ऋग्वेद मंडळ ( १ )

ऋग्वेद मंडळ ( २ )

ऋग्वेद मंडळ ( ३ )

ऋग्वेद मंडळ ( ४ )

ऋग्वेद मंडळ ( ५ )

ऋग्वेद मंडळ ( ६ )

ऋग्वेद मंडळ ( ७ )

ऋग्वेद मंडळ ( ८ )

ऋग्वेद मंडळ ( ९ )

ऋग्वेद मंडळ ( १० )

आपले वेद - ऋग्वेद प्रस्तावना

’विद्’ या अनेकार्थी धातूपासून ’वेद’ शब्द बनला आहे. २ र्‍या गणातील विद् = वेत्ति, वेद - जाणणे (to know) ; ४ थ्या गणातील विद् = विद्यते, असणे (to be); ६ व्या गणातील विद् = विन्दति, विन्दते - लाभ होणे (to gain); ७ व्या गणातील विद् = विन्ते, विचार करणे (to think); १० व्या गणातील विद् = वेदयते - इतरांस ज्ञान करून देणे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वस्तूविषयी ज्ञान प्राप्त करून घेणे, ते अनुभविणे, तो अनुभव दुसर्‍यांना प्राप्त होण्यासाठी विषद करणे हा मनुष्याचा स्थायी स्वभाव. आणि असा अनुभव जेव्हां पराकाष्ठेच्या उच्च प्रतीचा असतो, निर्भेळ असतो, अवर्णनीय असतो त्याला ’आनंद’ म्हटले आहे. आनंद ही एक स्थिती आहे. या आनंदालाच ब्रह्मप्राप्ती, आत्मविद्या, आत्मज्ञान, साक्षात्कार, दर्शन, ज्ञान इत्यादि उपाधी आहेत. स्वाध्याय, कर्म, प्रार्थना, भक्ति, तपाचरण इत्यादि मार्गे ’पूर्ण ज्ञान’ अनुभविणे व अशा अनुभवाची इतरांनाही प्रचिती यावी यासाठी झटणे हेही मानवी स्वभावास अनुसरून आहे. पण असे ज्ञान कोणी कोणाला ’देऊ’ शकत नाही अथवा कोण्या विशिष्ट ’कृति’ने ते प्राप्त होईलच असेही म्हणता येत नाही. कारण ’ते’ फक्त अनुभवता येते, पण काय अनुभवले हे सांगता येत नाही. त्याचे कारण एकच आहे. मानवाला उपलब्ध असलेल्या मन, बुद्धि, इंद्रिये या सर्वांच्या ते पलिकडचे आहे. ते केवळ ईश्वरी कृपेनेच मिळण्यासारखे आहे. अशी ईश्वरी कृपा होते तीही फक्त मानवास उपलब्ध असलेली मन, बुद्धि, इंद्रिये जेव्हां शुद्ध व पावन होतात तेव्हांच. मन बुद्धि यांच्या अती शुद्धावस्थेत ’ज्ञाना’चे दर्शन होते. अव्यक्त ज्ञान बुद्धिद्वारे व्यक्त होते. आणि बुद्धित व्यक्त व्हावयाचे एक साधन आहे त्याला म्हणतात शब्द - वाक् - वाणी. व्यवहार दशेत जाणणे, उमजणे होतच असते. पण शाश्वत, नित्य तत्त्वांचे दिव्य स्फुरण होऊन जे वाक्‌द्वारा बाहेर पडते त्याला दर्शनशास्त्र म्हणण्याचा प्रघात आहे. ज्यांना नित्य तत्त्वांचे दिव्य दर्शन घडते त्यांना द्रष्टा वा ऋषि म्हणतात. असे दर्शन मनाच्या उत्थान दशेत, समाधीदशेतच होऊ शकते. ऋ. (१३२४.३) या ऋचेत म्हटले आहे की ऋषिंना आपल्या अंतःकरणात ज्या वाक् (वेदवाणी) ची प्राप्ती झाली ती त्यांनी सर्व मनुष्य जातीला शिकविली. अशी वेदवाणी ज्यांना ज्या स्वरूपात प्राप्त झाली त्याला "मंत्र" म्हटले गेले आहे. मंत्र ऋषिगणांना वाक्‌रूपे ’दिसले’. ऋग्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथापैकी कौषितकी ब्राह्मण (१०.३०) व ऐतरेय ब्राह्मण (३.९) यानुसार ’ऋषिंना वेदमंत्र दिसले’ असाच अभिप्राय आहे. म्हणून वैदिक संहितेच्या सूक्त, ऋचा यासंबंधी ज्या ऋषिंच्या नावाचा उल्लेख केला जातो त्यांना त्या मंत्राचे प्रणेते न मानता त्या त्या मंत्रांचे त्यांना मंत्रद्रष्टे मानले जाते. निरुक्तकार यास्काचार्य एके ठिकाणी म्हणतात ’ऋषिर्दर्शनात् स्तोमान ददर्श’ - त्यांनी मंत्र पाहिले म्हणून त्यांचे नाव ’ऋषि’ पडले. आणखी एके ठिकाणी उल्लेख सपडतो की - ’द्रष्टारः ऋषयः स्मर्तारः’ - स्रष्टारः वा कर्तारः नव्हेत. ऋषि मंत्राचा द्रष्टा आहे, त्यांचा ’कर्त्ता’ नव्हे. अशा श्रृति कवनांचा संग्रह म्हणजे आपले वेद. मंत्रांचे असे दर्शन कोणा विशिष्ट काल-मर्यादेतच होणे संभवनीय नाही. फार मोठ्या कालगणनेत, अनेक अनेक जणांना अशा मंत्रांचे स्फुरण झालेले आहे. स्फुरण झाले म्हणजे जे आधीच आहे ते अवतरले, व्यक्त झाले. कारण आदिचैतन्य ब्रह्मदेवाची निर्मितीच वेदांपासून असल्याने ते मुळात ’आहेत’. आकाशात व्याप्त असलेले अव्यक्त स्वरूपातील नित्य शब्द जसे कण्ठ, तालु, जिव्हा याद्वारे अभिव्यक्त केले जातात, अगदी त्याच प्रमाणे श्ब्दमय नित्य वेद ऋषींच्या माध्यमातून सामाधी अवस्थेत अभिव्यक्त वा प्रकट झाले. आचार्य शंकराचार्यांनी आपल्या शारीरक भाष्य २.३.१ मध्ये याचे जोरदार समर्थन केले आहे. बृहद्‌अरण्यक उपनिषदात वेदांना परमेश्वराचा ’श्वास’ मानले आहे. नित्य परमेश्वराचा श्वासही नित्यच असणार, तर वेद देखील नित्यच आहेत. या ’श्वासा’चा अर्थ ’ज्ञान’ असाही केला जातो म्हणून ’ज्ञान’ही नित्य आहे. असे हे नित्य ज्ञान पुरुषाला तपाचरणाच्या अत्युच्च अवस्थेत ईश्वरीय प्रेरणेने त्याच्या अंतःकरणात अवतरीत होते.

महाप्रलयकाळी ’वेद’ अव्यक्त अवस्थेत असतो. सर्गाच्या, उत्पत्तीच्या आरंभी परमेश्वर सर्वप्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याला वेद देतो. या वेदांच्या साहाय्याने ब्रह्मदेव सृष्टीची (सृष्टींची) उत्पत्ती करतो. अशा प्रकारचे वर्णन पुरातन ग्रंथांतून पाहायला मिळते (श्वेतावतार उप., वंशब्राह्मण, पुराणे, भगवद् गीता इ.). आणखी काही ठिकाणी वेगवेगळे उल्लेख सापडतात - अजपृश्नि नामक ऋषि आपल्या तपोबळाने वेदांना प्रसाद रूपाने प्राप्त करता झाला. अशाच रीतीने अंगिरा नामक ऋषिसही वेद प्राप्त झाला. कुठे म्हटले आहे, भगवंताने मत्स्य अवतारी वेदांचे प्रतिपादन केले. सांख्य व योग दर्शनकारांच्या मते वेद-कर्त्त्याचा पत्ताच लागत नाही म्हणून ते अपौरुषेय आहेत. तसेच वैशेषिक दर्शनकार व वैय्याकरण मतवादी अर्थरूप व ज्ञानरूप वेदांना अपौरुषेय मानतात. मीमांसा शास्त्रानुसार वर्णमालेची कधी उत्पत्ती होत नसते. ते कण्ठ, तालु इ. अभिव्यंजक उपकरणांनी अभिव्यक्त होतात. मूलतः वर्ण (अर्थात् वाक्) नित्यच आहे. जैमिनी मीमांसकार तर शब्दासहित शब्दार्थही नित्य आहेत असेच म्हणतात.

आर्य समाजचे स्वामी दयानंद सरस्वती वेदांचे शब्द, अर्थ, शब्दार्थ-संबंध तथा क्रम यांनाही नित्य मानतात. त्यांच्या मते वेदात अनित्य व्यक्तिंबद्दल वर्णन नाही. वेदात दिसणार्‍या शब्दांचा ते ऐतिहासिक वा भौगोलिक नावे न करता त्या शब्दांचा ते यौगिक अर्थ लावतात. जसे ’वसिष्ठ’ हे ऋषिचे नाव नसून त्याचा अर्थ ’प्राण’ करतात. तसेच भारद्वाज = मन, विश्वामित्र = कान, असा अर्थ करतात. अशा प्रकारे शब्दवाचक अर्थोत्पत्तीस मनुस्मृतिमध्ये एक प्रमाण आहे - ’सर्वेषां स तु नामानि कर्माणि च पृथक् पृथक् । वेदशब्देभ्य एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे ॥’ (१.२१) - हिरण्यगर्भरूपाने असलेला तो परमात्मा सर्व प्राण्यांची भिन्न नावे व कर्मे, पूर्वकल्पामध्ये जशी होती तशीच सृष्टीच्या आरंभी वेदशब्दांवरून समजून घेऊन निर्माण करता झाला. उदा. - कुंभाराने घट करावे, कोष्ट्याने वस्त्र विणावे. अतएव वेदांसंबंधी असा एक विचार प्रवाह आहे जो मानतो की उर्वशी - पुरुरवा (ऋ. सूक्त १०.९५), नहुष ययाति, यम, सुदास इत्यादि नामांनी ज्या कर्मांचा निर्देष आढळतो तो नित्य इतिहास आहे. पौराणिक (मर्त्यस्वरूपाचा) इतिहास नव्हे. पुराणकारांनी या नावांच्या नाम-कर्म संबंधानुसार पौराणिक इतिहासाची रचना केली. म्हणून लोकोत्तर विषय वेदांत नाहीतच.

वेदांतर्गत मंत्रांना श्रृति म्हणतात हे मागे आले आहेच. ऋषिगणांनी समाधी अवस्थेत, परमेश्वराने उच्चारलेल्या वेदांचे आपल्या अंतःकरणात ’श्रवण’ केले आणि त्या अंतर्नादाला संसाराच्या कल्याणासाठी विश्वात त्यांचा प्रसार केला. वैदिक साहित्यापसून तंत्रसाहित्यासहित आपली सर्व पुरातन शास्त्रे जसा ईश्वर नित्य आहे तसा वेद नित्य आहे असा प्रचंड उद्‌घोष करतात. तसेच तो शाश्वत आहे, अपौरुषेय आहे. ऋषिगणांना तपाचरणाने अक्षर, शब्द, वाक्य छंदरूपे अंतःकरणार जो वेद प्राप्त झाला, तोच वेद सद्यस्थितीत आपल्यास उपलब्ध आहे. जवळपास सर्व आस्तिक मतवादी शास्त्रे वेदाला हिरण्यगर्भ - cosmic egg - संभूत मानतात. वेद भाष्यकर सायणाचार्य एके ठिकाणी म्हणतात - ’प्रत्यक्षेण अनुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते । एनं विदंति तस्माद् वदस्य वेदता ॥’ - प्रत्यक्ष किंवा अनुमानद्वारा जे जे उपाय अगम्य आहेत, ’त्याचे’ (परमेश्वराचे) ज्ञान संबोधन करविण्यात वेदांचे वेदत्व आहे. ’भूतं भव्यं भविष्यं च, सर्वं वेदात् प्रसिध्यति’ - भूत, भविष्य व वर्तमानातील सर्वकाही वेदांपासूनच ज्ञात होत असते. ज्ञानी पुरुष वर्तमान व भविष्यातील सर्व घटना ’पाहतो’. (मनुस्मृति). म्हणजेच वेद त्रिकाल सूत्रधारी आहे आणि ज्ञानी ऋषीही त्रिकालदर्शी व मंत्रद्रष्टे आहेत.

( to be continued... )



GO TOP