श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण

॥ श्रीराम समर्थ ॥[ Use Right click for download ]


गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥

विवरण : कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टाचार आहे. मंगलाचरण करण्याच्या २-३ पद्धती आहेत. ग्रंथाच्या विषयाचे स्वरूप स्पष्ट करणें हेंहि एक प्रकारचें मंगलाचरणच मानले जाते. इष्ट देवतेला नमस्कार करणे हे मंगलाचरणाचे स्वरूप अधिक लोकप्रिय असे आहे. समर्थ या ठिकाणी पहिल्या ३ ओळींत नमस्काररूप मंगलाचरण करीत आहेत. तर चवथ्या ओळींत त्यांनी वस्तुनिर्देशरूप मंगलाचरण केले आहे.

अंगीकृत कार्य निर्विघ्नपणे पार पडावे हा मंगलाचरणाचा हेतू आणि गणेश हा स्वभावत:च विघ्नहर्ता, त्यामुळे समर्थांनीं ग्रंथाच्या आरंभी गणपतीलाच वंदन करून मंगलाचरण केले आहे. आपण श्रीगणेशाय नमः म्हणतो, कार्याचा श्रीगणेशा झाला म्हणतो. यावरून गणेशाचें माहात्म्य लक्षात येते. देवपूजेच्या वा प्रत्येक मंगलकार्याच्या आरंभीं गणपतिपूजन-निदान स्मरण तरी केले जातेच. त्याच्या मागचे कारण भावनिक आहेच पण सांस्कृतिक आणि सामाजिकहि आहे. आज ज्या तात्त्विक कारणासाठी आपण चांगल्या अर्थाने लोकसत्तेचा उदो उदो करीत असतो त्याचे प्रतीक गणेशरूपांत आहे. हा देव गणपति आहे. गणांचा, समूहाचा, लोकांचा तो नेता आहे. रक्षणकर्ता आहे, शास्ताहि आहे. मात्र तो तांत्रिक पद्धतीने केवळ निवडणूक जिंकल्यामुळे झालेला पुढारी नाही. तो गुणांचाहि ईश आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणीं समूहाच्या, समाजाच्या, लोकांच्या, गणांच्या नेतेपद आरूढ होण्यास योग्य ठरविणारे बुद्धिमत्ता, बहुश्रुतता, सूक्ष्मदृष्टि, उद्यमशीलता, क्षमाशीलता, दृढता, शौर्य, धैर्य, कर्तृत्व, सामर्थ्य, लोकसंग्रह, नि:स्वार्थता इत्यादि इत्यादि अनेक गुण व सद्गुण, उत्कृष्टरीतीने आहेत, उत्कटतेने आहेत. हे सद्गुण त्याच्याजवळ नम्र सेवकांप्रमाणे विनयाने राहतात, तो जणू त्यांचा स्वामी आहे आणि म्हणून तो गणाधीश झालेला आहे. निर्गुणाची सगुणांत येण्याची इच्छा ज्याच्या रूपाने साकारली, तो जो आद्यप्रणव ॐकार हें गणेशाचेच प्रतीक आहे. श्रीज्ञानेश्वरांनी 'अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडळ । मस्तकाकारें ॥' (ज्ञा. १।१९) असे म्हणून ते स्पष्ट केले आहे. ॐकाराची आकृति आपण नेहमी आडवी रेखाटतो, ती जर उभी रेखाटली तर एकदंत गजाननाच्या मखाच्या आकृतीशीं तिचे सादृश्य अगदी जवळिकेचे आहे हे सहज लक्षात येईल. म्हणून समर्थ या गणेशरूपालाच निर्गुणाच्या आरंभिण्याच्या इच्छेचा मूळारंभ म्हणतात.

सृष्टीच्या सर्व भावांचे किंवा सृष्टीतील सर्व भावांचें तो मूलस्थानहि आहे आणि ईशहि आहे.

आपल्या पातळीवर चांगल्या-वाईटाचा, त्याज्य-ग्राह्याचा जणू याच्याशी संबंध नाहीं असे सुचविण्यासाठी समर्थ सर्वा गुणांचा म्हणतात. कारण मुळांत चांगले व वाईट कांहीं नसते. सृष्टींत, सगुणांत, आकारांत वस्तूंत जे काहीं असतें ते मूलतः एकापेक्षा दुसरे फार तर वेगळे असते पण चांगले किंवा वाईट नसते. त्याचे चांगुलपण किंवा वाईटपण हे नंतरच्या उपयोगावर कोठें, किती, काय, कसे, कोणाला आणि कां या परस्परसंबंधांतून आकाराला येत असते. कामक्रोधहिं नसून चालणार नाहींत आणि नुसत्या भावभक्तीनें व्यवहार निभणार नाहीत. गहूंतांदळाप्रमाणेच ईशसृष्टीत अफू-सोमलालाहि स्थान आहे. एरवी विष म्हणून त्याज्य असलेली अनेक द्रव्ये रोग नाहींसा करण्याच्या दृष्टीने प्रभावी असतात, म्हणून स्वयंपाकघरांत तिरस्कारार्ह असलेले विष वैद्याच्या हातांत औषध ठरते. कोणाला केव्हा व कां याचा विचार करून वैद्य कसे, काय व किती ठरवितो, म्हणून विषहि अमृतासारखे कार्य करते. निर्गुणाचा मुळारंभ म्हणण्यात वाईट-चांगले, त्याज्य-ग्राह्य याचें पलीकडे असलेल्या मूळतत्त्वाचा बोध आहे व त्याच रूपांत समर्थ गणेशाला वंदन करतात. आरंभाचा मुळारंभ म्हणण्यात केवळ शुद्ध तत्त्व हे सृष्ट्युन्मुख झाले आहे असेंहि सुचविले जाते. नमस्कारासाठीं, भक्तीसाठीं, प्रगतीच्या ध्येयासाठीं, भावाच्या सगुण आलंबनासाठी तत्त्व या अवस्थेतच असले पाहिजे.

समर्थ गणेशानंतर, विद्येची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रसिद्ध असलेली जी शारदा, सरस्वती तिला वंदन करीत आहेत. ज्या नमू शब्दाने वंदन सुचविले जाते तो नमू शब्द दोघांच्याहि, गणेशाच्या व शारदेच्याहि वंदनाचा वाचक आहे. उंबर्‍यावर ठेविलेला दिवा जसा दोन्ही खोल्यांना प्रकाशित करतो तोच देहलीदीप-न्याय येथेंहिं आहे असे समजावें. आदिशक्ति, आदिमाया, शारदा जी परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी या चारी वाणीचे मूलस्थान आहे तिला येथे वंदन केले आहे. वाणी, शब्द, ध्वनि ही स्पंदाची स्फुरणारी परिणत स्वरूपे आहेत. स्पंदाचा किंवा स्फुरणाचा तो पहिला परिणाम आहे असेंहि म्हणता येईल. जगताच्या आरंभी शब्द होता कारण तेच ब्रह्माचे पहिले स्फुरण होते असे कांहीं शास्त्रकार मानतात. जगताच्या मुळाचा शोध घेण्यास प्रवृत्त झालेले विज्ञान कांहींजणांच्या मते तरी आद्यस्पंदापर्यंत जाऊन पोंचले आहे. आपल्या वैदिक परंपरेंत वेदवाणी जगताच्या आरंभी प्रकट झाली अशी धारणा आहे.

ॐकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा ।
कण्ठं भित्त्वा बहिर्यातौ तस्मान्मांगलिकावुभौ ॥


हें मतहिं शब्दाच्या आद्यतेचेच द्योतक आहे. स्पष्ट अशा वाणीची विभागणी संकल्प, भावना, विचार, शब्द अशा क्रमाने केल्यास ब्रह्माच्या "एकोऽहं बहुस्याम् प्रायेय" या संकल्प-भावना-विचाराचाहि आद्यस्फुरणांत समावेश होऊ शकतो. शारदेला या सर्वांचे मूळ म्हणून समर्थ चिच्छक्ति, माया, आद्यप्रकृति या ब्रह्माच्या अभिन्न शक्तीचा बोध करीत आहेत.

मूलतत्त्वांना हा नमस्कार कशासाठी करावयाचा तर कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठीं. हें कार्य कोणते ? तर राघवाच्या अनंत मार्गाला लागण्याचे. सर्व मनाचे श्लोक माणसाला या मार्गाच्या प्रवासासाठी प्रवृत्त करण्याकरितां, या मार्गाने चालणाराला प्रोत्साहन देण्याकरिता निर्माण झाले आहेत. हा मार्ग अनंत आहे. कधीहि न संपणारा आहे. आलों, पोचलों, असें वाटणे हा या मार्गावरचा अडथळा ठरतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात- त्याप्रमाणे प्रत्यक्ष महेशहि, भगवान शंकरहि, या मार्गाचा अजून कापाडीच आहे. (ज्ञा. ६।१५३) वाट सुरूच आहे. प्रवासीच आहे. हा मार्ग कधी संपत नाहीं. याचे कारण या मार्गाचे ध्येय, साध्य जें परब्रह्म तेहि नि:सीम, अमर्याद, अनंत आहे. समर्थांचा राघव हा दशरथाचा पुत्र म्हणून ज्ञात असलेला ऐतिहासिक पुरुष नव्हे. हा राघव परमात्मारूप आहे. हे परब्रह्म आमच्याकरितां राघवाच्या, रामचंद्राच्या रूपाने प्रकट झाले इतकेंच. या राघवापर्यंत आपणास जाऊन पोचावयाचे आहे. मनाच्या श्लोकांनी सांगितलेला मार्ग त्याच्याकडे पोंचविणारा आहे. अशा अति अवघड कार्याला लागण्यापूर्वी सगुण साकार परब्रह्मरूप गणेश आणि चैतन्यासकट वाणीला, वैखरीला, प्रेरणा देणारी आदिशक्ति शारदा यांना विनयाने, प्रेमादराने, भक्तिभावाने नमस्कार करून वा नमस्कार करा असे सांगून समर्थ जणू साधकांसाठी त्यांचा आशीर्वाद मागत आहेत आणि मग म्हणत आहेत चला, आता कामाला लागू या. या अनंत असलेल्या राघवं या. जिथे, ज्याकडे जावयाचे आहे ते समर्थांना जणू प्रत्यक्ष समोर उभे आहे आणि म्हणून समर्थ समोर असलेल्या राघवाकडे बोट दाखवून म्हणत आहेत, या राघवाच्या मार्गाला लागू या. पूर्ण ब्रह्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ असलेल्या समर्थांना त्यांचे दैवत सदासर्वदा प्रत्यक्षच आहे आणि म्हणून त्यांनी "करी रे मना भक्ति या राघवाची ॥" (म, श्ले. २६) "करी रे मना ध्यान या राघवाचे" (म. श्लो. ६६) "घनश्याम हा राम लावण्यरूपीं" (म, श्लो. ६७) "करी काम निःकाम या राघवाचे" (म. श्लो. ७७) "नभासारखें रूप या राघवाचे" (म. श्लो. १९७) असा आपल्या दैवताचा उल्लेख ते प्रत्यक्ष समोर असल्याप्रमाणे अनेकवेळां केला आहे.

समर्थांसारख्या थोर सत्पुरुषांचे ऐकावयाचें तें यासाठींच. त्यांचे ज्ञान हें केवळ शब्दज्ञान नाहीं. ते पांडित्याचे प्रतीक नाहीं. ते साक्षात्काराला आलेल्या अनुभवातून उमटलेले आहे. प्रत्यक्ष पुढे असलेल्या वस्तूचा बोध करणारे आहे.

मंगलाचरण झालें आतां प्रत्यक्ष उपदेश -

मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥

हे सर्व मनाचे श्लोक भुजंगप्रयात वृत्तांत आहेत. या वृत्तांत प्रत्येक ओळीत १२ अक्षरे व ४ य गण असतात. ३ अक्षरांच्या गटांचा एकेक गण होतो. य गणामध्ये पहिले अक्षर ह्रस्व व दुसरी दोन दीर्घ अशी रचना असते. या रचनाविशेषामुळे भुजंगप्रयातातील काव्याला एक आकर्षक खटका, ठेका, ताल प्राप्त होतो आणि त्यामुळे या वृत्ताच्या माध्यमांतून सांगितलेल्या उपदेशाला एक प्रकारचा प्रभावीपणाहि येतो.

समर्थ जनसंपर्कासाठी घरोघर हिंडून भिक्षा मागत असत. घराघरांशी संबंध यावा आणि जागृतीचे कार्य प्रत्येक ठिकाणी पोचावें या दृष्टीने ही भिक्षेची पद्धत फार सरस ठरली असली पाहिजे. विरक्तीला बाध नाही, कोणावर तसे आग्रही ओझें नाहीं आणि कार्यकर्त्यांची उपासमार नाही. व्यक्तीव्यक्तीशी संबंध, कुटुंबाकुटुंबाचें निरीक्षण या गोष्टी सहज घडत असल्यामुळे जागृति करणेंहि सोपे. भिक्षा मागताना रामदासी लोकांना उपयोगी पडावे म्हणून हे श्लोक समर्थांनी रचले असे म्हणतात.

समर्थांच्याकाळीं मुसलमानी राजवट बद्धमूल झालेली होती. मुसलमान फकीर घरोघर भीक मागत हिंडत असत. खटकेदार गज्जला म्हणत ते आपल्या धर्माचा प्रचार करीत भोळ्या-भाबड्यांची मने आकर्षून घेत. लोकहि त्यांच्या भजनीं लागत. दर्गेपिरांना नवस करीत. त्यांच्या उरूसांत दिमाखाने भाग घेत. स्वाभिमान नष्ट झाला होता. स्वत्व उरले नव्हते. या आपत्तींतून लोकांना हळुवारपणे बाहेर काढणे अत्यंत आवश्यक होते. समर्थांसारखा थोर पुरुष, देशकालपरिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला थोर विचारवंत अशा वेळी व्यवहाराच्या दृष्टीने तटस्थ राहणे, उदासीन राहणे शक्यच नव्हते. "बुडत हे न देखवेना डोळा । म्हणून कळवळा येतो मज ।" अशी त्यांची वृत्ति या कळवळ्यांतूनच त्यांना मनाच्या श्लोकांसारखे प्रभावी काव्य स्फुरले असले पाहिजे, गज्जलांच्या प्रचाराला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी त्यांच्याचसारखा ताल ठेका असलेला हा मुजंगप्रयाताचा छंद त्यांनी निवडला असेल अशीहि शक्यता आहे.

सकाळची प्रसन्न वेळ, सडारांगोळीने शृंगारलेले अंगण आणि त्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ उभे राहून समर्थांसारखा तेजःपुंज, वैराग्यसंपन्न, योगीराज, मेघासारख्या करुणागंभीर ध्वनीने या मनाच्या श्लोकांची साद घालीत असेल त्यावेळी व्यक्तिव्यक्ति स्वधर्माच्या स्वाभिमानाने, आत्महिताच्या प्रेरणेने जागृत होऊन कोणत्याहि त्यागाला सिद्ध होत असेल यात शंकाच नाही. वाढली जाणारी भिक्षा कदाचित या त्यागाच्या सिद्धतेचेंच छोटेसे प्रतीक असेल.

असेल गरज तर वागतील चांगले. त्यांना हवें असले तर येतील माझ्याकडे, असे उपेक्षेने न म्हणतां आळसाने झोपेच्या गुंगीत गढून गेलेल्या मुलाला अभ्यासासाठी आईने हालवून वा पाण्याचा शिडकावा टाकून जागे करावे त्याप्रमाणें समर्थ हे जनजागृतीचे कार्य स्वतः वा शिष्यांकरवी करीत असत. सारा भारतवर्ग परक्यांच्या मनोबोध टाचेखाली चिरडला जात असतांना महाराष्ट्रांत तेवढे स्वराज्य उभे राहिले त्याला तुकाराम महाराजांची आणि समर्थांची घरोघर जाऊन पोंचणारी अमृतवाणीच पोषक ठरली असली पाहिजे.

सर्व संत योग्यतेने कितीहि एकमेकांसारखे असले तरी अवतारकार्याच्या दृष्टीने त्यांनीहि प्रकृतिभेद धारण केलेला असतो हेच खरे. ऐकण्याची इच्छा नाहीं तर सांगा कशाला असे न म्हणतां कधीं हनुवटी धरून वात्सल्यानें, तर कधी मुस्काडीत मारून वात्सल्यगर्भ कठोरतेने समाजाला शिकवण्याचें कार्य महाराष्ट्रांत त्याकाळी दोन संतांनी केले. एक तुकाराम महाराज व दुसरे समर्थ रामदास स्वामी. दोघेहि चांगलेच तापट व फटकळ आहेत. आणि दोघांच्याहि हातांत दंडुका आहे. करूणरसाने भरलेल्या मेघाजवळ कडकडाट करणारी तळपती वीज असावी तसेच हे आहे.

मला वाटते- रामकृष्ण परमहंसांनीं सद्गुरूंचे तीन प्रकार केले आहेत. एक सद्गुरू केवळ रस्ता दाखवितात व आपल्या ठिकाणी बसून थोड्याशा खाणाखुणा सांगतात. दुसर्‍या प्रकारचे सद्गुरू मार्गातील अडचणी, वळणे, वळसे, सोयी, निवासस्थले इत्यादी बारीक सारीक खांचाखोंचा सांगून मार्गावरील प्रवासाची नेमकेपणाने कल्पना देतात. तिसर्‍या प्रकारचे सद्गुरू वरील दोन्ही तर करतातच पण प्रसंगविशेष शिष्याचा कान धरून त्याला वठणीवर आणतात व त्या मार्गाने ओढीत नेतात, कधी उचलूनहि नेतात. हे तिसर्‍या प्रकारचे सद्गुरुत्व फार दुर्मिळ आहे. यासाठी सद्गुरूचें ठिकाणी स्वसामर्थ्याविषयींचा अलौकिक विश्वास पाहिजे. आणि शिष्यहि तितका निष्ठावान् पाहिजे. गुरूने थोडा आवाज चढवून बोलतांच वा मनाविरुद्ध वागतां-सांगतांच ज्यांची शिष्यत्वाचे त्यागपत्र देण्याची सिद्धता असते त्याचा कान गुरू कशाकरितां धरील आणि कां घ्धरावा ? गुरूने कान धरला तरी पुढे चालावयाचे असते ते स्वत:च्याच पायाने व हें कान धरणेंहि आरंभी आरंभीचे व लाक्षणिक स्वरूपाचे असते. मार्गक्रमणाचें तें कांही वाहन नव्हे. कितीहि मोठे सद्गुरु अवतरले तरी मनुष्यजातीतील उद्धाराचे प्रमाण अत्यल्पच राहिले आहे. हे कां ते लक्षांत यावे म्हणूनच हे सांगितले. असो. तुकाराम महाराज काय किंवा समर्थ रामदास स्वामी काय हे या तिसर्‍या प्रकारांत बसणारे सद्गुरु आहेत.

परमार्थात काय किंवा व्यवहारांत काय कोणी खरें तें ऐकत नाहींत. त्याला खरें नकोहि असते. स्वत:च्या मताला व वर्तनाला पाठिंबा देणाराच कुणी असेल तर तोच प्रत्येकाला बरा वाटतो. त्यामुळे मला स्वत:ला रस्ता दाखविणारे पहिल्या, फार तर दुसर्‍या वर्गातील गुरु चांगले वाटतात. सध्यांचा काळ तरी तिसर्‍या वर्गातील गुरूला अनुकूल असेल असे वाटत नाहीं, गुरु कान धरण्यास जाईल तर त्याचा अपमान होईल हेच खरें. उपदेशकाची भूमिका पंढरपूरला जाण्याचा रस्ता दाखविणाच्या पाटीसारखी असावी. पंढरपूरला जावयाचे कां नाही ते जाणाराने आपल्या इच्छेने पाहिजे तसे ठरवावें. पाटी ज्या खांबावर लावलेली असते त्या खांबाभोंवत क्वचित् उकिरडाहि साचलेला असतो पण पाटी आपले रस्ता दाखविण्याचे काम करीत असते.

माणसे नम्रतेचा आव कितीहि आणीत असली तरी बहुधा आपले सोडावयास तयार नसतात, कांहीं रोगी जसें भेटेल त्याला औषधे व पथ्ये विचारतात आणि मग आपल्या सोयीनें एकाचें औषध व दुसर्‍याचे पथ्य करतात तसेच पुष्कळ माणसे परमार्थमार्गात वागत असतात. खरोखरीच कोणाविषयी कोणाला आदार नसतो. कोणी कोणाला भीत नसते. आदर आणि भय हे भाव प्रगट होत असतील तर त्याच्या बुडाशी कोठे तरी स्वार्थ लपलेला असतो. आदर वा भय आहे म्हणण्याने म्हणणारा विनयी ठरतो; व ज्याच्याविषयी ते भाव आहेत म्हटले जाते तो मोठा ठरतो. त्याच्या थोरवीची प्रसिद्धि होते. अंतःकरणांत भय वा आदर खरेंच असेल तर त्या आदरणीय व्यक्तीला न आवडणारी गोष्ट माणसाच्या हातून कधीहि घडली नसती. आपण विनयी आहों या सूक्ष्म अहंकारानें, 'वाटले तर ऐका' असे म्हटले तर तेहि माणसाला आवडत नाहीं व नेमकें आग्रहाने सांगितले तर ते त्याला पटतहि नाहीं आणि म्हणून व्यवहारांत कान धरून नेणे शक्य नसते. तोहि जुलुमाचा रामराम ठरतो. समर्थांची वृत्ति मात्र कुणी ऐकत नाहीं म्हणून स्वस्थ बसणारी नव्हे. ते सर्व परिस्थिति विचारांत घेऊन योग्य ते आग्रहाने सांगत राहणारच. समर्थांनी मनाला उपदेश केला आहे आणि अवखळ मुलाला आंजारून-गोंजारून त्याच्याकडून काम करून घ्यावे तसें समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधीत आहेत.

खरे म्हणजे परमार्थमार्गातील सर्व आपत्तीचें मूळ मनच आहे. "करुं कायी करुं कायी । मन हें ऐकत नाहीं । बुद्धि कराया पुण्य जाय । परि मन बैंची अघडोहीं ॥" असे श्रीसद्गुरु दासगणूमहाराजांनी म्हटले आहे ते यासाठीच. तो बहुधा सर्वांचा, सर्वकाळचा अनुभव आहे. शास्त्रकारहि "मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः' असेच सांगतात. अर्जुनासारख्या विलक्षण सामर्थ्य असलेल्या पुरुषालासुद्धा

"चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्‌दृढम् ॥ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥" (भ. ६।३४)

असे म्हणण्याची पाळी येते. ते कठीण आहे, बलवान आहे, अवखळ आहे, हट्टी आहे. नाठाळ मुलासारखे आहे. अज्ञानीहि आहे. म्हणून बाळ मोठा शहाणा ! म्हटलें कीं ऐकण्याची शक्यता निर्माण होते. त्याला बळानें वाकविणे फारसे शक्य नसते. त्याच्या कलानेच घ्यावे लागते. मन जर खरेंच सज्जन असते तर त्याला आवर्जून भक्तिमार्गाला जा असे सांगण्याचे कारणच पडले नसते.

असे असले तरी मनाचा एक गुण मोठा चांगला आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "कां जे यया मनाचें एक निकें । जें हें देखिले गोठीचिया ठाया सोके । म्हणून अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाईजे ॥ (ज्ञा. ६।४२०) मनाला एकदा एखाद्या गोष्टीची गोडी लागली की ते मग त्याला चिटकून राहते. सत्त्व हा मनाचा मूळ स्वभाव, म्हणून तर सर्व माणसे स्वभावतः भजनशील असतात. "देखे मनुष्यजात सकळ । स्वभावतः भजनशील-" (ज्ञा. ४।६७) पण माणसाच्या मनाचें हें मूलभूत सात्त्विकपण जन्मजन्मांतरीच्या रजोगुण-तमोगुणांच्या प्रभावानें लुप्त झालेले असते. स्वार्थातून निर्माण झालेल्या काम-क्रोध-लोभ-मोह इत्यादि विकारांनी माणसाचे जीवन झांकोळलेले असते. तेच संस्कार मनावरहि होतात. मन हे स्वत:च्या कर्तृत्वानेंच दुर्जनतेच्या पातळीवर उतरलेले आहे. सभोवतीची परिस्थिति सुसंस्काराला अनुकूल नसली की मग हा बिघाड वाढू लागतो. घातकतेच्या पातळीवर पोचतो. दुर्दैवाने गेल्या पन्नास पाऊणशें-वर्षात चांगले संस्कार बुद्धिपुरस्सर घडविले पाहिजेत ही विचारसरणी जुनाट वाटू लागली आहे. इतिहास-भूगोल शिकवावे लागतील, गणित शिकवावे लागेल पण नैतिकता कशाला शिकवावयाला हवी असे म्हणून क्रमिक पुस्तकांत चुकून माकून आलेले नैतिकतेचे पाठ त्यांची थट्टा करून टर उडवून, बाजूला काढले गेले. त्या उपदेशाचे विडंबन झाले. परिणाम असा झाला की आजची तरुण पिढीं कुठेतरी भरकटली. शिक्षण घेऊनहि तिच्यावर संस्कार झाले नाहीत. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकणाच्या अगदी कोवळ्या युवकांतहि गुप्तरोगासारख्या घाणेरड्या विकारांचे प्रमाण वाढू लागले आहे. ही घटना विचारी माणसाचे हृदय पिळवटून टाकणारी नाहीं काय ? बहुसंख्य घरांतून सुसंस्कार होईनासे झाले आहेत. त्यामुळे क्वचित् कोठे घरांतून चांगले संस्कार असले तरी त्या घरांतील मुलंहि चांगलीच निघतील याचा भरंवसा उरलेला नाहीं. घराघरांतील आन्हिक म्हणजे बापाने दाढी घोटणे आणि आईने आरशापुढे उभे राहून प्रसाधन करणे एवढेच असेल, वडीलधार्‍या मंडळींच्या तोंडी मोठ्या पदावरील राजकीय पुढार्‍यापासून शाळेतील शिक्षकापर्यंत सर्वांना उद्देशून तुच्छतेचीच भाषा असेल, स्वत:ची व्यसने आणि व्यवहारांतील खोटेपणाचे वर्तन मुलांच्या समोर उघड होण्यात खंत नसेल तर मुलांवर चांगले संस्कार कसे घडणार ?

परिसीमेचा चांगला आणि टोंकाचा वाईट असा स्वभाव सोडून दिल्यास शेंकडा ८०-९० लोकांवर तरी संस्काराचे परिणाम होतात, व चांगले किंवा वाईट वळण लागते. आईबाप अगदी चांगले, सद्वर्तनी असूनहि मुलें वाईट निघत नाहींत असे मुळीच नाहीं. पण त्यामुळे सुसंस्कार केले पाहिजेत या विधानाला बाध येत नाही. एकादे मूल कितीहि खायला घातले तरी लठ्ठ होत नाहीं. अन्न त्याच्या अंगी लागत नाहीं. अशा मुलाला कशाला जेवायला घालायचे असे म्हणून चालतें कां ? एकादा रोग औषध घेत असतांनाहि बरा होत नाहीं. पण औषध घेत आहे तोपर्यंत रोग वाढत नाही, हा तरी औषधापासून होणारा लाभच नाहीं काय ? तसेच संस्काराचेंहि आहे. म्हणून सुसंस्कार करीत असले पाहिजे. सदुपदेश केला पाहिजे. संस्कार होऊ शकत नसतील तर ते होतील अशी परिस्थिति प्रयत्नपूर्वक निर्माण केली पाहिजे. त्या दृष्टीने यथाशक्य दक्ष राहिले पाहिजे. याच दृष्टीने समर्थं मनाला उपदेश करीत आहेत. मन मूलतः सत्त्वगुणांचे आहे. म्हणून समर्थ त्याला सज्जन म्हणून त्याच्या सात्त्विकतेची जाणीव करून देत आहेत असे समजावे किंवा नाठाळ मनाला थोडे गोंजारीत आहेत, असेंहि समजावें.

समर्थ म्हणतात मना, तू भला आहेस. सज्जन आहेस. तेव्हा सज्जनाने सज्जनासारखेच वागले पाहिजे. त स्वार्थात, विषयोपभोगांत, चैनीत लोभांत, लबाडीत, दुष्टतेत गुंतून राहतोस हे बरे नाही. ते तुझ्या सज्जनपणाला शोभणारे नाही. भजनमार्गाला लागणे, भक्तीची वाटचाल करणे हेच सज्जनपणाला खरोखरी शोभणारे लक्षण आहे. तू हा भक्तीचाच श्रेष्ठ मार्ग धर. म्हणजे तुला श्रीहरीची, परमेश्वराची प्राप्ति स्वभावतः होईल, सहजासहजी होईल. कारण इतर कोण्याहिं उपायापेक्षा, साधनापेक्षा, मार्गापेक्षां, भक्तीचा मार्ग ईश्वरापर्यंत जाऊन पोचण्याच्या दृष्टीने तुलनेने अधिक सोपा, अधिक जवळचा आणि अधिक निश्चयाचा आहे. सर्व मनाच्या श्लोकांमध्ये या भक्तिमार्गाचेच वर्णन सविस्तर व निरनिराळ्या अंगांनी यावयाचे आहे.

समर्थ पहिल्या श्लोकांत राघवाच्या मार्गाला लागू असें म्हणतात. आणि या पुढच्या श्लोकांत भक्तिपंथानें गेलें म्हणजे श्रीहरीची भेट होते असे म्हणतात. यावरून समर्थांना राघव आणि श्रीहरि म्हणजेच राम आणि कृष्ण यांच्यांत भेद वाटत नव्हता हे सिद्ध होते. आणि तरी कांही वारकरी मंडळी समर्थ रामदासस्वामींविषयी दुजेपणा दाखवतात याचा खेद होतो. असो, नवीन तरुण पिढीने तरी या भेदबुद्धीपासून दूर राहावे एवढ्याकरितांच हा उल्लेख केला. राघवाचा आणि श्रीहरीचा मार्ग वेगळा नाहीं, एकच आहे. उपासनेनें शुद्ध झालेल्या बुद्धीने चित्त समाधींत लीन झाल्यावर नंतर जे दिसतें तें एक आत्मतत्त्वच, साक्षात्कार होतो तो एका आत्म्याचाच. त्याचे वर्णन मात्र शब्दप्रभू महात्मे भिन्नभिन्न साधकांच्या प्रगतीसाठी अनेकविधरीतीनें करीत असतात. यासाठी विचारवंतांनीं तरी नामभेदानें बिचकून जाऊ नये. नामभेदामागे एकच तत्त्व असते हा वेदाचा आदेश लक्षांत ठेवावा हें ध्यानात यावे यासाठी समर्थ एकदां राघव, एकदां श्रीहरि असा उल्लेख बुद्धिपुरस्सर करीत असावेत असें मला वाटते. एकविधा भाव हा भक्ताचा स्वधर्म असला तरी त्यानेंहि विवेक सोडूं नये, हट्टाग्रहीं होऊं नये, भक्तिमार्गांतहि हे लक्षात ठेवले पाहिजे, यासाठीच समर्थ असे सांगत आहेत.

समर्थ भक्तिमार्गाला लागा असें मुद्दाम म्हणतात. कर्म, योग, ज्ञान, हेहि मार्ग असून त्याचा उल्लेख करीत नाहींत. याचे महत्त्वाचे कारण असें की सर्वसामान्यांच्या मनोवृत्तीच्या दृष्टीने गोडी वाटण्यासारखी परिस्थिति जेवढी भक्तिमार्गात आहे तेवढी इतर मार्गात नाहीं. इतर मार्गात चूक सुधारण्यास फारसा वाव नसतो. भक्तिमार्गात झालेल्या चुका सुधारण्याची संधि इतर कोणत्याहि मार्गापेक्षा अधिक असते. आणि म्हणून अन्य सर्व संतांप्रमाणेंच जीवानें भक्तिमार्गाला लागावें असाच समर्थांचाहि आग्रह आहे.

भक्तिमार्गाला लागावे म्हणजे काय करावें. तेहि समर्थ क्रमाक्रमाने सांगणार आहेत. वाईट, अहितकर ते टाकावें, चांगलें हितकर तें निष्ठेने स्वीकारावें ही या भक्तिमार्गातील आचाराची पहिली पायरी. हे चांगले-वाईट तरी कसे ठरवावें ? तर्काच्या आणि शास्त्रप्रामाण्याच्या भरीला पडले तर निबिड अरण्यामध्यें शिरल्यावर होते तसेच होणार. म्हणून समर्थ त्याचाहि व्यावहारिक मार्ग सांगत आहेत. संभावित लोक सामान्यत: ज्याला वाईट म्हणतात ते वाईट समजून टाकून द्यावें आणि भली माणसे ज्याला चांगले म्हणतात त्याचा प्रयत्नपूर्वक स्वीकार करावा आणि मन:पूर्वक ते आचरणांत आणण्यासाठी झटावें.

सामान्यतः दुर्जन जरी असला तरी तो दुष्कृत्याचे उघड समर्थन करीत नाहीं. करीत नव्हता असे म्हणा पाहिजे तर. दरोडेखोरांचाहि आपसांतील प्रामाणिकपणावर विश्वास असावा लागतो. आपल्या जुन्या वाङ्‌मयातील चार्वाक हा स्वैराचाराचा पुरस्कर्ता मानला जातो. पण तोहि आजच्या नवमतवादी विचारसरणीपेक्षां पुष्कळ बरा म्हणण्याची वेळ आली आहे. कर्ज काढून तूप पिणे ही त्याच्या स्वैराचाराची परिसीमा आहे. यालाच तो सुखाचे जीवन म्हणतो. तूप खाल्ल्यामुळें बुद्धि वाढते आणि शुद्ध होते. शरीरहि सशक्त होते. आयुष्य वाढते. कर्ज मिळण्यासाठी पत वाढवावी लागते. या सर्व गोष्टी परिणामी हिताच्याच ठरू शकतात. चार्वाकहि चोरी करून दारू प्यावी असे म्हणत नाहीं. क्रौर्याचा आणि व्यसनाचा पुरस्कार तोहि करीत नाहीं. वाईटाचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार करण्याची सवय शरीराला आणि मनाला लागली की त्याचा विवेक वाढू लागतो. संयम अंगवळणी पडतो.

लोकांमध्ये रूढ असलेल्या चांगल्या वाईटाच्या कल्पना या अनेक पिढ्यांच्या अनुभवावर आधारलेल्या असल्यानें कोण्या एकाच्या कल्पनेला वाटणार्‍या बर्‍यावाईटाच्या विचारापेक्षा अधिक प्रामाणिक असतात, अधिक विश्वासनीय असतात म्हणून आरंभी तरी या लोकमताचाच आदर करावा असे समर्थांनी सांगितले आहे.[ Use Right click for download ]


प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥

भक्तिमार्गाला लावावें म्हणजे काय करावे त्या संदर्भात हाहि श्लोक विचार करण्यासारखा आहे. वरवर दिसावयास अगदी व्यावहारिक आणि तांत्रिक उपाय समर्थ सांगत आहेत. तसें म्हटले तर कोणालाहि साधाव्या, आचरणांत आणण्यास सोप्या जाव्या आणि निष्ठेने करीत राहिल्या तर अधिकाधिक प्रगतीस सहाय्यक व्हाव्या अशा गोष्टी सांगणें हें समर्थांचे एक वैशिष्ट्य आहे.

सकाळी उठून प्रथम मनांतल्या मनांत रामाचे चिंतन करावे असा आदेश समर्थांनी दिला आहे. या आदेशाने एक प्रकारे झोपलेल्याला जाग आणली आहे. जागे होतांच काय करावे वा जागे होणें कशाला म्हणतात ते सांगितले आहे. प्रभात शब्दानें एक विशिष्ट काळ सुचविला जातो. सूर्योदयापूर्वीच्या २-३ घटका म्हणजे प्रभातकाळ, सामान्यतः ४॥ पासून ६-६॥ पर्यंतचा काळ प्रभातकाळ म्हणता येईल, आरोग्यासाठी आणि चिंतनासाठी जागे होण्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. रात्री ९॥-१० वाजता झोंपणाच्या माणसाला ६-७ तास झोप झाल्यानंतर यावेळीं चांगली जाग येते. आयुर्वेदाने हा काळ वाताचा सांगितला आहे. मलशुद्धीच्या दृष्टीनेंही यावेळी जागे होणे अधिक उपयक्त ठरते. शौचमुखमार्जन उरकलें म्हणजे शरीर स्वच्छ, हलकें, उत्साही राहतें व ही वेळ मननचिंतनास अधिक चांगली. वातावरणहि शांत, प्रसन्न, सुखशीतल असें असते. बुद्धि सतेज आणि मन उत्साही असते. यावेळी केलेल्या नामस्मरणाचा परिणाम शरीर-मनबुद्धीवर चांगला हितकर असाच होतो. मृगाजिनावर, लोकरीच्या आसनावर वा टणक अशा स्वत:च्या अंथरूणावरहि साधी मांडी घालून, शक्यतो ताठ बसावे. तोंड पूर्वेकडे वा उत्तरेकडे असावे. हात नाभीच्या खाली अर्धांजली करून एकमेकांवर ठेवावेत किंवा ज्ञानमुद्रा करून दोन्हीं गुडघ्यांवर ठेवावेत. आणि मग मनातल्या मनांत इष्ट देवतेचे नामस्मरण करावें.

हें नामस्मरण वैखरी वाणीच्या आधीं ज्या मध्यमा पश्यन्ति आणि परा अशा वाणी शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत त्याद्वारा करावें, परेच्याद्वारा नामस्मरण घडणे ही गोष्ट सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार अवघड अशी आहे. एखाद्याच महात्म्याला हे साधेल, साधलेले असेल. एकाग्रता पूर्ण होऊन ती ध्यानाच्या पातळीवर चढली, बुद्धि स्थिरावली, मन चंचलता टाकून निर्वासन झालें, म्हणजेच परा वाणी कार्यक्षम होऊ शकते. दीर्घकालीन सातत्य, शरीरमनाची शुद्धता आणि उत्कट प्रयत्न याविनां हें साधणारे नव्हें. आरंभीं आरंभीं तरी या नादाला न लागणेच श्रेयस्कर. थोडावेळ मानसिक नामस्मरण करून इतर उद्योगाला लागण्यापूर्वी कांहीं वेळ वैखरी वाणीनेंहि नामाचा उच्चार करावा. आपल्या जुन्या परंपरेंत पहाटेच्या वेळी निरनिराळीं प्रात:स्मरण स्तोत्रे वा भूपाळ्या म्हणायची पद्धति आहे. गेल्या पिढीपर्यंत हे वळण समाजामध्ये सार्वत्रिक होते. अगदीं तमासगिरांनीसुद्धा भूपाळ्यांची रचना केलेली आहे. वर्तमानकाळीं मात्र हे सर्व नव्याने सांगण्याचा प्रसंग आलेला आहे. तरुण पिढीमध्ये हा आचार जवळजवळ राहिलेला नाहीं. उलट बुद्धिवादाच्या नावाखालीं यांत काय अर्थ आहे ? हे कशाला ? याचा काय उपयोग ? असे प्रश्न विचारून, टिकून राहिलेले अनेक चांगले आचारहि जीवनाला पारखे होतील अशी परिस्थिति निर्माण केलेली आहे. जुन्या गोष्टी मोडून काढल्या पण त्या जागी नवीन चांगले आचार मात्र रूढ केले नाहीत. त्यामुळे एक तर्‍हेची पोकळी निर्माण झाली. नैराश्य वाढले.

फॅशनच्या नावाखाली नवीन पिढीमधे घुसलेल्या अनेक गोष्टींची तरी उपयुक्तता सिद्ध करण्यासारखी आहे काय ? पण हा प्रश्न विचारण्याची सोय मात्र राहिलेली नाहीं.

आपल्या परंपरेंत 'संदिग्धे परलोकेऽपि त्याज्यमेवाशुभं जनैः । नास्ति चेत् नास्ति को हानिः अस्ति चेत् नास्तिको हतः ॥' असे सांगितले आहे. हे व्यावहारिकदृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. ईश्वर आहे की नाहीं ? नामस्मरणांत वेळ घालवावा की नाही ? त्यामुळे कोणता लाभ होतो ? याचा निर्णय झाला नाहीं तरी सकाळच्या वेळांतील १०-१५ मिनिटें नामस्मरणांत घालविली तर असा कोणता विशेष तोटा होणार आहे ? माझ्या अल्प बुद्धिला वाटते त्याप्रमाणे खरोखरीच समजा परमेश्वर नसला तर नामस्मरणांत घालविलेली १०-१५ मिनिटें वाया जातील, असा कितीतरी वेळ वाया जातो हे आपणांस माहीत आहेच. पण ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्यासारखे थोर थोर महात्मे, विचारवंत पुरुष सांगतात त्याप्रमाणे परमेश्वर खरोखरीच असेल तर त्याच्याकरिता मी १०-१५ मिनिटेंहि देऊ शकत नसेन तर मी माझ्या अध्यात्मिक लाभाच्या दृष्टीने केवढी तरी हानि करून घेतली असेच होणार नाहीं काय ? यासाठी नामस्मरणाने झाला तर लाभच होईल. तोटा कांहींच नाही असा विचार करून नामस्मरण करावें. यालाच 'दु अर ऑन द सेफर् साईड' असे म्हणतात.

थोड्या निराळ्या प्रकारचा माझा एक अनुभव या संदर्भात सांगतों. उन्हाळ्यांत लोणावळ्यास राहणे होत असतांना मी कामासाठी रोज लोणावळ्याहून पुण्यास येत असे. सकाळी १०-१० ॥ वाजता गाडी असायची व ११॥-१२ वाजता मी पुण्यास पोंचायचो. महाविद्यालयांत जाऊन काम करून पुन्हा संध्याकाळी परतायचे. सकाळी जातांना जेवून जावयाचे. ती. दादा मला रोज शिदोरी घेऊन जाण्यास भाग पाडावयाचे. मी म्हणत असे हा प्रवास रोजचा आहे. १॥ तासांत संपतो. मी जेवून जातो. तेव्हां रोज शिदोरी बरोबर कशाला ? दादा म्हणत 'हमाल करावा लागेल इतके त्याचे ओझे तुला होतें कां ? प्रवासांत कांहीतरी शिदोरी बरोबर पाहिजे अशी आपली पद्धत आहे. शास्त्रांत कुठे वचन आहे कीं नाहीं तें तुझे तू शोधून काढ.' ते मला रोज आठवणीने शिदोरी घेण्यास लावीत. एकदां वाटेत गाडीचे कांहींतरी बिघडले आणि ती मध्येच कुठेतरी थांबली, ४-५ तास खोळंबून राहावे लागले आणि मग ज्यांच्याजवळ कांहीं नव्हते त्यांचे किती हाल झाले ते विचारूं नका. शिदोरी बाळगण्याचा नियम असल्यामुळे मी व माझ्या बरोबर एक प्रवासी लहान मूल सुखरूप राहिलों, नामस्मरणांत घालविलेला वेळ अनावश्यक वाटला तरी असाच उपयुक्त ठरणे शक्य आहे.

आज आपण ज्या तर्‍हेचे जीवन जगत आहोंत त्यांत शरीर-मन-बुद्धीवर अनेक प्रकारचे ताण सतत पडत असतात. या वाढत्या ताणांमुळेच अपचन, मलावष्टंभ, आम्लपित्त, निद्रानाश, रक्तदाब, मधुमेह, हृद्रोग यासारख्या लहान मोठ्या विकारांचे प्रमाण बरेंच वाढले आहे. या ताणांचे दुष्परिणाम नाहींसे करण्याच्या दृष्टीनेंहि पहाटेच्या प्रसन्न वेळी शांतपणे केलेल्या नामस्मरणाचा पुष्कळ उपयोग होण्यासारखा आहे. अगदीं यांत्रिक पद्धतीने केलेल्या नामस्मरणादि कृतींचाहि कांहीं लाभ आहेच. भावानें, श्रद्धेने, निष्ठेने केले तर अधिकस्य अधिकं फलम् प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नुसते पहाटे तेवढे नाम घ्यावें असे नसून दिवसभरहि त्याचे यथाशक्ति स्मरण वा उच्चारण करीत असावे, म्हणजे त्याचा परिणाम मध्यमेतील व पश्यंतींतील उच्चारणावरहि होतो. एकांती तर घ्यावेंच पण लोकांतीहि घ्यावे. यासाठीच 'अहो येता जाता उठत-बसता काम करिता' या श्लोकाने "समस्तांची लज्जा त्यजुनि भगवत्‌चिंतन" करण्यास सांगितले आहे.

पुरेसा अभ्यास नसेल, जीवन शुद्ध, सात्त्विक, पवित्र नसेल, तर मनांतल्या मनांत नाम घेण्याचाहि ताण येतो. म्हणून नाम मोठ्याने घ्यावे. यासाठीच "अती आदरें गद्य घौषें म्हणावें" असे सांगितले आहे. कांहीं कांहीं वेळ टाळमृदंगाच्या घोषांतहि घ्यावे. यांतील जे शक्य आहे ते, शक्य तितकें अधिक वेळ, नियमानें, आदरानें, प्रेमानें, निष्ठेने करावे.

हें नामस्मरणासंबंधीं सांगितले. आतां एरवींचे वर्तन कसे असावें तेंहि समर्थ सांगतात, "जेणें विठ्ठलमात्रा घ्यावी । तेणें पथ्यें सांभाळावीं ।" असे संतवचन प्रसिद्ध आहे. नामस्मरण वा पूजाअर्चादि कोणतेहि धार्मिक कृत्य हे त्याच्या जोडीने आचार-विचारांतील पवित्रता चढत्या-वाढत्या क्रमानें स्वीकारल्यावांचून फलद्रूप होत नाहीं हें निश्चित समजावें. म्हणून पहिल्या दोन ओळींत नामस्मरण करावे असे सांगितल्यानंतर पुढच्या तिसर्‍या ओळींत समर्थ सद्वर्तनी असावे, सदाचाराचा त्याग करू नये असे सांगत आहेत. सदाचार हाच थोर आहे. म्हणजे श्रेष्ठ, वंदनीय, आदरणीय स्वीकार्य आहे. तो आचरणांत आणलाच पाहिजे. त्याचा त्याग होता कामा नये. आता हा सदाचार म्हणजे तरी काय ? या शब्दाचे अर्थ दोन रीतीने करता येतील, सतां आचारः = सदाचारः सज्जनांची जी वागण्याची पद्धत तिलाच सदाचार असे म्हणावे किंवा सत् आचार = सदाचारः सत्य असा जो आचार, सत्यावर अधिष्ठित अशी जी वागण्याची पद्धति तीहि सदाचारच होय. यांतील सत्याचे आचरण करण्यास वा वागणूक सत्याधिष्ठित ठेवण्यास सत्य म्हणजे काय ते कळले पाहिजे. हे इतके सोपे नाही. विचार करणाराच्या बुद्धींतले गुणदोष, वस्तुस्थितीला झांकून, जे जसे आहे त्यापेक्षा उण्याअधिक प्रमाणांत वेगळेच दर्शन घडवितात. एकाच घटनेचे वर्णन निरनिराळी माणसे किती निरनिराळ्या प्रकारांनी करतात ते पाहिलें म्हणजे हे लक्षात येईल. म्हणून सत्य काय ते यथार्थरीतीने जाणून घेणे नेहमीच अवघड ठरते. सत्याच्या ज्ञानासाठीं बुद्धि अत्यंत निर्मळ, पूर्वग्रहरहित, तीक्ष्ण आणि निश्चल असली पाहिजे. लाकडे मोजण्याचा तराजू, जरी तराजूच असला तरी सोने मोजण्यासाठी वा प्रयोगशाळेतील महत्त्वाच्या रसायनांचे माप घेण्यासाठीं तो उपयोगी पडत नाहीं. तसेच नेहमीचे व्यवहार चांगलेपणाने करणारी बुद्धिहि कसोटीस उतरणार्‍या सत्याचें ज्ञान करून घेण्यास असमर्थ ठरते. सत्याच्या ज्ञानासाठी बुद्धीला सूक्ष्म संवेदनक्षमता असावी लागते. एका राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये रसायने मोजण्याचा तराजू मी पाहिला तो मूळ वास्तूपेक्षा अधिक खोल पक्का पाया घेऊन तळापासून भरून आणलेल्या काँक्रीटच्या ओट्यावर कोनाडा करून बसविलेला होता. मोजणान्याच्या श्वासोच्छ्वासाचाहिं परिणाम होऊ नये म्हणून काचेच्या कपाटामध्ये तो सुरक्षित ठेवला होता. सत्यज्ञान करून घेणारी बुद्धि ही अशीच निर्लेप असावी लागते. इतकी सूक्ष्मता आपल्या बुद्धीला कोठून आणावयाची. संतांनी हा तराजू उपलब्ध करून घेतलेला असतो. यासाठी सत्याचा आचार हा जो सदाचाराचा अर्थ केला जातो तो आपल्या दृष्टीने निरुपयोगी आहे. म्हणून व्यर्थहि आहे. जे खरेच मोठे आहेत त्यांचा आचार तो सदाचार. 'महाजनो येन गतः सः पन्थाः ।' सदाचाराचा हाच अर्थ आपल्या उपयोगाचा आहे.

माणसाचे मोठेपण ठरवितांना मात्र सावध राहिले पाहिजे. थोडा विवेक केला तर हे मोठेपण समजून घेता येईल. हा विवेक कठीण असला तरी सत्यशोधनासाठी लागणार्‍या सूक्ष्मतेइतका दुर्लभ नाही. निवडून आला आहे, संपत्तिमान आहे, सत्ताधारी आहे, गोड बोलतो, चांगला विद्वान् वक्ता आहे, त्याच्या व्याख्यानाला सुशिक्षितांचीहि प्रचंड गर्दी जमते, यावरून माणसाचे मोठेपण ठरविणे योग्य नसते. निःस्वार्थता आणि कार्यक्षमता हे दोन गुण ज्याच्याजवळ जितक्या अधिक प्रमाणांत असतील तितक्या प्रमाणांत तो मोठा असे समजता येईल. एक थोर व्यक्ति दुसर्‍या थोर व्यक्तीपेक्षा निराळी असू शकेल. पण तरीहि ती थोरच. गोखले आणि टिळक एकमेकापेक्षा वेगळे होते. त्यांचा विरोध प्रसिद्ध आहे. तरीहि ते थोरच होते. कार्याच्या दृष्टीने त्यांनी एकमेकांशी झुंज घेतली असली तरी गोखल्यांची थोरवी टिळकांना मान्य होती. गोखल्यांच्यावरील मृत्यलेखांत टिळकांची ही भूमिका उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे. रानडे आणि टिळक, भांडारकर आणि टिळक यांचेहिं असेच होते. दोघेहि टिळकांची योग्यता जाणून होते. विरोधक असूनहि मोठेपणा मान्य करण्याचे हें औदार्य सामान्य नव्हे.

एकाच्या दृष्टीने शंकराचार्य मोठे ठरतील तर दुसर्‍याच्या दृष्टीने मध्वाचार्य मोठे ठरतील, पण हा कोणाचेच अनुकरण करीत नाही. यांतील खरा मोठा कोण ते ठरवा. मग कोणाप्रमाणे वागावयाचे ते पाहूं. तोंवर मी आपला नटाचेच अनुकरण करतो असे म्हणून माणूस सदाचरणहि टाळीत असतो ही स्थिति चांगली नाहीं.

श्रेष्ठ व्यक्तींवर, थोर माणसावर श्रद्धा ठेवावी. आणि त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावें हेंच चांगलें. मनांतून वाईट गेलें म्हणजे शरीरांतून जाईल हे कितीहि खरे असले तरी थोड्याशा निग्रहाने शरीरांतून वाईट घालवण्याच्या प्रयत्नास लागल्यावांचून मनांतील वाईट उठावण्याचा संभव नाहीं हे लक्षात ठेवले पाहिजे. रूढी आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत त्या यासाठींच, उंबच्यावर बसू नये. उंबच्यावर शिंकू नये. उभ्याने पाणी पिऊ नये. दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. या मागची कारणे कदाचित् सांगता येणार नाहींत. विज्ञानालासुद्धा 'का' चें (why चें) उत्तर देतां येत नाही. हे नियम कदाचित् जीवनाला एक प्रकारचे अनुशासन असावें, शिस्त असावी, प्रत्येक कृति जाणीवपूर्वक व्हावी म्हणूनहि असतील, पण आज स्वैरतेलाच स्वातंत्र्य मानले जाते. आमच्या खाजगी जीवनात डोकावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे असा प्रश्न उद्दामपणे विचारला जातो. दुर्वर्तन लपवून ठेवावे आणि प्रतिष्ठा मिळवावी याचाच हा एक प्रयत्न आहे. चांगले लिहिल्याबद्दल जर सत्कार घ्यावयाचा, तर वाईट लिहिण्याबद्दल खेटरें खाण्याचीहि तयारी का नसावी ?

समर्थ सदाचरणी माणसाला धन्य म्हणतात ते यासाठी. निवडून येणे, मान, मान्यता मिळविणे, श्रीमंत होणे यात खरी धन्यता नाही. पापभीरू असणे, दुसर्‍याच्या धनाची अभिलाषा न धरणे, परस्त्रीकडे कामुक दृष्टीने न पाहणे, शक्यतों दुसर्‍यास साह्य करणे, आपला स्वार्थ साधण्यासाठी इतरांना पीडा न देणे, दुसर्‍याच्या अधिकारावर अतिक्रमण न करणे, दुसर्‍याची निंदा न करणे, स्वत:ची वृत्ति प्रसन्न राखणे हीं सदाचाराची लक्षणे आचरणात आणण्यांतच खरी धन्यता आहे. असे ज्याचे जीवन असतें तोंच स्तुतीला पात्र झाला पाहिजे. म्हणून खाजगी जीवन हें स्वच्छ पाहिजे. कोणाचेंहि खाजगी जीवन पाहूं नये हे व्यवहारतः कितीहि खरें असले तरी पाहण्यासारखें खाजगी जीवन नसणे हा जीवनाचा अध:पात आहे.

मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धि नको रे ॥
मना धर्मता नीति सोडू नको हो । मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

आपल्या मनांत येणाच्या विचारतरंगांचे आपण कधीं विश्लेषण केले आहे काय ? विश्लेषण करूं गेले तर भय वाटेल असे विचार कितीतरी प्रमाणांत येत असतात. अगदी नको त्या गोष्टी मनांत येत असतात. असे विचार मनात येऊ नयेत म्हणून जो जो प्रयत्न करावा तो तो मन नाठाळ मुलासारखे हट्टीपणा करते. लहान मलांच्या खोड्या कौतुकानें पहात बसलें तर वाढतात. विरोध केला तर आणखीच उफाळून आल्यासारख्या होतात. 'मन चिंती ते वैरी न चिंती' अशी म्हण आहे. तिची यथार्थता कोणालाहि पटावी अशीच वस्तुस्थिति असते. आपल्या अगदी जवळच्या माणसाबद्दलहि अशा कल्पना मनांत येतात कीं जशा कट्टर शत्रूच्याहिं मनांत येणार नाहींत. यासाठीच यजुर्वेदानें "तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु" अशी प्रार्थना कळकळीने केली आहे. मनांत येणाच्या वाईट विचारांचा वेग असा विलक्षण असतो कीं परमेश्वर कृपा करील तर त्यातून सुटका होईल एरवी नाहीं. म्हणून "मदीय हृदयीं सदा शुभ विचार देवा स्फुरो' अशी भगवंताची प्रार्थना करावी लागते.

आपल्याकडे अशी धारणा आहे कीं, अशी श्रद्धा आहे कीं, आकाशांतून कांहीं देवता तथास्तु तथास्तु असे म्हणत गुप्तरूपाने फिरत असतात. आपल्या मनांत कांहींतरीं वाईट विचार यावा आणि देवतांनी तथास्तु म्हणण्यास गांठ पडावी असे होऊ नये, म्हणून वाईट गोष्टी मनांत आणू नयेत, निदान वाईट बोलू तरी नये. मनाला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न यासाठी सतत करीत राहिले पाहिजे. मनांतहि वाईट न येणे हा सदाचरणाचा आदर्श आहे.

माणूस दुसर्‍याच्या दुःखानें दुःखी होतो असे पष्कळ वेळा घडते. पण माणूस दुसर्‍याच्या सुखाने सुखी होतो असे सहसा होत नाही. आपलें बरें न होता दुसर्‍याचे बरे झालेले पाहिले तर त्याच्या मनांत पाप येते. त्याचा अहंकार दुखावतो; ज्याचें बरे झालेले दिसते त्याची हा निंदा करतो, त्याचे दहा दोष दहा लोकांत सांगितल्यावांचून यास चैन पडत नाहीं. लग्नासारखा एकादा कौटुंबिक समारंभ चांगल्यारीतीने पार पडला की मग त्यावर आप्तस्वकीयांकडून होणारी टीका-टिपणी ऐकण्याजोगी असते. शक्ति असती तर माणसाने दुसर्‍याचे वाईट करण्यास मुळींच मागे पाहिले नसते. पण अनेक कारणांनी त्याच्या सामर्थ्याला मर्यादा पडल्यामुळे तो ते घातक कृत्य करू शकत नाहीं. बुद्धींत तर पाप येतेच; पण तें पांडित्य निंदेच्या रूपाने प्रकट होते. निंदा हे मत्सराचेच अपत्य आहे. यासाठी दुष्टवासना आणि पापबुद्धी यांना मनांत थारा मिळणार नाही असा प्रयत्न सदोदित करीत राहिले पाहिजे.

मनाला वळण लावावयाचे ते आपले आपणच प्रयत्नपूर्वक लावावे लागते. दुसरा कोणी त्यांत उपयोगी पडू शकत नाहीं. आधीं विचार, मग निश्चय, नंतर क्रिया असा क्रम असतो. दुष्टवासनेचा परिणाम पापबुद्धींत होतो. प्रत्यक्ष कृतीला जितकीं बंधने असतात तितकी ती विचाराला नसल्यानें वाईट विचाराचे धोके आरंभीं तरी लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाईट विचारांची खंत वाटेनाशी होऊन पापाविषयीची बुद्धि बळावत जाते आणि ही बलवान् होऊ लागली कीं, मग वागण्यावरील बंधनेहि ढिली होत जातात. आणि माणूस अनीति करू लागतो. मनाला आवरणे फारसे हातांत नाहीं. पण शरीर आवरणे पुष्कळसे स्वाधीन असते. म्हणून समर्थ धर्म आणि नीति सोडू नको असा उपदेश मनाला करीत आहेत. मनांत येणार्‍या वाईट वासनांवर नियंत्रण ठेवणे हे फारसे तुझ्या हातांत नाहीं हें आम्हांस माहिती आहे. पण मनांत येणारे वाईट विचार क्रमाक्रमानें नाहींसे होऊन मन शुद्ध व्हावे असे तुला खरोखरीच वाटत असल्यास तुझे प्रत्यक्ष वागणे तरी निदान धर्माला व नीतीला सोडून घडणार नाही, अशी दक्षता घे, असे समर्थ म्हणत आहेत.

कबीरांचे एक वचन या दृष्टीने विचारांत घेण्यासारखे आहे. कबीर म्हणतात - मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर । नहीं खींची कमान तो कहाँसे छूटेगा तीर ॥ एखाद्याचा घात करावा असा विचार मनांत येणे कितीहि वाईट असो प्रत्यक्ष घात-बाण जोडून धनुष्याची दोरी ओढली, बंदुकीचा घोडा दाबला म्हणजे होतो. तेवढे तरी निदान करू नकोस. मनाने साधत नसेल तर शरीराने तरी सदाचारांत रहावे, त्याचाहि क्रमानें लाभ होऊ शकतो. पूजा-संध्या-स्तोत्रे, कीर्तन, अन्नदान, तीर्थयात्रा या गोष्टी मनांत येतांच कराव्या. मनांत येत नसल्या, कंटाळा येत असला तरी कराव्या. जमतील, साधतील त्याप्रमाणे करीत राहून अधिकांत अधिक चांगल्या कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करावा. पण चांगल्या साधतील तरच करू नाहीं तर नाहीं असें मात्र म्हणू नये. मन चांगल्या गोष्टींत रमेल तर उत्तमच, पण तसे होत नाही म्हणून शरीर तरी चांगल्या गोष्टींतून बाहेर काढू नये, चांगल्या गोष्टींतच ठेवावे. कीर्तन-प्रवचनांत मन कधींच रमत नाही. म्हणून सर्वदा सिनेमाच पाहतो हें ठीक नाहीं. सिनेमाचे विचार मनांत येत असतील तरी कीर्तन प्रवचनाला वा मंदिरात मधून मधून आग्रहाने जाऊन बसणें हेंच श्रेयस्कर आहे.

'असो नसो भाव । जो हा देखे पंढरीराव' असे संतानी म्हटले आहे ते यासाठीच. मनांत तितकी श्रद्धा नसली तरी पंढरपूरला जा. स्थानांचा कांहीं प्रभाव असतो. वस्तूचेंहि कांही मूल्य असते. त्यामुळे प्रयत्नांना क्षेत्र उपलब्ध होते.

धर्माने आणि नीतीने वागतांना आपली प्रकृति, प्रवृत्ति, परिस्थिति विचारांत घेतली पाहिजे. आदर्शाचीं शास्त्रवचने शब्दशः विचारात घेऊन चालणार नाहींत. यासाठीच समर्थांनी सार काय, महत्त्वाचे काय, गौण कोणतें, अपरिहार्यपणे आचरणांत आणलेच पाहिजे असे काय आहे त्याचा विचार करावा, विवेक करावा असे सांगितले आहे. माणसाचा स्वभाव मोठा विचित्र आहे. सार काय, असार काय, याचा विवेक जर केला नाहीं तर चांगल्या गोष्टीतहिं विकृति निर्माण होते. संन्यासधर्म एरवीं फार कडक, कोणत्याही इंद्रियाचे लाड त्या आश्रमांत चालणार नाहींत. इंद्रियनिग्रह हाच तेथे नियम. पण विवेकानंदांनीं संन्याशाला कांहीं सवलती दिल्या आहेत. तंबाखू खाणे ही त्यातील एक सवलत. माणसाला कोटेंच कोणतीच सवलत दिली जात नाहीं तर तो सर्व बंधने झुगारून देण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून कमी धोक्याच्या गोष्टींत सवलत द्यावी व अधिक घोक्याच्या गोष्टी कटाक्षानें टाळण्यास सांगाव्या असा विचार त्यांनी येथे सांगितला आहे. माझ्या माहितीचे एक उदाहरण सांगतों. एका दशग्रंथी कर्मठ ब्राह्मणाचा मुलगा लहानपणापासून अत्यंत कडक शिस्तीत, हे खाऊ नको, असे करू नको, या बंधनांत वाढला. त्या बापड्याला कांदा-लसूण तर राहोच पण गाजर-वांगेहि वर्ज्य होते. पुढे तो महाविद्यालयांत शिक्षणासाठी शहरांत आला आणि इतका स्वैर वागू लागला कीं कांदा-लसूणच काय पण मद्यमांसहीं त्याला वर्ज्य राहिले नाही. सर्व समाजच्या-समाज नियमाच्या बंधनांत जेव्हां काटेकोरपणे पण सहजतेने वागत असतो तेव्हा आपण स्वतः पाळत असलेले नियम जाचक वाटत नाहींत, नव्हे थोडे अधिक नियम पाळणेहि भूषणाचेच वाटते, पण कोणतेच नियम न पाळणारा समाज भोंवती असतांना फार कडक नियमांचा दुराग्रह धरणे, हे घसरगुंडीला लावण्यास कारणीभूत ठरणारे आहे. कांदा व मांस यामधे कांद्याची सवलत देणे इष्टच मानले पाहिजे. आपल्याकडचे कांहीं कडक नियम मंत्रशक्तीच्या जपणुकीसाठीं होते. खाद्याखाद्य, स्पर्शास्पर्श हा त्यांतीलच एक भाग होता. गेल्या हजार-बाराशे वर्षांत तरी ब्राह्मणाने समाज म्हणून मंत्रशक्तीचा आधार शिल्लक ठेवला आहे असे दिसत नाही. त्यादृष्टीने असलेले विधिनिषेध आज इतके कटाक्षाने पाळावेत की नाही याचा विचार केला पाहिजे. अधिक वाईट टाळण्यासाठी कमी वाईटाचा विचार करणेहि पुष्कळ वेळां इष्ट ठरते. "नियमेंविण राहू नये" हे खरेच पण त्यावेळी 'फार नियम करू नये ' हेही लक्षात ठेवलेच पाहिजे. चांगलें कितीहि चांगले असले तरी ते पचावे लागते. त्याचे अजीर्ण होऊ देता कामा नये. अधिक चांगल्याकडून कमी चांगल्याकडे येण्यापेक्षा कमी चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे जाणे जास्त चांगलें. उद्योग-व्यवसायांत असलेल्या एका गृहस्थाने विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ करण्याचे एकदां ठरविले. एका पाठाला ८ ते १० मिनिटे लागतात. दोन पावणेदोन तासाचा वेळ आपण सहज देऊ शकू, असा त्याचा विचार, पण हे गणित प्रत्यक्ष व्यवहारांत उतरू शकले नाहीं. १२ पाठ पुरे न होण्याचा अनुभव आल्यामुळे त्याचे पाठ करणेच सुटले. त्याने एकच पाठ करावयाचे ठरविलें असते तर त्याचा नियम कदाचित् पार पडला असता. आपली शारीरिक, मानसिक शक्ति किती ? आपल्याला किती झेपेल याचा विचार करून नियम ठरवावे लागतात हेच यांतलें सार होय. त्याचा विचार माणसाने केलाच पाहिजे.[ Use Right click for download ]


मना पाप संकल्प सोडूनि द्यावा । मना सत्य संकल्प जीवीं धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥

माणसाच्या हातून घडणार्‍या कृतीचा विचार केला असतां बुद्धि-इच्छा-क्रिया असा क्रम आढळतो. यासाठी क्रियेंत परिणत होण्यापूर्वी वा क्वचित् क्रियेंत परिणत झाल्यानंतरहि योग्य काय वा अयोग्य काय याचा विचार माणसाच्या अंतःकरणांत सतत राहिला की त्याचे वर्तन धर्माला आणि नीतीला अनुकूल असे होते वा होऊ लागते.

मागील श्लोकांत आलेल्या धर्मनीतीचेच अधिक स्पष्टीकरण समर्थ या श्लोकांत करीत आहेत. पापसंकल्प सोडून देणे, सत्यसंकल्प करीत राहणे आणि विषयोपभोगाच्या कल्पनेत न गुंतणे यांतूनच सद्धर्म आणि सन्नीति अंतःकरणांत रुजत असते व तसे झाले नाहीं तर जगामध्ये माणसाची छीः थू होते. यासाठी सावध रहावे असे समर्थ म्हणतात.

पापपुण्याची कल्पना आणि धर्म व नीति या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. पापपुण्याच्या कल्पना सर्वत्र व सर्व प्रकारच्या समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत आहेतच, त्या वेगवेगळ्या असतील; कदाचित् परस्परविरुद्धहि असतील पण आहेत हे सत्यच. काळे-पांढरे, कडू-गोड, खारट-तुरट यांत रासायनिक भेद आहे व तो निश्चित स्वरूपाचा आहे. पण या कल्पना भौतिक आणि जड आहेत. काळे आणि पांढरे, कडू आणि गोड यांच्या ज्ञानांत मतभेद होण्याची विशेषशी शक्यता नाहीं. पण बर्‍या-वाईटाचे ज्ञान असें निश्चित व सार्वत्रिक एकरूपतेचें नाहीं. केंस काळे चांगले, दांत पांढरे चांगले, कडूलिंब कडू म्हणून त्याज्य, पण कारले कडू असून रुचकर म्हणून स्वीकार्य. पण कारल्याची रुचि सार्वत्रिक नाहीं. गोड पदार्थ गोड खरा पण तो पानांत न पडू देणारी माणसे आहेत. कैरी चांगली कोणती ? झोंबणारी आंबट कां खोबर्‍यासारखी पण आंबटपणाचा वास असलेली खोबरी ? लोणच्यासाठी आंबट चांगली. नुसती खायला खोबरी चांगली. संबंधानें, परिस्थितीने, रुचिभेदाने, देशकालभेदानें, चांगले वाईट पालटते; उलटसुलटहि होते. अशा स्थितींत वाईट किंवा चांगले म्हणजेच धर्मशास्त्रदृष्ट्या पाप किंवा पुण्य कसे ठरवायचे ? आपण ज्याला पाप म्हणू त्याला दुसर्‍या समाजांत पाप समजत नसतील, कदाचित् पुण्यहिं समजत असतील. सध्या दळणवळणाच्या सुलभतेमुळे दुसर्‍या समाजाशी निकटचा संबंध येत आहे. त्यामुळे अनेकांच्या चालीरीती, समाजव्यवस्था, बर्‍यावाईटाच्या कल्पना यांचे निरीक्षण जवळून करता येऊ लागले आहे. त्यामुळेच दुसर्‍याचे आचार-विचार पाहून आपण आपल्या रीतीभाती त्याची तुलना करू लागलों आहोंत आणि स्वैराचाराची मुळांत ओढ असलेल्या संस्कारहीन व्यक्तींना अमक्या समाजांत अमक्या आचाराला चांगले समजतात, अमका आचार प्रतिष्ठितपणाचा समजला जातो, त्यांत पाप आहे म्हणून तो वर्ज्य करावा असे कुणी म्हणत नाहीं तर आपणच तोच आचार वाईट का समजावा ? पापपुण्याच्या कल्पना थोतांड वाटतात त्या या विचाराने.

आचार-विचारांत, विधिनिषेधांमधे चमत्कारिक विविधता आढळते हे खरेंच. हिंदू संस्कृतींत एकमेकांचे उष्टें खाणे प्रशस्त मानले जात नाहीं. पण मुसलमानांच्या मध्ये एका ताटांत जेवणें प्रतिष्ठितपणाचे मानले जाते. हिंदूंमध्ये सगोत्रच काय पण सपिंड विवाहहि निषिद्ध मानला जातो. तर मुसलमान, खिश्चन, ज्यू या समाजांत चुलत बहिणीशी किंवा सावत्र बहिणीशी विवाह करता येतो असे म्हणतात. अगदी ब्राह्मणां-ब्राह्मणांतसुद्धा या संबंधीचे आचार परस्परविरुद्ध टोंकाचे आहेत. कोंकणस्थ ब्राह्मण जिला मामेबहीण म्हणतो ती मामाची मुलगीं ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मणांत विवाहासाठी योग्य मानतात; अधिकाराची समजतात; तर माध्यंदिन देशस्थांत स्वत:च्या गोत्राप्रमाणेच मामाच्या गोत्रांतली मुलगीहि विवाहासाठीं वर्ज्य मानली जाते. मग मामाच्या मुलीशी विवाह करण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाहीं. मांसाहार, मद्यपान यांतहि असेच आहे. पापपुण्याच्या कल्पनेप्रमाणे पाप करणारा मनुष्य नरकांत जातो असे आहे. तर तीच कृति भिन्न समाजांतील व्यक्तींनी केल्यास तो स्वर्गात जातो असे कसे म्हणता येईल ? बरे असा विरोध असतो, विसंगति असते, म्हणून आपणांस जें जिथे जसे करावेसे वाटेल ते ते चांगले म्हणून करावे, मान्य व्हावें, प्रतिष्ठित ठरावे असे तरी म्हणता येईल काय ? आपल्या महाराष्ट्रांत एके काळी दारुबंदीचे नियम कडक होते. इतर कांही राज्यांत दारूबंदी नव्हती. तेव्हां अमुक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हा नाही. म्हणून मी इथेहि दारू पिणार, असे म्हणून कोणी प्रत्यक्ष तसे वागू लागला तर तो अपराध ठरतो ना ? आपल्या देशांत वाहने रस्त्याच्या डावीकडून हांकावी असा नियम आहे. म्हणून आपल्याकडे तैलरथाची दिक्-प्रेरक चाकें वाहनाच्या उजवीकडे असतात. कांहीं परदेशांत रस्त्याच्या उजवीकडून चालणे हा नियम असतो. त्यांची वाहने त्या सोयीची डावीकडे दिक-प्रेरक असलेली असतात. क्वचित त्या गाड्या आपल्या देशांतील रस्त्यावरूनहि धांवतात पण डावीकडून वाहन चालवण्याचा नियम मात्र मोडता येत नाहीं.

आपल्या देशांत हिंदूंना द्विभार्या–प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. पण समतेच्या आणि न्यायाच्या घोषणा करणार्‍या आपल्या निधर्मी शासनाने मुसलमानांना खूष करण्यासाठी, सगळी लाज गुंडाळून, मुसलमानांना मात्र या कायद्यांतून वगळले आहे; आणि तरी या कायद्याचा भंग करणारा हिंदू हा अपराधी ठरावयाचा तो उरतोच, कायदे जसे, आपण तर्कवाद कांहीं केला तरी, जे जिथे जसे असतील तसेच पाळतो त्याप्रमाणेच पापपुण्याच्या कल्पनेचे मानले पाहिजे. मी भारतांत आहे, महाराष्ट्रांत आहे, हिंदू आहे म्हणून इतरत्र तसे नसलेले कायदे जर माझ्यावर बंधनकारक असतात, त्यांचा भंग मी करू शकत नाही, तर पापपुण्याच्या बाबतींतहि ज्या परंपरेंत मी जन्माला आलों तिच्या मर्यादा मी पाळणे आवश्यकच मानले पाहिजे. गोष्ट मुळांत चांगली की वाईट हे ठरविणे कठीण असते. पापपुण्याच्या कल्पना उलट सुलट होतात हेंहि खरेंच, पण म्हणून पापपुण्याची कल्पनाच वाईट समजावी कीं काय ? विचारणारा कुणी नाहीं आणि प्रत्यक्ष परिणाम लक्षात येत नाहीत म्हणून पापपुण्याच्या कल्पना आपण मोडू शकू. पण शासनाने घातलेल्या निर्बंधाच्या बाबतीत काय करणार ? बहुमत निर्माण करून, सत्ता हातात घेऊन, कायदे हवे तसे बदलतां येतात हे तत्त्वतः कितीहि खरें असले तरी, व्यक्ती-व्यक्तीचा-अगतिकपणा उघडच असतो, मान्य नसलेला निर्बंधहि या अगतिकपणाने पाळावाच लागतो, दुःख सोसावेच लागते. याचा अनुभव आपण गेली २५ वर्षे पुरेपूर घेतला आहे. यासाठी पापपुण्याच्या कल्पनांचा उपहास करण्याचे धोरण बुद्धिवादाने स्वीकारू नये हेच खरें. मतभेदास वाव राहिला तरी निर्बंध, नियम, शासन यांच्यावाचून समाजाची व्यवस्था टिकणार नाही. मग व्यक्तिशः थोडी अडचण सोसूनहि आपण मर्यादा पाळतो तसेच पापपुण्याचेंहि समजावें, पापपुण्याच्या कल्पनेवांचून समाजधारणा टिकूंच शकणार नाहीं. चांगल्या-वाईटाच्या, पाप-पुण्याच्या कांहीं कल्पना समाजांतील बहुसंख्य माणसांच्या अंतःकरणांत अजूनहि टिकून आहेत म्हणून शासनाची आणि निर्बंधांची प्रतिष्ठा अद्यापहि थोडी तरी टिकून आहे.

पाप-पुण्य ही कल्पनाच वाईट म्हटले तर आपल्याला जगताच येणार नाहीं. आपण समतेचा घोष भले करा, पण परमोच्च अवस्थेंतील परमार्थाव्यतिरिक्त समता प्रस्थापित करीन म्हणणें हें थोतांड तरी आहे वा स्वप्न-रंजन तरी आहे. वेदांतानें मानलेल्या तीन सत्तांपैकीं परमसत्य अशी जी पारमार्थिक सत्ता तिच्यांतच काय ती एकता-समता खर्‍या अर्थाने नांदू शकते. इतर दोन ज्या प्रतिभासिक आणि व्यावहारिक सत्ता त्यांत समता मानतांच येणार नाही. विविधता, सापेक्ष संबंधावर आधारलेले चांगले-वाईट आणि विरोध या गोष्टी आचारविचारांच्या दृष्टीने पत्करल्यावांचून गति नाहीं. नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्त स्वभाव असें जें ब्रह्म तें जेव्हां जगताचे कारण म्हटले जाते तेव्हां ब्रह्मालाही शबलत्व आले असे म्हणण्यास वेदांत-शास्त्र कचरत नाहीं. तर व्यवहाराधिष्ठित शास्त्रें चांगल्या वाईटाचा वा पापपुण्य कल्पनेचा त्याग कसा करणार ?

भिन्न भिन्न समाजांत चा भिन्न भिन्न देशकालांत पापपुण्याच्या कल्पना वेगळ्या असतात हे खरे असले तरी त्यांत मनमानी नसते. आपण योगायोग, अपघात, चान्स मानीत नाहीं. निसर्गात आपण योजनाबद्धता मानतो, कांहीं नियति मानतों. त्यामुळे पापपुण्याच्या कल्पनांच्या मागेहि एक धोरण आहे, विचाराचे सूत्र आहे, हे लक्षात घ्यावयास हवे. माझ्या आवडी-निवडी या सर्वत्र प्रमाण धरून चालले तर आपत्ति येईल. माझ्याच प्रकृतीला ऊन सोसत नाहीं, एकाद्या प्रकृतीला थंडी सोसत नाही, आणि हें मी माझ्या आवडी-निवडीनें वा इतरांचे पाहून ठरवू शकत नाहीं. उंच आणि धिप्पाड असण्याचे कांहीं फायदे आहेत, कांहीं लाभ आहेत, पण कितीहि प्रयत्न केला तरी जपानी माणूस पंजाबी माणसांसारखा होणार नाहीं. प्रकृतीचे हे नियम जसे आपण अगतिकपणे मानतों तसेच संस्कृतीचे आणि सभ्यतेचे नियमहि समाधानाने मानण्यास शिकले पाहिजे. मी भारतांत हिंदू संस्कृतीत नियति म्हणून जन्माला येतो. तर केवळ मला वाटते म्हणून त्यांतील परंपरांचा त्याग मला करता येणार नाहीं.

खालच्या कोर्टात दोषी ठरलेला माणूस वरच्या न्यायालयांत निर्दोष ठरतो. केव्हां केव्हां याच्या उलटहि घडते. दोन्ही पक्षाचे वकील, माझ्याच पक्षकाराचे म्हणणे योग्य आहे, असे कायद्याचे आधार देऊनच सांगत असतात. जुन्या कायद्याच्याजागी संपूर्ण नवीन असा वेगळाच कायदा अधिकृतरित्या मान्य केला जातो. तरीपण व्यक्तीं-व्यक्तीगणिक तिच्या आवडी-निवडी वा सोयी-गैरसोयी पाहून कायदे बदलता येत नाहींत; तसेंच पाप-पुण्याच्या कल्पनेचेंहि मानले पाहिजे. पापपुण्याच्या कांहीं कल्पना पोरकट वाटल्या, उपहासार्ह वाटल्या, अर्थहीन वा हेतुशून्य वाटल्या तरी त्या मोडतानाहि तेच दोष निर्माण होणार नाहीत याची काळजी व्यक्ती-व्यक्तीने घेतलीच पाहिजे. मला सगळेच समजते हा अहंकार तर व्यर्थच आहे; पण मला सगळेच समजू शकेल हा अहंकारहि नेहमीच यथार्थ ठरणार नाहीं. ज्ञान मिळवावे, ज्ञान वाढवावें, आत्मविश्वासाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा; पण अहंकारानें कोणालाहि तुच्छ लेखू नये, ही वृत्ति ठेवली म्हणजे पाप-पुण्याच्या कल्पनेचा आपण करतो तेवढा अनादर होऊ शकणार नाहीं.

प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देणें तत्त्वतः शक्य आहे. पण सगळ्यांना अनुकूल म्हणजे प्रत्येकाला अनुकूल असा कायदा करणें मात्र अशक्य आहे. आपल्या लोकशाहींत तर न्यायाची विटंबना होईल असे निर्बंध निर्माण होतात. होऊ शकतात. विरोधी मते विभागली गेल्यामुळे मुळांत अल्पमतवाला, विरोधी बहुमतवाल्यावर राज्य करू शकतो. बुद्धिवाद येथे अगतिक होतो, अशा स्थितीत पापपुण्यासारख्या किती तरी सूक्ष्म कल्पनांच्याविषयी त्याने अहंकारी निर्णय घेण्यांत काय अर्थ आहे. प्रतिकूल कायदा, अन्याय्य कायदा, हें शल्य असले तरी कायद्याला मान देणे हें आवश्यक असते आणि भूषणावहहि ठरते. सॉक्रेटिसचें उदाहरण यादृष्टीने मोठे विचार करण्यासारखे आहे. त्याची भूमिका मुळांत प्रामाणिक आणि हितकारक अशीच होती. व्यापक दृष्टीने योग्य होती पण अॅथेन्सच्या त्यावेळच्या शासनाला सॉक्रेटिस डोईजड म्हणून नको होता. त्या शासनाने त्याला प्राणदंड दिला. सॉक्रेटिसनें तो दंड निष्ठेने स्वीकारला. त्याच्या मित्रांचा, त्याच्या चाहत्यांचा, त्याने हा दंड सोसू नये, पळून जावें, प्राणरक्षण करावे; असा आग्रह होता; पण अॅथेन्सचा नागरिक म्हणून सॉक्रेटिसने मृत्यूची शिक्षा भोगण्याचेच पत्करले. ज्ञानेश्वर महाराज यासाठीच शास्त्राने सांगितले तर राज्याचाहि त्याग करावा आणि विषालाहि विरुद्ध म्हणून टाकू नये असे म्हणतात.

शास्त्र म्हणेल सांडावें । तें राज्यहि तृण मानावें ।
जें घेववी तें न म्हणावें । विषहि विरुद्ध ॥ ज्ञा. १६-४६०


एका वैद्याने लहान मुलाच्या तापावर त्याला अतिविष द्या असे सांगितले. मुलाची आई संस्कृत घेऊन बी.ए. झालेली. तिला वाटलें एवढ्याशा मुलाला अतिविष कसे सोसेल. तिने आपलें बाजारांतून विष आणूनच त्याला दिले. आता त्या मुलाचे काय झाले असेल ? वैद्याला विचारले असते तर त्याने सांगितले असते- बाई, विष अतीतं-अति विषम्-वनस्पतिदृष्ट्या जन्मानें बचनागासारख्या विषाच्या वर्गातलें असले तरी गुणाने विषत्व ओलांडून गेलेले असल्यामुळे त्याला अतिविष म्हणतात. यातील विनोद सोडून द्या पण स्वतःचे डोकें चालवून पाप-पुण्याचा विचार करू नये. विचाराची बैठक शुद्ध शास्त्राची वा शास्त्रशुद्धतेची असावी.

पापपुण्याचा सामान्यपणे असा अर्थ करता येईल कीं जें ज्याच्या हिताचे, नुसते वरवरच्या सुखाचे नव्हें, तर कल्याणाचे, तें त्याच्यासाठी पुण्य, शरीरापेक्षा मनाला, मनापेक्षां बुद्धीला, बुद्धीपेक्षां आत्म्याला अनुकूल तों तों अधिकाधिक पुण्यकारक; उलट असेल तर अधिकाधिक पापमय, या दृष्टीनेंहि शास्त्राची प्रवृत्ति, देशकाल-परिस्थितीचा विचार करून, स्वैराचाराकडून संयमाकडे, अनिर्बंध चैनीकडून निरपवाद आवश्यकतेकडे मनुष्याला वा समाजाला प्रेरणा देण्याची असते. "चोदना लक्षणोऽ अर्मः ।" अशी मीमांसकांनी केलेली धर्माची व्याख्या या दृष्टीने विचारात घेण्यासारखी आहे. उन्नति, प्रगति यादृष्टीने आहे त्या स्थितींतून तर्कशुद्ध, शास्त्रपूत आदर्शाकडे वाटचाल करावयाची ठरवल्यानें तर, अनेक स्तर वा पायर्‍या कल्पाव्या लागतात. यांत मानवीसमाज मुळांत निरनिराळ्या पायरीवर असू शकतात. वरच्या पायरीच्या दृष्टीनें खालची पायरी कनिष्ठ अशीच मानावी लागते. पापपुण्याच्या भिन्नतेचा विचार या दृष्टीने केला पाहिजे. एका पायरीवरच्या समाजाच्या संयमी प्रवृत्तीला बल देण्यासाठीं केलेले नियम आणि भिन्न पातळीवरील समाजाला संयम शिकवण्याकरिता केलेले नियम यांत अंतर असावयाचेंच, उदाहरण म्हणून एका गोष्टीचा विचार करू. मनुष्याच्या प्रकृतीचा व शरीररचनेचा विचार करतां मांसाहार हा माणसाच्या दृष्टीने अनैसर्गिक आहार आहे. माणसाच्या तोंडांतील दांतांची रचना विचारात घेतली तर तें सहज लक्षात येईल. घोडा, बैल यांच्या दांतांप्रमाणे माणसाचे दांत फताडे आणि सपाट आहेत. वाघ, सिंह, कुत्रे, मांजर यांसारखे त्याचे सुळे उंच, तीक्ष्ण नाहींत. सर्व मांसाहारी प्राणी पाणी पितांना जीभ बाहेर काढून पाणी पितात. मनष्य हा मांसाहारी नसलेल्या प्राण्याप्रमाणें ओठाने पाणी पितो. असे आणखीहि कांहीं भेद दाखवता येतील. सिंहाला जसे गवत, कडबा खाणे अनैसर्गिक आहे, तसेच माणसाने मांस खाणें अनैसर्गिक आहे. म्हणून माणसाने मांसाशन न करणे हे पुण्य. त्यादृष्टीने मांसाहार करणे हे पाप. मांसाहारामागची प्राणिहत्त्या विचारात घेता मांसापासून निवृत्त होणें हें सात्त्विक विचाराच्या माणसास सहज पटण्यासारखे आहे. मग आतां मांसाहाराची संवय आहे, परिस्थिति आहे, परंपरा आहे. अशा स्थितींत मांसाहारी माणसाला त्यापासून निवृत्त करण्यासाठी मांस खाऊ नको, खायचे झाले तर अमूक यज्ञ करून खा, नुसता मांसाहार करूं नको. त्याच्या जोडीला कांहीं शाकाहार घे. रोज मांसाहार करू नको. निदान श्रावणांत तरी मांस खाऊ नको असे सांगितले जाते. ज्या जातींत मांस खाल्लेले चालते, त्या जातींतले वारकरी गळ्यांत माळ घातली की मांस खात नाहींत. वृत्तींतील सात्त्विकता टिकवण्यासाठी ब्राह्मणाने तरी मांस खांऊ नये असे आग्रहाने सांगितले जात असे. दुर्दैवाने इतरांना निवृत्तमांस होणे चांगले म्हणून सांगण्याच्या ऐवजी ब्राह्मणच प्रवृत्तमांस होऊ लागले आहेत हें अध:पतन आहे. आपले प्रयत्न खालून वर, असंयमांतून संयमाकडे जाण्याचे असले पाहिजेत. असतो मा सद्‌गमय, तमसो मा ज्योतिर्गमय ही आपली उपनिषद्काळापासूनची धारणा आहे.

यावरून हे निश्चित झालें कीं पाप-पुण्याच्या कल्पनेमधे विविधता आढळली तरी पापपुण्याची कल्पना हीं एक अनुशासन म्हणून स्वीकारलीच पाहिजे. यांत कांहीं तारतम्य असू शकते, असते. सगळेच विधिनिषेध सारख्याच महत्त्वाचे नसतात. व्यावहारिक जीवनात निर्बंध जसेच्या तसे राहून पालनाचें तारतम्य ठेवावे लागते. 'हा रस्ता रहदारीचा नाहीं' अशी पाटी असलेल्या रस्त्यावर बहुधा नियमितपणे रहदारी चालते. पुलावरून जावे. रेल्वेरूळ ओलांडणाच्यावर खटला भरला जाईल अशाहि पाट्या आगगाडीच्या बहुतेक स्थानकांवर असतात. पण त्याचा किती मान ठेवला जातो हेंहि आपणास माहीत आहे. असे नियम मोडण्याकरितांच असतात, असे कुणी थट्टेने म्हणतातहि पण तरी सुद्धा त्या पाट्या लावणे योग्य नाहीं असे कुणी म्हणत नाहीं. आगगाडीचे रूळ न ओलांडण्याचा नियम तर शेवटीं माणसाच्या हिताचाच असतो. अपघात घडल्यास नियमाच्या पाटीकडे बोट दाखवून रेल्वे त्याचे उत्तरदायित्व नाकारू शकते. हा रस्ता रहदारीचा नाहीं म्हणणारा स्वत:च्या स्वामित्वाची जाणीव इतरांस देत असतो व त्यांची तेथून जाण्याची कृति अधिकाराची नाहीं हे सुचवित असतो. धर्मशास्त्रांतील पापपुण्ये, तद्‌विषयक विधिनिषेध या स्वरूपाचेहि असू शकतात.

माणसाच्या हातून पातक घडते. त्यामागे पातकासंबंधीचा संकल्प असतो, भूक लागते, खावेसे वाटते, खाण्याचा पदार्थ चिवडा असेल तर बरे असा विचार मग मनांत येतो. खावेसे वाटते या पातळीपर्यंत हे योग्य आहे. त्यानंतर निर्माण होणारी चिवडा खाण्याची इच्छा हीं मात्र भूक लागणाच्या अवस्थेशीं आपण समजतो तितकी सुसंगत नाहीं. बहुतेक वेळीं अनावश्यक आणि बर्‍याच वेळी अनारोग्यकर आहे. हा खाण्याच्या प्रकरणांतील पापसंकल्प, आधी पापसंकल्प उत्पन्न होतो व नंतर पाप घडते. पापसंकल्प उत्पन्नच झाला नाहीं तर पाप घडणार नाहीं. म्हणून समर्थ अधिक सावधपणे पाप सोडून द्यावे म्हणण्यापेक्षां पापसंकल्प सोडून द्यावा असे म्हणतात.

माणसाच्या बाबतींत तरी नैसर्गिक इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कराव्या लागणाच्या कृती यामध्ये सहजता राहिलेली नाही. त्याच्या धारणा, त्याच्या कल्पना, त्याचे विचार, त्याची आवड, त्याची परिस्थिति, त्याचेवरील संस्कार या कारणांनीं माणसामाणसांतील इच्छेमध्ये मूलतः सारखेपणा आढळला तरी तदनुरूप घडणार्‍या कृतीमध्ये वा त्याकरिता स्वीकारल्या जाणाच्या साधनांमध्ये सारखेपणा राहत नाहीं आणि म्हणूनच मुळांत इच्छेची नैसर्गिक मर्यादा पारखून घ्यावी लागते आणि सभ्यता संस्कृतीच्या दृष्टीने कृती व साधनांचीहि निवड करावी लागते. पशूंत ही आवश्यकता विशेषशी नसते. माणसाला मात्र बंधनाचा स्वीकार करावाच लागतो. कारण मुळांत त्याच्या इच्छाच नैसर्गिक राहिलेल्या नसतात. उदा. पशूची कामवासना बव्हंशी नैसर्गिक प्रमाणात असते आणि त्याला विशेष स्वरूपाचें सामाजिक जीवनहि नसते. त्याला त्याची आवश्यकताहि नसते. अर्थातच नर-मादी या शुद्ध नैसर्गिक भेदापलीकडे पशूच्या बाबतींत आणखी काहीं वेगळा विचार करण्याचे कारणहि उरत नाही. त्यामुळे कामवासनेच्या पूर्तीसाठी त्याला गम्या-अगम्याचा विचार करण्याचे कारण नाही. पशूला विचार करावा लागत नाही तर माणसाला तरी का लागतो ? मनुष्यहि शेवटीं पशूसारखाच प्राणी आहे ना ! त्याच्या नैसर्गिक भुकांना तेवढे विधिनिषेधाचे बंधन का ? असें कांही विचारवंत म्हणविणारेहि गंभीरपणे विचारतात. बहुसंख्य साहित्यिकांनी तर असे बंधन नसावें असें गृहीत धरून सर्व प्रकारच्या स्वैराचाराचा पुरस्कार प्रकट-अप्रकटपणे चालविला आहे. यावर एक प्रश्न उलट विचारण्यासारखा आहे. पशूतील कामजीवनासाठी बहुधा नर-मादी येवढाच भेद पुरेसा होतो. तेथे वय, रंग, रूप, पुष्टि वा इतर काही गुण यावर ते आकर्षण अवलंबून नसते. शिंगें कशी आहेत ? कातडीचा रंग कोणता आहे ? नाक रेखीव आहे की नाही, डोक्याचा आकार कसा आहे ? यावर पशूच्या कामजीवनाचे आकर्षण अवलंबून असल्याचे दिसत नाही. तेथे वयहि नसते आणि नातीहि नसतात. माणसांत मात्र या प्रत्येक गोष्टीला काही ना काही तरी महत्त्व प्राप्त होते. केवळ स्त्रीत्व किंवा पुरुषत्व एवढाच आकर्षण-विषय न राहता वय, रंग, रूप, बुद्धिमत्ता, सत्ता, संपत्ति, कर्तृत्व, विद्वत्ता, नृत्यनाट्यगीतादिकला यांच्यामुळे आकर्षणाचे स्वरूप पालटते, उणे-अधिक होते. मिळालें तें नको वाटते. मिळालेलें नाहीं तें हवें वाटते, आणि याला केवळ नैसर्गिक प्रेरणांच्यापेक्षा काही वेगळ्याच प्रेरणा कारणीभूत होत असतात. आणि म्हणूनच या प्रेरणांना काही अनुशासन आवश्यक ठरतें. पशूच्या प्रगति-परागतीचा विचार आवश्यक नाही. माणसांना तो आहे. समाजशासन, सभ्यता, संस्कृति या सर्व गोष्टी माणसाला विचारांत घ्याव्याच लागतात. त्या प्रत्येकाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे काही विधिनिषेध असतात. मग संस्कृतीचा उत्कृष्ट भाग असा जो धर्म त्यांतील विधिनिषेधांची म्हणजेच पुण्याची वा पापाची तेवढी उपेक्षा करणे शहाणपणाचे ठरणारे नाही. माणसाला काही विशिष्ट रंग-रूप गुणांचे आकर्षण राहते. त्याला ते हवेहवेसे वाटते, त्याचेच चिंतन त्याच्या मनबुद्धीला व्यापून राहते. आणि म्हणून समर्थ पापात्मक चिंतनाला म्हणजेच पापसंकल्पाला सोडून द्या म्हणतात. प्रत्यक्ष शरीराने घडणाऱ्या पापापेक्षांहि पापाचें चिंतन परमार्थदृष्ट्या अधिक घातक ठरते. पातके पुन्हा पुन्हां घडत राहतात. याला मनाचा पापसंकल्प कारणीभूत असतो. म्हणून न्यायालयाच्या क्षेत्रांत योजनापूर्वक घडलेल्या अपराधकृत्यांना शिक्षा अधिक असते. नुसतेंच शरीर कोठेहि असले तरी त्यांत पातक नसते, असे म्हणता येईल. पातक राहतें तें मनबुद्धीच्या आश्रयानें, मन-बुद्धि शरीरापासून वेगळी करता येत नाही ही तर अडचण आहे. विधिनिषेध निर्माण होतात ते त्यामुळे. मुक्ताला पाप-पुण्य उरत नाहीत असें जें आपल्याकडे सांगितले आहे- "भेदाभेदौ सपदि गलितौ पुण्यपापे विशीर्णे" अशी जी त्याची स्थिति होते, याचे कारण त्याच्या हृदयांत पापसंकल्प संभवत नाहीं हे आहे. माणसाच्या हातून सहसा संकल्पावांचून पाप पडत नाही. घडणाऱ्या पातकांतील शंभरी नव्याण्णव पातकें संकल्पानेच घडत असतात. म्हणून समर्थांनी पापसंकल्प सोडून दे असे आग्रहाने सांगितले आहे.

पापसंकल्प सोडून दिला आता काय करावे ? त्याचे उत्तर पुढच्या ओळीत दिले आहे.

मन कधी रिकामें राहू शकत नाही. यासाठी काय टाकावें हें सांगितल्यानंतर लगेच काय घ्यावें हेंहि सांगितलेच पाहिजे. समर्थ म्हणतात- "मना तू सदा सर्वदा सत्याचा, सत्याविषयींचा संकल्प करीत जा." हा सत्यसंकल्पहि नुसते काहीतरी चिंतावयाचें म्हणून चिंतू नकोस. तर सत्यसंकल्प ही गोष्ट तुझ्या जीवांत, हृदयांत खोलवर जडली जाईल असे पहा. सत्यसंकल्प हा तुझा जिव्हाळ्याचा विषय असू दे. आपल्यांत 'काशीस जावें नित्य वदावें' अशी एक म्हण आहे. शरीराच्या दौर्बल्याने व परिस्थितीच्या प्रतिकूलतेने चांगल्या गोष्टी प्रत्यक्षांत लगेच घडविता येत नाहींत. तेव्हां निदान त्या संबंधीचे विचार तरी सतत मनांत घोळवीत असावे. म्हणजे कधी ना कधीं मनाची तत्संबंधीची आवड वाढत जाते व त्याप्रमाणांत मन निग्रहीं होत जाते. मग शरीराकडूनहि त्या गोष्टी घडविण्याइतकी उत्कटता वृत्तींना येते आणि नंतर कृति घडते. शरीर जड आहे. ते मनाबरोबर राहू शकत नाहीं. शरीराच्या हालचालीसाठी नित्याची संवय वा बलवान प्रेरणा पाठ असावी लागते. म्हणून शरीराने चांगले घडविण्यासाठी मनाने सतत चांगले विचार करीत असले पाहिजे. कारण जे चांगले असतें तें टिकून राहते. सत्य शब्दाचा मूळ अर्थ केवळ अस्तित्व असाच आहे. त्यामुळे लक्षणेने सत्य म्हणजे चांगले असा अर्थ निष्पन्न होतो आणि त्यावरूनच जे चांगलें तेच सत्य असा आचारोपयोगी सिद्धांतहि बांधता येतो.

सत्यसंकल्प हे स्वत:च्या प्रकृति-प्रवृत्ति-परिस्थितीप्रमाणे वेगळे वेगळे वा निरनिराळ्या पायरीवरचेहि असू शकतील.

देव-मानव-दानवांना आकाशवाणीतून द द द असा एकाक्षरी ध्वनी ऐकू आला. ब्रह्मदेवाने त्याचा अर्थ मात्र तिघांना तीन प्रकारांनी सांगितला. स्वैर विलासाची चटक असलेल्या देवांना दमन, स्वार्थात गुरफटलेल्या माणसाला दान व सूडबुद्धीने वागणार्‍या क्रूरकर्मी राक्षसांना दया असे आचरणासाठी व चिंतनासाठी तीन वेगवेगळे अर्थ ब्रह्मदेवाने उपदेशिले. त्या त्या जातीची विशेष प्रवृत्ति लक्षांत घेऊनच हे आदेश दिलेले आहेत, मनुष्य स्वार्थी, त्याला स्वतःजवळचे सोडवत नाहीं. असलेले पुरे वाटत नाहीं. ही त्याची प्रवृत्ति कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय अस्वास्थ्यास आणि अनर्थास कारणीभूत होते. तेव्हा त्याला दानाची प्रेरणा केल्यावाचून गति नाहीं. तो लबाड "दान द्यावे म्हणतां पण सत्पात्र व्यक्ति भेटत नाहीं, तेव्हा काय करावे" असे म्हणून पळवाट काढतो. तेव्हा त्याला "र्‍हिया देयं, भिया देयं, श्रद्धया देयं, अश्रद्धया देय" असे सांगावेच लागते. म्हणून माणसाच्या बाबतीत दान हा स्वाभाविक सत्यसंकल्प, परोपकार, त्याग, सेवा, तीर्थयात्रा, तप, पूजा, अध्ययन, नामस्मरण यासंबंधीचे विचार हे सारे सत्यसंकल्प. मी संयमाने राहीन, खरे बोलेन, न्यायाने वागेन, दुसर्‍याला शक्य ते सहाय्य करीन, योग्य आहार घेईन, दुसर्‍याला लागेल, बोंचेल असे बोलणार नाहीं, करणार नाही. स्वार्थासाठी कोणाची स्तुति करणार नाहीं. मत्सराने निंदा करणार नाहीं, अन्यायाचा प्रतिकार अवश्य करीन पण सूडबुद्धीने वागणार नाही, असे कित्येक विचार सत्यसंकल्पांत मोडतात, नियमितपणा, व्यवस्थितपणा, अनुशासन, उद्यमशीलता, स्वच्छता हेहि सत्यसंकल्पाचे विषय होऊ शकतात. अशा या सत्यसंकल्पाला श्रवण हे अगदी जवळचे साधन; ते अधिक परिणामकारकहि. म्हणून आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून सत्यसंकल्पासंबंधीचे हे आदेश सदुपदेशाच्या रूपाने मानवी मनावर सतत संस्कार करीत राहतील अशी दक्षता घेतली गेली आहे. "बरें सत्य बोला यथातथ्य चाला." येथपासून ते "शाळेला जातांना मुलांनीं वाटेत तमाशा पाहत थांबू नये" वा "सदा दात घासोनि तोंडा धुवावें" येथपर्यंत आदेश देण्यात आले आहेत. क्रमिक पुस्तकांतून त्यांचा समावेश करून ते वळण लहानपणापासून लागेल अशी व्यवस्थाहि केली जात होती. पण अलीकडे कर्मठतेचा, घातक रूढीचा, शब्दप्रामाण्यत्वाचा, बंधनांच्या अतिरेकाचा धिःकार करणे आवश्यक आहे या विचाराखालीं केवळ परंपरेने आले आहेत आणि धर्माच्या वा नीतीच्या कक्षेत मोडतात म्हणून अनेक जुन्या आदेशांचे अविवेकाने विडंबन करण्याची प्रथा रूढ झाली आहे. एका कवीनें मनाच्या श्लोकाचे विडंबन केलें - मना सर्वथा नीट पंथें न जावें. इत्यादी. विडंबन हें दंभाचारावरचे एक खुसखुशीत औषध आहे हे मान्य, पण दंभ आणि त्याचे विडंबन या गोष्टी कळण्यासाठी बुद्धि, विवेक-विचाराने बरीच प्रौढ झालेली असली पाहिजे. बालबुद्धीला हे कळणे शक्य आहे काय ? म्हणून त्याच्या हातांत पडावयाचे वाङ्‌मय ध्वन्यर्थाने व लक्षणेने भारावलेले असता कामा नये. ते साधे, सरळ, कथाप्रधान असावे. लहानपणीं स्मृति जितकी जागृत असते तितकी प्रज्ञा जागृत नसते. म्हणून स्मृतीला पुरेसे काम द्यावे आणि प्रज्ञेला फार डिवचू नये. एवढे तरी शिक्षणशास्त्रज्ञ म्हणविणार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे ना ! पण खेदाची गोष्ट अशी की आजची अनेक क्रमिक पुस्तकें पाहिली की शिक्षणतज्ञ म्हणविणारे नव्या नव्या खुळांना बळी पडत आहेत, खोल विचार करीत नाहीत असे म्हणावेसे वाटते. "तू फार शहाणा आहेस" या वाक्यांतील दंश कळण्याइतके तरी सर्वसामान्य बुद्धीच्या मुलाचे वय वाढलेले असले पाहिजे ना ! यासाठीच अनंतफंदीने सर्वसामान्यांचा विचार करून "धोपटमार्गा सोडू नको" असे सांगितले आहे. आपण मात्र विडंबन, वांकडेपणा, दंश यालाच साहित्य मानीत आहोंत की काय असे वाटू लागले आहे. ही वक्रता ललित साहित्याला शोभून दिसते हे मान्य केले तरी सत्यसंकल्प करीत असावा या आदेशाशीं मात्र प्रतिकूल आहे. तेव्हां आर्जव, सरळपणा, प्रसाद, माधुर्य याच साहित्यगुणांचा सत्यसंकल्पाच्या वाढीसाठी अवलंब केला पाहिजे. चांगल्याचे चिंतन केले पाहिजे व वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे. या दोन गोष्टीं वेगवेगळ्या व स्वतंत्र नाहींत. त्या परस्परपूरक आहेत. सात्त्विकता या एका नाण्याच्या या दोन बाजू आहेत असे म्हणता येईल, म्हणून दोन्ही अंगांनी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. नाहीतर आवश्यकतेच्या नावाखाली संकल्पाला वाईट वळण कधीं लागले ते कळणारहि नाही. निसर्गतः शरीर, मन, बुद्धि यांना आपापल्या पातळीवर कांहीं आवश्यकता असतात व त्या पुर्‍या करणेहि इष्ट असते. आवश्यकतेच्या कांटेकोर मर्यादेच्या आंत अपेक्षाची पूर्तता करणे यांत वाईट कांहींच नाहीं. परंतु मोहाने ही मर्यादा कळत नकळत ओलांडली जाते. संकल्प, कल्पना, विषयासक्ति आणि विकृति, विकार या क्रमाने मूळच्या आवश्यकतेनुसार उत्पन्न झालेल्या अपेक्षेचा वा संकल्पाचा अधःपात होऊ लागतो आणि त्याची परिणति शेवटी लोकांमध्ये अशा व्यक्तीची छीः थूः होण्यांत होते. संपत्तीच्या उन्मादांत ते इतकें जाणवत नाहीं. अलीकडे आपण ज्या पद्धतीने नागरी जीवन जगतो त्यांतहि दुर्वर्तनामुळे होणार्‍या छीः थुः पासून स्वत:ला वाचविता येते. पूर्वी समाज-जीवनांतील व्यक्ति, इतकी अलग, इतकी तुटक, राहू शकत नसे. आडोसा कुठे, कोणाला, किती याचे नियम होते आणि त्यामुळे दुर्वर्तन चटकन प्रगट होत असे. आणि त्यामुळेच काझी प्रकरणासारखी फसवणुकीची प्रकरणे घडत नसत. अलीकडे तुझे मी पाहत नाहीं, माझे तू पाहूं नकोस, ही वृत्तीच प्रतिष्ठा पावली आहे. आणि त्यामुळे विकार मोकाट सुटल्याने प्राप्त होणारी अवहेलना तितक्या प्रमाणांत जाणवत नाहीं, हे खरे असले तरी समर्थांनी सांगितलेला नियम सभ्य-सज्जन माणसांनी लक्षात ठेवलाच पाहिजे.

लोकामध्ये छीः थुः होऊ नये ही भावना जर व्यक्तिव्यक्तीच्या अंतःकरणांत जागृत झाली आणि कोणत्याहि परिस्थितींत दुर्वर्तनी माणसाला प्रतिष्ठा मिळणार नाहीं इतका समाज दक्ष झाला तर अलीकडे आपण पाहतो ती सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराची परिस्थिति सुधारून समाजामध्ये स्वास्थ्य, शांतता वाढेल यांत शंका नाहीं. आपल्या इतिहासांतील फार मोठ्या मोठ्या माणसांनी ही जाणीव ठेवली आहे. एका दृष्टीने भगवान रामचंद्र व दुसर्‍या दृष्टीने श्रीज्ञानेश्वर महाराज ही याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत.

आपण मात्र समाजाचा दृष्टिकोण उदार नाहीं अशी तक्रार करीत असतो. समर्थ सांगतात त्याप्रमाणे "विकारें घडे हो जनीं सर्व ची ची" हा व्यावहारिक नियम फार महत्त्वाचा आहे. हा धाक जर प्रत्येकाच्या मनांत राहील तर दुर्वर्तन होण्याचे कारणच राहणार नाही.[ Use Right click for download ]


नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारूं । नको रे मना मछरू दंभ भारू ॥ ६ ॥

आपण नेहमी ऐकतो तो अनुक्रम कामक्रोध, कामानंतर क्रोध, असा आहे. समर्थांनी मात्र इथे क्रोधाचा उल्लेख प्रथम केला आहे. याचे कारण कदाचित् विरक्तांच्या, तपस्व्यांच्या, धार्मिकांच्या जीवनात कामापेक्षा क्रोधाचाच आविष्कार अधिक उग्र असतो हे असावें. अपूर्ण राहणे हा कामाचा स्वभाव आहे. आणि तो तसा अपूर्ण राहिला की, स्वाभाविकपणेच क्रोधांत परिणत होतो. आवश्यक आणि इष्ट असा काम कोणता, धर्माविरुद्ध असा काम कोणता ? हे विवेकपूर्वक लक्षांत न घेता काम तेवढा सगळा वाईट या भावनेने आवरण्याच्या प्रयत्नांत तो दडपला जातो. पण नाहीसा होऊ शकत नाही आणि मग हा दडपलेला काम, क्रोधाचे, द्वेषाचे रूप घेऊन प्रगट होतो. वा क्रोधाचे वेगळे अस्तित्व मानले तर क्रोधाला उत्पन्न करतो. अनेक विरक्त, उपभोगाच्या दृष्टीने फार संयमी असलेली माणसे, संप्रदायाच्या दृष्टीने साधू, संन्यासी, गोसावी, बैरागी असलेले लोक, अनेकवेळां नको तेवढे संतापी असतात असे आढळते. आणि म्हणूनच कदाचित समर्थांनी क्रोधाचा उल्लेख प्रथम केला असावा. कदाचित् कामापेक्षा क्रोध हा जिंकण्यास सोपा म्हणून जिंकण्याच्या क्रमात क्रोधाचा आधी उल्लेख केला असावा. किंवा सामाजिक दृष्ट्या क्रोध अधिक उपद्रवी, सभोंवतीच्या लोकांना अधिक त्रासदायक असलेला, वातावरणातील प्रसन्नता त्वरित नष्ट करणारा असा असल्याने अधिक उच्छाद देणारा म्हणून त्याला प्राधान्य दिले असावे. धार्मिक, पारमार्थिक म्हणून ओळखल्या जाणाच्या माणसावर क्रोधाविष्ट होण्याचा प्रसंग वारंवार येतो असे आढळून येते. साधानमार्गाला लागलेल्या माणसासाठी कोणताहि उपदेश विशेष महत्त्वाचा असल्याने समर्थांनीं त्याहि दृष्टीने क्रोध आरंभी सांगितलेला असणार. कांहीं एका विचारसरणीप्रमाणे परमार्थमार्गात किंवा अध्यात्मिकतेत कामापेक्षां क्रोध अधिक अडथळा उत्पन्न करणारा असतो असे मानले जाते. अवस्थानुक्रमाने ते योग्यहि आहे. क्रोधांत प्रतिकाराची भावना प्रबल असल्यामुळे अहंकार अधिक बलवान् होतो व त्यामुळे प्रगतीला अडथळा होणे स्वाभाविकच आहे. सर्वसामान्यांचा विचार करतां परमार्थमार्गातील माणसे वा साधना करणाच्या व्यक्ति अधिक प्रगत असतात, अधिक विकसित असतात. त्यामुळे अहंकाराचे स्वरूपहिं थोडे उग्र असते आणि त्यांना आपल्याला कोणी मानीत नाहीं, आपले कोणी ऐकत नाही, असे लक्षात येते तेव्हा स्वाभाविकच ते संतापतात. आपण लोकांना जें सांगतो ते त्यांच्याच कल्याणाचे, त्यांच्याच हिताचे असतांना आपले लोकांनी ऐकू नये म्हणजे काय ? ही जाणीवच माणसांच्या मनांत क्रोधाचा भडका उडविते. म्हणून समर्थ म्हणतात- बा मना ! क्रोधाविष्ट होऊ नकोस. या विकारापासून दूर रहा. कारण क्रोध हा वरवर परिणामकारक वाटला तरी खरोखरीच शेवटी खेद उत्पन्न करणारा आहे. खिन्नता आणणारा आहे. अनुत्साह, नैराश्य, वैताग, विषण्णता ही सगळीं या खेदाचीच निरनिराळीं रूपें व अवस्थांतरे आहेत. क्रोधामुळे मनुष्य अधिकाधिक स्वयंकेन्द्रित होत जातो. तो परिस्थितीचे योग्य ते स्वरूप जाणून घेऊ शकत नाहीं, दुसर्‍याचा विचार करू शकत नाहीं, कोणाविषयीही सहानुभूति ठेवू शकत नाहीं, परिणामी लोकही मग त्याच्याविषयी अधिकाधिक विकल्प बाळगतात. आणि लोकांची ही वृत्ति लक्षात आल्यामुळे साधकाच्या मनालाही एक प्रकारची मरगळ येते वा कधी कधी त्याच्या भावना अधिकाधिक क्षुद्र होत जातात. मागच्या पिढीतील एका फार मोठ्या नामवंत इतिहासकाराच्या जीवनांत या क्रोधामुळे कांहीं वेळां किती कोतेपणा येत असे त्याचे वर्णन चरित्रकारांनी केले आहे. हे संशोधक एका गांवीं पाहुणे म्हणून गेले. यजमानाने त्यांना माडीवरची चांगली उजेडाची प्रसन्न खोली राहण्याकरिता दिली. पलीकडेच एक पटांगण होते व तेथे शाळेतील कांहीं लहान मुले खेळत होती. त्यांच्या आरडाओरड्याने हे संशोधक अस्वस्थ झाले आणि त्यांनी मुलांना दरडावले. मुले त्यामुळे अधिकच चेकाळली. तेव्हा या संशोधकांना वाटले की आपल्या शत्रूंनी आपणांस त्रास देण्यासाठी मुलांची बुद्ध्या योजना केली आहे. आणि त्या संतापाच्या भरांत नियोजित संशोधन सोडून ते थोर संशोधक निघून गेले.

विचारांच्या विस्कळीतपणांत व विसंगतींतहि या क्रोधीपणाचा परिणाम झालेला दिसतो. म्हणून समर्थ म्हणतात- स्वत:ला आणि भोवतालच्या वातावरणाला खिन्न करून टाकणारा हा क्रोध, हे मना ! तू जवळ करू नकोस. व्यवहाराच्या सामान्य पातळीवर कोणाकडून तरी कामे करून घेण्याच्या दृष्टीने खर्‍याखोट्या प्रलोभनाप्रमाणेच योग्यायोग्य धाकाचाहिं कांहीं प्रमाणांत तरी उपयोग होतो असे आढळून येते. त्यामुळे ज्याला कामे करून घ्यावयाची आहेत, कार्याचे उत्तरदायित्व ज्याच्यावर आहे, त्याला साधन म्हणून स्वतःसंबंधीचा धाक इतरांना राहील अशी परिस्थिति निर्माण करावी लागते. हा जो धाक आहे तो शील, चारित्र्य, कौशल्य, संबंधिताचे बरे-वाईट करण्याचे सामर्थ्य यामुळे मुख्यतः निर्माण होतो आणि त्याला वरवर तरी तापटपणाचे व संतापाचे सहाय्य होते. तेव्हा व्यावहारिक पातळीवर कामाप्रमाणेच क्रोधाचीहिं कांहीं उपयुक्तता आहे; पण तो केवळ साधन म्हणून असला पाहिजे. त्याला एखाद्या सेवकाप्रमाणे वागवता आले पाहिजे. परंतु ही गोष्ट फार कठीण जाते. साधन म्हणून क्रोधाला जवळ करतात अशी माणसे खरोखरी फार मोठी असावी लागतात. या थोर लोकांची विवेकशक्ति सदासर्वदा चांगली जागृत असते आणि म्हणून क्रोधासारख्या विकारांच्या ते आहारी जात नाहींत. तुकाराम, कबीर, यांच्यासारख्या सत्पुरुषांच्या वाङ्‌मयामध्ये ते रागावले आहेत, संतापले आहेत अशी उदाहरणे दिसतात पण त्याचे स्वरूप "मातेच्या कोपी थोकले । स्नेह आथी ।" (ज्ञा. २८८) असे असते. सामान्यांचा क्रोध हा मनोभंगातून आणि अहंकारांतून निर्माण होतो. तो केवळ साधन राहत नाहीं. सेवक राहत नाहीं. डोक्यावर चढतो, डोक्यांत चढतो, स्वामी होतो. अर्थातच अशा क्रोधाचा परिणाम इतरांवर किती आणि कसा होतो हे सांगणे कठीण आहे. पण जो रागावतो, संतापतो त्याला मात्र नानाप्रकारचा खेद भोगावा लागतो.

खेदकारी क्रोध कधी साधन नसतो. अर्थात् स्वसंरक्षणाच्या दृष्टीने अशा क्रोधापासून साधकाने तरी प्रयत्नपूर्वक दूर राहिले पाहिजे.

कामाचे मूळ शुद्ध स्वरूप उपयुक्त असेच आहे. धर्माने नियंत्रित असलेला, सदाचाराच्या मर्यादेत वावरणारा, संतसत्पुरुषांचे वा श्रुतिस्मृतींचे आदेश शिरसावंद्य मानणारा काम हा स्वीकारण्यास योग्य असाच असतो. गीतेच्या सातव्या अध्यायांत भगवान् अशा कामाला स्वत:चे स्वरूप मानतात. तो काम येथील काम नव्हे. हे समर्थांनी नाना विकारी हे विशेषण देऊन स्पष्ट केले आहे. आवश्यकतेच्या मर्यादेंतला काम, शुद्ध स्वरूपांतला काम हा कधीहि नानाप्रकारचे विकार निर्माण करणारा नसतो.

काम या शब्दाने सामान्यतः स्त्री-पुरुष संबंधाची अभिलाषा, लैंगिक वासना असा अर्थ गृहित धरला जातो. प्रमाण आणि प्रभाव विचारात घेता ते ठीकही आहे. खरे म्हणजे कोणतीहि इच्छा होणे, कांहीं हवे वाटणे, हे मिळाले नाही तर चालणार नाही असे वाटणे हे सगळेच काम या शब्दाने गृहीत धरता येईल, परंतु खर्‍या शास्त्रपूत आवश्यकतेच्या मर्यादेत जे हवे वाटते, पाहिजे वाटते, ज्याची इच्छा होते तो हा काम नव्हे. त्या कामाची कुणी निंदा करीत नाही. शरीर-मनबुद्धीच्या स्वास्थ्यासाठी, विकासासाठीं, उन्नति-प्रगतीसाठी त्याची आवश्यकता असते. पण आवश्यकतेच्या पूर्तीसाठीं उत्पन्न होणाच्या इच्छांचे स्वरूप इतकें स्वाभाविक राहत नाही. अनेक प्रकारच्या कारणांनी त्या त्या इंद्रियांना आणि मनालाहि विषयांच्या उपभोगाची चटक लागते. ही लागणारी चटक येथे काम या शब्दाने अभिप्रेत आहे. विषयोपभोगांतील हे अतियोग, मिथ्यायोग, क्वचित् हीनयोग हे कामाचे स्वरूप राहते व त्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक विकार उत्पन्न होतात. पाश्चात्य मानसशास्त्राचा बहुतेक भर लैंगिक कामावर आहे व त्यामुळे उद्‌भवणार्‍या अनेक शारीरिक मानसिक विकृतींचे वर्णन त्या शास्त्रातून येते. आपल्या परंपरेत काम शब्द यापेक्षा अधिक व्यापक अर्थाने वापरला जातो. निरनिराळ्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना सुखावह वाटणार्‍या अनेक प्रकारच्या शारीरिक अभिलाषा आणि सत्तासंपत्ति-मानमान्यता इत्यादि मानसिक अभिलाषा या सर्व कामाचीच प्रतीके आहेत. व्यक्तिव्यक्तींचा विचार करता लैंगिक वासनेचे स्वरूप बरेच व्यापक आणि उत्कट असते व त्यामुळे काम शब्दाने तेवढेच प्रथम लक्षांत येते हे जरी खरे असले तरी शब्दस्पर्शरूपरसगंधाची अभिलाषा किंवा धन-पदलौकिकाची हांव हीहि वैयक्तिक आणि सामाजिक जीवनांत अनेकवेळा प्रभावी होते असे दिसते. कामामुळे नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात असे म्हणतांना कामाचे स्वरूपहि तेवढे व्यापक धरले पाहिजे. व्यक्ति, कुटुंब, समाज, राष्ट्र या सर्व पातळीवर रोगांपासून युद्धापर्यंत, अस्वास्थ्यापासून संघर्षापर्यंत ज्या विकृति उत्पन्न होतात त्याला त्या त्या पातळीवरचा वा व्यक्ति-विशेषाचा काम हाच कारणीभूत असतो. निदान तो त्याचे प्रधान कारण तरी असतोच, कटकटी, भांडणे, अपहार, अन्याय, अत्याचार या सर्व भानगडी काममूलकच असतात. आणि मग या विकृतींनीं गांजलेली शरीरे वा मने परमार्थाच्या साधनामध्ये फारच मोठा अडथळा निर्माण करतात. यासाठी समर्थांनी मना ! नाना प्रकारचे विकार उत्पन्न करणार्‍या कामाचा तू अवलंब करू नकोस असे सांगितले आहे. शरीरयात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून वा परिस्थितिवशात् प्राप्त असलेली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी क्वचित् कोठे कधी साधन म्हणून कामक्रोधांचा अवलंब करावाच लागतो पण त्यामुळे वाटलेले सुख वा झालेला लाभ आसक्तींत परिणत होऊ नये म्हणून समर्थ म्हणतात- यांचा अवलंब सर्वदा करू नकोस, किंवा कामक्रोधाची लागलेली चटक एकदम नाहीशी होत नाही, शरीर-मानसिक विकृती वाढू नयेत हे कितीही खरे असले तरी अनेक कारणांनी विकृती वाढतात. अशा वाढलेल्या अवस्थेत त्या एकदम नाहीशा करणेहि धोक्याचे असते. म्हणूनहि समर्थांनी कदाचित् थोडी सूट देण्याच्या कल्पनेत कामक्रोधाचा अवलंब सर्वदा करू नकोस असे म्हटले असावे. ही तिसरी ओळ इतर तीन ओळींप्रमाणे स्वतंत्र लागत नाही. तिचा विनियोग पहिल्या दोन ओळींतील विकाराकडे किंवा चवथ्या ओळीतील विकाराकडे केला पाहिजे. चवथ्या ओळीतील विकाराकडे दंभ, मत्सराची उपयुक्तता जवळजवळ शून्य असल्याने तिसरी ओळ पहिल्या दोन ओळींतील विकारांकडेच लावणे बरें.

कांहीं पुस्तकांतून 'नको रे मना सर्वदा अंगिकारू' च्या ठिकाणीं 'नको रे मदा सर्वदा अंगिकारू' असा पाठ आहे. पण मग सर्वदा शब्दाचा अन्वय करणे कठीण जाते, मदाच्या बाबतींत सर्वदा नकोकधी कधी असं दे, असे म्हणता येणार नाहीं. सर्वदा शब्दाचा अर्थ कधीच असा करून संगति लावता येईल. पाठभेदानें तिसर्‍या ओळींत आलेल्या मद या विकाराचाही थोडा विचार करणे योग्य ठरेल.

मद म्हणजे ताठा, दर्प, गर्व, उर्मट, उद्दाम स्वभाव हेंच अहंकाराचें परिवर्धित आणि विकृत असे स्वरूप, मी जो, जसा, जेवढा आहे असे लोक समजतात त्यापेक्षा काहीं अधिक आहे, इतरांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे, तशी ते ठेवीत नसतील तर मला ती त्यांना करून दिली पाहिजे असे वाटणें हें मदाचे प्राथमिक स्वरूप. श्रीमंत-सत्ताधारी माणसे, कलावंत-विद्वान-कर्तृत्ववान् लोक, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, वक्ते, साहित्यिक, सुंदर स्त्रिया, बुद्धिमान् पुरुष, तरुण-त्यांतहि तारुण्यांत नुकतेच पदार्पण करणारे युवक - या सर्वांच्या ठिकाणी मद या विकाराचा प्रादुर्भाव बहुधा होतो. त्यामुळे इतरांच्याकडे तुच्छेतेने पाहणे, इतरांची अवहेलना करणे, ज्याच्याविषयीं वास्तविक आदर बाळगावा, त्यांच्यापुढेहि उद्दामपणाने वागणे, उर्मटपणाने बोलणें, तुसडेपणा दाखविणे, आपले दोष विचारांत न घेणे, इतरांच्या सद्गुणांकडे दुर्लक्ष करणें, दुसर्‍याचे दोष हुडकणे ही सर्व मदाचींच निरनिराळीं रूपे आहेत. थट्टा, लीला ही समान अधिकार्‍याशी, समान अधिकाराच्या क्षेत्रांत, समवयस्कांत क्वचित् शोभून दिसली तरी वयाने, मानाने, योग्यतेनें-अधिकाराने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात थट्टेचा अवलंब करणें हेंहि मदाचेच एक रूप आहे. दुर्गुणाचा त्याग करण्यासाठी स्वत:जवळच्या दोषांची चांगली जाणीव असावी लागते. पण मदामुळे माणसाला त्यादृष्टीने पार आंधळेपणा येतो. त्याला स्वत:चे दोष दिसतच नाहींत. कुणी दाखवले तर पटत नाहींत. आणि त्यामुळे सुधारण्याची शक्यता दुरावते वा नाहीशी होते. दुसर्‍यांचे सद्गुण न कळल्यामुळे त्यांना कुणी आदर्श असत नाहीं, कुणी अनुकरणीय उरत नाहीं, अर्थात प्रगतीची तीहि दिशा बंद होते. म्हणून मदाला कधीच जवळ फिरकू देऊ नकोस असें समर्थ म्हणतात.

वक्ता मीच, धनाढ्य मीच, जगती माझीच रीती बरी ॥
कर्तृत्वास मदीय पार न कुणा बुद्धीत माझी सरी ॥
सत्ता एक मलाचे योग्य, सगळी व्हावी प्रतिष्ठा मला ॥
सारे विश्व मदांध तुच्छ समजे तो पाहिजे टाळिला ॥
असे एक सुभाषित आहे. ते या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखे आहे.

मत्सर आणि दंभ यांची तशी कांहींच आवश्यकता नाही. आवश्यकतेची फार ओढाताण करून त्यांच्या अस्तित्वाला मान्यता देणे योग्य नाहीं. मद-मत्सर हे नेहमींचे ओझे आहे. समर्थ त्यांना भार हे विशेषण देऊन एक प्रकारें अनवश्यकता, अनैसर्गिकता सुचवीत आहेत.

मत्सरामध्ये अंतःकरणाची क्षुद्रता, स्वभावाची नीचता व्यक्त होते. जे मला पाहिजे असते ते मला न मिळतां दुसर्‍याला मिळते आहे असे पाहून अंतःकरणाचा एक प्रकारे जळफळाट होतो. यामुळे लाभ कोणताच नाही. दुसर्‍याचे सुख न पाहवणे ही वृत्ति उभयपक्षी अस्वस्थता निर्माण करणारी आहे. मत्सर हे जसे क्षुद्रतेचे तसेच दुबळेपणाचेहि प्रतिक आहे. त्याचा अवलंब करणे हा एक प्रकारचा पलायनवाद आहे. म्हणून या घातक विकारांपासून साधकाने कोसों दूर राहिले पाहिजे.

दंभ ही अनधिकार लोकेषणेची संतति आहे. मान-सन्मान, प्रतिष्ठा, लौकिक या गोष्टी उत्कटतेने हव्याशा तर वाटतात; पण ज्या गुणांमुळे त्यांची सहजतया प्राप्ति होते असे शील, चारित्र्य, विद्वत्ता, त्याग, तप, इत्यादि गुण जवळ मात्र नसतात. आणि मग माणूस हे सद्गुण आपल्याजवळ असल्याचा देखावा करीत असतो. धार्मिकता सिद्ध करण्यासाठी टिळेमाळा, पूजापाठ, तीर्थयात्रा, यज्ञयाग, व्रतें, वैकल्ये इत्यादि इत्यादि कृत्यें तो करीत राहतो. श्रीसद्गुरु दासगणूमहाराजांनी आपल्या एका फटक्यांत अशा दांभिक धार्मिकतेचे वर्णन खोंचकपणे केले आहे. ते म्हणतात,

भाळिं टिळे ढळढळित चंदनी लावुनि चतुराईचे ।
जणू का सिग्नल आगगाडिचे ॥
उपकरण्याला बघुन भाळतां जरी भगवन् किरीटी ।
तरी का तांबट थोडे हटीं ॥
चांदी, सोने, पांच, हिर्‍याला जरि भगवन् भाळतां ॥
तरी का सराफ हटिं बैसतां ? ॥
उज्वल तांब्या, आसन लोकरी, घणघण वाजे घांट ।
पुजेचा लांबवरी बोभाट ।
वक्ता मीच, अनाव मीच, जगती माझीच रीती बरी ॥
कर्तृत्वास मदीय पार न कणा त माझी सरी ॥
सत्ता एक मलाचे योग्य, सगळी व्हावी प्रतिष्ठा मला ॥
सारे विश्व मदांध तुच्छ समजे तो पाहिजे डाळिला ॥
गुलाल, बुक्का, अबीर, चंदन, अष्टगंध, अर्गजा ।
पाहिजे, म्हणत गरुडध्वजा ॥
जाईजुई नी बकुल मालती निशिगंधाचा तुरा ।
हारामधिं निव्वळ बटमोगरा ॥
निरांजने ती दहाविस जळतीं नाश तुपाचा खरा ।
बदामी नैवद्याला शिरा ।
अशी पूजेची करी कवाईत बहुरूप्याचे परी ।
भक्तिचें नांव नसे अंतरी ॥

कपड्याचा भगवेपणा, मठमंहती, समाजकार्य, देशसेवेचा देखावा, निःस्पृहतेचा आव आणणे, त्यागाचे सोंग मिरविणे ही सर्व दंभाचींच निरनिराळी रूपें होत. साहित्यांतील वाङ्‌मयचौर्य हें दंभाचेच एक रूप आहे. व्यक्तीच्या व समाजाच्या हिताच्या सर्व क्षेत्रांत दंभाचे अस्तित्व उणेअधिक प्रमाणांत आहेच. त्यामुळे तात्कालिक लौकिक मिळाला तरी परिणाम ते अनिष्ट ठरते. वर्तनाला लागलेली खोटेपणाची चटक शेवटी माणसाचा घात करते म्हणून हे ओझे तू उचलू नको असें समर्थ सांगतात.

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ॥
स्वयें सर्वदा नग्न वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

कांहींहि चांगले, इतरांपेक्षा वेगळे, असे करावे या भावनेने कुणी त्या प्रयत्नास लागला की समाजामध्ये अशा व्यक्तीला त्रास देण्याची काही लोकांची प्रवृत्ति स्वाभाविकपणे आढळते. मग कुणी त्याची निंदा करतो, कुणी त्याला तिरस्काराने वागवतो, त्याचेकडे दोषैकदृष्टीने पाहून कोणी त्याचा मानसिक छळ मांडतो, कुणी त्याच्याविषयीं मत्सराने जळफळतो. अशा छळवादी व्यक्तींच्या हातांत असलेली सत्ता, त्यांना मिळालेली संधि आणि त्यांचे सामर्थ्य याला अनुसरून या छळाचे प्रमाण उणें-अधिक राहते. पण कोणत्याहि क्षेत्रांत त्या त्या साधकाला सुखावह परिस्थिति लाभत नाहीं, अनुकूल वातावरण भेटत नाहीं, हें मात्र सत्य आहे. कदाचित् ईश्वरी योजनाच तशी असावी. बुद्धि, कर्तृत्व, निष्ठा या गुणांना परिस्थिति प्रतिकूल नसेल तर तेज चढतच नाहीं. उन्नतीचा मार्ग दमछाक करणाराच असावयाचा, पण साधकाच्या दृष्टीने या प्रतिकूल वातावरणाचे दुष्परिणामहि होतात. त्याला उबग वाटतो. नैराश्य येते. तो विषण्ण होतो. पलायनवादी बनतो. वैतागाने, स्वीकारलेला मार्ग सोडण्यापासून तो देह सोडण्यापर्यंत त्याच्या मनाची सिद्धता होऊ लागते. ही परिस्थिति फार घातक असते. म्हणून समर्थ साधकाला उपदेश करीत आहेत कीं मना ! तूं अंतःकरणामध्ये अत्यंत श्रेष्ठ असे धारिष्ट धर.

तुझे धैर्य अविचल असू दे. अपुरें-थोडेसें, मधून-मधून व्यक्त होणारे धारिष्ट पुरणार नाहीं. धैर्य, वादळी मेघांना तोंड देत उभे असलेल्या पर्वत-शिखरासारखे स्थिर असले पाहिजे. श्रेष्ठ धारिष्ट म्हणण्यांत हा इतका भाव अभिप्रेत आहे. धारिष्टामध्ये प्रत्याघाताची कल्पना मूलभूत नाहीं. अविचल राहण्याची, सोसण्याची कल्पना मुख्य आहे. आक्रमण, प्रत्याघात हा शौर्यातील भाग आहे. स्थिरता, सोशिकपणा, न सोडणे, न पळणे, दटून उभे राहणे हे भाव धैर्य, धारिष्ट यांच्यात समाविष्ट होतात. म्हणून परमार्थमार्गातील साधकाचा तो महत्त्वाचा गुण. या मार्गात प्रत्याघात, आक्रमण विशेषसे अभिप्रेत नाही. कारण प्रत्याघात आणि संरक्षणासाठी आक्रमण हें शारीरिक पातळीवरच योग्य आहे. शारीरिक विरोध करणारी परिस्थितीची प्रतिकूलता निर्माण होईल तर गोष्ट निराळी. पण या पातळीवर प्रतिकूलता बहुधा उतरत नाही. ती उपेक्षा, तुच्छता, तिरस्कार, अवहेलना, निंदा याच मानसिक पातळीवर बहुधा राहते. आणि म्हणून साधकानें या बाबतीत जितका ठेवता येईल तेवढा सोशिकपणा ठेवला पाहिजे. शंकराचार्यांनी एका प्रकरण ग्रंथांत सोशिकपणाला-तितिक्षेला, क्षमेला वज्रानेंहि न भंगणाच्या कवचाची उपमा दिली आहे.

निंदा, तिरस्कार, उपेक्षा याचा जो जाच माणसाला होतो त्याच्या मुळाशी स्वत:विषयीच्या कांहीं कल्पना व स्वत:ची स्थिति कशी असावी याची अपेक्षा हीच कारणीभूत असते. साधकाला वाटते- मी कोणाच्या अध्यात मध्यांत नाहीं, मी कोणाला त्रास देत नाहीं, माझ्याकडून होईल तेवढे लोकांच्यासाठी करीत असतो, मी स्वीकारलेल्या मार्गामुळे कोणाच्या स्वार्थाला धक्का लागण्याची शक्यता नाहीं, अशा स्थितींत तिरस्कार-उपेक्षादि गोष्टी माझ्या वाट्याला कां याव्या ? खरे म्हणजे हे विचार माणसाच्या मनांत येतात, त्यांत केलेल्या कार्याचा गौरव अपेक्षित असतो. कौतुक हवेसे वाटते. ते घडत नाहीं तेव्हां मग तिरस्कार तरी कां अशी एक प्रकारची तडजोडीची वृत्ती तो स्वीकारतो. पूर्ण समर्पण, अहंकाराचा वा अस्मितेचा पूर्ण अभाव जोंवर वृत्तींना प्राप्त झाला नाहीं, मनाला प्राप्त झाला नाहीं तोंवर कांहीं ना कांहीं तरी प्रसंग असे घडत राहणारच, जेथें खरा जिव्हाळा असतो वा विरुद्ध दिशेने स्वार्थ असतो, तेथेंच स्तुतीची, कौतुकाची भाषा जन्म पावते. एरवी गुणग्राहकता ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. माणसे फुकटांतला भलेपणा मिळवण्यासाठी वा स्वत:च्या रसिकतेचे प्रदर्शन करण्यासाठींहि कांहीं वेळा गुणग्राहकता दाखवतात, कौतुक करतात. अल्प समज असलेले, बालबुद्धि असलेले लोक या दंभानेंहि सुखावतात. हा एक प्रकारचा तोंडदेखलेपणा आहे. त्याचा मोह साधकाने तरी धरू नये. स्वीकारलेल्या मार्गाच्या दृष्टीने प्रगतीउन्नतीसाठी ज्याचे सहाय्य होण्याची शक्यता असते, त्याच्याच शब्दांतून कौतुकाची वा प्रोत्साहनाची अपेक्षा करावी. इतरांच्या निंदा-स्तुतीकडे साधकाने तरी विशेषसे लक्ष देऊ नये. निंदा ऐकू आली तर उच्चारले गेलेले दोष आपणांत खरेच आहेत कां ? याचे मात्र परीक्षण करावे. पण त्यामुळे न्यूनगंड उत्पन्न होऊ देऊ नये.

कोरड्या भलेपणाची अपेक्षा करून मग खंत करण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून समर्थ श्रेष्ठ धारिष्ट ठेवण्यास सांगून होताच धारिष्ट कशाकशामुळे चळतें व त्यावर उपाय काय ते पुढच्या ओळींत सांगत आहेत. रामदास स्वामी म्हणतात दुसर्‍यांचीं नीच बोलणींहि तू सोशीत जा, नीच शब्दानें खोंचक, लागट, अवहेलना करणारे, हलकटपणाचे, दुष्टाव्याचे, असे सर्व प्रकारचे भाषण गृहीत आहे. हे सर्व योग्य त्या कारणावांचूनच असते किंवा फारच थोडे कारण या प्रसंगाला निमित्त झालेले असते. नीच शब्दानें ही अन्याय्य भूमिकाच स्पष्ट झाली आहे. अशा भाषणांतून संबंधित व्यक्तीने सुधारावे अशी अपेक्षा नसते. बोलणार्‍याच्या अंतःकरणांतील संबंधितांविषयीचा द्वेष, तिरस्कार, मत्सर या बोलण्यांतून व्यक्त होत असतो. अशा प्रसंगी साधकानें हे शब्दांचे आघात शांतपणाने सोसता यावेत अशी स्वतःच्या मनाची सिद्धता ठेवली पाहिजे. कोणीहि दोन माणसे एकत्र आली की नको तीं बोलणी ऐकण्याचा प्रसंग निर्माण होणारच हे गृहीत धरले पाहिजे. अशा वेळी त्याचा परिणाम होऊ देता कामा नये तरच साधकाला मार्गक्रमण शक्य आहे, नाहीं तर त्याची सर्व शक्ति परिस्थिति सुधारण्याच्या प्रयत्नांत वा परिस्थिति कशी सुधारावी या विचारांत वेचली जाऊन त्याला स्वत:च्या प्रगतीसाठी शक्तीचे पाठबळ मिळणारच नाहीं.

परिस्थितीवर कोणाचेहि नियंत्रण नसते. ती खर्‍या अर्थानें कोणी सुधारू शकत नाहीं. बिघडणे आणि सुधारणे हे दोन्हीहि स्वतःपुरतेच मर्यादित असते. त्याचे अनुषंगिक परिणाम कदाचित् परिस्थितीवर होत असतील पण माझी सुधारणा होण्यासाठी परिस्थिति सुधारली पाहिजे याच दृष्टीने कोणी विचार करीत राहील तर त्याची सुधारणा होण्याची शक्यता दुरावत जाईल यात शंका नाही. परिस्थिति अनुकूल असली तर साधकाला काही लाभ होतच नाहीं असे मुळींच म्हणावयाचे नाहीं. अनुकूल-प्रतिकूल वातावरणाचे परिणाम लाभहानींच्या दृष्टीने काही प्रमाणात अवश्य होतात. पण त्यासाठी किती प्रयत्न करावा, कसा, कोणता प्रयत्न करावा एवढाच विचार मनात ठेवणे मात्र श्रेयस्कर नसते. म्हणून समर्थ सोशीत जावे असा तितिक्षेचा, सहनशीलतेचा मार्ग सांगत आहेत.

सोसावे याचा अर्थ उपेक्षा करावी, तुच्छ लेखावे असा मात्र नाही. कारण त्यामुळे माणसाच्या अंतःकरणांतील अहंकार बळावतो. व्यवहारतः नैराश्याने खचून जाण्यापेक्षा अहंकाराच्या बळावर मनाची उभारी टिकून राहणे शक्य असले तर एका दृष्टीने ते इष्टच म्हटले पाहिजे. परंतु हा अहंकार निर्लज्जपणांतहि परिणत होऊ शकतो, आणि ती स्थिति फारच वाईट. तेव्हां उपेक्षेला तुच्छतेचे स्वरूप येऊ नये ही काळजी साधकाने घेतलीच पाहिजे म्हणून समर्थ "स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें" असे म्हणतात.

तुम्हीं बोलतच राहा. मी ते ऐकतच नाहीं. ही वृत्ति दुसर्‍या बोलणाच्या माणसाला अधिक चिडवण्यांत परिणत होते. म्हणून कुणी लागट बोलत असला तर आपली भूमिका काय आहे ते अवश्य स्पष्ट करावें. मात्र हे करीत असतांना ध्वनि चढा येणार नाहीं, भाषा समर्थनाची असणार नाहीं, वाक्यप्रयोग खंडनाचा नसेल, याची दक्षता घेतली पाहिजे. शब्द सौम्य आणि उच्चारण नम्रतेचे असले पाहिजे. याचा परिणाम हळूहळू परिस्थिति सुधारण्यावर होतो. होऊ शकतो. माणसाच्या भोंवती जसे सगळेच ज्ञानेश्वर-तुकाराम नसतात, त्याप्रमाणे सगळेच दुर्योधन-दुःशासनहि नसतात. दुष्टावा नाहीसा करता येत नाहीं. पण अपसमज दूर होऊ शकतात. स्वत:विषयीचे अपसमज पसरले तर त्यांतूनहि प्रतिकूलता निर्माण होऊ शकते. म्हणून स्वत:ची भूमिका स्पष्टपणे आणि सौम्यपणे पुनः पुनः प्रकट करण्याची आवश्यकता असते. म्हणून समर्थ स्वयें वदावें, सर्वदा वदावें, आणि नम्र वाचे वदावे असे आवर्जून सांगत आहेत.

माझी भूमिका लक्षात न येण्याइतकी भोंवतालची माणसें अडाणी आहेत काय ? एकदां सांगितले तर त्यांना कळू नये काय ? असा विचार साधकाच्या मनांत येतो आणि मग तो मौन स्वीकारतो. मौनामुळे त्याच्या अंतःकरणांत उत्पन्न होणार्‍या खिन्नतेला अधिक गंभीरता येते. आणि इतरांचे झालेले अपसमज दूर होण्यास साधन राहत नाही. उलट ते वाढण्याची शक्यताच बळावते. म्हणून स्वत:ची भूमिका, मनोवृत्ति, साध्य-साधनासंबंधींच्या अपेक्षा, या पुनः पुनः स्पष्ट करीत राहिले पाहिजे. त्यांत प्रदर्शन नसावे, स्वत:च्या गौरवाची भावना नसावी; पण संकोचहि नसावा, खोटी लज्जाहि नसावी. दुसर्‍याच्या अंतःकरणांतील रागद्वेषादि विकार नाहीसे करण्याचा हा चांगला मार्ग आहे म्हणून समर्थ "मना सर्व लोकांसि रे नीववावें' असे सांगतात.

आपल्याकडे प्राचीन काळापासून 'सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समारभे' असा संकल्प करण्याची पद्धत आहे. आपण जें सत्कृत्य आरंभिलेले असते त्याला शक्यतों कोणाचा विरोध असू नये ही या मागची भावना. इतरांच्या मनांतील सद्भाव साधकाच्या प्रगतीला अप्रत्यक्षपणे कारणीभूत होतो. प्रत्येक वेळीं सहकार्य लाभणें, देणे शक्य नसले तरी सद्भाव मिळणे, ठेवणे शक्य होते आणि त्याचा उपयोगहि होतो. म्हणून स्वतःविषयींचे विकल्प जनमानसांत निर्माण होणार नाहींत, वाढणार नाहींत तर उणावत जातील असा प्रयत्न साधकाने अगदीच वर्ज्य मानू नये. आरंभीच्या अवस्थेत तरी ही गोष्ट केवळ उपयुक्तच नव्हे तर आवश्यक समजली पाहिजे. सिद्धाची वा सिद्धतेच्या जवळ पोंचलेल्याची अवस्था निराळी आणि साधनेची प्राथमिक स्थिति निराळी. लोकांची क्षिति मी बाळगत नाहीं, मला त्यांच्या भावनेशी काय कर्तव्य आहे, हा विचार साधकाने सहसा करू नये, आपल्या वागणुकीने, आचरणानें, सरळपणाने, सौजन्याने, आर्जवाने, नम्रतेने इतरांची मने प्रसन्न होत राहतील अशी इच्छा बाळगावी आणि तसा यत्नहि करावा.[ Use Right click for download ]


देहे त्यागिता कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हे चि क्रीया घरावी ॥
मना चंदनाचें परी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जनां नीववावें ॥८॥

ज्या वृत्ति माणसाला नैसर्गिकपणेंच सहज मिळालेल्या असतात त्यांचाच उपयोग माणसाच्या प्रगतीसाठीं व्हायचा असतो. व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाच्या ठिकाणीं धनेषणा, दारेषणा आणि लोकेषणा या तीन वासना सहजपणे असतात. धनेषणा म्हणजे- उपभोगाच्या वस्तू प्राप्त करून देणारी साधने, ज्याच्या विनिमयांतून मिळतात ती–सत्ता, संपत्ति मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची वासना. दारेषणा म्हणजे- पंच ज्ञानेंद्रियांना शब्द-स्पर्श-रसादि विषयांपासून सुख मिळावे, ते सतत मिळावें, पुष्कळ मिळावे, विविध प्रकाराने मिळावे असे वाटत राहणे. स्त्रीविषयक अभिलाषा एवढाच दारेषणा याचा अर्थ नाहीं. तो अर्थ तर त्यांमध्ये समाविष्ट आहेच पण इतर इंद्रियांच्या भोगलालसाहि त्यांत समाविष्ट आहेत. दारेषणा हें उपलक्षण आहे. मिष्टान्ने, पक्वान्ने, खमंग पदार्थ खावेत, नाटक, चित्रपट, नृत्य पाहावें, संगीत ऐकावें, मऊ लुसलुशीत गाद्यागिरद्यांवर लोळावे, नानाप्रकारची सुगंधी द्रव्ये वापरावीत, या सर्व लालसा दारेषणेचेच अंग आहेत. लोकांनी कौतुक करावे, चांगले म्हणावें, स्तुती करावी, प्रशंसा करावी, मानपत्रे मिळवावीं, सन्मान व्हावा, सत्कार करावा, भोंवतीं माणसांची मोठी दाटी जमावी, असे वाटणे ही लोकेषणा. ही लोकेषणा अगदी लहान मुलांतहि असते. बाळ शहाणा म्हटल्यावांचून लहानलहान मुलेंहि सांगितलेली कामे उत्साहाने करीत नाहींत. दुष्ट, स्वार्थी, दुर्वर्तनी माणसालाहि आत्मसमर्थन करावेसे वाटते. लोकांकडून चांगले म्हणून घेण्यासाठी दंभाने चांगुलपणा मिरवावा असे वाटत असते. या तिन्हीं एषणा एकापेक्षा एक वरच्या दर्जाच्या, सूक्ष्म आणि उत्कट आहेत आणि यातल्या प्रत्येकीच्या प्राप्तीसाठी इतर दोघींचा कांहीं प्रमाणात तरी त्याग करावा लागतो असे त्यांचे संबंध आहेत. या सर्व एषणा मनुष्याला दुःखांत लोटणाच्या आणि समाजस्वास्थ्याला चूड लावणार्‍या आहेत. धनेषणा आणि दारेषणा या तर वैयक्तिक आणि सामाजिक अध:पाताचे प्रबल कारण होऊ शकतात. त्यांतून मुक्त होण्यासाठी लोकेषणेचे प्रलोभन उपयोगी पडणारे आहे. मनुष्य मनबुद्धीच्या दृष्टीने जों जो अधिक विकसित, प्रगत वा उन्नत तों तों त्याच्या अंतःकरणावर धनेषणेपेक्षा दारेषणेचा, दारेषणेपेक्षां लोकेषणेचा प्रभाव अधिकाधिक असतो व त्यामुळे दारेषणेमुळे धनेषणा व लोकेषणेमुळे दारेषणा क्षीणबळ होते वा सुटते. लोकेषणेचे शुद्ध स्वरूप हें सुसंस्कृतपणाचे लक्षण ठरते. प्रगतीचें, उन्नतीचे साधन ठरते. धनेषणा ही वस्तुतः मूलभूत एषणा नव्हे. त्यामानाने दारेषणा हीच अधिक मूलभूत एषणा आहे. कारण धन हे उपभोगाची साधने वा विषय मिळवण्याच्या कामीं व साठवून ठेवण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक माध्यम आहे. या माध्यमाच्या बळावर म्हणजेच संपत्तीच्या बळावर आपल्याला वाटेल तेव्हां वाटेल त्या वस्तू, वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या प्रमाणांत, मिळू शकतील या विश्वासानेच मनुष्य संपत्तीचा लोभ बाळगतो. पण पुढे त्याचेच व्यसन बनते आणि मग उपभोगांचा बळी देऊन, विषयसुखाकडे पाठ फिरवून, कांहीं माणसे तरी केवळ संपत्ति गोळा करण्याच्याच मागे लागतात. त्यांनाच आपण कृपण वा कंजूष म्हणतो, जे स्वत:हि उपभोगत नाहींत त्यांच्याकडून इतरांना सुखसाधनांचा पुरवठा होणे अशक्यच आहे. कृपणाच्या या वृत्तीचा उपहास करणारा एक मजेदार संस्कृत श्लोक उपलब्ध आहे. मूळच्या हिंदी सुभाषिताचा तो अनुवाद आहे.

भर्तारं कृपणं जगाद दयिता म्लाना मुखश्री कथं ।
किं कश्चित् कटितश्च्युतः पण इतः कस्मै प्रमादात् ददः ।
दत्तो नैव च्युतश्च नैव मयि तद् संभाव्यते वा कथं ।
दातारं प्रसमीक्ष्य कंचिदपरं कान्ते विषण्णं मनः ।

कृपण नवर्‍याला बायकोने विचारले- तुमचे तोंड का उतरलंय ? कडोसरीचा पैसा गळून पडला कां चुकून कोणाला दिलात ? तेव्हां नवरा म्हणाला भलतेच ! –कोणाला दिलाहि नाहीं आणि गळूनहि पडला नाही. माझ्याकडून या दोन्हीं गोष्टी होतीलच कशा ? पण येतां येतां एक खुळा मनुष्य पाहिला- भिकार्‍याने त्याला एक पैसा मागितला आणि त्याने खिशात हात घालून तो चटकन् काढून दिला. पैशासारख्या महत्त्वाच्या वस्तूचे महत्त्व मूर्ख लोकांना कळत नाहीं त्याचे वाईट वाटले मला ! अशी उधळपट्टी चांगली कां ? " कृपण प्रवृत्ति ही सर्वांत घातक प्रवृत्ति आहे. तिने प्रगतीची सर्व आशाच संपते. म्हणून कोठेंहि कृपणाची निंदा सर्वांत अधिक आढळते. कृपण मनुष्य कधीहि लोकप्रियता संपादू शकत नाहीं. त्यापेक्षा विलासी आणि चैनी माणसे अधिक लोकप्रिय असतात. खरी लोकप्रियता संपादन करण्यासाठींहि माणसाला विलासांत, उपभोगांत, चैनीत थोडी तरी काटकसर करावी लागते. दुसर्‍याकरिता झीज सोसावीच लागते. त्यामुळे समर्थ येथे लोकेषणेचे प्रलोभन मनुष्याच्या पुढे ठेवून व्यक्तीचा अधःपात करणार्‍या आणि समाजामधे अस्वास्थ्य, संघर्ष निर्माण करणार्‍या धनेषणा-दारेषणेतून त्याला बाहेर काढत आहेत आणि ही लोकेषणा म्हणजेच कीर्तीची अभिलाषा परमार्थालाहि विघातक होणार नाही अशा पातळीवर सहजपणे चढावी यासाठी देहपतनानंतरहिं टिकून राहील अशी कीर्ति संपादिली जाईल यादृष्टीने स्वतःचे वर्तन ठेवावे असे सांगत आहेत.

सत्ता आणि संपत्ति ज्यांच्याजवळ आहे अशा व्यक्ती स्वत:च्या नांवाच्या संस्था काढणे, स्वत:चे पुतळे उभारणे, इमारतीवर आपल्या नांवांच्या पाट्या लावणे अशासारख्या गोष्टी करून आपली कीर्ति टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. शील, चारित्र्य, सद्गुणाचा पत्ता नसला तरी पैशाच्या बळावर अशी कीर्ति त्यांना कांहीं काळ विकत घेता येते हे खरे, पण ही खरी कीर्ति नव्हे व समर्थांना ती अभिप्रेत नाहीं. ही एक प्रकारची प्रसिद्धि आहे, जाहिरात आहे. संपत्तीच्या बळावर गरजू लोकांची कांहीं नड भागवावी आणि त्यांच्यावर कृतज्ञता लादून स्वतःचे नांव मिरवून घ्यावे आणि त्यांतहि तीन पिढ्यांचा उल्लेख साधावा अशी ही बनियेगिरी आहे. मंदिराला एकादें चांगले चित्र भेट म्हणून द्यावे व त्यात आपल्या धंद्याची, दुकानाची, जाहिरात करून घ्यावी हे याचे क्षुद्रतम उदाहरण.

माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की त्याने स्वतः प्रयत्न न करताँहि लोकांनी पिढ्यान्‌पिढ्या त्याचे गुण गात राहिले पाहिजे. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, शिवाजी, अहिल्याबाई हीं त्यांची उत्कृष्ट उदाहरणे. अशी कीर्ति सत्तेनें वा संपत्तीने विकत घेता येत नाही. ती शील, चारित्र्य, कर्तृत्व, त्याग, औदार्य, पराक्रम, जनहिताची तळमळ, इत्यादि, इत्यादि सद्गुणांच्या बळावर प्राप्त होत असते. हे सद्गुण केव्हा तरी निमित्ता-निमित्ताने प्रगट होऊन चालत नाहीत तर ते सद्गुण हाच माणसाचा स्वभाव बनावा लागतो. हे इतके सोपे नाही. याकरितां त्याग, श्रम आणि सातत्य अपेक्षित असते. श्रीमंतांचे वा सत्ताधार्‍यांचे पुतळे उभारले जातात. त्याखाली त्यांची नावेहि झळकतात. पण 'कोण हो हे फलाणे फलाणे ! असे विचारण्याचा प्रसंग येतो. नांवाची पार्टी पहावी आणि हे नाव कोणाचे असे विचारण्याचा प्रसंग यावा यावरूनच विकत घेतलेल्या तथाकथित कीर्तीचे मोल जाहिरातींची हस्तपत्रे लोक वाचून फेकून देतात. ती पायदळी तुडविली जातात. पण ही नांवे दगडात खोदून भिंतीत बसविली असल्याने पायदळीं तुडविली जात नाहींत इतकेंच, पण जनमानसांतून ती बाहेर फेकली गेलेली समोर दिसले तरी व्यक्ति न स्मरणे ही एक प्रकारे पायमल्लीच नाही काय !

विचारणार्‍या अज्ञानी व्यक्तीच्या बाबतीतहिं अशा गोष्टी घडतात पण ते इथे अभिप्रेत नाही. एखाद्याने कोण व्यास, कोण वाल्मिकी असे विचारले तर त्यांत विचारणाराच्या बुद्धीची खालची पातळीच व्यक्त होत असते.

चिरस्थायी कीर्ति लाभण्यासाठी माणसाला नि:स्वार्थपणे श्रम करावे लागतात आणि तेच चंदनाप्रमाणे झिजावे या उपमेनें समर्थ स्पष्ट करीत आहेत. रामकृष्णांप्रमाणेच रावणकंसाचीहि नावे लोकांना ठाऊक असतात. अशोक-चंद्रगुप्ताप्रमाणे चेंगिझखान आणि औरंगजेबहि लोकांना विसरता येत नाहीं. समाजाची सेवा करणाच्या पुढार्‍याप्रमाणेच क्रूर दरोडेखोरांची नांवेंहि वृत्तपत्रातून झळकतात, अधिक ठळकपणे झळकतात, पण ही कीर्ति नाहीं; ही अपकीर्ति आहे. ती येथे समर्थांना अभिप्रेत नाहीं व हेच त्यांनी चंदनाच्या उपमेंतून स्पष्ट केले आहे. चंदन जसे सुगंधी आणि शीतल असते आणि आपल्या या गुणांचा लाभ लोकांना व्हावा म्हणून ते स्वतः झिजत राहते, त्याप्रमाणे माणसाने सद्गुणी व परोपकारी असले पाहिजे. श्रमाला, त्यागाला न कंटाळता लोकांना सुखावण्यासाठी, समाजाच्या देशाच्या हितासाठीं, सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यावेळी स्वत:च्या शरीरसुखाकडे दुर्लक्ष करावें लागले तरी ते श्रेयस्कर मानले पाहिजे. सहाणेवर उगाळल्या जाणार्‍या चंदनाची उपमा देण्यांत एवढा सर्व भाव अभिप्रेत आहे.

हा त्याग, हे कष्ट; ही स्वसुखनिरपेक्षता, हे परिश्रम म्हणजेच चंदनासारखें झिजणें कोणाकरितां असावे ? या प्रश्नांचे उत्तर देतांना समर्थ म्हणतात- कीं तुझ्या वर्तनानें, तुझ्या कृतीने सज्जनांचे अंतःकरण प्रसन्न झाले पाहिजे, त्यांच्या मनाला समाधान झाले पाहिजे. प्रयत्नशीलापुढे ठेवलेले हे ध्येय महत्त्वाचे आहे. कारण स्वत:च्या धनेषणा, दारेषणा, लोकेषणेसाठी लोक नाना प्रकारचे कष्ट करीत असतातच. कधीहि समाधान न पावणाच्या, तृप्त न होणार्‍या, पुरेसं झालं, पुष्कळ केलंत असे न म्हणणार्‍या, जामात, जठर, जायेसाठी अहोरात्र राबणारे मानवी जीव या जगांत पुष्कळ आहेत. अतिश्रमामुळे त्यांना क्षयहि होतो. पण हे झिजणें चंदनाप्रमाणें नाहीं. चंदन जसें देवपूजेसाठी झिजते, तसे माणसाचे श्रम सज्जनांच्या तोषासाठी असले पाहिजेत. सज्जन हा तोंडाने बोलत नाहीं. तो सहसा कोणाला, जिभेनें वाईट म्हणत नाही; पण त्याचेंहि अंतःकरण चांगल्या कृतीने सुखावते. आणि वाईट वर्तनाने दुखावते. म्हणून समर्थ सज्जनांच्या अंतःकरणाचा उल्लेख आवर्जून करीत आहेत. तोंडपुजांनी केलेली स्तुती, दुर्जनांनी केलेली निंदा आणि सज्जनांचे मौन वा कौतुक यांचे स्वरूप समजावून घेतले पाहिजे तरच कसे वागावें हें नीटपणे कळेल अन्यथा आत्मवंचना पदरीं येईल.[ Use Right click for download ]


नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अति स्वार्थड्बुद्धी न रे पाप साचे ।
घडें भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दुःख मोठें ॥९॥

माणसाने नि:स्वार्थी असावें, स्वार्थत्यागी असावे, असे आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितलेले आहे. स्वार्थत्यागी पुरुषांना आपल्या संस्कृतीमध्ये परम आदरणीय मानले जाते. समर्थ या श्लोकामध्ये स्वार्थ सोडण्याचाच आदेश देत आहेत. तेव्हां निःस्वार्थी कोणाला म्हणावे किंवा स्वार्थाच्या मर्यादा कोणत्या ? अतिस्वार्थाचे स्वरूप काय ? हे एकदा नीटपणे समजून घेतलेच पाहिजे, भर्तृहरीने दुसर्‍याच्या सुखाकरिता स्वार्थत्याग करणाराला उत्तम म्हटले असून सामान्य माणसाने निदान स्वार्थाला अविरोधी असतांना तरी इतरांना सहाय्य करावे अशी अपेक्षा बाळगली आहे. पण या "स्वार्थाला अविरोधी" चे स्वरूप निश्चित होण्यासाठी त्याने अधमाचे लक्षण सांगताना जो स्वार्थ साधण्यासाठी इतरांच्या हिताची हानि होईल असे वागतो त्याला राक्षस म्हटले आहे.

यासाठी स्वार्थ शब्द सर्व प्रकारांनी जाणून घेणे अपरिहार्य आहे. स्व अधिक अर्थ, याचा शब्दशः अर्थ स्वतःला आपल्याला पाहिजे असणे, हवें वाटणे, कशाची तरी अपेक्षा असणे असा आहे, आणि जोंवर शरीर धारण करावे लागते तोंवर शब्दशः अर्थाने निःस्वार्थी होणे ही अशक्य गोष्ट आहे. अत्यंत पूर्णावस्थेस पोंचलेल्या योग्याचे काय होत असेल कोणास ठाऊक ? पण इतर सर्वांना निश्चयाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत अन्न-वस्त्र-निवारा याची आवश्यकता राहतेच. अगदीं नंगे राहणारे गोसावीहि झोपडी वा अंथरूण-पांघरूण याचा त्याग करू शकत नाहींत असेच दिसून येते. (मग नग्न राहण्याचा उद्देश काय ते समजत नाहीं. ते विकार जिंकण्याचे साधन, कां विकार जिंकल्याचे प्रदर्शन ? ईश्वरच जाणे.) एरवीं सर्व थोर साधु-सज्जन-महात्म्यांना अगदी प्राथमिक स्वरूपाच्या अशा का होईना पण शरीरधारणेसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत अन्न-वस्त्रनिवार्‍याचा स्वीकार करावाच लागतो. ते चवींचे दास नसतील, त्यांचे हवें नको केवळ आरोग्यशास्त्राला धरून असेल, सामान्य जनाप्रमाणे ते त्यात ऐश्वर्य, प्रतिष्ठा, विलास मानीत नसतील पण कोणत्याही स्वरूपांत अन्नावांचून वा निवार्‍यावांचून राहणे फार काळ कोणालाहि शक्य नाही. त्यामुळे शास्त्रानेहि भुकेला एक प्रकारचा रोग मानून भिक्षान्नाने का होईना त्याची, चिकित्सा करावी असे सांगितले आहे. श्रीमतुशंकराचार्यांनी "क्षुद्‌व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम्" असे म्हटले आहे; पण लगेच या आवश्यकतेला कोणत्याहिं प्रकारानें आसक्तीचे, चैनीचे, भोगलालसेचे रूप येऊ नये म्हणून चेतावणी देतात की "स्वाद्वन्नं न तु याच्यताम्" गोड अन्न मिळावे, रुचकर अन्न मिळावे अशी, इच्छा करू नये. भिक्षा मागावी पण भजी वा जिलब्या तळून वाढा असे म्हणू नये, हें जें गोड वर्ज्य सांगितले आहे, ते त्यापासून भय आहे, म्हणून नव्हे. मधुमेही माणसाला गोड जसे वर्ज्य असते तसा प्रकार येथे नाहीं. गोडाचे भय बाळगणें हें दौर्बल्य आहे. निर्भयता हें परमार्थाचे महत्त्वाचे अंग आहे; आणि कदाचित् यासाठीच शंकराचार्य पुढे लगेच 'विधिवशात् प्राप्तेन संतुष्यताम्' असे म्हणतात. याचा अर्थ गोड मागू नये हे कितीहि खरे असले तरी दैवगतीने जर मिळाले तर ते फेकून द्यावे असेहि वागू नये. सर्व शरीरभोग हे प्रामाणिकपणे प्रारब्धाच्या आधीन ठेवावेत. केवळ शारीरिक हालचाली व्यतिरिक्त शरीरभोगांसाठी विशेष असे प्रयत्न करू नये, जे अनायासे मिळेल त्याचा समाधानाने स्वीकार करावा. स्वीकार आणि त्याग यांना फक्त आरोग्य रक्षण एवढेच प्रयोजन असावें, अपथ्य नसतांनाहि गोड खावयाचेंच नाहीं असा निश्चय केला तर अतिथीला देव मानणाच्या सद्गृहस्थाचे हालच होतील. देवतेला अर्पण करताना आपल्याला जे शक्य त्यांतील अधिक चांगले अर्पण करावे, हा जो नियम, त्याचे पालन गृहस्थाने मग कसे करावे ? सामान्यतः ही अडचण कोणाला विशेषशी जाणवत नाही. कारण मनाच्या दुबळेपणामुळे धार्मिक कृत्ये केल्यावाचून राहवत नसले तरी ती कशीतरी उरकून टाकण्याकडे माणसाची प्रवृत्ति असते. म्हणून तर पुण्याहवाचनाच्या सुपार्‍या, वाणाचा खण आणि होमाचे तूप हे असे स्वतंत्र जातीचे पदार्थ बाजारात मिळतात. या प्रवृत्तीमुळेच अतिथीनेच कांहीं कडक नियम केले तर त्याची अडचण आपल्याला जाणवत नाहीं. कदाचित् ते इष्टच वाटेल. पण अतिथीने असे कठोर नियम करावे की नाहीं आणि करावयाचे ठरविले तर त्याचा उद्देश काय असावा हे लक्षांत घेतलेच पाहिजे. साधकावस्थेत आरंभीं इंद्रियजयासाठी काही उग्र व्रतें निश्चयाने पाळावीहि लागतील, पण तो सार्वत्रिक नियम असू शकणार नाहीं. ती सहजता नव्हे. तात्पर्य असे कीं अपरिहार्य आवश्यकतेपुरती इच्छा करणे हा आपण समजतो त्याप्रमाणे स्वार्थ नाहीं. शास्त्राने तर "यावद् भ्रियेत जठरं तावत् स्वस्थं हि देहिनाम्" पोटापुरते घेणे हा प्रत्येक प्राणिमात्राचा अर्थात् मनुष्याचाहि अधिकार आहे असे शास्त्र सांगते, आणि त्यामुळेच आपल्या संस्कृतीमधे भिक्षा घेणाराच उपकार करतो, घालणारा करीत नाहीं अशी धारणा होती; आणि म्हणूनच आपल्याकडे सहस्रावधी वर्षांच्या काळात आर्थिक-कारणाचे संघर्ष कधीं जन्माला आले नाहींत. अलीकडे मात्र हे उदात्त स्वरूप राहिले नाही. आता दान देणारा उर्मट, निदान अहंकारी तरी, झाला आहे. आणि मागणारा लाचार आहे किंवा भिक्षा लादावी अशी त्याची वृत्ती आहे. पोटापुरते घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे हे खरेंच, पण हा अधिकार सांगणार्‍या शास्त्रानेच 'अधिकं योऽभिमन्येत स स्तेनि दण्डमर्हति' 'अधिकाची इच्छा करणारा चोर आहे. त्याला शिक्षा केली पाहिजे असेंहि सांगितले आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. देशकाल परिस्थितीप्रमाणे आश्रमव्यवस्थेला जे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यांतील कर्तव्याचा वा उत्तरदायित्वाचा विचार करतां सध्या आवश्यकतेच्या मर्यादा पूर्वीपेक्षा पुष्कळच रुंदावल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. एक काळ असा होता की ज्या वेळी गृहस्थाश्रमी ब्राह्मणानेंहि तीन दिवसांपेक्षा अधिक संचय करू नये असा आदर्श सांगितला होता, आणि एक वर्षपर्यंत संचयाची सूट देण्यात आली होती. पुढे शास्त्रानेहि आपले नियम थोडे शिथिल केले. गृहस्थानें अपत्यांचे संगोपन करावे, मुलांना चांगले शिक्षण देऊन वाढवावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन असा व्यवसाय मिळवता येईल, मुली चांगल्या घरात दिल्या जातील या गोष्टींसाठी आवश्यक तो संचय करण्याचीहि अनुज्ञा दिली आहे. आता या सवलतींचीहि अधिक ओढाताण केली पाहिजे कां ? मुलाचे योग्य ते शिक्षण झाले- तो पूर्ण वयामधे आला, मुलगी चांगल्या घरी दिली, तिचे वर्षसण पार पडले, पहिले बाळंतपणहि झाले, आतां आपल्यावरचे दायित्व संपले व त्यांच्यासाठी करावयाच्या संचयाची आवश्यकता उरली नाहीं असे वाटले पाहिजे. द्रव्यसंचय किती आणि किती प्रकाराने करावा याला काही मर्यादा असावी कीं नाहीं ? वृत्ति जर लोभीच राहिली तर शासनाचे काय किंवा धर्मशास्त्राचे काय, निर्बंध केवळ पुस्तकात राहतील. प्रत्यक्षात माणूस अनेक पळवाटा शोधून अनाचार करीतच राहील; आणि त्यामुळे तो स्वतःचे आणि समाजाचेहि स्वास्थ्य गमावून बसेल. यासाठी आवश्यकतेपुरत्या द्रव्यसंग्रहाला आडकाठी नसली तरी संपत्ति गोळा करण्याची मर्यादाहि लक्षात घेतली पाहिजे, तरच व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचेहि जीवन सुखावह होईल, म्हणून समर्थ म्हणतात की, "नको रे मना द्रव्य तें पूढिलांचे."

तुझ्या व्यतिरिक्त दुसर्‍या कोणाहि व्यक्तींचे द्रव्य तू घेता कामा नये. दुसर्‍याचे पैसे अनधिकाराने प्रत्यक्ष घेण्यामधे लांच किंवा चोरी असते, पण असे पैसे अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारे मिळविले जातात. तीहि वस्तुतः चोरीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जे आपल्या अधिकाराचें नाहीं ते कोणत्याहिं रीतीने मिळविणे ही चोरीच आहे कारण अधिकारापेक्षा अधिकाची अपेक्षा करणे म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे कोणाच्या तरी अधिकारावर अतिक्रमणच होते. त्याच्या अधिकाराचे काढून घेतल्यासारखेंच होते. कुणीतरी ते करणारच मग मीच का नको असे माणसाला वाटते. व्यवहारदृष्ट्या ते क्षम्यहि मानले जाते. योग्यहि मानले जाते. पण ते सज्जनपणाला शोभणारे नाहीं एवढे तरी निदान लक्षात ठेवले पाहिजे. नीतीचा नियम असा की इतर कुणी अनीतीने वागत असले तरी मी नीती सोडता कामा नये. स्वसंरक्षणाकरिता कराव्या लागणार्‍या प्रतिकारासाठी सर्वसामान्य नीतिनियमाला शास्त्रानेच अपवाद सांगितले आहेत. आणि प्रसंगविशेष त्यांचा अवलंब करणे हीहिं नीतीच आहे. पण तेच जीवन होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे.

श्रीमत् वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामी महाराज हे एक मोठे अधिकारी पुरुष अलीकडच्या काळात होऊन गेले. त्यांच्याविषयी असे सांगितले गेले आहे की त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत्या आणि विशेष कारणाने ते त्यांचा उपयोगहि करीत असत. पण त्यांनी त्याकरिता एक मर्यादा ठरवून घेतली होती. रोग घालविणे, पिशाच्च बाधा दूर करणे एवढ्यापुरताच ते आपल्या सामर्थ्याचा क्वचित् उपयोगहि करीत. पण मला नोकरी लागेल असे काही करा असे कोणी म्हणाले तर ते ऐकत नसत. कुणा भक्ताने याचे कारण विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण केले की याला जर नोकरी मिळवून देण्यासाठी मी माझ्या सिद्धींचा उपयोग केल तर सहजपणाने ती नोकरी ज्याला मिळाली असती त्याच्यावर मी अन्याय केला असे होईल, ते मी करणार नाही. पुढिलांच्या द्रव्याबाबत किती सूक्ष्म विचार करावा लागतो ते यावरून स्पष्ट होण्यासारखे आहे. लॉटरी किंवा रेस यांतून द्रव्यप्राप्ति व्हावी म्हणून देवाला कुणी नवस केला तर तो फलद्रूप होण्याची शक्यता नाही. रोगमुक्ति किंवा अपत्यप्राप्ति यांचे तसे नाहीं. ते प्रकरण पूर्णपणे त्या त्या व्यक्तिशी संबद्ध आहे. त्यात इतर कोणावर अतिक्रमण होणार नाही. तेव्हां आवश्यकतेपुरते घेणे यांत स्वार्थ नाहीं व त्यांत कुणाला लुबाडल्यासारखेहि होत नाही. आरोग्यापुरते अन्न व निवारा, समाजात संभावितपणे वावरण्यास उपयोगी पडतील अशीं वस्त्रादि साधने आणि मुलामुलींना योग्यरीतीने मार्गी लावण्यासाठी वेचावे लागणारें धन यासाठी कुणी काही केले (कांहीहि केले नव्हे) तर त्यात आक्षेपार्ह कांहीं नाहीं हे लक्षात घेऊन समर्थ म्हणतात, "अति स्वार्थबुद्धि न रे पाप सांचे."

"अधिकाची अपेक्षा करणे हे पाप आहे. ते तू करू नयेस." यावर कांही लोक असे म्हणतील कीं- मग ऐश्वर्य, समृद्धि, विलास, महत्त्वाकांक्षा या सर्व गोष्टी त्याज्यच मानावयाच्या काय ? आणि तसे मानले तर संतांचे सर्व वाङ्‌मय हे केवळ संन्याशासाठी, गोसावी-बैराग्यांसाठी आहे असे म्हणावे लागेल. सर्वसामान्य गृहस्थाला या उपदेशाचा उपयोग नाही असे होईल. पण ही शंका योग्य नाहीं. भारतीय संस्कृतीला तरी ऐश्वर्याचे, समृद्धीचे वावडें नाहीं. कोठे कोठें तीव्र वैराग्याचा उपदेश केला असला तरी तो आत्यंतिक भोगलोलुपतेच्या, अनावर आसक्तीच्या प्रतिकारासाठी केलेला आहे. समृद्धि, ऐश्वर्य, त्याज्य ठरविण्यासाठी नाहीं. "जोडोनिया धन उत्तम वेव्हारें" जर समृद्धि मिळणार असेल, ऐश्वर्य वाढणार असेल तर त्यांत निंद्य असे काही नाहीं. पण असे अगदी क्वचित् होते. समृद्धि आणि ऐश्वर्य एखाद्याच भाग्यवंताला सरळपणाने लाभतात. बहुधा यासाठी लांच, काळे व्यवहार, लुबाडणूक, फसवणूक, तस्करी अशी साधनेच वापरलेली असतात. या गोष्टी अति स्वार्थापायींच होतात. म्हणून समर्थांनी त्यांना पाप म्हटले आहे. आपल्या असामान्य कर्तृत्वाचा वा बुद्धीचा सदुपयोग करून कुणी श्रीमंत होत असला तर संस्कृतीला ते अमान्य नाहीं; धर्म त्याला फार तर अधिक उदार हो असा उपदेश करील. पण त्याज्य मार्गाने मिळालेली श्रीमंती त्याज्य आहे असे म्हणणार नाहीं. पण अति स्वार्थबुद्धीने 'प्रतिष्ठेसाठीं ऐश्वर्य,' या खोट्या कल्पनेने द्रव्य मिळविण्याचे जे न्याय्य मार्ग आहेत तेच डावलले जातात, साम्यवादामध्ये श्रीमंतीच त्याज्य मानली आहे. तर धनवाद्यांनी कोणत्याहि मार्गाने श्रीमंत होणे योग्य असे गृहीत धरले आहे. भारतीय संस्कृतीने या दोन्ही अतिरेकी व निष्ठुर समाज-पद्धतींचा त्याग करून न्याय्य मार्गाने श्रीमंत व्हा आणि औदार्यानें दीनजनांना सुखी करा, असे वागण्यास सांगितले आहे. त्यामुळे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला वाव राहूनहि त्याची परिणति कधीं सामाजिक संघर्षात झाली नाही. पण संस्कृतीच्या या आदेशाचे पालन सुटले आणि सामाजिक आपत्ति बळावत चालल्या. समाजातल्या सर्व गोष्टी बारकाईने न्याहाळणाच्या समर्थांच्या ते लक्षात आले आणि म्हणूनच त्यांनी अति स्वार्थबुद्धीला ती पापरूप असल्याने दूर ठेवा असा आदेश दिला.

पाप ही अशी वस्तु आहे कीं ती केव्हां ना केव्हां तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत भोगावीच लागते. त्यांतून कोणाची सुटका होत नाही. या जन्मीं नाहीं तर पुढच्या जन्मीं. या जन्मींचे नसेल तर मागच्या जन्मींचे, पण पाप हे आपले भोग देतेच. अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक, वैयक्तिक वा कौटुंबिक दुःखांच्या स्वरूपांत, पाप आपले परिणाम दाखवीत असते. म्हणून समर्थ म्हणतात "घडे भोगणें पाप तें कर्म खोटें." अतिस्वार्थबुद्धीने, लोभानें, न्यायान्यायाचा विचार न करता केवळ आपल्याच सुखसमृद्धीवर लक्ष ठेवून इतरांना त्यामुळे कितीहि कसाहि त्रास होत असला तरी तिकडे लक्ष न देता आपल्या अधिकाराचे जे नाहीं, ज्यांत दुसर्‍याची फसवणूक वा लुबाडणूक आहे, असे धन गोळा करण्याची प्रवृत्ति त्याज्यच होय, या प्रकाराने धन मिळविण्यासाठीं जें करावें लागते त्यांत सर्व निषेधांना धाब्यावर ठेवून वागावे लागते; आणि मग हें कर्म बाहेरून जरी सुखसमृद्धी वाढविणारे वाटले तरी परिणाम दुःखदैन्याला कारणीभूत होते, अशा श्रीमंत माणसाचें ऐश्वर्य आपणाला उघड दिसते. आपण त्याची चैन, त्याचा विलास, त्याची सामाजिक प्रतिष्ठा पाहून त्याचा हेवा करू लागतो. त्याचे अगदी आधुनिक पद्धतीने, अनेक सोयीच्या खोल्यांनी युक्त असलेले शृंगारलेले घर, त्यांतील वैभवी सुखसाधने, शृंगार-विलासाच्या अनेक वस्तू उघड पाहतों आणि मग माणसाच्या मनांत येते, आम्ही इतकें सरळपणाने वागतों, पापपुण्याचा विचार करतों तरी आमच्या कपाळीची प्रपंचातली ओढगस्त अवस्था कांहीं नाहींशी होत नाहीं, मग धर्माची बंधनें कशाला पाळावयाची ? पण या श्रीमंतीच्या अंतरंगांत डोकावून पाहिले तर ते जीवन अनेक प्रकारच्या दुःखांनी भारावलेलेंच दिसून येईल. त्या घरांत दिखाऊ शिष्टाचार आणि वरवरची औपचारिक सभ्य भाषा यांचा वावर दिसत असला तरी खरा जिव्हाळा, आपुलकी, परस्परप्रेमादर यांचा अभावच दिसून येतो. शरीर विलासांत लोळतांना दिसले तरी खरे आरोग्य अभावानेच दिसते. निद्रानाश, मानसिक अस्वास्थ्य, भय, चिंता, बुद्धीवर सतत दडपण, अपचन, रक्तदाब इत्यादि इत्यादि अत्यंत पीडाकर आणि बर्‍या न होणाच्या विकारांनी ही श्रीमंती सदैव त्रस्त झालेली, व्यथित झालेली असते. म्हणून समर्थ म्हणतात- ज्या कर्मामुळे पाप भोगावे लागते ते खोटे आहे, ते करू नये. जी संपत्ति सरळ मार्गाने मिळवलेली नाहीं तिचे फार मोठे दडपण उरावर असते. मग त्या भयाच्या, चिंतेच्या ताणांतून सुटका व्हावी म्हणून ही श्रीमंती व्यसनाधीन होते, स्वैर आचारांत, अनाचारांत बुडून राहते. यांतून पुन्हां निराळ्या आपत्ती जन्माला येतात. म्हणून अशा चिंतांनीं पोखरलेलें ऐश्वर्य खरे सुख स्वास्थ्य वा समाधान देऊ शकत नाहीं.

तो खरा सुखी की ज्याला चिंता नाहीं. प्रत्येक मिळवलेल्या पैशागणिक चिंता वाढत असेल तर त्याची अभिलाषा का करावी ? वाममार्गानें संपन्न होणारी कांहीं माणसे कधी कधी फार निगरगट्ट असतात, निर्लज्ज असतात, त्यामुळे त्यांचे ठिकाणीं भय, चिंता व त्यांचे परिणाम दिसत नाहीत. पण असे दुर्योधनीवृत्तीचे फार दुर्मिळ, अधमांच्या जातींतहि "लाखों में एक," तेव्हां त्या अपवादाचा विचार करण्याचे कारण नाहीं. सामान्यांनी आपल्या वर्तनाच्या समर्थनासाठीं अशी दुर्योधनी उदाहरणे विचारांत न घेणेच बरें ? असे वरून निगरगट्ट वाटणारे दुर्जनहि आंतून तसे नसतात. सज्जनाला जो आधार मानसिकदृष्ट्या का होईना लाभतो, तो दुर्जनाला कधीच नसतो. म्हणून अंतःकरणाच्या खोल तळाशी हा निर्लज्ज वाटणारा माणूसहि अस्वस्थच असतो. यासाठी समर्थांनी ज्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असे कर्म करू नये असे म्हटले आहे. "हांसत कर्म करावें, भोगावें रत तेच परिणामी" असा ज्या कर्माचा परिणाम दुःखदायक आहे ते करतांच कां ? ज्यामुळे स्वतःला अधःपाताच्या पातळीवर उतरावे लागते, जी शेवटीं वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक वा राष्ट्रीय पातळीवर पीडा देणारी, अस्वास्थ्य निर्माण करणारी अशी ठरतात, ती कृत्ये केव्हांहि झाले तरी टाळणेंच हितकारक असते. यासाठी प्रत्येकाने आपल्या हवें-नकोच्या मर्यादा शास्त्रपूत पातळीवर निश्चित केल्या पाहिजेत व त्यांतच समाधान मानण्याची संवय मनाला लावली पाहिजे. एका विशिष्ट मर्यादेनंतर तरी माणसाचें हें सुखसमाधान मनावर अवलंबून असते. मनाला जर योग्य त्या मर्यादेत मिळणाच्या सुखोपभोगांत संतुष्ट राहण्याची संवय लावली नाहीं तर कांहींहि व कितीहि मिळाले तरी मन असमाधानी आणि दुःखीच राहते. कारण "न होतां मनासारिखें दुःख मोठें."

अधिकाधिक सुख, चैन, विलासाच्या लालचीने आणि त्यातून निर्माण होणार्‍या राक्षसी महत्त्वाकांक्षेने बुद्धिमान माणसांनीं विज्ञान राबविले. परिणामतः वैज्ञानिक प्रगतीच्या एका शतकाच्या आंत, लक्षावधि वर्षे पृथ्वीवर सुखाने जगलेली मनुष्यजात, सर्वनाशाच्या खोल कड्याच्या टोंकावर येऊन उभी राहिली. पशुतुल्य दास्य कपाळी येऊन मिळणारी शांतता किंवा स्वैराचारी संघर्षाचा नंगा नाच यावांचून तिच्यापुढे पर्याय राहिला नाहीं. एकीकडे जीवन असह्य करून टाकणारी सर्व प्रकारची प्रदूषणें आणि दुसरीकडे सर्व जीवनच नष्ट करू शकणारी अणुध्वम्‌सारखीं वा त्याहूनहि भयानक अशीं शस्त्रास्त्रें मनुष्य जातीला एकाद्या भयानक राक्षसासारखी आपल्या दाढेखाली चिरडून गिळंकृत करण्यासाठी उभी आहेत. वैज्ञानिक प्रगतीचे हे परिणाम पाहिले म्हणजे मनूने महायंत्रनिर्माण हे पातक का सांगितले हे लक्षात येईल.

चंद्रशेखर रमणांसारख्या अलीकडेच दिवंगत झालेल्या थोर शास्त्रज्ञानींहि अंतराळयानांसारख्या वैज्ञानिक प्रगतीचा व्याप वाढविणे हे योग्य नाहीं असेंच म्हटले आहे. या अंतराळ संशोधनासाठी होणाच्या संपत्तीच्या प्रचंड व्ययामुळे मनुष्यजात दरिद्री होईल, राष्ट्रेच्या राष्ट्रें विनाश पावतील, असे भय त्यांनी व्यक्त केले होते. वैज्ञानिक प्रगतीच्या नादामध्ये निसर्गचक्र हें कांहीं अंशाने तरी अनियमित होते आणि त्यांतून अतिवृष्टि, अनावृष्टि, वादळे, उन्हाळ्या-हिवाळ्यांचा असमतोल अशा आपत्ति निर्माण होतात. असे भय, कुणी ज्योतिषी नव्हे तर, नामवंत शास्त्रज्ञच अनेक प्रकारांनी व्यक्त करीत आहेत. या सर्वांचे मूळ माणसाच्या अतिरिक्त भोगलालसेंत वा अमर्याद महत्त्वाकांक्षेत आहे. पण माणसाने जणूं झापड लावून घेतली आहे आणि तो हे दूरदृष्टीने पाहण्याचे टाळीत आहे.

अलीकडे माणसाने भ्रामक बुद्धिवादाच्या आधारानें ईश्वराचे अस्तित्व, धर्माचे नियंत्रण, हे मानावयाचें नाहीं असे सोयीस्करपणे ठरविले असल्याने त्याला दुर्वर्तनाचीं वा स्वैराचाराची बोंच तितकीशी लागत नाही. त्यामुळे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मिळवावयाचे म्हणजे मिळवावयाचे एवढेच जणू ध्येय त्याच्या पुढे असते. कशाकरिता पाहिजे, किती पाहिजे, कसे मिळवावयाचे हा विचारच तो करीत नाहीं. आणि मग अधिक, याहून अधिक, एवढीच दुःखदायक दैन्यपरिणामी धारणा त्याचेपुढे राहते. हे खरोखरीच योग्य आहे काय ? याचा विचार माणसाने केला पाहिजे.

लहान मुलाच्या संदर्भात एक लोककथा प्रसिद्ध आहे- एका कुटुंबात पति, पत्नी व दोन वर्षाचे लहान मूल एवढीच माणसे होती. आजच्या दृष्टीने अगदीं आदर्श कुटुंब. आईला कांहीं महत्त्वाच्या कामाकरिता बाहेर जाणे आवश्यक होते. लहान मूल घेऊन जाणे सोयीचे नव्हते. तेव्हा मुलाला सांभाळण्याची कामगिरी वडिलांच्यावर सोंपवणे आवश्यक होते, त्यांनी ती 'हो हो' म्हणून अभिमानाने पत्करली व घरांत होतीं नव्हती तेवढीं खेळणी मुलापुढे टाकली. सगळीं खेळणीं एकदम मिळाल्याने मूल थोडा वेळ फार आनंदले, पण तेवढ्याच लौकर त्याचा त्या खेळण्यांतील रसहि संपला; आणि ते खाऊ मागू लागले. वडिलांना समोरच गुळाचा डबा दिसला व तो काढून त्यांनी मुलाच्या समोरच त्यांतील सुपारी एवढा गूळ त्याच्या हातावर ठेवला. समोर गुळाने भरलेला डबा पाहिल्यानंतर मुलाने आणखी गूळ मागितला. वडिलांनी लिंबाएवढा गूळ त्याच्या हातावर ठेवला. मूल आणखी म्हणाले, वडिलांनी आंब्याएवढा गूळ दिला. मूल आणखी म्हणाले, नकार मिळताच त्याने भोकाड पसरलें. वडिलांनी वैतागून नारळाएवढा गूळ त्याच्यापुढे आपटला. तरी मुलाचे आणखी थांबेना. मारले, धोपटले तरी पोर ऐकेना. बापाने चिडून सगळा डबा मुलापुढे आदळला. तरी पोर आणखी म्हणून रडतच होते. वडील वैतागले. त्रस्त झाले. मुलापेक्षा मोठा आवाज काढून ओरडू लागले तरी प्रश्न सुटलाच नाहीं.

थोड्या वेळाने आई परत आली. घराचे रणांगण पाहून ती चकित झाली. क्षणार्धात सर्व परिस्थिति तिच्या लक्षात आली. थोडे स्मित तिच्या मुखावर उमटले. तिने प्रथम गुळाच्या डब्यासह सारा पसारा आवरला, डोळे, नाक, तोंड यांतील पाण्याने बरबटलेले मुलाचे तोंड स्वच्छ केले. त्याला उचलून घेऊन थोडे थापटले. थोपटलें. त्याच्याशी लाडिक बोलून भलत्याच गोष्टींत त्याचे लक्ष वेधून, कशाला तरी हात रे करून शांत केले, आणि मग विचारले तुला काय हवें ? मूल म्हणालें खाऊ ! पुष्कळ खाऊ. आईनें हंसून बरे म्हटले. मुलाला खाली ठेवून उचलून ठेवलेला गुळाचा डबा काढला. त्यांतील एक लहान सुपारीएवढा व एक मोठ्या सुपारीएवढा असे दोन खडे आपल्या दोन्ही हातांवर घेऊन मुलापुढे घरले आणि प्रेमळपणे म्हणाली, यांतला तुला पाहिजे तो घे बरें ! मूल हसले आणि त्याने आईच्या हातांतील मोठ्या खड्यावर झेप घालून तो खडा उचलला व तोंडात घालून आनंदाने ते खेळू लागले. आईने बापाकडे पाहिले. बापाने आपला पराभव मोकळ्या मनाने मान्य केला. घरामधली प्रसन्नता पुन्हा प्रगट झाली.

माणसाचे मन या लहान मुलासारखे आहे. इंद्रियें जणू त्याची समजूत पटावी म्हणून त्याच्यापुढे अधिकाधिक विषयोपभोगाची साधने ठेवतात तरी मनाची तृप्ति होतच नाहीं. त्याच्या 'आणखी आणखी' चा आक्रोश वाढतच जातो. शेवट इंद्रियें थकतात. तरी मन असंतुष्टच राहते. शेवटीं बद्धि कार्यकारी होते आणि ती ज्या मर्यादेत विषयोपभोग इष्ट आहे, योग्य आहे, हितकर आहे त्या मर्यादेत कांहीं उणें, कांही अधिक असे गट करून विषय त्यापुढे ठेवते. स्वाभाविक थोड्या अधिकाचा स्वीकार केला जातो. आणि थोडे उणे पाहिले असल्याने समाधानहि मिळते. यासाठीच आपल्या संस्कृतीनें अगदीं वेदकालापासून सुद्धा "अधःपश्यस्व मोपरि" - खालच्याकडे पहा वरच्याकडे पाहूं नको असा आदेश दिला आहे. मोटारींतून जाणाच्याने फटफटीवरून जाणाच्याकडे पहावे. त्याने दुचाकीवाल्याची परिस्थिति लक्षात घ्यावी. दुचाकीवाल्याने पायी चालावे लागत नाही ना याचा आनंद मानावा. पायी चालणाराने, अनवाणी चालावे लागणाराच्या दुःखाचा विचार करावा. पण होते ते नेमकें उलटे होते. मोटारवालाहि आपली गाडी फियाट किंवा अँबेसडर आहे म्हणून दुःखी असतो. डॉज, शेवरोलेट, इंपाला आपल्याजवळ नाहीं याचे त्याला दुःख होते, हे कुठे थांबणार ? आवश्यकतेला निश्चित सीमा राहते. अगदी देशकालपरिस्थितीचा विचार करूनहि आवश्यकता कधीं अमर्यादित होऊ शकत नाहीं. पण चैनीच्या कल्पनांना कधीहि अंतपार राहत नाहीं. "निस्वो वष्टि शतं, शति दशशतं लक्षं सहस्राधिपः" या सुभाषितांत वर्णिल्याप्रमाणे शंभर रुपये मिळणारा, पाचशें रुपये मिळविणारा या महागाईच्या दिवसांत आपलें भागत नाही म्हणतो हे समजू शकते, पण चार हजार रुपये मिळवणारा न्यायाधीशहि आपलें भागत नाही म्हणून त्यागपत्र देतो तेव्हा काय म्हणावे आणि त्यातहि तो समाजवादाचा पुरस्कर्ता ! मनुष्याच्या हावरेपणाचे यापेक्षा अधिक घोर विडंबन असेल असे वाटत नाहीं. बरें हें अधिक मिळविण्यासाठी तरी सरळ, संभावित, न्याय्य मार्गाचा अवलंब केला जातो का ? सौजन्य राखले जाते का ? तर तसेहि नाहीं. चोरटे व्यवहार, लुबाडणूक, फसवणूक, पिळवणूक, संप, बंद, घेराव, निष्ठूर दडपणे, क्रूर धमक्या यांचाहि अवलंब करण्यांत खंत वाटत नाहीं. या वृत्तीनेच वागावयाचे ठरल्यास कोणतेंहि शासन, कोणतीहि समाजरचना वा कोणतीहि वैज्ञानिक प्रगति मनुष्याला सुखशांतता देऊ शकणार नाहीं. नैसर्गिक इच्छा पूर्ण कराव्यात, त्या दडपू नयेत, याविषयी केव्हांच वाद नव्हता; पण जी जी इच्छा होते ती ती नैसर्गिकच आणि तिची पूर्ति झालीच पाहिजे हे मात्र केव्हांहि, कोणालाहि, कुठेहि न परवडणारेच आहे. भ्रांत बुद्धिवादी, संयमाला दडपण म्हणतात आणि दडपणाने विकृति येते असा कांगावा करतात. त्यांची ही विचारसरणी फोल आहे. संयमाने शक्तींचे संरक्षण होते आणि उपभोगक्षमतेचे सामर्थ्य व काल दोन्हींहि वाढतात, त्यामुळे तो रसिकतेने जीवनाचा उपभोग अधिक दीर्घकाळ घेऊ शकतो. उलट उत्तेजनाने आणि स्वैर उपभोगाने, उपभोगाची पात्रताच उणावते. कारण स्वैर उत्तेजनाने सामर्थ्य झपाट्यानें क्षीण होते आणि मग अशी माणसे घोर नैराश्याने आणि विषण्णतेने वयाच्या तिशी-पस्तीशींतच दीन, अस्वस्थ आणि विकृत होतात. म्हणून सुखाची कल्पना मनाच्या स्वाधीन केली तर दुःखाशिवाय कांहीं वाट्याला येण्याची शक्यताच नाही. असे सांगून श्रीसमर्थांनी माणसाने नेहमी संयमांत समाधान शोधावे असे सुचविले आहे.[ Use Right click for download ]


सदा सर्वदा प्रीति राम धरावी । दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी ॥
देहेदुख हें सुख मानीत जावें । विवेकें सदा सस्वरूपीं भरावें ॥ १० ॥

कोणाला तरी आपले म्हणावें, कोणावर तरी प्रेम करावें, परस्पर जिव्हाळ्याने समाधान मिळवावे, ही माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ति आहे. शरीराच्या आवश्यकता विशिष्ट प्रमाणांत भागल्या की त्याची ही प्रवृत्ति प्रकट झाल्याविना राहत नाहीं. पण ही भावना कुणाविषयीं धरावी म्हणजे हिताचे ठरते त्याचे उत्तर समर्थ देत आहेत. ते म्हणतात-प्रेम कर, तुला हव्या हव्या वाटणार्‍या गोष्टींपैकींच ती एक आहे, पण तुझे हे प्रेम रामावर असू दे. बायको, मुलें, घरदार, सत्तासंपत्ति हे तुझ्या प्रेमाचे विषय असू नयेत. घरादाराचा त्याग कर, कुटुंबातल्या लोकांशीं तुसडेपणाने वाग, असा याचा अर्थ मुळीच नाहीं. पण प्रेमाची जी उत्कटता तिचे अधिष्ठान कुटुंब व संसार असू नये एवढेच येथे अभिप्रेत आहे. आत्यंतिक उत्कट प्रेमाचे अधिष्ठान ते असावें कीं जें शाश्वत सुख, परमसंतोष वा आंतरिक प्रसन्नता मिळवून देईल. हे विषयप्रधान प्रपंचातून कधीहि मिळण्याची शक्यता नाहीं. म्हणून रामदासस्वामी "सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी" असे सांगतात. विषयांवर प्रेम करणे शिकावे लागत नाहीं. मिळवावे लागत नाहीं. विषयांची अभिलाषा असलेल्या इंद्रियांच्या माध्यमानें ती ओढ मनाला स्वभावतःच लागते. परमार्थाचें सुख हे इंद्रियनिरपेक्ष असल्याने त्याची आवड मात्र जोपासावी लागते, प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते. म्हणून समर्थ-रामाच्या ठिकाणी प्रीति धारण करावी आणि ती सदा सर्वदा म्हणजे अहर्निश उत्कटतेने असावी असे सुचवितात. संसारविषयक प्रेम, लोभ, आसक्ति यांना मात्र काळ, वेळ, व्यवहार यांच्या मर्यादा असतात, असल्या पाहिजेत. नाहींतर ते प्रकरण फार दुःखदायक होते. अधिक, आणखी अधिक हा परमार्थाचा पक्ष आहे. प्रपंचाचा नाहीं. कारण परमार्थ हा स्वभावतःच अनंत आहे. प्रपंचाचे तसे नाहीं. तेथे आधी मर्यादा आणि मग उपभोग असेंच धोरण असले पाहिजे. लुगडे केवढ्याचे घ्यावयाचे हे निश्चित झालें की मग काठ-पदर-रंग-पोत यांत आवडी-निवडीला वाव ठेवण्यास अडचण नाही. अन्यथा तसे व्यवहार दिवाळखोरीचे ठरणार, निदान उगीचच ओढाताण तरी निर्माण करणारच. म्हणून समर्थांनी संसारात यथालाभांत संतोष मानण्यास शिकावे म्हणजेच जीवाला होणारे दुःख सहजपणे टाळता येते असें "दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी" या शब्दांनी सांगितले आहे.

जीवाला होणाच्या बहुतेक सांसारिक पीडा या द्वेष, लोभ, आसक्ति इत्यादि विकारांच्यामुळे होणार्‍या आहेत. ओढ परमार्थाची ठेवावी. म्हणजे मूळ कारणेंच दूर झाल्याने दुःखहि टाकल्यासारखेच होते. पण शरीराच्या पातळीवर मात्र जे कष्ट करावे लागतात वा सोसावे लागतात, ते परिणामी सुखाचेच असतात. म्हणून शारीरिक कष्टांनाहि सुख मानण्यास शिकले पाहिजे हे लक्षात यावे यासाठी समर्थ म्हणतात- "देहेदुख ते सूख मानीत जावें." देहाला होणारे दुःख, 'देहे' ला होणारे कष्ट हे सुखकारक नसतात, हे खरें असलें तरी त्यांना सुख मानण्यास शिकले पाहिजे तरच हित होईल.

परमार्थाच्या दृष्टीने कुंती तर 'विपदः सन्तु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो' असेच मागते. कारण आपत्ती आल्या म्हणजेच परमेश्वराचे स्मरण व्हावे असा मनुष्यस्वभाव आहे. आपत्ती नसतांना परमेश्वराचे स्मरण राहूं नये वा राहू शकत नाहीं असा विपरीत ध्वनि कुंतीच्या वचनांतून काढू नये. कुंती ही फार थोर योग्यतेची स्त्री होऊन गेली, उत्कट, प्रेमळ भक्ताच्या भावनेंतून ती म्हणते की मनुष्याच्या स्वभावधर्माने एरवीं ईश्वराचे स्मरण राहणार नसेल तर ज्यामुळे ते स्मरण सतत होत राहील अशा आपत्ती पुन्हां पुन्हां आल्या तरी चालतील. कुंतीच्या म्हणण्याचा असा भाव आहे. क्रिया आणि प्रतिक्रिया बहुधा समान असते. या सिद्धांताप्रमाणेहि दुःख आनंदाने स्वीकारले तर मागोमाग सुख स्वभावतःच येईल आणि दुःखानंतर सुख भोगणें हेंच खरोखरी सुख असल्यानें ज्याच्या प्रतिक्रियेतून दुःख जन्माला येते, ते सुख मागण्यात काहींच अर्थ नाहीं. म्हणूनहि कुंतीने दुःख येऊ दे असे म्हटले असेल, ते काहीही असले तरी शरीराला सुखकारक न वाटणाच्या कृती परिणामी हितकारकच ठरतात.

आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने दैनिक जीवनांतहि हें अनुभवास येते. आरोग्याचे सुख मिळवावे असे वाटत असेल तर सुखासीन जीवनाचा त्याग केला पाहिजे. अनेक प्रकारांनी शरीराला कष्ट होतील असेंच वागले पाहिजे. ज्यांना पोटभर अन्न आणि पुरेसा निवारा मिळतो अशा शरीरकष्टावर जगणार्‍या, श्रमजीवी व्यक्तीचे आयुष्य, अतिरिक्त विलासांत लोळणाच्या श्रीमंतापेक्षा कितीतरी अधिक आरोग्यसंपन्न असते. जें जिभेला रुचकर ते आरोग्याला चांगले असतेंच असे नाहीं. भेळ, भजी, चिवडा, थालिपीठे, तळलेले पदार्थ, मिष्टान्नें हीं जिभेला नेहमीच हवी हवीं वाटतात. पण प्रतिदिनीं तसे पदार्थ खाण्यांत असणे आरोग्याच्या दृष्टीने फार घातक आहे. मसाल्याचे चमचमीत खमंग पदार्थ हे पुष्कळ प्रमाणांत खावेसे वाटतात हे खरेंच आहे. पण त्याने पोट बिघडते हे त्याहून खरे आहे. नुसती ताक-भाकरी, दूधपोळीं खा असे पोट बिघडलेल्या माणसाला सांगितले तरी ते त्याला मानवत नाहीं, तोंडी लावण्यावांचून त्याचे अडतेच आणि थोडीशी सूट त्या दृष्टीने दिली की मग ते प्रमाण क्रमाने वाढत जाते व अपथ्य मूळ पदावर येते. यासाठी थोडी भूक राखून खाणे, तिखट-मीठ-मसाल्याचे प्रमाण अतिशय मर्यादेत ठेवणे हे जिभेच्या दृष्टीने कितीहि नको वाटणारे असले तरी आरोग्याच्या दृष्टीने हितकरच असते. पराच्या मऊमऊ गाद्या सुखावह वाटल्या तरी पृष्ठवंशाचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने टणक शय्याच हितकारक असते. लांबवर चालण्याचा व्यायाम घेणे फार लाभदायक ठरणारे आहे. पण माणसे बसची वाट पहात अर्धा अर्धा तास ताटकळत उभे राहणेहि जणं सुखाचें मानतात. "चरैवेति चरैवेति चराति चरतो भगः" हा अतिप्राचीन आदेश शरीरकष्टाच्या दृष्टीनेंहि लक्षात घेण्यासारखाच आहे. वयाच्या ७०-७५ व्या वर्षातहि काटक आणि उत्साहीं असलेल्या वृद्धांचा विचार केला तर ते आपल्या पूर्वायुष्यात शरीरश्रमाला कंटाळत नव्हते असेच आढळून येईल. आमचे दादा (श्रीदासगणूमहाराज) वयाच्या ८० व्या वर्षीहि पंढरपूरची १-२ मैलाची नगरप्रदक्षिणा नेमाने करीत असत. पुढे ते होईनासे झाले तरी पण महाद्वारापर्यंत, दत्तापर्यंत ते शक्यतो जाऊन येत, दुपारी झोपत नसत. शक्यतों ताठ बसून राहत, अगदी साधे जेवण घेत. त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी त्यांच्या समागमें चालावयाचे म्हणजे मला थोडे धावावें लागत असे. हे कसे शक्य होते असे मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की "अरे, मीं पोलिसांत होतो तेव्हा दिवसाला २०-२५ मैल सहज चालून कामें करीत होतो." अलिकडे आपण जीवनमान उंचावण्याच्या तंत्रात सहजपणे कराव्या लागणाच्या शारीरिक कष्टाला मुकलो आहोत आणि मग आमचे निरोगीपण हे प्रभावी औषधांच्या उपयोगावर येऊन बसले आहे. जो शरीराकडून भरपूर काम करून घेतो, त्याला आवश्यक तेवढे देऊन चांगले राबवितो त्याचे आरोग्य उत्तम राहते. आळसांत सुख नाही. चवींत सुख नाहीं. "जयाचे ऐहिक धड नाहीं । त्याचें परत्र पुससी कायी ॥" (ज्ञा. ४।१५५) हें समर्थानीं नाहीं तर ज्ञानोबारायांनी सांगितले आहे. उपनिषदांनीहि 'नायमात्मा बलहीनेन लभ्यः' -दुर्बलाला आत्मसाक्षात्कार होणार नाहीं असे म्हटले आहे. शरीर, मन वा बुद्धि हे भाव दुबळे असले, समर्थ नसले, काटक नसले, सोशिक नसले तर आत्मदर्शनाची योग्यता येणे शक्य नाही.

तितिक्षा आणि तपश्चर्या वा विविध व्रताचरणे ही मुख्यतः या तिन्ही गोष्टींची कार्यक्षमता वाढविण्यासाठीच आहेत. व्यायाम, कष्ट सोसणे हेच त्यांचे बाह्य स्वरूप असते. खरोखरीच ज्याला संयमाने वागून सुखासीनतेचा लोभ सोडून सुखावह म्हणून प्रत्यक्ष अनुभवास येणारे आरोग्यहि नीट राखता येत नाहीं, रोग बळावतात हे अनेकवेळा अनुभविले असूनहि पथ्य संभाळता येत नाही, तो परमार्थामध्ये स्वतःची प्रगति कशी करून घेऊ शकणार ? म्हणून इहपर प्रगतीलाहि सारखाच उपयोग असणारा सिद्धांत सांगतांना समर्थ म्हणतात- देहदुःख ते सुख मानीत जावें." याच्या पुढची ओळ आहे 'विवेकें सदा सस्वरूपी भरावें.' सस्वरूपीं हें स्वस्वरूप आहे. त्यावेळचीं उच्चारपद्धति किंवा प्रत करणारांचे अनवधान यामुळेच स्वस्वरूपींचे सस्वरूप झाले असावे. देहाची अशी उपेक्षा कां ? देहाचे लाड का करावयाचे नाहीत ? त्याचे मूलतत्त्व सांगताना ही चौथी ओळ आली आहे. 'देह, इंद्रियें, मन हे माझे स्वरूप नाहीं-मी त्यापेक्षा वेगळा आहे. हा जो मी तो स्वच्या अर्थाने सच्चिदानंद स्वरूप आहे. देहादि ही त्याची साधने आहेत. म्हणून तर विचार देहादींचा नाहीं तर त्या पलीकडे असलेल्या आत्म्याचा करावयास पाहिजे. देहालाच आत्मा समजणारे नास्तिक प्रामाणिकपणे बोलतील तर मनाचेंहि अस्तित्व मानू शकणार नाहीत. (अलिकडे प्रगत मानसशास्त्र तसे मानू लागले आहे.) पण मग मानवीजीवनातील आनंददायक अशा अनेक गोष्टींची संगति त्यांना लावता येणार नाही. जड देहापलीकडे कांहीं आहे असे मान्य केले तरच अनेक उदात्त गोष्टींचा अर्थ लागतो. म्हणून समर्थांनी देहाचे दुःख हे दुःख न मानता सुख मानावे असे सांगून तुझे खरे स्वरूप काय आहे ते विवेकाने जाणून घे, हे लक्षांत घेण्यासाठी आदेश दिला की "विवेकें सदा सस्वरूपीं भरावें."

कोणतेहि काम करताना माणसाचे स्वरूपाचे अवधान सुटता कामा नये. तसे झाले तरच त्याचे सर्व व्यवहार हितकरतेच्या पातळीवर सुधारतील, आत्मा हे माझे स्वरूप आहे. देह म्हणजे मी नव्हे. हा सिद्धांत पूर्णपणे सत्य असला तरी त्याचा अनुभव घेणे ही गोष्ट सोपी नाही. देहबुद्धि सोडतो म्हणताच सुटत नाहीं. मी आत्मा आहे म्हणताच आत्मसाक्षात्कारहि होत नाही. माणसाचे संस्कार, त्याचे प्रारब्ध, त्यामुळे असणारी प्रकृति, प्रवृत्ति वा परिस्थिति यामुळे श्रद्धाभावाने वाचलेल्या ग्रंथातून शब्दज्ञान झाले तरी ते अनुभवास येण्यासाठी कराव्या लागणाच्या प्रयत्नांचा कालावधि फार दीर्घ असू शकतो. तो केवळ वर्षांच्याच नव्हे तर कधीं कधीं जन्मांच्या संख्येने मोजावा लागतो आणि यामुळेच समर्थांनी स्वस्वरूप विवेके भरावे असे सांगितले आहे. मी देह नाहीं, आत्मा आहे. हा विवेक आहे. खरेंच, पण याकरिता करावी लागणारी साधना क्रमाने लक्षात घेतली पाहिजे. निष्ठा राखली पाहिजे. पी हळद कीं हो गोरी असे कुठेच साधत नसते. आरोग्यशास्र सांगणाच्या आयुर्वेदानेंहि गुण क्रमाक्रमाने वाढवीत गेले पाहिजे. घाई कामाची नाहीं, अन्यथा त्यामुळे आपत्ति वाढतात असेच सांगितले आहे. देहाचे दुःख सुख मानीत जावे असे म्हणतांच दिवसानुदिवस कडकडीत उपास करावेत, उन्हांत तापावें व पावसांत भिजावें, थंडीत कुडकुडावे असा याचा अर्थ नाहीं. हेंहि सोसू शकते पण त्यालाहि मर्यादा आहे, क्रम आहे. मूळचे शरीराचे सामर्थ्य कसे आहे ? त्यावर हे अवलंबून राहील. चौथ्या दिवशी येणारे हिव व नंतर भरणारा ताप हा चातुर्थिक ज्वराचा प्रकार फार हट्टी असतो. एका सद्गृहस्थाने या लांबलेल्या दुखण्याला कंटाळून थंडी भरून येत असतांना गार पाण्यात उडी घेतली, आणि त्या दिवसापासून त्यांचे हिंव पळाले. ते ऐकून हाच प्रयोग दुसर्‍या एका गृहस्थाने तसाच रोग असलेल्या आपल्या वृद्ध आईवर केला आणि ती बापडी म्हातारी पुन्हा उठलीच नाहीं. उतावीळपणे कोणतेहि कार्य साधत नाहीं. सर्वांगीण विचार करावा लागतो. म्हणून समर्थ विवेकाचा अवलंब करावा असे सांगतात.

समर्थांचा विवेकावर एकूण फार भर आहे. अनेक ठिकाणीं, अनेक संदर्भात त्यांनी या विवेकाचा आग्रहाने उल्लेख केला आहे. माणसाला पुष्कळदा कोणत्या तरी टोंकावर जाणे सोपे जाते. कारण त्यामुळे थोड्या वेळांत प्रश्न सुटतील असे त्यास वाटत असावें. सगळे खाण्यास संमति नसेल तर मुळीच न खाणें तो स्वीकारतो. पण त्याला वैद्यांनी सांगितले कीं जेवण घ्यायला हरकत नाहीं पण मीठ मुळींच खाऊ नको तर हे मात्र बहुधा त्याला परवडत नाहीं. नेहमी घ्याव्या लागणाच्या दक्षतेचाच त्याचेवर जणू ताण येतो आणि माणसाला ते नको असते. मग तो वैतागाने म्हणतो, 'एकदा काय ते सांगा, एकसारखें नको !' परंतु हें चालेल का ? २४ तासांचा श्वास आपण एकदम घेत नाहीं आणि तास दोन तास श्वासावांचून राहूंहि शकत नाहीं. उंट घेऊ शकतो म्हणतात, तसें रोज कटकट नको म्हणून महिन्याचे अन्नपाणी माणूस पोटांत एकदम भरून घेऊ शकत नाहीं; वर्षाची आंघोळ ४-५ तास बसून एकदांच करून घेता येत नाही. या सर्व गोष्टी त्या त्या प्रमाणांत वरचेवर प्रत्यहीं कराव्या लागतात. विवेकाचेंहि तसेंच आहे.

चूक झाली तर तिचे परिणाम भोगल्यावांचून सुटका नाहीं. होणारी चूक आणि तिचे परिणाम हे त्या व्यक्तीपेक्षा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. सरळ राजमार्गाने चालता चालतां एकदम पाय घसरणें निराळे आणि हिमालयांतील कड्याच्या टोकावरून जाणाच्या अरुंद अवघड रस्त्याने जातांना पाय घसरणे निराळे, पाय घसरणे ही एकच चूक खरी; परिणामांत फार अंतर आहे. दाढी करतांना वस्तरा लागून थोडेसे रक्त निघालें काय वा एकाद्या अपघातांत सांपडून अवयव तुटून वाहणारा रक्तप्रवाह काय ? धनुर्वाताच्या संसर्गाच्या दृष्टीने दोन्हीं सारखेच आहे. म्हणून चूक लहान की मोठी हा वस्तुतः प्रश्न नसतो. चूक ही चूकच असते; आणि ती लहान म्हणून क्षम्य मानल्यास तो गबाळेपणा परिणामी घातक ठरण्याची फार शक्यता असते. देहाचे आरोग्य, इंद्रियांची तृप्तता, मनाचा संतोष, बुद्धीची स्थिरता या क्रमानें आत्म्याच्या प्रसन्नतेपर्यंत माणसाला पोंचावयाचे असते. म्हणून "देहेदुःख तें सुख मानीत जावे" असे सांगून होतांच "विवेकें सदा स्वस्वरूप भरावें" असा उपदेश करून समर्थ रामदासस्वामी प्रारंभिक साधन आणि अंतिम साध्य या दोघांचेंहि वर्णन करीत आहेत आणि विवेक शब्दाचा उपयोग करून त्याची पद्धतीहि स्पष्ट करीत आहेत.[ Use Right click for download ]


जनीं सर्व सूखी असा कोण आहे । विचारें मना तूं चि शोधून पाहे ॥
मना त्वां चि रे पूर्व संचीत केलें । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ॥११॥

समर्थांनी मागच्या श्लोकांतील तिसर्‍या ओळींत "देहेदुःख ते सुख मानीत जावे" या प्राथमिक साधनाचा उल्लेख केला. पण हे साधन करण्याची प्रवृत्ति होण्यासाठी माणसाची मनोभूमि तयार होण्याची आवश्यकता आहे. दुःख हें टाळता येण्यासारखें नाहीं त्याला तोंड द्यावे लागणारच आहे हे लक्षात आले तर माणसाची मानसिक सिद्धता होते. म्हणून समर्थ दुःखाची अपरिहार्यता या श्लोकानें सांगत आहेत. कोणाला सगळ्या प्रकारची सुखेंच भोगावयास मिळतात, दुःखाचा स्पर्शीहि होत नाही असे कधीच होत नाहीं. कुणीहि याला अपवाद नाहीं. नल-राम-युधिष्ठिरांसारख्या अत्यंत थोर व्यक्तींनासुद्धा अनेक प्रकारचीं, जीवन असह्य वाटावे अशीं दुःखें भोगावी लागल्याचा इतिहास आहे. ज्यांची सत्ता, संपत्ति, ऐश्वर्य पाहून आपणांस हेवा वाटतो, त्यांच्या जीवनाचा बारकाव्याने शोध घेतला तर असे आढळून येईल की त्यांनाहिं या अभिलषणीय अशा गोष्टींच्या समागमें, अनेक प्रकारचीं, त्यांतूनच निर्माण होणारी, वा इतरहिं पुष्कळ दुःखें भोगावीं लागतात. "एकपुती रडे व सातपुतीहि रडे" अशीच अवस्था असते. संपत्ति असेल तर आरोग्य नसेल, सत्ता असेल तर कठोर निंदेला तोंड द्यावे लागले असेल, कीर्ति असेल तर प्रापंचिक सुखाला तिलांजली द्यावी लागली असेल. त्यामुळे इतर सगळे सुखांत आहेत व मला तेवढे दुःख भोगावे लागते असे मानून हाय हाय करण्यात अर्थ नसतो.

एका तत्त्ववेत्त्याने लग्न करावें कीं करू नये या प्रश्नाचे उत्तर करणारा व न करणारा या दोघांनाहि पश्चात्ताप होतो, अशा शब्दांत दिले होते. ते खरोखरीच विचार करण्यासारखे आहे. निपुत्रिक दुःखी असतोच पण ज्यांची संतति दुर्गुणी निपजली आहे तो त्याहिपेक्षां दुःखी असतो. जगामधे सर्वत्र सुखदुःखाची मिश्रणेच असतात. ती कधी थोडी उणीं, कधीं थोडी अधिक असतात. विचारपूर्वक पाहूं गेलें म्हणजे हे चांगले लक्षात येते. तेच करावे असें समर्थ सांगतात. "सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृतः" कांहीहि करतों म्हटले की त्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे दोष समाविष्ट असतातच, अग्नि प्रज्वलित करावयाचा म्हटले तर थोडा तरी धूर होतोच. इंधन वाईट असेल तर विचारावयासच नको. म्हणून जगामधे वागतांना, जें करावयाचें तें सुखाच्या अभिलाषेनें वा दुःखाच्या तिरस्काराने निवडू नये. दृष्टि हितावर असावी, असा नीट विचार केला म्हणजे दुःख वाट्यास आल्याची वा सुख न मिळाल्याची तडफड उणावते. तसेंच सुखप्राप्तीनें मनुष्य उन्मत्तहि होत नाहीं वा दुःखप्राप्तीने विषण्ण होत नाहीं. त्याची कार्यक्षमता अबाधित राहते. सुखदुःखाचा विचार मुळींच करू नये असें नाहीं. "पित्तं यदि शर्करया शाम्यति कोऽर्थः पटोलेन' हे खरेंच आहे. रोगावरचे उपचार सुखावह असतील तर बुद्ध्या कडू काढ्याचे घोट घेण्याची आवश्यकता नाहीं. पण प्रसंग आला तर त्याचा कंटाळा करणेहि इष्ट नाही.

प्राप्त परिस्थितीमध्ये सुखदुःखाचा हा असा विचार करणे हितावह असल्यानें आवश्यक असले तरी मुळांत सर्वसमर्थ ईश्वराच्या अद्भुत सृष्टीमध्ये दुःख असावेंच का ? असा एक प्रश्न विचारवंतांना बहुधा बोंचत असतो. त्याचे उत्तर समर्थ तिसर्‍या व चौथ्या ओळींत देत आहेत. "मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें । तयासारखें भोगणें प्राप्त झालें ॥" भारतीय संस्कृतीतील विचारवंतांनीं, ईश्वरीसृष्टींत विद्यमान असलेला कार्यकारी नियम, आपल्या साक्षात्कारी प्रज्ञेने आणि प्रासादिक प्रतिभेने शोधून काढला आहे. या त्रिकालाबाधित ईश्वरी नियमासच कर्मविपाकाचा सिद्धांत असे म्हणतात. अग्नीचा शोध, विजेचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध, स्थलकाल सापेक्षतेचा शोध, अणुगर्भाच्या स्वरूपाचा शोध, हे शोध जसे माणसाच्या बुद्धिमत्तेचे आणि विज्ञानाच्या प्रगतीचे द्योतक आहेत तसाच कर्मविपाकाचा सिद्धांतहिं आहे.

अलीकडे तथाकथित बुद्धिवादी खोट्या समतेच्या आणि भ्रांत मानवतेच्या नांवाखालीं या सिद्धांताची टिंगल करीत असले, तो वास्तव नसून काल्पनिक असल्याचे प्रतिपादित असले, तरी खर्‍या विचारवंतांना त्याची विद्यमानता नाकारता येण्यासारखी नाहीं. कर्मविपाक नाकारणें हें वरवर सोयीचे वाटले तरी ते शेवटीं कारणावांचून कार्य होते असेच म्हणण्यासारखे आहे. कुणीतरी दुराग्रहाने म्हणेल तर ते तर्कट ठरेल. तो तर्क असणार नाहीं. न्याय्य तर असणार नाहींच, कोणतीही कार्यें ही जवळच्या वा दूरच्या कारणांशीं संबद्ध असतातच. कार्यकारणांची ही मालिकाच असेल, कदाचित् मधील अंतरामुळे वा सूक्ष्मतेमुळे कारण लक्षात येत नसेल, पण ते नाकारणे योग्य ठरणार नाहीं. बीजावांचून झाड उगवलें वा शिजविणार्‍यावांचून स्वयंपाक झाला असे म्हणण्यासारखेच ते ठरेल. पूर्वजन्म वा पुनर्जन्म हे या कर्मविपाकाचेच अनुषंगिक सिद्धांत आहेत. ते त्याचे परिणामहि आहेत आणि त्याला पूरकहि आहेत.

कर्मविपाक मानल्यामुळे कर्तृत्वाला बाघ येतो आणि मनुष्य दैववादी बनतो असे मानणे चुकीचे आहे. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे माणसाने चालणें, फिरणें, चढणे सोडून द्यावे आणि नुसते बसून रहावे असे जसे होत नाही तसेच कर्मविपाकाच्या सिद्धांताने मनुष्य निष्क्रिय होतो असे मानण्याचे कारण नाहीं. माणसे आळशी असतात याचा जसा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाशी संबंध नाहीं, तसाच कर्मविपाकामुळे माणूस दैववादी वा प्रयत्नवादी ठरत नाहीं. मनुष्य कसाहिं असला तरी कर्मविपाक आपले काम करीतच असतो, कारण तो गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच ईश्वरीसृष्टीचा शाश्वत नियम आहे. त्यांतल्यात्यांत विचारच करावयाचा झाला आणि आधारच शोधावयाचे ठरविले तर कर्मविपाकानें दैववादाला प्रोत्साहन मिळण्याच्या ऐवजी प्रयत्नवादालाच प्रेरणा मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण दैव ही स्वयंभू गोष्ट नसून ते पूर्वकर्माच्या परिपाकाला ओळखीसाठीं दिलेले नांव आहे. वर्तमानकालीन प्रयत्न हे कर्म आणि न भोगलेलें भूतकालीन कर्म हे दैव असे त्याचे मुळांत स्वरूप आहे.

भूतकाळावर माझे कोणतेहि नियंत्रण नाहीं. पण वर्तमानकाळ ही माझ्या स्वाधीनची गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यकाळ मी माझ्या इच्छेप्रमाणे घडवू शकेन असा विश्वास कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे माणसाच्या अंगांत बळावण्याची शक्यता आहे. कर्मविपाक नाकारला तर घटनांचा अर्थ सांगतांना योगायोग वा अपघात स्वीकारावा लागतो आणि योगायोग स्वीकारणें हें प्रयत्नामागची सर्व प्रेरणा नष्ट करण्यासारखे आहे. कर्मविपाकामध्ये कर्माला अनुसरून भोग घडतो व त्यामुळे भोगामध्ये परतंत्रता सांगितली असली तरी कर्माचे स्वातंत्र्य त्याच नियमाने सिद्ध होते व तसेच ते प्रतिपादिले आहे हेंहि लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून समर्थांचे शब्द 'मना जे तुझे पूर्वसंचित आहे । तयासारखे भोगणें भाग रे हे ॥" असे नसून मना त्वांचि रें पूर्वसंचित केलें । तया सारिखें भोगणें प्राप्त झालें ।" असे आहेत, पूर्वसंचित हा माझ्या कर्तृत्वाचा भाग आहे. तें केव्हा तरी माझ्या कर्तृत्वातून, मी केलेल्या बर्‍या-वाईटांतून, निर्माण झाले आहे. तो योगायोग वा अपघात नाहीं असे शास्त्र सांगते ते फार महत्त्वाचे आहे. वर्तमानकाळाचा विचार करता कदाचित् ते सोयीचे नसेल पण सृष्टीचे नियम असे कालसापेक्ष नसतात, मला आतां डोंगरावर चढायचे आहे. आता गुरुत्वाकर्षणाचा नियम नको या म्हणण्याला कांहीं अर्थ नाहीं. अग्नीची उष्णता स्वयंपाकापुरती असावी; चटका लावतांना नसावी असे कधी होऊ शकत नाही.

पूर्वकर्मामुळे आता परिस्थिति कशीहि असली तरी मी ती भविष्यकाळांत माझ्या वर्तमान सत्कृत्यांच्या बळावर सुधारून घेईन असा आत्मविश्वास याच कर्मविपाकामुळे माणसांच्या हृदयांत (विचार केला तर) जागृत होऊ शकतो. आणि ते लक्षात आणून देण्यासाठींच, तुला हें जें नको ते भोगावे लागत आहे, तो तुझ्या पूर्वकर्मातून निर्माण झालेल्या संचिताचा परिणाम आहे, म्हणून मागे कांहीं झाले असले तरी आतां तरी सन्मार्गास लागून सत्कर्म कर असे सांगितले आहे.

आपल्या संस्कृतीमध्ये कर्माचे संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे तीन भाग पाडलेले आहेत. जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जें प्रत्यक्ष भोगीत असतो ते प्रारब्ध आणि जें निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित, ब्रह्मज्ञान्याच्या पातळीवर संचित आणि प्रारब्ध वा प्रारब्ध आणि क्रियमाण यांच्या परिणामाचा भेद स्पष्ट होतो. एरवीं तीं तीनहि सामान्य माणसाकरिता, परिणामाच्या दृष्टीने, सारखीच असतात. तेव्हां भोगण्याचा प्रसंग आला म्हणजे कुरकुर करण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष कृति करतांना सावध राहिले पाहिजे असा संतांचा आदेश आहे.

मना मानसीं दुःख आणं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

दहाव्या श्लोकामध्ये ज्याप्रमाणें समर्थांनी देहाला पडणारे कष्ट हें परिणामीं हिताचे असल्यामुळे त्या कष्टांनाच सुखाचें मानीत जावे असा साधनेचा विचार सांगितला आहे. त्याप्रमाणे येथे एक प्रकारे मानसिक साधना सांगितली आहे.

ज्यांच्याविरुद्ध माणसाचीं सदाची तक्रार असते तीं दुःखें कां भोगावी लागतात याचा विचार ११ व्या श्लोकांत करून झाला, आतां या १२ व्या श्लोकांत पुन्हां मागे सांगितलेल्या साधनापेक्षा वरच्या प्रतीचें साधन समर्थ स्पष्ट करीत आहेत आणि त्यामुळेच साध्य प्राप्त होते असे जणू सुचवीत आहेत. यातील शेवटच्या दोन ओळीं जणं १० व्या श्लोकांतील ३च्या व ४थ्या ओळींची रूपांतरें वा खरें म्हणजे स्पष्टीकरणे आहेत. शरीराचे दुःख हे मानणें न मानणे अशा स्वरूपांत नेहमीच असेल असे नाहीं. सकाळी लौकर उठणे, व्यायाम करणे, विनामसाल्याचे साधे जेवणे, आळस टाकणे, थंडपाण्याने स्नान करणे, चालण्याचा कंटाळा न करणे इत्यादि गोष्टी या परिणाम हितावह असतात. आणि थोड्याशा संवयीनें त्या सुखावह मानताहि येतात; निदान टाळण्याइतक्या त्रासदायक वाटत नाहीत. पण सगळ्याच शारीरिक दुःखाचे असे असेल असे नाहीं. कांटा मोडणे, अपघातात सापडणे, मार लागणे, अन्नापाण्यावांचून दीर्घकाळ राहण्याचा प्रसंग येणे, थंडी-ऊन-पावसात मुळींच निवारा न मिळणे, वेदना होणारा व्याधी निर्माण होणे इत्यादि गोष्टींना जेव्हा तोंड देण्याची वेळ येते तेव्हा शरीराला होणारी पीडा ही सोसता आली तरी तिला दुःख न मानणे जवळजवळ अशक्य आहे. पण ते दुःख शरीराचे शरीरापुरते ठेवणें मात्र वाटते तितकें अशक्य नाहीं. म्हणून समर्थ अशा दुःखाच्या संदर्भात उपदेश करतात कीं शरीराला वेदना सोसाव्या लागल्या तरी ते दुःख मनात आणू नकोस, हाय हाय करू नकोस, कण्हूं नकोस. इतरांना उच्छाद होईल असे वागू नकोस.

व्यवहारांत आपल्याला या दोन्ही पातळीवरचे लोक पुष्कळ वेळां दृष्टीस पडतात. कांही माणसे व्याधीमधे त्यामानानें पुष्कळशी शांत असतात तर कांही किरकोळ दुखण्यानेहि हळवेपणाने सगळे घर डोक्यावर घेतात. हा जो दुसरा प्रकार आहे तो मुख्यतः शारीरिक नसून मानसिक आहे. यामुळे शरीराला होणाऱ्या पीडा उणावत नाहींतच. उलट स्वतःचें दुखणे वाढण्याचे आणि इतरांना दुखणे येण्याचे तें निमित्त ठरतें. म्हणून तें टाळावे असे समर्थांचे सांगणें आहे. शोक आणि चिंता या दुःखाच्याच पुढच्या वा दुःखामुळे निर्माण होणाऱ्या मनाच्या अवस्था आहेत, त्या तर कधींच उत्पन्न होऊ देऊं नयेत असे समर्थ 'सर्वथा' या शब्दाने सुचवित आहेत.

वेदांतज्ञानाचें खरें प्रयोजन, दुःख दूर करणें हे नसून, शोक दूर करणें हें आहे. दुःख हे पुष्कळवेळा वस्तुतंत्र असतें. त्यामुळे त्यावर माणसाचे नियंत्रण प्रस्थापित होईलच असें नाहीं; पण दुःखामुळे उत्पन्न होत आहे असें वाटले तरी, शोक वा चिंता ही स्थिति पूर्णपणे कर्तृतंत्र आहे, माणसाच्या स्वाधीनची आहे. म्हणून दुःख झाले तरी शोक करू नये या शब्दाने तें सांगतां येईल. शोक आणि चिंता ही हायहाय, तळमळ, व्यग्रता, अनिश्चितता, धरसोड, खंत, विषण्णता, वैताग, नैराश्य अशा स्वरूपांत व्यक्त होत असतात. आणि विचाराने, विवेकाने या स्थितीला न येणे हे पुष्कळसें माणसाच्या स्वाधीन आहे; तेच प्रयत्नपूर्वक करावें असे समर्थ सांगतात.

या सर्वच गोष्टी साधण्यासाठी मी म्हणजे देह नाहीं हा विचार निदान बुद्धीच्या पातळीवर तरी मान्य व्हावा लागतो आणि तो आचाराच्या पातळीवर उतरण्यासाठीं विवेकाने प्रयत्न करावे लागतात. तेच समर्थ सांगत आहेत. कारण देह म्हणजे 'मी' नाही. हा 'मी' त्यापेक्षा कुणी वेगळा असला पाहिजे हें विचारवंतांच्या लक्षात येणे शक्य आहे. देह प्रत्यक्षतः जड आहे. त्यात दिसणारी चैतन्याची प्रेरणा ही कुठे तरी निराळ्या ठिकाणी उगम पावत असली पाहिजे, हें विचारी माणसाच्या लक्षात येणे शक्य आहे. कोणत्याहि प्रकाराने शरीराचे विश्लेषण केलें तरी त्यात चैतन्याचा मूलस्त्रोत सांपडत नाहीं हें निश्चित. आणि या चैतऱ्याावांचून "मी" पणा स्फुरत नाहीं हेहि निश्चित. तेव्हा रक्त-मास‍-हाडे-कातडे इत्यादि धातु वा त्याच्या मुळाशी असलेली पंचमहाभूतें यांचा समुदाय म्हणजे जरी देह असला तरी मी म्हणून होणारे स्फुरण या जड द्रव्याचे नाहीं हें लक्षांत येऊ शकते. हे लक्षांत घेऊन तो विचार निश्चित करून साधनेला लागणे व त्यामुळें क्रमाक्रमानें स्वतःची प्रगति साधून मी देह नाहीं ही धारणा दृढावणें व योग्य त्या प्रमाणात ती व्यवहारांतहि अनुभविता येणे हेच विदेहीपण प्राप्त झाल्याचे लक्षण आहे. सामान्यतः मुक्तीचे स्वरूप हेंच आहे. विदेहीपणा अनुभवणे म्हणजेच मुक्ती भोगणें आहे. साधना कोणत्या दिशेने करावयाची आहे हे लक्षांत आणून देण्यासाठीच कदाचित् समर्थांनी या विदेहीपणाने भोगावयाच्या मुक्तीचा उल्लेख मनाच्या श्लोकांत इतक्या आधीच केला असावा.

माणूस प्रकृति-प्रवृति-परिस्थितिप्रमाणे कुठेहि असला तरी त्याचें अंतिम ध्येय मोक्ष, मुक्ति हेंच आहे. कुठे जावयाचें आहे तें ठरल्यावांचून वाटचालीचा आरंभ होऊं शकत नाहीं. पण हे लक्षांत न आल्यामुळे कांही वेळा लोक अशा या सांगण्यावर आक्षेप घेतात. त्यांचे म्हणणें असते कीं तुम्ही म्हणतां तशी मोक्ष, मुक्ति कांहीं असलीच तर ती फार अंतिम अवस्था आहे. ज्यांच्यापुढे तुम्ही ती सांगता त्या माणसापासून ती कोसों दूर आहे. स्वार्थ, भ्रष्टाचार, द्वेष, तिरस्कार, विषयलालसा, लुबाडणूक इत्यादि मानव समाजाला कलंक असणारे विकार थैमान घालीत असतांना मोक्षाच्या उपदेशांत काय अर्थ आहे ? ज्यांना स्वार्थापोटी देशाचे, समाजाचे, तर राहूं द्या पण कुटुंबाचेंहि कल्याण साधावेसे वाटत नाहीं त्यांना मोक्षाचे तत्त्वज्ञान सांगणें हें केवळ श्रमाचा आणि कालाचा अपव्ययच नसून दंभाचारास प्रोत्साहन देण्यासारखेहि आहे. ज्यांना स्वच्छताच कळत नाहीं त्यांना पावित्र्य कसें काय कळणार ? ज्याला चार पावलेहि टाकता येत नाहीत त्याला गिर्यारोहणाच्या बिकट यात्रेंत भाग घेतां येईल कां ?

वरवर पाहतां हा आक्षेप योग्य वाटतो. पण तें पूर्ण सत्य नाहीं. अवस्थाक्रमानें ध्येयवाद सांगणे आणि माणसाच्या श्रद्धा दृढ करीत नेणे, रुचेल-पचेल तेवढेच सांग, हेंहि संतानीच केलें आहे व बौद्धिक पातळीवर अजून बालकंच असणाऱ्या माणसांच्या करितां तें करावेंच लागतें. पण सर्वांनाच असें समजणें हा अन्याय आहे. रोग फार घातक आहे असें प्रत्येक रोग्यास सांगू नये हें कितीहि खरें असले तरी कांहीं रोग्यांना ते सांगावेच लागतें. सगळेच रोगी कांहीं सारखेच हळवे असतात असें नाहीं. उलट रोगाच्या परिणामाची स्पष्ट कल्पना असणें कांहीं लोकांना इष्ट असतें कारण त्यामुळें त्यांना व्यवहारांची वा कुटुंबाची व्यवस्था लावणे सोयीचे होते. ध्येयवादाचेहि तसेंच आहे.

आपण आज लोकसत्तेचा पुरस्कार करतो. जीवनामध्यें स्वतंत्रता, समानता, बंधुता असावी असें मानतो, त्यावरची व्याख्यानें देतो आणि ऐकतोहि. पण हा ध्येयवाद प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा किती दूर आहे हे आपणास माहीत आहेच ना ? अगदीं आपल्या स्वाधीन असलेल्या निवडणुकांतहि आपण हा ध्येयवाद कधींहि साकार करूं शकलो नाहीं. सगळ्याच पक्षोपपक्षानी निवडणुकांच्या वेळी डिमडिम् पिटलेला ध्येयवाद प्रत्यक्ष व्यवहारात पायदळींच तुडविला आहे. जात लक्षांत ठेवली आहे. भ्रष्टाचार केला आहे. या गोष्टी तर पूणर्पणें इहवादीच आहेत ना ? तेथेहि ध्येय आणि व्यवहार यांत राहणारे पराकाष्ठेचे अंतर तसेंच टिकून आहे ना ? मग परमार्थ मार्गातील ध्येयवादावर 'तो फार दूरचा' असा आक्षेप घेण्यांत काय अर्थ आहे.

मोक्ष हा पुरुषार्थ आपण समजतो तसा इतर तीन पुरुषार्थाप्रमाणे सामाजिक संबंधानें नियंत्रित नाहीं. तो तत्वतः आणि व्यवहारतःहि वैयक्तिक आहे. आणि पात्रता असलेल्या कोणाहि व्यक्तीला "याचि देही याचि डोळा" हा मुक्तीचा सोहळा भोगणें शक्य आहे. त्यातले कठीणपण परिस्थितीचें नसून प्रवृतीचे आहे. दूरता वाटते तीहि याच कारणानें. आणि स्वतःच्या प्रवृत्तीला योग्य तें वळण लावणे हें कोणत्याहि माणसास शक्य आहे. आणि म्हणून माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे असें आपले शास्त्रकार मानतात. यासाठीं समर्थांनी मोक्षमुक्तीचा उत्तुं आदर्श प्रामाणिकपणे वाटचाल करण्याची इच्छा असलेल्या माणसापुढे आरंभीच मांडला आहे.

मना सांग पां रावणा काये जालें । अकस्मात तें राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं । बळे लागला काळ हा पाठिलागीं ॥ १३ ॥

माणसाचे जीवन हे त्याच्या स्वतःच्या मापाने साठ, सत्तर, शंभर वर्षांचे म्हणजे दीर्घकालीन वाटलें तरी ते विश्वाच्या उत्पत्ति-स्थितीच्या मापाने फारच लहान आहे. आपण कृमिकीटकांचे जीवन क्षणभंगुर समजतो. कालप्रवाहाच्या मापाने माणसाचे आयुष्यहि सापेक्षतः तसेंच म्हटलें पाहिजे आणि जें कांहीं आहे तेंहि भरवशाचे नाहीं. काळाच्या तोंडांत गेल्यासारखेच आहे. मगरीच्या तोंडात असलेल्या मासोळीने तिचें तोंड मिटण्यापूर्वी स्वतःस सुरक्षित मानावें तसेंच माणसाचे आहे. त्यासाठी मोठ्यांत मोठे ऐतिहासिक उदाहरण देऊन समर्थ सांगतात- बा मना ! म्हणजे विचारी माणसा ! रावणाचे काय झालें तें तुला माहीत आहे ना ! रावण ही कोणी सामान्य व्यक्ति नव्हती. अलौकिक सामर्थ्याने संपन्न असा तो विलक्षण पुरुष होता. जन्माने ब्राह्मण होता. चांगला विद्वान् होता. वेदाची पदे त्यानें पाडली आहेत. भगवान शंकराला त्याने प्रसन्न करून घेतलें. त्यासाठीं उग्र तपश्चर्या केली. आपल्या पराक्रमाने जग जिंकलें, देवांना दीन करून सोडले. त्याच्याजवळ ऐश्वर्यानें भरलेले भव्य प्रासाद, शोभिवंत उद्याने, अपार संपत्ति, सहस्त्रावधि सुंदर स्त्रियांनी भरलेले अंतःपुर, विपुल संतति, विशाल साम्राज्य, असें सगळे कांहीं होते. 'अकुतोभय वैभव' त्याच्याजवळ होते पण त्याची वृत्ति राक्षसी होती. त्याच्या धाकाने मी मी म्हणणारे वीरहि थरकांपत असत. पण त्याचें पुढें काय झाले ? माणसाची कालगणना चकित व्हावी अशा दीर्घकाळाचे त्याचें ऐश्वर्यशाली साम्राज्य अवघ्या दोन महिन्यांत, त्याच्या हातून निसटले. लंकेचे तें राज्य बिभीषणाला मिळालें. रावण आपल्या विशाल बलदंड सेनेसह धुळीला मिळाला. त्याचा स्वतःचा तर सर्वस्वी नाश झालाच पण त्याच्या कीर्तीचाहि नाश झाला. उलट तो वाईटपणाचें, अधमतेचे एक प्रतीक ठरला. त्याची अपकीर्ति तेवढी टिकून राहिली. म्हणून समर्थ सांगतात, ऐश्वर्याकरितां तूं वेडेवांकडे वागूं नकोस. पिढ्यान् पिढ्यांचें कर्तृत्व पाठीशी असेल तर गोष्ट निराळी. अन्यथा एका पिढीत रंकाचा लखपति सरळ मार्गाने होणे क्यचितच शक्य असतें. यासाठींच 'पापं हि श्रियो मूलम्' असें म्हटले आहे. चांगल्या मार्गानें मिळालें तरी ऐश्वर्य मिळवूंच नकोस असें गृहस्थाश्रमी माणसाला सांगितलें नाहीं. तें तसें सांगितलें असलें तर परमार्थमार्गांत त्वरेने प्रगति व्हावी असें ज्याला वाटत असेल त्याच्या करितां तें सांगितलें आहे असें समजावे. चांगल्या मार्गामध्ये सन्नीति, सदाचार तर गृहीत आहेच पण या यांत्रिक युगामध्ये सामाजिक समतोल ढासळणार नाही याचाहि विचार करणें आवश्यक आहे. तेव्हां ऐश्वर्याचा लोभ धरतांना आपलें वर्तन सन्नीतीची कक्षा ओलांडून जाणार नाहीं याची दक्षता घेतलीच पाहिजे. पण तें फार कठीण आहे. नर्काडीच्या खतानेच पीक चांगलें येते तसेंच जणू ऐश्वर्याचेंही होतें. पण तें चालते तर हें कां चालू नये असें मात्र म्हणूं नये. परंतु माणूस तसाच विचार करतो. सत्ता, संपत्ति, वैभव मिळतें आहे ना ? मग त्यासाठी सन्नीतीचा त्याग करावा लागला तर काय बिघडले असें माणसास वाटतें.

सन्मार्गानें ऐश्वर्य मिळणारच नाहीं असें नाहीं. पण त्यासाठीं योग्य कर्तृत्वाला सरळ वाव मिळाला पाहिजे. पण बहुतेकांच्या अंतःकरणांत स्वार्थभावना हीच प्रबल असते. ती न्यायान्यायाचा विचारच करीत नाहीं आणि मग कर्तृत्वाला सरळ मार्ग उरत नाहीं. वाकडी वळणे घ्यावी लागतात. पुष्कळ वाहतूक असलेल्या मार्गावरची वेगवान वाहने आणि पादचारी माणसेंहि अनियंत्रितपणें चालू लागली कीं कुणा एकाला स्वतःचे वाहनहि सरळ नियमाप्रमाणे चालविता येत नाहीं.

व्यवहारांत माणसाने गृहीतच धरल्यासारखे असते कीं दुसरा मला फसवणारच आहे; मी सरळ वागून भागणारच नाहीं. आणि दोघांनींहि असें गृहीत धरले म्हणजे मग सरळपणा बाजूला राहतो. वस्तू घेतांना मूल्यासाठी होणारी घासाघीस हे याचे एक लहानसे उदाहरण. वस्तू घेतांना योग्य मूल्याचा विचार राहत नाहीं. भाव चढवून सांगितले जातात आणि पाडून मागितले जातात. आणि मग होणाऱ्या घासाघाशींत उभय पक्षांना आपल्या चतुरपणाचें समाधान मिळवावयाचे असतें. या पद्धतीच्या व्यवहारांत घासाघीस न करणारा सरळ मनुष्य बावळट ठरतो. गिऱ्हाइकाला खरें सांगून पटत नाहीं. त्याला चांगली वस्तु स्वस्त मिळाल्याचे समाधान हवें असतें आणि व्यापाऱ्याला गिऱ्हाईक घालविणे परवडत नाहीं; मग वंचना हाच व्यवहार होऊन बसतो. सगळेच सज्जनपणानें वागतील तर असा प्रसंग येणारच नाही, पण स्वार्थाला कुठेतरी लोभ चिकटतो आणि फसवणूक हाच व्यवसाय होऊन बसतो.

बरीच जुनी गोष्ट आहे. एक वकील आपल्या व्यवसायामध्ये चांगले श्रीमंत झाले होते. ते त्यांच्याकडे आलेल्या अशिक्षित माणसाला असें सांगत म्हणे कीं- तुझा खटला या मोठ्या पुस्तकात पाहून लढवू कां लहान पुस्तकात पाहून लढवू ! मोठ्या पुस्तकाप्रमाणे २०० रुपये पडतील, लहान पुस्तकाप्रमाणे ५० रुपये पडतील. आता हा काय न्याय आहे का ? पण हे असें चालते. डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, पुढारी, अधिकारी, मंत्री, बुवा, महंत सगळे असेंच वागतात. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा ! वाईट वासनेचा त्वरित त्याग कर. वासनाच टाकून दे असें समर्थ म्हणत नाहींत तर ती वाईट नसावी ही त्यांची अपेक्षा आहे. आवश्यकतेपेक्षा अधिकाची अपेक्षा करणें हे वाईटाचे पहिले रूप आणि तें मिळविण्यासाठी दुसऱ्याच्या न्याय्य अधिकारावर अतिक्रमण करून बलात्काराच्या, वंचकतेच्या मार्गाने जाणें हे वाईटपणाचे दुसरे रूप. ऐश्वर्यासाठी त्या वाईटाचा अवलंब करूं नकोस. अन्यथा त्या रावणासारखे होईल असे समर्थ सांगत आहेत. याठिकाणी कांही वेळां एक युक्तिवाद केला जातो. विचारले जातें कीं- चांगल्या मार्गानें मिळालेले ऐश्वर्य तरी टिकून राहते काय ? तेंहि नष्टच होतें ना ! मग तें चांगल्याच मार्गानें मिळविले पाहिजे असा आग्रह कशाला ? ज्याला शक्य आहे त्याने कोणत्याहि मार्गानें, पण ऐश्वर्य मिळवावे. जर मरावयाचेंच आहे तर भरपूर भोगून तरी मरावे. भीषण युद्धाच्या आघाडीवर निघालेले सैनिक जसे अनिर्बंधपणे विलास भोगून घेतात, तसेंच माणसाने का वागूं नये ? पण ही भूमिका विचारीपणाची नव्हे; कारण माणसाचे व्यक्तिजीवन हें असे एकांडे नाहीं. तें कुटुंब, समाज, राष्ट्र आणि पुनर्जन्म यांशी संबद्ध आहे. माणसाने संबंधाचे हें सर्व क्षेत्र विचारांत घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच पाठीमागे लागलेला काळ विचारांत घेऊनच माणसाने सदाचरणी राहिले पाहिजे. आपल्यापुरतें आणि या जन्मापुरते पाहणे हे माणसास तरी न शोभण्यासारखे आहे.

धर्मराज युधिष्ठिराला जे भोगाचें लागलें तें त्यांच्या सदाचरणामुळेच, सौजन्यामुळेच, असें म्हणणें खरे नाही. त्याच्यावरची संकटे ही त्याच्या द्यूताच्या आसक्तीतून म्हणजे समर्थांच्या भाषेत कड्या वासनेंतूनच जन्माला आलेली आहेत.

वाईट वासनांचा त्याग, सन्नीतीचा अवलंब, सदाचरण हें योग्य आहे असें ज्याक्षणी पटले त्याक्षणी माणसाने त्याचा अवलंब केला पाहिजे, आतांच काय घाई आहे ? पाहू म्हातारपणी; असा दीर्घसूत्रीपणा उपयोगाचा नाही. म्हणून समर्थ म्हणतात "बळे त्यागला काळ हा पाठिलागी ॥" प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. गेलेला पुन्हा परत मिळत नाहीं. आणि हे सर्व केव्हां संपेल याची शाश्वती नाहीं. म्हणून मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग चांगले घडावे, चांगले मिळावे, हित साधावे याकरिताच केला पाहिजे.

जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला । परी शेवटीं काळमूखीं निमाला ॥
महाथोर ते मृत्यपंथे चि गेले । कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥

कोणतेहि जीवन हे जन्म आणि मृत्यू यांच्याशी जोडलेले आहे. मेला म्हणजे संपले असे चार्वाक समजतात. मेल्यानंतर जीव थडग्यात पडून राहतो. आणि मग केव्हां तरी एकदा शेवटच्या दिवशी ईश्वरी निवाड्याप्रमाणे तो आपल्या पापाचे फळ भोगण्यासाठी नरकांत वा पुण्यानें फळ भोगण्यासाठी स्वर्गांत जातो असें कांहीं म्हणतात. हिंदू धर्म जन्म आणि मृत्यू यांचें चक्र मानतो. प्रत्येक जीवन हें पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांनीं युक्त आहे आणि त्याचें स्वरूप माणसाच्या कर्माप्रमाणें निश्चित होतें. कर्माची योग्यता पारखावी त्यागते ती यासाठींच. जे जे जन्मास आले ते ते नियमानें मेले आहेत. "मारुनि मरणा अमर जाहलो" असें म्हणणें हा केवळ अर्थवाद आहे. थोर माणसाला मृत्यु हा चुकलेला नाहीं. प्रत्येकाचे इहलोकीचे जीवन केव्हां ना केव्हां तरी संपुष्टांत येतेंच. मरणाला मारून राहणें म्हणजे एकतर मुक्त होणें किंवा सत्कीर्तीरूपाने उरणे. त्यामुळें जन्माला आल्यानंतरचे मरण टळते असें होत नाहीं. तें प्रत्येकाला भोगावेच लागतें. अगदीं सर्वश्रेष्ठ अवतारहि या नियमाला अपवाद नाही. मृत्यु कोणालाहि टळत नाहीं, कोणालाहि टाळता आला नाहीं. जी खरीच थोर माणसे आहेत तीं आपलें कार्य संपताच त्याला आमंत्रण देतात वा तो जेव्हां येईल तेव्हां त्याचें आनंदाने स्वागत करतात. मरणाला न भिणें एवढाच फार तर मरणाला मारून राहणे याचा अर्थ करतां येईल. "पीर मरे पैगंबर मरे मर गये जिंदा जोगी" हेंच शेवटी खरें आहे. द्वैताने किंवा भेदाने भरलेल्या या दृश्य जगांत प्रत्येक जीवनाला अदृश्य होणें चुकत नाही मग गौरवाने फार तर त्याला मृत्यु हे नांव देऊं नये. कैलासवासी झाले, देवाज्ञा झाली असे म्हणावे; पण अर्थ एकच आहे.

समर्थानी दासबोधामध्यें मृत्यूची अपरिहार्यता सांगणारा एक स्वतंत्र समासच लिहिला आहे. त्यांत ते म्हणतात-

मृत्यु न म्हणे ऋषेश्वर । मृत्यू न म्हणे कवीश्वर ॥
मृत्यु न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥
मृत्यू न म्हणे संत । मृत्यू न म्हणे हा महंत ॥
मृत्यू न म्हणे हा गुप्त । होतसे ॥
मृत्यु न म्हणे थोर थोर । मृत्यु न म्हणे हरिहर ॥
मृत्यु न म्हणे अवतार । भगवंताचे ॥

हें ऐकायला चमत्कारिक वाटतें, नकोसे वाटते, कांहीं वेळां श्रद्धेला, भावनेला धक्का देणारे वाटते. म्हणून समर्थांनी श्रोतीं कोप न करावा । अशी विनंति केली आहे. आहे ती वस्तुस्थिति मान्य करण्यावाचून गति नसते. जन्माला आल्यानंतर मृत्यू ही टाता येणारी गोष्ट नाही. एका राजाला म्हणे ज्योतिषाने सांगितलें की तुझा मरणकाळ जवळ आला आहे. राजाला वाटलें राजधानी सोडून पळालो म्हणजे मरण टळेल. तो घोड्यावर बसून दूरच्या गावांला जाण्यासाठी पळाला. त्या गावाच्या जवळ आला तो मृत्यू त्याला भेटला. राजा म्हणाला-अरे ! तुला चुकविण्यासाठी तर आलो. यम म्हणाला-इथेच तर तुझी माझी भेट ठरलेली होती. मी वाटच पाहत होतों अजून तूं कसा येत नाहींस म्हणून. राजा दचकला आणि त्याचापासून दूर होण्यासाठी त्यानें घोड्याला पिटाळले. तो वेशींतील दगडाला अडकून घोडा पडला आणि राजाआंत फेकला जाऊन पडल्याजागीं गतप्राण झाला.

सारांश, जन्म काय, जीवनांतील सुखदुःखे काय किंवा मृत्यु काय, तिन्ही, माणसांनी केलेल्या बऱ्या-वाईट कर्मांशी संबद्ध असून अपरिहार्य आहेत. तें जसें असेल तसें भोगावेच लागते. जसे मृत्यु टळावा आणि जीवनातले भोग भोगावे हें होऊं शकत नाही तसेंच जीवनांतील भोग टाळण्याकरितां मृत्णूलाहि जवळ करतां येत नाहीं. तसें बुद्धिपुरस्सर करणें ही आत्महत्या ठरते व तें पातक आहे. तुरुंगांतून पळून जाणें व फांसीच्या कैद्याने आत्महत्या करणें हा जसा अपराध आहे तसेंच आत्महत्येचें आहे. यासाठीं कर्मे करतांना सावध राहिलें पाहिजे. अन्यथा जन्माला येणे, जगणे आणि मृत्यु पावणें हें वेदनामय होऊन जाणारे आहे. त्यांतून कोणाचीहि सुटका नाहीं.[ Use Right click for download ]


मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्व ही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्व ही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥ १५ ॥

सर्व जगत ही मृत्णूभूमि आहे. "मरणं प्रकृतिः शरीरिणाम्" हाच इथला नियम आहे. पण माणसे जणू अमरपट्टा घेऊन आल्यासारखी वागतात. मी मी ची जाणीव अहंकाराचे रूप घेते आणि माझें माझें म्हणत नाना प्रकारचे व्याप पाठी लावून घेतले जातात. रेल्वेच्या डब्यांत शिरलेला नवीन येणाऱ्याला जसा वागवतो त्याप्रमाणें माणसे जीवनांत वागतात. आपण जागेवर टोपी, पिशवी असें काहीतरी ठेवून जागा अडवतो आणि इतर प्रवाश्यांना तेथे बसू देत नाही. "मी" पणाचा बळावलेला अहंकार किती पीडाकर होतो याची स्वतःला जाणीव होत नाहीं. दुसऱ्याचा अहंकार मात्र त्याच वेळीं तिरस्कारार्ह वाटत असतो. आपलेंहि तसेंच आहे हें लक्षांत घेतलें जात नाहीं. माणसाने स्वतःला चिरंजीव मानून वागावें पण ते ज्ञान मिळवतांना. ज्ञानाची फळें "याचि देही याचि डोळा" भोगावी या कल्पनेने. पण धर्माचरण करतांना मात्र मृत्यूनें शेंडी पकडली आहे, हिसडा मारून केव्हां घेऊन जाईल तें सांगतां येत नाहीं, हीच भावना ठेवली पाहिजे.

सत्तासंपत्तीचा कितीहि संग्रह केला असला तरी त्यांचा त्याग करून अकस्मात् निघून जावे लागते. कृतकर्माशिवाय कांहींहि समागमें येत नाहीं. "धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे । भार्या गृहद्वारि जनः स्मशाने । देहश्चितायां परलोकमार्गे । कर्मानुगो गच्छति जीव एकः ॥ ही अगदीं वस्तुस्थिति आहे. म्हणून समर्थ सदाचाराने वाग असें सांगतात. सदाचरणाने वागण्याने मनःस्वास्थ तरी निश्चयानें अबाधित राहते. पण माणसे तेंहि करीत नाहीत. मी आणि माझें या अहंकाराने स्वतःहि बुडतात आणि इतरांनाहि बुडवतात. बुडत्याचा पाय खोलांत जातो आणि त्यानें घाबरून, जो काढावयास आला त्याच्याहि गळ्याला मिठी मारावी आणि दोघांनाहि बुडण्याचा प्रसंग ओढवावा तसें होतें. यासाठीं मृत्यूची जाणीव ठेवून, जगतातील प्रत्येक गोष्ट विनाशी आहे, हें लक्षांत ठेवून माणसाने वागावे हेंच त्याच्या कल्याणाचे आहे. या विषयांत सर्व संताचे एकमतच आहे. ज्ञानेश्वर महाराज तर मनुष्य ऐट कशाकरिता मिरवितो हेंच लक्षांत येत नाहीं (ज्ञा. ९-५०७), असें म्हणतात. सदाचाराने वागले, ईश्वराला आपलेसे केले, तरच तरणोपाय आहे; अन्यथा मृत्युलोकांतील वावरणें हें पेटलेल्या वणव्यांत सापडण्यासारखे आहे (ज्ञा. ९-४९२ ). विषयाच्या सुखाला मोहित व्हावे आणि त्यांतील अनित्यता विचारांत घेऊं नये असें करणें म्हणजे विषारी वनस्पतीच्या मुळ्यांचा रस काढावयाचा आणि त्याला अमृत नांव ठेवायचे असे आहे (ज्ञा. ९-४९८) तुझ्यावर काळाची उडी पडेल तेव्हां तुला कोण वाचवणार आहे, असें तुकाराम महाराजहि म्हणतात.

संतांची ही बोलणी आपणापैकी पुष्कळांना न रुचली तरी तीं पूर्णपणे यथार्थ आहेत. अगदीं सत्य आहेत. साक्षात्कारी महानुभावांनी ते अनुभविलें आहे. निरपवाद सुखाचा, शाश्वत आनंदाचा, अखंड अव्यय प्रसन्नतेचा त्यांनीं अनुभव घेतला आहे. म्हणून विषयसुखाविषयींचे वा इहलोकाविषयींचे त्यांचे बोल हे आमच्या कल्याणाचे आहेत. त्याविषयीं अनादर बाळगणे कृतघ्नपणाचे आहे. चंद्रावर जाऊन आलेल्या अंतराळवीरांचे अनुभव आपल्या इहलोकीचा अनुभवापेक्षां अगदीं वेगळे असले तरी आपण ते यथार्थ मानतो आणि लहानशा उचवट्यावरहि चढतांना दमणारे आपण त्या अंतराळवीरांचा प्रेमादराने सत्कार करतो. गौरीशंकरावर जाऊन आलेल्या परिश्रमी व्यक्तींचे सर्व जगतांत केवढे कौतुक झालें ! देशोविदेशी ते सन्मानिले गेले. अशा स्थितींत ब्रह्मपदी पोचलेल्या आणि जगत्‌कल्याणासाठी संसारांत वावरणाऱ्या महात्म्यांच्या विषयी अनादर व्यक्त करणें कृतप्नपणाचें आहे; निदान अडाणीपणाचे तरी आहेच आहे.

मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तो ही पुढें जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥ १६ ॥

कोणी एक मरण पावतो. त्याच्या विषयींच्या आपुलकीने दुसरा रडतो. परंतु असा रडणाराहि आपण स्वतः या मरणारांच्या रांगेत उभे आहोंत हें लक्षांत घेत नाही. जन्मलेले सगळे या एका मार्गानेच जावयाचे असतात. त्यांतून कोणाचीहि, अगदीं कोणाचीहि, सुटका होत नाहीं. कोणी जात्यांत तर कुणी सुपात असतात इतकेंच. तेव्हां कोणाच्या मृत्यूमुळें हर्षशोक मानण्यांत अर्थ नसतो. प्राप्त परिस्थितीला समाधानाने तोंड देत आपलें कर्तव्य करीत राहणे हेंच इष्ट असतें. अंत्येष्टीच्या विधींतहि मरणाराच्या नावाने रडूं नये असा आदेश आहे.

माणूस योग्यतेचा असला, त्याच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असले कीं त्याच्या मृत्यूनें दुःख होईल हे अगदीं स्वाभाविक आहे. योग्य नाहीं तें शोक करणें. शोकाचे मूळ लोभांत आहे आणि शोकाची परिणति क्षोभामध्यें होतें. पारब्धानुसार घडावयाच्या गोष्टी घडतच असतात. अगदीं कोणाचेंहि कोणावाचून अडत नाहीं. तेव्हा आत्मीयतेपोटी दुःख होणें नैसर्गिक असले तरी शोक होतो तो मोहापोटी, आसीक्तिपोटी, अविवेकापोटी. जन्ममृत्यूचे चक्र मागे लागते ते यामुळेंच. शोक ही दुःखाची स्वाभाविक परिणति नसून तो लोभमोहाचा परिणाम आहे. आपणास वाटते, प्रेम-जिव्हाळा असणे ही जर चांगली गोष्ट आहे तर त्यांतून वियोगामुळे शोक निर्माण होणारच; पण तें योग्य नव्हे. थोर लोकांच्या जीवनात याची उदाहरणे दिसून येतात.

लो. टिळकांचा थोरला मुलगा प्लेगनें वारला. तरी केसरीचा निघावयाचा अंक वेळेवरच निघाला. टिळकांचीच पत्नी ते मंडालेला तुरुंगात असतांना वारली तेव्हा अंतःकरणाला जाऊन भिडणारे एकच वाक्य विद्वांसांना पाठविलेल्या पत्रात टिळकांनी लिहिले आहे, पण गीतारहस्थाचे लेखन थांबले नाहीं.

माझ्या वडिलांच्यावर (श्री. दामुआण्णा आठवले) ती. दादांचे पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूनें ती. दादांना (दासगणूमहाराज) दुःख निश्चितच झालें पण अमृतानुभव भावार्थमंजिरी पूर्ण झालीच. आपल्याला मात्र पुष्कळ वेळां हा विवेक राहत नाही. दया काय, वात्सल्य काय, हे सन्माननीय सद्‌गुणच आहेत. पण ते तद्‌विषयक लोभामुळे आपत्तीजनक होतात.

महर्षि भरताची कथा यादृष्टीने लक्षांत घेण्यासारखी आहे. त्यानें हरिणाचे एक अनाथ पोर दयाबुद्धी सांभाळले आणि त्याच्यावरील लोभाने त्यांना इतकें मोहित केले कीं मुळांत अधिकारी तत्त्ववेत्ते असूनहि महर्षि भरतांना हरिणाचा जन्म घ्यावा त्यागला. म्हणून त्यानंतर तें फार सावध राहिले आणि कोणतीहि प्रतिक्रिया स्वतःच्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची दक्षता त्यांनी बाळगली आणि म्हणूनच त्या जन्मांत त्यांना जडभरत म्हणू त्यागले. त्यावेळी त्यांची अवस्था कांहींशी बालोन्मत्त पिशाचवत् होती. यास्तव दया काय, प्रेम काय, वात्सल्य काय, मोहांत परिणत होणार नाही असें पाहिलेच पाहिजे. "पुण्यमपि पापमेव बंधकत्वात्" असें म्हणतात ते यासाठीच. एरवी अनाथाची दया करणें यांत वाईट काय आहे ? पण भरतांना यामुळेच हरिणाचा जन्म घ्यावा लागला.

आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे तो हा मोह टाळण्यासाठींच. मुले मोठी झाली, कर्ती झाली, कीं त्यांच्या विषयीचे ममत्व सोडून माणसाने वानप्रस्थी झालें पाहिजे. पण हा मोह सुटत नाहीं हे खरे. इतर काहीं नसले तर निदान एकटेपणाचाच उबग येतो आणि तोच मोहांत पाडतो. मुलांच्या संसारात राहिले तर निदान तटस्थवृत्तीने रहा, तेहि घडत नाहीं.

स्वतःच्या आवडी-निवडी, राहणीच्या कल्पना, वागण्याची पद्धत मुलावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणें लादली जाते आणि मग मुले वडीलधाऱ्या माणसांचा तिरस्कार करतात, निदान कंटाळा तरी करू लागतात. त्याची बोच वृद्धांना अधिकच खेद उत्पन्न करणारी ठरते. काहींचे जागणे तर याहिपेक्षा पुढच्या पायरीवर जाऊन लोभामुळे विषयासक्त होते. या अवस्थेला उद्देशून आमच्या ती. दादांचे एक भाषित -

केसांनीं बघुनी वयास आपुल्या कृष्णत्वहि त्यागिले ।
लक्षावे विषयांस ना म्हणूनि ते चक्षूहि मंदावले ॥
ताठा टाकून वाकली बघ ख सर्वास वंदावया ।
चित्ता टाक आतां भटकणें शोभे न जे या वया ॥

माणसाचा हिरवेपणा वयोमानाने जातो. पण हिरवटपणा मात्र उणावत नाही. लोभ सुटत नाही. आसक्ति मोहांत पाडते आणि हीच आसक्ति"पुनरपि जननं पुनरपि मरणम्" या चक्रांत गुंतविते. पुरता न होणे हें लोभाचे लक्षण आहे. शरीर दुबळे झालें तरी मनांतून तो जात नाहीं. त्यामुळें मग क्षोभ अधिकच वाढतो. इहलोकींचे जीवन दुःखमय होते आणि पुढच्या दुःखमय जीवनासाठी जणू ती शिदोरी नव्याने बांधून घेतली जाते.

मनीं मानव वेर्थ चिंता वाहातें । अकस्मात होणार होऊनि जातें ॥
घडे भोगणें सर्व ही कर्मयोगें । मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥ १७ ॥

मानव मनीं चिंता व्यर्थ वाहते. असा नपुंसकलिंगी शब्दप्रयोग करण्यांत माणसाचे दौर्बल्य विशेषरीतीनें व्यक्त झाले आहे. संबंधिताविषयींची तुच्छता, उद्वेग प्रगट करणे हाहि एक भाव अशा प्रयोगांत असतो. एकाद्या माणसाला तो वेडा आहे असें म्हणणें यातसुद्धा एकप्रकारचा सन्मानच आहे असें म्हटले पाहिजे. पण आहे झालं वेडं-खुळं हें म्हणण्यानें मात्र पराकाष्ठेची तुच्छता व्यक्त होते.

माणूस आधीं दक्षता घेत नाहीं. आणि मग जें व्हावयाचें तें टळत नाहीं हें निश्चित असतांनाहि काय होईल, कसें होईल याची चिंता करीत बसतो; आणि ही चिंताहि प्रयत्नाला सहाय्यक होणारी नसून व्यर्थ असते. भावी घटनांचे गांभीर्य लक्षांत घेऊन तें टाळण्यासाठीं, यथाशक्ति प्रयत्नशील होण्यासाठी ज्या तऱ्हेची भावना मनामध्ये बाळगावी लागते ती चिंता नव्हे. ज्या तऱ्हेची भावना माणसाला गोंधळांत पाडते, नुसतेच काय करावें, कसें करावे असें विचार उठत राहतात आणि हातून होत कांहींच नाहीं ही जी स्थिति ती व्यर्थ चिंता. ही बाळगण्यांत कांहींच अर्थ नाहीं. हिच्यामुळें उरलीसुरली कार्यक्षमताहि धुळीला मिळते.

भूतकाल माणसाच्या हातून निसटून गेलेला असतो आणि भविष्याचा कोणताहि भरवंसा देता येत नसतो. माणसाच्या हातात आहे तो वतर्मानकाल. त्याचाच त्यानें सदुपयोग केला पाहिजे; पण तेवढेंच होत नाहीं आणि मग जें व्हावयाचें तें टाळण्याचा कोणताहि मार्ग उपलब्ध असत नाही. वर्षभर उनाडक्या करणारा विद्यार्थी परीक्षेच्या निर्णयाचा दिवस जवळ येऊ त्यागला कीं चिंता करीत रडवेला होतो. तसेंच सगळीकडे होतें. हें माणसाला कळत नाहीं असें नाहीं; पण ती वेळ गेलेली असते. पीक येईल कीं नाहीं आणि किती येईल यासंबंधी सामान्य तर्क बांधता आले तरी त्यावरचे नियंत्रण हें माणसाच्या स्वाधीनचें नसते. शेतीसाठी करावयाचे कष्ट तेवढे त्याच्या स्वाधीनचे असतात. पण तिकडे दुर्लक्ष होते. आतां भवितव्याची चिंता करून लाभ कोणता ? जे व्हावयाचें तें होणारच. "होणारे न चुकेल होईल जरी ब्रह्मा तथा आडवा." काळजी घ्यावयाची असते ती बाण सोडण्यापूर्वी, प्रत्यंचा चढविण्यापूर्वी, बाण काढण्यापूर्वी, बाण जोडण्यापूर्वी, धनुष्य ओढण्यापूर्वी. यावेळीं दक्षता घेतली तर त्याचा उपयोगहि असतो. या गोष्टी माणसाच्या स्वाधीनहि असतात. माणसाच्या स्वाधीन त्याचें कर्म असते. भोग त्याच्या स्वाधीन असत नाहीं. सगळे जें भोगावे लागते तें कर्मानुसार भोगावे लागतें. हें लक्षांत न ठेवणारी माणसे ही व्यवहारतः कितीहि बुद्धिमान वाटली तरी खरोखरीच मतिमंदच ठरतात. कर्म करण्याचें वेळीं योग्य ती दक्षता न घेणे हें बुद्धिमत्तेच्या अभावाचे पहिलें लक्षण आणि जें आपल्या स्वाधीनचें नाहीं तें मनाप्रमाणें घडले नाहीं तर खेद करीत बसणे हें बुद्धीच्या हीनतेचें दुसरें लक्षण. जी गोष्ट आपल्या हातांतील नाही तिच्याविषयी माणसाने भगवदिच्छा समजून कोणत्याहि प्रकारचा खेद न बाळगता समाधानाने राहिले पाहिजे. "ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्तीं असूं द्याबे समाधान ॥ पण हें समाधानच राहत नाहीं.

जें घडावयास हवें होतें तें घडत नाहीं या वियोगाने माणसे रागावतात, संतापतात, दुःखी होतात, विषण्ण होतात. समर्थीच्या दृष्टिकोनांतून हाच माणसांचा मूखर्पणा आहे. आपलें आवश्यक तें कर्तव्यकर्म करीत राहणें निराळे आणि त्याची फळें प्राप्त झालीं नाहींत म्हणून विषण्ण होणें निराळें. पण माणसे कर्तव्य करतात असें दिसते तेंहि ममत्वाने, आणि हें ममत्व एका परमेश्वराव्यतिरिक्त कोठेहि राखणें दुःखालाच कारणीभूत ठरणारे असते.

या श्लोकातील वियोग शब्दाचा अर्थ मृत्यु असाहि करणें शक्य आहे. कुणाच्याहि मृत्यूनें असें शोकाकुल होऊन जाणें हेहि अज्ञानमूलकच आहे. या मागच्या ४- ५ श्लोकांत समर्थांनी मानवी शरीराची, पर्यायाने संसाराची क्षणभंगुरता आणि त्याच्या विनाशाची अपरिहार्यता सांगितली आहे. अतिसामर्थ्यसंपन्न असूनहि रावणासारखे दुष्ट मरतात. अपकीर्ति होऊन नष्ट होतात. म्हणून दुष्ट वासनांचा त्याग करावा. अत्यंत थोर थोर लोकहि कालवश होतात असें दिसत असल्याने माणसाने कशाचाहि लोभ धरूं नये, कसलाहि अहंकार बाळगू नये, असें लक्षांत ठेवावे आणि कालक्रमानें शरीर हें स्वभावतःच नष्ट होणारे असल्यानें अनेक प्रकारच्या व्याधींनीं, नाना प्रकारच्या दुःखांनी पीडिलें जात असल्यानें कशाविषयींही उगीचच चिंता करीत बसू नये. आणि योग्य ते उपाय करीत असून अपेक्षित ते यश मिळाले नाहीं तर खेदहि करीत राहूं नये. अशा नकारात्मक गोष्टी सांगून झाल्यानंतर समर्थ माणसाला कांहीं विधायक सूचना करीत आहेत. समर्थ म्हणतात -

मना राघवेंवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणे । तया वर्णितां सर्व ही श्लाघ्यवाणे ॥ १८ ॥

हे मना ! एका रामचंद्रावांचून दुसऱ्या कशाचीहि आशा बाळगू नकोस. मुले-बाळे, आप्तेष्ट, नेते-पुढारी कुणी कामाला येणार नाहीत. ईश्वराला आपलेसे करशील तर तोच एक तेवढा कोणत्याहि प्रसंगीं पाठीराखा म्हणून उपयोगी पडेल. तेव्हां आशा बाळगावयाची झाली, भरवसा धरावयाचा झाला, तर एका रामचंद्राचाच, ईश्वराचाच धरावा हेंच चांगलें. ईश्वराविण कशाची आशा धरू नको हें सांगण्यांत ईश्वरप्राप्तीविण कशाची अपेक्षा असूं नये हेहि गृहीतच आहे. प्रापंचिक सुखांना प्रमुख मानून तीं सुखे वा तीं सुखे पुरविणारी साधनें ईश्वराकडे मागत राहणे हें ईश्वराची आशा न धरण्यासारखेच आहे.

रामचंद्राशिवाय इतर सर्वांची आशा सोडून दे असें म्हटलें कीं कोणत्याहि माणसाची कीर्ति गाऊं नकोस हा नियम ओघानेच प्राप्त होतो. कारण माणसे जी कोणाची तरी स्तुति करतात ती श्रीमंतांची, सत्ताधाऱ्यांची वा प्रतिष्ठा पावलेल्या व्यक्तींची करतात. या लोकांची स्तुति करून त्यांना संतुष्ट केले म्हणजे प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे स्वतःचा लाभ साधतां येतो हें मर्म व्यवहारी माणसास पक्कें ठाऊक असतें. त्यामुळें भरमसाठ गौरवाच्या शब्दप्रयोगानें मानपत्राची वा स्तुतीची भाषा ओसंडून वाहते यांत एक प्रकारें लाचारी आहे. स्वार्थलंपटता आहे. ती योग्य नव्हे. माणसाची स्तुति करूं नये असें म्हणण्यांत, गुणग्राहकता असूं नये, कौतुक करूं नये, आदर बाळगू नये, वा जे खरोखरीच चांगले आहे त्याचा प्रचार करूं नये असें मुळींच नाहीं. पण माणसे स्तुति करतात ती या भावनेने क्वचितच. एरवी अघळपघळ वागणारी, बोलणारी, माणसेंहि खऱ्या गुणग्राहकतेच्या प्रसंगीं कृपणाहूनहि कृपण होतात. मग त्यांच्या कोशांत ठीक, बरें या व्यतिरिक्त जणू शब्द उरतच नाहींत. चांगले, उत्तम, उत्कृष्ट हे शब्द जणू त्यांना अज्ञात असतात. सत्ताधाऱ्यांच्यापुढें स्तुतीच्या शब्दांची कारंजी नाचविणारी विद्वत्ता खऱ्या गुणग्राहकतेच्या समयी दुष्काळी ओढ्याप्रमाणें कोरडी पडते. पण मत्सरापोटी निंदा करतांना मात्र प्रतिभेला पांडित्याचा बहर येतो.

आपल्या परंपरेमध्यें गुणग्राहकता वर्ज्य मानलेली नाही उलट सज्जनाची व्याख्या करतांना भर्तृहरीनें "परगुणपरमाणू पर्वतीकृत्य नित्यं । निजहृदि विकसन्तः सन्तिसन्तकियन्तः ॥" असेंच म्हटलें आहे. सज्जन स्वतःचे गुण सांगतच नाहीं. तो वर्णन करतो दुसऱ्याच्या गुणाचे आणि केवळ त्यामुळेंच तो स्वतः गुणवान असल्याचें लोकांच्या लक्षांत येते असेहि भर्तृहरीने म्हटलें आहे. तेव्हां समर्थांच्या वचनांतून गुणग्राहकता वर्ज्य मानावी असें समजण्याचे मुळींच कारण नाहीं. संत, सद्‌गुरु, सज्जन यांची जेव्हा केव्हां संधी मिळेल तेव्हां तेव्हां माणसाने स्तुति केलीच पाहिजे तरच चांगलेपणाचे संस्कार घडतील. लहान मुलांचे योग्य त्या प्रसंगीं कौतुक करावे, तरच त्यांना प्रोत्साहन मिळेल. पण एवढेच नेमके होत नाहीं. केलेल्या आणि न केलेल्या कामाचेंहि श्रेय स्वतःकडेच ओढून घेण्याची माणसाची प्रवृत्ति असते. असो. खरोखरीच ज्यांची स्तुति करावी असे सद्‌गुण माणसाजवळ किती असतात ? ईश्वर मात्र सर्व सगुणांचा सागर आहे. म्हणून वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनीं, संतमहात्म्यांनीं वारंवार गुणगान केलें आहे तें एका ईश्वराचेंच. ईश्वराची स्तुति करणें हेंच श्रेयस्कर आहे.[ Use Right click for download ]


मना सर्वथा सत्य सांडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य तें सत्य वाचे वदावें । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥ १९ ॥

माणसाची स्तुति कां करूं नये हें समर्थ या श्लोकांत सांगतात. माणसाच्या अंगांत बहुधा खरें सद्‌गुण नसतात. त्याचे गुण भासतात ते पुष्कळदां अज्ञानानें किंवा स्वार्थाने वा दंभाने ते त्याच्यावर लादले जातात म्हणून. पाहुणा जेव्हां स्वयंपाकाची स्तुति करतो तेव्हां तो पुढच्या जेवणाची चांगली सोय करून ठेवीत असतो इतकेंच. त्याचे बोलणे अमृतासारखे आहे, तो जणूं पृथीला नमवीत चालतो, हा सूर्यासारखा तेजस्वी आहे, ही तरुणी चंद्रासारखी सुंदर आहे, असें म्हणण्यांत काव्य असेल कदाचित् पण हें कधी यथार्थ ठरेल काय ? रसिकता व्यक्त करण्यासाठीं वा प्रतिष्ठितपणा सांभाळण्यासाठी माणसे असें काहीसे बोलतात. व्यवहाराच्या दृष्टीने कांहीं मर्यादेत अशा बोलण्याची उपयुक्तताहि आहे. पण सभ्यतेपोटी, शिष्टाचार सांभाळण्यासाठी असे बोलणे निराळे आणि स्वार्थासाठी लाचारीनें कुणाचा भाट होणें निराळें. निदान परमार्थमार्गातल्या साधकाने तरी सत्याची कास सोडता कामा नये आणि मिथ्या गोष्टीचा पुरस्कार करतां कामा नये. व्यवहारामध्ये मिथ्या आणि असत्य हे दोन शब्द सामान्यतः सारख्याच अर्थाचे मानले जातात. पण शास्त्रदृष्ट्या त्यांत अंतर आहे. जें खरें नसून खऱ्यासारखे भासते तें मिथ्या. दोरीवर भासणारा साप हा मिथ्या आहे. जें वस्तुतः जसें नाही तसें तें अज्ञानाने, मोहानें, वैयक्तिक दुर्बलतेनें, भासणें हें मिथ्यापणाचें स्वरूप. दंभ हाहि मिथ्याच. तेव्हां सत्याचा पुरस्कार करावा, सत्य ओळखावे आणि तें जाणण्याइतकी मन, बुद्धि, किंवा इंद्रियें ही शुद्ध, सात्त्विक असावींत तरच सत्याचा त्याग न करणें आणि मिथ्या न स्वीकारणें घडूं शकते. सत्य हें सत्यच आहें. तें तसेंच जाणले पाहिजे व सांगितलें पाहिजे. नवीन बुद्धिवादाने सत्याला सापेक्ष ठरविणारे तर्क मांडले आहेत ते वास्तविक कुतर्क आहेत. सापेक्षता सत्याच्या ठिकाणीं नसून ती तें ओळखणाऱ्या व पाहणाऱ्यांच्या ठिकाणीं असूं शकते. पण ती व्यक्तींतली उणीव आहे. तो इंद्रिय-मनबुद्धीच्या ठिकाणचा दोष आहे. जें सत्य त्रिकालाबाधित आणि निरपेक्ष तेंच वास्तविक सल्त्य होय. सत्याला स्थलकालाचें वा पाहणाराच्या योग्यायोग्यतेचे बंधन असूं शकत नाहीं. बुद्धिमध्यें रजोगुण, तमोगुण नसले, मनामध्यें स्वार्थ नसला, इंद्रियांना आसक्ति नसली म्हणजे सत्याचे दर्शन सहजपणे होते आणि अशी व्यक्ति जें पाहते, जें सांगते तें आपल्याला कळत नसलें तरी सत्यच असतें. भगवातू श्रीकृष्णासारखे पूर्णावतार आणि ज्ञानेश्वरांसारखे महात्मे ही या सत्यवादाची उदाहरणे.

पण माणसाला सत्य रुचत नाही, सोसत नाही, खरा अभिप्राय बहुधा कोणालाच नको असतो. खरें बोलणाऱ्याला मित्र मिळतील हें क्वचितच घडते. व्यवहारातील शिष्टाचार काय असतील ते असोत कारण ते खऱ्या अर्थाने पाळणे हें फारच अवघड आहे.

सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूद्यात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।
प्रियं च नानृतं बूयात् एष धर्म सनातनः ॥

खरे बोलावे, लोकांना आवडेल असे बोलावे, आवडणार नाहीं ते खरें असलें तरी बोलू नये, आवडते म्हणून खोटे सांगू नये. ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. ही फक्त "न ब्रूयात् मौनमाश्रयेत्" हा नियम पाळणारालाच साधेल. प्रत्यक्ष आचरण्याच्या वेळीं अप्रिय सत्यहि सांगावे लागते. तर प्रसंगविशेषी प्रिय असें असत्यहि बोलावे लागते. अप्रिय सत्याची उदाहरणे देण्याचे कारण नाहीं. माणूस पुष्कळ वेळां अहंकाराने तर, कांहीं वेळां तरी कर्तव्यपालनाच्या भावनेने अप्रिय असें सत्य बोलत असतोच. लाचारीने व स्वार्थासाठी बोलल्या जाणाऱ्या प्रिय असत्यााचा निषेध मागच्या श्लोकातील स्तुतीच्या प्रकरणांत आलाच आहे.

शास्त्रकारांनी सत्याची कसोटी 'हित' ही सांगितली आहे. 'यद्‌भूतहितमत्यन्तं तत् सत्यमिति धारणा." मात्र हित म्हणजे जे स्वार्थ साधून देणारे वा आपाततः सुखावह वाटणारे ते नव्हे. जे श्रेयस्कर, परिणामी लाभदायक, वस्तुतः कल्याणकारक ते हित आणि प्रसंगविशेषीं या हितासाठी वर वर दिसणाऱ्या वा भासणाऱ्या असत्याचाहि अवलंब करावा त्यागतो. नुकत्याच चालू बोलूं त्यागणाऱ्या लहान बालकाचे कौतुक जर त्याची आई करणार नाही तर मुलाची प्रगति होणें शक्यच नाही. मुलं वेड्यावाकड्या रेघोट्या काढते आणि प्रारंभी तरी आईला म्हणावे लागते, वा ! काय छान लिहिले आहे ! मुलाचे पोट बिघडू नये अशी इच्छा असेल तर लाडू लपवून ठेवावे लागतात आणि संपले म्हणून सांगावें लागते. विहिरीजवळ जाऊ द्यावयाचे नसेल तर जाऊं नको तेथें बागुलबोवा आहे असें भय घालावे लागते. हें सर्व वरवर पाहतां खोटेच आहे, मिथ्याच आहे. पण यामुळे निर्माण होणारी सापेक्षता व्यक्तीची आहे हें लक्षांत ठेवले पाहिजे.

हे लक्षांत न घेतल्यामुळें अहंकाराने स्वतःला न्यायाचा जणू मूर्तिमंत अवतार समजणारे अतिशहाणे, श्रीकृष्णाला अनेक प्रसंगी दूषणे देत असतात. पण श्रीकृष्णाच्या वर्तनाची कसोटी परीक्षिताच्या जन्माच्या निमित्ताने त्यागलेली आहे आणि तरी श्रीकृष्णाला दोष देणे हें मिथ्या पुरस्कारणेंच आहे. ते करता कामा नये.

दुसऱ्याची निंदा करताना वा दोष दाखवताना मनुष्य जितका जागत असत्याचा वा कांटेकोरपणाचा आव आणतो तितका तो स्वतःच्या उणीवा लक्षांत घेण्याच्या कामी दक्ष असतो काय ? याचाहि विचार करणें आवश्यक आहे. दुसऱ्याचे अंगी नसलेले दोष त्याचेवर लादणारा माणूस स्वतःच्या झालेल्या चुका वा असलेल्या उणीवाहि आग्रहपूर्वक अमान्य करीत असतो. आपल्या स्वभावाचे वा कृत्याचे नाना प्रकारांनी समर्थनच करीत असतो. आपलें चुकले व आपल्यांत दोष आहेत असे त्यास कधी वाटतच नाहीं. अगदीं जिव्हाळ्याच्या अधिकारी आप्ताने, सन्मित्रानें वा ज्याला तो आपण होऊन गुरु मानतो त्यानेहि दाखविलेल्या चुका माणसाला मानवत नाहींत, आवडत नाहींत. लाचाहि रागच येतो. दोष दाखविणारा चांगला विद्वान आणि कुशल वक्ता असेल तर माणूस एकवेळ निरुत्तर होईल पण तरी त्याला मार्गदर्शकाचे सांगणें पटणार नाहींच. वस्तुतः झालेल्या चुका आपण होऊन लक्षांत येणे, निदान कोणी सांगितल्या तर मोकळ्या मनाने मान्य करणें व न संतापतां, न वैतागता पुनरपि त्या वा तशा चुका हातून घडणार नाहीत याची दक्षता घेणे हेंच माणसाच्या प्रगतीचे साधन आहे. पण हृदयांत घर करून बसलेला अहंकार इतका बलवान् असतो कीं तो सत्याचे खरे ज्ञान होऊच देत नाही. अहंकारामुळें जे वाटते ते वाटणें यथार्थ नसतें. हें लक्षात घ्यावे म्हणून समर्थ 'सत्य तें सत्य वाचे वदावे आणि मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे' असें आग्रहाने सांगत आहेत.

चूक ही चूकच. अपराध हा अपराधच. त्याचे लहान-मोठेपण मानणें सापेक्ष आहे. वीर परशुरामांची माता आणि महर्षि जमदग्नीची पत्नी महासाध्वी रेणुका हिचा शिरच्छेद ज्या अपराधासाठी जमदग्नींनी करविला त्याचे स्वरूप इतके तुच्छ आणि नगण्य होते की तिच्या त्या स्वाभाविक भावनेला अपराध म्हणणेंहि अतिशयोक्तीचें ठरावे. अलीकडे तर आपण यापेक्षा कितीतरी पटीनें दोषास्पद असणाऱ्या घटनांना "यात काय बिघडले ? " "याने काय होते ?" असेंच सहजपणाने म्हणत असतो. 'काकडीच्या चोरीला फाशीची शिक्षा योग्य नाही' अशा अर्थाची मराठीमधे एक म्हण आहे. रेणुकेला जें वाटले ते काकडीची चोरी म्हणण्याइतक्या पातळीवरहि येणे शक्य नाही आणि तरी जमदग्नीने आपल्या पत्नीला, साध्वी पत्नीला व्यभिचारिणी अशा घाणेरड्या नावाने संबोधले आणि शिरच्छेदाची शिक्षा ठोठावली. स्वतः मातृभक्त पुत्रानें पित्याची आला म्हणून ती कार्यवाहीत आणली. या आज्ञाधारकपणानें जमदग्नि प्रसन्न झाले आणि परशुरामास वर माग म्हणाले. परशुराम म्हणाले-माझ्या आईस जीवंत करा. जमदग्नीनी प्रसन्न मनाने ती मागणी मान्या केली. रेणुका जिवंत झाली पण त्या थोर स्त्रीने एवढ्याशा लहान, अगदी नगण्य अशा अपराधासाठी क्रूर शिक्षा ठोठावली म्हणून जमदग्नीना दोष दिला नाहीं. उलट आपली चूक लहान नव्हती, त्याचें हे योग्य प्रायश्चित्त मिळालें असेंच तिला वाटलें. त्यामुळेच ती देवता म्हणून वंदनीय, पूजनीय ठरली. माहूर हें रेणुकेचे स्थान पवित्र क्षेत्र ठरलें. श्रीविश्णूदासासारखे थोर अधिकारी तिचे अनन्य भक्त झाले.

स्वतःच्या हातून घडलेल्या मोठ्यांत मोठ्या चुकांनाहि निरनिराळ्या कारणासाठी समर्थनीय मानणारांची जात आणि मनुष्य स्वभावाचा विचार करतां व्यवहारतः तरी अगदी नगण्य असलेल्या दोषांनाहि शुद्ध तात्त्विक भूमिकेने कठोर शिक्षेसहि योग्य मानणाऱ्यांची वृत्ति यांतील अंतर लक्षांत घेण्यानेंच मनुष्य अध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होण्याची शक्यता आहे.

व्यवहारांत वागतांना इतका सूक्ष्म, इतका कठोर कांटेकोरपणा वा इतकी उग्र सत्यनिष्ठा अवलंबता येणार नाही हे खरेच; पण त्यामध्यें द्वेषबुद्धि, दांभिकता, राक्षसी स्वार्थ वा लाचारी नसावी, एवढे तरी मान्य केलेंच पाहिजे. सभ्यता, सौजन्य, शिष्टाचार समजूं शकतो. दुसऱ्याला सुधारण्याचे उत्तरदायित्व ज्याच्यावर प्रत्यक्षपणे सोपवले गेलेले नाहीं वा दुसऱ्याची सुधारणा करणें हें ज्यानें जीवनकार्य वा व्रत म्हणून स्वीकारले नाहीं त्यानें सौजन्य आणि सभ्यता यांचेंच पालन करावें. मग सत्यवादाला थोडीशी मुरड घालावी त्यागली तरी चालेल. सत्यवादाच्या नांवाखाली वा स्पष्टवक्तेपणा असावा म्हणून सौजन्याचा घात करणारा फटकळपणा हे व्यवहारशून्यतेचेंच लक्षण मानलें पाहिजे. खऱ्या, निःस्पृह व्यक्तीला कांहीहि शोभते. तोच आव इतर स्वार्थपरायणांनीं आणूं नये. त्यांनीं केवळ स्वतःच्या सुधारणेचा विचार करावा. खरी निःस्पृह माणसे फटकळ असतातच असे नाहीं. लोकांमध्यें जो फटकळपणा आढळतो तो बहुधा सत्ता आणि संपत्तीने युक्त असणाऱ्या अहंकारी व्यक्तीमध्यें. म्हणून आपल्या प्रगतीपुरतें पहावे. सौजन्य हें आत्मविकासाला सहाय्यक आहे.

वस्तुतः दुसऱ्या कोणाला सुधारता येतच नाहीं. कुणी कोणाचें ऐकत नाहीं. महर्षी व्यासांसारख्या थोर महात्म्यालाहि, प्रज्ञावंत पुरुषालाहि, माझें कुणी ऐकत नाहीं असेंच म्हणावें लागलें, तेथें सामान्यांची काय कथा ? तेव्हां दुसऱ्याच्या बाबतींत सत्यवादी असण्याचे कारणच नाही'. याच दृष्टीनें "कासया गुणदोष वानूं आणिकाचे । मज काय त्याचें उणें आहे ॥ " असे संत म्हणतात. सुधार शक्य आहे फक्त आपलें आपणाला. तेथें मात्र सत्य काय आणि मिथ्या काय याचा करतां येईल तेवढा सूक्ष्म विचार करावा आणि मिथ्याचार टाळून सत्यनिष्ठ होण्याचा अहर्निश प्रयत्न करावा.

बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना ते चि मोठी ॥
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासी । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥

भगवंतांनी गीतेच्या १३ व्या अध्यायांत ज्ञान कशा-कशाला म्हणावे तें १८ लक्षणांनीं सांगितलेलें आहे. त्यांत जन्ममृत्युजरा-व्याधिदुःखदोषानुदर्शम् (भ. १३-८) असें एक ज्ञानलक्षण सांगितले आहे. त्यांत पुढच्या तिघांचेंहि जन्म हेंच मूळ कारण असल्यामुळें जन्माची दुःखे व जन्माचे दोष लक्षांत घेतले तर पुढील सर्वच दुःखदायक प्रवासाचा परिहार होणे शक्य असल्यानें पुन्हा जन्मच येणार नाही अशी दक्षता माणसाने घ्यावयास हवी. कारण एकदां जन्म स्वीकारला कीं मग जरा, व्याधि आणि मृत्यु हे अपरिहार्य आहेत. आत्महत्या हा त्यांतून सुटावयाचा मार्ग नाहीं. कारण तो घोर अपराध आहे. तुरुंगांतून पळून जाणें हें जसें शासकीय क्षेत्रांत दंडनीय मानलें जातें तसेंच अध्यात्मिक क्षेत्रांत आत्महत्येचेहि आहे. तेथें जसें तुरुंगांतून पळून जाणाऱ्या माणसाला मागील सर्व शिक्षा व पळून जाण्याच्या अपराधाबद्दल पुन्हा अधिक शिक्षा भोगावी लागते तसेंच आत्महत्येनंतर होते. पुढचा जन्म चुकत नाही. त्यांत उरलेले भोग भोगावे लागतातच आणि आत्महत्येचे पातक शिरावर बसल्याने त्याचेहि प्रायश्चित्त अधिक दुःखभोगाच्या रूपानें घ्यावेंच लागतें.

जरा, व्याधि, मृत्यु या प्रत्यक्षपणे अनुभवास येणाऱ्या आणि अंवतीभोंवतीहि प्रत्यहीं उघडपणे दिसूं शकणाऱ्या अवस्थांची, त्यातील दोषांची आणि दुःखाची जशी माणसाला स्पष्ट कल्पना असते वा येऊ शकते, तशी स्थिती जन्म या अवस्थेची नाहीं. पण तीच इतरांना मूळ कारण असल्यानें समर्थ जन्मदशेचें स्वरूप या श्लोकामधे स्पष्ट करून सांगत आहेत.

जे अनुभवलें वा वारंवार दिसलें, त्यानें तरी माणूस कोठे शहाणा होतो ? एक बुद्धाचा तेवढा अपवाद. त्यानें तेवढे रथातून जातांना एक व्याधिग्रस्त, एक वृद्ध, एक प्रेत पाहिले आणि पित्यानें अत्यंत सुखांत वाढविलेल्या या सुकुमार आणि सुखी राजपुत्रानें सारथ्यास विचारले हें काय आहे ? सारथ्याने सांगितलें- प्रत्येक माणसास या अवस्थांतून जावेच लागते आणि त्याचक्षणी गौतमाने संसारातील सर्व सुखें आपल्या हाताने बाजूस सारून, ज्यामुळे या आपत्तीतून तरून जातां येईल असा मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला. लौकरच यशोधरेसारखी तरुण, सुंदर, सालस पत्नी आणि राहुलासारखे राजबिंडे कोवळें पोर यांचा त्याग करून तो तपश्चर्येसाठी अरण्यांत निघून गेला. सामान्य माणसाचे असे होत नाहीं. पुढच्यास ठेच त्यागून मागच्याने शहाणे व्हावें एवढा विवेक तो दाखवीत नाहीच पण स्वतः ठेचा खात असतांनाहि शहाणा होत नाहीं. असें लक्षात आल्याने जनकल्याणाची तळमळ असलेल्या संतांनी आपल्या वाङ्‌मयांतून जन्मदोषाचें, जन्मदुःखाचे अनेकवेळा सविस्तर वर्णन करून ठेवले आहे.

अलीकडील कांहीं नवीन लोकांना, विशेषतः नवविचारांच्या बुद्धिवाद्यांना, संतानी केलेलें हें वर्णन बीभत्स, किळसवाणे, अमंगल म्हणून आक्षेपार्ह वाटतें. त्यासंबंधीची त्यांची भूमिका ते मोठ्या आग्रहीपणाने मांडीतहि असतात. त्यांतील त्यांचें पहिलें म्हणणें असें कीं ज्या तऱ्हेच्या दुःखाचे कोणालाहि थोडेसेंहि स्मरण असत नाहीं त्याचें वर्णन करून पुढच्या संपूर्ण जीवनाविषयी तिरस्कार निर्माण करणें हा संतांचा प्रयत्न नैराश्य पसरविणारा आणि म्हणूनच घातक आहे. या अनुषंगाने मग बुद्धिवादी इतरहि आक्षेप घेत असतो. गर्भात असतांना बालकाला वेदना होतात हें मानण्यास तरी पुरावा काय आहे ? असेंहि त्यांचें म्हणणें असते. पण गर्भात असतांनाहि बालकाला फार वेदना असतात, हें अलिकडील शास्त्रज्ञांनीहि मान्य केलें आहे. दुसरें असें कीं ज्याचे स्मरण नाहीं, जाणीव नाहीं, त्याचें वाईटपण जर नाकारावयाचें असेल तर वेड्याला बरें करण्याचें प्रयत्न सोडून दिले पाहिजेत.

बहुधा कोणत्याहि वेड्याला आपण वेडे आहोत हें पटत नाहीं. आणि त्यावर केले जाणारे उपचार त्यास मानवत नाहींत. उलट दुःखदायक वाटतात. तरीहि समाजांत शहाणा म्हणविणारा समुदाय वेड्यावर उपचारांचे बलात्कार करीतच असतो. अपराध्यानें स्वतःचा अपराध, अपराध म्हणून स्वीकारला तरच त्याला शिक्षा द्यावी; अन्यथा त्याला दोषमुक्त मानावें, हें कोणत्या समाजांत चालण्यासारखे आहे. ४- ५ वर्षांचे मूल रोगाने पीडले असलें तर त्याच्यावर पथ्य लादावे लागतें. ते करावें कीं नाहीं हें त्याच्यावर सोपवून चालत नाहीं. जन्माचे दोष सांगू नका म्हणणाऱ्या बुद्धिवाद्यांनी यांची उत्तरे शोधली तर संतांची भूमिका योग्य असल्याचे कळण्यास अडचण पडणार नाहीं.

दुसरा एक विचार असा असतो कीं जन्माला येण्याची जी प्रक्रिया आहे, ती निसर्गसिद्ध स्वाभाविक अशीच असल्याने अपरिहार्य आहे. तेव्हा तिचे दोष, हे दोष म्हणून मानण्यांत अर्थ नाही. संतानी तें केलें आहे म्हणून तें चूक आहे. यांतील अपरिहार्यतेचा जो अंश आहे तो कांहीं अंशी योग्य असला तरी पूर्णपणे उचित नाहीं. अपरिहार्यता प्रक्रियेस आरंभ झाल्यानंतर आहे. प्रक्रियाच अपरिहार्य नाहीं. तत्त्वज्ञानाप्रमाणे जन्माचे दुःख पुन्हा भोगावयास न लागणे ही गोष्ट माणसाच्या स्वाधीनची आहे. ज्यांना पुनर्जन्म नाकारावयाचा आहे त्या चार्वाकमतानुयायांची गोष्ट निराळी. त्यांचा विचार येथें करतां येणार नाहीं.

एकादी गोष्ट अपरिहार्य असेल पण त्यामुळें ती चांगली ठरत नाहीं आणि अपरिहार्य म्हणून चांगली वाटतांहि कामा नये. मलमूत्रात लोळणे चांगलें नाहीं. लहान मूल मलमूत्रांत लोळते व त्याहि स्थितींत तें हात पाय हालवीत हसत खिदळत असतें. थोडे मोठे झालें तर तें विष्ठाहि चिवडतें. पण शहाणी आई, दक्ष आई, त्याला तसे करूं देत नाहीं. मुलाला लगेच स्वच्छ करते. कदाचित् त्याच्या इच्छेविरुद्ध ती स्वच्छता त्याच्यावर लादते. मूल आक्रोश करीत असते आणि आई त्याला धुवून पुसून स्वच्छ करीत असते. क्वचित् मारतेहि. मुलाला जे वाईट, वाईट म्हणून जाणवत नाहीं, उलट आईला जें चांगलें वाटते तें मुलाला आवडत नसतांनाहि आई मुलावर लादते. पण ही गोष्ट चांगली नाहीं असें बुद्धिवादी म्हणत नाहींत. काही विक्षिप्त मानसशास्त्रज्ञांची एकांगी, एककल्ली भूमिका सोडली तर आई मुलाच्या स्वच्छतेची काळजी घेते ही गोष्ट समाजाने आणि आरोग्यशास्त्रानेहि आवश्यक अशीच मानलेली आहे.

हीच स्थिति जन्माच्याहि वर्णनाची आहे. म्हणून जन्माला येण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या अवस्थांना संत चांगले मानीत नाहींत व माणसाने त्या प्रसंगातून सुटका करून घ्यावी असा त्यांचा उपदेश असतो. अपवाद केवळ मानवी कल्याणासाठी अतिशय उदात्त जीवन जगण्याच्या अवतारकार्याचा. पण तो संदर्भ स्वतंत्र आहे. या वर्णनाचा त्याच्याशी कांहीं संबंध नाहीं. जन्ममृत्यूच्या पाशांतून सुटणे यालाच आपल्याकडे मोक्ष म्हटले जातें व मोक्ष हाच परम पुरुषार्थ आहे. मृत्यूच्या पाशांतून सुटावयाचें असेल तर जन्माच्या पाशांतून सुटले पाहिजे अन्यथा 'मरणं प्रकृतिः शरीरिणाम्' हा नियम सार्वत्रिक आणि त्रिकालाबाधितच आहे. आणि त्यामुळें पुन्हा जन्माला न येणे हाच त्यावरचा एकमात्र खरा उपाय आहे.

कांही अवस्थेमध्ये आपल्याला हें पटते. जीवन नको वाटावे आणि संपलें तर बरें झालें असें म्हणावें असे प्रसंग मानवी जीवनांत घडतात कीं नाही ? उदा. अर्धांगवायूच्या विकाराने विकल झालेला मनुष्य क्वचित् वर्षानुवर्ष जगतो, त्याला हालचाल करतां येत नाहीं, मलमूत्रत्यागासाठीं अंथरुण सोडता येत नाहीं, मलमूत्राचे वेग आवरता येत नाहीत, क्यचित् आलेले कळतहि नाहींत. शुश्रूषा करणारी माणसे दक्ष नसली, जिव्हाळ्याची नसली म्हणजे मग त्या रोग्याचे हाल पाहवत नाहीत. शुश्रूषा करणाऱ्या माणसाला स्वतःचे जीवन असल्यानें त्याला, रोग्याची उपेक्षा केली म्हणून, फार दोषहि देतां येत नाहीं. अशा स्थितींत तो रोगी, विवेकी असेल तर, आतां मरण आलें तर बरें असें स्वतः म्हणत असतो आणि त्याच्या अवतीभोवतीचे इष्टमित्रहि हा सुटला तर बरे असेच प्रगट किवा अप्रगट म्हणत असतात. त्या रोग्याचे खरें दुःख परस्वाधीनपणाचें असतें. ज्या रोग्यामध्ये परस्वाधीनपणा येत नाही, किंवा आलेला निश्चयानें फार काळ टिकत नाही, अशा रुग्णावस्थेत मरण बरें अशी भावना आप्तेष्टांना तरी होत नाही. वेदनांच्या तीव्रतेने कदाचित् त्या रोग्यास होईल.

जन्म आणि जन्मापासूनचे सर्व जीवन हें खऱ्या अर्थाने कधीच स्वतंत्र नसतें. उण्याअधिक प्रमाणांत तें परतंत्रच असतें. त्यासाठीं कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची बंधने स्वीकारावींच लागतात. आपल्या मर्यादांची जाणीव ठेवावी लागणें हें एरवी गुप्त म्हणून प्रसिद्ध असले एक फार विचित्र असें बंधनच आहे. मोक्ष म्हणजे सर्व बंधनांचा अभाव असा सिद्धांत असल्यानें, जन्माच्या मागोमाग सोसावी लागणारी बंधने टाळणे हेंच उचित असल्यानें संतानी त्याचाच विचार सामान्यांना चांगली जाणीव व्हावी इतक्या स्पष्टतेनें केला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आईच्या उदरांत असतांना काय अवस्था भोगावी लागते याचें स्वरूप तर लक्षांत घ्या.

खरोखरीच जाणीव नसते म्हणूनच तें जाणवत नाहीं. जाणीव असलेल्या स्थितींत तशी अवस्था भोगत असल्याची कल्पना करून पहावी म्हणजे संतवचनांची यथार्थता समजेल. स्मरण नसतें म्हणून बरें वाटतें म्हणण्यांत काय अर्थ आहे ? अज्ञानाला वरदान मानण्यासारखेच तें आहे. पारमार्थिक दृष्ट्या तें काय उपयोगाचे ? हितकर काय आहे तें एकदां ठरल्यानंतर त्याकडे प्रवृत्त करण्यासाठीं मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून कांहीं गोष्टी स्पष्ट सांगितल्या तर त्यासाठीं राग कां वाटावा ? स्मरण राहत नाहीं, म्हणून वस्तुस्थिति खोटी म्हणतां येईल कां ? हितकर त्याचें स्मरण द्यावेच लागतें. आवडो न आवडो, सोमीचे असो वा नसो, तें आवश्यकच असते. विमान आक्रमणाची कल्पना देण्यासाठी भोंगा होतो. त्यावेळीं कोणी जेवत असतो, कोणी खेळत असतो, कोणी झोपलेला असतो. सर्व गोष्टी सोडून तळघराकडे पळावे लागते. आतां अशा परिस्थितीत कुणी त्या भोंग्यावर चिडला तर त्याला विचारी मनुष्य काय म्हणेल ? त्याच दृष्टीनें संतांच्या उपदेशाचा राग धरण्यांत अर्थ नाहीं.

गर्भवासांत काय होते तें सांगतांना समर्थ म्हणतात गर्भावासांत जीवाला फार यातना असतात. कारण तो तिथे शिजत असतो, पचत असतो, पण वाढ होण्यासाठी या उष्णतेची आवश्यकताच असते. थंडींत वाढ होत नाहीं. वाढीसाठी उष्णताच उपयोगी असते. धान्याला मोड येणे ही एकच गोष्ट उन्हाळ्यांत व हिवाळ्यांत कशी होते तें पाहिलें म्हणजे हें लक्षांत येईल. दुधाचे दही होतांनाहि हेंच लक्षांत येते. गर्भाचे पोषण नि आरोग्य पूर्णपणे आईच्या आहारविहारावर अवलंबून असल्यानें तिने अज्ञानाने वा मोहानें केलेले मिथ्याचार तिच्यापेक्षा, कोवळ्या गर्भालाच अधिक भोगावे लागतात. हें परस्वाधीनपण फारच केविलवाणे आहे. म्हणूनच समर्थ बहू हिंपुटी होईजे मायपोटीं असें म्हणतात.

जन्मास येतांना अधोमुख होऊनच यावे लागते. जणू हताश पराभवाचे हें प्रतीक. तसें न यावें तर आईच्या व स्वतःच्याहि जीवास धोका निर्माण होतो. अगदीं सरळपणे जन्म झाला तरी संकुचित मार्गानें बाहेर पडण्याचे जे दडपण डोक्यावर आणि शरीरावर येतें व त्यामुळे ज्या वेदना होतात त्याही असह्य म्हणाव्या अशाच असतात. जाणीव नसल्यामुळें त्यांचें स्मरण नसतें इतकेंच. नाना प्रकारची शस्त्रकर्मे संमोहन देऊन केली जातात. त्यामुळें शस्त्रकर्माच्या वेदना जाणवत नाहींत. अर्थात त्याचें स्मरणहि असत नाहीं. पण म्हणून कोणी शस्त्रकर्म करण्याचा प्रसंग हौसेने ओढवून घेत नाही. तेच जन्माच्याहि बाबतींत समजलें पाहिजे.

जन्माला येणें नको हें मान्य झालें तर मग त्यांतून सुटावयाचा मार्ग कोणता ? जन्मयातना पुन्हा भोगण्याचा प्रसंगच येणार नाहीं हें कसें घडेल ते समर्थ पुढील श्लोकांत सांगत आहेत.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP