श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण

॥ श्रीराम समर्थ ॥

महा भक्त प्रल्हाद हा कष्टविला । म्हणोनी तया कारणें सिंह झाला ॥
न ये ज्वाळ वीषाळ संन्नीध कोण्ही । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥

मागील ९६ व्या श्लोकांत प्रल्हादवरद नरसिंहाची कथा सविस्तरपणें सांगण्यांत आलीच आहे. प्रल्हादासंबंधी एक गोष्ट तेथें उल्लेखिण्याची राहिली. प्रल्हादाला महाभक्त असें समर्थांनी कां म्हटलें तें तेथें सांगितलें आहे. येथे प्रल्हादाला महाभक्त म्हटलें आहे. प्रल्हादाचे अलौकिक मोठेपण असें कीं त्यांनी भगवान् नरसिंह प्रसन्न झाले असतांना आपल्या एकट्याच्या उद्धाराची अपेक्षा केली नाहीं. ते म्हणतात-भगवान् ! सगळेच जण मोक्षाच्या अपेक्षेनें साधना करतात. माझी एकट्याने मुक्त होण्याची इच्छा नाहीं. संसारसुखाच्या मोहांत गुरफटून तुला अंतरलेल्या या दीन जनांचाहि उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. "नैतान् विहाय कृपणान् विमुमुक्षु एकः " या अपार करुणेमुळेच प्रल्हाद महाभक्त ठरले. श्रीतुकाराम महाराजांनीहि "बुडत हे जन देखवेना डोळा । म्हणून कनवळा येतो मज । " असेच म्हटलें आहे. संतांच्या हृदयाची ही विशालता, ही उदारताच त्यांच्या असामान्य मोठेपणाचे कारण आहे.

कृपा भाकितां जाहला वज्रपाणी । तयाकारणें वामनु चक्रपाणी ॥
द्विजांकारणें भार्गव च्यापपाणी । उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥

बली हा पराक्रमी असुर राजा, विरोचनाचा पुत्र आणि भक्ताग्रणी प्रल्हादाचा नातू होता. प्रल्हादाच्या संस्कारामुळे कदाचित् तो वृत्तीनें धार्मिक असला तरी तसा तो उदार आणि निष्काम भक्त नव्हता असें दिसते. यज्ञयागादि धार्मिक कृत्यांनी सामर्थ्य मिळवावे आणि त्याचा उपयोग सत्ता-संपत्ति मिळविण्याकडे करावा असें त्यांचें धोरण होते. त्यानें एकदां इंद्रपदाची अभिलाषा धरून मोठे यज्ञसत्र मांडले. तेव्हां घाबरलेल्या इंद्राने भगवान् विष्णूंची प्रार्थना केली आणि बलीपासून माझें रक्षण करा असें विनविले. त्याप्रमाणें विष्णूंनी, कश्यप-अदितीच्या पोटी वामन रूपानें अवतार घेतला आणि ते बटूच्या वेषांत यज्ञमंडपात उपस्थित झालें. बलीने त्यांचा सन्मान करून अर्घ्यपाद्य अर्पण केले आणि दान मागण्यास सांगितले. त्या तेजस्वी ब्रह्मचाऱ्याने तीन पावलें भूमि मागितली. बलीला ती हास्यास्पद वाटली तरी बटूच्या आग्रहामुळे त्यानें त्रिपाद भूमीचे उदक सोडले. शुक्राचार्यांनी यांतील धोका ओळखून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलें नाहीं. हातावर उदक पडताच वामनाने विराट रूप धारण केले. पहिल्या पावलाने सर्व पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने द्युलोक व्यापला आणि तिसरे पाऊल कुठे ठेवावे अशी पृच्छा केली. बलीने सर्व जाणले आणि त्यानें स्वतःचें मस्तक पुढें वाकवून तेथें तिसरा पाय ठेवण्यास सांगितलें. बली शेवटीं प्रल्हादाचा नातूच होता. विष्णू प्रसन्न झाले व पुढील मन्वन्तरी तूं इंद्र होशील असा वर देऊन त्यास पाताळांत नेले आणि विष्णू स्वतः बलीचे द्वारपाल होऊन राहिले असेंहि वर्णन येतें. आजच्या राज्यकर्त्यांप्रमाणें आपल्या माणसांना संतुष्ट करण्यासाठीं अधिकारपदे वाढविण्याचे तंत्र देवाने वापरले नाहीं. नाहीं तर त्यालाहि आतां जसे दोन उपपंतप्रधान, त्याप्रमाणें दोन इंद्र नेमून दोघांनाहि संतुष्ट करतां आलें असतें. पण ईश्वरी राज्य न्यायाने चालते, तेथें कोणाच्या तरी स्वार्थासाठीं घटनेत पालट केला जात नाही. ईश्वरानें इंद्राचेंहि रक्षण केलें आणि बलीचेंहि शेवटीं कल्याणच झालें. कोणत्याहि पातळीवरच्या भक्ताची उपेक्षा होत नाहीं ती अशी. मग तो भक्त आर्त असो कीं अर्थार्थी असो. कोणत्याहि अवस्थेतील भक्तिभाव हा श्रेयस्करच आहे. सत्ता-संपत्तीनें उन्मत्त झालेल्या क्षत्रिय राज्यकर्त्यांनी शांत-तपस्वी अशा विद्याव्यासंगी ब्राह्मणांवरहि अनन्वित अत्याचार केले. त्यांच्या पारिपत्यासाठी भगवान् विष्णूने जमदग्नीच्या पोटीं परशुरामरूपानें अवतार घेतला. उन्मत्तांचा संहार केला. ही कथा प्रसिद्ध आहे. दुर्देवाने या परशुरामकथेचें अलीकडे फार विकृतीकरण झालें आहे. कुणी त्याला ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय अशा जातीयवादाचे रूप दिलें, तर कोणी परशुरामाच्या कृत्यांचें, राक्षसीवृत्तीने घेतलेला आंधळा अविवेकी सूड, असें मूल्यमापन केलें. या दोन्हीं प्रकारचे वर्णन ही विकृति आहे, अतिशयोक्ति आहे. परशुरामाचा पराक्रम वर्णन करण्याच्या मागे, ब्राह्मणांचा विशेषतः भृगुवंशीयाचा जातीय अहंकार असता तर, पुढें क्षत्रिय रामाने ब्राह्मण परशुरामाचा पराभव केल्याचे वर्णन परंपरेत सन्मान पावलें नसतें, ब्राह्मण कवींनींहि रसाळपणे गायिले नसतें. संतकवी श्रीतुलसीदासांनीं आपल्या "रामचरित मानस" या अत्यंत लोकप्रिय असलेल्या महाकाव्यांत हा प्रसंग फार रसाळपणे वर्णन केलेला आहे. असें असतांना परशुरामाच्या कृत्याला एक सूडाचा प्रवास म्हणावें हें अविवेकाचे आहे. राष्ट्रीय पातळीवर सोशिकपणा हा दुर्गुण आहे. अन्यायाचा प्रतिकार आपल्या सर्व शक्तीनिशी उग्रपणानें केला पाहिजे. त्या दृष्टीनें आक्रमण हेंच खरे संरक्षण आहे असें ज्यांचें मत आहे, त्या संपादकांनीहि परशुरामाविषयीच्या या विकृत दृष्टिकोनाला प्रसिद्धी द्यावी हें न समजणारे आहे. भाविकांनी पुराणकथेतील इतिहास विकृत केला असें म्हणाऱ्या बुद्धिमंतांनी नवीन दृष्टिकोन व संशोधन या नांवाखाली प्रसिद्ध होणाऱ्या प्राचीन घटनांच्या आणि व्यक्तींच्या घातक विकृतीकरणाचा खरें म्हणजे खरपूस समाचार घ्यावयास हवा होता. पण तसें झालें नाहीं. परंपरेनें मान्य असलेल्या प्राचीन मूल्यांवर तर्क आणि न्याय गुंडाळून आघात करणें हेंच जणू बुद्धिमतेचें आणि प्रगत विचारांचें गमक ठरलें आहे. घरामध्ये ढेकूण आणि पिसवा फार झाल्या असल्या तर त्यांचा नाश करण्यासाठी तीक्ष्ण औषधें फवारावींत, पण घरच पेटवून देणे शहाणपणाचे नाही ही गोष्ट प्रगतीपर विचारांचे आधुनिक बुद्धिमंत लक्षांत घेतील तर बरे. समर्थांसारख्या राष्ट्रीय विचाराने भरलेल्या, समाजकल्याणाची तळमळ असलेल्या, निःस्पृह महापुरुषाला सतत शस्त्र उगारून उभा असलेला परशुराम आदरणीय वाटतो आणि देव भक्ताची उपेक्षा करीत नाहीं, या संदर्भांत उल्लेखनीय वाटतो हें फार महत्त्वाचे आहे. स्वच्छ मनाने आपण तें समजून घेतलें पाहिजे.

अहिले सतींलागि आरण्यपंथें । कुढावा पुढें देव बंदी तयातें ॥
बळें सोडितां घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२३ ॥

इंद्राच्या संसर्गानें भ्रष्ट झालेल्या, गौतमपत्नी अहलेच्या उद्धारासाठी रामचंद्र अरण्यातील तिच्या निर्मनुष्य आश्रमामध्यें आवर्जून आले आणि तिचा उद्धार केला अशी कथा आहे. ती सर्वांना परिचित आहे. मागे ३२ व्या श्लोकांत हा उल्लेख आला आहे.

रामचंद्राने रावणाच्या बंदीतून देवांना सोडविले. या प्रसंगाचा उल्लेखहि ३१ व्या श्लोकांत आहे. ईश्वराच्या भक्तसंरक्षक या ब्रीदाचा सर्व इतिहासपुराणांतून जणू डंका वाजतो आहे. हें जाणून माणसाने तो आपली उपेक्षा करणार नाही या भरंवशानें भक्तिमार्गाला लागावे.

अनेक ठिकाणीं या श्लोकाचा चवथा चरण "नुपेक्षी कदा राम दासाभिमानी" असा आलेला आहे. कांहीं ठिकाणीं तर हें सर्व प्रकरणच उपेक्षी कदा राम दासाभिमानी या २८ ते ३७ येथें एकवार येऊन गेलेल्या पालुपदानेच आलेले आहे. समर्थांना केवळ रामावताराचें नव्हे तर परमात्म्याचेंच भक्ताची उपेक्षा न करण्याचें ब्रीद आहे असें सांगावयाचे असल्यानें या प्रकरणांत त्यांनी राम हे विशिष्टतावाचक नांव टाळून देव हें सर्वसाधारण ईश्वरवाचक नांव स्वीकारले आहे. या संदर्भांत येथें रामावतारातील घटनेच्या वर्णनापुरतें "नुपेक्षी कदा रामदासाभिमानी" हें पालुपद घेणे म्हणजे राम हा ईश्वरापेक्षा कुणी वेगळा आहे असें समर्थांना वाटत असल्याचा अपसमज गृहीत धरणे आहे. तसा संभव राहूं नये म्हणून 'नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी' हेचे पालुपद स्वीकारणें बरें असें मला वाटतें.

तये द्रुपदीकारणें लागवेगें । त्वरे धांवतु सर्व सांडूनि मागें ॥
कळीलागि जाला असें बोध्य मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४॥

आर्त भक्तीचा आदर्श म्हणून द्रौपदीचे चरित्र लक्षांत घेतलें पाहिजे.

मोहाला बळी पडून युधिष्ठिर कौरवाच्या सभेतील कपटद्युतांत डावामागून डाव हरला. वैभव, राज्य गेलें. द्युतांत भावांना आणि स्वतःला पणाला लावून तो हरला. पांडव कौरवांचे दास झाले. द्युताचा अभिनिवेश आतां युधिष्ठिराच्या डोक्यांत चढला होता. शकुनीने खिजवल्यामुळें त्यानें साध्वी द्रौपदीलाहि पणाला लावले आणि तो पुन्हा हरला. दुर्योधनाचा उन्मत्तपणा आता शिगेला पोचला होता. कुत्सित भाषण करून, कर्णाने अधमपणानें त्यांत भर घातली. रजस्वला, एकवस्त्रा, द्रौपदी फरफटत ओढून सभेत आणली गेली. स्वसंरक्षणासाठीं द्रौपदीने बुद्धिवाद केला. पण त्या तेजस्विनीचे चातुर्य निष्फळ ठरलें. भीष्म-द्रोण उत्तर देऊं शकले नाहींत. विदुराचे आणि विकर्णाचें भाषण अरण्यरुदन ठरलें. धर्मपाशानें हात बांधले गेलेले पांडव खालीं माना घालून बसलेले होते. नराधम दुःशासन वस्त्राला हात घालून खेंचू पाहत होता. तेव्हां खाटकाच्या सुऱ्याखाली गाय हंबरावी, तशी द्रौपदी हंबरली. अगतिक होऊन अनन्यभावानें तिने कृष्णाचा धावा केला. "गोविन्द द्वारकावासिन् कृष्ण गोपीजनप्रिय । कौरवैः परिभूतां मां किं न जानासि केशव ॥ हे नाथ हे रमानाथ व्रजनाथार्तिनाशन । कौरवार्णवमग्नां मामुद्धरस्व जनार्दन ॥ कृष्ण कृष्ण महायोगिन् विश्वात्मन् विश्वभावन । प्रपन्नां पाहि गोविन्द कुरुमध्येऽवसीदतीम् ॥ भगवान् धांवत आले आणि जणू त्यांनीं वस्त्रावतार धारण केला. अगणित वस्त्रे द्रौपदीला पुरविली. वस्त्रे ओढता ओढता थकलेला दुःशासन शेवटीं गलितगात्र होऊन कोसळला. द्रौपदीचे रक्षण झालें. "हा अंबरावतार श्रितलज्जारक्षणार्थ अकरावा । प्रभुमत असे सदवनीं आग्रह वेषीं कदापि न धरावा" ॥ असें पंडितांनी केलेलें वर्णन अगदी यथार्थ आहे. नंतर आतां कलियुग लागलें असल्यानें ईश्वर बौद्धावतार धारण करून मौन घेऊन बसला आहे. कलियुगामध्ये भक्तींतील दांभिकपणा वाढला, निष्ठा उणावली, उत्कटता उरली नाहीं, म्हणून देव मौनी झाला आहे असे वाटतें. वस्तुतः भक्तांचा ईश्वर होता तसाच आहे "पालिता गोपसुंदर्यः स कृष्णः क्वापि नो गतः " असें एक वचन आहे तें आशयाच्या दृष्टीनें यथार्थ आहे. गोपींचा कृष्ण, भक्तांचा कृष्ण कुठे गेला नाहीं. तो आहेच. भक्तांकरितां तसाच दक्ष आहे. आपली भक्ति अव्यभिचारी नसते, पतिव्रतेच्या निष्ठेची नसते, म्हणून अनुभव येत नाही. परीक्षा व्हावी लागते. परीक्षेला उतरावे लागते. तेव्हां देव पावतो. शासनाकडून अनुदान मिळवावयाचें असेल तर मान्य कक्षेतील योजना नीट आखून विनंति करावी लागते तरी दोन दोन वषें उत्तर येत नाहीं. एकाने असें कां याची चौकशी केली तेव्हा सचिवाने सांगितलें-अहो ! पोकळ फसव्या योजना अलीकडे फार येतात. तेव्हां स्थळी प्रकरणे सगळ्या दृष्टीनें नीट पारखून घ्यावी लागतात म्हणून वेळ लागतो. तुमची विनंति प्रामाणिक आहे असें आढळून आलें आहे. लौकरच मार्गी लागेल, चिंता करू नका. तात्पर्य, मौन धारण केले असेल तर तो परीक्षा पाहतो आहे असें समजावे. पण भूमिका प्रामाणिक असेल तर दुर्लक्ष होते हे भय बाळगण्याचें कारण नाहीं. देव आपल्या भक्ताची कधीं उपेक्षा करीत नाहीं असा दृढ विश्वास साधकाने बाळगावा.

समर्थांनी या दृष्टीनें या दहा श्लोकांच्या प्रकरणांतून निरनिराळ्या स्वरूपाची उदाहरणे देऊन, अवतारकार्यांतील घटना सांगून भगवंताची भक्तवत्सलता पुन्हा पुन्हा गौरवून सांगितली आहे.

अनाथां दिनांकारणें जन्मताहे । कलंकी पुढें देव होणार आहे ॥
जया वर्णितां सीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥

अशारीतीने भगवंतांनी आजवर दीन-अनाथांच्या रक्षणासाठी अनेक अवतार घेतले आहेत. दहा अवतार प्रसिद्ध आहेत. त्यांतील नऊ झाले आहेत. कल्की किंवा कलंकी हा दहावा अवतार अजून व्हावयाचा आहे. तो कलियुगाच्या शेवटीं शेवटीं होईल असें म्हणतात. त्यात आर्य-संस्कृतीच्या, वैदिक संस्कृतीच्या विरोधी असणाऱ्या, स्वैराचारी, अनाचारी, अत्याचारी म्लेच्छांचा नाश भगवंत करतील आणि मग पुन्हा सत्ययुगाला आरंभ होईल. भगवंताचे हें उज्वल चरित्र, अलौकिक सामर्थ्य, षड्गुणैश्वर्य वर्णन करणें व्यासांसारख्या अलौकिक प्रज्ञेच्या आणि प्रतिभेच्या महापुरुषालाच काय, पण वेदांनाहि साधणारे नाहीं, तेव्हां श्रुति-स्मृति-संतांनी जें सांगितलें आहे त्यावर विश्वास ठेवावा आणि सन्मार्गानें, भक्तिमार्गानें चालावे देव त्याची कधीं उपेक्षा करणार नाहीं.

जनाकारणें देव लीळावतारी । बहूतां परी आदरें वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्म्यें महां नष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥

परमेश्वर अवतार घेतो तो भक्तासाठी, जनकल्याणासाठीं, लोकांच्या उद्धारासाठीं. त्याच्या ठिकाणीं कसली उणीव नाहीं, त्याला कसली अडचण नाहीं, त्याला कशाची अपेक्षा नाहीं. तो सर्वार्थाने पूर्णकाम आहे. तरी अनन्य भक्ताची, अव्यभिचारी भक्ताची, ज्ञानी भक्ताची त्याला ओढ आहे. भक्तांचा योगक्षेम वाहणे हें त्याचें व्यसन आहे. संतांचे संरक्षण आणि धर्माचें संस्थापन हें त्यानें आपलें कर्तव्य म्हणून ठरविलें आहे. भक्तजनांसाठी तर भगवान् वेडा होतो. ज्ञानोबाराय म्हणतात- "तो पाहवा हे डोहळे । म्हणून अचक्षूंसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पूजूं तयाते ॥ दोनीवरी दोनी । भुजा आलों घेऊनि । आलिंगावयालागुनी । तयाचे आंग ॥" (ज्ञा. १२ | २२३ - २४) अशी भगवंताची स्थिति असते. श्रीनामदेव, चोखोबाराय, जनाबाई, दामाजी, एकनाथ इत्यादि संतांच्या चरित्रामध्यें ईश्वराची भक्ताविषयींची ही ओढ, हें वात्सल्य, हा जिव्हाळा अनेक रूपांनी प्रगट झाला आहे. " तयाचें आम्हा व्यसन । तो आमुचें निधिनिधान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥ ' (ज्ञा. १२ । २३७) असें भगवंताचे म्हणणें ज्ञानेश्वर माऊलींनी उद्‌धृत केले आहे. तें अनेक स्थळी, प्रकारांनीं वारंवार, साक्षात्कारास आले आहे. भगवंताची तीहि एक लीलाच आहे. त्याला कोणत्याहि रूपाने प्रगट होण्याची आणि भक्तासाठी कोणतीहि कामे करण्याची जणू हौस असते. "संतसंरक्षणार्थांय संभवामि क्षणेक्षणे । !" असे माझा ज्येष्ठ बंधु तुकाराम याने गीतेचे अनुकरण करीत म्हटलें आहे तें मोठे मार्मिक आहे.

माणकोजी बोधल्यांचे शिष्य गोपालनाथ यांची परीक्षा पाहण्यासाठी तो वाघाच्या रूपानें प्रगट झाला. जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत (ज्ञा. १० | ११८) या अवस्थेंत नामदेवराय आले कीं नाहींत हें पाहण्यासाठी श्वानरूपानें त्यानें गाकर पळविले. नाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून राबला. दामाजीसाठी महाराच्या वेषाने गेला. संतसखूसाठीं कऱ्हाडांत तिच्या सासरी सखूच्या भूमिकेत स्त्रीवेषानें नांदला. अशा हृदय भरून आणणाऱ्या अनेक कथा आहेत. म्हणून समर्थ म्हणतात- बहूतां परी आदरें वेषधारी होऊन, देव लोकांसाठी अनेक प्रकारच्या अवतारलीला करतो. आई जसे मुलांसाठी कष्ट उपसते आणि तरी शिणत नाहीं, तेंच वात्सल्य भगवंताच्याहि हृदयांत आहे. मात्र हे सर्व भक्तांसाठी आहे. ईश्वराची अनेकरूपें आहेत. ती सर्व लोकांच्यासाठीच आहेत. शासन गौरव करतें, अनुदान देते, सोयी पाहते, शुश्रूषा करतें, शिक्षण देते, न्याय करतें, शिक्षाहि ठोठावते. ईश्वराचें अवतारकृत्यहि असेंच आहे. ईश्वर सहाय्यास धावला असे वर्णन ऐकले कीं माणसे हुरळल्यासारखीं होतात, पण भगवंत आपल्या प्रिय भक्तासाठी तें करतो त्याला कोणते भक्त प्रिय आहेत ते त्यानेंच स्वतः गीतेच्या १२ व्या अध्यायांत "यो मद्‌भक्तः स मे प्रियः " असें वारंवार म्हणून स्पष्ट केलें आहे तें लक्षांत घेतले पाहिजे.

हें सर्व पहावयास पाहिजे तसें कुणी पहात नाहीं आणि मग समर्थांसारखे संत रागावतात, कळवळून शिव्या घालतात. अनेक तर्कटी आहेत ते ईश्वर नाहींच म्हणतात. अनेक पंडित आहेत, ज्ञानी आहेत ते ईश्वराच्या सगुण साकार रूपाला मान देत नाहींत. अनेक विद्वान आहेत ते ईश्वराच्या भक्तवात्सल्याला अर्थवाद मानून दूर सारतात. अधिकारभेदाने सर्व संभवनीय आहे हा विवेक मात्र कुणी करीत नाहीं त्यामुळें सर्वसामान्य जीवन एकीकडे नास्तिकांच्या स्वैराचाराने तर दुसरीकडे तथाकथित धार्मिकाच्या दंभाचारानें बुजबुजलेलें राहते. सामान्य माणूस मात्र खरे काय तें न कळल्याने भांबावलेला राहतो. मग मानसिक समाधानासाठी काहीतरी थोडे करून देवाचे यथाशक्ति केलें या समजुतीखाली प्रपंचाच्या नव्या नव्या व्यापांत गुरफटून जातो.

सामान्य मनुष्य आत्मकल्याण करून घेऊं शकत नाहीं वा उद्धरून जावे अशी उत्कट इच्छाहि त्याच्या मनांत उत्पन्न होत नाहीं. याला कारण आहेत ते ईश्वराचें अवतारकृत्य न जाणणारे तर्कटी-नास्तिक वा ढोगी-धार्मिक. म्हणून समर्थ त्यांना मूर्तिमंत पापरूप असें म्हणतात. आणि चिडून जाऊन, संतापून दुरात्मे, महानष्ट, चांडाळ अशा शिव्या घालतात. समर्थ इतके रागावतात त्याचे कारण असें कीं तर्कटी वा ढोंगी माणसे स्वतः तर आपली हानी करून घेतातच, पण तेवढेच केवळ घडते तर ते अज्ञानी ठरले असते, मूर्ख ठरले असते. पण एवढ्याने भागत नाही. हे तर्कटी, हे ढोंगी, स्वैराचाराचे, अनाचाराचे एक फसवे तत्त्वज्ञान उभे करतात, आणि सामान्यांना भुरळ पाडून विनाशाच्या मार्गाला नेतात. समर्थ त्यांना पापी, नष्ट, दुरात्मे, चांडाळ म्हणतात ते यामुळे.

जगीं धन्य तो रामसूखें निवाला । कथा ऐकतां सर्व तल्लीन झाला ॥
देहेभावना रामबोधें उडाली । मनोवासना रामरूपीं बुडालीं ॥ १२७ ॥

मागच्या श्लोकांत समर्थांनी त्याज्य कोण, ज्याचा धिकार करावा असा कोण, तें सांगितलें. आतां या श्लोकांत ते, अभिनंदनीय कोण, ज्याचें वळण घ्यावें असा कोण, तें सांगत आहेत. समर्थ म्हणतात- तो धन्य होय, ज्याचें सुख रामामध्ये आहे. श्रीरामचंद्राच्या नामस्मरणांत, चिंतनांत, कथाश्रवणांत, सेवेत ज्याला अतिशय सुख होते, आणि त्या अलौकिक दिव्य अशा भक्तिसुखानेच जो तृप्त होतो, शांत होतो, आणखी वेगळे कांहीं पाहिजे अशी हांव त्यामुळें ज्याला उरलेली नसते, तोच धन्य होय. सत्पुरुषांचे, संतमहात्म्यांचें, धन्यतेचें हें मापच कांहीं वेगळे आहे. ते ज्याला धन्य म्हणतात, भाग्यवान म्हणतात, त्याचे ते मोठेपण आपल्याला पटेल कीं नाही आणि क्वचित् पटले तरी मानवेल कीं नाही कोणास ठाऊक ? आणि त्यामुळेंच तर संत, संत असतात आणि आपण आपणच असतो. श्रीशंकराचार्य म्हणतात, "कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः " ज्याच्याजवळ नुसती लंगोटीच लज्जारक्षणापुरती आहे तो भाग्यवान, तोच भाग्यवान, मात्र हा लंगोटीवाला दरिद्री नाही, पामर नाही, बापुडवाणा भिकारी नाहीं. हा आहे- "वेदान्तवाक्येषु सदा रमन्तः । देहादिभावं परिवर्जयन्तः । आत्मानमात्मन्यवलोकयन्तः । कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ " श्रीतुकाराम महाराज म्हणतात, "भाग्यवंत म्हणो तया । शरण गेले पंढरीराया । " त्यांचाच दुसरा एक अभंग आहे त्यांत ते म्हणतात- "विठोबाचे अखंड चिंतन ज्यांच्या अंतःकरणांत असतें, जे गीता आणि भागवत प्रेमाने ऐकतात, अशा रीतीनें आपल्या हितासाठी जे सदैव जागत असतात, हीच सात्विक आवड असलेले कन्यापुत्र त्यांच्या कुळी जन्माला येतात, त्यांचे आईवडीलहि धन्य होत. मग तें स्वतः धन्य असतात हें सांगावयास नको.

श्रीशंकराचार्यांचें धन्याष्टक म्हणून एक लहानसे प्रकरणच आहे. त्यात कुठेही ज्यांच्याजवळ मोठा बंगला आहे, पैसा-आडका विपुल आहे, खाण्यापिण्याची चंगळ आहे, अधिकार पदावर आरूढ आहे, मुले चांगली मिळवती आहेत, बायको सुंदर आहे, सुगरण आहे, पुष्कळ लोक पुढे उभे राहून हांजी हांजी करीत आहेत, चांगला वक्ता आहे, विद्वत्तेच्या पदव्या मिळविलेल्या आहेत, कीर्तन- प्रवचन उत्तम करतो इत्यादि गोष्टींचा मुळींच उल्लेख नाहीं. आपली धन्यतेची कल्पना आणि या थोर पुरुषांची धन्यतेची धारणा यांत आकाश-पाताळाइतकें अंतर आहे. आम्ही फार तर लोकप्रिय ललित साहित्य लिहिणाराला व त्यामुळेंच समाजामध्यें वाहवा मिळतें अशाला धन्य समजू नाट्य-नृत्य-गायन यांत ज्याला विशेष रस आहे त्याला धन्य मानूं. पण सत्पुरुष धन्यतेच्या दृष्टीने यांतील कोणालाहि मोजीत नाहींत. ते म्हणतात-रामभक्तींत ज्याला सुख आहे, ईश्वराच्या लीला ऐकताना जो तल्लीन होऊन जातो, तो धन्य. आपण ऐकतांना तल्लीन होतो. पण ते वक्ता चांगला रसाळपणे बोलणारा, खुसखुशीत विनोद करून हसविणारा, नकला करणारा इत्यादि असला तर. उत्तम गाणे आणि थट्टा टिंगल हें आपलें कीर्तनांतील आकर्षण. ईश्वराच्या अवतारलीला किंवा संतांची चरित्रे ऐकण्याचेच प्रेम आपणांस खरोखरी असते काय ? सांगणारा काय सांगतो हे खरे म्हणजे महत्त्वाचे. त्यांत आपण तल्लीन होत नाहीं. आपल्या तल्लीनतेला कोण सांगतो आणि कसे सांगतो ही कारणें असतात. आपण भक्ति प्रधान मानीत नाही, भावाला मानीत नाही, करमणूक हेंच जणू आपल्या श्रवणाचे प्रयोजन असतें. आणि ती जेव्हां होत नाहीं तेव्हां श्रोता बहुधा झोपेत लीन होतो. समर्थांना धन्यतेसाठी रामाची कथा ऐकतांना होणारी तल्लीनता अभिप्रेत आहे.

मी एक गोष्ट ऐकली आहे. एक शास्त्रीबुवा रामकथा सांगत असत. आणि श्रोत्यामधला एक भाविक ठाकूर मोठ्या प्रेमाने ती ऐकत असे. शास्त्रीबोवा मनानें फार कोमल होते. ते सीताहरण आणि त्या पुढचे रामायण कधीं सांगत नसत. सीतावियोग आणि त्यामुळें रामचंद्रांना झालेलें दुःख त्यांना वर्णवत नसे. एकदा शास्त्रीबुवांना कांहीं महत्त्वाच्या कामानिमित्त बरेच दिवस परगावी जाणें भाग होते, म्हणून शिक्षण संपून नुकत्याच परत आलेल्या आपल्या मुलाला त्यांनी ८ - १० दिवस रामायण सांगण्यास सागितले. मुलगाहि चांगला वक्ता होता, विद्वान होता, त्यामुळें श्रोते टिकून राहिलें, थोडे वाढलेहि. पण मुलाने रामायण कथा सरळपणे पुढे नेली, सुवर्णमृग, मारीचवध, त्यानें 'लक्ष्मणा ! धाव' म्हणून मारलेली हाक, लक्ष्मणाच्या हृदयाला घरे पडणारी, सीतेने केलेली अविवेकी दुरुत्तरें, लक्ष्मणाचे रामाकडे येणे, रावणाने गोसाव्याच्या रूपानें प्रगट होणें, सीतेला पळवून नेणे, इत्यादि प्रसंग त्यानें खुलवून सांगितले. श्रोते त्या नवीन भागामध्ये रंगून गेले होते. रावण आपल्या मूळरूपात प्रगटला व त्यानें सीतेला उचलून नेले, ती आक्रोश करू लागली, असा उल्लेख येताच तो भाविक ठाकूर ताडकन् उभा राहिला. त्याने आपल्या कमरेची तलवार उपसली आणि तो ओरडून म्हणाला, ' माझ्यासारखा रामभक्त इथें उपस्थित असताना रावण सीतामाईला नेतो म्हणजे काय ? कुणीकडे गेला तो ! सांगा. " या आवेशाने पुराणिक गांगरला व तो चाचरत म्हणाला दक्षिणेकडे, तेवढे ऐकताच हा ठाकूर मंदिराबाहेर उभ्या असलेल्या आपल्या घोड्यावर बसला आणि त्याला टाच मारून दक्षिणेकडे दौडत निघाला. खाचखळगे, नदी-नाले, झाडे-झुडपे, दगड-गोटें कशाचीहि क्षिति न बाळगता तो घोडा पळवीत होता. शेवटी एका कड्याच्या टोकावरून कोसळण्याचा प्रसंग आला. तरी या निष्ठावंताला भान नव्हतें. त्याचा तो उत्कट भाव पाहून स्वतः भगवान् रामचंद्र प्रगट झालें, त्यांनी घोडा अडवला आणि त्या ठाकुराला म्हणाले, " अरे ! रावणाचा संहार करून मी स्वतःच सीतेला सोडवून आणले आहे" आतां तुला कष्ट करण्याचें कारण नाही.

मला वाटतें बहुतेक श्रोते त्या ठाकुराला वेडा म्हणून हसले असतील, कारण ते सर्व देहावर होतें, आणि हाच तेवढा देहभान विसरला होता. ठाकुराचे हें वेड खरेंच. पण तें नवस करून मागून घ्यावें असें आहे. रामाच्या नुसत्या कथाश्रवणानें त्याचें देहभान हरपले, त्याला स्थलकालाची जाणीव उरली नाहीं. असे जे असतात त्यांना समर्थांनी धन्य म्हटलें आहे.

देहाच्या पलीकडे 'मी' ला अस्तित्व आहे हें समजल्यावांचून देहभाव जाणार नाहीं. मृत्यूनें हा देह जाईल जातोच. पण त्यानें देहभावना नष्ट होत नाहीं. ती तशीच राहते, म्हणून तर जन्ममरणाचे फेरे मागे लागतात. संसारांतून मुक्त होतां येत नाही. रामकथेनें तल्लीनता आली की देहाचे बंध शिथिल होतात, आणि मग जीव कसा ? ईश्वर कोण ? यांचे संबंध काय ? इत्यादि बोधाने देहाविषयींची अहंता नाहीशी होते, होऊं शकते. पण त्यासाठी माणसाच्या सर्व आशाआकांक्षा रामरूपांत बुडाल्या पाहिजेत. मनामध्ये केवळ ईश्वराचेच प्रेम असलें पाहिजे. वासना एवढीच असावी कीं ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, ईश्वराची भक्ति लाभावी.

आपल्याला केव्हातरी देवधर्मांतले काही श्रवण घडावे, पूजा करावी, पाठ वाचावा असें वाटतें. मुळीच वाटत नाहीं, असें नाहीं म्हणून तर कीर्तन-प्रवचनकारांचें बरें चालते. मठाचे उत्पन्न वाढते. महंतांना भाव येतो. मंदिरे, तीर्थक्षेत्रे गजबजून जातात. पण एवढेच होतें. आपल्या मनांतल्या वासना पुनःपुनः अनेक प्रकारच्या सांसारिक विषयांकडे धाव घेत राहतातच. त्या रामरूपात, देवभक्तींत, अध्यात्मांत बुडून जात नाहींत. देवधर्माच्या गोष्टी या तात्पुरत्या, वरवरच्या, उत्कटतेचा स्पर्श नसलेल्या अशाच राहतात आणि म्हणून धन्यतेला पात्र होत नाहींत. चित्तवृत्ति ईश्वरचरणी तल्लीन होईल तरच धन्य म्हणता येईल.

मना वासना वासुदेवीं बसों दें । मना कामना कामसंगीं नसों दें ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥

समर्थांनी या श्लोकांत वासनांना परमार्थामध्ये कसे बुडवावे याचें साधन प्रत्यक्षपणे सांगितलें आहे, पर्यायाने सांगितले, लक्षणेने सांगितले, ध्वन्यर्थानें सुचविले, सगळ्यांच्याच लक्षांत येतें असें नाहीं. सर्व वेळीं तें उपयोगींहि पडत नाहीं. म्हणून कांहीं वेळां तरी स्पष्टपणें आदेश द्यावा लागतो तसा तो येथें दिला आहे.

वासना पूर्णपणे परमार्थांत बुडून जातील तेव्हां जातील; पण त्यासाठीं आरंभी तरी त्या कुठे ठेवाव्या तें सांगितलें पाहिजे. लग्न झाल्यावर पातिव्रत्यधर्माची अपेक्षा करावी हे योग्यच आहे. पण वर शोधतांनाहि दक्षता घेतलीच पाहिजे. स्त्री पतिव्रता असावी. ती पतिव्रताधर्माला बळी जाणें योग्य नाही. म्हणून समर्थ वासनेसाठी एक उत्कट अधिष्ठान सांगत आहेत. मनोवृत्तीला आकर्षक विषय पुरवीत आहेत.

समर्थ म्हणतात-मना ! तुझ्या सर्व वासना, सर्व हवें वाटणें, सगळ्या आशा-आकांक्षा वासुदेवाच्या ठिकाणीं राहूं देत.

समर्थांच्या लेखी राम आणि कृष्ण यांत उपासनेच्या दृष्टीनें भेद नाहीं, हें येथील वासुदेव या कृष्णवाचक शब्दाचा उपयोगावरून सिद्ध होते. समर्थ स्वतः रामोपासक आहेत. पण कृष्णभक्ति करणारा वाया जातो असा सांप्रदायिक दुराग्रह त्यांचे ठिकाणी नाही. त्यांतून ओढ लागण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक आकर्षणाचा विचार करतां सर्वसाधारणां करितां तरी कृष्णचरित्र हें अधिक आकर्षक आहे हें निश्चितच. रामचरित्र ऐकतांच रामाविषयी आदर वाटतो. प्रेम निर्माण होण्यासाठी तेथें निष्ठेने उपासना करावी लागते. कृष्णचरित्रामध्ये कोणालाहि जिव्हाळा वाटावयाला लावतील असे गुण अधिक आहेत. तेव्हां वासनेचा विषय म्हणून समर्थांनी कृष्णाचा उल्लेख केला आहे हें ठीकच झालें.

काय करा ते सांगून झाल्यानंतर,काय करूं नये ते सांगितलेच पाहिजे, तरच आदेशाला पूर्णता येते. सामान्यांकरितां तरी तें फारच आवश्यक आहे. म्हणून समर्थ सांगतात-बा मना ! तुझ्या कामना कामाच्या संगतींत नसाव्या म्हणजे माणसाच्या हवें-नकोला आसक्तीचे, विषय-लोलुपतेचें स्वरूप येऊ नये. सर्वच हवे नको संपणे ही फार कठीण गोष्ट आहे. देह आहे तोपर्यंत भूक लागावयाचीच, लागलीच पाहिजे. पण भूक योग्य ते अन्न मागते. भाजी- भाकरी मिळाली तरी शांत होते, चिवडा हवासा वाटतो, लाडू खावेसे वाटतात. ही खऱ्या अर्थाने भूक नाहीं. म्हणून समर्थ कामनाच नको. कल्पनाच नको, असें म्हणत नाहींत. पण भुकेला आसक्तीचे स्वरूप येऊ नये, कामनेने चैनीलाच गरज मानूं नये, असें त्यांना सांगावयाचें आहे. म्हणून वावग्या कल्पना नसाव्या, विकृत कल्पना करूं नये, विचारांना भरकटू देऊं नये, असें समर्थाचे सांगणे आहे.

यासाठीं वासना-कामना-कल्पनांना चांगलें वळण लागणे आवश्यक आहे. नैसर्गिक प्रेरणा जेव्हां सुसंस्कार घेतात तेव्हां माणसाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होतो. म्हणून समर्थ सांगतात की तूं सज्जनांच्या संगतीत रहा म्हणजे चांगले संस्कार होतील आणि सुधारशील. पण सज्जन हो आणि मग सज्जनांच्या संगतीत रहा. सुधारण्यासाठींहि, सुधारणे हें चांगलें आहे, आवश्यक आहे आणि तसें झालेंच पाहिजे अशी प्राथमिक धारणा तरी असावी लागते. हाच मनाचा सज्जनपणा. तसे झाले म्हणजे मग तें मन सज्जनांच्या संगतीने, तेथील पवित्र सात्त्विक वातावरणांत शुद्ध होतें, उन्नत होतें.

मंदिर मोठे आहे, शांत आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे, मूर्ती आकर्षक आहेत, शृंगारलेल्या आहेत, पुजारी भाविकपणें पूजाअर्चा नीटनेटकी आणि शास्त्रशुद्ध रीतीनें करतो आहे. या सर्व वातावरणाचा माणसाच्या मनावर चांगला परिणाम घडतो. पण गर्दीत खिसे कापावयास मिळतील याच भावनेने जो तिथे जातो त्या चोराला मंदिराचे पावित्र्य काय उपयोगी पडणार ? म्हणून संतांच्या संगतीचा लाभ व्हावा यासाठीहि मनाला सज्जनतेचा कांहीं स्पर्श असलाच पाहिजे.

गतीकारणें संगती सज्जनाची । मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनातीत होऊनि राहें ॥ १२९ ॥

सज्जनांच्या संगतींत राहण्याचा खरा लाभ, परमार्थाच्या दृष्टीनें बुद्धींत इष्ट तो पालट होणें, हा आहे. बुद्धि ज्या रीतीनें विचार करते त्याचरीतीने माणसाची प्रगति-परागति, उन्नति वा अधोगति होत असते. ईश्वराने माणसाला बुद्धि दिली, विचार करण्याचें सामर्थ्य दिले, घटनेमागील कारणें शोधून काढण्याची जिज्ञासा दिली, बुद्धीला स्वातंत्र्य दिलें, आणि हवें तसें वागण्यासाठी माणसाला मोकळे सोडले. माणसाने मात्र या इतक्या चांगल्या संधीचा फारसा सदुपयोग करून घेतला नाही. विषयोपभोगांतील आवश्यकतेचें भान न ठेवता तो सुखाला लालचावला, विषयाधीन झाला आणि मग क्रमाक्रमानें शरीर-मन-बुद्धि यांनाहि अनिष्ट वळण लागलें, शरीर सुखासीन झालें, मन विषयाच्या ओढीने चंचल बनलें, आणि भाड्यानें घेतलेल्या विद्वानाप्रमाणे बुद्धीहि शरीर-मनाला अनुकूल असेच निर्णय देऊं लागली. याचीच सवय लागली, व्यसन जडले आणि जन्मजन्मांतरीच्या या दीर्घकालीन संस्कारानें तेंच योग्य आहे असेंहि वाटूं लागलें. प्रत्यक्षांत वेगळेच घडत होतें, अनुभव चांगला नव्हता, पण तरी त्याची मीमांसा मात्र योग्य रीतीनें करतां येत नव्हती. बुद्धीचा श्रम दूर व्हावा असें वातावरणच नव्हतें. तें मिळावे म्हणून समर्थांनी सज्जनांच्या संगतींत आदराने रहा, त्यामुळें अगदीं दुर्जन असला तरीहि त्याची बुद्धि पालटते, कुबुद्धीची सुबुद्धि होते, चांगले आणि वाईट नेमके कळू लागतें, चांगलें स्वीकारले पाहिजे हें कळू लागतें असा उपदेश केला आहे. पण या मार्गांत एक अडथळा आहे. तो म्हणजे रतिपति मदनाचा, कामाचा, विषयासक्तीचा. हा काम दुष्ट, दुरात्मा आहे, नष्ट चांडाल आहे, घातक-फसवा आहे. अनेक प्रकारची प्रलोभने तो निर्माण करतो. सुखालाच हित भासवतो. असत्यालाच सत्याचे पुट देऊन माणसाची वंचना करतो. या कामाने जर बुद्धि प्रभावित झाली तर स्वैराचाराची तत्त्वज्ञानें निर्माण होतात, आणि मग माणसाचे काय होईल, समाज कुठे जाईल तें सांगणें कठिण होतें. एऱ्हवी बरी वागणारी निरुपद्रवीं माणसेंहि, अस्वास्थ्य आणि संघर्षाची बळी ठरतात. अनन्वित संकटे त्यांच्या वांट्याला येतात. दुःखांतून, दैन्यांतून कोणाचीच सुटका होत नाहीं. दुःखाचा विसर पडण्यासाठी माणसे व्यसनाधीन होतात आणि मग अधःपाताला सीमा रहात नाहीं. विषयासक्तीला आवर न घातल्याचे हे परिणाम आहेत. कामाला नष्ट म्हटलें आहे ते यासाठींच.

या नष्ट कामाच्या, अतिरिक्त आसक्तीच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे मनाच्या अतीत होऊन राहणे हा. मनाच्या अतीत होणें म्हणजे कोणत्याहि वृत्ती मनांत उठणार नाहींत अशी स्थिति होणें. या स्थितींत सर्व प्रकारचे हवें-नको संपले पाहिजे. मन पूर्णपणे निर्विकार झालें पाहिजे.

मना अल्प संकल्प तो ही नसावा । मना सत्य संकल्प चित्तीं वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तो ही तजावा । रमाकांत येकांत काळीं भजावा ॥ १३० ॥

मनातीत होऊन राहणे काय व ते कसे घडावे याचा उपाय समर्थ या श्लोकांत सांगत आहेत.

मनानें कोणत्याहि रीतीचा संकल्प करूं नये. अनवश्यक असे कोणतेहि विचार मनांत येऊ देऊं नयेत. भोवती अनेक प्रकारच्या घटना घडत असतात, मन त्याविषयी उगीचच विचार करतें. नानाप्रकारचे अपघात घडतात, वादळे होतात, कडे कोसळतात, अष्टग्रही, पंचग्रही कोणत्यातरी राशीला येते. पुढारी भांडतात, विद्वानांची वक्तव्ये प्रसिद्ध होतात, सभा-परिषदा भरतात. वृत्तपत्रे त्यांच्या वार्ता ठळकपणे प्रसिद्ध करतात. वाचकांच्या पत्रव्यवहारांतून अनुकूल-प्रतिकूल मतांचे रण माजते. आतां या सर्व गोष्टींचा आपणांशी किती संबंध असतो ? तरी यासंबंधींचे विचार उगीचच मनामध्ये घोळत राहतात. आणि कधीकधी त्यावर व्यर्थ चर्चाहि होत राहतात. याच्याच जोडीला भर म्हणून माणसाला नाना प्रकारची स्वप्ने पडत असतात आणि तोहि चिंतनाचा विषय होतों. भोवती घडणाऱ्या प्रत्यक्ष घटनांच्या सुखदुःखाचाहि माणसाने विचार करूं नये. त्यापासून अलिप्त राहावें असें शास्त्र सांगते. आणि माणसे तर स्वप्ने ही भविष्यसूचक आहेत हे गृहीत धरून विचारांचा घोळ घालीत बसतात. ज्याला मनातीत व्हावयाचें आहे, त्यानें यातले कांहीं करूं नये.

मन अगदीं रिकामे राहणे फार कठिण आहे. त्याला जर कांहीं चांगला उद्योग लावून दिला नाहीं, तर तें जणू पिशाच्चाच्या स्वाधीन होतें म्हणून मनानें सत्यसंकल्प करावा. चांगले विचार करावेत, चांगल्या संबंधी विचार करावेत. ईश्वराच्या लीलांचे, संतांच्या चरित्रांचे स्मरण करावें. सदुपदेशांचे चिंतन करावें. तत्त्वज्ञानाचा विचार करावा. सन्मार्गाचा शोध घ्यावा. साधना बळावेल असें पहावे ब्रह्मासंबंधीचे ज्ञान तेंच सत्य, सर्वदा त्याच अनुसंधानांत असावे, उगीच बडबड करूं नये. घोळ घालीत बसू नये. अपसमज करून घेऊं नये.

आहे त्यापेक्षा कांहीं वेगळे मनांत येणे हा विकल्प. अनुकूल घडावे असें वाटत राहणे हा संकल्प. मन घड्याळाच्या लंबकाप्रमाणें या संकल्प-विकल्पांत हेलपाटत राहते. मी एखादी बरी वस्तु एखाद्याला दिली, एखाद्याकरितां कांहीं थोडेसे केलें की त्याने मजविषयीं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, 'मी तुमचा आभारी आहे' असे म्हटले पाहिजे, असें मला वाटते हा संकल्प. त्यानें तसें म्हटलें नाहीं, कीं तें जाणवते. साधा शिष्टाचारहि याला कळत नाहीं. हा शिष्ट आहे, अहंकारी आहे, उर्मट आहे, असें वाटते हा विकल्प. ओळख राहत नाहीं. ओळखत नाहीं, ओळख देत नाही, आमंत्रण दिले जात नाही, अतिथ्यात उणीव पडते, वृत्त कळत नाहीं, कळविले जात नाहीं. या अशा गोष्टींतून अपसमज वाढतात. या विकल्पांमुळेंच अगदीं जवळच्या नातेवाईकांत व मित्रांमित्रांतहि वितुष्ट येतें. अगदीं पती-पत्नीहि समाधानाने नांदू शकत नाहींत. असेंच दुसऱ्या विषयी झाले अपसमज चार चौघांत बोलून दाखविण्याचीहि माणसाला फार घाई होते. निदान असें बोलणें तरी माणसाने टाळावे फारच बोचले असेल तर प्रत्यक्ष त्या व्यक्तिलाच विचारून निराकरण करून घ्यावें. पण कोणाच्या पाठीमागे त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची निंदा करणें माणसाने टाळावे या अशा निंदेमुळे विकल्प करण्याची प्रवृत्ति अधिकाधिक बळावते, ते टाळा. मन निर्विकार व्हावें, मनामध्ये नेहमी चांगलेच विचार यावेत. विकल्पाची शक्यता उणी होत जावी, यासाठीं समर्थ उपाय सांगतात की "एकांतांत जाऊन ईश्वराचें भजन करा. "

मन निर्विकार होत नाही, रिकामे मन पिशाच्चाचे क्रीडांगण होतें. ईश्वरी भजन हा त्यावरचा उत्तम उपाय. मन कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ईश्वरी भजनांत गुंतले तर संकल्प-विकल्पाची गडबड शांत होऊं शकते. मन पूर्ण रिकामे, पूर्ण निर्विकार होईल तर मनाचे मनपणच जाईल, मन अमन होईल; उन्मनी अवस्था प्राप्त होईल. पण हे सोपे नाहीं. अनेक विषयांची आसक्ति असलेल्या मनाला अमन तरकाय पण एकाग्र करणेंहि कठिण आहे. पृथीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत कोणतीहि वस्तु अधर ठेवता येत नाहीं. फार दूर अंतराळांत वस्तु तशी राहूं शकते म्हणतात. पुण्याच्या कक्षेत मात्र वस्तु टांगून ठेवायची झाल्यास खुंटी हवी असते. मन संकल्प-विकल्प करते ते विषयाच्या ओढीने. ईशभजनाच्या खुंटीला तें यासाठी अडकवून ठेवले पाहिजे.

जेव्हां जेव्हां एकांत मिळेल तेव्हां तेव्हां ईशस्मरण करावें किंवा शक्यतो एकांतांत जाऊन ईशस्मरण करावे, असा दोन्हीं प्रकाराने चौथ्या ओळीचा अर्थ करता येईल.

एकांतामध्यें एकाग्रता वाढण्यास मदत होते. विषय प्रत्यक्ष समोर नसल्यामुळें इंद्रिये शांत राहतात. स्वाभाविक मनहि मोकळे राहू शकते. वास्तविक एकांताचा विचार थोडा दूर ठेवला तरी, एका गोष्टीचा आपल्यापैकी बहुतेकांना चांगला अनुभव असेल. आपण तीर्थयात्रा उत्सव-महोत्सव याला जातो. घरचे नित्याचे व्याप त्यावेळीं भवती नसतात त्यामुळे तेथील कार्यक्रमांत मन अधिक रमते, बरें वाटतें. काहीं लोक कौतुकाने म्हणतात कीं घरची आठवणसुद्धा इतके दिवस झाली नाहीं. हें कांहींसे खरेहि असते. कारण घराच्या दृष्टीने हा एकांतच मिळालेला असतो. एकांत जो जो सर्वांगीण होत जाईल तो तो मनाची एकाग्रता वाढत जाईल आणि तें भजनांत रमू लागेल.

साधकाने सुखासाठी अरण्यांत जावे असें समर्थांनी मागे एका श्लोकांत सांगितलें आहे. त्याचाहि उद्देश एकांत मिळावा हाच आहे. पण घरांत कुणी नसलें कीं घर खायला उठते अशी ज्यांची वृत्ती आहे, त्यांना पूर्ण एकांताचा लाभ होण्याची शक्यता नसते. त्यांनी क्रमाक्रमानेंच एकांतवासाची संवय लावून घेतली पाहिजे.

भजाया जनीं पाहतां राम येकु । करीं बाण येकु मुखीं शब्द येकु ॥
क्रिया पाहतां उधरे सर्व लोकु । धरा जानकीनायकाचा विवेकु ॥ १३१ ॥

समर्थ रामदास स्वामी हे रामभक्त आहेत. आपल्या आराध्यादेवतेचे महात्म्य अनेक प्रकारांनी गावे असें स्फुरण त्यांना होत असते, साधकाला आकर्षण वाटावें, त्याची श्रद्धा दृढ व्हावी, असाहि, उद्देश या वर्णनाच्या मागें असतो. समर्थ म्हणतात- ज्याचें भजन करावें अशा योग्यतेचें रामचंद्र हें एकच दैवत या जगतांमध्ये आहे. रामचंद्रासारखा एकबाणी, एकवचनी अवतार दुसरा नाहीं. एकबाणी म्हणजे धनुष्यावर एक बाण एकदां लावला कीं नेम लागलाच पाहिजे. हें उपलक्षण आहे. यावरून एक गोष्ट साधण्यासाठी जें करावयाचें तेंच नेमके आणि योग्य रीतीनें केलें जातें हा गुण एकबाणी या विशेषणांतून सुचविला जातो. एकवचनी म्हणजे एकदाच बोलणारा, जें बोलले त्या शब्दांना धरून राहणारा, शब्द न पालटणारा. मी असें बोललोच नव्हतो, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, त्यावेळच्या परिस्थितींत म्हणून तसें बोललो, इत्यादि स्पष्टीकरणे देण्याचा प्रसंग ज्याच्यावर येत नाहीं असा माणूस. हे दोन्हीं गुण नेत्याच्या अंगी असणें आवश्यक आहे. त्यामुळें अनुयायांच्यावर पश्चाताप करण्याचा प्रसंग कधी येत नाही. हे गुण असले तरच पुढारी विश्वासार्ह ठरतो. रामचंद्राच्या ठिकाणीं हे दोन्हीं गुण आहेत, असे त्यांचें चरित्र सांगते.

रामचंद्रांचें सर्व वर्तन हें पूर्णपणे निःस्वार्थी होतें, लोकांच्या कल्याणासाठी होतें, लोकांच्या मार्गदर्शनासाठी होतें. विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणापासून ते सीतात्यागापर्यंत सर्व घटनांचा सूक्ष्म दृष्टीनें विचार केला म्हणजे रामचंद्रांच्या कृतीमागची दिव्य उदात्तता जाणवल्यावांचून राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात-जानकीनायकाचा, भगवान रामचंद्राचा आश्रय करा, तुमच्या भजनाचा, स्मरणाचा, चिंतनाचा विषय तोच एक असूं दे. जानकी नायकाचा विवेक धरा म्हणण्यांत हेच अभिप्रेत आहे. येथील विवेक शब्दावरून आणखीहि एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. फार थोर व्यक्तींचे मोठेपण सामान्य मापाने मोजून चालत नाहीं. थोराची चरित्रे वाचतांना असा मोह फार वेळां होतो. पुष्कळ वेळां भली माणसेंहि या मोहाला बळी पडतांना दिसतात. राज्यत्याग, शूर्पणखेची विटंबना करणें, सुवर्णमृगाच्या मागें लागणे, सीतेच्या विरहाने शोकाकुल होणें, वालीवध, सीतात्याग, शंबूक- दंडन, इत्यादि प्रसंग वस्तुतः रामचंद्रांच्या थोरवीचे अनेकानेक पैलू प्रगटविणारेच आहेत. पण हें नीट समजून घेतलें पाहिजेत म्हणूनहि समर्थ विवेक शब्दाचा उपयोग करतात.

विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त ते ही निवाले ॥
बरें शोधल्यावीण बोलो नको हो । जनी चालणें शुध नेमस्त राहो ॥ १३२ ॥

समर्थांचे समर्थपण, ज्या कांहीं श्लोकांतून विशेष रीतीनें व्यक्त होतें, त्यांच्या अनुभव-क्षेत्राची विशालता लक्षांत येते, आदेशातील नेमकेपणा पटतो, त्यांतील हा एक श्लोक आहे. आमचे ती. दादा समर्थांना अध्यात्माच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणत. मुख्याध्यापकाकडे अध्यापनविषयक कामापेक्षा व्यवस्थापनविषयक कामेच अधिक असतात. समर्थांनी या श्लोकामध्ये ज्याला भले व्हावयाचें आहे, भलेपणा मिळवावयाचा आहे, त्याच्या जीवनाचे व्यवस्थापन सांगितलें आहे. जीवन सुखानें आणि समाधानाने जावे अशी सामान्यतः सर्वांचीच अपेक्षा असते. फार मोठ्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा सामान्यांच्या पुढें सहसा नसतात. अर्थात् तशा असला तरी या श्लोकातील आदेश त्यालाहि उपयोगी पडणाराच ठरेल.

जीवनामध्ये संतुष्ट होण्याचा प्रसंग येऊं नये असे वाटत असेल तर आणि दुसरा कुणी असा संतप्त असेल त्याला कसें शांत करावें हें जाणून घ्यावयाचे असेल तर हा श्लोक उत्तम मार्गदर्शन करील. समर्थ दोन गोष्टी स्पष्टीकरणासह सांगत आहेत.

'विचारूनि बोले'चे स्पष्टीकरण तिसऱ्या ओळींत आणि विवंचूनि चाले'चे स्पष्टीकरण चवथ्या ओळींत आहे.

'विचारून बोले' याचेंहि दोन भाग आहेत. विचार करून बोल आणि तज्ञाचा किंवा शास्त्राचा विचार घेऊन बोल.

जेव्हां केव्हां बोलावयाचें, लिहावयाचे तेव्हां तें नीटपणे सर्व प्रकारचा साधक बाधक विचार करून, तज्ञांची मते चांगली पारखून, शास्त्रवचनें चांगली शोधून, थोरांच्या वाक्यांचा आधार घेऊन, मगच लिहावे वा बोलावे. लिहिण्यापेक्षां बोलणें कमी गंभीरपणाचें आहे, तेव्हां बोलतांना विशेष काळजी घेतली नाहीं तरी चालेल, असें समजूं नये. लिहिण्याइतकेंच बोलणेंहि महत्त्वाचे आहे, असेंच समजून वागले पाहिजे. खरें म्हणजे बोलणें हेंच महत्वाचे आहे. लिहिणें हा त्याचा आनुषंगिक पर्याय आहे. म्हणूनच समर्थांनी लिहिण्याचा उल्लेखच केला नाहीं, केवळ कसें बोलावे तेवढेच सांगितलें आहे. परंतु अलीकडच्या मुद्रणसुलभतेच्या काळांत लिहिण्यालाच अधिक व्यापकता येत असल्यानें बोलण्याच्या संदर्भांत लिहिणेंहि गृहीत धरावे, असें मला वाटतें.

विचार करून, विचार घेऊन बोलले म्हणजे तें सत्याच्या अधिक जवळचे असतें आणि हितकारक ठरतें. दुर्दैवाने आजकाल विद्वान् म्हणणारी मंडळींहि त्याकडे दुर्लक्ष करतात. केवळ आधुनिक म्हणून जसी एखादी गोष्ट वाईट नसते, त्याप्रमाणेंच केवळ, परंपरेनें स्वीकारलेली म्हणूनहि एखादी गोष्ट असत्य नसते, त्याज्यहि नसते. पण हा विचार विद्वान लिहितां-बोलतांना करीत नाहींत. परंपरागत धारणांवर आघात करतांना त्यांना विलक्षण स्फुरण येतें, आणि त्या अभिनिवेशांत मग दुष्ट तर्काचा आणि असत्याचाहि पुरस्कार केला जातो. रामायण महाभारतावरचे लिहिले आधुनिकांचे विविध प्रकारचे लिखाण या गोष्टीची साक्ष देईल. महाभारताची वा रामायणाची कोणतीहि प्रत प्रमाण मानली तरी या आधुनिकांनी केलेल्या अनेक विधानांना त्यांत आधार मिळणे शक्य नाहीं. त्यांच्या विधानाच्या उलट वचनेंहि अनेक आहेत तरी लेखक आपला स्वैराचार सोडीत नाहींतच.

भारतीय परंपरेत पुरोहितांची सर्वंकष सत्ता कधी नव्हती, आजहि नाहीं, आणि तरी ब्राह्मणांविरुद्ध आक्षेप घेताना हा विचार कुणी करीत नाहीं. एकदां एका आधुनिक समाजवादी विद्वानानें माझ्या बैठकींतच माझ्यासमोर म्हटलें कीं 'हिंदू धर्मांत पुरोहितशाही अशी कधीच नव्हती. पण आम्ही असें म्हटलें तर या सनातनी लोकांना बळ मिळेल म्हणून आम्हीं तें बोलत नाहीं.' संघर्ष वाढता राहावा अशीच ज्यांची वृत्ति असेल ते असेंच वागणार. पण हें "बरें शोधल्यावीण"चे बोलणें झालें. त्यामुळें लाभ कोणाचाच नाहीं. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले अस्वास्थ्य तेवढे वाढणार, वातावरण संतप्त राहणार स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी तेंच कोणाला इष्ट वाटत असेल तर वेगळे. शांतता, स्वास्थ्य हवें असेल तर असें बोलतां कामा नये.

समर्थांचा दुसरा आदेश संतापशमनासाठीं आहे, तो विवंचूनि चालण्याचा, विवेकपूर्वक वागण्याचा, कृति करण्यापूर्वी पूर्णपणे सावध राहण्याचा. ज्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल असे माणसाच्या हातून काही घडता कामा नये. जो जो माणसाचे अधिकारपद उंच आणि कार्यक्षेत्र व्यापक, तो तो त्यानें सावध राहण्याची दक्षता अधिकाधिक घेतली पाहिजे. विचार करतांना साधकबाधक विचार करावयाचे असल्यानें अगदीं टोकावर जाऊन विचार केले तरी एकवेळ चालतात, पण वागतांना मात्र असे टोक गाठून चालत नाहीं. तेथे नेहमी मध्यमक्रमच अवलंबिला पाहिजे. समर्थांनी यासाठींच 'विवंचूनि चाले' या आदेशाला 'जनीं चालणें शुध नेमस्त राहो' अशी पुस्ती जोडली आहे.

व्रते-वैकल्यें, पूजा-पाठ, सोवळे-ओवळें, खाण्यापिण्यासंबंधीं नियम, कंजूषपणा वा उधळपट्टी, वेषभूषा, आदरातिथ्य, विषयसेवन या सर्व प्रकरणात माणसाने नेमस्तपणा धरावा. मध्यमक्रम अवलंबावा मात्र मुळांत हें वागणे शुद्ध, निर्मळ, सदाचारी असावें. या दृष्टीने एक संस्कृत वचन मार्मिक आहे. "अनाचारस्तु मालिन्यम् अत्याचारस्तु मूर्खता । बिचाराचारसंयोगः स सदाचार उच्यते । " वर्षानुवर्ष न धुतलेली धाबळी वा कद हे जसें सोवळें नाही तसेच रस्त्याचीं पायतणें घालून घरांत हिंडणें ही सुधारणाहि नव्हे.

शुद्ध, सात्त्विक राहता येत नाहीं, पण केवळ तामस होऊं नये. वर्तनामध्यें सात्त्विकतेचे प्राधान्य राहील अशी दक्षता घ्यावी. ही शुद्धताहि आहे आणि नेमस्तताहि आहे. जीवनांत नेहमीच तोल राखून चालावे लागतें. तेच या नेमस्त शब्दाने सुचविले आहे. ध्येय निश्चित असलें व पवित्र असलें कीं हा नेमस्तपणा शुद्ध ठरतो.

हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी । जेणें मानसीं स्थापिलें निश्चयासी ॥
तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे । तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥

हरिभक्त कसा असतो ते या श्लोकांत समर्थ सांगत आहेत, आणि त्याच्या संगतीने साधकाला कोणता लाभ मिळतो तेहि समर्थांनी स्पष्ट केले आहे.

समर्थ म्हणतात- हरिभक्त म्हणजे सत्पुरुष. हा विरक्त असतो, वैराग्ययुक्त असतो. त्याच्या अंतःकरणांत विषयसेवनाची आसक्ति लव-मात्र नसते. तसेच तो ज्ञाननिधि असतो, ज्ञानाचा सागर असतो. त्याच्याजवळ ज्ञानविज्ञानांपैकीं आवश्यक तें सर्व पुरेपूर असतें. खरें म्हणजे ज्ञान हें एकरूप आहे. ब्रह्माचें किंवा आत्म्याचें यथार्थ ज्ञान हे त्याचें स्वरूप आहे. तेव्हां खऱ्या अर्थाने त्याला ज्ञाननिधि किंवा ज्ञानसागर अशीं संग्रहवाचक विशेषणें देणें तितकेसें योग्य नव्हे. विज्ञानाच्या प्रकरणांत तसे म्हणणे एकवेळ चालेल. समर्थांनी येथें विज्ञान शब्द वापरला आहे. मात्र या विज्ञानामध्ये त्यांना ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान हेहि गृहीत आहे. कारण ही हरिभक्तीची लक्षणें आहेत. विज्ञान या शब्दाचा अर्थ कांहीं ठिकाणी प्रपंचासंबंधीचें ज्ञान असा न करता अध्यात्मज्ञान असाच केला आहे. श्रीज्ञानदेवांनी मात्र ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, विज्ञान म्हणजे प्रपंचविषयक ज्ञान आणि प्रपंचाला सत्य मानणे म्हणजे अज्ञान असें म्हटलें आहे. "तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुतां पाऊलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगीं जयाचां ॥ अर्जुना या नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंहिं जाण ॥" (ज्ञाने ७ | ५ - ६) अशा त्यांच्या ओव्या आहेत.

गीतेच्या तेराव्या अध्यायांत अमानित्व-अदंभित्वादि ज्ञानाची अठरा लक्षणें सांगितली आहेत. ही सर्व ज्याच्या ठिकाणी व्यक्त असतात तो ज्ञानराशी. गीतेच्या चौदाव्या अध्यायामध्ये आत्मज्ञानाचे सविस्तर वर्णन करून झाल्यानंतर पंधराव्या अध्यायाचे प्रयोजन सांगतांना ज्ञानेश्वर महाराजांनी "तरी विरक्तीवांचून केंही । ज्ञानासी तगणे नाहीं । हे विचारूनि ठाई । ठेंविलें देवे ॥ " (ज्ञाने. १५ | ३६) असें म्हटलें आहे. ज्ञान होईल कदाचित, पण ते टिकले पाहिजे, तरच उपयोगाचे. आणि ज्ञानाचें टिकणें हें अंतःकरणाच्या शुद्धतेवर म्हणजेच विरक्तीवर, वैराग्यावर अवलंबून आहे. यासाठीं समर्थांनी हरिभक्त आधीं विरक्त आणि मग ज्ञानराशी असतो असें म्हटलें आहे.

विरक्त वा वैराग्य ही अंतःकरणाची स्थिति आहे. जवळच्या संग्रहावरून वा परिग्रहावरून त्यांचें स्वरूप वा प्रमाण ठरविता येणार नाहीं. जवळ कांहीं नसलेला एखादा अकिंचन भिकारी विरक्त नसेल. उलट ऐश्वर्याने संपन्न असलेला राजा जनक विरक्त होता. शुकाचार्यांनींहि त्यांचे शिष्यत्व पत्करावे असा त्याचा अधिकार होता. श्रीरंगनाथस्वामी निगडीकर हे सत्पुरुष खरे, पण बैरागी नव्हते. अधिकारपदावरील एखाद्या श्रीमंताप्रमाणें ते थाटांत राहत, घोड्यावरून हिंडत, भारी कपडे वापरीत, अलंकार धारण करीत. तेव्हा विरक्त हा शब्द आपण समजतो त्या वरवरच्या अर्थाने उपयोजिणे वास्तव ठरणार नाही. आपली मापे प्रामाणिक असतातच असें नाहीं. या संदर्भात ती. वै. सोनुमामा दांडेकर एक उदाहरण गंमतीने सांगत असत. ते म्हणत-एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि चार आणे द्या म्हणाला. मी ते दिले. लगेच तो माझ्याविषयी सांगत फिरू लागला कीं सोनापंत म्हणजे काय ! लाख माणूस ! पुन्हा एकदां तो गृहस्थ माझ्याकडे आला. त्यानें असेंच दोन चार आणे मागितले. मी ते दिलें नाहींत. तेव्हां त्यानें सांगावयास सुरूवात केली कीं सोनापंत ! हेः ! ! त्यांचें ज्ञानेश्वरी सांगणें काय जाळायचे, कांहीं उपयोग नाहीं ! चार आणे देणे किंवा न देणे हे माणसाची योग्यता ठरवण्याचे माप असू शकते काय ?

माणूस कसा वागतो, कसा राहतो,काय नेसतो, काय खातो, एवढ्यावरून त्याचें खरे स्वरूप कळणार नाही.

हरिभक्ताचे आणखी एक लक्षण समर्थ सांगत आहेत. त्याच्या मनातील निश्चय दृढ असतो. धरसोड, चंचलपणा, सरड्याच्या रंगाप्रमाणे पालटणारें विचार असें त्याच्याजवळ नसतात. अर्थातच अशा हरिभक्ताच्या संगतीत माणसाला बरें वाटतें. त्याची भेट झाली, त्यानें पाहिले, दोन वाक्ये तो बोलला, त्यानें प्रेमळ हाताने कुरवाळले, त्याच्या वरदहस्ताचा थोडासा स्पर्श मस्तकाला झाला, तरी माणसाचा संताप, खेद नाहीसा होतो, मन शांत होतें, वृत्तींना प्रसन्नता लाभते. अशा थोर हरिभक्ताने चार वाक्ये जरी उच्चारली तरी माणसाच्या अंतःकरणांतील नाना प्रकारचे संदेह दूर होतात, श्रद्धा बळावते, बुद्धि स्थिरावते. मात्र यासाठीं हरिभक्ताच्या संगतीत जाणाऱ्याचे मन सरळ असलें पाहिजे, प्रांजळ असलें पाहिजे तो विनयी असला पाहिजे, अहंकारी असतां कामा नये. नाहीतर पाण्यात अखंड भिजूनहि सुसरीच्या पाठीला मऊपणा जसा येत नाहीं, ती तशीच कठोर, खडबडीत राहते, तसेंच याचेंहि व्हावयाचें.

नसे गर्व आंगीं सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इहीं लक्षणीं जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥

समर्थ या श्लोकांत योग्याची, सत्पुरुषाची, पूर्ण पुरुषाचीं, लक्षणें सांगत आहेत. योगी आढळावा, सत्पुरुष भेटावा, असें बहुतेकांना वाटते. आपण आपल्या मापाने कोणाकोणाला योगी, सत्पुरुष, महाराज, भगवान् ठरवितो ? लोकविलक्षण वेषभूषा, वाढलेला दाढीजटा, गंधांचे टिळे, माळांचे वेढे, कीर्तन प्रवचनांतील रंगढंग, मोठा वैभवी मठ, हजारोंची जेवणावळ असलेले उत्सव महोत्सव, मनांतले ओळखणे, भूतभविष्य सांगणे, रोग घालविणे, अद्भुत रीतीनें भस्म, कुंकू, प्रसाद काढून देणे, संततिसंपत्तीची इच्छा पूर्ण करणें, संकटांतून सोडविणे इत्यादि इत्यादि पाहून आपण साधू ठरवितो. हें रत्नाचा तोल करतांना वखारींतला कांटा वापरण्यासारखे आहे.

वर उल्लेखिलेल्या गोष्टी कोणाजवळ असतील तर त्याला फार तर तंत्रज्ञ समजावे. कामापुरता त्याचा उपयोगहि पाहिजे तर करून घ्यावा. त्या धंदेवाईकाचें कांहीं शुल्क असेल तर तेहि द्यावे. काम झालें तर सौजन्याने त्याचे आभारहि मानावेत, पण त्याला कोणी साधु, महात्मा, योगी समजून त्याचेपुढे "घालीन लोटांगण वंदीन चरण" असे करूं नये. ही अशीं माणसे बहुधा स्वार्थसाधू असतात, परमार्थाची अधिकारी नसतात. खऱ्या साधूची ओळख आपणाला पटणे कठिण आहे. बहुधा आपली फसगतच होते. "योगियांच्या खुणा योगी जाणें" असें म्हणतात. यासाठीं या प्रकरणी समर्थांसारख्या अधिकारी पुरुषांचेच विचार ऐकून घेतले पाहिजेत.

निरहंकारी असणें हें सत्पुरुषाचे पहिलें लक्षण. आपल्या योग्यतेची, मोठेपणाची, आपल्या अंगीचा सामर्थ्याची, सद्गुणाची त्याला जाणीव नसते. आपली थोरवी, आपली योग्यता, इतरांच्या लक्षांत आणून देण्यासाठी तो प्रयत्न करीत नाहीं, हस्ते-परहस्ते स्वतःची ख्याति वाढवीत नाहीं, भवती स्तुतिपाठकांचा मेळा जमवीत नाहीं. आपला मानसन्मान व्हावा असें त्याला वाटत नाहीं. त्याला सत्काराची अपेक्षा नसते. स्तुतीने तो खुलत नाही, चढत नाही, कारण या सर्व गोष्टी अहंकाराच्या पोटीं जन्माला येतात, आणि साधूजवळ अहंकार नसतोच. अहंकाराचा स्पर्शच ज्याला नाहीं, त्याच्याजवळ ताठा, दर्प, मद, गर्व, ही अहंकाराची अवस्थांतरें असण्याची शक्यताच नाहीं.

वीतराग म्हणजे आसक्तीच्या पार गेलेला. निरहंकारी मनुष्य स्वभावतःच अनासक्त असतो. ज्याचें 'मी' सुटले त्याच्याजवळ 'माझें' म्हणून कांहीं उरतच नाहीं. त्याला विषयोपभोगांची अभिलाषाच नसते. खाणे, पिणे, लेणे, राहणे यासाठीं अमुकच पाहिजे, इतकेंच पाहिजे, असा त्याचा आग्रह नसतो. ऐश्वर्याची, वैभवाची, संपत्तीची कामना तो करीत नाहीं.

साधु हा उपभोग घेतो पण क्षमेचा आणि शांतीचा. त्यामुळें निंदा, अवहेलना, अपमान, तिरस्कार, उपेक्षा कितीहि जरी झाली, नाना प्रकारची संकटे कोसळली, आपत्ती आल्या, तरी त्याची चित्तवृत्ति निवांत जागी तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणें प्रसन्न आणि शांत असते. तो क्षमाशील असतो, सहनशील असतो. पण तो अगतिक नसतो, दुर्बल नसतो. लाचार, दुबळा माणूस निरुपायानें सहन करतो, पण त्याचे मन चरफडत असतें. याचें मन शांत असतें, आणि त्यामुळें क्षमाशीलता त्याला उपभोगाचे सुख देते.

क्षमा, शांति हे वैयक्तिक सद्गुण आहेत. व्यक्तिजीवनाचें ते आदर्श आहेत, हा व्यष्टिधर्म आहे. आपण हिंदू माणसे मात्र नेमके उलटे वागतो. सामाजिक पातळीवर, राष्ट्राच्या पातळीवर आपण सोशिक, शांत, उदार आहोत. हिंदू म्हणून आमच्यावर अनेक आपत्ती आल्या, आमचे न्याय्य अधिकारहि लुबाडले गेले, आमच्या देशाची छकलें उडाली, स्वार्थी उन्मत्तांनीं कूरपणें आपला लाभ करून घेतला, आणि तरी आम्हीं शांतच राहिलों. वैयक्तिक पातळीवर मात्र आमचा मत्सर जागृत असतो. आम्ही सूडबुद्धीने वागत. बांधाच्यामुळे गेलेल्या वीतभर जागेसाठी न्यायालयांत भांडत बसतो. संत असे असत नाहींत. ते वैयक्तिक लाभहानीचा विचार करीत नाहींत. आणि म्हणूनच ते शांत आणि क्षमाशील राहण्यात आनंद अनुभवू शकतात. अगतिकपणे तडफडणारे स्वार्थी मन हें सुख मिळवू शकत नाहीं.

दयाशीलता आणि अखंड दक्षता हीच सत्पुरुषाची योगसाधना असते. नाना प्रकारच्या आपत्तीनी रंजले गांजलेले लोक विषयसुखालाच सर्वस्व मानून त्यांत रंगलेले पामर, यांच्याविषयी सत्पुरुषांच्या अंतःकरणांत दया असते. उन्हाळ्यामध्ये तहानेने तडफडणारे गाढव पाहून श्रीएकनाथ महाराजांचे अंतःकरण द्रवले आणि त्यांनी काशीहून रामेश्वराला घालण्यासाठी वाहून आणलेली, गंगेची कावड त्या दीन मुक्या प्राण्याच्या मुखांत ओतली. आपल्या हातून हें घडले नसतें. सत्पुरुषांच्या अंतःकरणांतील दया ही पूर्णपणे निरपेक्ष आणि व्यापक असते. आपत्तीत सांपडलेल्या आप्तांविषयीं आपणाला जें वाटेल तें संतांना भूतमात्राविषयी वाटत असते.

सत्पुरुष दक्ष असतो. आवश्यक गोष्टी तो वेळच्यावेळी, योग्य रीतीने करणारच. समर्थांचा या दक्षतेवर फार भर आहे. मनुष्याचे जीवन हा एक प्रवास आहे, आणि प्रवाशाने दक्ष राहिलेंच पाहिजे, नाहीतर तो लुटला जाईल, जायचे तिथे तो योग्य रीतीनें पोचणार नाहीं. वेंधळेपणा, गबाळेपणा, दीर्घसूत्रीपणा हा कांहीं सद्गुण नाहीं आणि सत्पुरुष आतून तरी तसा कधींच नसतो. आळशी माणसाने आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठीं परमार्थाची ढाल वापरावी आणि ईश्वराची इच्छा असेल तसें होईल म्हणावे. हा लुच्चेपणा आहे. आम्हीं चित्रपटाचें, नाटकाचे आसन लांब ओळीत उभे राहून आधीं आरक्षित करणार, नुसता खेळ पाहण्यासाठी लांबचा प्रवास करणार; आणि यात्रेला कां गेला नाहींस असें म्हटलें तर ईश्वराची इच्छा असेल तेव्हां घडेल असें सांगणार, ही लबाडी आहे. सत्पुरूष कर्तव्याला ओझे मानीत नाहीं. शारीरिक कष्टाला कंटाळत नाहीं. श्रमाने कधीं वैतागत नाहीं. विहितकर्म तो कधीं टाळीत नाहीं. तो परमार्थासाठी सर्वदा दक्ष असतो.

सत्पुरुष निर्लोभी असतो. वीतरागतेचे, वैराग्याचे, हे दृश्य रूप आहे. ज्याच्या अंतःकरणांत अनासक्ति नांदते, त्याचे ठिकाणी लोभ संभवतच नाहीं. उपाधि तो वाढवीत नाही. संग्रहाची त्याला हौस नसते. जो वीतराग आहे, निर्लोभी आहे, तो स्वाभाविकपणेच निश्चिंत असतो. त्यामुळे त्याचे ठिकाणीं कोणत्याहि प्रकारचा क्षोभ नसतो. ज्याला कशाची फिकिर नाहीं तो फकीर. संत खऱ्या अर्थाने असा असतो.

ज्याच्या अंतःकरणांत स्वार्थ नाहीं, अहंकार नाहीं, ज्याला कशाची अभिलाषा नाहीं, ज्याचें हवें-नको संपलेले असतें, त्याला क्षुब्ध होण्याचे कारणच नसतें. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे जीवन त्या दृष्टीनें आदर्श आहे. समाजाने अनेक प्रकारचा छळवाद केला असूनहि ते कधी क्षुब्ध झाले नाहींत. चीड, संताप, भय, उद्वेग, यांपासून ते पूर्ण मुक्त होते. लोकांकडून इतकी गांजणूक सोसूनहि जनकल्याणाविषयीची त्यांच्या अंतःकरणांतील भावना कधी उणावली नाहीं. प्रेमळ आईच्या वात्सल्यानेंहि लाजावे, अशी जीवाआगळी माया त्यांनी लोकांच्यावर केली. जन्मदात्री माताहि इतके प्रेम करूं शकत नाहीं. थोडा प्रकृतिभेद असला तरी सर्व संत असेच असतात. आपण मात्र एवढ्या तेवढ्या कारणांनी भडकून उठतो. अगदी फुसक्या निमित्तानेंहि आम्हीं अस्वस्थ होतों. आमचा संताप अनावर होतो. सूडाच्या भावनेनेंहि आम्ही पेटतो. आमच्या तोंडांतून अपशब्दांची बरसात झडते. आणि संत अत्यंत प्रतिकूल परिस्थितींतहि शांत- प्रसन्न राहतात. परमेश्वराचें ' अक्षोभ्य' हे नांव त्यांनाहि पूर्णपणे शोभते.

संताच्या ठिकाणची ही दया, क्षमा, शांति सत्त्वगुणाचा परिणाम असतो. त्यात अगतिकता नाहीं, लाचारी नाहीं, दैन्य नाहीं. तो अल्पसंतुष्ट असतो. अयाचितवृत्तीनें राहील, कदाचित् भिक्षा मागेल, पण तो दीनवाणा भिकारी नाहीं. उलट आत्मतृप्त असल्यानें ईश्वरी प्रेमांत रंगून गेल्यामुळे परमेश्वरावरील दृढ विश्वासाने, संतांच्या ठिकाणीं कांहीं वेगळ्या प्रकारची मस्तीच पुष्कळवेळा दिसून येते. आत्मानंदांत ते धुंद असतात. जगाचे पाश त्यांना खेचू शकत नाहींत. कबिरांचे एक मोठे सुंदर पद आहे. ते म्हणतात- "हमन हे इश्क मस्ताना हमनको होशियारी क्या । रहे आजाद या जगमें हमन दुनियासे यारी वा ।।" संत दीन नाहींत, बापुडवाणे नाहींत. कारण त्यांच्याजवळ कोणत्याहि दृष्टीनें परस्वाधीनता नसतें, ते पूर्णपणे स्वतंत्र असतात. कोणावरहि त्यांचें जीवन अवलंबून नसते. त्यांच्या संबंधांत जें कांहीं घडत असते तें सर्व भगवंताच्या प्रेरणेने होत असतें आणि म्हणून समर्थ स्वतःच एके ठिकाणीं "आम्ही काय कुणाचे खातो रे । तो राम आम्हांला देतो रे ॥" असें म्हणतात. हा डौल सामान्य नाहीं.

समर्थांनी सत्पुरुषाची लक्षणें सांगतांना योगी शब्द वापरला असूनहि या श्लोकांत वा अन्यत्रहि, अलिकडे फार सोप्या झालेल्या कुंडलिनीच्या जागृतीचा वा सिद्धींचा, चमत्कारांचा उल्लेख केला नाहीं. उदात्त अशी अंतःकरणाची अवस्थाच अनेक सद्गुणांच्या माध्यमाने सांगून या लक्षणावरून संत, योगी ओळखावा असें समर्थ म्हणतात, हे लक्षांत घेतलें पाहिजे.

धरी रे मना संगती सज्जनाची । जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळें भाव सदबुद्धि सन्मार्ग लागे । महां क्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥

सज्जनाच्या संगतीचे हे महात्म्य थोड्या निराळ्या शब्दांत १२९ व्या श्लोकांत आलें आहे.

कस्तुरीच्या संगतीने मातीलाहि सुगंध लागतो. तसें सज्जनांच्या संगतीने माणसाचे होते. येथील सज्जन हा सत्पुरुष आहे. सामान्य सभ्य गृहस्थ नव्हे. सत्पुरुषांच्या संगतीने मनुष्याच्या अंतःकरणांतील सद्‌भाव वाढतात. चांगलें काय ते बुद्धीला पटते. बुद्धि सत्याचा निश्चय करूं शकते. सन्मार्गानें जाण्याची, सदाचरणाने वागण्याची प्रेरणा निर्माण होते. हें जणू सत्पुरुषांच्या प्रभावाने, बळाने घडविल्याप्रमाणें विनायास घडते, सहजपणे घडते.

माणसे सत्य सोडतात, ते कोणत्यातरी भयापोटी. क्रौर्य काय किंवा पळपुटेपणा काय, दोन्ही भय या भावनेचेच आविष्कार आहेंत असें मानसशास्त्र सांगते. संतांच्या संगतीने माणसाच्या ठिकाणीं निर्भयपणा येऊ शकतो. अत्यंत कूर असा विक्राळ काळहि जणू मोडून पडतो, म्हणजे मृत्यूचेंहि भय वाटेनासें होतें. कारण सत्पुरुषाजवळ उत्कट रीतीनें वास करणाऱ्या दैवी संपत्तीचें अभय हें पहिलें लक्षण असल्याचें गीतेने सांगितलें आहे.

भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहें ।
जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना । भय मानसी सर्वथाहि असेना ॥ १३६ ॥

सर्व ब्रह्मांड भयानें व्यापले आहे. मनुष्याच्या जीवनांत एकहि वस्तु अशी नाहीं कीं जिला कशाचेंहि भय नाहीं. भर्तृहरीने एका श्लोकात कांहीं भयांचा उल्लेख केला आहे आणि शेवटीं निर्भय काय तेहि त्यानें सांगितलें आहे.

भोगे रोगभयं कुले च्युतिभयं वित्ते नृपालाद्‌भयम् ।
माने दैन्यभयं बले रिपुभयं रूपे तरुण्या भयम् ।
शास्त्रे वादभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद्भयम् ।
सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां विष्णोः पदं निर्भयम् ॥
'वैराग्यमेवाभयम् !' असाहि एक पाठ आहे.

असे असल्यामुळें सामान्याला निर्भय होता येत नाहीं. कारण आसक्तीनें तो सृष्टीशी जोडला गेलेला असतो. सृष्टीच्या मागें असलेल्या मूलतत्त्वाकडे तो झेप घेऊं शकत नाहीं, त्यामुळें भयातीत होऊं शकत नाहीं. संतांनी मात्र या दिसणाऱ्या, प्रत्ययास घेणाऱ्या, व्यवहाराला आधार होणाऱ्या, जगतामागचे अनादि, अनंत, अव्यय, अखंड, अनिर्वचनीय असें तत्त्व साक्षात्कारानें जाणले असतें आणि त्यामुळे ते भयाच्या अतीत होतात, भयाच्या पलीकडे जातात. ' द्वितीयात् वै भयं भवति" असें शास्त्र सांगते. जेथें जेथें द्वैत आहे, भिन्नतेची, वेगळेपणाची, भावना आहे, तेथें तेथें भय राहते. संतांच्या लेखी सर्व द्वैत संपलेले असते; सर्व, द्वंद्वे मिटलेली असतात आणि त्यामुळें त्यांना कशाचेंहि भय उरत नाहीं. सर्व भूतजात त्यांना आत्मरूप झालें असल्याने मनामध्ये भय वाटण्याचे काही कारण उरतच नाही, ते सर्वथा निर्भय होतात.

आपल्याला एकट्याला करमत नाहीं म्हणून आपण द्वैत गोळा करतो. त्यानें आरंभी थोडे बरें वाटतें. पण हें बरें वाटणेच माणसाला मोहांत पाडून विवेकभ्रष्ट करतें, आणि मग सर्व जीवन भयानें ग्रस्त होते. त्यासाठीं तात्पुरते उपाय शोधले जातात, पण तें पुवाळलेल्या घावाला वरून मलमपट्टी केल्यासारखे होतें. तत्त्वाचे ज्ञान हाच त्याच्यावरील खरा उपाय असतो. संतांच्या संगतींत तद्‌विषयक जिज्ञासा जागृत होते आणि त्यांच्या उपदेशानेच तृप्त होते.

जिवा श्रेष्ठ ते पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसे चि ठेले ॥
देहेबुधिचें कर्म खोटे टळेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३७ ॥

उपदेश करतांना जें जें माणसाच्या हिताचे तें श्रेष्ठांनी म्हणजे थोरांनी, संतांनी अगदीं स्पष्टपणें सांगून ठेवले आहे.

या श्लोकातील श्रेष्ठ शब्द हा जीवाला जें श्रेष्ठ म्हणजे हिताचे, ते श्रेष्ठ म्हणजे संत स्पष्टपणें सांगून गेले आहेत अशा दोन्हीं अर्थानी वापरता येईल. श्रेष्ठ शब्द हितवाचक मानला तर संत शब्द अध्याहृत मानावा लागेल आणि श्रेष्ठ शब्द संतवाचक मानला तर हित शब्द अध्याहृत मानावा लागेल.

कांहीं लोक आपला मोठेपणा टिकविण्यासाठी सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगत नाहींत, उघड करीत नाहींत. कांहीं हिताचे राखून ठेवतात, चोरून ठेवतात. आपली आवश्यकता भासावी अशा रीतीनें, अर्धवटपणे, सांगतात. धंद्याची गुपिते कुणी उघड करीत नसतो; पण सत्पुरुष निःस्वार्थी आहेत, त्यांना कशाचीच हाव नसते. लौकिक मिळवावा, प्रख्याति व्हावी, अनेकांनी भोवती भोवती असावे, असें त्यांना कधीं वाटत नाहीं. त्यामुळे त्यांचें सांगणे अगदीं स्पष्ट, उघड आणि रोकठोक असतें.

अशा स्थितींत असंख्य लोकांनी आपलें हित साधून घेतले पाहिजे कीं नाहीं ? कारण हित म्हणजे काय ? तें कसें ओळखावे ? हित साधनाचा मार्ग कोणता ? साधनें कोणती ? हें अगदीं स्पष्टपणे, सहज समजावे, अशा रीतीनें, अनेकांनी, अनेक प्रकारांनीं, वारंवार पुढे मांडून ठेवले असूनहि, माणसे बहुधा जिथे होतीं, जशीं होतीं, तशींच आहेत, तिथेच आहेत. त्यांचें अज्ञान आणि तज्जन्य अहंकार, विषयलोलुपता, स्वार्थाधंता इत्यादि दुर्गुण जसेच्या तसेच आहेत. कोणी संत समाजाला मार्गदर्शन करण्यासाठीं आज पुढें येत नाही, तसा कुणी श्रेष्ठ संत दिसत नाहीं, म्हणून माणसे उद्धरून जात नाहींत, हित साधून घेऊं शकत नाहींत, असें रडगाणे गाण्यांत कांहीं अर्थ नाहीं. सृष्टीचे व्यापार होत आहेत त्याअर्थी कोणी संत अस्तित्वांत नाहींत या म्हणण्याला कांहीं अर्थ नाहीं. ते आपल्याला ओळखता येत नसतील हें शक्य आहे. पण ते मुळांतच नाहीत हे संभवतच नाहीं. संत प्रत्यक्ष समोर दिसत नसले तरी आपली अडचण होण्याचे वास्तविक कारण नाहीं. श्रीसमर्थांच्या चरित्रांतीलच एक प्रसंग आहे.

समर्थांचा देह सुटण्याचा काळ जवळ आला. त्यांनीं आपल्या परिवारातील मंडळींना तसें सांगितलें, तेव्हां सर्वदा सहवासांत असलेली ती मंडळी कासावीस झालीं, विलक्षण दुःख करूं लागली. त्यांच्या डोळ्याचे पाणी खळेना, उरात हुंदके मावेनात. शोकाने त्यांना कांहीं सुचेनासें झालें. तेव्हा समर्थ त्यांना हासून म्हणाले-अरे ! शोक कशाचा करतां ? माझ्याजवळ इतके दिवस राहून हेंच शिकलात कां ? माझें जड शरीर म्हणजे "मी" कां ? मी शरीराने आहे कीं नाहीं याला काय महत्त्व आहे ? आत्माराम आणि दासबोध हें माझें स्वतःसिद्ध रूप आहे. तें कोठे जाणारे नाहीं. तें तुमच्याजवळ आहे, तुमच्या स्वाधीन आहे. मग खुळ्यासारखा शोक कां करितां ? मातीच्या शरीराचा लोभ कां धरता ?

हा प्रसंग फार उद्‌बोधक आहे. भारतीय संस्कृति या दृष्टीनें फार संपन्न आहे. महाभारत, श्रीमद्‌भागवत यांच्या रूपानें भगवान् व्यासमहर्षि आपणांमध्यें वावरत आहेत. अमृतानुभव, ज्ञानेश्वरी या रूपानें श्रीज्ञानेश्वर महाराज आईच्या वात्सल्याने आपणांस भरवीत आहेत. गाथेच्या रूपानें श्रीतुकोबाराय सन्मार्ग दाखवीत आहेत. दासबोध, मनोबोधाच्या रूपानें श्रीसमर्थ रामदासस्वामी नाना प्रकाराने पढवीत आहेत. कबीर आहेत, नानक आहेत, तिरुवल्लूर आहेत, शंकराचार्य आहेत, रामकृष्ण आहेत, रमण आहेत. आपल्या रसाळ आणि उद्‌बोधक वाङ्मयाच्या रूपानें अजरामर असलेली ही मंडळी आमच्या अंवतीभोवतीं आहेत, आम्हांला जागवीत आहेत, सावध करीत आहेत.

आम्ही मात्र त्यांचेकडे लक्ष देत नाहीं. नाठाळ, आळशी पोराने, ऐन परीक्षेच्या दिवसातहि सकाळी लौकर उठू नये, घड्याळाचा गजर थप्पड मारून बंद करावा, पुस्तके केवळ उशी म्हणून उपयोगांत आणावीत, आईने जागे केलें तरी कुरकुरून पुन्हा मुरगुट मारावी, फार तर 'हो उठतो' म्हणून नव्या दमाने ताणून द्यावी, असेंच आमचेंहि होत असतें. त्या अज्ञानी पोराला झोपेचा मोह आवरत नाहीं, आळसांत सुख वाटते. आम्हाला विषयाच मोह सुटत नाहीं. इंद्रियांना होणाऱ्या सुखापलीकडे कांहीं चांगलें आणि हिताचे आहे हें पटत नाही. आमची ही देहबुद्धि फारच उत्कट असते. मी म्हणजे देह आणि देहाचे सुख तें माझें सुख, ही धारणाच देहबुद्धि या शब्दाने अभिप्रेत आहे. केवळ देहबुद्धी जखडलेला मनुष्य कांहीं चांगलें करू शकत नाहीं, कांहीं हिताचे साधू शकत नाहीं.

ईश्वर नाहीं, परलोक ही खोटी कल्पना आहे, पुनर्जन्म हें थोतांड आहे, असें ज्यांना म्हणावयाचे असेल त्यांचें हें तर्कट गृहीत धरूनहि असे लोक केवळ शरीरसुखापुरतें पाहतील तरी त्यांचें कांही भले होण्याची शक्यता नाहीं. शरीराचे हित जें आरोग्य, तें विचारांत घ्यावयाचे ठरविलें तरी शरीरसुख प्रधान मानता येणार नाहीं. तिथेहि संयम, त्याग, सातत्य, प्रयत्न, कष्ट कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत स्वीकारावेच लागतील. इंद्रियांना वाटणारे सुख हे खरें सुख नाहीं हें मान्य करावेच लागेल. वैयक्तिक हिताचा विचार करतांनाहि हें लक्षांत घ्यावें लागतें. मग कुटुंब, समाज, राष्ट्र या अधिकाधिक व्यापक क्षेत्राचा विचार करतांना संयमादींचें महत्त्व लक्षांत घेणे भागच आहे. पण देहबुद्धि हा विचारच करूं देत नाही. म्हणून तर तिचें कर्म खोटे आहे असें समर्थ म्हणतात. या देहबुद्धीमुळेंच, सत्यस्वरूपाच्या अज्ञानाचा परिणाम असलेल्या या देहात्मवादामुळेंच, हिताचे जें काय तें आधीं ऐकावेसेच वाटत नाहीं, ऐकले तरी कळत नाहीं, कळले तरी वळत नाहीं. हित ही वस्तु कांहीं पालटणारी नसते. देशकालपरिस्थितीचा तिच्यावर खऱ्या अर्थाने काही परिणाम होत नाहीं. विज्ञानयुगांतहि पालटली आहेत ती सुखसाधनें. हित कांहीं नवीन व्हावयाचें नाहीं, नवीन कळावयाचें नाही. हिताचे ठेवणे हें जुनेच आहे. मीपणाने, देहबुद्धीच्या अहंकाराने त्याचें आकलन होत नाही इतकेंच. समर्थांनी देहबुद्धि ही चांगली नाहीं तिचा निरास केला पाहिजे, ती टाकली पाहिजे, तीच मनुष्याच्या सन्मार्गसाधनेतील मोठा अडथळा आहे, तिच्यामुळेंच अनेक प्रकारच्या आपत्ती माणसाला भोगाव्या लागतात, असें या मनोबोध प्रकरणांत, आरंभापासून शेवटपर्यंत अनेक प्रकारांनी, अनेक श्लोकांतून, सांगितलें आहे. विवेके देहेबुधि सोडून द्यावी ( १२), देहेबुधि नीरूपणीं वीसरावीं ( १०३), देहबुधिचा निश्चयो ज्या टळेना ( १३८), देहेबुधि ते आत्मबुधी करावी ( १६३), उपाधी देहेबुद्धि ते वाढविते ( १६८), देहेबुधिचा आठऊ नाठवावा ( १६९), देहेबुधि हे ज्ञानबोधे तजावी ( १७०), देहेभान हें ज्ञानशस्त्रे खुडावें ( १८८), देहबुधिचा निश्चयो ज्या टळेना । तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना ( १९१), तया पाहता देहबुधी उरेना ( १९७) या व्यतिरिक्त प्रत्यक्ष देहबुद्धि असा शब्द वापरला नसला तरी देहासंबंधीची उपेक्षा धारण केली पाहिजे अशा अर्थाची वचनें इतरहि श्लोकांतून आलेली आहेत. देहाला सर्वस्व मानण्याच्या वृतीवर परिणाम व्हावा व माणसाने विवेक करावा, हाच हेतु या पुन्हा पुन्हा सांगण्याच्या मागे आहे.

भ्रमें नाडळे वीत ते गुप्त जालें । जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें ॥
देहेबुद्धिचा निश्चयी ज्या टळेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३८ ॥

मागच्या १३७ व्या श्लोकापासून " जुनें ठेवणें मीपणें आकळेना" अशा पालुपदाचे पाच श्लोकांचे प्रकरण आरंभलेलें आहे. सध्याच्या काळांत या विचाराचे अधिकच महत्त्व आहे. प्रगति-उन्नति हे आजचे परवलीचे शब्द आहेत. काळ पालटत असतो. परिस्थिति नित्य नवे रूप धारण करीत असते. आपण तिच्याशी जमवून घेतलें पाहिजे, काळानुरूप परिवर्तन केलें पाहिजे, असें सारखे ऐकविले जातें. असें सांगणें, मानणे हेंच बुद्धिवादाचे गमक ठरलें आहे. विचारवंत म्हणविणारे याच मताचा सातत्याने प्रचार करीत असतात. आणि समर्थ मात्र " जुनें ठेवणें मीपणें आकळेना" असें म्हणून अहंकार सोडा, तुमच्याजवळ तुम्हांला ऐश्वर्यसंपन्न, सुखी, समाधानी करणारा, उन्नत विचारांचा, उदात्त चारित्र्याचा बहुमोल ठेवा पुरातन काळापासून आहे तो ओळखा, जाणून घ्या, असा आग्रह धरीत आहेत. तेव्हां एकदां शांत मनानें, साधक बाधक विचाराने, पूर्ण जागृत विवेकाने प्रगति, परिवर्तन, पालट, काळासवें धावणे या शब्दांच्या मागची भूमिका नीट जाणून घेतली पाहिजे.

प्राप्त होणें शक्य असा जो आदर्श, तो मिळत नाहीं तोपर्यंत त्याच्या दिशेनें पुढे पुढे पावलें टाकीत राहणे ही प्रगति आहे. पर्वताच्या पायथ्यापासून पर्वताच्या शिखराकडे जातांना कष्टाचे चढउतार धैर्याने पार पाडावे लागतात. चालत रहावे लागतें. तें प्रगतीचे असतें. शिखरावर पोचल्यानंतर पुढें टाकले जाणारे प्रत्येक पाऊल हें अधोगतीचे लक्षण असतें.

जन्माला आलेले मूल वाढू लागतें. वीसपंचवीस वर्षांपर्यंत त्याच्या शरीरांत, हालचालींत, अवरयवांच्या सामर्थ्यांत, क्रमानें परिवर्तन होत राहते, विकास होत राहतो. पंचविसाव्या वर्षी व्यक्तिमत्त्वाला सर्वदृष्टीनें पूर्णता येते, आणि शरीराच्या पातळीवर तरी पुढें १०-१२, वर्षें तें नैसर्गिकपणे जसेच्या तसें टिकून राहते. पुढें नकळत उतार लागतो. पन्नाशीनंतर तें थोडे जाणवू लागतें, आणि पुढें-पुढें तें चांगलेच व्यक्त होतें. म्हातारपणाची लक्षणें प्रगट होतात. शरीराचे बळ उणावते. इंद्रियांची कार्यक्षमता जाते. आणि पुढें जीवन राहिलेंच तर तें भारभूत झालेलें असतें. सामान्यतः हें असें घडते व्यक्तिपरत्वे ५ - १० वर्षांचे अंतर राहते इतकेंच. आता जन्मापासून वयाच्या पंचविशीपर्यंत होणारे परिवर्तन हें परिवर्तनच आणि पस्तिशीनंतर अनुभवास येणारा पालट हेहि परिवर्तनच. दोन्हीहि सारखीच इष्ट आणि आवश्यक मानावीत काय ? पस्तिशीनंतर अनुभवास येणारे परिवर्तन हें होत नसेल किंवा लांबत असेल तर तें व्हावें म्हणून वा त्याचा वेग वाढवावा म्हणून माणसाने प्रयत्नशील असावें काय ? पन्नाशी उलटलेलाहि एखादा माणूस केस काळेभोर असलेला, एकहि दौत न पडलेला, पाच-दहा कोस चालण्याचा प्रसंग आला तरी न डगमगणारा, दांत बळकट, दृष्टि भेदक, कान तिखट, हात सशक्त, अशा कार्यक्षम शरीराचा, पंचविशीतल्या तरुणालाहि लाजविणाऱ्या उत्साहाचा असला तर त्याला अप्रगत, मागासलेला म्हणावें काय ? आणि तिशीतच ज्याच्या शरीरावर म्हातारपणाची अवकळा दिसू लागली आहे त्याला प्रगत समजावे काय ?

फार पूर्वी, धूर ओकणाऱ्या चुलीवर, कदाचित् मातीच्या भांड्यांतून तांदूळ शिजवून, पत्रावळीवर वाढून जेवीत असत. आज वैज्ञानिक संशोधनामुळे साधनें वेगळीं आहेत. ज्वलनशील वायूंच्या शेगड्यांवर अत्याधुनिक अशा दाबाच्या पाचनपात्रांत (प्रेशर-कुकर) अन्न शिजविलें जातें. जेवणासाठी उच्चासनें व भोजनमंच, काचपात्रे, चकचकीत थाळ्या आणि काटेचमचे यांची सोय असते. पण या आधुनिक साधनसंभारांत शिजविले जातात ते डाळ-तांदूळच. त्यांत कांहीं परिवर्तन झालें नाहीं.

मनुष्य, मनुष्य म्हणून या सृष्टींत वावरू लागला तेव्हांपासून त्याची शरीररचना आणि शरीरक्रिया जशी होती तशीच आहे. सहस्त्रावधि वर्षांचा काळ लोटला तरी इंद्रियांची स्थले पालटली नाहींत, अवयवाच्या क्रिया वेगळ्या झाल्या नाहींत. परिवर्तन ही नैसर्गिक आवश्यकता असती तर येथेंहि परिवर्तन अपेक्षित होतें. परिवर्तनवाद्यांनीं, सतत प्रगतीचा धोषा लावणारांनीं, या गोष्टीचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपः ।
नानाहिताग्रिर्नाविद्वान् न स्वैरी स्वैरिणी कुतः ॥

उपनिषद्‌कालीन एका गजाने माझ्या राजवटींत कोणी चोर नाहीं, कृपण नाहीं, दारुडा नाहीं, अधार्मिक नाहीं, अशिक्षित नाहीं, कोणी स्वैराचारी पुरुष नाही तर दुर्वर्तनी स्त्री असणें कसें संभवनीय आहे, असे म्हटले आहे. यांत कौटुंबिक, आर्थिक, वैयक्तिक, सामाजिक सुखस्वास्थ्याचे जें स्वरूप आहे त्यापेक्षा अधिक चांगली समाजरचना कल्पनेने तरी सुचविणे सध्या आहे काय ? सतत पालटत राहिलें पाहिजे असें सांगून आपणांस काय मिळवावयाचे आहे ? संघर्ष, अस्वास्थ्य आणि प्रदूषण हीच आपली ध्येंयें आहेत काय ?

सृष्टीमध्ये विविधता निश्चित आहे. सर्वच सृष्ट पदार्थांत ती आहे. अचेतनांत आहे तशी ती सचेतनातहि आहे. त्या विविधतेचे मूल्यांकन प्रकृति, प्रवृत्ति, परिस्थितीप्रमाणे वेगवेगळे होतें, आणि त्यांतून जन्मास आलेली विषमता कधीं कधीं फार जाचक होते व ती संघर्ष आणि अस्वास्थ्याला जन्म देते. भारतीय संस्कृतीनें या विविधतेचा समतोल रहावा, विविधतेच्या आश्रयानें असणाऱ्या सामर्थ्याचे केंद्रीकरण होऊं नये, निरनिराळ्या शक्ति विकेंद्रित रहाव्या, सर्वांना आपले हित साधता यावें, प्रत्येकाला समाधान लाभावे, कुणी उपेक्षित राहूं नये, लुबाडला जाऊं नये, आक्रमक होऊं नये, म्हणून एक विशिष्ट समाजव्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण; ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम; धर्म, अर्थ काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ; कर्म, भक्ति, योग, ज्ञान असे चार मार्ग; यांचा समावेश केला आणि सहस्त्रावधि वर्षांच्या दीर्घकालापर्यंत समाज ऐश्वर्यशाली, संपन्न, सुखी, संतुष्ट, सुस्थिर आणि समाधानी राहील अशी व्यवस्था केली. हें ठेवणे जुनें असले तरी शिळे नाहीं, म्हणूनच कुजके नाहीं, सडले नाहीं, अर्थातच त्याज्य नाहीं, तिरस्कारार्ह नाहीं. कांहीं दोष, कांहीं मलिनता कोणत्याहि व्यवस्थेत शिरू शकते. प्रत्येक रचनेच्या, कांहीं स्वाभाविक उणीवाहि असतात. दोष, मळ काढून टाकावे लागतात. कांहीं अपरिहार्य उणीवा संतोषाने सोसाव्या लागतात. समाजव्यवस्थेच्या दृष्टीनें सर्वदाच शत प्रतिशत उत्तम, चांगलें वा निर्दोष असें कांहीं असूं शकत नाहीं. तेथें कमी वाईट आणि अधिक चांगलें, हा निकष लावूनच पर्याय शोधावा लागतो. समाजव्यवस्थेची भारतीय धारणा ही या दृष्टीनें समाजरचनेच्या कोणत्याहि पद्धतीपेक्षा, कल्पनेपेक्षां, वादापेक्षां अधिक चांगली आहे, कमी वाईट आहे आणि म्हणूनच निःशंकपणे श्रेयस्कर आहे.

दुर्दैवाने गेल्या अनेक शतकांच्या पारतंत्र्यामुळें जाणून, नेणून द्रष्ट झालेल्या वा इष्ट केलेल्या, भ्रांत बुद्धीला हें पटेनासें झालें आहे, म्हणून समर्थ " भ्रमें नाडळें वीत ते गुप्त जाले" असें म्हणतात. संपत्ति जवळ आहे, पुढें आहे, भव्योदात्त संस्कृतीचें धन हाताशी आहे. तें सर्व सुख साधन आहे. पण तें तसें आहे हें भ्रमानें आपण जाणून घेत नाहीं आणि त्यामुळें गर्भश्रीमंताच्या उदरी येऊनहि संपत्तीचा ठेवा कुठं आहे ते निश्चित न समजल्याने जन्मदारिद्र्य भोगावें लागावें, तशीं स्थिति आपली झाली आहे. दाराशी आलेल्या कामधेनूला कुणी भाकड गाय समजला, चिंतामणि कोणाला गारगोटी वाटली, कल्पवृक्षाखाली बसून कुणी संकटाचीच कल्पना केली तर तो दोष त्याचाच आहे. सर्व अनुकूलता असतांना दुर्दैन्याच्या रूपाने त्याची शिक्षा आपण भोगीत आहोंत.

देहबुद्धि सोडल्यावांचून आपणांत सुधारणा होणार नाहीं. इंद्रियसुखांना सर्वस्व समजणाऱ्या देहात्मवादाचा, भौतिक प्रगति म्हणजेच सगळे कांहीं असें मानणाऱ्या जडवादी तत्त्वज्ञानाचा, त्याग केल्यावांचून जें हिताचे आहे, आपल्या स्वाधीन आहे, तें आपण जाणूं शकणार नाहीं. देहबुद्धीचा निषेध समर्थांनी ठायीं ठायीं केला आहे तो यासाठींच.

'जुने ठेवणे' हिताचे असून दिसत नाहीं. तें कांहीं तें खऱ्या अर्थाने गुप्त आहे म्हणून नव्हे. तें गुप्त नाहीं, प्रगट आहे, उघड आहे पण त्याकडे पाहण्याची आपली दृष्टि नीट नाहीं. बुद्धीची तर्कप्रणाली सरळ नाहीं. हळवा आणि घायकुता माणूस जसा सदैव विपरीत कल्पनाच करीत असतो, घटनांचे अर्थ प्रतिकूलच पाहतो, तसें आपलें आपल्या सांस्कृतिक ठेव्याच्या संबंधांत होतें. तर्कबुद्धी शुद्ध असेल, विश्वास दृढ असेल तर असें होणार नाहीं.

पुढें पाहतां सर्व ही कोंदलेंसे । अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे ॥
अभाव कदा पुण्य गाठी पडेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३९ ॥

आपले तत्त्वज्ञान सांगते कीं हें सगळे ब्रह्मच आहे. "सर्व खलु इदं ब्रह्म" पाहणारा, विचार करणारा जो मी तो, आणि त्या मीच्या दृष्टिपथांत, विचारपथांत येणारे आणि न येणारे, परमाणूपासून खगोलांतील प्रचंड ग्रहताऱ्यांनी भरलेलें, सूक्ष्मतम कृमिकीटकांपासून मनुष्यापर्यंतच्या नानाविध जीवांना समाविष्ट करून घेणारे, अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेले, हें विशाल ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मच आहे, ब्रह्माचा एक आविष्कार आहे. विचार करणाराहि ब्रह्म आणि ज्याचा विचार करतो तेंहि ब्रह्मच. पण अभाग्याला, करंट्याला, अज्ञान जोपासून त्यांतच रमणाऱ्या पामराला, मात्र वास्तवतेचें हे भान येत नाहीं. तो हें सर्व जड मानतो, पाषाण मानतो, उपभोगाचे एक साधन मानतो.

श्रद्धेने संस्कारित अशी बुद्धि नाहीं किंवा विचाराने, विवेकाने, सरळ प्रामाणिक तर्काने परिष्कृत अशी भावना नाहीं त्यामुळें हें असें होतें. इंद्रियें जें अनुभवतात, मनाला जें पटते, बुद्धीला जे वाटतें, ते प्रामाणिक यथार्थ वा वास्तवपणानें सत्य असतेंच असें नाहीं. इंद्रिय, मन, बुद्धि ही ज्ञानसाधनें खरी पण ती कार्यक्षम, शुद्ध, निर्मल असावी लागतात. तसें नसेल तर त्यांच्या आश्रयानें असणारे दोष माणसाला सत्याच्या साक्षात्कारापासून दूर नेतात. हें जेव्हां अज्ञानाने घडेल, निरागस अज्ञानाने घडेल, अविकसित अवस्थेतील बालभावानें घडेल, तेव्हां ते क्षम्य असेल. कारण त्यावेळी सुधारणा होण्याची पूर्ण शक्यता असते. पण जेव्हां मूलभूत अज्ञानावर, श्रमावर अहंकाराने बुद्धिवादाची पुटें चढतात व तेंच खरें मानण्याचा दुराग्रह बळावतो तेव्हां मात्र हें क्षम्य नसते. समर्थ त्याला अभागी, करंटा म्हणतात तें यासाठी. जेथें शक्यता नाहीं, संभव नाहीं, तेथे कुणी जाणता माणूस फारसा दोष देत नाहीं.

पांच वर्षांच्या लहान अजाण बालकाकडून, त्यानें उपनिषदे वाचली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत अशी अपेक्षा कुणी करीत नाहीं; पण मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जर ज्ञानेश्वरी मी वाचली नाहीं असें भूषणाने मिरवीत असेल तर त्याला अभागी वा करंटा म्हणण्यावांचून दुसरें काय म्हणणार ? ज्ञानेश्वरी मी वाचली नाहीं म्हणण्यामागे, आजच्या विज्ञानयुगांतील प्रगत कालाच्या दृष्टीनें अंतराळांत संचार करणाऱ्या, चंद्रावर जाऊन पोचलेल्या मानवाच्या दृष्टीनें, ज्ञानेश्वरींत उपयोगी पडणारे कांही नाही, म्हणून ती वाचण्यांत कांहीं अर्थ नाहीं, असें जाणून मी ती वाचली नाहीं, असें या प्रथितयश साहित्यिकांना म्हणावयाचे असतें. कोठेंहि, कशावरहि भाव नसलेले हे अश्रद्ध तर्कटी स्वतःच्या आणि इतरांच्याहि कल्याणाची हानी करीत असतात. त्यांचा बुद्धिवाद मोठा विलक्षण असतो. हें सगळे ब्रह्म आहे ना ! सच्चिदानंद आहे ना ! मग जगांत जडता कशी ? दुःखे कां ? भयानक विषमता कां आढळून येते ? ब्रह्म जर सर्वव्यापक आहे तर शिल्पकार जिला पायाखाली धरून घडवितो त्या दगडाच्या मूर्तीला देव म्हणून वंदनीय का मानावयाचें ? तिची पूजा कशाला करावयाची ? ब्रह्म जर सर्वत्र ओतप्रोत भरून आहे तर पाप-पुण्याची कल्पना थोतांड नाही काय ? पाप- पुण्याच्या कल्पनेवर आधारलेले विधिनिषेध जीवनाचे मार्गदर्शक म्हणून कशासाठी मानावयाचे ? "आत्मवत् सर्वभूतानि यः पश्यति स पश्यति" हें ब्रह्माच्या व्यापकतेवर आधारलेले तत्त्वज्ञान खरें असेल तर भारतीय संस्कृतीनें भीषण अशा जातिभेदाचा पुरस्कार कशासाठी केला ? इत्यादि इत्यादि आक्षेप घेतले जातात. अवस्थाक्रम लक्षांत न घेतल्याने हें असें तर्कट केलें जातें. जगतातील सगळ्या वस्तू धन-ऋण विद्युत्कणांनी भरलेल्या आहेत. त्याच्यावाचून दुसरी वस्तुसत्ता नाहीं. असें आजचे प्रगत विज्ञान सांगते आणि तरी विज्ञानवादी, विज्ञानाचे मान्य पदवीधर वस्तूंची उपयोगिता वा मूल्य एकच मानीत नाहींत. हिरा आणि कोळसा यांच्या उपयोगांत आणि मूल्यांत आकाश-पाताळाचें अंतर राहते. मूल घटक विद्युत्कण असूनहि त्यांच्या उण्याअधिक प्रमाणांनीं अत्यंत विभिन्न गुणधर्मांचे पदार्थ निर्माण होतात. त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया अगदीं वेगवेगळ्या असतात. मानवी शरीरहि अंती त्याच मूल घटकांचे असते. तरी त्याच मूल घटकांच्या विविध वस्तू शरीरावरील परिणामाच्या दृष्टीनें अन्न, औषध आणि विष अशा भिन्न भिन्न गटांत समाविष्ट होतात. मूलभूत एकता आणि एकरूपता, अंतिम सत्य असतांनाहि, त्याची यथार्थता अबाधित असतांनाहि, शरीराच्या पातळीवर अन्न आणि विष हे कधीं सारखेंच मानतां येईल काय ? भूमितींतल्या बिंदुला लांबी, रुंदी, जाडी कांहीं नाही तरी तो जागा व्यापतो. आणि आपण कितीही सूक्ष्मपणे काढलेला कोणताहि बिंदू लांबी, रुंदी, जाडीच्या, विरहित नसतो. मूळांतील व्याख्येचें आतां काय करावयाचें ? विज्ञाननिष्ठ म्हणविणाऱ्या आपल्या नित्याच्या व्यवहारात अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्या खपवून घेणाऱ्यानें परमार्थातील साधकोपयोगी व्यवहारावर आक्षेप घेणे अडाणीपणाचें आहे.

कार्यक्षम इंद्रियाच्या बुद्धिमान् माणसालाहि शरीराच्या म्हणून कांहीं मर्यादा असतात त्या गृहीत धरूनच त्यानें मार्ग काढावयाचा असतो. यासाठींच परब्रह्म, ईश्वर, अवतार, श्रेष्ठ व्यक्ति, अशा अवस्थांचा विचार करणे भाग होतें. दागिना म्हणजे सोने नव्हे पण सोन्याचा स्वीकार करतांना ते कोणत्या ना कोणत्या आकारांत असावयाचेंच. आकाराला महत्त्व नाहीं हें तत्त्वतः मान्य करूनहि दागिन्यांची उपयुक्तता काढून घेतां येत नाहीं, प्रतिष्ठा नाकारता येत नाहीं. म्हणून सोने ओळखावे, दागिना स्वीकारावा. ब्रह्म जाणावे, जगांत राहावे, ईश्वर मानावा, मूर्तिपूजा करावी.

सौंदर्य ही काय वस्तु आहे ? ती वस्तुच्या ठिकाणीं आहे कां द्रष्ट्याच्या भावांत राहते, याचा तात्त्विक आणि यथार्थ निर्णय बुद्धिवादाच्या पातळीवर करतां येईल काय ? प्रगत विज्ञानयुगाला शोभण्यासारखे निश्चित नियम या प्रकरणांत सांगतां येतील काय ? आणि तरी जाणत्या रसिकाला वाङ्‌मय, चित्र, शिल्प, नृत्य, संगीत, या कलांचा आस्वाद घेऊन आनंदाचा अनुभव मिळतो कीं नाहीं ? पतिव्रतेचें प्रेम, मातेचे वात्सल्य, देशभक्ताची भावना, चारित्र्यसंपन्नांचे व्यवहार, यांना भौतिक नियमांची कसोटी लावता येईल काय ? केवळ जडवादाचा स्वीकार केला तर शोषितांविषयी, दलितांविषयीं सहानुभूति वाटणे शक्य आहे काय ? राष्ट्राचा ध्वज, पक्षाचे प्रतीक, मताच्या घोषणा, यांना खराच अर्थ उरतो कां ? रसायन आणि पदार्थविज्ञान शास्त्रांपेक्षां मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वेगळेपणानें स्वीकारावे लागतें की नाहीं ? जीवशास्त्राचे नियम केवळ रसायनशास्त्राच्या आणि पदार्थविज्ञानाच्या चौकटीत बसवता येतील काय ? यातले जर काहीच होत नसेल आणि तरी पदार्थविज्ञानशास्त्र किंवा त्याहिपेक्षा सूक्ष्म असे परमाणूविज्ञानशास्त्र जर मूलभूत सत्य असेल तर 'सर्व खल्विदं ब्रह्म' या वेदान्तावर आक्षेप घेता येणार नाहीत.

राज्यशासन आणि परमाणूविज्ञान याचा जितका संबंध आहे, त्यापेक्षा मूर्तिपूजादि साधनांचा वा पापपुण्य कल्पनेवर आधारलेल्या विधिनिषेधांचा 'सर्व खलु इदं ब्रह्म' या तत्त्वज्ञानाशी अधिक निकटचा संबंध आहे. तो समजावून घ्यावयाचाच नाहीं वा तो जाणून घेण्यांत अर्थ नाहीं, असे ठरविले असल्यानें आपल्या परंपरागत आचार-विचारांचें वास्तव महत्त्व लक्षांत येत नाहीं.

श्रद्धेला, भावनेला, विश्वासाला, बुद्धी इतकेच, तर्का इतकेच, किंबहुना थोडे अधिक मूल्य आहे. बुद्धि त्याज्य नाहीं पण भावना अधिक उपयुक्त आहे. आरंभापासून शेवटपर्यंत साथ देणारी आहे. बुद्धीने भावनेचा तोल राखावा. श्रद्धेचा रस्ता स्वच्छ करावा. भावनेची सेविका व्हावे, सखी व्हावे. स्वामिनी होण्याची अपेक्षा धरू नये. केवळ बुद्धिवादानें कांहीं पदरांत पडत नाहीं. चांगलें वाईट ठरविता येत नाहीं. पदरांत पाडून घेण्यासाठी चांगलें काय, हें समजून घेण्यासाठी भावनेचाच आधार घेतला पाहिजे. त्याविना गति नाहीं. भावना ही संस्कारांतून पोसली जाते. तिला परंपरेचा, स्वकर्माचा, दीर्घकालाचा आधार असतो. आवडी-निवडी, हवें-नको, केवळ बुद्धिवादानें ठरत नाही. त्यांतील इष्टानिष्ट समजून घेण्यासाठी शास्त्रांचा म्हणजेच निःस्पृह आणि जाणत्या पुरुषांच्या, दीर्घकालीन अनुभव व्यक्त करणाऱ्या, शब्दांचा आधार घ्यावा लागतो.

शास्त्रवचनांवर, संतवचनांवर विश्वास ठेवला नाहीं आणि अंतःकरणांत भाव नसेल तर काहीहि चांगलें म्हणून घडणे शक्य नाहीं. हिताचा मार्ग दिसणार नाहीं. समर्थ " अभावें कदा पुण्य गाठी पडेना" म्हणतात तें यासाठींच.

आपलें आपल्यालाच पहावयाचे असते, पण त्यासाठीं आरसा चांगला आणि स्वच्छ असावा लागतो. आरशाची कांच समतल नसली, त्यांत जर उंच-सखलपणा असला किंवा आरशावर मळ साचला असला, तेलकटपणामुळें तो पक्का झाला असला, तर आरशांत दिसणारे आपलेंच प्रतिबिंब जसें दिसावयास पाहिजे तसें दिसत नाही म्हणून आरशाची कांच निदोंष असावी लागते आणि तिच्यावरचा मळ कांहीं रासायनिक चूर्णे वा औषधी द्रव्यें यांनीं काढावा लागतो. आपल्या अंतःकरणाचे तसेंच आहे. तें यमनियमांनीं समतल होतें आणि ध्यानपूजनादि साधनानी स्वच्छ होतें. मग "अहं ब्रह्मास्मि"चा साक्षात्कार होतो आणि "सर्वं खल्विदं ब्रह्म" अनुभवास येते.

" आदौ ब्रह्माहमस्मीत्यनुभव उदिते खल्विदं ब्रह्म पश्चात् । " असें श्रीमत् शंकराचार्यांनीं म्हटलें आहे. ध्यानादि साधनेने मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला कीं मग भोवती दिसणारे, भासणारे जगत्हि ब्रह्मावांचून वेगळे नाहीं, तें सर्व जसेच्या तसे ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मच आहे, असे प्रत्ययास येतें, असे आचार्य म्हणतात.

साधना ही साधना आहे, सिद्धि नव्हे. त्या मार्गानें प्रयत्न केल्यास सिद्धि मिळू शकते. प्रतिबिंब दिसते तें आरशांत. आरसा स्वच्छ करणाऱ्या चूर्णांत प्रतिबिंब दिसत नाहीं. तसे पाहूं जाणारा वा दिसत नाहीं म्हणून चूर्ण निरुपयोगी मानणारा खुळा ठरतो. ब्रह्मज्ञानापर्यंत नेऊन पोंचविणाऱ्या साधनांकडेहि त्याच दृष्टीनें पाहिलें पाहिजे. हा विवेक केला कीं मग जगताला जड समजण्याचा वा मूर्तीला एक पाषाण मानण्याचा अभागीपणा, करंटेपणा, हातून घडणार नाहीं. परंतु असे घडण्यासाठी अहंकार सोडून, नम्रपणे, परंपरापूत विचार, जुने ठेवणे, जाणून घेतलें पाहिजे.

जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं । गुणें गोंविलें जाहलें दुख देहीं ॥
गुणावेगळी वृत्ति ते ही वळेना । जुणें ठेवणें मीपणें आकळेना ॥ १४० ॥

तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे कांहीं इतर पदार्थजाताच्या ज्ञानाप्रमाणें बाहेरून मिळणारे उपरे ज्ञान नाहीं. आत्मा काय, ब्रह्म काय किंवा ईश्वर काय, हे कुठे तरी बाहेर विशिष्ट स्थलीं, दूर अंतरावर आहेत असें नाहीं. शास्त्र सांगते- "तत्त्वमसि" तेंच तूं आहेस. ज्याला मी म्हणजे जीव समजतोस तो आत्मा म्हणजे ब्रह्मच आहे. भगवंत स्वतःच गीतेत सांगत आहेत कीं- “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।" (भ. १८ | ६१) ईश्वर हा प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयांत वास करतो. त्या हृदयस्थ ईश्वराचें वर्णन नारायणोपनिषदाने तर फारच सुंदर आणि प्रत्ययकारी भाषेनें केलेले आहे. हृदयातल्या दहराकाशांत, निळ्या मेघातून तळपणाऱ्या विजेप्रमाणे तेजस्वी आणि नीवारशूकाप्रमाणें सूक्ष्म, अशी एक ज्योत, सुवर्णप्रकाशाने तेवत असते. त्या ज्योतींत परमात्मा वास करतो. “तस्या शिखायामध्ये परमात्मा व्यवस्थितः ।" प्राणिमात्रांच्याच काय पण भूतमात्रांच्या, वस्तूजातांच्या संबंधांत हें सत्य आहे. या वस्तुस्थितीचा केवळ साक्षात्कार करून घ्यावयाचा असतो, पण तेंच घडत नाहीं. म्हणून तर समर्थ म्हणतात- "जयाचे तया चुकले प्राप्त नाही "

"तुझें आहे तुजपाशी । परि तूं जागा चुकलासी ॥" अशी माणसाची स्थिति होते. “काखेत कळसा आणि गांवाला वळसा" ही म्हणहि तत्त्वतः हाच अर्थ सांगते. खरें म्हणजे असें होऊं नये; पण असें होतें हें खरें. अगदीं व्यावहारिक, इंद्रियगम्य अशा गोष्टींतहि या विस्मृतीचा अनुभव येतो. आपण नेमकी सापडावी म्हणून आवर्जून एखादी वस्तु ठेवलेली असते आणि पाहिजे तेव्हां शोध करूनहि ती सांपडत नाहीं.

नाकाला जरा जड वाटू लागलेली नथ लग्नकार्याच्या गडबडींत कुठेतरी काढून ठेवण्यापेक्षा लागेल तेव्हां लगेच घालता यावी म्हणून मंगळसूत्राला अडकवून ठेवली, आणि मग पुण्याहवाचनाला बसण्याच्या वेळी ती सापडेना. अंगभर पदर घेण्याच्या पद्धतीमुळे इतर कोणालाहि गळ्यांत अडकविलेली नथ दिसणें शक्य नव्हतें. नथ खऱ्या हिऱ्याची, भारीची. त्यामुळें लग्नघराचे गोंधळघरांत रूपांतर झालें. संशय, कावाकाव, आरडाओरडा यांना उधाण आलें.

असें कितीदा तरी होतें. कपाळावर सरकविलेला चष्मा कुठे ठेवला म्हणून हुडकणारी माणसे वारंवार आढळतात.

वेड्याची अवस्था तर या दृष्टीने निश्चितच विचारांत घेण्यासारखी आहे. एकदां एक मुख्यमंत्री, एक वेड्याचे रुग्णालय पाहावयास गेले. बरा होत आलेला एक वेडा बागकाम करीत होता. पुढारीपणाला आवश्यक तो जिव्हाळा दाखविण्याच्या दृष्टीनें मंत्र्यांनीं त्या वेड्याच्या पाठीवर हात ठेवून आपुलकीच्या रसात बुडविलेल्या शब्दांनी त्याची चौकशी केली. वेडा चमकून, हातातील काम टाकून, सरळ उभा राहिला आणि त्यानें मंत्र्याला विचारले- "तुम्ही कोण ? " "मी या राज्याचा मुख्यमंत्री. " मंत्र्यांनी डौलांत उत्तर दिले. "लौकरच बरे व्हाल. मीहि स्वतःला असेंच समजत होतो. येथें आलात तें बरें झालें" -वेडा म्हणाला. मंत्री ओशाळले. काय बोलावे तें त्यांना सुचेना. छायाचित्रकारांनीं तो भाव नेमका टिपला. माझा स्वतःचाहि अनुभव मोठा विचित्र आहे. पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयांत अध्यापक असतांना मी विद्यार्थ्यांना येरवड्याचे वेडयांचे रुग्णालय दाखविण्यासाठी गेलों होतों. आम्हांला मार्गदर्शन करणारे तेथील चिकित्सक कांहीं कामांत गुंतले होते. म्हणून त्यांची वाट पहात वाचनालय कक्षात मी थांबली होतों. मुले इकडेतिकडे हिंडत होती माझ्या समोरच एक गृहस्थ नीटनेटक्या कपड्यांतले, सभ्य दिसणारे, वृत्तपत्र वाचीत होते. थोडाच वेळात ते माझ्याशी बोलू लागले. मी कोण, कुठला याची चौकशी केली. मी विचारल्यावरून आपलें नांव, गांव, व्यवसाय त्यांनीं सांगितला. ५ - ७ मिनिटे आमचें संभाषण व्यवस्थित चाललें होतें. मध्येच त्यांनी मला विचारले "इथल्या अधिकारी चिकित्सकाची तुमची ओळख आहे ना ? " "हो ! आहे थोडी. " "माझें एक काम करतां कां ? कराच. " "काय बरें ? " "मला सोडून द्यायला सांगा. मला येथें उगीच अडकवून ठेवले आहे, वेडा समजून. " माझ्या डोक्यांत तेव्हां प्रकाश पडला. हा गृहस्थ वेडा असेल असें तत्पूर्वी मला वाटलें नाहीं. वेड्याची सुद्धां प्रत्येक कृति वेड्यासारखीच असते असें नाहीं. एरवीचे वागणे पुष्कळसें सर्वसामान्यासारखेच असतें, पण तरीहि तीं माणसे वेडीच असतात.

आपण वेडे आहोंत हें न कळणे, हे वेडाचे मोठेच लक्षण आहे. माणसाचे आत्म्याविषयीचे अज्ञान या वेडासारखेच आहे. ब्रह्म मायेने आवृत आहे. पुरुष प्रकृतीच्या पाशांत गुंतलेला आहे. भगवान् स्वतःच म्हणतात, "नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः । मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥" (भ. ७.२५ ). ईशावास्योपनिषदाने सत्याचे मुख सोन्याच्या झाकणाने झांकले राहते असें वर्णन केलें आहे. चांगला बुद्धिमान् माणूसहि मूढ ठरतो तो यामुळेंच. तो मायेच्या प्रभावांतून दूर होऊं शकत नाहीं. प्रकृतीच्या अंगभूत अशा सत्त्व-रज- तमाचा पडदा त्याच्या ज्ञानशक्तीला कुंठित करतो. सत्यापेक्षा त्याच्या झाकणाचेच आकर्षण त्याला वाटते, जशी पुष्कळ तेले बाटलीचा सुंदर आकार आणि चित्रविचित्र रंगांचे सुरेख वेष्टण यामुळेंच अधिक खपतात. तेलांतले गुण विचारांत घेतले जातच नाहीत.

मनुष्य आत्मज्ञानापासून दुरावतो तो हा असा. वेड्यासारखी त्याला आत्मविस्मृति झालेली असते. खुळ्या गिऱ्हाइकासारखा तो वेष्टणाला भुलतो. सत्यापर्यंत पोचू शकत नाहीं. कांहीं वेगळे सत्य यामागे आहे आणि ते जाणून घेतलें पाहिजे असेहि त्याला वाटत नाहीं. ज्ञानाची साधनें असलेली इंद्रिये, मन, बुद्धि ही सर्व उण्याअधिक प्रमाणांत सत्त्वरजतमांनीं व्यापलेली राहतात, म्हणून दूषित असतात. ती सत्याचे यथार्थज्ञान करून देऊं शकत नाहींत. खरें हित कशात, खरें सुख कशात, तें कळत नाहीं, आणि मग स्वाभाविकपणेंच नानाप्रकारचीं दुखे भोगावी लागतात.

ज्याचा त्याग केला पाहिजे तें टाकावेसे वाटत नाहीं, घेऊं नये ते स्वीकारावेसें वाटतें, करूं नये तें केलें जातें. आणि मग दुःख भोगण्यावांचून गति नसते. अंतःकरणाची, अंतःकरणवृत्तीची, या गुणांच्या पाशांतून सुटका झाली तरच खरें काय ते कळेल, आणि दुःख टळेल, पण हेंच अवघड आहे. भगवंतांनीं अर्जुनाला निस्त्रैगुण्य हो असें सांगितलें आहे तें यादृष्टीनेंच.

वृत्तीवरील गुणांचे संस्कार इतके बलवान असतात कीं त्यांतून सुटण्यासाठी केलेल्या जाणत्या माणसाच्या प्रयत्नांनाहि यावे तसे यश येत नाहीं. ईश्वराच्या कृपेची, भगवत्प्रसादाचीच, त्यासाठीं अपेक्षा असते. सत्यदर्शनासाठी भगवंताचीच करुणा भाकावी लागते, प्रार्थना करावी लागते की-हे भगवन् ! अत्यंत आकर्षक असल्यानें, सत्याला लपविणाऱ्या या सोन्याच्या झांकणाला दूर करणें, काढून टाकणें, आमच्या शक्तीच्या बाहेरचे आहे. आपणच प्रसन्न व्हा आणि दयाळूपणानें हें झांकण काढून द्या. तरच सत्य पाहण्याची इच्छा असणाऱ्या आम्हांला सत्याचे दर्शन होईल.

ही प्रार्थना ईश्वरानें ऐकावी असा उत्कट भाव हृदयात नसतो, नम्रता नसते, अहंकाराने प्रार्थनेचें महत्व समजत नाही, आणि मग आपलीच जुनी ठेव आपल्याला गवसत नाहीं.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP