॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(पूर्वार्ध)

पंचिका ३ री
ब्रह्ममायाजीवेशस्वरूप

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
ब्रह्मलक्षणनिर्धार


सृष्टिपूर्वी सतचि आहे । हे सौम्य विचारुन पाहे ।
निश्चयें श्रुती म्हणताहे । बृहदारण्यीं ॥१॥
बृहदारण्यक उपनिषदात श्रुती निश्चयपूर्वक सांगते की, "हे सौम्य, सृष्टी उत्पन्नापूर्वी सत्तत्वच होते. हे नीट विचार करून पहा. " (१)

आत्माचि अग्रिं असे । अरणीषट्क बोलतसे ।
नांवें दोनि परि असे । एकचि रूप ॥२॥
अरणीषट्क (छान्दोग्य उपनिषदाच्या सहाव्या अध्यायात) असे सांगते की, "आत्माच सर्व सृष्टीच्या अगोदर होता. "या दोन्ही विधानांत 'सत्' आणि 'आत्मा' अशी दोन वेगवेगळी नावे दिसली तरी 'सत्' आणि 'आत्मा' ह्यांचे रूप एकच आहे. (२)

तें प्रत्यक्ष ज्ञाना नव्हे विषय । तेथें अनुमानें करावें काय ।
न चले शब्दाचा उपाय । दृष्टान्तहि कैंचा ॥३॥
ते प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नाही. तेथे अनुमानाने काय करावे ? शब्दप्रमाणाचाही तेथे उपाय चालत नाही, मग दृष्टान्त कसा चालेल ? (३)

तरि तें कैसें जाणावें । जाणिल्यावीण समाधान नव्हे ।
बुद्धि इंद्रिया स्वभाव । अगोचर असे ॥४॥
अशा परिस्थितीत त्याचे ज्ञान कसे व्हावे ? जाणल्याशिवाय तर समाधान होणार नाही. ते स्वभावत:च बुद्धी आणि इंद्रियांना अदृश्य आहे. (४)

परि न्यायाचे चत्वार लक्षण । येणेंचि होय ब्रह्मज्ञान ।
मनेंचि जाणोनि पावन । श्रुति ही ऐसी ॥५॥
पण न्यायशास्त्रामध्ये ज्ञानाची चार प्रमाणे सांगितली आहेत. (प्रत्यक्षज्ञान, अनुमानज्ञान, शब्दज्ञान व दृष्टान्त) तेव्हा याच प्रमाणांनी ज्ञान होते. 'मनानेच त्या ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान करून घ्यावे' असे श्रुतीही सांगते. (५)

मना ज्याचेनिं मनपण । परि मना नकळे अधिष्ठान ।
ऐसें श्रुतीचें वचन । येणें रीतीं जाणावें ॥६॥
"मनाला ज्यामुळे मनपण येते, पण त्या मनाला आपले अधिष्ठान असूनही जे कळून येत नाही त्यालाच ब्रह्म असे जाणून घ्यावे, असे श्रुतीचे वचन आहे. (६)

अशब्द अस्पर्श अरूप । अरस अगंध अमुप ।
अनणु अदीर्घ निर्विकल्प । श्रुति वचनेंचि सांगे ॥७॥
ते ब्रह्म, अशब्द, अस्पर्श, अरूप, अरस, अगंध, अमूप, अनणू, अदीर्घ, निर्विकल्प आहे असे श्रुती शब्दांनीच सांगते. (७)

शब्द तरी चालेना । शब्देंविणही कळेना ।
म्हणउनि श्रुति तन्न तन्ना । प्रवर्तली शब्दें ॥८॥
पण त्या ब्रह्माच्या बाबतीत शब्द उपयोगाला येत नाही. पण शब्दाशिवाय ते कळत नाही. म्हणून श्रुती 'ते तसे नाही, ते तसे नाही' (नेति, नेति) असे शब्द वापरण्यास उद्युक्त झाली. (८)

अर्थ बोधोनि शब्द जाय । म्हणउनी शब्दचि उपाय ।
उपमा नसे त्यासि काय । करावें ऐका ॥९॥
शब्द अर्थाचे ज्ञान करून देतो आणि स्वत: लोप पावतो, असे त्याचे स्वरूप आहे. तरीही शब्दावाचून दुसरा उपायच नाही. ज्याला कशाची उपमाच देता येत नसेल त्याच्या संदर्भात काय करावे, ते ऐका. (९)

सर्व साम्यता तरि न घडे । एकांशी साहित्य पडे ।
तें जाणावें रोकडें । आकाश ऐसें ॥१०॥
उपमेच्या संदर्भात ब्रह्माशी संपूर्ण साम्य सांगता येईल. अशी सापडणे शक्य नाही. एकांगाने साम्य दाखवणे शक्य आहे. असा स्पष्टपणे पण लक्षात येणारा पदार्थ म्हणजे आकाश होय. (१०)

विभु व्यापक निरंश असे । ब्रह्म व्योमा भेद नसे ।
ब्रह्मीं चैतन्य अधिक असे । म्हणोनि उपमा ॥११॥
ते मोठे आहे. व्यापक आहे, अंशरहित आणि निरवयव आहे. या दृष्टीने ब्रह्म आणि आकाश यांत भेद नाही. ब्रह्मामध्ये चैतन्य अधिकचे आहे. तेवढा गुणधर्म सोडल्यास त्या दोहोंमध्ये उपमा होऊ शकते. (११)

हा जगद्भ्रम भासला । परि सत्य अधिष्ठान असे याला ।
अधिष्ठानेंवीण भ्रमाला । कोठें न देखों ॥१२॥
हा जगाचा पसारा भ्रमरूप आहे, असे भासले तरी त्याला सत्याचा (सत्पदार्थाचा) आधार आहे. कारण कोणताही भ्रम मूळ आधारावाचून वेगळा असा कोठेही आढळणार नाही. (१२)

हें अनुमानें कळें ऐसें । आतां प्रत्यक्ष ज्ञान तें कैसें ।
ब्रह्म आत्मा भेद नसे । उपाधि निरसतां ॥१३॥
अनुमानप्रमाणाच्या साहाय्याने वरील सत्य कळू शकते. पण त्याचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होऊ शकेल ? आत्मा हा अज्ञानाच्या उपाधीमुळे जीवरूपाने ब्रह्माहून वेगळा भासत असला तरी ती उपाधी बाजूला सारताच आत्मा आणि ब्रह्म यांमध्ये मुळीच भेद उरत नाही. (१३)

प्रत्यक्षासी प्रमाण काय । हें सर्वथा बोलों नये ।
परि अप्रमाण न होय । महावाक्य पहा ॥१४॥
पण असा अनुभव प्रत्यक्ष येऊ शकतो याला प्रमाण काय ? पण अशी शंका घेऊ नये. कारण कोणतेही महावाक्य अप्रमाण मानता येत नाही. (१४)

ब्रह्म सच्चिदानंद पूर्ण । सत्य ज्ञान अनंत घन ।
हें श्रुतीचें वचन । स्वरूपरूपें ॥१५॥
वेदांनी ब्रह्माचे स्वरूपलक्षण सांगण्याच्या निमित्ताने ब्रह्म हे सत्, चित्, आनंद, पूर्ण, सत्य, ज्ञान, अनंत, घनरूप (सर्वत्र ठासून भरलेले) आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. (१५)

असतची पूर्वी होते । श्रुतीच सिद्ध करी शून्यातें ।
अनुभवास येइना तें । तरी सत् कैसें ॥१६॥
पूर्वी सर्वत्र असत्च होते या शब्दांनी श्रुती शून्यवाद सिद्ध करते. दुसरे असे की, त्या ब्रह्माचा जर अनुभव येत नसेल तर त्याला 'सत्' कसे म्हणता येईल ? (१६)

असत् जरी म्हणसी । तरी असत् कळे कोणासी ।
कोणती जिव्हा पुससी । जिव्हेनेंचि ॥१७॥
मग त्याला 'असत्' असे म्हटले तर ते 'असत्' आहे असे कोणाला समजते ? आपल्याच जिव्हेने आपली कोणती जिव्हा आपण पुसून टाकू शकतो ? (म्हणजे जिव्हेने जिव्हा पुसता येत नाही.) (१७)

तथापि असत् आहे किं नाहीं । यांत विचारून बोले कांहीं ।
जरी म्हणसी असत् नाही । नाहीं ते नाहीं कदा ॥१८॥
तरीसुद्धा ते ब्रह्म असत् आहे की नाही, याबाबतीत नीट विचार करून सांग. जर तू असे म्हणशील की 'असत्' नाही तर मग जे नाही ते केव्हाही नाहीच, असे ठरते. (१८)

जरी असत् आहे म्हणतां । हाचि व्याघात तत्वतां ।
हा दोष तुज न कळतां । बोलत अससी ॥१९॥
जर 'असत् आहे' असे म्हणत असशील तर ते आपल्याच विधानाचे आपणच खंडन केल्यासारखे होईल. हा व्याघात दोष होय. तो तुझ्या लक्षात न आल्याने तू असे म्हणत आहेस. ('असत्' अस्तित्वात नसलेले 'आहे' असे म्हणणे विसंगत आहे. ज्याला आपण 'असत्' असे म्हणतो तो पदार्थ 'आहे' असे कसे म्हणता येईल ?) (१९)

असत् तें सर्वथा नाहीं । तरि आहे हें कोणास पाही ।
शून्य म्हणसी आहे कांही । तेंचि सद्रूप ॥२०॥
'असत्'हे सर्व प्रकारे नाहीच, असे असताना 'आहे'असे आपण कोणास म्हणतो ? त्याला शून्य असे तू म्हणत असशील आणि ते आहे असे म्हणत असशील, तर त्या आहे असे म्हणण्यानेच ते सद्‌रूप ठरते. (२०)

सत् आहे म्हणतां । हाही दोष द्विरुक्तिता ।
तरि वासना अति दृढ होतां । आदरें द्विरुक्ती ॥२१॥
'सत् आहे असे तुम्हीसुद्धा म्हणता. तो द्विरुक्तीचा दोष सिद्ध होत नाही का ? असा आक्षेप घेशील तर त्याला उत्तर असे की, प्रेम अगदी दृढ असेल तेव्हा तेथे द्विरुक्तीचा दोष क्षम्य ठरतो. तेथे द्विरुक्तीचा आदरच केला जातो. (२१)

बोलणें तें बोलतों । करणें तें करितों ।
सत् आहे तैसे तो । द्विरुक्ति दोष नाहीं ॥२२॥
मी बोलायचे ते बोलतो, करायचे ते करतो, असे आपण म्हणतो. तसेच 'सत् आहे' असे म्हणतो. अशा प्रकारच्या बोलण्यात द्विरुक्ती हा दोष मानत नाहीत. (२२)

सत् कालत्रयीं नासेना । सृष्टि स्थिति प्रलय रचना ।
होतां जातां चळेना । जैसे तैसें ॥२३॥
'सत्' म्हणजे सदैव असणारे. ते कालत्रयीही नष्ट होत नाही. जगामध्ये उत्पत्ती (सृष्टी) , स्थिती आणि प्रलय या घडामोडी सतत चालत असताना जे 'सत्' आहे ते अजिबात चळत नाही. ते जसे आहे तसेच राहते. (२३)

ब्रह्म सत् व्हावया योग्य असे । जें कालत्रयीं न नासे ।
नासें तें सत्ही नसे । घटाचे परी ॥२४॥
एक ब्रह्मच तेवढे असे सत् होण्याच्या योग्यतेचे आहे. ते कालत्रयीही नष्ट होत नाही. नाश पावणाऱ्या घटाप्रमाणे जे नाश पावणारे असते त्याला सत्'म्हणता येत नाही. (२४)

ज्ञान म्हणजे स्वप्रकाश । जाणतें सर्व जडास ।
सर्वांसि जरी होय नाश । तरि देखणा आहे ॥२५॥
चित् म्हणजे ज्ञान. ते स्वयंप्रकाशी असते. ते सर्व जड पदार्थांस जाणते. सर्व पदार्थांचा नाश झाला तरी त्या नाशाचाही ते द्रष्टा असते. (२५)

दिसे तयासी पाहतो । भासे तयासी जाणतो ।
शून्यास स्वतां अनुभवितो । सुषुप्तिपरी ॥२६॥
असा स्वयंप्रकाशी द्रष्टा जे जे दृश्य आहे त्याला पाहतो, जे जे भासते त्याला जाणतो आणि सर्वनाशानंतर उरणाऱ्या शून्याचाही अनुभव घेतो. असा शून्याचा अनुभव झोपेत येतो. (२६)

म्हणसी स्वप्रभ कळेना । बुद्ध्यादिकां भासेना ।
परप्रकाशें तत्वें नाना । वर्तती त्यां नकळे ॥२७॥
असा स्वयंप्रकाशी कोण ते आपल्याला कळत नाही, बुद्धी इत्यादींना तो भासत नाही, इतर अनेक पदार्थ किंवा तत्त्वे परप्रकाशाने व्यवहार करतात, त्यांनाही तो कळत नाही, असे म्हणत असशील तर त्याचे उत्तर असे की, (२७)

चक्षु घटातें पाहे । चक्षु घटासी गोचर नव्हे ।
तैसें बुद्ध्यादिकां जाणताहे । बुद्ध्यादि नेणती ॥२८॥
डोळा घटाला पाहू शकतो, पण घटाला चक्षू दिसू शकत नाही, त्याप्रमाणे हा स्वयंप्रकाशी चिदात्मा बुद्धी इत्यादी तत्त्वांना जाणतो पण बुद्धी इत्यादी तत्त्वे त्याला जाणत नाहीत. (२८)

सर्वदा असे जाणतां । यथार्थ न वाटे तत्वतां ।
उपाधियोगें जाणें पाहतां । येर्ह वीं नाहीं ॥२९॥
तो सर्वकाळ जाणणारा असूनही आपल्याला तो सत्य वाटत नाही. कारण पदार्थमात्रांच्या उपाधिगुणांमुळे त्या पदार्थमात्रांचे आपल्याला ज्ञान होऊ शकते. येरवी उपाधिअभावी ते ज्ञान झालेच नसते. (२९)

ऐक चक्षु घटातें पाहे । तेव्हांचि देखणी दशा आहे ।
घटाभावीं चक्षु का राहे । अंधळा होऊनी ॥३०॥
डोळा घटास पाहतो तोपर्यंतच त्याची द्रष्टा अशी अवस्था असते आणि घट नसताना तो डोळा आंधळा होऊन राहतो काय ? (३०)

सर्व असतां जाणितलें । नसता काय नेणणें आलें ।
म्हणसि उपाधिसवें लया गेलें । तें पाहिलें कोणें ॥३१॥
सर्व पदार्थ असताना त्यांना आपण जाणतो. ते पदार्थ नसतील तेव्हा आपण अज्ञानी बनतो काय ? तू म्हणशील की आपले जाणणे (ज्ञान) उपाधीबरोबरच लयाला जाते, पण मग ते ज्ञान लयाला गेले (नाहीसे झाले) हे कुणाला कळते ? (३१)

ज्ञानाचा लय ज्ञानें पाहिला । तरि आपणा देखतां आपण मेला ।
ऐसी नाहीं आयकिला । हाही दोषचि ॥३२॥
ज्ञानाचा लय ज्ञानानेच पाहिला असे म्हणणे म्हणजे आपणासमोरच आपण मेलो असे म्हणण्यासारखे होईल. असे कधी ऐकिवात नाही. हाही दोषच ठरेल ना ? (३२)

ज्ञान तरि दुसरें नाहीं । कीं ज्ञान लया होईल गाही ।
यासी प्रमाणही नसे कांही । नाश कैसा मानावा ॥३३॥
बरे ज्ञानच ज्ञानाच्या लयाचे साक्षी होईल असे म्हणावे तर दोन ज्ञाने संभवत नाहीत (ज्ञान एकच असते) . बरे ज्ञानाचा नाश झाला, याला प्रमाण काय ? तेव्हा ज्ञानाचा नाश कशाच्या आधारावर मानावा ? (३३)

ब्रह्म चिद्रूप व्हावया योग्य आहे । स्वप्रभत्वें सर्वां जाणताहे ।
न जाणे ते चिद्रूपहि नव्हे । घटाचे परि ॥३४॥
ब्रह्म चिद्‌रूप होण्यास योग्य आहे. ते स्वयंप्रकाशी असन सर्व जाणणारे असते. जे जाणत नाही त्याला चिद्‌रूप म्हणता येत नाही. घट हे त्याचे उदाहरण होय. तो कुणाला जाणत नसल्यामुळे त्याला चिद्‌रूप म्हणता येत नाही. (३४)

ब्रह्म अनंत परिपूर्ण । त्रिविधा परिच्छेदविहीन ।
तया परिच्छेदाचें लक्षण । अवधारा आधीं ॥३५॥
ब्रह्म हे अनंत. असून (सगळीकडे ओतप्रोत भरलेले असे) परिपूर्ण आहे. त्याचे परिच्छेद म्हणजे विभाग पडत नाहीत. त्या परिच्छेदाचे स्वरूप आधी ऐकून घ्या. (३५)

आहे अमुके देसीं । नसे कांही अन्य देशी ।
ऐसें जें का एक देशीं । तो देशपरिच्छेद ॥३६॥
एखादा पदार्थ अमुक देशात आहे. अन्य देशात नाही. अशाप्रकारे विशिष्ट देशाशी तो निगडित असतो याला देशपरिच्छेद म्हणतात. (३६)

पर्जन्यकाळीं दिसती । उष्णकाळीं हरपती ।
काल परिच्छेद तयाप्रती । बोलिजेतो ॥३७॥
एखादा पदार्थ पावसाळ्यात दिसतो, उष्ण काळात (उन्हाळ्यात) हरपून जातो (नाहीसा होतो) याला कालपरिच्छेद म्हणतात. (३७)

पृथ्वीमाजीं दिसे कांही । अपामाजीं नि:शेष नाहीं ।
काशांत आहे काशांत नाहीं । हा वस्तुपरिच्छेद ॥३८॥
एखादा पदार्थ पृथ्वीमध्ये दिसतो. आपतत्त्वामध्ये (पाण्यामध्ये) दिसत नाही. अशा प्रकारे विशिष्ट वस्तूशी निगडित असणे याला वस्तुपरिच्छेद म्हणतात. (३८)

ब्रह्म व्यापकपणें अगाध । यास्तव नसे देशपरिच्छेद ।
नसे कालाचा परिच्छेद । नित्यत्व हेतू ॥३९॥
ब्रह्म सर्वव्यापक असल्यामुळे त्याचा अंत लागत नाही. ते अगाध आहे म्हणून त्याच्या ठिकाणी वस्तुपरिच्छेद नाही. ते नित्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी काळाचाही परिच्छेद नाही. (३९)

सर्वी सर्वावभासक । नव्हे वस्तु परिच्छेदक ।
त्रिविध प्रकारें वस्तु एक । परिच्छेदशून्य ॥४०॥
ते सर्व पदार्थात असून सर्वांना प्रकाशित करणारे असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वस्तुपरिच्छेदही नाही अशा प्रकारे वस्तु म्हणजे ब्रह्म हे तिन्ही प्रकारांनी परिच्छेदशून्य असे एकमेव आहे. (४०)

परिच्छेदशून्य जे वस्तू । तेचि जाणिजे अनंतु ।
श्रुति निर्धारें बोलतु । आनंदहि तया ॥४१॥
असे परिच्छेदरहित जे ब्रह्म ते अनंत आहे, हेही समजून घ्यावे. वेद त्यालाच निश्चयपूर्वक आनंदरूपही मानतात. (४१)

आनंद वृत्तीचा स्वभाव । मानितील कोणी अभिप्राव ।
आनंदकोशें पंचमावयव । पुच्छत्वें वर्णिला ॥४२॥
आनंद हा वृत्तीचाच स्वभाव आहे, असे कोणी मानतील. याच आनंदाला तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदकोश मानले असून ब्रह्माचे पाचवे अंग म्हणजे पुच्छरूपाने त्याचे वर्णन केले आहे. (४२)

सुखदु:ख उद्भवे वृत्ती । प्रत्यय दाउनि लया जाती ।
तैसा नव्हे आदिमूर्ती । आनंदरूप ॥४३॥
वृत्तीमध्ये सुखे आणि दु:खे उत्पन्न होतात. त्यांचा अनुभव देऊन ती लय पावतात. ब्रह्म हे जे आद्यतत्त्व (आदिमूर्ती) आहे ते या सुखदुःखांसारखे नसून प्रत्यक्ष आनंदरूपच आहे. (४३)

तया आनंदासी नाश नाहीं । असतचि असे सर्वदांही ।
दुजा अनुभवी नसतांहि । अनुभाव्यरूप ॥४४॥
त्या आनंदाला नाश नाही. तो सर्वकाळ असतो. त्याचा अनुभव घेणारा दुसरा कोणी नसतानाही तो अनुभव घेण्याजोगा आहे. (अनुभाव्य) (४४)

योग्य असे ब्रह्मानंद । सुखदु:खहीन स्वानंद ।
सुखदु:खें उठे खेद । नव्हे आनंदवृत्तीपरी ॥४५॥
ब्रह्मानंद प्राप्त करण्यास योग्य असून सुखदु:खरहित असा निखळ आनंदरूप आहे. आनंदवृत्तीमध्ये सुखे दुःखे निर्माण होतात, त्यामुळे खेद वाटतो. ब्रह्मानंद हा त्याप्रकारचा वृत्तिरूप आनंद नाही. (४५)

कोणी प्रतियोगी कल्पिती । असतास्तव सत् म्हणती ।
जडामुळें भाविती । चिद्रूप ऐसें ॥४६॥
कोणी तद्विरुद्ध वस्तूच्या अथवा धर्माच्या अपेक्षेने ब्रह्माच्या ठिकाणची ही सत्, चित् आणि आनंद ही लक्षणे अस्तित्वात आहेत असे मानतात. म्हणजे असत्च्या अपेक्षेने ब्रह्म सत् आहे असे मानतात, जडाच्या अपेक्षेने ते चित् स्वरूप आहे असे मानतात. (४६)

दु:ख प्रतियोगी आनंद । हें नव्हे प्रमाणसिद्ध ।
राजयासी मांडिलें युद्ध । वांजेच्या कुमरें ॥४७॥
आणि दुःखाच्या अपेक्षेने आनंदाचे अस्तित्व मानतात. पण हे त्यांचे मत प्रमाणांनी सिद्ध होत नाही. वांझेच्या पुत्राने राजाबरोबर युद्ध सुरू करावे तसा हा प्रकार ठरेल. (४७)

तैसें असज्जड दु:ख कांही । उत्पन्नचे जालें नाहीं ।
सच्चिदानंदास तें काहीं । प्रतियोगी नव्हे ॥४८॥
त्याप्रमाणे असत्, जड, दुःख असे जे आपण म्हणतो ते मुळात उत्पत्रच झाले नाही. त्यामुळे सत्, चित्, आनंद या त्रयीला ते काही प्रतियोगी होऊ शकत नाहीत. (४८)

हे शब्द प्रतियोगी असती । वस्तुप्रतियोगी न होती ।
वैखरी अभावें शब्द नासती । अर्थ न जाय त्यासवें ॥४९॥
हे तीन केवळ शब्दरूपातील प्रतियोगी होत. वस्तुरूपातील (वास्तवातील) प्रतियोगी नव्हेत वैखरी नसेल तर शब्द नाश पावतील. पण अर्थ नाश पावत नाही. (अर्थ शब्दांबरोबर त्यांच्या मार्गाने जात नाही.) (४९)

तरी सच्चिदानंद नांव । मायेनें कल्पिला देव ।
म्हणसी तरी मायेचा अभाव । त्यापूर्वी तें काय आहे ॥५०॥
आता असे म्हणशील की, सच्चिदानंद हे नाव व ते धारण करणारा देव हे मायाकल्पित आहेत तर मायेचा अभाव असताना तिच्यापूर्वी कोणते तत्त्व होते ? (५०)

रज्जूचा सर्प जाला । तेणें न वचे रज्जु कल्पिला ।
सर्पाभावींही रज्जूला । रज्जुत्व असे ॥५१॥
रज्जूचा सर्प झाला की त्याच्याकडे रज्जू म्हणून पाहता येत नाही, पण सर्प नसतानाही रज्जूच्या ठिकाणी रज्जूपणा असतोच. (५१)

म्हणुन आहे तेंचि आहे । चिदानंद कल्पित नव्हे ।
शब्द फोल परि तो आहे । शव्देंविणही ॥५२॥
म्हणून जे आहे ते प्रथमपासूनच आहे. चिदानंद ब्रह्म हे कोणी कल्पना केल्याने झालेले नसते. त्याचा निर्देशक जो चिदानंद हा शब्द व्यर्थ होऊ शकेल. पण त्या शब्दाअभावीही ते असतेच असते. (५२)

ब्रह्म एक परिपूर्ण । सच्चिदानंद हे लक्षण ।
किंवा असती गुणिगुण । कीं अंशांशी ॥५३॥
ब्रह्म हे परिपूर्ण सर्वत्र भरलेले असे आहे. ब्रह्म हे लक्ष्य असून सच्चिदानंद हे त्याचे लक्षण आहे, किंवा ब्रह्म हे गुणी असून सच्चिदानंद हे त्याचे गुण आहेत, किंवा ब्रह्म हे अंशी असून सच्चिदानंद हे त्याचे अंश आहेत. (५३)

ती प्रकारें विकल्पिलें । प्रथम पक्षा अंगिकारिले ।
इतर दोनी जे उरले । दूषण दे त्यासी ॥५४॥
आता ब्रह्म आणि सत्, चित्, आनंद यांच्या परस्परसंबंधांबद्दल ही जी निरनिराळी तीन पर्यायी मते नोंदवली आहेत, त्यातील पहिल्या पक्षाचा आम्ही स्वीकार करतो. बाकीचे जे दोन पर्याय उरतात. (गुणी-गुण, अंशी-अंश) त्यांचा दोषयुक्त म्हणून आम्ही त्याग करतो. (५४)

ब्रह्मगुणी सतादि गुण । तरि जाले ब्रह्म सगुण ।
मायेस्तव सत्वादि गुण । त्यासी नाश बोलिला ॥५५॥
ब्रह्म गुणी मानले तर त्याचे सत्, चित्, आनंद हे गुण ठरतात. त्यामुळे ब्रह्म सगुण ठरते. मायेपासून निर्माण झालेले सत्व, रज आणि तम त्या गुणांचा तर नाश होतो, असे सांगितले जाते. (५५)

सतादिकां नाश नाहीं । यास्तव गुणीगुणत्व नाहीं ।
अंशांशी भाव तोही । सांश वस्तूतें ॥५६॥
ब्रह्माच्या सत्, चित् आणि आनंद या लक्षणांना नाश नाही. त्यामुळे ब्रह्म आणि सत्, चित्, आनंद यांच्यामध्ये गुण गुणी संबंध मानता येत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म आणि त्याची सत्, चित् इत्यादी लक्षणांमध्ये अंश आणि अंशी असाही संबंध मानता येत नाही. कारण अंशी-अंशी असा संबंध फक्त सांश वस्तंनाच लाग होतो. ब्रह्म हे अंशविरहित असल्याने त्याच्या संदर्भात तो लाग होत नाही. (५६)

वस्तूचा एकदेशीं लक्षण । त्यासी अंश म्हणावें जाण ।
तिसरें लक्ष्यलक्षण । अंगिकारिलें ॥५७॥
वस्तूचा एक मर्यादित भाग व्यापणारे एक लक्षण हेच तिचा अंश असे मानल्यास तिथे अंशअंशी संबंध दाखवता येईल. पण लक्षणाला अंश म्हणणे योग्य नाही. या कारणाने हे दोन्ही पर्याय नाकारल्यामुळे तिसरा लक्ष्य-लक्षण संबंध स्वीकारला आहे. (५७)

लक्ष्य एक लक्षणें आन । म्हणसी होय द्वैतपण ।
शब्दास्तवे दिसती भिन्न । परि एकार्थ असे ॥५८॥
लक्ष्य हे एक असून त्याची लक्षणे त्यापासून वेगळी आहेत त्यामुळे त्यांमध्ये द्वैत मानावे लागते असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की, 'लक्ष्य' आणि 'लक्षण' या शब्दांमुळे ते भित्र वाटत असले तरी त्यांचा अर्थ एकच आहे. (५८)

अनेक शब्द एकार्थी । शब्द पर्याय तया म्हणती ।
विप्र द्विजहि नामें असतीं । ब्राह्मणाचीं ॥५९॥
एकच अर्थ असलेले असे अनेक शब्द जेव्हा एखाद्या भाषेत दिसतात, तेव्हा त्यांना शब्दपर्याय किंवा पर्यायी शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, द्विज, विप्र हे पर्यायी शब्द एकाच ब्राह्मण या अर्थाचे निदर्शक होत. (५९)

नुसतें ब्रह्मचि बोधावें । तरि वेद ब्राह्मणा ब्रह्म नांवें ।
अतिव्याप्तीस्तव स्वभावें । लक्षणे सिद्ध ॥६०॥
ब्रह्म शब्दाने केवळ ब्रह्माचाच बोध व्हावा, पण वेदांना आणि ब्राह्मणांनाही 'ब्रह्म' असेच नाव आहे. म्हणजे ब्रह्म शब्द उच्चारताच ब्रह्माखेरीज इतर दोन्ही नावांचा बोध होतो म्हणजे येथे अतिव्याप्तीचा दोष येतो. म्हणून सत्, चित्, आनंद ही ब्रह्माची लक्षणे सिद्ध होतात. (६०)

सत् म्हणतां ब्रह्माच्या ठाईं । जडत्व ऐसें कल्पि कईं ।
तें निवारणार्थ ज्ञानाचि सोई । जें ब्रह्म चिद्रूप ॥६१॥
केवळ चिटपाला बा म्हणावे तर ब्रह्माला जड़त्व मानावे लागते. तसे होऊ नये म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी ही ज्ञानाची जोड देण्यासाठी ब्रह्माला चिद्‌रूप मानावे लागते. (६१)

ब्रह्म म्हणावें चिद्रूप । तरि वृत्ति ज्ञानापरि असद्रूप ।
होय म्हणून सच्चिद्रूप । ब्रह्म म्हणावें ॥६२॥
चिद्‌रूपाला ब्रह्म म्हणावे तर वृत्तिज्ञानाप्रमाणे ते असद्‌रूप ठरण्याची शक्यता होती. म्हणून ब्रह्माला 'सच्चिद्‌रूप' असे मानावे लागते. (६२)

जरी आनंदरूप नाहीं । मोक्ष पुरुषार्थ नसे कांही ।
अविद्यानिरासें आनंदही । प्राप्त साधका ॥६३॥
आता ब्रह्म जर आनंदरूप नसेल तर मोक्ष हा पुरुषार्थ मानता येणार नाही. पुरुषार्थासाठी काही उद्दिष्ट असावे लागते. आनंद नसेल तर साधकाची ब्रह्मप्राप्तीकडे प्रवृत्ती तरी कशी होईल ? अविद्येचा निरास झाल्याने साधकांना आनंद प्राप्त होतो. आनंद हेच ब्रह्मप्राप्तीचे प्रयोजन ठरते. (६३)

सच्चिदानंद हें लक्षण । लक्ष्य ब्रह्म हें परिपूर्ण ।
नांवे मात्र भिन्न भिन्न । वस्तु एक ॥६४॥
तेव्हा सच्चिदानंद हे ब्रह्माचे लक्षण असून परिपूर्ण ब्रह्म हे लक्ष्य आहे. त्या ब्रह्माची नावे मात्र भिन्न भिन्न असून सद्वस्तू मात्र एकच आहे. (६४)

परस्परेंहि एकार्थि । लक्ष्यासी लक्षणें मिळती ।
सद्ब्रह्म चिद्ब्रह्म म्हणती । आनंदही ब्रह्म ॥६५॥
ही लक्षणे आपापसात एकार्थी (एकाच अर्थाची) असून ती परब्रह्म या लक्ष्याला बरोबर लागू होतात. म्हणूनच सद्बह्म, चिद्ब्रह्म, आनंदब्रह्म अशी नावे ब्रह्मासाठी वापरता येतात. (६५)

ब्रह्मबोधार्थ ब्रह्मलक्षण । येथें नाहीं कीं दूषण ।
वस्तु अखंड दंडायमान । भेद कैंचा ॥६६॥
ब्रह्माचे ज्ञान व्हावे म्हणून तर ही ब्रह्मलक्षणे सांगावी लागतात. यात काही दोष नाही. या तीनही लक्षणांमध्ये एकच सद्वस्तू (ब्रह्म) व्यापून राहिलेली आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये काहीच भेद नाही. (६६)

प्रकाश उष्ण वर्तुळ । एकचि जैसें सूर्यमंडळ ।
अतिव्याप्ती होय केवळ । अग्निसी एकांश टाकितां ॥६७॥
प्रकाश, उष्ण, वाटोळे अशा तिन्ही लक्षणांनी निर्देश होणारे सूर्यमंडळ एकच असते. यातील वाटोळे हे लक्षण गाळले तर ते वर्णन अग्नीला लागू होईल व अतिव्याप्ती हा दोष येईल. (त्याचप्रमाणे बाकीच्या दोन लक्षणांबाबत समजावे. उष्णत्व हे लक्षण गाळले तर चंद्र असा बोध होईल व अतिव्याप्ती होईल. प्रकाश हे लक्षण गाळले तर उष्ण आणि प्रकाश या दोहोत साहचर्य असल्याने कोणतीही वस्तू सिद्ध होणार नाही. मग तेथे अव्याप्ती हा दोष येईल.) (६७)

एक एव अद्वितीय ब्रह्म । ऐसा श्रुतीचा अनुक्रम ।
त्रिविध भेदाचें नाम । खंडिले असे ॥६८॥
ब्रह्म हे एकटेच आणि अद्वितीय आहे, असे श्रुतीने सांगितले आहे. (एकमेवाद्वितीयं ब्रह्म) आणि त्यामुळे ब्रह्माच्या बाबतीत तीन प्रकारचे भेदही संभवत नाहीत. (सजातीय, विजातीय आणि स्वगत हे तीन भेद होत.) (६८)

एक म्हणतां सजातीय भेद । नाही हा श्रुतीचा अनुवाद ।
वस्तु अखंड अभेद । चित् दुसरें नाहीं ॥६९॥
एक या लक्षणाने ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद नाही असे श्रुती सांगते. सद्वस्तू अथवा ब्रह्म अखंड, भेदरहित असून चिद्वस्तू ही सद्वस्तूहून वेगळी नसून अभिन्न आहे. (६९)

एवं या अवधारणें । स्वगत भेदा खंडिले तेणें ।
निरवयवा बहुधा कोणें । कल्पावें हो ॥७०॥
अशा प्रकारे या निश्चित विधानाने ब्रह्माच्या ठिकाणी येणाऱ्या स्वगत भेदाचेही खंडन केलेआहे. जे मुळात निरवयव म्हणजे अवयवहीन आहे त्याच्या ठिकाणी बहुविध प्रकारांची कल्पना कोणाला करता येईल ? (७०)

श्रुति अद्वितीय ऐसें बोले । जड जाता निवारिलें ।
विजातीय भेदा खंडिलें। येणें रीती ॥७१॥
श्रुतीने ब्रह्माचे अद्वितीय असे दुसरेही लक्षण सांगितले आहे. त्यायोगे यच्चयावत जड पदार्थाचे तिने निरसन केले आहे. अशा प्रकारे ब्रह्माच्या बाबतीत विजातीय भेदाचेही तिने खंडन केले आहे. (७१)

अद्वैत ब्रह्म परिपूर्ण । तेथें कैचें लक्ष्य लक्षण ।
अनेकचि नाहीं एकपण । कोणें कोणा बोलावें ॥७२॥
ब्रह्म अद्वैत आणि परिपूर्ण असून तेथे लक्ष्य लक्षण हा भेदही खरे पाहता लागू होत नाही. जिथे अनेकत्वच नाही तिथे एकत्व तरी म्हणता येईल काय ? तेथे बोलणारा तरी कोण आणि ऐकणारा तरी कोण ? (७२)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ब्रह्मलक्षणनिर्धारे । प्रथमसमास: ॥१॥
हरिः ॐ तत्सत्




॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
मायाविद्याअविद्यावर्णन


सांगितलें ब्रह्म निर्गुण । जें व्यापक निश्चल परिपूर्ण ।
तेंचि जाणिजे ब्रह्मज्ञान । परि मायाही समजावी ॥१॥
आतापर्यंत निर्गुण, व्यापक, निश्चल, परिपूर्ण अशा ब्रह्माचे वर्णन केले त्यालाच ब्रह्मज्ञान असे जाणावे. पण त्याचबरोबर मायाही समजली पाहिजे. (१)

हिरियाचा व्हावया लाभ । गारा पाहाव्या आरंभ ।
तैसा जाणिजे स्वप्रभ । मायानिरासें ॥२॥
हिऱ्यांचा लाभ होण्यासाठी आरंभी गारा कशाला म्हणतात हे पाहिले पाहिजे. (हिरे व गारा यांत गारांचा त्याग करूनच हिऱ्यांची प्राप्ती होते.) त्याप्रमाणे मायेचे निरसन केल्यानंतरच स्वयंभू अशा ब्रह्माचे ज्ञान होते. (२)

न जाणतां नव्हे त्याग । म्हणुन मायेचा प्रसंग ।
निर्धार होतां इचा मग । निश्चय सत्याचा ॥३॥
जर माहितीच नसेल तर त्याग कसा करता येईल ? म्हणून मायेच्या वर्णनाची आवश्यकता वाटते. मायेच्या स्वरूपाचे निश्चित ज्ञान झाल्यानंतरच सत्य नेमके कशाला म्हणतात, याचा निश्चय होतो. (३)

माया मुळींच न संभवे । तरि निर्धारें काज नसावें ।
वंध्यापुत्रासी वधावें । कोण निमित्त ॥४॥
माया मुळातच उद्भवत नाही, अशी स्थिती असती तर सत्याचा निश्चय करण्याचे कारणच नव्हते. वांझेच्या पुत्राला ठार करण्यासाठी निमित्त शोधण्याची गरज आहे काय ? (४)

तरी ऐसी नव्हे मायाराणी । ब्रह्मादिकां न कळे करणी ।
शास्त्रें राहिली थोटाऊनी । अंत न लागे ॥५॥
पण मायाराणी अशी नाही आहे. मोठमोठ्या ब्रह्मादी देवांनासुद्धा तिची करणी कळत नाही. शास्त्रे तिच्यापुढे थोटी होऊन बसतात, त्यांना तिचा अंत लागत नाही. (५)

हे अनंताची अनंती । हे परब्रम्हाची शक्ति ।
सर्व जगाची स्थिति गती । इजवीण नाहीं ॥६॥
ही माया अनंताची अनंत शक्ती आहे. ती परब्रह्माची शक्ती आहे. सगळ्या जगाची स्थिती, गती (व्यवहार) हिच्यावाचून अडून बसतात. (६)

आपण जेथें प्रगटली । त्यासी निजऊन खेळे एकली ।
प्रकृती असुन जाली । पुरुषरूप आपण ॥७॥
ही माया अशी आहे, की ती जिथे जन्म घेते त्याला नष्ट करून एकटीच खेळत बसते. स्वतः प्रकृती असूनही स्वत:च पुरुषरूपही धारण करते. (७)

दुजेविण मांडिला भोग । अजत्वें उभविलें जग ।
नाना तत्त्वांची लगबग । एकपणा न मोडतां ॥८॥
ती दुसऱ्या कोणा पुरुषाची मदत न घेता उपभोग घेते व स्वत: न जन्मता जगाची उभारणी करते. स्वत:चे एकपण मोडू न देता निरनिराळ्या तत्त्वांची एकच गर्दी करून टाकते. (८)

आपण कामधेनु जाली । जीवेश वत्सा प्रसवली ।
दुग्धपान करऊं लागली । द्वैताचें येथेष्ट ॥९॥
ती स्वत: कामधेनू बनली, तिने जीव आणि ईश्वर या वासरांना जन्म दिला आणि त्यांना द्वैतभावनारूपी दूध हवे तितके पाजू लागली. (९)

इच्या स्वरूपाची मर्यादा । बोलतां शीण जाला वेदा ।
कोण पडे इच्या छंदा । अघटनही घडवी ॥१०॥
हिच्या स्वरूपाची व्याप्ती करता करता वेदांना शीण आला. अघटित (कधीही न घडलेले) असे घडवण्याऱ्या हिच्या नादी कोण लागेल ? (१०)

असो इचा निर्धार । कळला पाहिजे साचार ।
श्रुति युक्ति लौकिक प्रकार । तीन जाणावे ॥११॥
तेव्हा हिच्या स्वरूपाचा निश्चय तर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्यासाठी श्रुती (वेदाचा आधार अथवा वेदप्रामाण्य) , युक्ती (म्हणजे अनुमान) आणि लौकिक (म्हणजे लोकव्यवहार) असे तीन प्रकार आहेत. (११)

तुच्छ आणि अनिर्वचनी । वास्तव असे मायाराणी ।
ऐका ते सावध होउनी । प्रमाणसिद्ध ॥१२॥
माया ही तुच्छ (तिरस्करणीय) , अनिर्वचनीय (वर्णन करता न येणारी) आणि वास्तव अशी आहे. ही तिची लक्षणे प्रमाणसिद्ध असून ती सावध होऊन ऐका. (१२)

तुच्छत्वें माया कैसी । जें रूपचि नाहीं इयेसी ।
अस्ति भाति प्रियत्वासी । व्यवहार इचा ॥१३॥
माया ही तिरस्करणीय कशी ? तर हिला रूपच नाही. तरी हिचा व्यवहार असणे, दिसणे आणि सुख या गुणांनी होतो. (१३)

शुक्तिकेच्या ठाई काहीं । रजत तिळभरी नाहीं ।
असणें दिसणें सर्वही । शुक्तिका एक ॥१४॥
शिंपला असतो त्याच्यामध्ये चांदी अजिबात नसते. तिथे असणे, दिसणे, सुखकारक होणे या तिन्ही गोष्टी शिंपल्याच्याच असतात. (१४)

शुक्तिका करून एकीकडे । रजत ताजवां न सांपडे ।
अस्ति भातिवीण निवडे । कैसी माया ॥१५॥
शिंपला जर बाजूला काढला तर त्याच्यात दिसणारी जी चांदी असते ती काही तराजूने तोलता येत नाही आणि दिसणेही तिथे उरत नसल्याने असणे आणि दिसणे या दोन्ही गोष्टी तिथे संभवत नाहीत. असणे आणि दिसणे या गुणांशिवाय मायेचा निवाडा कसा करता येईल ? (१५)

अस्तित्व ब्रह्मीचें काढावें । चिद्रूप दिसणें त्यागावें ।
मायेचे रूप धुंडावें । मग तें कैसें ॥१६॥
त्याप्रमाणे मुळात ब्रह्माचे ठिकाणी असणे, दिसणे आणि सुखरूपता ही लक्षणे आहेत. त्यातील असणे हे लक्षण काढून घेतले, त्याचे चिद्‌रूप म्हणजे भातित्व, त्याचा त्याग केला तर मग मायेचे रूप कसे शोधावे ? (१६)

तेथें तरी कांही नाही । शून्यापरी निस्तत्व तेंहि ।
माया निर्धारिंसि पाहिं । तुच्छत्वरूप ॥१७॥
मायेच्या ठिकाणी तर यांपैकी काहीच नाही. तीही शून्य कल्पनेप्रमाणे निःसत्त्व आहे. त्यामुळे माया ही निश्चितपणे तिरस्करणीय ठरते. (१७)

माया जाण अनिर्वचनीय । जेथें युक्ति क्षीण होय ।
नव्हे मायेचा निश्चय । नाना विकल्पीं ॥१८॥
माया अनिर्वचनीय आहे, हे समजून घे. मायेपुढे युक्तिवाद क्षीण पडतो. कितीही पर्याय पुढे केले तरी मायेचा निश्चय होऊ शकत नाही. (मायेचे नेमके स्वरूप कळत नाही.) (१८)

माया भिन्न कीं अभिन्न । अथवा म्हणावी भिन्नाभिन्न ।
कीं भिन्नाभिन्नविलक्षण । तेहि नाहीं ॥१९॥
माया ब्रह्मापासून भिन्न आहे की अभिन्न आहे ? अथवा ती भित्रही आहे आणि अभिन्नही आहे, अशी उभयस्वरूपी आहे ? किंवा भित्रही नाही, अभित्रही नाही, अथवा भित्राभित्र अशी उभयस्वरूपीही नाही ? तर तसेही म्हणता येत नाही. (१९)

सावयव ना निरवयव । उभयात्मक उभयहीन वाव ।
सत् कीं असत् नांव । घेतलें न वचे ॥२०॥
माया सावयव (अवयवांसहित) नाही, की अवयवविरहितही नाही, ती उभयात्मक (दोन्ही प्रकारची) आहे असेही म्हणता येत नाही. अथवा ती उभयहीन म्हणजे भिन्नही नाही, अभिन्नही नाही आणि उभयस्वरूपी नसणारीही नाही. तिच्याबाबतीत यापैकी काहीच बोलता येत नाही. तसेच सत् आणि असत् अशी परिभाषाही तिला लागू पडत नाही. (ती सत् नाही. असत् नाही. सदसत् नाही की सदसद्विलक्षणही नाही.) तिच्याबाबतीत याप्रकारचे नाव घेताच येत नाही. (२०)

सदसत् उभयात्मक नसे । उभय विलक्षण काइसें ।
आतां हेंचि कैसें । निवडून दावूं ॥२१॥
ती सत्, असत् आणि उभयात्मक यांपैकी काहीच नाही, तर मग ती उभयविलक्षणही कशी असू शकेल ? आता हेच स्पष्ट करून सांगू. (२१)

माया म्हणावी भिन्न । तरी हे ब्रह्मशक्ती गहन ।
निवडितां नये एक क्षण । स्वरूपा वेगळी ॥२२॥
माया जर भिन्न म्हणावी तर ब्रह्माची शक्ती असणारी ही माया इतकी गूढ आहे की ब्रह्मस्वरूपापासून ती क्षणभरही वेगळी काढता येत नाही. (२२)

शुक्तितेहून रजतासी । काढितां नये निश्चयेसी ।
सच्चिद्रूपीं माया तैसी । भिन्न नव्हे ॥२३॥
शिंपल्यापासून त्यावर दिसणारी चांदी वेगळी कधीच काढता येत नाही, त्याप्रमाणे सच्चिद्‌रूप ब्रह्मापासून माया भिन्न नसते. (२३)

जरी म्हणावी अभिन्न । तरी सर्वदां नसे विद्यमान ।
शक्ताची शक्ती असे जाण । कार्यानुमेय ॥२४॥
जर ती ब्रह्मापासून अभिन्न आहे असे म्हटले तर ती नेहमी विद्यमान नसते. शक्तिमंताची जी शक्ती असते ती तिच्या कार्यावरून अनुमानाने कळत असते. (२४)

अग्नि असे सर्व काळ । तेथें शक्ति नसे सर्व वेळ ।
फोड येतां निवळ । कळूं येती ॥२५॥
अनी सर्व काळ असला तरी जाळण्याची शक्ती त्याजवळ सर्वकाळ नसते. हाताला फोड आल्यावरच ती लक्षात येते. (२५)

तैसे जगत्कार्य जयेचें । तें रूप नव्हे शक्ताचें ।
जरी म्हणावें स्वरूपाचें । तरी सर्वदां नाहीं ॥२६॥
ज्या मायेचे जगत् हे कार्य आहे, ते शक्तिमंत ब्रह्माचे स्वरूप नाही. ते ब्रह्माचेच स्वरूप आहे असे म्हटले तर ते (जगत्) सर्व काळ असत नाही. ब्रह्म मात्र सर्व काळ असते. (२६)

कार्यामुळें शक्ति आहे । वेगळी तो शक्त नव्हे ।
स्वीकार वेगळेपणें आहे । अवश्य भिन्न ॥२७॥
स्वतंत्रपणे जगनिर्मितीला समर्थ नाही. तिचा वेगळेपणाने स्वीकार करता आला असता तर तिला भिन्न आहे असे अवश्य म्हणता आले असते. (२७)

म्हणून अभिन्न माया नाहीं । उभयात्मक विरोध पाहीं ।
अंधार आणि प्रकाश कांही । एकत्र नसे ॥२८॥
म्हणून माया अभित्र नाही. आता उभयविध म्हणजे भिन्नाभिन्न आहे असे म्हटले तरी विरोध येतो. अंधार आणि प्रकाश हे एकत्र राहात नाहीत. (२८)

भिन्नाभिन्नविलक्षण । येणेंहि बोलें दूषण ।
म्हणोनियां वचन । बोलतां नये ॥२९॥
जगदूपी कार्यावरून ती ब्रह्माची शक्ती आहे असे अनुमानाने ठरवता आले तरी ती मायेला भिन्नाभिन्न विलक्षण म्हणजे भित्रही नाही आणि अभिन्नही असे म्हटले तर तसे म्हणण्यातही दूषण येते. म्हणून तशाप्रकारचे विधान करता येत नाही. (२९)

सावयव माया म्हणावी । तरी अरूपा कोणें पाहावी ।
कार्य न दिसे न दिसावी । शक्ति अग्नीची ॥३०॥
माया सावयव आहे असे म्हणावे तर ती रूपहीन असल्यामुळे तिला कोठे पहावे ? तिचे कार्य दिसते पण ती दिसत नाही. अग्नीची शक्ती दिसत नाही, पण तिचे कार्य मात्र दिसते. तसेच हे आहे. (३०)

जग कांही माया नव्हे । जग जिचें कार्य आहे ।
तयेसी कोण पाहताहे । अरूपा ती ॥३१॥
जगाला माया म्हणून संबोधता येणार नाही, मग जग जिचे कार्य आहे त्या मायेला कोण पाहू शकेल ? अर्थात् कोणालाही ते शक्य नाही. म्हणून ती अरूप अशीच आहे. जिला रूपच नाही ती माया सावयव कशी म्हणता येईल ? (३१)

निरवयव म्हणावी माया । तरी सावयवता जगत्कार्या ।
मृगजळीं पिकती जैसिया । साळि केळी ॥३२॥
आता मायेला निरवयव म्हणावे तर तिचे कार्य असलेले जग सावयव आहे. मृगजळापासून साळी केळी कशा पिकतील ? (निरवयवापासून सावयव सृष्टी कशी निर्माण होईल ?) (३२)

सावयव निरावयव उभय । हें विरोधि बोलतां नये ।
उभयहीन तो न होय । पदार्थ कोठें ॥३३॥
माया सावयवही आहे आणि निरवयवही आहे असे परस्परविरोधी विधान करता येत नाही आणि ती उभयहीन म्हणजे सावयवही नाही आणि निरवयवही नाही असेही म्हणता येणार नाही. कारण असा दोन्ही गुणधर्महीन पदार्थ कोठेही मिळणार नाही. (३३)

माया सत् कां न म्हणा । तरी प्रवर्तलीं शास्त्रें नाना ।
गुरु शास्त्र विचारणा । मायानिरासार्थ ॥३४॥
मायेला सत् का म्हणू नये ? याचे उत्तर असे की माया सत् नाही हे सांगणारी अनेक शास्त्रे निर्माण झाली आहेत. निरनिराळी शास्त्रे, सद्गुरू आणि निरनिराळ्या विचारप्रणाली ही सर्व मायेच्या निरासासाठीच उत्पन्न झाली आहेत. (३४)

माया सत् जरी असती । तरी स्वानुभवें न निरसती ।
साधका ब्रम्हप्राप्ती । कैसेंनी होय ॥३५॥
माया जर सत् असती तर स्वानुभवाने तिचे निरसन झालेच नसते. तसेच मायेचे निरसन झाल्यानंतरच प्राप्त होणारी ब्रह्मप्राप्ती साधकाला कशी काय झाली असती ? (३५)

आतां तरी माया असत् । तरी जगत्कार्य दिसत ।
नाभाव परिणमत । न्यायार्थ ऐसा ॥३६॥
आता मायेला असत् म्हटले तर जगताच्या रूपाने तिचे कार्य दिसते आहे. अभावातून काहीच परिणाम निष्पन्न होत नाही, असा न्यायशास्त्राचा अभिप्राय आहे. (३६)

म्हणून असत् म्हणतां नये । सदसत् विरोध होय ।
विलक्षण सदसत् उभय । तिसरें नाहीं ॥३७॥
म्हणून मायेला असत् म्हणता येणार नाही. ती सत् आणि असत् अशी उभयस्वरूपी आहे असे म्हणण्यात विरोध आहे. तसेच ती सत् आणि असत् या दोहोहून वेगळी आहे असेही म्हणता येत नाही. कारण असा तिसरा पदार्थच संभवत नाही. (३७)

एवं द्वादश विकल्प होतां । मृगजळा नये निर्धारितां ।
या परि अनिर्वचनीयता । मायेसि असे ॥३८॥
अशा प्रकारचे बारा विकल्प जरी पुढे ठेवले तरी मृगजळाचे अस्तित्व सिद्ध करता येणार नाही. त्याप्रमाणेच माया ही अनिर्वचनीय आहे असेच म्हणणे क्रमप्राप्त ठरते. (३८)

ब्रह्म माया अनिर्वचनी । एकार्थ मानितील कोणी ।
ये विशी दृष्टांत देऊनी । साम्य मोडिलें ॥३९॥
आता ब्रह्मही अनिर्वचनीय आहे, मायाही अनिर्वचनीय आहे. तेव्हा ही दोन्ही तत्त्वे एकच आहेत असे कोणी मानतील तर त्यासाठी दृष्टान्ताच्या साहाय्याने त्यांचे साम्य मोडून काढता येईल. (३९)

साखर गोड नये सांगतां । मृगजळही नये बोलतां ।
साकर ब्रह्म तत्वता । माया मृगगजळ ॥४०॥
साखर गोड आहे. ती कशी गोड आहे हे सांगता येत नाही. म्हणून ती अनिर्वचनीय आहे. तद्वत् मृगजळाबद्दलही काही बोलता येत नाही. म्हणून तेही अनिर्वचनीय आहे. पण त्यामुळे साखर आणि मृगजळ एकच ठरणार नाहीत. साखरेची गोडी आपण चाखू शकतो. मृगजळात भिजल्याचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. ब्रह्म हे साखरेच्या अनुभवासारखे आहे. माया ही मृगजळाच्या अनुभवासारखी आहे, (असे समजावे.) (४०)

मृगजळा नव्हे विकल्प । इतुकेनें नव्हे वास्तवरूप ।
मृगचि मानिती अल्प । बुद्धिहीन ते ॥४१॥
मृगजळाला सत्, असत्, सदसत्, सदसद्विलक्षण असा कुठलाच विकल्प लागू होत नाही म्हणून त्याला वास्तवपणा येत नाही. मात्र हरिण त्याला वास्तव मानतात, कारण ते अल्पबुद्धीचे अथवा बुद्धिहीन असतात. (४१)

तैसे सांसारिक जन । तया माया सत्य हें वचन ।
व्यवहार नव्हे शक्तिवीण । लौकिकीं सत्य ॥४२॥
त्याप्रमाणे सांसारिक जनांना माया सत्य आहे हे वचन मान्य होते. कारण प्रापंचिक व्यवहार अशा अनिर्वचनीय शक्तीवाचून होत नाही, हे लौकिक सत्य आहे. (४२)

तुच्छ म्हणतसे श्रुती । अनिर्वचनी नाना युक्ति ।
वास्तव ते लोकरीती । त्रिविधा माया ॥४३॥
वेद मायेला तुच्छ (तिरस्करणीय, त्याज्य) मानतात, निरनिराळ्या युक्तिवादांनी ती अनिर्वचनीय ठरते आणि लोक व्यवहारात ती सत्य ठरते. अशी ही माया तीन प्रकारची आहे. (४३)

हे अज्ञानीं नांदत । ज्ञानी अंग न धरित ।
स्वानुभवें असेना सत् । साधका ब्रह्मप्राप्ति ॥४४॥
ही माया अज्ञानामध्ये (सुखाने) राहाते. पण ज्ञानामध्ये तिला अस्तित्व नसते. स्वानुभवाने ती सत् नाही असे ठरते. (मायेचा नाश झाला की) साधकाला ब्रह्मप्राप्ती होतेच. (४४)

जालें मायेचे निरूपण । विद्या अविद्या शक्ति दोन ।
विद्या म्हणजे ज्ञान । अज्ञान अविद्या ॥४५॥
मायेचे निरूपण झाले. आता मायेच्या विद्या आणि अविद्या अशा दोन शक्ती आहेत. विद्या म्हणजे ज्ञान असून अविद्या म्हणजे अज्ञान होय. (४५)

रज्जूचें जें आच्छादन । आवरण शक्ति अभिधान ।
सर्पाचें जें उत्पादन । ते विक्षेप शक्ति ॥४६॥
सर्प आणि दोरी या प्रसिद्ध दृष्टान्तामधील दोरी झाकली जाते या प्रकाराला आवरणशक्ती असे नाव आहे आणि दोरीच्या जागी जो सर्प दिसतो त्याला विक्षेपशक्ती असे म्हणतात. (४६)

स्वरूपासि जे आवरक । दुसीर जगदुत्पादक ।
आवरण आणि विक्षेपक । शक्ति अनादि दोन्ही ॥४७॥
आवरणशक्ती ब्रह्मस्वरूपावर आवरण घालते, तर विक्षेपशक्ती ही त्या जागी जगाची उत्पत्ती करते. अशा या आवरक आणि विक्षेपक दोन शक्ती अनादी (आरंभरहित) आहेत. (४७)

आवरण शक्ति अविद्या । विक्षेप शक्ति ते विद्या ।
उभयें व्यापिले साद्या । जीव मात्र ॥४८॥
आवरणशक्ती म्हणजेच अविद्या आणि विक्षेपशक्ती ही विद्या होय. या दोन्ही शक्तींनी सर्व जीवांना व्यापून टाकले आहे. (४८)

विक्षेप शक्ति ज्ञान । न स्वीकारिजें वचन ।
तरी जडासी नव्हे चळण । जगदांध्य प्रसंग ॥४९॥
विक्षेप शक्ती म्हणजे ज्ञान होय. हे म्हणणे मान्य केले नाही तर जडाच्या ठिकाणी हालचाल उत्पन्न होणार नाही आणि जगदांध्य म्हणजे जंगमाच्या ठिकाणी जाणीव राहणार नाही. (४९)

म्हणोनि विद्या विक्षेप शक्ति । जयेतें शुद्धसत्वा म्हणती ।
असो आवरण शक्तीची गती । सांगणे नलगे ॥५०॥
म्हणून विद्या ही विक्षेपशक्ती मानावी लागते. तिला शुद्धसत्त्वा असे म्हणतात. हे असो. आता आवरणशक्तीचे कार्य वेगळे सांगण्याची गरज नाही. (५०)

मी जीव मज अज्ञान । मज आहे जन्म मरण ।
ऐसे जीव भुलले जीचेनें । मळिणसत्व अविद्या ॥५१॥
मी जीव आहे. माझ्या ठिकाणी अज्ञान आहे, मला जन्म-मरण आहेत असा भ्रम जीवांना जिच्यामुळे होतो ती आवरणशक्तिरूप अविद्या होय. तिला मलिन सत्त्वा (रजतमयुक्त) असे म्हणतात. (५१)

न होतां अविद्यानिरसन । कैचें होय स्वानुभव ज्ञान ।
मोक्ष नव्हे ज्ञानेंविण । ज्ञान पावन सर्वांसी ॥५२॥
या अविद्येचे निरसन झाले नाही तर स्वानुभवाचे ज्ञान कसे होईल ? ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणार नाही. ज्ञान हे सर्वांसाठीच पवित्र आहे. (५२)

अविद्या हे अनादि । कांही जयते नसे आदि ।
परि हे ज्ञानासी विरोधी । तेजा तम जैसें ॥५३॥
अविद्या ही अनादी आहे, कारण तिला आरंभ नाही, प्रकाशाला जसा अंधकार त्याप्रमाणे ती विद्येला म्हणजे ज्ञानाला विरोधी आहे. (५३)

स्वस्वरूप स्वयंप्रकाश । तेथें तमा कैसा अवकाश ।
करुनिया आशंकेस । बोलता जाला ॥५४॥
स्वस्वरूप तर स्वयंप्रकाशी आहे, तेथे अंधाराला वाव कोठून असणार ? अशी शंका कोणी व्यक्त केली तर त्याचे स्पष्टीकरण असे (५४)

स्वरूप सर्वां अविरोध । नसे पदार्थमात्रीं विरोध ।
आकाश जैसें स्वत:सिद्ध । तेजा तमासी ॥५५॥
स्वरूप म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कोणासही विरोध नाही. सर्व पदार्थ त्यात सामावू शकतात. आकाशात प्रकाशाला, अंधाराला सारखाच वाव आहे. (५५)

आकाश सर्वांसी व्यापक । जगत् जितुकें अनेक ।
होतां जातां अलेपक । निश्चल जैसें ॥५६॥
आकाश सर्व पदार्थांना व्यापून असते. जगामध्ये जे जे अनेक पदार्थ उत्पन्न होतात, नष्ट होतात त्या सर्वांपासून आकाश अलिप्त असते, निलेप असते आणि ते सर्वदा निश्चल राहाते. (५६)

तैसें जें जें उद्भवलें । तितुकें स्वरूपींच वर्तलें ।
अस्तिभातिविण राहिलें । न वचे कदा ॥५७॥
त्याप्रमाणे जे जे पदार्थ उत्पन्न होतात. ते सर्व ब्रह्मातच राहतात. यांमध्ये ब्रह्माचीच अस्ति-भाति-प्रियत्व ही लक्षणे असतात. त्यांवाचून त्यांना अस्तित्वच मिळू शकत नाही. (५७)

मूळमायेपासून भूमि । पावेतों तत्वें अनुक्रमीं ।
या सर्वाची वास्तव भूमि । जें अधिष्ठान ब्रह्म ॥५८॥
मूळमायेपासून भूमीपर्यंत जी तत्त्वे क्रमश: निर्माण झाली त्या सर्वांची मूळ आधारभूमी हे अधिष्ठान ब्रह्मच आहे. (५८)

तेजातमा विरोध असे । ज्ञानाज्ञाना एकत्व नसे ।
ज्ञान होतां अपैसें । अज्ञानहानी ॥५९॥
तेज आणि अंधकार यांच्यात विरोध आहे. ज्ञान-अज्ञान ही एक नव्हेत. ज्ञान प्राप्त होताच आपोआपच अज्ञानाचा नाश होणारच. (५९)

बहुता काळाचें विवर । कोंडिलें असतां अंधार ।
तेथे नलगे कीं उशीर । दीप लावितां नासे ॥६०॥
एखादे विवर पुष्कळ दिवस बंद करून ठेवले तर त्यात दाटून राहिलेला अंधार दिवा लावताक्षणीच नष्ट होतो. (६०)

जेचक्षणीं ज्ञान होय । तेच क्षणी अज्ञान जाय ।
म्हणून ज्ञानाचा उपाय । साधकीं योजावा ॥६१॥
त्याप्रमाणे ज्या क्षणी ज्ञान होते त्याच क्षणी अज्ञान नाहीसे होते. म्हणून साधकाने ज्ञानाचाच मार्ग धरावा. (६१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
मायाविद्याअविद्यावर्णनानुकारे । द्वितीयसमास: ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
ईशनिर्धार


आकाशीं वायूचें चलण । तैसें परब्रह्मीं स्फुरण ।
चंचली बिंबले चैतन्य । तोचि ईश्वर ॥१॥
आकाशात वायूची झुळूक निर्माण होते, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी जी स्फूर्ती निर्माण होते, त्या चंचल स्फूर्तीमध्ये जो चैतन्याचा भाग प्रतिबिंबित होतो त्यास ईश्वर म्हणतात. (१)

मायेमध्यें व्यापिलें । तें सगुण ब्रह्म बोलिलें ।
मायागुणें त्यासी आलें । सर्वज्ञपण ॥२॥
तो भाग मायेने व्यापलेला असल्यामुळे त्यास सगुण ब्रह्म असे म्हणतात. मायेच्या योगाने त्याच्या ठिकाणी सर्वज्ञपण येते. (२)

सर्व पुरींचा ईश । म्हणोनि नामें पुरुष ।
जगदिच्छा जयास । जगदीश ऐसें ॥३॥
त्याला पुरुष नाव पडण्याचे कारण तो सर्व प्रींचा ईश म्हणजे स्वामी असतो. त्याला जगत् निर्माण करण्याची इच्छा होते म्हणून त्यास जगदीश असे म्हणतात. (३)

सर्व जगातें नियमन । सर्वांतरीं राहुन ।
करी नियंता आपण । अंतर्यामित्वें ॥४॥
तो सर्व जगाचा नियामक असून तो सर्वांच्या अंतर्यामी राहून जगाचे नियमन करत असतो. (४)

ऐसिया अनंत श्रुती । यातें जगदीश्वर म्हणती ।
विक्षेपादि अनंत शक्ति । वर्तवितो सर्वज्ञ ॥५॥
अशाप्रकारे अनंत श्रुती (वेद) याला जगदीश्वर म्हणतात. तो सर्वज्ञ असून विक्षेपादी (मूळ स्वरूपाला झाकून टाकते ती आवरणशक्ती आणि त्या जागी नवीन रूपाची निर्मिती करते ती विक्षेप शक्ती) अनंत शक्तींचे चालन करतो. (५)

येथें शास्त्राचें भांडण । मतें स्थापिती अनान ।
आणि लौकिकीही जन । विपरीत भाविती ॥६॥
ईश्वराच्या स्वरूपाबद्दल आणि कार्याबद्दल अनेक शास्त्रे आपापसात भांडत आहेत. शास्त्रे आपापली भिन्न भिन्न मते पुढे मांडत आहेत. त्याचप्रमाणे लौकिक व्यवहारातही सर्व लोक परस्परविरुद्ध कल्पना करत आहेत. (६)

व्हावया मतें खंडण । कीजें सर्वही निरूपण ।
करिती ईश्वर अनुवादन । आवडी सारिखें ॥७॥
इतरांच्या मताचे खंडन करण्यासाठी सर्वजण स्वत:चे निरूपण करतात. ते आपल्या आवडीनुसार ईश्वराचे प्रतिपादन करत असतात. (७)

अनंत करचरण । अनंत जयाचें वदन ।
स्वर्गादि हें त्रिभुवन । अवयव जया ॥८॥
ईश्वराला अनंत हात आहेत, अनंत पाय आहेत. त्याला अनंत तोंडे आहेत. स्वर्ग इत्यादी सर्व लोक हे त्याचे अवयव आहेत. (८)

पुरुषसूक्तीं बोलिला । श्रुतिप्रमाण असे याला ।
आणि अर्जुनें अवलोकिला । श्रीकृष्णकृपें ॥९॥
पुरुषसूक्तामध्ये वरीलप्रमाणे त्याचे वर्णन केले आहे. त्या वर्णनाला वेदाची मान्यता आहे आणि अर्जुनाने श्रीकृष्णाच्या कृपेने त्याचे प्रत्यक्ष अवलोकन केले आहे. (पहा-भगवद्गीता अ. ११वा) (९)

ऐसा हा विराट पुरुष । हाचि सर्वांचा ईश ।
विराळवादी म्हणती यास । जगदीश्वर ॥१०॥
असा हा विराट पुरुष असन तोच सर्वांचा ईश्वर आहे. विराळवादी लोक त्याला जगदीश्वर म्हणतात. (१०)

हैरण्यगर्भ म्हणें हें कैसे । दृश्यासी ईश्वरत्व काइसें ।
जेणें ब्रह्मांड चळतसे । तो सूत्रात्मा ईश्वरू ॥११॥
हिरण्यगर्भ पक्षाचे लोक म्हणतात, हे कसे शक्य आहे ? जे दृश्य आहे त्याला ईश्वर कसे मानता येईल ? माळेमधील सूत्राप्रमाणे सर्वांच्या अंतर्यामी राहून जगाचे जो नियमन करतो त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. तो अंतर्यामी हाच ईश्वर आहे. (११)

सर्व मणीयांत सूत्र असे । जडीं चलण जें होतसें ।
सूक्ष्म चांचल्यत्व जया असे । हिरण्यगर्भ ईश्वरू ॥१२॥
सर्व मण्यांमध्ये जसे एकच सूत्र अनुस्यूत असते, त्याप्रमाणे सर्व दृश्य सृष्टीला जो व्यापून असतो तोच हिरण्यगर्भ होय. त्याच्या योगानेच जड पदार्थांमध्ये सुद्धा चलनवलन होते (वारा वाहतो, नदी वाहाते, पृथ्वी स्वत:भोवती व सूर्याभोवती भ्रमण करते इत्यादी.) जो सर्व पदार्थांना सूक्ष्म रूपाने व्यापून असतो, जो चंचल असतो त्याला हिरण्यगर्भ, ईश्वर असे म्हणतात, (१२)

एक म्हणती सृष्टि चलण । दोहोंसी अव्याकृत कारण ।
तयासी ईश्वर अभिधान । दुजिया नाहीं ॥१३॥
काहीजण म्हणतात की, सृष्टी आणि चलनवलनाचा व्यापार यांच्यामागे जे अव्याकृत अनिर्वचनीय कारण असते त्यालाच ईश्वर असे म्हणावे. इतर कुठल्याही पदार्थाला ते नाव देता येत नाही. (१३)

एक म्हणे माया ईश्वरू । जें जग जयेचा विस्तारू ।
अर्धनारी नटेश्वरू । दुजा नाहीं ॥१४॥
दुसरे काहीजण म्हणतात की, माया हाच ईश्वर आहे. हे जग तिचाच विस्तार आहे. ती अर्धनारीनटेश्वर आहे. दुसरे कोणी नाही. (१४)

एक म्हणे सृष्टि उत्पत्ति । परमाणु पासून होती ।
म्हणोनि ईश्वरू आणिकाप्रती । बोलोंच नये ॥१५॥
दुसरे लोक असे म्हणतात की, सृष्टीची उत्पत्ती परमाणूंपासून होते. म्हणून यांच्याखेरीज इतरांना ईश्वर म्हणूच नये. (१५)

एक म्हणती चतुरानन । करी सृष्टीचें सृजन ।
ईश्वर तरी त्याहुन । कोण असे ॥१६॥
काहीजण म्हणतात की, ब्रह्मदेव हाच सृष्टीची उत्पत्ती करतो. मग ईश्वर त्याच्याखेरीज दुसरा कोण असणार ? (१६)

जेव्हा ब्रह्मया संकट पडिलें । तेव्हां विष्णूचें स्मरण केलें ।
नाना अवतार धरिले । पाळिलें त्रैलोक्य ॥१७॥
दुसरे काहीजण म्हणतात, जेव्हा जेव्हा ब्रह्मदेवाला संकट पडले, तेव्हा तेव्हा त्याने विष्णूचे स्मरण केले. त्यानेही त्याच्या विनंतीवरून अनेक अवतार धारण केले आणि त्रैलोक्याचे पालन केले. (१७)

जे जे भक्त पृथ्वीवरि । तयासि नाना संकटीं तारी ।
ईश्वरू हा निर्धारि । विष्णूच एक ॥१८॥
पृथ्वीवर जे जे त्याचे भक्त झाले, त्यांना त्याने संकटांतून पार पाडले. त्यामुळे निश्चितपणे हा विष्णूच एकमेव ईश्वर आहे. (१८)

जेव्हां विष प्रगटलें । तेव्हां विष्णूनें स्मरण केलें ।
मग सदाशिवें प्राशिलें । सर्वही विष ॥१९॥
दुसरे काहीजण म्हणतात, क्षीरसागराच्या मंथनाच्या प्रसंगी जेव्हा विष प्रगट झाले, तेव्हा विष्णूने शंकरांचे स्मरण केले. तेव्हा सदाशिव श्रीशंकरांनीच सर्व विष प्राशन केले. (१९)

तेव्हां पंचवदन ईश्वरू । हाचि करिती निर्धारू ।
तोही स्मरला विघ्नहरु । त्रिपुरवधा जातां ॥२०॥
तेव्हा पंचमुखी श्रीशिवशंकर हाच खरा ईश्वर आहे, असा ते निश्चय करतात. मग दुसरे म्हणतात की, त्रिपुरांचा वध करण्यासाठी जात असता त्यालाही विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे स्मरण करावे लागले. (२०)

ईश्वरु तो गणपति । गाणपत्य म्हणती ।
शाक्त म्हणती । शक्ति सर्वेश्वरु ॥२१॥
तेव्हा गणपती हाच खरा ईश्वर आहे, असे गाणपत्यांचे म्हणजे गणपतिभक्तांचे मत आहे. याउलट शक्तीचे उपासक जे शाक्त ते म्हणतात की, शक्ती हीच सर्वेश्वर आहे. (२१)

सौर म्हणती सूर्य नारायण । एक म्हणे सहस्त्रनयन ।
ईश्वरू हा सूर्यनंदन । दंडकर्ता ॥२२॥
सूर्याचे उपासक असलेले सौर म्हणतात की, सूर्य नारायण हाच खरा ईश्वर होय, तर दुसरे म्हणतात की, हजार डोळे असलेला इंद्र हाच परमेश्वर आहे. तर इतर काहीजण म्हणतात की, मनुष्यांच्या पापपुण्यांचा हिशेब ठेवून मृत्यूनंतर त्यांना शिक्षा करणारा सूर्यपुत्र यमराज हाच खरा ईश्वर आहे. (२२)

एक म्हणती प्रारब्ध । एक म्हणे आकाश शब्द ।
एक म्हणती वायू प्रसिद्ध । सर्वा चाळक ॥२३॥
काही म्हणतात, प्रारब्ध हेच ईश्वर आहे. कोणी आकाशाला ईश्वर मानतात, कोणी शब्द हाच ईश्वर मानतात, तर कोणी सर्वांचा चालक म्हणून प्रसिद्ध असलेला वायू हाच ईश्वर आहे असे मानतात. (२३)

एक म्हणती अग्निदेव । एक म्हणती आपोदेव ।
एक म्हणती धरी सर्व । वसुंधरा ॥२४॥
काही जण अग्रीला देव मानतात, काही जण आप म्हणजे जल ही देवता मानतात, तर काही जण पृथ्वी ही सर्वांना धारण करते म्हणून तिलाच देव मानतात. (२४)

पृथ्वी उचलिता शेष । तोचि सर्वांचा ईश ।
कूर्म वराह सावकाश । म्हणती कोणी ॥२५॥
काही जण शेष हा सर्व पृथ्वीचा भार उचलतो म्हणून त्यालाच सर्वांचा ईश्वर मानतात. काही जण कासव, वराह या अवतारांना ईश्वर मानतात. (२५)

मल्हारी भैरव वेताळ । भूमंडळीचे देव सकळ ।
किती करिती कोल्हाळ । आपुलाले परी ॥२६॥
याप्रमाणे मल्हारी, भैरव, वेताळ इत्यादी पृथ्वीवरच्या सर्व देवांना आपापल्या परीने मोठा गलका करून ईश्वर मानण्याचा अट्टाहास कित्येक लोक करत आहेत. (२६)

तुळसी पिंपळ पळस । पूजिताती सावकाश ।
किती सांगावे पाषाणास । धातुपूजन करिती ॥२७॥
काही लोक शांतपणे तुळस, पिंपळ, पळस या वृक्षांचीही ईश्वर म्हणून पूजा करतात. आता आणखी किती सांगावे ? निरनिराळे लोक पाषाण, धातू यांचीही पूजा करतात. (२७)

कुदळी पानें तृण । अवघियांचें करिती पूजन ।
म्हणती आम्हां ईशान । बहु भाग्य देतो ॥२८॥
काही जण कुदळी, पाने, गवत यांची पूजा करतात. ते म्हणतात की आम्हाला आमचा ईश्वर पुष्कळ भाग्य देतो. (२८)

आवडी सारिखें बोलती । जे ते वादा प्रवर्तती ।
आपुलेंचि खरें म्हणती । इतर तें खोटें ॥२९॥
प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे बोलतो. आपले म्हणणे कोणी ऐकले नाही तर विवाद करायला प्रवृत्त होतात. ते आपलेच खरे असून इतरांचे म्हणणे खोटे आहे असे म्हणतात. (२९)

येथें कोणीं आशंका केली । पूजका फळें कैसी जालीं ।
तरि भावनेनें फळली । वासनाबळें ॥३०॥
यावर कोणी शंका घेतील की हे भिन्न भित्र देव खरे नसतील तर त्यांची पूजा करणारांना फळे कशी मिळतात ? यावर उत्तर असे की त्यांच्या भावनेमुळे आणि वासनेमुळे ही फळे त्यांना मिळतात. (३०)

असो हे विरोधाचे बोलणें । अतिव्याप्ती होय येणें ।
एक ईश्वरू बहुधा कोणें । सत्य मानावें ॥३१॥
आता ही परस्परविरोधी मते बाजूला ठेवू. ही सगळी मते अतिव्याप्ती या दोषाने युक्त आहेत. म्हणजे ईश्वर एकच असताना ईश्वरत्व अनेक व्यक्ती आणि पदार्थांना लागू केले जात आहे. ईश्वर एकच असताना त्याला बहुविध ठरविणारी मते कोण मान्य करील ? (३१)

तरि अविरोधि तें कोणतें । तेंचि बोलिजे निगुते ।
सर्व मतासी मान्य होतें । आणि श्रुतिप्रमाण ॥३२॥
तर कोणाचाही विरोध होणार नाही असेच मत आता सांगू. ते सर्व मतवाद्यांना स्वीकार्यही असेल आणि वेदांनाही मान्य होईल. (३२)

तृणापासून मूळ मायेतें । चैतन्यचि चेष्टवितें ।
वर्तवून अलिप्त राहतें । तोचि ईश्वरु ॥३३॥
गवतापासून मूळमायेपर्यंत सर्व पदार्थांना एक चैतन्यतत्त्वच व्यापार करायला लावते. ते चेतन तत्त्व सर्वांना व्यापार करायला लावते आणि स्वत: मात्र अलिप्त राहते. तोच ईश्वर होय. (३३)

सर्वव्यापी सर्वाधार । आदि करुनी हरिहर ।
चैतन्य एक जगदीश्वर । दुसरा नाहीं ॥३४॥
जे सर्वव्यापी असून हरिहर आदिकरून सर्वांना आधारभूत आहे. ते चैतन्यमय तत्त्वच जगाचा परमेश्वर आहे, दुसरे कोणी नाही. (३४)

जेथें जैसा जेणें भाविला । तेथें तैसा तया प्रगटला ।
ऐसिया वचनें विरोध आला । कोण तो सांगा ॥३५॥
ज्या ठिकाणी ज्याने त्याची जशी कल्पना केली त्या ठिकाणी त्याच्यापुढे त्याच्या कल्पनेप्रमाणे तो प्रकट होतो असे सांगितल्यानंतर कोणता विरोध येतो सांगा. (३५)

सर्वज्ञ आणि सर्वशक्ति । तो एकची जगज्जोती ।
येविशीं अनंत श्रुती । असती वेदाच्या ॥३६॥
जो सर्वज्ञ आहे आणि सर्वशक्तिमान आहे असा जगज्ज्योती अंतरात्मा एकच आहे. या संदर्भात वेदाची अनेक वचने आहेत. (३६)

सर्व ईश्वरुचि म्हणतां । पूजकासी फळें विषमता ।
वेगळालीं दिसतीं तत्वतां । काय म्हणोनि ॥३७॥
सर्व काही ईश्वरच आहे असे आपण म्हणता मग पूजकांना विषम (असमान) फळे का मिळतात ? ही मिळणारी फळे वेगवेगळी का दिसतात ? (३७)

तरी रज तम सत्व गुण । त्रिविधा श्रद्धेचें लक्षण ।
जैसें जयाचें कल्पी मन । तैसेच फळ तयासी ॥३८॥
याचे उत्तर असे की, पूजकाची श्रद्धा सत्त्व, रज, तम या तीन गुणांनुसार तीन प्रकारची असते. ज्याचे मन जशी कल्पना करते, तसेच फळ त्याला मिळते. (३८)

जैसा जयाचा भाव । तैसाचि होतसे देव ।
येथें न धरावा अभाव । ईश्वरु एकचि ॥३९॥
ज्याचा भाव जसा असेल तसाच त्याचा देव होतो. येथे अभावात्मक कल्पना करू नये. ईश्वर हा एकच आहे. (३९)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ईशनिर्धारप्रकारे । तृतीयसमास: ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
जीवनिर्धार


निर्विकारीं जें स्फुरण । तेथेंचि असती ज्ञानाज्ञान ।
विद्याप्रतिबिंब ईशान । पूर्वी निरोपिला ॥१॥
निर्विकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी जे स्फुरण निर्माण होते, त्या स्फुरणातच ज्ञान म्हणजे विद्या आणि अज्ञान म्हणजे अविद्या असतात. विद्येतील ब्रह्माचे प्रतिबिंब म्हणजेच ईश्वर होय, हे पूर्वीच सांगितले आहे. (१)

अविद्या अज्ञान नेणिव । तेथें बिंबलें चैतन्य नांव ।
तयासी बोलिजे जीव । चिदाभास ॥२॥
अविद्या म्हणजे अज्ञान अथवा नेणीव होय. तिच्यात चैतन्य तत्त्वाचे म्हणजे ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते, त्याला जीव असे म्हणतात. ते चैतन्याचा आभास असते म्हणून त्याला चिदाभास असे म्हणतात. (२)

भूतांपासून निर्मिलें । सूक्ष्म तत्व जें जें जालें ।
सप्तदश मिश्रित केलें । हिरण्यगर्भ जें ॥३॥
पंचमहाभूतांपासून जी सूक्ष्म सतरा तत्त्वे (पाच प्राण, पाच कर्मेन्द्रिये, पाच ज्ञानेन्द्रिये, मन आणि बुद्धी) निर्माण झाली ती परस्परात कालवली. त्या सर्वाच्या ठायी अंतर्यामित्वाने असणारा जो सूत्ररूप आत्मा त्याला हिरण्यगर्भ असे म्हणतात. (३)

सूत्रात्मा जया म्हणती । तेथें व्यापली जगज्जोती ।
समष्टि तादात्म्यें जें चित्ति । म्हणुन ईश्वरु ॥४॥
त्यालाच सूत्रात्मा असेही नाव आहे. तोच जगज्ज्योती, अंतरात्मा आहे. तो समष्टिरूपाने असून चैतन्यरूप आहे. म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. (थोडक्यात तो सर्व ब्रह्मांडाचा समष्टिरूप अंतरात्मा आहे.) (४)

तेचि पृथकाकारें विभागलें । चहू खाणींत प्रवेशलें ।
व्यष्टितादात्म्यें विसरलें । व्यापकपणा ॥५॥
तेच चैतन्यतत्त्व वेगवेगळ्या व्यक्तींनुसार विभक्त झाले आणि अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज्ज अशा चार खाणीत प्रविष्ट झाले तेव्हा त्याला आपल्या व्यापकपणाचा विसर पडला आणि त्याला व्यष्टितादात्म्य प्राप्त झाले. (५)

म्हणुन व्यष्टीचा अभिमान । लिंगाध्यासें भिन्न भिन्न ।
तयासी जीव हे अभिधान । बोलिजेतें ॥६॥
त्याच्या ठिकाणी व्यष्टीचा (म्हणजे विशिष्ट पिंडाचा अथवा देहाचा) अभिमान निर्माण झाला, लिंगाध्यासाने (आपण वेगळा असा सूक्ष्म देह आहोत या आभासयुक्त ज्ञानाने) तो भिन्न भिन्न वाटू लागला, त्याला जीव असे नाव दिले जाते. (६)

भूतांचे करुन पंचीकरण । खाणी ज्या केल्या निर्माण ।
उत्तम मध्यम आणि हीन । ती प्रकारें ॥७॥
पंचमहाभूतांचे पंचीकरण करून ज्या खाणी निर्माण केल्या तो उत्तम, मध्यम आणि हीन अशा तीन प्रकारच्या होत. (७)

लिंगाध्यासें चैतन्य । प्रवेशलें भिन्नभिन्न ।
जितुक्या उपाधि संपूर्ण । तितुकेहि जीव ॥८॥
लिंगाध्यासाने म्हणजे लिंगदेहाचा म्हणजेच सूक्ष्म देहाचा आत्म्यावर आरोप करून जेवढे वेगवेगळे लिंगदेह निर्माण झाले त्यात चैतन्याचा प्रवेश झाला. अशा प्रकारे जेवढ्या उपाधी तेवढे जीव निर्माण झाले. (८)

एक असून वेगळें जालें । उपाधिसारिखें विकारलें ।
तितुकेंचि त्यासी स्फुरण जालें । मी मी ऐसें ॥९॥
मुळात ते एकच चैतन्य असले तरी उपाधिभेदाने ते भिन्न भिन्न वाटू लागले आणि त्या त्या उपाधींनुसार त्यात विकार झाले. जेवढे विकार झाले तेवढीच 'मीपणाची' भिन्न भिन्न स्फुरणे त्यात निर्माण झाली. (९)

उत्तम उपाधि ते कोणती । कळली पाहिजे निश्चिती ।
म्हणुनीया सांगिजेती । पृथकाकारें ॥१०॥
आता वर म्हटल्याप्रमाणे त्यांमध्ये उत्तम, मध्यम आणि हीन असे प्रकार निर्माण झाले. त्यांमध्ये उत्तम उपाधी कोणती ते कळले पाहिजे म्हणून तिचे स्वतंत्रपणे निरूपण केले पाहिजे. (१०)

देव यक्ष गंधर्व गण । इंद्र चंद्रादि मरुद्गण ।
जेथें विशेष सत्वगुण । उत्तमदेह ॥११॥
देव, यक्ष, गंधर्वसमूह, इंद्र, चंद्र, मरुद्गण या सर्वांमध्ये सत्त्वगुण विशेष असतो म्हणून त्यांना उत्तम जीव समजावे. (११)

त्यांतही असे मिश्रित । रजतमाचें गूढत्व ।
म्हणुनिया उत्तमांत । तीन विभाग ॥१२॥
त्यांमध्येही रज-तम हे गुण गूढपणे मिश्रित असतात. त्यानुसार त्यांतही तीन विभाग होतात. (१२)

सत्वसत्वात्मक देव । रजसत्वात्मक गंधर्व ।
यक्षगणादि सर्व । तमसत्वात्मक ॥१३॥
सत्त्वगुणाचे प्राधान्य असलेले सात्त्विक जीव म्हणजे देव रजोगुणाचे वर्चस्व असलेले सात्त्विक जीव म्हणजे गंधर्व आणि यक्षगण इत्यादी बाकीचे सर्व जीव तमोगुणप्रधान सात्त्विक जीव समजावेत. (१३)

मर्त्यादि हे मध्यम । जाणीव नेणीव सम ।
हे रजात्मक अनुक्रम । तेहि त्रिविध ॥१४॥
मर्त्य मानव इत्यादी जीव मध्यमवर्गातले आहेत. त्यांच्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही समसमान असतात. त्या सर्वांत रजोगुणाचे प्राबल्य असते. त्यातही सत्त्वरजादी गुणांच्या कमीअधिक प्रमाणानुसार तीन प्रकार होतात. (१४)

सत्वरजात्मक मानव । रजरजात्मक गो अश्व ।
तमरजात्मक पशु पक्षि जीव । बहुत असती ॥१५॥
सत्त्वगुणप्रधान रजात्मक जीव म्हणजे मानव होत. रजोगुणप्रधान राजसिक जीव म्हणजे गाय, घोडे इत्यादी पशू होत. तमोगुणप्रधान राजसिक जीव म्हणजे अन्य प्राणी आणि पक्षी होत. ते संख्येने पुष्कळ असतात. (१५)

तमोगुण नेणीव लक्षण । जे कनिष्ठ सर्वाहून ।
त्याचेहि प्रकार तीन । पूर्वानुसार ॥१६॥
तमोगुण हा अज्ञानस्वरूप असतो. तमोगुणी सर्वांहून कनिष्ठ असून त्यांचेही पूर्वीप्रमाणेच तीन प्रकार होतात. (१६)

सत्वतमात्मक दानव । रजतमात्मक रक्ष सर्व ।
तमातमात्मक क्रूरभाव । तिर्यगादि ॥१७॥
सत्त्वगुणप्रधान तमोगुणी जीव म्हणजे दानव होत. रजोगुणप्रधान तमोगणी जीव म्हणजे राक्षस होत आणि तमोगुणप्रधान तमोगुणी जीव म्हणजे क्रूर स्वभावाचे राक्षस, पिशाचादी जीव होत. (१७)

गुणीं गुण कालवलें । बहुधा प्रकारें वेगळाले ।
जीव चैतन्य तैसें जालें । सौम्य क्रूर मध्यम ॥१८॥
गुणांचे परस्परात मिश्रण होऊन त्यांचे अनेक भिन्न भिन्न प्रकार निर्माण झाले. त्यांच्या कमी अधिक प्रमाणानुसार जीवचैतन्यांचे ही सौम्य, क्रूर, मध्यम इत्यादी प्रकार निर्माण झाले. (१८)

आप सहज मधुर । बहु वनस्पति औषधि मात्र ।
तैसें तैसें कडू क्षार । गोडही जाले ॥१९॥
पाणी स्वभावत: गोड असते. पण अनेक वनस्पती, औषधी यांच्या संपर्काने ते कडू, खारट, गोड असे होते. (१९)

जंगमीं जालें चंचळ । स्थावरीं असे निश्चळ ।
दिसे न दिसे परी केवळ । जीवचैतन्य असे ॥२०॥
त्याप्रमाणे जीवचैतन्य जंगम पदार्थात चंचल, स्थावर पदार्थात निश्चल होते. ते तसे दिसो न दिसो ते केवळ जीवचैतन्यच असते. (२०)

जीव स्थावरीं नाहीं । ऐसें न कल्पावें कांही ।
वृक्ष पाषाण सर्वही । जीवेंविन वाढतीना ॥२१॥
स्थावर पदार्थात जीव नाही अशी कल्पना करू नये. वृक्ष, पाषाण वगैरे सर्व पदार्थ जीव असल्याखेरीज वाढले असते का ? (२१)

एवं उत्तम मध्यम अधम । त्रिविध केला अनुक्रम ।
देहमात्र जितुका नाम । तो तो जीवे ॥२२॥
अशा प्रकारे उत्तम, मध्यम, अधम असे त्रिविध प्रकार स्पष्ट केले. जेवढे म्हणून देह आहेत ते ते सर्व जीवच होत. (२२)

तोचि विष्णू तोचि महेश । तोचि इंद्र तोचि गणेश ।
तोचि मानवीं चिदाभास । श्रुति म्हणें ॥२३॥
जीवच विष्णू आहे. जीवच महेश आहे. मनुष्यांमधील चिदाभासही तोच आहे, असे श्रुती सांगते. (२३)

देव दानव मानव । ते ते अवघे जरी जीव ।
तरी भज्य भजकत्व वेगळिव । काय म्हणोनी ॥२४॥
यावर शंका अशी की, देव, दानव, मानव हे सगळेच जरी जीव असले तरी त्यांच्यामध्ये हा भज्य, हा भजक असा भेद कशामुळे उत्पन्न होतो ? (२४)

इच्छा होतां देह धरिला । स्वरूपविस्मरण नसे त्याला ।
तेणें गुणें व्यवहार जाला । तरी नित्यमुक्तता ढळेना ॥२५॥
यावर उत्तर असे की, देव हे स्वेच्छेने देह धारण करतात. देह धारण केल्यानंतरही त्यांना स्वरूपाचे विस्मरण नसते. त्यामुळे त्या देहांकरवी काही व्यापार झाले तरी त्यांची नित्यमुक्त ही स्थिती ढळत नाही. (२५)

इच्छेसारिखें सामर्थ्य मोठें । तेणें जाले देव लाटे ।
इतर प्राणी ते करंटे । आणि ज्ञानहीन ॥२६॥
इच्छेप्रमाणेच देवांचे सामर्थ्यही मोठे आहे, त्यामुळे देव बलवंत ठरले. त्यांच्यापुढे इतर प्राणी करंटे आणि ज्ञानहीन ठरले. (२६)

नित्यमुक्तत्व गेलें । किंचिज्ज्ञत्व ठाकून आलें ।
विषय वांछूं लागले । आवडी सारिखा ॥२७॥
त्यांची नित्यमुक्तता गेली आणि केवळ अल्पज्ञान वाट्यास आले. आपल्या आवडीनुसार विषयांची इच्छा करत राहिले. (२७)

मग ब्रम्हा म्हणे प्रजेसी । आदरा वेगें कर्मासी ।
कर्मे इच्छिल्या फळासी । पावाल सहज ॥२८॥
मग ब्रह्मदेव या आपल्या प्रजेला म्हणाला, "तुम्ही आता वेगाने कमें करायला लागा. म्हणजे या कर्माच्या साहाय्याने इच्छिली फळे सहजपणे मिळवू शकाल. " (२८)

यज्ञादि कर्मे करिती । तेणें देव संतुष्ट होती ।
पर्जन्य वृष्टि करिती । तेणें पिकतीं सर्व धान्यें ॥२९॥
मग ही माणसे यज्ञादी कर्मे करू लागली. त्यामुळे देव संतुष्ट होऊ लागले. ते मग पर्जन्यवृष्टी करू लागले, त्या योगाने सर्व पिके पिकू लागली. (२९)

प्रपंची कांही संकट पडिलें । तें देवें निवारिलें ।
मग सहज भजूं लागले । प्राणिमात्र ॥३०॥
प्रपंचात काही संकट आले त्यांचे देवाने निवारण केले. तेव्हा साहजिकच सर्व प्राणी त्या देवाला भजू लागले. (३०)

नाना धरुनि अवतार । दुष्टाचा करी संव्हार ।
घेणे भक्तांचा कैवार । कृपाळू देव ॥३१॥
देव कृपाळू असल्यामुळे तो निरनिराळे अवतार घेऊन दुष्टांचा संहार करतो, तो भक्तांची बाजू घेऊन त्यांचे रक्षण करतो. (३१)

कोठे स्वामी कोठे सेवक । परि जिन्नस मासला एक ।
येथें नसे कीं कुतर्क । श्रुतिसिद्ध असे ॥३२॥
कोठे स्वामी, कोठे सेवक अशा भिन्न भिन्न भूमिका असल्या तरी मूळ पदार्थ एकच. हा कुतर्क नाही तर वेदांनीच मान्य केलेला हा सिद्धान्त आहे. (३२)

स्वर्ग मृत्यु पाताल वासी । राहणें असे जिवासी ।
जो कर्मे करी जैसीं । फळें तैसीं भोगित ॥३३॥
जीवांना स्वर्ग, मृत्युलोक अथवा पाताळ अशा लोकांत वास्तव्य करावे लागते. जो जशी कमें करील तशी फळे त्याला भोगावी लागतात. (३३)

देव भोगिती नित्य सुख । कीटकादिकां नाना दु:ख ।
मानवांसी सुख दु:ख ।अवश्य भोगवी ॥३४॥
देव नेहमी सुखे भोगतात, कीटकांना निरनिराळ्या प्रकारची दु:खे भोगावी लागतात, तर मानवांना सुख आणि दु:ख दोन्ही भोगावी लागतात. (३४)

छापील पुस्तकात ३५ क्रमांकाची ।
ओवी दिलेली नाही ॥ ३५ ॥
ईश्वर नियंता असून जीव भोक्ता आहे. या वचनाची व्यवस्था कशी लावायची ? तर ईश्वर हा जीवाच्या संचिताला अनुसरून वागतो. (३५)

ईश्वर नियंता जीव न्यामक । जीव भ्राम्य ईश भ्रामक ।
माया गुणें काळाचें चाक । फिरवितसे ॥३६॥
ईश्वर नियंता असून जीव हा त्याच्या तंत्राने फिरणारा असतो. ईश्वर हा चुंबक असून जीव त्याच्याबरोबर फिरणारा पदार्थ आहे. तो मायेच्या साहाय्याने काळाचे चाक फिरवत असतो. (३६)

निमिषापासून कल्पवरि । तें कालचक्र निर्धारीं ।
ईश्वराचिये करीं । जीवहारी भ्रमताति ॥३७॥
ते कालचक्र निमिषापासून कल्पापर्यंत कालाचे नियंत्रण करत आहे. ते कालचक्र ईश्वराच्या हातात असून जीव त्याच्याबरोबर रांगेत फिरत असतात. (३७)

जीव पिंडीं राहतसे । परि ईशाचे स्थान कैसें ।
ये विशें श्रुति असे । वचन ऐका ॥३८॥
जीव पिंडात (शरीरात) राहतो, पण ईश्वराचे स्थान कोणते ? याविषयी वेदवचन आहे ते ऐका. (३८)

प्रपंचाचिये वृक्षीं । बैसले असती दोन पक्षी ।
एक विषय फळातें भक्षी । एक साक्षी अभोक्ता ॥३९॥
प्रपंचरूपी वृक्षावर दोन पक्षी बसले आहेत. त्यातील एक पक्षी विषयरूपी फळ खात आहे आणि दुसरा काही न खाता साक्षी बनून ते पाहत आहे. (३९)

नाना देह हे घट जाणावे । लिंग देह जळ ओळखावें ।
तेथे प्रतिबिंब तया नांवे । जीव ऐसे ॥४०॥
निरनिराळे देह हे घट जाणावेत. लिंगदेह त्यातील पाण्याप्रमाणे आहेत. त्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब म्हणजे जीव होत. (४०)

चैतन्यासारिखा भास । तया नांव चिदाभास ।
येथुनी हा समास । पूर्ण जाला ॥४१॥
हा जीव चैतन्यासारखा भासतो, म्हणून त्याला चिदाभास असे म्हणतात. येथे हा समास पूर्ण झाला. (४१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
जीवनिर्धारप्रकार । चतुर्थसमास: ॥४॥
हरिः ॐ तत्सत्




॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
जीवेशसृष्टप्रकार


माया अविद्या जीवेश्वर । निरोपिले हे चत्वार ।
याचें अधिष्ठान जें साचार । तेंहि बोलिलें ॥१॥
आतापर्यंत माया, अविद्या, जीव आणि ईश्वर या चार तत्त्वांचे निरूपण केले. यांचे सत्य अधिष्ठान जे ब्रह्म आहे त्याचेही निरूपण केले. (१)

आतां हे पांचही पुढती । निरोपिजे यथामती ।
एकत्र यांची स्थिति गति । विनियोग कैसा ॥२॥
आता या पाचांचेही यापुढे आणखी निरूपण करायचे आहे. यांची सुटी रूपे स्पष्ट केली. पण ती सर्व एकत्र आली असता त्यांची स्थिती, व्यवहार कसे होतात त्यांचा विनियोग (उपयोग) कसा होतो ते आता पहायचे आहे. (२)

माया हे प्रकृति जाण । मायावी हा ईशान ।
जगदादि जालें जें निर्माण । ते अवयव दोहींचे ॥३॥
प्रथम माया म्हणजेच प्रकृती होय. हे समजून घ्या. ईश्वर हा मायी म्हणजे मायेचे अधिष्ठान आहे. या दोहोंपासून जे जगत् इत्यादी निर्माण झाले ते या दोहोंचेही अवयव जाणावेत. (३)

माया अविद्या हे अरिसे । उभयीं प्रतिबिंब जें भासें ।
ते जाणावी आभासें । जीवेश दोन्हीं ॥४॥
माया आणि अविद्या ही दोन्ही तत्वे आरशासारखी समजावीत. या दोहोंच्या मध्ये जी ब्रह्माची किंवा मुख्य आत्म्याची प्रतिबिंबे पडतात त्यांना अनुक्रमे ईश्वर आणि जीव समजावे. ते दोन्हीही आभासरूप आहेत. (४)

जैसा कोणी एक पुरुष । निरंजनी निद्रिस्थ संतोष ।
दुजे न देखतां आणि आपणास । मी हा असें स्मरेना ॥५॥
कोणी एक पुरुष आहे तो एकांतात शांतपणे झोपलेला आहे त्या अवस्थेत अतिशय संतुष्ट आहे. आपणाहून दुसऱ्या कशाचेही त्याला स्मरण नाही. इतकेच काय आपल्या मीपणाचेही त्याला स्मरण नाही. (५)

तयासि जाली आठवण । कांही क्रीडावें आपण ।
म्हणून कल्पिली अश्विन । वरी आपण बैसला ॥६॥
अशा अवस्थेत स्वस्थपणे निजला असताना त्याला एकाएकी आपण काही क्रीडा करावी म्हणून त्याने कल्पनेने एक घोडी निर्माण केली. तो तिच्यावर स्वार झाला. (६)

घोडी तरी सत्य नसे । तैसाचि बैसणारहि असे ।
खरा पुरुष नुठतां कैसें । घोडी फेरिता जाला ॥७॥
घोडी सत्य नव्हती. तसाच त्या घोडीवर बसणारा पुरुषही खरा नव्हता. खरा पुरुष तर निवांत झोपला होता. तो उठला नसतानाच त्याने घोडीला कसे फिरवून आणले ? (७)

फेरितां फेरितां अटखळे घोडी । आपण खाली घाली उडी ।
एका वृक्षाचिये बुडीं । धरून घोडी बैसला ॥८॥
तो घोडीला फिरवत असताना ती घोडी अडखळली. तेव्हा त्याने खाली उडी मारली. त्यानंतर त्या घोडीला धरून तो एका झाडाखाली बंध्याजवळ बसला. (८)

पूर्व स्थळीं जो निजेला । तो मी हें नि:शेष विसरला ।
हा मी जो का बैसला । घोडी हातीं ॥९॥
पूर्वीच्या ठिकाणी जो मनुष्य झोपलेला होता, तो आपणच आहोत हे तो विसरला. तो स्वत:ला घोडी हाताने पकडून वृक्षाखाली बसलेला मनुष्यच समजत होता. (९)

तेथें कल्पिलीं उदंडें । हत्ती रथ पदाति घोडे ।
वरुति बैसणारही कोडे । आपणची जाला ॥१०॥
तेथेही त्याने अनेक हत्ती, रथ, पायदळ, घोडे यांची कल्पना केली. त्यांवर बसणारा आपणच अशीही कल्पना त्याने केली. (१०)

आपण जो का बैसला । तयासिही विसरला ।
आपण बहुधा जाला । स्मरणास्मरणें ॥११॥
त्यावेळी झाडाखाली घोडी हातात धरून बसणाऱ्यालाही तो विसरला आणि या स्मरण आणि विस्मरणाच्या खेळात स्वत:ची त्याने अनेक रूपे कल्पिली. (११)

कोठें राजा कोठें रंक । कोठें स्वामी कोठें सेवक ।
वस्त्र शस्त्र अमोलिक । जाला कटक निजांगें ॥१२॥
कधी राजा, कधी रंक, कधी स्वामी, कधी सेवक, मूल्यवान वस्त्रे, शस्त्रे, सैन्य इत्यादी सर्व आपणच होऊ लागला. (१२)

मग एकपणही विसरला । बहुधापणें भांबावला ।
तों अकस्मात् पडिला घाला । परराष्ट्राचा ॥१३॥
मग आपण एकटे आहोत हेही तो विसरला आणि स्वत:च्या विविध अनेक रूपांनी तो भांबावला. तेवढ्यात तेथे अकस्मात परराष्ट्राचे आक्रमण झाले. (१३)

दोन्हीं दळें मिळालीं । एक मारिती एक मेलीं ।
कितेक घायाळें जालीं । हा हा करिती ॥१४॥
दोन्ही सैन्ये एकमेकाला भिडली. कोणी मारत होते. कोणी मेली, कित्येकजण घायाळ होऊन हा हा असा आक्रोश करू लागले. (१४)

कोठें सुखी कोठें दु:खी । ऐसी होतां भुताटकी ।
मुळी निजेला तो एकाएकी । आपणा स्मरता जाला ॥१५॥
कोठे सुखी माणसे होती, तर कोठे दुःखी माणसे होती. अशा प्रकारचा भुताटकीसारखा हा प्रकार चालू असताना एकाएकी त्याला त्या मूळच्या निजलेल्या पुरुषाचे स्मरण झाले. (१५)

पाहतां आपुलें एकपण । नि:शेष हरपलें बहुपण ।
हत्ती घोडे बसणेंपण । तेंहि नाहीं ॥१६॥
आपले ते एकटेपण पाहताक्षणीच, त्याचे अनेकपण पूर्णपणे हरवले. मग हत्ती, घोडे, त्यांवर बसणे इत्यादी सर्व नाहीसे झाले. (१६)

या दृष्टांता पडिपाडें । दार्ष्टान्तींही बोलणें घडे ।
तेंचि आतां उघडें । सावध ऐका ॥१७॥
या दृष्टान्ताच्या बरोबरीने त्यातील दान्तिकही आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे. तेच आता सांगतो. सावध होऊन ऐका. (१७)

एक ब्रह्म निराकार । सच्चिदानंद अपार ।
त्रिविध भेदाचा अणुमात्र । स्पर्शचि नाहीं ॥१८॥
मुळात ब्रह्म एकमेवाद्वितीय, निराकार, सच्चिदानंदस्वरूप, अनंत, अपार असे आहे. त्याच्या ठिकाणी सजातीय, विजातीय, स्वगत या भेदांचा अणुमात्र स्पर्श नाही असे आहे. (१८)

दुसरेंचि नाहीं पाहे कोण । दुजेवीण एकलेंपण ।
हेहि नाहीं आठवण । ज्ञानाज्ञानातीत ॥१९॥
तेथे दुसरे कोणी अजिबातच नाही तर त्याला पहाणार कोण ? दुसऱ्याअभावी आपण एकटेच आहोत याचीही त्याला आठवण नसते. ते ज्ञान आणि अज्ञान यांच्या पलीकडचे असते. (१९)

कोणी न जाणे तयासी । स्वतां नेणे आपणासी
मग आहें हें कायिसि । चावटि करा ॥२०॥
त्याला कोणी जाणत नाही, तो स्वत:च स्वत:ला जाणत नाही अशा परिस्थितीत तो आहे अशी निरर्थक बडबड तरी कशासाठी करायची ? (२०)

तरी तो पुरुष निजेला । तो आणिकांना आपणाला ।
न दिसे नेणें परि निजेला । तोचि कवणू ॥२१॥
तर तो निजलेला पुरुष इतरांना तर सोडाच, स्वत:लाही दिसत नव्हता. स्वत:ला ओळखत नव्हता. पण मग तो झोपला होता तो कोण होता ? (२१)

तैसें दुजें जेथें नाहीं । तरी कोण कोणातें पाही ।
जाणता जाणण्याते काही । जाणों शकेना ॥२२॥
त्याप्रमाणे जेथे दुसरे कोणीच नव्हते, तेथे कोण कोणाला पहात होते ? जाणणारा माणूस जाणण्याच्या क्रियेला स्वत: जाणू शकत नाही. (२२)

न जाणतां परि आपण आहे । तो सर्वथा नाहीं नव्हे ।
पुढें आठवण जी होताहे । तेचि कोणा ॥२३॥
तो स्वत:ला जाणत नसला तरी तो स्वत: होता. तो पूर्णपणे नव्हता असे होत नाही. कारण नंतरच्या त्याला जे स्मरण झाले ते कुणाला झाले ? (२३)

म्हणुन नाहीं म्हणणे अयुक्त । जें सर्वदा असे सदोदित ।
शून्यवादियाचा घात । सहजचि जाला ॥२४॥
म्हणून त्या एकलेपणामध्ये तो नव्हता असे म्हणणे योग्य नाही. तो सर्वकाळी सदोदित असतो. त्यामुळे शून्यवादी लोकांचे खंडन सहजगत्या झाले. (२४)

मी ब्रह्म हे आठवण । ऐसें जालें पुढें स्मरण ।
निर्विकारीं विकार पूर्ण । हाचि जाणावा ॥२५॥
आपण ब्रह्म आहोत, असे स्मरण त्याला नंतरच्या काळात झाले. यालाच निर्विकाराच्या ठिकाणी झालेला विकार म्हणावा. (२५)

आठवू जनी न होतां । तरी एकपणा मुकला होता ।
आठवणीसरिसी अनंता । सुखेच्छा जाली ॥२६॥
हे स्मरण झाले नव्हते तोपर्यंत त्याला एकलेपणाचेही स्मरण नव्हते. पण ते स्मरण होताच त्या अनंत ब्रह्माला सुखेच्छा निर्माण झाली. (२६)

त्या स्फुरणीं दोन प्रकार । चळण आणी जाणीव थोर ।
चंचलते घोडी बैसणार । तोचि जाणता ॥२७॥
ब्रह्माला आपलेपणाचे स्मरण होणे यालाच त्याच्या ठिकाणी झालेले स्फुरण म्हणतात. त्या स्फुरणाचे दोन प्रकार आहेत. चलन आणि ज्ञान. चंचलतारूप घोडीवर बसणारा तोच ज्ञाता होय. (२७)

आपण एक हें विसरला । चंचलातें जाणों लागला ।
विस्मरणें आपणा चुकला । ऐसें नाहीं ॥२८॥
आपण एकटेच आहोत हे तो विसरला व चंचल दृश्याला जाणू लागला. पण त्या विस्मरणामुळे तो स्वतः हरवला होता असे होत नाही. (२८)

निद्रस्थ ठाईंचा खरा जाता । तरिच निर्विकार विकारता ।
तो तैसाचिही असतां । मिथ्या विकार ॥२९॥
झोपलेला माणूस आपल्या स्थानापासून खरेच गेला असता तर त्या निर्विकारामध्ये बदल (विकास) झाला असे म्हणता आले असते. पण तो तर जसा होता तसाच आहे. त्याअर्थी त्याच्यात झालेला विकार किंवा बदल हा मिथ्या म्हणजे खोटा ठरतो. (२९)

चंचलीं जो जाणता । तोचि मायेचा नियंता ।
तेणें निर्मिले ज्या पदार्था । ईश्वरसृष्ट म्हणे श्रुति ॥३०॥
चंचलाचा जो जाणता असतो तोच त्या मायेचा नियंताही असतो. त्याने निर्माण केलेल्या पदार्थांना श्रुती (म्हणजे वेद) ईश्वरसृष्ट असे म्हणते. (३०)

ईक्षणापासून प्रवेशवरी । तें तें ईश्वरसृष्ट निर्धारी ।
जें जें तत्व उत्पन्न करी । स्वतां करी प्रवेश ॥३१॥
ईक्षणापासून (अवलोकनापासून) प्रवेशापर्यंतचे सर्व ईश्वरसृष्ट आहे, हे लक्षात घ्या. तो जे जे तत्त्व निर्माण करतो, त्यात स्वतः प्रवेश करतो. (३१)

गुणभूतें उद्भवलीं । ते ते जाण त्या चळणें निर्मिलीं ।
अष्टधेची मिळणी जाली । तेव्हां प्रगटल्या खाणी ॥३२॥
त्यानंतर जे त्रिगुण आणि पंचमहाभूते निर्माण होतात ती सर्व त्याच्या चलनामुळे निर्माण होतात. अहंकार, मन, बुद्धी आणि पंचमहाभूते अशी अष्टधा प्रकृतीची जुळवाजुळव झाली की जीवांच्या निरनिराळ्या खाणी प्रगट होतात. (३२)

चौखाणींचीं अनंत शरीरें । प्रगटती जालीं अपारें ।
जीवांशें प्रवेशतां बा रे । विलंब नाहीं ॥३३॥
मग अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज्ज अशा चार खाणींची अनंत, अमर्याद शरीरे निर्माण होतात. त्यात लगेच जीवांश प्रवेश करतात. त्या प्रवेशाला विलंब लागत नाही. (३३)

अपंचीकृत सप्तदश । पंचीकृत देखतां देहास ।
आपुल्याला स्थानीं वास । करिते जाले ॥३४॥
पंचमहाभूतांच्या मिश्रणाने तयार झालेल्या स्थूल देहास पहाताच त्यात अपंचीकृत अशी लिंगदेहाची सतरा तत्त्वे त्यात प्रवेश करतात आणि आपापल्या जागा धरून बसतात. (३४)

हा गुणाभूतांचा विकार । उपक्रमीं याचा विस्तार ।
येथें बोलिला प्रवेश मात्र । तोचि अवधारा ॥३५॥
गुण आणि भूतांच्या विकासाचा हा भाग सृष्टीची उत्पत्ती या विभागात त्यांचा विस्तार करून सांगण्यात येतो. येथे फक्त प्रवेशापुरता भाग सांगितला आहे. तो लक्ष देऊन ऐका. (३५)

अग्नि वाचा होऊनी । प्रवेशता जाला वदनीं ।
वायु प्राणवेष घेऊनी । नासीकीं प्रवेशे ॥३६॥
अग्नीने वाचेचे रूप घेऊन मुखात प्रवेश केला, वायूने प्राणांचा वेश घेऊन नासिकेत प्रवेश केला. (३६)

आदित्य चक्षु जाला । डोळियांत प्रवेशला ।
श्रोत्र होणें दिशेला । प्रवेश कर्णीं ॥३७॥
आदित्याने चक्षुरूप घेऊन डोळ्यांत प्रवेश केला. दिशांनी श्रवणेंद्रिये बनून कर्णात प्रवेश केला. (३७)

औषधी वनस्पति केश । होऊनि त्वचीं प्रवेश ।
चंद्रातें मनोरूपें वास । हृदयभुवनीं ॥३८॥
औषधी वनस्पतींनी केस होऊन त्वचेमध्ये प्रवेश केला तर चंद्राने मनोरूपाने हृदयात प्रवेश केला. (३८)

मृत्य होऊन अपान । प्रवेशला गुदस्थान ।
आप तें रेत होऊन । शिश्नीं राहिलें ॥३९॥
मृत्यूने अपानाचे रूप घेऊन गुदद्वारात प्रवेश केला आणि जल रेतरूपाने शिश्नामध्ये राहिले. (३९)

इतकें बोलिलें अरणीं । तितुकें निवेदिलें ये क्षणीं ।
न्यूनाधिक इंद्रिय श्रेणी । न बोलतां तें प्रवेशली ॥४०॥
ऐतरेय उपनिषदात इतके सांगितले आहे. ते सर्व या क्षणी सांगितले. अशा प्रकारे कमीजास्त इंद्रियांनी शरीराच्या निरनिराळ्या भागात प्रवेश केला. (४०)

ऐसे सर्वही प्रवेशतां । परि नये विषईं वर्ततां ।
मग या सर्व देवता । प्रार्थित्या जाल्या ॥४१॥
अशा प्रकारे सर्व इंद्रियांनी शरीरात प्रवेश केला खरा, पण त्यांना विषयांपर्यंत जाता येत नव्हते. तेव्हा या सर्व देवतांनी परमेश्वराची प्रार्थना केली. (४१)

आपणावीण नव्हे चळण । ऐसें जाणोनि ईशान ।
कपालत्रय भेदुन । जीवरूपें प्रवेशला ॥४२॥
तेव्हा आपल्याशिवाय देहात चलनवलन होऊ शकणार नाही, असे ओळखून ईश्वराने टाळूचा भेद करून शरीरामध्ये जीवरूपाने प्रवेश केला. (४२)

स्थावर जंगमें पहिलीं । निर्मून जगज्जोती प्रवेशिली ।
मग स्थावरें वाढू लागलीं । चळूं लागली जंगमें ॥४३॥
स्थावर जंगम असे पदार्थ ईश्वराने अगोदर निर्माण केले त्या सर्वात ईश्वराने (जगज्जोती, अंतर्यामी) प्रवेश केला. मग त्यावर पदार्थ वाढू लागले आणि जंगम पदार्थ हालचाल करू लागले. (४३)

ईशसृष्टि इतुकी । पुरुषें कल्पिली सेना निकी ।
वरी बैसणार अनेका । तैसा जीवरूपी प्रवेशे ॥४४॥
मागे निजलेल्या पुरुषाने जसे केवळ सैन्य निर्माण केले. त्याप्रमाणे त्यातील वाहनांवर बसणारेही अनेक निर्माण केले. त्याप्रमाणे परमेश्वराने अनेक जीवांच्या रूपाने सर्व निर्माण केलेल्या पदार्थात प्रवेश केला. (४४)

ईशें जितुकें निर्मिलें । तितुके जीवेसी भोग्य जालें ।
कन्येतें पित्याने निर्मिलें । भोग्य जालें भर्त्यासी ॥४५॥
ईश्वराने जेवढे पदार्थ निर्माण केले तितके सगळे जीवाला भोग्य म्हणून प्राप्त झाले. बापाने कन्येला निर्माण केले आणि ती तिच्या नवऱ्याला भोग्य झाली असा हा प्रकार झाला. (४५)

ईशें पदार्थमात्र निर्मिले । तरि जीवें तेथें काय केलें ।
ऐसिये आक्षेपीं ऐकिलें । पाहिजें उत्तर ॥४६॥
ईश्वराने सर्व पदार्थ निर्माण केले. पण जीवाचे तेथे कार्य काय ? असा आक्षेप कोणी केला तर त्याचे उत्तर ऐकावे. (४६)

जागृति स्वप्न सुषुप्ति आदि । अंतिं मोक्ष प्रतिपादी ।
जीवसृष्टि हे वेदीं । प्रतिष्ठिली असे ॥४७॥
जागृती, स्वप्र, सुषुप्ती, मरणानंतर मिळणारा मोक्ष इत्यादी गोष्टी जीवाने निर्माण केल्या आहेत, असे वेदात सांगितले आहे. (४७)

जीवें वेगळें नाहीं निर्मिलें । ईशनिर्मिता भोग्या आणिलें ।
तेणेंसि व्यवहारूं लागलें । आपपर कल्पुनी ॥४८॥
जीवाने वेगळे काहीच निर्माण केले नाही. फक्त ईशनिर्मित पदार्थांना भोग्य बनवले. त्यामुळे सर्व जीव 'हे माझे, हे दुसऱ्याचे'अशी आपपर भावना ठेवून व्यवहार करू लागले. (४८)

एक स्त्री निर्मिली देवें । नाना कल्पना केली जीवें ।
माता भगिनी स्वभावें । स्नुषा कन्या ॥४९॥
देवाने एक स्त्री निर्माण केली. पण तिच्या संदर्भात जीवाने अनेक गोष्टींची कल्पना केली. ती माता, भगिनी, कन्या, सून इत्यादी विविध नावे तिला दिली. (४९)

पुत्र बंधु श्वशुर पिता । नांवे जाले प्रतियोगी होतां ।
मनोमयातें निर्मिता । होय जीव ॥५०॥
त्यानुसार वरील नात्यांशी जुळणारी पुत्र, भाऊ, पिता, सासरा अशी प्रतियोगी नावे पुरुषाला प्राप्त झाली. अशा प्रकारे जीवाने ही सगळी मनोमय सृष्टी निर्माण केली. (५०)

माझें तुझें हें कल्पिलें । इतुकेनेंचि बंधन पडिलें ।
ईशनिर्मित जें जें जालें । ते ते बाधक न होती ॥५१॥
त्यात पुन्हा हे माझे, हे तुझे'अशा ईश्वरसृष्ट पदार्थाविषयी कल्पना केल्याने तो बंधनात सापडला. ईशाने जे जे निर्माण केले ते मुळात असे बाधक होत नाही. (५१)

जें जें दृष्टीस पाहिलें । नेत्र लावून मनीं कल्पिलें ।
तें प्रत्यक्ष दिसूं लागलें । सत्याचे परी ॥५२॥
जे जे दृष्टीस पडले, तेच डोळे बंद करून मनाने त्याची कल्पना केली, तर ते सत्य असत्याप्रमाणे प्रत्यक्ष दिसू लागते. (५२)

प्रिय तरी सुख जालें । क्रूर दिसतां भय वाटलें ।
सामान्य तें उपेक्षिलें । दिसतां जरी ॥५३॥
ते कल्पित दृश्य प्रिय असेल तर सुख होते, क्रूर किंवा भयंकर दिसले तर भय वाटते आणि जे दृश्य सामान्य दिसते त्याची उपेक्षा केली जाते. (५३)

ऐसें सुखदु:ख कल्पितां । होती जीव सृष्टि करितां ।
वासनेची अति दृढता । म्हणोनि बाधक ॥५४॥
अशा प्रकारे कल्पनेने सुखदुःखांची निर्मिती करणे हीच जीवसृष्टी होय. तिच्यामुळे वासना दृढ होत जाते, म्हणून ती बाधक होय. (५४)

अंतकाळीं जें जें आठवें । तें तें लागें पुढें व्हावें ।
म्हणून बाधक जाणावें । ते जीवसृष्ट ॥५५॥
अंतकाळी ज्याची आठवण येते ते ते मरणोत्तर व्हावे लागते. या कारणाने जे जे जीवसृष्ट ते ते बाधक जाणावे. (५५)

ईशसृष्ट बाधक नसे । येथें कोण उपपत्ति असे ।
बोलिजे ती अपैसे । अनुभवसिद्ध ॥५६॥
आता ईशसृष्टी बाधक नसते, यासाठी कोणता युक्तिवाद आहे ? यावर अनुभवसिद्ध असा दृष्टान्त सांगतो. (५६)

कोणी पुरुष निजेला । स्त्रियेसी घेऊनी बाजुला ।
तो पाठिसी सर्पही आला । परि तो निद्रेत नेणें ॥५७॥
एक पुरुष आपल्या स्त्रीसह निजला. तेवढ्यात पाठोपाठ एक सर्पही तेथे आला. परंतु तो पुरुष निद्रिस्त असल्यामुळे त्याला ते कळले नाही. (५७)

लीन जालें अंत:करण । स्रीसुखही नेणें आपण ।
आणि सर्पभय दारुण । तेंही नसे ॥५८॥
त्याचे अंत:करण निद्रेत इतके लीन झाले होते की त्याला स्त्रीसुखाचीही जाणीव नव्हती, तशी सर्पाची भीतीही वाटत नव्हती. (५८)

प्रत्यक्ष स्त्री सर्प असून । सुखदु:खा नातळे जाण ।
म्हणून बाधक कल्पनागुणें । येर्हदवीं निर्बाध ॥५९॥
स्त्री, सर्प प्रत्यक्षात असूनही त्याला सुख, दुःख यांपैकी काहीच जाणवत नव्हते. म्हणजे कल्पनेमुळे एखादी गोष्ट बाधक ठरते. येरवी ती बाधारहित असते. (५९)

सत्यासत्य जाणोनि ज्ञानें । जीवसृष्टातें त्यागणें ।
जीवन्मुक्तीचें लक्षण । बोलिलें असे ॥६०॥
म्हणून ज्ञानाच्या साधनाने सत्य असत्य जाणून जे जीवसृष्ट म्हणजे जीवाने कल्पनेने निर्माण केलेले असते त्याचा त्याग करावा. हेच जीवन्मुक्तीचे लक्षण सांगितले आहे. (६०)

असो प्रसंगासी जें आलें । निरूपणसमाप्ति नेलें ।
परि जागृतादि व्यापरले । जीव कैसे ॥६१॥
असो, प्रसंगाने जसे आले तसे हे निरूपण आता समाप्त केले. परंतु जीव जागृती, स्वप्र, सुषुप्ती यांमध्ये कसा व्यापार करतात, हे पाहिले पाहिजे. (६१)

जैसा उर्णनाभि एकला । तंतू निर्मून क्रीडता जाला ।
तैसा जागृति स्वप्न सुषुप्तीला । एकला क्रीडे ॥६२॥
ज्याप्रमाणे कोळी नावाचा कीटक स्वत:च तंतू निर्माण करून क्रीडा करतो. त्याप्रमाणे जीवही जागृती, स्वप्र आणि सुषुप्ती या अवस्था निर्माण करून त्यांमध्ये एकटाच क्रीडा करत असतो. (६२)

अंत:करण इंद्रिये । घेणें पडे जो जो विषय ।
तयासि नांवही होय । जागृती ऐसी ॥६३॥
अंत:करण आणि इंद्रिये यांच्या साहाय्याने जेव्हा विषयांचे ग्रहण होते त्या अवस्थेला जागृती असे नाव आहे. (६३)

इंद्रिय विषयेविण । संस्कारें कल्पी मन ।
घडे सुखदु:ख भोगेवीण । ते स्वप्नावस्था ॥६४॥
इंद्रिये आणि विषय नसताना केवळ संस्कारांमुळे मन त्यांची कल्पना करते त्यावेळी भोग नसतानाही सुखदुःख होते. त्या अवस्थेला स्वप्नावस्था म्हणतात. (६४)

मन जेथें लया जाय । परि सुखाचा प्रत्यय होय ।
अज्ञान नाश न होय । ते सुषुप्ती ॥६५॥
ज्या अवस्थेत मनाचा लय होतो, पण एक प्रकारच्या सुखाचा अनुभव येतो, पण अज्ञानाचा नाश झालेला नसतो त्या अवस्थेला सुषुप्ती असे म्हणतात. (६५)

ऐसा तिहीं अवस्थें एकला । सुखदुःखीं क्रीडूं लागला ।
परि एकपणा विसरला । भांबावला नानात्वीं ॥६६॥
अशा प्रकारे तिन्ही अवस्थांमध्ये तो एकटा जीव क्रीडा करतो. परंतु स्वत:चे एकटेपण विसरून जातो आणि सभोवतालच्या नानात्वामध्ये भांबावून जातो. (६६)

हे जाणावें सेनेचे परी । आपआपणातें मारी ।
मेली घायाळ परी । सुखदु:खें शिणती ॥६७॥
हे एखाद्या सैन्यासारखे आहे. तेथे सैनिक आपापसात लढतात, मरतात, घायाळ होतात आणि सुखदुःखांनी शिणतात. (६७)

क्षणा हर्ष क्षणा खेद । क्षणा क्रोध क्षणा मद ।
जन्ममरण भोगी द्वंद्व । कल्पवरी ॥६८॥
क्षणात हर्ष, क्षणात खेद, क्षणात क्रोध, क्षणात मद अशाप्रकारे द्वन्द्व असेतो कल्पान्तापर्यंत जन्म मरण भोगत राहतात. (६८)

मूळपुरुषें इच्छा टाकिली । सेना जैसी निमाली ।
ईशसृष्टीही बुडाली । नव्हतीच जैसी ॥६९॥
अशा प्रसंगी मूळ निजलेल्या पुरुषाने इच्छाच करायचे सोडून दिले तर सैन्य (त्याच्या लढाया, सुखदुःखे, हर्षामर्षादी भावना हे सर्व) क्षणार्धात संपून जाते आणि ईश्वरसृष्टी ही नाहीशी होते. जशी काही ती निर्माणच झाली नव्हती. (६९)

पूर्व पुरुषापरी । एकलें ब्रह्म निर्धारी ।
हें काल्पनिक जाणता उरी । जीवेशां नसे ॥७०॥
निद्रिस्त मूळ पुरुषाप्रमाणे जेव्हा एकटे ब्रह्मच तेवढे आहे आणि बाकीचे सर्व काल्पनिक आहे हे त्याच्या लक्षात आले की जीव आणि ईश यांना वावच राहात नाही. (७०)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
जीवेशसृष्टप्रकारे । पंचमसमासः ॥५॥
इति पंचिका संपूर्णा ॥३॥ ओवी संख्या २८३
हरिः ॐ तत्सत्



GO TOP