॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(उत्तरार्ध)

पंचिका ८ वी
समाधिअभ्यास

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
निदिध्यासपंचदशांगप्रकार


श्रोता पुसे वक्तया लागून । पूर्वार्धीं जालें निरूपण ।
उत्तम अधिकारियाचें लक्षण । आतां एक अपेक्षा ॥१॥
श्रोता वक्त्याला विचारतो, "पूर्वार्धामध्ये जे आपण निरूपण केलेत, त्यामध्ये उत्तम अधिकारी कुणाला म्हणावे, याची चिन्हे आपण सांगितलीत. आता आणखी एक अपेक्षा आहे. (१)

मंदप्रज्ञ भावार्थी । तया साधनें मोक्षप्राप्ति ।
तरी तयासि होय मुक्ति । तेचि निरोपा ॥२॥
आता मंद प्रज्ञ आणि भाविक माणसाला साधनांनी मोक्ष मिळतो म्हणता, तरी त्यालाही मोक्षप्राप्ती कशी होते ते सांगा. (२)

वक्ता बोले तदनंतर । त्यासिहि पाहिजे अधिकार ।
विश्वासी आणि तत्पर । साधानाविशीं ॥३॥
त्यावेळी वक्ता उत्तर देतो की, त्या माणसालादेखील मुळात पात्रता ही पाहिजेच. त्याला आपल्याला सांगितलेल्या साधनांवर विश्वास पाहिजे आणि तत्परता (त्या साधनांना वाहून घेण्याची तयारी) पाहिजे. (३)

सुषुप्ति आणि मरण । तों काल राखी अनुसंधान ।
तरी तोहि पावे समाधान । विचारापरी ॥४॥
झोप आणि मरण येईपर्यंत (म्हणजे आपल्या जागृतावस्थेत सर्वकाळ) सर्वकाळ वरील गोष्टींचे अनुसंधान (ध्यास) कायम ठेवील तर त्यालाही विचारमार्गाप्रमाणे समाधान मिळेल. (४)

सांख्ययोगें होय पावन । तेंचि पाविजे योगेंकडून ।
ऐसें बोलिला भगवान । अर्जुनाप्रति ॥५॥
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत (भ. गी. ५. ५) सांगितले आहे की, सांख्याच्या (विचाराच्या) मार्गाने जो उद्धार होतो, तोच योगाच्या (साधनमार्गाने) मार्गानेही होतो. (५)

येथें कोणी भाविती । मायादिकां सत्यत्वें स्थापिती ।
तरी ते मतवादियाची मति । आभासयुक्त सांख्यादि ॥६॥
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांख्य आणि योग अशी दोन मोक्षाची साधने सांगितली आहेत. त्यामुळे काही लोकांची अशी कल्पना होते की, सांख्यदर्शनाप्रमाणे श्रीकृष्णदेखील प्रकृती अथवा मायातत्त्वाला सत्य म्हणून प्रस्थापित करीत आहेत. पण ते खरे नाही, असे मत मांडणाऱ्यांची बुद्धी कशीही असो ती खरी नाही. सांख्य दर्शनाचा विचार आभासिक म्हणजे खोटाच आहे. (६)

सांख्य म्हणिजे विचार । योग म्हणिजे चित्त स्थिर ।
विचारें पावले परपार । तें योगेंहि पावे ॥७॥
सांख्य शब्दाचा खरा अर्थ येथे विचारमार्ग असा आहे. योग शब्दाचा अर्थ चित्त स्थिर करण्याचा साधनरूप अभ्यासमार्ग होय. विचाराच्या मार्गाने मोक्ष प्राप्त होतो. (संसाराच्या पलीकडच्या तीराला जाता येते) तसा तो योगाच्या मार्गानेही (साधनरूप अभ्यासमार्गानेही) प्राप्त होतो. (७)

व्हावें चित्त एकाग्र । वैराग्य विवेक समग्र ।
तेणें करावी आदर । निर्गुणोपासना ॥८॥
ज्याचे चित्त एकाग्र असून ज्याच्या ठिकाणी विरक्ती आणि सदसद्विवेक यांची सामग्री आहे त्याने निर्गुणोपासनेच्या (अभ्यासमार्गाच्या, ध्यानमार्गाच्या) साधनाचा अवलंब करावा. (८)

त्या उपासनेचें लक्षण । बहुधा असे भिन्न भिन्न ।
साधन पाहतां अनुसंधान । एकचि असे ॥९॥
त्या उपासनेची पद्धत जरी वेगळी असली तरी त्या सर्वांमध्ये अनुसंधान हे साधन मात्र एकच आहे. (९)

श्रीमत्‌ आचार्य उक्ति । निरोपिली अपरोक्षानुभूतीं ।
बोलिली साधनसंपत्ति । पंधरा अंगे ॥१०॥
श्रीमत् शंकराचार्यांनी आपल्या अपरोक्षानुभूती या प्रकरण ग्रंथात त्या साधनसंपत्तीची १५अंगे सांगितली आहेत. (१०)

नामें मात्र भिन्न भिन्न । जाणिजे एक अनुसंधान ।
ऐका तयाची नामाभिधानें । आणि रूपें कैसीं ॥११॥
ही नावे भित्र भिन्न असली तरी ते सर्व अनुसंधानच आहे, हे लक्षात घ्यावे. त्या अंगांची नावे आणि स्वरूपे कशी आहेत, ते ऐका. (११)

यम नियम त्याग मौन । देशकाल आसन ।
मूलबंध देहसमान । दृष्टिस्थिति ॥१२॥
यम-१, नियम-२, त्याग-३, मौन४, देश-५, काल-६, आसन-७. मूलबंध-८, देहाची समतोल स्थिती-९, दृष्टी एकाग्र करणे १०, (१२)

प्राणायाम प्रत्याहार । धारणा ध्यानप्रकार ।
समाधि हा निर्धार । पंधरा अंगे ॥१३॥
प्राणायाम ११, प्रत्याहार-१२, धारणा-१३, ध्यानाचे प्रकार-१४, समाधी-१५ अशी ती १५अंगे जाणून घ्या. (१३)

हे सुलभ राजयोगिया । कठिण नव्हेति अभ्यासावया ।
निदिध्यासा अधिकार जया । तेणें हेंचि अनुष्ठावें ॥१४॥
ही सर्व साधने राजयोग्याला सुलभ आहेत. ज्याला निदिध्यासाचा अधिकार आहे त्याने याच साधनांचे अनुष्ठान करावे. (१४)

जयासि न ठके श्रवण मनन । अनुसंधानीं जो मळिण ।
तेणें योगाभ्यास करणें । पतंजलियुक्त ॥१५॥
ज्याला श्रवण, मनन जमत नसेल, ज्याचे अनुसंधान मलिन (अपूर्ण) असेल, त्याने पतंजलिप्रणीत योगाभ्यास करावा. (१५)

जयाचे शुद्ध हृदय । तेणें करणें हा उपाय ।
तोचि कैसा यथान्वय । बोलिजे तो ॥१६॥
ज्याचे हृदय शुद्ध असेल त्याने वरील साधनांचा जरूर अवलंब करावा. तो कसा करायचा तो आता क्रमश: सांगतो. (१६)

सर्व ब्रह्म ओळखावें । बाह्येंद्रियासी आवरावें ।
विवेक विषय त्यागावें । हा अभ्यास यमाचा ॥१७॥
हे सर्व ब्रह्मच आहे हे प्रथम ओळखावे आणि बायेंद्रियांना आवर घालावा, विवेकाने विषयांचा त्याग करावा ह्याला यम या साधनाचा अभ्यास म्हणावे. (१७)

ब्रह्म जें कां परिपूर्ण । तेथें मनाचें अनुसंधान ।
जडजात विसर्जून । हा नियम ज्ञात्याचा ॥१८॥
परिपूर्ण अशा ब्रह्माच्या ठिकाणी मनाचे अनुसंधान ठेवावे, सर्व जड विषयांचा त्याग करावा, हाच ज्ञात्याचा नियम होय. (१८)

नामरूप विसर्जावें । अस्तिभातिप्रिय जाणावें ।
चिदात्मत्व आठवावें । हाचि त्याग मुख्य ॥१९॥
नामरूपांचे विसर्जन करून ते सर्व अस्तिभाति प्रिय स्वरूप ब्रह्मच आहे हे ओळखाव, चिदात्मतत्त्वाचे स्मरण करावे. यालाच मुख्य त्याग म्हणतात. (१९)

वाणी मना अगोचर । हाचि जयाचा निर्धार ।
तेथें चित्तासि करी स्थिर । हेंचि मौन उत्तम ॥२०॥
वाणी आणि मन यांना अगोचर असणे हेच ज्याचे लक्षण आहे त्यावर चित्त स्थिर करावे हेच श्रेष्ठ प्रकारचे मौन होय. (२०)

ब्रह्मीं वाणी मुराली । प्रपंची नवचे बोली ।
सदसत्कल्पना केली । तरी ते व्यर्थ ॥२१॥
वाणी अगदी ब्रह्मामध्ये मुरून गेली आहे. प्रपंचाच्या गोष्टी बोलण्यात येत नाहीत, सदसत् कल्पनाही मनात आणणे व्यर्थ ठरते, (२१)

म्हणुन शब्दाची प्रवृत्ति । विवादें पडेना गुंती ।
हेंचि मौन निर्धारी चित्तीं । न बोलणें मुर्खाचे ॥२२॥
शब्दांच्या प्रवृत्तीनुसार वादविवादात पडून गुंतत नाही, यालाच खरे खरे मौन समजावे. मूर्ख लोक मात्र न बोलणे म्हणजेच मौन समजतात. (२२)

आदिअंतीं जग नसे । मध्येंहि जाणावें तैसें ।
जयास्तव सर्व दिसे । तोचि देश सेवावा ॥२३॥
आरंभी जग नव्हते, अंतीही ते असणार नाही. एवढे कशाला ? या दोहोंच्या मध्येही ते नसतेच. पण ज्याच्यामुळे ते सर्व आहे असे दिसते तोच खरा देश होय. त्याचाच आश्रय करावा. (२३)

जयाचिया निमिष्यांत । ब्रह्मादि होती अनंत ।
तोचि काल सदोदित । प्रातःकाळादि नव्हे ॥२४॥
ज्याच्या एका निमिषात अनंत ब्रह्मदेव निर्माण होतात तोच सदा उदित असा खरा काळ होय. प्रात:काळ इत्यादी नव्हेत. (२४)

सर्वाचें जें अधिष्ठान । तेथें सुखें अनुसंधान ।
सहजसिद्ध आसन । जेथें सिद्ध बैसले ॥२५॥
सर्व वस्तूंचे जे अधिष्ठान आहे. त्याच्या ठिकाणी अनुसंधान हेच सहजसिद्ध आसन होय. याच आसनावर पूवींचे अनेक सिद्ध बसलेले होते. (२५)

उत्पत्तिस्थान सर्वांचें । तेथेंचि स्थापन मनाचें ।
हें जाणिजे मूलबंधाचे । लक्षण राजयोगिया ॥२६॥
जे सर्वांचे उत्पत्तिस्थान आहे, तेथेच मनाची प्रतिष्ठापना करणे हे राजयोग्याच्या मूलबंधाचे लक्षण होय. (२६)

मायेपासून तत्वादि जितुकें । ब्रह्मतत्वींच हे निकें ।
अंगें अंगींच सुशोभकें । समता राहे ॥२७॥
मायेपासून पुढची जेवढी तत्त्वे असतील ती सर्व ब्रह्मातच अंतर्भूत आहेत; अंगाचे अवयव अंगातच शोभून दिसतात. हे ओळखणे हीच समता होय. (२७)

येर देहाचें समानत्व । शुष्ककाष्ठाचें रुजुत्व ।
तें अज्ञानियाचें महत्व । कोरडे श्रम ॥२८॥
एरवी देह समतोल ठेवणे हे वाळलेल्या लाकडाच्या सरळपणासारखे आहे. अज्ञानी लोकांना त्याचे कौतुक वाटो, पण ते केवळ कोरडे श्रम होत. (२८)

नेत्रीं ज्ञानाचें अंजन । सर्व जगचि जगजीवन ।
करी सर्वदा अवलोकन । ज्ञानदृष्टी ॥२९॥
डोळ्यात ज्ञानाचे अंजन घातलेले असल्यानंतर सर्व जगच जगजीवन (परब्रह्म) वाटते. हीच ज्ञानदृष्टी होय. (२९)

दृश्य द्रष्टा दर्शन । या तिहींसी जें अधिष्ठान ।
तेथें जयाचें अनुसंधान । नासाग्र विलोकन ढोंगिया ॥३०॥
दृश्य, द्रष्टा, दर्शन या त्रिपुटीचे जे अधिष्ठान आहे त्याचे अनुसंधान हे तिचे वैशिष्ट्य होय. ढोंगी माणसाला मात्र नाकाच्या अग्रभागी स्थिर केलेली दृष्टी हीच ज्ञानदृष्टी वाटते. (३०)

अंतःकरणाची वृत्ति । ब्रह्माकारें स्फुरती ।
निरोधल्या विषयवृत्ति । हाचि प्राणायाम ॥३१॥
सर्व विषयवृत्तींचा निरोध केल्यानंतर अंत:करणाच्या वृत्ती ब्रह्मरूपाने स्फुरण पावणे हाच खरा प्राणायाम होय. (३१)

प्राणायामाचें लक्षण । पूरक कुंभक रेचन ।
तें बोलिजे भिन्न भिन्न । अनुसंधानात्मक ॥३२॥
प्राणायामाचे लक्षण म्हणजे त्यातील पूरक, कुंभक, रेचक ही अंगे होत. अनुसंधानात्मक प्राणायामामध्ये त्याचे स्वरूप कसे असते हे वेगळे करून सांगतो. (३२)

प्रपंच नामरूपात्मक । याचा निषेध तो रेचक ।
मी ब्रह्म हें धरिलें एक । पूरक तो हाचि ॥३३॥
नामरूपात्मक प्रपंचाचा निषेध हाच रेचक होय. मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय पूरक होय. (३३)

तया वृत्तीचें निश्चलत्व । हें कुंभकाचें महत्त्व ।
ज्ञानिया असे सहजत्व । अज्ञान घ्राणा पीडिती ॥३४॥
ही ब्रह्मात्मक वृत्ती निश्चल ठेवणे यालाच कुंभक म्हणतात. ती अवस्था हीच कुंभकाची थोरवी होय. ज्ञानी माणसाला ती सहज प्राप्त होते. इतर अडाणी माणसे प्राणायामाच्या नावाखाली विनाकारण नाकाला त्रास देत राहतात. (३४)

विषय ब्रह्माकार पाहे । ब्रह्मीं चित्त स्थिर राहे ।
ज्ञात्यासि हा सुलभ आहे । प्रत्याहार ॥३५॥
सर्व विषय बह्माकार पाहणे, ब्रह्मामध्येच चित्त स्थिर ठेवणे हा खरा प्रत्याहार होय. तो ज्ञानी माणसाला अगदी सुलभ आहे. (३५)

मन धांवताहे जेथें जेथें । तो आपणासी पाहे तेथें ।
येणें रीती धरणें मनातें । धारणा प्रसिद्ध जगीं हेची ॥३६॥
मन जेथे जेथे धावते, तेथे तेथे स्वरूप पाहणे, अशा प्रकारे मनाला धरून ठेवणे हीच खरी धारणा होय. ज्ञात्यांच्या जगात तीच प्रसिद्ध आहे. (३६)

आता चवदावें ध्यान । जेथें जेथें जाय मन ।
तेथें ब्रह्म परिपूर्ण । कोंदाटलेंसे ॥३७॥
आता १४अंगांचे ध्यान कसे असते ते पाहू. जेथे जेथे मन जाईल तेथे तेथे सर्वत्र ब्रह्मच कोंदाटलेले पाहणे हेच ध्यान होय. (३७)

तेथें तरी विषय कैचा । चित्तीं ध्यास निरालंबाचा ।
हाचि अखंड ध्यानाचा । राजयोगिया आनंद ॥३८॥
त्या ध्यानाला विषय तरी कोणता असणार ? मनामध्ये निरालंबाचा ध्यास हेच अखंड ध्यान होय. राजयोग्याचा तोच आनंद होय. (३८)

तो ग्रासुनी वृत्त्यानंद । सुखरूप स्वानंदकंद ।
हरपला द्वैताचा भेद । हा समाधि ज्ञानिया ॥३९॥
तो वृत्तिरूप आनंद गिळंकृत करून आपण सुखरूप स्वानंदाचा गाभा होऊन राहणे, हीच ज्ञात्यांची समाधी होय. त्या ठिकाणी द्वैताचा भेद हरवलेला असतो. (३९)

ऐसीं हें पंधरा अंगें । अभ्यासी जो संतसंगे ।
एकरूप अंतरंगे । सहजसिद्ध ॥४०॥
अशा रीतीने संतसंगतीने या१५अंगांचा जो अभ्यास करतो तो सहजसिद्ध होय. ही १५अंगे दिसायला भिन्न असली तरी अंतरंगात ती एकरूपच आहेत. (४०)

तया अभ्यासें कडून । अवलंबे अपरोक्ष ज्ञान ।
संशयरहित समाधान । पावे योगिराज ॥४१॥
त्या अभ्यासाने अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन योगिराज संशयरहित समाधान प्राप्त करून घेतो. (४१)

जाले साधनाचें सफळ । उरलें परब्रह्म केवळ ।
माया अविद्येचा मळ । अभ्यासें धुतला ॥४२॥
अशा रीतीने साधने सफल झाली. अभ्यासाने माया-अविद्या यांचा मळ धुवून टाकला. शेवटी फक्त एकमेव परब्रह्म उरले, (४२)

मग साधनापासून सुटला । केवळ निःसंदेह जाला ।
बंधमोक्षवार्ता तयाला । उरली नाहीं ॥४३॥
म्हणजे मग त्या साधनांपासून तो मुक्त झाला असे म्हणता येईल; नि:संदेह म्हणजे संशयरहित झाला. आता बंध मोक्ष ही भाषाही त्याच्या बाबतीत उरत नाही. (४३)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
निदिध्यासपंचदशांगप्रकारे । प्रथमसमासः ॥१॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
निर्गुणोपासनाप्रकार


