श्रीहंसराजस्वामीकृत 'आगमसार' - ग्रंथपरिचय
श्रीहंसराजस्वामींचा आगमसार हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. स्वतंत्र म्हणायचे कारण, स्वामींचे बरेचसे ग्रंथ काही प्रमुख ग्रंथांवरील टीकाग्रंथ आहेत. त्यामुळे यात आपला विषय मांडतांना आपणास योग्य वाटेल अशा रीतीने विषयास अनुसरून आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य स्वामींना मिळाले. सुमारे ३,५०० ओव्यांच्या या ग्रंथात प्रामुख्याने सर्व प्रमुख उपनिषदांचे सार सिद्धान्तरूपाने मांडले आहे. बराचसा भाग संवादरूपाने असून मधून मधून काही दृष्टांतही दिलेले आहेत. भाषा प्रासादिक असली तरी विषयच कठीण असल्यामुळे एका वाचनात बोध होणे कठीण आहे.
स्वामींच्या इतर ग्रंथांप्रमाणे या ग्रंथांतही स्वामींनी अनुबंध चतुष्टयाची चर्चा केली आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग करून पूर्वार्धात तात्त्विक चर्चा व उत्तरार्धात ब्रह्म-ऐक्य प्राप्तीच्या साधनांची चर्चा अशी ग्रंथ मांडणी केली आहे. ’वेदेश्वरी’ प्रमाणे इथेही तीव्रप्रज्ञ अधिकार्यासाठी मोक्षप्राप्तीसाठी तात्त्विक निरूपण पुरेसे आहे असे सांगून मंदप्रज्ञासाठी ’अभ्यास’ सांगितला आहे. पूर्वार्ध/उत्तरार्धात सात सात पंचिका असून प्रत्येक पंचिकेत पाच पाच समास आहेत. प्रत्येक पंचिकेला तसे प्रत्येक समासालाही त्यातील विषयाला धरून स्वतंत्र नाव दिले आहे.
पूर्वार्धात सांख्य म्हणजे तात्त्विक विचाराचे प्रतिपादन आहे. विचाराच्या साहाय्याने पिंडब्रह्मांडातील नित्यानित्य वस्तूंचा विवेक करून स्वतःच्या अभेदरूप ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेणे, हा या भागाचा मुख्य विषय होय. त्यासाठी वेदान्ताच्या दृष्टिकोणातून जीव, जगत्, परमेश्वर, अविद्या, माया, कूटस्थ, ब्रह्म यांची स्वरूपे व त्यांचे परस्परसंबंध इत्यादिंचे वर्णन आले आहे. हे करताना भिन्न मतांचा परामर्शही करण्यात आला आहे. श्रवणमनननाच्या साहाय्याने आणि गुरुकृपेच्या योगाने जीवाला प्रथम आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते आणि नंतर विचारांच्या साहाय्याने तो अपरोक्षज्ञान प्राप्त करतो असे प्रतिपादन आहे.
उत्तरार्धात योगाचा विचार केला आहे. हा योग पतंजलिप्रणीत योगाहून वेगळा आहे, हे दाखविण्यासाठी त्यांनी शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूतीत जी ध्यानाची १५ अंगे सांगितली आहेत, त्यांचा अनुवाद केलेला आहे. अभ्यासाचे प्रत्यक्ष वर्णन फक्त ८ व्या पंचिकेत आले आहे. बाकीच्या भागात या अभ्यासाने साध्य होणार्या फलांचा विचार क्रमशः केला आहे. अभ्यास म्हणजे ध्यानाच्या साहाय्याने ब्रह्मात्मैक्य साध्य करण्याचा मार्ग. तो करीत असताना अनेक विघ्ने येतात. त्यांचे निरसन कसे करावे, तो साध्य झाला की क्रमाक्रमाने जीवन्मुक्ती, विदेहमुक्ती, सहजस्थिती इत्यादि उत्तरोत्तर श्रेष्ठ अशा अवस्थांची प्राप्ती होऊन दृढ अपरोक्षस्थितीला साधक कसा पोहोचतो याचे विवेचन स्वामींनी तपशीलाने केले आहे. शेवटच्या पंचिकेत अध्यात्मिक दृष्टीने व्यवहारातील चार वर्ण, चार आश्रम, देहादिकांच्या जागृत्यादि अवस्था यांच्या नवीन अर्थाची फोड करून सांगितली आहे. शेवटी संत, गुरुभक्त इत्यादिंची स्तवने करून ग्रंथ संपविला. ग्रंथाच्या शेवटचे पसायदानही खास वेदान्ती आहे.
GO TOP