|
अनुक्रमणिका
भागवत पुराण-माहात्म्य (पाद्मे) भागवत पुराण स्कंध ( १ ) भागवत पुराण स्कंध ( २ ) भागवत पुराण स्कंध ( ३ ) भागवत पुराण स्कंध ( ४ ) भागवत पुराण स्कंध ( ५ ) भागवत पुराण स्कंध ( ६ ) भागवत पुराण स्कंध ( ७ ) भागवत पुराण स्कंध ( ८ ) भागवत पुराण स्कंध ( ९ ) भागवत पुराण स्कंध ( १० ) भागवत पुराण स्कंध ( ११ ) भागवत पुराण स्कंध ( १२ ) भागवत पुराण-माहात्म्य (स्कान्दे) |
श्रीमद् भागवत महापुराण भागवत माहात्म्य म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथाची प्रस्तावना. भागवताचा एक अर्थ आहे - भगवतः इदं भागवतम् - म्हणजे भगवंतांचे स्वरूप दर्शविणारे शास्त्र, भगवत् तत्त्वाचा निर्देश करणारे शास्त्र. जी व्यक्ति भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. ह्याचा अर्थ असा झाला - भगवत्तत्त्व, ते जाणण्याचे साधन (ग्रंथ श्रवण) व ते जाणणारी व्यक्ती या सर्वांना ’भागवत’ म्हटले आहे. भागवतकथा अर्थात् ’श्रीमद् भागवत महापुराण्’ ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ति आहे, हे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे. या प्रस्तावनारूपी महात्म्यात म्हटले आहे - कालव्यालमुखग्रास त्रासनिर्णाय हेतवे । श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौ कीरेण भाषितम् ॥ (मा. १.११) - संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्या अमृताचे नाव आहे श्रीमद्भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. कारण पुढच्याच श्लोकात म्हटले आहे - जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत् - अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते. एवढी याची थोरवी. याचे महत्त्व किती आहे हे माहात्म्यात आणखी एके ठिकाणे सांगितले आहे. श्रीशुकदेव भागवत कथा राजा परीक्षिताला सांगणार आहेत हे देवांना कळल्यावर ते लगेच अमृतकुंभ घेऊन आले आणि श्रीशुकदेवांना म्हणाले हा अमृत परीक्षिताला द्या म्हणजे तूर्त त्याचा मृत्यू टळेल आणि त्या बद्दल्यात आम्हाला ही कथा द्या. शुकदेव म्हणाली - कुठे काचेच्या तुकड्याची तुम्ही हिरे-माणिकांशी बरोबरी करताय ? एवढे भागवताचे महत्त्व आहे. ज्याला समजले, उमजले तोच याचे प्राशन करणार. मन्दा सुमन्दमतयोः वा सांसारिक भोगांत सुख शोधणारे, त्यातच गुरफटलेले यांना कळणे कठीण आहे. ज्याने प्रेयसाचे फोलपण आणि श्रेयसाचे महत्त्व जाणले आहे, जो विरक्त झाला आहे तोच भागवतामृताचा स्वाद घेण्यास वळणार. भागवत ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे परम पुरुषार्थ अर्थात परमात्मा कोणत्याही शास्त्रग्रंथाचे अध्ययन करणार्यांमध्ये काही विशेषगुण असणे इष्ट मानतात; ज्यावरून त्या ग्रंथाचे अध्ययनास तो पात्र आहे असे समजले जाते. त्याला ’अधिकारी’ म्हणतात. पंडितांनी भागवताचा प्रथम स्कंध याला ’अधिकारी’ स्कंध मानले आहे. भगवत गीतेच्या श्रवणास जसे अर्जुनाला सर्वात श्रेष्ठ अधिकारी गणले आहे तसेच परीक्षितास भागवतात सर्वश्रेष्ठ अधिकारी मानले आहे. गीता श्रवणाचा परिणाम म्हणून अर्जुन म्हणाला ’नष्टो मोहः स्मृतिर्लब्ध्वा - आणि तो आपले कर्तव्य करण्यास तयार झाला; तसेच भागवतकथा श्रवणानंतर राजा परीक्षिताला तत्काळ मुक्ति मिळाली. या स्कंधात १९ अध्याय आहेत. पहिले तीन अध्याय उपोद्धात, पुढचे तीन अध्याय नारद-व्यास संवाद, पुढील बारा अध्याय (७ ते १८) परीक्षित आख्यान आणि शेवटचा अध्याय शुकदेव आख्यान असा या स्कंधाचा क्रम आहे. श्रीमद् भागवताचा मुख्य वक्ता श्रीशुकदेव आणि मुख्य श्रोता राजा परीक्षित आहे याबद्दल शंकेचे कारण नाही. तसे पाहता सूत आणि शौनक यांचा जो वर्णन-श्रवण संबंध आलाय तो यज्ञातील एक अंग या रूपाने आला आहे. यज्ञसंबंधी दोन सवनांच्या मध्यंतरातील वेळ सत्कारणी लागावा हा हेतू. अर्थात भागवत श्रवण हा गौण भाग झाला. नारद-व्यास संवादामध्ये विशेष चिंता दिसते ती लोकहिताची. प्रचंड शास्त्र निर्मीती करूनही अपेक्षित लोककल्याणाची सिद्धी झालेली नसल्याने व्यासांनी आत्मग्लानी आली होती. नारद-व्यास संवादाने व्यासांच्या आत्मग्लानीची निवृत्ति झाली. पण शुक-परीक्षित संवाद वरील दोन्ही संवादांपेक्षा विलक्षण आहे. शुकदेव निर्गुण भावामध्ये स्थित, निवृत्तिपरायण, आत्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ आहेत. राजा परीक्षित लौकिक-ऐहिकाच्या चिंतेने मुक्त असून त्याच्या अंगी पूर्ण वैराग्य बाणले आहे. या जोडीला वैयक्तिक वा लोकहित असे काही साधायचे नव्हते. दोघेही भगवत् परायण, भगवंतांच्या यशोगाथांकडे आकृष्ट झालेले आणि शुद्ध मनाने वर्णन-श्रवणामध्ये तल्लीन झालेले. या स्कंधामध्ये निर्णय केला गेला आहे की मनुष्यासाठी परमात्म विषयक वर्णन आणि श्रवण हे एकमात्र त्याच्या परमपुरुषार्थाच्या सिद्धीचे साधन आहे. आणि तसे पाहता संपूर्ण भागवतपुराण श्रवण हेच परमपुरुषार्थाचे साधन आहे हे धुंधुकारीच्या मुक्तीवरून सिद्ध होते. या स्कंधेतील चर्चेवरून दिसते की मनुष्याचे जीवन क्षण क्षण क्षीण होत आहे. आयुष्य किती झपाट्याने पुढे सरकते याचा पत्ताच लागत नाही. या जीवनात जाणून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, कर्तव्ये अनेकानेक आहेत; तरीही उरलेल्या अल्प वेळेतही महानातील महान प्राप्तव्य प्राप्त करून घेणे शक्य आहे. कसे ? भगवान श्रीहरि सर्वांतर्यामी आणि सर्वस्वरूप आहेत. मग त्याच्या प्राप्तीसाठी परमात्म संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच जीवमात्रासाठी परम कल्याणाचे साधन आहे. कारण निर्गुणनिष्ठ ऋषीमुनीही भगवंतांच्या गुणानुवादात रमताना दिसतात.
नवव्या स्कंधात प्राधान्याने वंशानुचरित व अवताचरित ईशकथानुरूप भक्तिवर्धक प्रसंगांचे वर्णन आले आहे म्हणून या स्कंधास "ईशानुकथा" हे नाव दिले गेले आहे. बहिरंग साधन व अंतरंग साधनांच्या अनुष्ठानाचे फळ भक्ति हेच आहे. गुणांच्या भेदाने नऊ प्रकारच्या दुःखांचे निवारण करणारे भगवंतांचे अनुयायीही नऊ प्रकारचे आहेत. ज्ञानी, कर्मी आणि भक्त या भेदाने महान पुरुषांची चरित्रेही तीन प्रकारात मोडतात. वरील नऊ प्रकारची दुःखे निवारणाच्या चरित्रांचे तेरा अध्याय आहेत. दहा इंद्रियांच्या द्वारा मनुष्याला सुखाची अनुभूती होते. म्हणून भगवंतांचे भक्त यानुसार दहा प्रकारचे मानले आहेत. या प्रकारच्या भक्तांच्या व स्वतः भगवान यांवर अकरा अध्याय नवम स्कंधात रचलेले आहेत. असे एकूण २४ अध्याय. सद्धर्माचरणाने प्रबल, जखडून टाकणार्या वासना क्षीण होतात, आणि भक्तीने बीजरूप वासनांचा नाश होतो. जीव जर सतत भगवत् गुणांचे, भगवत् लीलांचे चिंतन करीत राहील तर त्याच्या मनांत ’भगवत् गुणांनुसार कर्म केले पाहिजे’ हा भाव दृढ होईल. मग नकळतच त्याचे सर्व लोकव्यवहार भगवत् भावनेने, प्रेम, आपुलकी, समत्त्व यांनी युक्त होतील. त्याला या भावना अंगी बाणण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. नवमस्कंधातील सर्व अध्याय परमात्मभक्ति जागृत होण्यास पोषक आहेत. दशकस्कंधामध्ये आपल्या आनंदमयी लीलांवर प्रकाश टाकीत सर्व जीवांचे मन भगवंताने आपल्याकडे आकृष्ट करून घेतले आहे हे सर्वसम्मत आहे. ज्या ज्या स्कंधामध्ये प्रसंगानुरूप ज्या लक्षणाचे प्राधान्य आहे त्यानुसार त्या त्या स्कंधांना नावे पडली आहेत. पण दशमस्कंधाला ’आश्रय’ म्हणायचे का ’निरोध’ म्हणायचे याबद्दल काही विद्वानांमध्ये मतभेद आहेत. श्रीधरस्वामी दशम स्कंधाला ’आश्रय स्कंध’ म्हणतात तर वल्लभाचार्य याला ’निरोध’ स्कंध म्हणतात. पण ’कृष्णस्तु भगवान् स्वयं’ (भा. १.३.२८) या उक्तीनुसार श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत आणि तेच दशम स्कंधात प्रगट झाले आहेत. श्रीकृष्ण स्वतः जगताचे ’आश्रय’ किंवा ’द्रष्टा’ आहेत म्हणून या स्कंधात आश्रयत्त्व निर्देशित केले गेले आहे. यावरून दशम स्कंधाला ’आश्रय स्कंध’ म्हणणेच संयुक्तिक होईल. निरोध याचा अर्थ ’प्रलय’ घेतला तर प्रलयाचे विस्तृत वर्णन १२ व्या स्कंधात केलेले आहे तेव्हा १२ व्य स्कंधाला ’निरोध’ आणि दशम स्कंधाला ’आश्रय’ म्हणणेच जास्त संयुक्तिक होईल. दशम स्कंधात ९० अध्याय आहेत. शेवटचे (८६ ते ८९) चार अध्याय सोडले तर सर्व अध्यायांत कृष्णासंबंधीच कथा आहेत. सुंदर लीला प्रसंग आहेत. यशोदेला मुखात दोनदा विश्वदर्शन देऊन तिचा मोह घालविला. रासलीला प्रसंग आहे. कित्येक जीवांचे उद्धार-प्रसंग आहेत. कृष्णावताराचे एक प्रयोजन ’परित्राणाय साधूनाम्, विनाशाय च दुष्कृताम्’ होतेच; पण रामावतारामध्ये भगवंत कितीतरी लोकांच्या अपेक्षांची पूर्ति तिथे करू न शकल्याने प्रत्येक वेळी ’पुढील अवतारात’ असे आश्वासन देत. त्या सर्व आश्वासनांची पूर्ति कृष्णावतारात झाली. उदा. ऋषीमुनींना वाटे आपण स्त्रीरूप घ्यावे आणि भगवंत आम्हाला पतिरूपात प्राप्त व्हावेत. ते सर्व इथे ’गोपी’ झाले. कोण कोण गोपी बनून कृष्णावतारात आले याचे फार विस्तृत वर्णन ’गर्गसंहिते’त आले आहे. दशम स्कंधाचे विशेष म्हणजे यातील कथा प्रश्न विचारणार्याला, त्या सांगणार्या वक्त्याला आणि ऐकणार्याला, तसेच इतर श्रोत्यांना, सर्वांनाच पवित्र करतो. श्रीमद् भागवतमहापुराण या ग्रंथाचा गाभा किंवा मुख्य प्राण म्हणायचे तर त्यातील स्कंध दहावा ज्यात कृष्णाच्या बाललीला तथा वयात आल्यानंतरच्या पृथ्वीचा भार उतरवणासाठी केलेल्या युद्ध कथा. मूळ कथा सांगणार्या मनांत नेमके काय सांगायचे आहे, याअर अनेक विद्वान् त्यावर भाष्यरूपाने प्रकाश टाकतात. भागवतावर निदान १६ भाष्ये दिसली. पण श्रीधरी भाष्य सोडले तर कोणत्याच भाष्याचा मराठी अनुवाद दिसला नाही. त्यातला त्यात श्रीवीरराघव यांचे भाष्य सोपे वाटले. त्यांच्या 'श्रीमद्भगवतचंद्रचंद्रिका' या भाष्यातील केवळ कृष्णचरित्र - अर्थात् स्कंध दहावा यातील प्रसंगानुसार काही श्लोकांवरचा मराठी अनुवाद "विवरण" या सदराखाली दिलेला आहे. हा अनुवाद सांगली येथील श्रीमति सुधा कुलकर्णी यांनी करून दिला आहे. अकराव्या स्कंधाचे नाव आहे ’मुक्तिस्कंध’ कारण यात मुक्तीचे निरूपण आहे. मुक्त म्हणजे अज्ञानकृत, अध्यासकृत, अन्यथारूपाचा परित्याग करीत आपल्या यथार्थ स्वरूपात स्थित होणे म्हणजे मुक्ति. अन्यथारूप अज्ञानमूलक आहे. अज्ञान नाहीसे झाले की आध्यासिक रूपाची निवृत्ति होतेच आणि आपल्या परिच्छिन्नतेचा, अपूर्णत्वाच्या भ्रमाचा निरास होतो. मुक्ति काल, द्रव्य इत्यादिकांवर अवलंबित नाही. ती स्वतःसिद्ध, नित्यप्राप्त आहे. अज्ञानामुळे आपण मुक्त नसून बद्ध आहोत असे भासते. अज्ञान नाहीसे झाल्यास जीवास अपरिच्छिन्न आत्मा आहोत याचा अनुभव होतो. या स्कंधात निमी व नऊ योग्यांचा संवाद तसेच यदुस दत्तत्रेयांनी चोवीस गुरू केल्याचे संवाद, हे प्रसंग साधकास उत्तम मार्गदर्शन करणारे आहेत. श्रीकृष्णाने भारत-युद्ध प्रसंगी ’भगवद् गीता’रूप अर्जुनास जसा उपदेश केला, त्याच धर्तीवर पण जरा विस्तृत स्वरूपात उद्धवास उपदेश केला आहे. याच स्कंधात भगवंतांनी आवरावर केल्यासारखे आपल्या मदाने उन्मत्त झालेल्या यदुवंशाचाही अंत घडविला आणि तद्नंतर स्वधामाला गेल्याचेही वर्णन आहे. या स्कंधात प्रामुख्याने प्रलय वर्णन असल्याने यास ’निरोध स्कंध’ नाव देण्यात आले आहे. यात चार प्रकारच्या - नैमित्तिक, प्राकृत, आत्यन्तिक व नित्य - प्रलयांचे विस्तृत वर्णन आले आहे ज्याचे वर्णन क्वचितच इतरत्र आढळते. श्रीशुकदेवांचा परीक्षितास केलेला अंतिम उपदेश आणि परीक्षिताच्या परमगतीचे वर्णन आहे. कलियुगातील राजवंश, वेदशाखा, पुराणांची लक्षणे, इतर पुराणांची नावे, त्यांची श्लोक संख्या इत्यादि अवांतर माहितीही आहे. यातच मार्कंडेय ऋषीला करविण्यात आलेले ’माया-दर्शन’ फार बहारीचे आहे. |