॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(पूर्वार्ध)

पंचिका ४ थी
समष्टिव्यष्टिनिरूपण

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
विवर्तवादप्रकार


ब्रह्म तरी निराकार । नव्हे अणुमात्र विकार ।
घन निबिड अपार । अंत न लागे     ॥१॥
ब्रह्म तर निराकार, निर्विकार म्हणजे अणूएवढासुद्धा विकार नसलेलेघना गच्च भरलेले) दाट आणि पार नसलेले आणि अंत न लागणारे असे अथांग आहे. (१)

तेथें मायादि विकार । कैसे जाले सचराचर ।
विकारलें निर्विकार । तरी निश्चळत्व बुडालें ॥२॥
मग त्यामध्ये मायादी सगळे विकार कसे झाले ? निर्विकार अशा त्या ब्रह्मामध्ये विकार निर्माण झाले असे म्हणावे तर त्याच्या निश्चळपणाला ढळ लागतो. (२)

कांही विकारलें नाहीं । तरि दिसताहे सर्वही ।
जैसे असेल तैसे तेही । यथार्थ निरोपा        ॥३॥
ब्रह्माला काहीही विकार झाला नाही असे म्हणावे तर सर्व सृष्ट पदार्थ दिसत आहेत. मग वास्तवात ते जसे असेल तसे आम्हांस सांगा. (३)

आतां याचें उत्तर । दिधलें पाहिजे साचार ।
जालेंचि नाहीं म्हणावे जर । तरि हे मानितीना ॥४॥
आता याचे उत्तर दिले पाहिजे. जर ते पदार्थ निर्माण झालेच नाहीत असे म्हणावे तर आक्षेपक ते मान्य करणार नाहीत. (४)

बाळासि म्हणावें बागुल नाहीं । त्यासी सत्य न वाटे कांहीं ।
बाळदशा जातां सर्वही । त्याचे त्यास कळे     ॥५॥
लहान मुलास बागुलबुवा नाहीच असे सांगितले तर त्याला ते काही सत्यच वाटणार नाही. बाल्यदशा उलटल्यानंतर त्याचे त्याला सर्वच कळून येईल. (५)

हा आकारू जया दिसला । तो बळकट अंतरी बैसला ।
त्या म्हणतां विकार नाहीं जाला । उपतिष्ठे कैसा ॥६॥
हा आकार ज्याला दिसला तो त्याच्या मनात बळकटपणे मूळ धरून बसतो. त्या माणसाला जर सांगितले की, तू म्हणतोस तसा विकार मुळीच झालेला नाही, तर त्याला तो सत्य कसा वाटेल ? (६)

हें पुढें आपेंआप । ज्याचें त्यास कळें रूप ।
ऐसें जाणोनि अध्यारोप । वर्णिता जाला     ॥७॥
पुढे आपोआप हे दृश्य मिथ्या आहे, हे त्याचे त्याला कळून येईल. असे जाणून अध्यारोप म्हणजे जे मिथ्या आहे त्याचे वर्णन वक्ता करू लागला. (७)

अध्यारोप तो अध्यस्त । ते न दिसतां ते दिसत ।
त्यासी म्हणावें विवर्त । वेदांतशास्त्रीं     ॥८॥
अध्यारोप म्हणजे अध्यास. वेदान्तशास्त्रामध्ये ते दिसत नसताना ते दिसते त्याला विवर्त म्हणतात. (८)

कारणापासून कार्य होतां । त्याची ती प्रकारें व्यवस्था ।
आरंभ परिणाम विवर्ता । ओळखावें       ॥९॥
कारणापासून कार्य निर्माण होते. त्याची व्यवस्था तीन प्रकारांनी होते. ते तीन प्रकार म्हणजे आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद. (अनेक कारणांपासून जेव्हा एक कार्य निर्माण होते त्यास आरंभवाद असे म्हणतात. कारण नष्ट झाल्यानंतर कार्याची उत्पत्ती होते त्यास परिणामवाद असे म्हणतात आणि कार्य सत्य नसताना जे दिसते त्याला विवर्तवाद असे म्हणतात.) (९)

आतां तिहींचे लक्षण । निरोपिजे भिन्न भिन्न ।
प्रस्तुत आरंभाचें कैसें चिन्ह । अवधारावें     ॥१०॥
या तिन्ही व्यवस्थांचे वेगवेगळे निरूपण करणे प्राप्त आहे. प्रथम आरंभवादाचे लक्षण लक्षपूर्वक ऐका. (१०)

मृत्तिकेचें कार्य घट । उपादान मृत्तिका अविट ।
निमित्तेंवीण नव्हे स्पष्ट । तो अन्य कुल्लाळ       ॥११॥
मृत्तिकेचे कार्य घट आहे. मृत्तिका हे त्याचे उपादान कारण आहे. (उपादान कारण म्हणजे समवायिकारण, वस्तूच्या निर्मितीचे प्रत्यक्ष कारण, कार्याच्या उत्पत्तीस ज्या जड द्रव्याची आवश्यकता असते ते होय.) घटाच्या उत्पत्तीचे मृत्तिका हे अपरिहार्य कारण आहे. (अविट पण तो घट प्रकट होण्यासाठी) कोणा ना कोणा निमित्ताची गरज असते. घटाच्या संदर्भात असे निमित्त कारण म्हणजे कुंभार होय. (११)

दोन्हीं जरी मिळालीं । तरी घटसिद्धि नाहीं जाली ।
मृत्तिका आपीं कालविली । तरी चक्रादि अपेक्षा ॥१२॥
मृत्तिका आणि कुंभार ही दोन्ही कारणे जरी एकत्र आली तरी त्यायोगे घटाची सिद्धी होऊ शकत नाही. घटसिद्धीसाठी मृत्तिका पाण्यात कालवली जाणे आवश्यक आहे. तसेच चक्र इत्यादी अन्य साधनांची अपेक्षा आहेच. (१२)

मृत्तिका आणि मृत्पिंड । कुलाल आणि चक्रदंड ।
कारणें जया उदंड । तो आरंभवाद     ॥१३॥
मृत्तिका, मातीचा गोळा, कुंभार, चाक, चक्रदंड इत्यादी अनेक कारणे ज्यासाठी लागतात त्याला आरंभवाद म्हणतात. (१३)

सत्यत्वें कारणा पालट होय । अथवा कारणासम असावें कार्य ।
उभय लक्षणाचा अभिप्राय । परिणाम ऐसा       ॥१४॥
कारणामध्ये वस्तुतः बदल होतो किंवा कारणासारखेच कार्य असते, या दोन्ही प्रकारांना परिणामवाद म्हणतात. (१४)

दुग्धाचें दही होतां । दुग्ध नासेचि तत्वतां ।
म्हणोनि द्वितीय जे अवस्था । तोचि परिणाम         ॥१५॥
दुधाचे दही होताना दूध स्वरूपत: नष्ट होते (नासते) . म्हणून त्याला जी दसरी अवस्था प्राप्त होते तोच परिणाम होय. (१५)

अन्यथा भाव सत्यत्वें नसे । ते नसतां परि ते भासे ।
अथवा कारणासमानही नसे । कार्य जे कां       ॥१६॥
दुसरी अवस्था प्राप्त होणे खरे नसते. कार्य प्रत्यक्षात नसताना भासते. तसेच ते कारणासारखेही नसते. (१६)

या उभयांसी बोलिजे विवर्त । शिंपीच्या ठाईं रजत ।
रज्जूवरी सर्प भासत । कीं स्थाणु पुरुष       ॥१७॥
या दोन्ही प्रकारांना विवर्तवाद असे म्हणतात. शिंपीच्या ठिकाणी चांदी किंवा दोरीच्या ठिकाणी सर्प अथवा खांबाच्या जागी पुरुष भासणे ही त्याची उदाहरणे होत. (१७)

ऐसे तीन प्रकारचे वाद । कार्य कारणा असे भेद ।
मुख्य वेदांतमतीं अनुवाद । विवर्ताचा असे     ॥१८॥
असे तीन प्रकारचे वाद सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधाने सांगितले जातात. कार्य आणि कारण यांच्यामध्ये भेद असल्यामुळे वेदान्तमताने हा विवर्ताचा प्रकार होय. (१८)

परि उभयांतें खंडिल्याविण । विवर्त नव्हे प्रतिपादन ।
आरंभ परिणाम हे दोन । दूषिले वेदान्ती     ॥१९॥
परंतु आरंभ आणि परिणाम या वादांचे खंडन केल्याखेरीज विवर्ताचे प्रतिपादन करता येत नाही. कारण वेदान्तामध्ये आरंभ आणि परिणाम या दोन्ही वादांना दोष दिले आहेत. (१९)

आरंभ जरी जगत्कार्य असतें । तरि कारणें होतीं बहुतें ।
एक असून जाले कल्पिते । मतवादी कोणी ॥२०॥
जगत हे जर आरंभवादाचे कार्य असते तर त्याच्या सिद्धीसाठी अनेक कारणांची आवश्यकता असते. वास्तविक कारण एकच असताना काही लोक अनेक कारणांची कल्पना करतात. (२०)

म्हणती माया उपादान । ईश्वरीं असे कर्तेपण ।
काल कर्म स्वभाव जाण । हें कारण समवाई   ॥२१॥
ते असे म्हणतात की, जगत्कार्यासाठी माया हे उपादान कारण असून ईश्वराच्या ठिकाणी त्याचे कर्तेपण आहे. म्हणजे ईश्वर हा निमित्तकारण आहे. काल, कर्म, स्वभाव ही समवायी कारणे होत. (२१)

निजरूपीं स्वभाव असतां । तरी काल कर्मा नापेक्षिता ।
अथवा काल कर्म होतां । स्वभाव नाहीं       ॥२२॥
ब्रह्माच्या ठिकाणी स्वभाव असता तर त्याने काल, कर्म या सामग्रीची अपेक्षाच केली नसती आणि काल, कर्म यांची जर आवश्यकता भासत असेल तर ईश्वराच्या ठिकाणी तसा स्वभावच नाही. (२२)

म्हणुन मायेचा स्वभाव । तेथेंचि काल कर्मासि ठाव ।
मायेसी कादाचित्कत्व । असे म्हणुन संभवे ॥२३॥
म्हणून स्वभाव मायेचाच असून काल, कर्म यांचे स्थानही मायाच मानावी लागते. माया ही कधी असते, कधी नसते म्हणून काल, कर्म इत्यादी कारणांची सामग्री तिच्या ठिकाणी मानावी लागते. (२३)

मायेपासून ऐलीकडे । जें जें बोलिजे तितुकें थोडें ।
स्वरूपीं पाहतां उघडें । मायाचि विवर्त         ॥२४॥
मायेपासून अलीकडे जे जे उत्पन्न होते ते ते व्याप्तीने अल्प म्हणजे थोडे असते. (याच्याउलट मायेच्या पलीकडचे ब्रह्म हे तत्त्व भूम म्हणजे व्याप्तीने तिच्यापेक्षा जास्त असते. स्वरूपाकडे पाहिले असता ते सदासर्वकाळ उघडे असे व्यापक तत्त्व आहे. म्हणून मायेलाच त्याचा विवर्त मानावे लागते. (२४)

मृगजळ सत्य असावें । तरि धान्यादि पिकावे ।
तैसे मायेच अभावें । काल कर्म मिथ्या        ॥२५॥
आता मृगजळ सत्य असते तर त्यावर धान्य इत्यादी पिके पिकली असती. त्या न्यायाने माया ही अभावरूप म्हणजे मिथ्या असल्याने काल, कर्म हे सुद्धा मिथ्याच ठरतात. (२५)

माया स्वभावादि तीन । परि यासी सत्य अधिष्ठान ।
नव्हे सत्यत्वें विकारणें । यासि विवर्त बोलावे ॥२६॥
माया आणि स्वभाव, काल, कर्म हे तीन पदार्थ सर्व मिथ्या असले तरी या सर्वांचे अधिष्ठान म्हणजे आधार असे जे ब्रह्म ते मात्र सत्य आहे. हे पदार्थ सत्य ब्रह्माचे विकार नाहीत. म्हणून त्यांना ब्रह्मावरील विवर्त असे म्हणावे. (२६)

म्हणोनि आरंभवाद नसे । परिणामही जाणा तैसे ।
सत्यत्वें अन्यथा न दिसे । कार्य कारणासम नाहीं   ॥२७॥
म्हणून मायादी सृष्टीच्या निर्मितीचे आरंभवादाच्या उपपत्तीने स्पष्टीकरण होत नाही. तसेच परिणामवाद स्वीकारूनही ते करता येत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीचा आविष्कार सत्य असल्याचे दिसत नाही, हे एक आणि सृष्टिरूप कार्य ब्रह्मरूप कारणासमान नाही. हे दसरे अशी दोन कारणे त्यामागे आहेत. (२७)

विकार सत्यचि म्हणावा । तरी ज्ञानें मोक्ष न बोलावा ।
जरि सर्पाचिया अभावा । ज्ञान रज्जूचें         ॥२८॥
आता ब्रह्माप्रमाणे त्याचा सृष्टिरूप विकारही सत्य मानला तर ज्ञानाने मोक्ष मिळतो असे म्हणता येणार नाही. सर्पाचा अभाव झाल्यानंतरच रज्जू म्हणजे दोरीचे ज्ञान होऊ शकते. (२८)

रज्जु अवघी नाहीं होती । मग सर्पाकारें परिणमति ।
परिणाम बोलिजे त्याप्रती । ऐसे तों नाहीं       ॥२९॥
जेव्हा संपूर्ण दोरी दिसेनाशी होते, तेव्हाच ती सर्परूपाने परिणाम पावते. पण याला परिणाम म्हणता येत नाही. कारण परिणामवादात कारणाचे सत्यत्वाने कार्यात परिवर्तन होते. (२९)

अनंतपण न मोडतां । माया सकार्य दिसतां ।
त्यासि परिणाम म्हणतां । जीभ न झडे     ॥३०॥
ब्रह्माचे अनंतपण अजिबात नष्ट न होता, त्याचे कार्य जी माया ही तिच्या कार्यासह धडधडीत दिसत असता, त्या मायेला व तिच्या कार्याला ब्रह्माचा परिणाम म्हणणाऱ्याची जीभ कशी झडत नाही ? (३०)

अथवा कार्य हें जें जालें । जड दु:ख आणि नाथिलें ।
अस्ति भाति प्रियत्वा मानिले । नवचे समान ॥३१॥
अथवा निर्माण झालेले कार्य जड, दःखात्मक आणि नास्तिरूप (नाही या स्वरूपाचे) आहे, त्याला ब्रह्माप्रमाणे अस्ति, भाति, प्रिय असेही मानता येत नाही. त्यामुळे येथे कार्य हे कारणाशी समानही म्हणता येत नाही. (३१)

निस्तत्व रूप जैशी माया । तेचि रूप जगात्कार्या ।
समानत्व कारण कार्या । परिणाम मायेचा       ॥३२॥
माया निस्तत्व म्हणजे अभावरूप आहे. तिचे कार्य जे जगत त्याचेही स्वरूप तसेच म्हणजे अभावरूप म्हणजे मिथ्या आहे. त्यामुळे कारण आणि कार्य यांच्यात सारखेपणा आहे. म्हणून जगाला मायेचा परिणाम मानता येते. (३२)

जालें दुधाचें दहीं । तैसें ब्रह्म कारण नाहीं ।
रज्जुवरील अही। म्हणून विवर्त         ॥३३॥
दुधाचे दही होते. त्याप्रकारचे कारण ब्रह्म नाही. दोरीच्या जागी सर्प दिसावा त्याप्रमाणे ब्रह्माच्या जागी जगत् दिसते म्हणून जगाला ब्रह्माचा विवर्त म्हणतात. (३३)

कारणाविशीं जे भ्रांती । ते ज्ञानेंचि लया जाती ।
विवर्तवाद वेदांतीं । स्वीकारिती ऐसा     ॥३४॥
कारणाविषयी जो भ्रम निर्माण होतो, तो भ्रम ज्ञानानेच नष्ट होतो. म्हणून वेदान्तामध्ये अशा प्रकारचा विवर्तवाद स्वीकारण्यात येतो. (३४)

आतां निमित्त आणि उपादान । याचें कैसें निरूपण ।
हेंचि ऐका सावधान । जें शास्त्र सिद्ध     ॥३५॥
आता जगत्कारणाच्या संदर्भात निमित्तकारण कोणते, उपादान कारण कोणते यांचे निरूपण कसे केले जाते त्याचे शास्त्रसिद्ध विवेचन सावधपणे ऐका. (३५)

माया उपादान असे । तेथें निमित्त न दिसे ।
निमित्त ईश्वरीं असे । परि उपादान नाहीं     ॥३६॥
माया हे उपादान कारण आहे. पण ती निमित्तकारण नाही. ईश्वर हा निमित्तकारण आहे पण तो उपादान कारण नाही. (३६)

यास्तव निमित्त उपादान । जेथें कारणत्व अभिन्न ।
तें एकचि अधिष्ठान । ईश्वर मायेसी       ॥३७॥
यासाठी जेथे निमित्त आणि उपादान कारणे अभित्रपणे असतात ते ब्रह्म ईश्वर आणि माया या दोहोंचेही एकमेव अधिष्ठान आहे. (३७)

ऐसें बोले वेद श्रुती । लय आणि स्थिति उत्पत्ती ।
जेथें असे तया म्हणती । अभिन्न कारण       ॥३८॥
वेदात (म्हणजे तैत्तिरीय उपनिषदात) असे म्हटले आहे की जेथे एखाद्या पदार्थाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था असतात तेच त्याचे अभिन्न कारण होय. (३८)

कार्य जेथें लया जाय । जाणावें तें उपादान होय ।
स्थिति उत्पत्ति जेथें होय । ते समवाई निमित्त ॥३९॥
जेथे कार्य लयाला जाते ते उपादान कारण होय. (उदाहरणार्थ, घट फुटल्यानंतर मातीच उरते. म्हणून मृत्तिका हे घटाचे उपादान कारण होय.) जेथे स्थिती आणि उत्पत्ती या दोन अवस्था असतात त्या कारणांना समवायी कारण आणि निमित्तकारण म्हणतात. (घटाचे समवायी कारण म्हणजे पाणी, कुंभाराचे चाक इत्यादी सामग्री आणि उत्पत्तीचे निमित्त असणारा कुंभार हे निमित्तकारण होय.) (३९)

उपादान अन्य नसे । लय श्रुति बोलतसे ।
वेगळें भावितील निमित्त ऐसें । उत्पत्ति बोले या हेतू ॥४०॥
लयश्रुती म्हणजे तैत्तिरीय उपनिषदातील लयासंबंधीचे विधान. 'यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति'या विधानानुसार उपादान कारण वेगळे असत नाही. काहीजण निमित्तकारणाला वेगळे मानतील म्हणून त्यालाच उत्पत्ती म्हटले आहे. (४०)

हे तिन्ही जेथें असती । अभिन्न कारण तया म्हणती ।
येथे कोणी आक्षेपिती । ऐसे दृष्ट नसे        ॥४१॥
उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही अवस्था जेथे एकवटलेल्या असतील त्याला अभिन्न कारण म्हणतात. येथे कोणी आक्षेप घेतील की याला काही दृष्टान्त नाही. (४१)

मृत्तिका हें उपादान । तेचि नव्हे निमित्त कारण ।
कुलालीं असे कर्तेपण । उपादान नसे      ॥४२॥
मृत्तिका हे घटाचे उपादान कारण आहे. पण तेच त्याचे निमित्तकारण नाही. याउलट कुंभार हे घटाचे निमित्तकारण आहे, पण तेथे उपादान कारण नाही. (४२)

घट कार्यासी भिन्न भिन्न । कारणें असती दोन ।
ऐसें अदृष्ट दूषण । अभिन्न कैसें       ॥४३॥
घट या कार्याला अशा प्रकारे मृत्तिका आणि कुंभार अशी दोन वेगवेगळी कारणे आहेत. तेव्हा वरील उत्पत्ती, स्थिती आणि लयविषयक विधानाला दृष्टान्तच नाही असा दोष त्यात असताना अभिन्न कारण ही कल्पना कशी स्वीकारता येईल ? (४३)

भिन्न कारणें घटीं दिसतीं । ते साहित्य न पडे दृष्टांती ।
तरि यासि उपमे येती । तेचि अवधारा           ॥४४॥
घटामध्ये भित्र कारणे दिसतात. पण दृष्टान्तासाठी त्याचे उदाहरण योग्य होऊ शकत नाही. तर मग या विधानाला दृष्टान्त म्हणून शोभेल तेच आता ऐका. (४४)

उर्णनाभी एकला । तंतु निर्मून क्रीडूं लागला ।
तरी अदृष्ट दोष आला । कैसा पाहा       ॥४५॥
एकटा कोळी हा कीटक तंतूची निर्मिती करून त्याच्या साहाय्याने क्रीडा करतो. या उदाहरणात वरील दोष कसा येतो ? म्हणजे अभिन्न कारणांसाठी हे उदाहरण योग्य आहे. (४५)

उर्णनाभीचे परी । अभिन्न ब्रह्म निर्धारी ।
माया आणि ईश्वरीं । अधिष्ठान एक       ॥४६॥
ब्रह्म हे या कोळी कीटकाप्रमाणे अभिन्न कारण आहे. त्यामुळे माया आणि ईश्वर यांचे एकमेव अधिष्ठान आहे. (४६)

मायोपाधि अवलंबिता । ते जाण उपादनता ।
स्वतां होय चेष्टविता । हे निमित्त कारण     ॥४७॥
तो मायोपाधीचा स्वीकार करतो तेव्हा उपादान कारण बनतो. तो या सृष्टीच्या व्यापाराला गती देतो म्हणन तो त्याचे निमित्तकारणही होतो. (४७)

एवं निमित्त उपादान । एकचि ब्रह्म अभिन्न ।
येथे संशयासी कारण । नसे कांहीं     ॥४८॥
अशा प्रकारे ब्रह्म अभित्रपणे निमित्त आणि उपादान कारण होते. याबाबतीत संशयाचे कारणच नाही. (४८)

पूर्वी होतें आक्षेपिलें । निर्विकार कैसें विकारलें ।
विवर्तातें अंगिकारिलें । तरी दूषण नाहीं       ॥४९॥
पूर्वी असा आक्षेप घेण्यात आला होता की, ब्रह्म निर्विकार असताना त्यात विकार कसे निर्माण झाले ? याला उत्तर असे की, विवर्ताच्या उपपत्तीचा स्वीकार केला तर असे दूषण येणार नाही. (४९)

रज्जुचिये अज्ञानें । नसून सर्पा दिसणें ।
रज्जु ओळखितां जाणें । अपसयाची     ॥५०॥
रज्जूच्या अज्ञानामुळे मुळात नसतानाही सर्प दिसू लागतो. पण रज्जूची ओळख पटताच तो सर्प आपोआप जातो. (५०)

सर्प जेव्हां जाला होता । तेव्हांचि नसे तत्वतां ।
ज्ञानें गेला मेला म्हणतां । लाजिजे कीं      ॥५१॥
जेव्हा सर्प झाला होता तेव्हाच तो मुळात नव्हता. ज्ञानामुळे तो गेला किंवा मेला असे म्हणतानाही लाज वाटते. (५१)

जेव्हां भासला विकार । तेव्हांचि असे निर्विकार ।
विकार जातां निर्विकार । बोलणें नलगे         ॥५२॥
जेव्हा विकार निर्माण झाला आहे असे भासले, तेव्हाच ब्रह्म निर्विकारच होते. विकार गेल्यामुळे ते निर्विकार झाले असे म्हणण्याची गरजच नाही. (५२)

जें जें अज्ञानें जालें । ते तें ज्ञानें लया गेलें ।
येथे समाधान असे जालें । विवर्त मिथ्या       ॥५३॥
जे जे अज्ञानामुळे निर्माण झाले ते ते सर्व ज्ञानामुळे लयाला गेले. विवर्तच मुळी मिथ्या ठरल्याने शंकेचे निरसन झाले. (५३)

आकाशादि जग आघवें । हे उपक्रमें सांगावें ।
कोणापासून कोण संभवे । हे निरोपिजे        ॥५४॥
सृष्टयुत्पत्तीचे निरूपण करण्याच्या ओघात आकाशादी सर्व जग कसे उत्पन्न झाले ते सांगावे. कोणापासून कोण निर्माण झाले तेही सांगावे. (५४)

येथें अनुक्रम तरि कैचा । हा संकेत बोलावयाचा ।
जैसा संभार स्वप्नीचा । एकदाचि भासे        ॥५५॥
खरे तर याबाबतीत क्रम तरी कोठे आहे ? हा फक्त बोलण्याचा संकेत झाला. स्वप्रात पाहिलेल्या वस्तूंचा समूह एकाच वेळी दिसतो. त्यात क्रम कुठे असतो ? (५५)

तैसें मुळीं जे स्फुरण जालें । त्यासवेंचि सर्व प्रगटलें ।
मग कल्पून नांवातें ठेविलें । अनुक्रमेंचि        ॥५६॥
त्याप्रमाणे मुळातच जे स्फुरण झाले त्याबरोबरच सर्व सृष्टी एकदम प्रकट होत असते. मग कल्पना, तिच्यातील पदार्थांना क्रम, नावे दिली जातात. (५६)

तथापि याचा अनुक्रम । श्रुतिसिद्ध असे परम ।
जालें रूप आणि नाम । तें तें सर्व बोलिजेते       ॥५७॥
तथापि, या सृष्टिनिर्मितीचा अनुक्रम श्रुती आणि वेदान्त यांना मान्य असाच आहे. या सृष्टिरचनेच्या क्रमामध्ये जी जी रूपे आणि नावे झाली ती ती सर्व पुढे सांगण्यात येतील. (५७)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
विवर्तवादप्रकारे । प्रथमसमासः ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
भूतसृष्टिप्रकार


निर्विकार जें निश्चळ । आकाशापरि केवळ ।
तेथें स्फुरण झालें चंचळ । वायु ऐसें      ॥१॥
जे ब्रह्म केवळ आकाशासारखे असून निर्विकार आणि निश्चळ असे आहे, त्याच्या ठिकाणी पाण्यावर जशा चंचल लाटा उठतात किंवा आकाशात जसा चंचल वायू निर्माण होतो त्याप्रमाणे चंचल स्फुरण निर्माण होते. (१)

आकाशीं वायु होतां । तेणें न जाय निश्चळता ।
चंचळासी वितुळता । वेळ नाहीं                    ॥२॥
आकाशात वायू निर्माण झाला तरी त्याची (आकाशाची) निश्चलता नष्ट होत नाही. पण त्यात निर्माण झालेल्या चंचल तत्त्वांना नष्ट होण्यास (किंवा विसकटून जाण्यास) काहीच वेळ लागत नाही. (२)

तैसें स्वरूप सच्चिद्‌रूप । आनंदघन अमूप ।
तेथें चंचळ तें अल्प । हो‍ऊन जातें       ॥३॥
त्याप्रमाणे स्वरूप सत्, चित् आणि आनंदघन (आनंदाने दाट भरून राहिलेले, आनंदाने परिपूर्ण) असून तेथे स्फुरणरूपी चंचल तत्त्व मर्यादित व्याप्ती असलेले आणि थोड्या कालावधीसाठी होऊन जाते. (३)

होतां जातां तरंग । पाणियासी नव्हे भंग ।
तरंगीं पाहतां अभंग । पाणीच असे       ॥४॥
पाण्यावर लाटा उठत असतात, ओसरून जात असतात, पण त्यांच्यामुळे पाण्यात खंड पडत नाही. तरंगांत पाहिले तरी तेथेही अखंड असे पाणीच असते. (४)

परब्रह्म तें स्वतां चित्‌ । ज्ञप्तिमात्र सदोदित ।
स्फुरणीं जें प्रतिभासत । साक्षि तत्व तें                 ॥५॥
परब्रह्म हे स्वत: चित्स्वरूप, ज्ञानस्वरूप आणि नित्य असे आहे स्फुरणात जे भासते ते साक्षीभूत तत्त्व आहे. (५)

तोचि जाणिजे अंतर्यामी । पुढें तत्वें प्रगटलीं अनुक्रमीं ।
अविद्यमान चंचळ उर्मी । हिरण्यगर्भ सूत्रात्मा          ॥६॥
त्यालाच अंतर्यामी असे जाणावे. त्यानंतर अनुक्रमे अनेक तत्त्वे प्रकट झाली. अगोदर आभासात्मक स्फुरणरूपी चंचल लहर निर्माण झाली. त्यानंतर सूत्रात्मा असा हिरण्यगर्भ निर्माण झाला. (हिरण्यगर्भ म्हणजे समष्टीचा सूक्ष्म देह अथवा लिंगदेह) . (६)

भूतांचे करून पंचीकरण । उभविलें हें त्रिभुवन ।
विराट जयाचें अभिधान । स्थूल समष्टि                   ॥७॥
मग पंचमहाभूते निर्माण झाली. त्या पंचमहाभूतांचे पंचीकरण करून या त्रिभुवनाची उभारणी केली. या स्थूल समष्टीला विराट असे नाव आहे. (७)

जैशा चित्रपटीं पाहतां । उमटती चारी अवस्था ।
तेणे रीती व्यवस्था । चौ प्रकारें          ॥८॥
ज्याप्रमाणे चित्रपट्टाच्या चार अवस्था असतात, त्याप्रमाणे परब्रह्माच्याही चार अवस्था असतात. (८)

पट असें स्वतां श्वेत । खळ लावितां होय घट्टित ।
वरी अनुकार रेखाटित । रंगभरित विशिष्ट                ॥९॥
पट मुळात पांढरा असतो. त्याला खळ लावल्यानंतर तो कडक बनतो. त्यानंतर चितारी त्याच्यावर रेखा आखून घेतो आणि नंतर त्यावर चित्र रंगवतो. (म्हणजे चित्रपटाच्या स्वच्छ धुतलेला शुभ्र, खळ सारवलेला, आखलेला व रंगवलेला अशा चार अवस्था असतात.) (९)

श्वेत पटाचिये परी । स्वस्वरूप निर्धारी ।
अंतर्यामी अवस्था दुसरी । घट्टित पटासम           ॥१०॥
त्या शुभ्र चित्रपट्टाप्रमाणे परब्रह्माची, पहिली स्वरूपावस्था अंतर्यामी ही. खळ लावून घोटवलेल्या पट्टाप्रमाणे दुसरी अवस्था आहे. (१०)

रंगेंविण रेखाटिलीं । अस्पष्ट तत्वें उद्भवलीं ।
तृतीय अवस्था जाली । सूत्रात्मरूप       ॥११॥
नंतर रंगावाचून केवळ रेखाटलेल्या अस्पष्ट चित्रांची रंगपट्टाची तिसरी अवस्था येते. ती परब्रह्माची सूत्रात्मा नावाची तिसरी अवस्था होय. (११)

पुढे चौथा विराट ।  प्रगटता जाला स्पष्ट ।
रंगित जैसा चित्रपट । अवस्था चौथी      ॥१२॥
पुढे रंगवलेला चित्रपट्ट ही चौथी अवस्था येते. ती परब्रह्माची विराट नावाची प्रकट झालेली अवस्था होय. (१२)

आतां हेंचि प्रांजळ करूं । तत्व सुटीचा विस्तारु ।
मुळीं स्फुरणाचा विकारू । मूळ माया जे                 ॥१३॥
आता मूळ स्फुरणालाच मूळ माया म्हणतात. त्या मूळ स्फुरणाचे विकार होऊन जी तत्त्वसृष्टी निर्माण झाली तिचा विस्तार स्पष्ट करून सांगतो. (१३)

कार्यी कारणत्व व्यापलें । कारणीं कार्य नाथिलें ।
येणें रीती समजलें । पाहिजे पुढें           ॥१४॥
कार्यामध्ये कारणाची व्याप्ती असते. पण कारणामध्ये कार्याची व्याप्ती नसते हे या रीतीने पुढेही समजून घ्यावे. (१४)

ब्रह्म सदंशे स्फुरणीं । आणि निस्तत्वें माया राणी ।
चंचलरूपें जाणतेपणीं । हे दोन्ही प्रकृति पुरुष         ॥१५॥
स्फुरणामध्ये ब्रह्म सद्‌रूपाने वास्तव्य करते, मायाही नाहीपणाने (निस्तत्व) वास्तव्य करते. प्रकृती चंचलपणाने आणि पुरुष ज्ञातेपणाने वास्तव्य करतात. (१५)

माया अविद्या जीव शिव । त्रिगुणादि भूतें सर्व ।
इतुक्याचें अस्पष्ट अवयव । स्फुरणीं असती               ॥१६॥
अशा प्रकारे माया, अविद्या, जीव, शिव, त्रिगुण, सर्व भूते इतकी सर्व तत्त्वे अव्यक्तपणे स्फुरणामध्ये असतात. (१६)

पुढें स्पष्टतेस पावले । एकापासून एक जाले ।
सूक्ष्मीं तयाचे मासले । बीजीं वृक्ष जैसा                 ॥१७॥
ही तत्त्वे पुढे एकामागून एक अशी स्पष्ट अथवा व्यक्त होत जातात. एका सूक्ष्म बीजात जसा सर्व वृक्ष सामावतो तसे या सर्वांचे अस्फुट अवयव त्या सूक्ष्मात असतात. (१७)

चंचल जाणीव मूळ माया । प्रकृति पुरुष म्हणावे तया ।
ज्ञानाज्ञान अविद्या माया । समजावी तेथें                 ॥१८॥
मूळ स्फुरणात जी चंचलता असते ती मूळ प्रकृती होय आणि तिथेच जी जाणीव असते तिला पुरुष म्हणतात. तेथेच ज्ञान आणि अज्ञान. अविद्यारूप माया असतात. (१८)

जितुकें असे स्फुरण । तितुकें होय जाणतेपण ।
तया नांव बोलिजें ज्ञान । विक्षेपशक्ति विद्या               ॥१९॥
स्फुरणाची व्याप्ती जेवढी असते तेवढीच जाणीव तेथे असते. त्यालाच ज्ञान असे म्हणतात. हीच विक्षेप (नवीन दृश्ये) निर्माण करणारी विद्या आहे. (विक्षेपशक्ती विद्या) . (१९)

तेथें चैतन्य प्रतिबिंबिले । ईशत्व ऐसें नाम आलें ।
तेंचि निमित्तकारण जालें । जगत्कार्यासी                 ॥२०॥
तेथे चित्ततत्त्वाचे प्रतिबिंब पडते त्यास 'ईश' असे नाव प्राप्त होते. तोच ईश्वर जगत्कार्याचे निमित्तकारण होते. (२०)

स्फुरणा इतुकें ज्ञान । येर अखंड दंडायमान ।
तयाचि नसे आठवण । तेंचि अज्ञान अविद्या               ॥२१॥
स्फुरणाच्या व्याप्तीएवढीच जाणीव किंवा ज्ञान असते. बाकीचा सगळा सलग पसरलेला जो भाग त्याची त्याला आठवणही होत नाही. त्यालाच अज्ञान किंवा अविद्या म्हणतात. (२१)

जें आवरण शक्तीचे लक्षण । तेथें चैतन्य प्रतिभासमान ।
तोचि जीव जगत्कारण । उपादान होय               ॥२२॥
हे अज्ञान म्हणजे आवरणशक्तीचे लक्षण होय. त्यामध्ये जे चैतन्याचे प्रतिबिंब पडते त्यालाच जीव म्हणतात. तोच जगत्कारणही होतो. तोच जगाचे उपादान कारणही होतो. (२२)

जाणीव तो सत्वगुण । नेणिव तमाचें लक्षण ।
मिश्रित जाणिजे रजोगुण । स्फुरणीं तिन्ही              ॥२३॥
जाणीव हा सत्त्वगुण आहे. नेणीव हे तमोगुणाचे लक्षण होय. दोन्ही मिश्रित होऊन त्यापासून रजोगुण होतो. हे तीनही गुण स्फुरणात असतात. (२३)

परब्रह्म जें सघन । स्फुरण नसे अवकाशेंविण ।
अवकाश तें आकाश पूर्ण । आणि शब्दहि असे            ॥२४॥
परब्रह्म हे घनदाट असून स्फुरणाला तर अवकाशाची गरज आहे. अवकाशाखेरीज स्फुरण असूच शकत नाही. अवकाश म्हणजे पोकळी. आकाश हीच ती पोकळी. त्याशिवाय आकाशाचा गुण जो शब्द तोही तेथे असतो. (२४)

स्फुरण सहज चंचळ । तोचि वायू जाणिजेल ।
स्वभावें भासूं लागेल । तेंचि तेज        ॥२५॥
स्फुरण हे सहज (स्वाभाविक) असून चंचल असते. त्यातील चंचलता म्हणजेच वायू होय. अशा त-हेने स्वाभाविकरीत्याच ते स्फुरण जेव्हा भासू लागेल (प्रकाशित होईल) तेव्हा त्यालाच तेज म्हणतात. (२५)

सूक्ष्मत्वें असें मृदु । तेंचि आप हें विशदु ।
अज्ञान कठिण संवादु । पृथ्वीचा ऐसा     ॥२६॥
स्फुरण हे सूक्ष्म असल्यामुळे स्वाभाविकच ते मृदू असते. ते आप तत्त्व होय, हे स्पष्ट आहे आणि त्यातील जड (अज्ञान) व कठीण भाग जो आहे तो पृथ्वीशी जुळतो. असा हा पंचभूतांचा मेळ स्फुरणामध्ये असतो, (२६)

हे असो तत्वें समस्त । तेथेंचि असतीं गुप्त ।
पुढें प्रगटतां भासूं लागत । वेगळालीं      ॥२७॥
हे असू द्यात. अशा रीतीने सर्व तत्त्वे स्फुरणामध्येच अव्यक्त रूपाने असतात. पुढे ती प्रगट होतात व वेगवेगळी भास लागतात. (२७)

आतां कोणापासून कोण जालीं । तत्त्वें कैसीं उद्‌भवलीं ।
कार्य कारणें समजलीं । पाहिजे ऐका      ॥२८॥
आता कोणते तत्त्व कोणत्या तत्त्वापासून झाले, ती तत्त्वे कशी निर्माण झाली, त्यांचा कार्यकारणसंबंध कशा प्रकारचा आहे, ते समजले पाहिजे, तरे ते आता ऐका. (२८)

साम्य‍अवस्था समानगुणीं । क्षोभता जाली गुणक्षोभिणी ।
प्रगटते झाले गुण तिन्ही । शक्तीसहित              ॥२९॥
अगोदर मूळ मायेत सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण साम्यावस्थेत होते. ती ढळल्याबरोबर तिला गुणक्षोभिणी ही अवस्था प्राप्त झाली आणि त्यासरशी तिन्ही गुण आपापल्या शक्तिनिशी प्रगट झाले. (२९)

ज्ञानशक्ति सत्वगुण । क्रियाशक्ति रजोगुण ।
द्रव्यशक्ति तमोगुण । तेचि भूतें                    ॥३०॥
सत्त्वगुण व त्याची ज्ञानशक्ती, रजोगुण आणि त्याची क्रियाशक्ती, तमोगुण आणि त्याची द्रव्यशक्ती असे सर्व प्रगट झाले. त्यांनाच भूते असे म्हणतात. (३०)

प्रथम विकार जो अवकाश । जया नांव आकाश ।
तेथें ब्रह्मीचा सदंश । व्यापून असे        ॥३१॥
स्फुरणामधील पहिला विकार म्हणजे अवकाश अथवा पोकळी हा होय. त्याला आकाश असे नाव आहे. त्यामध्ये ब्रह्माचा सदंश (सत्+अंश-म्हणजे सच्चिदानंद या तीन लक्षणातील अस्तित्वाचा अंश) व्यापून आहे. (३१)

निस्तत्व माया बोलिली । तिची कारणत्वें व्याप्ति जाली ।
सदंशा नामें ठेविलीं । तेंचि माया        ॥३२॥
असत् (मिथ्या) स्वरूपी माया ती कारणरूपाने व्यापक झाली आणि सदंशाला नामे प्राप्त झाली. ती मायाच होय. (३२)

सत्ताविण आकाश । रूपा कैंचा अवकाश ।
नाहींपणें तयांस । निस्तत्व बोलिजे       ॥३३॥
त् (अस्तित्व) नसेल तर आकाशाला वाव कसा असेल ? मग ते नाही (निस्तत्व) असे ठरेल. म्हणून त्याला निस्तत्व अथवा मिथ्या म्हणावे लागेल. (३३)

मुख्य आकाशाचें लक्षण । शून्य अवकाश शब्दगुण ।
ते मायेच्या एकांशी जाण । न्यून असे               ॥३४॥
आकाशाचे मुख्य लक्षण म्हणजे शून्यत्व, पोकळी आणि शब्दगुणयुक्त असे आहे. आकाश हे मूळ मायेपासून निर्माण झाले, त्यामुळे त्याची व्याप्ती मायेहून कमी असते. ती मायेपेक्षा एक अंशाने कमी असते. (३४)

त्यापासुनी वायु जाला । पूर्व कारणें व्यापिला ।
वायु आहेसा दिसला । तो सदंश                        ॥३५॥
आकाशापासून वायू झाला. कारण हे कार्याला व्यापते या न्यायाने त्याचे पूर्वकारण जे आकाश त्याने त्याला व्यापून टाकले. वायू आहेसा वाटतो तो त्याचा सदंश होय. (३५)

सदंशावाचून कांहीं । वायुसी रूपच नाहीं ।
तेचि तेथें निस्तत्वही । मायादेवीचें       ॥३६॥
सदंशाखेरीज वायूला दुसरे रूपच नाही. त्याचे रूपहीन असणे हीच त्याच्यामध्ये असलेल्या निस्तत्व (मिथ्या) मायेची खूण आहे. (३६)

आकाशाचा शब्दगुण । तेथें प्रगटला आपण ।
वारा वाजतां सणसण । कळूं येतो        ॥३७॥
आकाशाचा शब्द हा जो गुण आहे तो वायूमध्ये प्रगट होतो. वारा सणसण असा वाजू लागला की तो गुण कळून येतो. (३७)

वायूचें रूप चंचळ । विहरणादि सकळ ।
स्पर्शगुण हा केवळ । जातीचा असे       ॥३८॥
वायूचे रूप चंचल असते त्यामुळे त्याचा सगळीकडे संचार असतो. वायूचा स्पर्शगुण हा तर जातिगुण आहे. (३८)

आकाशाचिये एकदेशीं । न्यूनत्व असे वायुसी ।
पुढें वायूचिये केशीं । तेज जन्मलें        ॥३९॥
आकाश हे कारणतत्त्व असल्यामुळे वायू हे जे कार्यतत्त्व ते आकाशापेक्षा व्याप्तीने मर्यादित असते. यानंतर वायूच्या कुशीतून तेज जन्म घेते. (३९)

अग्नि आहे हा सदंश । निस्तत्वही तेथें असे ।
शब्दगुणेंहि आकाशें । वस्ति केली        ॥४०॥
अग्नी आहे हाच त्याच्यात असलेला सदंश आहे. तो अर्थातच ब्रह्माचा अंश होय. मायेचे निस्तत्वही तेथेच आहे आणि शब्दगुणाच्या निमित्ताने आकाशानेही तेथे वस्ती केलेली आहे. (४०)

ध्वनी भुगभुगें उठली । उष्ण स्पर्शे वस्ति केली ।
ते कारणत्वें आली । व्याप्ति वायुची       ॥४१॥
अग्नी प्रदीप्त झाला असता त्यातून भुगभुग असा ध्वनी निघतो. . . . . . . . . अग्नीचा स्पर्श उष्ण असतो. त्याअर्थी वायूच्या स्पर्श या गुणाने तेथे वस्ती केली आहे. अशा त-हेने तेज या तत्त्वाचे कारण म्हणून वायूचीही तेथे व्याप्ती आहे. (४१)

प्रकाश उष्ण दाहक । मुख्य तेजाचें रूपक ।
रूपगुण अवश्यक । निजत्व स्वभाव      ॥४२॥
प्रकाश, उष्णता, दाहकत्व हे तेजाचे मुख्य रूप आहे. त्याचा रूपगुण हा स्वाभाविक स्वत:चा असा गुण तर तेथे आवश्यकच आहे. (४२)

वायु दशांशें न्यून । तेज असें भासमान ।
तया तेजापोटीं जनन । आपाचें जालें     ॥४३॥
वायूच्या व्याप्तीच्या दशांशाने कमी अशी तेजाची व्याप्ती दिसते. त्या तेजाच्या पोटी आप तत्त्वाचा जन्म होतो. (४३)

आहे ऐसें वाटें आप । तेचि जाणावें सद्‌रूप ।
तेणेंविण असद्रूप । तेचि माया              ॥४४॥
आप म्हणजे पाणी आहे, असे वाटते. तेच त्याचे सद्‌रूप आहे. हे त्याच्या ठिकाणचे ब्रह्माचे लक्षण झाले. ते नसेल तर जे असद्‌रूप राहते तीच माया होय. (४४)

बुलबुला उठे नाद । तोचि आकाशींचा शब्द ।
शीत स्पर्श उठे मृद । वायुतत्त्वाचा       ॥४५॥
बुलबुल असा जो पाण्याचा ध्वनी उठतो तोच आकाशाचा शब्दगुण होय. आपाचा शीतल आणि मृदू स्पर्श जो जाणवतो तो वायुतत्त्वाचा स्पर्शगुण तेथे आहे. आपतत्त्व जे दिसते, तो तेजाचा गुण तेथे आला आहे. आपतत्त्व हे मृदू आणि ओलसर असते. तो वायुतत्त्वाचा स्पर्श गुण होय. (४५)

दिसणें तेजाचें रूप । मृदु क्लेदन असें आप ।
मुख्य रस आपोआप । निजोगुण जाला             ॥४६॥
पाणी दिसते हे तेजाचे रूप, मऊ आणि ओलसर असते तो वायूचा गुणधर्म होय आणि ते रसमय म्हणजे द्रवरूप आहे. हा त्याचा स्वभावधर्म आहे तो तर आपोआपच तिथे आलेला आहे. (४६)

अग्निहून दशगुण । आप एकदेशीं न्यून ।
मग त्या आपापासून । पृथ्वी जन्मली     ॥४७॥
अग्नीपेक्षा आपतत्त्व दशांशाने कमी व्याप्त आहे. त्यानंतर त्या आपतत्त्वापासून पृथ्वी निर्माण होते. (४७)

आहे पृथ्वी ते सत्‌ । माया निस्तत्वे वर्तत ।
कडकडां शब्द उठत । आकाशतत्वाचा     ॥४८॥
या पृथ्वीतत्त्वातही ब्रह्माचा सत् (आहेपणा) हा अंश आहे. सत् तत्त्वाचा अभाव असेल तेथे माया निस्तत्व म्हणजे मिथ्यापणाने आहे. पृथ्वीचा जो कडकड शब्द उठतो तो आकाशतत्त्वाचा भाग आहे. (४८)

कठिण स्पर्श वायूचा । चित्रविचित्र भास रूपाचा ।
प्रवेश असे तेजाचा । आप ऐका           ॥४९॥
कठीण स्पर्श हा वायूचा भाग आहे. पृथ्वीच्या चित्रविचित्र रूपांचा भास हा पृथ्वीच्या ठिकाणी होणाऱ्या तेजाच्या प्रवेशाचा भाग आहे. आता आपतत्त्वाचा भाग ऐका. (४९)

कडू क्षार मधुर । रसगुणें आप साचार ।
निजरूपाचा विचार । कैसा भूमीचा        ॥५०॥
पृथ्वीतील कडू, खारट, मधुर अशा द्रव पदार्थांच्या रूपाने पृथ्वीतील आप तत्त्वाचा बोध होतो. आता पृथ्वीचा स्वत:चा असा स्वाभाविक अंश कोणता ते ऐका. (५०)

कठिण आणि धारण । गंध असे निजोगुण ।
आपाहून असें न्यून । दशांशे पृथ्वी       ॥५१॥
कठिणपणा, धारकत्व म्हणजे धारणा करणारा आणि गंध हा पृथ्वीचा स्वत:चा गुणधर्म आहे. पृथ्वी ही आपतत्त्वाहून दशांशाने कमी व्याप्तीची आहे. (५१)

उणें एकाहुनी एक । परि जडत्वें अधिकाधिक ।
गुणहि तैसे अवश्यक । अधिकपणें        ॥५२॥
या आकाशापासून पृथ्वीपर्यंतच्या पंचमहाभूतांमध्ये प्रत्येक तत्त्व आपल्या कारणतत्त्वाहून दशांशाने कमी असते पण जडपणामध्ये मात्र ते वाढत जाते. तसेच गुणांच्या बाबतीतही प्रत्येक तत्त्व कारणतत्त्वापेक्षा अधिकाधिक वाढत जाते. (५२)

आकाश एक शब्दगुण । वायु शब्द स्पर्श द्विगुण ।
तेज जाणावें त्रिगुण । शब्दस्पर्शरूप       ॥५३॥
आकाशाचा शब्द हा एकच गुण आहे. वायूचे शब्द आणि स्पर्श असे दुप्पट गुण होतात. तेज हे शब्द, स्पर्श आणि रूप अशा तीन गुणांनी युक्त आहे, असे जाणून घ्यावे. (५३)

शब्द स्पर्श रूप रस । चारी गुण हे आपास ।
पांच गुण करिती वास । पृथ्वींमध्यें       ॥५४॥
आपतत्त्वाचे शब्द, स्पर्श, रूप आणि रस असे चार गुण आहेत, तर पृथ्वीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे पाच गुण वास्तव्य करतात. (५४)

शब्दगुण आकाशीं । म्हणून वेद्य श्रोत्रासी ।
शब्द स्पर्श हे वायूसी । श्रोत्र त्वचेसी वेद्य                ॥५५॥
आकाशाचा शब्द गुण असल्यामुळे त्याचे ज्ञान कानाने होते. वायूचे शब्द आणि स्पर्श हे गुण असल्यामुळे तो कान व त्वचा यांच्याद्वारे समजतो. (५५)

शब्द स्पर्श रूप तेज । श्रोत्रत्वक्‌चक्षुसि समज ।
शब्द स्पर्श रूप रस बुझ । आप चतुर्गुण                 ॥५६॥
तेजाचे शब्दस्पर्श आणि रूप हे गुण असल्याने त्याचे ज्ञान कान, त्वचा, डोळे यांनी होते. आपतत्त्व हे शब्द, स्पर्श, रूप आणि रस या चार गुणांनी युक्त आहे. (५६)

म्हणोनि वेद्य चहुसी । श्रोत्रत्वक्चक्षुजिव्हेसी ।
शब्द स्पर्श रूप रस गंधासी । असणें पृथ्वी               ॥५७॥
म्हणून ते श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा या चार इंद्रियांनी ज्ञात होते आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे पाच गुण आहेत. (५७)

म्हणुन पांचा इंद्रियासी । श्रोत्रत्वचाचक्षुजिव्हेसी ।
घ्राण ज्ञानेंद्रियपंचकासी । वेद्य पृथ्वी      ॥५८॥
म्हणून ती श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण या पाच इंद्रियांनी ज्ञात होते. (५८)

ऐसीं पंच महाभूतें । पावलीं जे उत्पत्तीतें ।
शक्तिसहित त्रिगुण त्यातें । व्यापिते जाले                ॥५९॥
अशा प्रकारे पाच महाभूते उत्पन्न झाली. त्यानंतर सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांनी त्यांना आपल्या शक्तींसह व्यापून टाकले. (५९)

सर्वज्ञ जो का ईश्वर । धारणादि शक्तीचा आदर ।
व्यापूनिया भूतमात्र । सहजचि असे      ॥६०॥
ईश्वर हा सर्वज्ञ असून तो धारणादी शक्तींचा अवलंब करून सर्व भूतांना व्यापून सहजपणे राहिला आहे. (६०)

आतां भूतगुणापासून । जन्मे क्रिया आणि ज्ञान ।
रजसत्त्वाच्या शक्ती दोन । प्रगटत्या जाल्या               ॥६१॥
आता भूतगुणांपासून क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या, रजोगुण, तमोगुण यांच्या दोन शक्ती प्रगट झाल्या. (६१)

ज्ञानेंद्रिय अंत:करण । ज्ञानशक्ति सत्त्वगुण ।
साधारण असाधारण । कार्य भूतांचे       ॥६२॥
आता ज्ञानेंद्रिय, अंत:करण, ज्ञानशक्ती आणि सत्त्वगुण ही भूतांचे साधारण आणि असाधारण कायें होत. (६२)

आकाशींचा सत्त्वगुण । श्रोत्रेंद्रिय होय निर्माण ।
वायूचा सत्वांश जाण । त्वगेंद्रिय जालें               ॥६३॥
आकाशाच्या सत्त्वगुणापासून श्रोत्रेन्द्रिय निर्माण झाले. वायूच्या सत्त्वांशापासून त्वगिंद्रिय निर्माण झाले. (६३)

तेज सत्त्वांशाचा । जन्म असे चक्षूचा ।
सत्त्वगुण आपाचा । तें रसनेंद्रिय                        ॥६४॥
तेजाच्या सत्त्वांशापासून चक्षू या इंद्रियाचा जन्म झाला. आपाच्या सत्त्वगुणापासून रसनेंद्रिय निर्माण झाले. (६४)

पृथ्वियेचा सत्वगुण । इंद्रिय उद्‍भवलें घ्राण ।
एवं ज्ञानेंद्रिय असाधारण । कार्य जालें               ॥६५॥
पृथ्वीच्या सत्त्वगुणापासून घ्राणेंद्रिय निर्माण झाले अशा प्रकारे ज्ञानेन्द्रियांची निर्मिती हे भूतांचे असाधारण (वेगवेगळे) कार्य निर्माण झाले. (६५)

सत्वगुणाचे साधारण । भूतसमष्टीपासून ।
जन्मलें हें अंत:करण । द्विधा चतुर्धा      ॥६६॥
या सर्व भूतांच्या एकत्रित सत्त्वगुणापासून दोन अथवा चार प्रकारचे अंत:करण निर्माण झाले. (६६)

मन बुद्धी चित्त अहंकार । येणें रीती हे चत्वार ।
अंतर्भूत करितां एकत्र । द्विधा होती       ॥६७॥
मन, बुद्धी, चित्त आणि अंत:करणाचे चार विभाग होत. त्यातील चित्त आणि अहंकार मन आणि बुद्धी या दोन प्रकारात अंतर्भूत केल्यानंतर अंत:करणाचे दोन विभाग होतात. (६७)

होय नव्हे हा संशय । तें मनाचें रूप होय ।
चिंतनात्मक चित्तान्वय । मनाच्या पोटीं                 ॥६८॥
हा अमुक पदार्थ आहे अथवा नाही हा जो संशय अंत:करणात निर्माण होतो ते मनाचे रूप जाणावे. चिंतन करणारे ते चित्त असून त्याचा समावेश मनामध्ये करतात. (६८)

निश्चयात्मक बुद्धीचा । पोटीं समावेश अहंकाराचा ।
येणें रीती अंत:करणाचा । द्विधा विभाग                 ॥६९॥
निश्चय करणारी ती बुद्धी, तिच्या पोटी अहंकाराचा समावेश होतो. अशाप्रकारे अंत:करणाचे दोन प्रकारचे विभाग होतात. (६९)

तैसाचि भूतांचा रजांश । क्रियाशक्ति पावे जन्मास ।
आधि असाधारण कार्यास । उद्भव कैसा               ॥७०॥
त्याचप्रमाणे भूतांच्या रजोगुणाच्या अंशापासून क्रियाशक्तीचा जन्म होतो. तत्पूर्वी असाधारण (वेगळाल्या) कार्याची निर्मिती कशी होते, ते पाहू. (७०)

रजोगुण आकाशींचा । निर्माण जालीसे वाचा ।
तैसा वायु रजांशाचा । पाणींद्रिय                        ॥७१॥
आकाशातील रजोगुणापासून वाचा निर्माण झाली. त्याचप्रमाणे वायूच्या रजोगुणापासून पाणी (हात) निर्माण झाले. (७१)

तेजाचा जो रजोगुण । गमनक्रियात्मक चरण ।
आप रजांशापासून । उपस्थेंद्रिय                    ॥७२॥
तेजाच्या रजोगुणापासून गमन क्रियायुक्त पाय निर्माण झाले. आणि आपाच्या रजोगुणापासून उपस्थ (जननेन्द्रिय) निर्माण झाले. (७२)

रजांश पृथ्वीचा काढिला । गुदेंद्रिया जन्म जाला ।
असाधारण कर्मेंद्रियाला । ओळखावें       ॥७३॥
पृथ्वीच्या रजोगुणाच्या अंशापासून गुदेन्द्रियाचा जन्म झाला. अशाप्रकारे असाधारण (वेगळाल्या) कर्मेद्रियांची निर्मिती झाली, हे जाणून घ्यावे. (७३)

समष्टिरूप पांचांचा । रजांश काढून भूतांचा ।
यया साधारण कार्याचा । प्राण जाला      ॥७४॥
पाची भूतांच्या समष्टीचा (अवघ्यांचा एकत्र मिळून) रजोगुण काढून त्यापासून झालेले साधारण कार्य म्हणजे प्राण होय. (७४)

तो वृत्तिभेदें साचार । जाला पंचविध प्रकार ।
प्राणापानव्यान निर्धार । उदान समान     ॥७५॥
वृत्तिभेदाने त्याचे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पाच प्रकार झाले. (७५)

कर्मेंद्रिय पंचप्राण । ज्ञानेंद्रियपंचक जाण ।
बुद्धि आणि दुजें मन । सप्तदशकलात्मक                 ॥७६॥
पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, पाच ज्ञानेंद्रिये, बुद्धी आणि मन अशी ही सतरा तत्त्वे होत. (७६)

समष्टिरूप दैवता । विराट इंद्रिये तत्वतां ।
कार्यकारणत्वें पाहतां । भेद नाहीं        ॥७७॥
अशा या समष्टिरूप दैवताची विराट ही इन्द्रिये होत. त्यांच्यामध्ये कार्यकारणभावाच्या दृष्टीने काही भेद नाही. (७७)

अपंचीकृतभूत कार्य । सूक्ष्मरूप भास होय ।
विषय साधन उपाय । अस्पष्टपणें        ॥७८॥
अपंचीकृत भूतांचे कार्य सूक्ष्मरूपाने भासते. त्यात विषय, साधन, उपाय ही सर्व अस्पष्टरूपाने असतात. (७८)

वर्षाकाळीं कोमळ दारुण । अथवा सस्यादिकें धान्य ।
अंकुरतां भासमान । अस्पष्ट होतीं        ॥७९॥
वर्षाकाळात प्रखर ऊन कोमल बनते किंवा धान्ये अंकुरताना (कोंभ फुटत असताना) अस्पष्ट होतात, (७९)

तैसा सूत्रात्मा हिरण्यगर्भ । कोमळपणें निघती कोंभ ।
भासती परि स्वयंभ । स्पष्ट न होतीं      ॥८०॥
त्याप्रमाणे सूत्रात्मा हिरण्यगर्भ आहे. कोंभ दिसतात पण स्वतः हिरण्यगर्भाचे अवयव स्पष्ट दिसत नाहीत. (८०)

पूर्व दृष्टांती स्मरावें । चित्रपटापरि अघवें ।
स्वरूप चिद्‌रूप स्वभावें । स्वतां शुभ्रपट                 ॥८१॥
मागे सांगितलेल्या चित्रपटाच्या दृष्टान्ताचे थोडे स्मरण करावे. स्वभावत:च चिद्‌रूप असलेले स्वरूप ब्रह्म हे शुभ्रपटाप्रमाणे आहे. (८१)

अंतर्यामी जो ईश्वर । मूळ मायेचा विचार ।
घोटून केला सुंदर । पटु जैसा               ॥८२॥
मूळ मायेचा विकार जो अंतर्यामी परमेश्वर तो घोटून सुंदर केलेल्या पटाप्रमाणे होय. (८२)

हिरण्यगर्भ चंचळरूप । अस्पष्ट जें कां अरूप ।
अंकुरला जगद्‌रूप । पट रेखाटल्या परि                  ॥८३॥
चंचलरूप जो हिरण्यगर्भ तो म्हणजे जगरूपी रोपट्याचा अस्पष्ट अरूप असा अंकुर असून वरील दृष्टान्तातील रेखांकित केलेल्या पटाप्रमाणे आहे. (८३)

पुढें भूतांचें पंचीकरण । करून केलें जग निर्माण ।
जीवरूपें प्रवेशे आपण । अंतर्यामी        ॥८४॥
त्यानंतर भूतांचे पंचीकरण करून जग निर्माण केले. आणि अंतर्यामी सूत्रात्म्याने त्यात जीवरूपाने प्रवेश केला. (८४)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
भूतसृष्टिप्रकारे । द्वितीयसमासः  ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
विराटोत्पत्तिप्रकार


सूक्ष्म तत्त्वें उद्भवलीं । साधनसंपत्ति प्रगटली ।
भोग नव्हे फिरूं लागली । वायूचे परी                    ॥१॥
सूक्ष्म अशी सतरा तत्त्वे निर्माण झाली. त्यांच्या रूपाने साधनसंपत्ती निर्माण झाली. पण ती भोगावाचून वायूप्रमाणे नुसती फिरू लागली. (१)

मग सर्वेश्वरें अवलोकिलें । भोग्य स्थान पाहिजे केलें ।
म्हणुनिया आरंभिलें । पंचीकरण भूतांचे                ॥२॥
तेव्हा सर्वेश्वराने हे पाहिले. त्यांच्यासाठी भोग्य स्थान निर्माण केले पाहिजे, असा विचार करून त्याने त्या पंचमहाभूतांचे पंचीकरण करण्यास सुरुवात केली. (२)

एकेक भूत द्विधा केलें । अर्ध भागातें ठेविलें ।
अर्ध चतुर्धा विभागिलें । तें वाटिलें चहूंसी                ॥३॥
त्या प्रक्रियेत त्याने एकेका भूताचे दोन दोन विभाग केले. अर्धा त्याच्या मूळ ठिकाणी ठेवून दुसऱ्या अर्ध्या भागाचे चार विभाग करून ते विभाग मूळ भूतांखेरीज बाकीच्या चार भूतांमध्ये समान वाटले. (३)

यासि भूत कर्दम म्हणावा । येणें स्पष्टत्व ये भूतां सर्वा ।
मग ब्रह्मांड अवयवा । आकारू होय                     ॥४॥
याला भूतकर्दम अथवा भूतांचा कालवलेला चिखल म्हणतात. त्या योगाने सर्व भूतांना स्पष्ट रूप प्राप्त होते. आणि मग ब्रह्मांडाच्या अवयवांना आकार प्राप्त होतो. (४)

तेचि पंचिकरण कैसें । सविस्तरें बोलिजें तैसें ।
तेणें रीती बुझसी अपैसे । स्थूल ब्रह्मांड                   ॥५॥
आता हे पंचीकरण कसे होते, हे सविस्तर सांगितले पाहिजे. त्या योगाने आपोआप स्थूल ब्रह्मांडाचे स्वरूपही आपोआप कळून येईल. (५)

प्रथम आकाश केलें द्विधा । अंत:करण भाग अर्धा ।
उरला भाग तो चतुर्धा । चौ भूतां दिधला                ॥६॥
प्रथम आकाशाचे दोन भाग केले. त्यातील पहिल्या अर्ध्या भागाला अंत:करण नाव असून त्याच्या उरलेल्या अर्ध्या भागाचे चार भाग करून ते उरलेल्या चार भूतांना वाटून टाकले. (६)

व्यान वायूसी दिधला । श्रोत्र तेजा समर्पिला ।
वाचा दिधली आपाला । शब्दगुण पृथ्वीसी                   ॥७॥
व्यान हा भाग वायूला दिला. श्रोत्र (कर्णेद्रिय) हा भाग तेजाला देऊन टाकला. वाचा हा भाग आपतत्त्वाला दिला आणि शब्दगुण हा भाग पृथ्वीला दिला. (७)

वायूचे भाग केले दोन । अर्ध भाग ठेविला समान ।
येर तो चतुर्धा विभागून । दिधला चहूंसी                 ॥८॥
वायूचे दोन भाग केले. त्यातील अर्धा समान हा भाग वायूत ठेवून बाकीच्या अर्ध्या भागाचे चार भाग करून ते चार तत्त्वांना विभागून दिले. (८)

मन ठेविलें आकाशीं । त्वचा दिधली तेजासी ।
पाणि अर्पिला आपासी । पृथ्वीसी स्पर्श              ॥९॥
मन आकाशात ठेवले. त्वचा तेजाला दिली आणि पाणींद्रिया हात) आपतत्त्वाला दिले आणि स्पर्श पृथ्वीला दिला. (९)

द्विधा तेजातें केलें । चक्षु अर्धभागा ठेविलें ।
चतुर्धा करून विभागिलें । येर अर्ध भाग                 ॥१०॥
तेजाचे दोन भाग केले. त्याचा अर्धा चमू हा भाग तेजामध्ये ठेवून बाकीच्या भागाचे चार विभाग करून बाकीच्या चार तत्त्वांना वाटून दिला, (१०)

बुद्धि आकाशा दिधली दान । वायूस देता झाला उदान ।
आपा अर्पिले चरण । रूपार्पण भूमीसी               ॥११॥
बुद्धी आकाशाला दिली, वायूला उदान दिला, चरणेंद्रिय आप तत्त्वाला दिले आणि रूप भूमीला अर्पण केले. (११)

द्विधा केले आपभूत । अर्ध भाग ठेविला उपस्थ ।
अर्ध चतुर्धा विभागित । तें अर्पित चौ भूतां               ॥१२॥
आप ह्या भूताचे दोन भाग केले. अर्धा उपस्थ हा भाग आपतत्त्वात ठेवला, बाकीच्या अर्ध्या भागाचे चार भाग करून ते चार भूतांमध्ये वाटले. (१२)

चित्त दिधलें आकाशा । वायूसी दिधले प्राणांशा ।
अर्पिली जिव्हा हुतांशा । पृथ्वीतें रसा दिधलें          ॥१३॥
आकाशाला चित्त दिले, प्राणाचा अंश वायूला दिला, जिव्हा अग्नीला अथवा तेजाला दिली आणि रस पृथ्वीला दिला. (१३)

पृथ्वी द्विधा विभागिली । भागार्ध गंधात्मक ठेविली ।
चत्वार भूतां दिधली । अर्धातील विभागें                 ॥१४॥
पृथ्वीचे दोन भागात विभाजन केले. त्यातील गंधात्मक अर्धा भाग पृथ्वीकडेच ठेवला. उरलेल्या अर्ध्या भागाचे चार विभाग करून ते चार भूतांना वाटून दिले. (१४)

अहंकारू दे गगना । वायूस अर्पिले अपाना ।
तेजासि दिधलें घ्राणा । आपातें गुद                     ॥१५॥
आकाशाला अहंकार दिला, अपान वायूला दिला, घ्राणेंद्रिय तेजाला दिले, गुदेंद्रिय आपतत्त्वाला दिले. (१५)

अंत:करण मन बुद्धि चित्त । अहंकार आकाशीं राहत ।
तेणें आकाश महाभूत । स्पष्ट जालें                     ॥१६॥
आकाशामध्ये अशा त-हेने अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंत:करणपंचक राहू लागले. त्यामुळे आकाश हे महाभूत तयार झाले. (१६)

व्यान समान उदान । प्राण आणि पांचवा अपान ।
वायुमध्यें राहून । तेणें वायूस रूप                      ॥१७॥
व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान वायूमध्ये राहिले. त्यांच्यामुळे वायूचे रूप तयार झाले. (१७)

श्रोत्र त्वक्‌चक्षु जिव्हा घ्राण । ज्ञानेंद्रियपंचक मिळून ।
राहतां स्पष्ट जाला अग्न । पांचांच्या अंशें                ॥१८॥
श्रोत्र (कान) , त्वचा, चक्षु (डोळे) , जिव्हा (जीभ) आणि घ्राण (नाक) अशी पाच ज्ञानेंद्रिये अग्नीच्या ठिकाणी मिळून राहिल्यामुळे त्या पाच ज्ञानेंद्रियांच्या अंशांनी अग्नीचे रूप स्पष्ट झाले. (१८)

वाचा आणि पाद । शिश्न आणि गुद ।
राहतां आपही विशद । दिसूं लागलें                     ॥१९॥
आपतत्त्वामध्ये वाचा, पाय, शिश्न (मूत्रोत्सर्जनमार्ग) , गुद (मलोत्सर्जन मार्ग) आणि हस्त ही पाच कर्मेन्द्रिये एकत्र आल्यामुळे आप तत्त्वही स्पष्टपणे दिसू लागले. (१९)

शब्द स्पर्श रूप रस । गंधादि मिळतां पृथ्वीस ।
तेणें गुणें धरणीस । स्पष्टता आली                     ॥२०॥
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे गुण पृथ्वीमध्ये एकवटल्यामुळे पृथ्वीला स्पष्टपणा आला. (२०)

कर्दम परी वेगळाले । पंच भूत दिसूं लागले ।
मग स्वभावें रचिले । सृष्टिकर्त्यानें                      ॥२१॥
हे सगळे तसे पाहिले तर कालवलेले चिखलच पण ही भूते वेगवेगळी दिसू लागली. मग सृष्टिकर्त्याने त्यांचे स्वभावधर्मही वेगवेगळे निर्माण केले. (२१)

पृथ्वी दशगुणें न्यून । रचिलें असे त्रिभुवन ।
स्वर्ग मृत्यु पाताळ तीन । अवयव विराटाचे             ॥२२॥
पृथ्वीच्या दसपट लहान असे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे लोक असलेले त्रिभुवन निर्माण केले. हे तीन लोक समष्टीचे स्थूल शरीर असलेल्या विराटाचे तीन अवयव होत. (२२)

सप्त पाताळ चरण । जेथें त्रिविक्रमाचे अधिष्ठान ।
सप्तविध तयाचे लक्षण । विभागिलें असे                 ॥२३॥
पाताळाचे सात प्रकार हे त्या विराटाच्या पायाचे सात भाग असून त्यांचे स्वरूप सात प्रकारात विभागले आहे. (२३)

पाताळ तें पादतळ । प्रपद तें रसातळ ।
गुल्फ द्वे महातळ । तळातळ जंघा                     ॥२४॥
पाताळ हे पायाचा तळभाग असून वरचा भाग म्हणजे रसातळ होय. दोन घोटे हे महातळ असून पोटऱ्यांच्या ठिकाणी तळातळ आहे. (२४)

जानुद्वय ते सुतळ । उरू अतळ आणि वितळ ।
जघनदेश महितळ । विराट पुरुषाचा                    ॥२५॥
दोन गुढघे म्हणजे सुतळ असून दोन मांड्या म्हणजे अतळ आणि वितळ हे भाग होत. त्या विराट पुरुषाचा जघनभाग म्हणजे पृथ्वी होय. (२५)

Ovi 26 missing (in the book)

आकाश ही नाभी असून नक्षत्रगण हे त्याचे हृदयस्थान होय. मान हा मह नावाचा लोक आहे. मुखाच्या जागी जन नावाचा लोक आहे आणि तप नावाचा लोक म्हणजे त्याचे कपाळ आहे. (२६)

सत्यलोक तो मस्तक । हस्त जाणा इंद्रलोक ।
अश्विनी देव नासिक । कर्णरंध्र दिशा                    ॥२७॥
सत्यलोक हे त्याचे मस्तक आहे. इंद्रलोक त्याचे हात होत. अश्विनीकुमार हे त्याची नासिका होत आणि सर्व दिशा या त्याच्या कानाची छिद्रे होत. (२७)

सूर्यलोक तो नयन । यमलोक दाढा कठिण ।
स्नेहकला दंत तीक्ष्ण । हास्य ते माया                   ॥२८॥
सूर्यलोक हा त्याचे डोळे असून यमलोक हा त्याच्या कठिण दाढा होत. स्नेहकला त्याचे तीक्ष्ण दात होत आणि माया ही त्याचे हास्य आहे. (२८)

वडवानळ ते जठर । कुक्षि ते सप्तसमुद्र ।
पर्वत ते अस्थिमात्र । नाडि नद्या                        ॥२९॥
वडवानल (समुद्रातील अग्नी) हा त्याचे जठर आहे. सात समुद्र हे त्याच्या बाजू होत. पर्वत हे त्याच्या अस्थि (हाडे) होत आणि नद्या म्हणजे त्याच्या नाड्या होत. (२९)

केश वृक्ष वायु श्वसन । रेत ते वृष्टि संपूर्ण ।
धर्म तो जाणिजे स्तन । अधर्म पृष्ठी                       ॥३०॥
वृक्ष हे त्याचे केस होत, वाय हा त्याची श्वसनक्रिया होय. पाऊस हा त्याचे वीर्य होय. धर्म हे त्याचे स्तन होत आणि अधर्म हा त्याची पाठ होय. (३०)

वृषण मित्र वरुण । ब्रह्मदेव तो शिश्न ।
लज्जा लोभ हे दोन । ओंठ कोमळ                     ॥३१॥
त्याचे वृषण (अंड कोश) म्हणजे मित्रावरुण हे देव होत. ब्रह्मदेव हा त्याचे शिश्न होय लज्जा आणि लोभ हे त्याचे दोन कोमल ओठ होत. (३१)

ऐसें त्रिभुवनींचें सर्व । हे विराटाचे अवयव ।
मग हिरण्यगर्भें ठाव । रहावया केला                    ॥३२॥
अशा त-हेने त्रिभुवनातील सर्व पदार्थ हे त्या विराटाचे अवयव आहेत. मग त्या विराट शरीरामध्ये हिरण्यगर्भ म्हणजे सूत्रात्म्याने आपल्या वस्तीचे स्थान बनवले. (३२)

इंद्रियरूप सर्व देवता । आपुलाले स्थानीं प्रवेशतां ।
जीव चैतन्यें व्यापितां । ईश्वर रूपें                      ॥३३॥
इंद्रियरूपी सर्व देवता आपापल्या ठिकाणी प्रवेश करून राहिल्यानंतर जीवचैतन्याने ईश्वराच्या रूपाने ते विराट-शरीर व्यापून टाकले. (३३)

मग समष्टिरूप ब्रह्मांड । विस्तारलें अति उदंड ।
मायादेवीचें थोतांड । चळूं लागले                        ॥३४॥
मग समष्टिरूप ब्रह्माडांचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि मायादेवीचा पोकळ पसाराही वाढू लागला. (३४)

स्वरूपापासून पृथ्वीवरी । जितुकीं कारणें निर्धारीं ।
ब्रह्मांडकार्याभीतरीं । तितुकींहि आलीं                    ॥३५॥
स्वरूपापासून पृथ्वीपर्यंत जेवढी कारणे असू शकतात, तेवढी सर्व ब्रह्मांडरूपी कार्यामध्ये समाविष्ट झाली. (३५)

सर्व व्यापार सिद्ध जाला । इंद्रिया विषय फावला ।
देवतेसी आनंद जाला । प्रवर्तते जाले                    ॥३६॥
असा हा सृष्टिरचनेचा उद्योग सिद्ध झाला. इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय मिळाले. त्यांच्या देवतांनाही आनंद मिळू लागला. त्यामुळे सर्व इंद्रियांना विषयसेवनाकडे प्रवृत्ती निर्माण झाली. (३६)

व्यापार बहुत असती । परि अवघ्या पंचवृत्ति ।
एकेक वृत्तीचे होती । दोन दोन भेद                     ॥३७॥
या शरीराकडून होणारे व्यापार अनंत आहेत. पण वृत्ती मात्र फक्त पाचच आहेत. प्रत्येक वृत्तीचे दोन दोन प्रकार आहेत. (३७)

व्यापार गगनतत्वाचा । अंत:करण अंश जातीचा ।
व्यान जाणावा वायूचा । आधार चळणा                  ॥३८॥
तेजाचें श्रोत्र ज्ञानेंद्रिय । आपाची वाचा कर्मेंद्रिय ।
पृथ्वींतील शब्द विषय । होय ऐकणें बोलणें               ॥३९॥
यातील गगनतत्त्वाचा व्यापार पाहू. त्याच्या अंशांपैकी अंत:करण हा अंश त्याचा स्वत:चा अंश आहे. वायूपासून त्याचा व्यान हा अंश झाला आहे. तो त्याचा चलनाधार आहे. तेजापासून श्रोत्र हे ज्ञानेंद्रिय त्याने घेतले आहे. आपतत्त्वापासून वाचा हे कमेंन्द्रिय त्याने घेतले आहे. पृथ्वीपासून शब्द हा विषय त्याने घेतला आहे. या गगनतत्त्वाचा व्यापार ऐकणे बोलणे या स्वरूपाचा आहे. (३८-३९)

वायुतत्त्वाचा व्यापार । मन आकाशाचें निर्धार ।
समान वायूचा आधार । त्वचा ज्ञानेंद्रिय तेजाची       ॥४०॥
कर्मेंद्रिय आपाचा पाणी । स्पर्श विषय मेदिनी ।
प्रगटून व्यापार दोनी । ग्रहणदान स्पर्शन                 ॥४१॥
वायुतत्त्वाचा व्यापार घडण्यासाठी आकाशतत्त्वापासून मन हा अंश त्याने घेतला आहे. वायुतत्त्वाचा समान हा अंश त्याचा चलनाधार असून तेजतत्त्वाचा अंश जी त्वचा ती त्याचे ज्ञानेंद्रिय आहे. आपतत्त्वाचा पाणी (हात) हा अंश त्याचे कमेंन्द्रिय आहे आणि पृथ्वीतत्त्वाचा स्पर्श हा अंश त्याचा विषय आहे. त्या सर्वांच्या संघातापासून घेणे-देणे आणि स्पर्श करणे हे व्यापार निर्माण होतात. (४०-४१)

तेज तत्त्व व्यापारलें । गगनीहूनी बुद्धीतें घेतलें ।
उदान वायूतें साह्य केलें । ज्ञानेंद्रिय चक्षु                 ॥४२॥
आपाचा कर्मेंद्रिय चरण । पृथ्वींतील रूप गुण ।
व्यापार होताती दोन । पाहणें आणि चालणें              ॥४३॥
तेजतत्त्व जेव्हा व्यापाराला प्रवृत्त होते, तेव्हा ते गगनतत्त्वापासून बुद्धी हा अंश घेते, वायुतत्त्वातील उदान, या अंशाचे ते साहाय्य घेते. चक्षू हे त्याचे ज्ञानेंद्रिय. हा त्याचा स्वत:चाच अंश आहे. आपतत्त्वाचा रूप हा अंश त्याचा गुण होतो. या सर्वांच्या मिश्रणातून पाहणे आणि चालणे हे दोन व्यापार निष्पन्न होतात. (४२-४३)

आप कैसें व्यापारत । घेऊन आकाशाचें चित्त ।
प्राणवायु साह्य करीत । जिव्हा ज्ञानेंद्रिय तेजाची       ॥४४॥
उपस्थ कर्मेंद्रिय आपुलें । भूमींतून रसातें काढिलें ।
तेणें व्यापार दोन जाले । अशन आणि रती              ॥४५॥
आता आपतत्त्वाचा व्यापार पाहू. त्यासाठी ते आकाशतत्त्वापासून त्याचा चित्त हा अंश घेते. त्याला वायुतत्त्वाचा प्राण हा अंश साह्य करतो. तेजाचा अंश असलेली जिव्हा ही त्याचे ज्ञानेंद्रिय होते. उपस्थ हा त्याचाच अंश या व्यापारातील त्याचे कर्मेन्द्रिय होते. ते पृथ्वीचा रस हा अंश घेते. या सर्वांच्या संयोगातून अशन (खाणे) आणि रतिसुख हे व्यापार होतात. (४४-४५)

पृथ्वी तत्त्वाचा व्यापार । आकाशींचा अहंकार ।
अपानवायू साह्यकर । ज्ञानेंद्रिय घ्राण तेजाचें               ॥४६॥
आपाचें कर्मेंद्रिय गुद । आपुला निजगुण गंध ।
विसर्ग आणि सुगंध । दोनची व्यापार                   ॥४७॥
पृथ्वीतत्त्व जेव्हा व्यापाराला प्रवृत्त होते. त्यावेळी ते आकाशतत्त्वापासून त्याचा अहंकार हा अंश घेते. त्याला वायुतत्त्वाचा अंश असलेल्या अपान वायूचे साहाय्य होते. तेजाचा अंश घ्राण हे त्याचे ज्ञानेंद्रिय होते. आपतत्त्वाचा गुद हा अंश त्याचे कर्मेन्द्रिय होते. पृथ्वीतत्त्वाचा स्वत:चा गंध हा गुण असा एकत्र समवाय होतो, तेव्हा विसर्ग आणि सुगंध हे दोन व्यापार सिद्ध होतात. (४६-४७)

तमोगुण द्रव्यशक्ति विषय । क्रियाशक्ति प्राण कर्मेंद्रिय ।
रजोगुणें ग्रहण होय । भोगसाधन                      ॥४८॥
या व्यापारक्रियेत सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचाही सहयोग आहे. तसेच त्या व्यापाराला द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिहींची आवश्यकता असते. विराटाच्या व्यापारातील द्रव्यशक्ती म्हणजे तमोगुण होय. तोच त्या व्यापाराचा विषयही आहे. त्यातील क्रियाशक्ती, प्राण आणि कर्मेन्द्रिये ही भोगसाधने रजोगुणाची होत. (४८)

सत्त्वगुण ज्ञानशक्ति । अंत:करण ज्ञानेंद्रिय होती ।
चांगले वाईट निवडिती । सुखदु:ख भोग जीवात्मया         ॥४९॥
ज्ञानशक्ती, अंत:करण आणि ज्ञानेंद्रिये ही सत्त्वगुणाची होत. यांच्या साहाय्याने जीवात्म्याचे चांगले वाईट भोग, सुख आणि दुःख निवडण्याचे कार्य होते. (४९)

असो ब्रह्मांडाच्या पोटीं । चहूं खाणीची दाटी ।
सर्व व्यष्टिसहित समष्टि । स्थावर जंगमें                ॥५०॥
असो. ब्रह्मांडाच्या पोटात चारी खाणींची दाटी झाली. सर्व व्यष्टीसहित समष्टी, स्थावर, जंगमे यांची गजबज झाली. (५०)

चित्रपट रंगविला । तेणें सर्व दिसूं लागला ।
तैसा ब्रह्मगोळ स्पष्ट जाला । चराचररूप              ॥५१॥
अशा त-हेने सर्व चित्रपट रंगवून तयार झाला. त्यामुळे सर्व गोष्टी स्पष्ट दिसू लागल्या आणि त्यायोगे चर आणि अचर पदार्थांनी युक्त असे सर्व ब्रह्मांड स्पष्ट झाले. (५१)

सस्यादि धान्यें फळलीं । नाना जिन्नसीं कळों आलीं ।
स्थावर जंगमें कळूं लागलीं । स्पष्टरूप               ॥५२॥
सस्यादी धान्ये सुफलित झाली, ब्रह्मांडातील विविध पदार्थांच्या योगाने त्यातील स्थावर पदार्थ, जंगम पदार्थ स्पष्ट होऊन कळू लागले. (५२)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
विराटोत्पत्तिप्रकारे । तृतीयसमास: ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
पिंडोत्पत्तिप्रकार


आतां पिंडोत्पत्तिप्रकार । बोलिजे तो सविस्तर ।
ते हो‍ऊनिया सादर । श्रवण करावें                      ॥१॥
आता पिंडाच्या उत्पत्तीचा प्रकार सविस्तर सांगितला जाईल तो आदरयुक्त होऊन श्रवण करावा. (१)

एक सागरीचें जीवन । सरिता तळीं भरती तेणें ।
तेणेंचि गाडगीं रांजणें । कितेक भरती               ॥२॥
एकाच सागराच्या पाण्याने नद्या, तळी भरतात. त्याच पाण्याने कित्येक गाडगी, रांजणे भरतात. (२)

तरि सागर नव्हे न्यून । जैसा तैसा परिपूर्ण ।
तैसा सूत्रात्मा हिरण्य । सागरापरी                     ॥३॥
तरी सागर त्यामुळे काही क्षीण होत नाही. तो नेहमीसारखाच परिपूर्ण असतो. हिरण्यगर्भ हा जो ब्रह्मांडाचा सूत्रात्मा तो या सागराप्रमाणे असतो. (३)

तया हिरण्यगर्भाचे अंश । विभागले जीवमात्रास ।
लिंगदेह वासनात्मकास । ओळखावें                     ॥४॥
त्या हिरण्यगर्भाचे अंश सर्व प्राणिमात्रात विभागले गेलेले असतात. वासनात्मक अशा त्या लिंगदेहास ओळखावे. (ब्रह्मांडाच्या लिंगदेहाचे नाव हिरण्यगर्भ असे आहे. तो सर्व प्राणिमात्रांमध्ये वासनांच्या रूपाने विभागला गेला आहे. त्याला ओळखावे असा अभिप्राय.) (४)

पाणी मेघद्वारा आलें । हिरण्यगर्भ कैसें विभागलें ।
अविद्या मायेनें उभविलें । नाना पिंड                    ॥५॥
अविद्या मायेने विविध प्रकारच्या पिंडांची निर्मिती केली. त्या पिंडांमध्ये हिरण्यगर्भ कसा विभागला जातो ? त्याचे उत्तर, मेघाच्या मार्गाने पाणी जमिनीवर येते. ते ज्याप्रमाणे सर्वत्र विभागले जाते त्याप्रमाणे होय. (५)

जैसे विहिरी आड खणिती । जळें लागतां पूर्ण होती ।
जे जे पिंड निर्माण होती । तेथे व्याप्ति लिंगाची        ॥६॥
आपण ज्या ज्या वेळी नवीन आड, विहिरी खोदतो त्यावेळी त्यांना पाणी लागते व ते आड व त्या विहिरी लगेच पाण्याने भरून जातात. त्याप्रमाणे नवीन पिंड निर्माण झाला रे झाला की तेथे हा सूक्ष्मदेह अथवा लिंगदेह व्यापून टाकतो. (६)

नित्य नवे उत्पन्न होती । कितेक घट फुटोनि जाती ।
कितेक जळें भरले असतीं । कोरडे कितेक               ॥७॥
घट नित्य नवे निर्माण होतात. त्यांतील कित्येक घट फुटून जातात. कित्येकांमध्ये पाणी भरले जाते. कित्येक तसेच कोरडे राहातात. (७)

तैसेचि पिंड उद्भवती । कितेक लयातें पावती ।
एक जन्मतांची मरती । एक पावती वृद्धाप्य              ॥८॥
त्याचप्रमाणे पिंड शरीरे निर्माण होतात. त्यातील कित्येक पिंड शरीरांचा विनाश होतो. कित्येक जन्मल्याबरोबर मरण पावतात, तर काहींना वार्धक्य प्राप्त होते. (८)

कीटकापासून गज । मासला एकचि सहज ।
लिंगदेहाची समज । दुसरी नाहीं                         ॥९॥
हे देह कीटकांचे असोत, की हत्तींचे असोत, सर्वत्र लिंगदेहांचे स्वरूप एकच असते. त्यात वेगळेपणा नसतो. (९)

अंगुष्ठमात्र भाविती । लिंगदेह सावयव म्हणती ।
तें जाणावें नेणती । वर्म कांही                         ॥१०॥
कोणी लिंगदेह आंगठ्याच्या आकाराचा मानतात. कोणी तो अवयवयुक्त आहे असे मानतात. त्यांची ही समज अज्ञानपणाची आहे, असे समजावे. त्यांना लिंगदेहाचे खरे स्वरूप कळलेले नाही. (१०)

पर्वतप्राय जीव असती । आणि धाकुटेहि नेणों किती ।
लिंगदेहाची व्याप्ती । सारखी असे                       ॥११॥
या जगात काही जीव पर्वताच्या आकाराचे असतात आणि लहान जीव तर असंख्य आहेत. पण या सर्वांमध्ये लिंगदेह सारख्याच प्रकारे व्यापून असतो. (११)

अंगुष्ठमात्र जालें । तरि लहान थोर न वचे व्यापिलें ।
पुन्हा येथें आक्षेपिलें । ज्या त्या सारिखा अंगुष्ठ       ॥१२॥
देह अंगुष्ठमात्र असला तरी त्यात लिंगदेह सामावू शकत नाही किंवा मोठ्या देहाला तो पुरेसा होत नाही, असा प्रकार नसतो. यावर काही जण म्हणतील की अंगुष्ठमात्र लिंगदेह याचा अर्थ त्या त्या देहाच्या अंगठ्याएवढा त्याचा आकार असतो. (१२)

ऐसेंहि कदा न घडे । मुंगीस गजदेहा येणें पडे ।
गजादि होतात किडे । प्रारब्धानुसार                     ॥१३॥
तर असेही कधी नसते. मागील जन्मातील मुंगीला पुढील जन्मी हत्तीचा देह प्राप्त होतो आणि हत्ती वगैरे मोठ्या प्राण्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार कीटकांचा जन्म प्राप्त होतो. (१३)

जितुकी उपाधी तितुके जळ । प्रमाण करणें ते बाष्कळ ।
जालें आशंकेचे निर्मूळ । येणें रीती सहजची              ॥१४॥
तेव्हा जेवढी उपाधी असेल तेवढेच जल तिच्यात सामावेल. तेव्हा लिंगदेहाचा आकार उपाधीच्या आकारानुसार बदलतो. याबाबतीत अनुमानादी प्रमाणे पुढे करणे बाष्कळपणाचे ठरेल. अशा प्रकारे वरील बाराव्या ओवीत उपस्थित केलेल्या आशंकेचे सहज निर्मूलन झाले. (जितकी उपाधी तितके त्यात पाणी सामावेल या न्यायाने पिंडाची व्याप्ती समजून घ्यावी.) (१४)

तेचि लिंग प्रारब्धवशें । वृष्टिद्वारा औषधि होतसे ।
तयाचें वीर्य होतसें । पुरुषें अन्न भक्षितां                 ॥१५॥
हाच लिंगदेह प्रारब्धानुसार पावसाची वृष्टी झाल्याबरोबर औषधी म्हणजे वनस्पतिरूप पावतो. मग पुरुषाने ती वनस्पती अत्र म्हणून भक्षण करताच तिचे वीर्यात रूपांतर होते. (१५)

स्त्रीपुरुषाचे संयोगी । रक्तरेत मिळतां कमळभागीं ।
गर्भाधान लागवेगीं । स्त्रीयासी होय                     ॥१६॥
मग स्त्री आणि पुरुष यांचे मीलन होताच स्त्रीच्या ओटीपोटात स्त्रीचे रक्त व पुरुषाचे वीर्य एकत्र मिसळतात आणि त्यायोगे स्त्रियांना लगेच गर्भधारणा होते. (१६)

गारुडी एकाचे एक दाविती । तैसे रक्तरेताचे देह होती ।
हे रेताची म्हणावी शक्ति । तरि सर्वदा नव्हे               ॥१७॥
गारुडी लोक एका पदार्थाच्या जागी दुसरा पदार्थ दाखवतात त्याप्रमाणे रक्त आणि वीर्याचे देह तयार होतात. ही शक्ती त्या वीर्याची म्हणावी तर तसे मुळीच नाही. (१७)

इंद्रजाल याहून कोणतें । रेतरक्त कठिण होतें ।
आणि जन्मतां वाढूं लागतें । चैतन्य होतें तैसेची      ॥१८॥
ते वीर्य आणि रक्त आळून कठीण होते आणि त्यातून बालकाचा जन्म झाल्यानंतर ते वाढूही लागते. पण या सर्व प्रक्रियेचा चैतन्यावर काही परिणाम होत नाही. ते जसे होते तसेच निर्विकार राहते. हा सर्व प्रकार इंद्रजालाप्रमाणे (जादूसारखा) नव्हे काय ? (१८)

अरे ही मायादेवी कौटाली । अघटण घडवी एकली ।
असो कोण पडे इच्या ख्याली । जे नाथिली स्वभावें         ॥१९॥
या चमत्काराचे खरे कारण म्हणजे ही मायादेवीच चेटूक करणारी आहे. ती एकटीच अशक्य कोटीतील घटना घडवण्यास समर्थ आहे. अशी ती माया स्वभावतःच अस्तित्वहीन म्हणजे असत् खोटी आहे. असो हिच्या नादी कोण ज्ञानी मनुष्य लागेल ? (१९)

अधिक होता रेत । तेथें जन्म पावे सुत ।
रक्ताधिक्यें कन्या होत । नपूंसक समानत्वें               ॥२०॥
वीर्याचा भाग जास्त असेल तर पुत्र निपजतो, रक्ताचा भाग जास्त असेल तर कन्या निपजते. दोन्ही समान असतील तर नपुंसक प्रजा निपजते. (२०)

गर्भी नवमासादि पूर्ण होता । बाळका प्रसवे माता ।
अस्थिमांसादि समस्ता । सप्त धातु                     ॥२१॥
गर्भामध्ये बालकाचे नऊ महिने पूर्ण झाले की माता अपत्याला जन्म देते. त्याचा देह अस्थि, मांस, सप्तधातू इत्यादी घटकांनी पूर्ण असतो. (२१)

साडेतीन श्वेत रेताच्या । साडेतीन रक्त रेताच्या ।
उभय माता पित्याच्या । धातु सांत                    ॥२२॥
त्यातील साडेतीन धातू श्वेत (पांढऱ्या रंगाच्या रेताच्या असून साडेतीन धातू तांबड्या रंगाच्या रक्ताच्या असतात. दोघाही मात्यापित्यांच्या मिळून सात धातू होतात. (२२)

परि हे पंचभूतांचे अंश । तेणेचि होय पिंडाचा भास ।
तेचि ऐका पंचवीस । पांच पांच एकेकाचे                 ॥२३॥
परंतु शरीराचे हे सर्व घटक पाच भूतांचे अंश आहेत. त्यांच्यामुळे ही पिंडाची भासमान आकृती तयार होते. प्रत्येक भूताचे पाच-पाच अंश असे एकूण पंचवीस अंश या पिंडामध्ये असतात. (२३)

अस्थि मांस त्वचा नाडी रोम । कठिण पृथ्वीचा अनुक्रम ।
रक्त रेत लाळ मूत्र घाम । द्रव्यत्वें आपाचें                ॥२४॥
त्यातील कठीण अशा पृथ्वीचे पाच अंश म्हणजे अस्थिा हाडे) , मांस, त्वचा, नाड्या आणि केस हे होत. तसेच द्रवरूप असणाऱ्या आप (जल) तत्त्वाचे अंश रक्त, वीर्य (रेत) , लाळ, मूत्र, घाम हे होत. (२४)

क्षुधा तृषा आळस निद्रा मैथुन । हे आभास तेजाचें लक्षण ।
चंचळ तितुके वायूचे गूण । तेचि अवधारा                ॥२५॥
क्षुधा (भूक) , तृषा (तहान) , आळस, निद्रा, मैथुन हे आभास तेजाचे घटक (लक्षणे आहेत. आता या पिंडाच्या ठिकाणी जेवढे चंचलपणाचे अंश आहेत ते सर्व वायूचे गुण आहेत. ते कोणते ते ऐका. (२५)

चलण वळण प्रसरण । निरोधन अकोचन ।
काम क्रोध शोक व्यापकपण । मोह भय आकाशाचे          ॥२६॥
चलन, वलन, प्रसरण, निरोधन आकुंचन हे वायूचे गुण आहेत, तर काम, क्रोध, शोक, व्यापकता, मोह, भय हे आकाशाचे गुण आहेत. (२६)

जायते जन्म अस्ति आहे । विवर्धते वाढताहे ।
विपरिणमते तारुण्य पाहें । विकार चौथा                 ॥२७॥
आता उत्पन्न झालेल्या सर्व पदार्थाचे पुढीलप्रमाणे सहा विकार आहेत. पहिला विकार जायते म्हणजे जन्म घेणे हा होय, दुसरा विकार अस्ति म्हणजे असणे. तिसरा विकार विवर्धते म्हणजे वाढणे हा होय. विपरिणमते म्हणजे वाढण्याची शीग गाठणे अथवा तारुण्याची अंतिम मर्यादा गाठणे हा चौथा विकार होय. (२७)

अपक्षीयते वृद्धत्व येतें । शरीर इंद्रिय क्षीण होतें ।
नश्यति तें नासतें । प्राण वियोगें                      ॥२८॥
अपक्षीयते म्हणजे वार्धक्य येणे हा पाचवा विकार असून वृद्धावस्थेमध्ये शरीर आणि इंद्रिये क्षीण होतात आणि शेवटचा सहावा विकार म्हणजे नश्यति म्हणजे नष्ट होणे. प्राण शरीराला सोडून सोडून जातात आणि ते शरीर नासते म्हणजे त्याचे अस्तित्व संपते. (२८)

सांगितले सहा विकार । इतुक्याचें घर हें शरीर ।
शरीर म्हणजे नाहीं उशीर । क्षणमात्र नासावया        ॥२९॥
अशा प्रकारे शरीराचे सहा विकार सांगितले. आता वर सांगितलेल्या सर्व घटकांचे मिळून हे शरीर बनते. ते कधी ना कधी नष्ट होतेच. शरीर म्हणजे नष्ट व्हायला जेथे उशीर लागत नाही ते (अशी त्याची व्युत्पत्तीच आहे मुळात.) (२९)

जारज अंडज स्वेदज । आणि चौथी उद्भिज ।
खाणीचा विस्तार समज । चौर्‍यांशी लक्ष योनी        ॥३०॥
या शरीरांच्या जारज (आवरणपिशवीतून बाहेर पडणारे) , अंडज (अंड्यातून बाहेर येणारे) , स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे आणि उद्भिज्ज म्हणजे जमिनीतून वर येणारे अशा चार प्रकारच्या खाणीत विस्तार होतो. त्यांमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनींचा समावेश होतो. (३०)

हिरण्यगर्भ इतुकें ठाईं । सूक्ष्म रूपें असें पाहिं ।
प्रगट कोठें दिसत नाहीं । सुषुप्तीपरी                    ॥३१॥
या इतक्या सर्व ठिकाणी हिरण्यगर्भ सूक्ष्म रूपाने असतो हे लक्षात घ्यावे. तो प्रकट रूपाने कोठेच दिसत नाही. आपण सर्वच झोप घेतो. पण ही झोप मात्र आपल्याला दिसत नाही. हिरण्यगर्भाचे तसेच आहे. (३१)

त्यांत चैतन्य प्रतिबिंबिलें । त्यासि जीव नाम ठेविलें ।
भूमंडळी संपूर्ण दाटलें । प्राणिमात्र                      ॥३२॥
त्यात चैतन्याचे प्रतिबिंब पडते त्यास जीव असे नाव दिले आहे. संपूर्ण पृथ्वीत सगळीकडे प्राणिमात्रांचीच दाटी झाली आहे. (३२)

ब्रह्मांडीचें इंद्रिय । अंशे पिंडीं प्रवेश होय ।
जितुका बोलिला समुदाय । देवतारूप                    ॥३३॥
ब्रह्मांडाची इंद्रियतत्त्वे अंशरूपाने पिंडात प्रवेश करतात. त्या पिंडात प्रवेश करून राहिलेल्या इंद्रियतत्त्वांना देवता म्हणतात. (३३)

इंद्रिय व्यापार देवता । गोलकीं राहिल्या तत्वतां ।
तया त्रिपुटीची व्यवस्था । पिंडी कैसी                   ॥३४॥
इंद्रिय व्यापार देवता आपापल्या ठिकाणी राहतात. पिंडातर्गत इंद्रिये. त्यांच्या देवता आणि त्यांचे व्यापार यांची जी त्रिपुटी सिद्ध होते ती पुढीलप्रमाणे आहे. (३४)

अध्यात्म अंत:करण । अधिभूत निर्विकल्प स्फुरण ।
अधिदैवत तया जाण । विष्णु असे                     ॥३५॥
पिंडातर्गत इंद्रियांना अध्यात्म असे म्हणतात. त्यांच्या व्यापारांना स्वामींनी अधिभूत म्हटले आहे व अधिदैवत म्हणजे त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. शरीरातील अंत:करणपंचक, ज्ञानेंद्रियपंचक, कमेंन्द्रियपंचक अशा एकूण १५ इंद्रियांची त्रिपुटे ३५ ते ४७ या ओव्यांत सांगितली आहेत. त्यांचे स्वरूप तळटीपेतील कोष्टकावरून कळेल. (३५)

अध्यात्म तेंचि मन । संकल्प अधिभूत लक्षण ।
अधिदैवत संपूर्ण । चंद्रमा होय                     ॥३६॥
अर्थ दिलेला नाही (३६)

बुद्धि अध्यात्म होय । बौद्धव्य अधिभूत निश्चय ।
अधिदैवताचा उपाय । ब्रह्मदेव                          ॥३७॥
अर्थ दिलेला नाही (३७)

अध्यात्म असे चित्त । चेतव्य तें अधिभूत ।
तेथें असे अधिदैवत । नारायण                         ।।३८॥
अर्थ दिलेला नाही (३८)

अध्यात्म अहंकार । अहंकर्तव्य व्यापार ।
अधिभूत आणि रुद्र । अधिदैवत असे                   ॥३९॥
अर्थ दिलेला नाही (३९)

अध्यात्म हे श्रोत्र । अधिभूत श्रोतव्य व्यापार ।
अधिदैवताचा विचार । दिशा असे                      ॥४०॥
अर्थ दिलेला नाही (४०)

त्वचा अध्यात्म जाण । स्पृष्टव्य अधिभूत लक्षण ।
अधिदैविकाची खूण । जाणावी वायू                     ॥४१॥
अर्थ दिलेला नाही (४१)

चक्षु अध्यात्य जेथें । द्रष्टव्य अधिभूत ।
सूर्य अधिदैवत । प्रसिद्ध जाणावें                        ॥४२॥
अर्थ दिलेला नाही (४२)

अध्यात्म हे रसन । अधिभूत रससेवन ।
अधिदैवत वरुण । ओळखावें                              ॥४३॥
अर्थ दिलेला नाही (४३)

घ्राण अध्यात्म जेथें । घ्रातव्य अधिभूत ।
अधिदैवत पहा तेथें । अश्विनौ देव                      ॥४४॥
अर्थ दिलेला नाही (४४)

वाचा अध्यात्म अग्नि दैवत । वक्तव्य हेंचि अधिभूत ।
पाणि अध्यात्म इंद्र दैवत । अधिभूत ग्रहण दान       ॥४५॥
अर्थ दिलेला नाही (४५)

अध्यात्म पादाधिभूतगमन । अधिदैवत तो वामन ।
अध्यात्म उपस्थाधिभूत भोगण । अधिदैवत प्रजापती   ॥४६॥
अर्थ दिलेला नाही (४६)

गुद अध्यात्म जेथें । विसर्ग अधिभूत ।
मृत्यु अधिदैवत । नैऋत्य नाम                        ॥४७॥
अर्थ दिलेला नाही (४७)

प्राणपंचक विषय । यासी जडत्व कारण होय ।
अध्यात्म त्रिपुटी न होय । म्हणोनिया                   ॥४८॥
शरीरामध्ये आणखी एक प्राणपंचक आहे. ते जड असल्यामुळे त्याचे अज्ञान हे कारण आहे. त्यामुळे वरील तीन पंचकांच्या बाबतीतली अध्यात्म त्रिपुटीही संभवत नाही. (४८)

ऐसे सूक्ष्म समुदाय । प्रवर्तती स्वस्वविषय ।
कीटक अथवा पर्वतप्राय । शरीर तेथें वासना              ॥४९॥
अशा त-हेने सूक्ष्म समुदाय स्वत:च्या विषयात प्रवृत्त होतात. ते कीटक असोत वा पर्वत असोत, शरीर तेथे वासना हा मात्र नियम सर्वत्र आहे. (४९)

वासनाध्यासें मरती। तैसाचि जन्म पावती ।
अंते मति: सा गति: । यातायाती चुकेना                ॥५०॥
वासनेच्या अध्यासामुळे (प्रभावामुळे) ते जीव मरतात व पुन्हा जन्मही घेतात. अंतकाळी त्यांची जी बुद्धी असते तीच गती त्यांना प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्या येरझारा काही चुकत नाहीत. (५०)

पुण्य होतां स्वर्गी चढती । पापास्तव कीटकादि होती ।
समानत्वे पावती । मनुष्य जन्म                       ॥५१॥
पुण्य घडले तर ते स्वर्गात जातात, पाप घडले तर त्यामुळे कीटकादी योनीत जातात. दोन्ही समान असतील तर त्यांना मनुष्यजन्म प्राप्त होतो. (५१)

मनुष्यजन्मीं जे जे केलें । तें तें तत्काळ सिद्धि गेलें ।
जीवन्मुक्त ज्ञानें झालें । नरदेहास्तव                    ॥५२॥
मनुष्यजन्मात जे जे केले जाते ते ते तत्काळ सिद्धीस जाते. म्हणन नरदेहामुळे ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानामुळे माणूस जीवन्मुक्त होतो. (५२)

जयासी नरदेह लाधला । तयासी महान लाभ जाला ।
ब्राह्मणत्वही पावला । तयावरी                         ॥५३॥
ज्याला नरदेह प्राप्त होतो त्याला फार मोठा लाभ होतो. त्यातभर म्हणून त्याला ब्राह्मणाचा जन्म मिळाला. (५३)

ज्ञान होय प्रमाणजन्य । तोचि ब्राह्मण तोचि धन्य ।
ज्ञानेवीन कृपण अन्य । श्रुति म्हणताहे                  ॥५४॥
त्यातही त्याला आत्मप्रचीती, शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती या तिन्ही प्रमाणांनी सिद्ध असे ज्ञान प्राप्त झाले तर तोच खरा ब्राह्मण होय. तोच खरा धन्यही होय. इतर सर्वही ज्ञानावाचून ( ज्ञानाच्या अभावी) कृपण होत असे श्रुतीचे म्हणणे आहे. (५४)

जो नरदेहासि आला । ज्ञानेंवीण व्यर्थ गेला ।
ब्रह्म न जाणतां झाला । आत्महत्यारा                   ॥५५॥
नरदेहास येऊनही ज्ञान प्राप्त झाले तर तो वाया गेला, ब्रह्मासंबंधी अज्ञानीच राहिला तर तो आत्महत्याराच होय. (५५)

मी देह ऐसी वासना । कोटि ब्रह्महत्या क्षणक्षणा ।
कोण करील त्यास गणना । अंत न लगे                ॥५६॥
मी देह आहे' अशी वासना म्हणजे क्षणाक्षणाला एक कोटी ब्रह्महत्या केल्याप्रमाणेच होय. त्या पापाची गणना कोण करत बसेल ? त्याला अंतच लागत नाही. (५६)

मायाप्रवाहीं पडिलें । जन्मुनीया पुन्हा मेले ।
मरतांचि पुन्हा आले । देह धरुनी                      ॥५७॥
मायाप्रवाहात पडलेले जीव तेथेच जन्मतात, तेथेच मरतात, मेल्यानंतर पुन्हा देह धारण करून तेथेच पुन्हा येतात. (५७)

वर्तणुकी क्रियमाण घडे । तिळतीळ संचीत जोडे ।
प्रारब्ध हो‍ऊन येणें पडे । पुन्हा देहा                     ॥५८॥
नित्याच्या वर्तणुकीतून क्रियमाण कर्म घडत जाते. त्या योगानेच कणाकणाने संचित कर्मामध्ये भर पडत जाते आणि त्यातीलच काही प्रारब्ध होऊन पुन्हा देहाला येणे भाग पडते. (५८)

कीटक नदीचा प्रवाहीं । पडतां त्या विसावा नाहीं ।
तैसा जीवास अवकाश कांही । क्षण एक नसे              ॥५९॥
कीटक नदीच्या प्रवाहात पडताच त्यास विसावा मिळत नाही. त्याप्रमाणे जीवाला एका क्षणाचीही उसंत मिळत नाही. (फुरसत मिळत नाही.) (५९)

नदीतीरीं कोणी भला । तेणें कीटक प्रवाहीचा काढिला ।
मग सुखें विश्रांति पावला । वृक्षछायेसी               ॥६०॥
ज्याप्रमाणे नदीच्या काठावरील कोणी भला मनुष्य कीटकाला बाहेर काढतो आणि तो कीटक एखाद्या वृक्षाच्या सावलीत सुखी होऊन विश्रांती घेतो, (६०)

तैसा कृपानिधी जैं भेटे । अनंत सुकृताचे नेटें ।
तरि भवसागर ओहटें । क्षणामाजीं                      ॥६१॥
त्याप्रमाणे मायाप्रवाहातील त्या जीवाला त्याच्या पूर्वी केलेल्या अनंत पुण्यांच्या प्रभावाने दयासागर असे सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा तो संसारसागर एका क्षणात ओसरतो आणि नष्ट होतो. (६१)

पावावया ज्ञानयोग । तो एकचि सत्संग ।
सत्संगेवीण रोग । नाना साधनें                    ॥६२॥
ज्ञानप्राप्ती होण्यासाठी सत्संग अथवा संतसंगती हाच एक उपाय आहे. संतसंगतीवाचून इतर साधने म्हणजे रोग होत. (६२)

सत्संग ज्ञानासी आधार । सर्व विश्रांतीचें माहेर ।
सर्व सुखाचा सागर । संतचरणीं असे                   ॥६३॥
संतांची संगती हाच ज्ञानाचा आधार होय. संतसंगती हेच सर्व सुखांचे माहेर आहे. संतांच्या चरणांपाशीच सर्व सुखांचा सागर आहे. (६३)

सत्संगापरते नाहीं सार । जीवमात्रासी आधार ।
कृपादृष्टी भवसागर । कोरडा करिती                     ॥६४॥
संतसंगासारखी दुसरी सारभूत गोष्ट नाही. संतसंग हाच सर्व प्राणिमात्रांचा आधार आहे. ते संत आपल्या कृपादृष्टीने हा संसारसागर कोरडा करून टाकतात. (६४)

सिंहावलोकनें तत्वतां । चित्रपटीच्या दृष्टांता ।
चराचरादि समस्ता । ब्रह्मांडांतर्वर्ति                      ॥६५॥
आतापर्यंत झालेल्या विचारमंथनाचे सिंहावलोकन करायचे झाल्यास या ब्रह्मांडामधील सर्व चराचर (६५)

ब्रह्मादिस्थावरापर्यंत । जड चंचल जें दिसत ।
तीं तीं चित्रें समस्त । उत्तमाधममध्यम                   ॥६६॥
ब्रह्मापासून स्थावरापर्यंत जे जे जड अथवा चंचल दिसते ते ते सर्व मागील चित्रपटाच्या दृष्टांतातील उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ चित्राप्रमाणे होत. (६६)

जंगमें चळती सकळ । स्थावरें तैसीचि निश्चळ ।
भिन्न उपाधि केवळ । परी तीं चित्रें सर्वहि ॥६७॥
त्यातील जंगम पदार्थ चलनवलन करतात, तर स्थावर पदार्थ निश्चल असतात. त्यांच्या उपाधी भित्र भिन्न असल्या तरी ही सर्व चित्रेच आहेत. (६७)

पाहतां का पटावरी । नाना वनें नाना गोपुरीं ।
तिन्ही लोकींचीं परी । तैसी आहे                        ॥६८॥
एकाच पटावर विविध वने, विविध गोपुरे असतात तद्वत तिन्ही लोकांची स्थिती आहे. (६८)

स्थावरी चंचलत्व दिसेना । तेथे चिदाभास असेना ।
मायादेवीनें कल्पना । आभासाची न केली                ॥६९॥
स्थावर पदार्थांच्या मध्ये चलनवलन (चंचलपणा) दिसत नाही तेथे चैतन्याचा आभास नाही, कारण मायेने तेथे चैतन्याची कल्पना केली नाही. (६९)

ओवी ७० missing book
छापील पुस्तकात नाही
॥ ७० ॥
चित्रपटावरील माणसांच्या अंगावर वस्त्रांचे आभास दाखवले. त्याप्रमाणे पर्वत, वृक्ष इत्यादी स्थावर पदार्थ त्या चित्रपटावर रेखाटले पण त्यांच्या ठिकाणी वस्त्रांचे आभास काढले नाहीत. (७०)

चित्रपटीं मनुष्य केलें । त्या वस्त्राचें आभास काढिले ।
पर्वत वृक्ष रेखाटिले । त्या वस्त्राभास नाहीं                ॥७१॥
वस्त्राभास वस्त्रासारखा दिसतो, चैतन्याभास चैतन्यासारखा दिसतो. पण त्याला वास्तवता नसते. (७१)

दर्पणीं प्रतिबिंबलें । मुखचि ऐसें गमलें ।
परि तें नि:शेष नाथिलें । आभासहि तैसा                ॥७२॥
आरशात मुखाचे प्रतिबिंब आपण पाहातो तेव्हा ते मुख खऱ्या मुखासारखेच वाटते. पण संपूर्णपणे खोटे (अस्तित्व नसलेले) असते. तसेच चिदाभासाचे जाणावे. (७२)

पट जैसा पसरिती । तेव्हां सर्व चित्रें दिसतीं ।
या मायेस्तव जगदुत्पत्ति । दिसूं लागती सर्वही        ॥७३॥
पट पसरल्यानंतर सर्व चित्रे दिसू लागतात. त्याप्रमाणे या मायेमुळेच सर्व जगाची उत्पत्ती दिसू लागते आणि सर्व पदार्थ दिसू लागतात. (७३)

पट जैसा गुंडाळितां । चित्रें हरपतीं तत्त्वतां ।
मायादेवी वितुळतां । जग लया जाय                   ॥७४॥
पट गुंडाळून ठेवताच त्यावरील सर्व चित्रे हरवून जातात. त्याप्रमाणे मायादेवी विरून जाताच जगही लय पावते. (७४)

ऐसा उत्पत्ति आणि लय । क्षणक्षणां होत जाय ।
याची गणना न होय । चित्रपटापरी                     ॥७५॥
अशा त-हेने प्रत्येक क्षणाला उत्पत्ती आणि लय होत असतो आणि चित्रपटांप्रमाणेच त्यांची गणना करता येत नाही. (७५)

सत्यादिकें सर्व फळतीं । ग्रीष्मकाळी करपतीं ।
बीजरूपें असतीं । भूमीमध्यें                              ॥७६॥
(वर्षाऋतूत) सर्व धान्यादी सर्व वनस्पती सुफलित होतात. पण ग्रीष्म काळात ती सर्व करपून जातात. पण भूमीमध्ये बीजरूपाने राहतात. (७६)

नेत्रे उघडितां सर्व दिसे । नेत्रे झांकितां कांही नसे ।
श्वास उठतां कल्पना उमसे । श्वासाभावीं लय होय      ॥७७॥
डोळे उघडल्याबरोबर सर्व काही दिसू लागते. पण तेच डोळे मिटल्यानंतर काहीही दिसत नाही. श्वास चालू असेल तर कल्पना उद्भवतात, पण श्वास नसेल तेव्हा त्या कल्पनांचा लय होतो. (७७)

येणें रीती मायादेवी । उद्भवतां जगातें दावी ।
जगासगट लयातें जावी । हा स्वभावचि तिचा         ॥७८॥
त्याप्रमाणे मायादेवीची उत्पत्ती होताच ती जगाचे दर्शन घडविते आणि जगाबरोबर ती लयाला जाते, हा तिचा स्वभावच आहे. (७८)

उत्पत्तिक्रम दाविला । जैसा वादीचा सर्प जाला ।
लय अनुक्रमें बोलिला । पुढिलें समासीं                   ॥७९॥
दोरीच्या ठिकाणी मुळात नसणारा साप दिसू लागतो. त्याप्रमाणे या विश्वाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला. आता पुढल्या समासात ओघानेच लयाची माहिती द्यावयाची आहे. (७९)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
पिंडोत्पत्तिप्रकारे । चतुर्थसमास: ॥४॥

हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
प्रपंचप्रलयप्रकार


ऐका प्रलयाचें लक्षण । तें पंचप्रकारें जाण ।
तेचि कैसे भिन्न भिन्न । बोलिजेते    ॥१॥
आता प्रलयाचे स्वरूप ऐका. तो पाच प्रकारचा आहे. ते पाच प्रकार एकमेकांहून कसे भित्र आहेत ते आता सांगण्यात येईल. (१)

पिंडी प्रलय दोन । एक निद्रा एक मरण ।
सुषुप्तिकालीं कल्पना लीन । प्रलयापरी      ॥२॥
पिंडामध्ये दोन प्रकारचे प्रलय असतात. त्यापैकी निद्रा हा एक प्रकार असून दुसरा प्रकार मरण हा आहे. झोपेच्या काळात कल्पना प्रलयकाळातल्याप्रमाणेच लय पावत असते. (२)

दुसरा प्राणाचा वियोग । सरतां प्रारब्धभोग ।
लिंगाध्यासें पुन्हा मग । जन्मासि येती     ॥३॥
दुसरा प्रकार म्हणजे प्रारब्धाचा भोग संपताच प्राणांचा वियोग होऊन मरण येते तो होय. मग नंतर लिंगदेहाच्या आरोपामुळे नवीन जन्म प्राप्त होतो. (३)

तैसे ब्रह्मांडीं दोन प्रलय । भौतिका संहार होय ।
दुजा भूतांचा होय क्षय । मूळमायेसह    ॥४॥
त्याप्रमाणेच ब्रह्मांडातही दोन प्रलय असतात. पहिला प्रलय पंचभूतांपासून निर्माण झालेल्या जगाचा संहार होतो तेव्हा होतो आणि पंचभूतांचा मूळ मायेसह जेव्हा संहार होतो तेव्हा दुसरा प्रलय होतो. (४)

त्रेचाळीस लक्ष वीस सहस्त्र । इतुके जातां संवत्सर ।
कृतादि युगें होतीं चार । पर्याय एक    ॥५॥
त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्षे उलटताच कृतादी चार युगांची समाप्ती होते. त्याला एक पर्याय म्हणतात. (५)

पर्याय होतां हजार । ब्रह्मयाचे प्रहर चार ।
शिणें करिता व्यापार । करी निद्रा इतुकीची     ॥६॥
असे एक हजार पर्याय होताच ब्रह्मदेवाचे चार प्रहर होतात. हे चार प्रहर व्यापार (नित्याचे उद्योग) करून तो थकतो. आणि मग तेवढाच काळ तो. निद्रा घेतो. (६)

स्थावर जंगमें लया जाती । जलमय होय जगती ।
देवताचक्रें वावरती । वायुरूपें         ॥७॥
त्यावेळी स्थावर, जंगम सर्व पदार्थ लयाला जातात. मग सर्व पृथ्वी जलमय होऊन जाते आणि देवतांचे समुदाय वायुरूप धारण करून वावरू लागतात. (७)

स्वर्ग मृत्यु पाताळ । इतुकें उचंबळें जळ ।
सरतां निद्रेचा काळ । ब्रह्मा जागा होय     ॥८॥
तेव्हा ते जल, स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांना व्यापून टाकण्याइतके उसळते. मग निद्रेचा काळ संपताच ब्रह्मदेव जागा होतो. (८)

सकळ जळमय पाहतां । ब्रह्मदेव होय प्राशिता ।
देव प्रगटती तत्त्वतां । सूर्यादिक        ॥९॥
सर्व ब्रह्मांड जलमय झालेले पाहिल्यावर ब्रह्मदेव ते सर्व जल पिऊन टाकतो आणि मग सूर्य इत्यादी देव प्रगट होऊ लागतात. (९)

जीवे सृष्टि उद्भवली । पूर्वकर्मे पुन्हां जालीं ।
मग व्यापार करूं लागली । पूर्वील स्थिती        ॥१०॥
त्यानंतर जीवसृष्टीची पुन्हा उत्पत्ती होते. पूर्वकर्माची पुन्हा उत्पत्ती होते. मग ते जीव पूर्वीप्रमाणेच व्यापार करू लागतात. (१०)

हा प्रलय दैनंदिन । जीवमात्राचें हनन ।
महाप्रलयाचें लक्षण । तेंचि कैसें        ॥११॥
या प्रलयाला दैनंदिन प्रलय म्हणतात. (कारण तो ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होतो.) या प्रलयामध्ये सर्व जीवांचा नाश होतो. आता महाप्रलयाचे स्वरूप कसे असते. ते पाहू. (११)

शतवर्षें अनावृष्टि । तेणें संहारे जीवसृष्टि ।
सूर्यासी खडतरता पुष्टी । तेणें आटी जलाची   ॥१२॥
या महाप्रलयात शंभर वर्षेपर्यंत पाऊस पडत नाही. त्यामुळे सर्व जीवसृष्टीचा संहार होतो. सूर्याचा रखरखीतपणा वाढतो. त्यामुळे सर्व पाणी आटून जाते. (१२)

सप्त सागर कोरडे होती । वडवानळा चढे दीप्ति ।
तेणें जळूं लागली क्षिती । मस्तक पोळे शेषाचें   ॥१३॥
सातही समुद्र कोरडे होतात. वडवानलाचे (सागरातील अग्नीचे) तेज वाढते. त्यायोगाने पृथ्वी जळू लागते. त्या अग्नीमुळे शेषाचे मस्तकही होरपळून निघते. (१३)

मग विषज्वाळा वमितां । नुरेचि पृथ्वीं जळतां ।
शिवनेत्रींचा अग्नि धडकतां । राखोंडी होय        ॥१४॥
त्यामुळे तो विषारी ज्वाळा ओकू लागतो. त्यामुळे पृथ्वी जळून खाक होते आणि तिचा लवलेशही शिल्लक राहात नाही. त्याचवेळी शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातील अनी भडकतो. त्याने पृथ्वीची राख होऊन जाते. (१४)

मेरु अवघा जळाला । देवतामेळ ओसरला ।
सप्त लोकांचाही जाला । येकसरा अंत      ॥१५॥
संपूर्ण मेरू पर्वत जळून जातो. देवतांचे सर्व समूह ओसरून जातात. त्याबरोबरच सातही लोकांचा एकदमच अंत होतो. (१५)

पुढें शतवर्षे वृष्टि होत । अखंड पाणी संधिरहित ।
जळ मातलें अद्भुत । सीमेपरतें             ॥१६॥
पुढे शंभर वर्षे वृष्टी होऊ लागते. सगळीकडे पाणीच पाणी होऊन जाते. त्या पाण्याला कोठेही कड नसते. पाणी आणि जमीन यांचा जोड म्हणून कुठे दिसत नाही. सगळीकडे सीमा नसलेले पाणी भरून जाते. (१६)

राखोंडी भूमीची विराली । नवतीच जैसी जन्मली ।
लवणा परी जाली । एकरूप जळीं      ॥१७॥
पृथ्वीची राख पाण्यात विरघळून जाते. ती जणू काही पूर्वी जन्मलीच नव्हती, असे होऊन जाते. मीठ जसे पाण्यात विरघळून एकरूप होऊन जाते तशी पृथ्वी पाण्याशी एकरूप होते. (१७)

मग महातेज प्रगटलें । इतुकें जळ शोषिलें ।
तप्तलोहीं शिंपडिलें । जळ जैसें             ॥१८॥
मग महातेज प्रकट झाले. त्याने हे सर्व पाणी त्याने शोषून घेतले. तापलेल्या लोखंडावर पाणी शिंपडल्यावर त्याची जशी अवस्था होते तसा हा प्रकार होतो. (१८)

दीपासी पालव घातिला । तेवि अग्नि वायूनें विझविला ।
वायुही वितळून गेला । आकाशा पोटीं   ॥१९॥
नंतर दिव्याला पदराने निरोप द्यावा तसा वायू अग्रीला विझवून टाकतो. पुढे तो वायूही आकाशाच्या पोटात वितळून जातो. (१९)

शून्य आणि शब्दगुण । आणि सर्व देवतागण ।
अहंकारी जाती विरून । तमोगुणीं      ॥२०॥
आकाशाचे शून्यत्व, शब्दगुण व सर्व देवता अहंकारात आणि तमोगुणात विरून जातात. (२०)

तम रज सत्व गुण । मूळस्फुरणीं होती लीन ।
विद्या अविद्या शक्ति दोन । नि:शेष हरपती ॥२१॥
तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण हे मूलस्फुरणात लीन होतात. त्यावेळी विद्या आणि अविद्या या दोन्ही शक्ती संपूर्णपणे हरवून जातात. (२१)

जळ आटतां प्रतिबिंबासी । रहणें न घडे अपैसी ।
शक्तीवीण जीवेशासी । तैसें जालें           ॥२२॥
पाणी आटल्यानंतर त्यात पडणारे प्रतिबिंबही आपोआपच राहात नाही. त्याप्रमाणे विद्या आणि अविद्या या शक्ती नाहीशा होताच जीव आणि ईश्वर या प्रतिबिंबिस्वरूप तत्त्वांची अवस्था होते. (ते दोन्ही नष्ट होतात.) (२२)

चंचळ स्फुरण राहिलें । अहं ब्रह्म लया गेलें ।
उपरि जें कोंदाटलें । तें बोलतां नये    ॥२३॥
नंतर चंचल स्फुरणही थांबते. 'अहं ब्रह्म' हा अहंकारही लय पावतो. त्यानंतर जे सर्वत्र व्यापून उरते त्याचे वर्णनच करता येत नाही. (२३)

द्वैतेवीण अद्वैत । शब्देवीण संकेत ।
उपमेवीण हेत । कैसा करावा     ॥२४॥
अद्वैताचे निरूपण द्वैताचा आश्रय केल्याशिवाय कसे करावे ? शब्दाचा आधार न घेता संकेत कसा करता येईल ? उपमेचा आश्रय केल्याखेरीज इष्ट अर्थ कसा सांगावा ? (२४)

वादीचा सर्प जाला । तो वादींत लया गेला ।
तैसा प्रसंग हाही जाला । विवर्तवाद     ॥२५॥
दोरीचा सर्प झाला तो यथार्थ ज्ञानानंतर दोरीतच लयाला जातो. तसाच हा विवर्तवादाचा प्रकार होय. (ब्रह्मावर मिथ्याभूत विश्वाचा आरोप होतो. ते विश्व आता ब्रह्मातच विलीन होते. ४२५)

येथें श्रोतीं आक्षेपिलें । कीं सर्व ब्रह्मीं लया गेलें ।
तरि कैसें जन्मा आलें । पुन्हा जीव    ॥२६॥
येथे श्रोत्याने आक्षेप घेतला आहे. सर्वच जर ब्रह्मामध्ये लय पावते तर जीव पुन्हा कसे जन्माला येतात ? किंवा (२६)

जन्मा न येतां मुक्त जालें । ऐशा आशंकेशी बळावलें ।
याचे उत्तर दिधलें । पाहिजे आतां      ॥२७॥
जीव जन्माला न येताच मुक्त होतात काय ? अशी शंका मनात जोर धरू लागते. त्या शंकेचे आता उत्तर दिले पाहिजे. (२७)

सुषुप्तिकालीं मनादि लीन । नि:शेष हरपती जाण ।
तरि जागृति घडे येणें । कासयासी     ॥२८॥
झोपेमध्ये मनादी इंद्रिये संपूर्णपणे नाहीशी होतात. तरीसुद्धा जागृतीत ती परत कशी येतात ? (२८)

जागृतीस प्रारब्धें आणिलें । तैसेंचि जीव जन्मा आले ।
स्वरूपीं प्रारब्ध कैसें राहिलें । सुषुप्तीपरी    ॥२९॥
तर जीवांच्या प्रारब्धाने त्यांना परत आणले जाते. त्याच न्यायाने प्रलयानंतर जीवसृष्टीचा पुन्हा जन्म होतो. स्वरूपाच्या ठिकाणी प्रारब्ध कसे राहते. झोपेत मनादी जसे राहतात तसेच हे प्रारब्ध प्रलयानंतरही राहते. (२९)

ज्ञानें बीज नाहीं जळालें । तेंचि जन्मा घेउनी आलें ।
अज्ञान म्हणसी नाथिलें । तरि तेंचि ज्ञान        ॥३०॥
ज्ञानाने ते बीज जळून गेलेले नसते. तेच अज्ञान होऊन ते जन्माला आलेले असते. आता अज्ञान मिथ्या आहे असे कळणे हेच खरे ज्ञान होय. (३०)

अज्ञान मिथ्या कळलें । तयासीच ज्ञान बोलिलें ।
परि ब्रह्म न जाणतां जालें । कैलें समाधान       ॥३१॥
अज्ञान मिथ्या आहे असे कळणे यासच ज्ञान म्हटले जाते हे जरी कळले तरी जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत समाधान कसे होईल ? (३१)

तुज मिथ्या ज्ञान कळलें । ब्रह्म नाहीं जाणीतलें ।
तरि मग अज्ञान गेलें । काशावरूनी      ॥३२॥
तुला मिथ्यात्वाचे ज्ञान झाले आणि ब्रह्मज्ञान झाले नाही असे म्हणत असशील तर तुझे अज्ञान नष्ट झाले हे कशावरून म्हणतोस ? (३२)

सर्प अज्ञानें भासला । रज्जु नाहीं ओळखिला ।
म्हणतां मिथ्या सर्प वाटला । हाचि असंभव     ॥३३॥
दोरीच्या ठिकाणी अज्ञानामुळे सर्प दिसत होता हे तुला कळले पण दोरीचे ज्ञान झाले नाही असे कसे म्हणतोस ? त्याचा अर्थ सर्प खोटा आहे हे तुला कळलेच नाही. सर्पाचे खोटेपण कळणे हेच दोरीचे ज्ञान होय. (३३)

जरि यथार्थ रज्जू कळें । तेव्हांचि अज्ञान मावळें ।
तरि सर्पभान वितुळें । आपेआप           ॥३४॥
दोरी खऱ्या अर्थाने कळते तेव्हाच अज्ञानही नष्ट झालेले असते. त्यामुळे दोरीच्या ठिकाणचा सर्पाचा आभासही आपोआप वितळतो (म्हणजे नाहीसा होतो.) (३४)

तैसें अज्ञाननिवृत्ति होतां । ब्रह्म जाणिलें तत्त्वतां ।
ब्रह्म स्वानुभवें जाणतां । अज्ञान हरपे   ॥३५॥
त्याप्रमाणे अज्ञानाचे निरसन होताच ब्रह्माचे स्वरूप कळते. ते ब्रह्म स्वत:च्या अनुभवाने कळते तेव्हाच त्याच्या विषयीचे अज्ञानही हरपते. (३५)

म्हणून ज्ञानें जो पावन झाला । तोचि एक मुक्त जाला ।
अज्ञानें प्रलय जरी जाला । तरी जन्म न चुके      ॥३६॥
म्हणूनच ज्ञानाने जो पवित्र झाला तोच खरा मुक्त होतो. अज्ञान जर शिल्लक राहिले तर त्या अज्ञानाने प्रलयकाळ जरी झाला तरी जन्म टळत नाही. (३६)

म्हणून प्रलय पांचवा । तो आत्यंतिक जाणावा ।
देह असतां ओळखावा । ज्ञान विवेकें    ॥३७॥
तेव्हा पाचवा आत्यंतिक प्रलय समजून घेतला पाहिजे. हा प्रलय देह अस्तित्वात असतानाच ज्ञान आणि विवेक यांच्या साहाय्याने जाणता येतो. (३७)

मी देहसें भाविलें । चेतना जडत्व कल्पिलें ।
बळकट तादात्म्य जालें । चिदचिदैक्यरूप ॥३८॥
मी देह आहे अशी कल्पना केली. चैतन्याच्या ठिकाणी जडत्वाची कल्पना केली आणि चित् आणि अचित् (किंवा चैतन्य आणि जड) यांचे ऐक्य मानले. (३८)

वेगळा असून तेचि जाला । तादात्म्य ऐसें म्हणावें त्याला ।
तेणें एकदेशत्व पावला । जीवत्व रूपें   ॥३९॥
वेगळा असून दुसऱ्या पदार्थाशी एकरूप होणे याला तादात्म्य असे म्हणतात. त्यामुळे स्वत: आत्मा असून तो जीव म्हणून वेगळा होतो आणि त्यामुळे एकदेशी म्हणजे मर्यादित होतो. (३९)

अहंकारें ग्रंथि पाडिली । देहबुद्धीनें बळकट केली ।
नाना यातना पावली । जन्ममरणाच्या    ॥४०॥
अहंकारामुळे ही गाठ (ग्रंथी) पडते. देह हाच आत्मा अशा दृढबुद्धीने ती गाठ पक्की होते आणि त्यामुळे जन्ममरणाच्या अनेक यातना तो जीव भोगत राहतो. (४०)

जरी सद्‌गुरु सत्‌शास्त्र । सत्संग सद्विचार ।
पूर्वपुण्ये अधिकार । सकळ मिळे           ॥४१॥
अशा वेळी सद्गुरू, सच्छास्त्र, सत्संग, सद्विचार, पूर्वपुण्य इत्यादीमुळे अधिकार (पात्रता) प्राप्त झाला. (४१)

तरीच हा ग्रंथिभेद । उडे देहबुद्धीचा खेद ।
आपुला आपण स्वानंद । ब्रह्मरूप              ॥४२॥
तरच हा ग्रंथी (गाठ) सुटतो. त्यावेळी आत्म्याला देह मानण्याची बुद्धी नष्ट होते आणि ब्रह्मरूपाची प्राप्ती होऊन स्वानंद भोगणे शक्य होते. (४२)

दृश्य अवघें ओसरलें । मायेचें महत्त्व उडालें ।
दुजेपणाचें जालें । निसंतान ॥४३॥
दृश्य सगळे नाहीसे झाले, मायेचे महत्त्व संपले, दुजेपणाची भावना पूर्णपणे नष्ट झाली. (४३)

आतां मरण कोणा यावें । जन्महि तैसा न संभवें ।
जेथें कल्पनेच्या नावें । शून्याकार      ॥४४॥
अशा अवस्थेत मरण कोणाला येईल ? आणि मरणाबरोबर जन्मही तसा शक्य नाही. त्या अवस्थेत कल्पनाही शून्य होते. (४४)

मृगजळ डोळा दिसतें । तैसें देह प्राब्धीं वर्ततें ।
निचेष्टीत कीं चेष्टतें । कोण जाणें           ॥४५॥
डोळ्यांना मृगजळ दिसावे त्याप्रमाणे देह प्रारब्धानुसार व्यापार करत असतो. तो देह निचेष्टित आहे की हालचाल करणारा आहे, याचे भान तरी कोणाला असते ? (अद्वैतानुभवात असे भान असणेच शक्य नाही.) (४५)

तेचि आपण असावें । तरि त्यासवें यावें जावें ।
आपण वस्तु स्वभावें । देहादि मिथ्या   ॥४६॥
आता देह म्हणजे आपणचअशी भावना असेल तर त्या देहाबरोबर आपण आलो, गेलो अशी भाषा वापरणे शक्य होईल. पण आपण म्हणजे साक्षात ब्रह्म आहोत असा जर अनुभव असेल तर स्वाभाविकपणे देह इत्यादी मिथ्या ठरतात. (४६)

मरणा ऐलीकडे मेला । निजसुखें सुखावला ।
आत्यंतिक प्रलय याला । बोलिजे ऐसे               ॥४७॥
असा माणूस मरण येण्याअगोदरच मेला (म्हणजे त्याची देहात्मभावना नष्ट झालेली असते.) तो स्वरूपाच्या प्राप्तीच्या सुखाने सुखी झालेला असतो. या अवस्थेला आत्यंतिक प्रलय असे म्हणतात. (४७)

माया हे जलधर । वर्षता हे जगनीर ।
चिद्‍गगन तें अपार । कोरडें असे        ॥४८॥
मायारूपी मेघ जगरूपी जलाचा वर्षाव करत असतात. (मायेमुळे जगाची निर्मिती होते.) पण चैतन्यरूपी अपार आकाशाचा मात्र त्या जलाशी मुळीच संबंध नसतो. ते अगदी कोरडे असते. (४८)

मायामेघ लया जातां । नाथिलेंपणें उद्‌भवतां ।
ब्रह्माकाशासी तत्वतां । लाभ ना हानी   ॥४९॥
मायारूपी मेघ लय पावला काय किंवा मिथ्यात्वाने उत्पन्न झाला काय, ब्रह्मरूप आकाशाला खरे पाहता काही लाभ नाही अथवा हानीही नाही. (४९)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
पंचप्रलयप्रकारे । पंचमसमास: ॥५॥
इति पंचिका संपूर्णा ॥४॥ ओवीसंख्या ३२१
हरिः ॐ तत्सत्



GO TOP