॥ आपले वेद ॥


'वेद' हा शब्द 'विद्' या संस्कृत धातूपासून झाला असून, त्या धातूचे संदर्भाप्रमाणे निरनिराळे असे अनेक अर्थ होतात. त्यांपैकीं पहिला व मुख्य अर्थ म्हणजे ' जाणणे ' असा होतो. उदाहरणार्थ - 'य एनं वेत्ति हन्तारं' या वचनांतील 'विद्' याचा अर्थ जाणणे असा होतो; त्याचप्रमाणे 'ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति', 'ऋचो ह यो वेद स वेद देवान्’ 'तमेव विदित्वा अतिमृत्युमेति' इत्यादि वाक्यांतील 'विद्'चा अर्थ म्हणजे जाणणे असा होतो. त्याचा दुसरा अर्थ म्हणजे 'मिळविणे', 'संपादन करणे' असा होतो. जसे:--' सिद्धिं विन्दन्ति मानवा:' या वचनांत 'विद्' म्हणजे मिळविणे हा अर्थ अभिप्रेत आहे. त्याचा तिसरा अर्थ 'असणे' असा करण्यांत येतो. जसे:- ' नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:' या वचनांत 'विद्' याचा अर्थ सत्ता अगर भावदर्शक असा होत असून 'न विद्यते' याचा अर्थ गीतेच्या टीकेत श्रीशंकराचार्य 'नास्ति' असा करतात. तसाच चौथा अर्थ म्हणजे 'विचार करणे'. जसे:-'वित्ते धर्म सदा सद्भिः’ - येथें ' विद्'चा अर्थ विचार करणे असा होतो. याप्रमाणे 'विद्' धातूचे प्रसंगानुसार निरनिराळे अर्थ होत असतात.

तेव्हा आता 'वेद' शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगणे म्हणजे 'वेत्ति (जानाति), 'विन्दति (लभते ).' 'विंत्ते (विचारयति) येन यस्मिन् वा सत्यज्ञानं स वेदः' याप्रमाणे सांगता येईल. प्राचीन भारतीय अर्थांचे देवताज्ञान, विश्वज्ञान, सत्यज्ञान-अर्थात् जागतिक व पारलौकिक ज्ञान-ज्या ग्रंथांत सूत्ररूपानें ग्रथित करून ठेवण्यांत आले आहे आणि ज्याच्या सहाय्याने ते मनुष्याला प्राप्त होते अगर विचार करण्यात मदत होते, त्याला वेद अशी संज्ञा आहे. आणि हे ज्ञान दोन प्रकारच्या ग्रंथांत मिळून सांगण्यांत आलें असून, त्यांपैकीं एका भागाला संहिता व दुसऱ्या भागाला ब्राह्मण हें नांव आहे. संहितेत ऋषींनी गाईलेले छंदोबद्ध मंत्र असून, ब्राह्मणांत त्या मंत्रांचा अर्थ, विनियोग व स्पष्टीकरण यांचा समावेश करण्यांत आला आहे. म्हणून मंत्र व ब्राह्मण या दोहोंना मिळून वेद अशी संज्ञा आहे. 'मंत्रब्राह्मणात्मको वेदः' अशी आपस्तंब ऋषींनी व 'मंत्रब्राह्मणोयोर्वेदनामधेयम्' अशी कात्यायन ऋषींनी वेद शब्दाची व्याख्या केली आहे. मंत्रांत प्रामुख्याने देवतांची स्तुति, प्रार्थना व वर्णन इत्यादि विषयांचा समावेश होत असून, ब्राह्मणांत विधि, अर्थ व विनियोग यांचा संग्रह व ऊहापोह करण्यांत आलेला असतो. विधीमध्ये यज्ञयागादि कर्मानुष्ठानाची चर्चा असून, अर्थवादामध्ये कर्माची प्रशंसा निंदा, हेतु, चिकित्सा, परक्रिया व पुराकल्प वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो.

वेदांत लोक ज्ञान, लौकिक मार्ग लौकिक उपाय यांचा मधून मधून बोध असला तरी केव्हां केव्हां वर तेवढ्यावर भागण्यासारखे नसतें. मनुष्याची बुद्धि जेथें लटपटते, लुली पडते, अशा प्रसंगी अलौकिक उपाय सांगून इष्टसिद्धि कशी करून घ्यावी याचेंही मार्गदर्शन या ग्रंथात केले असल्यामुळे मनुष्याला हे ग्रंथ ऐहिक व पारलौक्कि उत्कर्षास कारणीभूत झाले आहेत. 'प्रत्यक्षेणानुमित्या ना वस्तूपायो न बुध्यते । एनं विदन्ति वेदेन तस्माद्वेदस्य वेदता ।' प्रत्यक्ष अगर अनुमानानें मनुष्याला जो उपाय सुचत नाही, तो वेदानें सूचित केला जातो म्हणून वेदाची वेदता होय. मनुष्य हा सुखप्रिय प्राणी आहे. त्याला नेहमी सुख पाहिजे असते. दुःखाचा त्याला मोठा तिटकारा असतो; आणि इष्टप्राप्ति झाली म्हणजे त्याला सुख होते, नि अनिष्ट घडून आले म्हणजे दुःखाचा डोंब उठतो. वेद हे इष्टप्राप्ति व अनिष्टपरिहार करण्यासाठींच अवतरले असल्यामुळें आत्मकल्याणेच्छु मनुष्याला प्रपंचांत ते मोठे उपकारक झाले आहेत. 'इष्टप्राप्त्यनिष्टपरिहारयोरलौकिकमुपायं यो ग्रंथो वेदयति स वेदः - इष्टप्राप्ति व अनिष्टपरिहार याविषयी अलौकिक उपाय - लौकिक नव्हे -, अपौरुषेय उपाय - पौरुषेय नव्हे, दैवी उपाय - मानवी नव्हे, सुचवून अगर दाखवून देणारा जो ग्रंथ त्यास वेद असें म्हणतात. या प्रमाणें वेद शब्दाचा हा थोडक्यांत अर्थ आहे.

वेदांची उत्पत्ति

हे वेद केव्हां झाले, कसे झाले, कोणी केले याविषयी चर्चा करणें - वाद माजविणे - हे आतां निष्फळ आहे. ते मनुष्यकृत म्हणजे पौरुषेय आहेत का मनुष्यकृत नाहीत म्हणजे अपौरुषेय आहेत, हा वादही तितकाच फोल आहे. ते केव्हां झाले, कां झाले ही असली चर्चाही अर्थशून्यच आहे, असें म्हटलें तरी चालेल. कां तर याविषयी प्रत्यक्ष पुरावा, निश्चित पुरावा, भरीव पुरावा कोणाजवळही नाही व कोणाला आतापर्यंत मिळालेलाही नाहीं व पुढे मिळण्याची आशाही नाहीं. नुसत्या तर्कटावरच भागवावे म्हटलें, तर ही गोष्ट सर्वमान्य होण्यासारखी नाहीं. कारण तो तर्क तरी असा कोठे सुप्रतिष्ठित आहे ? बुद्धीची कसरत करून आज कांहीं तरी निष्कर्ष काढावा न काढावा तो उद्या कोणीतरी सवाई तर्कज्ञ येऊन निराळ्या विचारसरणीनें तो खोडून काढतोच की नाही ? मग तर्काची तरी प्रतिष्ठा ती काय राहिली ? एकाने तर्क करावा व दुसऱ्याने तो खोडून काढावा, दुसऱ्याने करावा व तिसऱ्याने खोडावा, ही अशी शर्यत आतांपर्यंत सारखी चालत आली आहे. म्हणून तोही अप्रतिष्ठित असल्यामुळें त्याच्यावर सर्वस्वी अवलंबणे हें शहाणपणाचे, सुरक्षितपणाचे होणार नाहीं, हा अनुभव हिशोबांत घेणे हेंच हिताचे आहे.

आतां वेदांच्या उत्पत्तीसंबंधाने ऋग्वेदाचा कौल काय मिळतो हे आपण आतां पाहूं. जेथे हा प्रश्न आला आहे ती ऋचा ही अशी आहे. 'तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे । छंदासि जज्ञिरे तस्माद्यजुस्तमादजायत ॥ १०-९०-९ ॥ सर्व प्रकारचे हविर्द्रव्य हवन करण्यांत आलेल्या त्या आदियज्ञापासून ऋग्वेद झाला, सामवेद झाला, छंदे झाली व यजुर्वेदही त्यापासूनच झाला. या वचनावरून वेद हे यज्ञपुरुषापासून झाले - सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी झाले - जग निर्माण होण्याच्या आधीं म्हजे मनुष्य उत्पन्न होण्याच्या अगोदर झाले - ही गोष्ट सिद्ध होते. वेदनारायणाचें हे असें स्पष्ट सांगणें आहे.

हाच भाव शतपथांत जरा निराळ्या तर्‍हेनें सांगण्यांत आला आहे तो असा - 'एवं वा अरेऽस्य महतो भूतस्य निश्वसितमेतत् । यद् ऋग्वेदो यजुर्वेद: सामवेदोऽथर्व विद्यााङ्‌‍गिरस इतिहास पुराणं विद्या उपनिषदः श्लोकाः सूत्राण्यनुव्याख्यानानि व्याख्यानान्यस्यैवैतानि सर्वाणि निश्वसितानि ॥ (श. प. १४-५-४-१०) याप्रमाणे या परमात्मस्वरूप महद्‌भूतापासून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वाङ्‌गिरस, इतिहास, पुराण, विद्या, उपनिषत् श्लोक, सूत्रे, व्याख्याने, अनुव्याख्यानें इत्यादि सर्व निश्वसित झालीं आहेत. हे शतपथ वचनही वरील ऋग्वेद वचनाचेच अर्थतः अनुकरण करतें. वेद हे परमेश्वराच्या श्वासोच्छ्‌वासापासून झाले म्हणजे ते परमेश्व‍र निर्मित आहेत असा निर्वाळा शतपथानेंही दिला आहे.

शिवाय आणखी एक उपपत्ति सांगितली आहे ती अशी -सः (प्रजापति :) इमाँस्त्रील्लोँकानभितताप । तेभ्यस्तप्तेभ्यस्त्रीणि ज्योतींष्यजायन्ताग्निर्योऽयं पवते सूर्यः ॥ स इमानि त्रीणि ज्योतींष्यभितताप । तेभ्यस्तप्तेभ्यस्त्रयो वेदाऽजायन्ताग्नेर्ऋग्वेदो वायोर्यजुर्वेदः सूर्यात्सामवेदः ( श. प, ११-५-२ व ३) -प्रजापतीने तपश्चर्या करून पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग असे तीन लोक उत्पन्न केल्यावर पुनः त्याने त्या तीन लोकांना अभितप्त करून त्यांपासून अग्नि, वायु व सूर्य हे उत्पन्न केले, आणि या तीन ज्योतींना पुनः अभितप्त करून त्यांच्यापासून तीन वेद निर्माण केले. अग्नीपासून ऋग्वेद, वायूपासून यजुर्वेद व सूर्यापासून सामवेद निर्माण झाला.

ही वेदोत्पत्ति दिसावयास वरील ऋग्वेदवचनास वरून वरून बाध आणण्यासारखी दिसली त री सूक्ष्म विचारांती ती वस्तुतः तशी नाहीं. कारण अग्नि काय वायु काय सूर्य झाला काय हे सर्व त्या आदियज्ञापासूनच झालेले आहेत. ’चक्षोः सूर्योऽजायत’ ’मुखादिन्द्रश्चग्निश्च प्राणाद्वायुरजायत’। १०-९०-१३ असें ऋग्वेदांत स्पष्ट आंगितलेलें असून, वरील शतपथ वचनांत त्या आदियज्ञपुरुषाच्या कोणत्या अंगापासून कोण उत्पन्न झाले याचे स्पष्टिकरण केलें आहे इतकेंच. त्या दोन्ही वचनात वस्तुतः परस्पर विरोध असा मुळींच नाही.

मनुस्मृतीत याविषयीं वचन आढळतें तें असे - ’अग्निर्वायुरविभ्यस्तु त्रयं ब्रह्मा सनातनम् । दुदोह यज्ञ सिद्ध्यर्थेमृग्यजुःसामलक्षणम् ॥’ (मनु १-२३). तो ब्रह्मा अग्निपासून ऋग्वेद, वायूपासून यजुर्वेद व सूर्यापासून सामवेद असे तीन नित्य वेद यज्ञसिद्ध्यर्थ निर्माण करता झाला.

तात्पर्य - वेदोत्पत्तिसंबंधाने सर्व अचनांत मोठें विलक्षण साम्य असल्यामुळे वेदांची उत्पत्ति ही मानवकृति नसून ती ईश्वरनिर्मित आहे, असें धरून चालण्यांत कसलेंही पाप नाहीं.

GO TOP