PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १२१ ते १३०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२१ (प्रजापति पालुपदसूक्त)

ऋषी - हिरण्यगर्भ प्राजापत्य : देवता - ’क’ प्रजापती : छंद - त्रिष्टुभ्


हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सं अ॑वर्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ आसीत् ।
स दा॑धार पृथि॒वीं द्यां उ॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ १॥

हिरण्य-गर्भः सं अवर्तत अग्रे भूतस्य जातः पतिः एकः आसीत्
सः दाधार पृथिवीं द्यां उत इमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥ १ ॥

सुवर्णाप्रमाणे अविकारी असे विश्वाचे बीज सर्वांच्या अगोदर पूर्णत्वाने विद्यमान होते, अशा स्वरूपाचा तो परमात्मा प्रकट होतांच सर्व चराचर वस्तूंचा एकटाच अधिपति झाला. त्यानेच ही पृथिवी आणि हा द्युलोक धारण केला आहे; तर आतां त्याच्याशिवाय दुसर्‍या कोणत्या देवाला हवि अर्पण करून उपासना करावी ? १.


य आ॑त्म॒दा ब॑ल॒दा यस्य॒ विश्व॑ उ॒पास॑ते प्र॒शिषं॒ यस्य॑ दे॒वाः ।
यस्य॑ छा॒यामृतं॒ यस्य॑ मृ॒त्युः कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ २ ॥

यः आत्म-दाः बल-दाः यस्य विश्वे उप-आसते प्र-शिषं यस्य देवाः
यस्य चायां ऋतं यस्य मृत्युः कस्मै देवाय हविषा विधेम ॥ २ ॥

ज्याने प्राणिमात्राला जीवात्मा दिला, शक्ति दिली, ज्याची आज्ञा सर्व दिव्यविभूति देखील शिरसावंद्य मानतात; अमरत्व हे ज्याची केवल छाया आहे. (तो कांही प्रत्यक्ष अंश नव्हे) आणि मृत्यु देखील ज्याची छायाच आहे तर अशा परमात्म्याला सोडून आणखी कोणत्या देवाला हवि अर्पण करून उपासना करावी ? २.


यः प्रा॑ण॒तो नि॑मिष॒तो म॑हि॒त्वैक॒ इद्राजा॒ जग॑तो ब॒भूव॑ ।
य ईशे॑ अ॒स्य द्वि॒पद॒श्चतु॑ष्पदः॒ कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ३ ॥

यः प्राणतः नि-मिषतः महि-त्वा एकः इत् राजा जगतः बभूव
यः ईशे अस्य द्वि-पदः चतुः-पदः कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ३ ॥

वस्तुजात सजीव असो किंवा नसो, ते निद्रित असो की नसो, ह्या जगताचा जो आपल्या श्रेष्ठ सामर्थ्याने एकटाच अधिपति झाला; आणि म्हणून सर्व मानव आणि चतुष्पाद सुद्धां ह्या सर्वांवर जो प्रभुत्व चालवितो तर अशा ईश्वरावांचून आतां कोणत्या देवाची हवि अर्पण करून आम्ही उपासना करावी ? ३.


यस्ये॒मे हि॒मव॑न्तो महि॒त्वा यस्य॑ समु॒द्रं र॒सया॑ स॒हाहुः ।
यस्ये॒माः प्र॒दिशो॒ यस्य॑ बा॒हू कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ४ ॥

यस्य इमे हिम-वन्तः महि-त्वा यस्य समुद्रं रसया सह आहुः
यस्य इमाः प्र-दिशः यस्य बाहू इति कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ४ ॥

ज्याच्या प्रभावामुळे हा हिमालय आणि तसेच दुसरेहि पर्वत त्याचे अंकित झाले, आणि रसा इत्यादि महानद्यांसह समुद्र सुद्धां ज्याचा अंकित झाला, तसेंच ह्या दिशा आणि उपदिशा ज्याचे भुजदण्ड शोभतात, अशा ईश्वरा वांचून आम्ही कोणत्या देवाची हवि अर्पण करून उपासना करावी ? ४.


येन॒ द्यौरु॒ग्रा पृ॑थि॒वी च॑ दृ॒ळ्हा येन॒ स्व स्तभि॒तं येन॒ नाकः॑ ।
यो अ॒न्तरि॑क्षे॒ रज॑सो वि॒मानः॒ कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ५ ॥

येन द्यौः उग्रा पृथिवी च दृळ्हा येन स्वर् इति स्वः स्तभितं येन नाकः
यः अन्तरिक्षे रजसः वि-मानः कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ५ ॥

हा भीषण नक्षत्रलोक आणि तशीच ही पृथ्वी ज्याने धारण केली आहे, ज्याने स्वर्गीय लोक आणि आकाश ह्यांना देखील सावरून धरून स्थिर केले, ज्याने अंतरालामध्ये रजोलोकाची मर्यादा आंखून दिली, त्याच्याशिवाय दुसर्‍या कोणत्या देवाची आम्ही हवि अर्पण करून उपासना करावे ? ५.


यं क्रन्द॑सी॒ अव॑सा तस्तभा॒ने अ॒भ्यैक्षे॑तां॒ मन॑सा॒ रेज॑माने ।
यत्राधि॒ सूर॒ उदि॑तो वि॒भाति॒ कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ६ ॥

यं क्रन्दसी इति अवसा तस्तभाने इति अभि ऐक्षेतां मनसा रेजमाने
यत्र अधि सूरः उत्-इतः वि-भाति कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ६ ॥

गर्जना करणारे अंतराळ आणि मेघमण्डळ हे दोन्ही त्याच्या कृपेने सांवरले आहेत, पण ते मनामध्ये भिऊन जाऊन ज्याच्याकडे कांपत कांपत निरखून पहात आहेत आणि उदित झालेला सूर्यसुद्धां ज्याच्या कृपेने आकाशांत उच्चभागी प्रकाशत असतो त्याच्यावांचून आतां कोणत्या देवाची उपासना हवि अर्पण करून करावी ? ६.


आपो॑ ह॒ यद्बृ॑ह॒तीर्विश्वं॒ आय॒न् गर्भं॒ दधा॑ना ज॒नय॑न्तीर॒ग्निम् ।
ततो॑ दे॒वानां॒ सं अ॑वर्त॒तासु॒रेकः॒ कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ७ ॥

आपः ह यत् बृहतीः विश्वं आयन् गर्भं दधानाः जनयन्तीः अग्न् इं
ततः देवानां सं अवर्तत असुः एकः कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ७ ॥

ज्याच्या योगाने श्रेष्ठ आपोदेवींनी सर्वांचा गर्भ आपल्या ठिकाणीच धारण केला. आणि विद्युत्‌रूपाने अग्नीला प्रकट करून सर्वत्र संचार केला तेव्हांच त्यांच्यापासून दिव्य विबुधांमध्ये एक प्राणशक्ति, एक सामर्थ्य निर्माण झाले तर ईश्वरावांचून आतां कोणत्या देवाला हवि अर्पण करून आम्ही उपासना करावी ? ७.


यश्चि॒दापो॑ महि॒ना प॒र्यप॑श्य॒द्दक्षं॒ दधा॑ना ज॒नय॑न्तीर्य॒ज्ञम् ।
यो दे॒वेष्वधि॑ दे॒व एक॒ आसी॒त् कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ८ ॥

यः चित् आपः महिना परि-अपश्यत् दक्षं दधानाः जनयन्तीः यजं
यः देवेषु अधि देवः एकः आसीत् कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ८ ॥

आपोदेवींनी आपल्या अंतर्भागी जगदुत्पादक शक्ति धारण केल्याने त्यांनी यज्ञाला जन्म दिला, ही गोष्ट ज्याने आपल्या महिम्याने समग्र जाणले, जो सर्व देवामध्ये एकटाच वरिष्ठ असा देव म्हणजे देवाधिपति ठरला आहे; तर त्याच्यावांचून आतां दुसर्‍या कोणत्या देवाला हवि अर्पण करून आम्ही उपासना करावी ? ८.


मा नो॑ हिंसीज् जनि॒ता यः पृ॑थि॒व्या यो वा॒ दिवं॑ स॒त्यध॑र्मा ज॒जान॑ ।
यश्चा॒पश्च॒न्द्रा बृ॑ह॒तीर्ज॒जान॒ कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ९ ॥

मा नः हिंसीत् जनिता यः पृथिव्याः यः वा दिवं सत्य-धर्मा जजान
यः च अपः चन्द्राः बृहतीः जजान कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ९ ॥

असा हा परमेश्वर आमचा कधीहि नाश करणार नाही. जो ह्या पृथिवीचा उत्पन्नकर्ता आहे; पण सत्य हाच ज्याचा स्वभावधर्म आहे, ज्याने द्युलोकहि उत्पन्न केला आहे तो परमेश्वर आमचा काय म्हणून नाश करील ? त्यानेच ह्या श्रेष्ठ आणि चंद्राप्रमाणे शीतल आणि आल्हाददायक नद्या उत्पन्न केल्या; तर आतां दुसर्‍या कोणत्या देवाची आम्ही हवि अर्पन करून उपासना करावी ? ९.


प्रजा॑पते॒ न त्वदे॒तान्य॒न्यो विश्वा॑ जा॒तानि॒ परि॒ ता ब॑भूव ।
यत्का॑मास्ते जुहु॒मस्तन् नो॑ अस्तु व॒यं स्या॑म॒ पत॑यो रयी॒णाम् ॥ १० ॥

प्रजापतेन त्वद् एतान्य् अन्यो विश्वाजतानिपरिता बभूव
यत्कामास् ते जुहुमस् तन् नोअस्तु वयं स्यामपतयो रयीणाम् ॥ १० ॥

हे प्राणिमात्रांच्या अधिपते देवा ! ह्या उत्पन्न झालेल्या यच्चयावत्‌ वस्तूंना तुझ्यावांचून दुसरा कोणीही व्याप्त करूं शकला नाही किंवा यथार्थपणे जाणूं शकला नाही. तर जी जी इच्छा मनांत धरून आम्ही तुझ्याप्रीत्यर्थ यज्ञ करूं, आमच्या त्या इच्छा सफल होवोत; आणि आम्ही सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे धनी हो‍ऊं असे घडो १०.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२२ (अग्निसूक्त)

ऋषी - चित्रमहस् वासिष्ठ : देवता - अग्नि : छंद - १, ५ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


वसुं॒ न चि॒त्रम॑हसं गृणीषे वा॒मं शेवं॒ अति॑थिं अद्विषे॒ण्यम् ।
स रा॑सते शु॒रुधो॑ वि॒श्वधा॑यसोऽ॒ग्निर्होता॑ गृ॒हप॑तिः सु॒वीर्य॑म् ॥ १॥

वसुं न चित्र-महसं गृणीषे वामं शेवं अतिथिं अद्रि-षेण्यं
सः रासते शुरुधः विश्व-धायसः अग्निः होता गृह-पतिः सु-वीर्यम् ॥ १ ॥

दिव्य निधीप्रमाणे अद्‍भुत तेज:संपन्न अत्यंत मनोहर आणि सुखमय असा भक्तांचा अतिथि जो अग्नि, त्याचे मी यशोवर्णन करीत आहे, तो अग्नि अजातशत्रु आणि अत्यंत सोज्वळ निष्कलंक असा आहे; सर्व जगाला तृप्त करणार्‍या अशा देणग्या तोच देतो; पण त्यांतहि तो यज्ञगृहाचा स्वामी आणि यज्ञसंपादक अग्नि उत्कृष्ट शौर्य हे वरदान उपासना करणार्‍या भक्ताला देतो १.


जु॒षा॒णो अ॑ग्ने॒ प्रति॑ हर्य मे॒ वचो॒ विश्वा॑नि वि॒द्वान् व॒युना॑नि सुक्रतो ।
घृत॑निर्णि॒ग् ब्रह्म॑णे गा॒तुं एर॑य॒ तव॑ दे॒वा अ॑जनय॒न्न् अनु॑ व्र॒तम् ॥ २ ॥

जुषाणः अग्ने प्रति हर्य मे वचः विश्वानि विद्वान् वयुनानि सुक्रतो इतिसु-क्रतो
घृत-निर्निक् ब्रह्मणे गातुं आ ईरय तव देवाः अजनयन् अनु व्रतम् ॥ २ ॥

हे अग्ने, तूं प्रसन्न होऊन माझ्या विनवणीला प्रेमानें मान्यता दे. तूं सर्वज्ञ आहेस, म्हणून हे अतुल कर्तृत्वा तुजला सर्व धर्म आणि सर्व विद्या विदित आहेत. तूं घृतानें अभ्यंग केल्यावर प्रर्थनातत्पर भक्ताला सन्मार्गाकडे जाण्याचीच प्रवृत्ति उत्पन्न कर. सर्व विबुधांनी तर तुझ्याच बिरूदास अनुसरून आपले ब्रीद ठरविले आहे. २.


स॒प्त धामा॑नि परि॒यन्न् अम॑र्त्यो॒ दाश॑द्दा॒शुषे॑ सु॒कृते॑ मामहस्व ।
सु॒वीरे॑ण र॒यिणा॑ग्ने स्वा॒भुवा॒ यस्त॒ आन॑ट् स॒मिधा॒ तं जु॑षस्व ॥ ३ ॥

सप्त धामानि परि-यन् अमर्त्यः दाशत् दाशुषे सु-कृते ममहस्व
सु-वीरेण रयिणा अग्ने सु-आभुवा यः ते आनट् सम्-इधा तं जुषस्व ॥ ३ ॥

सातहि भुवने फिरणारा जो तूं अमर देव तो तूं हवि अर्पण करणार्‍या सत्कार्यनिरत भक्तासाठी आपले तेज प्रकट कर, तसेंच जो उपासक समिधा अर्पण करून तुझी सेवा करितो त्याच्यासाठी हे देवा असे कर की ज्यामध्ये शूर पुरुषांची गर्दीच गर्दी असते अशा ऐश्वर्याशी त्याचा योग घडवून आण आणि त्याच्यावर प्रसन्न हो ३.


य॒ज्ञस्य॑ के॒तुं प्र॑थ॒मं पु॒रोहि॑तं ह॒विष्म॑न्त ईळते स॒प्त वा॒जिन॑म् ।
शृ॒ण्वन्तं॑ अ॒ग्निं घृ॒तपृ॑ष्ठं उ॒क्षणं॑ पृ॒णन्तं॑ दे॒वं पृ॑ण॒ते सु॒वीर्य॑म् ॥ ४ ॥

यजस्य केतुं प्रथमं पुरः-हितं हविष्मन्तः ईळते सप्त वाजिनं
शृण्वन्तं अग्निं घृत-पृष्ठं उक्षणं पृणन्तं देवं पृणते सु-वीर्यम् ॥ ४ ॥

यज्ञाचा जो ध्वज आणि आद्य पुरोहित म्हणजे आचार्य आहे आणि ज्याचे सत्वबल सात प्रकारचे आहे, अशा अग्नीमध्ये हविर्भाग अर्पण करून ऋत्विज्‌ त्याचे स्तवन करितात. जो भक्ताची प्रार्थना ऐकतो, ज्याला घृतधारांनी अभ्यंग करितात, जो बलप्रद, वृद्धिप्रद, सेवकाचा कामनापूरक आणि सकल शौर्यसंपन्न आहे, त्या अग्नीला हविर्दानाने तृप्त करितात. ४.


त्वं दू॒तः प्र॑थ॒मो वरे॑ण्यः॒ स हू॒यमा॑नो अ॒मृता॑य मत्स्व ।
त्वां म॑र्जयन् म॒रुतो॑ दा॒शुषो॑ गृ॒हे त्वां स्तोमे॑भि॒र्भृग॑वो॒ वि रु॑रुचुः ॥ ५ ॥

त्वं दूतः प्रथमः वरेण्यः सः हूयमानः अमृताय मत्स्व
त्वां मर्जयन् मरुतः दाशुषः गृहे त्वां स्तोमेभिः भृगवः वि रिरुचुः ॥ ५ ॥

देव आणि मानव ह्यांचा पहिला आणि सर्वोत्कृष्ट प्रतिनिधि तूं आहेस, तुजमध्ये आहुति अर्पण झाली तर आम्हांला अमरत्व मिळावे म्हणून हृष्ट हो. भक्ताच्या यज्ञगृहांत मरुतांनी तुजला अलंकृत केले आणि स्तुति कलापांच्या योगाने भृगूंनी तुजला विभूषित केले ५.


इषं॑ दु॒हन् सु॒दुघां॑ वि॒श्वधा॑यसं यज्ञ॒प्रिये॒ यज॑मानाय सुक्रतो ।
अग्ने॑ घृ॒तस्नु॒स्त्रिरृ॒तानि॒ दीद्य॑द्व॒र्तिर्य॒ज्ञं प॑रि॒यन् सु॑क्रतूयसे ॥ ६ ॥

इषं दुहन् सु-दुघां विश्व-धायसं यज-प्रिये यजमानाय सुक्रतो इतिसु-क्रतो
अग्ने घृत-स्नुः त्रिः ऋतानि दीद्यत् वर्तिः यजं परि-यन् सुक्रतु-यसे ॥ ६ ॥

सहज दोहन करूं देणारी जी यज्ञरूप धेनु तिच्यापासून उत्साहरूप विश्वपोषक दुग्ध दोहन करणार्‍या, हे अतुल पराक्रमी अग्निदेवा, तूंहि यज्ञकर्मरत यजमानासाठी घृताभिषिक्त हो‍ऊन सत्यधर्माची तीन स्थाने किंवा तीन अंगे उज्वल करतोस; आणि धर्ममार्ग जो यज्ञ त्याच्यामध्ये सर्वत्र संचार करून तूं आपला पराक्रम निदर्शनास आणतोस ६.


त्वां इद॒स्या उ॒षसो॒ व्युष्टिषु दू॒तं कृ॑ण्वा॒ना अ॑यजन्त॒ मानु॑षाः ।
त्वां दे॒वा म॑ह॒याय्या॑य वावृधु॒राज्यं॑ अग्ने निमृ॒जन्तो॑ अध्व॒रे ॥ ७ ॥

त्वां इत् अस्याः उषसः वि-उष्टिषु दूतं कृण्वानाः अयजन्त मानुषाः
त्वां देवाः महयाय्याय ववृधुः आज्यं अग्ने नि-मृजन्तः अध्वरे ॥ ७ ॥

ह्या उष:कालाच्या वेळी केवळ तुलाच आमचा हव्यवाहक प्रतिनिधी करून आम्ही मानव यज्ञ करीत असतो. आपण महत्त्वाला चढावे म्हणून हे अग्ने, दिव्य विबुधांनी तुजला अध्वर यागांत आज्य हवि भरपूर अर्पण करून हर्षोत्फुल्ल केले ७.


नि त्वा॒ वसि॑ष्ठा अह्वन्त वा॒जिनं॑ गृ॒णन्तो॑ अग्ने वि॒दथे॑षु वे॒धसः॑ ।
रा॒यस्पोषं॒ यज॑मानेषु धारय यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ८ ॥

नि त्वा वसिष्ठाः अह्वन्त वाजिनं गृणन्तः अग्ने विदथेषु वेधसः
रायः पोषं यजमानेषु धारय यूयं पात स्वस्ति-भिः सदा नः ॥ ८ ॥

हे अग्निदेवा, आम्ही वसिष्ठकुलोत्पन्न कविजनांनी तुज सर्वसामर्थ्यपूर्ण देवाला यज्ञसभेमध्ये स्तवन करून पाचारण केले आहे, तर आमच्या यजमानांच्या वैभवाचा उत्कर्ष कर, आणि दिव्यविबुधांनो, तुम्हीहि असाच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२३ (वेनसूक्त)

ऋषी - वेन भार्गव - देवता - वेन : छंद - त्रिष्टुभ्


अ॒यं वे॒नश्चो॑दय॒त् पृश्नि॑गर्भा॒ ज्योति॑र्जरायू॒ रज॑सो वि॒माने॑ ।
इ॒मं अ॒पां सं॑ग॒मे सूर्य॑स्य॒ शिशुं॒ न विप्रा॑ म॒तिभी॑ रिहन्ति ॥ १॥

अयं वेनः चोदयत् पृश्नि-गर्भाः ज्योतिः-जरायुः रजसः वि-माने
इमं अपां सम्-गमे सूर्यस्य शिशुं न विप्राः मति-भिः रिहन्ति ॥ १ ॥

हा वेन पहा; गर्भाला जसे आवरण असते तसे ज्याला प्रकाशाचे आवरण आहे, अशा वेनाने रजोलोकांच्या मूळ प्रदेशामध्ये पृश्नीच्या बालकांना म्हणजे मेघपटलांतील जलांना लांब दूर रेटून दिले; म्हणून ज्या ठिकाणी सूर्य हा समुद्रोदकाला टेकलेला असा दिसतो त्या स्थानी (म्हणजे क्षितिजामध्ये) तो वेन असतांना ज्ञानी कवि आपल्या प्रतिभा स्फुरित कवनांनी त्याचे लालन करितात १.


स॒मु॒द्रादू॒र्मिं उदि॑यर्ति वे॒नो न॑भो॒जाः पृ॒ष्ठं ह॑र्य॒तस्य॑ दर्शि ।
ऋ॒तस्य॒ साना॒व् अधि॑ वि॒ष्टपि॒ भ्राट् स॑मा॒नं योनिं॑ अ॒भ्यनूषत॒ व्राः ॥ २ ॥

समुद्रात् ऊर्मिं उत् इयर्ति वेनः नभः-जाः पृष्ठं हर्यतस्य दर्शि
ऋतस्य सानौ अधि विष्टपि भ्राट् समानं योनिं अभि आनूषत व्राः ॥ २ ॥

हा वेन समुद्रांतून त्याच्या लाटांना वर उसळून देतो, नभो मण्डलामध्ये तो उंच दिसूं लागला म्हणजे मग त्या रमणीय वेनाचा पृष्ठभाग स्पष्टपणे दृग्गोचर होतो आणि ईश्वरी सत्याचे निदर्शक जे आकाश त्याच्या अत्युच्च प्रदेशी तो सुप्रकाशित होतो, त्या वेळी त्याच आकाशांत वास करणारी दुसरी अनेक नक्षत्रे आहेत ती त्याचे अभिनंदन कारितात २.


स॒मा॒नं पू॒र्वीर॒भि वा॑वशा॒नास्तिष्ठ॑न् व॒त्सस्य॑ मा॒तरः॒ सनी॑ळाः ।
ऋ॒तस्य॒ साना॒व् अधि॑ चक्रमा॒णा रि॒हन्ति॒ मध्वो॑ अ॒मृत॑स्य॒ वाणीः॑ ॥ ३ ॥

समानं पूर्वीः अभि ववशानाः तिष्ठन् वत्सस्य मातरः स-नीळाः
ऋतस्य सानौ अधि चक्रमाणाः रिहन्ति मध्वः अमृतस्य वाणीः ॥ ३ ॥

एकाच ठिकाणी वास करणार्‍या त्या वत्साच्या माता तो सर्वांचाच बालक असें समजून त्याच्याकडे पाहून हंबरत उभ्या राहतात आणि सत्य धर्माचे जे यज्ञमंदिर त्यांच्या मुख्य भागी संचार करून अमृतमधुर अशा स्तुति वाणींचा आस्वाद घेतात ३.


जा॒नन्तो॑ रू॒पं अ॑कृपन्त॒ विप्रा॑ मृ॒गस्य॒ घोषं॑ महि॒षस्य॒ हि ग्मन् ।
ऋ॒तेन॒ यन्तो॒ अधि॒ सिन्धुं॑ अस्थुर्वि॒दद्ग॑न्ध॒र्वो अ॒मृता॑नि॒ नाम॑ ॥ ४ ॥

जानन्तः रूपं अकृपन्त विप्राः मृगस्य घोषं महिषस्य हि ग्मन्
ऋतेन यन्तः अधि सिन्धुं अस्थुः विदत् गन्धर्वः अमृतानि नाम ॥ ४ ॥

ज्ञानी कविजनांना त्याचे स्वरूप माहीत असते त्या कारणाने त्याच्यावर ते प्रसन्नच असतात आणि त्या श्रेष्ठ मृगाच्या नांवाचा घोष ऐकून तिकडेच वळतात. नंतर सत्यधर्माच्या मार्गाने ते सिन्धुपर्यंत जाऊन थडकतात, कारण त्या ठिकाणी अमृताचे अनेक प्रकार त्या वेनरूपी गंधर्वाला आढळले होते ४.


अ॒प्स॒रा जा॒रं उ॑पसिष्मिया॒णा योषा॑ बिभर्ति पर॒मे व्योमन् ।
चर॑त् प्रि॒यस्य॒ योनि॑षु प्रि॒यः सन् सीद॑त् प॒क्षे हि॑र॒ण्यये॒ स वे॒नः ॥ ५ ॥

अप्सराः जारं उप-सिष्मियाणा योषा बिभर्ति परमे वि-ओमन्
चरत् प्रि यस्य योनिषु प्रियः सन् सीदत् पक्षे हिरण्यये सः वेनः ॥ ५ ॥

इतक्यांत त्याची प्रिया अप्सरा ही गालांतल्या गालांत हंसत हळूच त्या आपल्या प्रिय वल्लभाला घेऊन अत्युच्च आकाशांत जाते; तोहि तिच्यावर अनुरक्त असतोच; त्यामुळे तो वेन आपल्या प्रियेच्या निवासस्थानी मजेने विहार करीत फिरतो आणि केव्हां केव्हां आपल्याच पंखावर टेंकून बसतो ५.


नाके॑ सुप॒र्णं उप॒ यत् पत॑न्तं हृ॒दा वेन॑न्तो अ॒भ्यच॑क्षत त्वा ।
हिर॑ण्यपक्षं॒ वरु॑णस्य दू॒तं य॒मस्य॒ योनौ॑ शकु॒नं भु॑र॒ण्युम् ॥ ६ ॥

नाके सु-पर्णं उप यत् पतन्तं हृदा वेनन्तः अभि अचक्षत त्वा
हिरण्य-पक्षं वरुणस्य दूतं यमस्य योनौ शकुनं भुरण्युम् ॥ ६ ॥

हे वेना; उंच आकाशांत भरार्‍या मारणारा उत्कृष्ट पंखांचा गरुड पक्षीच की काय अशा भावनेने लोकांना तूं खरोखर मनापासून प्रिय वाटतोस, आणि अशा वृत्तीनेच ते तुजकडे पाहतात. अथवा सुवर्णाचे पंख असलेला वरुणाचा दूतच तूं आहेस किंवा यमाच्या नगरीकडे भर्रदिशी उडून जाणारा पक्षीच आहेस असे समजून ते तुझ्याकडे कौतुकाने पाहतात ६.


ऊ॒र्ध्वो ग॑न्ध॒र्वो अधि॒ नाके॑ अस्थात् प्र॒त्यङ् चि॒त्रा बिभ्र॑द॒स्यायु॑धानि ।
वसा॑नो॒ अत्कं॑ सुर॒भिं दृ॒शे कं स्व१र्ण नाम॑ जनत प्रि॒याणि॑ ॥ ७ ॥

ऊर्ध्वः गन्धर्वः अधि नाके अस्थात् प्रत्यङ् चित्रा बिभ्रत् अस्य आयुधानि
वसानः अत्कं सु-रभिं दृशे कं स्वः ण नाम जनत प्रियाणि ॥ ७ ॥

पहा तो गंधर्व आतां आकाशाच्या उच्च भागी सज्ज हो‍ऊन उभा राहिला, त्याने आपली अद्‍भुत शस्त्रास्त्रे सुद्धां पुढे सरसावली, आपले वैभव दाखविण्यासाठी त्याने आपले झगझगीत कवच चढविले आणि प्रकाशाप्रमाणे आपलेंहि नांव लोकप्रिय केले ७.


द्र॒प्सः स॑मु॒द्रं अ॒भि यज् जिगा॑ति॒ पश्य॒न् गृध्र॑स्य॒ चक्ष॑सा॒ विध॑र्मन् ।
भा॒नुः शु॒क्रेण॑ शो॒चिषा॑ चका॒नस्तृ॒तीये॑ चक्रे॒ रज॑सि प्रि॒याणि॑ ॥ ८ ॥

द्रप्सः समुद्रं अभि यत् जिगाति पश्यन् गृध्रस्य चक्षसा वि-धमर्न्
भानुः शुक्रेण शोचिषा चकानः तृतीये चक्रे रजसि प्रियाणि ॥ ८ ॥

जेव्हां एखाद्या तेजस्वी तो बिन्दूप्रमाणे अल्प शरीरी वेन समुद्राकडे जातो आणि गृध्राप्रमाणे तीक्ष्ण आतुरतेच्या दृष्टीने नानाविध धर्मांच्या ह्या जगामध्ये चोहोंकडे अवलोकन करितो, तेव्हां सूर्य हा आपल्या शुभ्रतेजस्क दीप्तीने तिसर्‍या रजोलोकांमध्ये प्रकाशित हो‍ऊन मानवांना प्रिय अशीच कृत्ये करतो. ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२४ (अग्नि-वरुण संवादसूक्त)

ऋषी - १, ५-९ अग्नि, वरुण आणि सोम; अवशिष्ट - अग्नि
देवता - १ - अग्नि; २-४ - अग्नि-आत्मन्; ६ - सोम; ९ - इंद्र; अवशिष्ट - वरुण :
छंद - ७ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


इ॒मं नो॑ अग्न॒ उप॑ य॒ज्ञं एहि॒ पञ्च॑यामं त्रि॒वृतं॑ स॒प्तत॑न्तुम् ।
असो॑ हव्य॒वाळ् उ॒त नः॑ पुरो॒गा ज्योग् ए॒व दी॒र्घं तम॒ आश॑यिष्ठाः ॥ १॥

इमं नः अग्ने उप यजं आ इहि पच-यामं त्रि-वृतं सप्त-तन्तुं
असः हव्य-वाट् उत नः पुरः-गाः ज्योक् एव दीर्घं तमः आ अशयिष्ठाः ॥ १ ॥

हे अग्निदेवा, ह्या आमच्या यज्ञासन्निध आगमन कर. हा यज्ञ असा आहे की त्याचे पांच यम म्हणजे नियंते (ऋत्विज), तीन वृतें म्हणजे तीन वेढे (किंवा सवने) आणि सात तंतू अथवा प्रकार आहेत. तर तूंच आमचे हविर्भाग पोहोंचविणारा प्रतिनिधि आणि तूंच पुरोहित हो; कारण ह्या अपरंपार निबिड अंधकाराला खाली दडपून तूंच त्याच्यावर शयन केले आहेस १.


अदे॑वाद्दे॒वः प्र॒चता॒ गुहा॒ यन् प्र॒पश्य॑मानो अमृत॒त्वं ए॑मि ।
शि॒वं यत् सन्तं॒ अशि॑वो॒ जहा॑मि॒ स्वात् स॒ख्यादर॑णीं॒ नाभिं॑ एमि ॥ २ ॥

अदेवात् देवः प्र-चता गुहा यन् प्र-पश्यमानः अमृत-त्वं एमि
शि वं यत् सन्तं अशिवः जहामि स्वात् सख्यात् अरणीं नाभिं एमि ॥ २ ॥

सृष्टीतील कोणतेहि गूढ उकलूं लागले म्हणजे देव नाही असे म्हणणार्‍याकडूनहि (नास्तिक वाद्याकडूनहि) देव असल्याची कबुली पुढे येतेच. हा अनुभव मी पाहिला म्हणूनच मी अमृतत्वाला पोहोंचणार. पण मी स्वत: जर अमंगल राहिलो (अमंगल आचरण केले) तर मंगलरूप जो ईश्वर त्याला मी सोडून दिले असें होईल आणि त्याच्या मित्रत्वापासून ढळून मी भलत्याच दिशेला जाईन २.


पश्य॑न्न् अ॒न्यस्या॒ अति॑थिं व॒याया॑ ऋ॒तस्य॒ धाम॒ वि मि॑मे पु॒रूणि॑ ।
शंसा॑मि पि॒त्रे असु॑राय॒ शेवं॑ अयज्ञि॒याद्य॒ज्ञियं॑ भा॒गं ए॑मि ॥ ३ ॥

पश्यन् अन्यस्याः अतिथिं वयायाः ऋतस्य धाम वि मिमे पुरूणि
शंसामि पित्रे असुराय शेवं अयजियात् यजियं भागं एमि ॥ ३ ॥

संचार करणार्‍या ह्या दुसरीचा (म्हणजे ग्रहमालेचा) अतिथि (कोण आहे ते) ओळखून त्यांच्या अबाधित धर्माचे निरनिराळे प्रकार मी अनुभवून पाहिले; तथापि जगत्‌पिता जो ईश्वर त्याच्यापाशी मी सुखासमाधानाची याचना केली, तेव्हांच आचार धर्मातील अयज्ञिय म्हणजे त्याज्य भाग टाकून देऊन योग्य भाग कोणता ते मला निश्चित करता आले ३.


ब॒ह्वीः समा॑ अकरं अ॒न्तर॑स्मि॒न्न् इन्द्रं॑ वृणा॒नः पि॒तरं॑ जहामि ।
अ॒ग्निः सोमो॒ वरु॑ण॒स्ते च्य॑वन्ते प॒र्याव॑र्द्रा॒ष्ट्रं तद॑वाम्या॒यन् ॥ ४ ॥

बह्वीः समाः अकरं अन्तः अस्मिन् इन्द्रं वृणानः पितरं जहामि
अग्निः सोमः वरुणः ते च्यवन्ते परि-आवर्त राष्ट्रं तत् अवामि आयन् ॥ ४ ॥

अशा स्थितीमध्ये मी पुष्कळ वर्षें व्यतीत केली; तथापि इंद्राचाच मी स्वीकार करतो, मग त्यासाठी पित्यालाहि (सोडावे लागले तरी) सोडून देतो. अशा अवस्थेत अग्नि, सोम, वरुण ही इतर नांवे सुद्धा अंत:करणांतून हलतात. शेवटी राष्ट्र देखील बदलते ही गोष्ट मला आतां पटली ४.


निर्मा॑या उ॒ त्ये असु॑रा अभूव॒न् त्वं च॑ मा वरुण का॒मया॑से ।
ऋ॒तेन॑ राज॒न्न् अनृ॑तं विवि॒ञ्चन् मम॑ रा॒ष्ट्रस्याधि॑पत्यं॒ एहि॑ ॥ ५ ॥

निः-मायाः ओं इति त्ये असुराः अभूवन् त्वं च मा वरुण कामयासे
ऋतेन राजन् अनृतं वि-विचन् मम राष्ट्रस्य अधि-पत्यं आ इहि ॥ ५ ॥

काय ? दैवी सामर्थ्यसंपन्न देवाची अद्‍भुत अतर्क्य शक्ति पार नाहीशी झाली काय ? हे वरुणा तुझी मजवर खरोखरच ममता असेल, तर शाश्वत सत्यापासून असत्य (म्हणजे अधर्म) निराळे निवडून काढ आणि माझ्या राष्ट्रावर तुझेंच अधिपत्य असूं दे ५.


इ॒दं स्वरि॒दं इदा॑स वा॒मं अ॒यं प्र॑का॒श उ॒र्व् अ१न्तरि॑क्षम् ।
हना॑व वृ॒त्रं नि॒रेहि॑ सोम ह॒विष् ट्वा॒ सन्तं॑ ह॒विषा॑ यजाम ॥ ६ ॥

इदं स्वरिदं इदास वामं अयं प्रकाश उर्व१न्तरिक्षम् ।
हनाव वृत्रं निरेहि सोम हविष्ट्वा॒ सन्तं ह॒विषा यजाम ॥ ६ ॥

हे ते दिव्य तेज, हेच ते उत्कृष्ट धेय, हाच तो प्रकाश, हेच ते विस्तीर्ण अंतरिक्ष; तर आतां वेळ कां ? आपण उभयता (देव आणि भक्त) मिळून वृत्राचा वध करूं. हे सोमराजा, इकडे बाहेर ये; तूं स्वत:च देवाचा हविर्भाग आहेस; पण तुजलाच आतां आम्ही हवि अर्पण करून तुझे यजन करूं ६.


क॒विः क॑वि॒त्वा दि॒वि रू॒पं आस॑ज॒दप्र॑भूती॒ वरु॑णो॒ निर॒पः सृ॑जत् ।
क्षेमं॑ कृण्वा॒ना जन॑यो॒ न सिन्ध॑व॒स्ता अ॑स्य॒ वर्णं॒ शुच॑यो भरिभ्रति ॥ ७ ॥

कविः कवित्वा दिवि रूपं आसजदप्रभूती वरुणो निरपः सृजत् ।
क्षेमं कृण्वाना जनयो न सिन्धवस्ता अस्य वर्णं शुचयो भरिभ्रति ॥ ७ ॥

प्रतिभावान्‍त कवीने आपल्या कवित्वशक्तीने द्युलोकांतील जे अलौकिक रूप ते काव्यांत रेखाटले; त्यामुळे अतिशय संतुष्ट हो‍ऊन वरुणाने दिव्योदकांना सहजच भूलोकी ओतून दिले तेव्हां मातेप्रमाणे जगाचे कल्याण करणार्‍या ज्या पवित्र नद्या त्यांनी ह्या सोमाचा निर्मळ वर्ण धारण केला ७.


ता अ॑स्य॒ ज्येष्ठं॑ इन्द्रि॒यं स॑चन्ते॒ ता ईं॒ आ क्षे॑ति स्व॒धया॒ मद॑न्तीः ।
ता ईं॒ विशो॒ न राजा॑नं वृणा॒ना बी॑भ॒त्सुवो॒ अप॑ वृ॒त्राद॑तिष्ठन् ॥ ८ ॥

ता अस्य ज्येष्ठं इन्द्रियं सचन्ते ता ईं आ क्षेति स्वधया मदन्तीः ।
ता ईं विशो न राजानं वृणाना बीभत्सुवो अप वृत्रादतिष्ठन् ॥ ८ ॥

अशा त्या आपोदेवी इंद्राचे जे परमश्रेष्ठ सामर्थ्य त्याची उपासना करूं लागल्या, तेव्हां आपल्याच धोरणांत (नादात) तल्लीन असणार्‍या आपोदेवींच्या समूहांत तो वास्तव्य करूं लागला; आणि मानवी प्रजाजन जसे राजाला पसंत करतात त्याप्रमाणे आपोदेवींनी इंद्राला पसंत केले कारण त्यांना वृत्राचा तिटकारा आलाच होता आणि त्याच्यापासून दूरच राहिल्या होत्या ८.


बी॒भ॒त्सूनां॑ स॒युजं॑ हं॒सं आ॑हुर॒पां दि॒व्यानां॑ स॒ख्ये चर॑न्तम् ।
अ॒नु॒ष्टुभं॒ अनु॑ चर्चू॒र्यमा॑णं॒ इन्द्रं॒ नि चि॑क्युः क॒वयो॑ मनी॒षा ॥ ९ ॥

बीभत्सूनां सयुजं हंसं आहुरपां दिव्यानां सख्ये चरन्तम् ।
अनुष्टुभं अनु चर्चूर्यमाणं इन्द्रं नि चिक्युः कवयो मनीषा ॥ ९ ॥

वृत्राला पाहून भेदरलेल्या नद्यांना निर्भय करण्यासाठी त्यांच्याबरोबर राहणारा आणि दिव्य नद्यांच्या प्रेमामध्ये विहार करणारा जो इंद्र त्याला भक्तजन हंस म्हणू लागले आणि अनुष्टुभ्‌वृत्तांत ग्रथित केलेल्या काव्यांच्या रसास्वादाने वारंवार डोलणार्‍या इंद्राला ज्ञानी कवि आपल्या अंत:स्फूर्तीच्या प्रभावाने उत्तम रीतीने ओळखूं लागले ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२५ (वाच् अम्भृणी देवीसूक्त)

ऋषी - वाच् अम्भृणी : देवता - आत्मन् : छंद - २ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


अ॒हं रु॒द्रेभि॒र्वसु॑भिश्चराम्य॒हं आ॑दि॒त्यैरु॒त वि॒श्वदे॑वैः ।
अ॒हं मि॒त्रावरु॑णो॒भा बि॑भर्म्य॒हं इ॑न्द्रा॒ग्नी अ॒हं अ॒श्विनो॒भा ॥ १॥

अहं रुद्रेभिः वसु-भिः चरामि अहं आदित्यैः उत विश्व-देवैः
अहं मित्रावरुणा उभा बिभर्मि अहं इन्द्राग्नी इति अहं अश्विना उभा ॥ १ ॥

मी (आदिशक्ति) रुद्रांबरोबर, दिव्य वसूंच्या बरोबर नित्य वसत असते, तशीच आदित्य आणि विश्वेदेव ह्यांच्या बरोबरहि मी वसत असते. मी मित्र आणि वरुण अशा दोघांच्याहि स्वरूपांना धारण करते, त्याचप्रमाणे इंद्राग्नि आणि उभयतां अश्वीदेव हे सर्व मीच बनले आहे १.


अ॒हं सोमं॑ आह॒नसं॑ बिभर्म्य॒हं त्वष्टा॑रं उ॒त पू॒षणं॒ भग॑म् ।
अ॒हं द॑धामि॒ द्रवि॑णं ह॒विष्म॑ते सुप्रा॒व्येख्प् यज॑मानाय सुन्व॒ते ॥ २ ॥

अहं सोमं आहनसं बिभर्मि अहं त्वष्टारं उत पूषणं भगं
अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्र-अव्ये यजमानाय सुन्वते ॥ २ ॥

आवेशाचा दणदणाट उडवून देणारा जो सोम त्याला मीच धारण करते; तसेंच त्वष्टा पूषा आणि भाग्याधिपति भग ह्यांनाहि धारण करते. हविर्भाग अर्पण करणारा, भक्तीने उत्सुक, आणि सोमरस पिळून समर्पण करणारा जो यज्ञकर्ता यजमान त्याला इच्छित असेल ते धन मी त्याला अर्पण करते २.


अ॒हं राष्ट्री॑ सं॒गम॑नी॒ वसू॑नां चिकि॒तुषी॑ प्रथ॒मा य॒ज्ञिया॑नाम् ।
तां मा॑ दे॒वा व्यदधुः पुरु॒त्रा भूरि॑ष्ठात्रां॒ भूर्या॑वे॒शय॑न्तीम् ॥ ३ ॥

अहं राष्ट्री सम्-गमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यजियानां
तां मा देवाः वि अदधुः पुरु-त्रा भूरि-स्थात्रां भूरि आवेशयन्तीम् ॥ ३ ॥

जगताची जी स्वामिनी ती मी; दिव्यनिधींचे जे भाण्डार ते मी. मी ज्ञानरूप आहेच; पण यज्ञयोग्य जे दिव्यविबुध, त्यांच्यामध्ये आद्य म्हणजे अगदी पहिली मीच आहे, म्हणूनच त्या देवांनी मला निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या ठिकठिकाणी ठेविले [निरनिराळ्या नांवांनी वर्णन केले] कारण मी असंख्य ठिकाणी वास करणारी, आणि असंख्य म्हणजे सर्व वस्तुमात्रामध्ये भरून राहिले आहे ३.


मया॒ सो अन्नं॑ अत्ति॒ यो वि॒पश्य॑ति॒ यः प्राणि॑ति॒ य ईं॑ शृ॒णोत्यु॒क्तम् ।
अ॒म॒न्तवो॒ मां त उप॑ क्षियन्ति श्रु॒धि श्रु॑त श्रद्धि॒वं ते॑ वदामि ॥ ४ ॥

मया सः अन्नं अत्ति यः वि-पश्यति यः प्राणिति यः ईं शृणोति उक्तं
अमन्तवः मां ते उप क्षियन्ति श्रुधि श्रुत श्रद्धि-वं ते वदां इ ॥ ४ ॥

जो प्राणी अन्न खातो, जो पाहतो, जो श्वासोच्छवास करतो किंवा बोललेले ऐकतो, तो ह्या सर्व क्रिया माझ्या शक्तीनेच करतो; पण ते त्यांना कळत नाही की ते सर्व माझ्याच ठिकाणी राहतात. तर बुद्धिमान्‌ मनुष्या, हे ऐकून ठेव. तुझा विश्वास बसेल असेच मी तुला सांगते ४.


अ॒हं ए॒व स्व॒यं इ॒दं व॑दामि॒ जुष्टं॑ दे॒वेभि॑रु॒त मानु॑षेभिः ।
यं का॒मये॒ तं-तं॑ उ॒ग्रं कृ॑णोमि॒ तं ब्र॒ह्माणं॒ तं ऋषिं॒ तं सु॑मे॒धाम् ॥ ५ ॥

अहं एव स्वयं इदं वदामि जुष्टं देवेभिः उत मानुषेभिः
यं कामये तम्-तं उग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तं ऋषिं तं सु-मेधाम् ॥ ५ ॥

जे देवांना आणि मनुष्यांनाहि मान्य झाले पाहिजे, तेच आतां मी स्वत: सांगते. ते हे की सत्कर्माचरणामुळे ज्याच्याकडे माझे मन ओढवते, तो शत्रूंना भयंकर दिसेल असे मी करते, त्यला ब्रह्मवेताहि करते, त्याला प्रज्ञावान्‌ ऋषि देखील करून सोडतें ५.


अ॒हं रु॒द्राय॒ धनु॒रा त॑नोमि ब्रह्म॒द्विषे॒ शर॑वे॒ हन्त॒वा उ॑ ।
अ॒हं जना॑य स॒मदं॑ कृणोम्य॒हं द्यावा॑पृथि॒वी आ वि॑वेश ॥ ६ ॥

अहं रुद्राय धनुः आ तनोमि ब्रह्म-द्विषे शरवे हन्तवै ओं इति
अहं जनाय स-मदं कृणोमि अहं द्यावापृथिवी इति आ विवेश ॥ ६ ॥

वेदाचा (ज्ञानाचा) द्वेष करणारा जो दुष्ट शत्रु त्याला ठार मारण्यासाठी रुद्राचे धनुष्य मीच सज्ज करते. जनतेच्या हितासाठी युद्धाची धुमाळीहि मीच उडवून देते; याप्रमाणे द्यावापृथिवीमध्ये मी सर्वत्र भरून राहिलेली आहे ६.


अ॒हं सु॑वे पि॒तरं॑ अस्य मू॒र्धन् मम॒ योनि॑र॒प्स्व् अ१न्तः स॑मु॒द्रे ।
ततो॒ वि ति॑ष्ठे॒ भुव॒नानु॒ विश्वो॒तामूं द्यां व॒र्ष्मणोप॑ स्पृशामि ॥ ७ ॥

अहं सुवे पितरं अस्य मूर्धन् मम योनिः अप्-सु अन्तरिति समुद्रे
ततः वि तिष्ठे भुवना अनु विश्वा उत अमूं द्यां वर्ष्मणा उप स्पृशामि ॥ ७ ॥

ह्या रजोलोकाच्या आणि मृत्यु लोकाच्या डोक्यावर मी (द्यौ) पित्याला उत्पन्न केले. पण माझे स्वत:चे मूलस्थान (आदिकारणरूप) समुद्राच्या आंत आहे. तेथून मी सर्व भुवनांना व्यापून राहिलेली असून माझ्या विस्ताराने मी द्युलोकाच्या सीमेलाहि सहज स्पर्श केला आहे ७.


अ॒हं ए॒व वात॑ इव॒ प्र वा॑म्या॒रभ॑माणा॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ।
प॒रो दि॒वा प॒र ए॒ना पृ॑थि॒व्यैताव॑ती महि॒ना सं ब॑भूव ॥ ८ ॥

अहं एव वातः-इव प्र वामि आरभमाणा भुवनानि विश्वा
परः दिवा परः एना पृथिव्या एतावती महिना सं बभूव ॥ ८ ॥

वायूप्रमाणे सर्वत्र संचार करणारी फक्त मीच आहे; कारण मीच ह्या सर्व भुवनांना उत्पन्न केले. म्हणूनच ह्या द्युलोकाच्याहि पलीकडे, मग ह्या पृथ्वीच्या पलीकडे सुद्धां (-पण हे सांगावयास नकोच की) मी आपल्या अशा प्रकारच्या म्हणजे अमर्याद विस्ताराने सर्व कांही व्यापून राहिलेली आहे ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२६ (रोगनाशन पालुपदसूक्त)

ऋषी - शैलूषि कुल्मलबर्हिष अथवा अहोमुच् वामदेव्य - चेवता - विश्वेदेव : छंद - १-७ - उपरिष्टाद बृहती; ८ - त्रिष्टुभ्


न तं अंहो॒ न दु॑रि॒तं देवा॑सो अष्ट॒ मर्त्य॑म् ।
स॒जोष॑सो॒ यं अ॑र्य॒मा मि॒त्रो नय॑न्ति॒ वरु॑णो॒ अति॒ द्विषः॑ ॥ १॥

न तं अंहः न दुः-इतं देवासः अष्ट मर्त्यं
स-जोषसः यं अर्यमा मित्रः नयन्ति वरुणः अति द्विषः ॥ १ ॥

भक्तवत्सल असे अर्यमा, मित्र आणि वरुण हे देव द्वेष्ट्यांचा नाश करून ज्याला द्वेषांपासून पार पलीकडे नेतात, त्या भक्ताला पातक, संकट आणि आपत्ति ह्यांपकी कशाचाहि स्पर्श होत नाही १.


तद्धि व॒यं वृ॑णी॒महे॒ वरु॑ण॒ मित्रार्य॑मन् ।
येना॒ निरंह॑सो यू॒यं पा॒थ ने॒था च॒ मर्त्यं॒ अति॒ द्विषः॑ ॥ २ ॥

तत् हि वयं वृणीमहे वरुण मित्र अर्यमन्
येन निः अंहसः यूयं पाथ नेथ च मर्त्यं अति द्विषः ॥ २ ॥

म्हणून हे मित्रा, हे वरुणा, हे अर्यमन्‌, आम्ही तुम्हांपाशी हात जोडून हे मागतो की ज्याच्या योगाने तुम्ही भक्ताला पातकाचा स्पर्श हो‍ऊं न देतां त्याचे रक्षण करिता आणि द्वेष्ट्यांच्या समूहांतून त्याला पार नेतां -ते वरदान द्या २.


ते नू॒नं नो॑ऽ॒यं ऊ॒तये॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
नयि॑ष्ठा उ नो ने॒षणि॒ पर्षि॑ष्ठा उ नः प॒र्षण्यति॒ द्विषः॑ ॥ ३ ॥

ते नूनं नः अयं ऊतये वरुणः मित्रः अर्यमा
नयिष्ठाः ओं इति नः नेषणि पर्षिष्ठाः ओं इति नः पर्षणि अति द्विषः ॥ ३ ॥

ते तुम्ही, म्हणजे हा वरुण, मित्र आणि अर्यमा - आमचे रक्षण करा. नेत्याच्या कार्यात तुम्ही अत्युत्कृष्ट नेते आहांत आणि द्वेष्ट्यांच्या समूहांतून आम्हाला पार पाडण्याच्या कामांतहि उत्तम मार्गदर्शक आहांत ३.


यू॒यं विश्वं॒ परि॑ पाथ॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
यु॒ष्माकं॒ शर्म॑णि प्रि॒ये स्याम॑ सुप्रणीत॒योऽ॑ति॒ द्विषः॑ ॥ ४ ॥

यूयं विश्वं परि पाथ वरुणः मित्रः अर्यमा
युष्माकं शर्मणि प्र् इये स्याम सु-प्रनीतयः अति द्विषः ॥ ४ ॥

वरुण, मित्र, अर्यमा असे तुम्ही विभूति ह्या जगताचे सर्व प्रकारे परिपालन करतां, तर सर्वांना प्रिय अशा तुमच्या सुखाश्रयाला आम्ही राहू असे करा. हे सन्मार्गदर्शकांनो तुम्ही - द्वेष्ट्यांच्या समूहांतून भक्तांना पार नेतां ४.


आ॒दि॒त्यासो॒ अति॒ स्रिधो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
उ॒ग्रं म॒रुद्‌भी॑ रु॒द्रं हु॑वे॒मेन्द्रं॑ अ॒ग्निं स्व॒स्तयेऽ॑ति॒ द्विषः॑ ॥ ५ ॥

आदित्यासः अति स्रिधः वरुणः मित्रः अर्यमा
उग्रं मरुत्-भिः रुद्रं हुवेम इन्द्रं अग्निं स्वस्तये अति द्विषः ॥ ५ ॥

ज्यांना कसलाहि उपद्रव हो‍ऊं शकत नाही असे आदित्य म्हणजे वरुण, मित्र आणि अर्यमा; त्याचप्रमाणे मरुत्‌ परिवेष्टित असा भीषण रूप जो रुद्र, तसाच इंद्र तसाच अग्निहि - ह्यांचा धांवा आमचे कल्याण व्हावे म्हणून, आणि द्वेष्ट्यांच्या समूहांतून सुखरूप पार पडावे म्हणून आम्ही करीत असतो ५.


नेता॑र ऊ॒ षु ण॑स्ति॒रो वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
अति॒ विश्वा॑नि दुरि॒ता राजा॑नश्चर्षणी॒नां अति॒ द्विषः॑ ॥ ६ ॥

नेतारः ओं इति सु नः तिरः वरुणः मित्रः अर्यमा
अति विश्वानि दुः-इता राजानः चर्षणीनां अति द्विषः ॥ ६ ॥

आम्हाला पार नेणारे कोण म्हणाल, तर वरुण, मित्र, अर्यमा हे जे प्राणिमात्रांचे राजे आहेत, ते आम्हांला सर्व संकटांतून आणि आमच्या द्वेष्ट्यांची फळी फोडून त्यांतून पार नेतीलच ६.


शु॒नं अ॒स्मभ्यं॑ ऊ॒तये॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
शर्म॑ यच्छन्तु स॒प्रथ॑ आदि॒त्यासो॒ यदीम॑हे॒ अति॒ द्विषः॑ ॥ ७ ॥

शुनं अस्मभ्यं ऊतये वरुणः मित्रः अर्यमा
शर्म यच्चन्तु स-प्रथः आदित्यासः यत् ईमहे अति द्विषः ॥ ७ ॥

आमच्या रक्षणासाठी वरुण, मित्र, अर्यमा हे आम्हांला क्षेमकर असोत. ते आदित्य आम्हांला परिपूर्ण सुखाचा आश्रय देवोत; कारण आमचे मागणे हेच की आम्ही द्वेष्ट्याचा नाश करून त्यांतून पार व्हावे ७.


यथा॑ ह॒ त्यद्व॑सवो गौ॒र्यं चित् प॒दि षि॒तां अमु॑ञ्चता यजत्राः ।
ए॒वो ष्व् अ१स्मन् मु॑ञ्चता॒ व्यंहः॒ प्र ता॑र्यग्ने प्रत॒रं न॒ आयुः॑ ॥ ८ ॥

यथा ह त्यत् वसवः गौर्यं चित् पदि सितां अमुचत यजत्राः
एवो इति सु अस्मत् मुचत वि अंहः प्र तारि अग्ने प्र-तरं नः आयुः ॥ ८ ॥

दिव्यनिधींनो, ज्याप्रमाणे पाय बांधलेल्या धेनूला पूर्वी तुम्ही मुक्त केले, त्याप्रमाणे हे पूज्य विभूतींनो, पातकापासून आम्हांला पूर्णपणे मुक्त करा; आणि त्यासाठी हे अग्निदेवा, आमचे आयुष्य तू अतिशय वृध्विंगत कर ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२७ (रात्रिसूक्त)

ऋषी - कुशिक सौरभ अथवा रात्रि भारद्वाज : देवता - रात्रि : छण्द - गायत्री


रात्री॒ व्यख्यदाय॒ती पु॑रु॒त्रा दे॒व्य१क्षभिः॑ ।
विश्वा॒ अधि॒ श्रियो॑ऽधित ॥ १॥

रात्री वि अख्यत् आयती पुरु-त्रा देवी अक्ष-भिः
विश्वाः अधि श्रियः अधि त ॥ १ ॥

ही पहा देवी रात्र येऊन ठेपली आणि येतां येतां ती आपल्या नेत्रांनी सर्वत्र निरखून पहात आहे आणि ती सर्व प्रकारच्या सौंदर्याने नटली आहे १.


ओर्व् अप्रा॒ अम॑र्त्या नि॒वतो॑ दे॒व्यु१द्वतः॑ ।
ज्योति॑षा बाधते॒ तमः॑ ॥ २ ॥

आ उरु अप्राः अमर्त्याः नि-वतः देवी उत्-वतः
ज्योतिषा बाधते तमः ॥ २ ॥

त्या अमरदेवीने विस्तृत, उंचसखल, असे सर्व भाग पार व्यापून टाकले आणि आपल्या नक्षत्रांच्या तेजाने अंधकाराचा विध्वंस केला २.


निरु॒ स्वसा॑रं अस्कृतो॒षसं॑ दे॒व्याय॒ती ।
अपेदु॑ हासते॒ तमः॑ ॥ ३ ॥

निः ओं इति स्वसारं अकृत उषसं देवी आयती
अप इत् ओं इति हासते तमः ॥ ३ ॥

रात्ररूपदेवीने येऊन केले काय तर आपली भगिनी जी उषा तिच्यासाठी मार्ग मोकळा केला; हे होत आहे तोच अंधकाराने तेथून पाय काढला ३.


सा नो॑ अ॒द्य यस्या॑ व॒यं नि ते॒ याम॒न्न्न् अवि॑क्ष्महि ।
वृ॒क्षे न व॑स॒तिं वयः॑ ॥ ४ ॥

सा नः अद्य यस्याः वयं नि ते यामन् अविक्ष्महि
वृक्षे न व्चसतिं वयः ॥ ४ ॥

ती रात्रदेवी आज आमची आहे, आणि पक्षी जसे वृक्षावरील आपल्या घरट्यांत विश्रांतीला जातात त्याप्रमाणे हे रात्रि, तुझ्या सर्व प्रहरांत आम्ही प्रवेश केला आहे ४.


नि ग्रामा॑सो अविक्षत॒ नि प॒द्वन्तो॒ नि प॒क्षिणः॑ ।
नि श्ये॒नास॑श्चिद॒र्थिनः॑ ॥ ५ ॥

नि ग्रामासः अविक्षत नि पत्-वन्तः नि पक्षिणः
नि श्येनासः चित् अर्थिनः ॥ ५ ॥

ह्या रात्रीच्या वेळी ग्रामवासी, प्रवासी, तसेंच पशुपक्षी, आणि भक्ष्य शोधण्यास फिरणारे श्येन पक्षी हे सुद्धां स्वस्थ निद्रासुख घेतात ५.


या॒वया॑ वृ॒क्य१ं वृकं॑ य॒वय॑ स्ते॒नं ऊ॑र्म्ये ।
अथा॑ नः सु॒तरा॑ भव ॥ ६ ॥

यवय वृक्यं वृकं यवय स्तेनं ऊर्म्ये
अथ नः सु-तरा भव ॥ ६ ॥

तर हे रात्रि, तूं हिंस्र पशु आणि लांडगे ह्यांना हांकून दे; चोरांनाहि पळवून लाव आणि आम्हांला तारक हो ६.


उप॑ मा॒ पेपि॑श॒त् तमः॑ कृ॒ष्णं व्यक्तं अस्थित ।
उष॑ ऋ॒णेव॑ यातय ॥ ७ ॥

उप मा पेपिशत् तमः कृष्णं वि-अक्तं अस्थित
उषः ऋणा-इव यातय ॥ ७ ॥

सर्व वस्तूंना चिकटणारा काळाकुट्ट अंधकार चोहोंकडे धडकून पसरला आहे; तर आपले कर्ज पार नाहींसे करून टाकावे त्याप्रमाणे हे उषे, त्याला नष्ट कर ७.


उप॑ ते॒ गा इ॒वाक॑रं वृणी॒ष्व दु॑हितर्दिवः ।
रात्रि॒ स्तोमं॒ न जि॒ग्युषे॑ ॥ ८ ॥

उप ते गाः-इव अकरं वृणीष्व दुहितः दिवः
रात्रि स्तोमं न जिग्युषे ॥ ८ ॥

धेनूला जवळ करावी त्याप्रमाणे तुजला मी जवळ केली आहे. हे द्युकन्यके, रात्रि (युद्धामध्ये) मी विजय मिळविण्याची इच्छा करीत आहे, तर माझा स्तोत्रकलाप मान्य करून घे. ८


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२८ (विश्वेदेवसूक्त, समावर्तन मंत्र)

ऋषी - विहव्य अंगिरस : देवता - विश्वेदेव : छंद - ९ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


ममा॑ग्ने॒ वर्चो॑ विह॒वेष्व् अ॑स्तु व॒यं त्वेन्धा॑नास्त॒न्वं पुषेम ।
मह्यं॑ नमन्तां प्र॒दिश॒श्चत॑स्र॒स्त्वयाध्य॑क्षेण॒ पृत॑ना जयेम ॥ १॥

मम अग्ने वर्चः वि-हवेषु अस्तु वयं त्वा इन्धानाः तन्वं पुषेम
मह्यं नमन्तां प्र-दिशः चतस्रः त्वया अधि-अक्षेण पृतनाः जयेम ॥ १ ॥

हे अग्निदेवा, संग्रामध्ये माझ्या पराक्रमाचे तेज उत्तम रीतीने चमकेल असे कर. तुजला प्रज्वलित करून आम्ही आपला उत्कर्ष करून घेऊं म्हणतो. तर चारहि दिशांकडील प्रदेश माझे अंकित व्हावे आणि तुझ्या धुरिणत्वाखाली शत्रुसैन्याचा आमी अगदी फडशा उडवून द्यावा असे होवो १.


मम॑ दे॒वा वि॑ह॒वे स॑न्तु॒ सर्व॒ इन्द्र॑वन्तो म॒रुतो॒ विष्णु॑र॒ग्निः ।
ममा॒न्तरि॑क्षं उ॒रुलो॑कं अस्तु॒ मह्यं॒ वातः॑ पवतां॒ कामे॑ अ॒स्मिन् ॥ २ ॥

मम देवाः वि-हवे सन्तु सर्वे इन्द्र-वन्तः मरुतः विष्णुः अग्निः
मम अन्तरिक्षं उरु-लोकं अस्तु मह्यं वातः पवतां कामे अस्मिन् ॥ २ ॥

ह्या संग्रामामध्ये सकल दिव्यविभूति - मरुत्‌, विष्णु, अग्नि हे इंद्राबरोबर येऊन माझे सहाय करोत. हे अंतरिक्ष देखील मजसाठी आपला प्रदेश अगदी मोकळा ठेवो. त्यांत वाहणारा वायु देखील माझ्या मनोरथसिद्धिसाठी पवित्रपणाने वाहत राहो २.


मयि॑ दे॒वा द्रवि॑णं॒ आ य॑जन्तां॒ मय्या॒शीर॑स्तु॒ मयि॑ दे॒वहू॑तिः ।
दैव्या॒ होता॑रो वनुषन्त॒ पूर्वेऽ॑रिष्टाः स्याम त॒न्वा सु॒वीराः॑ ॥ ३ ॥

मयि देवाः द्रविणं आ यजन्तां मयि आशीः अस्तु मयि देव-हूतिः
दैव्याः होतारः वनुषन्त पूर्वे अरिष्टाः स्याम तन्वा सु-वीराः ॥ ३ ॥

सकल दिव्यविबुध हे प्रसाद म्हणून मला स्थिरसंपत्ति अर्पण करोत, त्यांचे आशीर्वाद माझ्या मस्तकावर असोत, त्यांच्या आगमनाचे फलहि माझ्या ठिकाणी अनुभवास येवो. प्राचीन जे यज्ञ संपादक, ते माझा हेतु सिद्धीस नेवोत आणि आम्हां स्वत:वर कोठूनहि कसलाहि आघात न होवो; आणि आम्हांला शूर पुत्र - शूर सैनिक प्राप्त होवोत ३.


मह्यं॑ यजन्तु॒ मम॒ यानि॑ ह॒व्याकू॑तिः स॒त्या मन॑सो मे अस्तु ।
एनो॒ मा नि गां॑ कत॒मच् च॒नाहं विश्वे॑ देवासो॒ अधि॑ वोचता नः ॥ ४ ॥

मह्यं यजन्तु मम यानि हव्या आकूतिः सत्या मनसः मे अस्तु
एनः मा नि गां कतमत् चन अहं विश्वे देवासः अधि वोचत नः ॥ ४ ॥

जे जे हव्य मजजवळ आहे त्याचेच हवन मजसाठी होवो. माझ्या मनांतील संकल्प सत्य होवोत. कसलेहि पातक, कसलाहि दोष मजकडे न येवो आणि हे दिव्यजनांनो तुम्ही माझाच पक्ष घेऊन माझ्या बाजूने बोला ४.


देवीः॑ षळ् उर्वीरु॒रु नः॑ कृणोत॒ विश्वे॑ देवास इ॒ह वी॑रयध्वम् ।
मा हा॑स्महि प्र॒जया॒ मा त॒नूभि॒र्मा र॑धाम द्विष॒ते सो॑म राजन् ॥ ५ ॥

देवीः षट् उर्वीः उरु नः कृणोत विश्वे देवासः इह वीरयध्वं
मा हास्महि प्र-जया मा तनूभिः मा रधाम द्विषते सोम राजन् ॥ ५ ॥

विस्तीर्ण असे सहा दिव्य लोक आमच्यासाठी आपले प्रदेश विस्तृत करोत. आणि हे दिव्य विभूतींनो त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमचे शौर्य प्रकट होईल असे करा. आमची प्रजा - आमची मुले लेकरें, आणि आमची गात्र आम्हांस सोडून जाणार नाहीत असे करा. हे राजा सोमा, आमच्या द्वेष्ट्यांची मनधरणी करण्याचा प्रसंग आम्हांवर आणू नको ५.


अग्ने॑ म॒न्युं प्र॑तिनु॒दन् परे॑षां॒ अद॑ब्धो गो॒पाः परि॑ पाहि न॒स्त्वम् ।
प्र॒त्यञ्चो॑ यन्तु नि॒गुतः॒ पुन॒स्तेऽ॒मैषां॑ चि॒त्तं प्र॒बुधां॒ वि ने॑शत् ॥ ६ ॥

अग्ने मन्युं प्रति-नुदन् परेषां अदब्धः गोपाः परि पाहि नः त्वं
प्रत्यचः यन्तु नि-गुतः पुनरिति ते अमा एषां चित्तं प्र-बुधां नेशत् ॥ ६ ॥

अग्निदेवा, तूं आमच्या शत्रूंचा(प्रतिस्पर्ध्यांचा) रोष आणि जोष नष्ट कर; आणि आमचा अजिंक्य संरक्षक हो‍ऊन आमचे रक्षण कर. आम्ही समोर येतांच शत्रु पाठ फिरवून त्यांची बोबडी वळून ते ओरडत आपल्या घराकडे धूम ठोकीत जातील असे कर; आणि अगोदर जरी ते हुषार असले, तरी शेवटी ते बावचळून त्यांचे चित्त ठिकाणावर राहणार नाही असे कर ६.


धा॒ता धा॑तॄ॒णां भुव॑नस्य॒ यस्पति॑र्दे॒वं त्रा॒तारं॑ अभिमातिषा॒हम् ।
इ॒मं य॒ज्ञं अ॒श्विनो॒भा बृह॒स्पति॑र्दे॒वाः पा॑न्तु॒ यज॑मानं न्य॒र्थात् ॥ ७ ॥

धाता धातॄणां भुवनस्य यः पतिः देवं त्रातारं अभिमाति-सहं
इमं यजं अश्विना उभा बृहस्पतिः देवाः पान्तु यजमानं नि-अर्थात् ॥ ७ ॥

उत्पादक शक्तींचाहि तूं उत्पन्नकर्ता आहेस. तूं जो सर्व जगताचा अधिपति देव, तो तूं आमचा रक्षक आणि आमच्या शत्रूंचा विध्वंसक आहेस. तर उभयतां अश्विदेव आणि बृहस्पति हे दिव्यविभूति आमचा हा यज्ञ आणि आमचे यजमान ह्यांचा सर्व अनर्थापासून सांभाळ करोत ७.


उ॒रु॒व्यचा॑ नो महि॒षः शर्म॑ यंसद॒स्मिन् हवे॑ पुरुहू॒तः पु॑रु॒क्षुः ।
स नः॑ प्र॒जायै॑ हर्यश्व मृळ॒येन्द्र॒ मा नो॑ रीरिषो॒ मा परा॑ दाः ॥ ८ ॥

उरु-व्यचाः नः महिषः शर्म यंसत् अस्मिन् हवे पुरु-हूतः पुरु-क्षुः
सः नः प्र-जायै हरि-अश्व मृळय इन्द्र मा नः रिरिषः मा परा दाः ॥ ८ ॥

अग्निदेवा, तूं सर्वव्यापि आणि श्रेष्ठ आहेस; ह्या संग्रामप्रसंगी तुजला सर्वांनी पाचारण केलेले आहे. तूं सर्व प्रकारच्या सामर्थ्यांनी संपन्न आहेस; तर तुझा कल्याणप्रद आश्रय आम्हांस लाभूं दे. हे हरिदश्वा इंद्रा, तूं आमच्या प्रजाजनांवर कृपादृष्टि ठेव; आमचा घात हो‍ऊं देऊं नको. किंवा आम्हांला दूर लोटूं नको ८.


ये नः॑ स॒पत्ना॒ अप॒ ते भ॑वन्त्व् इन्द्रा॒ग्निभ्यां॒ अव॑ बाधामहे॒ तान् ।
वस॑वो रु॒द्रा आ॑दि॒त्या उ॑परि॒स्पृशं॑ मो॒ग्रं चेत्ता॑रं अधिरा॒जं अ॑क्रन् ॥ ९ ॥

ये नः स-पत्नाः अप ते भवन्तु इन्द्राग्नि-भ्यां अव बाधामहे
वसवः रुद्राः आदित्याः उपरि-स्पृशं मा उग्रं चेत्तारं अधि-राजं अक्रन् ॥ ९ ॥

आमचे जे शत्रु आहेत त्यांचा सर्वस्वी पराभव हो‍ऊन ते पार पळून जावोत; कारण इंद्राग्नीच्या सहाय्यानेच त्यांच्यावर आम्ही हल्ला चढवीत आहोत; म्हणून दिव्यनिधि जे रुद्र आणि आदित्य ह्यांनीच मला सर्वश्रेष्ठ शत्रुभयंकर आणि मोठा धोरणी असा सार्वभौम केला आहे ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२९ (नासदीय सूक्त, यज्ञसूक्त)

ऋषी - परमेष्टिन् प्रजापति : देवता - पर्मात्मन् : छंद - त्रिष्टुभ्


नास॑दासी॒न् नो सदा॑सीत् त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्योमा प॒रो यत् ।
किं आव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्न् अम्भः॒ किं आ॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १॥

न असत् आसीत् नो इति सत् आसीत् तदानीं न आसीत् रजः नो इति वि-ओम परः यत्
किं आ अवरीवरिति कुह कस्य शर्मन् अम्भः किं आसीत् गहनं गभीरम् ॥ १ ॥

जेव्हां हे विश्व उत्पन्न झाले नव्हते त्या वेळेस असत्‌ (म्हणजे इंद्रियांना अगोचर असें) ज्याला म्हणतात ते कांही नव्हते किंवा सत्‌ म्हणतात तेहि नव्हते; त्या वेळी (अंतरिक्षात्मक) रजोलोक नव्हता, किंवा आकाशहि नव्हते, आणि आकाशाच्या बाहेर पलिकडे जे कांही आहे तेंहि नव्हते. अशा वेळी आवरण तरी कोणते असणार ? आणि सुखाचा आश्रय तरी कोठचा आणि कोणाचा असणार ! मग त्या वेळी अत्यंत दुर्गम आणि खोल असे उदक कोठून असणार ? १.


न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत् प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन् न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥

न मृत्युः आसीत् अमृतं न तर्हि न रात्र्याः अह्नः आसीत् प्र-केतः
आनीत् अवातं स्वधया तत् एकं तस्मात् ह अन्यत् न परः किं चन आस ॥ २ ॥

त्यावेळी मृत्यु नव्हता आणि अमृत म्हणजे अमरत्वहि नव्हते; तसेंच रात्र आणि दिवस ह्यांच्या निरनिराळेपणाचा मागमूसहि नव्हता. अशा वेळी अगदी निश्चल असे जे आदितत्त्व ते मात्र आपल्याच अतर्क्य शक्तीने शासोच्छवास करीत होते; पण तो श्वासोच्छवास वायुविरहित होता. त्या वेळी तेच तत्त्व एकटेंच विद्यमान होते; त्याच्यावांचून दुसरे किंवा त्याच्यापेक्षा पलीकडे किंवा श्रेष्ठ असे कांहीहि नव्हते २.


तम॑ आसी॒त् तम॑सा गू॒ळ्हं अग्रे॑ऽप्रके॒तं स॑लि॒लं सर्वं॑ आ इ॒दम् ।
तु॒च्छ्येना॒भ्व् अपि॑हितं॒ यदासी॒त् तप॑स॒स्तन् म॑हि॒नाजा॑य॒तैक॑म् ॥ ३ ॥

तमः आसीत् तमसा गूळ्हं अग्रे अप्र-केतं सलिलं सर्वं आः इदं
तुच्छ्येन आभु अपि-हितं यत् आसीत् तपसः तत् महिना अजायत एकम् ॥ ३ ॥

पण नंतर प्रथमत: तम रूप अथवा आकार नाही असे निराकार परंतु गतिमान उदक-तत्त्व सर्वत्र भरून राहिले. ते प्रभावशाली व्यापक तत्त्व तमाच्या पातळ पापुद्र्याने झाकलेले होते, पण नंतर तैजस तत्त्वाच्या प्रभावाने तेथे एक, म्हणजे सृष्टीचे बीज उत्पन्न झाले ३.


काम॒स्तदग्रे॒ सं अ॑वर्त॒ताधि॒ मन॑सो॒ रेतः॑ प्रथ॒मं यदासी॑त् ।
स॒तो बन्धुं॒ अस॑ति॒ निर॑विन्दन् हृ॒दि प्र॒तीष्या॑ क॒वयो॑ मनी॒षा ॥ ४ ॥

कामः तत् अग्रे सं अवर्तत अधि मनसः रेतः प्रथमं यत् आसीत्
सतः बन्धुं असति निः अविन्दन् हृदि प्रतीष्या कवयः मनीषा ॥ ४ ॥

त्यानंतर जेव्हां प्रथम मनोरूप बीज उत्पन्न झाले, तेव्हां त्या मनाच्या ठिकाणी काम म्हणजे (वासना, इच्छा, अथवा) संकल्प उत्पन्न झाला. याप्रमाणे ज्ञानी महात्म्यांनी आपल्या अंत:करणांत ह्या सर्व गोष्टीचा बुद्धीने विचार करून हा शोध निश्चित केला की दृशाचा संबंध किंवा उगम अदृश्यांत आहे ४.


ति॒र॒श्चीनो॒ वित॑तो र॒श्मिरे॑षां अ॒धः स्वि॑दा॒सी३दु॒परि॑ स्विदासी३त् ।
रे॒तो॒धा आ॑सन् महि॒मान॑ आसन् स्व॒धा अ॒वस्ता॒त् प्रय॑तिः प॒रस्ता॑त् ॥ ५ ॥

तिरश्चीनः वि-ततः रश्मिः एषां अधः स्वित् आसी३त् उपरि स्वित् आसी३त्
रेतः-धाः आसन् महिमानः आसन् स्वधा अवस्तात् प्र-यतिः परस्तात् ॥ ५ ॥

दृश्य आणि अदृश्य, अथवा गोचर आणि अगोचर ह्या दोन्ही प्रकारच्या वस्तूंमध्ये एक तेजोमय तंतू आडवा आहे. त्याच्या वरच्या बाजूस काय आहे आणि खालच्या बाजूस काय आहे बरे ? सर्व उत्पादक शक्ति तेथे आहेत आणि त्यांचे महत्‌कार्यहि तेथेच आहे. त्यांमध्ये इच्छा-स्वातंत्र्य म्हणा, प्रयत्‍न म्हणा हा त्या तंतूच्या खालच्या बाजूस आणि त्याचा अनुभव किंवा प्रत्यय हा त्याच्या वरच्या बाजूकडे आहे ५.


को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त् कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः ।
अ॒र्वाग् दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥ ६ ॥

कः अद्धा वेद कः इह प्र वोचत् कुतः आजाता कुतः इयं वि-सृष्टिः
अर्वाक् देवाः अस्य वि-सर्जनेन अथ कः वेद यतः आबभूव ॥ ६ ॥

हे सर्व जरी खरे, तरी ह्या सर्व गोष्टी वस्तुत: अनुभवाने कोणाला कळतात ? आणि ते आम्हांला इथे येऊन कोण सांगणार ? ही नाना प्रकारची विविध सृष्टि कोठून आली किंवा कशापासून कशा प्रकारे निर्माण झाली असेल ? दिव्य विबुधांना हे ठाऊक आहे असें म्हणावे तर दिव्यविबुध तर सृष्टीच्या नंतरचे, त्यांना काय माहीत ? मग आतां हे कसे झाले ते कोण सांगेल ? ६.


इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्योम॒न् सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥

इयं वि-सृष्टिः यतः आबभूव यदि वा दधे यदि वा न
यः अस्य अधि-अक्षः परमे वि-ओमन् सः अङ्ग वेद यदि वा न वेद ॥ ७ ॥

ही विविध सृष्टि जेथून - ज्याच्यापासून निर्माण झाली, ती त्याने धारणा केली असो किंवा नसो. पण येवढे खरें की ह्या सृष्टीचा जो नियंता अत्युच्च आकाशांत, म्हणजे बुद्धीला अगम्य अशा ठिकाणी आहे. त्याला मात्र हे सर्व माहित असलेच पाहिजे; आणि त्यालाहि जर माहीत नसेल तर मग झालेच--(मग हे कोणालाच कळणार नाही) ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३० (सृष्ट्युत्पत्तिसूक्त)

ऋषी - यज्ञ प्राजापत्य : देवता - सृष्टी (उत्पत्ती) : छंद - १ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


यो य॒ज्ञो वि॒श्वत॒स्तन्तु॑भिस्त॒त एक॑शतं देवक॒र्मेभि॒राय॑तः ।
इ॒मे व॑यन्ति पि॒तरो॒ य आ॑य॒युः प्र व॒याप॑ व॒येत्या॑सते त॒ते ॥ १॥

यः यजः विश्वतः तन्तु-भिः ततः एक-शतं देव-कर्मेभिः आयतः
इमे वयन्ति पितरः ये आययुः प्र वय अप वय इति आसते तते ॥ १ ॥

हा जो यज्ञ चोहोंकडून तंतूच्या योगाने पसरून दिला आहे, तो देवाप्रीत्यर्थ केलेल्या शेकडों प्रकारच्या कर्मांनी विस्तार पावला आहे. येथे जे आमचे वाडवडील पितर, किंवा विद्वान्‌ सज्जन आलेले आहेत तेच हे यज्ञकर्मरूप वस्त्र विणण्याचे कार्य करितात; आणि वस्त्राचे ताणे वाणे ताणले जात असतां - हे पुढें विणीत जा, असे मागे विणीत ये, याप्रमाणे सांगत येथेंच बसतात १.


पुमा॑ँ एनं तनुत॒ उत् कृ॑णत्ति॒ पुमा॒न् वि त॑त्ने॒ अधि॒ नाके॑ अ॒स्मिन् ।
इ॒मे म॒यूखा॒ उप॑ सेदुरू॒ सदः॒ सामा॑नि चक्रु॒स्तस॑रा॒ण्योत॑वे ॥ २ ॥

पुमान् एनं तनुते उत् कृणत्ति पुमान् वि तत्ने अधि नाके अस्मिन्
इमे मयूखाः उप सेदुः ओं इति सदः सामानि चक्रुः तसराणि ओतवे ॥ २ ॥

वास्तविक पाहतां पुराणपुरुष हाच यज्ञरूप तन्तु पसरतो. तोच ते तन्तु उकलून उलगडतो; आणि आकाशाच्या उंच घुमटांत हा सृष्टिरूप यज्ञ तोच विस्तारून देतो. हे पहा त्याचे किरण; तेच परिधि, त्याच्या आसनाभोंवती रोंवले आहेत. आणि त्यांनीच यज्ञरूप वस्त्र विणण्यासाठी सामसूक्तांची धोटी बनविली २.


कासी॑त् प्र॒मा प्र॑ति॒मा किं नि॒दानं॒ आज्यं॒ किं आ॑सीत् परि॒धिः क आ॑सीत् ।
छन्दः॒ किं आ॑सी॒त् प्र.अ॑उगं॒ किं उ॒क्थं यद्दे॒वा दे॒वं अय॑जन्त॒ विश्वे॑ ॥ ३ ॥

का आसीत् प्र-मा प्रति-मा किं नि-दानं आज्यं किं आसीत् परि-धिः कः आसीत्
छंन्दः किं आसीत् प्रौगं किं उक्थं यत् देवाः देवं अयजन्त विश्वे ॥ ३ ॥

ह्या यज्ञाचे विधिनियम कोणते होते, त्याचा आदर्श कोणता, त्याचा मूळ उद्देश कोणता, हव्यघृत कोणते ठरविले, परिधि म्हणजे मर्यादा कोणती, छंद कोणता, प्रौग (शस्त्र) कोणतें, उक्थ कोणते होते, दिव्य विबुधांनी प्रथम जेव्हां यज्ञ केला, तेव्हां वरील व्यवस्था कोणती होती ? ३.


अ॒ग्नेर्गा॑य॒त्र्यभवत् स॒युग्वो॒ष्णिह॑या सवि॒ता सं ब॑भूव ।
अ॒नु॒ष्टुभा॒ सोम॑ उ॒क्थैर्मह॑स्वा॒न् बृह॒स्पते॑र्बृह॒ती वाचं॑ आवत् ॥ ४ ॥

अग्नेः गायत्री अभवत् स-युग्वा उष्णिहया सविता सं बभूव
अनु-स्तुभा सोमः उक्थैः महस्वान् बृहस्पतेः बृहती वाचं आवत् ॥ ४ ॥

तेव्हां गायत्री छंदाचे अग्नीशी सहचर्य झाले. उष्णिक्‌ छंदाशी सविता संलग्न झाला. तेजस्वी सोम अनुष्टुप्‌ आणि उक्थ ह्यांच्याशी युक्त हो‍ऊन प्रकट झाला, आणि बृहस्पतीच्या वाणीने बृहती छंदाची रचना उत्पन्न केली ४.


वि॒राण् मि॒त्रावरु॑णयोरभि॒श्रीरिन्द्र॑स्य त्रि॒ष्टुब् इ॒ह भा॒गो अह्नः॑ ।
विश्वा॑न् दे॒वाञ् जग॒त्या वि॑वेश॒ तेन॑ चाक्.ल्प्र॒ ऋष॑यो मनु॒ष्याः ॥ ५ ॥

विराट् मित्रावरुणयोः अभि-श्रीः इन्द्रस्य त्रि-स्तुप् इह भागः अह्नः
विश्वान् देवान् जगती आ विवेश तेन चाक्ळ्प्रे ऋषयः मनुष्याः ॥ ५ ॥

मित्रावरुणांच्या ठिकाणी विराट्‌ छंदाने आश्रय घेतला. त्रिष्टुप्‌ छंद हा येथे यज्ञांत दिवसाच्या स्तवनांमध्ये इंद्राचा भाग म्हणून ठरला आणि जगती छंदाने विश्वेदेवांच्या समूहांत प्रवेश केला. अशा रीतीने यज्ञाद्वाराच ऋषींची आणि मनुष्यांच्या कर्तव्याची व्यवस्था उत्पन्न झाली ५.


चा॒क्.ल्॒प्रे तेन॒ ऋष॑यो मनु॒ष्या य॒ज्ञे जा॒ते पि॒तरो॑ नः पुरा॒णे ।
पश्य॑न् मन्ये॒ मन॑सा॒ चक्ष॑सा॒ तान् य इ॒मं य॒ज्ञं अय॑जन्त॒ पूर्वे॑ ॥ ६ ॥

चाकेप्रे तेन ऋषयः मनुष्याः यजे जाते पितरः नः पुराणे
पश्यन् मन्ये मनसा चक्षसा तान् ये इमं यजं अयजन्त पूर्वे ॥ ६ ॥

याप्रमाणे प्राचीन जी यज्ञसंस्था निर्माण झाली - तिनेंच ऋषि, मनुष्य आणि आम्हां मानवांचे वाडवडील उत्पन्न केले; म्हणून ज्या दिव्य विभूतींनी पूर्वी अशा यज्ञाचे यज्ञद्वारा यजन केले, त्या दिव्य विबुधांना मी आपल्या मनश्चक्षूंनी प्रत्यक्ष पाहतोंच आहे असे मला वाटते ६.


स॒हस्तो॑माः स॒हच्छ॑न्दस आ॒वृतः॑ स॒हप्र॑मा॒ ऋष॑यः स॒प्त दैव्याः॑ ।
पूर्वे॑षां॒ पन्थां॑ अनु॒दृश्य॒ धीरा॑ अ॒न्वाले॑भिरे र॒थ्योख्प् न र॒श्मीन् ॥ ७ ॥

सह-स्तोमाः सह-चन्दसः आवृतः सह-प्रमाः ऋषयः सप्त दैव्याः
पूर्वेषां पन्थां अनु-दृश्य धीराः अनु-आलेभिरे रथ्यः न रश्मीन् ॥ ७ ॥

देवांनी निर्माण केलेले जे सात ऋषि, ते ऋक्‌ स्तोत्रांचे समूह जाणणारे, छंद जाणणारे आणि सर्व विधिनियमांच्या परंपरेत पारंगत होते, म्हणून पूर्वीच्या ज्ञानी महात्म्यांनी घालून दिलेल्या मार्गाचा बुद्धिमान्‌ भक्तांनी विचार करून सारथि जसा अश्वांचा लगाम हाती घेतो त्याप्रमाणे लोक नियंत्रणाची सूत्रे हातीं घेतली ७.


ॐ तत् सत्


GO TOP