॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(उत्तरार्ध)

पंचिका १४ वी
उपसंहार

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
संतस्तवन


आतां कळस हा ग्रंथींचा । गोड घास शेवटिचा ।
स्तव आरंभिला संतांचा । मंगलरूप ॥१॥
सद्‍गुरू तेंचि संत । जे भवसागरीं हेला तारित ।
येथें भेदाची नसे मात । आदि अंत सद्‍गुरू ॥२॥
लक्षणेंचि नसतां साधूसी । स्तवनीं वाचा प्रवर्ते कैसी ।
मायायोगें स्तवितां त्यासी । तरी दोष कोणता ॥३॥
माया हें सामर्थ्य जयाचें । परादिकाही अंश तिचे ।
जीवन सागरीं सागरींचे । काय वेचे टाकितां ॥४॥
संत हेचि बुद्धिदाते । प्रकाशविती निजदृष्टीतें ।
आप्त सुहृद संतापरतें । नसे त्रिभुवनीं ॥५॥
संत वाचा आणि वाचक । संत वाणीचे प्रेरक ।
संत प्राणाचे चालक । अकर्तेपणें ॥६॥
संत साधका विसावा । संत हा निजधनाचा ठेवा ।
संत मायिकाचा गोवा । तोडोनि टाकिती ॥७॥
संत वैराग्याचें घर । संत ज्ञानाचें भांडार ।
संत उपरमासी थार । विश्रांतीची विश्रांती ॥८॥
संत हेचि सहस्त्रकर । ज्ञानप्रकाश करिती थोर ।
उदय‍अस्तुविण निरंतर । अखंड प्रभा ॥९॥
संत मायबाप सखे बंधू । मित्र स्वजन ते साधू ।
व्रतें तपें धारणा विविधु । संतावीण काई ॥१०॥
संत जीवाचा जिव्हाळा । संत आनंदाचा सोहळा ।
संत प्रेमाचा गळाळा । अमृताहुनी ॥११॥
शांति क्षमा देशधडी फिरती । तया न मिळे विश्रांति ।
मग आलिया संतांप्रती । माहेरा कन्या जेवी ॥१२॥
तीर्थे पावन न होय । व्रततपें शुद्धता न ये ।
प्रायश्चित्ता न चले उपाय । बुद्धिपूर्वक दोषा ॥१३॥
ते संतीं न लागतां घडी । अनंत जन्मीचे दोष बिघडी ।
प्रलयाग्न जैसा धडाडी । एक दसोडी उरों नेदी ॥१४॥
ज्ञानवैराग्यप्रबोधजळें । जीव कैसे शुद्ध केले ।
की शिवत्व जाले ओवळें । मायामुळें मळलेंजें ॥१५॥
बहु काय बोलूं बोलें । वेदें न वचे जें प्रकाशिलें ।
तेचि संतीं उघडे केलें । शरणागतासी ॥१६॥
ज्ञानेंचि एक पावन होती । बोले जरी वेदश्रुति ।
परी संतांवीण ज्ञानशक्ति । अंमल करीना ॥१७॥
जैसी मात्रा अति अमोलिक । सर्व रोगासी जे दाहक ।
परी वैद्य नसतां परीक्षक । व्यर्थचि जाय ॥१८॥
क्षेत्रांचे उपाध्ये सांडिले । तरी तीर्था जाउनी काय केलें ।
जेणें संतांसी अव्हेरिलें । ते मुकले निजसुखा ॥१९॥
संतांसी जो शरण आला । न पाहतीच थोर धाकुला ।
वेगीं साम्राजीं बैसविला । कृपाकटाक्षें ॥२०॥
संतांचिये कृपे ऐसी । मातेची कृपा कायसी ।
माता वधी बाळकासी । विपत्यकाळीं ॥२१॥
देव कृपावंत मोठे । शरणागतासी गोमटे ।
वैरी मारिले नेटें । समान भाव नसे ॥२२॥
शत्रु मित्र सारिखे संता । म्हणोनि देवा न ये तुळितां ।
क्षमेविशीं पाहतां । पृथ्वीचि वाटे ॥२३॥
नांगर घालोनी फाडिली । पदघातें सर्वी ताडिली ।
परी कृपेनें फळें दिधलीं । समान सर्वां ॥२४॥
परि तेही जड कठीण । कोणासी न करी पावन ।
उपमे देता संतालागुन । अति दुषणचि की ॥२५॥
लोहाचें होय सुवर्ण । परिसाचेनि सन्निधानें ।
परी परिसशक्ती जे आपण । वंचिली परिसें ॥२६॥
संतें उपदेशून दासातें । संतचि केले निभ्रांते ।
तेहि कैवल्या होती दाते । परंपरा ऐसी ॥२७॥
कामधेनु चिंतामणी । कल्पतरु कल्पिलिया दानीं ।
समर्थ असती परी कोणी । निर्विकल्प देतीना ॥२८॥
सूर्ये बाह्य प्रकाशिजे । परी अंतर तम तें न वजे ।
म्हणोनि केवि उपमिजे । ज्ञानसूर्य ते संत ॥२९॥
असो संतां नसे उपमा । मौनेंचि वंदावें पादपद्मा ।
ग्रामो नास्ति कुतः सीमा । लक्षणेविण स्तवन ॥३०॥
सर्व तीर्थांचे तीर्थ ते संत । सर्व व्रतांचे फळ ते संत ।
सर्व कर्मासि असे क्षाळित । श्रीचरण संताचे ॥३१॥
सर्व देवाचे देव साधु । संतसामर्थ्य ते अगाधु ।
कृपेसरिसा भवसिंधु । कोरडा करिता ॥३२॥
स्वस्वरूपाचे मायबाप । ते हें संताचें स्वरूप ।
अविनाशी अखंड अमुप । ते हे संत ॥३३॥
इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
संतस्तवनानुकारे । प्रथमसमासः ॥१॥॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
साधकगुरुपुत्रस्तवन


गुरु तेचि हे गुरुपुत्र । जे ज्ञानाचे सत्पात्र ।
जे पवित्रा करिती पवित्र । गुरुदास्यत्वें ॥१॥
माझिये देवार्चनींच्या मूर्ति । गुरुपुत्रचि गा निश्चिती ।
पंचप्राणाची आरती । अखंड होतसे ॥२॥
वेदार्थशुद्धजळाचा । अभिषेक होतसे साचा ।
अर्थोद्‌भूत सानुभूतीचा । परिमळु धूप ॥३॥
कल्पनेंविण सुमनातें । हार गुंफिला प्रेमतंते ।
निजानंद वृत्तीच्या हातें । कंठी सुदला न सुकेची ॥४॥
पूर्ण पूर्णात्वीं उरलें । हेंचि गुरुपुत्रा भोजन जालें ।
नामरूप हे विसर्जिलें । मुख क्षाळिलें करांसह ॥५॥
ऐसी हे अखंड पूजा । सहज होतसे वोजा ।
परी पूजकचि न दिसे दुजा । अहंपणेंविण ॥६॥
गुरुपुत्र गुरुस्वरूप । येथें कोणता पा आक्षेप ।
दीपें लाविला जैसा दुजा । प्रकाशासारिखा ॥७॥
जयाचीं लक्षणें पाहतां । अमृता आली कडवटता ।
जयाच्या तेजें मलिनता । अग्नीसी आली ॥८॥
श्रोता म्हणे तयाचीं लक्षणें । आम्हां सांगावीं कोणकोणें ।
वक्ता म्हणे सावध होणें । यथामति बोलिजे ॥९॥
नामरूप मिथ्या स्वभावें । जें जें मायोद्‌भव आघवें ।
ऐसें दृढ जालें बरवें । इच्छा नसे या हेत ॥१०॥
विषय असती बहुत । परी दोनच जीवा अनर्थ करीत ।
ते हे जाणवे स्त्री वित्त । बांधोनि घालिती बंधनी ॥११॥
मृत्तिका आणि सुवर्ण । हे दोनी जयासी समान ।
होय दोषदृष्टी जैसें वमन । त्यागचि केला ॥१२॥
एकांती जरी उर्वसी । कामशांत्यर्थ उपासी ।
परी जयाचिया मानसीं । विकारचि नव्हे ॥१३॥
पंचवर्षी कुमारी । कीं शतवर्षी म्हातारी ।
तैशाचि तरुणी सुंदरी । समान पाहे ॥१४॥
सर्वभूतीं मी एकला । स्त्रीपुरुषामाजीं व्यापला ।
मीच भोगून अलिप्त ठेला । चर्मभोग तो काय ॥१५॥
जैसा मुमुर्षू लग्नाची । इच्छा न करी साची ।
अहंकृति सांडिता देहाची । इच्छा निमाली ॥१६॥
ऐसा काम जेथें नसे । वैराग्य तेथें वसतसे ।
तमाभावीं प्रकाशें । वस्ती केली ॥१७॥
कामाचा धाकुटा बंधु । जो महा खडतर क्रोधु ।
तयासी पडला विरोधु । विवेकासी ॥१८॥
समष्टितादात्म्य पिंडापरी । आपुला आपण निर्धारी ।
माझी तुझी केली बोहरी । तरी क्रोध कैचा ॥१९॥
जिव्हा दातानें चाविली । कोणें बत्तीसी पाडिली ।
भूतें भौतिका पीडा केली । माझें काय तेथें ॥२०॥
आपुली कांता परपुरुषीं । आपण पाहतां दृष्टीसी ।
तो परु हा मी न ये मानसीं । मा क्रोध तो केवी ॥२१॥
ऐसी अक्रोधता पाहसी जेथें । विवेक ज्ञान राहिलें तेथें ।
तया साधका वेद गुह्यार्थें । माळ घातली बळें ॥२२॥
आपपरु न दिसे साचा । तरी लोभ असावा कासयाचा ।
लोभाभावीं तृष्णेचा । घातचि जाला ॥२३॥
लोभ तृष्णा हे निमाली जरी । निजतृप्ति अपैसा वरी ।
सर्व भूतीं पाहे निर्वैरी । मद तो कैचा ॥२४॥
मदाभावीं समता जाली । तेणे शांति बळावली ।
तेणें दंभवृत्ति विघुरली । नव्हती जैसी ॥२५॥
मत्सर करावा कोणासी । आपण ब्रह्म सर्व देशीं ।
लोकेविण लौकिकासी । स्वानुभवें ग्रासिलें ॥२६॥
अहंता ममता प्रयत्न । सुख दुःख पाप पुण्य ।
लज्जाभयादि संपूर्ण । देशधडी जाले ॥२७॥
शांति दांति उपरम । तितिक्षा श्रद्धा नियम ।
हें बळकाविलें परम । संपत्ति साधनें ॥२८॥
विवेक वैराग्य महा शूर । हे दोन्ही असतां खबर्दार ।
अन्य साधनाचा परिवार । पुसत घर येताती ॥२९॥
इतुकी साधनें जयापाशीं । नांदत असती दिवानिशीं ।
गुरुपुत्र साधक तयासी । नांव ठेवी श्रुति ॥३०॥
परी सर्व साधनसंपत्तीसी । जीवन जैसें उपवनासी ।
आश्रयो असे निश्चयेसी । सद्‍गुरुराज ॥३१॥
चातकासी जैसा घन । चकोरासी रोहिणीरमण ।
तैसा अनन्यासी पावन । श्रीसद्‍गुरुनाथ ॥३२॥
मुख्य सद्‍गुरूचें भजन । हेंचि कैवल्य गुरुपुत्रालागुन ।
सद्‍गुरुवीण उपासन । सच्छिष्या नाहीं ॥३३॥
गुरुदेव गुरु मायबाप । गुरु स्वरूपाचें स्वरूप ।
गुरुवीण बापुडे अल्प । सकळ कांहीं ॥३४॥
काया वाचा आणि मन । गुरुचरणीं होय अभिन्न ।
हें मुख्य गुरुपुत्राचें लक्षण । तेथें ज्ञानही असे ॥३५॥
असो ऐसिया गुरुपुत्रासी । माझी पूजा अहर्निशी ।
बहुत बोलणें कासयासी । त्या राहावयासी हृदय स्थान ॥३६॥
इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
साधकगुरुपुत्रस्तवनप्रकारे । द्वितीयसमासः ॥२॥॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
साधनोत्तीर्णप्रकार


आतां परमार्थाची संपदा । जेणें पावविलें निजपदा ।
सकळ दुःखाची आपदा । भवबाधा निरसली ॥१॥
हे उपकारी सामुग्री थोर । शब्द शास्त्र विचार ।
आणि श्रवणमननादि प्रकार । यासी उत्तीर्ण व्हावें ॥२॥
उत्तीर्णपणाची मात । कैसेनि तो पुढें संकेत ।
प्रस्तुत अवधारा सावचित्त । हे उपकारी कैसे ॥३॥
अवकाशीं जो जन्मला । प्रवृत्ति निवृत्ति दिवटा जाला ।
बंध मोक्ष या दोहीला । शब्देंचि रूपा आणिलें ॥४॥
अविद्येसी होतां वरपडा । जीवाते बंध करी उघडा ।
विद्यात्मकत्वें रोकडा । मोक्ष दे हाची ॥५॥
जैसा दुभाषी नर कोणी । समजावित उभयांलागुनी ।
तैसा शब्द अविरोधपणीं । सारिखा उभया ॥६॥
तो एकलाचि महावीर । स्त्रीवेषें जाला चतुःप्रकार ।
परादिकीं नांदे सधर । तत्तदाकार परिणमे ॥७॥
जेणें तस्कर धाडिले वनीं । आपणचि निघाला धावणी ।
तेवी या शब्दाची करणी । अघटित असे ॥८॥
हा अविद्येसी साह्य होता । नाथिलें बळाविलें द्वैता ।
तूं मी या ऐसिया नंता । बहुधा केले ॥९॥
पुढे त्रिविध प्रकारीं हा भ्रम । नाथिलेपणें करी उपशम ।
वैराग्य विचार होता परम । साहकारि जेव्हां ॥१०॥
मृत्तिकेसी अग्नि इंधन । जेधवां मिळती मूसीं पूर्ण ।
तेव्हां मृत्तिकेचेचि होय सुवर्ण । पुढें मळ झाडतां ॥११॥
अविद्यात्मकें मळला । कठिणपणीं नानात्वा आला ।
तों वैराग्य-ज्ञान-विचारें ताविला । गुहामूसेमाजीं ॥१२॥
अज्ञाण कठिणत्व परादिकांचे । जातां विद्यात्मक राहणें त्याचें ।
ऐसे उपकार शब्दाचे । असती मायां ॥१३॥
श्रोता म्हणे शब्दें येणें । आत्मा भेटविला आत्मपणें ।
किंवा अज्ञान निरसतां होणें । उपकारी कैसा ॥१४॥
आत्मया आत्मा दाविला । हा शब्दचि व्यर्थ गेला ।
अविद्यानाशें उपकारी जाला । तरी अविद्या मिथ्या ॥१५॥
मिथ्या म्हणिजे नाहीं । नाहीं ते नाशिलें कहीं ।
तरी उपकार हा कदां ही । बोलोचि नये ॥१६॥
ऐसें श्रोतयाचें उत्तर । ऐकोनि वक्ता दे प्रत्युत्तर ।
तुम्ही बोलतां हेंचि खरें । तरी तारतम्य असे ॥१७॥
अविद्या अज्ञान मुळीं नसतां । परी नाथिली आली बद्धता ।
तेचि विचारें मिथ्या होतां । अज्ञान नाशिलें ॥१८॥
आणि अविद्येसी नासुनी । आपण निमाला तत्क्षणीं ।
परादि आटल्या चारी वाणी । सहगमनीं पतिव्रता ॥१९॥
आपण सहकुटुंब निमाला । मग आत्माचि परिपूर्ण उरला ।
ऐसा उपकारी थोर जाला । दोहीपरी ॥२०॥
तैसेचि सत्शास्त्र वेदांत । शब्द ब्रह्म जया म्हणत ।
तेंहि उपकारीच होत । बोलिला न्यायें ॥२१॥
श्रवणमननादि साधन । निदिध्यासें पावे समाधान ।
मोडला परमार्थ उभवून । उपकारी जालें ॥२२॥
आतां वैराग्यसहित विचार । हे दोनी महाशूर ।
पाहतां तयांचा उपकार । थोरचि असे ॥२३॥
प्रवृत्ति निवृत्ति दोहींकडे । दोन दोन वीर असती गाढे ।
तेणें सर्व सेनेसी बळ चढे । स्वस्वदळीं ॥२४॥
प्रवृत्तिकडे क्रोध काम । हे दोन्ही दांडुगे परम ।
येणें जितुका अविद्यासंभ्रम । पैसावला बळें ॥२५॥
निवृत्तिकडे दोघे वीर । बळावले वैराग्य विचार ।
तरी कामक्रोधादि असुर । प्राणचि टाकिती ॥२६॥
मग प्रवृत्तिचि सेना । उगीच पावे अवसाना ।
विजयी देखोनि दोघां जणा । सर्व परमार्थी मिळती ॥२७॥
शमदमादि शांति । उपरमादि जितुकी संपत्ति ।
साधकाप्रति उपासिती । निर्वैरपणे ॥२८॥
म्हणोनि वैराग्य विचार । शत्रु पराभवून सत्वर ।
आपणहि निमती साचार । स्वामिकार्यार्थ ॥२९॥
मग आत्माचि आत्मपणीं अखंडैकरस पूर्णपणीं ।
विचारादिकांची ऐसी करणी । तरी उपकार थोर कीं ॥३०॥
यासि उत्तीर्णता कैसी । न देखों अन्य पदार्थासी ।
अनन्य होता सद्‍गुरूसी । सहज उत्तीर्ण ॥३१॥
कारण सद्‍गुरुंवाचून । काय करिती बापुडें दीन ।
हे सर्वही गुरोराधीन । सर्वदा असती ॥३२॥
सद्‍गुरूचे पाई डोई । ठेवितां जालों उतरायी ।
सत्य सत्य निःसंशयी । उरलों चिन्मात्ररूप ॥३३॥
इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
साधनोत्तीर्णप्रकारे । तृतीयसमासः ॥३॥॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
ग्रंथोपसंहार


आता ग्रंथ-उपसंहारु । नामे जया आगमसारु ।
चतुर्दशपंचिकेचा निर्धारु । विषय तो एकचि ॥१॥
उपनिषदादि आचार्यसंमति । वेदान्तसागर जया म्हणती  
त्यांतील सारार्थ प्राकृतीं । यथामति काढिला ॥२॥
प्राकृत भाषेंत जरी आला । अर्थ नवचें कीं बाटला ।
अंत्यजा घरिंचे अग्नीला । विटाळ कोण म्हणे ॥३॥
शास्त्रसंपन्न जे नर । जया वैराग्यादि विचार ।
गुरुमुखें अपरोक्ष साक्षात्कार । तया होय गीर्वाणें ॥४॥
अनधीत जे इतर । विविदिषा होय अधिकार ।
तयासि प्राकृत ग्रंथ परपार । करिती अनायासें ॥५॥
रिंगणीचिया वृक्षातें । अमृतफळें येतीं आयतें ।
तरी शिणावें कासयातें । आम्रवृक्षलावणीं ॥६॥
गीर्वाण शब्द टाकुनी । अर्थेचि पावे समाधानी ।
तोचि अर्थ प्राकृतीं जाणोनी । शब्द फलकट सांडिजे ॥७॥
दोहींचा अर्थ तो एक । अर्थेचि पाविजे परलोक ।
हे अनुभवी जाणती विवेक । येर ते मत्सरी ॥८॥
रामकृष्णादि अवतार । मनुष्यरूपें भूमीवर ।
सर्व जनासी जाले गोचर । महोदय भाग्याचा ॥९॥
तेचि ते वैकुंठीं असतां । कोण देखे त्या भगवंता ।
तैसें तया गुह्य संस्कृता । कोण जाणे ॥१०॥
अवतार होतां देवत्व गेलें । ऐसें नाहीं ऐकिलें ।
पतितपावन हें नाम जालें । तिहीं लोकीं ॥११॥
तैसेचि प्राकृतींच्या अर्थे । बहुत पावली परमार्थपंथे ।
न्यूनाधिक कोणी येथें । मानुंचि नये ॥१२॥
येथें सर्वा असे अधिकार । अनधीत आणि स्त्रीशूद्र ।
वैराग्ययुक्त आणि विचार । इतुके साचार पाहिजें ॥१३॥
वरी गुरुसेवेची आवडी । श्रवणमननादि अति गोडी ।
तया न लगतां अर्ध घडी । शिवा पडिपाडी होतसे ॥१४॥
स्त्रीशूद्रही शिवासमान । मा काइ न होती ब्राह्मण ।
श्रोता म्हणे हो अनुमान । थोरसा वाटे ॥१५॥
असती जे वेदाधीत । तयासीच ज्ञानें मोक्ष होत ।
अन्यथा मानितां वेदासि येत । व्यर्थता सहज ॥१६॥
वक्ता म्हणे हो सावधान । जडभरत जन्मतांचि पावन ।
तेणें केलें अध्ययन । कोणतें सांगा ॥१७॥
श्रोता म्हणे पूर्वजन्मीचें । अध्ययन असे साचें ।
वक्ता म्हणे हो सर्वांचे । ऐसेंचि असे ॥१८॥
अन्य याती ब्रह्मज्ञानीं । तेही पूर्वपुण्याची करणी ।
वेदार्थ आकळिला पूर्वजन्मीं । तोचि हा येथें प्रगटला ॥१९॥
तरी वेदासी न ये व्यर्थता । वेदचि सर्वांसि तारिता ।
पूर्वी वेदाधीत न होतां । ज्ञानीं प्रवृत्तीच नव्हे ॥२०॥
तस्मात्‌ हें पूर्वीच जालें । परोक्ष ज्ञान सर्व आकळलें ।
अपरोक्षीं उणें राहिलें । पुन्हा जन्मले या हेतू ॥२१॥
गत दिवसाचें अध्ययन । दुसरे दिवशी होय पठण ।
तैसें पूर्व संपादित जें ज्ञान । प्रगटलें येथें ॥२२॥
देशिकपूर्व परोक्षज्ञान । होय जरी सप्रमाण ।
बुद्धिपूर्वक पाप संपूर्ण । अग्नि इंधना जाळी जेवी ॥२३॥
देशिकपूर्वक अपरोक्षज्ञान । विचारें होय सप्रमाण ।
मूलज्ञाना तमा सहस्त्र किरण । मध्यान्हींचा जैसा ॥२४॥
अज्ञानचि निःशेष जातां । ब्रह्म परिपूर्ण होय ज्ञाता ।
तरी शिवादिकांची साम्यता । काय नसे त्या ॥२५॥
असो वेदार्थ आलोडुनि आला । वेदांत प्राकृतीं उमटला ।
तरी हा पाहिजे सेविला । मुमुक्षुजनीं ॥२६॥
श्रोता म्हणे ग्रंथ प्राकृत । पूर्वीच असती वेदांतसंमत ।
पूर्वाचार्य जाले बहुत । तेणें जगदोद्धार केला ॥२७॥
आतां याचे प्रयोजन कोणतें । अवधारा हों एकचित्तें ।
घरोघरीं अन्नसंतर्पणातें । श्रीमंत करिती ॥२८॥
मुमुक्षु साधक याचक । तृप्ति पावती अनेक ।
सकल ग्रंथांची अमोलिक । ठाई ठाई छत्रें ॥२९॥
कोणी एक दरिद्रियाला । धनाचा कूप सांपडला ।
तेणें करितां संतर्पणाला । काय न भक्षिती कोणी ॥३०॥
संतर्पण तेणें न करितां । काय उपवास पडती समस्तां ।
आपुल्या श्रेयार्थ तत्वतां । करितसे तो ॥३१॥
हा ग्रंथ न होतां प्रस्तुत । साधक राहती ना अतृप्त ।
परी अंतरींचा जो हेत । तो प्रगट करूं ॥३२॥
गुरुभक्ताचें घडावें सेवन । ऐसें वांछित होतें मन ।
परी दुर्बळ मी दैवहीन । तें प्राप्त कैचें ॥३३॥
ऐसें जें हीनत्व आलें । तें पाहिजे निवारिलें ।
म्हणून पूर्वीचे बोल बोलिले । उच्छिष्ट समर्थांचे ॥३४॥
हेचि गुरुपुत्र पाहती । आपुलें ठाई संतोषती ।
तेणें माझी हीनत्वगती । निरसून गेली ॥३५॥
संतोष करावा सकळांचा । हाचि प्रकार ईशपूजनाचा ।
संतोष होतां सत्साधकाचा । पूर्ण सेवेचा अधिकारू ॥३६॥
हें इतुकेचि प्रयोजन । गुरुपुत्र ते गुरुसमान ।
अन्यथा नव्हे नव्हे आण । श्रीसद्‍गुरुची ॥३७॥
आतां येव्हडाहि परिहारु । कासयासी मी मी करूं ।
कर्ता केलें याचा विचारु । पुढिले समासीं ॥३८॥
इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ग्रंथोपसंहारप्रकारे । चतुर्थसमासः  ॥४॥॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
ग्रंथाकर्तृत्वगुरुभजनप्रकार


कर्तृत्व कोणासी आलें । आणि उत्पन्न काय केलें ।
हें आतां पाहिजे धुंडिलें । सप्रतीत ॥१॥
केलें तें आधी पाहतां । मग कळेल कीं कोण कर्ता ।
म्हणोनि पाहावें आतां । केलें तें काय ॥२॥
स्पर्शादिवर्ण अनादि असती । ॐकार त्रिमात्राची गती ।
शब्दगुण आकाशाची प्रतीति । अनादीच असे ॥३॥
वेदशास्त्र ते अनादि । आणि अर्थ तो सर्वा आदि ।
तरी केलें हें प्रतिपादी । नूतन कोण ॥४॥
केलें तें न दिसे कोठें । तरी तें व्यर्थ अवघें खोटें ।
मग कर्तेपणाचें तुटें । मूळ सहजचि ॥५॥
तथापि देहासी करणें घडे । तरी हे सुषुप्तींत न करी मढें ।
देहावीण इंद्रिया राहणें न घडे । मा करणें कैंचें ॥६॥
प्राण तो जडत्वें न करिती । बुद्ध्या परप्रकाशें वर्तती ।
देहावीण तया आदिअंती । रूपचि नाही ॥७॥
आत्मा तरी निराभास । मिथ्यात्वें न करी चिदाभास ।
उभयतादात्मीं तयास । कर्तृत्व जरी ॥८॥
तादात्म्य अज्ञानें केलें । ज्ञान होतां तें नासलें ।
आतां हें कर्तृत्व आलें । कोठें पहा ॥९॥
केळीचा गाभा पाहूं जातां । सर्व टरफलें येती हातां ।
तरी जयाचे नांव कर्ता । तो खपुष्पापरी ॥१०॥
कर्ता ठाईचा जन्मेना । केलें तें मिथ्या नाना ।
तरी आतां बोलावे ना । केलें न केलें ॥११॥
सर्व ब्रह्मांड जेणें केलें । तेथें कर्तृत्व नाहीं आलें ।
मृगजळासी वडवणिलें । हे मिथ्या शब्द ॥१२॥
मागील वर्ण पुढें जोडी । पुढिल नेले मागिलकडि ।
इतुक्या हेतु उगाचि बडबडी । कर्तेपणें ॥१३॥
असो सद्‍गुरूनाथ हें मीपण । उरोचि नेदी आपण ।
सर्व जालें जें निरूपण । कोणे रीती कळेना ॥१४॥
आदिअंती हा सद्‍गुरू । मध्येंहि तयाचा विस्तारू ।
मी मी हा कैचा चोरु । उरला तेथें ॥१५॥
पेरिला तेव्हां असे उसु । वाढतांहि म्हणावे उसु ।
काढतांहि उसीं उसु । रसरूप अवघा ॥१६॥
मुळीं कंदही दिसेना । सेंडा फळ हि असेना ।
मध्ये कणिसहि लागेना । तरी निर्फळ नव्हे ॥१७॥
उस सर्वांगी सफळ । तेथें कल्पू नये फळ ।
म्हणून हा सद्‍गुरू दयाळ । ग्रंथा आदिअंती ॥१८॥
डोरलियाचिया व्रता । पुसे विमानाची वार्ता ।
तैसे नसे गा वेदांता । सप्रतीत ज्ञान ॥१९॥
शब्दा सरिसे भरंगळले । तरी तें जाणावे व्यर्थ गेलें ।
अर्थरूपचि श्रवणें जालें । या नांव प्रतीति ॥२०॥
पापाची खंडणा देहबुद्धीसहीत । होता होइजे निभ्रांत ।
ब्रह्मरूप होय निवांत । या नांव प्रतीति ॥२१॥
भोजन करितां होय तृप्ति । सर्वेचि ढेंकरु असे देती ।
हेचि मुख्य फलश्रुति । दुजा पुसणें नलगे ॥२२॥
दृश्य पाप वोसरले । पुण्य परब्रह्म उरलें ।
तरीच प्रतीत बाणलें । समाधान अंगीं ॥२३॥
ऐसें सप्रतीत जरी कळलें । तरीच पाहिजे अंगिकारिलें ।
येर अवघेचि फोल जालें । शब्दजात ॥२४॥
असो ज्ञान जालिया संपूर्ण । यावत्प्रारब्ध देहाचें वर्तन ।
मुक्ति वरील सद्‍गुरूभजन । हेंचि फल ज्ञानाचें ॥२५॥
तयाचीं लक्षणें कैसीं । अभिन्नपणें एकरसीं ।
चित्सागरीं लहरी जैसी । विलसत असे ॥२६॥
देहबुद्धि तरी दास । जीव तरी तुझा अंश ।
आत्मत्वीं तूं मी दोहींस । ठाव नाहीं ॥२७॥
संत सत्‌ आणि सद्‍गुरु । हा नामभेदाचा प्रकारु ।
परी तो एकचि निर्विकारु । मीपणेंविण ॥२८॥
मीपणेंविण भजन । तेंचि नवविध लक्षण ।
सच्चरणा नुरावें भिन्न । वेगळेपणें ॥२९॥
श्रवण कीर्तन स्मरण । पादसेवन अर्चन ।
वंदन दास्य परिपूर्ण । सख्य निवेदन नववें ॥३०॥
हे नवविध परी एक । ऐक्यभक्तीचें कौतुक ।
जाला ग्रंथाचा विवेक । संपूर्ण येथुनी ॥३१॥
आतां संतांसी विनवणी । सावध असावें श्रोतेजनीं ।
परोपकारालागुनी । वरप्रसाद मागों ॥३२॥
श्रोते वक्ते बद्धांजलि । ऐकावया सरसावली ।
गुरुमाउली प्रसन्न जाली । म्हणती त्वरा करा ॥३३॥
संत सद्‍गुरू अति उदार । चिद्‍गगनीं उदेला दिनकर ।
साधक मुमुक्षु त्यासमोर । प्रार्थिते जाले ॥३४॥
सद्‍गुरुसी जें अनन्यशरण । तत्काल व्हावें द्वैतखंडण ।
संत म्हणती सुप्रसन्नवदन । तथास्तु तथास्तु ॥३५॥
अहंकाराचा वारा । न लागो तया सुकुमारा ।
निघती संत मुखोद्‍गारा । तथास्तु तथास्तु ॥३६॥
कल्पनेची उष्ण झळी । न स्पर्शोचि साधककुळीं ।
म्हणती संत मुखकमळीं । तथास्तु तथास्तु ॥३७॥
माइकाची भीड न पडो । गुरुचरणीं वृत्ति दडो ।
संत म्हणती तैसेंचि घडो । तथास्तु तथास्तु ॥३८॥
स्वस्वरूपाचा विसरु । क्षणभरी न हो अवसरू ।
ऐकतां बोलतील सद्‍गुरू । तथास्तु तथास्तु ॥३९॥
गुरुनामेंवीण शिणे वाणी । तरी जिव्हा जावो झडोनी ।
संत उदार बोलती तत्क्षणीं । तथास्तु तथास्तु ॥४०॥
गुरुविण देखे जरी अनेक । तरी तत्क्षणीं फुटो हा मस्तक ।
संत बोलती अलोलिक । तथास्तु तथास्तु ॥४१॥
मी ब्रह्म हें ही मुरो । परी सद्‍गुरूचरणीं उरो ।
संत म्हणती वासना पुरो । तथास्तु तथास्तु ॥४२॥
झाला एकचि जयजयकार । वरदाष्टकाचा प्रकार ।
मौनेचि घातले नमस्कार । अनन्यभावें ॥४३॥
या वरदाष्टकाचे विश्वासें । लागती सद्‍गुरूचे कासे ।
तयासि फल तें कायसें । फलरूप होय ॥४४॥
इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ग्रंथाकर्तृत्वगुरुभजनप्रकारे । पंचमसमासः ॥५॥
इति उपसंहारपंचिका संपूर्णा  ॥१४॥  ओवीसंख्या १८४ ॥ उत्तरार्ध ओवीसंख्या १४४३ ॥
इति श्रीमद् आगमसारः समाप्तः ॥ एकंदर संख्या ३५२६ ॥

GO TOP