॥ पञ्चदशी ॥
द्वादशः परिच्छेदः - ब्रह्मानन्दे आत्मानन्दः

नन्वेवं वासनानन्दाद्‌ब्रह्मानन्दादपीतरम् ।
वेत्तु योगी निजानन्दं मूढस्यात्रास्ति का गतिः ॥ १ ॥
धर्माधर्मवशादेष जायतां म्रियतामपि ।
पुनः पुनर्देहलक्षैः किं नो दाक्षिण्यतो वद ॥ २ ॥
अस्ति वोऽनुजिघृक्षुवाद्दाक्षिण्येन प्रयोजनम् ।
तर्हि ब्रूहि स मूढः किं जिज्ञासुर्वा पराङ्मुखः ॥ ३ ॥

उपास्तिं कर्म वा ब्रूयाद्विमुखाय यथोचितम् ।
मन्दप्रज्ञं तु जिज्ञासुमात्मानन्देन बोधयेत् ॥ ४ ॥
बोधयामास मैत्रेयीं याज्ञवल्क्यो निजप्रियाम् ।
न वा अरे पत्युरर्थे पतिः प्रिय इतीरयन् ॥ ५ ॥
पतिर्जाया पुत्रवित्ते पशुब्राह्मणबाहुजाः ।
लोका देवा वेदभूते सर्वं चात्मार्थतः प्रियम् ॥ ६ ॥
पत्याविच्छा यदा पत्‍न्यास्तदा प्रीतिं करोति सा ।
क्षुदनुष्ठानरोगाद्यैस्तदा नेच्छति तत्पतिः ॥ ७ ॥
न पत्युरर्थे सा प्रीतिः स्वार्थ एव करोति ताम् ।
पतिश्चात्मन एवार्थे न जायार्थे कदाचन ॥ ८ ॥
अन्योऽन्यप्रेरणेऽप्येवं स्वेच्छयैव प्रवर्तनम् ॥ ९ ॥
श्मश्रुकण्टकवेधेन बालो रुदति तत्पिता ।
चुम्बत्येव न सा प्रीतिर्बालार्थे स्वार्थ एव सा ॥ १० ॥

शि० -या प्रकरणाच्या प्रथमाध्यायीं तूष्णीं स्थितीतील वासनानंद आणि सुषुप्ति; ब्रह्मानंद याखेरीज समाधीतील निजानंद जो सांगितला तो जाणण्यास केवळ योगी मात्र सक्षम आहेत. पण मूढास तो समजणे कठिण असल्यामुळें त्यांनी काय करावे ? ॥ १ ॥
गु० केवळ अज्ञानी आहेत त्यांचे होईल तसें होवो. पूर्वजन्मी केलेल्या पुण्यपापरूप कर्मवशात् जन्ममरणाच्या फेऱ्यांत पडेनात बापडे. त्यांजवर दया करून उपयोग काय ? ॥ २ ॥
शि० -सर्वांवर अनुग्रह करण्याचें काम ज्या अर्थी आपण पत्करलें आहे त्या अर्थी असें म्हणून कसे चालेल ? त्यांच्याही उद्धारास कोणतातरी तरी मार्ग सांगितलाच पाहिजे. गु० अरे, मूढ दोन कारचे आहेत. एक जिज्ञासु म्हणजे ज्यास तत्त्वज्ञानाची इच्छा आहे तो, आणि दुसरा परमुख ह्यणजे ज्यास ती इच्छा नसून केवळ परलोकाची मात्र इच्छा आहे तो. यांपैकी तूं कोणाचा पक्ष घेतोस ? ॥ ३ ॥
पराङ्मुख जर म्हणशील तर त्याला आम्ही उपासना किंवा कर्म सांगून वाटेस लावतो. आणि जिज्ञासु असून मंद बुद्धीचा असेल तर त्याला आत्मानंदाचें विवेचन करून मार्गास लाविलें पाहिजे. ॥ ४ ॥
शि० -ह्या आत्मानंदाचे विवेचन पूर्वी कोणी केलें आहे काय ? गु० - होय तर. याज्ञवक्यऋषीनें आपल्या मैत्री नामक पत्‍नीस असा बोध केला आहे कीं, "हे प्रिये, स्त्रीला पति जो आवडतो तो पतीच्या सुखाकरितां नव्हे, तर तिच्या स्वतःच्या सुखाकरतां. ॥ ५ ॥
याचप्रमाणे पति, जाया, पुत्र, पशु, ब्राह्मण, क्षत्रिय लोक, देव, वेद, आणि सृष्टींतील इतर सर्व पदार्थ, मनुष्यास आपल्याचकरिता प्रिय झाले आहेत ॥ ६ ॥
जेव्हां पतीविषयी स्त्रीला काम उत्पन्न होतो तेव्हां तिला तो अतिप्रिय होतो. आणि जेव्हां क्षुधा, अनुष्ठान आणि रोगादि इहींकरून तो युक्त असतो तेव्हां ती त्याला आवडत नाहीं. ॥ ७ ॥
यावरून तिची प्रीति स्वार्थाकरिता आहे, ती कांहीं पतीकरितां नव्हे. तसेंच उलट पक्षी पाहता पतीची स्त्रियेवरील प्रीति ही स्त्रियेकरितां नसून केवळ स्वतःकरितांच आहे. ॥ ८ ॥
याप्रमाणे परस्पर प्रीति करण्याची प्रेरणा स्वेच्छेनेंच उत्पन्न होते. ॥ ९ ॥
बाप मुलाचे जे इतके मुके घेतो, ते काहीं मुलाकरिता नव्हेत, तर केवळ आपल्याकरितां आहेत. कारण मुलाकरितां जर म्हणावे तर दाढीचे केस त्याच्या कोमल आंगास टोंचल्यानें तें मूल रडत असतांही हा मुके घेतच असतो. तेव्हां अर्थातच मुलाकरितां नव्हेत हें उघड आहे. ॥ १० ॥


निरिच्छमपि रत्‍नादि वित्तं यत्‍नेन पालयन् ।
प्रीतिं करोति सा स्वार्थे वित्तार्थत्वं न शङ्कितम् ॥ ११ ॥
अनिच्छति बलीवर्दे विवाहयिषते बलात् ।
प्रीतिः सा वणिगर्थैव बलीवर्दार्थता कुतः ॥ १२ ॥
ब्राह्मण्यं मेऽस्ति पूज्योऽहमिति तुष्यति पूजया ।
अचेतनाया जातेर्नो सन्तुष्टिः पुंस एव सा ॥ १३ ॥
क्षत्रियोऽहं तेन राज्यं करोमीत्यत्र राजता ।
न जातेर्वैश्यजात्यादौ योजनायेदमीरितम् ॥ १४ ॥
स्वर्गलोकब्रह्मलोकौ स्तां ममेत्यभिवाञ्छनम् ।
लोकयोर्नोपकाराय स्वभोगायैव केवलम् ॥ १५ ॥

ईशविष्ण्वादयो देवाः पूज्यन्ते पापनष्टये ।
न तन्निष्पापदेवार्थं तत्तु स्वार्थं प्रयुज्यते ॥ १६ ॥
ऋगादयो ह्यधीयन्ते दुर्ब्राह्मण्यानवाप्तये ।
न तत् प्रसक्तं वेदेषु मनुष्येषु प्रसज्यते ॥ १७ ॥
भूम्यादिपञ्चभूतानि स्थानतृट्पाकशोषणैः ।
हेतुभिश्चावकाशेन वाञ्छन्त्येषां न हेतवे ॥ १८ ॥
स्वामिभृत्यादिकं सर्वं स्वोपकाराया वाञ्छति ।
तत्तत्कृतोपकारस्तु तस्य तस्य न विद्यते ॥ १९ ॥
सर्वव्यवहृतिष्वेवमनुसन्धातुमीदृशम् ।
उदाहरणबाहुल्यं तेन स्वां वासयेन्मतिम् ॥ २० ॥

ही मनुष्याची गोष्ट झाली. आतां द्रव्याविषयीं तर बोलायलाच नको. कारण सोने रुपे बोलून चालून जड असल्यामुळें त्यांत इच्छेचा संभवच नाहीं. म्हणून त्याजविषयींची मनुष्याची प्रीति केवळ स्वार्थाकरितांच आहे हहे उघड आहे. ॥ ११ ॥
तशीच जनावरांची गोष्ट. वाण्याची बैलावरील प्रीति जर बैलाकरितां म्हणावी तर त्याजवर बळजोरीने तो ओझे कसें टाकील ? याजकरितां तीहि प्रीति स्वतःचकरितां. ।॥ १२ ॥
जातीवर जी आमची प्रीति आहे, तीही स्वार्थपरच. मी ब्राह्मण आहे म्हणून मी पूज्य आहें, असा जो जातीविषयीचा संतोष तो मनुष्यासच होतो; तो जातीस होत नाहीं. ॥ १३ ॥
तसेंच मी क्षत्रिय आहे, मी राज्य करतो, असा राजाभिमानही मनुष्यालाच होतो. क्षत्रिय जातीला मुळीच नाहीं. हाच नियम बाकीचे वैश्यादिक जातींला लागू आहे. ॥ १४ ॥
हा सिद्धांत इतका खरा आहे कीं, तो केवळ प्रपंचालाच लागतो असें नाहीं. परमार्थातही यानें आपला अंमल तितकाच बसविला आहे. स्वर्गलोक ब्रह्मलोक इत्यादि मला मिळावे अशी जी मनुष्याला इच्छा होते तीही केवळ स्वतःकरितांच आहे. त्या लोकांकरिता नाहीं. ॥ १५ ॥
आपलें पाप नष्ट व्हावे म्हणून ईश विष्णू इत्यादि देवतांची लोक जी उपासना करतात ती आपले पाप जावे म्हणून. निष्पापी जे देव त्यांना काय त्यांची जरूर आहे. ॥ १६ ॥
तशीच वेदाध्ययनाची गोष्ट. ऋग्वेदादि चार वेदांचे अध्ययन जें करतात तें आपलें व्रात्यत्व जाऊन ब्राह्मण्य यावें म्हणून. वेदाला कांही त्याची जरूरी नाहीं, मनुष्यांनाच आहे. ॥ १७ ॥
तशीच पृथ्व्यादि पंचभूतें यांवर जी मनुष्याची प्रीति आहे तीही आपल्याकरितांच. आपल्याला राह-ण्यास जागा पाहिजे म्हणून पृथ्वी प्रिय, तृषेकरितां पाणी, स्वयंपाकाकरिता अग्नि, शोषणाकरिता वायु आणि अवकाश मिळावा म्हणून आकाश. ॥ १८ ॥
याचप्रमाणें धनी आणि चाकर, राजा आणि प्रजा, यांचाही संबंध तसाच आहे. त्यांची परस्परांविषयीची हितचिंता केवळ आपल्याकरितांच आहे. कोणाचा कोणांवर उपकार नाहीं. ॥ १९ ॥
अशीं उदाहरणे व्यवहारांत पुष्कळ आहेत. यावरून मनुष्याने आल्यावरील जी स्वभाविक प्रीति ती ओळखून दृढ करावी. ॥ २० ॥


अथ केयं भवेत्प्रीतिः श्रूयते या निजात्मनि ।
रागो वध्वादि विषये श्रद्धा यागादि कर्मणि ॥ २१ ॥

भक्तिः स्याद्गुरुदेवादाविच्छा त्वप्राप्तवस्तुनि ।
तर्ह्यस्तु सात्विकी वृत्तिः सुखमात्रानुवर्तिनी ॥ २२ ॥


प्राप्ते नष्टेऽपि सद्‌भावादिच्छतो व्यतिरिच्यते ।
सुखसाधनतोपाधेरन्नपानादयः प्रियाः ॥ २३ ॥

आत्मानुकुल्यादन्नादिसमश्चेदमुनात्र कः ।
अनुकूलयितव्यः स्यान्नेकस्मिन्कर्मकर्तृता ॥ २४ ॥सुखे वैषयिके प्रीतिमात्रमात्मा त्वतिप्रियः ।
सुखे व्यभिचरत्येषा नात्मनि व्यभिचारिणी ॥ २५ ॥


एकं त्यक्त्वाऽन्यदादत्ते सुखं वैषयिकं सदा ।
नात्मा त्याज्यो न चादेयस्तस्मिन्व्यभिचरेत्कथम् ॥ २६ ॥
हानादानविहीनेस्मिन्नुपेक्षा चेत्तृणादिवत् ।
उपेक्षितुः स्वरूपत्वान्नोपेक्ष्यत्वं निजात्मनः ॥ २७ ॥

रोगक्रोधाभिभूतानां मुमूर्षा वीक्ष्यते क्वचित् ।
ततो द्वेषाद्‌भवेत्त्याज्य आत्मेति यदि तन्न हि ॥ २८ ॥
त्यक्तुं योग्यस्य देहस्य नात्मता त्यक्तुरेव सा ।
न त्यक्तर्यस्ति स द्वेषस्त्याज्ये द्वेषे तु का क्षतिः ॥ २९ ॥

आत्मार्थत्वेन सर्वस्य प्रीतेश्चात्मा ह्यतिप्रियः ।
सिद्धो यथा पुत्रमित्रात्पुत्रः प्रियतरस्तथा ॥ ३० ॥

शिष्य -आत्म्याविषयी अनिमित्त प्रीति जी आपण सांगितली ती कोणची म्हणून समजावी ? जगामध्ये प्रीतीची चार स्वरूपे राग, श्रद्धा, भक्ति आणि इच्छा ( आवड) आतां दृष्टीस पडतात. राग हीच आपण सांगितलेली प्रीति म्हणावी तर ती केवळ स्त्री पुत्र धन इत्यादिकांच्याठायीं, श्रद्धा यज्ञयागादि कर्माविषयीच आहे. ॥ २१ ॥
भक्ति म्हणावी तर ती केवळ गुरुदेवतेविषयीच आणि इच्छा म्हणजे आवड म्हणावी तर ती केवळ अप्राप्य वस्तूविषयींच. तर तुम्ही सांगितलेली जी एक सारखी असणारी प्रीति ती यांपैकी कोणती ? गु० -तूं ज्या चार प्रकारच्या प्रीति सांगितल्यास त्यांना व्यभिचार घडतो तसा आमच्या आत्मप्रीतीस व्यभिचार मुळीच नाहीं. तर त्या प्रीतीचे स्वरूप तुला आतां सांगतो. सर्वदा सुखावरच जडलेली अशी अंतःकरणाची सात्विकवृत्ति तीच आमची आत्मप्रीति. ॥ २२॥
शि० -मग ती इच्छा म्हणावी. आत्मप्रीति कसची ? गु० -ती इच्छा होऊं शकत नाहीं. कारण इच्छा ही वस्तु प्राप्त होण्यापूर्वी मात्र असते. परंतु या प्रीतीची गोष्ट तशी नाहीं. वस्तु प्राप्त होवो किंवा नष्ट हो, ती जशाची तशी असते. म्हणून ही आत्मप्रीतीच आहे. इच्छा नव्हे.॥ २३ ॥
शि० -अन्नपानादि पदार्थ सुखास साधनीभूत आहेत म्हणून ते प्रिय झाले आहेत. यावरून असें अनुमान होतें कीं, ज्या ज्या म्हणून प्रिय वस्तु त्या त्या सुखाची साधने आहेत. आतां आपण म्हणतां कीं, आत्मा प्रिय आहे. त्यावरून त्यालाही सुखसाधनत्व आलें. मग बाकीच्या अन्नपानादिकांत व आत्म्यांत भेद तो काय ? गु० -आत्मा हा अन्नपानादिकांप्रमाणें सुखसाधन म्हणतां येत नाहीं. कारण अन्नपानादिकांपासून असें निराळें एक सुख प्राप्त होण्याचें असतें, तसें आत्मरूप साधनाने सुख घेणारा कोण; शि० -आत्म्यापासून सुख आत्म्यानेच घ्यावे गु० -तसें मानल्यास एकाला कर्मता आणि कर्तृता येऊन विरोध येईल. ॥ २४॥
शि० - वैषयिक सुखावरही तशीच प्रीति असते. तेव्हां तुमचा आत्मा आणि विषयसुख यांत भेद काय ? गु० -भेद आहे; नाहीं कसा ! विषयसुखावर प्रीति जरी असली तरी ती केवळ प्रीति होय. ती निरतिशय नव्हे म्हणजे एकसारखी नसते. ती एका विषयसुखास सोडून दुसऱ्यावर जाते. म्हणून ती व्यभिचारिणी होय. तशी आत्मप्रीति नव्हे. या प्रीतीस कधीं व्यभिचारच नाहीं. म्हणून आत्मा अतिप्रिय आहे. ॥ २५ ॥
ती जशी एका विषयसुखास सोडून दुसऱ्यावर जाते तशी ही आत्मप्रीति नव्हे. कारण, आत्म्याचा त्यागही घडत नाहीं आणि ग्रहणही घडत नाहीं. तेव्हां त्या प्रीतीस व्यभिचार कसा येईल ? ॥ २६ ॥
शि० -ज्या वस्तूस त्याग आणि ग्रहण नाही ती तृणासारखी उपेक्षेस पात्र आहे; म्हणून तुमचा आत्माही तसा उपेक्ष्य म्हणजे तुच्छ झाला कीं ? गु० -तुच्छ कसा होईल, अरे जो त्याग ग्रहणास विषय नाहीं तो उपेक्षेस तरी कसा विषय होईल. उपेक्षा करणारा आणि आत्मा यामध्ये मुळीं भेदच नाहीं. तेव्हां याची उपेक्षा कोण करणार ? ॥ २७॥
शि० - मनुष्याला रोगाने फार ग्रासले असतां किंवा अतिसंताप आला असतां, त्यास मरणाची इच्छा झालेली जगांत दृष्टीस पडते, यावरून आत्मा द्वेषामुळे त्याज्य आहे असें होते. ॥२८॥
गु० -होय मरणाची इच्छा मनुष्यास होते. पण ती देहत्यागाची इच्छा. देह कांहीं आत्मा नव्हे. देहाचा त्याग करणारा जो कोणी निराळा आहे तो आत्मा आणि त्याविषयी कांहीं त्याचा द्वेष नसतो. शि० -देहाविषयी तरी असतो ना ? गु० -देहाविषयी असेना बापडा. तेणेकरून आमचे सिद्धांतास काय हानी. ॥ २९ ॥
याकरिता सर्व पदार्थांवरील प्रीति आत्मार्थच असल्यामुळें तो ज्याप्रमाणें पुत्रास्तव पुत्राचा मित्र झाल्यामुळे पुत्रच मित्रापेक्षां अधिक प्रिय असला पाहिजे, त्याप्रमाणें आत्माही सर्वांमध्ये प्रिय आहे हें सिद्ध झालें. ॥ ३० ॥


मा न भूवमहं किं तु भूयासं सर्वदेत्यसौ ।
आशीः सर्वस्य दृष्टेति प्रत्यक्षा प्रीतिरात्मनि ॥ ३१ ॥
इत्यादिभिस्त्रिभिः प्रीतो सिद्धायामेवमात्मनि ।
पुत्रभार्यादिशेषत्वमात्मनः कैश्चिदिरितम् ॥ ३२ ॥
एतद्विवक्षया पुत्रे मुख्यात्मत्वं श्रुतीरितम् ।
आत्मा वै पुत्रनामेति तच्चोपनिषदि स्फुटम् ॥ ३३ ॥
सोऽस्यायमात्मा पुण्येभ्यः कर्मेभ्यः प्रतिधीयते ।
अथास्येतर आत्मायं कृतकृत्यः प्रमीयते ॥ ३४ ॥
सत्यप्यात्मनि लोकोऽस्ति नापुत्रस्यात एव हि ।
अनुशिष्टं पुत्रमेव लोक्यमाहुर्मनीषिणः ॥ ३५ ॥
मनुष्यलोको जय्यः स्यात्पुत्रेणैवेतरेण नो ।
मुमूर्षुर्मन्त्रयेत्पुत्रं त्वं ब्रह्मेत्यादिमन्त्रकैः ॥ ३६ ॥


इत्यादिश्रुतयः प्राहुः पुत्रभार्यादिशेषताम् ।
लौकिका अपि पुत्रस्य प्राधान्यमनुमन्यते ॥ ३७ ॥
स्वस्मिन्मृतेऽपि पुत्रादिर्जीवेद्वित्तादिना यथा ।
तथैव यत्‍नं कुरुते मुख्याः पुत्रादयस्ततः ॥ ३८ ॥
बाधमेतावता नात्मा शेषो भवति कस्यचित् ।
गौणमिथ्यामुख्यभेदैरात्मायं भवति त्रिधा ॥ ३९ ॥
देवदत्तस्तु सिंहोऽयमित्यैक्यं गौणमेतयोः ।
भेदस्य भासमानत्वात्पुत्रादेरात्मता तथा ॥ ४० ॥

शि० -युक्तीनें तसें सिद्ध पण अनुभव कुठे तसा आहे. गु० - अनुभवही तसाच आहे. मीं सदा सर्वदा असावे कधींच नष्ट होऊं नये. अशी आत्मप्रीतिदर्शक इच्छा कोणास बरें नाहीं ? तस्मात् अनुभवावरूनही सिद्ध झालें. ॥ ३१ ॥
शि० -याप्रमाणें अनुभव, युक्ति आणि श्रुति या तीन प्रमाणांनीं आत्म्यावरील अति प्रति सिद्ध केली. पण कित्यकांचे मत असें आहे कीं, पुत्रभार्यादिकाकरिताच आपण आहो. ॥ ३२ ॥
तीं कांहीं आपणाकरिता नव्हेत. म्हणूनच तींच अतिप्रीतीस पात्र आहेत. व याविषयी श्रुतीमध्ये प्रमाणही आढळतें. "आत्मा वै पुत्रनामासि" असें उपनिषदामध्यें पुत्राला मुख्यत्व दिले आहे. ॥ ३३ ॥
श्रुतींत असें म्हटले आहे कीं, "बाप आपल्या मुलाला पुण्यकर्मानुष्ठानाकरितां आपल्या जागी प्रतिनिधी नेमून आपण जराग्रस्त होऊन कृतकृत्य बुद्धीने देह ठेवितो." ॥ ३४ ॥
याप्रमाणें पुत्राला मुख्यात्मत्व सिद्ध होतें म्हणून पित्याचा आत्मा जरी असला, तरी "अपुत्राला लोक नाहीं" असें पुराणांतच सांगितलें आहे. याकरिताच पित्याने ज्यास पुढील मंत्राचा उपदेश केला असा पुत्रच परलोकास साधन आहे असें पंडित म्हणतात. ॥ ३५ ॥
इतकेंच नव्हे तर ऐहिक सुखास देखील मुलाचीच गरज आहे. याविषयी श्रुतिप्रमाण असें आहे की, हा मनुष्यलोक पुत्रानेंच जिंकण्यास योग्य आहे. इतर कोणच्याही कर्मीनें तो जिंकता येत नाहीं. कारण निपुत्रिकांस कितीही संपत्ति असली तरी तिजपासून त्यांस सुख होत नाही. वर जो उपदेश म्हणून सांगितला तो मरणाच्या वेळीं बाप मुलाला करतो तो असा - "तूंच ब्रह्म, तच लोक आणि तच यज्ञ. "॥ ३६ ॥
या सर्व श्रुतींमध्ये आत्म्यापेक्षा पुत्रभार्यादिकानांच महत्त्व दिलें आहे इतकेंच नव्हे, तर पुत्राला या रीतींचे प्राधान्य जगांत सर्व लोक देतात. ॥ ३७ ॥
आपण मेलो तरी बायकामुलांनीं सुखाने रहावे म्हणून मनुष्य पैसा जमीन इत्यादिकांची तजवीज होईल तितकी आपण स्वत: दुःख भोगूनही करतो. याकरिता पुत्रादिकच मुख्य आहेत असें ठरतें. ॥ ३८ ॥
गु० -तं म्हणतोस तें खरे आहे. परंतु एवढ्यावरूनच पुत्रदारांपेक्षा आत्मा कमी प्रिय ठरतो असें समजू नको. कारण आत्म्याचे प्रकार तीन आहेत. एक गौणात्मा दुसरा मिथ्यात्मा आणि तिसरा मुख्यात्मा. ॥ ३९॥
हा देवदत्त सिंह आहे असें म्हणून आम्हीं जेव्हां दोघांचे ऐक्य करतो, तेव्हां उभयतांमध्ये भेद असल्यामुळें तें ऐक्य खेर नव्हे. केवळ औपचारिक आहे. तसाच पुत्रत्माही गौणच समजला पाहिजे. ॥ ४० ॥


भेदोऽस्ति पञ्चकोषेषु साक्षिणो न तु भात्यसौ ।
मिथ्यात्मताऽतः कोषाणां स्थाणोर्चौरात्मता यथा ॥ ४१ ॥
न भाति भेदो नाप्यस्ति साक्षिणोऽप्रतियोगिनः ।
सर्वान्तरत्वात् तस्यैव मुख्यमात्मत्वमिष्यते ॥ ४२ ॥

सत्येवं व्यवहारेषु येषु यस्यात्मतोचिता ।
तेषु तस्यैव शेषित्वं सर्वस्यान्यस्य शेषता ॥ ४३ ॥
मुमूर्षोर्गृहरक्षादौ गौणात्मैवोपयुज्यते ।
न मुख्यात्मा न मिथ्यात्मा पुत्रः शेषी भवत्यतः ॥ ४४ ॥

अध्येता वह्निरित्यत्र सन्नप्यग्निर्न गृह्यते ।
अयोग्यत्वेन योग्यत्वाद्बटुरेवात्र गृह्यते ॥ ४५ ॥
कृशोऽहं पुष्टिमाप्स्यामीत्यादौ देहात्मतोचिता ।
न पुत्रं विनियुङ्क्तेऽत्र पुष्टिहेत्वन्नभक्षणे ॥ ४६ ॥
तपसा स्वर्गमेष्यामीत्यादौ कर्त्रात्मतोचिता ।
अनपेक्ष्य वपुर्भोगं चरेत्कृच्छ्रादिकं ततः ॥ ४७ ॥

मोक्ष्येऽहमित्यत्र युक्तं चिदात्मत्वं तदा पुमान् ।
तद्वेत्ति गुरुशास्त्राभ्यां न तु किंचिच्चिकीर्षति ॥ ४८ ॥
विप्रक्षत्रादयो यद्वद्बृहस्पतिसवादिषु ।
व्यवस्थितास्तथा गौणमिथ्यामुख्या यथोचितम् ॥ ४९ ॥

तत्र तत्रोचितेप्रीतिरात्मन्येवातिशायिनी ।
अनात्मनि तु तच्छेषे प्रीतिरन्यत्र नोभयम् ॥ ५० ॥

साक्षी आणि पंचकोश यांत प्रत्यक्ष भेद असूनही तो भ्रमाने भासत नाहीं. स्थाणूवर जसा चोराचा भ्रम व्हावा तसा कोशांवर आत्म्याचा भ्रम होतो. म्हणून प्रत्येक कोश मिथ्यात्मा समजावा. ॥ ४१ ॥
आणि त्या सर्व कोशांचा जो साक्षी तोच मुख्यात्मा समजावा. कारण तेथें भेद मुळींच नाहीं व भासतही नाहीं. कारण भेद असण्यास व भासण्यास दुसरा कोणी एक प्रतियोगी पाहिजे. साक्षीस तसा प्रतियोगी कोणीच नाहीं. याला मुख्यात्मा म्हणण्याचें कारण हेंच कीं, तो सर्वांचेठायी आहे. ॥ ४२ ॥
या तीन आत्म्यांपैकी ज्या ज्या व्यवहारांत जो जो आत्मा योग्य असेल, त्या त्या व्यवहरात त्याला मुख्यत्व देऊन इतर गौण (उपसर्जन) असें समजावे. ॥ ४३ ॥
जेव्हां बाप मरणास टेकतो, तेव्हां आपलें घर शेत इत्यादिकांचें रक्षण व्हावें म्हणून आपल्या बायकामुलांनाच त्या कामी योजितो. म्हणन त्यांनाच येथें आत्मत्व दिलें पाहिजे. कारण साक्षी अविकारी असल्यामुळें मुख्यात्म्याचा येथें उपयोग नाहीं. आणि देह मरणोन्मुख असल्यामुळें मिथ्यात्माही निरुपयोगी आहे. ॥ ४४ ॥
यास दृष्टांत. "अध्येता ( अध्ययन करणारा) अग्नि आहे" या वाक्यांत खरा दहन करणारा अग्नि समजावयाचा नव्हे. कारण अध्ययन करण्याचा गुण त्यामध्ये नाहीं. म्हणून अध्ययन करणारा शिष्यच असा या ठिकाणी अग्नि शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. ॥ ४५ ॥
तसेंच "मी कृश झालो आहे. दुग्ध पिऊन मला लठ्ठ झालें पाहिजे." अशा व्यवहारांत अन्नभक्षणाला योग्य अशा देहालाच आत्मत्व दिलें पाहिजे. कारण तेथें पुत्राचा उपयोग नाहीं. म्हणून येथें मिथ्यात्म्यालाच प्राधान्य दिलें पाहिजे. ॥ ४६ ॥
त्याचप्रमाणें तप करून स्वर्गास मी जाईन अशा इच्छनें जेव्हां मनुष्य तप करतो, तेव्हां तेथें कर्ता जो विज्ञानमय त्यालाच आत्मत्व दिलें पाहिजे. देहास देतां येत नाहीं. कारण तेव्हां तो शरीरास सुख देणारे सर्व भोग एकीकडे सारून कृच्छ्रचांद्रायणादि तपाचे अनुष्ठान करतो. ॥ ४७ ॥
तसेंच शमादि साधनाने मला मुक्ति व्हावी असें जेव्हां मनुष्य इच्छितो, तेव्हां गुरुशास्त्राचे साहाय्याने त्यास ज्ञान होतें. मग त्याला काहीच करण्याची इच्छा नसते. अशा प्रसंगीं मुख्यात्म्यालाच प्राधान्य दिलें पाहिजे. ॥ ४८ ॥
ब्राह्मणानें बृहस्पतिसवेकरून यज्ञ करावा, या वाक्यावरून तो यज्ञ करण्याचा अधिकार ब्राह्मणालाच आहे. राजाने राजसूययज्ञ करावा, या वाक्यावरून तो यज्ञ करण्याचा क्षत्रियासच अधिकार आहे. आणि वैश्याने स्तोमनामक यज्ञ करावा. या वाक्यांत तो यज्ञ करण्यास वैश्यालाच अधिकार आहे. त्याप्रमाणें गौण, मिथ्या व मुख्य हे तीनही आत्मे त्या त्या उचित व्यवहारांत प्रधान आहेत. ॥ ४९ ॥
ज्या ज्या व्यवहारी जो जो आत्मा प्रधान असेल त्या त्या व्यवहारांत त्या त्या आत्म्यावर अतिशय प्रीति असते. त्यावाचून त्याच्याकरितां जे दुसरे पदार्थ आहेत त्याजवर प्रीतिमात्र असते, पण तितकी नसते. आणि त्यावाचून इतर पदार्थांवर प्रीतीही नसते आणि अतिप्रीतिही नसते. ॥ ५० ॥


उपेक्ष्यं द्वेष्यमित्यन्यद् द्वेधा मार्गतृणादिकम् ।
उपेक्ष्यं व्याघ्रसर्पादि द्वेष्यमेवं चतुर्विधम् ॥ ५१ ॥

आत्मा शेष उपेक्ष्यं च द्वेष्यं चेति चतुर्ष्वपि ।
न व्यक्तिनियमः किन्तु तत्तत्कार्यात्तथा तथा ॥ ५२ ॥
स्याद्‌व्याघ्रः संमुखो द्वेष्यो ह्युपेक्ष्यस्तु पराङ्मुखः ।
लालनादनुकूलश्चेद्विनोदायेति शेषताम् ॥ ५३ ॥
व्यक्तीनां नियमो मा भूल्लक्षणात्तुव्यवस्थितिः ।
आनुकूल्यं प्रातिकूल्यं द्वयाभावश्च लक्षणम् ॥ ५४ ॥
आत्मा प्रेयान् प्रियः शेषो द्वेष्योपेक्ष्ये तदन्ययोः ।
इति व्यवस्थितो लोको याज्ञवल्क्यमतं च तत् ॥ ५५ ॥
अन्यत्रापि श्रुतिः प्राह पुत्राद्वित्तात्तथान्यतः ।
सर्वस्मादान्तरं तत्त्वं तदेतत्प्रेय इष्यताम् ॥ ५६ ॥
श्रौत्या विचारदृष्ट्यायं साक्ष्येवात्मा न चेतरः ।
कोषान्पञ्च विविच्यान्तर्वस्तुदृष्टिर्विचारणा ॥ ५७ ॥
जागरस्वप्नसुप्तीनामागमापायभासनम् ।
यतो भवत्यसावात्मा स्वप्रकाशचिदात्मकः ॥ ५८ ॥
शेषाः प्राणादिवित्तान्ता आसन्नास्तारतम्यतः ।
प्रीतिस्तथा तारतम्यात्तेषु सर्वेषु वीक्ष्यते ॥ ५९ ॥
वित्तात्पुत्रः प्रियः पुत्रात्पिण्डः पिण्डात्तथेन्द्रियम् ।
इन्द्रियाच्च प्रियः प्राणः प्राणादात्मा परः प्रियः ॥ ६० ॥

आतां इतर पदार्थ म्हणून जें वर म्हटले, त्याविषयीं मनुष्याच्या मनाची वृत्ति दोन प्रकारची असते. एक उपेक्षा आणि दुसरी द्वेषवृत्ति. या वृत्तिभेदाने पदार्थातही उपेक्ष्य आणि द्वेष्य असे दोन भेद झाले. मार्गावर पडलेले तृणादिक हे उपेक्ष्य आहेत आणि व्याघ्रसर्पादिक दुष्ट प्राणी द्वेष्य आहेत. याप्रमाणे मनोवृत्तीचे प्रकार चार झाले. ॥ ५१ ॥
आत्मा आत्मशेष उपेश्य आणि द्वेष्य या चारीमध्ये अमुकच आत्मा, अमुकच त्याचा शेष, अमुकच उपेक्ष्य आणि अमुकच द्वेष्य असें म्हणतां येत नाही. तर त्या त्या समयी त्या त्या कार्यापासून जशी जशी लाभहानीअसेल त्यात्याप्रमाणें तें समजावयाचें. ॥५२॥
येथें वाघाचेच उदाहरण घेतलें म्हणजे झालें. वाघ समोर आपल्या आंगावर आला असतांना तो द्वेष्य होतो. दूर डोंगरावर जात असतां उपेक्ष्य होतो. आणि तोच पालन करणाऱ्या दरवेशाला लाभदायक असल्यामुळें प्रिय होतो. म्हणजे, त्यास आत्मशेषता येते. ॥ ५३ ॥
या तिन्हींचें येथें लक्षण सांगितलें असतां समजण्यास बरें पडेल. कारण येथें व्यक्तीचा नेम नाहीं. तें लक्षण असें कीं, पदार्थ अनुकूल असतां प्रिय होतो, प्रतिकूल असतां द्वेप्य होतो आणि दो- न्हीही नसेल तर तो उपेक्ष्य समजावा. ॥ ५४ ॥
यावरून असें झालें कीं आत्मा हा सर्वांत प्रिय आणि त्याला उपकार करणारे पदार्थ त्याहून कमी प्रिय आणि त्यावांचून बाकीच्या पदार्थांत कांहीं द्वेष्य आणि उपेक्ष्य अशी व्यवस्था याज्ञवल्क्यांनी केली आहे. ॥ ५५ ॥
याप्रमाणें पुरुषविध ब्राह्मणांतही आत्म्याचा अतिप्रियपणा वर्णिला आहे. तेथें असें म्हटले कीं, "सर्वांच्या अंतरीं असणारा आत्मा पुत्र, वित्त व दुसऱ्या सर्व पदार्थापेक्षां फार प्रिय आहे." ॥ ५६ ॥
आतां श्रुतीस अनुसरून विचारदृष्टीनें पाहिले असतां सर्वांचा जो साक्षी तोच आत्मा ठरतो. येथें विचार म्हणजे हाच कीं पंच कोशांचा विवेक करून आपल्या आंत दृष्टि लावावी. ॥ ५७ ॥
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांचे येणे जाणें ज्याला सहज समजते तोच स्वप्रकाश चिद्रूप आत्मा. ॥ ५८ ॥

या साक्षीवांचून बाकीचे प्राणापासून वित्तापर्यंत सर्व पदार्थ जितके जितके आत्म्याच्या जवळ जवळ असतील तितकी तितकी त्याविषयी अधिक अधिक प्रीति असलेली दृष्टीस पडते. ॥ ५९ ॥
जसे द्रव्यापेक्षा मनुष्यास पुत्र प्रिय आहे. कारण पुत्राच्या जीवावरील धोका निवारण्यास द्रव्य खर्च करतो. पुत्रापेक्षांही आपला देह प्रिय आहे. कारण स्वदेह रक्षणाकरिता पुत्रादिकाला दुसऱ्यास दिल्याची उदाहरणे पुष्कळ आहेत. तसेंच इंद्रियांचा नाश होण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्य देहपीडा देखील सहन करतात. म्हणन देहापेकक्षाही इंद्रिये प्रिय म्हटली पाहिजेत. आणि प्राणावर संकट आलें म्हणजे तो वाचविण्याकरिता नाक डोळे गेलें तरी फारशी पर्वा नसते. म्हणून इंद्रियांपेक्षा प्राण प्रिय आहेत. याप्रमाणे उत्तरोत्तर एकाहून एक अधिक प्रिय असल्याचा अनुभव आबाल वृद्धास आहे. आणि प्राणापेक्षाही आत्मा प्रिय आहे. हा अनुभव मात्र तत्त्ववेत्त्यासच आहे. ॥ ६० ॥


एवं स्थिते विवादोऽत्र प्रतिबुद्धविमूढयोः ।
श्रुत्योदाहारि तत्रात्मा प्रेयानित्येव निर्णयः ॥ ६१ ॥
साक्ष्येव दृश्यादन्यस्मात्प्रेयानित्याह तत्त्ववित् ।
प्रेयान्पुत्रादिरेवेमं भोक्तुं साक्षीति मूढधीः ॥ ६२ ॥
आत्मनोऽन्यं प्रियं ब्रूते शिष्यश्च प्रतिवाद्यपि ।
तस्योत्तरं वचोबोधशापौ कुर्यात्तयोः क्रमात् ॥ ६३ ॥

प्रियं त्वां रोत्स्यतीत्येवमुत्तरं वक्ति तत्त्ववित् ।
स्वोक्तप्रियस्य दुष्टत्वं शिष्यो वेत्ति विवेकतः ॥ ६४ ॥
अलभ्यमानस्तनयः पितरौ क्लेशयेच्चिरम् ।
लब्धोऽपि गर्भपातेन प्रसवेन च बाधते ॥ ६५ ॥
जातस्य ग्रहरोगादिH कुमारस्य च मूर्खता ।
उपनीतेऽप्यविद्यत्वमनुद्वाहश्च पण्डिते ॥ ६६ ॥

यूनश्च परदारादि दारिद्र्यं च कुटुम्बिनः ।
पित्रोः दुःखस्य नास्त्यन्तो धनी चेन्म्रियते तदा ॥ ६७ ॥

एवं विविच्य पुत्रादौ प्रीतिं त्यक्त्वा निजात्मनि ।
निश्चित्य परमां प्रीतिं वीक्षते तमहर्निशम् ॥ ६८ ॥
आग्रहाद्‌ब्रह्मविद्‌द्वेषादपि पक्षममुञ्चतः ।
वादिनो नरकः प्रोक्तो दोषश्च बहुयोनिषु ॥ ६९ ॥
ब्रह्मविद्‌ब्रह्मरूपत्वादीश्वरस्तेन वर्णितम् ।
यद्यत्तत्तत्तथैव स्यात्तच्छिष्यप्रतिवादिनोः ॥ ७० ॥

याप्रमाणे आत्मा अतिप्रिय आहे असें सिद्ध जाहले. याविषयी ज्ञानी आणि अज्ञानी यामध्ये चाललेला वाद श्रुतीत सांगितला आहे. यावरूनही आत्म्याचे प्रियतमत्व ठरतें. ॥ ६१ ॥
तो वाद असा की, साक्षी हा यावत् दृश्य पदार्थांपेक्षा फार प्रिय आहे असें तत्त्ववेत्त्वाचे म्हणणे, आणि अज्ञानी असें म्हणतो कीं, पुत्रादिकच प्रियतम आहेत आणि साक्षी हा केवळ त्यांचा भोक्ता आहे. ॥ ६२ ॥
आत्म्यावाचून दुसरे पदार्थ प्रिय आहेत असें म्हणणारा मनुष्य एक शिष्य तरी असला पाहिजे किंवा प्रतिवादी तरी असला पाहिजे. म्हणून त्याजवर तत्त्ववेत्त्यानें दिलेले जे उत्तर तें शिष्यपक्षी बोधपर आणि प्रतिवादीपक्षी शापपर असें दोन प्रकारांनीं घेतलें पाहिजे. ॥ ६३ ॥
ते उत्तर असें कीं. "अरे हे प्रिय प्रिय म्हणतोस पण हे तुला रडवील बरें" येथें आपण ज्याला प्रिय म्हणतों त्यामध्यें रडविण्याचा दोष आहे असें शिष्य विवेकाने समजतो. आणि प्रतिवाद्याच्या वाटणीस शापच होतो. प्रिय म्हणण्यामध्यें रडविण्याचा दोष आहे असे जें झटले त्या दोषाचा तो असा विचार करतो. ॥ ६४ ॥
उदाहरणार्थ पुत्रच घे म्हणजे झालें. हा पुत्र मनुष्यास जो इतका प्रिय झाला आहे तो जन्मास येण्यापृर्वीपासनूच मनुष्यास कसे रडवितो तें पहा. तो झाला नाहीं तरी आईबापांत दुःख आहेच. बरें झाला तरी गर्भपाताची भीति. त्यांतून सुटला तर प्रसवाचें दुःख. ॥ ६५ ॥
त्यातूनही सुटून उदराबाहेर आला तर ग्रहांची व रोगांची पीडा व त्यातूनही सुटून मोठा झाला तर खुळा होण्याची चिंता. बरे शाहणा झाला, मुंज झाली, तरी त्यास विद्या कशी येईल ही चिंता आहेच. कदाचित् विद्याही चांगली झाली तर त्यांचें लग्न कसें होईल ही चिंता. ॥ ६६ ॥
सुदैवेंकरून मुलगी चांगली मिळून लग्नही झालें तरी चिंता कोठे गेली. त्याला एकादे बाहेर छंदाचे व्यसन लागेल. बरें, व्यसन नाहीं, तर मुले फार होऊन त्यांचे पोटाची पंचाईत पडेल. तीही कदाचित् पंचाईत गेली म्हणा. संतति, संपत्ति, विद्या, सद्गुण इत्यादिक गोष्टी सर्व प्राप्त झाल्या तरी शेवटी त्याच्या मरणाविषयी काळजी आहेच. याप्रमाणे आईबापांच्या दुःखास अंतच नाहीं. ॥ ६७ ॥
असा विचार करून पुत्रादिकांवरची प्रीति सोडून देऊन परम प्रीति काय ती आत्म्यावरच आहे असा निश्चय करून रात्रंदिवस आत्म्याचेच तो अनुसंधान करतो. ॥ ६८ ॥
वर आम्ही म्हटले आहे कीं, ही प्रीति तुला रडवील असा तत्त्ववेत्त्या प्रतिवाद्यास शाप दिला तो असा कीं, आग्रहाने किंवा तत्त्ववेत्त्याशी द्वेष करून धरलेला पक्ष न सोडणाऱ्या प्रतिवादीला नरकप्राप्ति होईल व जन्मजन्मांतरी दुःख होईल असें सांगितलें. ॥ ६९ ॥
खरेंच आहे कीं, ब्रह्मवेत्ता हा केवळ ब्रह्मच असल्यामुळें त्याला ईश्वरत्वही सहजच आलें. तो शिष्यास किंवा प्रतिवाद्यास शाप किंवा आशीर्वाद रूपाने जें जें बोलेल तें तें खरेंच होईल यांत नवल तें काय ? ॥ ७० ॥


यस्तु साक्षिणमात्मानं सेवते प्रियमुत्तमम् ।
तस्य प्रेयानसावात्मा न नश्यति कदाचन ॥ ७१ ॥
परप्रेमास्पदत्वेन परमानन्दरूपता ।
सुखवृद्धिः प्रीतिवृद्धौ सार्वभौमादिषु श्रुता ॥ ७२ ॥
चैतन्यवत्सुखं चास्य स्वभावश्चेच्चिदात्मनः ।
धीवृत्तिष्वनुवर्तेत सर्वास्वपि चितिर्यथा ॥ ७३ ॥

मैवमुष्णप्रकाशात्मा दीपस्तस्य प्रभा गृहे ।
व्याप्नोति नोष्णता तद्वच्चितेरेवानुवर्तनम् ॥ ७४ ॥

गन्धरूपरसस्पर्शेष्वपि सत्सु यथा पृथक् ।
एकाक्षेणैक एवार्थो गृह्यते नेतरस्तथा ॥ ७५ ॥


चिदानन्दौ नैव भिन्नौ गन्धाद्यास्तु विलक्षणाः ।
इति चेत् तदभेदोऽपि साक्षिण्यन्यत्र वा वद ॥ ७६ ॥

आद्ये गन्धादयोप्येवमभिन्नाः पुष्पवर्तिनः ।
अक्षभेदेन तद्‌भेदे वृत्तिभेदात्तयोर्भिदा ॥ ७७ ॥

सत्ववृत्तौ चित्सुखैक्यं तद्वृत्तेर्निर्मलत्वतः ।
रजोवृत्तेस्तु मालिन्यात्सुखांशोऽत्र तिरस्कृतः ॥ ७८ ॥
तिन्तिणीफलमत्यम्लं लवणेन युतं यदा ।
तदाम्लस्य तिरस्कारादीषदग्नं यथा तथा ॥ ७९ ॥
ननु प्रियतमत्वेन परमानन्दतात्मनि ।
विवेक्तुं शक्यतामेवं विना योगेन किं भवेत् ॥ ८० ॥

जो पुरुष साक्षी जो सर्वांत उत्तम प्रिय असा आत्मा त्याचें अनुसंधान करतो, त्याला तो अतिप्रिय आहे आणि त्याला पुत्रादिकांप्रमाणें नाशही नाहीं. ॥ ७१ ॥
आत्मा परप्रेमास्पद आहे म्हणून तो परमानंदरूपही आहे. सार्वभौमादि पदांपासून हिरण्यगर्भापर्यंत जसजशी प्रीतीची वृद्धि होते तसतशी सुखाचीही वृद्धि होते, असें बृहदारण्यकांत सांगितलें आहे. ॥ ७२ ॥
शिष्य - तुम्ही, म्हणता कीं आनंदरूपता हा आत्म्याचा स्वभावच आहे. पण चैतन्य जसे त्याचा स्वभाव म्हणता येईल तसे सुख हा त्याचा स्वभावच म्हणतां येत नाहीं. कारण तसें जर असतें तर सर्व बुद्धिवृत्तीच्या ठायीं चैतन्याप्रमाणे सुखाचीही व्याप्ति असती. पण तशी कांहीं दृष्टीस पडत नाही हे कसें ? ॥ ७३ ॥
गुरु - याला तुला एक दृष्टांत देतो, म्हणजे चांगले समजेल. दिव्याचा स्वभाव दोन प्रकारचा. एक उष्णता आणि दुसरा प्रकाश. परंतु सर्व घरांत प्रकाशाची जशी व्याप्ति असते, तशी उष्णतेची नसते. म्हणून काय तेथें उष्णता नाहीं म्हणता येईल काय ? त्याप्रमाणें बुद्धिवृत्तीच्याठायी चैतन्याचीच व्याप्ति असून कोठे कोठे सुखाची असते. ॥ ७४ ॥
शिष्य - चैतन्य आणि आनंद या दोन्हींचा अभेद आहे तर चैतन्य प्रकाश करणारी जी ही वृत्ति तीच आनंदालाही व्यक्त करील. गुरु - तसा कांहीं नियम नाही. कल्पना कर कीं, ज्यामध्ये गंध, रूप, रस, स्पर्श, असे चारीही गुण असलेला एक पदार्थ आहे, उदाहरणार्थ आंबाच कां घेईनास. आतां या आंब्याचे ज्ञान होण्यास एकाच इंद्रियाने भागत नाही. तर त्याचा गंधादिक प्रत्येक गुण समजण्यास घ्राणादिक निराळी इंद्रियेच पाहिजेत. एक गुण दुसऱ्या इंद्रियाने घेता येतच नाहीं. ॥ ७५
शिष्य - खरे, परंतु हां दृष्टांत बरोबर जुळत नाहींसे वाटतें. कारण गंधादिक गुणांमध्ये जसा परस्पर भेद आहे तसा चैतन्य आणि आनंद यांत मुळींच नाहीं. गुरु - चैतन्य आणि आनंद या दोन्हींचा अभेद जो तूं म्हणतोस तो काय साक्षीच्या ठिकाणी कीं दुसऱ्या ठिकाणी तें सांग. ॥ ७६ ॥
साक्षीचे ठायीं जर म्हणशील तर चैतन्य आणि आनंद यांचा जसा अभेद आहे तसा आंब्यामध्ये किंवा पुष्पामध्येंही गंधादि गुणांचा अभेदच आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी जर म्हणशील तरी आमचा दृष्टांत तसाच जुळतो. इंद्रिये भिन्न भिन्न असल्यामुळें गंधादि गुणही भिन्न झाले. त्याप्रमाणें वृत्तिभेदाने चैतन्य आणि आनंद यांत भेद आला. ॥ ७७ ॥
शिष्य-मग चिदानंदाचें ऐक्य तरी कोठे दृष्टीस पडते ? गुरु - बुद्धीची जी सात्विक वृत्ति तीत चिदानंदाचे ऐक्य स्पष्ट भासते. कारण ती वृत्ति स्वच्छ आहे. परंतु राजस वृत्ति मलीन असल्यामुळें तिजमध्यें सुखांशाचा लोप होतो. ॥ ७८ ॥
यास दृष्टांत. चिंचेमध्यें मीठ घातले असतां त्याचा आंबटपणा जसा कमी होतो, त्याचप्रमाणे वृत्तीमध्ये रजोगुण मिळाल्यानें तिचाआनंद लोपनू जातो. ॥ ७९ ॥
शिष्य - आत्मा प्रियतम असल्यामुळें तो परमानंदरूप आहे असें विचाराअंती ठरलें, परंतु योगावाचून काय होणार ? ॥ ८० ॥


यद्योगेन तदेवैति वदामो ज्ञानसिद्धये ।
योगः प्रोक्तो विवेकेन ज्ञानं किं नोपजायते ॥ ८१ ॥

यत् साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
इति स्मृतं फलैकत्वं योगिनां च विवेकिनाम् ॥ ८२ ॥
असाध्यः कस्यचिद्योगः कस्यचिज्ज्ञाननिश्चयः ।
इत्थं विचार्यमार्गौ द्वौ जगाद परमेश्वरः ॥ ८३ ॥
योगे कोऽतिशयस्तेऽत्र ज्ञानमुक्तं समं द्वयोः ।
रागद्वेषाद्यभावश्च तुल्यो योगिविवेकिनोः ॥ ८४ ॥
न प्रीतिर्विषयेष्वस्ति प्रेयानात्मेति जानतः ।
कुतो रागः कुतो द्वेषः प्रातिकूल्यमपश्यतः ॥ ८५ ॥
देहादेः प्रतिकूलेषु द्वेषस्तुल्योद्वयोरपि ।
द्वेषं कुर्वन्न योगी चेदविवेक्यपि तादृशः ॥ ८६ ॥
द्वैतस्य प्रतिभानं तु व्यवहारे द्वयोः समम् ।
समाधौ नेति चेत्तद्वन्नाद्वैतत्वविवेकिनः ॥ ८७ ॥

विवक्ष्यते तदस्माभिरद्वैतानन्दनामके ।
अध्याये हि तृतीयेतः सर्वमप्यतिमङ्गलम् ॥ ८८ ॥
सदा पश्यन्निजानन्दमपश्यन्नखिलं जगत् ।
अर्थाद्योगीति चेत्तर्हि सन्तुष्टो वर्धतां भवान् ॥ ८९ ॥

ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे मन्दानुग्रहसिद्धये ।
द्वितीयेऽध्याय एतस्मिन्नात्मानन्दो विवेचितः ॥ ९० ॥
इति ब्रह्मानन्दे आत्मानन्दः समाप्तः ॥ १२ ॥

गुरु - जें योगाने होतें तेंच योगावाचूनही होतें असें आम्ही म्हणतो. शिष्य - तुमचा अभिप्राय, समजला नाही. गुरु - जें योगाने होते तेंच योगावाचूनही होतें. अरे ज्ञानसिद्धीकरितां जसा आम्ही मागील प्रकरणी योग सांगितला तसें विवेकापासूनही ज्ञान होतें असें आम्ही म्हणतो. ॥ ८१ ॥
याविषयी गीतेत प्रमाणही आहे. जें स्थान सांख्यानें मिळतें, तेंच योगानेही मिळतें. असें योगी आणि विवेकी या दोघांनाही ज्ञानद्वारा मोक्षरूपी फळ मिळतें. ॥ ८२ ॥
शिष्य - दोन्हीही मार्गांचे फल एकच असल्यानंतर शास्त्रानें दोन मार्ग कां सांगितले ? गुरु- कित्येकांना योग साध्य होतो, आणि कित्येकांस विवेक करणे सोपे वाटते. अशा अभिप्रायाने भगवंताने दोन मार्ग सांगितले.. ॥ ८३ ॥
शिष्य - तथापि मला योग आणि विवेक दोन्ही भिन्न आहेत असें वाटतें. गुरु - असें तुला कां वाटतें. दोघांना ज्ञान सारखेच हें तर तूं कबूल करतोस ना ? शिष्य - पण योग्याला रागद्वेष मुळींच नसतात. गुरु - ते विवेक्यालाही नसतात. ॥ ८४ ॥
अरे ज्याला आत्माच सर्वांमध्ये प्रिय झाला त्याची प्रीति विषयावर कशी जाईल ? विषय अप्रिय झाल्यावर मग अर्थातच त्याला कोणचीही गोष्ट प्रतिकूल नाहीं. मग राग-द्वेष तरी. कोठून येणार ? ॥ ८५ ॥
शि० -विवेक्याला देहादिकांस ज्या प्रतिकूल वस्तू असतात त्यांविषयीं द्वेष असतो. गु - तसा योग्यालाही असतो. शि० -तसा द्वेष करीत असतांना तो योगीच नव्हे. गु०- तशा वेळीं तो विवेकी नव्हे. ॥ ८६ ॥
शि० -पण तुमच्या विवेक्याला देहाचे भान असतें. गु० -भान असतें परंतु तें व्यवहारकालीं की विवेककाली ? शि० -व्यवहारकाली. गु० -तशा वेळीं योग्यालाही द्वैतभान आहे. शि० -पण समाधिमध्ये कुठे आहे ? गु०-त्याप्रमाणें विवेक्यालाही विवेकदशेत द्वैतदर्शन नाहीं. ॥ ८७ ॥
याचे प्रतिपादन पुढील प्रकरणी म्हणजे पुढील अद्वैतानंद नामक तिसऱ्या अध्यायांत आम्ही करूं. ॥ ८८ ॥

शि० - तुमच्या विवेक्याला जगाचे भान मुळींच नमून सर्वदा निजानंदच जर भासला तर तो योगीच म्हटला पाहिजे, विवेकी कसला ? गु० -तसें म्हणतो कोण ? आमच्या मते योगी आणि विवेकी एकच. ते तुझ्या समजुतीस पक्के यावें असें आमच्या मनांत होतें तसें झालें. आतां स्वस्थ ऐस. ॥ ८९ ॥
याप्रमाणे आम्ही ब्रह्मानंद प्रकरणाच्या या दुसऱ्या अध्यायी मंदबुद्धीच्या लोकांकरिता आत्मानंदाचें विवेचन करून हें प्रकरण आटपतो. ॥ ९० ॥