॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(पूर्वार्ध)

पंचिका २ री
ज्ञान प्रतिष्ठा

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
ज्ञानसाधनप्रकार


गणेश शारदा सद्‌गुरु । संत सज्जन कुलेश्वरू ।
सर्वही माझा रघुवीरू । सद्‌गुरुरूपें ॥१॥
गणेश, शारदा, सद्गुरू, संत-सज्जन, कुलदैवत ही सर्वही माझ्या सद्गुरूंच्या रूपातील माझा रामच होत. (१)

वंदुनीयां श्रोतेजन । कीजे वेदांत कथन ।
उपनिषदांचा अर्थ गहन । प्राकृतीं प्रगटे ॥२॥
आता श्रोतेजनांना नमस्कार करून वेदान्ताचे निरूपण केले जाईल. त्यायोगाने उपनिषदांचा गहन अर्थ प्राकृत भाषेत प्रकट होईल. (२)

मुख्य मोक्ष म्हणिजे ज्ञान । ऐका तयाचे साधन ।
जैसें करितांचि मंथन । अग्नि प्रगटे ॥३॥
मुख्यत: मोक्ष म्हणजेच ज्ञान आहे. त्या ज्ञानाचे साधन ऐका. (अग्नीसाठी) काष्ठांचे मंथन म्हणजे घर्षण केल्यानंतर जसा अग्नी प्रकट होतो, त्याप्रमाणे (३)

गुरु शास्त्र आणि विचार । तरीच निरसे अंध:कार ।
ज्ञानप्रकाश होय थोर । आपआतपणा भेटे ॥४॥
गुरू, शास्त्र आणि विचार या तीन गोष्टी असतील तरच अज्ञानरूपी अंधकार नष्ट होईल आणि ज्ञानाचा प्रकाश वाढेल, आणि या ज्ञानाच्या प्रकाशात आपण आपल्याला भेटतो. (४)

तें तरी निजरूप आपुलें । जरि गुरुशास्त्र न विचारिलें ।
तरी तें दुरी दुरावलें । अति दूरतर ॥५॥
जर गुरू, शास्त्र यांचा विचार घेतला नाही, तर ते आपले आत्मरूप आपल्यापासून दूर दूरवर जाते. (आपल्यापासून दुरावते. ४५)

जैसा काष्ठीं अग्नि असे । मथनेंवीण प्रकाश नसे ।
तरी अंधकारू निरसें । कवणेपरी ॥६॥
काष्ठामध्ये अनी असतो. पण त्याचे मंथन केल्याखेरीज त्याचा प्रकाश मिळत नाही. तो मिळाला नाही तर अंधकाराचे निरसन कोणत्या प्रकाराने होईल ? (तसाच हा प्रकार होय.) (६)

आचार्य तो पूर्वारणी । शिष्य जाणिजे उत्तरारणी ।
शास्त्रविचार मथनीं । ज्ञानाग्नि प्रगटे ॥७॥
या ज्ञानाग्नीच्या मंथनप्रक्रियेत आचार्य अथवा गुरू हे खालची अरणी (मंथन काष्ठ) असून शिष्य हा वरची अरणी समजावी. शास्त्रविचार पाहणे हे मंथन होय. अशा मंथनातून ज्ञानरूपी अग्री प्रकट होतो. (७)

पृथकाकारें सांगिजेल । मुख्य सद्‌गुरु जैं भेटेल ।
शब्दब्रह्मीं परब्रह्मीं असेल । निपुण जो का ॥८॥
वेगळ्या प्रकाराने हे सांगता येईल. जे शब्दब्रह्म (म्हणजे शास्त्रविचार) आणि परब्रह्म (अध्यात्मविचार) यांत पारंगत असतील असे सद्गुरू जेव्हा भेटतील, (८)

तरिच अधिकारियासी । ज्ञान होय निश्चयेसी ।
मिळे आपण आपणासी । सद्‌गुरु प्रसादें ॥९॥
तेव्हाच अधिकारी शिष्याला निश्चितपणे ज्ञान प्राप्त होते. सद्गुरूंच्या कृपेनेच आपली आपल्या स्वरूपाशी गाठ पडते. (९)

परब्रह्मीं निष्णात असे । प्रबोधशक्ति शब्देंवीण नसे ।
अवघा शब्दब्रह्म जाणतसे । परि अनुभव नाहीं ॥१०॥
एखादा परब्रह्माच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या बाबतीत निपुण आहे, पण शब्दज्ञानाच्या अभावी त्याच्याजवळ दुसऱ्याचे प्रबोधन करण्याची शक्ती नाही; किंवा सर्व प्रकारच्या शब्दज्ञानाचा जो जाणकार आहे, परंतु परब्रह्माच्या ज्ञानाचा त्याच्याकडे अनुभव नसेल. (१०)

तरी गुरुत्व न ये तयासीं । उभयीं निपुण अहर्निशी ।
तो सद्‌गुरु सच्छिष्यासी । मिळणी करी ॥११॥
या दोघांनाही गुरुत्व प्राप्त होत नाही. पण जे या दोन्ही प्रकारात रात्रंदिवस निपुण असतात. असेच सद्गुरू शिष्याची स्वरूपाशी भेट घालून देऊ शकतात. (११)

एक ब्रह्मज्ञानेवीण । जो जो उपदेश तो तो शीण ।
मंत्र यंत्र उपासन । अधिकारिया न लगति ॥१२॥
एक ब्रह्मज्ञान नसेल तर जो जो (कोरडा) उपदेश केला जाईल. तो उपदेश म्हणजे केवळ श्रम होत. तेव्हा अधिकारी शिष्याला सद्गुरूखेरीज मंत्र, यंत्र अथवा उपासना यांपैकी कशाचीही गरज भासत नाही. (१२)

सद्‌गुरुमुखें सच्छास्त्रश्रवण । हें सद्गुिरुचिया आधीन ।
मनन आणि निदिध्यासन । हें शिष्याकडे ॥१३॥
सद्गुरूंच्या मुखातून सच्छास्त्रश्रवण करण्याची संधी मिळणे हे सद्गुरूंच्यावर अवलंबून आहे. पण श्रवण केलेल्या ज्ञानाचे मनन आणि निदिध्यास या गोष्टी मात्र सर्वस्वी शिष्यावर अवलंबून आहेत. (१३)

गुरुवीण शास्त्र पाहिलें । तें जाणावें बाष्कळ जालें ।
निश्चयासीं बाणलें । न वचे कदां ॥१४॥
गुरूंचा अव्हेर करून शास्त्रग्रंथांचा अभ्यास केला तर तो अभ्यास बाष्कळ ठरतो. त्याला कधीच निश्चयाचे स्वरूप येत नाही. (१४)

गुरुपदीं जो अनन्य । वेदांत तोचि जें गुरुवचन ।
तरी सच्छास्त्राचें प्रयोजन । काय असे ॥१५॥
एखादा शिष्य गुरुचरणांपासी पूर्णपणे अनन्यगतिक, एकनिष्ठ असेल, सद्गुरूंच्या मुखातून जे निघाले तो वेदान्त अशी त्याची श्रद्धा झाली असेल तर त्याला इतर शास्त्रग्रंथांची काय आवश्यकता ? (१५)

हें सत्य परि शास्त्राधारें । आवडी सद्‌गुरुपदीं थोरें ।
ऐकिलें नसतां निर्धारें । अनन्यत्व कैंचें ॥१६॥
हे खरे असले तरी शास्त्राच्या आधारानेच सद्गुरुचरणांवरची भक्ती स्थिर होते. जर शास्त्रांचे श्रवण झालेच नसेल तर सद्गुरूंबद्दल निश्चयपूर्वक, अनन्यगतिक निष्ठा कशी होईल ? (१६)

मागें गुरुशिष्य अपार । उपदेश असे शास्त्राधार ।
वर्तमानीं अथवा पुढें होणार । वेदवचनेंवीण नाहीं ॥१७॥
मागे जे अनेक (अगणित) गुरुशिष्य होऊन गेले, त्यांचाही उपदेश शास्त्रवचनानुसारच होत होता. वर्तमानकाळात जे गुरुशिष्य असतील आणि येथून पुढे जे निर्माण होणार असतील त्यांचाही उपदेश वेदवचनांशिवाय होणार नाही. (१७)

तूं तें ब्रह्म अससी । वेदाचीं वचनें ऐसीं ।
अनुभवें खंडी संशयासी । सद्‌गुरुनाथ ॥१८॥
वेदांमध्ये 'तूच ते ब्रह्म आहेस' (तत्त्वमसि) अशा प्रकारची वचने आहेत. या वचनांच्या बाबतीत संशय निर्माण झाला तर ज्यांनी या वचनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे असे सद्गुरुमहाराज तो अनुभव त्या शिष्याला देऊन त्या संशयाचे खंडन करून निराकरण करतात. (१८)

शास्त्रेंवीण संशय न जाय । गुरुवीण अनुभव न होय ।
वेदवचनें गुरुसेवनें लाहे । समाधान ॥१९॥
शास्त्रावाचून संशय जाणार नाही आणि गुरूवाचून अनुभव प्राप्त होणार नाही. अशा प्रकारे वेदवचने आणि गुरुसेवा या दोहोंच्या साहाय्याने समाधान प्राप्त होते. (१९)

वेद हा स्वत:प्रमाण । कदां नव्हे अप्रमाण ।
प्रमाणसिद्ध जें ज्ञान । तेणेंचि अविद्यानिवृत्ति ॥२०॥
वेद हा. स्वत:प्रमाण म्हणजे इतर ग्रंथांवर अवलंबून न राहता स्वतंत्र असे प्रमाण आहे. तो कधीही अप्रमाण (अविश्वसनीय, मिथ्या) ठरणार नाही. जे ज्ञान प्रमाणांनी सिद्ध झालेले असते त्यानेच अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होत असते. (२०)

वेदें जरी ब्रह्मज्ञान । तरी जैमिनीचें ऐसें वचन ।
कीं क्रियापरत्व संपूर्ण । वेदासि असे ॥२१॥
पण वेदांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते असे असले तरी त्याबाबत एक अडचण आहे. पूर्वमीमांसाकार जैमिनीने असे म्हटले आहे की संपूर्ण वेद क्रियापर आहेत. (क्रियेचा आग्रह धरणारे आहेत.) (२१)

सर्व वेदासि क्रियात्व आलें । तरी वेदासी दूषण लागलें ।
सच्चिदानंद ब्रह्म कळलें । काशावरुनी ॥२२॥
सर्व वेदच जर असे क्रियापर ठरले, तर वेदांवर मोठाच दोष येतो. (ब्रह्मज्ञान हे विचारानेच प्राप्त होते. असा सिद्धान्त आहे. वेद तर क्रियापर ठरले. मग ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत वेद अप्रमाण ठरतात. मग ते ज्ञान कोणत्या शास्त्राने होते ?) मग सत्, चित्, आनंद या स्वरूपाचे ब्रह्म कसे कळते ? (२२)

विधि निषेध नामधेय । अर्थवाद मंत्रान्वय ।
त्रिकांड वेदाचें तात्पर्य । हें काय मिथ्या ॥२३॥
वेदांची तीन कांडात विभागणी होते. ज्ञान, कर्म आणि उपासना. या त्रिकांड वेदांचे तात्पर्य त्यातील विधिवाक्ये, निषेधवाक्ये, नामोच्चार, त्यातील अर्थवाद (फलश्रुती) , आणि मंत्रांचे परस्परसंबंध यांवरून ठरते. हे मिथ्या ठरेल काय ? (२३)

सच्चिदानंद हा विधि । तन्न तन्न या निषेधी ।
उभयरूपें अवधी । ज्ञानकांडीं ॥२४॥
तसे होणार नाही. वेदही ज्ञानपरच आहेत. ब्रह्म हे सत्, चित्, आनंदस्वरूपी आहे, हे त्यातील विधिवाक्य होय. ब्रह्म म्हणजे तत् न'या प्रकारच्या निषेधवाक्यांवरून कळते. वेदाच्या ज्ञानकांडात ह्या दोन्ही प्रकारची वाक्ये आहेत. (२४)

नामधेय उपासन । मंत्रसिद्धि क्रिया पूर्ण ।
अर्थवाद साधारण । त्रिकांडासी ॥२५॥
नामोच्चारण म्हणजे उपासना, त्यातील मंत्रपदे इत्यादी गद्य-पद्य प्रकार म्हणजे मंत्रसिद्धी होय आणि त्रिकांडात्मक संपूर्ण वेदातील फलश्रुती'मोक्ष'हीच आहे. ती सर्व कांडांना समानच आहे. (२५)

क्रियापरत्वचि मानावें । तरी ब्राह्मण कासया व्हावें ।
सर्व वेदार्था आणावें । दूषन कैसें ॥२६॥
वेद संपूर्ण क्रियापर मानला तर (ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः) ब्राह्मणत्व व्यर्थच ठरेल. मुख्य म्हणजे अशा (जैमिनीच्या) विधानांनी संपूर्ण वेदांना दूषण आणणे योग्य ठरेल काय ? (२६)

तरी त्या वचनाची काय गती । अपेक्षा असे चित्तीं ।
सकळ कुळा दोष लागती । तो पुत्र परित्यजावा ॥२७॥
मग जैमिनीच्या या वचनाचे काय करायचे ? असा मनात विचार येत असेल तर त्याचे उत्तर असे की, ज्यामुळे संपूर्ण कुळाला जर दोष (डाग, कलंक) लागत असेल असा पुत्र जरी असला तरी त्याचा त्याग करावा. (२७)

ग्रामासाठीं कुळ सांडिजे । देशाकरितां ग्राम दंडिजे ।
ऐशा न्यायार्थें जाणिजे । वचन मिथ्या ॥२८॥
गावाच्या हितासाठी आपल्या कुळाचा त्याग करावा, देशाच्या हितासाठी गावाला शासन करावे, या न्यायाच्या अनुरोधाने वरील (जैमिनीचे) वचन मिथ्या आहे असे समजावे. (२८)

स्वर्गार्थ यज्ञ करावा । या वचनेंचि विश्वास जिवा ।
अन्य प्रमाणाचा गोवा । न इच्छी कोणी ॥२९॥
'स्वर्गप्राप्ती'साठी यज्ञ करावा या वचनावरच सर्वसाधारण जीवांचा विश्वास असल्याने इतर प्रमाणांच्या गुंतागुंतीत कोणी पडत नाही. (इतर प्रमाणांच्या गुंतागुंतीत पडण्याची इच्छा कोणी जीव धरत नाहीत.) (२९)

म्हणउपनी वेद स्वत:प्रमाण । तत्काळ होय अज्ञान खंडण ।
तेणेंचि स्वरूप प्रगटमान । साधकां होय ॥३०॥
म्हणून वेद स्वत:प्रमाण आहेत. (त्यांना अन्य प्रमाणांची गरज नाही) त्यांच्या श्रवणाने अज्ञानाचे तत्काळ खंडन होते, त्याच योगाने साधक असतील त्यांना स्वरूप प्रगट होते. (स्वरूपाचा साक्षात्कार होतो. ४३०)

परि विचाराची अपेक्षा असे । तेणें असंभावना नासे ।
विपरीतत्वहि जातसे । तयासवें ॥३१॥
परंतु त्यासाठी विचाराची अपेक्षा आहे. विचागमळे संशयरूप असंभावना नष्ट होते. त्याचबरोबर विपरीत ज्ञानही नाहीसे होते. (असंभावना आणि विपरीतभावना हे ज्ञानाच्या मार्गातील दोष आहेत.) (३१)

वेद स्वत:प्रमाण म्हणतां । आणि विचार करावाही सांगतां ।
तरी स्वत:प्रमाण आतां । काशावरुनी ॥३२॥
यावर शंका अशी की एकीकडे तुम्ही वेदाला स्वत:प्रमाण म्हणता आणि लगेच वेदाच्या जोडीला विचाराची अपेक्षा आहे असे म्हणता, मग वेद स्वत:प्रमाण कसे ठरतील ? वेदालाही विचारांची मदत घ्यावी लागते असे यावरून ठरते. (३२)

जैसा दिपु लाविला । तेणें अंधकारु नाशिला ।
परी निर्वातत्व वाती तेला । अपेक्षा असे ॥३३॥
शंका बरोबर आहे. पण असं पहा, दिवा लावला आणि त्याने अंधार नाहीसा केला. पण त्या दिव्याला वारा नसणे, (निर्वातत्व) वात आणि तेल यांची अपेक्षा असतेच की नाही ? (३३)

तूं ब्रह्म हे श्रुति बोले । बहुधा गुरुमुखें ऐकिलें ।
प्रतिबंधें असत्य वाटलें । हे असंभावना ॥३४॥
वेदाने सांगितले की, तू ब्रह्म आहेस. हे वचन बहुधा गुरुमुखातून ऐकलेले असते. पण ऐकणाऱ्याच्या ज्ञानामध्ये अडथळा असल्यामुळे त्याला ते असत्य वाटते, हीच असंभावना होय. (म्हणजे आपणच ब्रह्म कसे असू हा संशय.) (३४)

मी किंचिज्ज्ञ मज कर्तेपण । ब्रह्म कैसा मी परिपूर्ण ।
हा विपर्यय याचें हनन । विचारचि करी ॥३५॥
मी तर अल्पज्ञानी, माझ्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमान आहे. असा मी ते परिपूर्ण ब्रह्म कसा असू शकेन ? असा विपरीत विचार मनात येणे यालाच विपरीत ज्ञान म्हणतात. विचारच या विपरीतज्ञानाचा नाश करतो. (म्हणजेच असंभावना आणि विपरीतता यांचा नाश करतो. (३५)

विचार म्हणिजे मनन । अनुभवानुसार तर्क करण ।
नाना कुतर्क दंडून । वृत्ति स्थिरावे ॥३६॥
विचार म्हणजे मनन करणे. म्हणजे आपल्याला जो अनुभव येत असेल त्यानुसार तर्क करणे. त्यायोगाने निरनिराळ्या कुतर्काचे खंडन होऊन वृत्ती स्थिर होते. (३६)

जरी विचार अपेक्षा जाली । जेणें वृत्ति बळावली ।
इतुकेनें वेदाची काय गेली । स्वत:प्रमाणता ॥३७॥
जरी वेदाला येथे विचाराची आवश्यकता भासली तरी त्याने वृत्ती दृढ झाली. एवढ्याने वेदाची स्वत:प्रमाणता कशी काय नष्ट होते ? (३७)

गुरु शास्त्र आणि विचार । श्रवण मनन सारासार ।
निदिध्यासें साक्षात्कार । अधिकारी पावती ॥३८॥
गुरू, शास्त्र आणि विचार, श्रवण, मनन सारासारविवेक आणि निदिध्यास या सगळ्यांमुळे अधिकारी साधकाला स्वरूप साक्षात्कार होतो. (३८)

नाना संशय छेदुन । मी ब्रह्म प्रतीति पूर्ण ।
त्रिविधा परि सत्य गहन । श्रवण या नांवे ॥३९॥
श्रवण म्हणजे निरनिराळ्या संशयांचे खंडन होऊन 'मी ब्रह्म आहे' असा पूर्ण अनुभव येणे. गुरू, शास्त्र आणि अनुभव या तिन्ही मार्गांनी त्याच्या सत्यत्वाची प्रतीती येणे, हे होय. (३९)

तेंचि मी हें अनुसंधान । भेदबुद्धीचें करी हनन ।
या नांव बोलिजे मनन । निदिध्यास पुढें ॥४०॥
मीच ब्रह्म आहे' असे चिंतन करून भेदबुद्धी नाहीशी करणे याला मनन म्हणतात. निदिध्यास म्हणजे काय ते पाहू. (४०)

जागृती अथवा स्वप्नीं । नाठवेंचि दुजे मनीं ।
एकतान समाधानी । हा निदिध्यास ॥४१॥
जागृतीत अथवा स्वप्नात दुसऱ्या कशाचेही स्मरण नसणे आणि सतत समाधानी असणे याला निदिध्यास म्हणतात. (४१)

पुढें सहज साक्षात्कार । आपुला आपण निर्धार ।
गळे वृत्तीचा विकार । निर्विकार सहज ॥४२॥
त्यानंतर सहज साक्षात्कार होऊन आपल्या स्वरूपाचा आपल्याला निश्चय होतो आणि वृत्तीचा विकार नष्ट होऊन मनुष्य निर्विकार बनतो. (४२)

प्रतिबंधें न वचे निर्धारिलें । तेंचि पाहिजे बोलिलें ।
अंतरी पाहिजे कळलें । प्रतिबंध कोणते ॥४३॥
पण प्रतिबंधामुळे निर्धार होत नाही. त्यामुळे प्रथम प्रतिबंधाचे स्वरूप कळले पाहिजे, कोणकोणते प्रतिबंध आहेत ते मनोमन कळले पाहिजे. (४३)

भूत भावि वर्तमान । प्रतिबंधाची लक्षणें तीन ।
अनुक्रमें साधकें ओळखून । परिहार योजावा ॥४४॥
प्रतिबंधांचे तीन प्रकार आहेत. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. साधकाने ते प्रकार क्रमश: ओळखून त्यांच्या निराकरणाचे उपाय करावेत. (४४)

मागें जे विषय भोगिले । स्त्रियादि सुख अनुभविलें ।
संन्यस्ता उपरी बैसलें । अंत:करण तेथें ॥४५॥
मागे जे विषयांचे सेवन केले असेल, स्त्रियादी सुखांचा अनुभव घेतला असेल, त्यांच्या ठिकाणी संन्यस्त साधकाचे मन गुंतून राहते. (४५)

तेणें गुणें श्रवण मनन । होतां न पविजे समाधान ।
हा भूत प्रतिबंध याचें निरसन । तेंचि कैसें ॥४६॥
त्यामुळे श्रवण, मनन इत्यादी करू लागले असता मिळावयाचे ते समाधान मिळू शकत नाही. याला भूत प्रतिबंध म्हणतात. याचे निरसन कसे करावे ? (४६)

पाहतां स्त्रियादिकांचे ठायीं । आत्मा आत्मी भेद नाही ।
त्या त्या विषयाचें समुदाईं । अधिष्ठान काय ॥४७॥
स्त्रियादिकांचा विचार मनात येताच, स्त्रीपुरुष अथवा पुरुष या सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मा वास्तव्य करतो. पुरुषांचा तो आत्मा आणि स्त्रियांचा तो आत्मी असा भेद तेथे नाही आणि या निरनिराळ्या विषयांच्या ठिकाणी कोणते अधिष्ठान आहे. सर्वत्र आत्माच तर आहे. (४७)

नामरूप जें जें आलें । तें तें मिथ्यात्वें विदारिलें ।
अस्ति भाति कोंदाटलें । विषय कैंचा ॥४८॥
जे नामरूपात्मक आहे ते सर्व मिथ्या आहे असे जाणून त्यांचा निरास करावा. सर्व विश्वच अस्ति, भाति, प्रिय या लक्षणांनी युक्त असलेल्या ब्रह्माने कोंदाकोंदी व्यापून टाकले आहे, तेव्हा तेथे विषय आणि विषयांचा भोक्ताअशा भेदाला वाव कसा असेल ? (४८)

विषयाभावीं भोग कैंचा । भोक्त्याभावीं कैंची इच्छा ।
येणे रीती संकल्पाचा । छेद कीजे ॥४९॥
विषयच जर नसेल तर त्यांचा भोग कसा शक्य होईल ? आणि भोक्ताच जर नसेल तर तेथे इच्छा कशी संभवेल ? असा विचार करून मूळच्या स्मरणरूप संकल्पाचे निरसन करावे. हे भूत प्रतिबंधाचे निरसन होय. (४९)

आतां जाणिजे वर्तमान । प्रतिबंधाचे कैसें चिन्ह ।
तयाचें चत्वार लक्षण । तेंचि अवधारा ॥५०॥
आता वर्तमान प्रतिबंधाचे चिह्न जाणून घेऊ. त्याची चार लक्षणे आहेत. ती प्रथम लक्षात घ्या. (५०)

प्रज्ञामांद्य आणि कुतर्क । दुराग्रह विपर्यय देख ।
वेगळालें याचें रूपक । पाहून त्याग कीजे ॥५१॥
प्रज्ञामांद्य, कुतर्क, दुराग्रह, विपर्यय ही ती चार लक्षणे होत. त्यांची वेगवेगळी रूपे जाणून त्यांचा त्याग करावा. (५१)

अर्थ न कळे प्रज्ञा थोडी । कुतर्के भलताचि अर्थ काढी ।
दुराग्रहें बळेंचि ओढी । म्हणे माझें खरें ॥५२॥
प्रज्ञामांद्य म्हणजे मंद बुद्धीमुळे अर्थ कळत नाही अशी स्थिती. कुतर्क म्हणजे चुकीचे अथवा दुष्ट तर्क करून भलताच अर्थ काढणे आणि दुराग्रह म्हणजे माझे म्हणणे खरे आहे, असे म्हणून बळेच ताणून धरणे. (५२)

विपर्ययें कष्टविलें । मी जीव म्हणोनि भ्रमलें ।
हे चारि मिळोनि बोलिलें । वर्तमान प्रतिबंध ॥५३।
विपर्यय म्हणजे विपरीत भावना. तिने प्राण्यांना फारच कष्ट दिले आहेत. आपण आत्मा असताना त्याला जीव मानणे हा विपर्यय होय. या चारींना मिळून वर्तमान प्रतिबंध असे म्हणतात. (५३)

अथवा विषयासक्ति स्वीकारिजे । विपर्यय दुराग्रह एक कीजे ।
एवं चारीचे हें लक्षण जाणिजे । प्रज्ञामांद्य कुतर्कादि ॥५४॥
किंवा विपर्यय आणि दुराग्रह या दोन चिह्नांचे एकत्रीकरण करून रिकाम्या झालेल्या जागी विषयासक्ती हे चिह्न घालावे. प्रज्ञामांद्य, कुतर्क इत्यादी चारी चिह्नांचे अशा त-हेने लक्षण समजून घ्यावे. (५४)

यासि करावें श्रवणमनन । तेणें याचें निरसन ।
बळेंचि आवरावें मन । विश्वासबळें ॥५५॥
या प्रतिबंधाचे निरसन करण्यासाठी श्रवण, मनन या साधनांचा अवलंब करावा आणि विश्वासाच्या बळाने मन बळेच आवरावे. (५५)

भावि प्रतिबंध ऐकिला । भरता त्रिजन्मीं मोक्ष जाला ।
वामदेवहि पावला । गर्भी समाधान ॥५६॥
भावी प्रतिबंधाच्या स्वरूपासंबंधी असे ऐकिवात आहे की, भरताला हरणाच्या ध्यासामुळे तीन जन्म घ्यावे लागले. वामदेवालाही गर्भवास स्वीकारून त्यात समाधान प्राप्त करावे लागले. (५६)

संशयरहित अपरोक्ष ज्ञान । त्याविशीं राहे जो अनुमान ।
मग अंतकालें जें आठवण । तेचि तया प्राप्ति ॥५७॥
संशयरहित जे अपरोक्ष ज्ञान त्याविषयी संशय बाळगला की, अंतकाळी जी स्मृती असेल त्याप्रमाणे त्याला गती मिळते. (५७)

यासि करावें निदिध्यासन । अखंड राखावें अनुसंधान ।
साक्षात्कार अपरोक्ष ज्ञान । येथेंचि होय ॥५८॥
त्याच्या निरसनासाठी निदिध्यास धरावा, अखंड अनुसंधान ठेवावे. त्यायोगाने याच जन्मी साक्षात्कार व अपरोक्ष ज्ञान होते. (५८)

तथापि तसेंचि अवसान आलें । अपरोक्ष ज्ञान नाहीं जालें ।
तरी जन्मांतरी समाधान पावलें । पूर्वील ध्यासें ॥५९॥
तथापि जरी साक्षात्कार न होताच मृत्यू आला तरी पुढच्या जन्मात मागच्या निदिध्यासाने अपरोक्ष ज्ञान होऊन समाधान प्राप्त होते. (५९)

मुख्य अनुसंधान न सोडावें । तेणेंचि एक पावन व्हावें ।
श्रवणमनन केलेंचि करावें । साक्षात्कारा पावेतों ॥६०॥
तेव्हा साक्षात्कार होईपर्यंत अनुसंधान सोडू नये. श्रवण, मनन पुन्हा पुन्हा करावे आणि पावन व्हावे. (६०)

मंदमतीचिया कृपा । हा प्रस्तावो निरोपिला बापा ।
येरांसी कायसे पां । लागती सायास ॥६१॥
मंदमती अधिकाऱ्यांची कणव येऊन हा उपाय सांगावा लागला. इतरांना काय सायास पडणार आहेत ? (६१)

सद्‌गुरुपदीं अनन्यता । तरि तुजसी काय बा चिंता ।
बोलिलें अर्था श्रुति समस्ता । अनायासें तया प्राप्ति ॥६२॥
सद्गुरुचरणांशी जर अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे कारण काय ? श्रुतीनी हा सगळा भावार्थ सांगितला आहेच. गुरुभक्ताला विनासायास अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते. (६२)

पावतां मुख्य अधिकार । वरि गुरु शास्त्र विचार ।
श्रवणमननें साक्षात्कार । विलंब नाहीं ॥६३॥
एक मुख्य अधिकार प्राप्त झाला, त्यावर सद्गुरू, शास्त्र आणि विचार यांची प्राप्ती झाली, आणि त्याला श्रवणमननाची जोड देताच साक्षात्काराला उशीर लागत नाही. (ताबडतोब साक्षात्कार होतो.) (६३)

हें यथार्थचि बोलिलें । विवेकें कल्पनेसी सांडिलें ।
मग अपैसेंचि उरलें । श्रुतिसिद्ध तत्त्व ॥६४॥
विवेकाने कल्पनेचा त्याग केला की मग आपोआपच जे उरते तेच श्रुतीनी सिद्ध केलेले तत्त्व म्हणजे ब्रह्म होय हे असे जे म्हटले आहे ते यथार्थच आहे. (६४)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
ज्ञानसाधन प्रकारे । प्रथमसमास: ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
मतखंडन


ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । अध्यात्मविद्या जया अभिधान ।
नाना मतांचे पेखण । कामा नये सर्वथा ॥१॥
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्यालाच अध्यात्मविद्या असे नाव आहे. ज्ञानाच्या बाबतीत विविध मतांचे अवडंबर उपयोगाचे नाही. (१)

अध्यात्मविद्या तेचि विद्या । परंपरा साधन अन्य विद्या ।
मोक्ष बोलिला परि आद्या । तो अर्थवाद ॥२॥
अध्यात्मविद्या हीच खरी एकमेव विद्या होय. इतर विद्या केवळ परंपरा टिकवणाऱ्या आहेत. त्यांनीही मोक्षच सांगितला असला तरी त्यांचे ते सांगणे अर्थवादात्मक म्हणजे पक्षगौरवासाठी असते. (२)

तूं मोठा पुण्यवान । कोणी नाहीं तुजसमान ।
ऐसें जिव्हेंनें करी स्तवन । तो अर्थवाद ॥३॥
तू मोठा पुण्यवान आहेत, तुझ्यासारखे कोणी नाही' अशा प्रकारे जिव्हेने स्तुती करणे म्हणजे अर्थवाद होय. (३)

विद्या तरी अवघ्या किती । तेथील कैसी फळश्रुति ।
अल्पसंकेतें यथामती । निवडोनि दाऊं ॥४॥
आता एकूण विद्या किती आहेत त्यांच्या फलश्रुती काय आहेत, हे थोडक्यात यथामती स्पष्ट करून सांगतो. (४)

ऋग्यजु:सामाथर्वण । हे मुख्य चत्वारि वेद पूर्ण ।
शिक्षा कल्प व्याकरण । छंद निरुक्त ज्योतिष ॥५॥
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे मुख्य चार वेद आहेत. शिक्षा (उच्चारशास्त्र) , कल्प (यज्ञक्रियाविधिशास्त्र) , व्याकरण, छन्दःशास्त्र, निरुक्त (व्युत्पत्तिशास्त्र) आणि ज्योतिषशास्त्र. (५)

ऐसीं साही शास्त्रें भिन्न भिन्न । ऐका उपांगाचे लक्षण ।
न्याय मीमांसा पुराण । धर्मशास्त्र ॥६॥
अशी भिन्न भिन्न सहा शास्त्रे आहेत. आता वेदांची उपांगे ऐका. न्याय, मीमांसा (वैदिक कर्मकांडाचे समर्थन करणारे शास्त्र) , पुराणे, धर्मशास्त्र. (६)

ही उपांगें चारा असतीं । एवं विद्या चतुर्दश म्हणती ।
सांख्य पातंजलादि होती । अंतर्भूत त्याचे ॥७॥
अशी चार उपांगे आहेत. या सर्व मिळून चौदा विद्या आहेत. त्यातच सांख्यशास्त्र, पातंजल म्हणजे योगशास्त्र इत्यादी त्यात समाविष्ट होतात. (७)

उपांगाच्या ठाई मतें । बोलती परस्परें विरोधातें ।
अध्यात्मविद्या म्हणणें जीतें । ते मीमासा उपांगी ॥८॥
उपांगांमध्ये परस्परविरोधी मते मांडली जातात. जिला अध्यात्मविद्या म्हणतात. ती मीमांसा या उपांगाच्या पोटात समाविष्ट होते. (८)

वैशेषिक न्यायाच्या पोटीं । पुराणिं पुराणाची थाटी ।
धर्मशास्त्रीं दाटी । बहुत नामाची ॥९॥
वैशेषिकमत हे न्यायाच्या पोटी समाविष्ट आहे. पुराण या उपांगामध्ये सर्व पुराणांचा समुदाय अंतर्भूत होतो. धर्मशास्त्रामध्ये अनेक धर्मशास्त्रपर ग्रंथांची दाटी झाली आहे. (९)

सांख्य पातंजली पाशुपत । वैष्णव रामायण महाभारत ।
या इतुकियांचा संकेत । धर्माशास्त्रीं ॥१०॥
धर्मशास्त्रामध्ये सांख्य, पातंजल (योगशास्त्र) , पाशुपत (शैवग्रंथ) , रामायण, महाभारत हे वैष्णवग्रंथ या इतक्या ग्रंथांचा समावेश होतो. (१०)

आतां उपांगाच्या ठाई । मोक्षातें बोलती काई ।
तो तो अर्थवाद नहीं । सिद्धांत एक ॥११॥
आता उपांगांच्या ठिकाणी काहीजण मोक्षाचे प्रतिपादन करतात. पण ती मते एक सिद्धान्त नसल्याने त्यांना अर्थवाद समजावे. (११)

देहेंद्रिया अतीत । आत्मा विभु नव गुण मिश्रित ।
षट्‌प्रमाणें बुद्धिस होत । साक्षात्कार जरि ॥१२॥
वैशिषिकांच्या म्हणण्यानुसार आत्मा देहेद्रियातीत असून विभू म्हणजे सर्वव्यापक आणि नवगुणमिश्रित असतो. बुद्धीस सहा प्रमाणे आहेत आणि साक्षात्कार म्हणजे- (१२)

वृत्तिसहित नव गुण । याचें होय नि:शेष हनन ।
तरिच मोक्ष अभिधान । वैशेषिक बोलती ॥१३॥
वृत्तीसहित नव गुणांचा नि:शेषनाश होणे होय. त्यालाच वैशेषिक मोक्ष असे म्हणतात. (१३)

प्रमेयादि षोडश पदार्थ । ज्ञानें द्वादश वर्गाचा घात ।
श्रवणमननें होत । मिथ्याज्ञाननिवृत्ति ॥१४॥
प्रमेयादी सोळा पदार्थ, तसेच बारा वर्ग यांचा ज्ञानाने नाश होतो. श्रवण मनन निदिध्यास यांच्या साहाय्याने मिथ्या ज्ञानाची (विपरीत कल्पनांची) निवृत्ती होते. (१४)

आणि शरीरादि एकवीस भेद । याचा आत्यंतिक उपमर्द ।
हा असे मोक्षवाद । न्याय शास्त्राचा ॥१५॥
आणि शरीर इत्यादी एकवीस भेद आहेत. त्यांचा आत्यंतिक नाश होणे, हाच न्यायशास्त्राच्या दृष्टीने मोक्ष होय. (१५)

ज्ञानावांचून नित्यानुष्ठान । काम्य निषिद्ध वर्जून ।
नव्हें पुढें क्रियमाण । अपर तार्किक बोलती ॥१६॥
इतर तार्किक असे सांगतात की, काम्य कमें, निषिद्ध कमें वयं करून नित्य आणि विहित कर्मांचे ज्ञाननिरपेक्ष (अशा कर्तृकत्वाचे ज्ञान न बाळगता) अनुष्ठान केले तर पुढे काही करायला उरत नाही. (१६)

वैदिक कर्मानुष्ठान विहित । आत्मज्ञान उभय मिश्रित ।
देहेंद्रियांचा धर्म नासत । भोगमात्रें ॥१७॥
सकळ हो‍ऊन उच्छेद । हाचि मोक्ष अनुवाद ।
जाणिजे तो अर्थवाद । पूर्वमीमांसकाचा ॥१८॥
(मुमुक्षूला क्रियमाण कर्माची बाधा होत नाही.) हाच त्याचा मोक्ष होय. वैदिक धर्माप्रमाणे विहित कर्मांचे आचरण करून आत्मज्ञान व कर्माचरण यांच्या समुच्चयातून देहेद्रियांचे धर्म भोगाने समूळ नष्ट करून मोक्ष प्राप्त होतो, असा पूर्व मीमांसकांचा युक्तिवाद आहे. तो समजून घ्यावा. (१७-१८)

जडचेतन आत्मा असे । ज्ञानकर्में दु:ख नासे ।
नित्य सुख उल्लसे । मोक्ष त्यास भट्ट म्हणे ॥१९॥
आत्मा जड व चेतन उभयरूप असून ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चयाने दुःखाचा नाश होतो आणि नित्य शाश्वत सुखाची प्राप्ती होते. त्याला भट्टमतानुयायी मीमांसक मोक्ष म्हणतात. (१९)

प्रकृति पुरुष विवेक करितां । सत्वपुरुषाचें ज्ञान होतां ।
प्रवृत्ति नव्हे भोगार्था । निरोध त्रिविध दु:खाचा ॥२०॥
प्रकृती-पुरुष यांच्यातील भेद विचारपूर्वक समजून घेऊन त्यातील मुख्य पुरुषाचे सत्त्वपुरुषाचे) ज्ञान करून घेतल्यानंतर भोगाकडे प्रवृत्ती होत नाही. त्रिविध दुःखांचा नाश होतो. (२०)

परि उपास्य उपासक भेद । हेंचि श्रेय नव्हे अभेद ।
हा जाणिजे मोक्षवाद । सांख्यशास्त्रींचा ॥२१॥
परंतु उपास्य आणि उपासक यात द्वैत मानणे हेच खरे श्रेय होय. अभेद किंवा अद्वैत नव्हे, हा सांख्यशास्त्रातील मोक्ष होय. (२१)

प्रकृति पुरुषाचा विवेक । आणि वैराग्याचा निरोध ।
यमनियमादि अष्टक । असंप्रज्ञात समाधि ॥२२॥
प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय या दोहोतील भेद जाणून घेणे आणि कड़क वैराग्य पाळणे;यम, नियम, प्राणायाम इत्यादी अष्टांग. योगाचे आचरण आणि असंप्रज्ञात समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी, (२२)

संकल्पादि वृत्तीचा निरोध । धर्ममेध बोलती शब्द ।
हा पातंजलीचा संवाद । मोक्ष ऐसा ॥२३॥
संकल्प इत्यादी वृत्तींचा निरोध यांना धर्मयज्ञ किंवा धर्ममेध म्हटले जाते. यालाच पातंजल योगशास्त्रात मोक्ष असे म्हटले आहे. (२३)

ब्रह्म जीव भेदाभेद । कार्य कारणीं लया जातसे ।
ज्ञानकर्मसमुच्चयें भेद नासे । हा मोक्ष त्रिदंडीचा ॥२४॥
ब्रह्म आणि जीव यांच्या सबंध द्वैत आणि अद्वैत असा उभयात्मक आहे कार्याचा कारणामध्ये लय होत जातो;ज्ञान आणि कर्म या दोहोच्या साहाय्याने सर्व भेद नष्ट होणे हा त्रिदंडी (संन्यास) पंथाच्या मते मोक्ष होय. (२४)

अन्य त्रिदंडी बोलती । होय जरी परमेश्वरप्राप्ति ।
तरीच होय मुक्ति । साधकासी ॥२५॥
त्रिदंडी (संन्यास) मार्गातील दुसरे लोक असे मानतात की, साधकाला परमेश्वराची प्राप्ती होणे हाच मोक्ष होय. (२५)

सतरंग निस्तरंग सागर । स्वरूप सविकार निर्विकार ।
कर्मज्ञानें जाय विकार । हा मोक्ष एकाचा ॥२६॥
समुद्र ज्याप्रमाणे लाटांसहित असतो, अथवा लाटा नसलेल्या अवस्थेतही असतो;त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप विकल्पयुक्त असते तसे विकल्परहितही असते. स्वरूपामध्ये जाणवत असलेले विकार, कर्म, ज्ञान यांच्या मार्गाने नाहीसे होणे हाच मोक्ष होय असे काही लोक मानतात. (२६)

शैवधर्म आचरावे । तेणें देहांती शिवलोका जावें ।
मोक्ष जाणिजे या नांवे । पाशुपत पुराणीं ॥२७॥
पाशुपत पुराणात शैवधर्माचे आचरण करावे आणि त्यायोगे देहान्तानंतर शिवलोकाची प्राप्ती व्हावी हाच मोक्ष सांगितला आहे. (२७)

वैष्णव पुराणीं । वैष्णव धर्माचरणीं ।
विष्णु लोकाचिये गमनीं । मोक्ष बोलती ॥२८॥
तर विष्णुविषयक पुराणांमध्ये वैष्णव धर्माच्या आचरणाने विष्णुलोकाला जाणे याला मोक्ष असे म्हटले आहे. (२८)

करिती पंचाग्नीसाधन । अर्चिरादि मार्ग क्रमून ।
हिरण्यगर्भी जाय मिळून । हैरण्यगर्भी मोक्ष ॥२९॥
हिरण्यगर्भाचे (ब्रह्मदेवाचे) उपासक मोक्षासाठी पंचाग्निसाधन करतात आणि त्याद्वारे अर्चिरादी मार्गाने (गीतेत आठव्या अध्यायात अर्चिरादी व धूम्रादी असे दोन मार्ग सांगितले आहेत.) त्यांपैकी पहिले हिरण्यगर्भा (ब्रह्मदेवा) मध्ये एकरूप होऊन जाणे यास मोक्ष मानतात. (२९)

नाना शक्तींचे अर्चन । तेणें कीजे मद्यपान ।
सुरतक्रीडा भ्रम जाऊन । शाक्त मोक्ष हा ॥३०॥
अथवा शक्तीची विविध प्रकारे उपासना करून म्हणजे त्यांमध्ये मद्यपान, सुरतक्रीडा, नशा इत्यादींचा अवलंब करून शेवटी भ्रांतिरूप अज्ञान नष्ट झाल्यानंतर तल्लीन होण्याने मोक्ष मिळतो. (३०)

केशोत्पाटन करावें । आणि दु:ख किमपि न व्हावें
पाषांडी बोलती सर्वे । हाच मोक्ष ॥३१॥
हा शाक्तपंथीयांचा मोक्ष होय. हाताने केस उपटावेत, ते करत असताना यत्किंचितही दुःख मानू नये. याला सर्व पाखंडी लोक मोक्ष असे म्हणतात. (पाखंडी म्हणजे वेदावर विश्वास न ठेवणारे, जैन, बौद्ध इत्यादी लोक. जैनांमध्ये भिक्षु डोक्यावरील केस हाताने उपटून टाकतात. पण हा विधी म्हणजे मोक्ष असे ते मानतात. हे मत चुकीचे आहे. ३१)

याहिपरी नानाभेद । मोक्षविशीं जे जे वाद ।
उदंड असती विवाद । न वचे कळला ॥३२॥
याप्रमाणे मोक्ष कल्पनेसंबंधी विविध प्रकारचे वाद आहेत, ती सर्व मते कळणे शक्य नाही. (३२)

जितुके देव तितुके भक्त । तैसी तैसी क्रिया करित ।
जें जें मनासि आवडत । तो तो मोक्ष त्याचा ॥३३॥
थोडक्यात हे समजून घ्यावे की जितके म्हणून देव आहेत तितके त्यांचे भक्तही असतात आणि त्या देवतेच्या आवडीप्रमाणे ते क्रिया करत असतात त्यामुळे त्यांच्या मनाला जे जे आवडते (इष्ट वाटतो त्यांचा) मोक्ष होय. (३३)

नाना शास्त्रीं प्रतिपादिलें । पंडितमान्य जरी जालें ।
नवरसिकही बोलिले । येणें तृप्ति कैची ॥३४॥
अनेक शास्त्रग्रंथांतून या मोक्षाचे स्वरूप वर्णन करून सांगितले आहे ते विद्वान लोकांना पटणारे असले आणि ते त्यांचे प्रतिपादन खूप रसाळ जरी असले तरी त्या प्रतिपादनाने तप्ती कशी होईल ? (३४)

सद्‌गुरुमुखें वेदांतश्रवण । प्रत्यगात्मा ब्रह्म अभिन्न ।
अविद्यानिवृत्ति हें ज्ञान । अध्यात्मविद्या ॥३५॥
सद्गुरूंच्या मुखातून वेदान्ताचे श्रवण करून प्रत्यगात्मा (देहातील आत्मतत्त्व) आणि ब्रह्म यांतील अभेद ओळखणे आणि अज्ञानाचा नाश करणे या ज्ञानाला अध्यात्मविद्या असे म्हणतात. (३५)

असो बंधचि सत्य असावा । तरिच मोक्षहि असे बरवा ।
नाना मतांचा गोवा । काय काज ॥३६॥
मुळात बंधन जर सत्य असेल तरच मोक्षही सत्य असेल याबाबतीत निरनिराळ्या मतांची आवश्यकताच काय ? (३६)

येथें नलगे कीं वित्पत्ति । न शास्त्राची भरती ।
हृदयीं वसिल्या कृपामूर्ती । सद्‌गुरुस्वामी ॥३७॥
हृदयामध्ये कृपेचे मूर्त रूप सद्गुरूस्वामींचे वास्तव्य असेल तर बाकीच्या व्युत्पत्तीची (पांडित्याची) गरज लागत नाही, की शास्त्रज्ञानाची भरताडही कामाची नाही. (३७)

अंधकार होता गहन । नाना दीपाचा करणें शीण ।
तें अकस्मात्‌ सूर्य येऊन । गृहामाजीं राहिला ॥३८॥
अंधार दाटून राहिला असेल त्यावेळी अनेक दिवे लावण्याचा खटाटोप करावाच लागतो. पण अशा प्रसंगी प्रत्यक्ष सूर्यच घरात येऊन राहिला तर कसे होईल ? तसे शास्त्रे, पांडित्य यांची प्रत्यक्ष सद्गुरूच हृदयात वसतीला आले असताना काय आवश्यकता आहे ? (३८)

इतुकें आयुष्य कोणास आहे । जें सकळ शास्त्र शोधून पाहे ।
सद्‌गुरुप्रसादेंच लाहे । येरां चाड नाहीं ॥३९॥
सगळे शास्त्र बारकाईने अभ्यासण्यासाठी आवश्यक असणारे एवढे दीर्घ आयुष्य कोणास असते ? तेव्हा सद्गुरूंच्या कृपाप्रसादानेच हवे ते ज्ञान मिळते. तेव्हा त्याव्यतिरिक्त अन्य साधनांची गरज नाही. (३९)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे
मतखंडणप्रकारे । द्वितीयसमास: ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
पूर्णज्ञाननिरूपण


धन्य धन्य हें ज्ञान । सकळ साधू मुनिजन ।
भूत भविष्य वर्तमान । येणेंचि ज्ञानें ॥१॥
हे ब्रह्मज्ञान खरोखरच धन्य होय. सगळे साधू, मुनिजन, भूत, भविष्य, वर्तमान इत्यादी सर्व काही या ज्ञानानेच व्यापले आहेत. (१)

ज्ञानासारखें पवित्र नाहीं । श्रुतिस्मृती देती गाही ।
देवमानव सर्वहि । येणेंचि ज्ञानें पावन ॥२॥
ज्ञानासारिखे पवित्र काही नाही, अशी श्रुती, स्मृती साक्ष देतात. देव, मानव हे सर्वजण या ज्ञानानेच पवित्र झाले आहेत. (२)

जो वैकुंठीचा राणा । नित्यमुक्त व्यापकपणा ।
कैलासवासी डुल्ले स्मशाना । येणेचि ज्ञानें ॥३॥
जो विष्णू वैकुंठाचा राजा आहे आणि तरीही जो नित्य मुक्त आणि सर्वव्यापक आहे; तसेच जो शंकर कैलासावर राहतो आणि स्मशानातही (आनंदाने) डोलतो, ते हे दोघेही या ज्ञानामुळेच या गोष्टी करू शकतात. (३)

ब्रह्मा आदि सनत्कुमार । वसिष्ठ नारदादि अपार ।
या सर्वांचें साचार । ज्ञान एकचि ॥४॥
ब्रह्मदेव, सनत्कुमार इत्यादी तसेच वसिष्ठ नारद इत्यादी अनेक लोक या सर्वांचे ज्ञान खरोखरच एकच आहे. (४)

तेंचि ज्ञान परंपरा । पावलेंसे गुरुद्वारा ।
वर्तमानी पुढें होणारा । ज्ञानचि गति ॥५॥
तेच ज्ञान गुरुपरंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे. वर्तमानकाळातील आणि भविष्यकाळातील लोकांना ज्ञान हेच आश्रयस्थान आहे. (५)

दीपें दीप लाविला । कोण थोर कोण धाकुला ।
आणि नामहि तयाला । दुसरें नाहीं ॥६॥
एका दिव्याने दुसरा दिवा पेटवल्यानंतर त्या दोहोंमध्ये कोणता लहान आहे, कोणता मोठा आहे असा भेद असतो काय ? बरे, या दोन्ही दिव्यांना दिवा हे एकच नाव आहे. ते दोन दिवे दिसत असले तरी त्या दोहोत अजिबात भेद नसतो. त्यांना भिन्न नावेही नसतात. (६)

तैसा गुरुराज शिष्यासी बोधी । परि शिष्यपणा उरों नेदी ।
निरसतांचि देहबुद्धी । गुरुची होय ॥७॥
त्याप्रमाणे सद्गुरू शिष्यास उपदेश करतात, तेव्हा त्या शिष्याला शिष्यपणाने राहूच देत नाहीत. त्या शिष्याच्या देहबुद्धीचे निरसन होताच तो स्वतः गुरूच होऊन जातो. (७)

अन्य विद्या श्रमें शिकतां । अभ्यास आवृत्ति न होतां ।
निर्मूळ होती तत्वतां । तैसी विद्या हे नव्हे ॥८॥
इतर सामान्य विद्या परिश्रमपूर्वक शिकाव्या लागतात. त्यांचा पुढे अभ्यास अथवा आवृत्ती झाली नाही, तर त्या विद्या नष्ट होतात. तशी ही ब्रह्मविद्या नाही. (८)

एकवेळ अपरोक्ष ज्ञान । होतां पेटे प्रलयाग्न ।
जाळून अज्ञान इंधन । सकार्य नाशी ॥९॥
एकदा का अपरोक्ष ज्ञान झाले की आत्यंतिक प्रलयाचा ज्ञानानी पेट घेतो आणि तो अज्ञानरूपी इंधन त्याच्या कार्यासह जाळून टाकतो. (९)

अग्नि काष्ठींच प्रगटतो । त्या काष्ठासहित सर्वांते जाळितो ।
तैसें देहप्राणादिका बोध तो । उरो नेंदी सहसा ॥१०॥
अग्नी लाकडातच प्रकट होतो. तो त्या लाकडासह सर्व काही जाळून टाकतो. त्याप्रमाणे ते अपरोक्ष ज्ञान देह, प्राण इत्यादींना एकाच वेळी (सहसा) जाळून त्यांपैकी काहीही शिल्लक ठेवत नाही. (१०)

जग जीव ईश्वर । उरोंचि नेदी भेद मात्र ।
येकसरा सकळां संहार । करीत उठे ॥११॥
जग, जीव, ईश्वर याप्रकारचा यत्किंचितही भेद तो ज्ञानरूपी अग्नी शिल्लक ठेवत नाही. तो सगळ्यांचा एकदम संहार करत सुटतो. (११)

इंधन असे तों जाळिलें । महातेजीं अवसान जालें ।
अज्ञान सकार्य नाशिलें । स्थिर जालें निजरूपा ॥१२॥
इंधन असेल तोपर्यंत तो अग्नी जाळून टाकतो, त्या इंधनाचा महातेजात नाश होतो. त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाचा त्याच्या कार्यासहित नाश करते आणि शेवटी मूळ स्वरूपात ते स्थिर म्हणजे शांत होते. (१२)

म्हणतां ज्ञानें सर्व जळालें । परी एकहि नाहीं गेलें ।
याविशीं ऐकिलें । पाहिजे उत्तर ॥१३॥
ज्ञानाने सर्व काही जळून जाते म्हणता, पण प्रत्यक्षात काहीही नष्ट होत नाही हे कसे ? याचे उत्तर आता ऐका. (१३)

ज्ञानें सर्व मिथ्या कळलें । भेदाचें खंडण जालें ।
तरि मग दृश्य जरी दिसले । तेणें विशेष काय ॥१४॥
ज्ञानामुळे सर्व पदार्थ मिथ्या आहेत असे कळते, तेव्हा सर्व भेदाचे खंडन होते. मग त्यानंतर दृश्य विश्व दिसले तरी त्यात विशेष असे काय आहे ? (१४)

मृगजळ डोळां दिसतें । म्हणउेनी सत्य म्हणावें त्यातें ।
दिसण्यासाठीं अज्ञान कार्यातें । सत्य मानावें ॥१५॥
डोळ्यांना मृगजळ दिसते एवढ्याच कारणासाठी त्याला सत्य मानायचे असल्यास माना. त्याच त-हेने अज्ञानकार्य दिसते म्हणून त्याला सत्य मानायचे असल्यास मानावे. (१५)

सर्व हे मिथ्या जाणावें । स्वरूपीं स्वरूपचि व्हावें ।
मुख्य ज्ञानाचें जाणावें । लक्षण ऐसें ॥१६॥
पण, हे सर्व दृश्य विश्व मिथ्या आहे हे समजून घ्यावे आणि मूलस्वरूपात मिसळून स्वत:च स्वरूप होऊन जावे. हेच ज्ञानाचे मुख्य लक्षण समजावे. (१६)

श्रोतीं पुन्हा आक्षेपिलें । न दिसावे निशेष नाथिलें ।
द्वैत निरसना श्रुति बोले । अद्वैत तेंचि ज्ञान ॥१७॥
यावर श्रोत्याने पुन्हा शंका घेतलेली आहे. संपूर्णपणे मिथ्या असेल ते दिसू नये हे ठीक आहे. श्रुतीचा आग्रह फक्त द्वैत नष्ट व्हावे एवढ्यापुरताच आहे. द्वैताचा अभाव म्हणजे अद्वैत, तेच ज्ञान होय. (१७)

जेथें आत्माचि असतो । तेथें कोण कोणा पाहतो ।
कोण कोणा जाणतो । दुसरें नाहीं ॥१८॥
जेथे केवळ आत्माच असतो, तेथे कोण कुणाला पाहत असतो ? कोण कोणाला जाणतो ? अर्थात कोणीच नाही. कारण येथे दुसरा पदार्थ नसतोच. (१८)

घे‍उनी श्रुतीचा आधार । द्वैत नसे तें ज्ञान साचार ।
बळावला आक्षेपु थोर । याचे उत्तर कैसें ॥१९॥
तेव्हा या श्रुतिवचनाचा आधार पाहाता जेथे द्वैत नसते तेच खरे ज्ञान होय. तेव्हा 'दृश्य दिसले तरी काय बिघडले ? ' असे कसे म्हणता येईल ? असा आक्षेप बळावतो. त्याचे उत्तर काय ? (१९)

हें श्रुति जे बोलें वचन । सुषुप्ति प्रलयपर असे जाण ।
किंवा जीवन्मुक्तीचें लक्षण । हे विचारीं पां ॥२०॥
आता श्रुतीचे मुक्तीविषयीचे जे वचन आहे ते सुषुप्ती, प्रलय यांच्या संदर्भात आहे की, ते जीवन्मुक्तीचे लक्षण आहे, याचा विचार करावा. (२०)

मुक्तीविषई श्रुति बोले । तरी आमुचें बोलणें यथार्थ जालें ।
सुषुप्ति प्रलयपर कल्पिले । तरि अवधारि पां ॥२१॥
श्रुतीचे वचन मुक्तीविषयी असेल तर आमचेच बोलणे खरे ठरेल. पण ते सुषुप्ती, प्रलय यांना उद्देशून असेल तर नीट लक्ष दे. (२१)

सुषुप्तिकालीं प्रलयकालीं । ज्ञानेवीण लया गेली ।
तरी सर्व मुक्त जाली । हे अतिव्याप्ति ॥२२॥
झोपेच्या वेळी अथवा प्रलय काळी ज्ञान न होताच सर्व दृश्य सृष्टी लयाला गेली तर सर्वच जीव मुक्त झाले, असे म्हणणे म्हणजे अतिव्याप्तीचा दोष येईल. (२२)

ज्ञानेंवीण मुक्त होती । तरी सद्गु्रु कासया करिती ।
शास्त्रादि साधनसंपत्ति । व्यर्थचि जाली ॥२३॥
ज्ञानावाचून कोणी मुक्त होत असतील तर मग सद्गुरू कशासाठी करायचा ? अशा परिस्थितीत शास्त्रे इत्यादी साधनसंपत्ती व्यर्थच ठरेल. (२३)

ज्ञानेंचि मोक्ष जोडे । हे काय श्रुतीचे बोल कुडे ।
मद्दपीयापरि घडे । उन्मत्त प्रलाप ॥२४॥
ज्ञानानेच मोक्ष मिळतो, हे श्रुतीचे वचन खोटे समजावयाचे काय ? तसे बोलणे म्हणजे दारुड्या माणसाच्या उन्मत्त प्रलापांचे त्याला स्वरूप येईल. (२४)

वादी म्हणे ऐसें नव्हे । ज्ञान हो‍ऊनसर्व जावें ।
तरी श्रुति अविरोध बरवे । अतिव्याप्तीहि नसे ॥२५॥
यावर वादी म्हणेल की, माझ्या बोलण्याचा अभिप्राय असा नाही. ज्ञान झाल्यानंतर सर्व नष्ट होत असेल, श्रुतीचाही त्याला विरोध नसेल, किंवा तेथे अतिव्याप्तीचाही दोष घडत नसेल, (२५)

सुषुप्ति अथवा प्रलयकाली । अज्ञानाची नव्हे होळी ।
ज्ञान होतांचि समूळीं । नासावें हें उत्तम ॥२६॥
सुषुप्तिकाळी अथवा प्रलयकाळी अज्ञानाची होळी होत नसेल (म्हणजे अज्ञानाचा नाश होत नसेल) आणि ज्ञान होताक्षणीच ते अज्ञान मुळासकट नष्ट होत असेल, तर उत्तमच होईल. (२६)

तरि याचें उत्तर कैसें । बोलिजे तें अपैसें ।
सर्वनाश ज्ञानें होतसे । तरि जीवन्मुक्ति बुडाली ॥२७॥
पण यापक्षी एक अडचण येते ती येथे मांडतो. तिचे उत्तर कसे कराल ? ज्ञानाने सर्व सर्वनाश होतो असे म्हटल्यास जीवन्मुक्तीची शक्यताच नाहीशी होते. (जीवन्मुक्तीची आशाच बुडाली असे म्हणावे लागेल.) (२७)

मागें उदंड ज्ञातें जालें । परि ते नाहीं लया गेले ।
लया जाती तरी उपदेशिलें । कोणे कोणा ॥२८॥
पूर्वी जे अनेक मोठमोठे ज्ञाते झाले ते लय पावले नाहीत. ते लय पावले असते तर कोणी कोणाला उपदेश केला असता ? (त्यांनी उपदेश तरी कसा केला असता ? आणि हा उपदेश तरी त्यांनी कोणाला केला असता ? म्हणजे यापक्षी संपूर्ण ज्ञानपरंपराच खंडित झाली असती.) (२८)

लय न हो उपाधीचा । परि लेश नाहीं सविकल्पाचा ।
निर्विकल्प समाधीचा । तोचि ज्ञाता ॥२९॥
यावर उत्तर असे की, ज्ञानदशेत उपाधीचा म्हणजे शरीराचा लय होत नाही. पण त्या अवस्थेत सविकल्पाचा अंशही उरत नाही. पूर्णपणे निर्विकल्प समाधीचा ज्ञाता त्यालाच म्हणावे. (२९)

येणें बोलेंहि उपदेश न घडे । म्हणून गुरुत्वाचें सांकडें ।
काष्ठप्राय होतां मढें । तरी जीवन्मुक्ति कैची ॥३०॥
याही शब्दांनी (म्हणजे उत्तराने) उपदेशप्रक्रिया शक्य होत नाही आणि गुरुत्व कल्पनाही धोक्यात येते. ज्ञानदशेत शरीर जर लाकडासारखे प्रेतवत जाले तर तिला जीवन्मुक्ती कसे म्हणावे ? (३०)

निर्विकल्प समाधिकाळीं व्हावें । उपदेशकाळीं सविकल्प असावें ।
याज्ञवल्क्यादि आघवे । आचार्य या रीती ॥३१॥
समाधिकाळी निर्विकल्प व्हावे आणि उपदेशकाळी सविकल्प असावे. याज्ञवल्क्य इत्यादी सर्व ज्ञानी पुरुष याच प्रकारे आचार्य ठरतात. या प्रकारे या प्रश्नांची सोडवणूक होईल असे म्हणावे तर, (३१)

तरी समाधिकाळी असे ज्ञान । उपदेशकाळी काय अज्ञान ।
हें बोलणें अप्रमाण । तुजचि साजे ॥३२॥
समाधिकाळी त्याच्या ठिकाणी ज्ञान असते आणि उपदेशकाळी त्याच्या ठिकाणी काय अज्ञान असते ? याप्रकारे प्रमाणशून्य बोलणे तुम्हांलाच शोभून दिसते. (३२)

आणिक बोले उत्तर । द्वैतहानी मिथ्यत्वें व्यापार ।
उभय मिळोन ज्ञान साचार । बोलिजेत असे ॥३३॥
आता ज्ञान म्हणजे काय ? द्वैताचा नाश आणि सर्व व्यापार होत असता ते मिथ्या आहेत असे कळणे या दोहोंना मिळून ज्ञान असे म्हणतात. (३३)

उभयांसी ज्ञान कल्पिलें । तरि घटादिक अर्धविभागी जाले ।
निर्विकल्पत्वें द्वैत देखिलें । नाहींच तेणें ॥३४॥
या दोन्ही गोष्टींना मिळून ज्ञान असे म्हणायचे असेल तर घट इत्यादी (निर्जीव पदार्थ) जड वस्तू ज्ञानाच्या अर्ध्या हिश्शाच्या वाटेकरी झाल्या म्हणायच्या ! कारण त्या निर्विकल्प असल्यामुळे त्यांनी द्वैत पाहिलेलेच नसते. (३४)

तुज मिथ्या ज्ञान नाहीं कळलें । द्वैतही नि:शेष नाहीं गेलें ।
समाधिकाळीं ऐकिले । शब्द घुंगुरटाचे ॥३५॥
यावर उत्तर असे की, तुला स्वत:ला मिथ्या म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, यांपैकी काहीच कळले नाही. तुझ्या मनातील द्वैताचाही पूर्णपणे निरास झालेला नाही, त्यामुळे तुला समाधिकाळी चिलटांचे आवाज ऐकू येत असतात. (३५)

तुजपरीस घटहि बरा । अर्धविभागी असे पुरा ।
त्याहून तूं निपटारा । अर्धभागहि नसे ॥३६॥
मग तुझ्यापेक्षा घट बराच म्हणायचा ! कारण तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानाच्या अर्ध्या भागाचा तरी वाटेकरी आहे. तू त्याच्याहीपेक्षा निकृष्ट आहेस. कारण तुला तेवढा अर्धभागही प्राप्त नाही. (३६)

मागुती विचारून बोले । म्हणे मिथ्या कळणें हेंचि भलें ।
तरि सुखरूप असिलें । पाहिजे तुवां ॥३७॥
(त्यानंतर तो म्हणजे वक्ता) विचार करून म्हणतो, सर्व व्यापाराचे मिथ्यात्व कळणे हेच खरे ज्ञान होय. आता तरी तुझे समाधान झाले पाहिजे. (तू सुखरूप व्हावेस.) (३७)

येथें जालें समाधान । सर्व मिथ्या हेंचि ज्ञान ।
दग्धवस्त्राचें दिसणें । तैसें जग ॥३८॥
अशा त-हेने आक्षेपकाचे समाधान झाले. सर्व मिथ्या कळणे हेच खरे ज्ञान होय. सर्व जग दग्ध वस्त्राच्या घडीप्रमाणे दिसू लागते. (३८)

जीव जग अविद्या माया । आणि ईश्वरासह मूळमाया ।
सर्व जातां ज्ञाना यया । सत्यत्व नसे ॥३९॥
याप्रमाणे जीव, जग, अविद्या, माया, मूळमाया, ईश्वर इत्यादी सर्व मिथ्या म्हणून नष्ट झाल्यानंतर या ज्ञानालाही सत्यत्व येणार नाही (असे आक्षेपक विचारतो.) (३९)

असत्य हे पूर्वीच बोलिलें । अज्ञान सरतां स्वयें विरालें ।
सत्यत्वेंचि प्रतिपादिलें । नाहीं ज्ञाना ॥४०॥
यावर श्रोता उत्तर देतो. ज्ञानसुद्धा असत्यच आहे हे आम्ही अगोदरच सांगितले आहे. अज्ञानाचे अस्तित्व संपताच ज्ञान स्वत: विरून जाते. त्यामुळे ज्ञान सत्य आहे, असे आम्ही कधीच प्रतिपादन केले नव्हते. (४०)

मिथ्या ज्ञाने प्रपंच सरे । हें कैसें मानावें खरें ।
येविशीं समाधान बा रे । अवधारी पा ॥४१॥
(यावर आक्षेपाची शंका अशी की,) मिथ्या असलेल्या ज्ञानाने प्रपंच नष्ट होईल, हे आम्ही खरे कसे मानावे ? (यावर श्रोता म्हणतो की) या शंकेचे आता मी समाधान करतो. नीट लक्ष देऊन ऐक. (४१)

जग जरि सत्य असत । तरि ज्ञानाच्या बापें न जातें ।
मुळींच मिथ्या तयातें । मिथ्या ज्ञानचि नाशी ॥४२॥
जग जर सत्य असते तर ज्ञानाच्या बापालाही ते नष्ट करता येणार नाही. जे मुळातच मिथ्या आहे त्याचा नाश मिथ्या ज्ञानच करू शकते. (असत्य ज्ञानानेच असत्य जगाचा नाश होतो.) (४२)

अज्ञानें जें जें जालें । तें तें ज्ञानेंचि लया गेले ।
रज्जू न कळतां भासलें । सर्पादिक ॥४३॥
अज्ञानाने जे जे झाले, ते ते ज्ञानानेच लयाला जाते. जोपर्यंत दोराची ओळख पटत नाही तोपर्यंतच सर्प इत्यादी भासतात. (४३)

तावत्काल सत्यत्व यासी । जंव ओळखिले नाहीं रज्जूसी ।
तों काल सत्यत्व जगासी | ब्रह्म जाणिलें नाहीं तों ॥४४॥
सादी वस्तूंना, रज्जू (दोर) ओळखला नाही तोपर्यंतच सत्यत्व असते. त्याप्रमाणे ब्रह्म जोपर्यंत जाणले नाही तोपर्यंतच जगाला सत्यत्व असते. (४४)

रज्जू जेव्हां ओळखिला । तत्क्षणीच सर्प मेला ।
ब्रह्मज्ञानें जगाला । ठावचि नाहीं ॥४५॥
ज्यावेळी रज्जूची ओळख पटली त्याक्षणीच सर्प मरण पावतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानानंतर जगाला अस्तित्वच उरत नाही. (४५)

ब्रह्म जाणणें हें ज्ञान । येथें आक्षेपु असे गहन ।
सविकल्पासि होय ज्ञान । कीं निर्विकल्पासी ॥४६॥
ब्रह्म जाणणे म्हणजे ज्ञान असे असेल तर येथे एक मोठा आक्षेप घेता योते. ब्रह्माचे ज्ञान सविकल्पाला होते की निर्विकल्पाला ? (४६)

सविकल्प ज्ञान तें द्वैत । निर्विकल्प तें अद्वैत ।
अद्वैती पाहतां मात । ज्ञानाची नाहीं ॥४७॥
सविकल्प ज्ञान हे द्वैतस्वरूप असते. निर्विकल्प म्हणजे अद्वैत होय. अद्वैतानुभवात ज्ञानाला वावच नाही. (ज्ञानाची गोष्टच काढता येत नाही.) (४७)

द्वैत सविकल्परूप ज्ञान । तें म्हणूं नये यथार्थ ज्ञान ।
आतां जाणणें हा शीण । ज्ञानचि सिद्ध नव्हे ॥४८॥
सविकल्परूप ज्ञान हे द्वैतयक्त असते. त्याला यथार्थ ज्ञान म्हणता येणार नाही. म्हणजे उभयपक्षी ज्ञानच सिद्ध होत नसल्याने जाणण्याचा हा खटाटोप शीणच ठरतो. (४८)

आतां यासी कैसें करावे । बोलिलें पाहिजे आघवें ।
ब्रह्म सच्चिदानंद जाणावें । अद्वैत जें कां ॥४९॥
यावर उत्तर देताना वक्ता म्हणतो की, आता या शंकेवर काय उत्तर द्यावे ? उत्तर तर दिले पाहिजे. ब्रह्म सच्चिदानंद असून अद्वैतस्वरूप आहे. (४९)

चित्‌ म्हणिजे स्वयंप्रकाश । मायादि जड परप्रकाश ।
या जडाशी चळण होतसे । स्वरूपाधारें ॥५०॥
चित् म्हणजे स्वयंप्रकाश. ब्रह्म स्वयंप्रकाशी असून मायादी जड तत्त्वे परप्रकाशी आहेत. या जड तत्त्वांमध्ये स्वरूपाच्या (म्हणजे ब्रह्माच्या आधारानेच चलनवलन होते. (५०)

आपुलेनि द्रष्टेपणे । या सर्वांसी ब्रह्म जाणे ।
द्रष्ट्यासी नव्हे देखणें । दृश्याचेनि ॥५१॥
ब्रह्म स्वत: द्रष्टा असल्याने या द्रष्टेपणाच्या सामर्थ्याने ते या सर्वमायादी दृश्यपदार्थांना जाणते. पण दृश्याला मात्र द्रष्ट्याचे ज्ञान शक्य होत नाही. (५१)

दृश्याकरितां द्रष्टा नांव । द्रष्टा नसतां दृश्य वाव ।
जाणतेपण तें अपूर्व । ते एकचि असे ॥५२॥
या दृश्यसृष्टीमुळेच त्या स्वरूपाला द्रष्टा हे नाव प्राप्त झाले. पण द्रष्टा नसेल तर दृश्य सृष्टी व्यर्थ ठरते. द्रष्टेपण अथवा जाणतेपण हे असे अपूर्व एकमेवा एकटेच) असते. (५२)

जाणणें जाणतयाच्या ठायीं । परोक्षत्व हें काई ।
कारण जेथें नाहीं । दुसरेंपण ॥५३॥
आता जाणत्याच्या ठिकाणी असणारे हे जाणतेपण परोक्ष कसे असेल ? कारण त्याच्या ठिकाणी दुसरेपणाला जागाच नाही. दुसरेपणाच्या अभावी ज्ञात्याचे ज्ञान नेहमी अपरोक्षच असते. (५३)

चक्षु चक्षुसी दिसेना । ब्रह्म ब्रह्मासी जाणेना ।
न दिसे न जाणें तरी आपणा । चक्षु ब्रम्ह चुकलें ॥५४॥
डोळा डोळ्याला पाहू शकत नाही त्याप्रमाणे ब्रह्म ब्रह्माला जाणू शकत नाही. पण दिसत नाही म्हणून डोळा आणि ब्रह्म स्वत:ला जाणू शकत नाहीत म्हणून ते आपलेपणाच्या जाणिवेला मुकले. (मी पाहतो, मी जाणतो अशी जाणीव त्यांच्यामध्ये नसते. ४५४)

सर्व जेणें जाणितलें । तेंचि ब्रह्म निश्चया आलें ।
सर्व जेणें देखिलें । तोचि डोळा ॥५५॥
ज्याला ह्या सर्व सृष्टीचे ज्ञान होते तेच ब्रह्म असे निश्चयाला येते. त्याच न्यायाने सर्व दृश्य ज्याने पाहिले तोच डोळा असे निश्चित करता येते. (५५)

ऐसें न जाणोनि जाणणें । ऐसीं असतां श्रुतीचीं वचनें ।
अनुभाव्यरूप अनुभवणें । अनुभवेवीण ॥५६॥
अशा प्रकारे न जाणता जाणते, अनुभवावाचून अनुभाव्याचा अनुभव घेते, ते ब्रह्म अशी श्रुतीची (वेदाची) वचने आहेत. (५६)

न जाणतां तेंचि आपण । अखंडैकरस परिपूर्ण ।
सहजीं सहजत्वें ज्ञान । यासी बोलिजे ॥५७॥
काही जाणत नाही तेच स्वरूप होय. ते अखंड, एकरस आणि परिपूर्ण असते. यालाच सहजावस्थेतील सहजज्ञान म्हणतात. (५७)

ब्रह्मस्वरूप ब्रह्म स्फुरणें । आपणातें आपण जाणें ।
सुषुप्तिकाळीं आत्मयातें । जाणीतलें पाहा ॥५८॥
ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्माचे स्फुरण होणे, आपण आपणाला जाणणे, झोपेत आत्मस्वरूपाला ओळखणे हे शक्य असते. (५८)

तेथें म्हणसी जाणितलें नाहीं । जागृत होतां सांगसी तेंहि ।
अनुभविल्यावीण कांही । आठऊ न घडे ॥५९॥
झोपेत आत्म्याचे ज्ञान होत नाही असे म्हणत असशील तर जागे झाल्यानंतर हे कसे सांगू शकतोस ? अनुभव घेतल्याखेरीज काही स्मरणच होणार नाही. (५९)

तैसा समाधि निर्विकल्प । अनुभवी स्वरूपें स्वरूप ।
अनुभव नसतां सविकल्प- । दशेकाळीं सुख नसे ॥६०॥
त्याप्रमाणे निर्विकल्प समाधी असते. तिच्यामध्ये स्वरूप होऊन स्वरूपाचा अनुभव घेता येतो. हा अनुभव नसेल तर सविकल्पकाळी सुखप्राप्ती (सुखाचाअनुभव) येणार नाही. (६०)

निर्विकल्पीं अनुभविलें । तें सुख सविकल्पीं लोटलें ।
म्हणउंनी वृत्तीसी जालें । परम समाधान ॥६१॥
जे आपण निर्विकल्प समाधीमध्ये अनुभवतो त्या आनंदाचा प्रत्यय आपल्याला सविकल्प दशेमध्ये येतो. त्यामळे आपल्या वृत्तीला परम समाधान प्राप्त होते. (६१)

आतां सविकल्प कीं निर्विकल्प । आपुला आपण सुखरूप ।
बोलणें खुंटलें आपेआप । द्वैताद्वैत कैंचें ॥६२॥
आता हा अनुभव सविकल्प की निर्विकल्प हा विचार न करता आपले ठायी आपण सुखरूप असतो. त्या अवस्थेत बोलणे आपोआपच थांबते. तेथे द्वैत की अद्वैत या विचाराला थारा कोठून मिळणार ? (मागच्या ४८व्या ओवीतील शंकेचे हे निरसन झाले) (६२)

धन्य गुरु धन्य शास्त्र । धन्य ज्ञानाचा विचार ।
येणें ज्ञानें अपार । साधक सिद्ध जाले । ॥६३॥
खरोखरच हे निरसन करणारे सद्गुरूही धन्य होत, ते शास्त्रही धन्य होय. त्यातील ज्ञानाचा विचारही धन्य होय. याच ज्ञानाने साधक सिद्धावस्थेला पोहोचतात. (६३)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
पूर्णज्ञाननिरूपणप्रकारे । तृतीयसमास: ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
वेदविनियोग


पावावया समाधान । पाहिजे ते मुख्य ज्ञान ।
तरी वेदाचें निरूपण । त्रिकांड कां ॥१॥
जर समाधान प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी मुख्यत्वे ज्ञान झाले पाहिजे. मग वेदाचे निरूपण ज्ञान, उपासना आणि कर्म अशा तीन कांडांत करायची काय आवश्यकता होती ? (१)

एक ज्ञानचे प्रतिष्ठावें । दुजें कांही न बोलावें ।
स्त्रीपुत्रादि विषय भोगावे । हेहि आज्ञा वेदाची ॥२॥
वेदांनी एक ज्ञानाचीच प्रतिष्ठापना करायला हवी होती. त्यांनी इतर दुसरे काही बोलायला नको होते. पण इथे तर स्त्रीपुत्रादी विषय भोगावेत अशी वेदच आज्ञा करत आहेत. (२)

वेद त्रिगुणात्मक नाना । तूं गुणातीत होई अर्जुना ।
भगवद्‌गीतेचिया वचना । म्हणून विरोध ॥३॥
वेद त्रिगुणात्मक असून अर्जुना, गुणातीत हो, असे भगवद्गीतेचे वचन म्हणून हा विरोध जाणवतो. (३)

वेद जरी बोलता । एक ज्ञानचि प्रतिष्ठिता ।
तरी जीव कासया भ्रमता । नाना सुखदु:खीं ॥४॥
वेदाने असे काही न सांगता एका ज्ञानाचीच प्रतिष्ठा वाढवली असती, तर जीव निरनिराळ्या सुखदुःखांमध्ये का फिरत राहिला असता ? (४)

म्हणून वेदेंच बंधन केलें । ऐसे शंकेतें बळाविलें ।
वेदवाक्यासी कल्पिलें । थोर दूषण ॥५॥
म्हणून वेदानेच जीवासाठी बंधन निर्माण केले आहे, अशी शंका बळावते आणि वेदवाक्यालादूषण देण्याची कल्पना मनात येते. (५)

वेदाचें तात्पर्य सकळ । ज्ञानपरचि असे केवळ ।
मंदमती जे बाष्कळ । वेद बरळ भाविती ॥६॥
यावर उत्तर असे की, संपूर्ण वेदाचे तात्पर्य ज्ञानपरच आहे. पण जे मंदमती बाष्कळ (बडबड करणारे) लोक असतात त्यांना मात्र वेद असंबद्ध बोलतो असे वाटते. (६)

बापाचा पुत्र आवडता । सर्वमान्य असावा जाणता ।
पूर्ण विद्या शिकतां । पिता संतोषे ॥७॥
बापाचा आवडता पुत्र असतो. तो ज्ञानी आणि सर्वमान्य व्हावा, असे त्याला वाटत असते, तो जर संपूर्ण विद्या शिकला तर त्यामुळे बापाला संतोष होतो. (७)

म्हणउ न अभ्यास करविती । परि त्या न कळे बाळमती ।
खेळावरी अवघी प्रीति । शिकणें गोड न वाटे ॥८॥
म्हणून तो त्याच्याकडून अभ्यास करवून घेतो. पण तो बालमती असल्याने त्याला काही कळत नाही. त्याचे खेळावरच अतोनात प्रेम असते. त्याला शिक्षण गोड वाटत नाही. (८)

गांवाबाहेरी धांवे । सवें सौंगडे मेळवावे ।
खाणेंपिणेंहि नाठवें । उष्णशीत स्मरेना ॥९॥
तो गावाबाहेर धावतो, आपल्या बरोबरचे सवंगडी गोळा करतो, त्याला खाण्यापिण्याचेही भान राहात नाही. ऊन, थंडी यांचेही स्मरण रहात नाही. (९)

पिता तळमळी अंतरीं । दु:खें कष्टतो हा भारी ।
हातपाय मोडे जरी । यासी काय कीजे ॥१०॥
बापाला अंत:करणात तळमळ वाटते. हा पोरगा विनाकारण धडपडतो, कदाचित हातपाय मोडून घेईल, याला काय करावे, याचा तो विचार करतो. (१०)

शिकविल्या तरी नायके । मग उपाय कल्पिला जनकें ।
चक्रे चेंडू कवतिकें । आणिक नाना खेळ ॥११॥
शिकवले तरी ऐकत नाही, अशी चिंता त्याला लागते. मग बापानेच एक उपाय शोधून काढला. त्याने चक्रे, चेंडू आणखी इतर अनेक खेळ मोठ्या कौतुकाने आणवून घेतले. (११)

मग आपुलिये आंगणी । बाळें मेळविलीं चिमणीं ।
येथें खेळावें म्हणुनि । बापें आज्ञा दिधली ॥१२॥
मग आपल्याच घराच्या अंगणात लहान लहान मुलांना जमवले आणि त्यांना 'तुम्ही येथेच खेळा' अशी त्याने त्यांना आज्ञा केली. (१२)

तैसें वेदाचें ठायीं जाण । जीव व्हावें ज्ञानसंपन्न ।
परि हे भुलले अविद्येनें । विषयचि आवडे ॥१३॥
तसेच वेदाच्या बाबतीत असे समज. जीव ज्ञानसंपन्न व्हावेत अशी वेदाची इच्छा आहे. पण जीव तर अविद्येमुळे भुललेले आहेत. त्यांना विषयातच रुची आहे. (१३)

आडळेल तेंचि खावें । देखिल्या स्त्रियेसी भोगावें ।
मनीं वाटें तेथें करावें । पशूपरी शयन ॥१४॥
जे सापडेल ते खावे, एखादी स्त्री पाहिली की तिचा भोग घ्यावा आणि मनात येईल तेथे एखाद्या पशूप्रमाणे शयन करावे, (१४)

ऐसें अनावर जालें । तेणेंगुणें दु:ख वाढलें ।
परि तयासी न कळलें । सुखचि मानी ॥१५॥
अशा प्रकारे ते अनावर (आवरण्यात कठीण) झाले, त्यामुळे त्यांचे दुःख वाढले. पण त्यांना ते कळत नव्हते, उलट त्या दु:खालाही ते सुखच मानत राहिले, (१५)

वेद म्हणे कैसें करावें । याचे भोग कैसे सुटावे ।
आणि यासी प्राप्त व्हावें । कैसें ज्ञान ॥१६॥
तेव्हा वेदाने म्हटले की, आता काय करावे ? या मुलांचे हे भोग कसे सुटतील ? आणि यांना ज्ञान कसे प्राप्त होईल ? (अशी काळजी त्याला वाटली.) (१६)

मग ब्राह्मणादि केले वर्ण । स्वजातीसी लावी लग्न ।
धाकुटी वय समान । पाणिग्रहण करवी ॥१७॥
तेव्हा (विचार करून) त्याने ब्राह्मणादी वर्ण निर्माण केले. त्यांना स्वजातीतच विवाह करावेत, लहानपणीच वयात फारसे अंतर नसेल अशांचाच विवाह करावा, (१७)

अग्नि द्विज वेदाधार । आश्रम केले चत्वार ।
त्यांत गृहस्थाश्रमचि थोर । प्रतिपादिलें ॥१८॥
अग्नी, ब्राह्मण आणि वेदांचा आधार घेऊन चार आश्रमांची व्यवस्था केली, त्यात गृहस्थाश्रमच श्रेष्ठ असे सांगितले. (१८)

कारण कीं यथेष्ट नाचरावे । भोगा परि बंधन असावें ।
पित्यापरि स्वभावें । हळु हळू भोगा निवर्तवि ॥१९॥
हेतू हा की, त्या जीवांनी स्वैरपणे स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागू नये, विषयांचा उपभोग घ्यावा पण त्यावर बंधन असावे. अशा त-हेने एखाद्या पित्याप्रमाणे वेद जीवांना त्यांची मर्जी सांभाळत त्यांना भोगापासून परावृत्त करतो. (१९)

भोगों नये ऐसें म्हणावें । बाळापरि न मानि स्वभावें ।
येथें आक्षेपिलें बरवें । की दंड करावा होता ॥२०॥
विषयांचा भोग घेऊ नका असे म्हणावे तर ती जीवरूपी मुले आपल्या स्वभावधर्मानुसार ऐकणार नाहीत, म्हणून वेदाने हा मार्ग शोधून काढला. यावर कोणी आक्षेप घेईल की, वेदाने जीवांच्या कलाने घेत न बसता, त्यांना चांगला दंड करायला हवा होता. (२०)

प्रपंची सुखदु:खें शिणती । हाचि दंड परि नये प्रतीति ।
विषयार्थ कोणी न विटती । वाढे प्रीति अधिक ॥२१॥
यावर उत्तर असे की, प्रपंचातील सुखदुःखांनी जीवांना खूप कष्ट होतात. हाच त्यांना मोठा दंड होय. पण त्यांना त्याचा प्रत्यय (जाणीव) येत नाही. त्या विषयभोगांचा (सुखदु:खदायक असूनही) त्यांना वीट तर येत नाहीच, उलट त्यांचे विषयांबद्दलचे आकर्षण अधिकच वाढते. (२१)

विश्वास नव्हे वेदवचनीं । ऐसा कोण जन्मला प्राणी ।
ऐसी आशंका असे मनीं । तरि अवधारि पां ॥२२॥
यावर आक्षेपकाचे म्हणणे असे की, वेदवचनांवर विश्वास नाही, असा कोणी प्राणी जन्माला आला आहे काय ? अशी आशंका मनात असेल तर नीट लक्ष दे. (२२)

प्रजार्थ ऋतुकाळीं गमन । पुत्र जालिया मातेसमान ।
ऐसें वेदाचें वचन । सत्य कां न वाटे ॥२३॥
स्त्रीला ऋतू असतानाच केवळ प्रजोत्पत्तीसाठी तिच्याशी संभोग करावा, तिला पुत्र होताच तिला मातेसमान मानावे, असे वेदाचे वचन असताना जीवांना का बरे सत्य वाटत नाही ? (२३)

इच्छा असतां विवाह करा । इच्छा नसतां माघारे फिरा ।
याहि वचनासी अव्हेरा । काय म्हणोनि ॥२४॥
तुमची इच्छा असेल तर विवाह करा, अन्यथा इच्छा नसेल तर माघारी फिरा, याही वेदवचनाचा काय म्हणून अव्हेर केला जातो ? (२४)

आवडीसारिखें घेती वचन । म्हणती शास्त्राची नाही अडचण ।
सुखे विषय भोगिती आपण । वेदें काय करावें ॥२५॥
जे वेदवचन आवडीसारखे असते तेवढेच स्वीकारतात आणि याबाबतीत शास्त्राची अडचण नाही असे शेखीने सांगतात आणि आपल्या इच्छेप्रमाणे विषय भोगत सुटतात, याला वेदाने काय करावे ? (२५)

आतां ऐका कर्माचे फळ । नित्यनैमित्तिक करून सकळ ।
होय अंत:करण निर्मळ । विविदिषा होय ॥२६॥
आता हेही लक्षात घ्या की, नित्य नैमित्तिक इत्यादी सर्व विहित कर्माचे फळ म्हणजे अंत:करणाची शुद्धी होणे हे होय, चित्तशुद्धी झाल्यानंतर जीवाच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा (विविदिषा) निर्माण होते. (२६)

हें मुख्य फळ वेदाचें । न करिती कोणी साचें ।
मग त्या त्या कर्मीं फळाचे । रुचिकर बोलिलें ॥२७॥
वेदाच्या मते कर्माचे हे मुख्य फळ होय. पण ते कोणीही विधियुक्त पद्धतीने करत नाही. म्हणून वेदाने त्या त्या फळाची आवड निर्माण होईल अशा प्रकारे त्या त्या कर्माची भलावण करावयास सुरुवात केली. (२७)

तेणें कामचि वाढला । नेणे कोणी मुख्य फळाला ।
अनेक धर्मादि विधि केला । परि कामना वाढे ॥२८॥
(पण झाले उलटेच.) त्यामुळे उलट कामच (कर्मासक्ती) वाढत गेला आणि मुख्य कर्मफळ कोणीचजाणून घेतले नाही. वेदाने अनेक धार्मिक कृत्यांचे विधान सांगितले, पण त्यायोगे कामनाच बळावत गेल्या. (२८)

पुत्रासि होतां रोग । नाना औषधाचे योग ।
माता करी लगबग । परि तो नेघे ॥२९॥
पुत्राला काही रोग होताच आई तातडीने काही औषधांचे इलाज करते, पण तो ती औषधे घेतच नाही. (२९)

मग गूळखोबरें साखर । दे‍ईन तूं हें घेसी जर ।
मग त्या लालुची लाऊनी नेत्र । घटघटा घेतलें ॥३०॥
मग त्यावर ती, तू हे औषधे घेतलीस तर तुला गूळ, खोबरे, साखर देईन, अशी प्रलोभने त्याला दाखवते. तेव्हा तो ती औषधे डोळे मिटून घटघटा घेऊन टाकतो. (३०)

म्हणें म्यां औषध घेतलें । म्हणून मज लाडू मिळाले ।
तैसें म्हणे पूर्वी कर्म केलें । प्राप्त जालें पुत्रादिक ॥३१॥
मग तो सांगत सुटतो की, मी औषध घेतले म्हणून मला लाडू मिळाले. त्याप्रमाणे जीवही सांगत सुटतो की, मी पूर्वी चांगली कर्मे केली त्यामुळे मला पुत्रप्राप्ती इत्यादी सुखे मिळाली. (३१)

तिक्ताम्ल अवपथ्य जाली । तेणें रोगनिवृत्ति बुडाली ।
पुत्रादि फळाशेनें मुकली । हृत्‌शुद्धीते ॥३२॥
कडू, आंबट इत्यादी पदार्थांच्या सेवनाने कुपथ्य झाले आणि त्यामुळे रोगापासून मुक्तता होऊ शकली नाही. त्याप्रमाणे पुत्रादी फळांच्या आशेने चित्तशुद्धीचे फळ चुकले. (३२)

जैसा वेल लाविला । फुलें तोडितां मुके फळाला ।
तैसा हा प्रसंग जाला । सकामनेनें ॥३३॥
ज्याप्रमाणे आपण वेल लाविला त्यावर फुले आली. ती फुले तोडल्यामुळे आपण त्याच्या फळांना मुकतो. त्याप्रमाणे पोटी कामना धरल्यामुळे ही वेळ आली. (चित्तशुद्धिरूप फळ प्राप्त झाले नाही.) (३३)

म्हणुनी काम्य निषिद्ध सांडुनी । प्रवर्ततां कर्माचरणीं ।
सहज होतां ईश्वरार्पणीं । अंत:करणशुद्धि ॥३४॥
म्हणून काम्य आणि निषिद्ध कमें सोडून जर कर्माचरण केले, (निष्काम भावनेने विहित कमें केली तर) आणि ते सहजपणे ईश्वरार्पण केले तर अंत:करणशुद्धी होते. (३४)

हा वेदाचा अभिप्राय । परंपरा ज्ञान उपाय ।
येथें अन्यथा न होय । हा कर्माचा विनियोगू ॥३५॥
हा वेदाचा अभिप्राय असून त्याप्रमाणे आचरण केले तर तो परंपरेने ज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग आहे. (निष्काम कमें-ईश्वराला फळे अर्पण-चित्तशुद्धी-ज्ञानप्राप्ती अशी परंपरा) या मार्गात काहीही विपरीत होत नाही. हा कर्मांचा खरा विनियोग आहे. (३५)

फळ ऐका उपासनेचें । जें स्थिरत्व व्हावें चित्ताचें ।
डोंगर हरपती दु:खाचे । आणि आनंदप्राप्ति ॥३६॥
आता उपासनेचे फळ ऐका. चित्ताचे स्थिरत्व होते. दुःखाचे डोंगर नाहीसे होतात आणि आनंदप्राप्ती होते. (३६)

चित्तस्थैर्य आनंदप्राप्ति । येविशीं कोण उपपत्ती ।
तरी पाहाना का सुषुप्ति । चित्ताभावी सुखरूप ॥३७॥
चित्तस्थैर्य होते आणि आनंदप्राप्ती होते याला आधार काय ? (यामागे कोणता युक्तिवाद आहे ?) तर झोपेमध्ये चित्ताचा अभाव असल्याने जीव सुखरूप असतो, हाच तो युक्तिवाद होय. (३७)

आवडी उपासावें निर्गुण । परी तें नकळे अज्ञानपणें ।
म्हणवून जालासे सगुण । कृपा अत्यंत जीवाची ॥३८॥
खरे म्हणजे निर्गुण ईश्वराची आवडीने उपासना करावी, पण ते अज्ञानामुळे कळत नाही, म्हणून परमेश्वर सगुण रूप धारण करतो. कारण त्याला जीवांवर कृपा करण्याची अत्यंत आवड आहे. (३८)

जैसी आवडी जीवासी । तैसीं रूपें धरी अपैसीं ।
धरणें नाना अवतारासी । ते भक्तांस्तव ॥३९॥
त्यामुळे जीवाच्या आवडीनुसार तो स्वेच्छेने रूपे धारण करतो. तो जे जे अवतार धारण करतो ते सर्व भक्तांसाठीच होत. (३९)

सर्व सांडूनी भजा मजला । तेणें सुख पावेल तुम्हांला ।
तेथेंहि कामनेनें घाला । घातिला बळें ॥४०॥
त्याची अपेक्षा अशी असते की, भक्तहो, सर्व गोष्टींचा त्याग करून तुम्ही माझी भक्त करावी. त्यामुळे तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. पण नेमकी येथेच आपली फलाकांक्षा घाला घालते. (४०)

देहेंद्रिया व्हावें सुख । ऐसें मानोनियां मूर्ख ।
अणिमादि ऐश्वर्य देख । मज असावें ॥४१॥
मूर्ख लोक फक्त देह आणि इंद्रियांना सुख व्हावे म्हणून 'मला अणिमादी सिद्धींचे सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात बाळगतात. (४१)

अत्यंत धारणा जाली । तेणें अणिमादि पावली ।
सालोक्यादि लाधली । मुक्ती तीन्ही ॥४२॥
त्यांची ही धारणा जेव्हा अत्यंत उत्कट होते तेव्हा अणिमादी सिद्धी त्यांना प्राप्त होतात आणि सलोकता, समीपता, सरूपता या तिन्ही मुक्ती त्याला (क्रमाने) प्राप्त होतात. (४२)

परि ते निजसुखा चुकले । मुख्य फळ तें राहिलें ।
ऐश्वर्यासी भुलले । नैश्वर्य न कळे ॥४३॥
पण ते आत्मसुखाला मात्र मुकतात. त्यांना मिळावयाचे तेच मुख्य फळ होय. पण नेमके तेच राहून जाते. ते ऐश्वर्याला भुलतात पण त्याची नश्वरता त्यांच्या लक्षात येत नाही. (४३)

यासि नैश्वर्य कैसें म्हणतां । ऐसी आशंका असे चित्ता ।
तरी सांग पतन अवचिता । जयविजया कोठोनी जाले ॥४४॥
ही जी त्यांना फळे मिळतात, त्यांना नश्वर कसे म्हणता ? अशी आशंका जर मनात असेल तर सांग बरे, जय-विजय यांचे अचानक पतन कसे झाले ? (४४)

म्हणोनि यांसी नाश आहे । खरें विचारूनि पाहे ।
अविनाश तें एकचि आहे । जें कामनातीत ॥४५॥
म्हणजेच या ऐश्वर्याला नाश आहे. खरे काय ते नीट विचार करून पहा. जे कामनेच्या पलीकडचे आहे ते अविनाशी तत्त्व एकच आहे. (४५)

काम नाहीं जयातें । तेणें जिंकिलें असे मातें ।
ठाईं ठाईं भगवंतें । निरूपण केलें ॥४६॥
ज्याच्या मनात काही इच्छा नाही, त्याने मला जिंकून घेतले, असे भगवंतांनी निरनिराळ्या ठिकाणी प्रतिपादन केले आहे. (४६)

काम नाहीं जयाचे चित्तीं । ऐसे भक्त थोडे असती ।
आर्त जिज्ञासु अर्थार्थी । कामनागुणें ॥४७॥
ज्यांना अजिबात काही इच्छा नाही असे भक्त थोडेच असतात. बाकीचे भक्त कामनेमुळे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी या तीन प्रकारात मोडतात. (आत म्हणजे पीडित, जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असणारा आणि काही अर्थ लाभाची इच्छा धरणारा तो अर्थार्थी होय.) (४७)

ज्ञानी भक्त तो मज आवडे । अन्यथात्वें बोलणें न घडे ।
म्हणुनिया हें सांकडें । कामना त्यागावी ॥४८॥
ज्ञानी भक्त मला आवडतो. त्याखेरीज अन्यांबद्दल बोलायला नको असे परमेश्वराने म्हटलेले आहे. त्यानेच ही अट घातली आहे, की कमें करताना कामनेचा त्याग करावा. (४८)

हेंचि उपासनेचे फळ । होय वासनेचे निर्मूळ ।
उठती सुखाचे कल्लोळ । निवळतां ज्ञान ॥४९॥
उपासनेचे हेच फळ आहे की, वासनांचे समूळ निर्मूलन होते व शुद्ध ज्ञान झाले की, सुखाचे कल्लोळ उठू लागतात. (४९)

हा विनियोगु उपासनेचा । त्रिकांड आशय वेदाचा ।
अधिकारास्तव बोले वाचा । परि अवसान ज्ञानी ॥५०॥
हा उपासनेचा विनियोग (उपयोग) आहे. हाच त्रिकांडात्मक (ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड) वेदाचा आशय आहे. वेद तोंडाने अधिकारपरत्वे वेगवेगळा उपदेश करत असला तरी त्याची परिणती ज्ञानातच होते. (५०)

म्हणून ज्ञानावांचून कांहीं । वेदासि बोलणेंचि नाहीं ।
या वचनासी गाही । अनुभवी असती ॥५१॥
म्हणून वेदाला ज्ञानावाचून दुसरे काही सांगायचेच नाही. जे अनुभवी लोक आहेत ते या वचनाची साक्ष देतील. (५१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
वेदविनियोगप्रकारे । चतुर्थसमास: ॥४॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
ज्ञानप्रतिष्ठा


वेद म्हणिजे ज्ञान । ज्ञान म्हणिजे नव्हे अज्ञान ।
सर्वकाळ जाणतेपण । स्वप्रभ आत्मा ॥१॥
वेद म्हणजे ज्ञान होय. ज्ञान म्हणजे अज्ञान नव्हे. ते आत्मा स्वयंप्रकाश असून त्याच्या ठिकाणी सर्वकाळी जाणतेपण असते. (१)

निरसावया अज्ञान । तें एकचि समर्थ ज्ञान ।
प्रकाश तमाचें निरसन । करि जैसें ॥२॥
ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराचे निरसन करतो त्याप्रमाणे अज्ञानाचे निर्मूलन करण्यास एकटे ज्ञानच समर्थ आहे. (२)

यासि उपायचि दुजा नाहीं । हें सत्य सत्य अन्यथा नाहीं ।
कर्म अथवा उपासना ही । परंपरा साधन ॥३॥
या संदर्भात दुसरा मार्गच (उपाय) नाही हे अगदी सत्य असून कर्म आणि उपासना ही फक्त परंपरासाधने आहेत, ती येथे असमर्थ ठरतात. (३)

तरि आतां हेंचि कैसें । ज्ञानावांचून उपाय नसे ।
बोलणें घडे अपैसें । श्रुति युक्ति अनुभवे ॥४॥
तर ज्ञानावाचून दुसरा उपाय नाही, हा विचार येथे श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्या आधाराने ओघाने आले म्हणून सांगतो. (४)

सत्य शब्द वाटे कठिण । असत्ये होय मनरंजन ।
परि सत्यावीण समाधान । सर्वथा नाहीं ॥५॥
सत्य शब्द उच्चारताच ते कठीण वाटायला लागते. असत्यामुळे मनाची करमणूक होते. परंतु खरे समाधान सत्यावाचून होत नाही. (५)

धरील माइकाची भीड । तें काय बोलेल द्वाड ।
असत्यांतील सत्य जाड । कैसें कळे ॥६॥
मायिक गोष्टीची भीड बाळगणारी कुत्सित व्यक्ती मायिकाखेरीज दुसरे काय बोलणार ? असत्यातील टळटळीत सत्य त्याला कसे कळेल ? (६)

मायिक म्हणिजे जालें नाहीं । वेगळें दिसतांहि सर्वही ।
जैसा रज्जूवरील अही । दिले परि मिथ्या ॥७॥
मायिक म्हणजे जे झालेच नाही ते. सर्व पदार्थ स्पष्टपणे वेगळे दिसत असूनही ते मुळात अस्तित्वातच नसतात. दोरीच्या जागी साप दिसतो खरा, पण तो मिथ्याच असतो. तसाच हा प्रकार आहे. (७)

रज्जू न कळतां सर्प जाला । तो रज्जू ज्ञानेंचि नाशिला ।
ब्रह्मज्ञानें प्रपंच भासला । नासे ब्रह्मज्ञानें ॥८॥
दोर न कळल्यामुळे साप झाला. त्या सर्पाचा नाश दोराच्या ज्ञानानेच झाला. त्याप्रमाणे ब्रह्माच्या अज्ञानामुळे प्रपंच भासला. तो ब्रह्माच्या ज्ञानाने नष्ट झाला. (८)

अज्ञानास्तव जग जालें । तरि यास सत्यत्व कैसें आलें ।
पूर्वभासानें सर्पादि जालें । परि त्या सत्यत्व नसे ॥९॥
अज्ञानामुळे जग निर्माण झाले. मग त्यास सत्यत्व कसे आले ? अगोदरच्या भासामुळे सर्पदी निर्माण झाले. पण त्यांना सत्यत्व नसते. (मग त्यांनाही सत्यत्व कसे आले ?) (९)

तरि याचें उत्तर कैसें । रज्जू सर्पाते जाणत नसे ।
मी हा सर्प जालों असे । सर्पही नेणें ॥१०॥
आता या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ? रज्जूला सर्प माहीत नसतो. मी सर्प झालो आहे, हे सर्पालाही माहीत नसते. (१०)

दोहींहून तिसरा अन्य । तयासी भासला कल्पनागुणें ।
पूर्वभास होतां प्रमाण चैतन्य । सर्पाकार परिणमलें ॥११॥
या दोघांहून वेगळा असा जो तिसरा असतो त्यालाच तो सर्प त्याच्या कल्पनेमुळे भासला. अशा पूर्वकाळी अनुभवलेल्या भासामुळे अंत:करणच (प्रमाणचैतन्य) सर्पाकाराने परिणाम पावते. (११)

तैसें ब्रह्म नेणें जगासी । जड प्रपंच नेणें आपणासी ।
प्रपंचभान होय ज्यासी । तो तिसरा वेगळा ॥१२॥
त्याप्रमाणे ब्रह्म जगाला जाणत नाही. जड प्रपंच (जग) स्वत:ला जाणू शकत नाही. ज्याला प्रपंचाची जाणीव होते तो या दोहोंहून वेगळाच असतो. (१२)

सत्यत्व ब्रह्मींचे घेतलें । जड मी हें ऐसें कल्पिलें ।
तया अभिमानें आणिलें । जगा सत्यत्व ॥१३॥
ब्रह्माच्या ठिकाणी असलेले सत्यत्व घेतले, जड देहाला मी अशी कल्पना केली, त्या अभिमानाने मग जगालाही सत्यत्व आणले. (१३)

पूर्वभास कैसा त्यासी । मी मी स्फुरण दिवानिशी ।
ब्रह्माकारे असतां तयासी । देहाकारत्व आलें ॥१४॥
त्याला पूर्वीचा भास कसा येतो, तर 'मी-मी' हे स्फुरण रात्रंदिवस चाललेले असते. त्यामुळे मुळात ब्रह्माकार असलेल्या त्याला देहाकार प्राप्त झाला. (१४)

तें देहाकारत्व जैं जाय । ब्रह्माकार ज्ञान होय ।
तरीच हा प्रपंच होय । मिथ्या ऐसा ॥१५॥
ते देहाकारत्व ज्यावेळी संपते त्यावेळी ते ज्ञान ब्रह्माकार होते. त्यायोगेच हा प्रपंच मग मिथ्या होतो. (१५)

रज्जू न कळतां सर्प न जाय । ब्रम्ह नेणतां प्रपंच न जाय ।
उभयांसीही उपाय । कळल्यावीण नाहीं ॥१६॥
जोपर्यंत रज्जू (दोरा) चे ज्ञान होत नाही, तोपर्यंत सर्प नष्ट होत नाही. तसे ब्रह्माचे ज्ञान झाले नाही तोपर्यंत प्रपंचही जात नाही. दोन्ही (सर्प व प्रपंच) ही नष्ट होण्यासाठी ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. (१६)

रज्जूसर्प जावया लागीं । नाना सायास आरंभी वेगीं ।
करीत असती वाउगीं । वेगळालीं ऐकिजे ॥१७॥
रज्जुसर्पाचा (रज्जूवरील सर्पाच्या भासाचा) नाश करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण ते वाया जातात. (१७)

वाळू मंत्रून आणिली । ते चहूंकडे टाकिली ।
अथवा दिग्बंधने केलीं । हें एक साधन ॥१८॥
त्यापैकी एक साधन असे की, वाळू मंत्रून आणतात. ती चहूकडे टाकतात किंवा सर्व दिशांना टाकून दिशांची नाकेबंदी करतात. (१८)

गारोडी साह्य केला । तेणे सर्प तात्काळ धरिला ।
परि आपण तेथून पळाला । कांप सुटला सर्वांगी ॥१९॥
अथवा एखाद्या गारोड्याची मदत घेतात. तो त्या सर्पाला ताबडतोब पकडतो. पण त्याच्या सर्वांगाला भीतीने कंप सुटल्यामुळे तो सर्प सोडून देऊन स्वतः तेथून पळून जातो. (१९)

गारोडी म्हणे हाती घे‍ई । हा तुज न करी काई ।
बाहेरी टाकी लवलाही । मज भय वाटतें ॥२०॥
अथवा तो गारोडीच दुसऱ्याला म्हणतो की हा सर्प हातात धर, तो तुला काही करणार नाही, पटकन त्याला धरून बाहेर नेऊन टाक. मला मात्र त्याची भीती वाटते. (२०)

आतां तिसरें साधन । धीटपणें कंबार बांधून ।
शस्त्रास्त्र मेळवी संपूर्ण । काठ्या भाले ॥२१॥
आता तिसरे साधन असे की, भोवतालचे लोक धीटपणाने कंबर कसून सर्व प्रकारची काठ्या, भाले इत्यादी शस्त्रास्त्रे मिळवून (२१)

अंधारी रज्जू बडविती । सर्प मेला रे म्हणती ।
कांहीं दृष्टी चळतां भाविती । जिवंत आहे ॥२२॥
अंधारातच त्या दोरीला बडवतात. मग 'सर्प मेला रे मेला' असे म्हणतात. काही जणांची तशात दृष्टी थोडीशी चळते आणि त्यांना तो हलल्यासारखा वाटतो. मग त्यांना तो जिवंत आहे असे वाटू लागते. (२२)

शीणचि होय साधनें करितां । निर्फळ जाले दीप लावितां ।
म्हणे काय हो इतुकें आता । श्रम पावलों ॥२३॥
अशा तहेची साधने (उपाय) करता करता त्यांना श्रमच फक्त होतात. मग दिवा लावून पाहातात तो आपले कष्ट फलहीन झाले हे त्यांच्या लक्षात येते आणि मग इतका वेळ आपण विनाकारणच श्रम करत होतो हे त्यांच्या लक्षात येते. (२३)

ऐसें दार्ष्टान्ती जाणावें । साधनें करिताती सर्वे ।
परि ज्ञानावांचून आघवें । शीणचि पावती ॥२४॥
दार्टान्तामध्ये (म्हणजे उपमेयपक्षी किंवा मुख्यार्थपक्षी) असेच समजून घ्यावे. सर्व प्रकारची सर्वजण साधने करतात. पण एक ज्ञानाच्या अभावी सर्वजण विनाकारण शीण पावतात. (२४)

नित्यनैमित्तिक आचरती । कांही दानधर्मे करिती ।
व्रतें तपें आरंभिती । म्हणती संसार तरूं ॥२५॥
काही लोक नित्य, नैमित्तिक विहित कर्माचे आचरण करतात, काहीजण दानधर्म करतात; काहीजण व्रते, तपे यांचे, त्यांच्या साहाय्याने आपण संसार तरून जाऊ या भावनेने आचरण करतात. (२५)

नाना परीचीं कर्मे करणें । तेणें देहासीच लागे येणे ।
कांही प्रपंचातील नव्हे उणें । दिग्बंधनापरी ॥२६॥
निरनिराळी कमें करण्याने पुढच्या जन्मी पुन्हा देहच धारण करावा लागतो. सर्पनाशासाठी केलेल्या दिशांच्या नाकेबंदीप्रमाणे ती कमें व्यर्थ ठरतात. प्राप्त झालेल्या प्रपंचाचे काहीही कमी होत नाही. (२६)

उपासनेचा केला आधार । देव भेटे साक्षात्कार ।
वैकुंठ कैलासादि अपार । लोकप्राप्ती जाली ॥२७॥
उपासनेचा आधार घेतला तर देव भेटतो. साक्षात्कार होतो; वैकुंठ, कैलास इत्यादी विविध लोकांची प्राप्ती होते. (२७)

तरी अज्ञान नासेना । भय कदापि जाईना ।
कोणी करील कल्पना । देवाजवळी भय कैचें ॥२८॥
तरी त्यामुळे अज्ञान नष्ट होत नाही. प्रपंचाचे भय काही केल्या जात नाही. यावर कोणी कल्पना करील की देवाच्या सानिध्यात भय कसे असेल ? (२८)

जैसा राजियाचा प्रधान । सकल राज्य तया आधीन ।
अंतरी भय असें दारुण । राजाज्ञेचें ॥२९॥
ज्याप्रमाणे एखाद्या राजाचा प्रधान असतो. सगळे राज्य राजाच्या अधीन असते आणि प्रधानाच्या मनात राजाज्ञेचे अतिशय भय असते. (२९)

अंगे जो राजा जाला । मग कोणाचे भय त्याला ।
देव होतां सन्निध राहिला । त्यासी निर्भयता कैंची ॥३०॥
पण जो स्वत:च राजा झालेला असतो त्याला कोणाचे भय असणार ? त्याप्रमाणे स्वतः देव न होता केवळ त्याच्या सांनिध्यात राहिल्याने त्याला निर्भयता कशी वाटेल ? (३०)

हे गारोडियापरी । अज्ञानाची नव्हे बोहरी
आतां तिसरें साधन अवधारी । प्रपंच-निरसनार्थ ॥३१॥
हा प्रकार गारोड्याच्या दृष्टांताप्रमाणे झाला. त्यायोगे अज्ञानाचा नाश होत नाही. आता प्रपंचाचा निरास करण्याचे तिसरे साधन ऐक. (३१)

स्वतां योग आरंभिला । बहु कष्टें सिद्धी गेला ।
ब्रह्मांडीं जाउनी कोंडिला । वायुबळें ॥३२॥
स्वत:च योगाभ्यास सुरू केला. पुष्कळ कष्टाअंती तो योगाभ्यास सिद्धीलाही गेला. ब्रह्मांडात (ब्रह्मरन्ध्रात) जाऊन बळेच वायूचे निरोधन केले. (३२)

तेथे अष्टसिद्धि आल्या । पुरविती पदार्था इच्छिल्या ।
साधु म्हणउिनी कीर्ति गेल्या । दिगंतरासी ॥३३॥
त्यावेळी तेथे अष्ट महासिद्धी आल्या. त्या सर्व इच्छित पदार्थ पुरवू लागल्या. त्या योग्याची महान साधू अशी कीर्ती होऊन दिशादिशात पसरली. (३३)

लोकें मनांत भाविलें । तेथेंचि त्यासी दर्शन दिधलें ।
कैलासीं जा‍ऊन आले । क्षणामाजीं ॥३४॥
लोकांनी मनात आणताच त्यांना बसल्या जागी दर्शन दिले. एका क्षणात कैलासाला जाऊन परत आले. (३४)

काळवंचना केली आकल्प । तनु वांचविली ।
क्षणें म्हणे जन्ममरण मेली । क्षणा धोका वाहे ॥३५॥
अथवा काळवंचना केली (म्हणजे आलेला मृत्यू थोपवून धरला) आणि कल्पान्तापर्यंत आपला देह वाचवला. एखाद्या क्षणी आपले जन्ममरण आता टळले असे म्हणत असतानाच दुसऱ्या क्षणीच जन्ममरणाचे भय त्याला जाणवत असते. (३५)

पंचभूतांसी नाश होय । तेथेंचि मानिला सत्य काय ।
बहु काल रक्षितांहि जाय । अकस्मात्‌ पुढें ॥३६॥
पंचमहाभूतांचा नाश होतो. पण याने मात्र आपला देह सत्य मानला. आणि पुष्कळ दिवस त्याचे रक्षण केले, पण तरीसुद्धा पुढे तो अचानकपणे जायचा तो जातोच. (३६)

भ्रमाचे निर्मूळ नाहीं जालें । केले सायास व्यर्थ गेले ।
अंतरी रज्जुत्व न ओळखिले । मारितां कष्ट ॥३७॥
पण एवढा खटाटोप करूनही भ्रम निर्मूळ गेला नाहीच. केलेले सर्व कष्ट वाया गेले. मनात सर्पाचे रज्जुत्व न ओळखल्याने तो मारण्यासाठी केलेले कष्ट वायाच जातात, तसेच येथे झाले. (३७)

तेथें दीपचि पाहिजे । मिथ्या ज्ञानेंचि जाणिजे ।
मग तयाचें ओझें । कांहींच नाहीं ॥३८॥
अशा वेळी तेथे दिवाच पाहिजे. तसेच सर्पाचे खोटेपण ज्ञानानेच ओळखले पाहिजे. ते एकदा ओळखले की, मग त्याच्या भीतीचे काहीच ओझे राहात नाही. (३८)

विनोदे रज्जूसी क्रीडतां । भयचि नाही तत्वतां ।
तैसे प्रारब्ध भोगितां । भीतिच नाहीं ॥३९॥
सहज विनोदाने दोराबरोबर खेळ करत असताना मनात काहीच भीती वाटत नाही, त्याप्रमाणे सहज भावनेने प्रारब्ध भोगत असता काहीच भीती वाटत नाही. (३९)

आपण ब्रह्म निर्गुण । कोणासि यावें जन्म मरण ।
येचि देहीं समाधान । पावला ऐसा ॥४०॥
आपणच निर्गुण ब्रह्म असल्यावर जन्म, मरण इत्यादी अवस्था कोणाला येणार आहेत ? अशा त-हेने याच देहात त्याला असे समाधान प्राप्त होते. (४०)

भवसर्प भयानक । लाविता विवेक दीपक ।
जालें सर्वहि सार्थक । ज्ञानेंचि पावन ॥४१॥
संसाररूपी सर्प अतिशय भयानक आहे. तथापि विवेकाचा दिवा लावताच सर्व कष्टांचे सार्थक होते. अखेर तो साधक ज्ञानानेच पवित्र होतो. (४१)

निश्चयेंसी होय ज्ञान । गुरुमुखें वेदान्तश्रवण ।
विचारें मनन निदिध्यासन । हेंचि साधन दुजें नाहीं ॥४२॥
निश्चयपूर्वक ज्ञान व्हावे, गुरुमुखाने वेदान्तश्रवण घडावे, विचारपूर्वक त्यावर मनन व्हावे, त्याचा निदिध्यास घडावा, हेच एकमेव साधन आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. (४२)

वेदान्त कासया म्हणावें । काय गुरुमुखें ऐकावें ।
ऐसिया आक्षेपिं स्वभावें । सांगिजेल ॥४३॥
पण वेदान्त कशाला म्हणतात, गुरुमुखाने कशाचे श्रवण करावे, असा आक्षेप कोणी घेतल्यास ते सर्व आता सांगतो. (४३)

जाणावें ब्रह्म निर्गुण । मायेचें काय लक्षण ।
नियंता ईश्वर तिजलागुन । तोहि ओळखावा ॥४४॥
निर्गुण ब्रह्माची ओळख व्हावी, मायेची लक्षणे काय आहेत, ती जाणून घ्यावीत. त्या मायेचा नियामक जो ईश्वर त्याचीही ओळख व्हावी. (४४)

जीव कैसा तो ओळखावा । कूटस्थ कोण तो जाणावा ।
अविद्याबंधन जीवा । तेंहि ओळखावें ॥४५॥
जीवाचे स्वरूप समजून घ्यावे, कूटस्थ कोण तो ओळखावा, जीवाला अविद्येचे (अज्ञानाचे) बंधन पडलेले असते तेही ओळखून घ्यावे, (४५)

जग समष्टी व्यष्टिरूप । जाणावा अपवाद अध्यारोप ।
त्वंपद तत्पदाचे रूप । असिपदीं ऐक्य कैसें ॥४६॥
पिंड ब्रह्मांडरूप (व्यष्टिसमष्टि) जग जाणून घ्यावे, सृष्टीचा संहार (अपवाद) आणि उत्पत्ती (अध्यारोप) कसे होतात ते समजून घ्यावे, त्वंपद म्हणजे काय, तत्पद म्हणजे काय आणि असिपद म्हणजे काय, (जीव, ब्रह्म आणि त्यांचे ऐक्य) त्यांचे ऐक्य कसे होते, (४६)

इतुकें निर्धारें जाणावें । सत्य असत्य धुंडावें ।
संशयरहित व्हावें । नि:संदेह ॥४७॥
इतके सगळे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. सत्य काय, मिथ्या काय यांचा शोध घ्यावा आणि संशयरहित, नि:संदेह व्हावे हेच वेदान्तश्रवण होय. (४७)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ज्ञानप्रतिष्ठायोगप्रकारे । पंचमसमास: ॥५॥
इति ज्ञानप्रतिष्ठारूपपंचिका संपूर्णा ॥२॥ ओवीसंख्या २६४ ॥
हरिः ॐ तत्सत्

GO TOP