श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण

॥ श्रीराम समर्थ ॥

जया नावडे नाम त्या येम जाची । विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें । मुखें बोलतां दोष जाती स्वभावें ॥ १०१ ॥

नाममहात्म्याच्या प्रकरणाचा उपसंहार करतांना समर्थ रामदास स्वामी निक्षून सांगत आहेत कीं ज्याला नामस्मरणाची आवड नाहीं, त्याला यमाचा जाच सहन करावा लागतो. काहीतरी विकल्प घेऊन व्यर्थ संशय धरून, जे नामाविषयीं तर्कटे रचीत बसतात, त्यांना नरकास जावे लागतें. छी ! छी ! किती वाईट परिस्थिति हे संशयात्मे हाताने उगीचच ओढवून घेत आहेत.

समर्थांची जनकल्याणाविषयींची तळमळ या ओळींतून उत्कटतेने व्यक्त होत आहे. जशी ती श्रीतुकोबारायांच्या "नाम न वदे ज्याची वाचा । " या अभंगांतून प्रकट होते.

मनुष्याचे, अनेक प्रकारच्या विकारांनी भरलेलें जीवन, ज्या साधनाच्या योगानें हळूहळू पण निश्चितपणे सुधारत जातें, ज्याच्यासाठी धन वेंचावें लागत नाहीं, शरीराला कांहीं कष्ट पडत नाहींत, अमुक प्रकारच्या आसनावर बसूनच घ्यावे असें जाचक वाटणारे कोणतेहि नियम ज्यासाठी आग्रहाने सांगितलें नाहींत, घेणाऱ्याच्या योग्यतेचा, पात्रतेचा, ज्याच्याशी विशेष संबंध नाहीं, असे सरळ, साधे, सोपे नाम घेतांनाहि लोक आळस करतात, नामाविषयीं अश्रद्धा दाखवितात, तेव्हा लोककल्याणासाठीच अवतीर्ण झालेले संत दुःखाने कळवळतात, वात्सल्याने संतापतात आणि मग आईने नाठाळ पोराला शिव्या घालाव्या तसे बोलतात. यम नावाची कुणी देवता नाहीं आणि नर्क नावाचा कुणी लोक नाहीं. तेथे जीवाला कृतकर्मासाठी मेल्यानंतर जावे लागतें व यातना सहन कराव्या लागतात हें खरे नाहीं, असें कोणाला बुद्धिवादाच्या बळावर म्हणावयाचे असेल तर म्हणावें. कारण हा विषय शेवटीं अगदीं थोडा अनुमानाचा आणि पुष्कळसा शब्द प्रामाण्याचाच आहे. कर्मविपाकाचा जो सिद्धांत आपल्या तत्त्वज्ञानानें निश्चितपणे स्वीकारला आहे, त्याचाच हा अनुषंगिक भाग आहे. पुराणासारख्या वाङ्‌मयामध्ये या नरककल्पनेचा पुष्कळच विस्तार आहे. पण पुराणे ही रोचनार्थ आहेत. त्यामुळें त्यांत अनेक गोष्टी प्रचारासाठी वा परिणामकारक व्हाव्या म्हणून खुलवून फुलवून सांगितलेल्या असतात, असें बुद्धिवादी मानतात. पुराणांच्या मांडणीचा हा विशेष आहे असें मान्य केलें तरी पुराणे ही कांहीतरी निराधार अशा असत्य गोष्टीचा पाठपुरावा करतात असें मात्र म्हणूं नये. आपल्या तत्त्वज्ञानांतील शास्त्रीय सिद्धांतच पुराणांनी सर्वसामान्य लोकांनांहि पटावेत अज्ञासाठी आकर्षकपणे, परिणामकारक रीतीनें सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुराणे रंगवून सांगतात पण खोटे सांगत नाहींत. त्यांतील सारसिद्धांत प्रामाणिक असतो, सत्यच असतो. पुराणांचा विषय बाजूला ठेवला तरी उपनिषदांसारख्या तत्त्वज्ञानाचा विचार गंभीरपणे करणाऱ्या अतिप्राचीन वाङ्‌‌मयांत आणि त्याच योग्यतेच्या महर्षि व्यासानी रचलेल्या ब्रह्मसूत्रांत पातकी जीवाला मरणोत्तर नरकवास भोगावा लागतो असें वर्णन आलेले आहे. "संयमने त्वनुभूयेतरेषां आरोहावरोहौ तद्गतिदर्शनात्" ( ३ - १ - १३) या व यापुढील तीन सूत्रांत हा नरकाचा विषय स्पष्टपणें मांडलेला आहे. कठोपनिषदांतहि उन्मत्त झालेले मूर्ख लोक पुनः पुन्हा यमाच्या तावडीत सांपडतात, असा विचार मांडला गेला आहे. (कठ २ - ६) भगवान् शंकराचार्यांनींहि " आत्मज्ञानविहीना मूढाः ते पच्यन्ते नरकनिगूढाः " असे सांगितलें आहे आणि उलट "सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा" असे आश्वासन दिले आहे. ज्ञानेश्वरमहाराजांनींहि अनेक संदर्भांत नरकाचा उल्लेख केला असून १३ व्या अध्यायांत अज्ञानाचें वर्णन करतांना ज्ञानोबाराय म्हणतात "परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल । हें कांहींच पुढील । देखे ना जो ।। तयाचेंनि आंगलगे । अज्ञान जगी दाटुगे । जें सज्ञानाहि संगे । झोंबो सके ।। ( १३ । ७७९ - ८०) ज्ञानेश्वरमहाराजांनीं येथें अलीकडच्या बुद्धिवाद्यांच्या विचारसरणीचाच जणू उल्लेख केला आहे.

तात्पर्य हें की नरकाची कल्पना ही तुच्छ मागून फेकून देण्यासारखी नाहीं. तिला कांहीं गंभीर अर्थ आहे आणि आपलें हित असावें असें वाटणाऱ्यांनी तरी जीवनाच्या उपयोगाचा म्हणून त्यासंबंधी विचार केला पाहिजे.

उपनिषदांतील द्रष्टे ऋषि, महर्षि व्यास, श्रीशंकराचार्य, श्रीज्ञानोबाराय हे महापुरुष प्रज्ञेचे महासागर आणि पांडित्याचे हिमालय आहेत. त्यांच्यासमोर तथाकथित बुद्धिवादानें अहंकार न मिरवितां विनम्र भाव धारण करणेंच शोभेल. विज्ञानाला मान्यता देणाऱ्यानें नास्तिकवादी असलेंच पाहिजे असें समजण्याचे कारण नाहीं. कांहीं सुखसाधनें उपलब्ध होत असल्यानें जीवनांत विज्ञानाचा उपयोग आहे. यासाठीं विवाद असण्याचे कारणच नाही. विज्ञानाला मर्यादा आहे. तें समृद्धि निर्माण करील पण ती समृद्धि शापित असण्याची शक्यता आहे, नव्हे समृद्ध राष्ट्रांतील प्रत्यक्ष अनुभव तसा आहे. विज्ञानाने निर्माण केलेल्या सुखी जीवनांतील रिकामा वेळ, माणसाच्या मनांत अनेक प्रकारच्या विकृति निर्माण करतो हा अनुभव, आतां अनेक प्रगत देशांत, विचारवंतांच्या डोकेदुखीचा आणि राष्ट्रापुढील गंभीर समस्येचा विषय झाला आहे. या विकृतीने लहान बालकेंहि पछाडली जात आहेत आणि त्यामुळे सामाजिक जीवन हें सर्व प्रकारची समृद्धि असूनहि संघर्षमय, भयग्रस्त आणि अस्वस्थ झालें आहे.

नरकाविषयींच्या अश्रद्धेने जणू मानवसमाजावर हा सूड उगवला आहे. तिने इहलोकींच्या समृद्ध जीवनालाच अस्वस्थता व अशांततेच्या रूपानें नरकवासाची कळा आणली आहे. यांतून सुटावयाचे असेल तर तत्त्वज्ञानानें दाखविलेल्या, धर्मशास्त्रानें आखून दिलेल्या, संतांनी उपदेशिलेल्या आणि थोर पुरुषांनी आचरिलेल्या मार्गानेच जावयास पाहिजे.

ईश्वरनिष्ठा, विहित कर्तव्याचें पालन, सदाचरण हाच तो मार्ग होय. नामस्मरण ही या मार्गावरच्या वाटसरूची शिदोरी आहे. तिचा अनादर करणें योग्य नव्हे. म्हणून समर्थ पुन्हा एकदां अत्यंत आदरानें नाम घ्या असें सांगत आहेत. समर्थ फार व्यवहारवादी आहेत. ते नाम प्रेमाने घ्या असें फारसे म्हणत नाहींत. कारण प्रेम काय किंवा भक्ति काय हे भाव उत्पन्न होणें कोणाच्या स्वाधीन नाहीं. तें बळाने निर्माण करतां येत नाहीत पूर्वसुकृत, संतसंगति आणि ईश्वरीकृपा यांचें पाठबळ त्यासाठी असावे लागतें. प्रेमाची ज्योत मोठी अद्‌भुत आहे. ती स्वप्रयत्नानें पेटविताहि येत नाहीं आणि विझविताहि येत नाही त्यासाठी अगतिक होऊन अनन्यभावानें प्रार्थना करणे एवढेच फार तर माणसाच्या स्वाधीन राहते. आदराचे तसें नाहीं. तो बाळगता येतो, ठेवता येतो, आणि दाखवितांहि येतो. आपल्या धर्मातील शिष्टाचारांत यासाठींच आदर दाखविण्याचे कांहीं नियम सांगितले गेले आहेत. स्वच्छता, शुद्धता, सत्कार, विनय, नम्रता यापद्धतीने तो दाखवितां येतो, आणि वाढवितांहि येतो. नामस्मरणाविषयीं हीच भावना ठेवावी. मनांतून प्रेम उत्पन्न होणे सोपे नाहीं आणि त्याचा फारसा आग्रहहि धरू नये, मुखाने यथावसर, यथाशक्ति प्रामाणिकपणे देवाचे नांव घेत जावे. या अभ्यासाचा परिणाम जीवनावर निश्चितपणें होतो. कार्यक्षमता वाढते. विवेक जागृत होतो, आसक्ति उणावते, कामक्रोध इत्यादि विकारांचे बळ तुटते. निराशा, अस्वस्थता, विफलता दूर राहू लागतात. जीवन समाधानी, आनंदी होऊं लागतें. संतोष घर हुडकीत येतो. प्रसन्नता प्रसन्न होते. आणि हें सर्व न कळत होते, विनायास होतें. देवाचे नांव तोंडाने उच्चारले म्हणजे दोष स्वभावतः नाहीसें होतात असें समर्थांनी यासाठींच म्हटलें आहे.

नामाचे सामर्थ्य वस्तुतंत्र आहे. कर्त्याच्या पात्रतेचा वा कौशल्याचा तेथें विशेष संबंध नाहीं. आपल्याला सुधारावयाचें आहे, दोष समजले आहेत तें टाळावयाचे आहेत, एवढे सामान्यपणे लक्षांत ठेवून नामस्मरण केलें तरी त्याचा लाभ हळूहळू क्रमाक्रमानें पण निश्चितपणे होत जातो. बुद्धिपुरस्सर अवहेलना करूं नये. नाम घेतो आहे, आता पुन्हा पुन्हा पातके करीत राहिले तरीकाय भय आहे असे मानू नये आणि आळस बाळगू नये. एवढे संभाळले म्हणजे झाले. इतर गोष्टींची दक्षता नाम स्वतःच घेईल.

अती लीनता सर्व भावें स्वभावें । जना सज्जनालागि संतोषवावें ॥
देहे कारणी सर्व लावीत जावे । सगूणी अती आदरेंसी भजावें ॥ १०२ ॥

माणसाचे जीवन उन्नत कशाने होईल ? त्याच्या आध्यात्मिक प्रगतींचा मार्ग कोणता ते समर्थ रामदासस्वामी या श्लोकांत सांगत आहेत. माणसाने विनयी असावें, नम्र असावे, अतिशय लीनतेनें वागावे ही लीनता सर्वदृष्टींनी, सर्व ठिकाणी असावी, आणि ती स्वभावाने असावी, पोटातून असावी. सोयीसाठी दाखविण्याचा प्रकार तेथें नसावा. लीनता हा गुण महत्त्वाचा खरा पण दुर्मिळ आहे. त्याचा प्रामाणिक आविष्कार फारच क्वचित् आढळतो. स्वार्थासाठी दुसऱ्याला प्रसन्न करण्याचे वा लोकप्रियता मिळविण्याचे एक साधन म्हणून माणसे लीनतेचा देखावा करतात. कमरेत वाकतात, हात जोडतात. मस्तक नमवितात, भेटीचे समाधान दाखविणारे उपरे हास्य ओठांवर आणतात, समोरच्याची तोंडभरून स्तुति करतात, सत्कारपूर्वक मानपत्र अर्पिण्याचा समारंभहि होतो; पण हे सर्व वरवरचे असतें. सहेतुक असते. माणसाचा अहंकार आंत फार जागृत असतो आणि त्यामुळें स्वतःशिवाय दुसऱ्याला मोठे मानावयास मनापासून कुणी सिद्ध नसते.

जवळ विशेष कांहीं नसतानाहि ही स्थिति असते. मग ज्याच्याजवळ कला- कौशल्य, साहित्य, वक्तृत्व, विद्वत्ता, बुद्धिमत्ता, शक्ति, सत्ता, संपत्ति, सौंदर्य यांतील कांहीं असेल त्यांचें तर पहावयासच नको. ज्यांच्याजवळ कांहीं नाहीं त्यांची नम्रता ही एक प्रकारची लाचारी आहे. त्यांत कांहीं विशेष नाहीं, भूषण नाही. ज्यांच्याजवळ कांहीं आहे ते विनयी असतील तर ते खरे. परमेश्वर कशाने भेटतो ते सांगतांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- "म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजें । व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जै जगा धाकुटें होईजे । तै जवळिक माझी ॥ (ज्ञा. ९ । ३७८ ). थोरपण, सगुणाच्या बळावर प्राप्त होणारा खरा लौकिक असला पाहिजे, पण तो दूर सारला पाहिजे. व्युत्पत्ति, विद्वत्ता असली पाहिजे, पण ती विसरली पाहिजे. मी म्हणजे कुणी विशेष आहे असें न वाटतां जगांतील वस्तुमात्रापुढें खऱ्या भावनेने नम्र होता आलें पाहिजे. तरच परमात्मा भेटतो असे श्रीज्ञानोबाराय म्हणतात.

ही खरी नम्रता मोठी शक्तिशाली असते. कोणत्याहि अभिचार मंत्रापेक्षां तिचें वशीकरण सामर्थ्य फार मोठे असतें. गुणग्राहकता, प्रशंसा, स्तुति, ही या लीनतेचीं बाह्यलक्षणें होत. मात्र त्यांचा उपयोग खऱ्या गुणग्राहकतेनें, निःस्वार्थपणें सज्जनांना संतुष्ट करण्याकडे व्हावा. एका नाटकाविषयी एका संपादकाने अत्यंत प्रतिकूल मत प्रत्यक्ष भेटींत व्यक्त केलें. पण त्यांच्या वृत्तपत्रांत मात्र चार स्तंभ भरून त्याच नाटकाची प्रशंसा प्रसिद्ध झाली होती. मी विचारले-अहो ! हे कसे ? ते म्हणाले- ही व्यवसायाची बांधिलकी आहे. आठ वेळां त्या नाटकाची जाहिरात करण्याचे पैसे आगाऊच मिळाले आहेत. व्यवहार हा असा चालतो. "चलनाहि बडा मुश्किल हे गाढे दोनों काम । सांचेमें तो जग नहीं झुला मिले न राम ॥ " खरी उन्नति लाभावी अशी जर इच्छा असेल तर माणसाने सज्जन मंडळी संतुष्ट व्हावीत याच दृष्टीनें आपलें वर्तन ठेवले पाहिजे. ती. दादांनी, "संतोष संभावित सज्जनांचा । वक्तृत्वानें साधणे साचा । हलकटांच्या वाहवाचा । बाळा लोभ धरू नको । !" असाच आदेश कीर्तनप्रवचनाचे नियम सांगतांना दिला आहे.

ज्यानें संतुष्ट करावयाचें तोहि स्वार्थी आणि ज्यांना संतुष्ट करावयाचें तेहि स्वार्थी; आतां तेथें सर्व खोटेपणाच भरलेला राहील यांत नवल काय ? चांगल्यांना संतुष्ट करावयाचे असेल तर आपण आधीं चांगले असले पाहिजे. जी माणसे खरीच सज्जन आहेत त्यांचा संतोष लाळघोटेपणा, हांजीहांजी, पुढें पुढें करणें, लांगूलचालन, भाट होणें यांनीं मिळत नसतो. सज्जन माणसे निःस्पृह असतात. त्यांना केवळ सगुणांची आणि सदाचरणाचीच चाड असते. तेव्हां त्यांना संतुष्ट करण्यासाठीं वर्तन खरेंच चांगले असावे लागते. सत्ता त्यांना वाकवू शकत नाही, संपत्ती त्यांना मोहवू शकत नाही. स्तुति त्यांना भुलवू शकत नाहीं.

निष्काम बुद्धीनें केलेली सेवा मात्र सज्जनांना संतोषवू शकते. म्हणून समर्थ म्हणतात- "देहे कारणी सर्व लावीत जावे." सर्व कारणी सर्वांच्या कामासाठी, शरीर कष्टवीत जावे. शरीर हे माणसाचा एक नोकर आहे, एक साधन आहे. त्याला सुखासीन होऊं न देणे हें स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीनेंहि श्रेयस्कर आहे. नानाप्रकारच्या कामांमध्यें शरीराला गुंतवून ठेव हें मनबुद्धीच्या स्वास्थाच्या दृष्टिनेहि हितकरच आहे. तेव्हां आजच्या भाषेत ज्याला समाजाच्या सेवेची कामे म्हणतात अशीं परोपकारी कृत्ये शरीराने झटून करावी. निरनिराळ्या धार्मिक वा सामाजिक कामांमध्यें माणूसबळाची फार आवश्यकता असते. अशा कार्यांत अंग मोडून राबावे अमुक एक काम प्रतिष्ठेचें आणि अमुक एक काम हीनता आणणारे असें कधींहि न मानतां जें वाट्यास येईल आणि जें आपणांस शक्य असेल तें आळस सोडून झटून करावें, दक्षतेने करावें. भगवान् श्रीकृष्णानें धर्मराजाच्या राजसूय यज्ञात उष्टी काढली होती तो आदर्श प्रत्येकानें डोळ्यापुढे ठेवावा आणि या प्रकारच्या सेवेतून कशाचीहि अपेक्षा नसावी. न मानाची, न धनाची, न कौतुकाची. अशी अपेक्षा धरून कामे करणें ही सेवा नसून तो व्यापार आहे, धंदा आहे. ते परमार्थाचे साधन कधीहि होऊं शकणार नाहीं. उलट निष्काम भावनेने काम करणें हे शारीरिक तप ठरेल. मग त्यांचें स्वरूप परिस्थितीप्रमाणें वा प्रकृतिभेदानें कोणतेंहि असू शकेल. आज ज्यांना समाजसेवा म्हणतात त्याप्रकारची कामे संतानी नाकारली नाहींत. " अथवा प्रवासें कां पीडा ! कां शिणले जे सांकडा । ते जीव सुरवाडा । आणिजती ! !" (ज्ञाने. १७ । २०५) या ज्ञानोबारायांच्या ओवीत सर्व प्रकारच्या समाजसेवेचा उल्लेख आहे असे म्हणतां येईल. धार्मिक परंपरेत रूढ असलेली यज्ञयाग, उत्सव-महोत्सव, देवपूजा, देवालयाची व्यवस्था, आईवडिलांना सुख देणे, सद्गुरूची वा संतांची सेवा करणे, इत्यादि कामें देह कारणी लावण्याच्या दृष्टीने, विचारांत घेण्यासारखी आहेत. आपल्या शक्त्यनुसार प्रामाणिकपणें ती करावींत.

ही सेवा प्रत्यक्ष घडली पाहिजे. शरीर त्या त्या कामी वस्तुतः राबले पाहिजे. मनांत असलें म्हणजे झालें, मनानें करणेंच फार महत्त्वाचे आहे, असें म्हणून शरीराला कष्ट देणे टाळले जाते. देहाचे श्रम वाचविले जातात. इंद्रियव्यापारानांहि महत्त्व आहे हें दुर्लक्षिले जातें. तसें होऊं नये म्हणून समर्थ "सगूणीं अति आदरेंसी भजावें" असें म्हणतात.

मानसपूजाभ्यास श्रेष्ठ खरा, पण तो खऱ्या अर्थाने साधण्याकरितां साधकाची पुष्कळच प्रगति झाले असावी लागते. मन गुंतून राहणे आणि एकाग्र होणें यासाठीं त्याचा उपयोग होतो. पण शरीर कष्टविणें आळसाने नको वाटते. सुखासीनतेचा मोह सोडवत नाहीं. आणि धार्मिक कृत्यासाठी साधन-सामग्री जमवतांना जें धन वेचावे लागतें तें स्वाभाविकपणे वाचते आणि मग तें चैनीसाठी अधिक प्रमाणांत वापरता येतें, म्हणून मानसपूजा कोणी करीत असेल तर तो दंभाचार ठरेल. तेव्हा संतरूपानें, सद्गुरुरूपाने, पूजनीय व्यक्तीच्या रूपानें वा आराध्य देवतेच्या मूर्त इत्यादि प्रतीकाने, आपलें दैवत निवडून घ्यावें आणि त्याची अतिशय आदरानें, नम्रतेने भागवाभागवी न करतां, नाना प्रकारांनीं सेवा करावी.

मनबुद्धीला वळण लावण्यासाठीं आधी इंद्रियांना वळण लावावे लागतें आणि त्यासाठीं शरीराच्या प्रत्यक्ष हालचालींना महत्त्व असतें. आपल्याकडे आदरसत्काराची वा पूजा-अर्चेचीं कामे करावींत असें यासाठींच सांगितलें आहे. त्यात अधार्मिकता शिरली; ते नुसते कर्मकांड झालें; त्यांतहि पळवाटा शोधल्या गेल्या, हे खरें, पण त्याच्या कंटाळ्यानें मूळ कृत्यच टाकून देणे इष्ट नाहीं. ऐकत आहे, पाहतों आहे, देतो आहे, करत आहे अशी नुसती कल्पना करण्यापेक्षा शक्य असेल तेव्हां व शक्य असेल तितके ऐकणे, पाहणे, देणे, करणें, हें अधिक महत्त्वाचे आहे, तें टाळू नये. निर्गुण निराकारामध्यें मन रमणे ही गोष्ट फार कठिण आहे. तें साधले आहे असा श्रम निदान साधकाने तरी बाळगू नये. सगुणभक्ति हें शरीर, इंद्रियें, मन, बुद्धि यांना चांगलें वळण लावण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. तिच्याकडे पाठ फिरविणे हें आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. "मुका क्रिया प्रतिपादी । सगुणभक्ति उच्छेदी । स्वधर्म आणि साधन निंदी । तो एक पढत मूर्ख ।। नाहीं भक्तीचे साधन । नाहीं वैराग्य ना भजन । क्रियेवीण बोले ब्रह्मज्ञान ! तो एक पढत मूर्ख ।।" (दासबोध २ । १०) ही समर्थांची वचनें साधकाने लक्षांत ठेवली पाहिजेत.

हरिकीर्तनें प्रीति रामी धरावी । देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवीं करावी ॥ १०३ ॥

सगुण भक्तीमध्यें कीर्तन ही एक महत्त्वाची भक्ति आहे. त्या कीर्तनामुळे स्वतःची प्रगति होते आणि श्रोत्यांनाहि कल्याणाचा मार्ग दिसूं शकतो. कीर्तनाला महत्त्व आहे तें यामुळेंच. पण या कीर्तनांत ईश्वराविषयी प्रेम असलें पाहिजे. कीर्तन हें करमणूकीचे स्वस्त साधन बनता कामा नये ही गोष्ट कीर्तनकारानें आणि श्रोत्यांनी दोघानीहि लक्षांत ठेवली पाहिजे. श्रीएकनाथ महाराजांनीं संतांच्या घरची कीर्तनमर्यादा स्पष्टपणें आखून दिली आहे.

सगुणचरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी
सज्जनवृंदे मनोभावे आधीं वंदावी ।
संतसंगें अंतररंगें नाम बोलावे !
कीर्तनरंगी देवासन्निध सुखेचि डोलावे ॥
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरां न कराव्या ।
प्रेमभरें वा वैराग्याच्या युक्ति विवराव्या ।
जेणे करूनी मूर्ति ठसावी अंतरीं श्रीहरीची
ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची ॥
जेणेंकरून श्रीहरीची मूर्ति अंतरंगांत ठसेल असे स्वरूप कीर्तनाचे असले पाहिजे. दुर्दैवाने हे लक्षांत घेतलें जात नाहीं.

माझ्या परिचयाचे एक सज्जन गृहस्थ एका कीर्तनाला गेले, आणि २ - २ ॥ तास खाली मान घालून बसले. कारण त्या कीर्तनामध्यें आचरट विनोद आणि अश्लील शृंगार यांवांचून दुसरें विशेष कांहीं नव्हतेंच. असें कां बोलतां असें कीर्तनकाराला त्यांनीं नंतर विचारले- कीर्तनकार पक्का मुरलेला. तो म्हणाला- "ज्ञानेश्वरींत शृंगार नाहीं काय ? स्त्रीसौदर्याचें लुसलुशित वर्णन त्यांनींहि केलें आहे. "कीं प्रथमवयसाकाळीं ! लावण्याची नव्हाळी ! झाटे जैसी आगळी ! अंगनाअंगीं ! !" (ज्ञाने. १|४२) या ओवीत तें स्पष्ट दिसते. रामदासस्वामींनींहि "नाना नव रसिक शृंगारिक । गद्यपद्याचें कौतुक | नाना वचनें प्रास्ताविक | शास्त्राधारें बोलावी ॥" असा आदेश दिला आहे. लोकांना तें आवडते तुम्हीं टीका कां करता ? " श्रोताहि स्पष्टवक्ता होता. तो म्हणाला- ' बुवा ! ज्ञानेश्वरीच्या ९००० ओव्यांत शृंगारिक म्हणता येतील अशा ९ ओव्याच फार तर सापडतील, आणि त्याहि अतिशय साध्या आणि सोज्वळ आहेत. तुमच्या २ - २ ॥ तासांच्या कीर्तनांत पाच-दहा वाक्ये सुद्धां तशीं सोज्वळ नव्हती रामदास स्वामींनीच ' शृंगारिक नवरसिक ! यांमध्ये सांडावे एक । स्त्रियादिकांचें कौतुक | वर्णू नये कीं ॥" (दासबोध १४ | ५) असे म्हटलें आहे. तें तुम्ही लक्षांत घेतले नाहीं. लोकांना आवडते म्हणून काय सांगता ? " टवाळा आवडे विनोद | उन्मत्तास नाना छंद । तामसास अप्रमाद ! गोड वाटे ॥ (दास- ७९) असेंहि समर्थ म्हणतात. या आवडी कीर्तनकारांनी पुरवावयाच्या नाहींत. आमच्या ती. दादांनी "नकला विनोद तमाशा । गायनाचा संगीत जलसा । आवडे लोकांच्या मानसा | परी तें पाप कीर्तनी ॥ नेमस्त गायन करावे । विनोद सभ्य असावे । प्रौढ, गंभीर बोलावे | थिल्लरता न शिवो द्यावी ॥ लोकसंग्रहा लोकरंजन । कांही अंशी अवश्य जाण | परी ते साधायाकारण | आपुली पायरी सोडू नये ॥ असा उपदेश कीर्तनाच्या संदर्भांत छात्रबोधात केला आहे.

कीर्तनांत कोणताहि रस वर्ज्य नाहीं हें खरे, पण सर्व रस ईश्वरभक्तीची अंगोपांगे असले पाहिजेत, आणि ते कीर्तनाच्या शांत, पवित्र, उदात्त, भूमिकेला शोभले पाहिजेत, पोषक झाले पाहिजेत. पंचपक्वानांच्या जेवणातील, चटणी- मीठ-कोशिंबिरींसारखे ते असले पाहिजेत. शरीराचे पोषण हा आहाराचा मुख्य उद्देश लक्षांत न घेता केवळ रुचि आणि स्वादाकडे पाहून केलेलें जेवण जसें घातक ठरते, तसेंच ईश्वरभक्ति हा मुख्य विषय लक्षांत न घेता केलेल्या कीर्तनाचे होतें. कीर्तनाला जाणारांनीहि हे विसरता कामा नये. "केनापि गीयमाने हरिगीते वेणुनादे वा । आनन्दाविर्भावो युगपत्स्यादष्टसात्त्विकोद्रेकः ॥ " असे श्रीशंकराचार्यांनीं प्रबोधसुधाकरामध्यें श्रोत्यांच्यासाठीं सांगितलें आहे. प्रेम ईश्वराच्या लीला ऐकण्याचे असावें, संतकथा ऐकण्याचे असावें, सांगणारा कोण आहे आणि तो कशा पद्धतीने सांगतो आहे याला श्रोत्यांनी महत्त्व देऊं नये. कळावे, पटावे, ठसावे, आचरणांत उतरावे, म्हणून कीर्तन ऐकावयाचे असतें. आरंभी आरंभी ऐकावेसे वाटावे म्हणून रंजकतेचाहि अवलंब केला जातो. पण श्रवणाची भूक खरी असली पाहिजे. हें फार महत्त्वाचें आहे. खरी भूक चवीकडे लक्ष देत नाहीं, खोड्या काढीत नाहीं, अमुकच हवें असा हट्ट धरीत नाहीं. कीर्तनविषयांत तसेंच असावें.

ईश्वराच्या आणि ईश्वरनिष्ठांच्या कथा ऐकत असतांना मन रमून गेलें पाहिजे. सर्वांगाचे कान करून ऐकावे अशी ओढ निर्माण झाली पाहिजे, ऐकतांना हृदय उचंबळून आलें पाहिजे, वेळेचे भान सुटले पाहिजे. "कीर्तन चांग कीर्तन चांग | होय अंग हरिरूप ॥ " अशी अनुभूत आली पाहिजे. हें एकदम होणार नाहीं हें खरें. पण इच्छेची आणि प्रयत्नाची दिशा तीच असावी. नारदीय पद्धतीतील पूर्वरंगाचा उद्देश हाच असतो. वारकरी पद्धतीचे तेंच एकमात्र वैशिष्ट्य आहे. म्हणून नारदीय पद्धतीच्या पूर्वरंगाला आणि वारकरी कीर्तनाला 'निरूपण' हे नांव दिलें जातें. माणसाच्या अंतःकरणांत ईश्वराविषयी प्रेम नसतें. ती ओढ त्याला लागत नाही त्याचे खरे कारण असे की मनुष्याची देहबुद्धि फार जागृत असते. शरीराला सुख हवें असतें. इंद्रिये विषयांकडे ओढ घेतात, मन हवे-नकोमध्ये गुंतून राहते मानसन्मानाची अभिलाषा उत्कट असते आणि बुद्धीचे प्रयत्न त्या दृष्टीनें अनुकूल मार्ग शोधण्यासाठी असतात. असेल-नसेल ती सर्व शक्ति याच कामी वेचली जाते. सगळा वेळ याच कारणी लागलेला असतो. मी आणि माझे यापलीकडे विचार करण्यास कुणाला जणू सवड नसते हीच देहबुद्धि. हिची पकड ढिली झाल्यावांचून ईश्वराविषयींचें प्रेम निर्माण होऊं शकत नाहीं. टणक, कठिण भूमींत बीज अंकुरत नाहीं तसेंच हे आहे. शेत नांगरून भुसभुशीत करावें लागतें. हें काम निरूपण करते.

मी कोण ? त्याचें स्वरूप काय ? देह कसा आहे ? अंतःकरण म्हणजे काय ? मी आणि माझें, ही भावना कां निर्माण होते ? सृष्टीचे स्वरूप काय ? तिचा कर्ता नियंता कोण ? त्याचा माझ्याशी काय संबंध ? जगतामध्ये माझें स्थान काय ? कामक्रोधादि विकार कां बळावतात ? त्यांना मर्यादा कां असली पाहिजे ? सदाचरण कसें असतें ? त्याचा अवलंब कां करावा ? स्वैरवर्तन हिताचे कां नाहीं ? इत्यादि विषय निरुपणांतून चर्चिले जातात. वक्ता अनुभवी, जाणता आणि श्रोता अवधान देऊन ऐकणारा व विचार करणारा असला म्हणजे मग त्याला एकेक गोष्ट उमगू लागते, उदाहरणांनी पटते, विवेकाने ठसते, निष्ठेने आचरणांत उतरू लागते. देहधारण हें साध्य नाहीं, साधन आहे, अवखळ इंद्रियांना संयमाचे बंधन असलें पाहिजे, मन हें विकाराच्या हातचे खेळणे बनता कामा नये. बुद्धीला नेमके हिताचे आणि स्थिर निर्णय घेतां आले पाहिजेत. हें कळले आणि वळले कीं मग देहबुद्धि उरत नाहीं. अंतःकरणाच्या क्षितिजावर ईश्वरी प्रेमाचा पूर्णचंद्र उगवतो आणि त्याच्या आल्हाददायक प्रकाशांत, साधक, जीवनांतील सुख-समाधान आणि वृत्तीची प्रसन्नता अनुभवू शकतो. कीर्तनांतील निरूपणाने हें व्हावें अशी समर्थांची अपेक्षा आहे. देहबुद्धि सुटण्याच्या दृष्टीनें, समर्थ, वस्तुतः कोणालाहि शक्य असलेला एक साधा पण महत्त्वाचा उपाय सांगत आहेत. रामदासस्वामी म्हणतात-परद्रव्य आणि परस्त्री यांच्या विषयीची अभिलाषाहि अंतःकरणांत येऊ देऊं नका.

धन मिळवूंच नये, न्याय्य-मार्गानें मिळणारे विषयोपभोग घेऊंच नयेत, संसारांत रमू नये, बायको टाकावी असें समर्थ सांगत नाहींत. तसें सांगण्याची आवश्यकताहि नसते. उपभोगाच्या अतिरेकाने झाले अजीर्ण नाहीसे व्हावें म्हणून पथ्य सांगावे लागलें तर तो भाग निराळा. देहधारणेसाठी प्रकृतिभेदानें उण्याअधिक प्रमाणांत विषयांचें सेवन करावें लागतें. त्यामुळें शरीराचे रक्षण होतें. मनाला प्रसन्नता लाभते. न्यायनीतीची मर्यादा ही त्यासाठींच निर्माण झाली आहे. संतमहंतांची तिला मान्यता आहे. त्यांनीं नाकारली आहे ती आसक्ति. निषेध केला आहे तो अतिरेकाचा. त्यांना त्याज्य वाटते ती स्वैरता.

परद्रव्य आणि परस्त्री यांच्याविषयी सांगतांना प्रत्येक मनुष्य उघड उघड चोऱ्या करतो, दरोडे घालतो, किंवा व्यभिचाराचे जीवन जगतो असें संतांनी गृहीत धरले नाहीं. कारण हे असे दुर्वर्तन शरीराने प्रत्यक्ष घडते अशीं माणसे फार थोडी असतात. ती इच्छा, तशी संधी व तेवढी शक्ति सर्वांना नसते हें उघडच आहे. बहुसंख्य माणसे सामान्यतः सज्जनच असतात. शरीराने दुर्वर्तन करीत नाहींत, कारण सदाचरणाची, नीतिन्यायाची, त्यांना चाड असते. समाजाचा धाक तीं बाळगतात. त्यामुळे शरीर पवित्र राहते. व्यवहाराच्या दृष्टीने हें योग्य आहे आणि आवश्यकहि आहे. संतांची अपेक्षा यापेक्षा अधिक आहे. ती थोडी सूक्ष्म आहे. परद्रव्य आणि परस्त्री यांच्याविषयी अभिलाषा मनांतहि येतां कामा नये, तरच परमार्थमार्गांत प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त होईल, असें संतांना सांगावयाचें असतें. अशी अभिलाषा जेव्हां अंकुरते, वाढते, क्रमानें बळावते, तेव्हांच पातके जन्मास येतात. म्हणून सावध राहावें लागतें.

असे विचार आमच्या मनांतहि येत नाहींत असें म्हणण्याचें धाडस सामान्यांनीं सहसा करूं नये. तो अधिकार केवळ संतांचा आहे. इतरांनी तसें म्हणणे वा मानणे अज्ञानाचें तरी आहे किंवा दांभिकतेचें तरी आहे. जर तसें खरेच असतें तर स्वतःच्या संसारात माणसे सुखी आणि संतुष्ट दिसली असतीं. मिळालें तेवढे धन पुरेसे वाटत नाहीं, मिळाली ती बायको चांगली वाटत नाही. बाकी सगळे चांगलें असलें तरी जणू लग्न होणें हाच एक दोष ठरतो. दुसऱ्याची बायको चांगली वाटते अशा अर्थाची एक परकीय भाषेतील म्हण आहे ती मनुष्याच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे.

चांगल्याला चांगलें म्हणणें, सुंदराला सुंदर म्हणणें, हें जर नाकारावयाचें तर तें रसिकतेला सोडचिट्टी देण्यासारखे आहे. असें परस्त्री सुंदर वाटण्याच्या मनोवृत्तीचे समर्थन कांहीं लोक करतात. ते खरें नाही. सुंदराला सुंदर म्हणण्यांत कांहींच दोष नाही सौंदर्य कळण्यासाठीं रसिकता हवी असते हें निश्चितच. पण वस्तूचे सौंदर्य जाणवताच ती वस्तु मला प्राप्त व्हावी, असें वाटूं लागतें त्याचें काय ? जपावे लागतें तें याला. म्हणून तर समर्थ "परद्रव्य आणीक कांता परावी ! येदर्थी मना सांडि जीवी करावी ॥" असें निक्षून सांगत आहेत.

परद्रव्याविषयींचा विचार मागें नवव्या श्लोकावरील विवरणांत आलेला आहे. परद्रव्य आणि परस्त्री यांच्याविषयींची अभिलाषा अंतःकरणांत निर्माण झालीच नाहीं, कीं आसक्तीचे एक क्षेत्र जिंकल्यासारखे होतें. विषयोपभोगाची जी ओढ असते तिचा पुरवठा तुटतो, बळ घटते, शत्रुसैन्याची रसद तोडणे हा युद्ध जिंकण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचें युद्धशास्त्र सांगते. तेंच येथेंहि होतें. कारण यामुळे आहे त्यांत संतोष मानण्यास शिकावे लागतें आणि मग विषयोपभोगांतील हितकरतेची मर्यादा ही स्पष्टपणें लक्षांत येऊ लागते.

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें । परी चीत दुःखीत तें लाजवीतें ॥
मना कल्पना धीट सैराट धांवे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥

समर्थांचा स्पष्टवक्तेपणा या श्लोकांत चांगल्या रीतीने व्यक्त होतो. देव आहे या कल्पनेवर माणसाचा विश्वास असतो. देव भेटला तर हवा असतो, कांहीं थोडे त्या दृष्टीनें प्रयत्नशीलहि असतात, आणि तरी देव त्यांना भेटत नाहीं ही वस्तुस्थिती असते. त्याची कारण मीमांसा समर्थ या श्लोकांत करीत आहेत. देवाचा अनुभव नाहीं म्हणून देव नाहीं असे म्हणणारे पुष्कळच आहेत, पण त्यांचे हे विचार अगदीं उथळ असतात. प्रत्यक्षवादाचें तत्त्वज्ञान उभे करणें वाटतें तेवढे सोपे नाहीं. कशावरहि श्रद्धा नसलेला असा शंभरी शंभर नास्तिक माणूस अजून जन्मास यावयाचा आहे. एक चार्वाक तेवढा प्रत्यक्षवादी होऊन गेला, आणि त्यामुळें तो आकाश महाभूत मानीत नसे. पृथ्वी, आप, तेज, वायु ही चारच भूतें तो मानी. कारण प्रत्यक्षाच्या व्याख्येप्रमाणें आकाशाचें प्रत्यक्ष होऊच शकत नाहीं, म्हणून तें नाहीं असें त्यांचें मत होतें. प्रत्यक्षवाद स्वीकारला कीं चार्वाकाचें हें मत त्याच्याशी प्रामाणिक आहे. पण आजच्या कांहीं बुद्धिवाद्यांनी चार्वाकाचा हा प्रत्यक्षवाद व्यवहारात अंगाशी येतो म्हणून चार्वाकाचे प्रत्यक्ष हें व्यापक प्रत्यक्ष होते, कांहीं प्रमाणांत अनुमानाचाहि त्यांत समावेश होता, वेदान्त्यांनी चार्वाकाचें खंडण करणें सोयीचे जावे म्हणून, प्रत्यक्ष कल्पनेचा बुद्धिपुरस्कार संकोच केला आहे, आणि चार्वाक खराकाय होता तें समजूं नये म्हणून त्याचे ग्रंथ नष्ट केले आहेत असा बिनबुडाचा आरोप कुटिलपणे केला आहे. केवळ प्रत्यक्षवादी राहत येत नाहीं म्हणून प्रत्यक्षवादाचें तत्त्वज्ञान सिद्ध करण्यासाठीं वापरलेली ही फसवी युक्ति आहे.

सत्य जाणून घ्यावयाचें असेल, जीवनांत नीट जगावयाचें असेल तर, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या तिन्ही प्रमाणांचा स्वीकार करावाच लागतो. प्रत्यक्ष प्रामाणिक असावें लागतें, अनुमान यथार्थ असणे आवश्यक आहे आणि शब्द विश्वसनीय असला पाहिजे, यांत वाद नाहीं. त्यासाठीं ही प्रमाणें मानणारांनीं पुष्कळ शास्त्रार्थ केलेला आहे. केवळ प्रत्यक्ष मानावयाचें ठरविलें तर आज आपणा सर्वांना मान्य असलेली अनेक शास्त्रीय सत्ये नाकारावी लागतील. सूर्यमालेपुरता विचार करतां सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते हाच खगोलशास्त्राचा सिद्धान्त आहे, पण तसा अनुभव कोणालाहि नाहीं. अनुभव आहे तो पृथ्वी स्थिर व सूर्य फिरतो हाच. आतां केवळ प्रत्यक्ष प्रमाणाचे काय करावयाचे ? या अशा अडचणीमुळेच चार्वाकाचे तत्त्वज्ञान मान्य आहे असें मानणारा फार मोठा अनुयायी वर्ग चार्वाकाला मिळालेला नाहीं, तरी व्यवहारतः ९० टक्के लोक चार्वाकमतानुयायीच आहेत अशी टीप केतकरांनी ज्ञानकोशांत दिली आहे, ती फार मार्मिक आहे. ईश्वर आहे हें कुणी अमान्य करीत नाहीं पण त्याकरिता आवश्यक त्या सदाचरण, न्याय, नीति, संयम, एकाग्रता, पावित्र्य, मनाची शुद्धता या गोष्टी मात्र कोणी प्रत्यक्ष वर्तनांत उतरविण्याचा प्रयत्न करीत नाहीं. ईश्वरप्राप्ति आणि तदनुषंगिक गोष्टी या केवळ गोष्टीच राहतात. तो कीर्तनप्रवचनांचा आणि केवळ श्रवणाचा विषय राहतो. कीर्तन-प्रवचनें व्यवसाय म्हणून होतात आणि थोडे मनोरंजन व्हावे यासाठीच श्रवण घडते.

कलौ लुब्धा नरा नार्यो व्यग्राः संसारकर्मणि ।
क्षणं क्रीडन्ति विश्रान्त्यै सायं वेदान्तचर्चया ॥
असें एका पंडिताने फटकळपणे म्हटलें आहे. तो म्हणतो-विषय-सुखाची अत्यंत ओढ असलेले स्त्री-पुरुष (लुब्धा), प्रपंचाच्या ऐहिक गोष्टींतच आपल्या सर्व शक्तीनिशी गुंतून पडलेले असतात (व्यग्राः), आणि मग संध्याकाळी थोडा वेळ थोडी करमणूक म्हणून, कांहीं विरंगुळा म्हणून (विश्रान्त्यै) वेदान्ताची चर्चा करीत असतात. या कलियुगांत घडते तें असें (कलौ).

विज्ञानातील लहान-सहान गोष्टीमागचे नियम कळण्यासाठी, सत्य आकळण्यासाठीं, फार कष्ट करावे लागतात, अगदी देहभान विसरून एकाग्र व्हावें लागतें. आर्किमिडीज, न्यूटन, मादाम क्युरी या संशोधकांची चरित्रे या दृष्टीनें लक्षांत घेण्यासारखी आहेत. या अशा कष्टांनाच आपल्याकडे तप म्हणतात. तप आचरावयाचें तर देहबुद्धि सोडून ध्येयनिष्ठा अंगिकारली पाहिजे. नुसत्या बोलघेवडेपणाला साध्याची प्राप्ति होण्याच्या दृष्टीनें कांहीं मूल्य नाहीं. परमेश्वर हे तर अत्यंत सूक्ष्म, विज्ञानाच्या दृष्टीनें फार दूर, असें परम सत्य आहे. त्याची प्राप्ति सुखलोलुप बोलघेवडेपणाने कशी व्हावयाची ?

माणूस नुसते बोलतो. असे करावे, तसें करावें, हें श्रेष्ठ आहे, हें महत्त्वाचे आहे; असे नुसते बोलतो, प्रत्यक्ष करीत नाहीं. याचें कारण मनाला ती ओढ नसते, मन शुद्ध नसतें, प्रसन्न नसतें, एकाग्र नसतें. तें भलभलत्या कल्पनेंत रंगलेले आणि नको ती धावपळ उगीच करणारे असे असतें. मनाचे व्यापार विचारांत घेतले तर आपलें आपल्यालाच आश्चर्य वाटावे अशी स्थिति होते. "हृष्टं कदापि रुष्टं शिष्टं दुष्टं च निन्दति स्तौति । चित्ते पिशाचमभवत् राक्षस्या तृष्णया व्याप्तम् ॥" हें शंकराचार्यांनीं केलेले मनाचे वर्णनच समर्थांना दुश्चित आणि सैराट धावे या शब्दांनी अभिप्रेत आहे. मनाचे हे व्यापार खरोखरीच त्यांची लाज वाटावी अशा स्वरूपाचे असतात. माणूस चांगला देवघरांत असतो, पूजा करतो, पोथी वाचतो, कीर्तन ऐकतो, तोंडाने स्तोत्रपाठ म्हणत असतो, आणि त्या वेळेला मन मात्र नेमके नको त्या गोष्टी आठवीत बसते. बहुतेकांचा हाच अनुभव आहे. नीतीची मर्यादा राखण्यासाठी, उर्वशीसारख्या त्रैलोक्यसुंदरीला सहजपणे नाकारणाऱ्या, अर्जुनासारख्या थोर महात्म्याचाहि अनुभव असाच आहे. अत्यंत चंचल आणि आडदांड अशा मनाला कसें आवराचे ? हा प्रश्न त्यालाहि भेडसावत होता. मग सामान्यांचें काय होत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. त्यादृष्टीनें अहर्निश प्रयत्न केल्यावांचून सर्वस्थळीं, सर्वकाळीं, सर्व दिशांनी सावध राहण्यावांचून, मनाला योग्य तें वळण लागणे शक्य नाही.

कीर्तन-प्रवचनकाराला देव भेटतो हा भ्रम आहे. लोकहि तसें चुकीने समजतात. बोलतो कसें ? सांगतो काय ? यापेक्षा, वागतो कसें ? करतो काय ? हें महत्त्वाचें आहे आणि हें ज्याचें त्याला नेमके समजते.

ज्याचें मन चंचल आहे, वासना गेल्या नाहीत, वैराग्य बाणलें नाहीं, कामक्रोध आवरले नाहींत, अहंकार उणावला नाहीं, म्हणजेच मन निर्मल, शांत, प्रसन्न झालें नाहीं, त्याचें भाग्य कधी उदयास येणारच नाहीं, आणि देव भेटण्याची तर शक्यताच नाहीं.

विवेकें क्रिया आपुली पालटावी । अती आदरें शुध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा । मना कल्पना सोड संसारतापा ॥ १०५ ॥

मनाला आवरण्यासाठी, मन शुद्ध, शांत, प्रसन्न करण्यासाठीं काय करावें त्याचा उपाय समर्थ रामदासस्वामी या श्लोकांत सांगत आहेत.

अर्जुनासारख्यालाहि मन आवरणे कठीण वाटलें तेथे आमची योग्यता ती काय ? कसें जमणार हें आम्हाला ? अपयश पदरी येण्यापेक्षा त्या भानगडींत न पडलेच बरे, असे कोणास वाटेल; पण तसें वाटूं देऊं नये म्हणून आईचे हृदय असलेले, संतजन सर्वांना साधले असे मार्ग दाखवित असतात, उपाय सुचवीत असतात. योग्यता ही काही आकाशातून पडणारी वा खाणींत सापडणारी गोष्ट नव्हे. क्रमाक्रमाने, पायरीपायरीने; प्रयत्नपूर्वक त्या त्या कार्यासाठी योग्यता प्राप्त करून घेतां येते. "नावेक विरक्तु । जाहला देवधर्मी नियतु । तरी तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ।।" (ज्ञा. ६ । ३४२) असें ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आसक्ति सुटत नाही आणि इंद्रियांवर नियंत्रण नसतें हे मनाच्या चंचलतेचे कारण आहे. आणि मनाची चंचलता इंद्रियांना अधिकच स्वैर बनविते. एकमेकांपासून पोषण घेत दोन्हीं वाढत असतात. शरीर आवरणे त्यांतल्या त्यांत अधिक शक्य आहे. म्हणून क्रिया पालटण्यावर समर्थांनी भर दिला आहे. चांगलें काय, वाईट काय, काय करावें, काय करूं नये, याची जाणीव धर्माने, शास्त्रानें, परंपरेने, रूढीने, थोरांच्या, वडीलधाऱ्यांच्या उपदेशानें, झालेली असते. पण त्याप्रमाणें वर्तन मात्र घडत नाही. विवेकाने असा पालट बुद्धिपुरस्सर घडवून आणावा लागतो.

बिघडलेली गोष्ट एकदम कधीं सुधारत नसते. कित्येक वेळां एकदम सुधारण्याचा प्रयत्न करणेहि अनिष्ट ठरतें. विवेकाची आवश्यकता असते ती त्यासाठीं. कित्येक वेळां स्वतंत्रपणें विचार करतां-वा तात्त्विक भूमिकेवरून-एकारी गोष्ट वाईट असते, त्याज्य असते. पण तरी व्यवहारामध्ये वागताना, तसें वागण्याची सवड ठेवावी लागते, देशकालपरिस्थितीचा, प्रकृति-प्रवृत्तीचा, अनुक्रमाने विचार करावा लागतो. आतांच, लगेच, नाहीं तर कधीच नाहीं, असें प्रत्येक वेळीं म्हणून चालत नाहीं. सगळेच साधावयाचे असलें तरी तें एकदम कधीचं साधत नाही हे लक्षांत ठेवावे लागते. विवेक करावा लागतो तो यासाठींच. शरीराला लागलेल्या संवयी व मनाला वाटणारे हवें-नको यांचा बारकाव्याने विचार करून त्यांतील नको तें क्रमाक्रमानें टाळीत गेलें पाहिजे, इष्ट तें हळू हळू साधीत गेलें पाहिजे. चांगली भूक लागली तरी पानांत वाढलेल्या कढत खिचडीत मध्येच हात घालून मोठा घास घेणे इष्ट नसतें; त्यानें बोटे भाजतात व जिभेलाहि चटका बसतो. पानांत वाढलेली खिचडी कडेकडेने, लहान लहान घास उचलीत, खाणेच शहाणपणाचे ठरतें. दीर्घकालपर्यंत न घासलेली तांब्यापितळेचीं भाडी एका घासण्याने स्वच्छ होत नसतात. पाऱ्यातील अशुद्धे काढून टाकण्यासाठीं त्याचें तीन वेळां ऊर्ध्वपातन करावे लागतें. काय करावयाचें आहे हें निश्चित झालें तरी तें कसें करावें, कुठे करावें, किती करावें, केव्हां करावें याचें तारतम्य बाळगावेच लागते. हाच विवेक. कंटाळा, आळस हा जसा चांगला नाहीं, तसा अत्युत्साहहि चांगला नाहीं. दीर्घसूत्रीपणा टाकणें जसें आवश्यक आणि हिताचे त्याप्रमाणेंच फार घाई करणे घातक हेहि लक्षांत ठेवले पाहिजे. कितीही भूक लागली तरी अन्न घांसाघासानें खावे लागतें, कितीहि तहान लागली तरी पाणी घोटाघोटानें घ्यावें लागतें. आणिकहि एक गोष्ट लक्षांत ठेवावी लागतें. करणें आणि न करणे, स्वीकारणें आणि टाकणें हें आपली स्वतःची परिस्थिति, प्रकृति, पाहून ठरवावे लागतें. दुसऱ्याचे पाहून, तसें वागून चालत नाहीं. क्रिया पालटावी लागते, आसने सोडावी लागतात. दुर्वर्तन टाळले पाहिजे. स्वैर वागणे चांगलें नाहीं, हें खरेंच, पण त्यासाठीं सर्वदृष्टीनें स्वतःचा विचार करावा लागतो. दुसऱ्याचे उदाहरण केवळ प्रेरक म्हणून उपयोगी पडते. हें सर्व लक्षांत ठेवून वागणे म्हणजेच विवेक करणें होय.

पालटामागची प्रेरणा ही जे चांगलें म्हणून वाटतें, त्याच्याविषयीच्या आदरानें निर्माण होते आणि मग जें चांगले, जे श्रेष्ठ, जें शुद्ध, जें पवित्र, ते क्रमाक्रमानें वर्तनांत मुरवीत गेले पाहिजे.

विषयोपभोग घ्यावयाचा तो आरोग्यशास्त्र लक्षांत ठेवून, शरीरधारणेच्या दृष्टीनें घेतला पाहिजे. व्यवहार-धंदा करतांना आपल्यापासून कोणाला कष्ट होणार नाहीत, कोणाची गांजणूक होणार नाही, कोणी लुबाडला जाणार नाहीं, कोणी फसविला जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. पूजापाठ करतांना ते प्रेमाने व निष्ठेने केले पाहिजेत. दानधर्म करतांना प्रामाणिकपणें उदार असलें पाहिजे. सामाजिक कामे करतांना स्वार्थाला दूर सारले पाहिजे. कुटुंबात वागतांना सरळपणा नि कर्तव्यबुद्धि ठेवली पाहिजे. स्वाभिमानी असावें पण अहंकारी असतां कामा नये. अन्याय सोसूं नये, पण अन्याय करूहि नये. आपण कोणाची निंदा करूं नये व आपली स्तुति इतरानी करावी अशी अपेक्षा करूं नये. दुःखितांविषयी कनवळा असावा. दीनांच्या साह्यास धावून जावे. आपण स्वतः चुकू नये. इतरांच्या वागण्याचा विचार क्षमाशील होऊन करावा. ईश्वरावर विश्वास ठेवावा. स्वराष्ट्राशी एकनिष्ठ असावे. समाजाचे व देशाचे ऋण मान्य करावें. तें फेडण्यासाठी दक्ष असावें. थोरांचा आदर करावा. लहानांच्यावर प्रेम करावें. जें कांहीं दुसऱ्याचे आहे, त्याची अभिलाषा धरू नये. द्वेष, मत्सर करूं नये. ताठ्याने वागू नये. कामक्रोधांना आळा घालावा. इंद्रियांना पीडा देऊं नये पण त्यांचें लाडहि करूं नयेत. स्वच्छता आणि पावित्र्य यांची आवड असावी. आणि हे सर्व देखाव्यासाठी नव्हे तर स्वभाव म्हणून, ओढ म्हणून प्रत्यक्ष वर्तनांतून प्रगट व्हावे. ' अती आदरें शुद्ध क्रिया धरावी' असें समर्थ म्हणतात ते या दृष्टीनें ध्यानांत घेतलें पाहिजे. विकारांना बळी पडल्यामुळे, स्वैराचारामुळे, दुर्वर्तनामुळे माणसाचे नैसर्गिक सामर्थ्य उगीचच वांया जातें. शक्ति नियंत्रित असेल तरच ती प्रभावी ठरतें. आणि म्हणून शुद्ध क्रियेच्या रूपानें शक्तीचा संचय करण्यास समर्थ सांगत आहेत, आणि हे सर्व, शरीर समर्थ आहे, इंद्रियें कार्यक्षम आहेत, कितीहि विचार केला, चिंतन केले तरी बुद्धीवर ताण येत नाहीं, डोके कलकलत नाही, मन चांगलें उत्साहि आहे, उभारी टिकून राहूं शकते तोच झाले पाहिजे.

सर्व दृष्टिने चांगलें वागण्याचा उपदेश ऐकला म्हणजे माणसे म्हणतात- " आम्हीं आपले सामान्य. कुणी ज्ञानेश्वर-तुकाराम नाहीं लागून गेलो. आमचें वागणे असे आपले इतपतच असावयाचे" इ. पण हें खरें नाहीं. प्रत्येक माणसाची चांगल्या वाईटाची जाण चांगली तीव्र असते. सूक्ष्महि असते. स्वतःच्या कोणत्याहि चुकीच्या वागण्याचे समर्थन तो अनेक प्रकाराने करीत असला तरी तशीच किंवा त्यापेक्षाहि लहान चूक जेव्हां दुसऱ्याकडून घडते तेव्हां हे लक्षांत येते. त्याच्या हातून चुकले यामागेहि योग्य, समर्थनीय, अन्य कारण असू शकेल हें कुणी लक्षांत घेत नाही. त्यावेळीं माणसाच्या विचाराचा काटा अगदीं धारवाडी होतो, नव्हे त्यावेळी त्यानें वापरलेला तराजू अगदी रासायनिक तराजूवर ताण करणारा असतो. चौथ्या दशमिकापर्यंतची नोंद (Fourth decimal) तेथे नोंदली जातें. आणि मग उपहास, अवहेलना, अधिक्षेप, निंदा या स्वरूपात ती व्यक्त होते हे लक्षात घेऊनच समर्थांनी बोलण्याप्रमाणें चालावे, वागावे अशी चेतावणी दिली आहे.

कीर्तनकार, प्रवचनकार, उपदेशक, पुढारी यांनाच केवळ उद्देशून हें वचन नाहीं. सामान्य माणसे व्याख्यानें देत नसली तरी निरनिराळ्या निमित्तानें व प्रसंगाने गप्पा, गोष्टी, चर्चा, वादविवाद करीतच असतात; थट्टा, टिंगल, निंदा, स्तुति यांत केव्हाना केव्हां तरी भाग घेतच असतात. ते सर्व बोलणेच आहे. या अशा बोलण्यातून चांगल्या वाईटाचा विचार कोठे ना कोठे येतोच. तोच स्वतः वागतांना लक्षांत ठेवला पाहिजे. श्रीज्ञानेश्वर-तुकारामांच्या पातळीवर कोणाला एकदम जातां येणार नाही हें मान्य करता येईल. ते संत, उदात्त चरित्राचे गौरीशंकर आहेत. आपल्याला एकदम तसे होता येणार नाहीं हे खरें, पण सन्मार्गानें वागता येणार नाहीं हे खरें नाहीं. माणसाने प्रयत्न केला, चांगले होण्याचा आग्रह प्रामाणिकपणे धरला, तर त्याला तो आहे त्या स्थितींतून अधिक प्रगत, अधिक उन्नत होणें मुळींच अवघड नाहीं. माणसाच्या जवळचे सुप्त सामर्थ्य अलौकिक आहे, प्रचंड आहे. त्याचा शोध लागला, योग्य वापर करतां आला तर "नरका नारायण बन जाय, " पण "नर करनी करे तो " चरणदास नांवाचे एक सत्पुरुष म्हणतात.

करनी बिन कथनी इसी ज्यों ससिबिन रजनी ।
बिन साहस ज्यों सूरमा भूषण बिन सजनी ।
बाँझ झुलावै पालना, बालक नहि माहीं ।
बस्तु बिहीना जानिये जहाँ करनी नाहीं ॥
बहु डिम्भि करनी बिना कथिकथि करमूए ।
सन्तो कथि करनी करी हरिके सम हुए ॥

करण्यावांचून बोलणे हे चंद्राविना असलेल्या रात्रीसारखे आहे. अंतःकरणांत शौर्य-धैर्याचा लवलेश नसलेल्या माणसाने हत्यार घेऊन रणांगणात जावे तसें आहे. जिला मूल होत नाही अशा स्त्रीने विरंगुळ्यासाठी रिकाम्या पाळण्याला झोके देत बसणे जसें खुळेपणाचे आहे तसेंच हें आहे. दांभिक माणसे नुसतीच बोलत राहतात. आणि नुसतीच मरून जातात. संत मात्र बोलल्याप्रमाणे वागतात आणि परमेश्वराच्या पात्रतेत जाऊन पोचतात.

वर्तनात उतरत नाहीं तें बोलणे समर्थांनाहि मान्य नाहीं. त्या दृष्टीनें प्रामाणिक प्रयत्न तरी निदान माणसाने करीत राहिलेंच पाहिजे. त्या दृष्टीनें माणसांत सुधारणा होण्यासाठी एक अगदी मूलभूत कल्पना समर्थ सांगत आहेत, "मना कल्पना सोडि संसारतापा. '"कल्पना सोडी' आणि 'संसारतापा सोडी' किंवा 'संसारतापा कल्पना सोडी. ' कल्पनांचा त्याग करून संसारतापातून मुक्त हो किंवा संसार हा तापदायक आहे ही कल्पना सोडून दे. उगीच काहीतरी कल्पना करून संसाराच्या सुखदुःखात गुंतून राहू नकोस. हें त्यातील सार. वेदान्त शास्त्राप्रमाणे संसार हा जर श्रमात्मक आहे तर त्यांतील सुखदुःखे ही सत्य असण्याची शक्यताच नाहीं. तीं खरी आहेत असें मानून चालल्यामुळें तर मनुष्य त्या मोहांत गुंतून, नको तिथे, नको तसें, वागतो आणि मग त्याचें वागणे दुर्वर्तनाच्या, पातकाच्या पातळीवर उतरते. यासाठी शास्त्रीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे. कल्पनांचा त्याग केला पाहिजे. समर्थीनी हा विचार मनाच्या श्लोकांत अनेक प्रकारांनीं, अनेक ठिकाणीं, सांगितला आहे. "मना कल्पना वाऊगी ते न कीजे" (१२८) "मना कल्पना ते नको वीषयाची" (५) "विवेके कुडी कल्पना पालटीजे" (४०) "मना कल्पना कल्पित कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी" (५९) "मना कल्पना धीट सैराट धांवे ! तया मानवा देव कैसेनि पावे" (१०४) "मने कल्पिता कल्पना ते सरावी" (१६४) “स्फुरे वीषई कल्पना ते अविद्या" (१७२) "मिळे ना कदां कल्पनेचे नि मेळी" (५४) "मना कल्पनालेश तो ही नसावा" (५८). वस्तुस्थिती बाधक नसते, वस्तुस्थितिसंबंधी केल्या जाणाऱ्या कल्पना बाधक होतात. तत्त्वज्ञानानुसारी शास्त्रामध्ये यासाठींच सुखदुःखापेक्षा शोकमोहाला अधिक घातक मानले आहे, कारण त्यांचा जन्म कल्पनेतून होतो. परमार्थांत प्रगति करू इच्छिणारानें तिचा त्याग करावा लागतो. येथीलहि त्याज्य म्हणून सांगितलेली जी कल्पना आहे, ती कविप्रतिभेचा विलास असलेली कल्पनाशक्ति मात्र नव्हे, हें लक्षांत घेतलें पाहिजे.

बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा । विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्व भूतीं जया मानवाला । सदा प्रेमळु भक्तिभावें निवाला ॥ १०६ ॥

माणसाने आपले जीवन विकसित कसें करून घ्यावें, ते अधिकाधिक पारमार्थिक कसें घडवावे आणि अध्यात्म अधिकाधिक कसें आपलेसे करावें, याचें सूत्र श्रीसमर्थ येथें सांगत आहेत. स्वच्छतेकरितां स्नान व शुद्धतेकरितां संध्या असा क्रम येथें आहे. एक शरीराकरितां आहे, एक मनाकरिता आहे. शरीराची स्वच्छता स्नानानें होते, मनाची शुद्धता संध्येनें साधते. स्वच्छतेची जाणीव आपण व्यवहारामध्यें बऱ्याच प्रमाणांत ठेवतो. घराची झाडलोट करतो, कपडे धुतो, भांडी घासतो, भाजीपाला धुवून घेतो, अंघोळही बहुधा प्रतिदिनी होते. पूर्वी जेवण-स्वयंपाकाच्या आधीं हें नियमानें होत असे. आता तो कटाक्ष ठेवला जात नाहीं. स्वयंपाकाच्या उष्णतेने घामट वाटतें म्हणून नंतर स्नान करण्याची तऱ्हा अलीकडे आहे. अस्वच्छ शरीराने केलेल्या स्वयंपाकाला अस्वच्छता येते, निदान अशुद्धता तरी येतेच, त्याचा विचार कुणी करीत नाहीं. पण हा विषय सूक्ष्म आहे.

माणसे संध्याहि करतात. वडीलधाऱ्यांचा धाक म्हणून, रूढी म्हणून, परंपरा म्हणून, काहीतरी देवाचे केलेलें असावें तें बरें म्हणून. संध्या वा तत्सम कृत्ये माणसे करतात, खरें म्हणजे उरकून टाकतात. पूजा-पाठ, स्तोत्रे-महात्म्यें वाचणे, देवाला जाऊन येणे इत्यादि सर्व संध्येचींच उपलक्षणे आहेत. संध्या शब्दाने तींहि गृहीत धरावीत हें सर्व घडते पण तें बरें नसतें, एकनिष्ठेचें नसतें. आणि समर्थ तर 'बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा' असे सांगतात.

पूर्वी स्नानांतील स्वच्छतेकडे फारसे लक्ष नसे. अलीकडे तें थोडे अधिक आहे. पूर्वी बहुतेकांचें स्नान म्हणजे अंघोळ (अंग ओलं) असे. अंग आणि नेसतीं वस्त्रे ओली झालीं कीं अंघोळ झाली. स्नानाचा संबंध शरीराच्या स्वच्छतेशीं आहे हें लक्षांत घेतलें तरच ते खरें स्नान. चांगल्या स्वच्छ स्नानानें मनहि टवटवीत, उत्साही, प्रसन्न, होवू शकते. स्नान झालें नसेल तर कोणत्याहि धार्मिक कृत्यांत भाग घेण्याचा अधिकार प्राप्त होत नाहीं अशी आपली धारणा आहे. स्नान हे व्रत आहे, त्रिकालस्नान करणें धार्मिकतेच्या दृष्टीनें फार प्रशस्त मानलें जातें. मर्यादित अर्थाने त्यालाहि महत्त्व आहे. ज्यांना कशातच उत्साह वाटत नाहीं अशा खिन्न मनोवृत्तीच्या लोकानी दोन वेळां, तीन वेळां स्नानाचा नियम करून पाहण्यासारखा आहे.

संध्या ही सूर्याची उपासना आहे. सर्व चैतन्याचा आणि सृष्टीच्या व्यापाराचा प्रेरक सूर्य आहे, तो परमेश्वराचे मूर्त प्रतीक आहे. संध्येच्या माध्यमांतून त्याच्याशी संबंध प्रस्थापित होतो आणि मग चैतन्याचे प्रेरक अंश आपल्यालाहि लाभू शकतात. सृष्टीचा प्राणभूत असलेला गायत्रीमंत्र हा सर्व मंत्रांचा, चक्रवर्ती सम्राट आहे. त्याचें अनुष्ठान जितक्या निष्ठेने होईल तितके तें लाभदायक होते. जो संध्या करीत नाही तो पूजा करतो, जप करतो, पोथी वाचतो. आपल्याकडे अधिकारभेद स्वीकारला असल्यानें अशी विविधता होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनीहि "द्विजासीच ब्रह्मसूत्र ! येरां स्तोत्र कां नाम मंत्र !" अशी विभागणी करून स्वाध्याय सांगितला आहे.

हें जें सर्व करावयाचें तें बरें केलें पाहिजे, एकनिष्ठेनें केलें पाहिजे, कसेतरी उरकण्याची, टाकणें टाकल्याची भावना, त्यामागे असूं नये. संध्यापूजादि गोष्टी करण्यांत आस्था पाहिजे, श्रद्धा पाहिजे. कोण काय करतो, हें महत्त्वाचें आहेच पण कसें करतो, किती करतो, याला त्याहूनहि अधिक महत्त्व आहे. करण्यामागे आवड, प्रेम, अधिकस्य अधिकं फलं ही भावना असणें आवश्यक आहे. जें करणें तें मनापासून केलें पाहिजे, लक्ष लावून केलें पाहिजे, सावध राहून केलें पाहिजे, हें सगळे लक्षांत घेऊन करणें म्हणजेच एकनिष्ठेनें करणें आहे. आपण असे करतो कां याचा विचार प्रत्येकानें करावा.

कोणाकोणाला कीर्तनप्रवचनांत हटकून झोप येते. झोप ही कुंभकर्णांची बायको. कुंभकर्ण मेला तेव्हां ती बापडी रिकामी झाली आणि तेव्हांपासून वेळ घालण्यासाठी म्हणून कीर्तनप्रवचनाला येऊ लागली, अशा अर्थाचें एक संस्कृत सुभाषित आहे. यांतील विनोद सोडून द्या. पण पुष्कळजण असे झोपतात हें खरें. कीर्तन काही कुणी त्यांच्यावर लादलेले नसतें. आपण होऊन थोडा त्रास सोसून आलेले असतात. तरी त्यांना झोप लागते. एक वेळ अंथरुणावर पडून झोप येणार नाही. पण कीर्तनांत येते. आतां हें चांगले नाहीं. तरीपण त्यांत झोप घेणारांचा दोष थोडा आहे. ही गोष्ट नकळत होते. अगतिकपणे होते. पण अशा झोप घेणाराकडे पाहून झोप न येणाऱ्या ज्या अन्य कुणाला उपहासाने हसू येतें ते जास्त दोषी आहेत, कारण ते सावध आहेत आणि कीर्तनांत त्यांचें लक्ष नाहींच. ज्याला झोप येते तो निदान दांभिक तरी नाहीं. असें सर्वत्रच होतें. श्रवण, पूजा, स्तोत्रपठण, पोथीवाचन हें सर्व माणूस करतो पण बरें करीत नाहीं. अंतःकरणांत खरी निष्ठा नसते, प्रेमादर नसतो. हा आपल्या उद्धाराचा मार्ग आहे हें मनापासून पूर्णपणे पटले नसतें. करतो ते गतानुगतिक म्हणून, नाहीं केलें तर पाप लागेल, संकटे भोगावी लागतील असें भय वाटतें म्हणून. या कृत्यामध्ये मन लागत नाहीं, बुद्धि स्थिरावत नाहीं; हात, डोळे, जीभ, यांची तेवढी हालचाल होत राहते. एक हिंदी कवि म्हणतो-
माला तो करमें फिरै, जीभ फिरै मुखमाहि । मनुवा तो दस दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहि ॥
जप करायला म्हणून बसतो तेव्हां हातातली माळ फिरते, तोंडातली जीभ हालते आणि त्याचवेळी मन मात्र दाही दिशांना भटकत असते याला नामस्मरण किंवा जप हें नांव कसे देतां येईल ? मनबुद्धीचीं केंद्रें वरच्या पातळीवरची आहेत, सूक्ष्म आहेत. हाताची, डोळ्याची, जिभेची हालचाल ज्याच्यामुळे होतें तीं प्रेरक केंद्रें स्थूल आहेत, खालच्या पातळीवरची आहेत. या वेगळेपणामुळें मनाला वा बुद्धीला करीत असलेल्या कामांत रमविणें, एकाग्र करणे अवघड जातें. गाडीवानानें गाडीला जुंपलेल्या बैलाला एकदां हाकावें आणि मग कासरा खाली ठेवून झोपी जावे तसें या कृत्याचे होतें. असें होऊं नये म्हणून समर्थांनी "विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा" अशी दुसरी ओळ सांगितली आहे. मनाला गोडी वाटावी, मन रमावें, नंतर ते एकाग्र व्हावें, स्थिर व्हावें असा उत्तरोत्तर वरचा वर्ग आहे. नुसते करणें हा अगदीं बालवर्ग. एकेका इयत्तेत, त्यातहि बालवर्गांत किती वर्षे बसावयाचे त्याचा विचार गंभीरपणे करावयास नको कां ?

अनेक विकारांमुळे चंचल होऊन, करीत असलेल्या धर्मकृत्यांतून पुन्हा स्थानभ्रष्ट होणाऱ्या मनाला, विवेकाने आवरून, वरचेवर मार्गी लावण्याचा, वळविण्याचा, स्थिर करण्याचा, प्रयत्न करावा लागतो. या पुन्हा पुन्हा करण्याचा कंटाळा बाळगून चालत नाहीं. मनाला वळविण्याचा त्यापेक्षा दुसरा मार्गहि नाहीं. नाटकांत किंवा सर्कशीत अभिनय किंवा कसरत पुन्हा पुन्हा करीत रहावे लागते. गायकाला एकेक स्वर गळ्यांत बसावा म्हणून कित्येक दिवसपर्यंत त्याचा रियाज करावा लागतो. गणित करण्याची रीत समजली म्हणजे तेवढ्यानेंच भागत नाहीं, त्या जातीची निरनिराळी उदाहरणे वारंवार सोडवावी लागतात. मनाच्या प्रकरणींहिं तेंच करावें लागतें. मन फार चुकार आहे. पूजेला बसल्यावर वा डोळे मिटल्यावर त्याच्या नाठाळपणाला जणू ऊत येतो. एरवी मनात कधीं आलें नसते तें त्यावेळीं नेमके येतें. यासाठीं मनाला माकडाची उपमा दिली आहे. पण एकदां गोडी लागली कीं मग तें रमते आणि स्थिरावते हा त्याचा गुणहि आहे. त्यासाठीं त्याला सामदामादींनी वरचेवर वळवीत राहावें, आवरीत राहावे. लौकर उठणे, गोष्टी वेळच्यावेळी करणें, व्यवस्थित आणि टापटिपीने करणें, याची संवय जशी प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते तसेंच मन रमविण्यासाठींहि करावें लागतें. श्रवणाची परिणति मननांत, मननाची निदिध्यासनांत व्हावी लागते. तसेंच पूजादींची परिणति एकाग्रतेत आणि एकाग्रतेची प्रसन्नतेंत झाली पाहिजे. मन हें त्याचें साधन आहे. तें सारखे भटकते केव्हां निसटते तें कळत नाहीं. त्याला आवरावे लागतें तें कसें त्याचा एक मार्ग समर्थ सुचवीत आहेत. "दया सर्वभूती जया मानवाला. " तो निवतो, शांत होतो, प्रसन्न होतो असे समर्थांनी म्हटलें आहे. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणीं साधकाच्या अंतःकरणांत दयाभाव असला पाहिजे. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळा येतो कां ? सर्व सोडून कोणत्याहि परिस्थितीत त्याच्या साह्यास जावे असे वाटतें कां ? हा माझा, हा परका, हा शत्रू, हा मित्र. हा माझ्या उपयोगी पडला किंवा पुढें कधीं पडेल अशा भावनेने दया येते कां ? सर्व ठिकाणीं, कोणताहि भेदाभेद न करतां, स्वभाव म्हणून, दया येते याचा विचार केला पाहिजे.

भीम तापट होता. गंधर्वांनी दुर्योधनाला पकडून नेले हे ऐकून त्याला बरें वाटले. पण युधिष्ठिराला तसें वाटले नाहीं. दुर्योधनाचीहि त्याला दया आली. म्हणून युधिष्ठिर संत ठरला.

ज्याच्या अंतःकरणांत दया नसते, त्याच्या अंतःकरणांत प्रेम, भक्ति निर्माण होऊं शकत नाहीं, त्याकरिता अंतःकरणाची कोवळीक पाहिजे. दया हे अंतःकरणाच्या कोवळिकेचें बाह्य रूप आहे. ती दाखवावयाची म्हणजे सुखासीनतेचा त्याग करावा लागतो, विषयोपभोगाला आळा घालावा लागतो, स्वार्थाला मुरड घालावी लागते, कर्तव्य भावनेने, निष्काम बुद्धीनें, सहाय्याला धावावे लागतें. त्यासाठीं होणारे कष्ट सोसावे लागतात. हें असें असलें कीं मग त्या अंतःकरणात प्रेमभक्ति उत्पन्न होऊं शकते, ईश्वरनिष्ठेने ती वाढत जाते, आणि मग अशा प्रेमळ मनाला शांति मिळते, प्रसन्नता प्राप्त होते.

मना कोप आरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगीं वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं । मना होई रे मोक्षभागीं विभागी ॥ १०७ ॥

मागच्या श्लोकांत निवाला, शांत झाला, प्रसन्न झाला असें वर्णन आलें आहे. ही शांति, प्रसन्नता, स्थिरावली पाहिजे. याचे उपाय सांगितले आहेत. राग, संताप, येऊ देऊ नये हा पहिला उपाय. संसारामध्यें तशी परिस्थिति भोवती बहुतेक वेळीं असतेच. जें हवें असतें, आवडते, तें मिळत नाहीं, जें घडूं नये असें वाटतें, तें घडत असते. संबंधित लोक, बोलू नये, वागूं नये, तसें वागत असतात, बोलत असतात. प्रतिकूल प्रसंग ओढवत असतात अशावेळींहि शांत राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. कांही वेळा कर्तव्यबुद्धीने रागावणे आवश्यकहि असेल पण तो क्रोध आलेला असतां कामा नये, आणलेला असला पाहिजे. 'कोप आरोपणा ते नसावी' याचा अर्थ राग उपजू देऊं नये, उत्पन्न होऊं देऊ नये हा जसा आहे तसाच रागाला चढू देऊं नये, त्यानें आपल्या डोक्यावर बसू नये, असाहि अर्थ करता येईल. कुणी रागवत नाही, संतापत नाही असे जर एकदा कळले तर त्या माणसाची जीवनात परवड झाल्याविना राहणार नाहीं. म्हणून संतापाच्या आधीन होऊ नये हें जितके खरे, तितकेच प्रसंगविशेषीं कर्तव्यबुद्धीने क्रोध आणता आला पाहिजे हेहि खरेंच. 'कोप आरोपणा नसावी' म्हणण्यांत समर्थांना तेंच अभिप्रेत असावें.

रागाच्या स्वाधीन झाल्यामुळें माणसाचे वागण्या-बोलण्यांतले तारतम्य सुटते. स्वतःच्या प्रकृतीवरही दुष्परिणाम होतात. परिस्थितींत सुधारणा होत नाहीं ती नाहींच. यासाठीं सावध राहून विचार केला पाहिजे. राग यावा असें दुसरे वागतात असें जें वाटते त्यामागे तसें वागणाराच्या दृष्टीनेहि कांही योग्य कारणें असूं शकतात तीं विचारांत घेतली गेली पाहिजेत. आपणाला आवडत नाहीं, पटत नाहीं असें जें वाटतें, तेहि योग्यच असतें असें नाहीं. आपल्या स्वभावामुळे रजोगुणाच्या, तमोगुणाच्या, प्राबल्यामुळे आपली आवड हीच मुळांत अनिष्ट असण्याची शक्यता आहे हेहि विचारात घेतले गेलें पाहिजे. बाहेरच्या घटनांमुळे आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या प्रतिक्रियांची अशी चिकित्सा करतां आली तर क्रोध माणसाच्या डोक्यावर चढणे शक्य नाहीं. तो त्याचा आज्ञाधारक सेवक होऊन राहील.

मनाला शांत राखण्याचा दुसरा उपाय, संत सज्जनाच्या संगतीत ग्रहणे हा. संतांचे आचार-विचार-उपदेश यांचा परिणाम परमार्थाच्या दृष्टीनें फार चांगला होऊ शकतो. मात्र त्यासाठी माणसाचे मन संस्कारक्षम असावें लागतें, नम्र साधकाचे असावें लागतें. यासाठींच समर्थांनी सज्जनांच्या संगतीत राहावें असें नुसतेच न म्हणतां बुद्धीहि साधूंच्या संगतीत राहिली पाहिजे असें आवर्जून म्हटले आहे. संगतीचा, वातावरणाचा माणसावर परिणाम होतो हें निश्चितच. सहवासांत असलेल्या लोकांचे आचार-विचार हे परिणाम करीत असतात. त्याचें चांगले किंवा वाईट संस्कार माणसांवर कांहीं प्रमाणांत तरी होतात. सज्जनांच्या सहवासामुळे वाईट संस्काराचें भय टळते आणि चांगल्या संस्काराचा संभव वाढतो.

पण यासाठी सहवासांत राहणाऱ्या व्यक्तीची वृत्ति अनुकूल असावी लागते. त्या वृत्तींत स्वार्थ, अहंकार, आळस, उपेक्षा, तुच्छता, असतां कामा नये. ध्येय निश्चित असलें पाहिजे, त्या दृष्टीनें प्रगति करून घेण्याची इच्छा उत्कट असली पाहिजे. विवेक जागृत असला पाहिजे. जे पाहिले, ऐकले, त्याचे मूल्यमापन करता आले पाहिजे. उपदेशाप्रमाणे वागण्यासाठीं प्रयत्नशील असले पाहिजे. ही बुद्धि जर नसेल तर सज्जनांच्या संगतीचा काही विशेष लाभ होणार नाहीं. मोठमोठ्या संतमहात्यांचें-त्यांच्या सेवेत, सहवासांत, दीर्घकालापर्यंत राहिलेले- शिष्यहि आपल्या गुरुच्या समोरच किंवा माघारी संपत्तीसाठीं, अधिकारपदासाठी आपसांत भांडल्याची उदाहरणे प्राचीन-अर्वाचीन काळीहि काहीं थोडी नाहीत. “सत्संगतीचा महिमा कळेना । सत्संग कोठे श्रमल्या मिळेना । सत्संगीने तुटते कुबुद्धि । सत्संग झाल्या बहुसाल सिद्धि ॥" या प्रसिद्ध श्लोकातील शेवटच्या दोन ओळी अगदी यथार्थ आहेत; पण त्यांची अनुभूति येण्याच्या दृष्टीनें पहिली ओळ महत्त्वाची आहे. सत्संगतीचा महिमा कळावा लागतो. तेंच होत नाही ही अडचण आहे. आणि त्यामुळें संतांची संगति दुर्लभहि होतें. माणसे संतांचा आदरसत्कार करतात. अगदीं पायांवर डोके ठेवून नमस्कार करतात. सहवासात राहतात. पण बहुधा तीर्थांतल्या गोट्यासारखी जशीच्या तशीच असतात.

यासाठी निषेध रूपानें समर्थ तिसरा उपाय सांगत आहेत.

विषयांचा संग, आसक्ति, फार घातक आहे. अत्यंत दुष्ट आहे. ती टाळावी, तिच्यापासून दूर राहावें, त्यासाठीं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. संग हाच शेवटी बुद्धिनाशापर्यंत नेऊन पोंचवितो असे भगवंतांनी स्पष्टच सांगितले आहे. त्यासाठीं तर समर्थांनी त्याला चांडाळ म्हणून शिवी घातली आहे. संग घातक आहे पण त्याचें स्वरूप घातक वाटत नाहीं, उलट लोभनीय वाटते, आकर्षक वाटतें. संगाचा हा कपटीपणा अधिक घातक आहे. सत्त्वगुण ही मनाची प्रकृति खरी, पण वृत्तींत प्रभावी असतो तो रजोगुण. आणि तो या संगाची, आसक्तीची भलावण करीत असतो आणि मग माणूस मोहाने बळी पडतो. म्हणून सावध राहिलें पाहिजे. कारण या विषयसंगानेंच अहंकार वाढतो, स्वार्थ बळावतो, विकार उन्मत्त होतात. आरंभी सुखासीनतेची चटक लागते, ती निरुपद्रवी वाटते आणि त्यांतूनच पुढें अनर्थ ओढवतो.

महर्षि नारदांनींहि आपल्या भक्तीच्या प्रकरणांत संगाविषयीं पुष्कळच सांगितलें आहे. भक्तीचे साधन सांगत असतांना त्यांनीं प्रथम संगत्यागाचा उल्लेख केला आहे. काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश अशी सर्वनाश करणारी कारणे आरंभी अगदी लहान वाटली तरी संगामुळे तीं सर्व समुद्रासारखी प्रचंड होतात आणि माणसाला बुडवतात, असें देवर्षि नारदांनी म्हटलें आहे. मायेतून कोण तरतो त्याचें उत्तर देतांना त्यांनीं “यः संगास्त्यजति यो महानुभावं सेवते यो निर्ममो भवति ।" असें दिलें आहे. समर्थांच्या या श्लोकांत उलट्या क्रमानें तोच विचार आला आहे, आणि हे तीन ज्याला साधले तो तरून जातो, उद्धरून जातो म्हणजेच मोक्षाचा वाटेकरी होतो असें समर्थ सांगतात. श्लोकाच्या चौथ्या ओळीतून तें स्पष्ट होतें.

'मोक्षभागी विभागी हो' याचा अर्थ मोक्षांत तुझा भाग आहेच, तो तू मिळव असा आहे. प्रत्येक मनुष्य मोक्षभागी म्हणजे मोक्षाचा अधिकारी आहेच. तो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याक्षणीच त्याचें नांव पटावर लिहिले गेलें आहे, पण त्यानें तो अधिकार प्रस्थापित केला पाहिजे. ही भाषा व्यवहारांतील गोष्टी उपमेसाठीं गृहित धरून केलेली आहे. मोक्ष हा कांहीं स्थावर जंगम संपत्तीसारखा इंद्रियगम्य विषय नाही. त्याची वाटणी होते, म्हणजे चतकोर, अर्धा वाट्याला येतो, तो पूर्ण राहत नाहीं. असें त्यामुळे मानतां येत नाही. मोक्षाचे स्वरूप समजावून सांगतांना, "न मोक्षो नभसः पृष्ठे न पाताले न भूतले । मोक्षो हि चेतो विमलं सम्यक्ज्ञानविबोधितम् ।" असें वर्णन आलेले आहे. म्हणजे शुद्ध, निर्मळ, प्रसन्न चित्त हाच मोक्ष. तो प्राप्त करून घेतला पाहिजे. मन त्या पातळीवर कसें पोचवावे यासाठी तर मनोबोधाचा, मनाच्या श्लोकांचा अवतार आहे.

शुद्ध, निर्मल, शांत, प्रसन्न, असणें हेंच मनाचे मूलभूत स्वरूप आहे व तेंच त्यानें प्राप्त करून घ्यावयाचे आहे. कापूस, मुळांत स्वभावतः शुभ्र पांढरा असतो, म्हणून वस्त्रहि मुळांत शुभ्र पांढरे असते तें मळतें, तें संसर्गानें. भट्टींत घातले व धुतले कीं उपरा मळ नाहींसा होतो आणि वस्त्राची मूळची स्वच्छता प्रगट होते. पांढरेपणा कांहीं बाहेरून त्याच्यावर लादला जात नाहीं. मनाचेंहि तसेंच समजावे. उपाधीमुळे तें विकारी होतें. साधनेने उपाधि नष्ट करावयाच्या असतात.

सदा सर्वदा सज्जनाचेनि योगें । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारीं । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥

मनुष्य जात्याच बुद्धिमान् असल्यानें तो विचार करतो. ऐकणे, वाचणे, अनुभवणे, पाहणे, यामुळे त्याच्या विचारांना चालना मिळते. बुद्धीची मर्यादा, प्रकृति, स्वभाव, यांतील भिन्नता, परिस्थितीचे स्वरूप यामुळे विचारांना निरनिराळ्या दिशा लागू शकतात. वेगवेगळी मतें बनतात. तीं कधीं सत्याच्या जवळ असतात. कधीं दूर, कधीं असत्याला सत्य व सत्याला असत्य मानणारी अशीं भ्रांत, कधीं निश्चित, कधी आग्रही, कधीं दुराग्रही, कधीं चंचल, सरड्याच्या रंगाप्रमाणें पालटणारीं, अशीहि तीं असतात. त्यामुळें दोन भिन्न मताच्या व्यक्ति एकत्र आल्या, तर चर्चा होते, आणि प्रकृतिभेदानें या चर्चेला वादविवादाचे स्वरूप प्राप्त होतें. या वादविवादाचेहि कांही लाभ निश्चित आहेत. बुद्धीला चालना मिळते, विचाराला नेमकेपणा येतो. आपलें मत मांडण्याचे कौशल्य लाभते, वाढते. पण कांहीं तोटेहि होतात. हट्टीपणा, दुराग्रह, प्रतिपक्षावर मात करण्याचा अभिनिवेश, हे अनिष्ट गुणहि वादामुळे वाढीस लागतात. नुसताच बोलभांडपणा येतो. विद्वतेचे प्रदर्शन करण्याची अहंता वाढते. हें सर्व साधकाच्या दृष्टीनें अनिष्ट आहे. म्हणून समर्थ येथून पुढें ५+३ अशा आठ श्लोकांनी वाद हितकारी असावा, सुखसंवाद हें त्याचें स्वरूप असावें असें उपदेशीत आहेत.

मनुष्य जें वागतो, त्याचामागे त्याच्या काहीं धारणा असतात, कांहीं संस्कारहि वागण्यावर परिणाम करीत असतात. समाजहिताच्या दृष्टीनें समर्थांना सदाचारी, सद्वर्तनी असा माणूस अपेक्षित आहे. त्यानें चांगले काय तें समजून घेतलें पाहिजे, त्याचे विचार निश्चित असले पाहिजेत. तो निष्ठावंत झाला पाहिजे, एकूण माणसाचे वागणेंहि चांगल्या अर्थाने सुधारले पाहिजे, असे समर्थांना वाटतें आणि म्हणून ते त्या दृष्टीनें काय करावें तें सांगतात.

माणसाच्या धारणा आणि त्याचें वागणे यावर सभोवतीच्या वातावरणाचा परिणाम मोठा असतो अन्यथा एरवी अचरटपणाच्या ठरल्या असत्या अशा वा परिणामी अनिष्ट असलेल्याहि अनेक गोष्टी अद्ययावत्पणाच्या नांवाखाली शिक्षित वर्गांतहि रूढ झाल्या नसत्या. म्हणून समर्थांनी साधकाला सज्जनांच्या संगतींत राहण्यास सांगितलें आहे

येथील सज्जन शब्दाने संत, सत्पुरुष अभिप्रेत आहेत. सर्वसामान्य भला माणूस एवढाच मर्यादित अर्थ येथें सज्जन शब्दाचा नाहीं. मनाला सज्जन म्हणतात, तेव्हां तो अर्थ अभिप्रेत असतो. ज्याची क्रिया पालटावयाची तो, म्हणजेच ज्याचें वर्तन सुधार आवश्यक आहे तो आणि ज्याच्या संगतींत राहून क्रिया पालटते, वागणे सुधारते, वर्तनाला भक्तीचा भावार्थ लाभतो तो, हे दोन्ही एका पातळीवरचे असणें शक्य नाहीं.

या दृष्टीने माणूस समजून घेण्यासाठी माणसाचे तीन वर्ग मी कल्पिले आहेत. जो शरीरानेंहि नको तसा वागत असतो, दुर्वर्तन करतांना, अनाचार करतांना ज्याला लाज वाटत नाहीं तो अधम. त्याला दुर्जन म्हणावें. ज्याच्या मनांत कांही वेळांतरी नको त्या गोष्टी करण्याची इच्छा होते पण शरीराने जो तसा कधीं वागत नाहीं, क्वचित् एखाद्या वेळीं मोहानें वागतांना चूक झाली तर लगेच ज्याला खंत वाटते, पश्चात्ताप होतो, तो मध्यम. त्याला सज्जन म्हणावें. आणि वाईट वागावे, अनाचार करावा असें ज्याच्या कधीं मनांतहि येत नाहीं मग शरीराने घडण्याची गोष्ट दूरच राहिली, असा जो, तो उत्तम. त्याला सत्पुरुष म्हणावें.

समाजामध्यें मध्यम वर्गातल्या, सज्जन म्हणावें अशा लोकांची बहुसंख्या असते, आणि ते मध्यम असल्यामुळें, मध्यस्थ असल्यामुळें परिस्थितिवशात् ते इकडे किंवा तिकडे कलूं शकतात. म्हणून संरक्षणाची किंवा संस्कारांची आवश्यकता त्यांनाच असते. सध्या हा आणखी एक वर्ग आहे. प्रतिष्ठितपणा मिळविण्यासाठी दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठीं, वागण्याची एक विशिष्ट पद्धति कांहीं लोकांची असते. वरवर पाहतांना ते अतिथ्यशील, नम्र, आर्जवी, आपुलकी, जिव्हाळा असलेले असें वाटतात. त्यांचे वागणे, बोलणें, नेमस्त, टापटिपीचे असते. मुरलेले धूर्त राजकारणी आणि व्यवहार-चतुर व्यापारी ही या वर्गातली उदाहरणे. पण ही जी सभ्यता आहे ती वरवरची आहे, उपरी आहे, देखाव्याची आहे. स्वार्थ तर साधावा पण तो कोणाला फारसा बोचूं नये किंवा आपल्या स्वार्थीपणाकडे कोणाचें लक्ष जाऊं नये वा तो कोणाच्या लक्षांत येऊ नये, अशासाठी सभ्यतेचे पांघरूण घेतले जातें. या सभ्य वागण्यांत जर कांहीं प्रामाणिकपणा असेल तर तो मध्यम वर्गात म्हणजे सज्जनांच्या गटांतच घालावा लागेल.

सत्पुरुषाच्या वागण्या-बोलण्यांत पोषाखी सभ्यता असण्याची शक्यताच नाही. म्हणून तर संत ओळख अवघड जाते नारदांनी यादृष्टीनेंच सत्संगाला अगम्य म्हटलें आहे.

चांगलें वागणे हेंच मुळांत नैसर्गिक आहे, निसर्गाला जवळचे आहे. या नैसर्गिकतेमुळेंच, स्वाभाविकतेमुळेंच चांगलें हें चांगलें ठरतें. वासना-संस्कारांनीं विकृती निर्माण होतात. विकृती वाईटाला रूढवितात. अनवधानाने त्यांत दीर्घकाल जातो, त्याची सवय लागते. मग पुढे त्याचे दुष्परिणाम दिसूं लागलें की माणूस सावध होतो. पण सवयीमुळे चांगलें हेंच दुष्कर होऊन बसलेले असतें. तें पुन्हा सुकर व्हावे यासाठी सज्जनांच्या संगतीने लाभ होतो. चांगलें काय आणि तें कसें शक्य आहे हें सज्जनांच्या संगतींत अनुभवास येतें. त्यांच्या सद्‌भावाची उत्कटता जाणवते. देखाव्याचें सभ्य वर्तन आणि प्रामाणिक शुद्ध चारित्र्य यांतील अंतर सत्पुरुषांच्या जीवनांत प्रत्ययास येतें. त्यांचा वेदान्त कीर्तन-प्रवचनापुरता नसतो. त्यांच्या विद्वत्तेला अहंकाराचा दर्प येत नाहीं. त्यांच्या धर्माचरणाला प्रसिद्धीची हाव असते. त्यांच्या आर्जवाच्या पोटांत स्वार्थ असत नाही. त्यांची नम्रता धूर्त नसते. विकाराचे ते दास नसतात. स्वामी असतात. त्यांची ईश्वरभक्ति अर्थाशी नसते. साधनेचे आडंबर ते करीत नाहींत. त्यांच्या कोमल हृद्यांत ईश्वराचें प्रेम भरून राहिलेलें असतें. विवेक हा त्यांचा सहचर असतो. दुसऱ्याच्या कल्याणाची त्यांची इच्छा प्रामाणिक असते. विचारी माणूस उघड्या डोळ्याने अशा सत्पुरुषाच्या संगतींत दीर्घकाल राहतो. तेव्हां आपण कसें होतो, कसें आहोत, आणि कसें व्हावयास पाहिजे हें त्याला उमगते आणि मग त्याची क्रिया पालटते, वर्तन सुधारते. अंतःकरणांत भक्तीचा जिव्हाळा उत्पन्न होतो. कृतीला भावाचा सुगंध लाभतो.

कृतीच्या मागची भक्तिभावाची भूमिका हीच महत्त्वाची. कृतीमध्ये पालट झाला आहे कीं नाहीं, सुधारणा झाली की नाही, हें भक्तिभावावरून ठरवावयाचें असते. बाह्यतः कृती वेगवेगळ्या असूं शकतात. प्रकृति-प्रवृत्तीच्या वेगळेपणामुळे, कोण कशात रमेल तें सांगणें कठिण आहे. कोणी पूजेत, कोणी पोथीत, कोणी कथेत, कोणी जपात, कोणी ध्यानांत, कोणी तीर्थयात्रेत, कोणी सेवेत, कोणी व्रत-नियमांत, कोणी दानांत, कोणी परोपकारांत असा जीवाभावानें निष्ठेने रंगला असेल. या कृत्यांत एकरूपता नाहीं, तरी अंतरंगांतील भक्तिभावामुळे त्यांचें पारमार्थिक महत्त्व सारखेच श्रेष्ठ असूं शकते. निष्ठा, प्रेम हें त्यांतील मूळ तत्त्व आहे.

माणसाचे आहार प्रांत भेदाने वेगवेगळे आहेत. काश्मिरी, सिंधी, पंजाबी, महाराष्ट्रीय, कर्नाटकी, तामिळी यांच्या आहारातील पदार्थ अगदीं वेगवेगळे आहेत. ते एकमेकांना आवडणार नाहींत, कदाचित् मानवणार नाहींत. म्हणून एक प्रकारचे अन्नच सगळ्यांनी घेतलें पाहिजे असा आग्रहहि धरता येत नाहीं. पण या विविध आहारांतलीं, शरीराचे पोषण करणारी मूलतत्त्वे मात्र, एकरूपच आहेत. वर्तनाचे, उपासनेचेंहि तसेंच असलें पाहिजे.

श्रीनारदांनी म्हटल्याप्रमाणे "तद्‌विस्मरणे परमव्याकुलतेति ।" अशी उत्कटता प्राप्त झाली पाहिजे. संतांच्या सहवासाचा लाभ त्यादृष्टीने फार होतो.

जो नुसताच बोलघेवडा नाहीं, त्याला हें सर्व जाणवते व त्यादृष्टीने तो प्रयत्नशीलहि असतो. केवळ बोलघेवडे असूं नये असें समर्थांनी सांगितलें आहे. जें जें श्रेष्ठ, चांगलें, आदरणीय म्हणून सांगितलें जातें, बोलले जातें, मानलें जातें, तें तें सर्व वर्तनांत उतरविण्याच्या दृष्टीनें माणसाने आग्रही असलें पाहिजे. 'क्रियेवीण वाचाळतेचे' वादविवाद हें व्यक्त स्वरूप असतें. समजावून सांगणें आणि जाणून घेणे, यासाठीं होणारे संभाषण समर्थांना इष्टच आहे. तोच तर या प्रकरणाचा विषय आहे. पण वादविवादाची भूमिका तशी नसते. प्रतिपक्ष्यावर मात करण्याच्या इच्छेनें केला जाणारा वाद हा न संपणारा आहे. गीतेने वाद हें भगवताचे स्वरूप सांगितले आहे तेव्हां तो न संपणारा असणे स्वाभाविकच आहे. बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि कौशल्य हे गुण असले की वादविवादामध्यें कोणालाहि विजय मिळवता येतो. ज्याचें हे गुण सरस आहेत तो जिंकतो. त्याहून श्रेष्ठ कोणी भेटला कीं पराजित होतो. दोघे तुल्यबळ असतील तर तणातणी वाढते आणि कंठशोष पदरी येतो. म्हणून चर्चा जी आहे ती स्वमतप्रतिष्ठापनेसाठीं न होतां, सत्य काय आहे तें जाणून घेण्यासाठी व्हावी. म्हणजे ज्ञान वाढते, मतपरिवर्तन होऊं शकते. वाद मिटतो. प्रामाणिक जिज्ञासा आणि निरहंकारी नम्र वृत्ति ही जर चर्चेची अंगे असतील तर वाद हा सुखसंवाद ठरतो. आणि तेव्हांच तो हितकरहि होतो.

शब्दाने आणि तर्काने वाद तुटत नाहींत कारण जें जाणून घ्यावयाचे आहे तें तत्त्व श्रीज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे "हें शब्दे विण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे । बोला आधीं झोंबिजे । प्रमेयासी ।।" (ज्ञाने. १ । ५८) अशा स्वरूपाचें असल्यानें तें जाणून घेण्यासाठी हृदयांत मार्दव असलें पाहिजे. "ऐसें हळुवारपण जे येइल ! तरीच हें उपेगा जाईल ! येरव्हीं आघवी गोठि होईल ! मुकया बहिरियाची ! !" (ज्ञाने. ६ । २६)

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा । जनीं सूखसंवाद सूखें करावा ॥
जगीं तो चि तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥

वादविवादामुळे प्रश्नाची तड लागेल, सत्याचा निर्णय होईल, या कल्पनेने कुणी चर्चा करूं म्हणेल तर त्यांत बहुधा यश येत नाहीं. (एकेकाळी मला या गोष्टीची फार हौस होती, मी अनेक गोष्टींवर अनेकाशी वाद केला आहे.) पण निरुत्तर होऊनहि आपलें म्हणणें कोणी सोडीत नाहीं. एखाद्या गोष्टीतील सत्य समजून घेण्यासाठी ज्या दोघांचा त्याच्याशी संबंध आहे, त्यांना समोरासमोर आणून, खरें जाणून घेण्याचा प्रयत्नहि यशस्वी होत नाहीं. दोघेहि परस्परांना तूं खोटे बोलतोस असेंच म्हणतात. कोणाची साक्ष काढावी तर तीहि उपयोगी पडत नाही कारण तोच असत्य बोलण्याचा आरोप पुन्हा होतो. शेवटीं चिडाचिड आणि क्वचित् रडारडहि होते. ज्यांत कोणाचे स्वार्थसंबंध गुंतले असण्याची शक्यता नाहीं, अशा तात्त्विक चर्चेतहि यापेक्षा वेगळे घडत नाहीं. एका विद्वान् निष्ठावंत सदगृहस्थाशी ज्ञानोत्तर भक्तीच्या संबंधांत एकदां मी तोंडी आणि लेखी पुष्कळ वाद केला पण आमचें कोणाचेच मतपरिवर्तन झाले नाहीं. महाभारताच्या संबंधात मी असाच एकदां एका प्रसिद्ध विद्वान व्यक्तीशी बोलण्यासाठी गेलों होतो. मुख्य विषय बाजूलाच राहिला आणि त्या विद्वानांनी शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर संभाजीने काम केलें तेंच विस्ताराने सांगितलें. म्हणून समर्थ म्हणतात- 'लोकामध्ये वादविवाद करणे सोडून द्या. त्या भरीस पडूं नका. '

श्रीनारदांनींहि "वादो नावलम्ब्यः बाहुल्यावकाशित्वात् अनियतत्वाच्च" असेंच सांगितलें आहे. शंकानिरसनासाठीं जिज्ञासू बुद्धीने सुखसंवाद अवश्य करावा पण गंमत अशी आहे कीं माणसे तिथेच मौन पाळतात. एरवी व्यर्थ वादविवादांत मात्र त्यांचा उत्साह असतो. अगदी क्षुल्लक गोष्टहि वादाचा विषय बनते. सरकारी यात्री-निवासांतील खोलीचे भाडे अधिक आहे कां योग्य आहे यावरहि हमरीतुमरी होते. आणि त्यानिमित्ताने उखाळ्यापाखाळ्याहि निघतात. असे वाद काय कामाचे ? आपल्या मताविषयी ईर्ष्यां अंतःकरणांत असेल तर निरुत्तर होण्याचा प्रसंग आला तरी तुमच्या सारखे आम्हांला बोलतां येत नाहीं, पण तुमचे म्हणणें पटत नाहीं असेच म्हणणार. आपला आग्रह सोडणार नाहीं. ज्ञानलालसा नसते, जिज्ञासा नसते, केवळ अहंकार असतो, म्हणून हें असें होते. ज्याला गुरु म्हणून आदरणीय मानावयाचे त्याच्याहि संबंधात हें असें घडते. गुरूशी बोलतांनाहि मोकळ्या मनानें बोलत नाहींत व ऐकत नाहींत. ती. दादांचे एक सुभाषित आहे. ते म्हणतात -
आज्ञाधारक आपणा म्हणवुनी वादाविवादा करी ।
खंडाया गुरुवाक्य तत्पर जणूं वादाटवींचा हरि ।
तोंडी बोलून सद्‌गुरु, मनीं धरी त्याच्यासवें तेढ ती ।
कोण्या देशिहि लक्षणें न बुधहो सल्लक्षणीं मोडती ।
या अशा वादविवादामुळे डोकें उगीच तापते, कंठशोष पदरी पडतो, तत्त्वबोध होतच नाहीं. म्हणून असे वादविवाद करूं नयेत. जिज्ञासू वृत्तीनें सुखसंवाद करावा. ऐकले, वाचले, पाहिलें, तर शंका आल्या पाहिजेत. विचार केला, मनन केले, तर त्या येतातहि. प्रश्न उत्पन्न होतात, ते घोटाळ्यांतहि पाडतात. म्हणून संकोच न करितां कुणी जाणता भेटला तर त्याला विचारले पाहिजे, शंकाचे निरसन करून घेतलें पाहिजे, प्रश्न सोडवून घेतलें पाहिजेत. अशा प्रामाणिकाशी बोलतांना ज्ञान्यालाहि आनंद होतो. अर्जुनाचे जिज्ञासुबुद्धीने प्रश्न विचारणें भगवंतालाहि फार आवडत होते असें ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात-
"पै अर्जुना आम्हांही वाडेकोडे । अखंड बोलू आवडे ।
परी काय कीजे न जोडे । पुसते ऐसे ॥
आजी मनोरथासी फळ । जोडिलासी तू केवळ ।
जे तोंड भरोनि निखळ । आलासी पुसो ॥" (ज्ञा. १५|४४८-४४९) पण असा योग क्वचितच येतो. केवळ करमणूक म्हणून ऐकणारेच फार.

तुटे वाद संवाद त्यात म्हणावें । विवेकें अहंभाव यातें जिणावें ॥
अहंतागुणें वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥

जेथें वाद मिटतो तो संवाद. निर्णय लागतो, सत्य उमजते, म्हणणें पटते, आचरणांत आणण्यासारखी गोष्ट असेल तर तसें वागण्याचा प्रयत्न करावासा वाटतो, केला जातो, असें जिथे घडते तो संवाद. पण असें होत नाही. कारण अहंभाव. अहंकार हाच सुखसंवादांतला मुख्य अडथळा आहे. न पटण्याची मुख्यतः दोन कारणें असतात. पहिलें कारण अज्ञान, दुसरें कारण अंहकार. पहिले कारण सर्वसामान्य आहे. दुसरें कारण मुख्यतः विद्वानाच्या आश्रयानें राहते.

एका चर्चेसाठी दोन प्रतिष्ठितांना आमंत्रण होते. त्यांतले एक थोडे आधीं आलें. आतां दुसरे आले तर त्यांच्या स्वागताकरितां मला उठून उभे राहावें लागेल हीच आपत्ति पहिल्याला वाटली. त्यांनीं तसें स्पष्ट बोलूनहि दाखविले, अशा अहंकारी भूमिकेतून निर्माण झालेली चर्चा निर्णयास कशी येणार ?

अज्ञानी माणसाजवळहि अहंकार नसतो असें नाहीं. आपल्या बुद्धीची शक्ति किती ? आपला अनुभव केवढा ? आपला अभ्यास, वाचन काय आहे ? यातले कांहींच विचारांत न घेतां माणूस ताडकन् हें मला पटत नाहीं असें म्हणतो. कां पटत नाहीं. त्याची मीमांसाहि तो करूं शकत नाहीं कारण अज्ञानामुळें तें सामर्थ्यच त्याच्याजवळ नसते.

विद्वानांचा अहंकार अधिक उग्र असतो. गेल्या दहा हजार वर्षात कोणाला जें कळले नाही. तें मला समजले आहे आणि तेंच मी तुम्हाला सांगणार आहे, असें म्हणणे हें उर्मट अहंकाराचे द्योतक आहे. अहंकारामुळें वादांतहि विकृति निर्माण होते. मग आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी फसवी उदाहरणे दिली जातात. खोटे पुरावे दाखविण्यांत येतात. बोलणारा बहुश्रुत असला, शरीराची ढब छाप पडणारी असली, वक्तृत्व प्रभावी असलें कीं कोणतेंहि मत कांहीं वेळ तरी भारावून गेलेल्या श्रोत्यांच्या गळी उतरविता येतें. पण हितकारक सत्य तेव्हाही दूरच राहते. स्वार्थासाठी ज्यांना आपल्या मताचा प्रचार करावयाचा आहे त्यांना ही साधने उपयोगी पडत असलीं तरी त्यामुळें साधकाची हानी होते. त्यानें जागरूक राहून आपल्या कल्याणासाठी हितकर संवाद कोणता तें ओळखले पाहिजे.

हिताकारणें बोलणें सत्य आहे । हिताकारणें सर्व शोधूनि पाहे ॥
हिताकारणें बंड पाषांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥

हित हेच सत्य आहे. हिताकरिता सत्याचा शोध घेतलाच पाहिजे. हित आणि सत्य हे एकाच नाण्याचे दोन पृष्ठभाग आहेत. यथार्थपणे सत्य असलेल्या वस्तुस्थितीचा प्रामाणिकपणे स्वीकार केला कीं त्याचा परिणाम हितसाधनात होतो. आपल्याला आपल्या अडाणीपणामुळे, बुद्धीच्या दौर्बल्यामुळे, अनुभवाच्या तोटकेपणामुळे, कधीं सत्याचे, तर कधीं हिताचे, तर कधी दोन्हींचेहि वास्तव स्वरूप कळत नाहीं.

आपल्याला जें योग्य वाटतें त्याला आपण सत्य म्हणतो. पण या योग्यायोग्याचा निर्णय देणारी बुद्धि रजोगुणानें, तमोगुणानं व्यापिलेली नाहीं ना, हें पाहिले नसते. ज्याच्या डोळ्याला रंग नेमका ओळखण्याचे सामर्थ्य नाहीं, त्यानें चित्राचे सौंदर्य आणि रंगसंगति यावर मत द्यावे किंवा ज्याला सुरेलपणा ही काय वस्तु आहे हें ऐकूनहि माहित नसते त्यानें सतारीच्या वा तंबोऱ्याच्या तारा जुळवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे जसें होते, तसेंच राजस तामस बुद्धीनें सत्य ठरवू गेलास होतें. विषयलोलुप इंद्रियांचा दास असलेला माणूस, त्याला त्या त्या वेळीं सुखावह वाटणाऱ्या वस्तूला, हितकर समजूं लागला तर योग्य ठरेल काय ? म्हणून सत्य काय याच्यासंबंधी पुष्कळ ऐकले पाहिजे. थोर थोर तत्त्ववेत्ते, निःस्पृह महात्मे, जगत्कल्याणासाठी अवतरलेले सत्पुरुष, जनहितासाठीच सत्याचे प्रतिपादन करीत असतात. हिताकरितांच ते सत्य बोलत असतात. त्यांचें बोलणें सत्य आणि हितकारकच असते.

आपण आपल्या हितासाठी, सत्याची ही प्रतिपादने नीट शोधून पाहिली पाहिजेत. अमूक एकजण सांगतो म्हणून ते खरें मानावें असें कुणीच सांगत नाहीं. एखाद्याचा स्वतःच्या निर्णायक बुद्धीवर पूर्ण विश्वास असेल तर त्यानें अगदीं शंकराचार्य, श्रीज्ञानेश्वर यांचेंहि सांगणे अमान्य केले तरी चालेल, पण तो निर्णय प्रामाणिकपणे, त्याचा स्वतःचा असला पाहिजे, आणि अभ्यासपूर्वक पूर्ण विचार करून तो घेतला असला पाहिजे. पण कुणीतरी प्रभावी व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व असलेला एखादा भगवान सांगतो वा वशिल्याने नेमला गेलेला एखाद्या विद्यापीठाचा विभाग-प्रमुख सांगतो, पुष्कळ खप असलेल्या वृत्तपत्राचा संपादक सांगतो, लटपटी खटपटीने अखिल भारतीय परिषदेचा अध्यक्ष झालेला साहित्यिक सांगतो, प्रसिद्धीच्या मागें लागलेला आणि नाना प्रकाराने खुर्चीला चिकटून राहिलेला पुढारी सांगतो, तें मला बरें वाटतें, मी मानतों, असें मात्र असता कामा नये. मार्क्स आणि फ्रॉईड हे अलीकडच्या काळांत मोठे विचारवंत होऊन गेले. बुद्धिमंतांच्या वैचारिक जगतांत त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला. ललित वाङ्‌मयाचे कलाक्षेत्रहि त्यांच्या सिद्धान्ताने प्रभावित झालें आणि 'कलेकरिता कला'वादीहि कळून न कळून त्या विचारांचे प्रचारक बनले. आणि असे असतांनाहि पन्नास पाऊणशे वर्षांत मार्क्स आणि फ्रॉईडचे अनेक सिद्धान्त असत्य ठरले, कालबाह्य ठरले, अपूर्ण ठरले. मार्क्सवाद्यांनाहि मार्क्सला गुंडाळून ठेऊन वाटचाल करावी लागली. फ्रॉईडच्या प्रत्यक्ष शिष्यानेच आपल्या गुरूची विधाने खोडून काढली. ख्यातनाम विचारवंतांच्या बाबतीत जर हें असें होतें, तर मग वर उल्लेखिलेल्या अनेक स्वयंभू पुढाऱ्यांच्या शब्दावर विश्वासून श्रीज्ञानेश्वरांसारख्या थोर महात्म्यांच्या वचनांना अप्रमाण मानणे योग्य नाहीं, हिताचे नाहीं, हें लक्षांत घेतलेच पाहिजे. समर्थ हिताकरिता सर्व शोधून पहावे असें म्हणतात. तसे शोधून पाहिलें म्हणजे शंकराचार्य-ज्ञानेश्वरादि महात्मे किती थोर आहेत, तें कळेल. त्यांच्या चरणावर मस्तकच ठेवले पाहिजे असें मी मी म्हणाऱ्या प्रज्ञावंतालाहि वाटेल. शोधून पाहणे हिताकरिता असेल तर हेंच घडेल.

नीट शोध घेणाऱ्या प्रज्ञावंताच्या हें लक्षांत येईल कीं उपनिषदांतील द्रष्टे ऋषि, शंकराचार्यादि तत्त्ववेत्ते, ज्ञानेश्वरादि महात्मे तुकाराम-रामदासांसारखे जगत्कल्याणासाठी तळमळणारे सत्पुरुष हे जें सांगतात-तेच सत्य आहे आणि हिताचे आहे. त्याच्याविरुद्ध जो कोणी सांगतो तो पाखंडी आहे. त्याचें हें लोकांना फसविणारे बंड मोडून काढलेंच पाहिजे. हे पाखंडी मोठे धूर्त असतात. आपला स्वार्थ साधावयाचा तर कसें वागले पाहिजे हे त्यांना चांगलें कळतें, आणि त्यामुळें जुन्या तत्त्ववेत्त्याच्या विचारांची उसनवारी करीत, त्याच्या माध्यमांतून आपली पाखंडी मतें ते लोकांच्या गळी उतरवीत असतात. निवड करण्याची दृष्टि नसलेले वा व्यापक अभ्यासाचे साधन नसलेले तथाकथित बुद्धिवादीहि ही भेसळ कौतुकाने स्वीकारतात. पाखंड्यांचे बंड माजते तें यामुळेंच. निष्ठुरपणे ते मोडून काढलें पाहिजे. कडक शब्दानी त्यांचा निषेध केला पाहिजे. पुराव्यानिशी त्याचें खंडन केले पाहिजे. जाऊं द्या कीं म्हणून उपेक्षा करणें, कुठे या वाचाळांच्या तोंडाला लागा म्हणून आळस करणे, हें शोभणारे नाहीं. उद्धटासी उद्धट आणि खटनटासी खटनट झालेंच पाहिजे. वैयक्तिक आणि सामाजिक हिताकरिता त्या ज्याला कांहीं कळतें त्या प्रत्येकाचे हें कर्तव्य आहे. म्हणून समर्थ स्पष्टपणें आदेश देत आहेत कीं, "हिताकारणे बंड पाषांड वारी ॥"

नेसूची लंगोटीहि देऊन टाकण्याइतके उदार असलेले तुकाराम महाराजहि " धर्माचें पालन । करणें पाषांडखंडन । हेंचि आम्हा करणें काम । बीज वाढवावे नाम ॥ तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे ॥ नाहीं भीडभार । तुका म्हणे साना थोर ॥" असेंच म्हणतात. एखाद्या लहानशा चोपड्याला, शासकीय पारितोषिक मिळालेला कोणी सामान्य साहित्यिक असेल वा लोकांना भुलवून त्या लोकप्रियतेच्या बळावर स्वतःला भगवान् म्हणवून घेणारा कोणी थोर वक्ता असेल, त्याच्या सांगण्यांतील असत्य, त्याच्या बोलण्यातील पाखंड मोडून काढलेंच पाहिजे. त्याच्यासाठी तीक्ष्ण शब्दांची शस्त्रे पाजळून सज्ज असलें पाहिजे. परमार्थ-सिद्धीचें बीज असलेल्या नामस्मरणासारख्या पवित्र, सोज्वळ साधनाचा पुरस्कार केलाच पाहिजे. सौजन्याचे आणि सात्त्विकतेचे मुकुटमणि असलेले श्रीज्ञानोबारायहि “येऱ्हवीं प्राप्ते मतांतरे ! थातंबूनी आंग भरे । बोलिजैल ते न सरे ! तुम्हांपासी ! ! (ज्ञाने. १३ - ३१८) असेंच म्हणतात. भ्रांत मताचे खंडन आवश्यक आहें असें त्या आईपेक्षांहि वत्सल हृदय असलेल्या महापुरुषाला वाटतें. शुद्ध प्रमेयाभोवतीचे शंकाकुंशकांचें गदळ काढून टाकलेच पाहिजे. पाण्यावरील शेवाळ दूर करणें हें जसें आवश्यक असल्याने कष्टाचे मानतां कामा नये, तसेंच पाखंड्यांनी माजविलेले बंड दूर करण्यासंबंधीहि मानलें पाहिजे. या वादाने पाखंडी सुधारण्याची शक्यता नाही, तशी अपेक्षाहि नाही, पण त्याच्या बोलण्याच्या प्रभावामुळे सामान्यांचा जो बुद्धिभेद झालेला असतो तो नाहींसा होऊं शकतो. म्हणून हा वादहि शेवटीं हितकारी संवादच ठरतो. तोहि आवश्यक तेथें केला पाहिजे.

जनी सांगतां ऐकतां जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥

अगदी वाल्मीकि- व्यास यांच्यापासून ते ज्ञानेश्वर-तुकाराम-रामदास यांच्यापर्यंत वा त्यानंतरहि झालेल्या रामकृष्ण परमहंस, रमणमहर्षि, स्वरूपानंद, दासगणूमहाराज, यांच्यापर्यंत अनेक थोरामोठ्यांनी चांगलें काय, हिताचे काय तें सांगितलें. तर्ककर्कश, बौद्धिक वाद करून सांगितलें, वा काव्यरसानें ओथंबलेल्या मधुर-रसाळ शब्दाने सांगितलें. आग्रह, कठोरपणा यांचा अवलंब केला, तसेच समजूत घालणे, अनुनय करणें, यांचाहि अवलंब केला. कधी रागाने फटकारले तर कधीं वात्सल्याने हनुवटी धरून समजाविले. पण काही थोडे अपवाद वगळले तरी मनुष्यजात सुधारली असें झालें नाही. माझें कोणी ऐकत नाहीं असा उद्वेग व्यासानींहि प्रगट केला. आणि श्रीधरस्वामींनाहि अंतकाळीं तेंच दुःख होते. सांगता-ऐकतांना जन्म गेला, पण शंका आणि प्रश्न, आणि त्यांच्या निरसनाकरितां केलेले वादविवाद जिथल्या तिथे, जसेच्या तसेच राहिले.

थोर महात्मे स्वतःपुरते तरी मुक्त होते, कोणी बद्ध जीव नव्हते. ते लोककल्याणासाठी अवतार घेऊन आले होते. आपलें कार्य संपताच निघून गेले. भगवंताशी एकरूप झाले. इतर बापडे ऐकणारे तर काय पण सांगणारेहि ठिकच्याठिकाणीं राहिले. कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, व्याख्याते उभे आयुष्य व्याख्यान- प्रवचनांत घालवितात. त्यांच्या शक्तीप्रमाणें, पात्रतेप्रमाणें त्यांना श्रोतेहि मिळतात. ते ५ - १० हि असतात आणि सहस्रावधीहि असतात. पण शेवटीं परिणामकाय ? जवळ-जवळ कांहींच नाहीं. सांगणारा तांदळाच्या ढिगावर दृष्टी ठेवून सांगणार व ऐकणारा फुकटात चांगला वेळ जातो वा बरी करमणूक होते म्हणून ऐकणार. सांगणाराला अनुभव नाही. ऐकणाराला जिज्ञासा नाही. हें असें सांगणे-ऐकणे काय कामाचे ?

फार जुनी गोष्ट आहे. मी एकदा शंका व त्या विचारणारा यांची जंत्री ठेवली होती. एकदा एका शंकेचे निरसन झाले म्हणजे त्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीने तरी दुसरी कांहीं नवीन शंका विचारावी की नाही. परंतु मला असें आढळले आहे कीं तीच तीच व्यक्ति पुन्हा पुन्हा त्याच त्याच शंका विचारते. एकच शंका, एकाच व्यक्तीने, एका वर्षांत, तीनदा विचारली असेहि आढळले. शंका त्याच असतात. ईश्वर आहे कां ? आहे तर अनुभव कां येत नाहीं ? चांगले वागूनहि दुःख कां भोगावे लागतें ? प्रारब्ध असेल तर प्रयत्नाला अर्थ काय ? पूजापाठांत मन लागत नाहीं काय करावें ? धार्मिक दिसणारा मनुष्यहि सदाचारी कां नसतो ? मन एकाग्र कां होत नाहीं ? जीवब्रह्माचें ऐक्य कसें ? इत्यादि. सांगणारा बहुधा नुसता पुस्तकीपंडित असतो. त्याला अनुभव नसतो, अनुभवासाठी जें करावें लागतें ते त्याच्याहि जीवनांत नसतें. तो पुस्तके पाहून संदर्भ गोळा करून सांगणार, आणि आपण काय विचारले होतें, कशा करितां विचारले होतें हेहि न आठवणारा, श्रवणांत अवधान नसलेला असा श्रोता ऐकणार. आतां संशय तसेच येत राहिले तर नवल नाहीं. अनुभव नसल्यामुळें सांगणाराचा, आणि प्रामाणिक जिज्ञासा नसल्यामुळें ऐकणाराचा सांगणे आणि ऐकणे हा केवळ दंभाचार ठरतो.

“अकरणात् मंदकरणं श्रेयः" या न्यायाने कांहीं करा पण नांदा असें म्हणून तेंहि बरें म्हणावयाचे इतकेंच सांगणारा कृष्णासारखा असला पाहिजे कीं जो विश्वासानें सांगेल. " अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः " (भ. १८ । ६६) आणि ऐकणारा अर्जुनासारखा पाहिजे, जो पुन्हा पुन्हा विचारील, अगदीं फटकळपणे विचारील, पण शेवटीं म्हणेल "स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव । " (भ. १८ | ७३) हा वाद खरा संवाद, आणि तोच हितकारी म्हणून तर म्हटले आहे कीं – "गीता सुगीता कर्तव्या किमन्यशास्त्रविस्तरैः ।"

जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणें ब्रह्मराक्षेस जाले ॥
तयाहूनि वित्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥

"तुटे वाद संवाद तो हीतकारी" हें पालुपद नसलें तरी हे ११३ - ११४- ११५ असें तिन्ही श्लोक आशयाचा विचार करतां वादविवादासंबंधीचेच आहेत. ११५ व्या श्लोकावरून तें स्पष्ट होतें. शास्त्रकारांनीं, संतांनी, स्वतःच्या वाङ्मयामातून माणसाच्या हिताचे तें काय हें पुष्कळ सांगितलें आहे. विद्वानांना तें चांगलें अवगत असतें. त्याच्या आधारे ते प्रवचने करतात, व्याख्यानें देतात, वादविवाद करतात, खंडनमंडन करीत फिरतात, पण स्वतः वागतांना मात्र त्या शास्त्राचा उपयोग करीत नाहींत, स्वतःच्या हिताचे जें तें नेमके टाकून देतात, आणि असें वागण्यालाहि पुन्हा शास्त्राधार आहे असें सांगतात. एका तज्ञाने एका रोग्याला एक औषध लिहून दिले. रुग्णाने विचारलें-कसें वापरावयाचे ? चिकित्सक गडबडींत होता. तो म्हणाला त्या बाटलीवर लिहिले असेल तसें करा. औषध आणले. बाटलीवर लिहिले होते की “keep the bottle tightly corked" हें चांगलें ठळक होतें. वीस पंचवीस दिवसानंतर भेट झाल्यावर वैद्याने विचारले- "काय म्हणते प्रकृति ?" "आहे तशीच आहे." "औषध आणलं नाहींत कां ? " " आणलं कीं." "मग घेतलंत ना !" "कसे घेणार ? " " म्हणजे ? " " तुम्हीच सांगितलं होतं की बाटलीवर सूचना असेल तसं करा. बाटलीवर ठळक अक्षरांत लिहिलेले होतें, बाटली घट्ट बूच लावून ठेवा. मी बाटली तशीच ठेवली." " असें कसे ? " असें वैद्याने म्हणतांच तो फार शहाणा रोगी वैद्याशीच भांडू लागला कीं तुम्हींच सांगितलें होतें म्हणून.

विद्वानांचे, पंडिताचे असेंच होतें. सगळे पांडित्य प्रक्रियेचे. प्रक्रिया कशासाठी तें कुणी लक्षांतच घेणार नाहीं. हें म्हणजे बूच घट्ट लावून ठेवणेच आहे. अहंकारामुळे हें असें होतें. ते आपणहून हिताकडे जाणार नाहींत. योगायोगाने क्वचित् हितच यांच्यासमोर आलें, तर हे त्याला डावलून दुसरीकडे जाणार आणि तरी आपलें चुकले असें त्यांना वाटणार नाहीच हीच अहंता. माझ्यासारखा दुसरा कोणी शहाणा नाहीं, मला वाटतें तेंच योग्य, माझ्या विरूद्ध कोणी असतां कामा नये. कोणी तसा असेल तर तो मूर्ख. मीच कसा योग्य आहे, तें त्याला पटवून दिलेच पाहिजे, या विचारानेच सदा वागणार. आयुष्य असेंच जाते. असे पंडित मेले म्हणजे त्यांच्या अहंकाराच्या दोषामुळे तें ब्रहाराक्षस होतात, असे समर्थांनी म्हटले आहे. भूतपिशाच्यापैकी ब्रह्मराक्षस हा एक वर्ग आहे. या योनींतून लौकर सुटका होत नाहीं असें मानलें जातें.

श्रीवामनपंडितांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांना वादविवाद करण्याची फार आवड. ते ठिकठिकाणी जाऊन वादामध्ये पंडितांना हारवीत आणि अजिंक्यपत्रे मिळवीत. त्यांना दिवसा मशाली लावून हिंडण्याचा मान होता असें म्हणतात. हा मान देणारा मोठा विनोदी असला पाहिजे. असो. वामनपंडित दिग्विजय करीत हिंडत असतांना त्यांना कांहीं अडचणीमुळे एका पिंपळाच्या पारावर रात्र काढण्याचा प्रसंग आला. अपरात्री तिथे दोन भुतें एकमेकांशी बोलत होतीं. एक त्या पिंपळावरच राहत होतें. दुसरें पाहुणे आलें होतें. तें पाहुणे भूत म्हणत होतें, "चांगला आहे रे हा पिंपळ ! तुझ्या शेजारच्या दुसऱ्या फांदीवर मी राहूं कां ? " "छे ! छे ती फांदी राखून ठेवली आहे. " "कोणा करितां ? " "वामनपंडिताकरिता. हा अहंकारी विद्वान जयपत्रे मिळवीत हिंडत असतो. तो मेल्यावर ब्रह्मराक्षस होणार आहे. तो येणार आहे या फांदीवर. तूं आपली सोय दुसरीकडे पहा. "

हे ऐकून वामनपंडितांना फार पश्चाताप झाला. ते अहंकार टाकून श्रीरामदासस्वामींना शरण गेले. सर्व इतिवृत्त त्यांनी त्यांना कळविले आणि अभय मागून बोध करण्याची विनंति केली. ते पुढें मोठे भगवद्‌भक्त म्हणून प्रसिद्ध झाले. अहंकारामुळे पांडित्य निरूपयोगी ठरतें. पूर्वी जीविकेसाठीं ब्राह्मण वर्गाला पांडित्य संपादन करावें लागत असे. आणि मग विद्वत्तेचा अहंकार त्यांना उर्मट बनवी. सर्वांकडे तें तुच्छतेने पाहत. परिणामी ते अधोगतीला जात. म्हणून श्रीतुकोबाराय आपल्या एका अभंगात म्हणतात- "बरा देवा कुणबी केलो । नाहीं तरी दंभेचि असतो मेलो ॥ भले केले देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥ सेवा चुकतो संतांची । नागवण हे फुकाची ॥ गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ॥ तुका म्हणे थोर । नरक होती अभिमाने ॥ " विद्वतेशी, विद्येशी, थोरपणाशी विरोध नाहीं. त्याज्य आहे तो अभिमान, गर्व, ताठा. विद्वत्तेनें खरे म्हणजे नम्र असावयास हवे. विद्या विनयेन शोभते असें म्हणतात. विद्या म्हणजे ज्ञान. ज्ञान ईश्वराचें अस्तित्व पटवून देते त्याचे सामर्थ्य, त्याचे सर्वज्ञत्व सांगते. त्याच्या स्वरूपाचा बोध करतें. आतां या ईश्वरी सत्तेपुढे कोणी मोठा, श्रेष्ठ, थोर, विद्वान् ठरणे शक्य आहे काय ? वेद ही ज्याची निश्वसिते आहेत त्याच्याहून अधिक शहाणपण कोणाजवळ असणें शक्य आहें ? सर्वसमर्थ ईश्वराच्या या अनंत अपार सृष्टीत मीच एक तेवढा कुणी पंडित असें म्हणणें हे डबक्यांतल्या मासोळीने प्रचंड देवमाशाचें अस्तित्व नाकारण्यासारखे आहे. मल्ल नको अतिमल्ल घने रे । घर नहीं तो बाहर बहुतेरे ॥ हे शहाणा म्हणविणाराने तरी विसरता कामा नये.

माणसाजवळ शहाणपण, विद्वत्ता, चातुर्य, बुद्धिमत्ता, वक्तृत्व हे सर्व गुण असावेत. नसले तर ते मिळविण्याचा प्रयत्न करावा, त्याकरिता श्रम करावेत, अभ्यास करावा. परिश्रमपूर्वक पांडित्य मिळवावे. इतरांनी वाटले तर या गुणांची जाणीवहि ठेवावी. पण हे गुण ज्याच्याजवळ आहेत त्याला मात्र त्याची अहंतापूर्वक जाणीव नसणे हेच भूषणाचे आहे, पण तसे क्वचितच आढळते. गुण नसणाराहि स्वतःला सद्गुणांचा पुतळा समजतो, असणारा तर काय बिडाच्या लोखंडासारखा ताठ असतो. माणसाला पाय असावेत. ते बळकटहि असावेत. असतातहि. पण त्यांचा उपयोग स्वतःच्या मार्गांने चालण्याकरिता करावयाचा असतो. दुसऱ्याला लाथा मारण्यासाठी नाहीं. स्वतःच्या जवळच्या गुणांचे तसेंच असावे. दुसऱ्या कोणाच्या लक्षांत आणून देण्यासाठी वा त्याला हिणवण्यासाठी गुणांची जाणीव ठेवू नये. 'बोलणाराची गाजरे विकली जातात, न बोलणाराची कस्तुरीहि विकली जात नाही', असें म्हणतात. व्यापारधंद्यांत प्रसिद्धी अपरिहार्य मानली जाते, पण ते निदान धंद्यापुरते तरी असावे. तो स्वभाव होऊं नये, त्याला लोकेषणेचे स्वरूप येऊ नये, पण तेवढे तारतम्य राहत नाही.

अलिकडे तर आपल्या गुणांची दुसऱ्याला जाणीव करून देणे हेंच महत्त्वाचे मानलें जाते. एका लेखकाने स्वतःचे एक नवीन लिहिलेले पुस्तक वृत्तपत्राकडे अभिप्रायाकरितां पाठविलें. एक संपादक त्याला वाटेत भेटले आणि आपणहून म्हणाले.
' अहो ! बरेच दिवस झाले तुमच्या पुस्तकावर अभिप्राय द्यायचा राहिला आहे.
'ठीक आहे. येऊ द्या सावकाश. '
'का असें करता ? '
काय ?
'तुम्हीच लिहून पाठवा ना !'
' अहो, असें कसें ? हे योग्य नाही. '
'सगळे असेंच करतात. आम्ही ते काटछाटून प्रसिद्ध करतो. अभिप्राय देणारी अधिकाराची माणसे तरी कुठे आहेत ? आमच्याकडे अलीकडे पुस्तके येतात ती प्रशंसापर अभिप्रायाचे कागद घालूनच. तुमचेच एक नुसते आले म्हणून मागें पडलें. ' त्या लेखकाने आपली पुस्तके पुन्हा अभिप्रायाकरिता कुठे पाठवलीच नाहींत. हें आत्मप्रसिद्धीचे युग आहे. असें केलेंच पाहिजे नाहीतर मागे पडावे लागेल असें लोक मानतात. स्वतःला ते करतां येत नसेल तर कोणा प्रशंसा करणाराची नियुक्ति केली पाहिजे. त्याकरिता सध्या पुष्कळ विद्वान भाड्याने मिळण्यासारखे असतात. 'येथें विद्वान् भाड्याने मिळतील' असा एक लेखच ३० - ३५ वर्षांपूर्वीं प्रकाशित झाला होता. आतां हें प्रमाण आणखीनच वाढलें असेल. निवडून यायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे. खूप पैसा, कोणत्याहि मार्गानें मिळवलेले दोन-पाच लाख रुपये आणि स्वतःची प्रशंसा करीत आपला मोठेपणा सांगत अखंड हिंडणे हें अलीकडे आवश्यकहि असेल, पण योग्य आहे असें मला वाटत नाहीं. लोकसत्तात्मक व्यवस्थेचा एरवी चांगला असलेला शासनप्रकार अयशस्वी झाला, भ्रष्टाचारांनीं किडला, तो यामुळेच. ज्याच्याजवळ चांगले गुण आहेत त्याला लोकांनी आपणहून निवडून दिलें असतें तर लोकराज्य कल्याणकारी ठरलें असतें. आज ते स्वतःचें असले-नसले गुण मिरवणाऱ्या, प्रचारतंत्रे आत्मसात केलेल्या, स्वयंमन्य, स्वार्थी पुढाऱ्यांमुळें, स्वाहाकारी ठरलें आहे. ऐहिकांतहि स्वतःच्या गुणांची प्रशंसा परिणामी लाभदायक ठरत नाहीं, परमार्थांत तर ती फारच घातक ठरते. म्हणून समर्थ आवर्जून सांगत आहेत 'मना सर्व जाणीव सांडूनि राहे.'

फुकाचें मुखी बोलतां काय वेंचे । दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळतां वेर्थ आहे । विचारे तुझा तूं चि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥

शाब्दिक पांडित्य मिळविणे सोपे आहे. त्या बळावर लोकांना आकर्षक वाटेल असें बोलणेंहि सोपे आहे. आजकाल मुद्रण विपुल असल्यामुळें निरनिराळे सूचिकोश, संदर्भकोश, विषयवारीनें संग्रहित सुभाषिते, संतांच्या वचनांचे संग्रह, कोणालाहि सहज उपलब्ध आहेत. आणि त्यांच्या सहाय्याने, त्यामानानें अगदीं थोडे श्रम करून वक्तृत्व रंगविणे सोपे आहे. पण हें सर्व बोलणे फुकट आहे; नुसते बोलायला काय लागतें ? त्याचा कांहीं उपयोग नाहीं. थोडे बरें बोलतां आले, कांहीं पाठांतर असलें, विषयानुरोधें संतवचनांचें पुरावे एकामागून एक दिले कीं, सामान्यजन आकृष्ट होतात, वाहवा मिळते, लौकिक वाढतो, व्याख्याने-प्रवचनांकरितां आमंत्रणे येतात. लोक भजनी लागतात. मानसन्मान मिळतो, महंती वाढते. पण हा सर्व व्यवहार झाला, व्यवसाय झाला, धंदा झाला. पारमार्थिकदृष्ट्या पदरांत कांहींच पडलें नाहीं, उलट हानि झाली. कारण थोडी वाहवा मिळू लागली, मानमान्यता वाढली कीं माणसाचा अहंकार पुष्ट होऊं लागतो आणि मग या अहंकाराची भूक वाढत जाते. दिवसादिवसांनीं, क्रमाक्रमानें, हा अहंकार स्वसंतोषासाठी पैसा, उपभोग, कीर्ति याच्यामागे अधिकाधिक प्रमाणांत लागतो. सरळपणा, साधेपणा, सौजन्य यांचा लोप होतो. माणूस माणूसहि राहत नाहीं. म्हणून समर्थ म्हणतात- 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.' ज्या सांगण्या बोलण्याचा प्रत्यक्ष आचरणांशी कांहीं संबंध नाही, असें बोलणें नुसती वाचाळता आहे. व्यर्थ बडबड आहे, तिचा कांही उपयोग नाहीं.

या संदर्भांत ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान सांगितलें आहे. ते म्हणतात- "पै तोंड भरो कां बिचारा । आणि अंतःकरणीं विषयांसी थारा । तरी नातुडे धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥ हां गा वौसणतयाचिया ग्रंथी । काई तुटती संसारगुंती । कीं परिवसिलेया पोथी । वाचिली होय ॥ ना ना बांधोनिया डोळे । घ्राणी लाविजती मुक्ताफळें । तरी तयाचे काय कळे । मोलमान ॥ तैसा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे माते ॥ " (ज्ञा. १५ ! ३९३ - ९६) "तोंडातून नाना प्रकारचे विचार जणू गंगेच्या ओघासारखे खळाळून वाहताहेत पण अंतःकरणांत मात्र विषयसुखाची अभिलाषा भरून राहिली आहे. अशा स्थितींत अर्जुना तुला निश्चयानें त्रिवार सांगतो, त्या व्यक्तीला माझी प्राप्ति होण्याची कांहींच शक्यता नाही. झोपेत बडबडावे तसें बाष्कळ असलेले ग्रंथ आधाराला घेतले तर त्यानें संसारातील गुंतागुंत सुटण्यात सहाय्य होतें काय ? पोथीला नुसताच स्पर्श केला, अगदीं तिच्यावर डोके ठेवून नमस्कार केला, तर न वाचताच तिच्यातील ज्ञान कधीं डोक्यांत शिरते काय ? एखाद्याचे डोळे घट्ट बांधले आणि सुंदर तेजस्वी असे गोल मोठे मोती त्याच्या नाकाला लावले तर त्या मोत्यांची किंमत त्याला करतां येते काय ? हे जसे कधींहि शक्य नाही, तसेंच कर्म, भक्ति, ज्ञान, योग, सौख्य, तर्क, मीमांसा, पुराणे, संतवचने, स्मृति आणि धर्मशास्त्रे यांच्यावर वक्तृत्वाच्या दृष्टीनें, व्याख्यान-प्रवचनांच्या दृष्टीनें कितीहि प्रभुत्व असलें, सहस्त्रावधि श्रोत्यांना ३ - ३ तासपर्यंत वेळेचा विसर पाडून रंगवून, खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य जरी वाणीला असले, तरीपण अशा विद्वान प्रभावी वक्त्याच्या अंतःकरणांत अहंकारच भरून राहिला असेल, सौजन्य, नम्रता, भक्तिभाव यांचा लवलेशहि तेथें नसेल तर हें सर्व पांडित्य असून नसल्यासारखे आहे. या पंडिताने कोट्यावधी जन्म जरी घेतले तरी तो माझ्यापर्यंत येऊन पोचाची थोडीहि शक्यता नाहीं." नुसती वाचाळता कां नसावी तें यावरून स्पष्ट होते. चारी वेद मुखोद्‌गत असलेल्या अहंकारी ब्राह्मणापेक्षां, केवळ एक गायत्री मंत्र तेवढा येत असलेला पण सदाचारी ब्राह्मण श्रेष्ठ आहे असें मनूनेहि म्हटलें आहे.

निरहंकारी सद्वर्तन, नम्र सदाचरण परमार्थात तर काय पण सुखी, समाधानी संसारासाठी, भलेपणा मिळविण्यासाठी, व्यवहारांतहि उपयोगी आहे.

आपण तसें आहो कीं नाहीं हें ज्याचें त्याला नक्की कळतें. इतरांचे अभिप्राय दोन्हीं दृष्टीनें फसवे असूं शकतात. दुसऱ्यांना केलेली निंदास्तुति यथार्थ नसते. निंदा द्वेषमत्सरांतून जन्माला येते. स्तुतीच्या मागें दंभ वा स्वार्थ असूं शकतो. म्हणून मी कसा आहे तें माझें मलाच ठरविलें पाहिजे "सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानीयले नाहीं जनमता ॥" असें संतांनी म्हटलें आहे तें यासाठींच. थोडे तटस्थपणाने पाहतां आलें कीं आपले दोष, आपल्या चुका, आपल्या लक्षांत येऊ शकतात. देह-इंद्रिय-मन यांच्याशी आपले तादात्म्य झाले असतें आणि म्हणून आपलें जें आहे तेंच आपल्याला योग्य वाटत राहते. शांतपणाने, थोडा साधक-बाधक विचार केला तर आपलें खरें-खोटे आपल्याला कळू शकते आणि तेंच प्रामाणिक असतें. म्हणून समर्थ "तुझें तूंच पहा पण विचाराने शोधून पहा." असे सांगतात.

तुटे वाद संवाद तेथें करावा । विवेकें अहंभाव हा पालटावा ॥
जनी बोलण्यासारखे आचरावे । क्रियापालटे भक्तिपंथें चि जावे ॥ ११५ ॥

१०८ व्या श्लोकापासून ८ श्लोकांचे हें प्रकरण चालू आहे. त्याचा उपसंहार या श्लोकाने होत आहे. सर्व प्रकरणाचे सार या श्लोकांत ग्रथित झाले आहे. जिथे वाद तुटतो, निर्णय लागतो, ज्ञानांत भर पडते, शंकाकुशंकांचें निरसन होतें, खरें काय तें समजून येतें तें आचरणांत कसें उतरवावे त्याची पद्धति कळते, इत्यादि लाभ ज्या चर्चेतून पदरी पडतात, त्या चर्चेला संवाद म्हणतात. हा संवाद तेवढा करावा. एरवी खंडनमंडनाच्या भरीला पडून वादविवाद करूं नये. त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं. अहंकार चांगलाच उद्दाम असतो. तो आपली चुकीची मतेहि दुराग्रहाने सोडीत नाही. कदाचित निरुत्तर होईल. पण मतपरिवर्तन होणार नाही. वादाने मतपरिवर्तन हा काळ शंकराचार्य-मंडनमिश्रांच्या बरोबर संपला आहे. तेव्हां साधकाने अहंकाराचा त्याग करावा आणि जिज्ञासू भावाने श्रवण करावे.

केवळ वक्तृत्वाने प्रभावित होऊं नये. आपली विवेकशक्ति जागृत ठेवावी. आपले बोलणें आणि आचरण यांत मेळ असावा. आपल्याशी कोणी खोटे बोलू नये, आपल्याला कोणी फसवू नये, आपल्याला कोणी त्रास देऊं नये, छळू नये, एवढे तरी आपल्याला कळतें ना ? भले इतर शाखांतील विधिनिषेध न कळोत. हें जें आपल्याला कळतें, तें तरी दुसऱ्याशी वागतांना आपण लक्षांत ठेवून नीट चांगलें वागावे हाच सदाचार. हाच धर्म. " आत्मवत् सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति" असें शास्त्रवचनच आहे. ज्ञान, ज्ञान म्हणतात तें हेंच. असें जो वागतो त्याचेंच ज्ञान साक्षात्काराला येते. क्रियेमध्यें पालट व्हावयाचा असतो तो याच दृष्टीनें. पालट झाला नाहीं तर भक्तिमार्गाला लागण्याचा अधिकारच प्राप्त होत नाहीं. हें सगळे एकदम साधणार नाहीं; पण प्रयत्न तरी त्या दृष्टीनें सातत्याने करीत राहिले पाहिजे. तेथें आळस नसावा, आत्मवंचना नसावी.

दुर्वर्तनासह 'हरे राम' उपयोगी पडत नाहीं. अधमपणानें वागतो आणि समाधि लागते हें संभवनीय नाही. अनाचार करीत असलेल्या व्यक्तीची कुंडलिनी कोणत्याहि मार्गानें जागृत होण्याची शक्यता नाहीं. परमार्थमार्गात कोणत्याहि दिशेनें प्रगति करून घ्यायची असली तरी क्रियेमध्यें पालट व्हावाच लागतो. वर्तन सुधारावेच लागते. इंद्रियांचे विषयोपभोग सन्मार्गीच असावे लागतात. त्यादृष्टीनें स्वतः प्रयत्नशील असावें लागते.

एका गृहस्थाने आपल्या घरांत जिकडे तिकडे हिमालयांतील पवित्र तीर्थक्षेत्रांची, मंदिरांची आणि मनोहर निसर्गदृश्यांची सुंदर सुंदर चित्रे लावून ठेवलेली होतीं. ' असे कां' म्हणून विचारल्यावर गृहस्थांनी उत्तर दिले 'मला हिमालयाची फार आवड आहे. चित्रामुळे तेथें गेल्याचा आनंद मिळतो. ' स्वतः गृहस्थ कधी ऋषिकेशलाहि गेला नव्हता. दिनदर्शिकावरील चित्रे हाच त्याचा हिमालय. माझें घर हिमालयमय आहे असें वर भूषण. चित्रदर्शनानें हिमालयांत जाण्याची प्रेरणा निर्माण व्हावी. तसें जर घडलेच नाहीं तर ते केवळ शोभेचे झालें, प्रदर्शन ठरलें. समर्थांचा भर क्रियेच्या पालटावर आहे तो यासाठीच. मनाच्या श्लोकांत अगदी आरंभापासून त्यांनीं हा विषय पुनःपुन्हा ठासून सांगितला आहे. 'जनीं वंद्य तें सर्व भावे करावें. ' ( २) 'सदाचार हा थोर सांडू नये तो' (३) 'मना धर्मता नीति सोडू नको हो' (४) 'देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ! मना सज्जना हे चि क्रीया धरावी !' (८) 'मना मिथ्या ते मिथ्य सोडून द्यावे' ( १९) 'स्वधमें चि चाले सदा उत्तमाचा' (४८)

'क्रिया भक्ति उपासना नित्या नेमे, (५७) 'देहे कारणी सर्व लावीत जावे' ( १०२) 'विवेकें क्रिया आपुली पालटावी' ( १०५) 'क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे' ( १०८) जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो' ( १३२) क्रियेवीण वाचाळता ते चि मोठी' ( १८२) अशा रीतीनें प्रत्यक्ष आचरणाचा महिमा समर्थांनी अनेक प्रकारांनीं गायिला आहे. कोणत्याहि साधनेच्या दृष्टीनें त्याचें फार महत्त्व आहे. क्रियेत पालट होऊन वर्तन सुधारून भक्तिमार्गाला लागावे असें सांगितल्यानंतर, भक्तीची थोरवी कळावी, त्यामार्गानें जाण्याचे आकर्षण उत्पन्न व्हावें म्हणून समर्थ निरनिराळ्या अवतारलीला वर्णन करून भक्ताच्या रक्षणासाठी देव कसा तत्पर असतो, तें पुन्हा एकदां पुढील १० श्लोकांतून सांगणार आहेत. हें प्रकरण पुराणकथांवर आधारित आहे.

बहू श्रापितां कष्टला अंबऋषी । तयाचें स्वयें श्रीहरि जन्म सोशी ॥
दिल्हा क्षीरसिंधू तया उपमानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥

वैवस्वस्त मनूच्या पोटी नभग नांवाचा एक पराक्रमी राजा झाला. त्याचा मुलगा नाभाग. कांहीं ठिकाणीं याचा मनूचा पुत्र म्हणूनच उल्लेख आहे. हा नाभाग राजा मोठा धार्मिक होता. त्यानें कधीं मांसाहार केला नाहीं असें त्यांचें वर्णन आहे. हा मोठा शूर, फार पराक्रमी, असा राजा होता. अंबरीष हा त्याचा पुत्र. हा आपल्या बापाप्रमाणेच मोठा पराक्रमी व धार्मिक असा होता. सहस्त्रावधि राजांच्या सवें एकट्याने लढून त्यानें विजय प्राप्त करून घेतले, असें त्याचें वर्णन महाभारतांत आहे. यानें दीर्घकाळपर्यंत अत्यंत चांगल्या रीतीनें राज्य चालवले असा त्याचा उल्लेख कौटिल्यानें आपल्या अर्थशास्त्रांत केला आहे. हा अंबरीष एकादशीचे व्रत मोठ्या निष्ठेने करीत असे. द्वादशीला सूर्योदय होतांच व्रताची पारणा करी. एकदां महासंतापी दुर्वास ऋषि अतिथि म्हणून त्याचेकडे आले. द्वादशीचे दिवशी सकाळी ते स्नान-संध्यासाठी नदीवर म्हणून गेले. त्यांची संध्या लांबली. सूर्योदय होऊन गेला तरी ऋषि परत आले नाहींत. अतिथीच्या आधीं भोजन करतां येईना आणि सूर्योदय होतांच पारणा केली पाहिजे असे एकादशीचे व्रत मोडता येईना. राजा धर्मसंकटांत पडला. शेवटी त्यानें विष्णूच्या अभिषेकाचे तीर्थ घेऊन पारणा केली. भोजन मात्र केलें नाहीं. पण तेवढ्यानेंहि दुर्वास संतापले आणि त्यांनीं तुला कांहीं पशुयोनींत आणि कांहीं मनुष्ययोनींत असे दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. तेव्हां विष्णूंनी तो शाप स्वतःवर घेतला आणि आपला भक्त अंबरीष याचे संरक्षण केलें.

दुर्वासांनी संतापून अंबरीषावर कृत्या सोडली. अशीहि एक कथा आहे. पण विष्णूंनी सुदर्शन सोडून कृत्येचा नाश केला. नंतर ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्याच मागें लागलें. दुर्वास ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ येथेंहि आश्रयांसाठी गेलें पण उपयोग झाला नाहीं. नारदांच्या सांगण्यावरून ते शेवटीं अंबरीषालाच शरण आले, आणि मग अंबरीषाने सुदर्शन चक्राला नमस्कार करून तें परतविलें. ही कथा अधिक प्रसिद्ध आहे. भागवतांत तिचा उल्लेख आहे. समर्थांनी मात्र पहिली अवतारविषयक कथाच गृहीत धरली आहे. आपल्या एकनिष्ठ भक्ताकरितां भगवंत त्याची संकटे स्वतः सोसतो. आई मुलाकरितां हवें ते कष्ट उपसते, तसेंच वात्सल्य भक्ताविषयीहि ईश्वराच्या अंतःकरणांत असते. म्हणून भक्तिमार्गाला लागावे.

दुसरी कथा उपमन्यूची. हा वसिष्ठ कुलोत्पन्न एक मंत्रद्रष्टा ऋषि. लहानपणी हा आपल्या मामासवें एका यज्ञांत गेला असतांना तेथें त्याला उत्तम असें गायीचे दूध प्यावयास मिळालें. घरीं परत आल्यावर त्यानें आईजवळ दुधाकरितां हट्ट घेतला. घरीं दारिद्र्य होतें. आईने आपल्या मुलाच्या समजुतीसाठी पाण्यांत पीठ कालवून त्याला दिले. जिभेला खऱ्या दुधाची मधुर चव कळली असल्यानें बालकाने तें पीठ-पाणी नाकारले आणि दुधासाठी तें आक्रोश करूं लागलें. आई म्हणाली- बाळ, आपण दरिद्री आहोंत. माझ्याजवळ रडून काम होणार ! तुझें वडील अयाचित वृत्तीनें राहतात तेहि तुला दूध देऊं शकणार नाहींत. तुला दूध पाहिजे असेल तर देवाजवळ माग. तो सर्वसमर्थ आहे. उपमन्यू आईला नमस्कार करून ध्रुवाच्या निश्चयानें बाहेर पडला, आणि त्यानें भगवान् शंकरांना आपल्या उग्र तपश्चयेंने आणि उत्कट भक्तीने प्रसन्न करून घेतलें. भगवान् शंकरानी त्याला दुधासाठी म्हणून क्षीरसागरच भेट म्हणून दिला. याच उपमन्यूनें श्रीकृष्णाला शिवसहस्रनामाचा उपदेश केला असें वर्णन महाभारतात आहे.

भगवान् फार उदार आहे. भक्तीने तो प्रसन्न झाला तर "अनंत हस्ते कमलावरानें देतां किती घेशील दो कराने ' अशी स्थिति माणसाची होते. म्हणून भक्तिमार्गाला लागा. देव आपल्या भक्ताची कधीं उपेक्षा करीत नाहीं असें समर्थ सांगतात.

धुरू लेकरूं बापुडे दैन्यवाणें । कृपा भाकिता दीधली भेटि जेणें ॥
चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥

सूर्यवंशामध्ये उत्तानपाद नांवाचा राजा होऊन गेला. ध्रुव हा त्याचा पुत्र. त्याच्या आईचे नांव सुनीति. हा मोठ्या प्रेमाने आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला असतांना त्याच्या सावत्र आईने, सुरुचीने राजाच्या लाडक्या राणीने, त्याला उत्तानपादाच्या मांडीवरून मत्सराने खालीं ओढले, आणि लाथ मारून हाकलून दिलें. लाडक्या बायकोच्या मुठीत गेलेला बाप कांहीं बोलू शकला नाहीं. ही अगतिकता ध्रुवाला फार बोचली. त्याची आई सुनीति त्याला म्हणाली- बाळ, असा शोक करूं नकोस. भगवंताला आपलासा कर. तो अनाथांचा नाथ आहे. पांच वर्षाचा ध्रुव आईला नमस्कार करून घराबाहेर पडला. महर्षि नारदांच्या उपदेशाप्रमाणे त्यानें श्रीनारायणाची आराधना केली. त्यांच्या निष्ठेने भगवान् प्रसन्न झाले. शामसुंदर चतुर्भुज असा रूपांत त्याच्यापुढे प्रकट झाले. ध्यानासाठी डोळे मिटलेले असतांनाहि परमात्म्याचे आल्हाददायक, शीतल तेज ध्रुवाला जाणवले. ध्याननिमग्न ध्रुवाने चकित होऊन आपले नेत्र उघडले आणि पाहिले तो त्या सगुणरूपाचे स्मित हास्य ध्रुवावर प्रसन्नतेचा अमृतवर्षाव करीत होतें. ध्रुवानें हात जोडले, मस्तक नमविले, पाय धरले, पण किती वेळ गेला तरी काय बोलावे तें त्याला सुचेना. तेव्हां श्रीनारायणाने आपल्या दिव्य शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला, आणि ध्रुवाच्या जिभेवर जणू प्रेमभक्तीने न्हालेली सरस्वती प्रगट झाली.

योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां ।
संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ॥
अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् ।
प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॥
भागवतकारांनीं संग्रहित केलेली ही ध्रुवस्तुति उदात्त भक्तिभावानें ओथंबलेली आहे. भगवान् प्रसन्न झालेलेच होते. त्यांनी चरणी लीन झालेल्या ध्रुवाला उचलून हृदयाशी धरले. वात्सल्याने त्याचें मुख कुरवाळले, त्याच्या कपाळाचे चुंबन घेतलें. आणि त्याला मधुरवाणीनें म्हणाले-बाळ ध्रुवा ! काय पाहिजे तुला ? माग. तुझ्या भक्तीने संतुष्ट होऊन मी तुला वर देण्यासाठी आलों आहे. ध्रुव म्हणाला, " भगवन् आपलें दर्शन झालें. आपल्या कमलाहून कोमल असलेल्या वरदहस्तांनी आपण मला कुरवाळले याहून मागावयासारखे काही उरतें काय ? माझे जीवन कृतार्थ झालें, धन्य झालें. "

या निष्काम भक्तीने परमात्मा नारायण अधिकच संतुष्ट झाले. ध्रुवाला आवश्यक वाटलें नव्हतें तरी सुरुचीसारख्या स्वार्थी, अहंकारी वृत्तीच्या लोकांना जाणवावे म्हणून, ध्रुवाची योग्यता म्हणून वा ध्रुवाच्या भक्तीच्या ऋणातून थोडे तरी उतराई व्हावें म्हणून देवांनी त्याला समुद्रवलयांकित पृथ्वीचे साम्राज्य आणि नंतर नक्षत्रमंडळांतील केंद्रस्थानी असलेल्या सप्तर्षीनाहि, त्याच्याभोंवती प्रदक्षिणा घालावी अशा अढळ ध्रुवपदाचें वरदान दिलें. देव आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाहीं, तें लक्षांत यावें म्हणून समर्थ ध्रुवाच्या कथेचा उल्लेख अगदीं बालबोधपणे करीत आहेत.

गजेंद्रूं महा संकटी वास पाहे । तयाकारणें श्रीहरी धांवताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानीं । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥

पांड्य देशाचा, इंद्रद्युम्न म्हणून एक राजा होता. तो एकदां पूजासाधनेत ध्यानस्थ असतांना अगस्ति ऋषि तेथे आले. राजा आपल्या साधनेत निमग्न असल्यानें त्यानें उठून त्या थोर ऋषींचे आतिथ्य केलें नाहीं. ऋषि रागावले. आणि त्यांनीं राजाला तू उन्मत्त झाला आहेस म्हणून मदोन्मत हत्ती होशील असा शाप दिला. राजाने नंतर प्रार्थना करून क्षमा मागितली. तेव्हां ऋषींनी उःशाप दिला कीं तूं कांहीं संकटांत सापडून भगवंताचा धावा करशील तेव्हां भगवंत प्रत्यक्ष धावून येऊन तुझा उद्धार करतील. हा हत्ती झालेला इंद्रद्युम्न गजेंद्र या नांवानें ओळखला जातो. तो हत्तीच्या एका कळपाचा नेता होता.

एकदा त्रिकूट पर्वतावर संचार करीत असतांना जलक्रीडेसाठीं तो एका सरोवरावर आला. तेथें एका मगराने या गजेंद्राचा पाय पकडला. हा मगरहि देवलऋषींच्या शापाने क्रूर जलचर म्हणून जन्माला आलेला हुहू नांवाचा गंधर्व होता. गजेंद्रानें आपला पाय सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या त्या प्रयत्नास यश आले नाहीं. कळपातील इतर हत्ती-हत्तीणीहि आपल्या या नेत्याला, अनेक प्रकारें प्रयत्न करूनहि, संकटमुक्त करूं शकले नाहींत. श्रम करूनहि आपणांस यश नाही असें आढळल्यावर, गजेंद्रास त्या संकटांत तसेंच सोडून, कळप परत फिरला. आपलें म्हणावयास गजेंद्राला कोणी उरले नाहीं. ज्यांच्या रक्षणासाठीं गजेंद्रानें त्यापूर्वी अनेक झुंजी दिल्या होत्या ते सर्व त्याला सोडून निघून गेले.

गजेंद्र थकला, हताश झाला आणि शेवटीं त्यानें कळवळून भगवंताचा धावा केला. भगवंताचे स्वरूप, नांव त्याला कांहींच माहीत नव्हतें. पूर्वजन्माच्या संस्कारानें, जगताचा कोणी धनी आहे आणि तोच दीन-अनाथांचा त्राता असणार, या कल्पनेने गजेंद्राने त्याहि स्थितींत सरोवरांत फुललेल्या कमळापैकीं एक कमळ सोंडेने उपटले आणि तेंच भगवदर्पणबुद्धीने आकाशामध्ये फेकून त्यानें अत्यंत आर्ततेने ईश्वरास हाक मारली. त्यासरशी भगवान् विष्णू तातडीने धावून आले व त्यांनीं चक्र फेकून नक्राला ठार केलें आणि गजेंद्राचा उद्धार केला. त्याला नक्रमुखांतून व पशुदेहांतूनहि सोडवले. वैकुंठलोकामध्ये भगवंतांचा सेवक म्हणून राहण्याचे भाग्य इंद्रद्युम्नला लाभले. पद्मपुराणांत आणि भागवतांत ही कथा सविस्तरपणे आलेली आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीहि या कथेचा उल्लेख केला आहे. "पाहे पां सावजें हातिरूं धरिलें । नेणें तया काकुळती मातें स्मरिलें । कीं तयाचे वावो पशुत्व जाहलें । तेणें पातलिया मातें ॥ (ज्ञा. ९|४४२). भक्तिमहात्म्यामध्ये या कथेचा उल्लेख अनेकांनी अनेक प्रकारांनी केला आहे. ही फार लोकप्रिय कथा आहे. अनन्यभावानें आर्त होऊन ईश्वराचा धावा करतांच तो आपल्या भक्ताची उपेक्षा कशी करीत नाहीं, हांकेसरसा कसा धावून येतो, ते या कथेच्या आधारे समर्थांनी व्यक्त केले आहे.

अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळुपणें तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥

अजामिळाची कथा आणि तत्संबंधी विवेचन ९५ व्या श्लोकांत सविस्तरपणें आले आहे. " अपि चेत् सुदुराचारो भजते मां अनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्यः सभ्यग् व्यवसितो हि सः ॥ " (भ. ९ । ३०) अशी भगवंतांची प्रतिज्ञाच असल्यामुळे पातक्यालाहि उद्धरून जाण्याचा मार्ग मोकळा आहे. भक्तिमार्गाचे तें वैशिष्ट्य आहे असेंहि म्हणतां येईल मात्र "यालागि दृष्कृती जऱ्ही जाहला । तरी अनुतापतीर्थी न्हाला । न्हाऊनी मजआंतु आला । सर्वभावें ॥ " (ज्ञाने. ९ ! ४२०) ही ज्ञानोबारायांची ओवी (या संदर्भात असलेलीच) सावधपणें लक्षांत घेतली पाहिजे. पश्चात्तापाने अत्यंत तप्त होऊन भगवंताची करुणा भाकेल, भक्तिमार्गाला लागेल तर तो निश्चितच उद्धरून जाईल. जसें अजामिळाचें झालें. अजामिळहि चुकून मुलाचे नारायण हें नांव घेतलें त्याक्षणी उद्धरला नाहीं. त्या अद्‌भुत योगायोगाने त्याला कृतकर्माचा पश्चात्ताप झाला, त्याने भक्तिसाधना केली व मग तो उद्धरला. 'पातकी होता' असा भूतकाळाचा प्रयोगच असला पाहिजे. आतां मी भक्ति करतो, नाम घेतो, मग मला पातकेहि करीत राहायला अडचण नाहीं, असा अपसमज कुणीहि आपल्या मनाशीं बाळगू नये. अजामिळासारखे परिवर्तन झालें असेल तरच भगवंत आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाहीं हें अनुभवास येईल.

विधीकारणें जाहला मछ वेगीं । धरी कूर्मरूपें धरा पुष्टिभागीं ॥
जना रक्षणाकारणें नीच योनि । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥

या श्लोकामध्ये दहा अवतारांपैकीं मत्स्य, कूर्म, वराह अशा पहिल्या तीन अवतारांचा उल्लेख समर्थांनी केला आहे.

२५ व्या कल्पाच्या शेवटीं ब्रह्मदेवाची रात्र आणि सृष्टीचा प्रलय चालू झाला होता. ब्रह्मदेव निद्राधीन असतांना, हयग्रीव नांवाच्या एका महाबलाढ्य दैत्याने सृष्टीच्या उत्पत्तीचे साधन असलेले वेद पळविले आणि तो त्या प्रलव-सागरांत कोठेतरी लपून बसला. ब्रह्मदेव जागा झाला आणि वेद पळविले गेले आहेत असें पाहिल्यानंतर किंकर्तव्यमूढ होऊन त्यानें भगवान विष्णूंची प्रार्थना केली व वेद सोडवून आणण्यास विनविले. त्याप्रमाणें भगवंतांनीं मत्स्यावतार धारण करून हयग्रीव दैत्याचा नाश केला. वेद सोडवून आणले, अशी कथा आहे. तीच येथें "विधीकारणें जाहला मछ वेगीं" म्हणतांना समर्थांना अभिप्रेत आहे.

मनूच्या संदर्भांत मत्स्यावताराची आणखी एक कथा सांगितली जाते ती येथें अभिप्रेत नाहीं.

दुसरा कूर्मावतार. समुद्रमंथनाच्या वेळीं क्षीरसागर घुसळण्यासाठी रवी (मथा) म्हणून घेतलेला मंदराचल, घुसळताना स्थिर राहीना, खालीं खालीं जाऊं लागला, तेव्हां देवानी प्रार्थना केल्यावरून विष्णूने कासवाचे रूप धारण केलें, आणि तो पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. तेव्हां समुद्रमंथन यशस्वीरीत्या पार पडलें. त्यांतून नाना प्रकारची रत्नें व अमृत लाभलें अशी प्रसिद्ध कथा आहे. पण ती येथें समर्थांना अभिप्रेत नाहीं असें दिसते निर्माण झालेली सृष्टी आपल्याच भारामुळे समुद्रांत बुडूं लागली. तेव्हां परमेश्वराने कासवाचे रूप धारण करून पृथ्वीला आपल्या पाठीचा आधार दिला व ती तोलून धरली, बुडूं दिली नाहीं. ज्यात कोणाहि दैत्याचा वध करण्याचा प्रसंग आला नाहीं असा हा एकच अवतार दिसतो. जयदेवाने आपल्या अष्टपदीत -
क्षितिरतिविपुलतरे तव तिष्ठति पृष्ठे ।
धरणिधरणकिण चक्र -गरिष्टे ।
केशव धृतकच्छपरूप, जय जगदीश हरे ।
असाच या अवताराचा उल्लेख केला आहे. समर्थांनींहि ' धरी कूर्मरूपे धरा पुष्टिभागी' असेंच वर्णन केलें आहे.

तिसरा अवतार वराहाचा. कश्यपाच्या, दिती नांवाच्या पत्नींच्या पोटीं जन्मलेल्या, हिरण्याक्ष नावाच्या एका दैत्याने सर्व पृथ्वीचेच हरण करून तिला पाताळात नेली. तेव्हां विष्णूने वराहरूपानें प्रगट होऊन हिरण्याक्षाचा वध केला व पृथ्वी आपल्या सुळ्यावर घेऊन बाहेर काढली. पृथ्वीच्या रक्षणासाठी नीच पशूचें रूप धारण करतानांहि भगवंतांनीं संकोच बाळगला नाहीं, यावरून त्यांचें कर्तव्याविषयीचें प्रेम सूचित होते. वराह रूपामध्यें भगवंतांची आराधना करण्याची पद्धति एके काळी भारतवर्षांत विशेष प्रमाणांत प्रचलित होती असें अनेक ठिकाणी सांपडलेल्या वराहाच्या प्राचीन मूर्तीवरून आढळतें.

जगत्कल्याणासाठी वा भक्तसंरक्षणासाठीं परमेश्वर किती तत्पर असतो ते या तिन्ही कथांवरून व्यक्त होते. महाप्रचंड अशा पृथ्वीचा उद्धार ज्यानें लीलया केला, त्याला आपल्या भक्ताचे रक्षण करण्यांत कांहींच श्रम नाहीत हें सांगावयास नकोच. मग तो भक्ताची उपेक्षा काय म्हणून करील ?

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP