श्री रामदासस्वामीकृत् 'मनोबोध' (मनाचे श्लोक) विवरण

॥ श्रीराम समर्थ ॥

अहंतागुणें सर्व ही दुख होतें । मुखें बोलिलें ज्ञान तें वेर्थ जातें ॥
सुखी राहतां सर्व ही सूख आहे । अहंता तुझी तूं चि शोधूनि पाहें ॥ १६१ ॥

नीट विचार करून पाहिलें तर लक्षांत येईल कीं जगतातील बहुतेक सर्व दुःखे अहंकारांतून जन्मास येतात. अहंकार हा आर्जव, विनय, नम्रता, आदर, जिव्हाळा, प्रेम, भक्ति, निष्ठा या सर्व सद्‌भावांचा शत्रू आहे. अहंकारी माणूस समाजांत कोणासच मानवत नाहीं व त्यामुळें तो उगीचच दुःखी होतो. आपली एक विशिष्ट योग्यता आहे व त्याप्रमाणे आपणास सत्ता, संपत्ति, सन्मान, लौकिक वा कौतुक प्राप्त झालें पाहिजे असें माणसास वाटतें. ही अपेक्षा पुरी होत नाहीं व त्यामुळें मनुष्य दुःख भोगतो.

लौकिकाच्या अपेक्षेनें हा अहंकार कित्येक वेळा खोटी नम्रता धारण करतो. असा माणूस जमिनीवर बसेल, सभेला गेला तर लांब पादत्राणांजवळ उभा राहील. पण कुणीतरी कार्यकर्त्यानें आपणांस पहावे आणि स्वतः नको नको म्हणत असतांनाहि आपणांस उच्चस्थानीं नेऊन बसवावे, अशीच अपेक्षा करेल. क्वचित् खराच उपेक्षिला गेला तर संतापेल. दांभिकाजवळचे सर्व कांहीं असतें तें प्रदर्शनासाठीं.

स्वतःजवळ चांगलें असावें. सहानुभूतीने तें दुसऱ्यास शक्य तर द्यावेंहि. पण आहे तें वा नाहीं तें दाखवण्याचा प्रयत्न मात्र करूं नये. जरी चांगलें असे कांहीं असलें तरी ते प्रदर्शनाच्या प्रयत्नाने वाया जाते. समर्थ ज्ञानाच्या उपलक्षणेनें हा विषय सांगत आहेत. कस्तुरी आपल्या सुगंधामुळे स्वतःच प्रगट होते. ही कस्तुरी आहे असें शपथ वाहून सांगण्याचा प्रसंग येतो तेव्हां ती कस्तुरी नसते. ज्ञानादि सर्व सगुणांचे तसेंच आहे.

अहंकार सोडून राहिले म्हणजे माणूस स्वतःहि सुखी होतो आणि इतरांनाहि सुखी करतो. अहंकाराचा स्पर्श हा कांट्यासारखा आहे आणि नम्रतेचा स्पर्श हा रेशमासारख्या आहे. रेशमाच्या मृदुल स्पर्शाने सुख होणें अगदीं स्वाभाविक आहे. अहंकार मात्र बोंचल्याशिवाय राहत नाहीं.

आपणाजवळ अहंकार आहे कीं नाहीं हें ज्याचें त्यानेंच शोधले पाहिजे. इतरांचे वागणे अहंकाराचे वाटणे हा सुद्धां स्वतःचा अहंकारच असतो. आपली स्वतःची कुणी दुसऱ्याने केलेली स्तुति, आपणाविषयीं दाखविलेला आदर, आपल्यापुढे व्यक्त केलेली नम्रता, जर कुणाला सुखवीत असेल व त्यामुळें तसें करणारा दुसरा चांगला आहे असें वाटत असेल तर तोहि स्वतःच्या अंतःकरणातील अहंकाराचाच परिणाम आहे असें जाणले पाहिजे. कौतुक करणारा चांगला आणि दोष दाखविणारा वाईट असें वाटणें हेंहि अहंकाराचेच द्योतक आहे. नम्रता असावी, पण नम्रता दाखविणे हा अहंकारच आहे. मला स्तुति आवडत नाहीं असें म्हणणें हें स्तुति आवडत असलेल्या अहंकाराचेंच थोडे सूक्ष्म रूप आहे. आपली खोटी निंदा ऐकूनहि ती करणाऱ्याविषयी तिरस्काराची, द्वेषाची भावना निर्माण झाली तर तोही अहंकारच आहे. अहंकार हाच अहंकार शोधण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असल्यानें अहंकार हा अहंकार आहे हेंच ज्यात येत नाहीं. फार प्रयत्नपूर्वक शोधावे लागतें, सावधपणे विवेकाचा अवलंब करावा लागतो, तो यामुळेंच व हे आपलें आपल्यालाच करावें लागतें. दुसऱ्या कोणाचें या कामी फारसें सहाय्य होऊं शकत नाही. तशीच उत्कट श्रद्धा असेल तर शास्त्राचें वा गुरूंचे मार्गदर्शन उपयोगी पडते. पण अहंकार श्रद्धेलाहि स्थिर राहू देत नाही म्हणून आपला आपण प्रयत्न करणें हेच श्रेयस्कर.

अहंतागुणें नीति सांडी विवेकी । अनीतिबळें श्लाघ्यता सर्व लोकीं ॥
परी अंतरीं सर्व ही साक्ष येते । प्रमाणांतरें बुद्धि सांडून जाते ॥ १६२ ॥

अहंकारामुळे जे अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात त्यांतील कांहींचे वर्णन या श्लोकांत आले आहे.

माणसाला बऱ्या-वाईटाचें ज्ञान अगदीं नसतें असें नाही तो विवेकी असतो, चांगलें काय, वाईट काय, हें त्याला नीट रीतीनें कळू शकतें. पण त्याच्या ठिकाणचा अहंकार त्याला जणू नीतीने वागूं देत नाही. त्याचें वागणें-बोलणें, खाणे-पिणें, आवडी-निवडी या शास्त्राच्या म्हणजे नीतीच्या मर्यादा सोडून असतात.

वर्तन असें अनीतिमान असलें, जीवन सर्व प्रकारच्या व्यसनांनीं आणि व्यभिचारांनीं बरबटले असले तरी लोकांमध्यें त्याला मानमान्यता मात्र हवी असते. तेवढ्यासाठी तो अनीतीचेच तत्त्वज्ञान बनवितो. अनीतीचे बळ तें हेंच. अनेक महंत, कलावंत, साहित्यिक, पुढारी हे याची स्पष्ट उदाहरणे आहेत. शिव्यागाळीनें भरलेल्या ओंगळ, बीभत्स, अश्लील लेखनाचीहि, वास्तवता वा पीडीत दलितांचे हुंकार या नांवाने भलावण होते. धादान्त असत्य आणि विकृत साहित्यहि, चाकोरीबाहेर पडण्याचा प्रयत्न, प्रस्थापिताशीं विरोध, क्रांतिकारी अभिनवता या नावांखाली मान्यता पावते. चांगुलपणा सिद्ध करण्यासाठीं शतकानुशतकांच्या अनुमवाने, मान्यतेनें, स्थिर झालेले नियमहि स्वतःच्या समर्थनासाठीं पालटले पाहिजेत असें प्रतिपादले जातें. अनीतीला तत्त्वज्ञान पुरवून बलवान् करावें आणि त्या बळावर प्रतिष्ठा मिरवावी, असाच हा अहंकारी प्रयत्न आहे. अनीतीचे तत्त्वज्ञान बनविणाऱ्या स्वैराचाऱ्यापेक्षां, दुर्वर्तन लपवून सदाचारी म्हणून मिरविणारा दांभिक परवडला. कारण सामाजिकदृष्ट्या तो तितका घातक नाहीं. सदाचाराची मूल्ये तो मान्य करतो. गांधीजींनी एकदां “दंभ म्हणजे असत्याची सत्यापुढें शरणागति” अशी व्याख्या केली होती. ती मार्मिक आहे यांत शंका नाही.

अनीतीचे तत्वज्ञान कसें बनविले जातें त्याचें एक बारीकसे उदाहरण सांगतों. मी एकदां वैद्यक-परीक्षेसाठीं मुंबईहून कलकत्त्याला चाललो होतों. महाराष्ट्रात त्यावेळीं दारुबंदी कडक होती. पहिल्या वर्गाच्या डब्यांत आम्हीं चौघेजण होतों. नागपूर जाईपर्यंत विशेष कांहीं घडले नाहीं. मग मात्र बाटल्या बाहेर निघाल्या, मांसाहारी थाळ्या मागविल्या गेल्या. धूम्रपान तर पूर्वीपासूनच चालू होतें. मी विवेकानंदांचें एक पुस्तक वाचीत होतो. मला त्यांच्यात सहभागी करण्याचा त्यांनीं पुष्कळ प्रयत्न केला. पण मला सिगारेट, मद्य, आम्लेट यांतील कांहींच चालण्यासारखे नव्हतें. मी वारंवार नकार दिला. तेव्हां त्यातील एक गृहस्थ मला म्हणाला- “अैसा कैसा जी ! मर्दको कुछ न कुछ शौक होनाहि चाहिये ।" व्यसन नसले तर पुरुष नाहीं असें म्हणणें हें कोणत्या प्रमाणाने सिद्ध करावयाचें ? “बुद्धि प्रमाणांतरें सांडून जातें” ती अशी. व्यसनाच्या युक्ततेला आधार कोणता ? न शास्त्राचा, न संस्कृतीचा, न खऱ्या सभ्यतेचा. श्रुति, स्मृति, संत याची वचनें म्हणूनच तर बुरसटलेल्या विचारांची द्योतक मानली जातात. बुद्धिवाद्यांनी निदान आरोग्यशास्त्र तरी प्रमाण मानलें पाहिजे कीं नाहीं. बिड्या पिणारा तेंहि लक्षांत घेत नाहीं. इतरांना या धूम्रपानामुळे उच्छाद होतो हें लक्षांत घेण्याचें सौजन्यहि तो दाखवीत नाहीं, उलट धूम्रवलये ही सभ्यतेचे प्रतीक असल्याचें सांगतो. ललितमधुर भाषेमुळे व्यसनाचे हें तत्त्वज्ञान सामान्यांच्या गळी उतरते, आणि मग धूम्रपान, मद्यपानासारखीं दुर्व्यसनें, आरोग्यदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक असलीं तरी, व्यापक प्रमाणांत पसरतात, कोंवळी तरुण पिढीहि त्यांची बळी ठरते. अहंकारी अनीतिमान् किती घातक ठरतो तें यावरून लक्षांत येईल.

अनीतीचे तत्त्वज्ञान बनविणारा अहंकारीहि, शेवटीं माणूसच असल्यानें, त्याला कुठे न कुठे, केव्हां ना केव्हा तरी, आपण वागतो, बोलतों तें योग्य नाहीं हें जाणवते. पण हा आंतला प्रामाणिक आवाज, अहंकारानें दडपला जातो. कारण कुणालाच, कशालाच, प्रमाण न मानणे हाच अहंकाराचा स्वभाव आहे.

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ झाला । देहातीत तें हीत सांडीत गेला ॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धी करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६३ ॥

येधून पुढें पांच श्लोकांत अहंकाराला प्रमुख आधार असलेल्या देहबुद्धीचा निरास करावा व त्यासाठीं संतांची संगति धरणे हा उपाय आहे, हा विषय प्रामुख्याने सांगितला आहे. मनाच्या श्लोकांत यापूर्वीहि कांहीं ठिकाणीं देहबुद्धि सोडून द्यावी (१२) (१०३), देहदुःख हेंच सुख मानावें ( १०), देहाची चिंता करूं नये (७८) अशा संदर्भात देहबुद्धीचा निरास सुचविला आहे. आणि 'मना बुद्धि ही साधुसंगीं वसावी' (१०७) “मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे” ( १२८) अशा रीतीने सज्जनाची संगति महत्त्वाची असून तिचा आश्रय करावा असेहि सांगितले आहे, पांच श्लोकांचे हे प्रकरण या विषयाची अधिक विस्ताराने चर्चा करणारे आहे. आकलनाच्या दृष्टीने आणि आचरणाच्या दृष्टीने हे प्रकरण फारच अवघड आहे. वरवर सोपे वाटले तरी थोड्या गंभीरपणाने विचार केला तर विषयाची कठिणता प्रत्ययास येईल.

संतवाङ्‌मयामध्ये शरीराची निंदा आणि स्तुति अशा दोन्हीं प्रकारें वर्णन आढळतें. तुकाराम महाराजांनी तर एका अभंगामध्येच “शरीर दुःखाचें कोठार” आणि "शरीर उत्तम चांगलें” असें शरीराचे दुहेरी वर्णन केलें आहे. शरीर हें जेव्हां साधन मानलें जातें तेव्हां तें चांगलें असतें. पण शरीर जेव्हां साध्य होतें तेव्हां मात्र तें घातक ठरतें.

तत्त्वज्ञान जेव्हां पंचकोशांचा विचार करते तेव्हां तो अस्थिमांसयुक्त, अन्नमय शरीरापासून, बुद्धिपर्यंतचा, विज्ञानमय कोशापर्यंतचा, विचार असतो. आणि अंतिम स्थितीतील आनंदमय कोशाचा विचारहि शेवटीं, कोशाचा विचार असल्यानें, तोहि कोश सोहंभाव अटकू होऊन कैवल्याला अडथळा आणूं शकतो. देहबुद्धीचा निरास करतांना या सर्व पातळ्यांचा विचार केला पाहिजे. कारण मीची, मीपणाची जाणीव स्थूल-सूक्ष्म-सूक्ष्मतर रूपाने या देहभावाशी संबद्ध असते. मीच्या वेगळेपणाची ही जाणीव पूर्णपणें नाहीशी होणें हाच ब्रह्माचा साक्षात्कार असतो. बाह्य जगताच्या, शरीराच्या, इंद्रियांच्या, मनाच्या, बुद्धीच्या माध्यमाने- मी कुणी वेगळा आहे, चांगला आहे वा वाईट आहे असें जाणवणे हीच देहबुद्धि व तीच माणसाला ब्रह्मापासून भ्रमानें वेगळे पाडीत असते. ब्रह्माशी एकरूपता अनुभविणें हे जीवाचे खरे हित. पण तें प्राप्त होणें दूरच राहते. इतकेच नव्हे तर अनेक जन्मांच्या संस्काराने दृढ झालेल्या या देहबुद्धीने जे खरे हित आहे, ते हित आहे हेहि लक्षांत येत नाही व त्यामुळेच खूप पैसा मिळवावा, ऐश्वर्य वाढवावे, शरीर सुंदर दिसावे म्हणून बहुमोल वस्त्रांनी व प्रसाधनांनी नटवावें, निरनिराळ्या इंद्रियांच्या द्वारा दर्शन स्पर्शनादि सुखे भोगावी, सत्तासंपत्तीच्या द्वारा मानसन्मान मिळावा, प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यावी, हेच काय ते साध्य आहे असे माणसाला वाटत राहतें. सदाचार, संयम, ईश्वरी साक्षात्कार लाभावा अशी प्रेरणा त्याला कधीं होतच नाही. या देहबुद्धीने 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' इथपासून ' चोरीं कृत्वा सुरां पिबेत्' येथपर्यंत सुख मिळविण्याच्या अभिलाषेचा अधःपात होतो आणि माणसाचे सर्वप्रकारें अहित होते.

समर्थांनी यासाठींच देहबुद्धिविषयींची जी दृढता आहे, उत्कटता आहे, ती आत्मबुद्धीचे ठिकाणीं ठेवावी असें आग्रहाने सांगितले आहे.

व्यवहाराच्या पातळीवर आणि परमार्थाचे एक साधन म्हणून शरीर वा शरीराची उपयुक्तता नाकारता येत नाहीं. पण शरीरच सर्वस्व मानून चाललें आणि शरीरापलीकडे कांहीं आहे याचा विचारच केला नाहीं तर जीवन अनेक प्रकारच्या दोषांनी भारले जाते. त्यातूनच स्वैराचार, अनीति, नागडी स्वार्थांधता, परपीडन, इत्यादि व्यक्तीचाच नव्हे तर समाजाचा घात करणारी परिस्थिति निर्माण होते. म्हणून माणसाने देहभावाच्या सुखकल्पनेत गढून गेलेली वृत्ति प्रयत्नपूर्वक आत्म्याकडे वळवावी. कांहीं उदात्त ध्येय निःस्वार्थपणें डोळ्यांपुढें ठेवावे. परोपकार, दान, ईश्वरभजन इत्यादी वृत्तींना शुद्ध आणि संयमित करणाऱ्या साधनांचा अवलंब करावा.

देहाच्या पलीकडे पाहण्याची ही प्रेरणा सज्जनांच्या संगतीमध्यें मिळू शकते. म्हणून प्रयत्नपूर्वक संतांच्या सहवासाचा लाभ अधिकाधिक घ्यावा.

मनें कल्पिला वीषयो सोडवावा । मनें देव निर्गूण तो वोळखावा ॥
मनें कल्पिता कल्पना ते सरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६४ ॥

आपल्याला जाणीव नसली तरी जगतातील बहुतेक सर्व व्यवहारांत कल्पनेचाच भाग फार मोठा असतो. सर्वसामान्य माणसाची चांगल्या-वाईटाची धारणा किंवा त्याची आवडनावड नीटपणें पाहिली तर हें लक्षांत येईल. कडू कारलीहि आवडीने खाणारे लोक आहेत. उलट, पथ्याला चालणारी दुध्या भोपळ्याची सात्त्विक भाजी पानात न पडूं देणारे लोकहि आहेत. “नावडतीचे मीठ आळणी” ही म्हण वरील विधान सिद्ध करणारी आहे. पतीपत्नीच्यामध्ये प्रेम असणें हें स्वाभाविकहि आहे आणि इष्टहि आहे. अशा स्थितींत मुलीवर जावयाचें प्रेम असलें तर तो चांगला वाटणें सरळ आहे पण सुनेवर प्रेम करणारा मुलगा मात्र बाईलबुद्ध्या वाटतो. हें कसें ? आपला तो बाळ्या आणि लोकाचें ते कारटे असें कां वाटावे ? दुसऱ्याची बायको चांगली का वाटावी ?

व्यवहार नीट राहत नाहींत, विकृत होतात, ते या कल्पनेमुळे. माणूस सत्यापासून दुरावतो. वस्तुस्थिति ओळखूं शकत नाहीं. कारण कल्पनेनें त्याच्या विवेकाला आणि जाणिवेला आंधळे बनविलेले असतें. यासाठीं समर्थ म्हणतात की, मनानें कल्पिलेला विषय नीट पारखून घेऊन सोडवावा. अवघड गणित जसें त्याची रीत नीट लक्षांत घेऊन सोडवावयाचे असतें तसेंच विषयासंबंधीहि करावे लागते. इंद्रिये बाह्यांगाला भुलतात. मनाला वाटणारी आवड-निवड प्रामाणिक नसतें. त्यामुळें विषयाचा स्वीकार किंवा धिक्कार हिताच्या दृष्टीनें नेमकेपणानें करतां येत नाहीं.

तत्त्वज्ञानातील दृष्टिसृष्टिवाद तर सृष्टीची सर्व धारणाच पाहणाराच्या कल्पनेवर अवलंबून असल्याचें सांगतो. निरीक्षणमानाप्रमाणें घटना प्रत्ययास येतात. निरीक्षणमान पालटले कीं घटनाहि वेगळी वाटते हें विज्ञानातील सूत्र, तत्त्वज्ञानांतील दृष्टीसृष्टीवादासारखेच आहे. हा सर्व मायेचा खेळ आहे असें तत्त्वज्ञान सांगते. मनुष्याचें शरीर-मन-बुद्धि मायेच्या प्रभावाखालींच वावरत असते. विषयाची सोडवणूक त्यामुळेंच अधिक अवघड होऊन बसते.

यांतूनहि बाहेर पडण्याचें एक सूत्र आहे. त्याचा विचार समर्थ दुसऱ्या चरणांत सांगत आहेत. मनुष्याच्या भोवती सगुण, साकार पदार्थांनी भरलेलें जग पसरले असलें आणि त्याचे सर्व व्यवहार सगुण, साकाराच्या माध्यमानेच होत असले तरी दिसणाऱ्या, भासणाऱ्या, नाना प्रकारच्या विविधतेने प्रत्ययास येणाऱ्या सृष्टीच्या मागें आधारभूत असें जें मूलतत्त्वच आहे, तें केवळ सत्तामात्र असें निर्गुण आहे, हें लक्षात घेतलें तर कल्पनेच्या पाशांतून सुटका होण्याची शक्यता उत्पन्न होते. समर्थ यासाठींच “मने देव निर्गूण तो ओळखावा” असें सांगत आहेत.

समर्थांना सगुण अमान्य नाहीं. सगुणभजनावर आणि मूर्तिपूजेवर त्यांचेंहि उक्त प्रेम आहे. मुक्तीच्या नांवावर सगुण भक्तीचा उच्छेद करणाराला त्यांनीं मूर्ख म्हटलें आहे. असें असलें तरी सगुणामागचें निर्गुण जर जाणले नाहीं तर मूर्तिपूजेतील खरा अर्थच निघून जातो. परमेश्वर केवळ प्रतिमा ठरतो. त्याच्या अनंततेला आणि व्यापतेला बाध येतो. उपासनेच्या दृष्टीनेंहि हें अनिष्ट आहे. देवासंबंधीची धारणा सत्य अशीच असली पाहिजे. देव निर्गुण आहे हें मनानें ओळखले कीं विविधता काल्पनिक आहे हें जाणवते आणि व्यवहार शुद्ध होऊं लागतो. श्रीतुकासममहाराजांनीहि "आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ।" असें सांगितलें आहे तें यादृष्टीने लक्षांत घेण्यासारखे आहे.

मूलतत्त्व जे अद्वैत त्याचे स्वरूप मोठे विचित्र आहे. तत्त्वतः ते जाणता येतें, अनुभविता येते, पण तो अनुभव वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करणे हे शेवटी द्वंताचेच रूप ठरते अद्वैतांत बोलणें, सांगणें, संभवत नाहीं. अर्थातच ऐकणेर्हि शक्य नसतें. या दृष्टीनें केलेला कोणताहि प्रयत्न शेवटीं द्वैताचा ठरतो व द्वैत हें कल्पनेच्या आश्रयानें असल्यानें, कल्पनेचा ठरतो. म्हणून कल्पनांचाहि निरास करण्यासाठीं कल्पनांचाच अवलंब करावा लागतो. भांडी स्वच्छ करण्यासाठीं राख वापरावी लागते तसेंच हें आहे. भांड्याला लावलेली राखहि शेवटीं काढून टाकावयाची असते. इतकेंच नव्हे तर राख धुण्यासाठी वापरलेलें पाणीहि पुसून टाकून भांडे कोरडे करावें लागतें. कित्येक वेळ पाण्याचा अंश नाहींसा होण्याची क्रिया आपोआपहि घडते, पण त्यासाठीं कांहीं वेळ भांडीं पालथीं घालणें, उभी करून ठेवणें, या गोष्टी कराव्याच लागतात. समर्थांनीं “कल्पना सारावी” असे न म्हणतां “कल्पना सरावी” असें जे म्हटलें आहें तें शेवटच्या अवस्थेतील सहजतेच्या अपेक्षेनेच म्हटलें आहे.

संत हे साक्षात्कारी असल्याने, अनुभवी असल्याने त्यांच्या संगतींत राहिले असतां त्यांच्या उपदेशाने कल्पनानिरासाचा अवस्थाक्रम योग्य रीतीनें स्पष्ट होत जातो म्हणून माणसानें सत्पुरुषांच्या सहवासांत राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे.

देह्यादिक प्रपंच हा चिंतियेला । परी अंतरीं लोभ निश्चीत ठेला ॥
हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६५ ॥

'मी’ देह या कल्पनेपासूनच प्रपंचाचा आरंभ होत असतो. 'मी देह' ही कल्पनासुद्धा 'मी' कुणी वेगळा, विशिष्ट या कल्पनेतून निपजते. हा वेगळा "मी", "माझें, माझें" या कल्पनेचे क्षेत्र वाढवीत नेतो. "माझें माझें"चे क्षेत्र जसजसे वाढत जाते तसतसे हा "मी" अधिकाधिक घट्ट होत जातो. "मी"चे घट्ट होणे आणि “माझें” चा विस्तार हे परस्परावलंबी आहेत. एकमेकांना पूरक आहेत. लोभ हे त्याचे माध्यम आहे. लोभच "मी"ला “माझे"शी आणि "माझे"ला "मी"शी जखडून ठेवतो. लोभरूपी ही आसक्तीच जिव्हाळ्या, प्रेमाचे, दर्शनी उदात्त, असें संभावित रूप धारण करते आणि माणसाला अधिकाधिक बंधनांत पाडते.

लोभाची उत्पत्ति मुळांत सुखकल्पनेत असल्याने, मनुष्यापुढे अधिकाधिक उदात्त, निःस्वार्थ, निरपेक्ष गोष्टींचे आकर्षण सुखाच्या दृष्टीने वाटत गेलें, वाढत गेलें तर लोभाचे पाश ढिले होत जातात. ही उदात्तता थोरांच्या चरित्रांत स्पष्ट दिसते. रामचंद्रांचें सीतेवर प्राणाआगळे प्रेम होते; पण तरी रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला. गोकुळच्या गौळणी या भगवान् श्रीकृष्णाच्या अभिन्नहृदयरूप होत्या. तरी कंसवधापूर्वी गोकुळ सोडल्यानंतर भगवान् पुन्हां गोकुळाला परत गेले नाहींत. हे प्रेम खरें उदात्त प्रेम होय. या उदात्ततेमुळेच खऱ्या प्रेमिकाला मीलनापेक्षा प्रतीक्षेत अधिक गोडी वाटते. या उदात्ततेमुळेच वाचस्पतिमिश्रांच्या पत्नीने भामतीनें, पतीकडून आपाततः झालेली घोर उपेक्षा समाधानाने सहन केली. त्या साध्वीनें स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवहि विद्यानंदांत तंद्री लागलेल्या आपल्या पतीला होऊ दिली नाही. प्रेमाचे हे दिव्य स्वरूप आपणास कळणेच शक्य नाही. आपण प्रत्यक्ष उपभोगात परिणत होणाऱ्या लोभाला, आसक्तीलाच, प्रेम हे सोज्वळ नांव देऊन व्यवहारांत समाधान मानीत असतो. देहबुद्धि त्यामुळे दृढावत जाते, अधिकाधिक बळकट होत जाते, हे आपण लक्षात घेत नाही.

'मी' आणि 'माझे' मध्ये असलेले हे लोभाचे बंधन नाहीसे करण्याची सोपी पण प्रभावी युक्ति समर्थ सांगत आहेत. मुक्त होण्यासाठी परमेश्वराचें चिंतन करावें ही ती युक्ति. परमेश्वराचे चिंतन जितकें सतत, जितकें अधिक, जितकें निरपेक्ष आणि जितकें उत्कटतेने होत जाईल तो तो मुक्त होणे साधत जाईल. माणसाच्या अंत:करणांतील लोभाची वृत्ति लक्षात घेऊन, त्याचे स्त्री इत्यादीच्या ठिकाणी असलेले आकर्षण पाहून समर्थांनी येथे मुक्तीलाच कांतेच्या, प्रेयसीच्या रूपांत वर्णिले आहे. श्रीतुकाराममहाराजांनीहि "तुका म्हणे मुक्ति पर्णिली नोवरी।" असें पत्नीच्या रूपकानेंच मुक्तीचे वर्णन केले आहे, प्रेयसीच्या भेटीसाठी जशी ओढ लागते तशी मुक्तीसाठी लागू द्या. प्रेयसीच्या मीलनाने जे सुख मिळतें त्यापेक्षा अनंत पटीने अधिक आणि शाश्वत सुख मुक्तीच्या प्राप्तीनें लाभतें हे लक्षात घ्या. हेच या रूपकांतून संतांना सुचवावयाचे असतें.

ईश्वराचे चिंतन हा मुक्तीसाठी, मोक्षासाठी; साधा, सरळ पण निश्चित फलदायी असा मार्ग आहे. त्याचे सविस्तर विवेचन मागे आलेले आहे.

ईशचिंतनाची गोडी लागावी, “माझें माझें"चा लोभ कमी व्हावा, उदात्त गोष्टींतील सुखाचे महत्त्व वाटावें, यासाठी संताचा सहवास उपयुक्त ठरतो. कारण ते सर्व त्यांनी अनुभविलेले असते. आणि तो अनुभव त्यांच्या सर्व जीवनांत भरून राहिलेला असतो. संतांच्या सहवासांत राहिल्याने सामान्य माणसावरहि या गोष्टींचा परिणाम होऊन तो सुधारतो.

अहंकार विस्तारला या देहाचा । स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा ।।
बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ।।१६६।।

या श्लोकांत मागील श्लोकांतील बोधाचाच थोडा अधिक विस्तार झालेला आहे.

"मी देह" ही भावना हे अहंकाराचें व्यक्त स्वरूप. देहापेक्षां वेगळ्या 'मी'ची जाणीव खऱ्या अर्थाने नसली तरी व्यवहारांत पुष्कळ वेळ माझा देह, माझे शरीर अशी देहाविषयींच्या भिन्नपणाची भाषा वापरली जातेच. म्हणजे 'माझें’चा आरंभहि देहापासूनच होतो. अहंकाराचें अधिक व्यक्त स्वरूप असलेले हे 'माझें’ स्त्री-पुत्र, आप्त-मित्र, घर, संपत्ति, ऐश्वर्य, सत्ता, मानसन्मान, प्रतिष्ठा, लौकिक या स्वरूपांत विस्तारत जाते. तेंच जन्ममृत्यूच्या फेऱ्यांत गोंवते. अनेक प्रकारच्या दुःखाला आणि आपत्तीला कारणीभूत होते. सर्व जीवन चिंतेने व्याकुळ करून सोडते. या "माझें माझें"च्या ठिकाणी व्यवहारांत उपयोगी असे काही अंश असले तरी तत्त्वतः विचार करतां “माझें माझें" वाटणे ही शेवटी भ्रांति आहे. बळाने म्हणजे दृढतेने प्रयत्नपूर्वक या भ्रांतीचे निरसन केले पाहिजे तरच जन्माला लागलेली सर्व प्रकारची चिंता, आयुष्यांत वांट्याला येणारे सर्व प्रकारचे क्लेश नाहीसे होतील.

प्रपंच हा अहंकाराचा विस्तार आहे. स्त्री-पुत्रादींच्या ठिकाणी उत्कटतेने असलेलें ममत्व हा शेवटीं भ्रम आहे. त्याची उपयुक्तता व आवश्यकता व्यवहाराच्या मर्यादेतच ठेवली पाहिजे. ती आसक्तींत परिणत होऊन हिताला बाधक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे सर्व संतांच्या सहवासांत समजू शकते; म्हणून संतसंगतीची इच्छा धरावी.

बरा निश्चय शाश्वताचा करावा । म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥
घडीनें घडी सार्थकाची करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६७ ॥

माणसाने आपल्या जीवनांत क्षणिक सुखदायक कोणतें आणि दीर्घकालीन लाभदायक काय याचा तरी विचार केलाच पाहिजे ना ! व्यवहारापुरता तरी माणूस- चांगला माणूस- हा विचार करतोच ना ! मिळालेला सर्वच्या सर्व पैसा कोणी सहसा चैनींत उधळीत नाहीं. स्वतःचें वर असावें म्हणून शिल्लक ठेवतो, विमा उतरवितो, मुलींच्या लग्नासाठीं, मुलांच्या शिक्षणासाठीं, म्हातारपणींच्या व्यवस्थेसाठी, मिळालेल्या पैशांतून शक्यतो अधिक राखून ठेवतो. अकल्पितपणें येणाऱ्या अडचणी, दुखणीबाणीं यासाठीं सोय करून ठेवली पाहिजे असें मानतो. हा सर्व शाश्वताचाच विचार आहे.

तत्त्वज्ञान ज्याला शाश्वत म्हणतें तें जरी हें नसलें तरी विचाराची जात एकच आहे. तत्त्वज्ञान स्थूलापेक्षां सूक्ष्माचा, मर्यादितापेक्षा व्यापकाचा, एका जन्मापेक्षां जन्मजन्मांतराचा शाश्वताच्या दृष्टीनें विचार करतें इतकेंच. या शाश्वताच्या विचारातूनच संयम, त्याग, तप, उपासना, ईश्वरशक्ति, सत्य, ब्रह्मानुभव इत्यादींचा उदय होत असतो. म्हणून माणसाने सतत क्षणिक आणि भ्रांत यांत गुंतून न राहतां शाश्वत काय, सत्य काय, तें विचारांत घ्यावे आणि आपलें वागणें त्या दृष्टीनें स्वतःला शाश्वत सुख देईल, सत्याकडे नेईल, अशा दृष्टीनें सुधारावें.

जिथें जसें आहो ती स्थिति आणि जेथें जावयाचें आहे, जें व्हावयाचें आहे तें ध्येय, यांत बरेंच अंतर असते व तें काटण्यासाठी लागणारा कालहि दीर्घ असतो. त्यामुळें विचाराने, विवेकाने, साधनेची वाटचाल करीत असतांनाहि नाना प्रकारचे संदेह निर्माण होतात आणि त्यामुळें मार्गक्रमण खंडित होतें.

संदेह निर्माण होतात त्याच्या मुळाशींहि पूर्ण निश्चय नसणे, श्रद्धा दृढ नसणे, इच्छा उत्कट नसणे, आलेल्या वैतागालाच वैराग्य समजणें, स्वतःच्या योग्यतेविषयीं, शक्तीविषयीं योग्य कल्पना नसणे, धैर्याचा अभाव असणें, अशीं कारणें असतात आणि त्यामुळें या कारणांनी वरचेवर संदेह वाटतो, संशय येतो, शंकाकुशंकानीं मन व्याकुळ होतें.

या संशयाच्या जंजाळातून बाहेर पडण्याचा उपाय एकच आहे, तो म्हणजे सद्ग्रंथांचें वाचन, सत्पुरुषाचा सहवास, सतत चिंतन आणि निरलस प्रयत्नांचें सातत्य.

हा उपाय साधावयाचा तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानून थोडाहि वेळ निरुपयोगी व्यर्थ गोष्टींत वाया न घालविता मिळेल तो सारा वेळ वरील उपायांसाठी घालविला पाहिजे. "घडीने घडी सार्थकाची करावी’ असे समर्थ या दृष्टीनेच सांगत आहेत. वेळ सार्थकी लावण्याची प्रेरणाहि सत्पुरुषाच्या संगतींत लाभते.

करी वृत्ति जो संत तो संत जाणा । दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा ॥
उपाधी देहेबुद्धितें वाढवीते । परी सज्जना केविं बाधू शके ते ॥ १६८ ॥

संत कोणाला म्हणावे? संत कसा ओळखावा? हा विचार पूर्वी 'जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा' या ४७ ते ५६ मध्ये आलेल्या दहा श्लोकांच्या प्रकरणांत विस्तारानें आला आहे. येथें पुन्हा महत्त्वाची दोन लक्षणें समर्थ सांगत आहेत. नाना प्रकारचे चमत्कार करणारा, अंतर्ज्ञान असलेला वा आपल्या भक्ताची संकटे दूर करून मनोगते पुरविणारा जो, तो संत अशी सामान्यांची धारणा असते. खऱ्या खोड्या सिद्धींचे प्रदर्शन करणारेच संत, अवतार वा भगवान् म्हणून प्रतिष्ठा पावतात. रामदास-तुकारामांसारख्या खऱ्या संतांनी मात्र सिद्धींच्या प्राप्तीचा वा सिद्धींच्या प्रदर्शनाचा अनेक ठिकाणीं, अनेक प्रकारें, कडाडून निषेध केला आहे. समर्थांचेंच 'जनस्वभावगोसावी' या नावाचे एक उपहासगर्भ प्रकरण आहे. त्यांत लोक आपल्या गुरूचा अधिकार सांगतांना कोणकोणत्या सिद्धीचे वा चमत्कारांचें वर्णन करतात तें सांगितलें आहे. आणि असा मनुष्य खरा योग्यतेचा अधिकारी नव्हे, संत नव्हे, असें तेथें समर्थानी उन्मेखून उपदेशिलें आहे.

जो स्वतःची वृत्ति संत म्हणजे स्थिर, शांत, प्रसन्न करतो त्याला संत म्हणून ओळखावें. संताच्या अंतःकरणांत दुराशा म्हणजे विषयोपभोगाची आसक्ति कधीं नसते, अर्थांतच विषयासक्तीच्या कारणानें निर्माण होणारे दैन्यहि त्याचें ठिकाणीं कधीं दिसत नाहीं. प्रपंचामध्यें आलेल्या मोठ्यांत मोठ्या आपत्तीनेंहि खरा संत कधीं विचलित होत नाहीं, गडबडून जात नाहीं, त्याची विवेक शक्ति त्याला सोडत नाही, त्याचा तोल कधीं ढळत नाहीं, त्याच्या मुद्रेवर खिन्नता येत नाही, मनोवृत्ति स्थिर, शांत अशी राहते.

प्रपंचातील सर्व आपत्तीचे मूळ ममत्वांत आणि विषयासक्तीत असतें. संत यांपासून वेगळा असतो. आपण मात्र बारीक-सारीक कारणानेंहि गडबडून जातो, दीन होतो. डोकेच दुखत असेल तर सुचू नये हे एकवेळ समजूं शकते, पण पाय ठणकत असेल, पोट दुखत असेल तरी आपणास कांहीं सुचत नाहीं असें कां व्हावें ? मनाविरुद्ध घडले कीं आपल्या केवळ मुद्रेवरच नव्हे तर सर्व शरीरावरच खिन्नता पसरते. चांगल्या कामांतहि मग उत्साह राहत नाहीं. कर्तव्याचाहि उबग येतो. संताची स्थिति मात्र “केला जरी पोत बळेंचि खाले । ज्वाला तरी ते वरतीं उफाळे ॥" अशी असते. दारिद्र्यांत तो लाचार नसतो, ऐश्वर्यात तो उन्मत्त होत नाहीं. दैन्यवाणा नसणे या लक्षणांत हें सर्व अभिप्रेत आहे.

विषयासक्तिरूपी दुराशा नसल्याने संत उपाधि वाढवीत नाही. उपाधि ह्या देहबुद्धि वाढविणाऱ्या असतात. ऐश्वर्याचा लोभ, विलासाची प्रवृत्ति, नाना प्रकाराने निर्माण केलेले उद्योगांचे व्याप, हे सर्व देहतादात्म्य वाढविणारे असतात. धार्मिक म्हणविणारा माणूस व्रतवैकल्यांचा पसारा मांडतो तोहि उपाधिरूपच असतो. त्यांतून देहबुद्धीचेच पोषण होत असते. पुण्य लागावें, संकटाचा परिहार व्हावा, यासारखे कांहीं हेतू व्रतांच्या मुळाशीं असतात. त्यानें सात्त्विकता वाढत नाहीं. व्रतें बहुधा खाण्या-पिण्याशीं संबद्ध असतात. तीं कधीं एकदा संपतात आणि आपण पुन्हा चारीठाव कधीं जेवतो असेंच बहुधा माणसाला होतें. व्रतांमुळे इंद्रियांना संयमाची सवय लागली पाहिजे, तेंहि विशेषेंकरून घडत नाहीं. माणसे नियम करतात तो ठराविक काळपर्यंत अमुक न खाण्याचा, अमुक वस्तूची लाखोली वाहण्याचा, वाती लावण्याचा, एखादी पोथी वाचण्याचा, फार तर जप करण्याचा. पण दुसऱ्याची निंदा करणार नाहीं, स्वतःची स्तुति करणार नाहीं, कोणाचा उपहास करणार नाहीं, आपला मोठेपणा मिरवणार नाहीं, दुसऱ्याला फसवून लुबाडून स्वतःचा स्वार्थ साधणार नाहीं, चांगलें केलेलें मिरवणार नाहीं; निंदा, अपमान, अवहेलना मनाला लावून घेणार नाहीं, वेळ सदैव सत्कारणीच लावीन इत्यादी मनाला चांगलें वळण लावणारे नियम कोणी करीतच नाहीं. संतांजवळ इतर प्रापंचिक उपाधीप्रमाणें धार्मिकतेचें प्रदर्शन करणाऱ्या या व्रतादि उपाधीहि नसतात. आणि क्वचित् कर्तव्य म्हणून आपल्या दृष्टीनें उपाधि असणाऱ्या कांहीं गोष्टींचा स्वीकार संत करीत असला तरी त्या उपाधी त्याला बाधत नाहीत, त्याचा अहंकार वाढवीत नाहीत. निर्मम होऊन, निःस्वार्थपणें कर्तव्य करीत असतांना लोकांमध्ये क्वचित् तो सर्वसामान्यासारखा दिसला तरी तो अलिप्तच असतो आणि म्हणून व्यवहारांत वागत असतांनाहि, हर्षामर्षभयोद्वेगादि विकार संतांच्या ठिकाणीं कधीं दिसत नाहींत.

आपण एक तर व्याप नको म्हणून कर्तव्यच टाळतो किंवा देहबुद्धीने माझें माझें म्हणून वाढविलेल्या व्यापाला कर्तव्य समजतो. उपाधि बाधत नसल्यामुळें संताजवळ या दोन्ही गोष्टी नसतात. उपाधि वाढते तीहि ममत्वानें आणि बाधते तीहि ममत्वानेच. आत्मसाक्षात्कारामुळे ज्याचे ममत्व संपलें, त्याला उपाधि बाधत नाही. त्याची उपाधि वाढत नाहीं. त्याचें पुढें उपाधीचे उपाधीपणच उरत नाहीं.

नसे अंत आनंत संता पुसावा । अहंकारविस्तार हा नीरसावा ॥
गुणेंवीण निर्गुण तो आठवावा । देहबुद्धिचा आठऊ नाठवावा ॥ १६९ ॥

संतांच्या संगतींत मूलतत्त्वाचें ज्ञान असतें. संतांनी त्या मूलतत्त्वाचा, ब्रह्माचा अनुभव घेतलेला असतो. देहभाव शून्य झालेला असल्यामुळें, संत जणू प्रत्यक्ष त्या ब्रह्मांतच राहत असतात. प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप असतात. मूलतत्त्व जें ब्रह्म त्याला अंत नाहीं, शेवट नाहीं, कोणतीहि सीमा नाहीं, मर्यादा नाहीं आणि त्यामुळेंच त्या मूलतत्त्वाचें ज्ञान होणें ही गोष्ट अतिशय कठिण होऊन नसते. संतानी अनुभव घेतलेला असल्यामुळें ते त्याविषयीं निश्चयानें सांगू शकतात. संतांच्या अंतःकरणांत मानवमात्राविषयीं जिव्हाळ्याची भावना असल्याने मानवाच्या हिताची साधनें ते आपलेपणाने सांगतात म्हणून त्या अनादि अनंत तत्त्वाविषयीं जें कांहीं जाणून घ्यावयाचे तें संतांनाच विचारून समजून घ्या.

तार्किक विद्वान् शब्दशानी, पोटार्थी, प्रचारक, लौकिकाला, प्रतिष्ठेला, लालचावलेले महंत, यांचे मार्गदर्शन कांहीं उपयोगाचें नाहीं. या लोकांच्या बोलण्यांत चांगलेपणाचा कांहीं अंश आहे असें मान्य केलें तरी त्यात पूर्णता नसते व त्यामुळें दुराग्रह, एकांगीपणा, भ्रम इत्यादि दोष निर्माण होऊ शकतात.

विद्वान् आहेत असे मान्य केले तरी या लोकांचे विचार कसे एकांगी असतात ते अनेकवेळां पाहावयास सापडते. एक प्रसिद्ध उदाहरण सांगतो- एका विद्वानानें "ज्ञानेश्वरी हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नसून काव्यग्रंथ आहे. उत्कृष्ट अशा रसाळ काव्याची निर्मिति हा ग्रंथरचनेचा हेतु श्रीज्ञानेश्वरांच्यापुढें होता” हा विषय आपल्या प्रबंधामध्ये ठासून मांडला आहे. दुसऱ्या एका विद्वानांनी श्रीशंकराचार्यांचें अद्वैत तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगणें हा ज्ञानेश्वरी लिहिण्याचा हेतू असल्याचें आपल्या प्रबंधांत मांडले आहे. तिसरे एक विद्वान् आहेत. आधुनिकतम इंग्रजी साहित्यशास्त्राच्या अनुरोधानें नाटकांची खूप पाल्हाळ असलेली परीक्षणे लिहिणें हीच त्यांची साहित्यसेवा आहे. त्यांनीं -ज्ञानेश्वरी ना काव्य ना तत्त्वज्ञानं' या नांवाचा लेख लिहिला. कोणतेंहि एक सुसंगत तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरींत नाही ज्ञानेश्वरीच्या निरनिराळ्या अध्यायांत तत्त्वज्ञानविषयक निरनिराळे आणि परस्परविरोधी असे विचार आले आहेत म्हणून ज्ञानेश्वरींत तत्त्वज्ञानहि नाहीं आणि काव्याची रसवत्ताहि तिच्यात नाहीं असें या विद्वानांचें म्हणणें.

ज्ञानेश्वरी हा अंत नसलेल्या अनंताची प्राप्ति घडवून देणारा ग्रंथ आहे. आईलाहि लाजवणाऱ्या, हृदयातील अपार वात्सल्यामुळें कोणी न पुसतांहि सांगितलेला तो हिताचा अमृतोपदेश आहे. अशा ग्रंथाचे मूल्यमापन लौकिकी विद्वान् कसें करूं शकणार ? ज्ञानेश्वरी ही काय आहे हे समजावून घ्यावयाचे असेल तर जोगमहाराज, केशवमहाराज देशमुख, गुरुदेव रानडे, सोनोपंत दांडेकर अशा ज्ञानेश्वरीचें अंतरंग अधिकारी असलेल्या व्यक्तींनाच विचारले पाहिजे. आमच्या ती. दादानी लिहिले आहे कीं ज्ञानेश्वरी ही कांहीं चित्तरंजनाची कादंबरी नव्हे, तिची गोडी कळण्यासाठीं अधिकार असावा लागतो. अनंताविषयीं संतांनाच कां विचारावें ? संत नसलेल्या विद्वानांचें सांगणें हिताचे कसें नसतें त्यासाठीं हें सांगितलें.

संत अनुभवाच्या पूर्णतेतून सांगतात. विद्वानाची बुद्धि ही पृथक्करणाचा अवलंब करीत असल्यामुळें एकांगी असते. एखादा विस्तृत, व्यापक विषय समजावून घेण्याच्या दृष्टीनें भागशः ज्ञान उपयोगी पडले तरी शेवटीं समजावून घ्यायची असते ती पूर्णता. शरीराचे ज्ञान - रुधिराभिसरण, पचनसंस्था, श्वसन, मज्जासंस्था अशा निरनिराळ्या विभागांनी शिकवले जातें. पण शरीर शेवटीं एक आहे आणि हे सर्व व्यापार परस्परोपकारक आणि परस्परावलंबी असल्यानें अंती एकरूप होतात, परस्पर भिन्न राहूं शकत नाहींत हें लक्षात घ्यावेच लागतें. ब्रह्मज्ञानाचेंहि तसेंच होतें.

आपला माल खपविण्याची इच्छा असलेला प्रचारक आणि मुलाच्या हिताची चिंता असलेली माता यांनी एखाद्या वस्तूची केलेली भलावण परिणामात सारखी नसते. तिच्यांत आकाशपाताळाचे अंतर असते. तीच स्थिति संतांचा उपदेश आणि लौकिकी विद्वानांचें साहित्य यांचीहि असते. ईश्वरविषयक ज्ञान घ्यावयाचे तें संतांकडून घ्यावें, मतवाद्यांकडून घेऊ नये, असें याच दृष्टीनें समर्थ सांगतात.

संतांना विचारले आणि त्यांनी सांगितले तर ते कळण्यासाठी आणि त्याहूनहि वळण्यासाठीं विचारणारा, ऐकणारा निरहंकारी असला पाहिजे तरच उपयोग, नाहीतर पालथ्या घड्यावर पडलेल्या पाण्याप्रमाणें तें सर्व व्यर्थ जावयाचे. तसे होऊं नये म्हणून समर्थांनी "अहंकार विस्तार हा नीरसावा” असें सागितले आहे.

सृष्टीच्या उत्पत्तीच्या मुळशी अहंकारच आहे. अहंकार हाच विश्वाचे बीज आहे. मुळाशी असलेला हा अहंकार नाहीसा करणें हीं गोष्ट आपल्या हातची नाहीं, साधनेला बाधकहि नाहीं आणि म्हणून, तो नाहीसा करण्याची तादृश आवश्यकताहि नाही. अहंकाराचा विस्तार, अहंकाराचा पसारा मात्र आपण वाढविलेला असतो. तो नाहींसा केला पाहिजे. मी कोण म्हणून सांगणें निराळें आणि मी विद्वान् मी शहाणा, मी नेता, मी कार्यकर्ता, मी परोपकारी, इत्यादि मीपणा मिरविणे निराळें. दुसरा भाग हा मीपणाचा म्हणजे अहंकाराचा विस्तार आहे. तो अनवश्यक आहे आणि अनिष्टहि आहे. तेराव्या अध्यायांतील श्रीज्ञानेश्वरांनी सांगितलेलीं अमानित्वाची लक्षणें प्राप्त करून घेणे हा अहंकाराच्या विस्ताराच्या निरसनाचा उत्तम उपाय.

अहंकाराचा विस्तार हा गुणांच्या माध्यमांतून होत असतो. रुचते, आवडते, चांगलें वाटतें, हवेसें वाटतें, यांतूनच मी आणि माझे यांचा विस्तार होतो. वैशिष्ट्य प्रस्थापित करावे असें मग वाटूं लागतें. गुण हेच तिथे कारण असतात. म्हणून सर्व गुणातीत असलेल्या निर्गुणाचा विचार असावा. असा मार्ग समर्थांनी दाखविला आहे. निस्त्रैगुण्य व्हावे असे गीतेनेंहि सांगितले आहे.

सर्व प्रकारची द्वंद्वे हा निर्गुणाच्या विचाराच्या मार्गातील अडथळा, द्वंद्वे बाधक होतात तीं देहबुद्धीमुळे. यासाठीं देहबुद्धीची आठवण होऊ नये हा उपाय चौथ्या ओळींत सांगितला गेला आहे.

देहबुद्धीच्या आठवणीमुळेंच मनुष्य सुखदुःखात गुंतून सहतो. त्यादृष्टीनेच तो शीतोष्णाचा, यशापयशाचा, मानापमानाचा, निंदास्तुतीचा विचार करतो. हिताची जाणीव उरत नाही आणि मग साधना ढिली पडते. कंटाळा येणे, आळस वाढणे, विषण्णता वाटणे हें वाढत जाते. यासाठीं शरीराचे लाड न करतां कोणत्याहि परिस्थितींत तें योग्य त्या प्रकारें राबविले जाईल यादृष्टीने दक्ष असले पाहिजे. पुन्हा पुन्हा येणाऱ्या कंटाळ्यावर मात करीत राहिले पाहिजे. हेंच देहबुद्धीचे आठवणे न आठवणे आहे.

देहेबुद्धि हें ज्ञानबोधें तजावी । विवेकें तये वस्तुची भेटि ध्यावी ॥
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे । म्हणोनि सदा तें चि शोधीत जावें ॥ १७० ॥

व्यवहारामध्ये जीवन जगत असतांना होणाऱ्या हालचाली, जाणवणाऱ्या संवेदना आणि उत्पन्न होणारे संकल्प-विकल्प प्रत्येक पातळीवर तटस्थपणें पारखीत राहिले तर शरीरेंद्रियमनबुद्धि यांच्याशी जडून राहिलेली मीपणाची भावना सुटत जाईल, मावळत जाईल, ‘मी’ चे सत्यस्वरूप उमगेल. तटस्थपणे पारखीत राहणे हाच ज्ञानबोध आहे. वेदान्तशास्त्रातील नानाप्रकारच्या प्रक्रिया यासाठीं कांहीं प्रमाणांत उपयोगी पडतात. कोणत्याहि परिस्थितींत उत्पन्न होणाऱ्या अनुकूल- प्रतिकूल संवेदनेमागे वाहत न जाता स्थिर राहण्याचा अभ्यास केला तर विवेकाची जागृति होते. ही विवेकाची जागृतीच सत्यवस्तूची भेट घडविते. स्वप्नांतील सुखदुःखे जशी जागृतींत उरत नाहींत, तशी विषयासक्तीमुळें व्यवहारात उत्पन्न होणारी सुखदुःखेही, विवेकापुढे टिकत नाहीत. सुखदुःखाचे शेवाळ दूर झाले, कीं निर्मळ जलाची प्राप्ति सहज होते. तसेंच विविधतेच्या मागे असलेल्या वस्तुस्थितीचे होते. यासाठीं बुद्धीची विचारधारा विषयासक्तीतून मागे घेतली पाहिजे.

शरीरधारणेसाठी आवश्यक म्हणून इंद्रियांना विषयसेवन करावें लागतें. आणि विषयसेवनाची ही प्रेरणा इंद्रियांना मनबुद्धीकडून लाभते. वृत्तीचा हा प्रवाह आतून बाहेर असा वाहत असतो. ही रचना नैसर्गिक आहे. “पराञ्छिखानि व्यतृणत् स्वयंभूः अतः परान् पश्यति नान्तरात्मन्” असे वर्णन उपनिषदांनी केलेलें आहे. इंद्रियांच्या या प्रवृत्तीमुळेच वस्तुतः सहज असलेले आत्मज्ञान हें कठिण आणि सातत्याच्या उत्कट प्रयत्नांनीच साध्य होणारे, असें झालेले आहे. स्वभावतः बहिर्मुख असल्यामुळें वृत्ती या सहजपणें तदाकार होत नाहींत. अंतरात्म्याच्या म्हणजेच ब्रह्माच्या स्वरूपाशी एकरूप होऊं शकत नाहींत. नाना प्रकारच्या साधना प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात त्या यासाठींच.

हे प्रयत्न धीराने, निरलसतेने, उत्कटतेने, जिव्हाळ्याने आणि सातत्याने करावे लागतात. थकवा, कंटाळा, आळस, उपेक्षा, अश्रद्धा हे भाव साधनेच्या संबंधांत कधीहि उत्पन्न होणार नाहींत याची काळ्यी घ्यावी लागतें. उतावीळपणा म्हणजे उत्कटता नाहीं हें लक्षांत ठेवावे लागतें. साधनेमध्यें शरीरासकट मनबुद्धि रमून जाईल हें घडावे लागतें. साधना क्रमाक्रमानें वरच्या वरच्या पायरीवर जाईल हें पहावे लागतें. साधनेच्या बाह्यांगाचा भार प्रगतीच्या, उन्नतीच्या मार्गातील अडथळा बनणार नाहीं अशी दक्षताहि घ्यावी लागते. “सदा शोधीत जावें” म्हणण्यांत इतकें सर्व अभिप्रेत आहे. शोध घेण्याला अनेक परी, अनेक पातळ्या, अनेक दिशा असतात हें ध्यानांत घेतलें कीं हें समजेल.

असे सार साचार तें चोरलेंसे । इही लोचनी पाहतां दृश्य मासे ॥
निराभास निर्गूण ते आकळेना । अहंतागुणें कल्पितां ही कळेना ॥ १७१ ॥

जे खरोखरीच सार आहे, सत्य आहे ते चोरलेले राहतें, अप्रगट राहते. दृश्य होत नाहीं, प्रत्ययास येत नाहीं; आणि हा त्या सत्यवस्तूचा स्वभावच आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात- “परी नवल लाघव तुझें । जे आपणपें चोरें” (ज्ञाने. १४|५ ). जें मूलतत्त्व आहे, तें प्रगट होण्याची इच्छा करीत नाही.

स्वतःच्या प्रगटीकरणाची त्याला आवश्यकताहि नाहीं, कारण तें परिपूर्ण आहे. प्रगट होणें, प्रसिद्धीला येणे, असें वाटण्यामागे जी लोकेषणा असते ती त्या मूलतत्त्वाच्या ठिकाणीं संभवतच नाहीं. म्हणून विनोदाने, गंमतीने ते मूलतत्त्व चोरून राहते, चोरलेले राहते, असें वर्णन केलें जातें.

तत्त्वाच्या दर्शनाची आकांक्षा अज्ञानाने त्याच्यापासून दुसवलेल्या आपल्या ठिकाणीं असते. इंद्रियें, मन, बुद्धि ही आपल्या ज्ञानाची साधनें. तीं स्वभावतः बहिर्मुख. त्यांना होणारे ज्ञान हें नेहमींच बहिरंगाचें, बाह्य विषयाचें, कवचाचे असतें. अंतरंगाचा वेध तीं घेऊं शकत नाहींत. या साधनांचे स्वरूपहि गुणमय आहे. तत्त्व आहे निर्गुण आणि निराभास. त्यामुळें आहे त्या स्वरूपांत इंद्रियांना, मनाला वा बुद्धीला त्या तत्त्वाचे आकलन होऊं शकत नाहीं.

सातत्याच्या दीर्घकालीन प्रयत्नाने इंद्रियांची विषयासक्ति सुटली. मन अंतर्मुख झालें, बुद्धि एकाग्र झाली, तर त्याचे आकलन होऊं शकेल पण अहंकार तेंहि घडूं देत नाहीं. या अहंतेमुळेंच बुद्धीला नको त्या विचारांचे फाटे फुटतात. नाना प्रकारच्या संकल्पविकल्पांनीं मनाला चंचलता येते आणि इंद्रियें विषयासक्त होतात. अहंकाराचा केवढा मोठा अडथळा साक्षात्काराच्या मार्गात आहे तें यावरून लक्षांत यावें.

स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या । स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥
मुळीं कल्पना दों रूपें ते चि जाली । विवेकें तरी सस्वरूपीं मिळाली ॥ १७२ ॥

मूलतत्त्व जें ब्रह्म तें वस्तुतः सर्वव्यापक पूर्ण, अखंड, निष्कल, केवल अद्वैत, असें असताना नाना प्रकारच्या विविधतेने भरलेली ही सृष्टि व त्या सृष्टींत वावरणारे नाना प्रकारचे जीव हें प्रकरण निर्माण होतें वा भासते ते तरी कां व कसें ? याचें उत्तर देण्याच्या प्रयत्नांत मायेची कल्पना साकारलेली आहे.

गणितामध्ये कोणतेहि मूल्य नसलेला वा कोणतेंहि मूल्य असलेला ‘क्ष’ गृहीत धरून उदाहरणे सोडवितात. तसेंच कांहींसे मायेचें स्वरूप आहे. उत्तरांत ‘क्ष’ कोठे नसतो. तो गळून जातो. मायेचें तसेंच होते. एकवेळ ब्रह्म समजेल पण माया समजणार नाहीं असें कांहींसे विनोदाने म्हटलें जातें पण तें लक्षांत ठेवण्याइतकें महत्त्वाचें निश्चित आहे. माया आणि अविद्या असा भेद कांहीं वेळां सोयीसाठी कल्पिला जातो. समजूत पटण्याच्या दृष्टीनें तें उपयुक्त ठरतें. समर्थांनीं येथें तो भेद गृहीत धरूनच वर्णन केले आहे. जीवाशीं जडून राहते ती अविद्या. ही अज्ञान, मोह, विषयासक्ति, हवें-नको, राग-द्वेष, कामक्रोधादि विकार यांना उत्पन्न करते. सृष्टीच्या उत्पत्तीच्या मागें जी ब्रह्माची शक्ति गृहीत धरली जाते ती म्हणजे माया. ही शुद्ध सत्त्वात्मक आहे. साधनेला हिचे साह्य होतें. हिच्यामुळे ब्रह्माचे सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापक, सर्वाधार, सर्वकारण इत्यादि स्वरूपांत वर्णन केलें जातें. मायारूप अशी ही चिच्छक्ति ब्रह्मापेक्षां वेगळी आहे असेंहि म्हणतां येत नाहीं. आणि नाहीं असेंहि म्हणतां येत नाहीं. हिच्यामुळेच जवळजवळ शेवटच्या क्षणापर्यंत ब्रह्मसाक्षात्कारामध्ये सहाय्य लाभते. यामुळेंच कांहीं वेदान्त्यांना माया हा शब्द वापरणे तितकेसे योग्य वाटत नाहीं. मग ते चिच्छक्ति, चिद्विलास, लीला, स्मृति, प्रभा, दीप्ति असे शब्द वापरतात. यामुळे कांहीं सोय होते तशी गैरसोयहि होते.

समर्थांनी माया हा शब्दच ब्रह्माची चिच्छक्ति अशा अर्थाने वापरला आहे. आत्माराम या ग्रंथांत मायेचें वर्णन विशेष प्रेमादराने केलेलें आहे. या मायेमुळेंच जीव-जगत्-जगदीश्वर असें त्रैत व्यवहारतः सत्य भासूनही ब्रह्माच्या अद्वैततेला बाध येत नाहीं. हेच ब्रह्माचें स्फुरण व माया तेथें कारण आहे.

वेदान्तांत, मायेच्या, ब्रह्माच्या आणि जगत्कारणतेच्या स्वरूपांत नाना प्रकारची मतें रूढ आहेत. त्या मतामतांत नुसतीच विविधता नाही तर विरोधहि आहेत. आणि त्या मतांनी निर्माण झालेले वाद कधीं संपणारेहि नाहीत आणि सुटणारेहि नाहीत. एक घास “विसा ठायीं” करून बालकाला भरवावें लागते. एकाच अन्नाच्या निरनिराळ्या घासांना कधीं काऊचा, कधीं चिऊचा, कधीं बाबाचा, कधीं माऊचा, कधीं आजीचा म्हणून नावें द्यावी लागतात. तसेंच अज्ञानी जीवाला मूलतत्त्व आणि तदधिष्ठित जीव-जगत्-जगदीश्वर यांचें स्वरूप समजावून सांगतांना वेदान्तशास्त्राचेहि होते. मूलतत्त्वाच्या, शास्त्रीय भाषेत प्रत्यगात्म्याच्या समजुतीसाठी, समजून घेणाराच्या प्रकृतिभेदानें, वा देणाराच्या प्रकृतिभेदानें, प्रक्रिया उत्पन्न होतात. त्या त्या मर्यादेत त्या सोयीच्या म्हणून चांगल्याहि असतात. पण इतकेंच. त्यापेक्षां प्रक्रियांना अधिक महत्त्व देणें हें दुराग्रहाचे ठरतें. यासाठीं शास्त्रकारांनी प्रक्रियांना “अनवस्थिता” असें विशेषण दिलें आहे तें फार महत्त्वाचें आहे. साधकाच्या दृष्टीनें या वादांत फार खोल जाण्याचें आपणास कारण नाही. माझा तो अधिकासह नाहीं.

सृष्टीच्या निर्मितीची मीमांसा करणारी एकच कल्पना माया आणि अविद्या या स्वरूपांत विभक्त होते, हें लक्षांत घेऊन जगदीश्वराच्या आणि जीवाच्या संदर्भात त्यांचें स्वरूप नीट जाणून घेणे हा विवेक करावा लागतो. या विवेकामुळे व्यवहार सुधारतो, उपासना शुद्ध होते आणि त्या बळावर स्वस्वरूप असें जें मूलतत्त्व, ब्रह्म, त्याच्याशी एकरूप होतां येतें.

स्वरूपीं उदेला अहंकारराहो । तेणें सर्व आछ्यादिलें व्योम पाहो ॥
दिशा पाहतां ते निशा वाढताहे । विवेकें विचारें विवंचूनि पाहें ॥ १७३ ॥

जेव्हां हें विविधतेने भरलेलें विश्व व्यक्त झालेलें नव्हतें तेव्हां सर्वत्र एकच एक तत्त्व भरून राहिले होतें. आहे आणि नाहीं, अमृतत्व आणि मृत्यू, प्रकाश आणि अंधार या द्वंद्वाच्या तें पलीकडे होतें. केवल सत् (अस्तित्व) हा एकच शब्द त्यांतल्या त्यांत त्या वस्तूचें वर्णन करताना अधिक प्रामाणिक आहे. इतर सर्व शब्द त्यामानानें कोणत्या तरी गृहीत कृत्यावर आधारलेले म्हणून अधिक मायिक आहेत.

उपमेने समजून घ्यावयाचे तर व्योम, आकाश या पदार्थाने जें समजतें, तसें त्या मूलतत्त्वाचे ब्रह्माचें स्वरूप आहे असें म्हणतां येतें. आकाश जसें सर्वाधार आणि सर्वव्यापक असून अलिप्त आहे. अनुभवास येतें तें अप्रतिघाताच्या रूपानें, कोणताहि अडथळा आणीत नाहीं, विरोध करीत नाहीं, या रूपाने. ब्रह्म असेंच निर्गुण, निराकार, असंग आहे.

मूलतत्त्व जें ब्रह्म त्याचें स्वरूप हें असें; आणि असंख्य प्रकारच्या विविधतेने भरलेलें विश्व प्रत्यक्ष रूपात समोर पसरले आहे, त्याची जाणीव असलेला आणि तदनुषंगाने विचार करणारा असा मी म्हणूनहि कोणी एक आहे.

हा मीच विचार करतो, प्रामाणिक राहतो, प्रयत्नाचें सातत्य ठेवतो, विकारांच्या पाशांतून सुटका करून घेतो, उपासनेच्या बळावर क्रमानें प्रगत होतो, उन्नत होतो, साक्षात्कारी संताच्या पातळीवर पोंचतो. त्याच्या भोंवतालची स्थलकालाची बंधने गळून पडतात आणि मग त्याला मूलतत्त्वाचे यथार्थ ज्ञान होतें. “अहं ब्रह्मास्मि” मीच ब्रह्म आहे हें त्याच्या अनुभवास येते आणि “सर्वं खल्विदं ब्रह्म” दिसणारें, भासणारें, हें सर्व ब्रह्मच आहे हें त्याच्या प्रत्ययास येते.

ज्ञानाच्या या प्रक्रियेतील वा अवस्थातसंतील ‘हें सर्व’ हें मायेचें रूप आणि 'मी आहे’ हा अहंकार सृष्टिक्रमाच्या मुळाशी हा 'अहं’ आहे असेंच शास्त्रकारांनीं संगति लावतांना म्हटलें आहे.

आरंभी केवळ एकाकी असलेल्या त्या मूलतत्त्वाचे ठिकाणीं, ब्रह्माचें ठिकाणीं मी एकटा आहे (एकोऽहं) ही जाणीव स्फुरली. एकट्याला करमत नाहीं. (एकाकी न रमते) म्हणून त्याला पुष्कळ व्हावेसे वाटलें (बहु स्याम्) आणि मग सृष्टिक्रमाला आरंभ झाला. असें काहीसे वर्णन शास्त्रकारांना करावें लागतें. “एकोऽहं” जाणवले नसतें तर पुढची भानगड झालीच नसती. पण 'अहं’ जाणवला आणि तोच पुढच्या सर्व विश्वोत्पत्तीचें कारण झाला. आकाशाप्रमाणें शुद्ध निर्मल असलेल्या स्वरूपांतच अहंरूपी राहू भासला आणि त्यानें मग स्वरूपाचें सर्व रूपच झाकून टाकले. हें आच्छादन अंधारासारखे झालें, त्यामुळें दिशा पाहूं जावें तर कांहीं दिसेना असें होतें. मेघाने आकाश भरलेल्या अवसेच्या रात्रीं, घनदाट अशा अज्ञात अरण्यांत, नसलेल्या पाऊलवाटा शोधण्याचा प्रसंग यावा तसें होतें. इंद्रियें थकून जातात, मनाला विषण्णता येते, बुद्धि कुंठित होते.

हें सगळे आणि इतर अनेकहि ज्याला नानाप्रकारें वेळोवेळीं जाणवते त्या 'मी’ची ही जाणीवशक्तीच, निसण्यावर घासलेल्या शस्त्राप्रमाणे, प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घेतलेल्या विवेकाची तीक्ष्णता धारण करील, तर तिचें तिलाच यथार्थज्ञान होऊं लागेल. म्हणून समर्थांनी शेवटच्या चरणामध्ये विवेकाने पहा, विचाराने पहा आणि विवंचून पहा असें आग्रहाने सांगितलें आहे.

अविद्याजन्य असो कीं मायाजन्य असो, मुळांत अस्तित्वांत असो कीं काल्पनिक असो, पण जीवाच्या ठिकाणीं असणारें वा भासणारे अज्ञान व तज्जन्य दुःखमोहादि विकार नाहींसे करण्याचा, विवेक करणें एवढाच एक मार्ग आहे.

अहंकाराला राहूची दिलेली उपमा मोठी मार्मिक आहे. कारण राहू हा कुणी शनि-मंगळाप्रमाणें अस्तित्वांत असलेला ग्रह नाही. तो कल्पनामात्र आहे, पण ग्रहणाच्या रूपाने त्याचा परिणाम दिसतो आणि फल-ज्योतिषाप्रमाणे कुंडलीत त्याचा प्रभाव आढळतो. अविद्येचे व अहंकाराचे तसेंच आहे. सत्याच्या, साक्षात्काराच्या, कसोटीवर टिकत नाहीं, तर्काने पटवून देता येत नाहीं आणि गृहीत धरल्यावांचून दिसणाऱ्या परिणामाची संगति लावता येत नाहीं. जसें आहे तसें यथार्थतेनें न कळल्यामुळेंच जसें जेवढें कळतें तेंच सत्य असें गृहीत धरून तत्त्वज्ञानाच्या निरनिराळ्या शाखा जन्मास येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- “म्हणोनि जैसा असे तैसिया । मातें नेणोनि धनंजया । वेदु जाणों गेला तव तया । जालिया शाखा ॥ तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी ॥ (ज्ञाने. १५|४३२-३३) विचारपूर्वक विवंचून पहावे लागते तें या मतभेदाच्या पसाऱ्यांतून सत्य शोधून काढण्यासाठी.

प्रकृतिभेदानें, अवस्थाभेदाने निर्माण झालेले मतभेद उपयुक्त असल्यामुळें टाळतां येत नाहींत आणि त्यांतच नित्याचे गुंतून चालत नाहीं. समर्थांनी विवेकाचें महत्त्व सांगितलें आहे तें यासाठींच.

जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना । भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना ॥
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो । दयादक्ष तों साक्षिनें पक्ष घेतो ॥ १७४ ॥

परब्रह्माचे ज्ञान इंद्रियांनी होणारे नाहीं. डोळे त्याला पाहूं शकत नाहींत. “जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षें' असें मागे १४९व्या श्लोकांत सांगितलें गेलें आहेच. ज्ञानचक्षूनें त्याला पाहूं म्हटलें तर तेंहि शक्य नाहीं. ज्ञान हें वस्तुतः भवाला म्हणजे संसाराला खाऊन टाकणारे आहे. ब्रह्मावर भासणारा संसाराचा भ्रम नाहींसें करणारे आहे. ज्याच्यामुळे संसार भासतो तें अज्ञान ज्ञानामुळे नष्ट झाल्यानें संसार उरतच नाहीं. अशारीतीने संसाराला खाणारे हें ज्ञान राखून ठेवलें तर तें तरी ब्रह्माचा साक्षात्कार घडवील असें म्हटलें तर तें ज्ञानहि, संसार भासविणारें अज्ञान संपतांच, लाकूड जळल्यावर ते जाळणारा अग्नीहि शांत व्हावा तसें नाहिसे होतें. "तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया । जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां । स्वयें जळें ॥ (ज्ञाने. १५ । ५२६) तेवीं समूळ अविद्या खाये । ते ज्ञानहि बुडोनि जाये । (ज्ञाने. १५|४४०) असें वर्णन श्रीज्ञानेश्वर महाराजांनी केलें आहे. विश्व घेऊन गेला कीं ते घेऊन जाणाऱ्या चोराचा मागहि लागत नाहीं असे श्रीज्ञानेश्वर विनोदानें म्हणतात.

अशा स्थितींत स्वतःच्या बुद्धीच्या बळावर ब्रह्माचा शोध घेऊ म्हटलें तर तें साधणारे नाहीं. भगवत्कृपा लाभली, तरच ब्रह्मस्वरूप असा आत्मसाक्षात्कार होऊं शकतो. "यमैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम्” हेंच शेवटीं खरे आहे. अक्षय, अखंड, अच्युत उत्पत्तिविनाशाच्या अतीत असलेला असा हा परमात्मा कृपावंत होऊन साधकाला, आपल्या भक्ताला, अक्षय स्वरूपाचा मोक्ष देतो.

समर्थांचे हे वचन साधनेचा अहंकार घालावणारे आणि श्रद्धावंत भाविकाला आश्वासन देणारे आहे.

भगवत्कृपेनें साधकाला मोक्षप्राप्ति होते याचें कारण भगवान् सर्वसाक्षी आहे. त्याला सर्व दिसते, सर्व कळतें. तो दक्ष आहे, तत्पर आहे. त्याच्याठिकाणीं दयाहि आहे. भगवान् परमदयाघन आहे. तो भक्तांचा पक्ष घेतो, भक्तांच्या पाठीशी वात्सल्यानें उभा राहतो. या दयाळूपणामुळेंच तो निर्गुणांतून सगुणांत येतो. भक्ताचे रक्षण करतो.

भगवान् दयाळू आहे, भक्तकैवारी आहे पण दक्ष आणि साक्षीहि आहे, या दोन्ही गोष्टी नीट समजून घेतल्या नाहींत तर संदेह निर्माण होण्याची शक्यता असते. रक्षण करण्याची, पक्ष घेण्याची, पाठीशी उभे राहण्याची भगवंताची एक पद्धति आहे. देव परोक्षप्रिय असतात असें शास्त्र सांगते. देवाचे सहाय्य बहुधा अप्रत्यक्षपणे लाभत असते. गुराखी गाई राखतो तसा देव रक्षणासाठी येत नाहीं. ज्याचें रक्षण कसवेसे वाटेल त्याला तो सद्बुद्धि देतो. “न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् । यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति तम् ॥ " असें एक संस्कृत सुभाषित आहे तें लक्षांत घेण्यासारखे आहे.

देवाने मला अन्न, वस्त्र, निवारा दिला आहे. लौकिकांत संभावितपणें जगतां येईल अशी सर्व सोय केली आहे. ही सर्व त्याची कृपा आहे. थोडा अहंकार सोडून पाहिले तर जीवनावश्यक गोष्टी त्यानें पुरेशा दिलेल्या आहेत. आपल्या योग्यतेपेक्षा थोडे अधिक दिलें आहे हें लक्षांत यावयास अडचण पडूं नये. दयाळू होऊन दिलेली ही देणगी तो दक्षतेने पाहणारच. देणगीचा व्यवस्थित उपयोग होत नाहीं असें दिसल्यास पुन्हा सहाय्यासाठीं ईश्वर कसा येईल ? समर्थांनी साक्षीने पक्ष घेतो असें म्हटलें आहे. साधकाने तें लक्षांत ठेवले पाहिजे.

या श्लोकातील दुसऱ्या ओळीच्या अर्थाविषयीं फार मतभेद आहेत. कोणी त्याचा अर्थ करतांना, काळ संसाराला खाऊन टाकणारा आहे, काळापासून संसाराचे रक्षण करूं म्हटले तरी करतां येत नाही असा अर्थ करतात. कोणी संसार-नाशानंतर देवत्वाचीहि कोटी नष्ट होते, असा या ओळीचा अर्थ करतात. हे दोन्हीं अर्थ स्पष्ट असलेल्या तिसऱ्या ओळीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीनें दूरान्वित होतात.

विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं । परी लीहिता कोण त्याचे कपोळीं ॥
हरू जाळितो लोक संव्हारकाळीं । परी सेवटीं संकरा कोण जाळी ॥ १७५ ॥

परमेश्वर भक्ताच्या कैवारासाठी निर्गुणांतून सगुणांत येतो हें खरेंच आहे. उपासनेसाठी ईश्वराचें हें सगुण स्वरूपच स्वीकारावें लागतें हेंहि खरेंच आहे. पण उपासनेसाठी स्वीकारलेल्या देवतेचे स्वरूप परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाशी मिळते- जुळते असलें पाहिजे हें लक्षांत आणून देण्यासाठीं समर्थ या श्लोकापासून पांच श्लोकांत देवाच्या श्रेष्ठ स्वरूपाची जाणीव करून देत आहेत.

आपल्या परंपरेमध्ये स्पष्टपणें प्रत्ययास येणारे आधिभौतिक आणि तत्त्वतः सत्य म्हणून मान्य करावें लागणारे अध्यात्म यांच्यामध्यें आधिदैवाचा एक स्तर आहे. हा आधिदैवाचा स्तरच निरनिराळ्या शक्तीच्या निरनिराळे कार्य करणाऱ्या, भिन्न भिन्न अधिकाराच्या अनेक प्रकारच्या देवतांच्या कल्पनेचे अधिष्ठान आहे. इंग्रजी संस्कारांत वाढलेल्या बुद्धिवादाला हा आधिदैवत वाद उपहासास्पद वाटला तरी मंत्राच्या मागें जें सामर्थ्य उभें असतें तें या आधिदैवाचेंच असते. नास्तिकांची श्रद्धा नसली तरी मंत्रशक्ति ही अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळें आपल्या मर्यादेत आधिदैवताला मान्यता देणे भाग आहे. पण तें अंतिम सत्य नाहीं. आधिदैवाच्या मागचे खरें सामर्थ्य अध्यात्माचें आहे हें लक्षांत घेऊन खऱ्या साधकाने आपल्या हितासाठी, उपासनेकरितां, आधिदैवतापेक्षां वरच्या, पातळीवर गेले पाहिजे, अशी अपेक्षा संतांना असते. त्याच उद्देशाने आधिदैवताचा मर्यादितपणा आणि उपास्य देवतेचे श्रेष्ठ स्वरूप साधकाच्या लक्षांत आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ति करतो, जीवांना जन्माला घालतो, त्यांचें भवितव्य त्यांच्या कपाळीं लिहून ठेवतो. ब्रह्मदेवाचें हें कर्तृत्व मोठे खरें. पण या ब्रह्मदेवाचें भवितव्य कुणीतरी ठरविले आहेच कीं नाहीं. तो कोण ? सृष्टीची निर्मिति करतांना आरंभी ब्रह्मा घोटाळला होता, त्याचा गोंधळ उडालेला होता, तो ज्याच्या कृपेने दूर झाला तो कोण ? श्रीज्ञानेश्वर म्हणतात- "पैं सृष्टीचिया उपक्रमा । पूर्वी गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥ मज ईश्वराते नोळखे । ना सृष्टीहि करूं शके । तो थोरू केला एकें । नामें जेणें ॥ जयाचा अर्थु जीवीं ध्याता । जें वर्णत्रयचि जपतां । विश्वसृजनयोग्यता । आली तया । " (ज्ञाने. १७ । ३३६- ३८)

रुद्र, महादेव ही संहारदेवता आहे. सृष्टीच्या प्रलयाचे काम त्याचेकडे सोपविलेलें आहे. महादेवाला हर म्हणतात तें यासाठींच. निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे हा महादेवहि महाप्रलयाच्या शेवटीं नाहींसा होतो. संहार करणाऱ्या रुद्राला नाहींसा करणारा हा कोण? अनादि, अनंत, ब्रह्माचें स्वरूप महादेवालाहि आकलन होत नाहीं. “जें शंभूचिये मती नागवे-” (ज्ञाने. ११ । २७) असें श्रीज्ञानेश्वरांनी म्हटलें आहे.

श्री. विनोबा भावे यांनी या श्लोकांत पालन करणाऱ्या विष्णूचा पालनकर्ता कोण असा उल्लेख नसल्यानं विष्णूची मुर्वत राहून गेलेली दिसते अशी खोंचक टीप दिलेली आहे. तत्त्वज्ञ संत अशी कोणाची भीडमुर्वत बाळगीत नाहीत. समर्थांनी दासबोधांत ब्रह्मदेव आणि शंकर यांचेबरोबर विष्णूचाहि उल्लेख केला आहे. तेथें ते म्हणतात- “ब्रह्माने सकल निर्मिले । ब्रह्मास कोणें निर्माण केलें । विष्णूनें विश्व पाळिलें । विष्णूस पाळितां कवणु ॥ रुद्र विश्वसंहारकर्ता । परी कोण रुद्रास संहारिता । कोण काळाचा नियंता । कळला पाहिजे ॥" या श्लोकात श्लोकाच्या सोयीसाठीं निर्माता ? ब्रह्मदेव आणि संहारकर्ता रुद्र या आद्यन्तांच्या उल्लेखाने, मधला विष्णु गृहीत धरावा असें अपेक्षिलें आहे. परमेश्वराची ओळख पटवून देतांना समर्थांनी दुसऱ्या एका ठिकाणीं स्पष्टच म्हटलें आहे कीं, “ब्रह्मा, विष्णू आणि हर । यांसी निर्मिता तोचि थोर । तो ओळखावा परमेश्वर । नाना यत्नें ॥ "

जगीं द्वादशादीत्य हे रुद्र आक्रा । असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥
जगीं देव धुंडाळितां आडळेना । जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना ॥ १७६ ॥

आधिदैवत हा ईश्वरी राज्यांतील अधिकारी वर्ग आहे. त्यांत बारा आदित्य, अकरा रुद्र, एकोणपन्नास मरुद्‌गण, आठ वसू इत्यादि देवतांचे गट आहेत. ही संख्या एकूण तेहतीस कोटी आहे असें वर्णन पुराणांनी केलें आहे. आधिदैवत हा अधिकारी वर्ग आहे असें एकदां मान्य केलें म्हणजे मग आपली ही प्रचंड पृथ्वी ही मोहरीएवढीही नाहीं त्या विश्वाचे राज्य चालविण्यासाठी तेहतीस कोटी ही संख्या फार मोठी आहे असें म्हणतां येणार नाही. हा देवतांचा गण अधिकारी वर्ग असला तरी शेवटीं त्या सर्वसमर्थ ईश्वराचा सेवकवर्गच आहे. खऱ्या भक्ताने जाणलें पाहिजे, ओळखलें पाहिजे तें त्या सर्वसमर्थ ईश्वराला. तेवढेंच आपण करीत नाहीं.

स्वार्थी माणसाने आपले लबाडीचे व्यवहार साधण्यासाठी शासनातील खालच्या लोकांना लाच देऊन स्वतःची कामें करून घ्यावींत त्याच वृत्तीनें माणसे पूजाअर्चादि करतात. नवसाला पावणारा कोण आहे तेवढेंच पाहतात. आणि आपल्या बऱ्या- वाईट मनोरथाच्या पूर्तीसाठीं त्या देवतांची पूजापाठादि आराधना करतात. माणसाच्या वृत्तींत राजस, तामस गुणांचे प्राबल्य असते. आणि मग गीतेने म्हटल्याप्रमाणें त्या त्या वृत्तीनें पूजाअर्चा केली जाते. या नाना देवतांच्या ठिकाणी असलेली प्रभावी शक्तीहि शेवटीं त्या सर्वसमर्थ ईश्वराची आहे हें सहसा लक्षांत घेतलें जात नाहीं. अशी समर्थ सत्ता या सर्वांच्या मागें आहे हें माहितही नसतें. कोणी सांगितलें तर, मनाच्या कोतेपणामुळें, विषयासक्तीमुळे ते पटतही नाही.

ईश्वराचे शुद्ध स्वरूप न कळल्यामुळें केली जाणारी ही आराधनाही हिताला कारणीभूत होत नाहीं. ईश्वराचें शासन हें भ्रष्ट शासन नाहीं. तेथें आपण कल्पितो, अपेक्षितो तसा भ्रष्टाचारहि नाहीं. विविध देवतांचे अस्तित्व मान्य केले तरी त्यांना कार्ये नेमून दिली आहेत. त्यांचें क्षेत्र मर्यादित आहे हे लक्षांत ठेवलेच पाहिजे. आपण तेवढेंच करीत नाहीं आणि म्हणून आमच्या कामनिक पूजाअर्चाहि करून न केल्यासारख्या ठरतात. "यस्तं न वेद किं ऋचा करिष्यति” जो त्याला, परमेश्वराला ओळखीत नाहीं, त्याला ऋचांचा, वेदमंत्रांचा, म्हणजेच पूजाअर्चादि कर्मकांडाचा कांहीं उपयोग होत नाहीं असें वेदानेच म्हटले आहे. यास्तव पूजाअर्चा करण्याची इच्छा असणारांनी परमेश्वराचें श्रेष्ठ स्वरूप जाणून घेतलेंच पाहिजे. गतानुगतिकतेनें कांहींतरी करीत राहिले तर परिणामी अश्रद्धाच बळावते आणि आपलेंच अहित होते. परमार्थ करतो म्हणणारांनी फार सावध राहिलें पाहिजे. समर्थांसारखे थोर संत समाजाला यादृष्टीनें सतत जागृत करीत असतात.

तुटेना फुटेना कदा देवराणा । चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥
कळेना कळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जगीं मीपणासी ॥ १७७ ॥

भारतीय संस्कृतीनें उपासनेसाठी मूर्तिपूजा स्वीकारलेली आहे. ध्यान-पारणा, प्रार्थना, भजन-पूजन या सर्व पातळीवर आराधनेसाठी इतर कोणत्याहि माध्यमापेक्षा मूर्तिपूजा ही अधिक सोयीची आणि अधिक उपयुक्त ठरणारी आहे यांत शंका नाहीं. ज्या समाजाने मूर्तिपूजा स्वीकारली नाहीं, ते समाज बुद्धिमत्ता आणि वैभव असूनहि दुःखी आणि अस्वस्थच राहतात असें आढळतें. आपण भारतीय मूर्तिपूजक आहोत ही अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट आहे.

जेत्या इंग्रजांच्या प्रभावाने आरंभी आरंभी इंग्रजी शिक्षण घेतलेला आपणांतील बुद्धिमंतांचा वर्ग मूर्तिपूजेविषयी विकल्प बाळगणारा झाला होता. प्रार्थनासमाज, ब्राह्मोसमाज, यासारखे संप्रदाय त्यावेळीं निर्माण झाले होते. शेंकडों वर्षांच्या पारतंत्र्यामुळें आपणहि अगतिक आणि प्रज्ञाहत झालों होतो. बाह्यांगाला चिकटून राहून कसेबसे आपलेपण राखीत होतों. मूर्तिपूजेमागील खरें तत्त्व कोणी फारसे लक्षांत घेत नव्हते. मूतींचे महत्त्व कां आणि कशात हे विशेषसें कोणाला कळत नव्हतें. श्रद्धा गबाळी झाली होती. मंदिरांना अवकळा आली होती, धार्मिक कर्मकांडाचे स्वरूप मागील अंकावरून पुढें चालू असें गतानुगतिक बनलें होतें, सांप्रदायांत दांभिकता वाढली होती. विद्वत्ता लाचार झाली होती. इंग्रजी राजवटींत झाला आहे तसा, तितका बुद्धिभेद जरी झालेला नव्हता, तरी समर्थांच्या काळी मुसलमानी पारतंत्र्यामुळे देशाची परिस्थिती चिंताजनकच होती. धर्माचे, भक्तीचे, उपासनेचे खरें स्वरूप लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संतमहात्मे तळमळत होते. मूर्तिपूजेचें खरें उदात्त स्वरूप लोकांच्या लक्षांत आणून देण्यासाठी निकडीचे प्रयत्न करीत होते. मनोबोधांतील हें प्रकरण त्यादृष्टीनें लक्षांत घेण्यासारखे आहे.

मूर्तिपूजा करणाराने मूर्ति म्हणजेच देव असें न समजता मूतींत देव पहावयाचा असतो. विशिष्ट आकारच्या मूर्तीला देव समजणें हा खरें म्हणजे देवाचा अपमान आहे. “अवजानन्ति मां मूढां मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ (गीता ९ । ११) हें गीतेचें वचन आणि त्यावरील ज्ञानोबारायांचे भाष्य मूर्तिपूजेच्या दृष्टीनें फार महत्त्वाचें आहे. शेवटीं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- “जंव आकारू एका पुढां देखिती । तंव हा देव येणें भावें भजती । मग तोंच बिघडलिया टाकिती । नाहीं म्हणोनी ॥ मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें । म्हणोनि ज्ञानचि ते आंधारें । ज्ञानासि करी ॥ " (ज्ञाने. ९ । १७०, १७१)

मूर्तिपूजा उपासनेचा चांगला प्रकार खरा. साधकाची प्रगति या मार्गानें लौकर होऊं शकते, पण तिचें शुद्ध स्वरूप जर लक्षांत घेतले नाहीं तर पाऊस न पाडणाऱ्या मेघाप्रमाणे या कृती व्यर्थ ठरतात.

देवाचे श्रेष्ठ स्वरूप जाणून मग तो उपासनेसाठीं मूर्तीत पहावयाचा असतो. मूर्ति म्हणजेच देव नव्हे हें लक्षांत आणून देण्यासाठी समर्थ म्हणतात, मूर्ति फुटते-तुटते, देव कधीं फुटत-तुटत नाहीं. ती मूर्ति उचलून कुठेतरी टाकतां येते. म्हणजे तरी चळते, ढळते. मूर्तींचें अवयव झिजून ती विद्रूप होते. पण हे असें दीनवाणेपण देवाला कधीं येत नाहीं. तो सर्वदाच अखंड, अभंग, अक्षय, रमणीय, प्रसन्न, असाच असतो. तो व्यापक आणि स्थिर राहतो. आवाहन वा विसर्जन मूर्तीपुरते असते. ईश्वर कधीं येत-जात नाहीं. श्रीमत् शंकराचार्यांनी आपल्या "परापूजा' या प्रकरणांत हा विषय स्पष्टपणें मांडला आहे. मूर्ति डोळ्याला दिसते. तिचें सौदर्य, तिचा रेखीवपणा, तिची भव्यता, दृष्टीच्या द्वारां सामान्य मनुष्यालाहि प्रभावित करते. पण खरा जो देव आहे तो डोळ्यांना न कळणारा, सामान्यदृष्टीला न दिसणारा, असा आहे.

समर्थ शेवटच्या ओळींत म्हणतात-माणूस आपला अहंकार, स्वतःचा मीपणा तसाच ठेवून मूर्तीची पूजा करतो, त्याला देवाचे स्वरूप कसें दिसणार? जेथें अहंकार राहतो, मीपणा राहतो तेथें देव राहत नाहीं. अहंकाराने शोधणाराला देवाचे घर सांपडत नाहीं. “फिरते है दरदर कि तेरा घर मिले । हम हैं जबतक वह हमें क्यों कर मिले ॥"

अहंकाराचे समर्पण झालें तरच पूजा ही पूजा ठरते, अन्यथा ती एक कवाईत होते. पूजेकरितां वापरली जाणारी सर्व द्रव्यें, खरी तर ईश्वरनिर्मितच आहेत. त्याचेंच त्याला द्यायचे आणि दिल्याचा अहंकार बाळगावयाचा. पैशाच्या बळावर आम्ही तीं विकत घेतो असें म्हणणेंहि योग्य नाहीं. कारण पैसा, संपत्ति म्हणजे लक्ष्मी तीहि त्याचीच आहे. अहंकार तेवढाच आपला आहे. तो ईश्वरार्पण झाला पाहिजे, करतां आला पाहिजे. सर्वसमर्थ ईश्वराच्या व्यापकतेची जाणीव ठेवून अहंकार सोडून त्याला शरण जाणें हीच खरी मूर्तिपूजा आहे.

जया मानला देव तो पूजिताहे । परी देव शोधूनि कोण्ही न पाहे ॥
जगीं पाहता देव कोट्यानुकोटी । ज्या मानली भक्ति जे ते चि मोठी ॥ १७८ ॥

मूर्तिपूजेमागची शास्त्रीय भूमिका कालक्रमानें लुप्त झाली. तत्त्वज्ञानाचा आधार सुटला आणि उरले तें गतानुगतिक कर्मकांड, सांप्रदायिक दुराग्रह आणि गबाळी भावना. देवघर टिकले पण देव्हाऱ्याला देवांच्या कोठाराची अवकळा आली. पंचायतन पूजेमागची समन्वयाची दृष्टि नाहीशी झाली, देवमूर्तींची संख्या अनेक प्रकाराने वाढू लागली, कुलपरंपरेनें आलेले, कोणी आणून दिलेले, सांपडलेले, तीर्थक्षेत्रांतून गोळा केलेले, रूपांकृति आवडली म्हणून घेतलेले, संप्रदाय विशेषाने लादलेले, कांहीं नवसाचे, कांहीं शकुनाचे, असे देव, देव्हाऱ्यांत गोळा झाले. दगड, लाकूड, तांबे, चांदी असे धातु रेशमादींचे धागे यांच्या मूर्ति निर्माण झाल्या. आवडीप्रमाणें त्यांच्या पूजा बांधल्या जाऊं लागल्या. फुलापानांचे विधिनिषेध निर्माण झाले. उत्साह आणि ऐश्वर्य यांच्या प्रमाणांत पूजादींचे समारंभ वाढू लागले. देवमूर्तीवर मानवी रुचि-अरुचीचें गुण लादून तिचे भोग-शृंगार होऊं लागले. भोगोपचाराचें प्रमाण इतकें वाढले कीं भाविकाला देवदर्शनासाठी वेळ मिळेनासा झाला.

आमचे ती. दादा एकदां डाकुरला गेले होते. तेथील मूर्तीचे भोगोपचार आणि त्यासाठीं बंद होणारे गाभाऱ्याचें दार पाहून वैतागले आणि रुष्ट होऊन त्यांनीं डाकुरनाथालाच विचारले कीं देवा तुम्हीं हे काय चालवले आहे ?

आठ प्रहरीं तुझें दार । उघडें अवघे दीड प्रहर ॥
त्याही देवा दीड प्रहरी । तुझे भोग नानापरी ॥
तेच भोग होतां होतां । वेळ संपतो तत्त्वतां ॥
भक्त बोडाण्यांनी तुम्हां । आणिलें जे पुरुषोत्तमा ॥
ते न शिरा-पुरी खाया । आणिले पतित ताराया ॥
काय वैकुंठांत याची । उणीव आहे तुजला साची ॥
म्हणून देवा या डाकुरीं । अवघें लक्ष भोगावरी ॥
गणू म्हणे वरच्यावरीं । लावू नका दारें हरी ॥

या भोगोपचारामागें समर्पणाची भावनाहि राहिलेली नसते. मंदिर ज्याच्या स्वाधीन असते, त्याची चंगळ मात्र यामुळे चालते, तें हेरून श्रीकबीर म्हणतात, “शेरसवाशेर मूँग पपडिया देवीको चढवायो । देवी बापुडी खावे न पिवे आपहि भोग लगायो ॥”

भोगामागची आसक्ति सुटावी यासाठीं भोग ईश्वरार्पण करणें हें एक साधन. पण त्याकरिता मुळांत विरक्तीचे महात्म्य पटलेलें असावें लागतें. तसें नसतें तेव्हां पूजेला दांभिकता येते किंवा पूजा हा धंदा होऊन बसतो. दोन्हीं गोष्टी पारमार्थिकदृष्ट्या अनिष्ट आहेत पण यांत सुधारणा होत नाहीं. स्वार्थ आणि अहंकार हे त्याकामीं आड येतात. कधीं भित्रेपणानें देव्हाऱ्यांतील देवाची संख्या व पूजेचें आडंबर कमी करावें असें वाटत नाहीं. शारीरिक, मानसिक, दौर्बल्यामुळें या परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळें तें सांभाळले जावे तसेंहि सांभाळले जात नाहीं. उपेक्षा, चालढकल, अनादर अशा भक्तीला घातक असलेल्या भावना शिरतात. आणि तरी आपण जी पूजाअर्चा करतो ती पुष्कळ करतो, चांगली करतो, हा अहंकार असतोच आणि हें जें चालू असतें तें सर्व देवाचे खरें स्वरूप न ओळखता चालू असतें.

भावना आणि श्रद्धा या गोष्टी श्रेष्ठ, खऱ्या सात्त्विक असाव्या लागतात. त्यांना राजस-तामस गुणांची बाधा होऊन चालत नाहीं. श्रद्धेला सात्विकतेच्या मर्यादेंत राखण्यासाठीच शास्त्रांचें व संतांचे मार्गदर्शन प्रेमाने आदरानें स्वीकारावे लागते. पुढच्या श्लोकांतून समर्थ त्याच विषयाकडे वळत आहेत.

तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले । तया देवरायासी कोण्ही न बोले ॥
जगीं थोरला देव तो चोरालासे । गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ॥ १७९ ॥

"जन्माद्यस्य यतः" या ब्रह्मसूत्रानें खऱ्या देवाचें म्हणजे ब्रह्माचें स्वरूप आणि सामर्थ्य सांगितले आहे. उपनिषदामध्ये एक कथा आहे. वरुणाचा पुत्र भृगु, हा जिज्ञासू होऊन शिष्यभावानें आपल्या पित्याकडे आला आणि म्हणाला- हे भगवन्! ब्रह्म काय आहे तें मला सांगा. पिता म्हणाला-पुत्रा, हें सर्व दिसणार, भासणारे विश्व ज्याच्यामुळें उत्पन्न होतें, ज्याच्या आश्रयानें राहतें आणि शेवटीं ज्यांत लय पावते तें ब्रह्म हें समज. पण तें तपानें जाणून घे. त्याप्रमाणें भृगूने तपश्चर्या केली आणि त्याला क्रमाक्रमानें सत्याच्या अधिकाधिक जवळचे ज्ञान होत गेलें. शेवटीं त्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला, आणि आनंद, सच्चिदानंद हेंच ब्रह्माचें स्वरूप हें त्याच्या अनुभवास आलें. देवाचे हें स्वरूप कोणास कळतहि नाहीं आणि तें कळावें अशी कोणाची इच्छाहि नसते. सृष्टीच्या उत्पत्ति-स्थिति-प्रलयाचा आधार कोणी असेल तर तो असो, त्याच्याविषयी कुणाला बोलावयाचेंहि नसतें आणि ऐकावयाचेंहि नसतें. लोकांना बहुधा हवा असतो तो नवसाला पावणार, संकटातून सोडविणारा आणि इच्छापूर्ति करणारा असा देव. “जगीं थोरला देव तो चोरलासे” असें समर्थ म्हणतात तें यासाठींच.

माणसाच्या कोत्या बुद्धीला आणि हळव्या मनाला खरा देव जणू पेलतच नाहीं. भव्यतेचा साक्षात्कार सुखावह होण्यासाठी धैर्य असावें लागतें. तें नसणारा उंबरा ओलांडण्याचाहि कंटाळा करतो. 'मी' आणि 'माझे' सोडावयाला लावणारा देव कोणाला आवडणार ? संयमाची शिदोरी घेऊन, वैराग्याच्या वाटेने ज्याच्याकडे जावे लागतें, ज्याच्या दर्शनासाठी प्रयत्नाची दीर्घकालीन वाटचाल करावी लागते, ज्याच्या भेटीसाठी सदाचाराचे परिचयपत्र लागतें, अहंकाराचा वासहि ज्याला सोसत नाहीं असा देव कोणास भावणार ? श्रद्धेची आणि प्रेमाची अपेक्षा न करतां, ओवाळलेल्या आरतीला आणि पुढें ठेवलेल्या एखाद्या नारळाला आणि खडीसाखरेला या चार दोन पैशाला भाळणारा देवच लोकांना बरा वाटत असतो. टाकणें टाकल्यासारखे केलेल्या नमस्कारालाहि जो वर्षभर तरी कृतज्ञ राहतो तो देवच चांगला असे लोक समजतात. थोरला देव, खरा देव चोरलेला राहतो, अज्ञात राहतो, तो माणसाच्या या वृत्तीमुळे.

खरा सद्गुरु भेटला आणि अशा ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय सद्गुरुकडे शिष्य समित्पाणि होऊन शरण गेला तरच माणसाची कोती वृत्ती पालटेल आणि खऱ्या देवाची ओळख त्याला पटू शकेल. हें घडण्यासाठीं गुरु आणि शिष्य दोन्ही अधिकारी असावे लागतात. त्यांतील गुरूच्या योग्यतेचें वर्णन पुढच्या श्लोकांतून समर्थ करीत आहेत.

गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी । बहुसाल मंत्रावळी शक्ति मोठी ॥
मनीं कामना चेटकें धातमाता । जनीं वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ १८० ॥

मनुष्यमात्राला आपल्या प्रगतीसाठीं गुरूची म्हणजे मार्गदर्शकाची नितांत आवश्यकता आहे. मग ही प्रगति अध्यात्माच्या वा व्यवहाराच्या अशा कोणत्याहि क्षेत्रांतील असो. या विषयासंबंधीचें विशेष स्पष्टीकरण मागें विस्तृतपणें आलें आहे.

येथील गुरूचा उल्लेख समर्थांनी खऱ्या परमार्थातील योग्यतेच्या संदर्भात केला आहे.

बुद्धिवादाच्या पातळीवर कुणी कितीहि नाकारले, तरी गुरूची आवश्यकता ही एक अपरिहार्य वस्तुस्थिति असल्यानें आपापल्या धारणेप्रमाणें गुरु या मालाला मागणी पुष्कळ आहे. खऱ्या मालाचा पुरवठा त्या प्रमाणांत होण्याची शक्यता नाहीं आणि त्यामुळें व्यावसायिक स्वार्थी लोक गुरु या नावाखाली कांहीहि खपवीत असतात, आणि त्यामुळें गुरुंची संख्या सहस्त्रावधि, लक्षावधि स्वरूपांत असते. श्लोकातील कोटी शब्दाचा अर्थ संख्यावाचक न घेतो प्रकारवाचक घेणे अधिक सोयीचे आहे. लक्षावधि प्रकारचे गुरु असतात असे समर्थांना थोड्याशा अत्युक्तीने सुचवायचे आहे.

खरा गुरु कोणास म्हणावे वा खऱ्या गुरूची आवश्यकता कोणत्या कारणासाठी असते, हें सामान्यतः कुणी लक्षांत घेत नाहीं आणि त्यामुळें असंख्य प्रकारचे लोक गुरु या नावाखाली मिरवीत असतात. गुरुंची संख्या अतोनात वाढण्याचे हेहि एक कारण आहे.

खऱ्या अध्यात्माची कोणाला कल्पना नसते आणि खऱ्या अध्यात्माचे महत्त्वहि कोणाला पटत नाहीं. त्यामुळें कांहीं अद्‌भुत चमत्कार करण्याचें सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे, ज्याला अंतर्ज्ञान वा भविष्यज्ञान आहे, जो संतति, संपत्ति, रोगमुक्ति, संकटांचा परिहार, अनेक प्रकारच्या कामनांची पूर्तता या संबंधींच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतो, ज्याच्याजवळ उत्सवमहोत्सवादींचा संभार वैभवशाली आणि आकर्षक असतो, मनोरथपूर्तीसाठीं जो मंत्र-तंत्रादि विधानें सांगतो, ज्याच्या वागण्याची तऱ्हा बालोन्मत्तपिशाचवत् असते, पूजेचा थाटमाट, मठमंदिरांची भव्यता, कीर्तन- प्रवचनांतील विद्वत्तापूर्ण आणि मनोहारी विवेचनें संगीतनृत्यादींनी अलंकारलेलें भजन, देखाव्याचे दानधर्म, लोकांना आकृष्ट करणारे यज्ञयाग, इत्यादींची अनुकूलता ज्यांनीं मिळविली आहे, लोकांना प्रभावित करील अशी वागण्या-बोलण्यांतील चतुरता ज्यांना साधली आहे, टिळेमाळादि बाह्यांगानें जें नटलेले आहेत, त्यांनाच लोक साधू समजतात आणि गुरु म्हणून त्यांच्या नादी लागतात. हें खरें साधूहि नव्हेत आणि गुरुहि नव्हेत. अध्यात्माच्या साध्यापासून ते कोस दूर असतात, आणि त्यामुळे साधकाला तो मार्ग दाखविण्याचेंहि सामर्थ्य त्यांच्याजवळ नसतें. वर उल्लेखिलेल्या सर्व गोष्टी या त्यांच्या उदरपूर्तीचा व्यवसाय म्हणून असतात. पारमार्थिक उपासनेचा तो स्वाभाविक आविष्कार नसतो वा प्रामाणिक साधनेचा भागहि नसतो.

वरील मंत्रतंत्रादि गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत, त्यांचीहि आवश्यकता वाटावी अशी परिस्थिति व्यवहारांत कांहीं लोकांची तरी असूं शकते. घडणारे वा घडतात असे वाटणारे सगळेच चमत्कार जरी प्रामाणिक नसले, चमत्कार घडले असें वाटण्यांत पुष्कळवेळां भाबडेपण, दंभ आणि गारुडीकौशल्य असले तरी चमत्कार होतच नाहींत असें वाटणे हा बुद्धिवादाचा अतिरेकी भ्रम आहे. चमत्कार घडविणाऱ्या सिद्धी खरोखरीच कांही लोकांना उपलब्ध असतात. आणि त्यामुळे कांहीं वेळां कांहीं लोकांना लाभहि होऊं शकतो. पण तरी असा लाभ करून देणारी व्यक्ति खऱ्या अर्थाने गुरु म्हणून मानूं नये, असें अध्यात्माचे मत आहे.

वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आयकर सल्लागार, अनेक प्रकारचे मध्यस्थ (एजंट) हे माणसाची अनेक प्रकारची कामे करून देतात व श्रममूल्य घेतात. त्याच वर्गात सिद्धींच्या बळावर चमत्कार दाखवून मनोरथ पूर्ण करणाऱ्यांना गणावे. त्यांना गुरू म्हणून वंदनीय मानण्याची आवश्यकता नाहीं. त्यांना ज्ञानेश्वर, तुकाराम वा रामदासांच्या योग्यतेचे मानण्याची चूक कोणी करूं नये. ते मुक्ति प्राप्त करून देणारे वा मोक्षाचा मार्ग दाखविणारे महात्मे नव्हेत. ते स्वतःला कांहीहि समजोत वा त्यांचे भाबडे भक्त वा प्रचारक-पुरस्कर्ते त्यांना योगयोगेश्वर, भगवान् अवतार इत्यादि श्रेष्ठ विशेषणांनी संबोधोत, त्यांची योग्यता नानाप्रकारच्या ऐहिक व्यावसायिकांइतकीच आहे. मोक्ष मिळवून देणारे नसल्याने आकर्षक वाटणारें त्यांचें व्यक्तिमत्त्व गुरु म्हणून व्यर्थ आहे असें निश्चयानें समजावे.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

GO TOP