ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

धर्मगुब्धर्मकृध्दर्मी सदसत्क्षरमक्षरम् ।
अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः ॥५१॥


४७५. धर्मगुप्
'धर्मगुप्‌ धर्मकृत् धर्मी' हा चरण उघडच धर्मसूत्रित आहे. या पुढील चरणांत दोन वार्तिकें आली आहेत "सदसत्" आणि "क्षरमक्षरम्" ह्रस्व तें वार्तिक, दीर्घ तें. सूत्र म्हणावयाचे. परमात्मा हा धर्मगुप् म्हणजे धर्माचे रक्षण करणारा आहे. तो धर्मकृत् म्हणजे धर्म-विधान करणारा आहे. तो धर्मी म्हणजे धर्मवान् आहे. ज्या गुणधर्मामुळे एखादा पदार्थ नामरूपास येतो तो कारणभूत स्वभावधर्म होय. उदाहरणार्थ गुडाची गोडी हा गुडाचा धर्म होय. त्या गोडी ह्या गुणधर्मामुळेच त्या पदार्थाला गुड हें नाम आणि रूप मिळाले आहे. प्रत्येक पदार्थाचा धर्म त्याचा जीवनहेतुभूत होऊन त्याला धारण करीत असतो. म्हणून तो धर्म म्हणावयाचा.या धर्माचे रक्षण प्रत्यगात्मरूपानें परमात्मा करीत असतो म्हणून तो धर्मगुप् होय. व्यक्ति-धर्म तसा समाज-धर्महि असतो. हा समाजधर्म म्हणजे व्यक्तींची पारस्परिक व्यवस्था होय, जिच्या योगें व्यक्ति आणि समाज दोन्ही यथाकाल कृतार्थ होतात.या सामाजिक व्यवस्थेलाच वर्णाश्रमधर्म म्हणावयाचे. या धर्माचा रक्षक म्हणून परमात्मा धर्मगुप् म्हणावयाचा. परंतु व्यक्ति व समाजहि स्वतंत्र नाहींत. तीं विश्वरचनेची अंगभूत आहेत. ते जे विश्व त्याचीहि एक व्यवस्था आहे, धर्म आहे. त्या धर्माचें तो परमात्मा रक्षण करीत आहे. म्हणून हे विश्व चालले आहे. विश्व चालले आहे, म्हणून समाज टिकला आहे. समाज टिकला आहे म्हणून व्यक्ति नांदते आहे. म्हणून तो परमात्मा धर्मगुप् होय. यालाच अनुलक्षून म्हटले आहे. "यथातथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः" त्या परमात्म्यानें हे सारें विश्व अनादि कालापासून यथावत् धारण केले आहे. टिकवून धरलें आहे. "त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता" गीतावचनहि त्याचाच अनुवाद करीत आहे.

४७६. धर्मकृत्
जनता ही धर्मी आहे. तिचा काहीएक जीवनाचा आदर्श असतो. त्या आदर्शाला अनुलक्षून तिचे विचारक आणि कारभारी जनतेसाठी एक संविधान तयार करतात. आणि ह्या संविधानाचे, ह्या धर्मसंहितेचे परिपालन जनतेची संसद् करीत असते. या त्रयीलाच इथे 'धर्मी धर्मकृत् आणि धर्मगुप्, म्हटलें आहे. भारतीय जनतेचा धर्म म्हणजे भारतीयता होय. या भारतीयतेच्या संगोपनासाठी आणि विकासासाठी गांधी, नेहरू, आंबेडकर यांनी जें संविधान रचलें तें भारतीय संविधान होय आणि त्याचे परिपालन करवून घेण्याची व्यवस्था म्हणजे भारतीय परमोच्च न्यायासन आणि संसद होय. ही त्रयी सुसंस्कृत व विकसित राष्ट्रांनाच असते असे नाही. एखादी वन्य जाति घेतली तरी तिच्यांतहि तुम्हांला ही त्रयी आढळून येईल. सारांश जिथे जीवन आहे तिथे आदर्श आहे आणि तिथे न्याय व दण्ड ही व्यवस्थाहि आहेच. आहे. मग तशी ती या विश्वाची कशी नसेल ? हे विश्व धर्मी आहे. त्याचा एक आदर्श आहे, धर्म आहे तदनुसार त्याची धर्मसंहिता आहे, आणि आहे एक धर्मशासन, जें जितकें मर्यादित तितके त्याचे स्वरूप स्थूल, जें जितकें व्यापक तितकें त्याचे स्वरूप सूक्ष्म. हे विश्व अति व्यापक आहे म्हणून त्याचे स्वरूप अव्यक्त आहे. त्याचा धर्म, त्याची धर्मसंहिता, त्याचे धर्मशासन अव्यक्त आहे. सत्य हा त्याचा धर्म आहे, सत्यच त्याचे संविधान आहे, आणि सत्यच त्याचा गोप्ता आहे. या परम सत्याला धरून सर्व संविधानें रचलीं आहेत. म्हणून परमात्मा हा धर्मकृत् म्हणावयाचा. कोणतीहि संहिता वेदाची अवेस्त्याची बायबलची कुराणाची वा मार्क्सची तदुपजीवीच आहे. .

४७७. धर्मी
धर्मी म्हणजे धर्मवान्. जिथे जिथे धर्म आढळून येतो तिथे तिथे धर्मी हा असलाच पाहिजे. धर्म हा केव्हांहि धर्मिपरतंत्रच असणार. वस्तु असेल तरच तिला नाम असेल, रूप असेल, गुण असतील. लांबी रुंदी उंची म्हणजे आकृति. पांढरा वा केशरी वर्ण. आणि ही आकृति व वर्ण दोहों मिळून रूप होते. ह्या रूपाला बर्फी असें नांव मिळते. सुगंधी, गोड म्हणून तिचे गुण वर्णिले जातात. शेर सव्वा शेर म्हणून तिचे वजन होते. ४०/५० रुपये तिची किंमत केली जाते. पण हे सगळे होतें तें त्या खव्याचे, त्या मूल द्रव्याचे. ते मूल द्रव्य नसेल तर नाम रूप गुण कुणाचा आश्रय करतील ? म्हणून धर्मी हा सर्वमूल होय. जनता नसेल तर तिचा आदर्श कुठला ? तदनुसार संविधान कुठले आणि शासन तरी कुठलें आणि कुणाचें करणार ? प्राज्याची व्याख्या केली जातेः Government of the people, for the people and hy the people. प्रजाघटित, प्रजाप्रातिनिधिक आणि प्रजाकर्तृक, परंतु प्रजाच नसली तर मग कांहींच असणार नाही. अर्थात् सत् असेल तर सत्ता असणार. आणि हा सत् च धर्मी होय. सद्रूप परमात्माच या विश्ववैचित्र्याचा आधार आहे. हे सारें धर्मवैचित्र्य आहे, कारण तो धर्मी आहे. ज्गद्‌रुप हा परिणाम, हा विवर्त दिसतो आहे, कारण तदाधारभूत सद्. वस्तु तो परमात्मा विद्यमान आहे. रज्जू नसेल तर सर्पाभासहि होणार नाही. या विश्वाचे अधिष्ठान तो परमात्मा धर्मी होय आणि तद्रूप जीवहि जीवनाधिष्ठानभूत धर्मी म्हणावयाचे. इथे 'धर्मी धर्मकृत् आणि धर्मगुप्' या पदत्रयीनें जीवनाचा एक संपूर्ण विचार व्यक्त झाला आहे. मग तुम्ही तो वैयक्तिक सामाजिक वैश्विक कोणत्याहि भूमिकेवर पहा आणि पडताळा.

४७८. सत्
'सदसत् क्षरमक्षरम् हा चरण एका दृष्टीनें मागील चरणाशी जोडलेला आहे आणि स्वतंत्रहि आहे. त्यांतील दोन वार्तिकें 'सदसत् आणि 'क्षरमक्षरम्' ही म्हटल्यास संबद्ध आहेत, म्हटल्यास स्वतंत्र आहेत. सबंध सहस्रालाच हे लागू आहे. मागील पदांत धर्म आणि धर्मी यांचा संबंध आपण पाहिला आणि परस्परविरुद्ध विधानें केली. धर्म हा धर्मीचा जीवन-हेतु असल्यामुळे तो कारणभूत होय आणि धर्मी हे कार्य होय असें एकदां म्हटलें. पुनः असेंहि म्हटलें की धर्म हे धर्मिपरतंत्र असतात, द्रव्याधित असतात म्हणून धर्म गौण होत, आणि धर्मीच वास्तव आहे. अशा प्रकारें वृक्षबीजन्यायानें इथे अनिर्णयाची आपत्ति येते असें वाटेल, परंतु त्याचा परिहार सूक्ष्म विचारानें सहज होणारा आहे. कारण आणि कार्य यांचा विचार केला म्हणजे हे कोडे उलगडते. कारण हे सदैव मूल म्हटले पाहिजे आणि म्हणून तेंच एकमेव सत् होय. कार्य हे काही झाले तरी मागाहून उत्पन्न होऊन आणि किंचित् काल दुगगोचर होऊन परत कारणांत विलीन होणारे असे असते. म्हणजे त्याची स्थिति ही स्वतंत्र नाही. म्हणून तेंच असत् म्हणावयाचे. असा विचार केला म्हणजे विश्व में कार्यरूप असल्यामुळे तें असत् होय आणि ब्रह्म हेच एकमात्र सत् होय, वेदान्ताचा हाच निर्णय आहे. केव्हां सदसत् ह्या संज्ञा उलट सुलट झालेल्या आढळून येतात. त्याचे कारण सदसत् ह्या संज्ञा सापेक्ष आहेत हे होय. सत् म्हणजे हे दृश्यमान विश्व असा अर्थ घेतल्यास ब्रह्माला असत् म्हणावे लागते. अर्थात् जें कार्य नव्हे तें. पण वस्तुतः जें स्वतंत्र आहे, विश्वाचे अधिष्ठान आहे, अपरिवर्तनशील आहे, तेच सत् ह्या पदवीस पात्र आहे आणि म्हणून विश्वाला असत् म्हटले जाईल. परंतु ह्या सर्व सापेक्ष कल्पना वा शाब्दिक कोलांट्या होत. वस्तुतत्त्व असते तसेंच असते म्हणजे कारण तें कारणच राहते आणि कार्य तें कार्यच म्हटले जाते. परमात्मा हा कारण रूपानें सत् आहे आणि कार्य रूपानें असत् आहे. आणि हेच पुढील पदांनी 'क्षरमक्षरम्' स्पष्ट केले आहे.

४७९. असत्
"असदेव इदं अग्र आसीत्, ततो वै सद् अजायत” आरंभी हे सगळे असत् होते आणि त्यांतून पुढे मग हे सत् झालें, असें उपनिषदांत म्हटले आहे तर दुसरे एके ठिकाणी नेमके याच्या विरुद्ध म्हटलें आहे-'कथं असतः सत् जायेत’ अहो ज्याला मुळीं अस्तित्वच नाहीं त्यापासून हे जग कसें निर्माण होणार ? संख्येपासून असंख्य सृष्टि होईल, पण शून्यापासून कशी होणार ? पहिले विधान व्यावहारिक आहे, दुसरें तात्त्विक आहे. हे दृश्यमान व्यक्त जगत् अव्यक्तांतून आलेलें आहे, हा पहिल्या वचनाचा आशय. दुसरें वचन त्याचा निषेध करीत नाही पण त्याला नेमके करते. ते म्हणतें तें जें अव्यक्त तेंच सत् म्हणजे त्रिकालाबाधित आहे. आणि त्या त्रिकालाबाधित सत् पासूनच हे असत् म्हणजे त्रिकालाबाधित नसलेलें कार्यरूप स्थूल जगत् निर्माण झाले आहे. उत्पत्तिपूर्व आणि लयोत्तर स्वरूपानें विद्यमान नसलेलें कार्य हे सत् संज्ञेस पात्र नाही. त्याला असतच म्हटले पाहिजे; आणि म्हटले पाहिजे सतापासूनच हे सारे झाले आहे, असतापासून नव्हे. तात्पर्य दोन्ही विधानें यथार्थ असून त्यांच्यांत विरोध नाही. त्यांची व्यवस्था भूमिकाभेदानें लागते आणि विरोध-परिहार होतो. जें व्यावहारिक भूमिकेवरून सत् म्हटले जातें तेंच पारमार्थिक भूमिकेवरून असत् आणि असत् तें सत्. सदसताची ही भिन्नभूमिक परिभाषा व्यामिश्र आहे, गुंतागुंतीची आहे. म्हणून त्यालाच पुढील पदांत क्षराक्षर म्हटले आहे. तिथे हा घोटाळा नाही. जें क्षरतें तें क्षर (असत्) आणि जें क्षरत नाही, त्रिकालाबाधित अविकृत राहतें तें अक्षर (सत्) होय.

४८०. क्षर
'क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्चते' अशा शब्दांत क्षराक्षराची व्याख्या गीतेंत केली आहे आणि ती ठीकच आहे. परमात्मा कार्य-कारणरूपानें सत् आणि असत्, क्षर आणि अक्षर दोन्ही म्हटला जातो. कार्यकारण या शब्दप्रयोगांत कार्य आधीं आलें आहे आणि कारण मागाहून. कारण, प्रथम नजरेत भरतें तें स्थूल, स्थूलाकडून मग विचारानें मनुष्य सूक्ष्माचे ग्रहण करतो. ही जी स्वाभाविक ज्ञान-प्रक्रिया तिलाच अनुसरून सदसत् आणि क्षराक्षर ही परिभाषा आलेली आहे. तेव्हां कार्य म्हणजे सत्, कार्य म्हणजे क्षर आणि कारण म्हणजे असत्, कारण म्हणजे अक्षर-असें हे समीकरण निष्पन्न होते. ज्याला इथे सत् वा क्षर म्हटलें त्यालाच गीतेंत अधिभूत अशी व्यापक संज्ञा आली आहे. भूत म्हणजे झालेलें. झालेलें अर्थात् व्यक्त झालेलें, व्यक्तीभूत. आणि या व्यक्तमात्राला अधिष्ठून राहते. तें अधिभूत म्हणावयाचे, दुसऱ्या शब्दांत, अधिभूत म्हणजे भूतत्व, भूतभाव. या भूताचा अभिमान बाळगणारा जो भाव तो अधिदैव म्हटला आहे. जो हा असा व्यक्ताचा अभिमान सोडून देणारा विविक्तभाव अथवा विवेक तोच अघियज्ञ होय. या विविक्तभावाला "अधियज्ञ म्हणण्याचे कारण असत्-त्याग हा यज्ञाचा गाभा आहे. "अग्नये स्वाहा, इदं न मम' असें म्हणून आहुति दिली जाते. ज्ञानयज्ञांत या हवनाचे पर्यवसान अज्ञान-त्यागांत होतें आणि म्हणून तन्निष्पन्न जो भाव तो अधियज्ञ म्हटला जातो. यांत जडाभिमान नसला तरी चेतनाभिमान आहे, सोऽहंभाव आहे. हाहि आठव जेव्हां मुरतो तेव्हां ब्रह्मनिर्वाण निष्पन्न होते. त्यालाच अक्षर अशी संज्ञा आहे. जीवाच्या उत्क्रांतीचा हा क्रम आहेः जडता अहंता सोहंता निरहंता. हे अखंडमंडल असें सतत चालले आहे. सर्व जीवजगत् त्यावर आरूढ परिभ्रमत आहे.

४८१. अक्षर
जें क्षर नाहीं तें अक्षर म्हणजे कूटस्थ म्हणावयाचें. सर्व कार्ये "जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते" या षड़ भावांनी ग्रासलेली आहेत. म्हणून ती क्षर म्हणावयाची. जे तसें नाहीं, तदविलक्षण आहे तें अक्षर होय, कारणरूप होय, कूटस्थ होय. ब्रह्म हे तसे या जगत्-कार्याचे कारण आहे. म्हणून त्याला अक्षर म्हटले आहे गीतेत, तर ब्रह्माला अक्षर म्हणण्याऐवजी अक्षरालाच ब्रह्म म्हटले आहेः "अक्षरं ब्रह्म परमम्' वेदालाहि ब्रह्म संज्ञा आहे. कारण, तो ब्रह्मप्रतिपादक आहे. या वेदाचे विश्लेषण केलें तर काय दिसून येतें ? वेद म्हणजे वाणी. तिचा प्रतिनिधि म्हणजे वाक्य. तें बनलें असतें शब्दांचे. ते शब्द बनले असतात अक्षरांचे आणि ही मूलाक्षरेंच तेवढी अक्षर म्हणजे अविनाशी आहेत. त्यांच्या पासून बनलेले शब्द, त्या शब्दांची बनलेली वाक्ये सगळी अक्षरशेष होतात. म्हणून अक्षर म्हणजे कारण होय.
छापखान्यांत आपल्याला अक्षरांचे हे अक्षरत्व चांगले प्रत्ययास येते. हजारों पुस्तकें छापली जातात पण ती सगळी आयसाक्षरांत परिणत होतात. अखेर ही आयसाक्षरें गाळून त्यांचा अयःपिंड बनतो. तो आणखी गाळला म्हणजे मृण्मय होतो. ती मृद् अखेर चिन्मय होते. हे जें असें कारणांचे कारण तेंच परम अक्षर म्हणजे अन्तिम तत्त्व होय. आणि तेंच सर्वकारण ब्रह्म म्हटले आहे. "अक्षरं ब्रह्म परमम्' या वाक्यांत परमं हें विशेषण कुणाचे ? तें साहचर्यानें ब्रह्माकडे जाते. म्हणून त्याचा अर्थ होतो जें अक्षर तें ब्रह्म असून तें अन्तिम होय.

४८२. अविज्ञाता
"विज्ञातारं अरे केन विजानीयात्" या वचनांत श्रुति त्या परमात्म्याला विज्ञाता म्हणत आहे. जे ज्ञान होतें तें सगळे ज्ञातृज्ञेय-विभागानें होते. म्हणजे जिथे कुठे ज्ञानोपलब्धिप्रक्रिया होते तिथे ती या विभजनानेच होते. असे कोणतेंहि ज्ञान होणे संभवनीय नाहीं की जिथे हा असा विभाग होत नाही. म्हणून श्रुति म्हणते की या प्रक्रियेंत में विज्ञात्रंग तेच ज्याचे स्वरूप आहे तोच विज्ञाता होय आणि तो केव्हांहि विज्ञेयांग होत नाही. आणि म्हणून ती म्हणते, विज्ञाता रे कसा विज्ञानविषय होणार ? तो जर विज्ञान-विषय झाला तर तो विज्ञातृरूपानें मिटेल. आणि स्वरूप-त्याग त्याला शक्यच नाही म्हणून तो सदैव विज्ञाताच राहतो. पण इथें तर त्याला अविज्ञात म्हटले आहे, तें कसे ? तें असेंः ज्ञेय विषय सर्व नश्वर असल्यामुळे ज्या वेळी ज्ञातृभिन्न ज्ञेयच मुळी नसते तेव्हा काय जाणणार ? आणि ज्ञात्याला तरी ज्ञाता म्हणण्यांत काय अर्थ राहिला ? आणि म्हणून जो विज्ञाता, तोच वस्तुतः अविज्ञाता म्हणावयाचा. "प्रपचोपशमं शान्तं शिवं अद्वैतं चतुर्थं मन्यन्ते". जिथे प्रपंचाला वाव नाहीं तिथे ज्ञातृज्ञेयज्ञान ही त्रिपुटी मावळली. तिथे सर्व च मावळलें, उदेलें एकच एक शांत तेज, ज्याचे वर्णन ज्ञानदेव पुढीलप्रमाणें करतातः
"मावळवीत विश्वाभासु । नवल उदेला चण्डांशु । अद्वयाब्जिनी-विकाशु | बंदूं आतां ॥ जो अविद्या-राती रुसोनिया । गिळी ज्ञानाज्ञान-चांदणिया । जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा ॥ " इत्यादि. यांत वर्णिलेला जो हा अद्‌भुत चित्सूर्य, जो विश्वप्रपंच प्रकट करीत नाहीं सामान्य सूर्याप्रमाणें, पण तो सर्व भेद-प्रपंच गिळून एकला एक राहतो, तो हा अविज्ञाता होय. अथवा विविधं गुणविचित्रं विश्वं जानाति इति विज्ञाता, न विज्ञाता अविज्ञाता नित्यनिरस्तप्रपंचत्वात् स्वदृक्त्वात् । जो विविध पाहतो तो विज्ञाता. जो एकविध पाहतो तो अविज्ञाता. जीव विज्ञाता म्हणावयाचा. परमात्मा तद्विलक्षण अविज्ञाता.

४८३. सहस्रांशु
सहस्र पद सहस्राचे स्वाभाविकच आवडतें पद आहे. त्यामुळे ते वारंवार आले आहे. सहस्रांशु म्हणजे सहस्ररश्मि. सहस्रशः अंशवः यस्य सः सहस्रांशः ज्याचे अंशु म्हणजे भानु अर्थात् किरण सहस्रशः म्हणजे हजारों पसरले आहेत तो सहस्रांशु होय. ही अनंतपार सृष्टि म्हणजेच परमात्म्याचे सहस्रांशु होत, त्याचा अनंत विस्तार होय. हा विस्तार देशतः जसा अनंत, तसा कालतःहि अनंतच आहे. आणि वस्तुतः तर तो अनन्त च आहे. आणि म्हणून अनन्त हे त्याचे एक विशेष नाम आहे. आणि सहन पदाचें जें वारंवार आवर्तन झाले आहे तेहि त्याचमुळे होय. असंख्येयत्व दाखविण्यासाठीहि संख्येचा उपयोग करावा लागतो. कशी विलक्षणता आहे पहा ! हा असा विरोधाभास परमात्म्याच्या वर्णनांत वारंवार उत्पन्न होतो. कारण खरोखर तो आश्चर्यमूर्तिच आहे. म्हणून गीतेनें ठीकच म्हटलें आहे-
आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनं, आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः |
आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ " गीता २ - २९

एखादा अष्टपैलू हिरा पाहूं लागलों तर कोणता पैलू अधिक सुंदर आहे हे सांगणे कठिण होऊन बसतें. जो पहावा तो सुंदरच वाटतो, अप्रतिम वाटतो. तुलना कशी ती करतांच येत नाही. मग जो सहस्रपैलू आहे, सहस्रांशु आहे त्या परमात्म्याबद्दल बोलतांना बोबडी वळली तर काय नवल ? एक साधे मोराचें पीस घेतलें व त्याचा डोळा पाहूं लागलों तर, त्याचे ते नाना रंग, त्या रंगांतील नाना तरंग त्या रंगतरंगांतील नाना आकृति आणि भाव पाहूं लागलों तर माणूस दंग होऊन जातो, मग त्या परमात्म्याबद्दल काय बोलावयाचें ? बोलावयाचेच नाही. तद्गतेन मनसा सर्वात्मना त्याच्या चरणी लीन व्हायचे.

४८४. विधाता
सृष्टीची जी प्रत्यक्ष कारणे आहेत ती सृष्टीचे धाते होत. ब्रह्मा, विष्णु, महेश, प्रजापति, मनु इत्यादि सृष्ट्यनुग्रहकारी देवता, त्या देवतांच्या अधीन असलेली सृष्टयुपादानें आणि उपकरणे म्हणजे धाते वा धातृतत्त्वे होत. सांख्यांत यांचे संख्यान झाले आहे. या तत्त्वविचाराला पौराणिकांनी लोकगेचक रूप दिलें आहे. दोन्ही मूलतः एकच. एक तात्त्विक रूप, दुसरें लौकिक रूपः सृष्टीची ही सर्व कारणे चिन्त्य आहेत. परंतु ह्या पलीकडे जे अचिन्त्य मूल कारण आहे तेंच इथें विधाता म्हटले आहे. त्याचाच उल्लेख गीतेंत पुढील प्रमाणें केलेला आहे.
कविं पुराणं अनुशासितारं अणोर् अणीयांसमनुस्मरेद् यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपं आदित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ गीता ८ - ९

या समग्र श्लोकांतील प्रत्येक पद मोठे अर्थपूर्ण आहे, परंतु 'सर्वस्य धातारं अचिन्त्यरूपम्' यांत सर्वार्थसार येऊन जाते. तो परमात्मा या निखिल विश्वाचा धाता म्हणजे कर्ता आहे आणि तो अचिन्त्य आहे. अचिन्त्य आणि धाता पदें एकत्र केली म्हणजे विधाता होतो. इसापनीतींतील बेडकी आणि तिचे पिलूं या कथेतील मोठा प्राणी जो बैल त्याचे मोठेपण जसें बेडकीला आपलें पोट फुगवून दाखवितां आलें नाही आणि त्या प्रयासांत प्राणास मात्र मुकावे लागलें तसें मानवी बुद्धीचें ईश्वराच्या महत्तेचे आकलन करतांना होते. तिच्या चिंध्या होऊन जातात, आणि बेडकीच्या पिला सारखें ईश्वरी महत्तेच्या अचिन्त्य वैभवानें भारावलेलें विनम्र श्रद्धामय व्यक्तित्व तेवढे उरतें. विष्णुसहस्र त्याचाच परिपाक आहे. त्याचेच निदर्शन आहे. या सहस्रमुखानें सहस्रशः वर्णन करून आणि त्या महत्तेचा पार न पावून शेवटीं नमः म्हणून डोके टेकलें आहे.

४८५. कृतलक्षण
कृतात्मा कृतबुद्धि कृतार्थ कृतकृत्य इत्यादि शब्दांप्रमाणें हा कृतलक्षण शब्द आहे. कृतं नित्यनिष्पन्न चैतन्यरूपं लक्षणं यस्य सः कृत-लक्षणः । कृत म्हणजे सहजसंपादित आहे ज्याचे लक्षण म्हणजे स्वरूप तो कृतलक्षण परमात्मा होय. परमात्मा हा नित्यशुद्धबुद्धमुक्त-स्वभाव आहे. त्याचे हे लक्षण स्वतःसिद्ध आहे. तें बाह्य नाही, म्हणून संपादनीय नाही. ते स्वरूप आहे म्हणून स्वतःसिद्ध आहे, सहज आहे. जे मिळविलें जातें तें गमविण्याची शक्यता असते. त्याच्या योगक्षेमाची चिंता वहावी लागते. पण कृतलक्षणांत ही भानगड नाही. आणि ह्या स्वरूपलक्षणाला अनुलक्षूनच भगवंतानें आश्वासन दिले आहे आपल्या भक्ताला 'योगक्षेमं वहाम्यहम्' म्हणून. भगवंत भक्ताचा हा स्वरूपलक्षणरूप योगक्षेम वहात असतो. तो त्याच्या संसाराची चिंता नाहीं वहात. तुकारामाचा योगक्षेम त्यानें कसा वाहिला ? धन गेलें, मान गेला, बायको पोरें अन्नान्न होऊन मेली. तो केवळ विदेह होऊन राहिला, आत्मनिष्ठ होऊन राहिला. हाच त्याचा भगवंतानें वाहिलेला योगक्षेम ! भारतसावित्रीचाहि कंठरव हाच नाही काय ? काय म्हणतात व्यास ?
धर्मे मतिर्भवतु वः सततोत्थितानां, स ह्येक एव परलोकगतस्य बन्धुः ।
अर्थाः स्त्रियश्च निपुणैरपि सेव्यमाना नैवाप्तभावमुपयन्ति न च स्थिरत्वम् ॥


जीव बाहेरून जें जें मिळवितो तें तें त्याचे आपलेसें होत नाही, त्याच्याजवळ स्थिर रहात नाही. मग राहतें काय ? राहते त्याचे लक्षण, त्याचे निजधन. म्हणून त्या निजधनाचीच काळजी घ्या. धर्माची आस्था बाळगा. इतर तुमचे सारे उद्योग अर्थ आणि काम संपादनाचे, श्री आणि स्त्री यांना प्रसन्न करण्याचे फुकट आहेत असें व्यास महर्षि एक लक्ष संहिता लिहून शेवटीं तात्पर्य म्हणून कंठरवानें सांगत आहेत. हा मानव-जीवनेतिहासाचा व्यास-मुनिकृत सनातन संदेश आहे, निष्कर्ष आहे. परमात्मा हा सिद्ध आहे. परंतु त्याचे उपासक साधक आहेत. सिद्धाचे जीवन सहज असते. साधकांना तें विवेकविचारपूर्वक प्रयत्नानें संपादावयाचे असतें. सिद्ध कृतलक्षण म्हणजे सहज स्वरूप आहे. साधक संपादित स्वरूप आहे.


गभस्तिनेमीः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः ।
आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्‌गुरू: ॥५२॥


४८६. गभस्तिनेमि
गभस्तयः किरणाः, नेमिः परिधिः, यस्य सः गभस्तिनेमिः । गभस्ति म्हणजे किरण हेच ज्याची नेमि म्हणजे परिधि वा धाव आहेत तो केन्द्रभूत सूर्य गभस्तिनेमि म्हणावयाचा. मागे नक्षत्रनेमि पद आलें आहे. त्यानें चंद्र परिलक्षित होतो, तर इथे गभस्तिनेमि पदानें सूर्य. त्रैलोक्याचे राज्य करणारें राजे खरोखर दोनच आहेतः एक, नक्षत्रनेमि चंद्र आणि दोन, गभस्तिनेमि सूर्य. दिवसां सूर्य तर रात्री चंद्र सत्ता गाजवीत असतो. दोघे मिळून रात्रंदिवस त्रैलोक्याचे राज्य करीत असतात. त्यामुळे खरे राजे हे दोनच होत. त्यांच्या वरूनच क्षत्रियांचे सूर्यवंश आणि चंद्रवंश असे दोन वंश कल्पिले आहेत. या मुख्य दोन वंशांशिवाय अग्निवंशहि कल्पिला जातो. जेव्हां सूर्य चंद्र नसतात तेव्हां अग्नि हा त्यांचा प्रतिनिधि राज्य करतो. म्हणून तो तिसरा वंश मानला गेला. पण खरे म्हणजे तो राजा नव्हे, तर राजाचा प्रतिनिधिच होय. तथापि, तो आमच्या फार उपयोगाचा आहे. चंद्रसूर्य दिव्य आहेत, हा भौम आहे. भौमच नव्हे तर अगदी घरगुती, हातचा; म्हणून ऋषि त्याची फार प्रेमानें उपासना करतात. म्हणतात"स नः पितेव सुनवे| अग्नें सूपायनो भव । सचस्वा नः सुअस्तये ॥ हे अग्निदेवा तूं पित्याप्रमाणें आमच्या भेटीसाठी आमच्या संनिध रहा आणि आम्हांला चांगल्या चांगल्या भेटी दे. आमची कोडे पुरव. तेजोराशि परमात्म्याच्या सूर्य, चंद्र आणि अग्नि ह्या तीन विभूति आहेत. म्हणून त्यांना अनुलक्षून परमात्म्याला कुठे नक्षत्रनेमि कुठे गभस्तिनेमि म्हटले आहे. त्याला ज्वालानेमिहि म्हणतां येईल. खरोखर जो कोणता प्रकाश आहे तो त्या परमात्म्याचा आहे. म्हणून त्याला तिन्ही पदें सहजच शोभतात. म्हटलेंच आहे गीतेतः
"यद् आदित्यगतं तेजो जगद् भासयतेऽखिलम् ।
यत् चन्द्रमसि यत् चाग्नौ तत् तेजो विद्धि मामकम् । गीता १५- १२


४८७. सत्त्वस्य
सत्त्व म्हणजे सत्ता. सत्त्व म्हणजे सत्त्वगुण. सत्त्व म्हणजे जीव, सत्त्ववान् पदार्थ. तात्पर्य सत्ता शब्दाचे भाव गुण द्रव्य असे अर्थ होतात. जो कोणता चराचर पदार्थ आम्हांला आहे म्हणून कळतो त्या पदार्थाच्या ठाईं सत्त्वगुण आणि सत्ता हीं उघडच आहेत. ती असल्यावांचून त्याचे अस्तित्वच प्रतीत होऊं शकत नाहीं. पदार्थमात्राच्या ठाईं असणारे हे जे विविध सत्त्व . त्या सत्त्वांत परमात्मा वास करीत आहे. म्हणून तो सत्त्वस्थ म्हणावयाचा.हिरण्यकशिपूला हे तत्त्वज्ञान नव्हतें. तो आत्मभिन्न कोणी ईश्वरसंज्ञक तिन्हाईत वस्तु आहे, अशी कल्पना करीत होता आणि म्हणून प्रह्लादाला तुझा ईश्वर कुठे आहे दाखव म्हणून विचारणा करीत होता. ज्या सत्तेच्या बळानें सर्व सत्त्व अस्तित्वात आहेत ती सत्ताच तो परमात्मा, तो परमेश्वर असल्यामुळे प्रह्लाद म्हणत होता की 'स्थिरचर व्यापुनि सगळें तो जगदात्मा दशांगुळे उरला' आहे. या खांबांत आहे ? म्हणून विचारतांच त्याने सहजच सांगितलें अलबत्. खांबावर प्रहार करतांच खांब कडकडला. कडकडाट त्या स्तंभवासी सत्तेचा, परमेश्वरी सत्तेचाच होता. स्तंभाची झिलपी निघाली, हिरण्यकशिपूच्या पोटांत शिरली आणि तो जमिनीवर पडला आणि मेला. कोणाच्या मांडीवर पडला तो ? तो परमेश्वराच्या मांडीवर पडला होता. परमेश्वराच्या करजांनी त्याचे विदारण झाले होतें. अशा प्रकारें सत्तामात्र त्या परमेश्वराची आहे आणि जे काय घडते घडलें वा घडणार आहे तें सारे त्या परमात्मसत्तेच्या अंकावरच होय. हे तत्त्वदर्शन ज्याला झालें तो सर्वत्र सत्त्वस्थ परमात्म्याला पाहतो. कोणता हि काल कोणते हि स्थल, कोणती हि घटना त्याच्या सत्तेवाचून नाही हे त्याला करतलामलकवत् प्रत्यक्ष दिसत असतें. या सत्त्वदर्शनाचेंच नांव आहे त्रिकालज्ञता, सर्वज्ञता. हे तत्त्वदर्शन सत्त्वोपासनेने बुद्धि विशुद्ध झाली म्हणजे होते. आणि ह्याहि अर्थाने परमात्मा हा सत्त्वस्थ होय.

४८८. सिंह
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत् तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ॥ गीता १० - ४१


या गीतावचनाप्रमाणे जें जें विभूतिमत सत्त्व आहे तें सर्व ईश्वरी आहे. सिंह ही हि तशीच एक ईश्वरी विभूति आहे. म्हणून परमात्म्याला इथे सिंह म्हटले आहे. पूर्वी हि एकदां सिंह शब्द येऊन गेला आहे. पक्षांत गरुड, वन्य पशूंत सिंह, ग्राम्य पशूंत वृषभ, जलचरांत मकर अशा ह्या भगवद्-विभूति प्रसिद्ध आहेत. सिंह हा नुसता ऊर्जित म्हणजे बलवानच नाहीं तर तो श्रीमान हि आहे. धीर गंभीर महासत्त्व आहे तो. त्याचे भव्य रूप, त्याचा घनगंभीर आवाज, त्याचा अतुल पराक्रम सर्व आदर्श आहे. त्याचा एवढा गौरव आहे कीं ह्या पशूचे पुच्छ आपल्या नामाला जोडण्यांत माणसाला धन्यता वाटू लागली. थोरपणा दाखवायला तो आपल्याला पुरुषसिंह म्हणवू लागला. एकट्या दुकट्या व्यक्तिच नव्हेत तर एक जात ची जात आपल्याला सिंह म्हणू लागली. नानकादि गुरूंचे शीख म्हणजे शिष्य आपल्याला सिंह म्हणजे सिंह पदवीने विभूषित करतात. सिंहाप्रमाणे ते आयाळ ठेवतात, सिंहाच्या नखदंतायुधांप्रमाणे सदैव कृपाण बाळगतात. सिंहा प्रमाणे निर्भय आणि पराक्रमी जीवन आकांक्षितात. जो कोणी असा आदर्श बाळगतो तो सिंह पदवीस पात्र आहे. परंतु सिंहनामांत आणखी हि एक भाव आहे. सिंह हा ग्राम्य नाहीं, तो आरण्यक आहे. जे ग्राम्य जीवन जगतात, ते सिंह पदवीस पात्र नाहींत. भगवान् बुद्धानें ऐहिक सुखोपभोगाचे ग्राम्य जीवन त्याज्य ठरवून आरण्यक मुनिवृत्ति, संयम आणि तत्त्व-चिंतन यांचे जीवन अंगीकारलें म्हणून त्यांना शाक्यसिंह म्हणत. सांसारिक जीवन भयग्रस्त आहे. त्यांत खरा पराक्रम नाहीं. जन्ममृत्यु - जराव्याधिदुःखदोषांपुढें तें हार खातें पण संन्यास अकुतोभय आहे. तो तत्त्वज्ञानाने आणि तत्त्वज्ञानपूर्वक संन्यस्त वृत्तीने जगून मृत्यूवर मात करतो आणि अमर होतो. हेंच सिंहत्व होय. आर्यत्व होय. परमात्म्याहून अधिक निर्भय आणि मृत्युंजय दुसरा कोण आहे ? म्हणून तो सिंह.

४८९. भूतमहेश्वर
गीता ही उपनिषदांचे उपनिषद् आहे. आणि उपनिषदें हि स्वत:च वेदांचे उपनिषद् म्हणजे रहस्य होत, सार होत. म्हणजे गीता ही साराचें सार झाली. 'दुग्धं गीतामृतं महत्' चा हि आशय हाच आहे. तथापि तो न ओळखतां तें गीतेला दूध म्हणणे न्यून आहे. वास्तविक म्हटले पाहिजे की गीता हे घृत आहे, उपनिषदें लोणी आणि वेद दूध. गीता ही जशी वेदाचें परम सार आहे तसें सहस्र हि आहे. वेदाचें तात्त्विक सार म्हणजे ब्रह्मसूत्रें, वेदाचें सात्त्विक सार म्हणजे गीता आणि भाविक सार म्हणजे सहस्र होय. सूत्रे सुबद्ध आहेत. तो विचार-ग्रंथ आहे. गीता प्रवाही आहे. आचाराचा तो धर्मग्रन्थ आहे. सहस्र मोकळे आहे. तो उच्चारग्रंथ आहे, जपग्रंथ आहे, गेय आहे. तिन्ही एकात्म आहेत. उपनिषदें ब्रह्मसूत्रे आणि गीता यांना परमार्थाची प्रस्थानत्रयी म्हणजे परमार्थाला पोचविणारे तीन मार्ग म्हटले आहे. पण मी तर सूत्रे गीता आणि सहन हीच प्रस्थानत्रयी म्हणावी म्हणेन. उपनिषदें आर्यांच्या आध्यात्मिक विचारांची खाण आहे. त्रयीच का ? चतुष्क, पंचक का नाही ? कारण आमच्या प्राचीनतम ज्ञानाचे वेदाचे, तीनच प्रकार ऋक् यजुस् साम अथवा आधुनिक भाषेत बोलायचे तर पद्य गद्य आणि गेय केले गेले आणि रूढ झाले आहेत म्हणून.
महाराष्ट्रासाठी म्हणजे मराठी भाषिकांसाठी देवांचा प्राचीन निरोप्या जो ज्ञानदेव त्यानेहि प्रस्थानत्रयी करून ठेवली आहे-अनुभवामृत, ज्ञानदेवी आणि हरिपाठ, आधुनिक निरोप्या विनोबानें दिलेली प्रस्थानत्रयी म्हणजे स्थितप्रज्ञदर्शन, गीताप्रवचन व गीताई ही होय.
पण ह्या सगळ्यांचे इथे काय प्रयोजन ? हेच की महेश्वर (गी. १३. २२) भूतमहेश्वर (गी. ९. ११) लोकमहेश्वर (गी. १०. ३) सर्वलोकमहेश्वर (गी. ५. २९) हीं नामें उपनिषदें आणि गीता ह्यांतून वारंवार आलेली आहेत आणि इथेहि ते आले आहे. आले आहे ते त्यांच्या परंपरेतून. म्हणून ती परंपरा पाहिली. महेश्वर म्हणजे अव्यक्त अक्षर परमात्मा. त्या अव्यक्त अक्षर परमात्म्यांतून भूते येतात आणि कांहीं काल व्यक्त दशेत राहून परत त्यांतच लीन होतात. म्हणून परमात्मा हा भूत-महेश्वर, लोकमहेश्वर म्हणावयाचा. पहा गीताः
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावं अजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ गीता ९ - ११


४९०. आदिदेव
"आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः" हा श्लोकार्घ उघडच देवसूत्रित आहे. एक संपूर्ण कल्पनासूत्र यांत आहे. तो परमात्मा हा आदिदेव आहे. तोच सृष्टीच्या पूर्वी विद्यमानहि असलेला.या सृष्टीचा आरंभक आहे. म्हणजे आरंभाचाहि तो आरंभक होय. म्हणून त्याला आदिदेव म्हणावयाचें. रामदासांनी याचेच वर्णन "मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा' असें केले आहे. या आदिदेवाला सृष्टिशास्त्राच्या भाषेत ब्रह्मा असें नांव आहे.
'ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव । विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता.' ब्रह्म हे जगत्- कारण आहे. तें ब्रह्म आणि हा ब्रह्मा एकच असला तरी ब्रह्म ही वेदान्त-परिभाषा आहे आणि वस्तुतः सृष्टीशी त्याचा संबंध नाही. परंतु ब्रह्मा हा या सृष्टीशी अपरिहार्यपणे निगडित आहे. त्यामुळे वेदान्त-विचार सांगतांना त्याला ब्रह्म म्हणतात तर सृष्टिशास्त्रांत त्याला ब्रह्मा म्हणतात. आणि या दोन्हीहि कल्पांना आदिदेव हा शब्द कवटाळतो. परमार्थ-विचार घ्या की सृष्टि-विचार घ्या, तो परमात्मा आदिदेव आहे. वेदांतील विभूति-योगांत म्हणूनच " ब्रह्मा देवानां पदवीः कवीनां, ऋषिर् विप्राणां, महिषो मृगाणाम् । श्येनो गृध्राणां, स्वधितिर् वनानां, सोमः पवित्रं अत्येति रेभन्" असें वर्णन आले आहे. गीतेत तर विश्वरूपदर्शनांत आदिदेव शब्दच वापरला आहे
त्वं आदिदेवः पुरुषः पुराणस् त्वं अस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम, त्वया ततं विश्वम् अनन्तरूप ॥ गीता ११ - ३८


परमात्म्याचा जो दिक्कालाद्यतीत महिमा मुख्यतः त्याला उद्देशून आदिदेव महादेव देवेश आणि देवभृद्गुरु ही नामें आली आहेत. तो महिमा इतका मोठा आहे की एका नामानें त्याचे वर्णन होऊं शकत नाही म्हणून एकसाथ चार नामें उच्चारलीं ! आणि वस्तुतः सहस्राचेहि हेच रहस्य आहे.

४९१. महादेव
परमात्मा सर्वादि असल्यामुळे तो आदिदेव म्हटला तसा तो सर्वांहून वयानें ज्येष्ठ आणि गुणांनी श्रेष्ठ असल्यामुळे महादेव म्हटला आहे. तो आदिदेव असल्यामुळे सर्वदेव त्याचे अनुज होत. तो परमात्मा अशा प्रकारे सर्व देवांचा सहजच अग्रज झाला. म्हणून तो वयानें मोठा म्हणावयाचा. गुणांनी तो श्रेष्ठ म्हणावयाचा तर तो कसा ? सर्व गण सत्त्वाधिष्ठित असल्यामुळे आणि परमात्मा हा सद्रूप असल्यामुळे तो सहजच सर्व गुणांचा आधार झाला. आणि म्हणून तो सर्व गुण-संपन्न गुणश्रेष्ठत्वानें महादेव म्हणावयाचा. देवता विशिष्ट-गुणमूर्ति होत. परंतु देव हा सर्वगुणसामग्यरूप आहे. त्यामुळे असा परमात्मा हा महादेव आणि इतर देवता अंशरूप असल्यामुळे सामान्य देव म्हणावयाचे.
उत्पत्ति स्थिति लय हे सृष्टीचे आणि सृष्ट पदार्थांचे अपरिहार्य असे भाव आहेत. त्यांत निवडीला, पसंतीला वाव कुठे आहे ? जो वर्तमान आहे त्याला आदि आहे, अंत आहे. असे जर आहे तर आदि मध्य अंत या विविध भावांत तरतमभावाला वाव नाहींच. ते तिन्ही समान आहेत. निर्विशेष आहेत. म्हणून त्यांच्या अनुग्राहक देवता ब्रह्मा विष्णु महेश यांच्यांतहि लहान मोठा कोणी नाही.
तत्त्वतः हे ठीक झाले, पण व्यवहारतः वर्तमानच महत्त्वाचे आहे. कारण खरोखर तेंच आहे. भूत आणि भविष्य अनुमित आहे, काल्पनिक आहे. जो हात, सोडून पळत्याच्या पाठीमागे लागतो त्याचे सगळेच गमावते. उलट ज्यानें चालू क्षण साधला त्यानें मागचा पुढचाहि साधला आहे. म्हणून त्रिगुणांत सत्त्वोपासना, कालांत वर्तमानोपासना श्रेयस्कर. तिचा अधिपति विष्णु म्हणून महादेव म्हणावयाचा.

४९२. देवेश
जो परमात्मा आदिदेव महादेव म्हटला तोच देवेशहि आहे. अंशी हा अंशांचा ईश म्हणजे स्वामी असतो. तसा सद्रूप परमात्मा सर्व सद्गुणांचा सर्व सद्वस्तूंचा स्वामी होय. तो सर्वसत्ताधीश आहे, सर्व ज्याच्या ठाई पर्यवसित होतात, संहृत होतात. देव म्हणजे प्रकाशमान, जें जें प्रकाशमान आहे तें तें सर्व देव आहे. सत्य च प्रकाशमान आहे, असत्य प्रकाशाभावरूप अंधकार होय, असत्याहून अधिक अप्रकाशमान अंधकाररूप दुसरे काय बरे असू शकेल ? अंधकार अंधकार म्हणून म्हणवला जाणारा प्रकाशाभावहि खरोखर तितका अंधकार नाहीं जितकें असत्य आहे. कारण अभावहि एक भाव आहे, पदार्थ आहे. पण असत्य हा तसाहि अभाव-पदार्थ नाही. अर्थात् भावाभावरूप जो कांहीं प्रकाश उर्फ देवभाव या विश्वांत आढळतो त्या सर्वांचा स्वामी तो सद्रूप परमात्माच होय आणि म्हणून त्याला देवेश म्हणावयाचें.
आदिदेव महादेव देवेश देवभृद्गुरु ही चार पदें क्रमशः ब्रह्मा विष्णु महेश आणि परमात्मा यांची वाचक आहेत असे म्हणता येईल. सूर्य प्रातःकाळी आपले सहस्रकिरण पसरूं लागतो मध्याह्नीं तो संपूर्ण विराजमान असतो. सायंकाळी तो आपले सर्व किरण गुंडाळून घेतो. रात्री ही तिन्ही कार्ये वर्जून तो स्वस्थ राहतो. या चार अवस्थाच उत्पत्ति स्थिति लय आणि निर्वाण म्हटल्या आहेत आणि त्यांचे अधिष्ठाते देवच ब्रह्मा विष्णु महेश आणि परमात्मा म्हणावयाचे. इथे विष्णु जो पालक तो महादेव म्हटला आहे आणि महेश जो संहारक तो देवेश म्हटला आहे. ईश ईशान महेश महेशान हीं महादेवाची संहारकाची नांवें प्रसिद्धच आहेत. कार्यानुषंगानें तो परमात्माच ब्रह्मा विष्णु महेश म्हटला जातो हे उघड आहे.

४९३. देवभृद्गुरु
परमात्मसत्ताच कार्यानुषंगानें ब्रह्मा विष्णु महेश पदवी धारण करते म्हणून तो परमात्मा देवभृद् म्हणजे सर्व देवांचे भरण पोषण करणारा, त्यांचे पालन करणारा म्हणावयाचा. माता पिता आणि दृष्टिदाता हे गुरु म्हणविले जातात. परमात्मा हा तसा सर्व देवांना जन्मदाता अन्नदाता आणि ज्ञानदाताहि असल्यामुळे तो देवभृद्-गुरु म्हटला आहे. "यो ब्रह्माण विदधाति पूर्व यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै" इत्यादि श्रुतींप्रमाणें परमात्मा हा देवांचा गुरु आहे.
देवभृद् आणि गुरु अशी दोन पदेंहि घेणे शक्य आहे. तथापि संख्या-निर्वाहासाठी आणि गुरुपदाची आवृत्ति टाळण्यासाठी हे एकपद मानले आहे. आणि देव-प्रधान च हा श्लोकार्ध आहे म्हणूनहि स्वतंत्र गुरु पद घेण्यापेक्षां देवभृद्-गुरु असें संयुक्त पद घेणेच अनुकूलहि आहे. ग्रंथकार हा नेहमीच "न्यून तें पुरतें अधिक तें सरतें" करून घ्या म्हणत असतो. तदनुसार देवभृत् मधेच गुरुभावहि येऊन जात असला तरी निर्गुण केवलस्वरूप परमात्म्याचे सर्वातिशायित्व प्रकट करण्यासाठी इथे गुरुपद आले आहे असें समजावें.
गुरुत्व कशांत आहे ? जीवननिर्वाह-कार्यांत गुरुत्व आहे. जें जें जीवननिर्वाहक आहे तें गुरु आहे. आई बाप गुरु जन्म देतात, भरण पोषण करतात, रक्षण करतात, शिक्षण देतात. थोडक्यांत जीवनाला व जीवन-साफल्याला आवश्यक ते सर्व ते पुरवितात. म्हणून ते गुरु होत. परमात्मा हा तसा या विश्वाचा गुरु आहे. पण तो परात्पर गुरु, 'गुरूणां गुरुः' आहे. विश्वाचे जे पालक ते देव. त्या देवांचा जो पालक ब्रह्मदेव म्हणजे देवभृत् आणि त्याचाहि जो पालक तो देवभृद्-गुरु. "यो ब्रह्माण विदधाति पूर्व यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै" इत्यादि वचनांत हेच परमात्म-गौरव गाइलें आहे.


उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः ।
शरीरभूतभृद्भोक्ता कपिन्द्रो भूरिदक्षिणः ॥५३॥


४९४. उत्तर
उत्तरति सर्वं अतिवर्तते इति उत्तरः । अथवा उद्+तरं उत्तरः, उच्चतरः । उत्तर म्हणजे पुढचा, पलीकडचा, वरचा. पूर्वोत्तर, अधरोत्तर, दक्षिणोत्तर इत्यादि शब्दांत उत्तर पदाचा असा प्रयोग आढळून येतो. या शिवाय प्रश्नोत्तर हाहि प्रयोग आहेच. त्यांत शंकासमाधान असा अर्थ आहे. सर्वत्र उत्तर म्हणजे उच्चतर श्रेयस्कर श्रेष्ठतर असा अर्थ आहे. पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा या प्रयोगांत तो श्लिष्ट आहे. पूर्व मीमांसा म्हणजे पूर्व कालीन तसा प्रारंभिक कच्चा वेदार्थ. उत्तर मीमांसा म्हणजे उत्तर कालीन तसा अन्तिम पक्का वेदार्थ. परमात्मा हा तसा अन्तिम सिद्ध स्वरूप आहे. सिद्धान्त आहे. म्हणून तो उत्तर म्हणावयाचा. साधक जीव हे पूर्व रूप होय, सिद्ध आत्मा हे उत्तर रूप होय. जीव आणि सृष्टि हे पूर्व रूप होय. ब्रह्मनिर्वाण हे उत्तर रूप होय. अशा प्रकारे परमात्मा हा या समस्त व्यक्त विश्वाचे उत्तर रूप आहे. सर्व विश्व त्याच्या ठाई पर्यवसित होते, परिनिष्ठित होते, म्हणून तो उत्तर.
परिनिष्ठा या अर्थानें उत्तर पद आपण पाहिलें. तो त्याचा अर्थ आहेच, पण त्याशिवाय त्यांत आणखी खोल अर्थ भरला आहे. अन्तिम काय आहे ? स्थिति की गति ? मृत्यु की जीवन ? परिनिष्ठा परिसमाप्ति ही अभावरूप शून्यरूप नाही. ती भावरूप आहे, जीवनरूप आहे आणि हे भावजीवन केव्हांहि गतिमत्च असणार, तें विझलेल्या दिव्याचे दीपनिर्वाण नाही, तर तेवणाऱ्या दिव्याचे दीपनिर्वाण आहे.
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचितस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ गीता ६ - १९

तेवणाऱ्या दिव्यांत तेल आणि वात जळत असते म्हणून तिथे निर्वाण म्हणजे ज्वलन-शान्ति नाही. पण रत्नदीपांत तेल वात नसून तेज तेवत राहतें. तेंच दीपनिर्वाण होय. तेज म्हणून तो दीप होय. ज्वलन नाही म्हणून तेंच निर्वाण होय. ब्रह्म-निर्वाण ही तशी गति आहे. सदैव आपलें उत्तररूप गांठण्याचा अजस्र प्रयास हेच त्याचे स्वरूप, "प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम् । "

४९५. गोपति
गो म्हणजे गाय, गो म्हणजे इंद्रियें, गो म्हणजे वाणी, गो म्हणजे ज्ञान, गो शब्द गम् धातूवरून आला आहे असें धातुवादी म्हणतात. शब्दवादी वा नामवादी म्हणतात गो नामावरून गम् धातु आला आहे. क्रिया स्वतंत्र नाही. ती कर्बधीन आहे. जगांत नामें आहेत आणि ती क्रिया करतात. वारा वाहतो. या प्रयोगांत म्हणूनच आधीं वारा हा कर्ता योजला जातो आणि नंतरच वा शेवटी क्रियापद येते. आधी क्रियाच होती आणि मागाहून कर्ता आला असें कधीं संभवूच शकत नाही म्हणून धातूवरून नामें आलीं नसून नामावरूनच धातु आले असे म्हटले पाहिजे. तें कसेंहि असो एवढें खरें की गो हे सत्त्व वा तत्त्व गमनशील आहे. गो गाय कुरणांत चरते. इन्द्रियें आपआपल्या विषयांत वावरतात. वाणीहि मनाच्या खुंट्यापासून सुटून आणि हृदयाच्या गोठ्यांतून बाहेर पडून व्यवहरते. ज्ञान सर्वत्र संचरतें. असे हे सर्व उच्चावच सूक्ष्मादि स्थूलान्त गोतत्त्व सर्वत्र भरले आहे. असे पाहतां हे सारें व्यक्ताव्यक्त विश्वच गोरूप आहे म्हटले तर त्यांत काय वावगे आहे ? या विश्वगोचा जो पति म्हणजे स्वामी तो गोपति होय. तो गोपतिच या 'जगत्यां जगत् चा, गतिमान जगांतील गतिशील पदार्थांचा, नियन्ता आहे. मात्र तो स्वतः गतिमय जगाच्या यातायातींतून परिपूर्ण मुक्त आहे. तो केवळ आहे, तो जो स्थिर शाश्वत परमात्मा तोच गोपति म्हणावयाचा. आमची प्राणेन्द्रियमनोबुद्धि सतत चलन वलन करीत असतात, पण त्यांचा स्वामी मात्र स्वस्थ उभा आहे. तो त्यांची सारी हालचाल नुसता पहात असतो. त्याच्या पाहणींत ह्या सगळ्या गाई चरत असतात. तो आपला 'त्रिभंगी देहुडा ठाण मांडूनियां राहे । कल्प -द्रुमातळी वेणु वाजवीत आहे । गोविंदु वो माये । गोपाळु वो माये । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु माए । शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ । बाप रखुमादेवीवरु विठ्ठल सकळ ॥ '

४९६. गोप्ता
या त्रेपन्नाव्या श्लोकांत जसे 'गोपतिर्गोप्ता हे शब्द जोडीनें आले आहेत तसेच ते पुढे त्रेसष्टाव्या श्लोकांतहि आले आहेत. इथें व्यापक अर्थानें तर तिथे ते विशिष्ट अर्थानें आले आहेत. इथें गोपति म्हणजे जगत्पति तर तिथे तो धेनुपालक आहे. इथे गोप्ता म्हणजे विश्वगोप्ता, जगद्रक्षक तर तिथें तो गोपालक, गोरक्षक आहे.
परमात्मा या विश्व-गोकुलाचा पति म्हणजे पालक आहे. जशी एखाद्या गोकुलाची, खिल्लाराची वाढ त्याच्या गोपतीवर, वळूवर अवलंबून असते, तशी या विश्वाची उत्पत्ति वृद्धि परमात्म्यावर अवलंबून आहे. गोकुलाचे संवर्धनच तो गोपति करीत नसतो, तर त्याचे संगोपनहि तो करीत असतो. म्हणून त्याला गोप्ता म्हणावयाचे. परमात्माहि तसाच या सृष्टीचा स्रष्टा आणि तिचा गोप्ता म्हणजे रक्षक आहे, पालक आहे, पिता आहे.
गोपति आणि गोप्ता हे शब्द गोकुलांतील जीवनाचे वाचक आहेत. कुटुंबांतहि आपण पाहतों की एकच व्यक्ति पति आणि पिता ह्या नात्यांनी कुटुंबाची वृद्धि आणि संरक्षण करीत असते, संवर्धन आणि संगोपन करीत असते. परमात्माहि तसाच या विश्वकुटुंबाचा जनक आणि पालक आहे आणि प्रसंगी जसा पिता कुटुंबाला शासनहि करतो तसा परमात्माहि या विश्वाचा संहारहि करतो. याचंच नांव आहे संसारसृष्टि स्थिति निरोध. इथें गोपतिर् गोप्ता या जोड नांवांत पहिल्या दोन कार्याचा उल्लेख आला आहे. परंतु तिन्ही कार्ये प्रतिक्षणी चाललींच आहेत. प्रतिक्षणी नवी सृष्टि निर्माण होत आहे. पूर्वक्षणी निर्मित सृष्टीचा योगक्षेम चालत आहे आणि तिचा उत्तर क्षणी निरोध होत आहे, तिचे विसर्जन होत आहे. पण हे सत्र चर्मचक्षूला नाही दिसत. म्हणून पुढील पद सांगतें की तो परमात्मा ज्ञानगम्य आहे. दिव्य चक्षूनेंच परमात्म्याचा हा ईश्वरी योग पाहतां येतो.

४९७. ज्ञानगम्य
परमात्मा हा चिन्मात्र असल्यामुळे तो ज्ञानानेच गम्य होणारा आहे, स्वसंवेद्य आहे. पंच विषय इंद्रियगम्य आहेत. स्मरणे मनोगम्य आहेत. विषयांचें आणि स्मरणाचे इष्टानिष्टत्व बुद्धिगम्य आहे. पण स्वतः अवगन्ता किंगम्य आहे ? तो या कोणालाच गम्य नाहीं. इन्द्रियमनोबुध्द्यादिकांचा तो विषय नाहीं. तो या सगळ्यांचा विषयी आहे. तो कोणाचाहि विषय होत नाही. याचा अर्थ तो जड कोटींत पडू शकत नाहीं, तो चेतन आहे. जो चेतन आहे तो अचेतन, जड कसा होणार ? विषयी विषय कसा होणार ? ज्ञाता ज्ञेय कसा होणार ? असें जर आहे तर मग तो स्वसंवेद्य तरी कसा म्हणावयाचा ? चेतनांचा तो स्वभावच आहे. जो स्वतःलाच जाणत नाहीं तो दुसऱ्या कशालाहि जाणू शकत नाही. जो मूर्छित वा मृत आहे तो कोणालाहि जाणूं शकत नाही. कारण तो मुळी स्वतःलाच जाणत नसतो. सर्वोपलधीचे द्वार स्वोपलब्धि आहे. ती चेतनाची अंगभूत आहे, त्याचा स्व-भावच आहे, म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हणावयाचे. इथेहि एक सूक्ष्म भेद आहे. इसर वस्तु ज्ञेय म्हटल्या आहेत, तो स्वतः संवेद्य म्हटला आहे. विषयवत् तो ज्ञेय नाहीं म्हटलेला आणि ज्ञानगम्य म्हणण्यांत तोच आशय आहे, ज्ञानस्वरूप आत्मा ज्ञानगम्य आहे म्हणजेच तो स्वसंवेद्य आहे. ज्ञानदेवानें या परमात्मतत्त्वाला म्हणूनच आद्य म्हटले आहे आणि स्वसंवेद्य म्हटले आहे.
ॐ नमो जी आद्या| वेदप्रतिपाद्या । जय स्वसंवेद्या| आत्मरूपा ॥
सर्वोपलब्धीचें मूळ ती स्वोपलब्धिच असल्यामुळे तिला ज्ञानदेव आत्मरूप स्वसंवेद्य व आद्य या विशेषण-त्रयीनें विशिष्ट करीत आहेत. "ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्" ज्ञानस्वरूप असलेलें हें ज्ञेय अमानित्वादि विंशति ज्ञान-लक्षणांनी आकळावें असें गीता सांगते. अर्थात् ज्ञानगम्य म्हणजे ज्ञानलक्षणांच्या योगें प्राप्त करून घ्यावयाचा परमात्मा. हाहि ज्ञानगम्य पदाचा विशिष्ट अर्थ. दोन्ही अविरोधी व पूरक होत. एक निष्ठा आहे, दुसरा मार्ग आहे. शंकराचार्य तत्कालीन वादानुसार कर्मद्वारा वा ज्ञानकर्मसमुच्चयद्वारा नव्हे तर केवळ ज्ञानानेच तो परमात्मा गम्य आहे म्हणून तो ज्ञानगम्य म्हणावयाचा असा सांप्रदायिक अर्थ घेतात. तोहि या पदांतुन निघू शकतो. तथापि तो इथे अभिप्रेत आहे असें नाहीं.

४९८. पुरातन
परमात्मा हा सर्वोपलब्धिकारण असल्यामुळे, म्हणजे त्याच्या आधी कोणत्याहि वस्तूचे अस्तित्व प्रतिपादणे संभवनीय नसल्यामुळे तो उघडच पुरातन होय. त्याच्याहून प्राचीन दुसरे काही नाही, इतकेंच नव्हे तर तसें कांही असू शकत नाही. म्हणून विश्वरूप दर्शनांत अर्जुन म्हणतोः
"त्वं आदिदेवः पुरुषः पुराणः' अर्थात् तो परमात्मा सर्वादि असून प्राचीनतम आहे. त्याच्या मानानें जगांतील जुन्यांतील जुनेहि अगदी अलीकडचें म्हणावे लागेल. काल आणि स्थल ह्या कल्पना व्यक्त सृष्टीतील आहेत. अव्यक्तांत स्थलकालांचा कायहिशोब ? जिथे भूत भविष्य वर्तमान, कल्प कल्पांतर, वर्ष मास, दिवसरात्र असला कांहीं विभागच नाही, तिथे तुम्ही कालाची गोष्टच काय करणार ? परंतु ती अव्यक्ताची वार्ता व्यक्ताच्या भाषेत सांगणे भाग पडते म्हणून मग त्या परमात्म्याला पुरातन सनातन नित्य अनादि अनन्त युगादिकृत् म्हणावे लागते. ही व्यक्तसापेक्ष भाषा असली तरी ती अव्यक्ताचा बोध करून देणारी, अव्यक्ताचा संकेत करणारी आहे. तिनें व्यक्ताचा किंबहुना तत्सदृशाचाहि अर्थ घ्यावयाचा नाही. तर तो जो केवल अचिन्त्य अक्षर अव्यक्त अनिर्देश्य परमात्मा त्याचाच भाव लक्षावयाचा आहे. इथेहि पुरातन पद तसेंच समजावयाचे आहे. त्यानें कालसापेक्ष कुठलाहि कल्प कल्पावयाचा नाही. युगादिकृत् म्हटलें म्हणजे युगाची, त्याच्या आरंभाची, त्याच्या कार्याची कल्पना आली. पण ही कल्पना व्यक्त-सापेक्ष असल्यामुळे, चिन्त्य कोटींत पडत असल्यामुळे परमात्म्याच्या अचिन्त्य अव्यक्त ऐश्वर्याची यथार्थ कल्पना द्यायला अक्षम आहे. परमात्म्याचे हे जें अतुल सर्वातीत सर्व-विलक्षण केवलस्वरूप ऐश्वर्य त्याचें ज्ञान करून घेणाराला होत नाही. तें वेदाला होत नाहीं, निर्वेदाला होते. म्हणून म्हटले आहेः
यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ।
अविज्ञातं विजानतां विज्ञातं अविजानताम् ॥


४९९. शरीरभूतभृत्
भृतकृत् भूतभृत् भूतभावन इत्यादि अनेकपदें मागे येऊन गेली आहेत. परंतु तिथे भूतशब्द सत्त्ववाचक आहे इथे शरीरभूतभृत् पदांत तो तत्त्ववाचक आहे. शरीर में पांचभौतिक म्हटले जाते. म्हणजे आकाश वायु तेज आप आणि पृथ्वी या पांच महाभूतांपासून चराचर सृष्टीच्या शरीराची रचना झालेली आहे. कोणतेंहि स्थूल शरीर या तत्त्वांचेच बनलेलें आहे. त्या- सर्व शरीरोपादानभूत पंच महाभूतांचाहि त्रिगुणात्मक प्रकृतिरूपानें भर्ता तो परमात्मा आहे. म्हणून त्याला म्हटले आहे शरीर-भूत-भृत्.
पांचभौतिक शरीर पंचभूतांपासून बनलें आहे, पण लिंगशरीर आणि कारणशरीर ही सूक्ष्म आणि सूक्ष्मतर शरीरें पांचभौतिक म्हणता येणार नाहींत. लिंगशरीर हे विषयग्राहक पंचेन्द्रिय-शक्तींचे व मनाचे मिळून बनलेलें मानले आहे आणि कारणशरीर हे अविद्यास्वरूप, ही दोन्ही शरीरें प्रकृतिगुणजन्य च असल्यामुळे त्यांचे स्वरूप प्राकृतच होय.
सारांश, सर्वभूतांची सर्व म्हणजे स्थूल लिंग कारण शरीरें प्राकृत होत आणि अव्यक्त-प्रकृतिरूपानें परमात्मा सर्व व्यक्त विसर्गाचा भर्ता आहे म्हणून तो म्हणावयाचा शरीररभूत-भृत्. जगांत नानाविध आवास बांधलेले आपण पाहतों-पर्णकुटी, मातीची घरें, चुनेगच्ची हवेल्या, अयोवज्रचूर्णनिर्मित भवनें इत्यादि. या सर्वांचे उपादान तृणदारुमृद्धातु होत. भूमि ही जशी भवनभूतभृत् म्हणावयाची तसा परमात्मा हा शरीरभूतभृत् होय. सर्व व्यक्त अव्यक्तांतून निर्माण झालेले आहे. व्यक्तिमात्राचा मूलाधार तें अव्यक्त आहे. अव्यक्तप्रभव त्रिगुण आहेत. त्या अव्यक्ताच्या रूपानें तो अक्षर परमात्मा इथे शरीरभूतभृत् म्हटला आहे.

५००. भोक्ता
परमात्मा प्रकृति-रूपानें, अव्यक्त-रूपानें, शरीरनिर्माणसामग्री पुरविणारा आहे, असे मागील पदांत म्हटले आहे, तर इथे त्या सामग्रीनें निर्मित शरीराचा अभिमानी बनून तद्द्वारा उच्चावच कर्में करणारा आणि त्यांची पुण्यापुण्य फळे भोगणारा जो जीव तोहि तोच आहे असे म्हटले आहे.
कार्य-कारण-कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते' गीता १३ -२१

कार्य म्हणजे शरीर आणि त्याचे कारण म्हणजे गुण या दोहोंचा हेतु प्रकृति आहे. आणि जीव आहे त्या देहांत उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखांचा ज्ञाता म्हणजे भोक्ता. आणि हे दोन्ही भाव म्हणजे शरीर आणि जीव ईश्वराची प्रकृतिच होयः
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च |
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा । गीता ७ - ४
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहोः ययेदं धार्यते जगत् ॥ " गीता ७ - ५

प्रकृति म्हणजे अविच्छेद्य अंगभूत भाव. कासव आपली अंगें केव्हां पसरतो केव्हां आवरून घेतो, पण असतो तो सदैव सांगच. तसाच परमात्माहि आपली द्विविध प्रकृति कल्पारंभी पसरूं लागतो आणि कल्पान्ती आवरून घेतो. पण ती प्रकृति असते सदैव त्याची अंगभूतच; आणि म्हणूनच तिला प्रकृति म्हणावयाचें.
कोणताहि प्राणी घेतला तर त्याच्या ठाई भोगायतन शरीर आणि भोक्ता जीव असा विभाग आढळून येतो. या दोहोंत भोगायतन ती जड प्रकृति असून भोक्तृत्व चेतनधर्म आहे. कारण जडाला ज्ञान होऊं शकत नाही. पण हे सुखादुःखात्मक ज्ञान भ्रांत आहे, म्हणून या जीवाला जीव म्हणावयाचे, नाही तर तो शुद्ध चेतनच आहे, शिवच आहे. म्हणूनच भोक्ता जीव ही परमात्म्याची प्रकृति म्हटली गेली. भ्रांत भोक्तृत्वरूप जडत्व त्यांत प्रतिबिंबित आहे. 'शुद्ध चेतन परमात्मा हा असा प्रकृतिपुरुषेश्वर आहे. दोन्ही त्याची प्रकृतिच होय, डावें उजवें अंग होय. "शरीर रूपी झाडावर जीवेश्वररूप दोन पक्षी राहतात. त्यापैकी जीव पक्षी हा त्या वृक्षाची सुखदुःखरूप कर्मफळे खातो आणि दुसरा ईश्वररूप पक्षी नुसता तटस्थ पहात असतो" असें वर्णन याच भावांना अनुलक्षून उपनिषदांत आले आहे.

शतक सहावें

५०१. कपीन्द्र
कपि शब्द सहस्रांत तीनदा आला आहे-वृषाकपिः श्लोक ११, कपीन्द्रः श्लोक १३ आणि कपिः श्लोक ९६. वृषाकपि पदाची व्याख्या भारतांत 'कपिर वराहः श्रेष्ठश्च धर्मश्च वृष उच्यते । तस्माद् वृषाकपि प्राह काश्यपो मां प्रजापतिः (भा शां ३४३-५९) अशी दिली आहे. ही आर्ष निरुक्ति आहे. आर्षवचन प्राचीनतम परंपरेवर आधारलेले असते. त्यामुळे तें चिंत्य आहे. तदनुसार वृषाकपि म्हणजे यज्ञ-सूकर असा अर्थ निष्पन्न होतो. प्राचीन वैदिक धर्म म्हणजे यज्ञ होय, आणि सूकरानें ही (वृजिन-) अर्णवमग्न मही रदानानें उचलली अशी प्रसिद्धि आहे. दोहोंच्या संयोगांतून असा भाव निघतो की या जगाचा उद्धार यज्ञानें व्हावयाचा आहे. यज्ञाधारच तें आहे. गीतेत हा विचार स्पष्टच आला आहेः पहा यज्ञार्थात् कर्मणो ऽन्यत्र लोको ऽयं कर्मबन्धनः - गीता ३.९ ते तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् - गीता ३.१५.
हे झालें वृषाकपि पदाबाबत. कपीन्द्र पदहि तदर्थकच दिसते. पुढील भूरिदक्षिण पदाच्या साहचर्यानें सदर पूर्ववर्ती कपीन्द्र पदहि यज्ञवाचक मानणे शक्य आहे. दोन्ही पदें जोडून वाचल्यास जो भूरिदक्षिण तो कपीन्द्र म्हणजे महावराह होय, महायज्ञ होय, धर्मश्रेष्ठ होय असा अर्थ निष्पन्न होतो.
कपि म्हणजे वराह हा अर्थ न घेतां कपि म्हणजे वानर असा अर्थ घेऊन कपीन्द्र म्हणजे वानरांचा स्वामी श्री राम असा अर्थ करतां येतो, पण तो गौण आहे. सहस्रांत पौराणिक आख्यायिका नसून तात्त्विक चिंतन आहे. सहस्रांत राम आहे पण तो दाशरथि नाहीं, तो आत्माराम आहे. कृष्ण आहे पण तो राधाकृष्ण नाहीं, देवकीनन्दन आहे, अदितिनन्दन आहे. तो कंसहन्ता नाही, पण मधुसूदन आहे चाणूरान्धनिषूदन आहे. तदनुसार कपीन्द्र म्हणजे यज्ञेश्वर होय.
पुढे ९६ व्या श्लोकांत "कपिलः कपिरव्ययः"या वचनांतहि अव्ययः कपिः म्हणजे अव्ययधर्म असाच आशय आहे. कपींत लालतोंडे आणि काळतोंडे असे दोन प्रकार आढळतात. अग्निहि तसा आहे. तो पेटतो तेव्हां तो लालतोंड्या असतो एरव्हीं काळतोंड्या. आणि सर्व अग्नीत यज्ञाग्नि हा श्रेष्ठ होय, म्हणून परमात्मा कपीन्द्र म्हणावयाचा. अथवा कपीन्द्र म्हणजे वानरयूथमुख्य हनुमान्हि समजायला हरकत नाही. भगवद्विभूति च आहे ती.

५०२. भूरिदक्षिण
बह्व्यः दक्षिणाः अस्य इति भूरिदक्षिणः यज्ञपुरुषः परमात्मा । ज्याला विपुल दक्षिणा मिळते तो यज्ञपुरुष परमात्मा भूरिदक्षिण म्हणावयाचा. ज्याची फी मोठी तो मोठा डॉक्टर, तसा ज्याची दक्षिणा मोठी तो मोठा यज्ञपुरुष, मोठा देव, परमात्मा हा सर्वांत मोठा यजनीय आहे, देव आहे, तो सर्व भूतांचा अन्तर्यामी आहे. सर्व भूतें सर्व पूजा त्यालाच अर्पण करतात. जो विशिष्टत्व राखून अभिमान बाळगून इंद्र चंद्र झाला, त्याचा भाग मर्यादित झाला. पण जो सर्वभूतात्मभूतात्मा आहे त्या परमात्याच्या ऐश्वर्याची बरोबरी कोण करूं शकतो ? त्याच्या इतका करभार, त्याच्या इतकी दक्षिणा कोणालाच मिळू शकत नाही.
भूरिः दक्षिणा दाक्षिण्यं अस्य इति भूरिदक्षिणः परमतत्परः परमात्मा । ज्याची दक्षिणा म्हणजे दाक्षिण्य मोठे तो, भूरिदक्षिण परमतत्पर परमात्मा म्हणावयाचा. 'कपीन्द्रो भूरिदक्षिणः' हे वचन याहि अर्थानें मोठे समर्पक आहे. कपीन्द्र हनुमान् हा भूरिदक्षिण म्हणजे सदैव हात जोडून सेवातत्पर किंकर उभा आहे. परमात्मा हा जसा परम सेव्य आहे, तसा तो आदर्श सेवकहि आहे. भक्तानें हाक मारण्याची देर की तो सेवेस हजर ! गजेन्द्रानें हाक मारली तर तो तत्काळ धावून आला. प्रहलादानें खूण केली, इषारा केला त्या बरोबर तो खांबांतून प्रकटला. याहून अधिक दक्षता, अधिकतत्परता ती कोणती म्हणावी ? परमात्मा अन्तर्यामी असल्यामुळे तुमच्या नुसत्या स्मरणा बरोबर, इषाऱ्याबरोबर तो तुमच्या सेवेस हजर होतो. तुम्ही झोपला तरी तो जागत असतो. त्याचे डोळे अनिमेष पाहत आहेत. तुम्ही उठला तर कमरेवर हात ठेवून तो तुमच्या हुकमाची वाट पाहत उभाच आहे.


सोमपोऽमृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः ।
विनयो जयः सत्यसन्घो दाशार्हः सात्वतां पति ॥५४॥


५०३. सोमप्र
सोमपान आणि सामगान म्हणजे सुखाची परमावधि होय. शरीराला पान आणि मनाला गान गारीगार करून सोडतें. देहप्राण आणि मन या दोहोंतून एकालाच सुख लाभल्यानें पूर्ण संतोष होत नाही. म्हणून वैदिक धर्मात सोमपान आणि सामगान यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सुख भौतिक असलें तरी तें उपेक्षणीय नाही. पण तिथेच थांबतां येत नाही. कारण तें अक्षय्य नाही. म्हणून माणूस अक्षय्य सुखाच्या शोधांत लागला आणि त्यानें जें आध्यात्मिक अक्षय्य सुख शोधून काढलें त्यालाहि त्यानें सोमच म्हटलें. जें ठाऊक असते त्याचे उदाहरण वा उपमा मनुष्य समजावून सांगतांना अव्यक्ताला देत असतो आणि तें स्वाभाविकच आहे. तदनुसारच माणसाची भाषा आणि वाङ्मय वाढत गेली आहेत. आध्यात्मिक भाषा ही प्रायः रूपकात्मक असते त्याचे कारणहि हेच आहे. इथेहि तोच प्रकार झाला आहे. भौतिक सोमवल्ली, तिची आधिदैविक देवता सोम आणि तिचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे स्वरूप परमानन्द हे तिन्ही अर्थ अपेक्षेनुसार घेतां येतात. अधिभूत, अधिदैव आणि अध्यात्म ह्यांना क्रमानें १, २, ३ असे अंक दिल्यास त्यांचे प्रस्तार १,२, ३,१+२, १+३,२+३, आणि १+२+३ असे सप्तविधच होतात. गरजेप्रमाणें एकत्वेन पृथक्त्वेन आणि बहुधा अर्थ करावयाचा. वैदिक मंत्रांत हे सर्व प्रस्तार समाविष्ट आहेत. त्यामुळे मंत्रांचा अर्थ एकेरी नाहीं तो संमिश्र आहे. मोगऱ्याचे फूल जसें सातपुटी असतें तसा वैदिक मंत्राचा वा शब्दाचा अर्थहि साप्तभौमिक असतो. सोम पदहि तसेंच आहे. त्यामुळे त्याचा एकेरी अर्थ अनेकदां नीट बसत नाही. 'सोमः पवित्रं अतिएति रेभन्' या वेदवचनांत सोमचा एकेरी अर्थ घेऊन चालणार नाही. भौतिक सोम (रस) गाळण्यांतून गाळून आवाज करीत येतो आणि दैविक सोम म्हणजे चंद्र अर्थात् त्याचे किरण आकाशाच्या गाळण्यांतून गाळून जणू आनंदोल्लास करीत येतात. आध्यात्मिक सोम म्हणजे आत्मज्ञान पवित्र अंतःकरणांतून गर्जत येतें. असें एकाच मंत्राचे अनेक अर्थ एकमेकांचा निषेध न करतां पण एकमेकांना पोटांत घालून येतात. इथे सोमप म्हणजे सोमयागांत यजिला जाणारा यज्ञभुक् परमात्मा होय.

५०४. अमृतप
सोमप आणि अमृतप ही दोन पदें जोडून आली आहेत. त्यांत तुलना आणि तफावत दाखविण्याचा हेतु आहे. प्रत्येक आदर्श जीवाला एका उंच भूमिकेवर घेऊन जायला मदत करीत असतो. म्हणून तो प्रत्येक आदर्शच परमात्मस्वरूप आहे. तथापि भूमिकानुसार त्यांच्यांत तरतमभाव हा राहतोच. इथेहि या दोन पदांत तसाच तो आला आहे. पार्थिव भोगापेक्षा दिव्यभोग श्रेयस्कर. लोकायतिक हे नास्तिक. ते पार्थिव भोगवादी होत. ते म्हणतात, हे आयुष्य आहे तोवर खा प्या मजा करा. मेल्यानंतर सगळाच कारभार आटोपला. "यावत् जीवेत् सुखं जीवेत्; ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः । " हा त्यांचा जीवनाचा आदर्श आहे. वैदिकांना तो मान्य नाही. ते आस्तिक आहेत. देह मेला म्हणून जीवन संपलें असें नाहीं. इहलोकाप्रमाणें परलोकहि आहे. त्या परलोकांत जीव कर्मानुसार सुखदुःख भोगतो असें ते मानतात आणि म्हणून पाप वर्ज्य करून यज्ञानें पुण्य संपादावें आणि पुण्यबलानें स्वर्गांत विपुल सुख भोगावें असें त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा वेदवाद गीतेच्या श्लोकांत असा आला आहे
"त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकं अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ॥ गीता ९ - २०
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना, गतागतं कामकामा लभन्ते ॥ " गीता ९ - २१

लोकायतिकांपेक्षा वैदिकांचा विचार बरा म्हटला तरी तो निर्दोष नाहीं. त्यांत शाश्वती नाही. पार्थिव भोग जसे क्षणिक तसे दिव्य भोगहि नश्वर आहेत. मग त्यांच्याबद्दल विचारी माणसाला उत्साह कसा वाटणार ? म्हणून वेदान्ती म्हणतात, बाबा रे तुझा तो सुरारस काय नि सोमरस काय कितीहि आनंद देणारा वाटला तुला, तरी तो आज ना उद्यां संपला म्हणजे पुनः येरे माझ्या मागल्याच ना ? पुनः दुःखच ना ? म्हणजे सगळे मुसळ केरांत ! तेव्हां त्यांत कांहीं सार नाही. जे चिरंतन अक्षय सुख त्याचीच कास धरली पाहिजे आणि असें जें आहे ते आहे आत्मज्ञान. तोच मानवाचा खरा आदर्श आहे. त्यासाठीच त्यानें जगावें मरावें आणि तरावें. तेंच अमृत. त्याचे पान करतो तो अमृतप होय, परमात्मा हा असा परमादर्शरूप असल्यामुळे तो अमृतप होय. वैदिकांच्या भूमिकेवरून तो सोमप तर वेदान्ताच्या भूमिकेवरून तो अमृतप होय.

५०५. सोम
"सोमपो ऽमृतपः सोमः' हा चरण एका विचाराच्या सूत्रांत गुंफलेला आहे. तो विचार मागील दोन पदांच्या चिंतनांत आपण पाहिला. तिथेच सोमपदाचेहि विवेचन आले आहे. परंतु तिथे 'सह उमया सोमः' हा सहबहुव्रीहि समास आणि विग्रह आपण पाहिला नाही. उमेसहित असलेला शिव तो सोम म्हणावयाचा. विष्णु-सहस्रांत हा सोम म्हणजे सांब कसा शिरला ? त्याचे इथे काय प्रयोजन ? इथे शिव विष्णु ब्रह्मा या देवतांचे स्मरण नसून हे एका परमात्म्याचे स्मरण आहे. त्यामुळे इथली सर्व पदें परमात्मवाचक आहेत, अन्यदेवतावाचक नाहींत. त्यामुळे शिववाचक वा विष्णुवाचक वा अन्य देवदेवतावाचक पदें सर्व परमात्मवाचक समजावयाची आहेत. तद्नुसार सोम हे पदहि परमात्मवाचकच घ्यावयाचे आहे. काय कल्पना आहे या पदांत ? परमात्मा हा चेतन असल्यामुळे तो सदैव स्मृतिमान् असतो. स्वानुभवयुक्त असतो, आत्मज्ञानयुक्त असतो. हे आत्मज्ञान ही आत्मविद्याच इथे उमापदानें लक्षित आहे. आणि ज्या अर्थी तो चिद्रूप परमात्मा सदैव आत्मविद्यानाथ आहे त्याअर्थी तो सोम म्हटला आहे. ॐकार हा जसा एकाक्षर ब्रह्म आहे तसा उमा शब्दहि द्व्यक्षर ब्रह्म म्हणता येईल. निदान, तिला ब्रह्मविद्यावाचक मानायला काहीच हरकत नाही. दोन्ही पदांत अउम हेच वर्ण आले आहेत. केनोपनिषदांत उमा हैमवती आली आणि तिनें देवांना ब्रह्माची ओळख करून दिली अशी आख्यायिका आलेली आहे. तदनुसार उमा म्हणजे ब्रह्मविद्या हे समीकरण दृढ होतें.
सोम हा अमृतस्यंदी म्हणून प्रसिद्ध आहे. परमात्मा हा तसाच जीवांना ज्ञानामृतानें अमर करतो, त्यांना परम सुख देतो, मोक्ष देतो, म्हणूनहि तो सोम म्हणावयाचा. आणि 'नक्षत्राणां अहं शशी, पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः' म्हणून सोम ही भगवद्-विभूति तर प्रसिद्धच आहे. -
सारांश, अभिधा, लक्षणा वा व्यञ्जना कोणत्याहि अर्थानें तो परमात्मा सोम आहे. नक्षत्रनाथ, विद्यानाथ, मोक्षनाथ; पोषण शिक्षण रक्षण देणारा.

५०६. पुरुजित्
पुरुजित् सहस्रजित् अनन्तजित् अशी ही पदें सहस्रांत आली आहेत. तिन्ही पदांचे तात्पर्य एकच आहे. परमात्मा हा द्यूतांत वा युद्धांत, दैवदृष्ट्या वा पुरुषकारदृष्ट्या विजेता आहे. विजयी आहे. तो पुरु म्हणजे विपुल धन जन जिंकतो. हार त्याला ठाऊक नाही. तो प्रत्यक्ष युद्धांत वा तत्प्रतीक सोंगट्यांच्या खेळांत द्यूतांत सारखा जितीवर जीत मिळवीत जातो. त्याचा प्रत्येक वार, त्याचे प्रत्येक दान त्याला जय मिळवून देत असते. तो सारखा शकुनीप्रमाणें जितं जितं म्हणत जातो आणि जिंकीत जातो. अशा प्रकारें तो पुरुजित् सहस्रजित् अनन्तजित होतो. परमात्मसत्ता सर्वोपरि आहे. तिच्या अधीन सारें विश्व आहे. त्यामुळे तीच एक विजयी आहे. जीवांचे क्षणिक जयपराजय त्या सत्तेपुढे सारखेच आहेत. ताटांतील काय नि वाटीतील काय दोन्ही घास शेवटी जसे खाणाऱ्याच्या पोटांतच जातात तसे सर्व जीव आणि त्यांचे उद्योग आणि त्यांची हार जीत सगळेचे सगळे त्या परमात्म-शक्तींत विलीन होतें. सर्व जलप्रवाह जसे शेवटीं समुद्रांत समाप्त होतात तसे जीवांच्या जीवनाचे ओघ त्यांच्या सर्व बऱ्यावाईट प्रवृत्तीसगट आणि त्यांच्या यशापयशासकट परमात्मसत्तेत समाप्त होतात. म्हणून तो परमात्मा पुरुजित् म्हणावयाचा. त्या परमात्मशक्तीला जो वश होऊन राहिला तोहि पुरुजित् म्हणावयाचा. कारण त्याची स्वतंत्र अशी हार जीत आतां राहिलीच नाही. गीतेंत भगवान् जीवाला हाच उपदेश देत आहेत-'निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् बरें वाईट सर्व ईश्वरी संकल्पानुसार घडत आहे. मी बरे कर्म करणारा म्हणून फुशारकी मारूं नको किंवा मी वाईट कर्म करणारा म्हणून खट्ट होऊं नको. पण ओळख की आपण ईश्वरी हातांतलें एक हत्यार आहों. तो हवा तसा त्याचा वापर करीत आहे . म्हणून त्यालाच वश होऊन रहावयाचें. यशापयश त्याचें. आपण त्यांत कुठेच कांहीं नाहीं. 'मा व्यथिष्ठाः । युध्यस्व । जेतासि । भुक्ष्व राज्यं समृद्धम् । ' भक्ताला भगवंताचे हे सरळ आश्वासन आहे. अभिवचन आहे.

५०७. पुरुसत्तम
पुरुषोत्तम गतिसत्तम अशी आणि अशा सारखीं पदें सहस्रांत अनेक आली आहेत. त्यांत उत्तर पद प्रायः श्रेष्ठार्थक असते आणि पूर्वपद नाम असते. आणि ही पूर्वोत्तर दोन पदें निर्धारणार्थक षष्ठीनें जोडलेली असतात. ही षष्ठी कुठे लुप्त असते, कुठे अलुक्. पुरु-सत्तम गतिसत्तम, पुरुषोत्तम, धर्मविदुत्तम, यदुश्रेष्ठ ही सामासिक उदाहरणे होत. क्षमिणां वरः, गोविदां पतिः, योगविदां नेता, शक्तिमतां श्रेष्ठः श्रीमतां वरः, सर्वशस्त्रभृतां वरः हीहि एक प्रकारे सामासिक च होत. पण इथें अलुक् समास आहे, असें म्हणता येईल. या वरील दोन प्रकारच्या सामासिक नामांत सूक्ष्म पाहतां असें दिसते की जिथें निर्धारण आहे तिथे षष्ठीचा प्रत्यय वापरला आहे आणि जिथे निर्धारण नाहीं तिथें समास केला आहे. पुरुषोत्तम हा समास पुरुषेषु उत्तमः असा सोडवला जाईल. इथे निर्धारण नाहीं अथवा तो असाहि सोडवणे शक्य आहे उत्तमः पुरुषः पुरुषोत्तमः इथेहि निर्धारण नाही. परंतु जिथे अनिर्धारणरूप सहज श्रेष्ठत्व प्रतिपादिलें नसून विशिष्टांत वरिष्ठ असा तौलनिक भाव असेल तिथे प्रायः षष्ठीचा प्रत्ययच वापरला आहे. क्षमिणां वरः आणि क्षमिवरः एक नाही. पहिल्यांत निर्धारण आहे, दुसऱ्यांत तुलना न करतां सामान्यपणे, श्रेष्ठत्व प्रतिपादिले आहे. तद्नुसार पुरु-सत्तम म्हणजे "पुरुषु सत्तमः" अथवा "सत्तमः पुरुः" असा विग्रह होईल. पहिला सप्तमीतत्पुरुष समास म्हटला जाईल व दुसरा कर्मधारय. दोहोंचा अर्थ एकच. श्रेष्ठ पुरु. गतिसत्तमः म्हणजे श्रेष्ठ गति. वीणावरः म्हणजे श्रेष्ठ वीणा. ही उदाहरणेहि तशीच आहेत. पण पुरु म्हणजे काय ? पुरु हे विशेषण की नाम ? तें नामच म्हटले पाहिजे. पुरु म्हणजे पुरुष, पुरु म्हणजे नर..... आणि पुरुसत्तम म्हणजे नरोत्तम पुरुषोत्तम, जडाहून चेतन श्रेष्ठ आहे. त्या चेतनांत उद्‌भिज्ज, स्वेदज, अंडज, जरायुज हे उत्तरोत्तर श्रेष्ठ होत. जरायुजांत चतुष्पादांहून द्विपाद श्रेष्ठ,त्यांतहि चक्षुष्मान् चक्षुष्मंतांतहि धीमान् श्रेष्ठ होय. अशा प्रकारे "पुरुषु बहुषु सत्तमः पुरु-सत्तमः" या हि अर्थाने पुरुसत्तम पद लावता येईल. अर्थात फरक नाहींच. असा जो पुरुसत्तम आहे तो परमात्माच म्हणावा. 'पुरुषात् न परं किंचित्, सा काष्ठा सा परा गतिः पुरुसत्तम आणि गति-सत्तम ही दोन्ही पदें वरील वचनांत उपनिषदानें गोविली व विवरिलीं आहेत.

५०८. विनय
प्रस्तुत श्लोकाच्या पूर्वार्धात दोन सूत्रे 'सोमपोऽमृतपः सोमः" आणि "पुरुजित् पुरुसत्तमः' येऊन गेली. उत्तरार्धातहि तशीच दोन आली आहेत. "विनयो जयः सत्यसंधः" आणि "दाशार्हः सात्वतां पतिः"
म्हणजे प्रत्येक चरण एक सूत्रवत् आहे. वस्तुतः सहस्रांतील प्रत्येक नामच एक सूत्र आहे. सूत्राची व्याख्या आहे "स्वल्पाक्षरं असंदिग्धं ग्रन्थतात्पर्यबोधकम् । अस्तोभं अनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः" ही व्याख्या सहस्रांतील प्रत्येक नामाला लागू पडते.खरोखर सहस्र हा एक अतिविशद गूढ सूत्रग्रंथ आहे. इतका सुलभ की कोणीहि तो आस्वादावा. इतका दुरूह की भल्या भल्यांनाहि उलगडूं नये. काव्याच्या द्राक्षापाक आणि नारिकेलपाक अशा दोन जाति कल्पितात. रघुवंशादि काव्ये द्राक्षापाक होत तर शिशुपालवधादि काव्ये नारिकेलपाक होत. द्राक्ष तोंडांतच टाकायचे काम, पण खोबरें खायचे म्हणजे कोण खटपट. एकांत सर्वत्र सौलभ्य आहे तर दुसऱ्यांत सर्वत्र काठिन्य भरलें आहे. द्राक्ष नीरदालाहि खातां येईल पितां येईल, तर नारळ दन्तीलाहि मुश्किलीनें सोलून फोडून काढून चावचाव चावून खावा लागेल. परंतु एकसमयावच्छेदें करून उभयपाक असें काव्य म्हणजे हे सहस्र आहे. तें दगडासारखें अभेद्य पण रसासारखें आस्वाद्य आहे-शर्कराखंडवत. खडीसाखरेचा खडा दांतवाल्याला नि बिनदांतवाल्यालाहि सारखाच आस्वाद्य आहे. कठिण असून रसाळ, रसाळ असून कठिण. खडीसाखरेचा खडा संपून जातो, पण हा नामाचा खडा जिभेवर सतत द्रवत राहूनहि संपत नाहीं.
विशेषेण नयति इति विनयः । परमात्मा हा सत्य आणि संयम उर्फ अहिंसा यांच्या योगें साधकाला गन्तव्याला नेऊन पोचवितो म्हणून तो विनय. विनयांत सत्य नसेल तर विनय म्हणजे चापलूसी वा चाटुकार होईल आणि संयम उर्फ अहिंसा नसेल तर विनय म्हणजे औद्धत्य म्हणावे लागेल. नेतृत्वाला दोन गुण वा बलें लागतात. एक दर्शन आणि दोन चरण. सत्य हे दर्शन-बल आहे, अहिंसा हे चरण-बल आहे. विनयांत ही दोन्ही बलें एकवटली आहेत. म्हणून विनय हा परमात्मा होय.
'विनयो जयः सत्यसंधः' हा नवाक्षर चरण झाला. शास्त्रमर्यादेसाठी विन ह्या अक्षरांना एकाक्षरी भाव झाला आहे असे समजावें. गीतेंतहि असा एकाक्षरी भाव आला आहे पहा-'मदनुग्रहाय परमम् । '-११-१
५०९. जयः
परमात्मा विनय आहे आणि म्हणून तो जयहि आहे. जय म्हणजे जिंकणारा. जीवनाच्या युद्धांत कोणाचा जय होतो ? जो सत्याग्रही आहे त्याचा. सत्यासाठी अहिंसेचा आग्रही तो सत्याग्रही होय. युद्ध हें मुत्सद्दी आणि योद्धा दोहों मिळून जिंकलें जातें. जीवनाच्या युद्धांत सत्य हा मुत्सद्दी आणि अहिंसा म्हणजे संयम हा योद्धा आहे. विनयांत सत्य आणि अहिंसा दोन्ही एकवटली आहेत आणि म्हणून जिथे विनय तिथे जय हा ठेवलेलाच आहे. म्हणून म्हटलें आहे 'विनयो जयः.' सत्यांत साध्य आणि साधन दोहोंचाहि अंतर्भाव होतो. म्हणून एकच नांव घ्यायचे झाले तर सत्य घेतले जाईल. दोन नावें घ्यायची तर सत्य आणि संयम घेतली जातील. संयमाचें अंतःस्वरूप अहिंसा आहे. अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य प्राणाघात-निवृत्ति ही सर्व संयमाची विविध रूपं होत. आणि सर्व संयम-धर्माचे तात्पर्य अहिंसाच आहे. इतकेच नव्हे तर सत्याचेहि तात्पर्य कार्यदृष्टीत अहिंसा च म्हणावे लागते. कारण सर्वत्र समदर्शन हेच सत्य आहे. आणि या दर्शनांतून निष्पन्न होणारा जो व्यवहार व्यापार तोच अहिंसा म्हटला जातो. द्वैतकल्पनेंत भय आहे,हिंसा आहे. आणि तदुत्थ सर्व व्यवहार व्यापारहिंसा म्हटला जाईल. म्हणूनच म्हटले आहे गीतेंत
समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ गीता १३ -२९

ज्यानें समदर्शनरूप परम सत्य ओळखलें तो हिंसा कोणाची करणार ? ज्याची हिंसा करायची तोहि तर तोच आहे. आपलीच हिंसा कोण करील ? पण समदर्शन म्हणजे सर्वत्र परमात्मादर्शन एकाएकी होत नाही. ती अहिंसेची परमावधि आहे. तो अहिंसेचा समुद्र आहे. त्या समुद्राला नदीच्या वाटेनें पोंचावें लागते. म्हणून म्हटले आहे 'अहिंसा परमो धर्मः'. "अहिंसा हे परम साधन आहे. याच्या योगें तें परम साध्य गांठतां येते. औष्ण्य अग्नीचा, प्रकाश सूर्याचा जसा स्वभाव आहे स्वधर्म आहे. तसा अहिंसा हा आत्याचा स्वभाव आहे, स्वधर्म आहे. आणि म्हणूनहि अहिंसा हा परम धर्म होय. आणि ज्या अर्थी 'नहि स्वभावो भावानां व्यावर्तेत' पदार्थांचा स्वभाव बदलूं शकत नाहीं त्या अर्थी एक त्याचाच जय आहे या जगांत. परमात्मा हा असा सदैव स्वभावस्थित असल्यामुळे त्याचा म्हणजे त्याच्या आत्मधर्माचा सत्य अहिंसादिकांचा जय आहे. म्हणून तो जय होय. "सत्यमेव जयते' "यतो धर्मस्ततो जयः" या सर्व वचनांचेहि हेंच तात्पर्य.

५१०. सत्यसंध
सत्या संधा प्रतिज्ञा यस्य सः सत्यसंधः | ज्याची संधा म्हणजे प्रतिज्ञा सत्य आहे तो सत्यसंध परमात्मा होय. परमात्म्याची काय प्रतिज्ञा आहे ? "सत्यमेव जयते, नानृतम्' "कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति' इत्यादि परमात्म्याच्या प्रतिज्ञा आहेत. सत्यच एक आहे. तेंच असतावर सदैव विजयी होतें. त्याला जो धरून राहतो तो परमात्म्याचा भक्त कधींहि नाश पावत नाही. कारण त्यानें शाश्वताचा आश्रय केलेला असतो, अशाश्वाताचा नव्हे. परमात्मा हा जीवाप्रमाणें कसली कामना धरीत नाहीं वा तिच्यासाठी कसला संकल्प करीत नाही वा त्याच्या सिद्धीसाठी कांही प्रतिज्ञा करीत नाही. त्याचे स्वरूपावस्थान, त्याचा स्वभाव हीच त्याची प्रतिज्ञा होय. सूर्याला प्रकाशच देत राहीन अशी प्रतिज्ञा करावी लागत नाही. तो त्याचा स्वभाव आहे. त्या प्रमाणें सत्य हीच ज्याची संधा म्हणजे व्रत वा शील आहे तो परमात्मा सत्यसंध होय. परमात्मा हा या दोन्ही अर्थानी सत्यसंध होय. सत्य हीच त्याची प्रतिज्ञा आहे आणि ती त्याची प्रतिज्ञा सत्य आहे, अवितथ आहे. संधा पद संपूर्वक धा धातू पासून व्युत्पादिले जाईल. अर्थात् संधा म्हणजे सम्यक् धारणा. ज्याची धारणाच सम्यक् नाहीं त्याची प्रतिज्ञा सत्य होऊं शकत नाहीं. अग्नीनें म्हटले की मी उष्ण नाही राहणार, शीत होईन, तर त्याची ही प्रतिज्ञा खोटी पडेल. कारण या प्रतिज्ञेला सम्यग् धारणेचा आधार नाही. स्वभावाविरुद्ध कोणतीहि प्रतिज्ञा होऊं शकत नाही. जो कोणी ती तशी काहील तो लटका पडेल. तो सत्यसंध नाहीं होणार. परमात्मा हा सत्यसंध आहे, कारण त्याची धारणा सम्यग् आहे. मी सत् चित् आनन्द आहे अशी त्याची धारणा आहे. आणि ही त्याची धारणाच त्याची प्रतिज्ञा आहे. त्याच्या या प्रतिज्ञेत केव्हांहि अंतर येत नाही. जो अशी आत्मनिष्ठा राखतो तोच विनय तोच जय आणि तोच सत्यसंध होतो. तोच विजेता, तोच जेता, 'तोच तीर्ण-प्रतिज्ञ होतो. परमात्माच एक असा आहे म्हणून तो "विजयो जयः सत्यसंधः' म्हटला आहे.

५११. दाशार्ह
"दाशार्हः सात्वतां पतिः" हा चरण वंशानुकीर्तन करणारा आहे. सहस्रांत भगवंताच्या "प्राचीन पदाचे 'म्हणजे प्रागैतिहासिक वा अनैतिहासिक अव्यक्त स्वरूपाचे चिंतन आहे, त्यांत "अर्वाचीन पदाचें" म्हणजे अवतारादिकांचें आख्यान नाही. कारण प्रारंभीच भीष्म म्हणतात "यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः । ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये' म्हणजे परमात्म्याची जी गौण अर्थात् गुणवाचक नामें ती सांगतों, (व्यक्तिवाचक नाही सांगत) हे विधान योग्यच आहे, पण अपवादानेंहि नियमच सिद्ध होतो. कृष्णावतार हा तसा अपवाद आहे. मनुष्य कितीहि तत्त्वचिंतक असला तरी तो देही आहे हे विसरता येत नाही आणि "अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्‌भिरवाप्यते' अव्यक्ताचे आकलन देहधारी माणसाला कठिणच जातें म्हणून तो व्यक्ताचा आश्रय करीत असतो. आणि त्यामुळेच स्वदेशीय आणि स्वकालीन महापुरुषाचा, परमेश्वरी अवताराचा, प्रभाव कोणीहि टाळू शकत नाही. खरोखर त्यांच्या द्वाराच त्या अव्यक्त महात्म्याचे परमात्म्याचें किंचित् किंचित् भान आणि ज्ञान आम्हांला होत असते. आणि म्हणून अव्यक्ताच्या चिंतनांत हे व्यक्ताचें नामरूप-गुणशील-कीर्तन येतें. गुरूविषयींची ही कृतज्ञता आहे. मनुष्य कितीहि ज्ञानी झाला तरी तो कृतज्ञता सोडू शकत नाही. ही कृतज्ञताहि मर्यादाशील असावी. कुलस्त्री जशी पतीचें नांव घेत नाही आणि घेते तेव्हां तें उखाण्यांत घेतें त्या प्रमाणें शंकराचार्यासारखे थोर पुरुष आपल्या गुरूचें नांव खुबीनें घेतात "भज गोविन्दं भज गोविंदम्' म्हणून. इथेहि सहस्रकार "दाशार्हः सात्वतां पतिः" म्हणून तशीच खुबीदार म्हणजे श्लिष्ट कृतज्ञता प्रकट करीत आहे. "दाशो दानं तं अर्हति इति दाशार्हः परमात्मा" "दशाहकुलोद्‌भवत्वाद् वा दाशार्हः श्रीकृष्णः । अर्थात् दाशार्ह म्हणजे परमात्मा, तसा व्यासमुखानें भीष्म म्हणतात, माझ्या पुरता श्रीकृष्ण दाशार्ह होय. ज्यांना माझा गुरु दशार्हकुलोद्‌भव श्रीकृष्ण मान्य नसेल त्यांच्यावर तो मी लादत नाही, त्यांना तो दानार्ह परमात्माच दाशार्ह होय. भीष्मानें श्रीकृष्णाची अग्रपूजा केली होती, हे स्मरणीय.

५१२. सात्वतां पति
यदु हा वंशपुरुष प्रसिद्ध आहे. त्यावरून यादववंश प्रसिद्ध झाला. तसा दशार्ह वा सात्वत् नामक कोणी वंशपुरुष होऊन गेल्याचे आज ज्ञात नाही, पण एकेकाळी तें असले पाहिजे. वंशांत अनेक महापुरुष होतात. आणि कालांतरानें तो एकच वंश त्यांच्या नांवानें ओळखला जाऊ लागतो. सूर्य मनु इक्ष्वाकु रघु एकाच वंशांतील महापुरुष. त्या प्रत्येकाच्या नावानें तो वंश वा कुल ओळखले जाते. तसेंच यदु, दशार्ह, सात्वत्, वृष्णि इत्यादि वंशपुरुषांवरून वा कुलपुरुषांवरून तो वंश वा वंशांतर्गत तें कुल वा कुलान्तर्गत एखादे उपकुल प्रसिद्ध होते. चंद्र वंश, यदु कुल, वृष्णि उपकुल असा विवेक लक्षांत घ्यावयाचा. पण हा विवेक सर्वत्र पाळला जात नाहीं आणि ठोबळ मानानें वंशकुलादि पदें निर्विशेष पर्याय म्हणून वापरली जातात. सात्वत् हे सात्वत् वंशीय लोक होत. या लोकांची जी कुलदेवता ती "सात्वतां पतिः" म्हटली गेली. कुलदेवता प्रथम एक अव्यक्त शक्ति असते. कालांतरानें तिला व्यक्ति बनविले जाते. म्हणजे तिचें जन्म गुण कर्म गाइलें जाते. अशा रीतीनें "अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां अबुद्धयः । परं भावम् अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्' हा जो गीतेनें पारमार्थिक तत्त्व आणि लौकिक व्यवहार यांचा प्रकार वर्णिला आहे तो सर्वत्र म्हणजे सर्व देशांत नि सर्व कालांत सर्व संप्रदायांत निर्माण होतो. तसाच तो सात्वतांत म्हणजे वैष्णवांच्या संप्रदायांत झालेला आहे. या कुलदेवतेचे स्वरूप काय ह्याचा विचार तत्त्वज्ञ भलें करोत, पण उत्सवप्रिय लोक तिला आपल्या आवडी प्रमाणें नाम-रूप-गुण-कर्म चिकटवून तिचा गोंधळ मांडीत आले आहेत. त्यांचें जें तंत्र उभे झालें तें सात्वत तंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. भारतांत मुख्यतः वैदिकांचा यज्ञमार्ग, आणि शाक्त-शैव-वैष्णवादिकांचा तंत्रमार्ग असे दोन संप्रदाय चालत आले आहेत. आजच्या हिंदु धर्मांत दोन्ही संप्रदाय एकवटून मंत्र-तंत्र-युक्त पूजाविधि होत असतो. मंत्र वैदिक आणि उपचार तांत्रिक होत. मंत्रांनी आम्नात आणि तंत्रांनी उपचरित एक परमात्माच आहे. "सात्वतां पतिः" पदानें इथे तो उपचरित परमात्मा, उल्लेखिलेला आहे. सात्वतां पति पदानें मानुषी तनु धारण करणारा सगुण साकार अवतीर्ण परमात्मा समजावयाचा. हा अवतारहि त्या निर्गुणाचा आहे हे विसरावयाचें नाहीं. अवतार शब्दच ते सांगत आहे. मंत्र प्राचीन घेऊन तंत्र अर्वाचीनच नव्हे तर आधुनिक घ्यावयाचें, या योगें परंपरा आणि प्रगति यांचा समन्वय साधून जीवन समुन्नत होईल.


जीवो विनयितासाक्षी मुकुन्दोऽमितविक्रमः ।
अम्भोनिधिरनतात्मा महोदधिशयोऽन्तकः ॥५५॥


५१३. जीव
'जीवो विनयिता साक्षी' हा चरण एक सूत्र आहे. यांत तीन पदे मिळून एक विचार ग्रथित केला आहे. जीवाच्या तीन भूमिका यांत वर्णिल्या आहेत. पहिली भूमिका जड जीवाची. जीवनप्रधान तो जीव. जगणे हाच एकमात्र ज्याचा हेतु आहे, उद्देश आहे तो जीव होय. त्याला अधिक उच्च उद्देश नाहीं, अथवा दिसून येत नाही. कृमि कीटकादि जीवांचा जीवनांत कोणता उद्देश दिसून येतो जगण्याव्यतिरिक्त ? जीवनाचा विशेष विचार तिथे नाही. या जड जीवांत जेव्हां आपले जीवन सोद्देश आहे, सहेतुक आहे अशी विचारजागृति होते तेव्हां तो जीव विनयिता बनतो आपल्या जीवनाला तो विशिष्ट दिशेनें नेतो. आपल्या जीवनाला तो विशिष्ट आकार देऊ इच्छितो आणि तद्नुसार चेष्टा म्हणजे हालचाल करू लागतो. हा असा धडपड्या जीव तो विनयिता म्हणावयाचा. नाना वासना आणि नाना संस्कार यांनी प्रेरित होऊन तो नाना अवस्थांतरें भोगीत असतो. या अभिमानी जीवाच्या विनयिता भूमिकेहून साक्षी ही भूमिका वरची आहे. या भूमिकेवर जीव आपल्या जीवनाच्या वासना, तत्प्रेरित कर्में आणि त्या कर्मांची फळे यांचा तटस्थपणे विचार करतो. त्यांच्या प्रवाहांत तो वाहून जात नाही, पण तटावर उभा राहून त्या प्रवाहाची वळणें वांकणे रंगतरंग पाहत असतो. या तीन भूमिकांना तामस, राजस आणि सात्त्विक म्हणतां येईल. तमांत अप्रवृत्ति, रजांत प्रवृत्ति आणि सत्त्वांत निवृत्ति वरचढ असते. या तीन भूमिकांवरील जीवांनाच आसुर, मानुष आणि दैव संज्ञा आहेत. ज्या अर्थी एक परमात्म-सत्ताच सर्वत्र नांदते आहे त्याअर्थी तीच हे तिन्ही भाव आहे असे म्हणावयाचे. म्हणून परमात्म्याला जीव म्हटले आहे.

५१४. विनयिता
शंकराचार्यांनी विनयिता म्हणजे विनयित्व आणि त्याचा साक्षी तो विनयिता-साक्षी असें सामासिक पद घेतले आहे. परंतु त्यांतून तर्कसंगत कांहीं अर्थ निघत नाही. त्यामुळे परत विनयिता आणि असाक्षी अशी दोन पदें कल्पिली आहेत. परंतु परमात्म्याला असाक्षी म्हणणेहि ओढून ताणून अर्थ करणे होय. जो आत्मभिन्न जग पाहत नाहीं तो परमात्माहि असाक्षी म्हणावयाचा. हे दोन्हीहि कल्प मला नीट दिसत नाहीत. विनयिता आणि साक्षी अशी दोन पदें घेणेच श्रेयस्कर. मागें साक्षी पद येऊन गेलें आहे तेव्हां तें पुनः घेणे योग्य नाही अशा विचारानें असाक्षी पद कल्पिलें आहे. पण हा विचार न म्हणतां अविचार म्हणवा लागेल. समानाक्षर पदें सहस्रांत अनेकदा आली आहेत. त्यांचा भिन्न अर्थ घेता येतो. तसा घेता न आला तरी तें पद ज्या आनुपूर्वीत येते ती भिन्न असते आणि त्यामुळे त्या पदाला एक वेगळा अर्थ वा वेगळी अर्थच्छटा प्राप्त होते. आणि म्हणून ते पद अनावृत्तच म्हणता येते. इथे तर सामासिक विनयितासाक्षी असें पद घेऊन वा विनयिता व असाक्षी अशी दोन पदें कल्पून कांहीं सरल अर्थ निष्पन्न होत नाही. त्यामुळे आणि जीवो विनयिता साक्षी असा क्रम साभिप्राय आहे असें मागील चिंतनांत सुचविलें आहे व तदनुसार विनयिता व साक्षी अशी दोन पदें घेणे प्रशस्त होय. सहस्रसंख्यातिक्रम होऊं नये म्हणून दुसरें एखादें नाम कमी करावे लागेल. आणि तसें तें याच श्लोकार्धात करता येतें हें पुढे दाखविले आहे. ..
विनय नाम धातूपासून विनयिता हे रूप साधलें आहे. विनयिता विशिष्ट दिशेनें आपलें विनयन करणारा. अथवा विनयिता म्हणजे गुरु ईश्वर, जो आपल्या अधीन जीवा-शिष्यांना सन्मानि परम पदाला पोंचवितो तो.

५१४. साक्षी (असाक्षी)
साक्षी हे पद जीवनाचें एक अत्यंत गूढ आणि परम सत्य प्रकाशित करतें. जीवाच्या ठाईं असलेलें जें अन्तरतर तत्त्व त्याचे स्वरूप विशद करणारे हे पद आहे. जीव सतत "मी हे करतो. मी हे सुख-दुःख अनुभवतों'. असें म्हणत असतो. परंतु प्रकृतीच्या, परापर प्रकृतीच्या, ह्या भावांहून वेगळा असा एक जो भाव तटस्थपणे या दोहोंचेंहि, कर्तृत्वाचे नि भोक्तृत्वाचे अवलोकन करतो तो साक्षी होय. गीता या परात्परभावाचे वर्णन असें करतेः
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस् तु प्रवर्तते ॥ गीता ५ - १४
नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥गीता - ५ - १५

हा जो केवळ साक्षिभाव तेंच परमात्म्याचे स्वरूप आहे. तें जीवाचें निजधाम आहे. ते त्याचे माहेर आहे. तदितर सारा संसार आहे. संसारांत जीव-वधूला परतंत्र होऊन रहावे लागते. माहेरी ती स्वतंत्र असते-स्वच्छंद अनिबंध स्वानंद ! केवल स्वानन्द उसळत असतो तिथेः "आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदासी" असें केवळ अद्वैत तिथे नांदत असतें.
'जीवो विनयिता साक्षी' म्हणजे जीव, जीवेश्वर आणि मुक्तेश्वर ह्या तीन भूमिका होत. जीव अज्ञानोपाधिक आणि अस्वतंत्र, जीवेश्वर स्वतंत्र पण ज्ञानोपाधिक, मुक्तेश्वर ज्ञानाज्ञानमुक्त केवल निरुपाधिक स्वतंत्र. हाच तो त्या विष्णूचा त्रिविक्रम होय. पुढील पदांत त्याच्या ह्या त्रिविक्रमाचें अमितविक्रम म्हणून गौरव गाइलें आहे. आणि ह्या त्याच्या मित वा अमित विक्रमाचे तात्पर्य मुकुंद पदानें प्रकट केलें आहे.
परमात्मा हा सदैव स्वदृक् असल्यामुळे तो साक्षी होय. पण त्याच कारणामुळे तो संसाराचा असाक्षी आहे. त्याला संसार ठाऊकच नाही. "तुका म्हणे जें जें बोला । तें तें साजे या विठ्ठला' म्हणून असाक्षी पदाचाहि आम्ही समादर करतो.

५१५. मुकुन्द
अमितविक्रम मुकुन्द 'मुकुन्दोऽमित-विक्रमः' हा चरण मागील चरणांत मांडलेल्या विचाराचा समारोप करतो. खरोखर परमात्मा, तो मुक्तिदाता मुकुंद, अमित- विक्रम आहे. त्यानें जीव, ईश्वर आणि परमात्मा अशा तीन भूमिका पादाक्रांत केल्या असल्या तरी त्याच्या पराक्रमाला गणति नाही. जितक्या म्हणून भूमिका तुम्ही कल्पाल तितक्या सर्व त्यानें पादाक्रांत केलेल्या आहेत. कां की सर्व कांहीं चेतनाचें अंकित आहे. एक विश्व, दोन लोकालोक, तीन स्वर्ग मृत्यु पाताल, भूर् भुवर् स्वर, सप्त लोकः भूर भुवर् स्वर् महर् जन तप सत्य अथवा चतुर्दश भुवनेंः सप्तलोक आणि सप्ततलें (तल अतल वितल सुतल तलातल रसातल पाताल) अशा अनेकानेक लोककल्पना केल्या जातात. त्या सर्वांना एका मोचक चेतनानें पादाक्रांत केलेले आहे म्हणून तो परमात्मा अमित-विक्रम मुकुंद होय. अमित-विक्रम हें मुकुंदाचें नित्यविशेषण आहे. म्हणजे अमित-विक्रम मुकुंद हे सविशेषण नाम आहे. ही दोन नामें नाहींत. अमित-विक्रम हे पद पुढेहि एकदा "प्रद्युम्नो ऽमितविक्रमः" श्लोक ६८ असें आलें आहे. तिथेहि तें नित्यविशेषण म्हणून आले आहे. श्री म्हणजे श्रीमान् हे जसें भगवंताचें नित्य-विशेषण आहे तसें अमितविक्रम हेहि त्याचे नित्य- विशेषण आहे. जेव्हा जेव्हां भगवंताचा उल्लेख होईल तेव्हां तेव्हां तो श्री भगवान् असाच होतो, तसा मुकुंद प्रद्युम्न या भगवदवतारांचाहि उल्लेख अमितविक्रम या विशेषणानें युक्त असाच व्हावा. तसा संकेत दोन्ही ठिकाणी जोडून आलेल्या अमितविक्रम या पदानें मिळतो. श्री आणि पराक्रम याच दोन भगवविभूति म्हणून गीतेंत उल्लेखिल्या आहेत. "यद् यद् विभूतिमत् सत्वं श्रीमद् ऊर्जितमेव वा" या वचनांत त्यांचा निर्देश आला आहे. अर्थात् ह्या दोन विभूतींनी परमात्मा आणि त्याचे अवतार हे सदैव विशिष्ट असतात, डाव्या उजव्या अंगांनी जसा पुरुष सदैव युक्त असतो त्या प्रमाणें. परमात्म्याचे अतुल सामर्थ्य, त्याचा अमित विक्रम मुकुंद पद व्यक्त करतें. 'मुकुं मुक्तिं ददाति इति मुकुंदः । ' प्रत्येक संकटांतून जो सोडवितो तो मुकुंद होय. सर्व संकटांचें गांठोडे म्हणजे संसार. त्यांतूनच तो सोडवितो म्हणून तो मुकुंद म्हणावयांचा. मृत्युसंसारसागरांतून सोडवितो म्हणून तो मुकुंद.

५१६. अमित-विक्रम मित-विक्रम
अमित-विक्रम हें परमात्म्याचें नित्यविशेषण असतें, त्याच्या अवतारांचें तें विशेषण असले तरी तें पद कोणी स्वतंत्र घेतलें म्हणून कुठे बिघडले ? "सर्वे वेदा यत् पदं आमनन्ति" सर्व ग्रंथ, सर्व शब्द ज्याचे वर्णन करतात असेंच तें पद आहे. सर्व नामें, सर्व सर्वनामें, सर्व विशेषनामें, सर्व विशेषणे, सर्व क्रियापदें, सर्व अव्ययें त्या एकाचेच वर्णन करतात. कारण ते एकच पद आहे. कारण तो एकच पदार्थ आहे-ॐकारांत पद आणि पदार्थ एकवटली आहेत. ॐ हे पद आहे म्हणजे तें गन्तव्य स्थान आहे, तें पद आहे म्हणजे तद्वाचक नाम आहे. असा पद शब्द श्लिष्ट आहे. वेदमंत्राच्या आरंभी ॐकाराचा जो उच्चार केला जातो त्याचे कारण हेच. त्या ॐकाराचें परोपरीनें केलेलें व्याख्यान म्हणजे वेद होत. तो ॐकार, तो परमात्मा खरोखर अमितविक्रम आहे. त्यामुळे त्याचे कितीहि पोवाडे गाइले तरी ते अपुरेच आहेत. "विष्णोर्नु वीर्य-महिमां कतमोऽहतीह ?' सामग्र्यानें त्या परमात्म्याचे पराक्रम कोण वर्णूं शकेल बरें ? सहस्र हि सहस्रमुखानें तें निःशेष गाऊं शकेल असें नाहीं. म्हणूनच म्हटले आहे भागवतांतः जो ते अनन्त-गुण अन्तचि ज्यांस नाहीं
मोजूं म्हणे निपट तो नर बालबुद्धि ।
कोणी रजःकण कदापि गणेल भूचे
जो सर्वशक्ति भगवान् न कदापि त्याचे ॥

परमात्म्याचे पराक्रम अमित आहेत, अगणित आहेत. त्याची नाम-रूप-गुण-कर्में सगळीच अनन्त आहेत, सगळीच अमित आहेत. प्रत्येक स्थळी आणि प्रत्येक काळी त्याचे अवतारकार्य चालूच आहे. त्यामुळे त्याचे दहा वा चोवीस अवतार झाले असें गणन होऊं शकत नाही. तें मानवी स्मरणशक्तीच्या मर्यादेचे गणन आहे, सर्वतोनन्त परमात्म्याचे वा त्याच्या अमित पराक्रमांचे नव्हे. म्हणून तो परमात्मा अमित-विक्रम होय.
'त्रीणि पदा विचक्रमे त्रेधा निदधे पदम्' असा त्रिविक्रम म्हणून वेदांत आणि दशावतार म्हणून लोकांत आणि विपूर्वक चक्रमे ह्या क्रियापदावरून इथे 'मित-विक्रम' हे पद स्मरलें आहे, असे म्हणतां येईल. म्हणून तो परमात्मा मित-विक्रम होय.

५१७. अम्भोनिधि
"अम्भोनिधिर् अनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः" या श्लोकार्धांत परमात्म्याचें जगदादिमध्यान्तकृत् रूप वर्णिलें आहे. तो अम्भोनिधि आहे. अम्भोनिधि म्हणजे समुद्र तर तो आहेच. "सरसां अस्मि सागरः" अशी ती भगवद्-विभूतिच वर्णिली आहे. आकाश डोंगर समुद्र नदी सूर्य चंद्र तारे इत्यादि ज्या ठळक गोष्टी आपल्या विशिष्ट महत्तेनें आपले लक्ष प्रथमदर्शनींच वेधून घेतात त्या भगवद्विभूति निःसंशयच आहेत. अम्भोनिधि समुद्रहि तशीच एक भगवद्विभूति आहे. पण इथे आणखी खोल अर्थ अभिप्रेत आहे. अम्भस् म्हणजे सृष्टीचें मूल अव्यक्त उपादान. शुक्रशोणितापासून म्हणजे रसापासून जीवसृष्टि होते असे आपण पाहतों. त्याप्रमाणें या सृष्टीचे मूळ द्रव्यहि रसरूप असलें पाहिजे. तो जो रस तेंच अम्भस्. त्याचा परमात्मा हा निधि आहे संग्रह आहे. म्हणून तो अम्भोनिधि म्हणावयाचा, तो परमात्मा अनन्तवीर्यामितविक्रम आहे. त्याचे वीर्य अपरंपार आहे. म्हणूनच तो सृष्ट्युत्पत्तिरूप अमित विक्रम करूं शकला आहे. अव्यक्त बैजिक शक्ति आणि व्यक्त निर्माणक्षमता म्हणजे वीर्य होय. तेंच अम्भस्. त्याचा सागर तो अम्भोनिधि परमात्मा या अनन्तपार सृष्टीचा, या सर्वतोनन्त विश्वाचा जनक आहे. हे अचाट सृष्टिकर्म, हा अमित विक्रम त्याचा आहे. जीव एखादें कांहीं कौतुकास्पद काम करतो तर त्यासाठी किती कुथनो, परंतु परमात्मा ही सारी सृष्टि कशी लीलेनें निर्माण करता झाला आहे ? त्याचा त्याला इतकाहि श्रम नाहीं कष्ट नाही. यावरून त्याच्या अनन्तवीर्यवत्तेचे अनुमान होते. असा तो अम्भोनिधि आहे.

५१८. अनन्तात्मा
अनन्तात्मा म्हणजे अनन्तरूप. परमात्मा हा देशतः कालतः आणि वस्तुतः अनन्त आहे. देशतः पाहूं गेल्यास दश दिशांत तो अफाट पसरलेला आहे. कुठेहि म्हणून त्याचा अंत गाठता येत नाही. आमचा भूगोल सूर्यमालेतील एक ग्रह. सूर्यमालेतील ग्रहांची अंतरेंच आम्हांला किती अगडबंब वाटतात ? पण ती सूर्यमाला ज्या आकाशगंगेचा एक बिन्दुमात्र होय ती किती विशाल म्हणावी ? आणि तीहि ज्या अनन्तपार आकाशाच्या अवकाशांत कणमात्र तरंगत आहे तो देशविस्तार केवढा म्हणून म्हणावा ! मानवी बुद्धिशक्ति तिथे कुंठित होते. म्हणून महिम्नकार ठीकच म्हणतोः
वियद्व्यापी तारागणगुणितफेनोद्गमरुचिः
प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः शिरसि ते ।
जगद् द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमिति
अनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः ॥

कालतः हि तो परमात्मा किती अफाट आहे ? या विश्वाचा आरंभ केव्हा झाला हे कोण सांगू शकेल ? काल हाहि जिथे एक सृष्ट पदार्थच आहे. तिथे सृष्टीचा आरंभ कोण कसा सांगणार ? आणि अन्त तरी कसा सांगणार ? ज्या परिभाषेनें आणि ज्या परिमाणानें कालगणना करावयाची ती परिभाषा ते परिमाणच जिथे उपलब्ध नाही तिथे कालगणना व्हावी कशी ? मध्यंतरी काही कालगणना आम्ही करतो, पण ती किती बिनबुडाची आहे ? तिला कांहीं आधार आहे काय ? सारांश काळाचाहि आदि मध्य अन्त लागत नाही आणि वस्तुतःहि तो परमात्मा अनन्तच आहे. चिद्रव्याचे मोजमाप घेतांच येत नाही. कारण हे द्रव्य निरणु आहे, अनणु आहे. अणूला लांबी रुंदी भार असू शकतो. पण जिथे असा अणु आणि तद्घटित द्रव्यच नाही तिथे मान वा इयत्ता संभवत नाही आणि म्हणून ती चिद्वस्तु अनन्त आहे, सान्त नव्हे. सारांश, "नान्तं न मध्यं न पुनस् तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप । " असें म्हणावे लागते. हा अनन्त-विस्तार त्याचाच आहे.

५१९. महोदधिशय
अव्यक्तार्णवांतून हे अनन्तार लोकपद्म उत्पन्न होते आणि परत त्या अव्यक्तार्णवांत तें लीन होतें. ज्या वेळी तें लीन होते तेव्हां तें कुठे जातें ? तेव्हां तें अक्षरकंद रूपानें जलाशयाच्या तळीं पहुडलेलें असते. म्हणून अव्यक्ताक्षररूप, त्या जगाच्या अक्षय कंदाला, परमात्म्याला, महोदधिशय म्हटलें आहे. अव्यक्त हे अनन्तपार आहे आणि सर्व व्यक्तसृष्टीचे मातृस्थान आहे म्हणून त्याला महोदधि म्हटलें आहे. पल्वलादि क्षुद्र जलाशय सुकू शकतात. पण महोदधि कधीच सुकत नाही. इतर सर्व जगत्कारणे क्षीण होतील, लीन होतील, पण अव्यक्तच क्षीण वा लीन कसे होणार ? म्हणूनच "अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव" म्हटले आहे. खरोखर हे व्यक्तहि अव्यक्तमयच आहे. तरंग उठण्यापूर्वी तो जलरूप असतो, तो निमाल्यावरहि जलरूपच होतो आणि तरंगाकार काय जलावेगळा असतो ? नाहीं, तोहि जलमयच असतो. तसें हें विश्व हा व्यक्ताकारहि, अव्यक्तमयच आहे. आम्हांला तें दिसत नाही, कळत नाही. म्हणूनहि म्हणावयाचें की तो अव्यक्त परमात्मा महोदधिशय आहे, अव्यक्ताच्या खोलच खोल अथांग गहनतेंत गंभीरतेंत दडलेला आहे, लपलेला आहे. अव्यक्तांत तर तो उघडच लपलेला आहे, पण व्यक्तांत तो त्याहूनहि अधिक अगम्य होऊन बसलेला आहे. एखादा बिलंदर चोर जसा साव म्हणून समाजांत वावरत राहून संदेहास्पदतेपासून मुक्त रहावा, त्याप्रमाणें दिसायला व्यक्त पण वस्तुतः अव्यक्त असा हा परमात्मा या विश्वाकारांत लपलेला आहे. म्हणून तो उदधिशय न म्हणतां महोदधिशय म्हटला आहे. व्यक्त गिळून अव्यक्तांत निश्चेष्ट पहुडलेला अकृत्यशेष अर्थात् कृतकृत्य परमात्मा हा महोदधिशय म्हटला आहे. कर्तव्य संपल्यावर माणूस आराम करतो, पहुडतो. त्या प्रमाणें उत्पत्ति- स्थिति-लयकार्यांतील शेवटचे लयकार्यहि करून झाले आणि म्हणून जो झोपला आहे तो महोदधिशय म्हणावयाचा. अशा प्रकारें उदधि महा आणि शय ही पदांगें साभिप्राय आहेत. खरोखर पद-पदांगांचा अर्थ-गौरव महोधिगंभीर आहे.

५२०. अन्तक
अन्त म्हणजे काय ? नाश विनाश की क्षय अपक्षय ? अन्त म्हणजे नाश नव्हे वा अपक्षयहि नव्हे, तर अन्त म्हणजे स्वाभाविक परिणति. 'फलपाकान्ता ओषधयः' फळे म्हणजे धान्यें परिपाकास आली असतां . जी संपतात सुकतात ती तृणे म्हणजे ओषधि होत. अर्थात् फलपाक हा त्यांचा अंत होय. इथे अन्त म्हणजे विनाश वा अपक्षय म्हणता येणार नाही. हा अंत म्हणजे स्वाभाविक परिणति होय. शालि-गोधूमादिकांची स्वाभाविक परिणति जशी त्या त्या धान्यांत होते तशी ह्या विश्वाची, ह्या समस्त सृष्टिप्रपंचाची परिणति ब्रह्म होय. आणि म्हणून परमात्मा हा अन्तक म्हणजे परिपाककृत् म्हणावयाचा. तो स्वतःच परिपाकरूप आहे आणि तो परिपाक घडवून आणणाराहि तोच आहे. बीजच स्वतः फल आहे आणि फल-क्षमहि तेंच आहे, फळेपर्यंत वाढणारेंहि तेंच आहे, तद्वत्. "तुका म्हणे बीजें बीज दाखविलें । पत्र पुष्प आलें गेलें वाया ॥ ". प्रत्येक वस्तूची स्वाभाविक परिणति जें आत्मदर्शन तें होई पर्यंत त्या वस्तूची जीवनप्रवृत्ति होत असते. गंगा सागराला मिळेपर्यंत वाहतच राहणार. सूर्याला मिळेपर्यंत अग्निज्वाला धडपडत राहणार. प्रत्येकाला अन्तरूप हे आत्मदर्शन करवून देणारा जो सर्वान्तर्यामी परमात्मा तोच अन्तक म्हणजे अन्तकृत् होय. सर्व कर्माचा, सर्व प्रवृत्तींचा, सर्व खटपटींचा सर्व धडपडींचा अंत करतो तो अंतकृत् होय. जो पर्यंत हे साफल्य लाभत नाही तो पर्यंत या विश्वांतील प्रवृत्ति खळणार नाही. लहान मोठी सर्व साफल्ये त्या त्या प्रवृत्तींचा अन्त होत आणि आत्मदर्शन हे त्या सर्व साफल्यांचे साफल्य होय. परमात्मा हा साफल्यापासून साफल्यास पोचविणारा म्हणून अंतक आहे. हे विश्व ब्रह्ममय असल्यामुळे वस्तुतः त्याचा नाश वा क्षय होऊच शकत नाही. होतो तो केवळ साफल्यरूप अन्त. सर्व मार्ग ज्या गन्तव्याला पोंचून कुंठित होतात तें परम पद परमात्मा असल्यामुळे तो परमात्मा अंतकृत् अन्तक म्हणावयाचा. सर्वहर मृत्यु हा कांहीं अंतक म्हणता येत नाही. कारण त्यानंतरहि वासना शिल्लकच राहतात. पण आत्मदर्शनानंतर त्या वासनाहि शिल्लक राहत नाहींत. म्हणून तेंच खरोखर अंतक होय. परिसमापन होय.
॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP