॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(उत्तरार्ध)

पंचिका १२ वी
सहजस्थितिलक्षण

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
सप्तविधसमाधान


जीवन्मुक्ति विदेहमुक्ति । दोहीं वेगळी सहजस्थिति ।
बद्धमुक्ततेची समाप्ति । जाली जेथें ॥१॥
जीवन्मुक्ती व विदेहमुक्ती या दोहोंपेक्षा सहजस्थिती वेगळी असते. त्या स्थितीमध्ये बद्धमुक्ततेची समाप्तीच होते. (१)

शिंपीचें काढून रजतु । मृगजळावरी बांधिला सेतु ।
परपार पावे वंध्यासुतु । जाला निवांत सुखरूप ॥२॥
शिंपल्याची चांदी काढून त्याचा मृगजळावर पूल बांधला. वंध्येचा पुत्र त्यावरून जाऊन परतीराला पोहोचला व निवांत सुखरूप झाला. (२)

भवसागरीं साधनांचा । सेतु बांधिला हा साचा ।
परपार पावला सुखाचा । चिदाभास ॥३॥
त्याप्रमाणे संसारसागरावर विविध साधनांचा पूल बांधला. हा जीव त्यावरून पलीकडे जाऊन सुखी झाला. (३)

रज्जु सर्प जीवें मारिला । मारिता बहु कष्टी जाला ।
शेवटीं जाउनी निजेला । आकाशामाजीं ॥४॥
रज्जुसर्पाला प्राणांनिशी ठार मारताना वंध्यापुत्र खूप कष्टी झाला. शेवटी तो आकाशात जाऊन झोपला. (४)

तैसा शब्द हा शिणला । येणें मोहाचा घात केला ।
होपळपणें लया गेला । शून्यामाजीं ॥५॥
त्याप्रमाणे शब्दाने मोहाचा घात केला त्यामुळे त्याला खूप शीण आला व पोकळपणाने तो शून्यामध्ये लय पावला. (५)

मुक्याबहिरिया गांठी पडली । निरूपणाची सीमा जाली ।
दोन्हींपणें वहात गेलीं । उगमाचिकडे ॥६॥
मुक्याबहिऱ्यांची गाठ पडली. निरूपणाची अगदी सीमा झाली. दोघेही वाहत वाहत उगमाकडे येऊन पोहोचले. (६)

शिष्य बहिरा गुरु मुका । तुटला द्वैताचा तवका ।
मीतूंपण मिळाले एका । नामरूप सांडोनी ॥७॥
शिष्य बहिरा होता, गुरू मुका होता. त्यांच्यातील द्वैतभावाची पकड सुटली. त्यामुळे नामरूपांचा त्याग करून त्यांचे मी-तूपण शेवटी एकरूप झाले. (७)

मेहुणी पाहुणी आली । तिनें गृहधनीण ग्रासिली ।
खातां खातांचि विराली । आपणही तेथें ॥८॥
मेहुणी पाहुणी म्हणून आली. तिने घरधनिणीला गिळून टाकले व खाता खाता स्वत:ही तेथेच विरून गेली. (८)

देहबुद्धि हे दांडुगी । ब्रह्मबुद्धि पावली वेगीं ।
देहबुद्धि झडतां वाउगी । ब्रह्मबुद्धि होय ॥९॥
तशी देहबुद्धी बलवान होती. पण तिच्याकडे ब्रह्मबुद्धी आली त्यामुळे देहबुद्धी तर झडलीच, पण त्यानंतर ब्रह्मबुद्धीही व्यर्थ ठरून नाहीशी झाली. (९)

आकाशपुष्पें करून गोळा । वायुतंतूनें केली माळा ।
तेचि वंध्यापुत्राचे गळां । अति शोभा पावली ॥१०॥
आकाशापुष्पे गोळा करून वाऱ्याच्या धाग्यांनी त्यांची माळ केली. ती माळ वंध्यापुत्राच्या गळ्यात अतिशय शोभू लागली. (१०)

सकळ शास्त्रीचे सिद्धांत । मननामाजीं प्रवर्तात ।
विचर जाला सुशोभित । वंध्यापुत्रापरी ॥११॥
त्याप्रमाणे सर्व शास्त्रांचे सिद्धान्त मननाकडे प्रवृत्त होतात. त्यामुळे त्या वांझेच्या पुत्राप्रमाणे विचारही सजला. (११)

रांझणींचें प्रतिबिंब काढिलें । दग्धपल्लवीं दृढ बांधिलें ।
चांदणियामाजीं घातलें । सुकावया ॥१२॥
रांजणातील प्रतिबिंब काढून जळालेल्या पालवीमध्ये ते पक्के बांधले आणि चांदण्यामध्ये सुकण्यासाठी वाळत घातले. (१२)

संचितक्रियमाणीं अडकलें । चैतन्य विवेकें काढिलें ।
प्रारब्धभोगार्थ सुकूं घातलें । अंतःकरणीं ॥१३॥
त्याप्रमाणे संचित क्रियमाण यात अडकलेल्या चैतन्याला विवेकाने बाहेर काढून प्रारब्ध भोगण्यासाठी अंत:करणामध्ये सुकायला घातले. (१३)

शिर उडवितां स्थाणुपुरुषाचें । तीन विभाग जाले त्याचे ।
एक निमाले एक नाचे । तिजा सागरीं पडिला ॥१४॥
स्थाणुपुरुषाचे शिर उडविताच त्याचे तीन विभाग झाले. एक मृत्यू पावला, एक नाचू लागला आणि तिसरा सागरात जाऊन पडला. (१४)

एक अहंकार त्रिविध जाला । मुख्य तो तेथेंचि निमाला ।
लौकिकी एक राहिला । एक गेला पूर्व स्थळा ॥१५॥
त्याप्रमाणे एक अहंकार तीन ठिकाणी विभागला गेला. मुख्य अहंकार जागचे जागी शांत झाला. एक लौकिकात राहिला आणि तिसरा पूर्वस्थळाकडे परत गेला. (१५)

वायु काटवणीं अडकला । पुत्र वेगेसी धाविला ।
सर्व वृक्षाचा ग्रास केला । सोडविलें पित्यातें ॥१६॥
वारा काट्याच्या जाळीत अडकला. त्याचा पुत्र त्याच्या सुटकेसाठी धावला. त्याने सर्व वृक्षांचा घास करून पित्याला मुक्त केले. (१६)

देहद्वयीं हा आत्मा । सापडलासे महात्मा ।
ज्ञानें जाळूनि सकार्य तमा । आत्मारामा सोडविलें ॥१७॥
त्याप्रमाणे दोन देहांच्या कचाट्यात बिचारा आत्मा अडकून पडला. तेव्हा ज्ञानाने कार्यासहित अज्ञानाला (तमाला) जाळून आत्मारामाला सोडविले. (१७)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
मिथ्यात्वलक्षणप्रकारे । प्रथमसमासः ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
सहजत्वलक्षण


बंधचि हा साच असावा । तरी मोक्षही मिरवी नांवा ।
यास्तव बंधमोक्षगोवा । सर्वथा नसे ॥१॥
सहजत्वलक्षण बंध जर खरोखर सत्य असता तर मोक्ष या नावालाही अर्थ प्राप्त झाला असता. म्हणून दोन्ही मिथ्या असल्यामुळे बंध आणि मोक्ष यांचा गुंता अजिबात नाही. (१)

ब्रह्मीहून भिन्न असता । तरी कैसा पा अभिन्न होता ।
ज्ञानेंचि केला सरता । हें व्यर्थ नव्हे ॥२॥
जीव ब्रह्माहून मुळातच भिन्न असता तर तो अभिन्न कसा होईल ? आणि ज्ञानाने त्याला मुक्त केला असे म्हणणेही व्यर्थ नाही काय ? (२)

अरे हें उगेंचि सहजगति । इतुकीही मायेची शक्ति ।
मिथ्यात्वें बांधितीं सांडिती । नवल तिचें ॥३॥
अरे हे सर्व व्यर्थच चालले आहे. ही सर्व मायेची शक्ती आहे. खोटी असूनही ती जीवांना बांधते, सोडवते हे तिचे नवलच होय. (३)

सहज ब्रह्म परिपूर्ण । सहज अखंड दंडायमान ।
सहजचि जालें स्फुरण । ज्ञानाज्ञानरूप ॥४॥
परिपूर्ण ब्रह्म सहजावस्थेतच असून ते अखंड अस्तित्व असलेले असे आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञानाज्ञानारूपी स्फुरण सहजच झालेले असते. (४)

सहज अज्ञानीं पडिलें । सहज जडा अवलंबिलें ।
सहजचि भोगू लागलें । जन्ममृत्यूतें ॥५॥
जीवही अज्ञानात सहजच सापडतो. तो सहजच जड देहाचा स्वीकार करतो आणि तो सहजच जन्म, मृत्यू यांचा भोग घेऊ लागतो. (५)

सहज कर्म करूं लागला । सहज योनी फिरे भ्रमला ।
सहजचि पुण्यपापें अवंतिला । सहज सुखदुःखा ॥६॥
तो सहजच कमें करू लागतो, सहजच अनेक योनी फिरत राहतो, सहजच पुण्यपापांच्या कचाट्यात सापडतो आणि सुखदुःखांना सहजच निमंत्रण देतो. (६)

सहज पुण्याच्या कोटी । नरदेहाची लाधली पेटी ।
सहज उपजला अनुताप पोटीं । सहज विरक्ति बाणे ॥७॥
पुण्याच्या कोटिभर राशीमुळे त्याला नरदेहाची पेटी सहज प्राप्त होते. त्यानंतर ओघानेच त्याला पश्चात्ताप वाटू लागतो, त्यानंतर त्याला सहजच वैराग्य प्राप्त होते. (७)

सहज सद्‌गुरू सत्शास्त्र । सहज श्रवणादि विचार ।
सहज होय साक्षात्कार । सहज भेटी आपुली ॥८॥
नंतर सद्गुरूंची भेट सहजच घडते, सच्छास्त्राचे सहजच श्रवण इत्यादी घडते, मग विचारही करतो आणि त्यातून सहजच साक्षात्कार पडतो आणि आपल्या आत्म्याची भेटही सहजच होते. (८)

सहजची अज्ञान गेले । सहजची ज्ञान मावळलें ।
सहजपणें उरलें । सहजी सहज ॥९॥
मग अज्ञान सहजच नष्ट होते, त्यानंतर ज्ञानही सहजच मावळते आणि सहजपणे सहजात सहज आत्मतत्त्व उरून राहते. (९)

सहज संचित जळालें । सहज क्रियमाण विरालें ।
सहज देह वर्तू लागले । प्रारब्धभोगीं ॥१०॥
मग संचित सहजच जळून जाते, क्रियमाण विरून जाते, आणि देह सहजपणे प्रारब्ध भोगत राहतो. (१०)

सहज निमाला संशय । सहज प्रवर्ते यथान्वय ।
सहजचि न करी उपाय । प्रारब्धक्षयासी ॥११॥
मग संशय सहजपणे नष्ट होतो आणि मग तो पुरुष यथाक्रम सहजपणे वावरू लागतो. तो प्रारब्धक्षय होण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करत नाही. (११)

सहज हे होती जाती । सहज इंद्रियें शिणतीं ।
सहजची आपली स्थिति । परिपूर्ण असे ॥१२॥
या सर्व गोष्टी सहजच होत राहतात, इंद्रियांना सहजपणे थकवा येतो, तसे आत्म्याची स्थिती सहजपणेच परिपूर्ण असते. (१२)

सहजत्व आपुलें नवचे । सहज होईना फुकाचें ।
क्षयवृद्धिवीण सहजाचें । सहजत्व असे ॥१३॥
आपले सहजपण कोठेही जात नाही, सहजपण व्यर्थ होत नाही. सहज आत्मतत्त्वाचे सहजपण क्षय, वृद्धी यांवाचून कायम असते. (१३)

सहज भोग संपतां । सहज देहाची नुरे वार्ता ।
ऐसें सहजचे असतां । निर्भय सहज ॥१४॥
मग प्रारब्धभोग सहजपणे संपून जातात, त्यामुळे देहाचे अस्तित्वच संपल्यासारखे होते, असे सगळे सहजपणे घडत असल्याने पुरुष सहजच निर्भय होतो. (१४)

सहज नामरूप गेलें । सहजचि अस्ति भाति उरलें ।
सहज सर्व दिसूं लागलें । मिथ्यात्व सहज ॥१५॥
मग नानरूपे सहजच नष्ट होतात, सहजच अस्तिभाति ही लक्षणे उरतात. सगळ्याच गोष्टी सहजपणे मिथ्या दिसू लागतात. (१५)

सहज मिथ्यात्व जडासी । सहज खंडिले विजातीयासी ।
ब्रह्मात्मैक्यीं सजातीय भेदासी । सहज निर्मूळ केले ॥१६॥
जड पदार्थांना सहजपणेच मिथ्यात्व येते, विजातीय असतील त्याचे सहजच खंडन होते आणि ब्रह्मात्मैक्याच्या अनुभवामध्ये सजातीय भेदही निर्मूल ठरतात. (१६)

सहज विरालें स्फुरण । स्वगत भेदाचें हें खंडन ।
सहज पावलें समाधान । प्रबोध होता ॥१७॥
स्फुरण सहज विरून जाते. स्वगत भेदाचे अशा प्रकारे खंडन होते. ज्ञान होताच समाधानही सहजपणेच प्राप्त होते. (१७)

सहज देश आटला । तरी देशपरिच्छेद कोणाला ।
स्फुरणाभावीं काळाला । कलनत्व कैंचे ॥१८॥
या अनुभवात देशभेद सहज आटून जातो, मग देश परिच्छेद कोणाला लागू होईल ? स्फुरणाचा अभाव असल्याने काळाला गती तरी कशी प्राप्त होईल ? (१८)

सहज कालपरिच्छेद । जाउनी सहजत्वें अभेद ।
वस्तुजाताचा उपमर्द । सहजची जाला ॥१९॥
कालपरिच्छेद सहजपणेच नष्ट झाल्यानंतर सहजपणेच जीवाची ब्रह्मतत्त्वाशी अभिन्नता होते. त्यामुळे सर्व पदार्थांचा निरास आपोआपच होतो. (१९)

वस्तुपरिच्छेद निमतां । सहज अनंतत्व अनंता ।
सहज स्वप्नींचा जागा होतां । सकार्य नासलें ॥२०॥
अशा त-हेने वस्तुपरिच्छेद नाहीसा झाल्यानंतर अनंत अशा आत्मतत्त्वाची अनंतता सहजच होते. तो स्वप्नातून सहजच जागा होतो. मग ते स्वप्न त्याच्या कार्यासह नष्ट होते. (२०)

सहज इतके मायेने । खेळ खेळून लय पावणें ।
सहज सहजीं अखंडपणें । जैसें तैसें संचले ॥२१॥
एवढा सगळा खेळ करून माया सहजपणे लय पावते. सहज ब्रह्म हे अखंडपणे आपल्या सहजपणात जसेच्या तसे असते. (२१)

सृष्टि पूर्वी सहजचि असे । सहजत्व प्रलयीं उरलेसे ।
मध्येंही जें जें होतसें । तेंही सहजपणें ॥२२॥
सृष्टी सहजच झाली आहे. प्रलयही सहजच होणार आहे. मधल्या काळात जे जे होत आहे तेही सहजपणेच होत असते. (२२)

सहज होतां जातां । सहज हलेना तत्वतां ।
मग हानिलाभाची वार्ता । सहजत्वें कोठें ॥२३॥
सर्व घडामोडी सहज होत जात असताना सहज ब्रह्म मात्र हलत नाही. त्यामुळे सहजपणात हानिलाभाची गोष्ट कशी असेल ? (२३)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
सहजत्वलक्षणानुकारे । द्वितीयसमासः ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
अकर्तृत्वनिरूपण


सहज होतांही व्यापार । समाधि न मोडे अणुमात्र ।
तिहीं अवस्थेचे विकार । असतांचि सरले ॥१॥
व्यापार सहजपणे होत असताही समाधी अणुमात्रही भंग पावत नाही. तिन्ही अवस्थांचे विकार त्या तीन अवस्था असतानाच संपतात. (१)

सत्वांश अंतःकरण भोक्ता । रजांश इंद्रिय साधनता ।
तमांश विषय कार्यजाता । गुणा गुण सेविती ॥२॥
सत्त्वगुणाचा अंश अंत:करण हे भोक्ता आहे. रजोगुणाचा अंश इंद्रिये ही साधने आहेत आणि तमोगुणाचा अंश विषय हे कार्य आहे. म्हणजे गुणच गुणांचे सेवन करतात. (२)

परी हे विकार बुद्धीचे । प्रतिबिंबहि भोक्तृत्व नवचे ।
मा अलिप्तत्व मुख्यबिंबाचे । काय बोलावें लागे ॥३॥
पण हे सर्व विकार बुद्धीचे होत. प्रतिबिंबालाही कधी भोक्तृत्व येत नाही. मग मुख्य बिंब अलिप्त असते हे काय सांगायला पाहिजे ? (३)

लहरीवरी लहरी । एक मरे एक मारी ।
परी पाणियासी दुसरी । अवस्था नसे ॥४॥
एका लाटेवर दुसरी लाट येते. एक मरते दुसरी मारते. पण पाण्याला दुसरी अवस्था नसते. (४)

असो तरंतीं असे पाणी । कीं ज्वाळामाजीं अग्नि ।
तैसे अंतर्बाह्यकरणीं । विषयां व्यापुनी आत्मा ॥५॥
असो, लाटांमध्ये पाणी असते किंवा ज्वाळांमध्ये अग्नी असतो. त्याप्रमाणे अंतर्बाह्य इंद्रियांमध्ये आणि विषयांना आत्मा व्यापून असतो. (५)

अग्निसी वेगळे असती । ते अग्निसंगें जळती ।
अग्नि अग्निचिये दीप्तीं । जळे कैसा ॥६॥
अग्रीपेक्षा जे वेगळे असतील ते अग्रीबरोबर जळून जातील पण अग्रीच अग्रीच्या ज्वालेने कसा काय जळून जाईल ? (६)

लहरीयोगें जळासी । हुडहुडी न ये जैसी ।
इंद्रियव्यापारें तैसी । बाधा नव्हे ज्ञानिया ॥७॥
लाटेमुळे पाण्याला हुडहुडी येत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला इंद्रियांच्या व्यापारांनी बाधा होत नाही. (७)

प्राण सर्वदा वाहती । ते गमनागमनीं दिसती ।
ठाईच असतां तयाप्रति । गमनगती न संभवे ॥८॥
प्राण वाहात असतात, ते येतात आणि जातात. त्यांच्या या गमनागमनामुळे त्यांचे हे वाहणे समजते. ते एकाच जागी असते तर त्यांच्यात गमनगती निर्माण होणार नाही. (८)

श्रवणें ऐके शब्दजात । पन्नास मात्रा एक स्वरांत ।
शब्द उठे अवकाशांत । आकाशींच विरे ॥९॥
कानांनी सर्व शब्द ऐकू येतात. एका स्वरात पत्रास मात्रा अंतर्भूत आहेत. पण शब्द आकाशात उत्पन्न होतो आणि आकाशातच विरतो. (९)

तरी बोलिके कोण जाले । काय श्रवणीं ऐकिलें ।
ऐकोनी नायकणें जालें । सहज ज्ञानिया ॥१०॥
तर त्यांमध्ये बोलणारे कोण ? कानांनी कोणाला ऐकले ? त्याप्रमाणे ज्ञानी माणसालासुद्धा ऐकू येऊनसुद्धा न ऐकल्याप्रमाणे होते. (१०)

वायु त्वचा स्पर्श तिन्ही । असती जरी भिन्नपणीं ।
तरी स्पर्श विषय ज्ञात्यालागुनी । ग्रहण होता ॥११॥
वायू, त्वचा, स्पर्श हे खरोखर भित्र असते तर ज्ञानी माणसाला स्पर्शविषयाचे ग्रहण होईल. (११)

स्पर्शामाजीं असे सघन । पदार्थमात्रींहि आपण ।
तरी मग स्पर्श स्पर्शणें । कोण कोणासी ॥१२॥
पण तो स्पर्शामध्ये किंवा स्पर्शविषय पदार्थांमध्ये सर्वत्र आपणच दाट भरून राहिला आहे. मग स्पर्श अथवा स्पर्शाची कृती कोणी कोणाला करायची ? (१२)

मक्षिका कोठें न बैसे । पवित्र अपवित्र तें कायसें ।
डोळिया काय एक न दिसे । तरी उष्टा नव्हेची ॥१३॥
माशी कोठे बसत नाही ? तिला पवित्र आणि अपवित्र यांचे काय ? डोळ्याला सर्व दिसत असले तरी त्यामुळे तो पदार्थ उष्टा होत नाही. (१३)

पाहणें डोळाहि तेजाचें । पदार्थीं भासकत्व हें कोणाचें ।
त्रिपुटीसी घनत्व आत्म्याचें । तेथें भिन्नत्व कोणतें ॥१४॥
कारण डोळा तेजामुळे पाहतो. पदार्थात भासण्याचा (दिसण्याचा) गुणधर्म कोणाचा ? सर्वच त्रिपुटीमध्ये आत्मा दाट असा व्यापून राहिला आहे. तेथे वेगळेपणा कसा राहील ? (१४)

हें वेगळें कैसें निवडावें । तरी कोणें कोणासी पाहावें ।
ऐसे ज्ञात्याचें स्वभावें । पाहणें तें न पाहणें ॥१५॥
हे वेगळे कसे काढावे ? कोणी कोणाला पाहावे ? अशा त-हेने स्वाभाविकच ज्ञात्याचे पाहणेही न पाहणेच असते. (१५)

रस रसना रसज्ञ । निवडितां न ये एक क्षण ।
रसरूपें एक जीवन । विभागलेसे ॥१६॥
रस, रसना, रसज्ञ या तिहीना एक क्षणभर सुद्धा वेगळे काढता येणार नाही. सर्व ठिकाणी एकच जलतत्त्व रसरूपाने विभागलेले असते. (१६)

अन्न जल आणि गोडी । या वेगळे कोण निवडी ।
सच्चिद्रूप पाहून अर्ध घडी । राहों न शकती ॥१७॥
अन्न, जल आणि गोडी यांना वेगळे वेगळे कोण काढील ? या तिन्ही गोष्टी सच्चिद्‌रूप पाहिल्यानंतर अर्ध घटकासुद्धा वेगळ्या राहू शकत नाहीत. (१७)

गुळें गुळासी खादलें । कीं जीवनें जिवनाचें पान केलें ।
हे कांहीच न संभवले । भिन्नत्वाविण ॥१८॥
गुळाने गूळ खाल्ला किंवा पाण्यानेच पाणी पिऊन टाकले. पण भित्रत्व नसल्याकारणाने या गोष्टी संभवत नाहीत. (१८)

द्वैताचा न होतां उमस । आणि सर्व सेवीतसे रस ।
तरी भोजन आणि उपवास । सारखाचि तया ॥१९॥
द्वैताची उत्पत्तीच झाली नसताना सर्व रसांचे सेवन केले तर भोजन आणि उपवास त्या पुरुषाला सारखेच की ! (१९)

पृथ्वीयेचा गंध गुण । आणि भूमीचाचि अंश घ्राण ।
एकरूपें विभागून । द्विधा जाली ॥२०॥
पृथ्वीचा गंध हा गुण होय, घ्राण (म्हणजे नाक) हा भूमीचाच अंश आहे. दोन्ही एकच पण त्यांच्या एकरूपाचे विभाजन होऊन त्यांचे दोन प्रकार झाले. (२०)

अश्विन तोचि कुमार । हा नामचि भेद मात्र ।
व्यापुनी आत्मा स्वतंत्र । आकाशापरी ॥२१॥
अश्विन हाच कुमार दोहोंमध्ये फक्त नावाचाच फरक आहे. या सर्वांना व्यापून आत्मा आकाशाप्रमाणे स्वतंत्रच होय. (२१)

कापुरें कापूर हुंगावा । कीं घ्राणाचा गंध घ्राणें घ्यावा ।
भिन्नत्वाचा नसतां गोवा । विषय कैचा ॥२२॥
कापराने कापराचा सुगंध घ्यावा, किंवा नाकाचा गंध नाकानेच घ्यावा. या दोन्ही क्रियांत भित्रपणाचा काहीच संबंध नसल्याने गंध हा विषय कसा होईल ? (२२)

येणें रीती कर्मेंद्रिय । प्रवर्तती स्वस्व विषय ।
विषयासी विषयत्व काय । नामरूपाविण ॥२३॥
अशा प्रकारे कमेंन्द्रिये स्वविषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होत असली तरी नामरूपावाचून विषयाला विषयत्व वेगळे असे काही आहे का ? (२३)

आपुलीच ध्वनी । उमटली जेथें पडसादनी ।
उभयस्वरें शब्दश्रेणी । भेदावतीना ॥२४॥
आपलाच आवाज पडसादामध्ये उठतो. पण मूळ नाद आणि त्याचा पडसाद यांच्या शब्दावलीमध्ये काही भेद निर्माण होतो का ? (२४)

आपुलाचि प्रतिभास दर्पणीं । दृश्य द्रष्टा उभयपणीं ।
एकला की जाले दोनी । बरे पहा ॥२५॥
आरशामध्ये आपलेच प्रतिबिंब पाहावे, तेव्हा दृश्य, द्रष्टा असे दोन भिन्न दिसतील. पण त्या एकच व्यक्ती आहेत की त्या दोन भिन्न व्यक्ती आहेत ? याचा विचार करा. (२५)

तैसें भोग्य भोक्ता साधन । एक परी भासती तीन ।
फेन बुद्‌बुद लहरी जाण । एक जळ ॥२६॥
त्याप्रमाणे भोग्य, भोक्ता आणि साधन या तीन गोष्टी भासत असल्या तरी एकच आहेत. फेस, बुडबुडे आणि लाटा या तीन गोष्टी म्हणजे एकच पाणी असते. (२६)

न मोडतां एकपण । दिसती जरी भिन्न भिन्न ।
तेंचि जाणिजे साजिरेंपण । दुणावलें कीं ॥२७॥
एकपणा न मोडता त्या गोष्टी भिन्न भिन्न दिसल्या तरी त्यांचे साजिरेपण एकच असून दुणावले असे फार तर म्हणता येईल. (२७)

चंदन सुगंधें वेष्टिला । कीं चंदन सुगंधत्वा आला ।
एकचि द्विधा भासला । एकपणीं ॥२८॥
चंदनाला सुगंधाने वेढले की, चंदनालाच सुगंधाचे रूप आले, दोन्ही एकच. एकच चंदन असूनही दोन प्रकारचा भासला, असे म्हणता येईल. (२८)

समुद्रीं असतां पाणी । लोकोपकारार्थ मेघ आणी ।
मेघीं असतां तयालागुनी । दुजें नांव कोणतें ॥२९॥
समुद्रात पाणी असूनही मेघ लोकोपकारासाठी ते आणतो. मेघात आल्यामुळे त्या पाण्याला दुसरे कोणते नाव द्यावे ? (२९)

पाणियाच्याचि धारा । वर्षताती अपारा ।
पृथ्वी व्यापुनी सरिता पुरा । एकचि पाणी ॥३०॥
पाण्याच्याच धारा सर्वत्र कोसळत असतात. पृथ्वी व्यापून नद्या वाहत असतात. सर्वत्र पाणी एकच असते. (३०)

पुन्हा सागरीं मिळालें । पाणीपणा नवचे मुकलें ।
तरी आलें अथवा गेलें । बोलणें तें वाव ॥३१॥
ते परत समुद्राला मिळते. त्याचा पाणीपणा नष्ट होत नाही. तेव्हा पाणी आले, पाणी गेले असे बोलणेही व्यर्थ ठरते. (३१)

मन वायुपासून जालें । आणि आकाशीं राहिलें ।
उभय कारण सांडून गेलें । मन तें कोठें ॥३२॥
मन वायूपासून निर्माण झाले आणि आकाशात राहिले, पण दोन्ही कारणांना सोडून मन अन्यत्र कोठे गेले काय ? (३२)

हिंडतां होय हिंपुटी । परि ते आकाशाचिया पोटीं ।
जातां येतांहि शेवटी । ठाईचा ठाई ॥३३॥
हिंडण्याने त्याला कष्ट होत असतील, पण ते आकाशाच्याच पोटात असते. ते गेले आले तरी शेवटी जागच्या जागीच राहते. (३३)

कुलालचक्रीं बैसली मासी । भोवतां दिसे चक्रासरिसी ।
परी ते अढळ जैसी तैसी । मनही तैसें ॥३४॥
कुंभाराच्या चाकावर माशी बसली. चक्राचे भ्रमण चालू झाल्यावर ती चक्रासारखी दिसली तरी ती जशीच्या तशी अढळच असते. मनाचेही तसेच आहे. (३४)

प्राण वायूतें जरी सांडी । मनीं मनपणा होय प्रौढी ।
तरी गमनागमन तातडी । बोलों येती सुखें ॥३५॥
प्राण वायूला सोडून जात असता, मनातच राहून मनाला प्रौढी (मोठेपणा) वाटत असती तर गमनागमन इत्यादी भाषा सुखाने वापरता आली असती. (पण तसे होत नाही.) ( ३५)

जैसे पक्षियाचे चरणीं । हातीं राहे सूत्रबंधनीं ।
तेथुनी उडे परी पाणी । न सोडी जैसा ॥३६॥
पक्ष्याच्या पायाला दोरी बांधून तो हातावर ठेवता येतो. तेथून तो उडेल पण हाताला सोडून जात नाही. (३६)

हें असो मनें कल्पिलें । सूक्ष्मचि जडत्वा आलें ।
मनविषयासी जाले । दोनी नाम ॥३७॥
हे असो, मन कल्पना करते. सूक्ष्माला जड स्वरूप येते. मनाचेच दोन्ही विषय. पण दोन्हीही एकच. त्यांना फक्त दोन भिन्न नावे असतात. (३७)

एकचि दो ठाई होतां । तरी कैचा भोग्य भोक्ता ।
हे उगीच द्वैत वरता । दिसे परी मिथ्या ॥३८॥
एकच वस्तू दोन ठिकाणी होताच भोग्य कोण आणि भोक्ता कोण ? वरून द्वैत दिसत असले तरी ते मिथ्या असते. (३८)

जाणें येणेंही न संभवे । विषया विषयत्वही नव्हे ।
तरी कोणें कोणा भोगावें । द्वैतचि नाहीं ॥३९॥
वस्तुतः जाणे येणे या दोन्ही क्रिया येथे संभवत नाहीत. विषयांनासुद्धा विषयत्व येत नाही. तेव्हा द्वैतच नसल्यामुळे कोणी कोणाला भोगावे ? (३९)

हेंचि पुढेंहि निरोपिलें । ज्ञात्याचे देह वर्तले ।
परी निश्चलत्व संचलें । जैसें तैसें ॥४०॥
याच अनुभूतीचे पुढे वर्णन केले आहे. ज्ञात्याचा देह व्यापार करत असला तरी त्याचे निश्चलत्व जसेच्या तसे राहते. (४०)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
अकर्तृत्वनिरूपणप्रकारे । तृतीयसमासः ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
सहजस्थितीप्रकार


करोनी कांहीच न करी । भोगोनि अभोक्ता निर्धारी ।
ऐसी हतवटी दुसरी । सहजस्थितिविण नसे ॥१॥
करूनही काहीच न करण्याची, भोगूनही काहीच न भोगण्याची हातवटी सहजस्थितीखेरीज दसरीकडे कोठे नाही. (१)

चांदणी चंद्र शोभला । चंद्रचि चांदणत्वें पघळला ।
विषय सेवितां करणाला । भिन्नत्व  तैसें ॥२॥
चांदण्यामुळे चंद्र शोभिवंत होतो किंवा चंद्र चांदण्याच्या रूपाने पाघळतो. विषयांचे सेवन करताना इंद्रियांचे भिन्नत्व तशा प्रकारातले होय. (२)

ज्वालें अग्नि प्रकाशिला । द्विगुण शोभा पावला ।
तयासि भेद नवचे कल्पिला । रतिमात्र जेवि ॥३॥
ज्वालेमुळे अग्नी प्रकाशित झाला, तिच्यामुळे त्याला दुप्पट शोभा प्राप्त झाली. पण दोहोंमध्ये कणभरदेखील भेद कल्पिता येत नाही. (३)

तेवि ज्ञातयाचीं करणें । स्वस्वरूपाचें पुष्टपणें ।
द्वैतरूपें विषयसेवनें । तों तों अद्वैत दुणावें ॥४॥
ज्ञात्याची इंद्रिये त्याप्रमाणे होत. द्वैतरूपाने विषयसेवन करत असतानाही स्वस्वरूपाच्या पुष्टपणाने अद्वैताचीच पुष्टी होते, अद्वैत दुणावते. (४)

जयाचा व्यापार तो एकांत । जयाचा विषय तें अद्वैत ।
जयाचा पूर्वपक्ष तो सिद्धांत । इतरां न कळे ॥५॥
त्याचा व्यापार हाच एकांत होय. त्याचा विषय म्हणजे अद्वैत होय. त्याचा पूर्वपक्ष हाच सिद्धान्त होय. तो इतरांना कळणार नाही. (५)

जयाचे मन ब्रह्मांड व्यापी । परी निश्चलत्व नवचे किमपि ।
बुद्धि निश्चया साक्षेपी । परी ते अरूप ॥६॥
त्याचे मन ब्रह्मांड व्यापते तरीसुद्धा ते आपले निश्चलत्व थोडेसुद्धा सोडत नाही, बुद्धी निश्चय करण्याच्या बाबतीत अत्यंत साक्षेपी आहे. परंतु तो निश्चय अरूप असतो. (६)

जयाचें चित्त चिंतनीं । विषयीं असतां स्वरूपस्मरणीं ।
जयाचा अहंकार त्रिभुवनीं । व्यापून असे ॥७॥
त्याचे चित्त सतत चिंतन करत असते. विषयात रममाण असूनही त्याचे स्वरूपाचे स्मरण चालू असते. त्याचा अहंकार त्रिभुवन व्यापून राहिलेला असतो. (७)

एकदेशी मी मी करिती । तेणें गुणें होय फजिती ।
तैसा नव्हे निश्चिती । सर्वाभूतीं मीच मी ॥८॥
जे एकदेशी (अव्याप्त, मर्यादित) असूनही मी मी करतात, त्यांची फजिती होते. तशी या ज्ञात्याची स्थिती नसते. तो त्यांच्यासारखा मुळीच नसतो. तो सर्व भूतांमध्ये स्वत:लाच पाहत असतो. सर्वांभूती मीच व्यापून आहे असे तो मानतो. (८)

दृश्य द्रष्टा दर्शन । गाळून जें का अधिष्ठान ।
सांडूनियां मीतूपण । अवघा मिचि दाटला ॥९॥
द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी टाळून, मी-तूपणाचा त्याग करून या सर्व भेदांचे जे मूळ अधिष्ठान ते मीच आहे, या भावनेने तो दाटलेला असतो. (९)

लैकिकीं जितके शब्द । ऐकतां ते तुल्य वेद ।
तरी द्वैतपणाचा भेद । कैंचा उरे ॥१०॥
लौकिकातले सर्व शब्द ऐकताना ते त्याला वेदतुल्य वाटतात. मग द्वैतपणाचे भित्र अस्तित्व कसे उरेल ? (१०)

ब्रह्म ब्रम्हाचिये घसणीं  स्पर्श उठे त्वचेलागुनी ।
ऐकांतीं अथवा जनीं । सारखाचि तो ॥११॥
त्याचा स्पर्शाचा अनुभव म्हणजे एक ब्रह्माचे दुसऱ्या ब्रह्माशी घर्षण होणे होय. हा अनुभव एकांतात असो वा लोकांतात असो, सारखाच असतो. (११)

जनीं जनार्दन सांडिती । मग एकांतीं कोणा धुंडिती ।
बळेंचि डोळां घालती माती । म्हणती ज्ञानांजन ॥१२॥
लोकातील परमेश्वराला जे सोडून देतात ते एकांतात कोणाचा शोध घेतात ? डोळ्यात बळेच माती घालतात आणि म्हणतात की, हे ज्ञानांजन घालतो आहे. (१२)

द्वैता भेणें पळूं जातां । द्वैत दुणावें तत्वतां ।
असो तया मूर्खाची वार्ता । कोण काज ॥१३॥
द्वैताला भिऊन पळू लागला की द्वैत दुप्पट वाढते. असो, त्या मूर्खाची गोष्ट करून काय फायदा ? (१३)

जयाचे दृष्टीचें पाहणें । जगचि होइजे जनार्दनें ।
नामरूपा सांडून जाणें । पाहण्यासरिसें ॥१४॥
ज्याच्या दृष्टीने पाहणे म्हणजे नारायणानेच सर्व जग होऊन जाणे होय आणि आपण पाहत असतानाच नामरूपाचा त्याग करणे होय. (१४)

प्रकाशापुढें जैसा तम । कीं शंकरापुढें काम ।
तैसें द्वैत जे रूपनाम । होय भस्म पक्षवातें ॥१५॥
प्रकाशापुढे अंधार किंवा शंकरापुढे मदन तसे त्याच्या वाऱ्यानेच (पक्षवात) नामरूपात्मक सर्व द्वैत भस्म होऊन जाते. (१५)

तया कासया आसन । कासयाचे देहसमान ।
दृष्टि तेथें नारायण । कोंदाटला असे ॥१६॥
त्याला (समाधीसाठी) आसनाची गरज काय ? देह ताठ ठेवून समान ठेवण्याची तरी आवश्यकता काय ? जेथे त्याची दृष्टी जाईल तेथे नारायण भरून राहिला आहे. (१६)

नेत्र जरी झांकिले । असंभाव्य स्वरूप संचले ।
अथवा तोंड जरी चुकविले । तरी ब्रम्ह सन्मुख ॥१७॥
त्याने डोळे जरी झाकून घेतले तरी त्याच्या डोळ्यात असंभाव्य स्वरूप सामावून राहिले आहे. अथवा त्याने तोंड जरी फिरविले तरी जिकडे त्याचे तोंड असेल तिकडे त्याच्यासमोरच ब्रह्म समोर उभे ठाकते. (१७)

ब्रह्म पाहतां सकळ । न पाहतां उरे केवळ ।
स्मरणीं ब्रह्मीचे कल्लोळ । विस्मरणीं तो परिपूर्ण ॥१८॥
ब्रह्माकडे पाहू लागताच पाहण्याची क्रिया न घडताच तो एकटाच उरतो. त्याच्या स्मरणात ब्रह्माचे तरंग उठत असतात आणि त्याच्या विस्मरणात तो स्वत:च परिपूर्ण ब्रह्म बनतो. (१८)

आतां डोळा दृश्य देखो । कीं दृश्यामाजीं सर्व माखो ।
कीं उभयत्व जाउनी राखो । आपुला आपण ॥१९॥
आता डोळा दृश्याचे अवलोकन करो की दृश्यामध्ये सर्व भरून जावो किंवा दृश्य, द्रष्टा दोन्ही जाऊन तो आपला आपणच राहो, (१९)

स्मरण विषयाते स्मरो । किं आपणिया उपसंहारो ।
कीं उभयातें विस्मरो । कीं स्मरो उभयातें ॥२०॥
स्मरणात विषयांचे स्मरण करो, की स्वत:चा लोप करो, किंवा दोघांनाही विसरून जावो, अथवा दोघांचेही स्मरण करो, (२०)

हानिलाभाचा खरखरा । जयाचा निमाला एकसरा ।
या हेतु आठवविसरा । विसरला तो ॥२१॥
त्याची हानिलाभाची काळजी मिटलेली असते. या दृष्टीने स्मरण विस्मरणाला तो विसरला असे म्हणावयाचे. (२१)

आपला आपणचि स्वादु । आपला आपण मकरंदु ।
रससेवनीं अभेदु । गंधग्रहणीं तैसा ॥२२॥
आपणच आपला आस्वाद घ्यावा, आपणच आपला मध सेवन करावा, तसा त्याच्या रससेवनात अथवा गंधग्रहणात अभेद निर्माण होतो. (तोच भोक्ता आणि तोच भोग्य असे संपूर्ण अद्वैत त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये असते.) (२२)

वाच्य वाचक खाउनी । वाचा प्रवर्तली वचनीं ।
पन्नास मात्रकाच्या श्रेणी । अनंत शब्द ॥२३॥
वाच्य आणि वाचक यांचा लोप करून वाचा बोलायला प्रवृत्त होते. पत्रास मातृका आणि असंख्य शब्द तयार होतात. (२३)

तयाचें बीज तो प्रणव । त्रिविधा दिसे एक नांव ।
उच्चार नाद ध्वनी आठव । चतुर्धाही तोची ॥२४॥
तरी त्या सर्वांचे मूळ बीज जो प्रणव (ओंकार) तो तीन घटकांचा दिसला तरी ते एकच नाव आहे. उच्चार, नाद, ध्वनी, स्मरण या रूपात चार प्रकारचा झाला आहे, तरी तो तोच आहे, (२४)

त्रिधा चतुर्धा वळून सूत । पन्नास गुंफिल्या असती त्यांत ।
पुढें मागें करितां उमटत । शब्दश्रेणी ॥२५॥
तीन घटकांचे रूप, अथवा चार घटकांचे रूप यांचे सूत एकत्र वळून सात पन्नास मातृका गुंफल्या आहेत. त्या मागेपुढे करून असंख्य शब्दांची मालिका उत्पन्न होते. (२५)

एक तीन पन्नास दिसती । परि ते रेखा आदिअंती ।
हे स्थूलदृष्टी भासती । ध्वनि ते सूक्ष्म ॥२६॥
एक, तीन अथवा पन्नास इत्यादी स्थूलदृष्टीने वेगळे दिसले तरी त्या सर्वात एकच रेषा असते. ते स्थूलदृष्टीने वेगवेगळे दिसत असले तरी ते सर्व सूक्ष्मरूपाने ध्वनीच असतात. (२६)

एक असून फुटी पडली । भिन्नपणें वर्ते एकली ।
ऐसी समता जेथें जाली । द्वैताची माउली वांजट ॥२७॥
ते सर्व एकच असून त्यांमध्ये फूट पडली. ते भिन्न असले तरी अभिन्नपणे वागू लागले. अशी समतादृष्टी जेथे निर्माण होते तेथे द्वैताची निर्मिती होत नाही. (द्वैताची आई वांझ असते. ४२७)

जो जो शब्द मुखीं आतुडे । ते तेहि वाणी बडबडे ।
परी किंचितही न मोडे । मौनपण ॥२८॥
मुखातून जो जो शब्द बाहेर पडतो ते ते वाणीच बडबडत असते. पण ज्ञात्याचे मौन किंचितही भंग पावत नाही. (२८)

ऐसेचि सर्वहि व्यापार । सप्तदश तत्वाचे प्रकार ।
होती जाती निर्विकार । जैसें तैसें ॥२९॥
अशा त-हेने मानवी देहाचे सर्वच व्यापार म्हणजे सतरा तत्त्वांचे प्रकारच होत. ते होतात आणि जातात. पण ज्ञाता जसाच्या तसा निर्विकार असतो. (२९)

सागरी वर्षती मेघ । कीं धावती सरिता ओघ ।
अग्नि तरणी शोषी अमोघ । परी न्यूनाधिक नव्हे ॥३०॥
सागरामध्ये मेघ वर्षाव करतात किंवा अनेक नद्यांचे प्रवाह त्यात येऊन मिळतात. अग्नी (वडवानल) , सूर्य इत्यादी पाण्याचे शोषण करतात. पण सागर मात्र कमीजास्त होत नाही. (३०)

सर्व प्राणिमात्र ज्यावरी वर्तती । तरि न्यूनाधिक नव्हे स्थिति ।
तेंचि आपण तया विकारिती । एकपिंड उपाधि कैची ॥३१॥
त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्र ज्याच्यावर वावरतात, तरी सुद्धा ब्रह्माच्या स्थितीमध्ये कमीजास्त काही होत नाही. त्या तत्त्वाला एक पिंडाची उपाधी कशी विकृत करू शकेल ? (३१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
सहजस्थितिप्रकारे । चतुर्थसमासः ॥४॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
अभेदभक्तिप्रकार


कैवल्याचे शिरावरी । नाचतसे विषयव्यापारीं ।
स्वप्नसुषुप्तिजागरिं । अभेदें वर्ते ॥१॥
स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती या तीनही अवस्थांमध्ये विषयव्यापारात मग्न असूनही मुक्त पुरुष कैवल्याच्या शिरावर नाचत असतो. (१)

सहज देव सहज भक्त । सहज पूजा होत जात ।
परि त्रिपुटीचा झाला घात । एकपणेंविण ॥२॥
त्याला देव सहज असतो. भक्तही सहज असतो. पूजाही सहजपणे होत जाते. पण त्याच्या ठिकाणी त्रिपुटीचा नाश झालेला असतो. त्याच्या ठिकाणी एकपणाही राहिलेला नसतो. (२)

देव राहिला एकीकडे । भक्त धावें भलतीकडे ।
विभक्तियोगें भक्ति घडे । कैसी ते नेणों ॥३॥
एरवी देव एकीकडे धावतो आणि भक्त दुसरीकडे धावतो, अशा विभक्तीतून (भित्रेपणातून) भक्ती कशी घडते कोण जाणे ! (३)

विज्ञानभक्ति ते पवित्र । भेद लेश नसे अणुमात्र ।
भज्य भजक एकत्र । जया भक्तीनें कालविले ॥४॥
विज्ञानभक्ती हीच पवित्र भक्ती होय. तिच्यात भज्य आणि भजक एकत्र कालवले जाऊन त्यांमध्ये अणुमात्रही भेद नसतो. (४)

देवभक्ताची चुकामुकी । माया खेळे एकीबेकी ।
ते सद्‌गुरूनें केली फुकी । जाले एकी दोनीपण ॥५॥
माया एकीबेकी खेळत असल्याने देवभक्तांची चुकामूक होत असते. पण सद्गुरूंनी ती माया व्यर्थ केल्याने द्वैताच्या जागी अद्वैत निर्माण होते. (५)

देवपण भक्तीं मिळालें । किं भक्त देवांत आटले ।
दोनी नसतां जें एकलें । एकपणाही न साहे ॥६॥
त्या प्रक्रियेमध्ये देवपण भक्तात मिळाले की, भक्तपण देवात आटले कोणास ठावूक ? दोन्हीच्या अभावी जे एकटे तत्त्व उरते त्याला एक असे म्हणणेही खपत नाही. (६)

आकाश जैसें गगनीं । कीं पाणियामाजीं पाणी ।
देवभक्ताची मिळणी । तैसी जाली ॥७॥
आकाश जसे गगनात, पाणी जसे पाण्यात त्याप्रमाणे देव आणि भक्त परस्परात मिसळून जातात. (७)

एक असतां सहजी । अज्ञानें केली दुजी ।
अज्ञान निरसतां मुरे शेजीं । स्वानुभवसुख ॥८॥
स्वाभाविकपणे एकच तत्त्व असताना अज्ञानाने त्या जागी द्वैत निर्माण केले जाते. शेवटी अज्ञान नष्ट होताच स्वानुभवसुख प्राप्त होते. (८)

अनेक म्हणे अन‍एक । जें सर्वाहून व्यतिरेक ।
एक म्हणजे सर्वत्रीं व्यापक । अन्वयरूप ॥९॥
अनेक म्हणजे एक नाही ते; पण 'सर्व'च्या अर्थापेक्षा अव्याप्त (व्यतिरेक) आणि विरोधी होय. हा व्यतिरेक होय आणि एक म्हणजे सर्वत्र व्यापून असलेला (अन्वय) हा अन्वय होय. (९)

म्हणून एक ते अनेक । अनेक तेचि एक ।
अन्वय आणि व्यतिरेक । हा पूर्वपक्ष ॥१०॥
म्हणून एक तेच अनेक आणि अनेक तेच एक होय. असा अन्वय व्यतिरेकरूप पूर्वपक्ष होय. (१०)

कीं अनेक आटलें । एकपणीं शब्द फोलें ।
अभेदभक्तीनें केलें कांहींचा बाही ॥११॥
एकात अनेक आटतात. एकपणाचा शब्ददेखील अभेद भक्तीने फोल केला जातो. अभेदभक्तीने काहीच्या बाही (वर्णनातीत) करून टाकले. (११)

एकपणाचा उमस । काढितां त्रिपुटी सावकाश ।
होत असे म्हणोनी ध्यास । एकपणाचा नसे ॥१२॥
एकपणाची उत्पत्ती होताच हळूहळू त्रिपुटीचा उदय होतोच. म्हणून एकपणाचा ध्यास घेता येत नाही. (१२)

OVI 13 MISSING IN PRINTED BOOK
त्रिपुटी विरून जाणे हीच अभेदभक्तीची किल्ली होय, रहस्य होय. ती कोणी न करताच आपोआप घडते. (१३)

त्रिपुटी जेथें विराली । हेच अभेदभक्तीची किल्ली ।
तरी ना करितांच घडली । अनायासें ॥१४॥
आपणच देव आणि आपणच भक्त हा केवळ नावाचाच व्यवहार होय, अभेदभक्ती ही नेहमी अव्यभिचारी असते. (१४)

एक प्रीति दो ठाई जाली । पतीं परपुरुषीं विभागली ।
तरि ते पतिव्रता बोलिली । नवचे कोणी ॥१५॥
एकच प्रेम, ते पती आणि परपुरुष यात विभागले गेले तर त्या स्त्रीला कोणी पतिव्रता म्हणणार नाही. (१५)

आपुल्यासाठीं देवावरी । प्रीति ठेवितां निर्धारी ।
तिसीच म्हणावें व्यभिचारी । भक्ति पैं गा ॥१६॥
आपल्यासाठी देवावर प्रेम केले तर त्या भक्तीला व्यभिचारी भक्ती म्हणतात. (१६)

एक जालिया भक्त देव । तरी द्वैताचा नुरे ठाव ।
अभेदभक्तीचा स्वभाव । ऐसा असे ॥१७॥
भक्त व देव एकरूप झाल्यावर द्वैताचे अस्तित्व उरत नाही. हा अभेदभक्तीचा स्वभाव आहे. (१७)

अभेद सहजचि आहे । आजि नवें केलें नव्हे ।
ऐसें समजून जो पाहे । तोचि लाहे येरां ठक ॥१८॥
अभेद तर मूळचाच आहे आज तो नव्याने झालेला नाही. असे समजून जो पाहील त्यालाच अभेदभक्तीचा लाभ होईल. इतरांना तिच्यापासून वंचित व्हावे लागेल. (१८)

सर्व हेंचि नामरूप । विचारें होतां तें अरूप ।
अभेदभक्ति अपोआप । न करितां होय ॥१९॥
सर्व हेच नामरूपमय विश्व होय. विचाराच्या साहाय्याने ते अरूप होताच अभेदभक्ती आपोआप, मुद्दाम न करता होते. (१९)

देव भक्त ते अक्षई । अक्षयरूप आपुला ठाई ।
आतां भजनाची नवाई । भिन्नत्वें कैची ॥२०॥
देव व भक्त अक्षयरूप असून आपापल्या ठिकाणी आहेत. मग भिन्नत्वाने भजन करण्याची नवलाई ती कोणती ? (२०)

एवं भिन्नत्व गेलें वृत्तीचें । मासले जितके नामरूपाचे ।
तें तें रूपडे देवाचें । भक्तासहित ॥२१॥
अशाप्रकारे वृत्तीचे भिन्नत्व निघून गेल्यावर जेवढे जेवढे नामरूपाचे नमुने असतील ते ते सर्व भक्तांसहित देवाचीच रूपे होत. (२१)

करणें पाहणें आटलें । द्वैतभाव विरालें ।
ऐसे भजन जरी घडलें । तरी उत्तमोत्तम ॥२२॥
करणे, पाहणे आटून जाऊन द्वैतभाव विरलेल्या अवस्थेत जर भजन घडले तर उत्तमच होय. (२२)

याविरहित कोणी म्हणती । ते जाणावी कर्मभक्ति ।
जेथें भेदाची समाप्ति । जाली नाहीं ॥२३॥
यावाचून जर कोणी भजन करत असतील तर ती कर्मभक्ती समजावी. कारण त्या भजण्यामध्ये भेदाची समाप्ती होतच नाही. (२३)

सहज सांडोनी सायासीं पडे । अभेद असतांची बिघडे ।
वर्म जाणती ना बापुडे । सहजस्थितीचें ॥२४॥
सहज गोष्टीचा त्याग करून विनाकारण कष्टात पडल्यासारखे ते होईल. आणि मुळात असलेला अभेद नष्ट होईल. त्या बापड्यांना सहजस्थितीचे वर्मच अद्याप कळले नाही, असे म्हणावे लागेल. (२४)

जीवन्मुक्ति विदेहमुक्ति । सहजस्थिति अभेदभक्ति ।
नामभेदमात्र दिसती । परी तें एकरूप ॥२५॥
जीवन्मुक्ती, विदेहमुक्ती, सहजस्थिती, अभेदभक्ती यांच्यात फक्त नावांचाच फरक दिसतो. खरे तर त्या सर्व एकरूपच होत. (२५)

सविकल्प निर्विकल्प जरी जालें । परी तें एकरूप भासले ।
सविकल्प मनें कल्पिलें । निर्विकल्पता कवणा ॥२६॥
सविकल्प निर्विकल्प असा भेद जरी असला तरी ते एकरूप होतात. सविकल्पाची कल्पना मन करते. पण निर्विकल्पाची कल्पना कोण करील ? (२६)

स्वस्वरूप बद्ध ना मुक्त । सविकल्प ना कल्पनातीत ।
नामरूपाचा संकेत । पूर्वपक्षीं होय ॥२७॥
स्वस्वरूप बद्धही नाही अथवा मुक्तही नाही. सविकल्प नाही अथवा कल्पनातीतही नाही. नामरूपाचा संकेत हा फक्त पूर्वपक्षादाखलच आवश्यक असतो. (२७)

ज्ञानें अज्ञान निरसलें । जीवद्वैत निःशेष गेलें ।
मिथ्या प्रतीतीस आलें । ईशद्वैत जितुकें ॥२८॥
ज्ञानाने अज्ञानाचे निरसन केले. त्यायोगे जीवद्वैत संपूर्णपणे गेले आणि जेवढे म्हणन ईशद्वैत असेल त्याची मिथ्यात्वाने प्रतीती झाली, (२८)

समाधान एक असतां । कल्पिलें नामसंकेता ।
हा देहसंबंध तत्वतां । उपाधिमुळें ॥२९॥
समाधानाचे स्वरूप एकच असताना नामसंकेताची कल्पना केली जाते. वास्तविक पाहता उपाधींच्या योगाने हा देहसंबंध जोडला जातो. (२९)

ज्ञानें समाधान जालें एक । अभंग जें का निश्चयात्मक ।
तयासीच हीं नामें अनेक । विदेहादि ठेविली ॥३०॥
ज्ञानाने अभंग असे समाधान निश्चयुरूपाने झाले असता त्या एकालाच विदेह इत्यादी अनेक नामे ठेविली जातात. (३०)

देहउपाधि निमाली । संकेतचिन्हें तीं सवें गेलीं ।
पुढे अनिर्वाच्यता संचली । स्थितिगतीविण ॥३१॥
देहउपाधी नाहीशी झाल्यावर ही सर्व संकेतचिन्हे तिच्याबरोबर गेली. त्यानंतर स्थितिगतिनिरपेक्ष अनिर्वचनीयताच साचन राहते. (३१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
अभेदभक्तिप्रकारे । पंचमसमासः ॥५॥
इति सहजस्थितिप्रकारपंचिका संपूर्णा ॥ १२ ॥ ओवीसंख्य १४२ ॥
हरिः ॐ तत्सत्

GO TOP