॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(पूर्वार्ध)

पंचिका ५ वी
त्वंपदशोधन

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
तनुत्रितयनिरसन


नरदेहासी आलिया । विचारें जाणावें आत्मया ।
तरी करणें तें महत्कार्या । संपादिलें ॥१॥
नरदेहाला आल्यानंतर विचाराच्या साहाय्याने आत्म्याला ओळखावे. असे करण्याने फारच मोठे कार्य पार पाडल्यासारखे होते. (१)

साळीचें भूस सांडुनी । तांदळू घे‍ईजे निवडुनी ।
तैसें देहत्रय ओलांडुनी । आत्मा ओळखावा ॥२॥
साळीच्या भुसाचा त्याग करून आतला तांदूळ निवडून घ्यावा त्याप्रमाणे देहत्रयाला ओलांडून मुख्य आत्मा निवडावा. (२)

आत्मा म्हणिजे आपण । स्वतःसिद्ध प्रकाशमान ।
मी नाहीं हा अनुमान । कोणासि नसे ॥३॥
आत्मा म्हणजे आपण स्वत:च स्वतः सिद्ध आणिप्रकाशमान असा. मी नाही असा तर्कच कोणी करू शकत नाही. (म्हणून आपण म्हणजेच आत्मा स्वत:सिद्ध आहे आणि आपण स्वत:पणाची जाणीव हीच प्रकाशाची खूण) (३)

तरी जाणणें तें काय । कासया विचार उपाय ।
आत्मा देह हा निश्चय । सुदृढ असे ॥४॥
तर मग आत्मा जाणावयाचा म्हणजे काय करायचे? आत्मा म्हणजे देहच असा निश्चय ठरल्यानंतर अन्य विचार कशासाठी करायचा? (४)

देहचि आत्मा भाविला । दोहीपरी दूषण या बोला ।
कर्मेवीण देह जन्मला । नाश जाला केलें त्या ॥५॥
आत्मा म्हणजे देहच अशी कल्पना केल्यावर तिच्यात दोन दोष उत्पन्न होतात. हा देह कोणत्याही कर्माशिवाय जन्माला आला आणि जे पूर्वी केले असेल त्या कर्माचा नाश झाला असे मानावे लागते. (५)

हे देह आतां जाले । तरि पूर्वकर्म कोणें केलें ।
येणें न करितां जन्मलें । हा एक दोष ॥६॥
हा देह आताच जन्माला आला असे मानले तर त्या देहाच्या निर्मितीचे कारण अशी कमें कोणी केली? या देहाने ती केली नाहीत तर ती न करताच तो देह जन्माला आला काय? हा एक दोष होय. (६)

प्रसुत कर्म करिताहे । देह तरि येथें नासताहे ।
भोगेंवीण केलें क्षया जाताहे । हा दुजा दोष ॥७॥
दुसरा दोष म्हणजे या जन्मात हा देह जी कमें करतो त्या कर्माचा भोग घेण्यापूर्वीच तो नष्ट होतो, हा दुसरा दोष होय. (७)

पाहतां कर्मी जे असती । तेहि आत्मा वेगळा भाविती ।
देहनाशें स्वर्गप्राप्ति । यागें आत्मयासी ॥८॥
कर्ममार्गी जे लोक आहेत, त्यांचा विचार पाहता, तेही देह आणि आत्मा वेगळे आहेत असे मानतात. यज्ञाच्या योगाने देहनाशानंतर आत्म्याला स्वर्गप्राप्ती होते. असे ते मानतात. (८)

अस्थिमांसानें भरिलें । नाडीत्वचेनें गुंडाळिलें ।
त्या आत्मा म्हणतां जालें । दुजें अज्ञान कोणतें ॥९॥
तेव्हा अस्थिमांसाने शरीरालाआत्मा मानणे हेच सर्वात मोठे अज्ञान आहे. (९)

सुषुप्ति अथवा मरणकाळी । देहासि निचेष्टता आली ।
त्यासि आत्मा कल्पना केली । जडें कीं चैतन्यें ॥१०॥
निद्रेमध्ये अथवा मरणकाळी देहाला निश्चेष्टता येते. (त्याची हालचाल बंद होते) त्याला आत्मा असे कोण मानतो? जडतत्त्व की चैतन्यतत्त्व? (१०)

देह जड कांहींच नेणें । मी देह भाविला चैतन्यें ।
म्हणोनि जाणतां ओळखणें । देह आत्मा नव्हे ॥११॥
देह तर जड असल्यामुळे त्याला काहीच कळत नाही. देहान्तर्गत चैतन्यच'मी देह आहे' अशी कल्पना करत असते. म्हणून जाणत्याने ओळखावे की देह हा आत्मा नाही. (११)

तरि हे देह काशाचे । म्हणसी तरि पंचभूतांचे ।
पंचीकरण पांचपांचाचे । पूर्वी निरोपिलें ॥१२॥
तर मग हा देह कशाचा बनला आहे, असे म्हणशील तर मागे आपण निरूपण केलेच आहे की, पंचमहाभूतांच्या पाच पाचांच्या पंचीकरणाने देह झाला आहे. ' (पहा-आगम. पं. ४. स. ४ओ. २४ ते २६४१२)

तूं देहावेगळा अससी । म्हणुन देहातें जाणसी ।
माझा देही म्हणसी । सहज होसी विलक्षण ॥१३॥
तू देहाहून वेगळा आहेस म्हणूनच तू देहाला जाणू शकतोस. 'माझा देह' असेही म्हणतोस तेव्हाच तू त्याहून वेगळा आहेस असे कबूल करतोस. (१३)

होतां देहासी व्यापार । विषय सेवितां अपारे ।
प्रमाणचैतन्य इंद्रियद्वारें । परिणमे ते जागृती ॥१४॥
देहाचे व्यापार चालू असताना इंद्रियांच्या मार्गाने विषयांचे अपार सेवन चाललेले असते. प्रमाणचैतन्य म्हणजेअंत:करणवृत्तियक्त जीव इंद्रियांद्वारे परिणाम पावतो तिला जागृती अवस्था म्हणतात. (१४)

हे अवस्था स्थूलाची । मानूं नये आत्मयाची ।
जाणें व्यवस्था व्यवहाराची । ते अवस्था केवी ॥१५॥
ही स्थूल देहाची अवस्था आहे. तिला आत्म्याची अवस्था मानू नये. आता या अवस्थेत जो व्यवहार घडतो म्हणजे इंद्रियांद्वारे विषयांचे जे सेवन चालते तिला जागृती असे म्हणतात. या अवस्थेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. (१५)

तया अवस्थेचे स्थान । तें जाणावें नयन ।
अवस्थेवीण स्थान । आत्मयासि केवी ॥१६॥
त्या अवस्थेचे मूल स्थान नेत्र हे आहे. अवस्था नसेल तर आत्म्याला स्थान कसे असेल? (१६)

देह अवस्था स्थान । तिहींसी अकार अभिधान ।
प्रणवाचा प्रथम चरण । आत्मा नव्हे ॥१७॥
देह, अवस्था, स्थान या तिहींना 'अ'कार असे नाव आहे. 'अ'कार हा प्रणवाचा पहिला चरण आहे. पण तो आत्मा नाही. (१७)

इतुक्याचा अभिमान वाहतो । विश्वाभिमानी या हेतो ।
अवस्था सरतां जातो । अभिमान त्यासवें ॥१८॥
या इतक्यांचाही अभिमान बाळगतो या कारणास्तव त्याला (जीवाला) विश्वाभिमानी असे म्हणतात. ही अवस्था संपताच तिचा अभिमानीही तिच्याबरोबर जातो. (१८)

पुरुषासि कोणताही अधिकार । येतां पावे नाम मात्र ।
सांडिता तेथील व्यवहार । नामहि जाय त्यासवें ॥१९॥
ज्याप्रमाणे पुरुषाला एखादा अधिकार प्राप्त होतो तेव्हा त्याला ते अधिकारवाचक नाव प्राप्त होते व तो अधिकार नष्ट होताच त्यामुळे प्राप्त झालेले नावही त्याबरोबर लयाला जाते. (१९)

तैसा जीवात्मा हा विश्व । जागृति अभावीं कैचें नांव ।
हा सत्त्वगुणाचा समुदाव । आत्मा गुणसाक्षी ॥२०॥
त्याप्रमाणे या जीवात्म्याला विश्व नाव तात्पुरते प्राप्त झालेले असते. ती जागृती अवस्था नष्ट होताच ते नाव कसे राहील? विश्वाभिमानी हा सत्त्वगुणाचा समुदाय असून आत्मा त्या गुणाचा केवळ साक्षीदार आहे. (२०)

स्थूल भोग स्थूलासी । आत्मा जाणता तयासी ।
सुखदुःख हें साक्षीसी । बोलोंचि नये ॥२१॥
स्थूल देहाला स्थूल भोगच प्राप्त होतात. आत्मा फक्त त्यांना जाणतो. म्हणजे तो साक्षी आहे. साक्षीला सुखदुःख असते असे म्हणताच येत नाही. (२१)

स्थूल देह आपण नसतां । कोणा स्त्रीपुत्रादि ममता ।
हें असो वर्ण आश्रमता । आत्म्यासी नाहीं ॥२२॥
स्थूल देह जर आत्मा नसेल तर स्त्री, पुत्र इत्यादीची ममता कोणाला असेल? म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ही ममत्वाची भावना नसते. एवढेच नव्हे तर वर्ण, आश्रम इत्यादी भेदही आत्म्याला नाहीत. (२२)

देह जेथें जन्मले । त्या कुळाचे धर्म लागले ।
देहसंबंधी गेले । देहासवे ॥२३॥
देह ज्या ठिकाणी जन्म पावतो, त्या कुळाचे धर्म त्या देहाला लागतात. ते धर्म ते देहसंबंध आहेत तोवरच असतात त्यामुळे ते देहाबरोबरच नाहीसेही होतात. (२३)

तीर्थ व्रत जप ध्यान । आणीकही नाना साधन ।
तें तें देहास्तव होणें । आत्मा साक्षी ॥२४॥
तीर्थ, व्रत, जप, ध्यान इत्यादी आणिकही काही साधने ही सर्व देहामुळेच शक्य होतात. आत्मा हा फक्त त्यांचा साक्षी असतो. (२४)

एवं स्थूलाचे निरसन । जे मी नव्हे आपण ।
आत्मा साक्षी चैतन्यघन । जडातें जाणता ॥२५॥
अशा प्रकारे स्थूल देह म्हणजे आत्मा या मताचे निरसन झाले. आत्मा म्हणजे मी नव्हे. आत्मा चैतन्यघन (चैतन्यरूप) असून, तो जड अशा स्थूल देहाचा फक्त जाणता आहे. (२५)

शिष्यें येथें प्रार्थिलें । देह निःशेष नाथिलें ।
मरतां फिरून जन्मा आलें । यासि काय निमित्त ॥२६॥
या प्रसंगी शिष्याने प्रार्थना करून विचारले, "देह तर निःशेष नष्ट होतो. मग मेल्यानंतर फिरून जन्माला येणे ही गोष्ट कशामुळे घडते? " (२६)

तरी हे जाणावी वासना । लिंगदेहाची कल्पना ।
देहबुद्धीची कामना । जन्मासि मूळ ॥२७॥
बुद्धीमध्ये स्थित वासना हीच लिंगदेहाच्या रूपाने देहबुद्धीची कामना करते व हेच जन्माचे मूळ कारण आहे (२७)

तया लिंगदेहाचे हनन । जरी होय आत्मज्ञान ।
ज्ञानेंवीण नाना साधन । तेणें लिंगभंग नव्हे ॥२८॥
जर आत्मज्ञान झाले तरच त्या लिंगदेहाचा नाश होतो. ज्ञानाखेरीज इतर अनेक साधने केलीत तरी लिंगदेहाचा नाश होत नाही. (२८)

हे अग्नीनें जळेना । उदकींही बुडेना ।
योगादि शीणती नाना । परि हे अनावर ॥२९॥
तो लिंगदेह अग्नीने जळत नाही, पाण्यातही बुडत नाही, योगादी अनेक उपाय करून लोक कष्टी होतात, पण लिंगदेहाचा प्रभाव मात्र अनावर असतो. (२९)

समुद्रपानहि बरवें । मेरू उन्मुळी सुखें नावें ।
अग्निही प्राशन करवें । परी चित्तनिग्रह कठिण ॥३०॥
एक वेळ समुद्राचे प्राशन करणे सोपे म्हणावे लागेल, मेरु पर्वतसुद्धा सुखाने कदाचित उखडून टाकता येईळ, एक वेळ अग्रीही पिऊन टाकणे शक्य होईल, पण चित्ताचा निग्रह करणे मात्र कठीण आहे. (३०)

याचे व्हावया खंडण । तें एकचि आत्मज्ञान ।
गुरुमुखें श्रवण मनन । तरीच ज्ञान विश्वासें ॥३१॥
या देहाचे खंडन करावयाचे एकमेव साधन म्हणजे आत्मज्ञान हेच होय. गुरुमुखाने श्रवण करून त्यावर मनन केले असेल तरच हे ज्ञान खात्रीपूर्वक प्राप्त होते. (३१)

मी मी देह म्हणतोसी । वासना बळाविली ऐसी ।
छेदावया तयासी । विवेकशस्त्र पाहिजे ॥३२॥
तू'मी देह आहे' असे म्हणतोस, अशी वासना दृढ झाली असेल तर ती तोडून काढण्यासाठी विवेकरूपी शस्त्राचीच गरज आहे. (३२)

जरि विश्वासें आवडि असे । निशिदिनीं धरिसी मानसें ।
तरि घेइ पा तुज देतसें । विवेक शस्त्र ॥३३॥
जर तुझा विश्वास असेल आणि जर तुझ्या मनात आवड निर्माण झाली असेल आणि रात्रंदिवस मनात त्यांचा निदिध्यास बाळगणार असशील तर मी तुला विवेकशस्त्र देतो. (३३)

मी प्रत्यगात्मा निश्चय । देहाध्यासें मज काय ।
येणें ध्यासें खंडण होय । देहबुद्धीचें ॥३४॥
मी निश्चितपणे प्रत्यगात्मा असून माझ्यावर देहाचा आरोप केला तरी माझ्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे? असा निदिध्यास घेतल्यानंतर देहबुद्धीचे खंडन होते. (३४)

देहबुद्धि दे‍ई मजला । जतन करी आत्मबुद्धीला ।
विसरसी जन्ममृत्यूला । हे भाक घेई ॥३५॥
(गुरू शिष्याला म्हणतात) ती देहबुद्धी मला देऊन टाक आणि आत्मबुद्धीचे ( मी आत्मा आहे या बुद्धीचे) जतन कर. त्यायोगे तुला जन्ममृत्यूची आठवणसुद्धा येणार नाही, हे माझे तुला वचन घे. (३५)

मुळी सर्पाकारें जाली । नोळखितां कितेक मेली ।
विचारें समजतां भुली । कांहीच नाहीं ॥३६॥
मुळी सर्पाच्या आकाराची झाली. ती न ओळखताच (सर्पाच्या भीतीने) कित्येक लोक मरण पावले. पण विचाराने तो सर्प नसून मुळी आहे हे लक्षात घेतले तर वरीलप्रमाणे भ्रमच निर्माण होणार नाही. (३६)

मी देह धरिला ध्यास । ओळखावें त्या वासनेस ।
तेथें प्रकार सप्तदश । असती वेगळाले ॥३७॥
मी देह आहे असा ध्यास धरला असेल तर ती वासना आहे, हे ओळखावे. त्या वासनेचे वेगवेगळे सतरा प्रकार आहेत. (३७)

लिंगदेह सतरा कळांचा । पृथकाकारें बोलिजे वाचा ।
निश्चय कळतां येथिचा । साकडें निरसे ॥३८॥
लिंगदेह हा सतरा घटकांचा आहे. ते आता स्वतंत्रपणे पाहू. त्याचे स्वरूप निश्चितपणे कळताच निर्माण झालेले संकट निरसून जाईल. (३८)

होय नव्हेसें वाटलें । निश्चयें नवचे अनुमानलें ।
तें अंतःकरण विभागलें । संशयरूप मन ॥३९॥
एखादी वस्तू आहे अथवा नाही अशी वाटते, अनुमानाने निश्चयपूर्वक सांगता येत नाही, अशा त-हेने अंत:करण विभागले जाते. त्या अंत:करणाच्या संशयरूप अंशाला मन असे म्हणतात. (३९)

हें अमुक निश्चय जाला । बुद्धि नाम आलें त्याला ।
दुसरा परिणाम जाला । अंतःकरणाचा ॥४०॥
अमुक पदार्थ ही अमुक वस्तु आहे असा निश्चय जेव्हा होतो, तेव्हा त्याला बुद्धी असे नाव प्राप्त होते. हा अंत:करणाचा दुसरा परिणाम किंवा भाग होय. (४०)

चित्ताचें असें जे चिंतन । मी अमुक हा अभिमान ।
या दो वृत्तीचें समावेशन । मनबुद्धीच्या ठाई ॥४१॥
चित्ताच्या द्वारा चिंतन चालते. अहंकार म्हणजे मी अमुक तमुक असा अभिमान होय. चित्त आणि अहंकार या दोन वृत्तींचा मन आणि बुद्धी यांच्यामध्येच समावेश होतो. (४१)

करी शब्दाचें श्रवण । ते श्रोत्रेंद्रिय जाण ।
स्पर्श जाणे शीतोष्ण । तें त्वगेंद्रिय ॥४२॥
शब्द ऐकते ते श्रोत्रंद्रिय (कान) जाणावे. थंड, उष्ण स्पर्श जाणते ते त्वगिंद्रिय (त्वचा) होय. (४२)

चक्षु रूपातें पाहे । जिव्हा रस जाणताहे ।
घ्राण गंधातें लाहे । हे ज्ञानेंद्रियें पंच ॥४३॥
डोळा रूप पाहतो. जिव्हेने रस जाणता येतो आणि घ्राणेंद्रिय म्हणजे नाक गंधाचा अनुभव घेते. अशी ही पाच ज्ञानेंद्रिये होत. (४३)

एक वाणी चतुर्धा जाली । ते समजावी वेगळाली ।
उगीच आठवण जाली । ते परा वाचा ॥४४॥
एकाच वाणीचे चार प्रकार होतात. त्यांचे वेगळे वेगळे स्वरूप जाणून घ्यावे. उगीच काहीतरी आठवते तिला परा वाचा म्हणतात. (४४)

स्फुरण दिसे न दिसे । तया नांव पश्यंती असे ।
मननीं जितुकें येतसे । ते मध्यमा वाणी ॥४५॥
चित्तात जे स्फुरते, ते स्पष्टपणे दिसे ना दिसे अशा स्वरूपात जाणवते ती पश्यन्ती वाचा होय. त्यानंतर मननात जेवढे म्हणून येते, त्याला मध्यमा वाणी म्हणतात. (४५)

वैखरी ते बोलणे । पाणींद्रिया घेणें देणें ।
पादेंद्रिया चालणें । रतिसुख उपस्थीं ॥४६॥
वैखरी म्हणजे प्रत्यक्ष बोलणे होय. (परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार होत) पाणींद्रिय म्हणजे हाताने घेणे आणि देणे असे दोन व्यवहार घडतात. पादेंद्रिय म्हणजे पायांनी चालण्याचा व्यापार होतो, तर उपस्थ म्हणजे शिश्नाचा रतिसुख घेण्याचा व्यापार होतो, (४६)

गुदे विसर्ग करी । हे पंचकर्मेंद्रियाची परी ।
तैसें प्राणही प्रकारी । पांचची असती ॥४७॥
गुदद्वाराने मलविसर्जन होते. अशा तव्हेने पंच कर्मेन्द्रियांच्या व्यापारांचे स्वरूप होय. त्याचप्रमाणे प्राणाचेही पाच प्रकार असतात. (४७)

हृदयी करी प्रीणन । तोचि जाणावा प्राण ।
अधो वाहतां अपान । बोलिजे तो ॥४८॥
हृदयात वाहताना जो सुख देतो तो प्राण म्हणून समजावा. गुदद्वाराच्या वाटेने खालच्या दिशेने जो वाहतो त्याला अपान असे म्हणतात. (४८)

हलवी सर्व संधीसी । समान नामें राहे नाभीसी ।
कंठि राहेणें उदानासी । क्षुत्पान करी ॥४९॥
जो वायू शरीरातील सर्व सांध्यांच्या हालचाली करतो त्याला समान असे नाव असून तो नाभीच्या ठिकाणी राहतो तर उदान हा कंठाच्या ठिकाणी राहतो आणि क्षुधाशमन (भूक भागवणे) आणि तहान भागवणे या क्रिया करतो. (४९)

व्यान सर्वांगी वावरे । अन्नरस पाववी नाडीद्वारे ।
हें पंचप्राण निर्धारें । जाणिजेती ॥५०॥
व्यान सर्व शरीरात वावरतो. तो नाडीद्वारा सर्व शरीराला अन्नरसाचा पुरवठा करतो. अशा प्रकारे हे पंचप्राण निश्चयपूर्वक समजून घ्यावेत. (५०)

मन बुद्धि इंद्रिय प्राण । सप्तदश हे मिळोन ।
लिंगशरीर हें अभिधान । आणि सूक्ष्मदेह ॥५१॥
मनबुद्धी, इंद्रिये आणि पंचप्राण हे सतरा मिळून लिंगदेह अथवा सूक्ष्मदेह होतो. (५१)

मनबुद्ध्‌यादि आत्मा जाणे । आपुलेनिं सर्वज्ञपणें ।
आत्मत्वीं बुद्ध्‌यादिकां राहणे । परी आत्म्यासी नेणती ॥५२॥
आत्मा या सर्व मन, बुद्धी इत्यादी इंद्रियांना आपल्या सर्वज्ञपणाच्या गुणधर्मामुळे जाणतो. शुद्ध आत्मस्वरूपात बुद्धी इत्यादी तत्त्वे राहतात, पण ती तत्त्वे आत्म्याला जाणत नाहीत. (५२)

सर्व लिंगातें व्यापुन । आत्मा असे चैतन्यघन ।
आत्मत्वीं नसे भासकपण । लिंगदेहाचें ॥५३॥
चैतन्यघन असा आत्मा संपूर्ण लिंगदेहाला व्यापून असतो. पण त्या आत्मस्वरूपात लिंगदेहाचा भास नसतो. (५३)

जागृतीं विषय भोगिले । त्या संस्कारा मन सोकले ।
अंतरीच आठवलें ते स्वप्नावस्था ॥५४॥
जागृतीच्या अवस्थेत विषयांचे भोग घेतले. त्या भोगांच्या संस्कारांस मन चटावते आणि ते मनात त्या भोगांचे स्मरण करते. हीच स्वप्रावस्था होय. (५४)

लिंगदेहास्तव । स्वप्नावस्थेचा भाव ।
लिंगाभावीं स्वप्न वाव । आत्मत्वीं नाहीं ॥५५॥
लिंगदेहामुळेच ही स्वप्नावस्था शक्य होते. लिंगदेह नसेल तर स्वप्रही नष्ट होते. आत्मस्वरूपात तर ते नसतेच. (५५)

अवस्थेचें स्थान कंठी । देह अवस्थादि त्रिपुटी ।
यासि बोलिजेते होटीं । उकार मात्रा ॥५६॥
या अवस्थेचे स्थान कंठ हे आहे. लिंगदेह हा देह, स्वप्रावस्था ही अवस्था आणि कंठ हे स्थान अशी ही त्रिपुटी आहे. त्या सर्वाची उकार ही मात्रा आहे असे म्हणतात. (या त्रिपुटीची मात्रा ओठांनी सांगायची झाल्यास 'उ'कार' मात्रा होय. ) (५६)

अकारेवीण उकार । वर्णेवीण उच्चार ।
दृश्येवीण भासमात्र । आत्मा नव्हे ॥५७॥
अकारावाचून उकार नसतो, वर्णावाचून उच्चार नसतो, दृश्यावाचून भास नसतो, तसा आत्मा नाही. (या सर्व गोष्टी अन्य घटकाची अपेक्षा करतात. त्या सापेक्ष असतात. तसा आत्मा सापेक्ष नसतो. (५७)

जैसा कापुसासी पीळ पडतां । दिसणें असे सुता ।
आत्मप्रकाशें तत्वतां । भासती लिंगें ॥५८॥
कापसाला पीळ पडताच जसे सूत दिसायला लागते त्याप्रमाणे आत्मप्रकाशाने ही सर्व चिन्हे स्पष्ट होतात. (५८)

पीळ असतां कापूस दिसे । भास व्यापून आत्मा असे ।
सूत कापुसीं न दिसे । आत्मत्वीं भास मिथ्या ॥५९॥
पीळ असतानाच कापूसही दिसत असतो, तसा भास असताना त्या भासाला आत्मा व्यापून असतोच. पण केवळ कापसामध्ये सूत दिसत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी भास मिथ्या ठरतात. (५९)

जाणीव नेणीव रजोगुण । प्रविविक्त भोग त्या लागुन ।
सुखदुःखाचे प्रत्यय होणें । लिंगाध्यासें तैजसा ॥६०॥
जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणास रजोगुण म्हणतात. तो लिंगदेहाचा गुण होय. लिंगदेहाला जे भोग घडतात त्यांना प्रविविक्त भोग म्हणतात. लिंगदेहाच्या आरोपाने सुखदुःखाचे अनुभव जो घेतो त्या जीवाला तैजस म्हणतात. (६०)

तो ध्यास मी मी हा टाकिला । तरि तो अभिमान कोणाला ।
भ्रांतीनें होता अवलंबिला । कळतां भ्रांति कैची ॥६१॥
या जीवाला जो 'मी मी' असा ध्यास लागलेला असतो, तो ध्यास जर टाकून दिला तर तो अभिमान कोणाला होईल? कोणालाच नाही. केवळ भ्रमामुळेच तो झाला होता, हे कळल्यावर तो भ्रम कसा शिल्लक राहील? (६१)

एवं सूक्ष्माचा भास । मिथ्या हे जाणिजेस ।
साक्षित्वें जाणता आत्मयास । मृगजळापरी ॥६२॥
अशा त-हेने सूक्ष्म देहाचा (लिंग देहाचा) भास हा खोटा आहे, हे जाणून घे. आत्मा हा फक्त साक्षी आहे आणि हा लिंगदेह मृगजळाप्रमाणे भासमान आहे. (६२)

