श्रीधरस्वामी (नाझरे)







पांडवप्रताप

रामविजय

हरिविजय

शिवलीलामृत



श्रीधरस्वामी (नाझरे) - परिचय



एक प्रख्यात महाराष्ट्र कवि व ग्रंथकार. याचे रामायण, भारत, भागवत इत्यादि ग्रंथ लोकप्रिय झाले आहेत. श्रीधराच्या पूर्वजांचें मूळ गांव नाझरें हे नाझरें महालाचे देशपांडे उर्फ देश कुलकर्णी होत. देशपांडेपण श्रीधाराच पणजा रंगोपंत घोडके यानें संपादिलें. घोडके हें त्यांचें पहिलें आडनांव. नाझरें महालाचे देशपांडे झाल्यावर त्यांनां नाझरेकर म्हणून लागले. श्रीधर यजुर्वेदी वाजसनेयी माध्यंदिन शाखेचा ब्राह्मण असून त्याचें गोत्र वासिष्ठ, व आनंद संप्रदाय होता. श्रीधराचा जन्म शके १६०० मध्यें व मृत्यु १६५० मध्यें झाला असें नवनीतादि पुस्तकांत आहे पण त्यास फारसा आदर नाहीं. पण हें जर खरें मानलें तर शिवाजीच्या अखेरीस तो जन्मला व शाहूच्या अमदानीच्या मध्यकाळीं तो मेला असें ठरतें. हा काळ फारच धामधुमीचा गेला. पण श्रीधराच्या ग्रंथांत कोणत्याहि राज्यक्रान्तीचा किंवा राजपुरुषाचा मुळींच उल्लेख नाहीं. श्रीधराचा बाप ब्रह्माजीपंत (ब्रह्मानंद) यानें 'आत्मप्रकाश' नांवाचा ओवीबद्ध ग्रंथ शके १६०३ मध्यें लिहिला. याचा उपसंहार श्रीधरानें केला आहे. श्रीधराचे ग्रंथ (१) हरिविजय; शके १६२४, मार्गशीर्ष शु॥ २, पंढरपुरीं संपूर्ण केला. (२) रामविजय; शके १६२५, श्रावण शु॥ ७, पंढरपुरीं संपूर्ण केला. (३) वेदान्तसूर्य; शके १६२५ माघ शु॥ ७, सिद्धश्रमास संपूर्ण केला. (४) पांडवप्रताप; शके १६३४, माघ शु॥ १०, पंढरपुरास संपूर्ण केला. (५) जैमिनी अश्वमेध; शके १६३७, पौष शु॥ ७, पाथरी येथें संपूर्ण केला (६) शिवलीलामृत; शके १६४०, फाल्गुन शु॥ १५, बारामतीस संपूर्ण केला. ह्याशिवाय त्यानें पांडुरंगमाहात्म्य, मल्हारिमाहात्म्य, वेंकटेशमाहात्म्य, अंबिकाउदय, इत्यादि ग्रंथ रचिले. याशिवाय त्यानें संस्कृतपदें व आरत्या इत्यादि रचल्या. राजश्री दत्तोबा गोसावी व मनोहर गोसावी बिन श्रीधर गोसावी, उपनाम नाझरेकर यानां शाहु महाराजानीं दिलेली इनाम सनद व श्रीधराची वंशावळ, भारत इतिहास संशोधक मंडळ, अहवाल शके १८३३ ध्यें (१०९ व ११० पानावर) आहेत. श्रीधराचे बहुतेक ग्रंथ महाराष्ट्रांतील स्त्रीपुरुष विशेषतः स्त्रिया आवडीनें वाचतात किंवा ऐकतात. त्यांची भाषा फार परिणामकारक व अलंकारिक असून वर्णनशैली तर अप्रतिम आहे.