संत एकनाथ महाराज




नाथ भागवत

भावार्थ रामायण

एकनाथ गाथा

चतु:श्लोकी भागवत

शुष्काष्टक

आनंद लहरी हस्तमालक

स्वात्मसुख

हरिपाठ



संत एकनाथ महाराज - परिचय

चौदाव्या शतकाचा उत्तरार्ध हा संत एकनाथांच्या कर्तृत्वाचा कालखंड होय. या कालखंडात जवळजवळ भारतभर यवनी राजसत्तेचे जाळे दृढ झाले शेते. राष्ट्र पारतंत्र्याच्या ग्रहणाने ग्रासले देते. धर्माला ग्लानी आली होती. लोकांच्या मनात मरगळ दाटली होती. समाजाचे आचार, विचार आणि भाषा राजसत्तेच्या तंत्राने चालताना दिसत होती. पारंपारिक समाजोद्धारक सामाजिक संस्था निष्प्रभ झाल्या होत्या. अशा बिकट परिस्थितीत एकनाथांनी समाजाला संघटित आणि सुस्थिर करण्याचा कृतिशील प्रयत्‍न केला. वादळात सापडलेल्या संस्कृतीचे तारू नाथांसारख्या तत्त्ववेत्त्या आणि कृतिशील संताने सावरण्याचा प्रयत्न केला.

बहामनी काळाच्या अस्मानी सुलतानी संकटाने ग्रासलेल्या महाराष्टाला आपल्या ग्रंथ बळाने, विचार बळाने आणि आचार बळाने दिशा दाखविली. कोणत्याही का कारणाने असेना किंकर्तव्यमूढ झालेल्या समाजाला उन्नतीचा, प्रगतीचा, स्वोद्धाराचा केवळ कोरडा उपदेश देण्यापेक्षा कृतिशीलतेकडे प्रवृत्त करणे, एकनाथांना महत्त्वाचे वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी समानतेच्या तत्त्वावर उभारलेल्या भागवत संप्रदायाची फेर उभारणी केली आपल्या जीवन शैलीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

नाना मते पाखंड । कर्मठता अति बंड ।
तयांचे ते ठेवणे तोंड । हरिभजनें ॥

कुलपरंपरा

पैठणच्या खेळ अशा भागवतभक्त संत भानुदास महाराजांच्या कुळात एकनाथांचा जन्म झाला. पूर्वपरंपरेने भानुदासाच्या कुळात हरिभक्तीची परंपरा होती. तिचा स्त्रोत एकनाथांपर्यंत आला, ह्यात नवल ते काय ? भक्तीचे बाळकडू एकनाथांना लहानपणापासूनच मिठाले होते. एकनाथांना बालपणातच मात्या-पित्यांच्या कृपाछत्राला पारखे व्हावे लागले. तरीही आजी-आजोबांनी आपल्या या नातवास वात्सल्याची उणीव भासू दिले नाही. उलट या नातवाला दुधावरच्या सायीसारखे जपले आणि उत्कृष्ट संस्कार केले. घरात सातत्याने चालत असलेल्या प्रवचन कीर्तनातून भगवदभक्तीचा संस्कार एकनाथांवर आपोआप होत गेला. त्यामुळे एकनाथांच्या ठिकाणी मुळात असलेली भक्तिभावनेची वेल, ह्या संस्कारांनी बहरास आली. नाथांची भक्ती डोळस आणि समाजसन्मुख अशी राहिली. त्यांच्या मनात स्वोद्धाराबरोबर समाजोद्धार झाला पाहिजे, असा विचार सतत असे. केवळ शब्द पांडित्याने हे होणार नाही. समानतेच्या विचारांची पाळेमुळे समाजमनात रुजवावयाची असतील तर त्या समाजमनाचा विश्वास आपल्या वागण्य्यातून मिळवला पाहिजे असें त्यांना वाटे. स्वतःच्या मार्गदर्शनासाठी आधी आपणच गुरूंचा धांडोळा घेतला पहिजे. त्यांच्या मार्गदर्शनानें लोकांना दिशा दाखविता येईल अशा विचारांनी एकनाथांनाना ग्रासले. नाथांनी गुरु प्राप्तीचा मार्ग चोखाळला.