निर्गुण ब्रह्म उपासन । हेंचि मुमुक्षूसी साधन ।
भवबंधाचे निकृंतन । तात्कालचि होय ॥१॥
निर्गुण ब्रह्माची उपासना हेच मुमुक्षूला एकमेव साधन होय. त्यायोगे संसाररूप बंध तत्काळ नष्ट होतो. (१)

संवादि भ्रमाचे परी । सत्य वस्तूचें ध्यान करी ।
चिरकाल अभ्यासितां दुरी । मुक्ति नसे साधका ॥२॥
संवादी भ्रमाप्रमाणे त्याने सत्य वस्तूचे ध्यान करावे. त्याचा दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतर साधकाला मुक्ती दूर नाही. (संवादी भ्रमाचे स्वरूप पुढील ओव्यांमध्ये स्पष्ट केले आहे. ) (२)

वेगळाले आवरक स्थानीं । ठेविले दीप आणि मणी ।
उभयांची प्रभा अंगणीं । सारिखी पडिली ॥३॥
एका मंदिराच्या दोन वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये एक दिवा, एक रत्नमणी असे वेगवेगळे ठेवले. दोघांचाही प्रकाश अंगणात सारखाच पडला होता. (३)

कोणी एक दोघे जण । उभय प्रभा अवलोकून ।
मणिबुद्ध्या करिती गमन । दोघे दोहींवरी ॥४॥
त्यावेळी कोणा दोन व्यक्तींनी दोन्हींचे प्रकाश पाहून हा रत्नमण्याचा प्रकाश आहे असे मानून दोघेही दोन दिशांनी त्या खिडक्यांकडे गेले. (४)

मणिबुद्ध्या दीपावरी । धाविला त्यासी श्रमासी उरी ।
मणि न लभेचि करीं । विसंवादी भ्रम ऐसा ॥५॥
तो मणी आहे असे मानून दिव्याच्या दिशेने जो धावला त्याच्या नशिबी फक्त श्रमच राहिले. त्याच्या हातात मणी काही आला नाही. याला विसंवादी भ्रम म्हणतात. (अपेक्षा धरली एक व प्रत्यक्षात अनुभव वेगळाच आला. ) (५)

देखुनी मण्याचे प्रभेला । अनुमानें मणीस वाटला ।
धावतां मणिलाभ झाला । तो संवादी भ्रम ॥६॥
पण मण्याचा प्रकाश पाहून दुसऱ्याला तो मणी आहे असे वाटले. त्या दिशेने तो धावला आणि त्याला रत्नमण्याचा लाभ झाला. याला संवादी भ्रम म्हणतात. (त्याने जी अपेक्षा मनात धरली होती त्याअपेक्षेप्रमाणेच घडले) (६)

तैसें निर्गुण ब्रह्म ध्यातां । निर्गुणचि होय तत्त्वतां ।
कीटक भ्रमरीतें आठवितां । भ्रमरीच होय ॥७॥
त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माचे ध्यान करून साधक प्रत्यक्षात निर्गुण ब्रह्मरूपच प्राप्त करतो. जसा अळीने भ्रमराचे स्मरण केल्याने ती अळीच स्वत: भ्रमर होते तसा हा प्रकार होय. (७)

श्रोता म्हणे जी निर्गुण । जाणतां करावें ध्यान ।
कीं न जाणतां अनुसंधान । किजेत आहे ॥८॥
यावर श्रोता प्रश्न करतो की, निर्गुणाचे ध्यान जाणीवपूर्वक करावे की, जाणीव होण्यापूर्वीच करावे ? (८)

श्रुतिसिद्ध कळतां प्राप्त जालें । मग ध्यान कासया लागलें ।
न कळतांहि ध्यान घडलें । नवचे कदा ॥९॥
श्रुती सांगते की ब्रह्माचे ज्ञान होणे म्हणजेच त्याची प्राप्ती होणे होय. तेव्हा असे श्रुतिसिद्ध ज्ञान झाल्यानंतर ध्यानाची गरज काय ? निर्गुणाचे ज्ञान न होताच त्याचे ध्यान कसे करता येईल ? अर्थात त्याचे ध्यान करता येणार नाही. उभयपक्षीही अडचण आहेच. (९)

ऐसें उभयपक्षीं पाहतां । ध्यानें नये उपासितां ।
ऐसें ऐकूनियां वक्ता । म्हणे तिसरा पक्ष ॥१०॥
अशा प्रकारे दोन्ही पक्षांच्या दृष्टीने पाहिल्यावर असे ध्यानमार्गाने निर्गुणब्रह्माची उपासनाच करता येणार नाही. हे ऐकल्यानंतर वक्ता तिसरा पक्ष सांगतो. (१०)

ब्रह्म परोक्षत्वें जाणावें । सच्चिदानंद ओळखावें ।
अपरोक्षालागी स्वभावें । ध्यान घडे साधका ॥११॥
ब्रह्म अगोदर परोक्षत्वाने जाणावे. नंतर प्रत्यक्ष अनुभवाने त्याचे सच्चिदानंद स्वरूप ओळखावे. ब्रह्माच्या अपरोक्षज्ञानासाठी साधकाला आपोआप ध्यान घडते. (११)

गुरुपदीं अति विश्वास । श्रवणमनन रात्रंदिवस ।
तरी परोक्ष ज्ञान तयास । तात्काळ होय ॥१२॥
गरूंवर पराकाष्ठेचा विश्वास. रात्रंदिवस श्रवणम हे असेल तर साधकाला तत्काळ परोक्ष ज्ञान प्राप्त होते. (१२)

विचारें अपरोक्ष जाणतां । समाधान पावे अवचिता ।
विचारा असे प्रतिबंधता । तरी ध्यान करावें ॥१३॥
त्यानंतर विचाराच्या साहाय्याने त्याला अपरोक्षज्ञान होते. विचाराच्या बाबतीत त्याला काही अडचण असेल तर त्याने ध्यान करावे. (१३)

ब्रह्म परोक्षत्वें जाणितलें । तरी भ्रम कां नाम ठेविलें ।
स्वतां निजांगें नाहीं जालें । म्हणोनि भ्रम ॥१४॥
आता संवादिभ्रमाने ब्रह्म परोक्षत्वाने कळत असेल, तर त्याला भ्रम म्हणण्याचे कारण काय ? असा प्रश्नउपस्थित केल्यास त्याचे उत्तर असे की, तो या ज्ञानाने स्वत: ब्रह्म होत नाही, म्हणून त्यास भ्रम म्हणतात. (१४)

मनबुद्धि अगोचर । ब्रह्म असे निर्विकार ।
श्रवणमननें केला निर्धार । सद्‌गुरुवचनें ॥१५॥
ब्रह्म निर्विकार असून मन, बुद्धी यांना न कळणारे आहे. पण सद्गुरूंच्या सांगण्यावरून श्रवण-मनन यांच्या योगाने निर्धार केला, (१५)

ब्रह्म परिपूर्ण कोंदाटलें । ऐसें अनुसंधान लागलें ।
परोक्षत्वें अनुभविलें । सच्चिदानंद ॥१६॥
तेव्हा सर्वत्र ब्रह्म कोंदाटले आहे असे अनुसंधान लागले म्हणजे सच्चिदानंद ब्रह्माचा परोक्ष अनुभव येतो. (१६)

विष्णु आणि सदाशिव । शास्त्रीं कळले सावयव ।
तैसेचि ध्यानीं धरी आठव । मानसपूजनीं ॥१७॥
शास्त्रात विष्णु, शंकर इत्यादी देव सावयव (साकार, मूर्त) आहेत असे सांगितले आहे. ते ज्ञान झाल्यानंतर मानसपूजनाच्या वेळी ध्यानात तसेच स्मरण ठेवले. (१७)

तेचि वासना दृढ होतां । विष्णु शिव प्रगटतीं तत्त्वतां ।
इच्छिलें पुरविती भक्ता । कृपाळुदेव ॥१८॥
अशाप्रकारे ती वासना दृढ होताच विष्णू, शंकर खरोखर प्रकट होतात आणि ते कृपाळू देव भक्तांचे इच्छित पूर्ण करतात. (१८)

तैसे ब्रह्म निर्गुण ध्यातां । वेगळा नुरेचि तत्त्वतां ।
ब्रह्मरूप अवचिता । हो‍ऊनी जातो ॥१९॥
त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माचे ध्यान केले तर साधक वेगळा राहूच शकत नाही. तो लगेच ब्रह्मरूप होऊन जातो. (१९)

हा मनाचा स्वभाव । जैसा जैसा दृढभाव ।
तैसाचि होय स्वयमेव । अन्यथा नव्हे ॥२०॥
हा मनाचा स्वभाव आहे. जसा दृढभाव असेल त्याप्रमाणे तो साधक इतर दुसरे काही न बनता अगदी तसाच बनतो. (२०)

भूताचें ध्यान करितां । भूतें होतीं तत्त्वतां ।
देव ध्यानीं आठवितां । देवा पाविजे ॥२१॥
भुताचे ध्यान केले तर ती माणसे अक्षरश: भूत होतात व ध्यानामध्ये देवाचे जर स्मरण केले तर त्यांना देवाची प्राप्ती होते. (२१)

जे जे धरिलें मनें । तैसे लागे जीवासि होणें ।
म्हणून निर्गुण उपासनें । निर्गुणचि होईजे ॥२२॥
मनात जे जे धरावे तसेच जीवाला व्हावे लागते. म्हणून निर्गुणाच्या उपासनेने निर्गुणच व्हावे. (२२)

श्रोता म्हणे जी पुढती । ध्यानें धरावे सगुण मूर्ति।
निराकार जे आदिअंती । तरी ध्यान कैसे ॥२३॥
यावर श्रोता विचारतो की, जी मूर्ती आपण प्रत्यक्ष पाहतो ती सगुण मूर्तीच ध्यानात आणता येते. पण जे ब्रह्म आरंभी आणि अंती निराकारच आहे, त्याचे ध्यान कसे काय करता येईल ? (२३)

वक्ता म्हणे ध्यान नव्हे । जाणणें तरी कोठे संभवे ।
ज्ञानेवीण पावावें । परपार कैसें ॥२४॥
वक्ता यावर उत्तर देतो की, ध्यानाचे काय घेऊन बसलास, ब्रह्माचे ज्ञान तरी कोणाला शक्य होणार आहे ? आणि ज्ञानावाचून परपार (भवसागराचा पलीकडचा तीर, मोक्ष) कसा गाठता येईल ? (२४)

श्रोता म्हणे ब्रह्म स्वप्रकाश । विचारें कळें साधकास ।
परी ध्याना नसे अवकाश । अंतःकरणीं ॥२५॥
यावर श्रोता म्हणतो की, ब्रह्म स्वप्रकाश आहे, हे साधकास विचाराने कळते. परंतु त्याच्या अंत:करणात मात्र ब्रह्माच्या ध्यानाला कोठे जागा नाही. (२५)

वक्ता म्हणे ज्ञानें कोणें । स्वप्रकाशातें जाणें ।
जड अवधी करणें । जाणती ना ॥२६॥
यावर वक्ता विचारतो की, कोणत्या ज्ञानाने साधक स्वयंप्रकाशी ब्रह्माला जाणू शकतो ? कारण इंद्रिये तर जड आहेत. त्यांना हे ज्ञान होऊ शकणार नाही. (२६)

श्रोता म्हणे न कळे कोणासी । बुद्धि निश्चया करी ऐसी ।
तैंचि आपण असंगासी । जाणणें घडे ॥२७॥
यावर श्रोता म्हणतो की, कोणत्याही इंद्रियाला न कळू देता, जेव्हा बुद्धी असा निश्चय करते की आपण तेच ब्रह्म आहोत, त्याच वेळी असंगाचे (ब्रह्माचे) ज्ञान होऊ शकते. (२७)

वक्ता म्हणे जैसें जाणिले । आपण असंगसें कळले ।
तैसेंचि पाहिजे ध्यान केले । निदिध्यासरूप ॥२८॥
यावर वक्ता म्हणतो की, तू असंगाचे ज्ञान ज्याप्रमाणे प्राप्त केलेस आमि आपण असंग (ब्रह्म) आहोत असे तुला कळले, त्याच प्रकारे निदिध्यासाच्या रूपात त्याचे ध्यान करावेस. (२८)

श्रोता म्हणे ज्ञान ध्यान । एकरूप दिसती समान ।
वक्ता म्हणे सावधान । भेद आहे ॥२९॥
श्रोता यावर विचारतो की, ज्ञान व ध्यान दोन्हीही एकरूप असून सारखीच दिसतात. यावर वक्ता म्हणतो की, थांब, दोहोंमध्ये भेद आहे. (२९)

विसर आठवातीत । अंगे ब्रम्हचि निश्चित ।
वस्तुतंत्र त्रिपुटीरहित । या नांव ज्ञान ॥३०॥
स्मरण आणि विस्मरण यांच्या पलीकडे असून स्वरूपत:जे निश्चितपणे ब्रह्मच आहे, जे वस्तुतंत्र व त्रिपुटीरहित आहे त्याला ज्ञान म्हणतात. (३०)

कर्तृतंत्रें उपासन । ब्रह्म मी ऐसें करी ध्यान ।
त्रिपुटीचें होतसें भान । द्वैतरूपत्वें ॥३१॥
ध्यान ही कर्तृतंत्र उपासना आहे. ती कर्त्याच्या तंत्राने चालते. तिच्यात मी ब्रह्म असे ध्यान केले जाते वद्वैतरूप असल्याने तिच्यामध्ये त्रिपुटीचे भान होत असते, (३१)

जो काल राहे ध्यान । तो काल वाटे समाधान ।
ध्यान भंगतां आपण । तळमळी जीविं ॥३२॥
जोपर्यंत हे ध्यान चाल असते, तोपर्यंतच समाधान प्राप्त होते व ध्यान भंग पावले की मनात तळमळ होते, (३२)

ध्यानें जें संपादिलें । तेणेंविण लया गेलें ।
वस्तुरूप नाहीं जालें । म्हणोनिया ॥३३॥
त्यामुळे ध्यानामुळे जे प्राप्त केले होते ते ध्यान थांबवताच वाया जाते. याचे कारण हे की वस्तूशी म्हणजे परब्रह्माशी आपण एकरूप झालो नाहीत. (३३)

वस्तुरूप व्हावयासाठी । ध्यान साधन कचाटि ।
होता अभ्यासाची पुष्टी । ज्ञानही लाभे ॥३४॥
वस्तुरूप होण्यासाठी ध्यानरूपी साधनाची खटपट करावी लागते. त्या अभ्यासाचे बळ वाढताच ज्ञानसुद्धा प्राप्त होते. (३४)

म्हणऊन ध्यान सोडूं नये । हे विचार ज्ञानास उपाय ।
ध्यानेंवीण दुजें काय । समीप असे ॥३५॥
म्हणून ध्यान केव्हाही सोडू नये. ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या हाताशी दुसरे काय आहे ? याचा विचार करावा. (अर्थात ज्ञानासाठी ध्यान हेच एकमेव साधन आहे) (३५)

कर्म अर्चन आणि योग । परंपरा तयाचा योग ।
निर्गुणोपासना लागवेग । असंगज्ञान करी ॥३६॥
कर्म, पूजा, योगाभ्यास या साधनांनी ज्ञानाची प्राप्ती होईल. पण ती परंपरेने क्रमाक्रमाने होणारी प्राप्ती आहे. पण निर्गुणोपासनेने ताबडतोब असंगज्ञान होते. (असंगज्ञान-ब्रह्मज्ञान) . (३६)

श्रोता म्हणे निर्गुणोपासना । न करिती कोणी जन ।
कर्मयोग सगुणोपासन । बहुत करिती ॥३७॥
यावर श्रोता म्हणतो की, निर्गुणोपासना कोणीही करत नाही. पण बहुतेक सर्व लोक कर्मयोग, सगुणोपासना यांची साधना करतात. (३७)

निर्गुण ध्यान श्रेष्ठ जरी । प्रवृत्ति कां नसे तरी ।
जेथें प्रवृत्तीची दाटी भारी । तेंचि श्रेष्ठ ॥३८॥
निर्गुणज्ञान श्रेष्ठ असले तरी तिकडे लोकांची प्रवृत्ती का होत नाही ? मग जिथे लोकांची प्रवृत्ती जास्त आहे तेच साधन श्रेष्ठ असे का मानू नये ? (३८)

वक्ता म्हणे अवधारा । कृषिगोरक्षादि व्यापारा ।
जितुका प्रवृत्तिपसारा । तितुका कर्मीं कोठें ॥३९॥
यावर वक्ता म्हणतो की, आता लक्ष देऊन ऐका. कृषी, गोरक्षण इत्यादी व्यापारांकडे लोकांची जेवढी प्रवृत्ती असते, तेवढी प्रवृत्ती कर्मयोगाच्या आचरणाकडे कोठे असते का ? (३९)

शंभरामाजीं एकला । कर्मप्रवृत्तीं देखिला ।
तरी कृष्यादिकाहून कर्माला । हीनत्व न ये ॥४०॥
शंभर माणसांमध्ये एखाद्याला कर्मयोगाच्या आचरणाची प्रवृत्ती होते. पण त्यामुळे कृषीइत्यादी व्यापारांपेक्षा कर्मयोग कमी महत्त्वाचा असे ठरत नाही. (४०)

सहस्त्र कर्मी मिळतां । योगा प्रवर्ते एकुलता ।
कर्माहून योगयुक्ता । योग्यता असे ॥४१॥
हजार कर्मयोगी असतील, तर त्यामध्ये एखादाच योगमार्गाकडे प्रवृत्त होतो; त्यामुळेच कर्मयोगापेक्षा योगमार्गाचे आचरण करणाराची योग्यता अधिक असते. (४१)

योगाची ही लक्षणगति । एखादिया सगुण भक्ति ।
परी योगाहूनि शक्ति । उपासनेची ॥४२॥
असे योगाभ्यासी एक लाख असतील तर त्यात एखाद्यालाच सगुणभक्ती करावीशी वाटते. असे असले तरी भक्तिमार्गाची शक्ती योगमार्गापेक्षा अधिक आहे. (४२)

तूं म्हणसी सगुणाचा ठाई । तत्पर असती बहु समुदाई ।
तरी ते कामनेचे अपायीं । गुंतून पडिले ॥४३॥
तू म्हणशील की समाजामध्ये सगुणाची भक्ती करणारे खूप लोक भेटतात. पण ते सर्व कामनेच्या आहारी गेलेले असतात. कामनेच्या अपायरूपखोड्यात ते गुंतून पडलेले असतात. (४३)

कामनेवीण सगुण भक्ति । कीं भगवान्‌ सर्वाभूतीं ।
ऐसे भक्त थोडे असती । परी श्रेष्ठत्व अधिक ॥४४॥
कामनारहित सगुणभक्ती करून परमेश्वर सर्व प्राणिमात्रांमध्ये आहे, असा अनुभव घेणारे भक्त फार थोडे असतात. पण त्यांचे श्रेष्ठत्व सकाम भक्तांपेक्षा केव्हाही जास्त आहे. (४४)

कोटीमाजी कोणी एक । पाहे निर्गुणाचा विवेक ।
निर्गुण ध्यान आवश्यक । श्रेष्ठचि आहे ॥४५॥
कामनारहित सगुण भक्ती करणारे एक कोटी लोक घेतले, तर त्यांमध्ये एखादाचा निर्गुणाचा विचार करतो. त्यामुळे निर्गुणध्यान निश्चितपणे श्रेष्ठच आहे. (४५)

श्रोता म्हणे जी पुढती । निर्गुण ध्यानाची संपत्ति ।
श्रेष्ठ परी वाटती । अत्यंत कठिण ॥४६॥
यावर श्रोता विचारतो की, निर्गण ध्यानरूप संपत्ती श्रेष्ठ खरी, पण ती फार कठीण आहे. (४६)

इतर साधनें सुलभ जाणावीं । तरी तेंचि ना आदरावी ।
वक्ता म्हणे हो बरवी । युक्ति काढिली ॥४७॥
त्यामानाने इतर साधने सोपी वाटतात. मग त्यांचाच स्वीकार का करू नये ? वक्ता यावर म्हणतो की, वा! छान! हा बरा युक्तिवाद केलात! ' (४७)

ब्राह्मणाचे धर्म कठिण । अत्यंत मोकळे यवन ।
तरि कां सांडून संध्यास्नान । ब्राह्मण भ्रष्टती ॥४८॥
ब्राह्मणाचे आचारधर्म खूप कठीण आहेत. त्या मानाने मुस्लिम (यवन) खूप मुक्त असतात. एवढ्या एका कारणासाठी का कोणी ब्राह्मण संध्यास्नान सोडून देऊन भ्रष्ट व्हायला तयार होतील का ? (४८)

तुजला मनें ओढिलें । देहबुद्धीसी जे सोकले ।
सुलभ परि तया जाले । अत्यंत कठिण ॥४९॥
तुला देहबुद्धीला सोकलेल्या (चटावलेल्या तुझ्या मनाने ओढले आहे (भूरळ घातली आहे) . ते मार्ग सुलभ असले तरी शेवटी कठीण होतात. (४९)

सोपा यवनाचा पाहून धर्म । सांडिलें आपुलें सर्व कर्म ।
जेव्हां होईल संग्राम । तेव्हां कळेल ॥५०॥
यवनांचा धर्म सोपा वाटून ज्यांनी आपले सर्व कर्म आचार सोडून दिले त्यांना युद्ध सुरू होईल तेव्हा खरे कळून येईल. (५०)

द्वैतीं भय असे उघडें । वाजती श्रुतीचे चौघडे ।
द्वैती जें जें करणें पडे । तें तें भयरूप ॥५१॥
द्वैतामध्ये भय असते (द्वितीयाद् वै भयं भवति) असे श्रुतीचे चौघडे वाजतात. द्वैतामध्ये राहून जे करावे लागते ते सर्व भयरूप असते. (५१)

जरी देहबुद्धि मावळे । तयासी साधनसोहळे ।
पुढें सन्निधचि निवळे । ज्ञानसूर्य ॥५२॥
जर देहबुद्धी मावळली तरच साधनांची सुखे त्याला (साधकाला) प्राप्त होतील. त्यानंतर ज्ञानसूर्य त्याच्याजवळच प्रकट होईल. (५२)

सूर्यापूर्वी अरुणाचा । प्रकाश होय साचा ।
तेवि निर्गुण उपासनेचा । अधिकारी असे ॥५३॥
सूर्याच्या अगोदर अरुणाचा उदय होतो व त्याचा प्रकाश अगोदर दिसतो. त्याप्रमाणेच निर्गुण उपासनेचा अधिकार आहे. (५३)

श्रोता म्हणे जी बरें झालें । महासंशयातें खंडिलें ।
आतां ध्यानचि अभ्यासिलें । पाहिजे साधकीं ॥५४॥
यावर श्रोता म्हणतो, "हे बरे झाले. तुम्ही माझ्या मनातील मोठा संशय दूर केलात. तेव्हा साधकांनी आता ध्यानाचाच अभ्यास केला पाहिजे, हे पक्के झाले. (५४)

परि हे निर्गुन ध्यान करिता । निर्बंध असे कोणता ।
जपादि मूर्तिध्यान धरितां । नेम बहु असती ॥५५॥
पण हे निर्गुण ध्यान करताना कोणते नियम पाळावे लागतात ? कारण जप, सगुण मूर्तीचे ध्यान करत असताना खूप नियम पाळावे लागतात. (५५)

तरि हे आतां सांगावें । नियमेंचि ध्यान करावें ।
मौनादिक अवलंबावे । किंवा कैसें ॥५६॥
तेव्हा आपण मला हे नियम सांगावेत. या नियमांनी ध्यान करावे काय ? मौनइत्यादी पथ्ये पाळावी लागतात किंवा काय ? " (५६)

वक्ता म्हणे सावधान । कोणतें नसे निर्बंधन ।
अखंड असावे स्मरण । ब्रह्मतत्वाचें ॥५७॥
यावर वक्ता म्हणतो, "नीट लक्ष देऊन ऐक. या ध्यानासाठी कोणतेही निबंध किंवा नियम नाहीत. फक्त ब्रह्मतत्त्वाचे अखंड स्मरण ठेवावे म्हणजे झाले. (५७)

नलगे एकांत आसन । अथवा जपादि मौन ।
दृढ राखावें अनुसंधान । योषाजारापरीं ॥५८॥
एकांत आसनाची गरज नाही किंवा जप, मौन इत्यादींचीही आवश्यकता नाही. पण स्त्री, तिचा प्रियकर हे जसे एकमेकांना विसरत नाहीत त्याप्रमाणे ब्रह्मतत्त्वाचे अखंड अनुसंधान राखावे. (५८)

व्हावया क्षुधा हरण । कीजे जैसें भोजन ।
द्वैताचें होय हनन । तैसें ध्यान करावें ॥५९॥
भूक भागवण्यासाठी जसे भोजन करावे लागते, तसे द्वैतबुद्धी नष्ट करण्यासाठी ध्यान करावे. " (५९)

श्रोता म्हणे भोजनासी । निर्बंध असे निश्चयेसी ।
वक्ता म्हणे क्षुधाहरणासी । निर्बंध नलगे ॥६०॥
यावर श्रोता म्हणतो, "अहो, भोजनासाठी सुद्धा काही नियम पाळायचे असतातच की ? "तेव्हा वक्ता म्हणतो, "भूक भागवण्यासाठी काही निर्बंध लागत नाहीत.'' (६०)

असो ब्रह्मात्मत्वीं अखंडिं । निरंतर वृत्ति मुरडी ।
जगजीवादिकां रोकडी । मिथ्या पाहे ॥६१॥
असो, ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्यभावनेवर वृत्ती वळव. जगत्, जीव इत्यादींकडे अगदी मिथ्यात्वबुद्धीने पहा. (६१)

ब्रह्मात्मा हेचि सत्य । जगजीवादि अनित्य ।
इतुकेचि ध्यानाचें कृत्य । सर्वदा राहे ॥६२॥
ब्रह्म व आत्मा हेच तेवढे सत्य असून जग, जीव इत्यादी अनित्य आहेत. एवढेच एक स्मरण ठेवण्याचे काम ध्यानात ठेवावयाचे असते. (६२)

जरी म्हणसी ध्यानासी । मौन असावें वाचेसी ।
इतुके नलगे व्यवहारेसी । स्मरण असावें ॥६३॥
तू म्हणत असशील ध्यानात वाणीचे मौन पाळायला नको का ? तर त्याचीही गरज नाही. नित्याच्या व्यवहारात ब्रह्मात्मैक्याचे स्मरण ठेवावे म्हणजे पुरे. (६३)

तेंचि वाणीचें चिंतन । श्रोतयासी करी कथन ।
वक्ता सांगतां करी श्रवण । हेंचि एकपरत्व ॥६४॥
हेच वाणीचे चिंतन होय. कोणी श्रोता भेटला तर त्याला हेच समजावून सांग. कोणी वक्ता सांगत असताना एकचित्ताने श्रवण कर. यालाच एकपरता म्हणतात. (६४)

तैसेचि व्यापार भोजनादि । आला समय संपादी ।
परी मन गुंतले छंदी । स्वरूपाकारत्वें ॥६५॥
त्याप्रमाणेच भोजन इत्यादी व्यवहार करत राहा. आल्या प्रसंगात करावयाची कामे करत राहा. परंतु मन मात्र नेहमी स्वरूपाकार करून स्वच्छंदानेराहा. (६५)

म्हणसी भोजनीं होय विस्मर । देहादि सत्य वाटती जर ।
इतुका नसे अवसर । स्मरे झडकरी ॥६६॥
तू म्हणशील की, भोजन करताना विसर पडला, देहादी सत्य वाटले तर काय करावे ? तर विस्मरणाला एवढा वेळ देऊच नकोस. लागलीच ब्रह्मात्मैक्याचे स्मरण कर. (६६)

विस्मर होतां क्षणभरी । व्रतभंग नव्हे निर्धारि ।
वस्तुनिश्चय सदृढ करी । बंधनें येरी कासया ॥६७॥
एखादा क्षण विस्मरण झाल्याने काही व्रत मोडत नाही. फक्त ब्रह्मबुद्धी कायम कर. तेवढे झाले की इतर निबंधांची काय गरज आहे ? (६७)

भोजनादि संपादावें । काव्यतर्कादि सांडावे ।
कृष्यादिकही त्यागावे । ध्याना विघ्नकर जे ॥६८॥
भोजन इत्यादी आवश्यक क्रिया जरूर कर. पण काव्य, तर्क इत्यादीचा मात्र त्याग कर, ध्यानाला विघ्नकारक ठरतील अशी कृषी इत्यादी कमेंही टाळावीत. (६८)

काव्यतर्कादि पाहिले । तरी तत्व जाय उपेक्षिलें ।
म्हणून पाहिजे सांडिलें । अवश्य यासी ॥६९॥
काव्य, तर्क इत्यादीच्या नादी लागलास तर मुख्य तत्त्वाची उपेक्षा होईल. म्हणून त्यांचा त्याग मात्र अवश्य केला पाहिजे. (६९)

भोजनादि नये सांडितां । शरीर पडेल अवचिता ।
तर्क कृष्यादि न करितां । देहनिर्वाह चाले ॥७०॥
पण भोजन इत्यादीचा त्याग करता येणार नाही. कारण तसे केल्याने शरीराचा त्याग घडेल. तसे तर्क, कृषिकर्म इत्यादीचे नाही. त्यांचा त्याग केला, तरी देहनिर्वाह चालू शकतो. (७०)

म्हणसी राज्य संपादी जनक । तरी दृढबोध निश्चयात्मक ।
तैसा तुज असतां तर्क । पढें अथवा कृषि करा ॥७१॥
तू म्हणशील की, जनकाने राज्य संपादन केले. ते सांभाळले. ते खरे पण त्याचे ब्रह्मात्मैक्याचे ज्ञान पक्के होते. अढळ होते. तशी जर तुझी बुद्धी असेल तर तर्कशास्त्राचे अध्ययन कर, किंवा कृष्यादी कमें कर. त्यांमुळे काही फरक पडणार नाही. (७१)

एवं हें निर्गुणोपासन । बहुत होताती पावन ।
पुढे अभ्यासलक्षण । निरोपिजेत ॥७२॥
अशा प्रकारची ही निर्गुणोपासना आहे. अनेक लोक हिच्या साधनाने मुक्त झालेले आहेत. आता यापुढे अभ्यासाचे लक्षण सांगितले जाईल. (७२)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
निर्गुणोपासनप्रकारे । द्वितीयसमासः ॥२॥

हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
अभ्यासयोग


ब्रह्म सच्चिदानंद पूर्ण । मागां बोलिलें लक्षण ।
सच्चिद्‍रूपा आच्छादन । अज्ञान माया करीना ॥१॥
पूर्ण सच्चिदानंद ब्रह्माचे लक्षण मागे स्पष्ट केले आहे. त्याच्या सद्‌रूप-चिद्‌रूप अंशांना अज्ञान किंवा माया आवरण घालू शकत नाहीत. (१)

सच्चिद् जरी आच्छादावें । तरी अज्ञान कोठें संभवें ।
मायाकार्य व्यवहारावें । कासयावरी ॥२॥
सच्चिद्‌रूपाला जर आवरण घालता आले असते तर अज्ञान कोठे निर्माण होईल ? आणि मायेचा व्यवहार कशावर कोणत्या अधिष्ठानावर)

तिसरा अंश आनंदाचा । आच्छादिल्या परी साचा ।
नाश व्हावया आवरणाचा । महावाक्यें प्रवर्तती ॥३॥
होईल ? (२ ब्रह्माचा तिसरा आनंदरूप अंश मात्र आच्छादिल्यासारखा आहे. त्या आवरणाचा नाश होण्यासाठीच महावाक्ये प्रवृत्त झाली आहेत. (३)

व्हावी आनंदाची प्राप्ति । सत्‌शास्त्र सत्संगति ।
उत्तम अधिकारी पावती । विचारें अपरोक्ष ॥४॥
त्या महावाक्यांचा उद्देश आनंदाची प्राप्ती व्हावी हाच असतो. उत्तम अधिकारी सत्शास्त्र, सत्संगतीने व विचाराच्या साहाय्याने अपरोक्षपणे त्या आनंदाची प्राप्ती करून घेतात. (४)

तेवि मंदप्रज्ञा न घडे । तया अभ्यासें मोक्ष जोडे ।
यदर्थी बोलिजे रोकडे । अभ्यासयोग ॥५॥
त्यांच्याप्रमाणे मंदप्रज्ञांना तो आनंद सहजपणे प्राप्त होत नाही. त्यांना अभ्यासाने मोक्ष प्राप्त होतो. त्यासाठीच आता अभ्यासमार्गाचे स्पष्टपणे विवेचन करावयाचे आहे. (५)

गुरुमुखें करावें श्रवण । संशयरहित परोक्षज्ञान ।
जाणावें ब्रह्म परिपूर्ण । श्रुतिप्रमाण जें ॥६॥
प्रथम गुरुमुखाने श्रवण करावे. श्रुतिप्रमाण अशा परिपूर्ण ब्रह्माचे संशयरहित पण परोक्षज्ञान करून घ्यावे. (६)

तेंचि होणें निजांगें । तरी अभ्यास करणें लागवेगें ।
अभ्यासेंवीण वाउगें । शब्दज्ञान ॥७॥
आता तेच ब्रह्म स्वतः व्हायचे असेल तर तत्परतेने अभ्यास करावा लागेल. अभ्यास नसेल तर केवळ शाब्दिक ज्ञान व्यर्थच होय. (७)

जैसी कोरडी लेखणी । न निघे अक्षरश्रेणी ।
ब्रह्म न जाणतां मनीं । सर्वब्रह्मता उमटेना ॥८॥
ज्याप्रमाणे कोरड्या लेखणीतून अक्षरांच्या ओळी उमटत नाहीत, त्याप्रमाणे ब्रह्म न जाणता सर्वब्रह्माची कल्पना मनात ठसणार नाही. (८)

अंतःकरण गुहास्थानीं । ब्रह्म निहित श्रुतिवचनीं ।
त्या मषीतें बुद्धिलेखणी । अभ्यासें चुबकळी ॥९॥
अंत:करणाच्या विवरस्थानी ब्रह्म ठेविलेले आहे असे श्रतिवचन आहे. त्या ज्ञानाच्या शाईत बुद्धिरूपी लेखणी अभ्यासाने बुडवून घे. (९)

मग इंद्रियांची प्रवृत्ति । जेथें तेथें प्रगटे ज्ञप्ति ।
तेंचि कैसे यथानिगुती । बोलिजेति साधन ॥१०॥
मग इंद्रियांची प्रवृत्ती ज्या ज्या ठिकाणी होईल, त्या ठिकाणी ठिकाणी जाणीव प्रगट होईल. तिचाच साधन म्हणून कसा उपयोग करावयाचा ते यथायोग्य रीतीने सांगतो. (१०)

अभ्यासाचिया भूमिका । चारी गा शीष्यटिळका ।
त्या अभ्यासाविया एका । अंतःकरणीं ॥११॥
अरे शिष्योत्तमा, अभ्यासाच्या चार भूमिका असतात. त्यांचा एका अंत:करणाने अभ्यास करावा. (११)

विक्षिप्तता गतायाता । संश्लिष्टता सुलीनता ।
एकांती बैसुनी तत्वतां । भूमिका अभ्यासी ॥१२॥
त्या अभ्यासाच्या चार भूमिका म्हणजे विक्षिप्तता, गतायाता, संश्लिष्टता, सुलीनता या होत. त्यांचा एकांतात बसून अभ्यास कर. (१२)

मन जेथून उमटतें । विषय कल्पना आठवितें ।
आठवणीतें जाणतें । तेंचि कवण ॥१३॥
मन जेथून उत्पन्न होते आणि विषय, कल्पना यांची आठवण करते. त्या आठवणींनाही जाणणारे असे जे काही आहे, ते काय आहे ? (१३)

सांडूनिया मनपण । स्फुरण वायूचें लक्षण ।
तेथें निश्चळ रूप जाणणें । अवलंबावे ॥१४॥
मनपणाचा त्याग करून जेथे वायूचे स्फुरण होते. तेथे निश्चळरूप ज्ञानाचा अवलंब करावा. (तेथे निश्चळ राहून जे ज्ञान होते ते प्राप्त करून घ्यावे. ४१४)

स्फुरण उपाधीस्तव । एकदेशी चंचलस्वभाव ।
दिसूं लागलें परी ते वाव । निश्चळ गगनापरी ॥१५॥
स्फुरणाच्या उपाधीमुळे मर्यादित एकदेशी चंचल स्वभावाचे जे काही दिसू लागते ते खोटे आहे. ब्रह्म हे आकाशाप्रमाणे निश्चळ असते. (१५)

तेंचि निर्धारितां अंतरीं । चैतन्य सागरापरी ।
मध्यें स्फुरणाची लहरी । एकदेशी दिसे ॥१६॥
त्याचा मनामध्ये निर्धार केला तर चंचलत्वाने स्फुरणाऱ्या लहरी चैतन्य सागरावरील लाटांप्रमाणे एकदेशी दिसू लागतात. (एकदेशी-मर्यादित व्याप्तीच्या) (१६)

तेंचि आपणसें वाटलें । तेणें आनंदें ब्रह्मांड भरलें ।
तें सुख नवचे बोलिलें । ज्याचा तो जाणे ॥१७॥
ते ब्रह्म आपणच आहोत असे जेव्हा वाटते तेव्हा होणाऱ्या आनंदाने सबंध ब्रह्मांड भरून गेल्याचे जाणवते. ते सुख शब्दांनी बोलून सांगता येणार नाही. ज्याचे त्यालाच ते कळते. (१७)

परी अभ्यास करितां । विघ्नें होताती तत्वता ।
तेहि चार ओळखीं । आता परिहारासहित ॥१८॥
पण हा अभ्यास करत असताना प्रत्यक्षात विघ्ने निर्माण होतात ती विघ्नेही चार प्रकारची आहेत. त्या विघ्नांचे स्वरूप आणि त्यांच्या परिहाराचे उपाय यांची आता ओळख करून घेऊ. (१८)

विक्षेप लय कषाय । चौथा रसास्वाद होय ।
भूमिका अभ्यासितां जाय । विघ्न निरसुनी ॥१९॥
विक्षेप, लय, कषाय आणि चौथा रसास्वाद अशी ती चार विघ्ने होत. परंतु आपल्या भूमिकेचा अभ्यास नीट केला तर त्या विघ्नांचे आपोआप निरसन होते. (१९)

विक्षेपाचें कैसें स्वरूप । विषयाकार मन संकल्प ।
निर्विकारीं भासती अल्प । देखिलें पदार्थ जे ॥२०॥
विक्षेपाचे स्वरूप कसे असते ? मन विषयाच्या आकाराप्रमाणे संकल्प करू लागते. ब्रह्म निर्विकार असताना त्याच्या ठिकाणी आपण जे जे पदार्थ पाहिले असतील ते ते एकदेशित्वाने भासू लागतात. (२०)

येथें पाहिजे वैराग्य । जें ऐश्वर्याचें सौभाग्य ।
दोषदृष्टीनें अयोग्य । त्याग कीजे ॥२१॥
आता अशावेळी सर्व ऐश्वर्याचे सौभाग्य जणु असलेले वैराग्य साधकाच्या ठिकाणी असले पाहिजे. जे जे अयोग्य असेल त्याचा दोषदृष्टीने त्याग करावा. (२१)

तो त्याग तरी कैसा । असावा विवेक सरिसा ।
विषय पदार्थाचा ठसा । उमटला काशावरी ॥२२॥
तो त्याग तरी कसा असावा. त्या त्यागाबरोबर विवेकाची जोड असावी. विषयरूप पदार्थाचा ठसा कशावर उमटला आहे, हे जाणून घ्यावे. (२२)

आकाशीं उमटती मेघ । कीं पाणियावरी तरंग ।
तैसे स्वरुपीं अमोघ । विषय भासती ॥२३॥
आकाशामध्ये जसे मेघ दिसू लागतात, पाण्यावर जशा लाटा उठतात, त्याप्रमाणे अफाट अशा स्वरूपाच्या (ब्रह्माच्या) ठिकाणी विषय भासत राहतात. (२३)

गोंडाळ सांडून एकीकडे । नीर जैसे सेवणे पडे ।
तैसें निजरूप रोकडे । जाणून विषय त्यागावा ॥२४॥
मग शेवाळ बाजूला सारून पाण्याचे सेवन करावे लागते त्याप्रमाणे ब्रह्मरूप प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यासाठी विषयांचा त्याग करावा. (२४)

एकदा सोडितां न जाय । वारंवार भास होय ।
विवेकें सांडावा उपाय । दुजा नाहीं ॥२५॥
हा त्याग एकदा करून भागत नाही. कारण विषयांचे भास वारंवार होत असतात. विवेकाने त्यांचा त्याग करावा, त्याखेरीज दुसरा उपाय नाही. (२५)

हा विक्षेप विक्षिप्तता । हाचि अभ्यास सर्वदा करितां ।
मनासि गोडी अवचिता । उपजे ब्रह्मीं ॥२६॥
हा विक्षेप होय आणि त्याचा त्याग करणे ही विक्षिप्तता होय. हाच अभ्यास सर्वकाळ केल्याने मनाला ब्रह्माच्या ठिकाणी अचानकपणे गोडी उत्पन्न होते. (२६)

परी दोहीकडे आवडी । विषयाकडे क्षणें वोढी ।
क्षणें स्वरूपीं मारी बुडी । आपुले आपण ॥।२७॥
पण विषय आणि ब्रह्म या दोन्हीबद्दल सारखीच आवड असते त्यामुळे एका क्षणाला ती आवड मनाला विषयाकडे ओढते तर दुसऱ्या क्षणाला ती स्वरूपात (ब्रह्मरूपात) आपली आपण बुडी मारते. (२७)

यासि म्हणिजे गतायाता । हा विक्षेप संस्कार ओळखी ताता ।
यासि पूर्वाभ्यास विवेकसहित । वैराग्य असावें ॥२८॥
या विघ्नाला गतायाता असे म्हणतात. बाबारे, हा विक्षेपाचा संस्कार आहे, हे ओळखून घे. त्याच्या निर्मूलनासाठी पूर्वाभ्यास आणि विवेकासहित वैराग्याची आवश्यकता आहे. (२८)

होतां अभ्यासपाटव । मनासी विषयाचा अभाव ।
विषयावीण स्वभाव । मनाचा हारपे ॥२९॥
अशा अभ्यासात प्रावीण्य प्राप्त झाल्यावर मनातून विषय नाहीसे होतात. विषय नष्ट झाल्यामुळे मनाचा स्व-भावही हरपून जातो. (२९)

येणें रीती विक्षेपाचें । अभ्यासें मूळ तुटें त्याचें ।
पुढें विघ्न असे लयाचें । तें दोप्रकारें ॥३०॥
अशा अभ्यासाने विक्षेपाचे मुळासकट निर्मूलन होते. त्यापुढचे विघ्न म्हणजे लय हे आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. (३०)

मनाचें राहतां चळण । निद्रा व्यापी येऊन ।
अथवा वृत्ति होय शून्य । न स्मरे कांही ॥३१॥
मनाचे चलन थांबताच निद्रा येऊन व्यापते अथवा. वृत्ती शुन्य होऊन काहीही आठवत नाही. (३१)

तेणें आत्मत्व अंतरलें । निज सुखासी बिघडलें ।
याचें निरसन पाहिजे केलें । अत्यंत आवडीनें ॥३२॥
त्यामुळे आत्मत्व दूर राहून निजसुखही नष्ट होते. आता याचे निरसन आवडीने केले पाहिजे. (३२)

मी सर्व सुखाचा कंद । अमुप निष्कल निर्द्वंद्व ।
आठवावें परी शब्द । अवलंबू नये ॥३३॥
मी सर्व सुखाचा कंद आहे, अमूप आहे, निष्कल आहे, द्वंद्वहीन एकमेव आहे असे आठवावे. पण त्यावेळी शब्दांचा आश्रय करू नये. (३३)

तेणें सुखाचि उमटे । वृत्तिमाजीं भरतें दाटे ।
तेणें निद्रादि वोहटे । प्रकाशीं तम जैसें ॥३४॥
त्यामुळे सुखच प्रकट होऊन वृत्तीमध्ये त्याचे भरते दाटते. त्या योगे प्रकाशामध्ये जसा अंधार नाहीसा होतो तशी निद्रा, वृत्तिशून्यता ही विघ्ने ओसरतात. (३४)

तो वृत्यानंद अवलंबितां । तेचि जाणावी संश्लिष्टता ।
लय विक्षेपादि समस्ता । दवडिले इनें ॥३५॥
अशा वृत्त्यानंदाची प्राप्ती म्हणजेच संश्लिष्टता होय. तिच्या योगाने लय विक्षेप इत्यादी विघ्ने दूर होतात. (३५)

संश्लिष्टतेपासून । विघ्नें उमटतीं दोन ।
कषाय आणि रसास्वाद । विघ्नकर समाधीसी ॥३६॥
संश्लिष्टतेमुळे दोन विघ्ने निर्माण होतात. त्यांची नावे कषाय आणि रसास्वाद अशी असून ती दोन्ही समाधीला विघ्नकारक आहेत. (३६)

हिरवें पिवळें दिसावें । अथवा नादचि उमटावें ।
हें कषायाचें जाणावें । लक्षण ऐसें ॥३७॥
हिरवे पिवळे असे रंग दिसू लागतात अथवा निरनिराळे नाद उठतात. हे कषायाचे लक्षण आहे, असे जाणावे. (३७)

मी ब्रह्म जालों परिपूर्ण । वृत्तीनें घेतला अभिमान ।
स्वस्वरूपाहून पडिला भिन्न । हा रसास्वादु ॥३८॥
मी परिपूर्ण ब्रह्म झालो आहे असा वृत्ती अभिमान धारण करते. त्यामुळे स्वरूपापासून साधक वेगळा पडतो, हा रसास्वाद होय. (३८)

यासि कैसें करावें । भिन्न वृत्तीतें सांडावें ।
नादरंगही त्यागावे । वमक जैसे ॥३९॥
त्यासाठी काय करावे ? तर वेगळेपणाच्या वृत्तीचा त्याग करावा. नाद, रंग इत्यादींचाही ओकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याग करावा. (३९)

वृत्ति स्वरूपींच मुरे । भूमत्वचि मात्र उरे ।
मेघ गगनींच विरे । कीं तरंग सागरीं ॥४०॥
वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी मुरते आणि मग केवळ भमत्व म्हणजे व्यापकपण उरते. आकाशात ढग विरून जावेत किंवा समद्रावरील लाटा ओसराव्यात तसा हा अनुभव आहे. (४०)

हे जाणावी सुलीनता । निर्विकार जे अवस्था ।
ऐसा समाधि दृढ होतां । निर्विशेष ब्रह्मानंद ॥४१॥
या अवस्थेला सुलीनता म्हणतात. ती निर्विकार अशी अवस्था आहे. अशी समाधी दृढ झाली तर निर्विशेष ब्रह्मानंद होतो. (४१)

अपरोक्ष सुख अनुभविलें । अंतःकरण चुबकळलें ।
मन बुद्धीसी दाटलें । अहंकारासहित ॥४२॥
अपरोक्ष सुखाचा अनुभव येतो. अंत:करण त्यात चुबकळून निघते. मन, बुद्धी, अहंकार इत्यादी सर्व त्याने व्यापून जातात. (४२)

तुटतां अज्ञान आवरण । ब्रह्म जें का सच्चिद्‍घन ।
हृदयाकाशीं भरलें पूर्ण । आनंदें सहित ॥४३॥
अज्ञानाचे आवरण तुटल्याबरोबर सच्चिद्घन असे ब्रह्म आनंदासह हृदयाच्या पोकळीत भरून जाते. (४३)

इंद्रियद्वारें दाटलीं । तेणें घटाची घनता विराली ।
सर्वांगाची दशा जाली । आकाशापरी ॥४४॥
इंद्रियाची दारे बंद झाल्याने घटाची घनता विरून जाते आणि सर्वांगाची दशा आकाशाप्रमाणे होऊन जाते. (४४)

आनंदप्रकाश उसळला । सर्व ब्रह्मांडभरी जाला ।
सकळ पिंडासी व्यापिला । अंतर्बाहेरी ॥४५॥
आनंदाचा प्रकाश उसळून सर्व ब्रह्मांड व्यापून टाकतो. तसाच पिंडासही अंतर्बाह्य व्यापून टाकतो. (४५)

कठिणपण उरोचि नेदी । अणुसहित सर्वातें भेदी ।
पृथ्वी आकाशातें कोंदीं । आपुले पुष्टपणीं ॥४६॥
तो कठीणपणा राहूच देत नाही. अणूसहित सर्वाचा भेद करून आपल्या पृष्टीने आकाश, पृथ्वी सर्व व्यापून टाकतो. (४६)

ब्रह्मांडा न धरवे धीर । कठिणत्व विरालें समग्र ।
नामरूपाचा व्यवहार । मृगजळापरी ॥४७॥
ब्रह्मांडाचा लोप होतो. कठीणपणा विरून जातो. नामरूपाचा सर्व व्यवहार मृगजळाप्रमाणे लटका होतो. (४७)

आत्मस्वरूपाच्या पुरीं । अनंत ब्रह्मांडाच्या हारी ।
अणु तुषाराच्या लहरी । दिसती स्वानुभवें ॥४८॥
आत्मस्वरूपाच्या या पुरात ब्रह्मांडाच्या अनंत रांगा आहेत. त्या रांगा म्हणजे त्या पुरातील पाण्याच्या तुषारकणांच्या लाटांप्रमाणे दिसतात, असा अनुभव येतो. (४८)

त्या वृत्तीतें जरी सांडिलें । अनंत ब्रह्मंड लया गेलें ।
उपरी जें निःसंग भरलें । केवळ ब्रह्म ॥४९॥
ती वृत्ती जर सोडून दिली तर ती अनंत ब्रह्मांडेही लयाला जातात. त्यानंतर सगळीकडे केवळ नि:संग असे ब्रह्मच भरून राहिलेले असते. (४९)

जया अभ्यासीं आवडी । तेणें स्वानुभवें उभविली गुढी ।
सायोज्यमुक्ति धडफुडी । विवेकें केली ॥५०॥
ज्याला अभ्यासाची गोडी असते त्याला स्वानुभवाने हे यश प्राप्त होते आणि विवेकाने सायुज्यमुक्ती प्राप्त होते. (५०)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
अभ्यासयोगप्रकारे । तृतीयसमासः ॥३॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
ब्रह्मानंदविवेचन


आणिकही एक प्रकार । आभ्यासाचा विचार ।
होत असतां व्यवहार । साधकीं आभ्यासावा ॥१॥
आपले व्यवहार चालू असताना साधकांनी आणखी एका अभ्यासाच्या प्रकाराचा अभ्यास करावा. (१)

एक मुख्य ब्रह्मानंद । दुजेविण सुखकंद ।
अनुभाव्यरूप निर्द्वंद । द्वैतवार्ता नसे ॥२॥
ब्रह्मानंद एक मुख्य आहे. तेथे द्वैत नसून तो केवळ सुखाचा कंद आहे व अनुभवानेच जाणण्यायोग्य आहे. (२)

तयाची व्हावीया प्रतीति । द्वारें दोनचि असतीं ।
वासनानंद अभ्यासिती । विषयानंदद्वारा ॥३॥
त्याची प्रतीती होण्यासाठी दोनच मुख्य दारे आहेत. विषयानंदाच्या मार्गाने काही लोक वासनानंदाचा अभ्यास करतात. (३)

ब्रह्मानंद विषयानंद । तिसरा तो वासनानंद ।
तिहीं वेगळा चौथा आनंद । भूमंडळीं असेना ॥४॥
ब्रह्मानंद, विषयानंद आणि तिसरा वासनानंद असे तीनच आनंद असतात. या तिन्ही आनंदांपेक्षा वेगळा असा चौथा आनंद या भूमंडळात. नाही. (४)

श्रोता म्हणे आनंद बहुत । निजानंद आणि अद्वैत ।
विद्यानंदादि असत । तरी तीनचि कैसे ॥५॥
यावर श्रोता म्हणतो की, आनंद तर पुष्कळ प्रकारचे आहेत. निजानंद आहे, अद्वैतानंद आहे, विद्यानंद आहे. असे अनेक मुख्य प्रकार तीनच आहेत. अद्वैतानंद, निजानंद ही ब्रह्मानंदास दिलेली नावे आहेत. (६)

नांव वेगळालें जालें । परि तें तीनचि मासले ।
अद्वैतादि जे बोलिले । ब्रह्मानंदासी ॥६॥
विद्यानंद आणि वासनानंद यांच्यात काही भेद नाही. तसेच सगळ्या विषयांचे आस्वाद एका विषयानंदात समाविष्ट होतात. (७)

विद्या आणि वासनानंद । यासी नसे कांही भेद ।
संपूर्ण विषयांचे स्वाद । एक विषयानंदीं ॥७॥
आधी या तिन्ही आनंदांचे स्वरूप समजून घ्यावे. त्यांच्यातील सत्य कोणता, मिथ्या कोणता हे ओळखावे आणि मग आल्या वाटेनेच मूळ उगमाकडे जावे. (८)

आधीं या तिहींसी जाणावें । सत्य मिथ्या ओळखावें ।
आलिया वाटेचि जावें । मूळ उगमासी ॥८॥
आनंद असताना केवळ तीनच आनंद आहेत असे कसे म्हणता ? (५)

मुख्य ब्रह्मानंद कोणता । जो सुषुप्तींत असे तत्वतां ।
जीव नाना श्रर्म पावता । जेथें विश्रांती येतसे ॥९॥
ही नावे वेगवेगळी असली तरी मुख्य ब्रह्मानंद कोणता ? तर सुषुप्तीमध्ये तो असतो. खूप परिश्रम केल्यानंतर जीव तिथेच विश्रांतीसाठी येतो. (९)

हा सर्वानुभव साचार । समाधिकाली ज्ञानिया गोचर ।
जेथें मनादि अहंकार । लीन होती ॥१०॥
हा सर्वांच्या अनुभवाचा विषय आहे. ज्ञानी माणसाला तो समाधीमध्ये दिसतो. तेथे मन, अहंकार इत्यादी लीन होतात. (१०)

सुषुप्तिकाळीं असे नेणणें । तया आनंदाते कोण जाणें ।
दुजेनिवीण असणें । सुखरूप मात्र ॥११॥
सुषुप्तिकाळी नेणीव असल्यामुळे त्या आनंदाला कोणी जाणू शकत नाही. फक्त द्वैताच्या अनुभवाखेरीज केवळ सुखरूप असणे हेच त्याचे स्वरूप होय. (११)

तया सुखातें जाणणें । तरी वासनानंदाच्या अनुमानें ।
तो वासनानंद अनुभवणें । विषयानंदीं ॥१२॥
त्या सुखाला जाणायचे असेल तर वासनानंदाच्या अनुमानाने जाणावे आणि त्या वासनानंदाचा अनुभव विषयानंदातून घ्यावा. (१२)

जैसा महाजळाचा आशय । भूमिपोटीं प्रगट न होय ।
शीतळत्वें अनुभवास ये । परीक्षावंताच्या ॥१३॥
भूपृष्ठाखाली असलेला मोठा पाण्याचा साठा भूपृष्ठावर प्रगट झाला नाही तरी परीक्षावंतांना शीतलपणावरून तो अनुभवता येतो. (१३)

तेथें कोमळ तृणें लसलसितीं । आणि औषधी हिरवाळती ।
तरी ते जाणावी शक्ति । रसरूपें आपाची ॥१४॥
त्या ठिकाणी कोवळे गवत लसलसत असते आणि वनस्पती हिरव्यागार झालेल्या असतात. त्यावरून पाण्याची रसरूप शक्ती जाणून घेता येते. (१४)

महा आशय आच्छदिला । तैसा ब्रह्मानंद भरला ।
नेणपणें न जाय कळला । आच्छादिल्यापरी ॥१५॥
मोठा जलाशय आच्छादित झालेला असावा, त्याप्रमाणे ब्रह्मानंद सर्वत्र व्यापून राहिला असला तरी जणु काही झाकलेला असल्याप्रमाणे नेणिवेमुळे तो कळून येत नाही. (१५)

शीतस्पर्शी अनुभविला । परीक्षावंतीं जाणितला ।
तो वासनानंद ओळखिला । पाहिजे अंतरी ॥१६॥
जलाशयाचे अस्तित्व भूपृष्ठाच्या शीतल स्पर्शाने परीक्षावंत ओळखतात त्याप्रमाणे साधकाला वासनानंद अंत:करणात ओळखता आला पाहिजे. (१६)

नाना औषधी वनस्पती । रसरूप टवटवीती ।
तैसा विषयानंद सेविती । लोकसमूह ॥१७॥
विविध प्रकारच्या औषधी वनस्पती पाण्याच्या रसरूप शक्तीने टवटवीत होतात त्याप्रमाणे सर्व लोकसमूह विषयानंदाचे सेवन करताना आढळतात. (१७)

आतां हेंचि प्रांजळ कीजें । जेणें ब्रह्मानंद उमजे ।
विषय-सेवनीं लाहिजे । निजसुख आपुलें ॥१८॥
आता हेच अधिक स्पष्ट करून सांगतो. त्यायोगाने ब्रह्मानंदाचे स्वरूप कळेल. विषयांचे सेवन करत असतानाही आपले निजसुख प्राप्त करून घेता येते. (१८)

जागृतीं विषय भोगिले । तेणें अति श्रम पावलें ।
इंद्रिय मनादि जाले । पराभिभूत ॥१९॥
जागृतीमध्ये अनेक विषय भोगले त्यामुळे इंद्रिये, मन इत्यादी अतिशय श्रमामुळे अगदी थकून जातात. (१९)

तेव्हां विश्रांति आवडे । विषयसुख तें नावडे ।
इंद्रियसमुदाय जाऊनि पडे । मनाच्या पोटीं ॥२०॥
तेव्हा त्यांना विश्रांती आवडू लागते, त्यावेळी विषयसुखांबद्दल नावड निर्माण होते. सगळा इंद्रियांचा समूह मनाच्या पोटात जाऊन पडतो. (२०)

मनही बुध्दीत मिळालें । बुध्दीने माघारा अवलोकिलें ।
तेव्हां आनंदाचें प्रतिबिंब पडिलें । बुद्धिमाजीं अकस्मात । ॥२१॥
मन-बुद्धीत जाऊन मिसळते. बुद्धीही जेव्हा मागे वळून पाहाते तेव्हा अकस्मात त्या बुद्धीत त्या ब्रह्मानंदाचे प्रतिबिंब पडते. (२१)

ते समई जरी अवलोकिलें । तरी कांहीं जाय अनुभविलें ।
पुढें बुद्धीसी ठक पडिले । मुख्यानंद अवलंबिला ॥२२॥
त्याच वेळेला निरीक्षण केले तर काही अनुभव येऊ शकतो. पुढे बुद्धी मुख्यानंदाचा स्वीकार करते त्यामुळे तिला भुरळ पडते. (२२)

बुद्धि नसतां वेगळेपणें । ब्रह्मानंद जाणिजे कोणें ।
सुखरूपचि असणें । अनुभवेंविण ॥२३॥
त्यावेळी बुद्धीचे वेगळे अस्तित्व नसल्यामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव कोणाला घेता येईल ? अनुभवावाचून केवळ सुखरूप होऊन राहणे एवढेच त्यावेळी शक्य असते. (२३)

मन बुद्धि अहंकार । निःशेष हरपती समग्र ।
एकला उरे ज्ञप्तिमात्र । स्वानंद आत्मा ॥२४॥
मन, बुद्धी, अहंकार हे सगळे संपूर्णपणे हरवून जातात. केवळ आत्मा तेवढा ज्ञानस्वरूप होऊन स्वानंदात निमग्न असतो. (२४)

म्हणसी बुद्धीवीण सुख । कैसें असे अशेख ।
जेथें नसती सुखदुःख । निर्विशेषत्वें ॥२५॥
आता तू प्रश्न विचारशील की, बुद्धिरहित अवस्थेमध्ये सामान्यत्वाने सुखदुःखे नसतात. अशावेळी बुद्धीवाचून सुख कसे असेल ? (२५)

विषयापरी संपादिलें । तें सुख तेव्हांचि हरपलें ।
हें सदोदित कोंदाटलें । अनुभवेंवीण ॥२६॥
विषयाप्रमाणे प्राप्त केलेले सुख तात्कालिक असून ते अनुभव घेतल्याबरोबर नाहीसे होते. हे सुख मात्र अनुभवावाचून सर्वत्र दाटलेले असते. (२६)

म्हणसी मृदु शय्यादि असती । सुषुप्तीं सुखसाधनें होतीं ।
तैसेंही न घडे आदिअंती । आनंदरूप असे ॥२७॥
तू म्हणशील की, झोपेसाठी मृदू शय्या इत्यादी सुखसाधने असतात, तर या आनंदाच्या बाबतीत आरंभापासून शेवटपर्यंत यांपैकी काहीही नसते. हे सुख सदैव आनंदरूपच असते. (२७)

भुकेस कोंडा निद्रेस धोंडा । लोकदंडक हा उघडा ।
म्हणऊन आनंद रोकडा । सुखदुःखाभावीं ॥२८॥
लोकांमध्ये 'भुकेला धोंडा, निजेस धोंडा' असे म्हणण्याचा प्रघात आहे. हा लोकदंडक स्पष्ट आहे. त्यानुसार ब्रह्मानंद हा सामान्य सुखदुखांशिवाय वेगळाच आनंद असतो. (२८)

श्रोता म्हणे पुढती । सुखदुःखाभावीं सुषुप्ति ।
तरी मृत्तिका पाषाण होती । सुखसंपन्न ॥२९॥
यावर श्रोता म्हणतो, 'सुखदुःखविरहित झोप हाच जर आनंद असेल तर मृत्तिका, पाषाण यांनाही सुखसंपन्न म्हणता येईल. ' (२९)

वक्ता म्हणे सुख पाषाणीं । जाणिलें हे काशावरूनी ।
तेथें हर्ष किंवा ग्लानी । दोन्ही नसे ॥३०॥
तेव्हा वक्ता म्हणतो, "पाषाणाला सुख असते हे कशावरून ? पाषाणांच्या ठिकाणी हर्ष किंवा दुःख दोन्ही नसतात. (३०)

कोणी पुरुष निजेला । तेथें सुखविकास देखिला ।
म्हणऊन सुखाचा स्वीकार केला । पाहिजे सुषुप्तीं ॥३१॥
उलट एखादा पुरुष झोपलेला असेल तर त्याच्या ठिकाणी सुखाची वाढ झालेली दिसते. म्हणून झोपेमध्ये सुख असते याचा स्वीकार केला पाहिजे. " (३१)

हें श्रोतयासी न मने । अनुभवेविण कोण जाणें ।
वक्ता म्हणे शून्य तरि कोणें । अनुभविलें सांग ॥३२॥
वक्त्याचे हे म्हणणे श्रोत्याला पटले नाही. तो म्हणतो, "प्रत्यक्ष अनुभवाखेरीज हे कुणालाच कळणार नाही. " तेव्हा वक्ता म्हणतो, "शून्याचा तरी कोणी अनुभव घेतला आहे, सांग. " (३२)

श्रोता म्हणे हो मनहि बुद्धीतंत मिळालें । बुद्धीनें अनुभव ।
प्रसिद्ध असे नेणिव । वक्ता म्हणे हो अपूर्व । पुसेन ते सांग पा ॥३३॥
तेव्हा श्रोता म्हणतो, "नेणीव तर सर्वत्र प्रसिद्धच आहे. " तेव्हा वक्ता म्हणतो, "ही अपूर्व गोष्ट आहे. मग आता मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरे दे. " (३३)

तुवा जे नेणिव देखिली ।  परसुषुप्ति कीं आपुली ।
म्हणसी परनिद्रा अनुभविली । तरी अवधारीं पा ॥३४॥
तू जी नेणीव पाहिली म्हणतोस, ती दुसऱ्याच्या झोपेतील की स्वत:च्या ? दुसऱ्याच्या झोपेतील नेणीव पाहिली असे म्हणशील तर असे पहा की, (३४)

आपुलें सुखदुःख नेणे । तो पराचें काय जाणे ।
तरी नेणिवेचीं लक्षणें । पाहिलीं कोठें ॥३५॥
ज्याला आपले सुखदुःख कळत नाही, त्याला दुसऱ्याचे सुखदुःख काय कळणार ? तेव्हा तू नेणिवेची नेमकी कुठे पाहिलीस ? (३५)

श्रोता म्हणे निद्रा आपुली । तेथेंचि नेणिव देखिली ।
वक्ता म्हणे हो साधली गोष्ट आमुची ॥३६॥
यावर श्रोता म्हणतो की, आपल्या निद्रेमध्येच मी नेणीव पाहिली. तेव्हा वक्ता म्हणाला, मग तर आमचेच म्हणणे सिद्ध झाले. (३६)

देखतां आपुली नेणिव । तोचि जयासी आठव ।
हा तरी सुखाचा अनुभव । अनुभवून सांगसी ॥३७॥
आपली नेणीव पाहून तिची ज्याला आठवण होते त्याला तो सुखाचा अनुभव नाही काय ? तो अनुभव घेतल्यानंतरच तू सांगत आहेस. (३७)

तरी सुख हें सुषुप्तीं असें । आपुलें  अनुभवें जाणतसे ।
तया अज्ञान ही आलेंसे । व्यर्थचि नांव ॥३८॥
तेव्हा सुषुप्तीत सुख आहे, हे आपल्या अनुभवाने जाणतोस. असे असताना त्या ज्ञानाला अज्ञान हे नाव विनाकारणच आले आहे. (३८)

बागुलत्व बागुलासी । लेकुरें कल्पितीं तयासी ।
तैसें अज्ञानें सुषुप्तीसी । अज्ञान नाम ठेविलें ॥३९॥
बागुलबुवाला बागुलपणा देण्याचे काम मुलेच कल्पनेने करतात. त्याप्रमाणे सुषुप्तीला अज्ञानानेचं अज्ञान हे नाव ठेवले आहे. (३९)

स्वसुखातें जाणे । आपुले निर्विशेषत्वपणें ।
या हेतु श्रुतिहि म्हणणे प्राज्ञचि प्रज्ञा ॥४०॥
आपल्या सुखाला साधक निर्विशेषपणे (सामान्यत्वाने) जाणतो, म्हणून श्रुती (वेद) सुद्धा प्राज्ञाला (सुषुप्तीतील जीवाला) प्राज्ञा जाणता म्हणते. (४०)

आणि ज्ञात्याचाही अनुभव । पुसून अज्ञानाचा ठाव ।
निजानंदाची ठेव । स्वप्रभत्वें असे ॥४१॥
ज्ञात्याचा अनुभवही तसाच आहे. अज्ञानाचे अस्तित्व समूळ पुसून टाकून निजानंदा (स्वानंद, स्वरूपानंद) चा ठेवा स्वत:च्याप्रकाशाने असतो. (४१)

असो समाधि अथवा सुषुप्ति । आनंद सुखाची व्याप्ति ।
तेंचि पुढे अनुभविती । वासनानंदी ॥४२॥
असो, समाधी आणि सषप्तीमध्ये या आनंदसुखाची व्याप्ती असते. त्याचाच नंतर वासनानंदामध्ये साधक अनुभव घेतात. (४२)

तो वासनानंद कैसा । तोचि बोलिजे अपैसा ।
सुषुप्त्यानंदाचा ठसा । उमटला बुद्धीं ॥४३॥
आता तो वासनानंद कसा असतो ते ओघाने सांगतो. सुषप्त्यानंदाचा बद्धीत जो ठसा उमटतो तोच वासनानंद होय. (४३)

तैसा जागृतीच्या अंतीं । निद्रा जेव्ह्या व्यापिती ।
तैसीच निद्रेची समाप्ति । वासना सुखरूप ॥४४॥
जागृतीच्या शेवटी निद्रा जेव्हा व्यापू लागते (म्हणजे निद्रेच्या आरंभी) तेव्हा आणि निद्रेची समाप्ती होऊन जेव्हा जागृती येऊ लागते तेव्हा या दोन संधिकाळात वासना सुखरूप असतात. (४४)

समाधिकालीं ज्ञातयानीं । निर्विशेष सुखाची खाणी ।
तेंचि प्रगटलें उत्थानीं । वृत्तीसी आनंद ॥४५॥
समाधिकाळात ज्ञात्यांना अशा निर्विशेष (सामान्य) सखाची खाणच प्राप्त झालेली असते. समाधीनंतरच्या उत्थानकाळातही तेच सुख वृत्तीच्या आनंदाच्या रूपाने प्रकटते. (४५)

ज्ञात्यासी तो आनंदाचा । व्यापारीं लोप नसे साचा ।
जागृति येतां अज्ञानाचा । प्रवाह विषई ॥४६॥
ज्ञानी माणसाला व्यवहार काळातही त्या आनंदाचा लोप होत नाही. पण अज्ञानी माणसांच्या बाबतीत मात्र जागृती येताच अज्ञानाचा विषयांकडे प्रवाह सुरू होतो. (४६)

म्हणोनि वासनानंद । जागृत-सुषुप्तीचा मध्य ।
सर्व लोकासी प्रसिद्ध । क्षणेक असे ॥४७॥
म्हणून जागृती आणि सुषुप्ती यांच्या मध्ये (संधिकाळात) सर्वच लोकांना ज्ञात असा (अनुभवता येईल असा) वासनानंद क्षणभर असतो. (४७)

तो वासनानंद साधकीं । ज्ञानदृष्टीं अवलोकीं ।
विषयसुखीं अनेकीं । ओळखी होय ॥४८॥
हा वासनानंद साधकांनी ज्ञानदृष्टीने ओळखावा. निरनिराळ्या विषयसुखांमध्ये त्याची ओळख पटते. (४८)

पात्र जळें भरिलें । बाह्य शीतत्वें अनुभविलें ।
परी जळा अनुमापक जालें । तेवी वासनानंद ॥४९॥
पाण्याने भरलेले भांडे बाहेरून गार लागते. त्या गारपणावरून भांडे पाण्याने भरलेले आहे. याचे अनुमान करता येते. त्याचप्रमाणे वासनानंदाचेही अनमान करता येते. (४९)

आतां विषयानंदद्वारां । वासनानंद अवधारा ।
उभयानुमानें एकसरा । ब्रह्मानंद प्रगटे ॥५०॥
विषयानंदाच्या द्वारा वासनानंदाचा अनुभव घेता येतो आणि विषयानंद आणि वासनानंद या दोहोंच्या एकत्र अनुभवाने ब्रह्मानंद प्रगट होतो. (५०)

अंतःकरण मन बुद्धि । मिळून इंद्रियाची मांदी ।
विषयसुखातें संपादी । जागृतीमध्यें ॥५१॥
जागृतीमध्ये अंत:करण, मन, बुद्धी आणि इंद्रियसमुदाय एकत्र येऊन विषयसुखाची प्राप्ती करतात. (५१)

परी ती बुद्धीची वृत्ति । त्रिगुणरूप व्यवहारती ।
तयाचीं रूपकें निश्चितीं । वेगळालीं परियेसा ॥५२॥
पण बुद्धिवृत्ती त्रिगुणांच्या रूपाने व्यवहार करत असते. त्यांची वेगवेगळी रूपे आता ऐका. (५२)

घोर मूढ आणि शांत । गुणयोगें वृत्ति होत ।
शांतवृत्तीत बिंबत । आनंदांश कांही ॥५३॥
गुणांच्या योगाने वृत्तीचे घोर, मूढ आणि शांत असे तीन प्रकार होतात. शांत वृत्तीमध्ये आनंदाच्या काही अंशाचे प्रतिबिंब पडते. (५३)

घोर मूढ वृत्ति होतां । आनंद लोपे तत्त्वतां ।
सत्‌ आणि चिद्‌रूपता । हे दोन्ही असती ॥५४॥
घोर आणि मूढ वृत्तींमध्ये आनंद लोप पावतो. मात्र सद्‌रूपता आणि चिद्‌रूपता ह्या दोन्ही असतात. (५४)

अग्निसंगे जळ तप्त । उष्णत्व अंश दिसत ।
परी प्रकाशांश लोपत । जळ उपाधीमुळें ॥५५॥
अग्रीच्या संसर्गाने पाणी तापते. पाण्यामध्ये उष्णत्वाचा अंश उतरल्याचे स्पष्ट दिसते. परंतु पाण्याच्या उपाधीमुळे प्रकाशाचा अंश मात्र लोप पावतो. (५५)

तैसे आनंदावांचून । सच्चिल्लक्षणें दोन ।
घोर मूढ वृत्तिलागून । व्यवहार होय ॥५६॥
त्याप्रमाणे घोर, मूढ वृत्तीला आनंदावाचून पण सत् आणि चित् लक्षणांनी व्यवहार होतो. (५६)

मूढ वृत्ति तमोगुण । तयाचें कैसें लक्षण ।
आलस्य प्रमाद नेणणें । परी सच्चिदंश असे ॥५७॥
मूढ वृत्ती म्हणजे तमोगुणच होय. आळस, प्रमाद आणि अज्ञान ही त्याची चिन्हे होत. तरीसुद्धा त्या मूढ वृत्तीमध्ये सत् आणि चित् यांचा अंश असतो. (५७)

सदंश प्रगट असे । चिदंश मलिणत्वें दिसे ।
पाणी डहुळतां जैसें । प्रतिबिंब मळीण ॥५८॥
सत् हा अंश प्रकट (उघड) असतो. चिदंश मात्र पाणी डहुळताच त्यातील प्रतिबिंब मलिन दिसावे त्याप्रमाणे मलिन दिसतो. (५८)

घोर रजाच्या वृत्ति । काम क्रोध लोभ प्रीति ।
मोहादि वासना होती । नानाविध ॥५९॥
घोर या रजाच्या वृत्ती होत. काम, क्रोध, लोभ, प्रीती आणि विविध मोहादी वासना या त्या वृत्ती होत. (५९)

तेथें सत्‌ आणि चिदंश । वस्ती केली सावकाश ।
परी नसे आनंदांश । प्रगट जनीं ॥६०॥
त्या ठिकाणी सत् अंश आणि चित् अंश यांनी सहज वस्ती केलेली असते. पण आनंदांश मात्र प्रकटपणे नसतो. (६०)

विषयभोगा सोकले । सुखदुःखा वरपडे जाले ।
निजसुख आच्छादिलें । येणें रीती ॥६१॥
लोक विषयोपभोगाला सोकल्यामुळे (चटावल्यामुळे) सुखदुःखांच्या अधीन होतात. अशा रीतीने निजसुख आच्छादिले जाते. (६१)

शांत वृत्ति सत्त्वगुण । क्षमा तितिक्षा विरक्ति पूर्ण ।
तेथें सच्चित्‌ हे लक्षण । आनंदही असे ॥६२॥
जेथे शांतवृत्ती, सत्त्वगुण, क्षमा, तितिक्षा (सुखदुःखसहिष्णुता) पूर्ण वैराग्य ही सामग्री असते तेथे सत् आणि चित् ही लक्षणे तर असतातच, पण तेथे आनंद हे लक्षणही असते. (६२)

परी तो प्रगट असेना । किंचित्‌ येतसे अनुमाना ।
विकारें शीणती कल्पना । म्हणोनिया ॥६३॥
पण तो आनंद प्रकट स्वरूपात नसतो. किंचित अनुमानाने तो जाणता येतो. कारण किंचित विकार होताच कल्पना शिणतात. यावरून त्या आनंदाचे अनुमान करता येते. (६३)

हे घोर मूढ आणि शांत । गुणविकार वृत्ति होत ।
या तिहींमाजीं गुप्त वर्तत । उदास वृत्ति चौथी ॥६४॥
घोर, मूढ आणि शांत गुणविकाराने बदलणाऱ्या वृत्ती होत. या तिहींमध्ये चौथी उदास वृत्ती गुप्तपणे राहात असते. (६४)

गुणाचे विकार न होतां । अथवा संधिमाजीं पाहतां ।
अनुभव हो आइता । उदास वृत्तिचा ॥६५॥
गुणांचे विकार होत नसतील तेव्हा, अथवा दोन वृत्तींच्या संधीमध्ये पाहिले असता उदास वृत्तीचा अनुभव आपोआप येतो. (६५)

तेथें सच्चिद्‌रूपासहित । आनंदही प्रतिबिंबत ।
तो वासनानंद निश्चित । साधकीं ओळखावा ॥६६॥
तेथे सद्‌रूप, चिद्‌रूप या लक्षणांसह आनंद ही प्रतिबिंबित झालेला असतो. साधकांनी तो वासनानंद आहे, असे निश्चितपणे ओळखावे. (६६)

करूनी सत्त्वगुणाचा आश्रय । रजतमाचा करी क्षय ।
पुढें शांतवृत्तीचा लय । उदासवृत्तिमाजीं ॥६७॥
तो वासनानंद सत्त्वगुणाचा आश्रय करून रज, तम या गुणांचा क्षय करतो. त्यानंतर शांतवृत्तीचाही उदास वृत्तीमध्ये लय होतो. (६७)

गुण विकार होती जाती । मध्य संधीं उदासवृत्ति ।
तेसमई आनंदानुभूति । प्रगटे साधका ॥६८॥
गणविकार होत जात असतात. त्यांच्या मध्य संधीमध्ये उदासवृत्ती असते. त्यावेळी साधकाला त्या उदासवृत्तीमध्ये आनंदानुभव मिळतो. (६८)

जागृति स्वप्न व्यवहार होतां । निमिषोन्मेषीं अवलोकितां ।
मना आनंदाचें ज्ञान होतां । सुखचि होय ॥६९॥
जागृती, स्वप्र यांच्यामधील व्यवहार चालू असता पापण्यांच्या उघडझापीमध्ये क्षणभर संधिकालाचे अवलोकन केले असता मनाला त्या आनंदाचे ज्ञान होते तेव्हा सुखच होते. (६९)

तैसाचि अभ्यास वाढवावा । विषई वासनानंद जाणावा ।
बळेंचि अनुभव घ्यावा । ब्रह्मानंदाचा ॥७०॥
तोच अभ्यास वाढवावा. विषयांमध्येही वासनानंद जाणून घ्यावा आणि प्रयत्नपूर्वक ब्रह्मानंदाचा अनुभव घ्यावा. (७०)

तोचि जागृतीच्या अंती । सुषुप्ति न ये पुरती ।
सहज होय अनुभूति । जागृतीं अभ्यासें ॥७१॥
तोच आनंद जागृती संपली आहे, अजून पुरती झोप आलेली नाही अशा संधिकालात सहज अनुभवता येतो. जागृतीतही अभ्यासाने त्या आनंदाचा अनुभव घेता येतो. (७१)

सुषुप्तींत नलगे बोलणें । ब्रह्मानंदाचीं लक्षणें ।
अनुभूतिवीण असणें । सुखस्वरूप ॥७२॥
सुषुप्तीत तर बोलण्याची गरजच नाही. तिथे ब्रह्मानंदाची सर्वच लक्षणे असतात. कोणत्याही प्रकारचा अनुभव न घेता आपल्याला सुखरूप स्थिती प्राप्त होते. (७२)

एवं जागृति स्वप्न सुषुप्ति । असे आनंदाची व्याप्ति ।
हेंचि साधन अहोराति । साधकें कीजे ॥७३॥
अशा प्रकारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये आनंदाची व्याप्ती असते. हेच साधन साधकांनी अहोरात्र करावे. (७३)

व्यापार आणि ब्रह्मानुभूति । एकसमईं उभय प्रतीति ।
अभ्यासें बळाविली मति । सुखदुःखा नातळे तो ॥७४॥
व्यापार आणि ब्रह्मानुभव या दोहोंचा अनुभव अभ्यासाने एकाच वेळी घेता येतो. अभ्यासाने बुद्धी दृढ झाल्यानंतर साधक सुखदु:खांच्या पलीकडे जातो. (७४)

जैसा माध्यान्हीं गंगाजीवनीं । कटिपर्यंत उभा कोणी ।
तयासी उष्ण शीत दोन्हीं । एकसमईं अनुभूति ॥७५॥
ज्याप्रमाणे दुपारच्या वेळी एखादा नदीच्या कमरेइतक्या पाण्यात उभा राहिला तर त्याला शीतलता आणि उष्णता या दोहोंचा एकाच वेळी अनुभव येतो, (तसाच व्यापार आणि ब्रह्मानुभव हे दोन्ही अनुभव एकाच वेळी घेता येतात. ७५)

अखंड आनंदाचें स्मरण । हाचि समाधि संप्रज्ञ ।
तया नसे उत्थान । तिहीं अवस्थें ॥७६॥
आनंदाचे अखंड स्मरण असणे याला संप्रज्ञात समाधी म्हणतात. त्या समाधीमध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये उत्थान होत नाही. (७६)

एवं विषय आणि वासना । ब्रह्मानंदीं पावती अवसाना ।
वर्तून लहरी जीवना । माजीं लय होय ॥७७॥
अशा प्रकारे विषय आणि वासना ब्रह्मानंदामध्ये विलीन होतात. पाण्यात लाटा उत्पन्न होतात आणि पाण्यामध्येच लय पावतात. तसेच येथे होते. (७७)

तरंगीं जैसें जळ । कीं ज्वाळीं असे अनळ ।
वासनानंदीं कल्लोळ । ब्रह्मानंदाचे ॥७८॥
लाटांमध्ये जसे पाणीच असते, ज्वालांमध्ये अग्नीच असतो, त्याप्रमाणे वासनानंदामध्ये ब्रह्मानंदाचे कल्लोळ असतात. (७८)

तरंगीं जळ ओळखिलें । तरंग जरी लया गेले ।
परी पाणी नवचे हलवलें । जैसें तैसें ॥७९॥
लाटांमधील पाणी ओळखल्यानंतर लाटा जरी लयाला गेल्या तरी पाण्याला मात्र काहीच विकार होत नाहीत. ते जसेच्या तसेच असते. (७९)

सुषुप्तिं अथवा प्राणप्रयाणीं । विषय वासना हरपती दोन्ही ।
एकटा उरे निदानीं । ब्रह्मानंद ॥८०॥
त्याप्रमाणे सुषुप्तीमध्ये अथवा प्राण निघून गेल्यानंतर विषय आणि वासना दोन्ही नाहीशा होतात आणि शेवटी एकटा ब्रह्मानंद उरतो. (८०)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ब्रह्मानंदविवेचनप्रकारे । चतुर्थसमासः ॥४॥
हरिः ॐ तत्सत्



॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
आचार्योपासन


पुरे साधनाची कचाटी। किती करूं पा चावटी ।
सकळ शेवटाचें शेवटी । मुख्यत्वें साधन ॥१॥
आता साधनांची खटपट पुरे. त्यासाठी किती बडबड करू ? या सगळ्या साधनांमध्ये शेवटचे मुख्य साधन वेगळेच आहे. (१)

सकळ साधनांमाजीं वरिष्ठ । सुलभ आणि स्पष्ट ।
सकळ साधनांचे कष्ट । येणें साधनें सफळ ॥२॥
ते सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन आहे. ते सोपे आणि स्पष्ट आहे. इतर साधनांत केलेले सर्व कष्ट या एका साधनाने सफळ होतात. (२)

सकल उपायांसी विश्रांति । ते जाणावें आचार्योपास्ति ।
जया घडे साधकाप्रति । मुक्ति करतळीं त्याच्या ॥३॥
सगळ्या साधनांना विश्रांती देणारे असे ते साधन म्हणजे आचार्योपासन (सद्गुरूंची सेवा) हे होय. हे साधन ज्या साधकाला घडते त्याच्या तळहातावर मुक्ती वास्तव्य करते. (मुक्ती त्याला अतिशय सुलभ आहे. ) (३)

ज्ञान वैराग्य विचार । निद्रेंत उपासिती त्यासमोर ।
श्रुतिस्मृति घेऊनी चामर । साधाकापुढें सर्वदा ॥४॥
ज्ञान, वैराग्य, विचार ही साधने झोपेतही या साधकाची सेवा करतात. श्रुती, स्मृती हातात चवऱ्या घेऊन त्याच्यासमोर नेहमी उभ्या असतात. (४)

ब्रह्मानंद घर पुसे । कीं गुरुपुत्र कोठें राहतसे ।
मज वियोग बहु जालासे । तयावांचुनी ॥५॥
'ब्रह्मानंद, 'गुरुपुत्र कोठे राहतो ? ' असे म्हणून त्याच्या घराचा पत्ता विचारतो. तो म्हणतो, "त्याला न भेटल्यामुळे मला त्याच्या वियोगाचे फार दुःख होते आहे. " (५)

ईश्वर अष्टमहासिद्धींसहित । हृदयींच असे नांदत ।
ॐकार राहिला द्वारांत । द्वारपाळ हो‍उनी ॥६॥
साक्षात ईश्वर आठ महासिद्धींसमवेत त्याच्या हृदयातच नांदत असतो. ॐकार (प्रणव) त्याच्या दारात द्वारपाल होऊन राहातो. (६)

बहु काय बोलूं वचनीं । लाजून पळाली मायराणी ।
अविद्येसी धीर कोठोनी । उभ्या प्राण सांडिला ॥७॥
आणखी शब्दांनी अधिक काय सांगू ? त्याला पाहाताच मायाराणी लाजून पळून गेली. अविद्येला तर तेवढाही धीर उरला नाही. तिने उभ्याउभ्याच प्राणत्याग केला. (७)

ऐसें माहात्म्य गुरुभक्तीचें । नेणवे नेणवे साचें ।
अनंत ढीग पुण्याचे । तयासीच घडे ॥८॥
गुरुभक्तीचे असे थोर माहात्म्य आहे. ते खरे पाहता समजतच नाही. ज्याच्या गाठी पुण्याचे अनंत ढिगारे आहेत, त्यालाच गुरुभक्तीचे माहात्म्य कळेल. (८)

गुरुवीण ब्रह्म निर्गुण । दुजें नसेचि भिन्न ।
तेथें देव हे सगुण । वेगळें कैचें ॥९॥
गुरू नसल्यामुळे ब्रह्म निर्गुण (गुणरहित) राहिले. ब्रह्म हे गुरूपेक्षा भिन्न असे नाहीच. मग सगुण देव हे गुरूपासून वेगळे कसे असतील ? (९)

नेणे ज्ञान नेणे ध्यान । नेणे समाधि उत्थान ।
गुरुविण द्वैतभान । मोक्षादि कां कैचें ॥१०॥
गुरुभक्ताला गुरुभक्तीपुढे ज्ञान, ध्यान, समाधी, उत्थान इत्यादी कशाचीही जाणीव नसते. गुरूवाचून या सर्व साधनांना द्वैतभान येते. मग त्यांनी मोक्ष इत्यादी कसे प्राप्त होतील ? (१०)

रात्री दिवस नेणें । जग तरी जाणावें कोणें ।
एक सद्‌गुरू व्यापकपणें । दुजें न देखे सर्वथा ॥११॥
त्याला गुरुसेवेपुढे रात्र, दिवस यांचेही भान नसते. मग इतर जगाचे ज्ञान कुणाला असणार ? एक सद्गुरूच व्यापक रूपात त्याला सर्वत्र दिसतो. त्यावाचून दुसरे काहीही त्याला दिसत नाही. (११)

घबाडा साधलें घबाड । घबाड जालें कबाड ।
घबाडीं उरलें घबाड । घबाडपणीं ॥१२॥
पूर्णाला पूर्ण मिळाल्याबरोबर सर्व दृश्यजात पूर्ण बनते, पूर्णातून पूर्णच उरते आणि पूर्णत्वानेच ते राहते. (१२)

जाणीव नेणीव बाबुळी । हरपती होय समुळीं ।
रत्नदीप्तीची काजळी । झाडली जैसी ॥१३॥
साधकाची जाणीव, नेणीव त्या पूर्णाच्या अनुभवात पाण्याच्या पृष्ठभागावरून जसे शेवाळ हटवले जाते, अथवा दीपाची काजळी जशी झाडली जाते, त्याप्रमाणे नाहीशा होतात. (१३)

ऐसा महाराज गुरुदास । केवळ परब्रह्माची मूस ।
जीवशिव येती विश्रांतीस । उपाधि सांडुनी ॥१४॥
असा गुरुदास महाराज (शिष्योत्तम) म्हणजे केवळ परब्रह्माची मूस होय. त्याच्याकडे जीव आणि शिव आपल्या उपाधींचा त्याग करून विश्रांतीस येतात. (१४)

वेदासी माहात्म्य न कळे । तें वाणीसी केवि चावळे ।
मौनाचेही जेथें गळे । निस्तत्वपण ॥१५॥
त्याचे मोठेपण वेदांनासुद्धा कळत नाही, ते साध्या वाणीला कसे बडबडता येईल ? मौनाचेही असारपण तेथे गळून पडते. (१५)

राजा कोणी संग्रामशूर । त्याचें सामर्थ्य त्यासमोर ।
भाट वर्णिती किंकर । परी सामर्थ्य ज्याचें त्या ॥१६॥
एखादा संग्रामशूर राजा असतो. त्याच्या सामर्थ्याचे त्याच्यासमोर त्याचे भाट इतर सेवक वर्णन करत असतात. पण ज्याचे सामर्थ्य त्यालाच ते माहीत. (इतरांनी केलेल्या वर्णनाने त्याची कल्पना येणार आहे का ? ) (१६)

तैसें त्याचें महत्त्व त्यासी । भाटापरी तल्लक्षणासी ।
वर्णिजेती गुरुभक्तीसी । यथामती ॥१७॥
त्याप्रमाणे त्याचा मोठेपणा त्याच्यापाशीच असतो. परंतु तरीसुद्धा भाट त्याचे वर्णन करतातच ना! त्यांच्याप्रमाणे आपल्या बुद्धीला कळेल त्याप्रमाणे गुरुभक्तीचे वर्णन करावे हे बरे ! (१७)

गुरुभक्ति गुरुभक्तासी । वर्णनीं काय फळे म्हणसी ।
माळीण हार गुंफी जैसी । भोगे तरी राजपत्नी ॥१८॥
गुरुभक्ती गुरुभक्तापाशीच असते. तिचे वर्णन करून तुम्हाला लाभ काय असे म्हणशील तर ऐक. माळीण हार गुंफते. त्या हाराचे सुख राणी भोगते. (१८)

भोगेवीण माळिणीसी । सुगंधाची समृद्धि जैसी ।
तैसें वर्णितां गुरुभक्तीसी । ब्रह्मानंद होय ॥१९॥
पण माळीण ते हाराचे सुख भोगत नसली तरी तिला सुगंधाचा घमघमाट भोगायला मिळतोच ना ! त्याप्रमाणे गुरुभक्तीचे वर्णन करण्याने ब्रह्मानंद होतो. (१९)

म्हणून गुरुभक्तीचें लक्षण । श्रोता वक्ता होय पावन ।
आतां ऐका सावधान । कांही एक बोलूं ॥२०॥
म्हणून गुरुभक्तीच्या वर्णनाने श्रोता आणि वक्ता हे दोघेही पावन होतात. म्हणून आता सावधपणे लक्ष द्या. त्या गुरुभक्तीचे (जसे जमेल तसे) थोडेफार वर्णन करतो. (२०)

सांडुनी अहं आणि ममता । सद्‌गुरुपदीं अनन्यता ।
आपणासगट समर्पिता । होय गुरुचरणीं ॥२१॥
गुरुभक्त मी आणि माझेपण यांचा त्याग करून सद्गुरूंच्या पायांपाशी अनन्य भावाने सादर झालेला असतो. तो स्वत:ला गुरुचरणांवर वाहून घेतो. (२१)

गुरुसेवनीं लागली गोडी । कल्प मानिला एक घडी ।
नित्य चौगुणी आवडी । जैसी वाढी उद्भिजा ॥२२॥
गुरूंची सेवा करण्यात त्याला एवढी गोडी लागते की एक कल्प त्याला अर्ध घटकेप्रमाणे वाटतो. (त्याने कितीही वेळ सेवा केली तरी त्याला तो काळ फार थोडा वाटतो. ) वेळूचा अंकुर (अथवा कोणतीही वनस्पती) जसा दिवसेंदिवस वाढत जातो, तशी त्याची गुरुसेवेची आवड चौपटीने वाढत जाते. (२२)

सूर्यविकाशनी कमळ । सूर्यासमोर सर्वकाळ ।
तेवीं गुरुदास केवळ । सद्‌गुरूपुढें ॥२३॥
सूर्यविकासी कमळ जसे नेहमी सूर्याकडे तोंड करून असते त्याप्रमाणे गुरुदास सद्गुरूंपुढे तत्परतेने उभा असतो. (२३)

काया वाचा आणि मन । गुरुसेवेचें लक्षण ।
बोलिजेती भिन्न भिन्न । संक्षेपमात्रें ॥२४॥
या गुरुसेवेची लक्षणे शरीर, वाणी आणि मन अशी तीन प्रकारांनी विभागली गेली आहेत. ती संक्षेपाने वेगवेगळी सांगतो. (२४)

सुखदुःख नेणें देहाचें । सदा सोहळे सेवेचे ।
सूर्योदयापसून उद्याचें । सूर्योदया पावेतों ॥२५॥
गुरुभक्ताला आपल्या शरीराचे सुखदुःख माहीत नसते. त्याच्यासाठी गुरुसेवेचे प्रसंग नेहमी आनंदाचे क्षण असतात. आजच्या सूर्योदयापासून ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत तो या सेवेच्या आनंदात असतो. (२५)

OVI 26 MISING IN PRINTED BOOK
सदगुरू बिछान्यावर झोपेत असताना तो बाजूला सतत हात जोडून उभा असतो किंवा चवरी घेऊन सतत ढाळत असतो. (२६)

सद्‌गुरू जागृतीसी आले । मस्तक चरणीं समर्पिलें ।
पादुकेसी पुढें केलें । वेगें चालिले दिशेकडे ॥२७॥
सद्गुरू जागे झाले की लगेच तो आपले मस्तक त्यांच्या पायांवर ठेवतो, मग तो सद्गुरूंच्या पादुका (पादत्राणे) समोर ठेवतो. ते लगेच पातर्विधीसाठी बहिर्दिशेला जातात. (२७)

तें स्थान पूर्वीच शोधिलें । चंदनें संमार्जन केलें ।
दीपमाळा अति शोभले । नाना सुगंधीं ॥२८॥
प्रातर्विधीचे स्थान त्याने अगोदरच स्वच्छ केलेले असते. त्यावर चंदनाचा सडा टाकलेलाअसतो. दिव्याच्या रांगांनी ते सुशोभित केलेले असते. निरनिराळ्या सुगंधांनी सुगंधित केलेले असते. (२८)

शौचक्रिया संपादून । आलें जेथें उदकस्थान ।
चौकीवरी बैसऊन । चरण क्षाळीले ॥२९॥
शौचक्रिया संपवून सद्गुरू पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणी येतात. तेथे त्यांना चौकीवर (चौरंगावर) बसवून तो त्यांचे पाय धुतो. (२९)

मुखमार्जन जालियावरी । नाना सुगंध उटणें करी ।
दधिमधुघृतक्षिरीं । पंचामृतस्नानें ॥३०॥
नंतर तोंड धुवून झाल्यानंतर तो निरनिराळ्या सुगंधी द्रव्यांचे उटणे त्यांच्या अंगाला लावतो. दही, मध, तूप, दूध घालून त्यांना पंचामृताचे स्नान घालतो. (३०)

शुद्ध जीवन मंगलस्नान । करऊनि पुसिलें आपण ।
शुद्धवस्त्र परिधान । इकडे आसन सिद्ध जालें ॥३१॥
पंचामृत स्नान झाल्यानंतर शुद्ध जलाने मंगलस्नान घालतो. तो त्यांचे अंग पुसतो आणि त्यांना शुद्ध वस्त्र नेसायला देतो. लागलीच आसन तयार करून ठेवतो. (३१)

सद्‌गुरूसी बैसविले । पूजासाहित्य सिद्ध केलें ।
गंधपुष्पीं पूजन जालें । वस्त्रालंकार ॥३२॥
सद्गुरूंना आसनावर बसवतो. पूजासाहित्य तयार करतो. सुगंधयुक्त फुले त्यांना अर्पण करून त्यांची पूजा करतो. त्यांना वस्त्रे आणि अलंकार देतो. (३२)

पूजा जालिया सांग । नैवेद्याची लगबग ।
षड्रस पात्रीं मग । वाढून आणिले ॥३३॥
अशा प्रकारे सर्वसांग पूजा केल्याबरोबर नैवेद्याची लगबगीने तयारी करतो आणि ताटात षड्रसयुक्त पक्वात्रे वाढून आणतो. (३३)

धूपदीप समर्पिले । भोजन समाप्त जालें ।
गंगाजळासीं घेतलें । तृप्त जाले गुरुराजे ॥३४॥
त्यानंतर धूप, दीप अर्पण करतो. सद्गुरूंचे भोजन मग संपते. मग तृप्त झालेले ते गुरुराज गंगाजलाची आपोष्णी घेतात. (३४)

पात्रीं राहिले जे शेष । तेचि सेविलें सावकाश ।
तस्तीचें उदक निःशेष । उच्छिष्टपान ॥३५॥
त्यांच्या पानात जे उरलेले अन्न असेल ते हा शिष्य सेवन करतो आणि मग त्यांच्या तस्तातील उच्छिष्ट पाणी सगळे पिऊन टाकतो. (३५)

अन्यस्थानीं दुजें आसन । तेथें बैसविलें नेऊन ।
तांबूल अर्पी प्रीतिकरून । पीकपात्र घेऊन उभा ॥३६॥
मग दुसऱ्या ठिकाणी सद्गुरूंसाठी दुसरे आसन घातलेले असते. तेथे तो सद्गुरूंना नेऊन बसवतो. मग त्यांना प्रेमाने विडा देतो आणि स्वत: पीक टाकण्याचे पात्र हातात धरून जवळ उभा राहतो. (३६)

ज्या ज्या काळीं जे जे भोग । ते ते अर्पी यथासांग ।
गुरुमुखीं ठेवी अभंग । दृष्टि आपुली ॥३७॥
ज्या ज्या काळी सद्गुरूंना जे जे भोग द्यायचे असतात, ते ते तो त्यांना यथासांग अर्पण करतो. त्याने आपली दृष्टी सतत गुरुमुखावर केंद्रित केलेली असते. (३७)

सद्‌गुरू करितां गमन । पाठी चाले आपण ।
सद्‌गुरुचरणींचे रजःकण । मस्तकीं वंदी ॥३८॥
सद्गुरू कोठे जाऊ लागले की हाही त्यांच्या पाठीमागे चालू लागतो. सद्गुरूंच्या पायांनी उडालेली धूळ आपल्या मस्तकावर घेऊन तिला वंदन करतो. (३८)

वातें रजःकण उडतां । माथा ओडवी खालुता ।
अतिकृपाळू सद्‌गुरुमाता । मजला शुद्ध करितसे ॥३९॥
वाऱ्याने धूळ उडू लागली असता ती घेण्यासाठी तो आपला माथा खाली वाकवून पुढे करतो. ती धूळ अंगावर उडताच दयाळू सद्गुरुमाउली मला शुद्ध करत आहे, असे म्हणतो. (३९)

गुरु वाहनीं आरूढती । आपण चाले सन्निध गति ।
खडे किंवा कांटे मोडती । परी तो नेणे सर्वथा ॥४०॥
गुरू वाहनात बसून जाऊ लागतात तेव्हा तोही त्यांच्या वाहनाच्या बरोबर चालू लागतो. त्याला चालताना खडे किंवा काटे मोडतात, पण त्यांचे त्याला भान नसते. (४०)

मस्तकीं धरूनीया छत्र । उष्ण न लगे अणुमात्र ।
ऐसें धरी परी वस्त्र । किमपि सुकेना ॥४१॥
सद्गुरूंना चालताना थोडेसुद्धा ऊन लागू नये म्हणून तो त्यांच्या मस्तकावर छत्री धरतो, त्यामुळे त्यांनी उन्हासाठी डोक्यावर घेतलेले ओले वस्त्र थोडेसुद्धा सुकत नाही. (४१)

जों जों देहा कष्ट होती । तों तों अधिक वाढे प्रीति ।
सद्‌गुरू जेथें बैसती । तेथे उभा सन्मुख ॥४२॥
गुरुसेवा करत असताना देहाला जेवढे कष्ट होतील, तेवढे त्याचे सद्गुरूंबद्दलचे प्रेम अधिक वाढते. सदगरू जेथे बसतील तेथे तो त्यांच्यासमोर उभा राहतो. (४२)

सूर्य जातां अस्तासी । पुन्हा आरंभिलें पूजेसी ।
गंधमाला धूसरासी । धूप दीप नैवेद्य ॥४३॥
सूर्य अस्ताला जाताच तो पुन्हा पूजेला आरंभ करतो. गंध, माळा, गुलाल, बुक्का (धूसर) , धूप, दीप, नैवेद्य, (४३)

तांबुलादि पूर्वरीती । नीरांजनादि आरती ।
जे जे गुरूसी प्रीति । तेंचि अर्पी तें काळीं ॥४४॥
विडा इत्यादी निरांजन ओवाळून आरती इत्यादी जे जे गुरूंना आवडते ते ते त्याकाळी अर्पण करतो. (४४)

शयनस्थान सिद्ध केलें । मग गुरूसी उठविले ।
मंचकीं शयन करविले । गुरुपदीं ठेविलें मस्तक ॥४५॥
त्यानंतर गुरूंचे अंथरूण घालतो. मग गुरूंना उठवून त्यांना मंचकावर झोपवतो. मग गुरूंच्या पायावर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार करतो. (४५)

चरण चुरी आवडी । मुख अवलोकी घडि घडि ।
नसे निद्रेची साकडी । मारिली दडी गुरुपदीं ॥४६॥
त्यांचे पाय आवडीने चुरतो. पुन्हा पुन्हा त्यांच्या तोंडाकडे पहातो. त्याला झोपेचे संकट नसते. तो सतत गुरूंच्या चरणांमध्ये दडी मारून राहतो. (४६)

तथापि निद्रेनें व्यापिलें । पदींच मस्तक ठेविलें ।
अनंत जन्मींचे श्रम गेले । क्षणामाजीं ॥४७॥
तरीसुद्धा झोपेने घेरलेच तर गुरूंच्या पायांवरच मस्तक टेकवतो. त्यावेळी त्या क्षणी अनंत जन्मांचे श्रम नाहीसे झाल्यासारखे त्यास वाटते. (४७)

ऐशी काया गुंतली सेवेसी । पवित्रता वर्णावी कैसी ।
तीर्थे पातलीं स्नानासी । चरणरजाच्या ॥४८॥
अशा त-हेने त्याचे शरीर गुरुसेवेमध्ये गुंतलेले असते. त्याचे पावित्र्य किती वर्णावे ? त्याच्या चरणांच्या धुळीत स्नान करण्यासाठी तीर्थक्षेत्रे येतात. (४८)

गुरुउच्छिष्ट भोजन । गुरुतीर्थाचें स्नानपान ।
तया देहाचें महिमान । सहस्त्रवदना कळेना ॥४९॥
जो गुरूच्या उच्छिष्टाचे (गुरूंनी उष्टावलेल्या) अन्नाचे जेवण करतो, गुरूंच्या तीर्थाचे स्नान, प्राशन इत्यादीसाठी सेवन करतो, त्या देहाचे माहात्म्य प्रत्यक्ष शेषालाही कळत नाही. (४९)

या रीती कायीक सेवन । आतां वाणीचें कैसें भजन ।
गुरु हीं अक्षरें दोन । नख शिख व्यापिलीं ॥५०॥
अशा रीतीने गुरुभक्ताने करावयाच्या कायिक सेवेचे वर्णन झाले. आता वाणीने करावयाची भक्ती कशी असते ते पाहू. गुरू या दोन अक्षरांनी त्याचे नखापासून ते शिखेपर्यंतचे शरीर व्यापलेले असते. (५०)

परेपासून वैखरी । गुरु अक्षराच्या हारी ।
जैसीं रत्नें सुवर्णावरी । कोंदण केलें ॥५१॥
ज्याप्रमाणे सुवर्णाच्या कोंदणात रत्ने बसवली जातात. त्याप्रमाणे 'गुरू' या अक्षरांच्या हारांनी त्याच्या परेपासून ते वैखरीपर्यंतच्या चारी वाणी सुशोभित झालेल्या असतात. (५१)

पन्नास मातृका आटल्या । दोहीं अक्षरीं साठविल्या ।
ज्याच्या वैखरीसी आल्या । पवित्र व्हावया ॥५२॥
पन्नास वर्ण आटवून गुरू या दोन अक्षरात साठवले. ते दोन्ही वर्ण त्याच्या वैखरी वाणीत पवित्र होण्यासाठी येतात. (५२)

गुरु गुरु जयजय गुरु । नादाचा चालिला सधरु ।
तेणें प्राण जाला स्थिरु । परादिक एक जाल्या ॥५३॥
'गुरू, जय जय गुरू'असा नादाचा जोरदार गजर चालत असल्यामुळे त्याचा प्राण स्थिर होतो. परादी चार वाचा एक होतात. (५३)

मन बापुडें वेडावलें । भजनींच नाचूं लागलें ।
ओवाळुनी सांडिलें । समाधिसुखा ॥५४॥
त्याचे मन बिचारे मोहित होऊन गुरूंच्या भजनात नाचू लागते आणि तो समाधिसुखाला या भजनानंदावरून ओवाळून टाकतो. (५४)

होतां कांही निरूपण । श्रवण करी सावधान ।
नम्रपणें करी प्रश्न । समाधान पावे ॥५५॥
काही निरूपण चालू असेल तर सावधानतेने त्याचे श्रवण करतो. मधून मधून नम्रतेने प्रश्न विचारून समाधान करून घेतो. (५५)

गुरुसी आवडे कैसा । आपुला प्रत्यगात्मा जैसा ।
क्षण एक न विसंबे पाडसा । हरिणी जैसी ॥५६॥
तो गुरूला अत्यंत प्रिय असतो, कसा म्हणाल तर अगदी आपल्या शरीरातील प्रत्यगात्म्याप्रमाणे (कूटस्थाप्रमाणे) . हरिणी जशी आपल्या पाडसाला एक क्षणभरही विसरत नाही तसे सद्गुरू त्याला विसरत नाहीत. (५६)

हें परब्रह्म गोठलें । दो ठाईंचि विभागलें ।
गुरुशिष्यरूपें जालें । एकपण न मोडितां ॥५७॥
हे परब्रह्मच जणु गोठले असून त्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. ते दोन भाग म्हणजे स्वत:चे एकपण न मोडता वेगळे दिसणारे गुरू आणि शिष्य हे होत. (५७)

येथें काय उपमावें । कासया व्यर्थ स्तववावें ।
उभयामाजीं जाऊन पडावें । मीपणेंविण ॥५८॥
या ऐक्याच्या बाबतीत कोणाची कोणाला उपमा द्यावी ? विनाकारण ही स्तुती कशासाठी करावी ? या दोघांच्या ऐक्यात मीपणा टाकून देऊन समरस व्हावे हेच योग्य होय. (५८)

असो जयाचे वचनीं । वेद राहिला येउनी ।
अर्थ प्रवेशला अंतःकरणीं । झडि देऊनी बळेंचि ॥५९॥
त्याच्या बोलण्यामध्ये साक्षात वेद येऊन राहिलेला असतो. त्यामध्ये अर्थ बळजबरीने मुसंडी देऊन प्रवेश करत असतो. (५९)

अंतःकरण प्राण मन । चारी वाणी संपूर्ण ।
गुरु गुरु हेंचि भजन । गुरुरूपचि जालें ॥६०॥
अंत:करण, प्राण, मन, चारी वाणी या सगळ्यांमध्ये गुरू गुरू असेच भजन चाललेले असते. ते गुरुरूपच झालेले असते. (६०)

पुढें मन कैसें प्रवर्तलें । गुरुभजनीं जें लागलें ।
तेंचि संक्षेपें बोलिलें । पाहिजे आतां ॥६१॥
आता गुरुभक्तीकडे वळलेले मन तिकडे कसे प्रवृत्त झालेले असते तेच संक्षेपाने सांगतो. (६१)

निमिष्यभरि गुरुचा । वियोग होतां मनाचा ।
धिवसा नव्हे राहवयाचा । म्हणुन गुरु आठवी ॥६२॥
आता गुरूचा मनाने एक क्षणभर जरी वियोग झाला तरी तो सहन करण्याचे धैर्य नसल्यामुळे तो भक्त लगेच सद्गुरूचे स्मरण करतो. (६२)

गुरूचें जें सिंहासन । अंगें जालें आपण ।
वरी मृदु अस्तरण । तेंहि जालों ॥६३॥
गुरूंचे जे सिंहासन तेच आपण स्वतः झालो अशी तो कल्पना करतो. त्यावर घातलेले मऊ अस्तरणही आपणच झालो, अशी तो कल्पना करतो. (६३)

गुरुपरिधानवस्त्र । जालों आपण वरी छत्र ।
आणि विंझणें चामर । वारिता मीचि ॥६४॥
गुरू परिधान करतात ते वस्त्रही आपणच झालो, त्यावर विंझणे म्हणजे चवरी ढाळणाराही मीच झालो, असेही त्याला वाटते. (६४)

गुरुसी जें जें आवडे । तें तें मी होईन रोकडें ।
गुरु पाहती जिकडे । ते दिशा मी होईन ॥६५॥
गुरूंना जे जे आवडते ते ते मीच व्हावे असे त्यास वाटते. गुरू जिकडे पाहतील ती दिशाही मीच होईन असे तो ठरवतो. (६५)

गुरुसी सुमनें आवडती । बाग होईन मी निश्चिती ।
नानाप्रकारें पुष्पजाति । समूळ होईन मी ॥६६॥
गुरूंना फुले आवडतात म्हणून त्यासाठी मीच बाग होईन आणि त्या बागेतील फलांच्या निरनिराळ्या जातीही मीच होईन, अशी त्याची इच्छा असते. (६६)

मीच हो‍ऊनी दोरा । मीच होईन फुलारा ।
मीच गुंफीन हारा । मीच घालीन कंठी ॥६७॥
मीच दोरा होईन, मीच फलारी होईन. मीच हार होईन आणि तो हार मीच स्वत: गळ्यात घालीन असा त्याचा ध्यास असतो. (६७)

मीच सुगंध होईन । गुरुघ्राणीं प्रवेशेन ।
गंधही मीचि घेईन । देवतारूपें ॥६८॥
मीच सुगंध होईन, मीच गुरूंच्या नासिकारंध्रात (नाकात) प्रवेश करीन आणि गुरुदेवतेचे रूपही मीच होऊन तो गंधही मीच घेईन, असे तो मानतो. (६८)

नाना धान्यें मी जालों । मीच दळू कांडू लागलों ।
जातिं उखळी साठविलों । पीठही जालों बारिक ॥६९॥
मीच निरनिराळ्या धान्यांची रूपे घेईन. त्यांचे दळण कांडण मीच करीन, जात्यामध्ये, उखळामध्ये साठवलेले बारीक पीठही मीच होईन असे त्याला वाटत असते. (६९)

अग्नि पाक पाककर्ता । पात्रें काष्टें तत्त्वतां
धमनी हो‍ऊनी फुंकिता । मीचि होय ॥७०॥
अग्नी, स्वयंपाक, स्वयंपाकी, निरनिराळी भांडी, लाकडे सर्व मीच होईन. मीच फुकणी होईन आणि फुकणाराही मीच होईन, असे त्याला वाटते. (७०)

मधुर तीक्ष्ण क्षार । रसरूप जालों सविस्तर ।
ताट वाट्या समग्र । हो‍ऊनी मी भरल्या ॥७१॥
जेवणातले मधुर, तिखट, खारट इत्यादी रस आपणच झालो असून ताट, वाट्या इत्यादी मीच होऊन त्या मीच भरल्या अशी तो कल्पना करतो. (७१)

खाली पृथ्वीवरी आडणी । केली ताटाची मांडणी ।
मीच मक्षिकाच्या श्रेणी । विंझण वारी मीच तेथें ॥७२॥
जमिनीवर ताट ठेवण्याची आडणी मीच झालो असून त्यावर ताट मीच मांडले आणि मीच विंझणवारा होऊन माशांच्या झुंडी वारीन अशी तो कल्पना करतो. (७२)

मीच ग्रास होईन । मीच करीं उचलीन ।
गुरुमुखींहि शिरून । म्यां मुख पसरिलें ॥७३॥
मीच घास होईन, मी हाताने उचलीन, मीच गुरुमुखात शिरून पुन्हा पुढील घासासाठी मुख पसरीन. (७३)

मीच गुरूचे दशन । जिव्हा मीचि होईन ।
चावणें आणि रस घेणें । मजचि असे ॥७४॥
मीच गुरूचे दात होईन, जिव्हा मीच होईन, त्यामुळे घास चावणे, त्याचा रसास्वाद घेणे हे माझेच काम आहे. (७४)

मी कुतर्काचा खडा । मजचि कळे उघडा ।
मीच काढी रोकडा । एकीकडा मी टाकी ॥७५॥
मीच घासात असलेला कुतर्काचा खडा असेन, तो खडाही मलाच कळेल, मी तो स्पष्टपणे काढीन, मीच तो बाजूला टाकीन. (७५)

मीच झारी मीच जीवन । मीच करितसें पान ।
मीच तृष्णा तृषाहरण । मजचि होय ॥७६॥
मीच झारी होईन, मीच पाणी होईन आणि ते पाणी पिणाराही मीच होईन, मीच तृष्णा असेन आणि तृष्णा हरण करणाराही मीच असेन. (७६)

मजची मी खाऊन । तृप्त जालों परिपूर्ण ।
मीच ढेंकर देऊन । निज संतोष पावलों ॥७७॥
मीच मला खाऊन टाकले, मीच पूर्णपणे तृप्ती प्राप्त केली आणि मीच ढेकर दिला आणि संतोषही मलाच झाला. (७७)

मीचि तांबूल मीचि सुरंग । मीचि सुगंध मीचि रंग ।
गुरुमुखीं शिरतां अभंग । अविट होईन ॥७८॥
मी विडा असून त्यामुळे आलेला चांगला रंगही मीच झालो. मीच गुरुमुखात शिरल्यावर अखंडित, अवीट होईन. (७८)

मी पीकपात्र मी उगाळ । मीच सेवीन अळुमाळ ।
मीचि सुगंध शीतळ । विंझणा हो‍ऊन घालीन ॥७९॥
मीच पिकदाणी होईन, त्यात टाकलेला पीक ही मीच होईन. मीच तो हळहळ सेवन करीन. (पिकदाणी तो पीक धारण करील हा अर्थ) मीच पंखा होऊन सद्गुरूंना सुगंधित आणि शीतल वारा घालीन. (७९)

मी चंदन मी उगाळीं । मीचि समतेच्या कचोळीं ।
मीचि उटी करकमळीं । सद्‌गुरू अंगी शोभत ॥८०॥
मीच चंदन होईन. मीच ते उगाळीन. मीच ते गंध समतेच्या (समदृष्टीच्या) कचोळ्यात साठवीन. मीच माझ्या हातांनी त्याची उटी सद्गुरूंच्या अंगी लावीन. मीच सद्गुरूंच्या अंगी शोभेन. (८०)

मृगमदाचा तिलक । मीच करीन अलोलिक ।
मुगुट वनमाळा अनेक । मीच अळंकार ॥८१॥
मीच कस्तुरीचा अपूर्व टिळा सद्गुरूंना लावीन. मीच मुगुट होईन, मीच अनेक वनमाळा होईन आणि गुरूंच्या अंगावरील अलंकारही मीच होईन. (८१)

मी हा सप्तधातू कठीण । मीचि अग्नींत आटेन ।
मग मी सुशोभित होईन । अळंकार सर्व ॥८२॥
मीच कठीण असे सप्तधातू होईन, मीच स्वतः अग्नीत आटेन, मग मीच सर्व सुशोभित अलंकार होईन. (८२)

करीं मुद्या पवित्रें । चरणीं वाक्या नेपुरें ।
मंद मंद मी गजरें ।सुखशब्द करीन ॥८३॥
हातामध्ये अंगठ्या, पवित्रके, पायात वाक्या, नूपुरे इत्यादी मीच होईन आमि मीच मंद मंद मधुर नाद करीन. (८३)

जेणें संतोष गुरूचा । नाना कळा तर्काचा ।
वेद हो‍ऊन वेदचर्चा । मीच वाचा शब्द मी ॥८४॥
सद्गुरूंना समाधान वाटेल असे विविध प्रकारचे युक्तिवाद मी करीन, वेद होऊन वेदचर्चाही मी करीन, मीच वाणी होईन, मीच शब्द होईन. (८४)

सद्‌गुरूमनीं जें आवडे । तें मी होईन रोकडें ।
सद्‌गुरुदृष्टि जेथें पडे । दृश्य उघडें मी सर्व ॥८५॥
सद्गुरूंना जाण्यासाठी जे ठिकाण आवडेल ते ठिकाण प्रत्यक्षात मीच होईन, सद्गुरूंची दृष्टी जेथे पडेल असे सर्व दृश्य मीच होईन. (८५)

मी हा आरसा अति सुंदर । मीचि होईन गुरुसमोर ।
गुरुराज बिंबले साचार । माझाच ठाई ॥८६॥
मीच सुंदर आरसा होऊन गुरूंच्या समोर येईन, त्यावेळी गुरुराजांचे प्रतिबिंब माझ्यातच उमटेल. (८६)

मी पंचप्राणाची वाति । लावीन ब्रह्माग्निज्योतीं ।
मी मी जळेन पुढतीं । मी आरती ओवाळीं ॥८७॥
मी पंचप्राणांची वात करून ब्रह्मरूप अग्रीच्या ज्योतीवर ती वात लावीन. त्या वातीच्या रूपाने मी सद्गुरूंच्या पुढे जळेन, मीच त्या वातीच्या रूपाने सद्गुरूंना आरती ओवाळीन. (८७)

मीच प्रकाशरूप जालों । मीच तम अज्ञान गेलों ।
मी सद्‌गुरू ओळखून धालों । आनंदलों मी ॥८८॥
मीच प्रकाशरूप झालो. मीच अज्ञानरूपी अंधकार होतो. प्रकाश येताच तो मी नाहीसा झालो. सद्गुरूंची ओळख पटताच मी संतुष्ट झालो. मीच आनंदित झालो. (८८)

मीचि हो‍ऊन सुखसाधन । मीचि गाद्यालोड संपूर्ण ।
गुरुराज करिती आरोहण । मजवरी प्रीति ॥८९॥
मीच सुखसाधने होईन, मीच गाद्या, लोड होईन. मग गुरुराज माझ्यावर आरोहण करतील. माझ्यावर त्यांची प्रीती होईल. (त्यांना मी आवडेन. ) (८९)

मी जाळिया गोंडे चांदवे । त्या मध्यभागीं जो मिरवे ।
गुरुराज धरिती स्वभावें । थोरला गोंडा मीचि ॥९०॥
मीच बिछान्यावर लोंबणाऱ्या जाळ्या, गोंडे, चांदवे होईन. त्या गोंड्यांच्या मध्यभागी शोभून दिसणारा गोंडा मीच असेन. मग गुरुराज स्वाभाविकपणेच त्याला हातात धरतील, तो थोरला गोंडा मीच होईन. (९०)

गुरुचरणींच्या पादुका । मीचि माझिया मस्तका ।
छत्र चामरें वाद्य डंका । सर्व सकटका मी होईन ॥९१॥
गुरूंच्या पायातील पादुका मीच होईन. त्या मीच मस्तकावर धारण करीन. गुरूंच्या मस्तकावरील छत्र, चवऱ्या, वाद्ये, नगारा सर्व लवाजमा मीच होईन. (९१)

मीच भोई हो‍ऊन । मीच पालखी घे‍ईन ।
मीचि मार्गासी चालेन । आडवाट सांडूनी ॥९२॥
मीच भोई होईन. मीच पालखी घेईन. मी आडवाट सोडून रस्त्याने चालेन. (९२)

श्रुतीचिया राजमार्गे । नाना मतांचे काटवण लागे ।
मी स्वानुभवकुठारीं निजांगें । संशयमूळ छेदीन ॥९३॥
श्रुतीच्या (वेदाच्या) राजरस्त्यावर भित्र भित्र मतांच्या काटेरी जाळ्या लागतात. मी स्वानुभवरूपी कु-हाडीने संशयरूपी मुळे तोडून टाकीन. (९३)

मोक्षापर्यंत जागृतिपासून । सडका केल्या समान ।
चतुरंग सेनेचा दणाण । चालतां दाटी नव्हे ॥९४॥
जागृतीपासून मोक्षापर्यंत श्रुतींनी सरळ चांगल्या सडका तयार केल्या आहेत. त्यावरून चतुरंग सेना वाजत गाजत गेली तरी चालताना गर्दी होत नाही. (९४)

कामक्रोधादि तस्कर । पळून गेले हे समग्र ।
प्रतिघाटि संग्रामशूर । महावीर मीच जालों ॥९५॥
कामक्रोध इत्यादी वाटमाये, चोर सगळे पळून गेले आहेत. डोंगरातील प्रत्येक घाटामध्ये युद्धातील झुंजार महावीर मीच होतो. (९५)

गुरुमुख निहाळून । मीच उलटा चालेन ।
फडकें प्रेमाचें निशाण । नाना वाद्यें वाजवी ॥९६॥
गुरू चालत असताना त्यांच्या मुखाकडे पाहात मी उलटा चालेन, माझ्या गुरुप्रेमाचे निशाण असे फडकत असताना मीच निरनिराळी वाद्ये वाजवीन. (९६)

पदार्थमात्र मीच जालों । सद्‌गुरुसेवेसी लागलों ।
आणि सन्निध राहिलों । गुरुपदें अनन्य ॥९७॥
मीच सगळे पदार्थ झालो, सद्गुरूच्या सेवेस लागलो आहेआणि गुरुचरणांवर अनन्य होऊन त्यांच्या सानिध्यात राहिलो आहे. (९७)

गुरु तरी निर्विकार । होतो माझाचि जोजार ।
आतां पातलों महाद्वार । अवघा केर राहूं द्या ॥९८॥
गुरू तर निर्विकार आहेत. सगळा माझा एकट्याचाच पसारा आहे. आता महाद्वारात पोचलो आहे. आता सर्व कचरा (फालतू गोष्टी) राहू द्यात. (९८)

पुढे मीपणावाचून । गुरुराज चैतन्यघन ।
मी मी हे तेथें मरोन । गुरुचरणीं दडालों ॥९९॥
माझ्यासमोर चैतन्याने ओतप्रोत असे सदगुरुराज आहेत. मी देखील मी, माझे या भावना नष्ट करून त्यांच्या चरणांवर दडी मारली आहे. (९९)

एवं ऐसी हे गुरुभक्ति । जया घडे साधकाप्रती ।
तयासी कायसी पा मुक्ति । आहे ऐसी म्हणों ॥१००॥
अशा प्रकारची ही गुरुभक्ती ज्या साधकाला घडते त्याला मुक्ती अशा प्रकारची आहे असे मी सांगत बसू काय ? (त्याला मुक्तीचे स्वरूप सांगण्याची गरज नाही. ) (१००)

ऐसा जो कां गुरुभक्त । स्वर्गीचें देव तटस्थ ।
कैलासवासी वर्णित । प्रेमभरित सर्वदा ॥१०१॥
असा गुरुभक्त जो कोणी असेल त्याचे स्वत: कैलासनाथ शंकर मोठ्या प्रेमाने वर्णन करत असतात व स्वर्गातील देव तटस्थ होऊन ते ऐकत असतात. (१०१)

आणि वैकुंठीचा राणा । पुसे नारदादी मुनिजना ।
ऐसा सद्‌गुरू भक्त पहाना । कोणी असे ॥१०२॥
आणि वैकुंठाधिपती विष्णू नारदादी मुनिजनांना विचारत असतात की, अशा प्रकारचा गुरुभक्त कोणी आहे का याचा शोध करा. (१०२)

वेद जयाचे बंदिजन । तो हा ब्रह्म परिपूर्ण ।
येणें उद्धरिलें त्रिभुवन । कृपादृष्टी ॥१०३॥
असा गुरुभक्त स्वत:च परिपूर्ण ब्रह्म असतो. वेद त्याचे भाट बनतात. त्याच्या साध्या कृपादृष्टीने सर्व त्रिभुवनाचा उद्धार होतो. (१०३)

चतुर्भुजादि रूप आमुचें । इतुकें नावडे साचें ।
जैसे देह गुरुभक्ताचें । अत्यंत आवडे ॥१०४॥
आम्हांला (विष्णूला) आमचे चतुर्भुज रूप तितकेसे आवडत नाही. त्यापेक्षा गुरुभक्ताचा देह आम्हांला अधिक प्रिय वाटतो. (१०४)

धन्य धन्य गुरुभक्ति । धन्य धन्य साधक मूर्ती ।
धन्य धन्य जी का प्रसवती । ऐसीया पुत्रा ॥१०५॥
त्याची गुरुभक्ती धन्य होय. त्याचे साधक रूप धन्य होय. अशा पुत्राला जन्म देणारी माता धन्य होय. (१०५)

OVI 106 MISING IN PRINTED BOOK
तो ज्या पृथ्वीवर आहे ती पृथ्वी धन्य होय. तो ज्या वसाहतीत राहतो ती वसाहत धन्य होय. अशा गुरुभक्ताला जे डोळ्यांनी पाहतात ते धन्य होत. (१०६)

धन्य धन्य ते जन । गुरुपुत्रासी करिती भाषण ।
धन्य धन्य ते पावन । जे अळंगिती त्या ॥१०७॥
गुरुभक्तासी जे भाषण करतात ते लोक धन्य होत. त्याला जे आलिंगन देतात ते लोक धन्य होत. (१०७)

धन्य धन्य जे वंदिती । धन्य धन्य जे स्तविती ।
ते ते पावन होती । श्रोते वक्ते ॥१०८॥
जे त्याला नमस्कार करतात, ते धन्य होत, त्याची जे स्तुती करतात, ते धन्य होत; त्याच्याबद्दल ऐकणारे, त्याच्याबद्दल बोलणारे श्रोते, वक्ते पवित्र होत. (१०८)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
आचार्योपासनप्रकारे । पंचमसमासः ॥५॥
इति पंचिका संपूर्णा ॥८॥ ओवीसंख्या ३५३
हरिः ॐ तत्सत्

GO TOP