श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण

॥ श्रीराम समर्थ ॥

बहू हिंडता सौख्य होणार नाही । सिणावें परी नातुडे हीत कांही ॥
विचारे बरें अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥

चांगलें व्हावें, चांगले मिळावे या इच्छेनें मनुष्य प्रयत्नच करीत नाही असें नाहीं, पण त्याच्या प्रयत्नाची दिशा वा ध्येयवाद हा एकरूप राहत नाहीं. विहीर खोदायची असेल तर एके ठिकाणींच दहा-वीस हात खोल खोदावी लागेल. कदाचित् अधिकहि खोदावी लागेल. पण ३ -४ हाताचे अनेक खड्डे सगळ्या शेतभर खोदले तरी व्यर्थ श्रमाशिवाय पदरी कांहींहि पडण्याची शक्यता नाहीं. कुठेतरी स्थिर राहून, निष्ठा ठेवून, प्रयत्नपूर्वक साधना केली पाहिजे. केव्हातरी लग्न केलेच पाहिजे ना ! नुसतेच वरसंशोधन किती दिवस चालणार ? देवाधर्माचे, श्रवणादि साधनाचे तसेच आहे. विद्वत्ता संपादनासाठी ग्रंथवाचन आणि अनुभवासाठीं ग्रंथवाचन यांत अंतर आहे हें ओळखलेच पाहिजे. साधनेच्या आरंभी' जरी नाना प्रकारच्या तीर्थयात्रा, विविध देवतांचे दर्शन, अनेकवा क्त्यांची प्रवचने, अनेक ग्रंथांची पारायणे, नाना प्रकारची व्रतवैकल्ये, विविध प्रकारचा पूजार्‍होमादि उपासना यांचा, मनाला ओढ निर्माण होण्यासाठीं, बुद्धीचा निश्चय दृढावण्यासाठीं, आवडीच्या निवडीला अवसर मिळण्यासाठी, कांहीं प्रमाणांत उपयोग होत असला तरी तेंच, तसेंच, वरवरपणें, वर्षानुवर्षे करीत राहणे हें करमणूकीचे वा वेळ घालविण्याचें साधन बनलें तरी साधना म्हणून त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं. अभ्यासक्रमांत सुद्धां शालांत परीक्षेला जितके विषय असतात तितके पदवी परीक्षेला नसतात. पदव्युत्तर परीक्षेला त्याहीपेक्षा कमी असतात, आणि पांडित्याच्या पदवीसाठी तर एखादाच विषय प्रबंधासाठी निवडून, त्यांतच खोल शिरून विवेचन करावें लागते. फार हिंडून सुखाचा लाभ होणार नाहीं असें समर्थ म्हणतात तें यासाठींच. ज्ञानेश्वरांनी व्यभिचारी भक्तीच्या नांवाखाली या प्रकारच्या चंचलतेचा तीव्र शब्दांनी उपहास केला आहे. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त, शनिवारी मारुती, रविवारी खंडोबा अशा हिंडणाऱ्या पुरुषाला ज्ञानेश्वर भक्त म्हणत नाहींत. देवाची मूर्ति घराच्या कोपऱ्यात ठेवावयाची आणि नवसाला पावतो म्हणून कुठल्यातरी दूरच्या देवाला खेटे घालावयाचे या वृत्तीला ज्ञानोबांसारख्या माऊलीचे अंतःकरण असलेल्या सौजन्यशील महात्म्यांनीहि वेशीवर पाल मांडून बसलेल्या वेश्येची उपमा दिली आहे; (ज्ञा. १३ । ८१० - ८२१) त्यांतला तिखट उपहास साधकाने लक्षांत घेतलेला बरा.

आदर सगळ्यांचाच असावा. द्वेष कुणाचाच करूं नये. पण निष्ठा कोठेतरी एके ठिकाणीं स्थिरावली पाहिजे. फार वाचल्याने, अनेक ग्रंथ धांडोळल्याने, अनेकांचे विचार सतत ऐकत राहिल्याने लाभ होतो, हें खरें नाहीं. नानुथ्यायातू बहून शब्दान वाचो विम्लपानं हि तत । असें शास्त्रवचन आहे, तें यादृष्टीने लक्षांत घेतलें पाहिजे. समर्थहि फार भटकण्याचा परिणाम केवळ शीण पदरी पडतो, हाती काहीच लागत नाहीं असें सांगतात. यासाठीं विचार करून विवेकपूर्वक वागून, नाविन्याची ओढ असणाऱ्या चंचल अंतःकरणाला, बरें काय , चांगलें काय , हिताचे काय , तें नीट समजावून दिलें पाहिजे. एक टाकून दुसरें घ्यावें लागतें, पण त्यांत कांही सोय , लाभ असेल तर, उपयुक्तता आढळून येईल तर. केवळ वेगळेपणा, निराळेपणा म्हणून आकर्षण, हें अप्रगल्भतेचे लक्षण आहे. तो काळाचा, वेळेचा, संपत्तीचा अपव्यय आहे.

घाण्याचा बैल त्याच त्याच वर्तुळांत फेऱ्या घालीत राहतो पण त्यांत कुणी प्रगति मानीत नाहीं. यासाठीं नुसते हिंडणे, पुष्कळ हिंडणे हें उपयोगाचे नाहीं हें लक्षांत घेतलें पाहिजे. "ठायीच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥ " हें वाक्या साधकानी विचारांत घेण्यासाठी आहे. त्या वचनातील प्रत्येक पद महत्त्वाचें आहे हे लक्षांत घ्यावें. रामचंद्राच्या ठिकाणीं वसती करावी असे समर्थ सांगतात त्यांतील 'वसती करावी' या शब्दप्रयोगाने मनाचे तें निवासस्थान व्हावें, स्थिर राहण्याचे स्थल व्हावें, असेंच त्यांना सुचवायचे आहे.

बहूतांपरीं हे चि आतां धरावे । रघूनायेका आपुलेसे करावें ॥
दीनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥

३८ व्या श्लोकापासून आरंभ झालेल्या 'मना सज्जना राघवी वस्ति कीजे' या मनोबोधातील एका अर्थगंभीर पंचकाचा उपसंहार क्रमानें ४२ व्या व पंचकाच्या ५ व्या श्लोकाने, समर्थ करीत आहेत. समर्थ म्हणतात, हे मना ! अनेक प्रकाराने सांगितलें तरी लक्षांत ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे रामचंद्राला, रघुनाथाला तूं आपलेसे केलें पाहिजेस. परमेश्वराला आपलेसे करण्याचे साधनच या श्लोक पंचकात गोवून दिलेलें आहे, उत्कटभक्तीने साधना करावी ( ३८), चंचलतेचा त्याग करावा (३९), वाईट कल्पना सोडून द्याव्या (४०), निष्ठा, एकाग्रता साधावी. (४१), आणि हें सर्व करीत असतांना परमेश्वर दीनांचा, अनाथांचा, अगतिक झालेल्यांचा, अनन्य भावाने शरण आलेल्यांचा, रक्षणकर्ता आहे हा विश्वास बाळगावा असें या ५ व्या श्लोकांत समर्थांनी प्रभावीपणे सांगितलें आहे. दीन शब्दाने येथें दुबळा, दरिद्री, व्याधिग्रस्त, संकटाने पीडलेला असा कोणी मनुष्य अपेक्षित नाही तशी माणसे पुष्कळ असतात. पण तीं कांही परमेश्वराची भक्त नसतात व देवाने त्यांना आपलेसे म्हटलें आहे, त्यांचा स्वीकार केला आहे असेंहि कोठे दिसत नाही .

दीन मनुष्य देवाला आवडतो, ईश्वर दैन्यप्रिय आहे असें नारदानी आपल्या भक्तिसूत्रांत म्हटलें आहे. पण त्या सूत्रांत या दैन्यप्रियत्वाचे स्पष्टीकरणहि नारद करतात, तें लक्षांत घेतलें नाहीं तर दैन्यप्रियत्वामुळे ईश्वराची निष्ठुरता, रताच सिद्ध व्हावयाची. म्हणून नारद दीन कोण तें सूत्राच्या पूर्वाधांत सांगत आहेत. ईश्वरस्यापया भिमानद्वेषित्वातू दैन्यप्रियत्वातू चं ' ज्याचा अभिमान गळून पडला, अहंकार गेला, तो येथें दीन शब्दाने अभिप्रेत आहे. खरी आर्तता त्याविना उत्पन्नच होत नाहीं. आणि आर्तांचे संरक्षण करणें हें तर परमेश्वराचें ब्रीदच आहे. रक्षणकर्ता हे त्याचें ब्रीद पावलोपावली गाजते आहे ! जणू ते त्याच्या पायांतील तोडरावर, खळखळ वाजवणाऱ्या साखळ्यांवर, नुपूरांवर कोरले आहे.

माणूस अभिमान टाकतो. निरहंकारी होतो, कृतकर्माच्या पश्चात्तापानें व्याकुळ होऊन आर्तभावाने परमेश्वराची करुणा भाकतो, तेव्हांच तो परमेश्वराच्या जवळ जाऊं शकतो, तो परमेश्वराचा होतो. परमेश्वर त्याला आपला म्हणतो. जीवाशिवाची भेट होते. जणू एकपणाहि मिठी पडो सरते । '. 'विभक्त नव्हे तो भक्त ही समर्थानी अन्यत्र केलेली भक्ताची व्याख्या येथें साक्षात्काराला येते. हें असें होणें म्हणजेच मनाची रामचंद्राच्या ठिकाणीं वस्ती होणे आहे. मन अमन होण्याने साधणारी पूर्ण समाधि ती हीच. "पै आपुलेनि भेर्देविण । माझे जाणिजे जें एकपण ! तयाचे नाव शरण ! मज येणे गा । (ज्ञा. १८ । १३९८) ही शरणागतीची ज्ञानेश्वरांनी केलेली व्याख्या ज्ञाननिष्ठेला जवळची असली तरी आर्ततेलाही दूरची नाहीं. राघवी वस्ति कीजे' या पालुपदाचा हाहि भाव लक्षांत घेण्याजोगा आहे.

मना सज्जना येक जीवी धरावे । जनी आपुले हीत तूवा करावें ॥
रघूनायेकावीण बोल नको हो । सदा मानसी तो निजध्यास राहो ॥ ४३ ॥

माणसाने लक्षांत घेण्यासारखी, अगदीं जीवाच्या ठिकाणीं धारण करण्यासारखी, एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे स्वहित साधणे ही. माणसाने आपलें हित साधून घेतलें पाहिजे. प्रपंचांत असतांना, लौकिकांत वावरतांना, कुटुंबाचा भार वाहतांना, निरनिराळ्या प्रकारची व पातळीवरची कर्तव्ये पार पाडतांना सर्व लक्ष स्वतःचें हित साधण्याकडे असलें पाहिजे. शब्द हितसाधन असा आहे. स्वार्थसाधन- सुखसाधन असा नाही हित हें पूर्णपणे साकार होतें ते परमार्थसाधनेंत, परमेश्वराच्या प्राप्तींत. आत्मलाभ तो हाच. त्याच्यासाठी सर्वस्वाचा, कुटुंबाचा, धनाचाच काय पण पृथ्वीचाही त्याग करण्याचा प्रसंग आला तरी मागे पाहूं नये, असें शास्त्र सांगते. म्हणून समर्थ आग्रहाने सांगतात कीं परमार्थाविना, परमेश्वराविना, रामचंद्राविना दुसरें कांहीं बोलूसुद्धा नको. परमेश्वरप्राप्ति, परमेश्वराचें भजन, पूजन, परमेश्वराचें नामस्मरण हा एकच ध्यास माणसाच्या मनांत सदा सर्वदा जागृत असला पाहिजे. तो त्याचा निजध्यास झाला पाहिजे. ध्यासाला सातत्य आणि सहजता आली की, तो निजध्यास, माणसाचा श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, पचनव्यापार हे जितक्या सहजतेने, अकृत्रिमरीत्या, भार न वाटता, श्रम न होतां, चाललेले असतात तसें परमाथीविषयीं झालें पाहिजे .

मना रे जनी मौन्यमुद्रा धरावी । कथा आदरें राघवाची करावी ॥
नसे राम तें धाम सोडून द्यावे । सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥

मागच्या श्लोकांत समर्थांनी 'रपूनायकावीण बोलो नको हो' हा जो आदेश दिला आहे त्याचे स्पष्टीकरण या ४४ व्या श्लोकांत केलें आहे. मौन्यमुद्रा धारण करावी, मौन असावे, लोकांमध्ये वावरतांनाहि बोलू नये, खरें म्हणजे आवश्यकतेपेक्षां अधिक बोलू नये. कारण जनी म्हणजे लोकांत वावरत असतांना १०० टक्के मौन बाळगणे ही गोष्ट फार कठीण आहे. पाटी घेऊन लिहीत बसणे किवा खाणाखुणा करून स्वतः श्रमणें व दुसऱ्याला घोटाळ्यांत पाडणे हें कांहीं खऱ्या अर्थाने मौन पाळणे नाहीं. कारण तसें म्हटलें तर जेवढे मुके आहेत तेवढेच सगळे श्रेष्ठ प्रतीचे साधक आहेत असेंच म्हणावें लागेल. अधिक बोलण्याची प्रवृत्ति कमी करण्याच्या दृष्टीनें लिहिणें आणि खुणा करणें यांचा प्रारंभिक उपयोग होत असला तरी आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्याची इच्छाच न होणें हाच मौनाचा खरा अर्थ आहे. आणि ही आवश्यकता, संयम, त्याग, खरें वैराग्य, समाधान या पातळीवर ठरली पाहिजे. इंद्रियांची विषयलोलुपता वा मनाची आसक्ति हें आवश्यकता ठरविण्याचे गमक होऊं शकत नाहीं. वाणीचा संयम हा शरीर-मनाचें बळ वाढविण्याच्या दृष्टीने एक चांगला प्रयोग आहे. सामान्यतः बडबडी माणसे कमी कार्यक्षम आढळतात. 'उथळ पाण्याला खळखळाट फार, 'गर्जेल तो पडेल काय ? ' या म्हणी या दृष्टीनें लक्षांत घेण्यासारख्या आहेत. बोलण्याच्या निमित्तानें, व्यर्थ गप्पा मारीत बसण्याने माणसाच्या शक्तीचा वा वेळेचा अपव्यय फार होतो आणि खऱ्या परमार्थाकरितां करावे लागणारे प्रयत्न मग सहजपणे व्हावे तितके होत नाहींत. यासाठी शक्य तितके मौन बाळगणे चांगलें. मौन म्हणजे वाणीचा संयम हें उपलक्षण मागून इतर कर्मेद्रियाचा आणि क्रमानें ज्ञानेंद्रियांचाहि संयम येथें अभिप्रेत आहे असें समजावे.

वाणीला काय द्यावयाचेंच, बोलावयाचेच तर तें रामचरित्राच्या गायनाचे असावें ! त्यामुळे उगीच गप्पा-टप्पा करण्याचें, वेळ घालवण्याचें आकर्षण कमी होते. इतरहि इंद्रियांना संयमाची सवय लागू शकते आणि चितशुद्ध होऊन भक्ति दृढावत जाते.

भगवंताचे गुणानुवाद गाणे हे नवविधा भक्तींतील एक महत्त्वाचें साधन आहे . ज्या विषयाचा परमार्थाशी प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष संबंध नसेल अशा गोष्टी करण्याचें टाळावे इतका अर्थ "नसे राम तें धाम सोडून द्यावे" या चरणामध्ये आहे. आवश्यक तो व्यवहार करणें निराळें आणि सुखेश्वर्याच्या लालसेने, प्रापंचिक व्यवहाराचे व्याप वरचेवर वाढवीत नेणें निराळें. या रीतीच्या उद्योगामुळेच निरनिराळ्या प्रकारचे ताप सोसावे लागतात. सरळपणाने वागता येत नाहीं. वंचना, फसवणूक, नीतिनिर्बंध ओलांडून जागणे, लपवाछपवी करणें, दुसऱ्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या लुबाडणे, या सर्व गोष्टी जन्माला येतात. अहंकार बळावतो. कामक्रोधांची उग्रता वाढत जाते. लोभ-मत्सरांचें स्वरूप अधिकाधिक पीडाकर होत जाते. म्हणून ज्यांत परमार्थाचा संबंध नाहीं अशीं, भगवंतापासून दूर नेणारी, जी कृत्ये असतील ती सर्व सोडून द्यावीत ज्याठिकाणी अशा परमार्थविरोधी भावनांचे पोषण होत असेल तें स्थलहि सोडून द्यावे.

खरोखरीच सुखाची अभिलाषा असेल तर लोकव्यवहारापासून दूर होऊन, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, वनश्रीने डवरलेल्या, वाहत्या जलप्रवाहाच्या खळखळत्या मंजुळ नादाने भारावलेल्या, अशा एखाद्या मनोहर स्थलाचा आश्रय करावा. जेथें कोणाचें मन सांभाळावे लागणार नाहीं, तिरस्कारानें, मत्सराने, उपहासाने खोचक बनलेली वाक्ये ऐकावी लागणार नाहींत, अहंकाराने फुललेले, स्वार्थांने बरबटलेले दुर्व्यवहार पहावे लागणार नाहींत, विषयासक्तीतून निर्माण झालेल्या संघर्षांचा ताण सोसावा लागणार नाहीं, असें तें स्थल असावें. जेथील वातावरण शांततेने आणि प्रसन्नतेनें भरलेले आहे, मंद वाऱ्याच्या झुळुकीवर पानें सळसळत आहेत, पक्षांची मधुर किलबिल त्याला साथ देत आहे, गगनचुंबी शिखरे, पाताळाची खोली मोजणाऱ्या दऱ्या, मेघाशी हितगुज करणारे उंच वृक्ष, नाना रंगाची फुलें उधळणाऱ्या वेली, निर्भय मनाने वावरणारी श्वापदे ज्याठिकाणी मन वेधून घेत आहेत, अशा स्थळी राहण्याचे भाग्य लाभले, आणि तेथील एखाद्या लहानशा देवमंदिरांत ध्यान-सुख अनुभवितांना मन रंगून गेलें, वेळेचे भान उरले नाहीं, शरीराला लागणाऱ्या आवश्यकतेचीहि फारशी ओढ उरली नाहीं, तर मग सुखाला पारावार नाही. खरे म्हणजे असें झालें तरच अरण्य सुखाचे होतें. त्याकरिता शरीर काटक असावें लागतें. शीतोष्ण सहन करण्याची क्षमता असावी लागते. कोणत्याहि प्रसंगाला धैर्याने तोंड देता येईल इतका निर्भटापणा वृत्तींत बाणाचा लागतो. भूक तहान सोसता द्यावी लागते. कंटाळा येऊन चालत नाहीं असें असलें तरच अरण्यवास सुखाचा होऊं शकतो. ज्याला एकट्याला करमत नाहीं त्याला अरण्यवास हा सुखापेक्षा दुःखदायक होण्याचीच शक्यता जास्त. जें जसें असेल तें तसेंच चालवून घेण्याची, इतकेच नव्हे तर गोड मानण्याची सवय लागलेली नसेल तर अरण्यवासानें श्रमसंतापां शिवाय दुसरें कांहीं पदर पडणार नाहीं. "नाहीं तरी सुखे असावे संसारी । फजिती तिसरी करूंनये ॥ " असे संत म्हणतात तें यासाठींच. 'सुखालागि आरण्य सेवीत जावे' या वाक्यांतील आकर्षण निर्माण होण्यापूर्वी, स्वतःच्या पात्रतेचाहि विचार करणें आवश्यक आहे. शरीर मनाच्या आवश्यकता फार थोड्या नसतील आणि मन रमण्यासाठी बाह्य उपाधि अपरिहार्य असतील तर अरण्यासारखे सुखसाधन नाहीं हें खरेंच आहे ! कारण तेथें मनाला बळाने खेचून वैतागांत पाडतील अशा गोष्टी फार थोड्या असतात आणि त्यामुळें मन शांत, स्थिर राहण्यास सहाय्य होते .

जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे ॥
तये संगतीची जनी कोण गोडी । जये संगतीनें मती राम सोडी ॥ ४५ ॥

जेथें राम नाहीं तें धाम म्हणजे स्थल, कार्य , उद्योग सोडून अरण्यांत जावे म्हणजेच सुख लागतें असें जें सांगतात त्यामागील कारण परंपरेची एक दिशा समर्थ या ४५ व्या श्लोकांत सांगत आहेत . माणसाच्या कल्याणासाठी, त्याचें जन्माचे सार्थक होण्यासाठी, हितसाधनासाठीं, त्याची बुद्धि परमार्थांत स्थिरावली पाहिजे. अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयीं निष्ठा दृढ राहिली पाहिजे. पण हें होत नाहीं. त्याला जी कारणें आहेत-त्यांतील एक महत्त्वाचें कारण विरोधी गुण असलेल्या व्यक्तीची संगत. मनुष्य प्रपंचामध्यें रमतो, व्यवहार त्याला सोडावेसे वाटत नाहींत याच्यामागे संगति हें कारण फार महत्त्वाचे आहे.

समाधान कशाने मिळतें ? तृप्तता, संयम, त्याग, सदाचरण, धर्मनिष्ठा या सर्व गोष्टी मनुष्याला खरे व टिकाऊ समाधान देणाऱ्या आहेत. पण भोवती संगत असते ती अशा लोकांची कीं ज्यांच्या वागण्यांत आणि विचारांत संयमाला कांहींहि महत्त्व नसतें. खावे, प्यावे , मजा करावी. ऐश्वर्याने, विलासाने रंगेल जीवन जगावें. त्यासाठीं उदंड संपत्ति मिळवावी, उपभोगाची साधनें वाढवावीत, सत्तास्थाने जिंकावीत, त्या माध्यमांतून प्रतिष्ठा मिरवावी. मग त्याकरिता काहीहि करावें लागलें, कसेंहि वागावे लागलें, तरी चालेल, अशी ज्यांची धारणा असते, तेच सभोवती असतात.

मनुष्याने महत्त्वाकांक्षी असले पाहिजे आणि महत्त्वाकांक्षा ही संपत्ति, सुखसाधनें, प्रतिष्ठा याच मापाने मोजली पाहिजे. याच्या आड येईल ते सर्व टाकले पाहिजे. नीति-अनीति, धर्म-अधर्म, पाप-पुण्य, सदाचरण-दुराचरण या सर्व कल्पना मनुष्यानेच निर्माण केलेल्या आहेत. आणि त्यांची उपयुक्तता देशकालपरिस्थितीवर अवलंबून आहे. तेव्हां पुण्यकल्पना, धर्माविषयीची निष्ठा या शब्दांना वस्तुतः कांहीं अर्थ नाहीं, असें गोंडस तत्त्वज्ञान विचारवंत म्हणविणारी काहीं बुद्धिमान् माणसे समाजासमोर निर्माण करीत असतात, आणि अनेक श्रीमंत, सत्ताधारी, प्रतिष्ठित अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये तें प्रत्यक्ष दिसूनहि येतें, त्यामुळे सामान्याला तोच आदर्श महत्त्वाचा वाटतो आणि मग जीवनाचे ध्येयही तेंच ठरून आधीं सांगितलेल्या समाधानाच्या खऱ्या मार्गानें जाणे नको वाटतें.

अहंकार हा मनुष्याचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. भ्रांत महत्त्वाकांक्षेसंबंधीच्या या फसव्या तत्त्वज्ञानानें हा अहंकार पुष्ट होतो आणि मग ज्यामुळे अहंकार सुखावला जाईल असाच गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. शास्त्रानें कामक्रोधादि जे विकार षड्रिपु म्हणून सांगितले तेच या अहमतेमुळे मित्र आहेत असें वाटूं लागतें आणि त्या घातक विचारांचें समर्थनहि होऊं लागतें. समाजाच्या कल्याणाची तळमळ असलेली चांगली विद्वान् माणसेंहि, 'कामाने वंशसातत्य राखले आहे, क्रोधामुळे दुष्टांना धाक बसतो, लोभाने ऐश्वर्य वाढते, मोहामुळे अनेक गोष्टींत रस घेतां येतो, मदामुळें स्वाभिमान जागृत होतो, स्वसंरक्षण होतें, मनुष्याचा आत्मविश्वास वाढतो, मत्सरामुळे महत्त्वाकांक्षेला प्रेरणा मिळते,' इत्यादि इत्यादि प्रतिपादन करीत असतात.

जगाच्या पाठीवर समृद्धीच्या शिखरावर पोचलेली अनेक राष्ट्रें आहेत. पण त्या देशामथें सुख, स्वास्थ, शांतता असल्याचें मात्र आढळून येत नाहीं. त्यामुळें आपल्या दरिद्री आणि तथाकथित मागासलेल्या देशांत प्रगतीचे हे महत्त्वाकांक्षी तत्त्वज्ञान आकर्षक वाटलें तरी जाणत्या नी त्याचा फोलपणा समजून घेतला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात ज्या तऱ्हेच्या संगतींतून समाधान नष्ट करणारे विचार मनांत येतात, अहंकार बळावतो आणि परिणामी परमार्थच अप्रिय वाटूं लागतो ती संगतीच सोडली पाहिजे. शरीरमनबुद्धीला वाईट वळण लावणाऱ्या या संगतीचे आकर्षण तरी वाटत कामा नये. त्या प्रकारचे जीवन आदर्श तरी वाटत कामा नये.

मना जे घडी राघवेवीण गेली । जनी आपुली ते तुवा हानि केली ॥
रघुनायेकावीण तो सीण आहे । जनी दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे । ४६ ॥

रामचंद्रांच्या चिंतनावांचून, परमार्थांच्या साधनाचाच जो वेळ वाया जाईल, तो आपल्या आयुष्याची हानि करणार आहे असें समजावे. आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो सत्कारणी लावणे हे माणसाने तरी आपलें कर्तव्य समजलें पाहिजे. रामचंद्रांच्या स्मरणावांचून, परमार्थसाधनावांचून जें जें कांहीं केलें जाते, तें सर्व एक प्रकारें शीण देणारे, कष्ट वाढविणारे असेंच असतें. मनुष्य जागृत तो, सावध तो, की जो प्रत्येक गोष्ट लक्ष लावून पाहतो. नीट प्रकारें विचारांत घेतो, विवेक करतो, सार काय , असार काय तें समजून त्याप्रमाणें वागतो .

जो दक्ष नाहीं तो प्रपंचातहि वेंधळा ठरतो, त्याच्या हातून सांडलवंड होते, भांडी पडतात, फुटतात, व्यापार खालावतो, वेळ साधत येत नाही, अपयश वाढते. दक्षता, सावधपणा हा गुण सर्वत्र उपयोगीच आहे.

मनुष्य प्रत्येक गोष्टींत सावध राहिला, त्यानें नीट विचार केला, त्याची विवेकबुद्धि जागृत असली म्हणजे तो परमार्थसाधनेंतच दृढ राहील. दृढच राहील यांत शंका नाहीं. विवेकी माणसाचे सर्वच प्रयत्न शाश्वत सुखासाठी असतील. परमेश्वरप्राप्ति हेंच त्याचें ध्येय असेल, उपासना हाच त्याचा उद्योग असेल. शरीररक्षणासाठी, देह धारणेसाठी तो कांहीं करणार नाहीं, असें मुळींच नाहीं पण त्याची शरीराची कल्पना मी म्हणजे शरीर नसून शरीर हें एक उच्चध्येयाच्या प्राप्तीचें साधन आहे, एवढीच असेल आणि त्यामुळें त्याचें लक्ष रामाच्या चरणकमलांपासून कधींच ढळणार नाहीं .

मनीं लोचनी श्रीहरि तो चि पाहे । जनी जाणता भक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥

हा श्लोक धरून पुढें दहा श्लोकांत समर्थांनी परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त कोण ? ते सविस्तरपणे सांगितलें आहे. या सर्व वर्णनामध्ये व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही क्षेत्रांत श्रेष्ठ पुरुष कसा वागतो त्याचा आदर्श समर्थांनी उभा केला आहे. श्रेष्ठ भक्ताचे महत्त्वाचें लक्षण सांगतांना समर्थ म्हणतात . तो मनानें आणि डोळ्यांनीहि एक परमेश्वराचेंच रूप काय तें पाहतो व अनुभवितो. बाहेर चर्मचक्षू ने त्याला परमेश्वराचें रूप न्याहाळणे आवडते एवढेच नव्हे तर त्याच्या अंतरंगांतहि सदा सर्वदा त्याला रूपाचा साक्षात्कार होत असतो. डोळ्यांनी श्रीहरीचे बाह्यरूप पाहणे हें मंदिरांत विराजमान असणाऱ्या देवमूर्तीच्याच स्वरूपांत केवळ घडते असें मानण्याचे कारण नाहीं. केवळ ध्यानांतच नव्हे तर चर्मचक्षू नीहि भगवंताच्या अत्यंत रमणीय अशा सगुण, साकार रूपाचा दिव्य साक्षात्कार श्रेष्ठ भक्तास होत असतो असाहि अर्थ लोचनी पाहे या पदांनी घेणे शक्य आहे. एका हिंदी सत्पुरुषाने यादृष्टीनें केलेलें वर्णन मोठे लक्षणीय आहे. "अंतर जामिहि ते बड बाहर जामिहि राम जे नाम लिये ते । प्रगट भये प्रल्हादकू हूँ प्रभू पाहन ते न हिये ते । "

ध्यानदर्शनापेक्षाहि हा प्रत्यक्ष नेत्रानी होणारा सगुणरूपाचा साक्षात्कार विशेष महत्त्वाचा मानला पाहिजे. मंदिरांतील देवदर्शनाचाहि आनंद संतांना उत्कृष्ट रीतीनें अनुभविता येतो; कारण त्यांचें सर्वच अंतरंग परमेश्वराच्या सच्चिदानंदमयतेनें पूर्णपणे व्यापिले गेलेले असते. "जनी जाणता होऊनि भक्त राहे" असाहि त्याचा अन्वय केला तर ज्ञानोत्तर भक्ति म्हणून ज्या अवस्थेचे वर्णन केलें जातें तीहि येथें अभिप्रेत आहे असें म्हणतां येईल; आणि पहिल्या चरणातील मनीं लोचनी ही दोन्ही पदे अधिक चांगल्या रीतीनें यथार्थ होतील, तसाच त्या त्या ओळीतील पुढचा 'च' कारहि अधिक अर्थवाही ठरेल. अर्थ साधेपणाने घेतला तरी त्याहि अवस्थेतील भक्ताचे महत्त्व सामान्य नाहीं. डोळ्यांनी परमेश्वराचें रूप पाहण्याची, मूर्तीचे दर्शन घेण्याची, तिच्या पूजाअर्चेत रंगून जाण्याची आवड, श्रद्धावंतांना, भाविकांना असतेच पण ती पुष्कळ वेळा वरवरचीहि राहूं शकते. देवदेवतांची महापूजा बांधणाऱ्याची वृत्ति याच प्रकारची असते. अभिषेकाचे वेळी चंद्रिकाधवल दुधाचे आणि दह्याचे ओघळ काळ्या सावळ्या मूर्तीच्या मस्तकापासून सर्व शरीरभर वाहू लागलें कीं, मूर्तीच्या दर्शनांतील आकर्षकता वाढते. आपण देवासाठी कांही चांगलें केले असें समाधानहि मग त्यांतून माणसास मिळतें. चांगल्या सुंदर वस्त्रांनी, बहुमोल अलंकारानी, सुगंधित रमणीय पुष्यानी मूर्ति सजविलेली असली कीं त्या दर्शनाने सुखावणाऱ्या भाविकांची संख्या पुष्कळच मोठी असते.

जे मनानें श्रीहरीला रूपाचे दर्शन घेतात त्यांना या स्थळ उपचारानी, दर्शनाच्या आनंदांत विशेष भर पडली असें कधीं वाटत नाहीं. मन रमणे, एकाप्र होणे , दर्शनाने अष्टसात्त्विक भाव दाटून येणे , देहभाव विसरणे, बाह्या जगताची वा परिस्थितीची जाणीव न उरणें, रूप-दर्शनानें तल्लीन होऊन जाणे, आणि त्यामुळें जणू आनंदसागरामध्यें विहार करीत आहे अशी प्रसन्नता अनुभवास येणे इत्यादि लक्षणें मनानें श्रीहरीचे रूप पाहूं शकणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीं थोड्याशा बाह्य निमित्तानें किंवा त्यावांचूनहि प्रगट होत असतात. घटघटाच्या ठिकाणी अंतर्बाह्य परमात्मा व्यापून राहिला आहे हें ज्ञानच त्याच्या ह्या दिव्य अनुभवास आधारभूत असतें. समर्थांनी भक्ताला जाणता हे विशेषण दिलें आहे तें याच भावाने.

भक्ताला जाणता हें दिलेलें विशेषण आणखीहि एका दृष्टीनें लक्षांत घेण्यासारखे आहे. परमार्थमार्गामध्यें मनुष्य साधा, सरळ, श्रद्धावान् निष्कपट असा लागतो यांत संशय नाही पण त्यावरून जो एक सोयीस्कर अपसमज पसरला आहे तो मात्र दुरांन्व यानेही खरा नाही. साधा सरळ म्हणजे वेडा, खुळा, बावळा, व्यवहारशून्य, सहज फसला जाणारा असा नव्हे. कपटी म्हणजे चतुर नव्हे, बावळा म्हणजे सरळ नव्हे. गबाळा म्हणजे साधा नव्हे. साधासरळ या दोन्हीं गुणांची गल्लत करणे हें अडाणीपणाचें लक्षण आहे. कदाचित् स्वार्थी धूर्तांनी आपल्या उभयविध सोयीसाठी ही नकोत तीं लक्षणें पारमार्थिकावर लादली असण्याचीहि शक्यता आहे. समर्थ भक्ताला जाणता म्हणतात- ते हें गबाळे बावळेपण नाकारण्यासाठींच. समर्थांनी आपल्या सर्व वाङ्क्मयामध्ये या दुर्गणाचा ठायीं ठायीं तिरस्कार केला आहे. प्रयत्नाची, दक्षतेची, चातुर्याची, स्तुतीहि केली आहे. तेव्हां जाणता भक्त म्हणजे ज्ञानी, श्रद्धावान प्रयत्नशील, साक्षेपी, विवेकी, चतुर असा भक्त. मागच्या श्लोकातील शेवटच्या ओळीतील दक्ष शब्द या विवरणाला पोषक असाच आहे.

तिसऱ्या ओळीचा अन्वय करतांना 'राखे' शब्द, 'गुणी प्रीति राखे' आणि 'साधनांचा क्रमू राखे' असा दोनदा घेतला पाहिजे. आधीं प्रगतीच्या दृष्टीनें आणि नंतर लोकसंग्रहाच्या दृष्टीनें या चरणातील विचार फार महत्त्वाचा आहे. परमार्थामुळें प्राप्त होणाऱ्या प्रसन्नता, समाधान, आनंद, शांति या गुणांवर किंवा परमेश्वराचे ठिकाणीं शास्त्रांनी वा संतमहात्म्यांनी सर्वज्ञता, सर्वशक्तिता, कृपावत्सलता, न्यायीपणा, औदार्य, सौंदर्य इत्यादि इत्यादि गुण सांगितले आहेत. त्यावर कोणाहि माणसाचे प्रेम बसणे, ते गुण आवडणे, त्याचा लाभ आपल्याला व्हावा असें वाटणे हें अगदीं स्वाभाविक आहे. यांची अपेक्षा ठेवूनच तर माणूस बहुधा परमार्थाला लागतो. थोर भक्तहि या गुणाविषयी प्रीतीच बाळगतो. पण त्याचें मोठेपण साधनांचा क्रम न विसरण्यामध्यें, साधनांचा क्रम राखण्यामध्ये आहे.

परमेश्वराची सर्वसमर्थता, सर्वशक्तिमत्त्व मान्य करतांना त्याचें सर्वज्ञत्वहि लक्षांत ठेवले पाहिजे. ईश्वर भक्तवत्सल आहे, दयाळू आहे हें खरेंच, पण तो न्यायी आहे हेहि विसरता कामा नये. समाधान, शांतता, आनंद ही सर्वांनाच हवी असतात पण त्यासाठी त्याग, तप, संयम याविषयीचे दृढ प्रयत्न आवश्यक असतात हे विसरून चालत नाहीं. माणूस बहुधा आपल्या सोयीचे म्हणून पहिलें लक्षांत ठेवतो व दुसरे सोयीस्करपणें विसरतो. तें चालत नाहीं. ध्येय निश्चित असलें तरी ध्येयाकडे जाणारा मार्ग क्रमाक्रमानेंच चालावयाचा असतो आणि ही वाटचाल सातत्याने, निष्ठेने, ओझे न वाटूं देतां, न कंटाळता, धीराने करावयाची असते. साधनांचा क्रम राखतो म्हणण्यामध्यें इतका सर्व भाव अभिप्रेत आहे. ही अशीं लक्षणें ज्या व्यक्तीच्या ठिकाणीं दिसतात तोच परमेश्वराचा धन्य भक्त होय असें समर्थ सांगतात.

सदा देवकाजी झिजे देह याचा । सदा रामनामें वदे नित्य वाचा ॥
स्वधर्मे चि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥

जो आपलें शरीर न कंटाळता, न थकता, ईश्वराच्या सेवेत सदैव राबवीत असतो तो रामचंद्राचा भक्त धन्य होय. येथेंहि देवाची सेवा, देवाचे काय हे शब्द समजून घेतले पाहिजेत. देवाचे काय असो कीं देवाची सेवा असो. ही देवाला आवडणारी वस्तु असली पाहिजे. देव पत्र, पुष्यफलांचाहि स्वीकार करतो, पण अर्पण करणाराच्या अंतःकरणांतील उत्कट भक्तीसाठीं. पानाफुलांची त्याला आवड असते म्हणून नाहीं. तेव्हां देवाचे काय कोणतें, त्याचें स्वरूप काय , त्याचे आचरण कसे करावें हें जाणणें फार महत्त्वाचे आहे. त्यांतहि पुन्हा समर्थांनी येथें देवाची सेवा असा शब्दप्रयोग न करतां देवाचे कार्य शब्द वापरले आहेत.

भगवंताने आपलें काय काय तें गीतेमध्ये स्पष्ट सांगितलें आहे. "परित्राणाय साधून विनाशाय च दुक्षृता म । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ " (भ. ४ ! ८) हें भगवंतांनीं आपल्या अवताराचे प्रयोजन सांगितलें आहे, आणि ईश्वर काय करणार नाहीं तर काय स्थिति होईल तेंहि भगवंत- "उत्सीदेयुरिमे लोका न कूर्याम कर्मम चेदहम । संकरस्य च कर्ता स्याम उपहन्यामिमा : प्रजाः । " (भ. ३ ! २४) तेव्हां जो स्वतःला देवभक्त म्हणवितो त्यानें आपल्या शक्तिबुध्या नुसार हे जे देवाचे कार्य आहे, तेंच न कंटाळता, न थकता करीत राहिले पाहिजे.

या प्रयत्नाचे व्यावहारिक बाह्य स्वरूप प्रकृतिभेदानें वेगवेगळे असूं शकेल, पण लोकांना सन्मार्गी लावून सुखी करणें आणि दुराचरण, दैन्य, दुःख यांपासून सोडविणे हे धार्मिक म्हणविणाऱ्या प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे आणि ते त्यानें यथाशक्ति सातत्याने करीत राहिलें पाहिजे. भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, यज्ञयाग, उत्सवमहोत्सव, अनाथअपंगांची सेवा, दुःखितांना सुखविणें, दलितांचा उद्धार करणें, संकटग्रस्तांना सोडविणे, अडाण्यांना शिकविणे, निराधारांना आधार देणे इत्यादि इत्यादि सर्व कृतींमागचा ध्येयवाद, शेवटीं परमेश्वराचें काय करणे हा आहे. वैयक्तिक पूजा अर्चा करूं नये किंवा ती व्यर्थ आहे असें म्हणण्याचा उद्देश मुळींच नाहीं. श्रमांचा परिहार व्हावा, धीर लाभावा, विश्वास वाढावा, मनोबल प्राप्त व्हावें म्हणून व्यक्तिशः केलेल्या पूजा प्रार्थनेचाहि फार उपयोग होतो यांत शंका नाही. पण पूजाप्रार्थनेव्यतिरिक्त चें एरवीचे जीवन जर देवकार्यांत वेचले जात नसेल, देवाच्या कामाला अनुकूल नसेल किंवा विरोधी असेल तर ही पूजाप्रार्थना कांहीं उपयोगाची नाहीं. ती आत्मवंचना तरी आहे वा दंभ तरी आहे. समर्थांना सदा शब्दाने दिवसाकाठी तास दोन तास चालणारे धार्मिक विधि अभिप्रेत नाहीत हें निश्चित. कोणताहि धार्मिक विधि नित्य चालेल पण सदा चालू शकणार नाहीं. सदा शब्दाने जीवनाची सर्व घडणच समर्थांना अभिप्रेत आहे हें लक्षांत घेतलें पाहिजे.

या कामातली उत्कटता लक्षांत यावी म्हणून समर्थ देवकार्य देह झिजे' असा शब्दप्रयोग करतात. यथाशक्तीच्या ढालीखाली केलेली देहाची थोडीशी हालचाल येथें समर्थांना अभिप्रेत नाहीं. देवाचे काय करणें ही एक तपस्या आहे. वत्सल आई मुलासाठी, सुगृहिणी कुटुंबासाठी, पतिव्रता पतीसाठी, स्वामिभक्त धन्यासाठी, खरा देशभक्त राष्ट्रासाठीं, योगी ध्येयासाठी, मांत्रिक सिद्धीसाठीं, धनलोलुप संपत्तीसाठीं जितके आणि ज्या प्रकारचे कष्ट करीत राहतो तसें करीत राहणे म्हणजे देह झिजवणें आहे. अतिश्रमानें कदाचित् थकवा येईल पण कंटाळा येणार नाहीं. देवकार्यामध्ये उत्साह सतत टिकून राहिला पाहिजे. आपण समजतो त्यापेक्षा शरीराची कार्यक्षमता कितीतरी पटीने अधिक असते. जेथें आवड असते, उत्साह असतो, तेथें ती प्रत्ययालाहि येते. तेव्हां देवाचे काय करणें हें वेठ सारण्यासारखे नसावे शारीरिक कष्टाची क्षिती न बाळगता तें केले असावें आणि असें ज्यांचे जीवन देवकार्यांत लागले असतें तो परमेश्वराचा भक्त धन्य होय असें समर्थ म्हणतात .

जो आपल्या वाणीने प्रतिदिनी' आणि सातत्याने, अखंडपणे देवाचे नांव घेत असतो, तो परमेश्वराचा भक्त धन्य होय. रामनामे हा बहुवचनी प्रयोग लक्षणीय आहे. त्यामुळें समर्थांच्या ठिकाणीं सांप्रदायिक आग्रह नाहीं ही गोष्ट लक्षांत येते आणि याच भावनेने समर्थ श्रीहरि या शब्दाचाहि रामाच्या जोडीने अनेक ठिकाणीं उल्लेख करतात. तुम्हांला आवडेल तें देवाचे कोणतेंहि नांव प्रेमाने घ्या, प्रतिदिनी घ्या, वरचेवर, सदैव घ्या असें समर्थांना सुचवावयाचें आहे.

सर्व संताच्या जीवनांतून त्यांची ही नामस्मरणाची, नामोच्चारणाची आवड, खरें म्हटले तर व्यसन, नियमानें प्रगट झालेली आहे. तुझें नाम माझ्या वाणीवर सदैव राहो हे मागणे, कदाचित् एकमात्र मागणे, संतांनी' देवाजवळ मागितले आहे. सुष्टीच्या आरंभी' शब्द होता व त्यांतून हें सर्व निर्माण झाले आहे असें शास्त्र सांगते. त्याचप्रमाणें परमार्थाची सर्व प्रगति नामस्मरणानें होऊं शकते, होतें, असा महात्म्यांचा अनुभवहि आहे आणि हा प्रभाव इतका महत्त्वाचा आहे कीं सर्व साधनांचे फळ नामस्मरणांतून क्रमाक्रमानें प्राप्त होत जातें. विषयांकडची ओढ उणावते, इंद्रियांना संयम येतो, चित्त शुद्ध होतें, बुद्धि स्थिरावते, जीव परमार्थांत रमतो. तेव्हा नित्य आणि सदा या दोन शब्दांवर लक्ष ठेवून होईल तितका अधिक वेळ आणि प्रतिदिनी नियमानें भगवंताचे नांव देशकालपरिस्थितीप्रमाणें उच्चारीत राहावे ते परमार्थप्राप्तीचें एक श्रेष्ठ साधन आहे हें निःसंशय. व्यवहारात वावरत असतांना, शरीराचे कोणतेहि व्यापार चालू असले तरी त्यावेळी देवाचे नांव घेणे सहज शक्य आहे आणि त्यामुळे नामस्मरणांतील सातत्य अनायासें टिकते त्याला इतर साधनसंभार लागत नाहीं. आणि श्रमहि होत नाहींत. हेंच नामस्मरण जेव्हां प्रेमाने हृदयाच्या स्पदंनासारखे सहज होऊन जाते तेव्हां तो भक्त धन्यतेस प्राप्त होतो.

जो केवळ स्वधर्माचेच पालन सदैव उत्तम प्रकाराने करतो, तोहि परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त आहे.

फार फार पूर्वीच्या काळी स्वधर्माचा विचार वर्णाश्रमभेदाने केला जात असे आणि तीच व्यवस्था समाज स्वाथ्याच्या दृष्टीनें एक चांगली व्यवस्था होती. दुर्दैवाने आज तरी आपण त्या आदर्श व्यवस्थेपासून फार दुरावलेले आहोंत. आजहि एकाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या संबंधांत तें अशक्य नाहीं पण तो आदर्श लाखांत एखाद्यालाच पूर्णपणाने पाळणे शक्य होणार आहे. इतरांच्यासाठी स्वधर्म शब्दाचा व्यावहारिकदृष्टीनें निराळा अर्थ केला पाहिजे. वर्णाश्रमव्यवस्था ही उत्तम व्यवस्था होती, आहे. समाजाचा विकास उन्नति, प्रगति पूर्ण होऊन सर्वच्या सर्व समाज सुख, स्वास्थ समाधानांत पूर्णपणे नांदावा हा आदर्श वर्णाश्रमव्यवस्था आपल्या मूळ शुद्ध स्वरूपांत प्रस्थापित झाली तरच शक्य आहे हेहि लक्षांत ठेवले पाहिजे. आज हे बोलणेंहि धोक्याचें झालें आहे, पण ते सत्य आहे आणि दीर्घकाळाच्या प्रयत्नाने शक्यहि आहे. तरीहि सध्या आपणांस त्याविषयींचा विचार कर्तव्य नाहीं. कारण समर्थांच्या काळीहि वर्णाश्रमधर्म हा शुद्ध स्वरूपांत अस्तित्वांत नव्हता, त्यावेळीं इतस्ततः विखुरले वर्णाश्रमधर्माचे कांहीं अवशेषच उरले होते आणि त्यामुळें होणारे दुःखहि समर्थांनी अनेक रीतीनें प्रगट केलें आहे. यास्तव स्वधर्मशब्दाचा कांहीं वेगळा विचार आपणांस केला पाहिजे.

स्वधर्म शब्द हा आपण आनंदाने स्वीकारलेली वा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी पत्करलेली जी जीवनपद्धति तिचा वाचक समजावा. तो वर्णाश्रमाच्या मूलभूत पद्धतीशी जितका मिळता जुळता असेल तितका चांगलाच. पण एकदां स्वीकारल्यानंतर जें स्वीकारले तें स्वधर्म मानून चालणें हेहि श्रेयस्करच आहे. हेहि पुन्हा कुलवतीच्या लग्नासारखे आहे. वरसंशोधन करतांना वराविषशींच्या अनेक अपेक्षा असूं शकतात आणि त्यादृष्टीने त्याच्याशी अधिकाधिक मिळता जुळता वर निश्चित केला जातो पण त्याच्याशी एकदां विधिपूर्वक विवाह झाला कीं मग मात्र निष्ठेमध्ये पर्याय असून चालत नाहीं. तीच गोष्ट स्वधर्मांचीहि आहे, एखादा उद्योग, एकादे क्षेत्र, एकादा व्यवसाय समाज विघातक नाही याचा विचार करून स्वीकारावा आणि मग स्वीकारलेला व्यवसाय आपल्या सर्व निष्ठेनिशीं पार पाडावा. जीव न ओतता, अप्रामाणिकपणें कशीतरी निरुपायानें स्वीकारलेली कामे करीत राहणे ही गोष्ट सज्जनाला शोभणारी नाहीं. समर्थ 'उत्तमाचा चाले' म्हणतात ते यासाठींच. कार्यक्षेत्र निवडताना कुलशीलपरंपरेचा आणि मग प्रकृति- प्रवृत्ति-परिस्थितीचा चांगला विचार करावा व क्षेत्र निवडावे, पण जें निवडले वा पत्करावे लागलें तेथें अप्रमाणिकपणा करून चालणार नाही. चिकित्सक (डॉस्कर) व्हावयाचें होतें, शिल्पज्ञ (इंजिनिअर) व्हावयाचें होते पण चांगला अभ्यास न केल्यामुळे किंवा पुरेसा होऊं न शकल्यामुळें शेवटीं लेखनिक व्हावें लागले, पण म्हणून त्यानें कामाच्या वेळीं कार्यालयात मासिके वाचावी किवा उपहारगृहामध्ये अधिक वेळ घालवावा हें योग्य ठरत नाहीं. तुम्ही कष्टकरी वा उद्योगपति कुणीहि असूं शकता पण जें काय करीत असाल तें प्रामाणिकपणे करीत राहणे ही भगवंताची सेवाच आहे. भगवंताला फुलें आवडतात पण तीं झाडावर फुललेली नव्हे, तर प्रामाणिकतेचा सुगंध आणि कौशल्याचे सौंदर्य असलेली स्वकर्म पुष्पे . समर्थाच्या उत्तम शब्दातून ही प्रामाणिकता व कौशल्य हेच अभिप्रेत आहे. ही पूजा हेंच ईश्वराचें मनोगत आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा रीतीनें तिसरी ओळ पहिल्या ओळीशी जोडली जाते ज दुसरी ओळ त्याचा सेतू होतो. हें स्वधर्माचरण जो निष्ठेने पार पाडतो तोच परमेश्वराचा सेवक आणि तोच धन्य होय .

सदा बोलण्यासारिखे चालताहे । अनेकीं सदा येक देवासि पाहे ॥
सगुणी भजे लेश नाहीं भ्रमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥

"बोले तैसा चाले त्याचीं वंदावी पाऊले" असें संतवचन प्रसिद्ध आहे आणि हें वागणे कधीं तरी प्रसंगाविशेष किंवा देखाव्यापुरतें असून चालत नाही तर तें नित्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग म्हणून असावें लागतें. दिलेले वचन या दिलेला शब्द पाळणे एवढा मर्यादित अर्थ या चरणाचा नाही. चांगलें वागण्यासंबंधींच्या आपल्या कांहीं धारणा असतात, आणि आपण त्या बोलून दाखवित असतो, किंवा विद्वत्तेच्या, अनुभवाच्या व वडिलकीच्या नात्याने आपण कांही प्रसंगाने वा कांहीं प्रसंग नसतांहि दुसऱ्यास शिकवीत असतो. हें असें मला आवडत नाहीं, हें असें मी कधीं करणार नाहीं अशी प्रौढीहि मनुष्य सहजपणे मिरवीत असतो पण तसे वागण्याचा प्रत्यक्ष प्रसंग उभा राहिला म्हणजे मात्र ज्याप्रकारचे बोलणें आपण केलें होते तदनुरूप वागणे माणसाच्या हातून घडत नाहीं. "परोपदेशे पांडित्य सर्वथा सुकरं वृणा । धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित सुमहात्मनः ॥ " असें सुभाषित आहे ते यासाठींच. बोलणें नेहमीच सोपे, तें कृतीत आणणें हें येरागबाळाचें काय नोहे. पण सत्पुरुषाच्या विषयांत मात्र हें सहज असतें. सर्वसामान्य माणसाच्या उक्ति-वृत्ति-कृतींत मेळ नसतो पण सत्पुरुषाच्या मात्र जें बोलण्यांत तेंच मनांत व जें मनांत तेंच कृतीत दिसते, म्हणून समर्थ त्याला धन्य असें म्हणतात .

आपले तत्त्वज्ञान सांगते कीं सूष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेत एकच सद्‌वस्तु अनेक रूपानी नटते वा नानाविध प्रकारांनीं भासते. त्यामुळें त्या विविधते मध्ये नांव, आकार, गुण आणि रंगहि अनेक प्रकारचे असतात. पण तरीसुद्धा त्याच्या मुळाशी' असलेलें तत्त्व एकरूपच असतें आणि हा सिद्धांत जाणत्या माणसाला ठाऊक असल्याने विविधता त्याच्या वृत्तीला विचलित करूं शकत नाहीं.

"यच्चकिंचित जगत् सर्व दृश्यते श्रुयते ऽपि वा !
अंतर्बाहीश्च तत् सर्व व्याप्य नारायणः स्थितः ! !
हा वैदिक सिद्धांत सर्व संतमहंतांच्या अनुभवास आलेला असतो आणि त्यामुळे प्रकृतिभेदाला अनुसरून असलेला संप्रदायभेद व तदंतर्गत देवताभेद व उपासनाभेद त्यांचे ठिकाणी उपेक्षेची वा द्वेषाची भावना निर्माण करूं शकत नाहीं. अनेक संप्रदायांत त्याला एकच धर्म दिसतो. अनेक नामरूपें असलेल्या मूर्तीच्या आकारात तो एकच देव पाहतो. त्यामुळें सर्वाभूती भगवद्‌भाव हा त्याचा सहजस्वभाव होतो. त्याच्या अंतःकरणांत द्वेष राहत नाहीं. आणि केवळ वेगळेपणामुळे त्याचें कुणाशी भांडण होत नाही माझ्यासारखा वागशील तर मी तुला मानीन असा एकरूपतेचा ( UNIFORMI) चा तो कधीं आग्रह धरीत नाहीं, आणि तरी सर्वत्र एकता भरून राहिली आहे हीच त्याची धारणा असते.

हिंदु संस्कृतीनें याच भावनेचा परिपोष तत्त्वज्ञानांतून आणि आचार-विचारांतूनहि केलेला आहे. जे जिथे जसे आहे तें तिथे तसे वस्तुतः भगवद्‌रूपच आहे हा अनुभव ज्याच्या जीवनांत ओतप्रोत भरलेला असतो आणि त्यामुळें आपले सोडण्याची, दुसऱ्यांचे स्वीकारण्याची वा आहे तें पालटण्याची आवश्यकताच ज्याला उरलेली नाहीं तो परमेश्वराचा भक्त धन्य होय.

वेदान्त शास्त्र सांगते कीं मूलभूत ब्रह्म हे निर्गुण, निराकार, अनिर्वाच्य, मनबुद्धीला अगोचर 'केवल' असें आहे. असें असलें तरी साधकाला उपासनेसाठी कोणत्या तरी गुणाचा अवलंब करावाच लागतो. इतकेंच नव्हे तर कोणत्याहि अवस्थेंत साधना सोडता येत नाहीं. या वद्देह साधना ही करावीच लागते. पूर्ण झाल्यावर साधना सुटते हें कितीहि खरे असले तरी पूर्णतेची जाणीव होणें हें अपूर्णतेचे महत्त्वाचे लक्षण शास्त्रानें सांगितलें आहे; त्यामुळें साधना कधी सोडता येत नाही. ती कदाचित् सुटेलहि पण सुटणं आणि सोडणे यांतील अंतर आकाश-पाताळा इतकें आहे. साधना म्हटलें कीं तिला गुणांचा आश्रय असावाच लागतो. सत्पुरुष साधनेचा कधीं त्याग करीत नाहीं आणि स्वभावतःच मग सगुण-भजनाचा त्याला कधीं कंटाळा येत नाही. परमेश्वर शरणागतवत्सल असल्यामुळें भक्तासाठी तो लीलेने सगुण साकाररूप धारण करतो आणि तें त्याच्या निर्गुण निराकार रूपाइतकेंच श्रेष्ठ असते. पूर्णताप्राप्त ज्ञानीहि आपल्या संतत्वाला जागून लोककल्याणासाठी या सगुण साकार उपासनेचाच आवडीने पुरस्कार करीत असतो. संतांची ती वृत्तीहि आहे आणि कर्तव्यहि आहे. तुकाराम-ज्ञानेशादि इतर संतांप्रमाणेंच समर्थांनींहि या सगुणोपासनेचा निष्ठेने पुरस्कार केलेला आहे. पण असें असले तरी ब्रह्म आपल्या मूळ रूपांत केवळ निर्गुणच आहे याविषयी संताच्या अंतःकरणांत कोणताहि संदेह नसतो आणि म्हणून लोकसंग्रहासाठीं सगुण-भजनाचा अवलंब करीत असतांनाहि त्यांच्या अंतःकरणांत ज्ञानभक्ति ही अंततोगत्वा एकरूपच असते आणि ब्रह्म हें आवांकमानसगोचार असून केवळ सत्तामात्र आहे आणि या ब्रह्माव्यतिरिक्त कांहींहि, कोठेहि, कधींहि अस्तित्वांत नव्हतें, नाहीं व येणारहि नाहीं याविषयी संत पूर्णपणे निःशंक असतात. असा जो महापुरुष आहे तो परमेश्वराचा भक्त धन्य होय.

नसे अंतरीं कामकारी विकारी । उदासीन जो तापसी ब्रह्यच्यारी ॥
निवाला मनीं लेश नाहीं तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥

थोर सत्पुरुष हा अंतःकरणामध्ये कामाने भारलेल्या विकारानी युक्ता नसतो हें सर्वांनीं समजून घेतलें पाहिजे. सत्पुरुषाच्या अंतःकरणांत, जीवनांत किंवा कृतीत कोणत्याहि स्वरूपाचा विकार नसतो असें नाहीं. कारण विकार शब्द आपण समजतो त्या अर्थी संपूर्ण वाईट नाहीं. ती एक निसर्गक्रमानें प्राप्त होणारी अवस्था असते आणि काही वेळा, कांहीं प्रमाणांत ती आवश्यक, इष्ट किंवा उपयुक्त असते. बाल्य, तारुण्य, वार्धक्य हे जीवनाचे विकारच आहेत. साय , तूप, लोणी, दही, ताक यांना शास्त्रीय भाषेत दुग्धविकृति म्हणजे दुधाचे विकार असेंच म्हणतात. दागिने हा सोन्याचा विकारच आहे. तेव्हां विकार म्हटलें कीं तो त्याज्य हें मानणे योग्य नव्हे. विकाराची त्याज्यता, अनिष्टता लक्षांत यावी म्हणून समर्थांनी विकाराला कामकारी असें विशेषण दिले आहे.

एका प्रकारचे विकार जसें इष्ट, उपयुक्त अपरिहार्य असतात तसे दुसऱ्या प्रकारचे नसतात. दूध नासणें आणि दुधाचे दही होणे यांची प्रक्रिया सारखीच असते. त्यामुळें ते दोन्हीहि दुधाचे विकारच होत; पण नासले दूध हें त्याज्य आहे. दही आवडीने खाल्लें जातें. तसेंच माणसाच्या अंतःकरणांतील विकारांचे आहे. स्वरूप, प्रमाण आणि देशकालपरिस्थिति याप्रमाणें हे विकार इष्ट वा अनिष्ट असूं शकतात. आपण ढोबळ दृष्टीनें वरवर विचार करतो तेव्हां दोन्हीं सारखेच दिसते. पण तें खरे नव्हे. अश्वत्था म्याच्या अध मपणामुळें मृत झालेल्या उत्तरेच्या मुलाला जिवंत करतांना मी असत्य बोललो नसेन, अधर्माने वागलो नसेन, रणांगणातून पळालो नसेन, तर हा बालक जिवंत होवो इत्यादि इत्यादि प्रतिज्ञा भगवान् श्रीकृष्णांनी केल्या होत्या, आणि ते बालक जिवंत झालें असें वर्णन महाभारतांत आहे. आता वरवरच्या अर्थाने नैतिक वर्तनाच्या या कसोट्या श्रीकृष्णाच्या चरित्राला लावण्याची सोय आहे कां ? द्रोणवधाच्या प्रसंगीं त्याने सांगितलेली युक्ति, जरासंधाच्या आक्रमणाच्या वेळीं शेवटच्या वेळेला मथुरेहून केलेलें पलायन, सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचा केलेला स्वीकार इत्यादि सर्व वरवर विचार करता त्याच्या प्रतिज्ञेशी विसंगत आहे असे दिसते. श्रीकृष्णाच्या बाललीलांत तर 'मी माती खाल्ली नाहीं. ' असे त्याच्या खोटे बोलण्याचे प्रकार सूरदासादि संतानी गायिले आहेत. यावरून हें लक्षात येईल कीं श्रीकृष्णाचा अवतार हा धर्मरक्षणासाठी असल्याने त्याची प्रत्येक कृति शुद्ध निःस्वार्थ भावने लोकसंग्रह साठी लोककल्याणासाठी केलेली होती. आणि त्यामुळें ती श्रेष्ठ, पवित्र, आदरणीय अशीच होती आणि ती तशीच मानली पाहिजे.

व्यासवसिष्ठादि प्रज्ञावंत महर्षीना, ज्ञानेश्वरादि संतांना, छत्रपती शिवाजी, लोकमान्य इत्यादि राष्ट्रपुरुषांना जन्म देणारा काय हा इष्टच असतो. "नाठाळाचे माथी काठी मारणाऱ्या ' तुकारामांसारख्या भगवद् भक्तांच्या अंतःकरणांतील क्रोध वंदनीय असतो, आवश्यक असतो. आई प्रेमभरानें बालकाचे चुंबन घेते त्यापेक्षा हित व्हावें म्हणून, मुलाला चांगलें वळण लावण्यासाठीं, संतापून थोबाडींत देते तेव्हां तिचें वात्सल्य अधिक उत्कटतेने अनुभवास येतें, असेंच जाणत्यांना वाटतें.

केवळ विकारी आणि कामकारी विकारी यांतील अंतर आतां लक्षांत येईल. श्रीगोंदवलेकर महाराज संपत्तीच्या वाटणीच्या निमित्तानें भाऊबंदांशी भांडत असत, अपशब्द उच्चारीत, असें वर्णन त्यांच्या चरित्रांत आहे. कारण व्यवहारांत तें आवश्यक होतें. महाराजांचें मोठेपण असे कीं असलें भांडण त्यांच्या डोक्यावर बसले नाहीं, डोक्यांत चढले नाही'. असे कामकारी नसलेले विकार कोठे दिसले तर ते त्याज्य मानण्याचे कारण नाहीं. कच्ची कैरी पिकून आंबा होतो हाहि विकारच, आणि पिकलेला आंबा सडतो हाहि विकारच; दोन्ही सारखेच त्याज्य नसतात. साय, दही, लोणी, तूप यांना दुधाचे विकार (दुग्धविकृति) असेच म्हणतात. त्यांचा उपयोग चांगलाच असतो. विकार जेव्हां पूर्णपणे नियंत्रित असतो, व्यक्तीच्या स्वाधीन असतो, धर्माच्या मर्यादा पाळून असतो, हेतुतः शुद्ध असतो, खऱ्या अर्थाने संरक्षण, प्रगति, विकास यांना पोषक असतो तेव्हां तो इष्ट असतो, आवश्यक असतो. थोर भगवद्‌भक्ताचे विकार असलेच तर असे असतात. ते कामकारी कधींच नसतात. ते 'कामु करवी ते करिती । ' असे कधीच नसतात. म्हणून ते धन्य होत. ही सर्व त्याच्या अंतःकरणाची प्रवृत्ति आहे. ती बाहेरून ओळखता येईलच असें नाहीं. सत्पुरुष बाहेरून कसा दिसेल तें सांगता येणार नाहीं. कावीळ झालेल्या माणसाला जसें सगळेच पिवळे दिसते त्याप्रमाणें धनेषणेत, दारेषणेंत गुंतलेल्या सामान्य माणसांना निरिच्छ, निरपेक्ष संतहि विषयासक्त किंवा प्रसिद्धिलोलुप आहेत असें वाटतें. अंतरंग शोधण्याची पात्रता सर्वांनाच नसते आणि संतत्व ओळखणे हा तर अंतरंगाचा विषय आहे. रत्नांचा परीक्षक विरळा तसे संत ओळखणाराहि विरळाच. समर्थानी अंतरीं शब्दाचा उपयोग केला आहे तो या दृष्टीनेच.

बाहेरून संत कदाचित् विकारीहि दिसेल पण अतरी-आतून-तो कामकारी नसेल. कारण तो दुसर्‍या श्लोकाच्या दुसऱ्याच ओळींत सांगितल्याप्रमाणें-वस्तुतः उदासीन, तापसी आणि ब्रह्मचारी असा असतो. उदासीन म्हणजे अलिप्त, तटस्थ, निर्मम, औत्सुक्य नसलेला. उदासीन म्हणजे माणूसघाणा नव्हे, तुसडा नव्हे, गर्विष्ठ तर नव्हेच नव्हे. उदासीन म्हणजे रड्या नव्हे. ज्याची स्थिति सर्वप्रकारच्या त्याज्य विकारांपासून, कामक्रोधादि षड विकारापासून, मायाममतेपासून वेगळी असते, वरची असते, विकार खाली असतात, जो त्यांपासून वर असतो, तो उदासीन. विकार त्याच्यापर्यंत पोचू शकत नाहींत आणि म्हणून ते त्याला त्याच्या स्थानापासून भ्रष्ट हि करूं शकत नाहींत.

तापसी म्हणजे तपस्वी, तप करणारा, तितिक्षा असणारा, कष्टाला न कंटाळणारा, सोशिक. परमार्थातील हा एक फार महत्त्वाचा सगुण आहे. सामान्य माणसाला कांहीं सोसत नाहीं, कोणाचें बोलणें सोसत नाही, कोणाचें वागणे सोसत नाहीं. उन्हाळ्यांत ऊन, पावसाळ्यांत पाऊस, थंडीत थंडी हें सर्व बाधते. त्यांतील कांहीं सोसत नाहीं. शारीरिक, मानसिक पातळीवर संयमाची सवय नसते, आणि त्यामुळे जे जें काही घडते तें पीडाकर ठरतें. क्षोभ निर्माण करणारे ठरते तापसी हें सर्व सहन करतो. क्रियेशी प्रतिक्रिया असें त्याच्या ठिकाणी घडत नाही. कारण त्याच्या ठिकाणी तितिक्षा असते, क्षमाशीलता असते, सोशिकपणा असतो. आणि हें सर्व घडते तें उदासीनतेतून घडते. तापसी अगतिक नसतो, दुर्बल नसतो. कित्येकवेळां माणसे प्रतिकूल परिस्थितींत गप्प बसलेली दिसतात, पण आतून वेदनेने तळमळत असतात. रागाने त्यांचा जळफळाट झालेला असतो. हें खरें तप नव्हे. तितिक्षा असावी लागते. तें खरें तप. " आली ऊर्मि साहे, तुका म्हणे थोडे आहे" असें म्हणून तुकोबारायानी' साधकाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलें आहे.

संत हा उदासीन असतो. म्हणून तापसी असतो आणि म्हणूनच ब्रह्मचारीहि राहूं शकतो, राहतो. उदासीनता ही संताची सहजप्रवृत्ति आहे, तापसी ही परिस्थितिवशात अनुभवास येणारी अवस्था आहे, आणि ब्रह्मचारी हा या दोहोंचा आचरणामध्येहि दिसून येणारा स्वाभाविक परिणाम आहे. ब्रह्मचारी शब्दाचा मूळ अर्थ 'ब्रह्मणि चरति,"ब्रह्मणे चरति,' ब्रह्मांत राहणारा, ब्रह्माकरितां जगणारा, ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असा आहे. यासाठी त्याला बहिर्मुखता सोडून अंतर्मुख व्हावे लागतें, विषयासक्ति सोडून ध्यानमग्न व्हावें लागतें. आणि मग त्याचा परिणाम लौकिकार्या र्थानेहि ब्रह्मचर्यपालनात होतो. मनांत उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रकारच्या वृत्तींवर आणि मग इंद्रियांवरहि संताचे पूर्ण स्वामित्व असते.

इंद्रिये त्यांच्या स्वाधीन असतात म्हणून त्यांना वसी म्हणतात. इंद्रियें त्यांची सेवक होतात म्हणून त्यांना गोस्वामी म्हणतात. ऋषीकेश शब्दाचा अर्थहि तोच आहे- " वशे हि यास्येंद्रियांनी " कारण हृशिक शब्दाचा अर्थ इंद्रिय असा आहे. आपण हें विशेषण परमेश्वरासाठी वापरतो. देवभक्त एकरूप होत असल्यानें भक्तहि देवाप्रमाणे इंद्रियांचे स्वामी असतात. ब्रह्मचारी शब्दांतील अर्थाची व्यापकता मोठी आहे. स्थूल शारीरिक क्रियेपुरता त्याचा अर्थ मर्यादित करणें हें चुकीचे आहे. तेवढाच अर्थ करून वागण्यामधे शारीरिक, मानसिक विकृतीहि निर्माण होते आणि मग तथाकथित बुद्धिवादी, ब्रह्मचर्य हें दोषास्पद ठरविण्याचा प्रयत्न करतात. ब्रह्मचारी शब्दाचा खरा अर्थ आणि त्यामागील व्यापकता लक्षांत यावी म्हणून समर्थ उदासीन, तापसी आणि ब्रह्मचारी हे शब्द एकाच संदर्भांत, संतत्वाच्या संदर्भांत, एकत्र वापरतात. हे तिन्ही भाव परस्परपूरक आणि एकमेकांना आधारभूत असे आहेत, ते तसे असतील तरच सुख, समाधान, प्रसन्नता देणारे होतात. संताच्या ठिकाणीं हे तिन्ही भाव जणू एकरूपतेने असतात आणि म्हणून ते धन्य होत.

संताच्या ठिकाणी कामकारी विकार नसतात, ते उदासीन असतात, तापसी असतात, ब्रह्मचारीहि असतात आणि याचा परिणाम म्हणून ते मनामध्ये निवले असतात. शांत असतात. त्यांचें अंतःकरण प्रसन्न असतें. आनंदी असतें. आपण आपल्या सोयीसाठी ईश्वराच्या भक्तांवर संकटे येतच नाहीत असें समजतो. कांहीं संतवचनांमुळे ईश्वर भक्तांना सर्व संकटांतून तारून नेतो अशी आपली समजूत झालेली असते. मर्यादित अर्थाने तसें घडतेंहि. पण तें आपण समजतो तितके व तसें खरें नसते. सर्व थोर संत-महंतांच्या, ईश्वराशी जवळिक साधली आहे अशा महात्म्यांच्या, महापुरुष म्हणून जे विख्यात आहेत अशा थोर व्यक्तींच्या, जीवनाचाच जर आपण विचार केला तर अनेक प्रकारची संकटे , आपत्ती, त्यांच्यावर कोसळली होती असेंच आढळून येते. स्वतः भगवान रामचंद्र, धर्मराज युधिष्ठिर, ज्ञानेश्वर, तुकोबाराय, भगवद्‌भक्त मीरा, संतसखू , रामकृष्ण परमहंस, रमणमहर्षि या सर्व थोरांच्या जीवनामधे कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकटे उग्र स्वरूपात आलेली होतीं असें दिसते. ज्या संकटांच्या आघातांनी सामान्य माणूस खचून गेला असता, पार मातीला मिळाला असता अशी संकटे या महात्म्यानी भोगली व्यावहारिक अर्थाने आपण ज्याला हाल, अपेष्टा, दुःख, ताप, व्याधि मानतो त्यांतून हे कोणी सुटलेले नव्हते. संतांची थोरवी-संकटे न येण्यांत नाहीं; आपत्तींतहि प्रसन्नचित्त राहण्यांत आहे.आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणांतून रजोगुण आणि तमोगुण यांचें प्राबल्य पार नाहीसे झालेलें असते. ही थोर मंडळी नित्यसत्त्वस्थ असतात आणि म्हणून त्यांचे समाधान कधी ढळत नाहीं, प्रसन्नता कधीं मळत नाहीं.

काम, क्रोध ही रजोगुणाची अपत्ये खरी पण तीं तमानें जणू दत्तक घेतली आहेत. तमोगुणांचे काय , क्रोध या आपल्या पुतण्यांच्यावर प्रेम फार. आणि म्हणून त्यानें आपली मोहप्रमादादि संपत्ति त्यांना देऊन टाकली आहे, असें वर्णन श्रीज्ञानेश्वरमहाराजानीहि केलें आहे. तेव्हां तमोगुण नाहींसा झाला कीं कामक्रोधांचें स्वरूपहि कामकारी राहत नाहीं. ते विकार त्याज्य या अवस्थेंत नष्ट होतात आणि त्याचा परिणाम म्हणूनच उदासीनतादि लक्षणे प्रगट होतात. अंतःकरण शांत, प्रसन्न, समाधानी राहते. सत्पुरुषाला ही स्थिति प्राप्त झालेली असते म्हणूनच त्याला सत्पुरुष म्हणावयाचे. असा हा ईश्वरभक्त धन्य होय.

मदे मत्सरे सांडिला स्वार्थबुद्धि । प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ॥
सदा बोलणें नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

लेश नाहीं तमाचा या संदर्भांत समर्थ त्या धन्य महात्म्या चें वर्णन करीत आहेत. वर्णनाची शैली मोठी गंमतीदार आहे. मदमत्सर, स्वार्थ यांनीच त्याला सोडले आहे. एखादा प्रसाधनवस्तूचा प्रचारक वयोवृद्ध पतिव्रतेकडे यावा , आपल्या वस्तू तिथे खपविण्याचा त्यानें खूप प्रयत्न करावा पण त्याच्या लाघवी, आर्जवी, कुशल शब्दांचाहि कांही प्रभाव पडूं नये आणि मग त्यानें निराश होऊन निघून जावे तसें संतांपुढें या मदमत्सरस्वार्थाचे होतें. मद स्वाभिमानाचें रूप घेऊन येतो आणि म्हणतो स्वत्वरक्षणासाठी माझा स्वीकार केलाच पाहिजे. मत्सर महत्त्वाकांक्षेचा वेष परिधान करतो आणि सांगतो इतरांसारखे सामान्य, उपेक्षित, दीन, जीवन जगण्यांत काय अर्थ आहे. स्वार्थबुद्धि म्हणते जगावयाचे आहे ना ! कुटुंबसंरक्षण हें कर्तव्य टाळून चालते काय ? समाजात राहावेंच लागतें ना ? मग प्रपंचाला आवश्यक ते घेतलेंच पाहिजे, त्याचा संग्रह केलाच पाहिजे. पण हें सारे केवळ समर्थन आहे. यापेक्षा संताचे वैशिष्ट असते. संतांना प्रपंच असूं शकतो, प्रकृतिभेद, प्रारब्ध भेद, कार्यभेद, यामुळे हा प्रपंचहि निरनिराळ्या स्वरूपाचा असतो. कधी तेथे दारिद्र्य दिसेल तर कधी ऐश्वर्य दिसेल. पण त्याची उपाधि त्यांना जडलेली नसेल. त्यांनी लोककल्याणासाठी, लोकसंग्रहासाठी जडवून घेतली असली तरी ती परमार्थातील उपाधि. त्या स्थितीस उपाधि म्हणणें हें केवळ वरवरच्या अर्थानेच असते; खरें नसते.

सामान्य माणसे प्रापंचिक उपाधि वाढवितात. त्यांना ती गोष्ट आवश्यक वाटते आणि हे कशाला म्हणून परमार्थाकरितां कराव्या लागणाऱ्या गोष्टीचा कंटाळा करतात. तेथें त्यांना साधेपणाचे महत्त्व पटत असते प्रपंचांतल्या उपाधि ह्या माणसाला दिवसेंदिवस मोहमग्रस्त करून घोटाळ्यांत पाडतात. आणि मग सुखदुःखाच्या भोवऱ्यात गिरक्या घेत तो अधिकाधिक खोलांत जात राहातो. परमार्थातील उपाधि ह्या साधकदशेत प्रगतीसाठी आरंभी स्वीकाराव्या लागल्या तरी पुढें पुढें त्यांची आवश्यकता कमी होऊन त्या सुटून जातात. पोहावयास शिकणाऱ्या माणसाने, भोपळा बांधून घेण्यासारखे हें आहे. ' भोपळा तरी बांधताच ना ! मग आमचें गाठोडे असूं द्या' हे म्हणण्यांत कांही अर्थ नसतो. प्रपंचांतल्या उपाधि या गाठोड्यासारख्याच आहेत. तरून जाण्याच्या दृष्टीनें तो अडथळा आहे. अलीकडे घरांत देव्हारा नसतो पण ड्रेसिंग टेबल मात्र अपरिहार्य झालेलें आहे. संध्या करतो म्हटले तर झारी, ताम्हन वा पळी-पंचपात्री मिळत नाहीं. पण लेमनसेट आणि टी सेंट यांनी कांचेच्या कपाटांना शोभा आणलेली असते. ध्यान धारणा तर जाऊं द्या पण संध्येलाहि वेळ नसतो. पण कपड्यांना इस्त्री, बुटांना पॉलिश, नेकटायची गांठ चांगली मारण्यासाठी प्रयत्न करणें यांत कितीतरी वेळ जातो. तो कारणी लागल्यासारखा वाटतो. सोवळ्यांत चालणारे रेशमी वस्त्र घरांत मिळणार नाही. पण कपड्याच्या ढिगानी कपाटे ओसंडलेली असतील. संत जेवत नाहीं, उघडा हिंडतो, झाडाखाली राहतो असें नसतें. पण प्रपंचाच्या उपाधीत तो गुरफटलेला राहत नाहीं. साधनें म्हणून कांहीं गोष्टी त्याच्याहि संसारांत असतील. लौकिकांत वावरावयाचें तर असा संग्रह करावाहि लागतो. परंतु आवश्यक उपयुक्तता निराळी आणि ऐश्वर्याची हौस निराळी. पहिली गोष्ट साधन आहे. दुसरीला उपाधि म्हटलें पाहिजे. संताजवळ ती नसते, म्हणून सामान्यापेक्षां तो वेगळा उमटून दिसतो. आणि साहजिकच धन्यतेस पात्र होतो. संतांच्या अंतःकरणामधे मदमत्सराला वाव नसल्याने त्यांचें बोलणें हें चांगलें असतें, चांगल्या संबंधी असते, चांगल्याकरितां असते. आणि जे सांगावयाचें तें ते सर्व वेळीं नम्र तेनें, हळुवारपणे, सौजन्याने, मधुर शब्दांत सांगतात असें समर्थ म्हणतात.

सत्पुरुषाचे बोलणें कसें असते याचें उत्कृष्ट वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलें आहे. "मग प्रार्थिला विपाये । जरि लोभे बोलो जाये । तरि परिसे तया होये । मायबापु ॥ कां नादब्रह्मचि मुसे आले । कीं गंगापय असळले । की पतिव्रते आलें । वार्धक्य जैसे ॥ तैसे साच आणि मवाळ । मितळे परि सरळ । बोल जैसे कल्लोळ । अमृताचे ॥ विरोधु वादबळु । प्रणितापढाळु । उपहासु छलु । वर्म स्पर्शू ॥ आटू वेगु विंदाणू आशा शंका प्रतारणू । हे संन्यसिले अवगुणू । जिया याचा ॥ (ज्ञा. १३ ! २६ ७- ७१) आधीं सत्पुरुषाला बोलण्याची फारशी हौस नसते पण जिज्ञासु साधकाने विनवणी केल्यावर त्याच्यावरील प्रेमाने बोलावयास लागेल आणि ते बोलणे स्नेहाने, कृपावात्सल्यानें असे ओथंबलेले असेल कीं आपल्याला जणू मायबाप भेटले असेंच ऐकणाराला वाटेल. त्याचे शब्द नादब्राह्म साकार झाल्याप्रमाणे मंजुळ असतील. त्यांना खळखळून वाहणाऱ्या गंगेचे पावित्र्य असेल. त्यांतील निरपेक्षता वृद्ध झालेल्या पतिव्रतेलाहि मागें सारण्याइतकी उत्कट असेल. तें सत्याला धरून असलें तरी कठोर नसेल. बोलणें सरळ असेल त्यांत फापटपसारा नसेल आणि शब्दांचे माधुर्य जणू अमृतावर तरंग उठावेत असें लोभनीय वाटेल. संतांच्या बोलण्यामध्यें उपरोध, भांडण तंट्यास उत्तेजन, टिंगल, तिरस्कार, मर्मभेदकपणा, हट्ट, कपट, आवेश, वंचकता, भ्रमोत्पाद्कता , पापाकडे प्रवृत्त करील अशी मादकता इत्यादि दुर्गुणांचा लवलेशहि नसेल. समर्थ सुवाचा आणि नम्रवाचा असें म्हणतात तें यासाठीच. पण हें बोलणें हे मायबापाचे बोलणें आहे हे लक्षांत ठेवले पाहिजे. कारण यांतील कोमलता, नादमाधुर्य हे गुण केवळ बाह्यार्थाने विचारांत घेतले तर मग श्रीतुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी हेच त्याला पुष्कळ प्रसंगीं अपवाद ठरायचे आणि मते मिळविण्यासाठी पुढारी ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळीं आपल्या मतदार संघाशी जसें वागतो, बोलतो तोच नग्नतेचा आदर्श ठरावयाचा. खरें म्हणजे अहंकारी उर्मटतेने सोयीसाठी नग्नतेचा हा मुखवटा त्या पुढाऱ्यांनी धारण केलेला असतो. ज्ञानेश्वरींत मार्दव आहे. गाथ्यांत सापडणार नाही, पण त्याची आवश्यकताहि नाही. आई संतापते, अत्यंत तापून 'मर मेल्या'हि म्हणते पण तिच्या तोंडातील 'मर मेल्या हाच 'चिरंजीव भव' साठी अत्युत्कृष्ट आशीर्वाद असतो आणि म्हणून संतांच्या नग्न वाचेचा अर्थहि मातेच्या वात्सल्याच्या मापाने लक्षांत ठेवला पाहिजे. वाणीचे हे गुण ज्या महापुरुषाच्या ठिकाणी असतात तो परमेश्वराचा भक्त धन्य होय.

क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे । न लिंपे कदा दंभ वादे वेवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥

परमेश्वराचा खरा भक्त कोण, धन्यता कोणती या अर्थाचे जे प्रकरण चालू आहे त्याचा मूळ उद्देश, संतांची लक्षणें सांगून त्यांची स्तुति करणें हा नाहीं, तर मनुष्य म्हणून जगावयास योग्य होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते ते या वर्णनाच्या निमित्तानें सांगितलें जात आहे. आपण नेहमी ज्याला धन्य म्हणतो ते निराळे आणि खरी धन्यता असते अशी अवस्था निराळी. श्रीमत्(शकराचार्यांनीसुद्धा धन्य कोण त्याचें वर्णन केलेलें आहे. ते असें
शांनते रनन्यमतिभिर्मपुरस्वभावै !
रेकत्वनिश्चितमनोभिरपेतमोहैः । !
साकं वनेषू विदितात्मपदस्वरूपं !
तद्‌वस्तु सम्यगनिशं विमृशांति सचि धन्या ! !
शान्त, परमेश्वराच्या ठिकाणी ज्यांची बुद्धि अनन्य झाली आहे, ज्यांच्या स्वभावांत गोडवा आहे, हें सर्व एकरूपच आहे, अद्वैतच आहे असा ज्यांच्या मनाचा निश्चय झालेला आहे, ज्यांना कशाचा मोह म्हणून उरलेला नाही, अशा सत्पुरुषाच्या संगतीत अरण्यातील एकांतांत राहून आत्म्याविषयी वा सद्‌वस्तूच्या स्वरूपाविषयी वा ते आत्मस्वरूप अनुभवास कसें येईल याविषयीं जे परस्पर संवाद करतात ते धन्य होत. मनोबोधांतील या प्रकरणींच्या अनेक श्लोकांत त्याचा स्पर्श दिसेल. या ५२ व्या श्लोकांत विशेष रीतीने हा प्रत्यय येतो.

सत्पुरुष मिळालेला मोकळा वेळ कसा घालवितो ते समर्थ सांगत आहेत. सद्‌भक्त आपला वेळ तत्वाचे चितन करण्यांत व त्याचा अनुवाद करण्यांत घालवितो. मिळालेला मोकळा वेळ माणसाने परमार्थ, अध्यात्म, तत्त्वज्ञान, सद्‌भक्ति, सद्धर्म, मोक्षसाधना यांच्या विचारांत घालवावा आणि त्यासाठीं उपनिषदे, रामायण, महाभारत, सताची चरित्रे, दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी यांच्या पठणांत किवा मननांत आणि तत संबंधीच्या चिंतनांत मग्न असावे. आणि आपल्याला काय समजलें तें पुन्हा एकदां बोलावे, सांगावे, मांडावे. हा त्या केलेला तत्त्वचिंतनाचा अनुवाद. या दोन्हीं गोष्टीं माणसाने करणें आवश्यक आहे. नुसते श्रवण वा वाचन कधीं उपयोगी पडत नाहीं, श्रवण-पठणाच्या मागोमाग चिंतन, मनन, निदिध्यासन आणि आचरण या गोष्टी क्रमाक्रमाने यथाशक्ती , यथामती , यथापरिस्थिति चढत्या वाढत्या क्रमानें प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. तत्त्वज्ञान हा परीक्षेसाठी अभ्यासावयाचा विषय नसून तें आचरणांत उतरवावे लागतें. तो जीवनाचा सहज भाग झाला पाहिजे. आपल्याला समजते तें नेमके सत्य किती ? मूळ सत्यापासून आपण किती जवळ वा दूर आहोंत ? जें सत्य म्हणून आपल्याला पटले, मानवले तें आचरणात कसें उतरवावे ? त्यासाठीं कोणत्या मार्गानें चालावे, साधनें काय ? प्रगति कशी होत जाते ? अडचणी कोणत्या येतात ? त्यांतून पार कसें पडावे ? हे सर्व चिंतन-मननांतून आणि काय समजलें तें निश्चित होण्यासाठीं केलेल्या अनुवादांतून स्पष्ट होत जात असतें. प्राचीन काळच्या अभ्यासापद्धतीत चिंतनिका म्हणून एक भाग असे. अनुवाद म्हणताना समर्थांना तोच अभिप्रेत असावा.

अनुवाद शब्दानेंहि नुसती पुनरावृत्ति अभिप्रेत नसून, तत्त्व आचरणात आणणें असाहि अर्थ तत्त्वानुवाद या शब्दांचा करणें शक्य आहे. कारण बहुतेक सर्व शब्द गतिवाचक आहेत असे आपले शास्त्र सांगते, बारीक सारीक गोष्टीचा साधक बाधक विचार करावा लागतो, तो त्या गोष्टी आचरणांत आणण्यासाठींच. श्रवणाच्या मागोमाग चिंतन, मनन, निदिध्यासन असावें लागतें तें यादृष्टीनेंच महत्त्वाचें आहे. या श्लोकाच्या पहिल्या ओळींत वेळ कसा घालवावा तें सांगून झाल्यानंतर समर्थ वेळ कसा घालवू नये तें दुसऱ्या ओळीत सांगत आहेत. सज्जनाचे अंतःकरण दंभाने व विवादाने कधीहि लिप्त होत नाहीं असें समर्थ सांगतात. वादविवाद हा बहुधा स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी केला जातो. दुसऱ्याचे म्हणणें खरें असलें तरी येन केन प्रकारेण ते अमान्य करावयाचें. त्यासाठीं वितंडेचाहि आश्रय करावयाचा. आपलें योग्य कसें तें सांगावयाचेंच नाही . तुझें कसें चुकले तेंच आग्रहाने मांडावयाचें. बोलण्यामागची ही भूमिका वेळेचा अपव्यय करणारी आहे. वादविवाद हा तत्त्वजिज्ञासेच्या भावनेने केला जावा. त्यांत प्रामाणिकपणा असावा. दंभ वा दुराग्रह नसावा. बोलण्याचे स्वरूप आणखी एका प्रकाराने कसें असते ते समर्थ तिसऱ्या चरणांत सांगत आहेत, उगमासंबंधी-मूलतत्त्व काय आहे. सुष्टीचा आरंभ कसा झाला ? जीव, जगत्, जगदीश्वर यांचा परस्पर संबंध काय ? कोणत्याहि प्रतिपादनाच्या मुळाशी सत्य काय आहे ? याचा विचार तो करतो आणि हें समजून घेण्यासाठी जाणत्यांच्यासवे मनमोकळेपणाने चर्चाहि करीत असतो हाच सुखसंवाद.

'काय आहे' तें समजून घेण्याच्या पाठीमागे मुळाशी जाऊन पाहण्याची प्रवृत्ति जर नसेल तर जें लिहिले गेलें, मांडले तेंच खरें मागून तसेंच आपलेही मत बनण्याचा दुर्धर प्रसंग ओढवतो. आजकालच्या बऱ्याच लेखकाच्या महाभारतविषयक लेखनामुळे सामान्याचेंच काय पण न्यायाधीशाच्या पदावरून काय करणाऱ्या सुशिक्षितांचेहि अपसमज कसें झाले असतात तें मी अनुभविलें आहे. यासाठी मुळाशी जाऊन पाहण्याची प्रवृत्ति जिज्ञासूमध्ये असली पाहिजे.

जिव्हाळ्याची मंडळी भेटली की त्यांच्याशी चर्चा करणें हे घडतेच पण त्याचें स्वरूप वर्तमानपत्री नसावे समोरच्याची स्तुति आणि अनुपस्थिताची निंदा हें गप्पागोष्टीतून होऊं नये. माणसाने बोलावे पण त्याचा संबंध पुरुषार्थाशी असावा. मग त्यांत अर्थ-कामांची, शास्त्रीय चर्चा आली तरी चालेल. वात्सायनासारख्या ऋषीनी कामशास्त्र लिहिले आहे आणि तो अभ्यासाचा विषय आहे. या शास्त्राच्या अभ्यासाने जितेंद्रिय प्राप्त होतें असें वात्सायन ऋषि म्हणतात. कोणत्यहीविषयाचे विवेचन जेव्हा शास्त्रपातळीवर होते तेव्हां ते मूलगामी ठरतें. प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून उपयोगी पडते माणसाने असा सुखसंवाद करावा. आपण आपला वेळ कोणत्या तऱ्हेच्या गप्पागोष्टींत घालवितो याचा विचार माणसानी, समर्थांनी सांगितलेल्या या सत्पुरुष लक्षणांच्या माध्यमांतून केला पाहिजे .

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा जिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥

आपण मराठी भाषेत सामान्यतः आर्जवी शब्दाचा अर्थ गोड बोलणारा, नम्रपणे बोलणारा, असा करतो. मुळांत आर्जव हा शब्द ऋजू म्हणजे सरळ या शब्दावरून आला आहे. तेव्हां आर्जव म्हणजे सरळपणा. त्याच्यावरून आर्जवी हा मराठी शब्द बनला. आर्जवी बोलणें हे लाळघोटेपणाचें बोलणें नव्हे. सभेतील मानपत्राच्या वेळचे, वाढदिवसाच्या वेळचे, वा सत्कारसमारंभाच्या वेळचे हें बोलणें नव्हे. तीं बोलणी तोंडदेखली, तोंडपूजेपणाची, दांभिक अशीं असतात. ज्याला माघारी शिव्या दिल्या जातात त्याच्याच ओव्या व्यासपीठावर गायिल्या जातात. सरळ बोलणें हें सौजन्याचे व शिष्टाचाराचे असूं शकते. परंतु ती दीनता, खोटी नग्नता, लाचारी म्हणजे आर्जव नव्हे. पुढच्या दोन ओळीतील आशय लक्षांत घेतला म्हणजे समर्थांना आर्जव शब्दाने काय अभिप्रेत आहे तें कळतें. उलट दिशेने पाहतां आर्जव म्हणजे सरळपणा पण सरळपणा म्हणजे फटकळपणा वा तुसडेपणाहि नव्हे. वाईटाला वाईट म्हणतांना अपशब्द वापरलेच पाहिजेत असें नाहीं. स्पष्ट सरळ बोलणें हे शिष्टाचार संभाळूनहि करतां येते आणि तेंच समर्थांना अभिप्रेत असल्याने आपल्या आर्जवी बोलण्याने लोकांमध्यें तो प्रिय असतो असे रामदास म्हणतात.

सत्पुरुषाविषयीची समर्थाची ही अपेक्षा कितपत फलदूप झाली असेल वा होईल हें सांगणें कठीण आहे. 'अप्रियस्थ च पथ्यस्थ वक्ता श्रोता च दुर्लभः' अशीच स्थिति सामान्यतः समाजांत पाहावयास मिळते. कारण जें जें पथ्याचे आहे तें तें बहुधा अप्रियच असते. औषध आणि चवीला गोड ही स्थिति अपवादात्मकच. अलीकडे गोळ्यांना वरून साखरी पाक चढवतात पण बोलण्याच्या बाबतीत तसें करूं असें म्हटलें तर दांभिकता वा वंचकता यांचा अवलंब करावा लागतो. निजकल्याणाची इच्छा असेल तर माणसानेच जें हिताचे आहे, पथ्याचे आहे, तें गोड मानून घेण्यास शिकले पाहिजे. आपत्ति येऊन कोसळल्यावर मग माणसे पथ्य स्वीकारतात. कडू गोळ्याहि मग निरुपायानें गिळतात. पण तें खरें श्रेयस्कर नव्हे. रोग होऊंच नये म्हणून आहार विहार नियंत्रित करणें चांगलें, पण त्यासाठीं आवडी निवडी नेमस्त कराव्या लागतात. आणि तेंच माणसाला भावत नाहीं व त्यामुळेंच सरळ स्पष्टवक्ता माणूस लोकप्रिय होण्याची शक्यता फार थोडी. म्हणून सत्पुरुषाच्या संदर्भांत सरळपणा हेंच गमक मानलें पाहिजे, लोकप्रियता हें गमक मानणे योग्य नाहीं.

जी माणसे स्वभावतः सज्जन असतील, ज्यांचा अहंकार उग्र नसेल, ज्यांच्या आचार-विचारांना विवेकाचे अधिष्ठान असेल आणि निदान ध्येयवाद म्हणून तरी ज्यांना हिताची नीट कल्पना आलेली असेल, तीच संभावित माणसे स्पष्ट सरळ भाषणावर प्रेम करूं शकतील. अशी माणसे जेव्हां समाजांत बहुसंख्येने असतील तेव्हांच संताचे मार्गदर्शन प्रत्यक्ष परिणामाच्या दृष्टीने यशस्वी होऊं शकते.

केवळ अनुयायांची दाटी हेंच सतत्चाचे गमक मानलें तर अनाचाराला स्पष्टपणें उत्तेजन देणारी आणि मुक्ततेच्या भूमिकेवर स्वैर स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी व्यक्ति, भगवान् म्हणून मिरवते, तीच आदर्श म्हणावी लागेल. पण त्याकरितांच मग स्वतंत्र मनोबोध लिहिला पाहिजे, व तेहि काय अनेक पुस्तकांच्या रूपानें चालू झाले आहेच. आपल्या भारतीय परंपरेचा आणि अर्थातच तुकाराम- रामदासादि संत सत्पुरुषाचा स्वैराचाराला पूर्ण विरोध आहे. त्यांनीं संयमाचे आणि सदाचरणाचेच तत्त्वज्ञान प्रतिपादिलें आहे आणि वस्तुतः तेंच समाजाच्या हिताचे आहे. हें न कळणे आणि आकर्षक व्यक्तिमत्वाला व रसाळ वस्तूत्वाला मोहून, प्रांत तत्वज्ञानाला बळी पडून, वहावत जाणें हेंच माणसाचे दुर्दैव आहे. संतांच्या जीवनांतील सरळपणा महत्त्वाचा, लोकप्रियता महत्त्वाची नाहीं असें म्हणतो तें यासाठींच.

माणसाला सरळ आणि स्पष्टपणाचेच आकर्षण वाटलें पाहिजे. विचारी माणसाला ते आवडतेंहि आणि म्हणूनच तुकोबारायांचे अभंग आदरानें, प्रेमाने वाचले जातात, गायिले जातात. सत्पुरुष हा सरळ वृतीचा असल्यानें सदा सर्वदा सत्यवादी असणें हा त्याचा स्वभावच आहे. त्यांतून विवेक हाहि त्याचा महत्त्वाचा सगुण आहे आणि त्यामुळे त्याची बुद्धि समतोल राहते. ती भरकटतहि नाही आणि भडकतहि नाहीं. त्याचें बोलणें या विवेकाच्या चाळणींतून चाळून घेतले असल्यानें तें "सक्तुमीव तितउना पुनंतो यत्र धीरा मनसा वाच्मक्रता । अत्रा सखायः सख्यानि जानते यद्रैषा लक्ष्मींनिहि ताधि वाचि । ' या वेदवचनाला धरून असतें आणि त्यामुळें वरवर दिसावयास तें कसेंहि वाटलें तरी शेवटीं मैत्रीच्या आणि हिताच्या कसोटीला उतरणारेच असते. याचें कारण तें कधींहि असत्य नसतें. मिथ्या बोलणें संतांच्या बाबतींत कधीं घडत नाहीं. कारण आत्यंतिक हित हीच सत्यत्वाची व्यावहारिक कसोटी आहे. आणि म्हणून संत जे बोलतील तें त्रिवार सत्यच असते. पूर्ण निःस्वार्थी आणि 'सर्वभूतहिते रत' असे असल्यानें मिथ्यत्वाचा स्पर्श त्यांच्या वाणीला कधी होत नाहीं. असे सदा सर्वदा सत्यवादी असलेले लोकच परमेश्वराचे श्रेष्ठ भक्त होत. आणि तेच धन्य होत.

सदा सेवि आरण्य तारूण्यकाळीं । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनीं निश्चयी दृढ ज्याच्या । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥

मागें ४४ व्या श्लोकांत समर्थांनी सुख पाहिजे असेल तर अरण्यांत जावे असें सांगितलें आहे. त्यावरून समर्थांना कोणत्या तऱ्हेच्या सुखाची अपेक्षा आहे तें स्पष्ट होते अरण्यांत मिळणारे सुख हें वैषयिक सुख नाहीं. अर्थांतच इंद्रियाच्या द्वारा त्याची प्राप्ति होणार नाहीं. रंगेल विलासी जीवनाला चटावलेल्या माणसाला अरण्यातील सुखाची कल्पना येणार नाहीं. तेथें सुखसोयी नाहींत. खाण्यापिण्याची हवी तशी व्यवस्था होणार नाहीं. वातावरणाचा भरवंसा नाही. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांना केव्हां तोंड द्यावे लागेल याचा नेम नाही. त्याच्या प्रतिकाराचें साधनहि उपलब्ध नाहीं. शरीर कष्टाला कंटाळून चालत नाही. जेवण्या-झोपण्याची वेळ सांभाळता येत नाही. असा सर्व नन्नाचा पाढा अरण्यांत असतो. तेव्हां अरण्यातील सुख हें केवळ शरीराच्या पातळीवरचे सुख नाहीं ही गोष्ट निश्चितच आहे. तें सुख शरीराच्या पातळीपेक्षी वरच्या पातळीवर भोगावयाचें सुख आहे. लौकिकांत, संसारांत वावरत असतांना शरीराचे चोचले पुरवले जातात. पण मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पदोपदी घडत असतात व त्यामुळें एरवी बाहेरून सुखी वाटणारे जीवनहि आतून वैतागलेले असते. सर्व नातेसंबंध, सर्व स्नेहसंबंध हे शेवटी स्वार्थाशी केंद्रित असल्यानें सौजन्य, समंजसपणा, औदार्य या गोष्टींचा अभाव तेथें वारंवार जाणवतो. जरा खोल जाऊन पाहिलें तर निश्चितपणें तो प्रत्ययास येतो. आणि मग शरीराच्या पातळीवर मिळत असलेलें सुखहि सुख आहे असें मनस्वी माणसाला कधी वाटत नाही. सुखाच्या संबंधी त्याची धारणा चुकली आहे असेंत्याच्या लक्षांत येतें आणि मग समर्थांसारखे संत साधकाच्या या विशिष्ट अवस्थेचा विचार करून त्याला "सुखालागि आरण्य सेवीत जावे " असा आदेश देतात. "विविक्तदेशसेवित्वं अरतिर्जनसंसदि ' (भ. १३ ! १०) हे जें गीतेने सांगितले .

ज्ञानलक्षण, त्याचेहि तात्पर्य हेंच आहे. प्रांपचिक आघाताने वैतागलेल्या माणसाला तें कधीं कधीं पटतेहि. पण बहुधा तेव्हां फार उशीर झालेला असतो. "अंकं गलितं पलिते मुंडे" अशी दीन अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग अरण्यांत गेला तर त्याचा कांहीं उपयोग होतो असें नाहीं. एक तर थकल्या भागल्या शरीराला रानावनात राहण्यामुळे उत्पन्न होणारे अनेक प्रकारचे कष्ट मुळींच सोसत नाहींत आणि त्या कष्टांमुळें उत्पन्न होणारी शारीरिक व्यथा सहन करण्याची शक्तीहि पूर्वी च्या सवयीमुळे व फार झालेल्या वयामुळे उरलेली नसते. आणि त्यामुळें "सुखालागि आरण्य सेवीत जावे" हें विधानच असत्य त्याला वाटूं लागतें. यासाठी समर्थ अरण्यांत जाण्याचे वय कोणते त्याचा आदर्श या श्लोकामधे सांगत आहेत. हें जें अरण्यांत जाणें आहे, तें कांहीं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी' नव्हे किंवा मृगयेसाठीहि नव्हे. तर पारमार्थिक साधनेचा तो एक भाग आहे, विवेक शक्तीवरची दडपणे व आचरणे जाऊन सूक्ष्म विचारांना वा चिंतनाला वाव मिळावा, मनाची एकाग्रता व्हावी, सदाचार वाढावा, संयम साधावा, लोभ कमी व्हावा, आपल्याला हव्या हव्या वाटणाऱ्या सुखाच्या गोष्टी नैसर्गिक आवश्यकतेच्या पातळीवर उतराव्या, शरीराचा सोशिकपणा वाढावा, ध्यानाची सवय लागावी, कोणी सहाय्यास येण्याची शक्यता नसल्याने स्वावलंबन सहज घडावे, वृत्ति निर्भय व्हावी इत्यादि उद्देश अरण्यांत जाण्याच्या मागें असतात. आणि हें सर्व साधावयाचे तर शरीर चांगलें कार्यक्षम असावें लागते आणि म्हणून समर्थ तरुणपणांतच अरण्यांत जाणें चांगलें असें सांगतात. प्रपंचाकरितां इंद्रियांची कार्यक्षमता असावी लागते हें सगळ्यांनाच पटते पण परमार्थ साधनेसाठी त्साहूनहि अधिक कार्यक्षम शरीराची आवश्यकता आहे हें मात्र सहसा लक्षांत घेतलें जात नाहीं. मनाला वळण लागण्याच्या आधीं शरीराला वळण लागावे लागतें. मनाचे विषय सुटावे असें वाटत असेल तर आधीं शरीराचे विषय सोडावे लागतात वा संयमाने घ्यावे लागतात आणि ही शक्यता तरुणपणीच अधिक असते. फार प्राचीनकाळी ब्रह्मचर्याश्रम, कठोर व्रतनियमांनी युक्त असलेल्या अवस्थेंत, कटाक्षाने पाळला जात होता आणि त्यामुळे वार्धक्य आल्यानंतर गृहस्थाश्रमानंतर घेतलेला वानप्रस्थहि सुखावह असे. वर्णाश्रमव्यवस्था विच्छिन्न झालेल्या या काळांत तें शक्य नाहीं. आणि म्हणून सर्व प्रकारच्या साधनांची जोड तरुणपणांतच मिळवून ठेवावी लागते. मुळींच न करण्यापेक्षा उशिरा करणेहि चांगलें असें म्हणतात. पण तो आदर्श होऊ शकत नाहीं. "वार्धक्ये तीर्थयात्रा कर्तुमिच्छन्ति मुढा : " या सुभाषितांत एक बारीक श्लेष आहे तो लक्षांत घेतला पाहिजे. "वार्धक्ये तीर्थयात्रां कुर्वन्ति मुढा : " असें सुभाषितकार म्हणत नाहीं. केतु इच्छनिऽ असें म्हणतो याचा अर्थ पूर्वी होऊं शकल्या नसतील, केल्या नसतील तर म्हातारपणी तीर्थयात्रा करूंच नये असें नाहीं. पण तारुण्य आणि संधि असतांना, करूं म्हातारपणी तीर्थयात्रा, असें म्हणून केवळ विलासांत जीवन घालविणाऱ्या तरुणांना येथें मूढ म्हटले आहे. बायकामुलांना घरांत नकोसा झाल्यानंतर किंवा दुबळ्या इंद्रियांनीं आतां सुखे भोगता येत नाहींत अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग देवधर्माला लागण्याचा विचार केला जातो. सेवानिवृत्त झाल्यानंतरच ज्ञानेश्वरी, ही काय भानगड आहे पाहूं या', म्हणतो. त्याच्या पदरांत परमार्थ कितीसा पडणार ? इंद्रियांनीं मिळणारी सुखे प्राप्त करून घेणे हें तसें सोपे आहे. पण स्थिर बुद्धि, शांत वृत्ति, प्रसन्नता, निरुपाधिक असा आनंद मिळविणे, हें काही तसें सोपे नाहीं. यासाठीं फार प्रयत्न करावे लागतात. फार कष्ट घ्यावे लागतात. बराच वेळ द्यावा लागतो. सातत्य टिकवावे लागते आणि यांतील वेळेव्यतिरिक्त कोणतीहि गोष्ट म्हातारपणी मिळणारी नाही त्या वया त मिळालेला रिकामा वेळहि पूर्वी संयम नसल्यामुळें कारणी लावता येत नाहीं व मग तो खायला उठतो. जीवन भकास, दीन आणि दुःखी होतें. यासाठी साधनेला लागावयाचे तें तरुणपणांतच लागले पाहिजे. दुर्दैवानें त्यावेळीं तें सुचत नाही, सुचविले तरी कळत नाही, कळले तरी वळत नाही. आणि मग उशीरा, व्हावा तसा उपयोग होत नाही. जी माणसे संतपदाला पोचली असें आपण पाहतों, त्यांनीं पुष्कळ वेळां अगदीं बालवया तच किंवा तारुण्य बहराला आलेले असतांनाच साधना केली आहे असें दिसते. जन्मजन्म जेथें पुरे पडत नाहींत असें शास्त्र सांगते, तेथे रोगग्रस्त अशा थकलेल्या शरीराच्या पाच-दहा वर्षांनीं काय होणार ? म्हणून समर्थ स्वतःच्या अनुभवाने सांगतात-तरुणपणांतच अरण्यांत जाणें चांगलें कारण त्यामुळेंच धन्यता प्राप्त होऊं शकते.

इथें अरण्य एक उपलक्षण आहे. एकांतास न कंटाळणें हें मुख्य व त्यासाठीं एकातांची सवय असणे व आवड निर्माण होणें हें साधन. त्यादृष्टीनें हा चरण फार महत्त्वाचा आहे.

आपल्या संस्कृतीनें १०० वर्षांचे पूर्णायुष्य मानलेले आहे. तें मिळावे म्हणून प्रार्थना केली आहे. हें जीवन कण्हत, कुथत स्वतःला कंटाळा येत व इतरांना कंटाळा आणीत जगण्याचे नसून तें दृढ शरीराचे, कार्यक्षम शरीराचे मागितले आहे. पण या दीर्घायुष्याचा उपयोग सुखविलासासाठीं नसून देवाच्या सेवेसाठी आहे. हीहि जाणीव आपल्या संस्कृतीनं ठेवली आहे. तसेंच जीवनाचा भरवसा नाहीं, अशी चेतावणी देऊन "कौमारआचरेत प्राज्ञः धर्मान भागजतानिह । " असा आदेशहि दिला आहे. दीर्घसूत्रीपणा कामाचा नाही' हें तर सर्वांनाच पटते म्हणून समर्थ सांगतात की अरण्यवास तारुण्यांतच साधला पाहिजे.

शरीर थकले म्हणजे येणारी निवृत्ति फार केवलवाणी निवृत्ति आहे. मनाचा मोह सुटत नाहीं आणि शरीर हालू शकत नाहीं. ही स्थिति फार वाईट. खरें म्हणजे शरीर चांगले समर्थ आहे पण मनालाच मोह नसल्यामुळे माणूस शांत राहतो. अर्थात् प्रसन्नहि राहतो. हें कसें साधावे यासाठीं पुढच्या दोन ओळी समर्थ सांगतात, "मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी !"

आपण जी सुखदुःखे भोगतो त्या दोन्हीतहि प्रत्यक्ष अनुभवाचे प्रमाण फार थोडे असते. त्यांतील कल्पनेचा वाटाच फार मोठा असतो. मनुष्याचे हें वैशिष्ट्य च आहे. पण त्यावरील त्याचें नियंत्रण सुटले तर दुःख आणि अस्वास्थ यांशिवाय पदरांत कांहीं पडत नाहीं. म्हणून माणसाने सुखदु : ख ही जेवढ्यास तेवढी ठेवावीत. त्यांत आपल्या कल्पनेची भर घालू नये. व्यवहारात अशा मनुष्याला तुसडा, अरसिक इत्यादि मानले जाते पण असा मनुष्य निरस नसतो. त्याला कशाचा व कोणाचाहि तिटकारा असत नाही. तो अलिप्त, खऱ्या अर्थाने उदासीन असतो. म्हणून कोणत्याहि प्रकारचा गोंधळ त्याच्या मनांत कधीं निर्माण होत नाहीं. मानापमानाच्या, निदास्तुतीच्या, यशापयशाच्या, अहंकारी अतिशयोक्तीनें त्याच्या मनाचे स्वास्थ कधीं ढळत नाहीं. त्याच्या शरीराच्या वेदनाहि कांहीं असल्याच तर त्या शरीराच्याच पातळीवर राहतात. सामान्य माणसाचे असें होत नाहीं. त्याचें कांहीं दुखलें-खुपलें किंवा मनाच्या पातळीवर कांहीं बिघडले कीं त्याच्या सर्व क्रिया ह्या अस्वास्थानें विकृत होऊन जातात. गुडघे दुखत असतांना चालत येणार नाही हें ठीक, वाचवत नाही' असें म्हणण्याचा प्रसंग कां यावा ? खरोखरीच कल्पनेने आपण अधिक दुःखी होतों. संत कशाशीच चिकटला नसल्याने तो सुखदुःखाचे मोजमापहि अलिप्ततेनें करूं शकतो आणि कल्पनांच्या पसाऱ्यात तो कधीं गुंतत नाहीं .

ही गोष्ट सत्पुरुषाला साधू शकते याचे कारण हें कीं तो आपल्या निश्चयावर नेहमी स्थिर असतो. त्याचें कारण , त्याच्या धारणा, त्याच्या श्रद्धा, त्याचा विश्वास हे दृढ असतात. आणि त्यामुळें त्याच्या मनाला कधीं चंचलता येत नाहीं. काय करावयाचें आहे, काय साधावयाचे आहे हें त्याचे निश्चित ठरलेले असतें. शास्त्राच्या, संताच्या वचनांवर त्याची दृढ श्रद्धा असते आणि या विश्वासाच्या बळावर त्याचें मार्गक्रमण सातत्याने होत राहते आणि मग ध्येय सिद्धीमध्ये जो कांहीं विलंब असतो तो असलाच तर फक्त काळाचा असतो. ध्येयसिद्धि दुरावते ती निश्चयाच्या शिथिलतेनें. ओले शेण पेटतच नाहीं. ओले लाकूड धुमसत राहते पण कापूर चटकन् पेटतो. निश्चयी माणसाच्या मनाचे तसेंच होते. सामान्यांची स्थिति याच्या उलट आहे. चांगल्या साधनेने सुद्धां ती पेटत नाहींत. फार तर धुमसत राहतात; आणि मग तो धूर असहय होऊन "नाहीं तरी सुखी असावें संसारी ! फजिती तिसरी करूं नये !" असें म्हणण्याचा प्रसंग ओढवतो .

दृढनिश्चयी माणसावर संकटे येतच नाहींत, दुःख कोसळतच नाही असे होत नाहीं. तो आपल्या ध्येयापासून चळत होत नाहीं एवढेच " फुटो हें मस्तक तुटो हें शरीर ! नामाचा गजर सोडू नये । " अशी त्याची धारणा असते. आणि अशी ज्याची धारणा असते तो संतपदावर त्वरित चढतो आणि धन्य होतो.

नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥

परमेश्वराचा जो श्रेष्ठ भक्त आहे त्याच्या अंतःकरणांत माणसाच्या जीवनांतील सुखस्वास्थ्य नष्ट करणारी दुष्ट आशा नसतें. त्याला धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ति यांची आसक्ति नसते. स्त्रीपुत्रादींचा मोह नसतो. प्रपंचांतील आप्तस्वकीय, बायका- मुले यांचा आणि याचा संबंध हा जणू झाडाखाली सावलीत बसलेल्या गुराविषयी झाडाला जसें वाटेल तसा असतो असे वर्णन श्रीज्ञानेश्वरमहाराजानी केलें आहे. सत्ता-कीर्तीची लालसा याने मी मी म्हणणाऱ्याचेहि जीवन व्यापले असतें. संतांना त्या विषयीचा लोभ तर चुकूनहि वाटत नाही. सर्वसामान्य माणसे ज्याबाबतींत अतिशय सावध, दक्ष, जागरूक असतात त्या सर्व लौकिक विषयांमध्यें संताला कांहीं रस नसतो. "यस्याम जाग्र्तिभूतानि सा निशा पश्यतो मुनेः ! !" (भ. २ ! ६९) असें गीतेत म्हटलें आहे तें यासाठींच. या सगळ्या गोष्टी जणू त्यानें प्रारब्धावर सोडलेल्या असतात. पण याचा अर्थ तो कोरडा, रूक्ष असतो असा मात्र नाहीं. निसर्गाचा असा नियम आहे कीं कुठे पोकळी राहूं शकत नाहीं. भक्ताचे अंतःकरणहि असें पोकळ, कोरे राहूं शकत नाही'. त्यालाहि तहान असते ती भगवंताच्या प्रेमाची. प्रेमाच्या बंधनांनी देवाला बांधावे किंवा आपण त्याच्याशी बांधले जावे हीच एक अतिशय उत्कट इच्छा भक्ताच्या अंतःकरणांत असते. भक्ति आणि प्रेम समानार्थक आहेत. अतिशय उत्कट अशा प्रेमालाच भक्ति म्हटलें जाते. हें प्रेम देवाकडून कांहीं मागत नाहीं. त्याची अभिलाषा एकच "सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति !" किंवा "ऐसे करी विठाबाई तुझे पाय माझे डोई ॥ " भगवताचे स्मरण होतांच वा त्याचें नाम उच्चारताच कंठ गहिवरून यावा, नेत्रांतून असू ओघळावे, अंगावर रोमांच दाटावेत, अशा उत्कटतेचा अनुभव मिळावा एवढीच त्याची इच्छा असते. या भक्तिसुखासाठी मग भक्त मोक्षालाहि तुच्छ लेखतो, अद्वैतालाहि रूक्ष मानतो. समर्थांनी पिपासा, तहान असा जो शब्द वापरला आहे तो या उत्कटतेच्या प्रतीकासाठी. माणसाच्या अंतःकरणामध्ये अशा आकांक्षा उत्कटतेने रहाव्या हे खरें पण त्या प्रपंचांतील ऐश्वर्यासंबंधी नसाव्या तर परमार्थासाठीं असाव्या, आध्यात्मिक उन्नतीसाठीं असाव्या.

काहीतरी मिळविण्याची इच्छा ही केवळ इच्छा म्हणूनत्याज्य किंवा वाईट नाहीं. तिचा विनियोग कुणी, कुठे, कशाकरिता करावा एवढाच प्रश्न आहे. ज्ञानेश्वर-तुकारामादि संत म्हणतात तुमची सर्व महत्त्वाकांक्षा, धडपड, प्रयत्न, आशा, इच्छा या परमार्थप्राप्तीसाठीं असूं देत. आम्हीं त्यांचें ऐकत नाहीं. आम्हांला मार्स्कृा आणि फॉईड मार्गदर्शक म्हणून मान्य आहेत. त्यांचे विचार ५०... ७५ वर्षांतच उलटे पालटे झाले. प्रत्यक्ष फॉइडच्या शिष्यानेच त्याच्या अतिरेकी मताचे खंडन केलें. रशियानेचमार्क्स गुंडाळून ठेवला. संतानी प्रस्थापित केलेलें तत्त्वज्ञान उपनिषदांतील प्राचीन ऋशिंपासून ते रमणमहर्षीपर्यंत अव्याहतपणें टिकून राहिलें आहे. कारण ते तत्त्वज्ञान स्वतः शाश्वत आहे, आणि शाश्वत आनंद प्राप्त करून देणारे आहे. म्हणूनच तें स्वीकारले पाहिजे.

भक्ताच्या अंतःकरणांतील ईश्वराविषयीचे प्रेम इतके उत्कट असतें कीं त्याच्या त्या भक्तिभावानें ईश्वर त्याचा ऋणी होतो. जणू भक्ताचेच उपकार ईश्वराच्या माथ्यावर चढतात आणि त्यातून उतराई होण्यासाठी मग देवच भक्तासाठी वाटेल ते करावयास तयार असतो. भगवंतांनीं अर्जुनाचे घोडे धुतले. धर्मराजाच्या यज्ञात उष्टी काढली.जनाबाईचे दळण दळले इत्यादि इत्यादि कथा त्यादृष्टीनें प्रसिद्ध आहेत.

या ऋणी केलेल्या देवाला मग भक्त, एखाद्या सावकाराने आपल्या कुळाला दटावावें तसेंहि दटावू शकतो आणि ईश्वराला तेच गोड वाटतें. उदगयनाचार्यांनी जगन्नाथाला असें रागावून विचारल्याचें प्रसिद्ध आहे. नामदेवासारखे लडिवाळ भक्तहि देवाची खरड काढताना दिसतात. या कथा नुसत्या ऐकतानाहि अंतःकरण उचंबळून येते अशी भावोत्कटता त्यांत आहे. परमेश्वर असा ज्यांचा ऋणी होतो ते सर्वोत्तमाचे दास खरोखरीच धन्य होत.

दिनाचा दयाळू मनाचा मवाळु । स्नेहाळु कृपाळू जनी दास पाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥

भक्त हा व्यवहारात कसा असतो तें समर्थ या श्लोकांत सांगत आहेत. संत, परमेश्वराचे भक्त, सत्पुरुष हें दीनजनांविषयीं दया बाळगणारे असतात. रंजल्या गाजल्या जनाविषयी त्यांचे अंतःकरण दयेने भरलेले असतें. आईचा अंतःकरणात आपल्या बालकाविषयी जी माया असते, कोमलता असते, तीच संताचा अंतःकरणांत भूतमात्राविषयी असते. अज्ञानपंकांत रुतले लोक संतांना बघवत नाहींत. त्यांच्या अंतःकरणातील निष्काम स्नेह त्यांना स्वस्थ बसू देत नाहीं. दुःखितांना, मोहग्रस्तांना पाहून त्यांचें मन कनवळ्यानें भरून येतें. मनुष्यमात्राचे पालन करण्यासाठीं वैकुंठसुखाचा त्याग करून संत अवतीर्ण होत असतात. पतिताविषयी त्यांच्या अंतःकरणांत कधीहि चीड, द्वेष वा तिरस्काराची भावना जागृत होत नाहीं. कोणी कसाहि वागला तरी त्यांच्या मनाचा कधीं जळफळाट होत नाहीं. उलट अपार करुणेने त्यांचे अंतःकरण भरून येतें. न ऐकणाऱ्या उर्मटाविषयींहि त्यांना केवळ कीवच वाटत असतें असें गौरवाने म्हणावें लागते. ईश्वर जशाशी तसा वागतो, संत कोणाशीहि अगदी नीच, दुष्ट, उर्मटाशीहि, आपुलकीने, जिव्हाळ्या, मैत्रीच्या नात्यानंच वागणार. म्हणून गीतेनेंहि भक्ताच्या वर्णनांत "मैत्रः करुण एव च" अशीं लक्षणें आवर्जून सांगितलेली आहेत. म्हणून तर समाजकल्याणाची इच्छा असलेल्या थोर पुरुषांनी माणसाने संतांचे पाय धरावेत असा आदेश दिला आहे. " धरावे तें पाय आजी आधीं. " असा हा जगतूकल्याणासाठीं दयाक्षमादि गुणांनी संपन्न असलेला सर्वोत्तमाचा दास खरोखरीच धन्य होय .

हें धन्य -दशक या ५६ व्या श्लोकाने संपत आहे. गीतेने जी स्थितप्रज्ञादि आदर्श पुरुषांची लक्षणें सांगितली आहेत त्यांच्याशी येथील वर्णन ताडून पाहण्यासारखे आहे. तेथील महत्त्वाचे सर्व गुण येथें सांगितले आहेतच. पण तो आदर्श , साधकाच्या उपयोगी यावा या दृष्टिनेहि समर्थ उपदेश करतात तें फार महत्त्वाचे आहे. या लक्षणांत कोठेंहि, कोणत्याहि, प्रकारच्या सिद्धींचे वा चमत्कार करण्याचें सामर्थ्य असल्याचें वर्णन नाहीं. गीतेने सांगितलेल्या स्थितप्रज्ञादि आदर्श पुरुषांच्या लक्षणांतहि ते नाहीं. कारण कोणत्याहि प्रकारच्या सिद्धींचा उपयोग पारमार्थिकदृष्ट्या शून्यच असतो. श्रद्धा दृढ होण्यासाठी अगदीं क्वचित् त्याचा उपयोग झाल्यासारखें दिसलें तरी अशा कृत्रिम उपायांनीं निर्माण झालेली श्रद्धाहि पोकळच असते. सिद्धी ही वासना अहंकाराला वाढवणारी असते, ती परमार्थाची हानीच करते. म्हणून गीतेसारख्या शास्त्रानें काय किवा समर्थ रामदासस्वामींनी काय , आदर्श पुरुषाच्या लक्षणांत सिद्धींचा संबंध येऊ दिला नाहीं. दुर्दैवाने आपण मात्र अमानित्वादि लक्षणांनीं युक्त असणाऱ्यापेक्षा चमत्कार करणारालाच श्रेष्ठ पुरुष समजत राहतो. वर्णन करीत असतांना पुढची व्यक्ती ही एकच असली तरी तिला संबोधितांना समर्थ भक्त, संत, महात्मा, योगी, सिद्ध अशीं विशेषणे न वापरता दास म्हणतात, सर्वोत्तमाचा दास म्हणतात. हें फार महत्त्वाचें आहे.

थोड्याशा सिद्धी प्राप्त असलेले किंवा लोकांना आकर्शून घेईल असें वस्तूत: असलेले या मार्गातले तथाकथित महंत स्वतःला परमेश्वर, ब्रह्मरूप, भगवान् सच्चिदानंद इत्यादि इत्यादि म्हणवून घेत असतात व तींच भूषणें, बिरुदे मिरवीत असतात. त्यांच्या त्या अहंकाराला थारा मिळू नये म्हणून समर्थांनी दास शब्दाची योजना केली आहे. शिष्यानें आपल्या गुरूला आदरभावाने आणि प्रामाणिक निष्ठेने कितीहि श्रेष्ठ, अगदीं ब्रह्मा, परब्रह्म ही मानावें; पण गुरूने स्वतःला काय समजावे आणि काय मानून मिरवावे तें लक्षांत रहाणे म्हणून समर्थ दास शब्दाचा उपयोग करीत आहेत. " अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णु दासा भाविकासी !" अशी या थोर पुरुषाची धारणा आहे. अहंकार हा अज्ञानापेक्षां ज्ञान्याच्याच मागे हात धुवून लागतो, अगदीं गळ्यांत पडतो असें ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलें आहे. त्या अहंकाराला बळ मिळू नये म्हणून दास शब्द वापरलेला असावा. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेहि एक भूमिका हा 'दास' शब्द व्यक्त करीत असतो. एकमात्र मूलभूत सत्याच्या दृष्टीनें म्हणजेच पूर्णपणे पारमार्थिक दृष्ट्या वा आपल्याला समजावून घेण्याच्या भाषेत परमोच्च स्थितींत, अद्वैत हीच केवळ वस्तुस्थिति असली, ब्रह्मा व्यतिरिक्त इतर सर्व मिथ्या असलें, ' अगा जें झालेंच नाहीं ! त्याची वार्ता पुससि कायी !' अशीच त्याची अवस्था असली, तरी समजून घेण्याच्या पातळीवर ज्ञानमार्गामध्यें ब्रह्म, ईश्वर, जीव, देह आणि जगत्- यांचा विचार करणें अपरिहार्य असते आणि त्यामुळे विचारापुरते तरी त्यांचे प्रचितीला येणे हें सत्य मागून चालल्याविना गति नसते. सर्व तत्त्वज्ञानांची उभारणी या पांचांच्या विचारावरच आधारलेली असते. त्यांचे संबंध कसे लावावेत व त्यांचें स्वरूप कोणत्या भाषेनें समजून घ्यावें यावर तत्त्वज्ञानाचा वेगळेपणा अवलंबून असतो. स्थूलमानाने भारतीय तत्त्वज्ञान तीन गटांत समाविष्ट करतां येतें. शंकराचार्यांचे अद्वैत हा एक गट, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्क यांनीं प्रतिपादिले विशिष्ट, शुद्ध आणि आये द्वैता द्वैत हा दुसरा गट आणि मद्ध्वा चार्यांनी पुरस्कारिलेले द्वैत हा तिसरा गट. श्रीमारुतीरायांनी या तिन्ही गटांतील तत्त्वज्ञानाचा एके ठिकाणीं फार उत्कृष्ट रीतीनें समन्वय साधला आहे. भगवान् रामचंद्रांची प्रार्थना करताना मारुतराव म्हणतात-
देहबुद्धधा तु दासोऽह जीवबुद्धा त्वदंशकः !
आत्मबुद्धचा त्वमेवाहं इति मे निश्चिता मतिः ! ।
तेव्हां जिवंत माणूस हा कितीही, केवढ्याह योग्यतेचा श्रेष्ठ पुरुष असला तरी तो शरीर धारण करीत आहे तोपर्यंत परमेश्वराच्या संबंधांतील त्याचा दासभाव कधीं नाहींसा होत नाहीं. देह धारण करीत आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी अंशांत देहभाव जागृत असतोच असतो. कळून न कळून ठेवावाच लागतो. आहार, निद्रा व निवाऱ्याची सोय यांची कांहीं ना कांहीतरी व्यवस्था करावीच लागते. अपरिग्रहाच्या वा वैराग्याच्या उत्कट धारणेने दिगंबर म्हणजे संपूर्ण नग्न राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे अंथरूण, पांघरूण वा झोपडी यांचा स्वीकार करतातच. अयाचित वृत्तीनें वा दोन घरीं तरी माधुकरी मागून त्यांना जगावे लागतें. अन्न-पाणी घ्यावें लागते मलमूत्र विसर्जन करावे लागतें. व्याधी झाल्या म्हणजे वेदनाहि जाणवतात, शीतोष्णा च्यादि स्पर्श कळतात. ज्ञानेंद्रियांना आपापल्या विषयांचें ज्ञान होते. कर्मेद्रियें आपापली कर्मे-उचित रीतीनें असेल पण-करीत राहतात आणि त्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात कितीहि मोठ्या माणसाच्या ठिकाणीं देहभाव हा अल्पांशानें असेल, निरुपद्रवीपणाने असेल, पण जागृत असतोच आणि ही वस्तुस्थिति सर्व मनुष्यदेहधारी व्यक्तीना जिवंत असेपर्यंत लागू आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या परमोच्च पातळीवर पोचलेली थोर माणसेंहि देहदृष्टिनें परमेश्वराचीं दास असतात. आणि त्या व्यक्तींनींहि आपली नम्रता कधीं सोडलेली नसते. भावावेशानें आलेल्या समाधि अवस्थेला उद्देशून किंवा तत्त्वज्ञानाने प्राप्त होणाऱ्या साक्षात्काराचें वर्णन गौरवाने करीत असताना देहासकट ब्रह्म झालो अशा अर्थाचे उद्‌गार त्यांनी क्वचित काढले तरी 'सेवकेः बाणे' याच वृत्तीनें ते आपलें जीवन जगत असतात. आणि हे सर्व लक्षांत घेऊनच समर्थ अशा परमपदाला पचलेल्या थोर महात्म्यांचाहि उल्लेख ' जगी धन्य तो दास सवोंत्तमाचा" असा विशेषरीतीनें करीत आहेत. साधकाने हें लक्षांत ठेवणे फार महत्त्वाचे आहे. साधकाने सुखासीन होऊ नये. शरीरकष्टाला कंटाळू नये, आळसाला थारा देऊ नये, हेहि या दास शब्दातून व्यक्त होते . समर्थांचे आराध्य दैवत भगवान् रामचंद्र असले तरी त्यांचे ठिकाणी सांप्रदायिक दुराग्रहाचा लवलेशही नाही हेंच येथील रामचंद्रांच्या, ईश्वराच्या संदर्भांत वापरलेल्या सर्वोत्तम या शब्दाने व्यक्त होतें .

जगी होईजे धन्य या रामनामें । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

मागील दहा श्लोकामध्ये धन्य कोणास म्हणावे त्याचें उत्कृष्ट वर्णन समर्थांनी केलें आहे. जिज्ञासू साधकापुढे, मुमुक्षू भाविकापुढे धन्यतेचा हा एक आदर्श समर्थांनी उभा केला आहे. परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त धन्य होय हा तो आदर्श. स्वाभाविकच ही धन्यता आपणासहि प्राप्त व्हावी असे विवेकी माणसाला वाटणारच. त्याचा उपाय समर्थ या ५७ व्या श्लोकांत सांगत आहेत. ते म्हणतात, रामनामाने मनुष्याला जगामध्ये धन्यता प्राप्त होते. अर्थात् हा दृष्टिकोन संतांचा आहे. सामान्य माणसापुढे या तऱ्हेची धन्यता बहुधा कधीं नसते. सत्ता, संपत्ति, ऐश्वर्य, कीर्ति हीच त्याच्यापुढे धन्यतेची लक्षणें म्हणून उभी असतात, आणि मग ती कोणत्याहि मार्गाने मिळविली तरी चालेल असें त्याला त्याच्यापुढे असलेल्या अनेक व्यक्तीच्या उदाहरणांवरून वाटूं लागतें. आणि याच विचारसरणीने परमार्थ तर दूर राहतोच पण ऐहिक जीवनहि दुःखमय होऊन जातें. ऐश्वर्यादि गोष्टी प्राप्त असलेली एखादी व्यक्ति ऐहिकदृष्ट्या पूर्ण सुखी आहे असें गृहीत धरले तरी त्याने अवलंबिलेला मार्ग जर न्यायाचा नसेल तर तें सुख इतर अनेकांना दुःखी करूनच जन्माला आलेले असतें हें निश्चित. आणि मग हें असें सुखी जीवन माणसाला न शोभणारे आहे. हा धोका टाळण्यासाठीच संतानीधन्यतेचा आदर्श सत्पुरुषाच्या लक्षणांनी उभा केला आहे. आणि ही धन्यता हीच खरी धन्यता आहे कारण यांतूनच मनाची प्रसन्नता, समाधान, संतोष, आनंदमयता ही शाश्वतरीतीने प्राप्त होत असते. अर्थातच या धन्यताप्राप्तीचें साधन विषयोपभोग किंवा संपत्ति आणि सत्ता होऊं शकत नाहीं. परमेश्वराचें नाम हेंच त्याचें अत्यंत सुलभ आणि म्हणूनच एकमात्र साधन आहे. तें जितक्या प्रेमाने, जितक्या सातत्याने घ्यावें तितक्या प्रमाणांत शरीर, मन, बुद्धि यांमध्ये क्रमाक्रमानें पण निश्चितपणें सुधारणा होत जाते.

त्याच्या जोडीला नित्यनेमानें भक्ति, उपासनेसाठी कांहीं क्रिया निष्ठेने केल्या पाहिजेत. समर्थांनी क्रिया, भक्ति, उपासना असा क्रम सांगितला आहे, तोहि फार महत्त्वाचा आहे. कोणत्याहि गोष्टीच्या प्राप्तीसाठीं नित्यनेमाला फार महत्त्व असते. मग या लाभाचे क्षेत्र कोणतेंहि असो. व्यावहारिक क्षेत्रांतहि याचा अनुभव येतो. कोणतेहि तांत्रिक कौशल्य, व्यवस्थापन वा संशोधन हें- अगदीं ऐहिकांतलें- विचारांत घेतलें तरी त्यासाठीं नित्यनेमाचें महत्त्व आहेच तेव्हां हाच नियम परमार्थालाहि लागू असणारच. क्रियेचे स्वरूप पालटेल इतकेंच जपादि अनुदाने, तीर्थयात्रा, पारायणे, भजने, कीर्तने, श्रवण वा सप्ताहादि कार्यक्रम ही सगळी क्रियेचीच स्वरूपें आहेत व त्यांतूनच उपासना पद्धति साकारते. मात्र हें सर्व भक्तीने झालें पाहिजे श्लोकातील शब्दांच्या अनुरोधानें आपण फार तर असें म्हणूया कीं नित्यनेमाने कोणतीहि क्रिया भक्तीने केली, प्रेमाने केली, आवडीने केली, कीं तीच उपासना होऊन इष्ट फळें देते.

ही क्रियाहि शरीराकडून घडणारी व मनाकडून घडणारी अशी दोन प्रकारची असते. यांत ध्यान, चिंतन, स्मरणादि मानसिक क्रिया आणि श्रवण, पठन, पूजनादि शारीरिक क्रिया यांचा समावेश आहे. प्रेमभक्ति हा अंतरात्म्याचा विषय आहे. मनाच्या माध्यमाने त्याचा अनुभव येऊ शकतो. कोणतीहि क्रिया फलित होण्यासाठी प्रेमभक्तीची नितांत आवश्यकता आहे हें कितीहि खरें असले तरी प्रेमभक्ति उत्पन्न करणें ही गोष्ट माणसाच्या स्वाधीनची नाहीं. देहमनाची शुद्धता आणि भगवतकृपा यांचा तो परिणाम आहे. ही अंतरंग भक्ति सोपी असती तर ' भक्ति तो कठीण सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा सूर !' असे भक्तीच्या प्रसारासाठी बद्धपरिकर झालेल्या सत्पुरुषानेहि म्हटलें नसतें. तेव्हां प्रेमभक्ति उत्पन्न होईल आणि मग साधना करूं असें म्हणून जर कोणी स्वस्थ बसला तर त्याला काहीच साधावयाचे नाहीं. म्हणून समर्थीनी क्रिया शब्दाचा उपयोग प्रारंभी केला आहे.

मनाची एकाग्रता, मनाची शांतता, मनाची स्थिरता, मनाची प्रसन्नता या गोष्टी उत्तम आणि आवश्यक खऱ्या पण हें मनावर बळाने लादता येत नाहीं. माणसाचे मन हें सर्वतंत्र स्वतंत्र आहे. अर्जुनासारख्या थोर संयमी पुरुषालाहि मनाचा हा नाठाळ हट्टीपणा चांगलाच जाणवला आहे. तेव्हां मनाच्या प्रसन्नतेच्या फारसे नादी न लागता शरीराकरवीं कांहीं गोष्टी व्रत म्हणून नियमानें करीत राहावे. ठराविक वेळीं, ठराविक प्रमाणांत, ठराविक पद्धतीने, शास्त्राज्ञेनुसार, आपल्या रुचीप्रमाणें किवा संतानी, गुरूंनी, सांगितलेल्या पद्धतीने क्रिया करीत राहावे. त्याचाहि हळूहळू परिणाम होतो. मुळांत सात्त्विक असलेलें मन राजस किंवा तामस बनते. बाह्य क्रियांच्या संस्कारांतून, सातत्याच्या प्रयत्नानें हे राजस, तामस गुण ओहोटीला लागून मनाची मूलभूत सात्त्विकता पुन्हा प्रगट होऊं शकते. प्रकृतिभेदानें कोणाला हें लवकर साधेल, कोणाला त्यामानाने फार दीर्घकाल प्रयत्न करावा लागेल. पण धैर्याचा आणि तितिक्षेचा अवलंब करून दीर्घ कालाचे हें आव्हान साधकाने स्वीकारलेंच पाहिजे .

मन कितीहि नाठाळ असलें तरी 'देखलिया गोडीच्या ठाया सोके' हाहि एक त्याचा गुण आहे. त्यामुळें कधीकाळी एकादे निमिष जरी प्रसन्नता त्याला साधनकाळांत लाभली तरी मनाला वळण लागण्याच्या दृष्टीनें ती उपयोगी ठरते म्हणून केवळ शारीरिक पातळीवरच्या क्रियाहि प्राथमिक अवस्थेंत उपयोगी पडतात. त्या आचरीत असतांना प्रेम आणि प्रसन्नता उत्पन्न झाली पाहिजे. ती अद्याप झाली नाहीं एवढी जाणीव ठेवून साधक नित्यनेम आचरूं लागला तरी त्याला लाभ होईल. आरंभी न जाणवण्याइतकी मंद गतीची प्रगतीहि पुढें त्वरेने होऊं लागेल, म्हणून नित्यनेमानें चढत्या वाढला पद्धतीने साधना करीत राहावे असें समर्थांना सांगावयाचें आहे.

हे सर्व ऐकले, वाचले म्हणजे माणूस एक प्रश्न विचारतो कीं मग प्रपंच केव्हां करावा ? खरे म्हणजे हा प्रश्न प्रामाणिक नसतो परमार्थांचें खरे आकर्षण नसते आणि विषयोपभोगाचा लोभ सुटत नाहीं. अशा परिस्थितींत स्वतःच्या वागण्याच्या समर्थनासाठी असे प्रश्न विचारले जातात. व्यावहारिक क्षेत्रामध्येंहि सेवेचे म्हणून कांहीं नियम असतात. चतुर्थश्रेणीच्या सेवकापासून ते श्रेष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यापर्यंत शासकीय क्षेत्रे, कार्यालये, उद्योगशाळा, सेना, विद्यासंस्था इत्यादि क्षेत्रांत माणसे कामे करीत असतात. कांहीं संस्थांमध्ये आजीव सेवक असेंहि एक कार्याचें स्वरूप असते. आणि या सर्व कार्यक्षेत्रांचे विशिष्ट असे नियम असतात. सैन्यामध्ये तर हे नियम अधिक कडक असतात व त्यांचें पालनहि कांटेकोरपणें करावें असे अनुशासन असतें. आतां हे सर्व करीत असतांना खाणे पिणे, बायकामुले, हौस, करमणूक या गोष्टी नियमाचे पालन प्रामाणिकपणें करणारा मनुष्य करूं शकत नाहीं असें आहे काय ? व कोणत्याहि सेवकाने हे कांहीं करूं नये अशी अपेक्षा नियम घालणाराची अपेक्षा असते काय ?

अगदीं कर्तव्यदक्ष, प्रामाणिक सेवकहि बायकामुलांच्यामध्ये रंगू रमू शकतो. खाणे पिणे तर जीवनाकरितां अपरिहार्य गोष्ट असते. त्यांतहि त्यांचा कांहीं वेळ जातो. मन रमविण्यासाठी तो कांहींहि करीत नाहीं असेंहि नाहीं. आणि हें केल्यामुळे त्याच्या कर्तव्यदक्षतेंत व प्रामाणिकपणांत अंतर येतें असेंहि नाहीं. केव्हां तरी कसोटीचे क्षण उभे राहतात आणि मग प्रामाणिक निष्ठेची परीक्षा होऊन जाते. ' आधी लग्न कोंडाण्याचें आणि मग राटाबाचे' असें वीरवर तानाजी मालुसरे म्हणाले. दुर्दैवाने ही कसोटी फार कठोर ठरली. तरी तानाजीने माघार घेतली नाहीं. पण तानाजीलाहि बायकामुले होती. घर-कारभार होताच. तेव्हां प्रपंचाला वेळ कुठला काढावा हें म्हणणे व्यर्थ आहे.

देवाने डोळे दिले आहेत तर पाहूं नये, नाक आहे तर वास घेऊं नये असें कोण म्हणतो ? पण पाहिलें कीं ते हवें वाटतें, मलाच पाहिजे असें वाटतें, आणि इतराच्यापेक्षा वेगळेपण सिद्ध करण्यासाठीं तें केवळ माझ्याजवळच असावें, दुसऱ्या कोणाजवळ नसावे असें वाटतें. आणि याचाच आग्रह निर्माण झाला कीं मग ते मिळविण्याच्या मार्गातली न्यायनीति पार लयाला जाते, शक्तीच्या आणि परिस्थितीच्या अनुकूलतेच्या प्रमाणांत हें घडते आणि पुरेशी शक्ति नसेल व परिस्थिति प्रतिकूल असेल तर मनाचा जळफळाट होतो. परमार्थाला केवळ प्रपंच बाधत नाहीं तर आसक्तीमुळें निर्माण होणाऱ्या या गोष्टी बाधतात. ममत्व, आसक्ति हे भाव कार्याला कदाचित् प्रेरणा देत असतीलहि पण त्यामुळे कौशल्याचा घात होतो हे निश्चित. अत्यंत कुशल शस्त्रवैद्यहि आपल्या मुलावर वा पत्नीवर शस्त्रकर्म करण्याचें टाळतो यावरून ममत्व हे कौशल्याला कसें बाधक असते हें लक्षांत येईल. म्हणून समर्थ तिसऱ्या ओळीत तत्त्वतः उदासीनता हीच सार आहे असें सांगतात. उदासीनता म्हणजे अलिप्तता, तटस्थता. ही खऱ्या अर्थाने प्राप्त करून घेणे हेच परमार्थाचे श्रेष्ठ साधन आहे. मनुष्य प्रापंचिक गोष्टींविषयी जो जो अनासक्त होत जाईल, तो तो परमार्थांविषयीची त्याची भक्ति वाढत जाईल. आसक्ति, ममता उणावली कीं, मन मोकळे होईल आणि मग जें जें साधन तो करीत असेल, वा जी जी कृति तो आचरीत असेल त्याचें ओझे त्याला वाटणार नाहीं. दडपण बहुधा कृतीचे नसतें. दडपण असतें ते आसक्तीचे. आणि म्हणून समर्थ उदासीन व्हावें, अनासक्त व्हावें, अलिप्त व्हावें, निर्मम व्हावें, म्हणजे मन मोकळे होते असे सांगतात.

नको वासना वीषयीं वृत्तिरूपे । पदार्थी जडे कामना पूर्व पापे ॥
सदा राम निःकाम चिंतीत जावा । मना कल्पना लेश तो ही नसावा ॥ ५८ ॥

मन मोकळे होण्यासाठी उदासीनता साधावी असें मागील श्लोकांत सांगितलें आहे. उदासीनता साधण्याचा उपाय समर्थ या श्लोकामध्ये दाखवीत आहेत. विषयाचा प्रत्यक्ष उपभोग मनुष्य सातत्याने फार काळ घेऊं शकत नाहीं. इंद्रियांना तें सामर्थ्यहि नाहीं. सातत्याने उपस्थित असतात त्या वासना किवा विषयाकारवृत्ति. त्यांचा त्याग करावा, उपभोगलालसा सोडावी, उपभोगकालीं झालेल्या सुखा जें स्मरण चित्ताला चिकटून असतें त्यातूनच पुन्हा पुन्हा वृत्ति तदाकार होते व वासना उत्कट होऊन शरीराच्या पातळीवर उतरतात म्हणून वृत्तीचा त्याग करावा. पूर्वी घडलेल्या पापांतून म्हणजे अनवश्यक आणि अनिष्ट क्रियेतून मनामध्ये विषयासंबंधी कामना उत्पन्न होतात. पूर्वी घडून गेलें आहे तें जन्मजन्मांतरीचे असेल किंवा या जन्मीचे असेल पण कांहीं झालें तरी कामना-निर्मितीच्यापूर्वी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा क्रियात्मक संस्कार असावाच लागतो आणि असें आहे म्हणून तर योग्य त्या पद्धतीच्या क्रियांच्या अभ्यासानें मनाला आवरणे वा वळण लावणे शक्य कोटीत येऊ शकते. यासाठी रामाचे चिंतन निष्कामभावनेने करावे. नामस्मरण-पूजापाठादि उपासनांच्या मागें कोणतीहि कामना नसावी. उपासनेचे रूप नवसाचे नसावे किवा त्याकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचें पूरक म्हणूनहि तें असूं नये. अगदीं पहिल्याच पायरीवर पूर्ण निष्कामता शक्य वाटली नाहीं तरी इच्छा करतांना अधिकाधिक उन्नत, उदात्त अशा गोष्टींच्या प्राप्तीची करीत जावी आणि शेवटीं शेवटीं तर कांहीं पुण्य लागावे, कांहीं साक्षात्कार घडावा, कांहीं प्रसन्नता चित्ताला प्राप्त व्हावी हीहि अभिलाषा सोडून द्यावी. तसें झाले नाहीं तर त्या कामवासनांची उतरती भांजणी सुरू होते. यासाठी' कल्पनेचा लेशहि कोणत्याहि प्रकारच्या कामना, वासना, अभिलाषा यांचा लहानसा अंशहि मनामध्ये येणार नाहीं असें व्हावें. कल्पना ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत असें व्हावें वा असें होऊं नये या प्रकारचीच असते. जें जे होईल तें तें अलिप्ततेनें, केवळ साक्षीभावानें पाहत राहिलें कीं निर्ममता, तटस्थता, उदासीनता साधू लागते.

या प्रगतीचा वा विकासाचा निश्चित क्रम गणितागत पद्धतीने सांगतां येणार नाहीं. एकदा मोठा दगड फोडण्यासाठी घातलेले घणाचे घाव प्रत्येक आघातानिशीं परिणाम करीत असले तरी दगड फुटण्याची क्रिया ही शेवटच्या घावाने एकदम घडल्यासारखे दिसते. तसेंच या साधनेतही होते. केव्हां तरी हवें नको एकदम संपून जातें. अस्वास्थ्य गळून पडते. प्रसन्नतेची उषा आपल्या सर्व सौदर्यानिशी अंतःकरणाच्या क्षितिजावर अचानक डोकावते, जीवन साधनेने, संतोषानें उजळून निघते.

विषयोपभोगाचे ज्याचें चिंतन सुटले त्याला मग कोणत्याहि परिस्थितीत आनंदी राहता येते. त्याच्या डोक्यावर कोणतेंहि ओझे नसतें, मनावर कोणतेंहि दडपण नसतें, कोणताहि भार त्याला वाहावाच लागत नाही आणि अशा स्थितींत तो क्वचित शरीराने श्रमला तरी मनाने कष्टत नाहीं. समर्थ कल्पनालेशहि नसावा म्हणतात ते यासाठींच .

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनीं कामना राम नाही जयाला । अती आदरें प्रीति नाही तयाला ॥ ५९ ॥

प्रत्यक्ष साधन काहीहि न करतां, मनाला परमार्थाची ओढ लागलेली नसताना, नुसत्या कल्पना करीत बसून ईश्वरप्राप्ति होणार नाहीं. जप-पूजा-अनुष्ठानादि कांहीं क्रिया, इंद्रियांचा संयम, कामक्रोधादि विकारांचा आवर, श्रद्धा, प्रेम- भक्तीची वाढती उत्कटता, धैर्य, तितिक्षा आणि या सर्वांसाठी अवश्य असणारी निष्ठा व सातत्य यांचा अवलंब केला तरच परमार्थमार्गांमध्ये पाऊले पुढे पडत जातात. हें करीन, तें करीन असे नुसते म्हणत राहणे वा उलट बाजूने याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग म्हणणे; हे दोन्हींहि कल्पनेचेच भाग होत. प्रत्यक्ष आचरणापासून मनुष्य त्यामुळें दुरावतो आणि मग कितीहि काळ लोटला तरी परमार्थ साधत नाहीं. ईश्वराची भेट होत नाहीं. "केल्याने होत आहे रे । आधी केलेंच पाहिजे ! !" हेंच शेवटीं एकमात्र साधन आहें. प्रयत्नालाच परमेश्वर समजावे आणि अंतःकरणामध्ये काहीतरी चांगलें धरून उद्योगास लागावे तरच प्रगतीची आशा आहे. अन्यथा जन्मामागून जन्म आणि युगामागून युगे लोटली तरी मनुष्याचा उद्धार होत नाहीं. त्याला कल्याण लाभत नाहीं. तेव्हा परमार्थ साधावा, ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, मनाची प्रसन्नता वाढावी असें वाटत असेल तर शेखमहंमदी कल्पनांचा त्याग करून प्रत्यक्ष आचरण करावयास लागले पाहिजे. शास्त्रनिष्ठा न सोडताहि माणसाला आपल्या प्रकृतीप्रमाणे आणि आवडीप्रमाणें साधना स्वीकारणें शक्य आहे. त्या शक्यतो सात्त्विक असाव्या एवढीच काळजी घ्यावी. साधनेचा उद्देश सात्त्विक नसेल तर साधनही सात्त्विक राहत नाही आणि माणूस मग मनोरथपूर्तीच्या वा सिद्धीच्या पाशांत सापडून तंत्रमार्गाचा अवलंब करतो, वाममार्गास लागतो. त्यांतून कदाचित् कांही सिद्धी, कांही चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईलहि, कामनापूर्तीच्या या रस्त्याने खरा अध्यात्मिक लाभ होणार नाही. महंती वाढेल पण रामाची भेट होणार नाही. ईश्वरी साक्षात्कार लाभणार नाहीं. मनामध्ये काम आणि राम एकत्र राहूं शकणार नाहीत. अंतःकरणांत कामना धरून व्रताचरण करणाऱ्या माणसाचे प्रेम, जें मिळवावयाचे आहे त्याच्यावर म्हणजेच पर्यायाने स्वतःच्या स्वार्थावर असते; तो त्याच्या अहंकाराचाच एक आविष्कार असतो; आणि मग ईश्वरालाहि तो कामपूर्तीचे साधन मानतो. परमार्थमार्गामध्यें जे प्रेम असावें लागतें तें निष्काम असावे लागतें. ज्याचें ईश्वरावर प्रेम असतें, ईश्वराविषयी ज्याच्या मनांत खरोखरीच आदरभाव असतो, त्याला स्वार्थासाठी ईश्वराला वेठीला धरणे कधीहि मानवत नाहीं. प्रेम आणि स्वार्थ या दोन भावना उजेड आणि अंधाराइतक्या परस्परविरुद्ध आहेत. ईश्वराला वश करतां येते तें प्रेमाच्या बळावर. ईश्वराला ओढ असते ती शुद्ध प्रेमाची. तें प्रेम ज्याच्या अंतःकरणांत नाही, अर्थांतच जे अंतःकरण कामनांनी बरबटले आहे, तें ईश्वरभेटीला पात्र होऊंच शकत नाहीं.

मना राम कल्पतरू कामधेनु । निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥

कल्पनेचा निरास केला पाहिजे, कामनांचा त्याग केला पाहिजे, हें सर्वार्थानें साधावयाचे तर त्यासाठीं कांहीं आलंबन स्वीकारावे लागतें. खरी पतिव्रता निष्काम होते, पतीवर केवळ जीवाभावानें प्रेम करते, कोणतीहि अपेक्षा न ठेवता त्याच्यासाठी केवळ सर्वभावाने राबत राहण्यांत तिला सार्थक वाटतें. पण हें घडावयासहि आधी लग्न व्हावे लागते, पति वरावा लागतो, आणि त्यांतहि तो समर्थ आणि सदगुणी लाभला कीं शालीन कुलवतीला पातिव्रत्याचा महिमा प्राप्त करून घेणे अधिक सोपे जातें. समर्थ त्या दृष्टीनें रामचंद्राची भक्ति करा असें सांगत असतांना, निष्काम भावनेने ईश्वरोपासना करा असा आदेश देत असतांना, प्रेमादरानें भक्तिमार्गाला लागा असे उपदेशीत असतांना ज्याची उपासना करावयाची तो रामचंद्र, परमेश्वर, किती थोर आहे ते या श्लोकांत सांगत आहेत.

कामना ठेवू नका असें सांगत असतांनाच रामचंद्र कसा भक्त कामकल्पदुम आहे तें समर्थ सांगतात. यामध्यें कोणतीहि विसंगति नाहीं. येणाराचे आतिथ्य करावें अशी शक्ति गृहस्थामध्ये असलीच पाहिजे. पण चांगले आतिथ्य होतें म्हणूनच कोणी येत राहील तर संपन्न गृहस्थाची भावना काय होईल तें लक्षांत घेतलें म्हणजे रामभक्तींत कामना नसावी आणि राम भक्त कामकल्पदुम आहे या गोष्टी सांगण्यामध्ये विरोध वा विसंगति कसी नाही' हे लक्षांत येऊ शकेल. पतिव्रतेने पतिसेवेत कोणतीहि कामना धरू नये तरच ती पतिव्रता असें जें सांगितलें जातें तें खऱ्या पातिव्रत्याच्या आदर्शासाठी. पति हा सर्वप्रकारानें दुबळा असतो म्हणून नव्हे. धर्मशास्त्रानें, ज्याला वरावयाचें तो कोणत्याहि प्रकाराने दुबळा असणार नाही याची काळजी घ्यावी, असें आवर्जून सांगितलें आहे. विवाह संबंध जोडतांना ती एक महत्त्वाची अट आहे. तोच नियम परमार्थमार्गातहि लागू आहे.

ईश्वराची समर्थता सांगतांना रामदासस्वामी म्हणतात 'राम हा कल्पतरु आहे, कामधेनु आहे, चिंतामणि आहे, अपार ऐश्वर्यांचा साठा आहे आणि त्याचें स्वरूप सर्वात महत्त्वाचे, सर्वात श्रेष्ठ असें आहे. ' जें जे कांहीं घडते, जें जें काहीं प्रत्ययाला येतें तें तें सर्व ईश्वरी सत्तेमुळेंच होतें. तेव्हां आता सर्वभावानें त्यालाच शरण जावे हेंच श्रेयस्कर नाहीं काय ? निरनिराळ्या इच्छांच्या पूर्तीसाठीं, निरनिराळी माध्यमे हुडकीत जाणें याची आता काय आवश्यकता आहे ? एका ईश्वरोपासनेंतच ही सर्व माध्यमे, साधनें समाविष्ट आहेत. ईश्वराच्या योग्यतेचें, रामचंद्राशी ज्याची तुलना करतां येईल, असें कोणतेंहि माध्यम त्रिभुवनांत नाहीं. ईश्वराच्या प्राप्तीनेंच जर सर्व सुखे सर्वकाळ भोगता येत असतील तर मग निरनिराळ्या सुखांच्या कल्पनेने त्याच्या प्राप्तीसाठीं इकडे तिकडे धावाधाव करण्यात काय अर्थ आहे ? सुख मिळेल या कल्पने सत्ता, संपत्ति, कीर्तीच्या मागे लागून प्रसन्नतेच्या दृष्टीनें अपयशाशिवाय दुसरे काहीहि पदरांत पडत नाहीं. याचा अनेकवेळा अनुभव प्रपंचामध्ये येत असतो. यांतील आपलें कोणी नाहीं, कसोटीच्या वेळीं कुणी टिकत नाहीं, असेंहि वारंवार अनुभवास येतें. विषयासंबंधीच्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्या विषमोपभोगातून अहंकार आणि आसक्ति वाढते. विषयोपभोग मिळाला नाहीं तर त्यामुळें संताप वाढतो आणि खिन्नता येते. यांत पुन्हा विविधतेचे आकर्षण भर घालते तें निराळेंच. या सर्व आपत्तीतून सुटण्यासाठी एका रामचंद्रालाच शरण जाणें हेंच उत्तम .

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP