PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १४१ ते १५०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४१ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - अग्नि तापस : देवता - विश्वेदेव : छंद - अनुष्टुभ्


अग्ने॒ अच्छा॑ वदे॒ह नः॑ प्र॒त्यङ् नः॑ सु॒मना॑ भव ।
प्र नो॑ यच्छ विशस्पते धन॒दा अ॑सि न॒स्त्वम् ॥ १॥

अग्ने अच्च वद इह नः प्रत्यङ् नः सु-मनाः भव
प्र नः यच्छ विशः पते धन-दाः असि नः त्वम् ॥ १ ॥

हे अग्निदेवा, येथे आमच्याकडे पाहून आमच्याशी भाषण कर. आमच्या सन्मुख येऊन आम्हांकडे कृपादृष्टीने पहा. हे लोकाधिपते, आम्हांला वरप्रसाद दे. आम्हांला धन देणारा तूंच आहेस १.


प्र नो॑ यच्छत्वर्य॒मा प्र भगः॒ प्र बृह॒स्पतिः॑ ।
प्र दे॒वाः प्रोत सू॒नृता॑ रा॒यो दे॒वी द॑दातु नः ॥ २ ॥

प्र नः यच्चतु अर्यमा प्र भगः प्र बृहस्पतिः
प्र देवाः प्र उत सूनृता रायः देवी ददातु नः ॥ २ ॥

तें उत्कृष्ट धन आम्हांला अर्यमा देवो. भाग्याधिप देवो, बृहस्पतिहि देवो. तसेंच दिव्य विभूति आणि देवी सूनृता अर्थात्‌ सत्य मधुर भाषणाची पुण्याई ही देखील आम्हांला आमचे इच्छित प्राप्त करून देवो २.


सोमं॒ राजा॑नं॒ अव॑सेऽ॒ग्निं गी॒र्भिर्ह॑वामहे ।
आ॒दि॒त्यान् विष्णुं॒ सूर्यं॑ ब्र॒ह्माणं॑ च॒ बृह॒स्पति॑म् ॥ ३ ॥

सोमं राजानं अवसे अग्निं गीः-भिः हवामहे
आदित्यान् विष्णुं सूर्यं ब्रह्माणं च बृहस्पतिम् ॥ ३ ॥

राजा सोम आणि अग्नि ह्यांनी आम्हांवर कृपा करावी म्हणून स्तुतिवाणींच्या योगाने आम्ही त्यांना पाचारण करितो. त्याचप्रमाणे, आदित्य, विष्णु, सूर्य, ब्रह्मा आणि बृहस्पति यांनाहि पाचारण करितो ३.


इ॒न्द्र॒वा॒यू बृह॒स्पतिं॑ सु॒हवे॒ह ह॑वामहे ।
यथा॑ नः॒ सर्व॒ इज् जनः॒ संग॑त्यां सु॒मना॒ अस॑त् ॥ ४ ॥

इन्द्रवायू इति बृहस्पतिं सु-हवा इह हवामहे
यथा नः सर्वः इत् जनः सम्-गत्यां सु-मनाः असत् ॥ ४ ॥

इंद्र, वायु आणि बृहस्पति हे भक्तांकडे सत्वर येतात त्यांनाहि आदराने पाचारण करितो; कारण त्या योगाने आमच्याशी ज्यांचा संबंध ये‍ईल असे सर्वच लोक आमच्याविषयी उत्तम बुद्धि ठेवतील ४.


अ॒र्य॒मणं॒ बृह॒स्पतिं॒ इन्द्रं॒ दाना॑य चोदय ।
वातं॒ विष्णुं॒ सर॑स्वतीं सवि॒तारं॑ च वा॒जिन॑म् ॥ ५ ॥

अर्यमणं बृहस्पतिं इन्द्रं दानाय चोदय
वातं विष्णुं सरस्वतीं सवितारं च वाजिनम् ॥ ५ ॥

तरी, अर्यमा, बृहस्पति, इंद्र, वायु, विष्णु, सरस्वति, सत्त्ववीर सविता (अशा ज्या विभूति) त्यांना आम्हाला वरदान देण्याविषयी हे अग्नि, तूं आग्रह धर ५.


त्वं नो॑ अग्ने अ॒ग्निभि॒र्ब्रह्म॑ य॒ज्ञं च॑ वर्धय ।
त्वं नो॑ दे॒वता॑तये रा॒यो दाना॑य चोदय ॥ ६ ॥

त्वं नः अग्ने अग्नि-भिः ब्रह्म यजं च वर्धय
त्वं नः देव-तातये रायः दानाय चोदय ॥ ६ ॥

हे अग्निरूपा देवा, तूं लौकिक अग्नीच्या द्वाराने आमची प्रार्थना आणि यज्ञ ह्यांची पूर्तता कर. आणि आम्ही ह्याचप्रमाणे देवाची सेवा करावी आणि दानधर्म करावा अशी आम्हांस प्रेरणा कर ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४२ (राक्षोघ्न अग्निसूक्त)

ऋषी - जरितृ सारङ्ग; ३-४ द्रोण; ५-६ - सारिसिक्क; ७-८ - स्तंबमित्र
देवता - अग्नि : छंद - १-२ - जगती; ७-८ - अनुष्टुभ्; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


अ॒यं अ॑ग्ने जरि॒ता त्वे अ॑भू॒दपि॒ सह॑सः सूनो न॒ह्य१न्यदस्त्याप्य॑म् ।
भ॒द्रं हि शर्म॑ त्रि॒वरू॑थं॒ अस्ति॑ त आ॒रे हिंसा॑नां॒ अप॑ दि॒द्युं आ कृ॑धि ॥ १॥

अयं अग्ने जरिता त्वे इति अभूत् अपि सहसः सूनो इति नहि अन्यत् अस्ति आप्यं
भद्रं हि शर्म त्रि-वराऊथं अस्ति ते आरे हिंसानां अप दिद्युं आ कृधि ॥ १ ॥

अग्निदेवा, हा मी तुझे स्तवन करणारा भक्त तुझाच सेवक झालो आहे. हे दर्पदलना, माझा दुसर्‍या कोणाशीहि आप्तपणा नाही. तुझा आश्रय तिप्पट दृढ आणि खरोखरच कल्याणरूप आहे. तर शत्रुघातका अशी जी तुझी झगझगीत तरवार ती आमच्या पासून दूर असूं दे ती आम्हांवर उगारूं नको १.


प्र॒वत् ते॑ अग्ने॒ जनि॑मा पितूय॒तः सा॒चीव॒ विश्वा॒ भुव॑ना॒ न्यृञ्जसे ।
प्र सप्त॑यः॒ प्र स॑निषन्त नो॒ धियः॑ पु॒रश्च॑रन्ति पशु॒पा इ॑व॒ त्मना॑ ॥ २ ॥

प्र-वत् ते अग्ने जनिम पितु-यतः साची-इव विश्वा भुवना नि ऋजसे
प्र सप्तयः प्र सनिषन्त नः धियः पुरः चरन्ति पशु-पाः-इव त्मना ॥ २ ॥

हे अग्नि, तू सर्व प्राणिमात्राला अन्न मिळावे अशीच इच्छा बाळगतोस म्हणूनच तुझा जन्म उत्कृष्ट होय. ही सर्व भुवने तूं एखाद्या प्रेमळ पालकाप्रमाणे आपल्या दीप्तीने सुशोभित करतोस, म्हणून आमचे अश्ववीर (घोडेस्वार) आणि आमच्या सद्बुद्धि ह्यांचा नेहमी विजयच होतो. आमच्या बुद्धि एखाद्या द्वारपालाप्रमाणे आपण हो‍ऊनच (तुझ्या) पुढे जात असतात २.


उ॒त वा उ॒ परि॑ वृणक्षि॒ बप्स॑द्ब॒होर॑ग्न॒ उल॑पस्य स्वधावः ।
उ॒त खि॒ल्या उ॒र्वरा॑णां भवन्ति॒ मा ते॑ हे॒तिं तवि॑षीं चुक्रुधाम ॥ ३ ॥

उत वा ओं इति परि वृणक्षि बप्सत् बहोः अग्ने उलपस्य स्वधावः
उत खिल्याः उर्वराणां भवन्ति मा ते हेतिं तविषीं चुक्रुधाम ॥ ३ ॥

तसेच तूं अरण्ये भक्षण करीत असतां, हे स्वतंत्रा अग्ने, तूं पुष्कळ प्रकारचे तृणादिक न जाळतां तसेंच राखून ठेवतोस, म्हणूनच तुझ्या कृतीने तृणाच्छादित भूमीतून अनेक मार्ग आंखले जातात. यासाठी ज्वालेला क्रोध ये‍ईल असे आमच्या हातून कांही न होवो ३.


यदु॒द्वतो॑ नि॒वतो॒ यासि॒ बप्स॒त् पृथ॑ग् एषि प्रग॒र्धिनी॑व॒ सेना॑ ।
य॒दा ते॒ वातो॑ अनु॒वाति॑ शो॒चिर्वप्ते॑व॒ श्मश्रु॑ वपसि॒ प्र भूम॑ ॥ ४ ॥

यत् उत्-वतः नि-वतः यासि बप्सत् पृथक् एषि प्रगर्धिनी-इव सेना
यदा ते वातः अनु-वाति शोचिः वप्ताइव श्मश्रु वपसि प्र भूम ॥ ४ ॥

तूं जेव्हां पृथ्वीवरील उंचसखल भागांतून एकटाच धगधगत धांवतोस, त्या वेळेस शत्रूच्या प्रदेशांत घुसून प्रळय उडवून देणारी सेनाच आली आहे काय असे वाटते. आणि जेव्हां तुझ्या ज्वालेला अनुकूल अशा तर्‍हेने वायु वाहतो तेव्हां तर वाढलेले केस केशकर्तकाने कापल्याप्रमाणे माजलेल्या रानाचे भूप्रदेश अगदी निर्मळ करतोस ४.


प्रत्य॑स्य॒ श्रेण॑यो ददृश्र॒ एकं॑ नि॒यानं॑ ब॒हवो॒ रथा॑सः ।
बा॒हू यद॑ग्ने अनु॒मर्मृ॑जानो॒ न्यङ्ङ् उत्ता॒नां अ॒न्वेषि॒ भूमि॑म् ॥ ५ ॥

प्रति अस्य श्रेणयः ददृश्रे एकं नि-यानं बहवः रथासः
बाहू इति यत् अग्ने अनु-मर्मृजानः न्यङ् अत्तानां अनु-एषि भूमिम् ॥ ५ ॥

त्याच्या ज्वालांच्या शिखरांच्या ओळी पाहिल्या आणि हे अग्नि, तूं आपले रखरखीत भुजदण्ड उंच सरसावून पुढील सपाट भूमीवरून जेव्हां धांवत सुटतोस, तेव्हां पुष्कळ रथांचे पथकच मैदानांतून धांवत आहे काय असे वाटते ५.


उत् ते॒ शुष्मा॑ जिहतां॒ उत् ते॑ अ॒र्चिरुत् ते॑ अग्ने शशमा॒नस्य॒ वाजाः॑ ।
उच्छ्व॑ञ्चस्व॒ नि न॑म॒ वर्ध॑मान॒ आ त्वा॒द्य विश्वे॒ वस॑वः सदन्तु ॥ ६ ॥

उत् ते शुष्माः जिहतां उत् ते अग्ने शशमानस्य वाजाः
उत् श्वचस्व नि नमः वर्धमानः आ त्वा अद्य विश्वे वसवः सदन्तु ॥ ६ ॥

आतां तुझी प्रखर उष्णता भरपूर वाढो, तुझी दीप्तज्वालाहि उंच होवो; आणि हे अग्नि, तूं (भक्तासाठी) कार्यव्यापृत असतां तुझा सत्ववेग वृद्धिंगत होवो. आपल्या ज्वालेने एकदम एकवटून विस्तृत हो‍ऊन मग प्रशान्त हो आणि आज सर्व दिव्यनिधि तुझ्या सभोंवार बसून राहोत ६.


अ॒पां इ॒दं न्यय॑नं समु॒द्रस्य॑ नि॒वेश॑नम् ।
अ॒न्यं कृ॑णुष्वे॒तः पन्थां॒ तेन॑ याहि॒ वशा॒ँ अनु॑ ॥ ७ ॥

अपां इदं नि-अयनं समुद्रस्य नि-वेशनं
अन्यङ् कृणुष्व इतः पन्थां तेन याहि वशान् अनु ॥ ७ ॥

हा पहा समुद्राच्या जलांचा आशय. हे त्या जलांचे निवासस्थान. तर आतां येथून तूं दुसरा मार्ग धर आणि त्या मार्गाने तुझ्या इच्छेला ये‍ईल तिकडे जा ७.


आय॑ने ते प॒राय॑णे॒ दूर्वा॑ रोहन्तु पु॒ष्पिणीः॑ ।
ह्र॒दाश्च॑ पु॒ण्डरी॑काणि समु॒द्रस्य॑ गृ॒हा इ॒मे ॥ ८ ॥

आयने ते परायने दूर्वाः रोहन्तु पुष्पिणीः
ह्रदाः च पुण्डरीकाणि समुद्रस्य गृहाः इमे ॥ ८ ॥

तूं जिकडून आलास तेथे आणि जिकडे जाणार आहेस तिकडे फुललेल्या दूर्वांनी भूमि आच्छादित होवो; जिकडे तिकडे पाण्याची सरोवरे आणि त्यांत कमले प्रफुल्लित असोत; खरोखर समुद्राची खास मंदिरे म्हणतात ती हीच ८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४३ (अश्विनीकुमारसूक्त)

ऋषी - अत्रि सांख्य : देवता - अश्विनीकुमार : छंद - अनुष्टुभ्


त्यं चि॒दत्रिं॑ ऋत॒जुरं॒ अर्थं॒ अश्वं॒ न यात॑वे ।
क॒क्षीव॑न्तं॒ यदी॒ पुना॒ रथं॒ न कृ॑णु॒थो नव॑म् ॥ १॥

त्यं चित् अत्रिं ऋत-जुरं अर्थं अश्वं न यातवे
कक्षीवन्तं यदि पुनरिति रथं न कृणुथः नवम् ॥ १ ॥

एखाद्या अश्वाला विजयतोरणांकडे धांवण्यासाठी प्रोत्साहन देऊन सज्ज करावे, त्याप्रमाणे तपश्चर्येच्या कष्टाने क्षीण झालेल्या त्या प्रसिद्ध अत्रिऋषींना आणि त्या कक्षीवानाला तुम्ही पुन्हा बलसंपन्न केलेत. रथाला ताण मारून तो नवीन करावा त्याचप्रमाणे बलसंपन्न केलेत १.


त्यं चि॒दश्वं॒ न वा॒जिनं॑ अरे॒णवो॒ यं अत्न॑त ।
दृ॒ळ्हं ग्र॒न्थिं न वि ष्य॑तं॒ अत्रिं॒ यवि॑ष्ठं॒ आ रजः॑ ॥ २ ॥

त्यं चित् अश्वं न वाजिनं अरेणवः यं अत्नत
दृळ्हं ग्रन्थिं न वि स्यतं अत्रिं यविष्ठं आ रजः ॥ २ ॥

ज्यांचे यश मलिन झाले नाही, अशा अशूर पुरुषांनी लढाऊ अश्ववीराला रणांत पुन्हा घेऊन जावे, त्याप्रमाणे हे अश्वीहो, तुम्ही संकटाची गांठ उलगडून अत्रिऋषीला मालिन्यापासून मुक्त करून अगदी तरुण केलेत २.


नरा॒ दंसि॑ष्ठ॒व् अत्र॑ये॒ शुभ्रा॒ सिषा॑सतं॒ धियः॑ ।
अथा॒ हि वां॑ दि॒वो न॑रा॒ पुन॒ स्तोमो॒ न वि॒शसे॑ ॥ ३ ॥

नरा दंसिष्ठौ अत्रये शुभ्रा सिसासतं धियः
अथ हि वां दिवः नरा पुनरिति स्तोमः न विशसे ॥ ३ ॥

अत्यद्‍भुत चमत्कृति दाखविणार्‍या शूरांनो, तुम्ही अत्रीला प्रज्ञा दिलीत, म्हणूनच हे दिव्य वीरांनो, तुमचे स्तवन कधी बंद पडत नाही ३.


चि॒ते तद्वां॑ सुराधसा रा॒तिः सु॑म॒तिर॑श्विना ।
आ यन् नः॒ सद॑ने पृ॒थौ सम॑ने॒ पर्ष॑थो नरा ॥ ४ ॥

चिते तत् वां सु-राधसा रातिः सु-मतिः अश्विना
आ यत् नः सदने पृथौ समने पर्षथः नरा ॥ ४ ॥

हे सुप्रसाद अश्वी देवांनो, तुमची ती औदार्याची देणगी आणि वात्सल्यबुद्धि कोणाच्याहि निरंतर ध्यानांत राहील. कारण हे शूरांनो, आम्ही प्रशस्त यज्ञमंदिरांत असलो काय आणि रणांत असलो काय दोन्ही ठिकाणी तुम्ही आमचे हेतु तडीसच नेतां ४.


यु॒वं भु॒ज्युं स॑मु॒द्र आ रज॑सः पा॒र ई॑ङ्खि॒तम् ।
या॒तं अच्छा॑ पत॒त्रिभि॒र्नास॑त्या सा॒तये॑ कृतम् ॥ ५ ॥

युवं भुज्युं समुद्रे आ रजसः पारे ईङ्खितं
यातं अच्च पतत्रि-भिः नासत्या सातये कृतम् ॥ ५ ॥

भुज्यु हा समुद्रांमध्ये लाटांवर उसळत अगदी दृष्टीच्या पलीकडे वहात गेला, तेव्हां हे सत्यस्वरूप अश्वीहो, तुम्ही त्याच्याकडे आपल्या पक्षिवाहनांतून गेलांत आणि त्याने समुद तरून जावे तशी व्यवस्था केलीत ५.


आ वां॑ सु॒म्नैः शं॒यू इ॑व॒ मंहि॑ष्ठा॒ विश्व॑वेदसा ।
सं अ॒स्मे भू॑षतं न॒रोत्सं॒ न पि॒प्युषी॒रिषः॑ ॥ ६ ॥

आ वां सुम्नैः शंयूइवेतिशंयू-इव मंहिष्ठा विश्व-वेदसा
सं अस्मे इति भूषतं नरा उत्सं न पिप्युषीः इषः ॥ ६ ॥

अत्युदार देवांनो, सकल ऐश्वर्यसंपन्नांनो, लोक सुखतत्पर राजाप्रमाणे तुम्ही उभयतां आपल्या कल्याणदायी वरदानांसह आमच्या सन्निध राहा. हे शूरांनो, जोराने वाहणार्‍या आणि तुडुंब भरून जाणार्‍या प्रवाहाप्रमाणे तुम्ही आम्हांमध्ये उत्साहाची भरती आणा ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४४ (इंद्रसूक्त)

ऋषी - सुपर्ण तार्क्ष्य अथवा ऊर्ध्वकृशन यामायन : देवता - इंद्र
छंद - २ - बृहती; ५ - सतोबृहती; ६ - विष्टापंक्ति; अवशिष्ट - गायत्री


अ॒यं हि ते॒ अम॑र्त्य॒ इन्दु॒रत्यो॒ न पत्य॑ते ।
दक्षो॑ वि॒श्वायु॑र्वे॒धसे॑ ॥ १ ॥

अयं हि ते अमर्त्यः इन्दुः अत्यः न पत्यते
दक्षः विश्व-आयुः वेधसे ॥ १ ॥

हे देवा ! हा अमृतमय सोमरस तुझ्याप्रीत्यर्थ आहे; अश्ववीराप्रमाणे तो आपला अधिकार चालवितो; कारण तो कर्तृत्वकुशल आणि सृष्टिनियमनासाठी विश्वाचे जीवनच झाला आहे १.


अ॒यं अ॒स्मासु॒ काव्य॑ ऋ॒भुर्वज्रो॒ दास्व॑ते ।
अ॒यं बि॑भर्त्यू॒र्ध्वकृ॑शनं॒ मदं॑ ऋ॒भुर्न कृत्व्यं॒ मद॑म् ॥ २ ॥

अयं अस्मासु काव्यः ऋभुः वज्रः दास्वते
अयं बिभर्ति ऊर्ध्व-कृशनं मदं ऋभुः न कृत्व्यं मदम् ॥ २ ॥

आम्हां मानवांमध्ये हा रस दानशील उपासकाला स्फूर्ति देणारा आहे. हा ऋभू आहे. आणि इंद्राचे वज्रहि हाच आहे. मौक्तिकापमाणे तेजस्वी उल्लसितपणा आणि ऋभूंप्रमाणे कर्तृत्वप्रेरक अशी तल्लीनता त्याच्याच ठिकाणी असते २.


घृषुः॑ श्ये॒नाय॒ कृत्व॑न आ॒सु स्वासु॒ वंस॑गः ।
अव॑ दीधेदही॒शुवः॑ ॥ ३ ॥

घृषुः श्येनाय कृत्वने आसु स्वासु वंसगः
अव दीधेत् अहीशुवः ॥ ३ ॥

तो दीप्तिमान सोमपल्लव कर्तृत्वशाली श्येनाच्या हातांमध्ये आणि ह्या येथील लतादिकांमध्ये त्यांना प्रिय हो‍ऊन राहिला आहे, ही गोष्ट अहीशुवाने ध्यानांत धरावी ३.


यं सु॑प॒र्णः प॑रा॒वतः॑ श्ये॒नस्य॑ पु॒त्र आभ॑रत् ।
श॒तच॑क्रं॒ योऽ॒ह्यो वर्त॒निः ॥ ४ ॥

यं सु-पर्णः परावतः श्येनस्य पुत्रः आ अभरत्
शत-चक्रं यः अह्यः वर्तनिः ॥ ४ ॥

श्येनाचा पुत्र जो सुपर्ण त्याने ह्या सोमाला स्वर्गातून भूलोकी आणले. तो शंभर चाकांच्या रथाप्रमाणे वेगवान आहे. "अहि" भुजंगाच्या मार्गानेंहि जो सुखरूप येऊं शकतो त्याला भूलोकी आणले ४.


यं ते॑ श्ये॒नश्चारुं॑ अवृ॒कं प॒दाभ॑रदरु॒णं मा॒नं अन्ध॑सः ।
ए॒ना वयो॒ वि ता॒र्यायु॑र्जी॒वस॑ ए॒ना जा॑गार ब॒न्धुता॑ ॥ ५ ॥

यं ते श्येनः चारुं अवृकं पदा आ अभरत् अरुणं मानं अन्धसः
एना वयः वि तारि आयुः जीवसे एना जागार बन्धुता ॥ ५ ॥

जो मनोहर, जो निरुपद्रवी आरक्त वर्ण आणि मधुर पेयाचे सर्वस्व आहे असा हा सोमपल्लव हे देवा, तुझ्याप्रीत्यर्थ श्येनाने आणला. ह्याच्या योगाने तारुण्याचा आवेश येतो आणि मनुष्याने उत्तम रीतीने जगावे म्हणून त्याचे आयुष्य वाढते; आणि ह्याच्या योगाने बन्धुभाव जागृत राहतो ५.


ए॒वा तदिन्द्र॒ इन्दु॑ना दे॒वेषु॑ चिद्धारयाते॒ महि॒ त्यजः॑ ।
क्रत्वा॒ वयो॒ वि ता॒र्यायुः॑ सुक्रतो॒ क्रत्वा॒यं अ॒स्मदा सु॒तः ॥ ६ ॥

एव तत् इन्द्रः इन्दुना देवेषु चित् धारयाते महि त्यजः
क्रत्वा वयः वि तारि आयुः सुक्रतो इतिसु-क्रतो क्रत्वा अयं अस्मत् आ सुतः ॥ ६ ॥

ह्याप्रमाणे सोमरसाच्या योगाने इंद्र हा दिव्य विभूतिंमध्ये शत्रूवर चालून जाण्याचा प्रचण्ड आवेश उत्पन्न करतो; त्याच्या प्रभावाने हे अपार पराक्रमी इंद्रा, आमचाहि आवेश आणि आयुष्य वाढेल असे कर आणि म्हणूनच हे अपारकर्तृत्वा, आम्ही आपल्याकडून हा रस पिळून अर्पण केला आहे ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४५ (सपत्नीरनाशन सूक्त)

ऋषी - इंद्राणी : देवता - सपत्‍नीनाशन : छंद - ६ - पंक्ति; अवशिष्ट - अनुष्टुभ्


इ॒मां ख॑ना॒म्योष॑धिं वी॒रुधं॒ बल॑वत्तमाम् ।
यया॑ स॒पत्नीं॒ बाध॑ते॒ यया॑ संवि॒न्दते॒ पति॑म् ॥ १॥

इमां खनामि ओषधिं वीरुधं बलवत्-तमां
यया स-पत्नीं बाधते यया सम्-विन्दते पतिम् ॥ १ ॥

ह्या औषधीला, ह्या अत्यंत प्रभावी लतेला मी भूमीतून खणून काढले. कारण जी दुसरी कोणी स्त्री सवत हो‍ऊं पहाते, तिला ह्या औषधीच्या योगाने अडथळा उत्पन्न होतो आणि वरकांक्षिणी वधूला योग्य पतीचा लाभ होतो १.


उत्ता॑नपर्णे॒ सुभ॑गे॒ देव॑जूते॒ सह॑स्वति ।
स॒पत्नीं॑ मे॒ परा॑ धम॒ पतिं॑ मे॒ केव॑लं कुरु ॥ २ ॥

उत्तान-पर्णे सु-भगे देव-जूते सहस्वति
स-पत्नीं मे परा धम पतिं मे केवलं कुरु ॥ २ ॥

जिची पाने अगदी टवटवीत आहेत अशा हे मंगल औषधि तुला देवतांनीच पाठविले आहे; तर जी माझी सवत हो‍ऊं पहात आहे तिला दूर उडवून दे आणि माझा पति फक्त मला एकटीलाच लाभेल असे कर २.


उत्त॑रा॒हं उ॑त्तर॒ उत्त॒रेदुत्त॑राभ्यः ।
अथा॑ स॒पत्नी॒ या ममाध॑रा॒ साध॑राभ्यः ॥ ३ ॥

उत्-तरा अहं उत्-तरे उत्-तरा इत् उत्-तराभ्यः
अथ स-पत्नी या मम अधरा सा अधराभ्यः ॥ ३ ॥

उत्तमांत उत्तम मी आहे, आणि उत्तमांतील उत्तम अशी हे औषधि तूं आहेस; पण माझी जी सवत आहे, ती मात्र अगदी हलक्यांतली हलकी आहे ३.


न॒ह्यस्या॒ नाम॑ गृ॒भ्णामि॒ नो अ॒स्मिन् र॑मते॒ जने॑ ।
परां॑ ए॒व प॑रा॒वतं॑ स॒पत्नीं॑ गमयामसि ॥ ४ ॥

नहि अस्याः नाम गृभ्णामि नो इति अस्मिन् रमते जने
परां एव परावतं स-पत्नीं गमयामसि ॥ ४ ॥

मी तर तिचे नांवहि घेत नाही आणि मीहि तिला आवडत नाही; म्हणून परकी अशी जी ही सवत तिला लांब दूरच्या ठिकाणी घालवून देऊं या ४.


अ॒हं अ॑स्मि॒ सह॑मा॒नाथ॒ त्वं अ॑सि सास॒हिः ।
उ॒भे सह॑स्वती भू॒त्वी स॒पत्नीं॑ मे सहावहै ॥ ५ ॥

अहं अस्मि सहमाना अथ त्वं असि ससहिः
उभे इति सहस्वती इति भूत्वी स-प्त्नीं मे सहावहै ॥ ५ ॥

मी प्रतिस्पर्ध्याला पादाक्रांत करणारी आहे, आणि तूंहि शत्रुनाशकच आहेस; तर आपण दोघीहि शत्रुमर्दन हो‍ऊन माझ्या सवतीला पराभूत करून टाकूं ५.


उप॑ तेऽधां॒ सह॑मानां अ॒भि त्वा॑धां॒ सही॑यसा ।
मां अनु॒ प्र ते॒ मनो॑ व॒त्सं गौरि॑व धावतु प॒था वारि॑व धावतु ॥ ६ ॥

उप ते अधां सहमानां अभि त्वा अधां सहीयसा
मां अनु प्र ते मनः वत्सं गौः-इव धावतु पथा वाः-इव धावतु ॥ ६ ॥

मी प्रतिस्पर्धी सवतीला नामोहरम करून तुझ्याकडे आले आहे; कारण तूंहि अरिमर्दनच आहेस; तर वासराकडे जशी गाय, किंवा उतरल्या वाटेने पाणी जसे जोराने धांवते, त्याप्रमाणे तुझे मन माझ्याकडे धांव घेऊं दे ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४६ अरण्यानीसूक्त)

ऋषी - देवमुनि ऐरम्मद : देवता - अरण्यानी : छंद - अनुष्टुभ्


अर॑ण्या॒न्यर॑ण्यान्य॒सौ या प्रेव॒ नश्य॑सि ।
क॒था ग्रामं॒ न पृ॑च्छसि॒ न त्वा॒ भीरि॑व विन्दती३~म् ॥ १॥

अरण्यानि अरण्यान्यि असौ या प्र-इव नश्यसि
कथा ग्रामं न पृच्चसि न त्वा भीः-इव विन्दतैंश्न् ॥ १ ॥

हे अरण्यस्वामिनी वनदेवते, तूं अशी आहेस की पाहतां पाहतां नाहीशी होतेस; पण तूं आम्हां ग्रामवासीयांना कां विचारीत नाहीस ? आम्हांला तू भितेस की काय ? १.


वृ॒षा॒र॒वाय॒ वद॑ते॒ यदु॒पाव॑ति चिच्चि॒कः ।
आ॒घा॒टिभि॑रिव धा॒वय॑न्न् अरण्या॒निर्म॑हीयते ॥ २ ॥

वृषारवाय वदते यत् उप-अवति चिच्चिकः
आघाटिभिः-इव धावयन् अरण्यानिः महीयते ॥ २ ॥

चिरचिर करणारा पक्षी जवळ आला म्हणजे त्याच्याशी, अथवा त्या कर्कश ओरडणार्‍या पक्षांशी किंवा किड्यांशी देखील ही देवता बोलते, आणि घंटानादाने आगमन सूचित व्हावे, त्याप्रमाणे गुणगुण आवाजानेंच ही वनदेवता आपली महति विश्रुत करते २.


उ॒त गाव॑ इवादन्त्यु॒त वेश्मे॑व दृश्यते ।
उ॒तो अ॑रण्या॒निः सा॒यं श॑क॒टीरि॑व सर्जति ॥ ३ ॥

उत गावः-इव अदन्ति उत वेश्म-इवदृश्यते
उतो इति अरण्यानिः सायं शकटीः-इव सर्जति ॥ ३ ॥

हिच्या रानांत कोठे कोठे गाई चरत असतात, कोठे कोठे राहण्याच्या झोपड्याहि दृष्टीस पडतात, आणि कोठे कोठे संध्याकाळी जेव्हां गाड्या परत फिरतात त्यांना ही वनदेवताच जणो घरी आणून सोडते ३.


गां अ॒ङ्गैष आ ह्व॑यति॒ दार्व् अ॒ङ्गैषो अपा॑वधीत् ।
वस॑न्न् अरण्या॒न्यां सा॒यं अक्रु॑क्ष॒दिति॑ मन्यते ॥ ४ ॥

गां अङ्ग एषः आ ह्वयति दारु अङ्ग एषः अप अवधीत्
वसन् अरण्यान्यां सायं अक्रुक्षत् इति मन्यते ॥ ४ ॥

हा पहा कोणी आपल्या गाईला हांक मारतो आहे. पहा, इकडे ह्या दुसर्‍या कोणी हे झाड तोडले आहे; पण संध्याकाळ झाली म्हणून जो अरण्यातच राहतो, त्याला मात्र येथे कोणी तरी ओरडते आहे असे वाटते ४.


न वा अ॑रण्या॒निर्ह॑न्त्य॒न्यश्चेन् नाभि॒गच्छ॑ति ।
स्वा॒दोः फल॑स्य ज॒ग्ध्वाय॑ यथा॒कामं॒ नि प॑द्यते ॥ ५ ॥

न वै अरण्यानिः हन्ति अन्यः च इत् न अभि-गच्चति
स्वादोः फलस्य जग्ध्वाय यथाकामं नि पद्यते ॥ ५ ॥

पण खरे पाहतां ही वनदेवता कोणालाच इजा करीत नाही; पण येथे श्वापदाशिवाय मात्र दुसरे कोणीच भेटणार नाही; तरी येथे जो राहणारा असेल तो मात्र ह्या वनांतील मधुर फळे खाऊन इच्छेस ये‍ईल तितका वेळ पडून राहू शकेल ५.


आञ्ज॑नगन्धिं सुर॒भिं ब॑ह्व॒न्नां अकृ॑षीवलाम् ।
प्राहं मृ॒गाणां॑ मा॒तरं॑ अरण्या॒निं अ॑शंसिषम् ॥ ६ ॥

आजन-गन्धिं सुरभिं बहु-अन्नां अकृषि-वलां
प्र अहं मृगाणां मातरं अरण्यानिं अशंसिषम् ॥ ६ ॥

रानांतील सुगंधि लता ह्यांचेच उटणे ही वनदेवता लावते. ही स्वत:हि सुवासिक आहे. हिच्याजवळ खाद्यपदार्थहि भरपूर आहेत. आणि ते उत्पन्न करण्याला जमीन नांगरावी लागत नाही; जी मृगादिक अरण्यपशूंना आईप्रमाणे वाटते, त्या वनदेवतेची प्रशस्ति मी यथामति केली आहे ६.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४७ (इंद्रसूक्त)

ऋषी - सुवेदस् शैरीषि : देवता - इंद्र : छंद - ५ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


श्रत् ते॑ दधामि प्रथ॒माय॑ म॒न्यवेऽ॑ह॒न् यद्वृ॒त्रं नर्यं॑ वि॒वेर॒पः ।
उ॒भे यत् त्वा॒ भव॑तो॒ रोद॑सी॒ अनु॒ रेज॑ते॒ शुष्मा॑त् पृथि॒वी चि॑दद्रिवः ॥ १॥

श्रत् ते दधामि प्रथमाय मन्यवे अहन् यत् वृत्रं नर्यं विवेः अपः
उभे इति यत् त्वा भवतः रोदसी इति अनु रेजते शुष्मात् पृथिवी चित् अद्रि-वः ॥ १ ॥

देवा, तुझा अगदी पुरातन उच्चतम जो आवेश त्याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. त्या आवेशानेच तूं वृत्राचा वध करून मानव जातीवरील तुझ्या परोपकाराचे कार्य घडवून आणलेस; त्या कारणानेच ह्या द्यावापृथिवी (रोदसी) देखील तुझ्याच अनुराधाने वागतात; हे वज्रधरा, तशीच ही पृथिवी देखील तुझ्या त्वेषाला भिऊन कांपत धांवत असते १.


त्वं मा॒याभि॑रनवद्य मा॒यिनं॑ श्रवस्य॒ता मन॑सा वृ॒त्रं अ॑र्दयः ।
त्वां इन् नरो॑ वृणते॒ गवि॑ष्टिषु॒ त्वां विश्वा॑सु॒ हव्या॒स्व् इष्टि॑षु ॥ २ ॥

त्वं मायाभिः अनवद्य मायिनं श्रवस्यता मनसा वृत्रं अर्दय
त्वां इत् नरः वृणते गविष्टिषु त्वां विश्वासु हव्यासु इष्टिषु ॥ २ ॥

हे निष्कलंका, युद्धांत यश मिळविण्याचे मनांत आणून तूं त्या कपटपटु वृत्राला आपल्या अतर्क्य मायेनेच ठार केलेस. प्रकाशधेनूच्या प्राप्तिची इच्छा झाली म्हणजे त्या कार्यांत शूर पुरुष तुझ्याच साहाय्याची याचना करितात; आणि आहुति देऊन जी इष्टि करावयाची त्या सर्व इष्टीमध्ये तुझीच प्रार्थना करितात २.


ऐषु॑ चाकन्धि पुरुहूत सू॒रिषु॑ वृ॒धासो॒ ये म॑घवन्न् आन॒शुर्म॒घम् ।
अर्च॑न्ति तो॒के तन॑ये॒ परि॑ष्टिषु मे॒धसा॑ता वा॒जिनं॒ अह्र॑ये॒ धने॑ ॥ ३ ॥

आ एषु चाकन्धि पुरु-हूत सूरिषु वृधासः ये मघ-वन् आनशुः मघं
अर्चन्ति तोके तनये परिष्टिषु मेध-साता वाजिनं अह्वये धने ॥ ३ ॥

तर सकलजनस्तुता देवा, हे जे आमचे धुरीण आहेत, त्यांच्याविषयी तूं प्रेमबुद्धि धारण कर. हे भगवंता, त्यांचा उत्कर्ष हो‍ऊन त्यांना ऐश्वर्य मिळालेंच आहे. कारण जरी आमचे धुरीण आपल्या मुलाबाळांत असले, वा अनेक कार्यात व्यग्र असले, अथवा एकाग्र बुद्धीने ध्यान करीत असले, किंवा ज्या प्रकारचे धनसंपादन करण्यांत कोणतेहि लज्जास्पत कृत्य करावे लागत नाही अशा कार्यात निमग्न असले, तरी सत्ववीर जो तूं त्या तुझेच स्तवन ते मोठ्या प्रेमाणे करीत असतात ३.


स इन् नु रा॒यः सुभृ॑तस्य चाकन॒न् मदं॒ यो अ॑स्य॒ रंह्यं॒ चिके॑तति ।
त्वावृ॑धो मघवन् दा॒श्वध्वरो म॒क्षू स वाजं॑ भरते॒ धना॒ नृभिः॑ ॥ ४ ॥

सः इत् नु रायः सु-भृतस्य चाकनत् मदं यः अस्य रंह्यं चिकेतति
त्वावृधः मघ-वन् दाशु-अध्वरः मक्षु सः वाजं भरते धना नृ-भिः ॥ ४ ॥

उत्तम रीतीने मिळविलेले वैभव ह्या (इंद्रा) च्या तीव्र तल्लीनतेची ओळख जो बाळगतो, त्यालाच योग्य दिसते. हे भगवंता, तुझ्या कृपेने ज्याचा उत्कर्ष होणार तोच भक्त तुला आपला यज्ञ अर्पण करतो आणि तोच आपल्या मित्रांसह सत्वाढ्यता आणि यशोधन ह्यांचा त्वरित लाभ करून घेतो ४.


त्वं शर्धा॑य महि॒ना गृ॑णा॒न उ॒रु कृ॑धि मघवञ् छ॒ग्धि रा॒यः ।
त्वं नो॑ मि॒त्रो वरु॑णो॒ न मा॒यी पि॒त्वो न द॑स्म दयसे विभ॒क्ता ॥ ५ ॥

त्वं शर्धाय महिना गृणानः उरु कृधि मघ-वन् शग्धि रायः
त्वं नः मित्रः वरुणः न मायी पित्वः न दस्म दयसे वि-भक्ता ॥ ५ ॥

आमच्या सैन्याच्या प्रबलतेसाठी आम्ही तुझ्या महिम्याचे स्तवन करीत आहो, तर भगवंता, तूं आमचा मार्ग मोकळा आणि प्रशस्त कर, आम्हांला वैभव दे. अतर्क्यशक्ति वरुण जसा, तसाच तूंहि आमचा मित्र आहेस. म्हणून हे अद्‍भुत कर्तृत्वा देवा, तूं जसे प्राणिमात्रांना अन्न देतोस, तसाच आम्हांलाहि भाग्यदाता हो ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४८ (इंद्रसूक्त)

ऋषी - पृथु वैन्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


सु॒ष्वा॒णास॑ इन्द्र स्तु॒मसि॑ त्वा सस॒वांस॑श्च तुविनृम्ण॒ वाज॑म् ।
आ नो॑ भर सुवि॒तं यस्य॑ चा॒कन् त्मना॒ तना॑ सनुयाम॒ त्वोताः॑ ॥ १॥

सुस्वानासः इन्द्र स्तुमसि त्वा सस-वांसः च तुवि-नृम्ण वाजं
आ नः भर सुवितं यस्य चाकन् त्मना तना सनुयाम त्वाऊताः ॥ १ ॥

इंद्रा, आम्ही उत्तम प्रकारें सोमरस काढून तुझे स्तवन करीत असतो; हे अपार पौरुषा देवा, सत्वशौर्य हस्तगत करण्याची आम्हांला इच्छा आहे; पण जे तुला आवडेल तेच आम्हांला श्रेयस्कर असणार; तर असेंच श्रेय आम्हांस दे; म्हणजे तुझेच संरक्षण मिळवून आम्ही स्वत: आपल्या हाताने सोमरस पिळून अर्पण करूं १.


ऋ॒ष्वस्त्वं इ॑न्द्र शूर जा॒तो दासी॒र्विशः॒ सूर्ये॑ण सह्याः ।
गुहा॑ हि॒तं गुह्यं॑ गू॒ळ्हं अ॒प्सु बि॑भृ॒मसि॑ प्र॒स्रव॑णे॒ न सोम॑म् ॥ २ ॥

ऋष्वः त्वं इन्द्र शूर जातः दासीः विशः सूर्येण सह्याः
गुहा हितं गुह्यं गूळ्हं अप्-सु बिभृमसि प्र-स्रवणे न सोमम् ॥ २ ॥

हे शूरा इंद्रा, धीरोदात्त असाच तूं प्रकट झालास आणि लोकांना त्रास देणार्‍या अधार्मिक जातीचे तूं सूर्यप्रकाशाच्या योगाने निर्दलन केलेस. त्याचप्रमाणे अनेक निर्झर ज्यावरून वाहात आहेत, अशा पर्वतामध्ये जसा आम्हांला सोमपल्लव सांपडला, तसेच अगदी गुहेमध्ये उदकांत लपवून ठेवल्या प्रमाणे जे ज्ञानाचे गुप्त रहस्य होते तेंहि आम्हांस सांपडले २.


अ॒र्यो वा॒ गिरो॑ अ॒भ्यर्च वि॒द्वान् ऋषी॑णां॒ विप्रः॑ सुम॒तिं च॑का॒नः ।
ते स्या॑म॒ ये र॒णय॑न्त॒ सोमै॑रे॒नोत तुभ्यं॑ रथोळ्ह भ॒क्षैः ॥ ३ ॥

अर्यः वा गिरः अभि अर्च विद्वान् ऋषीणां विप्रः सु-मतिं चकानः
ते स्याम ये रणयन्त सोमैः एना उत तुभ्यं रथ-ओळ्ह भक्षैः ॥ ३ ॥

तूं आमचा प्रभु आहेस; तूं सर्वज्ञ आणि ऋषींच्या प्रेमळ स्तवनांचा मार्मिक ज्ञाता आहेस; तर तूं आम्ही केलेल्या स्तुतींचीहि वाखाणणी कर; म्हणजे ह्या सोमरसाच्या योगाने आम्ही भक्तीत रंगून जाऊं आणि हे रथारूढा अर्पण केलेल्या या मिष्टान्नांनी तुजला प्रसन्न करून घेऊं ३.


इ॒मा ब्रह्मे॑न्द्र॒ तुभ्यं॑ शंसि॒ दा नृभ्यो॑ नृ॒णां शू॑र॒ शवः॑ ।
तेभि॑र्भव॒ सक्र॑तु॒र्येषु॑ चा॒कन्न् उ॒त त्रा॑यस्व गृण॒त उ॒त स्तीन् ॥ ४ ॥

इमा ब्रह्म इन्द्र तुभ्यं शंसि दाः नृ-भ्यः नृणां शूर शवः तेभिः भव स-क्रतुः येषु चाकन् उत त्रायस्व गृणतः उत स्तीन् ॥ ४ ॥

इंद्रा, ही प्रार्थनास्तोत्रे आम्ही तुझ्या प्रसन्नतेसाठी म्हटली आहेत; तर शूरांमध्येंहि शूर अशा देवा, तूं आमच्या सैनिकांना उत्कृष्ट बल अर्पण कर; ज्यांच्यामध्ये येऊन राहण्याला तुजला हौस वाटते, त्या ह्या आमच्या सैनिकांना घेऊन तूं पराक्रम कर; आणि तुझे स्तवन करणारे आम्ही भक्त आणि आमच्या प्रदेशांतील लोक ह्या सर्वांचे तूं रक्षण कर ४.


श्रु॒धी हवं॑ इन्द्र शूर॒ पृथ्या॑ उ॒त स्त॑वसे वे॒न्यस्या॒र्कैः ।
आ यस्ते॒ योनिं॑ घृ॒तव॑न्तं॒ अस्वा॑रू॒र्मिर्न निम्नैर्द्र॑वयन्त॒ वक्वाः॑ ॥ ५ ॥

श्रुधि हवं इन्द्र शूर पृथ्याः उत स्तवते वेन्यस्य अर्कैः
आ यः ते योनिं घृत-वन्तं अस्वाः ऊर्मिः न निम्नैः द्रवयन्त वक्वाः ॥ ५ ॥

हे वीरा इंद्रा, आमच्या पृथींचा धांवा ऐक, वेन्याच्या ऋक्‌ स्तोत्रांच्या योगानेंहि तुझेच स्तवन चाललेले असते (तेंहि ऐक); ज्या वेन्याने घृतादिकांनी परिपूर्ण आणि घृताप्रमाणे निर्मल आणि तेजस्वी असे जे तुझे निवासस्थान त्याची किती तरी प्रशंसा केली आहे, आणि त्याचे कविजन तर ममत्वरहित मार्गांनी पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे तुझ्याकडे धांवून जात आहेत ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १४९ (सवितृसूक्त)

ऋषी - अर्चत् हैरण्यस्तूप : देवता - सवितृ : छंद - त्रिष्टुभ्


स॒वि॒ता य॒न्त्रैः पृ॑थि॒वीं अ॑रम्णादस्कम्भ॒ने स॑वि॒ता द्यां अ॑दृंहत् ।
अश्वं॑ इवाधुक्ष॒द्धुनिं॑ अ॒न्तरि॑क्षं अ॒तूर्ते॑ ब॒द्धं स॑वि॒ता स॑मु॒द्रम् ॥ १॥

सविता यन्त्रैः पृथिवीं अरम्णात् अस्कम्भने सविता द्यां अदृंहत्
अश्वम्-इव अधुक्षत् धुनिं अन्तरिक्षं अतूर्ते बद्धं सविता समुद्रम् ॥ १ ॥

ज्या जगत्प्रेरक सविता देवाने आपल्या यंत्रांनी अर्थात्‌ नियमांनी पृथ्वीला घनत्व आणले, त्याच सवित्याने खांबावांचून हा द्युलोक उचलून सांवरून धरला आहे. अश्वाला भरधांव सोडावे त्याप्रमाणे जगत् प्रेरक सवित्याने अधांतरी आणि अमर्याद पोकळीमध्ये अंतरिक्षाला जणो हलवून घुसळून टाकले आणि तेथे मोठा आवाज घुमवून दिला, तसेंच तारकांचा समुद्रहि तेथेच डांबून ठेवला १.


यत्रा॑ समु॒द्र स्क॑भि॒तो व्यौन॒दपां॑ नपात् सवि॒ता तस्य॑ वेद ।
अतो॒ भूरत॑ आ॒ उत्थि॑तं॒ रजोऽ॑तो॒ द्यावा॑पृथि॒वी अ॑प्रथेताम् ॥ २ ॥

यत्र समुद्रः स्कभितः वि औनत् अपां नपात् सविता तस्य वेद
अतः भूः अतः आः उत्थितं रजः अतः द्यावापृथिवी इति अप्रथेताम् ॥ २ ॥

ज्या पोकळीत तारकांच्या समुद्राला स्थिर केले, तेथेंच तो उचंबळून गेला. हा समुद्र कोणता ते एक अपानपात्‌ सवित्यालाच माहीत. ह्या पोकळीतच भूमि उत्पन्न झाली. तेथूनच रजोलोक निघाला, आणि त्याच आकाशांत नक्षत्रें आणि पृथिवी ह्यांचा विस्तार झाला २.


प॒श्चेदं अ॒न्यद॑भव॒द्यज॑त्रं॒ अम॑र्त्यस्य॒ भुव॑नस्य भू॒ना ।
सु॒प॒र्णो अ॒ङ्ग स॑वि॒तुर्ग॒रुत्मा॒न् पूर्वो॑ जा॒तः स उ॑ अ॒स्यानु॒ धर्म॑ ॥ ३ ॥

पश्चा इदं अन्यत् अभवत् यजत्रं अमर्त्यस्य भुवनस्य भूना
सु-पर्णः अङ्ग सवितुः गरुत्मान् पूर्वः जातः सः ओं इति अस्य अनु धर्म ॥ ३ ॥

ह्यानंतर त्याच्या पाठीमागून हा अमर विभूतींचा लोक आणि त्याच्या प्रभावाने हे दुसरे यज्ञरूप पवित्र सामर्थ्य उत्पन्न झाले. जगत्प्रेरक सवित्यापासूनच सुपर्ण म्हणजे गरुड हा प्रथमच उत्पन्न झाला. तो सवित्याच्या अनुशासनाप्रमाणे चालतो ३.


गाव॑ इव॒ ग्रामं॒ यूयु॑धिरि॒वाश्वा॑न् वा॒श्रेव॑ व॒त्सं सु॒मना॒ दुहा॑ना ।
पति॑रिव जा॒यां अ॒भि नो॒ न्येतु ध॒र्ता दि॒वः स॑वि॒ता वि॒श्ववा॑रः ॥ ४ ॥

गावः-इव ग्रामं यूयुधिः-इव अश्वान् वाश्राइव वत्सं सु-मनाः दुहाना
पतिः-इव जायां अभि नः नि एतु धर्ता दिवः सविता विश्व-वारः ॥ ४ ॥

वृषभ जसे गावांकडे, योद्धा जसा अश्वांकडे, प्रेमळ पान्हावलेल्या धेनू जशा वासरांकडे, पति जसा पत्निकडे त्याप्रमाणे हा द्युलोकाला सांवरून धरणारा सर्वजनप्रिय सविता आमच्या (स्तुतीकडे) आगमन करो ४.


हिर॑ण्यस्तूपः सवित॒र्यथा॑ त्वाङ्गिर॒सो जु॒ह्वे वाजे॑ अ॒स्मिन् ।
ए॒वा त्वार्च॒न्न् अव॑से॒ वन्द॑मानः॒ सोम॑स्येवां॒शुं प्रति॑ जागरा॒हम् ॥ ५ ॥

हिरण्य-स्तूपः सवितः यथा त्वा आङ्गिरसः जुह्वे वाजे अस्मिन्
एव त्वा अर्चन् अवसे वन्दमानः सोमस्य-इव अंशुं प्रति जागर अहम् ॥ ५ ॥

हे जगत्प्रेरका, अंगिरस कुलोत्पन्न हिरण्यस्तूपभक्त हा सत्त्वप्राप्तीच्या धकाधकीत जसा तुझा मन:पूर्वक धांवा करीत असतो, तसा मीहि तुझ्या कृपेसाठी तुजला प्रणाम करून तुझे स्तवन करून सोमपल्लवाप्रमाणे तुझ्या कृपाकटाक्षासाठी रात्रींच्या रात्री जागून काढीत आहे ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५० (अग्निसूक्त)

ऋषी - मृळीक वासिष्ठ : देवता - अग्नि : छंद - ४-५ - उपरिष्टाज्ज्योति; अवशिष्ट - बृहती


समि॑द्धश्चि॒त् सं इ॑ध्यसे दे॒वेभ्यो॑ हव्यवाहन ।
आ॒दि॒त्यै रु॒द्रैर्वसु॑भिर्न॒ आ ग॑हि मृळी॒काय॑ न॒ आ ग॑हि ॥ १॥

सम्-इद्धः चित् सं इध्यसे देवेभ्यः हव्य-वाहन्
आदित्यैः रुद्रैः वसु-भिः नः आ गहि मृळीकाय नः आ गहि ॥ १ ॥

हे अग्नि, तुला समिधांनी प्रज्वलित केले म्हणजेच हे हविर्वाहका, तूं देवांसाठी योग्य प्रकारे प्रज्वलित होतोस; तर तू आदित्य, रुद्र आणि वसू ह्यांच्यासह येथे आगमन कर. आमच्यावर कृपा करण्यासाठी आगमन कर १.


इ॒मं य॒ज्ञं इ॒दं वचो॑ जुजुषा॒ण उ॒पाग॑हि ।
मर्ता॑सस्त्वा समिधान हवामहे मृळी॒काय॑ हवामहे ॥ २ ॥

इमं यजं इदं वचः जुजुषाणः उप-आगहि
मर्तासः त्वा सम्-इधान हवामहे मृळीकाय हवामहे ॥ २ ॥

हा आमचा यज्ञ, तसेच हे आमचे स्तोत्र तूं संतोषाने स्वीकारावेस म्हणून आमच्याकडे ये आणि म्हणूनच हे उत्तम प्रज्वलित झालेल्या अग्ने आम्ही मर्त्यजन आमच्या कल्याणासाठी तुझा धांवा करीत आहो २.


त्वां उ॑ जा॒तवे॑दसं वि॒श्ववा॑रं गृणे धि॒या ।
अग्ने॑ दे॒वाँ आ व॑ह नः प्रि॒यव्र॑तान् मृळी॒काय॑ प्रि॒यव्र॑तान् ॥ ३ ॥

त्वां ओं इति जात-वेदसं विश्व-वारं गृणे धिया
अग्ने देवान् आ वह नः प्रिय-व्रतान् मृळीकाय प्रिय-व्रतान् ॥ ३ ॥

हे सर्वज्ञा, जातवेदा, सर्व संसेव्य अशा तुझे स्तवन मी भक्तीने करीत आहे; तर हे अग्नि, तूं दिव्य विभूतींना येथे घेऊन ये; त्यांचे धर्मनियम आम्ही पाळावे त्यांना प्रिय असते; आणि आम्हांलाहि त्यांचे धर्मनियम प्रियच वाटतात म्हणून त्यांना घेऊन ये. ३.


अ॒ग्निर्दे॒वो दे॒वानां॑ अभवत् पु॒रोहि॑तोऽ॒ग्निं म॑नु॒ष्याख्प् ऋष॑यः॒ सं ई॑धिरे ।
अ॒ग्निं म॒हो धन॑साताव् अ॒हं हु॑वे मृळी॒कं धन॑सातये ॥ ४ ॥

अग्निः देवः देवानां अभवत् पुरः-हितः अग्निं मनुष्याः ऋषयः सं ईधिरे
अग्निं महः धन-सातौ अहं हुवे मृळीकं धन-सातये ॥ ४ ॥

अग्निदेव हा देवांचा अग्रेसर झाला. यास्तव आम्ही मानव आणि ऋषि ह्यांनी अग्नीला उत्तम रीतीने प्रज्वलित केले म्हणून युद्धांत यशोधनाच्या प्राप्तीसाठी त्या श्रेष्ठ अग्नीचा त्या कृपाळू देवाचा मी धांवा करतो ४.


अ॒ग्निरत्रिं॑ भ॒रद्वा॑जं॒ गवि॑ष्ठिरं॒ प्राव॑न् नः॒ कण्वं॑ त्र॒सद॑स्युं आह॒वे ।
अ॒ग्निं वसि॑ष्ठो हवते पु॒रोहि॑तो मृळी॒काय॑ पु॒रोहि॑तः ॥ ५ ॥

अग्निः अत्रिं भरत्-वाजं गविष्ठिरं प्र आवत् नः कण्वं त्रसदस्युं आहवे
अग्निं वसिष्ठः हवते पुरः-हितः मृ?ईकाय पुरः-हितः ॥ ५ ॥

अग्नीने अग्रिंचे भरद्वाज गविष्टाराचे रक्षण केले तसेच आमचा कण्व आणि त्रसदस्यू ह्यांचेहि युद्धांत संरक्षण केले, म्हणून लोकांच्या कल्याणासाठी ज्यांची योजना झाली, असे वसिष्ठ हे पुरोहित हो‍ऊन अग्नीचे यजन करतात ५.


ॐ तत् सत्


GO TOP