PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १३१ ते १४०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३१ (इंद्र, अश्विनीकुमार सूक्त)

ऋषी - सुकीर्ति काक्षीवर : देवता - ४-५ - अश्विनीकुमार; अवशिष्ट - इंद्र : छंद - ४ - अनुष्टुभ्; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


अप॒ प्राच॑ इन्द्र॒ विश्वा॑ँ अ॒मित्रा॒न् अपापा॑चो अभिभूते नुदस्व ।
अपोदी॑चो॒ अप॑ शूराध॒राच॑ उ॒रौ यथा॒ तव॒ शर्म॒न् मदे॑म ॥ १॥

अप प्राचः इन्द्र विश्वान् अमित्रान् अप अपाचः अभि-भूते नुदस्व
अप उदीचः अप शूर अधराचः उरौ यथा तव शर्मन् मदेम ॥ १ ॥

आमचे शत्रु हे इंद्रा, पूर्वेकडे असोत, पश्चिमेकडे असोत, वर उत्तरेकडे असोत, किंवा हे वीरोत्तमा खाली दक्षिणेकडे असोत; त्या सर्वांना, हे शत्रूविध्वंसका, तूं पार नाहींसे कर--की जेणे करून आम्ही तुझ्या आश्रयाखाली राहून आनंद मग्न हो‍ऊं १.


कु॒विद॒ङ्ग यव॑मन्तो॒ यवं॑ चि॒द्यथा॒ दान्त्य॑नुपू॒र्वं वि॒यूय॑ ।
इ॒हेहै॑षां कृणुहि॒ भोज॑नानि॒ ये ब॒र्हिषो॒ नमो॑वृक्तिं॒ न ज॒ग्मुः ॥ २ ॥

कुवित् अङ्ग यव-मन्तः यवं चित् यथा दान्ति अनु-पूर्वं वि-यूय
इह-इह एषां कृणुहि भोजनानि ये बर्हिषः नमः-वृक्तिं न जग्मुः ॥ २ ॥

असें नाही काय की धान्य उत्पन्न करणारे शेतकरी ज्याप्रमाणे शेतजमिनीतील तण काढून टाकून पिकाची ताटेंहि ओळीने कापीत जातात, त्याप्रमाणे तुजला प्रणिपात करून यज्ञासाठी दर्भ वगैरे कापावयाचे; पण तसे जे कांहींच करीत नाहीत, त्यांना त्याचे फळ तूं येथल्या येथेंच भोगावयास लाव २.


न॒हि स्थूर्यृ॑तु॒था या॒तं अस्ति॒ नोत श्रवो॑ विविदे संग॒मेषु॑ ।
ग॒व्यन्त॒ इन्द्रं॑ स॒ख्याय॒ विप्रा॑ अश्वा॒यन्तो॒ वृष॑णं वा॒जय॑न्तः ॥ ३ ॥

नहि स्थूरि ऋतु-था यातं अस्ति न उत श्रवः विविदे सम्-गमेषु
गव्यन्तः इन्द्रं सख्याय विप्राः अश्व-यन्तः वृषणं वाज-यन्तः ॥ ३ ॥

खिळखिळा झाल्याने कसा तरी जोडलेला रथ उद्दिष्ट स्थळी वेळच्या वेळी पोहोंचत नाही; किंवा भलत्याच रीतीने वागल्यास संग्रामांत विजयहि मिळत नाही; हे जाणून प्रकाश-धेनूंची, भूप्रदेशाची आणि अश्वधिपत्याची इच्छा धरणारे ज्ञानी भक्त आपल्या सत्वसामर्थ्यांची पराकाष्टा करून वीर धुरीण जो इंद्र त्याची सेवा, त्याचे सख्य लाभावे म्हणून करितात ३.


यु॒वं सु॒रामं॑ अश्विना॒ नमु॑चाव् आसु॒रे सचा॑ ।
वि॒पि॒पा॒ना शु॑भस्पती॒ इन्द्रं॒ कर्म॑स्व् आवतम् ॥ ४ ॥

युवं सुरामं अश्विना नमुचौ आसुरे सचा
वि-पिपाना शुभः पती इति इन्द्रं कर्म-सु आवतम् ॥ ४ ॥

हे अश्वी देवांनो, तुम्ही उल्हादी सोमरस यथेच्छ प्राशन करून आपणास "असुर" म्हणविणार्‍या नमिचि दैत्याशी युद्ध करण्याच्या कामी, हे मंगलधीशांनो, इंद्राबरोबरच सहकार्य केलेत ४.


पु॒त्रं इ॑व पि॒तरा॑व् अ॒श्विनो॒भेन्द्रा॒वथुः॒ काव्यै॑र्दं॒सना॑भिः ।
यत् सु॒रामं॒ व्यपि॑बः॒ शची॑भिः॒ सर॑स्वती त्वा मघवन्न् अभिष्णक् ॥ ५ ॥

पुत्रम्-इव पितरौ अश्विना उभा इन्द्र आवथुः काव्यैः दंसनाभिः
यत् सुरामं वि अपिबः शचीभिः सरस्वती त्वा मघ-वन् अभिष्णक् ॥ ५ ॥

आणि आईबाप जसे पुत्राला सहाय्य करितात त्याप्रमाणे हे इंद्रा, अश्विदेवांनी आपल्या चातुर्याने आणि अद्‍भुत कर्तृत्वाने भक्तांना) सहाय केले, तसेंच जेव्हां आपल्या अतर्क्य शक्तींनी प्रोत्साहित हो‍ऊन तूं मनोभिराम अशा सोमरसाचे प्राशन केलेस, त्या वेळी हे भगवंता, सरस्वतीने देखील तुझी सेवा केली ५.


इन्द्रः॑ सु॒त्रामा॒ स्ववा॒ँ अवो॑भिः सुमृळी॒को भ॑वतु वि॒श्ववे॑दाः ।
बाध॑तां॒ द्वेषो॒ अभ॑यं कृणोतु सु॒वीर्य॑स्य॒ पत॑यः स्याम ॥ ६ ॥

इन्द्रः सु-त्रामा स्व-वान् अवः-भिः सु-मृळीकः भवतु विश्व-वेदाः
बाधतां द्वेषः अभयं कृणोतु सु-वीर्यस्य पतयः स्याम ॥ ६ ॥

इंद्र हाच भक्तांचा उत्तमोत्तम तारक आहे; तर तो स्वतंत्र, सर्वज्ञ आणि सर्वैश्वर्यवान्‌ देव आपल्या संरक्षणांनी आम्हांवर अनुग्रह करो; तो द्वेषांचा आणि द्वेष्ट्यांचाहि नायनाट करो, आम्हांला निर्भय करो आणि त्याकरतां आम्ही शौर्यवृत्तीचे अधिपति हो‍ऊं असे करो ६.


तस्य॑ व॒यं सु॑म॒तौ य॒ज्ञिय॒स्यापि॑ भ॒द्रे सौ॑मन॒से स्या॑म ।
स सु॒त्रामा॒ स्ववा॒ँ इन्द्रो॑ अ॒स्मे आ॒राच् चि॒द्द्वेषः॑ सनु॒तर्यु॑योतु ॥ ७ ॥

तस्य वयं सु-मतौ यजियस्य अपि भद्रे सौमनसे स्याम
सः सुत्रामा स्व-वान् इन्द्रः अस्मे इति आरात् चित् द्वेषः सनुत युयोतु ॥ ७ ॥

त्या यज्ञार्ह देवाच्या वात्सल्यबुद्धीच्या आश्रयाने आणि कल्याणकारक कनवाळूपणाच्या आधाराने आम्ही राहूं. इंद्र हाच भक्तांचा सर्वोत्तम असा तारक आहे; तर तो सर्वस्वी स्वतंत्र देव आमच्या द्वेष्ट्यांचा, मग ते उघड असोत, की गुप्त असोत, अगदी उच्छेद करो ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३२ (मित्रावरुणसूक्त)

ऋषी - शकपूत नार्मेध : देवता - १ - द्यावापृथिवी, अश्विनीकुमार; २-७ मित्रावरून
छंद - 1 - न्यंकुसांरिणी; २, ६ - प्रस्तारपंक्ति; ७ - महासतोबृहती; अवशिष्ट - विराज्


ई॒जा॒नं इद्द्यौर्गू॒र्ताव॑सुरीजा॒नं भूमि॑र॒भि प्र॑भू॒षणि॑ ।
ई॒जा॒नं दे॒वाव् अ॒श्विना॑व् अ॒भि सु॒म्नैर॑वर्धताम् ॥ १॥

ईजानं इत् द्यौः गूर्त-वसुः ईजानं भूमिः अभि प्र-भूषणि
ईजानं देवौ अश्विनौ अभि सुम्नैः अवर्धताम् ॥ १ ॥

जो कोणी यज्ञ करतो, त्याला दिव्यनिधि अर्पण करण्यासाठी द्युलोक हा आपला हात पुढे करतो; जो कोणी यज्ञ करतो त्याला ही पृथ्वी कीर्तीने भूषविण्यास पुढे सरसावते; जो कोणी यज्ञ करतो, त्याचा अश्विदेव हे आपल्या मंगल आशीर्वादांनी उत्कर्ष करितात १.


ता वां॑ मित्रावरुणा धार॒यत्क्षि॑ती सुषु॒म्नेषि॑त॒त्वता॑ यजामसि ।
यु॒वोः क्रा॒णाय॑ स॒ख्यैर॒भि ष्या॑म र॒क्षसः॑ ॥ २ ॥

ता वां मित्रावरुणा धारयत्क्षिती इतिधारयत्-क्षिती सु-सुम्ना इषितत्वता यजामसि
युवोः क्राणाय सख्यैः अभि स्याम रक्षसः ॥ २ ॥

हे मित्रावरुणांनो, ते तुम्ही उभयतां प्राणिमात्रांचे धारण करतां, तुम्ही उत्तम कल्याणकारी आहांत; म्हणूनच आम्ही मोठ्या मनोत्साहाने तुमचे यजन करितो आणि सत्कार्यशील भक्ताशी जे तुमचे ममत्व असते, त्याच्याच बळावर आम्ही राक्षसांचा समूळ फडशा उडवून देऊं २.


अधा॑ चि॒न् नु यद्दिधि॑षामहे वां अ॒भि प्रि॒यं रेक्णः॒ पत्य॑मानाः ।
द॒द्वाँ वा॒ यत् पुष्य॑ति॒ रेक्णः॒ सं व् आ॑र॒न् नकि॑रस्य म॒घानि॑ ॥ ३ ॥

अध चित् नु यत् दधिषामहे वां अभि प्रियं रेक्णः पत्यमानाः
दद्वान् वा यत् पुष्यति रेक्णः सं ओं इति आरन् नकिः अस्य मघानि ॥ ३ ॥

हे पहा, तुमच्याप्रीत्यर्थ आम्ही हवि अर्पण करीत आहो, तुमच्या ठिकाणी सर्वश: लक्ष ठेऊन राहिलो आहोत, कारण आमच्या इच्छित वस्तूंचे अधिपत्य लाभावे ही आमची मनीषा आहे; आणि जो भक्त तुम्हांला हवि आणि भक्तिभाव अर्पण करितो, तो आपल्या उद्दिष्ट उत्कर्षाला नेतो, त्याच्या ऐश्वर्याचा कोणीहि नाश करू शकत नाही ३.


अ॒साव् अ॒न्यो अ॑सुर सूयत॒ द्यौस्त्वं विश्वे॑षां वरुणासि॒ राजा॑ ।
मू॒र्धा रथ॑स्य चाक॒न् नैताव॒तैन॑सान्तक॒ध्रुक् ॥ ४ ॥

असौ अन्यः असुर सूयत द्यौः त्वं विश्वेषां वरुण असि राजा
मूर्धा रथस्य चाकन् न एतावता एनसा अन्तक-ध्रुक् ॥ ४ ॥

हे ईश्वरा (वरुणा), तो जो दुसरा मित्र म्हणून आहे, त्याला द्युलोकानेच जन्म दिला; पण हे वरुणा, सर्व वस्तुमात्राचा राजा तूंच आहेस, आतां इतर कांही सांगावयाचे तर अंतकाच्या रथाचा माथा चित्ताकर्षक नाही ह्या येवढ्याशा दोष दृष्टीने काय त्या अंतकाचा द्रोह होईल ? ४.


अ॒स्मिन् स्व् एख्प् तच् छक॑पूत॒ एनो॑ हि॒ते मि॒त्रे निग॑तान् हन्ति वी॒रान् ।
अ॒वोर्वा॒ यद्धात् त॒नूष्व् अवः॑ प्रि॒यासु॑ य॒ज्ञिया॒स्व् अर्वा॑ ॥ ५ ॥

अस्मिन् सु एतत् शक-पूते एनः हिते मित्रे नि-गतान् हन्ति वीरान्
अवोः वा यत् धात् तनूषु अवः प्रियासुयजियास्व् अर्वा ॥ ५ ॥

ह्या शकपूताच्या ठिकाणी हाच दोष दिसला की मित्रत्व असतांना सुद्धां तो निघून चाललेल्या सैनिकांना मारीत सुटला; पण त्या वेळी तुम्ही जे भक्तरक्षक त्या तुमच्या अश्वारूढ वीराने प्रिय आणि पूज्य व्यक्तींच्या शरीराचे रक्षण केले ५.


यु॒वोर्हि मा॒तादि॑तिर्विचेतसा॒ द्यौर्न भूमिः॒ पय॑सा पुपू॒तनि॑ ।
अव॑ प्रि॒या दि॑दिष्टन॒ सूरो॑ निनिक्त र॒श्मिभिः॑ ॥ ६ ॥

युवोः हि माता अदितिः वि-चेतसा द्यौः न भूमिः पयसा पुपूतनि
अव प्रिया दिदिष्टन सूरः निनिक्त रश्मि-भिः ॥ ६ ॥

प्राज्ञ मित्रावरुणांनो, तुमची माता अदिति आहे आणि ज्याप्रमाणे द्युलोक हा वृष्टि करून सर्व कांही स्वच्छ करतो, ज्याप्रमाणे भूमिसुद्धां सर्व वस्तूंना स्वच्छ करते, त्याप्रमाणे जगत्‌जननी अदिति ही सर्वांच्या पातक क्षालनाचे कार्य उत्तम रीतीने पार पाडते; तर तुम्हांला जे जे प्रिय वाटते, तेच आमच्या दर्शनास आणा आणि तेच रविकिरणांनी स्वच्छ करा ६.


यु॒वं ह्यप्न॒राजा॒व् असी॑दतं॒ तिष्ठ॒द्रथं॒ न धू॒र्षदं॑ वन॒र्षद॑म् ।
ता नः॑ कणूक॒यन्ती॑र्नृ॒मेध॑स्तत्रे॒ अंह॑सः सु॒मेध॑स्तत्रे॒ अंह॑सः ॥ ७ ॥

युवं हि अप्न-राजौ असीदतं तिष्ठत् रथं न धूः-सदं वन-सदं
ताः नः कणूक-यन्तीः नृ-मेधः तत्रे अंहसः सु-मेधः तत्रे अंहसः ॥ ७ ॥

सर्व सुकृतांचे अधिपति तुम्ही आहांत; तुम्ही आतां येथे थांबा; ज्याच्या धुरेवर किंवा बैठकीवर मनाप्रमाणे आरामशीर बसतां येते, अशा रथावर आरूढ हो‍ऊन सज्ज रहा, आणि आपत्तींनी गांजलेल्या नृमेधाच्या प्रजाजनांचे पातकापासून (संकटापासून) रक्षण करा; तसेंच सुमेधाच्याही लोकांचे दुरितापासून रक्षण करा ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३३ (इंद्रसूक्त)

ऋषी - सुदास पैजवान : देवता इंद्र : छंद - १-३ - शक्वरी; ४-६ - महापंक्ति; ७ - त्रिष्टुभ्


प्रो ष्व् अस्मै पुरोर॒थं इन्द्रा॑य शू॒षं अ॑र्चत ।
अ॒भीके॑ चिदुलोक॒कृत् सं॒गे स॒मत्सु॑ वृत्र॒हास्माकं॑ बोधि चोदि॒ता नभ॑न्तां अन्य॒केषां॑ ज्या॒का अधि॒ धन्व॑सु ॥ १॥

प्रो इति सु अस्मै पुरः-रथं इन्द्राय शूषं अर्चत
अभीके चित् ओं इति लोक-कृत् सम्-गे समत्-सु वृत्र-हा अस्माकं बोधि चोदिता नभन्तां अन्यकेषां ज्याकाः अधि धन्व-सु ॥ १ ॥

ह्या इंद्राप्रीत्यर्थ असे एक प्रभावी "अर्क" स्तोत्र मोठ्याने म्हणा की त्याच्या योगाने त्या इंद्राचा रथ सर्वांच्या पुढे सरसावेल. इंद्रा, युद्धामध्ये अगदी खेचाखेंच उडाली असली तरी देखील शत्रुसैनिकांचा सप्पा उडवून तूं तेथील जागा ऐसपैस करतोस आणि शत्रु सैनिक तुडून पडताच अशा भयंकर संग्रामामध्ये वृत्राचा नि:पात करतोस; तर असा तूं आम्हांस प्रोत्साहन दे आणि आमच्या शत्रूंच्या धनुष्यावर चढविलेल्या भिकारड्या दोर्‍या तटकन तुटून जातील असे कर १.


त्वं सिन्धू॒ँरवा॑सृजोऽध॒राचो॒ अह॒न्न् अहि॑म् ।
अ॒श॒त्रुरि॑न्द्र जज्ञिषे॒ विश्वं॑ पुष्यसि॒ वार्यं॒ तं त्वा॒ परि॑ ष्वजामहे॒ नभ॑न्तां अन्य॒केषां॑ ज्या॒का अधि॒ धन्व॑सु ॥ २ ॥

त्वं सिन्धून् अव असृजः अधराचः अहन् अहिं
अशत्रुः इन्द्र जजिषे विश्वं पुष्यसि वार्यं तं त्वा परि स्वजामहे नभन्तां अन्यकेषां ज्याकाः अधि धन्व-सु ॥ २ ॥

तूं अहि भुजंगाला ठार मारून दिव्य नद्यांना खाली भूलोकाकडे सोडून दिलेस. हे इंद्रा अजात शत्रु असाच तूं प्रकट झालास; पहा की, सर्व पदार्थ उत्कृष्ट दशेस येतील अशा रीतीने, तूं त्यांचे पोषण करतोस, म्हणूनच आम्ही तुजला हृदयाशी घट्ट धरून ठेविले आहे; तर आमच्या शत्रूंच्या धनुष्यावर चढविलेल्या भिकारड्या दोर्‍या ताडकन तुडून जावोत २.


वि षु विश्वा॒ अरा॑तयोऽ॒र्यो न॑शन्त नो॒ धियः॑ ।
अस्ता॑सि॒ शत्र॑वे व॒धं यो न॑ इन्द्र॒ जिघां॑सति॒ या ते॑ रा॒तिर्द॒दिर्वसु॒ नभ॑न्तां अन्य॒केषां॑ ज्या॒का अधि॒ धन्व॑सु ॥ ३ ॥

वि सु विश्वा अरातयः अर्यः नशन्त नः धियः
अस्ता असि शत्रवे वधं यः नः इन्द्र जिघांसति या ते रातिः ददिः वसु नभन्तां अन्यकेषां ज्याकाः अधि धन्व-सु ॥ ३ ॥

आमचे शत्रु नाश पावोत; तूं आमचा प्रभु आहेस, तर (तुझ्या ठिकाणी) आमच्या बुद्धि लीन होवोत. हे इंद्रा, जो दुष्ट आम्हांला ठार मारूं पाहतो, त्याच्यावरच तूं आपले घातक अस्त्र फेंकून मारतोस; तुझा जो वरप्रसाद तो आम्हांस इच्छित निधि देणारच; पण आमच्या शत्रूंच्या धनुष्याच्या त्या भिकार दोर्‍या तटकन तुटून जावोत ३.


यो न॑ इन्द्रा॒भितो॒ जनो॑ वृका॒युरा॒दिदे॑शति ।
अ॒ध॒स्प॒दं तं ईं॑ कृधि विबा॒धो अ॑सि सास॒हिर्नभ॑न्तां अन्य॒केषां॑ ज्या॒का अधि॒ धन्व॑सु ॥ ४ ॥

यः नः इन्द्र अभितः जनः वृक-युः आदिदेशति
अधः-पदं तं ईं कृधि वि-बाधः असि ससहिः नभन्तां अन्यकेषां ज्याकाः अधि धन्व-सु ॥ ४ ॥

हे इंद्रा, जो कोणी दुष्ट दुर्जन आमच्या आसपास राहून आमचा घात करण्यास लांडग्याप्रमाणे टपून बसलेला असेल, त्याला तात्काळ आपल्या पायाखाली चेंगरून टाक. आमच्यावर हल्ला चढविणारांना चेंचून टाकणारा तूंच आहेस; तर त्या दुष्टांच्या धनुष्यांच्या भिकार दोर्‍या तटकन तोडून टाक ४.


यो न॑ इन्द्राभि॒दास॑ति॒ सना॑भि॒र्यश्च॒ निष्ट्यः॑ ।
अव॒ तस्य॒ बलं॑ तिर म॒हीव॒ द्यौरध॒ त्मना॒ नभ॑न्तां अन्य॒केषां॑ ज्या॒का अधि॒ धन्व॑सु ॥ ५ ॥

यः नः इन्द्र अभि-दासति स-नाभिः यः च निष्ट्यः
अव तस्य बलं तिर मही-इव द्यौः अध त्मना नभन्तां अन्यकेषां ज्याकाः अधि धन्व-सु ॥ ५ ॥

जो कोणी आमच्या कुळांतील किंवा आमचा निकट संबंधी म्हणवून आम्हांला खाली पाडण्याच्या उद्योगांत असेल, त्याचे बळ तूं आपण हो‍ऊनच उखडून टाक. मग ते बळ आकाशायेवढें कां मोठे असेना, म्हणून त्या आमच्या शत्रूंच्या धनुष्याच्या भिकारड्या दोर्‍या ताडकन तुटतील असे कर ५.


व॒यं इ॑न्द्र त्वा॒यवः॑ सखि॒त्वं आ र॑भामहे ।
ऋ॒तस्य॑ नः प॒था न॒याति॒ विश्वा॑नि दुरि॒ता नभ॑न्तां अन्य॒केषां॑ ज्या॒का अधि॒ धन्व॑सु ॥ ६ ॥

वयं इन्द्र त्वायवः सखि-त्वं आ रभामहे
ऋतस्य नः पथा नयाति विश्वानि दुः-इता नभन्तां अन्यकेषां ज्याकाः अधि धन्व-सु ॥ ६ ॥

हे इंद्रा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणारे आहोत. तुझीच कृपा संपादन करण्याचा आमचा सारा प्रयत्‍न आहे; तर न्यायाच्या (=सधर्माच्या) मार्गाने आम्हांला सर्व पातकांच्या तसेंच संकटांच्या पार ने, आणि शत्रूंच्या धनुष्यांच्या भिकार तोर्‍या तटकन तोडून टाक ६.


अ॒स्मभ्यं॒ सु त्वं इ॑न्द्र॒ तां शि॑क्ष॒ या दोह॑ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे ।
अच्छि॑द्रोध्नी पी॒पय॒द्यथा॑ नः स॒हस्र॑धारा॒ पय॑सा म॒ही गौः ॥ ७ ॥

अस्मभ्यं सु त्वं इन्द्र तां शिक्ष या दोहते प्रति वरं जरित्रे
अच्छिद्र-ऊघ्नी पीपयत् यथा नः सहस्र-धारा पयसा मही गौः ॥ ७ ॥

हे इंद्रा, आम्हांला श्रेष्ठ कामधेनु अर्पण कर; की जी तुझ्या भक्ताला अभिष्टरूप दुग्ध देते. तिची कांस कधींहि गळकी नसतेच; पण अभीष्टाच्या दुधानं नेहमी टंच फुगलेली असते आणि जी त्या दुधाच्या असंख्या धारा सोडते ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३४ (इंद्राचे पालुपदसूक्त)

ऋषी - १-५, ६ पूर्वार्ध - मान्धातृ यौवनाश्व; ६ उत्तरार्ध, ७ गोधा ऋषी
देवता - इंद्र : छंद - १-६ - महापंक्ति; ७ - पंक्ति


उ॒भे यदि॑न्द्र॒ रोद॑सी आप॒प्राथो॒षा इ॑व ।
म॒हान्तं॑ त्वा म॒हीनां॑ स॒म्राजं॑ चर्षणी॒नां दे॒वी जनि॑त्र्यजीजनद्‌भ॒द्रा जनि॑त्र्यजीजनत् ॥ ।

उभे इति यत् इन्द्र रोदसी इति आपप्राथ उषाः-इव
महान्तं त्वा महीनां सम्-राजं चर्षणीनां देवी जनित्री अजीजनत् भद्रा जनित्री अजीजनत् ॥ १ ॥

हे इंद्रा, सुप्रभाती तूं उषेला ज्याप्रमाणे प्रकाश देतोस, त्याप्रमाणेच उभयतां द्यावापृथिवींनाहि तूं आपल्या तेजोभाराने गच्च भरून सोडले आहेस. ज्या ज्या वस्तु किंवा ज्या ज्या व्यक्ति थोर म्हणून प्रसिद्ध त्या सर्वांमध्येहि तूं श्रेष्ठ आहेस. तूं चराचरांचा चक्रवर्ति आहेस, म्हणूनच देवी (अदिती) मातेने तुजला प्रकट केले आणि तुजला प्रकट केले म्हणूनच ती लोकजननी स्वत:च कल्याणरूप ठरली १.


अव॑ स्म दुर्हणाय॒तो मर्त॑स्य तनुहि स्थि॒रम् ।
अ॒ध॒स्प॒दं तं ईं॑ कृधि॒ यो अ॒स्माँ आ॒दिदे॑शति दे॒वी जनि॑त्र्यजीजनद्‌भ॒द्रा जनि॑त्र्यजीजनत् ॥ २ ॥

अव स्म दुः-हनायतः मर्तस्य तनुहि स्थिरं
अधः-पदं तं ईं कृधि यः अस्मान् आदिदेशति देवी जनित्री अजीजनत् भद्रा जनित्री अजीजनत् ॥ २ ॥

जो दुष्ट मनुष्य दुसर्‍याचा कपटाने नाश करण्याचा नेहमी प्रयत्‍न करतो, त्याची शक्ति कितीहि दृढ (खंबीर) असली, तरी तिचा चुराडा कर. त्या दुष्टाला तूं आपल्या पायाखाली चेंचून टाक; कारण तो आमचा घातच करूं पाहणार. त्यासाठीच देवी (अदिति) मातेने तुजला प्रकट केले आणि म्हणूनच ती कल्याणकारिणी ठरली २.


अव॒ त्या बृ॑ह॒तीरिषो॑ वि॒श्वश्च॑न्द्रा अमित्रहन् ।
शची॑भिः शक्र धूनु॒हीन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभि॑र्दे॒वी जनि॑त्र्यजीजनद्‌भ॒द्रा जनि॑त्र्यजीजनत् ॥ ३ ॥

अव त्याः बृहतीः इषः विश्व-चन्द्राः अमित्र-हन्
शचीभिः शक्र धूनुहि इन्द्र विश्वाभिः ऊति-भिः देवी जनित्री अजीजनत् भद्रा जनित्री अजीजनत् ॥ ३ ॥

हे शत्रुनाशना, ज्याच्यापासून सर्वांना चंद्राप्रमाणे आल्हाद वाटतो, अशा ज्या उत्साहाच्या श्रेष्ठ प्रवृत्ति त्यांचा, हे सर्वसमर्था तू आपल्या शक्तींनी आमच्यावर वर्षाव कर. यासाठीच देवी (अदिति) मातेने तुजला प्रकट केले, आणि म्हणूनच ती लोकजननी स्वत: कल्याणकारिणी ठरली ३.


अव॒ यत् त्वं श॑तक्रत॒व् इन्द्र॒ विश्वा॑नि धूनु॒षे ।
र॒यिं न सु॑न्व॒ते सचा॑ सह॒स्रिणी॑भिरू॒तिभि॑र्दे॒वी जनि॑त्र्यजीजनद्‌भ॒द्रा जनि॑त्र्यजीजनत् ॥ ४ ॥

अव यत् त्वं शत-क्रतो इतिशत-क्रतो इन्द्र विश्वानि धूनुषे
रयं नि सुन्वते सचा सहस्रिणीभिः ऊति-भिः देवी जनित्री अजीजनत् भद्रा जनित्री अजीजनत् ॥ ४ ॥

अतुलपराक्रमा इंद्रा, तूं सर्व प्रकारची वरदाने भक्तावर जणूं उधळतोसच. सोम अर्पण करणार्‍या भक्ताला सर्व प्रकारचे वैभव तूं आपल्या सहस्त्रावधि सहाय्यक शक्तींनी अर्पण करातोस, म्हणूनच देवी (अदिति) मातेने तुजला प्रकट केले आणि ती लोकजननी स्वत: कल्याणरूप ठरली ४.


अव॒ स्वेदा॑ इवा॒भितो॒ विष्व॑क् पतन्तु दि॒द्यवः॑ ।
दूर्वा॑या इव॒ तन्त॑वो॒ व्य१स्मदे॑तु दुर्म॒तिर्दे॒वी जनि॑त्र्यजीजनद्‌भ॒द्रा जनि॑त्र्यजीजनत् ॥ ५ ॥

अव स्वेदाः-इव अभितः विष्वक् पतन्तु दिद्यवः
दूर्वायाः-इव तन्तवः वि अस्मत् एतु दुः-मतिः देवी जनित्री अजीजनत् भद्रा जनित्री अजीजनत् ॥ ५ ॥

धर्मबिंदुप्रमाणें चोहोंकडे चमकणार्‍या अंतरिक्षांतील झगझगीत उल्का जिकडे तिकडे विखरून पडोत; आणि दूर्वांचे तण भरपूर वाढावे, त्याप्रमाणे बेफाट माजलेल्या कुबुद्धीचें बेट आमच्यांतून पार निपटून टाकलें जावो. आणि या कारणासाठींच देवी अदिति मातेनें तुजला प्रकट केलें आणि ती लोकजननी त्या योगानें कल्याणकर ठरली. ५


दी॒र्घं ह्यङ्कु॒शं य॑था॒ शक्तिं॒ बिभ॑र्षि मन्तुमः ।
पूर्वे॑ण मघवन् प॒दाजो व॒यां यथा॑ यमो दे॒वी जनि॑त्र्यजीजनद्‌भ॒द्रा जनि॑त्र्यजीजनत् ॥ ६ ॥

दीर्घं हि अङ्कुशं यथा शक्तिं बिभर्षि मन्तु-मः
पूर्वेण मघ-वन् पदा अजः वयां यथा यमः देवी जनित्री अजीजनत् भद्रा जनित्री अजीजनत् ॥ ६ ॥

हातांत लांब अंकुश धरावा, त्याप्रमाणे हे विवेकमया, हे ज्ञानमया, तूं आपल्या हातांत आपले शक्तिरूप आयुध वागवितोस; हे भगवंता, तू जन्मरहित; म्हणून एखादा अज जसा आपल्या पुढच्य़ा पायाखाली झाडाची डहाळी दाबून धरतो, त्याप्रमाणे तूं यमरूपाने प्राण्यांचे नियंत्रण करतोस; म्हणूनच देवी (अदिति) मातेने तुजला प्रकट केले आणि त्या योगाने ती लोकजननी कल्याणकारिणी ठरली ६.


नकि॑र्देवा मिनीमसि॒ नकि॒रा यो॑पयामसि मन्त्र॒श्रुत्यं॑ चरामसि ।
प॒क्षेभि॑रपिक॒क्षेभि॒रत्रा॒भि सं र॑भामहे ॥ ७ ॥

नकिः देवाः मिनीमसि नकिः आ योपयामसि मन्त्र-श्रुत्यं चरामसि
पक्षेभिः अपिकक्षेभिः अत्र अभि सं रभामहे ॥ ७ ॥

दिव्य विभूतींनो आम्ही तुमची कोणतीहि आज्ञ बुद्धिपुर:सर मोडीत नाही किंवा तिच्याविषयी अविश्वासहि धरीत नाही. (इतकेच काय पण) तुमच्याकडून मननयोग्य वाक्ये ऐकतो त्याप्रमाणेच आम्ही चालतो; आमचे मित्र आणि अनुयायी यांच्यासह वर्तणूकहि ठेवतो; आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊनच आम्ही तुम्हांला घट्ट कवटाळून धरिले आहे ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३५ (कुमार नचिकेतस्-यम संवादसूक्त)

ऋषी - कुमार यामायन : देवता - यम : छंद - अनुष्टुभ्


यस्मि॑न् वृ॒क्षे सु॑पला॒शे दे॒वैः स॒म्पिब॑ते य॒मः ।
अत्रा॑ नो वि॒श्पतिः॑ पि॒ता पु॑रा॒णाँ अनु॑ वेनति ॥ १॥

यस्मिन् वृक्षे सु-पलाशे देवैः सम्-पिबते यमः
अत्र नः विश्पत् इः पिता पुराणान् अनु वेनति ॥ १ ॥

उत्तम पालवीने डवरलेल्या ज्या वृक्षाखाली जगन्निवास यमराज दिव्यगणांसह सोम प्राशन करितो, त्याच ठिकाणी तो आम्हां प्रजाजनांचा स्वामि आणि पिता यम हा आमच्या पुरातन पूर्वजांवरहि कृपा करो १.


पु॒रा॒णाँ अ॑नु॒वेन॑न्तं॒ चर॑न्तं पा॒पया॑मु॒या ।
अ॒सू॒यन्न् अ॒भ्यचाकशं॒ तस्मा॑ अस्पृहयं॒ पुनः॑ ॥ २ ॥

पुराणान् अनु-वेनन्तं चरन्तं पापया अमुया
असूयन् अभि अचाकशं तस्मै अस्पृहयं पुनरिति ॥ २ ॥

आमच्या पुरातन पूर्वजांवर दयार्द्र दृष्टीने पाहणारा सर्वगामी जो यम त्याला (मी देखील पाहिलें) ह्या असल्या पातकी दुर्बुद्धीने मी मत्सरग्रस्त होतो; तरीहि त्याला अवलोकन करूं शकलो; इतकेंच काय, पण त्याचे पुन: दर्शन व्हावे अशी इच्छा सुद्धां मे बाळगली आहे २.


यं कु॑मार॒ नवं॒ रथं॑ अच॒क्रं मन॒साकृ॑णोः ।
एके॑षं वि॒श्वतः॒ प्राञ्चं॒ अप॑श्य॒न्न् अधि॑ तिष्ठसि ॥ ३ ॥

यं कुमार नवं रथं अचक्रं मनसा अकृणोः
एक-ईषं विश्वतः प्राचं अपश्यन् अधि तिष्ठसि ॥ ३ ॥

हे कुमारा, तूं आपल्या (आकांक्षारूप) मन:संकल्पाने एक नूतन रथ असा बनविला आहेस, की त्याला चाके मात्र नाहीत; पण त्याला एक वासनारूप प्रेरकशक्ति आहे, तिच्या योगाने तो वाटेल तिकडे फिरूं शकतो. हा रथ तुला स्वत:ला दिसत नाही पण त्याच्यावरच तूं आरूढ झाला आहेस ३.


यं कु॑मार॒ प्राव॑र्तयो॒ रथं॒ विप्रे॑भ्य॒स्परि॑ ।
तं सामानु॒ प्राव॑र्तत॒ सं इ॒तो ना॒व्याहि॑तम् ॥ ४ ॥

यं कुमार प्र अवर्तयः रथं विप्रेभ्यः परि
तं साम अनु प्र अवर्तत सं इतः नावि आहितम् ॥ ४ ॥

हे कुमारा, तुझ जो रथ, तूं ज्ञानी सज्जनांच्या समोर इकडे फिरवीत आणलास, त्याच्या पाठोपाठच त्यांनी साम सूक्तयुक्त प्रार्थना तुजवर कृपादृष्टि ठेवण्याविषयी मजकडे पोहोंचली. त्या कारणाने तो तुझा मनोरथ आम्ही येथून परत जाणार्‍या नौकेतच ठेवला आहे (तो पहा) ४.


कः कु॑मा॒रं अ॑जनय॒द्रथं॒ को निर॑वर्तयत् ।
कः स्वि॒त् तद॒द्य नो॑ ब्रूयादनु॒देयी॒ यथाभ॑वत् ॥ ५ ॥

कः कुमारं अजनयत् रथं कः निः अवर्तयत्
कः स्वित् तत् अद्य नः ब्रूयात् अनु-देयी यथा अभवत् ॥ ५ ॥

त्या कुमाराचा पिता कोण; (तो कुमार कोण) तसेंच, रथ बनविला तो कोणी आणि कोणता ? रथाला परत फिरविले ते कोणी ? हा प्रकार आम्हांला कोण समजावून सांगेल ? म्हणजे त्यांतील परत करण्याचा अथवा संचिताचा भाग कोणता ठरला आहे ते आम्हांस समजेल.५.


यथाभ॑वदनु॒देयी॒ ततो॒ अग्रं॑ अजायत ।
पु॒रस्ता॑द्बु॒ध्न आत॑तः प॒श्चान् नि॒रय॑णं कृ॒तम् ॥ ६ ॥

यथा अभवत् अनु-देयी ततः अग्रं अजायत
पुरस्तात् बुध्नः आततः पश्चात् निः-अयनं कृतम् ॥ ६ ॥

हा परत करण्याचा (म्हणजे भोगण्याचा संचित) भाग जसा ठरला असेल, त्याप्रमाणेच पुढे बनाव बनतो. त्याचा गड्डा प्रत्येक प्राण्याच्या पुढेंच असतो, पण त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्‍न मात्र मागाहून होतो ६.


इ॒दं य॒मस्य॒ साद॑नं देवमा॒नं यदु॒च्यते॑ ।
इ॒यं अ॑स्य धम्यते ना॒ळीर॒यं गी॒र्भिः परि॑ष्कृतः ॥ ७ ॥

इदं यमस्य सदनं देव-मानं यत् उच्यते
इयं अस्य धम्यते नाळीः अयं गीः-भिः परि-कृतः ॥ ७ ॥

हे पहा, जगन्नियन्ता जो यम, त्याचे जे स्थान त्याला देवाचेच स्थान म्हणतात. हा ऐका त्याच्या नलिकावाद्याचा निनाद; त्याच्याच देववाणीने तो त्या वाद्यांतून प्रसृत हो‍ऊन अलंकृत झाला आहे ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३६ (मुनिवर्णनसूक्त)

ऋषी - अनुक्रमे १ ते ७ - जूति; वातजूति, विप्रजूति, वृषाणक, करिक्रत, एतश, ऋष्यश्रृंग हे सात ’वातरशन’ ऋषी
देवता - विश्वेदेव : छंद - अनुष्टुभ्


के॒श्य१ग्निं के॒शी वि॒षं के॒शी बि॑भर्ति॒ रोद॑सी ।
के॒शी विश्वं॒ स्वर्दृ॒शे के॒शीदं ज्योति॑रुच्यते ॥ १॥

केशी अग्निं केशी विषं केशी बिभर्ति रोदसी इति
केशी विश्वं स्वः दृशे केशी इदं ज्योतिः उच्यते ॥ १ ॥

ज्याच्या मस्तकावर लांब लांब किरणरूप केश आहेत, तोच महानुभाव सूर्य आपल्या ठिकाणी अग्नीला धारण करितो, तसेंच विषाला धारण करितो, आणि द्यावापृथिवीनाहि धारण करितो. तो रश्मिकेश सूर्य हा अखिल द्युलोक सर्वांना दृग्गोचर होईल अशा रीतीने धारण करितो. म्हणूनच त्याच्या देदीप्यमान तेजाला रश्मिकेश म्हटले आहे १.


मुन॑यो॒ वात॑रशनाः पि॒शङ्गा॑ वसते॒ मला॑ ।
वात॒स्यानु॒ ध्राजिं॑ यन्ति॒ यद्दे॒वासो॒ अवि॑क्षत ॥ २ ॥

मुनयः वात-रशणाः पिशङ्गाः वसते मला
वातस्य अन ध्राजिं यन्ति यत् देवासः अविक्षत ॥ २ ॥

असाच प्रकार ह्या पृथ्वीवर जटाधारी जे मुनि त्यांचा आहे. वायु हाच अशा मुनींची कौपीन बनलेला असतो. त्यांचे अंग धुळीने धूसर आणि मलीन झालेले असते आणि त्यांनी एखादे वस्त्र परिधान केलेच; तर जे पिंगट, मळकट असेल असेच वस्त्र ते नेसतात, आणि वायूच्या झपाट्याच्या वेगाचे अनुकरण करून जेथे दिव्यजनांनाच प्रवेश असतो, तेथेंहि जाऊं शकतात २.


उन्म॑दिता॒ मौने॑येन॒ वाता॒ँ आ त॑स्थिमा व॒यम् ।
शरी॒रेद॒स्माकं॑ यू॒यं मर्ता॑सो अ॒भि प॑श्यथ ॥ ३ ॥

उत्-मदिता मौनेयेन वातान् आ तस्थिम वयं
शरीरा इत् अस्माकं यूयं मर्तासः अभि पश्यथ ॥ ३ ॥

ते उन्मत्ताप्रमाणे वागतात; कोणाशींहि कांही बोलत नाहीत [पण मनाशी असे म्हणत असतात की] आम्ही वायूचे अनुकरण करून वायुरूपच झालो आहो; तर हे मानवांनो, तुम्हाला आतां आमची शरीरेंच फक्त दिसतील. (दुसरे कांही कळणार नाही) ३.


अ॒न्तरि॑क्षेण पतति॒ विश्वा॑ रू॒पाव॒चाक॑शत् ।
मुनि॑र्दे॒वस्य॑-देवस्य॒ सौकृ॑त्याय॒ सखा॑ हि॒तः ॥ ४ ॥

अन्तरिक्षेण पतति विश्वा रूपा अव-चाकशत्
मुनिः देवस्य-देवस्य सौकृत्याय सखा हितः ॥ ४ ॥

अशा प्रकारचा "मुनि" हा अंतरिक्ष मार्गाने जाऊं शकतो, त्याला सर्व वस्तूंची रूपे दिसतात. "मुनि" हा जणों प्रत्येक दिव्यविबुधांचा उपकारक कर्तृत्व मनुष्यांना समजावे म्हणून त्या देवांचा येथे ह्या लोकी राहणारा मित्रच आहे ४.


वात॒स्याश्वो॑ वा॒योः सखाथो॑ दे॒वेषि॑तो॒ मुनिः॑ ।
उ॒भौ स॑मु॒द्राव् आ क्षे॑ति॒ यश्च॒ पूर्व॑ उ॒ताप॑रः ॥ ५ ॥

वातस्य् अ अश्वः वायोः सखा अथो इति देव-इषितः मुनिः
उभौ समुद्रौ आ क्षेति यः च पूर्वः उत अपरः ॥ ५ ॥

मुनि हा वायूचा (म्हणजे वायूला) वेग देणारा, त्याचप्रमाणे तो वायूचा सखा म्हणजे सहायक आहे. म्हणूनच "मुनीला" देवाकडून प्रेरणा होते असे समजतात; त्यायोगाने पूर्वेकडच्या समुद्रापासून तो पश्चिमेकडच्या समुद्रापर्यंत सर्व ठिकाणी आणि दोन्ही समुद्रांवरसुद्धा "मुनि" हा आपले निवासस्थान करूं शकतो ५.


अ॒प्स॒रसां॑ गन्ध॒र्वाणां॑ मृ॒गाणां॒ चर॑णे॒ चर॑न् ।
के॒शी केत॑स्य वि॒द्वान् सखा॑ स्वा॒दुर्म॒दिन्त॑मः ॥ ६ ॥

अप्सरसां गन्धर्वाणां मृगाणां चरणे चरन्
केशी केतस्य विद्वान् सखा स्वादुः मदिन्-तमः ॥ ६ ॥

अप्सरा, गन्धर्व, मृगादि पशू ह्यांपैकी पाहिजे त्यांच्या स्थानामध्ये "मुनि" संचार करूं शकतो. मुनि हा प्रत्येकाचे मनोगत जाणतो आणि त्याचा स्वभाव गोड आणि आनंदी वृत्तीचा असल्याने तो कोणाचाहि मित्र होतो ६.


वा॒युर॑स्मा॒ उपा॑मन्थत् पि॒नष्टि॑ स्मा कुनन्न॒मा ।
के॒शी वि॒षस्य॒ पात्रे॑ण॒ यद्रु॒द्रेणापि॑बत् स॒ह ॥ ७ ॥

वायुरस्मै उप अमन्थत् पिनष्टि स्म कुनन्नमा
केशी विषस्य पात्रेण यत् रुद्रेण अपिबत् सह ॥ ७ ॥

त्याच्यासाठी वायु हा सर्व पदार्थ घोळून घोळून पुसून स्वच्छ करतो आणि अतिशय कठीण, टणक अशा वस्तूंचेहि अगदी पीठ करतो. कारण मुनीने केलेली तपस्याच तशी केलेली असते. ती हीच की मुनीने रुद्राबरोबरच आणि त्याच्याच पात्राने विष प्राशन केलेले असते ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३७ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - अनुक्रमे १ ते ७ - भरद्वाज, कश्यप, गोतम, अत्रि, विश्वामित्र, जमदग्नि, वसिष्ठ हे सप्तर्षि
देवता - विश्वेदेव : छंद - अनुष्टुभ्


उ॒त दे॑वा॒ अव॑हितं॒ देवा॒ उन् न॑यथा॒ पुनः॑ ।
उ॒ताग॑श्च॒क्रुषं॑ देवा॒ देवा॑ जी॒वय॑था॒ पुनः॑ ॥ १॥

उत देवाः अव-हितं देवाः उत् नयथ पुनरिति
उत आगः चक्रुषं देवः देवाः जीवयथ पुनरिति ॥ १ ॥

देवांनो, हा पहा दुर्दैवी मनुष्य अगदी दुर्गतीच्या तळाशी गेला आहे. त्याची हे देवांनो, तुम्ही पुन्हा उन्नति करा. त्याला वर आणा. तसेच हे देवांनो, मी अनेक अपराध केले आहेत. तरीसुद्धां देवांनो, तुम्ही पुन्हां माझ्या जिवांत जीव ये‍ईल असे करा १.


द्वाव् इ॒मौ वातौ॑ वात॒ आ सिन्धो॒रा प॑रा॒वतः॑ ।
दक्षं॑ ते अ॒न्य आ वा॑तु॒ परा॒न्यो वा॑तु॒ यद्रपः॑ ॥ २ ॥

द्वौ इमौ वातौ वातः आ सिन्धोः आ परावतः
दक्षं ते अन्यः आ वातु परा अन्यः वातु यत् रपः ॥ २ ॥

हे दोन प्रकारचे वायु दोन्ही दिशांकडून वाहतात. एक समुद्रावरून आणि दुसरा अगदी दूरच्या लोकांतून वाहतो. त्यापैकी एक वायु आपली झुळूक दाखवून तुझ्या ठिकाणी चातुर्याची तरतरी उत्पन्न करो आणि दुसरा वायु तुझ्यामध्ये जे पातक आहे (जे दोष आहेत) ते घालवून देवो २.


आ वा॑त वाहि भेष॒जं वि वा॑त वाहि॒ यद्रपः॑ ।
त्वं हि वि॒श्वभे॑षजो दे॒वानां॑ दू॒त ईय॑से ॥ ३ ॥

आ वात वाहि भेषजं वि वात वाहि यत् रपः
त्वं हि विश्व-भेषजः देवानां दूतः ईयसे ॥ ३ ॥

गे वायु तूं वाहतोसच तर आमच्याकडे रोगनाशक औषध वाहत आण; पण त्या वेळी हे वायु आमच्यामध्ये जे दोष आहेत, ते मात्र फुंकून उडवून दे. यच्चावत्‌ औषधांचे सर्वस्व तूं आहेस, दिव्य विभूतींचा प्रतिनिधि म्हणून संचार करतोस ३.


आ त्वा॑गमं॒ शंता॑तिभि॒रथो॑ अरि॒ष्टता॑तिभिः ।
दक्षं॑ ते भ॒द्रं आभा॑र्षं॒ परा॒ यक्ष्मं॑ सुवामि ते ॥ ४ ॥

आ त्वा अगमं शन्ताति-भिः अथो इति अरिष्टताति-भिः
दक्षं ते भद्रं आ अभर्षं परा यक्ष्मं सुवां इते ॥ ४ ॥

आमचे कल्याण होईल, तसेंच आमच्या संकटांचा परिहार होईल अशा आशेने मी तुजकडे धांव घेतली आहे; त्या योगाने तुझ्यापासून चातुर्याची तरतरी मी संपादन केली आणि तुझ्याच बळावर क्षयासारख्या असाध्य रोगांचाहि नायनाट करीन ४.


त्राय॑न्तां इ॒ह दे॒वास्त्राय॑तां म॒रुतां॑ ग॒णः ।
त्राय॑न्तां॒ विश्वा॑ भू॒तानि॒ यथा॒यं अ॑र॒पा अस॑त् ॥ ५ ॥

त्रायन्तां इह देवाः त्रायतां मरुतां गणः
त्रायन्तां विश्वा भूतानि यथा अयं अरपाः असत् ॥ ५ ॥

तर हे देवांनो, तुम्ही ह्या ठिकाणीच आमचे रक्षण करा; मरुतांचा समूह देखील आमचे रक्षण करो. सकल भूतमात्र आमचे रक्षण अशा रीतीने करो की हा मानव निर्दोष होईल ५.


आप॒ इद्वा उ॑ भेष॒जीरापो॑ अमीव॒चात॑नीः ।
आपः॒ सर्व॑स्य भेष॒जीस्तास्ते॑ कृण्वन्तु भेष॒जम् ॥ ६ ॥

आपः इत् वा ओं इति भेषजीः आपः अमीव-चातनीः
आपः सर्वस्य भेषजीः ताः ते कृण्वन्तु भेषजम् ॥ ६ ॥

वायूप्रमाणे आपोदेवी ह्या औषधींचे सारसर्वस्वा आहेत. निर्मळ उदकें देखील व्याधींचे उच्चाटन करितात. उतकें ही सर्व रोगांवर औषधच आहेत; तरी ती उदके तुला औषधाप्रमाणे होवोत ६.


हस्ता॑भ्यां॒ दश॑शाखाभ्यां जि॒ह्वा वा॒चः पु॑रोग॒वी ।
अ॒ना॒म॒यि॒त्नुभ्यां॑ त्वा॒ ताभ्यां॒ त्वोप॑ स्पृशामसि ॥ ७ ॥

हस्ताभ्यां दश-शाखाभ्यां जिह्वा वाचः पुरः-गवी
अनामयित्नु-भ्यां त्वा ताभ्यां त्वा उप स्पृशामसि ॥ ७ ॥

दहा शाखा असलेले जे आपले हात त्यांच्यापेक्षा जिव्हा हीच वाचेचे हृद्‌गत झटपट बोलून दाखवितो; पण आतां त्या दशशाख (म्हणजे दहा बोटांच्या) हातांनीच आम्ही तुझ्या अंगाला स्पर्श कारतो. (आणि तुझ्या शरीरांरातील रोगाचा नाश करतो) ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३८ (इंद्रसूक्त)

ऋषी - अंग औरव : देवता - इंद्र : छंद - जगती


व॒ त्य इ॑न्द्र स॒ख्येषु॒ वह्न॑य ऋ॒तं म॑न्वा॒ना व्यदर्दिरुर्व॒लम् ।
यत्रा॑ दश॒स्यन्न् उ॒षसो॑ रि॒णन्न् अ॒पः कुत्सा॑य॒ मन्म॑न्न् अ॒ह्यश्च दं॒सयः॑ ॥ १॥

तव त्ये इन्द्र सख्येषु वह्नयः ऋतं मन्वानाः वि अदर्दिरुः वलं
यत्र दशस्यन् उषसः रिणन् आपः कुत्साय मन्मन् अह्यः च दंसयः ॥ १ ॥

ते जे आमचे पुढारी त्यांनी हे इंद्रा, तुझ्याच आपुलकीमुळे सद्धर्माचा विचार मनांत आणून बल राक्षसाचे अगदी तुकडे तुकडे करून टाकले. पण त्याच्या अगोदर त्याच ठिकाणी तूं उषांचा उत्पन्न करून दिव्य उदकांना बन्धमुक्त केलेस आणि मन:पूर्वक केलेल्या स्तवनांनी प्रसन्न हो‍ऊन वृत्राचे सोबते जे दुसरे अनेक भुजंग त्या सर्वांचा कुत्सासाठी अगदी नायनाट केलास १.


अवा॑सृजः प्र॒स्वः श्व॒ञ्चयो॑ गि॒रीन् उदा॑ज उ॒स्रा अपि॑बो॒ मधु॑ प्रि॒यम् ।
अव॑र्धयो व॒निनो॑ अस्य॒ दंस॑सा शु॒शोच॒ सूर्य॑ ऋ॒तजा॑तया गि॒रा ॥ २ ॥

अव असृजः प्र-स्वः श्वचयः गिरीन् उत् आजः उस्राः अपिबः मधु प्रियं
अवर्धयः वनिनः अस्य दंससा शुशोच सूर्यः ऋत-जातया गिरा ॥ २ ॥

तूं सृष्टीची उत्पत्ति करणार्‍या शक्ति मोकळ्या सोडून दिल्यास; मेघांना भिरकावून दिलेस, पर्वतांना नम्र केलेस, उषारूप प्रकाशवति धेनूंना वर आणलेस आणि मधुर सोमरसाचे प्राशन केलेस. आणि त्यानंतर ज्याच्या सामर्थ्याने तूं वृक्षलतांची अभिवृद्धि करतोस, तोच सूर्य तुझ्या सत्यसंकल्पमय वाणीनेच प्रकाशमान झाला २.


वि सूर्यो॒ मध्ये॑ अमुच॒द्रथं॑ दि॒वो वि॒दद्दा॒साय॑ प्रति॒मानं॒ आर्यः॑ ।
दृ॒ळ्हानि॒ पिप्रो॒रसु॑रस्य मा॒यिन॒ इन्द्रो॒ व्यास्यच् चकृ॒वाँ ऋ॒जिश्व॑ना ॥ ३ ॥

वि सूर्यः मध्ये अमुचत् रथं दिवः विदत् दासाय प्रति-मानं आर्यः
दृळ्हानि पिप्रोः असुरस्य मायिनः इन्द्रः वि आस्यत् चकृ-वान् ऋजिश्वना ॥ ३ ॥

त्या सूर्याने चालतां चालतां आकाशाच्या मध्यभागी आपल रथ क्षणभर थांबवून सोडून दिला; कारण त्या वेळी अधार्मिक जे दास, त्यांना "आर्यजन" हे यथायोग्य प्रतिस्पर्धी भेटले. त्याप्रसंगी नाना प्रकारच्या कपटयुक्त्या लढविणारा जो असुर जाती "प्रिप्रु" त्याच्या बळकट दुर्गांचा इंद्राने ऋजिश्वाविषयींच्या केवळ मित्रप्रेमामुळे विध्वंस केला ३.


अना॑धृष्टानि धृषि॒तो व्यास्यन् नि॒धीँरदे॑वाँ अमृणद॒यास्यः॑ ।
मा॒सेव॒ सूर्यो॒ वसु॒ पुर्यं॒ आ द॑दे गृणा॒नः शत्रू॑ँरशृणाद्वि॒रुक्म॑ता ॥ ४ ॥

अनाधृष्टानि धृषितः वि आस्यत् नि-धीन् अदेवान् अमृणत् अयास्यः
मासाइव सूर्यः वसु पुर्यं आ ददे गृणानः शत्रून् अशृणात् वि-रुक्मता ॥ ४ ॥

त्या दुर्गांवर पूर्वी कोणीहि चढाई केली नव्हती; परंतु शत्रुधर्षक इंद्राने ते दुर्ग पार उच्छन्न करून टाकले. त्याप्रमाणे देवा न मानणारे जे अधार्मिक होते, त्यांचे द्रव्यनिधि त्याने सहज हस्तगत केले. सूर्य जसा चंद्राला प्रकाश अर्पण करतो त्याप्रमाणे इंद्राने भक्तांच्या नगरांना योग्य अशी संपत्ति अर्पण केली. आणि त्यांच्या स्तवनाने प्रसन्न हो‍ऊन आपल्या झगझगीत आयुधाने शत्रूचे तुकडे उडविले ४.


अयु॑द्धसेनो वि॒भ्वा विभिन्द॒ता दाश॑द्वृत्र॒हा तुज्या॑नि तेजते ।
इन्द्र॑स्य॒ वज्रा॑दबिभेदभि॒श्नथः॒ प्राक्रा॑मच् छु॒न्ध्यूरज॑हादु॒षा अनः॑ ॥ ५ ॥

अयुद्ध-सेनः वि-भ्वा वि-भिन्दता दाशत् वृत्र-हा तुज्यानि तेजते
इन्द्रस्य वज्रात् अबिभेत् अभि-श्नथः प्र अक्रामत् शुन्ध्यूः अजहात् उषाः अनः ॥ ५ ॥

इंद्राशी युद्ध करण्याला कोणी देखील धजत नाही असा तो अजिंक्य आणि सर्वव्यापी आहे. शत्रूला छिन्नभिन्न करणार्‍या आपल्या वज्राने तो वृत्रनाशन इंद्र सर्व इच्छित भक्तांना अर्पण करतो. ज्यांना तेजस्विता पाहिजे, त्यांना तेजाने प्रखर करतो. त्यामुळे त्याच्या घातक वज्राला सर्वच भितात. सूर्य, चन्द्र हे निर्मल आहेत, तरी तेहि आपआपल्या गतीने चालूं लागतात. उषा देखील आपला रथ सोडून बाजूला होते ५.


ए॒ता त्या ते॒ श्रुत्या॑नि॒ केव॑ला॒ यदेक॒ एकं॒ अकृ॑णोरय॒ज्ञम् ।
मा॒सां वि॒धानं॑ अदधा॒ अधि॒ द्यवि॒ त्वया॒ विभि॑न्नं भरति प्र॒धिं पि॒ता ॥ ६ ॥

एता त्या ते श्रुत्यानि केवला यत् एकः एकं अकृणोः अयजं
मासां वि-धानं अदधाः अधि द्यवि त्वया वि-भिन्नं भरति प्र-घिं पिता ॥ ६ ॥

ही महत्कृत्ये तुझी आहेत आणि तुझीच केवल कृत्यें श्रवणीय आहेत. तूंच एकट्याने एक यज्ञविमुख राक्षसाला ठार केलेस. महिने कोठून कसे धरावे ते तूंच ठरविलेस आणि म्हणूनच आकाशांत नक्षत्ररूप चक्राच्या परिधीचे जे तूं निरनिराळे विभाग पाडलेस, ते विभाग आजपर्यंत द्यौ पित्याने तसेच धारण केले आहेत ६ .


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १३९ (सवितृ, गंधर्वसूक्त)

ऋषी - विश्वावसु देवगंधर्व : देवता - १-३ - सवितृ; ४-६ - विश्वावसु गंधर्व : छंद - त्रिष्टुभ्


सूर्य॑रश्मि॒र्हरि॑केशः पु॒रस्ता॑त् सवि॒ता ज्योति॒रुद॑या॒ँ अज॑स्रम् ।
तस्य॑ पू॒षा प्र॑स॒वे या॑ति वि॒द्वान् स॒म्पश्य॒न् विश्वा॒ भुव॑नानि गो॒पाः ॥ १॥

सूर्य-रश्मिः हरि-केशः पुरस्तात् सविता ज्योतिः उत् अयान् अजस्रं
तस्य पूषा प्र-सवे याति विद्वान् सम्-पश्यन् विश्वा भुवनानि गोपाः ॥ १ ॥

सूर्यकिरण हेच ज्याचा तेजोविस्तार, असा जो हरित्‌प्रभावान्‌ सविता, त्याने आपला अविरत प्रकाश क्षितिजाच्या वर उंचावून दिला; त्याच्याच धोरणाने सर्व कांही जाणणारा आणि जीवमात्राचे रक्षण करणारा पूषा हा सकल भुवनांचे निरीक्षण करीत संचार करतो १.


नृ॒चक्षा॑ ए॒ष दि॒वो मध्य॑ आस्त आपप्रि॒वान् रोद॑सी अ॒न्तरि॑क्षम् ।
स वि॒श्वाची॑र॒भि च॑ष्टे घृ॒ताची॑रन्त॒रा पूर्वं॒ अप॑रं च के॒तुम् ॥ २ ॥

नृ-चक्षाः एषः दिवः मध्ये आस्ते आपप्रि-वान् रोदसी इति अन्तरिक्षं
सः विश्वाचीः अभि चष्टि घृताचीः अन्तरा पूर्वं अपरं च केतुम् ॥ २ ॥

मानवी प्रजेवर आपला दृष्टिक्षेप करीत करीत आणि द्यावापृथिवी आणि अंतराल ह्यांना प्रकाशाने व्यापून टाकीत हा सविता आकाशाच्या मध्यभागी स्थिर होतो; आणि तेथूनच पूर्वपश्चिम दिशांच्या मध्ये आपल्याच किरणांनी घृताप्रमाणे तकतकीत दिसणार्‍या सर्व प्रदेशांचे तो अवललोकन करतो २.


रा॒यो बु॒ध्नः सं॒गम॑नो॒ वसू॑नां॒ विश्वा॑ रू॒पाभि च॑ष्टे॒ शची॑भिः ।
दे॒व इ॑व सवि॒ता स॒त्यध॒र्मेन्द्रो॒ न त॑स्थौ सम॒रे धना॑नाम् ॥ ३ ॥

रायः बुध्नः सम्-गमनः वसूनां विश्वा रूपा अभि चष्टे शचीभिः
देवः-इव सविता सत्य-धर्मा इन्द्रः न तस्थौ सम्-अरे धनानाम् ॥ ३ ॥

सकल ऐश्वर्याचे मूळ, दिव्य निधींचे भाण्डार, असा हा सविता आपल्या दैवी शक्तीच्या योगाने सर्व प्रकारचे आकार स्पष्ट निदर्शनाला आणतो. म्हणूनच सत्य हाच ज्याचा स्वभावधर्म तो हा सविता ईश्वराप्रमाणेच आहे; इंद्राप्रमाणे तोहि यशोधनासाठी चालणार्‍या संग्रामामध्ये भक्तसयार्थ सज्जच असतो ३.


वि॒श्वाव॑सुं सोम गन्ध॒र्वं आपो॑ ददृ॒शुषी॒स्तदृ॒तेना॒ व्यायन् ।
तद॒न्ववै॒दिन्द्रो॑ रारहा॒ण आ॑सां॒ परि॒ सूर्य॑स्य परि॒धीँर॑पश्यत् ॥ ४ ॥

विश्व-वसुं सोम गन्धर्वं आपः ददृशुषीः तत् ऋतेन वि आयन्
तत् अनु-अवैत् इन्द्रः ररहाणः आसां परि सूर्यस्य परि-धीन् अपश्यत् ॥ ४ ॥

हे सोमा, तुझ्या इच्छेप्रमाणे विश्वावसु गन्धर्वाला पाहण्याची आपोदेवींना उत्कट उच्छा झाली; पण हा उद्देश त्यांना सद्धर्माच्या पालनानेच साध्य झाला; त्या सर्वांना कार्याकडे जोराने प्रवृत्त करणारा जो इंद्र त्याला हा उद्देश तत्काल कळला आणि त्याप्रमाणे सूर्याच्या तेजोवलयाचे अरे उदकाच्या पृष्ठभागावर हेलकावत असलेले सर्वांनी पाहिले ४.


वि॒श्वाव॑सुर॒भि तन् नो॑ गृणातु दि॒व्यो ग॑न्ध॒र्वो रज॑सो वि॒मानः॑ ।
यद्वा॑ घा स॒त्यं उ॒त यन् न वि॒द्म धियो॑ हिन्वा॒नो धिय॒ इन् नो॑ अव्याः ॥ ५ ॥

विश्व-वसुः अभि तत् नः गृणातु दिव्यः गन्धर्वः रजसः वि-मानः
यत् वा घ सत्यं उत यत् न विद्म धियः हिन्वानः धियः इत् नः अव्याः ॥ ५ ॥

तो रजोलोकाचे आक्रमण करणारा दिव्य गन्धर्व विश्वावसु हा आम्हांला जे सत्य असेल ते, आणि जे सत्य आम्हांला अज्ञात असेल ते अशा दोन्ही प्रकारची वस्तुस्थिति समजावून देवो; तो आमची प्रतिभा जागृत करो आणि आमच्या बुद्धीचा विकास करो ५.


सस्निं॑ अविन्द॒च् चर॑णे न॒दीनां॒ अपा॑वृणो॒द्दुरो॒ अश्म॑व्रजानाम् ।
प्रासां॑ गन्ध॒र्वो अ॒मृता॑नि वोच॒दिन्द्रो॒ दक्षं॒ परि॑ जानाद॒हीना॑म् ॥ ६ ॥

सस्निं अविन्दत् चरणे नदीनां अप अवृणोत् दुरः अश्म-व्रजानां
प्र आसां गन्धर्वः अमृतानि वोचत् इन्द्रः दक्षं परि जानात् अहीनाम् ॥ ६ ॥

नद्यांच्या मार्गाने जाऊनच त्याला त्यांच्यावर सत्ता चालविणारा समुद्र त्याला आढळला आणि कोंडलेल्या धेनूच्या पाषाणमय बंदिखान्याची द्वारे इंद्राने मोकळी केली. अशी अमृताप्रमाणे प्रिय वाक्ये जेव्हां त्या आपोदेवींना सांगितली, त्यांतच हेहि सांगितले की आपोदेवींना निरोध करणार्‍या भुजंगाचे चातुर्यबळ इंद्राने अजमावून त्याचा नाश केला ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४० (शुद्धाग्निसूक्त)

ऋषी - अग्नि पावक : देवता - अग्नि : छंद - १-२ - विष्टारपंक्ति; ६ - उपरिष्टाज्ज्योति; अवशिष्ट - सतोबृहती


अग्ने॒ तव॒ श्रवो॒ वयो॒ महि॑ भ्राजन्ते अ॒र्चयो॑ विभावसो ।
बृह॑द्‌भानो॒ शव॑सा॒ वाजं॑ उ॒क्थ्य१ं दधा॑सि दा॒शुषे॑ कवे ॥ १॥

अग्ने तव श्रवः वयः महि भ्राजन्ते अर्चयः विभावसो इतिविभावसो
बृहद्भानो इतिबृहत्-भानो शवसा वाजं उक्थ्यृअं दधासि दाशुषे कवे ॥ १ ॥

हे अग्निदेवा, कीर्ति आणि तारुण्याचा विपुल जोम तुझ्याजवळ निरंतर आहे; हे प्रभामण्डिता, तुझ्या ज्वालांची कान्ति दूरवर प्रकाशत असते; हे दीप्तकिरणा, प्रशंसनीय अशी जी सत्वाढ्यता, ती तूं आपल्या उत्कट बलाने भक्ताला अर्पण करतोस १.


पा॒व॒कव॑र्चाः शु॒क्रव॑र्चा॒ अनू॑नवर्चा॒ उदि॑यर्षि भा॒नुना॑ ।
पु॒त्रो मा॒तरा॑ वि॒चर॒न्न् उपा॑वसि पृ॒णक्षि॒ रोद॑सी उ॒भे ॥ २ ॥

पावक-वर्चाः शुक्र-वर्चाः अनून-वर्चाः उत् इयर्षि भानुना
पुत्रः मातरा वि-चरन् उप अवसि पृणक्षि रोदसी इति उभे इति ॥ २ ॥

तूं पवित्र तेजाचा, शुभ तेजाचा निधि आहेस. तुझ्या तेजोभरांत यत्किंचितहि न्यून नसते. असा तूं आपल्या किरणांनी युक्त हो‍ऊन वेदीवर प्रदीप्त होतोस. सुपुत्र जसा मातेचा समाचार घेऊन कांही उणे असेल ते पुरे करतो, त्याप्रमाणे तूं आपल्या तेजाने उभय लोक पूर्ण भरून सोडतोस २.


ऊर्जो॑ नपाज् जातवेदः सुश॒स्तिभि॒र्मन्द॑स्व धी॒तिभि॑र्हि॒तः ।
त्वे इषः॒ सं द॑धु॒र्भूरि॑वर्पसश्चि॒त्रोत॑यो वा॒मजा॑ताः ॥ ३ ॥

ऊर्जः नपात् जात-वेदः सुशस्ति-भिः मन्दस्व धीति-भिः हितः
त्वे इति इषः सं दधुः भूरि-वर्पसः चित्र-ऊतयः वाम-जाताः ॥ ३ ॥

हे ओजस्वितेच्या प्रभवा, हे सकल वस्तुज्ञानमण्डिता, तुजला आम्ही वेदीवर ध्यानपूर्वक स्थापन केले आहे; तर आमच्या स्तवनांनी तूं हृष्ट हो. नाना प्रकारची रूपे धारण करणार्‍या, अद्‍भुत प्रकाराने रक्षण करणार्‍या, आणि मनोवेधक रीतीने उत्पन्न झालेल्या अशा ज्या उत्साहप्रवृत्ति त्या सर्व तुझ्याच ठिकाणी असतात ३.


इ॒र॒ज्यन्न् अ॑ग्ने प्रथयस्व ज॒न्तुभि॑र॒स्मे रायो॑ अमर्त्य ।
स द॑र्श॒तस्य॒ वपु॑षो॒ वि रा॑जसि पृ॒णक्षि॑ सान॒सिं क्रतु॑म् ॥ ४ ॥

इरज्यन् अग्ने प्रथयस्व जन्तु-भिः अस्मे इति रायः अमर्त्य
सः दर्शतस्य वपुषः वि राजसि पृणक्षि सानसिं क्रतुम् ॥ ४ ॥

क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांना आटोक्यांत ठेऊन, हे मृत्युरहिता, खरे जे ऐश्वर्य ते आम्हांकडे पोहोचवून दे. तूं आपल्या प्रेक्षणीय कान्तीने शोभून जातोस आणि विजय प्राप्त करून देणारा पराक्रम भक्तांच्या ठिकाणी भरपूर ठेवतोस ४.


इ॒ष्क॒र्तारं॑ अध्व॒रस्य॒ प्रचे॑तसं॒ क्षय॑न्तं॒ राध॑सो म॒हः ।
रा॒तिं वा॒मस्य॑ सु॒भगां॑ म॒हीं इषं॒ दधा॑सि सान॒सिं र॒यिम् ॥ ५ ॥

इष्कर्तारं अध्वरस्य प्र-चेतसं क्षयन्तं राधसः महः
रातिं वामस्य सु-भगां महीं इषं दधासि सानसिं रयिम् ॥ ५ ॥

अध्वरयागाला प्रोत्साहन देणारा, उत्कृष्ट ज्ञान देणारा तूं उत्तम कृपाप्रसादाचा सांठा धारण करतोस, त्याप्रमाणेच उत्कृष्ट आणि भाग्यप्रद वरदान, श्रेष्ठ प्रतीची उत्साहवृत्ति आणि विजयश्रीचे वैभव ह्या ज्या देणग्या त्याहि तुझ्यापाशी भरलेल्या आहेत. ५.


ऋ॒तावा॑नं महि॒षं वि॒श्वद॑र्शतं अ॒ग्निं सु॒म्नाय॑ दधिरे पु॒रो जनाः॑ ।
श्रुत्क॑र्णं स॒प्रथ॑स्तमं त्वा गि॒रा दैव्यं॒ मानु॑षा यु॒गा ॥ ६ ॥

ऋत-वानं महिषं विश्व-दर्शतं अग्निं सुम्नाय दधिरे पुरः जनाः
श्रुत्-कर्णं सप्रथः-तमं त्वा गिरा दैव्यं मानुषा युगा ॥ ६ ॥

सद्धर्माचा बोध करणारा, परमश्रेष्ठ, सकल विश्वाला पाहणारा, भक्तांची हांक ऐकणारा अपार विख्यातीने विभूषित अशा तुज अग्नीला तुझे भक्तजन, त्यांना खरे सुख प्राप्त व्हावे म्हणून ह्या मानवी युगामध्ये स्तुतिपूर्वक आपल्यापुढे स्थापन करितात ६.


ॐ तत् सत्


GO TOP