॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(उत्तरार्ध)

पंचिका ११ वी
विदेहमुक्तिलक्षण

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
सप्तविधसमाधान


सांगितली जीवन्मुक्ति । परी विदेहमुक्ति ते कोणती ।
ये पंचसमासीं यथामति । बोलिजेत असे ॥१॥
जीवन्मुक्ती म्हणजे काय ते सांगितले. आता विदेहमुक्ती म्हणजे काय ते यापुढील पाच समासांत यथामती सांगितले जाईल. (१)

परी येथें पडिला विचार । आचार्यादि मुनिवर ।
विदेहमुक्तीचा निर्धार । प्रारब्धक्षयीं केला ॥२॥
पण एक विचार असा येतो की, आचार्यादी मुनिवरांनी प्रारब्धनाशानंतर विदेहमुक्तीची प्राप्ती होते, असा विचार मांडला आहे. (२)

देह असतां विदेहमुक्ति । बोलतां विरोध येईल त्याप्रति ।
प्रारब्धक्षयीं जें प्रतिपादिती । तें विदेहकैवल्य ॥३॥
पण प्रारब्धक्षयानंतर विदेहकैवल्य (विदेहमुक्ती) प्राप्त होते असे प्रतिपादन करणाऱ्यांच्या प्रतिपादनात विरोध जाणवतो. देह असताना विदेहमुक्ती कशी शक्य होईल ? (३)

तरी विरोध न ये तयांसी । त्यांची विवक्षाचि ऐशी ।
पावतो विदेह कैवल्यासी । देहप्रारब्ध संपता ॥४॥
पण त्यात विरोध येत नाही. देहप्रारब्ध संपताच विदेह कैवल्य प्राप्त होते असे त्यांना म्हणावयाचे आहे (विवक्षा) . (४)

देह असतां विदेहमुक्ति । निर्विकल्पत्वें होय प्रतीति ।
मुक्तिकोपनिषदश्रुति । विदेहमुक्तिपर असे ॥५॥
देह असतानाही निर्विकल्पत्वामुळे विदेहमुक्तीचा प्रत्यय येतो. सर्व मुक्तिकोपनिषद हे विदेहमुक्तिपरच आहे. (५)

अरूप जो वासनाक्षय । जो निर्विकल्प समाधि होय ।
तेचि विदेहमुक्ति निश्चय । श्रोतीं केला पाहिजे ॥६॥
अरूप वासनाक्षय म्हणजेच निर्विकल्पसमाधी होय. तीच विदेहमुक्ती होय, असा निश्चय श्रोत्यांनी केला पाहिजे. (६)

तुर्येसहित वृत्तीसी । जो कां स्वानुभवें ग्रासी ।
पावला पूर्ण समाधानासी । उन्मनी तेही सांडुनी ॥७॥
जो स्वानुभवाने तुर्यावस्थेसहित वृत्तीला ग्रासून टाकतो आणि शेवटी उन्मनीचाही त्याग करतो. त्यालाच पूर्ण समाधान प्राप्त होते. (७)

मनाचे जालें उन्मन । उन्मनी तया अभिधान ।
स्वस्वरूपीं पाहतां मन । उत्पन्नचि नाहीं ॥८॥
ज्यावेळी मनच उन्मन (मनोलयाची अवस्था) होते त्या अवस्थेला उन्मनी म्हणतात. पण स्वस्वरूपाचा विचार केला तर मन उत्पन्नच होत नसते. (८)

दृश्य द्रष्टृत्वींच विरे । द्रष्टा द्रष्टेपणें नुरे ।
ते समयीं फुंज उतरे । मीपणाचा ॥९॥
दृश्य द्रष्टेपणातच विरून जाते, पुढे द्रष्टादेखील द्रष्टेपणाने शिल्लक राहात नाही, त्यावेळी मीपणाचा अभिमान देखील गळून पडतो. (९)

मी ब्रह्म हा अभिमान । यासी वृत्तीचि कारण ।
निवृत्ति-पद तें अभिन्न । कळलें पाहिजे ॥१०॥
'मी ब्रह्म आहे' असा जो अभिमान निर्माण होतो, त्याला वृत्तीच कारण असते. निवृत्ति (वृत्तिरहित अवस्था) पद म्हणजे काय ते अभिन्नपणे कळले पाहिजे. (१०)

उपाधियोगें सात नामें । समाधानाचीं संकेत वर्मे ।
बोलिली असतीं श्रीरामें । दासरूपें अवतारू ॥११॥
समर्थ रामदासस्वामींच्या रूपाने अवतार घेऊन स्वतः श्रीरामांनीच समाधानाची लक्षणे सांगितली आहेत. उपाधिभेदामुळे त्यांना सात भिन्न नामे प्राप्त झाली आहेत. (दासबोध ४. ४. ८-९) (११)

संगत्याग आणि निवेदन । विदेहस्थिति अलिप्तपण ।
सहजस्थिति उन्मनी विज्ञान । हे सप्तही एकरूप ॥१२॥
संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपणा, सहजस्थिती, उन्मनी आणि विज्ञान अशी ती सात नावे होत. पण ती सर्व एकरूपच आहेत. (१२)

याही वेगळे नामाभिधान । समाधानाचे संकेत वचन ।
असो हे सातचि लक्षण । भिन्न भिन्न सांगों ॥१३॥
याही वेगळी समाधानाची चिन्हे सांगणारी आणखी काही नामे असतील. पण या सातांचीच भिन्न भिन्न लक्षणे येथे सांगतो. (१३)

संग म्हणजे मीपण । जें मुक्तपणाचे बंधन ।
तेंचि सांडिल्यावाचून । संगत्याग कैचा ॥१४॥
संग म्हणजे मीपणा. तो मुक्तपणाचे बंधन आहे. त्याचा त्याग केल्यावाचून संगत्याग कसा घडेल ? (१४)

अहं ब्रह्म हें प्रतीति । तेचि त्रिपुटीतें दाविती ।
ते त्रिपुटी जेथें लया जाती । अधिष्ठानशेषत्वें ॥१५॥
'अहं ब्रह्मास्मि'हा जो अनुभव आहे. तो त्रिपुटीचा निदर्शक आहे. तो अनुभव त्रिपुटीसापेक्ष आहे. ती त्रिपुटी अधिष्ठानाला मागे शिल्लक ठेवून जेव्हा लय पावते; (१५)

दीप कापुरा मिळणी । कापूर जाता जळुनी ।
ज्योति काजळी दोन्ही । किमपी उरेना ॥१६॥
दिवा आणि कापूर यांचा संयोग होताच कापूर जळतो, त्याबरोबरच ज्योत आणि काजळी दोन्हीही नष्ट होतात. मागे काहीच शिल्लक राहात नाही. (१६)

तैसें अज्ञान स्वानुभवज्ञानें । जाळून आपण लया जाणें ।
अनुभवेविण जे कां असणें । हाचि संगत्याग ॥१७॥
त्याप्रमाणे स्वानुभवज्ञान हे अज्ञान नष्ट करून (जाळून) शेवटी स्वत:ही लय पावते, त्यानंतर अनुभवविरहित अवस्थेत असणे हाच संगत्याग होय. (१७)

मीपणासहित तूंपण गेलें । मी ब्रह्म हेंही विरालें ।
उपरी जें निःसंग भरलें । हेंचि निवेदन ॥१८॥
मीपणासहित तूपणाही गेला, मी ब्रह्म हा अनुभवही विरून गेला त्यानंतर जे नि:संग उरते तेच निवेदन होय. (१८)

मी देह कीं मी ब्रह्म । वृत्तीनें सांडिला हा भ्रम ।
केवळब्रह्मीं उपरम  । हे विदेहस्थिति ॥१९॥
मी देह आहे की ब्रह्म, हा संभ्रम सोडून देताच केवळ ब्रह्मामध्ये शांत होणे ही विदेहस्थिती होय. (१९)

जळीं जैसें कमळ भिजेना । आकाश वायूनें हलेना ।
वृत्तीवीण तैसे आपणां । सदृढ केले ॥२०॥
पाण्यात कमळ भिजत नाही, आकाश वायूने हलत नाही, त्याप्रमाणे वृत्तीवाचून स्वत:ला स्थिर करणे, (२०)

संपूर्ण उपाधि असतां । परीपूर्ण असें अलिप्तता ।
हें चवथें लक्षण तत्वतां । समाधानाचें ॥२१॥
संपूर्ण उपाधी असूनही परिपूर्ण अलिप्तता ठेवणे हे समाधानाचे चवथे लक्षण (म्हणजे अलिप्तता) होय. (२१)

जैसें प्रारब्धें देह व्यापारे । तैसे वर्तेना कां बारे ।
होय नव्हे करणें सरे । हें सजहस्थिति ॥२२॥
प्रारब्ध असेल त्याप्रमाणे देह व्यापार करत असेल तर त्याला तसे खुशाल करू देत, पण करणे अथवा न करणे, हे जेव्हा संपते त्याअवस्थेला सहजस्थिती म्हणतात. (२२)

मन सांडून एकीकडे । आपण ओतप्रोत चहूंकडे ।
वृत्तिसहित मन बुडे । हेचि उन्मनी गा ॥२३॥
मनाचा एकीकडे त्याग करून आपण चोहीकडे ओतप्रोत भरला आहे;जेथे वृत्तीसहित मन बुडून जाते त्या अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. (२३)

ज्ञान निःशेष हरपलें । अखंड परिपूर्णचि उरलें ।
यासींच विज्ञान बोलिलें । लक्षण सातवें ॥२४॥
ज्ञान संपूर्णपणे हरवल्यानंतर शेवटी अखंड परिपूर्ण उरते, त्या अवस्थेला विज्ञान म्हणतात. हे समाधानाचे सातवे लक्षण होय. (२४)

वृत्तीरहित जें समाधान । निवडुनियां ज्ञानाज्ञान ।
संकेत जे कां भिन्नाभिन्न । परी ते एकरूप ॥२५॥
वृत्तिरहित जे समाधान ज्ञान आणि अज्ञान यांना बाजूला सारून राहते त्याला भिन्न भित्र नावे दिली तरी ते एकच असते. (२५)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
सप्तविधसमाधानप्रकारे । प्रथमसमासः ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
निर्विकल्पसमाधिप्रकार


जागृति स्वप्न सुषुप्ति । ऐका जयातें म्हणती ।
कैसी तयांची स्थिति । स्वानुभवें वर्णिजे ॥१॥
ज्यांना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती असे म्हणतात त्यांची स्थिती स्वानुभवाच्या आधाराने वर्णन करतो. (१)

लोकरीती जैसे दंडक । जागृतादि जें रूपक ।
त्या विलक्षण स्वानुभविक । बोलिजेत असे ॥२॥
लोकांमध्ये जागृती इ. जी कल्पना असते त्यापेक्षा स्वानुभवातील त्यांचे स्वरूप एकदम भिन्न असते. तेच आता सांगतो. (२)

आदौ सुषुप्ति अवधारा । स्वप्न जाणिजे तदनंतर ।
मुख्य जागृतीचे निर्धारा । निर्विकल्प वस्तु ॥३॥
प्रथम सुषुप्तीचे स्वरूप ऐका. त्यानंतर स्वप्न अवस्थेचे स्वरूप ऐका. नंतर जागृतीतील निर्विकल्प ब्रह्म समजून घ्या. (३)

लोकव्यापार जागृति । स्वप्न आणि सुषुप्ति ।
हे तिन्हीही अज्ञानभ्रांति । सुषुप्तीच निश्चयें ॥४॥
लोकव्यवहारातील जागृती, स्वप्र, सुषुप्ती या तिन्ही अवस्था म्हणजे अज्ञानजन्य भ्रमच होत. त्या तिन्ही अवस्था म्हणजे खरी सुषुप्तीच आहेत. (४)

वार्ता नाहीं निज वस्तूची । भ्रमरूप अवस्था साची ।
यातना भोगिती फुकाची । जन्ममृत्युरूप ॥५॥
या अवस्थांमध्ये लोकांना निजवस्तू म्हणजे आत्मस्वरूपाची खबरही नसते. ती खरी भ्रमरूप अवस्थाच आहे. त्यामुळे लोक विनाकारण जन्ममरणरूप यातना भोगत असतात. (५)

निद्रेमाजीं पुण्यपाप । स्वर्गनरकादि अमूप ।
सुख दुःख भोगिती परी अल्प । स्वप्नजागृती नाहीं ॥६॥
त्या निद्रेमध्ये पुण्यपाप, स्वर्ग नरक इ. पुष्कळ सुखदुःखे ते भोगतात. पण त्या निद्रेतून त्यांना स्वप्न अथवा जागृती अजिबात प्राप्त होतनाही. (६)

अनंत जन्माचें सुकृत । पुण्यमार्गी जे वर्तत ।
तयासी विविदिषा होत । कीं ब्रह्म जाणावें ॥७॥
ज्यांचे अनंत जन्मांचे पुण्य गाठी असेल आणि जे पुण्य मार्गाने जाणारे असतील त्यांनाच ब्रह्म जाणावे अशी इच्छा निर्माण होते. (७)

गुरु शास्त्र आणि विचार । श्रवणमननादि प्रकार ।
स्वानुभवें आत्मसाक्षात्कार । अपरोक्ष जाले ॥८॥
गुरू, शास्त्र आणि विचार, श्रवण मननादी साधने आणि स्वानुभवाने अपरोक्ष आत्मसाक्षात्कार होतो. (८)

हेंचि स्वप्न गा निश्चिती । चराचरें स्वप्नापरी दिसतीं ।
स्वानुभवें आत्मप्रतीति । परि ते भ्रमरूप ॥९॥
यालाच स्वप्रावस्था म्हणतात या अवस्थेत सर्व चराचरे स्वप्राप्रमाणे दिसतात. स्वानुभवाने आत्मप्रतीती येते. पण ती भ्रमरूप असते. (९)

जागृतिपरी स्वप्नीं वाटे । परी ते माईक जाणावें खोटें ।
स्वानुभवें त्रिपुटी उठे । तरी जगृती कैसी ॥१०॥
या स्वप्रावस्थेत जागृतीतल्याप्रमाणे वाटते. पण ते मायिक असते, खोटे असते. स्वानुभवात जर त्रिपुटी निर्माण होत असेल तर ती जागृती कशी म्हणावी ? (१०)

नानात्व मिटलें एकनिर्वाणीं । एकचि जालें बहुधापणीं ।
दोन्हीं उर्मी जातां आटोनी । आपणा आपण लाभे ॥११॥
नानात्वाचा एकामध्ये लय झाला, अथवा एकाचा बहुधापणात विस्तार झाला. या दोन्ही ऊमींचा लोप झाल्यानंतर आपण आपल्याला प्राप्त होवो. (११)

लाभे आपुला आपण । किंचिन्नसतां द्वैतभान ।
हेचि अनुभवाची खूण । स्वप्नांतील जागृती ॥१२॥
काहीही द्वैताचे भान नसता आपली आपल्याला प्राप्ती होते हीच स्वप्रातील जागृतीच्या अनुभवाची खूण आहे. (१२)

अनुभव अनुभवियांत । अनुभवेवीण अनुभव होत ।
स्वतां असतांहि निवांत । स्वप्नाकडे येतसे ॥१३॥
अनुभव अनुभवित्यामध्ये विरून अनुभवावाचून अनुभव बनतो. स्वत: निवांत असताही स्वप्नावस्थेकडे येतो. (१३)

अनुभाव्यरूप जाला । अनुभव अनुभविता विराला ।
तरी वाटे कांही आला । जागृतीकडे ॥१४॥
तो स्वत: अनुभाव्यरूप (अनुभवाचा विषय) झाल्यावर अनुभव आणि अनुभविता विरून जातात. तेव्हाच तो काही जागृतीकडे थोडाफार आला असे वाटते. (१४)

जागरीं स्वप्न आठवी । तैसी अनुभाव्य उठाठेवी ।
पुढें जागृतीची पदवी । बोलतांचि नये ॥१५॥
जागृतीमध्ये स्वप्राची आठवण व्हावी, तद्वत अनुभाव्याची उठाठेव तो करतो. पण त्या प्रकाराला जागृतीची पदवी देता येत नाही. (१५)

न बोलतां कळे कैसे । बोलतां अर्थरूप होतसे ।
त्रिपुटी आटतां अपैसे । तेचि ते जागृती ॥१६॥
हे न बोलताच कळावे. कारण, बोलू पाहताच त्याला 'अर्थरूप' येते. त्रिपुटी आपोआप आटेल तीच जागृती होय. (१६)

त्रिपुटीरहित जो अनुभव । परी अनुभवियासी कैंचा ठाव ।
एकलाचि उरे अपूर्व । एकपणेंविण ॥१७॥
त्रिपुटीरहित अनुभव येतो तो अनुभवित्याला कसा कळेल ? शेवटी तो एकटाच पण एकटेपणाची जाणीव नसलेला असा उरतो. (१७)

द्वैत उत्पन्नचि नाहीं । रज्जूवरील जैसा अही ।
एका एकपण तेंही । बोलणे कैसें ॥१८॥
रज्जूवरील सर्पाभासाप्रमाणे द्वैतच मुळात उत्पन्न झालेले नसते. तो एकटाच असतो. पण त्याला एकटेपण तरी कसे म्हणायचे ? (कारण एक म्हणताना दुसऱ्याची अपेक्षा असते. तशी अपेक्षा येथे नसतेच. ) (१८)

म्हणून एकपणेवीण । होणें न होणें सांडून ।
अखंड जे का परिपूर्ण । आपण वस्तु ॥१९॥
इथे एकपणाही नाही. काही व्हायचे नसते अथवा न व्हायचेही नसते. फक्त जे अखंड परिपूर्ण असे जे उरते ती वस्तू म्हणजे आपण होय. (१९)

हेंही बोलणें नवचे । काज नसेचि मौनाचें ।
आहे नाहीं जाऊन साचें । नाहींपणें असे ॥२०॥
हेही बोलणे अशक्य होय. येथे मौनाचेही कारण नाही. आहे नाही, केवळ नाहीपणाने तो असतो. (२०)

चंचलें निश्चल दवडिलें । चंचल स्वभावेंचि नाथिलें ।
मिथ्या तें सत्यत्वें राहिलें । नवचे कदा ॥२१॥
चंचलाबरोबर निश्चलही घालवून टाकले. चंचल स्वभावानेच मिथ्या होते. जे मिथ्या असते ते कधीच सत्यत्वाने राहू शकत नाही. (२१)

अनुभव अनुभविता । अनुभव्य आणि ध्येय ध्याता ।
ध्यान ज्ञानज्ञेय ज्ञाता । त्रिपुटी जितुक्या ॥२२॥
अनुभव, अनुभविता आणि अनुभाव्य, ध्येय ध्याता आणि ध्यान; ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान अशा जेवढ्या म्हणून त्रिपुटी असतील, (२२)

हे सर्वही चंचलपण । निश्चळ नव्हेती आपण ।
आठवितां निश्चल पूर्ण । चंचलत्व होतें ॥२३॥
त्या सर्व चंचलपणात येतात. त्या कधीच निश्चळ नसतात. निश्चलाचे स्मरण करायला गेले की त्याला चंचलत्व येते. (२३)

कुंथून आकाशीं वळघता । शीणचि उरे तत्वतां ।
ठाइचे ठाई राहतां । पृथ्वीचवरी ॥२४॥
महत्प्रयासाने आकाशात जायचा प्रयत्न करताच कष्टच होतात. जागचे जागी राहायचे ठरविल्यास पृथ्वीवरच राहतो, (२४)

घाणवटीचें ढोर चालतां । श्रमे परी नवचे पंथा ।
ठाइचे ठाई असतां । चालणें व्यर्थ ॥२५॥
घाण्याचे जनावर चालत राहते, त्याला श्रम होतात. पण ते रस्त्याला लागत नाही. जागच्या जागी राहिल्यामुळे त्याचे चालणे व्यर्थ होय. (२५)

तैसें निश्चलपणें पाहतां । चंचलचि होय मागुतां ।
म्हणून मिथ्या चंचलाची वार्ता । सांडितां बरें ॥२६॥
त्याप्रमाणे निश्चलपणाने पाहू लागले की मागाहून पुन्हा चंचलच बनतो. म्हणून मिथ्या चंचलाची गोष्टच टाकून देणे बरे. (२६)

चंचल जेणें सांडिलें । त्यासीही पाहिजे त्यागिलें ।
आतां जें कांही उरलें । कोण जाणे ॥२७॥
ज्याने चंचलाचा त्याग केला त्याचाही (अनुभविते पणाचाही) त्याग केला पाहिजे. आता त्यानंतर जे काही उरेल ते काय आहे कोण जाणे! (ते अनिर्वचनीय आहे. ४२७)

जेथें वाणी निवर्तली । अप्राप्य मनासी किल्ली ।
श्रुति जे ऐसी बोलिली । तें सत्यसत्य ॥२८॥
जेथे वाणी परतते, मनाची किल्ली अप्राप्य असते, असे जे श्रुतीने म्हटले आहे ते अगदी सत्य आहे. (२८)

चंचल चक्र सांडून । ज्ञाता होय जो अभिन्न ।
या नांव पूर्णसमाधान । निर्विकल्परूप ॥२९॥
चंचलाचे जे चक्र त्याचा त्याग करून ज्ञाता जेव्हा अभिन्न राहतो, त्या स्थितीला निर्विकल्परूप पूर्ण समाधान असे नाव आहे. (२९)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
निर्विकल्पसमाधिप्रकारे । द्वितीयसमासः ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
शून्यखंडण


श्रोता म्हणे हेचि कैसें । कीं अनुभविता अनुभव नसते ।
तरी शून्यची निश्चयें असे । काहीं नाहीं ॥१॥
श्रोता म्हणतो असे कसे असेल ? अनुभविता आणि अनुभव नसतील तर ते शून्याचेच प्रतिपादन नव्हे काय ? (१)

आपण वृत्तिशून्यचि व्हावें । तरीच समाधान पावावें ।
अन्यथा असे तें स्वभावें । अनुभवासी येतें ॥२॥
आपण वृत्तिशून्य झालो तरच समाधान प्राप्त करू शकतो. नाहीतर जे असेल त्याचा अनुभव येतच राहणार. (२)

वक्ता म्हणे शून्य म्हणसी । तरी चंचलवृत्ति ते कोणासी ।
कळे वृत्तीतें कीं शून्यासी । विचारी बापा ॥३॥
यावर वक्ता म्हणतो की, जर शून्य म्हणत असशील तर चंचल वृत्ती कोणाला कळते ? वृत्तीला की शून्याला ? यावर जरा विचार कर. (३)

शून्य तरी कांही नाहीं । वृत्तीसी कैसें जाणे पाहीं ।
जाणे तरी भूतजडातेंही । जाणीव असती ॥४॥
शून्य म्हणजे काही नसणे. मग त्याला वृत्तीचे ज्ञान कसे होते ? शून्य जाणणारे असते तर भूते, जड पदार्थ यांनाही ती जाणीव असायला पाहिजे. (४)

वृत्तीसी जरी जाणीव । हें बोलणेंची तो माव ।
मृगजलपानें अपूर्व । तृषाहरण होती ॥५॥
वृत्तीला जाणीव असते असे म्हणावे तर ते बोलणे व्यर्थ ठरेल. कारण मृगजळ पिऊन तहान भागते, असे म्हणण्यासारखा तो प्रकार होईल. (५)

आणि श्रुतीसीही विरोध । स्वानुभवियासी आला बाध ।
श्रुति-ज्ञात्याहून अगाध । प्रमाण तें कोणतें ॥६॥
हे बोलणे वेदविरुद्धही आहे. तसेच स्वानुभवी ज्ञात्याच्या अनुभवालाही त्यामुळे विरोध येतो. वेद आणि ज्ञाते यांच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ प्रमाण कोणते ? (६)

ज्याचे भास सर्व भासती । ऐसे बोलतसे श्रुति ।
वृत्तीवीण स्वानुभवप्रतीति । समाधिकालीं ज्ञात्यासी ॥७॥
ज्याच्या तेजाने हे सर्व जग भासते (प्रकाशित होते) असे श्रुतीच सांगते. (मुंडक २. २. १०) आणि ज्ञात्याला समाधिकाळी वृत्तीवाचून स्वानुभवप्रतीती येत असते. (७)

हे दोन्हीही खोटे केले । मग घरचि बुडाले ।
वृत्तीनें वृत्ति जाणतां आले । अति दूषणचि कीं ॥८॥
या दोघांनाही खोटे करणे म्हणजे घरच बुडविणे होय. वृत्तीनेच वृत्तीचे ज्ञान होते म्हणताना अतिशय दोष येतो. (८)

जे वेदबाह्य असती । तेही वेदातें वंदिती ।
आणि ब्राह्मण असून जे दूषिती । ते अंत्यजाहुनी निकृष्ट ॥९॥
वेदबाह्य असणारेही वेदांना वंदन करतात आणि ब्राह्मण असूनही जे वेदांना दूषण देतात ते अंत्यजाहूनही निकृष्ट होत. (९)

आणि स्वानुभवियांचे प्रमाण । वेदें घेतलें आपण ।
तयासी करितां अप्रमाण । त्याहून अधम कोणता ॥१०॥
आणि वेदही स्वानुभवी ज्ञात्यांचे प्रामाण्य स्वीकारतो आणि त्या अनुभवी ज्ञात्यांनादेखील जो अविश्वसनीय ठरवितो, त्याच्यापेक्षा अधिक अधम दुसरा कोण असेल ? (१०)

वृत्ति जेणें जाणितली । वृत्ति नव्हे पाहिजे कळली ।
हे स्वानुभवें जरी उगवली । तरीच भुलि निवर्ते ॥११॥
वृत्तीचे अस्तित्व ज्याला कळते त्यालाच वृत्तीचा अभावसुद्धा कळला पाहिजे. ही जाणीव स्वानुभवाने कळली तरच भ्रम ओसरेल. (११)

सेवक जैसा राजयाचा । राजचिन्हीं मिरवे साचा ।
राजा म्हणून तयाचा । निर्धारू केला ॥१२॥
राजाचा सेवक राजचिन्हे धारण करून मिरवतो. पण त्यालाच राजा म्हणून समजण्यात यावे. (१२)

तैसी वृत्ति हे बापुडी । काय जाणे धडफुडी ।
सुषुप्तींत मारिली दडी । शून्यामाजीं ॥१३॥
त्याप्रमाणे वृत्ती बिचारी तिला काय कळणार ? सुषुप्तीत तर ती शून्यामध्ये दडी मारून बसते. (१३)

वृत्ति असतां आपण जाणें । वृत्तीचा अंत पाहिला जेणें ।
शून्यासही प्रकाश करणें । स्वप्रभत्वें ॥१४॥
वृत्ती असलेली ज्याला कळते, त्यालाच वृत्तीचा अंतही कळतो. तो स्वप्रभेच्या बळावर शून्यालाही प्रकाशित करतो. (१४)

जाणतां सर्वज्ञ तो एक । त्यावीण सर्व हे माईक ।
असो शून्याचें कौतुक । वाटे या हेतु असे ॥१५॥
तोच एक सर्वज्ञ जाणता आहे. त्याच्यावाचून हे सर्व मायिक आहे. शून्याचे कौतुक याच कारणासाठी वाटते. (कारण शून्याला जाणणाराही कोणीतरी आहे. ) (१५)

सर्व दृश्यजात सांडिलें । चंचल तितुकें प्रतीती आलें ।
वृत्तीनें अनुभवूं लागलें । ठक पडिले सहजची ॥१६॥
सर्व दृश्य पदार्थांचा त्याग केला. ते सगळे चंचल आहे असे अनुभवास आले. त्यांच्या वृत्तीने अनुभव घेऊ लागले की तिला भुरळ पडते. (१६)

आपण निश्चळ हें कळेना । वृत्तीसी सत्यत्व असेना ।
कांही नाहीं हे वासना । सदृढ केली ॥१७॥
आपण चंचल नसून निश्चळ आहोत हे त्याला कळत नाही, वृत्तीला सत्यत्व देता येत नाही. त्यामुळे काहीच नाही (शून्य आहे) अशी वासना पक्की केली जाते. (१७)

स्वरूपीं न होतां अभिन्न । वृत्तीचें गळालें अहंपण ।
सहजचि जाले वृत्तिशून्य । अविवेकानें ॥१८॥
वृत्ती स्वरूपाशी अभिन्न होत नाही (एकरूप होत नाही) तरी पण तिचा अहंपणा गळून गेला. अशा वेळी अविचाराने तो सहज वृत्तिशून्यतेचा अनुभव घेऊ लागला. (१८)

वेगळेपणें पाहूं जातां । शून्यचि होतसे ज्ञाता ।
स्वरूपीं अभिन्न तत्वतां । विचारें जालें पाहिजे ॥१९॥
स्वरूपापेक्षा वेगळा राहून ज्ञाता पाहू लागला तेव्हा शून्याचाच तो अनुभव घेऊ लागतो. तेव्हा विचाराने स्वरूपाशी एकरूप होता आले पाहिजे. (१९)

अभिन्न मुळींच आहे । साधक शोधून न पाहे ।
बळेंचि संदेहीं पडताहे । शून्यावस्थें ॥२०॥
खरे तर तो स्वरूपाहून मूळचाच अभिन्न आहे. पण साधक ते शोधून पाहत नाही आणि मग शून्यावस्थेत पडून तो विनाकारण संशयात सापडतो. (२०)

एक वृत्तीकडे भरंगळती । एक शून्यामाजी पडती ।
विचारें जें अभिन्न होती । तेचि धन्य धन्य ॥२१॥
एकजण वृत्तीकडे घसरतो, तर एकजण शून्यामध्ये पडतो. विचाराने जे साधक स्वरूपाशी अभिन्न होतात, तेच धन्य होत. (२१)

येथें श्रोता समजला । शून्याचा ठाव पुसिला ।
नाहीं तें नाहीं तयाला । बोलणें नलगे ॥२२॥
आता श्रोत्याला याचा अर्थ कळला. त्याने मनातून शून्याचे अस्तित्व काढून टाकिले, जे नाही ते नाहीच. त्याविषयी बोलण्याचेही कारण नाही. (२२)

परी अनुभवासी ठाव नाहीं । यासी कैसें करणें पाही ।
जैसे असे यथार्थ तेंही । निरोपावें आम्हां ॥२३॥
पण अनुभव येत नाही. याला काय करावे ? तेव्हा जी वस्तुस्थिती असेल ती आम्हाला सांगावी असे श्रोते विनंती करून सांगतात. (२३)

याचें उत्तर पुढलें समासीं । दीजेत असे निश्चयेसी ।
श्रोता सावधान मानसीं । सदृढ असावे ॥२४॥
तेव्हा वक्ता पुढल्या समासात याचे उत्तर देण्याचे आश्वासन देतो. श्रोत्यांनी सावधान असावे. मनाने दृढ असावे. असे तो त्यांनासांगतो. (२४)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
शून्यखंडनप्रकारे । तृतीयसमासः ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
पूर्णसमाधानप्रकार


वृत्तीसहित सर्वांते जाणे । आपुलेनि सर्वज्ञपणें ।
वृत्त्यादि जडें संपूर्णें । हें काय जाणती ॥१॥
ब्रह्म वृत्तीसहित सगळ्यांना आपल्या सर्वज्ञपणाच्या बळावर जाणते. वृत्त्यादी मात्र संपूर्णपणे जड आहेत. ते काय जाणू शकणार आहेत ? (१)

गर्भगत लेंकुरा ज्ञान । होतें मातेचें परिपूर्ण ।
तरी अखंड दंडायमान । वृत्तीसी कळूं येतें ॥२॥
गर्भातील लेकराला मातेचे परिपूर्ण ज्ञान होऊ शकेल तरच अखंडपणे सर्वत्र असणाऱ्या ब्रह्माला वृत्ती जाणू शकेल. (२)

गर्भस्थ न जाणें माता । वृत्तीसी न कळे हिंपुटी होतां ।
तरी अनुभवाची वार्ता । केवी बोलावी ॥३॥
गर्भस्थाला आईचे ज्ञान होऊ शकत नाही. वृत्तीलाही ब्रह्म कळत नाही आणि त्यामुळे निराश व्हावे लागते. तिच्या ब्रह्मानुभवाची गोष्ट तर दूरच राहिली. (३)

अनुभववृत्ति सांडून । विचारेंचि व्हावे अभिन्न ।
न जाणतां जें का परिपूर्ण । तेंचि आपण निश्चयेसी ॥४॥
अनुभववृत्तीचा त्याग करून विचाराच्या साहाय्यानेच ब्रह्माशी अभिन्न व्हावे. परिपूर्ण ब्रह्माला जाणून घेण्याच्या खटपटीत न पडता निश्चयाच्या बळावर आपण प्रत्यक्ष तेच व्हावे. (४)

दृश्यत्वें वृत्तीसी सांडिलें । स्वप्रभत्वें शून्य ओलांडिलें ।
मग अपसयाचि उरलें । अभिन्न ब्रह्म जे कां ॥५॥
दृश्य म्हणून वृत्तीचा त्याग केला, स्वप्रभेच्या बळावर शून्य ओलांडले की मग आपोआपच ब्रह्म अभिन्नपणे उरते. (५)

ब्रह्म जरी अगोचर । आपन भिन्न असतां जर ।
तरी अनुभवाचा विकार । सुखी होता ॥६॥
ब्रह्म जरी अगोचर (इंद्रियांनी न समजणारे) असले, आणि आपण जर त्यापेक्षा वेगळे असतो तर अनुभवाचा विकार सुखाने होऊ शकला असता. (६)

आपण तेंचि जरी जाणावें । अभिन्न कैसें अनुभवावें ।
आपुला खांदा बैसावें । आपण केवी ॥७॥
पण आपणच ब्रह्म आहोत असे ज्ञान झाल्यावर आपल्याहून अभिन्न अशा त्या ब्रह्माचा अनुभव कसा घ्यायचा ? आपल्याच खांद्यावर आपल्याला बसता येईल का ? (७)

साखर गोड जिव्हेसी । कस्तुरी सुगंध घ्राणासी ।
रूप सुंदर डोळ्यासी । भिन्नत्वामुळें ॥८॥
आपल्या जिभेला साखर गोड लागते, नाकाला कस्तुरीचा सुगंध घेता येतो, एखादे रूप डोळ्यांना सुंदर दिसते. या गोष्टी अथवा हे अनुभव केवळ आपण त्या त्या पदार्थापेक्षा भिन्न असतो म्हणून शक्य होतात. (८)

साखर साखरेची न घे गोडी । कस्तुरी सुगंध केवी निवडी ।
आपणातें देखे आवडी । डोळाचि कैसा ॥९॥
साखर साखरेची गोडी चाखू शकत नाही, कस्तुरीला आपला सुगंध ओळखता येईल का ? डोळाच स्वतः आपल्याला आवडीने पाहू शकतो काय ? (९)

जिव्हा सर्व रसातें जाणे । आपणातें चाखूं नेणें ।
परी जिव्हेची रसज्ञता कोणें । निवारिली पा ॥१०॥
जीभ सर्व रसांचा आस्वाद घेऊ शकते, पण स्वत:ची चव तिला स्वत:ला चाखता येत नाही. पण त्यामुळे जिभेची रस जाणण्याची क्षमता कोणी नाकाराली आहे काय ? (१०)

तैसा आपण आपणासी । अनुभवा नवचे दशी ।
परी अनुभव्य रूप तयासी । निवारी कोण ॥११॥
त्याप्रमाणे ब्रह्म आपण आपणाला एक दशीएवढे देखील अनुभवू शकत नाही. पण त्यामुळे त्याचे अनुभाव्य (अनुभवाचा विषय होण्याची क्षमता) रूप कोण नाकारू शकेल ? (११)

आहे तैसें आहेच आहे । अनुभवासी कोण लाहे ।
अखंड अद्वैतचि राहे । अनंतरूप ॥१२॥
ब्रह्म आहे तसे आहेच पण त्याचा अनुभव कोणाला घेता येईल ? ते अखंड, अद्वैत आणि अनंत असेच आहे. (१२)

द्वैताद्वैत बोलणें काय । नाम संकेत वाया जाय ।
पुढे खुंटला उपाय । अनिर्वाच्य वस्तु ॥१३॥
द्वैताद्वैत अशा संज्ञांचा तरी इथे उपयोग काय ? त्याला नाव देण्याचा प्रयत्न फोलच जाणार आहे. परब्रह्म अनिर्वाच्य असल्याने त्याच्या बाबतीत असे भिन्नत्वाने जाणण्याचे सर्व उपाय खुंटतात. (१३)

ऐसें ऐकोनि श्रोता । स्वानुभवें होय बोलतां ।
सप्रेम दाटला पुरता । माथा चरणीं ठेविला ॥१४॥
हे ऐकून श्रोता स्वानुभवाने 'होय' असे म्हणाला. त्यावेळी त्याला प्रेमाने गहिवरून आले आणि त्याने वक्त्याच्या चरणांवर मस्तक ठेविले. (१४)

म्हणे स्वस्वरूप निर्विकार । अभिन्नत्वेंचि निर्धार ।
तेथें अनुभूतीचा केर । द्वैतेंवीण असेना ॥१५॥
तो म्हणाला, "ब्रह्म हे निर्विकार आहे. त्याचा अनुभव अभिन्न राहून घेता येतो. तेथे द्वैत नसल्यामुळे अनुभूतीचा फापटपसारा मुळीच नसतो. " (१५)

चंचलें जरी अनुभवावें । तरी तें माईकचि स्वभावें ।
तेणेंगुणें बळें संभवें । शून्य संदेह ॥१६॥
चंचल मायिकाच्या साहाय्याने त्याचा अनुभव घेतला तर तो अनुभव स्वाभाविकपणेच मायिक ठरणार. त्यामुळे विनाकारणच शून्याचा संशय येत राहील. (१६)

आपण परिपूर्ण अखंड । वितुळलें चंचळाचें बंड ।
शून्य शून्यपणें द्वाड । मुळिंच नाहीं ॥१७॥
ब्रह्म आपण स्वत: परिपूर्ण अखंड असल्याने त्याच्यापुढे चंचलाचे सर्व प्रयत्न निष्फल होतात. आणि ते त्रासदायक शून्य शून्यपणामुळे मुळीच नाही असे ठरते. (१७)

कैचें जड कैचें चंचळ । शून्यत्वाचा धुतला विटाळ ।
आपुला आपण केवळ । परिपूर्ण असे ॥१८॥
कसले जड, कसले चंचळ ? त्यांच्याबरोबर शून्यत्वाचा विटाळही धुतला गेला. आणि परमात्मा आपला आपण केवळ परिपूर्ण अशा स्वरूपात राहिला. (१८)

ब्रह्मासि ब्रह्मत्व दिधले । निःसंगासी निःसंग केले ।
निर्विकल्पाचें मोडिलें । सविकल्पपण ॥१९॥
अशा प्रकारे ब्रह्माचे ब्रह्मत्व त्याला दिले, नि:संगाला नि:संग केले, निर्विकल्पाचेही सविकल्पपण मोडून काढले. (१९)

आतां संदेहचि नाहीं । नसे संशया उरी कांहीं ।
धन्य तुमचा अनुग्रही । साफल्य जालें ॥२०॥
आता संदेह उरला नाही. संशयाला अवसर राहिला नाही, तुमच्या अनुग्रहामुळे मी धन्य झालो. माझ्या जन्माचे सार्थक झाले. (२०)

ऐकोनी श्रोत्यांचें समाधान । वक्ता आनंदला पूर्ण ।
पडलें दोघा आलिंगन । अश्रु नयन डवरले ॥२१॥
श्रोत्याचे हे समाधानाचे उद्गार ऐकून वक्त्याला पूर्ण आनंद झाला. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. त्या दोघांचेही डोळे त्या आनंदाने भरून आले. (२१)

म्हणे माझिया श्रमाचे । परिहार जाले गा साचे ।
गुह्य जें का सदाशिवाचें । आकळलें तुम्हां ॥२२॥
वक्ता म्हणाला की, "माझ्या श्रमाचा आज परिहार झाला. कारण तुम्हांला सदा शिव अशा परब्रह्माचे रहस्य कळले. (गुह्य ज्ञान प्राप्त झाले. ) (२२)

आमुच्या अंतरीं होतें । तें तुम्हां बाणलें अवचितें ।
हेंचि असो सुदृढ तुमतें । सत्य सत्य त्रिवाचा ॥२३॥
माझ्या अंत:करणात जे होते, ते तुम्हाला अचानक कळले. तुमच्या मनावर ठसले. हेच ज्ञान तुमचे ज्ञान पक्के आणि कायम राहील. हे त्रिवार सत्य मी सांगत आहे. (२३)

जालें परम समाधान । तुटला बोल खुंटले मौन ।
परिपूर्ण स्वानंदघन । वस्तु वस्तुत्वें ॥२४॥
श्रोत्याला अतिशय समाधान झाले. त्यामुळे बोलणे खुंटले. मौनालाही आवर घातला गेला. परिपूर्ण, घनदाट स्वानंदस्वरूप, ब्रह्म ब्रह्मरूपानेच उरले. (२४)

निर्विकल्पता जया बाणली । त्याची वर्तणुक कैसीं जाली ।
तें पुढेले समासीं बोलिली । अवधारोत साधक ॥२५॥
आता ज्याच्या अंगी निर्विकल्पता पूर्णपणे बाणली, त्याची वर्तणूक कशी असते, ते पुढील समासात सांगितले जाईल. साधकांनी लक्षपूर्वक ऐकावे. (२५)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
पूर्णसमाधानप्रकारे । चतुर्थ समासः ॥४॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
विदेहस्थितीप्रकार


ऐका तया पुरुषाची स्थिति । ब्रह्माकारत्व आदिअंतीं ।
मी ब्रह्म कीं देह निश्चिती । आठवचि नाहीं ॥१॥
त्या पुरुषांची स्थिती ऐका. तो आदी-अंती ब्रह्माकारच झालेला असतो. मी ब्रह्म आहे किंवा देह आहे, याचे त्याला स्मरणच नसते. (१)

मी देह आहे कीं नाही । याचें विस्मरण पडिलें पाहीं ।
मी ब्रह्म होय अथवा नाहीं । हा संशयोचि मेला ॥२॥
मी देह आहे की नाही, याचे त्याला विस्मरण पडलेले असते. त्यामुळे मी ब्रह्म आहे अथवा नाही हा संशय त्याच्या मनातून फिटलेला असतो. (२)

एवं कल्पनेसी सांडिलें । पूर्ण पूर्णत्वीं समरसलें ।
म्हणसी देह काष्ठवत्‌ पडिले । ऐसें नाही ॥३॥
अशा प्रकारे त्याने कल्पनेचा त्याग केला, पूर्ण आहे ते पूर्णत्वामध्ये समरसून गेले. पण याचा अर्थ त्याचा देह काष्ठवत् पडला असेनाही. (३)

तीं पूर्वसंस्कारें चळतें । त्रिविध कार्य निफजतें ।
आपण स्वस्वरूप स्मरणातें । विस्मरणातीत ॥४॥
त्याचा देह पूर्वसंस्कारांनी चलनवलन करत असतो. त्याच्याकडून कायिक, वाचिक, मानसिक अशी तिन्ही प्रकारची कायें होत असतात. तो स्वत: मात्र विस्मरणातीत होऊन म्हणजे विस्मरण सोडून स्वस्वरूपाच्या स्मरणात मग्न असतो. (४)

कुल्लाळ पावला राजपदवी । मग रासभें कासया राखावी ।
तैसी देहद्वयाची उठाठेवी । निर्विकल्पा कासया ॥५॥
कुंभाराला राजाचे पद प्राप्त झाले. मग त्याने गाढवे कशाला राखत बसावे ? त्याप्रमाणे एकदा निर्विकल्प झाल्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांची उठाठेव करण्याचे त्याला कारण काय ? (५)

असो स्मरणविस्मरणावरी । बिंदुलें घातलें निर्धारीं ।
शुष्क तृणाचे परी । देहद्वय वर्तती ॥६॥
असो, याप्रमाणे तो स्मरण आणि विस्मरण या दोन्हींचाही त्याग करतो, मग त्याचे दोन्ही देह वाळलेल्या गवताप्रमाणे होतात. (६)

देहासी अति सुख जालें । कीं अत्यंत दुःखें पीडिलें ।
जागृत की झोपीं गेलें । न स्मरे तो ॥७॥
त्याच्या देहाला अतिशय सुख झाले किंवा तो देह अतिशय दुःखाने पीडित झाला, तो जागृतीत असला काय किंवा झोपेत गेला काय, त्याला कशाचेच स्मरण नसते. (७)

देह स्वजनीं कीं रानीं । भूमीं कीं अंथरूणीं ।
ग्रामीं कीं स्मशानीं । न स्मरे तो ॥८॥
देह आप्तस्वकीयांच्या मध्ये आहे की आडरानात आहे, भूमीवर आहे की अंथरुणावर आहे, गावात आहे की स्मशानात आहे याचे त्याला स्मरण नसते. (८)

देशीं कीं विदेशीं । कुग्रामीं कीं काशीं ।
वोहळीं कीं भागिर्थीसी । न स्मरे तो ॥९॥
देह स्वत:च्या देशात आहे की विदेशात आहे, कुग्रामात आहे की काशीमध्ये आहे, ओढ्यात आहे की भागीरथीमध्ये आहे, याचे त्याला स्मरण नसते. (९)

पलंगीं कीं चौरंगीं । शीतळीं की आगीं ।
भोगी कीं विरागीं । न स्मरे तो ॥१०॥
तो पलंगावर आहे की, चौरंगावर आहे, थंड जागी आहे की आगीत आहे, भोग भोगत आहे की विरक्त अवस्थेत आहे, याचे त्याला स्मरण नसते. (१०)

ब्राह्मण कीं क्षत्रीं । संन्याशी कीं अग्निहोत्री ।
पुत्रपौत्रीं कीं अपुत्रीं । न स्मरे तो ॥११॥
तो ब्राह्मण आहे की क्षत्रिय, संन्यासी आहे की अग्निहोत्री; पुत्र, नातवंडे यांच्यामध्ये आहे की निपुत्रिक आहे; याचे त्याला स्मरण नसते. (११)

मनुष्य कीं गंधर्व । देव किंवा दानव ।
रंक असे कीं राव । न स्मरे तो ॥१२॥
तो मनुष्य आहे की गंधर्व, देव आहे की दानव, गरीब आहे की राजा, याचे त्याला स्मरण नसते. (१२)

समुदाई कीं एकला । चालतो कीं बैसला ।
नाचतो कीं निजेला । न स्मरे तो ॥१३॥
तो समुदायात बसलेला आहे की एकटाच आहे; चालतो आहे की बसलेला आहे, नाचतो आहे की झोपलेला आहे, याचे त्याला स्मरण नसते. (१३)

तृषित किंवा प्याला । धाला किंवा भुकेला ।
चंदनें कीं विष्ठेनें लेपिला । न स्मरे तो ॥१४॥
तहानेलेले आहे की पाणी पिऊन तृप्त झालेला आहे, जेवण करून तृप्त झालेला आहे की भुकेलेला आहे, चंदनाचा लेप दिलेला आहे की विष्ठेने लिडबिडलेला आहे, याचे त्याला स्मरण नसते. (१४)

पादचारी कीं सुखासनी । संगे पुरुष कीं कामिनी ।
कंठी हार कीं धामिनी । न स्मरे तो ॥१५॥
तो पायी चालतो आहे की पालखीत आहे, त्याच्याबरोबर पुरुष आहे की स्त्री, त्याच्या गळ्यात हार आहे की धामण, याचे त्याला स्मरण नसते. (१५)

निंदिती कीं स्तविती । पूजिती कीं ताडिती ।
ओढिती कीं फाडिती । न स्मरे तो ॥१६॥
लोक त्याची निंदा करत आहेत की स्तुती, त्याची पूजा करत आहेत की त्याला मारत आहेत, त्याला ओढत आहेत की फाडत आहेत, त्याला त्याचे स्मरण नसते. (१६)

नेसला कीं नागवा । चेतन कीं जड पडावा ।
बांधिला किंवा सोडावा । न स्मरे तो ॥१७॥
त्याने वस्त्र नेसलेले आहे की तो विवस्त्र आहे, तो चैतन्ययुक्त आहे की जड होऊन पडलेला आहे, त्याला बांधून ठेवलेले आहे की मुक्त आहे. याचे त्याला स्मरण नसते. (१७)

जन्मलें कीं मेलें । जाळिलें कीं पुरिलें ।
किंवा वैकुंठासी नेलें । न स्मरे तो ॥१८॥
तो जन्मला आहे की मरण पावलेला आहे, त्याला जाळलेले आहे की पुरलेले आहे की त्याला वैकुंठाला नेण्यात आले. याचे त्याला स्मरण नसते. (१८)

मद्यपी जैसा उन्मत्त । वस्त्रशस्त्रातें नेणत ।
तैसा हा विदेहमुक्त । देहातें न स्मरे तो ॥१९॥
त्याचा देह दारुड्यासारखा उन्मत्त आहे, त्याला वस्त्राचे अथवा शस्त्राचे भान नसते, असा हा विदेहमुक्त असतो त्याला देहाचे स्मरण नसते. (१९)

येणेंचि परी वाणी । बोलती किंवा मौनी ।
लौकिकी कीं पुराणी । न स्मरे तो ॥२०॥
याच प्रकारे त्याची वाणी बोलती आहे की मौनी, ती लौकिक आहे की पुराणकालीन आहे, याचे त्याला स्मरण नसते. (२०)

शिकवी कीं वेडा लावी । शुभाशुभ कोणे जाणावी ।
निंदा कीं स्तवनीं प्रवर्तावी । न स्मरे तो ॥२१॥
ती वाणी लोकांना शिकवते की वेड लावते ? ती शुभ आहे की अशुभ हे कोणी ठरवायचं ? ती निंदेस प्रवृत्त होते की स्तुतीस ? याचे त्याला स्मरण नसते. (२१)

भजनीं कीं श्रवणीं । कीं प्रवर्ते वक्तेपणीं ।
आगमीं कीं वेदपठणीं । न स्मरे तो ॥२२॥
तो भजन करतो आहे की श्रवण करतो आहे ? की वक्तृत्व करतो आहे ? तो उपनिषदे वाचतो आहे की वेदपठन करतो आहे, याचे स्मरण त्याला नसते. (२२)

ऐकतो कीं पाहतो । खातो कीं वास घेतो ।
अस्पर्श किंव स्पर्शतो । तेही स्मरेना ॥२३॥
तो ऐकतो आहे की पाहतो आहे ? तो खात आहे की नुसताच वास घेतो आहे ? तो स्पर्श करतो आहे की स्पर्श करत नाही आहे ? तेही त्याला स्मरत नाही. (२३)

तैसेचि मनाचेही धर्म । धर्म चिंती की अधर्म ।
कुकर्म कीं अकर्म । न स्मरे तो ॥२४॥
त्याप्रमाणेच मनाच्या धर्माबाबतीतही असते. तो धर्माचे चिंतन करतो की अधर्माचे ? तो वाईट कमें करतो आहे की कमेंच करत नाही आहे ? हे काही त्याला स्मरत नाही. (२४)

व्यापारीं कीं स्वप्नीं । कीं सुषुप्तींत पडे जाउनी ।
शोकें कीं हर्षे होन्ही । न स्मरे तो ॥२५॥
तो व्यवहार करतो आहे की स्वप्नात आहे ? की झोपेत गेला आहे ? तो शोकात निमग्न आहे की आनंद भोगतो आहे ? हे त्याला स्मरत नाही. (२५)

मननीं कीं देवताध्यानीं । सगुणीं किंवा निर्गुणीं ।
अथवा लागे विषय चिंतनीं । न स्मरे तो ॥२६॥
तो मनन करतो आहे की देवतेचे ध्यान करतो आहे ? तो सगुणाचे ध्यान करतो आहे की निर्गुणाचे ? अथवा विषयांच्या चिंतनात दंग आहे हे काही त्याला स्मरत नाही. (२६)

लोकांती कीं एकांती । भोगीं किंवा विरक्ति ।
सुवर्ण किंवा माती । न स्मरे तो ॥२७॥
तो लोकांमध्ये आहे की एकांतात आहे ? भोगात आहे की विरक्तीत आहे ? समोरची वस्तू सोने आहे की माती ? हे काही त्याला स्मरत नाही. (२७)

स्वर्गीं कीं पाताळी । सत्यलोकीं कीं भूमंडळीं ।
कीर्तनी कीं गोंधळीं । न स्मरे तो ॥२८॥
तो स्वर्गलोकात आहे की पाताळात ? सत्यलोकात आहे की भूमंडळात ? कीर्तनात रमलेला आहे की गोंधळात ? याचे त्याला स्मरण नसते. (२८)

धामीं कीं आरामीं । जनीं किवा श्रीरामीं ।
निष्काम किंवा कामीं । न स्मरे तो ॥२९॥
तो आपल्या घरी आहे की बागेत आहे ? तो लोकामध्ये वावरतो आहे की श्रीरामाचे चिंतन करतो आहे ? तो कामनारहित आहे की कामनेने व्याप्त आहे याचे त्याला स्मरण नसते. (२९)

मन आहे कीं नाहीं । समाधीं कीं प्रवाहीं ।
गेलें कीं आलें पाहीं । न स्मरे तो ॥३०॥
त्याला मन आहे की नाही ? तो समाधीत आहे की प्रवाहात पडला आहे ? आपल्या वस्तू गेल्या की आल्या ? याचे त्याला स्मरण नसते. (३०)

हें ब्रह्मांड गेलें कीं आहे । सृष्टी कीं स्थिति होताहे ।
कीं लया गेलें सर्व हें । न स्मरे तो ॥३१॥
हे ब्रह्मांड नष्ट झाले आहे की अजून आहे ? सृष्टिरचना चालू आहे की तिला स्थैर्य प्राप्त झाले आहे ? की हे सर्वच लय पावले आहे ? याचे त्याला स्मरण नसते. (३१)

कैचें वैकुंठ कैचें कैलास । सर्व आटलें एक मूस ।
पंच भूतांचा बा कस । वितळून गेला ॥३२॥
त्याला वैकुंठ काय नी कैलास काय, सर्व एका मुशीत आटून गेल्यासारखे वाटते. पंचभूतांचा वेगळेपणाही वितळून गेल्यासारखे वाटते. (३२)

कैंची माया कैंचे अज्ञान । कैंचे ध्यान कैंचे ज्ञान ।
कैंची समाधि उत्थान । जाणिव नेणीव कैंची ॥३३॥
त्याला माया काय, अज्ञान काय; ध्यान काय ज्ञान काय; समाधी काय, उत्थान काय; जाणीव काय, नेणीव काय; या कशाचेच भान नसते. (३३)

ऐशी स्थिति जया पुरुषाची । तया वर्णिता मति कैंची ।
सविकल्प कीं निर्विकल्पाची । दशा राहिली ॥३४॥
ज्या पुरुषाची अशी अवस्था असते, त्याचे वर्णन करायला बद्धी कशी समर्थ होईल ? त्याची अवस्था सविकल्पाची आहे की निर्विकल्पाची हेही ठरवता येत नाही. (३४)

ऐशी दशा नव्हे जयासी । स्थिति तरी आठवा मानसीं ।
संग्रामशूर जो पुण्यराशी । त्यासीच घडे ॥३५॥
अशी दशा ज्याला अनुभवता येत नाही. त्याने निदान त्याच्या स्थितीचे मनाने स्मरण तरी करावे. अशा प्रसंगाशी दोन हात करायला जो समर्थ शूरवीर असेल आणि ज्याच्या पदरी पुण्याचा साठा असेल त्यालाच हे शक्य होईल. (३५)

मुखीं बोलतां वाटे सोपें । करणीं करतां टीर कांपें ।
देहबुद्धि सांडितां अति सोपें । कठीण नव्हे ॥३६॥
तोंडाने बोलायला हे सोपे वाटते. पण त्याप्रमाणे आचरण करताना मात्र कठीण परिस्थिती होते. देहबद्धीचा त्याग करणे ही सोपी गोष्ट नाही. ती कठीण नाही काय ? (३६)

देह प्रारब्धा आधीन । हें नव्हें की अप्रमाण ।
याचा सांडिताही अभिमान । आयुष्य आहे तों न मरे ॥३७॥
देह तर प्रारब्धाच्या अधीन असतो हे खोटे नाही. पण त्याचा अभिमान सोडणे हे आयुष्य असतोपर्यंत शक्य नाही. तो अभिमान आयुष्य सरेपर्यंत सरत नाही. (३७)

येथें असे गुरुकिल्ली । अहंकारें तनु धरिली ।
उभयासहित जेणें टाकिली । टाकित्या सहित ॥३८॥
देहबुद्धी सोडण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे. अहंकाराने देहाचा ताबा घेतला आहे. त्या दोहोंचाही त्याग करणाऱ्यासह करता आला पाहिजे. (३८)

एक गेला एक राहिला । तेणें अवलंबिलें तिजला ।
राहो जावो आम्हांला । शब्द नाहीं ॥३९॥
मग एक गेला, एक राहिला; त्याने देहबुद्धीला ग्रासले; तो राहो अथवा जावो इत्यादींच्या बाबतीत आम्हांला बोल देऊ नका (आम्हांला दोष देऊ नका. ) (३९)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
विदेहस्थितिप्रकारे । पंचमसमासः ॥५॥
विदेहलक्षणपंचिका संपूर्णा ॥११॥ ओवीसंख्या १४२ ॥
हरिः ॐ तत्सत्

GO TOP