सद्‌गुरु

आध्यात्मिक मार्गात सद्‌गुरूला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सद्‌गुरुप्राप्तीची पहिली पायरी म्हणजे गुरुसेवा. गुरुप्राप्तीच्या ओढीने एकनाथ पैठणहून निघाले ते थेट देवगिरीस आले. तिथे जनार्दन स्वामींची सेवा त्यांनी आरंभली. सेवेने तृप्त झालेल्या स्वामींनी एकनाथांवर कृपा केली. गुरुंमवेत एकनाथांनी गीता, भागवत, उपनिषदे, योगवासिष्ठ इ. ग्रंथाचे वाचन, चिंतन, मनन आणि परिशीलन केले. त्या ग्रंथातील विचार आपल्या अंगी उतरविण्याची पराकाष्ठा केली. सद्‌गुरुंच्या आज्ञेने एकनाथांनी तपश्चर्या केली. तीर्थयात्रा केल्या. तपश्चर्येने नाथांच्या ठिकाणी असलेल्या संदेहांचा निचरा झाला. तीर्थयात्रेच्या निमित्ताने समाजाचे, समाजमनोवृत्तीचे, आचार-विचारांचे निरीक्षण नाथांना करता आले. या अभ्यासामुळे नाथांना आपल्या जीवनातील पुढील कार्याचा आराखडा आपल्यासमोर तयार करता आला.

एकनाथांचे लौकिक गुरु जनार्दनस्वामी असले तरी मानस गुरु संत झानेश्वर आहेत. तेराव्या शतकात भागवत संप्रदायाचे सामाजिक समतेचे जे कार्य ज्ञानेश्वरांनी सुरू केले होते ते मध्यंतरीच्या कालखंडात काहीसे खंडित झाले होते. ते कार्य एकनाथांना पुढे न्यायचे होते. त्या इष्टीने त्यांच्या कार्याची वहिवाट सुरू होती.

ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात आपला विचार परंपरागत कर्मकांडात, मठामंदिरात बंदिस्त न करता अठरापगड जाती असलेल्या बहुजन समाजापर्यंत नेला. नुसता नेला नाही तर त्यांच्या मनःकोषात बिंबवला. ज्ञानेश्वरांचे हे कार्य एकनाथांनी आपल्या काळात कृतिशीलतेतून पुढे नेले.

ज्ञानदेवे येऊनि स्वप्नात । सांगितली यात मजलागि ।
दिव्य तेजःपुंज मदनाला पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ।
अजान वृक्षांची मुळी कंठास लागली । येऊनी आळंदी काढ वेगी ।
एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले । श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वर ॥

ह्या अभंगाचा अभिधाशक्तीने जो अर्थ सांगितला जातो तो असा की, ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीस अजानवृक्षाच्या मुळीचा विळखा बसला होता. तो दृकाढण्यासाठी नाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात सांगितले. या अर्थापेक्षा वरील अभंगाचा रूपकात्मक अर्थ आपण घेतला तर तो अधिक चपखलपणे लक्षात येतो, तो असा, एंकनाथकालीन समाजमनावर अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडे इ. मुळ्या खोलपर्यंत गेल्या होत्या. ह्या सर्व गोष्टीत अडकलेल्या समाजाला ज्ञानी करावयाचे असेल तर काही वेगळा कृतिशील विचार त्यांच्यासमोर ठेवणे आवश्यक होते. ते कार्य नाथांनी केले. ते कार्य एकनाथांच्या कृतिउक्तीतून समाजासमोर आले. आदर्श गृहस्थाश्रमाचा वास्तुपाठ लोकांसमोर एकनाथांच्या गृहस्थधर्माच्या माध्यमातून आला. अशा रीतीचा वेगळा अर्थ वरील अभंगाचा काढला तर एकनाथांच्या कार्याचे वेगळेपण सहज दृगोचर होते. एकनाथ काळात प्रतिकारशून्य झालेल्या हिंदुसमाजामधे कार्यक्षमता आणि अस्मिता जागविण्याचे दुष्कर कार्य नाथांना करावयाचे होते. यासाठी कोणाची मदत वा सहानुभूती मिळेल, ही त्यांना अपेक्षा नव्हती. आपण आपले कार्य आपल्या वागण्यातून करावे, आचरणातून दाखवावे, त्याचा परिणाम समाजावर होईल आणि तो आचार-विचार समाजाला पटला तर तो विचार समाज पटकन उचलून धरेल हीही खात्री त्यांना होती. एकनाथांची ती खात्री सार्थ होती. त्यांच्या काळापूर्वी निष्प्रभ झालेल्या धर्म, भाषा, वाङ्मय आणि संस्कृती इत्यादिंना नाथकाळात चैतन्य मिळाले. लोकांच्या मनातील आपल्या संस्कृती, धर्म इ. विषयीची अस्मिता पुनर्जागृत होत होती. या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे प्रवर्तक एकनाथ होत. स्वोद्धार आणि लोकोद्धार करण्यासाठी काही वेगळे प्रयास करण्याची आवश्यकता नाही, घर-संसार सोडून कुठेही जावे लागत नाही. विहित कर्मे, गृहस्थधर्म करीत असतानाही आपले ईप्सित साध्य करता येते असा त्यांचा विश्वास होता.

गृहाश्रमु न सांडिता । कर्मरखा नोलांडिता ।
निज व्यापारी वर्तता । बोधु सर्वथा न मेळे ॥ (ए. भा. ९-४३५)
एकनाथांच्या जीवनशैलीतून प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय आढळतो. त्यांनी आचारांची शुद्धता राखून कर्मठपणाचे बंड मोडले. पांडित्याची प्रतिष्ठा वाढवून पढिकतेचे स्तोम कमी केले. प्रेमळपणा, सौजन्य आणि शांती या स्वतःच्या सहज गुणांनी लोकांच्या मनात प्रेम निर्माण केले.

की ते भूत दयावर्ण । की माहेरा आली कणव ॥ (एक. भाग. १-३२)

एकनाथांनी केलेले संतांचे वर्णन त्यांना स्वतःस तंतोतंत लागू पडते. कोणत्याही गुणांचा अतिरेक त्यांच्या चरित्रात आढळत नाही. अचल तत्त्वनिष्ठा, ठाम विचारसरणी आणि त्यावरहुकूम कृतिशीलता हे नाथांच्या स्वभावाचे स्थायीभाव होत. आपला विचार लोकांसमोर सांगताना प्रखरता आणि अभिनिवेष यापेक्षा सौम्यता आणि ऋजुता यांचा नाथ आश्रय घेतात. परंपरेचा बोज राखून लोकांचा बुद्धिभेद न होऊ देता धीमेपणाने, संयमाने, निरलसपणाने समाज जीवनात सुधारणा आणावी असा त्यांचा विश्वास होता. "जो सद्‌भावो संतचरशी । तोच भावो ब्राह्मणी ।" या उक्तीतून त्यांच्या समतोल विचारांचे दर्शन घडते.

एक हरीआत्मा

कोणत्याही घरात जन्म झाला तरी त्या जन्माने व्यक्त होणाऱ्या भेदाची प्रतिष्ठा ज्ञानी माणसाने बाळगू नये. कारण सर्वांचा आत्मा एकच असतो, त्याचा आदर केला पाहिजे. केवळ माणसांपुरता हा नियम नसून पशुपक्ष्यादिकांच्या संदर्भातही हे जाणले पाहिजे. "आत्म्याच्या एकत्वाचे रहस्य जाणून जाणत्या पुरुषाने आपले वर्तन सर्वांसाठी समदृष्टी या न्यायाने ठेवावे", हा विचार एकनाथांनी केवळ सांगितला नाही तर कृतीतून दाखविला. तीर्थयात्रा करीत असताना काशीची गंगा दक्षिणेत रामेश्वरास अर्पण केली म्हणजे पुण्यसंचय होतो, असा समज होता. एकनाथांनी गंगा घेऊन रामेश्वराकडे जात असताना तहानेनें व्याकूळ झालेले गाढव रस्त्यात पाहिले. त्याची ती तहानेची धडपड त्यांना स्वस्थ बसू देईना. 'सर्वाभूती आत्मा' हे तत्त्व लक्षात घेऊन त्या गाढवास गंगोदक पाजले, त्याचा आत्मा तृप्त केला. तीर्ययात्रेतील बरोबरच्या लोकांना आश्चर्य वाटले. परंतु नायथांना कर्तव्यपूर्तीचे, कृतिउक्तीच्या ऐक्यतेचे समाधान वाटले असावे. ही कथा सत्या-सत्यतेच्या कसोटीवर घासणे न घासणे यात स्वारस्य नाही. आत्म्याचे एकत्व आहे, हा विचार नायांनी आपल्या वरील कृतीतून दाखविला. नाथांच्या विचारांची साक्ष देणारी ही कथा जीवनमूल्याचा आदर्श समाजापुढे ठेवणारी आहे हे निश्चित.

नाथकाळात वर्णाश्रभधर्म फार काटेकोरपणे पाळला जात होता. सर्वज्ञ नाथ मात्र कर्मकांडातील वर्णाश्रम धर्माचे फोलपण जाणत होते. सर्वांभूती आत्मा एकच आहे, याचे ज्ञान त्यांना झालेले होते. त्यामुळे त्यांची वागणूक सर्वांशी समान होती. जशी ब्राह्मणांशी तशीच अंत्यजाशी. नाथांच्या घरी श्राद्धाची पाकक्रिया चालू असताना त्याचा दरवळ रस्त्यावरून जाणाऱ्या महारांच्या नाकात शिरला. 'काय हे चविष्ट अन्न' असा विचार महारांच्या मनात आला. नाथांनी संपूर्ण महारवाडा जेऊ घातला. श्राद्धाची पुन्हा पाकक्रिया केली. ब्राह्मण श्राद्ध करण्यास आले नाहीत. नाथांनी खेद मानला नाही.

असेच एकदा गोदावरीच्या तीरावर उन्हात रडणाऱ्या मुलाला नाथांनी कडेवर घेतले. त्याला त्याच्या घरी पोहोचवले. ते मूल कडेवर घेताना ते कोणाचे मूल हा विषार नाथांच्या मनात शिवलाही नाही.

'सर्वांभूती भगवंत' ही भावना आपल्या कृतिउक्तीतून बाळगणाऱ्या नाथांनी समाजाची पर्वा न करता कर्मकांडाच्या भिंती ओलांडल्या. नाथांच्या या कृती वंदनीय आहेत. त्यांच्या रक्तात समभावाचे विचार किती खोलवर रुजले होते याचा प्रत्यय या दतकथांमधून येतो. आपल्या बिछान्यात येणाऱ्या वडाऱ्याचा सत्कार करणे, आजारी महाराची सुश्रुषा करणे अशा नाथजीवनातील अद्‌भुत चमत्कारांच्या दंतकथा नाहीत तर त्यांच्या संतत्वाचा साक्षात्कार दाखविणाऱ्या कथा आहेत. त्यातून त्यांची विचारसरणी आणि सर्वांकडे समानतेने पाहण्याचा विशाल दृष्टिकोन प्रत्ययास येतो. नाथांचे असे आचरण तत्कालीन सामाजिक परिस्थितीकडे पाहता चमत्काराप्रमाणे अद्‌भूत वाटणारे आहे. त्यांच्या काजळात समाजात तत्त्वज्ञान आणि आचरण यातील तफावत दिसून येत होती. ती तफावत नाथांनी आपल्या वागण्यातून दूर करण्याचा कृतिशील प्रयत्न केला हे त्यांचे वेगळेपण आहे.

शांतिब्रह्मनाथ आपल्या विरोधकांना शांतीने आणि संयमाने तोंड देणे हा तर नाथांचा स्वभावविशेष होता. असेच एकदा नित्यनियमाप्रमाणे एकनाथ गोदावरीवरून स्नान करून येत असतात. घाटावर नाथांच्या अंगावर एका यवनाने थुंकी टाकली. नाथांनी पुन्हा गोदावरीत जाऊन स्नान केले. पुन्हा-पुन्हा ती घटना घडत होती. एकनाथ अविचल आणि शांत होते. असे म्हणतात की असे एकशेआठ वेळा झाले. शांतिब्रह्म नाथांची अधविचलता पाहून त्या यवनाला आपल्या कृतीची शरम वाटली. त्यांनी नाथांची क्षमा मागितली, "तुझ्यामुळे मला आज पुण्यमय गोदावरीचे एकशेआठ वेळा स्नान झाले. उलट तुझेच माझ्यावर अनंत उपकार झाले आहेत." शांतिब्रह्माने काढलेले हे शब्द त्यांच्या श्रेष्ठतेचे द्योतक आहेत. त्यातून नाथांचे अलौकिकपण दिसते. समाजाचा प्रतिकार, छळ सोसतानाही शांती, क्षमा, दया, तितिक्षा, अक्रोध, इ. गुणांपासून एकनाथ विचलित झाले नाहीत. हे त्यांचे वेगळेपण जाणवल्यावाचून राहत नाही. त्याचबरोबर तत्कालीन परिस्थितीचे दर्शन या दंतकथेतून घडते. यवनी राजसत्तेचा इतका जोर होता की सामान्य नागरिक उद्दामपणाने नाथांसारख्या ज्ञानी माणसाला अशा प्रकारचा त्रास देण्याची हिम्मत करू शकतो ? अशाही परिस्थितीत एकनाथांनी आपले जीवित कार्य केले. अशा कित्येक बोलक्या दंतकथा नाथांचे वेगळेपण दाखविणाऱ्या आहेत.

त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार आपल्या ग्रंथामधूनही केला. तिथेही त्यांच्या शांत स्वभावाचे पडसाद दिसतात. त्यांच्या साहित्यात शांतरस आणि भक्तिरस यांचेच आधिक्य आढळते.

परमार्थाची मुख्यत्वे स्थिती ।
पाहिजे गा परमशांती ॥

या एकनाथांच्या उद्‌गारास स्वानुभूतीची धार आहे.

स्वतःविषयी एका अभंगात नाथांनी म्हटले आहे, "माझा जन्म मूळ नक्षत्रावर झाला, मी माझ्या आई-वडिलांना गिळले, मूळ नक्षत्राची शांती करता अवघ्याची शांती झाली."

आत्मचरित्रात्मक अभंग म्हणून या अभंगाचे वेगळे मोल असले तसे. "अवघ्याची शांती" या शब्दाचा अर्थ मला तरी अवघे जग शांतिमय आणि प्रसन्न होण्यासाठी तळमळणारे शांतिब्रह्म नाथ जाणवतात. नाथांच्या जीवनात प्रवृत्ती आणि निवृत्ती हातात हात घालून जात आहेत. ब्रह्मसाक्षात्कार व्हावयाचा असेल तर शांतिड्ब्रह्म आधी आत्मसात होणे आवश्यक कसे आहे, जीवनात तोल न ढळू देता शांतीच्या पायघड्यांवरून जाणे कसे योग्य आहे, हे नाथांच्या व्यक्तिमत्त्वातून जाणवत राहते. त्यातूनच त्यांचे वेगळेपण लक्षात येते.

संदर्भ :
कल्याणी विशेषांक - १९९७
डॉ, मंगला माधव वैष्णव MA. Phd.
वैष्णव निवास भ ५६/३९/२, नवीन उस्मानपुरा, औरंगाबाद