श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण
॥ श्रीराम समर्थ ॥
[ Use Right click for download ]
मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सांडी रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासीं । मना सज्जाना भेटवीं राघवासी ॥ २१ ॥
जन्मानंतर मरण व मरणानंतर जन्म हें जें जिवाचे मागें अखंडपणे लागले चक्र आहे तेंच येरझारा या शब्दाने सुचविले आहे. मानवी जन्माला आल्यानंतर तें चुकविण्यासाठी प्रयत्नशील असणें हेंच त्याचें खरे कर्तव्यहि आहे. म्हणून समर्थ या श्लोकामधे जन्ममृत्यूचें चक्र, येरझारा चुकव असे आवर्जून सांगत आहेत. या येरझारा जिवाच्या पाठीशी कशामुळे लागतात त्याचें कारणहि, समर्थ वासना या शब्दाने सांगत आहेत. कारण वासना याच जन्मा चे कारण असतात. "जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ' हा अध्यात्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या श्लोकातील चूकवी हा शब्द देह -दीप न्यायाने घ्यावयाचा आहे. उंबऱ्यात ठेवलेला दिवा जसा दोन्ही खोल्या मध्ये प्रकाश पाडतो तसा चुकवी या शब्दाचा अर्थ-संबंध मागच्या आणि पुढच्या शब्दांशी आहे. वासना चुकवी आणि (त्या बळावर) येरझाराहि चुकवी असा अन्वय या चरणाचा लावता येईल. कोणत्या ना कोणत्या तरी वासनांच्या बळे माणूस कर्में करतो व त्या क्रियमाणांतूनच पुढें भोगावे लागणारे संचित व प्रारब्ध निर्माण होते म्हणून वासना सोड, म्हणजेच हवें नको सोडणे हेंच जन्म टाळण्याचे मूळ साधन ठरतें.
वासना सोडण्याचे सामर्थ्य येण्यासाठी, मनुष्याला त्यांचें जे स्थूल परिणाम संस्कारांच्या रूपानें जीवनामधे प्रत्ययाला येतात, ते सोडण्यापासून आरंभ करावा लागतो. आणि म्हणून समर्थ दुसऱ्या ओळीमथें मनाला धनसंपत्ति आणि स्त्रीविषयींचें आकर्षण यांचा त्याग कर असा आदेश देत आहेत. या ओळीतील सांडि रे हें क्रियापदहि वरच्या ओळींप्रमाणें दोन्हीकडे घ्यावयाचें आहे. कामना सांडी आणि द्रव्यदारां सांडी. द्रव्यदारांविषयक कामना सांडी असाहि अर्थ त्या ओळींतून घेतां येईल. पण विभक्तीची रूपें स्पष्ट नसल्याने सांडि रे क्रियापद दोन्हींकडे स्वतंत्रपणें घेणेच अधिक योग्य ठरेल.
त्यातून कामना ही द्रव्यदारेपुरतीच मर्यादित असते असेंहि नाही. कित्येक वेळा लोकेषणेच्या स्वरूपातील कामना ही अधिक बलवान् आणि अमर्यादित असूं शकते आणि त्यांत सज्जनतेच्या मर्यादा फारशा सुटत नसल्याने चांगल्या चांगल्या माणसांनाहि तिचा मोह टाळता येत नाहीं, टाळावासा वाटत नाहीं.
आपण सामान्यतः वासना आणि कामना हें शब्द सारख्याच अर्थाचें समजतो. पण येथें ते त्यांच्या मधील सूक्ष्म अंतर गृहीत धरून वापरले आहेत. वासना ही मूलभूत आणि पुष्कळ वेळा आवश्यकहि असूं शकते. याच वासनेला जेव्हां आसक्तीचे रूप प्राप्त होते, उत्कटता येते, मर्यादे चे भान राहत नाहीं, तेव्हा ती वासना कामनेत परिणत झाली आहे असे समजावे. हा भेद प्रकाराचा नसून प्रमाणाचा आहे.
द्रव्यदारांविषयक कामना या आपण सामान्यतः समजतो तितक्या नैसर्गिक व आवश्यक नाहींत व म्हणून अपरिहार्यहि नाहीत संस्कारानें, अभ्यासानें, प्रयत्नानें त्यांच्या आसक्तींतून सुटणे शक्य आहे. रामकृष्ण परमहंसांसारख्या अनेक थोर पुरुषांची चरित्रे त्थादृष्टीने प्रसिद्ध आहेत. जें उत्कटतेने वाटते तेहि सोडता येतें असें लक्षात आले म्हणजे मग त्या मानानें कमी उत्कट असणाऱ्या इच्छा आकांक्षा आवरता येतील असा विश्वास माणसाला वाटू लागतो. आणि मग वासना सोड हेहि साधणे शक्य होते. पण माणूस-स्वतःला सभ्य आणि सुसंस्कृत समजणारा माणूसहि-अनेक प्रकारांनी या द्रव्यदाराविषयक कामनेमथें गुरफटून गेलेला असतो आणि तसें राहणे हें त्याला रसिकपणाचें आणि भूषणाचेंहि वाटत असतें. अनेक प्रकारच्या मर्यादांमुळें, उणीवा मुळे, वा दौर्बल्यामुळे द्रव्यदारौविषयक जी अभिलाषा त्याला स्वतःच्या जीवनांत प्रत्यक्षपणें पूर्ण करून घेता येत नाही ती मग तो साहित्याच्या, ललित वाङ्मयाच्या माध्यमातून अनुभविण्याचा प्रयत्न करतो. ललित साहित्याची लोकप्रियता वाढते ती यामुळेंच. हा संस्कार मनावर होणें चांगले नाही म्हणून तर नारदानी आपल्या भक्तिसूत्रामर्धे "स्त्रीधन नास्तिकचरित्रं न श्रवणीयर ' असा आदेश दिला आहे. संयम कार्यवाहीत यावा असे वाटणाऱ्या साधकाने नारदीय आदेशाला मान देणेच हिताचे आहे हे निश्चित.
अपरिहार्य वाटणाऱ्या, स्वाभाविक वाटणाऱ्या द्रव्यदारांविषयक कामना जिंकता आल्या कीं मग कीर्ति, सत्ता, बरें खावे, बरें ल्यावे, बरें असावें यांच्या विषयीच्या अपेक्षा मोह टाळणे वा नियंत्रित ठेवणे सहज शक्य होते आणि हे सर्व करावें लागतें तें पुन्हा पुन्हा भोगाव्या लागणाऱ्या जन्ममृत्यूचें संकट टाळण्यासाठी. म्हणून समर्थ तिसऱ्या ओळींत मागच्या श्लोकांत सांगितलेल्या गर्भवासाच्या यातनांचे पुनरपि स्मरण करून देत आहेत. आणि मनाने परमेश्वराशीं जीवाची भेट घालावी असे जणू मनाची विनवणी करून सांगत आहेत.
परमेश्वराचें प्रेम नसेल, परमेश्वरदर्शनाची ओढ नसेल, परमेश्वरस्वरूपाचें ज्ञान नसेल, तर मग कोणत्याच साधनांना यश म्हणून येत नाहीं. केलेले प्रयत्न वाया जातात. वा उगीच काया व्यर्थ शिणली, निरर्थक कष्ट घेतले अशी जाणीव बोचत राहून मनुष्य आतून परमार्थापासून दुरावतो, आणि मग शरीराने जे करीत राहतो ते टाकणें टाकल्यासारखे कसेतरी केलेलें, लादलेले ओझे रटाळपणे ओढत नेल्यासारखे, वरवरचे, केवळ यांत्रिक स्वरूपाचे होते. समर्थ " भेटवी" या शब्दातून साधकाच्या अंतःकरणातील परमेश्वराच्या भेटीची ओढ सुचवीत आहेत आणि मनाला सज्जन म्हणून त्याचा अनुनय करीत आहेत. खरे म्हणजे मनाला सज्जन म्हणणे हा वदतो व्याघात वाटावा अशी वस्तुस्थिति आहे. त्याचा उद्दडपणा, त्याचा हट्ट, त्याची चंचलता, त्याचा ओढाळ स्वभाव, याचें वर्णन अर्जुनासारख्या संयमी, सदाचारी पुरुषानेहि केलें आहे. आणि प्रत्येकाला, विशेषतः साधकाला, मनाच्या या स्वरूपाचा अनुभव आल्यावांचून राहत नाही. अशा स्थितींत त्याला सज्जन म्हणणें हे केवळ अनुनयाचे वाटणे स्वाभाविक आहे.
मागे एकदा ती. दादांना असा प्रश्न विचारला होता की समर्थांसारख्या थोर संतांनी मनाला सज्जन म्हटलें आहे हें आईने नाठाळ कारट्याला त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी शाहणा माझा बाळ ! म्हणून गोजारावे तशा स्वरूपाचें आहे काय ? तेव्हां दादा म्हणाले, तसें असलें तरी बिघडले कोठे ? एखाद्या अज्ञान्याला त्याच्या स्वतःच्या कल्याणासाठी हितकर गोष्टीकडे प्रवृत्त करावें म्हणून थोडे चढविले तरी तें इष्टच आहे. तो कांहीं दंभाचार नव्हे, वा त्यांत वंचकतेचा दोषहि नाही. मनुष्य स्वभावाचे तें एक वैशिष्टच आहे आणि तें लक्षांत घेऊन जागणे संतांच्या जीवित-कार्याच्या दृष्टीनें उचित असेच आहे. पण असें असलें तरी मनाला सज्जन म्हणण्यामार्गे आणखी एक भाव आहे आणि तो शास्त्रीय स्वरूपाचा आहे.
मन हे मुळांत रजोगुणी वा तमोगुणी नाहीं. तें सात्त्विक आहे. जें मुळांत चांगले असतें तेच पुन्हा प्रयत्नानें चांगले करणण्याने स्वच्छ होते मन हें मुळांत सत्त्वगुणी असल्यानें सज्जनपणा हाच त्याचा स्वभाव आहे. तें संस्कारानें रजोगुणी, तमोगुणी होतें, आणि जन्मजन्माच्या आवर्तनांतून पुन्हा पुन्हा तेच रजोगुणादि संस्कार दृढावत जातात, आणि मग जणू मनाचा तोच स्वभाव आहे असे वाटूं लागते. यासाठीं समर्थ जणू मनाला सज्जना म्हणून त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देत आहेत. आयुर्वेदाने सत्त्वं मनः असे सांगून "रजस्तमश्च मनसी हौ च दोषाबुदाहहै ? ' असे म्हटले आहे. जन्माने, पिंडाने माणूस आहे पण तसे असून जेव्हां कोणी माणसासारखा वागत नाही तेव्हां त्यालाच माणसासारखे वाग, माणूसकीने वाग, असें सांगितलें जातें. याच दृष्टीने मनाला सज्जन म्हणून संबोधिले आहे जे सांगितलें आहे, कीं बाबा ! तू सज्जन आहेस. सात्त्विकता, सज्जनता हे तुझे मूळ रूप आहे. तेव्हां तूं मला माझा घात करणाऱ्या विषयांकडे ओढीत नेऊ नकोस. मला राघवाची, रामाची गांठ घालून दे. मला परमेश्वराकडे घेऊन जा. त्याचें दर्शन घडव.
मना सज्जना हीत माझें करावें । रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वाि वायूसुताचा । जना उधरी नाथ लोकत्र याचा ॥ २२ ॥
समर्थ म्हणतात हे मना ! तूं सज्जन आहेस आणि म्हणून माझें (जीवाचे) हित करणें हेंच तुला उचित आहे. सज्जनाने कोणालाहि कल्याणाच्या मार्गाला न्या. अधःपाताकडे ढकलणे हें सज्जनाला शोभणारे नाहीं. ती दुर्जनाची प्रवृत्ति आहे. श्रेय आणि प्रेय यांचें द्वंद्व माणसाला नेहमीच मोहांत पाडीत असतें. श्रेयाची ओळख पटत नाहीं असें नाहीं. पण प्रेया ची ( प्रिय) ओढ सुटत नाहीं. पुष्कळ वेळां बुद्धि विवेक करूं पाहते पण मन सन्मार्गानें जाऊं देत नाहीं. इंद्रियांची सुखे त्याला आकर्षक वाटतात आणि तेंच खरें सुखाचे आहे असेंहि वाटूं लागते. विषयांच्या संगतींत सुख नाहीं, विषयांचा उपभोग घ्यावयाचा तर तो शरीरधारणा लक्षांत घेऊनच घ्यावयाचा. पण ही मर्यादा बहुधा कधींच पाळली जात नाही त्यामुळें शरीरधारणाहि होत नाहीं, आरोग्य दूर जातें, अ ध्यात्मिकदृष्ट्या हानी होईल तें वर आणखी निराळेच. यासाठीं प्रेयाकडची ओढ नाहीशी करणें वा नियंत्रित ठेवणे हेंच हिताचे असते. प्रेमाला श्रेय समजणें हें तर फारच घातक. श्रेय हेच ज्याचें प्रेम बनलें आहे-तो भाग्यवान. हे भाग्य केवळ श्रेष्ठ भक्ताच्या ठिकाणींच दिसते आहे. तुकाराममहाराजानी यासाठींच " भाग्यवंत म्हणो तया । शरण गेले पंढरीराया ' असें म्हटलें आहे. श्रीशंकराचार्य फार स्पष्टपणें "कोपीनवनः खलु भाग्यवनः " असें म्हणतात.
सामान्याला प्रेयाचे दुष्परिणाम अनेक प्रकारें पटवून देऊनच श्रेयाकडे वळवावे लागतें. त्याला हित नको असते असें नाहीं, पण दुर्दैवाने तो सुखालाच हित समजत असतो. विषयोपभोगांच्या विपुलतेला तो समृद्धि समजतो, विषयांच्या अमर्याद उपभोगाला तो रसिकता समजतो. या गोष्टी खऱ्या हितांत बसत नाहींत हें समर्थ लक्षांत आणून देतात आणि मग म्हणतात-बाबा मना ! तूं सज्जन ना ! मग माझें हित कर आणि त्यासाठीं श्रीरामचंद्राला घट्ट धरून ठेव. विषयाची ओढ सोडून दे.
रामचंद्र हें समर्थांचे दैवत. ते रामाचे एकनिष्ठ उपासक. रामचंद्रावर त्यांचें प्रेम फार. रामचंद्राची भक्ति त्यांच्या अंतःकरणाला वेड लावते आणि त्यामुळें रामासंबंधींचा कोणताहि विषय निघाला कीं रामचंद्राचें श्रेष्ठत्व अनेक प्रकारांनी पटवून दिल्यावांचून त्यांना राहवत नाही. प्रेमाचे आणि भक्तीचे हेंच स्वरूप आहे. तें आपल्या आराध्यदेबतेविषयी परोपरीने, उत्कटतेने बोलणारच-आआपल्या आराध्यदेवतेचे गुणगान करणारच. अंतःकरणांत प्रेम नसते, ओढ नसते, आणि मग माणसाला मर्यादेचे स्मरण होते खरें प्रेम कधीं मर्यादित असूं शकत नाहीं, आणि म्हणून तें मर्यादा पाळीतहि नाहीं. हें प्रेम स्तुतीच्या रूपानें व्यक्त होत असते. पतिव्रता आपल्या पतीची, सत्शिष्य आपल्या गुरुची, भक्त आपल्या देवतेची स्तुती करतांना कधी कंटाळणार नाही. समर्थांना तसेच रामाच्या संदर्भांत प्रेमाचे भरते येते, आणि मग ते रामचरित्रांतील गोष्टींचा वैशिष्ट्याने उल्लेख करतात. रामाचे श्रेष्ठपण इतरानांहि पटवून द्यावे हाहि उद्देश त्यांत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असतो. समर्थ सांगतात कीं बाबा मना ! तुझ्यासारखा वेगवान मनोजय च असा मारुती रामाला आपला धनी मानतो, स्वामी मानतो हें ध्यानी घे. मारुती हे एक मोठे अद्भुत व्यक्तिमत्व आहे. वानर जातींत जन्माला आलेला हनुमान असामान्य बुद्धिमान् आहे. बुद्धिमतां वरिष्ठ आहे, संगीतापासून व्याकरणापर्यंत अनेक शास्त्रांत पांडित्य संपादन केलेला मारुती वेदाभ्यासजड नाहीं, चतुर आहे. राजकारणधुरंधर आहे, असामान्य शक्तिशाली असून, नवनागसहसबळी असून, जितेंद्रिय आहे आणि असें हे असामान्य व्यक्तिमत्त्व रामचंद्रापुढें नम्र आहे. रामाचा दास म्हणवून घेण्यांत भूषण मानणारे आहे. यावरून रामचंद्राच्या मोठेपणाचे गणित मांडता मेणे शक्य। आहे. फार मोठी व्यक्ती रामचंद्राला श्रेष्ठ मानते, एवढीच रामचंद्रां ची थोरवीची मर्यादा नसून ते सर्व विश्वाचे, स्वर्गमृत्यूपातळाचे, त्रिलोकाचे धनी आहेत. आणि त्याहिपेक्षां त्यांनी (रामचंद्रांनी) लोकांच्या उद्धाराचे व्रत घेतलें आहे. लोकोद्धाराचे व्रत हा जणू रामचंद्राच्या श्रेष्ठत्वाच्या मुगुटावरील तुरा आहे. असे असल्यामुळें या अशा अत्यंत श्रेष्ठ दैवताला दृढ धरून ठेवणे हेंच हिताचे आहे.
कोणाचा तरी उपासक असणें, आपल्या उपास्याची स्तुति करणें, आणि आपल्या ह्या उपासनेचा प्रचार करणें हें मनुष्यस्वभावाला अगदीं धरून आहे. भले तो स्वतःला बुद्धिवादी म्हणो पण कोणाविषयी तरी त्याला नितांत आदर असतो. त्याच्याहि काही श्रद्धा असतात. आणि आपल्या या श्रद्धेचा वा आदर्शाचा तो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समर्थक असतो, प्रचारकहि असतो. तो शंकराचार्यांना मानीत नसेल परंतु मार्क्साला मानीत असेल, त्याला राणाप्रतापचें मोठेपण पटणार नाही, पण स्टॅलिन त्याला थोर पुरुष वाटेल. तो जन्मदात्या बापाचे श्राद्ध करणार नाही पण नाहीं त्या व्यक्तींच्या जन्मशताब्द्या उकरून काढून स्मृतिदिन साजरे करील. श्राद्ध करणें हा गबाळेपणा आणि स्मृतिदिन साजरे करणे हें प्रगतीचे लक्षण; वास्तुशांत करणें बुरसुटलेपणाचें आणि कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली, कोणाच्या तरी हस्ते, उद्घाटन समारंभ करणें हें मात्र बुद्धिवादाचें असे तो मानतो. मला तरी पारंपरिक सनातनीपणापेक्षां हे बुद्धिवादी-गतानुगतिकत्वच अधिक गबाळेपणाचें वाटतें. यांत पद्धतीचे परिवर्तन असल्यामुळें खुळ्या परिवर्तनवाद्यांना तेंच प्रगतीचे लक्षण वाटत असेल तर कोणास ठाऊक ? पण साध्य काम, थेय काटा,ध्ये काय तें अस्पष्ट असतांना परिवर्तनाचा धोशा लावणे आणि तेंच श्रेयस्कर समजणें याच्याइतकें आत्मघातकी तत्त्वज्ञान दुसरे नाहीं. जें जुने आहे, तें निदान काळाच्या ओघात परीक्षिले गेलें आहे. त्याचें चांगुलपण पिढ्यानुपिढ्यांच्या अनुभवाने स्पष्ट झालेलें आहे आणि म्हणूनच तें टिकून राहिलेलें आहे. यासाठींच समर्थ कित्येक सहस्रकांपूर्वी होऊन गेलेल्या रामचंद्राचें महिमान आवडीने गात आहेत.
न बोले मना राघवेवीण कांहीं । जनीं वाउगे बोलतां सूख नाहीं ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो । देह्यांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥
रघुनायका दृढ चित्तीं धरावे या चरणाचा अर्थ काय ? तें कसें करावें याचें स्पष्टीकरण समर्थ जणू या श्लोकांत करीत आहेत.
परमेश्वर आपल्या चित्तांत ठसावा, त्याचे चिंतन घडाणे, त्याचे ध्यान साधावे, त्याचा साक्षात्कार व्हावा, अशी इच्छा परमार्थाची गोडी असणाऱ्या माणसाच्या मनांत उण्या-अधिक प्रमाणांत स्पष्ट किंवा अस्पष्टपणानें असतेच. पण या इच्छा फारच क्वचित् परिपूर्ण होतात. जे परमार्थाला लागत नाहीत. पण जे परमार्थमार्गात आहेत-लोक म्हणतात म्हणून नव्हे-तर खरेंच आहेत, त्यांनाहि त्यांच्या इच्छेप्रमाणे यश किती मिळतें याचा विचार केलाच तर नन्नाचा पाढा वाचावा लागेल. इच्छेप्रमाणे यश मिळू नये हें खेदजनक असते. वात्सल भावाने समर्थ त्याची कारणें स्पष्ट करीत आहेत.
रघूनायकास चित्तीं धरावे असें जरी वाटलें तरी दृढ धरावे या जाणिवेत उत्कटता नसते. त्यासाठीं करावी' लागणारी साधनें कटाक्षाने आचरिलीं जात नाहीत. सर्व साधनांत सोपे साधन म्हणून नामस्मरणाचा साधा उपाय संतानी सांगितला आहे. "मनीं नसे तरी नसो परी याचें तरी वसो । " एवढी सवडहि देऊन ठेवली आहे. आतां हें तरी सातत्याने घडते काय ? जेमतेम तास अर्धा तास नांव घेणारा मनुष्यहि आपण मोठी साधना केली असें समजतो आणि इतर वेळ अक्षरशः वायफळ गप्पांत घालतो. आवश्यक ते बोलणें, कामापुरते बोलणे टाळता येत नाही, टाळूहि नये. पण माणूस दिवसाकाठी जें बोलतो तें आवश्यक आणि कामाचेच आहे असें म्हणतां येईल काय ? स्वतःची स्तुति करणें, इतरांच्या कुचाळक्या करणें, मान्यता पावलेल्या व्यक्तींच्या दोषांविषयीं चिकित्सा करीत राहणे, आपण त्यांतले नाहीं हें सिद्ध करण्यासाठीं स्वतःसंबंधीं बोलणें, वर्तमानपत्रांतल्या बातम्या, राजकारणे, आप्तेष्टांची वर्तणूक, महागाई, तरुण मुले व वृद्ध माणसे यांची वागणूक, नटनट्या, चित्रपट, नाटके या संबंधात वेळेचे भान न ठेवता माणसे जे बोलत असतात, त्यांतील किती टक्के भाग महत्त्वाचा असतो, आवश्यक ठरतो, उपयोगी असतो ? याचा विचार केला म्हणजे रिकाम्या वेळांतील बहुसंख्य वेळ वायाच घालविला जातो असें लक्षात येईल.
अलीकडच्या नियतकालिकांनी तर मनुष्याचा रिकामा वेळ वाया घालविण्यासाठी साहित्य पुरविण्याचें व्रत घेतले दिसते खेळ, अपराध आणि निवडणूका यांच्यासंबंधी प्रसिद्ध होणारे भडक आणि सविस्तर वृत्त उपयोगाचे आहे हें कोणत्या निकषाने ठरविणार ? त्यामुळें मन:स्वास्थ्य नाहींसें होतें, क्षोभ निर्माण होतो व त्याचे परिणाम उण्या-अधिक प्रमाणांत रक्तदाबावर होतात आणि तरी वृत्तपत्रांच्या स्वरूपांत पालट होत नाहीं तो नाहींच. चांगली, सुसंस्कृत म्हणविली जाणारी वृत्तपत्रेहि याला अपवाद नाहींत. ललित वाड्रमय हि अश्लीलतेच्या, बीभत्सतेच्या, अनैतिकतेच्या अधिकाधिक घातक असणाऱ्या मार्गानें जणू घोडदौड करीत आहे. आतां याच्या वाचनात व त्यावरील चर्चेत जाणारा वेळ हा केवळ वाया जातो इतकेंच नव्हे तर हानिकारकहि असतो. म्हणून समर्थ म्हणतात-जनीं वाऊगे बोलतां सुख नाहीं , मानवी आयुष्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांतला प्रत्येक क्षण फार मोलाचा आहे.
गेलेला कोणताहि क्षण, कितीहि द्रव्य मोजले तरी पुन्हा परत येणारा नव्हे, इतका मूल्यवान आणि दुर्लभ आहे. शंकराचार्य म्हणतात-
"आयुः क्षणल्लमात्रे न लध्यते हेमकोटिभिः क्यापि । तत्त्वेतू गच्छति व्यर्थ ततः पर काधिका हानिः । " प्रत्येक जाणारा क्षण पुन्हा परत येणार नसल्याने आयुष्याचा तेवढा तुकडा कापून फेकून दिला आहे असें होतें. आयुष्य संपण्याचा क्षण, मृत्यूचा क्षण, पळ, घटिका, दिवस, वर्षांनी जवळ जवळ येत असतो. कुणीहि, केवढाहि अधिकारी असला तरी यांतून सुटका नाहीं आणि ज्यांच्याकरितां त्याने आतांपर्यंतच्या आयुष्यातले असे अनेक क्षण, कारणी लावले या कल्पनेने, वाया घालविले असतात त्या आप्तेष्टापैकी कोणीहि शेवटच्या क्षणी त्याच्या उपयोगी पडत नाहीं. मग ती व्यक्ति कुणीहि असो. आई, बाप, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ, पति, पत्नी, सत्ताधारी, पुढारी, यांतील कुणीहि कामाला येत नाहीं. श्रीतुकाराम महाराजांनी एका अभंगात त्याचें छान वर्णन केलें आहे.
अंतःकरणपूर्वक कांहीं परमार्थसाधन केलें असलें, निःस्वार्थ भावाने कांहीं योग्य कर्तव्ये पार पाडली असलीं, तर शेवटच्या क्षणी त्यांचा कांहीं लाभ मानवाला होऊं शकतो. पण ही जाणीव शेवटच्या क्षणी होऊन काय उपयोग-ती पुष्कळ आधीं, अगदीं तरुणपणी झाली तरच कांहीं उपयोग होऊं शकतो. दुर्दैवाने तसें घडत नाहीं. शरीर थकले, आतां प्रपंचाकरितां कांहीं करणें शक्य राहिलें नाहीं, म्हातारा जवळच्यांना आणि घरच्यांना नकोसा झाला, म्हणजे लोक ज्ञानेश्वरी हुडकू लागतात. कधींच न करण्यापेक्षा उशीरा करणें चांगलें म्हणून तें मान्य करावयाचें इतकेंच. तें खरें उपयोगी पडणारे नव्हे. म्हातारपणी उशीरा आरंभ केला ठीक. आतां तरी देहरक्षणापलीकडे मिळालेला सर्व वेळ नामस्मरणांत, श्रवणांत, चिंतनांत, ध्यानात, पूजापाठांत जातो काय ? तसेहि होत नाही'. त्याहिवेळी प्रपंचाच्या नको त्या चिंता डोक्यावर चढलेल्या असतात. म्हातारपण हा स्वतःच एक रोग आहे. त्याचीं अनेक लक्षणें अनेक रूपानी वारंवार प्रगट होत असतात. आणि त्या दुःखांतच किती तरी वेळ जातो. याहीपेक्षा आल्यागेल्याजवळ स्वतःच्या दुःखाची गाऱ्हाणीं गाण्यांत म्हातारपणाचा किती वेळ वाया जातो याचा विचारहि कुणी करीत नाही.
हें सर्व जाणून-नेणून, प्रगट-अप्रगट देह म्हणजेच मी मानण्याचे प्रकार आहेत. देहापलीकडे कांहीं आहे आणि तें साध्य केलें पाहिजे असें वाटल्यावांचून वाया जाणारा वेळ कारणी लावण्याची इच्छाच होणार नाही'. म्हणून समर्थ ' रघुनायका दृढ चित्तीं धरावे असे सांगतात आणि दृढ धरणे कसें साधेल असें कुणी विचारले तर त्याचें 'वेळ वायां घालवू नये, वायफळ बोलू नये' इत्यादि साधन सांगून तेंच शेवटीं तुझ्या उपयोगी पडेल दुसरें कांहीं पडणार नाहीं, असा बोध करतात.
रघूनायकावीण वाया शिणावे । जनासारिखे वेर्थ कां वोसणावे ॥
सदासर्वदा नाम वाचे वसो दे । अहंता मनीं पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥
माणूस आपल्या जीवनामध्यें ज्या गोष्टीकरितां फार धडपड करतो त्या सर्व गोष्टी परमार्थापेक्षां निराळ्याच असतात. सुखोपभोगाच्या अभिलाषेने नाना तऱ्हेची संपत्ति मिळवीत राहणे व ती मिळविण्यासाठी कोणत्याहि प्रकारचा विधिनिषेध न बाळगणे हेंच जणू जीवनाचे सर्वस्व मानले जातें. याच्या जोडीलाच सत्तेची, कीर्तीची हाव मिळाली कीं मग विचारावयासच नको. सर्व जीवन त्याकरिता कराव्या लागणाऱ्या श्रमांनी ओतप्रोत भरून जातें. या सर्व धडपडींतून सुखाचा किती लाभ होतो हा प्रश्न इतका विवाद्य आहे कीं त्याचें खरें उत्तर शोधण्याचा प्रयत्न मनुष्य करीत नाही म्हणूनच बरें.
समाधान, वृत्ति, स्वाल्व्हा, आनंद या गोष्टी इतक्या दूर राहतात कीं खरें सुख म्हणून खरोखरीच कांहीं असतें हेहि माणसाला पुढें पुढें पटेनासें होते. सत्ता, संपत्ति, कीर्ति, अनेक प्रकारचे विषयोपभोग, विलासाची सर्व साधनें ही शेवटीं असमाधान देणारी, स्वास्थ घालविणारीं ठरतात, इतकेंच नव्हे तर त्यामुळें कोणालाहि निसर्गतः सहजप्राप्त असलेलें आरोग्यहि दुर्लभ होऊन जातें. ही गोष्ट केवळ ब्दाक्तीपुरतीच मर्यादित राहत नाहीं तर सर्व कुटुंब, सारा समाज अस्वास्थानें भरून जातो. अनेक प्रकारचे संघर्ष ठायीं ठायीं उभे राहतात. त्यामुळें शरीरच नव्हे तर मनबुद्धीहि पिळवटून निघते आणि मग मनुष्य विचार करूं लागला कीं त्साचेपुढे आपणास हवें होतें तें काय आणि येऊन पोचलो तें कोठे ? असे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. अंतःकरण निराश होतें, विषण्ण होतें. देहाचे सुख हेंच सर्वस्व माजून केलेली खटपट अशारीतीने अगदीं व्यर्थ ठरतें, तो सर्व शीण वांद्या जातो. खरे सुख कशात आहे हें न कळल्याचा, न वळल्याचा हा परिणाम आहे. समर्थ म्हणतात-बाबा ! परमेश्वराची प्राप्ति हें मनुष्यजन्माचे खरे सार्थक असूनही त्या रघुनायकाला, रामचंद्राला तूं विसरलास. त्याच्या प्राप्तीची कांहींच खटपट न करतां प्रापंचिक लाभाने प्राप्त होणाऱ्या काल्पनिक सुखाच्या मार्गे लागून सर्व प्रकारचे श्रम सातत्याने केलेस. त्यांतून कांहीं निष्पन्न होत नाहीं हें लक्षांत आलें तरी निरनिराळ्या प्रकारांनीं पुन्हा तेच तेंच करीत राहिलास. शेवटीं तें सर्व वायाच गेलें ना ! देहधारणेच्या पलीकडे विषयोपभोगाला सर्वस्व माजून केलेले परिश्रम वाया जाणारच. मृगजळाच्या पाठीमागे धावणे म्हणजे उरी फुटून मरणेच आहे. विचारी माणसाने असें करूं नये.
पण असा विचार, असा सद्विचार माणसाच्या मनामद्धो येऊच नये, उमजूच नये, क्वचित् स्फुरलाच तर टिकू नये असेंच भोवतीचे वातावरण असतें. ज्या समाजामधे आपण वावरतो त्या समाजांतील बहुतेक सर्व लोक तत्त्वज्ञानदृष्ट्या फसव्या असलेल्या सुखोपभोगाच्या मागेंच लागलेले असतात. खोट्या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांना बळी पडलेले असतात आणि त्यामुळें जीवनामर्धे पदार्पण करूं पाहणारा युवक हा प्रवाहपतित झाल्यासारखा त्याच याच मार्गानें चालत राहतो. त्याला विचार करावासा वाटत नाहीं. देखाव्यानें मोहित होऊन तो केवळ अनुकरण करीत राहतो. आसपासचे लोक वागतात तसेंच वागावे शेजाऱ्याच्या घरांत जशी सामग्री आहे तशीच माझ्याकडेहि असावी. त्याच्यासारखे वा त्याच्याहून अधिक चांगले कपडे आपण करावेत. अनेक प्रकारच्या वस्तू साधनें, उपकरणे, संपादन करावींत. तेंच सुखाचे आहे. त्यामुळेंच प्रतिष्ठा वाढते, असे समजून मग तसें राहणीमान मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे न्यायअन्याय गुंडाळून ठेवून, विधिनिषेधांची क्षिति न बाळगता, माणूस वागूं लागतो आणि मग तें अस्वास्थाचें आमंत्रण ठरते.
यासाठीं समर्थ म्हणतात- लोकाचे पाहून कां बोलतोस ? कां वागतोस ? स्वतःला काम पाहिजे, कां पाहिजे, यांचा विचार स्वतंत्रपणें आणि शास्त्रीयदृष्ट्या करून मनुष्य वागला तर तें योग्यच आहे. आवश्यक आहे. पण स्वतःची बुद्धि जणू गहाण ठेवून दुसऱ्याचे केवळ अनुकरण करण्याचा मोह जेव्हां माणसाला होतो तेव्हां तो घातकच असतो. परकीयाच्या आचारविचारांनी आपले असेच झालें आहे. आपण स्वत्वाला पारखे झालीं त्यामुळें सर्व दिशांनी आपली घसरण होत असतांनाहि आपण नाविन्याच्या मोहानें खुळ्या विचारांना कवटाळून बसलों. आपण आज बोलतो ते विचारहि परक्यांचे आहेत, भाषाहि परक्यांचीच आहे. एरवी स्वाभिमानाची आणि बुद्धिवादाची प्रौढी मिरविणारे लोक परकीय आचार- विचारांचे दास होण्यांतच प्रतिष्ठा मानतात असे आढळून येतें. समर्थ म्हणतात, असें कां करतोस ?
सत्ता, संपत्ति, कीर्ति, प्रतिष्ठा यांच्यामागे लागूं नये, तें सुखाचे नाहीं हें जर खरें तर मग सुखासाठी काय करावे ? सामान्यतः संसारी माणसाला न पटणारी गोष्ट समर्थ येथें सांगत आहेत. ते म्हणतात, सदा सर्वदा देवाचे नांव घेत जा.
मनापासून घेतां आलें, आवडीने घेतां आलें, नामस्मरणाचे प्रेम वाटूं लागलें तर तें उत्तमच. तसें झालेच पाहिजे. पण नामस्मरणाविषयीचे प्रेम उत्पन्न होणें ही गोष्ट कांहीं सोपी नाहीं. व्हावी म्हटल्यानें होत नाहीं. नको म्हटल्याने राहत नाही तेव्हां ज्या गोष्टीवर आपली सत्ता चालत नाहीं ती न मिळाली तर त्याविषयीं खंत बाळगणे इष्ट नाहीं. जे आपल्या स्वाधीनचे आहे तेंच करीत रहावे नामस्मरणाचें प्रेम वाटूं लागणे हें आपल्या हातचे नाहीं. पण नामाचा उच्चार करणें हे आपल्या हातचे आहे. समर्थ तेच साधन येथें सांगत आहेत.
सहजसुलभ, सोपे, कोणत्याहि अटी नसलेले असें हें एक साधन आहे. तें सातत्याने करीत राहिले तर इतर आवश्यक त्या गोष्टी आपोआप साधतात असे सर्व संताचे आश्वासन आहे. शरीराचे पोषण व्हावें म्हणून पक्वान्न खाणे कितीहि चांगले वाटले तरी तें मिळणे वा करतां येणे हें सहज जमण्यांतलें नाहीं आणि क्वचित् जमले तरी तें योग्य रीतीने पचणें हेहि अवघडच आहे. त्यापेक्षा साधी भात-भाकरी काय वाईट ! नामस्मरणाचें तसेंच आहे. भात-भाकरी हितकर खरी पण रुचकर नसल्याने माणसे मिष्टान्नाचा मोह धरतात आणि आरोग्य बिघडवून घेतात. परमार्थांत तसेच होते. 'योगयाग विधि येणे नोहे सिद्धि' असें थोर थोर संतांनी अगदीं जीव तोडून सांगितलें तरी कुणी ऐकत नाही.
परमार्थमार्गामध्यें गुरु करणें महत्त्वाचें मानलें जातें ते धार्मिकदृष्टा, आपल्या कल्याणाचे काम करावें ते नेमके कळावे म्हणून. पण शिध्या गुरुला न विचारताच आपल्याच लहरीने धार्मिक कृत्ये करीत असतो. त्यांतहि त्याच्या प्रतिष्ठेच्या कल्पना, बरें वाटतेच्या कल्पना, त्याला गुरुचा आदेश घेऊं देत नाहींत, कुळधर्मकुळाचारासारख्याा परंपरेनें चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचें पालन करीत असतांना गुरूंच्या आदेशाची आवश्यकता न मानली तर चालेल. पण तदितर पूजापाठ, तीर्थयात्रा, दानधर्म, होमहवन इत्यादि ज्या गोष्टी माणूस करतो, त्यामध्यें खरें म्हणजे तज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. पण लोक जे बोलतात त्यावरूनच हा स्वतः काय करावें त्याचे निर्णय घेत असतो आणि याचें महत्त्वाचें कारण, तें चांगलें दिसते मग तें मी कां करूं नको ? त्यानें केलेले चालते तर मी कां करूं नये ? असे वा यासारखे विचार माणसाच्या मनांत येतात. या सर्व गोष्टी म्हणजे खरोखरीच जाणत्या अनुभवी वैद्याला न विचारता आपल्या रोगावर आपणच औषध घेण्यासारखे आहे. औषधाची प्रसिद्धि कोणीहि वाचावी, कोणतीहि वाचावी पण औषध घेण्यापूर्वी तज्ञाचीच संमति घेतली पाहिजे. हें सर्व सांगण्याचे कारण इतकेंच की नामस्मरणासारखे अत्यंत सोपे आणि प्रभावी साधन उपलब्ध असतांनाहि तिकडे दुर्लक्ष करून कोणत्या ना कोणत्या कल्पनेने वा कोणाचें तरी पाहून, ऐकून, काहीतरी वाचून लोक स्वतःच निर्णय घेत असतात. ही स्वतःच निर्णय घेण्याची जी प्रवृत्ति आहे ती अहंकारांतून उगम पावत असते.
हा अहंकार मी आणि माझें या रूपानें प्रगट होत असतो व तोच माणसाच्या सर्व व्यापाराच्या मार्गे कारण म्हणून असतो. व्यवहारांतहि हा अहंकार फारसा उपयुक्त ठरत नाही. तेथेहि तो ज्याचा त्याला इष्ट वाटला तरी इतरांना उबगच आणतो; पण परमार्थात तर त्याच्या इतके घातक दुसरे कांहीं नाहीं, असेंच सर्व संतमहंतांनी म्हटलें आहे. येथेंहि समर्थांनी अहंकाराला-अहंतेला पापिणी हेंच विशेषण दिलें आहे. आपल्या सोयींसाठी फार तर पातकाच्या पातळीवर जाणारा अहंकार नसावा असाहि अर्थ करतां येईल. स्वाभिमानाच्या नांवाखाली' जे अहंकार खपतात त्यांची सोटा यामुळे होईल. जे हिताचे आहे तें प्रिय वाटत नाहीं. जें कर्तव्य आहे तें आवडीचें ठरत नाहीं ! आणि त्यामुळेंच सर्व प्रकारचे अनर्थ जन्माला येतात. असें जें होतें त्याच्या मुळाशी अहंता हेंच कारण असते आणि हें, विचार केला तर, ज्याचे त्याच्या लक्षांत येणेंहि शक्य आहे.
[ Use Right click for download ]
मना वीट मानूं नको बोलण्याचा । पुढें मागुता राम जोडेल कैचा ।
सुखाची घडी लोटत सूख आहे । पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥ २५ ॥
अहंकाराचा एक अगदीं स्वाभाविक परिणाम असा दिसून येतो कीं त्याला दुसऱ्याचे बोलणें नको वाटतें, कंटाळवाणे वाटतें, म्हणून समर्थ सांगत आहेत कीं बाबा ! बोलण्याचा वीट मालू नको. हें वाक्य पुष्कळ व्यापक अर्थाने लक्षांत घेण्यासारखे आहे. माणसाला स्तुतीचा कधीं कंटाळा येत नाहीं. ती कितीहि झाली तरी अधिक हवीच असे वाटतें. एका आधुनिक कवीने ' अंबाड्याच्या भाजीत घातलेले फोडणीचे तेल कितीहि असलें तरी कमीच वाटतें, तसेंच स्तुतीचेंहि होतें' असें म्हटलें आहे. माणसाला ज्या बोलण्याचा वीट येतो त्याचे दोन प्रकारांत वर्गीकरण करणें शक्य आहे. साधकाने त्या दोन्हीं दृष्टिकोनांतून विचार करून स्वतःचें वर्तन सुधारले पाहिजे.
ज्याचा वीट येतो आणि नकोसे वाटतें असे दोन प्रकारचे बोलणें माणसाच्या कानांवर पडते. एक उपदेशाचे आणि दुसरें तिरस्काराचें वा निंदेचे. उपदेशाचे बोलणें हे दोन प्रकारच्या लोकांकडून ऐकण्याचा प्रसंग येतो. (१) अधिकार, योग्यता आणि संबंध असलेल्या व्यक्तींकडून आणि (२) तसे नसलेल्यांकडून.
ज्यांच्याजवळ अधिकार व योग्यता नाहीं आणि ज्यांचा कांहीं सबधहि नाहीं अशा व्यक्तीने कांही सांगितलें तर माणसाला तें ऐकावेसे वाटत नाहीं. पण साधकाने तेहि वाटू देतां कामा नये. अशा परिस्थितींत जे सांगतो ते योग्य आहे की नाही याचा विचार अवश्य करावा. सांगणारा त्या योग्यतेचा आहे कीं नाहीं याचा विचार करणें तादृश महत्त्वाचें नाहीं. बालादपि सुभाषितं ग्राह्यन् असें म्हटलें जातें तें यासाठींच. योग्यतेच्या माणसाने अधिकार असतांना केलेल्या उपदेशासबंधीहि माणसाला वीट येतो आणि मग तो त्या व्यक्तीलाच टाळीत असतो. तें बोलणें योग्य नाहीं, चांगलें नाहीं असें तर म्हणतां येत नाहीं, कारण तसें सिद्ध करता येत नाहीं; पण त्याप्रमाणें आचरण करणे कष्टाचे वाटतें, दुःखदायक वाटतें, खरोखरीच हितावह ठरेल कीं नाहीं याविषयीं शंका येते. तें उपदेशाचे बोलणें आपल्या धारणेपेक्षां वेगळे असते आणि असा विचार त्या उपदेशाविषयी मनांत आल्यामुळे तें सांगणें, पुन्हा पुन्हा ऐकणे कंटाळा आणते. अशा वेळी अलीकडची सुधारलेली माणसे बोअर झाल म्हणतात. मुळांत तें उपदेशाचे बोलणें पटत नाहीं, मानवत नाही, हेंच खरें
साधकाने उपदेशाचे बोलणे तर काय पण तिरस्काराचें, निंदेचे भाषणहि आत्मशोधनाला कारणीभूत होत असल्यानें, सोशिकपणा वाढविण्यास सहाय्य करणारे असल्यानें, स्वागतार्हच मानलें पाहिजे. निंदकाला आपला शत्रू न मानतां संप्राप्ति-विशारद (पॅथालॉजिस्ट) मानावे. तो नेहमी शरीरामध्यें काय काम दोष आहेत तेंच सांगत असतो, काय, कसे, किती बिघडले तेंच सांगत असतो, आणि आपण त्याच्याकडून तीच अपेक्षा करीत असतो. निंदक शुल्क न घेतां, कुणी अपेक्षा ठेवली नसली तरी, आपणहून दोषांचें दिग्दर्शन करीत असतो, मग साधकाने त्याच्याविषयी' शत्रुत्वाची भावना कां बाळगावी ? दुसरा कोणी सुधारत नसतो. आपलें आपण सुधारावयाचें असते आणि प्रत्येक घटनेचा उपयोग त्यादृष्टीनें करून घ्यावयाचा असतो हें साधकाने लक्षात ठेवले पाहिजे.
म्हणून समर्थ म्हणतात- "मना बीट मावू नको बोलण्याचा । " बोलण्याचा असा वीट मानशील तर तितिक्षा कशी वाढेल ! नको वाटतें, कंटाळा येतो, म्हणून सोडून देशील, तर तें पळून जाणें ठरेल आणि हिताचे आहे हें पटत असून ऐकणार नाहीसं तर प्रगति खुंटेल. निंदा सोसली पाहिजे, उपदेश ऐकला पाहिजे, म्हणजे आचरणांत आणला पाहिजे. हें जर केलें नाहीं तर जी गोष्ट साधावयाची आहे म्हणून माणूस परमार्थमार्गाला लागतो, ती कशी मिळणार ? ईश्वरदर्शनाचा दुसरा मार्ग उपलब्धच नाहीं. नामस्मरण करणें, सदाचार न सोडणे, संयमाने वागणे, कामक्रोधांना जिंकणे, आळस सोडणे, कर्तव्ये पार पाडणे या गोष्टी केल्याच पाहिजेत. परमेश्वर भेटावयाचा तो याच मार्गाने. मार्गानें जा म्हणून कोणी सांगत असेल तर त्याचा कंटाळा करून कसें चालेल ! ईश्वर भेटावा अशी इच्छा आहे तर मग नामस्मरणादि साधनें स्वीकारलीच पाहिजेत.
ईश्वर भेटाचा अशी इच्छा उत्कटतेने होत नाहीं त्याचें कारण चालू घडी असते ती त्यातल्यात्यात सुखावह असते हें होय. आणि त्यामुळें ज्याची कल्पना नाहीं, अनुभव नाहीं अशा परमार्थसुखाची ओढ लागत नाहीं. म्हणून तर परमार्थाचा अधिकारी कोण होतो ३ सांगतांना-जो संसार दुःखे दुखावला । त्रिविधतापे पोळला । तोच एक अधिकारी झाला । परमार्थासी ॥ असें म्हणून ठेवले आहे. पण अशा अगतिकर्तेतून, नैराश्यांतून परमार्थाकंडे ओढले जाणें हें कांहीं फारसे इष्ट नाहीं, कारण मग ही मनोवृत्ति वैराग्याची नसते. ती वैतागाची असण्याची शक्यता अधिक असते. वैताग हा तसा फलदायी ठरूं शकत नाहीं. कारण परमार्थांत कांहीं पी हळद आणि हो गोरी अशी अपेक्षा धरता येत नाहीं. तेथेंहि धीरच धरावा लागतो, वाटच पहावी लागते. नाहीतर तर तेथेंहि भजन्नलिया सर्वे । सिद्धि न जरी पावे । तरी म्हणे आघवे । टवाळचि हे । (ज्ञा. १३ । ८१०) अशी वृत्ति उत्पन्न होते आणि ही नास्तिकता प्रपंचाच्या आसक्तीइतकीच किंबहुना थोडी अधिकच घातक असते. म्हणून परमार्थाकडे लागावयाचें ते पूर्ण विचारांती, विवेकाने लागले पाहिजे. रोग झाल्यानंतर मग आरोग्य मिळविण्याकरितां प्रयत्न करण्यापेक्षा रोग नसतांनाच आरोग्य टिकविण्यासाठी, वाढण्यासाठी, प्रयत्न करणें हेच अधिक इष्ट असतें. म्हणून समर्थ सांगतात-प्रपंचातलें सुख हें न टिकणारे सुख आहे. सुखावह परिस्थिति नाहीसी होते. मुले-माणसे, आप्तेष्ट कोणत्या ना कोणत्या तरी रूपांत दुरावतात. प्रतिष्ठा नाहीशी होते, शक्ति क्षीण होते. हें असें तर होतेंच पण प्रपंचांत वाटणाऱ्या सुखाची विलक्षणता अशी आहे कीं, एकदां जें सुखाचे वाटले व तें बाहापरिस्थितींत तसेंच टिकून राहिले असलें तरी मग सुखाचे वाटत नाहीं. जणू 'अतिपरिचयादवज्ञा' होते. त्यापेक्षा अधिक, त्यापेक्षा निराळें हवेसे वाटूं लागतें. पहिल्याचा कंटाळा येतो आणि नवीन मिळालें नाहीं, प्राप्त झालें नाहीं तर कांहींच नव्हते तेव्हां जसें दुःख वाटत होते, तसें दुःख वाटूं लागते.
आहे त्यांत समाधान न वाटणे, तृषा न होणें व त्यामुळें अधिकाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करीत राहणे ही महत्त्वाकांक्षा म्हणजे ईश्वरानें माणसाला दिलेली एक अखत शक्ति आहे. मुळांत ती परमेश्वराच्या प्राप्तीमधे परिणत व्हावी यासाठी' मानवाला दिली आहे. समुद्रांतून निघालेल्या पाण्याचा वाहण्याचा जो गुण आहे तो जसा समुद्राला मिळण्यासाठी आहे, तसेच जीवाचेंहि आहे.
ईश्वरापासून निघालेला जीव पुन्हा ईश्वरालाच मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्यानें त्याला त्या आधीच्या कोणत्याहि स्थितींत नित्याचे सुख लाभत नाहीं, म्हणून प्राप्त झाले कोणतेंहि सुख त्याला कृति वा समाधान देऊं शकत नाहीं. पण अज्ञानाने, विषयांच्या उपभोगांतून निर्माण झालेल्या संस्कारानें, मोहानें, माणसे या मूलभूत प्रवृत्तीचा उपयोग ज्या हेतूकरितां ती वापरली पाहिजे त्याकरिता न करतां भलत्याच ठिकाणीं करतात त्यामुळेंच त्याला नाना प्रकारांनी 'खरें प्राप्तव्य काय ? खरें कर्तव्य तरी काय ? ' ते समजावून देण्याचा प्रसंग येतो.
समर्थांनी येथें सुखाची क्षणभंगुरता सांगून तेंच केलें आहे. ते म्हणतात- आतां तुला जें प्राप्त झालें व कांहीं काळ जें सुखा वाटत आहे तें पुढें लौकरच नाहीसें होणार आहे, त्याचें स्वरूप पालटणार आहे. या भौतिक जगांत कांहींहि जसेच्या तसे टिकणारें नाहीं. तारुण्य, आरोग्य, मान, धन, सत्ता, संपत्ति, प्रतिष्ठा, ज्यांना तूं जिव्हाळ्याचे समजतोस ते आप्तेष्ट, यातले कांहींहि तुला पाहिजे त्या स्वरूपांत दीर्घकाळ टिकणारें नाहीं. मग त्यांत आसक्त होऊन कां राहतोस ! कारण या आसक्तीच्या पोटी केले जाणारे श्रम सगळे वाया जाणार आहेत.
देहेरक्षणाकारणें यत्न केला । परी सेवटी काळ घेऊनि गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची । पुढें अंतरीं सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥
समर्थ विचारतात-जन्माला आत्यापासून जें जीवन तूं जातोस त्यांत तुझी धडपड, तुझे प्रयत्न, तुझी हाव , तुझा आग्रह कशासाठी' असतो ? देहाच्या रक्षणासाठी ! हें त्याचें उत्तर. मनुष्यानं देहरक्षण हेंच सर्वस्व मानावें का ? विचारी माणूस याचें उत्तर नाही असेंच देईल. बहुसंख्या माणसे या देहरक्षणापलीकडे बाकी कांहींहि फारसे करीत नसली तरी देहरक्षण हेंच ध्येय असें कुणी म्हणणार नाही आस्तिक असेल, परंपरेच्या श्रद्धा मानणारा असेल, तर तो ईश्वरभक्ति, ईश्वरप्राप्ति, मोक्ष हें ध्येय सांगेल. नास्तिक असेल, स्वतःला बुद्धिवादी समजणारा असेल, तर देशभक्ति, समाजकार्य, वैज्ञानिक प्रगति, शास्त्रीय संशोधन, मानवतेची सेवा, समतेची प्रतिष्ठापना इत्यादि इत्यादि गोष्टी ध्येय म्हणून सांगेल. पण हें जें आपलें ध्येय तो मानतो त्यासाठीं तो किती वेळ देतो. देहाचे भरण, पोषण आणि उपयोग यासाठींच माणसाचे बहुतेक सगळे बळ आणि वेळ वेचला जातो ! कां ? प्रपंचाकरितां संयोजन असतें पण परमार्थाकरितां कांहीं योजना असते काय ?
नाहीं ! असेंच सर्वसाधारण उत्तर आहे.
देहाची उपेक्षा करावी असें कोणी म्हणत नाहीं. पार्वती तपश्चर्या करीत असतांना तिची परीक्षा पाहण्याकरिता बटुवेषानें प्रगट झालेल्या शंकराने तिला पहिला प्रश्न विचारला आहे कीं :
अपि त्वशक्का तपसि प्रवर्तसे ।
शरीरमाद्य खलु धर्मसाधनमू ॥
आपली शक्ति पाहून तपाचे आचरण करीत आहेस ना ? धर्माचरणाचे शरीर हें पहिलें साधन आहे. संतांनीही 'कथेची सामग्री देव अबसानावरी असेंच म्हटलें आहे. वैदिक रूषीनींहि प्रार्थना करतांना आम्हांला शंभर वर्षाचे आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळावे, शरीराचे सर्व अवयव धडधाकट आणि कार्यक्षम असावेत असेंच म्हटले आहे. पण अशा आरोग्य-संपन्न दीर्घायुष्य लाभलेल्या धडधाकट शरीराचा उपयोग आम्ही देवाच्या कामासाठी करूं असें ते ऋषी पुढे म्हणतात. रुद्रांतील चमकानी जगांतील सगळे पदार्थ मला द्या, मला द्या, अशा, शब्दांत मागितले आहेत. धनधान्य, संपत्ति, गाई, घोडे, वासरे मागितली आहेतच; पण दगड सुद्धां मागितले आहेत. यावरून भौतिक जगांतील सर्व वस्तू उपयुक्त आहेत आणि आवश्यक आहेत हेंच सिद्ध होतें. पण अशा या भौतिक वस्तूंच्या सहाय्याने संपन्न झालेलें आयुष्य आणि कार्यक्षम झालेलें शरीर हे शेवटीं यज्ञाच्या कामी लावावयाचे आहे आणि तो यज्ञहि शेवटीं यज्ञासाठी म्हणजे परमेश्वरासाठीं आहे असेंहि रुद्रामध्ये सांगितले आहे. संरक्षिलेल्या देहाचा हा उपयोग कोणी लक्षांत ठेवतो काय ?
हा उपयोग लक्षांत न घेतां केलेले देहरक्षण हें शेवटीं खरोखरीचे देहरक्षणहि होत नाहीं. शरीर निरोगी आणि काटक असलें, पडतील ते कष्ट सोसणारें असलें, थंडी, ऊन, वाऱ्याला घाबरणारे नसलें म्हणजेच देहाचे रक्षण साधलें असें म्हणावयाचें ना ? पण सुखोपभोगाच्या मागें लागलेल्या माणसाचे तेहि होत नाहीं. शरीर-सुखाच्या अपेक्षेनें तो इंद्रियांचे लाड करतो, विषयोपभोगांत विलासी होतो, आणि शरीराची कार्यक्षमता व आरोग्य गमावून बसतो. अनेक दुर्धर रोगांना भर तारुण्यांतच शरीर बळी पडते, देहाला दुबळेपणा येतो. वेलदोड्याने थंड, लवंगेने उष्ण अशी स्थिति होते. हे परिणाम बहुधा विलासी जीवनाचे आहेत. कोणतेंहि ध्येय पुढें न ठेवता देहरक्षण केलें तर त्या देहाचे पुढें काय होते ? शरीर शेवटीं मातीलाच मिळते ना ! देहाची शेवटीं राखच होते ना ! कितीहि देहरक्षण करतो म्हणाला तरी शेवटीं म्हातारपणी' येणारी दुर्बलता, विकलांगता टाळता येते काय ? मग कोणताहि ध्येयवाद न ठेवता केलेलें देहरक्षण काय कामाचे ? शरीर हें साधन म्हणून वापरणेच चांगलें. त्याचे लाड करणें व्यर्थच आहे. म्हणून समर्थ मानवाचे सर्वोच्च ध्येय, ईश्वरभक्ति, तेंच साधावे असें सांगतात.
संसाराची वा संसारातल्या अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीची चिंता करू नये. योग्य ते प्रयत्न आणि प्रारब्ध यांचा परिणाम म्हणून जें व्हावयाचें तें होईल. आग्रह असावा तो परमेश्वराच्या भक्तीचा. शरीर आणि मन यांच्या पातळीवर पारमार्थिक क्षेत्रांत साधन म्हणून जे करतां येईल तें प्रामाणिकपणे आणि लींनतेने करीत रहावे आपल्या ऐश्वर्याला अनुसरून सत्यात्रीं दान द्यावे, पूजापाठ, तीर्थयात्रा या गोष्टी शक्त्यानुसार कराव्यात आणि नामस्मरणामध्ये अधिकाधिक वेळ घालवावा. या गोष्टी व्रत म्हणून कराव्याच व त्यांतील आवड वाढावी आणि भगवंताच्या चरणावरचे प्रेम वृद्धिगत व्हावे यासाठी तळमळीने प्रार्थना करावी. म्हणजे क्रमाक्रमाने सं साराविषयीच्या चिंता उणावत जातात आणि शेवटीं नाहींशाहि होतात.
ऐहिक मनोरथ पूर्ण होतात आणि भौतिक संकटे येत नाहींत असें ईश्वरकृपेचें फळ सांगितलें जातें. तें फारसे खरे नाहीं. तसा अनुभव फार क्यचितूपणेच विशेष कारणानी येतो आणि हे क्षेत्र मंत्रतंत्र मार्गाचे आहे. खऱ्या अर्थाने भक्तिमार्गाचें नव्हे. भक्तावर दुःखे येतच नाहींत हें खरें नाहीं. सामान्यावर होतो तसा दुःखाचा परिणाम मनावर होत नाहीं हें मात्र खरें. ' अस्थिर स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते । " (भ. ६ ! २२) अशी भक्ताची स्थिति असते. वाहनाचे आघातशोषक उत्कृष्ट असले आणि आंतील गाद्या मऊ गुबगुबीत असल्या म्हणजे रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास होत नाहीं तसे भक्तीत होते. तितिक्षा, श्रद्धा आणि प्रेम या बळावर कोणत्याहि स्थितींत भक्त प्रसन्न आणि समाधानी राहूं शकतो. पण हे भक्तिमार्गाच्या फार वरच्या स्थितीतले अनुभव झाले. सामान्य स्थितीतील व्यक्तीला आणि प्राथमिक अवस्थेत हें तत्त्व पेलणारच नाहीं. त्याच्यासाठी समर्थ सांगतात-
भवाच्या अर्थ काय भीतोसी लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायका सारिखा स्वामि शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥
लंडी म्हणजे भेकड. समर्थ म्हणतात-मानवा ! किती रे भेकड तू ! संसाराच्या भयानें काय घाबरतोस. ज्याला घाबरावे, घ्यावें त्याचे ठिकाणी कांहीं पराक्रम लागतो. लहान मुले बागुलबुवाला भितात. कारण अज्ञानी असतात. बागुलबुवा ही वस्तू मुळांत नाहीं हें वयाने थोराड झालेल्या माणसाला कळायला हवे !
दोरीवरच्या सापाला घाबरण्यांत काय अर्थ आहे ? संसाराची स्थिति तशीच आहे. तत्त्वतः ज्याला अस्तित्व नाहीं त्याला काय घाबरतोस ? दाढी मिशा आल्या वर सगळ्यांना जसें शोभत नाहीं, तसें जाणत्या माणसानी संसाराला भिणें शोभत नाहीं. मनुष्यानं ईश्वरावर निष्ठा ठेवावी आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी धैर्याने ताठ उभे रहावे. परिस्थितीला घाबरणे म्हणजे परिस्थिति आणखी बिकट करून ठेवणे आहे. शिडीवर चढायचे झाले तर पाय लटपटू देतां कामा नयेत. कोसळण्याचा धोका वाढतो तो शिडीच्या लटपटण्यापेक्षां पायांच्या लटपटण्यामुळे. सर्वत्र असेंच होते. रस्त्याला वळणे नसली, रस्ता पुष्कळ रुंद असला, चांगला मोकळा असला म्हणजे चांगल्या वेगाने सतत जातां येईल हें वरवर पाहतां खर्रे वाटले तरी अशा रस्त्यावर वेगाने जाताना सारथ्याला डुलकी येते आणि अपघात वाढतात असा अनुभव आहे. रस्त्याला वळणे, वळसे, आवश्यकच असतात असें म्हणावें लागतें. संसारातल्या प्रतिकूल परिस्थितीचेंहि तसेंच म्हणावें. आपण सावध मात्र आणि धीराने वागाजें हेंच शेवटीं उपयोगी पडणारे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मना ! धैर्य धारण कर, धाक सोडून दे, भय बाळगू नकोस, आणि विश्वास वाढण्यासाठी आश्वासन देतात की भगवान् रामचंद्रासारखा धनी तुझ्या मस्तकावर आहे. त्याच्या कृपाछत्राखाली तूं आहेस. भक्तांच्या रक्षणाकरितांच त्याने धनुष्य धारण केलें आहे आणि तें सत्य आहे. तो तुझी उपेक्षा करणार नाहीं. रामरक्षेत रामाचे वर्णन -
आत्तसज्जधनुषाविषूस्पृशा व क्षयाशुगनिषेगसंगिनौ ॥
असें केलें आहे. त्यानें धनुष्यावर प्रत्यंचा चढविलेली आहे आणि बाण जोडून तो सिद्ध आहे. ' आम्हांला कल्पना नव्हती' असें म्हणणारा मेणचट, मेंगळट नेता हा नाहीं, अनुसायावरच संतापणारा आणि सुधृढापुढे नांगी टाकणारा असाहि हा नाहीं. दीर्घसूत्री तर नाहींच नाहीं. भक्तरक्षणाच्या कामी तो चांगला तापट आहे. त्याचा लक्ष्मण त्याहून तापट आहे. तेव्हां रामभक्तानें आपलें रक्षण कसें होईल अशी चिंता बाळगण्याचें कारणच नाहीं.
रामचंद्राने सुग्रीवाचे रक्षण केलें तो प्रसंग लक्षांत घेण्यासारखा आहे. विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेले अनेक बुद्धिवादी, रामशास्त्री प्रभुण्यांचा आव आणून, वाली वध प्रकरणी रामचंद्राला दोष देत असतात. सुग्रीवपेक्षा वाली बलवान् आणि पराक्रमी होता. वालीपासून मी तुझें रक्षण करीन असें रामचंद्रांनी सुग्रीवाला वचन दिलें होतें. वाली आणि सुग्रीवाच्या मल्लयुद्धाला आरंभ झाला तेव्हां सुग्रीव अशा बिकट परिस्थितींत आला होता, की रामचंद्र क्षणाचाहि विलंब करते तर सुग्रीव जिवंतच राहिला नसता. म्हणून रामचंद्रांनी तांतडी केली. इथे न्यायान्यायाचा विचार करणें म्हणजे कर्तव्याला चुकणें आहे आणि सर्वदा अन्यायानेंच वागणाराशी, अत्याचार आणि अतिक्रमण हेच ज्यांचें धोरण असते त्यांच्याशी, न्यायाने वागून त्यांना अधिक उन्मत्त होण्याची संधि देणे हे धोरण कांहीं रामचंद्रांचें नव्हतें. साधनशुचितेचा अतिरेकी हट्ट वैयक्तिक क्षेत्रापुरता संन्याशाला शोभतो. राजकारणांत उतरलेल्या वीराला शोभणारा कांहीं तो फार मोठा सगुण नाहीं. "ये यथा मां प्रपद्यने तास्तथैव भजाय्यहमू । " (भ. गीता ४ ! ११) हाच ईश्वरी न्याय आहे. तेच तत्त्व रामचंद्रांचेंहि होते. म्हणून आपण त्यांना ईश्वरी अवतार मानतो तेव्हां असा दक्ष आणि समर्थ धनी मनुष्याला लाभला असतांना रागावलेल्या दंडधराचें म्हणजे यमाचे म्हणजे मृत्यूचें भय बाळगण्याचें कारण काय ? रामचंद्रावरील विश्वासाने मृत्यू टळत नसतो. मृत्यूचें भय टळते हें लक्षांत ठेवलेच पाहिजे.
दिनानाथ हा राम कोदंड धारी । पुढें देखतां काळ पोटीं थरारी ॥
जना वाक्य नेमस्त हें सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥
परमेश्वर आपल्या भक्तांची कधीं उपेक्षा करीत नाहीं हें निरनिराळ्या उपायांनीं आणि उदाहरणांनी समर्थ समजावून देत आहेत. "नुपेक्षी कदा राम दासाभिमानी !" राम भक्ताचा अभिमानी आहे. तो त्याची कधीं उपेक्षा करीत नाहीं असें पालुपद असलेले १० श्लोक या ठिकाणी क्रमानें आहेत.
हा विषय समर्थांना साधकाच्या मनावर चांगला बिबवावयाचा आहे. आणि म्हणून याच अर्थाने नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी हे पालुपद असलेले १० श्लोक समर्थानी मनोबोधांतच पुन्हा एकदा सांगितले आहेत. ( ११६ ते १२५) कोणत्याहि जीवाला आपल्याला कोणाचा तरी आधार आहे असें निश्चित वाटावे लागतें. या आधाराच्या बळावर त्याला मोठे धैर्य लाभत असतें. साधे कुत्रेहि आपल्या धन्याच्या दारांत उभे राहून रानांत सिंह गरजला तर त्यालाही भुंकून मोठ्या धैर्याने प्रत्युत्तर देते. कविवर्य मोरोपंतांनीं ही घटना उपमेसाठीं वापरलेली आहे. आई जवळ असतांना लहान पोर जितक्या खोड्या करतें तितक्या आई जवळ नसतांना परक्या घरांत करीत नाहीं. बालकाला आईचा आधार वाटतो. असा आधार हवासा वाटणे, आहे असे पटणे , हीच आस्तिकता. माणूस आपल्या जीवनामध्ये असा कोणता ना कोणता तरी आधार शोधीतच असतो. तो ईश्वर असेल, सत्पुरुष असेल, विचारवंत असेल, तत्त्ववेत्ता असेल, संशोधक, शास्त्रज्ञ, नेता, कार्यकर्ता यापैकी की असेल, कुणी जिव्हाळ्याचा मित्र असेल, कुणी आप्त असेल; पण विश्वासाच्या आधारावांचून माणसाला तरी उभे राहणे अशक्य आहे.
अलीकडे माणसे स्वतःला भूषणाने नास्तिक म्हणवून घेतात. त्यांना ते बुद्धिमत्तेच्या प्रखरतेचें द्योतक वाटतें. पण तो अडाणीपणा तरी असतो. नाहीं तर दंभ तरी असतो. आधार आहे या कल्पनेंतच माणसाचे दैन्य उणावते, आत्मविश्वास वाढतो. इतर प्रकारचे आधार हे तेवढे बळकट नसल्याने संतानी सर्वसमर्थ ईश्वराचाच आधार घ्यावा आणि याच भरवशावर राहावे असें सांगितलें आहे. कारण परमेश्वर हाच शेवटीं सर्वाधार आहे. त्याच्याच बळावर इतर लहान मोठ्या आधारांना कार्यक्षमता येत असते आणि हा आधार सर्वांसाठीं केव्हांहि उपलब्ध आहे. अडचण आधार देणाराकडून नाहीं, घेणाराकडून आहे. ती दूर व्हावी म्हणून तर नाना प्रकारांनी संत उपदेश करीत असतात. आपण ज्या रीतीनें लहान व मोठी ही कल्पना करतो ती कल्पना परमार्थांत नाही. ईश्वर दीनानाथ आहे. दीन दुबळ्यांचा 'जे कां रंजले गांजले' त्यांचा तो नाथ, रक्षक, पालक असा आहे. त्यामुळें त्याला भेटण्यासाठी मध्यस्थ नको. तुम्हीं त्याला सरळ भेटू शकता. आणि असा हा दीनानाथ परमेश्वर, रामचंद्र धनुष्य धारण केलेला आहे. धनुष्य सज्ज करून उभा आहे. त्यानें शस्त्रसंन्यास केलेला नाही. शस्त्र वापरणारच नाहीं अशी त्याची प्रतिज्ञा नाहीं. कृष्णावतारीं तशी प्रतिज्ञा केली होती तरी भक्तरक्षणासाठीं तीहि मोडावी लागली. आणि हा प्रतिज्ञाभंगहि संतानी भूषण म्हणूनच गायिला. विणूसहसनामामधे परमेश्वराचें गुणवर्णन करणारी हजार नावे आहेत. पण उपसंहार करतांना घेतले नांव 'सर्वप्रहरणायुध' असें आहे. शस्त्र बाळगण्याचीच लाज वाटणे हा विचार अवैदिक आहे. भगवान रामचंद्र शस्त्रधारी आहेत. इतकेंच नव्हे तर त्यांचें शस्त्रकौशलाहि असामान्य आहे. हत्यार नुसते हातांत असून चालत नाहीं, तें वापरण्याचे कौशल्यहि हातांत असावें लागतें. आणि त्या शस्त्रापासून समोरच्याला धाक उत्पन्न व्हावा अशी वीरश्रीहि अंगाअंगांतून प्रगट व्हावी लागते. ज्ञानेश्वरांनी कुमारीच्या हातांतले शस्त्र काय कामाचे (ज्ञा. ९ ! १७७) असें म्हटलें आहे. 'मानापमाना'तील लक्ष्मीधराच्या हातांतले शस्त्र उपहासाचा विषय होतो. भगवान् रामचंद्र कोदंड पाणि आहेत, आणि त्यांचा धाक इतका विलक्षण आहे, कीं त्यांना समोर पाहतांच, ज्याला सर्व त्रिभुवन घाबरते असा, कळिकाळहि भयानें थरकांपतो. समर्थ म्हणतात, आम्हीं ही अतिशयोक्ति करीत नाहीं. हें आमचें बोलणें नेमस्तपणाचें आहे, नेमके, नेटके यथार्थ आहे.
सामान्यतः आपण असें बोलत नाहीं. आपल्या बोलण्यांत स्तुतीचा गौरव तरी असतो नाही तर निंदेची तुच्छता तरी असते. चहा चांगला झाला तर आपण म्हणणार वा ! अमृतासारखा झाला आहे. आणि बिघडला तर म्हणणार काडेचिराईताचा काढा यापेक्षा काय वाईट ! या दोन्हीं प्रकारांत अतिशयोक्ति आहे. एखादा पदार्थ रुचकर आहे की नाहीं एवढेच फार तर म्हणतां येईल. पण इतक्या शब्दांनी आपलें समाधान होत नाहीं. जणू आपल्या दुबळ्या ग्रहणशक्तीचा हा परिणाम आहे. यथार्थ बोलणें आपल्याला आकर्षक वाटत नाहीं.
संत निःस्वार्थी आणि सत्यवादी असल्यानें ते सहसा अतिशयोक्तीचा अवलंब करीत नाहीत माणसाला त्याच्या नेहमीच्या सवयीने भगवान रामचंद्राच्या प्रभावाचे वर्णनहि अतिशयोक्तीचे वाटेल. तसें तें वाटूं नये म्हणून समर्थ त्यांतल्या य थार्थपणाची प्रतिज्ञा करीत आहेत. रामाचे सामर्थ्य अलौकिक आहे आणि वत्सल हृदयी असल्यानें तो भक्तांची उपेक्षा करीत नाहीं हें जें आम्ही म्हणतो तें आमचें बोलणें नेमस्त आहे, ठाम आहे , अगदीं धरून आहे.
पदी राघवा सदा ब्रीद गाजे । बळे भक्तरीपूशिरीं कांबि वाजे ॥
पुरी वाइली सर्व जेणे विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥
मी भक्ताचे रक्षण करीन अशी रामचंद्रांची प्रतिज्ञा आहे. आणि ती त्यांच्या चरित्रांत पदोपदी जणू गर्जना करीत प्रगट होत असते. म्हणजे सहज कळण्याइतकी उघड स्वरूपांत असते. जे कुणी भक्तांचा छळ करीत असतील असा दुष्टांच्या मस्तकावर रामचंद्रांच्या हातांतील शस्त्र वेगाने आघात केल्याशिवाय राहत नाहीं. ब ळें या शब्दांतून रामचंद्रांना येणारा रागच समर्थांनी व्यक्त केला आहे. संरक्षणासाठी राग येणे, आणणें आवश्यक असतें .
शाकुंतलातील एक प्रसंग मोठा लक्षांत घेण्यासारखा आहे. इंद्राला राक्षसांच्या पारिपत्यासाठी दुष्यंताच्या सहाय्याची अपेक्षा होती. दुष्यंत शकुंतलेच्या विरहाने खिन्न झाला होता तेव्हां इंद्राचा सारथी मातली याने दुष्यंत सहाय्यासाठी सिद्ध व्हावा याकरितां गुप्तरूपानें दुष्यंताच्या मित्राला, विदूषकाला छळले दुष्यंत मोठ्या त्वेषाने विदूषकाच्या रक्षणासाठी धावला तेव्हां मातलीनें प्रगट होऊन वसुस्थिती सांगितली. "प्रायः स्वे महिमानं क्षोभातू प्रतिपद्यते हि जनः । " रागामुळेच माणसाचे सामर्थ्य प्रगट होते म्हणूनच मी आपणाला राग आणला असे मातली म्हणाला आणि मग दुष्यंत इंद्राच्या सहाय्यासाठी गेला. परमार्थमार्गामध्यें क्रोध वाईट म्हटला आहे हें खरें पण त्यामागची भूमिका निराळी आहे. स्वार्थ वाईट आणि स्वार्थ दुखावल्यामुळें उत्पन्न होणारा क्रोध वाईट. संरक्षणाकरितां आवश्यक असलेला क्रोध या जातीचा नव्हे. शांतता निराळी आणि मिळमिळीतपणा निराळा. परमार्थमार्गांतील व्यक्ति शांत असतात, सोशिक असतात, दयाळू असतात, क्षमाशीलहि असतात; पण त्यावरून त्या शेळपट, विळविळीत असतात किंवा असाव्यात असें समजणें चूक आहे. नाठाळाचे माथी' काठीच घालावी लागते हें संतांनांहि मान्य आहे व आपण तसें करत, तीस शब्दांचे बाण घेऊन आपण वावरत असें त्यांनीं आवर्जून सांगितलें आहे. दयेच्या व्याखोत संतानी भूतांचें पालन आणि कटकाचे निर्दालन या दोन्हीं गोष्टींचा समावेश केला आहे. दुष्टाचे पारिपत्य करण्यासाठीं रागवावेच लागतें. ज्याला योग्य वेळीहि रागावता येत नाहीं, वाईटाची आणि वाईट गोष्टीची ज्याला चीड येत नाहीं, तो कोणाचें संरक्षण करूं शकणारच नाहीं. आणि अशा नेभळट व्यक्तीविषयीं कोणासही आपलेपणा वाटणार नाहीं आणि ती व्यक्ति दुष्टांना धाकहि दाखवू शकत नाहीं. समर्थ म्हणतात, रामचंद्राची स्थिति तशी नाही. ते भक्तांच्या संरक्षणासाठी त्याच्या शत्रूचे पारिपत्य करतांना मागेपुढे पाहणार नाहींत.
रामचंद्रांचा आणखी एक गुण फार महत्वाचा आहे. त्यांच्याजवळ अजेदुजे, लहानमोठे हा भेद नाहीं. ते उदार आहेत. त्यांचें हें औदार्य मोठे विलक्षण आहे. विशाल लोकसंख्या असलेली सर्व अयोध्यानगरी त्यांनीं उद्धरून नेली होती. तेव्हां - एकट्याची ते उपेक्षा करतील हें शक्यच नाहीं.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
मनोबोधांतील या श्लोकाची शब्दरचना अत्यंत प्रभावी अशी आहे. हा श्लोक खड्या सुरांत स्वच्छ, स्पष्ट शब्दानी नुसता उच्चारला तरी प्रत्यक्ष समर्थ पुढें उभे राहून, कुबडी धरलेला उजवा हात उभारून मेघासारख्या धीरगंभीर पद्धतीने आपले कसें होईल या भयानें व्याकुळ झालेल्या जीवाला जणू आश्वासन देत आहेत, त्याचा उत्साह वाढवित आहेत, त्यांचें धैर्य जागे करीत आहेत, असें वाटावे, असें सामर्थ्य या श्लोकांत प्रगट झाले आहे.
भक्त देवावर प्रेम करतो. पण देवाला भक्ताचा अभिमान असतो. अभिमानामध्ये प्रेमापेक्षा थोड्या अधिक भावना एकवटलेल्या असतात. जणू भक्ताच्या प्रेमाचे देव व्याजासुद्धां फेडीत असतो. रामचंद्राला आपल्या भक्ताचा अभिमान असल्यामुळें त्या भक्ताकडे वाकड्या दृष्टीनें पाहण्याची कोणाची छाती आहे !
एखाद्या साधारण रक्षकाच्या पाठीशी अगदी सामान्य अशी राजसत्ता थोड्याशा प्रमाणांत उभी असली तरी त्या रक्षकाचा धाक बाळगला जातो, गणवेषातील रक्षकाचा तर अधिकच. मग ज्याच्या पाठीशी रामचंद्र उभे आहेत, ज्यांच्या पराक्रमाची, दृढनिश्चयाची, सत्यवादित्वाची, भक्तवात्सल्याची; औदार्याची अपार कीर्ति तिन्ही लोकांत पसरली आहे; महर्षी वाल्मिकीसारख्या अनन्यसाधारण- प्रतिभेचा कवि, आद्यकवि, महाकवि, ज्या रामचंद्रांचें गुणवर्णन करतांना मोहून गेला, त्या समर्थ रामचंद्राच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने कोण पाहू शकणार ?
महा संकटी सोडिले देव जेणे । प्रतार्पे बळे आगळा सर्व गूणें ॥
जयातें स्मरे शैल्य जा शू ळपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥
रावणाने उन्मत्तपणानें सर्व देव बंदींत घातले होते. या बंदिवासांत हलकी- सलकीं कामे करणें इंद्रादि देवांना भाग झालें होते व त्यांचें जीवन या भीषण सं कटाने लाजिरवाणें व दुःखमय होऊन गेले होते. भगवान रामचंद्रांनीं आपल्या शौर्याच्या बळावर लंका जिंकली. गर्विष्ठपणानें अत्यंत शूर बनलेल्या महापराक्रमी रावणाचा त्याच्या शूर परिवारासह निःपात केला आणि देवाना बंदिवासांतून सोडविले. स्वर्गामध्यें आनंदीआनंद झाला. रामचंद्राचा प्रताप सामर्थ्यानें बळाने असा अलौकिक आहे, अखंड आहे.
केवळ पराक्रमी असणे, प्रतापी असणें, अत्यंत शौर्यशाली असणे एवढेच रामचंद्रांचे वैशिष्ट्य नाहीं. ज्या ज्या सद्गुणांच्या अस्तित्वामुळे थोरपणा येतो, श्रेष्ठता प्राप्त होते, ज्या एखाद्याहि गुणामुळे मनुष्य फार मोठा मानला जातो ते सर्व सगुण भगवान रामचंद्राच्या ठिकाणीं एकवटलेले आहेत. अत्यंत विरक्त असलेल्या महातपस्वी, वाल्मिकी ऋषींना रामचंद्रांचे चरित्र काव्यांतून गावे असें जे वाटलें ते त्यांच्या ठिकाणीं एकवटलेल्या सद्य गुण समुच्चयामुळेच . वाल्मिकी रामायणाच्या बालकांडांतील पहिल्या सर्गांतच रामाच्या गुणसमुच्चयाचें अत्यंत मनोहर वर्णन आलेले आहे. अतिथि म्हणून आश्रमांत आलेल्या देवर्षि नारदांना वाल्मिकीने प्रश्न केला की, महाराज सांप्रत या पृथ्वीतलावर सदगुणी, शौर्यसंपन्न, धर्मज्ञ , कृतज्ञ, सत्यवादी, दृढव्रत, चारित्र्यसंपन्न, सर्व भूतमात्रांचे हित साधण्यामधे तत्पर असलेला, विद्वान् समर्थ, ज्याचें दर्शन कोणालाहि प्रिय होईल असा, संयमी, क्रोध जिंकलेला, निर्मत्सर, संतापून रणांगणांत उभे राहिल्यानंतर ज्याच्या पराक्रमाचा देवानाहि धाक वाटावा असा वीर पुरुष सध्यां कुणी आहे का ? आपण सर्वत्र संचार करतां तेव्हां अशा महापुरुषाचें ज्ञान आपणालाच असणार. नारद प्रसन्नपणानें हसून म्हणाले-मुनिश्रेष्ठा तूं ज्या चे सगुण वर्णन केले आहेस त्यांतला एखादा गुण कांहीं प्रमाणांत जवळ असलेली माणसेंहि दुर्मिळ. मग हे सर्व सगुण आपल्या पूर्णरूपांत एकत्र असलेला महापुरुष आढळणे किती अवघड आहे, याचा तूंच विचार कर; पण तरी हेंच सर्व काय पण याहूनहि किती तरी पटीनें अधिक सगुणांनी अलंकृत असलेला एक असामान्य पुरुष सध्या पृथ्वीतलावर आहे. इक्ष्वाकुच्या कीर्तिमान् वंशांत जन्मलेला, अयोध्येचा राजा रामचंद्र सर्व सगुणांचा जणू मूर्तिमंत पुतळा आहे. मदनानेहि लाजावे असें त्याचें शरीर सर्व शुभलक्षणांनीं युक्त आहे, रेखीव आहे, सुडौल आहे, खांदे भरलेले आहेत. बाहू दीर्घ नि बलिष्ठ आहेत. छाती रुंद आहे. कपाळ भव्य आहे. तो बुद्धिमान् आहे, नीतिमान आहे, असामान्य वक्ता आहे. सर्व शास्त्राचे मर्म जाणणारा आहे, चतुर आहे. सगळ्यांच्याकडे समदृष्टी पाहणारा आहे, साधु- संत-सज्जनांनाहि हवाहवासा वाटेल असा लोकप्रियहि आहे, समुद्रासारखा गंभीर आहे. त्याचें धैर्य हिमालयासारखे उतुंग आहे. महाविष्णूप्रमाणें तो पराक्रमी आहे. चंद्राप्रमाणें आल्हाद देणारा आहे. पृथ्वीसारखा क्षमाशील आहे. संतापला म्हणजे प्रलयकाळचा अग्नि वाटावा असा तेजस्वी आहे. कुबेरासारखा वैभवसंपन्न आहे. प्रजावत्सल आहे. त्याचें आचरण अत्यंत पवित्र आहे. ज्याला आपलें म्हणतो त्याच्या पाठीशी रक्षणाकरितां सदैव उभा असतो. वेदशास्त्रनिपुण आहे. आणि असें म्हणून नारदानी सर्व रामचरित्र थोडक्यांत सागितले वाल्मिकीनें ज्या ज्या गुणांची अपेक्षा केली त्याहिपेक्षां अधिक गुण नारदांनी वर्णन केले. प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होऊन बोलते आहे असें तें सर्व वर्णन अत्यंत श्रुतिमनोहर आहे. समर्थ म्हणतात, माझा प्रभु राम सर्व सगुणांनी युक्त आहे. त्याचे हें स्वरूप असामान्य आहे. नारदासारखे देवर्षि किंवा महर्षि वाल्मिकीसारखे प्रतिभासंपन्न कवि रामाच्या या गुणसंपदेला मोहित झाले यांत आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे ! देवाधिदेव भगवान शंकर आणि त्रिलोकजननी महासति पार्वतीहि रामचंद्रांचें स्मरण करण्यांत धन्यता मानतात. या विषया त त्या पतिपत्नींचेंहि एकमत आहे. असा रामचंद्र भक्तांचा अभिमानी आहे. तो भक्तांची कधींहि उपेक्षा करणार नाहीं.
अहल्या शिळा राघवे मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णितां सीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥
अहिल्येच्या हातून घडलेल्या व्यभिचारदोषामुळें संतापलेल्या गौतमाने तिला शाप दिला होता आणि ती एका निबिड, निर्जन अरण्यामध्यें शिळा होऊन पडली होती. प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणा मध्ये शिळा होऊन पडल्याचा उल्लेख नाही पण इतरत्र अनेक ठिकाणीं अनेकांनी अहल्या शिळा होऊन पडली होती असेंच गृहीत धरले आहे. आणि सर्व संतानी त्याचाच अनुवाद केला आहे. संशोधन या विषयांत मला फारसा रस नाहीं. तेव्हां अहलोच्या प्रकरणी वस्तुस्थिति काय आहे त्या विषयी खोलांत शिरण्याचे कारण नाहीं. रामचंद्रांच्या कृपेने अहिल्ये चा उद्धार झाला हें सर्वमान्य आहे आणि प्रस्तुत विषयाच्या संदर्भांत आपणांस तेवढे पुरेसे आहे. व्यभिचारासारखे स्त्रीजातीला कलंक लावणारे अत्यंत घोर पातक हातून घडले असतांनाहि रामचंद्रांच्या पवित्र चरणकमलांचा स्पर्श होतांच अहल्या सर्व पातकांतून मुका झाली आणि दिव्य देह प्राप्त होऊन तिचा उद्धार झाला असे रामचंद्र पतितपावन आहेत.
परब्रह्म स्वरूप असलेल्या या रामचंद्राचें वर्णन करतांना वेदांचें सामर्थ्यहि तोटके ठरलें. गुणवर्णन यथार्थपणे करतां आलें नाहीं. वेद शेवटीं नेति नेति म्हणाले. स्वतः चारित्र्यसंपन्न असलेले रामचंद्र पातक्याचा तिरस्कार करून त्याला दूर ठेवीत नाहींत, उलट त्याला जवळ करतात, पातकांतून सोडवितात. उद्धाराचा मार्ग दाखवितात, उद्धरून नेतात. आपल्या भक्तांची रामचंद्र कधींहि उपेक्षा करीत नाहीत.
[ Use Right click for download ]
वसे मेरुमांदार हे सूष्टिलीळा । शशी सूर्य तारांगणे मेघमाळा ॥
चिरंजीव केले जनी दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥
रामचंद्रानें आपले दोन भक्त, हनुमंत आणि बिभीषण यांना चिरंजीव केले आहे. जोंवर पृथ्वीतलावर मेरुमांदार हे पर्वतराज स्थिरपणानें टिकून आहेत आणि जोंवर आकाशामध्ये चंद्र, सूर्य, महनक्षत्रे आणि जलवर्षाव करणाऱ्या मेघांचा समुदाय अस्तित्वांत आहे, म्हणजे एकूण या सर्व सुष्टीचे व्यापार जोंवर होत राहणार आहेत तोवर बिभीषण आणि मारुती रामभक्ति करीत राहणार आहेत. चिरंजीव शब्दांतील चिर पदानें एवढा कल्पनातीत दीर्घकाळ अपेक्षित आहे. आणि हा केवळ आशीर्वाद नाहीं. नाहीं तर आपल्याइकडे पूर्वी शेत, गावे इत्यादि गोष्टी दान दिल्या जात असत, आणि त्या ताम्रपटावर मोठ्या गौरवाने अमक्या अमक्या राजाने अमुक अमुक व्यक्तीला ही भूमि यावचंद्रदिवाकरौ दान दिली आहे, असा उल्लेख असे. दान देणाराचे राज्य आणि दान देणाराचा वंशहि शे- दोन वर्षांपलीकडे कधी टिकला नाही. अशीं ताप्रपत्रे सांपडतांत तीं उत्खनांनामध्ये आणि त्यामुळें इतिहासांत एखाद्या ओळीची भर पडते. यापलीकडे यावच्चंद्रदिवाकरौला (जोंवर चंद्र, सूर्य आहेत तोवर ला) अर्थ नसतो पण बिभीषणाने आणि मारुतीने, दोघांनींहि, आपल्या जीवावर उदार होऊन रामचंद्रांची सेवा केली आणि रामचंद्रांनी त्यांना खरोखरीच चिरंजीवपद दिले अधिकारी उपासकांना त्यांचें साक्षात दर्शन अद्यापि होतें, असा भाविकांचा विश्वास आहे. सुष्टीचा सामान्य निसर्गक्रम गुंडाळून आपल्या भक्तांवर अशी अलौकिक कृपा करणारा रामचंद्र माझी उपेक्षा करणार नाहीं असा विश्वास प्रत्येकानें बाळगावा या हेतूनें समर्थ सांगत आहेत.
मी माझ्या भक्तांचा सर्व प्रकारचा भार वाहीन असें आश्वासन रामचंद्रांनी दिलें आहे. असा उल्लेख पुराणांत आहे, "योगक्षेमै वहाय्यह ' (भ. ९ ! २२) असें भगवंतांचे गीतेतील वचन प्रसिद्धच आहे. आणि त्यामुळें भक्तांची उपेक्षा होईल ही शक्यताच रामचंद्रांच्या ठिकाणीं संभवत नाहीं. पण माणसाला भरवसा वाटत नाहीं हे मात्र खरे. मी परमेश्वर मानतों, ईश्वरावर माझा विश्वास आहे असें मनुष्य तोंडाने कितीहि म्हणत असला तरी तो विश्वास त्याच्या वर्तनांत दिसावयास पाहिजे तसा दिसत नाहीं. परमेश्वराच्या अंतःकरणांत कृपा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, उपेक्षा मुळींच नाहीं. पण तो सर्वज्ञ आहे, न्यायी आहे, त्यामुळें मागितले तरी, काय द्यावे, किती द्यावे, केव्हां द्यावे आणि कोणाला द्यावे, कसें द्यावे हा विचार वात्सल्यापोटींच ईश्वराला करावा लागतो.
वत्सल कुटुंबांतहि याची उदाहरणे आपण पाहतों ना ! घरांत बनवलेले खाद्य पदार्थ आईने मुलांसाठीच केलेले असतात. पण मुलांना तो भरवंसा नसतो. आई देते तेव्हां थोडे देते, आतांच देणार नाहीं म्हणून सांगते, कित्येक वेळां डबा उचलून लपवून सुद्धां ठेवते. हें सर्व ती मुलाच्या हितासाठीच करीत असते. अज्ञानी बालक मात्र मागितलेले मिळालें नाही' कीं रडून गोंधळ करतात; मग कित्येकवेळां आई त्यांना मारते सुद्धां. पण या सर्व वेळीं ती वत्सल माताच असते. सर्वज्ञ परमेश्वराचेंहि तसेंच आहे. माणसाला अज्ञानामुळें, तो भरवंसा येत नाहीं आणि मग त्याची निष्ठा चंचल होते, विश्वास डळमळतो. तो आपल्या खुळ्या कल्पनेप्रमाणें श्रद्धेसाठी निरनिराळे आधार शोधतो. स्वतःला पटणारे पथ्य सांगेपर्यंत निरनिराळ्या वैद्याला मी आतां काय करूं म्हणून विचारणारे रोगी मला माहीत आहेत. चिकित्सकावर विश्वास नसल्याचेच हें लक्षण आहे. परमार्थमार्गामध्यें "संशयात्मा विनश्यात ' (भ. ४४०) हा दंडक आहे. माणसे उणी ठरतात तीं श्रद्धेच्या स्थिरतेंत आणि प्रयत्नाच्या सातत्यांत. एरवी सगळे उदंड असते.
ईश्वरावर खरोखरीच श्रद्धा असती तर माणसाला प्रपंचाची काळजी वाटली नसती. आपलें कसें होणार असें भय पडलें नसतें, पण भाविक म्हणविणारीं, देवधर्म करणारी, पूजापाठ न चुकू देणारी माणसेहि, आपत्तीत शोकाकुल, दीन, कासाविसी करणारी अशीं आढळतात. विश्वास असतो पण तो कसाला उतरत नाही. समर्थ म्हणतात अरे, मी तुझा भार घेतला आहे, भक्ताचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे, असें भगवंतांचे आश्वासन आहे आणि त्याला व्यासांसारख्या थोर महात्म्याची साक्ष आहे. रामचंद्र आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाहींत असा विश्वास निश्चयाने बाळग, संशयांत पडूं नकोस.
असे हो जया अंतरीं भाव जैसा । वसे हो तया अंतरीं देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे च्यापपाणी । उपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥
मनोबोधांतील सर्व श्लोक मार्गदर्शक आहेत, चांगले आहेत, पण हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. समर्थ वर्मावर बोट ठेवून मर्माचे विचार सांगत आहेत. आतापर्यंत जणू प्राथमिक स्वरूपाचें, परमार्थमार्गाविषयीं आकर्षण निर्माण करील असें भाषण समर्थ करीत होते. पण आतां त्यांनीं अगदीं गाभ्याला हात घातला आहे. जें सत्य ते मोकळेपणानें स्पष्ट केलें आहे. समर्थ या श्लोकामध्ये जो सिद्धांत सांगत आहेत तो यथार्थ आहे; पण न रुचणारा आहे. आमचें चांगलें व्हावें, तें लौकर व्हावें अशी अपेक्षा सर्वच बाळगतात व तशी प्रार्थनाहि करतात. समर्थ म्हणतात-तुमवे चांगलें निश्चित होईल. पण केव्हां ? तर तुम्हीं चांगले व्हाल तेव्हां. ही मोठी पंचाईत आहे. आम्ही तोंडाने म्हणत असलो तरी आमची अपेक्षा अशी असते की आम्ही कसेंहि असूं कसेंहि वागूं परमेश्वरानें मात्र आमच्यावर कृपाच केली पाहिजे. तसें न घडल्यास आम्हीं परमेश्वरावर रागावणार, पूजापाठ सोडून देणार किंवा ईश्वर म्हणून कोणी नाहीं, आतापर्यंत उगीच फसलो असें मानणार.
माणसाने एक लक्षांत ठेवले पाहिजे. आपण करतो ते देवधर्म, पूजापाठ, व्रतें, साधने आपल्या स्वतःसाठी असतात. स्वतःच्या देहाच्या, मनाच्या, कार्यक्षमतेसाठीं, इच्छाच्या संयमासाठी वा मुक्ततेसाठी या साधनांचा उपयोग व्हावयाचा असतो. ईश्वरावर उपकार होण्यासाठी या गोष्टी करावयाच्या नसतात. ईश्वराचें त्यावाचून कांहींहि अडत नाहीं ! ईश्वर दयाळू आहे हें निश्चित. पण तितकाच तो न्यायी आहे हेहि विसरून चालणार नाहीं. तो सर्वशक्तिमान आहे. तसाच सर्वज्ञहि आहे. ईश्वरा वरच्या रागाने आपण साधने सोडली तर त्यांत आपलीच हानी आहे. आम्ही नास्तिक झालो तर त्यांत आमचेच अकल्याण आहे. यासाठी समर्थानी, शास्त्रकारांनी, संतानी ईश्वर केव्हां कोणावर प्रसन्न होतो तें निश्चयानें सांगितलें आहे. ' थये यथा मां प्रपद्यने तास्तथैव भजाय्यहम्" (भ. ४ ! १०) अशी ईश्वराचीच प्रतिज्ञा आहे. " भावेन देवः " भाव तसा देव असा शास्त्राचा सिद्धांतच आहे. इतकेंच नव्हे तर भाव तोचि देव असेंहि म्हटलें जाते.
वीज कार्यक्षम असली तरी, आपली तार जर ढिली पडली असेल तर दिवा लागणार नाहीं, पंखा फिरणार नाहीं, यंत्र चालणार नाहीं. ईश्वरी प्रसादाचे तसेंच होते. म्हणून समर्थ म्हणतात-तुमच्या अंतःकरणांतील भाव जसा असेल तसा ईश्वर तुमच्यासाठी होईल. तुम्हीं तोंडाने काय म्हणतां हें महत्त्वाचे नाहीं. आदरणीय सोनूमामा दांडेकर एक उदाहरण सांगत असत. देवाला जाणारा एक गृहस्थ बिडी पीत जायचा आणि मूर्तीपुढे आला कीं बिडीचा हात पाठीमागे करून नमस्कार करायचा. या वर्तनाला ईश्वराविषयीचा आदरभाव म्हणतां येईल कां ? याच्या उलट एक उर्दू कविता आहे. एक दारूडा दारू वाटणाऱ्या साकीला म्हणतो-मी आतां मशिदींत असलो म्हणून काय झालें ! इथेंहि मला दारू दे नाहीतर दारू पिण्यासाठी जिथे ईश्वर नाहीं अशी जागा दाखव. आतां ही ईश्वराच्या व्यापकतेवरची श्रद्धा म्हणावयाची काय ? अशा माणसाला दारू मागितली कीं गोमूत्र पाजले पाहिजे आणि सांगितलें पाहिजे कीं ईश्वर सर्वत्र असल्यानें तो जसा दारूत तसा गोमूत्रांतहि आहे, म्हणून दोन्ही एकच. पी गोमूत्र. ही' अशी व्यापकता मानणे मात्र चालणार नाहीं. भाव कसा शुद्ध नसतो हें यावरून लक्षांत येईल.
आपली जितकी व जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणांत व तितका देव आपल्याजवळ असतो. नुसत्या भाषणाने आणि विचाराने कार्ये होत नसतात. त्या सर्व ठिकाणीं भाव हा महत्त्वाचा आहे. लाटा वेगवेगळ्या आकाराच्या लहान मोठ्या कशाहि असल्या तरी पाणी एकरूपच असतें. शुद्ध, सात्त्विक, निष्ठावंत भाव हें गंगाजल आहे. बाह्य साधना, उपचार उपासना, ह्या तरंगासारख्याा आहेत. भावाने माणसाची घडण कळते. बाह्योपचार हे दांभिकहि असूं शकतात.
देवाचे कांहीं करावेसे वाटतें यामागे पुष्कळदां एक प्रकारची मनोरंजनाची, करमणूकीची भावना असते. वेळ घालविण्याचें तें एक पर्यायी साधनहि असूं शकते. त्यांत कधी गतानुगतिकता असते, कधीं भय असतें, कधी व्यापारीवृत्ति असते. अकरणातू मंदकरणं श्रेयः या न्यायानें तें स्वागतार्ह मानलें तरी परमार्थाच्या मूलभूत उद्देशाच्या दृष्टीनें तेवढे पुरेसे होत नाहीं. खऱ्या महत्त्वाचें वा उपयुक्त ठरत नाहीं हेहि प्रामाणिक साधकाने लक्षांत ठेवलेच पाहिजे. कधींहि कीर्तनाला न येणारे एक सदगृहस्थ एकदां कीर्तनाला उपस्थित होते. पूर्वीचा परिचय असल्यानें कीर्तनकाराला आश्चर्य वाटले. त्यानें विचारले, अहो ! तुम्हीं इकडे कसे ! गृहस्थ म्हणाला, चित्रपट पहायला म्हणून गेलो होतो; तर काय , पण काळी तिकिटेंहि मिळाली नाहींत. तेव्हां म्हटलें चला ! कीर्तनालाच जाऊं; वाटेवरच होतें म्हणून आलो. कीर्तनश्रवणामागची ही भावना स्पृहणीय नाहीं. ज्या भावनेने मनुष्य माथेरान, नैनिताल, उटकमंड या निसर्गरम्य ठिकाणीं जातो, त्याच भावनेने जर बदरीकेदार, बदरीनारायण, गंगोत्री, पंढरपूर, व्यंकटेशगिरी, रामेश्वर या तीर्थक्षेत्रींहि गेला तर त्याचा लाभ काय आणि किती ? पत्ते खेळणे आणि पूजा करणे हें एकाच हेतूनें करून कसें चालेल ?
दुचाकीवरून जाणारा मनुष्य जसा स्वतःचा तोल सांभाळतो, तसा प्रपंचामध्ये परमार्थ सांभाळला पाहिजे. परमार्थामध्ये अनन्यभाव लागतो, म्हणतात तो हाच. दुचाकीवरून जातांना मनुष्य पायडल मारण्याव्यतिरिक्त किंवा मुठीचे दांडे नियंत्रित करून दिशा ठरविण्याव्यतिरिक्त काही करीतच नाहीं असें नाही पण तें सर्व इतर करणें तोल राखण्यात व्यत्यय येणार नाहीं इतक्या बेतानेच केलें जातें. आपण जणू संसार सांभाळण्यासाठी परमार्थ करीत असतो आणि तोंडाने मात्र ' अन्यथा शरण नास्ति त्वमेव शरणं मम' हा मंत्र घोकीत असतो आतां 'तस्मातू कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरे हा अनुभव आला नाहीं तर तो दोष कोणाचा ? परमार्थहि आपण देवाणघेवाणीनें करतो. एक व्यापार या भावनेने करतो. नवसाच्या रूपानें केला जाणारा देवधर्म बहुधा याच प्रकारचा असतो. रोग बरा होण्यासाठी रोग-चिकित्सक आणि औषधे यावर होणारा खर्च आणि नवस फेडीसाठी केलेली व्रतें यांचा हिशोब तपासावा म्हणजे मला काय म्हणावयाचे आहे तें लक्षांत येईल. पोथी वाचण्याचे आणि स्तोत्र म्हणण्याचे नवस तर याहीपेक्षां स्वस्तांतले आहेत. पोथी वाचली, स्तोत्र म्हटलें कीं हा सुटला. ही कांहीं अनन्यता नाहीं. हेहि लागते पण ती फारच प्राथमिक अवस्था आहे. यांतहि कांहीं मंत्रशास्त्र आहे आणि या तंत्रमंत्रांचीहि कांहीं फळें आहेत. पण हा परमार्थ नाहीं आणि त्यांत माणसाची उन्नतीहि नाहीं. फलश्रुती लक्षांत घेऊन देवधर्म करणें ही परमार्थाची फारच प्राथमिक अवस्था आहे. त्याला शिक्षण क्षेत्रांतील शिशुवर्गाची उपमा दिली पाहिजे. यासाठीं साधकाने जपले पाहिजे ते भावाला, निष्ठेला, त्या त्यागाला आणि सातत्याला रामचंद्रांनी बिभीषणावर व मारुतीवर कृपा केली. दोघेहि रामाचे भक्त. त्यांची सातत्यातही सामान्य नव्हे. पण पारमार्थिक दृष्ट्या जें मारुतीला मिळालें तें बिभीषणाला मिळालें नाहीं. असें सांगतात कीं लंकेहून परत आल्यानंतर भगवान् रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळीं लेकेवर विजय मिळविण्यासाठी ज्यांचें ज्यांचें सहाय्य घडले त्या सर्वांना पारितोषिके वाटण्यांत आली. कोणाला महावस्त्र, दिलें, कोणाला मुकुट दिले, कोणाला रत्नहार दिले, कोणाला रथासारखी वाहने दिली. सुमीच, बिभीषण, अंगद, नलनील, जांबुवंत यांच्यासारख्यांचें विशेष सत्कार झाले. कांहीं दिले नाहीं ते केवळ मारुतीला. तें सीतेच्या लक्षांत आलें आणि ती म्हणाली, हें हो काय ? ज्यांनी अगदीं किरकोळ कामे केली वा केल्यासारखे दाखविले त्यांनाही तुम्हीं आठवणीने पारितोषिके दिलींत, आणि ज्यानें सगळ्यांत जास्त कष्ट घेतले त्या मारुतीला मात्र अगदीं विसरलात, काय म्हणावें आता ! रामचंद्र गंभीरपणे शांतच राहिले. सीतेने पुन्हा विचारल्यावर भारावलेल्या शब्दाने म्हणाले, सीते ! मारुतीने खरेंच माझ्या करिता फार केलें पण त्याच्या ऋणांतून मोकळे होण्याकरिता त्याला देण्यासारखे माझ्याजवळ कांहीं नाहीं. सीता म्हणाली-मी देते. माझा आईने मला, ज्यातील एकेक रत्न पृथ्वीमोलाचे आहे असा रत्नहार दिला आहे तो देते मारुतीला. ठीक आहे, तुझी इच्छा ! दे. सीतेने मारुतीला हाक मारली व त्याचा गौरव करून पारितोषिक म्हणून रत्नहार दिला. तो रत्नहार घेऊन मारुतीने समोरच्या उद्यानातील एका वृक्षावर उडी मारली, आणि मोठ्या कुतुहलाने तो रत्नहार व त्यांतील रत्ने उलटीसुलटी करून निरखून पाहिली आणि अपेक्षाभंग झाल्यासारखी मुद्रा करून हारांतून एकेक रत्न तोडून काढलें, दाताखाली दाबून त्याचे तुकडे केले, ते तुकडे हातावर घेऊन निरखून तुच्छेतेने फेकून दिले. सीतेला या कृतीचा फार राग आला. ती भरसभेत मारुतीला टाकून बोलली. तेव्हा मारुतीराय नप्रपणानें म्हणाले, मातुः श्री, मला रत्नहाराचें भूषण नाहीं. सुंदर दिसणाऱ्या आणि बहुमोल मानल्या जाणाऱ्या या रत्नांमध्ये राम नाही मग काय उपयोग त्यांचा मला ? म्हणून फोडून पाहिली, निश्चिति करून घेतली व टाकून दिली. सर्वांना हा अडाणीपणाच वाटला.
सीता रागावलेलीच होती. ती म्हणाली- रत्नांत राम हुडकतोस, तुझ्यांत तरी आहे कां ? तेव्हां मारुतीने आपलें विशाल वक्षःस्थल आपल्याच हाताच्या तीस नखांनी फाडले सर्व सभा आश्चर्यचकित होऊन पहात होती. मारुतीरायांच्या हदटासिंहासनावर भगवातू रामचंद्रांची शामसुंदर मूर्त विराजमान होती. तें दृश्य पाहिले आणि बिभीषण खिन्न झाले. त्यांना वाटले, माझा सन्मान झाला. मला पारितोषिकें मिळाली. राज्य माझ्या स्वाधीन करून मला तिथला अधिपति बनवले. पण रामचंद्रांनी मारुतीला जें दिलें तसें काहीं मला दिलें नाहीं. त्यानें आपली ही तळमळ वसिष्ठांच्यापुढें व्यक्त केली. तेव्हां वसिष्ठ म्हणाले, बिभीषणा, रामचंद्रांना शरण येतांना तू म्हणालास-त्यक्का दारांश्च पुत्रांश्च त्वामहं शरणं गतः । रामचंद्रांनी तुझी शरणागति याच मापाने मोजली. जसा भाव तसा देव. शरणागतींतहि वासनांचा अंश सूक्ष्मपणानें राहिलेला असतो, राहूं शकतो. खऱ्या अनन्यतेला तोहि सोसत नाहीं.
ज्या अपराधाकरितां रेणुकेला जमदग्नीने शिरच्छेदाची शिक्षा ठोठावली त्या अपराधाचे स्वरूप तरी काय होते ! आपण त्या अपराधाला अपराध म्हणणें, पाप म्हणणें, हेहि घोर पातक ठरेल इतका तो अपराध अगदी नगण्य होता. रेणुकेला वाटलें तसें वाटणे हेंच सज्जन माणसाच्या दृष्टीनेहि अगदीं स्वाभाविक होतें. तरी जमदग्नीने तिला क्षमा केली नाहीं आणि रेणुकेनेहि ती मागितली नाहीं. तिने शिक्षा संतोषानें स्वीकारली म्हणूनच ती जगदंबा ठरली. देवता म्हणून वंदनीय झाली. आमच्या संवेदना, वासनांच्या संघर्षा मध्ये बोथट होऊन गेलेल्या असतात. त्यांना ही सूक्ष्मता जाणून घेण्याचें सामर्थ्यच उरले नसतें. पण भगवंत अलिप्त आहे, साक्षी आहे, तटस्थ आहे. त्यामुळें त्याची संवेदना फार तीक्ष्ण आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म भेदहि त्याच्या लक्षांत येतो. कांहीं माणसे भोजनचतुर, शब्द चतुर असतात असें म्हणतात. भगवंत तसे भावचतुर आहेत. त्यामुळें कसोटीला शतप्रतिशत उतरणारी अनन्यता असल्यावांचून अपेक्षित कृपा कशी प्राप्त होणार ! धंद्यांत मुरलेला सावकार दागिना कितीहि सुंदर असला तरी डाग लावलेल्या लाख सोन्याला बावनकशी सोन्याचें मूल्य कधीं देतो काय ?
आपण आपल्या सोयीकरतां योगक्षेमं वहाम्यहम ही भगवंताची प्रतिज्ञा लक्षांत ठेवतो. हा श्लोकाचा चौथा चरण आहे. पहिल्या तीन चरणांत कोणाचा योगक्षेम वाहतो त्याचें वर्णन आहे. जो ईश्वराचें अनन्यभावानें चिंतन करतो (अनन्या स चिंतोतोंय मां), सर्व प्रकाराने सेवा करतो (पर्युपासते) आणि ज्याचें अंतःकरण ईश्वराशी निरंतर संलग्न असते (नित्याभियुक्ताना) त्याचा योगक्षेम ईश्वर वाहतो असें गीता सांगते. या तीन चरणांतल्या कसोटीला कोणी उतरतो कां ? श्रीएकनाथ महाराजांनी सद्गुरूची सेवा करीत असतांना गुरुगृही राहून निष्ठेने सर्व प्रकारची सेवा केली. गुरुकडून केली जाणारी उपेक्षा आणि गुरुच्या तापटपणाचे आघात दीर्घकाळ सोसले. पैची एक चूक झाली होती तर ती सुधारण्यासाठी रात्रभर जाग्रण केलें तेव्हां गुरूची कृपा झाली. आपण कसें वागतो याचा आपण कधीं विचार करतो काय ? गुरूने क्षमाशीलच असलें पाहिजे असा आग्रह आपण सोयीकरतां धरीत असतो आणि आम्ही मात्र, जाऊं द्या कीं, केलें हें काय थोडे आहे, आम्हीही पुष्कळ करतो, एवढ्या तेवढ्याने काय बिघडते, आम्हीं आपली सामान्य माणसं, आम्हीं कोठे ज्ञानेश्वर, तुकाराम लागून गेलोंत असें बोलून माणूस स्वतःला व दुसऱ्यालाहि फसवीत असतो.
परमार्थात राजकारणी पुरुषाचे सत्य चालत नाहीं आणि व्यवहारांत सत्य काय तें स्पष्टपणें बोलतां येत नाहीं. बोलल्यास ऐकणाराला तें वाईट लागते त्यामुळे कटुता येते. संबंध दुरावतात, तुटतात सुद्धां. ज्याच्याविषयी आदर बाळगून, पायांवर डोके ठेवून नमस्कार करतात त्याचेंहि स्पष्ट बोलणें रुचत नाहीं. हा मनुष्य सांगतो आहे तेव्हां स्वतः सुधारले पाहिजे असे वाटत नाहीं. आले मोठे सांगणारे असेंच वाटतें. त्या बोलण्याला स्वार्थी हेतू सुद्धां चिकटविले जातात. कीर्तन-प्रवचनांत सामान्यपणे बोलतांना जितके स्पष्ट बोलतां येते, तितके प्रत्यक्ष व्यवहारांत वैयक्तिक संबंधांत बोलतां येत नाहीं. पण ही भीड बाळगण्याचें समर्थाना कांहीं कारण नाहीं. ते स्पष्टपणें सांगतात की जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव. तुम्हीं अनन्य झालांत कीं परमेश्वर तुमचे रक्षण करतोच करतो. रक्षण झालें नाहीं तर अनन्यता साधली नाहीं असें निश्चित समजायचे . माणसाच्या अंतःकरणावर अनेक प्रकारच्या वासना-संस्कारांचीं पुटे असतात. कथी काम असतो, कधीं क्रोध असतो, कधीं मत्सर असतो, कधीं मद असतो, आणि त्यामुळें अनन्यता साधत नाही. इच्छा असूनहि साधत नाहीं. साधना करावी लागते ती त्यासाठींच. समर्थांनी २०५ श्लोकांतून तोच मार्ग अनेक प्रकारांनीं पटवून दिला आहे.
सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
परमेश्वराचे स्वरूप हे भक्ताकरितां सगुण साकार होत असलें तरी वस्तुतः तें सर्व व्यापक आहे. "मया ततमिद सर्व जगदव्यक्तमूर्तिना" (भ. ९४ असें गीता सांगते तें या दृष्टीनेंच. आणि तो प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयातही वास करतो असें शास्त्र सांगते. तेव्हां भक्तावर आलेले संकट ईश्वराला आधीं कळावे लागतें आणि तें नाहींसें करण्याकरितां तो दुरून कुठून तरी धावून येतो असें समजणें हें अज्ञानाचें लक्षण आहे. ईश्वर जवळच आहे तर मग सकटे येतांतच कां आणि आली तरी ती लगेच नष्ट होत कशी नाहींत, असा प्रश्न सश्रद्ध म्हणविणारीं माणसेंहि विचारतात. समर्थ त्यांना या श्लोकांत उत्तर देत आहेत. समर्थ म्हणतात, परमेश्वर सर्वव्यापक असल्याने तो सदा सर्वदा प्रत्येक माणसाच्या जवळ आहेच आणि तो जें देतो तें कांहीं तरी क्षुद्र वा सामान्य असें नसतें. ज्यांत दुःखाचा लवलेशहि नाहीं अशा निरतिशय सुखानें भरलेला जो मोक्ष, केवळ आनंद हेंच ज्याचें स्वरूप आहे असा मोक्ष, भगवान् भक्तांना देत असतो आणि असा बहुमोल ठेवा सांभाळण्याची पात्रता आहे कीं नाहीं हे पाहण्यासाठी देव साधकाची परीक्षा पाहत असतो.
या परीक्षा पाहण्यालाच आपण संकट समजतो आणि म्हणून त्याला आपण कंटाळतो . उनाड विद्यार्थ्याला जसें परीक्षा हें संकट वाटतें आणि मग त्याचें डोके दुखू लागतें तसेच आपलें होते. परीक्षकाला आपण दुष्ट समजतो, आणि म्हणून आपली भाषा 'उत्तीर्ण (पास) झालो' आणि ' अनुत्तीर्ण (नापास) केलें' अशी असतें. आपणच स्थानकावर उशीरा गेलों असें म्हणत नाहीं, गाडी चुकली असें म्हणतो. दोष आपला नाहीं, परिस्थितीचा आहे असें मानणे आपल्या सोयीचे असतें. खरा निष्ठावंत साधक हा संकटाने कधी डगमगतच नाहीं. "तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हांसी ॥ " अशी असिष्ठरु तुकाराम महाराजांप्रमाणे किंवा "बिपदः सलू नः शलतू" अशी माता कुंतीप्रमाणें आपणाला विचित्र वाटणारी मागणी त्याची असते.
प्रगति केव्हां होते, कशी होते, एखादी हवी वाटणारी वस्तु किंवा विद्या कशी मिळते ? हें आपण जर नीट लक्षात घेतलें तर कृपाळूपणें अल्पधारिष्ट पाहे या वचनाची यथार्थता समजेल. पोहायला शिकजिणारा शिक्षक आणि लेकराला चालायला शिकविणारी आई यांना कुणी दुष्ट, कठोर अशी विशेष लावील काय ? शिक्षक नको नको म्हणत असतांना पाण्यांत खेचतो, आधाराचा हात अचानक न कळत काढून घेतो त्यावेळी नाका-तोडात पाणी जाऊन जीव घाबरा होतो आणि मनुष्य घाबरला कीं नाका-तोंडात हटकून पाणी जातें आणि असें झाल्याशिवाय पोहायला कधीं येत नाहीं. पडल्याशिवाय कोणत्याहि मुलाला कधींहि चालता आले नाहीं. कित्येक वेळां पडल्यामुळे रडू येईल इतकेंहि लागतें. कांहीं मुले, पडूं या कल्पनेने, आधींच रडतात आणि तरी समोर उभी असलेली शहाणी आई त्या पडण्या-रडण्याची अगदीं उपेक्षा करते, हासत उभी राहते. आतां आईला मुलाचे प्रेम नाहीं असें म्हणणार कां ? दुचाकीवर बसायला शिकावयाचे म्हणजे हातपाय खरचटून घेण्याची सिद्धता ठेवावीच लागते. कधी' कधीं गुडघे फुटतात. डोक्याला खोकहि पडते. शस्त्राचा शस्त्रपणा त्याच्या तीस धारेत आहे.
आणि धार लावण्याकरितां सहाणेवर घासून घ्यावें लागतें. हिमालयांतील तीर्थयात्रेचा आनंद मिळावयाचा म्हणजे थंडी सोसावी लागते. विलक्षण चढउताराच्या रस्त्यानें पायांत गोळे येईपर्यंत आणि गुडघे ठणकेपर्टीत चालावेच लागते. यांतील प्रत्येक गोष्ट ही कष्ट देणारीच आहे. तें संकट म्हणून त्याची भीति बाळगली तर प्रगतीला मुकावे लागतें. कष्टाशिवाय शरीराची कार्यक्षमता वाढत नाहीं आणि कष्ट कधींहि सुखावह नसतात. म्हणून संकटांमद्धो उपेक्षा होते असें वाटलें तरी कृपाळू परमेश्वर हिताकरिता तसें करीत असतो हें साधकाने लक्षांत ठेवले पाहिजे.
धैर्य, वृति, निष्ठा, तितिक्षा या गुणांची परमार्थासाठी नितांत आवश्यकता आहे आणि या गुणांची कसोटी संकटाविना, प्रतिकूल परिस्थितिविना लागत नाहीं. स्वस्थे को बा न पंडितः ! अशी स्थिति सगळ्यांचीच असते. पण त्याचा कांहीं उपयोग नाही. आईला जसें मुलाचे भित्रेपण, दुबळेंपण सहन होत नाहीं तसें परमेश्वरालाहि सहन होत नाहीं. आणि म्हणून प्रारव्यादि कारणानी जेव्हां साथकाभोंवती प्रतिकूल परिस्थिति निर्माण होते तेव्हां शिक्षणाची ही संधी प्राप्त झाली आहे या भावनेने तो साधकाच्या सहाय्याला लगेच धांवत नाहीं. भावनांना उत्कटता आपत्तीत जशी येते तशी सर्व अनुकूल असतांना येत नाहीं. आपत्ति ही कांहीं वेगळीच स्थिति आहे असें मानले तर मग यच्चकिंचितू जगातून सर्व दृश्यते श्रूचतेऽपि या । अंतबहिश्च तत् सर्व व्याण्य नारायणः स्थितः । हें उपनिषष्ठाक्य व्यर्थ होईल. माणसाची श्रद्धा किती पोकळ असते, स्वार्थी असते, याची' उदाहरणे पुष्कळ वेळां दिसून येतात. संकट आले म्हणजे आमचें सुख देवाला पाहवलें नाही, असें लोक बोलतात. जणू कांहीं याच्या सुखाचा देवाला मत्सर वाटला आहे. कारखानदारांचे वैभव पाहून कारकुनांनी जळफळावें अशी कां देवाची स्थिति असते ? तो षडगुणैअधर्मसंपत्र आहे, लक्ष्मीपति आहे, सच्चिदानंदस्वरूप आहे. त्याला कोणाचा हेवा वाटण्याचे कारणच काय ? माणूस ही कुकल्पना करतो तेव्हां देवाचे काहीच बिघडत नाही पण यावरून माणसाची पातळी कोणती हें समजते.
खरे म्हणजे साधकाने प्रत्येक आपत्ति हा एक नवा धडा आहे असें मानलें पाहिजे. त्यामुळें क्वचित् शरीराला थोडे कष्ट होतील पण त्यामुळें मनाची प्रसन्नता आणि बुद्धीची विवेकशक्ति चढतीवाढती राहील आणि तसें राहण्यात फार आनंद आहे. थोडेसे मनाविरुद्ध घडले कीं माणसे क्षुब्ध होतात. त्यांचें डोक गरगरतें, अंग थरकांपर्ते, कांहीं सुचत नाहीं, कोठे लक्ष लागत नाहीं, संताप अनावर होतो. हे असें काय कामाचे ? कोणत्याहि परिस्थितींत मन शांत राहिलें, बुद्धि स्थिर राहिली, तरच बाहेर पडण्याचा मार्ग दिसूहि शकतो व त्या वाटेने जातांहि येते.
मनःशांति टिकणें हे परमेश्वराच्या दृढ श्रद्धेचे फळ आहे. सुदामदेव म्हणतात,
नियती घेऊन दुःखे भारी' ।
कष्टविण्या मज येते दारी ।
परी टाकिते श्वास हताशी ।
बघून मला तव पदकमलासी ।
सुदामदेवाची ही जी भावना आहे ती साधण्याचा अभ्यास साधकाने केला पाहिजे. संकटाच्या वेळीच धीर सुटू देतां कामा नये. आपण तूप, तेल, पाणी सांठविण्यासाठीं भाडे घेत, तें फुटके नाहीं असें निश्चयानें पाहतों. फुटक्या भांड्यांत भरलेले पदार्थ गळून वांद्या जातात. मोक्षासारखे असामान्य आनंदवैभव ज्यास घ्याक्याचे आहे त्याचें अंतःकरण तें धारण करण्यास पात्र नको काय ? तिजोरी विश्वासू माणसाच्या हातांत सोपवावयाची असते. चोराच्या नाहीं. महत्त्वाची कामे वेंधळ्या माणसावर सोपविली की कार्यनाश झालाच. शहाणी माणसे तें करीत नाहींत. तीं आधीं परीक्षा पाहतात. परमेश्वर तसेंच करतो. ज्या अंतःकरणामर्धे परमार्थ सांठवावटााचा आहे त्या अंतःकरणाला अहंकार, काम, क्रोध, मत्सर यांची छिद्रे असतां कामा नयेत. परमार्थ ही वस्तु फार सूक्ष्म आहे. नको त्या विकाराचे बारीकसेंहि छिद्र परमार्थाला साठू देत नाहीं. छिद्रें बुजविण्यासाठी भाडे तापवावें लागतें, ठोकावे लागतें, त्याला डाग द्यावे लागतात किंवा रोंगणहि भरावे लागतें. व्रतें, वैकल्ये, पूजा, पाठ हें डाग दे वा रोंगण भरण्यासारखे आहे. डाग देण्यासाठीं सुद्धां पुन्हा तापवावे लागतेंच. सकटे, आपत्ति, प्रतिकूल परिस्थिति हें तापविणे, ठोके मारणे यासारखे आहे. तेव्हां साधकाने दृढ श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. परमेश्वर भक्तवत्सल आहे, कृपाळू आहे, सर्वव्यापक असल्यानें सदा सर्वदा पाठीशी उभाच आहे, अशा निश्चयानें वागावे. आपत्तीमध्यें सहाय्य लाभले तर ती परमेश्वराची कृपाच समजावी; न च लाभले तर ही आपली कठोर परीक्षा घेतली जात आहे, यांत पहिल्या क्रमांकानें उत्तीर्ण झालें पाहिजे म्हणजे चांगलें पद मिळविण्यासाठी आपण पात्र ठरूं या निष्ठेने विवेकाने जागाचे, धैर्याने वागावे. योग्य ते प्रयत्न न कंटाळता, न खचता करीत राहावे. साधकाने खरोखरीच अहर्निश ज्याचा जप करीत राहावा असा हा श्लोक आहे.
[ Use Right click for download ]
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामी तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥
भक्ताचा रक्षणासाठी देवहि उत्सुक असतो असें समर्थ कविसंकेताच्या आघाराने दिलेल्या उपमेने सांगत आहेत. चक्रवाक नांवाचा काव्यामधे वारंवार उल्लेखिला जाणारा एक पक्षी आहे. पाण्याच्या आश्रयानें राहणारा हा पक्षी रात्रीच्या वेळीं भेटीसाठी चक्रवाकीला उत्कंठेने साद घालतो. पलीकडच्या तीराहून ती प्रियकराच्या भेटीसाठी या तीरावर येते. तोवर मीलनासाठी आतुर झालेला चक्रवाक झेप घेऊन त्या तीरावर गेलेला असतो. प्रत्येकवेळी उभटाताचे तसेंच होते. उत्कट प्रेमाच्या ओढीने भेटीसाठी थोडा वेळ वाट पहावी एवढा धीर कोणालाच नसतो. रात्रीच्या अंधारांत त्यांना नीट दिसतहि नाहीं. आणि त्यामुळें रात्रभर इकडून तिकडे हेलपाटे घालूनहि दोघांची भेट घडत नाहीं. प्रत्येकवेळी वाढत्या विरहदुःखाने तें चक्रवाकयुगुल आर्त आक्रंदन करीत राहते. तेवढ्यांत सूयोंदय होतो आणि त्या सूर्याच्या कोमल सुवर्ण किरणांच्या प्रकाशांत परस्परांचें मधुर मीलन होतें. दुःख नाहीसें होते आणि आनंद उसळतो.
या कविसंकेतांतील सूर्य उगवणें आणि दुःख दूर होणे ही घटना तेवढी स्वीकारून समर्थ म्हणतात-चक्रवाकाला सुख देण्यासाठी सूर्याने धावून यावे तसा संकटाने गांजलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर धावून येतो. कारण परमेश्वर हा जीवाचा स्वामी आहे, रक्षक आहे, पालक आहे. भक्ताच्या रक्षणासाठी धावून येणे हें त्याचें कर्तव्य आहे. त्याचेवरील तें दायित्व आहे. पुराणकथांतून, इतिहासांतून आणि संतांच्या जीवनांतून या प्रकारची उदाहरणे कितीतरी आहेत. गजेंद्रमोक्ष ही पुराणकथा, द्रौपदीच्या रक्षणाचा भारतातील प्रसंग, संत सखू जनाबाई, दामाजीपंतांची साध्वी पत्नी यांच्या हाकेसरशी परमेश्वराने थांबून येणे, या सर्व कथा साधकास आश्वासन देणाऱ्याच आहेत. पण त्यासाठीं साधकाने काय करावें ? त्याचें उत्तर समर्थ निराळ्या प्रकाराने "हरीभक्तीचा घाव गाजे निशाणी" या चरणामध्ये देत आहेत. परमेश्वर उपेक्षा करीत नाहीं हे खरें, पण तो आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाहीं आणि भक्त होण्यासाठी भक्ति केली पाहिजे. तोच आदेश समर्थ या चरणांतून देत आहेत.
तात्पर्य एकच असलें तरी या ओळींचा अर्थ तीन प्रकारांनीं लावणे शक्य आहे. निशाण शब्दाचे तीन अर्थ आहेत. ( १) नगाऱ्यासारखे वाद्य (२) ध्वज, पताका, झेंडा, ( ३) लस. हे तिन्ही अर्थ घेऊन हा चरण लावता येईल. शब्दांना अर्थाचें ओझे होत नाहीं असा एक मार्मिक सिद्धांत श्री. विनोबाजी भावे यांनी सांगितला आहे. महात्म्यांच्या वचनाची व्यापकता लक्षांत येण्याच्या दृष्टीनें विनोबांचे हे मत विचारांत घेण्यासारखे आहे व साधकाच्या दृष्टीनें उपयुक्तहि आहे. नगारा वाजवावा त्याप्रमाणें हरिभक्ति उद्घोषाने करावी. कोणाची भीडभाड वा संकोच या कामी नसावा. लाबुनी मृदंग श्रुति टाळ घोष ही वारकरी संप्रदायामध्ये रूढ असलेली पद्धति समर्थविचाराशीं सहमत अशीच आहे. यात एक प्रकारची सामुदायिकताहि आहे. मन रमते, गोडी लागते, भाव वाढण्यासाठी सहाय्य होतें. लयबद्ध टाळ वाजू लागले, मृदंग ठेक्यांत खणखणू लागला आणि नामाचा सुस्वर गजर होऊं लागला कीं एरवी फारशी धार्मिक कृत्ये न करणारे लोकहि भारावून जातात, रोमांचित होतात. त्याचेहि डोळे आनंदाश्रूंनी भरून जातात. अंतःकरणाच्या तळाशी कुठेतरी पडून राहिलेली श्रद्धा फुंकरीचा वाऱ्याने स्फुल्लिंग चेतावा तशी व्यक्त होते. भक्तिमार्गांतील ही एक आवश्यक प्रक्रिया आहे.
हरिभक्तीचे निशाण उंच फडकत ठेवावे. त्याचें फडकणे, डोलणें गाजू दे हाहि दुसरा अर्थ. भक्तीची उत्कटता, तिच्याविषयीं असणारा अभिमान हे भाव या अर्थांतून सुचविले जातात. साधकाला हरिभक्तीचे भूषण अभिमानाने मिरवता आलें पाहिजे आणि भक्तीची पातळी नेहमीचं राखली पाहिजे हेहि यावरून समजून घ्या आपणहि उद्धरून जावे आणि इतरांनाहि मार्गदर्शन लाभावे चांगल्या गोष्टीचा प्रचारहि व्हावा हाहि उद्देश या वरील दोन्ही अर्थांतून व्यक्त होऊं शकतो.
लक्ष्य वेधासाठीं बाण फेकावा तसें पारमार्थिक उद्दिष्ट साधण्यासाठीं हरिभक्तीचा उपयोग करावा. एकाग्रता, स्थिरता, वेग या गोष्टींची सूचना या अर्थांतून मिळते. परमार्थ साधनासाठी हे तिन्ही गुण उपयुक्त आहेत हें तर सर्वमान्य होण्यासारखे आहे. दूरवरचे लक्ष्य अचूक वेधण्यासाठी, शस्त्राच्या ठिकाणी आणि शस्त्र वापरणाऱ्याच्या ठिकाणीं ससमदृष्टी अपेक्षित असतें. हाहि आशय पर्यायाने या तिसऱ्या अर्थांतून निघतो. हरिभक्ति हें परमार्थप्राप्तीचें असें समर्थ साधन आहे हाहि अर्थ साधकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
संकटाचा परिहार व्हावा. सुख लाभावे म्हणून समर्थ हा उपदेश करीत आहेत. सतत नाम घ्यावें. अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी, धीर असावा . परमेश्वर भक्तवत्सल आहे, तो उपेक्षा करीत नाहीं, असा विश्वास बाळगावा. संकटाने गांगरून जाऊ नये. हे सर्व सांगणें, पुढच्या श्लोकांतून "राघवी वस्ती कीजे ' हा जो आदेश दिला आहे, त्याच्या प्रस्तावनेसारखे आहे. सुख मिळालें पाहिजे, स्वास्थ लाभले पाहिजे असें मनापासून वाटतें ना ? तर मग परमार्था मध्ये स्थिर होणें हाच एक उपाय आहे. शरीरधारणेसाठी उपयोगी पडणारे कांहीं अंश प्रपंचांत आहेत हें निश्चित पण तेथें सुखाची अभिलाषा करणें म्हणजे कांजी पितांना अमृताचे परिणाम अपेक्षिणें आहे. वैभव, ऐश्वर्य हे सुखावह असते असें सामान्यतः मानलें जाते. कांहीं एका अंशांत आणि प्रमाणांत तें खरेंहि आहे. पण सुखाचे तेवढे प्रमाण (निराळ्या स्वरूपांत असेल पण) दोन प्रहरची ज्याला प्रांत नाही आणि ज्याच्या निवाऱ्याची बरी सोय आहे त्यालाहि मिळतें. मग ऐश्वर्याच्या मागें लागून नाना प्रकारची विवंचना लावून कां घ्यावी ? सतत एक प्रकारच्या ताणाखाली आणि भाराखाली का राहावें कीं ज्याचा परिणाम म्हणून सहज प्राप्त असलेल्या आरोग्याचाहि बळी द्यावा लागतो ? ज्यांच्याजवळ सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य आहे त्यांच्या मनःस्थितीचा आपण कधीं शोध घेत नाहीं म्हणून मोहानें त्या ऐश्वर्याविषयी आकर्षण वाटतें. खरी वस्तुस्थिति समजत गेली आणि मनुष्य विवेकी असेल तर तो ऐश्वर्य आणि वैभव नको असेंच म्हणेल. चांगल्या मार्गानें ऐश्वर्य मिळतच नाहीं आणि ऐश्वर्यामुळे सज्जनाचा अधःपात होतोच असें समजायचे कारण नाहीं. पण ऐश्वर्य ही गोष्ट प्रारब्धा धीन समजून प्रयत्नपूर्वक सन्मार्गानें चालाचे हेंच उत्तम.
इंग्रजीमध्ये एका राजासंबंधी एक गोष्ट लहानपणी वाचल्याचे आठवते. एका राजाच्या ऐश्वर्याची, सर्वंकष सत्तेची आणि विलासी जीवनाची, थोड्या खेळीमेळींत असलेल्या अधिकाऱ्यानें बरीच प्रशंसा केली. त्यावेळीं तो राजा म्हणे कांहीं बोलला नाहीं आणि एका समारंभात त्यानें आपल्या या अधिकाऱ्याला भोजनाचे आमंत्रण दिलें. समारंभ फारच ऐश्वर्यशाली आणि विलासी असा आखलेला होता. सगळीकडे थाटमाट आणि टापटीप यांची विपुलता होती, खाद्यपदार्थ विपुल होते, नृत्य-गायनासारखे रंगेल कार्यक्रम योजिले होते, पण हा अधिकारी ज्या आसनावर बसला होता त्या आसनाच्यावर थेट डोक्यावर येईल अशी तीस धारेची जड, मोठी तलवार सुतासारख्या अगदीं बारीक दोरीने टांगून ठेवलेली होती आणि ते पाहतांच या अधिकाऱ्याची त्या समारंभाची चवच संपली. समारंभ संपल्यावर राजाने विचारले-मन रमले ना ! तेव्हां तो म्हणाला-उठून गेलो असतो तर भित्रेपणाचा आरोप आला असता आणि इतराच्या उपहासाला मी पात्र झालो असतो म्हणून निरुपायानें मी समारंभात भाग घेतला. दोरी तुटून तलवार खालीं येईल आणि अंगांत घुसेल या भयानें व्याकूळ होतो. राजा म्हणाला बाबा ! आम्हीं ऐश्वर्य भोगतो असें दिसते पण आमच्या डोक्यावरची टांगती तलवार तुम्हांला दिसत नाही तेव्हां सुखाच्या कल्पनेने ऐश्वर्याच्या मागे लागण्यांत कांहीं अर्थ नाहीं. आवश्यकतांची पूर्ति व्हावी लागते. त्यांत संकोच बाळगण्यासारखे कांहीं नाहीं असें सत-सज्जनानीहि म्हटले आहे. पण त्याचा लाभ घेऊन विलासालाच आवश्यकता मानण्याची, चैनीलाच गरज समजण्याची चूक कोणी करूं नये. जगा मध्ये तीनच लोक सुखी असतात. वेडे, निर्लज्ज आणि हरिभक्त. यातील पहिल्या दोन गोष्टी चांगल्या नाहींत. वेड्याचे स्थान रुग्णालयांत. दुसऱ्याने हवे तर राजकारणांत पडावे. हे दोन्ही मार्ग भल्या माणसाचे नव्हेत. त्याला सुखासाठी करतां येण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे, 'हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी', ही. या मार्गानें जाणाऱ्याची देव कधी' उपेक्षा करीत नाहीं.
मना प्रार्थना तूजला येक आहे । रघूराज थकीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥
समर्थ म्हणतात मना ! तुला एक आग्रहाची विनंति आहे, प्रार्थना आहे. रामचंद्रांविषयी तुझ्या अंतःकरणांत आश्चर्याची भावना सतत असूं दे. रामचंद्रांचें दर्शन, स्मरण, भजन, पूजन हें प्रत्येक वेळीं माणसाच्या मनाला आश्चर्यचकित करणारे असलें पाहिजे. एकादी अत्यंत प्रिय गोष्ट कल्पना नसतांना अचानकपणे प्राप्त झाली म्हणजे आश्चर्याचा जो भाव उत्कंठित झालेल्या अंतःकरणामध्ये दाटून येतो तसा रामचंद्राच्या संबंधांत, ईश्वराच्या संबंधांत, परमार्थाच्या संबंधांत प्रत्येकवेळी उत्पन्न झाला पाहिजे. परमार्थाची जीवाला ओढ लागली असेल तरच ही गोष्ट शक्य आहे. परमार्थाची अशी ओढ लागणे हीच मोठी दुर्लभ अशी गोष्ट होऊन बसली आहे. याचें कारण एकच कीं विषयासक्त अंतःकरणामध्ये परमार्थाविषयींचे उत्कट प्रेम मुळांतच नसतें, आणि ज्याच्याविषयीं ओढ वाटत नाहीं त्याच्याविषयी, त्याच्या प्राप्तीविषयीं, दर्शनाविषयी मग आश्चर्याचा भाव उत्पन्न न झाला तर नवल वाटण्याचे कारण नाहीं. आश्चर्याचा भाव उत्पन्न होणें तेव्हांच शक्य होतें की जेव्हां मन त्याविषयीं प्रेमादरानें पूर्ण भरलेलें असते .
समर्थ म्हणतात-परमाथीविषयी, रामदर्शनाविषयीं साधनेकरितां कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांच्या विषयी, माणसाच्या अंतःकरणांत कधींहि अवज्ञा असतां कामा नये. अनादर, तिरस्कार, आळस, कंटाळा, तुच्छता, उपेक्षाबुद्धि, टाकणें टाकल्यासारखे थातुरमातुर कांहीं तरी करणें, सर्वांगीण प्रयत्नांचा अभाव असणें, सातत्य नसणे, सर्व शक्ति पणाला लावावी असें न वाटणे ही सर्व अवज्ञेची लहानमोठी किंवा स्पष्ट-अस्पष्ट रूपे आहेत, आणि आश्चर्याची गोष्ट अशी कीं ही सर्व परमार्थाच्या संबंधांतच नेमकी प्रगट होतात.
प्रपंचाविषयीं असें वाटलें तर तें एका दृष्टीनें हितकर आहे असेंच म्हटलें पाहिजे, पण तिथे असें कधींच होत नाहीं. मनुष्य प्रपंचाविषयीं आग्रही, उद्योगी, निष्ठेने सतत धडपडणारा असा असतो. तेथील अपयश त्याला प्रपंच विषयी दूर करीत नाहीं. तो निराळ्या मार्गानें, निराळ्या प्रकाराने पुन्हा पुन्हा खटपट करीत राहतो. कार्यप्रवण राहतो. प्रपंचांत माणूस पक्का प्रयत्नवादी असतो, आणि परमार्थांत मात्र तो दैववादाची कास धरून वागत असतो. असेल आमच्या दैवांत तर घडेल परमार्थ ! जेवढें घडते तेवढे तरी काय थोडे आहे ! या भावनेने तो भजन पूजन करीत असतो. हें घडता कामा नये तरच परमार्थ साधेल अन्यथा तो जें जें करतो तें सर्व वाया जाईल, निरुपयोगी ठरेल. परमार्थ हा माणसाचे आश्रयस्थान बनला पाहिजे. तो साधले तर केव्हातरी करण्याचा तात्पुरता विषय असतां कामा नये. यासाठीं समर्थ सांगतात, मना ! तूं चांगला आहेस, सज्जन आहेस. सर्वदा रामचंद्रांच्या जवळच निवास कर.
' रघुराज थकीत होऊनि पाहे । ' या ओळीचा निराळ्या प्रकाराने अर्थ केला जातो. तोहि लक्षांत घेण्यासारखा आहे.
मना ! तूं परमेश्वराची रामचद्राची-भक्ति इतक्या उत्कटतेने कर, परमार्थविषयीची तुझी ओढ इतकी विलक्षण असूं दे कीं परमेश्वरानें, राजाधिराज रामचंद्रानें, आश्चर्यानें थक्क होऊन तुझ्याकडे पाहिले पाहिजे. तुझ्या निष्ठेविषयीं अपरंपार कौतुक रामचंद्राच्याच हृदयांत दाटून आलें पाहिजे. फार विलक्षण अशी गोष्ट समर्थ सुचवीत आहेत. ईश्वराची भक्ति सर्वच करतात. पण हातीचेनी लीलाकमळें । खं तयातें । (सा. १२ ! २२३) असें देवालाच वाटावयास लावणारी भक्ति केवढी थोर म्हणावयाची ! ती साधली पाहिजे. आतां देवालाच भक्ताची ओढ लागते. कबीरांचा एक दोहा मोठा बोधप्रद आहे. महात्मा कबीर म्हणतात, "मनुवा मेरा मरी गयो दुर्बल भयो शरीर । पीले पीछे हरि फिरे कढत कबीर कबीर । " आतां ईश्वरच कबीराच्या मागें लागतो आहे. तो म्हणतो आहे, अरे ! कबीर थांब रे ! मला सोडू नकोस. माझ्यापासून दूर जाऊं नकोस. एकदां तरी मला भेट. ' भक्तीची ही अवस्था किती श्रेष्ठ ! किती आकर्षक आहे ! पण ही स्थिति केव्हां प्राप्त झाली ? तें कबीर पहिल्या ओळींत सांगत आहेत. माझें मन अमन झालें आहे. त्यानें कामक्रोधादि षडड्विका र सोडले आहेत. विषयांची हाव त्याचें ठिकाणी उरली नाहीं. संकल्पविकल्पानें त्याला आता चंचलता येत नाहीं. म्हणजे मनाला मनपणाच राहिला नाही. तें आतां प्रमाथी, हट्टी, दुर्निग्रह, चंचल असे राहिलेलें नाही. तें जणू मरून गेले आहे. परमेश्वराच्या चरणी जणू पूर्णपणे लीन झालें आहे. साधनेच्या बळावर देहभाव जवळ जवळ नाहींसा झाला आहे. देहाशी आतां तादात्म्य राहिलेलें नाहीं आणि असें जेव्हां झालें तेव्हां मग ईश्वराला ओढ लागली. अशी अवस्था भक्ताला प्राप्त झाली पाहिजे. गोकुळांतल्या गोपी, तुकारामांसारखे महात्मे, नामदेवांसारखे लडिवाळ भक्त या पायरीवरचे थोर पुरुष होत. हाच आदर्श साधकाने ठेवला पाहिजे.
समर्थ रामदास स्वामी याचे आराध्यदैवत श्रीरामचंद्र हेच असलें आणि या रामाच्या चरित्रामध्ये , रामायणामध्ये वर्णन केलेल्या अनेक घटनांचा उल्लेख त्यांनीं रामचंद्राची थोरवी गाण्यासाठी केला असला व त्यावरून सूर्यकुलावतंस, दशरथनंदन, अयोध्यानति, जानकीजीवन, राजा रामचंद्र याचीच उपासना ते करीत असले व तिचाच प्रसारहि करण्याची त्यांची भूमिका असली तरी आपल्या या उपास्थामागची समर्थांची कल्पना किती दिव्य आणि किती विशाल आहे तें या श्लोकातील पहिल्याच ओळींतून प्रगट होते. ऋग्वेदादी चारी वेद, व्याकरणादि सहाही शास्त्रें आणि पद्यादि अठरा पुराणें-उपपुराणें ही सर्व ज्याच्या वर्णनाने भारावलेली आहेत त्या रामचंद्ररूप परमेश्वराशी योग साधला असतां समाधान बाणतें, समाधान मिळतें आणि टिकून राहते, इतकेंच नव्हे तर तुम्ही जणू समाधानरूप होऊन राहता. त्या रामचंद्राची दृढभावानें भक्ति करा. असा भाव समर्थाच्या या उपदेशाचा आहे.
प्रत्यक्षांत राम किवा रामचरित्र हा कांहीं वेदशास्त्रपुराणांचा विषय नाहीं. शास्त्रामध्यें कोठेच रामचंद्राचा संबंध आला असण्याची शक्यता नाहीं. व्याकरणामध्ये राम शब्दाची व्युत्पत्ती सांगितली असली किंवा उत्तरमीमांसा शास्त्रांत वेदान्तांत उपमेसाठी रामचंद्राचा ओझरता उल्लेख आला असला तरी रामचरित्राचे गायन करणे हा त्या शास्त्रांचा विषय आहे असें म्हणतां येणार नाहीं. पुराणामध्ये पद्यपुराण-भागवत यासारख्या काही ठिकाणीं पुराण-विस्तारांच्या मानानें अगदी संक्षिप्तांत रामचरित्र आलें असलें तरी व्यावहारिक एक अर्थाने सर्व पुराणे रामचंद्राचे गुणगान करतात असें म्हणतां येणार नाहीं. वेदांविषयी तर हें आणखीनच खरें आहे. राम हा शब्द वेदांत क्वचित् कोठे आला असेल पण रामचरित्राशी संबद्ध एकादे सूक्त तर राहोच, एकादी क्रवाहि वेदामध्ये असण्याचा संभव नाहीं. कारण ऐतिहासिकदृष्ट्या रामचरित्र वेदांच्या तुलनेत फारच अर्वाचीन आहे. अशा स्थितींत "जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे" या ओळीचा अर्थ व्यापकपणे घेतल्यावांचून गत्यंतर नाहीं.
रामचंद्र हा परमेश्वराचा अवतार. परब्रह्माचे तें भक्तांच्यासाठी धारण केलेलें सगुण साकार रूप. हीच धारणा रामोपासनेच्या मागें असल्यामुळें आणि सर्व वेदशास्त्रपुराणें ही परमेश्वरपर असल्यानें समर्थ रामाचे वर्णन करतांना निश्चयात्मक रीतीनें "जया वर्णितीं वेदशास्त्रे पुराणे" असा घोष करीत आहेत. या रामभक्तीचें फल सांगत असतांना समर्थ म्हणतात रामचंद्राशीं जोडले गेलांत तर तुम्हांला समाधान प्राप्त होईल. समाधान ही अंतःकरणांत अनुभवाला येणारी एक विलक्षण अवस्था आहे. योगाचे फळ म्हणून सांगितलेली समाधि आणि समाधान हे दोन्ही शब्द मुळांत एकाच अर्थाचें आहेत. सम , आ , धा अशीच सव्युत्पती तेथें आहे. या समाधान शब्दाने अंतःकरणाची प्रसन्नता, स्थिरता, तृप्तता, अभिप्रेत आहे. कोणत्याहि प्रयत्नाचें वा साधनेचे यापेक्षा मोठे फळ असूं शकत नाही आणि तें रामोपासनेनें मिळतें. यासाठीं माणसाने आपले मन रामचंद्राच्या ठिकाणीं स्थिर राहील असें केलें पाहिजे.
मन चंचल आहे हें निश्चितच, पण खऱ्या अर्थाने तो मनाचा स्वभाव नव्हे. चंचलपणा ही मनाची प्रकृति नव्हे. मन हें मुळांत सत्वगुणात्मक आहे. 'सत्त्वं मनः ' असेंच शास्त्रकारांनी सांगितलें आहे. "रजस्तमश्च मनसी द्वौच दोषावृदा हतौ ' चंचलपणा रजोगुणामुळें येतो व तो मनाचा दोष आहे. म्हणून प्रयत्नानें, साधनेने, निष्ठेने तो काढून टाकणें शक्य आहे. आपलें सर्व चांचल्य रामचंद्राचें ठिकाणीं वाहून टाका असें समर्थांनी सांगितलें आहे तें याच दृष्टीनें. जर ती मनाची प्रकृति असती तर "सर्व चांचल्य दीजे" असें म्हणतांच आलें नसते. कोळशाचा काळेपणा काढून टाकता येत नाहीं. वस्त्रावरचा डाग, कापूस पांढराशुभ्र असल्यानें, काढून टाकत येणे शक्य आहे. तेंच मनाच्या चंचलतेलाहि लागू आहे.
साधक निष्ठेने उपासना करीत असला तरी आरंभी आरंभी पण दीर्घकालपर्यंत मनाच्या चंचलतेचा त्याला फार त्रास होतो. अगदीं निराश व्हावे, आपल्याला कांहीच साधणार नाहीं, कधीच साधणार नाहीं, सोडून द्यावा हा प्रयत्न, असें वाटावे-इतकी उग्रता या चंचलतेमुळें होणाऱ्या त्रासाला असते. कसोटीची वेळ असते ती याच क्षणी. निष्ठेची परीक्षा याच प्रकाराने होऊन जाते.
मनाचे सातत्य टिकविण्याचा एक विलक्षण मार्ग शास्त्रकारांनीं सांगितला आहे. अंतःकरण चंचल होते तें कामक्रोधमदादि विकारांनीं. ते विकारच परमेश्वरार्पण करावेत असें भक्तिशास्त्र सांगते. त्यामुळेंहि मन ईश्वरार्पण होण्यास सहाय्य होऊं शकते. असें सांगतात कीं एक गृहस्थ एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला-देव दयाळू आहे, तो माझें काम करील या भावनेने मी त्याची पुष्कळ प्रार्थना केली पण मला त्याचें कांहीं फळ मिळालें नाहीं. त्यामुळें मला देवाविषयी तिटकारा आला आहे. तेव्हां ते सत्पुरुष ह सले आणि म्हणाले ठीक आहे-देव फार निष्ठुर आहे, आणि तो माझें कांहीं काम करणार नाहीं असें सारखे म्हणत जा. देवमंदिरावरून चुकून कधीं गेलास तर मी याला नमस्कार करणार नाहीं असें म्हणत जा. गृहस्थ म्हणाला कीं ठीक आहे पण त्याची ही ईश्वरविषयक क्रोधाची भावना लवकरच नकळत खऱ्या प्रेमांत परिणत झाली. अनेक प्रेम प्रकरणे संघर्षांतून, भांडणांतून जन्माला आली आहेत असें व्यवहारातहि अनेक वेळां आढळतें. वाङ्क्मयाने याची आवर्जून नोंद घेतली आहे. तेव्हां कोणत्याहि भावनेने ईश्वराचें स्मरण घडणे हें महत्त्वाचें आहे; उपयुक्त आहे, हें यावरून लक्षांत येईल. 'सर्व चांचल्य दीजे' हें म्हणण्यामध्यें हाच भाव आहे.
अंतःकरण भगवदर्पण करण्याचा आरंभ कसाहि करावा पण प्रयत्न सोडू नये. 'तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय ' याच भावनेने साधनेत दृढ राहावें. साधकाने कंटाळा येऊ देतां कामा नये. तोच घातक आहे. आपण भजनपूजन नामस्मरणाला कंटाळतो कारण तेंच तेंच वारंवार करावयास नको वाटतें. पण माणसाने गंभीरपणे विचार करावा की जर हृदय स्पंदनाला कंटाळले, फुक्फुसे श्वासोच्छून्नासाला कंटाळली तर देहाची काय दशा होईल ? नामस्मरणादि साधनाचे तसेंच आहे. म्हणून न कंटाळता जसें असेल त्या स्थितींत मन परमेश्वरचरणीं ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे.
मना पाविजे सर्व ही सूख जेथें । अती आदरें ठेविजे लक्ष तेथें ॥
विवेकें कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥
सर्व सुख परमार्थांत आहे. परमेश्वराच्या चरणी आहे, अशी सर्व संत पुरुषांची धारणा आहे "सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर । '" 'तुझें पायी सुख सर्व आहे. '" 'सुखालागी करिशी तळमळ । तरी तूं पंढरिसी जाई एक वेळ । मग तूं अवघाचि सुखरूप होशी । जन्मोजन्मीचे दुख विसरशी । " अशीं वचनें सतवाड्रमयामध्ये किती तरी आढळतात. समर्थांचीहि धारणा तीच आहे. माणसाला सुख हवे असतें. ते निरापद, विपुल आणि सातत्याने मिळालें पाहिजे अशीहि भावना त्याचे ठिकाणीं असते. पण त्याची सुखाची कल्पना बहुधा इंद्रियांना होणाऱ्या अनुकूल सवेदनेपुरतीच मर्यादित असते. शास्त्राची दृष्टी इतकी संकुचित नाहीं आणि म्हणून भगवंतांनीं सुखाची व्याख्या करतांनाच म्हटलें आहे.
कीं, ' य त्तदग्रे बिषमिव परिणामे s मृ तोपमभम । ततू सुखं सात्त्विक प्रोक्त आत्मबुद्धिप्र सादजम । " (भ. १८ ! ३७) जें आरंभी विषासारखे नको वाटतें, त्रासदायक होतें, ज्याची ओळख आत्म्यामध्यें स्थिर झालेल्या बुद्धीच्या निर्मलतेमुळें पटते, तें खरें सुख होय. सात्त्विक सुख म्हणून त्या लाच ओळखावे. इतर सुखे ही आडनावाची सुखे असून राजस-तामस गुणाच्या प्रभावाने वास्तविक सुखकर नसलेल्या गोष्टीहि सुखकर वाटाव्या असें त्याचें स्वरूप असतें.
खऱ्या सुखाच्या म्हणजेच हिताच्या गोष्टी आरंभी तरी सुखाच्या वाटत नाहींत. असा परमार्थांतला काय पण व्यवहारातलाहि अनुभव आहे. सकाळी लौकर उठणे, नियमितपणे वागणे, व्यायाम करणें, राहणी साधी ठेव, जेवणातील मीठ-मसाले कमी करणें, तंबाखूसारखी व्यसने नसणे, स्वच्छता व टापटीप पाळणे, या गोष्टी उपयुक्त आहेत, हिताच्या आहेत. हें कळण्यासाठी कांहीं वेदान्तशास्त्राची आवश्यकता लागत नाहीं. पण त्यांचें आचरण तरी किती माणसे किती प्रमाणांत करतात ? इंद्रियलोलुपता हेंच त्याचें कारण आहे. व्यवहारांतील आरोग्यादि गोष्टींतसुद्धां जी लोलुपता विरोधक ठरते तीच परमार्थालाहि विरोधक ठरेल यांत कांहींच नवल नाही.
थोडेसे सुख ज्यात असतें अशा गोष्टीच्या प्राप्तीसाठी सुद्धा कितीतरी कष्ट पडतात. दक्षता, प्रयत्न, कौशल्य, यांत उणे पडता कामा नशे अशी स्थिती असते. मग सर्व सुख जिथे एकवटले आहे तो परमार्थ मिळविणे हें काम आरामखुर्चीत बसून डोलण्याइतके सोपे कसे असेल ? खरी सुखे प्रयत्नपूर्वक मिळवावी लागतात इतकेंच नाही तर त्या सुखांची गोडी प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते. सात्त्विक सुखाच्या संदर्भांत भगवंतांनींच हें स्पष्टपणें सांगितले आहे. अभ्यासाद्र मते यत्र दुःखानं च निगच्छति । (भ. १८ ! ३६) सात्त्विक सुखामधे मन रमण्यासाठी सुद्धां दीर्घकालीन अभ्यासाची आवश्यकता असते आणि मग त्याचा परिणाम म्हणून मनुष्य दुःखांतून मुक्त होतो. यासाठी समर्थांनी ज्या परमार्थामध्ये सर्व सुख समाविष्ट आहे, त्या परमार्थावरच आदरपूर्वक सर्व लक्ष केंद्रित करावें असा आदेश दिला आहे.
माणसे परमार्थ करीतच नाहींत असें नाहीं पण तीं लक्षपूर्वक आणि आदरपूर्वक करीत नाहींत. परमार्थाविषयी खरी आस्था, खरा जिव्हाळा, पोटांतून नसतो आणि मग जें होते ते पुरवणी सारखे होते वा गतानुगतिक भावनेने होतें. याचें महत्त्वाचे कारण असें कीं परमार्थांमध्ये सर्व सुख आहे हेंच मुळीं मनाला पटत नाहीं. सत्ता-संपत्ति ऐश्वर्य, लोकप्रियता, विलासाची वा खाण्यापिण्याची रंगेल साधने यांची विपुलता हीच सुखावह आहे असें मनाला वाटत असते. मग त्यांच्या प्राप्तीसाठीं अपार कष्ट करण्याची आणि नीतिनियम गुंडाळून ठेवण्याचीहि मनुष्याची सिद्धता असते. माणसाचे हे विचार योग्य नव्हेत-समर्थ कुडी कल्पना म्हणतात ती या लाच. शास्त्राचा अभ्यास, सदग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन, सत्पुरुषाचा सहवास, सज्जनांची संगति, ईश्वराची प्रार्थना, भजन, पूजन, नामस्मरण, सद्रुरूची सेवा, अहंकार, काम, क्रोध इत्यादि विकारांना आवरणे, या माध्यमांतून आपल्या अंतःकरणामध्ये जे वाईट विचार असतात-त्यांचा वाईटपणा, कुडेपणा हा कळत जातो. चांगल्या वाईटाचा विवेक करण्याची शक्ति क्रमाक्रमाने वाढत जाते. वाईट आहे हें ठामपणे कळले कीं मग तें सुटणे वा सोडणे हें शक्य होऊं लागते. त्यादृष्टीने माणसाने प्रयत्नशील असलें पाहिजे.
माणसाच्या अंतःकरणांत ज्या कल्पना येतात त्या सगळ्याच चांगल्या असतात किंवा सगळ्याच वाईट असतात असें कधींच नसते. चांगल्यावाईटाचें मिश्रण कमी अधिक प्रमाणांत प्रत्येकाच्याच अंतःकरणांत असतें. त्यांतील दैवी संपत्तीचे अंश कोणते आणि आसुरी संपत्तीचें अंश कोणतें याचा प्रामाणिकपणे विचार करून आसुरी दुर्गुण टाकून दिले पाहिजेत आणि दैवी सगुण वाढवीत राहिले पाहिजे. हे सोपे नसते. तांदळातले खडे काढणें हें आधीं अवघड. त्यांतल्यात्यांत पांढऱ्या रंगाच्या तांदुळांतील काळ्या रंगाचे खडे काढणें हें त्यामानानें सोपे पण जेव्हां पांढरेच खडे तांदळात मिसळलेले असतात, तेव्हां पुष्कळवेळा निवडणे पुरत नाहीं, तर घोळणे आणि रोळणेहि करावें लागतें आणि हें सर्व फार दक्षतेने, प्रयत्नपूर्वक करावें लागतें. दुर्गुणांच्या संबंधांत तसेंच आहे. मुळांत दुर्गुण म्हणून त्याज्य असला तरी इंद्रियाच्या आणि मनाच्या कुड्या धारणेप्रमाणें तो दुर्गुण, दुर्गुण म्हणून जाणवत नाहीं हा तांदळात पांढरा खडा. फार प्रयत्न करावे लागतात ते यासाठींच. पांढरा खडा दातांखाली जाणवतो तसें दुर्गुणाचे वर्तन अस्वास्थ्य निर्माण करतें. यास्तव प्रयत्नपूर्वक रामचंद्राच्या चरणाशी सतत राहिलें पाहिजे. ज्या पातळीवर शक्य असेल त्या पातळीवर शरीर, मन, बुद्धि परमार्थांतच स्थिरावेल असा उद्योग केला पाहिजे "मना सज्जना राघवी वस्ति कीजे" असें पुन्हा पुन्हा सांगितलें आहे तें यासाठींच.