श्रीमत् शंकराचार्यकृत् योगतारावली

आपलें जीवन आनंदमय बनविण्याच्या दृष्टीनें योगतारावलि हें स्तोत्र अथवा प्रकरण फारच फार उपयुक्त आहे. या स्तोत्राची रचना करून आचार्यांनी खरोखर सामान्य मानवांवर फारच मोठे उपकार केलेले आहेत. व्युत्पन्न आणि बुद्धिमान् असलेले लोक प्रस्थानत्रय वाचतील, त्यावरील भाष्यें वाचतील, शास्त्रग्रंथ वाचतील आणि आत्मकल्याणाचा मार्ग शोधून काढतील, पण ज्यांना शास्त्रव्युत्पत्ति नाहीं असे सामान्य मानव आत्मकल्याणाचें यथार्थ मार्गदर्शन न झाल्यामुळें आत्मकल्याणाला मुकतील आणि हातीं आलेला बहुमोलाचा मानव देह आपण व्यर्थ दवडला असा पश्चात्ताप करण्याची त्यांच्यावर पाळी येईल. असा त्यांच्यावर प्रसंग येऊ नये म्हणून भगवत्पूज्यपाद आचार्य या योगतारावली स्तोत्रांत अज्ञ जनांना आत्मकल्याणाचें मोठ्या दयार्द्र बुद्धीने सक्रिय मार्गदर्शन करीत आहेत. भक्ति, ज्ञान, आणि वैराग्य ही सर्व आत्मकल्याणाची सामग्री खरी, पण ती वाटते तितकी सोपी नाहीं. शेकडों जन्माचे पूर्वपुण्य पदरी असेल तरच भक्तीचा लाभ होतो. ज्ञान मिळविणे ही काय सोपी गोष्ट आहे ? साधे व्यावहारिक ज्ञान देखील सहजासहजी मिळत नाहीं, मग पारमार्थिक ज्ञानाच्या दुर्मिळतेबद्दल काय सांगावे ? वैराग्य हें तर फारच दुर्लभ असते. वैराग्याच्या गोष्टी सोप्या, पण तें अंगीं बाणणे अत्यंत कठीण. वैराग्यामध्ये इंद्रियनिग्रहाला आणि मनोनिग्रहाला प्राधान्य असतें आणि नेमकी तीच गोष्ट अत्यंत अवघड असल्याचें आपल्या प्रतीतीस येईल. बड्या बड्या ज्ञान्यांची जेथें फटफजीति होतें तेथें सामान्य मानवांची कथा काय ? योगाभ्यासाचें खतपाणी घातल्याशिवाय भक्ति, ज्ञान आणि वैराग्य याची बीजे अंतःकरणांत चांगली रुजत नाहींत. भक्ति, ज्ञान, वैराग्य आणि योग या चार पायांच्या चौरंगावर विराजमान झालेला जीवात्माच निजानंदाचा अनुभव घेऊं शकतो. तात्पर्य, भक्ति, ज्ञान आणि वैराग्य यांच्या जोडीला योग हा अत्यंत आवश्यक आहे यांत संशयच नाही.

यावर कोणी विचारील कीं, नित्यनिरतिशय आनंदाच्या प्राप्तीकरितां आवश्यक असलेल्या चतुर्विध सामग्रीपैकीं भक्ति, ज्ञान आणि वैराग्य ही साधने जर दुर्लभ आहेत, तर योग तरी कोठें सुलभ आहे ! योगाभ्यासांतही कष्ट आहेतच. यावर उत्तर असें कीं, खरें आहे. योगाभ्यासही कष्टसाध्य आहे ही गोष्ट खरी आहे, पण तो अभ्यासानें सुलभ आहे यांत संशय नाहीं. योगाभ्यास ही आहे या भावनेने त्याची उपेक्षा करण्यापेक्षा तो हळूहळू अभ्यासिला तर कोणालाही सिद्ध करून घेता येईल इतका तो सोपा आहे. मात्र हळूहळू नित्यनियमानें योगाचा अभ्यास केला पाहिजे. " केल्याने होत आहे रे आधीं केलेंच पाहिजे । यत्न तो देव जाणावा अंतरीं धरितां बरें ॥ " ही समर्थांची उक्ति लक्षांत ठेवून प्रत्येकानें योगाचा अभ्यास अवश्य करावा इतका तो लौकिक दृष्टीनें व पारमार्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

आपल्याला सुख - नित्य सुख पाहिजे आहे ना ? आपल्याला समाधान पाहिजे आहे ना ? तर मग आपलें मन शांत होणें अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मन शांत नाहीं तोपर्यंत आनंद कसा लाभेल ? मनाच्या शांतीसाठी ब्रह्मात्मैक्यभावना होणें आवश्यक आहे. "सर्वं खल्विद ब्रह्म, ब्रह्मैवाहमस्मि, अहं ब्रह्मैवाऽस्मि, हंसः सोऽहम्, शिवोऽहम्" या भावनेला ब्रह्मात्मैक्यभावना असें म्हणतात. बुद्धि निर्मळ असल्याशिवाय ही भावना बुद्धीत खऱ्या अर्थाने ठसत नाहीं. अर्थज्ञानावांचून शब्द हा निरर्थकच असतो. याच अप्रिप्रायानें व्याकरण- महाभाष्यकार देखील "एकः शब्दः सम्यग्ज्ञातः सुप्रयुक्तः स्वर्ग लोके कामधु‌ग्‌भवति " या वाक्यानें अर्थज्ञानपूर्वक शब्दप्रयोगाचेच महत्त्व प्रतिपादन करीत आहेत. अर्थज्ञानाबरोबरच क्रियानुष्ठानही ओघानेंच आलें पाहिजे." क्रियेवीण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचे वमन" हा ही समर्थांचा इशारा विसरून भागणार नाही. "जनीं हीत पंडीत सांडीत गेले, अहंतागुणें ब्रह्मराक्षेस झाले" असा हा भावनाविरही केवल पांडित्याचा दुष्परिणाम अटळ अंसतो. श्रीतुकाराम महाराजांनीं देखील "नाश केला शब्दज्ञानें" या वचनाने केवल शब्दज्ञानाची निरर्थकता दर्शविलेलीच आहे. तात्पर्य, ब्रह्मात्मैक्यभावना ही खऱ्या अर्थाने बुद्धींत प्रति बिंबित होणें आवश्यक आहे. त्यासाठीं बुद्धि निर्मळ होणे आवश्यक आहे. बुद्धि निर्मल होण्यासाठी योगाभ्यासाची आवश्यकता आहे. याच अभिमायानें गीतेंतही श्रीकृष्णप्रभूनी "नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । नचाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ?" ( गी. २-६६) असा आपला अभिप्राय व्यक्त केलेला आहे. याच अभिप्रायानें आचार्यांनी देखील साधकाचे ज्ञान, भक्ति आणि वैराग्य यांना योगाभ्यासाचे अधिष्ठान लाभावे म्हणून या योगतारावलीत योगप्रक्रियेचें दिग्दर्शन केले आहे.

योगतारावलीचा मुख्य विषय नादानुसंधान आहे. मन एकाग्र झाल्याशिवाय खऱ्या आनंदाचा अनुभव येत नाहीं. मनाला एकाग्र करण्याकरितां नादानुसंधान हेंच एक उत्कृष्ट. साधन आहे. तें इतर सर्व साधनांपेक्षां अत्यंत श्रेष्ठ आहे. आचार्यांनी स्वतः अनुभवाने ही गोष्ट पडताळून पाहिलेली आहे. योगतारावली आचार्यांच्या स्वानुभवाचा विषय आहे. आचार्य येथें केवळ शास्त्रार्थाचा विचार करीत नाहींत, तर शास्त्रामध्ये सांगितलेला सिद्धान्त आणि त्या सिद्धान्ताचा साक्षात्कार करून घेण्याची साधने यांचा कार्यकारण भाव योगतारावलींत निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने ते स्वतः चोखाळून पहात आहेत आणि आपल्याला आलेला अनुभव आपल्याप्रमाणे इतरांना घेता यावा, या अनुभवानें प्राप्त होणारी शांति, समाधान आणि अनिर्वचनीय असा नित्यनिरतिशय आनंद आपल्याप्रमाणें इतरांनाही लुटता यावा याच हेतूनें आचार्यांनी या योगतारावलीच्या रूपाने स्वात्मानुभवाचे बोलच लिहून ठेवलेले आहेत.

यावर कोणी असें विचारील कीं, " तमेव विदित्वा अतिमृत्युमेति" " ज्ञानादेवतु कैवल्यम्" इत्यादि वचनांवरून ज्ञानानेच मानव सर्व संसारबंधनांतून मुक्त होतो व ज्ञानानेच कैवल्यसुखाचा अनुभव घेऊं शकतो ही गोष्ट सिद्ध होत आहे, त्याला योगाभ्यासाची जोड कशाला पाहिजे ? खरें आहे. सांसारिक बंधने व दुःखे ही अज्ञान मुलक असल्यामुळें अज्ञानाचा निरास झाल्याशिवाय सांसारिक बंधनांचा निरास होणार नाहीं. सांसारिक बंधने निरस्त झाल्याशिवाय सर्व दुःखांतून सुटका होणार नाहीं व ती झाल्याशिवाय खऱ्या सुखाचा अनुभवही मिळणार नाहीं. अज्ञानाचा निरास ज्ञानानेच होत असल्यामुळें ज्ञान हेंच मोक्षसुखाचें अंतिम साधन होय यांत संशय नाहीं. तथापि केवळ ज्ञानाने अज्ञानाचा निरास होत नसतो ही गोष्ट लक्षांत घ्यावी. ज्या ज्ञानाने अज्ञानाचा निरास व्हावयाचा असतो तें ज्ञान निःसंदिग्ध असावें लागतें, तें ज्ञान दृढ असावें लागतें. ज्ञानाला निःसंदिग्धता आणि दृढता प्राप्त होण्याकरितांच योगाभ्यासाची आवश्यकता आहे. भोजनाने क्षुधानिवृत्ति होते हा कार्यकारणभाव कळल्याने क्षुधा निवृत्त होत नसते. क्षुधानिवृत्तीसाठी प्रयत्नाने पाकनिष्पत्ति करून भोजन करावे लागतें. प्रकाशाने अंधकाराचा नाश होत असतो एवढे कळाल्यानें अंधकार नाहींसा होत नाहीं. तो नाहीसा करण्याकरितां प्रयत्नाने प्रकाश निर्माण करावा लागतो. त्याचप्रमाणे अज्ञानाचा निरास करणारें आत्मज्ञान हें केवळ शब्दज्ञानाने प्राप्त होत नाहीं. त्याच्या प्राप्तीकरितां कांहीं प्रक्रियेची - अभ्यासाची आवश्यकता आहे. त्याच प्रक्रियेला अथवा अभ्यासाला योग असें म्हणतात. या योगाची जोड असल्याशिवाय खऱ्या अर्थाने ज्ञानाचा लाभ होत नाहीं.

ज्ञानी होण्याकरितां योगी होणें हे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाला योगाची जोड नसेल तर तें ज्ञान योगसाधनेच्या अभावीं संदिग्ध आणि शिथिल असल्यामुळें मोक्ष प्राप्त करून देण्याला समर्थ असूं शकत नाहीं. योगाभ्यासालाही पण आत्मज्ञानाची जोड असल्याशिवाय तो योगाभ्यास मोक्षसुखाला कारणीभूत होऊं शकत नाहीं. " योगहीनं कथे ज्ञानं मोक्षदं भवति ध्रुवम् । योगो ही ज्ञानहीनस्तु न क्षमो मोक्षकर्मणि ॥" " तस्माज्ज्ञानं च योगं च मुमुक्षुर्दृढमग्यसेत्।" असें योगतत्त्वोपनिषदांत सांगितलेले आहे.

शास्त्रपचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति या तिन्ही प्रचीतींच्या त्रिवेणी संगमावर येऊन पोहोचल्याशिवाय खऱ्या आनंदांत - आत्मानंदांत अवगाहन केल्याचे समाधान लाभणार नाही. शास्त्रांत सांगितलेळीं प्रमेये आगोदर धुंडाळावीत, तीं गुरूंच्या अनुभवाने पडताळावीत आणि नंतर स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या अनुभवापर्यंत पोहोचावे. उसाची लागवड कशी करावी ? तो कसा वाढवावा ? गुर्‍हाळे कशी चालवावीत ? उसाच्या रसाची खडीसाखर कशी करावी ? या सर्व विषयांचे अगोदर वाचन करावे लागतें. ते विषय ऐकावे लागतात. ती सर्व कृति प्रत्यक्ष पहावी लागते व नंतर स्वतः ती करावी लागते. याप्रमाणे खडीसाखर बनवून ती स्वतः चाखण्यांत जें समाधान आहे तें अनिर्वचनीय आहे. हिमालययाची वर्णने वाचावीत, ऐकावींत आणि स्वतः पायी तीर्थयात्रा करून हिमालयाच्या भव्य स्वरूपाचे दर्शन घ्यावे. त्यांतच खरा आनंद आहे. तीच स्थिति स्वानुभवाने आत्मानंदाचा साक्षात्कार करून घेण्यांत असते.

योग हा ज्ञानदीप उज्ज्वल करण्याचें एक उत्कृष्ट साधन आहे. काष्ठांत असलेला अग्नि काष्ठांचे मंथन अथवा घर्षण केल्याशिवाय प्रकट होत नाहीं. त्याचप्रमाणे योगाभ्यासावांचून बुद्धीमध्ये ज्ञानदीपही प्रज्वलित होणार नाहीं. " यथाग्निर्दारुमध्यस्थो नोत्तिष्ठेन्मथनं विना । विना चाम्यासयोगेन ज्ञानदीपस्तथा नहि ॥" हें वचन योगकुंडल्युपनिषदांतील असल्यामुळें यांतील अभ्यासयोग शब्दाचा अर्थ योगाभ्यास असाच करणें उचित आहे. स्वभावतःच चंचल असलेलें मन योगाभ्यासाशिवाय निश्चल होऊं शकणार नाही. मन आत्मस्वरूपीं निश्चल - स्थिर - अर्थात् एकाग्र झाल्याशिवाय आत्मस्वरूपाचा साक्षात्कारही होणार नाहीं. याच अभिप्रायानें " विदान्मनो धारयेताप्रमत्तः" शहाण्या माणसाने अत्यंत सावधपणानें योगाभ्यासानें मनाची धारणा म्हणजे एकाग्रता संपादन करावी असा श्वेताश्वतरोपनिषदानें आत्मतत्त्वाचे विवेचन करतां करतां योगाभ्यासाचा मोठा मार्मिक इशारा देऊन ठेवलेला आहे.

अध्यात्मज्ञानाला जशी योगाभ्यासाची बैठक आवश्यक आहे त्याचप्रमाणे योगाभ्यासालाही अध्यात्मज्ञानाचा आधार आवश्यक आहे. योगाभ्यासाला अध्यात्मज्ञानाचें साहचर्य नसेल तर तो अध्यात्मज्ञानविरहित योगाभ्यास हा एक सर्कशीतला खेळच ठरेल. पक्कान्न उत्तम आहे, पण त्याला साखर नाहीं खिचडी उत्तम आहे, पण तिला मीठ नाही. त्याचप्रमाणे योगाभ्यास उत्तम आहे पण त्याच्या जोडीला अध्यात्मज्ञान नसेल तर तो योगाभ्यास साखर नसलेल्या पकान्नाप्रमाणें अथवा मीठ नसलेल्या खिचडीप्रमाणे अगदीं निरस ठरेल.

योगाभ्यासाच्या जोडीला अध्यात्मज्ञान नसेल तर त्या योगाभ्यासाला योग हें नांवच देता येणार नाहीं. आत्मसाक्षात्काराची अपेक्षा अंतःकरणांत ठेवून ती पूर्ण करण्याकरिता जे प्रयत्न केले जातात, त्या प्रयत्नांनीं मनाची जी एक विशिष्ट अवस्था संपादिली जाते, मनाला अंतर्मुख करून परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जें स्थिर केले जातें त्या स्थितीलाच योग असें म्हणतात. अशी अग्निपुराणांत योगाची व्याख्या केलेली आहे. " आत्मप्रयत्नसापेक्षा विशिष्टा याः मनोगतिः । तस्या ब्रह्मणि संयोगो योग इत्यभिधीयते ॥ " यद्यपि " योगश्चित्तवृत्तिनिरोधः " चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. अशी पतंजलीनी योगाची व्याख्या केलेली आहे. तथापि त्यांनाही चित्त आत्मप्रवण असणें हें अभिप्रेत आहेच. व्यवहारदशेत चित्त हें निर्विषय कधींच असूं शकत नाहीं अशा स्थितींत त्याचा निरोध करणें म्हणजेच चित्ताला इतर विषयांपासून परावृत्त करून परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणें हें ओघानेच आलें. यालाच योग असें म्हणतात. तात्पर्य योगाच्या जोडीला अध्यात्मविचार आणि अध्यात्मविचारांच्या जोडीला योगाभ्यास हा असलाच पाहिजे.

योग म्हटलें कीं, सर्वसामान्य लोकांना हा विषय आपला नव्हे असें वाटतें. घरदार सर्व कांहीं सोडून गिरिकंदरांत अथवा निर्जन अरण्यांत किंवा नदीच्या कांठीं झोपडी बांधून एकांतांत रहाणाऱ्या लोकांनीच योगाभ्यास करावा अशी सर्वसाधारण लोकांची समजूत असते. पण ती सर्वस्वी खरी नव्हे. जीवांना दुःखांतून सोडविणे हें योगाचे ध्येय. अर्थात् ज्यांना ज्यांना आपण दुःखांतून मुक्त व्हावें अशी इच्छा असेल ते सर्व योगाभ्यासाचे अधिकारी आहेत. स्त्रीपुरुष बालवृद्ध, तरुण आणि प्रौढ, दरिद्री आणि श्रीमंत, अशिक्षित आणि विद्वान् हे सर्वच योगाभ्यासांचे अधिकारी आहेत. योगाभ्यासाला जातपात कांही आड येत नाहीं.

आचार्यांनी या प्रकरणाला योगतारावली हें नांव दिलेले असल्यामुळें या प्रकरणाचा विषय योग आहे ही गोष्ट निर्विवाद होय. आचार्यांच्या योगतारावलींतला योग हा राजयोग आहे. याच अभिप्रायाने योगतारावलीच्या १४, १५ आणि १६ या तिन्ही श्लोकांत राजयोग या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. " राजासौ गच्छति इत्युक्ते सपरिवारस्य राज्ञो गमनं प्रतीयते" राजेसाहेबांची स्वारी चालली आहे असे म्हटलें कीं राजेसाहेबांच्या बरोबर त्यांचा लवाजमाही असल्याचें लक्षांत येतें. त्याचप्रमाणे राजयोगाचा उल्लेख केल्याबरोबर राजयोगाचीं अंगें व उपांगे ही ही विवक्षित असतातच हें निराळें सांगणे नको. याच अभिप्रायाने आम्ही योगतारावलीच्या आधारे राजयोगाचे वर्णन करतांना राजयोगाच्या अंगांचें व उपांगांचेंही अत्यंत संक्षेपाने विवेचन करण्याचें योजिले आहे. आपआपल्या परिस्थितीप्रमाणे ज्यांना ज्यांना जेवढे शक्य असेल त्यांनीं तेवढा अभ्यास अवश्य करावा. सर्व परिस्थिति अनुकूल नसली तरी उद्विग्न अथवा उदास न होतां यथाशक्ति कांहीं न कांहीं तरी योगाभ्यास अवश्य करावा. हा अभ्यास वायां जाणार नाहीं. याने आरोग्य लाभेल, आयुष्य वाढेल, मन प्रसन्न आणि शांत राहील. शेवटीं नित्य आणि निरतिशय आनंदाचा साक्षात्कार होऊन आपण पूर्ण सुखी व्हाल.

इतर स्तोत्रांप्रमाणेच आचार्यांनी योगतारावलीचीही रचना अत्यंत सुंदर, प्रसन्न आणि गोड शब्दांनी केलेली आहे. इतर स्तोत्रांप्रमाणेच हे प्रकरणही नित्य पाठांत ठेवावे अशी याची योग्यता आहे. नक्षत्रे ज्याप्रमाणें आकाशांत प्रकाशत असतात आणि मार्गदर्शनही करीत असतात त्याचप्रमाणे योगाच्या व आत्मज्ञानाच्या क्षेत्रांत हे श्लोक मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. योगमार्गातील ही नक्षत्रपंक्तिच असल्यामुळें या प्रकरणाला योगतारावली असें अन्वर्थ नांव दिले आहे. अभिजित नक्षत्रासह नक्षत्रे अद्वावीस आहेत. योगतारावळींतील चेकांची सरुयाही पण अठ्ठावीसच आहे. एकोणतिसाव्या श्लोकामध्य योगाभ्यासपूर्वक अध्यात्मविचारांनीं आत्मतत्त्वाचा साक्षात्कार झाला म्हणजे आत्मा हा विभु म्हणजे विश्वव्यापी असून तो निरंजन अर्थात् देहादि उपाधीच्या गुणदोषांपासून सर्वस्वी अलिप्त आहे ही गोष्ट बुद्धीला पटते व तो योगी ज्ञानी होऊन जीवन्मुक्त अवस्थेंत विराजमान होतो. असा योगाभ्यासाचा व ज्ञानाचा महिमा वर्णन केलेला आहे. योगतारावलीतील आरंभापासून सत्तावीसपर्यंतचे श्लोक इंद्रवजा आणि उपेंद्रवला वृत्तांतले आहेत. अठ्ठाविसाव्या श्लोकाचा छंद वसंततिलका आहे. त्याचप्रमाणे एकोणतिसावा श्लोक मालिनी वृत्तांतला आहे. आतां आपण प्रत्यक्ष योगतारावलीचा विचार करूं.

वन्दे गुरूणां चरणारविन्दे
     संदर्शित-स्वात्म-सुखावबोधे
जनस्य ये जाङ्‌गलिकायमाने
     संसार-हालाइल-मोह-शान्त्यै ॥ १ ॥

स्वात्मसुखाचा साक्षात्कार ज्यांनीं दाखवून दिला, जे संसाररूपी हालाहल विषाने प्राप्त होणाऱ्या मूच्छेचा निरास करण्याकरितां अज्ञजनांना जडीबुटी देऊन विष उतरविणाऱ्या विषवैद्यांचे कार्य करीत आहेत, त्या श्रीगुरूंच्या चरणारविंदांना मी नमस्कार करीत आहे. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे. सत्तावीस-अठ्ठावीस श्लोकांचे योगतारावली प्रकरण दिसण्यांत अतिशय लहान आहे, पण साधकाला इष्टफल प्राप्त करून घेण्याचा मार्ग दाखविण्यांत तें अतिशय महाच आहे यांत शंकाच नाही. त्याचें हें महत्त्व लक्षांत घेऊनच आचार्यांनी या प्रकरणाच्या आरंभी पहिल्या श्लोकाने मंगलाचरण केलेले आहे. संकल्पित कार्य निर्विघ्नपणें परिसमाप्त व्हावें हा मंगलाचरणाचा उद्देश असतो. याच उद्देशाने विद्वान् तत्त्ववेत्ते आपल्या ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करीत असतात. कांहीं विद्वान् मनांतल्या मनांतच इष्ट देवतेचे स्मरण करून ग्रंथाला आरंभ करतात, तर कांहीं विद्वान श्लोकाच्या रूपाने अथवा वाक्याच्या रूपानेंही मंगलाचरण करीत असतात. त्यांत आपल्याप्रमाणे इतरांनींही मंगलाचरणपूर्वकच कोणत्याही सत्कार्याला आरंभ करावा असें सुचविण्याचा त्यांचा हेतू गर्भित असतोच. मंगलाचरणाने भगवत्कृपेनें संभाव्य विघ्नेंही दूर होत असतात.

या प्रकरणाच्या मंगलाचरणांत आचार्य आपल्या गुरूंच्याच चरणारविंदीं वंदन करीत आहेत. आयुष्याला योग्य ते वळण लावून आयुष्याची सफलता प्राप्त करून देणे आणि जीवाला पूर्ण समाधान व शांति प्राप्त करून देणे, जीवाला पूर्ण सुखी करणें हें थोर कार्य गुरूंकडूनच होत असल्यामुळें गुरूंबद्दल जितकी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी ती थोडीच होईल.

साधु, संत, महात्मे, ऋषि, मुनि, तत्त्ववेत्ते त्याचप्रमाणे पुराणें, उपनिषदे आणि वेद हे सर्वच गुरूंचा महिमा मुक्तकंठाने गात आहेत. कबिरांनीं गुरु आणि गोविंद म्हणजे परमात्मा हे दोघेही आपल्यापुढे उभे असतांना परमेश्वरापेक्षां गुरूंनाच धन्यवाद दिलेले आहेत. " गुरु गोविंद दोऊ खडे काके लागौं पाय । बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय ॥" भागवतकारांनीं तर गुरूंना कर्णधार मानले आहे. आचार्यांना तर साऱ्या त्रिभुवनांत सद्‌गुरूंना कोणाची उपमा द्यावी हे सुचलेच नाहीं. " दृष्टान्तो नेच दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्‌गुरोर्ज्ञानदातुः" असें त्यांनीं शतश्लोकींत स्पष्टच म्हटले आहे. छांदोग्योपनिषदाच्या सहाव्या अध्यायांतही " आचार्यवन् पुरुषोवेद्" सद्‌गुरूंनी मार्गदर्शन केल्याशिवाय आत्मकल्याणाचा ठेवा हातीं लागणार नाहीं. ज्यांना सद्‌गुरु भेटेल त्यांनाच आत्मकल्याणाचा मार्ग दिसेल असा आपला अभिप्राय स्पष्टच दिलेला आहे.

" यस्य देवे पराभक्तिः यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥" ज्याची ईश्वराच्या ठिकाणी दृढभक्ति आहे, पराकोटीचें प्रेम आहे, जसे ईश्वराच्या ठिकाणी तसेच ते गुरूंच्या ठिकाणीही पण आहे, त्यालाच नामरूपात्मक, विश्वप्रपंचाचे अनित्यत्व, देहाचे, धनाचे व वैभवाचे अशाश्वतत्व तसेंच पुत्र, मित्र, कलत्र, आप्त, बांधव आणि शत्रु यांच्यासंबंधांचें क्षणिकत्व हे कळेल. त्याचप्रमाणे आत्म्याचे अजरत्व, निर्विकारत्व, निराकारत्व, निरंजनत्व, निर्गुणत्व तसेच सच्चिदांदरूपत्व हे सर्व कांहीं कळू शकेल. हा सर्व गुरूंचा महिमा लक्षांत घेऊनच " गुरुभक्ति सदा कुर्यात् श्रेयसे भूयसे नरः । गुरुरेव हरिः साक्षान्नाबयमित्यब्रवीच्छ्रुतिः " असा वेदांचा आदेश आहे. हा सर्व अभिप्राय लक्षांत घेऊन आम्हीही " गुरुर्बह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥" या शब्दानी श्रीगुरुंच्या चरणी वंदन करीत आहो.

"संदर्शितस्वात्मसुखावबोधे" स्वात्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग गुरूंनीच दाखविलेला असतो. "गृणाति उपदिशति इति गुरुः" जे आत्मकल्याणाचा अचूक मार्ग दाखवितात, त्यांनाच गुरु असें म्हणतात. "गीर्यते स्तुयते इति गुरुः" अशी गुरुशब्दाची दुसरी व्युत्पत्ति आहे. वेदशास्त्रे देखील ज्यांचा महिमा गातात त्यांना गुरु असें म्हणतात. "गिरति अज्ञानं इति गुरुः" अशी ही एक गुरु शब्दाची व्युत्पत्ति आहे. जे शिष्याचें अज्ञान गिळून टाकतात अर्थात निरस्त करतात त्यांना गुरु असें म्हणतात. याप्रमाणे अज्ञानाचा निरास आणि आत्मज्ञानाचा प्रकाश गुरूंच्याच कृपेने प्राप्त होत असल्यामुळें त्यांचे अज्ञ जीवांवर फार मोठे उपकार असतात. यावर कोणी असें विचारील कीं, परमार्थमार्गात गुरूंची काय आवश्यकता आहे ? शास्त्रे वाचावीत, संतांचे ग्रंथ वाचावेत, म्हणजे अज्ञानाचा निरास होईल, आत्मज्ञानाचा प्रकाश मिळेल. त्याला गुरु कशाला पाहिजे ? भोळ्याभाबड्या लोकांनी गुरूंचे स्तोम माजविले आणि धूर्त लबाड लोकांनी गुरु या नात्यानें लोकांना फसविले तेव्हां परमार्थाच्या मार्गात कोणीही गुरु करूं नये. पण ही शंका बरोबर नाहीं. चोर लुबाडतात म्हणून कोणी धन मिळवावयाचे सोडले आहे का ? वैरी अथवा गुंड घरे जाळतात म्हणून घर बांधावयाचे कोणी सोडले आहे का ? नाहीं. मग धूर्त लोक गुरूंचें सोंग घेऊन फसवितात म्हणून सद्‌गुरुकडून आत्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग समजावून घेणे कां सोडावे ? एऽक रे एऽक, दोऽन रे दोन हें शिकण्याकरितां गुरु लागतो. नवीन गांवीं अपेक्षित असलेलें ठिकाण शोधून काढण्याकरितां गुरु लागतो, तर मग आत्मसुखाच्या साक्षात्काराचा मार्ग शोधण्यासाठी गुरु कां नको ? तो आपल्या बुद्धीने कळेल असें जर कोणी म्हणेल तर ती कल्पना चुकीची आहे. कठोपनिषदामध्ये यमाने नचिकेताला स्पष्टच सांगितलें आहे कीं, बाबा रे ! तूं माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून सांगतो, आत्मसाक्षात्काराचा लाभ हा केवळ तर्काने होणार नाहीं. तो केवळ ग्रंथ वाचून होणार नाहीं. अनुभवी तज्ज्ञ गुरूने सांगितलें तरच तो सुलभ रीतीनें होऊं शकेल. अभ्यास क्रमातील एखाद्या विषयाच्या पुस्तकांची गर्दी असली आणि गाईडही असलें तरी देखील तो विषय तज्ज्ञाच्या मुखातून ऐकल्या शिवाय उलगडत नाहीं. मग आत्मसाक्षात्कारीविषयीं काय सांगावे ? पोहणें शिकावयास गुरु लागतो. उत्तम गायन शिकावयास गुरु लागतो. मलखांबावरील उड्या व कुस्तीतील डावपेच शिकावयास गुरु लागतो. माका, ब्राह्मी गुळवेल इत्यादि वनस्पतींचे ज्ञान करून घेण्यास गुरु लागतो तर मग अध्यात्मज्ञानालाही गुरु लागेल यांत नवल काय ? ज्वर आला म्हणजे मनुष्य वैद्याकडे धाव घेतो. सर्पदंश झाला म्हणजे मांत्रिकाकडे धाव घेतो त्याचप्रमाणे संसारतापानें पोळलेला मानव योग्य अधिकारी गुरूंकडे धावला तर त्यांत वावगें काय आहे ? याच अभिप्रायाने आचार्य या लोकाच्या उत्तरर्धात गुरूचे महत्त्व वर्णन करीत आहेत.

"संसारहालाहलमोहशान्त्यै जनस्य ये जाङ्‍गलिकायमाने भवतः" संसाररूपी हालाहल विषाने प्राप्त झालेल्या मुर्च्छेच्या शांतीकरितां जे अज्ञजनांना विषवैद्याप्रमाणे उपयोगाला येतात, अशा त्या गुरूंच्या चरणारविंदांना मी नमस्कार करतो; असा पहिल्या चरणाशी संबंध जोडून अर्थ लावावा. "संसरति अनेन इति ससारः" अशी संसार शब्दाची व्युत्पत्ति आहे. ज्याच्यामुळे जी व हा पुनः पुन्हा जन्म घेतो, मरतो, या दुःखदायक मृत्युलोकांत भटकतो त्याला संसार असें म्हणतात. अज्ञान अथवा अज्ञानजन्य वासना याच जन्म, मृत्यु आणि दुःख या सर्वांना कारण असल्यामुळें अज्ञान किंवा अज्ञानजन्य वासना हाच संसार शब्दाचा अर्थ झाला. अथवा "संसरति अस्मिन् इति संसारः" या व्युत्पत्तीप्रमाणे विचार केल्यास संसार या शब्दाचा अर्थ मृत्युलोक असाही होतो. अदृष्टाच्या अधीन होऊन जेथे वरचेवर जन्म घ्यावा लागतो व मरावे लागतें त्या मृत्युलोकाला संसार असें म्हणतात. "पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जनी जठरे शयनम् ॥" असें हें संसारचक्राचे रहाटगाडगे सारखे चालू असतें.

संसार हा अत्यंत कष्टप्रद आहे असें शास्त्रे सांगतात. संतमहात्मे त्याल अनुमोदन देतात. आपल्या अनुभवानेही या सिद्धांताला पुष्टिच मिळते. या संसाराला कोणी गहन अरण्याची उपमा देतात, तर कोणी त्याला दुस्तर सागर म्हणतात. आचार्यानीं ऐतरेयोपनिषदाच्या द्वितीय खंडांत या संसारसागराचे मोठे रसभरीत पण यथार्थ स्वरूपाचें व र्णन केले आहें. "अस्मिन् संसारार्णवे अविद्या-काम-कर्म-प्रभव-दुःखोदके, अनन्ते अपारे, निरालम्बे, विषयेन्द्रिय-जनित- सुख-लव-लक्षण-विश्रामे, पञ्चेन्द्रियार्थ-तृणमासरुत-विक्षोभोत्थितानर्थ-शत-महोर्मौ, महारौरवाद्यनेक-निरयगत-हाहेत्यादि -कूजिताक्रोशनोद्भूत-महारवे, सत्य-आर्जव-दान- दया-अहिंसा शम-दम-ध्रुत्यादि- आत्मगुण-पाथेय-पूर्ण ज्ञानोडुपे, सत्सङ्‍ग-सर्वत्यागमार्गे मोक्ष-तीरे, अग्न्यादयो देवताः पतितवत्यः" अग्निवरुण, कुबेर, इंद्र इत्यादि मोठे मोठे देव देखील या संसारसागरात गटांगळ्या खात आहेत. अज्ञानमूलक संकल्प आणि संकल्पमूलक बरींवाईट कर्म यांच्यापासून प्राप्त होणारी दुःखें हेच या संसारसागरांतील अथांग जल होय. अनेक प्रकारच्या दुर्धरव्याधि, जरा आणि मृत्यु, हे या संसारसागरांतील महाभयंकर जलचर आहेत. हा संसारसागर अनादि अनंत आणि अपार आहे. यांत सांपडलेल्या जीवांना कशाचाही आधार नाहीं. स्त्री-पुत्र, वित्तवैभव इत्यादि विषयांपासून होणारे क्षणिक सुख हाच या संसारसागरांतील विसावा वाटतो. विसावा कसला तो ? आभास मात्र आहे. शब्दस्पर्शादि पंचज्ञानेंद्रियांच्या अनुकूल विषयांबद्दल असलेली अनावर तृष्णा हेंच कोणी वादळ-तुफान वारा, या तुफान वाऱ्यामुळे या संसारसागरावर शेकडों अनर्थांच्या प्रचंड लाटा उसळत आहेत. महारौरवादि अनेक यातनांमध्यें खितपत पडलेल्या लोकांचे हाहाकार कण्हणें आणि आक्रोश हीच या संसारसागराची सतत गर्जना चालू असते. काहो ! अशा या भयंकर संसारसागराला तरून जाण्याला कांहीं साधन आहे का ? कांहीं मार्ग आहे का ? आणि या सागराचे पैल तीर तरी कोणतें ? यावर उत्तर देतात - सत्य, आर्जव, दान, दया, अहिंसा, शम, दम, धृति इत्यादि आत्मगुण; गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या आरंभी सांगितलेली दैवी संपत्ति अथवा योगाभ्यासांतील प्राथमिक अंग म्हणून सांगितलेलें यमनियम इत्यादि शिधासामग्रीनें पूर्ण भरलेलें ज्ञानरूपी जहाज हेंच या संसारसागराला तरून जाण्याचें उत्कृष्ट साधन होय. सत्संग आणि सर्वत्याग अर्थात् कर्मफळांची निरपेक्षता हाच या संसारसागराला तरून जाण्याचा मार्ग होय. तसेच मोक्ष अर्थात सर्व-दुःख-विनिर्मुक्ति हेंच या संसारसागराचे पैल तीर आहे. असा आहे हा संसारसागर.

आचार्यांनी प्रकृतस्थलीं संसाराला हालाहल म्हटलेले आहे. हालाहल हें एक महाभयंकर विष आहे. यालाच कालकूट असें म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळीं पहिल्या प्रथम हें निर्माण झालें तेव्हां त्रैलोक्याची त्रेधा उडाली ! आदिगुरु भगवान् शंकर यांनीच त्रैलोक्याला या संकटांतून सोडविलें. प्रकृतस्थलीं सामान्य अज्ञजन हे या संसाररूपी हालाहल विषाच्या बाधेने मूर्च्छित झालेले आहेत. त्यांची विषबाधा दूर होणें आवश्यक आहे. विषबाधा दूर करणाऱ्याला जांगलिक असें म्हणतात. जंगलांतील जडीबुटींचें त्याला चांगले ज्ञान असतें. जडीबुटींच्या साहाय्याने विषबाधेवर उपचार करण्यांत तो निपुण असतो. प्रकृतस्थलीं जांगलिकाचे - विषवैद्याचें काम सद्‌गुरूच करूं शकतात. त्यांच्याशिवाय या संसारविषाची बाधा दूर करण्याला दुसरें कोण समर्थ आहे ? अशा या गुरूंच्या चरणारविंदीं आचार्य म्हणतात, मी नमस्कार करतो.

सदाशिवोक्तानि सपादलक्ष-
     लयावधानानि वसन्ति लोके ।
नादानुसन्धानसमाधिमेकं
     मन्याहे मान्यतमं लयानाम् ॥ २ ॥

पहिल्या श्लोकांत गुरुवंदनरूप मंगलचरण केल्यानंतर आतां या दुसऱ्या श्लोकांत लयाचे अर्थात् चित्ताच्या पूर्ण एकाग्रतेचे परमात्मस्वरूपीं चित्ताने समरस होऊन राहण्याचे स्वतः अनुभवलेले असे सर्वोत्कृष्ट साधन निर्दिष्ट करीत आहेत. "सदाशिवोक्तानि सपादलक्षलयावधानानि लोके वसन्ति, (परं) लयानां मध्ये नादानुसन्धानसमाधिं एकं मान्यतमं मन्यामहे ।" शंकरांनी मनाचा लय करून घेण्याची सव्वा लाख साधने सांगितलेली आहेत. त्या सर्व साधनांनी प्राप्त होणाऱ्या समाधीपेक्षां नादानुसंधानाने प्राप्त होणारी समाधि हीच आम्हांला अत्यंत मान्य आहे असें आम्ही समजतो. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे. लय लागला, लय लागला असे आपण नेहमी म्हणतो, पण लय म्हणजे काय याचा आपण विचार केलेला नसतो. सामान्यपणे आपलें चित्त एखाद्या विषयामध्ये तल्लीन झाले, एकाग्र झालें म्हणजे लय लागला असे आपण समजतो. यावरून चित्ताची एकाग्रता म्हणजे लय असा प्रकृतस्थलीं लय शब्दाचा अर्थ आहे. वस्तुतः कोणत्या तरी विषयांत चित्ताने एकाग्र होणें हा खरा लय नव्हे. बगळाही एकाग्रतेने ध्यान करित असतो, पण त्याच्या एकाग्रतेला कोणी लय म्हणणार नाहीं. कारण त्याच्या ध्यानाचा विषय मासा असतो. कामिनी आणि कांचन हा विषय डोळ्यांपुढें ठेवून कित्येक लोक तन्मय होतात, पण त्यांच्या या तन्मयतेला लय म्हणतां येणार नाहीं. "लयो विषयविस्मृतिः" असें लयाचे लक्षण हठयोगप्रदीपिकेंत केलेले आहे तें अत्यंत समर्पक आहे. कोणत्याही विषयाचें चित्तांत स्मरण न होणें, कोणत्याही विषयाकडे चित्ताने न जाणें अथवा कोणतीही वृत्ति चित्तांत निर्माण न होणें यालाच खरा लय म्हणतात. विषयांची स्मृति ही वासनागूलक असते. मनातील वासना जागृत झाल्या कीं विषयांची आठवण होत असते. याकरिता चित्ताचा लय असा व्हावयास पाहिजे कीं, पुन्हा चित्तामध्ये विषयवासनांची उत्पत्ति होतां कामा नये. ह्यालाच लय असें म्हणतात. तात्पर्य, "अपुनर्वासनोत्थानालयो विषयविस्मृतिः" हेंच लयाचे यथार्थ लक्षण होय. यालाच समाधि असें दुसरें नांव आहे. ही समाधि दोन प्रकारची असते. एक सबीज समाधि व दुसरी निर्बीज समाधि. सबीज समाधीलाच संप्रज्ञात समाधि असें म्हणतात, तर निर्बीज समाधीला असंप्रज्ञात समाधि असें म्हणतात. यांना सविकल्प समाधि व निर्विकल्प समाधि अशींही नांवे आहेत.

निर्विकल्प समाधि ही ध्येयभूत असल्यामुळें ती फलस्वरूप आहे तर सविकल्प समाधि ही निर्विकल्प समाधीचे अगदीं जवळचें अंग होय, म्हणून ती साधनस्वरूप आहे. सविकल्प समाधीमध्यें इतर सर्व विषय मनांतून गेलेले असले तरी मी इष्ट देवतेचे ध्यान करीत आहें, ही वृत्ति मनांत डोकावीत असतेच त्यामुळें ध्याता, ध्यान आणि ध्येय या वृत्तींचा सविकल्प समाधीमध्ये निरास झालेला नसतो. या अवस्थेंत मन सर्वस्वी वृत्तिशून्य होत नाहीं म्हणूनच या अवस्थेला संप्रज्ञात समाधि असें योग शास्त्रांत नांव दिलेले आहे. ज्या वेळेला मनांतून याही वृत्ति मावळतात, कोणतीही वृत्ति मनांत उदयाला येत नाहीं त्या वेळेला त्या समाधीस निर्विकल्प समाधि असें म्हटलें जातें. त्याच समाधीला शास्त्रकारांनी असंप्रज्ञात समाधि अथवा निर्वीज समाधि असें नांव दिले आहे. "तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीजः समाधिः" असे पतंजलींनीं या समाधीचे वर्णन केले आहे. या अवस्थेंत जीव हा स्वस्वरूपी विराजमान होऊन रहात असतो. अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेत असतो. फार काय सांगावें ? तो आनंदरूपच होतो. हाच अभिप्राय " तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम्" या सूत्रांत पतंजलींनी स्पष्ट केलेला आहे. ही अवस्था प्राप्त होणें हाच खरा लय होय.

अव उपसर्गपूर्वक धा धातूचा अर्थ मन लावणे, लक्ष देणें असा आहे. या धातूपासूनच अवधान शब्द निष्पन्न झालेला आहे. अवधान म्हणजे चित्ताची एकाग्रता. चित्ताची एकाग्रता साधण्याची जी साधने आहेत त्यांनाही अवधान असेंच म्हणतात. अवधानामध्ये ध्यानाचा उत्कर्ष असतो. ध्यानाच्या उत्कर्षांतूनच समाधिअवस्थेचा लाभ होत असतो. अवधान याच्या उलट अर्थानें अनवधान अथवा व्यवधान हे शब्द उपयोगांत आणले जातात. अनवधान याच अर्थाने संस्कृतमध्ये, प्रमाद हा शब्द आहे. अमरकोषांत "प्रमादोऽनवधानता" असा पर्याय दिलेला आहे. गैरसावध असणें किंवा चुकीच्या मार्गाने प्रवृत्त होणें याला प्रमाद असें म्हणतात. ज्या वेळेला जे करावयास पाहिजे तें न करणें आणि जें करावयास नको आहे तें करीत बसणे हें प्रमादाचें स्वरूप आहे. "अनवधानतायाः अभावः अवधानम्" असले प्रमाद होऊं न देणें हेंच अवधानाचे लक्षण होय. सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखांची निवृत्ति परमेश्वराच्या कृपेनेच होऊं शकते. "अज्ञान मूलक सांसारिक दुःखांचा निरास हा तत्त्वज्ञानानेच होतो." ही गोष्ट खरी असली तरी तें तत्त्वज्ञान ईश्वरकृपेशिवाय प्राप्त होणार नाहीं. ईश्वर परम दयाळू आणि पूर्ण समर्थ आहे. तो सच्चिदानंद रूप आहे. त्याचें आपण सतत चिंतन केलें पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही वृत्ति चित्तांत निर्माण होतां कामा नये. अशा रीतीनें ईशचितनांत तन्मय होणें, तन्मय होण्याचा प्रयत्न करणें हेंच प्रकृतस्थलीं "अवधान" या शब्दाने अभिप्रेत आहे.

चित्ताची तन्मयता घडवून आणण्याची जी जी सामग्री असेल किंवा जी साधने असतील त्या सर्वांना "अवधान" असेंच म्हणतात. "अन्न हें जीवन आहे" असें आपण म्हणतो. जीवन शब्दाचा तत्त्वतः जगणे हा अर्थ आहे, पण असे असूनही जगण्याचे साधन असलेल्या अन्नालाही जीवन हा शब्द लावला जातोच. त्याचप्रमाणें अवधान शब्दाचा अर्थ लय अथवा चित्ताची एकाग्रता असा असूनही प्रकृतस्थली लयाच्या साधनांना उद्देशून अवधान शब्द योजलेला आहे. अशीं अवधाने अर्थात् चित्ताच्या एकाग्रतेची साधने असंख्य आहेत. तीं सर्व साधने आदिनाथ भगवान शंकर यांनी वर्णन करून सांगितलेली आहेत. ते अखिल विश्वाचे गुरु आहेत. विश्वाच्या कल्याणासाठी जें जें आवश्यक तें सर्व त्यांनीं उपदेशिलेलें आहे. मनाचा लय घडवून आणण्याला अत्यंत उपयुक्त असलेल्या या योगविद्येचेही तेच गुरु आहेत. नाथ म्हणजे स्वामी - संरक्षण करणारा. जीवाची शिवाशी गांठ घालून या जीवाला मृत्युच्या भयापासून व संसाराच्या दुःखांपासून सोडविणारा जर कोणी असेल तर तो एक गुरूच होय. भगवान शंकर हे जगाचे आद्य गुरु आहेत म्हणूनच त्यांना आदिनाथ असें म्हणतात. आदिनाथापासून पुढे मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ अशा परंपरेने ही विद्या चालत आलेली आहे.

आदिनाथ भगवाच सदाशिव यांनी सांगितलेली लयावधानें अर्थात् चित्तलयाचीं साधने "सपादलक्ष" म्हणजे सव्वा लाख आहेत. या ठिकाण सव्वा लाख या शब्दाचा अर्थ असंख्य एवढाच समजावा. हठयोगप्रदीपिका-कारांनी तर सव्वाकोटि संख्येचा उल्लेख केलेला आहे. श्रवण, नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, इष्टदेवतेचें स्मरण, अर्चन, वंदन, इत्यादि भक्तियोग हे सर्व मनाचा लय करण्याचीच साधने होत. धारणा, ध्यान इत्यादि योगाची अंतरंग साधने हीं देखील मनाच्या लयाचींच साधने होत. रूपानुसंधान, स्वरूपानुसंधान, नादानुसंधान, वह्निशिखानुसंधान, दीपशिखानुसंधान, त्राटकक्रिया, शांभवीमुद्रा, खेचरीमुद्रा, उन्मनीमुद्रा, मंत्रजप आणि विविध उपासना इत्यादि असंख्य मनोलयाची साधने आहेत. साध्य एकच असलें तरी अधिकारभेदानें व रुचिभेदाने अनेक साधनांचा निर्देश केलेला आहे. याप्रमाणें लयाची म्हणजे समाधीचीं अनेक साधने लोकांमध्यें प्रसिद्ध आहेत. कांहीं पुस्तकांतून "वसन्ति लोके" या ऐवजी "लसन्तु भूमौ" असा पाठभेद आढळतो. भूमंडलावर मनाचा लय करून घेण्याची अनेक साधने विराजत आहेत. विराजोत बिचारी. असा त्याचा अर्थ करावा.

चित्तलयाच्या असंख्य साधनांत नादानुसंधान हें फारच उच्च कोटीचे उत्कृष्ट साधन होय. अर्था नादानुसंधानाने घडून येणारा चित्ताचा लय हा इतर साधनांनी होणाऱ्या चित्ताच्या लयापेक्षां अत्यंत उत्कृष्ट कोटीचा असतो. मनाला तिळमात्रही त्रास होऊं न देता मनाचे रंजन करीतच नाद हा मनाला आपल्याशी समरस करून घेत असतो. नाद हा परब्रह्मस्वरूप असल्यामुळें नादाशीं समरस झालेलें मन सहजच ब्रह्मस्वरूपीं एकरूप होऊन जाते. तेथें मनाचें मनपण निराळें रहात नाहीं. ते पूर्णपणे मावळून जातें. यालाच उन्मनीभाव असे म्हणतात. या उन्मनीभावामध्यें पूर्ण आनंदाचा साक्षात्कार होत असतो. अशा रीतीनें नादानुसंधानानें घडून येणारा चित्ताचा लय हा सहज अनायासाने पूर्ण आनंदाचा साक्षात्कार करून देणारा असल्यामुळें इतर सर्व लयापेक्षां तो अत्यंत श्रेष्ठ होय यांत शंकाच नाहीं. याच अभिप्रायाने आचार्य या श्लोकाच्या उत्तरार्धात नादानुसंधानाने प्राप्त होणाऱ्या समाधीचें श्रेष्ठत्व वर्णन करीत आहेत. "नादानुसंधान-समाधिमेकं मन्यामहे मान्यतमं लयानाम् ।" इतर कोणत्याही साधनानें प्राप्त होणाऱ्या समाधीपेक्षां नादानुसंधानानें प्राप्त होणारी समाधि हीच एक अत्यंत श्रेष्ठ होय. हे केवळ शास्त्र नसून आमचा अनुभवही याचप्रमाणें ग्वाही देत आहे. याच अभिप्रायाने आचार्यांनी "मन्यामहे" या क्रियापदाची योजना केलेली आहे प्रबोध सुधाकर नांवाच्या प्रकरणांतही आचार्यांनी हाच अभिप्राय स्पष्ट केलेला आहे. "परमानंदानुभवात् सुचिरं नादानुसंधानात् । श्रेष्ठश्चित्तलयोऽयं सत्स्वन्यलयेष्वनेकेषु ॥" नादाच्याच अनुसंधानाने नादाशी समरस असलेलें नादांतर्गत तेज, ब्रह्मचैतन्यस्वरूप आत्मप्रकाश या प्रकाशाचाही साक्षात्कार होत असतो. आत्मस्वरूप असलेल्या या नादांत आणि या रूपांत साधकाचे मन चिरकाल तल्लीन होऊन राहील तर पुन्हा त्याला संसाराचें बंधन प्राप्त होणार नाहीं. "नादाभ्यन्तर्वर्ति ज्योतिर्यद्वर्तते ही चिरम् । तत्र मनो लीन चेन्न पुनः संसारबन्धाय ॥" असा हा नादानुसंधानाचा अगाध महिमा या दुसऱ्या श्लोकाने वर्णिलेला आहे. "राजयोगपदं प्राप्तुं सुखोपायोल्पचेतसाम् । सद्यः प्रत्ययसंधायी जायते नादजो लयः ॥" अनाहतनादाच्या अनुसंधानानें सिद्ध होणारा चित्तलय हा ताबडतोब आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देणारा आहे. अज्ञ जनांना ब्रह्मपदीं लीन होण्याचें तें एक अत्यंत सोपें साधन आहे असें स्वात्मारामयोगी यांनी हठयोगप्रदीपिकेंतही वर्णन केले आहे. म्हणूनच सर्व लयांमध्यें नादानुसंधानाने प्राप्त होणारा लय हा अत्यंत श्रेष्ठ होय.

सरेचपूरैरनिलस्य कुम्भैः
     सर्वासु नाडीषु विशोधितासु ।
अनाहताख्यो बहुभिः प्रकारै-
     रन्तः प्रवर्तेत सदा निनादः ॥ ३ ॥

"सरेचपूरैः अनिलस्य कुम्भैः सर्वासु नाडीषु विशोधितासु (सतीषु) बहुभिः प्रकारैः अनाहताख्यः अन्तः निनादः सदा प्रवर्तेत ।" रेचक आणि पूरक यांच्यासहवर्तमान प्राणवायूचा वरचेवर कुंभक केल्यामुळें देहातील सर्व नाड्या शुद्ध झाल्या असतां अनेक प्रकारांनीं अनाहत नांवाचा अंतर्नाद नेहमी प्रवृत्त होईल. वरचेवर तो ऐकू येईल. असा या तिसऱ्या श्लोकाचा सरळ अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत नादानुसंधानानें प्राप्त होणारी समाधि ही सर्व समाधीमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे असें सांगितलें. त्यावर स्वाभाविकच नाद म्हणजे काय ? तो कसा निर्माण होतो ? तो केव्हा निर्माण होतो ? त्याचे प्रकार किती आहेत ? अनुसंधान म्हणजे काय आणि तें कसें करावे ? इत्यादि प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचे सोपपत्तिक दिग्दर्शन आचार्यांनी या तिसऱ्या श्लोकांत केले आहे. किंबहुना नादोत्पत्ति-प्रक्रियाच येथें सांगणें विवक्षित आहे. श्लोकाच्या पूर्वार्धांत याच प्रक्रियेचा निर्देश केलेला आहे. तेव्हां आपण आतां त्याचाच विचार करूं.

नद्, शब्द करणें, दुमदुमणे, गरजणें या धातूवरून नाद शब्द निष्पन्न, झालेला आहे. जो दुमदुमतो, गरजतो अथवा शब्दरूपानें व्यक्त होतो त्याला नाद असें म्हणतात. नाद आणि निनाद हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. नाद या शब्दाचा अर्थही शब्दच आहे. "शब्दे निनाद- निनद-ध्वनि-ध्वान-रव-स्वनाः" अशा रीतीनें अमरकोशांत शब्दाचे जे पर्याय दिले आहेत. त्यांत नाद शब्दही आहेच. "नद्यते इति नादः" अशी मतंगमुनींनीं नाद शब्दाची व्युत्पत्ति दिलेली आहे. नाद शब्दांतील नकार हा प्राणवायूचा द्योतक असून दकार हा देहामध्यें असलेल्या कायाग्नीचा वाचक आहे. अग्नि आणि वायु यांच्या परस्पर संयोगांतून नादतत्त्वाचा आविर्भाव होत असतो. "यदुक्तं ब्रह्मणः स्थानं ब्रह्मग्रन्थिश्च यः स्मृतः । तन्मध्ये संस्थितः प्राणः प्राणाद्‌वह्निसमुद्‌भवः ॥ वह्निमारुतसंयोगान्नादः समुपजायते ।" "नकारं प्राण इत्याहुर्दकारश्चानलो मतः । जातः प्राणाग्रिसंयोगात्तेन नादोदऽभिधीयते ।" असे मतंगमुनि आणि शार्ङ्गदेव यांनी म्हटलेले आहे.

संस्कारांच्या प्राबल्याने प्रथम आत्म्याच्या ठिकाणी संकल्पाचें स्फुरण होतें. नंतर मनाला प्रेरणा मिळते. मनाचा कायाग्नीवर आघात होतो. तो कायाग्नि मुलाधारचक्रांत ब्रह्मग्रंथीच्या आश्रयानें असलेल्या वायुवर आघात करतो. कायाग्नीच्या आघाताने संचलित झालेला प्राणवायु हा तेथून शरीरांत ऊर्ध्वगामी होतो. वायुच्या आघाताने मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या चक्रातील दलांच्या ठिकाणींही स्पंदन सुरू होतें. त्या स्पंदनांतच नादतत्त्व अभिव्यक्त होण्याचे बीज असतें. सूक्ष्म नादलहरींना बरोबर घेऊन तो प्राणवायु ज्या वेळीं हृदयाच्या आसमंतात् संचार करतो त्या वेळीं त्या नादांना सुस्पष्ट स्वरूप प्राप्त होतें. हृदयस्थानी असलेल्या अनाहतचक्रांत या नादाला सुस्पष्ट स्वरूप आलेले असलें तरी हा नाद सर्वांना ग्रहण करतां येत नाहीं. गुरुकृपा, ईशकृपा आणि पूर्वजन्मींच्या अथवा इहजन्मींच्या योगाभ्यासाचे पाठबळ ज्यांना असेल तेच हा नाद ऐकू शकतात.

प्रकृतस्थलीं नादाला अनाहत असें जें म्हटलें आहे, ती एक पारिभाषिक संज्ञा आहे. तत्त्वतः नाद हा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्याला उत्पत्ति नाहीं व विनाशही नाहीं. विश्वांत व्यापून असलेले तेजस्तत्त्व हें जसे दोन काष्ठांच्या संघर्षणानें अग्निरूपाने अभिव्यक्त होतें, इंधनाच्याच आकारानें तें प्रतीतीला येतें व इंधनरूपी उपाधि संपला कीं, तें आपल्या मूळ स्वरूपांत विलीन होते त्याचप्रमाणे नादतत्त्व देखील ब्रह्मग्रंथि किंवा ब्रह्मस्थान म्हणून समजल्या जाणाऱ्या आधारकंदांत प्राणवायु आणि कायाग्नि यांच्या संघर्षांतून अभिव्यक्त होत असतें. परा आणि पश्यन्ती या दोन अवस्थेतून वर अनाहतचक्राच्या ठिकाणी आल्यानंतर त्याचें स्वरूप अधिक स्पष्ट होत असतें. तथापि सामान्य जनांना त्याचें ग्रहण होत नाही. तो नाद तसाच ऊर्ध्वगामी होत होत शेवटीं मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलातील महाकाशांत लीन होऊन जातो. अशा रीतीने हा नाद आंतल्या आंतच अभिव्यक्त होतो व लीन होतो. याच अभिप्रायाने या नादाला अनाहत नाद असें म्हटलेले आहे. "आहतोऽनाहतश्चेति द्विधा नादो निगद्यते ।"

नादलहरींनीं संवलित असलेला प्राणवायु हा विशुद्धिचक्राजवळ कंठस्थानी आला म्हणजे त्याला अस्पष्ट वैखरीचे स्वरूप येतें आणि तेथून पुढें तो कंठ, तालु, मूर्धा, दंत आणि ओष्ठ या उपाधींचे साहाय्य घेऊन जेव्हां प्रकट होतो तेव्हां त्याला आहत नाद असें म्हटलें जातें, या आहत नादालाच उपाधिभेदानें भिन्न-भिन्न वर्णांचे स्वरूप येतें. या वर्णांच्या विशिष्ट समूहालाच शब्द किंवा पद असें म्हटलें जातें व "पदसमूहो वाक्यं" या लक्षणाप्रमाणे पदांच्या समूहाला वाक्याचें स्वरूप येतें. ही वाक्यें अथवा ही भाषाच सर्व वाग्व्यवहाराचें साधन होय " नादेन व्यज्यते वर्णः पदं वर्णात् पदाद्‍वचः । वचसो व्यवहारोऽयं नादाधीनमतो जगत् " ( संगीतरत्नाकर)

अंतर्नादासंबंधानें आणखी एक विचार. तंबोऱ्यांत चारच तारा आणि दोनच स्वर असतात. ते म्हणजे षड्ज आणि पंचम. तंबोरा उभा धरून आपण वाजवू लागलो कीं, उजवीकडील शेवटची तार मध्यसप्तकांतील षड्ज दाखविते. डावीकडील पहिली तार मध्यसप्तकातील पंचम दाखविते तर मधल्या दोन तारा ज्यांना जोड अशी संज्ञा आहे त्या तारसप्तकांतील षड्ज दाखवितात. या तारा लयबद्ध पद्धतीने आपण छेडूं लागलो कीं, षड्ज आणि पंचम हे दोन स्वर स्पष्टच श्रुतिगोचर होतात. दोन्ही स्वर व्यक्त होतांना तारांवर बोटांचा आघात होत असल्यामुळें हे स्वर आघातजन्य आहेत असें म्हणावे लागतें. यांनाच आहत ध्वनि असे दुसरे नांव देता येईल. षड्ज आणि पंचम या दोन्ही संवादी स्वरांचे अगदीं बरोबर संमीलन झालें कीं, त्यांतूनच अगदीं स्पष्टपणे ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत आणि निषाद याही स्वरांचा आविर्भाव होत असल्याचें ऐकू येते. हे जे इतर स्वरांचे ध्वनि ऐकू येतात त्या ध्वनींना व्यक्त करणाऱ्या तारा तंबोऱ्यांत नसतात. अर्थातू षड्ज आणि पंचम सोडून बाकीचे ऐकून प्रतीतीस येणारे स्वर अथवा ध्वनि त्यांनाही तंबोऱ्यांतील अनाहत ध्वनि असेंच म्हणावें लागेल.

षड्ज आणि पंचम या आहत ध्वनीपेक्षा ऋषभ, गंधार इत्यादि अनाहत ध्वनि जे तंबोऱ्यांतून व्यक्त होतात ते मनाला फारच आकर्षक वाटतात. बाह्य ध्वनीपेक्षा या अनाहत अंतर्ध्वनीमध्ये मनाचा चटकन लय होतो. मन तेथें तल्लीन होऊन जातें. मनाला अपूर्व आनंद वाटतो. याच न्यायाने देहाांतर्गत अनाहत ध्वनींचे स्वरूप समजावे. तंबोर्‍यांत अभिव्यक्त होणाऱ्या अनाहत स्वरांना अभिव्यक्त करणाऱ्या तारा तंबोऱ्यांत नसतात व त्यांच्या आघाताचा प्रश्नही उपस्थित होत नाहीं. मग हे स्वर किंवा हे अनाहत ध्वनि आले कोठून ? असा प्रश्न पुढें येतोच. याला उत्तर असें कीं, ध्वनीचे मूळ स्पंदनांत आहे. षड्ज आणि पंचम दाखविणाऱ्या तारांच्या ठिकाणी आघाताने स्पंदन सुरू झाले कीं, ह्या स्पदनक्रियेने निर्माण होणाऱ्या नादलहरींचेही परस्परामध्यें संवलन हे होतच असतें. स्पंदन हें तारांच्या ठिकाणी होत असतें, पण त्याच्या लहरी आकाशभर पसरत असतात. त्या स्पंदनांच्या लहरींतच अवांतर स्वरांची अधिष्ठाने असतात. त्या स्पंदनलहरी विशिष्ट मर्यादेत येऊन पोहोचल्या कीं तेथें निराळ्या ध्वनीचा अथवा विशिष्ट स्वरांचा आविर्भाव होत रहातो. हाच अनाहत ध्वनि अथवा अनाहत स्वर होय.

आपल्या देहांतही मूलाधारचक्रापासून स्पंदनाला आरंभ होतो. त्या स्पंदनांच्या लहरी शरीरातील विविध चक्रांच्या विविध दलातून लहरतात. लहरींतून लहरी अशा असंख्य लहरींच्या परंपरा निर्माण होतात. त्याच लहरी अथवा तींच स्पंदने विशिष्ट संख्येने विशिष्ट अवस्थेल येऊन पोहोचली म्हणजे त्यांतून अनाहत स्वरूपाचे विविध ध्वनि कानाच्या आतील पडद्यावर येऊन आदळतात व आपल्याला अंतर्ध्वनीचा - अंतर्नादाचा अथवा अनाहत ध्वनीचा किंवा अनाहत नादाचा साक्षात्कार होत असतो. तेथें मनाचा लय झाला म्हणजे अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव येतो.

कांहीं लोक अनाहत नाद आणि त्यांचें श्रवण यांचा हा लौकिक कार्य-कारणभाव मानीत नाहींत. अनाहतध्वनि हा अलौकिक आहे व त्याचें श्रवणही अलौकिक श्रवणेंद्रियानेच होत असतें असें ते म्हणतात. ज्याप्रमाणे परमेश्वराचे दिव्य रूप अथवा दिव्य ऐश्वर्य अवलोकन करण्याकरितां दिव्य दृष्टीची गरज असते त्याचप्रमाणे परमात्मस्वरूप अनाहतनाद श्रवण करण्याकरिताही दिव्य श्रवणेंद्रियांची गरज असते. परमेश्वराच्या कृपेनेच या दिव्य श्रवणेंद्रियांचा लाभ होऊन साधकाला अनाहतनादाचें श्रवण घडते असें त्यांचें म्हणणें आहे.

नाद हा विषयच असा आहे कीं, तेथें मनाने रमलेच पाहिजे. भेरी, मृदंग, शंख, बांसरी इत्यादि वाद्यांचे नुसते नाद जरी कानांवर आले तरी देखील मन त्या नादांत रमून जातें, तन्मय होतें. कलकत्त्यांत एकदा गवई लोकांची मैफल होती. बडे बडे गवई आपला रंग जमवीत होते. त्या सभेत सवाई गंधर्वही होते. त्यांच्यावर गाण्याची पाळी आली. फक्त दोन तंबोरे. ते इतरांनी लावले, पण सवाई गंधर्वाचे समाधान झालें नाहीं. ते त्यांनीं स्वतः जुळविले. ते इतके तंतोतंत जुळले कीं, तीन मिनिटे सभा केवळ तंबोऱ्यांच्या नादानेच नागाप्रमाणे डोलूं लागली ! सर्वांच्या चित्तवृत्तीचा तंबोऱ्याच्या नादाशी लय लागला ! अवर्णनीय आनंदाच्या भरांत सभेने टाळ्यांचा कडकडाट केला ! तात्पर्य, बाह्य नादहि-आहतनादही चित्ताला इतका रमवितो, तर मग अंतर्नाद अथवा अनाहतध्वनि चित्ताला किती रमवील याची कल्पना करावी. याच अभिप्रायाने आचार्यांनी "भेरी-मृदङ्‍ग-शङ्‍खाद्याहत-नादे मनः क्षणं रमते । किं पुनरनाहतेऽस्मिन् मधुमधुरेऽखण्डिते स्वच्छे ॥ " असे प्रबोधसुधाकरांत अनाहतनादासंबंधानें प्रशंसोद्रार काढलेले आहेत.

अनाहतनाद हे अनेक प्रकारचे आहेत. अभ्यासाच्या प्रारंभी हा नाद समुद्राच्या गर्जनेप्रमाणें ऐकू येतो. पुळ्याच्या गणपतीजवळ पूर्णिमेच्या रात्रीं निवांतपणे स्वस्थ बसावे. पुढे पसरलेल्या विशाल सागरावरील तरंग जणु कांहीं अहमहमिकेने गणपतीच्या चरणी विलीन होण्याकरिता धाव घेत आहेत. त्या नीरव वातावरणांत फक्त त्या तरंगांचेच शब्द कानांवर येऊन आदळतात. हुबेहूब त्याच स्वरूपाचा अंतर्नाद क्वचित्प्रसंगी नादानुसंधानाच्या अभ्यासकालात पहिल्या प्रथम आपल्या कानी येईल. क्वचित्प्रसंगी गंभीर घनगर्जना चालू असल्याची प्रतीति येईल. क्वचित्‌प्रसंगी एखादा मोठा नगारा वाजत आहे असा प्रत्यय येईल. एखाद्या वेळीं झांगड ( भाकरीच्या आकाराची मोठी झांज) वाजत असल्याचें ऐकू येईल. प्राणवायू आज्ञाचक्राला ओलांडून ब्रह्मरंधाकडे जावयास निघतो त्या वेळीं अनाहतनादाला किंचित सूक्ष्मता येते. डमरू, मृदंग, तबला, कुडबुडें इत्यादि वाद्यांप्रमाणें अनाहतनादाचें स्वरूप ऐकू येतें. क्वचित् शंख किंवा कर्णा वाजल्याप्रमाणें आवाज येईल, तर क्वचित घंटानाद होत असल्याची प्रतीति येईल. त्यानंतर तोच नादलहरीनीं संवलित असलेला प्राणवायु सहस्त्रदलकमलांतील महाकाशांत स्थिरावला म्हणजे अनाहतध्वनीचे स्वरूप आणखी अधिक सूक्ष्म होत जातें. शेवटीं शेवटीं हा अनाहतनाद किनरी, वीणा, बांसरी किंवा बारक्या घुंगरांप्रमाणे ऐकू येऊ लागतो. क्वचित्प्रसंगी तो भ्रमरांच्या गुंजारवाप्रमाणेही ऐकू येतो. असे हे अंतर्नादाचे विविध प्रकार लक्षांत घेऊनच, आचार्य म्हणतात, "अनाहताख्यो बहुभिः प्रकारैरन्तः प्रवर्तेत सदा निनादः ! ".

अनाहतनाद अनेक प्रकारचे असले तरी समाधिअवस्थेच्या दृष्टीने त्यांचे पांच प्रकार केलेले आहेत - ( १) सगर्भक, ( २) निगर्भक, ( ३) निरंजन, ( ४) चिद्वोधक आणि ( ५) सदानंदित अशी त्यांची नावे आहेत. त्या नादोपासनेनें साधकाच्या बुद्धीवर होणारे परिणाम निपुणमति, स्थिरमति, शुभमति इत्यादि नावांनी व्यक्त केलेले आहेत. जनवात्सल्य व्याधिविलय इत्यादि नादोपासनेची फले, तसेंच शरीरांतील त्वचा, रक्त, मांस इत्यादि धातूंशी नादांचे संबंध आणि त्या त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या नादानुसंधानानें प्राप्त होणाऱ्या दूरश्रवण, दूरावलोकन, वचनसिद्धि, वज्रकायत्व इत्यादि सिद्धि, पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व इत्यादि तत्त्वांचा नादांशी संबंध, नादांची वलये, नादांच्या साहचर्यानें प्रतीतीला येणारे पीत, शुद्ध, रक्त, नील इत्यादि वर्ण, अशा अनेक विषयांचे अनाहत नादांशी असलेले संबंध शास्त्रज्ञांनीं वर्णिलेले आहेत.

अनेकांच्या मनांत येथें एक अशी शंका येते कीं, अनाहतनाद ही एक केवल कल्पना आहे, तो भ्रम आहे. असे अनाहतध्वनि ऐकू येणे शक्य नाहीं. पण ही शंका बरोबर नाहीं. कोणतें ज्ञान प्रमात्मक आहे व कोणतें ज्ञान भ्रमात्मक आहे, हें पहाण्याची शास्त्रज्ञांची कांहीं कसोटी आहे. एकजण म्हणतो, शंख पांढरा आहे तर एकजण म्हणतो, शंख पिवळा आहे. खरोखर शंख पांढरा आहे का पिवळा आहे हे कसें ठरवावयाचें ? शंख पांढरा आहे असे म्हणणारे किती आहेत व शंख पिवळा आहे असे म्हणणारे किती आहेत हे प्रथम पहावयाचे. त्यानंतर त्यांचे प्रकृतिधर्म, स्वभावधर्म यांचेंही निरीक्षण, परीक्षण करावयाचें. त्यांची योग्यता, हेतु व प्रामाणिकपणा यांचाही विचार करावयाचा. असे बहुसंख्यलोक ज्या विषयाबद्दल आपलें जें मत व्यक्त करीत असतील त्या विषयाचे तेंच स्वरूप यथार्थ समजावयाचे असतें. ज्यांचा स्वभाव सदोष आहे, हेतु सदोष आहे, योग्यता आणि प्रामाणिकपणा यांची जेथे न्यूनता आहे, शारीरिक प्रकृति ज्यांची निर्दोष नाहीं, ज्यांची वातवह, पित्तवह आणि कफवह स्रोतसें सदोष आहेत, धातुवह स्रोतसें ज्यांची सदोष आहेत, वात, पित्त आणि कफ ज्यांचे विकृत आहेत. संज्ञावह स्रोतसें आणि मनोवह स्रोतसें ज्यांची विकृत आहेत. प्राणवह स्रोतसेंही ज्यांची शुद्ध नाहींत अशा लोकांनी एखाद्या विषयाबद्दल व्यक्त केलेले मत हे यथार्थ स्वरूपाचे असं शकणार नाहीं. शंख पिवळा आहे असे म्हणणाऱ्यांचे पित्त विकृत झालेलें असतें. त्याच्या डोळ्यांना कावीळ हा विकार झालेला असतो. आणि म्हणूनच शंख पिवळा आहे असें त्याचे म्हणणें यथार्थ स्वरूपाचे आहे असें कोणी मानीत नाहीं. याच न्यायाने अनाहतनाद हा भ्रम आहे असें म्हणणाऱ्यांचें म्हणणे हें सत्य आहे असें मानता येत नाहीं. कारण तो स्वतःच अज्ञानी, अनभ्यासी, अननुभवी आणि मनोवह स्रोतसें व संवेदनावह स्रोतसें दूषित असलेला असा असल्यामुळें भ्रांत आहे, ही च गोष्ट सिद्ध होते. साधु, संत, महात्मे, ऋषि, मुनि, तत्त्ववेत्ते योगी, आणि ज्ञानी हे सर्व एकमुखाने अनाहतनादाचें वर्णन करीत आहेत. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तिनाथ, चांगदेव, कबीर, मीराबाई, संत एकनाथ, श्रीसमर्थ, इत्यादि संतवाङ‍्मयांत अनाहतनादाचीं विपुल वर्णने आहेत. तशींच तीं पुराणे व उपनिषदे इत्यादि ग्रंथांतूनही आहेत. तेव्हां अनाहत नादाबद्दल शंकाच घेणे नको.

अनाहतनाद किंवा अनुहतध्वनिसंबंधी संतांचे आनंदोद्‌गार

तंत आणि वितंत, त्यामाजीं मथित ।
नाद उमटत स्वानंदाचा ॥ - निवृत्तिनाथ
निवृत्तीनें मन ठेविले चरणीं ।
नादाची निशाणी अखंडित ॥ - निवृत्तिनाथ
नासिकेचा प्राण कोणें मार्ग येत ।
नाद दुमदुमित अनुहतीं ॥ - ज्ञानेश्वर
सहस्रदळांमधून अनुहात ध्वनि उठीं ।
नामाचेनि गजरें पातकें रिघालीं कपाटीं ॥ नामदेव
जयजय झनकून जयजय झनकून ।
अनुहात जंगट नाद गर्जे ॥
परतल्या श्रुति म्हणती नेति ।
त्याही नादाअंतीं स्थिर राहती ॥ - गोरा कुंभार
अनुहात घंटा श्रवणीं ।
ऐकुनि विस्मय जाहली जनी ॥ - जनाबाई
त्रिवेणीचा ओघ तेथें अंग धुतले ।
अनुहात झणझणाट नाद ऐकिले ।
गुणातीत डाहाळी पाळणा लाविला ।
तेथें खत पहुडला मुक्ताईचा ।
निजी निज बाळा न कीं पैं आळी ।
अनुहात टाळी वाजविते ॥ - मुक्ताबाई
पांडूरंगे सत्य केला अनुग्रह ।
निरसूनि संदेह देह बुद्धि ॥
जीवशिवा सेज रचिली आनंदे ।
आऊटाविये पदीं आरोहण ॥
निजी निजरूपीं निजविला तुका ।
अनुहत बाळका हरू गाती ॥ - तुकाराम
अनुहातीं गुंतला नेणे बाह्यरंग ।
वृत्ति येतां मग बळ लागे ॥
मदें माते तया नाहीं देहभाव ।
आपुले अवयव आवरीतां ॥ - तुकाराम
सतरावियेचें स्तन्य देसी ।
अनुहताचा हलरु गासी ।
समाधिबोधे निजविसी । बुझाबुनी ॥ - ज्ञानेश्वर
हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदया आंतु आली ।
तंव अनुहताची बोली । चावळे ते ॥
तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमो लागे ।
तंव ब्रह्मस्थानीचे बेगें । सहज फिटे ॥ - ज्ञानेश्वर
कशि मोहनी घातली गुरुनं ।
मशिं वेडचि गेले भरून ॥ ध्रु ॥
श्रवणांत पेरणी केली । ती नयनीं उजेडा आली ।
मनपवन चित्त एक करून ॥ १ ॥
ऐकतां गजर भुल पडली ।
विज आकाशांत कडकडली ।
मनपवनचित्त दृढ धरून ॥ २ ॥ - महिपति
रुणसुण रुणसुण किनरी वाजे ।
येणेचि आनंद त्रिभुवन गाजे ॥
चांगा वटेश्वर नादीं निमाला ।
ब्रह्म पाहतां ब्रह्मचि जाहला ॥ - चांगदेव
धिं धिं तुरे वाजती । अनुहत ध्वनिं गर्जति ॥ - नामदेव
अनुहातध्वनि करित निशिदिनी ।
मन लुब्धुनि गेलें तया ॥
अखंड हे खेळे जपे सर्वकाळीं ।
हदय कमळी आनंदला ॥ - नरहरी सोनार

आतां आपल्याला हा अनाहतनाद ऐकू येईल का ? याचे प्रश्नाचें उत्तर देण्याकरिता आचार्यांनी या तिसऱ्या श्लोकाचा पूर्वार्ध लिहिला आहे. तुम्ही रेचक, पूरक यांच्यासह कुंभक प्राणायामाचा अभ्यास करा म्हणजे तुमच्या शरीरातील सर्व नाड्या अर्थात त्वचा, रस, रक्त मेद इत्यादि धातूंना वाहून नेणारी स्रोतसें, मलमूत्र आणि स्वेद यांना वहाणारी स्रोतसें, वातपित्तादि दोषवह स्रोतसे, मनोवह स्रोतसें आणि संवेदनावह स्रोतसें ही सर्व स्रोतसें शुद्ध होतील. आणि ही स्रोतसें शुद्ध झाली कीं शरीरामध्ये विविध प्रकारचे अन्तर्नाद उमटूं लागतील. अनाहतनाद ऐकू येण्याकरितां मनोवह स्रोतसांची व संज्ञावह स्रोतसांची शुद्धि होणें आवश्यक आहे. या दोन्ही, प्रकारच्या स्त्रोतसांच्या शुद्धीकरितां दोषवह स्रोतसांची व धातुवह स्रोतसांची शुद्धि होणें आवश्यक आहे. आणि त्या शुद्धीकरितां प्राणायामांची आवश्यकता आहे. असा हा प्राणायाम आणि नाडीशुद्धि, तसेच नाडीशुद्धि आणि अनाहत ध्वनि यांचा कार्यकारणभाव आचार्यांनी दाखविलेला आहे.

नाडीशुद्धिकरिता प्राणायामाचा अभ्यास करावयाचें म्हटलें कीं प्राणायामाबरोबर यम, नियम आणि आसने ही योगाची तीन अंगें प्राणायामाची पूर्वपीठिका म्हणून ओघानेच येतात. यमनियमपूर्वक आवश्यक त्या आसनांचा अभ्यास करून प्राणायामाने शरीरातील नाड्यांची शुद्धि केल्यानंतर शरीरांत अभिव्यक्त होणाऱ्या अंतर्नादाच्या ठिकाणी सर्व इंद्रियांना विषयांपासून पराङ्‍मुख करून, मनाला संलग्न करणें यांतच अष्टांगयोगांतील प्रत्याहार आणि धारणा या दोन अंगांचा अंतर्भाव होतो. अनाहतनादाचें अनुसंधान म्हणजे अखंड चिंतन. यालाच ध्यान असे म्हणतात ध्यानाचीच परिपक्वावस्था म्हणजे सविकल्प समाधि होय. या सविकल्प समाधींत ध्याता, ध्यान आणि ध्येय या वृत्तींचा सूक्ष्म स्वरूपांत का होईना पण उदय होत असतोच. पुढें पुढें याही वृत्ति मावळतात व साधकाला निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त होते. इंधन संपले कीं अग्नि जसा जागच्या जागी शांत होतो त्याचप्रमाणे या अवस्थेंत अंतःकरणांतील सर्व वृत्ति निमाल्या कीं मन आपोआपच ब्रह्मस्वरूपीं लीन होते. अशा रीतीनें नादोपासनेंत साधकाला अष्टांगयोगाचें अनुष्ठान सहजच घडतें. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि सविकल्प समाधि हीच योगाची आठ अंगें होत. या आठ अंगांनी संपादली जाणारी निर्विकल्प समाधि हेंच योगाचें अंतिम लक्ष्य आहे. तेंच अध्यात्मज्ञानाचेंही अंतिम लक्ष्य आहे आणि तेंच फलरूप भक्तीचेंही अंतिम स्वरूप आहे. अनन्यभावाने हरिभक्तीच्या क्षेत्रांत पदार्पण करणाऱ्या भक्तालाही अष्टांगयोगाचा सहजच लाभ होतो. श्री. ग. वि. तुळपुळे यांनी प्रकाशित केलेल्या योगतारावलीच्या प्रस्तावनेतील श्री संत गुलाबराव महाराज यांचा एक मार्मिक अभंग आम्ही वाचकांना सादर करीत आहो.

योगाचे अष्टांग नामींच मिळती । नाम तें वेदान्तीं मिश्रीत कीं ॥ १ ॥
नाम घेंतां वाचे इंद्रिय विस्मृति । या नांव बोलती यम भक्त ॥ २ ॥
नामामध्ये शुद्धि तोष आणि दया । हरिभक्तराया नियम हा ॥ ३ ॥
नाम घेतां देह स्तब्धहि होऊन । भक्तासी आसन हेंचि नित्य ॥ ४ ॥
नाम घेता कंठ होतसे सद्‍गद । श्वास तोही बंद पडे तेव्हां ॥ ५ ॥
हेंचि हरिभक्ता प्राणसंयमन । कुंभकादि जाण एका काळी ॥ ६ ॥
नाम घेता वाचे मनासी आकळ । प्रत्याहारबळ हरिभक्ता ॥ ७ ॥
नाम घेता वाणी मनानें एकाग्र । भक्तासी प्रकार धारणा हा ॥ ८ ॥
नामे श्रीहरीचा होय आविर्भाव । हरिभक्ता ठाव हेंचि ध्यान ॥ ९ ॥
हरिसंगे पडे सकळ विसर । समाधि साचार संप्रज्ञात ॥ १० ॥
गुरुकृपे हरी सांगाते खेळणे । सर्वत्र पाहणे गुरुभक्ति ॥ ११ ॥
गुरुहरीमाजी नाहीं कांहीं भेद । स्वये झाला सिद्ध गुरुभक्ति ॥ १२ ॥
शिष्य तोचि हरी गुरु तोचि नंद । प्रेमांत प्रसिद्ध गोपिरूप ॥ १३ ॥
हाचि निर्विकल्प समाधीचा ठेवा । परी तीव्र व्हावा नामवेग ॥ १४ ॥
नव्हे हें रूपक नव्हे संनिवेश । पहातां प्रत्यक्ष प्रतीति हे ॥ १५ ॥
योगाचे हें सुख ज्ञानेश्चर पाय । तेथें भक्ति माय नेवो आम्हां ॥ १६ ॥

नादाचें अनुसंधान करण्याच्याच दृष्टीने नव्हे तर सर्व साधारणपणे व्यवहाराच्या दृष्टीनेंही आपल्या जीवनांत अष्टांगयोगाचा फारच मोठा उपयोग होत असतो. ऐहिक व आमुष्मिक अथवा व्यावहारिक आणि आध्यात्मिक उभयविध जीवनामध्ये अष्टांगयोगाच्याच अभ्यासानें पराकोटीचे समाधान मिळविता येतें. हें अष्टांगयोगाचें महत्त्व लक्षांत घेऊन आम्ही या ठिकाणी नादानुसंधानाच्या व नाडीशुद्धीच्या विषयसंदर्भानें अत्यंत संक्षेपाने अष्टांगयोगाची माहिती देत आहोंत.

यमनियम हा योगमंदिराचा पाया आहे, तर आसनांचा अभ्यास हें योगमंदिराचें जोतें आहे. प्राणायाम हा या मंदिराच्या सर्व बाजूंनी उभ्या असलेल्या भिंती होत तर प्रत्याहार, धारणा आणि ध्यान ही सर्व या योगमंदिराचें चढते वाढते शिखर होय. समाधिअवस्था ही तर या योगमंदिराचा कळसच होय. सच्चिदानंद परब्रह्म हें या मंदिराच्या आत-बाहेर सर्वत्र व्यापलेले असून साधकाच्या इष्ट रूपाने तें या मंदिरांत मूर्तरूपाने विराजमान झालेलें आहे. असा या मंदिराचा थाट आहे. यमनियम हे सर्वसामान्य मानवजीवनातील व्यवहार मानवी जीवनाला उज्ज्वल करणारे आहेत. यांच्या अभ्यासाने मानव हा खऱ्या अर्थाने मानव बनतो. सध्या अपेक्षित असलेल्या मानवतावादाचे हेंच ध्येय आहे.

"अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्य क्षमा धृतिः । दयार्जवं मिताहारः शौचं चैव यमा दश ॥ " आपल्या हातून कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख होऊं न देण्याची दक्षता घेणे याला अहिंसा म्हणतात. ज्याच्या योगें सर्वांचे हित होईल असेंच भाषण करणें, असेंच लेख लिहिणें आणि असेंच वागणें याला सत्य असें म्हणतात. हाच खरा वास्तववाद होय. अलीकडे कांहीं साहित्यिक वास्तववाद या गोंडस नांवाखाली जें लिहीत आहेत आणि जें बोलत आहेत तें सर्व मानवी जीवनाला विनाशाकडे नेणारे आहे. परकीय धनाचा, घरदार वित्तवैभव आणि कांता इत्यादिकांचा अपहार न करणें याला अस्तेय असें म्हणतात. उपस्थेंद्रियाचा संयम करणें हें ब्रह्मचर्याचे लक्षण होय. सिनेतारकांची चित्रे डोळ्यापुढे ठेवणे, पहाणे अथवा मनांतही आणणें हें जीवनस्वास्थ्याला विघातक आहे. प्रतिकार करण्याचें अंगीं सामर्थ्य असूनही व्यक्तिशः आपल्यावर अपकार करणाऱ्याला शासन न करणें याला क्षमा असें म्हणतात. या ठिकाणी हें लक्षांत ठेवावे कीं, हाच अपकारकर्ता समाजकंटक वश समाजाला छळीत असेल, तर त्याला योग्य तें शासन करणें हें कर्तव्यच ठरतें. उत्कर्षाच्या आणि अपकर्षाच्या काळांत अथवा सुखाच्या आणि दुःखाच्या काळांत चित्ताची समता राखणें याला धृति असें म्हणतात. दुसऱ्याचे क्लेश यथाशक्ति दूर करण्याचा प्रयत्न करणें याला दया असे म्हणतात. मनांत एक बाहेर एक अशी वृत्ति न ठेवता सर्वांशी सरळ वागणे याला "आर्जव" असें म्हणतात. आर्जव म्हणजे हांजी हांजी वृत्ति नव्हे. आहारही परिमित असावा. तो अधिक नसावा व कमीही नसावा. तसेंच तो सात्विक असावा. काळजीपूर्वक शरीराची आतून बाहेरून स्वच्छता राखणे तसेंच मनही शुद्ध राखणे यालाच "शौच" असें म्हणतात. हे सर्व आचार जीवनांत अत्यंत आवश्यक आहेत.

" तपः संतोषमास्तिक्यं दानमीश्वरपूजनम् । सिद्धान्तवाक्यश्रवणं ह्रीर्मतिश्च जपो हुतम् ॥नियमा दश सम्प्रोक्ताः " शीतोष्णादि इंद्रांची सहिष्गुता वाढविण्यासाठी आणि इंद्रियांना ताब्यांत ठेवण्यासाठी जी व्रतें पाळलीं जातात त्यांना तप असें म्हणतात. न्याय्य प्रयत्नाने आपल्याला जेवढे मिळेल तेवढ्यांतच निर्वाह करणें व त्यांतच समाधानानें असणें हें संतोषाचे लक्षण होय. धर्माविषयी आस्था असणें, अधर्माचे व पापाचे भय वाटणे याला आस्तिक्य असे म्हणतात. आस्तिक्याचेंच दुसरें नांव श्रद्धा असें आहे. माता, पिता, गुरु, संत, महात्मे आणि शास्त्रे यांच्या वचनांवर विश्वास असणें व त्याप्रमाणें वागण्याचा प्रयत्न करणें हेंच श्रद्धेचे लक्षण होय. कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता, मानमान्यता किंवा कीर्तीचीही इच्छा न करतां योग्य व्यक्तीला किंवा संस्थेला अपेक्षित असलेले पदार्थ अर्पण करणें हें खऱ्या सात्त्विक दानाचे स्वरूप होय. "ईश्वरः सर्वभूतानां हद्देशेऽर्जुन तिष्ठति" या वचनाप्रमाणे अथवा " जें जें भेटेल भूत । ते तें मानिजे भगवंत ॥" या संतांच्या उक्तीप्रमाणें सर्व प्राणी परमात्मस्वरूप आहेत असे समजून त्यांना, यथाशक्ति संतोषवीत रहाणें ही ईश्वरपूजाच होय. ती आपल्या हातून सतत घडावी, संतांचे उपदेश, वेदान्तचर्चा आणि श्रीहरीची चरित्रे नेहमी ऐकावीत. यालाच स्वाध्याय असें म्हणतात. ह्री म्हणजे लज्जा. कोणतेही निंद्य कार्य करतांना, वस्तूची वाजवीपेक्षां अधिक किंमत घेतांना, लाचलुचपत खातांना, पागडी मागतांना, कामचुकारपणा करतांना मनाला लाज वाटली पाहिजे. हें एक विवेकाचे, वैराग्याचे अथवा अंतःकरणशुद्धीचे उत्तम लक्षण होय. अंतःकरणांत नेहमी सत्संकल्प असणें याला मति असें म्हणतात. त्याचप्रमाणे गुरूंनी उपदेशिलेल्या मंत्राचा विधिपूर्वक जप करणें आणि अग्नीला आहुति अर्पण करणें यांचाही नियमांतच अंतर्भाव होतो. असे हे दहा प्रकारचे नियम आहेत. या यमनियमांचा मानवी जीवनाची पातळी खऱ्या अर्थाने उंचविण्यासाठी केवढा, उपयोग आहे हें निराळें सांगणे नको.

जाणिवेने व अभ्यासाने यमनियमांचे वळण अंगीं बाणल्यानंतर खरी योगाभ्यासाची पात्रता येते. अनाहतनादाच्या साक्षात्काराकरितां आवश्यक असलेल्या नाडीशुद्धीसाठी प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी कांहीं आसनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आसनांचा अभ्यास आरोग्य संपादन करणें किंवा तें सुरक्षित ठेवणे या दृष्टीनें अत्यंत उपयुक्त आहे. प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधि यांचा अभ्यास करीत असतांना कांहीं विघ्नें आड येतात. त्यामध्ये शरीरांत व्याधि असणें हे एक मोठे विघ्न आहे. मन न लागणे, मनांत उत्साह नसणे हें दुसरे विघ्न होय. मन संशयग्रस्त असणें हें तिसरें विघ्न होय. जें करावयाला पाहिजे तें न करणे आणि जें करावयाला नको तें करीत रहाणें याला प्रमाद असें म्हणतात. प्रमाद हा योगमार्गातील चौथे विघ्न होय. ज्यांचें पचन होणें अवघड असे गोड आणि जड पदार्थ खाणे, अधिक खाणे, तळकट, तिखट, खारट, आंबट आणि, मसालेदार खमंग पदार्थ खाणे यायोगे शरीरांत जडता येते आणि मनांत तमोगुण वाढतो, त्यामुळे आळस येतो. हा आळस योगाभ्यासांतील पांचवें विघ्न होय. अशी आणखी कांहीं विघ्नें आहेत. या विघ्नांचे निरसन करण्याकरितां विशेषतः व्याधि, अनुत्साह आणि आळस यांना घालविण्याकरितां आसनांचा निश्चित उपयोग होतो.

"स्थिरसुखमासनम्" कांहीं कष्ट न होतां शरीराने बराच वेळ एका अवस्थेंत स्थिर रहाणे याला आसन म्हणतात. घट स्थिर राहिला कीं घटातील पाणीही स्थिर रहाते. त्याचप्रमाणे शरीररूपी घट स्थिर राहिला कीं त्यांतील चित्तरूपी जल हेही स्थिर राहील. या दृष्टीनें शरीराचे स्थैर्य साधण्यासाठीं आसनांचा अभ्यास करणें उपयुक्त आहे. आसने बरीच आहेत. तथापि त्यांतल्या त्यांत अत्यंत उपयुक्त अशा कांही थोड्या आसनांचा या ठिकाणी परिचय दिला आहे. वाचकांनी यथाशक्ति व यथावकाश त्यांचा अभ्यास अवश्य करावा.

घोंगडीची, शक्य असल्यास पांढऱ्या घोंगडीची चारपदरी घडी अंथरावी. त्यावर त्याच आकाराची पांढऱ्या शुभ्र धुतवस्त्राची घडी अंथरावी. तात्पर्य, आसनांच्या अभ्यासाला मृदु आस्तरण असावें. त्यावर रोज सकाळी सूर्योदयानंतर दोन घटिकापर्यंत अथवा सूर्यास्ताच्या सुमारास आसनांचा अभ्यास करावा. शक्यतो आसनांच्या व प्राणायामाच्या अभ्यासाकरिता स्वच्छ, पवित्र आणि प्रसन्न अशी जागा योजावी. एकान्त असावा.

( १) सिद्धासन - प्रथम डावी १ मांडी घालावी. गुदस्थान आणि उपस्थ यांच्यामध्ये असलेली उभी शीर, तिला सीवनी असें म्हणतात. सीवनीच्या मधोमध डाव्या पायाची टाच पक्की बसवावी. नंतर उजवी मांडी घालून उजव्या पायाची टाच उपस्थाच्यावर आणि नाभिस्थानाच्या खालीं बसवावी. नंतर वक्षस्थलाच्यावर आणि गळ्याच्या खालीं हनुवटी दृढ बसवावी. मन एकाग्र करावे. दृष्टि स्थिर करून दोन्ही भुवयांच्या मध्ये लावावी. दोन्ही हात सरळ गुडघ्यावर ठेवावेत. अंगुष्ठ आणि तर्जनी या दोन बोटाची टोके ज्ञानमुद्रेपमाणें एकमेकांना जुळवावींत आणि बाकीची तीन बोटे एकमेकांना जुळवून सरळ ठेवावीत. सर्व आसनांत १ सिद्धासन अत्यंत श्रेष्ठ आहे. "एतन्मोक्षकपाटभेदजननं" या आसनाने मोक्षाची कवाडे उघडी होतात. याने शरीरातील नाड्या शुद्ध होतात. कुंडलिनी जागृत होते. या एकाच आसनांत मूलबंध, उड्डियाणबंध आणि जालंधरबंध, हे तिन्ही बंध सिद्ध होतात. याच आसनाला वज्रासन, मुक्तासन आणि गुप्तासन अशींही नांवे आहेत. कांहीं लोक या आसनांत थोडाबहुत फरकही मानतात. गृहस्थाश्रम्यांनी या आसनाचा अभ्यास फार वेळ करूं नये अशी योगी लोकांची सूचना आहे.

( २) स्वस्तिकासन - प्रथम सरळ मांडी घालावी. नंतर उजवा तळपाय आणि बोटें डाव्या मांडीच्या आणि पोटरीच्या मध्यें घालावींत. डावा तळपाय व बोटे उजव्या मांडीच्या आणि पोटरीच्या मध्ये घ्यावींत. दोन्ही हात सरळ गुडघ्यावर ठेवावेत. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे शरीर "समं कायशिरोग्रीवं" अशा स्वरूपांत सरळ ठेवावे. दृष्टि नाकाच्या शेंड्यावर स्थिर ठेवावी. मनाने ईशचिंतन करावे. हें आसन अत्यंत सोपे असून फार महत्त्वाचें आहे. तें कोणीही केव्हांही आणि कितीही वेळ करावे. याने कांहींही अपाय होणार नाहीं. हें अत्यंत कल्याणकारक असल्यामुळें याला स्वस्तिकासन असें म्हणतात. स्वस्ति शब्दाचा अर्थ कल्याण असा आहे. याच आसनावर बसून प्राणायाम, प्रत्याहार-धारणा, ध्यान, समाधि मंत्रजप व पुरश्चरण इत्यादि सर्व गोष्टी केल्या जातात. या आसनानें शरीरही निरोगी रहाते.

( ३) पद्मासन - डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवावा. त्याचप्रमाणे उजव्या मांडीवर डावा पाय ठेवावा. दोन्ही टाचा ओटीपोटाच्या जवळ कराव्यात. तळहात उताणे करून डाव्या हातावर उजवा हात ठेवावा ते दोन्ही हात टाचेवर ठेवावेत. जीभ पडजिभेच्या बाजूला जितकी वर वळवितां येईल तितकी वळवून धरावी. वक्षस्थलाच्या वरच्या बाजूस ऊर्ध्वजत्रूंच्या मध्यावर हनुवटी पक्की बसवावी. दृष्टि नासाग्रावर स्थिर करावी. याच आसनामध्ये गुदस्थानाचा संकोच करून अपानवायुला वर खेचले म्हणजे मूलबंधही सिद्ध होतो. मूलबंधानें अपान वायु वर खेचला जातो. जिव्हाबंधनानें व जालंधरबंधाने प्राणवायु खालीं ढकलला जातो. अपान आणि प्राण या दोहोंचा नाभिस्थानाजवळ संगम होतो. याच अवस्थेला उद्देशून गीतेमध्ये "अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथाऽपरे ।" असें वर्णन केलेले आहे. नाभिस्थानाचाही संकोच करून नाभीला पृष्ठवंशाकडे खेचले की ओढियाण बंधाची क्रिया घडते. त्यामुळें आधार कंदावर असलेल्या कुंडलिनीला धक्का बसून ती जागृत होते. तिच्या जागृतीमुळे सुषुम्नेचे दार खुले होतें. मनासह प्राणवायू सुषुम्नेत प्रविष्ट होतो. इंद्रिये अंतर्मुख होतात. मन एकाग्र होतें. विवेकदीप उजळतो. त्याच प्रकाशांत साधकाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो. असे हें पद्मासन फार महत्त्वाचें आहे. "सर्वव्याधिविनाशनं" हें या आसनाचे फळ आहे. हे मत्स्येंद्रनाथांचे अत्यंत आवडते आसन होय. श्रीगौतमबुद्ध आणि श्रीज्ञानेश्वर महाराज याच आसनावर नेहमी बसत.

( ४) बद्धपद्मासन - वर सांगितलेल्या पद्धतीने पद्मासन केल्यानंतर डाव्या हातानें पाठीला वळसा घालून डाव्या पायाचा आगठा धरावा आणि त्याचप्रमाणे उजव्या हाताने पाठीला वळसा घालून उजव्या पायाचा आगठा धरावा. कांहीं वेळ शांत बसावें. " एतद्‌व्याधिविनाशकारि यमिनां " हे आसन .साधकाच्या देहातील सर्व व्याधींचा निरास करते. कांहीं लोक पद्मासन आणि बद्धपद्मासन हें एकच मानतात.

( ५) वीरासन - डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवावा. डाव्या पायावर उजवी मांडी ठेवावी. उजव्या गुडघ्याला दोन्ही तळहातांची मिठी द्यावी. दृष्टि नाकाच्या शेंड्यावर लाबून ताठ बसावे. त्याचप्रमाणे उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून उजव्या पायावर डावी मांडी ठेवावी. डाव्या गुडघ्याला दोन्ही तळहातांची मिठी द्यावी. दृष्टि नासाग्रावर स्थिर करून सरळ रेषेंत ताठ बसावे. " एकं पादं तथैकस्मिन् विन्यसेदूरुणि स्थितम् । इतरस्मिंस्तथाचोरुं वीरासनमितीरितम् ॥ " ( हठयोगप्रदीपिका ). याच आसनावर गुदद्वाराचा संकोच करून अपानवायुस वर खेचावे. पोट खपाटीं करावे आणि हनुवटी छातीच्या वरच्या हाडांच्या मध्यभागी दाबून बसवावी म्हणजे मूलबंध, उड्डियानबंध आणि जालंधरबंध हे तिन्ही बंध साधले जातात. कांहीं पुस्तकांतून वीरासनाच्या आकृति चुकीच्या दिलेल्या आढळतात. वर दिलेल्या पद्धतीप्रमाणेंच वीरासन करावे. ते सोपे असून उपयोगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

( ६) पश्चिमोत्तानासन - दोन्ही पाय जुळवून जमिनीवर दंडासारखे ताठ पसरावेत. दोन्ही हातांची तर्जनी किंचित् वाकडी करून तर्जनी आणि आगठा यांच्या साहाटयानें दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे धरावेत. हळू- हळू कपाळ गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्व करावा. गुडघ्यावर डोके ठेवीत असताना गुडघे जमिनीपासून वर उचलले न जातील अशी खबरदारी घ्यावी. यालाच पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. शिवसंहितेंत याला उग्रासन असें म्हटलेले आहे. हें आसन फार महत्त्वाचे आणि अत्यंत उपकारक आहे. याने सुषुस्म्नामार्ग खुला होतो आणि प्राणवायु सुषुम्नामार्गाने वाहू लागतो. याने मेद वाढत नाहीं. पोट सुटत नाहीं. जठराप्रि प्रदीप्त होतो. भूक चांगली लागते. शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. रस, रक्त इत्यादि धातूंचे अभिसरण चांगले होतें. धात्वग्नि आणि दोषाग्नि हेही प्रदीप्त होतात. दोष आणि धातू यांचें साम्य राखले जातें. शरीरांत वातादि दोषांचा आणि धातूंचा प्रकोप होत नाहीं. अशा रीतीनें हें आसन आरोग्यफलदायी आहे.

( ७) पूवोंत्तानासन - पाय ताठ करून उताणे निजावें. जुळविलेले दोन्ही पाय हळूहळू वर उचलून डोक्याच्या पाठीमागे टेकवावेत. पायाच्या विरुद्ध दिशेनें दोन्ही हात जमिनीवर सरळ रेषेत पसरून ठेवावेत अथवा दोन्ही हात पायांकडे नेऊन पश्चिमोत्तानाप्रमाणेच पायांचे अंगठे धरावेत. हें सर्व करीत असतांना गुडघ्यांत बांक न येईल अशी खबरदारी घ्यावी. हेही आसन अत्यंत उपयुक्त आहे.

( ८) सर्वांगासन - पूर्वोत्तानासन झाल्यानंतर तसेच ते, जुळविले पाय आकाशांत सरळ उचलून धरावेत. पहिल्या प्रथम कमरेला दोन्ही हातांचा आधार द्यावा. शरीराचा सर्व भार खांद्यावर ठेवावा. दोन्ही हात सरळ जमिनीवर पसरून हे आसन करतां येईल इतका याचा अभ्यास करावा. हें आसन करतांना आकाशांत पद्मासनाप्रमाणें मांडीही घालावी. हा सर्व व्यायाम नाडीशुद्धीला अत्यंत उपयुक्त आहे.

( ९) धनुरासन - उजव्या पायावर डावा पाय ठेवून दोन्ही पाय पसरावेत. नंतर डाव्या हाताचा आंगठा व तर्जनी आणि मध्यमा यांच्या चिमटीने उजव्या पायाचा आगठा धरावा. त्यानंतर याच पद्धतीने उजव्या हाताने डाव्या पायाचा आंगठा धरून तो उजव्या कानापर्यंत आणावा. दृष्टि उजव्या पायाच्या आंगठ्यावर स्थिर करावी. धनुष्याच्या दोरीला बाण लावून ती कानापर्यंत ओढली असतां जसा आकार दिसावा तसाच आकार या आकृतीचा दिसतो. म्हणून याला धनुरासन असें म्हणतात. कांहीं लोक याला आकर्ण धनुरासन असेही म्हणतात. ही पद्धति हठयोगप्रदीपिकाकारांनीं सांगितलेली आहे. घेरंडसंहिताकारांची पद्धत मात्र निराळी आहे. जमिनीवर सरळ पालथे पडावे. गुडघ्यापासून पाय वळवून पाठीकडे आणावेत. उजव्या हाताने उजव्या पायाचे व डाव्या हाताने डाव्या पायाचे मणगट धरून छाती जितकी वर उचलता येईल तितकी वर उचलावी. यानें शरीराला धनुष्याच्या आकाराचे वळण येतें धनुरासनाच्या या दोन्ही पद्धति हितावहच आहेत.

( १०) भुजंगासन - प्रथम सरळ पालथें निजावें. पायाच्या आंगठ्यापासून नाभीपर्यंतचा भाग जमिनीस (आसनावर) टेकलेला असावा. होन्ही तळहात नाभिस्थानाजवळ खालीं टेकवून नाभीपासून डोक्यापर्यंतचा भाग वर उचलून धरावा. दृष्टि अगदी समोर ठेवावी. भुजंगासारखा आकार दिसतो म्हणून याला भुजंगासन असें म्हणतात. या आसनाने जठराग्नि प्रदीप्त होतो. सर्व रोग नाहींसे होतात. कुंडलिनीशक्तीही जागृत होते.

( ११) मत्स्यासन - बद्धपद्मासन घालून उताणे निजावे. डोक्याला दोन्ही हातांचा वेढा घालून उजव्या हाताने डावा दंड आणि डाव्या हाताने उजवा दंड धरावा. हे आसन फार उपयुक्त आहे. याने पोट साफ रहाते. पोटांत वात धरीत नाही. वात धरण्याची सवय असल्यास ती कमी होते. भूकही चांगली लागते पोट दुखत नाहीं. स्त्रियांची मासिकपाळीही साफ होते.

( १२) शीर्षासन - हे आसन प्रसिद्ध आहे. पहिल्या प्रथम भिंतीच्या शेजारी प्रशस्त मऊ आसन घालून त्यावर एक चांगली जाड धोतराची घडी अथवा चुंबळ ठेवावी. तिच्यावर डोके ठेवावे. डोक्याच्या मागच्या बाजूस दोन्ही हाताच्या मिठीचा पक्का आधार द्यावा. सर्व शक्ति एकवटून पाय हळूहळू वर उचलावेत आणि भिंतीस लावावेत. पुढें हळूहळू ते सरळ वर उचलावेत. मांड्या, पोटर्‍या अगदी ताठ कराव्यात. आरंभी आरंभीं हें आसन अगदी थोडा वेळ करावे. पुढें अभ्यास वाढला म्हणजे भिंतीचा आधार घेण्याची आवश्यकता रहाणार नाहीं. आपली प्रकृति लक्षांत घेऊनच या आसनाचा अभ्यास वाढवावा. मानवत नसेल तर तें अधिक वेळ करूं नये. हे आसन मानवले तर फारच हितावह आहे. तें शरीराला रसायनासारखें आहे. याच, आसनाला विपरीतकरणीमुद्रा अथवा कपालासन असेंही नांव दिलेले आढळतें. याच आसनांत मांड्या वळवून पद्मासन घातले की ऊर्ध्वपद्मासन तयार होतें गुडघ्यापासून पाय पाठीकडे वळते ठेवले कीं, अर्ध वृक्षासन तयार होईल. दोन्ही पाय परस्पर विरुद्ध दिशेला पसरवून ते इकडे तिकडे फिरविले कीं शरीरातील सर्व स्नायूंना योग्य तो व्यायाम मिळतो आणि सर्व नाड्या शुद्ध होतात. अशा रीतीनें हें आसन मोठे उपयुक्त आहे.

( १३) वृक्षासन - सरळ उभे रहावे. डाव्या मांडीच्या मुळाशी उजव्या पायाची टाच लावावी. दोन्ही हात जोडून दृष्टि नासाग्रीं स्थिर करावी. वृक्षासारखे ताठ असावें. उलट सुलट दोन्ही बाजूनी हें आसन करावे.

( १४) मयूरासन - प्रथम जमिनीवर दोन्ही गुडघे टेकून बसावे. नंतर गुडघ्यांच्या पुढें दोन्ही हात जमिनीवर टेकवावेत. हाताची बोटे गुडघ्याकडे करावींत. कांहीं लोक तीं सरळ पुढें ठेवतात. नंतर नाभिस्थानाच्या दोन्ही बाजूंना हातांच्या कोपरांचा आधार द्यावा. शरीराचा तोल नीट संभाळून पाय सरळ मागें पसरावेत. ते किंचित् वरच्या बाजूसही तोलून धरले जातील असा प्रयत्न करावा. मोरासारखा आकार दिसत असल्यामुळे यास मयूरासन असें म्हणतात आरोग्याच्या दृष्टीनें हें आसन फारच उपयुक्त आहे. "हरति सकलरोगानाशु गुल्मोदरादीनभिभवति च दोषानासनं श्रीमयूरम्" गुल्म, मूत्रकृच्छ्र, अष्ठीला - पोटांत वात धरणे, पोट दुखणे, एवढेच काय, पण जलोदरासारखे दुर्धर विकारही या आसनाने निरस्त होतात. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा तें प्रकोप होऊं देत नाहीं. यामुळें आरोग्य चांगले रहाते व भूकही उत्तम लागते.

( १५) मत्स्येन्द्रपीठ - प्रथम सरळ मांडी घालून बसा नंतर उजव्या पायाची टाच डाव्या मांडीच्या मुळाशीं डाव्या ओटीपोटाला दाबून बसवावी. डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे जमिनीस टाच लावून ठेवावा. उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेरून घेऊन त्यानें डाव्या पायाचा आंगठा धरावा. डाव्या हाताने पाठीला वळसा घालून उजव्या पायाची टाच धरावी. डाव्या खांद्याकडे तोंड वळवून दृष्टि नासाग्रीं ठेवावी. यास मत्स्येंद्रासन म्हणतात. मत्स्येंद्रनाथांनी याचा पुरस्कार केलेला आहे. मयूरासनाप्रमाणेच हेही आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असून यानें कुंडलिनी जागृत होते व मूर्धस्थानीं सहस्रदलकमलांत असलेल्या चंद्रमंडलालाही स्थिरता येते, असें याचे वर्णन केले आहे. हें आसन उलट-सुलट दोन्ही बाजूंनी करण्याचा प्रयत्न करावा.

( १६) शवासन - सर्व आसने करून झाल्यानंतर शेवटीं कोणत्याही स्नायुला ताण न देता शवासारखे स्वस्थ उताणे पडून रहावे. यानें सर्व श्रमांचा परिहार होतो व चित्तालाही विश्रांति मिळते.

आहार हा नेहमी परिमित आणि सात्त्विक असावा. गहू, उच्च जातीचे तांदूळ, जव, साठीसाळ म्हणजे दोन महिन्यांत तयार होणारे भात, मुगाची डाळ, दूध, तूप, लोणी, साखर, खडीसाखर, मध, ताजें मधुर ताक, संधवमीठ, मिरपूड, सुंठ, आले. भाज्यांपैकीं परवर, पडवळ, दोडका, घोसाळे, भेंडी, दुध्या भोपळा इत्यादि पदार्थ सेवन करावेत. पाणी स्वच्छ, सुंदर आणि गाळलेले असावें. कडू, आंबट, तिखट, खारट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातांना बरें वाटलें तरी ते शरीराला अपायकारक असतात. ते शक्यतों टाळावेत. शरीरांत आळस किंवा जडता निर्माण होणार नाहीं असाच आहारविहार असावा. प्रकृतिस्वास्थ्य सुरक्षित असावें.

आतां नाडीशुद्धीला प्रत्यक्ष कारणीभूत असलेल्या प्राणायामाचा आपण विचार करूं. आपले शरीर नखशिखान्त लहानमोठ्या नाड्यांनी व्यापले आहे. योगी आणि तत्त्ववेत्ते शरीरातील नाड्या बहात्तर हजार असल्याचें सांगतात. या नाड्या आतून सुषिर म्हणजे पोकळ असतात. त्यांच्यांतून रसरक्तादि धातु, वात, पित्त आणि कफ तसेंच स्वेदमुत्र इत्यादि मल सारखे वहात असतात. यांतच कांहीं स्रोतसें इंद्रियवह, मनोवह आणि संवेदनावहही आहेत. ते प्राकृत अवस्थेंत शरीराला आरोग्य देतात, भूषित करतात, तर विकृत अवस्थेत दूषित करीत असतात. याकरिता शरीरातील सर्व नाड्यांना शुद्ध ठेवून दोष, धातु आणि मल यांना निर्दोष राखणे आणि त्यांच्या गतीला कोठेंही अडथळा निर्माण होऊं न देणे आवश्यक असतें. आसनांच्या व प्राणायामाच्या अभ्यासाने ही गोष्ट साधता येते. पोकळ नळ्यांतून अडकून बसलेला केरकचरा ज्याप्रमाणें आपण फुंकून साफ करतो त्याचप्रमाणे रेचक, पूरक आणि कुंभक या प्राणायामानी शरीरांतील पोकळ नाड्यांनाही साफ स्वच्छ ठेवले पाहिजे.

प्राणायाम कसा करावा याची माहिती सुबोधस्तोत्रसंग्रह, भाग पहिला, पान २९७ व ९८ पहा. "प्राणः स्वदेहजो वायुः" आपल्या शरीरांत असणाऱ्या वायूला प्राण असे म्हणतात. "शरीरान्तः सञ्चारी वायुः प्राणः" शरीरामध्यें संचार करणाऱ्या वायुला प्राण ही संज्ञा आहे. "आयामस्तन्निरोधनयम्" शरीरांत प्राणवायूची जी स्वाभाविक गति श्वासोच्छवासाच्या रूपाने चाललेली असते, त्या गतीचा निरोध करणें या क्रियेला प्राणायाम असे म्हणतात. "तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः" अशी पतंजलींनी प्राणायामाची व्याख्या केलेली आहे. तस्मिन् सति म्हणजे आसनक्रियेचा चांगला अभ्यास झाल्यानंतर श्वास म्हणजे बाहेरचा वायु नाकाने शरीरांत घेणे आणि प्रश्वास म्हणजे शरीरातील वायु नाकानें बाहेर सोडणे. या स्वाभाविकपणे चालू असलेल्या वायूच्या गतीचा विच्छेद म्हणजे निरोध करणें हेंच प्राणायामाचें सामान्य स्वरूप होय. पूरक, रेचक आणि कुंभक असे प्राणायामाचे तीन प्रकार आहेत. बाहेरचा वायु शरीरांत घेणे यास पूरक असे म्हणतात, तर शरीरांत घेतलेल्या वायुला बाहेर सोडणें याला रेचक असें म्हणतात. बाहेर सोडलेल्या वायूला कांहीं काळ बाहेरच स्थिर ठेवणे अथवा शरीरांत घेतलेल्या वायूला कांहीं काळ शरीरांत स्थिर ठेवणें या क्रियेला कुंभक असें म्हणतात. यापैकी पहिल्या क्रियेला बहिःकुंभक असें म्हणतात, तर दुसऱ्या क्रियेला अंतःकुंभक असें म्हणतात. आणखी निराळ्या दृष्टीनें कुंभकाचे दोन प्रकार आहेत. एक सहित कुंभक व दुसरा केवल कुंभक. पूरक आणि रेचक यांच्यासह केल्या जाणाऱ्या कुंभकाला सहित कुंभक असें म्हणतात. तर पूरक आणि रेचक या क्रिया न करतां स्वाभाविकरीत्या सुखाने वायु धारण करणें या क्रियेला केवल कुंभक असें म्हणतात. सहित कुंभकाचेही सूर्यभेदन, उज्जायी, सीत्कारी, सीतली, भस्त्रिका, सामरी, मुर्च्छा आणि प्लाविनी असे आठ प्रकार आहेतच. या सर्व कुंभकांत केवल कुंबक हा अत्यंत श्रेष्ठ आहे. आचार्यांनी योगतारावलींत सहा श्लोकांतून या केवल कुंभकाचा मोठा गौरवपूर्वक उल्लेख केलेला आहे.

पूरक, रेचक आणि कुंभक हे तिन्ही मिळून एक प्राणायाम पूर्ण समजला जातो. डाव्या नाकपुडीवर उजव्या हाताची करंगळी आणि अनामिका ठेवून डावी नाकपुडी दाबून धरावी. उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास वर घ्यावा. नंतर उजव्या हाताच्या आंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून धरावी. तर्जनी आणि मध्यमा हीं दोन बोटे मोकळीच ठेवावींत. अशा रीतीनें शरीरांत घेतलेला प्राणवायु शरीरांत कोंडून ठेवावा. नंतर डाव्या नाकपुडीवरची बोटें किंचित् सैल करून कोंडलेल्या प्राणवायूला डाव्या नाकपुडीवाटे अगदीं हळूहळू बाहेर सोडावें. जितक्या मात्रांनी पूरक केला असेल त्यांच्या चौपट मात्रांनी कुंभक करावा आणि दुप्पट मात्रांनीं रेचक करावा. याप्रमाणे उलट-सुलट पद्धतीने प्राणायामाचा अभ्यास करावा. प्राणायामाच्या वेळीं प्रणव, गायत्री-मंत्र अथवा कोणत्याही इष्ट देवतेचा मंत्र त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन उपयोगांत आणावा. त्यायोगे मनाला स्थिर व शांत करण्याला अधिकच साहाय्य होईल. याप्रमाणें प्राणायामांचा अभ्यास केल्याने शरीरातील सर्व नाड्या अत्यंत शुद्ध होतात. सुषुम्ना नाडीचे मुख मोकळे होतें. प्राणवायुचा सुषुम्ना नाडींत प्रवेश होतो. प्राणाबरोबर मनही प्रविष्ट होतें. मनाचा सुषुम्नानाडीत प्रवेश होणें हीच खरी एकाग्रता होय. याच एकाग्रतेतून अनाहतनादाचें श्रवण होऊं शकते. "विधिवत्प्राणसयामैर्नाडीचक्रे विशोधिते । सुषुम्नावदनं भित्त्वा सुखाद्विशति मारुतः ॥" "नादाभिव्यक्तिरारोग्यं जायते नाडिशोधनात्" (हठयोगप्रदीपिका). श्रीयालवल्क्यमुनींनी देखील नाडीशुद्धीची जी अनेक लक्षणें सांगितली आहेत त्यांत अनाहतनाद प्रकट होणें हेही एक लक्षण सांगितलेले आहे. "नादाभिव्यक्तिरित्येतच्चिह्नं तत्सिद्धिसूचकम्"

सुषुम्नानाडीलाच ब्रह्मनाडी, ब्रह्मस्थान, ब्रह्ममार्ग इत्यादि नावे दिलेली आहेत. चित्ताने या नाडींत प्रवेश केल्याशिवाय जीवाला ब्रह्मभाव प्राप्त होत नाही. मन सुषुम्नानाडीत प्रविष्ट झाल्याशिवाय त्याला नादब्रह्माचा अथवा स्वस्वरूपाचा साक्षात्कार होत नाहीं. प्राणासमवेत मनाने सुषुम्नानाडीत क्षणभर प्रवेश केला कीं स्वरूपपरिचिंतनाबरोबरच आपल्या उजव्या कानांत आपल्याला अनाहतनाद ऐकू येईल, असें आचार्यांनी 'प्रबोधसुधाकरांत' म्हटलेले आहे. "यावत्क्षणं क्षणार्धं स्वरूपपरिचिन्तनं क्रियते । तावद्दक्षिणकर्णे त्वनाहतः श्रूयते नादः ॥" हृत्कमल, आज्ञाचक्र अथवा सहस्रदलकमल यांच्या आत आत्मस्वरूपीं अथवा परमात्मस्वरूपीं अन्तःकरणवृत्ति ठेवून सिद्धासनावर निश्चल बसावे दृष्टि निमेषोन्मेषरहित अर्धोन्मीलित स्वरूपांत ठेवावी. अशा रीतीनें इष्ट देवतेशी समरस होणें याला योगशास्त्रांत शांभवीमुद्रा असें म्हणतात. या शांभवीमुद्रेनेही सुषुम्ना नाडींत होणाऱ्या अनाहतनादाचें उजव्या कानाने आपण श्रवण करूं शकतो. "मुक्तासने स्थितो योगी मुद्रा सन्धाय शाम्भवीम् । शृणुयाद्दक्षिणे कर्णे नादमन्तःस्थमेकधीः ॥" ( हठयोगप्रदीपिका). तात्पर्य, यमनियमपूर्वक आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासाने शरीरांतील सर्व नाड्या पूर्णपणें शुद्ध झाल्यानंतर अनाहतनाद श्रवण करण्याची योग्यता येते. हाच अभिप्राय आचार्यांनी या तिसऱ्या लोकांत प्रकट केलेला आहे. पराङ्‍मुखीमुद्रेनेंही अनाहत नादाचे श्रवण होऊं शकते. सिद्धासन अथवा स्वस्तिकासन घालून शांतपणे बसावे. दोन्ही हाताचे आंगठे दोन्ही कानांत दृढ बसवावेत. दोन्ही डोळे मिटवून आगठ्याजवळचीं बोटे पापण्यांवर ठेवावीत. मधल्या दोन्ही नाकपुड्या दाबून धराव्यात. अनामिका आणि कनिष्ठिका या दोन बोटांनीं ओठांचा वरचा आणि खालचा भाग झांकावा. मुख मिटलेले असावें. ही मुद्रा सर्व इंद्रियांना विषयांपासून पराङ्‍मुख करणारी असल्यामुळें हिला पराङ्‍मुखी मुद्रा असें म्हणतात. कोणी हिला षण्मुखीमुद्रा असेही म्हणतात. या मुद्रेनेंही सुषुम्नामार्गात होणारा अनाहतनाद ऐकू येतो. मात्र सुषुम्नामार्ग हा आसने आणि प्राणायाम यांच्या योगानें शुद्ध केलेला असावा. "श्रवणपुट-नयन-युगल-घ्राणमुरखानां निरोधनं कार्यम् । शुद्ध सुषुम्नासरणौ स्फुटममलः श्रूयते नादः ॥ " (हठयोगप्रदीपिका). अनाहत नादाच्या सिद्धीसाठी आवश्यक असलेल्या यम, नियम, आसन आणि प्राणायाम या चार योगांगांचें संक्षिप्त स्वरूप आम्ही वाचकांच्यापुढे ठेवले आतां नादानुसंधानाच्या अनुषंगाने प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या अंगाचे संक्षिप्त विवेचन चौथ्या श्लोकांत आपण पाहूं.

नादानुसंधान नमोऽस्तु तुभ्यं
     त्वां साधनं तत्त्वपदस्य जाने ।
भवत्प्रसादात्पवनेन साकं
     विलीयते विष्णुपदे मनो मे ॥ ४ ॥

"हे नादानुसंधान तुभ्यं नमः अस्तु, अहं त्वां तत्त्वपदस्य साधनं जाने, मे मनः भवत्‍प्रसादात् पवनेन साकं विष्णुपदे विलीयते ।" हे नादानुसंधाना ! तुला माझा नमस्कार असो. तूं ब्रह्मपदाच्या प्राप्तीचे साधन आहेस असें मी समजतो. तुझ्या कृपेने माझें मन प्राणवायूसह विष्णुपदीं अर्थात् विश्वव्यापक असलेल्या ब्रह्मस्वरूपीं लीन होत आहे. असा या लोकाच्या अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

परब्रह्मस्वरूपीं मनाने पूर्णपणे लीन होऊन रहाणे यालाच समाधि असें म्हणतात. ही अवस्था प्राप्त होणें यांतच मानवी जीवनाची सफलता आहे. परमार्थाच्या मार्गाने प्रवृत्त झालेले साधक हीच अवस्था प्राप्त करून घेण्यासाठीं सतत प्रयत्न करीत असतात. ज्यांना परब्रह्माच्या निर्गुण स्वरूपांत आपल्या मनाचा लय घडवून आणता येत नाहीं ते त्या परब्रह्माच्या सगुण स्वरूपांत आपल्या मनाचा लय करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. सगुण स्वरूपी मन लीन झाले तरी तें निर्गुण स्वरूपी लीन झाल्यासारखेंच आहे. सोन्याचे अलंकार हातीं आले तरी ते सोनेंच हातीं आल्यासारखे असतें. बाजारांत साखर नाहीं मिळाली तरी बत्तासे, साखरेची चित्रे किंवा गांठ्या मिळाल्या तरी साखर मिळाल्यासारखेच होतें. याच न्यायाने सगुण स्वरूपी मन तन्मय झालें तरी तें निर्गुण स्वरूपी रमल्यासारखेंच आहे.

यावर कोणी असे विचारील कीं, अहो ! जें निर्गुण आहे तें सगुण कसें असू शकेल ? जें सगुण आहे तें निर्गुण कसें असू शकेल ? यावर श्रीतुलसीदासांनीं मोठे मार्मिक उत्तर दिलेले आहे. "जो गुणरहित सगुणसो कैसे ? जल हिम उपल विलग नहिं जैसे । फूले कमल सोह सर कैसे ? निर्गुण ब्रह्म सगुण भये जैसे ॥" बर्फाचे खडे किंवा आकाशांतून पडलेल्या गारा ह्या पाण्याहून निराळ्या नाहींत. तूप थिजले तरी तें वितळलेल्या तुपाहून निराळें नसतें. कमळ विकसलें तरी तें मिटलेल्या कमळाहून निराळें होत नाहीं. त्याचप्रमाणे परमात्मतत्व सगुण रूपाने साकारले तरी तें निर्गुण रूपाहून निराळें नाहीं. विकसित झालेल्या कमलांनीं सरोवराची शोभा जशी अपूर्व दिसावी त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्म नामरूपानें नटले, सगुण रूपाने साकारले तर त्याची शोभा कांहीं अपूर्वच दिसते ! याच अभिप्रायाने भगवद्धक्त आपल्या मनाचा लय परमेश्वराच्या सगुण स्वरूपांतच करीत असतात. पतंजलिमहर्षींनी देखील "ईश्वरप्रणिधानाद्वा" या सूत्राने अनन्यचित्तानें केली जाणारी ईश्वरोपासना ही देखील निर्विकल्प समाधीचे साधन असल्याचे सांगितलेंच आहे. ईश्वराची रूपे अनंत असल्यामुळें त्याच्या उपासनेचे प्रकारही असंख्य आहेत. ते सर्व प्रकार मनाच्या लयाची साधनेच होत. अशा रीतीनें मनाच्या लयाची साधने असंख्य असली तरी आचार्य प्रकृतस्थलीं नादानुसंधान हेंच मनाच्या लयाचे - निर्विकल्प समाधीचे सर्वोत्कृष्ट साधन असल्याचें स्वानुभवाने सांगत आहेत.

"त्वां साधनं तत्त्वपदस्य जाने" या श्लोकांत "तत्त्वपद" आणि "विष्णुपद" असे दोन शब्द आचार्यांनी योजले आहेत. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. "ॐ तद्‍ब्रह्म । ॐ तद्वायुः । ॐ तदात्मा । ॐ तत्सर्वम् ।" इत्यादि महानारायणीयोपनिषदांतील वाक्यांनी तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म किंवा आत्मा असा सांगितलेला आहे. तस्य भावः तत्त्वं अशी तत्त्व शब्दाची व्युत्पत्ति आहे. भाव शब्दाचा अर्थ स्वरूप असा आहे. प्रकृतस्थलीं तत्त्व शब्दाचाही अर्थ ब्रह्माचें स्वरूप अर्थात् ब्रह्म असाच होतो. "तत्त्वं ब्रह्मणि याथार्थ्ये" या कोशांतही तत्त्व शब्द हा ब्रह्माचा वाचक असल्याचें सांगितले आहे. "पद्यते गम्यते इति पदं" या व्युत्पत्तीने पद शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. "सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म" या तैत्तिरीय श्रुतिवचनाप्रमाणें ज्ञान शब्दाचा अर्थ ब्रह्म असाच आहे. तात्पर्य, तत्त्वपद म्हणजे सच्चिदानंदरूप परब्रह्म. अनाहत नादाचे अनुसंधान म्हणजे अखंड चिंतन हेंच सच्चिदानंदरूप परब्रह्माच्या साक्षात्काराचे सर्वोत्कृष्ट साधन होय. असा हा "त्वां साधनं तत्त्वपदस्य जाने" या दुसऱ्या चरणाचा अभिप्राय आहे.

अगदी सहज रीतीनें आपल्या मनाचा सच्चिदानंदरूपीं लय करून घेण्याचें नादानुसंधान हे एक सर्वोत्कृष्ट साधन असल्यामुळें आचार्यांनीं या श्लोकाच्या पहिल्याच चरणांत नादानुसंधानाबद्दल अत्यंत आदर व्यक्त करीत नादानुसंधानाला नमस्कार केलेला आहे. ब्रह्मस्वरूपी मन समरस करण्यास नादानुसंधानाचा कसा उपयोग होतो हें तत्त्व या श्लोकाच्या उत्तरार्धात स्पष्ट केले आहे. तें आतां आपण पाहूं.

"भवत्प्रसादात् पवनेन सार्क विलीयते विष्णुपदे मनो मे" हे नादानुसंधाना ! तुझ्या कृपेने माझें मन अगदीं सहज रीतीनें प्राणवायूसह ब्रह्मस्वरूपीं लीन होत आहे. मागील श्लोकांत वर्णन केल्याप्रमाणे आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासानें देहातील सर्व नाड्यांचें शुद्धीकरण झालें की यमनियमांच्या पाठबळाने विवेकी बनलेले मन विषयांपासून विरक्त होऊन आत्मप्रवण होऊं लागतें. मनाला विषयांपासून परावृत्त करतांना इतर इंद्रियांना देखील आपआपल्या विषयापासून परावृत्त करावेच लागतें. यालाच योगशास्त्रांत "प्रत्याहार" असें म्हटलेले आहे. इंद्रिये ही स्वभावतःच विषयोन्मुख असतात. विषय दिसला कीं तिकडे तीं धाव घेत असतात. इंद्रियांच्या पाठोपाठ मनही धांवत असतें आणि मनाच्या पाठोपाठ शरीराचीही हालचाल सुरू असतेच. यांच्यांतूनच अस्वस्थता निर्माण होते. याकरिता साधकांना विवेकाच्या बळाने वैराग्य धारण करून इंद्रियांना आपआपल्या विषयांपासून परावृत्त करावे लागतें. हेंच प्रत्याहाराचें स्वरूप होय. "इंद्रियाणां विचरतां विषयेषु स्वभावतः । बलादाहरणं तेषां प्रत्याहारः स उच्यते ॥" असे योगयाज्ञवल्क्यात प्रत्याहाराचे लक्षण दिलेले आहे.

प्रत्याहाराचा अभ्यास करतांना इंद्रियांना जसे विषयांपासून आवरावे लागतें तसेंच मनालाही विषयांपासून आवरावे लागतेंच. इंद्रियांना आणि मनाला बाह्य विषयांपासून आवरणे यालाच अंतर्मुख होणें असें म्हणतात.

मनाचा स्वभाव असा आहे कीं, तें सर्वस्वी निर्विषय कधीं राहूच शकत नाहीं. बाह्य विषयांपासून त्याला आवरले तें स्वभाविकच अंतर्विषयाकडे वळणार. मनानें अंतर्विषयाकडे वळणे यालाच आत्मप्रवण होणें असें म्हणतात. मन आत्मप्रवण झालें की इंद्रियांचा विषयांशी संबध आपोआपच सुटतो. याच अवस्थेला प्रत्याहार असें म्हणतात. मन ब्रह्मचिंतनाकडे प्रवृत्त झालें की बहिरिंद्रियांच्या वृत्तीही ब्रह्मचिंतनाला अनुरूप अशाच निर्माण होत रहातात. साधक हा अंतरिंद्रियाने व बहिरिंद्रियांनींही प्रत्याहारकालीं आत्मप्रवणच होत असतो. याच अभिप्रायाने "शब्दादिषु विषयभावनामुत्सृज्य ब्रह्मभावनं तत्प्रत्याहार" अशीही एका विद्वानाने प्रत्याहाराची व्याख्या केलेली आहे, ती योग्यच आहे. पतंजलींनीं देखील याच अभिप्रायाने "स्वविषयासम्प्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः" आपल्या विषयाशी संबंध सुटल्यानंतर इंद्रियांनी अंतर्मुख झालेल्या चित्ताचे अनुकरण करणें हेच प्रत्याहाराचें स्वरूप होय, अशीच प्रत्याहाराची व्याख्या केलेली आहे.
प्रकृतस्थलीं अन्तर्मुख झालेलें मन हें अनाहतनादाचें अनुसंधान म्हणजे चिंतन करूं लागलें कीं साधकाचे कानही अनाहतनादाचें श्रवण करण्याकरितां उत्सुक झालेले असतात. नेत्रांनाही तेथें कांहीं तरी अलौकिक रूप दिसतेच. तें दिव्य रूप पहाण्याकरितां नेत्रही उत्कंठित झालेले असतात. 'ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत् " अशा शब्दांनी वेदांनींही त्या रूपाचे वर्णन केलेले आहे. रसनेंद्रियालाही तेथील अलौकिक रसाचा आस्वाद घ्यावयास सापडतो. घ्राणेंद्रियाला तेथें दिव्य गंधाची उपलब्धि होतच असते. त्या तत्त्वाचा स्पर्शही कांहीं अनिर्वचनीयच असतो. त्या अनिर्वचनीय दिव्य तत्त्वाला स्पर्श करण्यासाठी साधकाचे त्वगिंद्रियही आतुरलेले असतें. तात्पर्य, मन नादानुसंधानाला उन्मुख झालें कीं, इतर इंद्रियेही त्या मनाला अनुसरतात. याच अवस्थेला प्रत्याहार असें म्हटलें जातें. हें योगाचे पाचवे अंग आहे.

मधुरनादाच्या ठिकाणी मनाला आकृष्ट करण्याचें सामर्थ्य हें स्वाभाविकच असते. श्रीकृष्णप्रभूच्या मुरलीचा मधुर नाद ऐकून वृक्षलतादि स्थावर जीवही मुग्ध होत होते. मग पशु, पक्षी, गाई-वासरें, गोप-गोपी आणि इतर जन मुग्ध होत असतील यांत नवल काय ? बाह्य नादही इतका आकर्षक असतो तर अंतर्नाद किती आकर्षक असेल याची कल्पना करावी. सूक्ष्म अन्तर्नाद अभिव्यक्त होण्याचें स्थान सुषुम्ना नाडी होय. प्राणासह सुषुम्ना नाडींत प्रविष्ट झालेलें मन अंतर्नादाशी संलग्न होतें. मनामध्यें नादाकार वृत्तिप्रवाह निर्माण होणें हेंच नादाचे अनुसंधान होय.

अनाहतस्य शब्दस्य ध्वनिर्य उपलभ्यते ।
ध्वनेरन्तर्गतं ज्ञेयं ज्ञेयस्यान्तर्गतं मनः ।
मनस्तत्र लय याति तद्विष्णोः परमं पदम् ॥

नादाचे अनुसंधान करणें हे आत्मानुसंधानच होय. नादामध्येच ज्ञेयतत्त्व सामावलेले आहे. किंबहुना नादतत्त्व आणि ज्ञेयरूप ब्रह्मतत्त्व ही दोन्ही एकच आहेत. "नादो ज्योतिर्मयः शिवः" असे नादबिंदुपनिषदांत म्हटले आहे. ज्योति किंवा शिव या दोन्ही शब्दांनी ब्रह्मच विवक्षित आहे. अशा रीतीनें अंतर्नादाशी संलग्न झालेलें मन हें ब्रह्मस्वरूपींच संलग्न झालेलें असतें याच अवस्थेला योगशास्त्रांत "धारणा" असें म्हणतात.

यमादिगुणायुक्तस्य मनसः स्थितिरात्मनि ।
धारणेत्युच्यते सद्‌भिः शास्त्रताप्तपर्यवेदिभिः ॥

पतंजलींनी देखील "देशबन्धश्चित्तस्य धारणा" अशी धारणेची व्याख्या केलेली आहे. ब्रह्मस्वरूप अनाहतनादरूपी देशाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर करणें असा त्याचा अर्थ आहे. हें योगाचे सहावे अंग होय. देश शब्दाने कोणताही ध्येयविषय घेता येत असला तरी प्रकृतस्थली अनाहतनाद हाच आचार्यांना विवक्षित असल्यामुळे त्याचा उल्लेख केला आहे. आपल्या शरीरातील मणिपूरचक्र, अनाहतचक्र, आज्ञा चक्र इत्यादि चक्रेंही देश शब्दाने विवक्षित असून त्या त्या ठिकाणी आपल्या इष्टदेवतेच्या स्वरूपांत मनाला स्थिर करणें हेही धारणेचेच स्वरूप होय.

धारणेचीच पुढची पायरी म्हणजे ध्यान होय. "तत्र प्रत्यर्येकतानता ध्यानम्" अशी ध्यानाची व्याख्या आहे. धारणेमध्ये ज्या विषयाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर केलें असेल त्याच विषयाचा दीर्घकाळ, तैलधारा जशी अखंड असते त्याचप्रमाणें चित्तवृत्तीचा अविच्छिन्न प्रवाह चालू असणें याला ध्यान असें म्हणतात. सगुण अथवा निर्गुण या रूपाने ध्यान दोन प्रकारचे असलें तरी सर्वत्र ध्यानामध्यें साधकाने ध्येय तत्त्वाशी आपले तादात्म्य चिंतावे लागतें हा धारणेपेक्षां ध्यानाचा विशेष आहे. " सोऽहमस्मीति या बुद्धिः सा च ध्याने प्रशस्यते" असे याज्ञवल्क्यांनीं म्हटले आहे. ध्येयतत्त्व हे निर्गुण असो अथवा सगुण असो, तेंच मी आहे. मी त्याहून निराळा नाहीं अशी भावना ध्यानामध्ये अनुस्यूत असते. नादानुसंधान या शब्दांतील अनुसंधान शब्दाचा अर्थ सतत, अविच्छिन्न चिंतन असाच आहे. नादामध्ये ॐचे अथवा सोऽहंचे चिंतन सहजच करतां येतें. याप्रमाणे नादानुसंधान हे नादब्रह्माचे ध्यानच होय. ध्यान हें योगाच्या आठ अंगांपैकीं सातवें अंग होय.

नादाच्या अनुसंधानानेंच अंतःकरणामध्यें सोऽहं तत्त्वाचाही ज्ञानदीप उजळतो. अज्ञानमूलक मोहांधकाराचा नाश होतो. अखंड प्रवाहरूपानें चाललेल्या एकाग्र ध्यानानें आत्मप्रकाश फाकतो. त्या प्रकाशांतच होणाऱ्या आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराने मन आत्मस्वरूपाशीं इतकें समरस होऊन जातें कीं, त्या वेळीं त्याला अंतबार्ह्य विश्वाचे कांहीं भान उरत नाहीं. हीच मनाची समाधि-अवस्था होय. यालाच स्वरूपी मनाचा लय झाला असें म्हणतात. लयाची पराकाष्ठा म्हणजे मनाने ध्येयतत्त्वाशीं एकरूप होऊन जाणें हीच आहे. ध्येयभूत जो सच्चिदानंदरूप परमात्मा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वृत्ति मनामध्ये उदयाला येत नसल्यामुळें समाधिअवस्थेत दुसरा कोणताच अर्थ भासत नाहीं. या वेळीं साधकाचें मन स्वरूपशून्यच झालेलें असतें. फक्त परमात्मतत्त्वच त्या वेळीं उर्वरित असतें. तें स्वयंप्रकाश असल्यामुळें आपल्या प्रकाशानेच प्रकाशत असतें. याच अवस्थेचे "तदेव अर्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः" या सूत्राने पतंजलींनीं वर्णन केले आहे. अशा रीतीनें ध्येयाशी मनाचें पूर्णपणे तादात्म्य प्राप्त होणें यालाच निर्विकल्प समाधि असें म्हणतात. ही निर्विकल्प समाधि फलरूप असल्यामुळें ती 'अंगी' अर्थात् मुख्य होय. या निर्विकल्पसमाधीच्याच पूर्वावस्थेला सविकल्प समाधि असें म्हणतात. सविकल्प समाधि ही अष्टांग योगातील आठवे अंग होय. तात्पर्य, योगाभ्यासबलानें सुषुम्ना नाडीचे मुख खुले होऊन प्राणवायूसह मन सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होते. तेथें त्याला नादतत्त्वाचा साक्षात्कार होतो. या नादतत्त्वालाच अनाहतनाद असें म्हणतात. या नादाचें अनुसंधान करीत मन प्राणवायूसह सहस्रदलकमलांतर्गत महाकाशांत विलीन होतें. या महाकाशालाच प्रकृतस्थलीं "विष्णुपद" असें म्हटले आहे. " वियद् विष्णुपदं वाऽपि" असा पर्याय देऊन अमरकोशकारानेंही विष्णुपद हा शब्द आकाशाचा वाचक असल्याचें सांगितले आहे. विष्णु म्हणजे व्यापनशील परब्रह्मतत्त्व. मूर्धस्थानीं असलेल्या सहस्रदलकमलांतील आकाशांत योगी लोकांना त्याचा साक्षात्कार होत असल्यामुळें त्या स्थानाला विष्णुपद हें अन्वर्थ नांव आहे. हा सर्व लाभ नादानुसंधनानेंच सहज सुलभरीतीनें घडून येत असल्यामुळें आचार्यांनी या श्लोकाच्या उत्तरार्धात " भवत्प्रसादात् पवनेन साक विलीयते विष्णुपदे मनो मे" अशा शब्दांनी नादानुसंधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.


जालन्धरोड्याणन-मूलबन्धा-      ञ्जल्पन्ति कण्ठोदर-पायु-मूलान् ।
बन्ध-त्रयेऽस्मिन्परिचीयमाने
     बन्धः कुतो दारुण-काल-पाशात् ॥ ५ ॥


"जालन्धरोड्याणनमूलबन्धान् कण्ठोदरपायुमूलान् जल्पन्ति; अस्मि बन्धत्रये परिचीयमाने सति दारुणकालपाशात् बन्धः कुतः ?" जालंधरबंध ओड्याणबंध आणि मूलबंध असे हे तीन बंध क्रमशः कंठ, उदर आणि गुदस्थान यांच्या मुळांशी त्यांच्या आधारानेच होत असतात असें योगी लोक एकमुखाने प्रतिपादन करीत आहेत. त्यांत मतभेद नाहीं. या तीन बंधांचा अभ्यास करीत असतांना कालपाश हा कितीही भयंकर असला तरी योग्याला त्या कालपाशाचें बंधन कोठून असणार ? अर्थात् या तीन बंधांचा अभ्यास करणारा योगी भयंकर अशा कालपाशांतूनही मुक्त होतो. असा या श्लोकाचा अन्वय आणि अन्वयानुसारी सरळ अर्थ आहे.

मागील श्लोकांत नादानुसंधान हें ब्रह्मपदाच्या प्राप्तीचे सुलभ आणि सर्वोत्कृष्ट साधन असल्याचें सांगितलें. त्याच्याही मागच्या श्लोकांत प्राणायामाच्या अभ्यासाने नाडीशुद्धि झाल्यानंतर आपल्या देहामध्ये अनाहतनाद अभिव्यक्त होऊं शकतो असें सांगितलें. या अनाहतनादाच्या, विशेषतः सूक्ष्म अशा अनाहत ध्वनीच्या अभिव्यक्तिचें स्थान सुषुम्ना नाडी आहे. ती स्वभावतः च 'सु सु' असा ध्वनि करीतच असते म्हणूनच तिला सुषुम्ना असें नांव पडलें आहे. "सु सु इति अव्यक्तशब्दं म्नायति इति सुषुम्ना" अशी सुषुम्ना या शब्दाची व्युत्पत्ति आहे. या सुषुम्ना नाडींतच सूक्ष्म नादाचा साक्षात्कार होत असतो. तो साक्षात्कार होण्यासाठीं प्रथम कुंडलिनीच्या मुखानें आच्छादित असलेलें सुषुम्ना नाडीचे द्वार मोकळे होणें आवश्यक आहे. तें मोकळे झाल्याशिवाय प्राणवायु सुषुम्नानाडींत प्रवेश करूं शकणार नाहीं. प्राणाचा प्रवेश झाल्याशिवाय मनाचा तेथें प्रवेश होणार नाहीं. प्राणाचा आणि मनाचा प्रवेश झाल्याशिवाय अनाहतनादाचें श्रवणही होणार नाहीं. अनाहतनादाचें श्रवणच जर झालें नाहीं, तर मग त्या नादाचे अनुसंधान कसें करतां येईल ? हा सर्व विचार लक्षांत घेऊन आचार्य या श्लोकांत सुषुम्ना नाडीचें द्वार मोकळे करण्याकरिता अत्यंत उपयुक्त असलेल्या योगप्रक्रियेतील तीन बंधांचा उल्लेख करून त्यांच्या स्वरूपाचाही निर्देश करीत आहेत. "जालन्धरोड्याणनमूलबन्धाञ्जल्पन्ति कण्ठोदरपायुमूलान्" जालंधरबंध, उड्डियानबंध आणि मूलबंध हे तिन्ही बंध शरीरामध्ये प्राणवायुचे बंधन करतात. प्राणवायूला आवरून धरतात म्हणून यांना बंध असें नांव दिलेले आहे. " बध्नाति प्राणवायुं इति बन्धः" अशी बंध शब्दाची व्युत्पत्ति आहे.

( १) जालंधरबंध - कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या - जत्रूंच्या मध्यभागी दाबून धरावे म्हणजे जालंधरबंध होतो. हा सिद्धासन, स्वस्तिकासन अथवा पद्मासन घालून करावा. या बंधाने कंठस्थानीं असलेलें शिरांचे जाळे बांधले जातें, म्हणूनच या बंधाला जालंधरबंध असें म्हणतात. जालंधर या नांवांत आणखी एक सूक्ष्म विचार असा आहे कीं, आपल्या मूर्धस्थानीं असलेल्या पूर्णचंद्रांतून अमृत स्त्रवत असतें तें अमृत देहाच्या मध्यभागी आलें कीं जाठराग्नीच्या उष्म्याने शुष्क होऊन जातें. याच कारणानें देह लवकर जीर्ण होतो. जालंधरबंधाच्या अभ्यासानें ते अमृत सरळ पचनमार्गात न उतरता सर्व शरीरभर पसरते व त्यामुळे योग्याचा देह लवकर जीर्ण होत नाहीं. संस्कृत भाषेमध्ये जलाचा पर्यायवाचक शब्द अमृत आहे. "जलानां समूहो जालं" जाल म्हणजे अमृताचा समूह. या समूहाला हा बंध आवरून धरतो म्हणूनच याला जालंधर असें म्हणतात. "जालं धरतीति जालन्धरः" अशी जालंधर शब्दाची व्युत्पत्ति आहे. जालंधरबंधानें कपालकुहरातून स्रवणारें अमृत जठराग्नीकडे न जातां सर्व शरीराला त्याचा लाभ होतो आणि त्यामुळें शरीराला जरावस्था लौकर प्राप्त होत नाहीं. याच अभिप्रायाने "बन्धो जालन्धराख्योऽयं जरामृत्युविनाशकः" असें म्हटलेले आहे. हा जालन्धरबंध "कण्ठदुःखौघनाशनः" कंठस्थानांतील सर्व रोगांचा नाश करणारा आहे. याने गलगंड, गंडमाला इत्यादि विकार होणार नाहींत, याने क्षयाचा ही प्रतिबंध होईल. असा हा जालंधरबंध उपकारक आहे.

( २) उड्डियानबंध - वर सांगितलेल्या तिन्ही आसनांपैकीं कोणतेंही ऐक आसन घालून उड्डियानबंधाचा अभ्यास करावा. हा बंध उदरस्थानीं करावयाचा असतो. नाभिस्थानचा खालचा भाग आणि वरचा भाग अशा या दोन्ही भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठवंशाकडे खेंचून घ्यावें. पाठीला पोक येऊ न देता सर्व शरीर ताठ ठेवावें. यालाच उड्डियानबंध असें म्हणतात. या बंधाने प्राणवायु हा शुषुम्ना नाडीमध्ये वर उड्डाण करतो म्हणूनच याला ओड्याण अथवा उड्डियानबंध असें म्हणतात. या उड्डियानबंधाचा अभ्यास आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्वाचा आहे. याला "मृत्युमातगकेसरी" असें म्हटले आहे. मृत्युरूपीं उन्मत्त हत्तीचा नाश करणारा हा प्रत्यक्ष सिंहच आहे. या बंधाने पोट नेहमी साफ राहते पोट साफ रहाण्यावरच बरेंचसें आरोग्य अवलंबून असतें. ज्याचे पोट साफ त्याचें आरोग्य उत्तम. पोट बिघडलें कीं आरोग्यही बिघडलेच म्हणून समजावें. उड्डियानबंधाच्या अभ्यासानें नाभिस्थानचा समान वायूही कधीं बिघडत नाहीं. अन्नरसाच्या व मलसूत्र आणि स्वेद इत्यादिकांच्या विभजनाचें व प्रेरणेचे त्याचें प्राकृतिक कार्य सुव्यवस्थित चालू असतें. सर्व शरीरभर पसरलेल्या लहानमोठ्या सर्व शिरांतून रसरक्तादि धातूंचे अभिसरण हें व्यानवायुमुळे होत असतें. ज्याच्या समानवायुचें आणि व्यानवायुचे कार्य उत्तम चालते त्याच्या देहाचे पोषणही उत्तम होत असतें. उड्डियानबंधाच्या अभ्यासाने जठराग्नीही चांगला प्रदीप्त होतो. भूक उत्तम लागते. शक्ति वाढते व आयुष्यही वाढतें. याच्या अभ्यासाने "वृद्धोऽपि तरुणायते" वृद्धही तरुण होतो असें याचे वर्णन केले आहे. उड्डियानबंधानें प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पांचही वायूंची प्राकृतिक कार्यें सुव्यवस्थित होत असल्यामुळे शरीराचे सर्वांगीण आरोग्य सुरक्षित रहाते. याच अभिप्रायानें " सवेर्षामेव बन्धानामुत्तमो ह्युड्डियानकः " असें योगशास्त्रांत या बंधाचें वर्णन केले आहे. पूरक प्राणायामाच्या शेवटीं व कुंभक प्राणायामाच्या आरंभी जालंधरबंध केल्यास ही क्रिया सोपी जाते. तसेंच कुंभक प्राणायामाच्या अंती व रेचक प्राणायामाच्या आरंभी उड्डियानबंध केल्यास हीही क्रिया सोपी जाते. ही गोष्ट या दोन्ही बंधांचा अभ्यास करतांना अवश्य लक्षांत ठेवावी.

"पूरकान्ते तु कर्तव्यो बन्धो जालन्धराभिधः ।
कुम्भकान्ते रेचकादौ कर्तव्यस्तूड्डियानकः ॥" हठयोगप्रदीपिका

मूलबंध - सिद्धासनांत सांगितल्याप्रमाणे डाव्या पायाची टाच सीवनीच्या मध्यमागी दाबून बसवावी. गुदद्वाराचें अधिकांत अधिक आकुंचन करून अपान-वायूला वर खेंचावे. शरीर ताठ ठेवावें. दृष्टि नासाग्रीं असावी. हेंच मूलबंधाचे स्वरूप होय. सिद्धासनांतच गुदद्वाराचा संकोच आणि अपान वायुचे ऊर्ध्वाकर्षण या दोन क्रिया अधिक केल्या की मूळबंधाचे स्वरूप सिद्ध होते. कांहीं योगी लोक डाव्या पायाची टाच गुदद्वाराशीं लावूनही हा मूलबंध करीत असतात. अनाहतध्वनि अभिव्यक्त होण्याला मूलबंधाचा चांगलाच उपयोग होत असतो. मूलबंधानें अपान वायु हा उर्ध्वगामी होत असतो. जालंधरबंधाच्या पूर्वक्षणी केल्या जाणाऱ्या पूरकाने व जालंधरबंधाच्या वेळीं होणाऱ्या कुंभकाने प्राणवायु हा अधोगामी होतो. अपान आणि प्राण यांचा नाभिस्थानाच्या अधोभागीं संगम होतो. त्यांच्या समागमानें स्वाधिष्ठानचक्रांतील आणि मणिपूरचक्रांतील अग्नि प्रदीप्त होतो. प्रदीप्त झालेल्या त्या अग्निज्वाळेंत अंतर्ध्यानाने कित्येकांना आत्मज्योतीचा साक्षात्कारही होत असतो.

प्राण आणि अपान यांच्या संयोगानें प्रदीप्त झालेल्या अग्नीच्या तापाने स्वाधिष्ठानचक्राच्या ठिकाणी असलेली कुंडलिनी जागृत होते. तिच्या जागृतीने सुषुम्नानाडीचें मुख मोकळे झाल्याबरोबर कुंडलिनीसह प्राणवायूचा सुषुम्नानाडीत प्रवेश होतो. अशा रीतीनें प्राणवायूचा बाह्य मार्ग हळूहळू सुटत जातो व सुषुम्नामार्गाने ऊर्ध्वगामी होतो. प्राण हा नादस्वरूप आणि अपान हा बिंदुस्वरूप असल्यामुळें मूलबंधानें त्या दोहोंचे एकीकरण झाल्यानंतर सुषुम्नानाडीमध्यें प्राण हा अनाहतध्वनीच्या रूपाने व अपान हा अनुस्वाराच्या रूपानें प्रतीतीस येतो. अशा रीतीनें सुषुम्ना नाडींत पूर्णपणें अभिव्यक्त झालेल्या नादाशी प्राणाबरोबर प्रविष्ट झालेलें मनही संलग्न होऊन जातें. शेवटीं नादाशी संलग्न झालेले मन नादाबरोबरच मूर्धस्थानीं असलेल्या विष्णुपदीं लीन होऊन जाते. हीच साधकाची समाधिअवस्था होय. अशा रीतीनें साधक हा समाधि-अवस्थेत पोहोचल्यावर मग त्याला कालपाश हा कितीही दारुण असला तरी त्याचें भय कोठून असणार ? जोपर्यंत मन ब्रह्मपदीं लीन होत नाहीं तोपर्यंतच मृत्यूचे भय असूं शकते. मन ब्रह्मपदीं लीन झाल्यानंतर तो साधक काळाचाही काळ बनतो, मग त्याला मृत्युपाशाचे भय कसें असणार ? तो सर्वबंधविनिर्मुक्त होतो. याच अभिप्रायाने आचार्यांनी या श्लोकाच्या उत्तरार्धात " बन्धत्रयेऽस्मिन्परिचीयमाने बन्धः कुतो दारुणकालपाशात्" अशा शब्दांनी या तिन्ही बंधांची फलश्रुति वर्णन केलेली आहे. असा हा जालंधरबंध, उड्डियाणबंध आणि मूलबंध या तिन्ही बंधांचा महिमा आहे.


ओड्याण-जालन्धर-मूलबन्धै-
     रुन्निद्रितायामुरगाङ्‌गागनायाम् ।
प्रत्यङ्‌मुखत्वात्प्रविशन्सुषुम्नां
     गमागमौ मुञ्चति गन्धवाहः ॥ ६ ॥


उड्डियानबंध, जालंधरबंध आणि मूलबंध या तिन्ही बंधांच्या अभ्यासानें "उरगांगनां" म्हणजे स्वाधिष्ठानचक्राच्या कर्णिकेवर खालीं मुख करून प्रसुप्त असलेली सर्पाकार कुंडलिनी ही जागी झाली असतां प्राणवायू हा अंतर्मुख होऊन सुषुम्नानाडीत प्रवेश करूं लागतो. तो त्या ठिकाणी प्रवेश करीत असतांना इडा आणि पिंगळा यांच्या द्वारा शरीराच्या बाहेर जाणे आणि बाहेरून शरीरांत प्रवेश करणें या दोन्ही क्रिया तो सोडून देतो. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे.

मागील श्लोकांत जालंधर, उड्डियान आणि मूळ या तिन्ही बंधांचा अभ्यास कसा करावा हें सांगितले. त्याचप्रमाणे या तिन्ही बंधांच्या अभ्यासानें साधक हा दारुण कालपाशाच्या बंधनांतून मुक्त होतो हेही सांगितले, पण या बंधत्रयाच्या अभ्यासानें साधकाची सर्व दुःखातून अथवा दारुण काळपाशांतून सुटका कशी होणार हा प्रश्न रहातोच. प्रस्तुत श्लोकांत आचार्य याच प्रश्नाचें उत्तर देत आहेत. या तिन्ही बंधांची रचना, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम आणि फलश्रुति हें आपण मागील श्लोकांत पाहिलेच आहे. आतां या बंधांचा आणि दारुण कालपाशांतून होणाऱ्या सुटकेचा कार्यकारणभाव कसा हें आपण आचार्यांच्या शब्दांतून पाहूं. जालंधर या शब्दाची व्युत्पत्ति मागील श्लोकांत आम्ही सांगितलीच आहे. कांहीं लोक जालंधर या शब्दाऐवजी जालंदर असा शब्द योजतात, तोही योग्यच आहे. जाल शब्दाचा दुःखजाल, अज्ञानजाल, दुर्वासनाजाल किंवा संसारजाल, असा अर्थ होतो. माशांना ज्याप्रमाणें जाळे अडविते, दुःख देते व शेवटीं तें त्यांचा घातही करते त्याचप्रमाणे अज्ञान, दुर्वासना आणि संसार यांची जाळी ही जीवांना जन्मभर ताप देतात व शेवटीं घातही करतात. अशा या जालांचे जालंधरबंध विदारण करतो म्हणून त्याला जालंदर असे नांव देणे योग्यच आहे. दॄ विदारण करणें या धातूपासून हा शब्द बनला आहे. " जालं दारयति अथवा दृणाति इति जालंदरः" अशी जालंदर या शब्दाची व्युत्पत्ति आहे.

या तिन्ही बंधांच्या अभ्यासाने शरीरातील कुंडलिनी जागृत होते. येथें ही एक गोष्ट लक्षांत घ्यावी कीं, आसने आणि प्राणायाम यांचा अभ्यास ज्याप्रमाणें यमनियमांच्या भूमिकेवरून करावयाचा असतो त्याचप्रमाणे या तिन्ही बंधांच्या अभ्यासालाही यमनियमांची भूमिका ही दृढ असावयास पाहिजेच. नाहीं तर या बंधांच्या अभ्यासाला केवळ बाह्य व्यायामाचे स्वरूप राहून त्याची आरोग्यादि फळें मिळतील, पण कुंडलिनीची जागृति होऊन तिचा सुषुम्ना नाडींत प्रवेश होणे, मनाचा नादानुसंधानानें ब्रह्मस्वरूपांत लय होणें, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणें या गोष्टी घडून येणार नाहींत. आणि या गोष्टी घडून आल्याशिवाय जीवाची अज्ञानातून, दुर्वासनांच्या जालांतून आणि संसारबंधनांतून सुटकाही होणार नाहीं. यमनियमांच्या दृढ भूमिकेवरून आसने आणि प्राणायाम यांच्या अभ्यासाने सर्व नाड्यांची शुद्धि झाल्यानंतर बंधत्रयांचा अभ्यास करावा म्हणजे कुंडलिनी जागृत होते, असें योगशास्त्र व योगी लोक सांगतात. तें आपण अनुभवून पहावयाचे आहे. याकरिता कुंडलिनी म्हणजे काय याचा आपण अगोदर विचार करूं.

कुंडलिनी हें एक आपल्या शरीरातील मोठे गुढ तत्त्व आहे. अनेक कवि, मुनि, तत्त्ववेत्ते, साधु, संत, महात्मे व ग्रंथकार यांनी कुंडलिनीचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. त्या सर्व वर्णनांत पूर्णपणे एकवाक्यता दिसून येत नाहीं. ज्यांना ज्यांना या तत्त्वाचा जसा अनुभव आला तसें त्यांनीं वर्णन करून ठेवले आहे. त्यांच्या वर्णनाची स्वरूपे भिन्न भिन्न असली तरी कुंडलिनी ही एक आपल्या शरीरातील अनिर्वचनीय शक्ति आहे याविषयी कोणाचाच मतभेद नाहीं. "शक्तिः कुण्डलिनी नाम बिसतन्तुनिभा शुभा" कुंडलिनी ही एक शक्ति असून ती कमळांतील तंतूप्रमाणें अत्यंत सूक्ष्म व नाजूक आहे असें योगकुंडल्युपनिषदात तिचे वर्णन केले आहे. "मुलाधारगता शक्तिः स्वाधारा बिन्दुरूपिणी । तस्यामुत्पद्यते नादः सूक्ष्मबीजादिवाड्ःकुरः ॥" मुलाधारचक्रांत रहाणारी कुंडलिनी ही एक शक्ति असून ती जीवतत्त्वाचा आधार आहे. सूक्ष्म वटबीजांतून जसा अंकुर निर्माण व्हावा त्याचप्रमाणे या शक्तीतूनच नाद उत्पन्न होत असतो असें योगशिखोपनिषदांत हिचे वर्णन केले आहे. "पराशक्तिः कुण्डलिनी बिसतन्तु तनीयसी " असें ललितासहस्रनामांत कुंडलिनीचे वर्णन केले आहे. "कन्दोर्ध्वे कुण्डली शक्तिः सुप्ता मोक्षाय योगिनाम्" चतुर्दल मुलाधारकंदाच्या ऊर्ध्वभागीं' कुंडलिनी नांवाची शक्ति असून ती नेहमी झोपलेली असते. योगी लोक योगाभ्यासानें तिला जागृत करतात तेव्हां ती त्यांना मोक्षसुख देते. याप्रमाणे हठयोगप्रदीपिकेंत तिचे वर्णन केलेले आहे. "मुलाधारे आत्मशक्तिः कुण्डली परदेवता" कुंडलिनी ही मुलाधारचक्रात रहात असून ती एक आत्मशक्तिस्वरूप श्रेष्ठ देवता आहे असें घेरंडसंहिताकार म्हणतात. तात्पर्य, कुंडलिनी ही एक आपल्या शरीरांतील अद्‌भुत व अलौलिक अशी दिव्य शक्ति आहे यांत संशय नाहीं.

मानवी शरीतील चक्रे

थोड्याशा दूर अंतरावर एखाद्या ठिकाणी अखंड धूमरेखा जमिनीपासून आकाशांत वर जात असलेली पाहून आपण त्या ठिकाणी अग्नि आहे असा तर्क करतो. नंतर तेथें जाऊन पाहिल्यावर त्या ठिकाणी अग्नि असल्याचें आपल्या दृष्टोत्पत्तीसही येतें. धूम हा अग्नीचे कार्य आहे. अग्नीवाचून धूम निर्माण होत नाहीं हें आपणांस माहीत असतें. म्हणूनच धूमावरून अग्नीविषयीं केलेला तर्क खरा ठरतो व त्याप्रमाणें आपल्याला अग्नि उपलब्धही होतो. याच न्यायानें आपल्या शरीरांत कुंडलिनीच्या जागृतीची कांहीं कार्ये उपलब्ध होतात. त्याच कार्यावरून आपण कुंडलिनीचा शोध केल्यास कुंडलिनी-शक्तीचाही आपल्याला साक्षात्कार होऊं शकेल.

मार्ग चालता चालता तहान लागल्यानंतर आपण एखाद्या वांटसरूला पाणी कोठे भेटेल, असा प्रश्न करतो. तो आपल्याला एखादी दिशा दाखवून या दिशेनें जा. दोन-तीन फर्लागांच्या अंतरावर डाव्या अथवा उजव्या हाताला नजर टाका. तुम्हांला विहीर दिसेल असें तो सांगतो. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेऊन आपण त्याप्रमाणें प्रयत्न करतो. आपल्याला विहीर सापडते. पाणी भेटतें. आपण तहान भागवतो. याच न्यायाने शास्त्र, साधुसंत व महात्मे यांच्या वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणें प्रयत्न केल्यास आपल्यालाही कुंडलिनी-तत्त्वाचा साक्षात्कार होईल हें निश्चित समजावे.

कुंडलिनी जागृत झाली कीं, इंद्रिये ही अधिकच अंतर्मुख होतात. मन आत्मप्रवण होतें. सुषुम्ना नाडीचें दार मोकळे होतें. प्राणवायु सुषुम्ना नाडींत प्रवेश करतो. प्राणाबरोबर मनही सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होतें. अंतरीं अनाहतनाद उमटूं लागतो. अद्‌भुत आणि दिव्य ज्योतीचे दर्शन घडते. अनेक प्रकारच्या अनिर्वचनीय सिद्धि फलद्रूप होतात. देहकांति दिव्य होते. शरीराभोवती सुगंध दरवळतो. सभोवारचें वातावरण शांत होतें.

कुंडलिनीसह प्राणवायू षट्चक्रांचा भेद करीत विष्णुपदी लीन होण्याला उत्सुक झालेला असतो. श्वासोछ्‍वासाच्या रूपाने नाकावाटें होणाऱ्या प्राणवायुच्या स्थूल क्रिया मंदावतात. प्राणाबरोबर नाद व नादाबरोबर मन हेही आत्मस्वरूपीं लीन होत असतें. जिकडे तिकडे आनंदाचाच आविर्भाव होत असतो. अशी ही कुंडलिनीच्या जागृतीची कार्य अनेक रूपांनी दिसूं लागतात. या सर्व कार्याचें मूळ मूलाधाराच्या ठिकाणी असलेली कुंडलिनीशक्ति हेंच होय. सर्व द्वैताभास मावळवून पिंडब्रह्माण्डी आनंदाला ओसंडविणारी ही कुंडलिनी-शक्ति म्हणजे प्रत्यक्ष जगदंबाच होय. तिचा महिमा श्रीज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दांत पहा-

ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचकवर्तीची शोभा ।
जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥ "

छायाकारांच्या भाषेत कुंडलिनीचे स्वरूप पहा -
जी शून्य ब्रह्माची मूर्ति साकार । परमात्म शिवाचा आधार ।
ॐकाराची साचार । जन्मभूमि ॥ " - गी. ६ श्लोक १४

कशी आहे ती कुंडलिनी ? हें श्रीज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दांत पहा -

नागिणीचें पिले । कुंकुमें नाहलें ।
वळण घेऊनि आलें । सेजे जैसे ॥
तैसी ते कुंडलिनी । मोडकी औट वळणी ।
अधोमुख सर्पिणी । निदैली असे ॥
विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी ।
पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥
तैसी सुबंध आठली । पुटीं होती दाटली ।
ते वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥ - गीता, अ. ६ श्लोक १४

कुंडलिनी ही नुकत्याच जन्मलेल्या नागिणीच्या पिलाप्रमाणें अत्यंत कोमल - सुकुमार असते. जणु कांहीं तें नागिणीचें पिलू केशर-कुंकवाने न्हाऊन निघाले आहे. शिवपिंडाकृति मूलाधारकंदाला तिने साडेतीन वेटोळी घातलेली असून तिने आपलें पुच्छ मुखामध्ये धरलेले आहे. मुलाधारचक्राच्या कर्णिकेंत मध्यभागी असलेल्या सूक्ष्म सुषुम्ना नाडीचे द्वार तिनें आपल्या फणेने अवरुद्ध करून टाकलेले असून ती त्या ठिकाणी सुप्ताअवस्थेत आहे. वर्तुलाकार विद्युल्लतेचे वेढे (वळें) जसे असावे तसाच तिचा आकार दिसतो. अथवा संकलित केलेल्या वह्निज्वाळांची ती घडीच असावी असें वाटतें. तावून सुलाखून शुद्ध-स्वच्छ केलेल्या शंभर नंबरी सोन्याची घासली-पुसलेली तार जशी लकाकत असावी तशीच ती दिसते. "तडिल्लेखासमरुचिः", "विद्युल्लेखेव भास्वरा", " तडिल्लेखातन्वी तपनशशिवैश्वानरमयी" उदयाला येणाऱ्या सूर्यमंडळाप्रमाणे, चंद्रबिंबाप्रमाणें अथवा अग्निज्वाळेप्रमाणे ती अत्यंत देदीप्यमान दिसते. असें तिचें संस्कृत भाषेतही वर्णन केलेले दिसते.

कुंडलिनीच्या साडेतीन वेटोळ्याबद्दल कांहीं लोक प्रणवांतील अकार, उकार, मकार आणि अर्धमात्र यांची कल्पना करतात, तर कांहीं लोक जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुरीया या तीन अवस्थांची कल्पना करतात. तें कांहीं असो, कुंडलिनीची वलयें साडेतीन आहेत ही गोष्ट खरी. कुंडल शब्दाचा अर्थ वेटोळे असा आहे. मूलाधाराच्या ठिकाणी ती साडेतीन वेटोळी घालून बसलेली असल्यामुळें तिला कुंडलिनी असे म्हटलेले आहे. कुंडली शब्दाचा अर्थ सर्प असा आहे. ती सर्पाप्रमाणे वेटाळीं घालून बसलेली असते म्हणूनही तिला कुंडलिनी असें म्हणतात.

कुंडलिनी जागृत करण्याकरितां आचार्यांनी योगतारावलींत जी साधने सांगितली आहेत तींच श्रीज्ञानेश्वर महाराजांनींही गीतेच्या सहाव्या अध्यायांत सांगितलेलीं आहेत, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तीं साधने म्हणजे मूलबंध, जालंधरबंध आणि उड्डियानबंध हीच होत. या तीन बंधांच्या अभ्यासाने कुंडलिनी जागृत होते ही गोष्ट निश्चित. याच अभिप्रायाने आचार्यांनी या श्लोकाचा पूर्वार्ध लिहिलेला आहे. उरगांगना म्हणजे नागीण. सर्पांना पाय नसतात. छातीनेच ते सरकत असल्यामुळें त्यांना उरग असे म्हणतात. त्यांची स्त्री म्हणून नागिणींना उरगांगना म्हटलें जातें. अंगना शब्द योजण्यांत आगरवी एक अभिप्राय असा आहे कीं, अंगना शब्दाचा अर्थ कोमलांगी अथवा शुभांगी असा आहे. "कल्याणानि शोभनानि सन्ति अङ्‍गानि अस्याः इति अङ्‍गना " जिचे अवयव कोमल - नाजूक असतात तिलाच अंगना असें म्हणतात. कुंडलिनीचा कोमलपणा हा वर आपण पाहिलाच आहे. अशी उरगांगना म्हणजे कुंडलिनी या श्लोकाच्या पहिल्या चरणांत सांगितलेल्या बंधत्रयांच्या अभ्यासानें जागृत झाल्यानंतर काय परिणाम होतात हेही आपण वर पाहिलेलेच आहे.

"प्रत्यङ्‍मुखात्वात्प्रविशन् सुषुम्नां गमागमौ मुश्चति गन्धवाहः" साधकाच्या देहातील प्राणवायु हा कुंडलिनीच्या जागृतीने ' प्रत्यङ्‍मुख म्हणजे अंतर्मुख होतो. श्वासोछ्‍वासांच्या रूपाने चालू असलेल्या त्याच्या स्थूल क्रिया मंदावतात. शरीराबाहेर बारा अंगुलांनीं प्रतीतीस होणारा श्वास हळूहळू कमी होऊं लागतो. श्वास आणि प्रश्वास यांची गति इतकी मंदावते कीं, गीतेच्या भाषेत "नासाभान्तरचारिणौ" या विशेषणाला ते पात्र होतात. श्वास आणि प्रश्वास यांनाच उद्देशून गीतेंत "प्राणापानौ" असे शब्द योजलेले आहेत. प्राणाची क्रिया पूरकाच्या रूपाने शरीरांत प्रवेश करण्याची असते तर अपानाची क्रिया रेचकाच्या रूपानें शरीराच्या बाहेर पडण्याची असते. ही गोष्ट येथें विशेषरूपानें लक्षांत घ्यावी एरवी अपान हा शब्द गुदस्थानीं असलेल्या वायूला उद्देशून योजतात.

कुंडलिनीच्या जागृतीने सुषुम्ना नाडीचे द्वार मोकळे झाल्यामुळे प्रत्यङ्‍मुख झालेला - अंतर्मुख झालेला प्राणवायु हा सुषुम्ना नाडींत प्रवेश करतो. प्राणवायुने सुषुम्ना नाडींत प्रवेश केला कीं त्याची बाहेरची गति ही अधिकच मंदावते व शेवटीं आचार्य म्हणतात त्याप्रमाणें "गमागमौ मुश्चति गन्धवाहः" अशी प्राणवायुची अवस्था होते. गन्धवाह शब्दाचा अर्थ प्राणवायु असा आहे कारण जीवांना त्यांनीं केलेल्या बऱ्यावाईट कर्माची फळें देण्याकरितां कारणीभूत असलेल्या वासनांचे जाळे हा प्राणवायुच वहात असतो. "गन्धान् वहति इति गन्धवाहः" अशी गंधवाह शब्दाची व्युत्पत्ति आहे. गंध म्हणजे चित्ताच्या ठिकाणी असलेलें वासनाजाल. त्याला धारण करण्याचें, वाहण्याचे कार्य प्राणवायु करीत असतो म्हणून त्याला गंधवाह असे म्हणतात.

प्राणवायु हा सर्व शरीरभर संचार करीत असला आणि शरीराच्या भरण पोषणाला अनुरूप अशा सर्व क्रिया त्याच्याकडूनच होत असल्या तरी श्वासोच्छ्‍वासाच्या रूपाने शरीरांत प्रवेश करणें आणि शरीरांतून बाहेर पडणें या त्याच्या मुख्य क्रिया आहेत. श्वासोच्छ्‍वासाच्या क्रिया या इडा आणि पिंगळा या दोन नाड्यांच्या द्वारा होत असतात. या दोन्ही नाड्या मुळाधारचक्रातूनच उत्पन्न झालेल्या आहेत. मूळाधारचक्राच्या डाव्या बाजूस इडा नाडी उगम पावते तर उजव्या बाजूस पिंगळा ही नाडी उगम पावते. या दोन्ही नाड्या सरळ, भ्रूमध्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. यांतील इडा नाडी ही गंगास्वरूप आहे सर पिंगळा ही यमुनास्वरूप आहे. इडानाडीला चंद्र आणि पिंगळा नाडीला सूर्य असेंही म्हटलेले आहे. हे प्राणवायूचे दक्षिणमार्ग व वाममार्ग समजले जातात. या दोन्ही नाड्यांच्या मध्यभागीं मुलाधारचक्रांतच सुषुम्ना नाडीचा उगम झालेला आहे. ही नाडी अग्निस्वरूप आहे. हिला प्राणवायूचा मध्यममार्ग असे म्हणतात. हिच्याच द्वारा प्राणवायू हा ब्रह्मपदीं लीन होत असल्यामुळें हिला ब्रह्मनाडी अथवा ब्रह्ममार्ग असेही म्हणतात. प्राणवायु हा जसा जसा ब्रह्ममार्गानें ऊर्ध्वगामी होईल तशा तशा इडा आणि पिंगला या मार्गानें श्वासोच्छवासाच्या रूपाने होणाऱ्या त्यांच्या क्रिया या अधिकच मंदावतात. शेवटीं प्राणवायू हा इडा आणि पिंगळा यांची मर्यादा ओलांडून ऊर्ध्वगामी झाला, आज्ञाचक्राचा भेद करून तो वर निघाला कीं इडा आणि पिंगळा यांची कार्य तेथेंच थांबतात. अर्थात् नाकावाटें श्वासोच्छवासाच्या रूपाने शरीराच्या बाहेर जाण्यायेण्याचे प्राणवायुचे कार्य आपोआप सुटते. याच अवस्थेला अनुलक्षून आचार्य म्हणतात, " गमागमौ मुञ्चति गत्यवाहः" प्राणवायु हा श्वासोच्छ्वासाच्या क्रिया सोडून देतो. गमागम म्हणचे जाणे-येणे. प्राणवायु हा या दोन्ही क्रिया सोडून देतो व साधकाच्या मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील अंतराकाशांत विष्णुपदी तो मनासह लीन होतो हीच साधकाची सर्वानंदमय समाधिअवस्था होय.


उत्थापिताधार-हुताशनोल्कै-
     राकुञ्चनैः शश्वदपान-वायोः ।
मत्तापताचमसर. पवना
     पीयूषधारां पिबतीह धन्यः ॥ ७ ॥


मागील श्लोकांत बंधत्रयाच्या अभ्यासाने कुंडलिनी जागृत होते. ती सुषुम्ना नाडींत प्रवेश करते. तिच्याबरोबरच प्राणवायु हाही मनासह प्रवेश करतो. षट्चक्रांचा भेद करीत करीत सहस्रदलकमलांत ते सर्व एकरूप होऊन स्थिर होतात हेही सांगितले. ही साधकाची समाधि अवस्था होय. या अवस्थेंत खाणे, पिणे, श्वासोच्छवास व रस-रक्तादि धातूंचे अभिसरण ही कोणतीच कार्य होत नसतात. अशा स्थितींत साधकाच्या देहाचे भरण-पोषण कसें होतें ? या प्रश्नाचें उत्तर देऊन आचार्य साधकाला धन्यवाद देत आहेत.

" अपानवायोः शश्वत् आकुश्चनैः उत्थापिताधार-हुताशनौल्कैः संतापितात् चन्दमसः पतन्तीं पीयुषधारां यः पिबति सः इह धन्यः ।" मूलबंधाचा अभ्यास करतांना अपानवायूच्या निरंतर आकुंचनांनी अर्थात् गुदस्थानाचा संकोच करून अपानवायूला वर प्रवृत्त केल्यामुळें मुळाधारचक्रांत असलेला अग्नि देखील प्रज्वलित होतो. अग्नीला येथें हुताशन म्हटले आहे. कारण तो अर्पण केलेल्या भक्ष्य, भोज्य, चोष्य आणि लेह्यरूपी चतुर्विध अन्नाचे सेवन करीत असतो. तें अन्न आहुतिरूपच आहे. म्हणूनच तर नामस्मरणपूर्वक केल्या जाणाऱ्या भोजनक्रियेला उद्देशून "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" असें म्हटले आहे. तात्पर्य, हा अग्नि अन्नरूपी हविर्द्रव्याचे पचन करीत असल्यामुळें याला हुताशन असें म्हटलेले आहे. हुताशन म्हणजे अग्नि. शरीरातील या अग्नीला वैश्वानर असें म्हणतात. या अग्नीच्या ज्वालांनी मूर्धस्थानीं असलेलें चंद्रमंडल हे संतप्त होते. संतप्त झालेल्या चंद्रमंडलांतून अमृताचा स्राव सुरू होतो. त्या अमृतानेच समाधिकालांत योग्याच्या देहाचे पोषण होत असतें. अशा रीतीनें चंद्रमंडलांतून स्रवणाऱ्या अमृतधारेचें जो योगी प्राशन करतो, या अमृतधारेचें जो पान करतो तो खरोखरच इहलोकीं धन्य होय.

ज्वाला, कीला इत्यादि शब्द क्वचित् अकारान्तही असतात त्याचप्रमाणे उल्का शब्द देखील अकारान्त गृहीत धरून आम्ही वर अन्वय दिलेला आहे. उल्का शब्द आकारान्तच आहे असा आग्रह असेल तर "उत्तापिताधारहुताशनोल्कैः" हें पद आकुञ्चनैः याचे विशेषण करून अन्वय लावावा. अर्थप्रक्रियेत कांहीं फरक नाहीं.


बन्धत्रयाभ्यास-विपाकजातां
     विवर्जितां रेचक-परकाभ्याम् ।
विशोषयन्ति विषय-प्रवाहं
     विद्यां भजे केवल-कुम्भरूपाम् ॥ ८ ॥


"बन्धत्रयाभ्यासविपाकजातां रेचक-पूरकाभ्यां विवर्जितां विषय-प्रवाहं विशोषयन्ति केवलकुम्भरूपां विद्यां ( अहं) भजे ।" सहाव्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणे जालंधरबंध उड्डियानबंध, आणि मूलबंध या तिन्ही बंधांचा अभ्यास करीत असतांना त्या अभ्यासाच्या परिपाकाने कुंडलिनीची जागृति होऊन तिने सुषुम्ना नाडींत प्रवेश केल्यानंतर तिच्या पाठोपाठ प्राण आणि मन हेही सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होतात, प्राणानें सुषुम्ना नाडींत प्रवेश केल्यानंतर हळूहळू श्वासोच्छवासाची क्रिया मंदावते व पुढें तीही बंद पडते. इडा व पिंगळा यांच्याद्वारा होणाऱ्या प्राणवायूच्या रेचकाच्या व पूरकाच्या क्रिया संपल्या कीं मूर्धस्थानीं प्राणवायु हा स्तंभित होऊन रहातो. या अवस्थेला केवलकुंभक असे म्हणतात. या अवस्थेंत विषयप्रवाह हे कुंठित होत असतात. केवलकुंभकाच्या अवस्थेंत असलेल्या प्राणवायूमध्येंच साधकाचे मनही विलीन झालेलें असल्यामुळें इंद्रियांच्या प्रवृत्ति विषयोन्मुख होत नाहीत. पुत्र, मित्र, कलत्र, वित्त, वैभव इत्यादि विषय स्वाभाविकच इंद्रियांना, मनाला व जीवाला आपल्याकडे खेचून घेत असतात. म्हणूनच त्यांना विषय असें म्हणतात. " विशेषेण षिण्वन्ति बध्नन्ति जीवान् इति विषयाः" अशी विषय शब्दाची व्युत्पत्ति आहे. जोपर्यंत मन अथवा जीव ब्रह्मस्वरूपी समरस होत नाहीं तोपर्यंत त्याला विषयसुखांत आनंद वाटतो. पण तें मन ब्रह्मपदीं लीन झालें कीं त्या ब्रह्मानंदापुढें विषयानंद त्याला तुच्छ वाटू लागतात. याप्रमाणे मन विषयापासून मुरडले कीं इंद्रियेही आपोआप मुरडतात. अशी अवस्था केवल कुंभकाच्या वेळीं - अर्थातू प्राणवायु हा सुषुम्नाद्वारा मनासह सहस्रदलकमलांत विष्णुपदी लीन झाला असतां निर्माण होत असतें. म्हणूनच केवलकुंभकाला तो विषयप्रवाहाचें शोषण करणारा आहे असें म्हटलें आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या अवस्थांतून जात असतां मन उत्तरोत्तर आत्मप्रवण होत रहाते व शेवटीं त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊन आत्मस्वरूपाशी तें समरस होऊन जातें. हें सर्व केवलकुंभकाच्या अवस्थेंत घडून येत असल्यामुळें केवल-कुंभकाला या श्लोकांत विद्या असे म्हटलेले आहे. "विद्यते ज्ञायते आत्मतत्त्वं अनया इति विद्या" अशी विद्या शब्दाची व्युत्पत्ति आहे. इंद्रियांना आणि मनाला विषयांपासून परावृत्त करून जीवाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार करून देणारी ही केवलकुंभकरूपी विद्या खरोखरच अत्यंत श्रेष्ठ होय. नाहीं तर भाराभर विद्या शिकला आणि पदव्या मिळविल्या, अधिकाराच्या जागा मिळविल्या आणि पैसाही मिळविला, पण चित्ताला शांति मात्र मिळाली नाहीं. मग काय त्या विद्येचा उपयोग. चित्ताला शांति केवलकुंभकानें मिळू शकते. म्हणूनच आचार्य म्हणतात, "विद्यां भजे केवलकुम्भरूपाम्" मी केवलकुंभकरूपी विद्येचाच आश्रय करीत आहे. मी केवलकुंभकाची उपासना करीत आहें अथवा अभ्यास करीत आहे.


अनाहते चेतसि सावधानै-
     रभ्यासशूरैरनुभयमाना ।
संस्तम्भितश्वास-मनःप्रचारा
     सा जृम्भते केवल-कुम्भकश्रीः ॥ ९ ॥


नादानुसंधानाच्या अनुरोधानें बंधत्रयाचा अभ्यास करीत असतांना सुषुम्ना नाडीचें मुख मोकळे होऊन कुंडलिनीसह प्राणवायु सुषुम्ना नाडींत प्रविष्ट होतो. मनही त्याच्याबरोबर प्रविष्ट होतें. उत्तरोत्तर अभ्यास अधिक वाढत चालला म्हणजे प्राणवायु हा अधिक अंतःप्रविष्ट होतो व त्याच्या पूरक आणि रेचक या रूपाने चालणाऱ्या बाह्य क्रिया थांबतात. सहस्रदलकमलाच्या अंतराकाशांत प्राणवायु स्थिरावला म्हणजे त्याला केवलकुंभकाची अवस्था प्राप्त होते, पण हें केव्हा घडते ? याच प्रश्नाचें उत्तर आचार्य या श्लोकांत देत आहेत. "चेतसि अनाहते सति सावधानै अभ्यासशूरैः अनुभूयमाना" केवलकुंभकाचें वैभव आपल्या प्रतीतीला येण्याकरितां चित्ताची शुद्धि, सावधानता आणि अभ्यासाची दृढता अथवा चिकाटी या सर्व गोष्टी असतील तरच केवलकुंभकाचें वैभव अनुभवता येईल.

साधकाचें चेतस् म्हणजे अंतःकरण हें विषयांनी अनाहत म्हणजे पराभूत न झालेलें असावें. अर्थात् अंतःकरण हे अत्यंत शुद्ध असावें. याचाच अर्थ यमनियमांची भूमिका दृढ असावी. मन शुद्ध असावें, प्रसन्न असावें, एकाग्र असावें. इंद्रिये आपल्या ताब्यांत असावीत. चित्तामध्ये शोक, दुःख आणि दैन्यही नसावे. कामक्रोधादि विकारही नसावेत. जे सुखी असतील त्यांच्याविषयी हे सुखी आहेत, ही मोठी समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे, अशी मित्रत्वाची भावना ठेवावी. कधीही त्यांच्याविषयी ईर्ष्या किंवा मत्सर नसावा. जे दुःखी असतील त्यांच्याविषयी करुणावृत्ति ठेवावी. हे दुःखी आहेत, यांच्या दुःखाचा निरास कसा बरें होईल ? मला यांचें दुःख घालविण्याकरितां काय बरें करतां येईल ? याप्रमाणे विचार करून यथाशक्ति आपण त्यांच्या उपयोगास यावें. जें पुण्यवान असतील त्यांच्याबद्दल चित्तांत आनंद मानावा. त्यांचा द्वेष करूं नये. जें पापी असतील त्यांची उपेक्षा करावी. त्यांच्या नादी लागू नये व त्यांचा द्वेषही करूं नये. याप्रमाणे वागल्यास चित्त नेहमी प्रसन्न रहाते. "मैत्री-करुणा-मुदितोपेक्षाणां भावनातश्चित्त-प्रसादनम्" ( योगसूत्र-३३ ). प्रकृतस्थलीं चित्ताच्या या अवस्थेलाच "अनाहत" असें म्हटले आहे. ही चित्ताची अनाहतता समाधीला अर्थात् केवलकुंभकाला अत्यंत उपयुक्त आहे. ही ज्यांना लाभेल त्यांनाच केवलकुंभक साधेल.

केवलकुंभकाकरितां दुसरा आवश्यक गुण म्हणजे सावधानता हा आहे. कोणत्याही प्रकारे बुद्धीचा प्रमाद होऊं न येन हे सावधपणाचें लक्षण होय. अथवा सावधानता म्हणजे चित्ताची एकाग्रता. ही साधकाला अत्यंत आवश्यक असते. केवलकुंभक साधण्याकरितां चित्ताची एकाग्रता अत्यंत उपयुक्त आहे. तिसरा गुण अभ्यासशूरता. अभ्यासाची चिकाटी ही साधकाला अत्यक आवश्यक आहे. मन किती चंचल असलें तरी अभ्यासाने त्याचा निग्रह करतां येतो. "अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः", "अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते" इत्यादि शास्त्रवचनें प्रसिद्धच आहेत. तात्पर्य, मनाची शुद्धि, चित्ताची एकाग्रता आणि अभ्यासाचे दार्ढ्य यांच्या साहाय्याने केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीस येतें. केवलकुंभकामध्यें पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छ्‍वासाच्या क्रिया स्तंभित होतात आणि मनाचेंही इकडे तिकडे भटकणे थांबते. मन स्थिरावले कीं तेथें निजानंदाचा साक्षात्कार होतो. अशा रीतीनें साधकाच्या ठिकाणी तें केवलकुंभकाचें वैभव "जृम्भते" म्हणजे वाढत रहातें, प्रकाशत रहातें.


सहस्रशः सन्तु हठेषु कुम्भाः
     सम्भाव्यते केवलकुम्भ एव ।
कुम्भोत्तमे यत्र तु रेचपूरौ
     प्राणस्य न प्राकृत-वैकृताख्यौ ॥ १० ॥


केवलकुंभकाच्या वैभवाचे वर्णन करावे तेवढे थोडे आहे. कारण नादानुसंधानादि द्वारा निष्पन्न होणाऱ्या केवलकुंभकानेंच जीवाला खऱ्या निजानंदाचा साक्षात्कार होऊं शकतो. हठयोगांत कुंभकांत हजार प्रकार सांगितलेले असले, तरी त्या सर्व कुंभकांत केवलकुंभक हाच "संभाव्यते" म्हणजे अत्यंत श्रेष्ठ म्हणून गणला जातो. या सर्वश्रेष्ठ कुंभकांत प्राणवायूच्या प्राकृत अथवा वैकृत स्वरूपाच्या पूरक आणि रेचक या क्रिया होत नसतात. असा या लोकाचा अन्वयानुरोधी सरळ अर्थ आहे.

हठयोग या शब्दाचा अपभ्रंश करून लोक हटयोग असा शब्द उच्चारतात व या योगाचा हट्टाशी व दुराग्रहाशी संबंध असल्याचें भासवितात, पण तें खरें नव्हे. हठयोग हाच खरा शब्द आहे. "हश्च ठश्च हठौ, हठयोः योगः हठयोगः" अशी हठयोग या शब्दाची व्युत्पत्ति आहे. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. अर्थात प्राणवायु आणि अपानवायु यांचा योग म्हणजे संयोग त्यांच्या स्वाभाविक गतीचा निरोध करून त्यांना एकत्र आणणें, यालाच हठयोग असें म्हणतात. "अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथा परे", "प्राणापानौ समी कृत्वा नासाभ्यन्तर चारिणौ" इत्यादि गीतावचनांतही हाच हठयोग सांगितलेला आहे. हठयोग, मंत्रयोग, लययोग आणि राजयोग असे योगाचे चार प्रकार आहेत. ते एकमेकांना उपकारकच आहेत. त्यांत राजयोग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो.

हठयोगामध्ये अनेक प्रकारच्या कुंभकांचें वर्णन केले आहे. त्या सर्वात केवलकुंभक हाच अत्यंत श्रेष्ठ आहे. तो साध्यस्वरूप आहे. इतर कुंभक हे गौण आहेत. त्यांचा केवलकुंभक सिद्ध करण्याकरितां उपयोग होऊं शकतो. ज्याची ज्याची जशी प्रकृति असेल त्यानें त्यानें आपल्या प्रकृतीला सुखावह होतील त्याच हठयोगांतील प्रक्रिया अभ्यासाव्यात व केवलकुंभक सिद्ध करावा. याच अभियाने "हठयोगामध्ये हजारों कुंभक सांगितलेले आहेत, ते खुशाल असूं द्या. त्या सर्वांमध्ये केवलकुंभक हाच श्रेष्ठ आहे व तो सर्वमान्य आहे" असें आचार्यांनी म्हटलेले आहे.

सहितकुंभक आणि केवलकुंभक असे कुंभकाचे दोन प्रकार पूर्वी सांगितलेलेच आहेत. त्यांत सहितकुंभकांमध्यें प्राणवायूची पूरक आणि रेचक ही क्रिया आवश्यक असते. केवलकुंभकामध्ये पूरक आणि रेचक या क्रिया होत नसतात. याच अभिप्रायाने श्लोकाच्या उत्तरार्धात " यत्र तु कुम्भोत्तमे प्राणस्य प्राकृतवैकृताख्यौ रेचपूरौ न, स एव केवलकुम्भकः" ज्या कुंभकांत प्राणवायूचे नैसर्गिक किंवा शास्त्रोक्त पद्धतीने निर्दिष्ट केलेले पूरक आणि रेचक हे प्रकार घडत नाहींत, त्याच कुंभकाला केवलकुंभक असें म्हणतात, आणि तो सर्व कुंभकात श्रेष्ठ आहे असे आचार्यांनी वर्णन केलेले आहे.

आपण जें नेहमी स्वाभाविकपणे श्वासोच्छवास करीत असतो त्यांत बाहेरचा वायु शरीरांत घेणे या क्रियेला श्वास म्हणतात आणि शरीरातील वायूला नाकावाटें बाहेर सोडणे या क्रियेला उच्छवास किंवा प्रश्वास असें म्हणतात. बाहेरचा वायु शरीरांत घेणे याला पूरकक्रिया असें म्हणतात, तर शरीरातील वायु बाहेर सोडणें याला रेचकक्रिया असें म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या क्रिया स्वाभाविकपणेच चाललेल्या असल्यामुळें त्यांना "प्राकृत" असें म्हटले आहे. प्राणायामाचा अभ्यास करीत असतांना अंतःकुंभकाच्या वेळीं अगोदर पूरक केला जातो व कुंभकानंतर रेचक केला जातो. त्याचप्रमाणे बहीः कुंभकाच्या वेळीं अगोदर रेचक केला जातो व कुंभकानंतर पूरक केला जातो. याप्रमाणे कुंभकाच्या अगोदर आणि नंतर जे पूरक आणि रेचक होत असतात त्यांनाच प्रकृत स्थलीं "वैकृत" असें म्हटले आहे. केवळकुंभकाच्या वेळीं हे प्राकृत किंवा वैकृत या नांवानी ओळखले जाणारे अर्थात स्वाभाविक आणि कृत्रिम अशा स्वरूपाचे पूरक आणि रेचक हे प्राणायाम होत नसतात. म्हणूनच या कुंभकाला केवलकुंभक असे म्हणतात. हा ब्रह्मानंदाचा अनुभव देत असल्यामुळें सर्व कुंभकांत श्रेष्ठ होय.


त्रिकूटनाम्नि स्मितितेऽन्तरङ्‍गे
     खे स्तम्भिते केवल-कुम्भकेन ।
प्राणानिलो भानु-शशाङ्‍क-नाड्यौ
     विहाय सद्यो विलयं प्रयाति व ॥ ११ ॥


"स्तिमिते अन्तरङ्‍गे त्रिकूटनाम्नि खे केवलकुम्भकेन स्तम्भिते सति प्राणानिलः भानुशशाङ्‍कनाड्यौ विहाय सद्यः विलयं प्रयाति" असा या श्लोकाचा अन्वय आहे. मनाला अंतरंग म्हणतात. अंग म्हणजे देहाचे घटक अवयव. यांत लिंगदेह - सूक्ष्मदेह देखील येतो या सूक्ष्म देहांत अन्तः म्हणजे शेवटीं प्रधान म्हणून मनच असतें. या अभिप्रायाने मनाला अंतरंग म्हटलें जातें. मन हें स्वभावतः अत्यंत चंचल असतें. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मनामध्ये घटक म्हणून प्रविष्ट झालेले असतात. विवेकाच्या अभावीं सर्वसाधारणपणें मनांत रजोगुणाचे व तमोगुणाचेंच प्राबल्य असतें. रजोगुणानें चंचलता आणि तमोगुणाने अज्ञान व मोह यांचा प्रकर्ष होत असतो. अज्ञानानें व मोहानें मन विषयांकडे सैरावैरा धांवत असतें. विवेकाने, वैराग्याने व अभ्यासानें त्याला आवरावे लागतें. रजोगुणाने तमोगुणाला व सत्त्वगुणाने रजोगुणाला जिंकून सत्त्वगुणाच्या प्रकर्षाने मनाला एकाग्र करावे लागतें. तसें तें योगाभ्यासानें एकाग्र करता येतें. एकाग्रतेचीच पराकाष्ठा म्हणजे मनाची निरुद्ध अवस्था होय. या निरुद्ध अवस्थेलाच समाधि असे म्हणतात. आचार्य या लोकांत याच अवस्थेचे वर्णन करीत आहेत.

अष्टांगयोगाचा अभ्यास करतां करतां प्रत्याहार, धारणा आणि ध्यान यांच्या अभ्यासाने, ईश्वरकृपेने अथवा गुरुकृपेने "स्तिमित" म्हणजे निश्चल झालेलें "अंतरंग" म्हणजे मन हें वरील तीन श्लोकांत सांगितलेल्या केवलकुंभकाने त्रिकूट नांवाच्या "खे" म्हणजे आकाशामध्ये अर्थात् मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील अंतराकाशांत "स्तम्भिते" म्हणजे स्थिर केलें असतां प्राणवायू हा सूर्यनाडी व चंद्रनाडी अर्थात इडा व पिंगळा या नाड्यांना सोडून "सद्यः" म्हणजे ताबडतोब "विलय प्रयाति" म्हणजे विष्णुपदी लीन होतो. ब्रह्मस्वरूपीं लीन होतो.

मूर्धस्थानीं कपालकुहरांत असलेल्या आकाशाला त्रिकूट असें नांव दिलेले आहे. तीन कपालास्थींचा समागम त्या ठिकाणी होत असल्यामुळें त्याला त्रिकूट असें म्हणतात. अथक इडा, पिंगला आणि सुषुस्ता या तीन नाड्यांचा संगम कपालकुलहरांत होत असल्यामुळेही त्याला त्रिकूट असें म्हटलें जाते. इडा आणि पिंगळा या नाड्या चंद्र व सूर्यस्वरूप असून सुषुम्ना नाडी ही अग्निस्वरूप आहे. सूर्य, चंद्र आणि अग्नि या तिघांचें कूट कपालकुहरांत असल्यामुळें त्याला त्रिकूट असे म्हणतात. त्या ठिकाणी असलेल्या आकाशालाही लक्षणेने त्रिकूट असेंच म्हणतात. या त्रिकूटसंज्ञक आकाशांत केवलकुंभकाने प्राणवायु स्थिर झाला कीं मनही स्थिर होतें. मनाच्या स्थैर्यावर प्राणवायुचेही स्थैर्य अवलंबून आहेच. "मनःस्थैर्ये स्थिरो वायुः" असा सिद्धान्तच आहे.

वासना आणि प्राणवायु ही दोन चित्तप्रवृत्तीचीं कारणें आहेत. यांपैकी कोणाही एकाचा क्षय झाला कीं बाकी उरलेल्या दोघांचा क्षय होतोच. वासना क्षीण झाल्या म्हणजे प्राणवायु आणि चित्त हे दोघेही क्षीण होतात. प्राणवायू क्षीण झाला म्हणजे चित्त आणि वासना क्षीण होतात. चित्त क्षीण झाले कीं प्राणवायु आणि वासना क्षीण होतात. प्रकृतस्थलीं प्राणवायूचा आणि चित्ताचा क्षय होणें यालाच लय असे म्हणतात. या लयालाच समाधि अथवा अद्वैतभाव असें म्हटलेले आहे. " यदा संक्षीयते प्राणः मानसं च प्रलीयते । तदा समरसत्वं च समाधिरभिधीयते ॥" अशी समाधीची व्याख्या आहे. या प्रमाणें प्राणाचा आणि मनाचा लय झाला म्हणजे सारे चित्तानंद मावळतात आणि अनिर्वचनीय चिदानंदाचा उदय होतो ! जीव धन्य होतो ! जन्म सफल होतो ! ज्योतीस भेटावयास गेलेला कापूर स्वःच ज्योतीरूप होतो. समुद्रस्नानाला गेलेली सैंधवाची बाहुली स्वतःच समुद्राशी समरस होते. याच अवस्थेला उन्मनी, मनोन्मनी, सहजावस्था, अमनस्कमुद्रा, अजाड्यनिद्रा, योगनिद्रा, निर्विकल्प समाधि, निर्बीज समाधि, असंप्रज्ञात समाधि इत्यादि अनेक नांवे आहेत ! ही अवस्था केवलकुंभकानें प्राप्त होते. केवलकुंभक हा नादानुसंधानानें सिद्ध होतो. अशी ही कार्यकारणभावाची परंपरा मोठी रमणीय आहे. ज्याला भाग्याने हा समाधिक्षण लाभला तो खरोखर मोठा धन्य होय.


प्रत्याहृतः केवल कुम्भकेन      प्रबुद्ध-कुण्डल्युपभुक्त-शेषः प्राणः प्रतीचीन-पथेन मन्दं      विलीयते विष्णु-पदान्तराले ॥ १२ ॥


शरीरामध्यें संचार करणाऱ्या वायूला प्राण असें म्हणतात. तोच शरीरामध्ये मुख्यत्वानें कार्य करीत असतो. त्याची व्याप्ति सर्व शरीरभर आहे. स्थानभेदाने व कार्यभेदानें त्यालाच अपान, व्यान, उदान आणि समान अशी नांवें मिळतात. अवांतर कार्यभेदानें त्यालाच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असेंही म्हणतात. तेव्हां प्राणवायु हा तर अति विस्तृत आहे आणि सुषुस्ता नाडी ही तर अति सूक्ष्म आहे. तेव्हां सुषुम्ना नाडीच्या विवरांत प्राणवायूचा प्रवेश कसा होणार ? या शंकेचे समाधान प्रस्तुत श्लोकानें करीत आहेत. केवलकुंभकाच्या प्राथमिक प्रयत्नाने इतर मार्गापासून प्राणवायुला परावृत्त केले जातें. नंतर मूलबंधाने व उड्डियाणबंधानें त्याला आधारचक्राजवळ कोंडलें जातें. तेथें कोंडलेला प्राणवायु हा आधारचक्रांतील अग्नीलाही प्रदीप्त करतो. त्या अग्नीच्या ऊष्म्याने व वायूच्या आघाताने साधकाची कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी ही नागीण आहे. नाग हे वायुभक्षक असतात. "पन्नगः पवनाशनः" अशी नागाची नावे आहेत. ती भुकेलेली नागीण प्राणवायूलाच खाते. अशा रीतीनें प्राणवायू क्षीण होऊं लागतो. त्यामुळें वरच्या शंकेला अवसर उरत नाहीं.

"प्रबुद्धकुण्डल्युपमभुक्तशेषः" जागृत झालेल्या कुंडलीने खाऊन शिलक राहिलेला प्राणवायु, तेथें जवळच असलेल्या सुषुम्ना नाडीचे मुख मोकळे झालेलें असल्यामुळें त्या मुखाने सुषुम्ना नाडीच्या विवरांत तो प्रवेश करतो. या सुषुम्ना नाडीलाच प्रतीचीनपथ असें म्हटले आहे. प्रतीचीनपथ म्हणजे पश्चिम मार्ग. शरीरातील इडा आणि पिंगळा हे प्राणवायुचे दक्षिणोत्तर मार्ग आहेत, तर सुषुम्ना, नाडी हा पश्चिम मार्ग आहे. प्रतीचीन शब्दाचा अर्थ अंतर्मुख असाही आहे. सुषुम्नामार्ग हा साधकाला अंतर्मुख करणारा मार्ग असल्यामुळें त्याला प्रतीचीनपथ असे म्हणतात. अथवा प्रत्यक् म्हणजे अंतर्यामी परमात्मा. त्याच्या प्राप्तीला हा मार्ग अनुकूल असल्यामुळें या मार्गाला प्रतीचीनपथ असे म्हटलेले आहे. आत्मप्राप्तीच्या या अत्यंत सूक्ष्म मार्गाने हळूहळू प्राणवायु हा प्रविष्ट होऊन विष्णूपदाच्या अंतरालामध्यें विलीन होतो. विष्णु म्हणजे विश्वाला व्यापून असलेलें व विश्वरूपाने नटलेले ब्रह्म. त्याचें पद म्हणजे स्वरूप. यालाच चिदाकाश असें म्हणतात. या चिदाकाशांत मनासह प्राणवायु विलीन होऊन जातो. "न स पुनरावर्तते" कर्मपाशांनीं बद्ध होऊन अज्ञ जीवाप्रमाणे पुन्हा तो संसाराकडे खेचला जात नाहीं. अंतराल शब्दाचा अर्थ अवकाश, आकाश असा आहे.


निरङ्‍कुशानां श्वसनोद्‍गमानां
     निराधनैः केवलकुम्भकाख्यैः ।
उदेति सर्वेंन्द्रिय-वृत्ति-शून्यो
     मरुल्लयः कोऽपि महामतीनाम् ॥ १३ ॥


साधक हा केवलकुंभकाचा अभ्यास करूं लागला म्हणजे त्याचे निरकुंशपणाने - स्वैरस्वरूपानें चाललेले श्वासोच्छ्‌वास निरुद्ध होतात. त्याच्या स्वाभाविक श्वासोच्छवास-क्रियांना प्रतिबंध होतो. या प्रतिबंधांतूनच त्याचा केवलकुंभक अधिक सिद्ध होत जातो. या कुंभकांतूनच प्राणवायुचा लय उदयाला येतो. प्राणवायूचा लय अनिर्वचनीय आहे. कारण यांत सर्व इंद्रियांच्या, मनाच्या, ज्ञानेंद्रियांच्या व कर्मद्रियांच्याही वृत्ति म्हणजे प्रवृत्ति अथवा व्यवहार पार मावळलेले असतात. आकाशांत रिकामा केलेला घडा जसा आतून आणि बाहेरून शून्यांत निमग्न झालेला असतो त्याच्या आंत-बाहेर कांहींच नसतें त्याचप्रमाणें केवलकुंभकाने ज्याच्या प्राणाचा लय झाला, त्याच्या अंतःकरणांत परिपूर्ण परब्रह्माव्यतिरिक्त कांहीच नसल्यामुळे तो आंत-बाहेर शून्य स्वरूप होतो. एकमेवाद्वितीय असाच तो होतो. अथवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, समुद्रांत बुडविलेला घट जसाआंत आणि बाहेर जलाने परिपूर्ण असतो त्याचप्रमाणे तो साधकही आंत-बाहेर परिपूर्ण परब्रह्माने व्यापलेला अर्थाद परब्रह्मस्वरूपाशी समरस झालेला असाच असतो. "अन्तः शून्यो बहिः शून्यः शून्यः कुम्भ इवाम्बरे । अन्तः पूर्णो बहिः पूर्णः पूर्णः कुम्भ इवार्णवे ॥" असें हठयोगप्रदीपिकेत त्याचें वर्णन केलेले आहे. अशा साधकांना आचार्यांनी महामति म्हणजे अत्यंत बुद्धिमान असें जे म्हटलें आहे तें अगदीं योग्यच आहे.


न दृष्टिलक्ष्याणि न चित्तबन्धो
     न देशकालौ न च वायुरोधः ।
न धारणा-ध्यान-परिश्रमो वा
     समेधमाने सति राजयोगे ॥ १४ ॥


आत्तापर्यंत वर्णन केलेल्या केवलकुंभकानें साधकाच्या प्राणवायूचा व मनाचा ब्रह्मरंधात विष्णुपदी लय झाल्यानंतर साधकाला जी अवस्था प्राप्त होते त्याच अवस्थेला प्रकृतस्थलीं राजयोग असे म्हटलेले आहे. राजयोग म्हणजे अष्टांगयोगाच्या अभ्यासानें प्राप्त होणारी निर्विकल्प समाधि. निर्विकल्प समाधि हा सर्व योगांमध्ये श्रेष्ठ योग असल्यामुळें याला राजयोग असें म्हणतात. "योगानां राजा राजयोगः" अशी राजयोग शब्दाची व्युत्पत्ति आहे. जीवात्मा आणि परमात्मा परब्रह्म यांच्या तादात्म्यसंबंधाला योग असें म्हणतात. जीवात्मा हा प्रत्येक शरीरांत विराजत असल्यामुळें राजाच आहे व परमात्माही विश्वरूपाने विराजत असल्यामुळे राजाच आहे. या दोन्ही राजांचे अर्थात् जीवशिवाचें तादात्म्य घडून येणे हाच खरा राजयोग होय. या अर्थाने "राजा च राजा च राजानौ, राज्ञो योगः राजयोगः" असा राजयोग शब्दाचा विग्रह करावा. असा हा राजयोग साधकाच्या ठिकाणी केवलकुंभकाच्या अभ्यासानें "समेधमान" म्हणजे उत्तम रीतीने अविच्छिन्न-अखंड वृद्धिंगत होऊं लागला असतां साधक हा ध्येयतत्त्वाशी अभिन्न होतो, शिवस्वरूप होतो, ब्रह्मस्वरूप होतो. त्याच्या दृष्टीपुढे कोणत्याही लक्ष्याची गरज उरत नाहीं. धारणेप्रमाणे त्याला चित्त कोठेही ध्येयवस्तूच्या ठिकाणी लावावे लागत नाहीं. चित्त ब्रह्मस्वरूपीं समरस झालें असल्यामुळें त्याला देशाचे अथवा काळाचे भान उरत नाहीं. त्याला सर्व दिशा मंगलमय भासतात व सर्वच काळ शुभस्वरूप वाटतो. त्याची चित्तवृत्ति ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे सर्व देश आणि सर्व काळ त्याला मंगलमयच असतात. त्याला प्राणायाम करावे लागत नाहींत व धारणा आणि ध्यान यांचेही कष्ट घ्यावे लागत नाहींत. असा हा या राजयोगाचा महिमा आहे.


अशेष-दृश्योज्झित-दृङ्‍मयाना-
     मवस्थितानामिह राजयोगे ।
न जागरो नापि सुषुप्तिभावो
     न जीवितं नो मरणं विचित्रम् ॥ १५ ॥


मागील श्लोकांत राजयोग वृद्धिंगत होत असतांना साधकाच्या सर्व वृत्ति मावळतात असें सांगितले, पण हें कसे शक्य आहे ? ज्ञान्याच्या ठिकाणीं देखील जागृति, स्वप्न, सुषुप्ति, खाणेंपिणें, चालणें, बोलणें इत्यादि सर्व व्यवहार दिसतातच. या शंकेचें समाधान करण्याकरितां आचार्यांनी हा श्लोक लिहिला आहे. पूर्वींच्या श्लोकांत वर्णन केलेल्या या राजयोगामध्यें समाधिकाळीं तर सर्व व्यवहार बंदच असतात, पण लोकदृष्ट्या व्युत्थानदशेमध्यें देखील राजयोगाने सिद्ध झालेले महात्मे केवळ ब्रह्मस्वरूपच असतात. शुद्ध चित्स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी अशेष दृश्यप्रपंचाचा तत्त्वतः कांहीं संबंध नसल्यामुळे संपूर्ण दृश्यप्रपंच हा तत्त्ववेत्त्याच्या दृष्टीनें मावळलेलाच असतो. दृश्यप्रपंचाचा निरास झाल्यामुळे ते केवळ "दृक्" म्हणजे ज्ञानस्वरूपच असतात. जेथे, देह, प्राण, मन, बुद्धि इत्यादिकांचें भानच नाहीं तेथें त्यांच्या दृष्टीने व्यवहार कसला ? तात्पर्य, "सर्वं खल्विदं ब्रह्म", "आत्मैवेदं सर्वम्" अशीच अवस्था असल्यामुळें त्या सिद्ध महात्म्यांकडून अशेष दृश्यपदार्थांचा त्यागच झालेला असतो. ते केवळ दृङ्‍मय म्हणजे ज्ञानस्वरूप, ब्रह्मस्वरूपच असतात. सामान्य लोक त्यांच्या बाबतींत जागृति, स्वप्न, सुषुप्ति, जीवन, मरण इत्यादि व्यवहाराची कल्पना करीत असले, तरी त्या सिद्ध पुरुषांना जागृति नाहीं, स्वप्न नाहीं, सुषुप्ति नाहीं, जीवन नाहीं, मरण नाहीं, कांही नाहीं. केवढे हें आश्चर्य आहे !

अहं-ममत्वाद्यपहाय सर्वं      श्रीराजयागे स्थिरमानसानाम् । न द्रष्ट्टता नास्ति च दृश्यभावः      सा जृम्भते केवलसंविदेव ॥ १६ ॥


जेथे तेथें मी मी मी अशा तर्‍हेची जी वृत्ति व्यक्त केली जाते त्या वृत्तीला अहंता असें म्हणतात. यालाच प्रौढी मिरविणे किंवा गर्व करणें असें आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक पदार्थाविषयी हे माझें तें माझें अशी भावना ठेवणे याला ममता असें म्हणतात. तात्पर्य, मोहमूलक आत्मीयत्वाची भावना म्हणजे ममता होय. अहंता आणि ममता या दोन्ही वृत्ति अंती जीवाला तापदायक असतात. ममता शब्दाचा मराठीमध्ये माया किंवा प्रेम असाही अर्थ करतात. हें प्रेमही मोहमूलक असेल तर तें तापदायकच ठरतें. या करितां विवेकी लोक अहंता आणि ममता यांचा त्याग करीत असतात. ज्यांनीं अहंता आणि ममता या सर्वांचा त्याग करून आपलें मन सर्वस्वी स्पृहणीय आणि सुंदर असलेल्या राजयोगाच्या ठिकाणी स्थिर केलेले आहे त्यांच्या ठिकाणी मी द्रष्टा आहे, हें सर्व दृश्य आहे, मी भोक्ता आहें, हें सर्व माझें भोग्य आहे, असा कोणताच भाव म्हणजे वृत्ति, कल्पना किंवा विचार शिल्लक रहात नाहीं. सर्व द्वैतभाव मावळलेला असतो. मग शिल्लक काय उरते ? या प्रश्नाचें उत्तर असे - "सा जृम्भते केवलसंविदेव" सा म्हणजे पूर्वी सांगितलेली किंवा शास्त्रांत प्रसिद्ध असलेली. केवलसंवित् म्हणजे अखंड, अनंत, स्वगत-सजातीय-विजातीय भेदरहित परिपूर्ण परब्रह्मच शिल्लक असतें.

अहंता म्हणजे अनात्मस्वरूप असलेल्या देहेंदियादिकांच्याविषयी आत्मत्वभावना आणि ममत्व म्हणजे तत्त्वतः आत्म्याशी ज्यांचा कांहीं संबंध नाही अशा घरदार वित्तवैभव आणि पुत्र मित्र इत्यादिकांच्या ठिकाणी असलेली आत्मीयत्वाची भावना. या दोन्ही भावना अज्ञानाचेच स्वरूप होय असे योगशास्त्र सांगत आहे. अनित्य पदार्थांना नित्य समजणे, अपवित्र पदार्थांना पवित्र मानणे, दुःखदायक असलेल्या पदार्थांना सुखकर समजणें आणि अनात्मस्वरूप असलेल्या पदार्थांना आत्मस्वरूप समजणे हें सर्व अज्ञानाचें लक्षण होय. "अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्य-शुचि-सुखात्म-ख्यातिरविद्या" ( साधनपाद योग सूत्र ५) असाही अहंता आणि ममता या शब्दांचा अर्थ करतात. विवेकाने व श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांच्या योगाने सर्व अज्ञानांचा निरास करून साधक हे राजयोगाच्या ठिकाणी विराजत असतात. श्री म्हणजे ब्रह्म. "मुमुक्षुभिः श्रीयते इति श्रीः" अशी श्री शब्दाची व्युत्पत्ति आहे. श्रीराजयोग म्हणजे ब्रह्मस्वरूपच असलेला राजयोग असा अर्थ होतो. राजयोग हा ब्रह्मस्वरुपच आहे. "स्वस्वरूपेण राजते इति राजा, राज्ञा योगः राजयोगः" स्वरूपाने विराजमान असलेलें स्वयंप्रकाश परिपूर्ण परब्रह्म हाच खरा राजा शब्दाचा अर्थ होय. या परब्रह्माशी योग म्हणजे तादात्म्यभाव प्राप्त होणें हाच राजयोग शब्दाचा अर्थ होय. या राजयोगाच्या ठिकाणी भाग्याने ज्यांचें मन स्थिर झालें, एकरूप झालें, त्यांचा सर्व द्वैतभाव मावळतो आणि केवळ संवित् म्हणजे शुद्ध निरुपाधिक आत्मचैतन्य हेंच "जृम्भते" म्हणजे प्रकाशत रहातें !


नेत्रे ययोन्मेष-निमेष-शून्ये      वायुर्यया वर्जित-रेच-परः । मनश्च सङ्‍कल्प-विकल्प-शून्यं      मनोन्मनी सा मयि सन्निधत्ताम् ॥ १७ ॥


वरच्या श्लोकांत राजयोगामध्यें विराजमान झालेल्या साधकाच्या सर्व वृत्ति - इंद्रियवृत्ति, मनोवृत्ति आणि प्राणवृत्तीही मावळतात असें सांगितले. याच अवस्थेला मनोन्मनी अवस्था असें म्हणतात. प्रस्तुत श्लोकांत आचार्य या मनोन्मनी अवस्थेचे वर्णन करीत आहेत. उन्मनी अवस्थेमध्ये सर्व वृत्तींचा निरोध झालेला असतो. डोळ्यांचे उन्मेष आणि निमेष देखील होत नसतात. उन्मेष म्हणजे डोळे उघडणे आणि निमेष म्हणजे डोळे झाकणे. उन्मनी अवस्थेंत या क्रिया देखील होत नसतात, कारण आपण अमुक पहावे किंवा अमुक पाहूं नये अशी वृत्तीच निर्माण होत नसते. या ठिकाणी डोळा हें एक उदाहरणमात्र आहे. डोळ्यांप्रमाणेच उन्मनी अवस्थेंत इतर इंद्रियांचेही व्यापार बंद पडलेले असतात. केवलकुंभकाच्या परिपक्व अवस्थेमुळे प्राणवायुचीं श्वासोच्छवासाच्या रूपानें होणारी पूरक आणि रेचक ही कर्मही बंद पडतात. त्याबरोबरच शरीराची हालचालही बंद पडलेली असते.

सौषुप्त अवस्थेंत मन पुरीतत् नांवाच्या नाडींत प्रविष्ट झालेलें असते आणि कुंडलिनी - शक्तीही स्वस्थानी प्रसुप्तच असते म्हणून देहाचा तोल संभाळला जात नाहीं. मनुष्य पेंगतो, बसल्या जागी डुलक्या घेतो व शेवटीं तो आडवाही होतो, पण चित्ताचा ब्रह्मस्वरूपीं लय झाल्यानंतर समाधिकाळांत साधकाचें मन सुषुम्नानाडीच्या मार्गाने सहस्रदलकमलांतील विष्णुपदांत लीन झालेलें असतें व साधकाची कुंडलिनीशक्तिही जागृत असते म्हणूनच साधकाचा देह समाधिपूर्वकाळांत सिद्धासन, स्वस्तिकासन अथवा पद्मासन यांपैकी ज्या आसनावर स्थिर झालेला असेल त्याच आसनावर तो तसाच निश्चल रहातो. याच कारणानें सुषुप्ति अवस्थेप्रमाणें समाधिअवस्थेत साधकाचा देह आडवा होत नाहीं.

या मनोन्मनी अवस्थेंत साधकाचें मन संकल्प आणि विकल्प यांनी शून्य झालेलें असतें. अशी ही मनोन्मनीची अर्थात् निर्विकल्प समाधीची अवस्था असते. हिलाच परिपूर्णब्रह्मावस्था असें म्हणतात. सा म्हणजे ती, मुमुक्षु लोकांना अपेक्षित असलेली आणि ब्रह्मवेत्त्यामध्यें प्रसिद्ध असलेली मनोन्मनी अवस्था आचार्य म्हणतात माझ्या सांनिध्याला यावी, ती मला प्राप्त व्हावी. ही अवस्था म्हणजे आनंदाची पराकाष्ठा होय. साधकानें देखील हठयोग अर्थात् प्राण आणि अपान यांच्या समीकरणाने कुंडलिनी-शक्तीला जागृत करण्याची क्रिया हेंच क्षेत्र समजून त्यांत आपलें चित्तरूपी बी पेरावे. त्याला विवेकयुक्त निःसीम वैराग्याचे जल शिंपडावे. अर्थात विवेकयुक्त वैराग्याचे मुबलक पाणी घालावे म्हणजे चित्तबीज अंकुरित होऊन तेथें कल्पलता उदयास येईल. हीच कल्पलता नित्यनिरतिशय आनंदाचे फळ देऊन साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण करील.

संस्कृत भाषेमध्ये पृषत्+उदर यांचा समास ज्याप्रमाणें पृषोदर होतो त्याचप्रमाणे मनस् + उन्मनी यांचाही समास मनोन्मनी असा होत असल्यामुळें मनोन्मनी हा शब्द अशुद्ध आहे अशी शंका घेण्याचे कांहीं कारण नाहीं.


चित्तेन्द्रियाणां चिरनिग्रहेण
     श्वासप्रचारे शमिते यमीन्द्राः ।
निवात-दीपा इव निश्चलाङ्‍गा
     मनोन्मनीमग्नधियो भवन्ति ॥ १८ ॥


यमीन्द्राः म्हणजे इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह करण्यांत निष्णात असलेले मोठे मोठे योगी, श्रेष्ठयोगी, चिरकाल मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह केल्यामुळें ज्यांची इन्द्रिये आणि मन अंतर्मुख झालेलें आहे, त्याचप्रमाणे अंतःकुंभकाच्या अभ्यासामुळें श्वासोच्छूवासाच्या गति ज्यांच्या शांत झालेल्या आहेत, अर्थात् प्राणवायूचा सुषुम्नानाडींत प्रवेश झालेला असल्यामुळें इडा आणि पिंगला या नाड्यांच्या द्वारा होणारी श्वासोच्छवासाची गति ज्यांची शांत झालेली आहे. ज्यांचे अवयव अगदी वाऱ्याचा संपर्क नसलेल्या खोलींत ठेवलेल्या दिव्याप्रमाणे निश्चल झालेले आहेत असेच ते दिसत असतात. मनोन्मनी अवस्थेमध्ये त्यांचें चित्त निमग्न झालेले असतें.

उन्मनी म्हणजे मनाच्या पलीकडे असलेली अवस्था. ज्या अवस्थेंत मनाचा मनपणा शिल्लक राहिलेला नसतो, त्या अवस्थेला उन्मनी असें म्हणतात. अथवा मनोन्मनी या शब्दांतील मन शब्दाचा अर्थ ब्रह्म असाही करतात. "मन्यते ज्ञायते अनेन इति मनं" अशी मन शब्दाची व्युत्पत्ति आहे. मन शब्द जसा सकारान्त आहे तसाच तो अकारान्तही आहे. ब्रह्म हें स्वयंप्रकाश असून सर्वप्रकाशक आहे. त्याच्याच योगाने सर्व कांहीं जाणले जातें. "यद्‌भासा सर्वमिदं विभाति" हें श्रुतिवाक्य प्रसिद्धच आहे. तात्पर्य, मनोन्मनी म्हणजे ब्रह्मस्वरूप अवस्था. या अवस्थेंत त्या थोर संयमी पुरुषांची बुद्धि निमग्र झालेली असते. संतांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास "मन रामी रंगले, अवघे रामचि राम झालें ! " अशीच त्यांची अवस्था झालेली असते.


उन्मन्यवस्थाधिगमाय विद्व-
     न्नुपायमेकं तव निर्दिशामः ।
पश्यन्नुदासीनतया प्रपञ्चं
     सङ्‍कल्पमुन्मूलय सावधानः ॥ १९ ॥


मागील श्लोकांत उन्मनी अवस्था ही ब्रह्मानंदस्वरूप आहे असा अभिप्राय व्यक्त केल्यानंतर साहजिकच प्रश्न असा येतो कीं, ही उन्मनी अवस्था आपल्याला कशी प्राप्त करून घेता येईल ? याच प्रश्नाचें उत्तर आचार्य या श्लोकांत देत आहेत. हे विद्वन् म्हणजे हे शहाण्या माणसा ! ब्रह्मानंदाची अवस्था आपण प्राप्त करून घ्यावी अशी उत्कट बुद्धि ज्याला झाली तो खरोखर शहाणाच होय. नाहीं तर पुष्कळ शहाणपण आहे, पण संसारबंधनांतून मुक्त होण्याची इच्छा नाहीं, मग त्या शहाणपणाचा काय उपयोग ? याच अभिप्रायानें आचार्यांनी प्रश्न करणाऱ्याला उद्देशून 'विद्वन्' हें संबोधन योजिले आहे. हे शहाण्या माणसा ! उन्मनी अवस्था प्राप्त करून घेण्याकरितां आम्ही तुला एक उपाय सांगतो. ऐक. या विश्वप्रपंचाकडे तूं उदासीन बुद्धीने म्हणजे साक्षी या भावनेने पहा. या प्रपंचांत आसक्त होऊन रहाण्यासारखें कांहीं नाहीं. या प्रपंचाचा माझ्याशीं अर्थात् आत्म्याशी तत्त्वतः तिळमात्रही संबंध नाहीं. मी या विश्वप्रपंचाचा केवळ साक्षी आहे. याच भावनेने वाग. प्रपंचांतील कोणत्याही वस्तूवर आसक्त न होतां प्रपंचातील कामे केवळ कर्तव्यबुद्धीने करीत रहा. आप्त-इष्ट, सोयरे-धायरे, पुत्र-मित्र, वित्तवैभव आणि स्त्री या सर्वांकडे ब्रह्मबुद्धीनें पहा. आणि दुःखांना कारणीभूत असलेले दुर्वासनामूलक सर्व संकल्प विवेकाने मन एकाग्र करून सोडून दे. यांतूनच तुला उन्मनी अवस्थेचा लाभ होईल. विषयासक्त मन हेंच सर्व दुःखांचे कारण होय. तेंच मन निर्विषय झालें कीं साधकाला मुक्तावस्थेचा लाभ होतो. मुक्तावस्था आणि उन्मनी अवस्था ही एकच आहे.

यावर कोणी अशी शंका घेईल कीं, अहो प्रपंचाकडे उदासीन बुद्धीने पहाण्याचा उपदेश वेदान्ताने केला म्हणूनच तर भारताचा नाश झालो. संकल्पाचे उन्मूलन करून राष्ट्राचा उत्कर्ष कसा होणार ? "अश्या च मे मृत्तिका च मे" असे म्हणणाऱ्या वेदांतील ऋषीप्रमाणे मनातील संकल्प वाढले पाहिजेत. तरच राष्ट्राचा उत्कर्ष होईल. ही शंका आपाततः रमणीय वाटली, तरी तत्त्वतः पाहूं गेल्यास तिच्यांत कांहीं अर्थ नाहीं असेंच दिसून येईल. प्रपंचाकडे उदासीन बुद्धीने पाहिल्यामुळे भारत अधोगतीला गेला नसून उलट प्रपंचाकडे आसक्त बुद्धीने पहाण्याची प्रवृत्ति वाढल्यामुळेच भारत अधोगतीकडे झुकला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वकाळात स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जो स्वार्थत्याग, जी शुद्ध बुद्धि आणि जी अनासक्त वृत्ति होती ती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेची सूत्रे हातीं घेतलेल्या लोकांत राहिली नाहीं. संकुचित स्वार्थ बळावला, विषयासक्ति प्रबळ झाली, राष्ट्राचें हित बाजूला सारून आपलें आणि आपल्या मुलाबाळांचेच हित पहाण्याची बुद्धि बळावली आणि त्यांतूनच लांचलुचपत, काळाबाजार इत्यादि घातक प्रथा निर्माण झाल्या. त्यांतूनच भारताचे पाय उत्तरोत्तर अधिक दुःखाच्या कर्दमामध्ये रुतत असल्याचें प्रतीतीस येत आहे. अजूनही भारत आचार्यांच्या अद्वैततत्त्वाचा अंतःकरणपूर्वक पुरस्कार करील तर तो निश्चित सुखी होईल. तात्पर्य, वरील शंका निरर्थक असून आचार्यांनी सांगितलेल्या मार्गानेच भारत सुखी होईल यांत शंका नाहीं.


प्रसह्य सङ्‍कल्प-परंपराणां
     सम्भेदने सन्तत-सावधानम् ।
आलम्बनाशादपचीयमानं
     शनैः शनैः शान्तिमुपैति चेतः ॥ २० ॥


संकल्पाचे उन्मूलन कसें करावे, हा एक मोठा प्रश्न असतो. कांहीं केल्या संकल्पाचें निर्मूलन होत नाहीं. मन पुनः पुन्हा कांहीं ना कांही तरी संकल्प करीत राहतेच. "असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्" मन हें अत्यंत चंचल आहे, त्याचा निग्रह करणें हें अत्यंत कठीण आहे. ही गोष्ट श्रीकृष्णालाही मान्य करावी लागली आहे. आचार्य या श्लोकांत मनाला कसें जिंकावे, मनातील संकल्प कसे घालवावेत, याची कल्पना देत आहेत. " सङ्‍कल्पपरंपराणां प्रसह्य सम्भेदने सन्ततसावधानं चेतः आलम्बनाशात् अपचीयमानं सत् शनैः शनैः शान्ति उपैति ।" मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या संकल्पांच्या परंपरा अर्थात् अविच्छिन्न संकल्प, त्यांना असह्य म्हणजे बळेंच "संभेदने" म्हणजे मोडून काढण्याविषयीं मनाने संतत म्हणजे निरंतर सावधान म्हणजे एकाग्रतेने तत्पर रहावयास पाहिजे. वैराग्य आणि अभ्यास यांच्या बळावर हळूहळू मनातील संकल्पांचे निर्मूलन करावे. विवेकाने विषयांचे दोष लक्षांत घेतले म्हणजे विषयांमध्यें दुःखच आहे ही गोष्ट प्रतीतीस येईल. मग हळूहळू मन विषयांपासून परावृत्त होईल. मन विषयांपासून परावृत्त झाले कीं त्याला सहजच शांतीचा लाभ होतो. मनातील संकल्पांचे निर्मूलन करणें ही गोष्ट कांहीं साधी सोपी नव्हे याच अभिप्रायाने आचार्यांनी मागील श्लोकांत विद्वन् आणि सावधान या शब्दांचा प्रयोग केलेला आहे. याही श्लोकांत "सन्ततसावधानं" हा पदप्रयोग केलेलाच आहे. हा त्यांचा साधकाला सावधानतेचा इशाराच आहे. मनातील संकल्पांचे निर्मूलन करणें हें अवघड असलें तरी अशक्य मात्र नाहीं. अवघड वाटणाऱ्या गोष्टी देखील हळूहळू केल्या जाणाऱ्या अभ्यासाने साध्य होत असतात. खडक कितीही कठीण असला तरी त्यावरून सतत वाहाणाऱ्या पाण्याच्या ओघानेंही खडकाला ओघाचा आकार येतो. विहीरीवर बांधलेल्या थारोळ्याच्या तोंडाशी जी शिळा बसविलेली असते तिच्यावरून मोटेच्या दोराचे सारखे घर्षण होत असतें. त्या घर्षणाने शिळेलाही वण पडतात. जें विष इतरांना डोळ्यांनी पहावतही नाहीं तें तोळ्या तोळ्याने भक्षण करणारे लोक असतातच. हा कशाचा परिणाम ? हा हळूहळू केल्या जाणाऱ्या अभ्यासाचाच परिणाम होय. याच अभिप्रायाने आचार्यांनीं चौथ्या चरणांत "शनैः शनैः" हा पदप्रयोग केलेला आहे. अभ्यासानें मनातील संकल्पांचे उन्मूलन करीत असतांना मन हळूहळू शांत होत रहातें. अग्नीचे इंधन संपले कीं अग्नि जसा जागच्या जागी शांत होतो त्याचप्रमाणे मनातील संकल्प मावळले कीं मनही जागच्या जागी शांत होते. संकल्प हेंच मनाचे आलंबन असल्यामुळें जसा जसा आलंबनाचा नाश होत जातो तसें तसें मन क्षीण होत जातें व शेवटीं तें आत्मस्वरूपांत लीन होऊन जातें. हें सर्व सिद्ध होण्याकरितां साधकाला अभ्यासकाळांत यमनियमांचें अनुष्ठान, आसनें आणि प्राणायाम, बंध आणि मुद्रा, कुंडलिनी-शक्तीची जागृति, प्राणवायूचा सुषुम्नानाडींत प्रवेश, अनाहतनादाचें अनुसंधान, केवलकुंभक आणि मनाचा लय याच मार्गांनीं जावे लागतें. हाच शांतीचा राजमार्ग आहे.


निश्वासलोपैर्निभृतैः शरीरै-
     र्नेत्राम्बुजैरर्धनिमीलितैश्च ।
आविर्भवन्तीममनस्कमुद्रा-
     मालोकयामा मुनिपुङ्‍गवानाम् ॥ २१ ॥


वर सांगितलेल्या मार्गाने अभ्यास करणारे ते खरोखर मुनिपुंगव म्हणजे श्रेष्ठ मुनिच होत. केवल कुंभकामुळें इडा आणि पिंगळा या नाड्यांच्या द्वारा होणाऱ्या त्यांच्या श्वासोच्छ्‍वास-क्रिया विराम पावलेल्या असतात. त्यामुळे त्यांचीं शरीरे निश्चल झालेलीं असतात. त्यांची नेत्रकमलेंही अर्धोन्मीलित अवस्थेंत असतात. मनातील संकल्प-विकल्पही मावळलेले असतात. अशी ही त्या श्रेष्ठ मुनींची एक प्रकारची अमनस्कमुद्राच प्रकट होत असलेली आम्ही पहात आहोंत. मुद्रा म्हणजे शरीराची एक प्रकारची विशिष्ट अवस्था. ज्या अवस्थेंत हालचाल नाहीं, इंद्रियांचे व्यापार नाहींत, श्वासोच्छ्‌वास नाहींत, संकल्प-विकल्प नाहींत, पण ही अवस्था म्हणजे मरण मात्र नव्हे. मरणामध्ये प्राणवायु देहाला सोडून गेलेला असतो, तर या अवस्थेंत तो सुषुम्ना नाडीच्या द्वारा ब्रह्मरंधांत प्रविष्ट झालेला असतो, मरणामध्ये देह जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला असतो, तर या अवस्थेंत तो " समं कायशिरोग्रीवं " या थाटांत आपल्या आसनावर विराजमान असतो. मरणामध्ये जीव हा आपल्या सूक्ष्म शरीराला बरोबर घेऊन कर्माच्या अनुरोधानें इकडे तिकडे भटकत असतो तर, या अवस्थेंत तो निजानंदांत तल्लीन झालेला असतो. म्हणूनच या अवस्थेला अमनस्कमुद्रा असें म्हणतात. "मुदं राति इति मुद्रा" ही अवस्था एक प्रकारचा आनंद देते म्हणून तिला मुद्रा असें म्हटले आहे. "मोदयति अपरोक्षज्ञानेन इति मुद्रा" असाही मुद्रा शब्दाचा विग्रह करतात. आत्मस्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार करून देऊन जीवाला ती आनंद देते म्हणून तिला मुद्रा असे म्हटलेले आहे. या अवस्थेंत मन हें उन्मनीभावाला गेलेले असतें म्हणूनच हिला अमनस्कमुद्रा असें म्हटलें जाते. भगवान् श्रीमहाविष्णू अथवा भगवा शंभुनाथ यांना ही मुद्रा प्रिय असल्यामुळें अथवा तेही या मुद्रेमध्ये विराजमान होत असल्यामुळें या मुद्रेला वैष्णवी मुद्रा अथवा शांभवी मुद्रा असेंही म्हणतात. ही अमनस्कमुद्रा ज्यांना लाभली ते मुनिपुंगव खरोखर धन्य होत. "यमिपुङ्‍गवानाम्" असाही पाठभेद आढळतो. श्रेष्ठ योगी असा त्याचा अर्थ करावा.


अमी यमीन्द्राः सहजामनस्का -
     दहंममत्वे शिथिलायमाने ।
मनोऽतिगं मारुतवृत्ति-शून्यं
     गच्छन्ति भावं गगनावशेषम् ॥ २२ ॥


"अमी" म्हणजे हे वरच्या श्लोकांत निर्दिष्ट केलेले 'यमीन्द्राः' म्हणजे बडे बडे योगी. त्यांना त्यांच्या योगाभ्यासामुळे आणि विवेकयुक्त वैराग्यामुळे "सहजामनस्कभाव" म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त झालेली असते. अर्थात सहज म्हणजे अकृत्रिम अमनस्क म्हणजे ब्रह्मभाव. क म्हणजे ब्रह्म. "कं ब्रह्म खं ब्रह्म" हें श्रुतिवचन प्रसिद्धच आहे. अमनस्क म्हणजे मनोनिर्मित संकल्प-विकल्परहित अथवा मनाच्या पलीकडचे. "न तत्र मनो गच्छति न वाक्" अशा वाक्यांनीं वेदाने ब्रह्माचे वर्णन केलेच आहे. म्हणूनच ब्रह्माला अमनस्क असें म्हणतात. तात्पर्य, अकृत्रिम कल्पनातीत असे जें अखंड, अनंत ब्रह्म तेंच सहजामनस्क शब्दाने या ठिकाणी विवक्षित आहे. अशा ब्रह्मावस्थेला तें प्राप्त झालेलें असल्यामुळें त्यांची अहंता आणि ममता शिथिल झालेली असते, मावळलेली असते. ते अशा भावाला म्हणजे अवस्थेला प्राप्त झालेले असतात कीं, त्या ठिकाणी प्राणवायूच्या वृत्ति म्हणजे श्वासोच्छ्‍वासाचे व्यापार शून्य झालेले असतात. मनाच्याही पलीकडची ती अवस्था असते. गगन म्हणजे चैतन्याकाश हेंच त्या अवस्थेंत शिल्लक उरले असतें. तात्पर्य, ते ब्रह्मरूप होतात.


निवर्तयन्तीं निखिलेन्द्रियाणि
     प्रवर्तपन्तीं परमात्मयोगम् ।
संविन्मयीं तां सहजामनस्कां
     कदा गमिष्यामि गतान्यभावः ॥ २३ ॥


वर वर्णन केलेली सहज अमनस्क अवस्था अत्यंत स्पृहणीय असल्यामुळें 'तिचा मला केव्हा लाभ होईल' अशी उत्कंठा या श्लोकांत आचार्य व्यक्त करीत आहेत. सर्व इंद्रियांना आपआपल्या विषयांपासून परावृत्त करणारी आणि पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, असंभावना, विपरीत भावना इत्यादि प्रतिकूल वृत्तींनी रहित अर्थात अत्यंत शुद्ध अशा आत्मयोगाकडे - आत्मसाक्षात्काराकडे प्रवृत्त करणारी, परमात्मयोग असें एकच पद कल्पिल्यास परमात्मतत्त्वाच्या साक्षात्काराकडे प्रवृत्त करणारी, असा अर्थ करावा. "संविन्मयी" म्हणजे केवळ ज्ञानस्वरूप असलेली, अपरोक्ष ब्रह्मानंदाला प्राप्त करून देणारी वरील श्लोकांत वर्णन केलेली सहज आणि अमनस्क अशी जी अवस्था त्या अवस्थेला 'गतान्यभावः' म्हणजे ज्याचा द्वैतभाव मावळलेला आहे अशा भूमिकेवर येऊन मी केव्हा बरें प्राप्त होईन ?

कांही लोक "गतान्यभावाम्" असा पाठ मानून सहज-अमनस्कमुद्रेचे तें विशेषण करतात. अमनस्कअवस्थेमध्ये सर्व भेदभाव मावळतो हें आपण वर पाहिलेलेच आहे.


प्रत्यग्विमर्शानिशयेन पुंसां      प्राचीनगन्धेषु पलायितेषु । प्रादुर्भवेत्काचिदजाडयनिद्रा      प्रपञ्चचिन्तां परिवर्जयन्ती ॥ २४ ॥


शास्त्रांत सांगितलेले व गुरूंनी उपदेशिलेलें आत्मस्वरूप लक्षांत घेऊन त्याचें अखंड चिंतन केल्यानेच आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊं शकतो. हीच गोष्ट आचार्य या श्लोकाने सांगत आहेत. "प्रत्यग्विमर्शातिशयेन" प्रत्यक् म्हणजे अन्तर्यामी आत्मा. अंतर्यामामध्ये राहून विश्वाला भुलवितो, चालवितो म्हणून अंतरात्म्याला प्रत्यक् असें म्हणतात. अंतर्मुख झालेल्या लोकांनाच त्याचा साक्षात्कार होऊं शकतो. म्हणूनही त्याला प्रत्यक् असें म्हणतात. "प्रातिलोम्येन अञ्चति इति प्रत्यक्" अशी प्रत्यक् शब्दाची व्युत्पति आहे. प्रत्यक् म्हणजे अंतरात्मा. त्याचा विमर्श म्हणजे सूक्ष्म विचार. देह आत्मा नव्हे, इंद्रिये आत्मा नव्हेत मन आत्मा नव्हे. हे सर्वनाशिवंत आहेत. आत्मा हा अविनाशी व आनंदमय आहे. अशाप्रकारच्या सूक्ष्म विचाराला विमर्श असें म्हणतात. या विचारांचा अतिशय म्हणजे पराकाष्ठा. या आत्मविषयक सूक्ष्म विचारांच्या पराकाष्ठेनें प्राचीनगंध म्हणजे पुरातन संस्कार पार पळून जातात, नाहीसे होतात. अशा रीतीनें निरंतर होणाऱ्या आत्मचिंतनाने प्राचीन संस्कार मावळल्यानंतर साधकाच्या ठिकाणीं एक प्रकारची अनिर्वचनीय "अजाड्यनिद्रा" म्हणजे सर्व इंद्रियांच्या वृत्ति जेथे निमाल्या आहेत अशा प्रकारची चिदानंदस्वरूप सहजावस्था प्रकट होते. त्या अवस्थेंत प्रपंचाची चिंता तिळमात्रही उरत नाहीं.


विच्छिन्न-संकल्प-विकल्प-मुले
     निःशेष-निर्मूलित-कर्म-जाले ।
निरन्तराभ्यासनितान्तभद्रा
     सा जृम्भते योगोनि योगनिद्रा ॥२५ ॥


जिच्यामध्यें प्रपंचाच्या विचारांचे अंकुर पार निरस्त होऊन जातात अशा स्वरूपाची वरच्या श्लोकांत वर्णन केलेली जी "अजाड्यनिद्रा" म्हणजे केवळ चिदानंदरूप परिपूर्ण परब्रह्मावस्था, तिलाच या लोकांत "योगनिद्रा" असें नांव दिलेले आहे. ज्या भाग्यवान् योग्याला या योगनिद्रेचा लाभ होतो तो योगी संकल्प-विकल्परहित असतो. संकल्प म्हणजे आपातत रमणीय वाटणाऱ्या विषयांबद्दल अतःकरणांत निर्माण होणाऱ्या वृत्ति. आणि विकल्प म्हणजे शशशृंग, वन्ध्यापुत्र, आकाशकमल इत्यादि शब्द श्रवण केल्यानंतर निर्माण होणारी वृत्ति. त्या वृत्तीला विषय वस्तुतः नसतो. " शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः" अशी योगसूत्रकारांनीं विकल्पाची व्याख्या केलेली आहे. अज्ञान हेंच या संकल्प-विकल्पांचें मूळ आहे. तें अज्ञान ज्याचें विच्छिन्न म्हणजे निरस्त झालेलें आहे, त्याचप्रमाणें ज्याच्या कर्मजालाचेंही निःशेष निर्मूलन झालेलें आहे असा तो योगी अनंत जन्मांच्या कर्मसमूहांतून मुक्त झालेला असतो. ज्ञानाग्नीने त्याची सर्व कर्मे भस्म झालेलीं असतात. निरंतर आत्मस्वरूपाच्या अभ्यासाने म्हणजे चिंतनानें त्या योगी पुरुषाच्या ठिकाणी प्रकट झालेली योगनिद्रा ही "नितान्तभद्रा" म्हणजे अत्यंत आनंदस्वरूप असते. आपल्या दैनंदिन जीवनांतील निद्रेहून ही निद्रा निराळी आहे, म्हणूनच या निद्रेला योगनिद्रा असें म्हटले आहे. योग म्हणजे ब्रह्मज्ञान. "युज्यते अनेन इति योगः" ब्रह्मज्ञानानेंच जीवात्मा हा परमात्मस्वरूपाशी संलग्न होतो, एकरूप होतो म्हणूनच ब्रह्मज्ञानाच्या परिपक्वावस्थेत सर्व इंद्रियांच्या व्यापारांचा उपशम होतो. सर्व इंद्रियांचे व्यापार थांबतात म्हणूनच या अवस्थेला निद्रा असें नांव दिलें आहे. अशी ही योगनिद्रा योग्याच्या ठिकाणी "जृम्भते" म्हणजे प्रकाशत रहाते.


विश्रान्तिमासाद्य तुरीयतल्पे
     विश्वाद्यवस्था-त्रितयोपरिस्थे ।
संविन्मयीं कामपि सर्वकालं
     निद्रां सखे निर्विश निर्विकल्पाम् ॥ २६ ॥


मागील श्लोकांत अजाढ्यनिदा, योगनिद्रा इत्यादि शब्दांनी ज्या अवस्थेचे वर्णन केले त्याच अवस्थेला या लोकांत निर्विकल्प चिन्मयनिद्रा असें नांव देऊन साधकाला मोठ्या प्रेमानें ही अवस्था प्राप्त करून घेण्याचा आचार्य आग्रह करीत आहेत. सखे हें संबोधन साधकाविषयीं आचार्याMच्या अंतःकरणांत असलेल्या नितान्त प्रेमाचे द्योतक आहे. हे मित्रा, असा त्या संबोधनाचा अर्थ आहे. हे सदगृहस्था ! अनादिकाळापासून अत्यंत गहन असलेल्या या संसाररूपी अरण्यांत तूं भटकत आहेस. आतां विश्रांति घे, विश्व तैजस आणि प्राज्ञ या तीन अवस्थांच्याही पलीकडे असलेली तुरीयावस्था ही तुझ्याकरितां उत्तम सुखशय्या आहे. तल्प म्हणजे शय्या किंवा अंथरुण. जाग्रदवस्थेचा अभिमानी असलेला जो जीव त्याला विश्व असें म्हणतात. तोच जीव स्वप्नदशेंत प्रविष्ट झाला कीं त्याला तैजस असें नांव मिळतें. तोच सौषुप्तअवस्थेत गेला कीं त्याला प्राज्ञ असें म्हटलें जातें. ही सर्व जीवाला अवस्थाभेदानें प्राप्त झालेलीं पारिभाषिक नावे आहेत. जागृति स्वप्न आणि सुषुप्ति, या तिन्ही अवस्थांच्या पलीकडची जी अवस्था आहे तिला तुर्या अथवा तुरीया असें म्हणतात. या तुरीयावस्थेचें अधिष्ठान असलेल्या चैतन्याला सर्वसाक्षी असे नांव दिलेले आहे. आचार्य म्हणतात, बाबा रे, या तिन्ही अवस्थांच्या वर असलेल्या तुरीय अवस्थारूपी शय्येवर विश्रांति घेऊन "निर्विकल्पां" म्हणजे वृत्तिशूत्त्य असलेली " काम् अपि " म्हणजे अनिर्वचनीय अशी जी संविन्मयी म्हणजे शुद्ध चैतन्यरूप अथवा नित्य निरतिशय आनंदरूप अवस्था, त्याच अवस्थेंत सर्वकाळ प्रविष्ट होऊन रहा. तात्पर्य, तूंही चिदानंद ब्रह्मस्वरूप हो, मुक्त हो.


प्रकाशमाने परमात्मभानौ
     नश्यत्यविद्या-तिमिरे समस्ते ।
अहो बुधा निर्मल-दृष्टयोऽपि
     किञ्चिन्न पश्यन्ति जगत्समग्रम् ॥२७ ॥


ब्रह्मसाक्षात्काराचा आनंद अनिर्वचनीय आहे. त्यांत तन्मय झालेल्याला दुसरें कांहीं दिसत नाहीं व सुचतही नाहीं. अशा अभिप्रायाने ब्रह्मपदीं तन्मय झालेल्या योगी लोकांची अवस्था वर्णन करीत आहेत. "परमात्मभानौ प्रकाशमाने सति" आत्मा म्हणजे शुद्धचेतन्य. तें चैतन्य सर्व विश्वाला व्यापून असतें, विश्वरूपाने नटलेले असतें व अंती सर्व विश्वाला आपल्या स्वरूपांत लीन करून घेत असतें म्हणून त्याला आत्मा असें म्हणतात. "अतति, अत्ति अथवा आदत्ते इति आत्मा " अशी आत्मशब्दाची व्युत्पत्ति आहे. तो आत्मा या जगांत सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्याहून श्रेष्ठ असें या जगांत दुसरें कांहीच नाहीं, म्हणून त्याला परम हें विशेषण दिलें जातें. शास्त्रे व तत्त्ववेत्ते त्याला परमात्मा असें म्हणतात. परमात्मा हाच कोणी भानु म्हणजे सूर्य. "भाति स्वयंप्रकाशते इति भानुः" दृश्य जगतांत सूर्य हा स्वयंप्रकाश असल्यामुळें त्याला भानु असें म्हणतात. तत्त्वतः परब्रह्म हेंच स्वयंप्रकाश असल्यामुळें खऱ्या अर्थाने भानु हा शब्द परब्रह्मालाच लागू पडतो. असा हा परमात्मभानु हृदयामध्ये प्रकाशू लागला असतां, सूर्योदय झाल्याबरोबर जसा अंधकार मावळतो त्याचप्रमाणे परब्रह्मरूपी सूर्याचा हृदयांत प्रकाश पडल्याबरोबर अज्ञानरूपी समस्त तिमिर पार मावळतें. तो साधक स्वतःच स्वयंप्रकाश परब्रह्मस्वरूपी सूर्य बनतो !

मावळवीत विश्वाभासु । नवल उदेला चंडांशु ।
अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥
जो अविद्याराती रुसौनिया । गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां ।
जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥ - ज्ञानेश्वरी अध्याय १६ ओ. १-२

अशा शब्दांत या अवस्थेचे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या बहारीने वर्णन केले आहे. या ठिकाणी नश्यति हें क्रियापद नसून अविद्यातिमिराचें तें वर्तमान- कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. परब्रह्मस्वरूपाच्या अपरोक्ष साक्षात्काराने अंतःकरणांतील समस्त अविद्यारूपी तिमिराचा नाश झाला असतां ते साधक "निर्मलदृष्टि" होतात. "निर्मला दृष्टिर्येषां ते निर्मलदृष्टयः" दृष्टि म्हणजे अपरोक्ष ज्ञान ते त्यांचें अत्यंत निर्मल असतें. त्यांत दोषाचा - भ्रांतीचा लेशही उरलेला नसतो. आतां खऱ्या अर्थाने ते "बुध" म्हणजे पंडित झालेले असतात. "बुध्यन्ते आत्मतया ब्रह्म इति बुधाः" अशी बुध शब्दाची व्याख्या आहे. "अयमात्मा ब्रह्म " असें तें खऱ्या अर्थाने जाणत असतात. म्हणून आचार्यांनी त्यांना बुध असे म्हटलेले आहे. पंडित या शब्दांत घटक असलेल्या पंडा या शब्दाचाही अर्थ आत्मविषयक-बुद्धि असाच आहे. ढोंग म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थाने सर्वत्र आत्मबुद्धीने जे पहातात तेच खरे पंडित होत. त्यांनाच प्रकृतस्थलीं बुध असें म्हटले आहे. असे हे बुध म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारी मुक्त झालेले लोक. त्यांच्या पुढें हें समग्र म्हणजे संपूर्ण अफाट जग विराजत असूनही आणि त्यांची दृष्टि निर्मल झालेली असूनही ते या जगाकडे किंचित् म्हणजे तिळमात्र पहात नाहींत. आत्मस्वरूपाहून व्यतिरिक्त असें या जगांत त्यांना कांहींच दिसत नाहीं. काय हें आश्चर्य आहे ! अशा थोर महात्म्यांच्या संगतींत शुद्धबुद्धीने जे जातात तेही तेच होतात ! "आपणासारीरखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ तया लागी ॥ " अशा महात्म्यांचें काय वर्णन करावे.

ब्रह्मानन्द-रसारूढो ब्रह्मानन्दैक-चिद्‌घनः ।
ब्रह्मानन्दरसोद्वाहो ब्रह्मानन्दरसम्भरः ॥
ब्रह्मानन्दजनैर्युक्तो ब्रह्मानन्दात्मनि स्थितः ।
आत्मरूपमिदं सर्वं; आत्मनोऽन्यं न किंचन ॥

ब्रह्मानंदाच्या रसात ते स्वयं निमग्न झालेले असतात. ते स्वतःच केवळ चैतन्यघन ब्रह्मानंदरूपच बनले असतात. ते जनतेवर निरंतर ब्रह्मानंदरसाचा वर्षाव करीत असतात. ब्रह्मानंदाच्या रसाने भरलेले ते मूर्तिमंत मेघच असतात. ते ब्रह्मानंदरूपी जलाचे सागर असतात. ब्रह्मानंदस्वरूप आत्म्याच्या ठिकाणीं तें निश्चल झालेले असतात. हें सर्व आत्मस्वरूपच आहे. आत्म्याहून निराळें असें कांहींच नाहीं. अशीच त्यांची अवस्था झालेली असते.


सिद्धिं हथाविध-मनो-विलयां समाधौ
     श्रीशैल-शृङ्‍ग-कुहरेषु कदोपलप्स्ये ।
गात्रं यदा मम लताः परिवेष्टयन्ति
     कर्णे यदा विरचयन्ति खगाश्च नीडान् ॥ २८ ॥

"तथाविधमनोविलयां" म्हणजे योगतारावलींत आतापर्यंत वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणें, ज्या अवस्थेंत मनाचा पूर्णपणे लय होऊन गेलेला आहे अशी स्वरूपावस्थारूप सिद्धि जिला तुरीयातीत अवस्था म्हणतात, ती मला केव्हा बरें प्राप्त होईल ? श्रीशैल पर्वताच्या शिखरावरील गुहांतून मी समाधि लावून बसलो आहे. माझा जीवात्मा परमात्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. मनातील संकल्प-विकल्परूपी विकार सगळे मावळलेले आहेत. मन निर्विकार झालेलें आहे. इंद्रियांचे सर्व व्यापार शांत झालेले आहेत. सर्व विषयांचें विस्मरण होऊन अंतःकरण ब्रह्मस्वरूपाशी अगदीं तदाकार झालेलें आहे. अशा तऱ्हेच्या समाधिअवस्थेत मी केव्हा बरें प्रविष्ट होईन ?

" निर्विकारतया वृत्या ब्रह्माकारतया पुनः ।
वृत्तिविस्मरणं सम्यक् समाधिरभिधीयते ॥ "

अशा स्वरूपाच्या समाधिअवस्थेचा मला केव्हा बरें लाभ होईल ? समाधिअवस्थेत शरीर निश्चल झाल्यामुळे माझ्या देहाला लता, वेळी सर्व बाजूंनी वेष्टित आहेत अशी अवस्था मला केव्हा बरें प्राप्त होईल ? त्याचप्रमाणें माझ्या कानांमध्यें पक्षी निर्भयपणाने घरटी बांधीत आहेत अशी अवस्था मला केव्हा बरें येईल ? तात्पर्य, या अवस्थेला पोहोचलेले महात्मे धन्य होत.

कांहीं लोक श्रीशैल शब्दाचा अर्थ मूर्धस्थानीं असलेले सहस्रदल कमल असा करतात. "श्रीपर्वतः शिरःस्थाने" असा तंत्रशास्त्रांतील संकेतही आहे. गात्र शब्दानें विराट् देहाची कल्पना करून मूलभोतिक विश्वप्रपंचाला लतास्थानीं कल्पितात. खग शब्दाचा अर्थ आकाशांत संचार करणारे चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे असा करून नीड शब्दाचा अर्थ त्यांची स्थाने असा करतात. तात्पर्य, मला विराट् स्वरूपाची अवस्था केव्हा बरें प्राप्त होईल ? "प्रज्ञेनात्मना सम्परिष्वक्तो न बाह्यं किञ्चन वेद नातरम्" इत्यादि वाक्यांनी बृहदारण्यकांत वर्णन केलेली अवस्था मला केव्हा बरें प्राप्त होईल ? असाही या श्लोकाचा अभिप्राय असल्याचें प्रतिपादन केले जाते. वस्तुतः योगतारावली येथें समास झाली. कांहीं पोथ्यांतून .खाली दिलेला श्लोक अधिक आढळतो.

विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ
     कुचकलशयुगे वा कृष्णसारेक्षणानम् ।
चरतु जडमते वा सजनानां महे वा
     मतिकृतगुणदोषा मां विभुं न स्पृशन्ति ॥ २९ ॥

माझी ही बुद्धि निर्विकल्पसमाधीमध्यें स्थिर राहो अथवा मृगांगनेप्रमाणे विलोलदृष्टि असलेल्या तरुण स्त्रियांच्या कुचकलशयुगालावर संचार करो. ती सज्जनांच्या मतांत संचार करो अथवा जडवाद्यांच्या मतांमध्ये संचार करो. बुद्धीच्या गुणदोषांचा माझ्याशी कांहीं संबंध नाहीं. बुद्धि ही भौतिक आहे, तर मी भूतातीत आहे. मी सर्वातीत निर्गुण, निराकार, निर्विकार परिपूर्ण परब्रह्मस्वरूप आहें.

आत्मसाक्षात्कारी असलेल्या यथार्थ तत्त्ववेत्त्याच्या दृष्टीने सर्व विश्व आणि विश्वातील व्यवहार त्याचप्रमाणे स्वतःचा देह, इंद्रिये आणि त्यांच्याकडून होणारे व्यवहार हे सर्वच ब्रह्मरूप झालेले असल्यामुळें त्याच्या ठिकाणी ब्रह्माव्यतिरिक्त भावनाच नसते. अशा स्थितींत त्याच्या व्यवहाराकडे इतरांनी व्यवहारबुद्धीनें पाहिलें, तरी त्याच्या दृष्टीने खरोखरच भेदबुद्धि मावळलेली असेल, तर आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याची बुद्धि कोठेही संचार करो, त्याला त्याचा कांहीं दोष नाही. लोकांनी त्याला नांवे ठेवली तरी ते ठेवोत बिचारे ! जीवन्मुक्ताला त्याचे काय सुखदुःख ! तांबड्या लाल गुंजांचा ढीग पाहून एखाद्याने त्या ठिकाणी रखरखित निखारे आहेत अशी जरी कल्पना केली, तरी गुंजांचा ढीग हा कांहीं निखारे होऊं शकत नाही. जीवन्मुक्ताच्या व्यवहारांकडे इतरांनी व्यवहारबुद्धीनें पाहिले, तरी ते व्यवहार व्यवहार होऊं शकत नाहींत. तत्त्ववेत्ता आणि त्याचे व्यवहार सर्व ब्रह्मस्वरूपच असतात.

काशीच्या तैलंगबावांना ते नागडे उघडे शहरांत फिरतात म्हणून लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी पकडले. न्यायाधीशामुळे उभे केले. अधिक विचाराकरितां आठ दिवसांची मुदत मागून घेतली. तुरुंगाच्या कोठडीत कोंडून ठेवले. कडेकोट बंदोबस्त होताच. दुसऱ्या दिवशीं सकाळीं कोठडीत पहातात, तर बाबा नाहींत ! कोठेंहि भिंतीला भगदाड नाही. छताला छिद्र नाहीं. दाराला मणगटासारखे गज आणि त्यांना शोभणारें तसेंच जाड कुलूप. हें सर्व जेथल्या तेथें सुव्यवस्थित होतें ! "अरे ! बाबा गये ! देखो. दौडो. पकडो." धावपळ सुरू झाली ! पहातात तर बाबा आपले पंचगंगा घाटावर मुलाबाळांच्या घोळक्यांत रमलेले आहेत ! पुन्हा पकडले. मॅजिस्ट्रेटपुढे उभे केले. आठ दिवसांची मुदत मागून घेतली. कोठडीत त्यांना कोंडून ठेवले. दुसऱ्या दिवशीं पहातात, तर पुन्हा तोच प्रकार ! शेवटीं न्यायाधीशाने सांगितलें कीं, यांच्यावर खटला भरून यांना काय शिक्षा देणार ? कायद्यांत फक्त सश्रम कारावासाची तरतूद आहे. आज आठ दिवस तुम्ही त्यांना कोंडून ठेवीत आहां. त्याचा काय उपयोग झाला ? मग मी यांना शिक्षा सुनावली तरी त्याचा काय उपयोग ? मी यांना सोडून देतो. ही गोष्ट सांगण्याचा हेतु एवढाच कीं, जीवन्मुक्तांच्या व्यवहाराकडे कोणी कितीही सदोष बुद्धीने पाहिले तरी त्यांचे व्यवहार सर्वस्वी निर्दोषच असतात. सर्व व्यवहारांकडे ते ब्रह्मबुद्धीनेंच पहात असतात. वस्तुस्थिति अशी आहे कीं, आचार्यांनी योगतारावलींत वर्णन केल्याप्रमाणे साधक हा क्रमाक्रमाने यमनियमादिकांचा अभ्यास करीत विवेकाने व वैराग्यानें आसने व प्राणायाम यांच्या साहाय्याने नाडीशुद्धि करून घेतो. बंधत्रयाच्या अभ्यासाने कुंडलिनी-शक्ति जागृत करून सुषुम्नानाडीद्वारा प्राणवायूला मनासह षटचक्रांचा भेद करीत अनाहतनादाचें अनुसंधान करीत रहातो. शेवटीं त्याची कुंडलिनी, नाद, प्राणवायु आणि मन ही सर्व सहस्रदलकमलांतील चिदाकाशांत लीन होतात. शेवटीं तो साधक उन्मनी, मनोन्मनी भावाला प्राप्त होतो. त्याची मुद्रा सहज अमनस्क स्वरूपाची बनलेली असते. अशा या अवस्थेंत - जीवन्मुक्त दशेत प्राप्त झाल्यानंतर त्याची बुद्धि मलिन आणि तुच्छ विषयांत कशी रमेल ? त्याची बुद्धि जडवादी नास्तिकांच्या मनांत कशी रमेल ? जीवन्मुक्त अवस्थेंत येईपर्यंत त्याच्या देहाला, इंद्रियांना व मनाला जें विवेकाचे व वैराग्याचे वळण लागलेले असतें त्याचा देह इंद्रिये आणि मन यांच्यावर जे चांगले संस्कार सतत अभ्यासाने दृढ झालेले असतात तेच संस्कार त्याचें देहभान हरपले तरी तसेंच प्रकट होत रहातात. "पहिले वळण इंद्रियां सकळां, भाव तो निराळा नाहीं दूजा." असा हा वर्षानुवर्षे निरंतर केल्या जाणाऱ्या अभ्यासाच्या संस्काराचा परिणाम अटळ असतो. कित्येक वेळेला आपली बुद्धि नसली तरी देहेंद्रियादिकांचे व्यवहार हे संस्काराप्रमाणेंच नकळत होत रहातात. अशा स्थितींत साधक ज्या उत्तम अभ्यासानी सिद्धावस्थेला पोहोचलेला असतो ते त्याचे उत्तम अभ्यासानें झालेले उत्तम संस्कार तो सिद्ध झाला तरी कायमच रहातात. साधकअवस्थेतील सत्प्रवृत्तीच्या रूपाने होणारे इद्रियादिकांचे व्यवहार हे साधनरूप असतात, तर सिद्धअवस्थेत पोहोचल्यानंतर तेच सत्प्रवृत्तीचे व्यवहार स्वाभाविक रूपानेच होत रहातात. तात्पर्य, सिद्ध अथवा जीवन्मुक्त झालेल्यांच्या हातून सहसा विपरीत आचार होणार नाहींत हें लक्षांत घ्यावें. त्याच्या हातून विपरीत आचरण घडत असेल तर तो जीवन्मुक्त तत्त्ववेत्ता नव्हेच. ज्ञानामृतानें तृप्त आणि कृतकृत्य झालेल्या योग्याला आपण विषयांमध्ये रमावें अशी वासनाच उत्पन्न होणें शक्य नाही. विषय संपादण्याचे अथवा भोगण्याचे त्याला कांहीं कर्तव्यही उरत नाहीं. तसें कांहीं असेल तर तो तत्त्ववेत्ताच नव्हे. "ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः । नैवास्ति किञ्चित् कर्तव्यमस्तिचेन्न स तत्त्ववितत्" असा तत्त्ववेत्यांचा स्पष्ट अभिप्राय आहे. ब्रह्मज्ञानी होऊनही चित्तवृत्ति विषयासक्त होत असेल तर "निष्फलं ब्रह्मदर्शनम्" असाही इशारा तत्त्ववेत्त्यांनी दिलेला आहे. अर्थवाद आणि वस्तुस्थिति यांतील अंतर लक्षांत घेणे आवश्यक आहे.

GO TOP