श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण

॥ श्रीराम समर्थ ॥

म्हणे दास सायास त्याचे करावे । जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥
गुरु अंजनेंवीण तें आकळेना । जुनें ठेवणें मीपणें तें कळेना ॥ १४१ ॥

जुनें ठेवणें म्हणजे आपली परंपरा, आपलें धर्मशास्त्र, आपलें अध्यात्म, आपला अर्थकामाचा विचार, आपल्या भारतवर्षामध्ये मान्यता प्राप्त असलेली समाजविषयक धारणा, आपले नीतिनियम, आपलें तत्त्वज्ञान, आपला प्राचीन इतिहास, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, हें आपलें वाङ्‌मय माणसाला पशुत्वातून देवत्वाच्या पदवीवर नेऊन सोडणारे, नराचा नारायण करणारे सामान्यालाहि सत्पुरुषाच्या पदावर चढण्याची संधी देणारे, सर्वांची सोय करून हितापर्यंत पोंचविणारें, हें सगळे आपले जुनें ठेवणें आहे. ते फार जुने आहे, वेदाइतके, महाभारताइतकें प्राचीन आहे. इतिहास संशोधकांना चक्कर यावी इतक्या पूर्वीचा हा काळ आहे, आणि त्यामुळेंच माणसाला ऐश्वर्यशाली बनविणारा हा समृद्ध ठेवा सहजासहजी ओळखता येत नाहीं. समर्थ म्हणतात-त्यासाठीं सायास केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, दक्षतेने, विवेकाने, सातत्याने श्रम केले पाहिजेत. आळस करतां कामा नये, दीर्घकालपर्यंत कराव्या लागणाऱ्या कष्टांना कंटाळता कामा नये. आंब्याच्या झाडाची फळे रोप लावताच चार सहा महिन्यांत हातीं पडत नाहीत, ५ - १० वषें त्याकरिता वाट पहावी लागते, हे लक्षांत ठेवले पाहिजे.

हें सगळे माणसाच्या नीटपणे ध्यानांत येत नाहीं, म्हणून त्याला कोणाचें तरी मार्गदर्शन पत्करावे लागते. माणसाचे हें वैशिष्ट्य आहे. पाहिजे तर वैगुण्यहि म्हणावें. माणसाला शिकविणारा, समजावून देणारा लागतोच लागतो. नैसर्गिक प्रेरणेने त्याला फारच थोडे साधणे शक्य आहे, त्यादृष्टीनें तो पशुपक्ष्यांइतका किंवा कृमिकीटकांइतकाहि स्वतंत्र नाही. सर्व जीवकोटीमध्यें मनुष्य श्रेष्ठ खरा पण हें श्रेष्ठत्व अनुभविण्यासाठीं त्याला पदोपदी मार्गदर्शन पत्करावे लागतें. म्हणून समर्थ म्हणतात आपलें हित, आपलें कल्याण, आपली प्रगति, आपली उन्नति साधावयाची असेल तर माणसाने जाणत्याचे, ज्ञात्याचे, तज्ञाचे पाय धरले पाहिजेत. आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार दूर सारून अनुभवी पुरुषाला शरण गेलें पाहिजे. ज्ञान देणारा सत्पुरुष निःस्पृह, उदार, कनवाळू असला तरी ज्ञान घेणाराची पात्रता सिद्ध व्हावी लागते. ती विनम्रपणे नमस्कार करण्याने, जिज्ञासेने, विनयाने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानें आणि आळस न करतां केलेल्या सेवेने सिद्ध व्हावयाची असते. यासाठींच गीतेने 'तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । मग "उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः " (भ. ४ | ३४) असें म्हटलें आहे. समर्थांनींहि "पाय त्याचे धरावे" म्हणून सांगितलें आहे. त्यात हा इतका भाव आहे.

आपण शिष्टाचार म्हणून, एक रूढी म्हणून किंवा मनांत नसले तरी लौकिकामध्ये नम्रता सिद्ध व्हावी म्हणून, नमस्कार करणें, जमिनीवर डोके टेकणें, पायांवर डोके ठेवणे, साष्टांग दंडवत घालणे, असें नमस्काराचे अनेक प्रकार करतो. पण त्यांत खरा विनय, खरा भाव, खरी श्रद्धा नसते. पंढरपुरामध्यें पायांवर डोके ठेवून परस्परांना नमस्कार करण्याची पद्धत अद्यापीहि रूढ आहे. "पंढरीच्या लोकां नाही अभिमान ! पाया पडे जन एकमेकां ।।" या संतवचनाचा तो परिणाम असावा. पण ते खरोखरीच निरहंकारी वृत्तीनें घडते काय ? ज्याच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावयाचा, त्याच्या विषयीं नमस्कार करणाराच्या अंतःकरणांत जर द्वेष, मत्सर, निंद्यतेची भावना असेल तर पायावर डोके ठेवणे या क्रियेला कांहीं अर्थ राहात नाहीं. पाय हे शरीरावयवामध्ये निकृष्ट. डोके हे शरीरावयवांमध्यें उत्कृष्ट. म्हणून त्याला उत्तमांग असें म्हणतात. माझें हें मस्तकहि तुमच्या पायांपेक्षा कमी योग्यतेचें आहे, अशी परमादराची भावना वंदनकर्त्याच्या मनांत असावयास हवी. पण तशी बहुधा नसते. त्यामुळे असा हा नमस्कार एक उपचार मात्र ठरतो. आमचे ती. दादा एकदां थट्टेने म्हणाले होते, "पंढरपूरचा हा नमस्कार निदान कांहीं लोक तरी तूं माझें सांगू नकोस, मी तुझें सांगत नाहीं, यासाठीं करतात. " भावनाशून्यतेवरची ही टीका आहे. ज्ञानसंपादनासाठीं ज्यानें नमस्कार करावयाचा त्या जिज्ञासूच्या अंतःकरणांत त्यावेळीं आदर नि नम्रता हे भाव असलेच पाहिजेत. श्रद्धा, विश्वासाचींच तीं अंगें आहेत. ज्ञान मिळवावयाचें तर जिज्ञासू श्रद्धायुक्त, तत्पर आणि संयमशील असावाच लागतो तरच ज्ञान मिळते. "श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । " (भ. ४ | ३९) असें गीतेने स्पष्टपणे म्हटलें आहे. ज्ञान मिळवावयाचे तर गुरूची त्यासाठी नितांत आवश्यकता आहे. गुरुवाचून प्राप्त झालेलें ज्ञान असावें तसें यथार्थ असत नाहीं. म्हणून आपल्याकडे अगदी प्राचीन कालापासून गुरूची आवश्यकता स्वीकारलेली आहे. "तद्‌विज्ञानार्थं गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् । " ब्रह्माचें ज्ञान विशेषरीतीने प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय अशा गुरूला हातामध्ये समिधा घेऊन शरण गेलें पाहिजे. "समित्पाणि" हें शिष्याचें विशेषण मोठे मार्मिक आहे. समिधा जशा वाळलेल्या असतात, तसा हा विरक्त असला पाहिजे. समिधा आहुतीसाठी असतात. तशी याची त्यागाची सिद्धता असली पाहिजे. वाक्यातील 'एव' कार महत्त्वाचा आहे. गुरूलाच शरण गेलें पाहिजे आणि गुरूला शरण गेलेच पाहिजे इतका अर्थ त्या 'एव' काराचा आहे. " आचार्यवान् पुरुषो वेद । " गुरु केल्यानंतरच पुरुषाला ज्ञान मिळू शकते असेंहि उपनिषदाने सांगितलें आहे. जगदगुरू श्रीशंकराचार्यानीं ज्ञानदात्या सद्गुरूला देण्यासारखी तुल्यबळ उपमाच सापडू शकत नाहीं, असें निश्चयानें सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजहि "म्हणोनि भाग्य जें सानुकूळ । जालिया केलें उगम सदा सफळ । तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥ कां इंद्रियें वाचा प्राण । या जालियांचें तैचि सार्थकपण । जे चैतन्य येउनि आपण । संचरे माजि ॥ तैसें शब्द जात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें । तें तैचि म्हणों ये आपुलें । जे सानुकूल गुरु ॥ (ज्ञाने- १० । १६८, ७१, ७२) अशीच श्रीगुरूची आवश्यकता प्रतिपादन करतात.

आमच्या ती. दादांनीहि "आत्मस्वरुपा पाहणे असल्या दर्पण घ्या गुरु हातीं । हें नच केल्या पाहूं गेल्या होईल अवघी फजिती ॥ " असेंच म्हटलें आहे. श्रीतुकाराममहाराजहि "सद्‌गुरुवांचोनि प्रेतरूपी वाणी ' असेंच गुरूचे महत्त्व सांगतात आणि ज्यानें गुरू केला नाही त्याचा "निगुरा अखंड सुतकाळा । " असा निषेध करतात.

समर्थांनीहि दासबोधांत "असो जयासी मोक्ष व्हावा । तेणे सद्‌गुरु करावा । सद्‌गुरूविण मोक्ष पावावा । हें कल्पांतीं न घडे ॥ " असें सांगितलें आहे. (दासबोध ५ | ११४)

अध्यात्ममार्गात सद्गुरूचे असें निरपवाद महत्त्व असल्यानें ' गुरू अंजनेंवीण तें आकळेना ' असें समर्थ या श्लोकांत सांगत आहेत. विशिष्ट रीतीनें मंत्रसिद्ध केलेले अंजन डोळ्यांत घालताच भूमिगत द्रव्य पाहण्याचे सामर्थ्य डोळ्यांत येतें, असें म्हणतात; तोच प्रभाव गुरुकृपेचा आहे, असा निश्चय समजावा. सत्यदर्शनासाठी गुरुकृपेची नितांत आवश्यकता आहे म्हणून तर ज्ञानेश्वरांसारखे, बुद्धिमत्तेच्या आकाशांतील सूर्यासारखे तेजस्वी असलेले, प्रज्ञावान् महापुरुषहि, गुरुभक्तीनें वेडे होतात. गुरूचे स्तवन करतांना त्यांच्या दिव्य प्रतिभेला विलक्षण स्फुरण चढते. प्रत्यक्ष परब्रह्मापेक्षा गुरु कोणी वेगळा आहे असें ते मानीतच नाहींत. अलीकडे मात्र या गुरुपरंपरेला तुच्छ लेखण्याची विचारधारा प्रसार पावत आहे. एका अधिकारी थोर पुरुषाच्या व्याख्यानाचा हा एक महत्त्वाचा विषय असतो. ते म्हणतात - गुरु मानूं नका, ग्रंथांवर विश्वास ठेवू नका, तुमचा तुम्हीं विचार करा.

तुमचा तुम्हीं विचार करा या आदेशाला, बुद्धीला चालना देण्याच्या दृष्टीनें, कांहीं महत्त्व निश्चित आहे. समर्थांनीहि "सर्व शोधून पाहे ' असें सांगून विवेकाला, विचारालाच, जागृत केलें आहे. पण कोणाचेहि ऐकू नका हा पूर्वार्ध मात्र योग्य नाही. तो पूर्णपणे आचरणांत आणावयाचे ठरविलें तर माणसाला एकहि पाऊल पुढें टाकता येणार नाहीं. हित कळणे आणि हित मिळविणे या दोन्हीं दृष्टींनी त्याचा घातच होईल. तुमचा तुम्हीं विचार करा, कोणाचेंहि ऐकू नका म्हणणाराचे तरी ऐकलेच पाहिजे ना ! हे विधानच अंतर्विरोधी आहे. बरे ! हे एवढे एक वाक्य उच्चारून भागते काय ? तुमचा तुम्हीं विचार करा या सिद्धांताचा प्रतिपादनासाठी एके दिवशी दीड तास अशी ५ - ७ दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली जाते. ही अशी आकर्षक, प्रभावी भाषेने सांगितलेली व्याख्यानें ऐकणाराचे मन, स्वतंत्रपणें विचार करण्याइतके मोकळे राहूं शकणार नाहीं.

"तुमचा तुम्हीं विचार करा" हें तरी माणसाला सांगावे लागतें, पटवून द्यावे लागतेंच ना ? मग "सद्‌गुरुवांचोनि सापडेना सोय" असें म्हणणाराची अवहेलना काय म्हणून करावी ? गुरूवर विश्वास ठेवावा, ग्रंथांचे मनन करावें, म्हणजे साधकबाधक विचार न करतां आंधळेपणाने चालावे असें नाही. उपनिषदांतील प्रजापति विरोचनाची कथा या दृष्टीने लक्षणीय आहे. गुरुवचन आंधळेपणाने स्वीकारणाऱ्या शिष्याचा तेथें स्वतः गुरूनेच उपहास केला आहे.

अर्जुनाच्या अंतःकरणात कृष्णभक्ती अत्यंत उत्कट असूनहि त्यानें श्रीकृष्णाच्या अनेक विधानांवर आक्षेप घेऊन त्यांना आडवे-तिडवे प्रश्न विचारले आहेत आणि सद्गुरुनिष्ठ ज्ञानेश्वरांनी अर्जुनाचे हें बुद्धिकौशल्य गौरविले आहे. तेव्हां गुरूपदेश स्वतंत्र विचाराला घातक असतो असें समजण्याचे काहींच कारण नाहीं. गुरु हा सर्वदाच मार्गदर्शक असतो, सहाय्यक असतो, आणि तसे सहाय्य प्रगतीची इच्छा असणारांनी घेतलेंच पाहिजे. घेत नाहीं म्हणणे हा अहंकार आहे. अगदीं बालवर्गापासून ते पदत्युत्तर परीक्षेच्या प्रबंधासाठी शिक्षकाची आणि मार्गदर्शकाची आवश्यकता असतेच. मार्गदर्शकावांचून, विद्यापीठ अत्यंत उच्च परीक्षेचा प्रबंधहिं स्वीकारीत नाही. एका रीतीनें ही निगुरा म्हणून केलेली अवहेलनाच आहे. तेव्हा माणसाने आपल्या हिताचे जुने ठेवणे काय आहे, कुठे आहे; हें समजून घ्यावयाचें असेल तर मला सगळे कळतें हा मीपणा बाजूला ठेवून तज्ज्ञांचें मार्गदर्शन नम्रपणानें पत्करलेच पाहिजे.

कळेना कळेना कळेना, ढळेना । ढळे, नाढळे, संशयो ही ढळेना ॥
गळेना गळेना अहंता गळेना । बळें आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२ ॥

'द्विर्बद्ध सुबद्ध भवति' असा एक नियम आहे. दोनदा बाधले कीं नीट बांधले जाते सुटू नये म्हणून गांठ मारावयाची असली तर एकावर एक २ - ३ गाठी माराव्या लागतात. तसें, सांगावयाचा विचार दृढपणानें ठसावा म्हणून समर्थ त्याच त्याच क्रियापदाचा तीन तीन वेळां उपयोग करून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जुन्या ठेवण्याचे, पारंपरिक मूल्याचे आकलन होणें, अहंता सोडल्याशिवाय कठिण आहे हे सांगत आहेत.

मनुष्याला खरोखरीच पुष्कळवेळा जें नेमके कळावयास हवें ते चांगलेंसे कळत नाहीं. त्याच्या अंतःकरणांतील संशय नाहीसे होत नाहीत. नाना कारणांनी, निमित्तांनी ते पुनःपुन्हा येतच राहतात. याचे महत्त्वाचें कारण आहे अहंकार नाहीसा न होणें हें. आपली विद्वत्ता, आपली बुद्धिमत्ता, आपले निर्णयकौशल्य, आपलें चातुर्य, आपली आकलनशक्ति, आपली स्मरणशक्ति, कामे करण्यातील स्वतःचे कौशल्य यावर माणसाचा फार विश्वास असतो आणि त्यामुळें आपल्याला वाटतें त्यांपेक्षा वेगळे काहीं सत्याला आणि हिताला अधिक जवळचे असूं शकते हें त्याला पटतच नाहीं. सत्याचे ज्ञान होण्यासाठीं बुद्धीचा धसमुसळा हट्ट उपयोगी पडत नाहीं. बुद्धीला भावनेचे, तर्काला थोरांच्या मान्यतेचे, विवेकाला विश्वासाचे पाठबळ असावें लागतें, तरच सत्य, हित यथार्थपणे समजते. अन्यथा प्रयोगावारी चाचपडत, वैतागत जीवन कंठावे लागतें.

अविद्यागुणे मानवा ऊमजेना । भ्रमें चूकलें हीत तें आकळेना ॥
परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें । परी सत्य मिथ्या असें कोण जाणें ॥ १४३ ॥

माणसाला इंद्रिये, मन, बुद्धि ही ज्ञानग्रहणाची सगळी साधने उपलब्ध आहेत. पण त्यावर अविद्येचे, मायेचें, रजतमांचें आवरण असल्यानें सत्य म्हणून जें कांहीं वस्तुतः आहे ते माणूस पाहूं शकत नाहीं.

अविद्या, अध्यास, माया यांचा वेदान्ताच्या परिभाषाशास्त्रांत प्रक्रियांच्या दृष्टीनें वेगवेगळा विचार केलेला आहे. पण उपयोगाच्या दृष्टीनें तितक्या खोलवर जाऊन, काथ्याकूट करण्याचें आपणांस कारण नाहीं. आपल्या व्यवहारांतील अनुभवाचा विचार केला म्हणजे आपण सत्यापासून दुरावलों आहोंत, आणि आपले हित झालेलें नाहीं एवढी समज थोडासा विचार करणाऱ्या कोणालाहि येऊ शकते. हें असेंच असावयाचे, हा काळाचा प्रभाव आहे. परिस्थितीचा परिणाम आहे, असें म्हणून कोणाला निराशावाद पसरवाराचा असेल तर गोष्ट निराळी. रोग आहे पण त्याचें दुःख ज्याला जाणवत नाहीं तो रोगी बरा होण्यांतला नाहीं असें जाणावे हें वैद्यकशास्त्र सांगते.

सगळें एक असतांना वेगळेंपणा भासणें आणि तोच खरा वाटणें हें अज्ञानाचें, अहंकाराच्या रूपानें प्रगट होणारे, पहिले स्वरूप. हा अहंकार जो जो बलवान होत जाईल, तो तो वासना, विकार वाढत जातात, आणि त्याप्रमाणात भ्रमहि होत राहतो. म्हणून आपलें हित दिसावे यासाठीं माणसाने अहंकाररूप अज्ञानाला दूर ठेवून आपल्या दिसण्याचे, वाटण्याचे, परीक्षण करीत गेले पाहिजे. ते निःस्पृह ज्ञात्याच्या मताशी ताडून पाहिलें पाहिजे. आपण ज्याला शास्त्र-शास्त्र असें म्हणतो तो प्रामाणिकांच्या दीर्घकालीन अनुभवांचा संग्रह असतो. म्हणून आपले वाटणे हें शास्त्राच्या कसोटीला उतरणारे नसेल तर ते अयोग्य आहे, त्यासंबंधीचा विचार पुन्हा नव्याने केला पाहिजे, एवढी तरी जाणीव मनुष्यास व्हावयास हवी.

न तपासता स्वीकारलेले खोटें नाणें शेवटीं स्वतःचाच तोटा करतें, व अडचणींत टाकते. मी बँकेत भरावयास नेलेली नोट खोटी निघाली तर ती भरली जात नाहीं व त्यामुळें माझा तोटा तर होतोच आणि वर ही तुमच्याजवळ कोठून आली, कशी आली, यासंबंधात विचारल्या जाणाऱ्या आडव्या तिडव्या प्रश्नींना उत्तरे देत बसावे लागतें, म्हणून नोटा घेतांना, निदान अधिक किंमतीच्या नोटा घेतांना त्या पारखून घेतल्या पाहिजेत. खोटी नोट ही खेळातल्या नोटेसारखी सहजासहजी वेगळेपणानें ओळखता येत नाहीं. ती खऱ्या नोटेसारखी जशीच्या तशीच दिसते. सत्य, मिथ्याचें तसेच होते. जे सत्य आहे ते पटत नाहीं. जें मिथ्या आहे तें उमगत नाही परिणामी हित लाभत नाही. इंद्रियांच्या अनुकूल प्रतिकूल संवेदना या अगदीं तात्कालिक असल्यानें त्यांवरून जीवनाच्या रक्षणाचे नियम बांधू गेलें तर अपाय घडतो. ताडाच्या झाडाखाली बसून एखादा दूध पीत असला तरी आपण त्याला ताडी पितो असें समजणार आणि देवीचें तीर्थ या नांवाखाली कुणी दारू पीत असला तर आपण त्याला धार्मिक मानणार. आपले हें दोन्ही निर्णय अगदीं उथळ आणि फसवे आहेत, सत्याच्या कसोटीला टिकणारे नाहींत. सगळीकडे बहुधा असेच होतें. म्हणून सावध राहिले पाहिजे.

जगीं पाहतां साच तें काय आहे । अती आदरें सत्य शोधूनि पाहें ॥
पुढें पाहतां पाहतां देव जोडे । भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥

असणें आणि दिसणे एकरूप नाहीं. असणें आणि भासणेंच नव्हे तर दिसणें आणि भासणेंहि वेगळे राहते. म्हणून सत्याचा ज्ञानासाठी शोध घ्यावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, सातत्याने श्रमावे लागतें आणि हें साधण्यासाठीं अंतःकरणांत सत्याविषयींची ओढ असावी लागते, शास्त्रवचनांविषयींचा आदर असावा लागतो. तसे नसेल तर श्रमाला बळी पडावे लागते.

"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् । " (भ. १५ | १४) या वाक्याचा उपयोग जर कुणी शिजवणे टाळण्यासाठी केला तर चालावयाचे नाहीं. पोटांत घालांवयाचें अन्न शिजवूनच घातले पाहिजे. जठराग्नीचें कार्य हें चुलीतील जाळापेक्षां निराळ्या स्वरूपाचें आहे. वस्तू विनाश पावत नाहीं, matter cannot be destroyed , याचा उपयोग एखाद्या वेंधळ्या व्यक्तीने हातून काचेची पात्रे फुटली म्हणजे करूं नये, शोधून पहावे लागतें तें यासाठी.

आज आपल्याला आश्चर्यचकित करणारी विज्ञानाची प्रगति एका दिवसांतहि झालेली नाहीं आणि अचानकहि झालेली नाहीं. शेकडो संशोधकांनी एकेक बारीक बारीक गोष्ट शोधून काढण्यासाठी तहानभूक विसरून परिश्रम केले आहेत. प्रयत्नाला यश आलें नाहीं तरी निराश न होतां नव्या उत्साहाने ते दीर्घकालपर्यंत शिणले आहेत. आपल्याला सत्यापर्यंत, ईश्वरापर्यंत, पोचावयाचे आहें, तेव्हां घाई चालणार नाहीं, उत्कट भावाने धैर्य धरून, सतत साधना केली पाहिजे. " अर्थं वा साधयेत् देहं वा पातयेत् । " असा आग्रह असला पाहिजे. बुद्धि शुद्ध पाहिजे, भावना उत्कट पाहिजे. भाव प्रामाणिक हवा. मग मात्र प्रत्येक पाऊल देवाच्या जवळ नेते आणि उलट प्रत्येक पावलागणिक श्रम, भ्रांति, अज्ञान हे विकार उणावत जातात, शिथिल होतात, गळून पडतात.

सदा वीषयो चिंतितां जीव जाला । अहंभाव अज्ञान जन्मासि आला ॥
विवेकें सदा सस्वरूपीं भरावे । जिवा ऊगमी जन्म नाहीं स्वभावें ॥ १४५ ॥

अज्ञानाने अहंभाव धारण करून जीव बहिर्मुख होतो आणि अखंड विषयाचें चिंतन करतो, व त्यामुळें विषयोपभोगाविषयीची वासना त्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. जीवाची जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून सुटका होत नाही. यासाठी माणसाने विवेक करावा. सल काय, मिथ्या काय, शाश्वत काय, चंचल काय, हितकर काय, अहितकर काय तें जाणून घ्यावें, प्रयत्नपूर्वक समजावे, आणि सत्य, शाश्वत हित असें जें आपलें मूळ स्वरूप तेथेंच लीन होऊन रहावे या आत्मज्ञानातच स्थिर रहावे.

ही संसाररूप माया नदी मुळांत जेथून उगम पावली तेथें जाऊन पोचावे, म्हणजे लक्षांत येईल कीं त्या मूळ शुद्ध ठिकाणीं जें आहें तें सारे स्वच्छ आहे, निर्मल आहें. तेथें विविधताच नसल्याने विकारांचे आणि विषमतेचे गदळ मुळींच नाही सारे कसे शांत, सात्त्विक, पवित्र आहे. वेगळा असा जीवभावच नसल्याने त्या ठिकाणीं जन्म नाहीं अर्थात् मरणहि नाहीं.

सृष्टीच्या मुळाशी, विश्वाच्याहि आरंभी जे काही शांत, शिव, अद्वैत, अनिर्वचनीय, अखंडैकरूप, असें जें कांहीं होतें तेंच ब्रह्म. त्याला कां कोणास ठाऊक पण "एकः अहं" मी एकटाच आहे असें जाणवले ही जाणीव हेंच मायेचें रूप आहे. एकट्याला चैन पडत नाहीं (एकाकी न रमते) म्हणून त्याला पुष्कळ व्हावेसे वाटलें (बहुस्याम्) आणि तो तसा झाला (प्रजायेय) अशारीतीने सृष्टीचा प्रवाह वाहू लागला.

कोणताहि जलप्रवाह जेथे उगम पावतो, तेथें तो शुद्ध निर्मल असाच असतो. पण जसा जसा पुढें वाहू लागतो तसेतसे त्या जलप्रवाहामध्यें इतरहि ओघ मिसळतात. नदी मोठी होत जाते, पण जलाची मलिनताहि वाढत जाते. गंगेचे स्वरूप गंगोत्रीशी आणि त्याहि वर गोमुखाशी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मल आहे. पण तेंच पुढे कलकत्त्याजवळ आलें कीं चूळ भरण्याचीहि इच्छा होऊं नये असें मलिन झाले असते. म्हणून स्वच्छता, शुद्धता, निर्मलता यांची अपेक्षा असेल तर प्रवाहाच्या उलट दिशेने उगमाकडे अधिकाधिक वरवर गेलें पाहिजे. आपण ज्या व्यवहारी जीवनांत वावरतो तो कलकत्याजवळचा गंगेचा प्रवाह आहे. यासाठीं उगमाचा वेध घेत घेत वाटचाल केली पाहिजे. ईश्वराचें दर्शन, ब्रह्माचा साक्षात्कार होईपर्यंत साधनारूपीं यात्रा केली पाहिजे. तेथे जाऊन पचले म्हणजे लक्षांत येईल कीं आपले स्वरूप, स्वस्वरूप हेच आहे. हे लक्षांत आलें कीं मग इतर कांही आकर्षक वाटणारच नाही, जीव तेथेंच रमून राहील.

दिसें लोचनी तें नसे कल्पकोडी । अकस्मात आकारलें काळ मोडी ॥
पुढें सर्व जाईल कांही न राहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥ १४६ ॥

येधून पुढें पांच श्लोकांत समर्थ एकप्रकारे ब्रह्मज्ञानाचा प्रवास घडवीत आहेत. ज्याला खरें संतत्व आहे, म्हणजे सत्ता आहे, अस्तित्व आहे, तें तत्त्व अविनाशी आहे, अनंत आहे, अमर्याद आहे. कोणत्याहि मर्यादे, सीमेने तें बद्ध होत नाहीं. हें जे मूलतत्त्व, जें त्रिकालातीत आणि सर्वव्यापक आहे, स्थल आणि कालहि जेथें गळून पडतात, तें तत्त्व शोधले पाहिजे आणि त्याचा साक्षात्कारहि करवून घेतला पाहिजे.

जें डोळ्याने दिसते तें दीर्घकालपर्यंत टिकत नाहीं. "यद् दृष्टं तन्नष्टं । " दिसते तें केव्हां ना केव्हां तरी नाही होणारे असतें. आधीं काही नसतें तिथे तें एकाएकी आकाराला येतें. ही आकाररूपे नाना प्रकारच्या विकारांना निमित्त होतात. उदाहरण म्हणून एका गोष्टीचा विचार करतां येईल.

ग्रीष्मामध्ये भूमि कोरडी, रखरखीत, रूक्ष दिसते. मृगाची पहिली सर कोसळली कीं मृद्‌गंध सगळीकडे दरवळतो आणि मग दोनचार दिवसांतच नाना प्रकारच्या अंकुरांनी सृष्टी हिरवी होते. ही हिरवळ विविधतेने भरलेली असतें. त्यांत काटेरी रूपे असतात, विषारी वनस्पती असतात, वड-पिंपळासारख्या महावृक्षांचे कोंब असतात, गुरांना मानवणारे गवत असतें. माणसाला रुचि देणारी भाजी असते. सुंदर रंगांची फुले असतात. आकर्षक आकाराची पानें असतात, शेते तरारतात, पिके डुलू लागतात. २ - ४- ६ महिने हें ऐश्वर्य टिकते. मग वनस्पती वाळू लागतात. त्यांची विविधता आणि सौंदर्य ही लोप पावतात. शिशिराच्या वावटळीने हें सुकलेले उडून जातें आणि पुन्हा उजाडलेलें रान पावसाची प्रतीक्षा करीत ओठंगून राहते.

उण्या-अधिक प्रमाणात सर्व सृष्टीचे आणि तिच्यातील भूतजातांचें असेंच होते. कृमि-कीटकांसारख्या काही भूताचे आयुष्य क्षणभरांत संपते तर कांहीं प्राणी शंभराहून अधिक वर्षें जगतात. महावृक्षांचें आयुष्य पाच-सहा शतकांचे असूं शकते, तर डोंगर आणि पर्वत अनेक सहस्रकांचा काल पाहतात पण प्रत्येकाला केव्हां ना केव्हां तरी फार लौकर किंवा उशिरा नाहीसें व्हावें लागतेंच.

सृष्टीचे स्वरूप हें असें असल्यानें विचारवंतांनीं, विषयाभिलाषा आणि इंद्रियांची सुखे यांच्या मोहांत न गुंतता, आपलें आयुष्य अनंताचा शोध घेण्यांत कारणी लावले पाहिजे.

फुटेना तुटेना चळेना ढळेना । सदा संचलें मीपणें तें कळेना ॥
तया येकरूपासि दूजें न साहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४७ ॥

सर्व सृष्ट पदार्थ, विश्वातील वस्तुजात जरी नश्वर असले, क्षणभंगुर असलें, केव्हां ना केव्हां तरी नाहींसे होणारे असले तरी त्यांच्या मुळाशी असलेलें शुद्ध तत्त्व, ज्याला सत्य किंवा ब्रह्म या नांवानें ओळखले जातें तें मात्र कधीं फुटत नाहीं, तुटत नाहीं, चळत नाहीं वा ढळतहि नाहीं. तें आपल्या निर्गुण, निराकार, सर्वव्यापक, अखंड, अशा स्वरूपांत सदा सर्वदा पूर्णपणे भरून राहते. माणूस स्वतःच्या ठिकाणीं असलेल्या अहंकारामुळे त्याची निर्गुणता, निराकारता, व्यापकता वा अखंडता जाणूं शकत नाहीं. त्या मूलतत्त्वाची एकरूपता, केवलता, सत्तामात्रता आधीं जशी होती तशीच आतांहि आहे आणि पुढेंहि राहणार आहे. त्याच्या ठिकाणीं त्या एकाशिवाय दुसरें कांहींहि खऱ्या अर्थाने संभवतच नाहीं. अनंत असा संत जाणून घ्यावयाचा आहे तो याच दृष्टीने.

पाण्यावर अनेक प्रकारचे लहानमोठे तरंग उमटतात. सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने त्यांना महाभयानक अशा लाटांचेंहि स्वरूप येतें. त्यांच्या तडाख्यानें विशालकाय नौका उलट्या होऊन बुडतात. तीरावरची घरेच काय पण दारेंहि होतीं की नव्हती अशी होऊन जातात. पण या कोणत्याहि स्थितीत पाण्याच्या पाणीपणांत कांहींहि अंतर पडत नाहीं. तरंग नसतानाच्या शांत स्थितींत, तरंग उमटत असतांना त्या रूपांत किंवा मोठमोठ्या लाटा वेगाने उसळत असतांना त्या आकारांत, पाण्याचा पाणीपणा जसाच्या तसाच असतो. लाटांच्या होण्याजाण्यानें त्यांत कांहीं अंतर पडत नाहीं. पाणीपणा विचारांत घेतला तर लाट आणि तरंग या शब्दांना त्या पातळीवर कांहीं अर्थच राहात नाहीं.

चूल, रांजण, बोळकें, मांठ, परळ, वीट, बाहुली वा कौल या स्वरूपांतील माती उपयोगाच्या दृष्टीनें विविध कामी येत असली तरी मातीपणानें एकरूपच असते. दागिन्याच्या रूपांत सोन्याचे असेच होते. पेटी, पाट, चौरंग, पलंग, दांडा, नाट वा किलचण, फळी वा खांब या रूपांत लाकूडहि असेंच राहते.

म्हणून विविधतेच्या मुळाशी असलेल्या एकरूपतेचा विचारच महत्त्वाचा मानला पाहिजे. "तया एकरूपासी दूजे न साहे" असे समर्थ म्हणतात ते या दृष्टीच.

विश्वामध्यें भासणारी विविधता ही जरी अस्थिर, पालटणारी, सापेक्ष संबंधावर आधारलेली म्हणून मिथ्या असली तरी तिच्या मुळाशी असलेलें तत्त्व मात्र स्थिर, निरपेक्ष आणि म्हणूनच सत्य असें आहे. कांहीं विद्वान, शाश्वत, त्रिकालाबाधित अंतिम असें सत्य म्हणून कांहीं आहे हेंच मान्य करीत नाहींत. पण तें योग्य नाहीं. लहानमोठ्या होऊं शकणाऱ्या परिघाच्या मध्याशीं जसा निश्चित आणि न पालटणारा असा केंद्रबिंदू असतो, तसेंच विश्वाच्या मुळाशी असलेल्या सत्याचे आहे. त्रिज्येच्या अपेक्षेनें परिघ पालटतो तसें अहंच्या अपेक्षेनें विविधता साकारते. हा अहं ज्याक्षणी नाहींसा होईल, त्याक्षणी केंद्र उपलब्ध झाले असेल.

निराकार आधार ब्रह्यादिकांचा । जया सांगतां सीणली वेदावाचा ॥
विवेकें तदाकार होऊनि राहें । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥ १४८ ॥

मूल तत्त्व ज्याला सत्य किंवा ब्रह्म असें म्हणावयाचें तें अवाङ्मनसगोचर आहे. वाणीने त्याचें वर्णन करतां येत नाहीं. मनाला त्याचें आकलन होत नाहीं. बुद्धीला त्यासंबंधीं विचार करतां येत नाहीं, निर्णय घेतां येत नाहीं. वेद ही परमेश्वराची जगत्कल्याणासाठीं अवतीर्ण झालेली अपौरुषेय अशी दिव्य वाणी, पण वेदालाहि ब्रह्माचें वर्णन समाधानकारकरीत्या करतां आलें नाहीं. त्यालाहि "नेति नेति - असं नाहीं" इतकेंच सांगतां आलें.

वर्णन करून सांगण्यासाठी मर्यादितपणा आणि द्वैत या गोष्टी गृहींत धराव्या लागतात. जी जी गोष्ट मला समजते, पाहतां येते वा वर्णन करून सांगतां येते, ती ती प्रत्येक जाणणारा जो मी त्याच्यापेक्षा वेगळी असते. ती एकमेकीपेक्षांहि वेगळी असते. म्हणजेच तिला सीमा, मर्यादा असते. ब्रह्म हे सर्वच दृष्टीनें अत्यंत विलक्षण अशी वस्तु आहे. तें निस्सीम आहे, अनंत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अखंड आहे, एकरस आहे, तेंच तें एकटे केवळ आहे. त्याच्यापेक्षा भिन्न कांहींहि, कोठेंहि, केव्हांहि नाहीं. म्हणून त्याचें वर्णन करतां येत नाहीं. ब्रह्मा, विष्णु, महेशादि देवता, खगोलामध्यें दिसणारीं नक्षत्रे, भूगोलावर दिसणारीं विविध द्रव्ये, सजीव-निर्जीव, जड-चेतन, चल-अचल, स्थूल-सूक्ष्म असें वस्तुजात हे सर्व त्या ब्रह्माच्या आधारावरच नांदत आहे.

समजावून सांगण्यासाठीं सांगणारांनीं स्वतःच्या धारणेप्रमाणे विवर्तवादाचा वा परिणामवादाचा आश्रय करावा. या वादांचे निरनिराळ्या दृष्टिकोनांतून आणखी प्रकार पाडावेत. त्याला आपल्या रुचीप्रमाणे मायावाद, अनभ्यस्त विवर्तवाद, अविकृत परिणामवाद, चिद्विलासवाद अशी नांवें द्यावीत. वचनांचे कीस काढावेत. शब्दांचे ध्वनी शोधावेत आणि चर्चा करावी. फल शेवटीं एकच. आणि तें म्हणजे निश्चित कांहीं सांगतां येत नाहीं हें. विचाराला चालना मिळविण्यासाठी या चर्चेचा थोडाबहुत उपयोग होतो. नाहीं असें नाही. प्रकृतिभेदानें प्रत्येकाची पातळी आणि रुचि वेगवेगळी असल्यानें त्यांना मानवेल अशी मतप्रणाली या विविध प्रकारच्या चर्चेतून उपलब्ध होते. तेव्हां साधकाने आपल्या प्रवृतीला जें भावते तें निवडून घ्यावें. हाच विवेक. आणि मग एकनिष्ठे सतत प्रयत्नशील राहून आपल्या ध्येयाशी एकरूप होतां येईल अशी साधना करावी.

कोणतेहि तत्त्व केवळ शब्दाच्या बळावर कधीहि जाणले जात नाहीं. तें अनुभवासच यावें लागतें. तेंच ब्रह्माच्या संबंधांतहि होतें. एक जुने वचन आहे "कसें बोटाने दाखवू तुला । घे अनुभव गुरुच्या मुला. " बोटाने दाखवितां येण्यासारखी, ही अमुक अमुक म्हणून वर्णन करून सांगण्यासारखी, ब्रह्म ही वस्तु नाहीं. ती अनुभवास येऊ शकते. गाढ झोपेसारखे हें आहे. म्हणून तर शास्त्रकारांनीं निद्रेला ब्रह्मानंदसहोदर असें विशेषण दिलें आहे. सामान्यतः प्रत्येक मनुष्य रोज गाढ झोप अनुभवत असूनहि, ती असते तेव्हां तिची जाणीव नसते. कशी येते, आली म्हणजे काय होतें वा तिचें स्वरूप काय ? याचें निश्चित वर्णन करतां येत नाहीं. ब्रह्मानंदाचे तसेंच आहे. गाढ झोप लाभावी म्हणून जसें सर्व जीवन कांहीं नियमानें नियंत्रित करावे लागते, तसेंच ब्रह्मानंदाच्या अनुभवासाठीहि साधना करावी लागते. झोप हा शरीराचा नैसर्गिक असा जड विकार असूनहि हवे तसें करीन, हवा तसा वागेन, हवे ते खाईन वा खाणार नाहीं असें म्हणून चालत नाहीं. यातल्या अनेक गोष्टींमुळें झोप दुरावते आणि रात्ररात्र तळमळत काढावी लागते वा निद्रानाशाचा हा विकार टाळण्यासाठीं अधिक घातक अशा विषारी द्रव्याचा उपयोग करावा लागतो. म्हणून निद्रेचे सुख अनुभवावयाचें असेल तर जीवन हें आरोग्यशास्त्राचे नियम सांभाळून जगावें लागतें. आळस वा अतिश्रम, उपासमार वा अजीर्ण, आत्यंतिक अभिलाषा, क्रोध, चिंता, भय, शोक यांचा त्याग करावा लागतो.

जे सहजप्राप्त असावयाचे त्या विषयांतसुद्धा इतकी दक्षता घ्यावी लागते तर जन्मजन्मान्तरींच्या अनिष्ट संस्कारांनीं विकृत झालेल्या अंतःकरणवृत्तींना, ब्रह्मज्ञानाच्या अनुभवास मुका लागेल, यांत कांहींच आश्चर्य नाही. स्वतःच्या जीवनक्रमांत, इंद्रियांच्या प्रवृत्तीत, अंतःकरणाच्या धारणेत, ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनें अनुकूल परिवर्तन झाल्यावांचून ब्रह्मज्ञान होणें दुरापास्त आहे. वर उल्लेखिलेल्या जुन्या वचनांमध्ये अनुभव घेण्यासाठी गुरुपुत्र व्हावे लागतें असें अपेक्षिलें आहे. कारण हें करून घ्यावयाचे अनुकूल परिवर्तन, मार्गदर्शनाशिवाय होणें दुर्घट आहे. यासाठींच समर्थांनी कदाचित् अनंत शोधून पाहण्याआधी संत शोधून पाहिला पाहिजे असा ध्वनि काढत येईल अशी शब्दरचना केली असावी.

ब्रह्माशी तदाकारता यावयाची, ब्रह्मरूप व्हावयाचे, म्हणजे माझें आणि मी हे दोन्ही भाव सुटावे लागतात. "मी" मुळे "माझें" वाढत जाते आणि "माझे" मुळें "मी" पुष्ट होत जातो. यामुळे साधनक्रमांत 'माझें' कमी व्हावें या उद्देशाने अस्तेय, अपरिग्रह, संयम, वैराग्य या गुणांचा स्वीकार करावयास सांगितला आहे. हे गुण चांगले जोपासले, इंद्रिय-मन-बुद्धीच्या पातळीवरहि ते चांगले बाणले म्हणजे 'मी' सुटणे सोपे जातें, शक्य होतें. हा साधनाक्रम व्यक्तिपरत्वे नेमकेपणानें सांगण्यासाठी अनुभवी मार्गदर्शक लागतो. संत तसा असतो. तो मिळाला कीं अनंताचा शोध घेणे सुकर होते.

जगीं पाहतां चर्मचक्षी न लक्षें । जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे ॥
जगीं पाहतां पाहणें जात आहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४९ ॥

उपनिषदांमध्ये ब्रह्माचें वर्णन करतांना "यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति | तदेव ब्रह्म त्वं विद्धि" (केन. १ । ६) असें वर्णन केले आहे. डोळे ज्याला पाहूं शकत नाहींत पण डोळ्याला पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्यामुळे प्राप्त होतें, तें ब्रह्म आहे, असें तूं जाण असा उपदेश तेथे आहे. त्याच्याच पुढें मनानें ज्याचें चिंतन होऊं शकत नाहीं पण मनाला चिंतन करण्याचे सामर्थ्य ज्याच्या शक्तीने मिळते तेंच ब्रह्म म्हणून ओळखावे असेहि तिथे सांगितलें आहे. उपनिषदाच्या या सिद्धांताचा अनुवादच समर्थांनी पहिल्या दोन ओळींत केला आहे.

जो अनंत शोधावयाचा आहे. तो चर्मचक्षूंनी दिसण्यासारखा नाहीं वा इतर इंद्रियांनींहि त्याचें ज्ञान होण्यासारखे नाहीं. डोळे येथें उपलक्षणासारखे आहेत. डोळ्यांनी दिसणार नाहीं, म्हणजे कोणत्याच इंद्रियांनी समजणार नाहीं असें येथें सांगावयाचें आहे.

मन, बुद्धी ही कान, नाक, डोळे या इंद्रियांच्यापेक्षां अधिक तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यापक आणि दूरगामी सामर्थ्य असलेली ज्ञानसाधने आहेत. त्यांनाहि ब्रह्माचें ज्ञान करून घेण्याच्या विषयांत फारच थोडे साधते. खरें म्हणजे कांहींच साधत नाहीं. क्वचित् समजल्यासारखे वाटतें पण तें फसवे असते.

डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा हे चर्मचक्षू आणि मन, बुद्धि हे ज्ञानचक्षू हे दोन्ही ब्रह्मापुढें पांगुळतात. समर्थांनी दासबोधांत 'चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तो अवघा च पूर्वपक्षु । निर्गुण ठाईचा अलक्षु । लक्षवेना ।। (दासबोध १३ । २ । १६) असें स्पष्टच म्हणून दोन्हीं ज्ञानसाधनांचीं अपूर्णता स्पष्ट केली आहे. तेव्हां दुसऱ्या ओळींत 'ज्ञानचक्षीं निरीक्षे' असा पाठभेद स्वीकारणें वा 'न रक्षे' पद जोडून त्याचा अर्थ 'निरक्षे करणे' किंवा 'न रक्षे' या पदांतून ज्ञानचक्षूंनी ब्रह्माचे ज्ञान होते पण राखले जात नाही, टिकत नाही, असा अर्थ करणें, अनवश्यक वाटतें. तें अर्थात् हे असे अर्थ करण्यासाठीं "दृश्यते त्वग्ऱ्यया बुद्ध्या” या उपनिषद्‌वचनाचा कांहीं आधार आहेच.

या श्लोकाची तिसरी ओळ मोठी अद्‌भुत आहे. ब्रह्माला पाहूं गेले म्हणजे पाहणेच नाहींसें होतें. ज्ञाता आणि ज्ञेय असें कांहीं उरतच नाहीं. मिठाच्या बाहुलीने समुद्राचा तळ शोधण्याचा प्रयत्न करावा म्हणजे जसें होईल तसेंच ब्रह्म पाहाणाराचे होतें. पाहण्यासाठी पाहणारा आणि जें पाहावयाचे ते वेगळे असावे लागतात, वेगळे रहावे लागतात. फार जवळीक सुद्धा पाहण्याच्या क्रियेला प्रतिकूल असतें. डोळ्यांत घातलेले काजळ यामुळेंच दिसूं शकत नाहीं. येथे नुसती जवळीक नाहीं तर एकरूपताच असते. तेव्हां कोण कोणाला पाहणार ? "तत्र केन कं पश्येत्” असा हा पाहणेपणा गळून पडतो असें जेथें घडते. तेथें जाऊन पोचणें म्हणजेच ब्रह्माचा शोध घेणे आहे.

नसे पीत ना श्वेत ना शाम कांहीं । नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं ॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५० ॥

संत असा अनंत किंवा संत आणि अनंत शोधून पहावा असे सांगणाऱ्या श्लोक-पंचकातील हा शेवटचा श्लोक आहे. ब्रह्माच्या अनिर्वचनीयतेचें कारण आणि ब्रह्माच्या प्राप्तीचे अधिक सोपे साधन असें दोन्हीहि या श्लोकांत स्पष्टपणें दाखविले आहे. ब्रह्म निर्गुण, निराकार आहे हें स्पष्ट करतांना समर्थांनी येथें रूप या गुणाचा विशेषतः उपयोग केला आहे. त्यावरून हेंच इतर गुणांच्या संदर्भातहि जाणून घ्यावें असें त्यांना अपेक्षित असावें. इतर इंद्रियांच्यापेक्षां रूप या विषयाचें ग्रहण करणारे नेत्र हें इंद्रिय, हें अधिक व्यापक कार्यक्षेत्रांत प्रभावी ठरत असल्यानें त्याच्या विषयांत जें सत्य आहे तें इतरहि इंद्रियांना लागू पडण्यासारखे असल्यानें वर्ण हा विषय प्रधान मानून त्याचा ऊहापोह केला आहे असें समजावे. ब्रह्माला कोणताहि रंग नाहीं, तें पिवळे नाहीं, पांढरे नाहीं, सावळे नाहीं, निळे नाहीं आणि असें असल्यामुळें ते व्यक्त वा अव्यक्त कांहींच सांगता येत नाही.

वस्तूची लांबी-रुंदी-जाडी किंवा उंची वा खोली म्हणजेच वस्तूचा आकार डोळ्यांनी दिसतो असें आपण मानीत असलो तरी वस्तूचा रंग तेवढाच डोळ्यांना दिसत असतो. भिन्न पार्श्वभूमीवर किंवा छायाप्रकाशाच्या साहाय्यानें आपणांस आकारादि गोष्टीचें ज्ञान होतें. ज्याला रंगच नाहीं, त्याचें रूप दिसणें शक्यच नाही. म्हणून वर्णहीन ब्रह्म व्यक्त होऊं शकत नाहीं असें समर्थ म्हणतात. ब्रह्माला अस्तित्व आहे. दृश्य जगताचा तें आधार आहे. अनेक प्रकारच्या विविधतेचे तें अधिष्ठान होऊं शकते त्यामुळें ब्रह्म हें संपूर्ण अव्यक्त आहे असेंहि म्हणतां येत नाहीं. म्हटले तर आहे म्हटलें तर नाही ही वर्णनाची शुद्धिपत्राप्रमाणे पुणेरी प्रथा माणसाला घोटाळ्यांत पाडते. नेमके ज्ञान देऊं शकत नाही. पण ब्रह्माची वस्तुस्थितीच अनिर्वचनीय असल्यानें, नाना प्रकारचे सिद्धांत त्याच्या आधारावर नांदतात, मतप्रणाली जन्मास येतात, संप्रदाय उभे राहतात, द्वैत, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाहेत, अद्वैत अशीं तत्त्वज्ञाने साकारतात. ज्याला कांहींच करावयाचें नसते त्या बुद्धिवाद्याला हा गोंधळ वाटतो.

जिची झेप ब्रह्मापर्यंत पोचण्याची शक्यता नाहीं अशा केवळ बुद्धीचा आधार घेतला म्हणजे असेंच व्हावयाचें. आंधळ्याने चित्राचे मूल्य ठरवावे, बहिऱ्याने संगीताचा सुरेलपणा निश्चित करावा, तसेच हें आहे. ब्रह्म ही तर्काने कळणारी वस्तु नाहीं. निःस्पृह जाणत्यांवर, कनवाळू संतांवर, दृढ विश्वास ठेवून त्यांच्या आदेशाचे श्रद्धेने पालन केलें तरच ब्रह्मापर्यंत पोचता येईल. मुक्त होता येईल. विश्वास हाच कुठेहि कार्याचा प्रेरक असतो. अंतःकरणांत विश्वास नसता तर शास्त्रज्ञांनीं प्रयोग केलेच नसते. पुन्हा पुन्हा अपयश येऊनहि नवीन नवीन प्रयोग करावेसे वाटतात, ते विश्वासाच्या बळावरच. साधना अशीच करावयाची असते. तिचें मार्गदर्शन शास्त्र, संत सद्गुरु करीत असतात. त्यांच्यावर भरंवसणें आणि उपासना करीत राहणे हाच अनंत अशा संताला, निस्सीम अशा सत्याला, सर्वव्यापक अशा ब्रह्माला शोधण्याचा मार्ग आहे.

खरें शोधितां शोधितां शोधताहे । मना बोधितां बोधितां बोधताहे ॥
परी सर्व ही सज्जनाचेनि योगें । बरा निश्चयो पाविजे सानुरागें ॥ १५१ ॥

सारखे सारखे शोधीत गेलें म्हणजेच शोध लागतो. पुन्हा पुन्हा बोधाचे ग्रहण केलें म्हणजेच बोध होतो. एकदां ऐकून वा रोज नवें-नवें ऐकून वा वाचून मनाला बोध होत नाहीं. सगळे नीटपणे आकळत नाहीं, उलगडत नाहीं. जें ऐकले वाचले त्यावर चितन-मनन-निदिध्यासन सातत्याने घडले पाहिजे. " श्रुतं हरति पापानि" हा अगदींच प्राथमिक विचार आहे. खेदाची गोष्ट अशी कीं फक्त हा एवढाच विचार कार्यवाहीत आहे.

कीर्तने-प्रवचने-व्याख्याने यांना श्रोत्यांच्या आवडीनुरूप आणि वक्त्याच्या कौशल्यानुरूप पुष्कळ माणसे जमतात, खूप दाटी होते. पण एवढेच होतें. वक्त्यानें काय सांगितलें म्हणून थोड्या वेळाने विचारले तर तें नीटपणे कुणी सांगू शकत नाहीं. थट्टा, विनोद गोष्ट क्वचित् लक्षांत राहते. वक्त्यानें हा आपल्याला टोमणा मारला आहे असें श्रोत्याला वाटलें तर तोहि लक्षांत राहतो. पण कोणत्या सिद्धांताच्या वा साधनेच्या संदर्भांत हें आलें आहे, तें कोणाच्या लक्षांत नसते याचें खरें कारण असें कीं श्रवण हा काही लोकांचा मनोरंजनाचा, वेळ घालविण्याचा किंवा पुण्य लागते या कल्पनेचा विषय असतो. सिद्धांत समजून घेतले पाहिजेत आणि तदनुसार साधना केली पाहिजे, या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्षच नसते. म्हणून त्या लक्षांत राहत नाहींत. श्रवणाचे असें होऊं नये म्हणून समर्थांनी "मना बोधितां बोधितां बोधिताहे" असें सांगून चिंतनमननावर भर दिला पाहिजे हे सुचविले आहे.

शोध लागणे किंवा बोध होणें, या सहजासहजी होणाऱ्या, साधणाऱ्या गोष्टी नव्हेत. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इहलोकाशी संबद्ध असलेल्या जड अशा विज्ञानातील सृष्टीचे नियम शोधतानांहि संशोधक शास्त्रज्ञांनी आपली आयुष्येच्या आयुष्ये वेचली आहेत. आपल्या सर्वशक्तीनिशी दीर्घकालपर्यंत चिंतनाचे आणि प्रयोगाचे कष्ट उपसले आहेत. वेडयाप्रमाणे इतर सर्व विसरून एकेका गोष्टीचाच पाठपुरावा केला आहे. इहलोकींच्या जड विज्ञानांत असें होतें तर परात्पर चैतन्याचे आकलन होण्यासाठीं " असेल माझा हरी । तरी मज देईल खाटल्यावरी !" म्हणून कसें चालेल ? त्यासाठीं आपल्या सर्व शक्तीनिशी सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे.

सत्याचा शोध घेणे असो वा त्या तत्त्वाचा मनाला बोध व्हावयाचा असो, दोन्हीसाठी अनुभवी जाणत्याचे मार्गदर्शन वरचेवर मिळाले पाहिजे. म्हणून समर्थांनी "परी सर्वहि सज्जनाचेनि योगें" असे तिसऱ्या चरणांत म्हटले आहे. सत्पुरुषाच्या संगतीचा महिमा समर्थांनी यापूर्वी अनेक श्लोकांतून गायिलेला आहेच. त्याचें यथाशक्ति विवरणहि त्या त्या ठिकाणीं केलेलें आहे. " धुंडिता धुंडितां देवो सत्संगें सापडें जनी !" असे समर्थांनी या संदर्भांत इतरत्रहि म्हटले आहे.

सत्संगतीचा लाभ होण्यासाठी केवळ यांत्रिक साहचर्य उपयोगी पडत नाहीं. साधकाच्या अंतःकरणांत, साधनेविषयी, सत्याच्या ज्ञानाविषयीं आणि ज्याच्या संगतींत राहावयाचे त्या सत्पुरुषाविषयी, सद्गुरुविषयी अनुराग असला पाहिजे. प्रेम असलें पाहिजे, भक्ति असली पाहिजे. तरच सत्याचा निश्चय करतां येईल किंवा बोध स्थिरावेल. अन्यथा अखंड पाण्यांत राहूनहि आतून कठिण व वरून कोरडा असलेल्या नर्मदेतल्या गोट्यासारखी स्थिति होईल.

बहतां परीं कूसरी तत्त्वझाडा । परी पाहिजे अंतरीं तो निवाडा ॥
मना सार साचार तें वेगळें रें । समस्तांमधें येक तें आगळें रें ॥ १५२ ॥

तत्त्वाचा झाडा देण्याचे चातुर्य जरी पुष्कळ असलें तरी अंतःकरणाची साक्ष पटेपर्यंत, सत्याचा निर्णय केवळ शब्दपांडित्यानें होऊं शकत नाहीं. घटपटाची खटपट किंवा अवच्छेदकावछिन्नाची लटपट यांच्या सहाय्याने, दुर्बोध पारिभाषिक संज्ञांच्या आधारावर, प्रक्रियांचे प्रतिपादन पुष्कळ कौशल्याने केलेलें आढळतें. जगद्गुरू श्रीशंकराचार्यांनीं प्रतिपादलेल्या अद्वैत मतांतहि "सर्वं खलु इदं ब्रह्म" हा सिद्धांत सिद्ध करणाऱ्या निरनिराळ्या १२८ प्रक्रिया आहेत असें म्हणतात. एखाद्याने त्या सर्वांचा खूप परिश्रमपूर्वक अभ्यास केला तर तो विद्वान् म्हणून मान्यता पावेल पण साक्षात्कारी होऊं शकणार नाहीं. हें सर्व वक्तृत्वामुळें वा प्रबंधामुळें लौकिकाचे साधन ठरेल, पण त्यांतून अनुभव उपलब्ध होऊं शकणार नाहीं, त्यासाठीं अंतःकरणानेंच निवाडा व्हावयास हवा, बुद्धीनेच विवेक केला पाहिजे.

ज्याची चर्चा केली जाते, ज्याविषयी खूप बोलले जाते, वादविवाद रंगतात, ते मूळ सत्य वा तत्त्व साररूपाने खरोखरीच या शब्दांच्या पसाऱ्यापेक्षां वेगळेच राहते. सगळ्या दिसणाऱ्या, भासणाऱ्या, विविधतेंत तें भेदातीतपणें एक असेंच राहते. विविधतेतील कोणत्याहि गुणाचा स्पर्श त्याला होत नाहीं. त्याचें स्वरूप वर्णनातीत असें आगळेच आहे. म्हणून तर अनुभवासाठी फार परिश्रम करावे लागतात. वरवरच्या शाब्दिक ज्ञानानें तें साधत नाहीं.

नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें । समाधान कांहीं नव्हे तानमानें ॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें । समाधान तें सज्जनाचेनि योगें ॥ १५३ ॥

खरोखरीचे समाधान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, अंतःकरण सर्वदा तृप्त, शांत, प्रसन्न राहावें असें वाटत असेल तर वरवरचे उपचार त्यासाठीं पुरेसे नाहीत. हें, समर्थ या श्लोकांत अधिक स्पष्टपणें सांगत आहेत.

पिंडज्ञान म्हणजे शरीरासंबंधीचें ज्ञान. यांत पांच कोशांचा विचार येतो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, असे एकाच्या आंत एक असलेले, अधिक सूक्ष्म आणि तरल होत जाणारे, हे पांच कोश आहेत. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धि, यांच्या सखोल विचार या पिंडज्ञानात समाविष्ट होतो. शरीर आणि तदंतर्गत इंद्रियादि भाव हे, आचरणारा, कर्ता या दृष्टीने उपासनेचे एक महत्त्वाचें अंग असल्यानें त्यांच्याविषयीचे ज्ञान करून घेणे आवश्यक होतें. तत्त्वज्ञान या शब्दाने येथें पिंडाव्यतिरिक्त सृष्टिचा विचार केला आहे. सृष्टीची उत्पत्ति, तेथील क्रम, उत्पत्तीची मूळ प्रेरणा, उत्पत्तीचे अधिष्ठान या सर्वांचा विचार येथें येतो. पंचमहाभूतांचा विचार हा त्यांतील महत्त्वाचा भाग. हे पिंडज्ञान आणि तत्त्वज्ञान दोन्हीं जरी एक जिज्ञासू म्हणून कोणी जाणून घेतलें असलें तरी केवळ तेवढ्याने समाधान प्राप्त होत नाही. शरीराची रचना जाणून घेतली, शरीराचे व्यापार कसे चालतात तें कळले आणि आरोग्यशास्त्राचा अभ्यास केला तरी केवळ तेवढ्याने मनुष्य निरोगी, स्वस्थ होण्याची शक्यता नाहीं. परीक्षेपुरतें आरोग्यशास्त्राचे नियम पाठ करून आरोग्यसंपन्नता येत नाहीं. तीच स्थिति तत्त्वज्ञानाची. नित्य काय आणि अनित्य काय, टिकणारे कोणतें-मरणारें कोणतें, आपल्या हिताच्या दृष्टीने काय घ्यावे,काय टाकावे, हें कळावे, त्या दृष्टीने उत्पन्न होणाऱ्या इच्छा, आकांक्षा, वासना या पारखून घेता याव्यात म्हणून तत्त्वज्ञान उपयोगी पडते. तत्त्वज्ञानाधारें वर्तन घडले नाहीं तर मग हे शाब्दिक तत्त्वज्ञान समाधान देऊं शकणार नाहीं. आरोग्याचे नियम चांगले ज्ञात असलेला वैद्यहि अपथ्य करील तर व्याधीने पीडला जाईलच; तसेच तत्त्वज्ञानाचा विद्वान् जर निरिच्छ, संयमी, सदाचरणी नसेल तर तोहि शोकमोहग्रस्त होऊन दुःखाने तळमळणारच.

कांहीं लोक चिंताच्या समाधानासाठी नृत्य, गायन, वादनादि वा त्यांच्या उपलक्षणेने काव्य, कथा नाटकादि ललितकलांचा आश्रय घेतात. या कलांच्यामुळें कांहीं मनोरंजन होईल पण तेवढेच होईल. हे तात्पुरते बरें वाटणे म्हणजे कांहीं खरें समाधान नव्हे. या निरनिराळ्या कलांमध्ये चतुर असलेले ख्यातनाम कलावंतहि परस्परांविषयीच्या द्वेषमत्सरांनी भरलेले असतात आणि वैयक्तिक जीवनांत कामक्रोधांनीं व तज्जन्य नानाप्रकारच्या व्यसनांनी किडलेले राहतात. पुवाळलेल्या गंभीर व्रणावर केवळ बाहेरची मलमपट्टी जशी उपयोगी पडत नाहीं, तसेंच मनःस्वास्थ्याच्या प्रकरणी या ललितकलांचे होतें.

तत्त्वज्ञानाच्या आधारावर शास्त्रानें मनुष्याच्या चित्तशुद्धीसाठी योगमार्गादि साधनें सांगितली आहेत. त्यांचा अवलंबहि कुठे कुठे बऱ्याच प्रमाणावर होतो. योगाचा अर्थ आहे, चित्तवृत्ति-निरोध. वासना नियंत्रित करून चित्तशुद्धी होण्यासाठी यज्ञयागाचा उपयोग होतो. पण हे दोन्ही उद्देश योगायागांचा अवलंब करणाऱ्या मनांत किती प्रमाणांत असतात तें सांगणे कठिण आहे. योगाचा अभ्यास करणारे बहुधा, आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या आसन प्राणायामांचा विचार करतात. योगाची अगदी प्राथमिक अंगें असलेलें यम-नियम यांकडे त्यांचें लक्ष नसतें. प्रत्याहारहि ते ओळखीत नाहींत. क्वचित् कांहीं लोक आसन-प्राणायामांतून ध्यानावर झेप घेऊं शकतात.

कांही योगाभ्यासी योगमार्गांतून प्राप्त होणाऱ्या सिद्धीची अभिलाषा बाळगतात. स्वतः योगशास्त्रकारांनीच सिद्धी या समाधीला विघ्नभूत आहेत असें निश्चयानें सांगितले आहे. योगमार्गातील सर्व क्रमांचा विचारहि कुणी सातत्याने, दृढ निश्चयाने करीत नाहीं. योगमार्गातील आवश्यक असलेले विधिनिषेध पाळणेही बहुतेकांना शक्य होत नाहीं. सर्वसामान्यांची प्रकृति आणि प्रवृत्तीहि योगाच्या दृष्टीनें अनुकूल नसते. म्हणून ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. त्याप्रमाणें- "म्हणोनि योगाचिया बाटा । जे रिगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि वांटा । भागा आला ॥” (ज्ञाने. १२ । ६९) अशी स्थिति साधकाची होते.

शक्तिपातानें कुंडलिनी जागृत होऊन योगातील समाधीचा लाभ होऊं शकतो. त्यासाठीं यमनियमांदींची पूर्वसिद्धता असण्याचे कांहीं कारण नाही, असें कांहीं लोक आग्रहाने प्रतिपादितात. येथें त्याविषयी चर्चा न करणे बरे, साधकाने या विषयांत फार सावध राहिले पाहिजे, एवढे मात्र आग्रहाने सुचवावेसे वाटतें. श्रीज्ञानेश्वरमहाराजांसारखा योगयोगेश्वर योगाला लोखंडाच्या चण्याची उपमा देतो, या मार्गानें जाणाराला नित्य नवा अग्निप्रवेश सोसावा लागतो, असें धमकावतो, ते लक्षांत घेणे आवश्यक आहे. या मार्गानें अविवेकाने जाणाराची स्थिति "हुरळली मेंढी, लागली लांडग्यापाठी" या म्हणीप्रमाणें होते.

यज्ञयागादींचा प्रकारहि पडावा तसा उपयोगी पडत नाहीं. यज्ञयागातील कर्मकांड अत्यत किचकट आहे. यज्ञाची साधनसामग्री जमविणे अवघड आहे. चितशुद्धि हा प्रधान उद्देश ठेवून हें कुणी करीत नाहीं. ही कृत्ये बहुतेक लौकिकासाठी तरी असतात वा सकाम तरी असतात. अर्थातच त्यांतून खरें समाधान लाभत नाहीं. नानाविध विषयांचा रसिकतेने उपभोग घेणे, विपुल संपत्तीने प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्यांत विलासीपणें राहणे, याला समाधानाचा उपाय समजून वागणारे लोक आहेत. त्यांचें जीवन तशी सोय नसणाऱ्या इतरांना, मोठे सुखाचे आणि आकर्षकहि वाटत असतें. प्रत्यक्षांत मात्र या श्रीमंतांना बहुधा झोपेच्या गोळ्या नियमानें घ्याव्या लागतात. विलासांत रमणाऱ्या अनेकांची शरीरें रोगांनी पोखरलेली असतात आणि मन नाना प्रकारच्या ताणामुळे विकृत झालेले राहते. खरें समाधान, खरा संतोष, तेथें क्वचितच आढळतो. साध्या शांत जीवनालाहि ते बापडे पारखे झालेले असतात. भोगांच्या अभिलाषेतून निर्माण झाले सुख हे, वेश्या जसे प्रेम करते, त्यासारखे आहे. कुलशीलवती साध्वीच्या उज्वल प्रेमाची सर त्याला कशी येणार ? शेवटीं भोगासक्त पुरुषाला शरीराच्या आणि मनाच्यााहि दृष्टीनें पश्चाताप करण्याचाच प्रसंग येतो.

कांहीं लोकांना त्यागामुळे समाधान लाभेल असें वाटतें ते संसाराच्या व्यापाने वैतागतात आणि तापटपणाने जणू अंगाला राख फासून रानावनात निघून जातात. पण वासनाबीज तसेंच राहिल्याने, तें नाहीसें करण्याचा क्रमबद्ध प्रयत्न न केल्यानें, अशी त्यागी माणसे हेकट, घायकुती, एवढ्या-त्तेवढ्यानें संतापणारी, नेहमी डोके चढलेली, आसपासच्या लोकांनाहि वैताग आणणारी अशीं राहतात, किंवा त्यागाचे भांडवल करून दंभाने महंती वाढवितात. त्यामुळें त्यांचीहि मनोवृत्ति अस्वस्थच असते. सरळ मार्गानें पैसा न मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांप्रमाणें ते भयग्रस्त असतात.

मनाच्या समाधानासाठी लौकिकांत मान्यता पावलेले बहुतेक सर्व उपाय असे फलप्राप्तीच्या दृष्टीनें निरूपयोगी ठरतात, म्हणून समर्थांनी सत्पुरुषाची संगत धरावी हा प्रभावी उपाय सांगितला आहे. सत्पुरुष हा आपल्या प्रत्यक्ष जीवनांत शांत, सात्त्विक, नीतिमान, निस्पृह, प्रेमळ, ईश्वरनिष्ठ असा असल्यानें, तो आदर्श डोळ्यापुढे असल्यामुळें, सहवासातील साधकाला वर्तनाचे तसेंच वळण लागतें. त्यांतून अनेक प्रश्न सहजपणे सुटतात. अनुभवी संताला साधकाच्या प्रकृति-प्रवृत्तीप्रमाणे काय करावें, काय करूं नये, कोणत्या क्रमानें जावे हें नेमके सांगतां येतें. त्यामुळें पुष्कळ कष्ट वाचतात. अडचणी कोणत्या येतात आणि त्यावर उपाय काय हेहि कळतें. साधनेचा उत्साह वाढतो. संयमाचे महत्त्व पटते. पवित्र वातावरणामुळे मन प्रभावित होते, हें सर्व सत्पुरुषाच्या सहवासांत घडते. म्हणून अंतःकरणाच्या समाधानासाठी भरवशाचा असा तोच एक उपाय आहे असें समर्थ सांगतात.

महावाक्य तत्त्वादिकें पंचिकर्णें । खुणें पाविजे संतसंगें विकर्णें ॥
द्वितीयेसि संकेंत जो दाविजेतो । तया सांडुनि चंद्रमा भाविजेतो ॥ १५४ ॥

ध्येयभूत अशा सत्याची यथार्थ ओळख पटवून देणारे जे ज्ञान, त्याचे अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान असे दोन भेद व्यवहाराच्या दृष्टीनें करतां येतात. यांतील अपरोक्ष ज्ञान हें साक्षात्काराशी, अनुभवाशी संबद्ध असतें. महावाक्यें हें ज्ञान करून देतात अशी धारणा आहे. 'तत्त्वमसि, " अहं ब्रह्मास्मि, "प्रज्ञानं ब्रह्म, " "अयमात्मा ब्रह्म” ही, चार वेदाची, चार महावाक्ये, सर्व वेदान्त तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान म्हणून आहेत. अधिकारी गुरु जेव्हां आपल्या योग्यताप्राप्त शिष्याला या महावाक्यांचा उपदेश करतो तेव्हां शिष्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतें. तो ब्रह्मसाक्षात्कारी होतो. या ब्रह्मसाक्षात्काराव्यतिरिक्त जें कांहीं ज्ञान आहे तें परोक्ष ज्ञान होय. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष. साक्षात् नव्हे तें. हें ज्ञान तत्त्वाची माहिती करून देते. सृष्टीचा विचार, ईश्वर आणि जगत्, जीव आणि जगत् यांचें संबंध, ईश्वर, जीव, जगत् यांचें स्वरूप इत्यादि इत्यादि. ज्ञान-विज्ञान हा परोक्ष ज्ञानाचाच भाग आहे.

जीव-जगताशीं संबद्ध अशीं मूलतः कुणी दोन, कुणी तीन, कुणी पांच, कुणी चोवीस, कुणी छत्तीस, अशीं मानलेली आहेत. संप्रदायभेदानें या पदार्थांची संख्या आणखीहि निरनिराळी आहे. सात, सोळा, पंचवीस, एकतीस, सदतीस, असेंहि त्यांचें प्रमाण उणें-अधिक आहे. या संख्येच्या संबंधांत सर्वसामान्य जिज्ञासूने फारसा आग्रह धरण्याचे प्रयोजन नाहीं. कुणी मतवादी ज्याला एक म्हणून मोजतो त्यांत भेद कल्पून दुसरा मतवादी ती संख्या वाढवितो. हेच उलटेंहि होतें. त्यामुळें या संख्याच्या विविधतेची काहीएक व्यवस्था लागू शकते.

पंचीकरण ही अशीच एक सृष्टीचा विचार करणारी व्यवस्था आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही क्रमानें अधिकाधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जाणारी पांच भूतें. या प्रत्येक भूतांतून एका भूताचा अर्धा भाग, इतर चारांचा मिळून अर्धा भाग असे महाभूत तयार होते. उदाहरणार्थ-पृथ्वी महाभूत म्हणजे अर्धा भाग पृथ्वी आणि आप, तेज, वायू, आकाश, या चारांचा एकेक अंश मिळून अर्धा असे सर्व मिळून पृथ्वी हें महाभूत बनते. इतर चारी महाभूतांच्या संबंधांत असेंच समजावे. मात्र या पंचमहाभूतांच्या नांवावरून पृथ्वी महाभूत म्हणजे माती, आप म्हणजे आपण पिण्याधुण्याकरितां वापरतो ते पाणी, तेज म्हणजे शिजविण्यासाठी वापरण्यांत येणारा अग्नि, वायु म्हणजे वारा, आकाश म्हणजे पोकळी असा स्थूल अर्थ वरवर पाहतां दिसतो, तसा घेऊं नये. ही महाभूतांची कल्पना स्थल नसून सूक्ष्म आहे. गंध हा गुण आणि जडता हा धर्म ज्या सूक्ष्म द्रव्याच्या आधारे राहतो तें पृथ्वी हें भूत. रस हा गुण आणि पिंडीभाव हेतुत्व (दोन किंवा अधिक कणांना परस्परांशीं जोडून ठेवण्याची शक्ति) हा धर्म ज्याच्या आश्रयानें राहतो तें आप हें भूत. रूप हा गुण आणि पचन, परिवर्तन हा धर्म ज्याच्या आश्रयानें राहतो तें तेज हें भूत. स्पर्श हा गुण आणि गति, प्रेरणा हा धर्म ज्याच्या आश्रयाने राहतो तें वायु हें भूत. शब्द हा गुण आणि अवकाश देणें, रचनाविशेषास सहाय्य देणें हे धर्म ज्याच्या आश्रयानें राहतात तें आकाश हें भूत. अशीं ही महाभूतांची स्वरूपें आहेत. त्यांच्या संयोगांतून सृष्टीतील सर्व वस्तुजात निर्माण होतें. पंचीकरण शब्दाने ही भूतसंयोगाची कल्पनाच अभिप्रेत आहे. हे सर्व नीट समजलें म्हणजे अध्यात्माच्या उपयोगाच्या दृष्टी सुष्टीचा विचार पूर्ण होतो. आजचे प्रगत विज्ञानहि या पंचभूतांचाच निराळ्या वर्गीकरणांतून, निराळ्या दृष्टीनें विचार करीत असतें. घनरूप, द्रवरूप, वायुरूप, शक्तिरूप आणि अवकाशरूप हें वर्गीकरण स्थूलमानाने विज्ञानाने स्वीकारले आहे. त्यासबंधीचे विस्तृत विवेचन आपणांस येथे अभिप्रेत नाहीं.

ही 'महावाक्ये' तत्त्वसंख्या आणि पंचीकरणाची प्रक्रिया, यांचें सांगोपांग विवरण अनुभवी पंडिताच्या, ज्ञानी सत्पुरुषाच्या सहवासांतून होतें. सुदैवाने "शाब्दे परे च निष्णातं" अशा सत्पुरुषाची गांठ पडल्यास ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन पोचण्याच्या दृष्टीनें या ज्ञानाचा सविस्तर ऊहापोह होत जातो आणि त्यांतील मर्म नेमके लक्षांत येतें, खूण पटते.

मात्र हें सर्व ज्ञान, परोक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष ब्रह्मसाक्षात्काराशी त्याचा तसा संबंध नाहीं. व्यवहारामध्यें लहान मुलाला आकाशामध्ये दिसणारी द्वितीयेची चंद्रकोर दाखविण्यासाठी जसा एखाद्या झाडाच्या फांदीचा उपयोग होतो, तसेंच ब्रह्माची ओळख पटविण्यासाठीं या तत्त्वज्ञानाचे, परोक्ष ज्ञानाचें होतें. याला 'शाखाचंद्रन्याय' अशी संज्ञा आहे. आकाशांतील चंद्राचे स्थल लक्षात येऊन त्याची ओळख पटणे हें महत्त्वाचें. आतां यावेळी दिग्दर्शनासाठी एखाद्या फांदीचा उपयोग होत असला तर ती फांदी महत्त्वाची नाहीं. उद्या किंवा आणखी थोड्या वेळाने तो चंद्र त्या फांदीवर दिसणार नाहीं. चंद्र दाखविण्यास उपयोगी म्हणून फांदीप्रमाणे, एखाद्या मंदिराचे शिखर, एखादा खांब, एखाद्या उंच घराच्या गच्चीचा कोपरा, इत्यादि वस्तूहि उपयोगी पडूं शकतील. ओळख पटवून घ्यावयाची असते ती चंद्राची, या ठिकाणी महत्त्व आहे तें चंद्रविषयक ज्ञानाला, तें झाल्यानंतर तटस्थ लक्षण म्हणून उपभोगी पडणाऱ्या शिखर, फांदी, यांची आवश्यकता लागेलच असें नाही. ब्रह्मज्ञान आणि प्रक्रियेचें पांडित्य यांचे असेच आहे.

जिज्ञासू साधकाने प्रक्रियांच्या वादविवादांत न घोटाळता, ब्रह्मसाक्षात्काराच्या दृष्टीनें प्रत्यक्ष साधनेचा अवलंब करावा, फांदी सोडावी आणि चंद्र जाणून घ्यावा असें समर्थानी सांगितलें आहे तें यासाठींच.

खुणा या शेवटीं खुणाच असतात. त्यांनीं लक्षांत येणाऱ्या संकेताचे महत्त्व आहे. आंकडे किंवा अक्षरे यांची चिन्हें निरनिराळी असलीं तरी संकेताने समजणारा अर्थ एकच असतो. तोच महत्त्वाचा. उच्चाराच्या दृष्टीने लिपीच्या दृष्टीनें, निरनिराळ्या भाषांतून एकच वस्तू निरनिराळ्या स्वरवर्णांनीं दर्शविली जाते. महत्त्व आहे ते अर्थाला, प्रत्यक्ष वस्तूला, तिचा परिचय करून देणाऱ्या चिन्हाला, मात्रेला नाहीं. चिन्हें वा शब्द हें अर्थाचें वाहन आहे. प्रत्यक्ष अर्थ नव्हे. हा विचार सर्व सांप्रदायिक करतील तर मतभिन्नतेचा बाऊ करून होणारी भांडणे मिटतील. द्वेषमत्सरांना स्थान राहणार नाहीं. एकोपा आणि समंजसपणा वाढेल.

दिसेना जनी तें चि शोधूनि पाहें । बरें पाहतां गूज तेथें चि आहे ॥
करी घेउं जातां कदा आडळेना । जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना ॥ १५५ ॥

सृष्टीच्या मुळाशी जें कांहीं तत्त्व आहे, तें सहजासहजी दिसणार, भासणारे वा प्रत्ययास येणारे नाही. त्या मूलतत्त्वाचें ज्ञान होण्यासाठी चांगल्या प्रकारें त्याचा शोधच घेतला पाहिजे. वरवर विचार केला तर, व्यवहाराच्या दृष्टीनें त्या शोधाचा प्रत्यक्ष लाभ कांहीं विशेष आहे असें सांगता येणार नाहीं. तरीपण सर्व दृष्टीनें सांगोपांग विचार केला तर मानवमात्राचें हित व्हावें, प्रगति-उन्नति व्हावी, विकास साधावा, यासाठीं जें प्रत्ययास येतें त्याच्या मुळाकडे, शोध येत जाणें हेंच उपयोगाचे आहे; इतकेंच नव्हे तर फार आवश्यक असेंहि आहे. आजची दिसून येणारी वैज्ञानिक प्रगति ही शोधीत जाण्याच्या जिज्ञासेंतून आणि त्यासाठीं कराव्या लागणाऱ्या अनलस प्रयत्नांतूनच जन्मास आली आहे. अब्जावधि रुपये खर्च करून आणि अनेक प्रकारचे धोके पत्करून मानवाने चंद्रावर पदार्पण केलें. श्री. तेनसिंग नोर्के याने "राधानाथ' शिखरावर आरोहण केले, अनेक प्रकारच्या आपत्तींना यशस्वीरीत्या तोंड देऊन दक्षिण ध्रुवावर झेंडा रोवला, अशासारख्या गोष्टींचें जगभर सहज कौतुक झालें. यांत प्रत्यक्ष लाभ काय झाला म्हटलें तर सांगणें कठिण आहे. पण मानवजात उंचावते ती अशा घटनांमुळेच या घटनांचे महत्त्व चांगला विचार केला तरच ज्यांत येऊ शकते. ब्रह्मज्ञानाचेंहि तसेंच होतें.

ब्रह्मज्ञान ही सहजासहजी उचलून घेतां येण्यासारखी स्थूल वस्तु नाही. तें दिसणाऱ्या, भासणाऱ्या, कल्पनेने जाणल्या जाणाऱ्या सर्व विश्वामध्यें आणि विद्यांतील यच्चयावत् वस्तुमात्रामध्यें, अखंडपणे, ओतप्रोत भरून राहिले आहे. कळत नाहीं, दिसत नाहीं, हें खरें, पण जें कांहीं आहे तें ब्रह्मच आहे. शोध घ्यावा लागतो, साधना करावी लागते, अखंड प्रयत्नाची कास धरावी लागते. ती, तें ब्रह्म अनुभवास यावें म्हणून. शोध घेणारा हा, ज्याचा शोध घ्यावयाचा त्यापेक्षा वेगळा नसल्याने, शोध घेणे वा प्रयत्न करणें यांचेहि व्यावहारिक अर्थ या साधनेत गळून पडतात.

म्हणे जाणता तो जगीं मूर्ख पाहें । अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥
जनीं मीपणें पाहतां पाहवेना । तया लक्षितां वेगळें राहवेना ॥ १५६ ॥

मला तें तत्त्व (ब्रह्म) कळले आहे, असें जो म्हणतो तो मूर्ख आहे, असें समर्थ अगदीं स्पष्टपणें या श्लोकांत सांगत आहेत.

श्रीज्ञानेश्वर महाराजहि "एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिले पण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसे जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥ " (ज्ञा. ९ । ३६८) असेंच म्हणतात. उपनिषदांनीहि 'यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ॥ " (केन २ । ११) असेंच म्हटलें आहे. मला झोप लागली आहे असे जो तोंडाने सांगतो, त्याला झोप लागलेली नसते. तसेंच हें आहे.

विचार करणारी, शोध घेणारी बुद्धि, कल्पना करणारे मन, वर्णन करणारी वाणी वा श्रवण-नेत्रादि इंद्रियें यांचे सर्व व्यापार जेथें संपतात, तें तत्त्व तर्कानें जाणतां येतें असें कसें म्हणतां येईल ? म्हणून मला समजलें असें म्हणणारा, तत्त्वज्ञानाची पहिली पायरीसुद्धां खऱ्या अर्थाने चढला नाहीं, असें म्हणावें लागते. त्याचें म्हणणें केवळ अहंकाराचे लक्षण ठरतें. झोप कशी लागते हें जसें कळत नाहीं, ते कळावे म्हणून सावध राहणारा जसा झोपेचा अनुभव कधीचं घेऊं शकत नाहीं, तसेच ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी अवशिष्ट असतांना ब्रह्मानुभवाचें होतें.

मिठाची पुतळी समुद्राचा शोध घ्यावयास गेली तर तिचें वेगळे अस्तित्व जसें उरतच नाहीं, वेगळेपण उरले तर समुद्राची विशालता कळतच नाहीं तसें ब्रह्माचा शोध घेतांना जीवाचे होतें.

मी पाहतों हा अहंकार, मी पहात आहे-मला पहावयाचे आहे ही मीपणाची जाणीव जोंवर उरलेली असते, तोवर ती जाणीवच, एखाद्या दाट धुक्यासारखी, साक्षात्काराच्या मार्गातील अडथळा ठरते. ही जाणीव हा मीपणा, हा अहंकार जेव्हां सुटतो तेव्हांच ब्रह्म अनुभवास येतें, आणि मग हा अनुभव घेणारा वेगळा राहतच नाही. पचलेल्या अन्नाचे शरीराशी जें नाते असतें तेंच जीवाचे ब्रह्माशी होतें. पचलेले अन्न जसें तुष्टिपुष्टीच्या रूपानें अनुभवास येतें, तसाच ब्रह्मज्ञानी शांत आणि प्रसन्न होतो. ब्रह्माचा अनुभव हा आनंदाच्या रूपानें अनुभविता येतो. अन्न खाण्याची इच्छा होते, भूक लागते, तेव्हां अन्न वेगळे असतें. अन्न खातांना तें रसनेंद्रियास संतोषवितें, तेव्हाहि तें वेगळेच असतें. पण तें पोटांत जातें आणि पचू लागतें तेव्हांहि वेगळेच राहील तर तुष्टीपुष्टी दूरच राहिली, उलट तें शल्यभूत होईल, विषरूप होईल, घातक ठरेल. आतां त्याचें वेगळेपण हें अनिष्ट आहे. अन्न पचल्यावर त्याचें शरीरभावांत रूपांतर होणें हेंच श्रेयस्कर असतें. भुकेपासून पुष्टीपर्यंतची प्रक्रिया ही सलग आहे. तेथे अन्नाचे द्वैत शरीराच्या अद्वैतांत केव्हां परिणत होतें तें समजत नाहीं. तरीसुद्धां भूक चांगली लागली, पचनशक्ति चांगली असणें, अन्न चांगलें निवडणे, चांगलें शिजवणे, चांगलें चावणे या गोष्टींकरिता प्रयत्नशील असावेंच लागते. परमार्थाच्या क्षेत्रांतील हीच साधना कीं जिच्यामुळे 'देव पहावया गेलो । देव होऊनि राहिलो ।" अशी स्थिती साधकाची होते. "अहं ब्रह्मास्मि”तील "अहं” आणि "असि” गळून पडतात, ठरते तें निखळ ब्रह्म. श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात- ' परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखें । देखतखेंवो ओळखे । म्हणें तत्त्व तें मी ॥ तिये ओळखीची सरिसें । सुखाचियां साम्राज्यीं बैसे । चित्तपण समरसे । विरोनि जाय ॥ (ज्ञा. ६ । ३६६, ६७)

बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे । जया निश्चयो येक तो ही न साहे ॥
मती भांडती शास्त्रबोधें विरोधें । गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥

माणसाने किती वाचावे, किती वाचले म्हणून अहंकार मिरवावा ? शास्त्रसंपत्ति ही अनंत, अपार आहे. रोज एक पुस्तक वाचून संपवतो म्हटलें तरी माणसाचे आयुष्य पुरणार नाहीं. अनेक जन्म घेतले तरी ते कमीच पडतील. जेवढें होईल तेवढे वाचले म्हटलें तरी त्यातून पदरांत काय पडलें याचा विचार करूं जावे तो निराशाच वाट्यास येतें.

शास्त्रांच्या शाखा पुष्कळ, त्या प्रत्येक शाखेचे ग्रंथ पुष्कळ आणि प्रत्येक ग्रंथाचे प्रतिपादन वेगवेगळे. पदार्थविज्ञान आणि रसायन या जड शास्त्रांमध्यें फारसे मतभेद दिसत नाहींत. कार्याच्या, परिणामाच्या रूपांत ते मुळींच नाहींत म्हटलें तरी चालेल. पण मूलकणांचे स्वरूप आणि ध्वनि, प्रकाश, विद्युत, चुंबकीय आकर्षण, यांचें यथार्थ ज्ञान यांत तेहि कांहीं मतभेद आहेतच. नेमकेपणा तेथेंहि संशयात्मकच आहे. जीवशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, यांसारख्या शास्त्रांमध्यें तर यांना शेवटीं शास्त्र तरी म्हणावें कीं नाहीं असा संशय उत्पन्न व्हावा असे दक्षिणोत्तर ध्रुवासारखे अगदीं टोंकाचे आणि परस्परविरोधी मतभेद आहेत. प्रामाणिक विद्वानांनीं आपापल्या शास्त्राच्या मर्यादा स्पष्टपणें मान्य केल्या आहेत आणि अज्ञाताचे क्षेत्र फार विशाल असल्याचें मोकळेपणानें स्वीकारले आहे. उदंड मतभेद यामुळेंच राहतात.

अध्यात्माचें क्षेत्र तर या मतभेदांनी गजबजलेले आहे. द्वैत, द्वैताद्वैत , विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, अद्वैत हेच केवळ भेद तेथें आहेत असें नाहीं तर या प्रत्येकाचे पुन्हा कित्येक पोटभेद आहेत. एका अद्वैतामध्येसुद्धा १०० - १२५ पेक्षां अधिक मतप्रक्रिया आहेत. कोणी जीव एक मानतो, कोणी असंख्य. माया आणि अविद्या एकच कीं वेगळी याविषयीहि मतांतरे आहेत, जीव आणि ब्रह्माचा संबंध कोणी अवच्छेदवादानें, कोणी आभासवादाने, तर कोणी प्रतिबिंबवादाने लावतो. कोणी दृष्टिसृष्टीवादी तर कोणी सृष्टिदृष्टीवादी. कोणी जीवन्मुक्ति मान्य करतात तर कोणी करीत नाहीत. कोणाचा ज्ञानोत्तरमुक्तीचा आग्रह तर कोणी ज्ञान व भक्ति एकरूप मानणारे. सम्यक्ज्ञानानें विबोधित झालेल्या निर्मल चित्तालाच कुणी मोक्ष म्हणणार तर कुणी मोक्षाचें सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता असे चार भेद कल्पिणार. कुणी मुक्तीला परमानंदस्वरूप मानणार तर कुणी मुक्तीला तुच्छ लेखून भक्तीला तिच्या डोक्यावर बसविणार. एका भक्तीचेसुद्धा गौणी, परा असे भेद पाडून त्यांचे पुन्हा अनेक विकल्प प्रतिपादिणार.

हे असे असंख्य मतभेद निरनिराळ्या आग्रही संप्रदायांना जन्म देतात आणि मग नाना प्रकारचे वादविवाद, खंडणमंडणाच्या प्रवृत्ति, व त्यांतून हेवेदावे निर्माण होतात. अध्यात्मिक अनुभव एकीकडेच राहतो, उरतो तो अंहकार आणि संघर्ष. भांडणांची रणधुमाळीच सर्वत्र चालू राहते. मतांतरांना अर्थ असतो तो जाणून घेणाराच्या प्रकृतिभेदानें, अवस्थाभेदाने वा पात्रताभेदानें. एकाच गांवाला जाण्याचे अनेक मार्ग असूं शकतात. अनेक दिशांनी वाहणारे प्रवाह शेवटीं समुद्रालाच मिळतात. अनेक पक्वान्नांनी निर्माण होणारी तुष्टि-पुष्टि एकरूपच असते. पण शब्दज्ञानी हें लक्षांत घेत नाहीं. त्याचा भर अनुभवावर नसतो, मांडणीवर असतो. स्वतःपेक्षा वेगळे मत तो अज्ञानाचें लक्षण मानतो. आपल्याला पटते तेंच शास्त्र. त्याला विरोध करील तो मूर्ख, या भावनेने लोक वागतात, त्याचा परिणाम द्वेष-मत्सरांत होतो.

संतमहात्मे या सर्व कारणांसाठीच ग्रंथ नुसता वाचावा असें म्हणत नाहींत, भाराभर पाठांतरावर त्यांचा भर नसतो. श्रीनामदेवरायांचें एक मार्मिक वचन आहे. ते म्हणतात- 'नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।" ज्ञानेश्वरीचे पारायण करणारे, ज्ञानेश्वरीवर प्रवचने करणारे, सर्व ज्ञानेश्वरी मुखोद्‌गत असलेले लोकहि पुष्कळ आहेत, परंतु अनुभवाचा संबंध आला कीं त्या कसोटीवर किती उतरतील कोणास ठाऊक कोणाची दिंडी पुढें चालावी आणि प्रसादाचा नारळ आधीं कोणाला मिळवा यावरून होणारी महंताची भांडणे पाहिली, आणि याहि कारणांसाठी त्यांना न्यायालयांत जाऊन झगडतांना पाहिले कीं मन विषण्ण होतें. 'एक तरी ओवी अनुभवावी ' असें नामदेव महाराज कां म्हणतात तें अशा वेळीं लक्षांत येतें.

मतभेद संपतात, भांडणें मिटतात, निरनिराळ्या प्रक्रियांची गति कुंठित होते, ती शास्त्रांनी सांगितलेल्या ज्ञानाचा चांगल्या प्रकारें बोध झाला म्हणजे. समर्थांना प्रबोध शब्दाने हेंच अनुभवात्मक यथार्थ ज्ञान अभिप्रेत आहे. अनुभवाच्या पातळीवर एकदां मनुष्य जाऊन पोंचला, प्रत्यक्ष वस्तूचा त्याला साक्षात्कार झाला कीं मग शब्दांचे ध्वनिभेद वा प्रक्रियांचे मार्गभेद त्याला विचलित करूं शकत नाहींत.

भूक लागल्यामुळे भात खाऊ इच्छिणारे चार प्रवासी एका स्थानकावर उपाहारगृहाच्या चालकाला आपणास काय पाहिजे तें सांगू लागले. चौघे चार प्रांतांतील होते. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. काश्मिरी म्हणाला-तोमूल. महाराष्ट्रीय म्हणाला-भात. पंजाबी म्हणाला-चावल. तामिळी म्हणाला-सोरु. स्थानक होतें कर्नाटकांत. त्याला अन्नम् माहीत. कोणालाच कांहीं समजेना. सगळे वर्दळीवर आले. स्थानकाधिपानें तें ऐकले. तो जाणकार त्यानें वाढप्याला भाताच्या थाळ्या घेऊन येण्यास सांगितलें. भांडण थांबले. सगळे एके ठिकाणीं बसून समाधानाने जेवले. प्रबोधनाने मतभेदाची गति खुंटते ती अशी.

श्रुती न्याय मीमांसकें तर्कशास्त्रे । स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें ॥
स्वयें शेष मौनाबला स्थीर पाहे । मना सर्व जाणीव सांडून राहें ॥ १५८ ॥

वेद, मीमांसाशास्त्र, तर्कशास्त्र, मनु, याज्ञवल्क्य इत्यादींच्या स्मृति, ब्राह्मणग्रंथ, उपनिषदें हें सर्व आपापल्या परीनें त्या त्या अवस्थेंत साधकाच्या उपयोगाचे आहेत, यांत शंका नाहीं. पण त्यातून नेमका अर्थ लक्षांत आणून देणारी समन्वयाची गुरुगम्यदृष्टि जर प्राप्त झाली नाहीं, तर या शास्त्रातील वचनें व त्यांची गृहीतकृत्ये परस्परांशीं ताडून पाहतांना फार विचित्र वाटतात. त्यांत केवळ विविधताच नव्हे तर विसंगति आणि विरोधहि जाणवतो. व त्यामुळें जसा व्हावा तसा खऱ्या तत्त्वाचा बोध होत नाहीं. या शास्त्रांच्या अभ्यासानें विद्वत्ता वाढते, वक्तृत्व फुलतें, प्रतिपादनाला गंभीरता येते. पण हा सर्व कौतुकाचा विषय झाला. त्यामुळें लौकिकांत प्रतिष्ठा लाभेल, पण आत्मज्ञान होणार नाहीं. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं या सर्व शास्त्रांना मोरपिसाची उपमा दिली आहे. ते म्हणतात-"मोराचां आंगि असोसें । पिसें अहाति डोळसें । परी एकली दिठी नसे । तैसें गा ॥ (ज्ञाने. १३|८३५) मोराची पिसे सुंदर दिसतात. शोभा आणण्यासाठी उपयोगी पडतात, त्या पिसांवर डोळेहि असतात, पण त्यांना दृष्टी नसते. सर्व शास्त्रांचें असेंच होतें. ब्रह्मस्वरूपाचें वर्णन करण्याच्या दृष्टीनी तीं शास्त्रें जणू आंधळी ठरतात आणि त्यामुळेंच आंधळ्याने हत्तीचा एकेक अवयव चाचपडून पहावा आणि हत्ती कसा होता त्याचे वर्णन करावें, तसा एकांगीपणा आत्म्याचें वर्णन करतांना शाखांना येतो. अर्थातच त्यांची वर्णने विचित्र भासणें स्वाभाविक असते.

शेष ही भगवंताची विभूति. त्याला हजार तोंडें, दोन हजार जिभा पण तोंहि परब्रह्माचें यथार्थ वर्णन करूं शकत नाहीं. लाजून तोहि अंथरुणाखाली दडला. देवांना व सनकादिक ऋषींनाहि ठाव लागला नाहीं असें वर्णन श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी केलें आहे. ते म्हणतात- पाहे पां जाणिवेचेनि बळें । कोणी वेदापासूनि असे आगळे । की शेषाहूनि तोंडागळें । बोलके आथी ॥ तोहि अंथरुणातळवटी दडे । येरू नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥ (ज्ञाने. ९ । ३७०-७१)

हे सर्व लक्षांत घेऊन साधकाने शब्दज्ञानाच्या वा पुस्तकी पांडित्याच्या नादी न लागता ध्यान आणि भक्ति यांचा अवलंब करून सर्व प्रकारची जाणीव, अहंकार, मीपणा टाकून त्याच 'एकपणाहि मिठी पडो सरली' या स्थितींत स्थिर राहिले पाहिजे. सर्व जाणीव सांडून राहणे हेंच खऱ्या अर्थाने सर्वसमर्पण आहे. अनन्यभावानें शरणागति म्हणतात ती हीच, ही भक्तीची भाषा झाली. याच स्थितीला ज्ञानाच्या भाषेत जाणीव सांडणें म्हणतात.

जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रुची प्राप्ति कैंची ॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना । तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना ॥ १५९ ॥

जाणीव, अहंकार, मीपणा हें विकार माशीसारखे आहेत. माशी पोटांत गेली कीं मळमळतें. पोटांत ढवळतें, उलट्या होतात. कितीहि चांगले, रुचकर अन्न पानांत असले तरी माशी पोटात गेलेल्या स्थितींत त्याची रुचीहि लागत नाही, स्वाद कळत नाहीं, खावे, जेवावे, अशी वासना राहत नाहीं. बळाने खाल्ले तर उलटून पडतें. उलट्या होऊन माशी पडून जाईल तेव्हाच सुख लाभते.

अन्नाच्या संबंधात माशीने जसे होते, तेंच ज्ञानाच्या संदर्भात अहंकाराने होतें. अहंकारासंबंधीचें कांहीं विवेचन मागील (११४) श्लोकांत आले आहे. अंतःकरणांत अहंकार असतांना शास्त्रे उपयोगी पडत नाहींत असेंच तेथें म्हटलें आहें.

नको रे मग वाद हा खेदकारी । नको रे मना भेद नाना विकारी ॥
नको रे मना सीकऊं पूढिलांसी । अहंभाव जों राहिला तूजपसी ॥ १६० ॥

मागे १०८ ते ११५ या श्लोकांत वादासंबंधीचें सविस्तर विवेचन आलें आहे. संतांना जिज्ञासू भावनेने केलेली चर्चा आवडते. पण आपलें तेंच खरें या धारणेने केलेला वाद मात्र संतांना पसंत नाहीं. हा असा वाद खिन्नता आणतो. जगतांमध्यें विविधता आहे. एक दुसऱ्यापेक्षां आकृति, वर्ण, गुण यांत वेगळा आहे. पण माझें जें तें चांगलें असें वाटूं लागलें कीं, हीच विविधता विकारी भेदांत, भेदांच्या विकृतींत परिणत होते. माणसाने हें टाकले पाहिजे.

एका मोठ्या लग्नसमारंभांत मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा, अशा निरनिराळ्या ठिकाणच्या संभावित महिला एकत्र झाल्या होत्या. सगळ्या चांगल्या प्रौढ आणि कुलीन होत्या. सभ्यहि होत्या. पण मुंबईच्या स्त्रिया पुण्याच्या स्त्रियांच्या वेषभूषेची, अडाणीपणाची म्हणून थट्टा करीत होत्या. पुण्याच्या महिला नागपूरकरांना मागासलेल्या ठरवीत होत्या आणि नागपुरी महिला मराठवाड्यातील बायकांना बावळ्या समजत होत्या. मराठवाड्यांतील बायका मुंबईची वेषभूषा पाहून म्हणत होत्या, "चांगल्या कुलीन स्त्रियांनीं असें राहणे बरें दिसते कां ? " खरें म्हणजे एखाद्या लमाण स्त्रीची वेषभूषाहि उपहासाचा विषय होतां कामा नये. मतें, उपासना आणि संप्रदाय यांच्या संबंधांत असेंच होतें. प्रत्येकानें आपली प्रकृति-प्रवृत्ति-परिस्थिति विचारांत घेऊन तत्त्वज्ञान व उपासना स्वीकारावी; पण माझाच मार्ग कल्याणाचा असें समजून अहंकाराने इतरांना शहाणें करण्याचा प्रयत्न करूं नये.

सांगणाराला जसा अहंकार असतो तसा ऐकणारालाहि असतो. आपलें जें मत तें बहुधा कोणी सोडीत नाहीं. वादविवादांत क्वचित् निरुत्तर झाला तरी तुमच्याइतकें चांगलें आम्हांला बोलतां येत नाहीं. एवढे फार तर म्हणतो. अशा स्थितींत निष्कारण वाद करून कंठशोषाचे धनी कां व्हावें ? सुधारण्याची, चांगलें होण्याची शक्यता असते ती स्वतःच्या संबंधांत. तशी सुधारणा आवश्यकहि असते. पण माणूस स्वतःला चांगला समजून जग सुधारले पाहिजे असें म्हणत असतो. स्वतःच्या प्रगतीला तोच अडथळा आहे असें समजतो. अहंकाराने असें मानणे म्हणजे आत्मनाश करून घेणेच आहे. "कासया गुणदोष वानूं आणिकाचे । मज काय त्यांचें उणें आहे ॥ " हें संतवचन लक्षांत घेऊनच माणसाने वागावे हें बरें ।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP