॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(उत्तरार्ध)

पंचिका १३ वी
फलस्वरूप

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
ज्ञानवैराग्योपरमप्रकार


श्रोता म्हणे ज्ञान तें एक । समाधान ज्ञानाचा परिपाक ।
सविकल्पादि नामें अनेक । कासया ठेविलीं ॥१॥
श्रोता म्हणतो, "ज्ञान एकच आहे. ज्ञानाचा परिपाक म्हणजे समाधान होय. मग सविकल्प इत्यादी अनेक नावे का बरे ठेवली ? " (१)

वक्ता म्हणे हें वृत्तिभेदें । नामें पावलीं विशदें ।
परि जाणिजेती अभेदें । मुक्तस्थिति एक ॥२॥
वक्ता म्हणतो, "वृत्तिभेदाने ही अनेक नामे प्राप्त होतात. पण ती सर्व अभिन्नत्वाने समजून घ्यावीत. पण मुक्तस्थिती एकच असते. (२)

समाधानाची एकरूपें । पावले असती गुरुकृपें ।
कोणी राहिले सविकल्पें । एक निर्विकल्पापरी ॥३॥
गुरुकृपेने एकच समाधान सर्वांना प्राप्त होते. पण कोणी सविकल्पाने राहतात. कोणी निर्विकल्पाने, (३)

एक प्रपंचीच वर्तती । एक उदास फिरती ।
एक पडोनीच राहती । एक दिसती उन्मत्त ॥४॥
कोणी प्रपंचात राहतात, कोणी उदासपणे फिरतात, कोणी पडूनच राहतात, कोणी उन्मत्तासारखे दिसतात. (४)

एक करिती देवतार्चन । एक करिती भजन ।
एक करिताती तीर्थाटन । एक कर्म आचरती ॥५॥
कोणी देवतांची पूजा करतात, कोणी भजन करत असतात, कोणी तीर्थाटन करतात, कोणी कर्माचरण करतात. (५)

एक संप्रदाय वाढविती । एक तेथून चुकविती ।
एक ज्ञान आच्छादिती । प्रगटती एक ॥६॥
कोणी संप्रदाय वाढवितात, कोणी ते टाळतात, कोणी स्वत:चे ज्ञान झाकून ठेवतात, कोणी ते प्रगट करतात. (६)

परी ते एकरूप झाले । प्रारब्धें देह वर्तू लागले ।
कोठें वैराग्य दिसलें । कोठें गुप्त ॥७॥
पण सर्वांचे ज्ञान एकरूपच असते. प्रारब्धानुसार सर्वांचे देह वर्तन करत असतात. कुठे वैराग्य दिसते, कुठे ते गुप्त असते, (७)

कोठें दिसें उपरम । कोठें दिसे सकाम ।
परी अंतरीचें वर्म । एकरूप असे ॥८॥
कुठे शांती दिसते, कुठे सकाम कर्मे दिसतात, पण त्या सर्वांचे अंतरीचे वर्म एकच असते. (८)

श्रोता म्हणे वैराग्य उपरम । हेंचि ज्ञानाचें भाग्य परम ।
कोठें गुप्त कोठें प्रगट हा नेम । संभवेना कीं ॥९॥
तेव्हा श्रोता म्हणतो की, "वैराग्य आणि शांती हीच ज्ञानाचे परम भाग्य होय. त्यामुळे कुठे गुप्त, कुठे प्रगट असा भेद असायला नाही पाहिजे. " (९)

तरी अवधारा मानसीं । त्रिविध लक्षणें हें कैसीं ।
ज्ञान तेथें उभयांसी । राहणें असे ॥१०॥
यावर वक्ता उत्तर देतो की, आता नीट लक्ष देऊन ऐका. ही त्रिविध लक्षणे समजन घ्या. जेथे ज्ञान असते. तेथे बाकीच्या दोहोंना राहावेच लागते. (१०)

नामरूप न करितां त्याग । ज्ञानचि नव्हे अभंग ।
जरी चंचल विरती सांग । ज्ञान लाहे उपरमें ॥११॥
नामरूपांचा त्याग न करता ज्ञान अभंग राहूच शकत नाही. जरी संपूर्ण विरक्ती चंचल असली तरी शांतीने ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. (११)

हे तिन्ही एकत्र असती । दोन आच्छादिल्यापरी वाटती ।
प्रारब्धें प्रतिबंधक दिसती । कोठें प्रगट ॥१२॥
ही तिन्ही लक्षणे एकत्रच असतात. त्यात दोन आच्छादिल्याप्रमाणे वाटतात. प्रारब्धयोगाने कोठे प्रतिबंधक दिसतात, कोठे प्रगट असतात. (१२)

या तिहींचें कैसें चिन्ह । हेतु स्वरूप कार्य पूर्ण ।
आणि अवधीचेंही लक्षण । भिन्नभिन्न सांगों ॥१३॥
या तिहींची लक्षणे, त्यांचे हेतू, स्वरूप आणि कार्य आणि त्यांचा शेवट इत्यादी वेगवेगळे करून सांगतो. (१३)

दोषदृष्टीं पदार्थीं देखिजे । या हेतू विरक्ति उपजे ।
त्याग हे स्वरूप ओळखिजे । पुन्हा भोगेच्छा नव्हे ॥१४॥
पदार्थाकडे दोषदृष्टीने पाहण्यामुळे विरक्ती उत्पन्न होते. स्वरूप ओळखल्यानंतर पुन्हा भोगेच्छा न होणे हे त्यागाचे स्वरूप होय. (१४)

श्रवणमननादि घडतां । हा हेतू ज्ञान उद्भवतां ।
ग्रंथिभेद स्वरूप तत्वतां । कार्य तें नव्हे एकरूप ॥१५॥
श्रवण मननादी घडल्याबरोबर ज्ञान उद्भवते. हा ज्ञानाचा हेतू म्हणजे कारण होय. ज्ञानाचे स्वरूप म्हणजे ग्रंथिभेद होणे, हे होय. त्याचे कार्य एकरूप नसते. (१५)

शमदमादि हेतु । बुद्धिनिरोध हा एकांतू ।
पुन्हा दंडळिना चित्तू । हें कार्य उपरमाचें ॥१६॥
शमदमादी हा हेतू. त्यामुळे उपरम प्राप्त होतो. बुद्धिनिरोध हे त्याचे स्वरूप होय. त्यामुळे चित्त विचलित होत नाही. हे उपरमाचे कार्य होय. (१६)

मुख्यत्वें ज्ञान प्रधान । हे साध्य असती दोन ।
मोक्ष नव्हे ज्ञानेंविण । श्रुतिप्रमाणसिद्ध ॥१७॥
यात ज्ञान हे मुख्य आहे. बाकीचे दोन ही साध्येच आहेत. मोक्ष ज्ञानावाचून मिळत नाही, हे श्रुतिप्रमाणसिद्ध आहे. (१७)

ज्ञान सांडून वराग्य घेती । आणि उपरम जरी करिती ।
परी वाउगें कष्टी होती । ते हतवटी न ये ॥१८॥
ज्ञानाचा त्याग करून वैराग्याचा स्वीकार केला आणि उपरम म्हणजे शांतीचा अवलंब केला तर त्यामुळे विनाकारण कष्ट मात्र होतील. ज्ञानाची जागा ते घेऊ शकणार नाहीत. (१८)

वैराग्य उपरम म्हणावें । परी यथार्थ तें रूप नव्हे ।
विवेकेंवीण शिणावें । मोक्षहि नाहीं ॥१९॥
वैराग्य, शांती हे असले तरी विवेकावाचून मोक्ष मिळणार नाही. कष्ट मात्र होतील, (१९)

वैराग्य-उपरम-आभासें । लोकांतरा गमन होतसे ।
अथवा योगिकुलीं जन्मतसे । पुढें ज्ञान होईल ॥२०॥
वैराग्य आणि शांती यांचा आभास करून स्वर्गादी लोकात जाता येईल किंवा योगिकुळात जन्म घेईल आणि त्यानंतर त्याला ज्ञान होईल. (२०)

ऐसें नव्हे कीं ज्ञान । उद्भवतां नासे अज्ञान ।
येथेंचि स्वयें ब्रह्म आपण । मोक्षरूप होतो ॥२१॥
पण ज्ञानाचे असे नाही. ते उत्पन्न झाल्याबरोबर अज्ञान नष्ट होते. याच जन्मात ताबडतोब जीव ब्रह्मरूप होऊन त्यास मोक्ष मिळतो. (२१)

तेथें वैराग्य आणि उपरम । हे असतीची निःसीम ।
प्रारब्धें दिसती विराम । पावले ऐसे ॥२२॥
ज्ञान असेल तेथे वैराग्य आणि उपरम ही दोन्ही असतातच. पण प्रारब्धामुळे ती नष्ट झाल्यासारखी दिसतात. (२२)

जनकादि राज्य जरी करितां । पूर्ण बोध तया पुरता ।
वैराग्य उपरमही पाहतां । तेथें असे ॥२३॥
जनकादिक राज्य करीत असताना त्यांना पूर्ण ज्ञान झालेले होते. वैराग्य आणि उपरमही त्यांचे ठिकाणी होते. (२३)

नव्हे जरी वैराग्य उपरम । तरी विदेहत्व कैसें नाम ।
हें अंतरीचें कळावें वर्म । बाह्य मुद्रा खोटी ॥२४॥
त्यांना जर वैराग्य, उपरम नसते तर विदेह हे नाव कसे पडले असते ? हे अंतरीचे वर्म समजून घ्यावे. बाह्य रूप खोटे समजावे. (२४)

बाह्यत्यागें नागवे जाले । अंतरी स्वर्गादि भोग इच्छिले ।
तें वैराग्य न वचे बोलिलें । विवेकजनीं ॥२५॥
वरवरचा त्याग करून एखादा मनुष्य नागडा हिंडेल, पण अंत:करणात मात्र स्वर्गादी भोगांची इच्छा करील, तर विवेकी लोक त्याला वैराग्य म्हणत नाहीत. (२५)

ब्रह्मलोकादितृणांत । वमकापरी न इच्छी चित्त ।
हे वैराग्य‍अवधि निश्चित । ज्ञानेंविण नव्हे ॥२६॥
ब्रह्मलोकापासून तृणापर्यंत सर्व वमकाप्रमाणे (ओकून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे) मानून चित्ताने त्याची इच्छा न करणे ही वैराग्याची सीमा होय. ती ज्ञानावाचून सिद्ध होत नाही. (२६)

सुषुप्ति सारिखी विस्मृति । उपरम अवधि निश्चिति ।
हेही घडे ज्ञात्याप्रती । मिथ्यात्व दृढ होतां ॥२७॥
अगदी झोपेतल्यासारखे विस्मरण ही उपरमाची सीमा होय. मिथ्यात्व दृढ झाल्यावर ज्ञात्याला तेही साध्य होते. (२७)

मी देह बुद्धि हे बळकट । स्मरतां न स्मरतां अविट ।
ऐसी ब्रह्मबुद्धि जरी निघोट । हेचि ज्ञानाची अवधि ॥२८॥
मी देह आहे ही बुद्धी इतकी दृढ असते की स्मरण असताही ती न स्मरल्यासारखी पक्की होते, त्याप्रमाणे ब्रह्मबुद्धी जर पक्की असेल तर ती ज्ञानाची परिसीमा होय. (२८)

द्वैतबुद्धीचें हनन । हेंचि वैराग्याचे लक्षण ।
ब्रह्माकार अनुसंधान । ज्ञान तें हेंचि ॥२९॥
द्वैतबुद्धीचा नाश हेच वैराग्याचे लक्षण होय, अनुसंधान ब्रह्माकार ठेवणे हेच ज्ञान होय. (२९)

चंचल उर्मी जेथें सरली । केवळ अखंडता संचली ।
हेचि उपरमाची किल्ली । ज्ञानिया लाभे ॥३०॥
चंचल वृत्ती नष्ट होऊन केवळ अखंडता साचून राहणे हीच उपरमाची गुरुकिल्ली होय. ती ज्ञानी लोकांना प्राप्त होते. (३०)

संशयरहित समाधान । हेंचि ज्ञान हेंचि विज्ञान ।
आतां देह प्रारब्धाधीन । वर्तो सुखें ॥३१॥
संशयरहित समाधान हेच ज्ञान आणि हेच विज्ञान होय. आता देह खुशाल प्रारब्धाच्या अधीन राहून वर्तणूक करो. (३१)

आतां पाहिजे तें करो । पडो अथवा फिरो ।
भोगीं विरागीं राहो मरो । यासी काज नाहीं ॥३२॥
तो पाहिजे ते करो, पडो, फिरो, भोगात राहो अथवा वैराग्यात राहो, अथवा मरो याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. (३२)

इच्छा नसे सविकल्पाची । अथवा निर्विकल्प दशेची ।
आणि मायानिर्मित मोक्षाची । सापेक्षा नसे ॥३३॥
त्याला सविकल्पाची इच्छा नसते अथवा निर्विकल्प दशेची इच्छा नसते. तसेच मायानिर्मित मोक्षाचीही अपेक्षा नाही. (३३)

हे अवघेचि घर रिधाले । न जाती जरी दवडिले ।
यथार्थ ज्ञान दृढ जालें । जया पुरुषासी ॥३४॥
ज्या पुरुषाचे यथार्थज्ञान दृढ झाले असेल त्याच्या घरी हे सर्व चालत येतात. हाकलून दिले तरी ते जात नाहीत. (३४)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
ज्ञानवैराग्योपरमप्रकारे । प्रथमसमासः ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
विद्वत्संन्यासप्रकार


ब्रह्मविद्‍ तोचि ब्राह्मण । येर जाति आश्रम ना वर्ण ।
हे व्यापारार्थ बाह्य चिन्ह । लोकरीती दंडका ॥१॥
जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण होय. बाकीची जात, आश्रम वर्ण ही नुसती व्यवहारासाठी वापरायची चिन्हे आहेत. ती केवळ लोकव्यवहारातील दंडक होत. (१)

जीव ब्राह्मण म्हणावा । तरी ब्राह्मणत्व आलें जगा सर्वा ।
देह तरी पुत्रादिभावा । देहदहनें ब्रह्महत्या ॥२॥
जीवाला ब्राह्मण मानले तर जगालाच ब्राह्मणपण येईल. देहाला ब्राह्मण मानले तर आपला देह (आपल्या मृत्यूनंतर) जाळणाऱ्या पुत्र, भाऊ यांना ब्रह्महत्या घडेल. (२)

वर्णासी तो नेम नाहीं । श्वेतरक्तादि कांही ।
जातीसी कल्पितां तेही । तरी अन्य जाती बहु ऋषी ॥३॥
वर्णावरून ब्राह्मणत्व ठरवले तर तेथे तांबडा, पांढरा इत्यादीचा विशिष्ट नेम नाही. बरे, जातीवरून ब्राह्मणत्व ठरवावे तर अनेक ऋषी इतर जातीतले आढळतात. (३)

ब्राह्मण म्हणावा कर्मवंत । तरी क्षत्रियादि यज्ञ करीत ।
जरी कल्पावा धर्मयुक्त । तरी आचरती सर्व ॥४॥
कर्म करणारा तो ब्राह्मण असे मानले तर क्षत्रियादी लोक यज्ञ करतातच. धर्माचे आचरण करणारा तो ब्राह्मण म्हणावा तर सगळेच धर्माचरण करतात. (४)

धर्मचि जरी ब्राह्मण । तरी असती कर्त्याधीन ।
पांडित्या तरी जाणती संपूर्ण । पदपदार्थान्वय ॥५॥
धर्म हाच ब्राह्मण असे म्हटले तर तो कर्त्याच्या अधीन असतो. पांडित्यालाच ब्राह्मण मानले तर सर्वांनाच पद, पदार्थ, पदांचा परस्परसंबंध येत असतो. (५)

अष्ट विकल्प विकल्पितां । दूषणें दिसतीं तत्वतां ।
ब्राह्मणपणाची वार्ता । तेथें नसे ॥६॥
अशा प्रकारे आठही विकल्पांची कल्पना केली तरी प्रत्येक विकल्पात दूषणे दिसतात. त्यामुळे तेथे ब्राह्मणपणाचे लक्षण आढळत नाही. (६)

जन्म होतांची शूद्रत्व । उपनयनीं आलें द्विजत्व ।
वेदपठणीं होय विप्रत्व । परी ब्राह्मण वेगळा ॥७॥
जन्म होताच मनुष्य शूद्र असतो. उपनयनानंतर त्याला द्विजत्व प्राप्त होते. वेदपठनाने त्याला विप्रत्व येते पण याहून ब्राह्मण मात्र वेगळाच होय. (७)

ब्रह्मविदत्व जयासी । तोचि ब्राह्मण पुण्यराशी ।
श्रोता म्हणे देहादिकासी । काय म्हणावे ॥८॥
ज्याला ब्रह्म कळते तोच पुण्यशील ब्राह्मण होय. यावर श्रोता प्रश्न करतो की, असे असेल तर मग देहादिकाला काय म्हणावे ? (८)

वक्ता म्हणे ऐका उत्तर । स्वानुभव युक्ति प्रकार ।
देहादि जड समग्र । परिचर्याधर्म याचा ॥९॥
तेव्हा वक्ता म्हणतो की, याचे उत्तर ऐका. स्वानुभव, युक्तिवाद यांच्या आधाराने मी सांगतो. देहादी हे सर्व जड आहे. त्यांचा सेवा हाच धर्म आहे. त्याचे पालन त्यांनी करावे. (९)

सप्तदशात्मक लिंग सूक्ष्म । यासी वैश्य हें नाम ।
कृषिगोरक्षादि धर्म । तेथें असती ॥१०॥
सतरा तत्त्वांचा सूक्ष्म लिंग देह हा वैश्य वर्णाचा असून त्याचे कृषि, गोरक्षा इत्यादी धर्म (कर्तव्ये) असतात. (१०)

कारण उभया विसावा । हा क्षात्र धर्म जाणावा ।
आनंदभोगें पाळी सर्वा । स्वबाहुबळें ॥११॥
कारणदेह हा या दोहोंचे विश्रांतिस्थान असून त्याचा क्षात्रवर्ण आहे. आनंदाच्या उपभोगाने तो सर्वाचे स्वत:च्या बाहुबलाने पालन करतो. (११)

वृत्तिसहित जें ज्ञान । जयासी तुर्या अभिधान ।
करी उभय अवलोकन । मध्यस्थ दीप जैसा ॥१२॥
वृत्तीसहित जे ज्ञान असते. त्याला तुर्या असे नाव आहे. ते मध्यस्थ दीपाप्रमाणे दोहोंचे अवलोकन करते. (१२)

तोची ब्राह्मण गा निश्चिती । येर बोलण्याची रीती ।
म्हणोनि ब्राह्मणत्व अन्याप्रती । बोलोचि नये ॥१३॥
तोच निश्चयपूर्वक खरा ब्राह्मण होय. बाकीचे ब्राह्मण केवळ उपचारापुरतेच ब्राह्मण होत. म्हणून दुसऱ्या कोणाला ब्राह्मण म्हणून संबोधूच नये. (१३)

श्रोता म्हणे ब्राह्मणासी । आश्रमेंविण रूपें कैसी ।
म्हणोनि प्रकृत प्रसंगासी । आश्रमादि दाखवा ॥१४॥
यावर श्रोता म्हणतो की ब्राह्मणत्वाला आश्रमांवाचून पूर्णता नाही. म्हणून प्रसंगपरत्वे ब्रह्मवेत्त्याच्या आश्रमांचे स्वरूप सांगा. (१४)

बहु बरें म्हणोनि वक्ता । जाला आश्रम विस्तारिता ।
देहबुद्धीनें बाटला होता । अज्ञान शूद्रत्व ॥१५॥
ठीक आहे' असे म्हणून वक्ता आश्रमांचे विस्तारपूर्वक वर्णन करू लागला. प्राणी अगोदर देहबुद्धीच्या योगाने बाटलेला असतो. तेच त्याचे अज्ञान आणि तेच त्याचे शूद्रत्व होय. (१५)

मग सद्‍गुरू उपाध्ये आले । शास्त्रादि संभार मेळविले ।
साधन सूत्र गळां घातलें । विवेक मुंज वैराग्य लंगोटी ॥१६॥
मग सद्गुरू हेच उपाध्ये आले. त्यांनी शास्त्रादी सामग्री जमा केली आणि साधनरूपी यज्ञोपवीत त्याच्या गळ्यात घातले. विवेकरूपी मुंज वनस्पती कमरेला बांधली आणि वैराग्याची लंगोटी त्याला दिली. (१६)

मग त्रिपदा महावाक्य । वाच्यांश सांडोनी अनेक ।
कर्णी सांगितले एक । तूं ब्रह्म अससी ॥१७॥
मग इतर अनेक वाच्यांश टाळून तत्त्वमसि' (म्हणजे) 'तू ब्रह्म आहेस' या महावाक्यरूपी त्रिपदा गायत्रीचा कानांमध्ये उपदेश केला. (१७)

देहबुद्धीचा करी कंटाळा । अनुष्ठानीं होय सोहळा ।
निज कृपेची उंच माळा । घातली गळां तयाच्या ॥१८॥
देहबुद्धीचा कंटाळा करायला सांगून त्याला अनुष्ठानाला बसवले. त्या अनुष्ठानाचाच मोठा सोहळा झाला. मग स्वत:च्या कृपेची (गुरुकृपेची) उंच माळ त्याच्या गळ्यात घातली. (१८)

मग लोकव्यापार सांडिले । एकांती आसन घातिलें ।
निजानुभवें अनुष्ठिलें । अनुसंधान जपादि ॥१९॥
मग त्याने लोकव्यवहार सोडून एकांतात आसन घातले आणि स्वानुभवाने अनुसंधान, जप इत्यादींचे अनुष्ठान सुरू केले. (१९)

अथवा श्रवणमननादि वेद पढे । संधीसी अनुष्ठानीं पवाडे ।
त्रिकाळ उपासी रोकडे । गुरु अर्क अग्नि ॥२०॥
किंवा श्रवण, मनन इत्यादीपूर्वक वेदांचे पठन करू लागला, संधिकाळात अनुष्ठानास प्रवृत्त झाला आणि गुरू, सूर्य, अग्नी यांची त्रिकाळ उपासना करू लागला. (२०)

हृदय कुंड शुद्ध क्षाळीं । कोमल ज्ञानाग्नीच्या ज्वाळीं ।
देहत्रय समिधा जाळी । कामना आज्यासहित ॥२१॥
त्याने हदयरूपी कुंड स्वच्छ धुतले, ज्ञानाग्रीच्या कोवळ्या ज्वाळांमध्ये तीन देहांच्या समिधा त्याने जाळल्या. त्यांच्याबरोबर कामनारूपी तूपही त्याने जाळले. (२१)

प्रेम पलाशाचा दंड । वैराग्य कौपीनेचें बांधिले खंड ।
दुजें वस्त्र कसिलें सदृढ । आच्छादिलें कामसदन ॥२२॥
प्रेमरूपी पळसाचा दंड त्याने हातात घेतला. वैराग्यरूपी लंगोटीचे दोन खंड त्याने बांधले आणि त्यानंतर तिचे वस्त्र करकचून बांधले आणि कामेंद्रियाला आच्छादून टाकले. (२२)

महानुभाव संतजनीं । अर्थ सिद्धान्न मागोनी ।
वृत्ति झोळी आणोनि । गुरुचरणीं निवेदी ॥२३॥
महानुभवी संत जनांकडे अर्थयुक्त सिद्धान्तांची माधुकरी मागून वृत्तिरूप झोळी गुरुचरणांवर ठेवली. (२३)

गुरु आज्ञा होतां क्षणीं । वेगीं प्रवर्तें अर्थ जनीं ।
तृप्ति याचें समाधानीं । गुरुवचनीं विश्वास ॥२४॥
गुरूंची आज्ञा झाल्याबरोबर ताबडतोब अर्थभोजनास तो बसला. समाधानाची प्राप्ती झाली. त्यामुळे तृप्ती झाली. गुरुवचनांवर त्याचा पूर्ण विश्वास असतो. (२४)

श्रोतीं आश्रमादि पुसिलें होतें । निवेदिलें ब्रह्मचर्यातें ।
व्यतिरेकें ब्रह्मानुभवानें । ब्रह्मचर्य ब्राह्मणा ॥२५॥
्रोत्यांनी आश्रमाविषयी विचारले होते. आतापर्यंत ब्रह्मचर्याचे हे निरूपण झाले. इतर सर्व गोष्टींचा निषेध करून ब्रह्मानुभव घेणे हेच ब्राह्मणाचे ब्रह्मचर्य होय. (२५)

अनेच्छा सुखादि भोगाची । नैष्ठिकता अनुष्ठानाची ।
न्यास करावा येथेची । हंस दीक्षा घ्यावी ॥२६॥
सुखादी भोगांची अनिच्छा दाखवून नैष्ठिक अनुष्ठानाची येथे समाप्ती करावी. मग हंसदीक्षा घ्यावी. (२६)

सुख इच्छा असे मनीं । उपकुर्वाण समापुनी ।
आदरी अन्वया लागुनी । शिरोमणी गृहमेधी ॥२७॥
मनात सुखादी भोगांची इच्छा असेल तर नंतर उपाकर्म (सोडमुंज) करून यथाक्रम वंश सातत्यासाठी श्रेष्ठ गृहस्थाश्रमाचा तो स्वीकार करतो. (२७)

श्रोतीं अवधारा परमु । ब्रह्मविद्या गृहस्थाश्रमु ।
सर्वाश्रमासी विश्रामु । आणि अग्निहोत्रा ॥२८॥
श्रोत्यांनी आता लक्ष द्यावे. ब्रह्मविद्येतील गृहस्थाश्रम कसा असतो ते ऐकावे. गृहस्थाश्रम इतर सर्व आश्रमांचे विश्रांतिस्थान असून त्यात अग्रिहोत्र धारण करावे लागते. (२८)

प्रवृत्तीच्या जाया तीन । जागृति सुषुप्ति स्वप्न ।
निवृत्तिरूप कांता दोन । तुर्या उन्मनी वरिल्या ॥२९॥
प्रवृत्तीमध्ये जागृती, स्वप्र आणि सुषुप्ती अशा तीन पत्नी असून निवृत्तीमध्ये तुर्या आणि उन्मनी या दोन पत्नी असतात. (२९)

भोगी स्वानंदाचे सुख । अतीथ अभ्यागत नव्हे विन्मुख ।
जे जे जयाची इच्छा देख । औदार्यपणें देतसे ॥३०॥
या गृहस्थाश्रमात स्वानंदाचे सुख भोगत असताना तो अतिथी, अभ्यागत यांना कधी विन्मुख जाऊ देत नाही. ज्यांची जशी इच्छा असेल ते ते उदारपणाने सर्वांना देतो. (३०)

आपणाहून जे अधिक । तयाचा होय सेवक ।
पुसे स्वानुभवाचें कौतुक । ग्रहण करी आवडी ॥३१॥
आपल्याहून जे श्रेष्ठ असतील त्यांचा तो सेवळ बनतो. त्यांना स्वानुभवाचे कौतुक विचारतो. मोठ्या आवडीने ते ग्रहण करतो. (३१)

स्वानुभवी जे समान । त्यांसी सख्य करी अनुदिन ।
परस्पर बाणती खूण । ब्रह्मानंदाची ॥३२॥
स्वानुभवाच्या बाबतीत जे समानधर्म असतील त्यांच्याशी तो दररोज सख्य करतो. त्यांच्या सहवासात राहतो. अशा रीतीने ब्रह्मानंदाची खुण एकमेकांना पटते. (३२)

मुमुक्षु आणि साधक । यांसी होय ब्रह्मशोधक ।
आपण करोनि शिकविले अनेक । सक्रिय ज्ञाना ॥३३॥
मुमुक्षू आणि साधकांना तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. अशा त-हेने स्वत: आचरण करून नंतर तो सर्वांना सक्रिय ज्ञानाची शिकवण देतो. (३३)

उभय संधीसी आहुती । प्रज्वळ ज्ञानाग्निज्योतीं ।
अज्ञान सकार्य टाकी हातीं । पंचस्त्रिया सेवेसी ॥३४॥
दोन्ही संध्यांच्या वेळी प्रज्वलित अशा ज्ञानानीच्या ज्वालेमध्ये अज्ञानाची त्याच्या कार्यासह आहुती देतो. त्यावेळी उपरनिर्दिष्ट पाच स्त्रिया त्याच्या सेवेला तत्पर असतात. (३४)

निज सामर्थ वीर्यापासून । प्रसवल्या पांचही पंचसून ।
वेगळाल्य सरूप सगुण । नामे ऐका तयाचीं ॥३५॥
स्वत:चे सामर्थ्य हेच वीर्य त्यापासून पाची जणींना पाच रूपसंपन्न गुणी पुत्र होतात. त्यांची नावे ऐका. (३५)

प्रिय पुत्र जाला जागृती । स्वप्नोद्भवा मोद म्हणती ।
प्रमोदा जनिली सुषुप्ति । तुर्या आनंदसुता ॥३६॥
जागृतीच्या पुत्राचे नाव प्रिय, स्वप्नाच्या पुत्राचे नाव मोद, सुषुप्तीच्या पुत्राचे नाव प्रमोद आणि तुर्येच्या पुत्राचे नाव आनंद आणि (३६)

उन्मनी जे जया प्रसवली । निरानंद नामें परम शोभली ।
चहू सुतांची लग्नें केलीं । पांचवा न करी ॥३७॥
उन्मनीने ज्याला जन्म दिला त्याचे नाव निरानंद. या पांच पुत्रांपैकी पहिल्या चार पुत्रांची त्याने लग्ने करून दिली. पाचव्याने लग्नच केले नाही. (३७)

प्रिया मिनली प्रीति । मोदासी ते उपरती ।
प्रमोदें स्वीकारिली शांती । आनंदे अनुभूति वरिली ॥३८॥
प्रियाला प्रीती ही पत्नी मिळाली, मोदाला उपरती ही पत्नी मिळाली. प्रमोदाने शांतीला पसंत केले. आनंदाने अनुभूतीशी लग्न केले. (३८)

ऐसा ज्ञात्याचा प्रपंच । विस्तारला बहु उंच ।
ऐसा कोणी ग्रहस्थाश्रमींच । सुखदुःखा नातळे ॥३९॥
असा हा ज्ञात्याचा प्रपंच अतिशय विस्तृत होतो. अशा या गृहस्थाश्रमात राहूनही एखादा सुखदुःखांच्या आधीन होत नाही. तो त्यांच्या पलीकडे गेलेला असतो. (३९)

ऐसा महाराज गृहस्थ । नित्य निरतिशयी व्रतस्थ ।
पुढें अन्वय व्यतिरेक समाप्त । करुनि वनी जाला ॥४०॥
असा तो गृहस्थाश्रमी नेहमी अतिरेक न करता संयमाने व्रतस्थ राहतो. नंतर अन्वय (आपले संबंध) आणि व्यतिरेक (आणि आपल्या मर्यादा-अव्याप्ती) यांचा त्याग करून तो वानप्रस्थ होतो. (४०)

चौघी जाया अति सुंदरी । आरोपिल्या पुत्राकरीं ।
पांचवी उन्मनि सपुत्र । संगें घेऊनी निघाले ॥४१॥
चार पत्नींना पुत्रांच्या हाती सोपवतो आणि पाचवी जी उन्मनी आणि तिचा पुत्र निरानंद यांच्यासह तो वनात जायला निघतो. (४१)

निरंजन जे रम्य स्थानी । राहिला तापसी हो‍उनी ।
भोगेंविण सेवी उन्मनी । आणि पुत्रही सन्निध ॥४२॥
निरंजन (निर्जन) अशा रम्य स्थानी तो तापसी होऊन राहतो. उपभोग न घेता तो उन्मनीचे सेवन करतो. त्याच्याबरोबर त्याचा पुत्रही असतोच. (४२)

परी त्रिपुटीचें सूत्र असे । मंद मंद ज्ञानाग्नि कुंडीं वसे ।
ज्ञानमयी शिखा विलसे । आणि कौपीन विरक्ति ॥४३॥
पण अद्याप त्रिपुटीचे जानवे त्याच्या गळ्यात असते. कुंडात ज्ञानानी अजून मंद स्वरूपात असतो. ज्ञान ही त्याची शेंडी असते आणि विरक्ती कौपीन त्याच्यापाशी असते. (४३)

ज्ञानाग्निकुंडावरी । उपरमाची केली छपरी ।
आपण राहिलासे द्वारीं । पश्चिमेच्या ॥४४॥
ज्ञानाग्नीच्या कुंडावर त्याने शांतिरूप छत्री धरलेली असते आणि आपण पश्चिमेच्या दासत वास्तव्य करून असतो. (४४)

जे कां मुळीं मूळाज्ञान । पूर्णाहुति करें घेउन ।
ज्ञानाग्नींत करी दहन । शेवटचि आला ॥४५॥
जे मूलाज्ञान राहिले होते त्याची पूर्णाहुती हातात घेऊन तो ज्ञानानीत दहन करतो. आता त्याचा शेवटच जवळ आलेला असतो. (४५)

पति प्रयाणोन्मुख पाहुनी । देह ठेविती होय उन्मनी ।
निरानंद पावला अवसानीं । मातेसवें ॥४६॥
पती प्रयाण करण्यास सज्ज झालेला पाहून त्याची पत्नी उन्मनी देहत्याग करते आणि पुत्र निरानंद आपल्या आईबरोबरच मृत्यू पावतो. (४६)

मग प्रेषोच्चार करितां । विरजाहोमीं जाळिलें द्वैतां ।
शिखा सूत्र कौपीन त्यागितां । वेळु नाही ॥४७॥
मग प्रेषोच्चार करून विरजाहोमामध्ये द्वैताचे दहन करतो. शिखा (शेंडी) , सूत्र (यज्ञोपवीत) आणि कौपीन यांचा त्याग करायला त्याला वेळ लागत नाही. (४७)

ज्ञानमयी शिखा उपडिली । अनुभूतिसूत्रेंसि करीं घेतली ।
विरक्तिकौपीनही त्यागिली । महा अग्निमाजीं ॥४८॥
मग तो आपली ज्ञानमय शेंडी उपटून टाकतो. अनुभवरूप यज्ञोपवीतासह ती तो हातात घेतो आणि विरक्तीरूपी कौपीनासह त्यांचा महाअग्नीमध्ये त्याग करतो. (४८)

मग खोपटासहित कुंड । जळालें अवघें बंड ।
परमहंस उरला अखंड । द्वैताद्वैत सांडुनी ॥४९॥
मग खोपटासहित ते कुंड सगळे जळून जाते. तो सगळा व्याप जळून जातो आणि शेवटी द्वैताद्वैतांच्या पलीकडे गेलेला तो परमहंस तेवढा अखंडपणे उरतो. (४९)

पुढें न वचे बोलिले । परेसीहि ठक पडिले ।
निरूपण समाप्त जालें । वर्णाश्रमाचें ॥५०॥
यापुढे वर्णन करणे अशक्य आहे. कारण येथे परावाणीलाही संभ्रम निर्माण होतो. अशा रीतीने हे वर्णाश्रमांचे निरूपण येथे समाप्त होते. (५०)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
विद्वत्संन्यासप्रकारे । द्वितीयसमासः ॥२॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
विविदिषासंन्यासप्रकार


श्रोता म्हणे आश्रम चारी । स्वानुभवें बोलिले निर्धारी ।
परि ऐसी कोठें न दिसे परी । बाह्य सर्व दिसती ॥१॥
श्रोता यावर म्हणतो की, स्वानुभवाने आपण चार आश्रमांचे वर्णन केलेत. परंतु असा प्रकार कोठे पहायला मिळत नाही. सर्वजण बाह्यात्कारीच दिसतात. (१)

वक्ता म्हणे सद्‌गुरुविण । ज्ञान कैचें केवि समाधान ।
अंतर्निष्ठेचे लक्षण । वेषधारिया न कळे ॥२॥
त्यावर वक्ता म्हणतो की, सद्गुरूवाचून ज्ञान कसे मिळेल ? किंवा समाधान तरी कसे मिळेल ? वेषधारी माणसाला अंतर्निष्ठेचे लक्षण कसे कळेल ? (२)

तुम्ही होते पुसिले । विदवत्संन्यासा निविदिलें ।
आता विविदिषासंन्यासा ऐकिलें । पाहिजे अंतरीं ॥३॥
तुम्ही विचारले होते म्हणून विद्वत्संन्यासाचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले. आता विविदिषा संन्यासाचे स्वरूप ऐका. (३)

हंस जयाते म्हणती । ब्रह्मानंद साधनसंपत्ति ।
गुरुमुखें श्रवणादि करिती । मनन निदिध्यास ॥४॥
हंस म्हणविणारे लोक ब्रह्मानंदाची साधनसंपत्ती गुरुमुखाने श्रवण करतात. मग मनन करतात, निदिध्यास करतात. (४)

त्याचा त्यागप्रकार । श्रोते ऐकोत सादर ।
पूर्वी बोलिला जो अधिकार । तीव्रतर वैराग्य ॥५॥
त्यानंतर ते जे त्याग करतात त्याचा प्रकार आता श्रोत्यांनी सादर होऊन ऐकावा. पूर्वी (मागे) जो अधिकार सांगितला तो तीव्रतर वैराग्य असणाऱ्या साधकाचा अधिकार होय. (५)

तेणें सर्व कर्म त्यागावें । एक सद्‍गुरुपाद सेवावे ।
कामादि ईषणा स्वभावें । विरजाहोमीं जाळी ॥६॥
त्याने सर्व कर्माचा त्याग करावा. सद्गुरुचरणांची सेवा तेवढी करावी. कामादी सर्व इच्छा तो विरजाहोमामध्ये जाळून टाकतो. (६)

भूलोक अकार विश्वाचा । तैजस उकारीं विलाप त्याचा ।
स्थूल भोग जागृतीचा । व्यष्टिसमष्टिसह ॥७॥
देहाचे जागृती, स्वप्र, सुषुप्ती या तीन अवस्थांनुसार स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे प्रकार होतात. त्यानुसार त्या अवस्थांच्या अभिमानी जीवांचेही अनुक्रमे विश्व, तैजस आणि प्राज्ञ असे प्रकार होतात. या जीवांचे तीन अवस्थांनुसार स्थूल, प्रविविक्त आणि आनंद असे तीन प्रकारचे भोग असतात. ओंकाराच्या तीन मात्रांमध्ये विभागणी केल्यास या तिन्ही देहांच्या अनुक्रमे अ, उ, म अशा मात्रा ठरतात. सप्त लोकांपैकी या तिन्ही अवस्थांचे भू, भुव: आणि स्व: असे तीन लोक असतात. (वरील चार ओव्यांमध्ये स्वामींनी ही माहिती दिली आहे. ती मागेपुढे झाली आहे. ती एकत्रितपणे जुळवून येथे दिली आहे. केवळ अनुवादामुळे गोंधळ उडेल म्हणून ती या स्वरूपात दिली आहे. पुढे अनुवाद दिला आहे. ) भूलोक अकार, विश्व या अभिमानी जीवाचा असून तैजसाच्या उकारामध्ये त्यांचे मिश्रण होते. व्यष्टी समष्टीसह (पिंड ब्रह्मांडासह) जागृतीचा स्थूल भोग तेथे घडतो. (७)

चंचल भास उकार । भुवर्लोक हा समग्र ।
प्रविविक्त भोग अहंकार । तैजस विष्णू ॥८॥
तैजस या अभिमानी जीवाला विष्णू म्हणतात. त्याचे चंचल भास असून उकार, समग्र भुवलोक, प्रविविक्त भोग आणि अहंकार हे त्याचे प्रकार होत. (८)

याचा विलाप मकारीं । करितां मृगजलाचेपरी ।
सप्तदशाची सामुग्री । अहाच वाटे ॥९॥
त्यांची कारणदेहाच्या मकारामध्ये सरमिसळ करताच सूक्ष्म देहाचे जे सतरा घटक असतात त्यांची सामग्री मृगजळाप्रमाणे निरर्थक ठरते. (९)

स्वर्ग सुषुप्ति अज्ञान । शून्य मकार प्राज्ञ ।
आनंदभोग निस्तत्वपण । या विलापन अस्तित्वीं ॥१०॥
कारण देहाची स्वर्ग लोक, सुषुप्ती अवस्था, अज्ञान हे स्वरूप, मकार (टिंब) ही मात्रा, प्राज्ञ हा अभिमानी जीव, आनंद हा भोग (निस्तत्त्वपणा) , या सामग्रीचा सद्‌रूपात (अस्तित्वात) लोप करावा. (१०)

तों प्राज्ञ ना अप्राज्ञ । उरे केवळ प्रज्ञानघन ।
अंतर्यामी शिव संपूर्ण । तयासीच बोलिजे ॥११॥
सद्‌रूप प्राज्ञ नाही की अप्राज्ञ नाही, अंतर्यामी व्यापून राहिलेला प्रज्ञानघन आत्मा तेवढा उरतो. त्यालाच शिव असेही म्हणतात. (११)

अर्थ इंद्रियाहूनि पर । तेही मनाच्या अवर ।
मनाहुनी बुद्धीचा विचार । सूक्ष्मत्वें पैलीकडे ॥१२॥
अर्थ इंद्रियांहून पलीकडे असतो. मन त्याच्या पलीकडे असते. (शब्दश:-मनाअलीकडे इंद्रिये असतात. ) बुद्धी सूक्ष्मत्वाच्या दृष्टीने मनाच्या पलीकडे असते. (१२)

त्याहुनी महान अंतरात्मा । चंचलत्वें महत्तात्व नामा ।
पुढें अव्यक्त त्याहुनी सीमा । पराकाष्ठा पुरुषरुप ॥१३॥
अंतरात्मा तिच्याहूनही पलीकडचा असतो. चंचलत्वाच्या दृष्टीने महत्तत्त्व, त्याहून अव्यक्त आणि त्याहीपलीकडे पुरुष असतो. (१३)

उपाधियोगें पुरुष नाम । सकळ विश्रांतीसी विश्राम ।
उरे केवळ आत्माराम । तुर्यु नाम जया ॥१४॥
त्याला उपाधींमुळेच पुरुष असे नाव दिले जाते. जो सगळ्या विश्रांतीची विश्रांती आहे. ज्यालाच तुर्य असेही नाव आहे, तो केवळ आत्माराम शेवटी उरतो. (१४)

मग अकार तोचि उकार । उकिआर तोचि मकार ।
अर्धमात्रा सर्वेश्वर । प्रणवरूप जो ॥१५॥
प्रणवाच्या साडेतीन मात्रांपैकी अकार तोच उकार-उकार तोच मकार असतो. अर्धमात्रा यांनी मिळून सर्वेश्वर प्रणव शेवटी उरतो. (१५)

भूत भविष्य वर्तमान । यासी अतीत जो निरंजन ।
हा प्रणवरूप संपूर्ण । एकाक्षर ब्रह्म ॥१६॥
हे प्रणवाचे संपूर्ण रूप एकाक्षर ब्रह्मच असून ते भूत, भविष्य, वर्तमान यांच्या पलीकडचे असून ते निरंजन म्हणजे निर्विकल्प, निष्कलंक असते. (१६)

क्षरत्व वृत्ति निमाली । अक्षरत्वें निश्चया आली ।
नामरूपें अनायासें गेली । उरली चिन्मात्र सत्ता ॥१७॥
तेथे क्षय पावणारी वृत्ती नष्ट होते. अक्षयत्वाने ती स्थिर होते. नामरूपे आपोआप लयाला जातात. शेवटी जाणीवरूप सत्ता मात्र उरते. आता या विविदिषा संन्यासाची तयारी कशी होते ते पहा. (१७)

व्यतिरेक वृत्तीसी धुतलें । चिद्‍रूप अन्वयें रंगविलें ।
पिंडब्रह्मांड आच्छादिलें । काषाय वस्त्रें ॥१८॥
सर्वांपेक्षा भित्रत्वाने राहणाऱ्या वृत्तीला धुवून काढले आणि मग सर्व एकरूप पहाणाऱ्या वृत्तीने चिद्‌रूपाला म्हणजे जाणिवेच्या (चैतन्याच्या रूपाला रंगविले आणि सर्व पिंड ब्रह्मांडच भगव्या रंगाच्या वस्त्राने झाकून टाकले. (१८)

स्थूल वसन त्यागिलें । लिंगसूत्र तें तोडिलें ।
मूळ खांडून काढिलें । अज्ञानशिखेचें ॥१९॥
स्थूल देहरूपी वस्त्राचा त्याग केला, लिंगदेहरूपी यज्ञोपवीत तोडून टाकले, अज्ञान म्हणजे कारणरूप शेंडीचे मूळच उपटून काढले. (१९)

दृश्यवस्त्र रंगविलें कावीं । प्रणवसूत्रामध्यें गोवी ।
कटिबंद कौपीन मिरवी । मोक्षकामा आच्छादन ॥२०॥
सर्व दृश्यरूपी वस्त्र कावेने रंगवले प्रणवरूपी सूत्रात गोवले. तोच कटिबंद आणि कौंपीन (लंगोटी) असून त्यांनी मोक्षकामनेला झाकून टाकले. (२०)

अष्टदेह पिंड ब्रह्मांड । अष्टपर्व नारायण दंड ।
मध्ये श्वेतचिद्वस्त्र खं । मूलाग्र ज्ञानाज्ञान ॥२१॥
पिंड ब्रह्मांगामहित अष्ट देह म्हणजे आठ कांड्यांचा नारायणदंड होय. त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचा जाणीवरूप वस्त्राचा तुकडा बांधला. ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही त्याच्या मुळाला आणि शेंड्याला बांधले. (२१)

अग्रीं दिसे किंचिदज्ञान । मुळीं पेटला ज्ञानाग्नि ।
सुटला वैराग्य प्रभंजन । क्षणमात्रें उरों नेदी ॥२२॥
शेंड्याला किंचित अज्ञान दिसते. मुळाशी ज्ञानरूपी अग्नी पेटवलेला आहे. पण वैराग्यरूपी जोराचा वारा त्या अग्नीला क्षणभरही टिकू देत नाही, (२२)

कमंडलू पंचभूतिक । त्यांत चैतन्यजळ हें एक ।
कमंडलू फुटतांहि न्यूनाधिक । जळ तो नव्हे ॥२३॥
पंचमहाभूतांचे कमंडलू सिद्ध करून त्यात चैतन्यजल घातले आहे. कमंडलू फुटला तरी चैतन्यजल कमीजास्त होत नाही. (२३)

निमिष्यापासून कल्पवरी । कालचक्राची जे फेरि ।
जप प्रणवाचा निर्धारीं । हंसाक्षरीं चाले ॥२४॥
एका निमिषापासून कल्पपर्यंत जी कालचक्राची फेरी पूर्ण होते, तोपर्यंत हंसाक्षरांनी (सोऽहम् अथवा अहंस:या मंत्रांनी) प्रणवाचा जप चाललेला असतो. (२४)

सहज आसन सहज जप । सहज चाले आपेआप ।
सहज समाधि सुखरूप । जेथें उत्थान असेना ॥२५॥
त्याचे आसन सहज असून जपही सहज चाललेला असतो. त्याचे चालणे सहज आपोआप चालल्यासारखे असून समाधीही सहजच असते. तिच्यातून त्याचे उत्थान होत नाही. (२५)

क्रियारूप जें कर्म । हा राहिला सर्व नेम ।
चत्वार उरलीं असतीं नामें । अवधारा त्यांची ॥२६॥
क्रियारूप कमें असलेला त्याचा नित्यक्रम बाजूला राहतो. आता त्याच्यासाठी फक्त चारच कमें राहिलेली असतात. त्यांची नावे ऐका. (२६)

स्नान शौच भिक्षा एकांत । याचीं रूपें ऐका समस्त ।
मन सज्जिलें स्वरूपांत । हेंचि स्नान यतिवरा ॥२७॥
ती कमें म्हणजे स्नान, शौच, भिक्षा, एकांत. त्यांची रूपे सर्वजण ऐका. मन स्वरूपात गढलेले असणे हेच यतिवराचे स्नान असते. (२७)

शौच तो इंद्रियदमन । ब्रह्मामृताचें भोजन ।
द्वैतेंविण अद्वैत सेवन । हाचि एकांत उत्तम ॥२८॥
शौच म्हणजे त्याच्या दृष्टीने इंद्रियदमन हेच होय. ब्रह्मामृताचे भोजन हीच त्याची भिक्षा म्हणजे जेवण असते. द्वैतावाचून अद्वैताचे सेवन हाच त्याचा एकांत असतो. (२८)

संशयरहित अपरोक्ष ज्ञान । होय तोंवरी हें साधन ।
होतां निजांगें आपण । सर्व गळे आपेआप ॥२९॥
संशयरहित अपरोक्षज्ञान होईतो हे साधन चालते. स्वत: आत्मरूप झाल्यानंतर सर्व आपोआप गळून पडते. (२९)

मग विविदिषा राहिली । विद्वत्ता ते प्राप्त जाली ।
कर्तृतंत्राचि पावली । वस्तुरूप दशा ॥३०॥
मग जाणण्याची इच्छा लोप पावते. कारण जाणावयाचे ते त्याने जाणलेले असते. त्याच्या अंगी ज्ञानरूपता बाणलेली असते. इतका काळ त्याच्याकडे कर्तृतंत्रताच होती. तिचे रूपान्तर वस्तुतंत्र होण्यात झाले. (३०)

एवं ऐसा हा यतिवर । बहु दुर्लभ भूमीवर ।
जयाचे दर्शनें प्राणिमात्र । उद्धार गति पावती ॥३१॥
अशा प्रकारचा यतिश्रेष्ठ पृथ्वीवर दुर्लभच होय. त्याच्या दर्शनाने सर्व प्राणिमात्रांचा उद्धार होतो. (३१)

वेषधारी बहु असती । दंड काषाय वागविती ।
परी वार्ताहि नेणती । श्रवणमननाची ॥३२॥
बाकीचे वेषधारी पुष्कळ असतात. ते दंड, भगवे वस्त्र धारण करतात, परंतु श्रवण-मननाची वार्ताही त्यांच्या कानी कधी पडत नाही. (३२)

निदिध्यास मग कैचा । साक्षात्कार दूर साचा ।
अति दूरतर वाचा । केवि बोलावा ॥३३॥
मग निदिध्यास त्यांना कोठून जमणार ? साक्षात्कार तर दूरच राहिला. वाणीने त्याचे वर्णन कसे करता येईल ? वाणीला तर ते ब्रह्म आणखीनच दूर असते. (३३)

उपटून सांडिली शेंडी । वासनेची वळली जुंबाडी ।
सदा सर्वदा तातडी । भिक्षा कलहाची ॥३४॥
त्याने शेंडी उपटून टाकली तरी वासनेची पेंडी तशीच वळलेली असते. आणि सदा सर्वकाळ भिक्षा मागण्याची, भांडणे करण्याची त्यांना घाई असते. (३४)

संत म्हणती निंदा कासया । वाणीसी श्रमचि वायां ।
तरी हे निंदा नव्हे स्वामिराया । अंतरी खेद वाटे ॥३५॥
यावर संत म्हणतील की, अशांची निंदा करून काय फायदा ? विनाकारण वाणीला श्रमच होतील. तर यावर आमचे स्पष्टीकरण असे की, ही निंदा नव्हे. अंत:करणात जो खेद वाटतो त्याचे हे वर्णन आहे. (३५)

कैसें जि हें अज्ञान । भुलविलें चेटकिया मायेन ।
काय करिती बापुडे दीन । सद्‍गुरुवाचोनी ॥३६॥
काय हे अज्ञान ? चेटकी मायेने या लोकांना कसे भुलविले ? हे बिचारे सद्गुरूवाचून काय करतील ? (३६)

असे जे सद्‍गुरुपदीं अनन्य । तेचि त्रिलोकीं धन्य ।
येरसर्वही अमान्य । वेदबाह्य ॥३७॥
सद्गुरूंच्या चरणी जे अनन्य आहेत असे लोक त्रैलोक्यात धन्य होत. बाकीचे वेदबाह्य गोष्टींप्रमाणे अमान्य होत. (३७)

जरी जाले जगविख्यात । अथवा वेद-शास्त्र-अधीत ।
तरी गुरुविण व्यर्थ त्यांचे जीवित । अजागलस्तनापरी ॥३८॥
जरी ते जगविख्यात झाले, वेदशास्त्रसंपन्न झाले, तरी त्यांचे जिणे सद्गुरूवाचून अजागल स्तनाप्रमाणे (शेळीच्या गळ्याशी लोंबणाऱ्या स्तनाप्रमाणे) व्यर्थ होय. (३८)

जेणें सत्संग धरिला । श्रवण मनन अभ्यासूं लागला ।
तया अवलोकून उचंबळला । ज्ञात्याचा आल्हाद ॥३९॥
ज्याने सत्संग धरला आणि जो श्रवणमननाचा अभ्यास करू लागला, त्याला पाहून ज्ञात्याचा आनंद उचंबळून येतो. (३९)

ज्ञानी जे पूर्ण समाधानी । त्याचा महिमा कोण वाखाणी ।
परी लागले जे गुरुभजनीं । त्या अनुमोदन संतांचे ॥४०॥
जे पूर्ण समाधानी ज्ञानी असतील, त्यांचा महिमा कोण वर्णन करील ? पण, जे गुरुभजनात निमग्न होतात, त्यांना संतांचे अनुमोदन लाभते. (४०)

केवळ अज्ञानी जे भ्रांत । तयांची खंती करी चित्त ।
वादी जे का पाषांडयुक्त । तया मौनचि बरें ॥४१॥
पण जे केवळ अज्ञानी आणि भ्रांत आहेत त्यांच्याबद्दल मनाला खंत वाटते आणि जे पाखंडी वादविवादाला प्रवृत्त होतात, त्यांच्या बाबतीत मौनच धारण केलेले बरे. (४१)

विविदिषासंन्यासपरी । येथें बोलिली निर्धारी ।
पुढें स्वानुभवाचे अनुकारीं । बोलिजे ते ऐका ॥४२॥
अशा प्रकारे विविदिषासंन्यासाचा प्रकार येथे सांगितला, पुढे स्वानुभवानुसार वर्णन केले जाईल, ते ऐका. (४२)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
विविदिषासंन्यासप्रकारे । तृतीयसमासः ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
स्वानुभूतिवर्णन


मज मागील दुःख आठवलें । स्वप्नवृत्तांत चेऊनी बोले ।
त्यारीती पाहिजे ऐकिलें । वैराग्य उपयोगी श्रोतीं ॥१॥
मला मागील दुःखाची आठवण झाली. स्वप्रातला वृत्तान्त मी जागृतीत येऊन सांगत आहे. त्या रीतीने श्रोत्यांनी वैराग्यासाठी उपयुक्त होईल म्हणून ते ऐकावे. (१)

अहो या सामर्थ्य मायेचें । विस्मयें बोलिलें न वचे ।
आपण खपुष्प परी जगाचे । दाविले खेळ ॥२॥
अहो, या मायेचे सामर्थ्य अगाध आहे. विस्मयामुळे ते सांगता येत नाही. स्वतः खपुष्प असूनही ती जगाचे विविध खेळ दाखविते. (२)

मी हा निर्धर्म अविनाशी । त्या मज बांधोनी ममतापाशीं ।
व्याघ्रापरी आपण दरवेशी । हो‍ऊनि हिंडविलें ॥३॥
खरे तर मी धर्महीन, अविनाशी स्वरूपाचा. पण असे असूनही ममतापाशांनी बांधून दरवेशी जसा वाघाला दारोदारी हिंडवितो तसे तिने मला हिंडविले आहे. (३)

क्षणे नरक क्षणे स्वर्ग । क्षणा देव क्षणा तिर्यग ।
क्षणा दाखवी मध्यभाग । मनुष्यादि योनी ॥४॥
एका क्षणात नरक, तर दुसऱ्या क्षणाला स्वर्ग, या क्षणाला देव तर दुसऱ्या क्षणाला वृक्षकीटकादी योनी, आणखी तिसऱ्या क्षणी मधल्या अवस्थांतील मनुष्यादी योनी असे हिंडविले आहे. (४)

नाथिलेंपण महापुरीं । चुबकुळ्या देत खालीवरी ।
उसंत नेदी अणुमात्री । सुखदुःख भोगवी ॥५॥
नसलेल्या खोट्या महापुरात तिने मला खाली वर अशा बुचकुळ्या दिल्या. एक क्षणाचीही उसंत न देता तिने मला सुखदुःखे भोगायला लावले. (५)

समुद्रींचे रेणु किती । नव्हे जैसी गणती ।
ऐशा अनंत योनीप्रती । मजसी हिंडविलें ॥६॥
समुद्रातील वाळूचे किती कण असतील ? त्यांची जशी गणना करता येणार नाही, त्याप्रमाणे असंख्य असलेल्या जीवयोनीमधून तिने मला फिरविले. (६)

म्यां तेथें जें जें केलें । तें तें अघासीच साह्य जालें ।
तये आधीन माझें काय चाले । कैवारियाविण ॥७॥
मी तेथे जे जे केले ते सर्व पापालाच साहाय्यभूत झाले. तिच्या अधीन असल्यामुळे आणि कोणी कैवारी न भेटल्यामुळे माझे काय बरे चालू शकले असते ? (७)

ऐसे कासाविस होतां । नरदेहा आणी अवचिता ।
तेथें कांही करूं धांवतां । पुन्हा आसुडी तेथुनी ॥८॥
अशा प्रकारे फिरताना मी खूप कासावीस झालो. मग अचानकपणे मी नरदेहात जन्माला आलो. तेथे काही करायचा प्रयत्न केला तर तेथूनही तिने मला हुसकावून लावले. (८)

भेणें देवा शरण गेलों । परि मी न वचे रक्षिलों ।
सत्यलोकादि हिंडलों । तरी हे बाई सोडीना ॥९॥
शेवटी भीतीने मी देवाला शरण गेलो. पण त्यांच्याकडून माझे रक्षण कोणी केले नाही. सत्यलोक इत्यादी लोकांतही फिरलो पण या बाईने पिच्छा सोडला नाही. (९)

सर्व देव इच्या आधीन । इच्या भयें कापती जाण ।
तरी आतां कैवारी कोण । मजलागीं सोडवी ॥१०॥
सर्व देवच हिच्या अधीन होते. हिच्या भयाने ते चळचळा कापत असतात, तर अशा परिस्थितीतून माझी सुटका करील असा रक्षणकर्ता कोण बरे असेल ? (१०)

देव म्हणती कर्मे करीं । पापाची होय जंव बोहरी ।
पुण्यसामुग्री असे पदरीं । तरिच सुख होईल ॥११॥
देव मला म्हणत असत की, कमें करीत रहा पापांचे जेव्हा जळून भस्म होईल आणि जेव्हा गाठी थोडेफार पुण्य साचेल, तेव्हा तुला सुख प्राप्त होईल. (११)

मग कर्में आदरिलीं । बहु कष्टें सिद्धी गेलीं ।
तेणें पुढें ओडवलीं । स्वर्गसुखें ॥१२॥
मग कर्मे करण्यास आरंभ केला. पुष्कळ कष्ट करून ती सिद्धीस गेली. त्यामुळे पुढे स्वर्गसुखांचे संकट उभे राहिले. (१२)

क्षणें तेथुनी टाकिलें । देवें कर्णीं हात ठेविले ।
पुन्हा भोगणें प्राप्त जालें । नाना योनी ॥१३॥
त्यातून काळ येताच मला ढकलून दिले. देवांनी कानांवर हात ठेवले. त्यामुळे निरनिराळ्या योनी फिरण्याचा भोग भोगणे सुरू झाले. (१३)

मागुती नरदेह पावला । शास्त्राचा भार वाहिला ।
व्रततपादि नेम ऐकिला । प्रवर्तलों तेथें ॥१४॥
शेवटी पुन्हा नरदेह प्राप्त झाला. त्यावेळी खूप शास्त्रे वाचून त्यांचा भार वाहिला. त्यातून व्रत, तपादी साधने व त्यांचे नियम ऐकले. मग ती साधने करायला प्रवृत्त झालो. (१४)

व्रतें केलीं उदंड । मंत्रयंत्रादि बडबड ।
नाना जप ध्यान कबाड । कण सांडोनी बडविले ॥१५॥
अनेक व्रते केली. मंत्रयंत्रादी बडबड केली. निरनिराळे जप, ध्यान इत्यादी धान्याचे कण नसलेला कडबा बडवत राहिलो. (१५)

देह क्षुधेनें पीडिला । खाऊनी नाना वृक्षांचा पाला ।
पंचाग्नीनें भाजून काढिला । तीर्थीं भिजविला चिरकाल ॥१६॥
निरनिराळ्या वृक्षांचा पाला खाऊन खाऊन देह भुकेने कष्टी झाला, त्या देहाला पंचाग्निसाधनाने भाजून काढले, तीर्थामध्ये पुष्कळ काळ भिजवला, (१६)

उलटें टांगून घेतलें । धुरें देहासी वांचविले ।
बहुकाळ वायु भक्षुन फुगविलें । भात्यापरी उदर ॥१७॥
उलटे टांगून घेतले, तेव्हा प्रतिष्ठित लोकांनी (धुरें) त्यातून देहाला वाचविले. त्यानंतर अनेक दिवस वायुभक्षण करून पोट भात्याप्रमाणे फुगविले. (१७)

देव मेळविले उदंडे । नाना धातूं किंवा गुंडे ।
तुळसी बेल फुलें कोडें । वाहिले तया मस्तकीं ॥१८॥
अनेक प्रकारचे देव गोळा केले, त्यात निरनिराळे धातूंचे देव होते, गुळगुळीत गोट्यांचे देव होते. त्या देवांच्या मस्तकांवर तुळशीची पाने, बेल, फुले इत्यादी मोठ्या कौतुकाने वाहिली. (१८)

अंतरीं वाढे कामना । बाह्य प्रवर्तलों भजन पूजना ।
तेथे देव कैचा वरी पाषाणा । वरपडा जालों ॥१९॥
ते करत असताना मनात इच्छा वाढू लागल्या तसतसा बाह्य भजन, पूजा इत्यादी साधने करण्यास प्रवृत्त झालो, तेथे देव कुठला ? उलट दगडाधोड्यांच्या अधीन झालो. (१९)

तप्त मुद्रा ताविल्या थोर । तेणें भाजिलें सर्व शरीर ।
टिळे माळा विचित्र वस्त्र । नाना सोंगें आणिलीं ॥२०॥
मोठमोठ्या मुद्रा तप्त करून त्यांनी सर्व शरीर भाजून काढले. टिळे, माळा, विचित्र वस्त्रे इत्यादी नाना सोगे धारण केली. (२०)

भस्म अंगी लेपन केलें । नखशिख रुद्राक्ष बांधिलें ।
नेत्र लावुनी ध्यान केलें । तेथें उमटलें स्त्री वित्त ॥२१॥
सर्व अंगाला भस्माचे लेप दिले, नखशिखान्त रुद्राक्ष बांधले, नेत्र बंद करून ध्यान केले, तो तेथे स्त्री आणि संपत्ती यांची चित्रे दिसू लागली. (२१)

देवें तेथें काय करावें । आपुलें अदृष्ट जाणावें ।
मायानिरासार्थ करूं जावें । तों तों वाढे द्विगुणा ॥२२॥
अशा वेळेला देवाने काय करावे ? आपले नशीब म्हणावे झाले. या मायेचे निरसन करावे म्हटले तर ती दुप्पट वाढू लागली. (२२)

वायु कोंडिला अति बळें । या या मायेचेनि सळें ।
तो तो अधिक उफाळे । नान सिद्धि बंधनें ॥२३॥
या मायेच्या वैरामुळे मोठ्या प्रयासाने वायू कोंडला. तो तो निरनिराळ्या सिद्धींच्या बंधनांसकट ती अधिक उफाळू लागली. (२३)

असो ऐसें जें जें केलें । तें तें तितुकें व्यर्थ गेलें ।
परी या मायेचें हलवलें नाहीं रोम ॥२४॥
असो, याप्रमाणे जे जे कर्म केले ते ते सर्व व्यर्थ गेले. पण या मायेचा एक केससुद्धा हलला नाही. (२४)

मग उदय पातला दैवाचा । महिमा ऐकिला सद्‍गुरूचा ।
मग न्यास करून सर्व कर्माचा । गेलों शरण कैवारिया ॥२५॥
मग दैवाचा उदय झाला. सद्गुरूंचा महिमा कानांवर पडला. मग सर्व कर्मांचा त्याग करून रक्षणकर्त्या त्या सद्गुरूंना मी शरण गेलो. (२५)

मरतयासी अमृतपान । कीं अवर्षणीं वर्षे घन ।
दुकाळीं मिळालें मिष्टान्न । तेवी स्मरण प्रभूचें ॥२६॥
मरणाऱ्या माणसाला अमृत प्यायला मिळावे, किंवा अवर्षणकाळी मेघाने वृष्टी करावी, दुष्काळात मिष्टान्न मिळावे त्याप्रमाणे मला ऐनवेळेला प्रभूचे स्मरण झाले. (२६)

अत्यंत मोकलितां धाय । त्वरें धावली गुरुमाय ।
अति कोमल हृदय । वज्रपंजरू दासासी ॥२७॥
मी हंबरडा फोडून रडू लागलो, तेव्हा गुरुमाउली वेगाने धावून आली. तिचे हृदय अतिशय कोमल असून ती आपल्या भक्तांसाठी वज्राचा पिंजराच होते. (२७)

कैवारी पाहुनिया दृष्टी । बळकट चरणीं घातली मिठी ।
सोडवीं सोडवीं कृपादृष्टी । या मायेपासुनी ॥२८॥
आपल्या रक्षणकर्त्याला पाहताच मी त्याच्या पायांना मिठीच मारली आणि म्हणू लागलो आपल्या कृपादृष्टीने आपण मला या मायेच्या तावडीतून सोडवा. " (२८)

सद्‍गुरू विचारिती मनीं । मुळींच नाही मायराणी ।
अघटित करऊं एक करणी । याचिया हातीं भक्षऊं ॥२९॥
सद्गुरू मनात विचार करू लागले. "माया तर मुळीच नाही. तरीपण याच्या हातून एक अपूर्व कृत्य घडवून आणू. त्याच्याच हातांनी मायेचे भक्षण करायला लावू. " (२९)

नाभी नाभी अभयकरें । मज संबोधिलें बारे ।
अपूर्व जडी एक आदरें । करीं समर्पिलीं माझ्या ॥३०॥
"भिऊ नकोस, भिऊ नकोस"असे म्हणून मला त्यांनी जवळ बोलाविले आणि माझ्या हातात एक अपूर्व वनस्पती त्यांनी दिली. (३०)

येथे दृष्टांत सुचला एक । उत्तरदेशिं करींचें कटक ।
त्यांत पातलें जंबूक । सारिखें पशु ॥३१॥
येथे एक दृष्टान्त सुचला. उत्तर देशात हत्तीच्या कळपात एक कोल्ह्यासारखा प्राणी आला. (३१)

वृक्ष एक वनस्पतीचा । महिमा जाणुनि तयाचा ।
गोंडा भिजऊनि पुच्छाचा । लघुशंकेनें ॥३२॥
त्याने एका वनस्पतीचा महिमा जाणून आपल्या शेपटाचा गोंडा आपल्याच लघुशंकेत बुडवून (३२)

शतावधी हस्तीचे भार । शिंपडितां होय तुषार ।
अणुप्राय पडतां अंगावर । सर्वही प्राणा मुकती ॥३३॥
ते जे कळपात शेकडो हत्ती होते त्यांच्या अंगांवर त्याने त्या लघुशंकेचे तुषार शिंपडले. त्यातील कणभर तुषार अंगावर पडताच ते सर्व हत्ती प्राणास मुकले. (३३)

मग त्या पशूनें हत्ती । भक्षून हुंगी वृक्षाप्रती ।
सान उदर परी ते भस्मती । पोटही न भरे ॥३४॥
मग त्या पशूने त्या हत्तींना खाऊन टाकले. नंतर तो त्या वनस्पतीला हुंगू लागला. त्याचे पोट लहान असले तरी एवढे हत्ती खाऊनही त्याच्या पोटात हत्तींचे भस्म झाले. त्याचे पोटही त्यामुळे भरले नाही. (३४)

सर्वही प्रेतें खाउनी । भुकेलेंचि हिंडे वनीं ।
ऐसी वनस्पतीची करणी । अघटित घडे ॥३५॥
सर्व प्रेते खाऊनही तो पशू भुकेलाच वनात हिंडत राहिला. अशी त्या वनस्पतीची अघटित करणी होती. (३५)

तेवी मज जंबुकाकरवीं । समूळ माया हे ग्रासवी ।
परी जडी आधीं जाणावी । कोठोनी आणिली ॥३६॥
त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्या रूपाने आलेल्या कोल्ह्याकडून ती माया मुळासकट खायला लावली. पण ही औषधी वनस्पती त्यांनी कोठून आणली ? ते आधी समजून घ्या. (३६)

मायेची काढोनी अंतरसाली । माझिये करीं वोपिली ।
तेणें अति क्षुधा वाढली । आज्ञा जाली भक्षीं गा ॥३७॥
त्यांनी मायेची अंतरसाल काढून माझ्या हातात दिली. त्यामुळे माझी भूक खूप वाढली. तेव्हा त्यांची आज्ञा झाली की ती आंतरसाल खाऊन टाक. (३७)

देहद्वय आधीं चघळिले । बाकस उगळूनि टाकिलें ।
अज्ञान निःशेष खांदलें । परी पोट न भरे ॥३८॥
मग आधी स्थूल सूक्ष्म हे दोन देह चघळले, चोथा टाकून दिला. अज्ञान संपूर्णपणे खाऊन टाकले, पण पोट काही भरेना. (३८)

मग ब्रह्मांड उंसापरी ।  रस घेउनी चिपाडें करी ।
हिरण्यगर्भाची सामुग्री । चंचलत्व शोखिलें ॥३९॥
मग मी सर्व ब्रह्मांडाची, उसाचा रस घेऊन चिपाडे करतात त्याप्रमाणे चिपाडे करून टाकली. हिरण्यगर्भाची सामग्री आणि चंचलत्व शोधून घेतले. (३९)

माया अविद्या शक्ति दोन्ही । आभाससहित खाउनी ।
दुजे उरले नाहीं कोणी । मायेवांचोनी निःशेष ॥४०॥
माया आणि अविद्या या दोन्ही शक्ती आणि त्यात प्रतिबिंबित झालेल्या ईश्वर आणि जीव ह्या दोन्ही आभासांसह खाऊन टाकल्या. तेव्हा मायेखेरीज दुसरे काही उरले नाही. (४०)

यज्ञीं जैसी पुर्णाहुती । माया ग्रासिली तेणें रीती ।
परी क्षुधेची नव्हे समाप्ति । कासाविस केलें ॥४१॥
मग यज्ञातील पूर्णाहुतीप्रमाणे मायाही गिळून टाकली. पण भूक काही शमली नाही. त्या भुकेने कासावीस केले. (४१)

मग सद्‍गुरुनाथें धाउनी । कांडी घेतली हिरोनी ।
मग उरला स्वानुभव खाउनी । ढेंकरू दिधला ॥४२॥
मग सद्गुरू धावून आले आणि त्यांनी हातातील कांडी काढून घेतली. मग उरला सुरला स्वानुभव खाऊन मी ढेकर दिला. (४२)

ऐक्यतेची करून शेज । सुखीं निजविलें मज ।
फिरून उठे ऐसें काज । उरलें नाहीं ॥४३॥
मग श्रीगुरूंनी ऐक्याची शेज करून मला सुखाने निजविले. त्यातून पुन्हा जागे होण्याचे कारणच राहिले नाही. (४३)

मग गुरुराजें आपण । पिंडब्रम्हांडीं घातलें ठाण ।
देहद्वयाचें वर्तन । स्वसत्तेंनें चालवी ॥४४॥
मग श्रीगुरूंनी आपण होऊन पिंडब्रह्मांडात स्थान मांडले आणि तेथून ते स्वसत्तेने स्थूल-सूक्ष्म या दोन्ही देहांचे नियंत्रण करू लागले. (४४)

मी मी वागवी हा गुरु । मीपणाचा करूनि मारू ।
एकला एक निर्विकारु । श्रुतिप्रतिपाद्य जो ॥४५॥
मीपणाचेही सद्गुरूच नियंत्रण करत होते. त्यांनीच मीपणाचा नाश करून, श्रुतिप्रतिपाद्य असा एकटा एक निर्विकार करून मला ठेवले. (४५)

यारीती प्रसंगासी आलें । तें यथामति बोलिलें ।
आतां  हर्ष खेद जाउनि उरलें । चिन्मात्र ब्रह्म ॥४६॥
अशा रीतीने प्रसंगाने आले ते मी स्वबुद्धीनुसार सांगितले. आता हर्षखेद नष्ट झाल्यानंतर केवळ चैतन्य ब्रह्म तेवढे उरले. (४६)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
स्वानुभूतिवर्णनप्रकारे । चतुर्थसमासः ॥४॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
कर्माकरणानुकार


निमाली जयाची वासना । त्या कर्मीं काज नसे जाणा ।
अहंतेविण निष्कर्मपणा । अर्थचि नसे ॥१॥
ज्याची वासना नष्ट झाली त्याला कर्माचे काही प्रयोजन नाही. अहंतेवाचून निष्कर्मपणालाही काही अर्थ नाही. (१)

समाधि ना जप ध्यान । ऐसें श्रुतीचें वचन ।
आणि स्मृतींचीहि प्रमाणें । उदंड असती ॥२॥
अशा ज्ञात्याला ना समाधीची गरज, ना जप ध्यानाची. असे श्रुतीचेच वचन आहे. याच अर्थाची स्मृतींचीही अनेक प्रमाणे आहेत. (२)

अकाम निष्काम आप्तकाम । तिहीं वेगळा पूर्णकाम ।
सर्व समाधाना विश्राम । आत्माराम सर्वदा ॥३॥
अकाम, निष्काम आणि वाप्तकाम या तिघांपेक्षा पूर्ण काम वेगळा आहे. आत्माराम तर नेहमी सर्व समाधानांचे विश्रांतिस्थान आहे. (३)

बाह्यविषयकामना गेली । तिसरी अकामता बोलिली ।
आत्मदर्शनें सहज आली । निष्कामता तया ॥४॥
बाह्य विषयांवरची कामना गेली आहे अशा स्थितीला अकामता म्हणतात. आत्मदर्शनाने त्या ज्ञान्याला सहजच निष्कामता प्राप्त होते. (४)

आत्मलाभें संतुष्टमनीं । आप्तकाम यालागुनी ।
लाभेच्छा पावे समाधानी । पूर्णकाम या हेतू ॥५॥
जो आत्मलाभाने मनात संतुष्ट झालेला असतो त्याला आप्तकाम म्हणतात. आणि ज्याची प्राप्तीची इच्छाच शांत झाली आहे त्याला पूर्णकाम असे म्हणतात. (५)

आपुला आपण सहज असतां । लाभही बोलावा केउता ।
आप्तकाम न ये बोलतां । मा कर्म निष्कर्म कैचें ॥६॥
आपला आपण सहजपणाने राहत असताना त्याला लाभ तरी कसे म्हणायचे ? जिथे आत्मकाम असेही म्हणता येत नाही तिथे कर्म, निष्कर्म हे शब्द तरी कसे वापरता येतील ? (६)

श्रुति अनुभूति उभयानें । विधि निषेधा न येणें न जाणें ।
तयासी अनुवादावें कवणें । अमुक म्हणोनी ॥७॥
श्रुती आणि अनुभव या दोन्ही निकषांनी त्याच्या ठिकाणी विधी आणि निषेध उत्पन्नही होत नाहीत आणि नाशही पावत नाहीत. अशा ज्ञात्याला अमुक प्रकारचा असे कसे म्हणता येईल ? (ज्ञाता विधि-निषेधांच्या पलीकडे पोहोचलेला असतो. त्याचे विशिष्ट प्रकारचा असे वर्णन करता येत नाही. ) (७)

तेथें कर्मज्ञानसमुच्चय हें । अप्रमाण बोलणें काय ।
जयासी श्रुति आज्ञापितां भिये । म्हणे इच्छा त्याची ॥८॥
त्याच्या बाबतीत 'कर्मज्ञान समुच्चय' हे बोलणे अप्रमाण ठरते. (त्याला अमुक मार्गच स्वीकार, अमुक स्वीकारू नकोस असे सांगता येत नाही. ) कारण वेदसुद्धा त्याला आज्ञा करायला घाबरतो. तो म्हणतो, "त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागू देत. " (८)

श्रोता म्हणे कृष्णवचनीं । कर्मसंसिद्धि समाधानीं ।
जनकादिका लागुनी । विहित कर्म असे ॥९॥
यावर श्रोता म्हणतो की, भगवद्गीतेत कृष्णाचे वचन असे आहे की, 'कर्मानेच सिद्धी प्राप्त होते. (भ. गी. ३. २०) आणि आसक्तिरहित समाधानी अशा जनकालाही विहित कर्माचे बंधन होते' असे सांगितले आहे. (९)

वक्ता म्हणे इतुके वचनीं । दुजें नायकसी कर्णी ।
त्यासी अर्थ नाहीं करणीं । आणि अकरणींहि असेना ॥१०॥
यावर वक्ता म्हणतो की, श्रीकृष्णाच्या अनेक उद्गारांपेकी तू फक्त एवढाच उद्धार ऐकलास. इतर अनेक उद्गार त ऐकतच नाहीस. त्याच गीतेत म्हटले आहे की, (भ. गी. ३. १८) त्या महापुरुषाला कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कमें न करण्याचेही काही प्रयोजन नाही. ' (१०)

हेंही वाक्य श्रीकृष्णाचें । यदर्थीं काज नसे दोहींचें ।
राजयासी द्वारपाळाचें । शासन केवी ॥११॥
"हेही श्रीकृष्णाचेच वचन आहे. त्याच्या अर्थानुसार ज्ञात्याला कर्म आणि अकर्म या दोन्हीचेही प्रयोजन नाही. राजाला द्वारपालाची आज्ञा पाळायचे बंधन असते काय ? '' (११)

श्रोता म्हणे त्या काज नसो । परी लोकोपकारार्थ करणें असो ।
श्रीकृष्ण करितसे अतिसो । विहित कर्माचा ॥१२॥
श्रोता म्हणतो की, त्याला प्रयोजन असो नसो, पण लोकोपकारासाठी तरी त्याला कर्म करणे असावे. (भ. गी. ३. २०) श्रीकृष्ण विहित कर्माचा अतिशयच आग्रह धरतो. (१२)

श्रेष्ठ जैसें आचरती । तें पाहुनी लोक वर्तती ।
म्हणोनिया ज्ञात्याप्रती । करणें हा विधी ॥१३॥
"श्रेष्ठ लोक ज्याप्रमाणे आचरण करतात ते पाहून इतर लोकही त्याप्रमाणे वर्तन करत असतात. त्यामुळे ज्ञात्याने कर्म केले पाहिजे, हा विधी होय. " (भ. गी. ३. २१) (१३)

वक्ता म्हणे सावधान । नेमू न करीच श्रीकृष्ण ।
करणे न करणें त्या स्वाधीन । इच्छिती तरी करिती ॥१४॥
यावर वक्ता म्हणतो की, "थांब. श्रीकृष्णाने ज्ञात्याला कर्म केलेच पाहिजे असा नियम केलेला नाही. करणे न करणे हे सर्वस्वी ज्ञात्याच्याच स्वाधीन आहे. त्याची इच्छा असेल तर तो करीलही. " (१४)

त्या जनचि ठाउके नव्हे । खरे बुडती तरी तारावे ।
बंधचि किमपि न संभवे । तरी मोक्ष कैचा ॥१५॥
वस्तुस्थिती अशी आहे की, ज्ञात्याला लोकच भित्रपणे ज्ञात नसतात. ते खरेच बुडत असतील तरच त्यांना तारणार ना ? मुळात बंधच नसेल तर मोक्ष कसा संभवेल ? (१५)

जरी श्रीकृष्ण बोलिला । मीही आचरतों कर्माला ।
परी नेमु न करी ज्ञातयाला । करा कीं न करा ॥१६॥
जरी श्रीकृष्ण म्हणाला की, मीही कमें करतो, तरी त्याने ज्ञात्याला हा नियम केलेला नाही. तुम्ही करा की न करा. (१६)

निश्चयोचि जरी करिता । तरी ऐसें श्रीकृष्ण न बोलता ।
कीं सर्व भौतिकीं आणि भूता । किचिदर्थ त्या नसे ॥१७॥
श्रीकृष्णाला निश्चयचा (नियम) करायचाच असता तर, "सर्व भौतिकांत आणि भूतांत ज्ञात्याला काही अर्थ वाटत नाही (३. १८) "असे श्रीकृष्म म्हणालाच नसता. (१७)

श्रोता म्हणे भगवंतासी । कर्मी अर्थ सिद्धि कायसी ।
परी लोकरीती सायासीं । सर्वही करी ॥१८॥
यावर श्रोता म्हणतो की, "भगवंताला कर्मात काय फायदा होता ? पण लोकरीतीप्रमाणे तो कष्टपूर्वक सर्व कमें करतच होता. " (१८)

वक्ता म्हणे देव संपूर्ण । वाहती प्रवृत्तीचा अभिमान ।
तयासी तो अगत्य करणें । विहितचि आहे ॥१९॥
यावर वक्ता म्हणतो, "सर्व देव प्रवृत्तीचा अभिमान बाळगणारे आहेत. त्यांना कमें करणे हे आवश्यकच आहे, असे वाटते. " (१९)

हे ज्ञातयासी नलगे । अवघीं माइकाचीं सोंगें ।
करणें न करणें लागवेगें । सांडिले तेणें ॥२०॥
पण ज्ञात्याला कर्माची जरुरी नाही. कारण हे सर्व दृश्य विश्व हे मायिकाची सोंगे आहेत. म्हणून त्यासंबंधीचे कर्तव्य काय, अकर्तव्य काय असा विचार करणे त्याने लगेच टाकून दिले आहे. (२०)

तथापि जरी आचरे । लोकरीती अनुकारें ।
करितां काय उणें पुरें । समाधानाचें ॥२१॥
तथापि लोकरीतीप्रमणे त्याने काही आचरण केले तर त्याच्या समाधानात काय उणे अधिक होणार आहे ? (२१)

कर्मी उदंड जेथें मिळाले । तेथें तेणेंही नाक धरिलें ।
बापें मेळविली जैसीं मुलें । त्यासह खेळे चक्रादि ॥२२॥
ज्या ठिकाणी कर्म करणाऱ्यांचा मेळावा जमला असेल त्या ठिकाणी तो नाकही धरील! बापाने आपल्या मुलाबरोबर खेळायला मुलं जमवली तर त्यांच्याबरोबर तोही चक्र इत्यादी खेळ खेळत नाही काय ? (२२)

मन-वाणी-अगोचर । हाचि ज्ञानाचा निर्धार ।
होतां इंद्रियाचा व्यापार । कर्मे निपजती ॥२३॥
ज्ञान हे मन, वाणी यांच्या टप्प्यापलीकडचे आहे, आणि इंद्रियांच्या व्यापारातून कमें निपजतात. (२३)

ऐसा परस्परें विषयभेद । ज्ञाता करीना कर्मोच्छेद ।
आणि कर्मीही उपमर्द । ज्ञानासी न करिती ॥२४॥
असा परस्पर विषयभेद असल्याने ज्ञाता कर्माचा उच्छेद करत नाही की कमी ज्ञानाचा करत नाहीत. (२४)

कर्मियांचे समाजीं । ज्ञाता कर्माते नावाजी ।
मुमुक्षुसाधका म्हणे काय जी । निर्फळ करिता ॥२५॥
कर्मी लोकांच्या समाजात ज्ञाता कर्माची स्तुती करील आणि मुमुक्षूला, साधकाला 'हे काय निष्फळ करता ? ' असे विचारीत बसेल. (२५)

तेथें आपणही त्यागी । करूं नेदी तया लागीं ।
श्रवण मनना प्रवर्तवि वेगीं । ब्रह्माभ्यास करवीत ॥२६॥
त्या ठिकाणी स्वतः कर्माचा त्याग करील आणि त्यांनाही कमें करू देणार नाही. उलट त्यांना श्रवण मनन यांकडे वळवून त्यांच्याकडून ब्रह्माभ्यास करवून घेईल. (२६)

येर कांहीं नसे उरलें । निःसंदेह ज्ञाते जाले ।
परी शरणागतां उपेक्षिलें । न वचे कदा ॥२७॥
त्यांना कर्म करायला काहीच उरलेले नसते. ज्ञाते निःसंदेह झालेले असतात. पण ते शरणागताची कधीही उपेक्षा करत नाहीत. (२७)

मुमुक्षूचा कृपेसाठीं । करूनि करविती अटाअटी ।
तयासी कर्तेपणाची गोष्टी । लाऊचि नये ॥२८॥
मुमुक्षूच्या कृपेसाठी स्वत: सायास करून त्यांना ते करायला लावतात. त्यांच्या बाबतीत कर्ते असा शब्द वापरूच नये. (२८)

कर्म अकर्म निष्कर्म । हा ज्ञातयासी नसे भ्रम ।
जो स्वयें आत्माराम । कर्मानिष्कर्मातीत ॥२९॥
म्हणून ज्ञात्याला कर्म, अकर्म, निष्कर्म असा भ्रम नसतोच. कारण तो कर्म, निष्कर्म इत्यादींच्या पलीकडे गेलेला असतो. तो स्वत:च आत्माराम झालेला असतो. (२९)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
कर्माकरणानुकारे । पंचमसमासः ॥५॥
इति फलरूपपंचिका संपूर्णा  ॥ १३ ॥ ओवीसंख्या २०१
हरिः ॐ तत्सत्

GO TOP