श्रीमद् भागवत महापुराण

विषय प्रवेश

भारतीय प्राचीन वाङ्‍मय अपार आहे. त्या सर्व वाङ्मयाचें विहंगमावलोकन करावे म्हटले तरी ते एका आयुष्यांत शक्य नाही. श्रुति, स्मृति, इतिहास, पुराण, षड्दर्शने, काव्यें, नाटकें, ज्योतिष, वैद्यक, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र असे विभाग सामान्यततया दिसून येतात. यांतील प्रत्येक विभागाच्या तपशीलांत शिरल्यास कितीतरी उपविभाग दिसून येतील. नुसत्या पुराणांचा विचार केला तरी ते वाङ्मयही अपरंपार आहे असे दिसते. पुराणे अठरा आहेत आणि अठरा उपपुराणेंही आहेत. याशिवाया पुराण सदृश इतर कितीतरी वाङ्मय आहे. नुसत्या पुराणांचा विचार करायचे म्हटले तरी ते एका जन्मांत शक्य होईलसे वाटत नाही. म्हणून शौनकादि ऋषींनी म्हटले -

प्रायेण अल्पायुषो मर्त्याः कलौ अस्मिन् युगे जनाः ।
मंदाः सुमदमतयो मंदभाग्या ह्युपद्रुताः ।
भूरीणि भूरिकर्माणि श्रोतव्यानि विभागशः ॥

बहुशः कलियुतांतील मानव, मंदबुद्धीचे, मंदभाग्याचे, मंद सामर्थ्याचे, नाना प्रकारच्या संकटांनी ग्रस्त झालेले असें आहेत. करावयाचें कर्म व ऐकावयाचे वाङ्मय विभागशः अनंत आहे. या विचाराची सद्य परिस्थिती जुळते असेच चित्र दिसते. म्हणून एका भागवताचे अध्ययन होणे तरी इष्ट आहे. भागवतासारखा सर्वांगसुंदर ग्रंथ भारतील वाङ्मय जगातील इतर वाङ्मयांत सांपडणें दिर्मिळ आहे. म्हणूनच या भागवताला प्रत्यक्ष श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ति म्हणतात.

श्रीमद्‌भागवत हा ग्रंथ श्रीहरीचे अवतार असणार्‍या वेदव्यासांनीं रचलेला असून त्यात १२ स्कंध, ३३५ अध्याय व १८,००० ग्रंथसंख्या (श्लोक) आहेत. वेदव्यासांनीच अठरा पुराणे रचली ज्याची ग्रंथसंख्या चार लक्ष सांगितली जाते. त्यांनी एक लक्ष श्लोकांचे महाभारत रचले तसेच ५६४ सूत्रे असलेले ब्रह्मसूत्र रचले. त्यांनीच अपार वेदसाहित्याचे विभाजन करून त्याचे चार भाग केले. इतर आस्तिक दर्शनांत तत्त्वज्ञानाविषयी जी अफुर्ण ता दिसून येते ती काधून टाकून त्या सर्व दर्शनांचा समन्वय भागवतात केलेला आह्द्ळून येतो. श्रुतीतील ज्या तत्त्वाचें सम्यक् आकलन स्पष्टपणें झाले नाहीं तें तत्त्व स्पष्टपणे मंदबुद्धीच्या लोकांना कळेल अशा रीतीने भागवताद्वारा श्रीहरि अवतार असण्यार्‍या वेदव्यासांनी प्रतिपादन केले आहे, म्हणूनच भागवतास वेदरूपी कल्पवृक्षाचें मधुर फळ म्हटले आहे. या अद्‍भुत कल्पवृक्षाच्या एकाच प्रकारच्या फळातील निरनिराळ्या रसांचा आस्वाद घेतांना अवर्णनीय आनंद होतो. त्यामुळे या भागवताची पठण परंपरा अव्याहत टिकून राहिली आहे.

’अर्थोऽयं ब्रह्मसूत्राणां भारतार्थं विनिर्णयः’ बादरायण वेदव्यांनी ’ब्रह्मसूत्रे’ या नावाने ओळखली जाणारी वेदांतसुत्रे रचली. हा ग्रंथ सूत्ररूपाने असल्यामुळे त्यांचे यथार्थ ज्ञान होईना म्हणूनच त्यावर भाष्यात्मक हें भागवत नावाचे पुराण रचले असें कांहींचे म्हणणे आहे व कांहींचे म्हणणे आहे की यात भारताचाच्या अर्थाचाही निर्णय आहे तसेच हे गायत्री मंत्रावरील भाष्य आहे. ’गायत्री भाष्यरूप्०ऽसौ वेदार्थपरिबृंहितः । पुराणानां साररूपः साक्षात् भगवतोदितः ॥ तात्पर्य, भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे फळ म्हणून म्हटले आहे ते यथार्थ आहे. याला भगवम्ताची वाङ्मयी मूर्ति म्हणण्याचा प्रघात आहे हे वर आले आहेच. ’ स्वकीयं यद्‍भवेत्तेजः तद्वै भागवते व्यधात् । तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्‌भागवतार्णवम् । तेनेयं वाङ्मयी मूर्तिः प्र्तत्यक्षा वर्तते हरेः ॥ ’ आपले स्वतःचे तेज श्रीकृष्णांनी या भागवतांत ठेवले. अंतर्धान पावल्यानंतर स्वतः श्रीकृष्ण या भागवतरूपी समुद्रात प्रविष्ट झाले तें भागवत म्हणजे श्रीहरीची प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ति होय. भागवताची परंपराही तशीच आहे.

१. प्रथमतः साक्षात् नारायणांनी ब्रह्मदेवास हे भागवत सांगितले. ब्रह्मदेवांनी तेच नारदास सांगून ’तद् एतत् विपुली कुरु’ - याचा विस्तार कर अशी आज्ञा केली. नारदांनी सांगितल्या वरून तेच भागवत वेदव्यासांनी श्लोकबद्ध केले व शुकाचार्यांना पढविले, ही एक परंपरा. २. ज्यावेळी नारायणांनी ब्रह्मदेवास या भागवताचा उपदेश केला, त्यावेळी शेषाने ते श्रवण केले. शेषापासून सनत्कुमार, त्यांचेपासून सांख्यायन व पुढे पराशर, बृहस्पति,, मैत्रेय व मैत्रेयापासून विदुर अशी दुसरी परंपरा सांगितली जाते. नारायणापासून अलौकिक परंपरेने प्राप्त झालेल्या भागवतांत सर्व काही अलौकिक असेल यांत आश्चर्य ते काय ?

यांतील रचनाचातुर्य अलौकिक आहे. प्रसंगानुसार वृत्तरचना आहे. नऊ रसांचा परिपोष ठिकठिकाणी योग्य रीतीनें झालेला आहे. साहित्यशास्त्रांत काव्याचें लक्षण निरनिराळ्या रीतीनें सांगितलें आहे. कित्येकजण ध्वनीला उत्कृष्ट काव्य म्हणतात तर कित्येकजण ’वाक्यं रसात्मकं काव्यं’ असे म्हणतात, तर कांहीजण ’रीतीलाच काव्याचा आत्मा’ असे म्हणतात. या दृष्टीनें विचार केला तर ही सर्व काव्याची लक्षणे भागवतांत आढळून येतात. इतिहास आहे, भूगोल आहे, ज्योतिष आहे, सृष्टिविकासाचा इतिहास आहे, राजकारण आहे, धर्मचर्चा आहे, मंत्रतंत्रांचा विचार आहे, सामान्यधर्म व विशेषधर्मांची चर्चा आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास या चार आश्रमांचे वर्णन आहे. स्त्रियांनी कशा तर्‍हेने वागावे ? त्यांचे धर्म कोणते हे सोदाहरण प्रतिपादन केले आहे. भरपूर निसर्गवर्णन आहे. प्रत्येकाने जगांत कसे वर्तावे हे सांगितले आहे. विधात्यानें निर्माण केलेल्या सृष्टीतील अनेक गोष्टींपासून, निसर्गापासून मानवांना काय शिकता येते हे निरनिराळ्या ऋतूंच्या वर्णनांच्या द्वारे जिज्ञासूपुढे ठेवले आहे. मानवाच्या स्वभावाचे चित्रण इतके वास्तववादी व सूक्ष्म आहे कीं, त्यापुढे सर्व श्रेष्ठ कवींनी नम्र व्हावे. वेदव्यासांनी कलियुगास प्रारंभ झाल्यावरचे भविष्य इतके अचूक वर्तविले आहे कीं, ते नुसते भविष्य वाचूनही ग्रंथकर्ता हा कोणींतरी अलौकिक असला पाहिजे याची खात्री पटल्यावाचून राहणार नाही. या सर्व गोष्टींचें वरआणन करताना जगांतील मानवांकडून केल्या जाणार्‍या कृतीचें पर्यवसान भगवंताच्या भक्तींत झालें पाहिजे व तसे झाले तरच मानव अंतिम कल्याणाला प्राप्त होईल अन्यथा नाही. हें निरनिराळ्या प्रसंगानुसार अत्यंत हृदयंगम रीतीने वर्णन केले आहे. सृष्टीला मूळ कारण असणार्‍या तत्त्वाचा विचार करतांना भागवतकारांनी सर्व दर्शनकारांचा समाचार घेतला असून "सृष्टीला मूळ कारण तो सर्वतंत्रस्वतंत्र परमात्मा" आहे हे तत्त्व विशद करून सांगितले आहे. बोपदेव ’हरिलीला’ नामक ग्रंथात म्हणतो - ’वेद, पुराण, काव्य हे धनी, मित्र, प्रिया या प्रमाणे होत. भागवतांत तीनही प्रकार आहेत. ज्याप्रमाणें धनी आपल्या नोकरांस आपल्या कामाची चिकित्सा न करतां आपलें काम करण्यास सांगतो, तद्वत् हे प्रत्येकास धन्याप्रमाणे आज्ञा करतात; मित्राप्रमाणें एकादी गोष्ट युक्तीनें सांगून त्याप्रमाणे आचरण करावयास लावतात. काव्य हे आपल्या स्त्रीप्रमाणें आहे. स्त्री ज्याप्रमाणें आपल्या मधुर भाषणानें रसालंकारादिकांनी युक्त असणार्‍या वाक्यानें पटवून देते तद्वत् काव्य आहे. श्रीमद्‍भागवतांत या तीनही पद्धतीनें विषय वर्णन केले आहे.

कित्येकजण भागवत हे द्वितीयास्कंधापासून खरे सुरू होते असे म्हणतात व प्रथम स्कंध हा उपोद्धातारासारखा आहे असे म्हणतात. पण त्यांचे म्हणणे प्रमाणाच्या कसोटीला उतरत नसल्यामुळे ते म्हणणें निर्मूल आहे. अगदी ’जन्माद्यस्य यतः" या श्लोकापासून भागवतास प्रारंभ होतो हे खुद्द भागवतांत व इतर अनेक पुराणांत स्पष्टपणे म्हटले आहे.
स्कंद, पद्म, मत्स्य या पुराणांत याविषयी स्पष्टपणे प्रमाणे आहेत.

आरभ्यः यत्र गायत्रीं वर्ण्यते धर्मविस्तरः ।
वृत्रासुरवधश्चापि यच्च भागवतं विदुः ॥

गायत्रीला प्रारंभ करून ज्यांत धर्मतत्त्वाचें व वृत्रासुरवधाचे वर्णन केले आहे तें भागवत होय.

उत्तमश्लोकचरितं चकार भगवान् ऋषिः । निःश्रेयसाय कोकस्य धन्यं स्वस्त्ययनं महत् । तदिदं ग्राहयामास सुतं आत्मविदां वरं ॥

अशा तर्‍हेचीच स्कंद व मत्स्य पुराणांतही वचनें आहेत. याशिवाय व्हागवतांतच वेदव्यास्यांच्या कर्तृत्वाबद्दल स्पष्टपणें केलेले उल्लेख आहेत.

भगवन वेदव्यासांनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी मंगलकारक कृतकृत्य वाटावयास लावणारें परमात्म्याचे चरित्र रचले. नंतर तेंच चरित्र आत्मवेत्त्यांत श्रेष्ठ असणार्‍या आपल्या मुलास - शुकाचार्यास सांगितले.

खुद्द शुकाचार्य एके ठिकाणी म्हणतात -

इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंमितम् ।
अधीतवान द्वापरादौ पितुर्द्वैपायनाद् अहं ॥ १.२.८ ॥

मह्य पुत्राय शांताय परं गुह्यं इदं जगौ ॥

ब्रह्मदेवांना संमत असलेले हे भागवत पुराण द्वापरयुगाच्या प्रारंभी माझे वडील द्वैपायन वेदव्यास यांचेपासून शिकलो. समाधानी असलेल्या आपल्या मुलाला - मला हें गूड पुराण वेदव्यासांनी सांगितले. या सर्व उल्लेखांवरून भागवत हे वेदव्यासांनीच रचले आहे असे सिद्ध होते.

तात्पर्य या भूतलावर ज्या दोन मार्गांनी भागवताचा प्रसार झाला त्याचे कौशल्याने संकलन करून सुसंबद्धरीत्या त्याची रचना केली, हे स्पष्टपणे प्रतीत होते. म्हणून भागवत म्हणजे शुक-परीक्षित संवाद एवढेंच नसून "जन्माद्यस यतः या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत अठरा हजार ग्रंथ (श्लोक) म्हणजे भागवत होय."

या ग्रंथात जरी प्रसंगानुरोधाने अनेक विषय चर्चिले असले तरे मुख्यतः परमात्म्याचेच चरित्र वर्णन केले आहे. भागवतातील मुख्य प्रतिपाद्य विषय कोणता हे कौशल्याने प्रथम स्कंधांत सुरुवातीसच व्यास-नारद संवादरूपाने दाखविले आहे.

अनेक पुराणें, भारतासारखा प्रचंड ग्रंथ, वेद-विभाग, ब्रह्मसूत्रें इत्यादि रचली असताही वेदव्यासांना पालले कार्य पुरे झाले असे वाटेना. कार्यपूर्तीचे समाधान वाटेना. तेव्हा खिन्न झालेल्या वेदव्यासांना नारदांनी विचारले कीं, "हे वेद्यव्यासा तुझी खिन्न कां ?" हा प्रश्न ऐकून वेदव्यासांनी नारदास म्हटले कीं, "नारदा, मी पुराणें रचली, महाभारथासारखा ग्रंथ रचला, ब्रह्मसूत्रे रचली, वेदाचे विभाग केले. इत्यके कार्य जनतेसाठी केले असताही माझ्या मनास कृतकृत्यतेचें समाधान वाटत नाहीं, हें असे कां व्हावे ?"

या वेदव्यासांच्या प्रश्नांस नारदांनी विचारपूर्वक उत्तर दिले.

"हे वेदव्यासा, तुम्ही सर्व गोष्टी वर्णिल्या आहेत हे कबूल. पण त्याच्या योगाने तुमच्या मनास समाधान प्राप्त होणार नाही. अनेक विषयांचे वर्णन केले असले तरी तुम्ही प्रामुख्यानें भगवंताचे गुणानुवाद गाईले नाहीत. म्हणून केवळ श्रीहरीचेंच गुणवर्णन समाधिभाषेने करा. म्हणजे तुमच्या मनास समाधान, कृतकृत्यता वाटेल." - अजं प्रजातं जगतः शिवाय तन्महानुभावाभ्युदयोनुगण्यतां ॥ - जगाच्या कल्याणाकरितां जन्म-मृत्यूरहित असणार्‍या परमात्म्यानें जे जे अनेक अवतार घेतले त्या सर्वांचे गुण वर्णन करा.

मला स्वतःला जे हे पद प्राप्त झाले आहे त्याला कारण मी केलेले अखंड भगवच्चिंतन हे आहे. असे सांगून आपल्या पूर्वजन्मांचा सर्व इतिहास सांगितला. तेव्हां आपले अवतारकार्य कशाने पूर्ण होईल हे समजून आल्यामुळे वेदव्यासांनी भगवद्‌गुण-प्रधान वर्णन ज्यांत आहे असा भागवत ग्रंथ रचला.

या संवादातील गूढार्थ सोडला तरी या संवादाने ग्रंथातील प्रतिपाद्य विषय "भगवच्चरित्र" आहे हे कौशल्यानें दाखविले आहे. याशिवाय अनेक श्लोकांतून भागवतांतील प्रतिपाद्य विषयांचे दिग्दर्शन केले आहे.

यमादिभिः योगपथैः कामलोभहतो मुहुः ।
मुकुंदसेवया यद्वत् तथात्माद्धा न शाम्यति ॥

मुकुंदाच्या उपासनेने मनास समाधान प्राप्त होते तसे काम लोभादिकांनी पीडलेल्या मनवांस यमनियमादि योगकर्माने प्राप्त होत नाही.

यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे ।
भक्तिः उत्पद्यते पुंसां शोकमोहभयापहा ॥ १.१.७ ॥

जी संहिता ऐकली असतां शोक, मोह, भय इत्यादिकांचा नाश करणारी पुरुषोत्तम श्रेकृष्णांविषयी भक्ति उत्पन्न होते.

बाराव्या स्कंधातही प्रतिपाद्य विषयांचे दिग्‌दर्शन केले आहे.

कलिमलसंसृतिकालनोऽखिलेशो
हरिरितरत्र न गीयते ह्यभीक्ष्णं ।
इह तु पुनर्भगवानशेषमूर्तिः
परिपाठितोऽनुपदं कथाप्रसंगैः ॥ १२.१२.६५ ॥

कलिमलसंसार नाहीसा करणार्‍या श्रीहरीचें चरित्र इतरत्र कथा प्रसंगाने वर्णिले आहे. या ग्रंथांत मात्र सर्वव्यापी, सर्वतंत्र-स्वतंत्र परमात्म्याचे चरित्र प्रत्येक पदापदातून वर्णन केले आहे. याप्रमाणे भागवताचा प्रतिपाद्य विषय "परमात्मचरित्र" हाच होय. हे चरित्ररूपी भगवत अनन्य मनानें श्रवण-पठण करणार्‍यांस वैकुंठप्राप्ती होते हें निश्चयानें सांगितले आहे. या वेदव्यासांनी रचलेल्या पुराणसंहितेचे सावधान चित्तानें अध्ययन केले असतां ब्राह्मण श्रीहरीच्या श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो. यांस प्रत्यक्ष उदाहरण परीक्षित् राजाचें आहे. परीक्षित् राजाने शुकाचार्यांच्या मुखांतून भागवत श्रवण केल्यावर त्याच्या मनास जें समाधान प्राप्त झाले तें त्याने बोलून दाखविले.

सिद्धोऽस्मि अनुगृहीतोऽस्मि भवता करुणात्मना ।
श्रावितो यच्च मे साक्षात् अनादिनिधनो हरिः ॥ २ ॥
नात्यद्‌भुतमहं मन्ये महतां अच्युतात्मनाम् ।
अज्ञेषु तापतप्तेषु भूतेषु यदनुग्रहः ॥ ३ ॥
पुराणसंहितां एतां अश्रौष्म भवतो वयम् ।
यस्यां खलूत्तमःश्लोको भगवान् अनवर्ण्यते ॥ ४ ॥
भगवन् तक्षकादिभ्यो मृत्युभ्यो न बिभेम्यहम् ।
प्रविष्टो ब्रह्म निर्वाणं अभयं दर्शितं त्वया ॥ ५ ॥
अनुजानीहि मां ब्रह्मन् वाचं यच्छाम्यधोक्षजे ।
मुक्तकामाशयं चेतः प्रवेश्य विसृजाम्यसून् ॥ ६ ॥
अज्ञानं च निरस्तं मे ज्ञानविज्ञाननिष्ठया ।
भवता दर्शितं क्षेमं परं भगवतः पदम् ॥ ७ ॥

राजा म्हणाला - भगवन ! करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी, अनंत अशा श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्या. आपल्या कृपेने मी कृत्यकृत्य झालो. अनेक दु:खांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्यांची कृपा होणे, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, असे मला वाटते. ज्या पुराणात भगवान श्रीहरींचे वर्णन केले आहे, ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकले. गुरुवर्य ! आपण मला परम शांतिस्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले. आता मला तक्षक इत्यादी कोणापासूनही मृत्यूचे भय वाटत नाही. ब्रह्मन ! आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन. आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचे नाहीसे झाले. भगवंतांच्या परम कल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडविला. (२-७)

या प्रमाणे भागवताचे माहात्म्य आहे. या भागवताकडे नुसत्या पुराणाच्या चृष्टीने पाहिल्यास याचे चांगल्या तर्‍हेने ज्ञान होणार नाही. ब्रह्मसूत्रे, गायत्रीमंत्र यांच्या भाष्यरूप हा ग्रंथ आहे असे अनेकांनी म्हटले आहे. ते अगदी यथार्थ आहे. "जन्माद्यस्ययतः" या भागवताम्तील प्रथम श्लोकांत ब्रह्मसूत्राची प्रतीके घेतली आहेत - अथातो ब्रह्मजोञासा, जन्माद्यस्ययतः, तत्तुसमन्वयात्, शस्त्रयोनित्वात् इत्यादि सूत्रें दिग्‌दर्शित केली आहेत. हे दिग्‌दर्शन ब्रह्मसूत्र व त्याचा अर्थ करतलामलकवत् आहेत त्यांनाच होईल. अशा तर्‍हेने सर्व ब्रह्मसूत्रांचे दिग्‌दर्शन संपूर्ण भागवतांत भागवत पठण करताना होईल.

श्री. रा. बा. अवधानी यांच्या ’भागवत’ ग्रंथावरून
to be continued...

GO TOP