|
श्रीमद् भागवत महापुराण
दोन शब्द.. आपल्या भाषेतून सर्व धर्मवाङ्मय एके ठिकाणी उपलब्ध व्हावे हा ’सत्संगधारा’ संकेतस्थळाचा मुख्य हेतू. आपल्या धर्मशास्त्रांतून प्राधान्यतः ’श्रीराम’ आणि ’श्रीकृष्ण’ या दोन अवतारांसंबंधीत असलेल्या वाङ्मयामध्ये रुची असलेल्यांची संख्या जास्त आहे. श्रीरामावतारासंबंधीत मूळ ग्रंथ म्हणजे - श्रीमद् वाल्मीकिय रामायण. वाल्मीकि रामायण अनुवादासहित सत्संगधारा आले, मग अध्यात्म रामायण, भावार्थ रामायण, समश्लोकी समच्छंद तुलसीकृत् रामायण झाले, आता आनंद रामायणाचे काम चालले आहे, पण त्याचा मराठी अनुवाद झालेला आढळला नाही. यथावकाश इतर रामायणेही सत्संगधारावर येतीलच, पण श्रीकृष्ण कथा अर्थात श्रीमद् भागवतमहापुराण आणि भगवद्गीता यांचा सत्संगधारावरील अभाव मलाच खटकत होता. पण असेही वाटायचे की हे दोनही ग्रंथ अभ्यासकांमध्ये, साधकांमध्ये इतके जवळचे आहेत की त्यावरचे काम हे सत्संगधाराचे आकर्षण ठरावे. आणि या दोन्ही ग्रंथांवरील काम वाचकांना पसंत पडेल इतपत करायचे हे फार धाडसाचे काम आहे असे वाटायचे. पण काम सुरू करायची हिम्मत होत नव्हती. शेवटी विचार केला किती दिवस चाल ढकल करायची ? सुरुवात करूया,मग अभिप्राय, सूचना येतील तसतसे त्यात सुधारणेचा प्रयत्न करता येईल, असा विचार करून श्रीमद् भागवत पुराणाचे काम २०१२ च्या दसर्याच्या मुहूर्तावर सुरू केले. आता मुख्य प्रश्न होता तो ’भागवताचे’ स्वरूप कसे असावे, आणि ठरवले की संहिता, समश्लोकी, मराठी अनुवाद, अन्वय वा शब्दार्थ आणि आवश्यक तेथे श्लोकांवर विवरण हे सर्व हवेच पण हे सर्व संमिश्र (composite) आणि मूळ स्वरूप या दोन्ही रूपात असावे. पण एवढे सर्व उपलब्ध करून द्यायचे तर त्याला बराच काळ लागणार. मग ठरविले की हे काम दोन टप्प्यात करायचे. आधी केवळ संहिता, समश्लोकी आणि मराठी अनुवाद, आणि दुसर्या टप्प्यात अन्वय, शब्दार्थ व विवरण. पण सुरू करताना असे वाटले की प्रथम श्रीकृष्ण कथा, श्रीकृष्ण चरित ज्यात आले आहे तो दशम स्कंध आधी करून मग पहिल्या स्कंधापासून सुरु करायचे. दशम स्कंधाचे काम झाल्यावर वाटले की भागवतात कृष्णलीलेनंतर त्यात दुसरा महत्वाचा विषय आहे तो मुक्तिसंबंधी स्कंधाचा, म्हणजे एकादश स्कंधाचा. मग एकादशाचे काम केले. आता नवम व द्वादश केले की सर्वमान्य असलेल्या दोन भागांपैकी भाग दुसरा पूर्ण होतोय म्हणून नवम, द्वादश स्कंधाचे काम पूर्ण करून पहिल्या स्कंधापासून उर्वरीत काम आता चालू आहे. संहिता व अर्थ गोरखपूर संपादित आवृत्तिप्रमाणे घेतला आहे. संपूर्ण संहिता आणि अर्थाची text सकट ध्वनीफीत (Audio) उपलब्ध आहे. संहितेचे ध्वनिकरण अगदी आत्मीयतेने सौ. मंदा कुलकर्णी यांनी करून दिले आणि अनुवादाचे वाचन सौ. ज्योत्स्ना तानवडे यांनी त्यांच्या अनेक उपक्रमांतून वेळ काढून करून दिले. या दोहोंचा सहभाग मोलाचा आहेच, पण अनुवाद, समश्लोकी याचे टंकलेखन व ते तपासण्याच्या कामी श्री संजय प्रधान माझ्या ’रामायण’ इत्यादि प्रकल्पाप्रमाणेच यातही मोलाची मदत करीत आहेत. दसर्याच्या काही काळ आधी श्री. विष्णुदास घेवारे कृत समश्लोकी भागवत पाहण्यात आले. मला ते खूपच आवडले. संहितेच्या पारायणापेक्षा समश्लोकीच्या पारायणाने आपण काय वाचतोय, त्या अध्यायाचा विषय काय आहे आणि त्यात पुराणकारांनी काय सांगितले आहे हे चटकन कळते, ध्यानात येते. शिवाय समश्लोकीची रचना अत्यंत सोपी आणि गेय आहे. श्री. घेवारे यांची काव्यप्रतिभा आणि भागवतावरील पकड पाहून थक्क व्हायला होते. असे वाटले की असा ग्रंथ जगासमोर यायलाच हवा. मग त्या ग्रंथाची एक प्रत आणि शक्य झाल्यास श्री. घेवारे यांची त्यांचा ग्रंथ संकेतस्थळावर घालण्याची परवानगी मिळविण्यासाठी खटपट सुरू केली. पण श्री घेवारे हयात नाहीत हे कळले तेव्हा फार वाईट वाटले. तरी त्यांचे चिरंजीव श्री. विक्रांत घेवारे यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांनी ग्रंथ संकेतस्थळावर घालण्याची परवानगी दिली आणि आनंद झाला. वाचकांना हा ग्रंथ नक्कीच आवडेल. to be continued... |