॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(पूर्वार्ध)

पंचिका ६ वी
तत्पदशोधन

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
ईशतनुनिरूपण


आतां तत्पदशोधन । कीजे संक्षेपें कथन ।
तरी असावें सावधान । जे श्रवणार्थी ॥१॥
त्वंपदाप्रमाणेच तत्पदाचे आता संक्षेपाने निरूपण करू तरी श्रवणाची इच्छा असणाऱ्यांनी अवधान द्यावे. (१)

त्वं पदाचिये परी । तनुचतुष्टय ईश्वरीं ।
तें विवेकें जो निवारीं । तया ब्रह्म निवळे ॥२॥
त्वंपदाप्रमाणेच ईश्वराच्या (तत्पदाच्या) ठिकाणी पण चार शरीरे आहेत. जो विवेकपूर्वक त्यांचे निवारण करतो त्यालाच ब्रह्म सापडते. (२)

कांही जें जें भासे दिसे । ब्रह्म त्याहून अनारिसें ।
दिसे भासे तें नासे । हें श्रुतिवचन ॥३॥
जे जे काही भासते अथवा दिसते त्यापेक्षा ब्रह्म वेगळेच असते. 'जे दिसते अथवा भासते ते नष्ट होते' असे श्रुतिवचन (वेदांचे शब्द) आहे. (३)

गोंडाळ सांडून एकीकडे । नीर सेविजे रोकडें ।
तेवि दृश्य विवेकें बिघडे । तरी निवडे परब्रह्म ॥४॥
शेवाळ बाजूस सारून ज्याप्रमाणे स्वच्छ पाण्याचे सेवन करावे त्याप्रमाणे विचाराने सर्व दृश्याचा पसारा नाहीसा झाला (विघडे) तरच परब्रह्म पारखून घेता येते. (निवडे) (४)

पंचभूतिक ब्रह्मांड । भीतरीं सांठवलें पिंड ।
पाहतां दृश्य उघड । परब्रह्म नव्हे ॥५॥
ब्रह्मांड पंचभूतांपासून निर्माण झालेले असून त्याच्या पोटात सर्व पिंडांची साठवण झाली आहे. ही दोन्हीही दृश्य प्रकारात मोडत असल्याने ती परब्रह्म नाहीत, हे उघड आहे. (५)

ब्रह्मलोकादि तृणांत । आकार जो जो दिसत ।
तें तें जाणावें नाशवंत । शाश्वत तेंचि शोधावें ॥६॥
ब्रह्मलोकापासून गवताच्या पात्यापर्यंत जो जो आकार दृष्टीस पडतो ते ते सर्व नाशवंत जाणावे. नाशवंताचा त्याग करून जे शाश्वत (कायम टिकणारे) असेल त्याचा शोध घ्यावा. (६)

रज्जूवरी सर्प भासला । त्या म्हणावें उत्पन्न जाला ।
तैसी उत्पत्ति अवस्था याला । बोलोंचि नये ॥७॥
दोरीवर सर्प भासला, त्याला उत्पन्न झाला असे म्हणावे. त्याप्रमाणे परब्रह्माला उत्पत्तीची अवस्था असते असे म्हणता येत नाही. (७)

जे आदिअंती शाश्वत । तेथें अवस्थेचा संकेत ।
हें बोलणें प्रमाणरहित । अवस्थातीत ब्रह्म असे ॥८॥
जे आरंभी आणि अंती शाश्वतच असते (सर्व अवस्थांमध्ये शाश्वतच असते. ) तेथे अवस्थांची भाषा वापरणे म्हणजे प्रमाण सोडून बोलणे होय. ब्रह्म अवस्थांच्या पलीकडचे आहे. (८)

जे नसतां दिसे उद्भवली । अवस्था तया लागली ।
ब्रह्मांड उत्पत्ति या बोलीं । अकारमात्रा ॥९॥
जी वस्तू अगोदर काही नसता नव्याने उत्पत्र झाल्यासारखी दिसते. तिच्याच मागे अवस्थांची उपाधी लागते. त्यादृष्टीने ब्रह्मांडाची उत्पत्ती म्हणजे अकारमात्रा होय. (९)

ब्रह्मांड उत्पत्ति अकार । जड समुदाय समग्र ।
हा दृश्यात्मक केर । ब्रह्मीं नाहीं ॥१०॥
ब्रह्मांडाची उत्पत्ती म्हणजे अकार. त्यातून निर्माण झालेला समग्र जड वस्तूंचा समुदाय हा सर्व दृश्यात्मक केर (त्याज्य) होय. ब्रह्मामध्ये त्याला वाव नाही. (१०)

उत्पत्तीचा अभिमानी । ब्रह्मा जाणिजे रजोगुणी ।
महाकल्पीं तयालागुनी । नाश आहे ॥११॥
उत्पत्तीचा अभिमान बाळगणारा ब्रह्मदेव हा रजोगुणी असून महाकल्पाच्या शेवटी त्याचा नाश ठरलेला आहे. (११)

ब्रह्मीं जालें जें स्फुरण । तेथें प्रगटती त्रिगुण ।
एकेक गुणापसून । तिन्ही देव जाले ॥१२॥
ब्रह्मामध्ये जे स्फुरण झाले त्यामध्ये त्रिगुण प्रकट झाले. त्यातील एकेका गुणापासून तीन देव (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) निर्माण झाले. (१२)

सृष्टि स्थिति प्रलय अवस्था । तिघे करिती व्यवस्था ।
उत्पत्ति पालण संहारिता । ब्रह्मा विष्णु महेश ॥१३॥
ह्या तिघांनी आपापसात उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांची व्यवस्था लावली. उत्पत्ती करणारा तो ब्रह्मदेव, पालन करणारा तो विष्णू आणि संहार करणारा तो महेश होय. (१३)

ब्रह्मा करितो उत्पन्न । तयासि नव्हे पालण ।
एकेक अवस्थेचा अभिमान । वाहत असती ॥१४॥
ब्रह्माकडे फक्त उत्पत्तीचा अधिकार आहे. पालनाचा अधिकार त्याच्याकडे नाही. हे तिन्ही देव एकेदा गोष्टीचा अभिमान बाळगत असतात. (१४)

परि ते ब्रह्मसामर्थ्य शक्ति । ब्रह्मयाची काय गति ।
ती शक्ति जेथें लया जाती । तरि अभिमान कैंचा ॥१५॥
पण ती ब्रह्मसामर्थ्यशक्ती आहे तेथे ब्रह्मदेवाची काय मात्रा चालणार ? ती मूळ शक्तीच जेथे लयाला जाते तेथे कशाचा अभिमान धरावा ? (१५)

ब्रह्मदेवापासून मुंगी । चैतन्य सारिखे असे जगीं ।
सामर्थ्य शक्ति वाउगी । न्यूनाधिक दिसे ॥१६॥
ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जगात चैतन्य सारखेच आहे. सामर्थ्यशक्ती मात्र कमीजास्त दिसते. (१६)

न्यूनाधिक जरी दिसलें । दिसतां सामर्थ्य मोठें जालें ।
तयासि अविनाशि कल्पिलें । अज्ञान जनीं ॥१७॥
सामर्थ्य कमीजास्त जरी दिसले तरी सामर्थ्य दिसताच लोकांना ते मोठे वाटते आणि अज्ञानी लोक त्याला अविनाशी मानतात. (१७)

म्हणोनि परमात्मा चतुरानन । बोलोंचि नये अप्रमाण ।
दिग्पाळादि देव संपूर्ण । ते तरी आज्ञाधर ॥१८॥
म्हणून ब्रह्मदेव हा सर्वात मोठा देव (परमात्मा) आहे असे निराधार बोलूच नये. दिक्पाल (दिशांच्या अधिष्ठात्री देवता) इत्यादी देव तर बोलून चालून आज्ञापालन करणारे देव आहेत. (१८)

ब्रह्मांड अवस्था अभिमान । मृगजळ जैसें भासमान ।
परब्रह्म ते निर्गुण । अभिमानातीत ॥१९॥
ब्रह्मांड, अवस्था, अभिमान हे सर्व मृगजळाप्रमाणे भासमान आहेत. पण परब्रह्म मात्र निर्गुण आणि अभिमानातीत (अभिमानरहित) आहे. (१९)

हिरण्यगरभ सत्रा कळांचा । चेष्टविणार ब्रह्मांडाचा ।
हा तरि विकार अष्टधेचा । भासमात्र होय ॥२०॥
ब्रह्मांडाला चेष्टविणारा सत्रा कळांचा हिरण्यगर्भ हा तर अष्टधा प्रकृतीचा विकार होय, त्यामुळे तो भासस्वरूप आहे. (२०)

परि ते नव्हे कीं शाश्वत । कल्पांती लया जात ।
आणि नाना विकारवंत । तें परब्रह्म कैसें ॥२१॥
परंतु तो शाश्वत नाही. कल्पाच्या शेवटी तो लयाला जाणार असतो. अशाप्रकारे निरनिराळे विकार प्राप्त करणारे ते तत्त्व परब्रह्म कसे असेल ? (२१)

स्थिति अवस्था तयाची । म्हणूं नये परमात्म्याची ।
उकार मात्रा तेथीची । परमात्मा केवी ॥२२॥
त्याची (विष्णूची) स्थिती ही अवस्था आहे. ती परमात्म्याची अवस्था असे म्हणू नये. त्याची उकार ही मात्रा आहे. पण तिला परमात्मा कसे म्हणता येईल ? (२२)

पालणाचा अभिमान । विष्णु वाहे आपण ।
नाना अवतार धरून । शरणागतां संरक्षी ॥२३॥
पालनाचा अभिमान स्वतः विष्णू बाळगत असतो. तो निरनिराळे अवतार घेऊन शरणागत भक्तांचे रक्षण करतो. (२३)

तेथें असे सत्वगुण । त्या म्हणों नये निर्गुण ।
मायिकासी शाश्वतपण । मानोचि नये ॥२४॥
त्याच्या ठिकाणी सत्त्वगुणाचे वास्तव्य असल्यामुळे त्याला निर्गुण म्हणता येणार नाही. जे मायिक आहे त्याच्या ठिकाणी शाश्वतपण मानूच नये. (२४)

मायातीत निरंजन । तेथें लावूं नये अभिमान ।
जग न होतां निर्माण । पाळिलें कोणें ॥२५॥
परब्रह्म मायेच्या पलीकडचे असते ते निरंजन म्हणजे निर्विकल्प अथवा निष्कलंक आहे. त्याच्या ठिकाणी अभिमानाचा आरोप करू नये. मुळात जग निर्माण झालेच नाही, मग त्याचे पालन कोण करणार ? (२५)

ऐसें विचारें पाहावें । सारासार शोधावें ।
लोकधाटी भरंगळावें । अविवेकि जनीं ॥२६॥
असा विचार करून पहावे. सार काय, असार काय याचा शोध घ्यावा. जे अविवेकी असतील त्या लोकांनी लोकरीतीप्रमाणे वाटेल तसे भरकटावे. (पण विवेकी लोकांनी तसे करू नये) (२६)

