नारद भक्तिसूत्रे

मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा ॥ ३८ ॥


अर्थ : परंतु प्रामुख्याने (ती भक्ति) महान असे जे महात्मेपुरुष त्यांच्या कृपेनेच (प्राप्त होते) अथवा भगवंताच्या अंशमात्रकृपेनेही (प्राप्त होते).


विवरण : मागील चौतिसाव्या सूत्रात त्या भक्तिप्राप्तीची साधने आचार्यगुण सांगतात असे सांगून पुढील सूत्रातून विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्‌गुण-श्रवण, कीर्तनादि साधनांचा अनुवाद केला आहे. जेव्हा अनेक साधने सांगितली जातात तेव्हा त्यांत गौणमुख्यभाव निर्माण होतो, मग या साधनांत श्रेष्ठ व मुख्य कोण, असा संशय आला असता या अडतिसाव्या सूत्रात त्याचे उत्तर देतात. ही मागील साधनेही तत्त्वतः अमुख्यच आहेत. मुख्य साधन महात्मे जे संत त्यांची कृपा अथवा भगवतकृपेचा अंश का होईना पण तो प्राप्त होणे हे आहे. जे जे भक्तिमान पुरुष म्हणविले गेले ते महात्म्यांच्या कृपेने किंवा भगवत्कृपेनेच प्रेमभक्तीचे अधिकारी बनले. इतर सर्व साधनांना फलद्रूप होण्याकरितादेखील महात्म्यांची कृपा लागते.

उद्धवोपदेश प्रसंगी भगवान श्रीकृष्ण सांगतात -
ते यमनियम बारा बारा । आणि सकळ साधन संभारा ।
यावया माझिया नगरा । मार्ग पुढारा चालेना ॥
ते गेलिया संतांच्या दारा । धरूनि साधूंच्या आधारा ।
अवघी आली माझिया घरा । एवं परंपरा मत्प्राप्ति ॥ एकनाथी भागवत अ. १२-३८, ३९
साधूने सांगता निर्धारी । नाना साधने हा काय करी ।
(१) या बारा यमनियमांची लक्षणे भागवत एकादशस्कंध, अध्याय एकोणीस श्लोक ३३-३४ मध्ये विस्ताराने सांगितली आहेत.) असे स्पष्ट म्हटले आहे. म्हणून मागे सांगितलेल्या साधनांना गौणत्व देऊन या सूत्रात मुख्यतः महत्कृपा हीच भक्ति निर्माण करू शकते असे स्पष्ट सांगतात. व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हादादिकांना नारदकृपेनेच भक्तीची प्राप्ती झाली होती हे प्रसिद्धच आहे. महत् हे विशेषण आहे, पण येथे ते विशेष्यरूपाने घेतले आहे. महत् म्हणजे मोठे, जगात सर्वात मोठे - व्यापक - आकाश आहे, पण त्या आकाशाहूनही व्यापक परब्रह्म आहे असे उपनिषदात म्हटले आहे. 'महतोमहीयान्' ही अनंत ब्रह्माण्डे ज्याच्या एका एका रोमरन्ध्रात सामावली जातात असे त्याचे वर्णन पुराणांतून आढळते. गीतेच्या दहाव्या अध्यायात 'हे सर्व जग ज्याच्या एका अंशावर आहे' असे म्हटले आहे. सर्वांचे कारण सर्वांचे अधिष्ठान, सर्वाहून व्यापक त्यास महत् असे म्हटले जाते. सारांश 'महत्' शब्द परब्रह्मवाचक आहे असे असता नारद महत् शब्द संत-महात्मे या अर्थाने येथे घेतात. गीतेतील नवव्या अध्यायात 'महात्मानस्तुमां पार्थ दैवी प्रकृति माश्रिताः ॥' म्हणून दैवी प्रकृतीचा अंगीकार करून अनन्य भावाने भजन करणार्‍यांना 'महात्मा' असे श्रीकृष्ण म्हणतात.

अशा व्यापक परमात्मस्वरूपास जो आपल्या हृदयात कोंडून ठेवतो 'जयाचे चित्त गवसणी । व्यापका मज ॥' "जेवढी माझी व्याप्ति । तेवढीच तयांची प्रतीति ॥" माझे व्यापकपण आघवे । गवसले तयाचेनि अनुभवे । न म्हणता स्वभावे । व्यापक जाहला ॥ असे त्या भक्ताच्या व्यापक महान, अनुभवाचे ज्ञानेश्वरीत जागोजागी वर्णन आढळते "। हे विश्वचि माझे घर । ऐसी मति जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ ज्ञा. १२-२१३ असे त्याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे.

अशा श्रेष्ठ अनुभूतीने युक्त पुरुषाला 'महान' असे म्हणतात. यानांच संत, साधु, सद्‌गुरु ही संज्ञा दिली जाते. भागवतामध्ये अनेक ठिकाणी अशा भक्तिमान पुरुषाला महान अशी संज्ञा दिली आहे ! 'महान्तस्ते समचित्ताः प्रशांताः ॥' महत्सेवा द्वारमाहुर्विमुक्तेः । इ. श्री मधुसूदन सरस्वतीनी आपल्या 'भक्तिरसायन' या भक्तिशास्त्रावरील अपूर्वग्रंथात भक्तीच्या ज्या अकरा भूमिका सांगितल्या आहेत त्यांत भक्तिप्राप्ती होण्यास 'प्रथम महता सेवा तद्दया पात्रता तात ॥' म्हणजे प्रथम महान असे जे भक्त त्यांची सेवा, नंतर त्यांच्या कृपेला पात्र होणे, असे म्हटले आहे. श्रीमद्‌भागवतामध्ये कपिल देवहूति संवादात स्पष्टच सत्संगति हीच भक्ति प्राप्त करून देणारी आहे असे म्हटले आहे.

सतां प्रसङ्गान्ममवीर्यसंविदो भवन्ति हृत्कर्णंरसायनाः कथा ।
तज्जोषणादाश्‍वपर्ग वर्त्मनि श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति ॥ भागवत ३-२५-२५.
सत्पुरुषांच्या समागमाने माझ्या पराक्रमाचे यथार्थ रूपाने वर्णन करणार्‍या आणि कानाला प्रिय लागणार्‍या कथा होतात, त्याचे सेवन करण्याने मोक्षमार्गात शीघ्र श्रद्धा, भक्ति, प्रेम यांचा क्रमशः विकास होत असतो.'

महान श्रेष्ठ अशा संतांच्या संगतीतच भगवद्‍भक्ति निर्माण होणे का व कसे शक्य आहे याचा विचार श्री कृष्णांनी उद्धवास स्पष्ट सांगितला आहे.

तेषु नित्यं महाभाग महाभागेषुमत्कथाः ।
संभवन्ति हितानृणां जुषतां प्रपुनन्त्यघम् ॥२८॥
ताये श्रृण्वन्ति गायन्ति त्द्यनुमोदन्ति चादृता ।
मत्पराः श्रद्धधानाश्च भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥ २९ ॥ ए. भा. २६

श्रीकृष्ण म्हणतात, हे भाग्यवान उद्धवा ! त्या महाभाग्यवान महापुरुषामध्ये लोकांचे हित करणार्‍या माझ्या कथांचे नित्य गुणगान चालत असते. त्या योगाने त्या गुणगान करणार्‍या पुरुषांचे सर्व पातक धुऊन जाते, सत्संगतीत त्या कथांचे निष्ठेने आदरपूर्वक श्रवण व गायन करून त्यात जे तल्लीन होतात त्यांची माझ्या ठिकाणी श्रद्धा तसेच श्रेठत्व बुद्धी असल्याने त्यांना माझी एकान्त भक्ती प्राप्त होते. महर्षींनी जसे "मुख्यतस्तु" असे पद घालून संतकृपा हेच ईशभक्तीचे मुख्य साधन आहे असे सांगितले आहे.

तसेच श्री एकनाथ महाराजही स्पष्ट सांगतात -
मुख्यत्वे संतांची सेवा । हेचि साधन अवडे देवा ।
संतवचने निजभावा । देतुसे तेव्हा निजभक्ती ॥७८४॥
ज्याशी आवडे संत संगाचा मेळू । जो साधुवचनी अतिभुकाळू ।
जो पडिले वचन नेणे उगळू । तोचि पाथाळू निजभक्ती । ७८५ ॥ एकनाथी भागवत अ. ११

कोटी जन्मांची पुण्यसंपत्ती । जरी गाठी असेल आइती ।
तै जोडे माझ्या संताची संगती । सत्संगे भक्ती उल्लासे ॥ १५२१ ॥
सत्संगे भक्तीची प्राप्ती । उद्धवा जाण तू निश्चिती ।
संतापाशी माझी भक्ति । वास पाहती उभी असे ॥ १५२२ ॥ एकनाथी भागवत ११.

एकूण महत्कृपेने भक्तिलाभ होतो हे नारद महर्षीचेच मत सर्वमान्य आहे. म्हणून श्री तुकाराम महाराजांनी 'नवविधा काय बोलिली जे भक्ती । द्यावी माझे हाती संतजनी ॥' अशी संतांची प्रार्थना केली आहे. कारण महात्म्यांचा अवतारच जगात भक्तिप्रेम नांदावे, सर्वांनी भगवद्‌भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे अशा भक्तिधर्माचा प्रसार करण्याकरिताच झालेला असतो. भागवत-धर्माचे आचरण होऊन अंतःकरणात भक्तिप्रेमाचा उदय होण्याकरिता संत सद्‍गुरुंनाच शरण जावे व त्यांच्यापासून भागवत धर्माचे शिक्षण घ्यावे असे नवयोगेश्वरांनी जनकास उपदेश करीत असता भागवत एकादश स्कंधाच्या तिसर्‍या अध्यायातील बाविसाव्या श्लोकात (तत्र भागवतान् धर्मान् शिक्षेत् गुर्वात्म दैवतः।) म्हणून स्पष्ट सांगितले आहे. या श्लोकावरील टीकेत श्री एकनाथ महाराज सांगतात.

'याचिलागी सद्‍गुरुपाशी । शरण रिगावे सर्वस्वेसी । तो संतोषोनिया शिष्यासी । भजनधर्मासी उपदेशी ॥३४९॥ जेणे भजने भगवंत । भजोनि जाहले उत्तम भक्त । ते भागवतधर्म समस्त । शिकावे निश्चित सद्‌भावेसी ॥३५०॥ अ. ३

महात्मे दयासागर असतात, उदार असतात. परिसाचा संबंध आल्याबरोबर जसे लोखंडाला सुवर्णत्व प्राप्त होते तद्वत् त्याचा क्षणभरही समागम झाला तर जीवनात भक्तिप्रेम निर्माण होते. तसेच 'महत्कृपा' असा सूत्रात शब्द आहे. कृपा, दया हा त्याच्या जीवनातील स्थायीभाव, केवढाही व कसाही पापी त्याच्यासमोर आला की तो कृपेचा अधिकारी बनतो. वाल्या कोळ्याचे उदाहरण प्रसिद्धच आहे.

महात्म्यांची कृपा होण्याचे साधन त्यांच्याविषयी आदरबुद्धी ठेवून त्यांची सेवा करणे, त्याच्या मनोगताप्रमाणे वागणे हे आहे. 'जे स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेंचि परम सेवा ॥' असे सेवेचे लक्षण ज्ञानेश्वरमहाराजांनी सांगितले आहे. महात्म्या पुरुषाचे मनोगत म्हणजे यावत् मानवमात्रांनी भगवदभक्तीत आपल्या आयुष्याचा वेच करावा व जीवन कृतार्थ करावे हेच असते. सूत्रात 'महत्कृपा' असा शब्द आहे.

वास्तविक कृपा ही केवळ महात्म्या पुरुषांच्या ठिकाणीच असते, इतर कोणी केवढाही मोठा पुरुष असला तरी त्याचे ठिकाणी काही स्वार्थ, लोभ, मोह असतोच म्हणून तो कृपेचा अधिकारी नसतो. श्री एकनाथ महाराज म्हणतात, कृपेसी स्वतंत्र जन्म नाही । जेथे उपजे तो साधु पाही । कृपा वसे संतांच्या देही । त्यांचेनि ते पाही । दाटुगी जगी ॥ ८३० ॥ कृपा त्यांचेनि महिमे आली । दया त्यांचेनि जिवे ज्याली । कठिणत्वाची काटी काढिली । समूळी उपटिली निष्ठुरता ॥ ८३१ ॥' ए. भा. अ. ११. श्री भागवताच्या एकादश स्कंधाच्या दुसर्‍या अध्यायात नारद-वसुदेव संवाद आला आहे, त्यात श्रीकृष्णपिता वसुदेव श्रेष्ठ महात्मे जे नारद त्यांच्याच कृपेचे वर्णन करीत आहे. त्यात देवाच्या कृपेपेक्षा संतांच्या कृपेचे श्रेष्ठत्व वर्णिले आहे. वसुदेव म्हणतो, देवाच्या कृपेत तारतम्य आहे. पण तुम्ही सर्वांवर समान कृपा करता. 'तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिले गुह्यज्ञान । ध्रुवबाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥ ७२ ॥ प्रल्हाद उपदेशिला जेव्हा । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हा । तुझीया कृपेचा हेलावा । तो निज विसावा दीनासी ॥ ७३ ॥ केवळ वाट पाडा देख । भजनेवीण एकाएक । महाकवी केला वाल्मिक । अमर अवश्यक वंदिती त्यासी ॥ ७४ ॥ देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी । ऐसा तू कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥ ७५ ॥' ए. भा. २.

एवढा विचार करण्याचे कारण महात्म्यांच्या कृपेचे स्वरूप व त्या कृपेने भक्तीची प्राप्ती कशी होते हेच योग्य प्रकारे सिद्ध व्हावे हे आहे. कोणास वाटेल महात्मे कृपा करून भक्ती प्रदान करतात हे खरे. पण असे महात्मे भेटणे कसे शक्य आहे ? त्यांची भेट दुर्लभ आहे हे पुढे नारदच सांगणार आहेत. भेटले तरी त्यांना ओळखावे कसे ? बाह्य चिन्हावरून त्यांना महात्मे म्हटले तर फसगत होण्याचा संभव आहे. अंतरंग चिन्हानी ओळखणे अशक्यप्राय आहे. 'तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभ आथी ॥' ज्ञानेश्वरी ७-१३७. असे स्वतः श्रीकृष्ण भगवानच म्हणतात. म्हणून एखाद्याला दुर्लभ अशी महात्म्यांची भेट, नंतर त्यांच्याकडून होणारी कृपा व त्या कृपेने भक्तीची निर्मिती हे फार कठीण आहे असे वाटत असल्यास त्यांच्याकरिता 'भगवत्कृपालेशाद्वा.' जर महात्म्याची कृपा न झाली अथवा अशक्य वाटले तर भगवत्कृपा कशानेही भक्तिसाधन होऊ शकेल. या दोन साधनांत क्रम मानण्याचे कारण नाही. तसेच यात गौण मुख्य भावही नाही. सूत्रात 'मुख्यतः' हे पद आरंभी आहे त्याचा अन्वय दोन्ही पदांशी म्हणजे महत्कृपा अथवा भगवत्कृपा यांच्याशी लावणे योग्य होईल. संतकृपेनेही भक्ती प्राप्त होते अथवा भगवत्कृपालेशानेही भक्तीची प्राप्ती होऊ शकते. तसेच 'लेश' पदाचा अन्वयही दोघांचेकडे लावला तरी शक्य आहे. जरी लेश शब्द आहे तरी तो न्यून अथवा अपूर्ण या अर्थी घेऊ नये. काही धातूचे सामर्थ्य एवढे मोठे असते की त्याचा अंशही प्राप्त झाला तरी तो पूर्णाचेच कार्य करतो. अमृताच्या सागरात जे सामर्थ्य असते तेच चूळभर अमृतातही असते. असे ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांन्तद्वारा सांगितले आहे. सूर्याचा एक किरणही पूर्ण अंधकार दूर करण्यास समर्थ असतो. त्याप्रमाणे संत अथवा देवाच्या कृपेचा कणही प्राप्त झाला तरी तो संपूर्ण भक्तिप्रेम संपादन करू शकतो. या दोहोपैकी कोणतीही गोष्ट भाग्यवशात घडली तरी भक्ती सिद्ध होते. म्हणजे संतकृपा किंवा भगवत्कृपा याच्या द्वाराच भक्तीचा लाभ होतो.

भगवत्कृपेचा लाभ केव्हा व कसा होतो ? कोणास वाटेल भगवान सर्वांच्या अंतःकरणात (हृदयात) वास्तव्य करणाराच आहे, तेव्हा सर्वांवरच तो कृपा करीत असेलच. हे जरी खरे आहे तरी सर्वांना हृदस्थाची जाणीवही नसते व त्याच्या भक्तीच्या प्राप्तीची आवश्यकताही वाटत नसते. याचे कारण देहाभिमान, इंद्रियतारम्य, विषयाच्या ठिकाणीच अनुकूल बुद्धी, सुखबुद्धी असते हे स्पष्ट आहे, श्रीकृष्ण म्हणतात, मी जनासी सदा सन्मुख । परी जगचि मजसी विन्मुख ॥ यासी काही आले देख । दाटूनि दुःख भोगिती ॥ १२-१६९. मागील तेहतिसाव्या सूत्रात मात्सैवग्राह्या मुमुक्षुभिः ॥ म्हणजे मुमुक्षूनी या भक्तीचा स्वीकार करावा असे नारदांनीच सांगितले आहे. देहतादात्म्यामुळे भोगावे लागणारे जन्म-मृत्यू, इंद्रिय विषय संयोगाने उत्पन्न होणार्‍या विकारापासून भोगावी लागणारी अनंत दुःखे, त्यांच्यापासून मुक्त होऊन भगवद्‍प्रेमाची तीव्र इच्छा ज्याला निर्माण झाली असेल तोच भगवंताला अनन्य शरण जातो, करुणा भाकतो, त्याच्यावरच भगवत्कृपा होऊ शकते. या विषयाचा विचार मागे सत्ताविसाव्या सूत्राच्या विवेचनात आला आहे असा जो अनुतापदग्ध मुमुक्षू आहे त्याच्यावरच ईश्वरकृपा होते, पर्जन्य जरी सर्वत्र पडतो तरी जी जमीन नांगरून तयार केली आहे व जिच्यात बीज पेरले आहे त्याच जमिनीत पीक येते. भगवान् श्रीकृष्ण भक्तवर्य उद्धवास स्पष्ट सांगतात, उद्धवा जेथ अनुताप नाही । तेथ माझी कृपा नव्हे काही । कृपेचे वर्म हेचि पाही । जै अनुताप देही अनिवार ॥ ३५८ ॥ माझे कृपेवीण निश्चिती । कदा नुपजे माझी भक्ती । माजी जालिया कृपा प्राप्ती । अनन्य भक्ती तो करी ॥ ३५९ ॥ माझे कृपेचे लक्षण । प्राप्त विषय भोगिता जाण । न तुटे माझे अनन्य भजन । पूर्ण कृपा जाणयानाव ॥ ३६० ॥ ए. भा. अ. २० तात्पर्य महात्मे, संत अथवा भगवान यांच्या कृपाप्रसादानेच ही भक्ती प्राप्त होऊ शकते. नारदाच्या स्वतःच्या जीवनातही त्यांना हाच अनुभव आला होता. भागवताच्या आरंभी त्याचे जे जीवनचरित्र त्यांनी सांगितले आहे त्यावरून हे स्पष्ट सिद्ध होते.


GO TOP