श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण
॥ श्रीराम समर्थ ॥
उभा कल्पवृक्षातळीं दुख वाहे । तया अंतरीं सर्वदा तें चि आहे ॥
जर्नी सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढें मागुतां शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥
जें जें मनांत येईल ते तें जो पुरवितो त्या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात. त्याच्यातळी उभा राहून जर कुणी दुःखाची कल्पना करील तर त्याला सतत दुःखच भोगावे लागेल. दुसरे काय होणार ? एक लोककथा आहे कीं अरण्यांतून जाणारा एक वाटसरू पुष्कळ चालण्याच्या श्रमाने थकून एका झाडाखाली विसावला. त्याला वाटलें या ओबडधोबड जमिनीवर आडवे होण्यापेक्षां छानसे अंथरूण असतें तर आंबलेल्या अंगाला अधिक विश्रांति मिळाली असती. असें त्याच्या मनांत आलें तोच त्या कल्पवृक्षाच्या प्रभावाने तेथें एक उत्कृष्ट, सुसज्ज पलंग घातला गेला. वाटसरू त्यावर झोपला मग त्याला वाटलें चालण्याचा शीण गेला, आतां पोटभर सुग्रास जेवण मिळेल तर किती बरें होईल ? त्याच्या या इच्छेसरशी त्याच्यापुढे पंचपक्वान्नांनी भरलेलें ताट, कुणी आणून ठेवल्यासारखे, प्रगट झालें. वाटसरू चकित झाला आणि धास्तावलाहि. त्याला वाटलें- ? आपोआप कसें घडते आहे ? कांहीं भूताटकी तर नाहीं ? लगेच भूत समोर उभे राहिलें. अरे बापरे ! खरेंच भूत ! ! हें मला छळणार की काय ? असें वाटसरूला वाटताच त्याचा छळ होऊं लागला.
प्रपंचांत असेंच होत नाहीं काय ? आपल्याला व्हावेसे वाटते आणि होत नाहीं असें खरोखरीच कितीदा होते ? अगदीं आवश्यक तेंहि माणसाला मिळत नाहीं असें बहुधा कधी घडत नाहीं. जी माणसे याहि पातळीच्या खालीं असतील त्यांच्याकरितां परमार्थाचा उपदेश नाहींच म्हटले तरी चालेल. ज्यांची दोन वेळच्या जेवणाची सोय नाहीं, लज्जारक्षणाइतकेहि वस्त्र जे वापरू शकत नाहींत आणि निवाऱ्याची सोय नाहीं, अशा माणसानी उपजीविकेचाच विचार करावा. शास्त्र त्यांच्याकडून परमार्थाची अपेक्षा करीत नाहीं. उलट त्यांना 'आधी प्रपंच करावा नेटका' असेंच संत सांगतात. जयांचें ऐहिक धड नाहीं । तयाचे परत्र पुसली कायी । " (ज्ञा. ४ । १५५) अशीच वस्तुस्थिति आहे. तेव्हां दोन प्रहरचीहि ज्यांना भ्रांत आहे त्यांचा विचार प्रस्तुत संदर्भात करण्याचें कारण नाही, प्रश्न आहे, तो- ही सोय ज्यांची चांगली झाली आहे-त्यांचें काय हा ! ज्यांची तशी उत्तम सोय आहे तीहि माणसे परमार्थाला लागत नाहींत, खरा परमार्थ करीत नाहींत हीच तर खरी अडचण आहे. ती एक सामाजिक आपत्तीहि आहे. ज्यांची पुरेशी सोय झालेली आहे त्यांची वाढती हांव इतर अनेक बापड्यांच्या भयानक दारिद्र्यास कारणीभूत होत असते. पर्यायाने संघर्ष निर्माण होतो. स्वास्थ्य हरपते आणि मग सर्वांनाच नाना प्रकारचे ताप आणि तज्जन्य दुखे भोगावी लागतात. म्हणजे सगळे चांगलें असतांना आपली दुखे आपण वाढविण्यासारखेच हें नाहीं काम ? मिळाले ते सुख विसरून जावे आणि प्राप्त झालेली दुखेंः घोळींत राहावे, हाच माणसाचा स्वभाव आहे. ज्याच्यामुळें सुख वाटाचे अशी परिस्थिति भोवती अगदींच नसते असें नाहीं. कांहीं थोड्या उणीवा असतील पण परिस्थिति सर्वथैव प्रतिकूल असेल असें दुर्दैव ज्यांच्या वाटाला येते त्या व्यक्ती केवळ अपवादात्मक गणाव्या लागतील. एरवीं स्वतःच्या अंतःकरणाची शुद्धता, आपला घायकुतेंपणा, हळवा स्वभाव, हेंच दुःखाचें खरें कारण आहे. पण माणसे मात्र सर्वदा परिस्थितीच्या नांवानें ओरडत राहतात. हें कल्पवृक्षाखाली बसून दुःखाची कल्पना करण्यासारखेच आहे.
मिळालें तें स्वतःच्या कर्तृत्वानें आणि मिळाले नाही तें दुसऱ्याच्या दोषामुळे ही माणसाची धारणा असते. पण ती क्वचितच खरी असतें. आपलें बरें झालें हें आपल्या कर्तृत्वानें, हा माणसाचा शुद्ध अहंकार आहे. कुटुंब, समाज, देश आणि ईश्वरी कृपा यांची अनुकूलताच प्रगतीच्या, उन्नतीच्या मार्गांत सहाय्यक असते आणि ही परिस्थिती बहुधा सर्वांना सामान्य अशीच असते. क्वचित् एखादा अपवाद आढळतो. हळव्या आणि छिद्रान्वेषी मनाला तो उत्कटतेने जाणवतो, पण अपवादच असतो. त्यानें नियमाला बाध येत नाहीं आणि म्हणून त्याचें भांडवल करण्यांत अर्थ नाहीं. पण माणसे टासप्राप्तीच्या वेळीं हें लक्षांत ठेवीत नाहींत, तीं अहंकाराने स्वतःच्या कर्तृत्वाचा टेंभा मिरवितात.
एका पुढाऱ्याला एका पत्रकारानें विचारले कीं तुम्ही इतके मोठे कसे झालांत ? हा म्हणाला- कोणाचेहि साह्य नसतांना, सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, माझ्या गुणांनीं मी हें स्थान मिळविले आहे. पत्रकार महाखवट होता. तो म्हणाला-बरे झाले, तुम्हीं हें सांगितलेत, माझ्या लेखी एका मोठ्या आरोपांतून ईश्वराची आणि समाजाची सुटका झाली.
माणसाला त्याच्या योग्यतेपेक्षा खरोखरीच अधिक मिळत असते. त्याचे श्रम वाया जात नाहीत, त्यांतून अधिकच लाभत असतें. एक दाणा पेरावा आणि शंभर घ्यावे हा निसर्गाचा नियम ईश्वरी औदार्याचा द्योतक आहे. तो सृष्टींतील सर्व कर्माला, निदान चेतन सृष्टीतील कर्माला सारखाच व्यापून आहे. मग सजीवांतील सर्वश्रेष्ठ असा जो बुद्धिमान मानव, तो एकटाच अपवाद कसा असणार ? ईश्वर उदार आहे, कनवाळूहि आहे. सर्वसमर्थ आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. तो कोणाला दुःखी काय म्हणून करील ?
मनुष्य स्वतःला दुःखी समजतो वा दुःखी होतो यांत जी वस्तुस्थिति असते तिचेहि कारण तो स्वतःच असतो. मिळालेल्या साधनाचा, प्राप्त असलेल्या अनुकूलतेचा, तो घ्यावा तसा उपयोग करून घेत नाहीं. शासनाने विहीर खोदण्याकरितां धन द्यावे, नाममात्र व्याजानें द्यावें आणि शेतकऱ्याने तें पोरीच्या लग्नांत, लौकिकाच्या लोभानें जेवणावळीच्या थाटासाठीं उडवावें आणि शेतीच्या व्यवसायाच्या नावाने कांगावा करावा, तसेंच माणसाचे होतें.
प्रतिकूल वाटणारी बारीक-सारीक कारणें कुठे तरी घडत असतात पण त्यांच्याच नावाने गवगवा केला जातो. नसते वाद वाढविले जातात. नकोत त्या कल्पना पोसल्या जातात. ज्या घटनांना, ज्या विकारांना, ज्या अपघातांना उपेक्षेनें मारावे त्यांनाच हट्टाने प्रमुखस्थान दिलें जातें. खुनाच्या वार्तेला भडक मथळे द्यावे आणि एकाद्या महापंडिताच्या सत्काराला कोपऱ्यांतहि जागा मिळू नये वा कोपऱ्यांतच मिळावी, असेच होत राहते आणि त्यामुळे ज्यांची उपेक्षा करावी ते विषय वादाचे रण घालतात आणि अस्वास्थ्यांत परिणत होणारे, संघर्षाचे युद्ध पेटवितात. आश्चर्याची गोष्ट अशी कीं भली माणसेच हें करीत असतात. पण या वृत्तीनें चांगलें कांहींच साधत नाहीं. दलितांचा उद्धार होत नाहीं, पीडितांच्या वेदना टळत नाहींत, उलट सर्वांची परिणति शोकामध्ये, खिन्नतेमध्यें, अस्वास्थामध्ये होते.
शस्त्रकर्म करतांना, सडलेले अवयव निष्ठुरपणे कापून टाकावे लागतात हें कितीहि खरें असलें तरी, न सडलेल्या शरीरावयवांची संख्या फार मोठी असते म्हणून शस्त्रकर्म यशस्वी होतें, आणि जीवन सुखावह होतें, हेहि लक्षांत ठेवले पाहिजे. सडकें कापतांना आंधळेपणाने, अनवधानानें किंवा भ्रमानें, सुस्थितींत असलेल्या अवयवांनाहि धक्का लागला तर संकट ओढवते. व्याधि मर्मस्थानीं असेल तर मरण कोसळते. शस्त्रकर्म करणाराला हें लक्षांत ठेवावे लागतें. म्हणून शस्त्रकर्म करणारा तज्ज्ञ असावा, अनुभवी असावा, त्यानें तसें योग्य तें प्रशस्तिपत्रक मिळवलेलें असावें, अशा अटी घातल्या जातात आणि त्या पाळाव्याहि लागतात.
पण साहित्यिकांना आणि पुढाऱ्यांना अशा कांहीं अटी वा बंधने नसल्यामुळें ते स्वार्थापोटी नसलेले वाद वाढवितात, असलेले भडकवितात. जें चांगलें आहे त्याचा विचार करीत नाहीत आणि मग शोक, उद्विग्नता यांच्याविना दुसरे कांहीं पदरी येत नाहीं.
माणसाची ही वृत्तीच खरी घातक आहे. या वृत्तीनें आपल्या हाताने तो हानी करून घेत असतो. समर्थ आतां अशा स्वहितविघातक व्यक्तींचें निरनिराळ्या प्रकारांनीं वर्णन करीत आहेत. 'जगी धन्य तो दास सवोंत्तमाचा' या पालुपदाच्या श्लोकसमुच्चयाने भाग्यवान पुरुषांची लक्षणें समर्थांनी सांगितली. आता माणसाचे करंटेपण कसें आहे तें समर्थ सांगत आहेत. दोष काढून टाकण्यासाठी त्यांचें वर्णन करावें लागतेंच.
निजध्यास तो सर्व तुटोनि गेला । बळें अंतरीं शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदें बुडाला । मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला ॥ ६२ ॥
प्रपंचांतील दुखेंः आहेत त्यापेक्षा अनेकपटीने वाढतात, त्याचें कारण असें कीं माणसे जें लक्षांत ठेवावयाचे, ज्याचा ध्यास घ्यावयाचा, तें सोडून इतर वासना, कामना, कल्पना, पोकळ चर्चा, नसते वादविवाद, याचाच विचार करीत राहतात, आणि जें करावयाचें तें सर्व सोडून देतात. समर्थांनी येथें वापरलेला निजध्यास हा शब्द निदिध्यास या उपनिषदांतील अतिप्राचीन शब्दाचे प्राकृत रूपहि असेल किंवा निजध्यास म्हणजे आपला म्हणजे आत्म्याचा ध्यास असाहि अर्थ असेल. पहिला अर्थ साधनाच्या दृष्टीनें आणि दुसरा अर्थ साध्याच्या दृष्टीनें अधिक महत्त्वाचा आहे. आपण साधकानी दोन्हीं अर्थ विचारांत घेणे उपयोगाचे आहे.
श्रवणापासून लाभ होतो. श्रवण ही पहिली भक्ति आहे. म्हणून चांगलें ऐकावे, सदाचार, सद्वासना, ईश्वरनिष्ठा यांना प्रेरणा लाभेल असें ऐकावे. दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, उपनिषदे, भारत, भागवत, रामायण यांचें वाचन करावें. चांगल्या विषयावरचीं, शक्य तर चांगल्या व्यक्तींनीं केलेली कीर्तने, प्रवचनें ऐकावी ऐकतांना विद्वत्ता, वक्तृत्व, आणि रंजकता, यापेक्षां विषयाची ओढ ठेवावी. जे श्रवण करतो म्हणतात ते हा विचार करीत नाहींत. त्यांना व्यक्तित्त्वाचे किंवा वक्तृत्वाचें आकर्षण असतें. शास्त्रानें आस्वाद हा श्रोत्याचा गुण सांगितला आहे. तो कुणी लक्षांत घेत नाहीं. ऐकल्यानंतर, त्याचें मनन, निदिध्यासन करावयाचें असतें हें तर जणू माहीतहि नसल्यासारखे लोक वागतात. वस्तुतः मनन-निदिध्यासनांवांचून केलेलें श्रवण हें व्यर्थ आहे. भोजनाचा लाभ नुसत्या अन्न खाण्याने होत नाहीं; तें पुढें पचावें लागतें. मग अंगी लागावे लागतें. तसें झालें नाहीं तर भोजन हें शल्यरूप होतें. जाणवत नसलें तरी श्रवणाचेंहि तसेच होतें. उगीच शंका येत राहणें, धड निश्चयच न होणें, हेहि खरें आणि तेंहि खरें-असें झोके मनाला बसणे, वादविवादाची आवड वाटणे, ही सर्व श्रवण न पचल्याचींच लक्षणे आहेत. न पचलेलें श्रवण हा मस्तकाला दिलेला व्यर्थ शीण आहे. यासाठीं मनन आणि निदिध्यासन याचा अवलंब निष्ठेनें करीत राहिलें पाहिजे. श्रवणाचा विवेकाने स्वीकार करणें म्हणजे मनन, आणि तें अंगीं लागणे, म्हणजे त्यांतील उपयुक्त ग्राह्य भाग आचरणांत उतरणे हें निदिध्यासन. हा निदिध्यास जर तुटला तर त्याचे परिणाम शोकसंतापादि मानसिक विकारांत होणे अगदीं स्वाभाविक असते. म्हणून निदिध्यास तुटणार नाहीं याची काळजी घेतली पाहिजे.
निजड्यास म्हणजे सदैव आत्मचिंतन, मनाची ओढ सारखी ईश्वराकडे लागलेली असणें. प्रापंचिक दुःखांतून उत्पन्न होणाऱ्या शोकमोहसतापापासून दूर राहण्यासाठी या ध्यासाचा फार उपयोग होतो. रस्ता कितीहि खडबडीत असला तरी ज्या गाडीने जातो तिच्या स्प्रिग्ज चांगल्या असल्या आणि बैठकीच्या गाद्या गुबगुबीत असल्या कीं रस्त्यांतील खट्टे, गोटे यामुळे बसणारे धक्के यात्रिकाला जाणवत नाहींत आणि त्याचा प्रवास सुखावह होतो. जीवनाच्या प्रवासांत निजध्यासानेंहि तसेंच होते. तत्त्वाचा अभ्यास, तत्त्वज्ञान, अध्यात्म हे अगदीं सूलदृष्ट्या विचारांत घ्यावयाचे ठरले तरी ते चांगल्यापैकी 'शॉक अबसर्वरऽ ७०८६९१५०८६७) आहेत हें तरी निश्चितच. थोड्याशा प्रयत्नानें मिळणारा हा लाभ अगदीं प्राथमिक अवस्थेतहि अनुभविता येतो. वाहनाच्या स्प्रिग्ज आणि गाद्या काढून टाकल्या म्हणजे जे हाल वाट्याला येतात, उघड्या खटाऱ्यांत बसून ओबड धोबड रस्त्यानें जातांना जें भोगावे लागतें, तेंच निजध्यास तुटला म्हणजेहि वाटधास येते. बाहेरचा रस्ता यदाकदाचितू शासन वा पालिका ठाकठीक करील पण या कलियुगांत तरी प्रपंच सुरळीत होण्याची शक्यता नाहीं. त्यांतील व्याधिमरणादि प्रसंग, सत्तासंपत्तीची, कीर्तीची हानी, परिवारातील व्यक्तीचे आग्रही अहंकारी स्वभाव, आप्तेष्टाचे स्वार्थ, उत्ष्टसुलट रागद्वेष, यांचे आघात होत नाहीत असा दिवस- ज्यांचा संसार त्यांतल्या त्यांत बरा आहे असें मानलें जातें- त्यांच्या तरी आयुष्यांत कितीदा उगवतो कुणास ठाऊक ? तेव्हां रस्ता दुरुस्त होईल ही धारणा सामकाने करण्यांत अर्थ नाहीं. त्यानें आपल्या वाहनाच्या गाद्या गुबगुबीत करून घेणे एवढेच सच्या आहे. निजध्यासानें तेच साधते. हा ज्याचा तुटला त्याचा अंतःकरणामध्ये शोक, संताप, त्याची इच्छा असो नसो, बलात्कारानें ठाण मांडतात आणि माणसाचा दुर्दशेला पार राहत नाहीं. दुःखाने, विषादाने, संतापाने त्याचें हृदय भरून जातें. आत्महत्येचे विचारहि त्याच्या मनांत डोकावतात. कांहींच चांगलें वाटत नाहीं. कुठेच सुख लागत नाहीं. सगळीकडे सर्वकाळ एक अस्वास्थ्यच वाट्याला येतें. निजध्यास तुटल्याचाच हा घोर परिणाम आहे.
निजध्यास तुटल्यामुळें भेदबुद्धि वाढत जाते, दुरावा वाढत जातो, आपलेपणा नष्ट होतो आणि मग घृणेला, तिरस्काराला, द्वेषाला अधिकाधिक धार येत जाते व त्यामुळें एरवी खरोखरच सुखावह आनंददायक असणाऱ्या गोष्टी त्याला सुखी किंवा आनंदी करूं शकत नाहींत. त्याला कुठे चांगलें दिसत नाहीं, कुठेच अनुभवाला येत नाहीं. तो छिद्रान्वेषी होतो. दुसऱ्याच्या ठिकाणीं दोषर् हुडकतो, पराचा कावळा करतो. प्रत्यक्ष सूड उगवता आला नाहीं तर निंदा तरी करीत राहतो. त्यामुळें एक विलक्षण खिन्नता त्याला प्राप्त होते, कोणत्याहि चांगल्या गोष्टीविषयी त्याला उत्साह वाटत नाहीं, वाटला तरी टिकत नाहीं. पूजापाठादि धार्मिक गोष्टी त्याला कंटाळा आणतात. सदाचरणाविषयींचे निश्चय डळमळू लागतात, नष्टहि होतात. यासाठीं आत्मविषयक चिंतन माणसाने सुटू देतां कामा नये.
निजध्यास साधून प्रपंचांत कसें वावरता येईल अशी एक शंका माणसाच्या मनात येते. पण आपण समजतो तेवढे हें अवघड नाहीं. थोडासा अभ्यास करावा लागेल पण तो साधण्यासारखा आहे. जे दुचाकी वापरतात त्यांच्या हें लक्षांत येण्यासारखे आहे. दुचाकी वापरावयाची म्हणजे तोल सावरता येणे महत्त्वाचें. जो दुचाकी चांगली चालवू शकतो त्याला आतां तोल सावरण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहींत. वळणे घेणे, मित्रांशी बोलणें, आवश्यक तेव्हां इकडे तिकडे पाहणे, समोरच्या अडथळ्याला चुकवणे, या सर्व गोष्टी तो सहज करूं शकतो. दुचाकीवर बसावयास शिकतांना मात्र यांतील प्रत्येक गोष्ट त्याचा तोल घालवणारी ठरली होती. आतां या सगळ्या गोष्टी त्याच्या मार्गक्रमणांत अडथळा आणीत नाहींत, त्याचा तोल घालवीत नाहींत आणि हें इतकें सहज होतें कीं तोल सांवरण्यासाठीं आपण कांहीं वेगळे केलें याची जाणीवहि राहत नाहीं. तोल सावरणे म्हणजेच निजध्यास आहे. निजध्यास म्हणजे तोल सावरणेच आहे. तेच अभ्यासाने प्राप्त करून घेतले पाहिजे व सावधपणे टिकवले पाहिजे.
घरीं कामधेनु पुढें ताक मागे । हरीबोध सांडुनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडें । तया मागता देत आहे उदंडें ॥ ६३ ॥
सगळ्या इच्छा ज्याच्या आश्रयानें पुऱ्या करून घेतां येतील असा अंतरात्मा सर्वांच्या हृदयांत अक्षय्य वास करीत असतांना, निजध्यासानें त्याची कृपा संपादन करून घेण्याचे सोडून माणूस प्रापंचिक गोष्टीत विषयाच्या लाभांत, सुखसमाधान मिळविण्याची इच्छा करतो, हें किती विलक्षण आहे ! श्रीज्ञानेश्वर महाराजांनींहि हें आश्चर्य प्रगट केलें आहे. "हृदयामध्ये मी रामु । असतां सर्व सुखाचा आरामु । कां भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ (ज्ञा. ९ | ६२) हेंच आश्चर्य समर्थांनींहि या श्लोकांत विशेष रीतीनें दर्शविले आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनु घरच्या अंगणांत बांधलेली असावी आणि तिला न ओळखता एखाद्या अडाणी गृहस्थांनी शेजारी पाजारी कोरड्यास म्हणून ताकाची भीक मागावी तसेंच हें घडते. माणसाला खरोखरीच सुख कोठे आहे, कसें आहे आणि कशाने मिळते हें एकदां कळलेच पाहिजे. जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट आनंद देणारी वस्तु गाढ झोप ही आहे. भले ललित वाङ्मयाने तिची उपेक्षा केलेली असो, पण ती वस्तुस्थिती आहे. माणसाला त्याच्या आवडीच्या एकेका विषयापासून आठआठ दिवस दूर ठेवावे आणि तसाच प्रयोग झोपेच्या बाबतींतहि करावा. म्हणजे झोपेचे काय महत्त्व आहे हें लक्षांत येईल. रात्रीं एकदां गाढ झोपावे आणि मग दुसऱ्या दिवशीं प्रसन्नतेने सर्व व्यवहार करावे. अध्यात्म आणि प्रपंचाचेंहि खरें असेंच आहे. गाढ झोप लागण्याच्या प्रकृतीला मुकावे लागेल असे आहार-विहारादि व्यवहार करूं नयेत, तसेंच अध्यात्म दुरावेल असा प्रपंच करूं नये. पण परमार्थाचे हें महत्त्व लक्षांत न घेतां माणसे सुख जें काय आहे तें विषयोपभोगानेंच मिळेल या कल्पनेने अहर्निश धडपडत राहतात. त्याचें हें वागणे कामधेनूची उपेक्षा करून ताक मागण्यासारखेच आहे.
तात्त्विक चर्चेतून, निरनिराळ्या ग्रंथांच्या वाचनांतून वा विविध प्रकारच्या श्रवणांतून मनुष्याला वस्तुतः ईश्वरविषयक ज्ञान व्हावयास हवें. त्याची निष्ठा दृढ व्हावयास हवी. बोध या शब्दांतून इतका सर्व भाव व्यक्त होतो. श्रवणादि गोष्टींतून असा बोध मिळविण्याच्या ऐवजी माणसे वादविवादाच्या, खंडन-मंडनाच्या नादी लागतात. शब्द हे बोधाचे माध्यम होण्याच्या ऐवजी विद्वत्तेचें माध्यम होतात आणि शब्दांचा वाढता संग्रह, अहंकारास पुष्ट करून, आपलें मत प्रस्थापित करणें व इतरांचे खोडून काढणे यांतच संतोष मानावयास शिकवतो. शब्द हे ज्ञानाचे वाहक निश्चित आहेत. पण त्यांचा आचाराशी वा अनुभवाशी संबंध राहिला नाहीं, तर मात्र शब्द हे माणसाच्या प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा होऊं शकतात आणि व्यर्थ वादाचे रणांगण त्यामुळें माजते. लो. टिळकांचे “गीतारहस्य” प्रसिद्ध झालें त्यावेळीं हा अनुभव आला. टिळकांनी गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला आणि शंकराचार्यांच्या नांवानें प्रसिद्ध असलेल्या संन्यासपरतेचें खंडण केले. त्याची प्रतिक्रियाहि उग्र रूपांत उसळली आणि मग कांहीं वर्षें तरी तोच एक वाद विद्वत्तेच्या क्षेत्रांत धुमाकूळ घालीत होता. टिळकभक्त आणि शंकराचार्यभक्त असे जणू युद्धच चालू होतें. स्वतः लो. टिळक त्यांत फारसे पडले नाहींत. शंकराचार्य तर भूतकालांतील व्यक्तिमत्त्व होतें. पण त्यांचे भक्त मात्र हमरीतुमरीवर येऊन नित्य आवेशाने परस्परांवर तुटून पडत होते. कोणी टिळकभक्त टिळकांसारखा कर्मयोगी नव्हता कीं कोणी शंकरभक्त आचार्यांसारखा विरक्त नव्हता. बोधापासून दूर गेलें कीं असेंच होतें. तत्त्ववेत्ता आणि प्रचारक, साक्षात्कारी आणि सांप्रदायी यांच्यांतील भेद हा बोधाचाच भेद आहे. हें न समजल्यामुळेंच व्यर्थ वादविवाद रंगत जातात आणि या काथ्याकुटांतून, शुष्क चर्चेतून, कंठशोष आणि शिरःशूल पदरांत पडतो. बोध सोडावा आणि वाद घालावा हेहि कामधेनु घरी असतांना ताक मागण्यासारखेच आहे. ज्याला मागितले तर वाटेल ते मिळेल असा चिंतामणि हातीं आला असतांना कुणी कांच समजून त्याला जर फेकून दिला तर या करंटेपणाला त्याचा तोच उत्तरादायी नाहीं काय ? चिंतामणि म्हणजे इच्छिले सर्व पूर्ण करणारे रत्न. त्याच्या जवळ आपणास काय हवें तें देण्याचे उदंड सामर्थ्य आहे. असें असताना त्यालाच जर कुणी कांचेचा तुकडा समजले तर तो दोष तसे समजणाऱ्याचाच आहे.
अती मूळ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्तीं बसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥
ज्याला कांहीं समजत नाहीं तो मूढ आणि ज्याला आपणांस समजत नाहीं हेहि समजत नाहीं तो अतिमूढ. अज्ञान मूढता नव्हे. म्हणजे अज्ञानामध्ये ज्ञान नसतें, ज्ञानाचा अभाव असतो, हे खरें असलें तरी अज्ञानाच्या ठिकाणीं सांगितलें तर समजून घेण्याची, ऐकले तर कळण्याची, पात्रता असूं शकते. मूर्ख तो, मूढ तो कीं ज्याच्या ठिकाणीं ही समजून घेण्याची पात्रताच उरलेली नसते; त्यामुळें त्याला त्याच्या हिताचे म्हणून कांहींहि चांगलें सांगू जावे तर तें ऐकून घ्यावें या मनःस्थितींत तो नसतो. मूढ कधी ऐकतच नाहीं, चांगले काय, श्रेष्ठ काय हिताचे काय, हें न समजल्यामुळे तें आचरणांत आणण्याचा प्रश्नहि उत्पन्न होत नाहीं. चांगल्या वस्तूसंबंधी बुद्धीचा एकदां निश्चय झालेला असला की मग चंचल स्वभावाचे मनहि अभ्यासाने, कांहीं प्रयत्नानें त्या हिताच्या ठिकाणीं एकाग्र करता येतें, स्थिर ठेवता येते. मनाला आवर घालणे, योग्य मार्गाकडे वळवणे हें काम बुद्धीचेंच आहे. त्या बुद्धीला जर चांगलें काय तें कळून घेण्याची इच्छा नसली तर चौफेर उधळलेल्या नाठाळ घोड्याच्या पाठीवर बसून भरकटत असतांना, घोड्याचा लगामहि तुटून जावा तसें होतें. आतां कोसळणे एवढेच शिल्लक राहते म्हणून सावध राहिलें पाहिजे. या अतिमूढतेच्या मुळाशी सुद्धी कोठे तरी आसक्तीचा अतिरेक हें कारण असतें, त्याचाच उल्लेख समर्थ पुढच्या चरणांत करीत आहेत. ज्याच्या अंतःकरणांत अतिकाम विषयोपभोगाची अत्यंत आसक्ति असते, त्याच्या मनामध्ये रामाला स्थान असत नाहीं. हिताचा विचार, चांगल्याचा विचार, परमार्थाचा विचार त्याच्या मनांत कधीं उत्पन्न होत नाहीं. आवश्यकता आणि चैन या गोष्टी मुळांत एक नाहींत. आवश्यकता निसर्गतः असते, स्वभावतः असते, मुळांत असते; पण चैन कृत्रिमच आहे, उपरी आहे. चैनीची आवश्यकता वाटूं लागली कीं नैसर्गिक इच्छेची मर्यादा संपून ती अतिक्रमण करूं लागली आहे असें समजावे. काम हें अतिक्रमणाचेंच स्वरूप आहे. त्याचीहि मर्यादा संपली कीं त्याचा अतियोग होतो, मग या कामाच्या अतियोगानें विवेकभ्रष्टता वाढू लागते, आणि परमार्थाविषयीचे प्रेम, ईश्वराविषयीची भक्ति, सदाचरणाची आस्था, ही जी रामाचा निवास अंतःकरणांत आहे असें सूचित करणारी लक्षणें आहेत, ती त्याच्या ठिकाणीं मुळीं दिसेनाशीच होतात. लोभ ही पूर्ण झालेल्या कामाची प्रजा आहे. तोहि जेव्हां मर्यादेबाहेर जातो, तेव्हां त्यांतून सर्व प्रकारचे संघर्ष, क्षोभ, अस्वास्थ्य, हे समाजाचा सर्वनाश करणारे विकार उत्पन्न होतात. दुर्योधन, रावण, औरंगझेब हे या अतिलोभाचेच बळी आहेत. त्यांचा स्वतःचा तर नाश झालाच पण त्यांनीं सर्व समाजाला जो उपद्रव दिला त्याचे परिणाम फार भयंकर झाले. यासाठीं माणसाने कामाला मर्यादा घालण्यास शिकले पाहिजे. पचेल तेवढेंच खाल्ले पाहिजे. सोसेल तेवढेंच भोगले पाहिजे. खाण्याभोगण्याचा आनंद हा त्याच्या प्रमाणांत नसून तें शरीराला मानवण्यांत असतो. हें सर्व दृष्टीनें, सर्व क्षेत्रांत लक्षांत ठेवले पाहिजे. पण बुद्धिमान् अशा माणसाचे दुर्दैव असें कीं हें समजून घेण्याची इच्छाहि त्याचें ठिकाणीं उत्पन्न होत नाहीं व याचा परिणाम म्हणून तो स्वैराचारी बनतो. फार मोठे आघात झाले, दुष्परिणाम भोगावे लागले, म्हणजे हें कधीं कधीं लक्षात येतें. पण तेव्हां फार उशीर झालेला असतो. प्रयत्न करण्याकरितां आवश्यक असणारा धीरहि त्यावेळीं ठेवता येत नाहीं, शरीर-मन- बुद्धीची कार्यक्षमताहि संपुष्टांत आलेली असते आणि मग दीनवाणे, केविलवाणे, जीवन वाट्यास येतें. ही दीनता म्हणजे जिवंतपणी भोगावा लागणारा एक नरकवासच आहे. सभोवतीच्या लोकांनी हेटाळणी करावी, तिरस्कार करावा आणि त्यांचेकडून अवहेलना, अपमान वाट्यास येत असतांना याला केविलवाणेंपणानें, लाचार जीवन जगावे लागावे, यापेक्षा अधिक दुःखदायक तें काय आहे ? म्हणून विषयोपभोगाविषयींची इच्छा आसक्तीत परिणत होणार नाहीं याची दक्षता माणसाने सतत घेतली पाहिजे व त्या दृष्टीनें आपलें डोके ताळ्यावर ठेवले पाहिजे.
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणें । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणें ॥
धरी रे मना आदरें प्रीति रामी । नको वासना हेमधामी विरामीं ॥ ६५ ॥
मागच्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणें दैन्यवाणें जिणे वाट्यास येऊ नये असें वाटत असेल तर काय करावें तें समर्थ या श्लोकांत सांगत आहेत. ज्याच्या अंतःकरणांत भक्ति नाहीं, ज्याच्या जीवनांत श्रद्धा नाही त्याची दैन्य भोगण्याशिवाय सुटका नाहीं. अतिबुद्धिवादाच्या नादी लागून मूर्खपणा केला कीं मग श्रद्धा, भक्ति हे जीवनाचे खरे आधार तुटून जातात आणि जीवन दुःखाने भरून जातें. म्हणून हृदयामध्यें श्रद्धा असणें, भक्ति असणें, निष्ठा असणें, हेंच जीवनाचे ऐश्वर्य आहे. हे भाव नसणे, हेंच दैन्य होय.
आपण मात्र हें समजून घेत नाहीं. आपण सत्ता, संपत्ति, संतति यालाच ऐश्वर्य समजतो. श्रीमंतीमुळे कांहीं सुखसाधनें उपलब्ध होतात हें खरें, पण आरोग्य आणि प्रसन्नता यांचा लाभ सुखसाधनांनीं वा तीं साधनें पुरविणाऱ्या श्रीमंतीनें होतो असें क्वचित् च आढळतें.
आपण ज्याला ऐश्वर्य समजतो, तें ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्या वाट्यास कधीं आलेंच नव्हतें. तुकारामांचा संसार दरिद्री म्हणतां येईल इतका सामान्य होता. त्यांनी आपल्या अनेक अभंगांतून या लौकिक दारिद्र्याचें वर्णन केले आहे. या दारिद्र्याकडेहि ते विनोदबुद्धीने पाहतात असें दिसते, ज्यातला कांहीं भाग वाट्यास आला असतां तरी माणसाने तीनदा आत्महत्या केली असती अशा दारिद्र्य रेषेखालील, तळीच्या प्रपंचातहि हे संतमहात्मे ' अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक । ' असे आत्मविश्वासाने म्हणतात हें केवढे आश्चर्य आहे. चांगला संसार करण्याची पात्रता संतांच्या ठिकाणीं नव्हती असे मानणे ही बुद्धिवादाची विकृति आहे. ज्याचा परमार्थ संपन्न होतो त्याला ऐहिक संपन्नता मिळविणे मुळींच अशक्य नसते पण तो तें करीत नाहीं. केवळ अध्यात्माच्या प्राप्तीसाठींच आपलें सर्वस्व पणाला लावतो. यांतच त्याची थोरवी असते. त्यामुळें ऐहिकांतील निंदा, अपयश, दारिद्र्य भरपूर प्रमाणांत वाट्यास येऊनहि संतांच्या जीवनांत दैन्य कधी डोकावतहि नाहीं. कारण एकच त्यांचें अंतःकरण ईश्वरभक्तीने भरून गेलेले असतें. आनंद, समाधान, प्रसन्नता यांची संतांच्या ठायीं कधी उणीव नसते. आपण मात्र ऐहिकाच्या नादी लागून संतांना लाभलेल्या या सुखसागरांतील शिंपलाभर सुखहि मिळवूं शकत नाहीं, याचें कारण खरे सुख कशात आहे हें न समजण्याचा मूर्खपणा हें आहे.
ज्याच्या अंतःकरणांत कोणत्या ना कोणत्या प्रकारची निष्ठा, भक्ति नांदत असते त्याला भयंकरांतील भयंकर आपत्तीचेहि भय वाटत नाही. शेकडो क्रांतिकारक जणू बोहल्यावर चढावे अशा हर्षाने फासावर लटकले. हजारोंनी रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे फटके पाठीवर बसत असतांना "वन्दे मातरम" चा घोष उल्हासाने केला. मुलाचे लग्न बाजूस सारून तानाजी सिंहगडावर धावले. शरीरांतून रक्ताचे पाट वाहत असतांना, शत्रु-शस्त्राच्या आघातांनी शरीराचे तुकडे उडत असतांना "तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला" असें बाजीप्रभूनें यमदूतालाच ठणकावले. हें पाहिलें, ऐकले म्हणजे बुद्धि आश्चर्यचकित होते, कल्पनाहि स्तिमित होते ! हें धैर्य, ही उभारी कोठून आली ? हिचा उगम देशभक्तीतून आहे, कर्तव्यनिष्ठेतून आहे. आपत्ति निश्चितच आहे, कारण ती परिस्थितिजन्य आणि दैवाधीन गोष्ट आहे; तो प्रारब्धाचा भाग आहे. माणसाच्या कर्तृत्वाला तिच्यामुळें बंधन पडण्याचे कारण नाहीं. मनोवृत्तीला दैन्य येण्याची आवश्यकता नाहीं. पतिव्रता दारिद्र्यांतहि समाधानी असते. आणि विलासिनी ऐश्वर्यातहि व्यभिचारास प्रवृत्त होते आणि परिणामी दैन्यदशेला पोंचते कारण भक्तिप्रेमाचा अभाव.
म्हणून समर्थ दैन्यांतून, दुःखांतून सुटका होण्यासाठी शहाणपणाचा मार्ग सांगत आहेत कीं बाबा ! तूं रामचंद्रांविषयीं प्रेम आणि आदर ठेव. प्रेमामध्यें ओढ आहे, जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, सहवाससंगतीचे सुख आहे. आदरामध्ये श्रेष्ठतेची, मोठेपणाची जाणीव आहे. प्रेम आणि आदर हे दोन्ही असले म्हणजे भक्ति साकारते. निष्ठा आणि श्रद्धा ही तिचीच अंगोपांगे आहेत. ती ज्याच्या अंतःकरणांत राहतात त्याला विश्वास आणि धैर्य यांची जाणीव कधीं भासत नाहीं; आणि म्हणूनच त्याचें समाधान कधीं भंग पावत नाहीं.
स्वार्थासाठी रोज एकमेकांशी भांडणाऱ्या, सत्तेच्या स्पर्धेसाठी देशहिताचा विचार एकीकडे सारून एकमेकांचे पाय ओढणाऱ्या, पांच वर्षे तरी आसन टिकेल कीं नाहीं अशी शंका असणाऱ्या, पुढाऱ्याने दिलेल्या आश्वासनावर आपण विश्वास ठेवत आणि त्या विश्वासानें जगतो वारांगनेपेक्षाहि चंचल असणाऱ्या राजसतेनें दिलेलें I promise to pay the bearer हें वचन विश्वासार्ह मानून कागदाचे तुकडे गोळा करून ठेवतो व त्या बळावर स्वतःला श्रीमंत समजतो. मग "योगक्षेमं वहाम्यहम्" अशी प्रतिज्ञा करणाऱ्या भगवंतावर भरवसून संतमंडळी समाधानाचे जीवन जगत असतील तर आश्चर्य वाटण्याचे काय कारण आहे. या ईश्वरभक्तीचे महत्त्व आपणास पटत नाहीं याचे कारण आपल्या अंतःकरणांतील मूर्खपणाची, भौतिक सत्तासंपत्तीची अभिलाषा हेंच आहे ! श्रीमंतींतून विषयोपभोग मिळत असतील, मिळतीलहि. पण त्यामुळें सुख, संतोष, समाधान निर्माण होतें असा अनुभव नाही. संपत्तीच्या मागोमाग ईर्षा, द्वेष, अहंकार, कृपणता, संताप, तडफड, अस्वास्थ्य, संघर्ष हेच उत्पन्न होत असतात. मोकळेपणा जातो. वृत्ति संकुचित होते, शरीराला आणि मनाला सहनशीलता राहत नाहीं. दुसऱ्याकडे क्षमाशीलतेने पहावे हें औदार्य दुरावते आणि या सर्वांचा परिणाम म्हणून ऐश्वर्यांत लोळत असतांना मन दुःखाने, वैतागाने भरून गेलेले राहते, स्वभाव त्रासिक, चिडचिडा आणि चमत्कारिक बनतो, अशी व्यक्ति स्वतःहि सुखी होऊं शकत नाहीं आणि दुसऱ्यालाहि सुखी करूं शकत नाहीं. म्हणून समर्थ म्हणतात, बाबा रे ! तुझी ओढ, आसक्ति, रामाकडे, ईश्वराकडे असूं दे. कर्तव्यभावनेनें संसार कर. केलाच पाहिजे. पण ऐश्वर्याची ओढ ठेवू नकोस. इतकी संपत्ति मिळाली पाहिजे, घर असें असें पाहिजे, इतका इतका आराम मिळाला पाहिजे, शरीराचे कष्ट शक्य तेवढ्या प्रमाणांत कमी झाले पाहिजेत अशी आसक्ति ठेवू नकोस. शरीराला शिणवू नये, इंद्रियांना पीडा देऊं नये, हें खरेंच आहे, पण शरीर राबवले नाहीं तर तें कार्यक्षम राहत नाहीं हें त्याहून खरे म्हणून अवश्यक तेवढी विश्रांती घ्यावी पण मऊ मऊ आसनावर लोळत पडण्यात सुख आहे असें मानण्याचा मूर्खपणा करू नये.
भौतिक प्रगतीने अनेक प्रकारची साधनें निर्माण केली आहेत व तीं ज्यांना कोणत्या ना कोणत्या तरी मार्गानें उपलब्ध आहेत त्यांना शरीराला कष्टविण्याचें कारण उरले नाहीं. परिणामी शरीराची कार्यक्षमता उणावली आणि ऐश्वर्याचे सुख भोगण्याचे त्राणहि त्यांच्या शरीरांत राहिलें नाहीं. हें दुबळेंपण येऊ नये म्हणून समर्थ म्हणतात कीं विरामीं वासना नसावी.
शरीराला कष्ट न देणे म्हणजे श्रीमंती ही कल्पना पूर्वी-अलीकडे दिसते तशी-नव्हती. या दृष्टीने आमचे दादा एक गोष्ट सांगत असत. वऱ्हाडचा एक श्रीमंत सावकार पैठणच्या एका सावकाराला मुलगी सांगून गेला. पंचक्रोशीच्या बाहेर सोयरीक न करण्याची पद्धति त्याकाळी होती. तेव्हां पैठणच्या सावकारांनी विचारले, आपण इतक्या लांब कां आलात ? उत्तर-आपण फार श्रीमंत आहात मीहि श्रीमंत आहे. माझी मुलगी लाडांत वाढलेली आहे. माझ्या तोडीचे श्रीमंत स्थळ जवळपास नाहीं. आपल्या गजान्त लक्ष्मीचा गौरव मी इतक्या दूरहि ऐकला आहे. मुलगी आपल्या घरीं पडली तर तिला कष्ट पडणार नाहींत, ती सुखांत नांदेल, म्हणून मी येथें आलों. पैठणचा सावकार म्हणाला, आपली हीच कल्पना असेल तर मुलगी माझ्या घरीं देण्याचा प्रयत्न करू नका. आपण म्हणतां तसें सुख, मी श्रीमंत असलो तरी माझ्या घरी मिळणार नाहीं. नोकरांनी सगळी कामे करावींत आणि मालकांनी केवळ गादीवर लोळावें अशी पद्धत माझ्या घरीं नाहीं. माझी सून २४ तास पैठणी नेसून वावरली तर तिला मी दर दोन महिन्यांनी नवी पैठणी घेऊन देईन, पण तिने पैठणी नेसूनहि सडासारवण हे रोज केलेंच पाहिजे. मी श्रीमंत म्हणून तिला सोन्याची घागर देईन, पण तिने नदीवरून रोज पाणी आणलेच पाहिजे. बहुधा तें लग्न झालें नसावे. लग्न हुंड्यांत मोडले नाहीं तर कष्टाच्या भयानें मोडले, शरीराने करण्यासारखे कांहीं काम नसलें कीं उरलेला रिकामा वेळ मनाच्या दृष्टीने फार वाईट परिणाम करणारा ठरतो. हाहि शरीराच्या सुखासीनतेचा आणखी एक दोष आहे. योग्य प्रकारें योग्य त्या कामांत राबणाऱ्या शरीरासह मनहि गुंतून राहते आणि मग स्वैर कल्पना करण्याची आणि उगीच इकडे तिकडे धावण्याची त्याची खोडहि सहजपणे मर्यादित होते. शरीराला काम नसलें की रिकामे मन पिशाच्चाची रंगभूमि होते. म्हणूनहि समर्थ म्हणतात- विरामीं वासना नको. अंतःकरणांत प्रेम-निष्ठा असली, आदर आणि भक्ति असली कीं रिकामपणाचे दैन्य शरीराला व मनाला कधींच येत नाहीं. सर्व जीवन संतोष, समाधानाने भरून जाते आणि या स्थितीला पुरुष प्राप्त झाला कीं "यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते । (भ. ६ | २२) अशी त्याची स्थिति होते. आतां त्याच्या जीवनांत दैन्य-दुःखाचें नांव तरी उरेल काय ?
नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनी वीष खाता पुढें सूख कैचे । करी रे मना ध्यान या राघवाचें ॥ ६६ ॥
सर्व संतमंडळीत रामदासस्वामी हे प्रवृत्तिपर विचारांचे, संसाराचा पुरस्कार करणारे, प्रपंचविज्ञान आग्रहाने मांडणारे आहेत, असें मानलें जातें. आणि त्यासाठींच इतर सर्व संतांना 'संताळे' असे म्हणून केवळ रामदासस्वामीची तेवढी राष्ट्रसंत, कर्मयोगी, जनकल्याणतत्पर अशा विशेषणांनी स्तुतीहि करण्यांत येते. आधुनिक बुद्धिवाद्यांचा हा विचार वारकरी नि रामदासी यांच्यांत जो दुजाभाव दिसतो तो निर्माण करणाऱ्या कारणांपैकीं एक आहे. वस्तुतः रामदासस्वामी आणि महाराष्ट्रातील इतर ज्ञानदेवादि संत यांच्यांत, सिद्धांत आणि साधन यादृष्टीने, तत्त्वज्ञानाचे म्हणून कांहींहि अंतर नाहीं. सगळेच अद्वैती आहेत, सगळ्यांनाच सगुणोपासना प्रिय आहे. सगळेच भक्तिमार्गाला व नामस्मरणाला श्रेष्ठ समजणारे आहेत. संसार सोडावा असेंहि कुणी सांगत नाहीं. आणि वैराग्य गुंडाळून संसारांत आसक्त होऊन राहावें असाहि विचार कुणी मांडलेला नाहीं. संसारासंबंधींच्या श्रीतुकाराम- महाराजांच्या व श्रीसमर्थ रामदासांच्या विचारसरणींत काहीहि अंतर नाही. मांडण्याच्या पद्धतींत थोडा भेद असतो पण तो कोणाहि दोन संतांच्या वाङ्मयाच्या आधारे दाखवितां येईल. तात्पर्याच्या दृष्टीनें, सिद्धांताच्या दृष्टीनें, बोधाच्या दृष्टीनें, श्रीज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास एकरूपच आहेत. 'संत दिसती वेगळाले | परी ते स्वरूपी मिळाले ॥' हीच वस्तुस्थिति आहे.
समर्थ प्रपंच नेटका करावयास सांगतात हे खरेच आहे. कारण "ज्याचें ऐहिक धड नाहीं । त्याचें परत्र पुससी कायी ॥" इहलोकीचा संसारादि व्यवहार हाहि ज्याला धडपणे करतां येत नाहीं त्याला परलोकींची म्हणजे प्रपंचाबाहेरची, केवळ शरीरभोगापलीकडचीं मोक्षप्राप्ति, ईश्वरभक्ति इत्यादि सुखे कशी लाभणार ? संसार करणें न करणें वेगळे. न करतां येणे वेगळे. हें न करतां येण्याचे दुबळेपण ज्याचें ठिकाणीं आहे तो परमार्थहि योग्य रीतीनें साधू शकत नाहीं असेंच श्रीज्ञानेश्वर महाराजांना म्हणावयाचे आहे. नपुंसकाला जसें कोणी नैष्टिक ब्रह्मचारी मानीत नाहीं, तसेंच हें समजावे. परमार्थासाठीहि चांगली बुद्धि, प्रयत्नशीलता, धैर्य, कार्यक्षमता, कौशल्य, दृढनिश्चय, शरीरस्वास्थ्य या सर्वांचीच अवस्थाभेदानें उणी- अधिक आवश्यकता असते. प्रपंच नेटका करण्यांत या सर्व गुणांची थोडी फार कसोटी लागत असते. दुबळेंपण पुष्कळ वेळां वैराग्याचा नांवावर खपविले जातें, तें फार अनिष्ट ठरतें. प्रपंच नेटका करा असें सांगण्यामागची भूमिका ही अशी. प्रपंच नेटका करणें हें त्याच्याविषयीची आसक्ति उणावण्याच्या दृष्टीनेहि उपयोगी पडते 'प्रपंच मूळचाच नासका ! म्हणोनि करावा नेटका ! नेटका करतां फिका । होत जातो ||' असें समर्थ सांगतात. त्याकडे नीट लक्ष देऊन पाहिले म्हणजे कांहीं आधुनिक बुद्धिवादी समजतात त्याप्रमाणें समर्थ हे इतर संतांच्यापेक्षां वेगळे असे प्रवृत्तिवादी नाहींत, त्यांचें प्रपंचविज्ञानहि संसारोन्मुख नाहीं हे लक्षांत येईल.
समर्थांचा संसारविषयक दृष्टिकोन या श्लोकांतून चांगला स्पष्ट झाला आहे. संसार हा असार आहे. त्यांत सारभाग असा कांहींच नाहीं. म्हणून त्यांत रस घेऊं नये. त्यांत रस घेण्याची वृत्ति ठेवली, मनुष्य आसक्त झाला तर तो घोर आहे, हे प्रत्ययास येते. घोर म्हणजे भयंकर भीतिदायक. संसाराच्या आसक्तीनें अनेक प्रकारच्या चिंताहि पाठीमागे लागतात आणि आसक्तीमुळें संसार एकदां मागे लागला की मग त्यांतून सुटकाहि होत नाहीं. मुंज, लग्न, गर्भारपण, बाळंतपण, रोगांत शुश्रूषा हे चक्र एकदां सुरू झालें की आपलें, मुलांचे, नातवाचे अशा गतीने फिरत राहते. हें एवढे कार्य झालें कीं मी मोकळा होईन हें म्हणणें खोटे ठरतें. चाकाच्या पट्ट्यांत सापडल्यासारखी माणसाची स्थिति होते. तो तळमळतो, ओरडतो. पण तुटल्याशिवाय सुटू शकत नाही. संसाराला घोर म्हटलें आहे तें यामुळेच. पण हे स्पष्टपणें खरें सांगणे माणसाला आवडत नाहीं. लोक रागवतात. " अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः " असें म्हटलें जाते तें यासाठींच. विषयसुखाविषयींच्या आसक्तीनें संसाराचे खरे स्वरूप काय तें सांगणें हें ऐकायला जरी नको वाटलें तरी तो घोर आहे हें सत्यच आहे. बहुतेक सगळ्यांचा अनुभव तोच असतो. कुणी ते लक्षात घेतो कुणी घेत नाहीं. लक्षांत घेणाराहि लक्षांत ठेवीत नाही. आणि लक्षांत राहिला तर सोयीचे नसतें म्हणून त्यावर चिंतन करीत नाहीं. संसाराच्या घोरपणाविषयीं इतर कोणाच्या साक्षीची कांहींच आवश्यकता नाहीं. स्वतःच्या जीवनांत जरा डोकावले, जरा लक्षपूर्वक खोलवर डोकावले तर संसाराचे हें सत्यस्वरूप सहज उघडकीला येईल.
संसार घोर आहे हें खरेंच पण तो टाकतांहि येत नाही. संसाराच्या स्वरूपाची व्यापकता इतकी विशाल आहे कीं बायको टाकली, घर सोडले, रानांत गेला, यादृष्टीनें संसार सुटला असें समजणें खुळेपणाचे ठरतें. तो कोणत्या ना कोणत्या तरी रूपांत भोवती असतो. बायकामुलांचा संसार ज्यांना नसतो त्यांनाहि संसाराचा ताप असतोच. मठपती महंतांचीहि त्यांतून सुटका होत नाही.
खऱ्या अधिकाराने युक्त असलेल्या गुरूंचे शिष्यहि सत्ता-सन्मान-ऐश्वर्यादि भौतिक संपत्तीसाठी गुरूच्या माघारी सोडा पण गुरूसमोरहि भांडल्याची ऐतिहासिक उदाहरणे आहेत. यासाठीं संसारांत सार नाहीं हें जाणून घेण्यास शिकले पाहिजे. संसार असार आहे हे सत्यच आहे. तसाच तो घोरहि आहे. पण हें सत्य प्रयत्नपूर्वक जाणून घेतलें पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात-संसार असार आहे हें सत्य आहे पण तें तू शोधून पहा. सत्य हें व्यापक आहे. त्रिकालाबाधित आहे. हें कितीहि खरें असलें तरी सूक्ष्म आहे. रस्त्यावर पडलेली वस्तू सहज उचलून घ्यावी तसें स्वरूप सत्याचे नसते. बागेत जाऊन फुले वेंचावींत तसें सत्य सहजपणे सांपडत नाहीं. सर्व चांगली साधनें जन्माला आली तीं सत्याच्या शोधासाठीच. माणसाला त्यासाठींच दीर्घकालपर्यंत आपल्या सर्वशक्तीनिशी, निष्ठेने आणि सातत्याने अथक प्रयास करावे लागतात. माणसाला स्वतःच्या ठिकाणी असलेल्या उणीवामुळे अनेक प्रकारें सत्याचा आभास होत असतो. त्या परिस्थितींत तेवढ्यापुरते तें खरे वाटतें पण तो श्रम असतो. आपल्या कल्पना, आपले विचार विवेकाने पुन्हा पुन्हा शोधून पहावे लागतात. या सातत्याच्या प्रयत्नांचा शीण येतो. माणसाला तो सोसत नाहीं. मग तो बुद्धिवादाचेंच पांघरूण डोक्यावरून घेऊन मुरगुट मारून झोपतो प्रकृत्या भित्री असणारी माणसे तोंडावर पांघरूण घेऊन पडतात. स्वतःला सुरक्षित समजण्याचा त्यांचा तो एक भाबडा प्रयत्न असतो.
स्वतःच्या कल्पना कितीहि योग्य वाटल्या तरी त्याचे पांघरूण घेऊन पडणें हा सत्यशोधनाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा ठरतो. जें चकचकीत दिसते तें सर्व जसें सोने नसतें तसेंच जें आकर्षक वाटतें तें सर्व सत्यहि नसतें. आपला आळस, आपल्या वासना, आपल्या सवयी, आपलें दौर्बल्य यांचा एकत्र वा सुटा परिणाम म्हणून, आकर्षक म्हणून नको त्या गोष्टींविषयी आकर्षण निर्माण होणें आणि तें नाहीसें करणें पुष्कळ वेळां आपल्या हातांतीलहि राहत नाहीं आणि मग भगवंताची प्रार्थना करावी लागते कीं हे भगवान् हिरण्मयेण पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्। तत्त्वम् पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ सोन्यासारख्या आकर्षक वाटणाऱ्या चकचकीत झाकणाने सत्याचे स्वरूप झाकलेले आहे. हें नारायणा ! जगद्रक्षका ! सूर्यदेवा ! कृपा करून तें आपणच दूर करा म्हणजेच सत्यदर्शनाची ओढ असलेल्या मला सत्याचे यथार्थरूप दिसेल.
हें सर्व होण्यासाठी, वाटण्यासाठी, संसाराची असारता केव्हां ना केव्हां तरी माणसाच्या अनुभवास यावी लागते. संसारी जीवनांत तसे प्रसंग अगदींच येत नाहीत असें नाहीं. पण माणूस आपल्या सोयीसाठी तो अनुभव म्हणजे संसाराचा स्वभावच आहे असें न मानतां तो त्या विशिष्ट प्रसंगाचे वा त्या विशिष्ट घटनेचे स्वरूप आहे असें मानतो. व त्यामुळें निराळ्या वेळीं निराळ्या प्रसंगात पुन्हा सुख अनुभवास येईल, आतां नाहीं तरी दुसऱ्यावेळीं मनासारखे घडेल या मोहानें माणूस प्रपंचांत गुरफटून राहतो. आणि मग त्याला तंबाखू दारू, अफू इत्यादि भयंकर पदार्थाचे व्यसन जडावे तसें होतें. या व्यसनामुळे दुष्परिणाम प्रगट होऊ लागतात, तरी सवयी मोडता येत नाहींत. दमा, खोकला याने हैराण झालेला रोगी विडी सोडत नाहीं. यकृत बिघडून अंथरूणाला खिळलेला रोगीहि दारूचा त्याग करू शकत नाहीं. समर्थांनी विषाचे उदाहरण देऊनच हा प्रश्न विचारला आहे. सुख हवें असेल तर विषाचे सेवन करीत राहणे कसें योग्य ठरेल ? जनी विष खातां पुढें सुख कैचे ? हाच प्रश्न ते विचारतात.
द्रव्य म्हणून कोणतेंहि विष वर्ज्य नाहीं. वैद्याच्या हातांत तर त्यांतील कांहीं अमृताचे काम करतात. पण तरी विष, विषच आहे. गहू, तांदूळ, वा दूध, तूप यांच्यासारखा त्याचा उपयोग करणें प्राणघातक ठरणारे असतें. संसाराचे स्वरूपहि या विषासारखेच आहे, हें माणूस लक्षांत घेत नाहीं. विषाचा स्वभावहि मोठा विचित्र आहे. हितकर असें जे दूध त्याचें व्यसन माणसाला लागत नाहीं. पण चहाचे मात्र व्यसन लागतें. दारूसारख्या इतर विषांविषयीं तर बोलावयासच नको. दारूडे परिवारासकट सर्व जीवनाची धूळधाण उघड्या डोळ्याने पाहतात. आणि तरी दारू सोडीत नाहींत. संसाराच्या आसक्तीचे तसेंच आहे. आसक्तीने संसारांत जो जो अधिक रममाण होत जावे तो तो दुःखदैन्याशिवाय दुसरे कांहींहि वाट्यास येत नाहीं. आसक्ति जो जो उत्कट तो तो दुःखदैन्याचे आघातहि बलवान् असेंच घडत जातें. संसारामध्यें आपण ज्यांना आपले म्हणतो त्यांतला खऱ्या अर्थाने आपला कुणी नसतो. सगळे स्वार्थकेंद्रित असतात आणि स्वार्थसाधनाच्यादृष्टीनें सोयीचे म्हणून संबंधात येतात-राहतात. त्यावेळीं वाटणारा गोडवा, दिसणारा जिव्हाळा बहुतांशी वरवरचा असतो, कसोटीला तो टिकत नाहीं, हें लक्षात घेऊन परिवारांत वावरले पाहिजे. म्हणून संसारांत राहावयाचे तें कर्तव्यभावनेने, आसक्तीनें नव्हे.
धर्मराजाने म्हणे नारदांना एकदा प्रश्न विचारला कीं संसारांत राहून सुख कसें मिळेल ? त्यावर नारद म्हणाले-मातरः पितरः पुत्राः बान्धवाः सुहदश्च ये । यत् कुर्वन्ति यदिच्छन्ति चानुमोदेत निर्ममः ॥ आईबाप, घरांतील वडिलधारी माणसे, मुले, बायको, इतर आप्तसंबंधी व इष्ट मित्र जें करतील, जसें वागतील, जें म्हणतील, जें मानतील त्या सर्वाला ठीक आहे असेंच म्हणत राहावे, पण तें निर्मम भावनेने म्हणावें. करा काय हवें तें असें वैतागून म्हणूं नये. कित्येक वेळा परिवारांतील व्यक्तीचे एखादे वर्तन आपल्या विचाराप्रमाणें अत्यंत अनिष्ट असेंहि असूं शकते. त्यावेळीं ठीक आहे हे म्हणणे आपल्या विचारांच्या प्रामाणिकतेच्या दृष्टीनें दांभिकहि ठरूं शकते अशा वेळीं फार तर कोणताहि आग्रह न धरता आपला निषेध नोंदवावा. पण ज्याचें हित त्याला कळतें, कळले पाहिजे, या विवेकाने 'मी म्हणतो तसेंच वागले पाहिजे' असा हट्ट मात्र धरू नये. व आपल्या मनाचा तोल ढळू देऊं नये. हीहि निर्ममताच आहे. हें असें निर्मम भावनेने वागता आलें कीं मग संसाराचा घोर, घोर राहत नाहीं. तो भयप्रदहि नसतो आणि चिंताजनकहि नसतो. बायका-मुलांपासून शरीरापर्यंत असलेला सर्व पातळीवरचा संसार हा मग एक साधन उरतो, सोय म्हणून राहतो आणि परमार्थाला त्याचा अडथळा राहत नाहीं.
संसारातील आसक्ती सुटणे हेंच महत्त्वाचे आहे. बाह्यस्वरूपांतील संसार हा कधी सुटतहि नाही व कधीं सोडावयाचाहि नसतो. वानप्रस्थ किवा संन्यासीहि संसारांतून सुटलेले असतात असें मानणे चुकीचे आहे. त्या अवस्थेंत महंती असेल तर प्रश्नच नाहीं पण महंती नसली तरीसुद्धा शरीर-रक्षण, शरीर-धारण, तर टाकताच येत नाही, तेव्हां संन्याशालाहि संसार असतोच. संन्यासाश्रम हाहि साधनमार्गावरील एक टप्पा असल्यानें त्याचे बाह्योपचार गृहस्थापेक्षा वेगळे असले तरी व्यापाचा विचार करतां तो संसारच असतो. म्हणून संसाराची आसक्ति सोडणे, आसक्ति सुटणे, हें महत्त्वाचें आहे व सारे प्रयत्न करावे लागतात ते त्यादृष्टीनेंच.
संसाराची आसक्ति सुटावी आणि परमार्थाची जवळीक घडावी यासाठी, समर्थ एक श्रेष्ठ साधन चौथ्या चरणांत सांगत आहेत. "करी रे मना ध्यान या राघवाचे" ईश्वराचें ध्यान हा सर्व प्रकारच्या बाधक आसक्तीवरचा एक चांगला उपाय आहे. योगमार्गात सांगितलेल्या क्रमानें ध्यान ही साधना, फार श्रेष्ठ प्रतीची आहे. समाधीच्या अगदीं अलीकडची अशी ती अवस्था आहे. पण त्या ध्यानसाधनेचा उपयोग विशिष्ट प्रमाणांत, विशिष्ट पद्धतीने, परमार्थमार्गाच्या अगदीं आरंभींहि करतां येतो. त्याठिकाणीं थोडीशी स्थिरता, चिंतन, एकाग्रता, असें त्याचें स्वरूप असतें. माणसाने दिवसाकांठीं थोडासा तरी वेळ यासाठीं काढला पाहिजे. वेळ शक्यतो ठराविक असावा. स्थानहि शक्यतो समतल, स्वच्छ, निवांत आणि पवित्र असावें. तेंहि ठराविक असेल तर फार चांगलें. स्वच्छता आणि पावित्र्य यादृष्टीनें तें अधिक उपयुक्त ठरतें. ध्यान करणें व तें ठराविक वेळीं आणि ठराविक स्थानीं करणें हे "अधिकस्य अधिकं फलम्" या दृष्टिने कितीहि महत्त्वाचे असलें तरी वेळेचा आणि स्थानाचा आग्रह ' ध्यानच करीत नाही' अशा स्थितीत परिणत होऊ नये. नेसेन तर पैठणी नाहीतर उघडीच राहीन असें जसें म्हणू नये, तुपाशी खाणे शक्य नसलें तरी उपाशी राहू नये, असें जसें म्हणतात, तसेंच ध्यानाचेंहि जाणावे ध्यानासाठीं वापरावयाचे आसन आपलें आपलें स्वतंत्र असावे. ते स्वच्छ असावें. दर्भाची, गवताची चटई, मृगाजिन, धूतवस्त्र असा क्रम असावा. घोंगडीसारखे लोकरीचे वस्त्रहि उत्तम; त्यांतहि पांढरी घोंगडी अधिक चांगली. या आसनावर पद्यासन, सहजासन, स्वस्तिकासन, किंवा इष्ट तर सिद्धासन घालूनहि बसावे. पाठीचा कणा गीतेने सांगितल्याप्रमाणें 'समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः !' (भ. ६ । १३) अशा स्थितींत सरळ असावा. खांदे सरळ आडव्या रेषेत स्थिर ठेवावेत. दृष्टीसमोर आपल्या इष्ट देवतेचे, संताचे वा गुरुचे चित्र असावें. प्रतिमा असावी किंवा ॐ, श्री, [स्वस्तिक], जाडरेषेनें एकांत एक काढलेली वर्तुळे, असें काहीतरी प्रतीक समोर ठेवावे. मात्र दृष्टीसमोर म्हणजे सरळ ताठ बसून डोळे ज्या पातळीत येतात त्या त्या पातळींत हें प्रतीक नसावे तें सामान्यतः हृदयाच्या पातळीवर स्वतःपासून १ - २ हात अंतरावर असावें. प्रकाश मंद असावा. तुपाच्या निरांजनाचा प्रकाश अधिक लाभदायक ठरतो. या कामी तज्ञाचे मार्गदर्शन शक्य तर घ्यावे. व्यक्ति विशेषाच्या दृष्टीनें नेमकेपणा येण्यास त्याचा उपयोग होतो. नंतर मनामध्ये आपल्या इष्ट देवतेचे स्वरूप वा तिचें नाम याच्याशिवाय दुसरें कांहीं येणार नाहीं या दृष्टी हळूहळू अभ्यास करावा. मनाची एकाग्रता साधण्यासाठी शैथिल्य आणि हट्ट दोन्हीं टोके वर्ज्य समजावी. सातत्य आणि क्रमानें वाढत जाणारा वेळ हे महत्त्वाचें समजावे.
शरीराचे आरोग्य चांगलें असलें, आसने, व्यायाम, प्राणायाम, (दीर्घश्वसन) यांचा अभ्यास ठेवला, ज्याच्यामुळे शरीर मनाचा क्षोभ निर्माण न होईल असें वर्तन ठेवले, आहार-विहार साधे, सात्त्विक ठेवले, म्हणजे ध्यानांतील एकात्मतेचा लाभ हा कमी श्रमांत अधिकाधिक मिळत जातो. मानवी जीवनांत कोणतीहि गोष्ट एकदम साधत नाहीं. परमार्थाचा प्रवास हा हिमालयातील यात्रेसारखा आहे. सर्व दिशांनी उंच सखल वळणे घेत जाणारा असा किंवा गोल जिन्याने चढण्यासारखा असतो. तेव्हां घाई न करतां उपयुक्त त्या सर्व गोष्टी क्रमाक्रमानें साधत जावे व सातत्य ठेवावे. ईश्वराविषयींची भक्ति अंतःकरणांत जितक्या उत्कट प्रमाणांत असेल त्या प्रमाणांत साधनेचे फल विपुल आणि लौकर मिळतें. पण "तुका म्हणे येथें । नाही चालत तातडी । " या वचनाप्रमाणें धीर न सोडता सातत्य सांभाळावे म्हणजे हळूहळू संसाराविषयींची आसक्ति उणावत जाते, अलिप्त राहता येते, आणि मग मनाची प्रसन्नता, अढळ होत जाते. "करी रे मना ध्यान या राघवाचे" या आदेशांत समर्थांना हेच अभिप्रेत आहे.
घनशाम हा राम लावण्यरूपीं । महा धीर गंभीर पूर्ण प्रतापी ॥
करी संकटी सेवकाचा कुढावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
आतां या श्लोकापासून 'प्रभाते मनीं राम चिंतीत जावा' या पालुपदाचे दहा श्लोक क्रमानें येत आहेत. मागच्या ६६ व्या श्लोकाच्या अती "करी रे मना ध्यान या राघवाचे" असे सांगितल्यानंतर ज्याचें ध्यान करावयाचें त्याचें स्वरूप आणि महत्त्व वर्णन करणें आवश्यकच आहे. ध्यानाचे एक महत्त्वाचें अंग असलेली एकाग्रता निर्माण व्हावयाची तर ज्याचें ध्यान करावयाचें त्याची थोरवी, त्याची योग्यता, मनोमन पटलेली असणें भाग आहे. समर्थ या श्लोकांनी ती पटविण्याचें काम करीत आहेत. जातां जातां ध्यानाचे महत्त्व व ध्यानाची अनुषंगिक साधनेहि समर्थ या दशश्लोकी प्रकरणांत सांगत आहेत. समर्थ येथें स्मरणापेक्षां वरच्या पायरीचा आणि ध्यानांत परिणत होणारा, ध्यानाचे अंग असलेला चिंतन हा शब्द वापरीत आहेत.
मनुष्याला स्वतःच्या उद्धारासाठी ज्या अनेक गोष्टी करावयाच्या असतात त्यांत नामस्मरणाचें, भानाचे आणि चिंतनाचे महत्त्व विलक्षण आहे. प्रापंचिक कर्में चांगली व्हावीत, त्यांतील अधर्म उणावत जावा, अंतःकरण शुद्ध व्हावें, विषयासक्ति सुटत जावी, या सर्वांसाठी नामाचे महत्त्व आहे. ईश्वर आणि त्याचें नामरूप हे एकरूपच असल्यानें नामाच्या पोटांत परमार्थाचे सर्व कांहीं येऊन जातें.
जन्माला आल्यापासून संसार हा प्रत्येकाच्या मागे लागलेला आहेच. तो करावाहि लागतो. फार प्रयत्नाने, न कंटाळता आणि उत्साहाने करावा लागतो. त्यासाठीं आपलें मन, बुद्धि, शरीर हे सर्वदृष्टीनें पणाला लावावे लागतें. बहुतेक लोक प्रपंचाचा हा हलकल्लोळ करीत असतातच. अलीकडे या हलकल्लोळाला फारच उधाण आलेले आहे. कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, पुढारी, राज्यकर्ते, अधिकारी सगळे स्वार्थासाठी हलकल्लोळच करीत असतात. ग्रामपंचायती- नगरपालिकांपासून तें विधानसभा, लोकसभेपर्यंत सगळीकडे हा हलकल्लोळच चाललेला असतो. संघर्ष आणि अस्वास्थ्य यांच्या वादळांत समाज ढवळून निघतो. सुख, शांतता दुरावते. असें घडूं नये यासाठीं हलकल्लोळ करणारांना 'देव मस्तकी धरावा !' असे संतानी सागितले आहे. पण तेवढे मात्र होत नाहीं. ' असेल माझा हरी । तरी मज देईल खाटल्यावरी !' या खुळेपणानें कोणी आळशी आणि निष्क्रिय राहतात तर कोणी ईश्वराला न मानतां केवळ स्वार्थाची कास धरून महोद्यम करतात आणि परिणामी वैतागतात. दैव चांगलें कीं प्रयत्न चांगले या प्रश्नाला एकेरी उत्तर संभवत नाहीं. दोन्हीं परस्परपूरक आहेत. त्यांतील प्रयत्न आपल्या हातांत आहेत पण दैवाची जाणीव ठेवली पाहिजे. फलाच्या दृष्टीनें त्याचेंहि महत्त्व आहे. शेतीसाठी केल्या जाणाऱ्या कष्टांना जशी पावसाची अपेक्षा असते तशीच प्रयत्नवादाला ईश्वरनिष्ठेचीहि असली पाहिजे. भारतीय संस्कृतींत ही गोष्ट सर्वांच्या लक्षांत राहावी यासाठीं ईश्वरचिंतनासाठी कांहीं वेळां सुचविल्या आहेत. प्रभातकालीं झोपेतून जागे होतांच, स्नान झाल्यानंतर, जेवणास बसतांना, दिवस मावळतांना, रात्रीं झोपण्यापूर्वी, देणाचे स्मरण प्रेमाने करावें, त्याचें नांव घ्यावें, प्रार्थना करावी, कांहीं स्तोत्रे म्हणावीत अशी आपली पद्धति आहे, होती म्हणू या. पण मनःस्वास्थ्य लाभण्याच्या दृष्टीनें या गोष्टीला फार महत्त्व आहे. प्रातःकाळचा समय स्मरणचिंतन यादृष्टीने उत्तम असतो. ती वेळ साधावी असें समर्थानी मनोबोधाच्या अगदीं आरंभी तिसऱ्या श्लोकातहि सांगितलें आहे आणि आताहि दहा वेळां त्याची पुनरावृत्ति करणार आहेत.
रामाचेच चिंतन, रामाचेच ध्यान कां करावें तें सांगतांना समर्थ म्हणतात माझा राम हा घनश्याम आहे, मेघनीळ आहे. आणि रूपानें लावण्ययुक्त आहे. सावळेपणा हा मेघाचे प्रतीक आहे. मेघ उदार, वर्षाजलानें भरलेला, असा दयार्द्र आणि समृद्धि देणारा, समृद्धि वाढविणारा, सृष्टीचे दैन्यदारिद्र्य नाहींसे करणारा असा असतो. जनसामान्याला हवेहवेसे वाटणारे तेच गुण ईश्वराचेहि ठिकाणी आहेत. ईश्वर रूक्ष नाहीं, कोरडा नाहीं, दयार्द्र आहे, दैन्य घालविणारा आहे. सावळा रंग हा संग्राहकहि आहे. ईश्वर सगळ्यांचा स्वीकार करतो, कोणास नाकारीत नाहीं. हेहि या शाम शब्दाने सुचविले जातें. ज्या ठिकाणीं मन रमते तेथें एकाग्रता लौकर येऊ शकते. ईश्वराच्या रूपसौदर्याचें वर्णन केलें जाते तें यासाठींच. पातिव्रत्याचा आग्रह धरावयाचा तर पति निवडतांना दक्षता घेतली पाहिजे असेंच शास्त्रानें सांगितलें आहे. अव्यंग, अपतित, दशदोषविवर्जित, असा वर निवडावा आणि मग पतिव्रताधर्माने राहावें. ध्यानाचा विषय सुंदर असावा आणि मग एकाग्रता साधावी. त्यामुळे व्रत निभावणे सोपे जातें इतकेंच. लावण्य हा शब्दहि सौंदर्य शब्दापेक्षां अधिक उत्कट आणि मार्मिक आहे. लावण्य हा रेखीवपणा, अधिक आकर्षकता यांच्या एकीकरणातून प्रत्ययास येणारा गुण आहे. अंतःकरणांतील भक्ति जशी वाढत जाईल तशी आराध्य देवतेच्या ठिकाणीं ही लावण्याची प्रतीति सार्वत्रिकपणे येत जाईल. श्रीमतवल्लभाचार्य म्हणतात त्याप्रमाणें "हसितां मधुरं रुदितं मधुरम् । मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥" अशीच भक्ताची अवस्था होते. समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम हा केवळ दिसावयास चांगला, देखणा, आकर्षक आहे एवढेच नाहीं तर तो महाधीर, गंभीर, पूर्णप्रतापी आहे. यांतील प्रत्येक शब्द, प्रत्येक विशेषण, प्रत्येक गुण, फार महत्त्वाचा आहे. धीर म्हणजे टिकून राहणारा, निश्चल. एकदा जें घेतलें, स्वीकारले, मानलें तें न सोडणारा, दृढनिश्चयी. धीर म्हणजे बुद्धिवादीहि, बुद्धिनिष्ठहि. असुरशब्दाप्रमाणें उत्पत्ति करून हा अर्थ सिद्ध करतां येतो. सोयीसाठी बुद्धीनें पारखून घेऊन मग दृढ राहावें असेंहि तात्पर्य धीर शब्दांतून काढता येण्यासारखे आहे. एकूण विचार करतां निश्चलता महत्त्वाची आहे.
दुर्दैवानें स्थैर्य, निश्चय या गुणांचे आज हंसे झालें आहे. तो रजोगुणाचा प्रभाव आहे. सतत पालट परिवर्तन, हाच जणू ध्येयवाद झाला आहे. खरें म्हणजे निश्चित स्वरूपाची ध्येयकल्पना, साध्यकल्पना स्थिर असल्यावांचून परिवर्तन, पालट, प्रगति या शब्दांना कांहींच अर्थ नाहीं. पण तें कुणी लक्षांत घेत नाहीं.
शिखरावर चढेपर्यंत टाकली जाणारी पाऊले यांना प्रगति म्हटलें तरी शिखरावर पोचल्यानंतर टाकली जाणारी पाऊले ही अधःपाताकडे नेणारीच असतात, हें लक्षात ठेवले पाहिजे. पंचवीशी-तिशीपर्यंत होते ती शरीराची खरी प्रगति. त्याच स्थितींत टिकून राहणे महत्त्वाचें. त्यापुढे होणारे शरीराचे परिवर्तन हें नको असणाऱ्या म्हातारपणाचें लक्षण होय. परिवर्तनवाद्यालाहि हा पालट हवासा असणार नाहीं. तेव्हां प्रगतीच्या विकासाचा एक अखेरचा टप्पा असतो तो टिकवून धरला पाहिजे, ठेवला पाहिजे. विरजलेलें दही अधिक आंबट होऊं नये म्हणून शीतकांत ठेवावे लागतें. मात्र ही स्थिरता सत्त्वगुणाची असावी, तमोगुणाची नसावी. हें स्थैर्य टिकवण्यासाठी गांभीर्याची, खोलीची, पूर्णतेची, आवश्यकता आहे. म्हणून समर्थ त्या गुणाचा लगेच उल्लेख करीत आहेत. आपण गंभीर नसतो म्हणून चंचल असतो. घराच्या स्थैर्याच्या दृष्टीनें त्याचा पाया खोल आणि पक्का असावा लागतो. मुळें खोल जाण्यावर झाडाचा विस्तार आणि स्थैर्य अवलंबून असतें. विद्वत्ता ज्ञानाच्या खोलीने मोजावी लागते. आज आपण हेहि विसरलो आहोंत. तात्पुरते, वरवरचे, काम-चलाऊ ज्ञान मिळालें कीं भागले असें आपणांस वाटतें. त्यामुळेंच शिक्षणाला त्याचे खरे स्वरूप उरले नाहीं. परिणाम, विद्यार्थी, विद्यार्थी न राहता परीक्षार्थी आणि पोटार्थी झाला आहे. ज्ञानाला, विद्येला, गांभीर्य आलें असतें तर प्रत्येकाला तंत्रज्ञानासाठी परकीयांच्या तोंडाकडे पहावे लागलें नसतें, परदेशांत जावे लागलें नसतें, परदेशांत शिकून येणारा पदवीधर आतां मी जें शिकून आलो आहे ते शिकण्यासाठीं परदेशांत कुणाला जावे लागणार नाहीं असें म्हणूं शकत नाहीं. राष्ट्रीय दृष्टिकोनांतून ही स्थिति मोठी दुर्दैवी आहे.
नीलकंठशास्त्री थत्ते म्हणून एक महापंडित पेशवाईच्या उत्तर कालांत आपल्या महाराष्ट्रांत होऊन गेले. ते मूळचे न्यायशास्त्राचे विद्वान नैय्यायिक. त्यावेळीं व्याकरणशास्त्र महाराष्ट्रात नव्हतें तें शिकण्यासाठी काशीस जावे लागत असे. ही गोष्ट एकदां नीलकंठशास्त्रींना बोचली. वयाच्या चाळीसाव्या वर्षी ते व्याकरण शिकण्यासाठी स्वतः काशीस गेले. तेथे राहून व्याकरणशास्त्राचें पूर्ण अध्ययन केलें. परत आल्यावर आत्मविश्वासाने त्यांनीं प्रगट केलें कीं आतां यापुढें व्याकरण शिकण्यासाठी कोणालाहि काशीस जावयाचे कारण नाहीं. तेथे शिकावयास मिळेल तें सर्व मी येथें शिकवीन. तेव्हांपासून महाराष्ट्रांत व्याकरणाची परंपरा निर्माण झाली. मागच्या पिढीत होऊन गेलेले म.म.वासुदेवशास्त्री अभ्यंकर हे थोर विद्वान् प्रसिद्ध वैय्याकरणी, श्री. नीलकंठशास्त्रींच्या परंपरेतीलच होते. हा आग्रह प्रत्येक विद्यार्थ्यांनें विद्या शिकतांना धरला पाहिजे. तरच देशाचे त्यांत कल्याण आहे.
गांभीर्य हा गुण विपुलतेचा आणि व्यापकतेचाहि द्योतक आहे. त्यामुळें एक प्रकारची परिपूर्णता त्यांतून सुचविली जाते. पण त्यामुळेंच ईश्वराच्या ठिकाणचा हा गुण आमच्यासारख्या भक्तांना थोडासा अडचणीत टाकणारा आहे. गांभीर्य ज्याच्याजवळ राहते तो वरवरच्या देखाव्याला भाळत नाहीं, फसत नाहीं, आणि आमचा सगळा परमार्थ तर वरवरचा असतो. आमचें बोलणें ओठांतलें, तें पोटातले नसतें. त्यामुळें गांभीर्यगुणाने युक्त असलेले रामचंद्र ते ऐकणारच नाहीत. इतर अनेक दोष ईश्वराजवळ चालतील पण अप्रामाणिकता, दंभ तेथें खपणार नाहीं. भक्त म्हणवितांना आपण किती सावध राहिलें पाहिजे तें यावरून लक्षांत येते.
ईश्वर पूर्णप्रतापी आहे. हा गुण भक्ताच्या दृष्टीनें महत्त्वाचा आहे. शौर्य, पराक्रम, महोद्यमशीलता, कार्यक्षमता त्यांतून सुचविली जाते. त्यामुळें एकदां ईश्वराचे झाले वा ईश्वरानें आपले म्हटलें की भक्ताला मग कशाचीहि चिंता असण्याचे कारण नाहीं. ईश्वराचें सामर्थ्य अलौकिक आहे; तो पूर्णप्रतापी आहे. त्यामुळें अमुक एक प्रकारची आपत्ति आली तर काय करावें हा प्रश्न कधींहि उत्पन्न होण्यासारखा नाहीं. म्हणून समर्थ पुढच्या ओळींत स्पष्टच सांगतात, 'करी संकटी सेवकाचा कुडावा' ईश्वर आपल्या दासाचे, सेवकाचे, संकटामध्ये रक्षण करतो. यासाठीं त्याचेवर पूर्ण विश्वास ठेवून रहावे समर्थांना दास्यभक्ति प्रिय आहे. यासाठींच ते स्वतःला रामदास म्हणवितात.
सर्व साधनांत नामस्मरण जसें सोपे तशी भक्तीच्या सर्व प्रकारांत दास्यभक्ति सोपी. दासाच्या योग्यतेचा, अधिकाराचा फारसा प्रश्न उत्पन्न होत नाहीं. निष्ठा आणि प्रामाणिकपणा तेवढा पुरतो. सख्य, आत्मनिवेदन हे प्रकार त्यामानाने अवघड आहेत. त्यासाठीं योग्यता असावी लागते. अधिकार फार मोठा असावा लागतो. परमार्थांत अहंकाराचे फार वावडे असतें. सेवक आणि दास या भावनेत अहंकाराला मुळांतच वाव राहत नाहीं. यासाठी हनुमंतासारख्या श्रेष्ठांनीहि दास्यभक्ति स्वीकारली. समर्थहि त्याच परंपरेतले आहेत. जवळीक साधण्याच्या दृष्टीनें हा मार्ग फार चांगला. त्यानें सर्व कांहीं साधते दास्यभक्तीचें हें महत्त्व लक्षांत घेऊनच श्रीज्ञानेश्वर महाराजांनी गुरुसेवेच्या निमित्तानें तिचें वर्णन विस्तृतपणे केलें आहे. त्यांतील उत्कटता मोठी विलोभनीय आहे. दास्यभक्ति आपापल्या पातळीवर कोणालाहि साधू शकते. क्रमानें उन्नत व प्रगतहि होतां येते. सख्यभक्ति व कांतासक्ति तशी अवघड. आपण सांगून गेले तरी त्यानें पसंत करून पत्करले पाहिजे ना ! 'सदा कैदाशिणीलाहि, हवा गोविंदसा पति ।' पण गोविंदाने कैदाशीण, पत्नी म्हणून काय म्हणून पत्करावी ? राधेच्या आणि रुक्मिणीच्या स्थानाचा मोह कुब्जेने धरू नये पण दास्य तिलाही करतां येते आणि मग तीहि प्रेम मिळवू शकते कीं जे राधेला आणि रुक्मिणीला मिळालें. म्हणून खरा भक्त दास्य, ही लाचारी समजत नाहीं, भूषण मानतो. तशी संधी मिळाली तर स्वतःला भाग्यवान समजतो. खऱ्या पतिव्रतेला पतीची दासी म्हणून घेण्यांत लज्जास्पद असें कांहीं वाटत नाहीं. म्हणून ईश्वराचें सेवक व्हावे, नम्रपणे दास व्हावे, प्रामाणिकपणे दास्य करावे; म्हणजे मग संकटकाळी ईश्वर पाठींशी उभा राहून रक्षण करतो.
ईश्वर भक्ताचे रक्षण करतो हा अर्थवाद मानण्याचे कारण नाही ते संपूर्णपणें सत्यच आहे. मात्र ईश्वर कोणत्या भक्ताचे रक्षण करतो ते समर्थांनी ' अनन्यास रक्षीतसें च्यापपाणी । ' या मनोबोधाच्या ३५ व्या श्लोकातील चरणाने स्पष्टपणें सांगितलेंच आहे. आमचे रक्षण होते असें आम्हांला विश्वासानें वाटत नाहीं. याचें कारण असें कीं आमच्या रक्षणाच्या कल्पना यथार्थ नसतात, योग्य त्या नसतात. ईश्वर सर्व समर्थ असला तरी सर्वज्ञ असल्यानें केवळ आमच्या इच्छेप्रमाणें वागत नाहीं. आमच्या हिताच्या दृष्टीनें योग्य तसें वागतो. आमच्या स्वार्थसंकुचित मापांत ते बसत नाहीं आणि मग ईश्वराने आमचें रक्षण केले नाहीं असा कांगावा होतो. श्रीकृष्णानें पांडवाचे रक्षण केलें असें आपण म्हणतो. पांडवांचे सर्व जीवन नीटपणे पाहिलें म्हणजे मगच त्यांतील खरें मर्म लक्षांत येईल.
आपल्या अनन्यतेत उणीव असते म्हणून आपला विश्वास डळमळतो. 'जो प्रभू किन्हो सो भल मानो । ' असें वाटणे हीच खरी सद्बुद्धि आहे. सत्पुरुषांच्या संगतींतून परमार्थांच्या निष्ठेतून ती लाभते. ईश्वरचिंतनांतून ती दृढावते. नसली तर जन्माला येते. म्हणून समर्थ सांगत आहेत कीं 'प्रभाते मनीं राम चिंतीत जावा. '
बळे आगळा राम कोदंडधारी । महा काळ विक्राळ तो ही थरारी ॥
पुढें मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥
ईश्वर सर्व समर्थ आहे. आणि त्यासाठीं आवश्यक तीं शस्त्रेहि त्याच्या हातांत आहेत. काय वाटेल तें झाले तरी मी शस्त्र धारण करणारच नाहीं असा गबाळा विचार ईश्वराचा नाही ज्याला हित साधावयाचे आहे त्याला हा गबाळेपणा परवडणाराहि नाहीं. ईश्वराचें अत्यंत श्रेष्ठ असें जें विष्णुसहस्रनाम स्तोत्र त्याचा शेवट "सर्वप्रहरणायुधः " या नामाने झाला आहे. हिंदूंची सगळीच दैवते शस्त्रधारी आहेत. नुसतीच शस्त्रधारी नाहींत तर सर्वशस्त्रभृतांवर आहेत. दत्त या दैवताने कोणाचा संहार केल्याचे उदाहरण नाहीं. पण तरी त्याच्या हातांत त्रिशूल आहे. ईश्वराचें सामर्थ्य कांहीं अलौकिक आहेच (बळे आगळा) पण तें सामर्थ्य निष्क्रिय नाही केवळ तटस्थ नाहीं तर कार्योन्मुखहि आहे. कर्तव्यपरायणहि आहे.
आवश्यकता नसेल तर शस्त्र चालवू नये. शस्त्र ही जातां येतां सहज वापरण्याची वस्तु नव्हेच. शस्त्र वापरण्यापूर्वी सर्वांगीण विचार केलाच पाहिजे. शस्त्राच्या वापरामागे अविवेक असतां कामा नये हें खरेंच पण शस्त्र वापरणारच नाही आणि शस्त्र वापरण्याची इच्छा होऊं नये म्हणून शस्त्रच जवळ ठेवणार नाहीं, हें म्हणणें गबाळेपणाचें आहे.
ईश्वराला भक्ताचे रक्षण करावयाचें आहे म्हणून तो शस्त्रधारी आहे, कोदंडधारी आहे. हें कोदंड धारण केल्याचा परिणाम समर्थ पुढच्याच ओळींत सांगतात, कीं अशा कोदंडधारी रामाला पाहून अत्यंत अक्राळ-विक्राळ फार भयानक असा महाकाळहि भयभीत होतो, पोटांतून घाबरतो आणि भयानें थरथर कापूं लागतो. तेथें सामान्य माणसाची गोष्ट काय मोठी आहे ? कळिकाळालाहि ज्याचें भय, त्याला आपल्या सेवकाचे रक्षण करणें मुळींच अवघड नाहीं. यासाठीं माणसाने ईश्वरावर विश्वास ठेवावा आणि प्रभातकाळीं त्याचें चिंतन करावे.
सुखानंदकारी निवारी भयातें । जनी भक्तिभावे भजावे तयातें ॥
विवेके तजावा अनाचार हेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥
ज्याची भक्ति करावयाची आहे तो प्रभु रामचंद्र सुखकारी आणि आनंदकारी दोन्हींहि आहे असें समर्थ आवर्जून सांगत आहेत. सुख म्हणजे हवें वाटणाऱ्या विषयाच्या उपभोगांतून होणारी जाणीव आणि आनंद म्हणजे परिणामी हितकर असलेल्या गोष्टींच्या स्वीकारानें होणारा लाभ. मनुष्य अपेक्षा कशाची करतो ? त्याला सुखाची जाणीव असते, आनंदाची ओढ असते. आणि मग जीवनामध्यें अनेक प्रकारच्या चुका होत जातात. या चुकांचे परिणाम भीतिदायक असतात. त्यांतूनहि रामभक्तीमुळे सुटका होते हें लक्षांत आणून देण्यासाठी समर्थ रामचंद्राचा "निवारी भयातें ' हा तिसरा गुण सांगत आहेत. हें सामर्थ्य फार महत्त्वाचे असें आहे. भय हाहि माणसाचा भाव नैसर्गिक आहे. आहारनिद्रेप्रमाणेंच जीवनाच्या अगदी आरंभापासून माणसाच्या मनांत भय नांदत असतें. अनेक प्रकारांनी माणसाला तें भेडसावीत असतें. मृत्यु, रोग, दारिद्र्य, अपकीर्ति इत्यादि रूपानें तें जाणवत राहते. भविष्यकाळ हें त्याचें अधिष्ठान असतें. परिवाराची चिंता आणि परिस्थितीची प्रतिकूलता त्याला सहाय्यक होते. अशा वेळीं कोणाचा तरी आधार जीवाला हवासा वाटतो. अनिश्चितता त्याला भेडसावीत असते. विश्वास वाटावा असें आश्वासन मिळाले कीं धीर येतो. ईश्वराच्या ठिकाणीं हा विश्वास दृढ असण्याची शक्यता सर्वांत अधिक म्हणून समर्थ ईश्वराचा तोहि गूण सांगून भयग्रस्त जीवाला आश्वासन देत आहेत.
आतां हे सर्व प्रत्ययाला यावें यासाठीं जीवानें काय करावें याचें मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ सांगतात कीं या लोकामध्ये माणसाने आपल्या हृदयामध्यें उत्कट भक्तिभाव धारण करून ईश्वराला भजावे. माणसे स्वभावतः भजनशील असतात. पण अज्ञानाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संस्काराचा प्रभाव म्हणून हृदयातल्या या सहजभावाचा मोहरा परमेश्वराकडे वळलेला राहत नाहीं. संपत्ति, विषयोपभोग, सत्ता, कीर्ति, कुटुंबपरिवार इत्यादींची प्रलोभने हृदयांतील या नैसर्गिक भावशक्तिला स्वतःकडे खेचून घेतात आणि मग माणूस, माणूस राहत नाहीं. त्याच्या वर्तनांत सरळपणा उरत नाहीं. जें करूं नये, जें टाळावे, तें केलें जातें. अभिलाषा वाढत जातात. हेवा, मत्सर, ईर्ष्या माणसाला अधिकाधिक अनाचारी बनवतात आणि मग जे भजन क्वचित् होते तें भक्तिभावाचे राहत नाही.
हिंदुस्थानामध्ये अनेक तीर्थक्षेत्रे व देवस्थाने आहेत. आळंदी, देहू, शिर्डी, शेगांव अशी संतांच्या महात्म्यानें पुनीत झालेलीं गांवे आहेत. याठिकाणी सहस्रावधींच्या सख्येने लोक जमत असतात. बुद्धिवादी नास्तिकांचा पराभव करून, पूजापाठ, दानधर्म अशीं कृत्ये आचरीत असतात. त्यासाठीं थोडे शरीरकष्टहि सहन करतात. संवयींना मुरड घालून नेहमीच्या व्यवहारातून बाहेर पडतात. द्रव्याचा व्यय अधिक होतो त्याची क्षिति बाळगीत नाहींत. पण तरी हें जें सर्व घडते तें भक्तिभावाचे नसतें, गतानुगतिकतेचें असतें, किंवा सांसारिक वासनांच्या पूर्तीसाठीं ते अवलंबिले जातें. ज्याला भक्ति साधावयाची आहे त्यानें हें टाळले पाहिजे. माणसाने शक्य तर सोन्यामोत्याचे दागिने वापरावेत व मग त्यांचें भूषण मिरवावे, पण माणसे, भूषण मिरविण्यासाठी सोने, मोती नसून सोन्यामोत्याप्रमाणें दिसणाऱ्या हलक्या वस्तूंनाच जवळ करतात; तसेंच भजनाचे होतें. ज्याच्या मनांत मत्सर आणि वर्तनांत अनाचार राहतो, त्याचें भजन हें खरे भजन न ठरत भजनाचे सोंग ठरतें. ज्या भजनाचे मागें सदाचाराचे अधिष्ठान नाहीं, चित्ताची शुद्धता नाहीं, वा त्या दिशेनें प्रयत्नहि केला जात नाहीं, तें भजन एक ढोंग ठरतें. म्हणून माणसाने विवेकाने वागावे आणि आपले वर्तन अधिकाधिक सदाचारी होत जाईल आणि मन शुद्ध, निर्मत्सर राहील असा प्रयत्न जाणून-बुजून करावा. त्याच्यासाठी क्रमाची, सातत्याची, दीर्घकालाची आवश्यकता असते. कितीहि टाकावे म्हटलें, तरी नको त्या गोष्टी एकदम सुटत नाहींत. तो यत्न पायरी-पायरीनेंच करावा लागतो. म्हणून समर्थ 'विवेके तजावा' असे म्हणतात. या विवेकामुळें क्रमाचे भान सुटत नाहीं. सातत्य आणि धीर टिकतो. सकाळी लौकर उठून मनःपूर्वक केलेली प्रार्थना त्यादृष्टीने उपयोगी पडते. म्हणून म्हटलें आहे कीं ' प्रभाते मनीं राम चितीत जावा. '
सदा रामनामें वदा पूर्णकामें । कदा बाधिजेनापदा नित्यनेमें ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७० ॥
पूर्णकामें रामनामें सदा वदा किंवा रामनामें वदा, पूर्णकामें वदा, (या) नित्यनेमे आपदा कदा बाधिजेना असा या श्लोकातील पहिल्या दोन ओळींचा अन्वय आहे. रामाचे नांव हें सर्व कामना, सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. तें सदैव उच्चारा किंवा पूर्णकाम होऊन म्हणजे संसार-सुखाविषयी तृप्त होऊन जेवढें मिळालें आहे आणि मिळतें आहे, तेवढे पुरेसे मानून, अधिक मिळविण्याची अपेक्षा न करतां, निष्काम भावनेने सदैव नामस्मरण करा असें समर्थ सांगत आहेत. पहिल्या प्रकारच्या अर्थाने आर्त व अर्थाथी लोकांची सोय होते. दुसरा अर्थ भाविकाला उन्नतीची दिशा दाखवतो. प्रामाणिक असेल तर आर्त, अर्थार्थी भक्तहि त्याज्य नाहीं. भगवंत स्वतःच 'उदाराः सर्व एवैते' (भ. ७ | १८) असें म्हणून त्याहि भक्तीला प्रतिष्ठा देतात, तीहि भक्ति स्वीकारतात आणि म्हणूनच समर्थानी नाम हें पूर्णकाम, कामना पूर्ण करणारे असें म्हटलें आहे आणि तें खरेंच आहे. जें मिळणे योग्य आहे तें नामाच्या प्रभावाने मिळतेंच मिळते, पण राहवत नसेल तर मागावयासहि अडचण नाहीं. पण प्रामाणिकपणाची कसोटी लागते ती अपेक्षांची पूर्तता होत नाही तेव्हां मात्र कोणत्याहि भावाने जे नाम घ्यावे तें सदैव घेतलें पाहिजे, नित्यनेमानें घेतले पाहिजे. नित्यनेम या शब्दाने एक प्रकारचे व्रताचरण सुचविले जातें. निष्ठायुक्त आग्रह त्यांतून व्यक्त होतो. सदैव नित्यनेमानें असें नामस्मरण जेव्हां होतें तेव्हां आपदा म्हणजे संकटे बाधत नाहींत असे समर्थ सांगतात. संकटें येतच नाहींत असें समर्थ म्हणत नाहींत हें लक्षांत घेतलें पाहिजे. आपत्ती न येणे आणि आपत्ति न बाधणे यांत आकाशपाताळाचें अंतर आहे. आपत्ती येणे न येणे दैवाधीन आहे. दैव प्रबळ, दुर्बल असेल त्याप्रमाणें घडेल. पण आपत्ति न बाधणें हें माणसाच्या स्वाधीनचें आहे. स्थितप्रज्ञ, भक्त, गुणातीत इत्यादीची लक्षणें आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर आपत्ती न बाधण्याची म्हणजेच संकटांतहि प्रसन्न राहण्याची सिद्धि प्राप्त होऊं शकते.
त्यासाठीं मद म्हणजे अहंकार आणि आलस्य म्हणजे कंटाळा हे दोन दुर्गुण सोडून दिले पाहिजेत. मदामुळें, अहंकारामुळे, साधनाचे महत्त्व पटत नाहीं. एवढ्यानें काय होईल, हे कशाला सोडायला पाहिजे, याने काय बिघडते, असें त्याला निरनिराळ्या प्रकाराने वाटत राहते. आळसामुळे सातत्य टिकत नाहीं. नित्यनेम टिकत नाहीं. त्यामध्यें विलक्षण खंड पडतो. कांहीं व्यत्यय येऊन, निमित्त होऊन, नेम चुकतो. अर्थात. मग जें घडते त्याचा विशेष उपयोग होत नाहीं; यासाठीं साधकाने सर्व प्रकारचा अहंकार आणि आळस यांचा त्याग करावा आणि नित्यनेमाने ' प्रभाते मनीं राम चिंतीत जावा. '
जयाचेनि नामें महा दोष जाती । जयाचेनि नामें गती पाविजेती ॥
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥
रामनामाचे माहात्म्य सांगत असतांना व ते विशेषेंकरून प्रभातकाळीं घ्यावें असा आग्रह धरीत असतांना समर्थ म्हणतात कीं रामाचे नाम हें मनुष्याच्या ठिकाणीं असणाऱ्या अनेक प्रकारच्या मोठ्यामोठ्या दोषांना घालविणारे आहे आणि यासाठीं ज्यामुळे या दोषाचे पोषण होईल अशा गोष्टी सकाळी उडून करण्याच्या ऐवजी परमेश्वराच्या नामाचे स्मरण करणें, चिंतन करणें हे, सर्व जीवन शुद्ध, निर्मळ होण्याच्या दृष्टीनें फार उपयुक्त असतें. याच्या उलट आपण शरीर-मनावरील ताण वाढतील, विशेषतः मनाला व्यग्रता येत राहील अशाच गोष्टी करीत राहतो. चहा आणि वर्तमानपत्रे यांच्यापासून दिवसाला आरंभ होतो. ज्या वर्तमानपत्रांमध्ये मनाला अस्वस्थता आणणाऱ्या वार्तांचीच भरमार असते. जगतामध्ये जणू शुद्ध, सात्त्विक, प्रसन्नता वाढविणाऱ्या घटना घडतच नाहींत. हत्या, अपघात, बलात्कार याची विस्तृत वर्णने, नटनट्यांच्या जीवनांतील भानगडी, राजकारणी पुढाऱ्यांची परस्पराच्या निंदाद्वेषानें व स्वतःच्या प्रौढीने भरलेली भाषणे, निरनिराळ्या प्रकारांनी करमणूक करणारांचे सत्कार, याच्याच वार्ता असतात. जें जें चांगलें म्हणून मानलें असेल त्याचें वस्त्रहरण करण्याचाच विडा पत्रकारांनी जणू उचललेला असतो. या सर्वांतून मनाचे अस्वास्थ्य वाढत जातें. आधींच माणसाच्या मनांत कामक्रोधादि विकाराची बीजे किंवा रोपे तरारली असतात त्यांत ही भर. भक्तीचे पोषण होण्यासाठी महर्षि नारदांनी निश्चितपणे एक नियम सांगितला आहे कीं, "स्त्रीधनं नास्तिकवैरिचरित्रं न श्रवणीयम् ।" वृत्तपत्रे नेमके तेवढेच ऐकवतात. मग अस्वास्थ्य वाढेल नाहीतर काय होईल !
अनेक देशांतून भारताचा राजदूत म्हणून काम केलेल्या व्यक्तीने जागतिक परिस्थितीचा आढावा घेतांना म्हटलें आहे कीं 'जगांतील माणसांची मने भ्रांत झालीं आहेत. शांतता आणि समाधान कोठेहि उरलेले नाही'. हे उद्गार एका आधुनिक विद्याभूषित राजदूताचे आहेत. सनातनी परंपरेचा वृथा अभिमान बाळगणारे असे ज्यांना तथाकथित बुद्धिवादी म्हणतात त्या कीर्तनकार प्रवचनकाराचे हे उद्गार नाहींत. त्यामुळें ह्या बुद्धिवाद्यांनाहि ते यथार्थ असल्याचें मान्य करण्यास अडचण नाहीं. या सर्वदूर पसरलेल्या अस्वास्थ्याचीं कारणें शोधू गेले म्हणजे लक्षांत येईल की भारतीय परंपरेने आवर्जून सांगितलेला नामस्मरणादि मनःशांतीच्या उपायांपासून प्रगत आणि शिक्षित म्हणविणारे फार दूर गेले आहेत. सकाळी, संध्याकाळीं, भोजनापूर्वी, रात्रीं झोपण्यापूर्वी नामस्मरण केलें तर मनःशांतीच्या दृष्टीने फार लाभ होतो. कारण माणसाच्या मनांतले मदमत्सरादि महादोष घालविण्याचें सामर्थ्य नामस्मरणांत असतें असें सर्व संतानी आग्रहपूर्वक सांगितलें आहे. तें अनुभवाला धरून असल्यानें वास्तव आहे. तो नुसता अर्थवाद नाही.
नाममहात्म्य गातांना पुराणांनी तर म्हटलें आहे कीं थोडा वेळ केलेल्या नामोच्चाराच्या ठिकाणीं जितकी पातकें घालविण्याचें सामर्थ्य आहे तितकी पातके कोणताहि माणूस करूं शकणार नाही.
नामस्मरणानें नुसते महादोष जातात इतकेंच नव्हे तर त्यामुळें मनुष्याला प्रगतीचा, उद्धाराचा मार्ग स्पष्टपणें दिसू लागतो. त्या मार्गानें जाण्याची आवड निर्माण होते आणि त्या मार्गानें चालण्याची शक्तीहि प्राप्त होते. म्हणून समर्थ 'गती पाविजेति' असें म्हणतात. नामस्मरणाच्या नित्यनेमाने पुण्याचा साठा वाढत जातो आणि त्याच्या बळावर माणसाला पाहिजे तसें सुख-समाधान लाभू शकते. सुखाच्या लाभाचा, पुण्याच्या संचयाशी निकटचा संबंध आहे, नव्हे पुण्यसंचय हेंच सुखाचे प्रमुख साधन आहे असेंहि म्हणतां येईल.
वाईट काय आहे तें कळले, वाईटाला वाईट कां म्हणतात तें कळले कीं मग वाईटाकडची प्रवृत्ति सहजपणे उणावत जाते. जाणीव जितकी उत्कट तितका त्यागहि त्वरेने घडतो. अन्नांत प्राणघातक विष मिसळले आहे हें कळताच मनुष्य जसा पंचपक्वान्नाचें ताट फेकून देतो तसेंच दुर्वर्तनाचेहि होऊं शकते. म्हणून नामस्मरण नित्यनेमाने केलें पाहिजे. निदान प्रभातकाळी तरी रामाचे चिंतन हटकून केलें पाहिजे. त्या योगानें चांगल्या-वाईटाचा विवेक वाढतो. सदाचरणास बळ लाभते.
न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांहीं । मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं ॥
महा घोर संसार शत्रु जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
रामनामाची महती पटवून देतांना, रामनामाची सुलभता समर्थ आणखी एका प्रकाराने सांगत आहेत.
एखादी गोष्ट कर असें माणसाला सांगितलें, कीं तो तिचें मूल्यमापन करतो. ही गोष्ट कशाकरिता करावयाची ? त्यामुळें प्रत्यक्ष लाभ काय होईल ? ती गोष्ट करण्याकरितां किती श्रम होतील ? किती कष्ट पडतील ? पैसे किती वेंचावे लागतील असा विचार मनुष्य करतो. प्रत्येक माणूस धंद्याने व्यापारी नसला तरी वृत्तीनें तसाच असतो. अर्धा पाऊणशेर भाजी घ्यायची असली तरी तास दीड तास हिंडून सारी मंडई शोधणारे लोक असतात.
माणूस तसा सर्वत्रच हिशोबी असता तर त्याची ही वृत्ति नैसर्गिक स्वभाव म्हणून क्षम्यहि मानतां आली असती, पण तसें नसतें. जी गोष्ट माणसाच्या आवडीची असते, जिचे त्याला व्यसन असतें, तिच्या संबंधांत तो वेळेचा, श्रमाचा वा पैशाचा थोडाहि विचार करीत नाहीं. धूम्रपानासारखे साधे सध्या मानलें जाणारे व्यसन किंवा पत्ते खेळण्याचा नाद यांत पैशाचा आणि वेळेचा होणारा अपव्यय माणूस कधीं लक्षांत घेत नाही. पण त्याच्या आत्यंतिक हिताची एखादी पारमार्थिक गोष्ट करावयास सांगितली कीं त्याचा सर्व हिशेबीपणा जागृत होतो. खरोखरीच रामाचे नांव घे म्हणून सांगतांना तें याप्रकारे पटवून देण्याचा प्रसंग समर्थांवर यावा या गोष्टीचीच माणसाला लाज वाटली पाहिजे, पण आहे ती वस्तुस्थिति नाकारण्यांत कांहीं अर्थ नसतो.
समर्थ म्हणतात-सकाळी उडून नित्यनेमाने परमेश्वराचे चिंतन कर; त्यांत तुझ्या पदरचा एक नवा पैसाहि खर्च होणार नाहीं, उलट भलत्यासलत्या गोष्टी करण्याची इच्छा कमी झाल्यामुळें विषयोपभोगासाठीं कळत न कळत होणाऱ्या वारेमाप उधळपट्टीला थोडा तरी आळा बसत जाईल.
एकदां एका गृहस्थाने एका चांगल्या प्रभावी कीर्तनकाराला सांगितलें कीं तुमची कीर्तने ऐकण्याची गोडी लागल्यापासून माझा चित्रपट, नाटक पाहण्याचा नाद उणावला. महिन्याकांठी पाचदहा रुपये तरी वाचले. दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी वाचण्यांतहि आनंद आहे हे अनुभवास आले आणि त्यामुळें पत्ते खेळण्याच्या नादामध्ये जाणारा वेळ वाचला. रामाचे नांव असें अगदीं व्यावहारिक दृष्टीनें रुपये, आणे, पैच्या भाषेतसुद्धा लाभदायक ठरूं शकेल.
दुसरी सोयीची गोष्ट म्हणजे देवाचे नांव घेण्यांत कांहीं कष्ट नाहींत, शरीर श्रमवावे लागत नाहीं, घाम येत नाहीं, असे हें विनाकष्टाचें साधन आहे.
येथें माणसाला एक विचित्र शंका येते. ज्याच्यासाठी पैशाचा व्यय होत नाहीं, जें फुकट लाभते आणि जी गोष्ट करता-मिळवताना कष्टहि होत नाहींत, ती वस्तु तुच्छ वा निरुपयोगीच असली पाहिजे. अशी शंका येऊ नये म्हणून समर्थ सांगतात-देवाचें नांव असे फुकटचे आणि सोपे असले तरी परिणामाच्या दृष्टीनें मोलाचे आहे, फार महत्त्वाचे आहे, अत्यंत उपयुक्त आहे. ते कुचकामाचे आहे असें वाटूं देऊं नका. रामनामाच्या प्रभावाने संसारासारखा माणसाच्या सतत मागे लागलेला महाभयंकर असा शत्रु सहजपणे जिंकता येतो. संसार हा शत्रु तर आहेच. अनेक चिंता, व्यथा, अस्वस्थता त्यामुळेंच माणसाच्या मागे लागतात. पण त्याला महाघोर, फार भयंकर, शत्रू असें जें म्हटलें आहे त्याचें कारण असें आहे कीं संसार मागे तर लागतो, मानगुटी तर बसतो, त्याचें ओझे वाहता वाहता मनुष्य थकून जातो, पण हें सर्व नको तें घडत असतांना संसार शत्रु आहे असें वाटत नाहीं. शत्रूचे शत्रुत्वच लक्षांत न येणे हीच यांतील मोठी घातकता आहे. म्हणूनच तो भयंकर ठरतो. रामनामाच्या गोडीने संसाराचे हें स्वरूप उघड होऊं लागते शत्रूचे शत्रुत्व लक्षांत आलें म्हणजे प्रतिकाराची क्षमता वाढते. सामर्थ्य वाढविता येतें. तेव्हां हा संसारासारखा घातकी शत्रु जिंकण्यासाठी रामाच्या नावाचे चिंतन करावें.
देहेदंडणेचें महा दुख आहे । महा दुख ते नाम घेतां न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥
आपल्या कडील तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे देह म्हणजेच मी असें कोणी सहसा मान्य करणार नाहीं. पण प्रत्यक्ष व्यवहारांत वागतांना मात्र बहुतेक माणसे देहात्मवादी वृत्तीनेच वागत असतात. तें स्वाभाविकहि आहे आणि कांहीं प्रमाणांत तें उपयुक्तहि आहे. देह म्हणजे मी नाहीं हे पटण्यासाठी अनुभवाचे क्षेत्र उंचावत जावे लागतें, व्यापक व्हावें लागतें. अनेक कारणांमुळें तें सगळ्यांना साधत नाहीं. सूर्य फिरत नाहीं, पृथ्वी फिरते हें कितीहि खरें असलें तरी सूर्याची गति डोळ्याने दिसते, पृथीची गति कधीं जाणवत नाहीं. अनुभव असतो तो देहाच्या मीपणाचाच आणि त्यामुळेंच देहाला कष्ट देणें, देहाला श्रमविणे, माणसाला दुःखदायक वाटतें आणि तो तें टाळतो. शरीराची सुखासीनता तो शोधीत असतो. त्या दृष्टीनें तो प्रयत्न करीत असतो. प्रत्यक्ष सिद्ध अशा देहाच्याच आरोग्याच्या दृष्टीनेहि ही सुखासीनता लाभदायक आहे कीं नाहीं याचाहि विचार मग माणूस करीत नाहीं. माणसाच्या या देहाला सुखविण्याच्या स्वभावाची पुरेशी कल्पना असल्याने समर्थ म्हणतात- देहाला त्रास देणे, कष्ट देणे, हें तुला देहदंडासारखे आणि दुःखदायक वाटते ना ! रामाचे नांव घेतांना तें भय बाळगू नको. त्याने शरीराला कष्ट तर कांहीं होणार नाहींतच पण इतर कांहीं कारणानी शरीराला व्यथा, वेदना, कष्ट जाणवत असतील तर तें दुःखहि या नामस्मरणाच्या नादांत निश्चितपणे नाहींसे होईल. प्रत्यक्ष भगवान शंकरांना हा अनुभव आला आहे. समुद्रमंथनाच्या वेळीं निर्माण झाले महाभयंकर हलाहल विष श्रीशंकरांनी जगाच्या कल्याणासाठी प्राशन केले त्या भयंकर विषाचा परिणाम त्यांनाहि भोगावा लागला. विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ काळानिळा झाला आणि त्यांच्या शरीराचा दाह होऊं लागला. अमृतमय चंद्राची कला मस्तकी धारण केली. जे स्पर्शाला फार गार आहेत असें साप गळ्याभोंवती गुंडाळले, हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावर वसती केली पण तिथल्या विलक्षण गारव्यानेंहि विषामुळे निर्माण झालेला दाह नाहींसा झाला नाहीं. शेवटीं नारदांच्या सांगण्यावरून त्यांनीं रामनामाचा जप आरंभिला आणि त्यांचा दाह नाहींसा झाला आणि तेव्हांपासून भगवान् शंकर हे अखंडपणे रामनामाचे चिंतन करीत असतात असा या रामनामाचा प्रभाव आहे.
मोठ्या माणसाचा अनुभव उद्धृत केला म्हणजे सामान्यांचा त्याच्यावर विश्वास बसतो. यासाठीं समर्थांनी श्रीशंकराचें उदाहरण घेतलें आहे. शंकर ही फार थोर विभूति म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये मान्यता पावलेली आहे. तथाकथित आधुनिक संशोधकांनीं त्यांना अनार्याची मूलदेवता ठरविण्याचा प्रयत्न केला असला तरी विवेकी माणसाने त्यामुळें बुद्धिभेद होऊ देऊं नये. शंकर ही अनार्यांची देवता होऊं शकत नाहीं. रानटी माणसाच्या दैवतकल्पना कधीं उच्च पातळीवर गेलेल्या नसतात. शंकराचे व्यक्तिमत्त्व हें लोकविलक्षण वाटलें तरी सर्व प्रकारच्या भव्यतेने आणि उदाततेनें परिपूर्ण आहे. आपण त्यांना सर्व प्रकारच्या ज्ञानाचें उगमस्थान म्हणतो.
त्या त्या ऋषिमंडळींना प्राप्त झालेले सर्व प्रकारचे ज्ञान-विज्ञान हें भगवान शंकरांच्या कृपेने मिळाले आहे अशी नोंद आपल्या परंपरेमध्ये सर्वत्र आहे. त्यांच्या थोरवीविषयी भारतीय मनांत थोडाहि संशय नाहीं. अगदीं अलीकडे होऊन गेलेल्या एका बलदंड समाजवाद्यालाहि शंकरांच्या या महत्तेस मान्यता द्यावी लागली आहे. शंकरांची ही थोरवी लक्षांत घेऊन समर्थांनी त्यांचें उदाहरण दिले आहे.
थोरांच्या अनुभवाचा प्रभाव पडणें हें मनुष्यस्वभावाला धरून आहे. आपल्या भारतीय परंपरेतील थोरांची थोरवी जरी कांहीं आधुनिक सुशिक्षितांना मान्य होत नसली तरी आपल्या परंपरेतील श्रेष्ठ तत्त्वांचे प्रतिपादन करीत असतांना नोबल पारितोषिक मिळविणाऱ्या कोण्या एका शास्त्रज्ञाचे उदाहरण दिले कीं हे बुद्धिवादी म्हणविणारेहि एखाद्या श्रद्धावंत भाविकाच्या थाटांत हो हो ! म्हणून मान डोलावून मान्यता दर्शवितात. अशांनी तरी, आपल्या परंपरेतील थोरांची नावे आदरणीय मानणाऱ्यांना नावे ठेवू नयेत.
भगवान् शंकरांना ज्या नामाच्या प्रभावाने स्वस्थता लाभली ते रामनाम सकाळी उठून नियमानें घ्यावे असें समर्थांचे आग्रहाचे सांगणें आहे.
बहूतांपरीं संकटे साधनाची । व्रतें दान उद्यापने तें धनाची ।
दिनाचा दयाळ मनीं आठवावा ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥
परमार्थमार्गामध्ये प्रगतीसाठी अनेक प्रकारची साधनें सांगितली जातात. अनेक प्रकारचे मार्ग आहेत. तपश्चर्यादि अनुष्ठाने आहेत. तीर्थयात्रा आहेत. अनेक प्रकारच्या देवतांच्या निरनिराळ्या उपासना आहेत. वाममार्गी शाक्तांचा, कौलांचा व कापालिकांचा महाभयंकर असा वामाचार आहे आणि त्या त्या पद्धतीचा पुरस्कार करणारे संप्रदाय आहेत. त्या त्या पद्धतीचे आकर्षण असणाऱ्या प्रवृत्तीचे लोकहि आहेत. समर्थ या सर्वांचा नाना प्रकारच्या संकटानी भरलेली साधनें या स्वरूपांतच उल्लेख करतात. यामध्यें तंत्राचा कांटेकोरपणा फार, विधिनिषेधांचे नियम कडक, शरीरावर आणि मनावर ताण पडेल असें प्रसंग फार आणि थोडे चुकताच सर्वनाश होण्याचे भय त्वरित सिद्धीच्या लाभाला भुलल्यामुळे या अशा पद्धतीच्या मागे लागून स्वतःचें नुकसान करून घेणारे साधक अनेक वेळां भेटतात. हातापायाला कापरे भरणे, नाना प्रकारच्या वेदना होणें, वेड लागणे, परमार्थ बाजूला राहून केवळ स्वैर दुर्वर्तनाने जीवन व्यापले जाणे अशा प्रकारचे कितीतरी धोके या मार्गानें जाणाऱ्यांना भोगावे लागतात. खरा लाभ एकीकडेच राहतो.
नाना प्रकारची व्रतें, उद्यापनें, अनुष्ठाने यांनीं चित्तशुद्धीचा कांहीं उपाय करावा म्हटलें तर तेहि कामी येत नाहीं. एक तर याकरितां फार पैसे लागतात. सगळी साधनें शास्त्रोक्तरीत्या जमविणे फारच महाग पडते आणि कष्टाचेंहि ठरतें, स्वतःला त्या व्रतादींचें पुरेसे ज्ञान असत नाहीं. त्यासाठीं लागणारे मंत्र येत नाहींत, तंत्र कळत नाहीं. कोण्या ब्राह्मणावर भरंवसावे तर तोहि धंदेवाईक असतो. त्याला व्रताच्या यथासांगतेपेक्षां त्यांतून स्वतःला होणाऱ्या दक्षिणादि लाभाचेच आकर्षण असतें. यजमानालाहि तितकी निष्ठा नसतें. त्यालाहि काहीतरी थातुरमातुर करून व्रतादि गोष्टी पार पाडल्याचे समाधान आणि धार्मिक म्हणून मिळणारा लौकिक तेवढाच बहुधा पाहिजे असतो. या निमित्तानें केलें जाणारे दानहि २५ पैशाच्या गोप्रदानाच्या स्वरूपाचें असतें. दानदक्षिणेसंबंधींचा शास्त्रीय नियम असा आहे कीं त्यासाठीं होणारा व्यय हा यजमानाच्या श्रीमंतीला साजेसा असला पाहिजे. दक्षिणा ही इतक्या कामाकरिता इतकी अशा स्वरूपाची मजुरी नाही. पण माणसाच्या स्वभावांतील सगळी काटकसर आणि भागवाभागवी या धार्मिक स्वरूपाच्या व्रतादीवरच कोसळते. या व्रतदानाकरितां वेचला जाणारा पैसाहि बहुधा उत्तम व्यवहारानें व न्याय मार्गानें मिळविलेला नसतो. अर्थातच व्रतादीचे तंत्रमंत्र संभाळले गेले तरी साधनें अशुद्ध असल्यानें त्याचें फल पाहिजे तसें मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात या भानगडीत पडताच कशाला ? परमात्मा दीनाविषयीं दया बाळगणारा आहे. दीन म्हणजे अकिंचन, दुबळा, असमर्थ. ज्याला पडतील ते कष्ट उचलण्याइतकी शरीराची वा मनाची उभारी नाहीं किंवा आवश्यक तो खर्च करण्याइतकीहि संपत्तीची अनुकूलता नाहीं. तेवढी निष्ठा नाहीं. तेवढी उत्कटता नाही. इच्छा आहे, पण प्रयत्नांची क्षमता नाही. अशा दीन माणसांच्या उपयोगी पडणारे नामासारखे दुसरें साधन नाहीं.
भगवान् दयाळू आहे. माणसातील उणीवांची त्याला चांगली जाणीव आहे. त्याच्या अंतःकरणांत क्षमा राहते. तो संभाळून घेतो. साधकाकडे आपलेपणाने पाहतो. त्याचें औदार्य व्यापक आहे. तेव्हां माणसाने इतर अवघड साधनांच्या नादी न लागता मनानें, असेल तेवढ्या भावाने, नामस्मरण करावें.
समस्तामध्ये सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधून पाहे ॥
जिवा संशयो वाउगा तो तजावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥
परमेश्वराचें नांव हें साराचे सार आहे. तें वरवर दिसावयाला अगदीं साधे, सोपे वाटत असल्यानें त्याचें खरें महत्त्व सहजासहजी लक्षांत येत नाही. म्हणून समर्थ आवर्जून सांगत आहेत कीं बाबा ! सर्व साधनामध्यें, परमेश्वराचें नांव हें सारभूत आहे. वेद-श्रुति-उपनिषदे-पुराणे-नाना प्रकारची शास्त्रें, संतांची वचनें या सर्वांचा धांडोळा घेतला असतांना खरें हातीं लागतें ते एक नाममहात्म्यच. समर्थांसारखे महात्मे सांगतात त्यावर विश्वास बसत नसेल तर स्वतःहि शोधून पाहण्यास हरकत नाहीं. शेवटीं सर्वांचे सार म्हणून हातीं लागतें तें देवाचे नांव. संतांनी जें सांगितलें तें अनुभवांतीच सांगितलें आहे. त्याकरिता त्यांनीं स्वार्थत्यागपूर्वक दीर्घकालपर्यंत तपश्चर्या केल्या आहेत, देशस्थिति पाहिली आहे, साधने धुंडाळली आहेत, बारीक सारीक अंशोपअंशावर पुष्कळ चिंतन केलें आहे आणि शेवटी समाजाचा विचार करून निर्णय दिलेला आहे कीं सगळ्या साधनांमध्ये खरोखरीच नाम हेंच सार आहे. श्रीसद्गुरू तुकाराममहाराज तर स्पष्टपणेच सांगतात- "वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि साधिला । विठोबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ॥ सकल शास्त्रांचा विचार । अंती इतुकाचि निर्धार ॥ अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥" पण इतकें जीव तोडून सांगितलें तरी माणसाला तें पटत नाहीं, त्याचा विश्वास बसत नाहीं, हें आश्चर्य आहे. भरमसाट जाहिरातीवर आणि आकर्षकपणे मांडलेल्या दुकानांतील शृंगारावर भुलून माणसे भोळेपणाने रुपयाची वस्तु पांच रुपयाला घेतात, आणि तींच माणसे संतवचनांचा विचार करतांना मात्र बुद्धिवादाचा आव आणतात.
संशय घेऊंच नये असें समर्थ म्हणत नाहीत. जें कांहीं ऐकले, वाचले, अनुभवास आलें, त्यावर चिंतन करीत असतांना विचारी माणसाच्या मनांत प्रश्न उत्पन्न होतातच. ते उत्पन्न झालेच पाहिजेत. ज्याला असें कां अशी शंका येत नाहीं, प्रश्न विचारावेसे वाटत नाहींत, त्यांची प्रगति खुंटल्यावांचून राहत नाहीं. म्हणून विचारी माणसाने जाणत्या व्यक्तीला प्रश्न विचारलेच पाहिजेत. अनेक प्रकाराने छेडलेच पाहिजे. गबाळेपणे ऐकावे आणि भोळेपणाने मानावें हा बावळटपणा परमार्थांत चालत नाहीं.
उपनिषदांमध्ये एक फार बोधप्रद कथा आहे. आत्मज्ञानानें सर्व कामनांची प्राप्ति होते आणि सर्व लोकांवर सत्ता प्रस्थापित होतें, असें ऐकून असुरांचा राजा विरोचन आणि देवांचा राजा इंद्र आत्म्याचे ज्ञान मिळविण्यासाठी प्रजापतीकडे गेले. ब्रह्मचर्य पाळून ३२ वर्षेपर्यंत प्रजापतीची सेवा केली. प्रजापतीने त्यांना पाण्यानें भरलेल्या पात्रांत डोकावून पाहण्यास सांगितलें आणि म्हटलें हें जें तुम्हांस पाण्यांत दिसते आहे तोच आत्मा. प्रजापतीसारख्या गुरूने सांगितलें म्हणून, हो म्हणून दोघेहि परतले. तें पाहून प्रजापतीला वाईट वाटलें. प्रजापति म्हणाला, कसे खुळे आहेत हे ! मी जे सांगितले तेच यांनी काहीहि विचार न करतां पत्करले. आतां जीवनाचे खरे श्रेय यांना कसें लाभणार ? यांचा पराभव होईल. विरोचनानें "गुरूने सांगितलें" या वाक्याचा आधार घेऊन आपल्या सोयीचा देहात्मवाद पत्करला, इंद्र मात्र जातां जातां गुरूंच्या वाक्यावर विचार करीत होता. प्रतिबिंब पडलें तें देहाचे व देहाला आत्मा मानणे त्याला योग्य वाटलें नाहीं. कारण आत्म्याच्या वर्णनांत अभय आणि अमृत अशीं लक्षणें सांगितली गेली होतीं. शरीराला अनेक प्रकारची भयें असतात. आणि तें अमरहि नसतें. तेव्हां इंद्र परत आला. प्रजापतीनें विचारले; अरे समाधान पावून गेला होतास. पुन्हा परत कां आलास ? इंद्रानें आपली शंका सांगितली आणि मग गुरूने त्याला अनेक वेळां तप करावयास लावून पायरीपायरीने आत्मज्ञानाचा उपदेश केला.
जिज्ञासू-भावाने शंका घ्याव्या आणि प्रश्न विचारावे ही वृत्ति अधिकारी पुरुषांनाहि अपेक्षितच असते. म्हणून परमार्थामध्ये संशयच घेऊं नये असें समर्थ म्हणत नाहींत. वावगा, नाठाळपणाचा, आपलेंच म्हणणें खर्रे करण्याच्या वितंडेचा, निःस्वार्थी, तपस्वी, कनवाळू असा पुरुषांचीचे ऐकावयाचें नाहीं अशा दुराग्रहाचा, संशय नसावा, एवढीच समर्थांची अपेक्षा आहे. आम्ही कोणाचे ऐकत नाहीं, आम्ही कोणाचें मानीत नाहीं, आमच्या बुद्धीला पटते तेंच आम्हीं खरें मानतों, असें म्हणणें बहुधा प्रामाणिकपणाचें नसतें. जें सत्य आहे त्याचा साक्षात्कार पूर्वी कोणाला झाला नव्हता आणि माझ्याशिवाय कोणाला होणार नाहीं हा अहंकार व्यर्थ आहे. तो मूर्खपणा तरी आहे वा दंभ तरी आहे. म्हणून समर्थ म्हणतात-वावगे संशय टाका, आणि शोधून पहा. नाम हेंच सार आहे असें तुमच्या प्रत्ययास येईल. प्रयोगपद्धतीला, शोधून पाहण्याच्या प्रक्रियेला, काहीतरी गृहीतकृत्य स्वीकारावेंच लागतें. वावग्या संशयाचा माणूस तेंहि पत्करीत नाहीं. त्यामुळे तो चालूच शकत नाहीं. पोचायचे स्थान, मार्ग आक्रमिल्यानंतर मिळावयाचे असतें. जेथून निघावयाचें तेथून, पोंचावयाचें गांव कधीं दिसत नाहीं. मार्गदर्शकावर विश्वास ठेवूनच रस्ता चालावा लागतो. आणि मग एकेक खाणाखुणा पटत पटत रस्ता योग्य आहे कीं नाहीं तें कळू लागते. आंधळेपणाने चालणें जसें चालणें नव्हे तसें डोळसपणा म्हणजे सगळे दिसलें तरच जाऊं असेंहि म्हणणें योग्य नाहीं.
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥
' प्रभाते मनीं राम चिंतीत जावा' हें मनोबोधांतील प्रकरण मोठे मधुर आहे, फार हितकर आहे आणि साधकाला धीर देणारे आहे. त्याचा शेवटचा श्लोक फार महत्त्वाचा आहे, ईशचिंतनाची अलौकिकता सांगणारा आहे.
माणूस सुखासाठी, समाधान लाभावे म्हणून अनेक गोष्टी करीत असतो. त्यांत ऐहिक आणि पारमार्थिक दोन्हींचाहि भाग असतो. शंभर टक्के नास्तिक माणसे अजून जन्मास यावयाची आहेत म्हटलें तरी चालेल. कशावर तरी त्याचा विश्वास असतो. मानव्यावर, माणूसकीवर आमचा विश्वास नाही असें म्हणण्याचें धाडस आजच्या काळांत बुद्धिवादीहि करूं शकणार नाहींत. समाजाची सेवा, अपंगांना सहाय्य, दलितांचा उद्धार, सर्वोदय, अन्त्योदय यांतले काहीतरी केल्यावांचून वा करतो असें दाखविल्यावांचून, निदान या अशा कार्याविषयी सहानुभूति दाखविल्यावांचून, त्यांना प्रोत्साहन दिल्यावांचून, आजच्या बुद्धिवाद्यात्महि राहवत नाही. या गोष्टीहि कुणी प्रामाणिकपणे करीत असेल तर तोहि धार्मिकच आहे. ईश्वराची सेवाच करीत आहे असेंच मी मानतो संतानींहि "जे कां रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोच साधू ओळखावा । देव तेथीच जाणावा ॥ " असेंच म्हटलें आहे. समाजसेवेची अनेक अंगोपांगे आहेत. आपल्या संस्कृतीतील पूर्त या कल्पनेंत त्या सर्वांचा समावेश होतो. माणसाने इष्टासह तेंहि आचरावे असेंच आपला धर्म सांगतो. त्याकडे दुर्लक्ष झाले असेल, त्यालाहि कांहीं कारणें असतील पण समाजाच्या तें लक्षांत आणून देणे इष्टच ठरेल.
या कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या माणसांना तरी समाधान लाभते कां ? अनुभव तसा नाही. प्रामाणिक सहकार्याच्या अभावीं, सहकाऱ्याच्या स्वार्थलोलुप्ततेमुळें, ज्यांच्याकरितां कष्टावयाचे त्यांच्या उन्मत्तपणामुळें व अडाणीपणामुळे, वैतागलेले, विटलेले, नको, हें पुरे, हें असें वाटणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. वैयक्तिक सुखाचा त्याग करून त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतलें पण तेथेहि दंभाचे दर्शन झालेंच. म्हणजे त्यांच्या दृष्टीनें पूर्ण इहवादी असलेला हा त्यागहि सार्थकी लागलाच नाहीं, सांग झालाच नाहीं.
कोणत्याहि त्यागाचे असेच होतें. परिस्थितीची प्रतिकूलता, साधनांची अपूर्णता, शरीराचे दौर्बल्य, चित्ताची चंचलता, बुद्धीची अस्थिरता, कंटाळा, आळस इत्यादि इत्यादि कारणांनी जें जें कांहीं करू जावे तें ते सर्व अर्धवट होतें, यथासांग होत नाहीं. यशापयशाविषयींची तटस्थता न बाणल्यामुळें माणसे स्तुतीने हुरळतात, निंदेने खचतात, इतराच्या दोषाने वैतागतात, त्यामुळें कुठेच समाधान लाभत नाहीं. मग तें सामाजिक कार्य असो किंवा यज्ञादि कर्म, दानपूजादि धर्म, योगादीचा अभ्यास, नाना प्रकारची व्रतें वा तीर्थयात्रा असें धार्मिक, पारलौकिक समजलें जाणारे कृत्य असो. कांहींहि यथासांग होत नाहीं.
यांतील कांहींच नको म्हणून पूर्ण देहात्मवादी बनून कुणी केवळ ऐहिक सुखोपभोगाच्या मागें लागतो म्हणेल तर तेहि त्याला पूर्णता आणि तृप्ति लाभत नाहीं. भोग 'तृप्त' करीत नाहींत. साधनें पुरी वाटत नाहींत, हांव वाढतच जाते आणि त्यामुळे इतरांच्या दृष्टीनें ऐश्वर्यांत असलेला माणूसहि असमाधानीच असतो. त्याच्या भोग भोगण्यांतहि पराक्रम नसतो, वैभव नसते, विलासी रसिकता नसते, तेहि मिळमिळीतपणाचा राहतो. झोकून दिल्यामुळे मिळणारे उत्कट सुख तेथेहि मिळवता येत नाहीं. कांहीं भोगांची तर केवळ कल्पनाच राहते. नुसती स्वप्नेच ठरतात तीं ! कांही म्हणजे कांहीं हातीं लागत नाहीं. भर्तृहरी वैतागून म्हणतो तसे- "मातुः केवलमेव यौवनवनोच्छेदे कुठारा वयम्" असेंच म्हणावेसे वाटतें. भोगांत तरी सांगता आहे कुठे ? दुबळ्या शरीरामुळे उपस्थित भोगांचाहि पुरेसा स्वाद घेतां येत नाही, असेंच होत राहते.
आपल्या प्रकृतीप्रमाणे, आवडीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, करावें वाटेल तें अवश्य करीत राहावें, पण त्या सर्व गोष्टींची पूर्तता ईशस्मरणाने होतें हें विसरू नये. माणसाचे कोणतेंहि ऐहिक किंवा पारलौकिक कृत्य "स्मरणादेव तद्विष्णोः संपूर्णं स्यात् इति श्रुति; " विष्णूच्या स्मरणानेंच, ईशचिंतनानेंच संपूर्ण होतें असें वेदानेच सांगितलें आहे. समर्थ म्हणतात या वचनावर विश्वास ठेवावा. ईशस्मरणानें सर्व कृत्यांची, सर्व कर्मांची, सर्व कर्तव्यांची उणीव दूर होऊन ती सांग होतात हें म्हणणें अगदीं यथार्थ आहे.
नामस्मरणामध्यें मन एकाग्र होत नाही, न होऊं दे. सकाळी उठल्याबरोबर अर्धी घटका नित्यनेमानें नाम घ्यावें. दिवसाकाठी मिळेल तो रिकामा वेळ नामस्मरणांत घालवावा. झोपण्यापूर्वी शय्येवर शांतपणे सरळ बसून ईशचिंतन करावे या नित्यनेमामुळे जीवन पालटते आहे, मनाची प्रसन्नता वाढते आहे, असा अनुभव निश्चित येईल. लहान मुले रोपाच्या बिया पेरतात आणि उगवले कां म्हणून पुन्हा पुन्हा उकरून पाहतात. तशी अधीरता मात्र नसावी. विश्वास ठेवावा, धीर धरावा, आळस करूं नये, सातत्य सोडू नये, प्रकृति-परिस्थितीमुळें काळ थोडा उणा- अधिक होईल इतकेंच. पण त्याचा विचार करूं नये आणि चढत्या वाढत्या प्रेमाने नामस्मरण करीत असावें. मनामध्ये ईश्वराचें स्वरूप साठवावे. त्याने माणसाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीं असें आश्वासन समर्थ रामदासांसारख्या थोर महात्म्यांनीं दिलेलें आहे म्हणून "म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । !"
करी काम निःकाम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वा जिवाचे ॥
करी छेद निर्द्वंद्व हे गूण गाता । हरिकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां ॥ ७७ ॥
माणूस जिथे आहे आणि जिथे जाऊन पोचावयाचा आहे. त्या दोन स्थानांमध्ये बरेंच अंतर असतें. तें अधिकाराप्रमाणें लांब-जवळ, उणें-अधिक असेल पण असतें हें निश्चित. आपण जवळ येतांच पाखरे भयानें उडून गेली या गोष्टीची खंत श्रीतुकाराम महाराजांना वाटली. आपला निर्वैर भाव अजून पूर्णतेला गेला नाहीं अशी त्यांची धारणा झाली व त्याकरिता त्यांनीं साधना केली असे म्हणतात. सामान्य जीवाच्या मार्गदर्शनासाठी ही लीला कदाचित् महाराजांनी केली असेल. श्रीशंकराचार्यांनींहि, आपल्या अंगावर पक्ष्यांनीं घरटी बांधावीत, अशी इच्छा एके ठिकाणी व्यक्त केली आहे.
जेथें जावयाचें तें मूलठिकाण शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धि, यांच्या पलीकडचे असले, अंतिम अवस्थेंत साधन म्हणून त्या कशाचाहि उपयोग होत नसला तरी, प्राथमिक अवस्थेंत या शरीरादींची उपेक्षा करून चालत नाहीं. आज मात्र एक महंत फसवे तत्त्वज्ञान आपल्या आकर्षक वक्तृत्वाच्या बळावर प्रचारीत आहेत. ते म्हणतात, "परमार्थ ही अंतर्यात्रा आहे. त्यासाठीं कांहींच करावयाचें नसतें. कांहीं करणें हा अडथळा असतो. शून्य व्हा. रिकामे व्हा. तसें होणें म्हणजेच पोचणे आहे. येथें कांहीं व्हावयाचें नाहीं, मिळवावयाचे नाहीं, जें आहेच त्याचा अनुभव घ्यावयाचा आहे. तुमचे कांहीं करणें हाच त्या अनुभवाच्या वाटेतला अडथळा आहे. सगळे धर्म, सगळे पंथ, सगळे गुरु, तुम्हाला नाना प्रकारची साधनें करावयास सांगून फसवीत आहेत. पूजापाठ, नामजप, तीर्थयात्रा, व्रतेवैकल्ये, दानधर्म हे सर्व निरुपयोगी आहे. गेल्या दहा हजार वर्षांत त्यानें कोणाचें कल्याण झालेलें नाहीं. तुम्हीं प्रगतीच्या, उन्नतीच्या मोहानें अनेक गोष्टी लादून घेतल्या आहेत. तुम्हीं काहीतरी आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यासारखे होऊं इच्छिता आणि केवळ त्यामुळेंच वैतागता. सत्यापासून दूर जाता. कोणासारखे होऊं नका. तुमचे तुम्हींच राहा. जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. हीच तुमची खरी मुक्ति आहे. तेंच परमेश्वराचे रूप आहे. सत्य आहे तें एवढेच. " इत्यादि इत्यादि विवेचन माणसाला मोठे आकर्षक वाटतें. पण तें खरें नाहीं. ती एक प्रकारची आत्मवंचना आहे. अंतिम स्थितींत जें अनुभवास येतें, तें आरंभीहि तसेंच मानणे हें योग्य नाहीं.
श्रेष्ठ प्रकारचे अनुभव ज्या थोर महात्म्यांनीं घेतले आहेत त्यांनीं आपली अनुभूति "मी मला सापडलो. '" 'साधने गळून पडली '" 'आता करणें म्हणून कांहीं उरले नाही. '" 'सदा सर्वत्र एक आनंदच भरून राहिला आहे. " असे म्हणून व्यक्त केली आहे हे खरें, पण ही सिद्धावस्था झाली. साधकाने तसेंच मानणे धोक्याचे आहे. पंचपक्वान्ने जेवून तृप्त झालेला मनुष्य प्रसन्नपणे वामकुक्षी करीत असतो, तेव्हां त्याला कांहीं करावयाचें आहे असें उरत नाहीं. पण त्याचेकडे पाहून भुकेला मनुष्यहि तसेंच वागूं म्हणेल तर चालेल काय ? भुकेलेल्याला लाकडे कोळसे जमविण्यापासून, अन्न शिजविण्यापर्यंतची सर्व खटपट करावी लागते, भीक तरी मागावी लागते किंवा सर्व आयते मिळेल असें स्नेहसंबंध तरी जोडून ठेवावे लागतात. म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न करावेच लागतात. पद्धति स्वीकारावीच लागते. कांहींच करायचे नाहीं असें आरंभीच म्हणून चालत नाही आणि हें जें कांहीं करावें लागतें, त्याला इंद्रिय-मन-बुद्धीचेच माध्यम असतें. पूर्णतेच्या परमोच्च शिखरावर पोचलेल्या रामदासांसारख्या थोर संतांना याची पूर्ण जाणीव असते, कारण जनसामान्यांच्या कल्याणाची त्यांच्या हृदयातील तळमळ ही अतिशय उत्कट आणि फार प्रामाणिक असते. म्हणून ते साधनें नाकारीत नाहीत. प्रकृति, प्रवृत्ति, परिस्थिति यांचा विचार करून संत ती सांगत असतात.
माणसाला शेवटीं जी स्थिति प्राप्त करून घ्यावयाची असते, जी खरोखरीच मुळांत त्याची वस्तुस्थिति असते. तिचे वर्णन करावयाचें झालें तर निष्काम, निर्द्वंद्व, स्वरूपावस्थित या शब्दानीच त्यांतल्या त्यांत करतां येतें. पण या लक्षणांचा अनुभव येण्यासाठी आपापल्या योग्यतेप्रमाणे पुष्कळ वाटचाल करावी लागते. समर्थ त्यासाठीं दिशा दाखवीत आहेत.
मनुष्याच्या अंतःकरणामध्ये रूपाविषयींची ओढ, विषयासंबंधीच्या इच्छा आणि निरनिराळ्या हट्टाविषयीचा हवे-नकोचा नाद उण्या-अधिक प्रमाणांत स्वभावतः असतो. समर्थ म्हणतात- ही जी मनाची स्वाभाविक वृत्ति आहे, ती नष्ट करतां येणे शक्य नाहीं आणि इष्टहि नाहीं. ती तशी असते हें मान्य करून तिचा स्वीकार केलाच पाहिजे. पण या वृत्तीचा प्रवाह जो भर वेगाने अगदीं एखादा प्रचंड धबधबा कोसळावा तसा केवळ ऐहिक विषयांकडेच वाहत असतो, तो रामाकडे वळणा. या नैसर्गिक बाह्यविषयगामी वृत्तींना ईश्वरोन्मुख करा म्हणजे तुम्हांस जें मिळवावयाचें आहे, साधावयाचे आहे तें निश्चितपणे लाभेल. मृगजळाच्या पाठीमागे धावण्याची, केवळ शीणच वाढविणारी वणवण थांबेल आणि शांत, प्रसन्न, आणि पवित्र, भव्य, दिव्य अशा मानससरोवराच्या अंतर्यात्रेचा आरंभ होईल. या अंतर्यात्रेतील पावलापावलागणिक सुखसमाधान वाढत जाईल. आनंदाची कारंजी नाचूं लागतील. विकसित होणाऱ्या प्रेमपुष्पांचा सुगंध तुम्हाला समाधि अवस्थेत धुंद करून टाकील, बाह्यजगताची जणू जाणीवच राहणार नाही. कबीर म्हणतात तसें- "हमन हें इश्क मस्ताना हमनको होशियारी क्या । रहे आजाद या जगमो हमन दुनियासे यारी क्या । " माणसाला अस्वस्थ करणारे, दुःख देणारे, असे बाह्य जगताचे सगळे संबंध जणू गळून पडतील, आणि ईश्वराच्या एकरूपतेच्या साक्षात्कारांत म्हणजे स्वस्वरूपात माणूस लीन होऊन जाईल. हे सहजपणाने घडावे अशी भक्तीमार्गांतली ही सोपी युक्ति आहे. जी इच्छा, जी वासना, जो काम प्रतिबंध करतो तोच त्या परमपुरुषाला अर्पण करून टाकावयाचा म्हणजे क्रमाक्रमानें वासनाचे निरसन होत जाते. जो जो भगवान् रामचंद्रांसारख्या आराध्यदेवतेचें नयनमनोहर असें परममंगल रूप चित्तामध्यें ठसावेल तो तो सागरांत मिसळलेल्या नदीप्रमाणें जीवाला स्वस्वरूपाची अनुभूति येत जाईल आणि मग अर्थातच बाह्यविषयांचे आकर्षण उरणार नाहीं. ईश्वराच्या लीला ऐकाव्या. ईश्वराच्या लीला गाव्या. सच्चरित्राच्या श्रवणमननात रंगून जावे ईश्वराचें सर्वसमर्थत्व, सर्वज्ञत्व परमकारुणिकत्व, औदार्य, अखिल ब्रह्मांडांना लीलेने धारण करणारे परमऐश्वर्य, इत्यादि गुण आठवितांना मन जो जो आनंदाने भरून जाईल, जो जो या गुणानुवादाचें व्यसन लागेल तो तो सुखदुःख, मानापमान, यशापयश इत्यादि द्वंद्वे मनुष्याच्या मन-बुद्धीची जी निष्ठुर ओढाताण करतात तें घडूंच शकणार नाहीं. मात्र त्यासाठीं हरिकीर्तनाविषयीं अंतःकरणाच्या वृत्तींना विश्वास वाटला पाहिजे.
परमेश्वराच्या लीलावतारी चरित्रांत स्वभावतःच एक विलक्षण आकर्षण आहे. काशीच्या एका प्रसिद्ध प्रवचनकार पंडितांनी आपला अनुभव एकदां सांगितला. ते म्हणाले- "काशीला एक संन्यासांचा मठ आहे. तेथें मी उपनिषदावर प्रवचन करीत होतो. एकदां केव्हां तरी ओघाओघाने कृष्णचरित्रांतील एक प्रसंग सांगितला आणि आयुष्यभर उपनिषदांचा अभ्यास आणि 'तत्वमसि'चा विचार करणारे ते संन्यासी त्या प्रसंगांत इतके रंगले कीं सर्वजण म्हणाले- 'उपनिषदे राहूं द्या. आतां कांहीं दिवस तरी प्रत्यहीं कृष्णकथाच सांगा." तत्त्वज्ञानाच्या शुष्क काथ्याकुटांतून स्वरूपसाक्षात्कार व्हावा आणि वृत्तींना तल्लीनता यावी त्यापेक्षा हरिगुणलीला ऐकतांना रंगून जाणाऱ्या वृत्तीला तो साक्षात्कार फार लौकर होईल असा विश्वास आम्हाला वाटूं लागला आहे आणि मग शास्त्रीबुवांनीं तेथें जवळजवळ वर्षभर कृष्णकथाच सांगितली.
हरिकीर्तनाचे हें सामर्थ्य अलौकिक आहे. स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याइतका विश्वास हवा. ईश्वरलीलांच्या प्रवाहांत या वा त्या कोण्याहि किनाऱ्याला लागण्याचा मोह न धरता सुखानें वाहत रहावे साधनमार्गातल्या साऱ्या पायऱ्या आपोआप ओलांडल्या जातील. कांहीं करावें न लागता सर्व होत राहील. पण त्यासाठीं अंतःकरणांत विश्वास असला पाहिजे. तरच हे लाभेल.
अहो ज्या नरां रामविश्वास नाहीं । तया पामरा बाधिजे सर्व कांहीं ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणे देहेसंसारचिंता ॥ ७८ ॥
ज्याला आपलें हित कशात आहे तें सांगितलें तरी कळत नाहीं, ईश्वर सर्वसमर्थ आहे, सर्वज्ञ आहे, तो योग्य तेंच करील हें ज्याला पटत नाहीं, म्हणजेच ज्याचा रामावर विश्वास नाहीं, त्याला समर्थ पामर म्हणतात. पामर म्हणजे शूद्र, ज्याची कीव करावी असा. माझ्या मताने माणसाला दिलेली ही सगळ्यांत वाईट शिवी आहे. पुरुषाला नपुंसक म्हणण्यासारखे हें आहे. स्वाभिमानी माणसाला लाचार म्हणण्यासारखे हें आहे. कल्याण करण्याकरितां धडपडणारे अंतःकरण निराशेने पिळवटून गेलावाचून अशी शिवी तोंडावाटे येणार नाहीं. कोणत्याहि लाभावाचून प्रीतीचा कळवळा असलेले अंतःकरणच हें म्हणूं शकते. समर्थ म्हणतात- संसारातल्या सर्व गोष्टी बाधतात त्या, त्या पामराला कीं ज्याचा रामावर विश्वास नाहीं. ज्याचा कशावरच विश्वास नाहीं, त्याला वेड तरी लागेल नाहीतर तो हिप्पी तरी होईल. गांजाचा अर्क खाऊन धुंदींत पडल्यावांचून जीवनांत तो दुसरें कांहीच करूं शकणार नाहीं.
गवताचा पुंजका सोसाट्याच्या वाऱ्याने भरकटत राहावा, तशी दशा माणसाची होईल. अंतःकरणांत विश्वास असल्यावांचून कोणत्याहि प्रतिकूलतेला तोंड देणे माणसाला शक्य नाहीं. माणसे उभारी धरू शकतात तीं विश्वासाच्या बळावर. आपत्तींतहि स्थिर राहूं शकतात तीं याच बळावर. आपण त्याला पाहिजे तर आत्मविश्वास म्हणा. पण शेवटीं तो विश्वासच आहे, श्रद्धाच आहे. आणि कोणत्याहि स्वरूपाच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा संबंध प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा दूरान्वयाने ईश्वराशीच पोचतो. कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा विश्वास असेल तर ईश्वर नाकारण्याचा अडाणीपणा करणें योग्य नाहीं. शास्त्रपूत दृष्टीनें ईश्वराच्या अस्तित्वाला मान देणे हेंच मग शहाणपणाचे ठरणारे आहे. बुद्धिमतेचें तेंच खरे लक्षण आहे. समर्थ म्हणतात-अरे जो ईश्वर सर्वसमर्थ आहे (महाराज), ब्रह्मांडाचा, सृष्टीच्या सर्व व्यापाराचा नियामक आहे (स्वामी), कैवल्यासारखी अत्यंत दुर्लभ, सर्वश्रेष्ठ वस्तु आपल्या भक्ताला सहजपणे देण्याइतका उदार आहे; त्याचे झाल्यावर, त्याला आपला म्हटल्यावर, त्याच्यावर विश्वास टाकल्यावर, त्याला निष्ठा अर्पण केल्यानंतर, तुला तुझ्या एवढ्याशा साडेतीन हात देहाची आणि एक बायको, दोन पोरांच्या संसाराची चिंता वाहण्याचे कारणच काय ?
मना पावना भावना राघवाची । धरी अंतरीं सोड चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा वेर्थ गेली ॥ ७९ ॥
रामचंद्राविषयीची आदराची, आपुलकीची भावना ही जरी मानसिक वृत्ति असली तरी या मानसिक वृत्ती स्वरूप अन्यवृत्तीप्रमाणे विषयांची आसक्ति वाढवून, चित्ताला मलिन करणारे नाही. उलट मनाला विषयाच्या ओढीपासून दूर नेऊन शुद्ध करणारे, पवित्र करणारे आहे. तेव्हां अंतरंगामध्ये ही रामचंद्राविषयीची भक्तिभावनाच सदैव दृढ राहील असें पहावे त्यामुळें संसाराविषयीची अनेक प्रकारची चिंता सुटत जाईल. या दोन्हीं गोष्टी जणू परस्परावलंबी आहेत. संसाराची चिंता सुटत जाईल तसें तसें अंतःकरण ईश्वरभक्तींत रमेल, आणि जो जो ईश्वराची ओढ लागेल तो तो सांसारिक गोष्टींविषयी चिंता करावी असें वाटणार नाही; याचें कारण असें की ज्याला आपण संसार संसार असें मानीत असतो तीच एक माया आहे. तो एक श्रम आहे. नसलेल्या गोष्टी आपण कल्पिल्या आहेत. आणि आपणच निर्माण केलेल्या या मोहजालांत जीव उगीचच गुरफटून गेला आहे. शरीर-मनाच्या नैसर्गिक आवश्यकतेपलीकडे जें हवे-नको वाटतें तें तर सगळ्यादृष्टीनें केवळ भ्रमात्मकच आहे. खरा जिव्हाळा, खरी आपुलकी त्यांत कोठेंहि नसते. साऱ्या आशा आकांक्षा खुळेपणानें जोपासलेल्या असतात. जें मुळांत सुखावह नाहीं, संतोषप्रद नाहीं, तत्त्वतः तर ज्याला अस्तित्वहि नाही, त्याच्याविषयीच्या आपणच लादलेल्या नाना प्रकारच्या धारणा जर व्यर्थ गेल्या, निरुपयोगी ठरल्या तर आश्चर्य वाटूं नये. दोरीवर साप पहावा आणि घाबरावे, एखाद्या चमकणाऱ्या वस्तूला सोने, चांदी वा रत्न समजून उचलण्यासाठी धावावे, तसेंच संसारातल्या सुखदुःखाच्या कल्पनांसंबंधी असतें. त्यांतली बहुतेक सर्व सुखदुःखे हा माणसाच्या कल्पनांसंबंधी असतें. त्यांतली बहुतेक सर्व सुखदुःखे हा माणसाच्या मनाचा खेळ असतो. दीर्घकालीन वासनांच्या संस्कारानें तो खरा असल्याचा भास दृढावत जातो आणि मग खऱ्या हिताचा परमार्थच उपरा ठरतो. म्हणून समर्थ म्हणतात- ईश्वराविषयी भक्तिभाव बाळगा. त्याची पवित्रता तुम्हांला या अपवित्र भ्रमापासून दूर करील.
धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें ।
तरा दुस्तरा त्या परा सागरातें ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।
करा नीकरा त्या खरा मछराते ॥ ८० ॥
अनुप्रासयुक्त शब्द असलेल्या या श्लोकाची रचना अर्थ लावण्याच्या दृष्टीनें थोडी अवघड आहे. एकेका पदाचें वा पदसंहतीचें वेगवेगळे अर्थ केले आहेत. मी माझ्या कल्पनेंप्रमाणें सांगणार आहे. आपल्याला कसें रुचते तें पहा. समर्थ म्हणतात -लक्ष्मीपति परमात्म्याला दृढ धरा. त्याचे व्हा. त्याला आपलेसे करा. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये मायेनें जें अंतर पडले आहे ते ज्ञान-ध्यान-भक्ति- योग यांचा यथाशक्ति अवलंब करून नाहीसें करा.
"हरा अंतराते"चा अर्थ शंकराच्या अंतःकरणांत ज्याचा निवास आहे म्हणजेच भगवान् शंकरांनींहि ज्या रामचंद्राला स्वतःच्या हृदयांत धरून ठेवले आहे, त्याला तुम्हीहि तसेंच धरून ठेवा किंवा ज्ञानयोगाच्या परिभाषेप्रमाणें अंतर असें जें मन तेंच नाहीसे करा. मनाला अमन करा म्हणजे त्या उन्मनी अवस्थेंतच स्वरूपसाक्षात्कार होईल. हा असा साक्षात्कार होणेच, श्रीवराला, परमेश्वराला धरून ठेवणे आहे. परमेश्वराला असें धरलेत, भक्तिभावाने त्याला पकडलेंत, त्याला आपलेसे केलेत म्हणजे एरवी तरून जाण्यासाठी अत्यंत दुस्तर, फार अवघड असा जो अतिविशाल मायासागर तो तुम्ही सहज तरून जाल. ज्या मायेतून तरून जाण्यासाठी केलेले सर्व प्रकारचे प्रयत्न अयशस्वी होतात असें श्रीज्ञानेश्वरासारख्या थोर महात्म्यांनीं सांगितलें आहे, ती माया सोपी होऊन जाते. श्रीशंकराचार्य म्हणतात- पांडुरंगाच्या भक्ताला एरवी अत्यंत खोल वाटणारा भवसागरहि तसा उरत नाही. भक्ताला त्याची खोली जास्तीत जास्त कमरेइतकी राहते. तसें सुचविण्यासाठी तर विठ्ठलाने आपलें हात कमरेवर ठेवले आहेत. ' श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात- अनेक प्रकारच्या साधनांनींहि तरून जाण्यास दुस्तर असलेली ही माया भगवद्भक्ताला ऐलीच थडी आटून नाहीशी झाल्यासारखी होते. तिच्यांतून तरून जाणें, आतां कष्टाचे, धोक्याचे, पोहणें उरतच नाही. तर कोरड्या पात्रांतून चालत जाण्याइतकें सोपे होते. "श्रीवरा धरा" आणि "दुस्तरा तरा" हें म्हणण्यांत समर्थांचा तोच भाव आहे. श्रीवराला धरावे तें कसें ? तर ज्याला धरणे दुर्भर आहे, ज्याची पूर्तता करणे, तृप्ति करणें दुर्घट आहे, फार अवघड आहे त्या पोटाला, उपलक्षणेने कामाला विसरून. पोटाची चिंता करूं नका, कामतृप्तीच्या मागे लागूं नका. त्यांचा व्याप आपल्या मागे लागला आहे हेहि विसरून जा. चला, त्या दृष्टीनें पुढें सरा. प्रयत्नाला लागा. पोट कधीं भरत नाहीं. काम कधीं तृषा होत नाहीं. एका सुभाषितकारानें "जकाराः पञ्च दुर्भराः " अशी मुळीं नोंदच केली आहे. तो म्हणतो- "जामाता जठरं जाया जातवेदो जलाशयः । पूरिता नैव पूर्यन्ते जकाराः पञ्च दुर्भराः ॥" यांना पूर्ण करण्याचा, कृपा करण्याचा कितीहि प्रयत्न करा, त्याला यश म्हणून यावयाचेच नाहीं. त्यांना विसरून जाणें, त्यांच्यापासून दूर सरणें हाच कामाची पूर्तता करण्याचा चांगला आणि सोपा मार्ग आहे. पण या कामाशी प्रत्यक्ष लढणे, त्याला जिंकणे, तसें सोपे नाहीं. कामाचा विस्तार क्रोधलोभाच्या मार्गानें मत्सरापर्यंत झालेला असतो. मत्सर हा शुद्ध गाढवपणा आहे. मला मिळावेसें वाटणे हें एक वेळ समजूं शकते. पण मला न मिळता दुसऱ्याला मिळालें वा मला मिळूनहि दुसऱ्याला मिळालें तर माझा जो जळफळाट होतो तो होणें म्हणजे शुद्ध गाढवपणाच नाहीं कां ? यासाठींच समर्थांनी मत्सराला खर म्हणजे गाढव म्हटलें आहे. प्रत्यक्ष माझी निंदा-स्तुति कोणी करील तर मला वाईट वाटेल किंवा सुख होईल हें समजू शकते, पण दुसऱ्या कोणा लेखकाला, विद्वानाला, गृहस्थाला चांगलें म्हटलें तर मला वाईट वाटावे किंवा त्याला वाईट म्हटलें तर मला बरें वाटावे, किंवा माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून मी दुसऱ्याची निंदा करावी या मत्सरीवृत्तीचे समर्थन कसें करणार ? असें वाटणे हा मूर्खपणाच आहे. कामक्रोधांची ही मत्सररूपी संतति गाढवासारखीं मूर्ख खरी पण फार बळकट आहे. म्हणून ती नष्ट करण्यासाठी तिच्याशी नेटाने झुंज घ्यावी लागते. निकरा करावा लागतो.
मला मिळावेसें वाटणे, न मिळालें तर दुःख होणें, हें नाहींसे व्हावे लागतें; पण तें साधण्यासाठी दुसऱ्याला मिळालें तर वाईट न वाटणे एवढे तरी साधावे लागतें. दुर्भर असलेल्या कामाच्या बुंध्यावर वाढलेला, क्रोधादींच्या फांद्यांनी विस्तारलेला संसाराचा हा महाप्रचंड वृक्ष एकदम बुंध्यावर घाव घालून तोडणे शक्य असले तरी सोपे वा सोयीचे नसतें. त्याच्या फांद्यांचा विस्तार आधीं कमी करावा व मगच बुंध्यांवर घाव घालावा हें बरे म्हणून समर्थ म्हणतात. मत्सराशी निकराने झुंज द्या. तो नाहीसा करा म्हणजे दुर्भर अशा कामालाहि विसरणे सोपे जाईल. बळ संपलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष करणें सोपे असतें.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ |