अध्याय ००१ ते ०५०

अध्याय ०५१ ते १००

अध्याय १०१ ते १५०

अध्याय १५१ ते २००

अध्याय २०१ ते २५०

अध्याय २५१ ते ३००

अध्याय ३०१ ते ३५०

अध्याय ३५१ ते ३८३



अग्निपुराण - प्रस्तावना

अग्निपुराण - नांवावरुन हें पुराण अग्निमाहात्म्य वर्णन करणारें असावें असा साहजिक तर्क धांवतो; पण तसें नसून अग्नीनें वसिष्ठाला पाठविलेलें विद्यासार यांत ग्रथित केलें आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित हीं पांच लक्षणें सामान्यतः पुराणांत प्रामुख्यानें आढळतात; यांशिवाय इतर अनेक विषय पुराणांत असतात. अग्निपुराणांत याच्या उलट प्रकार आहे. वरील पंचलक्षणांना यांत विशेष महत्व दिलें नसून, परा व अपरा या दोन विद्या यांत जास्त विवेचिल्या आहेत. यांखेरीज मनुष्याला उपयुक्त अशा पुष्कळ गोष्टी यांत घुसडून दिल्या आहेत, हें सहज चाळणारालाहि समजून येतें. थोडक्यांत याचें स्वरुप सांगावयाचें म्हणजे हा एक स्वतंत्र प्राचीन ज्ञानकोशच आहे. अवतारचरित्रें, भारतरामायणादि इतिहास ग्रंथ, पुराणें, वंशावळी जगदुत्पत्तिविवेचन, ज्योतिःशास्त्र, वास्तुशास्त्र, वैद्यकशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदःशास्त्र, काव्य-व्याकरणशास्त्र, तत्त्वज्ञान, व्यवहारनीति, यांसारिखे विविध विषय यांत आहेत. पुराणामध्यें हा ग्रंथ तामस कोटींत घालण्यांत येतो याचें कारणच हें कीं यांत परमार्थासंबंधी फार थोडा उहापोह केला आहे.

आनंदाश्रम संस्कृत ग्रंथावलींत प्रसिद्ध झालेल्या अग्निपुराणाच्या प्रतींत ३८३ अध्याय व ११४५७ श्लोक आहेत. नारदपुराणांत अग्निपुराणांतील श्लोकसंख्या १५ हजार व मत्स्यपुराणांत ही संख्या १६ हजार म्हणून म्हटली आहे. शिवाय या पुराणाची विषयानुक्रमणिका जी नारदपुराणांत दिली आहे त्यांत ईशनकल्पवृत्तांताचा उल्लेख केलेला आहे पण तो वृत्तांत उपलब्ध असणार्‍या अग्निपुराणांत नाहीं. तसेच बल्लाळसेनानें दानसागरांत अग्निपुराणांतील म्हणून जे उतारे घेतले आहेत त्यांतील कांहीं यांत नाहींत. तेव्हां या पुराणाचा कांहीं भाग लुप्‍त झाला असला पाहिजें हें सिद्ध होतें.

याचा काल कोणता हें सांगणें फार कठीण आहे. तथापि ख्रि. शकाच्या ५ व्या शतकानंतर व मुसलमानी स्वार्‍या हिंदुस्थानावर होण्याच्या आधीं याचें संकलन झालें असावें असें वाटतें.

या पुराणांत अनेक विषय आल्यामुळें या पुराणाचें सविस्तर वर्णन दिल्यास प्राचीन हिंदूंच्या सामाजिक व राजकीय आयुष्यक्रमाची साकल्यानें कल्पना येईल म्हणून या ग्रंथाचें सविस्तर वर्णन दिलें आहे. व प्रसंगीं ज्या अनेक विषयांविषयीं सामान्य वाचकास जिज्ञासा असेल अशा विषयांचे तर अधिक विस्तारशः वर्णन केलें आहे. अग्निपुराणांत अनेक शास्त्रांचें विवेचन आहे. निरनिराळ्या शास्त्रांवरील लेखांच्या प्रसंगीं अग्निपुराणांचा उल्लेख करावा लागतो किंवा त्यांतील शास्त्रविवेचनाचें स्वरुप द्यावें लागतें. यासाठी अग्निपुराणाचें यथार्थ स्वरुप येथेंच दिलेले बरें.

अं त रं ग नि री क्ष ण
दशावतार वर्ण अ. १-१६

पहिल्या अध्यायांत प्रथम श्लोकामध्यें लक्ष्मी, सरस्वती, गौरी, गणेश, स्कंद, ईश्वर ब्रह्मा, बन्हि, इन्द्रादिक, व वासुदेव यांचे मंगल केलें आहे. इतक्यांचे मंगल अथवा त्यांना केलेला नमस्कार इतरत्र आपणांस फारसा आढळत नाहीं.

ॠषींनी सूतांस आम्हांस सारांत सार काय आहे तें सांग असा प्रश्न केला. तेव्हां झालेला अग्निवसिष्ठसंवाद सूतानें ॠषींस सांगितला. हा अग्निवसिष्ठसंवाद म्हणजेच अग्निपुराण होय. परा व अपरा या दोन विद्येला धरुन हें पुराण सांगण्यांत आलें आहे. अर्थात् ॠग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद व त्यांची सहा अंगे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष व छंद, मीमांसा, धर्मशास्त्र, पुराण, न्याय, वैद्यक, गांधर्व, धनुर्वेद, अर्थशास्त्र, हीं अपरा व परा म्हणजे ब्रह्मप्राप्त्यर्थ सांगितलेली ज्ञानविषयक वचनें, ह्या परापरा विद्या होत. अशा तर्‍हेनें या पुराणाचा आरंभ झाला आहे.

दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे ब्रह्मदेव, सृष्टी वगैरे विषयांपासून या पुराणाला आरंभ न होतां अवतारचरित्रापासून आरंभ झाला आहे.

अ. २. मत्स्यावतारचरित्र अ. ३. कूर्मावतार. पद्मपुराण व मत्स्यपुराण यांमध्यें हे विषय आले आहेत. विषयांच्या प्रतिपादनांत फरक नाहीं. श्लोकरचना मात्र निराळी आहे. मत्स्यपुराणांत कुर्मांवतारचरित्र आढळत नाहीं. अवतार चरित्रें बहुतेक पुराणांत आहेतच. अ. ४ वराह, नारसिंह, वामन व परशुराम यांचीं संक्षिप्‍त चरित्रें, अ. ५ श्रीरामावतार. यांत वाल्मीकिरामायणांतील जन्मकांडाचा संक्षिप्‍त विचार आला आहे. अ. ६ रामायण, अयोध्याकांड. अ. ७ रामायण, अरण्यकांड अ. ८ रामायण, किष्किन्धाकांड. अ.९ रामायण, सुंदरकांड. अ. १० रामायण, युद्धकांड. अ.११ रामायण, उत्तरकांड. ''रामरावणयोर्युध्दं रामरावणयोरीव '' हा सुप्रसिद्ध श्लोकार्ध येथें आहे. हें रामायण संक्षिप्‍त असून त्यांत महत्त्वाचा कोणताही कथाविषय सुटलेला नाहीं. या एकंदर रामायणाच्या श्लोकांची संख्या १८९ आहे.

अ. १२ कृष्णावतार (यांत आलेल्या गोमंताचा निर्णय कसा करावयाचा. कारण गोमंत हा आपण जर गोवा प्रांत घेतला तर जरासंधाच्या स्वारीला भिऊन मथुरा सोडून कृष्ण इतक्या दूर पळून गेला असेल हें संभवनीय नाहीं. गोमंत हें पर्वताचें नांव आहे. भागवतांत त्या पर्वताचें नांव निराळें आहे.)

भारताख्यान अ. १३ । १४ । १५ यांत आहे. तीन अध्याय मिळून अवघे ७२ श्लोक आहेत.

अ. १६ वा. बुद्धवतार व कल्क्यवतार. बुद्धावताराची कथा सर्वत्र आहेच. बुद्धावताराची पौराणिक समजूत अथवा कथा अशी आहे कीं, पूर्वी देव दैत्यांच्या युद्धांत देवांचा पराभव झाला. तेव्हां देवांनीं विष्णूची प्रार्थना केली. विष्णूनें बुद्धाचा अवतार घेतला. तो काल असा होता कीं सगळे दैत्य वैदिक कर्म करणारे होते व त्यांस त्या धर्मापासून भ्रष्ट करुन त्यांचा नाश करावयाचा होता म्हणून बुद्धाचा अवतार विष्णूनें घेतला. म्हणून बुद्धांच्या मताचें अनुकरण करणारे बौद्ध होत. त्यापुढें जैनमताचा उद्‍भव झाला अशी समजूत व्यक्त केली आहे. जैनमताचा पुरस्कर्ता विष्णूचाच अवतार असें समजतात.

आर्हतः सोऽभवत्पश्चादार्हतानकरोत्परान् ॥
सृष्टीची उत्पत्ति अ. १७-२०

अ.१७. जगत्सर्गवर्णन; सर्ग म्हणजे ब्रह्मापासून हिरण्यगर्भ ब्रह्मापर्यंतची उत्पत्ति. हें वर्णन सर्वांच्या परिचयाचें आहे. ''अप एव ससर्जादौ '' हा श्लोक इतर पुराणाप्रमाणें येथेंहि आहे (१७।७). अव्यक्त ब्रह्म, प्रकृति-पुरुष, महत्व, अहंकार, तो तीन प्रकारचा, वैकारिक, तैजस, व तामस अहंकार. - आकाश वायु, तेज पाणी व पृथ्वी ही तामस अहंकाराची संतती. तैजस अहंकारापासून इन्द्रियें व वैकारिक अहंकारापासून इन्द्रियांच्या अधिष्ठातृ देवता व मन हीं उत्पन्न झालीं. ''ततःस्वयंभूर्भगवान् '' या श्लोकार्धापासून अध्याय संपेपर्यंत सगळे श्लोक भारतांतून घेतले असावेत. कारण दोन्ही ग्रंथांत श्लोकरचनेचें साम्य आहे असें टीपाकारानें म्हटलें आहे. हेच श्लोक हरिवंश अ. २ यामध्यें आहे असें टीपाकार म्हणतो. अ. १८ वा स्वायंभुवमनुवंशवर्णन, हा अध्याय थोड्या फार फरकानें पूर्वीच्याच अध्यायाप्रमाणें हरिवंशांत आहे. अ. १९ कश्यपवर्णन अ. २० जगत्सर्गवर्णन ( पुढें चालू ) अ. १७ यांत सांगितलेल्या प्राकृतादि तीन सर्गांच्या पुढचें हें वर्णन आहे प्राकृतसर्गामध्यें महत्सर्ग ( महतापासून अहंकारापर्यंत ), भूतसर्ग (आकाशापासून पृथ्वीपर्यंत ), वैकारिक सर्ग ( भूतांच्या सूक्ष्मत्वानें बनलेला इंद्रियवर्ग ), हे तीन सर्ग मोडतात. विकृत सर्गामध्यें स्थावर, तिर्यक् स्त्रोतस, अर्धःस्त्रोतस, ऊर्ध्वस्त्रोतस व अनुग्रहसर्ग असे ५ भाग कल्पितात. तियग्स्त्रोतस् म्हणजेच तिर्यक् योनीमध्यें जन्मलेले प्राणी, उर्ध्वस्त्रोतस् म्हणजेच देवसर्ग, अर्वास्त्रोतस् म्हणजे मनुष्य सर्ग, हे वैकृत पांच व तामस तीन मिळून ८ सर्ग, व नववा सात्विककुमारसर्ग होय. म्हणून ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेले जगाचे मूलभूत नऊ सर्ग होत.

देवोपासना व मंत्र अ. २१ - ३८

अ. २१ विष्ण्वादि देवतांची सामान्यपूजा. यांत देवतांच्या मंत्रबीजांचें विधान आहे. अ. २२ पूजाधिकारार्थ सामान्य स्नानविधि. अ. २३ आदिमूर्त्यादि- पूजाविधि अ. २४ कुंडनिर्माणादि अग्निकार्यादिकथन. षोडशसंस्कार. अ. २५ वासुदेवादि मंत्रलक्षण. अ.२६ मुद्रालक्षण. अ. २७ शिष्यांना दीक्षा देण्याचा प्रकार. अ. २८ आचार्यभिषेक वर्णन. अ. २९।२९ मंत्रसाधनविधि, सर्वतोभद्रादि लक्षण व विधान. अ. ३०; ३१ अपामार्जनविधान. अ. ३२ निर्वाणदीक्षासिध्यर्थसंस्कारवर्णन. अ. ३३।३६ पवित्रकारोपण विधि, पूजा व होम, (अधिवासन व इतर देवतासंबंधी पवित्रारोपण विधि-उत्तर खंड अ. ८९ पद्म पुराण त्यांत व ह्यांत फरक आहे. हा पवित्रारोपण विधि श्रावण महिन्यांत सांगितला आहे. ) अ. ३८ देवालयनिर्माणफल, निर्माणारंभ. देवालय निर्माण करण्यासाठीं जमीनीची परीक्षा. ही परीक्षा पंचरात्र, अथवा सहा रात्र यांमध्यें दिली आहे. प्राणप्रतिष्ठा करण्याला लायक ब्राह्मण कोण याचा ग्रंथोक्त विचार येणेंप्रमाणें. मध्यदेशांतील ब्राह्मण प्राणप्रतिष्ठेला योग्य आहे. कच्छ, कावेरी, कोंकण, कलिंग, कांची, काश्मीरक या देशांतील ब्राह्मण प्रतिष्ठेला अयोग्य आहेत. जमीनीचा उंचवटा काढून टाकून ती सारखी करावी व मापावी. नंतर अष्टदिशेकडे सातु, उडीद, हळद वगैरे द्रव्यें टाकावींत. त्या योगानें राक्षस पिशाच्च वगैरेंचा नाश होतो. ही जमीन देव स्थापनेला योग्य होते. ही जमीन सारखी करण्याचें यंत्र म्हटलें म्हणजे बैलांकडून नांगर ओढणें हा होय. हा विषय कमी जास्त प्रमाणानें मत्स्यपुराण अ. २५२ पासून आला आहे.

उ पा स ना मि श्र वा स्तु शा स्त्र ३९.१०६

अध्याय ३९ पासून ४५ पर्यंतचा विचार वास्तुशास्त्रविषयक विचार आहे. यांतील बराचसा भाग दुर्बोध आहे.

अ. ४६/४७ शालग्राम लक्षण. व पूजन अ. ४८ केशवादि चोवीस नांवांच्या मूर्तीचें स्तोत्र. अ. ४९ दशावतारप्रतिमालक्षण. अ.५० चंडी आदि देवींच्या प्रतिमेचीं लक्षणें; अ. ५१ सूर्यादिग्रहदेवताप्रतिमालक्षणें. अ. ५२ चौसष्ट्योगिनीप्रतिमालक्षणें अ. ५३ लिंगादिलक्षण. अ. ५४ लिंगाच्या प्रमाणाचें व्यक्ताव्यक्तस्वरुप. अ. ५५ पिंडिकालक्षण. अ. ५६ दशदिक्पालयागवर्णन. अ. ५७ कलशाधिवासविधि. अ. ५८ स्नपन विधि. अ. ५९ अधिवासनविधि. अ. ६० वासुदेवादि देवतांची सामान्य प्रतिष्ठा. अ. ६१ अवमृतस्नान, द्वारप्रतिष्ठा. ध्वजारोपण विधि. अ. ६२ लक्ष्यादिदेवताप्रतिष्ठासामान्यविधि. अ.६३ विष्णवादिदेवताप्रतिष्ठासामान्यविधि. पु स्त क ले ख न वि धि. - हें कसें लिहावें याचा विचार नसून फक्त वर सांगितलेले नारसिंह मंत्र रुपेरी अथवा सोनेरी शाईनें नागर भाषेमध्यें लिहावेत येवढाच उल्लेख आहे.

स्था प ना क र्म - अ. ६४ कूपवापीतडागप्रतिष्ठाविधि. अ. ६५ सभादिस्थापनविधि. अ. ६६ जमीनीची परीक्षा करुन तेथें वास्तुयाग करावा. ही सभा चौक अथवा गांवाच्या आरंभी करावी, शून्य ठिकाणी करूं नयें. या सभेमध्यें चार, तीन, दोन अथवा एक शाल किंवा कोपरे हे सोडावेत.

अ. ६६ देवतासामान्यप्रतिष्ठा. अ. ६७ जीर्णोद्वारविधि. अ. ६८ वा उत्सवविधि. अ. ६९ मूर्तीना स्नान घालण्याचा विधि. अ. ७० पादपप्रतिष्ठा. वृक्षांना अलंकृत करुन सोन्याच्या सुईनें टोंचे मारावेत व नंतर पूजा करावी. अ.७१ गणपतिपूजा. अ. ७२ स्नानविधि. अ. ७३ सूर्यप्रजाकथनं सूर्याच्या अंगाला रक्षावगुंठन करुन पूजा करावी. अ. ७४ / ७५ शिवपूजाहोमविधि. जप करतांना चर्मानें वेष्टिलेलें खड्गचें गंध, फूल, अक्षता, दर्भ इत्यादिकांनीं पूजावें. ऱतांत अर्ध्याचें पात्र घेऊन अग्निगृहांत जावें. यागाला लागणार्‍या सर्व द्रव्यांची तरतूद ठेवावी. उत्तरेकडे तोंड करुन कुंडांवर प्रोक्षण करावें. हें प्रोक्षण अस्तमंत्रानें करावें, वर्मानें अभ्युशण, खड्गानें जमीन उकरणें, वर्मानें सारखी करुन पाणी शिंपडणें, बाणाच्या टोकानें मातीचें ढेंकूळ फोडणें, त्रिसूत्री परिधान, वर्माने पूजन अशाच तर्‍हेनें ही सर्व तांत्रिक पूजा आहे असें समजावें.

अ. ७६ चंडपूजा अ. ७७ कपिलापूजा अ. ७८ पवित्राधिवासनविधि. कुलधर्म अजून प्रसिद्ध आहे अ. ७९ पवित्रारोहण विधि. अ. ८० दमनका रोहणविधि. अ. ८१ समयदीक्षा अ. ८२ वा. संस्कारदीक्षा.

हे सर्व विषय मंत्रशास्त्रांतले आहेत.

अ. ८३ निर्वाणदीक्षाविधि. अ. ८४ निवृत्तिकलाशोधन. अ. ८५ प्रतिष्ठाकलासंशोधन. अ. ८६ विद्यासंशोधनविधि. अ. ८७ शांतिशोधनविधि. अ. ८८ निर्वाणदीक्षाशेषविधि वर्णन. अ. ८९ एकतत्त्वदीक्षाविधि. अ. ९० अभिषेकादि. अ. ९१/९२ प्रतिष्ठविधि, अभिषेकानें देवतापूजन संक्षेपानें. अ. ९३ वास्तुपूजा. अ. ९४ शिलाविन्यास. अ. ९५ प्रतिष्ठा कालसामग्र्यादिविधि. अ. ९६ प्रतिष्ठाविधींतील अधिवासनविधि. अ. ९७ शिवप्रतिष्ठाविधि. अ. ९८ गौरीप्रतिष्ठाविधि. अ. ९९ सूर्यप्रतिष्ठा. अ. १०० व्दारप्रतिष्ठाविधि अ. १०१ प्रासादप्रतिष्ठा. अ. १०२ ध्वजारोपणविधि.

अ. १०३ जीर्णोद्धारविधि. अ. १०४ प्रासादलक्षण. अ. १०५ गृहादिवास्तुविचार. अ. १०६ नगरादिकवास्तुकथन.

भू गो ल ज्ञा न - अ. १०७ प्राचीनभूगोलज्ञानबोधक आहे स्वायंभुवसर्ग. स्वयंभुमनूच्या वंशाचा थोडक्यांत उल्लेख. अ. १०८ भुवनकोश. या भुवनामध्यें सात द्वीपें असून त्यांच्या भोंवतीं सहा सागराचा वेढा आहे. त्या सप्‍तदीपांचीं नांवें :- जंबु, प्लक्ष, शाल्मलि, कुश, क्रौंच, शाख व पुष्कर, हीं होत. सहा समुद्रांचीं नांवें - खारा समुद्र, उंसांचा समुद्र, दारुचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, दुधाचा समुद्र, गोड्या पाण्याचा समुद्र. अ. १०९ तीर्थमाहात्म्य. अ. ११० गंगामहात्म्य. अ. १११ प्रयागमाहात्म्य. अ. ११२ वाराणसी माहात्म्य. अ. ११३ नर्मदामाहात्म्य. अध्याय ११४ ते ११६ गयामाहात्म्य. पुराणांतील ''एको मुनिः कुंभकुशाग्र हस्त '' हा रुढ श्लोक या ठिकाणीं गाहे. अ. ११७ श्राद्धकल्प. ११८ भारतवर्ष या भरतवर्षात इन्द्रद्वीप, कसेरु, ताम्रवर्ण, गभस्ति, नागद्वीप, सौम्य, गांधर्व, वारुण, अशीं आठ वर्षे आहेत. ११९ महाद्वीपादिवर्णन. १२० भुवनकोशवर्णन.

फलज्योतिषमिश्रित ज्योतिःशास्त्र व वैद्यक अ. १२१-१४१ अ. १२१ ज्योतिःशास्त्र. अ. १२२ कालगणना. १२३ युद्ध जयार्णवीय. नानायोगांची नांवे. युद्धजयार्णव हा ग्रन्थ दिसतो. स्वरोदय, शनिचक्र, कूर्मचक्र, व राहुचक्र, हे यांत विषय आहेत. अ. १२४ युद्धजयार्णवीय ज्योतिःसारवर्णन. अ. १२५ युद्धजयार्णवीय नानाचक्रवर्णन. हा व या पुढील वर्णनभाग मंत्रशास्त्राचा आहे. अ. १२६ नक्षत्रनिर्णय. अ. १२७ नानाबल.

अ. १२८ कोटचक्र. अ. १२९ अर्धकाणु. अ. १३० मंडलादिकथन. १३१ घातचक्र. १३२ सेवाचक्र. १३३ नानाबलवर्णन. गर्भामध्यें असलेल्या जीवाचें ग्रहबलावरुन स्वरुपवर्णन; उदाहरणार्थ. सूर्याच्या घरांत पडलेला फार उंच स्थूल, कृश, ठेंगणा असा नसून मनुष्य मध्यम असतो, गोरा व पित्त प्रकृतीचा असून रक्ताक्ष, गुणी व शूर उपजतो. याप्रमाणें पुढील ग्रहांचें बलाबल जाणणें. याचप्रमाणें ग्रहांच्या दशांचें बलाबल वर्णिलें आहे. याशिवाय मंत्रविद्या वर्णिली आहे. अ. १३४ त्रैलोक्यविजयविद्यामंत्रशास्त्र. अ. १३५ संग्रामविजयविद्या. अ. १३६ नक्षत्रचक्र. अ. १३७ महामारीविद्याकथन (मंत्र). अ. १३८ मंत्रशास्त्रांतील सहा कर्मे. अ.१३९ साठ संवत्सरांचीं नांवें अ. १४० वश्यादि योग. यांत कांहीं वनस्पतींचीं नांवें आहेत.

अ. १४१ छत्तीस पदकांचें ज्ञान. वनस्पतींचा व इतर द्रव्यांचा उल्लेख आहे. येथें ज्योतिषमिश्र वैद्यक आहे. हिरडा (हरीतकी), ब्याहडा (अक्ष), अवळकाठी (आमलकी), मिरें (मरीच), पिंपळी (पिप्पली), बाळंतशेप (शिफा), चित्रक (वन्हि), सुंठ (शुंठी), गुडुची (गुळवेळ), वेखंड (वचा), निंब (निंबक), अडळसा (वासक), शतावरी (शतमूली), सैंधव (सैंधंव), सिंधु वारक, निर्गुडी (कंटकारी), गोखरु (गोक्षुरक), बेल (बिल्व), पुनर्नवा किंवा घेटोळी (पौनर्नवा), एरंड, मुंडी, शेंदेलोख (रुचक), माका (भृंग), क्षार, पित्तपापडा (पर्पट), धणे (धन्याक), जिरें (जिरक), बडीशेष (शतपुष्पी), ओंवा (जवानिका), वावडींग (विडंग), खैर (खदिर), बाहवा (कृतमाल), सिद्धार्थ, दारुहळद, मोहरी.

अ. १४२ मंत्रौषधिप्रकरण. प्रश्न कसा पाहवायाचा विचार अ. १४३/१४४ कुब्जिका पूजा, अ. १४५ मालिनी मंत्र. अ. १४६ अष्टाष्टकदेव्य. अ. १४७ त्वरितापूजा. अ. १४८ संग्रामविजयपूजा. अ. १४९ लक्षकोटिहोम.

व र्णा श्र म ध र्म अ. १५० मन्वंतरें. अ. १५१ वर्णेतर धर्मकथन. सर्व धर्मांचें श्रवण करावें, राजांवर प्रेम ठेवावें. याशिवाय अहिंसा सत्यवदन वगैरे धर्म सार्ववर्णिक आहेतच. वध्यांचा वध करणें हें चांडाळाचें काम होय स्त्रियांवर उपजीविका करणें व त्यांचे रक्षण करणें हें वैदेहकाचें काम होय. अश्वसारथ्य करणें हें सूताचें काम होय. व्याधाचें काम करणें हें पुल्कसाचें काम होय. राजाची वंशावळीं गाणें अथवा स्तुति करणें हें मागधाचें काम होय. रंगावतरण व शिल्पावर जीवन करणें हें आयोगवाचें काम होय. गांवाच्या बाहेर राहणें व मृतांचीं वस्त्रें धारण करणें हें चांडाळाचें काम होय. चांडाळ अस्पृश्य होय.

गाईसाठीं अथवा ब्राह्मणासाठीं अथवा स्त्रिया मुलें वगैरे आपत्ती मध्यें पडल्यास त्यांच्यासाठीं ज्यानें आपला देह खर्ची पाडला तो ह्या बाह्य वर्गांतून वर येतो. किंवा त्या बाह्याची सिद्धि होते.

गृ ह स्थ वृ त्ति. अ.१५२ गृहस्थवृत्ति. मरेपर्यंत ब्राह्मणानें आपली वृत्ति सोडूं नये. तथापि आपत्कालीं त्यानें क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र वृत्तीचा आश्रय करावा. या पुढच्या म्हणजे बाह्यांच्या वृत्तीचा आश्रय करुं नये. कृषि, वाणिज्य, गोरक्षा, व व्याजबट्टा हें ब्राह्मणाच्या वृत्तीचें साधन आहे. गोरस, गूळ, मीठ, लाख, व मांस हीं विकूं नये. भूमी खणून, औषधी तोडून, पिपीलिकांदिकांचा नाश केल्यानें घडणार्‍या पातकांचा नाश यज्ञानें होतो. पण हे यज्ञाचें फल देवपूजेनेंच शेतकर्‍यास प्राप्‍त होतें. नांगरास आठ बैल जुंपणें उत्तम, ६ जोडणे मध्यम, चार जोडणें अधम व २ जोडणे अधमाधम. याला धर्म्य, जीवितार्थ, नृशंस व धर्मघातक अशीं नांवें आहेत.

अ. १५३ ब्रह्मचर्याश्रम धर्म. अ. १५४ विवाह. विवाहाच्या वेळेस क्षत्रिय स्त्रीनें बाण, वैश्यस्त्रीनें चाबूक, शुद्रस्त्रीनें फडकें हातांत धरावें. अपत्यविक्रयास प्रायश्चित नाहीं. ''नष्टे मृते प्रव्रजिते.'' हा पाराशर स्मृत्युक्त श्लोक येथें आहे. अ. १५५ आचार. अ. १५६ द्रव्यशुद्धि अ. १५७ प्रेतासंबंधी अशौचनिर्णय अ. १५८ गर्भस्त्रावाचा अशौचनिर्णय. अस्थिसंचयनास. ४।५।७।९ हे दिवस अनुक्रमानें घ्यावे असें हा ग्रंथकार म्हणतो. परंतु पराशरमाधवामध्यें ३।५।७।९ हे दिवस घेतले आहेत व अस्थिसंचयन गोत्रजांसह करावें असें मत दिलें आहे व चतुर्थाबद्दलचा उल्लेख विष्णुस्मृतीचा केला आहे. अ. १५९ अ. संस्कृतादिशौचनिर्णय. अ. १६० वानप्रस्थाश्रमवर्णन अ. १६१ यतिधर्म. अ. १६२ धर्मशास्त्रकथन अ. १६३ श्राद्धकल्पवर्णन.

१६४ नवग्रहहोम १६५ नानाधर्मवर्णन; ''न स्त्री दुष्यति जारेण ... बलात्कारोप भुक्ता चेत्'' बलात्कारानें उपभुक्त स्त्री अथवा शत्रु हस्तगत स्त्री टाकावी; ती ॠतुकालीं शुद्ध होते. कित्येकांच्या मतें योगाची व्याख्या 'मन व इन्द्रियें यांच्या संयोगास योग म्हणतात' (विषयेन्द्रियसंयोगेकाविद्योगंवदंतिवै) अशी आहे; परंतु ग्रंथकारास हें म्हणणें पसंत नाहीं. असवर्णानें स्त्रीचे ठायी राहिलेला गर्भ तो असेपर्यंत ती स्त्री अशुद्ध आहे. शल नाहिसें झाल्यावर रजानंतर ती स्त्री शुद्ध होते. (अशुद्धतुभवेत्‍नारी यावच्छल्यंनमुंचति ) अ. १६६ वर्णधर्मादिकथन अ. १६७, ग्रहयज्ञ अयुतलक्षकोटिहोम अ. १६८।१७४ महापातकादिकथन व प्रायश्चित्त.

व्रतें. अध्याय १७५ पासून २०८ पर्यंत अध्याय व्रताकडेसच दिलें आहेत. अ. १७५ व्रतपरिभाषा अ. १७६ प्रतिपदा व्रतें. अग्निव्रत अ. १७७ द्वितीयाव्रतें. अ. १७८ तृतीयाव्रतें. अ. १७९ चतुर्थीव्रत. अ. १८० पंचमीव्रतें अ. १८१ षष्ठीव्रतें. अ. १८२ सप्‍तमीव्रतें. अ. १८३।१८४ अष्टमीव्रतें अ. १८५ नवमीव्रतें. अ. १८६ दशमीव्रतें. अ. १८७ एकादशीव्रतें. १८८ द्वादशीव्रतें. अ. १८९ श्रवणद्वादशीव्रत. अ. १९० अखंडद्वादशीव्रत. अ. १९१ त्रयोदशीव्रतें. अ. १९२ चतुर्दशी व्रतें. अ. १९३ शिवरात्रिव्रत. अ. १९४ अशोकपौर्णिमाव्रत. अ. १९५ वारव्रतें. अ. १९६ नक्षत्रव्रतें. नक्षत्र पुरुष कल्पून त्याची पूजा करावयाची. अ. १९७ दिवसव्रतें. अ. १९८ मासव्रतें. अ. १९९ अनेक व्रतें. अ.२०० दोपदानव्रत. तुलनेसाठीं या एकंदर व्रतांचा व त्यासंबंधीच्या कथांचा संग्रह आपणांस व्रतराज, व्रतार्क किंर्वा व्रतकौमुदी वगैरे धार्मिक ग्रंथांमध्यें सांपडेल. या अध्यायांत देविका नदीचें नांव आहे. ही कोठें आहे, हें कळत नाहीं.

अ. २०१ नवव्यूहार्चन. अ. २०२ पुष्पवर्गकथन, देवांच्या पूजेला लागणारीं निरनिराळ्या तर्‍हेचीं फुलें. अ. २०३ नरक वर्णन. अ. २०४ मासोपमासव्रत. अ. २०५ भीष्मपंचकव्रत अ. २०६ अगस्त्यार्ध्यदानकथन अ. २०७ कौमुदव्रत अ. २०८ व्रतनादादिसमुश्चय.

दा न मी मां सा - अ. २०९ दानपरिभाषाकथन. अ.२१० महादानविधि अ.२११ अनेक प्रकारची दानें. ज्यांच्यापाशीं दहा गाई आहेत त्यांनी १ द्यावी. याप्रमाणें दशांशाचें प्रमाण आहे. येथें उल्लेखिलेलें महिषदान हें आम्हांस अपरिचित वाटतें. तसेच रुप्याचा चंद्र करुन मस्तकीं धरावा; व तो ब्राम्हणाला द्यावा. आपला लोखंडाचा पुतळा करुन देणें किंवा निरनिराळ्या द्रव्यांचा पुतळा करणें, तो असा. पुरुष काळ्या तिळाचा बनवावा. दांत रुप्याचे बनवावे, डोळे सोन्याचे, हातांतील तरवार उगारलेली दाखवावी, तांबडे वस्त्र नेसलेला, शंखाच्या माळा घातलेला, पायांत पादत्राण घातलेला, काळी कांबळ पांघरलेला, डाव्या हातांत मांस दिलेला, सोन्याच्या अश्वावर बसलेला असा हा काल पुरुष करावा.

ब्राह्मणाला दासी अर्पण करावी. (दासीं दत्वा द्विजेन्द्राय) बसवपुराणांत बसव हा जंगमांस पुष्कळ वेश्या देत असे असें वर्णन आहे, त्यास हंसावयास नको अ. २१२ मेरुदान अ. २१३ पृथ्वीदान अ. २१४ नाडीचक्र. अ. २१५ संध्याविधि. गायत्री जप व हवन यांसंबंधीं विचार सांगितला आहे. अ. २१६।२१७ गायत्रीनिर्वाण. अ. २१८ राजधर्माचें वर्णन. पूर्वी राज्याभिषेक कालीं राजाला सर्व तर्‍हेच्या धार्मिक लोकांचे पालन करीन अशी प्रतिज्ञा करावी लागत असे. निरनिराळ्या ठिकाणांची माती राजाच्या प्रत्येक अवयवाला लावावी असा आचार असतो. पर्वतशिखरावरची माती राजाच्या मस्तकी लावावी, वारुळाची माती कानांवर लावावी, मुखीं विष्णुच्या देवालयाची लावावी. याप्रमाणें जाणावें. ठिकठिकाणच्या मातींचें वर्णन करतांना वेश्येच्या दाराची माती घेऊन राजाच्या कंबरेला लावावी असा आचार सांगितला आहे. सर्व वर्णाकडून राजाला अभिषेक झाल्यावर त्यानें आरशांत व तुपांत पहावें. विष्णुदिकांचें पूजन करावे. शय्येवर व्याघ्रचर्म टाकलेलें असावें. व त्यांवर पुरोहितानें बसून राजास मधुपर्क देऊन वस्त्र बांधावें (पट्टबंध). राजानें मुगुट बांधावा. या मुगुटामध्यें पंचचर्म असावें, म्हणजे मुगुट घालतांना, ज्याप्रमाणें आज शिपायांच्या पटक्यांत टोपी आपणांस आढळते तसें मुकुटामध्यें चर्म बांधावें (पंचचर्मोजरंददेत्). नंतर बैलाच्या, सिंहाच्या, वाघाच्या किंवा चित्त्याच्या कातड्यांवर राजानें बसावें. प्रतिहारीनें प्रधान, सचिव वगैरे लोक दाखवावे; म्हणजे त्यांची माहिती करुन घ्यावी. नंतर दानें वगैरे ब्राह्मणांस देऊन घोडा व हत्तीची पूजा करुन राजाची मिरवणूक राजमार्गानें काढावी.

अ. २१९ अभिषेकमंत्र, या मंत्रांत कांहीं देव, ॠषी, पर्वत, देश, नद्या यांचीं नांवें आली आहेत. त्यांत नद्यांची बरींच अपरिचित नांवें आहेत. अच्छोदा, देविका, वरुणा, निश्चिरा, पारा, रुपा, गौरी, वैतरणी, अरणी वगैरे. अ. २२० साहाय्यसंपत्ती म्हणजे अधिकारीमंडळ अथवा राज्यव्यवस्थेस लागणारीं खाती व त्यांवर अधिकार्‍यांची योजना. राजाला राज्याभिषेक झाल्यावर त्यानें शत्रूंना जिंकावें. सेनापती ब्राह्मण किंवा क्षत्रिय असावा. धनाध्यक्षास म्हणजे खजिनदाराला रत्‍नाची व हिशेबाची माहिती असावी. हस्त्याध्यक्ष हा जितश्रम असावा; त्याला हस्तीची परीक्षा असावी. तसाच घोडदळाचा मुख्य अश्वशास्त्रांत पारंगत असावा; (दुर्गाची) किल्लेदार फार हुषार असावा; तसाच वास्तुचा अधिकारी (स्थपती) हा शिल्पशास्त्रांत निष्णात असावा. मंत्री हुषार असावा. सभासद धर्म जाणणारे असावेत. यंत्रमुक्त, पाणिमुक्त, अमुक्त, व मुक्तधारित, हे चार प्रकार बाण व शास्त्र सोडण्याचे आहेत. आचार्य वरील चारी प्रकारांत तद्ज्ञ असावा व युद्ध करण्यांत कुशल असून राजाचें हित साधणारा असावा. प्रतिहारी नीतिशास्त्रामध्यें तद्ज्ञ असावा. दूत गोड बोलणारा, अक्षीण, व अतिबलाढ्य असावा. किंवा प्रतिज्ञेदाखल राजास विडा देण्यासाठीं ज्याची योजना करीत तो तृतीयप्रकृती असे; सारथ्याकडे कामाची बरीच जबाबदारी असे. तो पूर्ण राजनिष्ठ असून संधिविग्रह, षाड्गुण्य, सैन्यादि सर्व जाणारा राजाचें रक्षण करण्यासाठीं नेहमीं हातांत तलवार धारण करणारा असावा. (सूदाध्यक्ष ) आचारी किंवा पाकशास्त्रज्ञ हा त्या पाकशास्त्रांत पूर्ण असावा.

लेखक वळणदार अक्षराचा (अक्षरवित्) असावा. (दौवारिक) देवडीवाला चतुर असावा म्हणजे बोलण्याची कला जाणणारा असावा. वैद्य आयुर्वेद जाणणारा असावा. अंतःपुरांतील कारभारी वृद्ध असावा. अंतःपुरांत काम करणार्‍या स्त्रिया पन्नास वर्षांच्या पुढें व पुरुष सत्तर वर्षांच्या पुढें असावेंत. आयुधागारामध्यें असणारा पुरुष नेहमीं सावध (जागृत) असावा.

राजानें नोकरांची योजना परीक्षा करुन करावी. म्हणजे धर्मिष्ठांस धर्मकार्यात, शूरांस युद्धकर्मांत, निपुणांस अर्थकृत्यांत नेमावेत. मंत्र्यानें वनगजांना धरण्याचा प्रयत्‍न करण्यासाठीं तद्ज्ञांची योजना करावी. पिढीजाद नोकर काढूं नयेत. पिढिजाद नोकर दायादप्रकरणीं योजूं नयेत. कारण ''तत्र ते हि समा मताः (?) असें दिले आहे. शत्रूच्या घरुन निघून आपल्या आश्रयास आलेल्या लोकांस (ते दुष्ट असोत वा सुष्ट असोत) आश्रयास ठेवावेत. दुष्टांवर विश्वास ठेऊं नये. देशांतराला गेलेल्या गुप्‍तदूताकडून माहिती घेतल्यानंतर त्याचा सत्कार करावा. नोकरांचे विभाग दोन करावेत. शत्रू, अग्नि, विष, सर्प व अयुधें यांकडे विशिष्ट नोकर असावेत व वाईट नोकर एका बाजूला असावेत. राजाच्या सर्व खात्यांतून गुप्‍तदूतांची योजना असावी. हे गुप्‍तदूत सौम्य, लोकांना न समजणारे, किंवा त्या खात्यांतील लोकांस सुध्दं परस्पर न जाणणारे, असे असावेत. व्यापारी, मांत्रिक, जोशी, वैद्य, सन्यस्तांसारखे दिसणारे, बलाबल जाणणारे, असावेत. यांवर राजानें पूर्ण विश्वास टाकूं नये. एकाच्या वाक्यांवर विश्वास ठेऊं नये. राजानें सेवकांचा किंवा लोकांचा रागापराग (प्रेम अथवा क्रोध) गुणागुण जाणून तसें वर्तावें. राजानें चालू एक तत्त्व लक्षांत ठेवावें लागत असे तें हें कीं आपण लोकांच्या रंजनासाठी अथवा जनतेच्या हितासाठीं आहोत.

अ.२२१ अनुजीविवृत्त. नोकरानें राजापाशी कसें वागावें याबद्दलचे नियम. नोकरानें राजाज्ञा शिष्यासारखी पाळावी, राजाचें त्यानें प्रिय बोलावें, अप्रिय तथापि हितकर असें बोलणें एकांती करावें, द्रव्याचा अपहार करूं नये, अथवा राजाची मानहानि करूं नये. राजाचे वेष, भाषा अथवा चेष्टा याचें अनुकरण करूं नये. वजाचा रोष ज्या माणसावर आहे अशाशी अंतःपुरचराध्यक्षानें (कंचुकीनें) संगत करूं नये. राजाच्या गुप्‍त गोष्टी त्यानें गुप्‍तच ठेवाव्यात. आपले कौशल्य दाखवून राजाला आपलेंसें करावें. राजानें हांक मारतांच आज्ञा केली असो, अथवा नसो, त्याने मी काय करूं असें विचारावें. राजानें वस्त्र, अलंकार, किंवा रत्नें बहाल केलेलीं धारण करावी. ज्या दरवाजानें परवानगी नाहीं, अशा दरवाजानें कधी जाऊं नये. जांभई देणें, थुंकणे, खोकणें, रागावणें, पलंगावर बसणें, कपाळाला आंठ्या घालणें, मोठ्यानें वातासरण करणें, ढेंकर देणें, या गोष्टी राजाच्या समीप करूं नये. आपल्या गुणांची स्तुती राजाच्या कानांवर नेहमीं जाईल अशा बेतानें माणसाची त्यानें योजना करावी, शाठ्य, लौल्य, पैशुन्य, नास्तिक्य, क्षुद्रता, चापल्य, इत्यादि दोष त्यामध्यें नसावेत. बहुश्रुतपणा, विद्या, शिल्प या कामीं त्यानें तत्पर असावें. तो कला जाणणारा असावा. राजाचे पुत्रस्नेही, मंत्री वगैरे लोकांनां नेहमीं नमस्कार करावा. प्रधानांवर विश्वास ठेऊं नये. राजाच्या मनांतील गोष्टी जाणून प्रसंगवशात् त्यानें वागावें. राजानें विचारल्यावांचून कांहीं बोलूं नये. आपत्तींतहि राजाचें काम करावे; प्रसन्न, वाक्यसंग्राही, असें असावें. थोड्या देणगीवर संतुष्ट असावें, राजाची स्तुति ऐकतांच संतुष्ट असावें, प्रसंगवशात् राजाच्या देणगीचा नेहमी उल्लेख लोकांपाशी करीत असावा.

अ. २२२. दुर्ग संपत्ति - राजानें दुर्गाचा आश्रय करावा. या दुर्गप्रदेशीं वैश्यशूद्रांची बहुधा वस्ती असावी. ही दुर्गभूमी बहुधा शत्रूच्या आहाराबाहेरची असावी. या जागेंत ब्राह्मणवस्ती क्वचितच असावी. मोलमजुरी करणारांचा भरणा तींत अधिक असावा. ती जागा देवमातृक नसावी. (देवमातृक म्हणजे नदीचें पाणी अथवा पावसाचें पाणी, ब्रीही, वगैरेचा पुरवठा असतो त्यास देवमातृक म्हणतात.) अर्थात् हा प्रदेश खडकाळ अथवा डोंगराळ असावा. व मुद्दाम तेथें पाण्याची सोय करावी. पुष्पफलधान्याची समुद्धि असावी. तेथें परचक्राला येतां येऊं नये. सर्प, तस्कर यांची भीति त्या प्रदेशाला नसावी. दुर्गाचे प्रकार सहा आहेत. ते असे. धनुर्दुर्ग, महीदुर्ग, नरदुर्ग, वार्क्षदुर्ग, अंबुदुर्ग, व गिरिदुर्ग. यांत गिरिदुर्ग हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा अभेद्य असून इतर सर्व दुर्ग शत्रूला लवकर भेदतां येतात व सर करतां येतात. (सर्वोत्तमं शैलदुर्गमभेद्यंचान्यभेदनम्) पूर्वी सांगितलेल्या प्रदेशीं राजानें शहराची, बाजाराची, देऊळ बांधण्याची तरतुद करावी.

अ. २२३।२५ राजधर्म. राजानें महसूल व कामकाजाची बजावणी व्यवस्थित व्हावी म्हणून अधिकारी नेमावा. व्यवस्था पुढीलप्रमाणें करावी. गांवाचा एक मुख्य अधिकारी कोणी तरी असावा, त्याच्यावर नजर दहागांवाच्या अधिकार्‍यांने करावी. दशग्रामाधिकार्‍यावर ताबा शंभर गांवाच्या अधिकार्‍यानें करावा. नंतर प्रांताधिकारी व त्यांपुढील अधिकार्‍यांची योजना पूर्वीप्रमाणें वाढती करावी.

त्यांच्या पगाराची व्यवस्था त्यांच्या कामानुरुप करावी. अधिकारी वर्गाची व्यवस्था बरोबर चालली आहे किंवा नाहीं याची बातमी रोज राजाला गुप्‍तदुतांकडून कळावी. ग्राम याचा अर्थ खेडें असा समजावा. गांवामध्यें उपस्थित झालेल्या तंट्याबखेड्यांची व्यवस्था गांवाधिकार्‍यानें करावी. परंतु तेवढ्याने न भागल्यास त्याची व्यवस्था दशग्रामाधिकार्‍यानें करावी. याप्रमाणें राजापर्यंतची व्यवस्था असावी. या व्यवस्थेचें मूलतत्त्व म्हणजे देशाची सुरक्षता होय. सुरक्षता हीच राजाची आर्थिक संपत्ति होय, व आर्थिक संपत्तीनेंच पुरुषार्थत्रयाची प्राप्ति होते. राष्ट्राला पीडा करणारा राजा नरकाला जाईल.

व्यवस्था - राजानें उत्पन्नाच्या मानानें सहावा हिस्सा वसूल घ्यावा. (राजा षड्भागमादत्ते सुकृताद्दुष्कृत।दपि) ही वसुली सरसकट असावी. म्हणजे चांगला अथवा वाईट हा भेद नसावा.

कराची आकारणी शास्त्रोक्त पद्धतीनें करावी. कर अथवा वसूल झालेलें द्रव्य याचे राजानें दोन विभाग करावे. एक भाग अथवा अर्धा वसूल कोशांत टाकावा. (कोशेप्रवेशयेदर्धं नित्यंचार्धंद्विजेददेत् ॥ निधिं द्विजोत्तमः प्राप्य गृण्हीयात्सकलं तथा) राहिलेला एक भाग ब्राह्मणास द्यावा.

ब्राह्मणानें त्या द्रव्याचे अनुक्रमें ४, ८ व १६ असे भाग करुन योग्यायोग्यतेप्रमाणें ब्राह्मण, क्षत्रिय, अथवा वैश्य यांमध्यें वांटून द्यावे. (चतुर्थमष्टमं भागं तथा षोडशकं द्विजः ॥ वर्णक्रमेण दद्याच्च निधि पात्रेतु धर्मतः)

खोटें बोलणार्‍या पासून राजानें त्याच्या द्रव्याच्या हिश्शापैकीं दंडादाखल आठवा भाग घ्यावा. ''अनृतं तु वदन् दंड्यः सुवितस्यांशमष्टमः ॥ प्रनष्टस्वामिकमृत्थं राजात्र्यब्दं निधापयेत् ॥ बिन वारसाचें (द्रव्य जिनगी ) राजानें तीन वर्षे आपल्या स्वाधीन ठेवावें. तीन वर्षांच्या पूर्वी त्या जिनगीला जर वारस उभा असेल तर त्याची चौकशी करुन वारसास ती द्यावी. वारस ठरविणें हे त्याच्या रुपावरुन व संख्येवरुन ठरवावे. (?) तीन वर्षांनंतर ती जिनगी राजानें खजिन्यात सामील करावी. अज्ञानाची जिनगी तो सज्ञान होईपर्यंत राजानें आपल्या ताब्यांत ठेवावी. सज्ञानाची व्याख्या शैशवा नंतरची स्थिति अशी आहे. ज्याप्रमाणें अज्ञानाची जिनगी रक्षण करण्याचा अधिकार राजाला आहे, त्याचप्रमाणें बालपुत्रा (जिचें मूल लहान आहे,) निष्कुला, अनाथ, पतिव्रता, विधवा, (आतुरा) आजारी व ''जीवंती '' (?) या स्त्रियांच्या जिनगीचें रक्षण राजानें करावें. त्यांच्या (वृत्तीची) उपजीविकेची जबाबदारी अर्थात् राजावर राहणार. वरील तर्‍हेच्या स्त्रियांची जिनगी हिरावूं इच्छिणार्‍या तिच्या बांधवांस राजानें शिक्षा करावी. ही शिक्षा चोराप्रमाणें असावी.

तुरंगावरच्या अधिकार्‍याचा रोजमुरा चोराच्या सांपडलेल्या द्रव्यावर भागवावा. चोरी झाली नसतांही जो चोरी झाली असें म्हणतो त्यास निसार्य्य नांवाची अथवा दंडाची शिक्षा करावी. (अहृते योहृतब्रुयान्निःसार्योदंड्यएवसः)

घरवाल्यानें घरांतील जमिनींत सापडलेलें द्रव्य राजाला दिल्यावर ते द्रव्य राजाचेंच होय. स्वराष्ट्रांत घडणार्‍या व्यापारांवर १/२० कर असावा. परराष्ट्रांतील (परदेश) व्यापारांवर कर नफा नुकसानी (क्षयव्यय) प्रमाणें ठरवावा. (शुल्कांशं परदेशाच्च क्षयव्ययप्रकाशकम् ज्ञात्वा संकल्पयेत्) व्यापार्‍यास होणार्‍या फायद्यावर १/२० कर घेतलाच पाहिजे. व्यापार्‍यानें तो न दिल्यास शिक्षेस पात्र होईल. नौकेवरील कर पूर्वीप्रमाणें असावा असें अनुमान निघतें. कारण कराचा नक्की उल्लेख केला नाहीं. पूर्वीप्रमाणें हा अर्थ मागील संदर्भावरुन घेतला आहे. स्त्रियांना व संन्याशांना नौकेचा कर नाहीं. नौका (दासांच्या ) कोळ्यांच्या चुकीनें नष्ट झाल्यास नौकेच्या खर्चाचा बोजा कोळ्यावर राजानें लादावा.

(वरील वाक्यावरुन असें अनुमान मात्र काढतां येईल कीं आज मित्तीस चालूं असलेली लिलांवपद्धती पूर्वी अंमलांत आणीत असावेत. मात्र मक्त्याचे पैसे घेऊन नौका पुरविणें राजाचें काम असावें) शूक धान्यावर कर १/६ असावा. शूक धान्य म्हणजे बाजरी वगैरे, शिंबि धान्यावर कर १/८ घ्यावा. राजानें वनांतील धान्यें देशकालानुरुप आणावींत (वरी, नाचणी, सावें, देवभात वगैरे). पशु व सोनें, यावरील कर १/५ व १/६ घ्यावा. सुगंधी द्रव्यें, औषधी, रस, मूल, फूल, फळ, कांदे, पानें, भाज्या, गवत, वेळू, कातडें, वेळूंतील बी (हें अगदी गव्हांसारखें असतें) वेळूंचीं अथवा वेतांचीं (वैदल) भांडी, दगडाचीं भांडी, किंवा इतर धातूंचीं भांडी, मधु, मांस, अथवा तूप, या सर्व पदार्थांवर १/६ कर असावा.

कराची माफी फक्त ब्राह्मणांस आहे. श्रोत्रिय ब्राह्मणाची उपजीविका त्याच्या गुणावरुन व वृत्तीवरुन ठरवावी. त्याचप्रमाणें गुणी माणसांना राजाश्रय मिळावा. जो राजा धर्मानें वागतो त्याचें आयुष्य, द्रव्य, व राष्ट्र वाढतें. कारागिरांकडून एक महिना काम घ्यावें.

अ. २२४ हा अंतःपुरांतील स्त्रियांच्या रक्षणाचा अध्याय आहे. त्रिवर्ग वृक्षाचें रुपक केलें असतां, तें असें होईल की धर्म हे या वृक्षाचें मूळ आहे. अर्थ त्याच्या शाखा असून काम त्याचें फळ होय. या त्रिवर्गाची प्राप्ति केवळ स्त्रियांच्या रक्षणानें होते म्हणून अंतःपुरांतील स्त्रियांचे रक्षण करणें हें राजाचें अनेक कर्तव्यांपैकीं एक मुख्य कर्तव्य होय. स्त्रिया कामाधीन असून, त्यांच्यासाठीं रत्नांचा संग्रह करावा. विषयाचें सेवन फारच मर्यादित असावें. यापुढें या अध्यायांतील विशेष म्हटला म्हणजे कोणती स्त्री आपणांवर आसक्त नाहीं हें ओळखण्याची लक्षणें व ती स्त्री वश होण्यास थोडा औषधिप्रकार सांगितला आहे हा होय.

अ. २२५ राजधर्म (राजपुत्राचें शिक्षण ) राजपुत्र एकांगी उपयोगाचा नाहीं. त्याचें शिक्षण धार्मिक, आर्थिक, कामिक, सांग्रामिक, शिल्पप्रचुर असावें. तोंडापुरतें गोड बोलणार्‍या लोकांची संगति त्याला न लागण्याविषयीं फारच खबरदारी घेतली पाहिजे. तामसी, लोभी, किंवा मानी लोकांची संगति नसावी. राजपुत्राच्या हालचालीची बित्तं बातमी लागण्यासाठीं शरीररक्षणाच्या निमित्तानें राजानें पुष्कळ लोक त्याच्या सेवेला ठेवावे. राजपुत्राला राजानें दुखवूं नये. राजपुत्र उनाड बनेल असें दिसल्यास राजानें युक्तीनें त्यास बंधन करावें. नम्र अशा राजपुत्रास सर्व अधिकाराच्या जागा घ्यावा. फांसें, शिकार किंवा मद्यपान यांपासून त्यास अलिप्‍त ठेवावें. दिवसा झोंप, वृथा अभिमान, बोलण्यांत उद्धटपणा, निंदा, दंड, कठोरपणा, द्रव्याचा निरर्थक खर्च, काम, क्रोध, मद, मान, लोभ, दया इत्यादि दुर्गुण त्याला न लागण्याची तजवीज राजानें करावी. आकाराचा (बांधणीचा ) उच्छेद व दुर्गादिकांची पडझड होणें म्हणजे अर्थनाश होय. देशकालादिकांचा विचार न करतां केलेलें दान अथवा निरर्थक खर्च, हें अर्थदूषण आहे.

राजानें प्रथम क्रोधादि जिंकून नोकरांवर ताबा ठेवावा, नंतर देश जिंकावा, पुढें बाह्य शत्रूंना जिंकावें. बाह्य शत्रू तीन प्रकारचे आहेत. खालील श्लोकांचा नीट अर्थ लागत नाहीं. ''गुरुवस्ते यथापूर्व कुल्यानंतरकृत्रिमः। पितृ पैतामहं मित्रं सामंतश्च तथा रिपोः। कृत्रिमंच महाभाग मित्रं त्रिविध मुच्यते '' स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, दंड, कोष व मित्र या सात अंगाला मिळून राज्य म्हणतात. वरील सात अंगापैकीं एकाहि अंगाचा द्रोह करणारास मृत्यूची शिक्षा करावी. तीक्ष्ण अथवा मृदू प्रसंगवशात् राजानें बनावें. नोकरांशी हसू नये. हंसणार्‍या राजाचा नोकरांकडून वरचेवर अपमान होतो. लोकसंग्रहार्थ राजानें कृतकव्यसन म्ह. नेहमीं कार्यतत्पर असावें.

स्मितपूर्व असें नेहमी राजानें बोलत असावें. दीर्घसूत्र राजा उपयोगाचा नाहीं. पण राग, दर्प, मान, द्रोह, पाप व अप्रिय यांबद्दल राजानें दीर्घसूत्र असावें.

राजानें वागण्याचे नियम :- आपली मसलत कोणाला समजूं देऊ नये. मंत्रविचार एकट्यानें किंवा पुष्कळाशीं करुं नये. केव्हांही कोठेंही विश्वास ठेऊं नये. राजानें उद्धट असूं नये. त्याच्या ठिकाणीं विनय असावा. राजांच्या कल्याणाच्या गोष्टी म्हणजे युद्धांतून परत न येणें, प्रजेचें पालन करणें, ब्राह्मणास दान देणें ह्या होत. कृपण, अनाथ, वृद्ध, विधवा, याची जीविका राजानें चालवावी. वर्णाश्रमव्यवस्था, तापसांचे पूजन, व तपस्वी वचनांवर विश्वास हें राजाचें आद्य कर्तव्य होय. राजानें बगळ्याप्रमाणें अर्थचिंतन, सिंहाप्रमाणें पराक्रम, लांडग्याप्रमाणें लूट, सस्याप्रमाणें पडतें, डुकराप्रमाणें दृढ प्रहार, मोराप्रमाणे चित्राकार, घोड्याप्रमाणें दृढभक्ति, कोकिलाप्रमाणें मधुर आलाप, कावळ्याप्रमाणें शंका, या सर्व गोष्टी लक्षांत ठेवाव्या. राजानें अज्ञातवस्तींत असावें. परीक्षा केल्यावांचून भोजन व शयन राजानें करूं नये. अज्ञात स्त्रीची भेट घेवूं नये; व अज्ञात नावेमध्यें बसूं नये. राजाच्या राज्याची शोभा व टिकाऊपणा हा केवळ लोकांच्या प्रजेच्या अनुरागावरच अवलंबून आहे.

सा मा दि उ पा य क थ न अ. २२६ प्रथम चार श्लोकांत दैव व पुरुष या वादांत पुरुषवादालाच अग्रगण्यत्व दिलें आहे. शत्रूचा बीमोड करण्यास चार उपाय आहेत ते येणें प्रमाणें :- साम, दान, भेद व दंड. सामाचे भेद दोन. तथ्य व अतथ्य. अतथ्य याचा आपण असा अर्थ करूं कीं वाजवीपेक्षा ज्यास्त साम (शांति). हा साम साधु पुरुषांमध्यें आढळतो यामुळे साधु पुरुष दुष्ट लोकांकडून पीडले जातात.

दुसरा प्रकार प्रसंगवशात् समजावा. परस्पर ज्यांच्यांत द्वेष आहेत, किंवा एकमेकांत कोपाग्नि वाढला आहे, अथवा अपमान झाला आहे अशा लोकांत भेद करणे फारच सोपें आहे किंवा त्यांस भिववणें, हेंही कदाचित् सोपे जाईल. ज्ञातीचा भेद करणाराचें फार बेतानें रक्षण करावें. मांडलिक अथवा प्रधानपुत्रादिकांचा कोप शमवून म्हणजे एकी करुन शत्रूंवर जय करावा. या चारी उपायांत दान हा उत्तम उपाय होय. वरील तीन उपायानें शत्रू साध्य न झाल्यास दंडाचा उपयोग करावा. दंडाबद्दल सावधगिरी पाहिजे. अदंड्यांना दंड करूं नये व दंड्यांना क्षमा करूं नये.

अ. २२७. दं ड प्र ण य न. दंडार्थ सुवर्णाची भाषा वापरली आहे आणि कोष्टक दिलें आहे तें असें :- तीन यव =कृष्णल; पांच कृष्णल =माष; सहा कृष्णल=कर्षार्ध; सोळा माष = सुवर्ण; चार सुवर्ण= निष्क; १० निष्क= धरण.

दंड (साहस) कमीतकमी (प्रथम) २५० पण असावा. मध्यम ५०० असावा. व जास्तींत ज्यास्त (उत्तम) १००० पण असावा. (असीतिभिर्वराटकैः पण इत्यभिधीयते) पण म्हणजे एक आणा.

चोरांनीं न चोरतां माझी चोरी झाली अशी खोटीच अफवा उठवतो त्यास राजानें दंड करावा. खोटे बोलणें अथवा बोलविण्याचा प्रयत्‍न करणें त्या दोघांस पूर्वीच्या दुप्पट दंड करावा. या श्लोकांतील दम शब्द दंड या अर्थी आहे. (दम शब्द आपल्या मराठींत सुद्धां आहे) खोटी साक्ष देणार्‍या त्रैवर्णिकांस पूर्वीप्रमाणेंच शिक्षा राजानें सांगावी. ब्राह्मणास शिक्षा म्हटली म्हणजे मुख्यत्वें करुन त्याला आपल्या हद्दीतून घालवून देणें ही होय. ठेव ज्याकडे ठेवली असेल व तिचा उपयोग ठेव ठेवून घेणारा जर करील तर त्यास ठेवेइतकी किंमत ठेव दाबणाराकडून द्यावी. ठेवीचा नाश करणारा अथवा ठेव न ठेवतां ती मागणारा ह्या दोघांना चोराप्रमाणेंच किंवा दुप्पट दंड करावा. अजाणतां जो दुसर्‍याच्या मालाची विक्री करतो, तो निर्दोष. परंतु जाणूनबुजून विक्री करणारास चोराप्रमाणेंच दंड करावा. पैसा घेऊन जो आपलें शिल्प देत नाहीं त्यास चोराप्रमाणें शिक्षा द्यावी. देतों म्हणून कबून करुन न देणारास सुवर्ण दंड करावा. भृति (वेतन) जो घेऊन काम करीत नाहीं, त्यास आठ कृष्णल दंड करावा.

विनाकारण किंवा अकालीं नोकरास जो सोडतो त्यालाही पूर्वीप्रमाणेच दंड असावा. नोकर विकत घेतला अथवा विकला याबद्दल घेणारास अथवा विकणारास १० दिवसाच्या आंत पश्चाताप झाल्यास व्यवहार परत व्हावा. वराचे दोष मनांत न आणतां जो आपली मुलगी देतो ती मुलगी दिली असली तरी न दिलेली समजावी. एकदां मुलगी देऊन तीच पुन्हा दुसर्‍यास दिली गेल्यास देणारास उत्तम साहस, म्हणजे १००० पण दंड करावा. कोणत्याही वस्तूबद्दल विसार घेऊन एखाद्या लोभी व्यापार्‍यानें ती वस्तु दुसर्‍यास विकल्यास तो सहाशें (सुवर्ण) दंडाला पात्र आहे. राखणावळ घेऊन जो गाईचें पोषण करीत नाहीं किंवा गाय राखीत नाहीं तो १०० सुवर्ण शिक्षेला पात्र आहे. गांवाचा घेर सरासरी १०० धनुष्य म्ह. ३०० हात असावा. शहराचा चौफेर घेर दुप्पट तिप्पट अथवा ज्यास्तही असावा. यावरुन तत्कालीन शहरें किती लहान होतीं हें कळेल.

त्याभोंवतीं धान्येकणसासह रचावीं व त्याला कुंपण इतकें उंच असावें कीं तें उंटाला सुद्धां दिसूं नये. अशा व्यवस्थेनें ठेवलेल्या धान्याची नासाडी करणारास ५०० सुवर्ण दंड करावा. धान्य नसतांना कुंपण मोडणारा दोषी ठरत नाहीं. धाकदडपशाहीनें घर, तळें, बाग, शेत वगैरे घेणारास ५०० सुवर्ण दंड करावा. अजाणून चूक झाल्यास २०० सुवर्ण दंड करावा. मर्यादेचे उल्लंघन करणारास २०० पण शिक्षा असावी. ब्राह्मणापेक्षां १०० पट क्षत्रियाला दंड असावा. वैश्याला २०० पट असावा व शूद्राला बंधन असावें. क्षत्रियाची, वैश्याची, किंवा शूद्राची निंदा करणार्‍या ब्राम्हणास अनुक्रमें ५०।२५।१२ पण असा दंड असावा. क्षत्रियाची निंदा करणार्‍या वैश्यास दंड पूर्वीप्रमाणेंच व शूद्राचा जिव्हाच्छेद करावा. ब्राम्हणाला धर्माचा उपदेश करणार्‍या शूद्राला दंड करावा व श्रुतदेशादि वितथी म्ह. बहुश्रूतपणाचें ढोंग करणारा त्यास दुप्पट दंड करावा.

निरर्थक अथवा सज्जनांना भलतेच दोष देणार्‍यास उत्तम प्रतीचा दंड. 'मी चुकलों ' असें कबूल करणारास निम्मा दंड करावा. आईबाप, भाऊ, वडील, सासरा, गुरु इत्यादिकांस शिविगाळ करणारा (आक्षारयन्) व गुरुला रस्ता न देणारा १०० पण दंडाला योग्य होतो. ''अंत्यजातिर्द्विजातिं तु येनांगेनापराध्रुयात् तदेवच्छेदयत्तस्यक्षिप्रमेवाविचारयन्'' अंत्यजाति त्रैवर्णिकांचा ज्या अंगानें अपराध करील, त्या अंत्यजातीच्या अंगाचा च्छेद करावा. सभेंत बसलेल्या राजाच्या देखत गर्वानें थुंकणाराचे ओंठ तोडवेत. त्याचप्रमाणें गुदानें अपशब्द करणारासही त्याच्या अवयवच्छेदनाची शिक्षा असावी. ''योयदंगंचरुजयेत्तदंगं तस्य कर्तयेत्'' सिंहासनावर बसलेल्या राजाचा देखत खालीं बसणारा जें आपलें कोणतेंही आंग खाजवील तें त्याचें आंग तोडावें. गाई, घोडे, हत्ती, उंट वगैरे पशूंचा घात करणाराचे अर्धे हायपाय तोडावे. निर्फल वृक्ष करणारास सुवर्ण शिक्षा द्यावी. जाणून वा न जाणून दुसर्‍याचें द्रव्य हरण करणारा, मर्यादेवरील अथवा रस्त्यावरील जलाशयाची मोडतोड करणारा दुप्पट दंडाला पात्र आहे. आडांतील दोरी अथवा घट हरण करणारा, किंवा पाणपोईची नासाडी करणारा, किंवा प्राण्यांना मारहाण करणारा ''एक मास'' शिक्षेला पात्र आहे. हा श्लोक मनुस्मृतीच्या धर्तीवर थोड्या फरकानें आहे. (यस्तुरज्जुंघटं कूपाद्धरेच्छिंन्द्यच्च तां प्रपाम् ॥ सदंडं प्राप्नुयान्मासंदंड्यः स्यात्प्राणि ताडणे) दहा किंवा त्यापेक्षां अधिक कुंभ धान्य हरण करणारास वधाची शिक्षा असावी. मनुस्मृतींतील टीकाकारानें जितके कुंभ चोरले असतील तितक्या कुंभांच्या ११ पट धान्य चोराकडून वसूल करावें, असें दिले आहे. सुवर्ण, रुपें, चांगली वस्त्रें, स्त्रिया व मनुष्यें यांची चोरी करणारास शिक्षा वधाची असावी.

येनयेनयथांगेनस्तेनोनृषुविचेष्टते॥ तत्तदेवहरेदस्यप्रत्यादेशाय पार्थिवः ॥ मनुष्याची चोरी करतांना मनुष्यास ज्या ज्या अंगाला दुखापत झाली असेल तें तें चोराचें अंग जाहीर रीतीनें तोडावें. ''ब्राह्मणः शाकधान्यादिह्यल्पंगृह्न्नदोषभाक्'' ब्राह्मणानें शाकधान्याची थोडी चोरी केल्यास तो दोषी समजला जात नाहीं. एकाद्यानें गाय किंवा देव याचें निमित्त करुन चोरी केल्यास शिक्षा पूर्वीप्रमाणें कायम; घर, शेतादि चोरणारा, व स्त्रीवर बलात्कार करणारा, विषप्रयोग करणारा, आग लावणारा, किंवा शस्त्र उगारुन अंगावर येणारा हे सर्व वधाच्या शिक्षेला पात्र आहेत. परस्त्रीशीं संभाषण करणारा, परवानगी वांचून प्रवेश करणारा, हे दंडास पात्र आहेत. स्वतः वर वरणारी स्त्री दंडाला पात्र नाहीं. उत्तम वर्णांतील स्त्रीशीं हलक्या वर्णांतील मनुष्यानें संबंध केल्यास तो वधाच्या शिक्षेस पात्र आहे. ''भर्तारलंघयेद्यातांश्वभिःसंघातयेत्स्त्रियं '' पतीचें उल्लंघन करुन निघून जाणार्‍या स्त्रियेस कुत्र्याकडून फाडवून खाण्याची शिक्षा करावी. वैश्यस्त्रीमागी ब्राह्मण, अंत्यजागामी क्षत्रिय हे पूर्ण दंडास पात्र आहेत.

सवर्णदूषित स्त्री ''पिंडमात्रोपजीवि '' करावी. 'ज्यायसा ' दुषितानारी (वृद्धाकडून दूषित झालेली स्त्री) हिला मुंडणाची शिक्षा असावी. वेतन घेऊन लोभानें दुसर्‍याकडे गमन करणारी वेश्या वेतनाच्या दुप्पट दंडाला पात्र आहे. भार्या, पुत्र, दास, शिष्य, भाऊ किंवा सोदर हे अपराधी असतां दोरीनें किंवा वेळूच्या छडीनें पाठीवर शिक्षा करावी. डोक्यांवर मारुं नये. लोकांच्या रक्षणासाठीं नेमलेल्या (रक्षार्थाधिकृत ) अधिकार्‍यानीं (कोतवाल शिपाई वगैरे ) प्रजेकडून पैसे खाल्ल्यास त्यांची (अधिकार्‍यांची ) मालमत्ता जप्‍त करुन त्यांस घालवून द्यावें; व ज्या कामावर ज्यांची योजना केली आहे त्या लोकांनीं कामकर्‍यांस कामाची आडकाठी केल्यास त्यांस वरील प्रमाणेंच शिक्षा करावी. अमात्य किंवा न्यायाधीश (प्राड्वीवक) आपली कामगिरी अयोग्य रितीनें बजावील त्यांस पूर्वीचीच शिक्षा कायम. गुरुपत्‍नीगमन करणारा, सुरा प्राशन करणारा, व चोरी करणारा, व ब्रह्महत्या करणारा, अशा महापातक्यांनां अनुक्रमें भग, सुराध्वज, श्वपाद व मस्तक अशा खुणा कराव्यात. ही शिक्षा ब्राह्मणासच असावी असा पुढील श्लोकावरुन तर्क होतो; कारण पुढील श्लोकांत ''शूद्रादीन्घातयेत् राजा पापान्विप्रान्प्रवासयेत्॥ महापातकीनांवित्तं वरुणायोपपादयेत्'' असे म्हटलें आहे. राष्ट्रामध्यें नेमलेला अधिकारी अथवा मांडलीस सामंत यांना मिळून चोरी करणार्‍या चोरांचे व त्यास मिळणार्‍या सामंताचे किंवा अधिकार्‍याचे हात तोडावेत; किंवा त्यास शूळावर चढवावें. गांवामध्यें जे चोराला वेतन देतात, किंवा त्याला आंतून फूस देतात. तसेंच भांडार कोश देणारे सर्व पूर्वीच्याच शिक्षेला पात्र आहेत. तडाग, देवता, आगारादिकांचा भेद करणारे यांस पूर्वीचीच शिक्षा कायम असावी. रस्त्यावर घाण करणारांस दंड करावा व घाण काढावयास लावावी. प्रत्येक महिन्याला द्यावयाचा कर बुडविणारास ५०० पण शिक्षा असावी.

समाबरोबर विषम जो वागतो त्यास ''मध्यम साहस'' असावा. व्यापार्‍याकडून लांच खाऊन अवरोधन करणारास निरनिराळ्या तर्‍हेनें ''उत्तम साहस'' करावें. द्रव्यांना दोष देणारे, व प्रतिच्छंद (?) विक्रय करणारे दोघे मध्यम दंडाला पात्र आहेत. खोटें बोलणारा, कपट करणारा, खोटी साक्ष देणारा त्यांना दुप्पट दंड करावा. अभक्ष्य भक्षण करणारा ब्राह्मण किंवा शूद्र त्यास कृष्णल दंड करावा. तुलाशासन करणारा, खोटी तुला करणारा किंवा तुला नाश करणारा अथवा यांचा उपयोग करुन व्यवहार करणारा हे सर्व उत्तम दंडाला पात्र आहेत. विष देणारी, अग्नि, पति, गुरु, विप्र, अपत्य, यांचा नाश करणारी अथवा त्यास फसविणारी स्त्री नाक, कान, हात, ओंठ तोडून गाईंबरोबर घालवून देण्यात योग्य आहे. शेत, घर, गांव, अरण्यें यांची नासधूस करणारा किंवा राजस्त्रियांकडे गमन करणारा यांना कटाग्नीनें जाळावें. राजाज्ञेंत कमीजास्त लिहून फरक करणारा तसाच पारदारिक यांना उत्तम दंड असावा. राजाच्या आसनांवर किंवा राजाच्या रथादिकामध्यें बसणारा उत्तम दंडाला पात्र आहे. न्यायानें जिंकलें असतांही जो आपणांस अजित म्हणतो त्यास दुप्पट दंड करावा. राजाला द्वंद्वास आव्हान करणारा वधाला योग्य आहे, व न बोलावतां बोलाविलें आहे असें सांगणारा शिक्षेला पात्र आहे. अपराधी दंड करणार्‍याच्या हातून पळून गेल्यास दांडिक हीनबल समजून शिक्षेला पात्र आहे. यापुढील व्यवहारप्रकरणांत कांहीं दंड आले आहेत.

युद्धयात्रा - अ. २२८ ते २३३ पर्यंत युद्धला निघण्यापूर्वी अथवा निघाल्यानंतर घडणार्‍या शुभाशुभ चिन्हांवरुन जयापजयाची दिशा ठरविणें. अ. २२८ युद्धयात्रा, योद्धे धष्टपुष्ट असावे. ज्या बाजूला भूकंप होईल ती दिशा युद्धला अपजय देणारी आहे. तसेंच केतूबद्दलही जाणावें. शरीरस्फुरण व सुस्वप्नदर्शन यायोगानें आपणांस जय प्राप्‍त होईल असें राजानें समजावे. ॠतुमानाने सैन्याच्या योजना - पावसाळ्यांत हत्ती व पायदळ ज्यांत पुष्कळ अशी सेना योजावी. हेमंत व शिशिर (मार्गशीर्ष ते फाल्गुन) रथ व घोडे ज्यांत जास्त अशी सेना योजावी. वसंतुॠतूंत किंवा शरदॠतूंत चारीप्रकारची सैन्ययोजना असावी. सेनेमध्यें विशेषतः पायदळ ज्यास्त असावें.

यु द्ध, आ णि श कु न -अ. २२९ स्वप्नशुभाशुभ दुःख स्वप्नहरण अ. २३०–३२ शकुन सहा प्रकारचे आहेत. वेळ, दिशा, देश, कारण, शब्द व जाती. हे शकून उत्तरोत्तर ज्यास्त शुभाशुभ फल देणारे आहेत. रात्रींचर, दिवाचर, व उभयचर, पशुपक्ष्यांचीं नांवें येथें दिलीं आहेत. ज्या मार्गानें पुष्कळ कावळे जातात त्या दिशेंनें वेढा पडलेला शहराचा भाग शत्रूच्या हस्तगत होतो इ. प्रकारचें विवेचन. अ. २३३ ग्रहावरुन जयापजयाची किंवा यात्रेची योजना करणें हा या अध्यायांतील विषय आहे.

अ. २३४ षा ड्गु ण्य - साम, भेद, दान व दंड यांचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. त्यांपैकीं स्वदेशामधील दंडाचा प्रकार पूर्वी थोडासा सांगितला. आतां परदेशीं दंडाबद्दल थोडा विचार करूं. दंडाचे ''प्रकाश'' व ''अप्रकाश'' असे दोन प्रकार आहेत. पैकीं लुटालूट, गांवाची नासाडी, धान्याचें हरण, जाळपोळ हे प्रकार पहिल्या सदरांत येतात. व विषप्रयोग, जाळपोळ, मारेकर्‍याकडून मारविणें, चांगले पाणी (अनेक द्रव्यांनीं) बिघडविणें, हे दुसर्‍या सदरांत मोडतात. युध्दंत पाय टाकण्यापूर्वी राजानें आपल्या युद्धानें होणार्‍या नुकसानीबद्दल पूर्ण विचार केला पाहिजे. नुकसान अथवा अनर्थ ओढवण्याचा संभव असल्यास शत्रूशीं संधोच करावा. शक्य तितकें अर्थक्षय करणार्‍या दानाचा विनियोग करूं नये.

शत्रूशीं कपट करण्याचा उपाय पुढीलपणें योजावा. शत्रूच्या शिबिरांत एका लठ्ठ पक्ष्याच्या पुच्छाला कोलीत बांधून सोडून द्यावें म्हणजे शत्रूला उल्कापात झाला असें वाटेल व त्याचें मन कचर खाईल. उल्कापात हें फार अशुभ मानीत. याप्रमाणें अनेक उत्पात शत्रूला दाखवावे. तपस्व्यांकडून किंवा ज्योतिषांकडून शत्रूचा क्षय होईल असें सांगवावें. शत्रूच्या मृत्यूच्या अनेक कंड्या पिकवाव्या. ऐंद्रजालिक प्रयोग दाखवावे, शत्रुसेनेवर रक्तवृष्टी पाडावी. देवाचा प्रसाद आपणास झाला आहे असें दाखवावें. राजवाडा किंवा उंच शिखरें यांवर शत्रूंचीं मस्तकें बांधावीं. षाड्गुण्य म्हणजे सहा प्रकार. संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव व संशय.

रा जा ची दि न च र्या - अ. २३५; दोन मुहुर्त रात्र उरल्यावर राजानें निजून उठावें. गुप्‍तदुतांस अगोदर बोलवावें, आयव्यय श्रवण करावा, मलमूत्रांचा उत्सर्ग, स्नानसंध्या, देवपूजन करुन सुवर्ण धेनु वगैरे दानधर्म करावा. नंतर अनुलेपन करावें. आरशांत पाहावें. गुरुची भेट घेऊन त्याचा आशीर्वाद घ्यावा. उंची अलंकार वस्त्रें परिधान करुन सभेंत प्रवेश करावा. एकंदर कार्याचा इतिहास ऐकून घ्यावा व कार्याचा निर्णय करावा. सभेचें कार्य संपवावें. व्यायाम करावा. शस्त्रादिकांची पाहणी करावी, इत्यादि.

र ण दी क्षा - अ. २३६ रणदीक्षा मिळाल्यावर राजानें सैन्यानिशीं निघाल्यावर एक कोस थांबून तेथें ब्राह्मणदिकांची पूजा करावी. परदेशाला गेल्यावर राजानें तेथील देशाचाराप्रमाणे वागावें. तेथील लोकांचा अपमान करुं नये, सैन्यरचना सूचीमुखासारखी असावी. सैन्य थोडें असतां पुष्कळ आहे असें शत्रूला भासवावें. सैन्यरचना करतांना पुढें थोडें, पाठीमागें वाढतें ठेवावें. व्यूहाची रचना प्राण्यांच्या अंगावरुन व द्रव्यावरुन करावी. व्यूहाचीं सामान्य दहा नांवें आहेत. गरुड, मकर, श्येन, अर्धचंद्र, वज्र, शकट, मंडळ, सर्वतोभद्र, चक्र व सूची. सर्व व्यूहांमध्यें सैन्य पांच ठिकाणीं वाटलें असतें. पांच पांच भागांपैकीं लढावू असे एक किंवा दोन असून बाकीचे भाग त्यांच्या रक्षणासाठी ठेवावे. राजाने स्वतः युद्ध करूं नये. सैन्यापासून एक कोस अंतरावर दूर रहावें. ''मूलच्छेदेविनाशःस्यान्नयुध्येच्च स्वयंनृपः सैन्यस्यपश्चात्तिष्ठेत्तु क्रोशमात्रे महिपतिः'' योध्यांनां अश्वासन देणें हें महत्त्वाचें कार्य आहे.

सैन्याचा मुख्यभाग मोडकळीस आला कीं, त्या ठिकाणीं राजानें वास्तव्य करूं नये. सैन्याची गर्दी असल्यास किंवा विरळ असल्यास व्यूहभेदाकडे त्याची योजना करुं नये. व्यूह फोडतांना एकजुटीनें किंवा एकदम फोडावा. प्रथम शत्रूचा व्यूह शिथिल करुन संधि साधून तो फोडावा. व्यूह फोडणाराचें रक्षण फार तजविजीनें करावें. हत्तीला पादरक्षार्थ चार योद्धे असावेत. रथाच्या रक्षणार्थ चार अश्व असावेत. हे रक्षक ढालतलवारीनिशीं असावेत. धनुष्यवाल्यांबरोबर तितकेच ढालवालें असावेंत. धन्व्यांच्या पाठीमागें अश्व असावेत. नंतर रथ, नंतर हत्ती, नंतर पायदळ; तोंडाला नेहमीं शूरच लोक असावेंत. शूर लोकांचे फक्त खांदेच दिसावेत. त्याच्यापुढील श्लोकार्धाचा अर्थ अस्पष्ट आहे (शूरान्प्रमुखतो दत्वा स्कंधमात्रप्रदर्शनम् कर्तव्यभरुसंघेन शत्रुविद्रावकारकं)

शूरांचें लक्षण - उंच शरीर, पोपटी नाक, प्रेमळ नजर (अजिम्हेक्षण) संहृतभू, संतापी, कलहप्रिय, नित्य संतुष्ट असणें हें आहे. मृतांची शवें युद्धभूमीपासून दूर करणें हे पायदळाचें मुख्य काम होय. तसेच अन्नपाण्याचा व आयुधांचा पुरवठा करणें हें होय. टक्करीचें काम हत्तीचें आहे. आपल्या सैन्याचा भेद करूं इच्छिणार्‍या शत्रूपासून स्वसैन्याचें रक्षण करणें, एकजूट झालेल्या शत्रूच्या सैन्याची फळी फोडणें हें समशेरबहाद्दरांचें काम होय. शत्रूला पाठमोरें करणें धन्व्यांचें काम होय. संघटित झालेल्या योध्यांस व त्यांच्या वाहनांस त्रस्त करणें, संघटित सैन्याची फाटफूट करणें, फाटाफुटीची एकी करणें, हें रथ्याचें काम होय. तटादिकांचा भेद करणें ही हत्तीचीं कामें होत. विषम (भूमी डोंगराळ अथवा आडवाट्याची जागा) ही पायदळास योग्य आहे. रथाला खांचखळग्याची जागा उपयोगाची नाहीं. हत्तीला दलदलीची जागा चांगली. या तर्‍हेनें रणभूमी पाहून राजानें आपल्या सैन्याची योजना व ने आण करावी. योध्यांना नेहमी नावांनें व कुलानें उत्तेजित करावें. धर्मनिष्ठ राजाला नेहमी जय प्राप्‍त होतो. युद्ध बरोबरीचें असावे. उ. हत्ती हत्तीबरोबर इत्यादि. प्रेक्षक, अशस्त्र, किंवा पतित यांनीं रणभूमीवर प्रवेश करूं नये.

शत्रु शांत, निद्राभिव्याप्‍त असतां, नदी किंवा वन, अधोत्तीर्ण, असतां, आकाश अभ्राच्छादित असतां, कपटयुद्ध करावें. शत्रू भग्न झाले, असें ओरडावें (बाहूप्रगृह्यविक्रोशेत् भग्ना भग्ना). सैन्याची कुमक आली शत्रूचा सेनापती पडला, राजाला धरलें वगैरे बातम्या आपल्या सैन्यांत नेहमी पसरवाव्यात, शत्रूला धरल्यावर प्रधानाकडून नजराणा (रत्‍नादि ) आल्यास त्याचा स्वीकार करावा. शत्रूच्या स्त्रियांचें रक्षण करावें. शत्रूला धरुन सोडून द्यावें. त्याच्याशी युद्ध करूं नये. पुत्राप्रमाणें त्याचें पालन करावें. देशाचार कधींच मोडू नये. विजय घेऊन ध्रुव नक्षत्रावर घरीं आल्यावर देवब्राह्मणांची पूजा करावी; त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. योद्ध्यांच्या कुटुंबपोषणाची योग्य तजवीज ठेवावी. युद्धांत मिळविलेलें द्रव्य नोकर चाकर अथवा योद्धे यांमध्यें वांटावें.

अ. २३७ श्रीस्तोत्र. अ. २३८ रामानें लक्ष्मणास सांगितलेल्या नीतीचें वर्णन सामान्य आहे (नीति व धर्म). अ. २३९ राजधर्म - राजाच्या गुणाचें वर्णन म्हणजे थोडक्यांत साधूंच्या गुणांचेंच वर्णन होय. (विनीतत्वं धर्मकता साधोश्चनृपतेर्गुणः ) यापुढें पुरोहित, अमात्य वगैरेंची थोडक्यात लक्षणें दिलीं आहेत. अ. २४० षाड्गुण्य. राजाचे मुख्य विचारविषय होणार्‍या मंडळांत १२ राजे असावेत. शत्रू, मित्र, शत्रुमित्र, मित्राचा मित्र, शत्रूच्या मित्राचा मित्र, पार्ष्णिग्राह, आक्रंद, आसार, अवनय इत्यादि. संधी सोळा प्रकारचे आहेत. कपाल, उपहार, संतान, संगत, उपन्यास, प्रतीकार, संयोग, पुरुषांतर, अदृष्टनर, आदिष्ट, आत्मा, उपग्रह, परिक्रम, छिन्न, परदूषण, व स्कंधोपनेय. या सोळा प्रकारांत मुख्य चार प्रकार होत. परस्परोपकार, मैत्र, संबंध व उपहार. संधीला २० माणसें अयोग्य आहेत. बाल, वृद्ध, दीर्घरोगी, बंधुबहिष्कृत, भीरुक, भित्रेलोक, लुब्ध, लुब्धजन, विरक्तस्वभावी, अत्यंत विषयी, अनेकचित्तमंत्र, देवब्राह्मणनिंदक, दैवोपहतक, दैवनिंदक, दुर्भिक्षव्यसनोपेत्त, बलव्यसनसंकुल, स्वदेशस्थ, बहुरिपु, बहुकालमुक्त, सत्यधर्मव्यपेत. हे सर्व संधी करण्यास अयोग्य आहेत. एकमेकांच्या अपकारानेंच विग्रह उत्पन्न होतो. वैर पांच प्रकारचें आहे (सापत्‍न, वास्तुज, स्त्रीज, वाग्जात, व अपराध). विग्रहाचे १६ प्रकार आहेत. यान हें पांच प्रकारचें आहे.

अ.२४१. सामादि. मंत्रशक्ति ही प्रभाव व उत्साह यांच्या जोरावरच प्रशस्त मानिली आहे. मंत्राचे प्रकार ५ आहेत, ते असे. ''अविज्ञात '' गोष्टींचें ज्ञान, ज्ञातचा गोष्टींचा निश्चय. द्विविध अर्थाच्या संशयाची निवृत्ति, शिल्लक पाहणें (शेषदर्शन), देशकालाच्या विभागानें सहायसंपत्तीचा विचार, विपत्तीचा प्रतीकार. मद, प्रमाद, काम, सुप्‍त व प्रलापित हे मंत्राला फोडणारे आहेत. प्रगल्भ, स्मृतिमान् वाग्मी, शस्त्र व शास्त्र यांत तत्पर, कामाचा पूर्ण अभ्यास असलेला (अभ्यस्तकर्मा) हाच राजाच्या सेवेला योग्य आहे. दूताला इतके गुण अवश्य आहेत. शत्रूच्या पुढें समजल्यावांचून उभे राहूं नये, किंवा सभेत जाऊ नये. शत्रूचा उणेपणा पाहून त्याशीं विरोध करावा. कार्याच्या कालाची नेहमी राजानें अपेक्षा करावी. रागापराग हे दूतांच्या दृष्टीवरुन व गालाच्या हालचालीनें जाणावे. गुप्‍तदूत व्यापारी, शेतकरी, भिक्षुक किंवा सोंगाड्या असावा. मंत्र, मंत्रफलसिद्धि, कामकाजाचें निरीक्षण, आयति, आयव्यय (जमाखर्च), दंडनीती, शत्रूचा प्रतिषेध, व्यसनाचा प्रतीकार, राज्य व राजाचें रक्षण, हीं कामें अमात्याचीं आहेत. तो जर व्यसनी असेल तर नियमित कार्य होणार नाहीं. हिरण्य, धान्य, वस्त यांची प्रजा ही वाहन होय. इत्यादि. अर्थ स्पष्ट नाहीं. (हिरण्य धान्य वस्त्राणि वाहनं प्रजया भवेत्॥ तथान्येद्रव्यनिचया हन्तिसव्यसना प्रजा) आपत्तींत असलेल्या प्रजेचें रक्षण, कोष व दंड यांचें निरीक्षण यानेंच करावें. दुर्गव्यसन म्हणजे यंत्र, प्राकार, परिखा वगैरे मोडकळीला येणें, शस्त्रांचा पुरवठा नसणें, क्षीण सैन्याची भरती असणें, हें होय. सैन्यव्यसन, उपरुद्ध, परिक्षिप्‍त, अमानित, विमानित, अभूत, व्याधित, श्रांत, दूरयात, नवागत, परिक्षीण, प्रतिहत, प्रहताग्रतर, आशनिर्वेद, भूयिष्ट, अमृतप्राप्तः, कलत्रगर्भ, निक्षिप्‍त, अंतःशल्य, विच्छिन्न, विविधासार, शून्यमूल. अस्वास्यसंहत, भिन्नकूट, दुष्पार्ष्णिग्राह, हें सैन्यव्यसन होय. या पारिभाषिक शब्दांचा अर्थनिश्चय काळजीपूर्वक केला पाहिजे सैन्याच्या तळामध्यें राजाचा निवेश व खजिना असावा. सामाचे भेद चार; दानाचे भेद पांच. भेदाचे प्रकार तीन. दमाचे भेद तीन. हे कुठें व कसे योजावे याचें थोडक्यांत विवेचन दिलें आहे.

अ. २४२ राजनीति. सैन्य सहा प्रकारचें असावें. त्यांची नांवे, मौल, भूत, श्रोणि, सुहृत, द्विषत्, आटविक. उत्तरोत्तर हे प्रकार अधिक कमी योग्यतेचे आहेत. हत्ति, घोडे, रथ, पायदळ हे सैन्याचे भाग अथवा अंग झाले, परंतु सैन्यभरती कशी असावी याबद्दलचे वरील प्रकार आहेत. मौल म्ह. खानदानीचे व पिढीजाद, व शास्त्रवेत्ते (मनुस्मृति अध्याय ७.५४ पहा); भूत-लायक किंवा स्वामिनिष्ठ; श्रोणी- (अर्थ काय); सुहृत्-मित्र; द्विषत्-शत्रु; आटविक-रानटी अरण्याची ज्यांनां माहिती आहे असे लोक. व्यूह शब्दाचा अर्थ आपण सैन्याची शिस्त व मांडणी असा ठरवूं. नदी, पर्वत, अरण्यें, दर्‍या खोर्‍या इत्यादि ठिकाणी जेथें भीतीचा संबंध असेल तेथें सैन्यानिशीं खुद्द सेनापतीनें जावें. ''नद्याद्रिववनदुर्गेषु यत्र यत्रभयंभवेत् सेनापतिस्तत्रगच्छेत् स्वयं व्युहीकुतैर्बलैः (शुक्रनीतीमध्यें हा श्लोक थोड्या पाठभेदानें आहे. शुक्रनीति अ.४ प्र. ७). सैन्यांतील नायक सगळ्यांच्या पुढें असावा व त्याच्याजवळ धाडशी शूर असे वीर असावेत. मध्यें कलत्र, स्वामी कोष इत्यादि असावेत. दोन्ही पार्श्वभागाला घोडे, घोड्यांच्या बाजूला रथ, रथांच्या बाजूला हत्ती, हत्तीच्या दोन्ही बाजूला रानटी सैन्य असावें. पाठीमागून सेनापती. अशी सेनेमध्यें मांडणी असावी.

खिन्नांना आश्वासन देत सज्ज अशा सैन्यासह दर मजल गांठावी. मागें रणदीक्षाप्रसंगीं, व्यूहांचीं नांवें सुचविलीं आहेत. त्यापैकीं पूर्वगामी सैन्यरचना असावी. पुढें भय आल्यास दोन्ही बाजूला मकर, श्येन, सूची, वीरवक्त्र यांपैकीं कोणती तरी असावी. पिछाडीला भीति उत्पन्न झाल्यास शकटव्यूह असावा. पार्श्वभागाला वज्रव्यूहाची रचना असावी. सर्व बाजूला सर्वतोभद्रव्यूह असावा. युद्धाचे प्रकार दोन. प्रकाशित युद्ध व अप्रकाशित युद्ध. अप्रकाशित युद्धांत विशेषतः छावणी रक्षण करणारांचा नाश करावा. सैन्याची प्रथम हुलकावणी देऊन आपल्या पाठीमागें लागणार्‍या शत्रुसैन्याला एक जुटीनें मारावें. छापा घालणें, अघाडीचें, पिछाडीचें, बगलेचें. हें सैन्य बहुधा प्रथम आटविक सैन्य लढवावें. नंतर वाहक सैन्य योजावें. छावणी, गांव, शहर, स्वामी, प्रजादिक सैन्य हें विश्वस्त असतां छापा घालावा. छापा केवळ रात्रींचा घालावा असें नाहीं. तर दिवसासुध्दं छापा घालावा. रात्रीं शत्रुसैन्य निद्रिस्त असतां त्यावर छापा घालतांना हत्ती व ढाल तलवार धरणार्‍या सैन्याची योजना करावी. गजदलाचा विशेष उपयोग म्हटला म्हणजे वनदुर्गामध्यें प्रवेश करणें, एक जुटीनें असलेल्या सैन्याची फोड करणें, फुटाफुट झालेल्या सैन्याची एक जुट करणें, खजिना सांभाळणें, अभिन्न सैन्याचा भेद करणे व मित्रसंधान या गोष्टीकडे रथदलाचा उपयोग होतो. अरण्यें, दिशा, मार्ग यांचा शोध लावणें; (वीवधासार लक्षण ) शत्रूच्या मार्गाची अथवा धान्यादिक पुरवठ्याची लक्षणें जाणणें; पाहणी करणें; अनुयायांची हालचाल करणें, (अनुयायाना पसरण), जरुरीचीं लगबगीचीं कामें करणें, (दिनानुसरण) हतोत्साहांना पाठबळ देणें, शिलकी अथवा पीछाडीच्या सैन्याचा नाश करणें, हें घोडदळाचें काम आहे. पायदळ नेहमीं सज्जशस्त्र असावें. शिबिराचें शोधन, स्वच्छता, तसेंच बस्तिकर्म, मलशोधन, दगड धोंडे, झाडें झुडें, कांटेरी झुडपें, जाळ्या, वारुळ वगैरे वाटेंतील काढून टाकणें. हीं कामें पायदळांचीं आहे. पायदळाला जमीन भरपूर असावी. म्हणजे बाहेर जाणें येणें अथवा पळण्याच्या वेळेस पळवाट काढणें यासाठी जमीन लायक असावी. पायदळाला सुध्दं अति कठीण जमीन उपयोगाची नाहीं. तथापि थोडीशीं झाडी, दगड धोंडे, खडकाळ प्रदेश, लहान सहान डोंगर किंवा टेकड्या यांतून सैन्याची ने आण करण्यास पायदळ उत्तम आहे. चिखल, झाडें, भातखाचर किंवा पाणथळ भूमी ही रथदळाला उपयोगी नाहीं. झाडी, लता, निर्झर, मोठाले डोंगर, समभूमी व चिखल नसलेला प्रदेश गजदळाला प्रशस्त आहे.

राजकार्यामध्यें येणार्‍या प्रतिग्रह शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या अशी आहे कीं, व्यूहांतील बाकीची सहा अंगें नष्ट झालीं असता (सहा अंगें पुढें आहेत.) सैन्याचा स्वीकार करणें, म्हणजे त्यांना आश्वासन देऊन लढविणें, यालाच प्रतिग्रह म्हणतात. या प्रतिग्रहावांचून व्यूह विलग दिसतो. प्रतिग्रहा वांचून युद्ध करणें अयोग्य होय. प्रतिग्रह याची व्याख्या दिली आहे कीं, ''उरस्यादीनिभिन्नानि प्रतिगृण्हन्बलानिहि ॥ प्रतिग्रह इतिख्यातो राजकार्यांतरक्षमः'' राज्याचें मूळ कोशावर (खजिन्यावर) अवलंबून असल्यामुळें तो खजिना नेहमी राजाच्या जवळ असावा. त्या खजिन्याचा योध्यांकडे उपयोग करतात. उदाहरणार्थ योध्यास शत्रूच्या नाशाबद्दल बक्षीस. युद्धांत योद्ध्यांकडून राजा मारला गेल्यास १००००० द्रव्य योद्ध्यांस द्यावें. राजाचा पुत्र मारला गेल्यास ५०००० द्रव्य त्यांस द्यावें. (द्रव्य हा शब्द सामान्यवाची आहेसा दिसतो.) सेनापती, गजयोद्धा वगैरे प्रमुख वीरांस मारणाराला ५०००० द्रव्य किंवा कामगिरी पाहून देणें. व्यायामविनिवर्तन (पूर्णपणें धडपड करणें.) सैन्याची धडपड अर्थात हालचालही पूर्णपणें होईल अशा बेतानें गर्दी न करतां युद्ध करावें. यामध्यें संकर व संकुल हे शब्द निरनिराळ्या अर्थाचे आहेत. पहिला अर्थ दाटी व दुसरा अर्थ एकजूट किंवा एकदम गर्दी करणें. महासंकुलयुद्धामध्यें हत्तीची योजना करावी. एका घोडेस्वाराला तीन पायदळ असावेत. एका हत्तीला १५ पायदळ असावेत, तीन घोडेस्वार असावेत. हेंच विधान रथाचें आहे.

व्यूहांची मुख्य अंगें सात आहेत. उर, कक्ष, पक्ष, मध्य, पृष्ठ, प्रतिग्रह व कोटी. बृहस्पतीच्या मतें व्यूहाचीं अंगें उर, कक्ष, दक्ष व पतिग्रह हीं आहेत. व शुक्राचार्यांच्या मतें कक्षा यांत नसावी. (स्मृतिसमुच्चयांत दिलेले औशनस व बृहस्पती स्मृति यांत हा विषय नाहीं.) फूट न पाडतां युद्ध करावें व एकमेकांनीं एकमेकांचें रक्षण करावें. व्यूहाच्या मध्यें सैन्य थोडे असावें. युद्ध केवळ नायकप्राण आहे. उराच्या ठिकाणीं प्रचंड हत्तीची योजना करावी. कक्षांना रथ, पक्षाला हत्तीचें सैन्य. याप्रमाणें व्यूहाची रचना केल्यास अर्तभेद व्यूहरचना असें म्हणतात.

रथांच्या जागीं घोडेस्वार, घोडेस्वारांच्या जागीं पायदळ, किंवा रथांच्या जागी हत्ती हीं लढवावीत. व्यूहाचीं पूर्वी सात अंगें सांगितलीं आहेतच. ह्या सात अंगांपैकीं कमी ज्यास्त प्रकारानें व्यूहरचना केल्यास त्याला निरनिराळ्या व्यूहांचीं नांवें प्राप्‍त होतात. त्याचीं मुख्य नांवें व पोटभाग थोडक्यांत पुढीलप्रमाणें दिलीं आहेत. मंडल, असंहत, भोग व दंड हे व्यूहरचनेचे भाग होत. व्यूहरचना म्हणजे पद्धतवार अथवा सशास्त्र सैन्यांची मांडणी. व्यूहांचीं नांवें पूर्वी दिलीं आहेत. व्यूहांच्या अंगांचीं मागें दिल्याप्रमाणें सात अंगें आहेत. त्या सात अंगांमध्यें सैन्य कसें उभें करावयाचें या शिस्तीला अथवा योजनेला वरील म्हणजे मंडल, असंहत, भोग व दंड हीं नांवें आहेत. मंडल म्हणजे सैन्याची सर्व बाजू हलविणें. (मंडलः सर्वतोवृत्ति) वृत्ति=हालचाल. असंहत म्हणजे सैन्याचे भाग पाडून वेगवेगळाली हालचाल करणें. (पृथग्वृतिरसंहतः) दंड म्हणजे तिरकी सैन्याची हालचाल करणें. (तिर्यग्वृत्तिस्तुदंडस्यात्) भोग म्हणजे वरील लक्षणांहून निराळी रचना अर्थात् सरळ व अखंड सैन्याची हालचाल करणें हा होय. (भोगोन्यावृत्तिरेवच.) तिरकी पण निरनिराळ्या तर्‍हेंनें सैन्याच्या रचनेमुळें दंडामध्यें पडलेले भेद. प्रदर, दृढक, असह्य, चाप, कुक्षि, प्रतिष्ठ, सुप्रतिष्ठ, श्येन, विजय, संजय, विशाल, सूची, स्थूणाकर्ण, चमूमुख, सर्पास्य, वलय.

भोग याचे भेद अतिक्रांत, प्रतिकांत, विपर्यय, स्थूणपक्ष, धनुष्पक्ष, द्विस्थूण, दंड, ऊर्ध्वग, द्विगुण व द्विचतुर्दंड. गोमूत्रिका, अहिसंचारी, शकट, मकर.

मंडळ-दंडपक्ष, (शकट ) व्यतिकीर्ण, हे भेद आहेत.

संहत - अष्टानीक, ऊर्ध्वांग, वज्रभेद असे प्रकार आहेत. कांहींत व्यूहांचीं नांवे व भेद आले आहेत. मंडळाचे प्रकार दोन. असंहताचे ६ प्रकार व भोगाचे ५.

दंडक व्यूहामध्यें कक्ष, पक्ष, उर व चवथें कोणतें तरी अंग असावें.

या व्यूहांचा अर्थ दूर्बोध झाल्यामुळें येथील श्लोक पुढें दिले आहेत. 'स्यात्कक्षपक्षोरस्यैश्च वर्तमानस्तु दंडकः। तत्र प्रयोगो दंडस्य स्थानं तुर्येण दर्शयेत्। स्याद्दंडसमपक्षाभ्यामतिक्रान्तः प्रदारकः । भवेत्स पक्षकक्षाभ्यामतिक्रान्तो दृढः स्मृतः। कक्षाभ्यां च प्रतिक्रांतव्यूहोऽसह्यः स्मृतो यथा । कक्षपक्षावधः स्थाप्योरस्यैः क्रान्तश्च खातकः ॥ द्वौ दंडौ वलयः प्रोक्तो व्यूहो रिपुविदारणः । दुर्जयश्चतुर्वलयः शत्रोर्बलविमर्दनः । कक्षपक्षोरस्यैर्भोगो विषमं परिवर्जयेत् । सर्पचारी गोमूत्रिका शकटः शकटाकृतिः । विपर्ययोऽमरः प्रोक्तः सर्वशत्रुविमर्दकः स्यात्कक्षपक्षोरस्यानामेकीभावस्तु मंडलः । चक्रपद्मादयो भेदा मंडलस्य प्रभेदकाः । एवंच सर्वतोभद्रो वज्राक्षवरकाकवत् । अर्धचंद्रश्च शृंगाटोह्यचलो नामरुपतः । व्यूहा यथासुखं कार्याः शत्रूणां बलवारणाः ॥

युद्धशास्त्रविषयक भाग जो येथें मांडला त्याच्यावरुन त्या कालाच्या युद्धपद्धतिसंबंधानें आपणांस निश्चित ज्ञान किती थोडकें आहे, हें मात्र अधिक व्यक्त होतें.

स्त्री पु रु ष ल क्ष णा दि. अ. २४३ पुरुष लक्षण. हीं लक्षणें वाचनीय आहेत. अ २४४ स्त्रीलक्षण अ. २४५.

चा म र, व शस्त्रास्त्रे.- चामरादिलक्षण. चामराला दांडा सोन्याचा असावा. त्याला पंख, मोर, हंस, शुक बलाका, यापैकीं एखाद्या पक्ष्याच्या पंखाचे चामर असावे. मिश्र पंख नसावेत. छत्राच्या दांड्याला ३ ते ८ पर्यंत भद्रासन क्षीर वृक्षाचें असून ५० अंगुल उंच असावें व त्याचा विस्तार तीन हाताचा असावा. त्याला जागोजाग सुवर्णादि बसवावें.

धनुष्य तीन द्रव्याचें असावें. धातु, शिंग, किंवा लांकूड. त्याप्रमाणें धनुष्याच्या दोरीचीं द्रव्येसुद्धां तीनच आहेत. वंश, भंगा (अंबाडी किंवा ताग), त्वचा (तात वगैरे). लांकडाच्या धनुष्याचें प्रमाण ४ हातांचें असावें. इतर द्रव्याचें कमी ज्यास्त प्रमाण आहे. मुष्टिग्राह (मुठीत धनुष्य धरण्याच्या जोगें), स्वल्पकोटी, त्वचाशृंग, शार्ङ्ग, लोहमय वगैरे त्यांत भेद आहेत. कोटीचा आकार स्त्रीच्या भुंवई प्रमाणें असावा. वरील द्रव्याच्या मिश्रणानें किंवा पृथकत्वानें धनुष्य बनवावें. शार्ङ्ग धनुष्याला रुप्याचे बिंदू असावेत. कुटिल, स्फुटित, व सछिद्र असे धनुष्याचे दोष आहेत. धातुमय धनुष्य, सोनें, रुपें, तांबे व लोखंड यापैकीं कोणत्याही धातुंचें असावें. शृंगमय धनुष्य माहिष, शारभ किंवा रोही यांच्यापैकीं जनावराच्या शिंगाचें असावें. काष्टमय धनुष्य, चंदन, वेत, साल, इत्यादिपासून तयार केलेलें असावें. सर्वांत वेळूचें धनुष्य जास्त चांगले असतें. हे वेळू शरद्यतूंमध्यें काढलेले असावेत. बाण वेळूचा असावा. त्या बाणाच्या टोकाशीं शेंबी लोखंडाची, किंवा सोनें, रुपें इत्यादी धातूंची असावी. त्यांचीं टोके तीक्ष्ण असावींत, व त्यांना तेल लावावें. ''नंदक'' नांवाचें खङ्ग-त्याची उत्पत्ति-मेरु पर्वतावर ब्रह्मदेव यज्ञ करीत होते
त्यांत लोह दैत्य आला. त्यावेळेस अग्नीची प्रार्थना ब्रह्मदेवानें केली. तेव्हां अग्नीपासून एक पुरुष उत्पन्न झाला व त्यानें त्या दैत्याला खङ्गानें मारिलें. त्या योगानें सर्वांना आनंद झाला, म्हणून त्यास नंदक असें म्हणतात. तें नंदक खङ्ग भगवंतानें घेतलें. खङ्गाचे प्रकार-खटीखट्टर, गांवाचें नांव (?) हें दिसण्यास फार चांगलें आहे. वार्षिक-कायच्छिद्. सूर्पारक-हें मजबूत आहे. वंग-तीक्ष्णच्छेद्. ( दीर्घ:सुमधुर:शब्दो यस्य खङ्गस्य सत्तम ) खङ्ग चांगलें म्हणजे आवाजदार व ५० बोटें लांब असावें. २५ व १२ लांबीचीं हीं मध्यम व कनिष्ठ आहेत. खङ्ग लांब असून त्याचा शब्द मधुर असावा. आवाज किंकिणी-प्रमाणें असावा. खङ्गाचें अग्र पद्माच्या पाकळीप्रमाणें किंवा मंडलाग्राप्रमाणें असावें म्हणजे उत्तम. काव्हेराच्या पानाप्रमाणें असणें हें चांगलेंच आहे. त्याला तुपासारखा रंग असावा. त्याची प्रभा विजेप्रमाणें असावी. खङ्ग मध्यभागीं व्रणलिंगाप्रमाणें असावें. काक, उलूक अशा वर्णाप्रमाणें शोभा असावी. आपलें तोंड खङ्गामध्यें पाहूं नये. उच्छिष्टानें शिवूं नये, व त्याचीं मूल्य, जाति, हीं सांगूं नये,

र त्‍न प री क्षा अ. २४६ वज्र, मरकत, रत्‍न, पद्मराग मौक्तिक, इन्द्रनील, महानील, वैदुर्य, गंधशस्य, चंद्रकांत, सूर्यकांत स्फटिक, पुलक, कर्केतन, पुष्पराग, ज्योतीरस, राजपट्ट, राज-मय, सौगंधिक, गंज, शंख, गोमेद, रुधिराक्ष, भल्लातक, धूली, मरकत; तुत्थक, सीस, पीलु, प्रवाल, गिरिवज्र, भुजंगमणि, वज्रमणि, टिट्टिभ, पिंड, भ्रामर, उत्पल. यामध्यें पाचाचें नांव आढळत नाहीं. या प्रकरणाचा विचार शुक्रनीतींत बराच केला आहे. व त्याची परीक्षा जरा विस्तृत दिली आहे.

अ.२४७ वास्तुलक्षण. वास्तूंत विशिष्ट देवतांची स्थापना
अ.२४८ पुष्पादिपूजाफल.

ध नु र्वे द अ. २४९ धनुर्वेदाचे पाद चार. रथ, हत्ती,घोडे व पायदळ. परंतु हे चार पाद योध्यांच्या शरीराचे होत; योद्ध्याच्या पद्धतशीर क्रियेचे प्रकार पांच. त्यांचीं नांवे; यंत्र-मुक्त, पाणिमुक्त, मुक्तसंधारित, अमुक्त व बाहुयुद्ध ( नियुद्ध )
हीं होत. शस्त्र व अस्त्र असे युद्धाचे संपत्तीचे दोन भेद. युद्धाच्या तर्‍हा दोन; सरळ युद्ध व कपटी युद्ध.

यं त्र मु क्त म्हणजे बाण फेंकणें वगैरे भाग यांत येतो. पा णि मु क्त - दगड, तोमर वगैरे टाकणें यास पाणिमुक्त म्हणावें. मु क्त सं धा रि त - शत्रूनें केलेल्या शस्त्राच्या किंवा अस्त्राच्या भडिमारास सांवरून धरणें, त्यांनी सोडलेलीं अस्त्रें आपण सावरणें याला मुक्तसंधारित म्हणतात. ढाली वगैरे यांत येतील. अ मु क्त-तलवारी वगैरे शस्त्रांच्या फेंकीला अमुक्त म्हणतात. नि यु द्ध:-शस्त्रास्त्रांवांचून युद्ध करणें यास नियुद्ध म्हणतात.

उत्त्तम प्रतीचें युद्ध म्हणजे धनुर्युद्ध, मध्यम प्रास, व कनिष्ठ खङ्गयुद्ध होय. धनुर्वेदामध्यें शिकविणारा गुरु ब्राम्हण मुख्य असावा. नंतर क्षत्रिय, व वैश्य, निदान पक्षीं शुद्र असावा शूद्राचा मुख्य अधिकार युद्ध करण्याचाच आहे. सैन्यांत भरती शक्य तितकी आपल्याच देशांतील लोकांची असावी. हीं येथील वचनें लक्षांत ठेवण्याजोगीं आहेत.

सै न्य शि क्षा प द्ध ति.- कवाईत-आंगठे, घोटे, व हातबोंटें, हीं एकमेकांशी घट्ट जुळलीं असून नजर पायांकडे सारखी देणें, यास समपदस्थान म्हणावें. वैशाखस्थाने-हातबोटें पायांवर ठेवून गुडघे सरळ व ताठ करणें, यास वैशाखस्थान
म्हणावें. पायाच्या बोटांत अंतर तीन वितींचें असावें. मंडल- स्थान-ज्यांत गुडघे हंसांच्या पंक्तीप्रमाणें दिसतात व मधलें प्रमाणें ४ वितीचें असतें त्यास मंडळ म्हणतात. आलीढ- नांगराच्या आकाराप्रमाणें ताठ गुडघे व मांडी करणें त्यास आलीढ म्हणतात. यामध्यें अंतर ५ वितींचे असावें. विपर्यस्त-वरच्या उलट लक्षणास विपर्यस्त म्हणावें. जातस्थान-डावा गुडघा वांकडा करून उजवा गुडघा सरळ करणें, घोटे व ( पार्ष्णिग्रह ) टाचा सारखे ठेवणें यांस जातस्थान म्हणतात. त्यामध्यें अंतर ५ बोटांचे असावें, किंवा १२ बोटांचे असावें. दंडायतस्थान-डावा गुडघा सरळ करुन उजवा पसरट करणें, किंवा उजवा गुडघा (कुब्ज) वांकडा करणें याला दंडायत म्हणतात. विकटस्थान-याचें लक्षण वरील प्रमाणेंच असून मधील अंतर मात्र दोन हातांचें असावें. संपुटस्थान-दोन्ही पाय उंच करणें, किंवा पसरट (उत्तान) गुडघे द्विगुण करणें, या विधीला संपुटस्थान म्हणतात. स्वस्तिक स्थान-किंचित् फिरविलेले व दंडा-सारखे सरळ पाय ठेवणें यास स्वस्तिक स्थान म्हणतात. यांमधील अंतर १६ बोटांचे असावें. ही सर्व पद्धत बहुधा धनुर्धार्‍याच्या बैठकीची असावी असें वाटतें. धनु-ष्याला वंदन करुन हातांत घ्यावें. त्याला दोरी लावलेलीअसावी. धनुष्याची कोटी जमिनीला टेंकवावी. ''फलादेश'' जमिनीवर ठेवावा. धनुष्य तोलावें. मनगटें व हात वांकडे करून बाणाचा पंख धनुष्याच्या दोरीवर चढवावा. धनुष्याचा विन्यास १३ अंगुलाचा असावा. पुढें अर्ध्यां श्लोकांत दोरीचीं प्राणशक्ति पाहून तो करावा त्यांत कमी ज्यास्त प्रमाण नसावें म्हणून सांगितलें आहे. धनुष्य नाभीवर ठेऊन नितंबावर बाण ठेवावेत. हात कानापर्यंत ओढावा. मुष्टीला प्रथम धरावें. दक्षिण स्तनाच्या अग्रभागी बाण असावा. मूठ सारखी असावी. आंत,
बाहेर, खाली, वर, वांकडी, उत्तान चंचल, घट्ट वळलेली अशी नसावी. पहिल्या मुष्टीनें लक्ष्य आच्छादित करून छाती वर उचलावी व सारथ्यानें त्रिकोणावर बसावें. खांदा खालीं करावा, मान निश्चल असावी, व मस्तक मयुरांचित असावें (मयुरांचित मस्तकाचें लक्षण शारंगदेवानें संगीतरत्‍नाकरामध्यें दिलें आहे.) कपाळ, नाक, तोंड, कोपरे, खांदे हे सरळ असावेत. खांदा व हनवटी यांमध्यें तीन अंगुलांचें अंतर असावें. मुख्य प्रमाण तीन बोटांचें असावें. दुय्यम २ व कनिष्ठ १ बोटाचें असावें. अंगठा व त्याच्या जवळचें बोट यांनी बाण उचलावा किंवा दुसर्‍या दोन बोटांनी घ्यावा. तो प्रत्यंचेवर चढवावा. प्रत्यंचा बाणाच्या लांबी इतकी ओढावी. ती जोरानें ओढावी. या एकंदर प्रकाराला आमुक्त असें नांव आहे. लक्ष्यवेध दृष्टीच्या व मुष्टीच्या अनुलक्षेंकरून करावा. उच्छेद म्हणजे डाव्या बाजूनें हात सोडणें याला उच्छेद म्हणावे. विमुक्तकामध्यें कोंपरा खालीं करावा. केवळ लक्ष्याकडेच दृष्टी असणें यास मध्यम म्हणावें. हातबाण हा सगळ्यांत उत्तम होय. तसेंच धुनष्याचें उत्तम प्रमाण ४, मध्यम साडेतीन, व कनिष्ठ तीन हात होय. हें वरील सर्व पायदळाचें विवेचन झालें. परंतु हे सगळे नियम अथवा शिस्त सर्वांनाच घोडेस्वार, रथदळ, गजदळ,
यांनाही लागू आहे. अ. २५० [ धनुर्वेद पुढें चालु ] धनुर्विद्येंचें शिक्षण देतांना प्रथम यज्ञभूमीवर सुनिर्धौत असें धनुष्य ठेवावें. मांसानें हवन करावें, धनुष्य, गदा वगैरे आयु-धांची पूजा करावी. चलाख विद्यार्थ्यांनें एकचित होऊन हातांत
बाण घ्यावा. (तूण) भाता पाठीला बांधावा व डाव्या अगर उजव्या कांखेंत तो अडकवावा. मोकळा बाण त्यांत ठेवावा.नंतर भात्यामधून बाण काढावा. तो उजव्या हातानें घ्यावा. उजव्या हातानें बाण मध्यें धरून डाव्या हातानें कक्षा व धनुष्य धरावें. धनुष्याला दोरी चढविल्यावर बाण पुंखाकडून दोरी- वर चढवावा. तो सिंहकर्णानें (अशा पुंखानें?) ताणून, (सिंह-कर्ण हें या पुंखाचें विशेषण लावावें कीं क्रियार्थ घ्यावें, ही शंका आहे) डाव्या कानाजवळ त्या बाणाच्या पुंखाचें फल न्यावें. (वर्णान् याचा अर्थ बाण घ्यावा असें वाटतें.) वर्णांना डाव्या हातांच्या मधल्या बोटानें धरावें. मन लक्ष्याकडे ठेऊन मुष्टी व दृष्टी समरेषेमध्यें आणावी, व उजव्या कानाकडे ओढून बाण सोडावा. दंड कपाळाचें लक्ष्य करून मारावा. चंद्रक १६ अंगुलाचा बाण हा कपाळावर मारावा. अभ्यास प्रथम अगदीं सावकाश करावा. (अक्षिलक्ष्य) नेम सावकाश धरून चतुरस्त्र म्हणजे चौकोनी लक्ष्य त्याचा वेध करावा. या अभ्यासाला क्षिप्रक म्हणावें. हा अभ्यास मूळापासून करावा. अतिशय सावकाशानें करावा. हा चतुर्वेधाचा अभ्यास पूर्णपणे झाला म्हणजे क्रमानें तीक्ष्ण, परावृत्त, गत, निम्न, उन्नत अशा लक्ष्यांचा अभ्यास व्हावा. (या अभ्यासक्रमाच्या वाचनानें आपणांस हल्लींच्या गोळीबार पद्धतीची आठवण होते.) ही धनुर्वेदाच्या अभ्यासाची पहिली पायरी झाली. हा अभ्यास पुढें वाढत वाढत दोन, तीन वेध एकाच वेळीं करण्यापर्यंत जातो. यापुढील १३ व १७ श्लोकांचा अर्थ नीट लागत नाहीं. (अ.२५१) धनुर्विद्येच्या अभ्यासाचें वर्णन करतांना, या अभ्यासाची साधारण परीक्षा विद्यार्थ्याच्या पुढील विशेषणावरून होईल. अभ्या- सक जितहस्त, जितमति, जितदृष्टि व लक्ष्यसाधक असावा. याप्रमाणें धनुविद्येचा अभ्यास झाल्यानंतर वाहनावर बसून अभ्यास करण्यास शिकावें.

पाश - यापुढें थोडक्यांत पाशांचे वर्णन आहे. पाश दहा हात असावा. या श्लोकांतील करमुख याचा अर्थ लागत नाही. या पाशाच्या दोर्‍या कापसाच्या, मुंजाच्या (मुंज एक प्रकारचें गवत आहे.) तांतीच्या, किंवा झाडाच्या सालीच्या मजबूत कराव्या (पूढील अर्ध्या श्लोकांतील त्रिंशत् शब्दाचा अर्थ कदा-चित् ३० धाग्याचा असा असूं शकेल काय ?). पाश डाव्या हातांत घेऊन दुसर्‍या हातानें तो टाकावा. कक्षेंत त्याचें स्थान असावें. कुंडलाच्या आकृतीप्रमाणें पाश करून मस्तकावर टाकावा. चर्मवेष्टित, व तूणान्वित अशा माणसावर या पाशाचा विनियोग करावा. वल्गित, प्लुत, व प्रव्रजित या ठिकाणीं समयोग विधी करून पाश टाकावा. ( अर्थ बरोबर समजला नाही.) शत्रूला प्रथम जिंकून नंतर पाश टाकावा.

त ल वा र, चि ल ख त - तलवार डाव्या बाजूला बांधावी. डाव्या हातानें म्यान धरावें व उजव्या हातानें त्यांतून तलवार काढावी. तलवारीची रुंदी ६ बोटांची असावी व लांबी अथवा उंची ६ हातांची असावी. वर्म, (चिलखत). लोखंडाच्या बारीक सांखळ्या (शलाका) तारांनी गुंफून तयार करावें. चिलखताचे प्रकार निरनिराळे आहेत.

भाता चामड्यांचा असावा, तो मजबूत व नवा असावा. भाता अर्धा हात असावा, किंवा बाणाच्या बरोबरीचा असावा. वरचा भाग तिरका असून वर गेलेला असावा.

सों ट्या चा उ प यो ग -- उजव्या हातांत लगुड घेऊन उगारावा व मारावा. किंवा दोन्ही हातानें मारावा. (उभा-भ्यामथ हस्ताभ्याम् कुर्यात् तस्य निपातनं) वध करणें फारच सफाईनें असावें. (अक्लेशेन तत: कुर्वन्वधे सिद्धि: प्रकीर्तिता.)

धनुर्वेद अ. २५२ (पुढें चालू) आयुधे-ढाल, तरवार, पाश, शूल, तोमर, गदा, परशु, मुद्गर, भिंदिपाल, लगुड, वज्र, पट्टिश, कृपाण, क्षेपणी, धनुष्य, बाण, चक्र हीं अयुधें होत. ढाल तलवारीच्या क्रिया ३२ प्रकारच्या आहेत. त्यांचीं नांवें. भ्रांत, उद्भ्रांत, आविंद्ध, आप्लुत, विप्लुत, प्लुत, संपात, समुदीश, श्येनपात, आकुल, उध्दूत, अवधूत, सव्य, दक्षिण अनालक्षित विस्फोट, करालेन्द्र, महासख, विकराल, निपात, बिभीषण, भयानक, प्रत्यालीढ, आलीढ, वराह, लुलीत, समग्र, अर्ध, तृतीयांश, पाद, पादार्ध, वारिज, वगैरे.

पाशक्रिया.-परावृत्त, अपावृत्त, गृहीत, लघु, ऊर्ध्वक्षिप्‍त, अध:क्षिप्‍त, संधारित, विधारित, श्येनपात, गजपात, ग्राहग्राह्य, हे अकरा प्रकार पाशधारणाचे होय.

पाश फिरविण्याचे प्रकार:-ऋजु, आयत, विशाल, तिर्यक्व भ्रामित.

चक्र-छेदन, भेदन, पात, भ्रमण, शमन, विकर्तन, व कर्तन.शूल-आस्फोट, क्ष्वेडन, आंदोलिक भेदत्रास, आघात. तोमर-ऋजुघात, भुजाघात, पार्श्वघात, दृष्टिघात. गदा-आवृत्त परावृत्त, पादोध्दंत, हंसमर्द विमर्द. मुद्गर-ताडन, छेदन, चूर्णन भिंदिपाल-संश्रांत, विश्रांत, गोविसर्ग, सदरहूच्या लगुडाच्या क्रिया तशाच होय. वज्र-अंत्य, मध्य, परावृत्त, निदेशान्त, कृपाण-हरण, छेदन, घात, भेदन, रक्षण, पातन, स्फोटन, क्षेपणी-त्रासन, रक्षण घात, बलोद्धरण, व आयत.

गदा युद्धामध्यें विशेषत: घडणार्‍या शारीरिक क्रिया पुढीलप्र-माणें. सप्तांग, अवदंश, वराह, उध्दूतक, हस्तावहस्तमालीन, एक हस्तावहस्तक, विहस्तबाहुपाश, कटिरोचित कोद्गत, उर, ललाट, हे गदायुद्धांतील हस्तक्रियेचें सामान्य लक्षण, करोध्दूत, विमान पादाहति, विपादिक, गात्रसंश्लेषण, शांत, गात्रविपर्यय, उर्ध्व प्रहार, घात, गोमूत्र, पादक, तारक, दंड, कबरीबंध, तिर्यक्बंध, अपामरी, भीमवेग, सुदर्शन, सिंहक्रांत, गजाक्रांत, गर्दभाक्रांत, हीं सर्व गदायुद्धांतील कृत्यें आहेत. याच्यांतील बहुतेक भाग दुर्बोध असून बराचसा पारिभाषिक शब्दांनीं भरलेला आहे.

नियुद्ध - बाहुयुद्ध-अथवा बाहुमूलाचें (बगलेच्या मुळाचें) आकर्षण, विकर्ष, ग्रीवा विपरिवर्त, पर्यासत, विपर्यासत, पशुमार, अजाविक, पादप्रहार, आस्फोट, कटिराचित, गात्र श्लेष, स्कंधगत, महीत्र्याजन, उरुललाटघात, विस्पष्टकरण,
उध्दूत, अवधूत, तिर्यङ्मार्गगत, यांतील बर्‍याच विशेषणांचा अर्थ लागण्यासारखा आहे. तसेंच बरेच पारिभाषिक शब्द आहेत.

गजयुद्ध - गजारोही गजस्कंध, अवक्षेप, अपरांमूख, देवमार्ग, अधोमार्ग अमार्ग गमनाकुल, यष्टिघात, अवक्षेप, जानुबंध, भुजाबंध, गात्रबंध, पिपृष्ट, सोदक, शुभ्र भुजावेष्टित, ही हत्तीवर बसलेल्या योध्यांची पद्धतशीर युद्धक्रिया होय.

हत्तीच्या रक्षणार्थ दोन अंकुश धरणारे, एक मानेवर बसणारा, दोन स्कंधावर बसलेले, धानुष्क किंवा ढाल तलवार धरणारे असे असावेत.

प्रत्येक रथाला व घोडेस्वाराला रक्षक म्हणून तीन घोडे-स्वार व धनुर्धारी असावेत. धनुर्धार्‍याच्या रक्षणार्थ चर्मधारक असावा.

अध्याय २५३ व्यवहारविषयक आहे. यांतील नियम व विचारपद्धति हीं धर्मशास्त्रग्रंथांबरोबर विचार करण्याजोगीं आहेत. अ.२५४ यांत ऋण देण्याबद्दलचे नियम आहेत. अ. २५५ दिव्यप्रमाणांस दिला आहे. अ.२५६ दायविभाग प्रकरण
अ.२५७ सीमाविवादादिनिर्णय. २५८ वाक्यारुष्यादि प्रकरण यांतील बराचसा भाग आजच्या हिंदुकायद्याच्या मूलाशीं आहे. यांचें सविस्तर वर्णन येथें बरेंच लांबट होईल.

जा दु टो ण्या क डे वे दां चा उ प यो ग - अ.२५९ ऋग्विधानम्. ऋग्विधान याचा अर्थ अनेक कार्यांकरितां विशेषत: अभिचारासाठीं ऋग्वेदमंत्राचा केलेला उपयोग. यावर स्वतंत्र एक ग्रंथ आहे. गायत्री जप-मेधा कर्म:-''सद-स्पती'' इ. तीन ऋचा. पुढें मृत्युनाशक ९ ऋचा दिल्या आहेत. निरोगी होण्याबद्दल ऋचा ''मित्रप्राज्ञपुरंदरम्'' निर्भय पंथ होण्यास ''तें पंथा'' हा मंत्र म्हणावा. ऋग्वेदांतील अमुक मंत्र म्हटल्यास जातिश्रैष्ठ्य प्राप्‍त होतें इत्यादि प्रकारची माहिती ऋग्विधानांत आहे. याचप्रमाणे पुढील तीन वेदांची ''विधानें'' समजावीं.

२६० यजुर्विधान. या विधानांत फक्त पूर्वांध्यायांत वर्णिलेल्या फलाच्या प्राप्‍तीसाठीं हवन करण्यास निरनिराळीं हवनीय द्रव्यें कोणतीं याचें वर्णंन आहे. यांतील हवनांस द्रव्यें शत्रुविद्वेषासाठी कावळ्याचे व घुबडाचे पंख घ्यावेत, असा उल्लेख आहे. ऋग्वेदविधानांत ऐंद्रजालिक मायेचाच फक्त उल्लेख केला आहे; परंतु यजुर्वेदविधानांत उच्चाटनविधि सांगितला आहे.

वरील दोन विधानांत न येणारा अंजनमोहन प्रकार या सामवेदविधानफलश्रुतीमध्यें सांगितला आहे. अ. २६१ सामविधान अ.२६२ अथर्वविधान. अ.२६३ उत्पातशांति.

उ पा स ना विषय - अ.२६४ देवपूजावैश्वदेवबलि-वर्णन. अ.२६५ दिक्पालादिस्नान. अ.२६६ विनायकस्नान. स्वप्नामध्यें अनेक दुश्चिन्हें दिसणें, त्याच्या परिहारार्थ स्नान. अ.२६७ माहेश्वरस्नानलक्षकोटिहोमादिकांचें वर्णन. अ.२६८ नीराजनाविधी. अ.२६९ छत्रादिप्रार्थना. अ.२७० विष्णुपंजर.

रा ज की य इ ति हा स, व वा ङ्‌म ये ति हा स- अ. २७१ वेदशाखादिकथन. अ. २७२ पुराणदानादिमाहात्म्य. अ. २७३ सूर्यवंश. अ. २७४ सोमवंश अ. २७५ यदुवंश वर्णन. अ. २७६ द्वादशसंग्राम कृष्णाच्या हातून घडलेल्या लढाया. अ. २७७ राजवंशवर्णन. यांत तुर्वंशांची कथा आहे. अ. २७८ पुरुवंशवर्णन. हा वंश पांडवांपर्यंतचाच आहे.

आ यु र्वे द. (अध्याय २७९-३०५ यांत मनुष्यवैद्यक, पशुवैद्यक, वृक्षवैद्यक व मधून मधून भिन्न विषय आले आहेत.) अ.२७९ सिध्दौषधालय अ.२८० सर्वरोगहरण औषधी.

मुख्यत: व्याधींचे प्रकार ४ शारीर, मानस, आगंतु व सहज अ.२८१ रसादिलक्षण, सोमजरस स्वादु, अम्ल व लवण, व अग्निज-कटुतिक्त व कषाय. अ.२८२ वृक्षायुर्वेद-प्लक्षवृक्ष उत्तरेकडे, वड पूर्वेकडे, दक्षिणेकडे आम्र, पश्चिमेकडे अश्वत्थ वृक्षांचें रोपण करावें. लिंब, अशोक, पुंना- गड, शिरीष, प्रियंगव, अशोक, कदली, जांभूळ, बकुळ, डाळिंब या वृक्षांना सकाळ संध्याकाळच्या थंड वेळेस पाणी घालावें.

उपटून लावलेलें वृक्षास वर्षाऋतूमध्यें जमीन कोरडी असतां पाणी रात्रीं द्यावें. उत्तम २० हात, मध्यम १६ हात व कनिष्ट १२; हे वृक्षांस लावण्याचें प्रमाण आहे. झाडाला फळ न आल्यास शस्त्रानें छाटावें, झाडांना फळ येतें पणे तें पूर्ण पिकत नाहीं, तर त्यांस विडंग (वावडिंग) व तूप चिखलांत मिसळून पाणी घालावें किंवा हुलगे, उडीद, मूग, तीळ, सातू व तूप या द्रव्यांचे चूर्ण करून थंड पाणी झाडांना घालावें म्हणजे झाडांना फुलें व फळें चांगलीं येतात.

झाडांच्या फलपुष्पादिकांची वाढ होण्यास सात रात्रीं शेळीच्या लेंड्या, सातूचें चूर्ण, तीळ, गोमांस व पाणी हीं घालावींत. झाडांची वाढ माशांच्या पाण्यानें चांगली होते. झाडांचे दोहद व कीड नाहींशीं होण्याला वावडिंग व तांदूळ, माशांचे मांस हीं पाण्यांत मिसळून घालावींत.

अ.२८३ अनेक रोगांचा नाश करणारीं औषधें अ.२८४ मंत्ररुपी औषधें; अ.२८५ मृतसंजीवन कर सिद्धयोग अ.२८६ मृत्युंजय योग औषधें अ.२८७ गजचिकित्सा. प्रशस्त हत्ती म्हटले म्हणजे लांब सोंडेचे, ज्यांचा उच्छवास मोठा आहे, असे होत. वीस किंवा अठरा नखें त्यास असावीं ? त्यांना मद थंडीच्या दिवसांत येत असावा, उजवा दांत उंच असावा व शब्द मेघा सारखा असावा. कर्ण विपुल असून त्याच्या अंगावर सूक्ष्मबिंदु असावेत. यापुढें हत्तीला औषधें कोणतीं द्यावीं याचा विचार दिला आहे.

अ.२८८ अश्ववाहनसार. यामध्यें घोड्याचा वेग, चालण्याची ढब, घोड्याला शिकवणूक कशी असावी याचा उल्लेख केला आहे. अ.२८९ अश्वचिकित्सा औषधी. अ.२९० अश्वशांति. अ. २९१ गजशांति अ.२९२ गवायुर्वेद अ.२९३ मंत्रपरिभाषा अ.२९४ नागलक्षण. सर्पादिकांच्या जाति. या जातींच्या लांबीचीं कांहीं प्रमाणें दिलीं आहेत.

वि ष वै द्य क (अ.२९५ ते २९८) अ.२९५ दंशचिकित्सा अ.२९६ पंचांगरुद्रविधान अ.२९७ विषाला हरण करणार्‍या मंत्र व औषधी. अ.२९८ गोनसादि चिकित्सा अ.२९९ बालादिग्रहहरबालतंत्र. अ.३०० ग्रहादिपीडाशमनार्थ मंत्र. अ.३०१ सूर्यार्चन. अ.३०२ अनेक मंत्रौषधि कथन. अ.३०३ अंगाक्षरार्चन.

मं त्र, व उ पा स ना वि ष य, अ.३०४ पंचाक्षरादि पूजा मंत्र अ.३०५ विष्णुनामें. अ.३०६ नारसिंहादि मंत्र अ.३०७ त्रैलोक्यमोहनमंत्र अ.३०८ त्रैलोक्यमोहनीलक्ष्म्यादिपूजा. अ.३०९ त्वरितापूजा. अ.३१०-३११ त्वरितामूलमंत्र. अ.३१२ त्वरिताविद्या. अ.३१३ नानामंत्र अ.३१४ त्वरिता. ज्ञान. अ.३१५ स्तंभनादिमंत्र अ.३१६ नानामंत्र अ.३१७ सकलादिमंत्राद्वार. अ.३१८ गणपूजा. अ. ३१९ वागीश्वरी पूजा अ.३२० मंडलपूजा अ.३२१ घोरास्त्रादिशान्तिकल्प. अ.३२२ पाशुपतशान्ति अ.३२३ षडंगान्यघोरास्त्राणि अ. ३२४ रुद्रशांति अ.३२५ रुद्राक्षादि लक्षण व धारण, अंशकादि, हा मंत्रशास्त्रांतीलच भाग आहे अ.३२६ गौर्यादिपूजा. अ.३२७ देवालयमाहात्म्य.

छंद, काव्य, नाटक, नृत्य, शिक्षा, अलंकार, ( अ.३२८-३४८ ) अ.३२८।३२९ छंदसार हें पिंगलाच्या ग्रंथावरून उतरलें आहे असें ग्रंथकार म्हणतो ( छंदोलक्ष्ये मूलजैस्तैः पिंगलोक्त यथाकमं.)

अ. ३३० छंदःसार. अ. ३३१ छंदाच्या जाति.अ.३३२ विषमवृत्त. अ.३३३ अर्धसमवृत्त. अ.३३४ समवृत्त. अ.३३५ प्रसादवर्णन. अ.३३६ शिक्षा ( हल्लीं प्रसिद्ध असलेली शिक्षा तिच्या मानानें पाहतांही बरीच कमी आहे. अवघे २२ श्लोक आहेत व त्या भिन्न श्लोकांचे तीन चरण शिक्षेच्याहून वेगळे आहेत ) अ.३३७ काव्यादिलक्षण अ.३३८ नाटकनिरुपण अ.३३९ रसरुपण. अ.३४० नृत्यामध्यें अंगविक्षेपकर्म निरुपण अ.३४१ अभिनयादिनिरूपण अ. २४२ शब्दालंकार, अ. ३४४ अर्थांलंकार, अ. ३४५ शब्दार्थालंकार. अ. ३४६ काव्यागुणविवेक अ. ३४७ काव्यादोषविवेक अ. ३४८ एकाक्षराभिमान. याच्यांत बहुतेक एका अक्षराचे एक किंवा क्वचित् अधिक अर्थ दिले आहेत.

व्या क र ण सा र - अ. ३४९-३५९ कात्यायनानें सांगित- लेलें व्याकरणसार तुह्मांस सांगतों, असा उपक्रम आहे. प्रथम १४ सूत्रांचा पाठ दिला आहे. यामध्यें सूत्र किंवा वृत्ति अथवा वार्तिक हा भाग नसून शब्दाचें स्वरूप दाखवित आहे. ३५० संधिसिद्धरूपें, ३५१ सुबविभक्तिसिद्धरूपें, ३५२ स्त्रींलिंग-शब्दसिद्धरूपें, ३५३ नपुंसकशब्दसिद्धरूपें, ३५४ कारकें, ३५५, समास ३५६ तद्धितरूपें, ३५७ उणदिसिद्धरूपे, ३५८ तिङविभक्तिसिद्धरूपें, ३५९ कृतसिद्धरूपें.

श ब्द को श - अ. ३६० स्वर्गपातालादि वर्ग यामध्यें आलेलीं नांवे किंवा श्लोक अमरकोशामध्यें आढळतात. अ. ३६१ अव्यायादि. अ. ३६२ नानार्थ वर्ग अ. ३६३ भूमि वनौषधि वर्ग अ. ३६४ नृब्रह्मक्षत्रविट्शूद्रवर्ग अ. ३६५ ब्रह्म वर्ग अ. ३६६ क्षत्रविट्शूद्रवर्ग. अ. ३६७ सामान्यनामालिंग.

अ. ३६८ प्रलयवर्णन, अ. ३६९ आत्यांतिक लय गर्भोत्पत्ति; मृताचें शरीर नष्ट झाल्यावर तो वायुरूप् यमलोकीं जातो. तेथें दु:ख भोगून वायुभूत गर्भाला येतो. मासानुक्रमें गर्भाची वाढ व त्याची उत्पत्ति. अ. ३७० शरीराचे अवयव
यामध्यें हातापायांच्या, शिरा, नाड्या, अस्थि तशाच इतर अवयवांच्या इत्यादिकांच्या संख्या दिल्या आहेत. अ.३७१ नरकनिरूपण.

योग अ.३७२ यमनियम अ.३७३ आसनप्राणायाम अ. ३७४ ध्यान, अ.३७५ धारणा, अ. ३७६ समाधि, अ. ३७६-३८० अध्यात्मब्रह्मज्ञान यामध्यें झालेला जडभरतरहुगणसंवाद भावतामध्येंही आहे. परंतु श्लोकरचना निराळी आहे. अ. ३८१ गीतासार; कृष्णार्जुनसंवादतात्पर्य यामध्यें बहुतेक गीतेंतील श्लोक आहेत. अ. ३८२ यमगीता. यामध्यें प्रत्येकांचीं विशिष्ट मतें ग्रथित केलीं आहेत. उदाहरणार्थ सर्वत्र समदर्शी, निर्ममत्व असंगता, हींच मुख्य कल्याणाचीं साधनें आहेत असें पंचशिख म्हणतो. गर्भापासून मरणापर्यंतच्या वयाच्या अवस्था जाणून त्याप्रमाणें वागणें हेंच कल्याणाचें साधन हें गंगाविष्णूचें मत आहे. याप्रमाणें निरनिराळीं बरींच मतें आहेत.

अ. ३८३ आग्नेयपुराणमाहात्म्य.



GO TOP