साधक शास्त्राकडे धाव घेतो तेव्हा अनेक साधनांचा पसारा त्याच्यापुढे उभा राहतो. कित्येक साधने स्वरूपानेच कठीण आहेत. कृच्छ्रचांद्रायणादि व्रते, तपे इत्यादी. कित्येकदा अधिकाराची अपेक्षा असते, कित्येक विशिष्ट देशकालव्यक्तीपुरती मर्यादित असतात. अशा स्थितीत प्राप्त अशा कलिकालात सर्वांना सर्वकाळी सुलभ असे भक्ती हेच साधन व्यासादि ऋषिमुनींनी निश्चित केले. त्यांच्या सुलभतेचा विचार पुढे सूत्र ५८ च्या विवेचनाचे वेळी होईलच. पण या भक्तिमार्गातही मतामतांचा गलबला होऊन अनेक पंथ, उपपंथ, उपासना पद्धती, भिन्नभिन्न आचार, तसेच भिन्न प्रयोजने निर्माण झाली. त्यांतही भेदाभेदांचा वादग्रस्त प्रश्न निर्माण केला गेला. भज्य-भक्ती भक्त यांच्या स्वरूपात संदेह निर्माण झाले, तसेच भक्तीच्या आत्यंतिक प्रयोजनाचा विसर पडून ऐहिक-पारत्रिक फलाकरिताच भक्ती करणाऱ्या आर्तअर्थार्थींची संख्याच अधिक झाली. खऱ्या भक्तीचे स्वरूप व प्रयोजन दृष्टीआड केले जात होते. अशा वेळी भक्त-भाविक समाजाला खऱ्या भक्तिमार्गाचे यथार्थ स्वरूप कळावे, भक्तीचे माहात्म्य कळावे, याकरिता श्रीनारद महर्षींनी भक्तिसूत्राची रचना केली. ती अल्पाक्षर असून बह्वर्थप्रतिपादक आहेत.

कोणत्याही विषयाचा स्वरूप, साधन व फल असा तीन प्रकारे विचार करण्याची विद्वानांची पद्धत आहे. या सूत्रांतूनही या तिन्ही गोष्टीचा निःसंदिग्ध विचार श्रीनारदमहर्षींनी केला आहेम् ही सूत्रे अवघी चौर्यांशीच आहेत, पण फार सारगर्भ अशी आहेत. प्रामुख्याने भक्तियोगाच्या सर्वच अंगाची व्याख्या त्या चौऱ्यांशी सूत्रांतून नारदमहर्षींनी केली आहे.

GO TOP