आपुलें आत्मत्व दृढ करणें । मृगजळवत्‌भासतां काय तेणें ।
दिसणें आणि न दिसणें । सारिखेंची ॥६३॥
मुख्य आपले आत्मत्व दृढ करावे. तो लिंगदेह हा मृगजळाप्रमाणे आहे, असे निष्पन्न झाल्यावर त्याचे दिसणे आणि न दिसणे सारखेच समजावे लागेल. (६३)

शोक मोह काम क्रोध । लिंगकार्य नानाविध ।
तुटतां लिंगाचा संबंध । कार्य जाय त्या सवें ॥६४॥
शोक, मोह, काम, क्रोध हे सगळे विविध प्रकारचे लिंगदेहाचे कार्य आहे. पण लिंगदेहाचा संबंध सुटताच त्याबरोबरच त्याचे कार्यही नष्ट होते. (६४)

असो स्थूळ सूक्ष्म हे दोन । यासि कारण अज्ञान ।
याचें न होतां खंडण । आत्मज्ञान कैचें ॥६५॥
अशा त-हेने स्थूल आणि सूक्ष्म देह हे अज्ञानामुळे उत्पन्न होतात. त्यांचे खंडन झाल्याखेरीज आत्मज्ञान कसे होईल? (६५)

ते कैसे म्हणसी अज्ञान । तरी सांग पा मी जें पुसेन ।
देहद्वया तूं विलक्षण । तो तूं कोण दाखवीं ॥६६॥
त्या अज्ञानाचे स्वरूप काय असा प्रश्न विचारशील तर मी जे प्रश्न विचारीन त्यांची उत्तरे तू दे. आता तू जो हा दोन देहांवेगळा आहेस, तो तू कोण आहेस हे दाखव. (६६)

शिष्य विचारी अंतरीं । देहद्वयसाक्षी मी निर्धारीं ।
सर्व जाणता असे परी । मी अमुक न कळें ॥६७॥
यावर शिष्य मनात विचार करतो, मी दोन्ही देहांचा साक्षी आहे. हे खरे, मी सर्व जाणतो हेही खरे आहे, पण मी कोण आहे, हे मात्र मला कळत नाही. (६७)

तरी आतां तोचि कैसा । नेणे नेणें मी सहसा ।
गुरु म्हणती गा पाडसा । हेंचि अज्ञान ॥६८॥
तरी आता तोच मी 'काही जाणत नाही असे म्हणतो, ते कसे? तेव्हा सद्गुरू म्हणतात, की अरे बाळा, यालाच अज्ञान म्हणतात. (६८)

तूं निरालंब साक्षी । देहद्वयातें परीक्षी ।
तो कोण पा निरीक्षीं । ज्ञप्तिमात्र ॥६९॥
तू कोणावरही अवलंबून नसणारा केवळ साक्षी आहेस, तू स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहांची नीट पारख कर आणि त्या दोहीवेगळा केवळ ज्ञानस्वरूप असा जो कोणी आहे त्याला जाणून घे. (६९)

दृश्यातें डोळां देखिलें । भासातें मनें ओळखिलें ।
आपआ्पणा नवचे कळलें । म्हणुनि भांबावलासी ॥७०॥
जे दृश्य होते, ते डोळ्यांनी पाहिलेस, जे आभासमय होते ते तू मनाने समजून घेतलेस, पण आपणच आपल्याला कळले नाही म्हणून भांबावून गेला आहेस. (७०)

दृश्यभासातीत जाणता । जाणोनि होसी नेणता ।
मी नेणें हे तुज कळतां अज्ञान मिथ्या ॥७१॥
तू दृश्य व भास यांच्या पलीकडचा आहेस हे तुला कळते, पण आपल्याला कळत नाही, असेच तुला वाटते. आपल्याला कळत नाही असे तुला कळते याचाच अर्थ अज्ञान हे मिथ्या आहे. (७१)

कारणदेह हे अज्ञान । सत्‌म्हणतां ज्ञानें हनन ।
असत्‌नव्हे कार्यानुमान । अनिर्वचनीय ॥७२॥
अज्ञान म्हणजेच कारण देह होय. त्याला सत् म्हटले तर ज्ञानाने तो नष्ट होतो. त्याला असत् म्हणावे तर कार्यावरून त्याचे अनुमान होते. त्यामुळे अज्ञान हे अनिर्वचनीय ठरते. (७२)

मनादि अंतःकरण । जेथे अत्यंत होती लीन ।
ती सुषुप्ति अवस्था जाण । हृदयस्थानीं ॥७३॥
मन, बुद्धी इत्यादी अंत:करणाचे घटक जेथे अत्यंत विलीन होतात, ती सुषुप्ती कारणशरीराची अवस्था होय. तिचे स्थान हृदय आहे. (७३)

आपुलेनि जाणतेपणें । तुवां सुषुप्ति अनुभविणें ।
अन्यथा नव्हे आठवणें । जागरिं सुषुप्तिसुखा ॥७४॥
तू स्वत: ज्ञाता असल्यामुळे सुषुप्ती तुला अनुभविता येते. नाहीतर जागृतीमध्ये सुषुप्तीचे सुख आठवत नाही. (७४)

तया नेणण्यातें जाणसी । जाणोनि मी नेणें म्हणसी ।
तेचि मकार मात्रा ऐसी । ओळखावी ॥७५॥
त्या अज्ञानाला तू जाणू शकतोस, पण त्याला जाणूनसुद्धा 'मला काही समजत नाही' असे तू म्हणतोस. त्यालाच 'म'कार मात्रा म्हणून समजावे. (७५)

आनंदसुखाचा भोग । जाणसी तमोगुणाचा योग ।
तुज जाणतयासी सांग । नेणीव कोठें ॥७६॥
तेथे जो भोग घडतो, तो आनंदस्वरूपाचा असतो आणि तेथे तमोगुणाचा संबंध असतो. वास्तविक पाहता तू जाणता असताना तुला अज्ञान कसे असेल? (७६)

बळें म्हणसी मी नेणता । होसी अभिमान धरिता ।
तोचि प्राज्ञ हे व्यवस्था । कारणशरीराची ॥७७॥
(आत्म्याला अज्ञान असत नाही. ) पण बळेच 'मी अज्ञानी आहे' असे म्हणत असशील तर अभिमान बाळगतोस. तोच प्राज्ञ नावाचा अभिमानी जीव होय आणि ती कारणशरीराची सामग्री होय. (७७)

हें अज्ञान तुज कळतें । किंवा नाहीं सांग पां तें ।
न कळे ऐसें वाटतें । जाण तयासी ॥७८॥
हे अज्ञान तुला कळते किंवा नाही हे सांग. आपल्याला कळत नाही असे तुला वाटते म्हणजे नेमके काय होते, ते नीट समजून घे. (७८)

अंधार दृष्टीसी दिसे । म्हणसी डोळा देखणा नसे ।
अज्ञान जेणें प्रकाशे । तो तूं स्वप्रभ ॥७९॥
अंधार दृष्टीला दिसतो आणि तू त्यावेळी म्हणत असतोस की डोळ्याला दिसत नाही. वास्तविक पाहता अंधारही डोळाच पहात असतो. त्याप्रमाणे अज्ञान ज्या योगाने प्रकाशते म्हणजे जाणवते, तो तू स्वप्रभ आत्मा तूच आहेस. (७९)

आतां सांडिं गा नेणपण । जाणता अससी परिपूर्ण ।
येणे रीती अज्ञान खंडण । सहजची जालें ॥८०॥
तेव्हा अज्ञान सोडून दे. तू पूर्णपणे ज्ञाता आहेस. अशा रीतीने अज्ञानाचे आपोआप खंडन झाले. (८०)

एवं स्थूळ सूक्ष्म कारण । जागृति स्वप्न सुषुप्ति जाण ।
विश्वतैजसप्राज्ञ । मात्रागुणत्रिपुटी ॥८१॥
अशा प्रकारे स्थूल, सूक्ष्म, कारण ही शरीरत्रिपुटी, जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही अवस्थात्रिपुटी; विश्व, तैजस, प्राज्ञ ही अभिमानी जीवत्रिपुटी; अउम ही मात्रात्रिपुटी; सत्त्व, रज, तम ही गुणत्रिपुटी; दृश्य, भास, अज्ञान ही भोग्यत्रिपुटी अशा या आठ प्रकारच्या त्रिपुटी सांगितल्या. (८१)

या इतुकीयांचा जाणता । तुझा तूंचि आयिता ।
तिही प्रतीति आतां । अनुभव घे‍ई ॥८२॥
या इतक्या त्रिपुटींचा तू सहजच जाणता आहेस. त्यांचा शास्त्रप्रतीती, गुरुप्रतीती आणि आत्मप्रतीती या तीन प्रतीतींच्या मार्गाने अनुभव घे. (८२)

ऐसें बोलतां श्रीसद्‌गुरू । निजसुखाचा लोटला पुरू ।
वृक्ष उन्मळून पडे थोरू । तैसा गुरुचरणीं पडियेला ॥८३॥
श्रीगुरूंनी असे म्हणताच शिष्याच्या ठिकाणी आत्मसुखाचा पूर दाटला आणि एखादा मोठा वृक्ष जसा उन्मळून पडतो, तसा तो सद्गुरूंच्या चरणांवर पडला. (८३)

कंठ जाला सद्गद । रोमीं उमटले स्वेदबिंद ।
फुंजें दाटला आनंद । नेत्रीं पाझर प्रेमाचे ॥८४॥
त्याचा कंठ सद्गदित झाला, त्याच्या शरीरावरील रोमारोमात घामाचे बिंदू दिसू लागले, अभिमानाने आनंद शरीरभर दाटून आला आणि डोळ्यांतून प्रेमाश्रू पाझरू लागले. (८४)

अंतःकरणाची वृत्ति । निःशेष होय हरपती ।
अखंड दाटली ज्ञप्ति । निवांत जाला ॥८५॥
त्यानंतर त्याच्या अंत:करणाची वृत्ती संपूर्णपणे लोप पावली आणि निखळ शुद्ध ज्ञानदशेने त्याला व्यापून टाकले आणि तो एकदम शांत झाला. (८५)

मग सद्‌गुरू थापटिती । सावध सावध गा पुढती ।
तुजला तुझी झाली प्राप्ति । ते निरोपीं मज पुढें ॥८६॥
मग सद्गुरूंनी त्याला 'सावध हो, सावध हो' असे म्हणून त्याला थापटले आणि पुढे म्हटले, "तुला तुझा अनुभव आला, तो माझ्यापुढे सांग बरे" (८६)

मग तया आनंदातें ग्रासुनी । उठोनि मस्तक ठेवी चरणीं ।
मंद मंद तये क्षणीं । बोलता जाला ॥८७॥
मग त्याने ते आनंदाचे भरते गिळून टाकले आणि तो जागेवरून उठला आणि पुन्हा सद्गुरूंच्या चरणांवर त्याने मस्तक टेकवले. मग तो मंद मंद स्वरात बोलू लागला. (८७)

जय जय आजि सद्‌गुरू । मज भवा उतरिलें पारू ।
माझा मी चित्सागरू । न दिसें परू एकला ॥८८॥
"सद्गुरूमहाराज, आपला जयजयकार असो. तुम्ही मला भवसागरातून बाहेर काढून पलीकडे पोचवले आहे. आता मीच चैतन्यमय सागर झालो असून माझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही मला दिसत नाही. मी एकमेव उरलो आहे. (८८)

कैचें अज्ञान दृश्य भास । माझा मीचि निराभास ।
ज्ञानघन स्वयंप्रकाश । दृश्याभास पुरे आतां ॥८९॥
आता अज्ञान कुठे राहिले? दृश्य आणि भासमान पदार्थ तरी कुठे राहिले? आता मीच भासविरहित झालो, केवळ ज्ञानरूप आणि स्वयंप्रकाश झालो. आता दृश्य आणि त्याचे आभास मला नकोत" (८९)

ऐसें ऐकतां वचन । गुरु म्हणती सावधान ।
तुझें अत्यंत समाधान । जालें नाहीं ॥९०॥
त्याचे हे बोलणे ऐकून सद्गुरू त्याला म्हणाले, सावधान, तुझे आत्यंतिक समाधान अजून झाले नाही. (९०)

तुज वाटे मज लाधलें । आत्मस्वरूप प्राप्त जालें ।
हे वृत्ति आनंदे गोविलें । तुजला मध्यें ॥९१॥
तुला वाटते आहे की, आपल्याला साध्य प्राप्त झाले. आपल्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले आहे पण ते ज्ञान नसून वृत्तीच्या द्वारे प्राप्त झालेला आनंद आहे. या वृत्त्यानंदाने तुला मधेच अडकवले आहे. (९१)

तरि या वृत्तीसी जाणावें । स्वरूपीं स्वरूपचि व्हावें ।
जेथे दुजेपणाच्या नावें । शून्याकार ॥९२॥
तरी ती वृत्ती म्हणजे काय हे तू जाणून घे. मग तिचा त्याग करून आपण निवांत स्वरूप होऊन स्वरूपातच राहावे. त्या अवस्थेत दुजेपणाच्या नावाने शून्यच असेल. (९२)

स्थूळ सूक्ष्म हें कार्य । या हेतु अज्ञान कारण होय ।
त्यासि अधिष्ठान जें होय । ते महाकारण ॥९३॥
स्थूल देह, सूक्ष्म देह हे कार्यरूप असून त्यांचे अज्ञान हेच कारण होय. त्या अज्ञानाचे जे मूळ अधिष्ठान ते महाकारण होय. (९३)

तुर्यावस्था तिहींतें जाणें । मी स्वरूप आठवि मनें ।
या वृत्त्यात्मकें तुज होणें । सहज वेगळें ॥९४॥
चौथी तुर्यावस्था या स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरांना व त्यांच्या अवस्थांना जाणते. मी स्वरूप झालो आहे, असे जे तुला वाटत आहे ते वृत्तीच्या योगाने जाणवते आहे. या वृत्तीच्या अडथळ्याने तू स्वरूपसुखापासून वेगळा पडतोस. (९४)

निज स्वानुभवें जाणावें । वृत्त्यात्मकासि त्यागावे ।
द्रष्टा साक्षी स्वभावें । आत्मत्वीं नाहीं ॥९५॥
स्वरूपास प्रत्यक्ष अनुभवाने जाणून घे. जे जे वृत्तिस्वरूप आहे (वृत्त्यात्मक) त्याचा त्याग कर. आत्मस्वरूपाच्या संदर्भात कोणी द्रष्टा नसतो, कोणी साक्षी नसतो. (९५)

दृश्य जेथें मिथ्या जालें । तरी द्रष्टुत्व कोणा आलें ।
साक्ष्य होतांची नाथिलें । साक्षी कवणु ॥९६॥
दृश्यच जर मिथ्या ठरले तर त्याला पाहाणारा द्रष्टा कसा सत्य असेल? जे साक्ष्य आहे. ते निर्माण होताच नष्ट झाले तर साक्षी कोण राहील? (९६)

द्रष्टासाक्षीविन । आपुला आपण सघन ।
मोडे वृत्तीचें मीपण । येणे रीती ॥९७॥
द्रष्टा आणि साक्षी यांच्या अभावी आत्मा आपल्या ठिकाणी संपूर्ण व्यापून असतो. अशा प्रकारे वृत्तीतील मीपणा तेथे संपूर्णपणे नष्ट होतो. (९७)

आपणाहून वेगळा कवण । कीं अनुभवी आत्म्यालागुन ।
येथें ज्ञान आणि अज्ञान । एक पांतीं ॥९८॥
आपल्यापेक्षा वेगळा असा दुसरा कोण आहे? आत्म्याचा अनुभव घेणारा तरी कोण आहे? या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान या दोहोंची योग्यता सारखीच. (९८)

आतां बोलणें खुंटलें । मौनही नसे कल्पिलें ।
अनुभवेंवीण ज्याचें त्या जालें । अत्यंत समाधान ॥९९॥
खरे म्हणजे येथे बोलणेच संपते. येथे मौनाची सुद्धा कल्पना करता येत नाही. (कारण ते सापेक्ष आहे. बोलण्याचा अभाव म्हणजे मौन, पण बोलणेच नसेल तर मौन धारण केले असे म्हणण्यात काय अर्थ ? ) अनुभवही येथे शक्य नसतो. (कारण अनुभव, अनुभव घेणारा आणि अनुभवकार्य या तिहींचाही येथे अभाव असतो. ) या अनुभवावाचूनच येथे आत्यंतिक समाधान प्राप्त होते. ते ज्याचे त्यानेच घ्यावयाचे असते. (९९)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
तनुत्रितयनिरसनप्रकारे । प्रथमसमासः ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
पंचकोशविवेक


विद्या भार्गवी वारुणी । अध्यात्मविद्येची खाणी ।
पंचकोशाचें निरसनीं । आत्मत्व लाभे ॥१॥
तैत्तिरीय उपनिषदातील भार्गवी वारुणी विद्या ही अध्यात्मविद्येची खाण आहे. तिच्यामध्ये पंचकोशांचे विवेचन आहे. या पंचकोशांच्या निरसनानंतर आत्मत्वाची प्राप्ती होते. (१)

परी आत्मशब्दाची प्रवृत्तीं । बहुधा असे अतिव्याप्ति ।
ते निवारावया निगुती । वेदांतग्रंथ ॥२॥
परंतु आत्मशब्दाच्या व्यवहारातील वापरामध्ये त्या शब्दाच्या अर्थाच्या संदर्भात पुष्कळ अतिव्याप्ती आढळते. त्या अतिव्याप्तीचे (नेमक्या अर्थाखेरीज इतर गैरलागू अर्थाचा समावेश) निरसन करण्यासाठीच वेदांतग्रंथांची निर्मिती झाली आहे. (२)

येथें मतें वेवादती । श्रुती आश्रय आणि युक्ति ।
बहुधा अनुभवही बोलती । आत्मविषईक ॥३॥
या संदर्भात अनेक मतामतांचे विवाद चालू आहेत. ते श्रुतींचे आधार देतात, युक्तिवाद करतात बरेचसे पक्षवादी आत्म्याविषयीचा आपला अनुभवही सांगतात. (३)

परी ते मतें कैसीं समजावीं । तरीच उगवे गथागोवी ।
भिडेनें स्वानुभपदवी । सिद्धि न वचें ॥४॥
पण मते कशी समजून घ्यावीत? ती योग्य त-हेने समजून घेतली तरच त्यांचा गुंता उलगडेल. केवळ भीड धरून विवेचन केल्यास स्वानुभवपदवी सिद्ध होणार नाही. (स्वानुभव प्राप्त होणार नाही. ) (४)

एक चार्वाक बोलती । पुत्र आत्मा हे श्रुती ।
अर्धविभागी स्री म्हणती । स्त्री पुत्र आत्मा ॥५॥
चार्वाक मताचे काहीजण असे सांगतात की, वेदांनी पुत्राला आत्मा म्हटले आहे. काहीजण म्हणतात स्त्री पतीच्या अर्ध्या पुण्याची वाटेकरी असते म्हणून स्त्री आणि पुत्र या दोघांनाही आत्मा म्हणावे. (५)

स्त्रीपुत्रही प्रिय असे । युक्ति भाविती अपैसे ।
वाढतां मरतां तोषे त्रासे । हा अनुभव ॥६॥
स्त्री आणि पुत्र दोघेही प्रिय आहेत. त्यासाठी ते पुढील युक्तिवाद करतात. दोघांची भरभराट झाली की, संतोष होतो आणि ती मरण पावली की दुःख होते हा अनुभवच आहे. (६)

अन्न ब्रह्म हे श्रुती । आत्मार्थ प्रिय हे युक्ति ।
मी कृश स्थूल अनुभविती । देहात्मा म्हणती अन्य ॥७॥
श्रुती म्हणते की, अन हे ब्रह्म आहे. ते अन्न आत्म्यासाठी प्रिय आहे, अन्नाच्या अभावी आपण कृश झालो अथवा अन्नाच्या अधिक सेवनाने आपण स्थूल झालो असा ते अनुभवही घेतात. म्हणून हे काहीजण देह हाच आत्मा असे म्हणतात. (७)

इंद्रिय चालक हे युक्ती । कलह ऐकिला श्रुती ।
मी अंध मुका भाविती । अनुभव ऐसा ॥८॥
दुसरे काहीजण असा युक्तिवाद करतात की, इंद्रिये चालक आहेत. इंद्रियांच्या श्रेष्ठत्वासाठीच्या कलहाबद्दल श्रुतीमध्ये ऐकायला मिळते. त्या त्या इंद्रियांच्या अभावी मी आंधळा झालो आहे, मी मुका झालो आहे असे काही लोक आपले अनुभव सांगतात. (८)

म्हणोनि आत्मा इंद्रिय । देह आत्मा म्हणणें काय ।
आत्मत्वाचा सिद्धांत होय । अन्य चार्वाकाचा ॥९॥
म्हणून इंद्रिये हीच आत्मा होत. देहाला आत्मा कशाला मानता? काही चार्वाकांनी इंद्रिये हीच आत्मा होत असा सिद्धान्त केला आहे. (९)

प्राण ब्रह्म हे श्रुती । प्राणें चळण हे युक्ति ।
मी क्षुधातृषावान्‌अनुभूती । प्राणात्मा म्हणती हैरण्यगर्भ ॥१०॥
दुसरे एक वेदवचन सांगते की, प्राण हेच ब्रह्म होत. कारण प्राणांमुळेच शरीराचे चलनवलन होते. मला भूक लागते, तहान लागते असा प्रत्येकाचा अनुभवही आहे. म्हणून हिरण्यगर्भाचे उपासक प्राण हाच आत्मा मानतात. (१०)

मन ब्रह्म हे श्रुती । मनेंचि कळे हे युक्ति ।
मज शोकादि अनुभूती । उपासक म्हणती मन ब्रह्म ॥११॥
'मन हे ब्रह्म आहे' असे श्रुती सांगते. मनामुळेच सर्व पदार्थ कळतात असा युक्तिवाद काहीजण करतात. आपल्याला शोकादी बऱ्या वाईट अनुभूती मनामुळेच होतात, म्हणून काही उपासक मन हेच ब्रह्म म्हणतात. (११)

विज्ञान ब्रह्म श्रुतीचे वचन । युक्ति बुद्धीसी कर्तेपण ।
अनुभवें निश्चय करी जाण । विज्ञानात्मा बौद्धमती ॥१२॥
'विज्ञान हे ब्रह्म आहे' असे श्रुतीचे वचन आहे. विज्ञान म्हणजे बुद्धी. तिच्याकडेच सर्व गोष्टींचे कर्तेपण आहे. ती अनुभवाने म्हणजे संस्काराने निश्चय करते. म्हणून बौद्धांच्या मताने विज्ञान अथवा बुद्धी हाच आत्मा म्हणता येईल. (वास्तविक पाहता बौद्ध आत्मा मानतच नाहीत. ) (१२)

अपरबौद्ध क्षणिकवादी । विज्ञानात्मा प्रतिपादी ।
क्षणिकत्व असे बुद्धी । म्हणोनिया ॥१३॥
दुसरे बौद्ध क्षणिकवादी आहेत. तेही विज्ञान हाच आत्मा असे प्रतिपादन करतात. बुद्धी देखील क्षणिक आहे. (पण ती संस्कारसातत्यामुळे हे निश्चयाचे काम करते. ) असे ते मानतात. (१३)

आनंद ब्रह्म श्रुतीचे वचनीं । नाना युक्ति प्रतिपादुनी ।
येथे मताची वेवादनी । बहुधा असे ॥१४॥
आनंद ब्रह्म आहे' असे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदात (तैत्तिरीय२. ८) अनेक प्रकारचे युक्तिवाद सांगून अशी निरनिराळ्या मतांची मांडणी केली आहे. (निरनिराळ्या मतांचे विवाद (म्ह. मतभिन्नता) सांगितले आहेत. ) (१४)

सुषुप्तिकाळीं आत्मा नसें । उपाधीस्तव दिसणें असें ।
म्हणोनि शून्य ऐसें । शून्यवादी म्हणे ॥१५॥
झोपेत आत्मा नसतो. तो उपाधींमुळेच दिसतो (जाणवतो) असे वाटते. म्हणून सर्व शून्यच आहे. तेच जगत्कारण आहे. असे शून्यवादी (बौद्ध) मानतात. (१५)

आत्मा अणुत्वें निर्धारी । संचार असे नाडिद्वारीं ।
प्रवर्ते इंद्रिय व्यापारीं । अणुवादी बोले ॥१६॥
आता आत्मा अणूएवढा असा निर्धार करून अणुवादी (वैशेषिक) असे सांगतात की हा अणूएवढा आत्मा नाड्यांच्या मार्गाने सर्वत्र संचार करतो. इंद्रियांच्या मार्गाने तो व्यवहार करण्यास प्रवृत्त होतो. म्हणून अणू हाच आत्मा होय. (१६)

माध्यमिक बोले वचन । अणु आत्मा अप्रमाण ।
एक समईं देहचलण । आपादमस्तक होय ॥१७॥
माध्यमिक (बौद्ध) असे सांगतात की, 'आत्मा अणुरूप आहे' असे म्हणणे प्रमाणरहित आहे. कारण ज्या ठिकाणी अणुरूप आत्मा असेल तेवढ्याच भागाची हालचाल शक्य होईल. पण आपल्या शरीरात तर सर्वच अवयवांची हालचाल एकाच वेळी चाललेली दिसते. (पायापासून ते मस्तकापर्यंत सर्व अवयवात ती हालचाल चालू असते. १७)

आत्मा देहा येवढा जरी । तरिच सर्व प्रवर्ते व्यापारीं ।
येथेंहि आक्षेप कोणी करी । नाना देह धरी कैसा ॥१८॥
आत्मा देहाएवढा असेल तरच सर्व अवयव व्यापार करण्यास प्रवृत्त होऊ शकतील. आता यावरही कोणी आक्षेप घेऊ शकतील. एकच आत्मा निरनिराळे देह कसे काय धारण करू शकेल? (१८)

जेव्हडी देहाची उपाधी । तैसा आत्मा हे प्रतिपादी ।
सर्व शरीरीं विशुद्धि । कंचुकप्राय आत्मा ॥१९॥
देह उपाधी जेवढी असेल तेवढा आत्मा असला पाहिजे, असे प्रतिपादन ते करू शकतील. सर्व शरीरांमध्ये आत्मा हा आवरक वस्त्रांप्रमाणे (कंचुकाप्रमाणे) व्यापून असतो. (१९)

कंचुक म्हणतां आत्मा खोल । नाडीद्वारा संचार नव्हेल ।
सूक्ष्मावयवीं नाडी सकळ । व्यापून असे ॥२०॥
आता आत्मा कंचुकाप्रमाणे आहे असे म्हणता तर मग शरीरातील खोलवर नाड्यांच्या द्वारे तो संचार कसा करू शकेल? कारण सर्व नाड्या या सूक्ष्मावयांमध्ये व्यापून आहेत. (२०)

माध्यमिक म्हणतां ऐसें । तार्किक म्हणे हें काइसें ।
आत्मा विभुत्वें असे । आकाशापरी ॥२१॥
माध्यमिकांनी अशी शंका काढताच तर्कशास्त्री म्हणतात की, त्यात काय आहे? आत्मा आकाशाप्रमाणे व्यापक (विभु) आहे. (२१)

आकाशीं शब्दादि गुण । तैसे आत्मत्वीं सुखादि गुण ।
आकाशापरी द्रव्य हा जाण । आत्मा असे ॥२२॥
आकाशाचे जसे शब्द इत्यादी गुण आहेत, तसे आत्म्याचे सुख इत्यादी गुण आहेत. आकाश ज्याप्रमाणे पदार्थ आहे त्याप्रमाणेच आत्माही पदार्थच आहे. (२२)

ऐसेचि चिद्‌रूपत्वीं वाद । आत्मत्वीं असती विवाद ।
तेचि आतां विशद । करूनि दाऊं ॥२३॥
अशा प्रकारे चिद्‌रूपाच्या संबंधात अनेक वाद आहेत तसेच आत्म्याच्या संबंधातही अनेक विवाद आहेत. तेच आता स्पष्ट करून दाखवू या. (२३)

तार्किकांतरगत प्रभाकर । आत्मा जडरूप निर्धार ।
चैत्यन्य बुद्धीचा विकार । आत्मा चिद्‌रूप नव्हे ॥२४॥
तार्किकांमध्ये प्रभाकरभट्टांच्या मताचे अनुसरण करणारे नैयायिक असे मानतात की, आत्मा निश्चितपणे जडरूप आहे. चैतन्य हा बुद्धीचा विकार आहे. आत्मा काही चिद्‌रूप नाही. (२४)

न्यायांतरभूत भट्टमतीं । आत्मा चिदचिद्‌रूप म्हणती ।
जागृत्स्वप्नीं असे चिती । सुषुप्तीं जडत्व ॥२५॥
नैयायिकांमध्येच जे भट्टमताचे अनुयायी आहेत, ते असे मानतात की, आत्मा चिद्‌रूप आहे आणि तसाच तो अचिद्‌रूप (जड) ही आहे. जागृती आणि स्वप्न या अवस्थांमध्ये तो चैतन्ययुक्त असतो तर सुषुप्तीमध्ये तो जड असतो. (२५)

ऐका सांख्यशास्त्राचें मत । आत्मा चिद्‌रूप सदोदित ।
नाना कुतर्काचे सिद्धांत । बोलोचि नये ॥२६॥
आता सांख्यशास्त्राचे मत ऐका. त्यांच्या मताने आत्मा हा नेहमीच चैतन्यरूप असतो. तेव्हा याबाबतीत इतर कुतर्काचे सिद्धान्त बोलूच नयेत. (२६)

असो ऐसे परस्परें । कलह करिताती पामरें ।
येथें आक्षेपिलें आदरें । श्रोतेजनीं ॥२७॥
असो, अशा प्रकारे ते बिचारे मतवादी आपापसात कलह करत आहेत. यावर श्रोते पुढीलप्रमाणे आक्षेप घेतात. (२७)

श्रुति युक्ति अनुभव । बोलताती हे सर्व ।
त्यासि दूषिता हे अपूर्व । काय म्हणोनी ॥२८॥
हे सर्व मतवादी वेदाधार, युक्तिवाद आणि अनुभव यांच्या आधाराने बोलत आहेत. पण त्यांना तुम्ही दोष देत आहात, ते कशासाठी? हे सर्व अपूर्वच वाटते आहे. (२८)

हे ऊहापोह नेणती । श्रुतीचे आभास घेती ।
कुतर्काच्या नाना युक्ति । मतें स्थापिती अनान ॥२९॥
त्यावर उत्तर असे की, हे सर्व मतवादी ऊहापोहाविषयी (आदिअंतीच्या सिद्ध अर्थाविषयी) अज्ञानी आहेत. ते श्रुतीच्या वरवर भाषणाच्या आधारांचा आश्रय घेतात. निरनिराळे कुतर्कयुक्त युक्तिवाद पुढे करतात आणि वेगवेगळ्या भिन्न भिन्न मतांचे प्रतिपादन करतात. (२९)

न होतां वेदांत सिंव्हाची हांक । विवादती दर्शने जंबूक ।
ऐकतां पोटीं शिरे धाक । अधोवदनें लपती ॥३०॥
जोपर्यंत वेदान्तरूपी सिंहाची गर्जना कानांवर पडत नाही, तोपर्यंत अन्य दर्शने (तत्त्वज्ञानाचे संप्रदाय) कोल्ह्यांप्रमाणे वादविवाद करत बसतात. (कोल्हेकुईच्या रूपातील चर्चा करत असतात) ; पण एकदा का वेदान्तरूपी सिंहाची गर्जना ऐकली की, त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो आणि ते भीतीने माना खाली घालून लपून बसतात. (३०)

असो आत्मत्वाचें ज्ञान । पंचकोशाचें विवेचन ।
तेचि ऐका पूर्वानुसंधान । भृगुवल्लीचें ॥३१॥
आता ही आत्म्याच्या स्वरूपाच्या ज्ञानाची चर्चा बाजूस ठेवू. तैत्तिरीय उपनिषदातील भृगवल्लीमध्ये जे पंचकोशाचे विवेचन केले आहे तेच त्याच्या पार्श्वभूमीसह आता ऐका. (३१)

भृगुप्रति वरुणें । विद्या दिधली सकरुणें ।
विविदिषा होतां भृगूनें । वरुणपित्या प्रार्थिले ॥३२॥
वरुण नावाच्या सद्गुरूंनी आपला पुत्र भृगुला कृपाळू अंत:करणाने विद्या दिली. परंतु आणखी जिज्ञासा (विवदिषा) निर्माण झाल्यामुळे भृगूने आपला पिता जो वरुण त्याला विनंती केली. (३२)

हे तात ! हे सद्‌गुरू । मज सांगावा जी विचारू ।
ब्रह्मस्वरूपाचा निर्धारू । कृपा करुनी दयाळा ॥३३॥
"हे तात, अहो सद्गुरूमहाराज, मला एक विचार समजावून सांगा. हे दयाळू गुरुवर्या, माझ्यावर कृपा करून मला ब्रह्मस्वरूपाचे निश्चित ज्ञान सांगावे. " (३३)

ऐकून वरुण संतोषला । विचारस्थळ दाविता झाला ।
तेणें विचारें पावला । समाधान भृगु ॥३४॥
त्याचे ते बोलणे ऐकन वरुण प्रसन्न झाला. त्याने भृगला विचाराची दिशा सांगितली. त्या विचाराने भृगूचे समाधान झाले. (३४)

विचाराचें कोणतें स्थळ । तेंचि करूं प्रांजळ ।
श्रोतींहि येथें निवळ । क्षण एक असावें ॥३५॥
त्या विचाराचे नेमके क्षेत्र आता स्पष्ट करून सांगतो. श्रोत्यांनीही ते क्षणभर लक्ष देऊन ते ऐकावे. (३५)

ज्यापासून हें सर्व होतें । आणि ज्या स्वरूपीं वर्ततें ।
शेवटीं जेथें लया जातें । तें अधिष्ठान ब्रह्म ॥३६॥
ज्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होते, उत्पन्न झाल्यानंतर ज्या स्वरूपात राहते आणि शेवटी ते जेथे विलीन होते, त्या अधिष्ठानभूत तत्त्वाला ब्रह्म म्हणतात. (३६)

भृगु विचारी मनीं । संकेतें न पवें अर्थालागुनी ।
अमुक म्हणोनि सांगा कर्णीं । पुन्हां ऐसें प्रार्थिलें ॥३७॥
भृगूने मनात विचार केला, अशा सांकेतिक बोलण्याने (अशा खुणेच्या बोलण्याने) काहीच अर्थज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट निर्देश करून 'हे अमुक म्हणजे ब्रह्म होय' असे माझ्या कानात सांगा अशी त्याने त्यांना प्रार्थना केली. (३७)

अधिकार पहावा भृगूचा । अन्न ब्रह्म बोले वाचा ।
उद्भव स्थिति लय सर्वांचा । अन्नाचा ठाई ॥३८॥
यावर वरुण पित्याने भृगूचा अधिकार पहावा म्हणून "अत्र म्हणजे ब्रह्म होय" असे शब्दांनी सांगितले. त्यांनी पुढेही असे सांगितले की, "सर्वच पदार्थांची उत्पत्ती, स्थिती आणि लय अत्रामध्येच होतो (३८)

तरि अन्न ब्रह्म जाणावें । या विचारीं प्रवर्तावें ।
ऐसें ऐकतां स्वभावें । विचारिता जाला ॥३९॥
म्हणून तू 'अत्र म्हणजे ब्रह्म आहे' या विचारावर लक्ष केंद्रित कर. " हे पित्याचे शब्द ऐकताच त्याने स्वाभाविकपणेच विचार करायला सुरुवात केली. (३९)

अन्न म्हणिजे जडें । तो हा स्थूल देह वाढे ।
शेवटीं अन्नींच वावडें । परि या सत्यत्व असेना ॥४०॥
अन्न म्हणजे जड पदार्थ होय. त्या जड पदार्थाच्या योगाने हा स्थूल देह वाढतो. तो स्थूल देह शेवटी अन्नातच फिरत राहतो. पण त्याला सत्यत्व नाही. ('वावडे' याऐवजी 'वावटें' असा पाठ येथे जास्त योग्य वाटतो. वावटे' म्हणजे 'विश्रांती पावतो' (४०)

म्हणोनि न घडे ब्रह्मत्व यासी । पुन्हां येऊनी पित्यापासी ।
हे गुरो अन्नब्रह्मासी । नाश आहे ॥४१॥
म्हणून अत्राला ब्रह्मपण देता येत नाही असा विचार करून तो पुन्हा पित्याकडे आला आणि म्हणाला, हे गुरुवर्या अन्न ब्रह्म म्हणून मानले तर त्याला शेवटी नाश आहे. ' (४१)

तरी अन्य आत्मा प्राणमय । तेणें अन्नाची पूर्णता होय ।
प्राण ब्रह्म हा निश्चय । विचारीं बापा ॥४२॥
तेव्हा त्याचा पिता त्याला म्हणाला, 'तर मग आत्मा हा प्राणमय आहे. त्या प्राणाच्या योगाने अन्नतत्त्वाला पूर्णता येते. तर मग प्राणतत्त्व हेच ब्रह्म आहे असा निश्चय करून त्यावर विचार कर. ' (४२)

मग प्राणाची विवंचना । पांच कर्मेंद्रिय पंचप्राणा ।
यासि जडत्व दुःख प्रयाणा । अंती नाश आहे ॥४३॥
त्यावर त्याने प्राणासंबंधी विचार करायला सुरुवात केली. पाच प्राण आणि पाच कर्मेन्द्रिये ही जड तत्वे आहेत. ती दु:खमय आहेत आणि शरीर सोडून जाताच त्यांचा अंतही होतो. (४३)

तरि यांसी ब्रह्मत्व कैसें । उभयकोश अविद्यात्मक ऐसें ।
यासि कोशत्व नाम आलेसें । आच्छादक हेतु ॥४४॥
तर त्यांना ब्रह्मपण कसे तेता येईल? तेव्हा अन्नमय कोश आणि प्राणमय कोश दोन्हीही जड असल्यामुयळे अज्ञानाने युक्त आहेत. त्यांना ते केवळ शरीरातील सूक्ष्म तत्त्वांचे आच्छादक असल्याने कोश पदवी देण्यात येते. (४४)

अविद्यक हे जडे । यासि ब्रह्मत्व कैसें घडे ।
पाहतां जैसे मडें । या उपदेशही नसे ॥४५॥
ही दोन्ही तत्त्वे अज्ञानयुक्त असून जड आहेत. त्यांना ब्रह्मपण कसे प्राप्त होईल? तसे पाहिले तर ही दोन्ही तत्त्वे निर्जीव शरीराप्रमाणे असून त्यांना उपदेशही देता येत नाही. (४५)

पुन्हा आला पित्यासमीप । प्राणब्रह्म असद्‌रूप ।
तरि कैसें तें ब्रह्मरूप । मज निरूपावें ॥४६॥
तेव्हा तो पुन्हा आपल्या पित्याकडे आला आणि म्हणाला, 'प्राणब्रह्म असत्य आहे. मग खरे ब्रह्मपण कसे आहे ते मला समजावून सांगा. ' (४६)

विद्या अविद्यात्मक मनोकोश । येथेंच श्रुतीचा उपदेश ।
आत्मा म्हणतां हे आदेश । चतुर्थावयवीं ॥४७।।
तेव्हा पिता त्याला म्हणाला, त्याहून सूक्ष्म कोश म्हणजे मनोमय कोश होय. तो ज्ञान आणि अज्ञान या दोहोंनी युक्त असतो. त्याच्या संदर्भात श्रुती ( तैत्तिरीय उपनिषद-ब्रह्मानंदवल्ली ३. १७ मध्ये) सांगते की, मनोमय कोशाचा चवथा अवयव म्हणजे आदेश (विधायक ग्रंथ) हा आहे. (४७)

विद्याविद्या दोनी कैसें । तेचि अवधारा मानसें ।
पंचज्ञानेंद्रियासहित असे । मनोमयाचा ठाई ॥४८॥
पण या कोशामध्ये विद्या आणि अविद्या (ज्ञान व अज्ञान) या दोन्ही एकत्र कशा असतात, असा प्रश्न मनात येतो. त्याचे समाधान मन एकाग्र करून ऐका. या मनोमय कोशामध्ये पंच ज्ञानेंद्रिये (४८)

ब्रह्मरूपीं खेळताती । तेथेंचि विषय व्यापरती ।
परि तयातें नेणती । हेचि अविद्या ॥४९॥
ही पंचज्ञानेंद्रिये ब्रह्मरूपावर खेळतात. तेथेच त्याच वेळी आपल्या विषयांमध्ये व्यापार करतात. पण त्या ब्रह्मरूपाला ओळखत नाहीत हीच अविद्या अथवा अज्ञान होय. (४९)

वाक्ये जी स्वतःप्रमाण । तेणें मनासी होय ज्ञान ।
हेंचि विद्येचे लक्षण । मनोमयकोशीं उपदेश ॥५०॥
वेदातील स्वत:प्रमाण, स्वत:सिद्ध अशी जी वचने आहेत, त्या योगाने मनाला ज्ञान प्राप्त होते. हेच विद्येचे लक्षण होय. मनोमय कोशामध्येच आदेश म्हणजे उपदेश शक्य आहे. (५०)

उपदेश विज्ञानीं कां न होय । तरि विद्यात्मक कोश उभय ।
विज्ञान आणि आनंदमय । येथें उपदेश कैंचा ॥५१॥
उपदेश विज्ञानमय कोशात का होत नाही? याचे कारण यापुढील विज्ञानमय आणि आनंदमय हे दोन्ही कोश मुळातच विद्यामय आहेत. तेथे उपदेश कसा काय होईल? (५१)

विज्ञान कैसा विद्यात्मक । तरि निश्चय करणें हें रूपक ।
कोणतेही संशयात्मक । बुद्धीसी नाही ॥५२॥
विज्ञानमय कोश विद्यात्मक कसा? तर निश्चय करणे हेच बुद्धीचे रूप आहे. बुद्धीमध्ये कोणत्याही संशययुक्त विचाराला स्थान नाही. (५२)

मनोकोशीं उपदेश मात्र । विज्ञानीं मनन निश्चय विचार ।
या हेतु श्रद्धैव शिर । विज्ञानमयी श्रुति बोले ॥५३॥
मन:कोशामध्ये फक्त उपदेशाला वाव आहे. विज्ञानमय कोशात मनन, निश्चय, विचार हेच व्यापार असतात. म्हणूनच विज्ञानमय कोशासंबंधाची श्रुती सांगते की श्रद्धा हेच या विज्ञानमय आत्म्याचे शिर आहे. (तैत्तिरीय उपनिषद ब्रह्मानंद वल्ली ४. ९) म्हणजे विज्ञानमय कोशाचे पहिले अंग श्रद्धा हेच आहे. (५३)

असो प्राणाहून अन्य मनोमय । तेणें पूर्ण प्राणमय ।
मनोमय हा ब्रह्म होय । विचारी गा अंतरी ॥५४॥
म्हणून मनोमय कोश हा प्राणाहून वेगळा आहे. प्राणमय कोश मनोमयामुळे पूर्ण होतो. म्हणून मनोमय कोश हा ब्रह्मपणाला योग्य आहे की नाही याचा मनात विचार कर. (५४)

मन आणि ज्ञानेंद्रिय । हे विषयसाधन होय ।
बंधमोक्षाचा उपाय । येणेंयोगें आत्म्यासी ॥५५॥
मन आणि ज्ञानेंद्रिये ही विषयांची साधने होत. त्यांच्या योगानेच आत्म्याला (जीवाला) बंध अथवा मोक्ष प्राप्त होतात. (५५)

काम क्रोध मोह शोक । लज्जा धारणा धाक ।
सर्व हें मनाचें रूपक । बंध मोक्ष या हेतू ॥५६॥
काम, क्रोध, मोह, शोक, लज्जा, स्मरणशक्ती (धारणा) , धाक (भीती) ही सर्व मनाचीच रूपे होत. यांच्यामुळेच बंध अथवा मोक्ष दोन्ही शक्य होतात. (५६)

क्षणा सुखी क्षणा दुःखी । क्षणा लया जाय शेखीं ।
म्हणोनि ब्रह्मत्व हे उखी । मनासि न घडे ॥५७॥
मनाचे असे आहे की, ते एका क्षणाला सुखी होते, तर लगेच दुसऱ्या क्षणाला दुःखी होते. आणखी एका क्षणाला ते शेवटी लयालाही जाते या कारणाने मनाला ब्रह्मत्वाची (ब्रह्मपणाची) भाषा लागू पडत नाही. (५७)

ब्रह्म अविनाशी उघडें । वाजती श्रुतीचे चौघडे ।
म्हणोनि आला पित्यापुढें । मना ब्रह्मत्व मायिक ॥५८॥
ब्रह्म तर अविनाश आणि उघडे आहे. श्रुतींचे (वेदांचे) चौघडे हेच वाजवून सांगत आहेत. असा विचार करून भृगू परत पित्यापुढे आला आणि म्हणाला, 'मनाच्या ठिकाणी ब्रह्मपण मायिक म्हणजे खोटे आहे. ' (५८)

संतोषोनि वरुण म्हणे । भला विचारी पावसी खुणें ।
आतां मना पूर्णत्व होय जेणें । अन्य आत्मा विज्ञानमय ॥५९॥
यावर वरुणाला संतोष झाला व तो म्हणाला, "शाबास! विचाराच्या साहाय्याने तू बरोबर इप्सित ठिकाणी पोचू शकतोस. आता या मनाला ज्यायोगाने पूर्णत्व येते असा दुसरा एक आत्मा तुला सांगतो. हा आत्मा विज्ञानमय असा आहे. (५९)

सर्व कर्तेपण तेथें असे । तेंचि विचारि मानसें ।
येथें आक्षेपिलें कैसें । तेंचि अवधारा ॥६०॥
सर्व कर्तेपण विज्ञानमयाचेच आहे. त्याचाच मनामध्ये विचार कर. परंतु त्यावर त्याने (भृगुने) जे आक्षेप घेतले. ते कशा प्रकारचे आहेत तेच लक्षपूर्वक ऐका. (६०)

हे दोन्ही मिळोनि अंतःकरण । कोश कल्पना कासया दोन ।
तरि अहंवृत्ति कर्तेपण । आणि मन ते इदंवृत्ति ॥६१॥
मन आणि बुद्धी हे दोन्ही मिळून अंत:करण बनते. मग त्यांच्या दोन वेगवेगळ्या कोशांची कल्पना कशासाठी करता? याचे उत्तर असे की, मीपणाचे स्फुरण बुद्धीने होते आणि अमुक पदार्थ अमुक आहे हे स्फुरण मनाने होते. (इदंवृत्ती मन, अहंवृत्ती बुद्धी (६१)

जरी बुद्धीसी मी मी स्फुरे । तरी मन विषयीं वावरें
ऐसें बाह्य आणि अंतरें । प्रवर्तती दोन्ही ॥६२॥
जेव्हा बुद्धीला मी मी असे स्फुरण होते तेव्हा मन विषयांच्या संदर्भात आपला व्यापार करते. अशा प्रकारे ही दोन्ही इंद्रिये मिळून अनुक्रमे आंतरव्यापार आणि बाह्यव्यापार यांमध्ये मग्न असतात. (६२)

अथवा दोन्हीही अंतरी । केव्हां प्रवर्तती बाहेरी ।
उभयावीण विषयव्यापारीं । सिद्धता नव्हे ॥६३॥
किंवा दोन्हीही मिळून केव्हा अंतापारात निमग्न असतात केव्हा बाह्यव्यापारात निमग्न असतात. मात्र दोहोवाचून विषयांसंबंधीचा व्यापार अशक्य आहे. (६३)

मनासि बुद्धीचा आधार । म्हणोनि दोन कोश साचार ।
असो करिता जाला विचार । भृगु विज्ञानाचा ॥६४॥
मनाला बुद्धीचा आधार असतो. म्हणून दोन्ही कोश असणे योग्य आहे. अशा प्रकारे निर्णय करून भृगने विज्ञानमय कोशाचा विचार केला. (६४)

बुद्धीस्तव जग होतें । बुद्धि असतां जग राहतें ।
बुद्धि जातां लया जातें । तरी कर्तृत्व खरें ॥६५॥
बुद्धीमुळे जग उत्पन्न होते, बुद्धी असेल तर जग राहते, बुद्धी नाहीशी होताच जग लयाला जाते. अशी परिस्थिती असेल तर बुद्धीचे कर्तृत्व खरे मानावे लागेल. (६५)

परि यासी लय होता । म्हणोनि नसे शाश्वतता ।
ब्रह्मत्व नव्हे या करितां । पुन्हां पित्याजवळि ये ॥६६॥
पण या कोशाचाही लय होतो, म्हणजे या कोशाला शाश्वतता नाही म्हणून त्याला ब्रह्मपणही नाही. असा विचार झाल्यावर तो पुन्हा पित्याजवळ आला. (६६)

म्हणे बुद्धि ज्ञानसंपन्न । परि सर्वदा नसे जाण ।
अनुभवी सुखातें कोण । बुद्ध्‌याभावी सुषुप्तीं ॥६७॥
त्याला तो म्हणाला, बुद्धी ज्ञानयुक्त असते. पण ती सर्वकाळ तशी नसते. सुषुप्ती अवस्थेमध्ये बुद्धीचा अभाव असताना झोपेच्या सुखाचा अनुभव कोण घेतो? (६७)

तरी माझें समाधान । होय ऐसें करा कथन ।
वरुण म्हणे सावधान । वास्तव सांगूं आतां ॥६८॥
तेव्हा माझे समाधान होईल असे मला सांगा. तेव्हा वरुण पिता त्याला म्हणाला, 'सावधान होऊन ऐक. तुला खरे ज्ञान सांगतो. ' (६८)

पूर्वी बोलिला अन्नमय । प्राणमयीं त्याचा निरास होय ।
पुढें विचारतां मनोमय । उपसंहार प्राणाचा ॥६९॥
या अगोदर तुला अन्नमय कोश सांगितला. त्या अनमय कोशाचा प्राणमय कोशात निरास होतो. नंतर मनोमय कोशाचा विचार करताच लक्षात येते की, प्राणमय कोशाचा मनोमय कोशात लय होतो. (६९)

बुद्धीसी जेव्हां ओळखिलें । तेव्हांचि मनोमय राहिलें ।
विज्ञान जेथें लया गेलें । तें अवधारी पां ॥७०॥
त्यानंतर विज्ञानमय कोशाची जेव्हा ओळख होते. तेव्हा मनोमय कोशाचा विचार थांबतो. या न्यायाने विज्ञानमय कोश जेथे लयाला जातो ते आता लक्ष देऊन ऐक. (७०)

आनंदमय सुषुप्ती । तेथें बुद्धीची समाप्ती ।
मग निखळ स्वयंज्योती । आनंदरूप आत्मा ॥७१॥
सुषुप्तीची अवस्था आनंदमय असते. त्या अवस्थेत बुद्धीचा अंत झालेला असतो. त्यामुळे केवळ आनंदरूप स्वयंप्रकाश असा आत्माच राहिलेला असतो. (७१)

आनंदापासूनि जालें । आनंदी वर्तू लागलें ।
शेवटी हें लया गेलें । आनंदामाजीं ॥७२॥
आनंदापासूनच हे जग उदयास येते. आनंदातच ते व्यापार करू लागले, शेवटी ते आनंदातच लय पावते. (७२)

आतां विचारीं अंतरीं । नसेचि कल्पना दुसरी ।
मस्तक ठेवून चरणावरी । परतता जाला ॥७३॥
आता यावर तू मनात विचार कर. तेथे दुसरी कोणतीही कल्पना नसते. हे ऐकून भृगूने आपल्या वरुणपित्याच्या चरणांवर मस्तक टेकवले व त्यानंतर तो परत गेला. (७३)

ब्रह्म हेंचि आनंदमय । याचा विचार करिता होय ।
पाहतां श्रुतीचा निश्चय । पांच अवयव ॥७४॥
मग आनंदमय कोश हेच ब्रह्म असा विचार तो करू लागला. याबद्दल श्रुतीचा निश्चय (वेदाचे मत) काय आहे, हे पाहू लागता त्याला त्या कोशाचे ५अवयव सांगितलेले दिसले. (७४)

पक्षापरि वर्णिले । प्रिया शिर कल्पिलें ।
मोदासि नां ठेविलें । दक्षिण पक्ष ॥७५॥
श्रुतीने पक्ष्याचे रूपक करून ह्या ५अवयवांचे वर्णन केले आहे. त्या पक्ष्याचे प्रिय हे शरीर आहे. मोद असे दक्षिण (उजव्या) पंखाचे नाव ठेवले. (७५)

उत्तरपक्ष तो प्रमोद । आत्मा वर्णिला आनंद ।
पांचवें अंग जें शुद्ध । पुच्छत्वें प्रतिष्ठा ॥७६॥
प्रमोद हा त्याच्या उत्तर ( इथे उत्तर-डावा) पंख आहे. आनंद हा त्याचा आत्मा म्हणून सांगितले आहे. त्या पक्ष्याचे पाचवे अंग शुद्ध ब्रह्म असून ते त्याच्या पुच्छाच्या ठिकाणी आहे. ते ब्रह्म हेच त्याची प्रतिष्ठा आहे. (७६)

वर्णिले कार्य कारण । शिरापासून आत्मत्व जाण ।
पुच्छासि कार्य कारण । दोन्ही नसे ॥७७॥
आता शिरपासून ते आत्म्यापर्यंत कार्यकारणभाव सांगितले आहेत. पण पुच्छाला मात्र कार्य आणि कारण हे दोन्हीही नाहीत. (७७)

तेंचि प्रतिष्ठा तेंचि सार । ऐसा मानिला निर्धार ।
या निरूपणाचा उच्चार । पुन्हां केला पाहिजे ॥७८॥
ब्रह्म हेच त्याची प्रतिष्ठा आहे. तेच त्याच्या अस्तित्वाचे सार आहे. असा निश्चय त्याने केला. या निरूपणाचा पुन:पुन्हा उच्चार केला पाहिजे. (७८)

कोश नाम हे कासया । वृत्तिभेदाच्या उपाया ।
वृत्ति निरसतां अपसया । कोशनिवृत्ति ॥७९॥
या अवयवांना कोश असे नाव का दिले आहे? तर हे सर्व वृत्तिभेद आहेत. ते वृत्तिभेद दाखवण्यासाठी त्यांच्या ठिकाणी कोशकल्पना केली आहे. वृत्तीचा निरास झाल्याबरोबर कोशकल्पनेचाही आपोआप निरास होईल. (७९)

भोग्यत्व आलें या कोशीं । म्हणोनि नाम प्रियत्व यासी ।
पाहतां भोक्त्याचे सुखासी । आवडती विषय ॥८०॥
ज्याला ज्याला कोश हे नाव दिले आहे ते ते सर्व भोग्य या सदरात येतात. कोश भोग्य आहेत म्हणून त्यांना प्रियत्वही चिकटते. भोक्त्याच्या सखाच्या दृष्टीने विचार करता त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये विषय येतात. भोक्त्याला सुख देतात म्हणून विषयांनाही प्रियत्व येते. (८०)

भोक्त्यातें जाणतां । उडे विषयममता ।
म्हणोनि भोक्ता आवडता । मोदत्व श्रुति म्हणे ॥८१॥
भोक्त्याचे ज्ञान होताच विषयांबद्दलची ममत्वाची भावना उडून जाते. त्यामुळे भोक्ता आवडू लागतो. याचेच श्रुती मोद म्हणून वर्णन करते. (८१)

विषयभान निःशेष जाय । आत्मलाभें सुखी होय ।
वासनावृत्तिं फुंज न समाय । त्यासी प्रमोद नाम ॥८२॥
विषयाचे भान संपूर्णपणे नाहीसे होते आणि आत्म्याच्या लाभाने मनुष्य सुखी होतो. वासनावृत्तीमध्ये गर्व (अभिमान) मावेनासा होतो. या अवस्थेला प्रमोद असे नाव आहे. (८२)

तेचि वासनावृत्ति मुरे । सुख सुखींच थारे ।
अनुभवें त्रिपुटी उरे । तो आनंद आत्मा ॥८३॥
तीच वासनावृत्ती मुरल्यानंतर (ओसरल्यानंतर) सुख सुखाच्या ठायी स्थिरावते आणि त्या अवस्थेचा अनुभव घेत असल्यामुळे अनुभावक, अनुभाव्य आणि अनुभव अशी त्रिपुटी उरते. त्या अवस्थेला आनंद असे म्हणतात. तो कोशरूपी पक्ष्याचा आत्मा होय. (८३)

ऐसीं कार्यकारणें चारीं । निरोपिलीं अंगें निर्धारी ।
पुच्छत्वें प्रतिष्ठा करी । श्रुति तें ऐका ॥८४॥
अशा प्रकारे या पक्षिशरीराची चार अंगे कार्यकारणाच्या समवेत वर्णन करून सांगितली. आता त्या शरीराच्या पुच्छाच्या रूपाने श्रुती ज्या ब्रह्माची प्रतिष्ठापना करते. ते ऐका. (८४)

आनंद ना निरानंद । अनुभवेवीन स्वानंद ।
अनुभाव्य शुद्ध बुद्ध । निखळ ब्रह्म ॥८५॥
ब्रह्माच्या ठिकाणी आनंद नाही, आनंदाचा अभावही नाही, हा अनुभवविरहित असा तो केवळ स्वानंदच आहे. त्यातील ज्याचा अनुभव येतो ते अनुभाव्य म्हणजे शुद्ध, बुद्ध (ज्ञानस्वरूप) असे निखळ ब्रह्मच होय. (८५)

यारीती पूर्ण समाधान । जाला भृगु ब्रह्मसंपन्न ।
करणें तें येथें संपूर्ण । समाप्त जालें ॥८६॥
अशा रीतीने पूर्ण समाधान होऊन भृगु ज्ञानसंपन्न झाला आणि या ठिकाणी सर्व क्रिया येथे समाप्त झाली. (८६)

निरतिशयानंद या नांव । जेथें नसे सातिशयत्व ।
नित्य ज्ञानियासी उत्साव । ज्याचा लव सर्वानंदी ॥८७॥
या अवस्थेला निरतिशयानंद असे नाव आहे. म्हणजे त्याहून अधिक असे दुसरे सुख नाही. तेथे उणे अधिक काही नाही. हा निरतिशयानंद म्हणजे ज्ञानी लोकांचा उत्सवाचा क्षण होय. सर्वानंद म्हणजे सर्व आनंदमय पाहणे ही अवस्था त्या निरतिशायनंदाचा एक अंशमात्र आहे. (८७)

पृथ्वीवरील जितुके जन । आनंदीच असे वर्तन ।
तयाचाही शतगुण । आनंद चक्रवर्तीसी ॥८८॥
पृथ्वीवरील सर्व लोक आनंदाच्याच अपेक्षेने राहत असतात. (जीवन जगत असतात) त्यांच्या आनंदापेक्षा शंभरपट आनंद चक्रवर्ती राजाला मिळत असतो. (८८)

राजियाहि शतगुणित । मनुष्यगंधर्व आनंदभरित ।
त्याचे शतगुणें वर्तत । आनंद देवगंधर्वा ॥८९॥
राजाच्या आनंदापेक्षा शंभर पटीने जास्त असा मनुष्यगंधर्वांचा आनंद असतो. त्यांच्या शंभर पटीने अधिक देवगंधर्वांचा आनंद असतो. (८९)

देवगंधर्वा शताधिक । आनंदे वर्ते पितृलोक ।
शतानंद होतां एक । अजानदेवाचा ॥९०॥
देवगंधर्वांच्या आनंदापेक्षा पितृलोकीचा आनंद शतपटीने अधिक असतो. पितृलोकीचे शंभर आनंद एकत्र केल्यानंतर अजानदेवांचा एक आनंद होतो. (९०)

अजानदेव शतगुण । देव आनंदती संपूर्ण ।
देवा शतगुणित पूर्ण । इंद्रानंद ॥९१॥
अजानदेवांच्या आनंदाच्या शंभर पटीने अधिक असा देवांचा आनंद असतो. देवांच्या आनंदापेक्षा शंभर पटीने इंद्राचा आनंद अधिक असतो. (९१)

शत आनंद इंद्राचे । सुख असें बृहस्पतीचें ।
शत आनंद तयाचे । ब्रह्मयाचें ठाई ॥९२॥
इंद्राचे शंभर आनंद म्हणजे बृहस्पतीचे सुख होय. त्याचे शंभर आनंद ब्रह्मदेवाच्या एका आनंदाबरोबर होतात. (९२)

एकाहून एक अधिके । सातिशय असतीं सुखें ।
अनंत सुखाचें वास्तव्य एके । श्रोत्रियाच्या ठाई ॥९३॥
अशा त-हेने सुखे एकाहून अधिक दुसरे अशी वरचढ (सातिशय) असतात. अशा अनंत सुखांचे वास्तव्य एका श्रोत्रियाच्या ठिकाणी असते. (९३)

या सुखाची मर्यादा । न वर्णवेचि वेदा ।
पुरे वाणीच्या वेवादा । मनासि अगम्य ॥९४॥
त्या सुखाची मर्यादा वेदालाही सांगता येत नाही. वाणीचे विवाद तेथे थांबतात. ते सुख मनालाही न कळणारे (अगम्य) असते. (९४)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
पंचकोशविवेकप्रकारे । द्वितीयसमासः ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
प्रत्यगात्मानिरूपण


अहो कल्पना उपाधि ऐसी । अब्रह्मत्व आणिलें आत्मयासी ।
निरसावया तयासी । निरूपण ऐका ॥१॥
कल्पना ही एक अशी उपाधी आहे की, तिने आत्म्याला अब्रह्मत्व आणले. तिचे निरसन होण्यासाठी पुढील निरूपण ऐका. (१)

ब्रह्म सच्चिदानंद असे । तें लक्षण आत्मत्वीं कैसें ।
श्रुति युक्ति अनुभवें होतसे । समाधान ॥२॥
ब्रह्म सच्चिदानंदस्वरूप आहे. ते लक्षण आत्म्याला कसे लागू होते? या शंकेचे श्रुती, युक्ती आणि अनुभवाने समाधान आता करण्यात येत आहे. (२)

चित्‌म्हणजे ज्ञानघन । आत्मा असे स्वप्रकाशमान ।
स्वानुभवें जाणावी खूण । ब्रह्मलक्षणाची ॥३॥
चित् म्हणजे ज्ञानाने ओतप्रोत असे अथवा अखंड दाटून असलेले ज्ञान (चिद्घन) . आत्मा स्वयंप्रकाशी आहे. त्याच्या ठिकाणच्या ब्रह्माच्या चिद्घन या लक्षणाची ओळख स्वानुभवाने जाणून घ्यावी. (३)

शब्दज्ञान स्पर्शज्ञान । रूप-रस-गंध-ज्ञान ।
हे विषय मात्र भिन्न भिन्न । परी ज्ञान अभेद ॥४॥
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय भित्र भित्र असले तरी त्यांचे ज्ञान मात्र एकाच प्रकारचे आहे. (४)

शब्दज्ञान जया आलें । तेणें स्पर्शा अनुभविलें ।
रूपरसा ओळखिलें । एकाचि ज्ञानें ॥५॥
ज्याला शब्दज्ञान होते त्यालाच स्पर्शाचेही ज्ञान होते. रूप, रस यांची ओळखही एकाच ज्ञानाने होते. (५)

विषयास्तव ज्ञान एकले । भिन्न भिन्न असें गमलें ।
परि तें ज्ञान विभागलें । नवचे कदां ॥६॥
ज्ञान हे एकाच प्रकारचे असून विषयभेदांमुळे ते भित्र भित्र असे वाटते. पण ज्ञानाची विषयभेदानुरूप विभागणी होऊ शकत नाही. (६)

जळ एकचि मधुर । उपाधीनें तीक्ष्ण क्षार ।
तैसें ज्ञान तें साचार । एकलेंचि असे ॥७॥
पाणी एकच असते. ते मुळात मधर असते. पण उपाधीमळे ते तीक्ष्ण, खारट असे वाटते. त्याप्रमाणे ज्ञान वस्तुतः एकच आहे. (७)

शब्दस्पर्शादि सांडावें । त्यांतील कळणें निवडावें ।
मग पाहतां स्वभावें । एकरूप ज्ञान ॥८॥
शब्द, स्पर्श इत्यादी उपाधिभेदांचा त्याग करून त्यांच्यातील कळण्याचा फक्त स्वीकार करावा म्हणजे ज्ञान स्वभावत: एकरूपच कसे आहे याची ओळख पटते. (८)

जितुके जागृतीचे व्यापार । बहुधा परि पांच प्रकार ।
तितुकेहि ज्ञान अणुमात्र । दुजें नाहीं ॥९॥
जागृतीचे जेवढे म्हणून व्यापार आहेत ते अनंत असले तरी या पाचच प्रकारात त्यांची गणना करता येते. ते पाच प्रकार म्हणजे एकरूप असे ज्ञानच होत. त्यांखेरीज दुसरे काही नाही. (९)

संपूर्ण जागृतीचें ज्ञान । एकचि असे जाण ।
स्वप्नींहि प्रकाशमान । तेंचि ज्ञान असे ॥१०॥
संपूर्ण जागृतीचे ज्ञान एकरूपच आहे हे जाणून घे. मग तेच ज्ञान स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा कसे प्रकाशमान असते (जाणवते) हे समजून घे. (१०)

शब्दस्पर्शादि पंच विषय । स्वप्नीं होतसे प्रत्यय ।
परि ज्ञान एकचि होय । जागृतिपरि ॥११॥
स्वप्नावस्थेमध्येही शब्द, स्पर्श इत्यादीचाच जागृतीप्रमाणे अनुभव येतो. पण जागृतीप्रमाणे ज्ञान तेच असते. (११)

जागरिं विषय अनुभविलें । तेंचि स्वप्नीं प्रतीती आलें ।
तरी दोन कासया कल्पिले । स्वप्न जागृती ॥१२॥
जागृतीच्या अवस्थेमध्ये ज्या विषयांचा अनुभव घेतला त्यांच्याच अनुभव स्वप्रावस्थेमध्येही येतो असे असताना स्वप्र, जागृती असे भेद का बरे केले? (१२)

जागृतीचे विषय होती । बहुकालें तैसेचि दिसती ।
स्वप्नीं दिसून हरपती । तेचि क्षणीं ॥१३॥
जागृतीत जे विषय असतात ते पुष्कळ काळपर्यंत तशाच दिसतात. (त्यांना स्थैर्य आहे. ) स्वप्रातील विषय मात्र दिसतात आणि त्याच क्षणाला हरपून जातात. (त्यांना स्थैर्य नसते. ) . (१३)

कांही स्थिरत्व जागृतीं असे । स्वप्नीं स्थिरत्व न दिसे ।
म्हणोनिया भिन्नत्व असे । उभय अवस्थेसी ॥१४॥
जागृतीत विषयांना थोडेफार स्थैर्य असते. स्वप्रावस्थेत मात्र ते स्थैर्य दिसत नाही. म्हणून या दोन अवस्थांमध्ये भेद आहे. (१४)

अवस्था दिसे वेगळाली । परि ते मुख्य चित्ती असे एकली ।
अवस्था जिणें जाणितली । स्वप्रभ ती ॥१५॥
या दोन्ही अवस्था भिन्न भिन्न दिसल्या तरी दोन्ही अवस्थांमध्ये चितती म्हणजे जाणीव एकच आहे. या दोन्ही अवस्था जाणण्याचे काम ही चितीच करते. ती स्वयंप्रभ आहे. (म्हणजे ती अवस्थांना प्रकाशित करते मात्र तिला कोणी प्रकाशित करत नाही. ) (१५)

त्याचि ज्ञानें सुषुप्तीं । अज्ञानसुखाची अनुभूती ।
जाणिलें नसतां पुढती । आठव जागरिं न घडे ॥१६॥
याच जाणिवेच्या रूपातील ज्ञानाने सुषुप्तीच्या अवस्थेतील अज्ञान आणि सुख यांचा अनुभव घेता येतो. सुषुप्तीत ती काही जाणत नाही, असे म्हणाल तर सुषुप्तीनंतर जागृती आल्यानंतर त्या सुखाची आठवण झाली नसती. म्हणजे सुषुप्तिकाळीही त्या सामान्य चितीच्या (जाणिवेच्या) द्वारे जाणणे असतेच. (१६)

मनेंवीण सुखातें जाणें । आपुलेनि सर्वज्ञपणें ।
नेणतपणासी आठवणें । तेंचि ज्ञान ॥१७॥
सुषुप्तीच्या अवस्थेत हे ज्ञान मनाच्या माध्यमाशिवाय स्वत:च्या सर्वज्ञपणाच्या बळाने सुखाला जाणते. जागृतिकाळी आपल्या अज्ञानाचे स्मरण होणे हेच ज्ञान होय. (१७)

स्वप्न जागृति जया कळली । तेणें सुषुप्ति जाणितली ।
तिहीं अवस्थेची जाली । जाणीव एकरूप ॥१८॥
ज्याला स्वप्न, जागृती या अवस्था कळल्या त्यालाच सुषुप्ती अवस्थेचेही ज्ञान होते. अशा त-हेने जागृती, स्वप्न आणि सुषप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये होणारे ज्ञान एकरूपच असते. (१८)

तैसें कालींचे जाणणें । आजि नव्हे शिळें जुनें ।
जेणें दिवस अनुभवणें । रात्रि जाणें ज्ञान तें ॥१९॥
कालचे ज्ञान क्षज शिळे झाले असा प्रकार नसतो. ज्याने दिवसाचा अनुभव घेता येतो, त्यानेच रात्रीचेही ज्ञान होते. (तिन्ही अवस्थांना जाणणारे हे ज्ञान एकरूपच असते. ४१९)

रविवाराचे ज्ञान गेलें । सोमवारीं नवें जालें ।
ऐसें नवचे कल्पिलें । ज्ञान तें एकचि ॥२०॥
रविवारचे ज्ञान गेले. आता सोमवारचे नवे ज्ञान आले आहे, अशी कल्पना करता येत नाही. सगळे इथून तिथे एकच ज्ञान असते. (२०)

शुक्ल कृष्ण पक्ष दोनी । जाणितलें एके ज्ञानी ।
मास ऋतु अयनीं । एकलें ज्ञान ॥२१॥
शुक्लकृष्ण पक्ष दोन्हीही एकाच ज्ञानाने कळतात. महिना, ऋतू, दक्षिणायन, उत्तरायण हे सर्व जाणणारे ज्ञान एकच असते. (२१)

संवत्सर कपिलाषष्ठी । युग महायुगाची गोष्टी ।
कल्प महाकल्प शेवटीं । एका ज्ञानें जाणितलें ॥२२॥
संवत्सर कोणते आहे, कपिलाषष्ठी योग केव्हा आहे, कोणते युग चालू आहे, कोणते महायुग चालू आहे; कल्पान्त, महाकल्पान्त म्हणजे काय हे सर्व एकाच ज्ञानाने जाणले जाते. (२२)

एक पिंडीं जे जाणीव । दुजे देहीं उमटे अपूर्व ।
अनंत देहाचा समुदाव । ज्ञानचि जाणें ॥२३॥
एका पिंडात (शरीरात) जी जाणीव असते तीच अपूर्व जाणीव दुसऱ्या देहातसुद्धा उमटते. विश्वातील अनंत देहांचा समुदाय या सर्वांना एकच ज्ञान जाणते. (२३)

देहावीण संधीसी । सुषुप्तिपरी अनुभवे तिसी ।
म्हणोनि नाश ज्ञानासी । बोलोंचि नये ॥२४॥
एका पिंडाची (देहाची) जाणीव तीच दुसऱ्या देहाच्या ठिकाणीही प्रगट होते. अनंत देहांच्या समुदायांना ज्ञानच जाणते. देह नसल्या अवस्थेचा म्हणजे संधीचा सुषुप्तीच्या अवस्थेप्रमाणे अनुभव ज्ञानच घेते. यामुळे ज्ञानाला नाश म्हणता येत नाही. (२४)

तिहीं कालीं ज्ञान असतें । याहून सत्‌ते कोणते ।
सच्चित्‌उभय लक्षणातें । आत्मत्वीं साधिलें ॥२५॥
ज्याअर्थी ज्ञान तिन्ही काळी असते त्याअर्थी दुसरे कोणते सत्तत्त्व असेल? तेव्हा सत्, चित् ही दोन्ही लक्षणे आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध झाली. (२५)

आतां तिसरा आनंद । आत्मा परमप्रेमास्पद ।
ऐसा श्रुतीचा संवाद । बहुधा असे ॥२६॥
आता तिसरे लक्षण आनंद हे होय. आत्मा हे उत्कृष्ट आनंदाचे स्थान आहे असे बहुतेक सर्व श्रुतींचे सांगणे आहे. (२६)

आत्मा आनम्दरूप असे । सर्व जनां न कळे कैसें ।
जाणतांहि विषयस्पृहा दिसे । ज्ञातयासी ॥२७॥
आत्मा आनंदरूप आहे, हे सर्व लोकांना कसे बरे कळत नसेल? कारण ज्ञानी माणूस सर्व जाणत असूनही त्याच्या ठिकाणी विषयाची आवड दिसून येते. (२७)

जरी प्रियतम असता । सर्व लोकीं प्रकटता ।
विषई न प्रवर्ते ज्ञाता । तरी प्रिय कैसा ॥२८॥
आत्मा जर प्रियतम असता तर सर्व लोकांना ते कळले असते ना आणि ज्ञाता मनुष्य विषयांकडे वळलाचनसता, तर मग आत्मा प्रिय कसा म्हणावा? (२८)

ऐसा आक्षेपु जाला । संशयो पाहिजे फेडिला ।
प्रियत्व न वाटे जनाला । समुदायास्तव ॥२९॥
असा आक्षेप आला असता संशयनिरसन केलेच पाहिजे. समुदायामुळे लोकांना आत्मा प्रिय आहे असे जाणवत नाही. (२९)

आपण असे प्रियतर । स्पष्ट न कळे विचार ।
समुदाय मिळाला फार । अहंममतेचा ॥३०॥
आत्मा प्रियतर आहे. पण लोकांना हा विचार स्पष्टपणे कळत नाही. कारण मीपणा, माझेपणा यांच्या प्रबळ समुदायामुळे आत्म्याचे प्रियतरत्व त्यांना कळत नाही. (३०)

आत्मत्व जेणें जाणितलें । त्यासि विषयसुख नाथिलें ।
विषयभोगी ऐसें वाटलें । प्रारब्धास्तव ॥३१॥
ज्याला आत्मतत्त्व खरे कळले आहे, त्याच्या दृष्टीने विषयसुख नाहीसे होते. परंतु तरीसुद्धा तो मनुष्य विषय भोगते असे वाटते. ते त्याचे विषय भोगणे प्रारब्धामुळे होत असते. (३१)

हें निरूपण पुढें असे । प्रस्तुत येथें काज नसे ।
आत्मा प्रेमरूप अपैसे । आदिअंतीं ॥३२॥
याचे निरूपण पुढे करायचेच आहे. सध्या तो विषय प्रस्तुत नाही. आत्मा सहजपणेच जन्मापासून ते अंतकाळपर्यंत नेहमी प्रेमरूपच असतो. (३२)

आणीक एक उपपत्ति । कळणें न कळणें वृत्ति ।
वृत्तिवीण स्वयंज्योति । आनंदरूप आत्मा ॥३३॥
आणखी एक उपपत्ती सांगता येईल. कळणे न कळणे हा वृत्तीचा भाग आहे. पण आत्मा हा स्वयंप्रकाशी असून निखळ आनंदरूप असतो. तो फक्त वृत्तीरहित अवस्थेतच कळू शकतो. (३३)

विषयाकार वृत्ति जाली । सुखरूप आत्मयातें विसरली ।
अज्ञानजनीं पैसावली । अहं ममता ॥३४॥
वृत्ती जेव्हा विषयाकार होते तेव्हा निखळ सुखाच्या रूपात असलेल्या आत्म्याचे तिला विस्मरण होते. अज्ञानी लोकांमध्ये मीपणा आणि माझेपणा या वृत्तीचा प्रसारझालेला असतो. (३४)

यासि अज्ञान मूळ । ज्ञानें होय जरा निर्मूळ ।
तरि वृत्तीसी निवळ । आनंद प्रगटे ॥३५॥
याला अज्ञान हे मूळ कारण आहे. ज्ञानाने जर ते अज्ञान समूळ नष्ट झाले तर वृत्तीमध्ये निखळ आनंद प्रगट होईल. (३५)

जया वृत्तीसी अज्ञान । तया वृत्तीसी होय ज्ञान ।
दोवृत्तीसी अधिष्ठान । एक आत्मा ॥३६॥
ज्या अंत:करणवृत्तीला अज्ञान झाले होते त्याच वृत्तीला ज्ञानही होते. या दोन्ही अज्ञानरूप आणि ज्ञानरूप वृत्तींचे आत्मा हेच एक अधिष्ठान असते. (३६)

आत्मा आनंदरूप न होता । तरी जगासी नसे सुखाची वार्ता ।
आणि ज्ञात्यासी अनुभव केउता । आनंदाभावीं ॥३७॥
आत्मा जर आनंदरूप नसता तर जगाला सुखाची कल्पनाही आली नसती आणि आनंदाच्या अभावी ज्ञात्याला अनुभव तरी कसा आला असता? (३७)

ऐसें उभयपक्षीं दूषण । बोलों नये आनंदहीन ।
आत्मा नित्यानंद पूर्ण । सदोदित ॥३८॥
अशा त-हेने दोन्ही बाजूंनी दोष येत असल्याने आत्मा आनंदहीन आहे, असे म्हण नये. तो सदोदित आनंदपूर्ण आहे. (३८)

एवं सच्चिदानंद परिपूर्ण । आत्मा असे सघन ।
तिही प्रतीति प्रमाण । आत्मा ब्रह्म ॥३९॥
अशा प्रकारे आत्मा सच्चिदानंद आणि परिपूर्ण ओतप्रोत आहे. (दाट भरून राहिला आहे) तेव्हा श्रुती, युक्ती, अनुभव या तिही प्रमाणांनी आत्मा ब्रह्म आहे हे ठरते. (ब्रह्माची सच्चिदानंद, परिपूर्ण, सघन ही लक्षणे आत्म्याच्याही ठिकाणी आढळतात. ) (३९)

स्त्रीपुत्रही प्रिय वाटले । परि प्रियतम नवचे बोलिले ।
तेथे व्यभिचार दिसून आले । तेव्हां प्रियत्वही माइक ॥४०॥
आता स्त्री, पुत्र हे प्रिय वाटले तरी त्यांना प्रियतम असे म्हणता येत नाही. त्यांच्या ठिकाणी प्रियत्वाचे पूर्व लक्षण नष्ट होऊन त्याविरुद्ध द्वेष्यत्वही येण्याचा संभव असतो. म्हणजे प्रियत्व या लक्षणाशी व्यभिचार दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या संबंधातले प्रियत्वही खोटे असते. (४०)

जेथें व्यभिचार दिसे । तें माईक जाणावें ऐसें ।
व्यभिचार जेथें नसे । तेंचि मुख्य ॥४१॥
जेथे जेथे अशा प्रकारचा व्यभिचार दिसून येतो ते ते मायिक म्हणजे खोटे आहे असे ओळखावे. जेथे व्यभिचार होत नाही तेच मुख्य प्रियत्व जाणावे. (४१)

हेंचि दृढ करावें । म्हणून आत्मत्व तीन नांवे ।
गौणात्मा मिथ्यात्मा स्वभावें । मुख्यात्मा तिजा ॥४२॥
हेच मनाशी पक्के समजावे. म्हणून या संदर्भात आत्म्याचे तीन प्रकार संभवतात आणि त्यानुसार त्याला तीन वेगवेगळी नावे देता येतील. गौणात्मा, मिथ्यात्मा आणि तिसरा मिथ्यात्मा अशी ती तीन नावे होत. (४२)

स्त्रीपुत्रादि हे गौण । मिथ्यात्मा देहादि जाण ।
मुख्यात्मा चिद्‌घन । प्रत्यगात्मा साक्षी ॥४३॥
स्त्री पुत्र इत्यादींना गौणात्मा म्हणावे. देह इत्यादींना मिथ्यात्मा म्हणावे आणि प्रत्यगात्मा, चिद्घनस्वरूप साक्षिरूप हा मुख्यात्मा होय. (४३)

पुत्र गौणात्मा कैसा । विभागी असे पितृशेषा ।
पशुधन कर्मा अशेषा । पुत्र अधिकारी ॥४४॥
स्त्री पुत्र हे गौणात्मा कसे? कारण पुत्र हा वडिलांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी असतो. पशू, धन, सगळी कर्तव्यकमें यांचा पुत्र हाच उत्तराधिकारी असतो. (४४)

बैसतां पुण्याहवाचनीं । तेथें अधिकारी असे पत्नी ।
सुखदुःखभोगालागुनी । अधिकारी मिथ्यात्मा ॥४५॥
पुण्याहवाचनासाठी अधिकारी पत्नीच असते. म्हणून स्त्री पुत्र यांना गौणात्मा ठरवले आहे. सुखदुःख इत्यादी भोग घेणाऱ्या देहादिकांना (सुखदु:खांच्या भोगासाठी देहादी अधिकारी आहेत म्हणून त्यांना) मिथ्यात्मा असे म्हटले आहे. (४५)

आपणा स्वर्गी सुख व्हावें । पुत्रें कर्म संपादावें ।
या हेतु आत्मत्व संभवें । पुत्ररूपें आपण ॥४६॥
आपल्याला स्वर्गात सुख व्हावे यासाठी पुत्राने कमें करायची असतात. यासाठी पुत्रामध्ये आत्मत्व संभवते. आपणच पुत्ररूपाने असतो. (४६)

आपण यज्ञादिक केलें । वय जराग्रस्त जालें ।
म्हणोनि पुत्रासी ठेविलें । प्रतिनिधि करूनी ॥४७॥
आपण यज्ञादी कमें केली आता वार्धक्य आहे, त्यामुळे ती कमें करण्यासाठी पुत्रास आपले प्रतिनिधी करता येते. (४७)

शरीरासी रोग जाले । स्त्रीपुत्रां औषध दिधलें ।
तेणें रोगा निवर्तन जालें । हें तो घडेना ॥४८॥
पण शरीराला रोग निर्माण झाला, म्हणून स्त्री पुत्र यांना औषध पाजले आहे आणि त्यामुळे रोगाचे निर्मुलन झाले असे कधी घडत नाही. (४८)

सर्व कर्मासि अधिकार । स्त्रीपुत्र नसती साचार ।
म्हणोनि गौणात्मा निर्धार । स्त्रीपुत्र निश्चयें ॥४९॥
तेव्हा सर्वच कमान स्त्रीपुत्र अधिकारी नसतात. म्हणून स्त्रीपुत्र ह्यांना गौणात्मा म्हणावे. (४९)

तैसाचि देह नासतो । सुखदुःख जीवात्मा भोगितो ।
देह मिथ्या या हेतो । मुख्यत्व नसे ॥५०॥
त्याचप्रमाणे देह नासतो आणि त्यातून निर्माण सुखदुःखे जीवात्मा भोगतो. यामुळे देहाला मिथ्या म्हणावे त्याला मुख्य म्हणता येणार नाही. (५०)

जाले गौणादि प्रकार तीन । परि व्यभिचार कैसा प्रियत्वालागुन ।
म्हणसी तरी सावधान । निवेदिजे तीतें ॥५१॥
गौणात्मा, मिथ्यात्मा आणि मुख्यात्मा हे आत्म्याचे तीन प्रकार पाहिले. परंतु प्रियत्वाच्या बाबतीत व्यभिचार होतो म्हणजे काय? असे म्हणशील तर त्याचेही विवरण केले जाईल. सावधान होऊन ऐक. (५१)

ईशसृष्ट जालें निर्माण । तयाचेहि प्रकार तीन ।
प्रिय द्वेष्य उपेक्षण । चौथें नाहीं ॥५२॥
परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीला ईशसृष्ट म्हणतात. त्याचेही तीन प्रकार होतात. प्रिय, द्वेष्य आणि उपेक्ष्य असे ते तीन प्रकार होत. यांखेरीज चौथा प्रकार नाही. (५२)

स्त्रीपुत्र प्रिय असतीं । व्याघ्र सर्प द्वेष्य होतीं ।
तृण पाषाण उपेक्षिती । सहजची स्वभावें ॥५३॥
स्त्री पुत्र इत्यादी हे प्रिय होत. व्याघ्र, सर्प हे द्वेष्य होत आणि स्वाभाविकपणेच गवत पाषाण हे उपेक्ष्य होत. (५३)

उपेक्षा तृणपाषाणीं । तेथें व्यभिचार असती दोनी ।
गृहकार्या पाहिजे म्हणोनि । प्रियत्व वाटे ॥५४॥
तृण, पाषाण यांना आपण उपेक्ष्य मानतो. पण त्यांच्याही बाबतीत प्रियत्व आणि द्वेष्यत्व असे दोन प्रकारचे व्यभिचार संभवतात. गृहकार्याला ते उपयोगी पडतात, म्हणून ते पाहिजे असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रियत्व वाटते. (५४)

घर अंगावरी पडतां । मार्गीं ठेंचा लागतां ।
उपेक्ष्य परि तत्त्वतां । द्वेष्यहि होय ॥५५॥
घर अंगावर पडले म्हणजे अथवा रस्त्याने जात असता ठेच लागल्यावर मुळात उपेक्ष्य असलेले हे प्रकार द्वेष्य ठरतात. (५५)

व्याघ्रादि द्वेष्य स्वभावें । तेथेंहि व्यभिचार संभवे ।
क्रीडेस्तव व्याघ्रादि पाळावें । लालितां प्रियत्व ॥५६॥
व्याघ्र इत्यादी स्वभावत: द्वेष्य होत. पण त्यांच्याही बाबतीत व्यभिचार संभवतो. क्रीडा करण्यासाठी म्हणून व्याघ्रादी पाळले जातात. त्यांचे लाड करताना त्यांच्याबद्दल प्रियत्व वाटू लागते. (५६)

मार्गीं जातां कोणे काळीं । न देखतां ते उपेक्षिली ।
द्वेष्य परि तेहि जालीं । व्यभिचाररूप ॥५७॥
कधीतरी रस्त्याने जात असता वाघ सादी समोर आले असताना आपण त्यांना न पाहिल्यामुळे त्यांची उपेक्षा केल्यासारखे होते. ते द्वेष्य असतानाही उपेक्षा ठरले, असा त्यांच्या बाबतीत व्यभिचार घडतो. (५७)

तैसेंचि स्त्रीपुत्र आवडते । निजस्वभावा अनुकूल जे ते ।
सर्व कार्या तत्पर असतें । तेंचि होती प्रिय ऐसें ॥५८॥
त्याचप्रमाणे स्त्री, पत्र हे आवडते असतात. पण ते केव्हा? आपल्या स्वभावाला ते जेव्हा अनुकूल असतात, आपली सर्व कामे करण्यामध्ये ते तत्पर असतात. तेव्हाच ते आपल्याला प्रिय असतात. (५८)

स्त्री जार पुत्र कुकर्मी । न शिके नायके अधर्मी ।
तरी द्वेष्य हे अनुक्रमीं । पित्यासी होय ॥५९॥
पण स्त्री जारिणी आहे. पत्र वाईट कमें करत आहे. तो काही केल्या शिकत नाही, आपले ऐकत नाही, धर्माविरुद्ध वागतो अशा परिस्थितीत स्त्रीपुत्र ही उभयता आपोआप मनुष्याला द्वेष्य वाटू लागतात. (५९)

बहुत नायके सांगता । तया उपेक्षी पिता ।
म्हणोनि व्यभिचार तत्त्वतां । प्रियत्वासि असे ॥६०॥
आता पुत्राला खप सांगन पाहिले. तरी तो काही ऐकत नाही असे असेल तेव्हा पिता त्याची उपेक्षा करतो. म्हणजे स्त्रीपुत्रांच्या बाबतीत प्रियत्व या गुणाच्या संदर्भात व्यभिचार आढळतो. (६०)

म्हणोनि जेथें व्यभिचार । ते प्रिय न होती साचार ।
मग प्रियतमाचा विचार । केविं बोलावा ॥६१॥
म्हणून जेथे व्यभिचार आढळतो ते वास्तविक पाहता प्रिय नव्हतेच. मग प्रियतम (सर्वात अधिक प्रिय) कोठून असणार? तो विचारच बोलता येणार नाही. (६१)

येथें आक्षेपिलें थोर । कीं आत्मत्वीं असे व्यभिचार ।
न कळतां आत्मा साचार । जनीं उपेक्षिजे ॥६२॥
येथे एक मोठा आक्षेप येऊ शकतो असा व्यभिचार आत्म्याच्या संदर्भातही होऊ शकतो. आत्मा म्हणजे काय ते कळतच नसेल तर लोक स्वाभाविकपणेच त्याची उपेक्षा करणार. (६२)

क्रोधें प्राणा करितां हनन । तरि आपुला शत्रु आपण ।
यापरता द्वेष्य कोण । दुजा असे ॥६३॥
क्रोधाच्या भरात एखाद्याने स्वत:चा प्राण दिला म्हणजे आत्महत्या केली म्हणजे आपणच आपला शत्रू झाला. साहजिकच तो मनुष्य स्वत:लाच द्वेष्य झाला. त्याला दुसरे कोण द्वेष्य असणार? (६३)

ऐसा दिसतो व्यभिचार । आत्मा कैसा प्रियतर ।
याविशीचें उत्तर । दिधलें पहिजे ॥६४॥
असा व्यभिचार आत्म्याच्या बाबतीत दिसून येतो. तेव्हा आत्मा प्रियतर कसा? (प्रिय < प्रियतर< प्रियतम असा विशेषणांच्या बाबतीत तरतमभाव असतो. या शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. (६४)

आत्मा नेणतां नाहीं कळलें । म्हणुन आपणासी उपेक्षिलें ।
तरि सुखी असावें वाटलें । तेंचि कोणा ॥६५॥
आत्मा म्हणजे काय हे नेणतेपणाने कळले नाही, म्हणून आत्म्याची उपेक्षा होते, असे म्हणता, पण ते खरे नाही तर मग आपण सुखी असावे असे कोणाला वाटत असते? (६५)

उपेक्षा करी आपली ऐसा । न देखोंचि कोणी सहसा ।
पशुपक्षादिकीं मानसा । आपुली प्रीति ॥६६॥
आपली आपणच उपेक्षा करील असा मनुष्य सहसा पहायला मिळत नाही. पशु, पक्षी यांना सुद्धा मनामध्ये आपल्या स्वत:बद्दल प्रेमच असते. (६६)

आपुला द्वेष करिती । मिथ्यात्वावरी कोपती ।
नाना व्यवहारीं दुःख पावती । म्हणोनियां ॥६७॥
आता आपला आपण द्वेष करतो, खोट्याचा राग येतो म्हणून नाना प्रकारच्या व्यवहारात दु:ख होते. (६७)

हें प्रीतीचें तारतम्य होतें । एक आवडे एका द्वेषितें ।
तेंचि ऐका समस्तें । प्रिय द्वेष्य कैसें ॥६८॥
या ठिकाणी प्रीतीचा तरतमभाव होतो. एकाबद्दल प्रेम वाटते, एकाबद्दल द्वेष वाटतो. आता सर्व पदार्थांचे प्रियत्व अथवा द्वेष्यत्व कसे ठरते ते ऐका. (६८)

जोवरी देह सुखी असे । तोंवरी स्त्रीपुत्र प्रिय दिसे ।
अग्नीत जळतां अपैसें । स्त्रीपुत्र टाकून पळे ॥६९॥
जोपर्यंत देहाला सुख मिळते तोपर्यंत स्त्रीपुत्र प्रिय आहेत असे दिसते. परंतु ते मरण पावले, त्यांचे अग्नीत दहन झाले म्हणजे त्या स्त्रीपुत्रांना टाकून मनुष्य पळ काढतोच ना! (६९)

आपुला डोळा चालिला । वैद्याकरी पाय तोडविला ।
परि डोळा संरक्षिला । प्रियत्वामुळें ॥७०॥
आपला एखादा डोळा जाणार आहे, पाय कापला तर डोळा वाचेल, असे जेव्हा वैद्य सांगतो तेव्हा डोळ्यांसाठी पाय कापून टाकायला तयार होतो आणि वैद्याकडून पाय कापून घेतो याचा अर्थ डोळा प्रिय असल्यामुळे आपण तो वाचवला. (७०)

अन्यायें राजा शिरच्छेद करी । म्हणे मज वांचवा निर्धारीं ।
कर्ण नासिक छेदिलें जरी । प्राण राहतां सुखी होय ॥७१॥
अन्यायाने राजाने शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. त्यावेळी तो मनुष्य म्हणतो, 'मला वाचवा' तेव्हा राजा त्याचे कान, नाक कापून त्याला सोडून देतो. तेव्हा कान, नाक कापन टाकले तरी आपले प्राण त्याने वाचवले, त्यामुळे तो सुखी झाला. (७१)

कांही निंद्य कर्म केलें । तेणें लोक निंदू लागले ।
अपकीर्तीसी मन विटलें । प्राण दिधलें कितेकीं ॥७२॥
एखादे निंद्य कर्म हातून घडले. त्यामुळे लोक निंदा करू लागले अशा अपकीतीला मन विटून जाते. मग कित्येक लोक प्राणत्याग करतात. (७२)

आपुला प्राण जरी देती । परि निज सुखातें इच्छिती ।
द्वेष्य उपेक्ष्य दिसती । अहाच बुद्धि ॥७३॥
तेथे आपला प्राण देऊनसुद्धा लोक काय मिळवतात? तर स्वत:चे सुखच जपतात. आपल्याला व्यवहारात जे द्वेष्य वाटते, उपेक्ष्य वाटते ते बुद्धीच ठरवत असते. ती बुद्धीच खोटी (अहाच) असते. (७३)

सर्वांहून मन प्रिय । समाधिकालीं द्वेष्य होय ।
मिथ्यात्व दृष्टीं उपेक्षतां ये । ज्ञानोत्तर काळीं ॥७४॥
मन सर्वांहून प्रिय असते. पण समाधीचा अनुभव घेताना तेच द्वेष्य वाटू लागते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर काळी सर्वच मिथ्या वाटू लागते. त्यावेळी भोवतालच्या सर्वच गोष्टींविषयी उपेक्षा वाटू लागते. (७४)

सर्वत्रिं असे व्यभिचार । आत्मा प्रिय साचार ।
येर प्रियता अविचार । हें सत्य जाणावें ॥७५॥
तेव्हा या सर्वांच्या बाबतीत प्रियत्वाच्या दृष्टीने व्यभिचार आढळतो. खरा प्रियतम आत्मा हाच आहे. इतर वस्तूंना प्रियत्व देणे हा अविचार आहे, हे खरे सत्य समजून घ्यावे. (७५)

हें ऐकून वादि म्हणे । पुत्रादि प्रिय कोटिगुणे ।
ऐसी श्रुतीचीही वचनें । निर्धार असे ॥७६॥
हे ऐकल्यावर वादी (आक्षेपक) म्हणतो की, 'पुत्रादी, कोटिएणांनी (कोटि पटीनी) प्रिय आहेत' अशा अर्थाची वेदाची वचने आहेत. त्यांचा (वेदांचा) तसा निर्णय आहे. (७६)

मग बोले सिध्दान्ती । तुज पुत्रादि प्रिय वाटती ।
परिणामीं तुजला रडविती । हें सत्य जाणावें ॥७७॥
मग सिद्धान्ती (मूळ सिद्धान्त मांडणारा) म्हणतो, "तुला पुत्रादी प्रिय वाटतात. पण शेवटी ते तुला रडवतील, हे खरे समजून घे. " (७७)

एक वचना बोलिलें । तें दोरीतीं विभागलें ।
शिष्याप्रति उपदेशिलें । आणि शापिलें वादिया ॥७८।
श्रुतीने असे एकच वाक्य म्हटले तरी त्याचे अर्थ दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एका अर्थाने शिष्याला उपदेश केला आहे तर दुसऱ्या अर्थाने आक्षेपकाला शाप दिला आहे. (७८)

वादियासी शाप कैसा । तुज पुत्रचि प्रिय ऐसा ।
आत्मा न कळे सहसा । तरी अंध तम न सोडी ॥७९॥
वाद्याला शाप कसा तर श्रुतीचा अभिप्राय असा की, तुला पुत्रच प्रिय वाटणार. कारण तुला आत्मा कळतच नाही. त्यामुळे परिणामी 'अंधतम' नावाचा नरक तुझ्या नशिबातून सुटणार नाही. (अज्ञानामुळे तू अंधतम नरकाला जाशील ७९)

तेंचि वचन शिष्याप्रति । प्रिय पुत्रादि वाटती ।
परिणामीं दुःख देती । म्हणोनि प्रीति सांडावी ॥८०॥
तेच वचन शिष्याला असे सांगते की, "तुला पुत्रादी प्रिय वाटतील पण परिणामी ते तुला दु:खच देतील. म्हणून तू त्यांच्यावरील प्रीतीचा त्याग कर. " (८०)

आत्मत्वीं उपजे प्रीति । सर्वविषईं विरक्ति ।
आत्मलाभें सायोज्यमुक्ति । तत्काळ होय ॥८१॥
"आत्म्याच्या ठिकाणी प्रीती उत्पन्न झाली तर सर्व विषयांबद्दल विरक्ती निर्माण होईल आणि आत्मलाभाने तत्काळ सायुज्यमुक्तीची प्राप्ती होईल. " (८१)

आत्मरूप जाणितलें । तया जाणणें नाहीं उरलें ।
आत्मलाभे संतुष्ट जाले । दुसरा लाभ अन्य नसे ॥८२॥
ज्याने आत्मरूप जाणून घेतले त्याला दुसरे काही जाणण्याजोगे उरतच नाही. जे आत्मलाभाने संतुष्ट होतात, त्यांना त्याहून श्रेष्ठ असा दुसरा लाभ राहातच नाही. (८२)

आत्मत्वाचा लाभ जाला । हा प्रत्यय कोठे आला ।
म्हणसी तरी अवलोकिला । समाधिकाळीं ॥८३॥
आत्मलाभ झाला आहे असा अनुभव केव्हा येतो? असे विचारशील तर हा अनुभव समाधिकाळी प्रत्ययाला येतो. (८३)

सर्व दृश्यातें सांडिले । मिथ्या भास ओलांडिलें ।
मग ज्ञप्तिरूप उरलें । आत्मस्वरूप ॥८४॥
सर्व दृश्याचा त्याग केला, मिथ्या भासाला ओलांडले, की मग केवळ ज्ञानस्वरूप असे आत्मरूपच उरते. (८४)

तेथें जें सुख जालें । वाणीनें नवचे बोलिलें ।
तें मौनेंची अनुभविले । अंतःकरणें ॥८५॥
आत्मस्वरूपाची ओळख पटताच जे सुख होते, ते भाषेने सांगता येणार नाही. ते अंत:करणाने मौनाच्या भाषेनेच अनुभवता येते. (८५)

येथें असे हो आक्षेप । अनुभविलें जें स्वरूप ।
तें सविकल्प निर्विकल्प । अंगिकारावें ॥८६॥
येथे आक्षेपक म्हणतो, 'माझा येथे आक्षेप आहे. ज्या स्वरूपाचा आपण अनुभव घेतो तो सविकल्प किंवा निर्विकल्प त्या दोहोंपैकीच एक काहीतरी असेल, हे तरी तुम्ही मान्य कराल. (८६)

सविकल्प जरी अनुभविलें । तरी काय सार्थक जालें ।
निर्विकल्प तें अनुभविलें । नवचे कदा ॥८७॥
त्यापैकी सविकल्पाचा जर अनुभव घेतला तर त्याचा काही फायदा नाही आणि निर्विकल्पाचा अनुभव तर कधीच घेता येत नाही? (८७)

ऐसा आक्षेपु जैं जाला । तो प्रश्नचि त्या अडवा केला ।
हा प्रश्न पाहिजे खंडिला । असदुत्तर म्हणोनियां ॥८८॥
असा आक्षेप समोर येताच सिद्धान्ती पक्षाने त्या आक्षेपाला प्रतिप्रश्न केला. कारण आक्षेपकाचा प्रश्न असत्य म्हणून त्याचे खंडन करणे आवश्यक होते. (८८)

सिद्धांती पुसे वादियासि । तुवां कल्पना केली ऐसी ।
ते सविकल्पासी कीं निर्विकल्पासी । जाली हे सांग ॥८९॥
सिद्धान्त्याने वाद्याला (आक्षेपकाला) विचारले, "तू जी कल्पना केलीस ती सविकल्पाला झाली होती की, निर्विकल्पाला झाली होती? हे सांग. " (८९)

निर्विकल्प कल्पना जाली । तरि व्याघात होय येणें बोली ।
म्हणसी सविकल्पा वाटली । तरि दोष अवधारीं ॥९०॥
तू म्हणशील की, 'ती कल्पना निर्विकल्पाच्या ठिकाणी निर्माण झाली' तर ते व्याघात ठरेल (वाणीची हानी ठरेल. कारण निर्विकल्प कधीही विकारत नाही. त्याच्या ठिकाणी कल्पना झाली हे म्हणणे व्यर्थ ठरेल. ) आता ती कल्पना सविकल्पाला झाली असे म्हणशील तरी त्या पक्षीही दोष आहेच. (९०)

सविकल्पाचा विकल्प जाला । हा चक्रिकापत्ती दोष आला ।
सविकल्पची विकल्पिला । तरी अनवस्था होय ॥९१॥
सविकल्पाला विकल्प झाला असे म्हणशील तर चक्रिकापत्तीचा दोष येईल. (याचा तो आणि त्याचा हा असे बोलणे. तू अगोदरच सविकल्पाची कल्पना केल्याने काही लाभ नाही असे म्हटले आहेस आणि आता तीच कल्पना पुढे मांडतो आहेस? ) आणि सविकल्पाने विकल्पाचे रूप घेतले असे म्हणशील तर 'अनवस्था' दोष येतो. (मुळातच संकल्पाचाच विकल्प झाला असे म्हणणे म्हणजे अनवस्था म्हणजे बिनबुडाचे बोलणे ठरते. ) (९१)

ऐसे दोषयुक्त बोलणें । असदुत्तराचीं लक्षणें ।
वादी घाबरून म्हणे । सदुत्तर कोणतें ॥९२॥
तेव्हा तुझे बोलणे दोषयुक्त आहे. ते उत्तर कुतर्कपूर्ण आहे. ' यावरून वादी घाबरून विचारतो की, 'मग योग्य उत्तर कोणते? ' (९२)

तरी अवधारीं मानसें । जलतरंगा भेद नसे ।
सविकल्प निर्विकल्प तैसें । ओळखावें ॥९३॥
सिद्धान्ती सांगतो, 'तर लक्ष देऊन ऐक. पाणी आणि त्यावरील तरंग यात काही भेद नाही. सविकल्प-निर्विकल्प हा भेद त्याप्रमाणेच जाणावा. (९३)

आत्मा नसे सविकल्प । ना नव्हे निर्विकल्प ।
जो जो करी संकल्प । तो तो पडे वेगळा ॥९४॥
आत्मा सविकल्प नाही किंवा निर्विकल्पही नाही. जो संकल्प करतो तो आपोआपच वेगळा पडतो. (९४)

जों जों जाणूं जावें । तों तों कांहींचि नेणवे ।
न जाणतां तरी व्हावें । कासाविस ॥९५॥
जो जो जाणावयाचा प्रयत्न करावा तो तो काहीच कळेनासे होते. जाणायचा प्रयत्नच सोडून दिला तर कासावीस व्हायला होते. (९५)

न जाणतां तेंचि आपण । या नांव बोलिजे ज्ञान ।
जाणिलें म्हणतां अज्ञान । सहजची जालें ॥९६॥
जाणण्याचा प्रयत्न न करता आपण तेच होणे याला ज्ञान म्हणतात. मला हे कळले असे म्हणताच सहजच आपल्या पदरी अज्ञान पडते. (९६)

जाणीवनेणिवेंविण । अनुभवें पावावी खूण ।
येथून हा संपूर्ण । समास जाला ॥९७॥
जाणीव नेणीव यांचे भान न ठेवता केवळ अनुभवानेच आत्मत्वाची प्राप्ती करावी. अशा प्रकारे या विचारापाशी हा समास संपूर्ण झाला. (९७)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
प्रत्यगात्मनिरूपणप्रकारे । तृतीयसमासः ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
कूटस्थविवेचन


आतां कूटस्थ चिदाभास । एकचि भासति मनास ।
निरसतां अन्यान्योध्यास । परम पुरुषार्थ साधकां ॥१॥
कूटस्थ आणि चिदाभास हे दोन्ही एकच आहेत असे मनास वाटते. परंतु दोहोंमधील अन्योन्याध्यास (याचे गण त्याला आणि त्याचे गुण याला असा खोटा व्यवहार) जर काढून टाकता आला तर साधकाला श्रेष्ठ परुषार्थाचा लाभ होईल. (१)

निर्विकारत्वें वसे देहीं । प्रत्यगात्मा कूटस्थ तोही ।
आभासे परि सत्य नाहीं । तो चिदाभास ॥२॥
देहामध्ये निर्विकारपणे जो वास्तव्य करतो तोच प्रत्यगात्मा व तोच कूटस्थ होय. ज्याचा नुसता आभास होतो, पण जो सत्य नाही त्यास चिदाभास असे म्हणतात. (२)

मिथ्या परि उपाधिवशें । सता सारिखाची दिसे ।
तोचि षड्‌विध विभागलासें । प्रकार ऐका ॥३॥
तो वास्तविक पाहता मिथ्या आहे, पण उपाधींच्यामुळे तो सतासारखाच दिसतो. तो सहा प्रकारात विभागला गेला आहे. ते प्रकार ऐका. (३)

साक्षित्व जया आलें । ते ईश्वरचैतन्य बोलिलें ।
अविद्याउपाधीनें जालें । जीवचैतन्य ॥४॥
ज्याच्याकडे केवळ साक्षित्व आले आहे त्यास ईशचैतन्य-१ असे म्हटले आहे. जो अविद्या उपाधीने ग्रस्त आहे त्यास जीवचैतन्य-२ म्हणतात. (४)

अंतःकरणीं बिंबतां । आली प्रमाणचैतन्यता ।
जडा चेष्टवी प्रमाता । प्रमातृचैतन्य ॥५॥
अंत:करणात बिंबल्याबरोबर त्यास प्रमाणचैतन्य-३ म्हटले जाते. जडांना हालचाल करायला लावतो त्यास प्रमातृचैतन्य अथवा प्रमाता-४ म्हणतात. (५)

जेणें विषयासी व्यापिलें । प्रमेयचैतन्य बोलिलें ।
प्रमाण प्रमेय दोन्हीं जाले । एकरूप ॥६॥
विषयाला व्यापणारे ते प्रमेयचैतन्य (विषयचैतन्य-५) म्हटले जाते. प्रमाण (अंत:करण) आणि प्रमेय (विषय) जेव्हा एकरूप होतात, (६)

तें फळचैतन्य साहवें । उपाधीस्तव दिसावें ।
आदि अंती सातवें । शुद्धचैतन्य ॥७॥
तेव्हा त्यास फळचैतन्य-६ म्हणतात. अशी ही सहा चिदाभासांची (आभास चैतन्यांची) नावे. ही आभासचैतन्ये वर सांगितलेल्या उपाधींमुळे वेगळी वेगळी जाणवतात. या सर्व सहा प्रकारांच्या चिदाभासांच्या आदी व अंतीही असणारे ते शुद्धचैतन्य होय. वरील सहा आणि हे सातवे अशी ही सात चैतन्ये होत. (७)

देहा आंत बाहेरी । आभासचि प्रवर्ते व्यापारीं ।
भोक्ता भोग्य सामुग्री । त्रिपुटी सहित ॥८॥
देहाच्या आत बाहेर सर्वत्र व्यापारास प्रवृत्त करणारा आभासच होय. भोक्ता, भोग्य, भोग ही त्रिपुटीसहित सामग्री म्हणजे आभासच होय. (८)

जैसें तळें जळें भरलें । त्यासी छिदें करून पाट केले ।
पाणी खळखळा चालिलें । केदाराप्रति ॥९॥
पाण्याने भरलेल्या तळ्याला छिद्र पाडून पाट केले म्हणजे मग ते पाणी शेताकडे खळखळा वाहू लागते. (९)

त्रिकोण चतुष्कोण । वाफे केले भिन्न भिन्न ।
तैसें तैसें जीवन । परिणाम पावले ॥१०॥
शेताचे त्रिकोणी, चौकोनी आकाराचे भिन्न भिन्न वाफे केले तर त्यानुसार त्या पाण्यालाही भिन्न भिन्न आकार प्राप्त होतात. (१०)

तैसे हृदयभुवनीं । प्रमाणचैतन्य पाणी ।
इंद्रियद्वारा निघोनी । विषयावरी जाते ॥११॥
त्याप्रमाणे हदयाच्या भुवनात अंत:करणचैतन्य (प्रमाणचैतन्य) हे पाण्यासारखे असून ते इंद्रियांच्या मार्गानी निघून विषयांपर्यंत जाते. (११)

जैसा जैसा विषय । प्रमाणचैतन्य तैसें होय ।
प्रमाण प्रमेय उभय । फलचैतन्य तें ॥१२॥
जसाजसा विषय असेल तसतसे प्रमाणचैतन्य बदलते प्रमाण आणि प्रमेय यांच्या संयोगातून फलचैतन्य बनते. (१२)

असो ऐसे सप्तविध । भासलें परि द्विविध ।
आभास आणि शुद्ध । तेचिं ओळखावें ॥१३॥
असो. चैतन्य अशा रीतीने सात प्रकारचे भासले तरी त्याचे मुख्यत्वे करून दोनच प्रकार आहेत. आभासचैतन्य अथवा चिदाभास आणि शुद्धचैतन्य असे ते ओळखावेत. (१३)

आकाशींचा सूर्य । तेणें भिंती प्रकाशमय ।
तेवि कूटस्थ देह समुदाय । सामान्य प्रकाशी ॥१४॥
आकाशातील सूर्यामुळे सर्व भिंती प्रकाशमान होतात. त्याप्रमाणे कूटस्थ (प्रत्यगात्मा, देहाला व्यापून असलेला आत्मा) हा देह समुदायाला निर्विकारत्वे (सामान्यत्वे) प्रकाशित करतो. हा सामान्य प्रकाश होय. (१४)

सूर्य दर्पणी प्रतिबिंबिला । प्रकाश सामान्यावरी पडिला ।
वर्तुळत्वें दिसूं लागला । भिंतीवरी विशेष ॥१५॥
सूर्याचे आरशात प्रतिबिंब पडते. त्याचा कवडसा सामान्यत्वाने प्रकाशित झालेल्या भिंतीवर पडतो आणि भिंतीवर तो वर्तुळाकाराने विशेष रूपात दिसू लागतो. हा विशेष प्रकाश होय. (१५)

तैसे बुद्धींत प्रतिबिंबिले । तेणें विषय स्फुरूं लागले ।
विशेषत्वें विभागिलें । अंतर्बाह्य ॥१६॥
त्याप्रमाणे कटस्थाचे बद्धीत प्रतिबिंबि पडते. त्यामुळे निरनिराळ्या विषयांचे विशेष रूपात ज्ञान होऊ लागते. अशा प्रकारे त्या विषयांची अंतर्बाह्य विभागणी होऊ लागते. (म्हणजे ते विषय भिन्न भिन्न रूपात जाणवू लागतात. ) (१६)

दर्पणस्थ जो प्रकाश । आच्छादिलें सामान्यास ।
विशेष भासे चिदाभास । मुख्य प्रकाश आच्छादिला ॥१७॥
दर्पणातील कवडशाने सामान्य प्रकाशाला आच्छादून टाकले जाते, त्याप्रमाणे चिदाभास हा विशेष प्रकाश असून त्यायोगे मुख्य सामान्य प्रकाश आच्छादिला जातो. (१७)

सूर्य नसतां आकाशीं । प्रतिबिंब कैसें प्रकाशी ।
कूटस्थेवीण जीवासी । चेतनत्व नाहीं ॥१८॥
आकाशात सूर्य नसेल तेव्हा त्याच्या प्रतिबिंबाचा कवडसा कसा पडणार व तो विशेष प्रकाश कसा देणार? त्याचप्रमाणे कूटस्थ नसेल तर जीवाच्या ठिकाणी चैतन्य असणार नाही. (१८)

अरिसे जरि काढिले । प्रकाशासहित प्रतिबिंब लोपलें ।
विषयासहित लया गेलें । बुद्धीवीण प्रतिभास ॥१९॥
आरसे काढून टाकले तर त्यांच्या कवडशांच्या प्रकाशासह सूर्याचे प्रतिबिंबही लोप पावते. तसे बुद्धी नसेल तर तिच्या अभावी भास विषयांसह लयाला जातात. (१९)

सूर्यें जितुकें प्रकाशिलें । दर्पण जातांही संचलें ।
बुद्धि नसतां कोंदाटलें । सामान्य ज्ञान ॥२०॥
पण सूर्याने जेवढे म्हणून प्रकाशित केले होते ते सर्व आरसे काढून टाकल्यानंतरही तसेच कायम राहते. त्याप्रमाणे बुद्धी नसतानादेखील सामान्य ज्ञान सर्वत्र भरून राहिलेले असते. (२०)

जो जो विषय स्फुरे । घटपटादि आकारें ।
तेथें चैतन्य आविष्कारे । विशेष सामान्य दोन्ही ॥२१॥
घट, पट इत्यादीच्या रूपाने जो. जो विषय स्फुरतो तेथे तेथे चैतन्याचा विशेष आणि सामान्य या दोन्ही रूपात आविष्कार होतो. (२१)

एकदाचि विषय प्रकाशी । अमुकें न कळे मनासी ।
ओळखावें सामान्यासी । कूटस्थाचे ॥२२॥
विषय एकदाच प्रकाशित झाल्यानंतर मनाला तो अमुक आहे अशी ओळख पटत नाही. त्यावेळी तो कूटस्थाचा सामान्य प्रकाश म्हणून ओळखावा. (२२)

हा घटपट ओळखण । विशेषत्वें होय ज्ञान ।
तें जाणावें लक्षण । आभासाचें ॥२३॥
पण हा घट, हा पट अशी जेव्हा ओळख पटते तेव्हा विशेष रूपाने त्याचे ज्ञान होते. ते ज्ञान म्हणजे चिदाभासाचे लक्षण समजावे. (२३)

ज्ञान होतांचि लया गेलें । पुढें सामान्यचि उरलें ।
अज्ञान ज्ञाना व्यापलें । मुख्य चैतन्य ॥२४॥
हे विशेष ज्ञान झाल्याबरोबर लयाला जाते. त्यानंतर सामान्य ज्ञानच उरते. या विशेष ज्ञान आणि विशेष न ओळखल्यामुळे उरणारे अज्ञान (सामान्य ज्ञान) या दोहोंना मुख्य चैतन्यच व्यापून टाकते. (२४)

प्रकाश एक आदि अंतीं । मध्यें आभासाची दीप्ति ।
प्रकाशून लया जाती । खद्योतापरी ॥२५॥
आदीअंती एकच प्रकाश असून स्फुरणकाळी मात्र आभासाचे तेज असते. ते काजव्याप्रमाणे काही काळ चमकून लयाला जाते. (२५)

विशेषत्व दिसुनि आलें । परि सामान्या नाहीं कललें ।
अनेक दर्पणीचे वेगळाले । प्रकाश भासती भिंती ॥२६॥
विशेषत्व दिसून येते पण सामान्य मात्र कळत नाही. अनेक आरशांचे प्रकाश (कवडसे) भिंतीवर चटकन दिसतात. (२६)

मध्यें संधि दिसती । प्रतिबिंबाची नसे दीप्ति ।
तया प्रकाशाची स्थिति । मुख्य सूर्याची ॥२७॥
दोन कवडशांच्या मध्ये संधी दिसतात. पण त्या संधींमध्ये (सांध्यांमध्ये) प्रतिबिंबाचे तेज नसते. पण त्या संधीमधील प्रकाश मात्र मुख्य सूर्याचा प्रकाश असतो. (२७)

घट नव्हता जाणिला । पुढें पाहतां ओळखिला ।
त्याचि क्षणीं लय जाला । आभासाचा ॥२८॥
अगोदर घट ओळखलेला नसतो. पुढे बारकाईने पाहिल्यानंतर तो ओळखू येतो. त्याच क्षणी आभासाचा लय होतो. (२८)

सांडून भासाची अवधी । मागें पुढें जे संधी ।
तो प्रकाश अनादि । कूटस्थाचा ॥२९॥
आभासाचा प्रांत सोडून त्याच्या मागेपुढे जो संधीचा भाग असतो तेथे जो प्रकाश असतो तो अनादी कूटस्थाचा प्रकाश असतो. (२९)

सांडून आकार घटाचा । पट देखे दृष्टी साचा ।
तोहि टाकून काष्ठाचा । आकार पाहे ॥३०॥
घट पाहात असताना घटाची आकृती सोडून आपण दृष्टीने पट पाहू लागतो. नंतर तोही आकार टाकून आपण काष्ठाचा आकार पाहू लागतो. (३०)

घट तरी सांडितां । पट नाहीं ओळखिला ।
मध्यें जो प्रतीति आला । कूटस्थ प्रकाश ॥३१॥
अशा या दृश्यमालिकेत घट पाहाण्याचे थांबवले आहे आणि अजून पटाची ओळख पटलेली नाही. अशा मधल्या काळात ज्याचा अनुभव येतो तो कूटस्थप्रकाश होय. (३१)

तैसाचि पटहि सांडितां । काष्ठाकार न होतां ।
संधिप्रकाश आईता । अनुभवा येतो ॥३२॥
त्याचप्रमाणे पट पाहण्याचे थांबवले आहे, पण अजून वृत्ती काष्ठाकार झालेली नाही, अशा मधल्या काळात संधिप्रकाश आपोआप अनुभवास येतो. तो कूटस्थप्रकाश होय. (३२)

बाह्य विषयाचे परी । प्रवर्तती अंतरीं ।
तें ओळखावें निर्धारी । सामान्य विशेष ॥३३॥
बाह्य विषयांप्रमाणेच अंत:करणातही सामान्य विषय संचार करतात. ते निर्धारपूर्वक ओळखावेत. (३३)

निश्चळ जैसें आकाश । होय वायूचा भास ।
तेवि चंचळपणें उमस । कल्पनेचा दिसे ॥३४॥
निश्चळ आकाशात ज्याप्रमाणे वायूचा भास होतो, त्याप्रमाणे अंत:करणात कल्पनेचा तिच्या चंचलपणामुळे प्रादुर्भाव जाणवतो. (३४)

मन बुद्धि आणि चित्त । अहंकारासमवेत ।
व्यापारून चहूंत । त्याक्षणीं हरपे ॥३५॥
मन, बुद्धी, चित आणि अहंकार या चारीतही ती व्यापार करून लगेच लोप पावते. (३५)

जैसी का विद्युल्लता । प्रकाशून चौ भूतां ।
वेळ नाहीं लया जातां । चंचळपणें ॥३६॥
वीज ज्याप्रमाणे चार भूतांना प्रकाशित करून चंचलत्वामुळे त्याक्षणीच लोप पावते. (३६)

तैसा चतुर्धा व्यापार । करून निमे साचार ।
पुढें दुसरा उद्वार । तैसाचि उठे निमे ॥३७॥
त्याप्रमाणे चारी अंत:करणवृत्तीत व्यापार करून ती कल्पना त्याचप्रकारे लगेच मावळते. त्यानंतर दुसरी कल्पना उगम पावते व त्याच पद्धतीने मावळते. (३७)

वृत्ति अखंड असती । कारंज्यापरी वाहती ।
तरी उठोन लया जाती । तेंचि कैसें ॥३८॥
यावर अशी शंका उपस्थित होते की, वृत्ती तर अखंड असून कारंज्याप्रमाणे सतत वाहत असतात, तर मग त्या उत्पन्न होतात व मावळतात हे म्हणणे कितपत बरोबर आहे? (३८)

पाणी वाहे कारंज्याचें । तेथेंहि अखंडत्व कैचें ।
उडतांचि पडे साचें । पुढें दुसरें येतें ॥३९॥
कारंज्याचे पाणी वाहत असते. तेथेही ते अखंड कुठे आहे? ते वर उसळते व लगेच खाली पडते. त्या जागी लगेच दुसरे पाणी येते. (३९)

अखंड उगेंचि दिसलें । परि एक आलें एक गेलें ।
तैसेचि वृत्तीचे मासले । बरे पाहा ॥४०॥
ते अखंड आहे असे उगीचच भासते. वास्तविक पाहता एक पाणी येते त्यावेळी दुसरे जात असते. त्याचप्रमाणे वृत्तींचा मासला (वृत्तींचे उदाहरण आहे, हे ओळखा. (४०)

तरंगी जळ व्यापलें । वृत्तींत चैतन्य कोंदाटलें ।
तेंचि दो रीतीं विभागलें । सामान्य विशेष ॥४१॥
तरंगांमध्ये ज्याप्रमाणे पाणी व्यापून असते त्याप्रमाणे वृत्तींमध्ये चैतन्य दाटून भरलेले असते. ते चैतन्य सामान्य व विशेष अशा प्रकारात विभागले जाते. (४१)

विशेषत्व उमटें । सामान्याचेनि नेटें ।
विशेष तेव्हांचि वोहटे । सामान्य सदोदित ॥४२॥
सामान्याच्या आधारावर विशेषत्व प्रकट होते. विशेषचैतन्य लागलीच ओसरून नाहीसे होते. सामान्यचैतन्य मात्र नित्य प्रकाशमान असते. (४२)

परी सामान्य आच्छादिलें । विशेषत्व दिसूं लागलें ।
संधीसी जरी अनुभविलें । सामान्य कळे ॥४३॥
पण सामान्य आच्छादिले जाताच विशेषत्व दिसू लागते. दोन विशेषांच्या संधीचा अनुभव घेतला तर सामान्य कळेल. (४३)

एक कल्पना उठोन गेली । दुसरी नाहीं उमटलीं ।
ते संधि जरी साधिली । सूक्ष्मदृष्टी ॥४४॥
एक कल्पना नाहीशी झाली व दुसरी उत्पन्न झाली नाही, तो संधिकाल सूक्ष्मदृष्टीने पहायला मिळाला, (४४)

तो प्रकाश आत्म्याचा । हाचि निष्कर्ष समाधीचा ।
मग अवसर कल्पनेचा । मंद मंद चाले ॥४५॥
तर तोच आत्म्याचा प्रकाश होय. समाधीचा तोच निष्कर्ष (निष्कर्ष-साध्य) होय. मग हळूहळू कल्पना ओसरू लागते. (४५)

विरल होतां कल्पना । संधि येती अनुमाना ।
जों जों मुरे कल्पना । तों तों सामान्य दुणावे ॥४६॥
कल्पना विरल होत असताना संधीचाअनुभव येऊ लागतो. जो जो कल्पना विरत जाते तो तो सामान्य दुणावू लागते. (४६)

विषेषत्व जरी गेलें । सामान्यची कोंदाटलें ।
तरी संपूर्ण योगाचें जालें । साफल्य चरम ॥४७॥
विशेषत्व नि:शेषपणे गेले तर सामान्य सर्वत्र कोंदाटलेले असतेच, ती अवस्था म्हणजे संपूर्ण योगाचे अंतिम साफल्यच होय. (४७)

अथवा अपरोक्ष अनुभविलें । विशेषत्वीं तेंचि देखिलें ।
मग उद्भवे अथवा निमालें । तेणेंसि काज नाहीं ॥४८॥
अथवा प्रत्यक्षपणे त्या सामान्याचा अगोदर अनुभव घेतला आणि विशेष चैतन्याच्या अनुभवातही त्याच सामान्यचैतन्याचा अनुभव घेतला तर विशेषत्व निर्माण झाले काय अथवा निमाले काय त्याच्याशी साधकाचे काही काम राहात नाही. (४८)

पाणियासी ओळखितां । तरंगाची काय चिंता ।
उद्भव आणि लय होतां । हानी ना लाभ ॥४९॥
एकदा मुख्य पाण्याची ओळख पटली की, मग त्यावरील तरंगाची चिंता करण्याचे कारणच काय? ते तरंग निर्माण झाले अथवा लय पावले तरी त्याला (साधकाला) ना हानी ना लाभ! (४९)

आभास कूटस्थ निवडिले । जैसे करतळी आंवळे ।
हें सर्वांसि कां न कळे । आक्षेपु ऐसा ॥५०॥
यावर आक्षेप असा येतो की, चिदाभास किंवा भासचैतन्य आणि कूटस्थ यांच्यातील भेद अगदी तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट करून सांगितला तरी तो सर्वांच्याच लक्षात का येत नाही? (५०)

न कळे आपुलें सामान्यत्व । बळावलें विशेषत्व ।
हें अज्ञानाचे महत्त्व । भोक्तृत्व जीवासी ॥५१॥
आपले सामान्यत्व कळत नाही आणि विशेषत्व मात्र बळावते, हे अज्ञानाचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच जीवाला भोक्तृत्व येते. (५१)

कूटस्थाचें स्वरूपलक्षण । सच्चिदानंद परिपूर्ण ।
असज्जड दुःखकारण । चिदाभास हा ॥५२॥
सत्, चित्, आनंद आणि परिपूर्ण हे कूटस्थाचे स्वरूप लक्षण आहे आणि याच्या अगदी उलट म्हणजे असत्, जड, दुःखाचे कारण असा चिदाभास आहे. (५२)

असंगत्व पूर्णत्व टाकिलें । सत्यत्व तितुकें घेतलें ।
जडत्व दुःख अवलंबिलें । मी मी जालें स्फुरण ॥५३॥
तर कूटस्थाच्या असंगत्व आणि पूर्णत्वाचा त्याग करून फक्त सत्यत्व घेतले आणि चिदाभासाच्या जडत्व आणि दुःखाचा स्वीकार केला म्हणजे मी मी असे स्फुरण होते. (५३)

शुक्तिका शकल पहे पुढें । त्रिकोण नीलपृष्ठत्व उडे ।
हे हे चमकितें रोकडें । रजत भावी ॥५४॥
शिंपला पाहिल्यावर त्रिकोणाकृती, निळा पृष्ठभाग हे गुण लयाला जाऊन हे जे चमकत आहे ते चांदीच आहे अशी कल्पना होते, तसाच हा प्रकार आहे. (५४)

पाहतां रजताचा अभाव । शुक्तिकेसी रजत नांव ।
तैसा आभासाचा अभाव । सत्यवस्तूवरी ॥५५॥
तसे पाहिले तर तेथे चांदीचा अभाव असतो आणि शिंपल्यालाच चांदी असे नाव दिलेले असते. त्याप्रमाणे सत्य वस्तु जी कटस्थ अथवा परब्रह्म त्यावर आभासाचा म्हणजेच चिदाभासाचा अभावच असतो. (५५)

कूटस्थ नाहीं न दिसे म्हणे । नसून सत्य मी मिरवणें ।
सुखी दुःखी होणें जाणें । मजला आहे ॥५६॥
कूटस्थ दिसत नाही त्याअर्थी तो नाहीच असे तो म्हणतो आणि म्हणून 'मी' असत्य असूनही त्याला सत्य मानून तो मिरवतो. त्यामुळे सुखी होणे अथवा दुःखी होणे हे या 'मी'चेच भोग त्याला भोगावे लागतात. (५६)

अन्योन्याध्यास ऐसा । मिथ्याच भाविला अपैसा ।
तया अज्ञानाचे निरासा । ज्ञान पाहिजे ॥५७॥
अशा प्रकारे मूळ वस्तूच्या लक्षणांचा आरोप असत् अशा चिदाभासावर आणि असत् वस्तूच्या लक्षणांचा आरोप सत् अशा मूळ वस्तूवर केला जातो. यालाच अन्योन्याध्यास असे म्हणतात. तो स्वभावत:च खोटा आहे, अज्ञानजन्य आहे. त्या अज्ञानाचा निरास करण्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे. (५७)

कळतां त्रिकोण पृष्ठ निळी । तेव्हां रजताची उडे भुली ।
सतादि लक्षणें आपुलीं । कळतां जीवत्व उडे ॥५८॥
समोरचा पदार्थ त्रिकोणाकृती असून त्याचा पृष्ठभाग निळा आहे असे कळताच त्यावर चांदीचा भ्रम झाला होता तो नाहीसा होतो आणि आपल्या ठिकाणी मुळात असलेली सत्, चित्, आनंद, परिपूर्ण ही लक्षणे कळून येताच मीपणाने वेगळे पडलेले जीवत्व उडून जाते. (जीवत्वाची भ्रान्ती नष्ट होते. ) (५८)

मी आहे हें वाटतें । अज्ञानें धरिलें जडातें ।
जड सांडून मी मी कोणतें । सत्व धुंडावें ॥५९॥
'मी आहे' असे वाटते. त्यामुळे अज्ञानामुळे जडत्वासच कवटाळले जाते. त्या जडाचा त्याग करून त्यातील मीरूप सत्त्व शोधून काढावे. (मी कोण हे सत्य शोधून काढावे. ४५९)

मी मी पाहत मुळास गेला । मुळीं न देखे मीपणाला ।
मग स्वतां आपणचि उरला । मीपणेंविण ॥६०॥
'मी'चा शोध करत अगदी अगदी मुळाशी जाऊन पोहोचला तरी 'मी' त्याच्या दृष्टीस पडत नाही. शेवटी 'मी'पणा विरहित 'आपण'च (आत्माच) उरतो. (६०)

स्वयें असंग सद्‌रूप । चिदानंद अमुप ।
मी मी हे असद्‌रूप । जड दुःख गेलें ॥६१॥
स्वतः आत्मा असंग, सद्‌रूप, चिदानंद व अमूप (अपरिमेय, मोजता न येण्यासारखा) आहे आणि 'मी मी' असे ज्याच्याबद्दल वाटते ते सगळे असत्, जड, दुःखरूप आहे, ते सर्व त्या ज्ञानासरशी नाहीसे होते. (६१)

स्वयें आत्मा आपण । मी मी असत्‌अवलक्षण ।
एवं स्वकीयत्व अहंपण । आत्मा आणि आभास ॥६२॥
स्वत: आपणच आत्मा आहोत, 'मी मी' हे असत् आणि अवलक्षणी (दोषरूप) आहे. अशा प्रकारे आत्मा हा स्वत:च असून आणि अहंकार हा चिदाभास आहे. (६२)

स्वयं अहं शब्द दोनी । एकार्थता यालागुनी ।
म्हणसी तरी भिन्नपणीं । सामान्य विशेष होती ॥६३॥
यावर आक्षेपक असा आक्षेप घेतो की, स्वयं आणि अहम् हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. मग असा भेद का करता? परंतु सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य असा भेद वरील दोन्हींच्या भेदातून स्पष्ट होतो. (म्हणजे 'अहम्' हा विशेष भेद असून आत्मत्व हा सामान्य प्रकार आहे. ) (६३)

तूं मी हा हे शब्द तीन । तिहींसि वर्ते सामान्य ।
एकदेशी जे लक्षण । तें तें विशेष ॥६४॥
तू, मी, हा हे तीन वेगवेगळे शब्द असून 'सामान्य प्रकाश या तिहींना व्यापून असतो. जे लक्षण एकाच भागापुरते मर्यादित असते ते ते विशेष प्रकाश या स्वरूपाचे असते. (६४)

मी मी हे सर्व शब्दासी । न प्रवर्ते एकदेशी ।
म्हणोनि मी मी या शब्दासी । विशेषत्व आलें ॥६५॥
'मी मी' हा शब्द वरील सर्व शब्दांना लागू होत नाही. त्यामुळे तो एकदेशी म्हणजे मर्यादित आहे. म्हणून 'मी मी' या शब्दांना विशेषत्व आले आहे. (६५)

तैसा स्वयं शब्द नाहीं । प्रवर्ते शब्दीं तिहीं ।
म्हणोनि सामान्यत्व पाहीं । स्वतां यासी ॥६६॥
तसे 'स्वयं' शब्दाचे नाही. तो वरील तिन्ही शब्दांना लागू होतो. म्हणून 'स्वयं' अथवा 'स्वत:' या शब्दांना सामान्यत्व येते. (६६)

हा स्वतां जात आहे । तूं स्वतां तया पाहे ।
मी स्वयें शक्य नव्हे । तिहींसी सामान्य ॥६७॥
उदाहरणार्थ, हा स्वत: जातो आहे, तू स्थ: त्याला पहा, मी स्वत: समर्थ नाही. अशा प्रकारे 'स्वयं अथवा स्वत:' हे शब्द वरील तिन्ही शब्दांबरोबर सामान्यत्वाने वापरता येतात. (स्वयं शब्द हा तिन्ही पुरुषांबरोबर वापरतात, तर 'अहम्'हा शब्द फक्त प्रथम पुरुषांतच वापरला जातो. म्हणून 'अहम्'शब्द विशेष अथवा मर्यादित स्वरूपाचा असून स्वयम्'शब्द सामान्य अथवा व्यापक स्वरूपाचा आहे. (६७)

सांडूनियां अहंपण । स्वयें आत्मा हें आपण ।
ज्ञानें निवतें अज्ञान । स्वयें चिद्‌घन निजांग ॥६८॥
अहंपणाचा त्याग करून स्वत: आपणच आत्मा आहोत या ज्ञानाने अज्ञानाचा निरास झाल्यावर स्वत: चैतन्यघन आत्मस्वरूप उरते. (६८)

श्रोता म्हणे हो ऐका । मज आठवली आशंका ।
सकार्य अज्ञान एका । अधिष्ठानीं असे ॥६९॥
यावर श्रोता आशंका उपस्थित करतो. "अज्ञानाचे आभास हे कार्य आहे. कूटस्थ हे त्याचे अधिष्ठान आहे. (म्हणजे कार्यासहित अज्ञान एका अधिष्ठानावर राहते. ) (६९)

आभास कार्य अज्ञानाचें । कूटस्थ अधिष्ठान त्याचें ।
तरी अज्ञानत्व कूटस्थाचें । कीं जीवाचे सांगा ॥७०॥
आभास हे अज्ञानाचे कार्य आहे. त्या आभासाचे कूटस्थ हे अधिष्ठान आहे तर मग अज्ञान कूटस्थाचे की जीवाचे ते सांगा. " (७०)

वक्ता म्हणे जी भलें भलें । प्रसंगानुसार आक्षेपिलें ।
याचें समाधान अवधारिलें । पाहिजे तुम्ही ॥७१॥
यावर वक्ता म्हणतो, "वा! छान! तुम्ही प्रसंगानुरूप आक्षेप घेतलात. आता त्याचे समाधान करतो. नीट लक्षपूर्वक ऐका. " (७१)

कूटस्थ अज्ञान आश्रय । परि जीवासि आच्छादक होय ।
हें दृष्टांतें समजे काय । बहु बोलोनी ॥७२॥
कूटस्थ अज्ञानाचा आश्रय असला तरी जीवाचा आच्छादक आहे. अधिक काही न बोलता हेच दृष्टान्ताने समजावून सांगतो. (७२)

सूर्यकिरणाचे मेघ होती । वाटे सूर्यासी आच्छादिती ।
सूर्या आवरक तरी दिसती । मेघ काशानें ॥७३॥
सूर्यकिरणांमुळे मेघ निर्माण होतात. ते सूर्याला आच्छादितात असे वाटते. मेघ सूर्याला झाकून टाकतात असे दिसते, असे कशाने होते? (७३)

नव्हे सूर्य आच्छादक । त्याचे अंश नेत्रगोलक ।
तया होतीं आवरक । मेघ हे पाहा ॥७४॥
मेघ हे खरे सूर्याचे आवरक नसतातच. सूर्याचे अंश असलेले जे नेत्रगोलक त्यांना मेघ आच्छादितात. त्यामुळे सूर्य आच्छादल्यासारखा दिसतो. (७४)

अधिष्ठान ब्रह्म कूटस्थ । अज्ञान तेथें मृषा भासत ।
तदंश जीवा आवरित । जे कूटस्थ न कळे ॥७५॥
कूटस्थ ब्रह्म अधिष्ठान आहे. तेथे खोटे असे (मुळात खोटे असलेले) अज्ञान असल्याचे भासते. त्या अज्ञानाचा अंश जीवाला आच्छादून टाकतो. त्यामुळे कूटस्थ कळत नाही. (७५)

आणिक एक उपपत्ति । जे अनुभव आणि युक्ति ।
जेणें संदेहनिवृत्ति । तत्काळ होय ॥७६॥
आणखी एक दुसरा दृष्टान्त सांगतो. तो अनुभव व युक्ती यांना पटणारा आहे. त्याने संशयाचे निरसन ताबडतोब होईल. (७६)

असंभाव्य समुद्र भरला । मध्यें भोंवरा उद्भवला ।
तेणें समुद्र आच्छादिला । हें तो न घडे ॥७७॥
अथांग असा समुद्र भरला आहे त्यात मध्येच भोवरा निर्माण झाला तर त्याने समुद्र आच्छादिला जाणे शक्य नाही. (७७)

निजरूपीं जालें स्फुरण । निर्वातपरि एकदेशी जाण ।
तेथेंचि असती ज्ञानाज्ञान । जाउळे जैसे ॥७८॥
तसे स्वरूपामध्ये स्फुरण निर्माण होते ते त्या त्या भोवऱ्याप्रमाणे एकदेशी असते. त्या ठिकाणी ज्ञान-अज्ञान हे जुळ्या भावंडांप्रमाणे असतात. (७८)

ज्ञानाज्ञाना तरी विरोध । एक स्थळीं कैसा संबंध ।
म्हणसी तरी सावध । एक समई दोन्हीं ॥७९॥
ज्ञान-अज्ञान यांच्यामध्ये विरोध आहे. मग ती एके ठिकाणी कशी राहतात असे म्हणशील तर सावधहोऊन ऐक. एकाच ठिकाणी, एकाच काळी दोन्ही परस्परविरोधी गोष्टी राहू शकतात. (७९)

घटाचें ज्ञान होतां । पटीं होय अज्ञानता ।
अथवा पटही जाणतां । अज्ञान घटाचें ॥८०॥
घटाचे ज्ञान होताच पटाचे अज्ञान होते अथवा पटाचे ज्ञान झाले की त्याच वेळी घटाचे अज्ञान निर्माण होत असते. (८०)

दोन्ही एकत्र राहतीं । कार्यानुरूप होती जाती ।
असो ज्ञानाज्ञाना वस्ती । एका स्फुरणा ॥८१॥
दोन्ही विरोधी गोष्टी एकाच वेळी राहतात. कार्य जसे असेल त्याप्रमाणे त्या निर्माण होतात, नाहीशा होतात. तात्पर्य हे की, ज्ञान-अज्ञान या दोघांचे एकाच स्फुरणामध्ये वास्तव्य असते. (८१)

त्या स्फुरणीं चैतन्य बिंबलें । चिदाभास त्या नांव आलें ।
तेथेंचि दोन्ही प्रगटलें । ज्ञानाज्ञान ॥८२॥
त्या स्फुरणामध्ये चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते, त्याला चिदाभास असे नाव प्राप्त झाले. त्याच ठिकाणी ज्ञान-अज्ञान दोन्ही प्रकट होतात. (८२)

होता कूटस्थाचें अज्ञान । मी जीव मज बंधन ।
होतां कूटस्थाचे परी ज्ञान । अज्ञानबंधन निरसे ॥८३॥
कूटस्थाचे अज्ञान होताच मी जीव आहे, मला बंधन आहे असे वाटू लागते. पण कूटस्थाचे ज्ञान झाल्याबरोबर मात्र अज्ञानामुळे आलेले बंधनही सुटते. (८३)

विशेषत्व हें अज्ञान । निरसे सामान्य होतां ज्ञान ।
वेद शास्त्र गुरु प्रमाण । इतुक्या हेतू ॥८४॥
विशेषत्व म्हणजेच अज्ञान होय आणि सामान्य म्हणजे ज्ञान होय. ते ज्ञान होताच विशेषत्वाचा परिहार होतो. हे वेदप्रतीती, शास्त्रप्रतीती, गुरुप्रतीती इत्यादी प्रमाणांनी सिद्ध आहे. (८४)

हाचि परम पुरुषार्थ । हेंचि ज्ञान हाचि स्वार्थ ।
न जाणतां तें जिणे व्यर्थ । पशुप्राय नराचें ॥८५॥
हे जाणणे हाच खरा श्रेष्ठ पुरुषार्थ होय. हेच खरे ज्ञान आणि हाच खरा स्वार्थ होय. हे ज्ञान न जाणणे म्हणजे माणसाचे जिणे पशुप्राय व्यर्थ ठरेल. (८५)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
कूटस्थविवेचनप्रकारे । चतुर्थसमासः ॥४॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
सप्तावस्थावर्णन


आत्मा अपरोक्ष जाणितला । हा आपणसा कळला ।
न वचे इच्छा काम कोणाला । शरीरतापही नाहीं ॥१॥
आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले. आत्मा म्हणजे आपणच हेही कळले. तो इच्छा, काम इत्यादींपासून अलिप्त आहे. त्याला शरीराचाही ताप नाही. (१)

जयासी होय ज्ञान । तोचि अधिकारी कोण ।
कूटस्थ कीं आभासलक्षण । कीं उभयात्मक ॥२॥
मग ज्याला ज्ञान होते तो अधिकारी कोण? कूटस्थ की चिदाभास जीव? की दोघेही? (२)

कूटस्थ तरी असंग । तया न घडे ज्ञानयोग ।
आभास तो मिथ्याची मग । ज्ञान तरीं कैंचें ॥३॥
कूटस्थ तर नि:संग असतो म्हणून त्याला ज्ञान होते असे म्हणता येत नाही आणि चिदाभास तर मिथ्याच आहे. मग तेथे ज्ञान कसे शक्य आहे? (३)

कूटस्थ सत्यत्व घेऊन । मी मी मिरवे म्हण‍ऊन ।
उभयात्मका विशेषण । अधिकाराचें ॥४॥
कूटस्थाचे सत्यत्व घेऊन चिदाभास 'मी मी' म्हणवून घेऊन मिरवतो म्हणून अधिकाराचे विशेषण उभयात्मक म्हणजे दोघांनाही लागू पडणारे आहे. (कूटस्थ आणि चिदाभास या दोघांनाही अधिकार आहे. ) (४)

हा जागृतीतें जाणे । स्वप्नानुभवी सर्वज्ञपणें ।
सुषुप्ति ओळखिली जेणें । तो हा आत्मा ॥५॥
कूटस्थ जागृतीला जाणतो, तो सर्वज्ञ असल्यामुळे स्वप्राचाही त्याला अनुभव येतो. सुषुप्तीही त्याच्या ओळखीची आहे असा हा आत्मा आहे. (५)

मन जयावरी खेळे । परि मनासी न कळे ।
बुद्धीतें निश्चयाचे सोहळे । जयाचेनि ॥६॥
त्याच्यावर मन खेळते (म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर मनाचे अस्तित्व आहे. ) पण मनाला तो कळत नाही. बुद्धी त्याच्याच आधाराने निश्चयाचे सोहळे करते. (६)

तो हा आत्मा आपण । आहे ऐसी बाणे खूण ।
आत्म शास्त्र गुरु प्रमाण । त्रिविधा प्रतीति ॥७॥
तो हा आत्मा आपणच आहोत ही खूण आत्मप्रतीती, शास्त्रप्रतीती, गुरुप्रतीती या तिन्ही प्रतीतीच्या प्रमाणांनी अंगी बाणते. (७)

हा मी अपरोक्ष ज्ञान । हें कूटस्थ नसे जाण ।
असंगासी अहंपण । बोलोंचि नये ॥८॥
पण कूटस्थाला हाच मी आहे असे प्रत्यक्ष ज्ञान नसते. कारण तो असंग आहे. असंगाच्या बाबतीत अहंकाराची गोष्ट बोलूच नये. (८)

आभासें कूटस्थ जाणतां । तत्क्षणीं हरपें तत्त्वतां ।
तरि मी हा आत्मा हे वार्ता । कैसी संभवे ॥९॥
आता चिदाभासाला आपण कूटस्थ आत्मा आहोत असे कळताच त्याच क्षणी तो नाहीसा होतो. त्यामुळे मी आत्मा आहे' असे म्हणणे त्याला कसे शक्य होईल? (९)

तरी त्रिविध अहंकार । एक तो मुख्य साचार ।
दोन अमुख्य निर्धार । ओळखावे हे ॥१०॥
अहंकार तीन प्रकारचा आहे. एक मुख्य अहंकार असून दुसरे दोन अमुख्य आहेत. हे लक्षात घ्यावे. (१०)

असंग सत्य कूटस्थ न कळे । मिथ्या आभास हें न निवळे ।
उगाचि मी मी हे खवळे । हा अभिमान मुख्य ॥११॥
असंग, सत्य असा कूटस्थ न जाणता, आभास मिथ्या आहे, हे समजून न घेता उगीचच'मी मी' अशी जाणीव प्रबळ होऊन उठते. तो मुख्य अहंकार होय. (११)

हाचि बंधासी कारण । येणें पावे जन्ममरण ।
येर अमुख्य जे दोन । तेचि कैसें ॥१२॥
हाच अहंकार बंधनास कारण होतो. त्याच्याच योगाने जन्म मरण प्राप्त होतात. बाकीच्या दोन अमुख्य अहंकार कसे आहेत, ते पाहू. (१२)

मी असंग ज्ञानघन । आत्मा कूटस्थ परिपूर्ण ।
मिथ्या आभास मृगजळीं मीन । विवेचनें कळलें ॥१३॥
विवेचनाच्या साहाय्याने 'मी असंग, ज्ञानघन, परिपूर्ण, कूटस्थ आत्मा आहे व आभास मात्र मृगजळातील माशाप्रमाणे मिथ्या आहे' असे कळते. (१३)

ज्ञानोत्तरीं मी मी स्फुरतें । परि तें मी नव्हेसें वाटतें ।
स्वानुभवें निवडिलें त्यातें । पुन्हा एक हो‍उं नेदी ॥१४॥
पण असे ज्ञान झाल्यानंतरसुद्धा मी मी' असे स्फुरण होते, पण तो मी नव्हेच असे वाटते. नंतर स्वानुभवाच्या बळावर साधक स्वरूपज्ञान निवडून घेतो व आभासाशी त्याचा संयोग होऊ देत नाही. (या दोन अनुभूतींना वेगळे ठेवता येते. ) (१४)

मग समाधि आणि व्यापार । दो रीती जाणावे अहंकार ।
शास्त्रीय आणि लौकिक विचार । दोहीं काळीं दोन ॥१५॥
तेव्हा समाधी आणि व्यापार असे या दोन अनुभूतींना म्हणतात. त्यानुसार अहंकाराचेही दोन प्रकार होतात. एक शास्त्रीय आणि दुसरा लौकिक. हे दोन्ही अहंकार दोन वेगवेगळ्या प्रसंगांमुळे दोन होतात. (१५)

समाधिकाळीं मी असंग । एक परिपूर्ण अभंग ।
हा शास्त्रीय अभिमान उमग । ज्ञानदृष्टी ॥१६॥
समाधिकाळी मी असंग, परिपूर्ण, अभंग आहे असे वाटणे हा ज्ञानदृष्टीचा शास्त्रीय अभिमान जाणून घे. (१६)

मी जातों मी पाहतों । मी करितों मी खातों ।
हें आभासकार्य जाणतों । लौकिकव्यापारीं ॥१७॥
या उलट लौकिक व्यापारामध्ये मी जातो, मी पाहतो, मी करतो, मी खातो अशा सर्व आभासकार्याचा अभिमान बाळगणे हा व्यापारकाळीचा अभिमान (अहंकार) होय. (१७)

ऐसे अमुख्य अहंकार । हे दोनी ज्ञानोत्तर ।
मुख्य अज्ञान साचार । बंधरूप ॥१८॥
हे दोन्ही अमुख्य अहंकार हे ज्ञानानंतरच्या काळातले अहंकार होत. अशा विविध अहंकारांपैकी मुख्य अहंकार अज्ञानजन्य असून बंधनस्वरूप आहे. (१८)

कूटस्थ असंग कळला । परोक्षज्ञान म्हणावें त्याला ।
तेंचि आपण प्रतीति आला । हे अपरोक्ष ज्ञान ॥१९॥
असंग कूटस्थाचे स्वरूप कळते, तेव्हा त्या ज्ञानाला परोक्षज्ञान म्हणावे. (परोक्ष म्हणजे दृष्टिआड, म्हणजेच अप्रत्यक्ष) तो कूटस्थ आपणच आहोत असे अनुभवाने कळते तेव्हा त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान (प्रत्यक्षात अनुभवलेले) म्हणावे. (१९)

परोक्ष अपरोक्ष ऐसें । हे दोन्हीं एका कैसें ।
म्हणसी तरी अपैसें । सप्त अवस्था जीवासी ॥२०॥
एकाच जीवाला परोक्षज्ञानानांतर अपरोक्षज्ञान कसे होते, असा प्रश्न विचारशील तर हे लक्षात घे की जीवाला स्वाभाविकपणे विकासाच्या सात अवस्थांतून जावे लागते. (२०)

अज्ञान आवरण विक्षेप । परोक्ष अपरोक्ष ज्ञानदीप ।
शोकमोक्ष सहावे रूप । तृप्ति निरंकुश सातवी ॥२१॥
त्या अवस्था पढीलप्रमाणे होत. अज्ञान+आवरण-विक्षेप→परोक्ष-अपरोक्ष (म्हणजे ज्ञानरूप दीप प्रज्वलित होतो) +शोक मोक्ष ही सहावी अवस्था आणि निरंकुशा तृप्ती ही सातवी अवस्था होय. (२१)

या सात अवस्था एकासी । दशमा परी जीवासी ।
दृष्टांती आणि दार्ष्टांतासी । सारिख्या असती ॥२२॥
एकट्याच जीवाला या साती अवस्थांतून जावे लागते. दशमाच्या कथेतल्या दृष्टान्त आणि दाान्तिकाशी त्या जुळणाऱ्या आहेत. (२२)

कोणी एक दाहा जण । मार्गीं जाता नदी उतरून ।
मोजिती आपणा सोडून । म्हणती दहावा कोठें ॥२३॥
काही दहा जण रस्त्याने जात असता त्यांच्या वाटेत नदी लागली. नदी ओलांडून गेल्यावर ते एकमेकाला मोजून पाहू लागले. पण मोजताना प्रत्येक जण स्वत:ला मोजायला विसरत होता. त्यामुळे संख्या फक्त नऊच भरत होती. दहावा कोठे गेला याची चिंता ते करू लागले. (२३)

दाहावा आपण विसरती । तेंचि अज्ञान निश्चिती ।
दहावा नाहीं न दिसे म्हणती । हेंचि दोरीतीं आवरण ॥२४॥
दहावा आपणच आहोत, हे ते विसरत होते. यालाच अज्ञान असे निश्चित जाणावे. दहावा नाही, दहावा दिसत नाही असे ते म्हणत होते. यालाच दोन प्रकारचे आवरण म्हणावे. (२४)

रडती मस्तक बडविती । दहावा नदींत मेला म्हणती ।
हाचि विक्षेप दुःखी होती । तिसरी अवस्था ॥२५॥
ते रडू लागले. डोक्यावर हात मारून घेऊ लागले:दहावा नदीत मेला असे म्हणू लागले. शोक करू लागले. हीच विक्षेप नावाची तिसरी अवस्था होय. (२५)

तेथें आला अकरावा । म्हणे आहे रे दहावा ।
शोक सांडुनी म्हणती दावा । हें परोक्ष ज्ञान ॥२६॥
तेथे अकरावा आणखी एक आला. तो म्हणाला की, गड्यांनो, दहावा सापडला तेव्हा त्यांनी शोक आवरला व म्हणाले, 'आम्हाला तो दाखवा'. याला परोक्षज्ञान असे म्हणतात. (२६)

मोजून दहावा दाविला । आपण ऐसा अनुभव आला ।
अपरोक्ष ज्ञान म्हणावें त्याला । अवस्था पांचवी ॥२७॥
त्याने पुन्हा मोजणी करून दहावा दाखवला. प्रत्येकाला दहावा आपणच आहोत असा अनुभव आला. त्यालाच अपरोक्षज्ञान म्हणतात. ही पाचवी अवस्था होय. (२७)

होय शोकाचें निवर्तन । हेंचि जाण शोकापगमन ।
आनंदती लाभें करून । हे तृप्ति सातवी ॥२८॥
आता शोक दूर झाला. यालाच शोकापगमन (शोक दूर जाणे) असे म्हणतात. ही सहावी अवस्था होय. हा मोठा लाभ झाला या विचाराने ते आनंदित जाले. हिलाच तृप्ती नावाची सातवी अवस्था म्हणतात. (२८)

आतां दार्ष्टांती हे कैसी । सप्त अवस्था जीवासी ।
आपण कूटस्थ निश्चयेंसी । अन्यथा नव्हे ॥२९॥
आता या कथेचे दान्तिक कसे आहे ते पाहू. जीवाला या सात अवस्थांतून जावे लागते. आपण कूटस्थ आहोत हे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. आपण इतर कोणी नाही आहोत, हे समजून घ्यावे. (२९)

नामरूपेंवीण एकला । अस्तिभातिरूप संचला ।
माईक समुदाय मीनला । नामरूपात्मक ॥३०॥
नामरूपातीत केवळ एकटा अस्ति-भाति-प्रिय या लक्षणांनी युक्त अशा कूटस्थाभोवती नामरूपात्मक खोटा समुदाय जमा झाला. (३०)

इतुकेनें जाला भ्रम । चुकला आपुला उगम ।
विस्मरण पावला परम । हे अज्ञान अवस्था ॥३१॥
त्यामुळे त्याला भ्रम झाला. आपण कोठून आलो हे तो विसरला, हीच अज्ञान अवस्था होय. (३१)

यापासून जालें आवरण । तें दों प्रकारें होय जाण ।
असत्‌एक दुजें अभान । दुसरी अवस्था ॥३२॥
त्या अज्ञानातून आवरण अवस्था आली. ते दोन प्रकारचे आहे. एक असत्आवरण दुसरे अभानआवरण हे दोन प्रकार होत. (३२)

कूटस्थ निःशेष नाहीं । हें असदावरण पाहीं ।
कूटस्थ न दिसे कोठेंही । हे अभानावरण ॥३३॥
कूटस्थ निश्चितपणे नाहीच अशी समजूत होणे यास असदावरण म्हणतात. कूटस्थ कोठे दिसत नाही, असे मानणे यास अभानावरण म्हणतात. (३३)

पुढें विक्षेप जाला पूर्ण । मी देहधारी जीव पण ।
मज आहे जन्ममरण । केलें पावेन पुढें मी ॥३४॥
मी देहधारी जीव असून मला जन्म मरण या अवस्था भोगाव्या लागत आहेत. मी जे कर्म करीन त्यानुसार त्याचे फळ मला भोगावे लागेल असा विश्वास ठेवणे हा विक्षेप होय. (अशा त-हेने जे वस्तुत: नाही त्याचा स्वीकार करणे म्हणजे विक्षेप) ( ३४)

ऐशा ध्यासें सुखदुःख । भोगिलेंचि भोगी अशेख ।
श्वानसूकरादि अनेक । भोगितां चुकेना ॥३५॥
अशा ध्यासाने तो सुखदुःख भोगतो. एकदा जे भोगले असेल तेच भोगत राहतो. श्वान, सूकर (डुक्कर) इत्यादी अनेक योनींचे भोग भोगल्यावाचून त्याची सुटका होत नाही. (३५)

ऐसें अज्ञान आवरण । तिसरा विक्षेप जाण ।
तिन्ही जीवासी बंधकारण । निरोपिल्या अवस्था ॥३६॥
याप्रमाणे अज्ञान, आवरण आणि तिसरा विक्षेप अशा या तीन जीवाला बंधनकारक अवस्थांचे वर्णन केले. (३६)

शंकाकार करी प्रश्न । तिन्ही अवस्था जीवालागून ।
विक्षेप हेंचि जीवाचें लक्षण । अज्ञान त्यापूर्वीं होतें ॥३७॥
यावेळी आक्षेपक प्रश्न करतो की, जीवाच्या या तीन अवस्था सांगितल्यात. त्यातील विक्षेप हेच खरे जीवाचे लक्षण दिसते. अज्ञान तर जीवाच्या अगोदर होतेच. (३७)

तरि अवस्था अज्ञानादि । जीवासी नसे अनादि ।
कूटस्थातें प्रतिपादी । अन्यथा विरोध ॥३८॥
तेव्हा अज्ञानादी अवस्था जीवाला नाहीतच. कूटस्थाला या अवस्था आहेत म्हणावे तर अन्यथा विरोध निर्माण होतो म्हणजे अज्ञान. कुणाचे जीवाचे की कूटस्थाचे? या दोन्ही बाबतीत विरोध दिसतो. (३८)

ऐसी शंका ऐकिली । म्हणे वक्ता अवधारा बोली ।
अज्ञानादि सर्वही राहिली । एका स्वरूपी ॥३९॥
अशी आशंका ऐकल्यावर वक्ता म्हणतो की याचे उत्तर आता ऐका. अज्ञानादी सर्व अवस्था एका कूटस्थाच्या अधिष्ठानावर राहात असतात. (३९)

परि अवस्था जीवाची । म्हणों नये आत्मयाची ।
जैसी स्थिति गर्भाची । मातापित्या नसे ॥४०॥
पण तरी अज्ञानादी अवस्था जीवाच्याच होत. त्या आत्म्याच्या अवस्था म्हणू नयेत. गर्भाच्या अवस्था मात्यापित्याच्या मानता येत नाहीत. (४०)

OVI MISSING IN PRINTED BOOK
जन्मापूर्वी गर्भावस्था गर्भिणीची अवस्था म्हणता येत नाही. गर्भावस्था ही लेकराचीच असे म्हटल्यावर दोष येत नाही. (४१)

जन्मापूर्वी जें अज्ञान । परि तें जीवासी आच्छादन ।
येथें नसें अनुमान । अनुभवसिद्ध ॥४२॥
जीव जन्माला येण्याच्या पूर्वीपासून असले तरी ते जीवाला आच्छादक होते. यात तर्काचा किंवा अनुमानाचा काही भाग नाही, कारण ते अनुभवसिद्ध आहे. (४२)

मज कांहीचि न कळे । ऐसा जीव बरळे ।
सर्वानुभवें निवळे । अज्ञान अवस्था ॥४३॥
जीव म्हणतो की, 'मला काहीच कळलं नाही तेव्हा या त्याच्या उद्गारावरून अज्ञानावस्था स्पष्ट होते तेव्हा जीवाचे अज्ञान अनुभवसिद्धच आहे. (४३)

OVI MISSING IN PRINTED BOOK
या अज्ञानातून आवरण निर्माण होते. ते दोन प्रकारचे आहे. एक असदावरण आणि दुसरे अभानावरण. (४४)

यापासून जालें आवरण । दों प्रकारें त्याचें लक्षण ।
एक तें असदावरण । अभानावरण दुजें ॥४५॥
कूटस्थ कोठेच नाही असे वाटणे याला असदावरण म्हणतात. कूटस्थ दिसतच नाही, असे वाटणे यात अभानावरण म्हणतात. (४५)

आवरण शक्तीचें मासले । येणें जीव आच्छादिले ।
यापासून कार्य जालें । विक्षेपरूप ॥४६॥
हे आवरणशक्तीचे नमुने झाले. या आवरणाने जीव आच्छादिले जातात. आवरणापासून विक्षेप हे कार्य निर्माण होते. (४६)

लिंगाध्यासें आपण । सोशीतसे जन्ममरण ।
सुखदुःखें पावें शीण । कल्पवरी ॥४७॥
लिंगाध्यासामुळे म्हणजे वासनातादात्यामुळे जीव जन्म मरणाची सुखदुःखे कल्पान्तापर्यंत भोगत शीण पावतो, याला विक्षेप म्हणतात. (४७)

कल्पांतींही सुटेना । लिंगाध्यास भंगेना ।
आपण आपणा कळेना । म्हणोनियां ॥४८॥
कल्पान्तानंतरही हा लिंगाध्यास सुटत नाही, तो भंग पावत नाही. याचे एकच कारण म्हणजे आपण आत्मरूप आहोत हे कळलेले नसते. (४८)

अज्ञान आवरण विक्षेप । तिन्ही अवस्था बंधरूप ।
उत्तर अवस्था संक्षेप । मोक्षरूप बोलिजे ॥४९॥
अज्ञान, आवरण, विक्षेप या अवस्था बंधनरूप असतात. याउलट बाकीच्या चार अवस्था या मोक्षरूप आहेत. (४९)

मोक्षकारक जें ज्ञान । तयाचेहि प्रकार दोन ।
एक तें परोक्षज्ञान । दुजे अपरोक्ष ॥५०॥
मोक्षकारक असे जे ज्ञान आहे त्याचे दोन प्रकार आहेत. एक परोक्षज्ञान आणि दुसरे अपरोक्षज्ञान होय. (५०)

सच्छास्त्र आणि सद्‌गुरू । होता श्रवणाचा आदरू ।
परोक्षज्ञान साचारू । प्राप्त अधिकारिया ॥५१॥
सत्शास्त्र आणि सद्गुरू यांच्या श्रवणाने अधिकारी व्यक्तीला परोक्षज्ञान प्राप्त होते. (५१)

परोक्षज्ञान मोक्षरूप । येथें नसें कीं आक्षेप ।
आवरण जे असद्‌रूप । येणें नष्ट होय ॥५२॥
परोक्षज्ञान मोक्षरूप असते याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्याच्या योगाने जीवाच्या असद्‌रूप आवरणाचा नाश होतो. (५२)

परोक्ष ज्ञानाचे दोन प्रकार । स्वर्गापरी नव्हे गोचर ।
ऐकून कळे साचार । हे एक परोक्ष ॥५३॥
परोक्षज्ञानाचे दोन प्रकार होत. स्वर्गासारखे लोक डोळ्यांनी दिसत नसले तरी ऐकून ऐकून त्यांचे स्वरूप कळते. हे एक प्रकारचे परोक्षज्ञान होय. (५३)

दुसरें आपणाहून वेगळें । दुजेपणें निवळें ।
सच्चिदानंद ब्रह्म कळे । ज्ञानदृष्टी ॥५४॥
दुसरे परोक्षज्ञान म्हणजे ब्रह्म आपल्याहून वेगळे आहे. आपल्यापेक्षा निराळे आहे असे जे वाटत होते ते सच्चिदानंद ब्रह्म ज्ञानसृष्टीने यथार्थ कळणे हे होय. (५४)

असंग कूटस्थ निर्विकार । सर्व कळे सारासार ।
परोक्षज्ञानाचा विचार । जाणिजे ऐसा ॥५५॥
कूटस्थ असंग असून निर्विकार आहे, सार काय असार काय इत्यादी कळायला लागते, हा परोक्षज्ञानाचा विचार होय, हे समजून घ्यावे. (५५)

गुरुचवन आणि विचार । येणें अपरोक्ष साक्षात्कार ।
येथे आक्षेपिलें थोर । कीं वाक्यें अपरोक्ष नव्हे ॥५६॥
त्यानंतर सद्गुरूंचे वचन आणि विचार यांच्या योगाने अपरोक्षज्ञान होते म्हणजे ब्रह्मात्मैक्याचा साक्षात्कार होतो. येथे एक आक्षेप येतो की, केवळ वाक्याने (गुरुवचनाने) अपरोक्षज्ञान होत नाही. (५६)

आप्तवचनें मीचि दशम । ऐसें कळलें जाउनी भ्रम ।
तैसें गुरुवचनेंचि कळे वर्म । मी ब्रह्म विचारें ॥५७॥
यावर उत्तर असे की, आप्त वचनामुळे (अधिकारी व्यक्तीच्या सांगण्यावरून) आपणच तो हरवलेला दहावा आहोत, असे कळते. त्या अगोदरचा भ्रम नाहीसा होतो. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या शब्दांनी 'मी ब्रह्म आहे' या विचाराचे वर्म कळून येते. (५७)

मी ब्रह्म हा निर्धार जाला । अपरोक्षज्ञान म्हणावें त्याला ।
येणें समूळ नाश झाला । अभानावरणासी ॥५८॥
'मी ब्रह्म आहे' असा निश्चय झाला की त्यालाच अपरोक्षज्ञान असे म्हणतात. त्या अपरोक्षज्ञानाने अभानावरणाचा समूळ नाश होतो. (५८)

अपरोक्षाचेहि प्रकार । दोन असती साचार ।
परप्रकाहीं गोचर । इंद्रिय मन देहादि ॥५९॥
अपरोक्षज्ञानाचेही दोन प्रकार आहेत. परप्रकाश आणि स्वयंप्रकाश. इंद्रिये, मन, देहादी इत्यादी परप्रकाश अपरोक्षज्ञानाने दिसतात. (५९)

हे स्वतः जड असती । पर प्रकाशेंचि दिसती ।
अपरोक्ष परि निवृत्ति । अज्ञान नव्हे ॥६०॥
हे सर्व पदार्थ स्वत: जड असतात आणि त्यामुळे ते परप्रकाशानेच दिसतात. ते अपरोक्षज्ञान असले तरी त्यामुळे अज्ञान नाहीसे होत नाही. (६०)

स्वप्रकाश चैतन्यघन । हा कूटस्थ सर्वां विलक्षण ।
हेंचि अपरोक्ष निवर्तन । अज्ञानाचें ॥६१॥
हा कूटस्थ स्वप्रकाश, चैतन्यघन आणि सर्वांपेक्षा वेगळा आहे असे कळणे, हेच खरे अपरोक्षज्ञान असून त्यानेच अज्ञानाचे निरसन होते. (६१)

अपरोक्ष आत्मा आपण । हाचि मोक्ष हेंचि ज्ञान ।
येणें ज्ञानें पावन । बहुत जाले ॥६२॥
आपण प्रत्यक्ष आत्मा आहोत हे कळले हाच मोक्ष आहे आणि हेच खरे ज्ञान होय, याच ज्ञानामुळे पुष्कळ लोक पावन झाले. (६२)

मी कूटस्थ अपरोक्ष ऐसें । असंग कूटस्थीं न दिसे ।
आभास तरि अन्य असे । त्या अपरोक्ष कैचें ॥६३॥
कूटस्थ असंग असल्याने त्याच्या ठिकाणी मी कूटस्थ आहे. अपरोक्ष आहे अशी भावना असणे शक्य नाही. आभास (चिदाभास जीव) तर बोलून चालून वेगळाच आहे. त्याला अपरोक्षत्व (प्रत्यक्ष आत्मैक्याचा अनुभव) कसे येणार? (६३)

म्हणसी तरी चिदाभास । कूटस्थ मी हा करी ध्यास ।
अज्ञानकाळीं आपणास । वेगळें होतें भाविलें ॥६४॥
असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की, जो चिदाभास अज्ञानकाळात स्वत:स वेगळे समजत होता, तोच मी कूटस्थ आहे असा ध्यास करू लागला. (६४)

तेणें सुखदुःखा भोगिलें । जन्म मारणें शीण जाले ।
म्हणोनि साक्षिया शरण आलें । सुख देखिलें अपार ॥६५॥
त्याने जन्ममरणाच्या सुखदुःखांचा अनुभव घेतलेला असतो, तो शिणून गेलेला असतो. म्हणून तो सद्गुरूला शरण जातो तेव्हा त्याला अपार सुख अनुभवायला मिळते. (६५)

राजपुत्रा इच्छा राज्याची । आज्ञा पाळी पितयाची ।
जीवासि इच्छा सुखाची । म्हणुन साक्ष्यनुसार वर्ते ॥६६॥
राजपुत्राला आपल्याला राज्य मिळावे अशी इच्छा असते. त्यामुळे तो वडलांची आज्ञा पाळतो. त्याप्रमाणे जीवाला सुखाची इच्छा असते म्हणून तो सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करतो. (६६)

अथवा तेंचि आपण । असून होता विलक्षण ।
प्रायश्चित्त तयाचें जाण । उगमीं मज्जन करी ॥६७॥
किंवा आपण स्वतः तेच स्वरूप असताना स्वत:ला तद्विलक्षण मानत राहिलो, या गोष्टीचे प्रायश्चित म्हणून तो स्वत:च्या उगमस्थानी म्हणजे ब्रह्मरूपात बुडी घेतो. (६७)

करून आपुला घात । साक्षित्वें कैसा राहत ।
म्हणसी तारि घेती कर्वत । राज्यलोभासाठीं ॥६८॥
तो आपला घात करून साक्षिरूपाने कसा राहतो, असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की, लोक राज्यलोभासाठी कर्वतीने कापूनसुद्धा घेतात. (आत्महत्या करतात) . (६८)

एवं जाले निरूपण । बंधरूप अवस्था तीन ।
परोक्षापरोक्ष ज्ञान । मोक्षरूप दोन्हीं ॥६९॥
अशाप्रकारे या विषयाचे निरूपण झाले. तीन बंधरूप अवस्था, मोक्षरूप असलेले परोक्ष, अपरोक्ष ज्ञान यांचे येथे स्पष्टीकरण झाले. (६९)

आतां दोनी फलरूप । अवस्थेचें स्वरूप ।
बोलिजेतें संक्षेप । तेंचि अवधारा ॥७०॥
आता शेवटच्या फलस्वरूप अवस्थांचे संक्षेपाने वर्णन करावयाचे आहे ते लक्षपूर्वक ऐका. (७०)

मी माझें हें बंधन । भोगिलें हें नेणपण ।
ज्ञानें तयाचें निरसन । निःशेष जालें ॥७१॥
आतपर्यंत मी माझे हे बंधन सहन केले, हे अज्ञान भोगले त्याचे ज्ञानाने संपूर्णपणे निरसन झाले. (७१)

देह प्रारब्धीं वर्तले । परि मी माझें हें हरपलें ।
अज्ञान निःशेष गेलें । सुखावले निजरूपीं ॥७२॥
देह प्रारब्धानुसार वागत असला तरी मी माझे हे बंधन गळून पडलेले असते. अज्ञान संपूर्णपणे गेलेले असते, तेव्हा कूटस्थ निजरूपात सुखावतो. (७२)

मी माझें गेलें कैसें । येविशीं उपपत्ति असे ।
कोणी ब्राह्मण सापडलासे । म्लेंछ समुदाई ॥७३॥
त्याचे मीपण, माझेपण'कसे जाते, याविषयीचा एक दृष्टान्त आहे. कोणी एक ब्राह्मण म्लेंच्छांच्या समुदायात सापडतो. (७३)

तेणें धरूनि बाटविला । त्रासे ब्राह्मणां शरण आला ।
प्रायश्चित्त घेतां पावला । पुन्हा ब्राह्मणत्व ॥७४॥
त्याला पकडून ते त्याला बाटवतात. मोठ्या कष्टाने तो ब्राह्मण सुटतो व ब्राह्मणांस शरण येतो. मग तो प्रायश्चित्त घेऊन पुन्हा ब्राह्मणपणा प्राप्त करून घेतो. (७४)

मग म्लेंछ समुदाय दृष्टीसी । पाहतां भय वाटे मनासी ।
तैसा अहंकार काम क्रोधासी । जीव हा भीतसे ॥७५॥
मग म्लेंच्छांचा समुदाय पाहताच त्याच्या मनाला भीती वाटायला लागते. त्याप्रमाणे अपरोक्षज्ञान प्राप्त झालेला हा जीव, अहंकार, काम, क्रोध यांना घाबरतो. (७५)

जरी प्रारब्ध व्यवहार । भोगितां शिणे थोर ।
कधीं सरे हा जोजार । क्लेशरूप ॥७६॥
प्रारब्धातले सर्व व्यवहार भोगत असताना त्याला खूप कष्ट पडतात. हा क्लेशरूप संसार कधी संपेल, यातून आपली मुक्तता होईल याची तो वाट पाहत असतो. (७६)

अज्ञान निःशेष गेलें । परि देहासी प्रारब्ध उरलें ।
दशमापरि व्रण पडिलें । तें मास पक्ष राहे ॥७७॥
त्याचे अज्ञान संपूर्णपणे गेलेले असते. पण देहाला अद्याप प्रारब्ध उरलेले असते. दशमाच्या कथेत दहाव्याला ज्याप्रमाणे व्रण पडला होता, तो महिना पंधरा दिवस राहतो. (७७)

करितां औषध उपचार । तें व्रण मिळे साचार ।
तैसा प्रारब्ध विचार । भोगमात्रें नासी ॥७८॥
औषधोपचार केल्यानंतर तो व्रण भरून येतो. त्याप्रमाणे प्रारब्धाचा विचार भोगण्याने नष्ट होतो. (७८)

आत्मलाभें संतुष्ट जाला । सुखदुःख नसे त्याला ।
मीपण त्यागून मोकळा जाला । देहदुःखा नातळे ॥७९॥
एकदा का आत्मलाभाने तो संतुष्ट झाला की मग त्याला सुखदुःख राहात नाही. तो मीपणाचा त्याग करून मुक्त होतो. मग त्याला देहाचे दुःख स्पर्श करत नाही. (७९)

जैसें नासिक छेदिलें नराचें । मग टाकिले समुदाय लोकांचे ।
अंधारी राहणें त्याचें । काणकोंडेपणें ॥८०॥
एखाद्या माणसाचे नाक कापल्यानंतर तो लोकांचे समदाय वयं करता कानकोंडेपणाने अंधारातच राह लागतो. (८०)

तैसें जीवासी घडलें । मीपणाचें नाक छेदिलें ।
मग सुखें वास्तव्य केलें । निजस्वरूपीं ॥८१॥
त्याप्रमाणे जीवाच्या बाबतीत घडते. त्याच्या मीपणाचे नाक कापून टाकल्यानंतर तो सुखाने स्वत:च्या स्वरूपात मुक्काम करतो. (समाधिसुखात निमग्न होतो. ) (८१)

तया व्यापारासी येतां । लाजचे वाटे तत्त्वतां ।
मी माझें न म्हणतां । प्रारब्ध भोगी ॥८२॥
त्यानंतर त्या समाधिसुखातून व्यापाराकडे परत येताना त्याला खरोखर लाज वाटायला लागते. तो मुकाट्याने 'मी माझे'ची भाषा न वापरता प्रारब्ध भोगतो. (८२)

ज्या क्षणीं मीपण गेलें । तत्क्षणीं सुखदुःख नासलें ।
सहज विक्षेपाचें जालें । निसंतान ॥८३॥
ज्याक्षणी त्याचे मीपण नष्ट होते त्या क्षणी त्याचे सुखदुःख नाहीसे होते आणि विक्षेपाचे अगदी सहजपणाने उच्चाटन होते. (८३)

इंद्रिय आत्मा मन । हें जरी मिळती तीन ।
तरी भोक्तृत्व श्रुतीचें वचन । विषयसुखाचें ॥८४॥
इंद्रिय, मन आणि आत्मा ही तीन तत्त्वे एकत्र जर मिळाली तर विषयसुखाचा भोग अपरिहार्यपणे घडतो, असे श्रुतीचे (वेदांचे) सांगणे आहे. (८४)

मुळीं विषयासी मिथ्यात्व । नामरूपाचा समुदाव ।
तरि इच्छेचा संभव । कवण अर्थीं ॥८५॥
मुळात विषयच मिथ्या आहेत. विषय म्हणजे नामरूपांचा समुदाय. त्यांच्याबद्दल इच्छा कशी निर्माण होईल? आणि ती कशासाठी (कोणत्या लाभासाठी) निर्माण होईल? (८५)

मीपणेंविन भोक्ता । बोलोंचि नये तत्त्वतां ।
तरि विषयकामना पाहतां । कोणासि होय ॥८६॥
मीपणा नष्ट झालेला असताना त्यावाचून भोक्त्याचा विचारच मुळात बोलता येत नाही. तेव्हा विषयांबद्दलची इच्छा कोणाला होईल? (८६)

भोग्याभाविं इच्छा गेली । भोक्त्याभाविं कोणा भुली ।
इच्छा इच्छक दोनी सरली । मीपणेंविन ॥८७॥
भोग्यच (भोग घ्यायचा ते विषय) नसल्यामुळे इच्छा गेली. भोक्ता (विषयांचा भोग घेणारा) नसल्यामुळे त्यांचा मोह कोणाला होणार? आणि मीपणा राहिलेला नसल्यामुळे इच्छा इच्छक (इच्छा करणारा) दोघेही नष्ट झाले. (८७)

तैसेंचि दुःख देहत्रयाचें । निःशेष हरपलें साचें ।
देहात्मबुध्दीनें सुखदुःखाचें । तादात्म्य होतें ॥८८॥
त्याप्रमाणे देहत्रयाचे (स्थूल, सूक्ष्म आणि कारण) दुःख संपूर्णपणे नाहीसे झाले. देहात्मबुद्धीने (म्हणजे देहाला आत्मा मानणाऱ्या बुद्धीने) सुख आणि दुःख यांच्याशी आपण एकरूप होतो. (८८)

देहबुद्धीचें निसंतान । होतां पावला समाधान ।
देहदुःख अवलक्षण । कोण जाणें ॥८९॥
ती देहबुद्धी संपूर्णपणे नष्ट होताच सुखदुःखे राहात नाहीत आणि जीवाला समाधान प्राप्त होते. तेव्हा देहदुःखासारखी खोटी भावना कोणाला जाणवणार? (८९)

शरीरतिहींसी कैसे ताप । बोलिजे तयाचें स्वरूप ।
वेगळालीं संक्षेप । स्थूळदेहीं नाना रोग ॥९०॥
स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन शरीरांना कोणते त्रास होतात त्यांचे स्वरूप आता संक्षेपाने सांगतो. स्थूल देहाला अनेक रोग ग्रासत असतात. (९०)

कफ वात आणि पित्त । तेणें अनंत व्याधी देहा होत ।
नसतां जरी वात पित्त । तरि देह वाचेना ॥९१॥
कफ, वात आणि पित्त या तीन धातूंमुळे देहाला अनंत रोग होतात. ते तीन धातूच नसले तर देहच वाचणार नाही. (९१)

देह रोगाचें जालें । तें नवचे वेगळें केलें ।
सूक्ष्मदेहीं ताप भरले । ते अवधारा आतां ॥९२॥
त्यामुळे देह हा रोगासाठीच आहे असे दिसते. देहाला रोगापासून वेगळे काढता येत नाही. आता सूक्ष्मदेहामध्ये जे ताप भरलेले आहेत, ते ऐका. (९२)

काम क्रोध मद मत्सर । अनेक रजोगुणविकार ।
प्रमादादि तमांकुर सुखविकार । सात्त्विकाचा ॥९३॥
काम, क्रोध, मद, मत्सर यांसारखे अनेक रजोगुण विकार, प्रमादादी तमोगुणाचे विकार आणि सत्त्वगुणाचा सुखविकार, (९३)

नाना आधि दुःखरूप । सूक्ष्मदेहाचे संताप ।
कारणदेहीं सर्व ताप । बीजरूप नेणिव ॥९४॥
निरनिराळे दुःखदायक आधी (मनोविकार) हे सूक्ष्म देहाचे त्रास होत. कारण देहात वरील सर्व ताप बीजरूपाने असतातच. त्याबरोबर अज्ञान हा मोठा ताप असतो. (९४)

ऐसें दुःख देहाचें । ज्ञान होतां आत्मयाचें ।
गेले मेले संचिताचे । कार्यवर्ग ॥९५॥
आत्म्याचे ज्ञान होताच वर सांगितलेली तिन्ही देहांची दु:खे नाहीशी होतात. नाश पावतात. देहदःखे म्हणजे संचिकर्माची निष्पत्ती आहे. आत्मज्ञानाने संचितकर्माची ही करणी नष्ट होते. (९५)

देहबुद्धीचा संबंध । तुटला अवघाचि खेद ।
जन्ममरण भवबंध । एकसरा गेला ॥९६॥
देहबुद्धीचा संबंध तुटला की सगळे दुःख नष्ट होते. त्यामुळे जन्म, मरण, संसाराचे बंधन इत्यादी एकदमच नष्ट होतात. (९६)

ऐसा जाला शोकभंग । अवस्थेचें साहवें अंग ।
आतां सातवी ते अभंग । निरंकुशा तृप्ति ॥९७॥
अशा प्रकारे सहावी शोकभंग नावाची अवस्था जीवाला प्राप्त होते. आता सातवी अवस्था म्हणजे निरंकुशा तृप्ती, तिचे स्वरूप पाहू. (९७)

जन्मा आलियाचें सार्थक । आत्मा ओळखिला एक ।
शास्त्रीय अथवा लौकिक । करणें तें केलें ॥९८॥
एक आत्मा ओळखिला की जन्माला येण्याचे सार्थक होते. मग शास्त्रीय अथवा लौकिक कमें केली तरी हरकत नाही. (९८)

साध्य तेंचि साधिलें । साधनाचें सफळ जालें ।
सुखरूप कोंदाटलें । निजात्मरूप ॥९९॥
कारण जे साध्य करावयाचे होते ते साध्य झालेले आहे. सर्व साधने सफळ झाली आहेत आणि स्वत:चे आत्मस्वरूप सुखरूपाने सर्वत्र भरून राहिलेले आहे, असा अनुभव येऊ लागतो. (९९)

धन्य धन्य सद्‌गुरूनाथ । मज केलेंसें सनाथ ।
कृपादृष्टीनें कृतार्थ । भवविष गेलें ॥१००॥
सद्गुरुनाथ खरोखर धन्य होत. मला त्यांनी अनुगृहीत करून आधार दिला (सनाथ केले. ) माझ्यावर कृपादृष्टी करून मला कृतार्थ केले. संसाररूपी विष त्यामुळे नष्ट झाले. (१००)

काय व्हावें उतराई । ऐसें बोलणें हें काई ।
माथा समर्पावा पाई । तरि आधींच हरपलें ॥१०१॥
आता यांचे उतराई कसे व्हावे? या बोलण्याला काही अर्थच राहात नाही. तेव्हा मौन भावाने पायावर मस्तक टेकवावे म्हटले तर ते आधीच लोप पावलेले आहे. (शरीरभावनाच मुळात नष्ट झालेली आहे. (१०१)

सर्व ब्रह्मांड ग्रासिलें । पिंड तेथे नवचे पुरवलें ।
परि पोटची नाहीं भरलें । चरणभुकेलें सर्वदा ॥१०२॥
मी सर्व ब्रह्मांडाचाच ग्रास घेतलेला आहे. तेथे एकटे शरीर कोठे पुरवणीला पडले असते? एवढे करूनही माझे पोट भरलेले नाही. ते सदासर्वकाळ गुरुचरणांच्या सेवेला भुकेले आहे. (१०२)

मग भक्षिलें आपणासी । तेणें तणावल्या कुशी ।
मग सुखरूप एकपणेसी । शयन केलें ॥१०३॥
मग मी स्वत:च स्वत:ला खाऊन टाकले. त्यायोगाने शरीराच्या सर्व बाजू तणावून एकपणाच्या जाणिवेसह निद्रा केली. (१०३)

सरली शब्दाची खटपट । अवघा आत्माची घनदाट ।
सर्व शेवटाचा शेवट । सहजीसहज ॥१०४॥
येथे शब्दांची खटपट संपली. सर्वत्र आत्माच घनदाट भरून राहिला आहे. सर्व शेवटाचा शेवट आता सहजपणे गाठलेला आहे. (१०४)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
सप्तावस्थावर्णनप्रकारे । पंचमसमासः ॥५॥
इति पंचिका संपूर्णा ॥५॥ ओवीसंख्या ४७९
हरिः ॐ तत्सत्

GO TOP