ॐ श्रीपरमात्मने नमः

॥ श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा ॥

"श्री विष्णुसहस्रनाम" हे एक स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे दुरितनाशक शस्त्र होय. हिंदु धर्मात अशी अनेक स्तोत्रे आहेत. पण "श्री विष्णुसहस्रनाम" या स्तोत्राचे महत्त्व अनन्य साधारण आहे. श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी "गेयं गीता-नामसहस्रम्" असे म्हणून गीता व हे सहस्रनाम, हिंदु धर्माचे मूलगामी, विश्वव्यापी मानवधर्मरूप, स्वरूप सांगणारे आहेत असे म्हटले आहे.

"नामस्मरण" हा नवविधाभक्तीमध्ये सांगितलेला एक प्रमुख भाव आहे. गौण म्हणजे गुणवर्णनपर भक्ती साधणारे नामस्मरण, जन्ममरण टाळणारे आहे, अशी श्रद्धा आहे. हे विष्णुसहस्रनाम स्तोत्र महाभारतात शेवटी आलेले आहे. भीष्माने हे स्तोत्र सांगितले आहे. त्याचे पठण व पाठन करीतच भीष्मांनी आपला देह ठेवला.

हे श्री विष्णुसहस्रनाम केवळ नामांची जंत्री नाही. त्यात धर्मज्ञान, अध्यात्म व सर्वकल्याणकारी कैवल्यसाधक साधनांची, कौशल्याने आंतरिक रचना केलेली आहे. स्तोत्र म्हणजे अर्थवाद. अर्थवादामध्ये स्तुती असते. पण ही स्तुती वरवरच्या अर्थात नसते. वरवरचे शब्द व अर्थ स्तुतिमध्ये पर्यवसित होत असतात. हे पर्यवसान सर्वांनाच सहज समजेल असे समजणे चुकीचे ठरेल. त्यासाठी ह्या स्तोत्रावर भाष्य आवश्यक असते. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रावर श्री. कुंदर दिवाण ह्यांनी असे विस्तृत, सहजगम्य व विद्वत्तापूर्ण भाष्य लिहिलेले आहे. "श्री विष्णुसहस्रनामात अध्याहृत असलेले धर्मज्ञान आजच्या काळाला आणि पिढीला विशद करून सांगणे आवश्यक होते व हे काम आजवर झाले नव्हते. श्री. कुंदर दिवाण यांच्या ह्या विवेचनाने ही मोठी उणीव पूर्णपणे दूर झाली आहे, असे मोठ्या संतोषाने म्हणावेसे वाटते." असे प्रशस्तिपत्र काका कालेलकरांनी दिलेले आहे.

श्री. कुंदर दिवाण ह्यांनी १०७ श्लोकांच्या ह्या श्रीविष्णुसहस्रनामावरील भाष्याला अनेक परिशिष्टे जोडलेली आहेत. श्री विष्णुसहस्रनामासारखीच इतर "सहस्रे" -स्तोत्रे, ह्यांची तौलनिक माहितीही त्यांनी दिली आहे. श्री विष्णूंच्या नामांचे विविधांगी वर्गीकरण व त्या वर्गीकरणानुसार त्या त्या नामाला प्राप्त होणारे अध्याहृत आध्यात्मिक अर्थ, श्री. कुंदर दिवाण ह्यांनी सुस्पष्ट केलेले आहेत. श्री. दिवाणांची विद्वत्ता, आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचा अधिकार आणि वेदोपनिषदांसह षड्दर्शनांचा त्यांचा सखोल अभ्यास, वाचकाला स्तिमित करून जाईल.

श्री विष्णुसहस्रनामाची वैदिक परंपरा आहे हे विशद करताना त्यांनी खालील विधान केलेले आहे. "वेदानुवचन आणि यज्ञ, दान व तप ही वैदिक उपासना आहे. पण तिचा फक्त त्रैवर्णिकांनाच अधिकार आहे. वेदमंत्र हे सर्वांना खुले नाहीत" हे विधान मात्र गतानुगतिक न्यायाने केलेले दिसते. मूळ वेद स्थूलपणे वाचले तरी लक्षात येईल की, वेदमंत्र सर्वांना खुले आहेत. यजुर्वेदातील ही ऋचा बोलकी आहे.

"यथेमां वाचं कल्याणी मावदानि जनेभ्यः ब्रह्मराजन्याभ्यां शूद्राय चार्याय च स्वीयचारणाय च"

"सर्वतोभद्र अशी ही वेदवाणी आम्ही सर्वांनी सांगितली तशी तुम्हीही सगळ्यांना सांगा. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र व घरातील स्वकीय (पत्नी आदी) ह्या सर्वांना हे वेदमंत्र शिकवा, अभ्यासू द्या." (यजुर्वेद २६/२) असे वेदवचनच आहे. असो. श्री. कुंदर दिवाण ह्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेली ही श्री विष्णुसहस्रनामाची सटीक आवृत्ती प्रकाशित करताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला अत्यंत आनंद होत आहे. सर्व स्तरावरील अभ्यासू व अध्यात्मजिज्ञासू, ह्या आवृत्तीचे सहर्ष स्वागत करतील ह्यात संदेह नाही. महात्मा गांधी, विनोबा भावे, काका कालेलकर ह्या सारख्या थोर विभूतींच्या सान्निध्यात पावन झालेल्या बुद्धिपूत श्री. कुंदर दिवाणांची ही प्रस्फुरित भाष्यवाणी अमृतोपम होय. मानवजातीचे जीवन या अमृताने समृद्ध होईल अशी खात्री आहे. श्री. कुंदर दिवाणांना विनम्र अभिवादन.

दिनांक १८ मार्च १९९७.
डॉ. मधुकर आष्टीकर
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

GO TOP