हिरण्यगर्भ पालण अवस्था । उकारमात्रेची व्यवस्था ।
करी पालणाची संस्था । अभिमानें विष्णू ॥२७॥
हिरण्यगर्भ ही पालनअवस्था असून तेथे उकार मात्रेची व्यवस्था मानली आहे. विष्णू अभिमानाने पालनाची जबाबदारी घेतो. (२७)

हें इतुकें मायागुणें । विकाराची लक्षणें ।
यासि निर्मिलें जया कारणें । अव्याकृतें ॥२८॥
हे सर्व मायानिर्मित आहे. ते सर्व विकारी आहे. त्याला अव्याकृत कारणाने निर्माण केले आहे. (२८)

आकार नसतां विकार होत । तयास म्हणावै अव्याकृत ।
सत्‌ म्हणतां नाश होत । असत्‌ तरी जगत्कार्य ॥२९॥
आकाररहित असून जे विकार पावते ते अव्याकृत होय. त्यास सत् म्हटले तर ते नाश पावणारे आहे. त्यास असत् म्हणावे तर जगत्कार्य हे त्याचे कार्य आपल्याला दिसते. (२९)

सदसद्‌-निर्वचनीं । अज्ञानतमाची खाणी ।
हिरण्यगर्भाची उभारणी । जिथून झाली ॥३०॥
त्यामुळे त्याचे सदसत् (सत् असत्) असे वर्णन करावे लागते. हिरण्यगर्भाची उभारणी जेथून झाली ते अव्याकृत अज्ञान तमाची जणु खाणच आहे. (३०)

यासि परमात्मा म्हणतां । लाज न वाटे तत्वतां ।
असज्जड दु:खरूपता । ज्ञानघन कैसा ॥३१॥
त्याला परमात्मा म्हणताना लाज कशी वाटत नाही ? जो असत्, जड, दुःखात्मक आहे. तो ज्ञानधन परमात्मा कसा असेल ? (३१)

होय सर्वांचा संहार । अज्ञान तम साचार ।
अज्ञाना न धरवे धीर । ज्ञानकाळीं ॥३२॥
या सर्वांचा शेवटी संहार होणारच आहे. अज्ञान म्हणजे खरोखर अंधकारच आहे. ज्ञानकाळ येताच अज्ञान तग धरू शकत नाही. (३२)

प्रलय असे जयासी। कैसा म्हणावा अविनाशी ।
मकार मात्रा तयासी । नाम आलें ॥३३॥
ज्याला प्रलय आहे. त्याला अविनाशी कसा म्हणावा ? त्याची मात्रा मकार या नावाने ओळखली जाते. (३३)

रुद्र तयाचा अभिमानी । नेणीव रूप तमोगुणी।
उत्पन्न झालें तयालागुनी । संहार करी ॥३४॥
त्याचा अभिमानी देव रुद्र असून अज्ञानरूप तमोगुण हा त्याचा गुण आहे. जे जे उत्पत्र झाले त्याचा तो संहार करतो. (३४)

उत्पन्नचि झालें नसतां । संहार बोलावा केउता ।
तेणेंविण अभिमान वार्ता । बोलोंचि नये ॥३५॥
खरे पाहता वरील सर्व गोष्टी उत्पत्रच झाल्या नाहीत. मग त्यांचा संहार होतो असे तरी कसे म्हणावे ? पण त्या शिवाय अभिमानाची गोष्ट तरी कशी करावी ? (३५)

हें असो सदाशिव । गुण मायेचा स्वभाव ।
गुणातीत देवाधिदेव । कळला पाहिजे ॥३६॥
हे असू द्या. शंकर सदाशिव हा गुणमायेचा स्वभाव असून देवाधिदेव हा गुणातीत आहे, हे कळले पाहिजे. (३६)

अव्याकृत प्रलय मकार । चौथा अभिमानी महेश्वर ।
माईक कळतां हा विचार । पुढें साच तें कळें ॥३७॥
अव्याकृत हा देह, प्रलय हा अभिमान, मकार ही त्याची मात्रा आणि अभिमानी देवता महेश्वर इत्यादी सर्व मायिक आहेत हे कळल्याबरोबर सत्य काय ते आपोआप स्पष्ट होईल. (३७)

कार्यकारणासी कारण । स्वरूपीं झालें जें स्फुरण ।
मी ब्रह्म हे आठवण । मूळमाया ती ॥३८॥
कार्यकारणांचेही कारण असणाऱ्या स्वरूपामध्ये जे स्फुरण होते, तेथे 'मी ब्रह्म आहे' असे स्मरण होते. त्याला मूळमाया म्हणतात. (३८)

पाणियावरी दिसे तरंग । म्हणों नये तो अभंग ।
नट जैसा आणी सोंग । परी सोंग तें नट नव्हे ॥३९॥
पाण्यावर जो तरंग दिसतो त्याला अभंग म्हणता येत नाही. नट ज्याप्रमाणे एखादे सोंग घेतो पण ते सोंग म्हणजे नट नव्हे, हे ओळखता आले पाहिजे. (३९)

जेथें शाश्वतता न दिसे । तें जाणावें माईक ऐसें ।
म्हणोनि परब्रह्म अनारिसें । तया विलक्षण ॥४०॥
जेथे शाश्वतता दिसून येत नाही, ते मायिक म्हणजे खोटे आहे असे जाणून घ्यावे. म्हणून परब्रह्म हे त्याहून वेगळे आहे, विलक्षण आहे. (४०)

स्फुरणेंवीण सर्वसाक्षित्व । कैसें मानावें सत्यत्व ।
कार्येंवीण कर्तृत्व । न ये जैसें ॥४१॥
ज्याप्रमाणे कार्यावाचून कर्तृत्व (कर्तेपणा) येत नाही, त्याप्रमाणे स्फुरणावाचून सर्वसाक्षित्वही येत नाही. त्या सर्वसाक्षित्वालाही सत्य मानता येत नाही. (४१)

तिही मात्रांसी आधार । अर्धमात्रा हा निर्धार ।
नसतां तिहींचा विकार । मग आधार कोणा ॥४२॥
अकार, उकार व मकार या तिन्ही मात्रांचा अर्धमात्रा हा आधार आहे. (अर्धमात्रा म्हणजे ॐ या अक्षरातील चंद्रबिंदू होय. ) पण वरील तिन्ही मात्रारूप विकारच मुळात अस्तित्वात नसेल तर ती अर्धमात्रा कुणाचा आधार होऊ शकेल ? (४२)

स्फुरणीं चैतन्य बिंबिलें । तें शबलब्रह्म बोलिलें ।
अभिमानें नांव पावलें । सर्वेश्वर ऐसें ॥४३॥
स्फुरणामध्ये मूळ चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते त्याला शबलब्रह्म असे म्हणतात. सर्वसाक्षित्वाचा ते अभिमान बाळगते. त्या अभिमानी देवतेला सर्वेश्वर असे नाव आहे. (४३)

सर्वचि जेथ नाहीं । तरी ईश्वरत्व तैसेंचि पही ।
आतां हें माइक सर्वहि । शाश्वत तें एक ॥४४॥
जेथे सर्वच अस्तित्वात नाही, तेथे सर्वेश्वर देखील तसाच बिनबुडाचा आहे असे समजावे. आतापर्यंत वर्णन केलेले हे चारी देह मायिक असून जे शाश्वत आणि एकटेच आहे ते परब्रह्म तेवढे सत्य आहे. (४४)

जेथें मायाचि स्पर्शेना । आहे परि दिसेना ।
न दिसे परि लोचना । माजीं भरलें ॥४५॥
त्या ठिकाणी माया स्पर्श करू शकत नाही, ते आहे पण दिसत नाही, ते दिसत नाही, पण डोळ्यामध्ये ते व्यापून राहिलेले आहे. (४५)

दृश्या सबाह्यअं तरीं । व्यापून असंभाव्य बाह्येरी ।
ते मर्यादा कोण करी । अनंत अगाध ॥४६॥
दृश्य पसाऱ्यास अंतर्बाह्य व्यापून त्याबाहेरही जे ते कल्पनेच्याही पलीकडे राहिलेले आहे त्याची मर्यादा कोणाला सांगता येईल ? ते परब्रह्म अनंत असून अगाध आहे. (४६)

समुद्रामध्यें खसखस । तैसें परब्रह्मीं दृश्य ।
जालेंचि नसतां तयास । उगेंचि बोलावें ॥४७॥
समुद्रामध्ये जशी खसखस तसे परब्रह्मामध्ये दृश्य विश्व होय. ते दृश्य वास्तविक पहाता झालेलेच नाही. केवळ बोलायचे म्हणून त्याबद्दल बोलावे लागते इतकेच! (४७)

बोलिल्यावीण कळेना । सिद्धांत वचनीं सांपडेना ।
जें जें बोलिजे तें जाणा । तो पूर्वपक्ष ॥४८॥
पण बोलल्यावाचूनही गत्यंतर नाही. कारण बोलले नाही, तर ते कळणार कसे ? पण सत्यरूप सिद्धान्त शब्दांच्या कवेत येणारच नाही. त्याविषयी जे जे बोलू ते ते सर्व पूर्वपक्षच ठरते. (४८)

शब्द पूर्वपक्ष सांडावा । अनुभवें लक्षांश धुंडावा ।
कळतां शब्दाचा गोवा । कांहींच नसें ॥४९॥
ते शब्दरूप पूर्वपक्षाचा त्याग करावा, अनुभवाने त्यातील लक्ष्यार्थ (सूचित अर्थ) शोधावा. तो एकटा लक्षात आला की शब्दांनी निर्माण केलेला गुंता काहीच राहात नाही. (४९)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ईशतनुनिरूपणप्रकारे । प्रथमसमास: ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
तत्पदपंचकोशप्रकार


ब्रह्म दृष्टी दिसेना । मनास तेंहि भासेना ।
परिपूर्ण कळेना । अज्ञानासी ॥१॥
ब्रह्म दृष्टीस दिसत नाही, मनासही भासत नाही, अज्ञानामुळे त्याचे परिपूर्ण स्वरूप कळत नाही. (१)

परब्रह्म कळल्यावीण । चुके कैसें जन्म मरण ।
विवेकें जाणावें निर्गुण । नानायुक्ति अनुभवें ॥२॥
परंतु त्याचे स्वरूप जाणल्याखेरीज जन्ममरण चुकणार कसे ? म्हणून विवेक, विविध युक्तिवाद आणि अनुभव यांच्याद्वारे ते जाणून घ्यावे. (२)

एकदां जरी न कळलें । तरी वारंवार पाहिजे विचारिलें ।
श्रवणमननें आभ्यासिलें । पाहिजे पुन: पुन: ॥३॥
एकवार प्रयत्न करून जर ते कळले नाही, तरी पुन:पुन्हा विचार केला पाहिजे. श्रवण मननाच्या द्वारे पुन:पुन्हा त्याचा अभ्यास केला पाहिजे. (३)

वेद शास्त्र पुराण । करिती नाना निरूपण ।
तेंचि महानुभाव संतजन । प्रगट करिती ॥४॥
वेद शास्त्र पुराणे जे निरनिराळ्या प्रकारांनी विवेचन करतात. तेच संतजन, महानुभाव आपल्या उपदेशातून प्रगट करतात. (४)

परी या जीवाचें अज्ञान । न पालटे भवबंधन ।
ज्याचे अनंत जन्मीचें साधन । तयासि ज्ञान लाभे ॥५॥
पण या जीवाचे अज्ञान एवढे प्रबळ असते की, त्यांचे भवबंधन (संसाराचे बंधन) काही केल्या फिटत नाही. ज्याने अनंत जन्मांमध्ये साधना केली आहे, त्यालाच ज्ञान प्राप्त होते. (५)

परि ज्ञानाचा प्रयत्न । सांडू नये न कळे म्हणुन ।
बळेंचि मनास ओलांडुन । पैलाड जावें ॥६॥
तरी ज्ञानाचा प्रयत्न मात्र काही कळत नाही म्हणून सोडून देऊ नये. बळाने मनास ओलांडून (मनावर मात करून) पलीकडे जावे. (६)

पिंडीं उपाधि मन । ब्रह्मांडीं मूळस्फुरण ।
विचारें तया ओलांडुन । जातां ब्रह्मचि कोंदले ॥७॥
पिंडाच्या ठिकाणी मनाचा मोठा अडथळा (उपाधी) आहे. ब्रह्मांडाच्या ठिकाणी मूळ स्फुरणाचा अडथळा आहे. पण विचाराच्या साहाय्याने हे अडथळे पार केल्यानंतर सर्वत्र ब्रह्मचभरून राहिले आहे. (७)

एकदा अनुभवें जाणितलें । मग जेथें तेथें कोंदाटलें ।
पाहतां न पाहतांहि आलें । प्रत्ययासी ॥८॥
एकदा अनुभवाने (प्रत्यक्ष साक्षात्काराने) ते जाणून घेतले की मग ते सर्वत्र कोंदाटलेलेच आढळते. मग ते पाहिले अथवा न पाहिले तरी प्रत्ययास येते. (८)

जरी तें प्रतीतीस आणावें । पंच कोशातें निवडावें ।
तरी वर्म पडे ठावें । आपेंआप वस्तु ॥९॥
त्याचा प्रत्यय यावा असे वाटले तर पंचकोशांचा निवाडा करावा. त्यामुळे ब्रह्माचे रहस्य आपोआप कळून येईल. (९)

स्थूळ ब्रह्मांड दिसतें । ती जाणावी पंचभूतें ।
अन्नमय ऐसें तयातें । स्थूळापरी जाणावें ॥१०॥
ब्रह्मांडाचे जे स्थूलरूप दिसते ती पंचभूते समजावीत व स्थूलदेहातल्याप्रमाणे त्याला ब्रह्मांडाचा अन्नमय कोश म्हणून ओळखावे. (तो ब्रह्मांडाचा स्थूलदेह होय) (१०)

निज वस्तूसी आच्छादन । म्हणोनियां कोशाभिमान ।
तया अंतरी ओळखण । हिरण्यगर्भ ॥११॥
हे स्थूल रूप आत्मस्वरूपाला आच्छादित करते म्हणून त्याला कोश असे नाव प्राप्त होते. त्याच्या अंतर्भागात हिरण्यगर्भ (ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह) असतो. (११)

तेही त्रिविध एकाहुन । एक असती आवरण ।
सूक्ष्मीं असती कोश तीन । आच्छादक हेतू ॥१२॥
तोही एकावर एक अशा तीन आवरणांचा बनलेला असतो. सूक्ष्म देहात ज्याप्रमाणे (प्राण, मन, बुद्धी असे) तीन आच्छादणारे कोश असतात त्याप्रमाणे येथेही असतात. (१२)

क्रिया कारण कर्ता । सूत्रात्मा विविध तत्वतां ।
प्राण मन बुद्धी पाहतां । त्वंपदापरी ॥१३॥
हा हिरण्यगर्भ क्रिया (प्राण) , करण (मन) , कर्ता (बुद्धी) या तीन तत्त्वांचा बनलेला असतो. त्वंपदाप्रमाणे ही तीन तत्त्वे त्याचे प्राणमय कोश, मनोमय कोश आणि बुद्धिमय कोश होत. (१३)

विहरणत्वादि धर्म वायूचे । कर्म व्यवहार जीवाचे ।
आणि क्रियात्व कर्मेंद्रियाचें । प्राणमय कोश ॥१४॥
वायूचे विहरणादी (संचार इ. ) स्वभावधर्म, जीवांचे (प्राणिमात्रांचे) कर्मव्यवहार व कर्मेन्द्रियांकडून होणाऱ्या क्रिया या सर्वांनी मिळून ब्रह्मांडाचा प्राणमय कोश होतो. (१४)

क्रियात्मकाचें कारण । भोग्यादिकांचें साधन ।
ज्ञानेंद्रिय आणि मन । मनोमय कोश ॥१५॥
या क्रियात्मक प्राणमय कोशाचे कारण, भोग्य अशा विषयांचे साधन म्हणजे ज्ञानेंद्रिये व मन म्हणजे मनोमय कोश होय. (१५)

सर्वांचें जें कर्तेपण । जगत्कार्या निमित्तकारण ।
ज्ञानसूत्रें सर्वां करी भ्रमण । सूत्रधारापरी ॥१६॥
या सर्वांचे जे कर्तृत्व अथवा कर्तेपण, जे जगद्‌रूप कार्याचे निमित्तकारण, जे सूत्रधाराप्रमाणे ज्ञानाच्या सूत्राने सर्वांना फिरविते, (१६)

परी भूतांचे राहे आंतरीं । चेष्टवीतसे नानापरी ।
जगत्कर्माचे व्यापारीं । अलिप्त असे ॥१७॥
आणि सर्व भूतांच्या अंत:करणात राहून त्यांच्याकडून विविध क्रिया करविते, जगरहाटीपासून स्वत: मात्र अलिप्त असते. (१७)

तो जाणिजे विज्ञानमय । सर्वबुद्धीचा समुदाय ।
जेथें असे समष्टिमय । चतुर्थ कोश ॥१८॥
त्या तत्त्वाला विज्ञानमय कोश असे समजून घ्यावे. सर्व सजीवांच्या बुद्धीचा समुदाय तेथे समष्टिरूपाने असतो, तो ब्रह्मांडाचा चौथा विज्ञानमय कोश जाणावा. (१८)

एवं क्रिया कर्म कर्तेपण । हें सूत्रात्म्याचें लक्षण ।
निरोपिले कोश तीन । समष्टिरूप ॥१९॥
अशा त-हेने सूत्रात्मा अथवा हिरण्यगर्भ याचे लक्षण म्हणजे क्रिया, कर्तेपण आणि कर्म होय. अशाप्रकारे सूत्रात्म्याच्या तिन्ही समष्टिरूप कोशांचे निरूपण झाले. (१९)

तया कर्तृत्वाचे अंतरीं । सूक्ष्मत्वें वास करी ।
तो आनंदमय निर्धारी । सर्व सुखाचा कंद ॥२०॥
त्या कर्तृत्वाच्या (विज्ञानमय कोशाच्या) गर्भात सूक्ष्मत्वाने वास्तव्य करणारा आनंदमय कोश आहे. तो सर्व सुखांचा कंद आहे. (२०)

तरी तो न ये प्रतीती । म्हणसी तरी सूक्ष्म अति ।
गूढ असे सर्वा भूतीं । अग्र्यबुद्धीनें कळें ॥२१॥
हा आनंदमय कोश अनुभवास येत नाही, असे म्हणू नकोस. तो अतिशय सूक्ष्म असून सर्व भूतांमध्ये गूढरूपाने असतो. तो सूक्ष्मबुद्धीनेच कळेल. (२१)

पटामाजी तंतू भरला । परि अंशूनें तंतु जाला ।
सूक्ष्मदृष्टी पाहतां आला । जाण तयासी ॥२२॥
पटामध्ये (वस्त्रामध्ये) तंतू भरलेला असतो. पण तंतू ज्या सूक्ष्म कणांचा बनलेला असतो. तो सूक्ष्म दृष्टीनेच (अग्र्य बुद्धीने-अग्र्य टोकदार) पाहता येतो. त्याला समजून घे. (२२)

सर्व बुद्धीसी अधिष्ठान । कर्तृत्वाचेंहि कारण ।
सूक्ष्मरूपें अवस्थान । विज्ञानाचें ॥२३॥
हा आनंदमय कोश सर्व बुद्धीचे अधिष्ठान असून सर्व कर्तृत्वाचेही कारण आहे. विज्ञानमय कोशाचे ते सूक्ष्मतर असे अधिष्ठान आहे. (२३)

ब्रह्मा विष्णु आणि हर । करितां शिणती व्यापार ।
तयासी विश्रांतिमंदिर । परम जे का ॥२४॥
ब्रह्मा, विष्णू, महेश हे विविध व्यापार करतात. शेवटी ते थकून जातात त्यांचे हे सर्वात श्रेष्ठ असे विश्रांति मंदिर आहे. (२४)

जैसे पक्षी व्यापारार्थ फिरती । व्यापारतां बहु कष्टती ।
मग नीडाकडे धांवती । पक्ष संकोचोनी ॥२५॥
ज्याप्रमाणे पक्षी आपापल्या उद्योगासाठी आकाशात फिरतात. त्या उद्योगांमुळे त्यांना पुष्कळ कष्ट होतात. मग आपल्या पंखांचा संकोच करून आपल्या घरट्याकडे ते धाव घेतात. (२५)

तेणेपरी कर्ताकरण । क्रियादिकांसी घेऊन ।
विश्रामा येती आनंदघन । सर्वाधार जो का ॥२६॥
त्याप्रमाणे कर्ता (बुद्धी) , करण (मन) ही क्रियादिकांना (प्राणांना) घेऊन सर्वांचा आधार असलेल्या आनंदाने ओतप्रोत असलेल्या या कोशाकडे धाव घेतात. (२६)

जें जें ज्यापासून जालें । तें तें त्या कारणीं राहिलें ।
तें कारणही कार्यात्वें मिळालें । निज कारणासी ॥२७॥
जे जे ज्यापासून झाले ते ते त्या त्या कारणामध्ये राहतात. शेवटी ते कारणही तत्पूर्वीच्या मूळ कारणाचे कार्यच असते. म्हणून ते कारणही निज मूळ कारणात विलीन होते. (२७)

तरी अवधारा आक्षेप । सर्वांसि आनंद बीजरूप ।
तरि सर्वांसी आपेआप । मोक्ष जाला ॥२८॥
आता यावर एक आक्षेप ऐका. जर आनंद अशा प्रकारे सर्वांनाच बीजरूपाने आधार असेल तर सर्वांनाच आपोआप मोक्ष मिळणार असे होत नाही काय ? (२८)

याचें ऐका उत्तर । सुषुप्तींत क्षीण व्यापार ।
विश्रामती जीव समग्र । परी तो मोक्ष नव्हे ॥२९॥
आता या आक्षेपाचे उत्तर ऐका. झोपेत सर्व व्यापार थांबतात. सर्व जीवांना विश्रांती मिळते. पण तो मोक्ष नव्हे. (२९)

जरी ज्ञानें जाय अज्ञान । तेचि होती पावन ।
येर जे का अज्ञान । पुन्हा जनन पावती ॥३०॥
ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नष्ट होते तेच मुक्त होतात. पावन होतात. बाकीच्या अज्ञानी लोकांना पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. (झोपेत अज्ञान नष्ट होत नाही. ) (३०)

जीवाचे अज्ञान जाय । या हेतू कोश आनंदमय ।
ज्ञानें मूलाज्ञान नष्ट होय । तरिच ब्रह्मप्राप्ती ॥३१॥
जीवाचे अज्ञान जावे म्हणूनच त्या आनंदमय कोशाची योजना आहे. ज्ञानाने मूळ अज्ञान नष्ट होईल, तरच ब्रह्मप्राप्ती शक्य आहे. (३१)

उपादान माया प्रधान । सांख्यवादियांचे लक्षण ।
वेदांती तया अभिधान । अज्ञान ऐसें ॥३२॥
सांख्यवादी ज्या माया अथवा प्रधान यांना उपादान कारण मानतात त्यालाच वेदान्तामध्ये अज्ञान असे नाव आहे. (३२)

तरी सांख्यमत स्वीकारिलें । म्हणसी तरी अज्ञान नाथिलें ।
सत्यत्वेंचि प्रतिपादिलें । सांख्यापरी न वचे ॥३३॥
जरी सांख्यमत मान्य केले तरी सांख्य ज्याप्रमाणे मायेचे सत्यत्व स्वीकारतात त्याप्रमाणे वेदान्तात अज्ञान हे सत्य मानत नाहीत. ते अज्ञान हे खोटे मानतात. त्याला सत्यत्व देता येत नाही. (सांख्यमताप्रमाणे वेदान्तात अज्ञान सत्य मानत नाहीत. ) (३३)

सर्व शास्त्राचा स्वीकार । वेदांती करिती साचार ।
निरसावया भेद मात्र । मतें दूषिती ॥३४॥
वेदान्ती सांख्यांच्या सर्व शास्त्राचा स्वीकार करतात. फक्त जेथे भेद असेल तेथे त्या भेदाचे निरसन करण्यासाठी त्या भित्र मतांना दूषण देतात. (त्या भित्र मतांवर टीका करतात. ) (३४)

मायाप्रधानत्वादि टाकिले । तरी सांख्य वेदांत संमत जाले ।
तेणें सत्यत्वें प्रतिपादिलें । म्हणुन दूषण ॥३५॥
मायेला प्रधान मानणे, तिला सत्य मानणे हे जर सांख्यांनी सोडून दिले तर सांख्य आणि वेदान्तमत एकच आहेत. त्यांनी मायेला सत्य मानले म्हणून वेदान्तामध्ये त्यांना दोष लावला आहे. (३५)

असो कोश आनंदघन । सुषुप्तीपरि अज्ञान ।
स्वानुभवें होतां हनन । जन्ममरण चुके ॥३६॥
असो. हा आनंदमय कोश सुषुप्तीप्रमाणे आहे खरा, पण स्वानुभवाने अज्ञान नष्ट झाले तरच जन्ममरण टळणार आहे. अन्यथा नाही. (३६)

इकडे दृश्य तिकडे स्वरूप । मध्यें शून्यत्वाचा आरोप ।
ज्ञानें निरसतां असद्‌रूप । मद सद्‌रूप सहजची ॥३७॥
एका बाजूला दृश्य पसारा आहे (जागृतीचा) दुसऱ्या बाजूला स्वरूप (ब्रह्मात्मैक्य) आहे. मध्ये शून्यावस्थेचा आरोप आहे. ज्ञानाने असद्पाचा निरास झाला की सहजच सद्पाची प्राप्ती होते. (३७)

म्हणून नेणीव सांडून । ज्ञानघन होतां ज्ञान ।
अज्ञान जातां दुसरें ज्ञान । तेंहि जाय त्यासवें ॥३८॥
म्हणून अज्ञान टाकून जेव्हा सर्व ज्ञानमय होते, अज्ञान गेल्यानंतर जी ज्ञानावस्था येते (मी ब्रह्म आहे, ही जाणीव) तीही त्या अज्ञानाबरोबरच नष्ट होते. (३८)

मग केवळ ब्रह्मचि उरे । त्रिपुटीज्ञान ओसरे ।
साधक साध्यत्व नुरे । साध्यरूप ॥३९॥
त्यानंतर केवळ ब्रह्मच उरते. त्या ज्ञानामध्ये त्रिपुटीने युक्त असलेले (ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान) ज्ञान ओसरते. साधक आणि साध्य असा भेद नष्ट होऊन सर्वच साध्यरूप होते. (३९)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
तत्पदपंचकोशप्रकारे । द्वितीयसमास: ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
मिथ्यात्वविवेचन


सर्वाची बाधा न होतां । सर्वब्रह्मा नव्हे ऐक्यता ।
नि:शेष होय द्वैता । अद्वैत निवळे ॥१॥
सर्वांची मिथ्या (बाधा) म्हणून प्रतीती आली नाही तर सर्व ब्रह्माशी ऐक्य पावणे कठीण आहे. द्वैताची निःशेष हानी होईल तेव्हाच अद्वैताची प्राप्ती होते. (१)

बाधा म्हणिजे मिथ्या ज्ञान । सत्यत्वबुद्धीचें हनन ।
नि:शेष जावें निपटुन । तरी श्रुतिविरोध ॥२॥
बाधा म्हणजे मिथ्या ज्ञान होय. मिथ्याज्ञान म्हणजे सत्यत्वाच्या विचाराचा नाश. मिथ्याज्ञान संपूर्णपणे नाहीसे व्हावे असे म्हणावे तर श्रुतीला (वेदाला) विरोध येतो. (श्रुतीमध्ये प्रपंचाचे वर्णन आढळते. तेव्हा मिथ्याज्ञान संपूर्णपणे नष्ट व्हावे असे म्हटल्याने श्रुतिविरोध येतो. (२)

ज्ञानें मिथ्या ओळखावें । मग दिसेना सुखें नावें ।
परी मिथ्यात्वाचें जाणावें । वर्म कैचें ॥३॥
ज्ञानाने मिथ्या म्हणून ओळखले तरी पुरेसे होईल. मग त्यानंतर खुशाल दिसेना का ? परंतु मिथ्यात्वाचे वर्म मात्र समजून घ्यावे. (३)

मुखें प्रपंच मिथ्या म्हण । अनुभव पुसतां लाजिरवाणें ।
ढोबळे द्रष्टीचें पाहणें । उपेगा न ये ॥४॥
तोंडाने प्रपंच मिथ्या म्हणून बोलत राहायचे, पण कोणी अनुभव विचारला तर लाजिरवाणी अवस्था व्हावी अशा ढोबळ दृष्टीने पाहणे उपयोगाचे नाही. (४)

जैसी रज्जु रज्जुत्वें ओळखितां । सर्पाची नुरेचि वार्ता ।
तैसें स्वानुभवें ब्रह्म जाणतां । न म्हणतां मिथ्या सहजचि॥५॥
एकदा दोरीचे दोरीपण ओळखले की, सापाची गोष्टच उरत नाही. त्याप्रमाणे स्वत:च्या अनुभवाने ब्रह्माची ओळख पटली की बाकीचे सर्व मिथ्या आहे असे न म्हणतादेखील सहजच मिथ्या ठरतात. (५)

जगासि जगत्व केतुले । स्वानुभवें पाहिजे कळलें ।
संपूर्ण जडत्व दिसूं लागलें । कासयानें ॥६॥
जगाचे जगपण म्हणजे काय, हे स्वानुभवानेच कळले पाहिजे. संपूर्ण जगच कशामुळे जड भासते, (६)

एक दिसे एक भासे । चंचल जड दोन ऐसे ।
परि ते दिसती कैसे । सत्य मिथ्या ॥७॥
एक दिसते, एक भासते, एक चंचल आहे, एक जड आहे, हे कळते पण ते सत्य आहे. हे मिथ्या आहे हे कसे काय दिसते ? (७)

मृत्तिकेवाचून काहीं । घटासी वेगळें सत्यत्व नाहीं ।
अस्तिभातिविण पाहीं । जगा रूप कोणतें ॥८॥
घटाला मातीवाचून वेगळे सत्यत्व नाही. त्याप्रमाणे अस्ति, भाति म्हणजे असणे, भासणे यांवाचून जगाला दुसरे रूप नाही. (८)

ज्याच्या असणेंचि असे । ज्याचे भातित्वें दिसे ।
सर्व हे जयास्तव भासे । हें श्रुतीचें वचन ॥९॥
कारण 'त्याच्या असण्यामुळे ते असते, त्याच्या प्रकाशण्याने ते दिसते, त्याच्यामुळेच हे सर्व भासते' असे श्रुतीचेच वचन आहे. (९)

श्रुति युक्ति अनुभव । जगा वेगळेपणें अभाव ।
रूप क्रिया आणि नांव । चौथें किमपि नाहीं ॥१०॥
श्रुती, युक्ती आणि अनुभव या मार्गानी जगाला ब्रह्मावेगळे स्वतंत्र अस्तित्व नाही. जग म्हणजे रूप, क्रिया आणि नाव हेच असून याशिवाय चौथे काही नाही. (१०)

स्थूल उदर कंठ लहान । हें इतुके रूप घट हें अभिधान ।
व्यापार हेचि क्रिया पूर्ण । त्रिविधा एक मृत्तिका ॥११॥
स्थूल उदर (पोट) , लहान कंठ आणि विशिष्ट आकार, घट हे नाव आणि पाणी साठवणे हा व्यापार म्हणजे क्रिया या तीन गुणांनी घट बनतो. रूप, नाव आणिक्रिया या तिन्ही प्रकारात मृत्तिका हे एकच सत्य आहे. (११)

तैसा जडाचा आकार । दिसें तें रूप साचार ।
नामें ठेविलीं अपार । ओळखीकरितां ॥१२॥
त्याप्रमाणे जडाचा आकार, त्याचे जे दिसते ते रूप आणि ओळखीकरता ठेवलेली अनेक नावे, (१२)

तिसरा व्यवहार होता। क्रियात्व आलें पाहतां ।
नाम रूप क्रिया तत्त्वतां । तिन्ही अस्तिभाति ॥१३॥
तिसरा त्याचा होणारा व्यवहार (खरेदी विक्री, पाणी इत्यादीची साठवण) घडला की त्याचे क्रियात्व स्पष्ट होते अशा प्रकारे रूप, नाम आणि क्रिया यांनी घट वेगळा वाटत असला तरी या तिहींनी त्याची अस्ति (आहे) , भाति (दिसतो) आणि प्रियत्व (तो उपयोगी आहे) हीच लक्षणे स्पष्ट होतात. (१३)

नेणून जरी घट घेतां । मृत्तिकाच येतसे हातां ।
जगव्यापार होत असतां । अस्तिभातिप्रियत्व ॥१४॥
अगदी नकळत घट हातात घेतला तरी हातात मृत्तिकाच येते. त्याप्रमाणे जगाचे निरनिराळे व्यापार घडत असताना त्या सर्वांचे खरे स्वरूप अस्ति, भाति, प्रिय एवढेच असते. (१४)

नाम रूप क्रिया तीन । व्यवहारती जीव संपूर्ण ।
सप्तान्नब्राह्मणीं वचन । एतद्विशीं असे ॥१५॥
सर्व जीवांचा व्यवहार नाम, रूप आणि क्रियांनी चालतो. त्या संदर्भात बृहदारण्यकोपनिषदातील सप्तात्र खंडात (बृ. १. ५. १) म्हणजेच सप्तात्र ब्राह्मणात एक वचन आहे. (१५)

समष्टिरूप जीवानें । उत्पन्न केली सप्तधान्नें ।
त्यामाजी तीन अन्नें । आपणासाठीं निर्मिली ॥१६॥
समष्टिरूप जीवाने सात धान्ये निर्माण केली. त्यापैकी तीन अन्ने स्वतःसाठी निर्माण केली. (१६)

सप्तान्नें ती कोणतीं । एक साधारण जया म्हणती ।
यवव्रीह्यादि धान्यें जीं तीं । मनुष्यासाठी ॥१७॥
ही सप्तात्रे कोणती ? तर ज्यांना सर्वसाधारण अत्र असे म्हणतात ती जव, गहू, साळी इत्यादी जी धान्ये ती मनुष्यासाठी निर्माण केली. (१७)

दुसरें क्षीर पशूकरितां । अन्नातें होय निर्मिता ।
देवार्थ अन्नें तत्त्वतां । दर्शपूर्णमास दोन्ही ॥१८॥
दुसरे दूध हे अत्र पशूसाठी त्याने निर्माण केले आणि देवांच्यासाठी निर्माण केलेली अत्रे म्हणजे अमावास्या, पौर्णिमा या तिथींना करावयाची दर्श, पौर्णमास ही दोन श्राद्धे होत. (१८)

प्राण वाणी मन । आत्मार्थ केले निर्माण ।
तिहीचें करितां भोजन । सुखदु:ख पावे ॥१९॥
त्याने स्वत:साठी प्राण, वाणी आणि मन ही अन्ने निर्माण केली. या तिहींचे भोजन करताच तो सुखदुःखे भोगू लागतो. (१९)

अन्नापासून मन जालें । आपचें प्राण निर्मिलें ।
छांदोग्य उपनिषदीं बोलिले । तेजोमय वाणी ॥२०॥
अन्नापासून मन झाले, पाण्यापासून प्राण निर्माण केले आणि तेजापासून वाणी निर्माण केली असे छान्दोग्य उपनिषदात सांगितले आहे. (२०)

नामरूपक्रिया जगासी । उभविले प्राणादिकांसी ।
हे विरोध जरी म्हणसी । तरी अवधारीं पां ॥२१॥
नाम, रूप आणि क्रिया यांनी युक्त अशा जगासाठी प्राण इत्यादी निर्माण केले. यात विरोध येतो असे म्हणशील तर नीट ऐक. (२१)

वाणी म्हणिजे नाम । मनचि रूप हा नेम ।
क्रिया प्राण हें वर्म । कळलें पाहिजे ॥२२॥
वाणी म्हणजेच नाम होय, मन हेच रूप होय आणि क्रिया म्हणजे प्राण होत. हे वर्म येथे कळले पाहिजे. (२२)

एवं नामरूप क्रिया । जीव व्यवहारे तिन्हीं यया ।
अज्ञानें शिणतो वायां । सत्यत्वबुद्धीनें ॥२३॥
अशा प्रकारे नाम, रूप, क्रिया यांच्याशी जीवाचा व्यवहार चालतो. त्यांना अज्ञानामुळे सत्य मानून तो विनाकारण कष्ट भोगतो. (२३)

तरी नाम रूप क्रियेतें । वेगळें सत्यत्व कोणतें ।
विवंचून पाहतां तयातें । अस्तिभाति ॥२४॥
तेव्हा नाम, रूप, क्रिया यांना वेगळे सत्यत्व असे कोणते आहे ? त्यांचा नीट विचार करून पाहिले तर अस्तिभाति हेच त्यांमध्ये आढळेल. (२४)

अस्तिभाति ओळखितां । नामरूपाची माईक वार्ता ।
येणें रीती या जगता । श्रुति बाध बोले ॥२५॥
एकदा त्यांमधील अस्ति, भाति ओळखले की, नाम, रूप इत्यादी असत्य म्हणजे खोटी आहेत हे लक्षात येते. अशा प्रकारे श्रुती (म्हणजे वेद) या जगाला बाधा म्हणजे मिथ्याज्ञान म्हणते, (२५)

जग हें सत्यचि म्हणतां । ब्रह्मलक्षणाची नव्हे सिद्धता ।
ब्रह्मलक्षणें सिद्ध होतां । सहज जगा मिथ्यात्व ॥२६॥
जग हे सत्यच आहे असे म्हटल्यावर ब्रह्म लक्षण सिद्ध होत नाही आणि ब्रह्मलक्षण सिद्ध करू गेले तर जगाला आपोआप मिथ्यात्व येते. (२६)

सर्व ब्रम्ह श्रुति बोले । या दिसती विरोध आले ।
या आक्षेपा ऐकिलें । पाहिजे उत्तर ॥२७॥
श्रुती तर सर्वच ब्रह्म आहे, असे म्हणते. मग वरील मताला विरोध येत नाही काय ? या आक्षेपाचे उत्तर आता ऐका. (२७)

सर्व म्हणिजे बहुत । ब्रह्म तें एक निश्चित ।
सर्व एका विरोध दिसत । म्हणोनि बाधित श्रुति सर्वा ॥२८॥
सर्व म्हणजे पुष्कळ. ब्रह्म एकच आहे, हे निश्चित आहे. सर्व आणि एक या दोन शब्दांत विरोध दिसत असल्यामुळे श्रुती 'सर्वा'ला मिथ्या ठरवते. (२८)

नाना हें कांही नसे । श्रुति सर्वा बाधितसे ।
आहे तें ब्रह्मचि असे । एकरूप ॥२९॥
किंवा हे काही नाहीच असे म्हणून श्रुती 'सर्वा'चा निषेध करते. जे काही आहे ते ब्रह्मच आहे आणि ते एकरूपच आहे, असे श्रुतीचे सांगणे आहे. (२९)

साधकाचे अंतरीं । बैसली नानात्वाची परी ।
सर्व ब्रह्म बोध करी । श्रुति माउली हे ॥३०॥
साधकांच्या मनातच बहुविधपणा घोळत असतो. त्यासाठी हे बहविधत्व सर्व ब्रह्मच आहे असेही श्रुती सांगते. दोन्ही वचनांचा अभिप्राय एकच आहे. (३०)

सर्व मिथ्या हें कळावें । तरिच ब्रह्म अनुभवावें ।
मिथ्या सर्पातें सांडावें । रज्जुज्ञान तरी होय ॥३१॥
सर्व मिथ्या आहे असे कळले तरच ब्रह्माचा अनुभव येऊ शकतो. मिथ्या सर्पाचा त्याग केल्यावरच दोरीचे ज्ञान होऊ शकते. (३१)

ब्रह्म जाणतां अखंड । ब्रम्हीं बुडालें ब्रहांड ।
माया अविद्या थोतांड । वितळून गेलें ॥३२॥
अखंड ब्रह्म जाणले की त्या ब्रह्मात सर्व ब्रह्मांड बुडून जाते आणि माया, अज्ञान इत्यादीचे थोतांड वितळून जाते. (३२)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
मिथ्यात्वविवेचनप्रकारे । तृतीयसमास: ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
ईश्वराभासप्रकार


श्रोता वक्त्यासी म्हणे । जग मिथ्याचि कोटिगुणें ।
परी जीव ईश सत्यपणें । वेगळे असती ॥१॥
श्रोता म्हणतो, "जग कोटि पटींनी मिथ्या आहे, पण जीव व ईश्वर सत्य आहेत म्हणून ते वेगळे आहेत. (१)

हे चेतनत्वें सदोदित । म्हणावे कैसें नाशवंत ।
ऐकोनी आक्षेपाचा संकेत । वक्ता बोलता जाला ॥२॥
ते दोघेही चेतन असल्यामुळे त्यांना नाशवंत कसे म्हणता येईल ? "या आक्षेपाचा रोख ऐकून घेतल्यानंतर वक्ता उत्तर देतो. (२)

जीवेश उभयांपरी । आभासातें निर्मिती ।
माया अविद्या हे श्रुति । तरी सत्य कैसे ॥३॥
मायेत ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते ते ईश्वर आणि अविद्येत ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते ते जीव. असे असल्यामुळे जीव-ईश्वर या दोन्ही आभासांना म्हणजेच प्रतिबिंबांना अनुक्रमे अविद्या आणि माया निर्माण करतात असे श्रुतीच सांगते. मग त्यांना सत्य कसे म्हणावे ? (३)

दर्पणीं प्रतिबिंबिलें । वाटे मुख दुसरें जालें ।
परी तें सर्वथा नाथिलें । आभासमात्र ॥४॥
आरशात पडलेल्या मुखाच्या प्रतिबिंबाकडे पाहिल्यावर असे वाटते की हे दुसरेच मुख आहे. पण ते सर्वप्रकारांनी खोटे व आभासरूप असते. (४)

जरीं जाले जीवेश सत्य । माया अविद्या कैसेनि मिथ्य ।
आणि जीवेशांचें कृत्य । जगहि सत्य जालें ॥५॥
जर जीव व ईश्वर सत्य असतील तर माया आणि अविद्या खोट्या कशा असतील ? आणि जीवेशांनी निर्माण केलेले जगही सत्यच मानावे लागेल. (५)

जग जीव सत्य असतां । ब्रह्म लक्षणाची नसे वार्ता ।
ऐसें विरोधीं बोलतां । वेदांत-हानी ॥६॥
जग आणि जीव यांना सत्य मानले की ब्रह्म लक्षणांची गोष्टच काढता येणार नाही; असे विरोधी मत मांडल्यामुळे वेदान्ताची हानी होते ती वेगळीच. (६)

माया अविद्या नाथिली । प्रतिबिंबा सत्यता कैसी आली ।
छांदोग्य श्रुति बोलिली । अल्प तें भूम नव्हे ॥७॥
माया अविद्या या खोट्या आहेत. प्रतिबिंबाला कधी सत्य मानता आणि येते काय ? यावर छान्दोग्य श्रुतीच असे सांगते की, 'जे अल्प आहे ते कधीच महान ठरत नाही. ' (७)

मिथ्यात्व चिदाभासाचें । पूर्वी निरोपिलें साचें ।
उपाधियोगें प्रतिबिंबाचें । दिसणें असें ॥८॥
चिदाभास मिथ्या आहे हे पूर्वीच सांगितले आहे. केवळ उपाधीमुळे तो प्रतिबिंबासारखा दिसू लागतो. (८)

श्रोता बोले पुढती । मिथ्यात्व असो जीवाप्रति ।
परी ईश्वर स्वयंज्योति । मिथ्या न म्हणावा ॥९॥
श्रोता यावर विचारतो की, जीवाला खोटेपण द्यायचे तर द्या, पण ईश्वर तर स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला मिथ्या म्हणू नये. (९)

ईशाचेनि सत्यपणें । जीव मिथ्या कोण म्हणें ।
उभय आभासाची लक्षणें । सारिखीं असतां ॥१०॥
ईश्वराला सत्यत्व देऊन जीवाला तेवढे मिथ्या कसे म्हणता येईल ? कारण दोघेही सारखेच आभासरूप आहेत, दोघांचीही लक्षणे सारखीच आहेत. (१०)

उभयता आभास कैसे । सर्वज्ञ किंचिज्ज्ञ भेद असे ।
किंचिज्ज्ञ मिथ्या आभासे । सर्वज्ञ तो साच ॥११॥
यावर श्रोता म्हणतो की, तुम्ही ईश्वर व जीव या दोहोंनाही आभास कसे म्हणता ? त्यांच्यात सर्वज्ञ आमि किंचिज्ज्ञ असा भेद आहे. ईश्वर हा सर्व काही जाणतो म्हणून तो सर्वज्ञ आहे. जीव हा फक्त मर्यादित गोष्टीच जाणतो, म्हणून तो किंचिज्ज्ञ आहे. म्हणून अल्पज्ञान असणाऱ्या जीवाला तुम्ही आभास माना, पण सर्वज्ञ ईश्वराला तुम्ही सत्य मानलेच पाहिजे. (११)

उपाधि उंच नीच दिसतां । प्रतिबिंबा नसे भिन्नता ।
त्या उभय उपाधि हरपतां । प्रतिबिंब कोठें पडे ॥१२॥
यावर वक्त्याचे उत्तर असे की, उपाधी कमी जास्त होण्याने प्रतिबिंबत्वावर काही परिणाम पडत नाही. त्या दोन्ही उपाधी नाहीशा झाल्या तर मात्र प्रतिबिंब कोठे पडेल ? (१२)

घटीं प्रतिबिंब नाथिलें । सरोवरींच्या सत्यत्व आलें ।
घटोदक सरोवरहि आटले । तरी दशा समान ॥१३॥
घटातील सूर्याचे प्रतिबिंब खोटे आणि सरोवरातील प्रतिबिंब तेवढे खरे असे म्हणता येईल का ? घटातील, सरोवरातील पाणी दोन्हीही आटले तर दोन्हीची अवस्था सारखीच असणार ना! (१३)

म्हणोनि ईश-जीव-जगासी । सत्यत्वकल्पना कायसी ।
ब्रह्म-अनुभवें तयासी । रूप कैचें ॥१४॥
म्हणून ईश्वर, जीव, जग या तिघांनाही सत्य कसे म्हणता येईल ? ब्रह्माचा अनुभव घेतल्यानंतर त्या तिहींचे अस्तित्व तरी उरेल का ? (१४)

जग जीव मिथ्या भासले । हें बोलणें नीटचि जालें ।
सर्वज्ञासी मिथ्या केलें । न वचे कोणी ॥१५॥
यावर आक्षेपकाचे म्हणणे असे की, जग आणि जीव हे खोटे आभासमय आहेत हे बोलणे ठीक आहे. पण सर्वज्ञ ईश्वराला मिथ्या म्हणायला कोणी धजणार नाही. (१५)

ज्याच्या भयें वायु हाले । ज्या भयें चंद्र सूर्य चाले ।
भूमंडळ आपें धरिलें । ज्याच्या भयें ॥१६॥
ज्याच्या भीतीने वारा हालतो, ज्याच्या भीतीने चंद्र-सूर्य आपापल्या हालचाली करतात, ज्याच्या भीतीने पाण्याने पृथ्वीचा भार धारण केला आहे, (१६)

आणि षड्‌गुण जयाप्रती । नित्य तया भगवान म्हणती ।
ज्ञान वैराग्य यश कीर्ति । मोक्ष संपत्ति ऐश्वर्य ॥१७॥
आणि ज्याच्या ठिकाणी सहा गुण आहेत, (कर्तृत्व, नियंतृत्व, भोक्तृत्व, विभुत्व, साक्षित्व सर्वज्ञत्व असे ईश्वराचे सहा गुण वज्रकोशाने दिले आहेत. ) त्याला नेहमी भगवान म्हणतात; ज्ञान, वैभव, यश, कीर्ती, मोक्ष, संपत्ती हे त्याचे ऐश्वर्य (ईश्वरत्वाचे गण) आहे. (१७)

ऐसिया श्रुति अनंत । ऐश्वर्याते वर्णित ।
तरी ईश्वर हा नेमस्त । सत्यचि असे ॥१८॥
अशा प्रकारे अनेक वेदवाक्ये त्याच्या ऐश्वर्याचे वर्णन करतात, त्यामुळे ईश्वर हा निश्चितपणे सत्यच आहे. (१८)

वक्ता म्हणे सावधान । अनंत श्रुतीचें व्याख्यान ।
करिती ऐश्वर्य वर्णन । परी तात्पर्य वेगळें ॥१९॥
यावर वक्ता म्हणतो की नीट लक्ष देऊन ऐका. श्रुतींनी केलेली ईश्वराच्या ऐश्वर्याची वर्णने पाहिली. पण त्यांचे तात्पर्य वेगळेच आहे. (१९)

जरी वर्णन माईकाचें । सत्यत्व प्रतिपादिलें न वचे ।
तन्न तन्न निषेधाचें । सत्य तरी काज काइ ॥२०॥
मायिक ईश्वराचे सत्यत्व श्रुतींनी सांगितलेले आहे, हे खरे नाही. (श्रुतींनी तसे सांगणे शक्य नाही. ) तसे असते तर 'तत् न तत् न' अशा प्रकारच्या निषेधाचे प्रयोजन तरी काय होते ? (२०)

जीवासी भोगीं प्रीति । कदां नव्हे विरक्ति ।
तया दाखविली भक्ति । कारुण्यास्तव ॥२१॥
जीवाला भोगावर प्रीती आहे. त्यापासून तो कधी विरक्तच होत नाही. त्याची दया येऊन श्रुतीनी त्याला भक्तीचा मार्ग दाखवला. (२१)

सर्वज्ञ ईश्वरा भजावें । संसार दु:ख सांडावें ।
जीवा बोधीतसे बरवें । निवृत्तिसाठीं ॥२२॥
'सर्वज्ञ अशा ईश्वराची भक्ती करावी, संसारातील दु:खातून मुक्त व्हावे' असा उपदेश श्रुती जीवाच्या केवळ निवृत्तीसाठी करत आहे. (२२)

ऐश्वर्यादि बोलिलीं । पुढें तन्न तन्न प्रवर्तली ।
निषेधितां सहजचि झाली । मिथ्यारूप ॥२३॥
श्रुतीने परमेश्वराच्या ऐश्वर्यादी गुणांबद्दल सांगितले. पण त्यानंतर लगेच 'तसे नाही, तसे नाही' असेही तिने सांगितले. या निषेधाने अगोदरची श्रुतिवचने आपोआप मिथ्या ठरली आणि ईश्वरही मिथ्या ठरला. (२३)

स्वप्नीं जैसी राज्यसंपत्ति । गजाश्वरथपदाति ।
स्वप्नी सत्य वाटती । परी जागृतीं कोठें ॥२४॥
स्वप्नातील हत्ती, घोडे, रथ, पायदळ इत्यादी राजैश्वैर्य स्वप्रदशेत खरे वाटते. मग जागृतीच्या अवस्थेत ते कोठे जाते ? (मिथ्याच ठरते. ) (२४)

मायाचि जेथें न दिसे । तरी ऐश्वर्य धर्म काइसे ।
धर्मी जो त्याही न दिसे । सत्यत्वपण ॥२५॥
मुळात मायाच दिसत नाही तेथे ऐश्वर्यादी धर्म कसे दिसणार ? आणि हे गुण धारण करणारा जो ईश्वर त्यालाही मग सत्यत्व दिसणार नाही. (२५)

ईश्वरत्व ,मायेनें कल्पिलें । कल्पितांचि दिसूं लागले ।
जो काल माया तों काल राहिलें । माया निमतां हारपे ॥२६॥
ईश्वरत्वाची कल्पना मायेनेच केली. तिने कल्पना करताच ते दिसू लागले. मायेचे अस्तित्व जोपर्यंत होते तेवढा काळच ते राहिले. माया नष्ट होताच ईश्वरत्वही नाहीसे होते. (२६)

ईशत्व मायेनें केलें । मायेसी सामर्थ्य कैसें आलें।
म्हणसी तरी स्वप्नीं उभविलें । निद्रेनें राज्यादि ॥२७॥
ईश्वराला मायेने निर्माण केले. मग मायेला हे सामर्थ्य कोठून आले ? असे म्हणशील तर निद्रेने स्वप्नात राज्यादी उभे करावेत तसा हा प्रकार आहे. (२७)

निद्रा अंश मायेचा । येवढा बडिवार साचा ।
मग स्वभाव मूळ मायेचा । काय बोलावा ॥२८॥
निद्रा हा मायेचा केवळ एक अंश असून एवढा पसारा उभा करते. मग मूळ मायेचा स्वभाव काय करणार नाही ? (२८)

न घडे तेंचि घडवी । न लोपे तयासी दडवी ।
इचे सामर्थ्याची पदवी । न भूतो न भविष्यति ॥२९॥
जे कधी घडणार नाही तेही माया घडवून आणते; जे कधी लोप पावणार नाही त्यालाही लपवून ठेवते; हिच्या सामर्थ्याची थोरवी कधी झाली नाही, कधी होणार नाही, या स्वरूपाची आहे. (२९)

म्हणोनि बडिवार मायेचा । म्हणो नये कीं साचा ।
माईकें जीवेश तयाचा । मूळीं अभाव ॥३०॥
पण एवढ्यावर लगेच हा मायेचा पसारा खरा आहे असे म्हणू नये. जीव आणि ईश्वर हे मायिक आहेत. त्यांचाही अभावच समजावा. (३०)

पुनरपि श्रोता बोले । सर्वज्ञत्व कैसें आलें ।
तरी हें सर्व निरोपिलें । पाहिजे आतां ॥३१॥
तेव्हा श्रोता पुन्हा म्हणतो, 'ईश्वराला सर्वज्ञत्व कसे येते ? ' तेव्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हे सर्व आता सांगितले पाहिजे. (३१)

अरे धर्मी जिणें कल्पिला । मिथ्यापणें उभा केला ।
धर्माविशीं शीण जाला । हें तो न घडे ॥३२॥
अरे जिने गुणधर्म धारण करणारा मिथ्या ईश्वर निर्माण केला, तिला त्याचे गुणधर्म निर्माण करताना शीण होईल असे कधी होईल का ? ' (३२)

धर्म धर्मित्व करणें । बोलिजे तें माया गुणें ।
चित्रें रेखाटितां होणें । हावभाव सहजची ॥३३॥
धर्म आणि धर्मीपणा यांची निर्मिती ही मायेचीच कायें होत. चित्रे काढल्यानंतर त्यांवरील हावभाव आपोआपच निर्माण होणार ना! (३३)

आभास कूटस्थापरी । ईशत्व ब्रह्मत्वीं निर्धारी ।
अन्योन्य तादात्म्य करी । अविद्यापरी माया ॥३४॥
चिदाभास जसा कूटस्थाच्या अधिष्ठानावर उभा राहतो, त्याप्रमाणे ईश्वरपणादेखील ब्रह्माच्या अधिष्ठानावर उभा राहतो. माया, चिदाभास आणि कूटस्थ यांचा अन्योन्य अध्यास घडवून आणते. (म्हणजे कूटस्थाचे काही गुण चिदाभासाला आणि चिदाभासाचे काही गुण कूटस्थाला चिकटविले जातात. ) त्याप्रमाणेच ईश्वर आणि ब्रह्म यांचा अन्योन्य अध्यास माया घडवून आणते. (३४)

सच्चिदानंद तीन । मुख्य ब्रह्मींचें लक्षण ।
सर्वज्ञ सर्व शक्तिमान । मायाजनित ॥३५॥
ब्रह्माच्या ठिकाणची मुख्य तीन लक्षणे म्हणजे सत्, चित् आणि आनंद ही होत. याउलट त्याचे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान हे गण मायेने निर्माण केलेले आहेत. (३५)

सर्वज्ञ सर्वशक्तिमंत । ब्रह्म जालें निश्चित ।
आनंद आणि सच्चित्‌ । ईश्वरीं आलें ॥३६॥
त्यामुळे ब्रह्म सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान झाले आणि त्याचे सत्, चित् आणि आनंद हे गुण ईश्वरावर लादले गेले. (३६)

ऐसा अन्योन्याध्यस । मुख्य तत्व आणि आभास ।
हेंचि अज्ञान जीवास । अविवेकें केलें ॥३७॥
अशा प्रकारे मुख्य तत्त्व (बिंब, सद्वस्तू, ब्रह्म) आणि आभास यांचा जसा अन्योन्याध्यास होतो तसाच अन्योन्याध्यास अविवेकामुळे अज्ञानी जीवाच्या ठिकाणी होतो. (३७)

सत्य असत्य एक केलें । तें विवेकीं कैसें मानिलें ।
नरोटीसहित खादलें । खोबरें जेणें ॥३८॥
सत्य आणि असत्य यांचे हे एकत्र कालवले जाणे विवेकी लोकांना (विचार करणाऱ्या लोकांना) कसे वाटते ? ते त्यांना नरोटीसहित खोबरे खाण्यासारखे वाटते. (३८)

असार जाणुनी त्यागावें । सार तें शोधून घ्यावें ।
तरिच विवेकी म्हणवावें । सूक्ष्मदृष्टि ॥३९॥
असार काय आहे ते समजून घ्यावे आणि त्याचा त्याग करावा. सार तेवढे बाजूला काढून त्याचा स्वीकार करावा असे करणाऱ्यालाच सूक्ष्म दृष्टी असलेला विचारी माणूस म्हणावे. (३९)

मायेची नुलंघितां भीड । स्वरूपीं नव्हे पवाड ।
म्हणुनि विवेकें घबाड । ब्रह्म तें जाणावें ॥४०॥
मायेची भीड ओलांडल्याखेरीज ब्रह्मरूपामध्ये प्रवेश मिळणार नाही. म्हणून विवेकाच्या साहाय्याने महाभाग्यरूप (घबाड) ब्रह्म जाणून घ्यावे. (४०)

सर्वज्ञत्वादि धर्म । हें मायिक जाणिजे वर्म ।
सच्चिदानंद परम । मायानिरासें कळें ॥४१॥
सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमान हे ईश्वराचे गुणधर्म मायिक (मायानिर्मित) आहेत, हे रहस्य समजून घ्यावे. मायेचे निरसन केल्यानंतर सर्वश्रेष्ठ सच्चिदानंद ब्रह्म कळते. (४१)

निरसतांचे माईक द्वैत । अनुभवा ये अद्वैत ।
अद्वैतीं द्वैताची मात । बोलोंचि नये ॥४२॥
खोट्या द्वैताचे निरसन करताच अद्वैताचा अनुभव येतो. त्यानंतर अद्वैतामध्ये द्वैताची गोष्ट बोलूच नये. (अद्वैतामध्ये द्वैत नावालाही शिल्लक राहात नाही. ) (४२)

येथेंहि श्रोतीं आक्षेपिलें । अद्वैत जरी अनुभवा आलें ।
तरी तें कोठें पाहिलें । द्वैतीं कीं अद्वैतीं ॥४३॥
यावर श्रोत्याने आक्षेप घेतला आहे. अद्वैताचा अनुभव आल्यानंतरदेखील तो अनुभव द्वैतामध्ये आला की अद्वैतामध्ये आला हा प्रश्न उरतोच. (४३)

समाधिकालीं अनंत । जेथें संकल्पाचा घात ।
एकरूप अद्वैत । स्वानुभवें कळे ॥४४॥
यावर उत्तर असे की, समाधिकाळी अनंत संकल्पांचा नाश होतो आणि त्यावेळी अद्वैत एकरूपपणेच कळते. (४४)

कळणें म्हणसी द्वैत । तरी जाणण्यातें जाणत ।
तें तरी एकचि अद्वैत । ज्ञानाज्ञान प्रकाशी ॥४५॥
कळणे हेच द्वैत आहे, असे म्हणत असशील तर ते जाणण्यालाच जाणणारे आहे. त्या ठिकाणी एकच अद्वैत ज्ञान आणि अज्ञान या दोहोंना प्रकाशित करत असते. (४५)

सुषुप्ति जेणें प्रकाशिली । वृत्तिवीण ज्ञप्ति एकली ।
सदोदित कोंदाटली । दुजेनवीण ॥४६॥
ज्याने सुषुप्तीला प्रकाशित केले ते वृत्तिरहित ज्ञान (ज्ञप्ती) एकटेच दुसऱ्याची अपेक्षा न करता अद्वैताने सर्वत्र भरून राहिले आहे. (४६)

द्वैतरहित अनुभविलें । अद्वैत प्रतीतीस आलें ।
द्वैत पाहतां नाथिलें । अद्वैत निवळे ॥४७॥
द्वैतरहितता अनुभवणे म्हणजेच अद्वैताची प्रतीती होय. द्वैत हे मिथ्या आहे हे कळताच अद्वैताची प्राप्ती होते. (४७)

जितुकें अद्वैत ओतप्रोत । तितुकें नकळे सदोदित ।
एकदेशी जे अनुभवित । तेणें सर्व सिद्धि कैची ॥४८॥
अद्वैताची व्याप्ती (विस्तार) जेवढी आहे तेवढे समग्र अद्वैत आपण जाणू शकत नाही. अशा एकदेशी ज्ञानाने (मर्यादित ज्ञानाने) संपूर्ण मोक्ष कसा मिळेल ? (४८)

ऐसें म्हणसी तरी द्वैत । अशेषत्वें कोणा कळत ।
एकदेशी जाणतां समस्त । संपूर्ण कळलें ॥४९॥
असे म्हणत असशील तर द्वैत तरी संपूर्णपणे कोणाला कळते ? तेव्हा एकदेशी द्वैताच्या ज्ञानानेही संपूर्ण द्वैत कळते. (४९)

एकदेशीही जाणतां । सिद्धि होतसे द्वैता ।
तेणेपरी अद्वैता । ज्ञानसिध्दी ॥५०॥
एकदेशी जाणण्यानेही द्वैताची सिद्धी होते. त्याप्रमाणे एकदेशी अद्वैताच्या जाणण्यानेही संपूर्ण अद्वैताची प्राप्ती होते. (५०)

द्वैत मिथ्यापणें कळलें । तें अद्वैतें जाणितलें ।
अद्वैतहि अनुभविलें । स्वतां चिद्‌रूपें ॥५१॥
द्वैत मिथ्या आहे असे कळते ते अद्वैतामध्ये कळते. त्याचप्रमाणे स्वत: चिद्‌रूपच अद्वैताचाही अनुभव घेते. (५१)

परप्रकाश तें द्वैत । स्वप्रकाश अद्वैत ।
द्वैतसिद्धि नसतां होत । अद्वैत असतां सिद्ध नव्हे ॥५२॥
द्वैत परप्रकाश असते. अद्वैत स्वयंप्रकाश असते. द्वैताची सिद्धी ते नसतानाही होत असते, तर अद्वैताची सिद्धी ते असतानासुद्धा होत नाही काय ? (५२)

असो आहे तेंचि आहे । द्वैत कालत्रयीं नव्हे ।
तथापि द्वैतासि जाणताहे । तेंचि अद्वैत ॥५३॥
असो, जे आहे तेच आहे. तथापि द्वैत मात्र कालत्रयीही नाहीच. तरी द्वैताला जे जाणते तेच अद्वैत होय. (५३)

जें जें ज्ञानासी गोचर । तें तें जाणिजे नि:सार ।
न जाणतांहि ज्ञप्तिमात्र । तेचि वस्तु अद्वैत ॥५४॥
ज्ञानाला जे जे दिसते ते ते सर्व नि:सार (साररहित म्हणजे मिथ्या) होय, असे जाणावे. जे जाणता येत नसून केवळ ज्ञप्तिरूपानेच असते त्यालाच अद्वैत ब्रह्म म्हणतात. (५४)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ईश्वराभासप्रकारे । चतुर्थ समास: ॥४॥

हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
केवलब्रह्मनिरूपण


ब्रह्म सदोदित संचले । निश्चल निर्वात भरलें ।
अंतचि नाहीं कोंदाटलें । जेथें जेथें ॥१॥
ब्रह्म सर्वकाळ सर्वत्र भरून राहिले आहे. ते निश्चल, निर्वात (वारा नसलेले) आणि अनंत असून जेथे तेथे कोंदाटले आहे. (१)

ऐसें तैसें म्हणतां नये । ज्ञानाज्ञान म्हणणें काय ।
विचारा न ठके सोय । अमुकें न ये दावितां ॥२॥
ते असे आहे, तसे आहे असे म्हणता येत नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे किंवा अज्ञान आहे, असेही म्हणणे शक्य नाही. विचाराला तेथे आधारच नाही, किंवा ते अमुक म्हणूनही दाखविता येत नाही. (२)

वर्णव्यक्ति किमपी नसे । स्थूल वाड म्हणावें कैसें ।
अणु दीर्घ पोकळसें । ब्रह्म नव्हे ॥३॥
त्याला वर्ण अथवा वेगळेपणा काही नाही, ते स्थूल आहे, मोठे आहे असे त्याच्याबद्दल कसे बोलावे ? ब्रह्म काही अणू, दीर्घ किंवा पोकळ नाही. (३)

घेऊं जातां घेतां नये । सांडु जातां सांडिता नये ।
कोणाचाचि न होय । विषय ब्रह्म ॥४॥
ते घ्यायला गेलो तर घेता येत नाही, ते टाकायला जावे तरी ते टाकता येत नाही. ब्रह्म कुणाचाच विषय होत नाही. (४)

पृथ्वीमध्यें भरलें । पृथ्वीस ज्याचेनि रूप आलें ।
जडत्वीं कठिणत्वीं दाटलें । परी कठिण नव्हे ॥५॥
ते पृथ्वीमध्ये भरून राहिले आहे, पृथ्वीला त्याच्याचमुळे रूप आले आहे, ते जडामध्ये दाट भरून राहिले आहे, कठीण पदार्थातही ते दाटले आहे. पण ते कठीण नाही. (५)

आपीं असे परि भिजेना । अग्निमध्येंहि जळेना ।
वायुमध्यें परि चळेना । वायुसवें ॥६॥
ब्रह्म पाण्यात आहे, पण पाण्याने ते भिजत नाही; अग्नीमध्ये ते जळत नाही, वायूमध्ये असूनही वायूबरोबर ते हालचाल करत नाही. (६)

ब्रह्म आकाशीं असे । परि आकाश डोळां दिसे ।
आकाश ज्याचेनि प्रकाशे । परि तें दिसेना ॥७॥
ब्रह्म आकाशात आहे, पण आकाश डोळ्यांनी दिसते, आकाश त्याच्यामुळेच प्रकाशित होते पण ते स्वत: मात्र दिसत नाही. (७)

आकाशही सर्वा व्यापक । भरून उरलें तिन्हीं लोक ।
परी निज वस्तूचें कौतुक । तें अनारिसें ॥८॥
आकाशदेखील सर्वव्यापक आहे. ते तिन्ही लोक भरून राहिलेले आहे. पण ब्रह्माचे (निजवस्तूचे) कौतुक हे आहे की, ते या सर्वापेक्षा वेगळे आहे. (८)

शून्य नेणीव शब्दगुण । श्रोत्रेंद्रिया होय वेदन ।
पोकळ अवकाश भासमान । आकाश कळे ॥९॥
आकाश हे शून्य आहे, तेथे नेणीव आहे, शब्द हा त्याचा गुण आहे, ते पोकळ आहे, भासमान आहे (ते भासते) अशा प्रकारे आकाशाची ओळख पटते. (९)

नेणिव शब्द भासमान । हें लक्षण नसतां समान ।
ब्रह्म घन परिपूर्ण । म्हणों येतें ॥१०॥
नेणीव, शब्दगुण, भासणारे ही लक्षणे आकाश आणि ब्रह्म यांच्यामध्ये समान नाहीत (म्हणजे आकाशात आहेत आणि ब्रह्मात नाहीत) तरी ब्रह्म गच्च भरलेले आहे. ते परिपूर्ण आहे असे म्हणता येते. (ही लक्षणे मात्र दोहोंना समान आहेत. ) (१०)

सूर्यप्रकाशें गगन । पिवळें होय भासमान ।
काळें होय सूर्याविण । रात्रिमाजीं ॥११॥
सूर्यप्रकाशामुळे आकाश पिवळे भासते. रात्री सूर्य नसताना ते काळे दिसते. (११)

वेगळेपणें कळूं आलें । म्हणुन आकाश नाम जालें ।
एकरसत्वें अनुभविलें । न वचे ब्रह्म ॥१२॥
अशा त-हेने आकाश वेगळेपणाने कळून येते. म्हणून त्याला 'आकाश' असे नाव प्राप्त झाले. तसे ब्रह्म मात्र सर्वत्र एकरसच व्यापलेले असल्यामुळे त्याचा वेगळेपणाने अनुभव येत नाही. (१२)

सूर्याचेनि दिसेना । चंद्रही तया प्रकाशीना ।
अग्निहि कांही भासविना । कष्टि होतां ॥१३॥
ते सूर्याच्या प्रकाशाने दिसत नाही, चंद्रही त्याला प्रकाशित करू शकत नाही, अग्नीही कितीही कष्ट केले तरी त्याच्यावर प्रकाश पाडू शकत नाही. (१३)

परी चंद्र सूर्य पावक । ज्याचे तेजें प्रकाशक ।
त्रिभुवनींची वर्तणूक । ब्रह्मा मध्यें ॥१४॥
परंतु चंद्र, सूर्य, अग्री त्याच्या तेजामुळे इतर पदार्थाना प्रकाशित करतात, ब्रह्मामध्ये सर्व त्रिभुवनाचा व्यापार चालतो. (१४)

अनंत ब्रह्मांडी उतरंडी । अनंत वेळा घडामोडी ।
होतां जातां सांकडी । ब्रह्मीं असेना ॥१५॥
अनंत ब्रह्मांडांच्या उतरंडीची अनंत वेळा जडणघडण ब्रह्मामध्ये होत असताना त्यांचे विनाश होत असताना ब्रह्माला त्यांचे काही संकट नाही. (१५)

पाणियावरी तरंग । होतां जातां पाणी अभंग ।
तैसी मायेची लगबग । परि ब्रह्म जैसें तैसें ॥१६॥
पाण्यावर तरंग उठतात, ते नाहीसे होतात तरी पाणी मात्र अभंगच असते. त्याप्रमाणे मायेचे सर्व व्यापार, सर्व उद्योग ब्रह्मामध्येच होत असले तरी ब्रह्म निर्विकारपणे जसेच्या तसेच राहते. (१६)

मायेपासून तृणांत । ब्रह्म दाटलें अद्‌भुत ।
मायेसहित जें जें निर्मित । जडजात सर्वही ॥१७॥
मायेपासून ते गवताच्या पातीपर्यंत ब्रह्म आश्चर्यकारक त-हेने दाटून राहिले आहे. मायेपासून जे जे काही निर्माण झाले ते सर्व जड विश्व ब्रह्माने व्यापून टाकले आहे. (१७)

अणुमाजीं ब्रह्म असे । ब्रह्म नव्हे अणु ऐसें ।
संपूर्ण ज्याचेनि प्रकाशे । परि तें जडा न कळे ॥१८॥
ब्रह्म अणूमध्ये आहे, पण ते अणूसारखे नाही, संपूर्ण विश्व त्याच्यामुळे प्रकाशित होते, पण त्या विश्वाला जडत्वामुळे ते कळत नाही. (१८)

देहादि जडचि केवळ । मनादि तत्त्वें चंचळ ।
चेतनासारिखें सकळ । परी पर प्रकाश ॥१९॥
देहादी केवळ जड वस्तू, मनासारखी चंचल तत्त्वे इत्यादी चेतनासारखी दिसत असली तरी परप्रकाशितच आहेत. (१९)

इंद्रियें बहिर्मुखें विचरती । परप्रकाशें विषय घेती ।
तया न कळे स्वयंज्योती । कारण दृश्य नव्हे ॥२०॥
इंद्रिये बहिर्मुख होऊन संचार करतात, परप्रकाशाने विषयांचे ग्रहण करतात (त्यांचा भोग घेतात) पण त्यांना स्वयंप्रकाशी परब्रह्म कळत नाही कारण ते इंद्रियग्राह्य (इंद्रियांना दृश्य) नाही. (२०)

अंत:करण मन बुद्धि । यासी इंद्रियांची उपाधी ।
स्वरूपीं घालितां अवधीं । करणत्वा मुकती ॥२१॥
मन, बुद्धी, अंत:करण यांना इंद्रियांची उपाधी आहे (ही अंतरिद्रिये बाह्य इंद्रियांच्या मागे धावतात) त्यांना ब्रह्मामध्ये केंद्रित केल्यास त्यांचे करणत्वच (इंद्रियपणच) नाहीसे होते. (२१)

पाणियामाजीं लवण । न निवडे जैसें भिन्न ।
तैसें बुद्धि आणि मन । वेगळे नुरे ॥२२॥
पाण्यामध्ये मीठ विरून जाते. ते वेगळेपणाने जसे निवडता येत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये लीन झालेली मन, बुद्धीवेगळेपणाने उरतच नाहीत. (२२)

जें जें सुखाकार वाटलें । परि त्या सुखीं मन विरालें ।
वेगळेपणें अनुभविलें । न वचे कदां ॥२३॥
जे जे सुखकर वाटते त्या सुखात मन रमते. पण ब्रह्मसुखात मन विरघळूनच जाते. त्याचा वेगळेपणाने अनुभव येतच नाही. (२३)

तथापि कांही कळलें । तें मनासवें लया गेलें ।
उपरि जें नि:संग भरलें । तें ब्रह्मस्वरूप ॥२४॥
तरीसुद्धा काही कळले असे वाटले तरी ते मनाबरोबरच लय पावते. त्यानंतर जे काही नि:संगपणे उरते ते ब्रह्मस्वरूपच होय. (२४)

जों काल मन उपाधि । तो काल अंतर्बाह्य संधि ।
तेणेंविण निरुपाधि । दिग्देश कैंचा ॥२५॥
जोपर्यंत मनाची उपाधी आहे, तोपर्यंतच अंतर्बाह्य संधी असतात, पण तेच नाहीसे होताच निरुपाधिक ब्रह्मच उरते, तेथे दिशा अथवा प्रदेश कसे असतील ? (२५)

सूर्याकरितां पूर्वोत्तर । दिशा कळती समग्र ।
उत्पन्न नसतां दिनकर । त्यासि काय म्हणावें ॥२६॥
सूर्य आहे म्हणून पूर्व, उत्तर इत्यादी सगळ्या दिशा कळतात. पण सूर्यच उगवला नाही तर त्यांना काय म्हणावे ? (२६)

प्रगटतां सूर्यमंडळ । किरणें प्रकाशे भूमंडळ ।
मायादि तत्त्वें सकळ । प्रकाशती एकसरां ॥२७॥
सूर्यमंडल प्रकट होताच त्याच्या किरणांनी सर्व भूमंडळ प्रकाशित होते. त्याप्रमाणे ब्रह्मामुळे मायादी तत्वे एकदम प्रकाशित होतात. (२७)

आकाशापरी सूर्य होता । मग तेजतमाची नसे वार्ता ।
तैसें स्फुरणाभावीं अनंता । ज्ञानाज्ञान कैचें ॥२८॥
सूर्य जर आकाशाप्रमाणे असता तर तेज, अंधकार यांची गोष्टच करता आली नसती. त्याप्रमाणे स्फुरणच झाले नसते तर अनंताचे ज्ञान किंवा अज्ञान कसे शक्य झाले असते ? (२८)

अपार सदोदित अमुप । निष्कलंक निजरूप ।
अंतचि नाहीं स्वस्वरूप । कैसें बोलावें ॥२९॥
ब्रह्म हे पार (सीमा) नसलेले, नेहमी उदय पावलेले, पुष्कळ, निष्कलंक इत्यादी आहे. त्याला अंतच नसल्यामुळे त्याचे वर्णन कसे करावे ? (२९)

मनबुद्धीसी ब्रह्म कळेना । ऐसेंच जाणावें अनुमाना ।
पुढें सांडून जाणतेपणा । अभिन्न व्हावें ॥३०॥
मन, बुद्धी यांना ब्रह्म कळत नाही तेव्हा ते अनुमानानेच जाणून घ्यावे. पुढे त्या ज्ञानीपणाचाही त्याग करून त्याच्याशी अभिन्न अथवा एकरूप व्हावे. (३०)

ऐसें न जाणोनि जाणावें । विवेकें भिन्नतेसी सांडावें ।
सर्व करणें तें स्वभावें । समाप्त जालें ॥३१॥
अशा प्रकारे न जाणून ते जाणावे, विचारपूर्वक त्याच्याशी जाणवणारी भिन्नता सोडून द्यावी. तेव्हाच सर्व क्रिया आपोआप समाप्त होतात. (३१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
केवलब्रह्मनिर्विकारे । पंचमसमास: ॥५॥
इति तत्पदशोधनप्रकारपंचिका संपूर्णा ॥ ६ ॥ ओवीसंख्या २०५
हरिः ॐ तत्सत्

GO TOP