ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त १ ते १०

ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १ ( इंद्रसूक्त, आसंग प्लायोगि दानस्तुती )

ऋषी - १-२ प्रगाथ काण्य; ३-२९ मेधातिथि अथवा मेध्यातिथि काण्य; ३०-३३ आसंग प्लायोगि; ३४ आसंगपत्नी शश्वती;
देवता - १-२९ इंद्र; ३०-३४ आसंग प्लायोगि दानस्तुती
छंद - २, ४ सतोबृहती; ५-३२ बृहती; ३३-३४ त्रिष्टुभ्


मा चि॑द॒न्यद्वि शं॑सत॒ सखा॑यो॒ मा रि॑षण्यत ।
इन्द्र॒मित्स्तो॑ता॒ वृष॑णं॒ सचा॑ सु॒ते मुहु॑रु॒क्था च॑ शंसत ॥ १ ॥

मा । चित् । अन्यत् । वि । शंसत । सखायः । मा । रिषण्यत ।
इन्द्रम् । इत् । स्तोत । वृषणम् । सचा । सुते । मुहुः । उक्था । च । शंसत ॥ १ ॥

दुसऱ्या कशाचीही प्रशंसा करूं नका; मित्रांनो, व्यर्थ कष्टी होऊ नका; सोमरस पिळताच मनोरथवर्षक वीर्यवान् इन्द्राचीच स्तुति करा आणि त्याच्या प्रीत्यर्थ वारंवार सामगायन करा. १.



अ॒व॒क्र॒क्षिणं॑ वृष॒भं य॑था॒जुरं॒ गां न च॑र्षणी॒सह॑म् ।
वि॒द्वेष॑णं सं॒वन॑नोभयंक॒रं मंहि॑ष्ठमुभया॒विन॑म् ॥ २ ॥

अवऽक्रक्षिणम् । वृषभम् । यथा । अजुरम् । गाम् । न । चर्षणिऽसहम् ।
विऽद्वेषणम् । सम्ऽवनना । उभयम्ऽकरम् । मंहिष्ठम् । उभयाविनम् ॥ २ ॥

उंचवट्यावरून मुसंडी मारून खालीं धांवत येणाऱ्या वृषभाप्रमाणे ज्याची धडक, जो जरामृत्युरहित, जो धेनूप्रमाणे परोपकारी, जो चराचरांना धाकांत ठेवणारा, द्वेष आणि राग असे दोन्हीं यथायोग्य रीतीने दर्शविणारा, आणि ऐहिक आणि पारत्रिक अशा दोन्हीं प्रकारच्या ऐश्वर्याने मंडित असा अत्युदार जो परमेश्वर इन्द्र त्याचे स्तवन करा. २.



यच्चि॒द्धि त्वा॒ जना॑ इ॒मे नाना॒ हव॑न्त ऊ॒तये॑ ।
अ॒स्माकं॒ ब्रह्मे॒दमि॑न्द्र भूतु॒ तेऽहा॒ विश्वा॑ च॒ वर्ध॑नम् ॥ ३ ॥

यत् । चित् । हि । त्वा । जनाः । इमे । नाना । हवन्ते । ऊतये ।
अस्माकम् । ब्रह्म । इदम् । इन्द्र । भूतु । ते । अहा । विश्वा । च । वर्धनम् ॥ ३ ॥

सहाय्यासाठी सर्व जन तुजला नानाप्रकारांनीं आळवीत आहेत, तर हे इन्द्रा, आमचेंही हें प्रार्थनास्तोत्र तुजला प्रत्यहीं संतोषवर्धक होवो. ३.



वि त॑र्तूर्यन्ते मघवन्विप॒श्चितो॒ऽर्यो विपो॒ जना॑नाम् ।
उप॑ क्रमस्व पुरु॒रूप॒माभ॑र॒ वाजं॒ नेदि॑ष्ठमू॒तये॑ ॥ ४ ॥

वि । तर्तूर्यन्ते । मघऽवन् । विपःऽचितः । अर्यः । विपः । जनानाम् ।
उप । क्रमस्व । पुरुऽरूपम् । आ । भर । वाजम् । नेदिष्ठम् । ऊतये ॥ ४ ॥

हे भगवंता, भक्तिप्रवण प्रमुख ज्ञाते जनांतील सामान्य मनुष्याच्या प्रार्थना परोपरीने सफल करतात, तर देवा, तूं आमच्या सन्निध ये, आणि जें नानाप्रकारचें सत्वैश्वर्य तूं आपल्या अगदीं जवळ बाळगतोस तेंच आमच्या सहायासाठी घेऊन ये. ४.



म॒हे च॒न त्वाम॑द्रिवः॒ परा॑ शु॒ल्काय॑ देयाम् ।
न स॒हस्रा॑य॒ नायुता॑य वज्रिवो॒ न श॒ताय॑ शतामघ ॥ ५ ॥

महे । चन । त्वाम् । अद्रिऽवः । परा । शुल्काय । देयाम् ।
न । सहस्राय । न । अयुताय । वज्रिऽवः । न । शताय । शतऽमघ ॥ ५ ॥

पर्वतभंजका, कितीही मोठी किंमत मिळाली तरी मीं तुजला कोणासही देणार नाहीं. शेकडो, हजारच काय, पण अयुत म्हणजे अगणित द्रव्य दिलें तरी, हे अपारदातृत्वा वज्रधरा, मीं तुजला कोणासही देणार नाहीं. ५.



वस्याँ॑ इन्द्रासि मे पि॒तुरु॒त भ्रातु॒रभु॑ञ्जतः ।
मा॒ता च॑ मे छदयथः स॒मा व॑सो वसुत्व॒नाय॒ राध॑से ॥ ६ ॥

वस्यान् । इन्द्र । असि । मे । पितुः । उत । भ्रातुः । अभुञ्जतः ।
माता । च । मे । छदयथः । समा । वसो इति । वसुऽत्वनाय । राधसे ॥ ६ ॥

इन्द्रा, तूं मला पित्यापेक्षांही अधिक आहेस; स्वत: कोणताही उपभोग न घेणाऱ्या भावापेक्षाही अधिक कनवाळू आहेस; तूंच माझी आई; तुम्ही माझें पालन करतां, म्हणून हे दिव्यनिधाना, ऐश्वर्योत्कर्ष आणि कृपाप्रसाद यांच्याविषयी तुम्ही मला एकसारखेच आहांत. ६.



क्वे॑यथ॒ क्वेद॑सि पुरु॒त्रा चि॒द्धि ते॒ मनः॑ ।
अल॑र्षि युध्म खजकृत्पुरंदर॒ प्र गा॑य॒त्रा अ॑गासिषुः ॥ ७ ॥

क्व । इयथ । क्व । इत् । असि । पुरुऽत्रा । चित् । हि । ते । मनः ।
अलर्षि । युध्म । खजऽकृत् । पुरम्ऽदर । प्र । गायत्राः । अगासिषुः ॥ ७ ॥

तूं कोठे गेला आहेस ? या वेळीं तूं कोठें आहेस ? जेथे जेथे भक्त आहेत अशा अनेक ठिकाणी तुझे मन ओढतेच; परंतु हे महायोद्ध्या, हे झुंझार वीरा, हे शत्रुदुर्गविध्वंसका, इकडे ये पहा, हे गायत्रगान करणारे भक्त तुझ्याप्रीत्यर्थ गायन करून राहिले आहेत. ७.



प्रास्मै॑ गाय॒त्रम॑र्चत वा॒वातु॒र्यः पु॑रंद॒रः ।
याभिः॑ का॒ण्वस्योप॑ ब॒र्हिरा॒सदं॒ यास॑द्व॒ज्री भि॒नत्पुरः॑ ॥ ८ ॥

प्र । अस्मै । गायत्रम् । अर्चत । ववातुः । यः । पुरम्ऽदरः ।
याभिः । काण्वस्य । उप । बर्हिः । आऽसदम् । यासत् । वज्री । भिनत् । पुरः ॥ ८ ॥

इन्द्राप्रीत्यर्थ तुम्ही गायत्रगायन उच्च स्वराने करा; शत्रुदुर्गभंजक जो इन्द्र तो सेवकाचाच आहे. ज्या ऋक्‌स्तवनांच्या योगाने कण्वकुलोत्पन्न भक्तांच्या यज्ञांत कुशासनावर आरूढ होण्यासाठीं वज्राधर इन्द्राने गमन केले, आणि अधार्मिकांचे दुर्ग उध्वस्त करून टाकले, त्या गायत्रस्तवनाने त्याला प्रसन्न करा. ८.



ये ते॒ सन्ति॑ दश॒ग्विनः॑ श॒तिनो॒ ये स॑ह॒स्रिणः॑ ।
अश्वा॑सो॒ ये ते॒ वृष॑णो रघु॒द्रुव॒स्तेभि॑र्न॒स्तूय॒मा ग॑हि ॥ ९ ॥

ये । ते । सन्ति । दशऽग्विनः । शतिनः । ये । सहस्रिणः ।
अश्वासः । ये । ते । वृषणः । रघुऽद्रुवः । तेभिः । नः । तूयम् । आ । गहि ॥ ९ ॥

जे तुझे अश्व दसपट शक्तीचे, शंभरपट शक्तीचे, किंबहुना सहस्रपटशक्तीचे आहेत. जे वीर्यशाली आणि वेगाने धांवणारे आहेत त्या अश्वांच्या योगाने तूं आमच्याकडे सत्वर ये. ९



आ त्व१॒॑द्य स॑ब॒र्दुघां॑ हु॒वे गा॑य॒त्रवे॑पसम् ।
इन्द्रं॑ धे॒नुं सु॒दुघा॒मन्या॒मिष॑मु॒रुधा॑रामरं॒कृत॑म् ॥ १० ॥

आ । तु । अद्य । सबःऽदुघाम् । हुवे । गायत्रऽवेपसम् ।
इन्द्रम् । धेनुम् । सुऽदुघाम् । अन्याम् । इषम् । उरुऽधाराम् । अरम्ऽकृतम् ॥ १० ॥

आज आतां गायत्रगानाची स्फूर्ति देणारा इन्द्र, विपुल दुग्ध आणि ज्याचा प्रवाह अफाट असा कांहीं निराळाच मनोत्साह देणारी कामदोहिनी स्वर्धेनू, आणि पूर्ण समाधान देणारा इन्द्र, या उभयतांना मी भक्तीनें पाचारण करतो. १०.



यत्तु॒दत्सूर॒ एत॑शं व॒ङ्कू वात॑स्य प॒र्णिना॑ ।
वह॒त्कुत्स॑मार्जुने॒यं श॒तक्र॑तुः॒ त्सर॑द्गन्ध॒र्वमस्तृ॑तम् ॥ ११ ॥

यत् । तुदत् । सूरः । एतशम् । वङ्कू इति । वातस्य । पर्णिना ।
वहत् । कुत्सम् । आर्जुनेयम् । शतऽक्रतुः । त्सरत् । गन्धर्वम् । अस्तृतम् ॥ ११ ॥

जेव्हा सूर्यतापाने एतशाला क्लेश झाले; तेव्हां वाकडे तिकडे फेरे घेऊन धावणारे आणि वाऱ्याचे पंख असलेले दोन अश्व, आणि अर्जुनीचा पुत्र कुत्स यांना अपारकर्तृत्वशाली इन्द्राने त्या एतशाकडे पाठवून दिलें आणि अजिंक्य गन्धर्वावर वर्चस्व स्थापन केले. ११.



य ऋ॒ते चि॑दभि॒श्रिषः॑ पु॒रा ज॒त्रुभ्य॑ आ॒तृदः॑ ।
संधा॑ता सं॒धिं म॒घवा॑ पुरू॒वसु॒रिष्क॑र्ता॒ विह्रु॑तं॒ पुनः॑ ॥ १२ ॥

यः । ऋते । चित् । अभिऽश्रिषः । पुरा । जत्रुऽभ्यः । आऽतृदः ।
सम्ऽधाता । सम्ऽधिम् । मघऽवा । पुरुऽवसुः । इष्कर्ता । विऽह्रुतम् । पुनरिति ॥ १२ ॥

मलमपट्ट्या लावल्या शिवाय, आणि खांद्याच्या हाडांना शस्त्राने छेद न करितांच ज्या इन्द्राने हाडाचा सांधा बरोबर बसवून दिला, तो अपारनिधि भगवंत हा दुखावलेला भाग पुनः जशाचा तसा खास नीट करून देईल. १२.



मा भू॑म॒ निष्ट्या॑ इ॒वेन्द्र॒ त्वदर॑णा इव ।
वना॑नि॒ न प्र॑जहि॒तान्य॑द्रिवो दु॒रोषा॑सो अमन्महि ॥ १३ ॥

मा । भूम । निष्ट्याःऽइव । इन्द्र । त्वत् । अरणाःऽइव ।
वनानि । न । प्रऽजहितानि । अद्रिऽवः । दुरोषासः । अमन्महि ॥ १३ ॥

परमेश्वरा इन्द्रा, अगदी नीच स्थितीला पोहचल्याप्रमाणें, आणि तुझ्याशी पारखे झाल्याप्रमाणें, किंवा फेकून दिलेल्या ओंडक्याप्रमाणें आम्ही आहोंत असें होऊं देऊं नको. हे पर्वतभंजका, कोणाच्या हातून आम्ही होरपळले जाणारे नव्हे अशी सर्वांची खात्री व्हावी आणि आम्ही तुझे मनन करावें असें कर. १३



अम॑न्म॒हीद॑ना॒शवो॑ऽनु॒ग्रास॑श्च वृत्रहन् ।
स॒कृत्सु ते॑ मह॒ता शू॑र॒ राध॑सा॒ अनु॒ स्तोमं॑ मुदीमहि ॥ १४ ॥

अमन्महि । इत् । अनाशवः । अनुग्रासः । च । वृत्रऽहन् ।
सकृत् । सु । ते । महता । शूर । राधसा । अनु । स्तोमम् । मुदीमहि ॥ १४ ॥

आम्ही उगीच घाई करणारे नाहीं, आम्ही क्रूर नाही तर हे शूरा वृत्रनाशना, आम्ही स्तवन केल्यानंतर तुझ्या महत् कृपेने आम्ही एकवार तरी प्रमुदित होऊं असें कर. १४.



यदि॒ स्तोमं॒ मम॒ श्रव॑द॒स्माक॒मिन्द्र॒मिन्द॑वः ।
ति॒रः प॒वित्रं॑ ससृ॒वांस॑ आ॒शवो॒ मन्द॑न्तु तुग्र्या॒वृधः॑ ॥ १५ ॥

यदि । स्तोमम् । मम । श्रवत् । अस्माकम् । इन्द्रम् । इन्दवः ।
तिरः । पवित्रम् । ससृऽवांसः । आशवः । मन्दन्तु । तुग्र्यऽवृधः ॥ १५ ॥

जेव्हां जेव्हां माझें स्तवन तो भगवंत ऐकेल, तेव्हां तेव्हां पवित्रातून झरझर पाझरणारे आल्हादकर असे आमचे सोमरस, तुग्रपुत्राला उल्हसित करणारे आमचे सोमबिंदु, या इन्द्राला तत्काल हर्षनिर्भर करोत. १५.



आ त्व१॒॑द्य स॒धस्तु॑तिं वा॒वातुः॒ सख्यु॒रा ग॑हि ।
उप॑स्तुतिर्म॒घोनां॒ प्र त्वा॑व॒त्वधा॑ ते वश्मि सुष्टु॒तिम् ॥ १६ ॥

आ । तु । अद्य । सधऽस्तुतिम् । ववातुः । सख्युः । आ । गहि ।
उपऽस्तुतिः । मघोनाम् । प्र । त्वा । अवतु । अध । ते । वश्मि । सुऽस्तुतिम् ॥ १६ ॥

सर्वांनी एकत्र मिळून केलेल्या तुझ्या स्तुतीकडे तूं आज आगमन कर. तुझ्या या सेवकाच्या, तुझ्या या प्रिय भक्ताच्या स्तुतिकडे आगमन कर; आमच्या दानशूर यजमानांनी म्हटलेले पद्य तुजला प्रसन्न करो, मननपूर्वक तुझें स्तवन करणें ही गोष्ट मलाही फार आवडते. १६.



सोता॒ हि सोम॒मद्रि॑भि॒रेमे॑नम॒प्सु धा॑वत ।
ग॒व्या वस्त्रे॑व वा॒सय॑न्त॒ इन्नरो॒ निर्धु॑क्षन्व॒क्षणा॑भ्यः ॥ १७ ॥

सोत । हि । सोमम् । अद्रिऽभिः । आ । ईम् । एनम् । अप्ऽसु । धावत ।
गव्या । वस्त्राऽइव । वासयन्तः । इत् । नरः । निः । धुक्षन् । वक्षणाभ्यः ॥ १७ ॥

"ग्राव्यांनीं सोमरस पिळा; त्या रसाला वसतीवरी उदकांत मिसळून द्या" असें सांगितलें तेव्हां, त्या रसाला गोदुग्धरूपवस्त्रांनीच जणों आच्छादित करून ऋत्विजांनी तो रस नद्यांच्या प्रवाहापासूनच जणो दोहन करून बाहेर आणला. १७.



अध॒ ज्मो अध॑ वा दि॒वो बृ॑ह॒तो रो॑च॒नादधि॑ ।
अ॒या व॑र्धस्व त॒न्वा॑ गि॒रा ममा जा॒ता सु॑क्रतो पृण ॥ १८ ॥

अध । ज्मः । अध । वा । दिवः । बृहतः । रोचनात् । अधि ।
अया । वर्धस्व । तन्वा । गिरा । मम । आ । जाता । सुक्रतो इति सुऽक्रतो । पृण ॥ १८ ॥

तूं आतां पृथ्वीवर असलास तरी तेथून ये, किंवा आकाशाच्या प्रकाशमय उच्च प्रदेशांत असलास तरी तेथून इकडे ये, ह्या माझ्या अखंडित स्तवनाने आनंदपूर्ण हो, आणि हे सत्कर्तृत्वशीला देवा, माझ्या संततीलाही आनंदाने पूर्ण कर. १८.



इन्द्रा॑य॒ सु म॒दिन्त॑मं॒ सोमं॑ सोता॒ वरे॑ण्यम् ।
श॒क्र ए॑णं पीपय॒द्विश्व॑या धि॒या हि॑न्वा॒नं न वा॑ज॒युम् ॥ १९ ॥

इन्द्राय । सु । मदिन्ऽतमम् । सोमम् । सोत । वरेण्यम् ।
शक्रः । एनम् । पीपयत् । विश्वया । धिया । हिन्वानम् । न । वाजऽयुम् ॥ १९ ॥

अत्यंत हर्षकारी आणि उत्कृष्ट असे सोमरस इन्द्राप्रीत्यर्थ पिळून सिद्ध करा, म्हणजे तो सर्वसमर्थ ईश्वर, रणांगणाकडे उत्सुकतेने धावणाऱ्या विजयेच्छु वीराप्रमाणे त्या रसाला सर्वांच्या एकाग्र ध्यानाने संतुष्ट होऊन सामर्थ्यानें ओतप्रोत भरून सोडील. १९.



मा त्वा॒ सोम॑स्य॒ गल्द॑या॒ सदा॒ याच॑न्न॒हं गि॒रा ।
भूर्णिं॑ मृ॒गं न सव॑नेषु चुक्रुधं॒ क ईशा॑नं॒ न या॑चिषत् ॥ २० ॥

मा । त्वा । सोमस्य । गल्दया । सदा । याचन् । अहम् । गिरा ।
भूर्णिम् । मृगम् । न । सवनेषु । चुक्रुधम् । कः । ईशानम् । न । याचिषत् ॥ २० ॥

गाळण्यानें सोमरस झटपट गाळून स्तुतीने मी तुझी निरंतर याचना करणारा याचक आहें; तर एखाद्या क्रूर श्वापदाप्रमाणें सोमसवनप्रसंगी तुला क्रोध येईल असें कांहीं माझ्या हातून न घडो; वास्तविक पहाता तुजजवळ मी याचना करणारच, कारण ईश्वराजवळ कोण याचना करणार नाहीं ? २०



मदे॑नेषि॒तं मद॑मु॒ग्रमु॒ग्रेण॒ शव॑सा ।
विश्वे॑षां तरु॒तारं॑ मद॒च्युतं॒ मदे॒ हि ष्मा॒ ददा॑ति नः ॥ २१ ॥

मदेन । इषितम् । मदम् । उग्रम् । उग्रेण । शवसा ।
विश्वेषाम् । तरुतारम् । मदऽच्युतम् । मदे । हि । स्म । ददाति । नः ॥ २१ ॥

भक्ताच्या हर्षानेच ज्याला प्रोत्साहन मिळतें, आंगच्याच उग्रपणाने जो उग्र वाटतो, जो आपल्या उत्कट बलाने सर्व प्रसंगांतून पार नेतो, जो हर्षाने ओथंबलेला आहे असा आल्हाद, स्वतः हर्षभरांत असतांनाच इन्द्र आम्हांस निश्चयानें देतो. २१.



शेवा॑रे॒ वार्या॑ पु॒रु दे॒वो मर्ता॑य दा॒शुषे॑ ।
स सु॑न्व॒ते च॑ स्तुव॒ते च॑ रासते वि॒श्वगू॑र्तो अरिष्टु॒तः ॥ २२ ॥

शेवारे । वार्या । पुरु । देवः । मर्ताय । दाशुषे ।
सः । सुन्वते । च । स्तुवते । च । रासते । विश्वऽगूर्तः । अरिऽस्तुतः ॥ २२ ॥

सेवाप्रचुर अशा उपासनेमध्यें, दानशील मानवाला किंवा सोमरस अर्पण करणाऱ्या भक्ताला आणि स्तवन करणाऱ्या उपासकाला, तो परमेश्वर, तो जगत्पूज्य, तो प्रमुख भक्तांनी स्तुत्य असा इन्द्र अत्युत्कृष्ट वरदान विपुलपणे देतो. २२.



एन्द्र॑ याहि॒ मत्स्व॑ चि॒त्रेण॑ देव॒ राध॑सा ।
सरो॒ न प्रा॑स्यु॒दरं॒ सपी॑तिभि॒रा सोमे॑भिरु॒रु स्फि॒रम् ॥ २३ ॥

आ । इन्द्र । याहि । मत्स्व । चित्रेण । देव । राधसा ।
सरः । न । प्रासि । उदरम् । सपीतिऽभिः । आ । सोमेभिः । उरु । स्फिरम् ॥ २३ ॥

इन्द्रा, इकडे आगमन कर, आणि आपल्या अद्भूत कृपाप्रसादानें, हे देवा, आम्हांस हर्षित कर. ज्यांचा रस तूं मरुतांसह प्राशन करतोस अशा सोमांनीं तुझे जगत्‌रूप विस्तीर्ण उदर एखाद्या सरोवराप्रमाणें तूं भरून टाक. २३.



आ त्वा॑ स॒हस्र॒मा श॒तं यु॒क्ता रथे॑ हिर॒ण्यये॑ ।
ब्र॒ह्म॒युजो॒ हर॑य इन्द्र के॒शिनो॒ वह॑न्तु॒ सोम॑पीतये ॥ २४ ॥

आ । त्वा । सहस्रम् । आ । शतम् । युक्ताः । रथे । हिरण्यये ।
ब्रह्मऽयुजः । हरयः । इन्द्र । केशिनः । वहन्तु । सोमऽपीतये ॥ २४ ॥

भक्तांच्या प्रार्थनेनें तुझ्या सुवर्णरथाला जोडले जाणारे शेकडोच काय पण हरिद्वर्ण अयाळाचे सहस्त्रावधि अश्व, हे इन्द्रा, तुला सोमप्राशनार्थ इकडे घेऊन येवोत. २४.



आ त्वा॒ रथे॑ हिर॒ण्यये॒ हरी॑ म॒यूर॑शेप्या ।
शि॒ति॒पृ॒ष्ठा व॑हतां॒ मध्वो॒ अन्ध॑सो वि॒वक्ष॑णस्य पी॒तये॑ ॥ २५ ॥

आ । त्वा । रथे । हिरण्यये । हरी इति । मयूरऽशेप्या ।
शितिऽपृष्ठा । वहताम् । मध्वः । अन्धसः । विवक्षणस्य । पीतये ॥ २५ ॥

सुवर्णमय अविनाशी रथांत आरूढ झालेला जो तूं त्या तुला, शुद्ध पृष्ठाचे आणि मयूरपिच्छाचे तुरे लावलेले दोन हरिद्वर्ण अश्व, मधुर आणि प्रशंसनीय अशा पेयाचे प्राशन करण्यासाठीं घेऊन येवोत. २५.



पिबा॒ त्व१॒॑स्य गि॑र्वणः सु॒तस्य॑ पूर्व॒पा इ॑व ।
परि॑ष्कृतस्य र॒सिन॑ इ॒यमा॑सु॒तिश्चारु॒र्मदा॑य पत्यते ॥ २६ ॥

पिब । तु । अस्य । गिर्वणः । सुतस्य । पूर्वपाःऽइव ।
परिऽकृतस्य । रसिनः । इयम् । आऽसुतिः । चारुः । मदाय । पत्यते ॥ २६ ॥

स्तवनप्रिय देवा, पिळून सिद्ध केलेला हा रस तूं सर्वांच्या अगोदर प्राशन करणारा आहेस म्हणूनच तो आधीं प्राशन कर. उत्कृष्ट रीतीनें बनविलेल्या आणि रुचिकर अशा सोमाचे हें पेय आहे; हा सुंदर रस तुला तल्लीन करण्यास खचित् समर्थ आहे. २६.



य एको॒ अस्ति॑ दं॒सना॑ म॒हाँ उ॒ग्रो अ॒भि व्र॒तैः ।
गम॒त्स शि॒प्री न स यो॑ष॒दा ग॑म॒द्धवं॒ न परि॑ वर्जति ॥ २७ ॥

यः । एकः । अस्ति । दंसना । महाम् । उग्रः । अभि । व्रतैः ।
गमत् । सः । शिप्री । न । सः । योषत् । आ । गमत् । हवम् । न । परि । वर्जति ॥ २७ ॥

जो एकटाच आपल्या अद्‌भुत चमत्काराच्या योगानें श्रेष्ठ ठरला जो आपल्या ब्रीदांनी शत्रूला भयंकर झाला. तो सुमुकुटधारी इन्द्र येथें येवो; त्याची आमची ताटातूट कधी न होवो; तो आमच्याकडे येणारच. कारण आमच्या हांकेकडे तो दुर्लक्ष करीत नाहीं. २७.



त्वं पुरं॑ चरि॒ष्ण्वं॑ व॒धैः शुष्ण॑स्य॒ सं पि॑णक् ।
त्वं भा अनु॑ चरो॒ अध॑ द्वि॒ता यदि॑न्द्र॒ हव्यो॒ भुवः॑ ॥ २८ ॥

त्वम् । पुरम् । चरिष्ण्वम् । वधैः । शुष्णस्य । सम् । पिणक् ।
त्वम् । भाः । अनु । चरः । अध । द्विता । यत् । इन्द्र । हव्यः । भुवः ॥ २८ ॥

इन्द्रा, तूं आपल्या घातक आयुधांनी शुष्ण राक्षसाच्या पाहिजे तिकडे हालू शकणाऱ्या किल्ल्यांचा चक्काचूर करून टाकलास. तूं प्रकाशाला अनुलक्षून नीट गेलास, आणि म्हणूनच हे इन्द्रा, तूं उभय लोकी वंद्य झाला आहेस. २८.



मम॑ त्वा॒ सूर॒ उदि॑ते॒ मम॑ म॒ध्यंदि॑ने दि॒वः ।
मम॑ प्रपि॒त्वे अ॑पिशर्व॒रे व॑स॒वा स्तोमा॑सो अवृत्सत ॥ २९ ॥

मम । त्वा । सूरे । उत्ऽइते । मम । मध्यन्दिने । दिवः ।
मम । प्रऽपित्वे । अपिऽशर्वरे । वसो इति । आ । स्तोमासः । अवृत्सत ॥ २९ ॥

सूर्यांचा उदय होतेवेळीं, तसेंच मध्यान्हकाळीं, त्याचप्रमाणें अस्तमानीं आणि रात्रीं देखील, हे दिव्यनिधाना इन्द्रा, माझ्या स्तवनांनी तुझें मन वळविलें आहे. २९.



स्तु॒हि स्तु॒हीदे॒ते घा॑ ते॒ मंहि॑ष्ठासो म॒घोना॑म् ।
नि॒न्दि॒ताश्वः॑ प्रप॒थी प॑रम॒ज्या म॒घस्य॑ मेध्यातिथे ॥ ३० ॥

स्तुहि । स्तुहि । इत् । एते । घ । ते । मंहिष्ठासः । मघोनाम् ।
निन्दितऽअश्वः । प्रऽपथी । परमऽज्याः । मघस्य । मेध्यऽअतिथे ॥ ३० ॥

स्तवन कर, स्तवन करच; हेच ते आमच्या दानशूर यजमानांचे अत्यंत उदार धनदाते होत. हे मेध्यातिथे, 'निन्दिताश्व,' 'प्रपथी' आणि 'परमज्या' हे आमचे यजमान आहेत बरें. ३०.



आ यदश्वा॒न्वन॑न्वतः श्र॒द्धया॒हं रथे॑ रु॒हम् ।
उ॒त वा॒मस्य॒ वसु॑नश्चिकेतति॒ यो अस्ति॒ याद्वः॑ प॒शुः ॥ ३१ ॥

आ । यत् । अश्वान् । वनन्ऽवतः । श्रद्धया । अहम् । रथे । रुहम् ।
उत । वामस्य । वसुनः । चिकेतति । यः । अस्ति । याद्वः । पशुः ॥ ३१ ॥

मी जेव्हां ते प्रेक्षणीय अश्व आस्थेने रथास जोडले, तेव्हां यदुराजाचा जो यःकश्चित् पशु आहे तो देखील असे अभिलषणीय अश्व कोठले आहेत तें न्याहाळून पाहूं लागतो. ३१.



य ऋ॒ज्रा मह्यं॑ माम॒हे स॒ह त्व॒चा हि॑र॒ण्यया॑ ।
ए॒ष विश्वा॑न्य॒भ्य॑स्तु॒ सौभ॑गास॒ङ्गस्य॑ स्व॒नद्र॑थः ॥ ३२ ॥

यः । ऋज्रा । मह्यम् । ममहे । सह । त्वचा । हिरण्यया ।
एषः । विश्वानि । अभि । अस्तु । सौभगा । आसङ्गस्य । स्वनत्ऽरथः ॥ ३२ ॥

ज्याने दोन तरतरीत घोडे त्यांच्या आंगावरील जरतारीच्या आस्तरणासह मला दिले, तो हा असंगाचा पुत्र स्वनद्रथ सर्व सद्‌भाग्ये आपलीशी करो. ३२.



अध॒ प्लायो॑गि॒रति॑ दासद॒न्याना॑स॒ङ्गो अ॑ग्ने द॒शभिः॑ स॒हस्रैः॑ ।
अधो॒क्षणो॒ दश॒ मह्यं॒ रुश॑न्तो न॒ळा इ॑व॒ सर॑सो॒ निर॑तिष्ठन् ॥ ३३ ॥

अध । प्लायोगिः । अति । दासत् । अन्यान् । आऽसङ्गः । अग्ने । दशऽभिः । सहस्रैः ।
अध । उक्षणः । दश । मह्यम् । रुशन्तः । नळाःऽइव । सरसः । निः । अतिष्ठन् ॥ ३३ ॥

आणि हे अग्ने, प्लयोगाचा पुत्र जो असंग त्याने दहा हजारांची देणगी देऊन दुसऱ्या राजांवर ताण केली; त्यानें मला दिलेले दहा वृषभ, सरोवरांतून कमलाचे देठ बाहेर निघावे त्याप्रमाणें, मजबरोबर बाहेर निघाले. ३३



अन्व॑स्य स्थू॒रं द॑दृशे पु॒रस्ता॑दन॒स्थ ऊ॒रुर॑व॒रम्ब॑माणः ।
शश्व॑ती॒ नार्य॑भि॒चक्ष्या॑ह॒ सुभ॑द्रमर्य॒ भोज॑नं बिभर्षि ॥ ३४ ॥

अनु । अस्य । स्थूरम् । ददृशे । पुरस्तात् । अनस्थः । ऊरुः । अवऽरम्बमाणः ।
शश्वती । नारी । अभिऽचक्ष्य । आह । सुऽभद्रम् । अर्य । भोजनम् । बिभर्षि ॥ ३४ ॥

त्या असंगाचे विशाल शरीर पुढें दृष्टीस पडलेंच; त्याचा बाहू गुटगुटीत, सणसणीत, आणि नीट खालीं सुटलेला असा होता, तो पाहून त्याची स्त्री शाश्वती त्याला म्हणाली कीं, "महाराज, आतां मात्र तुम्ही यथायोग्य सुखोपभोग मिळविणार हें खास." ३४



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त २ ( इंद्रसूक्त, विभिंदु दानस्तुती )

ऋषी - १-४० मेधातिथि काण्व आणि प्रियमेध आंगिरस; ४१-४२ मेधातिथि काण्व
देवता - १-४० इंद्र; ४१-४२ विभिंदु दानस्तुती : छंद - १-२७, २९-४२ गायत्री; २८ अनुष्टुभ्



इ॒दं व॑सो सु॒तमन्धः॒ पिबा॒ सुपू॑र्णमु॒दर॑म् । अना॑भयिन्ररि॒मा ते॑ ॥ १ ॥

इदम् । वसो इति । सुतम् । अन्धः । पिब । सुऽपूर्णम् । उदरम् ।
अनाभयिन् । ररिम । ते ॥ १ ॥

दिव्यनिधाना, हें पिळून सिद्ध केलेले सोमपेय तूं प्राशन कर. तुझें उदर नेहमी तृप्तच आहे. हे अकुतोभया, आम्ही तें पेय तुलाच अर्पण करू. १.



नृभि॑र्धू॒तः सु॒तो अश्नै॒रव्यो॒ वारैः॒ परि॑पूतः । अश्वो॒ न नि॒क्तो न॒दीषु॑ ॥ २ ॥

नृऽभिः । धूतः । सुतः । अश्नैः । अव्यः । वारैः । परिऽपूतः ।
अश्वः । न । निक्तः । नदीषु ॥ २ ॥

ऋत्विजांनी खळबळून धुतलेला, ग्राव्यांनी चुरलेला आणि लोकरीच्या गाळण्यानें गाळलेला असा हा रस, नदीमध्यें अश्व धुवून स्वच्छ करावा त्याप्रमाणें स्वच्छ झाला आहे. २



तं ते॒ यवं॒ यथा॒ गोभिः॑ स्वा॒दुम॑कर्म श्री॒णन्तः॑ । इन्द्र॑ त्वा॒स्मिन्स॑ध॒मादे॑ ॥ ३ ॥

तम् । ते । यवम् । यथा । गोभिः । स्वादुम् । अकर्म । श्रीणन्तः ।
इन्द्र । त्वा । अस्मिन् । सधऽमादे ॥ ३ ॥

ज्याप्रमाणें आम्ही यव पुरोडाश रुचिकर करतो त्याप्रमाणें, हे इन्द्रा, सर्वांच्या आनंदाच्या या प्रसंगीं आम्ही हा रस गोदुग्धाशीं मिश्रित करून फार मधुर बनविला आहे. ३.



इन्द्र॒ इत्सो॑म॒पा एक॒ इन्द्रः॑ सुत॒पा वि॒श्वायुः॑ । अ॒न्तर्दे॒वान्मर्त्याँ॑श्च ॥ ४ ॥

इन्द्रः । इत् । सोमऽपाः । एकः । इन्द्रः । सुतऽपाः । विश्वऽआयुः ।
अन्तः । देवान् । मर्त्यान् । च ॥ ४ ॥

इन्द्र हाच एकटा सोमप्राशन करणारा आहे. दिव्यविबुध आणि मर्त्य मानव यांच्या अंतर्यामी वास करणारा तो सर्वात्मा इन्द्रच सोमरस प्राशन करणारा होय. ४.



न यं शु॒क्रो न दुरा॑शी॒र्न तृ॒प्रा उ॑रु॒व्यच॑सम् । अ॒प॒स्पृ॒ण्व॒ते सु॒हार्द॑म् ॥ ५ ॥

न । यम् । शुक्रः । न । दुःऽआशीः । न । तृप्राः । उरुऽव्यचसम् ।
अपऽस्पृण्वते । सुऽहार्दम् ॥ ५ ॥

भक्तांशी सहृदय होणाऱ्या इन्द्राला, हे सोमरस, मग ते अति तेजस्वी असोत, किंवा वाईट रीतीनें मिसळलेले असोत, किंवा तृप्तीचा अतिरेक करणारे असोत, ते त्या सर्वव्यापी देवाला प्रसन्न करीत नाहींत असें होतच नाहीं. ५.



गोभि॒र्यदी॑म॒न्ये अ॒स्मन्मृ॒गं न व्रा मृ॒गय॑न्ते । अ॒भि॒त्सर॑न्ति धे॒नुभिः॑ ॥ ६ ॥

गोभिः । यत् । ईम् । अन्ये । अस्मत् । मृगम् । न । व्राः । मृगयन्ते ।
अभिऽत्सरन्ति । धेनुऽभिः ॥ ६ ॥

व्याध जसे हरिणाला पकडूं पाहतात, त्याप्रमाणें आमच्याशिवाय दुसरे भक्त, दुग्धमिश्रित सोमाच्या योगानें अथवा धेनूंच्या योगाने, त्याला आम्हांपासून दूर गुंतवू पाहतात; ६.



त्रय॒ इन्द्र॑स्य॒ सोमाः॑ सु॒तासः॑ सन्तु दे॒वस्य॑ । स्वे क्षये॑ सुत॒पाव्नः॑ ॥ ७ ॥

त्रयः । इन्द्रस्य । सोमाः । सुतासः । सन्तु । देवस्य ।
स्वे । क्षये । सुतऽपाव्नः ॥ ७ ॥

म्हणून, हे तीन प्रकारचे पिळलेले सोमरस, त्या सोमप्रिय इन्द्राच्या गृहांत, त्या देवाच्या स्वतःच्या गृहांतच जाऊन पोहोंचोत. ७.



त्रयः॒ कोशा॑सः श्चोतन्ति ति॒स्रश्च॒म्वः॒॑१ सुपू॑र्णाः । स॒मा॒ने अधि॒ भार्म॑न् ॥ ८ ॥

त्रयः । कोशासः । श्चोतन्ति । तिस्रः । चम्वः । सुऽपूर्णाः ।
समाने । अधि । भार्मन् ॥ ८ ॥

हे तीन द्रोणकलश रसाने अगदीं भरून चालले आहेत; या तीन झाऱ्या अगदीं तोंडोतोंड भरलेल्या आहेत; आणि ही सर्व व्यवस्था एकाच उपासनागृहांत होते. ८.



शुचि॑रसि पुरुनिः॒ष्ठाः क्षी॒रैर्म॑ध्य॒त आशी॑र्तः । द॒ध्ना मन्दि॑ष्ठः॒ शूर॑स्य ॥ ९ ॥

शुचिः । असि । पुरुनिःऽस्थाः । क्षीरैः । मध्यतः । आऽशीर्तः ।
दध्ना । मन्दिष्ठः । शूरस्य ॥ ९ ॥

सोमा, तूं शुद्धच आहेस, तूं अनेक पात्रांत अधिष्ठित झाला आहेस. आणि त्यामध्यें दुधाशी आणि घट्ट दह्याशीं मिश्रित झाला आहेस; म्हणून त्या शूर इन्द्राला तूं अत्यंत हर्षप्रद होणारच. ९.



इ॒मे त॑ इन्द्र॒ सोमा॑स्ती॒व्रा अ॒स्मे सु॒तासः॑ । शु॒क्रा आ॒शिरं॑ याचन्ते ॥ १० ॥

इमे । ते । इन्द्र । सोमाः । तीव्राः । अस्मे इति । सुतासः ।
शुक्राः । आऽशिरम् । याचन्ते ॥ १० ॥

इन्द्रा, तुझ्यासाठी आम्ही मिळवलेले हे शुभ्र तेजस्क आणि तीव्र सोमरस आतां आटीव दुधात मिसळले जाण्याची जणो वाट पहात आहेत. १०.



ताँ आ॒शिरं॑ पुरो॒ळाश॒मिन्द्रे॒मं सोमं॑ श्रीणीहि । रे॒वन्तं॒ हि त्वा॑ शृ॒णोमि॑ ॥ ११ ॥

तान् । आऽशिरम् । पुरोळाशम् । इन्द्र । इमम् । सोमम् । श्रीणीहि ।
रेवन्तम् । हि । त्वा । शृणोमि ॥ ११ ॥

तर हे इन्द्रा, त्या रसात आटीव दूध, पुरोडाश आणि हा सोमरस असें एकत्र मिसळून दे. तूं अक्षयवैभवसंपन्न आहेस हेंच मीं जिकडे तिकडे ऐकतो. ११.



हृ॒त्सु पी॒तासो॑ युध्यन्ते दु॒र्मदा॑सो॒ न सुरा॑याम् । ऊध॒र्न न॒ग्ना ज॑रन्ते ॥ १२ ॥

हृत्ऽसु । पीतासः । युध्यन्ते । दुःऽमदासः । न । सुरायाम् ।
ऊधः । न । नग्नाः । जरन्ते ॥ १२ ॥

सोमरस प्राशन केले म्हणजे ते हृदयांत युद्धप्रवृत्ति उत्पन्न करतात; पण उन्मत्त झालेले मनुष्य सुरेच्या धुंदीत असतां जसे कांहींच करूं शकत नाहींत त्याप्रमाणें उघडी वाघडी दरिद्री माणसेंही तुझे स्तवन करूं शकत नाहींत. १२.



रे॒वाँ इद्रे॒वतः॑ स्तो॒ता स्यात्त्वाव॑तो म॒घोनः॑ । प्रेदु॑ हरिवः श्रु॒तस्य॑ ॥ १३ ॥

रेवान् । इत् । रेवतः । स्तोता । स्यात् । त्वाऽवतः । मघोनः ।
प्र । इत् । ऊं इति । हरिऽवः । श्रुतस्य ॥ १३ ॥

तुजसारख्या परमैश्वर्यवान् देवाचें स्तवन करणारा भक्त ऐश्वर्यवान होणारच. हे हरिदश्वा, सर्वविख्यात् भगवंत जो तूं त्याचा सेवक ऐश्वर्यवान् खास होणारच यांत संशय कसला ? १३.



उ॒क्थं च॒न श॒स्यमा॑न॒मगो॑र॒रिरा चि॑केत । न गा॑य॒त्रं गी॒यमा॑नम् ॥ १४ ॥

उक्थम् । चन । शस्यमानम् । अगोः । अरिः । आ । चिकेत ।
न । गायत्रम् । गीयमानम् ॥ १४ ॥

भक्तिहीनाचा शत्रु इन्द्र आहे. तो त्या भक्तिहीनाच्या सामगायनाकडे किंवा तो गात असलेल्या गायनाकडे मुळींच लक्ष देत नाही. १४.



मा न॑ इन्द्र पीय॒त्नवे॒ मा शर्ध॑ते॒ परा॑ दाः । शिक्षा॑ शचीवः॒ शची॑भिः ॥ १५ ॥

मा । नः । इन्द्र । पीयत्नवे । मा । शर्धते । परा । दाः ।
शिक्ष । शचीऽवः । शचीभिः ॥ १५ ॥

हे इन्द्रा, गर्वाने फुगलेल्या घातक्याच्या हातीं किंवा आंगावर खेकसणाऱ्या दुष्टाच्या हातीं आम्हांस देऊं नको. हे सर्वशक्तिमान देवा, तूं आपल्या दैवीशक्तीनें आम्हांस सन्मार्गाला लाव. १५.



व॒यमु॑ त्वा त॒दिद॑र्था॒ इन्द्र॑ त्वा॒यन्तः॒ सखा॑यः । कण्वा॑ उ॒क्थेभि॑र्जरन्ते ॥ १६ ॥

वयम् । ऊं इति । त्वा । तदित्ऽअर्थाः । इन्द्र । त्वाऽयन्तः । सखायः ।
कण्वाः । उक्थेभिः । जरन्ते ॥ १६ ॥

तुझ्याकडेच लक्ष देणारे, आणि तोच एक हेतू मनांत बाळगणारे आम्ही कण्वकुलोत्पन्न, सर्वांशी सारखे वागणारे भक्त तुझें स्तवन करीत आहो. १६.



न घे॑म॒न्यदा प॑पन॒ वज्रि॑न्न॒पसो॒ नवि॑ष्टौ । तवेदु॒ स्तोमं॑ चिकेत ॥ १७ ॥

न । घ । ईम् । अन्यत् । आ । पपन । वज्रिन् । अपसः । नविष्टौ ।
तव । इत् । ऊं इति । स्तोमम् । चिकेत ॥ १७ ॥

सत्कार्यरत भक्ताच्या अभिनव दृष्टीने हे वज्रधरा, मी दुसऱ्या कोणाचेंही स्तवन केले नाहीं; तर केवळ तुझ्याच स्तवनाकडे लक्ष ठेवले. १७.



इ॒च्छन्ति॑ दे॒वाः सु॒न्वन्तं॒ न स्वप्ना॑य स्पृहयन्ति । यन्ति॑ प्र॒माद॒मत॑न्द्राः ॥ १८ ॥

इच्छन्ति । देवाः । सुन्वन्तम् । न । स्वप्नाय । स्पृहयन्ति ।
यन्ति । प्रऽमादम् । अतन्द्राः ॥ १८ ॥

दिव्यविबुध हें सोम अर्पण करणाराची इच्छा करतात; झोप घेण्याची त्यांना कधीं आकांक्षाच होत नाहीं; तर सदैव जागरूक राहूनच तें मनुष्याचे दोष सुधारीत असतात. १८.



ओ षु प्र या॑हि॒ वाजे॑भि॒र्मा हृ॑णीथा अ॒भ्य१॒॑स्मान् । म॒हाँ इ॑व॒ युव॑जानिः ॥ १९ ॥

ओ इति । सु । प्र । याहि । वाजेभिः । मा । हृणीथाः । अभि । अस्मान् ।
महान्ऽइव । युवऽजानिः ॥ १९ ॥

आपल्या सत्वसामर्थ्यांसह तूं येथें आगमन कर. नवयुवतीशी विवाह करणाऱ्या आढ्यतेच्या मनुष्याप्रमाणे आमच्यावर रुष्ट होऊं नको. १९.



मो ष्व१॒॑द्य दु॒र्हणा॑वान्सा॒यं क॑रदा॒रे अ॒स्मत् । अ॒श्री॒र इ॑व॒ जामा॑ता ॥ २० ॥

मो इति । सु । अद्य । दुःऽहनावान् । सायम् । करत् । आरे । अस्मत् ।
अश्रीरःऽइव । जामाता ॥ २० ॥

सासऱ्यास छळण्याची इच्छा धरणाऱ्या निर्धन जांवयाप्रमाणें आजचा सायंकालचा समय भगवान् इन्द्र हा आमच्यापासून दूर राहून न घालवो. २०.



वि॒द्मा ह्य॑स्य वी॒रस्य॑ भूरि॒दाव॑रीं सुम॒तिम् । त्रि॒षु जा॒तस्य॒ मनां॑सि ॥ २१ ॥

विद्म । हि । अस्य । वीरस्य । भूरिऽदावरीम् । सुऽमतिम् ।
त्रिषु । जातस्य । मनांसि ॥ २१ ॥

ह्या वीराची मानव हितकर बुद्धि किती अत्युदार आहे तें आम्ही जाणतो. या त्रिभुवनामध्ये अवतरलेल्या देवाचे अंतःकरण किती दयार्द्र आहे तेही आम्ही जाणतो. २१.



आ तू षि॑ङ्च॒ कण्व॑मन्तं॒ न घा॑ विद्म शवसा॒नात् । य॒शस्त॑रं श॒तमू॑तेः ॥ २२ ॥

आ । तु । सिञ्च । कण्वऽमन्तम् । न । घ । विद्म । शवसानात् ।
यशःऽतरम् । शतम्ऽऊतेः ॥ २२ ॥

कण्वांनीं पिळलेला हा रस पात्रांत ओत. उत्कटबलशाली आणि भक्ताला शेकडों प्रकारचे सहाय्य करणाऱ्या देवापेक्षा कोणी अधिक यशस्वी आहे असें खरोखरच आम्ही मानीत नाहीं. २२.



ज्येष्ठे॑न सोत॒रिन्द्रा॑य॒ सोमं॑ वी॒राय॑ श॒क्राय॑ । भरा॒ पिब॒न्नर्या॑य ॥ २३ ॥

ज्येष्ठेन । सोतः । इन्द्राय । सोमम् । वीराय । शक्राय ।
भर । पिबत् । नर्याय ॥ २३ ॥

मुख्य ऋत्विजानें पिळलेला सोमरस, सर्वसमर्थ मानवहितकारी वीर जो इन्द्र त्याच्यासाठी घेऊन ये; म्हणजे इन्द्र तो रस प्राशन करील. २३.



यो वेदि॑ष्ठो अव्य॒थिष्वश्वा॑वन्तं जरि॒तृभ्यः॑ । वाजं॑ स्तो॒तृभ्यो॒ गोम॑न्तम् ॥ २४ ॥

यः । वेदिष्ठः । अव्यथिषु । अश्वऽवन्तम् । जरितृऽभ्यः ।
वाजम् । स्तोतृऽभ्यः । गोऽमन्तम् ॥ २४ ॥

अश्व आणि धेनू यांनी युक्त असें सत्वसामर्थ्य जो निर्वेधपणे स्तवन करणाऱ्या भक्ताला अतिशय देतो तोच हा. २४.



पन्य॑म्पन्य॒मित्सो॑तार॒ आ धा॑वत॒ मद्या॑य । सोमं॑ वी॒राय॒ शूरा॑य ॥ २५ ॥

पन्यम्ऽपन्यम् । इत् । सोतारः । आ । धावत । मद्याय ।
सोमम् । वीराय । शूराय ॥ २५ ॥

सोमरस पिळणाऱ्या ऋत्विजांनो, हा प्रशंसनीय, हा अतिप्रशंसनीय सोमपल्लव त्या शूरवीर इन्द्राला हर्ष व्हावा म्हणून धुवून स्वच्छ करा. २५.



पाता॑ वृत्र॒हा सु॒तमा घा॑ गम॒न्नारे अ॒स्मत् । नि य॑मते श॒तमू॑तिः ॥ २६ ॥

पाता । वृत्रऽहा । सुतम् । आ । घ । गमत् । न । आरे । अस्मत् ।
नि । यमते । शतम्ऽऊतिः ॥ २६ ॥

म्हणजे तो वृत्रनाशन इन्द्र सोमरस प्राशन करील. तो आमच्याकडे आगमन करणारच. तो असंख्य सहाय्ये देणारा देव आमच्यापासून कधीं दूर थांबून राहणार नाहीं. २६.



एह हरी॑ ब्रह्म॒युजा॑ श॒ग्मा व॑क्षतः॒ सखा॑यम् । गी॒र्भिः श्रु॒तं गिर्व॑णसम् ॥ २७ ॥

आ । इह । हरी इति । ब्रह्मऽयुजा । शग्मा । वक्षतः । सखायम् ।
गीःऽभिः । श्रुतम् । गिर्वणसम् ॥ २७ ॥

भक्तांच्या प्रार्थनासूक्तांनी जोडले जाणारे मंगलकारक हरिद्वर्ण अश्व, स्तवनप्रिय आणि सर्वविख्यात भक्तसखा जो देव त्याला आमच्या स्तुतींच्या योगाने येथें घेऊन येतात. २७.



स्वा॒दवः॒ सोमा॒ आ या॑हि श्री॒ताः सोमा॒ आ या॑हि ।
शिप्रि॒न्नृषी॑वः॒ शची॑वो॒ नायमच्छा॑ सध॒माद॑म् ॥ २८ ॥

स्वादवः । सोमाः । आ । याहि । श्रीताः । सोमाः । आ । याहि ।
शिप्रिन् । ऋषिऽवः । शचीऽवः । न । अयम् । अच्छ । सधऽमादम् ॥ २८ ॥

हे सोम फार रुचकर आहेत, तर ये; ते दुग्धमिश्रित आहेत, म्हणून इकडे ये; हे दर्शनीय मुकुटधरा, हे ऋषिप्रिया, हे सर्व शक्तिमान देवा, हा सोमरस तुझ्या सहप्राशनहर्षाला योग्य नाहीं काय ? २८.



स्तुत॑श्च॒ यास्त्वा॒ वर्ध॑न्ति म॒हे राध॑से नृ॒म्णाय॑ । इन्द्र॑ का॒रिणं॑ वृ॒धन्तः॑ ॥ २९ ॥

स्तुतः । च । याः । त्वा । वर्धन्ति । महे । राधसे । नृम्णाय ।
इन्द्र । कारिणम् । वृधन्तः ॥ २९ ॥

ज्या स्तुति तुझ्या कृपाप्रसादाच्या लाभासाठी, आणि ज्या स्तुति, तूं पराक्रम गाजवावास यासाठीं हे इन्द्रा, तुझ्या आनंदाचे संवर्धन करतात त्याच स्तुति स्तोत्रकर्त्याचाही आनंद वृद्धिंगत करतात. २९.



गिर॑श्च॒ यास्ते॑ गिर्वाह उ॒क्था च॒ तुभ्यं॒ तानि॑ । स॒त्रा द॑धि॒रे शवां॑सि ॥ ३० ॥

गिरः । च । याः । ते । गिर्वाहः । उक्था । च । तुभ्यम् । तानि ।
सत्रा । दधिरे । शवांसि ॥ ३० ॥

हे स्तुतिलालस देवा, ज्या स्तुति तुझ्याप्रीत्यर्थ केल्या, जी सामगायनें तुझ्या प्रीत्यर्थ गायिली, त्यांनीं तुझी सर्व सामर्थ्यें एकदम एकत्र केली, ३०.



ए॒वेदे॒ष तु॑विकू॒र्मिर्वाजाँ॒ एको॒ वज्र॑हस्तः । स॒नादमृ॑क्तो दयते ॥ ३१ ॥

एव । इत् । एषः । तुविऽकूर्मिः । वाजान् । एकः । वज्रऽहस्तः ।
सनात् । अमृक्तः । दयते ॥ ३१ ॥

अशाच रीतीनें, हा अपार कर्तृत्वशाली वज्रधर इन्द्र, जो पुरातन कालापासून अगदीं अप्रतिहत आहे, तोच एक सर्व सत्वसामर्थ्यें भक्तांना देऊं शकतो. ३१.



हन्ता॑ वृ॒त्रं दक्षि॑णे॒नेन्द्रः॑ पु॒रू पु॑रुहू॒तः । म॒हान्म॒हीभिः॒ शची॑भिः ॥ ३२ ॥

हन्ता । वृत्रम् । दक्षिणेन । इन्द्रः । पुरु । पुरुऽहूतः ।
महान् । महीभिः । शचीभिः ॥ ३२ ॥

तो असंख्य ठिकाणी, असंख्य जनांनी स्तविलेला परमथोर इन्द्र तशाच थोर शक्तींनी आपल्या उजव्या हाताने वृत्राला ठार मारील. ३२.



यस्मि॒न्विश्वा॑श्चर्ष॒णय॑ उ॒त च्यौ॒त्ना ज्रयां॑सि च । अनु॒ घेन्म॒न्दी म॒घोनः॑ ॥ ३३ ॥

यस्मिन् । विश्वाः । चर्षणयः । उत । च्यौत्ना । ज्रयांसि । च ।
अनु । घ । इत् । मन्दी । मघोनः ॥ ३३ ॥

ज्याच्या मध्ये चराचर जगत् आणि त्यांतील उलाढाली आणि धुमाकूळ या सर्वांचा समावेश होतो, तो हा परमेश्वर दानशूर यजमानाच्या हर्षानेच हर्षित होतो. ३३.



ए॒ष ए॒तानि॑ चका॒रेन्द्रो॒ विश्वा॒ योऽति॑ शृ॒ण्वे । वा॒ज॒दावा॑ म॒घोना॑म् ॥ ३४ ॥

एषः । एतानि । चकार । इन्द्रः । विश्वा । यः । अति । शृण्वे ।
वाजऽदावा । मघोनाम् ॥ ३४ ॥

दानशाली यजमानांना सत्वसामर्थ्याची देणगी देणारा अशी ज्याची सर्वत्र ख्याति आहे, त्याच इन्द्राने, त्या परमेश्वरानें या सर्व वस्तु निर्माण केल्या आहेत. ३४.



प्रभ॑र्ता॒ रथं॑ ग॒व्यन्त॑मपा॒काच्चि॒द्यमव॑ति । इ॒नो वसु॒ स हि वोळ्हा॑ ॥ ३५ ॥

प्रऽभर्ता । रथम् । गव्यन्तम् । अपाकात् । चित् । यम् । अवति ।
इनः । वसु । सः । हि । वोळ्हा ॥ ३५ ॥

प्रकाशधेनू इच्छिणाऱ्या ज्या भक्तावर देव कृपा करतो त्याच्याकडे फार लांबून देखील तो आपला रथ घेऊन जातो, आणि तो सर्वेश्वर त्या भक्ताकडे दिव्यधन वाहून आणतो. ३५.



सनि॑ता॒ विप्रो॒ अर्व॑द्भि॒र्हन्ता॑ वृ॒त्रं नृभिः॒ शूरः॑ । स॒त्यो॑ऽवि॒ता वि॒धन्त॑म् ॥ ३६ ॥

सनिता । विप्रः । अर्वत्ऽभिः । हन्ता । वृत्रम् । नृऽभिः । शूरः ।
सत्यः । अविता । विधन्तम् ॥ ३६ ॥

तो ज्ञानरूप इन्द्र अश्वारूढ सैनिकांसह यश मिळवून देणारा, आणि आपल्या वीरांसह हल्ला करून वृत्राचा नाश करणारा आहे; तो शूर, सत्यस्वरूप आहे आणि उपासनारत भक्तांवर कृपा करणाराही आहे. ३६.



यज॑ध्वैनं प्रियमेधा॒ इन्द्रं॑ स॒त्राचा॒ मन॑सा । यो भूत्सोमैः॑ स॒त्यम॑द्वा ॥ ३७ ॥

यजध्व । एनम् । प्रियऽमेधाः । इन्द्रम् । सत्राचा । मनसा ।
यः । भूत् । सोमैः । सत्यऽमद्वा ॥ ३७ ॥

भक्ता प्रियमेधा, एकाग्र मनाने इन्द्राचे यजन कर; तो इन्द्र सोमांच्या योगाने खरोखरच अगदीं तल्लीन होऊन गेला आहे. ३७.



गा॒थश्र॑वसं॒ सत्प॑तिं॒ श्रव॑स्कामं पुरु॒त्मान॑म् । कण्वा॑सो गा॒त वा॒जिन॑म् ॥ ३८ ॥

गाथऽश्रवसम् । सत्ऽपतिम् । श्रवःऽकामम् । पुरुऽत्मानम् ।
कण्वासः । गात । वाजिनम् ॥ ३८ ॥

ज्याचे गुणानुवाद भक्तजन गातात, जो सज्जनांचा प्रभू आहे, जो भक्तांच्या प्रख्यातीची इच्छा धरतो आणि जो सर्वात्मा आहे, त्या सत्ववीर इन्द्राचें, हे कण्वांनों, तुम्ही गुणगायन करा. ३८.



य ऋ॒ते चि॒द्गास्प॒देभ्यो॒ दात्सखा॒ नृभ्यः॒ शची॑वान् । ये अ॑स्मि॒न्काम॒मश्रि॑यन् ॥ ३९ ॥

यः । ऋते । चित् । गाः । पदेभ्यः । दात् । सखा । नृऽभ्यः । शचीऽवान् ।
ये । अस्मिन् । कामम् । अश्रियन् ॥ ३९ ॥

ज्यांनीं त्याच्या ठिकाणी आपला भाव ठेवला, त्यांचा कैवारी होऊन सर्वशक्तिमान इन्द्राने कांहीं एक सुगावा नसतांना देखील शूर भक्तांना प्रकाशधेनू प्राप्त करून दिल्या. ३९



इ॒त्था धीव॑न्तमद्रिवः का॒ण्वं मेध्या॑तिथिम् । मे॒षो भू॒तो॒३॒॑ऽभि यन्नयः॑ ॥ ४० ॥

इत्था । धीऽवन्तम् । अद्रिऽवः । काण्वम् । मेध्यऽअतिथिम् ।
मेषः । भूतः । अभि । यन् । अयः ॥ ४० ॥

ज्याप्रमाणें हे पर्वतभंजका, ध्यानभिमग्न असा जो कण्वकुलोत्पन्न मेधातिथि, त्याच्यासाठी तूं मेंढ्याचे रूप घेऊन त्याच्याकडे गेलास. ४०.



शिक्षा॑ विभिन्दो अस्मै च॒त्वार्य॒युता॒ दद॑त् । अ॒ष्टा प॒रः स॒हस्रा॑ ॥ ४१ ॥

शिक्ष । विभिन्दो इति विऽभिन्दो । अस्मै । चत्वारि । अयुता । ददत् ।
अष्ट । परः । सहस्रा ॥ ४१ ॥

विभिन्द राजा, तूं त्या ऋषीला चार अयुत द्रव्य देऊन सहाय्य केलेस, आणि त्या शिवाय आणखी आठ सहस्र द्रव्य दिलेस. ४१.



उ॒त सु त्ये प॑यो॒वृधा॑ मा॒की रण॑स्य न॒प्त्या॑ । ज॒नि॒त्व॒नाय॑ मामहे ॥ ४२ ॥

उत । सु । त्ये इति । पयःऽवृधा । माकी इति । रणस्य । नप्त्या ।
जनिऽत्वनाय । ममहे ॥ ४२ ॥

रणाच्या म्हणजे आनंदाच्या अमृतजलाची दृष्टि करणार्‍या ज्या दोघी, कन्यका, त्यांनीं जगताचे मातृपद स्वीकारावें म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतों. ४२.



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ३ (इंद्रसूक्त, पाकस्थामन् कौरयाण दानस्तुती )

ऋषी - मेध्यातिथि काण्व : देवता - देवता-१-२० इंद्र; २१-२४ पाकस्थामन् कौरयाण दानस्तुती ;
छंद - विषम-बृहती; सम--सतोबृहती; २१ अनुष्टुभ् ; २२-२३ गायत्री; २४ बृहती).



पिबा॑ सु॒तस्य॑ र॒सिनो॒ मत्स्वा॑ न इन्द्र॒ गोम॑तः ।
आ॒पिर्नो॑ बोधि सध॒माद्यो॑ वृ॒धे॒३॒॑ऽस्माँ अ॑वन्तु ते॒ धियः॑ ॥ १ ॥

पिब । सुतस्य । रसिनः । मत्स्व । नः । इन्द्र । गोऽमतः ।
आपिः । नः । बोधि । सधऽमाद्यः । वृधे । अस्मान् । अवन्तु । ते । धियः ॥ १ ॥

हा रसाळ आणि गोदुग्धमिधित सोमरस, हे इन्द्रा, तूं प्राशन कर आणि तल्लीन हो; तू सर्वांसह हर्षनिर्भर होणारा आहेस; आमचा उत्कर्ष व्हावा म्हणून तूं आमचा आप्त हो. तुझ्या ठिकाणी जडलेल्या बुद्धि आमचे रक्षण करोत. १.



भू॒याम॑ ते सुम॒तौ वा॒जिनो॑ व॒यं मा नः॑ स्तर॒भिमा॑तये ।
अ॒स्माङ्चि॒त्राभि॑रवताद॒भिष्टि॑भि॒रा नः॑ सु॒म्नेषु॑ यामय ॥ २ ॥

भूयाम । ते । सुऽमतौ । वाजिनः । वयम् । मा । नः । स्तः । अभिऽमातये ।
अस्मान् । चित्राभिः । अवतात् । अभिष्टिऽभिः । आ । नः । सुम्नेषु । यमय ॥ २ ॥

तुज सत्ववीराच्या कनवाळू अंतःकरणांत आम्ही राहू असें कर. मग्रूर दुष्टाच्या तडाक्यात आम्हांस सापडूं देऊ नकोस; तुझ्या अद्‌भुत आणि इष्ट अशा सहाय्यांनी आमचे संरक्षण कर आणि तुझ्या कल्याणमय छत्राखाली आम्हांस वागवून घे. २.



इ॒मा उ॑ त्वा पुरूवसो॒ गिरो॑ वर्धन्तु॒ या मम॑ ।
पा॒व॒कव॑र्णाः॒ शुच॑यो विप॒श्चितो॒ऽभि स्तोमै॑रनूषत ॥ ३ ॥

इमाः । ऊं इति । त्वा । पुरुवसो इति पुरुऽवसो । गिरः । वर्धन्तु । याः । मम ।
पावकऽवर्णाः । शुचयः । विपःऽचितः । अभि । स्तोमैः । अनूषत ॥ ३ ॥

हे अपारविभवा, ह्या माझ्या स्तवनवाणी तुझा संतोष वृद्धिंगत करोत. अग्निप्रमागे तेजस्वी आणि पवित्र असे ज्ञानी भक्तजन सूक्तांनी तुझे सदैव संकीर्तन करोत. ३.



अ॒यं स॒हस्र॒मृषि॑भिः॒ सह॑स्कृतः समु॒द्र इ॑व पप्रथे ।
स॒त्यः सो अ॑स्य महि॒मा गृ॑णे॒ शवो॑ य॒ज्ङेषु॑ विप्र॒राज्ये॑ ॥ ४ ॥

अयम् । सहस्रम् । ऋषिऽभिः । सहःऽकृतः । समुद्रःऽइव । पप्रथे ।
सत्यः । सः । अस्य । महिमा । गृणे । शवः । यज्ञेषु । विप्रऽराज्ये ॥ ४ ॥

सहस्रावधि ऋषींनी वेष्टित आणि दर्पदलन सामर्थ्यानें अलंकृत असा इन्द्र समुद्राप्रमाणें विस्तृत झाला. तो सत्यस्वरूप आहे म्हणूनच त्याचा महिमा आणि उत्कट प्रभाव यांची महती ह्या विप्र-राज्यातील यज्ञांत मी गात असतो. ४.



इन्द्र॒मिद्दे॒वता॑तय॒ इन्द्रं॑ प्रय॒त्य॑ध्व॒रे ।
इन्द्रं॑ समी॒के व॒निनो॑ हवामह॒ इन्द्रं॒ धन॑स्य सा॒तये॑ ॥ ५ ॥

इन्द्रम् । इत् । देवऽतातये । इन्द्रम् । प्रऽयति । अध्वरे ।
इन्द्रम् । सम्ऽईके । वनिनः । हवामहे । इन्द्रम् । धनस्य । सातये ॥ ५ ॥

देवाची उपासना यथासांग व्हावी म्हणून इन्द्रालाच आम्ही पाचारण करतो. प्रारंभ केलेल्या ह्या यागांत आम्हीं इन्द्राचीच करुणा भाकतों; आम्ही विजयेच्छु होऊन संग्रामामध्ये इन्द्रालाच हांक मारतो, आणि यशोधनाच्या प्राप्तीसाठीही इन्द्राचाच धांवा करतो. ५.



इन्द्रो॑ म॒ह्ना रोद॑सी पप्रथ॒च्छव॒ इन्द्रः॒ सूर्य॑मरोचयत् ।
इन्द्रे॑ ह॒ विश्वा॒ भुव॑नानि येमिर॒ इन्द्रे॑ सुवा॒नास॒ इन्द॑वः ॥ ६ ॥

इन्द्रः । मह्ना । रोदसी इति । पप्रथत् । शवः । इन्द्रः । सूर्यम् । अरोचयत् ।
इन्द्रे । ह । विश्वा । भुवनानि । येमिरे । इन्द्रे । सुवानासः । इन्दवः ॥ ६ ॥

इन्द्राने आपल्या महिम्यानें द्युलोक आणि भूलोक ह्यांचा विस्तार केला, हाच त्याचा उत्कटप्रभाव होय; सूर्यालाही इन्द्रानेच प्रकाशित केलें. ही सर्व भुवनें इन्द्राच्या ठिकाणी आहेत म्हणूनच सुयंत्र चालली आहेत; आणि यज्ञांत पिळले जाणारे सोमरसही इन्द्राच्याच ठिकाणी पोहोचतात. ६.



अ॒भि त्वा॑ पू॒र्वपी॑तय॒ इन्द्र॒ स्तोमे॑भिरा॒यवः॑ ।
स॒मी॒ची॒नास॑ ऋ॒भवः॒ सम॑स्वरन्रु॒द्रा गृ॑णन्त॒ पूर्व्य॑म् ॥ ७ ॥

अभि । त्वा । पूर्वऽपीतये । इन्द्र । स्तोमेभिः । आयवः ।
सम्ऽईचीनासः । ऋभवः । सम् । अस्वरन् । रुद्राः । गृणन्त । पूर्व्यम् ॥ ७ ॥

तूं सर्वांच्या आधीं सोमप्राशन करावेंस म्हणून, हे इन्द्रा, ऋत्विज आणि ऋभु ह्या सर्वांनी तुझ्या सन्मुख होऊन उच्च स्वरांत सूक्तांनी तुझें स्तवन केलें. रुद्रपुत्र मरुतांनीही, पुरातन जो तूं त्या तुझें संकीर्तन केलें. ७.



अ॒स्येदिन्द्रो॑ वावृधे॒ वृष्ण्यं॒ शवो॒ मदे॑ सु॒तस्य॒ विष्ण॑वि ।
अ॒द्या तम॑स्य महि॒मान॑मा॒यवोऽनु॑ ष्टुवन्ति पू॒र्वथा॑ ॥ ८ ॥

अस्य । इत् । इन्द्रः । ववृधे । वृष्ण्यम् । शवः । मदे । सुतस्य । विष्णवि ।
अद्य । तम् । अस्य । महिमानम् । आयवः । अनु । स्तुवन्ति । पूर्वऽथा ॥ ८ ॥

ह्याच सोमाच्या सर्वव्यापी हर्षभरांत इन्द्राने आपला वीर्यप्रभाव आणि धडाडी वृद्धिंगत केली, म्हणून पूर्वीप्रमाणें आज देखील भक्तजन त्याचा महिमा गात असतात. ८.



तत्त्वा॑ यामि सु॒वीर्यं॒ तद्ब्रह्म॑ पू॒र्वचि॑त्तये ।
येना॒ यति॑भ्यो॒ भृग॑वे॒ धने॑ हि॒ते येन॒ प्रस्क॑ण्व॒मावि॑थ ॥ ९ ॥

तत् । त्वा । यामि । सुऽवीर्यम् । तत् । ब्रह्म । पूर्वऽचित्तये ।
येन । यतिऽभ्यः । भृगवे । धने । हिते । येन । प्रस्कण्वम् । आविथ ॥ ९ ॥

मी तुजपाशी तें लोकोत्तर वीर्यशालित्व मागतो, आणि तुझे चिन्तन प्रथम करावे म्हणून तें अपूर्व ज्ञानही तुझ्याच कडून घेतो, कीं ज्याच्या योगाने, प्रसंग पडला तेव्हां यतीकरितां आणि भृगूंकरिता तूं प्रस्कण्वावर कृपा केलीस. ९.



येना॑ समु॒द्रमसृ॑जो म॒हीर॒पस्तदि॑न्द्र॒ वृष्णि॑ ते॒ शवः॑ ।
स॒द्यः सो अ॑स्य महि॒मा न सं॒नशे॒ यं क्षो॒णीर॑नुचक्र॒दे ॥ १० ॥

येन । समुद्रम् । असृजः । महीः । अपः । तत् । इन्द्र । वृष्णि । ते । शवः ।
सद्यः । सः । अस्य । महिमा । न । सम्ऽनशे । यम् । क्षोणीः । अनुऽचक्रदे ॥ १० ॥

ज्याच्या योगानें तूं समुद्र उत्पन्न केलास; प्रचंड नद्या उत्पन्न केल्यास; ते वीर्थशालित्व, ती धडाडी, हे इंद्रा, तुझी होय. तुझा हा महिमा कोणींही वर्णू शकत नाहीं; द्युलोक आणि भूलोक या उभयतांनीही त्याचें आपल्या गर्जनेनें अनेकवेळा अभिनंदन केले आहें. १०.



श॒ग्धी न॑ इन्द्र॒ यत्त्वा॑ र॒यिं यामि॑ सु॒वीर्य॑म् ।
श॒ग्धि वाजा॑य प्रथ॒मं सिषा॑सते श॒ग्धि स्तोमा॑य पूर्व्य ॥ ११ ॥

शग्धि । नः । इन्द्र । यत् । त्वा । रयिम् । यामि । सुऽवीर्यम् ।
शग्धि । वाजाय । प्रथमम् । सिसासते । शग्धि । स्तोमाय । पूर्व्य ॥ ११ ॥

इन्द्रा मीं तुजपाशी अक्षय संपत्तीची आणि वीर्यशालित्वाची याचना करीत आहे, तर मला सामर्थ्य दे. सत्त्वाढ्यतेची लालसा प्रथम धरणारा जो मी त्या मला समर्थ कर; हे पुरातना, तुझे गुणानुवाद गाण्याला मजला समर्थ कर. ११.



श॒ग्धी नो॑ अ॒स्य यद्ध॑ पौ॒रमावि॑थ॒ धिय॑ इन्द्र॒ सिषा॑सतः ।
श॒ग्धि यथा॒ रुश॑मं॒ श्याव॑कं॒ कृप॒मिन्द्र॒ प्रावः॒ स्व॑र्णरम् ॥ १२ ॥

शग्धि । नः । अस्य । यत् । ह । पौरम् । आविथ । धियः । इन्द्र । सिसासतः ।
शग्धि । यथा । रुशमम् । श्यावकम् । कृपम् । इन्द्र । प्र । आवः । स्वःऽनरम् ॥ १२ ॥

ध्यान करण्याची इच्छा धरणारा जो हा भक्त त्याला, हे इन्द्रा, तशी शक्ति दे; कारण पौर नांवाच्या भक्तावर तूं तशी कृपा केली आहेस. ज्याप्रमाणें रुशम, श्यावक, आणि कृप यांच्यावर हे इन्द्रा, तूं अनुग्रह केलास त्याप्रमाणें दिव्य प्रकाशाकडे नेण्यास योग्य अशा या भक्तजनांवर कृपा कर. १२.



कन्नव्यो॑ अत॒सीनां॑ तु॒रो गृ॑णीत॒ मर्त्यः॑ ।
न॒ही न्व॑स्य महि॒मान॑मिन्द्रि॒यं स्व॑र्गृ॒णन्त॑ आन॒शुः ॥ १३ ॥

कत् । नव्यः । अतसीनाम् । तुरः । गृणीत । मर्त्यः ।
नहि । नु । अस्य । महिमानम् । इन्द्रियम् । स्वः । गृणन्तः । आनशुः ॥ १३ ॥

कोणता उत्कंठित भक्त तुझ्या सर्वगामी स्तुतीतून-अपूर्व स्तुतीच तेवढ्या निवडन काढून त्या गात बसेल ? कारण या इंद्राचा महिमा आणि ईश्वरीसामर्थ्य यांची महती गाणारे जे भक्त आहेत, त्यांनीं दिव्य प्रकाशाची प्राप्ति करून घेतली नाहीं असें झालें काय ? खरोखर दिव्य प्रकाशाचे स्तवन करणारे भक्त देखील ह्या इन्द्राचा महिमा आणि ईश्वरीसामर्थ्य यांचा थांग लावूं शकले नाहींत. १३.



कदु॑ स्तु॒वन्त॑ ऋतयन्त दे॒वत॒ ऋषिः॒ को विप्र॑ ओहते ।
क॒दा हवं॑ मघवन्निन्द्र सुन्व॒तः कदु॑ स्तुव॒त आ ग॑मः ॥ १४ ॥

कत् । ऊं इति । स्तुवन्तः । ऋतऽयन्त । देवता । ऋषिः । कः । विप्रः । ओहते ।
कदा । हवम् । मघऽवन् । इन्द्र । सुन्वतः । कत् । ऊं इति । स्तुवतः । आ । गमः ॥ १४ ॥

तुझी स्तुति आणखी कोणकोणते भक्त करीत आहेत ? सद्धर्माचरण करण्यासाठीं कोण तळमळत आहेत ? कोणती देवता, कोणता ऋषि, कोणता ज्ञानीभक्त तुझे चिन्तन करीत आहे ? हे भगवंता इन्द्रा, सोम अर्पण करणारा आणि स्तवन करणारा जो भक्त त्याच्या हांकेसरशी तूं केव्हां येशील ? १४.



उदु॒ त्ये मधु॑मत्तमा॒ गिरः॒ स्तोमा॑स ईरते ।
स॒त्रा॒जितो॑ धन॒सा अक्षि॑तोतयो वाज॒यन्तो॒ रथा॑ इव ॥ १५ ॥

उत् । ऊं इति । त्ये । मधुमत्ऽतमाः । गिरः । स्तोमासः । ईरते ।
सत्राऽजितः । धनऽसाः । अक्षितऽऊतयः । वाजऽयन्तः । रथाःऽइव ॥ १५ ॥

पहा अत्यंत मधुर अशीं सूक्ते आणि स्तुति भक्तांच्या मुखांतून निघत आहेत. त्या तत्काल जय देणाऱ्या, यशोधन देणाऱ्या, संरक्षण सामर्थ्य कधींही क्षीण होऊं न देणाऱ्या आणि रथाप्रमाणें सत्वविजयी आहेत. १५.



कण्वा॑ इव॒ भृग॑वः॒ सूर्या॑ इव॒ विश्व॒मिद्धी॒तमा॑नशुः ।
इन्द्रं॒ स्तोमे॑भिर्म॒हय॑न्त आ॒यवः॑ प्रि॒यमे॑धासो अस्वरन् ॥ १६ ॥

कण्वाःऽइव । भृगवः । सूर्याःऽइव । विश्वम् । इत् । धीतम् । आनशुः ।
इन्द्रम् । स्तोमेभिः । महयन्तः । आयवः । प्रियऽमेधासः । अस्वरन् ॥ १६ ॥

सूर्याप्रमाणे तेजस्वी भृगूंना, कण्वाप्रमाणेच ध्यानाचे सर्व फल प्राप्त झालें; आणि म्हणूनच प्रियमेधांनीं इन्द्राचा महिमा गाण्याच्या इच्छेने सूक्तांनी त्याचे गुणगायन उच्चस्वरानें केलें. १६.



यु॒क्ष्वा हि वृ॑त्रहन्तम॒ हरी॑ इन्द्र परा॒वतः॑ ।
अ॒र्वा॒ची॒नो म॑घव॒न्सोम॑पीतय उ॒ग्र ऋ॒ष्वेभि॒रा ग॑हि ॥ १७ ॥

युक्ष्व । हि । वृत्रहन्ऽतम । हरी इति । इन्द्र । पराऽवतः ।
अर्वाचीनः । मघऽवन् । सोमऽपीतये । उग्रः । ऋष्वेभिः । आ । गहि ॥ १७ ॥

वृत्राचें अगदीं उच्चाटन करून टाकणाऱ्या इन्द्रा, तूं दूरच्या लोकी असलास तरी तेथून आपले हरिद्वर्ण अश्व जोड, आणि आमच्याकडे मुख करून, हे भगवंता, शत्रुभयंकर असा तूं आपल्या महापराक्रमी मरुतांसह आगमन कर. १७.



इ॒मे हि ते॑ का॒रवो॑ वाव॒शुर्धि॒या विप्रा॑सो मे॒धसा॑तये ।
स त्वं नो॑ मघवन्निन्द्र गिर्वणो वे॒नो न शृ॑णुधी॒ हव॑म् ॥ १८ ॥

इमे । हि । ते । कारवः । वावशुः । धिया । विप्रासः । मेधऽसातये ।
सः । त्वम् । नः । मघऽवन् । इन्द्र । गिर्वणः । वेनः । न । शृणुधि । हवम् ॥ १८ ॥

हेच ते कविजन, हेच ते ज्ञानी भक्त, कीं ज्यांनीं मेधाजनन यज्ञासाठी अगदीं ध्यान लावून फार मोठ्याने तुझे स्तवन केलें; म्हणून हे भगवंता, स्तवनप्रिया इन्द्रा, प्रेमोत्कंठित जनाप्रमाणें तूं आमचा धांवा ऐक. १८.



निरि॑न्द्र बृह॒तीभ्यो॑ वृ॒त्रं धनु॑भ्यो अस्फुरः ।
निरर्बु॑दस्य॒ मृग॑यस्य मा॒यिनो॒ निः पर्व॑तस्य॒ गा आ॑जः ॥ १९ ॥

निः । इन्द्र । बृहतीभ्यः । वृत्रम् । धनुऽभ्यः । अस्फुरः ।
निः । अर्बुदस्य । मृगयस्य । मायिनः । निः । पर्वतस्य । गाः । आजः ॥ १९ ॥

इन्द्रा, तूं आपल्या प्रचंड धनुष्यांपासून होणाऱ्या टणत्कारानेच वृत्राला दूर भिरकावून देऊन ठार केलेंस, आणि मायावी जे अर्बुद आणि मृगय राक्षस त्यांच्या डोंगरी किल्ल्याच्या बाहेर प्रकाशधेनूंना आणून सोडलेस. १९.



निर॒ग्नयो॑ रुरुचु॒र्निरु॒ सूर्यो॒ निः सोम॑ इन्द्रि॒यो रसः॑ ।
निर॒न्तरि॑क्षादधमो म॒हामहिं॑ कृ॒षे तदि॑न्द्र॒ पौंस्य॑म् ॥ २० ॥

निः । अग्नयः । रुरुचुः । निः । ऊं इति । सूर्यः । निः । सोमः । इन्द्रियः । रसः ।
निः । अन्तरिक्षात् । अधमः । महाम् । अहिम् । कृषे । तत् । इन्द्र । पौंस्यम् ॥ २० ॥

यज्ञांतील तीन अग्नि अत्यंत तेजाने झळकू लागले, सूर्यही बाहेर निघून सुप्रकाशित झाला, आणि इन्द्राचे जणूं सामर्थ्यच असा सोमरस निस्तोष झाला, पण ह्या सर्व गोष्टी त्या धिप्पाड अहिभुजंगाला तूं आकाशांतून खालीं धाडकन् आपटून मारलेंस, आणि हे इन्द्रा, तें तुझें अपूर्व पौरुष प्रकट केलेंस तेव्हांच घडून आल्या. २०.



यं मे॒ दुरिन्द्रो॑ म॒रुतः॒ पाक॑स्थामा॒ कौर॑याणः ।
विश्वे॑षां॒ त्मना॒ शोभि॑ष्ठ॒मुपे॑व दि॒वि धाव॑मानम् ॥ २१ ॥

यम् । मे । दुः । इन्द्रः । मरुतः । पाकऽस्थामा । कौरयाणः ।
विश्वेषाम् । त्मना । शोभिष्ठम् । उपऽइव । दिवि । धावमानम् ॥ २१ ॥

इन्द्र, मरुत् आणि कुरयाणाचा पुत्र पाकस्थामा यांनी सर्व वस्तूंमध्ये अत्यंत शोभिवंत आणि आकाशाकडेच जणों आपण होऊन धांव घेणारा असा वेगवान् अश्व मला दिला. २१.



रोहि॑तं मे॒ पाक॑स्थामा सु॒धुरं॑ कक्ष्य॒प्राम् ।
अदा॑द्रा॒यो वि॒बोध॑नम् ॥ २२ ॥

रोहितम् । मे । पाकऽस्थामा । सुऽधुरम् । कक्ष्यऽप्राम् ।
अदात् । रायः । विऽबोधनम् ॥ २२ ॥

आरक्त वर्ण, वाहन योग्य, भरदारपुठ्ठ्याचा, आणि विजय संपत्तीची आकांक्षा उत्पन्न करणारा असा तो अश्व मला पाकस्थामा ह्याने दिला. २२.



यस्मा॑ अ॒न्ये दश॒ प्रति॒ धुरं॒ वह॑न्ति॒ वह्न॑यः ।
अस्तं॒ वयो॒ न तुग्र्य॑म् ॥ २३ ॥

यस्मै । अन्ये । दश । प्रति । धुरम् । वहन्ति । वह्नयः ।
अस्तम् । वयः । न । तुग्र्यम् ॥ २३ ॥

आणि त्याच्या जोडीला दुसरे असे दहा अश्व धुरेला जोडून दिले कीं, ते पक्ष्याप्रमाणे तुग्र्याला झट्‌दिशी स्वस्थानी घेऊन जातील. २३.



आ॒त्मा पि॒तुस्त॒नूर्वास॑ ओजो॒दा अ॒भ्यञ्ज॑नम् ।
तु॒रीय॒मिद्रोहि॑तस्य॒ पाक॑स्थामानं भो॒जं दा॒तार॑मब्रवम् ॥ २४ ॥

आत्मा । पितुः । तनूः । वासः । ओजःऽदाः । अभिऽअञ्जनम् ।
तुरीयम् । इत् । रोहितस्य । पाकऽस्थामानम् । भोजम् । दातारम् । अब्रवम् ॥ २४ ॥

आत्मा हें पोषक अन्न, शरीर हें वस्त्र आणि ओजोदायफ तप हें तैलाभ्यङ्ग ह्या तीन गोष्टीं नंतर चवथी अपूर्व गोष्ट म्हटली म्हणजे, मला आरक्तवर्ण अश्वाची देणगी देणारा उदारधी जो पाकस्थामा तो होय असें मीं वारंवार सांगितले आहे. २४.



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ४ (इन्द्र, पूषन्‌सूक्त )

ऋषी - देवातिथि काण्व : देवता - १-१४ इंद्र; १५-१८ पूषन् ; १९-२१ कुरूंग दानस्तुती;
छंद - विषम-बृहती; सम-सतोबृहती; २१ पुर उष्णिह



यदि॑न्द्र॒ प्रागपा॒गुद॒ङ्न्य॑ग्वा हू॒यसे॒ नृभिः॑ ।
सिमा॑ पु॒रू नृषू॑तो अ॒स्यान॒वेऽसि॑ प्रशर्ध तु॒र्वशे॑ ॥ १ ॥

यत् । इन्द्र । प्राक् । अपाक् । उदक् । न्यक् । वा । हूयसे । नृऽभिः ।
सिम । पुरु । नृऽसूतः । असि । आनवे । असि । प्रऽशर्ध । तुर्वशे ॥ १ ॥

इन्द्रा, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे आणि खालीं दक्षिणेकडे देखील ऋत्विजांनी तुझा धांवा चालविलेला असतो; हे सर्वश्रेष्ठा, तुझ्या शूर भक्तांनी तुला सर्वत्र स्फुरण आणले तें आनवा करतां आणलें; आणि हे रणधुरंधरा, तसें तें तुर्वशासाठींही आणले. १.



यद्वा॒ रुमे॒ रुश॑मे॒ श्याव॑के॒ कृप॒ इन्द्र॑ मा॒दय॑से॒ सचा॑ ।
कण्वा॑सस्त्वा॒ ब्रह्म॑भिः॒ स्तोम॑वाहस॒ इन्द्रा य॑च्छ॒न्त्या ग॑हि ॥ २ ॥

यत् । वा । रुमे । रुशमे । श्यावके । कृपे । इन्द्र । मादयसे । सचा ।
कण्वासः । त्वा । ब्रह्मऽभिः । स्तोमऽवाहसः । इन्द्र । आ । यच्छन्ति । आ । गहि ॥ २ ॥

आणि जरी तूं रुम, रुशम, श्यावक आणि कृप या राजांच्या यज्ञामध्ये सोमरसाने हर्षित होत असलास तरी कण्वकुलोत्पन्न भक्त, तुला प्रार्थना अर्पण करणारे भक्त, ब्रह्मसूक्तांनी तुजला आपल्याकडे आकर्ष करीत आहेत. तर इकडे आगमन कर. २.



यथा॑ गौ॒रो अ॒पा कृ॒तं तृष्य॒न्नेत्यवेरि॑णम् ।
आ॒पि॒त्वे नः॑ प्रपि॒त्वे तूय॒मा ग॑हि॒ कण्वे॑षु॒ सु सचा॒ पिब॑ ॥ ३ ॥

यथा । गौरः । अपा । कृतम् । तृष्यन् । एति । अव । इरिणम् ।
आऽपित्वे । नः । प्रऽपित्वे । तूयम् । आ । गहि । कण्वेषु । सु । सचा । पिब ॥ ३ ॥

ज्याप्रमाणें रानांतील तान्हेलेला वृषभ तृणरहित प्रदेशांतील उदकपूर्ण तडागाकडे धांवत जातो त्याप्रमाणें प्रातःकाळीं आणि सायंकाळी देखील तूं आमच्या सवनाकडे त्वरित ये, आणि आम्हां कण्वांसमक्ष सर्व सोमरस एकदम प्राशन कर. ३.



मन्द॑न्तु त्वा मघवन्नि॒न्द्रेन्द॑वो राधो॒देया॑य सुन्व॒ते ।
आ॒मुष्या॒ सोम॑मपिबश्च॒मू सु॒तं ज्येष्ठं॒ तद्द॑धिषे॒ सहः॑ ॥ ४ ॥

मन्दन्तु । त्वा । मघऽवन् । इन्द्र । इन्दवः । राधःऽदेयाय । सुन्वते ।
आऽमुष्य । सोमम् । अपिबः । चमू इति । सुतम् । ज्येष्ठम् । तत् । दधिषे । सहः ॥ ४ ॥

भगवान् इन्द्रा, हे सोमरसबिंदु सोम पिळणाऱ्या भक्ताला वरदान देण्याकरितां तुला हर्षनिर्भर करोत. यासाठीं चमूपात्रें जवळ ओढून घेऊन त्यांतील पिळलेला रस तूं प्राशन केलास, आणि आपलें तें सर्वोत्कृष्ट सर्वंकष तेज धारण केलेस. ४.



प्र च॑क्रे॒ सह॑सा॒ सहो॑ ब॒भञ्ज॑ म॒न्युमोज॑सा ।
विश्वे॑ त इन्द्र पृतना॒यवो॑ यहो॒ नि वृ॒क्षा इ॑व येमिरे ॥ ५ ॥

प्र । चक्रे । सहसा । सहः । बभञ्ज । मन्युम् । ओजसा ।
विश्वे । ते । इन्द्र । पृतनाऽयवः । यहो इति । नि । वृक्षाःऽइव । येमिरे ॥ ५ ॥

आपल्या बलाने तूं शत्रूंचे निर्दलन केलेंस, आपल्या ओजस्वितेनें त्यांच्या आवेशाचा चुराडा केलास, म्हणून हे श्रेष्ठतमा इन्द्रा, जरी त्या सर्वांना युद्धाची खुमखुम होती तरी तुझ्यासमोर ते वृक्षांप्रमाणे उन्मळून पडले. ५.



स॒हस्रे॑णेव सचते यवी॒युधा॒ यस्त॒ आन॒ळुप॑स्तुतिम् ।
पु॒त्रं प्रा॑व॒र्गं कृ॑णुते सु॒वीर्ये॑ दा॒श्नोति॒ नम॑{}उक्तिभिः ॥ ६ ॥

सहस्रेणऽइव । सचते । यविऽयुधा । यः । ते । आनट् । उपऽस्तुतिम् ।
पुत्रम् । प्रावर्गम् । कृणुते । सुऽवीर्ये । दाश्नोति । नमउक्तिऽभिः ॥ ६ ॥

तुझ्या स्तवनभक्तीचें रहस्य ज्यानें अनुभवाने जाणले तो जणो काय सहस्रावधि तरुण योध्यांनीं वेष्टित असल्याप्रमाणे वावरतो. उत्कृष्ट वीर्यशाली कृत्यांत तो आपल्या पुत्राला अग्रेसर करतो, आणि परमेश्वराची प्रणामपुरःसर स्तुति करून दानधर्म करतो, ६.



मा भे॑म॒ मा श्र॑मिष्मो॒ग्रस्य॑ स॒ख्ये तव॑ ।
म॒हत्ते॒ वृष्णो॑ अभि॒चक्ष्यं॑ कृ॒तं पश्ये॑म तु॒र्वशं॒ यदु॑म् ॥ ७ ॥

मा । भेम । मा । श्रमिष्म । उग्रस्य । सख्ये । तव ।
महत् । ते । वृष्णः । अभिऽचक्ष्यम् । कृतम् । पश्येम । तुर्वशम् । यदुम् ॥ ७ ॥

तुजसारख्या शत्रुभयंकराच्या कृपाछत्राखालीं असल्यावर आम्हीं कशालाही भिणार नाही आणि थकूनही जाणार नाहीं. तुज वीर्यसागराचें जे महत्‌कृत्य तें सर्वतोमुखी व्हावें असेंच आहे; तर आतां तुर्वश आणि यदु यांना आनंदांत असलेले मी पाहीन असें कर. ७.



स॒व्यामनु॑ स्फि॒ग्यं॑ वावसे॒ वृषा॒ न दा॒नो अ॑स्य रोषति ।
मध्वा॒ सम्पृ॑क्ताः सार॒घेण॑ धे॒नव॒स्तूय॒मेहि॒ द्रवा॒ पिब॑ ॥ ८ ॥

सव्याम् । अनु । स्फिग्यम् । ववसे । वृषा । न । दानः । अस्य । रोषति ।
मध्वा । सम्ऽपृक्ताः । सारघेण । धेनवः । तूयम् । आ । इहि । द्रव । पिब ॥ ८ ॥

वीर्यसागर इन्द्र आपल्या डाव्या बाजूकडे कल देऊन स्वस्थपणे अधिष्ठित झाला आहे. सेवेमध्ये खण्ड पडला तरी तो क्रुद्ध होत नाहीं; हे इन्द्रा, आमच्या धेनू जणों काय मधु मक्षिकांच्या मधानेंच ओथंबलेल्या आहेत, इतकें त्यांचे दुग्ध मिष्ट आहे, तर सत्वर ये, धांवत ये, आणि मधुर दुग्ध प्राशन कर. ८.



अ॒श्वी र॒थी सु॑रू॒प इद्गोमाँ॒ इदि॑न्द्र ते॒ सखा॑ ।
श्वा॒त्र॒भाजा॒ वय॑सा सचते॒ सदा॑ च॒न्द्रो या॑ति स॒भामुप॑ ॥ ९ ॥

अश्वी । रथी । सुऽरूपः । इत् । गोऽमान् । इत् । इन्द्र । ते । सखा ।
श्वात्रऽभाजा । वयसा । सचते । सदा । चन्द्रः । याति । सभाम् । उप ॥ ९ ॥

इन्द्रा, तुला जो प्रियमित्र असेल तो अश्वसंपन्न असतो, तो योद्धा असून गोसंपन्न असतो, आणि त्याचा आंगलोटही उत्तमच दिसतो. आंगांत भक्कम जोम राहील अशा तारुण्यानें तो नेहमी मंडित असतो, आणि चन्द्राप्रमाणें आल्हाद तेजस्क होऊन तो लोकसभेमध्ये प्रवेश करतो. ९.



ऋश्यो॒ न तृष्य॑न्नव॒पान॒मा ग॑हि॒ पिबा॒ सोमं॒ वशाँ॒ अनु॑ ।
नि॒मेघ॑मानो मघवन्दि॒वेदि॑व॒ ओजि॑ष्ठं दधिषे॒ सहः॑ ॥ १० ॥

ऋश्यः । न । तृष्यन् । अवऽपानम् । आ । गहि । पिब । सोमम् । वशान् । अनु ।
निऽमेघमानः । मघऽवन् । दिवेऽदिवे । ओजिष्ठम् । दधिषे । सहः ॥ १० ॥

तृषाक्रांत मृग पाणवठ्याकडे धावतो तसा तूंही आमच्याकडे धांवत ये आणि सोमरस यथेच्छ प्राशन कर. हे भगवंता, कृपाळूपणानें खालीं भूमिवर उदकवृष्टि करणारा तू प्रतिदिनी अत्यंत ओजस्वी आणि दुर्दम्य तेज धारण करतोस. १०.



अध्व॑र्यो द्रा॒वया॒ त्वं सोम॒मिन्द्रः॑ पिपासति ।
उप॑ नू॒नं यु॑युजे॒ वृष॑णा॒ हरी॒ आ च॑ जगाम वृत्र॒हा ॥ ११ ॥

अध्वर्यो इति । द्रवय । त्वम् । सोमम् । इन्द्रः । पिपासति ।
उप । नूनम् । युयुजे । वृषणा । हरी इति । आ । च । जगाम । वृत्रऽहा ॥ ११ ॥

अध्वर्यू ! तूं धांवत जा; हा सोमरस प्राशन करण्यासाठी इन्द्र उत्सुक झाला आहे; आणि म्हणून आपले बलाढ्य अश्व झटपट जोडून तो वृत्रनाशन इन्द्र तडक येथें येऊन पोहोचला आहे. ११.



स्व॒यं चि॒त्स म॑न्यते॒ दाशु॑रि॒र्जनो॒ यत्रा॒ सोम॑स्य तृ॒म्पसि॑ ।
इ॒दं ते॒ अन्नं॒ युज्यं॒ समु॑क्षितं॒ तस्येहि॒ प्र द्र॑वा॒ पिब॑ ॥ १२ ॥

स्वयम् । चित् । सः । मन्यते । दाशुरिः । जनः । यत्र । सोमस्य । तृम्पसि ।
इदम् । ते । अन्नम् । युज्यम् । सम्ऽउक्षितम् । तस्य । आ । इहि । प्र । द्रव । पिब ॥ १२ ॥

ज्या भक्तांच्या घरीं तू सोमरसाच्या प्राशनाने तृप्त होतोस, तो भक्त खरोखरच आपल्या स्वतःला धन्य समजतो; हा तुझा प्रिय नैवेद्य येथें ओतून ठेवला आहे. तर इकडे धांवत ये, आणि तो प्राशन कर. १२.



र॒थे॒ष्ठाया॑ध्वर्यवः॒ सोम॒मिन्द्रा॑य सोतन ।
अधि॑ ब्र॒ध्नस्याद्र॑यो॒ वि च॑क्षते सु॒न्वन्तो॑ दा॒श्व॑ध्वरम् ॥ १३ ॥

रथेऽसथाय । अध्वर्यवः । सोमम् । इन्द्राय । सोतन ।
अधि । ब्रध्नस्य । अद्रयः । वि । चक्षते । सुन्वन्तः । दाशुऽअध्वरम् ॥ १३ ॥

अत्यंत श्रेष्ठ योद्धा जो इन्द्र त्याच्या प्रीत्यर्थ, हे अध्वर्यूंनो, तुम्हीं सोमरस पिळून सिद्ध करा. पहा, सोमरस पिळणारे ग्रावे, जगदाधार इन्द्राचा दानप्रचुर यज्ञ हाच आहे असें जगाला आपल्या ध्वनीने स्पष्टपणे सांगत आहेत. १३.



उप॑ ब्र॒ध्नं वा॒वाता॒ वृष॑णा॒ हरी॒ इन्द्र॑म॒पसु॑ वक्षतः ।
अ॒र्वाङ्चं॑ त्वा॒ सप्त॑योऽध्वर॒श्रियो॒ वह॑न्तु॒ सव॒नेदुप॑ ॥ १४ ॥

उप । ब्रध्नम् । ववाता । वृषणा । हरी इति । इन्द्रम् । अपऽसु । वक्षतः ।
अर्वाञ्चम् । त्वा । सप्तयः । अध्वरऽश्रियः । वहन्तु । सवना । इत् । उप ॥ १४ ॥

वीर्यशाली सेवक जे दोन हरिद्वर्ण अश्व ते त्या जगदाधार इन्द्राला यज्ञकर्मसमारंभांत घेऊन जात आहेत; तर हे इंद्रा, अध्वरयागाची शोभाच असे जे तुझे शीघ्रगामी अश्व ते तुजला आमच्या सोमसवन प्रसंगीं इकडे घेऊन येवोत. १४.



प्र पू॒षणं॑ वृणीमहे॒ युज्या॑य पुरू॒वसु॑म् ।
स श॑क्र शिक्ष पुरुहूत नो धि॒या तुजे॑ रा॒ये वि॑मोचन ॥ १५ ॥

प्र । पूषणम् । वृणीमहे । युज्याय । पुरुऽवसुम् ।
सः । शक्र । शिक्ष । पुरुऽहूत । नः । धिया । तुजे । राये । विऽमोचन ॥ १५ ॥

अगणितधन जो विश्वपोषक पूषा त्याच्या सहवासासाठी आम्ही त्याची विनवणी करीत आहों. हे सकलजनाहूता सर्वसमर्था पूषा, हे संकटमोचना, बुद्धिबलानें संकटांशी झगडण्याचें, आणि ऐश्वर्य प्राप्त करून घेण्याचे आम्हांला शिक्षण दे. १५.



सं नः॑ शिशीहि भु॒रिजो॑रिव क्षु॒रं रास्व॑ रा॒यो वि॑मोचन ।
त्वे तन्नः॑ सु॒वेद॑मु॒स्रियं॒ वसु॒ यं त्वं हि॒नोषि॒ मर्त्य॑म् ॥ १६ ॥

सम् । नः । शिशीहि । भुरिजोःऽइव । क्षुरम् । रास्व । रायः । विऽमोचन ।
त्वे इति । तत् । नः । सुऽवेदम् । उस्रियम् । वसु । यम् । त्वम् । हिनोषि । मर्त्यम् ॥ १६ ॥

दोन्ही हातांत सुरी (क्षुर) धरून तिला घांसावे त्याप्रमाणें आम्हांला संकटरूप दगडावर घांसून तीक्ष्ण कर. हे दुःखविमोचना, आम्हाला अक्षय संपत्ति अर्पण कर. जें उषःकालच्या कान्तिप्रमाणें तेजस्वी आहे, आणि जें मर्त्य मानवांकडे तूं सहज विखरून देतोस तें तुजजवळचे अक्षय धन आम्हाला लाभ होवो, १६.



वेमि॑ त्वा पूषन्नृ॒ञ्जसे॒ वेमि॒ स्तोत॑व आघृणे ।
न तस्य॑ वे॒म्यर॑णं॒ हि तद्व॑सो स्तु॒षे प॒ज्राय॒ साम्ने॑ ॥ १७ ॥

वेमि । त्वा । पूषन् । ऋञ्जसे । वेमि । स्तोतवे । आघृणे ।
न । तस्य । वेमि । अरणम् । हि । तत् । वसो इति । स्तुषे । पज्राय । साम्ने ॥ १७ ॥

हे विश्वपोषका तुझे अनुरंजन करण्याची मला उत्कंठा आहे, आणि तुझे स्तवन करण्याचीही उत्कंठा असणार; परंतु हे अतुल दीप्तिमान पूषा, या व्यतिरिक्त जे असेल ते मला नको. ते भलते सलतेच असतें; हें दिव्यधना, सामप्रिय पज्राकरितां मीं तुझे गुणसकीर्तन करीत आहे. १७.



परा॒ गावो॒ यव॑सं॒ कच्चि॑दाघृणे॒ नित्यं॒ रेक्णो॑ अमर्त्य ।
अ॒स्माकं॑ पूषन्नवि॒ता शि॒वो भ॑व॒ मंहि॑ष्ठो॒ वाज॑सातये ॥ १८ ॥

परा । गावः । यवसम् । कत् । चित् । आघृणे । नित्यम् । रेक्णः । अमर्त्य ।
अस्माकम् । पूषन् । अविता । शिवः । भव । मंहिष्ठः । वाजऽसातये ॥ १८ ॥

आमच्या धेनू दूर कोठेंतरी तृणभक्षणार्थ गेलेल्या आहेत; हे अतुलदीप्तिमंता हे मृत्युरहिता, माझें कायमचे धन काय तें हेच; तर हे पूषा तूं आमचा कल्याणकारी संरक्षक हो, आणि सत्वप्राप्तीच्या झगड्यांत अत्यंत औदार्य प्रकट कर. १८.



स्थू॒रं राधः॑ श॒ताश्वं॑ कुरु॒ङ्गस्य॒ दिवि॑ष्टिषु ।
राज्ङ॑स्त्वे॒षस्य॑ सु॒भग॑स्य रा॒तिषु॑ तु॒र्वशे॑ष्वमन्महि ॥ १९ ॥

स्थूरम् । राधः । शतऽअश्वम् । कुरुङ्गस्य । दिविष्टिषु ।
राज्ञः । त्वेषस्य । सुऽभगस्य । रातिषु । तुर्वशेषु । अमन्महि ॥ १९ ॥

तेजस्वी आणि भाग्यशाली अशा कुरंग राजाच्या स्वर्गप्रद यज्ञांत तुर्वश राजांच्या देणग्यांमध्ये मला शंभर अश्वांची भरभक्कम देणगी मिळाली. १९.



धी॒भिः सा॒तानि॑ का॒ण्वस्य॑ वा॒जिनः॑ प्रि॒यमे॑धैर॒भिद्यु॑भिः ।
ष॒ष्टिं स॒हस्रानु॒ निर्म॑जामजे॒ निर्यू॒थानि॒ गवा॒मृषिः॑ ॥ २० ॥

धीभिः । सातानि । काण्वस्य । वाजिनः । प्रियऽमेधैः । अभिद्युऽभिः ।
षष्टिम् । सहस्रा । अनु । निःऽमजाम् । अजे । निः । यूथानि । गवाम् । ऋषिः ॥ २० ॥

कण्व कुलोत्पन्नाच्या सत्वाढ्य वंशजाच्या बुद्धिबलांनी स्वर्लोकप्रद यज्ञांत प्रियमेधांनीं अनेक देणग्या मिळविल्या; त्यांत अगदीं निर्दोष अशा साठ हजार गाईंची खिल्लारे होतीं. तीं सर्व तो ऋषि घेऊन गेला. २०.



वृ॒क्षाश्चि॑न्मे अभिपि॒त्वे अ॑रारणुः ।
गां भ॑जन्त मे॒हनाश्वं॑ भजन्त मे॒हना॑ ॥ २१ ॥

वृक्षाः । चित् । मे । अभिऽपित्वे । अररणुः ।
गाम् । भजन्त । मेहना । अश्वम् । भजन्त । मेहना ॥ २१ ॥

माझें आगमन होतांच वृक्ष देखील आनंदाच्या कडकडाटाने उद्गारले कीं, पहा हे भक्तजन अपूर्व देणगीनें धेनू मिळवून बसले आणि अश्वही मिळवून बसले. २१



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ५ ( अश्विनीकुमारसूक्त, कशु चैद्य दानस्तुती)

ऋषी - ब्रह्मातिथि काण्व : देवता - १-३६, ३७ पूर्वार्ध अश्विनीकुमार; ३७ उत्तरार्ध, ३८-३९ कशु चैद्य दानस्तुती;
छंद - १-३६ गायत्री; ३७-३८ बृहती; ३९ अनुष्टुभ्



दू॒रादि॒हेव॒ यत्स॒त्य॑रु॒णप्सु॒रशि॑श्वितत् । वि भा॒नुं वि॒श्वधा॑तनत् ॥ १ ॥

दूरात् । इहऽइव । यत् । सती । अरुणऽप्सुः । अशिश्वितत् ।
वि । भानुम् । विश्वधा । अतनत् ॥ १ ॥

सत्‌चारित्र्य आणि आरक्तवर्ण उषा देवीने दूर अंतरावरून परंतु येथें यज्ञ‍मण्डपांतच असल्याप्रमाणे आपली प्रभा उत्फुल्ल केली आणि आपले किरण चोहींकडे पसरून दिले. १.



नृ॒वद्द॑स्रा मनो॒युजा॒ रथे॑न पृथु॒पाज॑सा । सचे॑थे अश्विनो॒षस॑म् ॥ २ ॥

नृऽवत् । दस्रा । मनःऽयुजा । रथेन । पृथुऽपाजसा ।
सचेथे इति । अश्विना । उषसम् ॥ २ ॥

वीरोचितवृत्ति धारण करणारे असे तुम्ही, आपल्या इच्छामात्रेकरून जोडल्या जाणाऱ्या ज्वलत्‌तेजोमय रथांत बसून, हे अद्‌भुत पराक्रमी अश्वीहो, उषादेवीबरोबरच राहत असतां. २.



यु॒वाभ्यां॑ वाजिनीवसू॒ प्रति॒ स्तोमा॑ अदृक्षत । वाचं॑ दू॒तो यथो॑हिषे ॥ ३ ॥

युवाभ्याम् । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । प्रति । स्तोमाः । अदृक्षत ।
वाचम् । दूतः । यथा । ओहिषे ॥ ३ ॥

सत्वसामर्थ्यसंपन्न देवांनो, भक्ताची स्तवनें तुम्हां उभयतांना प्रत्यक्ष दिसतात म्हणून मीही तशीच स्तुति दूताप्रमाणे तुम्हां उभयतांकडे अंतःकरणपूर्वक पोहोचवली आहे. ३.



पु॒रु॒प्रि॒या ण॑ ऊ॒तये॑ पुरुम॒न्द्रा पु॑रू॒वसू॑ । स्तु॒षे कण्वा॑सो अ॒श्विना॑ ॥ ४ ॥

पुरुऽप्रिया । नः । ऊतये । पुरुऽमन्द्रा । पुरुवसू इति पुरुऽवसू ।
स्तुषे । कण्वासः । अश्विना ॥ ४ ॥

सर्वांना प्रिय, सकल आनंदानी युक्त, अपारनिधींनी संपन्न अशा अश्वीदेवांनो, आम्ही कण्वकुलोत्पन्न भक्त सहाय्यासाठीं तुमचा धांवा करीत आहो. ४.



मंहि॑ष्ठा वाज॒सात॑मे॒षय॑न्ता शु॒भस्पती॑ । गन्ता॑रा दा॒शुषो॑ गृ॒हम् ॥ ५ ॥

मंहिष्ठा । वाजऽसातमा । इषयन्ता । शुभः । पती इति ।
गन्तारा । दाशुषः । गृहम् ॥ ५ ॥

तुम्ही अत्यंत दानशील आणि पूज्य आहांत. तुम्ही सत्वसामर्थ उत्तम रीतीनें प्राप्त करून देणारे, मनाला उत्साह आणणारे आणि मंगलाधिपति असूनही भक्ताच्या गृही स्वतः जातां. ५.



ता सु॑दे॒वाय॑ दा॒शुषे॑ सुमे॒धामवि॑तारिणीम् । घृ॒तैर्गव्यू॑तिमुक्षतम् ॥ ६ ॥

ता । सुऽदेवाय । दाशुषे । सुऽमेधाम् । अविऽतारिणीम् ।
घृतैः । गव्यूतिम् । उक्षतम् ॥ ६ ॥

अशा प्रकारचे तुम्ही आहांत, तर जिला अपाय होण्याचा संभवच नाही अशा सद्बुद्धीची देणगी सुदेव भक्ताला द्या; त्याच्या धेनूंचे निवासस्थान घृतवृष्टीनें भिजवून टाका. ६.



आ नः॒ स्तोम॒मुप॑ द्र॒वत्तूयं॑ श्ये॒नेभि॑रा॒शुभिः॑ । या॒तमश्वे॑भिरश्विना ॥ ७ ॥

आ । नः । स्तोमम् । उप । द्रवत् । तूयम् । श्येनेभिः । आशुऽभिः ।
यातम् । अश्वेभिः । अश्विना ॥ ७ ॥

ससाण्याप्रमाणें द्रुतगतीने धावणाऱ्या अश्वांसह, हे अश्वीहो, तुम्ही आमच्या स्तवनांकडे त्वरेने धांवा. ७.



येभि॑स्ति॒स्रः प॑रा॒वतो॑ दि॒वो विश्वा॑नि रोच॒ना । त्रीँर॒क्तून्प॑रि॒दीय॑थः ॥ ८ ॥

येभिः । तिस्रः । पराऽवतः । दिवः । विश्वानि । रोचना ।
त्रीन् । अक्तून् । परिऽदीयथः ॥ ८ ॥

दूर अंतरावरील द्यूलोकाची तिन्ही स्थानें, त्यांतील यच्चावत् तेजोगोल आणि पृथ्वीवरील तमोमय प्रदेश यांच्या भोंवती तुम्ही ज्या अश्वांच्या योगानें भ्रमण करितां त्यांच्यासह आमच्याकडे या. ८.



उ॒त नो॒ गोम॑ती॒रिष॑ उ॒त सा॒तीर॑हर्विदा । वि प॒थः सा॒तये॑ सितम् ॥ ९ ॥

उत । नः । गोऽमतीः । इषः । उत । सातीः । अहःऽविदा ।
वि । पथः । सातये । सितम् ॥ ९ ॥

प्रकाश धेनूंनी संपन्न करील असा उत्साह आणि अभीष्टप्राप्ति या गोष्टी आम्हांला साध्य करून घेता याव्या म्हणून, हे दिनप्रकाशाचा लाभ करून देणाऱ्या अश्वीदेवांनो ! आमचे मार्ग मोकळे करा. ९.



आ नो॒ गोम॑न्तमश्विना सु॒वीरं॑ सु॒रथं॑ र॒यिम् । वो॒ळ्हमश्वा॑वती॒रिषः॑ ॥ १० ॥

आ । नः । गोऽमन्तम् । अश्विना । सुऽवीरम् । सुऽरथम् । रयिम् ।
वोळ्हम् । अश्वऽवतीः । इषः ॥ १० ॥

अश्वीदेवहो ! गोसंपन्न उत्तम वीर आणि उत्तम रथ यांनी परिप्लुत असें वैभव, आणि अश्वसंपन्न करणारा उत्साह अशी देणगी तुम्ही घेऊन या. १०.



वा॒वृ॒धा॒ना शु॑भस्पती दस्रा॒ हिर॑ण्यवर्तनी । पिब॑तं सो॒म्यं मधु॑ ॥ ११ ॥

ववृधाना । शुभः । पती इति । दस्रा । हिरण्यवर्तनी इति हिरण्यऽवर्तनी ।
पिबतम् । सोम्यम् । मधु ॥ ११ ॥

आनंदोत्फुल्ल, मंगलाधीश, अद्‌भुतचारित्र्य, आणि सुवर्णरथारूढ अश्वीदेवहो, तुम्ही मधुर सोमरस प्राशन करा. ११.



अ॒स्मभ्यं॑ वाजिनीवसू म॒घव॑द्भ्यश्च स॒प्रथः॑ । छ॒र्दिर्य॑न्त॒मदा॑भ्यम् ॥ १२ ॥

अस्मभ्यम् । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । मघवत्ऽभ्यः । च । सऽप्रथः ।
छर्दिः । यन्तम् । अदाभ्यम् ॥ १२ ॥

सत्वसामर्थ्याच्या ऐश्वर्याने मंडित असणाऱ्या अश्वीहो, आम्हाला आणि आमच्या दानशाली यजमानांना तुमचे विस्तीर्ण आणि अभंग असे जें निवासस्थान तें प्राप्त करून द्या. १२.



नि षु ब्रह्म॒ जना॑नां॒ यावि॑ष्टं॒ तूय॒मा ग॑तम् । मो ष्व१॒॑न्याँ उपा॑रतम् ॥ १३ ॥

नि । सु । ब्रह्म । जनानाम् । या । अविष्टम् । तूयम् । आ । गतम् ।
मो इति । सु । अन्यान् । उप । अरतम् ॥ १३ ॥

आमच्या मंडळीने म्हटलेले प्रार्थनासूक्त गोड मानून घेणारे तुम्ही आमच्याकडे त्वरेने आगमन करा; दुसऱ्या कोणाकडेही जाऊं नका. १३.



अ॒स्य पि॑बतमश्विना यु॒वं मद॑स्य॒ चारु॑णः । मध्वो॑ रा॒तस्य॑ धिष्ण्या ॥ १४ ॥

अस्य । पिबतम् । अश्विना । युवम् । मदस्य । चारुणः ।
मध्वः । रातस्य । धिष्ण्या ॥ १४ ॥

हे अश्वीहो, तल्लीन करणारे आणि तुम्हांला अर्पण केलेलें जें सुंदर मधुर पेय त्याचा, हे बुद्धिगम्य देवांनो, तुम्ही आस्वाद घ्या. १४.



अ॒स्मे आ व॑हतं र॒यिं श॒तव॑न्तं सह॒स्रिण॑म् । पु॒रु॒क्षुं वि॒श्वधा॑यसम् ॥ १५ ॥

अस्मे इति । आ । वहतम् । रयिम् । शतऽवन्तम् । सहस्रिणम् ।
पुरुऽक्षुम् । विश्वऽधायसम् ॥ १५ ॥

शेकडों, हजार प्रकारचे जें धन आहे, सकलबलसंपन्न आणि सकल पोषक जें वैभव आहे तें आम्हांला अर्पण करा. १५.



पु॒रु॒त्रा चि॒द्धि वां॑ नरा वि॒ह्वय॑न्ते मनी॒षिणः॑ । वा॒घद्भि॑रश्वि॒ना ग॑तम् ॥ १६ ॥

पुरुऽत्रा । चित् । हि । वाम् । नरा । विऽह्वयन्ते । मनीषिणः ।
वाघत्ऽभिः । अश्विना । आ । गतम् ॥ १६ ॥

खरोखर पुष्कळ ठिकाणीं, हे वीरांनो, मननशील भक्त आपल्या स्तोतृजनांसह तुमचा धांवा परोपरीने करीत असतात. तर हे अश्वीहो, तुम्ही त्यांच्याकडे आगमन करा. १६.



जना॑सो वृ॒क्तब॑र्हिषो ह॒विष्म॑न्तो अरं॒कृतः॑ । यु॒वां ह॑वन्ते अश्विना ॥ १७ ॥

जनासः । वृक्तऽबर्हिषः । हविष्मन्तः । अरम्ऽकृतः ।
युवाम् । हवन्ते । अश्विना ॥ १७ ॥

कुशासन सिद्ध करून आणि हवि हातांत घेऊन सर्व तयारीने सज्ज झालेले भक्तजन, हे अश्वीहो, तुम्हांला हांक मारीत आहेत. १७.



अ॒स्माक॑म॒द्य वा॑म॒यं स्तोमो॒ वाहि॑ष्ठो॒ अन्त॑मः । यु॒वाभ्यां॑ भूत्वश्विना ॥ १८ ॥

अस्माकम् । अद्य । वाम् । अयम् । स्तोमः । वाहिष्ठः । अन्तमः ।
युवाभ्याम् । भूतु । अश्विना ॥ १८ ॥

तर तुम्हांला अत्यंत त्वरेने इकडे आणण्याला समर्थ असा आमचा हा धांवा, हे अश्वीहो, तुम्हां उभयतांच्या अंतःकरणांत जाऊन भिडो. १८.



यो ह॑ वां॒ मधु॑नो॒ दृति॒राहि॑तो रथ॒चर्ष॑णे । ततः॑ पिबतमश्विना ॥ १९ ॥

यः । ह । वाम् । मधुनः । दृतिः । आऽहितः । रथऽचर्षणे ।
ततः । पिबतम् । अश्विना ॥ १९ ॥

तुमच्यासाठी हा जो मधानें भरलेला बुधला तुमच्या रथाच्या मार्गावर ठेवलेला आहे त्यांतील मध, हे अश्वीहो, तुम्ही प्राशन करा. १९.



तेन॑ नो वाजिनीवसू॒ पश्वे॑ तो॒काय॒ शं गवे॑ । वह॑तं॒ पीव॑री॒रिषः॑ ॥ २० ॥

तेन । नः । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । पश्वे । तोकाय । शम् । गवे ।
वहतम् । पीवरीः । इषः ॥ २० ॥

आणि त्यानें प्रसन्न होऊन, हे सत्वैश्वर्यवान् देवांनो, आमच्या पशुंना, आमच्या लेकरांना आणि आमच्या धेनूंना पुष्टि मिळेल असा उत्साह उत्पन्न करा. २०.



उ॒त नो॑ दि॒व्या इष॑ उ॒त सिन्धूँ॑रहर्विदा । अप॒ द्वारे॑व वर्षथः ॥ २१ ॥

उत । नः । दिव्याः । इषः । उत । सिन्धून् । अहःऽविदा ।
अप । द्वाराऽइव । वर्षथः ॥ २१ ॥

आणखी हे दिनप्रवर्तकांनों ! आमच्यासाठी तुम्ही दिव्य उत्साह आणि उदकपूर्ण नद्या यांचा प्रवाह द्वाराने बाहेर लोटावा त्याप्रमाणें धों धों वर्षाव करतां. २१.



क॒दा वां॑ तौ॒ग्र्यो वि॑धत्समु॒द्रे ज॑हि॒तो न॑रा । यद्वां॒ रथो॒ विभि॒ष्पता॑त् ॥ २२ ॥

कदा । वाम् । तौग्र्यः । विधत् । समुद्रे । जहितः । नरा ।
यत् । वाम् । रथः । विऽभिः । पतात् ॥ २२ ॥

तुग्राचा पुत्र समुद्रांत फेकून दिलेला होता, त्यानें तुमची अशी कोणती सेवा केली कीं, हे वीरांनो, तुमचा रथ पंखानी उडाल्याप्रमाणें त्याच्याकडे झटकन् उडून जावा ? २२.



यु॒वं कण्वा॑य नासत्या॒ ऋपि॑रिप्ताय ह॒र्म्ये । शश्व॑दू॒तीर्द॑शस्यथः ॥ २३ ॥

युवम् । कण्वाय । नासत्या । अपिऽरिप्ताय । हर्म्ये ।
शश्वत् । ऊतीः । दशस्यथः ॥ २३ ॥

तसेच दुष्टांनी सतावून सोडलेल्या कण्वाला एका मोठ्या वाड्यांत कोण्डलें होतें तेथें त्याला तुम्ही नाना प्रकारचे सहाय्य दिलेत. २३.



ताभि॒रा या॑तमू॒तिभि॒र्नव्य॑सीभिः सुश॒स्तिभिः॑ । यद्वां॑ वृषण्वसू हु॒वे ॥ २४ ॥

ताभिः । आ । यातम् । ऊतिऽभिः । नव्यसीभिः । सुशस्तिऽभिः ।
यत् । वाम् । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू । हुवे ॥ २४ ॥

तर त्याच अपूर्व आणि प्रशंसनीय सहाय्यांसह तुम्ही आमच्याकडे या. आणि म्हणूनच, शौर्य-धनाचा वर्षाव करणाऱ्या देवांनो, मी तुमचा धांवा करीत आहे. २४.



यथा॑ चि॒त्कण्व॒माव॑तं प्रि॒यमे॑धमुपस्तु॒तम् । अत्रिं॑ शि॒ञ्जार॑मश्विना ॥ २५ ॥

यथा । चित् । कण्वम् । आवतम् । प्रियऽमेधम् । उपऽस्तुतम् ।
अत्रिम् । शिञ्जारम् । अश्विना ॥ २५ ॥

ज्याप्रमाणें तुम्ही कण्वावर कृपा केलीत, किंवा माननीय जो प्रियमेध, किंवा अत्रि, किंवा शिंजार यांना, हे अश्वीहो, सहाय केलेत; २५



यथो॒त कृत्व्ये॒ धनें॒ऽशुं गोष्व॒गस्त्य॑म् । यथा॒ वाजे॑षु॒ सोभ॑रिम् ॥ २६ ॥

यथा । उत । कृत्व्ये । धने । अंशुम् । गोषु । अगस्त्यम् ।
यथा । वाजेषु । सोभरिम् ॥ २६ ॥

आणि ज्याप्रमाणे युद्ध हें प्राप्त कर्तव्य झाले असतां अंशूला सहाय्य दिलेत, गोधन मिळविण्यांत अगस्त्याला, आणि सत्वरक्षणाच्या झटापटींत सोभरीला यशस्वी केलेत; २६.



ए॒ताव॑द्वां वृषण्वसू॒ अतो॑ वा॒ भूयो॑ अश्विना । गृ॒णन्तः॑ सु॒म्नमी॑महे ॥ २७ ॥

एतावत् । वाम् । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू । अतः । वा । भूयः । अश्विना ।
गृणन्तः । सुम्नम् । ईमहे ॥ २७ ॥

त्याचप्रमाणे, हे वीर्यधन देवांनो, किंवा त्याच्याहीपेक्षां अधिक भावनेने आम्ही तुमचे गुणानुवाद गाऊन तुमच्याजवळ आमच्या कल्याणाची याचना करीत आहों. २७.



रथं॒ हिर॑ण्यवन्धुरं॒ हिर॑ण्याभीशुमश्विना । आ हि स्थाथो॑ दिवि॒स्पृश॑म् ॥ २८ ॥

रथम् । हिरण्यऽवन्धुरम् । हिरण्यऽअभीशुम् । अश्विना ।
आ । हि । स्थाथः । दिविऽस्पृशम् ॥ २८ ॥

ज्याची धुरा सुवर्णाची, घोड्याचा लगामही सुवर्णाचा, आणि जो आकाशाला जाऊन भिडतो, अशा रथांत तुम्ही आरोहण करा. २८.



हि॒र॒ण्ययी॑ वां॒ रभि॑री॒षा अक्षो॑ हिर॒ण्ययः॑ । उ॒भा च॒क्रा हि॑र॒ण्यया॑ ॥ २९ ॥

हिरण्ययीम् । वाम् । रभिः । ईषा । अक्षः । हिरण्ययः ।
उभा । चक्रा । हिरण्यया ॥ २९ ॥

तुमच्या रथाची बसण्याची साटी सुवर्णाची, कणा सुवर्णाचा, आणि त्याचप्रमाणे दोन्ही चाके देखील सुवर्णाचींच आहेत. २९.



तेन॑ नो वाजिनीवसू परा॒वत॑श्चि॒दा ग॑तम् । उपे॒मां सु॑ष्टु॒तिं मम॑ ॥ ३० ॥

तेन । नः । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । पराऽवतः । चित् । आ । गतम् ।
उप । इमाम् । सुऽस्तुतिम् । मम ॥ ३० ॥

तर हे सत्वधनाढ्य देवांनो, अशा रथांत आरोहण करून, तुम्ही दूरच्या लोकांत असला तरी तेथूनही या माझ्या प्रेमळ स्तवनाकडे आगमन करा. ३०.



आ व॑हेथे परा॒कात्पू॒र्वीर॒श्नन्ता॑वश्विना । इषो॒ दासी॑रमर्त्या ॥ ३१ ॥

आ । वहेथे इति । पराकात् । पूर्वीः । अश्नन्तौ । अश्विना ।
इषः । दासीः । अमर्त्या ॥ ३१ ॥

दूरच्या लोकांतून येत असतांना अधार्मिक लोकांच्या उत्साहातिरेकाला दडपून टाकून त्यांना इकडे धरून आणा. ३१.



आ नो॑ द्यु॒म्नैरा श्रवो॑भि॒रा रा॒या या॑तमश्विना । पुरु॑श्चन्द्रा॒ नास॑त्या ॥ ३२ ॥

आ । नः । द्युम्नैः । आ । श्रवःऽभिः । आ । राया । यातम् । अश्विना ।
पुरुऽचन्द्रा । नासत्या ॥ ३२ ॥

आणि दैदीयमान ऐश्वर्यांसह, आपल्या विश्रुतयशांसह आणि अक्षयधनासह हे अश्वींनो, हे सकलाल्हादप्रद सत्यस्वरूप देवांनों तुम्ही आमच्याकडे आगमन करा. ३२.



एह वां॑ प्रुषि॒तप्स॑वो॒ वयो॑ वहन्तु प॒र्णिनः॑ । अच्छा॑ स्वध्व॒रं जन॑म् ॥ ३३ ॥

आ । इह । वाम् । प्रुषितऽप्सवः । वयः । वहन्तु । पर्णिनः ।
अच्छ । सुऽअध्वरम् । जनम् ॥ ३३ ॥

तुमचे ठिपकेदार तुळतुळीत आणि पंख असलेले अश्व, येथें मनोभावाने अध्वरयाग करणाऱ्या भक्ताकडे तुम्हाला घेऊन येवोत. ३३.



रथं॑ वा॒मनु॑गायसं॒ य इ॒षा वर्त॑ते स॒ह । न च॒क्रम॒भि बा॑धते ॥ ३४ ॥

रथम् । वाम् । अनुऽगायसम् । यः । इषा । वर्तते । सह ।
न । चक्रम् । अभि । बाधते ॥ ३४ ॥

तुमचा रथ, कीं ज्याच्या मागें भक्तजन गात चाललेले असतात, आणि जो नेहमी भक्ताच्या मनोत्साहाबरोबरच राहतो त्या तुमच्या रथाचे चाक कधीही अडत नाहीं. ३४.



हि॒र॒ण्यये॑न॒ रथे॑न द्र॒वत्पा॑णिभि॒रश्वैः॑ । धीज॑वना॒ नास॑त्या ॥ ३५ ॥

हिरण्ययेन । रथेन । द्रवत्पाणिऽभिः । अश्वैः ।
धीऽजवना । नासत्या ॥ ३५ ॥

अशा त्या सुवर्णमय, आणि शीघ्रगामी अश्व जोडलेल्या रथाच्या योगाने, हे सत्यस्वरूप देवांनों, तुम्ही मनोवेगी झाला आहात. ३५.



यु॒वं मृ॒गं जा॑गृ॒वांसं॒ स्वद॑थो वा वृषण्वसू । ता नः॑ पृङ्क्तमि॒षा र॒यिम् ॥ ३६ ॥

युवम् । मृगम् । जागृऽवांसम् । स्वदथः । वा । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ।
ता । नः । पृङ्क्तम् । इषा । रयिम् ॥ ३६ ॥

सदैव जागरूक राहणाऱ्या जंगली श्वापदाचेंही तुम्ही चोज करतां, तर हे वीर्यधनाढ्य देवांनो, आमच्याही शाश्वत संपत्तीला उत्साहाची जोड द्या. २६.



ता मे॑ अश्विना सनी॒नां वि॒द्यातं॒ नवा॑नाम् ।
यथा॑ चिच्चै॒द्यः क॒शुः श॒तमुष्ट्रा॑नां॒ दद॑त्स॒हस्रा॒ दश॒ गोना॑म् ॥ ३७ ॥

ता । मे । अश्विना । सनीनाम् । विद्यातम् । नवानाम् ।
यथा । चित् । चैद्यः । कशुः । शतम् । उष्ट्रानाम् । ददत् । सहस्रा । दश । गोनाम् ॥ ३७ ॥

हे अश्वीहो ! मला अशा नवीन देणग्यांचा लाभ करून द्या कीं जेणेकरून चेदी देशाचा कशु राजा शंभर उंट आणि दहा हजार गाई धार्मिक जनांना देत जाईल. ३७.



यो मे॒ हिर॑ण्यसंदृशो॒ दश॒ राज्ङो॒ अमं॑हत ।
अ॒ध॒स्प॒दा इच्चै॒द्यस्य॑ कृ॒ष्टय॑श्चर्म॒म्ना अ॒भितो॒ जनाः॑ ॥ ३८ ॥

यः । मे । हिरण्यऽसन्दृशः । दश । राज्ञः । अमंहत ।
अधःऽपदाः । इत् । चैद्यस्य । कृष्टयः । चर्मऽम्नाः । अभितः । जनाः ॥ ३८ ॥

ज्याने सुवर्णाप्रमाणें अंगकांतीच्या दशदेशच्या राजांकडून माझा सन्मान करविला, त्या चैद्य राजाच्या चरणाखालींच सर्व जन आहेत. त्याच्या भोंवतीं ढालाईत सैनिकांची नेहमीच गर्दी असते. ३८.



माकि॑रे॒ना प॒था गा॒द्येने॒मे यन्ति॑ चे॒दयः॑ ।
अ॒न्यो नेत्सू॒रिरोह॑ते भूरि॒दाव॑त्तरो॒ जनः॑ ॥ ३९ ॥

माकिः । एना । पथा । गात् । येन । इमे । यन्ति । चेदयः ।
अन्यः । न । इत् । सूरिः । ओहते । भूरिदावत्ऽतरः । जनः ॥ ३९ ॥

हे चेदीचे राजे ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने कोणीही जाऊं शकणार नाहीं; आणि त्यांच्या शिवाय दुसरा एखादा लोकनायक, किंवा ज्यास्त दानशूर असा मनुष्य आहे असें कोणी समजत नाहीं. ३९.



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ६ ( इंद्रसूक्त, तिरिंदर पार्शव्य दानस्तुती )

ऋषी - वत्स काण्व : देवता - १-४५ इंद्र; ४६-४८ तिरिंदर पार्शव्य दानस्तुती : छंद - गायत्री



म॒हाँ इन्द्रो॒ य ओज॑सा प॒र्जन्यो॑ वृष्टि॒माँ इ॑व । स्तोमै॑र्व॒त्सस्य॑ वावृधे ॥ १ ॥

महान् । इन्द्रः । यः । ओजसा । पर्जन्यः । वृष्टिमान्ऽइव ।
स्तोमैः । वत्सस्य । ववृधे ॥ १ ॥

परमथोर इन्द्र जो वर्षाव करणा-या मेघाप्रभाणें मनोरथांची वृष्टि करणारा आहें, तो मज वत्साच्या स्तवनांनी आनंदाने प्रफुल्ल झाला. १.



प्र॒जामृ॒तस्य॒ पिप्र॑तः॒ प्र यद्भर॑न्त॒ वह्न॑यः । विप्रा॑ ऋ॒तस्य॒ वाह॑सा ॥ २ ॥
कण्वा॒ इन्द्रं॒ यदक्र॑त॒ स्तोमै॑र्य॒ज्ङस्य॒ साध॑नम् । जा॒मि ब्रु॑वत॒ आयु॑धम् ॥ ३ ॥

प्रऽजाम् । ऋतस्य । पिप्रतः । प्र । यत् । भरन्त । वह्नयः ।
विप्राः । ऋतस्य । वाहसा ॥ २ ॥
कण्वाः । इन्द्रम् । यत् । अक्रत । स्तोमैः । यज्ञस्य । साधनम् ।
जामि । ब्रुवते । आयुधम् ॥ ३ ॥

सनातन सद्धर्माच्या संततीला संतुष्ट करणारे जे स्तवनज्ञ ऋत्विज्, त्यांनीं सद्धर्माच्या धाराप्रवाहानें जेव्हां आपली सेवा अर्पण केली; जेव्हां कण्वांनी यज्ञाचे साधन म्हणून इन्द्राला स्तवनांनी प्रसन्न केलें, तेव्हां आयुध हेंच त्यांचें आप्त ठरलें. २-३.



सम॑स्य म॒न्यवे॒ विशो॒ विश्वा॑ नमन्त कृ॒ष्टयः॑ । स॒मु॒द्राये॑व॒ सिन्ध॑वः ॥ ४ ॥

सम् । अस्य । मन्यवे । विशः । विश्वाः । नमन्त । कृष्टयः ।
समुद्रायऽइव । सिन्धवः ॥ ४ ॥

ज्याच्या आवेशापुढे सर्व उद्योगरत जन असे नम्र होतात की जशा समुद्रापुढे नद्याच. ४.



ओज॒स्तद॑स्य तित्विष उ॒भे यत्स॒मव॑र्तयत् । इन्द्र॒श्चर्मे॑व॒ रोद॑सी ॥ ५ ॥

ओजः । तत् । अस्य । तित्विषे । उभे इति । यत् । सम्ऽअवर्तयत् ।
इन्द्रः । चर्मऽइव । रोदसी इति ॥ ५ ॥

तेव्हांच ह्या इन्द्राची ओजस्विता चमकली कीं जेव्हां पृथ्वी आणि आकाश हे दोन्ही लोक त्यानें चामड्याप्रमाणें एकत्र शिवून टाकले. ५.



वि चि॑द्वृ॒त्रस्य॒ दोध॑तो॒ वज्रे॑ण श॒तप॑र्वणा । शिरो॑ बिभेद वृ॒ष्णिना॑ ॥ ६ ॥

वि । चित् । वृत्रस्य । दोधतः । वज्रेण । शतऽपर्वणा ।
शिरः । बिभेद । वृष्णिना ॥ ६ ॥

आणि जगाची पांचावर धारण बसविणाऱ्या वृत्राचें मस्तक, आपल्या शेकडो धारांच्या शौर्यवर्षक वज्राच्या योगाने छिन्नभिन्न केलें. ६.



इ॒मा अ॒भि प्र णो॑नुमो वि॒पामग्रे॑षु धी॒तयः॑ । अ॒ग्नेः शो॒चिर्न दि॒द्युतः॑ ॥ ७ ॥

इमाः । अभि । प्र । नोनुमः । विपाम् । अग्रेषु । धीतयः ।
अग्नेः । शोचिः । न । दिद्युतः ॥ ७ ॥

म्हणून आमच्या ह्या ध्यानस्तुति इतर स्तुतींच्या अगोदर आम्ही मोठ्याने गातो; त्या स्तुति अशा की जणों काय अग्नीच्या तेजस्वी ज्वालाच. ७.



गुहा॑ स॒तीरुप॒ त्मना॒ प्र यच्छोच॑न्त धी॒तयः॑ । कण्वा॑ ऋ॒तस्य॒ धार॑या ॥ ८ ॥

गुहा । सतीः । उप । त्मना । प्र । यत् । शोचन्त । धीतयः ।
कण्वाः । ऋतस्य । धारया ॥ ८ ॥

ध्यानस्तुति अंतःकरणांत गूढ होत्या; त्या जेव्हां आपण होऊन मुखांतून बाहेर पडून चमकल्या, तेव्हां कण्व देखील सद्धर्माच्या धाराप्रवाहानें चमकूं लागले. ८.



प्र तमि॑न्द्र नशीमहि र॒यिं गोम॑न्तम॒श्विन॑म् । प्र ब्रह्म॑ पू॒र्वचि॑त्तये ॥ ९ ॥

प्र । तम् । इन्द्र । नशीमहि । रयिम् । गोऽमन्तम् । अश्विनम् ।
प्र । ब्रह्म । पूर्वऽचित्तये ॥ ९ ॥

तर हे इन्द्रा, तें अपूर्व गोयुक्त आणि अश्वयुक्त धन, आणि तुझें चिन्तन प्रथम व्हावें म्हणून तें सूक्तज्ञान, अशा दोहोंचाही आम्हांस लाभ घडो. ९.



अ॒हमिद्धि पि॒तुष्परि॑ मे॒धामृ॒तस्य॑ ज॒ग्रभ॑ । अ॒हं सूर्य॑ इवाजनि ॥ १० ॥

अहम् । इत् । हि । पितुः । परि । मेधाम् । ऋतस्य । जग्रभ ।
अहम् । सूर्यःऽइव । अजनि ॥ १० ॥

मीच एकट्यानें पित्यापासून सत्यधर्माची बुद्धि ग्रहण केली, आणि म्हणूनच मी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा जन्मलो. १०.



अ॒हं प्र॒त्नेन॒ मन्म॑ना॒ गिरः॑ शुम्भामि कण्व॒वत् । येनेन्द्रः॒ शुष्म॒मिद्द॒धे ॥ ११ ॥

अहम् । प्रत्नेन । मन्मना । गिरः । शुम्भामि । कण्वऽवत् ।
येन । इन्द्रः । शुष्मम् । इत् । दधे ॥ ११ ॥

मीं पुरातन मननीय स्तोत्रानें, कण्वाप्रमाणे आपल्या स्तवनवाणी अलंकृत करतो, म्हणजे तेणेंकरून इन्द्र आपलें शोषक तेज प्रकट करीलच करील. ११.



ये त्वामि॑न्द्र॒ न तु॑ष्टु॒वुरृष॑यो॒ ये च॑ तुष्टु॒वुः । ममेद्व॑र्धस्व॒ सुष्टु॑तः ॥ १२ ॥

ये । त्वाम् । इन्द्र । न । तुस्तुवुः । ऋषयः । ये । च । तुस्तुवुः ।
मम । इत् । वर्धस्व । सुऽस्तुतः ॥ १२ ॥

इन्द्रा, ज्यांनीं तुझें अजून स्तवन केलें नसेल, आणि ज्या ऋषींनी तुझें स्तवन केलेलें असेल अर्थात् पुढें होणाऱ्या आणि मागें होऊन गेलेल्या भक्तांमध्यें माझ्याच स्तवनानें संतुष्ट होऊन प्रफुल्लित हो. १२.



यद॑स्य म॒न्युरध्व॑नी॒द्वि वृ॒त्रं प॑र्व॒शो रु॒जन् । अ॒पः स॑मु॒द्रमैर॑यत् ॥ १३ ॥

यत् । अस्य । मन्युः । अध्वनीत् । वि । वृत्रम् । पर्वऽशः । रुजन् ।
अपः । समुद्रम् । ऐरयत् ॥ १३ ॥

वृत्राचे तुकडे तुकडे करीत असतांना त्या भगवंताचा आवेश जेव्हां दणकला, त्याच वेळेस त्यानें नद्या समुद्राकडे धाडून दिल्या. १३.



नि शुष्ण॑ इन्द्र धर्ण॒सिं वज्रं॑ जघन्थ॒ दस्य॑वि । वृषा॒ ह्यु॑ग्र शृण्वि॒षे ॥ १४ ॥

नि । शुष्णे । इन्द्र । धर्णसिम् । वज्रम् । जघन्थ । दस्यवि ।
वृषा । हि । उग्र । शृण्विषे ॥ १४ ॥

इंद्रा जगताला शुष्क करणाऱ्या शुष्ण राक्षसावर जेव्हां तूं सर्वांना आधार देणारे असें आपलें वज्र हाणलेस, तेव्हांच तूं शत्रूभयंकर म्हणून प्रख्यात ठरलास. १४.



न द्याव॒ इन्द्र॒मोज॑सा॒ नान्तरि॑क्षाणि व॒ज्रिण॑म् । न वि॑व्यचन्त॒ भूम॑यः ॥ १५ ॥

न । द्यावः । इन्द्रम् । ओजसा । न । अन्तरिक्षाणि । वज्रिणम् ।
न । विव्यचन्त । भूमयः ॥ १५ ॥

द्युलोकाचे तेजोगोल, तेजस्वितेंत इन्द्राला मुळींच मागें टाकू शकले नाहींत, अंतरिक्षलोकही त्या वज्रधराला व्यापून टाकू शकले नाहींत, आणि भूप्रदेशही इन्द्राला व्याप्त करूं शकले नाहींत. १५.



यस्त॑ इन्द्र म॒हीर॒पः स्त॑भू॒यमा॑न॒ आश॑यत् । नि तं पद्या॑सु शिश्नथः ॥ १६ ॥

यः । ते । इन्द्र । महीः । अपः । स्तभुऽयमानः । आ । अशयत् ।
नि । तम् । पद्यासु । शिश्नथः ॥ १६ ॥

इन्द्रा, प्रचंड उदकप्रवाहांत जो राक्षस त्यांना अडवून धरून आंत दडी देऊन राहिला होता, त्याचा बरोबर माग काढून तूं त्याला तेथच्या तेथेंच ठार केलेस. १६.



य इ॒मे रोद॑सी म॒ही स॑मी॒ची स॒मज॑ग्रभीत् । तमो॑भिरिन्द्र॒ तं गु॑हः ॥ १७ ॥

यः । इमे इति । रोदसी इति । मही इति । समीची इति सम्ऽईची । सम्ऽअजग्रभीत् ।
तमःऽभिः । इन्द्र । तम् । गुहः ॥ १७ ॥

ज्या राक्षसाने ह्या एकत्र नांदणाऱ्या विस्तीर्ण द्यावापृथिवींना डांबून धरले होतें त्याला, हे इन्द्रा, तूं निबिड अंधकारात गाडून टाकलेस. १७.



य इ॑न्द्र॒ यत॑यस्त्वा॒ भृग॑वो॒ ये च॑ तुष्टु॒वुः । ममेदु॑ग्र श्रुधी॒ हव॑म् ॥ १८ ॥

ये । इन्द्र । यतयः । त्वा । भृगवः । ये । च । तुस्तुवुः ।
मम । इत् । उग्र । श्रुधि । हवम् ॥ १८ ॥

इन्द्रा, ज्या जितेंद्रिय साधूंनी आणि ज्या भृगुकुलोत्पन्न भक्तांनी तुझी स्तुति केली असेल, तरीही हे शत्रुभयंकरा, तूं माझी हांक ऐकून घेच. १८.



इ॒मास्त॑ इन्द्र॒ पृश्न॑यो घृ॒तं दु॑हत आ॒शिर॑म् । ए॒नामृ॒तस्य॑ पि॒प्युषीः॑ ॥ १९ ॥

इमाः । ते । इन्द्र । पृश्नयः । घृतम् । दुहते । आऽशिरम् ।
एनाम् । ऋतस्य । पिप्युषीः ॥ १९ ॥

इन्द्रा, ह्या ठिपकेदार मेघरूप धेनू घृताच्या आणि दाट दुधाच्या धारा सोडतात, आणि अशा रीतीनें ती धारा सद्धर्माची पोषक झाली. १९.



या इ॑न्द्र प्र॒स्व॑स्त्वा॒सा गर्भ॒मच॑क्रिरन् । परि॒ धर्मे॑व॒ सूर्य॑म् ॥ २० ॥

याः । इन्द्र । प्रऽस्वः । त्वा । आसा । गर्भम् । अचक्रिरन् ।
परि । धर्मऽइव । सूर्यम् ॥ २० ॥

इन्द्रा, त्या बहुप्रसव धेनूंनी तुजला मुख्य गाभा समजून आपल्या मुखाने आपल्यामध्ये ठेवून दिले. ज्याप्रमाणें पृथ्वीला धारण करणारा द्युलोक सूर्याला आपल्यामध्ये ठेवतो त्याप्रमाणें ठेवले. २०.



त्वामिच्छ॑वसस्पते॒ कण्वा॑ उ॒क्थेन॑ वावृधुः । त्वां सु॒तास॒ इन्द॑वः ॥ २१ ॥

त्वाम् । इत् । शवसः । पते । कण्वाः । उक्थेन । ववृधुः ।
त्वाम् । सुतासः । इन्दवः ॥ २१ ॥

हे उत्कटबलाढ्या, कण्वांनी तुला उक्थस्तोत्रांनी हर्षोत्फुल्ल केलें, तसें या पिळलेल्या सोमबिन्दूंनीही केले आहे. २१.



तवेदि॑न्द्र॒ प्रणी॑तिषू॒त प्रश॑स्तिरद्रिवः । य॒ज्ङो वि॑तन्त॒साय्यः॑ ॥ २२ ॥

तव । इत् । इन्द्र । प्रऽनीतिषु । उत । प्रऽशस्तिः । अद्रिऽवः ।
यज्ञः । वितन्तसाय्यः ॥ २२ ॥

इन्द्रा, वज्रधरा, तुझ्या मार्गदर्शकत्वाखालीच तुझें स्तवन करावयाचे असते आणि यज्ञही साङ्ग संपादन करावयाचा असतो. २२.



आ न॑ इन्द्र म॒हीमिषं॒ पुरं॒ न द॑र्षि॒ गोम॑तीम् । उ॒त प्र॒जां सु॒वीर्य॑म् ॥ २३ ॥

आ । नः । इन्द्र । महीम् । इषम् । पुरम् । न । दर्षि । गोऽमतीम् ।
उत । प्रऽजाम् । सुऽवीर्यम् ॥ २३ ॥

हे इन्द्रा, ज्याप्रमाणें तूं शत्रूचा किल्ला फोडून मार्ग मोकळा केलास त्याप्रमाणे धेनूंनी समृद्ध अशी उत्साहवृत्ति, पुत्रपौत्र आणि वीर्य शालित्व यांचें भांडार तूं मोकळे कर. २३.



उ॒त त्यदा॒श्वश्व्यं॒ यदि॑न्द्र॒ नाहु॑षी॒ष्वा । अग्रे॑ वि॒क्षु प्र॒दीद॑यत् ॥ २४ ॥

उत । त्यत् । आशुऽअश्व्यम् । यत् । इन्द्र । नाहुषीषु । आ ।
अग्रे । विक्षु । प्रऽदीदयत् ॥ २४ ॥

तसेंच हे इन्द्रा, शीघ्रगामी अश्वांनी परिपूर्ण असें वैभव, जें तूं पूर्वी नहुषकुलोत्पन्नांना दिलें होतेस, तसें वैभव आम्हांसही अर्पण कर. २४.



अ॒भि व्र॒जं न त॑त्निषे॒ सूर॑ उपा॒कच॑क्षसम् । यदि॑न्द्र मृ॒ळया॑सि नः ॥ २५ ॥

अभि । व्रजम् । न । तत्निषे । सूरः । उपाकऽचक्षसम् ।
यत् । इन्द्र । मृळयासि । नः ॥ २५ ॥

इन्द्रा जेव्हां तूं आम्हांवर कृपा करतोस, तेव्हां सूर्यरूपाने आमच्या अगदीं दृष्टीसमोर त्याचा रश्मिसमूहही धेनूसमूहाप्रमाणे पसरून देतोसच. २५.



यद॒ङ्ग त॑विषी॒यस॒ इन्द्र॑ प्र॒राज॑सि क्षि॒तीः । म॒हाँ अ॑पा॒र ओज॑सा ॥ २६ ॥

यत् । अङ्ग । तविषीऽयसे । इन्द्र । प्रऽराजसि । क्षितीः ।
महान् । अपारः । ओजसा ॥ २६ ॥

कारण, हे इन्द्रा, तूं आपली धडाडी व्यक्त करतोस आणि पृथ्वीवरील प्राणिमात्रांवर आपली राजसत्ता चालवितोस; असा तूं परमथोर आणि तेजस्वितेंत अपरंपार आहेस. २६.



तं त्वा॑ ह॒विष्म॑ती॒र्विश॒ उप॑ ब्रुवत ऊ॒तये॑ । उ॒रु॒ज्रय॑स॒मिन्दु॑भिः ॥ २७ ॥

तम् । त्वा । हविष्मतीः । विशः । उप । ब्रुवते । ऊतये ।
उरुऽज्रयसम् । इन्दुऽभिः ॥ २७ ॥

म्हणूनच भक्तजन हविर्भाग हातीं घेऊन आणि सोमरस पिळून तुला व्यापकसंचारी देवाला रक्षणासाठीं हांक मारीत असतात. २७.



उ॒प॒ह्व॒रे गि॑री॒णां सं॑ग॒थे च॑ न॒दीना॑म् । धि॒या विप्रो॑ अजायत ॥ २८ ॥

उपऽह्वरे । गिरीणाम् । सम्ऽगथे । च । नदीनाम् ।
धिया । विप्रः । अजायत ॥ २८ ॥

पर्वताच्या दरींत आणि नद्यांच्या संगमावर ज्ञानी विप्र आपल्या ध्यानबलाने लोकांत प्रकट झाला. २८.



अतः॑ समु॒द्रमु॒द्वत॑श्चिकि॒त्वाँ अव॑ पश्यति । यतो॑ विपा॒न एज॑ति ॥ २९ ॥

अतः । समुद्रम् । उत्ऽवतः । चिकित्वान् । अव । पश्यति ।
यतः । विपानः । एजति ॥ २९ ॥

स्तवनांत तल्लीन होऊन तो जेथून जाण्यास निघतो तेथूनच समुद्र आणि जलाशय यांच्याकडे तो सूक्ष्मज्ञानी अवलोकन करतो. २९.



आदित्प्र॒त्नस्य॒ रेत॑सो॒ ज्योति॑ष्पश्यन्ति वास॒रम् । प॒रो यदि॒ध्यते॑ दि॒वा ॥ ३० ॥

आत् । इत् । प्रत्नस्य । रेतसः । ज्योतिः । पश्यन्ति । वासरम् ।
परः । यत् । इध्यते । दिवा ॥ ३० ॥

आणि नंतर सृष्टीच्या सनातन बीजाचे जें सूर्यरूपी तेज द्युलोकाच्या पलीकडे धगधगत असते तें तेज ज्ञानीजन पाहतात. ३०



कण्वा॑स इन्द्र ते म॒तिं विश्वे॑ वर्धन्ति॒ पौंस्य॑म् । उ॒तो श॑विष्ठ॒ वृष्ण्य॑म् ॥ ३१ ॥

कण्वासः । इन्द्र । ते । मतिम् । विश्वे । वर्धन्ति । पौंस्यम् ।
उतो इति । शविष्ठ । वृष्ण्यम् ॥ ३१ ॥

इन्द्रा, सर्व कण्वकुलोत्पन्न जन तुझें वात्सल्य, तुझें पौरुष, आणि हे प्रबलोत्तमा, तुझे वीर्यशालित्व त्यांचा महिमा वृद्धिंगत करतात. ३१.



इ॒मां म॑ इन्द्र सुष्टु॒तिं जु॒षस्व॒ प्र सु माम॑व । उ॒त प्र व॑र्धया म॒तिम् ॥ ३२ ॥

इमाम् । मे । इन्द्र । सुऽस्तुतिम् । जुषस्व । प्र । सु । माम् । अव ।
उत । प्र । वर्धय । मतिम् ॥ ३२ ॥

म्हणूनच इन्द्रा, ही माझी प्रेमळ स्तुति ग्रहण कर, मजवर उत्तमरीतीनें कृपा कर, आणि माझ्या सुबुद्धिचें संवर्धन कर. ३२.



उ॒त ब्र॑ह्म॒ण्या व॒यं तुभ्यं॑ प्रवृद्ध वज्रिवः । विप्रा॑ अतक्ष्म जी॒वसे॑ ॥ ३३ ॥

उत । ब्रह्मण्या । वयम् । तुभ्यम् । प्रऽवृद्ध । वज्रिऽवः ।
विप्राः । अतक्ष्म । जीवसे ॥ ३३ ॥

हे पुराणपुरुषा, वज्रधरा, सर्वांच्या जीवनासाठीं म्हणूनच आम्ही स्तवनज्ञ कवींनी तुझ्या प्रीत्यर्थ सुंदर प्रार्थनासुक्ते रचली आहेत. ३३.



अ॒भि कण्वा॑ अनूष॒तापो॒ न प्र॒वता॑ य॒तीः । इन्द्रं॒ वन॑न्वती म॒तिः ॥ ३४ ॥

अभि । कण्वाः । अनूषत । आपः । न । प्रऽवता । यतीः ।
इन्द्रम् । वनन्ऽवती । मतिः ॥ ३४ ॥

कण्व कुलोत्पन्नांनी असें स्तवन केलें कीं इन्द्राविषयी प्रेमोत्सुक झालेली त्यांची प्रतिभा, नद्या जशा सखल प्रदेशाकडे जोराने वाहतात त्याप्रमाणें वाहू लागली. ३७.



इन्द्र॑मु॒क्थानि॑ वावृधुः समु॒द्रमि॑व॒ सिन्ध॑वः । अनु॑त्तमन्युम॒जर॑म् ॥ ३५ ॥

इन्द्रम् । उक्थानि । ववृधुः । समुद्रम्ऽइव । सिन्धवः ।
अनुत्तऽमन्युम् । अजरम् ॥ ३५ ॥

नद्या जशा समुद्राला मिळून त्याला वृद्धिंगत करतात त्याप्रमाणें इन्द्राची थोरवी उक्थ स्तोत्रांनी वृद्धिंगत केली आहे; तो इंद्र असा कीं ज्याचा क्रोधावेश कोणाच्यानेंही आवरला जात नाहीं. आणि जो कधींही जराग्रस्त होत नाहीं. ३२.



आ नो॑ याहि परा॒वतो॒ हरि॑भ्यां हर्य॒ताभ्या॑म् । इ॒ममि॑न्द्र सु॒तं पि॑ब ॥ ३६ ॥

आ । नः । याहि । पराऽवतः । हरिऽभ्याम् । हर्यताभ्याम् ।
इमम् । इन्द्र । सुतम् । पिब ॥ ३६ ॥

दूरच्या द्युलोकापासून तूं आपल्या हरिद्वर्ण अश्वांसह या ठिकाणी आमच्याकडे ये, आणि हे इंद्रा, सोमरस प्राशन कर. ३६.



त्वामिद्वृ॑त्रहन्तम॒ जना॑सो वृ॒क्तब॑र्हिषः । हव॑न्ते॒ वाज॑सातये ॥ ३७ ॥

त्वाम् । इत् । वृत्रहन्ऽतम । जनासः । वृक्तऽबर्हिषः ।
हवन्ते । वाजऽसातये ॥ ३७ ॥

वृत्राचा समूळ उच्छेद करणाऱ्या इन्द्रा, कुशासन सिद्ध करून वाट पाहणारे भक्तजन सत्वसामर्थ्याचा लाभ व्हावा म्हणून तुझाच धांवा करीत आहेत. ३७.



अनु॑ त्वा॒ रोद॑सी उ॒भे च॒क्रं न व॒र्त्येत॑शम् । अनु॑ सुवा॒नास॒ इन्द॑वः ॥ ३८ ॥

अनु । त्वा । रोदसी इति । उभे इति । चक्रम् । न । वर्ति । एतशम् ।
अनु । सुवानासः । इन्दवः ॥ ३८ ॥

भूमि आणि आकाश असे दोन्ही लोक, अश्वाच्या पाठीमागून जसे रथाचे चाक फिरते त्याप्रमाणें तुझ्या अनुरोधानें फिरतात, आणि हे सोमबिन्दु देखील तुझ्याचकडे वाहतात. ३८.



मन्द॑स्वा॒ सु स्व॑र्णर उ॒तेन्द्र॑ शर्य॒णाव॑ति । मत्स्वा॒ विव॑स्वतो म॒ती ॥ ३९ ॥

मन्दस्व । सु । स्वःऽनरे । उत । इन्द्र । शर्यणाऽवति ।
मत्स्व । विवस्वतः । मती ॥ ३९ ॥

दिव्य प्रकाश प्राप्त करून देणाऱ्या ठिकाणी, आणि शर्यणावतांतही हे इन्द्रा, तूं हर्षोत्फुल्ल हो. आणि विवस्वानाच्या मननीय स्तवनाने तल्लीन हो. ३९.



वा॒वृ॒धा॒न उप॒ द्यवि॒ वृषा॑ व॒ज्र्य॑रोरवीत् । वृ॒त्र॒हा सो॑म॒पात॑मः ॥ ४० ॥

ववृधानः । उप । द्यवि । वृषा । वज्री । अरोरवीत् ।
वृत्रऽहा । सोमऽपातमः ॥ ४० ॥

प्रचंड स्वरूप धारण करून वीर्यशाली वज्रधर इन्द्राने द्युलोकाच्या आसमंतात फार मोठ्याने सिंहनाद केला. कारण तोच वृत्राचा नाश करणारा, आणि अत्यंत प्रेमाने सोमरस प्राशन करणारा आहे. ४०.



ऋषि॒र्हि पू॑र्व॒जा अस्येक॒ ईशा॑न॒ ओज॑सा । इन्द्र॑ चोष्कू॒यसे॒ वसु॑ ॥ ४१ ॥

ऋषिः । हि । पूर्वऽजाः । असि । एकः । ईशानः । ओजसा ।
इन्द्र । चोष्कूयसे । वसु ॥ ४१ ॥

पूर्वकाळचा ऋषि कोणता तें पाहूं गेल्यास खरोखर हे इन्द्रा, तूंच आहेस. आपल्या तेजस्वितेनें तूंच एकटा सर्वसत्ताधीश आहेस, आणि म्हणूनच अत्यंत महनीय जें धन तें तूंच जतन करतोस. ४१.



अ॒स्माकं॑ त्वा सु॒ताँ उप॑ वी॒तपृ॑ष्ठा अ॒भि प्रयः॑ । श॒तं व॑हन्तु॒ हर॑यः ॥ ४२ ॥

अस्माकम् । त्वा । सुतान् । उप । वीतऽपृष्ठाः । अभि । प्रयः ।
शतम् । वहन्तु । हरयः ॥ ४२ ॥

तुझे भरदार पुठ्ठ्याचे शेंकडो अश्व तुजला आमच्या प्रेमळ स्तवनांकडे आणि पिळलेल्या सोमरसाकडे घेऊन येवोत. ४२.



इ॒मां सु पू॒र्व्यां धियं॒ मधो॑र्घृ॒तस्य॑ पि॒प्युषी॑म् । कण्वा॑ उ॒क्थेन॑ वावृधुः ॥ ४३ ॥

इमाम् । सु । पूर्व्याम् । धियम् । मधोः । घृतस्य । पिप्युषीम् ।
कण्वाः । उक्थेन । ववृधुः ॥ ४३ ॥

मध आणि घृत यांची समृद्धि करून सोडणाऱ्या प्राचीन कवींच्या ध्यानस्तुतीचा विकास कण्वांनी उक्थ स्तवनाने केला. ४३.



इन्द्र॒मिद्विम॑हीनां॒ मेधे॑ वृणीत॒ मर्त्यः॑ । इन्द्रं॑ सनि॒ष्युरू॒तये॑ ॥ ४४ ॥

इन्द्रम् । इत् । विऽमहीनाम् । मेधे । वृणीत । मर्त्यः ।
इन्द्रम् । सनिष्युः । ऊतये ॥ ४४ ॥

सर्व महनीय विभूतींमध्ये यज्ञांत मर्त्यमानवाने इन्द्रालाच शरण जावे; अभीष्ट प्राप्तीची आतुरता असेल त्यानेंही इन्द्रालाच रक्षणासाठी शरण जावे. ४४.



अ॒र्वाङ्चं॑ त्वा पुरुष्टुत प्रि॒यमे॑धस्तुता॒ हरी॑ । सो॒म॒पेया॑य वक्षतः ॥ ४५ ॥

अर्वाञ्चम् । त्वा । पुरुऽस्तुत । प्रियमेधऽस्तुता । हरी इति ।
सोमऽपेयाय । वक्षतः ॥ ४५ ॥

सर्वजनस्तुता देवा, प्रियमेधानें प्रशंसा केलेले तुझे हरिद्वर्ण अश्व, तुजला आम्हांकडे वळवून सोमप्राशनार्थ खास घेऊन येतीलच. ४५



श॒तम॒हं ति॒रिन्दि॑रे स॒हस्रं॒ पर्शा॒वा द॑दे । राधां॑सि॒ याद्वा॑नाम् ॥ ४६ ॥

शतम् । अहम् । तिरिन्दिरे । सहस्रम् । पर्शौ । आ । ददे ।
राधांसि । याद्वानाम् ॥ ४६ ॥

तितिन्दिर विद्यमान असतांना शंभर, आणि पर्शु विद्यमान असतांना हजार, अशी देणगी मिळाली. तशाच, यादवाकडनूही देणग्या मिळाल्या. ४६.



त्रीणि॑ श॒तान्यर्व॑तां स॒हस्रा॒ दश॒ गोना॑म् । द॒दुष्प॒ज्राय॒ साम्ने॑ ॥ ४७ ॥

त्रीणि । शतानि । अर्वताम् । सहस्रा । दश । गोनाम् ।
ददुः । पज्राय । साम्ने ॥ ४७ ॥

त्याचप्रमाणे तीनशे चपळ घोडेस्वार, दहा हजार गाई अशीही देणगी सामगायनप्रवीण पज्राला मिळाली. ४७.



उदा॑नट् ककु॒हो दिव॒मुष्ट्रा॑ङ्चतु॒र्युजो॒ दद॑त् । श्रव॑सा॒ याद्वं॒ जन॑म् ॥ ४८ ॥

उत् । आनट् । ककुहः । दिवम् । उष्ट्रान् । चतुःऽयुजः । ददत् ।
श्रवसा । याद्वम् । जनम् ॥ ४८ ॥

एकाशी एक याप्रमाणें जोडलेल्या चार चार उंटांच्या चौकड्या याद्वाच्या मनुष्यांना देऊन ककुह राजाने सत्कीर्तीच्या योगाने सर्व द्युलोक व्यापून टाकला. ४८.



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ७ (मरुत्‌सूक्त )

ऋषी - पुनर्वत्स काण्व : देवता - मरुत् : छंद - गायत्री



प्र यद्व॑स्त्रि॒ष्टुभ॒मिषं॒ मरु॑तो॒ विप्रो॒ अक्ष॑रत् । वि पर्व॑तेषु राजथ ॥ १ ॥

प्र । यत् । वः । त्रिऽस्तुभम् । इषम् । मरुतः । विप्रः । अक्षरत् ।
वि । पर्वतेषु । राजथ ॥ १ ॥

हे मरुतांनो, जेव्हां भक्ताच्या मुखांतून त्रिष्टुभ स्तोत्र वदविणारे उत्साही पेय तुमच्याकरितां स्तवनज्ञ कवीने पात्रांत ओतले, त्या वेळीं तुम्ही पर्वतप्राय मेघांत विराजमान झाला होतां १.



यद॒ङ्ग त॑विषीयवो॒ यामं॑ शुभ्रा॒ अचि॑ध्वम् । नि पर्व॑ता अहासत ॥ २ ॥

यत् । अङ्ग । तविषीऽयवः । यामम् । शुभ्राः । अचिध्वम् ।
नि । पर्वताः । अहासत ॥ २ ॥

आपली धडाडी प्रकट करणाऱ्या शुभ्रतेजस्क देवांनो ! तुम्ही आपला मार्ग आक्रमित असतां तेव्हां पर्वत देखील हलावयास लागतात २.



उदी॑रयन्त वा॒युभि॑र्वा॒श्रासः॒ पृश्नि॑मातरः । धु॒क्षन्त॑ पि॒प्युषी॒मिष॑म् ॥ ३ ॥

उत् । ईरयन्त । वायुऽभिः । वाश्रासः । पृश्निऽमातरः ।
धुक्षन्त । पिप्युषीम् । इषम् ॥ ३ ॥

मोठ्याने गर्जना करणारे पृश्निपुत्र मरुत् हे वायूच्या सोसाट्याबरोबर आपलाही आवाज घुमवून देतात आणि पुष्टिदायक उत्साहाचा जणो लोंढाच धों धों वाहवयास लावतात. ३



वप॑न्ति म॒रुतो॒ मिहं॒ प्र वे॑पयन्ति॒ पर्व॑तान् । यद्यामं॒ यान्ति॑ वा॒युभिः॑ ॥ ४ ॥

वपन्ति । मरुतः । मिहम् । प्र । वेपयन्ति । पर्वतान् ।
यत् । यामम् । यान्ति । वायुऽभिः ॥ ४ ॥

जेव्हां मरुत् हे वायूबरोबर चालत जातात तेव्हां ते चोहोंकडे धुके पसरून देतात आणि पर्वतांना चळचळा कांपावयास लावतात. ४.



नि यद्यामा॑य वो गि॒रिर्नि सिन्ध॑वो॒ विध॑र्मणे । म॒हे शुष्मा॑य येमि॒रे ॥ ५ ॥

नि । यत् । यामाय । वः । गिरिः । नि । सिन्धवः । विऽधर्मणे ।
महे । शुष्माय । येमिरे ॥ ५ ॥

तुमच्या मार्गाला, आणि जगाचे धारण करणारे जें तुमचे महत् सामर्थ्य त्याला, पर्वत किंवा नद्या ह्या कोणाच्यानेंही आंवरून धरवत नाहीं. ५.



यु॒ष्माँ उ॒ नक्त॑मू॒तये॑ यु॒ष्मान्दिवा॑ हवामहे । यु॒ष्मान्प्र॑य॒त्य॑ध्व॒रे ॥ ६ ॥

युष्मान् । ऊं इति । नक्तम् । ऊतये । युष्मान् । दिवा । हवामहे ।
युष्मान् । प्रऽयति । अध्वरे ॥ ६ ॥

रात्रौ आम्ही तुम्हालाच सहाय्यार्थ पाचारण करतो, दिवसाही पाचारण करतो; आणि अध्वरयाग चालू झाला असतां तुम्हांलाच पाचारण करतो. ६.



उदु॒ त्ये अ॑रु॒णप्स॑वश्चि॒त्रा यामे॑भिरीरते । वा॒श्रा अधि॒ ष्णुना॑ दि॒वः ॥ ७ ॥

उत् । ऊं इति । त्ये । अरुणऽप्सवः । चित्राः । यामेभिः । ईरते ।
वाश्राः । अधि । स्नुना । दिवः ॥ ७ ॥

आरक्तवर्ण आणि अद्भुत स्वरूप मरुत् हे गर्जना करीत करीत आपल्या मार्गांनी द्युलोकाच्या शिखरावरून जातात. ७.



सृ॒जन्ति॑ र॒श्मिमोज॑सा॒ पन्थां॒ सूर्या॑य॒ यात॑वे । ते भा॒नुभि॒र्वि त॑स्थिरे ॥ ८ ॥

सृजन्ति । रश्मिम् । ओजसा । पन्थाम् । सूर्याय । यातवे ।
ते । भानुऽभिः । वि । तस्थिरे ॥ ८ ॥

सूर्याला जातां येण्यासाठीं, ते आपल्या ओजस्वितेने त्याचे किरण आणि मार्ग असे दोन्ही उत्पन्न करतात; आणि त्याच्या प्रकाशासह निरनिराळ्या दिशांनी चालू लागतात. ८.



इ॒मां मे॑ मरुतो॒ गिर॑मि॒मं स्तोम॑मृभुक्षणः । इ॒मं मे॑ वनता॒ हव॑म् ॥ ९ ॥

इमाम् । मे । मरुतः । गिरम् । इमम् । स्तोमम् । ऋभुक्षणः ।
इमम् । मे । वनत । हवम् ॥ ९ ॥

मरुतांनों, ऋभूंना प्रबळ करणाऱ्या मरुतांनों, ही माझी स्तुति, हें माझें स्तोत्र, हा माझा हविर्भाग, तुम्ही प्रेमाने मान्य करून घ्या. ९.



त्रीणि॒ सरां॑सि॒ पृश्न॑यो दुदु॒ह्रे व॒ज्रिणे॒ मधु॑ । उत्सं॒ कव॑न्धमु॒द्रिण॑म् ॥ १० ॥

त्रीणि । सरांसि । पृश्नयः । दुदुह्रे । वज्रिणे । मधु ।
उत्सम् । कवन्धम् । उद्रिणम् ॥ १० ॥

या पृश्निपुत्रांनी तीन मोठमोठी सरोवरें दोहून तुडुंब भरली; वज्रधारी इन्द्राप्रीत्यर्थ मधानें परिपूर्ण असा झरा आणि उदकाने परिपूर्ण असा मेघ यांचेंही दोहन केलें. १०.



मरु॑तो॒ यद्ध॑ वो दि॒वः सु॑म्ना॒यन्तो॒ हवा॑महे । आ तू न॒ उप॑ गन्तन ॥ ११ ॥

मरुतः । यत् । ह । वः । दिवः । सुम्नऽयन्तः । हवामहे ।
आ । तु । नः । उप । गन्तन ॥ ११ ॥

मरुतांनों, सुखशांतीची इच्छा धरणारे आम्हीं भक्त तुम्हांला द्युलोकापासून पाचारण करीत आहोंत, तर तुम्ही आमच्याकडे अवश्य या. ११.



यू॒यं हि ष्ठा सु॑दानवो॒ रुद्रा॑ ऋभुक्षणो॒ दमे॑ । उ॒त प्रचे॑तसो॒ मदे॑ ॥ १२ ॥

यूयम् । हि । स्थ । सुऽदानवः । रुद्राः । ऋभुक्षणः । दमे ।
उत । प्रऽचेतसः । मदे ॥ १२ ॥

खरोखरच हे दानशूर रुद्रपुत्रांनो, हे ऋभुक्षहो, तुम्ही यज्ञगृहांत वास करतां आणि हर्षभरांतही उत्कृष्ट ज्ञानीच राहता. १२.



आ नो॑ र॒यिं म॑द॒च्युतं॑ पुरु॒क्षुं वि॒श्वधा॑यसम् । इय॑र्ता मरुतो दि॒वः ॥ १३ ॥

आ । नः । रयिम् । मदऽच्युतम् । पुरुऽक्षुम् । विश्वऽधायसम् ।
इयर्त । मरुतः । दिवः ॥ १३ ॥

मरुतांनों, शत्रूचा मद जिरविणारे, अत्यंत प्रबळ, सर्वांचे पोषण करण्याला समर्थ असें जें धन, तें द्युलोकांतून आमच्याकडे पाठवून द्या. १३.



अधी॑व॒ यद्गि॑री॒णां यामं॑ शुभ्रा॒ अचि॑ध्वम् । सु॒वा॒नैर्म॑न्दध्व॒ इन्दु॑भिः ॥ १४ ॥

अधिऽइव । यत् । गिरीणाम् । यामम् । शुभ्राः । अचिध्वम् ।
सुवानैः । मन्दध्वे । इन्दुऽभिः ॥ १४ ॥

तुम्ही जेव्हां पर्वतांच्यावरून आपला मार्ग आक्रमण कराल, तेव्हां हे शुभ्रतेजस्क मरुतांनों, पिळल्या जाणाऱ्या आमच्याही सोमरसांनी हर्षनिर्भर व्हा. १४.



ए॒ताव॑तश्चिदेषां सु॒म्नं भि॑क्षेत॒ मर्त्यः॑ । अदा॑भ्यस्य॒ मन्म॑भिः ॥ १५ ॥

एतावतः । चित् । एषाम् । सुम्नम् । भिक्षेत । मर्त्यः ।
अदाभ्यस्य । मन्मऽभिः ॥ १५ ॥

याचप्रमाणे अप्रतिहत सामर्थ्यवान् जो ईश्वर त्याच्या स्तवनांच्या योगाने मरुतांजवळ आपल्या कल्याणाची याचना करावी. १५.



ये द्र॒प्सा इ॑व॒ रोद॑सी॒ धम॒न्त्यनु॑ वृ॒ष्टिभिः॑ । उत्सं॑ दु॒हन्तो॒ अक्षि॑तम् ॥ १६ ॥

ये । द्रप्साःऽइव । रोदसी इति । धमन्ति । अनु । वृष्टिऽभिः ।
उत्सम् । दुहन्तः । अक्षितम् ॥ १६ ॥

जे वृष्टिभरानें आकाश आणि पृथ्वी यांना पाण्याच्या बुडबुड्यांप्रमाणे फुगवून देतात, आणि उदकाचा अक्षयनिर्झर जो मेघ त्याचें दोहन करतात. १६.



उदु॑ स्वा॒नेभि॑रीरत॒ उद्रथै॒रुदु॑ वा॒युभिः॑ । उत्स्तोमैः॒ पृश्नि॑मातरः ॥ १७ ॥

उत् । ऊं इति । स्वानेभिः । ईरते । उत् । रथैः । उत् । ऊं इति । वायुऽभिः ।
उत् । स्तोमैः । पृश्निऽमातरः ॥ १७ ॥

ते पृश्निपुत्र मरुत्, मेघाच्या गर्जना, तसेंच रथसमूह, तसेंच वायू अणि भक्तांचा स्तोत्रनिनाद यांच्याबरोबरच आपलाही ध्वनि उंचावून देतात. १७.



येना॒व तु॒र्वशं॒ यदुं॒ येन॒ कण्वं॑ धन॒स्पृत॑म् । रा॒ये सु तस्य॑ धीमहि ॥ १८ ॥

येन । आव । तुर्वशम् । यदुम् । येन । कण्वम् । धनऽस्पृतम् ।
राये । सु । तस्य । धीमहि ॥ १८ ॥

ज्याच्या योगाने तुम्ही तुर्वशाला आणि यदूला सहाय्य केलेंत, विजयधनाकांक्षी कण्वावर कृपा केलीत, त्याच अक्षयसंपत्तिसाठी आम्ही तुमच्या ठिकाणी ध्यान लावीत आहो. १८.



इ॒मा उ॑ वः सुदानवो घृ॒तं न पि॒प्युषी॒रिषः॑ । वर्धा॑न्का॒ण्वस्य॒ मन्म॑भिः ॥ १९ ॥

इमाः । ऊं इति । वः । सुऽदानवः । घृतम् । न । पिप्युषीः । इषः ।
वर्धान् । काण्वस्य । मन्मऽभिः ॥ १९ ॥

दानशूरांनी, घृताप्रमाणे पुष्टिदायक असा जो तुमचा उत्साहप्रसाद, तो कण्वांच्या मननीय स्तोत्रांनी वृद्धिंगत होवो. १९.



क्व॑ नू॒नं सु॑दानवो॒ मद॑था वृक्तबर्हिषः । ब्र॒ह्मा को वः॑ सपर्यति ॥ २० ॥

क्व । नूनम् । सुऽदानवः । मदथ । वृक्तऽबर्हिषः ।
ब्रह्मा । कः । वः । सपर्यति ॥ २० ॥

हे दानशूरांनों, हे कुशासनाधिष्ठित देवांनो ! तुम्ही ह्या वेळेस कोणाच्या यज्ञांत हर्षनिर्भर होत आहां ? कोणता स्तोता तुमची सेवा करीत आहे ? २७



न॒हि ष्म॒ यद्ध॑ वः पु॒रा स्तोमे॑भिर्वृक्तबर्हिषः । शर्धाँ॑ ऋ॒तस्य॒ जिन्व॑थ ॥ २१ ॥

नहि । स्म । यत् । ह । वः । पुरा । स्तोमेभिः । वृक्तऽबर्हिषः ।
शर्धान् । ऋतस्य । जिन्वथ ॥ २१ ॥

तें येथेंच नव्हे काय, की जेथे पूर्वीं तुम्ही भक्तांच्या स्तवनांनी प्रसन्न होवून सद्धर्माच्या सैन्याला प्रोत्साहन दिलेंत. २१.



समु॒ त्ये म॑ह॒तीर॒पः सं क्षो॒णी समु॒ सूर्य॑म् । सं वज्रं॑ पर्व॒शो द॑धुः ॥ २२ ॥

सम् । ऊं इति । त्ये । महतीः । अपः । सम् । क्षोणी इति । सम् । ऊं इति । सूर्यम् ।
सम् । वज्रम् । पर्वऽशः । दधुः ॥ २२ ॥

त्यांनी जलाचे मोठमोठे प्रवाह आणि द्यावापृथिवी आणि तसेंच सूर्य यांना एकत्र ठेवले आणि वज्राला त्याच्या सांध्या सांध्यांच्या जागी चांगले मजबूत केलें. २२.



वि वृ॒त्रं प॑र्व॒शो य॑यु॒र्वि पर्व॑ताँ अरा॒जिनः॑ । च॒क्रा॒णा वृष्णि॒ पौंस्य॑म् ॥ २३ ॥

वि । वृत्रम् । पर्वऽशः । ययुः । वि । पर्वतान् । अराजिनः ।
चक्राणाः । वृष्णि । पौंस्यम् ॥ २३ ॥

पण त्यांनीं वृत्राची खांडोळीं उडवून दिलीं, प्रकाशहीन पर्वताचे तुकडे तुकडे केले, आणि वीराला योग्य असें आपलें पौरुष गाजविले. २३.



अनु॑ त्रि॒तस्य॒ युध्य॑तः॒ शुष्म॑मावन्नु॒त क्रतु॑म् । अन्विन्द्रं॑ वृत्र॒तूर्ये॑ ॥ २४ ॥

अनु । त्रितस्य । युध्यतः । शुष्मम् । आवन् । उत । क्रतुम् ।
अनु । इन्द्रम् । वृत्रऽतूर्ये ॥ २४ ॥

त्रित हा युद्ध करीत असतां त्याचा जोम आणि कर्तृत्व तुम्ही जतन केलीत, आणि वृत्राशीं चाललेल्या युद्धांत इन्द्राच्या पाठोपाठ गेलांत. २४.



वि॒द्युद्ध॑स्ता अ॒भिद्य॑वः॒ शिप्राः॑ शी॒र्षन्हि॑र॒ण्ययीः॑ । शु॒भ्रा व्य॑ञ्जत श्रि॒ये ॥ २५ ॥

विद्युत्ऽहस्ताः । अभिऽद्यवः । शिप्राः । शीर्षन् । हिरण्ययीः ।
शुभ्राः । वि । अञ्जत । श्रिये ॥ २५ ॥

त्यांच्या हातांत बिजली खेळते, ते स्वतः विलक्षण देदीप्यमान, त्यांच्या मस्तकावर सुवर्णाचे शिरस्त्राण; अशा रीताने शुभ्रतेजस्क मरुत् जगताच्या शोभेसाठी आविर्भृत् झाले. २५.



उ॒शना॒ यत्प॑रा॒वत॑ उ॒क्ष्णो रन्ध्र॒मया॑तन । द्यौर्न च॑क्रदद्भि॒या ॥ २६ ॥

उशना । यत् । पराऽवतः । उक्ष्णः । रन्ध्रम् । अयातन ।
द्यौः । न । चक्रदत् । भिया ॥ २६ ॥

पूर्वीं जेव्हां तुम्ही उशनासाठी वृषभाच्या गुहेंत प्रवेश केलात, तेव्हां आकाशांतील मेघाप्रमाणें तोही भीतीनें मोठ्याने ओरडला. २६.



आ नो॑ म॒खस्य॑ दा॒वनेऽश्वै॒र्हिर॑ण्यपाणिभिः । देवा॑स॒ उप॑ गन्तन ॥ २७ ॥

आ । नः । मखस्य । दावने । अश्वैः । हिरण्यपाणिऽभिः ।
देवासः । उप । गन्तन ॥ २७ ॥

तर ह्या यज्ञाच्या दानप्रसंगीं पायांत सुवर्णालंकार घातलेल्या अश्वांसह, हे दिव्य विभूतींनो, तुम्ही आम्हाजवळ या. २७.



यदे॑षां॒ पृष॑ती॒ रथे॒ प्रष्टि॒र्वह॑ति॒ रोहि॑तः । यान्ति॑ शु॒भ्रा रि॒णन्न॒पः ॥ २८ ॥

यत् । एषाम् । पृषतीः । रथे । प्रष्टिः । वहति । रोहितः ।
यान्ति । शुभ्राः । रिणन् । अपः ॥ २८ ॥

ह्यांच्या रथाला जोडलेल्या ठिपकेदार हरिणींना त्यांच्यातील वेगवान् मृग जेव्हां आपल्याबरोबर ओढून नेतो तेव्हां शुभ्रतेजस्क मरुत्- उदकवृष्टि करीत गमन करतात २८



सु॒षोमे॑ शर्य॒णाव॑त्यार्जी॒के प॒स्त्या॑वति । य॒युर्निच॑क्रया॒ नरः॑ ॥ २९ ॥

सुऽसोमे । शर्यणाऽवति । आर्जीके । पस्त्यऽवति ।
ययुः । निऽचक्रया । नरः ॥ २९ ॥

सुषमानदीच्या काठाने, शर्यणावतांत, आर्जिकी नदीच्या प्रासादमंडीत तटाकाच्या बाजूने, लहान लहान चाकें लावलेल्या गाडींत बसून मरुत् वीरांनी गमन केलें. २९.



क॒दा ग॑च्छाथ मरुत इ॒त्था विप्रं॒ हव॑मानम् । मा॒र्डी॒केभि॒र्नाध॑मानम् ॥ ३० ॥

कदा । गच्छाथ । मरुतः । इत्था । विप्रम् । हवमानम् ।
मार्डीकेभिः । नाधमानम् ॥ ३० ॥

मरुतांनो, याप्रमाणे तुमचा धांवा करणाऱ्या, तुमची विनवणी करणाऱ्या स्तवनज्ञ भक्ताकडे तुम्ही आणि आपल्या सुखमय प्रसादांसह केव्हां जाल बरें ? ३०.



कद्ध॑ नू॒नं क॑धप्रियो॒ यदिन्द्र॒मज॑हातन । को वः॑ सखि॒त्व ओ॑हते ॥ ३१ ॥

कत् । ह । नूनम् । कधऽप्रियः । यत् । इन्द्रम् । अजहातन ।
कः । वः । सखिऽत्वे । ओहते ॥ ३१ ॥

आतां तुम्हांला कोण प्रिय वाटतो ? इन्द्रालाही जर तुम्ही सोडून गेलांत तर तुमचे मित्रत्व असावें अशी कोण इच्छा करील ? ३१.



स॒हो षु णो॒ वज्र॑हस्तैः॒ कण्वा॑सो अ॒ग्निं म॒रुद्भिः॑ । स्तु॒षे हिर॑ण्यवाशीभिः ॥ ३२ ॥

सहो इति । सु । नः । वज्रऽहस्तैः । कण्वासः । अग्निम् । मरुत्ऽभिः ।
स्तुषे । हिरण्यऽवाशीभिः ॥ ३२ ॥

कण्व कुलोत्पन्नांनो ! सुवर्णाचे भाले आणि वस्त्र हातांत धारण करणाऱ्या मरुतांच्या बरोबरच आतां मी अग्निरूप भगवंताचे स्तवन करतो. ३२.



ओ षु वृष्णः॒ प्रय॑ज्यू॒ना नव्य॑से सुवि॒ताय॑ । व॒वृ॒त्यां चि॒त्रवा॑जान् ॥ ३३ ॥

ओ इति । सु । वृष्णः । प्रऽयज्यून् । आ । नव्यसे । सुविताय ।
ववृत्याम् । चित्रऽवाजान् ॥ ३३ ॥

वीर्यशाली, पूज्यतम, आणि अद्‌भुतसत्वाढ्य मरुतांना आमच्या अपूर्व कल्याणासाठी वळवून आणतो. ३३.



गि॒रय॑श्चि॒न्नि जि॑हते॒ पर्शा॑नासो॒ मन्य॑मानाः । पर्व॑ताश्चि॒न्नि ये॑मिरे ॥ ३४ ॥

गिरयः । चित् । नि । जिहते । पर्शानासः । मन्यमानाः ।
पर्वताः । चित् । नि । येमिरे ॥ ३४ ॥

पर्वत देखील हरलो म्हणून त्यांच्यापुढे सामोरे झाले, आणि मेघ तर त्यांच्यापुढे अगदीं नम्र होऊन गेले. ३४.



आक्ष्ण॒यावा॑नो वहन्त्य॒न्तरि॑क्षेण॒ पत॑तः । धाता॑रः स्तुव॒ते वयः॑ ॥ ३५ ॥

आ । अक्ष्णऽयावानः । वहन्ति । अन्तरिक्षेण । पततः ।
धातारः । स्तुवते । वयः ॥ ३५ ॥

डोळ्यांच्या नजरेप्रमाणें झटकन धावणारे अश्व अंतरिक्षमार्गाने उड्डाण करणाऱ्या मरुतांना घेऊन येतात आणि स्तोतृजनाला तारुण्याचा जोम आणतात. ३५.



अ॒ग्निर्हि जानि॑ पू॒र्व्यश्छन्दो॒ न सूरो॑ अ॒र्चिषा॑ । ते भा॒नुभि॒र्वि त॑स्थिरे ॥ ३६ ॥

अग्निः । हि । जनि । पूर्व्यः । छन्दः । न । सूरः । अर्चिषा ।
ते । भानुऽभिः । वि । तस्थिरे ॥ ३६ ॥

छंदाप्रमाणे, किंवा सूर्य आपल्या प्रभेनें दृग्गोचर होतो त्याप्रमाणें हा पुरातन अग्नि प्रकट झाला, आणि त्याच्या किरणांबरोबरच मरुतांनीं जिकडे तिकडे संचार केला. ३६.



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ८ ( अश्विनीकुमारसूक्त )

ऋषी - सध्वंस काण्व : देवता - अश्विनीकुमार : छंद - अनुष्टुभ्



आ नो॒ विश्वा॑भिरू॒तिभि॒रश्वि॑ना॒ गच्छ॑तं यु॒वम् । दस्रा॒ हिर॑ण्यवर्तनी॒ पिब॑तं सो॒म्यं मधु॑ ॥ १ ॥

आ । नः । विश्वाभिः । ऊतिऽभिः । अश्विना । गच्छतम् । युवम् ।
दस्रा । हिरण्यवर्तनी इति हिरण्यऽवर्तनी । पिबतम् । सोम्यम् । मधु ॥ १ ॥

हे अश्वीहो, सकल सहाय्यांसह, तुम्ही उभयता आमच्याकडे या; आणि हे अद्‌भुतरूप, सुवर्णरथारूढ देवांनो, तुम्ही आमच्या सोमरसाचे मधुर पेय प्राशन करा. १.



आ नू॒नं या॑तमश्विना॒ रथे॑न॒ सूर्य॑त्वचा । भुजी॒ हिर॑ण्यपेशसा॒ कवी॒ गम्भी॑रचेतसा ॥ २ ॥

आ । नूनम् । यातम् । अश्विना । रथेन । सूर्यऽत्वचा ।
भुजी इति । हिरण्यऽपेशसा । कवी इति । गम्भीरऽचेतसा ॥ २ ॥

हे अश्वींनो, हे भक्तपोषकांनो, सुवर्णकांति देवांनो, प्रतिभासंपन्नांनो, गंभीरांतःकरण देवांनों, सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा आपल्या रथांत आरूढ होऊन त्वरेने या. २.



आ या॑तं॒ नहु॑ष॒स्पर्यान्तरि॑क्षात्सुवृ॒क्तिभिः॑ । पिबा॑थो अश्विना॒ मधु॒ कण्वा॑नां॒ सव॑ने सु॒तम् ॥ ३ ॥

आ । यातम् । नहुषः । परि । आ । अन्तरिक्षात् । सुवृक्तिऽभिः ।
पिबाथः । अश्विना । मधु । कण्वानाम् । सवने । सुतम् ॥ ३ ॥

तुम्ही नहुषाच्या यज्ञमंडपांत अंतरिक्षातून मंजुल स्तवनांच्या ध्वनीने प्रवेश करतां, आणि आम्हां कण्वकुलोत्पन्नांच्या सवनांत पिळून सिद्ध केले सोमपेय प्राशन करतां. ३.



आ नो॑ यातं दि॒वस्पर्यान्तरि॑क्षादधप्रिया । पु॒त्रः कण्व॑स्य वामि॒ह सु॒षाव॑ सो॒म्यं मधु॑ ॥ ४ ॥

आ । नः । यातम् । दिवः । परि । आ । अन्तरिक्षात् । अधऽप्रिया ।
पुत्रः । कण्वस्य । वाम् । इह । सुसाव । सोम्यम् । मधु ॥ ४ ॥

तर तुम्ही आमच्याकडे द्युलोकांतून अंतरिक्षांतून आगमन करा; कारण हे भक्तप्रिय देवांनो, कण्वकुलोत्पन्न जो मी त्यानें तुमच्यासाठी मधुर सोमरस पिळून सिद्ध केला आहे. ४.



आ नो॑ यात॒मुप॑श्रु॒त्यश्वि॑ना॒ सोम॑पीतये । स्वाहा॒ स्तोम॑स्य वर्धना॒ प्र क॑वी धी॒तिभि॑र्नरा ॥ ५ ॥

आ । नः । यातम् । उपऽश्रुति । अश्विना । सोमऽपीतये ।
स्वाहा । स्तोमस्य । वर्धना । प्र । कवी इति । धीतिऽभिः । नरा ॥ ५ ॥

आमची प्रार्थना ऐकून तरी, हे अश्वीहो, तुम्हीं सोमप्राशनार्थ इकडे या; सूक्ताची अभिवृद्धि करणाऱ्या देवांनो, हे कवींनो, हें वीरांनो, आमच्या ध्यानस्तुतींनी तुमचें स्वागत होवो. ५.



यच्चि॒द्धि वां॑ पु॒र ऋष॑यो जुहू॒रेऽव॑से नरा । आ या॑तमश्वि॒ना ग॑त॒मुपे॒मां सु॑ष्टु॒तिं मम॑ ॥ ६ ॥

यत् । चित् । हि । वाम् । पुरा । ऋषयः । जुहूरे । अवसे । नरा ।
आ । यातम् । अश्विना । आ । गतम् । उप । इमाम् । सुऽस्तुतिम् । मम ॥ ६ ॥

ज्याप्रमाणें पूर्वीं ऋषींनी कृपाप्रसादासाठी स्तुतींनी करुणा भाकून तुम्हाला आणले, त्याचप्रमाणें आतांही हे वीरांनो या, आणि हे अश्वीहो, कळवळ्यानें केलेल्या ह्या माझ्या स्तुतीकडे आगमन करा ६.



दि॒वश्चि॑द्रोच॒नादध्या नो॑ गन्तं स्वर्विदा । धी॒भिर्व॑त्सप्रचेतसा॒ स्तोमे॑भिर्हवनश्रुता ॥ ७ ॥
किम॒न्ये पर्या॑सते॒ऽस्मत्स्तोमे॑भिर॒श्विना॑ । पु॒त्रः कण्व॑स्य वा॒मृषि॑र्गी॒र्भिर्व॒त्सो अ॑वीवृधत् ॥ ८ ॥

दिवः । चित् । रोचनात् । अधि । आ । नः । गन्तम् । स्वःऽविदा ।
धीभिः । वत्सऽप्रचेतसा । स्तोमेभिः । हवनऽश्रुता ॥ ७ ॥
किम् । अन्ये । परि । आसते । अस्मत् । स्तोमेभिः । अश्विना ।
पुत्रः । कण्वस्य । वाम् । ऋषिः । गीःऽभिः । वत्सः । अवीवृधत् ॥ ८ ॥

तेजोमय द्युलोकापासून तुम्ही आमच्याकडे आगमन करा; दिव्यप्रकाशदायकांनो, मज वत्साची सेवा जाणणाऱ्या देवांनो, ध्यानस्तुतींनी प्रसन्न होऊन आगमन करा. भक्ताचा धांवा ऐकणाऱ्यांनो, स्तवनांनी इकडे आगमन करा; काय ? आमच्याशिवाय दुसरे भक्त प्रेमळ स्तवनांनी तुम्हाला विनवीत आहेत ? पण, हे अश्वीहो, कण्वपुत्र जो वत्सऋषि त्यानें तुम्हांला स्तवनांनी हर्षोत्फुल्ल केलें नाहीं काय ? ७-८.



आ वां॒ विप्र॑ इ॒हाव॒सेऽह्व॒त्स्तोमे॑भिरश्विना । अरि॑प्रा॒ वृत्र॑हन्तमा॒ ता नो॑ भूतं मयो॒भुवा॑ ॥ ९ ॥

आ । वाम् । विप्रः । इह । अवसे । अह्वत् । स्तोमेभिः । अश्विना ।
अरिप्रा । वृत्रहन्ऽतमा । ता । नः । भूतम् । मयःऽभुवा ॥ ९ ॥

तुमच्या ज्ञानी भक्ताने तुमचा कृपाप्रसाद व्हावा म्हणून तुम्हांला येथें स्तवनांनी पाचारण केले आहे; तर हे अश्वीदेवांनो, हे निष्कलंकांनो, अज्ञानरूप वृत्राचा समूळ उच्छेद करणाऱ्या देवांनो, तुम्ही आम्हाला कल्याणप्रद व्हा. ९.



आ यद्वां॒ योष॑णा॒ रथ॒मति॑ष्ठद्वाजिनीवसू । विश्वा॑न्यश्विना यु॒वं प्र धी॒तान्य॑गच्छतम् ॥ १० ॥

आ । यत् । वाम् । योषणा । रथम् । अतिष्ठत् । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू ।
विश्वानि । अश्विना । युवम् । प्र । धीतानि । अगच्छतम् ॥ १० ॥

ज्या वेळेस तुमची नववधू रथांत आरूढ झाली; त्या वेळेस, हे सत्वाढ्य अश्वींनो, सर्वांच्या ध्येयाकडे तुम्ही लक्ष पोहोंचविलेत. १०.



अतः॑ स॒हस्र॑निर्णिजा॒ रथे॒ना या॑तमश्विना । व॒त्सो वां॒ मधु॑म॒द्वचोऽशं॑सीत्का॒व्यः क॒विः ॥ ११ ॥

अतः । सहस्रऽनिर्निजा । रथेन । आ । यातम् । अश्विना ।
वत्सः । वाम् । मधुऽमत् । वचः । अशंसीत् । काव्यः । कविः ॥ ११ ॥

तर असंख्य आकार धारण करणाऱ्या तुमच्या रथांतून, हे अश्वीही, तुम्ही आगमन करा. पहा, काव्यमर्मज्ञ आणि कवि जो वत्स त्यानें तुमची मधुर शब्दांनी प्रशंसा केलीच आहे. ११.



पु॒रु॒म॒न्द्रा पु॑रू॒वसू॑ मनो॒तरा॑ रयी॒णाम् । स्तोमं॑ मे अ॒श्विना॑वि॒मम॒भि वह्नी॑ अनूषाताम् ॥ १२ ॥

पुरुऽमन्द्रा । पुरुवसू इति पुरुऽवसू । मनोतरा । रयीणाम् ।
स्तोमम् । मे । अश्विनौ । इमम् । अभि । वह्नी इति । अनूषाताम् ॥ १२ ॥

हे अलोटहर्षाने प्रसन्न आणि अपारनिधींनीं संपन्न असणाऱ्या देवांनो ! दिव्य धनांचे दाते तुम्ही आहांत. हे अश्वींनो, भक्ताचे हृदय तुम्ही आपल्याकडे खेंचणारे आहां, तर ह्या माझ्या स्तोत्राचे कौतुक करा. १२.



आ नो॒ विश्वा॑न्यश्विना ध॒त्तं राधां॒स्यह्र॑या । कृ॒तं न॑ ऋ॒त्विया॑वतो॒ मा नो॑ रीरधतं नि॒दे ॥ १३ ॥

आ । नः । विश्वानि । अश्विना । धत्तम् । राधांसि । अह्रया ।
कृतम् । नः । ऋत्वियऽवतः । मा । नः । रीरधतम् । निदे ॥ १३ ॥

अश्विदेवांनो, तुम्ही आम्हांला सर्व प्रकारची अशीं कृपाधनें द्या की त्यांत कोणताही व्यत्यय नसावा. आम्ही वेळच्या वेळीं यजन करावे असें करा, निन्दकांच्या तावडींत आम्हांस देऊं नका, आणि निंदेच्या आधीन आम्हांस करूं नका. १३.



यन्ना॑सत्या परा॒वति॒ यद्वा॒ स्थो अध्यम्ब॑रे । अतः॑ स॒हस्र॑निर्णिजा॒ रथे॒ना या॑तमश्विना ॥ १४ ॥

यत् । नासत्या । पराऽवति । यत् । वा । स्थः । अधि । अम्बरे ।
अतः । सहस्रऽनिर्निजा । रथेन । आ । यातम् । अश्विना ॥ १४ ॥

सत्यस्वरूप अश्वीहो, तुम्ही अगदी दूरच्या लोकीं असला, किंवा आकाशांत जरी असला, तरी तेथूनही आपल्या अगणित रूपे धारण करणाऱ्या रथांतून तुम्ही आमच्याकडे या. १४.



यो वां॑ नासत्या॒वृषि॑र्गी॒र्भिर्व॒त्सो अवी॑वृधत् । तस्मै॑ स॒हस्र॑निर्णिज॒मिषं॑ धत्तं घृत॒श्चुत॑म् ॥ १५ ॥

यः । वाम् । नासत्यौ । ऋषिः । गीःऽभिः । वत्सः । अवीवृधत् ।
तस्मै । सहस्रऽनिर्निजम् । इषम् । धत्तम् । घृतऽश्चुतम् ॥ १५ ॥

सत्यस्वरूप अश्वीहो, ज्या वत्स ऋषीने प्रार्थनास्तुतींनी तुमची महती गायिली त्याला तुम्ही घृतप्रचुर आणि हजारों स्वच्छ रूपें धारण करणारी उत्साह संपत्ति दिलीत. १५.



प्रास्मा॒ ऊर्जं॑ घृत॒श्चुत॒मश्वि॑ना॒ यच्छ॑तं यु॒वम् । यो वां॑ सु॒म्नाय॑ तु॒ष्टव॑द्वसू॒याद्दा॑नुनस्पती ॥ १६ ॥

प्र । अस्मै । ऊर्जम् । घृतऽश्चुतम् । अश्विना । यच्छतम् । युवम् ।
यः । वाम् । सुम्नाय । तुस्तवत् । वसुऽयात् । दानुनः । पती इति ॥ १६ ॥

हे अश्वीहों, तुम्ही त्याला अशी घृतप्रचुर ऊर्जस्विता द्या, कीं त्यानें कल्याण प्राप्तिसाठी तुमचे स्तवन करावे, आणि हे दातृश्रेष्ठहो, दिव्यनिधीची आकांक्षा धरावी. १६



आ नो॑ गन्तं रिशादसे॒मं स्तोमं॑ पुरुभुजा । कृ॒तं नः॑ सु॒श्रियो॑ नरे॒मा दा॑तम॒भिष्ट॑ये ॥ १७ ॥

आ । नः । गन्तम् । रिशादसा । इमम् । स्तोमम् । पुरुऽभुजा ।
कृतम् । नः । सुऽश्रियः । नरा । इमा । दातम् । अभिष्टये ॥ १७ ॥

शत्रुमर्दनांनो, तुम्ही ह्या प्रार्थनास्तोत्राकडे या. सर्वांचे पोषण करणा-या देवांनो, हे वीरांनो, आम्हांला उत्तम वैभवानें मंडित करा; आमच्या इच्छित प्राप्तिसाठी हीं वरदाने आम्हांला द्याच. १७.



आ वां॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ प्रि॒यमे॑धा अहूषत । राज॑न्तावध्व॒राणा॒मश्वि॑ना॒ याम॑हूतिषु ॥ १८ ॥

आ । वाम् । विश्वाभिः । ऊतिऽभिः । प्रियऽमेधाः । अहूषत ।
राजन्तौ । अध्वराणाम् । अश्विना । यामऽहूतिषु ॥ १८ ॥

तुम्ही आपल्या सकल सहाय्यांसह यावें म्हणून प्रियमेधाने तुमचा धांवा केला. कारण प्रत्येक प्रहरांत देवाप्रीत्यर्थ होणाऱ्या हवनांत, आणि हे अश्वीहो, अध्वरयागांतही तुम्ही राजाप्रमाणें मिरवितां. १८.



आ नो॑ गन्तं मयो॒भुवाश्वि॑ना श॒म्भुवा॑ यु॒वम् । यो वां॑ विपन्यू धी॒तिभि॑र्गी॒र्भिर्व॒त्सो अवी॑वृधत् ॥ १९ ॥

आ । नः । गन्तम् । मयःऽभुवा । अश्विना । शम्ऽभुवा । युवम् ।
यः । वाम् । विऽपन्यू इति । धीतिऽभिः । गीःऽभिः । वत्सः । अवीवृधत् ॥ १९ ॥

अश्वीहो, कल्याणकारक आणि मंगलप्रद असे तुम्ही आमच्याकडे या. हे स्तवनार्ह देवांनो ! पहा, ह्या वत्साने आपल्या ध्यान स्तोत्रांनी आणि कवनांनीं तुमची महती प्रसृत केली. १९.



याभिः॒ कण्वं॒ मेधा॑तिथिं॒ याभि॒र्वशं॒ दश॑व्रजम् । याभि॒र्गोश॑र्य॒माव॑तं॒ ताभि॑र्नोऽवतं नरा ॥ २० ॥

याभिः । कण्वम् । मेधऽअतिथिम् । याभिः । वशम् । दशऽव्रजम् ।
याभिः । गोऽशर्यम् । आवतम् । ताभिः । नः । अवतम् । नरा ॥ २० ॥

ज्या दृष्टींनी तुम्ही कण्वावर आणि मेधातिथीवर कृपा केलीत, ज्या दृष्टींनी तुम्ही वश आणि दशव्रज यांचें रक्षण केलेत, ज्या दृष्टींनी तुम्ही गोशर्याचा सांभाळ केलात, त्याच कटाक्षांनी हे वीरांनो, आमच्यावरही कृपा करा. २०.



याभि॑र्नरा त्र॒सद॑स्यु॒माव॑तं॒ कृत्व्ये॒ धने॑ । ताभिः॒ ष्व१॒॑स्माँ अ॑श्विना॒ प्राव॑तं॒ वाज॑सातये ॥ २१ ॥

याभिः । नरा । त्रसदस्युम् । आवतम् । कृत्व्ये । धने ।
ताभिः । सु । अस्मान् । अश्विना । प्र । अवतम् । वाजऽसातये ॥ २१ ॥

हे वीरनायकांनों ! कर्तव्य म्हणून ठरलेल्या युद्धांत ज्या सहाय्यांनी तुम्ही त्रसदस्यूचे रक्षण केलेत त्याच सहायांनी, हे अश्वीहो, सत्वधनाच्या लाभासाठी आमचेही सहाय्य करा. २१.



प्र वां॒ स्तोमाः॑ सुवृ॒क्तयो॒ गिरो॑ वर्धन्त्वश्विना । पुरु॑त्रा॒ वृत्र॑हन्तमा॒ ता नो॑ भूतं पुरु॒स्पृहा॑ ॥ २२ ॥

प्र । वाम् । स्तोमाः । सुऽवृक्तयः । गिरः । वर्धन्तु । अश्विना ।
पुरुऽत्रा । वृत्रहन्ऽतमा । ता । नः । भूतम् । पुरुऽस्पृहा ॥ २२ ॥

स्तोत्रें, प्रेमळ प्रार्थना आणि कवनें ही, अश्वीदेवांनो, तुमचे यश वृद्धिंगत करोत. सर्व ठिकाणच्या दुष्टांचा समूळ नाश करणारे असे तुम्ही आमच्या मनांत स्पृहणीय आकांक्षा विपुल उत्पन्न करा. २२.



त्रीणि॑ प॒दान्य॒श्विनो॑रा॒विः सान्ति॒ गुहा॑ प॒रः । क॒वी ऋ॒तस्य॒ पत्म॑भिर॒र्वाग्जी॒वेभ्य॒स्परि॑ ॥ २३ ॥

त्रीणि । पदानि । अश्विनोः । आविः । सन्ति । गुहा । परः ।
कवी इति । ऋतस्य । पत्मऽभिः । अर्वाक् । जीवेभ्यः । परि ॥ २३ ॥

पहा, अश्विदेवांची तीन पावले आपल्या गुप्तस्थानांतून बाहेर येऊन दृग्गोचर होत आहेत. तर हे दिव्य कवींनो, सनातन सत्याच्या सोपानानें आम्हा जीवांवर दया करण्यासाठीं आमच्या सन्मुख या. २३.



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ९ ( अश्विनीकुमारसूक्त)

ऋषी - शशकर्ण काण्व : देवता - अश्विनीकुमार : छंद - १, ४, ६, १४-१५ बृहती; २,३,-२०-२१ गायत्री; ५ ककुभ ; १० त्रिष्टुभ् ; ११ विराज् ; १२ जगती; अवशिष्ट-अनुष्टुभ्



आ नू॒नम॑श्विना यु॒वं व॒त्सस्य॑ गन्त॒मव॑से ।
प्रास्मै॑ यच्छतमवृ॒कं पृ॒थु च्छ॒र्दिर्यु॑यु॒तं या अरा॑तयः ॥ १ ॥

आ । नूनम् । अश्विना । युवम् । वत्सस्य । गन्तम् । अवसे ।
प्र । अस्मै । यच्छतम् । अवृकम् । पृथु । छर्दिः । युयुतम् । याः । अरातयः ॥ १ ॥

हे अश्वीहो, आतांच्या आतां तुम्ही ह्या वत्सावर कृपा करण्यासाठीं आगमन करा. त्याला तुमचा निर्वेध आणि विस्तीर्ण आश्रय द्या; आणि जे अधार्मिक असतील त्यांना छाटून टाका. १.



यद॒न्तरि॑क्षे॒ यद्दि॒वि यत्पङ्च॒ मानु॑षाँ॒ अनु॑ । नृ॒म्णं तद्ध॑त्तमश्विना ॥ २ ॥

यत् । अन्तरिक्षे । यत् । दिवि । यत् । पञ्च । मानुषान् । अनु ।
नृम्णम् । तत् । धत्तम् । अश्विना ॥ २ ॥

जे जें अंतरिक्षांत, जें जें द्युलोकांत, किंबहुना मानवांच्या पांचही समुदायांत जें पौरुष असतें, तें हे अश्वीहो, तुम्हीच त्या ठिकाणी ठेवतां. २.



ये वां॒ दंसां॑स्यश्विना॒ विप्रा॑सः परिमामृ॒शुः । ए॒वेत्का॒ण्वस्य॑ बोधतम् ॥ ३ ॥

ये । वाम् । दंसांसि । अश्विना । विप्रासः । परिऽममृशुः ।
एव । इत् । काण्वस्य । बोधतम् ॥ ३ ॥

तुमच्या अद्‌भुत चारित्र्याचें ज्या मर्मज्ञ भक्तांनी सतत चिंतन चालविले, त्यांच्याप्रमाणेच ह्या कण्वाची स्थिति आहे असें समजा. ३.



अ॒यं वां॑ घ॒र्मो अ॑श्विना॒ स्तोमे॑न॒ परि॑ षिच्यते ।
अ॒यं सोमो॒ मधु॑मान्वाजिनीवसू॒ येन॑ वृ॒त्रं चिके॑तथः ॥ ४ ॥

अयम् । वाम् । घर्मः । अश्विना । स्तोमेन । परि । सिच्यते ।
अयम् । सोमः । मधुऽमान् । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । येन । वृत्रम् । चिकेतथः ॥ ४ ॥

हेच तें धर्मपात्र तुमच्यासाठी आहे की जें आमच्या स्तवनामुळे दुग्धाने भरून जातें; आणि हाच तो मधुर सोमरस कीं ज्याचे प्राशन केल्याबरोबर, हे सत्वधनाढ्य देवांनो, वृत्र कोठे आहे तें तुम्हांला समजते. ४.



यद॒प्सु यद्वन॒स्पतौ॒ यदोष॑धीषु पुरुदंससा कृ॒तम् । तेन॑ माविष्टमश्विना ॥ ५ ॥

यत् । अप्ऽसु । यत् । वनस्पतौ । यत् । ओषधीषु । पुरुऽदंससा । कृतम् ।
तेन । मा । अविष्टम् । अश्विना ॥ ५ ॥

जी करामत उदकांत, जी मोठमोठ्या वृक्षांत, तसेंच जी लतादिकांत तुम्ही करून ठेवली आहात, त्या करामतीच्या योगाने हे असंख्य अद्‌भुत कृत्ये करणाऱ्या देवांनो, हे अश्वीहो, तुमचे कृपाछत्र आमच्यावर असू द्या. ५.



यन्ना॑सत्या भुर॒ण्यथो॒ यद्वा॑ देव भिष॒ज्यथः॑ ।
अ॒यं वां॑ व॒त्सो म॒तिभि॒र्न वि॑न्धते ह॒विष्म॑न्तं॒ हि गच्छ॑थः ॥ ६ ॥

यत् । नासत्या । भुरण्यथः । यत् । वा । देवा । भिषज्यथः ।
अयम् । वाम् । वत्सः । मतिऽभिः । न । विन्धते । हविष्मन्तम् । हि । गच्छथः ॥ ६ ॥

सत्यस्वरूपदेवांनो, तुम्ही वेगाने भ्रमण करतां; आणि हे दिव्य विभूतींनो, मानवांना औषधोपचार करतां, पण त्या गोष्टी ह्या वत्साला तुमच्या मनामुळेच कीं काय मिळतात; कारण तुम्ही हवि अर्पण करणाराकडेच जातां. ६.



आ नू॒नम॒श्विनो॒रृषिः॒ स्तोमं॑ चिकेत वा॒मया॑ ।
आ सोमं॒ मधु॑मत्तमं घ॒र्मं सि॑ङ्चा॒दथ॑र्वणि ॥ ७ ॥

आ । नूनम् । अश्विनोः । ऋषिः । स्तोमम् । चिकेत । वामया ।
आ । सोमम् । मधुमत्ऽतमम् । घर्मम् । सिञ्चात् । अथर्वणि ॥ ७ ॥

आतांच ह्या ऋषीने आपल्या उत्कृष्ट प्रतिभेने अश्वीदेवांचे स्तोत्र ध्यानांत आणले आहे. तर आतां त्यानें अत्यंत मधुर सोमरस आणि हा उष्ण हविर्भाग अथर्वपात्रांत ओतून ठेवावा. ७.



आ नू॒नं र॒घुव॑र्तनिं॒ रथं॑ तिष्ठाथो अश्विना ।
आ वां॒ स्तोमा॑ इ॒मे मम॒ नभो॒ न चु॑च्यवीरत ॥ ८ ॥

आ । नूनम् । रघुऽवर्तनिम् । रथम् । तिष्ठाथः । अश्विना ।
आ । वाम् । स्तोमाः । इमे । मम । नभः । न । चुच्यवीरत ॥ ८ ॥

तुमच्या शीघ्रगामी रथावर हे अश्वीहो, तुम्ही आतांच्या आतां आरोहण करा. पहा, मीं केलेल्या प्रार्थनास्तवनांनीं तुम्हांला मेघाप्रमाणें हालवून सोडले आहे. ८.



यद॒द्य वां॑ नासत्यो॒क्थैरा॑चुच्युवी॒महि॑ ।
यद्वा॒ वाणी॑भिरश्विने॒वेत्का॒ण्वस्य॑ बोधतम् ॥ ९ ॥

यत् । अद्य । वाम् । नासत्या । उक्थैः । आऽचुच्युवीमहि ।
यत् । वा । वाणीभिः । अश्विना । एव । इत् । काण्वस्य । बोधतम् ॥ ९ ॥

सत्यस्वरूप देवांनो, आम्ही जसे आज उक्थ स्तोत्रांनी तुमचे अंतःकरण हलवून टाकीत आहो; किंवा हे अश्वीहो, तुम्हांला स्तुतींनी विनवीत आहो त्याचप्रमाणे कण्वाकडेही लक्ष ठेवा. ९.



यद्वां॑ क॒क्षीवाँ॑ उ॒त यद्व्य॑श्व॒ ऋषि॒र्यद्वां॑ दी॒र्घत॑मा जु॒हाव॑ ।
पृथी॒ यद्वां॑ वै॒न्यः साद॑नेष्वे॒वेदतो॑ अश्विना चेतयेथाम् ॥ १० ॥

यत् । वाम् । कक्षीवान् । उत । यत् । विऽअश्वः । ऋषिः । यत् । वाम् । दीर्घऽतमाः । जुहाव ।
पृथी । यत् । वाम् । वैन्यः । सदनेषु । एव । इत् । अतः । अश्विना । चेतयेथाम् ॥ १० ॥

जसा पूर्वी कक्षीवानानें, जसा व्यश्व ऋषिनें, किंवा जसा दीर्घतमाने तुमचा धांवा केला, किंवा जसा वेनपुत्र पृथी याने यज्ञमंदिरात धांवा केला, त्याचप्रमाणे हे अश्वीहो, आमचीही विज्ञप्ति तुमच्या ध्यानांत असू द्या. १०.



या॒तं छ॑र्दि॒ष्पा उ॒त नः॑ पर॒स्पा भू॒तं ज॑ग॒त्पा उ॒त न॑स्तनू॒पा ।
व॒र्तिस्तो॒काय॒ तन॑याय यातम् ॥ ११ ॥

यातम् । छर्दिःऽपौ । उत । नः । परःऽपा । भूतम् । जगत्ऽपौ । उत । नः । तनूऽपा ।
वर्तिः । तोकाय । तनयाय । यातम् ॥ ११ ॥

आमच्या आश्रयाचे प्रतिपालक म्हणून तुम्ही आगमन करा, आणि आमच्या पाठीवर राहून आमचा सांभाळ करणारे व्हा. तुम्ही जगत्पालक म्हणून आमच्या शरीराचे संरक्षक व्हा; आणि आमच्या मुलांलेकरांसाठी आमच्या यज्ञगृही आगमन करा. ११.



यदिन्द्रे॑ण स॒रथं॑ या॒थो अ॑श्विना॒ यद्वा॑ वा॒युना॒ भव॑थः॒ समो॑कसा ।
यदा॑दि॒त्येभि॑रृ॒भुभिः॑ स॒जोष॑सा॒ यद्वा॒ विष्णो॑र्वि॒क्रम॑णेषु॒ तिष्ठ॑थः ॥ १२ ॥

यत् । इन्द्रेण । सऽरथम् । याथः । अश्विना । यत् । वा । वायुना । भवथः । सम्ऽओकसा ।
यत् । आदित्येभिः । ऋभुऽभिः । सऽजोषसा । यत् । वा । विष्णोः । विऽक्रमणेषु । तिष्ठथः ॥ १२ ॥

तुम्ही इन्द्रासह एकाच रथांत बसून जात असला, किंवा हे अश्वीहो, वायूमह एकाच गृहांत वास करीत असला, किंवा आदित्याबरोबर, किंवा ऋभूंबरोबर आनंद करीत असला अथवा विष्णूच्या मार्गक्रमणांत तुम्ही त्याच्याबरोबर राहिला असला तरीही आमच्याकडे या. १२.



यद॒द्याश्विना॑व॒हं हु॒वेय॒ वाज॑सातये । यत्पृ॒त्सु तु॒र्वणे॒ सह॒स्तच्छ्रेष्ठ॑म॒श्विनो॒रवः॑ ॥ १३ ॥

यत् । अद्य । अश्विनौ । अहम् । हुवेय । वाजऽसातये ।
यत् । पृत्ऽसु । तुर्वणे । सहः । तत् । श्रेष्ठम् । अश्विनोः । अवः ॥ १३ ॥

आज हे अश्वीहो, मीं सत्वधनाच्या प्राप्तीसाठी तुमची विनवणी करीत आहे; कारण संग्रामामध्ये झुंजारवीराच्या अंगी जी धडाडी येते तीच तुम्हां अश्वीदेवांची कृपा होय. १३.



आ नू॒नं या॑तमश्विने॒मा ह॒व्यानि॑ वां हि॒ता । इ॒मे सोमा॑सो॒ अधि॑ तु॒र्वशे॒ यदा॑वि॒मे कण्वे॑षु वा॒मथ॑ ॥ १४ ॥

आ । नूनम् । यातम् । अश्विना । इमा । हव्यानि । वाम् । हिता ।
इमे । सोमासः । अधि । तुर्वशे । यदौ । इमे । कण्वेषु । वाम् । अथ ॥ १४ ॥

म्हणून हे अश्वीहो, आतांच आमच्याकडे या; हे तुमचे हविर्भाग येथे ठेवले आहेत. हे सोमरस, तुर्वश आणि यदु यांच्या समक्ष पिळले आहेत; हे तुमच्या कण्वांसमक्ष पिळले आहेत. १४.



यन्ना॑सत्या परा॒के अ॑र्वा॒के अस्ति॑ भेष॒जम् । तेन॑ नू॒नं वि॑म॒दाय॑ प्रचेतसा छ॒र्दिर्व॒त्साय॑ यच्छतम् ॥ १५ ॥

यत् । नासत्या । पराके । अर्वाके । अस्ति । भेषजम् ।
तेन । नूनम् । विऽमदाय । प्रऽचेतसा । छर्दिः । वत्साय । यच्छतम् ॥ १५ ॥

सत्यस्वरूप देवांनो, दूर देशांत किंवा येथें जवळ जे जें औषध असेल त्यानें युक्त असें जें निवासस्थान तें विमदाला आणि वत्साला, हे पूर्णज्ञानी देवांनो, तुम्ही अर्पण करा. १५.



अभु॑त्स्यु॒ प्र दे॒व्या सा॒कं वा॒चाहम॒श्विनोः॑ । व्या॑वर्दे॒व्या म॒तिं वि रा॒तिं मर्त्ये॑भ्यः ॥ १६ ॥

अभुत्सि । ऊं इति । प्र । देव्या । साकम् । वाचा । अहम् । अश्विनोः ।
वि । आवः । देवि । आ । मतिम् । वि । रातिम् । मर्त्येभ्यः ॥ १६ ॥

अश्वीदेवांच्या शब्दाबरोबर उषादेवीसह मीही जागृत झालो. तर हे उषा देवि, काव्यस्फूर्ति आणि वरप्रसाद यांचा साठा तूं आम्हां मर्त्यजनांसाठी प्रकट कर. १६.



प्र बो॑धयोषो अ॒श्विना॒ प्र दे॑वि सूनृते महि । प्र य॑ज्ङहोतरानु॒षक्प्र मदा॑य॒ श्रवो॑ बृ॒हत् ॥ १७ ॥

प्र । बोधय । उषः । अश्विना । प्र । देवि । सूनृते । महि ।
प्र । यज्ञऽहोतः । आनुषक् । प्र । मदाय । श्रवः । बृहत् ॥ १७ ॥

देवी उषे, तूं अश्वीदेवांना आमच्या यज्ञाची जाणीव करून दे. हे सत्यमधुरभाषिणी श्रेष्ठ देवि, तूं सज्ज हो; यज्ञहोत्या तूंही सत्वर सिद्ध हो, आणि दिव्यविबुधांच्या तल्लीनतेसाठी त्यांचें महत् यश वर्णन कर. १७.



यदु॑षो॒ यासि॑ भा॒नुना॒ सं सूर्ये॑ण रोचसे । आ हा॒यम॒श्विनो॒ रथो॑ व॒र्तिर्या॑ति नृ॒पाय्य॑म् ॥ १८ ॥

यत् । उषः । यासि । भानुना । सम् । सूर्येण । रोचसे ।
आ । ह । अयम् । अश्विनोः । रथः । वर्तिः । याति । नृऽपाय्यम् ॥ १८ ॥

हे उषे, तू जसजसी गमन करतेस, तसतशी आपल्या उज्ज्वलतेनें सूर्याच्या बरोबरीनें प्रकाशमान होतेस ! अशा वेळी अश्वीदेवांचा रथही, वीरांनी रक्षण करण्यास योग्य अशा यज्ञमण्डपाकडे येतो. १८.



यदापी॑तासो अं॒शवो॒ गावो॒ न दु॒ह्र ऊध॑भिः । यद्वा॒ वाणी॒रनू॑षत॒ प्र दे॑व॒यन्तो॑ अ॒श्विना॑ ॥ १९ ॥
प्र द्यु॒म्नाय॒ प्र शव॑से॒ प्र नृ॒षाह्या॑य॒ शर्म॑णे । प्र दक्षा॑य प्रचेतसा ॥ २० ॥

यत् । आऽपीतासः । अंशवः । गावः । न । दुह्रे । ऊधऽभिः ।
यत् । वा । वाणीः । अनूषत । प्र । देवऽयन्तः । अश्विना ॥ १९ ॥
प्र । द्युम्नाय । प्र । शवसे । प्र । नृऽसह्याय । शर्मणे ।
प्र । दक्षाय । प्रऽचेतसा ॥ २० ॥

जेव्हां किंचित् पिवळसर अशा सोमवल्ली, धेनू आपल्या कासेंतून पान्हा सोडतात त्याप्रमाणें मधुररसाची धारा सोडतात; किंवा ज्या वेळेस प्रेमळ भक्त प्रार्थना म्हणूं लागतात, तेव्हां अश्विदेवहो, आमच्या तेजस्वितेसाठी, उत्कट बलासाठीं, वीरांना योग्य अशा धकाधकीसाठी, जगत्‌कल्याणासाठीं आणि कर्तव्यतत्परतेसाठी, हे पूर्णप्रज्ञ देवांनो, तुम्ही पुढें सरसावा. १९-२०.



यन्नू॒नं धी॒भिर॑श्विना पि॒तुर्योना॑ नि॒षीद॑थः । यद्वा॑ सु॒म्नेभि॑रुक्थ्या ॥ २१ ॥

यत् । नूनम् । धीभिः । अश्विना । पितुः । योना । निऽसीदथः ।
यत् । वा । सुम्नेभिः । उक्थ्या ॥ २१ ॥

जेव्हां आमच्या ध्यानाने प्रसन्न होऊन हे अश्वीहो ! तुम्हीं आमच्या पितृसदनांत विराजमान होतां, जेव्हां हे उक्थगायनप्रिय देवांनो, उत्तम स्तुतींनी तुमचे स्तवन होतें तेव्हाही तुम्ही प्रकट व्हा. २१.



ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त १० ( अश्विनीकुमारसूक्त)

ऋषी - प्रगाथ काण्व : देवता - अश्विनीकुमार : छंद - १ बृहती; २ मध्येज्योति; ३ अनुष्टुभ् ; ४ आस्तारपंक्ति; ५ बृहती; ६ सतोबृहती



यत्स्थो दी॒र्घप्र॑सद्मनि॒ यद्वा॒दो रो॑च॒ने दि॒वः ।
यद्वा॑ समु॒द्रे अध्याकृ॑ते गृ॒हेऽत॒ आ या॑तमश्विना ॥ १ ॥

यत् । स्थः । दीर्घऽप्रसद्मनि । यत् । वा । अदः । रोचने । दिवः ।
यत् । वा । समुद्रे । अधि । आऽकृते । गृहे । अतः । आ । यातम् । अश्विना ॥ १ ॥

तुम्ही कदाचित् दूरच्या प्रवासांत असला, किंवा त्या द्युलोकाच्या प्रकाशमय स्थानांत असला, अथवा विस्तीर्ण अशा अंतरिक्ष समुद्रांत निर्माण केलेल्या मंदिरात असला तरी तेथूनही, हे अश्वीहो, आमच्याकडे या. १.



यद्वा॑ य॒ज्ङं मन॑वे सम्मिमि॒क्षथु॑रे॒वेत्का॒ण्वस्य॑ बोधतम् ।
बृह॒स्पतिं॒ विश्वा॑न्दे॒वाँ अ॒हं हु॑व॒ इन्द्रा॒विष्णू॑ अ॒श्विना॑वाशु॒हेष॑सा ॥ २ ॥

यत् । वा । यज्ञम् । मनवे । सम्ऽमिमिक्षथुः । एव । इत् । काण्वस्य । बोधतम् ।
बृहस्पतिम् । विश्वान् । देवान् । अहम् । हुवे । इन्द्राविष्णू इति । अश्विनौ । आशुऽहेषसा ॥ २ ॥

अथवा मनुराजासाठी जसा तुम्ही यज्ञांत भाग घेतलात, तसाच कण्वाच्याही यज्ञांत घेतला पाहिजे असें तुम्ही समजा. म्हणून तुमच्याबरोबरच बृहस्पति, सर्व दिव्यविबुध, तसेच इन्द्र आणि विष्णु यांना, हे चपलाश्वगामी देवांनो, मीं पाचारण करतो. २.



त्या न्व१॒॑श्विना॑ हुवे सु॒दंस॑सा गृ॒भे कृ॒ता ।
ययो॒रस्ति॒ प्र णः॑ स॒ख्यं दे॒वेष्वध्याप्य॑म् ॥ ३ ॥

त्या । नु । अश्विना । हुवे । सुऽदंससा । गृभे । कृता ।
ययोः । अस्ति । प्र । नः । सख्यम् । देवेषु । अधि । आप्यम् ॥ ३ ॥

त्या अश्वीदेवांचा मी धांवा करतो कीं ज्याची अद्‌भुत सत्कृत्ये मानवांनी ध्यानांत धरण्यासाठी केलेली आहेत; आणि दिव्यविभूतींमध्यें ज्यांचे आमच्याशी जिव्हाळ्याचे मित्रत्व आणि भक्तीचे नाते जुळलेले आहे; ३.



ययो॒रधि॒ प्र य॒ज्ङा अ॑सू॒रे सन्ति॑ सू॒रयः॑ ।
ता य॒ज्ङस्या॑ध्व॒रस्य॒ प्रचे॑तसा स्व॒धाभि॒र्या पिब॑तः सो॒म्यं मधु॑ ॥ ४ ॥

ययोः । अधि । प्र । यज्ञाः । असूरे । सन्ति । सूरयः ।
ता । यज्ञस्य । अध्वरस्य । प्रऽचेतसा । स्वधाभिः । या । पिबतः । सोम्यम् । मधु ॥ ४ ॥

ज्या तुम्हांमध्यें यज्ञ प्रतिष्ठित होतात, धार्मिक लोकधुरीण जेथे नाहींत तेथेही ज्या तुम्हांमुळे धर्माग्रणी उत्पन्न होतात, ते तुम्ही अध्वरयागाचे स्वाभाविकपणेंच पूर्णपणे ज्ञाते आहांत; आणि म्हणूनच तुम्ही मधुर सोमरस प्राशन करतां. ४.



यद॒द्याश्वि॑ना॒वपा॒ग्यत्प्राक्स्थो वा॑जिनीवसू ।
यद्द्रु॒ह्यव्यन॑वि तु॒र्वशे॒ यदौ॑ हु॒वे वा॒मथ॒ मा ग॑तम् ॥ ५ ॥

यत् । अद्य । अश्विनौ । अपाक् । यत् । प्राक् । स्थः । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू ।
यत् । द्रुह्यवि । अनवि । तुर्वशे । यदौ । हुवे । वाम् । अथ । मा । आ । गतम् ॥ ५ ॥

अश्वीहो, जरी आज तुम्ही पश्चिमदिग्भागी असला, किंवा हे सत्वाढ्य देवांनो, पृर्वदिक्‌प्रांती असला, अथवा जरी तुम्ही द्रुह्यु किंवा अनु, अथवा तुर्वश किंवा यदु यांच्याबरोबर असला तर तुम्हांला मी भक्तीने पाचारण करीत आहें, तर तुम्ही मजकडे अवश्य या. ५.



यद॒न्तरि॑क्षे॒ पत॑थः पुरुभुजा॒ यद्वे॒मे रोद॑सी॒ अनु॑ ।
यद्वा॑ स्व॒धाभि॑रधि॒तिष्ठ॑थो॒ रथ॒मत॒ आ या॑तमश्विना ॥ ६ ॥

यत् । अन्तरिक्षे । पतथः । पुरुऽभुजा । यत् । वा । इमे इति । रोदसी इति । अनु ।
यत् । वा । स्वधाभिः । अधिऽतिष्ठथः । रथम् । अतः । आ । यातम् । अश्विना ॥ ६ ॥

जरी तुम्ही अंतरिक्षांतून उड्डाण करीत जात असलां, किंवा हे भक्तपोषकांनो, द्युलोक व पृथिवी यांच्या भोंवतीं फिरत असला, किंवा आपल्या स्वाभाविक परिपाठीप्रमाणें रथांत बसून जात असला, तरी हे अश्वीहो, तुम्ही तेथूनही आगमन करा. ६.



ॐ तत् सत्



GO TOP