श्रीरामदासस्वामीकृत् मनोबोधाचे (मनाचे श्लोक) विवरण

मनोबोध-विवरण-००१-०२०

मनोबोध-विवरण-०२१-०४०

मनोबोध-विवरण-०४१-०६०

मनोबोध-विवरण-०६१-०८०

मनोबोध-विवरण-०८१-१००

मनोबोध-विवरण-१०१-१२०

मनोबोध-विवरण-१२१-१४०

मनोबोध-विवरण-१४१-१६०

मनोबोध-विवरण-१६१-१८०

मनोबोध-विवरण-१८१-२०५


प्रास्ताविक :

[प्रास्ताविक व सर्व श्लोकांची विवरणें श्री वरदानंद भारती यांच्या 'मनोबोध' ग्रंथातून]

समर्थ रामदासस्वामींच्या मनोबोध या प्रकरणाचा विशेष विचार आपण आता करणार आहोत. दोनशे पाच श्लोकांचे हे लहानसे प्रकरण आहे. परंतु संपूर्ण समर्थ-वाङ्‌मयाचे ते सार आहे. मनाचे श्लोक या नावानेहि हे प्रकरण प्रसिद्ध आहे. समर्थ-वाङ्‌‌मय तसे पुष्कळ विस्तृत आहे, प्रचंड आहे. स्वयंपाकघरांतील चटणीमिठापासून अध्यात्माच्या परमोच्च अनुभवापर्यंत जीवनावश्यक अशा सर्व गोष्टींचे मार्गदर्शन समर्थ-वाङ्‌मयाने ठसठशीतपणे केले आहे. या वाङ्‌मयाची व्यापकता आश्चर्य वाटावे इतकी विशाल आहे.

समर्थांचे वाङ्‌मय रचनेच्या दृष्टीने छंदोबद्ध असले तरी शैली आणि आशय या दृष्टीने ते गद्यप्राय आहे. समर्थांच्या स्वभावाला भाषेचा हळुवारपणा, आशयाचा रसाळपणा आणि रचनेची कोवळीक जणू मानवत नसावी; पण समर्थ-वाङ्‌मयाचे सार म्हणून उल्लेखिलेले हे मनोबोध प्रकरण मात्र रसाळपणाच्या दृष्टीनेंहि सरस आहे. या प्रकरणाचे पुन्हां वेंचे काढणे हे फार अवघड जाते. अमृत आटवून अर्धे करता येत नाही; करावे लागत नाहीं, करू नये; तसेच येथेहि होते.

श्रीविनोबाजींनी आपल्या आवडीप्रमाणे शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्या बोधप्रद वाङ्‌मयाचे सार काढून, ते निरनिराळ्या नावांनी लहान लहान पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्ध केले आहे. पण त्यांनी समर्थांचे हे मनोबोध प्रकरण मात्र सर्वच्यासर्व प्रसिद्ध केले आहे. त्याचे पुन्हां वेंचे काढले नाहीत आणि त्याच्या प्रस्तावनेत अशा अर्थाचे म्हटले आहे की समर्थांचे वाङ्‌मय ही सोन्याची खाण आहे. त्यातून सोनें पुष्कळ निघते. पण मनोबोध ही सोन्याची खाण नसून जणू सोन्याची लगड आहे. वा सोन्याने भरलेली तिजोरी आहे असेहि म्हणता येईल. श्रीविनोबांचा अभिप्राय अगदीं यथार्थ आहे.

मी माझा स्वत:चा अनुभवच सांगतो. पुस्तक सहज खिशांत ठेवण्याजोगें असल्याने व मूल्यहि कमी असल्याने प्रवासात वाचण्याकरिता म्हणून बहुधा प्रत्येक वेळी नवे पुस्तक विकत घेतले गेले. आवडलेल्या, चांगले वाटलेल्या श्लोकांवर प्रत्येक वेळी खुणा करीत गेलों, असें ५-६ वेळा तरी झाले. एकदां मनोबोधाची ती सर्व पुस्तकें कुतूहलाने एकत्र पाहिली तेव्हा आढळले की दोनशेंपांच श्लोकांपैकी १६४-१६५ श्लोकांवर निवडीच्या खुणा आहेत. तात्पर्य इतकेंच की मनोबोध हे सर्वच प्रकरण फार सरस, आशयघन आणि बोधप्रद आहे. आपण जितक्या वेळां वाचू तितक्यावेळां निरनिराळेच श्लोक हवेहवेसे वाटतात. असे हे फार सुंदर प्रकरण आहे.

आमचे दादा (सद्गुरु दासगणूमहाराज) हे वस्तुतः समर्थ सांप्रदायाचे; पण त्यांचे विशेष प्रेम श्रीतुकोबारायांच्या गाथ्यावर आणि ज्ञानेश्वरीवर होते. त्यांत ते अगदी रंगून देहभान विसरायचे, पण तीर्थस्वरूप दादांना मनोबोध हे प्रकरण मात्र फार आवडे.

मनाचे श्लोक सर्व समर्थ-वाङ्‌मयामध्ये सोपेपणा, सरसता, ठसठशीतपणा आणि उत्कृष्टपणे केलेले उच्च असे मार्गदर्शन यांनी ओतप्रोत भरलेले आहेत. या एकाच प्रकरणामध्ये समर्थ आपल्या सर्व सामर्थ्यानिशी उभे आहेत. इतकेंच नव्हे तर श्रीज्ञानेश्वरमहाराज, तुकोबाराय आणि श्रीकबीर यांचीहि भेट याठिकाणी होते आणि म्हणून मनाच्या श्लोकांची गोडी कांहीं वेगळीच आहे. समर्थांच्या भाषेची गद्यसदृशता आणि भाषाशैथिल्य मनाच्या श्लोकांतहिं आढळते, व्याकरणदोषहि अनेकवेळा भेटतात, व्याकरणशुद्ध भाषेच्या कसोटीला हे श्लोक तितकेसे उतरत नाहीत. पण हा दोष केवळ समर्थांचाच आहे असे नाही. श्रीवामनपंडित, रघुनाथपंडित, राम जोशी, प्रभाकर यांचीहि भाषा व्याकरणदृष्ट्या शिथिलच आहे. आमचे ती. दादाहि व्याकरणाकडे फारसे लक्ष देत नसत. व्याकरणाचे नियम गुंडाळून ठेवण्यात या सर्वांनीच पुष्कळ स्वातंत्र्य घेतले आहे. अपवाद फक्त एक मोरोपंतांचा. त्यांचे सर्व काव्य रचनेच्या दृष्टीने अत्यंत व्याकरणशुद्ध असे आहे. त्यांच्या सर्व काव्यसंभारांत व्याकरणाच्या चुका ४-५ तरी शोधून सांपडतील की नाही याविषयी शंका आहे. कविकुलगुरु कालिदास सुद्धा अनेक प्रयोग पाणिनीला सोडून करतो. प्रतिभासंपन्न महाकवींनीं व्याकरणाचा अपमान केलेला नाही हे खरे. पण व्याकरणाच्या निबिड बंधनामुळे भाषेला जडपणा येत असेल तर तोहि त्यानीं येऊ दिलेला नाहीं. समर्थांची भाषा आर्ष म्हणजे ऋषींची, ऋषीला शोभण्यासारखी आहे. खरोखरीच प्रतिभासंपन्न अधिकारयुक्त वाणीला व्याकरणदृष्ट्या असलेले थोडेसे शैथिल्यहि शोभून दिसते. निदान मूळच्या सौंदर्यात उणीव आणीत नाहीं, एवढे तरी निश्चित म्हणता येईल. केंस अगदीं चापून चोपून बांधले तरच चांगले दिसतात असे कांहीं नाहीं. एखाद-दुसरी मोकळी वार्‍यावर भुरभुरणारी केसांची बट सौंदर्य वाढविणारीहि ठरते. याउलट केंस अस्ताव्यस्त आणि पिंजारलेलेहि असू नयेत. भाषेचेंहि तसेच आहे.

व्याकरणदृष्ट्या शैथिल्य हा दोष खरा पण फारसा महत्त्वाचा नाहीं. आधीं भाषा की आधीं व्याकरण ? भाषेवरून व्याकरण तयार झाले आहे. त्यामुळे प्रतिभावंत महाकवींना आणि समर्थांसारख्या जनहितासाठी तळमळणाच्या सत्पुरुषांना व्याकरणासाठीं धारेवर धरून चालणार नाहीं. मनाच्या श्लोकांतील भाषा व्याकरणाच्या व छंदाच्या दृष्टीनें क्वचित् कोठें शिथिल असली तरी मनोबोधांतील भाषेत एक प्रकारचे उसळते चैतन्य आहे, ओज आहे, आवेश आहे, साक्षात्काराचें तेज आहे, जनहिताची तळमळ आहे, सर्वप्रकारच्या मार्गदर्शनाचा नेमकेपणा आहे आणि त्यामुळे हे मनोबोध प्रकरण अतिशय मनोवेधक आणि प्रभावी आहे हे नाकारता यावयाचें नाहीं. व्याकरणदृष्ट्या दोष असल्यामुळेच मनाचे श्लोक प्रभावी ठरले आहेत असे मात्र कृपा करून कोणीं समजू नये. मनोबोध हे प्रकरण मुख्यतः २०० श्लोकांचे आहे. पहिला श्लोक नमनाचा आणि शेवटचे चार उपसंहाराचे मिळून हे दोनशेपांच श्लोक आहेत. कांहीं ठिकाणीं मनाचे श्लोक २१० असल्याचा उल्लेख आहे. पण प्रचलित आवृत्त्या तरी २०५ श्लोकांच्याच आहेत. मी २१० श्लोकांची आवृत्ति पाहिली आहे. पण मी विद्वान् नसल्यामुळे मला आवृत्त्यांच्या अशा संशोधनाचे तसे आकर्षण नाहीं.

मनाचे श्लोक हे जर सारभूत वाङ्‌मय आहे तर ते तरी एवढे मोठे म्हणजे २०० श्लोकांचे को असावें ? लहानसे सुटसुटीत २५-३० श्लोकांचे कां असू नये ? असे वाटण्याचा संभव आहे. तसे असते तर चाललें नसते असे मुळीच नाहीं. शंकराचार्यांची कित्येक प्रकरणे अशी छोटी छोटीं पण अत्यंत प्रभावी अशी आहेत. मनोबोध तितका लहान नाहीं आणि सामान्यतः मनुष्यप्रकृतीचा, प्रवृत्तीचा, विचार करता फार लहान प्रकरणे उपदेश म्हणून पुरेशीहि उरत नाहीत. माणसाची बुद्धि, माणसाची प्रवृत्ती, माणसाची परिस्थिति इतक्या विविधतेने भरलेली असते की परमार्थाची वाटचाल खरीच करावयाची असेल तर त्याला करावयाचे मार्गदर्शन जरा सविस्तरच करावे लागते. नवख्या ठिकाणी स्वत: जावयाचे असेल तर पत्ता थोडा सविस्तरच माहीत करून घ्यावा लागतो. षड्रिपु टाकून द्या आणि ब्रह्म जाणा एवढ्या एका वाक्यांत उपदेश करून चालत नाहीं. एवढ्याशा एका वाक्याने ज्ञान होत असते तर उपनिषदांतील जी प्रसिद्ध तत्त्वमसि इत्यादि चार महावाक्यें आहेत, तेवढ्याने माणसाचे सर्वकाळीं व पूर्णपणे भागले असते. कारण मूळ सिद्धान्त तेवढाच आहे. अनेक महात्म्यांनी निर्माण केलेले लक्षावधि ग्रंथ, त्यावरील टीका आणि भाष्ये असे प्रचंड वाङ्‌मय मग निर्माण झालेच नसते. परंतु इतकें थोडक्यात सांगून माणसाचे भागत नाहीं. बुद्धि असावी तितकी एकाग्र व कुशाग्र नसते. तिला अज्ञान-मोह-आसक्ति अहंकार इत्यादि इत्यादि कारणांनी सतराशेंसाठ फाटे फुटलेले असतात. आणि त्यामुळे बुद्धीचे आहे ते सामर्थ्यहि अनेक प्रकारांनी फाटून विभागलेले असते. त्यामुळे माणसाची स्थिति "एक धड ना भाराभर त्या चिंध्या कशाला' अशी होते.

दुसरे असे कीं परमार्थ हवासा वाटला तरी संसारांत जो आग्रह असतो, जी जिद्द असते, प्रयत्नाची पराकाष्ठा असते तितकी व तशी परमार्थात नसते. संक्षेप, काटकसर, भागवाभागवी, चालढकल, सारी येते ती परमार्थांच्या माथी. संसाराला वेळ असतो, परमार्थाला नसतो. त्यामुळे अनेक प्रकारचे संशय प्रवृत्ति-परिस्थितीचा परिणाम म्हणून माणसाच्या मनांत डोकावत असतात. त्यांचे निराकरण झाल्याशिवाय आस्था वाटत नाहीं. आस्था वाटल्याशिवाय आग्रह, हट्ट वा जिद्द निर्माण होत नाहीं. संशयाच्या निराकरणासाठी, शंकांच्या उत्तरांसाठी, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विस्ताराने सांगावे लागते. विस्तार फार झाला तर त्याचाहि कंटाळा येतो. भार वाटतो. स्पष्टीकरणाच्या, विवेचनाच्या, पटवून देण्याच्या, मन रंगविण्याच्या विस्तारांत मूळ विषय झाकोळून सांपडेनासा होतो. म्हणून शास्त्रकारांनी लिहिणे, बोलणे कसे असावे याचा नियम सांगतांना 'नातिसंक्षेपविस्तरम्' फार थोडक्यांत सांगू नये व पाल्हाळहि लावू नये असा आदेश दिला आहे. या आदेशाचे मर्म मनाचे श्लोक रचतांना समर्थांनी नेमकें लक्षात ठेवल्याचे दिसते.

हे जे मनाचे श्लोक वा मनोबोध त्याचा उपयोग काय ? या ग्रंथाची फलश्रुति काय ? ते स्वतः रामदासस्वामींनींच उपसंहाराच्या शेवटीं अगदी शेवटच्या श्लोकांत सांगितले आहे. समर्थ म्हणतात,

मनाचीं शतें ऐकतां दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती ॥
चढे ज्ञानवैराग्य सामर्थ्य अंगीं । म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥


मनाचे श्लोक ऐकण्याचा परिणाम म्हणून माणसांतील दोष नाहीसे होतात. हे दोष अनेक प्रकारचे आहेत. बुद्धीची चंचलता, मनाचे संकल्प-विकल्प, इंद्रियांची विषयांविषयीची आसक्ति, त्या दृष्टीने नको तिथे, नको तशा, नको तेव्हां होणाच्या शरीराच्या हालचाली ही दोषांची मूळ स्थाने, कामक्रोधादि षड्विकारहि यांतच समाविष्ट होतात. हे सगळे दोष मनोबोधाच्या श्रवणाने नाहीसे होऊ लागतात. प्रथमच काय चुकतें तें समजतें. दोष कुठे, कोणते कसे पडतात तें लक्षात येते. दोषांना दोष का म्हणावें तेहि कळू लागले आणि मग अर्थातच ते टाळायचे उपायहि लक्षात येतात. दोष टाळणे आवश्यक आहे हे पटू लागतें आणि ते टाळलेच पाहिजेत असा आग्रहहि निर्माण होतो.

ज्यांची बुद्धि मंद आहे त्यांनाहि हे साधू लागते असें समर्थ म्हणतात. मनुष्याच्या बुद्धीची तीक्ष्णता, निर्मलता, विपुलता माणसामाणसांत वेगवेगळ्या प्रमाणाची असू शकते. पण माणूस म्हणून जन्माला आला की त्याला काही ना कांहीं बुद्धीचे देणे लाभलेले असतेच असते. तें उणें-अधिक असेल पण नसतेंच असे कधीं होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपली प्रगति करून घेणे शक्य होते व त्यामुळेच क्रमाक्रमाने माणसाचे ज्ञान वाढू लागते. ते टिकविण्यासाठी वैराग्याची आवश्यकता असते हेंहि माणसाला पटते आणि जें पटतें तें निष्ठेनें आचरणांत आणण्याचे सामर्थ्यहि वाढत जाते.

हे सर्व घडत जाते यांत शंका नाही. परंतु त्यासाठी माणसाचा विश्वास दृढ असावा लागतो. शास्त्र काय, संतांचे बोधप्रद वाङ्‍मय काय वा सद्गुरूचा उपदेश काय, सर्वच मानवाच्या कल्याणासाठी असते. परंतु त्यावर जर दृढ विश्वास नसेल तर माणसाच्या हातून व्हावयाचे कोणतेहि प्रयत्न निश्चयाने वा सातत्याने होत नाहीत. त्यामुळे चांगला बोध वा व्यक्तिव्यक्तीची असलेलीहि पात्रता उपयोगास येत नाही. उलट संशयामुळे प्रगति होण्याच्या ऐवजी परागति होत जाते आणि ही घसरण विनाशापर्यंतहि पोंचू शकते. याचकरितां समर्थ म्हणतात- तुमच्यात काही दोष असले, तुम्ही मतिमंद असलात तरी तुम्हाला साधन लाभेल, तुमची प्रगति होऊ शकेल. तुम्ही मुक्तीचा, मोक्षाचा, कैवल्यसुखाचा अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकाल. पण तुम्ही दृढ विश्वासाने पूर्ण श्रद्धेने या मार्गाची वाटचाल केली पाहिजे.

प्रगति ही निरनिराळ्या अवस्थाक्रमाने व्हावयाची असते आणि सर्वच माणसे काही एका पायरीवर, एका पातळीवर असू शकत नाहीत. परमार्थाचा आरंभ काय वा परमार्थाची वाटचाल काय, असाल तेथून पुढती चला या पद्धतीनेच व्हावयाची असते. आणि धरलेली वाट, न कंटाळतां, आळस व त्यामुळे वाटणारे खोटें समाधान टाळून, चालत राहावी लागते. यासाठी विश्वासाची नितांत आवश्यकता असते.

परमार्थ हा सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना तेथे अधिकार आहे. हे कितीहि खरे असले तरी प्रपंच धड करण्याचे सामर्थ्यहि ज्यांच्याजवळ नाहीं, ती माणसे परमार्थात यशस्वी होतील हे गृहीत धरणे चुकीचे आहे. प्रपंचासाठी जशी बुद्धि लागते तशीच ती परमार्थासाठीहि लागते. थोडी अधिकच लागते म्हटले तरी चालेल पण प्रपंचावर माणसाचा जेवढा विश्वास असतो, तेवढा परमार्थावर असत नाहीं. आणि म्हणून त्याची कार्यक्षमता प्रपंचात प्रगट होते, परमार्थांत होत नाहीं. मनुष्याला बुद्धि आणि भावना या दोन गोष्टी लाभलेल्या आहेत. भावनेचा तोल राखण्यासाठी बुद्धीचा पुष्कळ उपयोग होतो. पण केवळ बुद्धीची वाटचाल वांझोटी ठरते. भावना मात्र ध्येयापर्यंत सरळ पोचूं शकते. पाण्याचा स्वभाव वाहण्याचा आहे, ते समुद्राला मिळेपर्यंत जसे वाहतच राहते मात्र तो प्रवाह वाहता राहील हें पहावे लागते. तसेच माणसाच्या भावनेचेंहि आहे.

अत्यंत बुद्धिमान माणसे वैफल्याने वेडी झालेली आढळतात पण भावनेच्या उत्कटतेचे हे दुष्परिणाम दिसत नाहीत, निदान तितक्या प्रमाणांत तरी दिसत नाहीत. उत्कट भावनेची माणसे सामान्यांच्या दृष्टिकोनांतून अव्यवहारी ठरतात. त्यामुळे लोक त्यांना वेडे म्हणतात. पण त्यांचे ते वेड चांगल्या अर्थानें ध्येयाचे वेड असते. आणि अशी ध्येयवेडी माणसेच यशस्वी होतात व यशाचा मार्ग घालून देऊहि शकतात.

विश्वास हें भावनेचेच चांगलें रूप आहे. तो विश्वास ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या प्रयत्नांत कधी उणीव पडत नाहीं आणि त्यामुळेच तो ''याचि देही याचि डोळां" मुक्तीचा सोहळा भोगू शकतो. मुक्ति, मोक्ष, कैवल्य यांचे स्वरूप वर्णन करून सांगणे कठीण आहे. प्रत्यक्ष सरस्वतीला सुद्धा ते सांगता येणार नाही असे म्हणतात. अशी ही इंद्रियातीत, परमानंदस्वरूप, अवाङ्‌मनसगोचर मुक्ति ही साक्षात्काराचा, अनुभवाचा विषय आहे. तीहि प्रत्यक्ष भोगतां येते असे या मनाच्या श्लोकांचे सामर्थ्य आहे असे समर्थ म्हणतात.

खोल वादांत न शिरतां, मनाच्या श्लोकामुळे मनुष्याचे जीवन भव्य, दिव्य, उदात्त, शांत, प्रसन्न, समाधानी, कार्यक्षम, निरलस आणि तेजस्वी होण्याची पूर्ण शक्यता आहे, असे म्हणता येईल. मात्र त्यासाठी दृढ विश्वास पाहिजे. नुसते वाचन, नुसते श्रवण हे त्यादृष्टीने मुळीच पुरेसे नाही. औषधांच्या जाहिराती वाचून वा जाहिरातीचे कागद कोळलेले पाणी पिऊन जसा रोग बरा होण्याची थोडीहिं शक्यता नाहीं; तसेच नुसत्या ऐकण्या-वाचण्याने काहींहि होण्याची शक्यता नाहीं, ऐकण्याच्या मागोमाग मनन, चिंतन आणि आचरण पाहिजेच, विश्वास ठेवावा या म्हणण्यांत तेच अभिप्रेत आहे. पुष्कळ लोक तशी माझी देवावर श्रद्धा आहे म्हणतात, पण ती लबाडी आहे. देवावर श्रद्धा आहे म्हणणार्‍याच्या वर्तनांत संयम आणि सदाचार चढत्या वाढत्या प्रमाणांत दिसलेच पाहिजेत. जेथे खराच विश्वास असतो तेथे शेंडी तुटो की पारंबी तुटो अशा निग्रहाने मनुष्य प्रयत्नशील असतो.

मात्र पूर्ण विचार न करतां, खोलवर न जातां कांहीतरी गृहीत धरून वागणे म्हणजे श्रद्धायुक्त जीवन नव्हे. न सोसण्यासारखे सत्य मनुष्य पाहू इच्छित नाही. ही कांहीं श्रद्धा नव्हे. नीट शारीरिक तपासणी तज्ञाकडून करून घ्यावयाची नाहीं व स्वत:ला निरोगी समजावयाचे याला कांहीं विश्वास ठेवणे म्हणता येणार नाहीं. हे भित्रेपण आहे. असो. श्रद्धाविश्वासाचा विषय मनाच्या श्लोकांतून पुढे येणारच आहे. मनाचे श्लोक ऐकण्याकरिता मानसिक सिद्धता कशी असली पाहिजे तें लक्षांत यावे म्हणून फलश्रुतीच्या अंतिम श्लोकाचा उल्लेख केला.

मनाचे श्लोक हे एक स्वच्छ, शीतल सुमधुर जलाचे सरोवर आहे. जिवंत सरोवर आहे. आपल्याला पाहिजे तेवढे पाणी आपण त्यातून घेऊ शकतों, आपली शक्ति, आपली बुद्धि, आपले सामर्थ्य, आपली निकड ही फार मर्यादित आहे. बुटकुल्यांत येणारे पाणी जसे बुटकुलेंभरच असणार तसेच मनाचे श्लोक सांगतांना माझे होणार आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. भांड्यांत पाणी एवढेसें तर येणार, मग सरोवरावर जा कशाला, असे मात्र म्हणू नये व बुटुकले लहान आहे म्हणून डबक्यांतहि बुडवू नये. मनाचे श्लोक सांगावयाचे ठरविलें तें याच दृष्टीनें. ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात त्याप्रमाणे थोडा पालट करून मीहि म्हणतो की 'तरी अवधान एकले दीजे । मग सर्व सुखासी पात्र होइजे । हे प्रतिज्ञोत्तर समर्थांचें । उघड ऐका ॥' (ज्ञा. ९/१)