PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १७१ ते १८०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७१ ( मरुतः सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : मरुतः - छंद - त्रिष्टुभ्


प्रति॑ व ए॒ना नम॑सा॒हमे॑मि सू॒क्तेन॑ भिक्षे सुम॒तिं तु॒राणा॑म् ॥
र॒रा॒णता॑ मरुतो वे॒द्याभि॒र्नि हेळो॑ ध॒त्त वि मु॑चध्व॒मश्वा॑न् ॥ १ ॥

प्रति वः एना नमसा अहं एमि सुऽउक्तेन भिक्षेए सुऽमतिं तुराणाम् ।
रराणता मरुतः वेद्याभिः नि हेळः धत्त वि मुचध्वं अश्वान् ॥ १ ॥

तुम्हाला अनेक प्रणिपात करून मी तुमच्याकडे आलो आहे. भक्तांकरितां तुम्ही तातडीने धांव घेतां, तेव्हां तुमचे गुणानुवाद गाऊन तुमच्या कृपेची भिक्षा मी मागत आहे. मरुतांनो, हे सर्व ध्यानीं आणून तुम्हीं मजवर प्रसन्न झालां आहांत तर राग सोडा आणि आपल्या रथाचे घोडे मोकळे करा. ॥ १ ॥


ए॒ष वः॒ स्तोमो॑ मरुतो॒ नम॑स्वान्हृ॒दा त॒ष्टो मन॑सा धायि देवाः ॥
उपे॒मा या॑त॒ मन॑सा जुषा॒णा यू॒यं हि ष्ठा नम॑स॒ इद्वृ॒चधासः॑ ॥ २ ॥

एषः वः स्तोमः मरुतः नमस्वान् हृदा तष्टः मनसा धायि देवाः ।
उप ईं आ यात मनसा जुषाणाः यूयं हि स्थ नमसः इत् वृधासः ॥ २ ॥

मरुतांनो, हें नमस्कृति पुरःसर म्हटलेलें स्तोत्र तुमचेंच आहे. आणि तें मी अंतःकरणपूर्वक व्यवस्थेनें जुळून म्हटलें आहे. तर त्याचा तुम्हीही मनःपूर्वक स्वीकार करा. खर्‍या कळवळ्यानें त्याचा आस्वाद घेण्याकरितां इकडे या कारण तुमच्या सेवकाची तुम्ही नेहमी अभिवृद्धिच करीत असतां. ॥ २ ॥


स्तु॒तासो॑ नो म॒रुतो॑ मृळयन्तू॒त स्तु॒तो म॒घवा॒ शम्भ॑विष्ठः ॥
ऊ॒र्ध्वा नः॑ सन्तु को॒म्या वना॒न्यहा॑नि॒ विश्वा॑ मरुतो जिगी॒षा ॥ ३ ॥

स्तुतासः नः मरुतः मृळयन्तु उत स्तुतः मघऽवा शंऽभविष्ठः ।
ऊर्ध्वा नः सन्तु कोम्या वनानि अहानि विश्वा मरुतः जिगीषा ॥ ३ ॥

मरुतांचे स्तवन आम्हीं यथामति केलेलें आहे. तर ते आम्हांवर कृपा करोत. सर्वांचे अत्यंत कल्याण करणारा इंद्रही, त्याची स्तुति केल्यामुळें आम्हांवर प्रसन्न होवो. आम्हांला विजयश्रीची लालसा आहे, म्हणून हे मरुतांनो, तुमच्या भाल्यांची रमणीय वृक्षराजी आमच्या करितां सदैव सज्ज असो. ॥ ३ ॥


अ॒स्माद॒हं त॑वि॒षादीष॑माण॒ इंद्रा॑द्‌भि॒या म॑रुतो॒ रेज॑मानः ॥
यु॒ष्मभ्यं॑ ह॒व्या निशि॑तान्यास॒न्तान्या॒रे च॑कृमा मृ॒ळता॑ नः ॥ ४ ॥

अस्मात् अहं तविषात् ईषमाणः इंद्रात् भिभिया मरुतः रेजमानः ।
युष्मभ्यं हव्या निऽशितानि आसन् तानि आरे चकृम मृळत नः ॥ ४ ॥

मरुतांनो ह्या महा जाज्वल्य इंद्रापासून मी भयानें थरथर कांपतच दूर निघून गेलों. तुमच्या करितां हविरन्नाची अगदीं तयारी केली होती, परंतु तीं हविरन्ने आम्हांला दूर सारावी लागली ह्या बद्दल आम्हांला क्षमा करा. ॥ ४ ॥


येन॒ माना॑सश्चि॒तय॑न्त उ॒स्रा व्युष्टिषु॒ शव॑सा॒ शश्व॑तीनाम् ॥
स नो॑ म॒रुद्‌भि॑र्वृषभ॒ श्रवो॑ धा उ॒ग्र उ॒ग्रेभिः॒ स्थवि॑रः सहो॒दाः ॥ ५ ॥

येन मानासः चितयन्ते उस्राः विऽउष्टिषु शवसा शश्वतीनाम् ।
स नो मरुत् ऽभिः वृषभ श्रवः धाः उग्रः उग्रेभिः स्थविरः सहऽदाः ॥ ५ ॥

हे इंद्रा, सनातन उषा आपल्या सामर्थ्याने प्रकाशल्या असतां तुझ्या कृपेनेंच त्या देदीप्यमान देवींचे दर्शन मानपुत्रांना घडलें, तर हे मनोरथ पूरका, हे पराक्रमी इंद्रा, तूं पुराण पुरुष आहेस, धैर्यबल देणाराही तूंच आहेस, तर भयंकर असा तूं भयंकर अशाच मरुतांना बरोबर घेऊन येऊन आम्हांला सुयश दे. ॥ ५ ॥


त्वं पा॑हीन्द्र॒ सही॑यसो॒ नॄन्भवा॑ म॒रुद्‌भि॒रव॑यातहेळाः ॥
सु॒प्र॒के॒तेभिः॑ सास॒हिर्दधा॑नो वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥

त्वं पाहि इन्द्र सहीयसः नॄन् भव मरुत्‍भिः अवयातऽहेळाः ।
सुऽप्रकेतेभिः ससहिः दधानो विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ६ ॥

हे इंद्रा, आपल्या बलशाली वीरांचे (मरुतांचे) रक्षण कर आणि मरुतांच्या वरचा राग अगदीं सोडून दे. त्या अत्यंत बुद्धिमान मरुतांचा तूं विजयशाली प्रभु आहेस असे सर्व जग समजतें, तर तात्काळ फलद्रूप होणारा मरुतांचा तुझा आसरा आम्हांस लाभेल असें कर. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७२ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - गायत्री


चि॒त्रो वो॑ऽस्तु॒ याम॑श्चि॒त्र ऊ॒ती सु॑दानवः । मरु॑तो॒ अहि॑भानवः ॥ १ ॥

चित्रः वोः अस्तु यामः चित्रः ऊती सुऽदानवः ।
मरुतः अहिऽभानवः ॥ १ ॥

हे दानशूर मरुतांनो, तुमचें आगमन आश्चर्यकारक होवो. हे नागांप्रमाणें चंचल किरणांच्या मरुतांनो तें आगमन तुमच्या सामर्थ्याच्या योगानें आश्चर्यप्रद होवो. ॥ १ ॥


आ॒रे सा वः॑ सुदानवो॒ मरु॑त ऋञ्ज॒ती शरुः॑ । आ॒रे अश्मा॒ यमस्य॑थ ॥ २ ॥

आरे सा वः सुऽदानवः मरुतः ऋञ्जती शरुः ।
आरे अश्मा यं अस्यथ ॥ २ ॥

हे दानशूर मरुतांनो, शत्रूच्या शरीरांत नीट घुसणारें तें तुमचें घातक शस्त्र आम्हांपासून दूर असो. तुम्हीं फेंकून मारतां तो तुमचा अशनी पाषाणही दूर असो. ॥ २ ॥


तृ॒ण॒स्क॒न्दस्य॒ नु विशः॒ परि॑ वृङ्क्तज सुदानवः । ऊ॒र्ध्वान्नः॑ कर्त जी॒वसे॑ ॥ ३ ॥

तृणऽस्कन्दस्य नु विशः परि वृङ्क्त सुऽदानवः ।
ऊर्ध्वान् नः कर्त जीवसे ॥ ३ ॥

हे दानशूर मरुतांनो, तृणस्कंदाच्या लोकांना चोहोंकडून घेरून कापून काढा. आम्हीं यश मिळवून जगावें म्हणून आमची उन्नति करा. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७३ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्


गाय॒त्साम॑ नभ॒न्यं१॑यथा॒ वेरर्चा॑म॒ तद्वा॑वृधा॒नं स्वर्वत् ॥
गावो॑ धे॒नवो॑ ब॒र्हिष्यद॑ब्धा॒ आ यत्स॒द्मानं॑ दि॒व्यं विवा॑सान् ॥ १ ॥

गायत् साम नभन्यं यथा वेः अर्चाम तत् ववृधानं स्वःऽवत् ।
गावः धेनवः बर्हिषि अदब्धा आ यत् सद्मानं दिव्यं विवासान् ॥ १ ॥

हे इंद्रा, जेणेंकरून तूं संतोष पावशील अशा प्रकारचे, आकाश दुमदुमून टाकणारे सामगायन (उद्धाता) गाईल, आणि स्वर्गीय प्रकाशाप्रमाणें लोकोत्तर व जिकडे तिकडे भरून जाणारे असें स्तोत्र आम्हींही मोठ्यानें म्हणूं. तूं आपल्या अमूर्त स्वरूपानें येऊन येथें दर्भासनावर बसतोस त्यावेळीं, ज्यांना कोणीही उपद्रव देऊं शकत नाहीं अशा तेजोरूप धेनु तुझ्या सेवेस तत्पर असतात. ॥ १ ॥


अर्च॒द्वृ॑षा॒ वृष॑भिः॒ स्वेदु॑हव्यैर्मृ॒गो नाश्नो॒ अति॒ यज्जु॑गु॒र्यात् ॥
प्र म॑न्द॒युर्म॒नां गू॑र्त॒ होता॒ भर॑ते॒ मर्यो॑ मिथु॒ना यज॑त्रः ॥ २ ॥

अर्चद् वृषा वृषऽभिः स्वऽइदुहव्यैः मृगः न अश्नः अति यत् जुगुर्यात् ।
प्र मन्दयुः मनां गूर्त होता भरते मर्यः मिथुना यजत्रः ॥ २ ॥

वीर्यशाली पुरोहित वीर्यशाली अशाच आचार्यांसह ताजी ऊन ऊन हविरन्नें तूं एखाद्या क्षुधित सिंहा प्रमाणें एकदम ग्रहण करावींस म्हणून तुला समर्पण करून तुझी उपासना करीत असतो. सर्व श्रेष्ठ देवा, यज्ञ-होता उल्लसित मनानें, आणि सन्मानीय यजमान पत्निसहित तुजला स्तवनानें संतुष्ट करतो. ॥ २ ॥


नक्ष॒द्धोता॒ परि॒ सद्म॑ मि॒ता यन्भर॒द्गर्भ॒मा श॒रदः॑ पृथि॒व्याः ॥
क्रन्द॒दश्वो॒ नय॑मानो रु॒वद्गौगर॒न्तर्दू॒तो न रोद॑सी चर॒द्वाक् ॥ ३ ॥

नक्षत् होता परि सद्म मिता यत् भरत् गर्भं आ शरदः पृथिव्याः ।
क्रन्दत् अश्वः नयमानः रुवत् गौः अन्तः दूतः न रोदसी इति चरत् वाक् ॥ ३ ॥

इंद्रा, तुझ्य यज्ञासाठीं हा जो आचार्य अग्निच्या तीन प्रदक्षिणा करून परत येतो, तो पृथ्वीवर शरद ऋतूंत उत्पन्न होणार्‍या फलसंपत्तिला घेऊनच येतो. ह्या शरद ऋतूंतच घोडे वाटेनें जातां जातां खिंकाळत असतात. बैल डुरकत असतात आणि दिव्य वाचा ही एखाद्या दूती प्रमाणें पृथ्वी व आकाश ह्यांच्या दरम्यान घोंटाळत असते. ॥ ३ ॥


ता क॒र्माष॑तरास्मै॒ प्र च्यौ॒त्नाननि॑ देव॒यन्तो॑ भरन्ते ॥
जुजो॑ष॒दिंद्रो॑ द॒स्मव॑र्चा॒ नास॑त्येव॒ सुग्म्यो॑ रथे॒ष्ठाः ॥ ४ ॥

ता कर्म अषऽतरा अस्मै प्र च्यौत्‍नानि देवऽयन्तः भरन्ते ।
जुजोषत् इंद्रः दस्मऽवर्चा नासत्याऽइव सुग्म्यः रथेऽस्थाः ॥ ४ ॥

ह्या इंद्राला अत्यंत प्रिय असे जे जे पदार्थ आहेत तेच आपण त्याला अर्पण करूं, भाविक जनहि प्रतिभा संपन्न स्तोत्रें त्याच्या प्रित्यर्थ म्हणत आहेतच, तर हा अद्‍भुत, तेजस्वी इंद्र, त्या पदार्थांचा आणि स्तोत्रांचा प्रीतीनें स्वीकार करो. तो नासत्या प्रमाणेंच भक्ताधीन असून त्यांच्या करितां रथावर अगदीं तयार होऊन बसलेला आहे. ॥ ४ ॥


तमु॑ ष्टु॒हीन्द्रं॒ यो ह॒ सत्वा॒ यः शूरो॑ म॒घवा॒ यो र॑थे॒ष्ठाः ॥
प्र॒ती॒चश्चि॒द्योधी॑या॒न्वृष॑ण्वान्वव॒व्रुष॑श्चि॒त्तम॑सो विह॒न्ता ॥ ५ ॥

तं ऊं इति स्तुहि इंद्रं यः सत्वा यः शूरः मघऽवा यः रथेऽस्थाः ।
प्रतीचः चित् योधीयान् वृषण्ऽवान् ववव्रुषः चित् तमसः विऽहंता ॥ ५ ॥

ह्या इंद्राचेंच स्तवन कर. हा महा सत्ववान, हा शूर, हा अत्यंत उदार व भक्तांकरितां रथारूढ होऊन बसला आहे. सकल कामनापूरक हाच असून कसाही शत्रू ह्याच्या पुढें येवो, त्याच्यापेक्षां हा वरचढ पृथ्वीला चोहोंकडून ग्रासून टाकणार्‍या अंधःकाराचा नाश करणाराहि हाच आहे. ॥ ५ ॥


प्र यदि॒त्था म॑हि॒ना नृभ्यो॒ अस्त्यरं॒ रोद॑सी क॒क्ष्ये३॑ नास्मै॑ ॥
सं वि॑व्य॒ इंद्रो॑ वृ॒जनं॒ न भूमा॒ भर्ति॑ स्व॒धावाँ॑ ओप॒शमि॑व॒ द्याम् ॥ ६ ॥

प्र यत् इत्था महिना नृऽभ्यः अस्ति अरं रोदसी इति कक्ष्ये३इति न अस्मै ।
सं विव्ये इंद्रः वृजनं न भूम भर्ति स्वधाऽवान् ओपशंऽइव द्याम् ॥ ६ ॥

इंद्र, हा विश्वांतील यच्चावत् शूरांपेक्षां पराक्रमानें खरोखर अतिशयच श्रेष्ठ आहे. हें एवढें विस्तीर्ण क्षितीज, पण तें त्याच्या कंबरबंदालाही पुरणार नाहीं. ह्या स्वप्रतापी इंद्रानें आकाश रूपानें पृथ्वीला कवटाळून धरून नक्षत्रांना आपल्या मस्तकावर शिर्पेंचाप्रमाणें ठेवून दिलेलें आहे. ॥ ६ ॥


स॒मत्सु॑ त्वा शूर स॒तामु॑रा॒णं प्र॑प॒थिन्त॑मं परितंस॒यध्यै॑ ॥
स॒जोष॑स॒ इंद्रं॒ मदे॑ क्षो॒णीः सू॒रिं चि॒द्ये अ॑नु॒मद॑न्ति॒ वाजैः॑ ॥ ७ ॥

समत्ऽसु त्वा शूर सतां उराणं प्रपथिन्ऽतमं परिऽतंसयध्यै ।
सऽजोषसः इंद्रं मदे क्षोणीः सूरिं चित् ये अनुऽमदन्ति वाजैः ॥ ७ ॥

हे वीरा, तूं सर्व सज्जनांचा पाठिराखा आणि सर्वोत्कृष्ट धुरीण आहेस, तेव्हां संग्रामामध्यें तुला मोठ्या आर्जवानें सहाय्या करितां घेऊन येण्यासाठीं, अत्यंत प्रेमानें एकत्र झालेलें भक्तजन तुज प्रज्ञावंत इंद्राला, यज्ञामध्यें हवि अर्पण करून प्रसन्न करून घेतात. ॥ ७ ॥


ए॒वा हि ते॒ शं सव॑ना समु॒द्र आपो॒ यत्त॑ आ॒सु मद॑न्ति दे॒वीः ॥
विश्वा॑ ते॒ अनु॒ जोष्या॑ भू॒द्गौः सू॒रींश्चि॒द्यदि॑ धि॒षा वेषि॒ जना॑न् ॥ ८ ॥

एवा हि ते शं सवना समुद्रे आपः यत् ते आसु मदन्ति देवीः ।
विश्वा ते अनु जोष्या भूत् गौः सूरीन् चित् यदि धिषा वेषि जनान् ॥ ८ ॥

तूं वर्षण केलेल्या दिव्य उदकाच्या धारा ज्याप्रमाणें ह्या भूलोकीं येऊन समुद्रास मोठ्या हर्षानें जाऊन मिळतात, त्याप्रमाणें आम्हीं अर्पण केलेल्या सोमरसाच्या धारा सुद्धां तशाच मोठ्या आनंदानें तुझ्याकडे जातात. ज्ञानी जन काय, किंवा सामान्य जनसमूह काय, सर्वांनाच जर तूं दयार्द्र बुद्धिनें आपलेंसे म्हणतोस तर सर्व जगाची स्तवन वाणी तुझ्याकडेच जावी ह्यांत नवल तें काय ? ॥ ८ ॥


असा॑म॒ यथा॑ सुष॒खाय॑ एन स्वभि॒ष्टयो॑ न॒रां न शंसैः॑ ॥
अस॒द्यथा॑ न॒ इंद्रो॑ वन्दने॒ष्ठास्तु॒रो न कर्म॒ नय॑मान उ॒क्था ॥ ९ ॥

असाम यथा सुऽसखायः एन सुऽअभिष्टयः नरां न शंसैः ।
असत् यथा नः इंद्रः वन्दनेऽस्थाः तुरः नः कर्म नयमानः उक्था ॥ ९ ॥

शूरांच्या अभय वचनांनी उत्तम मित्रच मिळाल्या सारखें होतें. तर अशा प्रकारचे उत्तम मित्र व उत्कृष्ट सहाय्य आम्हांस ह्याच्या कृपेनें मिळालें असें होवो, आणि हा इंद्र त्या चंचल मनाप्रमाणें सर्वगामी खरा परंतु तो आमचें सत्कर्म व स्तोत्र गायन सिद्धीस नेऊन आमच्या उपासनेंतच स्थिर राहील असें घडो. ॥ ९ ॥


विष्प॑र्धसो न॒रां न शंसै॑र॒स्माका॑स॒दिंद्रो॒ वज्र॑हस्तः ॥
मि॒त्रा॒युवो॒ न पूर्प॑तिं॒ सुशि॑ष्टौ मध्या॒युव॒ उप॑ शिक्षन्ति य॒ज्ञैः ॥ १० ॥

विऽस्पर्धसः नरां न शंसैः अस्माक असत् इंद्रः वज्रऽहस्तः ।
मित्रऽयुवः न पूःऽपतिं सुऽशिष्टौ मध्यऽयुव उप शिक्षन्ति यज्ञैः ॥ १० ॥

थोर थोर पुरुषांच्या आणि स्पर्धारहित साधुजनांच्या विनंतीस मान देऊन कां होईना, हा वज्रधर इंद्र सर्वथैव आमचा होवो. एखाद्या नगराधिपतीचा राज्यकारभार उत्तम व्यवस्थित चालला आहे, असें पाहून त्याचें प्रेम संपादन करण्याविषयीं उत्सुक असे लोक जसा त्या नगराधिपतीचा गौरव करतात, त्या प्रमाणें ह्या इंद्राच्या अंतःकरण प्रेमाची इच्छा करणारे भक्त त्याला यज्ञ यागानें प्रसन्न करीत असतात. ॥ १० ॥


य॒ज्ञो हि ष्मेन्द्रं॒ कश्चि॑दृ॒न्धञ्जु॑हुरा॒णश्चि॒न्मन॑सा परि॒यन् ॥
ती॒र्थे नाच्छा॑ तातृषा॒णमोको॑ दी॒र्घो न सि॒ध्रमा कृ॑णो॒त्यध्वा॑ ॥ ११ ॥

यज्ञः हि स्म इंद्रं कः चित् ऋंध्न् जुहुराणः चित् मनसा परिऽयन् ।
तीर्थे न अच्छ ततृषाणं ओकः दीर्घः न सिध्रं आ कृणोति अध्वा ॥ ११ ॥

कोठें कोठें इंद्राला संतुष्ट करणारा असा यज्ञयाग चालू आहे, तर कोठें कोठें मनाचा चंचल असा भ्रष्ट मनुष्य विनाकारण भटकत फिरतांना दृष्टिस पडत आहे. पहिले कर्म एखाद्या पवित्र प्रवाहाजवळ तान्हेलेल्या वाटसराकरितां बांधलेल्या घराप्रमाणें होय, आणि दुसरे आतुर मनुष्याला लांबचा रस्ता मेटाकुटीस आणतो त्या प्रमाणें निरर्थक होय. ॥ ११ ॥


मो षू ण॑ इ॒न्द्रात्र॑ पृ॒त्सु दे॒वैरस्ति॒ हि ष्मा॑ ते शुष्मिन्नव॒याः ॥
म॒हश्चि॒द्यस्य॑ मी॒ळ्हुषो॑ य॒व्या ह॒विष्म॑तो म॒रुतो॒ वन्द॑ते॒ गीः ॥ १२ ॥

मो इति सु नः इन्द्र अत्र पृत्ऽसु देवैः अस्ति हि स्म ते शुष्मिन् अवऽयाः ।
महः चित् यस्य मीळ्हुषः यव्या हविष्मतः मरुतः वन्दते गीः ॥ १२ ॥

हे इंद्रा आज ह्या युद्ध प्रसंगी तूं आमचा अव्हेर करूं नको. हे देव-परिवेष्टित महा पराक्रमी इंद्रा, हा पहा तुझा हविर्भाग येथें तयार आहे. तूं परम थोर आणि सकल कामना पूरक असा देव, तेव्हां माझे - हवि अर्पणोत्सुक भक्ताचे - वेडे वांकडे बोल, तुझे आणि मरुतांचे गुण संकीर्तन करीत आहेत. ते मान्य करून घे. ॥ १२ ॥


ए॒ष स्तोम॑ इंद्र॒ तुभ्य॑म॒स्मे ए॒तेन॑ गा॒तुं ह॑रिवो विदो नः ॥
आ नो॑ ववृत्याः सुवि॒ताय॑ देव वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १३ ॥

एषः स्तोमः इंद्र तुभ्यं अस्मे इति एतेन गातुं हरिऽवः विदः नः ।
आ नः ववृत्याः सुविताय देव विद्याम एषं वृजनं जीरऽदानुम् ॥ १३ ॥

हे इंद्रा, हें आमचे स्तोत्र तुला अर्पण असो, हे हरिदश्व इंद्रा, त्या स्तवनानें प्रसन्न होऊन आम्हांला सन्मार्ग दाखव. देवा ज्यांत आमचें खरें कल्याण आहे, त्याच मार्गाकडे आम्हांला घेऊन जा, म्हणजे तात्काळ फलद्रुप होणारा उत्साह वर्धक असा तुझा आश्रय आम्हाला प्राप्त होईल. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७४ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्


त्वं राजे॑न्द्र॒ ये च॑ दे॒वा रक्षा॒ नॄन्पा॒ह्यसुर॒ त्वम॒स्मान् ॥
त्वं सत्प॑तिर्म॒घवा॑ न॒स्तरु॑त्र॒स्त्वं स॒त्यो वस॑वानः सहो॒दाः ॥ १ ॥

त्वं राजा इंद्र ये च देवाः रक्षआ नॄन् पाहि असुर त्वं अस्मान् ।
त्वं सत्ऽपतिः मघऽवा नः तरुत्रः त्वं सत्यः वसवानः सहःऽदाः ॥ १ ॥

इंद्रा, जे देव आहेत त्यांचाही तूं राजा आहेस. आमच्या शूर सैनिकांचें रक्षण कर. तूं सर्व साधुजनांत श्रेष्ठ, औदार्यशाली आणि आमचा तारक आहेस, तूं सत्यस्वरूप, संपत्तिदाता आणि धैर्यदाता आहेस. ॥ १ ॥


दनो॒ विश॑ इंद्र मृ॒ध्रवा॑चः स॒प्त यत्पुरः॒ शर्म॒ शार॑दी॒र्दर्त् ॥
ऋ॒णोर॒पो अ॑नव॒द्यार्णा॒ यूने॑ वृ॒त्रं पु॑रु॒कुत्सा॑य रन्धीः ॥ २ ॥

दनः विशः इंद्र मृध्रऽवाचः सप्त यत् पुरः शर्म शारदीः दर्त् ।
ऋणोः अपः अनवद्य अर्णाः यूने वृत्रं पुरुऽकुत्साय रन्धीः ॥ २ ॥

हे इंद्रा अभद्र भाषणानें आपली जिव्हा विटाळणार्‍या दुष्ट अधमांचा तूं धुव्वा उडविलास, त्याच वेळेस त्यांच्या निवार्‍याची जागा जे सात शारद दुर्ग (होते) त्याचाही तूं पार विध्वंस करून टाकलास. हे निष्कलंका, लाटांनी उचंबळणार्‍या उदकांचे प्रचंड प्रवाह तूं चालू केलेस आणि तुझा भक्त जो तरुण पुरुकुत्स, त्याच्या स्वाधीन त्याच्या शत्रूस करून दिलेंस. ॥ २ ॥


अजा॒ वृत॑ इंद्र॒ शूर॑पत्नी॒वर्द्यां च॒ येभिः॑ पुरुहूत नू॒नम् ॥
रक्षो॑ अ॒ग्निम॒शुषं॒ तूर्व॑याणं सिं॒हो न दमे॒ अपां॑सि॒ वस्तोः॑ ॥ ३ ॥

अज वृतः इंद्र शूरऽपत्‍नीः द्यां च येभिः पुरुऽहूत नूनम् ।
रक्षो इति अग्निं अशुषं तूर्वयाणं सिंहः न दमे अपांसि वस्तोः ॥ ३ ॥

हे इंद्रा, जगताच्या शत्रूंच्या सैन्याचे धुरीण शूर असून त्यांनी सर्व आकाशगोल व्यापून टाकला आहे. तेव्हां त्यांना तेथून हाकून लाव आणि ज्या अग्निहोत्राचा उच्छेद होऊं नये आणि जें त्वरित फलदायी आहे, त्या आमच्या घरांतील अग्नि होत्राचें व तसेंच इतर उपासनांचे सिंहाप्रमाणे जागरूक राहून रक्षण कर. ॥ ३ ॥


शेष॒न्नु त इं॑द्र॒ सस्मि॒न्योनौ॒ प्रश॑स्तये॒ पवी॑रवस्य म॒ह्ना ॥
सृ॒जदर्णां॒स्यव॒ यद्यु॒धा गास्तिष्ठ॒द्धरी॑ धृष॒ता मृ॑ष्ट॒ वाजा॑न् ॥ ४ ॥

शेषन् नु ते इंद्र सस्मिन् योनौ प्रऽशस्तये पवीरवस्य मह्ना ।
सृजत् अर्णांसि अव यत् युधा गाः तिष्ठत् हरी इति धृषता मृष्ट वाजान् ॥ ४ ॥

हे इंद्रा, तुझ्या वज्राच्या नुसत्या कडकडाटानें व त्याच्या झळाळीनेंच ते सर्व जगाचे शत्रू, तुझा महिमा वृद्धिंगत व्हावा म्हणूनच किं काय जागच्या जागींच गतप्राण होऊन पडले. पहा ह्या इंद्रानें युद्ध करून दिव्योदकाचे कल्लोळ मोकळे करून दिले, प्रकाश धेनूहि मुक्त केल्या, आणि आपल्या अश्वांवर आरूढ होऊन तडाक्यासरशीं दिव्य सामर्थ्यें भक्तास प्राप्त करून दिलीं. ॥ ४ ॥


वह॒ कुत्स॑मिंद्र॒ यस्मि॑ञ्चा॒कन्त्स्यू॑म॒न्यू ऋ॒ज्रा वात॒स्याश्वा॑ ॥
प्र सूर॑श्च॒क्रं वृ॑हताद॒भीके॑ऽ॒भि स्पृधो॑ यासिष॒द्वज्र॑बाहुः ॥ ५ ॥

वह कुत्सं इंद्र यस्मिन् चाकन् स्यूमन्यू इति ऋज्रा वातस्य अश्वा ।
प्र सूरः चक्रं वृहतात् अभीके अभि स्पृधः यासिषत् वज्रबाहुः ॥ ५ ॥

हे इंद्रा, कुत्स नांवाच्या ज्या भक्तावर तूं अत्यंत प्रेम करतोस त्याच्याकडे वायूचे सरळमार्गी व एकसारखे भरधांव धांवणारे घोडे घेऊन ये. उषःकालीं सूर्य आपला एक चाकी रथ आमचेकडे आणो. आणि वज्रधर इंद्र आपला मोर्चा पातकी शत्रूकडे फिरवो. ॥ ५ ॥


ज॒घ॒न्वाँ इं॑द्र मि॒त्रेरू॑ञ्चो॒दप्र॑वृद्धो हरिवो॒ अदा॑शून् ॥
प्र ये पश्य॑न्नर्य॒मणं॒ सचा॒योस्त्वया॑ शू॒र्ता वह॑माना॒ अप॑त्यम् ॥ ६ ॥

जघन्वान् इंद्र मित्रेरून् चोदऽप्रवृद्धः हरिऽवः अदाशून् ।
प्र ये पश्यन् अर्यमणं सचा आयोः त्वया शूर्ताः वहमानाः अपत्यम् ॥ ६ ॥

हे हरिदश्व इंद्रा, सज्जनांना प्रेरणा करणारा तूं, अशी तुझी प्रख्याती आहे, म्हणून तुझ्या भक्तांना पीडा करणारे व दानधर्म पराङ्‍मुख असे जे जे दुष्ट होते, त्यांचा तूं संहार करून टाकलास. हे देवा, कोणाचेंच प्रभुत्व मान्य न करणार्‍या त्या दुष्टांना जेव्हां तूं प्रथम बाजूस फेंकून देऊन आपटलेंस त्याच वेळेस प्राणिमात्राचा पाठिराखा तूं आहेस, ही गोष्ट त्यांच्या ताबडतोब प्रत्ययास आली. ॥ ६ ॥


रप॑त्क॒विरिं॑द्रा॒र्कसा॑तौ॒ क्षां दा॒सायो॑प॒बर्ह॑णीं कः ॥
कर॑त्ति॒स्रो म॒घवा॒ दानु॑चित्रा॒ नि दु॑र्यो॒णे कुय॑वाचं मृ॒धि श्रे॑त् ॥ ७ ॥

रपत् कविः इंद्र अर्कऽसातौ क्षां दासाय उपऽबर्हणीं करिति कः ।
करत् तिस्रः मघऽवा दानुऽचित्राः नि दुर्योणे कुयवाचं मृधि श्रेत् ॥ ७ ॥

हे इंद्रा, काव्यस्फूर्तीच्या प्राप्तिसाठीं ज्ञानी कवींनी तुझे यथार्थ वर्णन केलें कीं, अधार्मिक दुष्टांना तूं भूमी हेंच आंथरूण पांघरूण करून दिलेंस त्या परम कारुणिक प्रभूनें तिन्ही लोक आपल्या औदार्यानें अद्‍भुत रीतीनें मंडित केले आणि रणांगणावर युद्ध करून कुयवाच् ह्याला जमीनदोस्त करून टाकलेंस. ॥ ७ ॥


सना॒ ता त॑ इंद्र॒ नव्या॒ आगुः॒ सहो॒ नभोऽ॑विरणाय पू॒र्वीः ॥
भि॒नत्पुरो॒ न भिदो॒ अदे॑वीर्न॒नमो॒ वध॒रदे॑वस्य पी॒योः ॥ ८ ॥

सना ता ते इंद्र नव्याः आ अगुः सहः नभः अविऽरणाय पूर्वीः ।
भिनत् पुरः न भिदः अदेवीः ननमः वधः अदेवस्य पीयोः ॥ ८ ॥

इंद्रा, तुझे ते पुरातन काळचे पराक्रम नवीन कवींनीही गाइले आहेत. युद्धें मुळींच होऊं देऊं नयेत, म्हणून तूं सर्व पातकी क्रूरांचा कायमचा निःपात करून टाकलास. ईश्वर-भक्तिहीन दुष्टांची सबंध जात व त्यांचे दुर्ग ह्या सर्वांचा उच्छेद केलास आणि ईश्वरनिंदक द्वेष्ट्यांच्या मारक शस्त्रांचे तुकडे करून टाकलेस. ॥ ८ ॥


त्वं धुनि॑रिंद्र॒ धुनि॑मतीर्‌ऋ॒णोर॒पः सी॒रा न स्रव॑न्तीः ॥
प्र यत्स॑मु॒द्रमति॑ शूर॒ पर्षि॑ पा॒रया॑ तु॒र्वशं॒ यदुं॑ स्व॒स्ति ॥ ९ ॥

त्वं धुनिः इंद्र धुनिमतीः ऋणोः अपः सीराः न स्रवन्तीः ।
प्र यत् समुद्रं अति शूर पर्षि पारय तुर्वशं यदुं स्वस्ति ॥ ९ ॥

इंद्रा, तुझ्या गर्जनेबरोबर सर्व जग थरथर कांपतें. धुनि नामक राक्षसानें अडवून धरलेल्या दिव्य उदक धारा तूं अशा रीतीनें मोकळ्या करून टाकल्यास कीं जणों काय नद्यांचे प्रचंड प्रवाहचे प्रवाहच कोसळत आहेत. हे शूरा आकाशरूप समुद्राच्याही पलिकडे तूं सहज निघून जातोस; तर आपल्या बरोबर तुर्वश आणि यदु ह्या तुझ्या भक्तांनाही पार ने. ॥ ९ ॥


त्वम॒स्माक॑मिंद्र वि॒श्वध॑ स्या अवृ॒कत॑मो न॒रां नृ॑पा॒ता ॥
स नो॒ विश्वा॑सां स्पृ॒धां स॑हो॒दा वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १० ॥

त्वं अस्माकं इंद्र विश्वध स्याः अवृकऽतमः नरां नृऽपाता ।
सः नः विश्वासां स्पृधां सहःऽदाः विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ १० ॥

हे इंद्रा, तूं सर्वतोपरी आमचा हो. कोणाही निरपराध्याला यत्किंचित्‌हि न दुखवितां तूं प्रेमानें सर्व मनुष्यांचे पालन करतोस तर आमच्या एकूण एक शत्रूंस तूं आमच्या हांतून पादाक्रांत कर म्हणजे तात्काळ फलद्रूप होणार्‍या तुझ्या उत्साह वर्धक आश्रयानें आम्हीं राहूं. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७५ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - अनुष्टुप्, त्रिष्टुभ्


मत्स्यपा॑यि ते॒ महः॒ पात्र॑स्येव हरिवो मत्स॒रो मदः॑ ॥
वृषा॑ ते॒ वृष्ण॒ इंदु॑र्वा॒जी स॑हस्र॒सात॑मः ॥ १ ॥

मत्सि अपायि ते महः पात्रस्यऽइव हरिऽवः मत्सरः मदः ।
वृषा ते वृष्णे इंदुः वाजी सहस्रऽसातमः ॥ १ ॥

हे इंद्रा तूं उल्लसित हो. हा हर्षकर आणि हर्षरूप सोमरस, तुझें तेजच असा हा सोमरस तूं यज्ञ पात्रांतून प्राशन केला आहेस, प्रमोद-दायक ओजस्वी आणि असंख्य जय मिळवून देणारा हा वीर्यवान् सोमरस तुज वीर्यवंतालाच ग्रहण करण्यास अगदीं योग्य आहे. ॥ १ ॥


आ न॑स्ते गन्तु मत्स॒रो वृषा॒ मदो॒ वरे॑ण्यः ॥
स॒हावाँ॑ इंद्र सान॒सिः पृ॑तना॒षाळम॑र्त्यः ॥ २ ॥

आ नः ते गन्तु मत्सरः वृषा मदः वरेण्यः ।
सहऽवान् इंद्र सानसिः पृतनाषाट् अमर्त्यः ॥ २ ॥

हर्षवर्धक, वीर्यवान्, अत्युत्कृष्ट आणि तीव्र असा सोमरस, हे इंद्रा, आमचा हा अभीष्टदायक शत्रुजित् आणि अमर सोमरस तुला जाऊन पोहोंचो. ॥ २ ॥


त्वं हि शूरः॒ सनि॑ता चो॒दयो॒ मनु॑षो॒ रथ॑म् ॥
स॒हावाँ॒ दस्यु॑मव्र॒तमोषः॒ पात्रं॒ न शो॒चिषा॑ ॥ ३ ॥

त्वं हि शूरः सनिता चोदयः मनुषः रथम् ।
सहऽवान् दस्युं अव्रतं ओषः पात्रं न शोचिषा ॥ ३ ॥

तूं खरोखर दानशूर वीर आहेस तर मज दीन मानवाचा मनोरथ तूं पूर्ण कर. तूं शत्रूंना जिंकणारा, तेव्हां अधार्मिक दस्यूंना मातीच्या भांड्याप्रमाणें आपल्या तेजानें भाजून काढ. ॥ ३ ॥


मु॒षा॒य सूर्यं॑ कवे च॒क्रमीशा॑न॒ ओज॑सा ॥
वह॒ शुष्णा॑य व॒धं कुत्सं॒ वात॒स्याश्वैः॑ ॥ ४ ॥

मुषाय सूर्यं कवे चक्रं ईशानः ओजसा ।
वह शुष्णाय वधं कुत्सं वातस्य अश्वैः ॥ ४ ॥

हे सर्वज्ञा, तूं जगाचा शास्ता आहेस. आपल्या ईश्वरी सामर्थ्यानें सूर्याच्या रथाचें एक चाक काढून घेऊन वायुरूप अश्वांच्या योगानें कुत्साला आणि शुष्णाच्या मृत्यूला अशा दोघांनाही एकदमच शुष्णाकडे घेऊन जा. ॥ ४ ॥


शु॒ष्मिन्त॑मो॒ हि ते॒ मदो॑ द्यु॒म्निन्त॑म उ॒त क्रतुः॑ ॥
वृ॒त्र॒घ्ना व॑रिवो॒विदा॑ मंसी॒ष्ठा अ॑श्व॒सात॑मः ॥ ५ ॥

शुष्मिन्ऽतमः हि ते मदः द्युम्निन्ऽतमः उत क्रतुः ।
वृत्रऽघ्ना वरिवःऽविदा मंसीष्ठाः अश्वऽसातमः ॥ ५ ॥

खरोखर तुझा आनंद पराकाष्ठेचा ओजस्वी, आणि तुझें कर्तृत्व अत्यंत लोकोत्तर असतें, म्हणूनच आपल्या शत्रुविनाशक आणि परमसुखदायक पराक्रमाच्या योगानें व्यापक असें सामर्थ्य प्राप्त करून येणारा तूं अशी वाखाणणी सर्वतोमुखी झालेली आहे. ॥ ५ ॥


यथा॒ पूर्वे॑भ्यो जरि॒तृभ्य॑ इंद्र॒ मय॑ इ॒वापो॒ न तृष्य॑ते ब॒भूथ॑ ॥
तामनु॑ त्वा नि॒विदं॑ जोहवीमि वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥

यथा पूर्वेभ्यः जरितृऽभ्यः इंद्र मयःऽइव आपः न तृष्यते बभूथ ।
तां अनु त्वा निऽविदं जोहवीमि विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ६ ॥

हे इंद्रा, तान्हेने व्याकूळ झालेल्यास जसें पाणी, त्याप्रमाणेंच प्राचीन काळच्या सद्‍भक्तास तूं आनंदप्रदच झालास, तर अशाच प्रकारच्या पुरातन "निविद्" स्तोत्रानें मी ही तुझा धांवा करीत आहे, तर तात्काळ फलद्रूप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय आम्हांला प्राप्त होईल असें कर. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७६ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - अनुष्टुप्, त्रिष्टुभ्


मत्सि॑ नो॒ वस्यऽ॑इष्टय॒ इंद्र॑मिंदो॒ वृषा वि॑श ॥
ऋ॒घा॒यमा॑ण इन्वसि॒ शत्रु॒मन्ति॒ न विं॑दसि ॥ १ ॥

मत्सि नः वस्यःऽइष्टये इंद्रं इंदो इति वृषा आ विश ।
ऋघायमाणः इन्वसि शत्रुं अंन्ति न विंदसि ॥ १ ॥

हे आल्हादकारक सोमरसा, परम सुखाची प्राप्ति आम्हांला व्हावी म्हणून तूं इंद्रास हर्ष उत्पन्न कर. तूंही वीरच आहेस तर त्या वीराच्याच आंगी प्रविष्ट हो. इंद्रा तूं क्रोध भरानें थरारून चाल करून जातोस तोंच एकही शत्रू तुझ्या आसपास ठरेल असा तुला सांपडत नाहीं. ॥ १ ॥


तस्मि॒न्ना वे॑शया॒ गिरो॒ य एक॑श्चर्षणी॒नाम् ॥
अनु॑ स्व॒धा यमु॒प्यते॒ यवं॒ न चर्कृ॑ष॒द्वृदषा॑ ॥ २ ॥

तस्मिन् आ वेशय गिरः यः एकः चर्षणीनाम् ।
अनु स्वधा यं उप्यते यवं न चर्कृषत् वृषा ॥ २ ॥

जो इंद्र सर्व प्राणिमात्रांचा एकच प्रभु होय, त्याच्याच ठिकाणी हे मना, माझ्या स्तवनवाणी रंगून जातील असें कर. बैलांच्या नांगरणीच्या अनुरोधानें जसें धान्य पेरतात, त्याप्रमाणें त्याच्या इच्छेस अनुसरून जीवांचे कर्म बीज पेरलें जात असतें. ॥ २ ॥


यस्य॒ विश्वा॑नि॒ हस्त॑योः॒ पञ्च॑ क्षिती॒नां वसु॑ ॥
स्पा॒शय॑स्व॒ यो अ॑स्म॒ध्रुग्दि॒व्येवा॒शनि॑र्जहि ॥ ३ ॥

यस्य विश्वानि हस्तयोः पञ्च क्षितीनां वसु ।
स्पाशयस्व यः अस्मऽध्रुक् दिव्याऽइव अशनिः जहि ॥ ३ ॥

पांचही लोकांचे प्राप्तव्य सर्वस्व तुझ्याच हातांत आहे, तर आमच्या द्वेष्ट्याला हुडकून काढ आणि विद्युल्लतेच्या धक्यानें मारल्याप्रमाणें त्यास मारून टाक. ॥ ३ ॥


असु॑न्वन्तं समं जहि दू॒णाशं॒ यो न ते॒ मयः॑ ॥
अ॒स्मभ्य॑मस्य॒ वेद॑नं द॒द्धि सू॒रिश्चि॑दोहते ॥ ४ ॥

असुन्वन्तं समं जहि दुःनशं यः न ते मयः ।
अस्मभ्यं अस्य वेदनं दद्धि सूरिः चित् ओहते ॥ ४ ॥

जो तुला सोम अर्पण करून तुझी भक्ति करीत नाहीं, जो तुला तुझी भक्ति करून आनंद देत नाहीं व ज्याचा सुगावा सुद्धां कोणास लागत नाहीं अशा प्रत्येक अभक्ताचा एकदम संव्हार करून, त्यांच्या ज्या कांही युक्त्या असतील त्या आम्हांस कळूं दे, आणि असें तूं करशील असा मला - तुझ्या भक्ताला पूर्ण भरंवसा आहे. ॥ ४ ॥


आवो॒ यस्य॑ द्वि॒बर्ह॑सोऽ॒र्केषु॑ सानु॒षगस॑त् ॥
आ॒जाविंद्र॑स्येन्दो॒ प्रावो॒ वाजे॑षु वा॒जिन॑म् ॥ ५ ॥

आवः यस्य द्विऽबर्हसः अर्केषु सानुषक् असत् ।
आजौ इंद्रस्य इन्दो इति प्र आवः वाजेषु वाजिनम् ॥ ५ ॥

ज्या एका लोकद्वय-विख्यात पुरुषाचा महिमा स्तोत्रद्वारें एकसारखा विस्तार पावत आहे, त्याला तूं सहाय्य केलेंस, इंद्राला अर्पण केलेल्या हे मनोहरकांति सोमरसा संग्रामांत व सामर्थ्य कसोटीस लावणार्‍या युद्धांतही तूं ओजस्वी योद्ध्यांचे संरक्षण कर. ॥ ५ ॥


यथा॒ पूर्वे॑भ्यो जरि॒तृभ्य॑ इंद्र॒ मय॑ इ॒वापो॒ न तृष्य॑ते ब॒भूथ॑ ॥
तामनु॑ त्वा नि॒विदं॑ जोहवीमि वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ६ ॥

यथा पूर्वेभ्यः जरितृऽभ्यः इंद्र मयःऽइव आपः न तृष्यते बभूथ ।
तां अनु त्वा निऽविदं जोहवीमि विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ६ ॥

हे इंद्रा, तान्हेने व्याकूळ झालेल्यास जसें पाणी, त्याप्रमाणेंच प्राचीन काळच्या सद्‍भक्तास तूं आनंदप्रदच झालास, तर अशाच प्रकारच्या पुरातन "निविद्" स्तोत्रानें मी ही तुझा धांवा करीत आहे, तर तात्काळ फलद्रूप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय आम्हांला प्राप्त होईल असें कर. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७७ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्


आ च॑र्षणि॒प्रा वृ॑ष॒भो जना॑नां॒ राजा॑ कृष्टी॒नां पु॑रुहू॒त इंद्रः॑ ॥
स्तु॒तः श्र॑व॒स्यन्नव॒सोप॑ म॒द्रिग्यु॒क्त्वा हरी॒ वृष॒णा या॑ह्य॒र्वाङ् ॥ १ ॥

आ चर्षणिऽप्रा वृषभः जनानां राजा कृष्टीनां पुरुऽहूतः इंद्रः ।
स्तुतः श्रवस्यन् अवसा उप मद्रिक् युक्त्वा हरी इति वृषणा आ याहि अर्वाङ् ॥ १ ॥

तूं इंद्र जगद्‌व्यापक, जन मनोरथपूरक, सर्व लोकांचा प्रभू आणि असंख्य लोक ज्याचा धांवा करतात असा आहेस. तुझें स्तवन आम्ही यथामति केलें आहे तर आपले उमदे घोडे रथाला जोडून आपल्या उत्तमोत्तम प्रसादानिशीं माझी विनवणी ऐकण्याकरितां इकडे भूलोकीं मजजवळ ये. ॥ १ ॥


ये ते॒ वृष॑णो वृष॒भास॑ इंद्र ब्रह्म॒युजो॒ वृष॑रथासो॒ अत्याः॑ ॥
ताँ आ ति॑ष्ठ॒ तेभि॒रा या॑ह्य॒र्वाङ् हवा॑महे त्वा सु॒त इं॑द्र॒ सोमे॑ ॥ २ ॥

ये ते वृषणः वृषभासः इंद्र ब्रह्मऽयुजः वृषऽरथासः अत्याः ।
तान् आ तिष्ठ तेभिः आ याहि अर्वाङ् हवामहे त्वा सुते इंद्र सोमे ॥ २ ॥

इंद्रा, तुझे वेगवान अश्व, वीर्यवान्, नामांकित आणि तुजसारख्या वीर श्रेष्ठाच्या रथास जोडण्याला योग्य असेच आहेत; तर भक्तांची प्रार्थना ऐकण्याबरोबर ते रथास आपोआप जोडले जातात. तर हे इंद्रा, त्या रथावर आरोहण करून आमच्याकडे भूलोकीं ये. सोमरस सिद्ध करून आम्हीं तुला आदरानें बोलावीत आहोंत. ॥ २ ॥


आ ति॑ष्ठ॒ रथं॒ वृष॑णं॒ वृषा॑ ते सु॒तः सोमः॒ परि॑षिक्ता॒ मधू॑नि ॥
यु॒क्त्वा वृष॑भ्यां वृषभ क्षिती॒नां हरि॑भ्यां याहि प्र॒वतोप॑ म॒द्रिक् ॥ ३ ॥

आ तिष्ठ रथं वृषणं वृषा ते सुतः सोमः परिऽसिक्ता मधूनि ।
युक्त्वा वृषऽभ्यां वृषभ क्षितीनां हरिऽभ्यां याहि प्रऽवता उप मद्रिक् ॥ ३ ॥

तूं इष्ट सिद्धींची जणों वृष्टीच करणारा आहेस, तेव्हां तूं भक्तमनोरथपूरक अशाच रथावर आरूढ हो. हा तुजकरितां सोमरस तयार करून त्यांत अनेक स्वादिष्ट पदार्थ घातले आहेत तर हे सकल लोक श्रेष्ठा, तूं आपले उमदे घोडे जोडून खाली (या भूलोकीं) मजकडे ये. ॥ ३ ॥


अ॒यं य॒ज्ञो दे॑व॒या अ॒यं मि॒येध॑ इ॒मा ब्रह्मा॑ण्य॒यमिं॑द्र॒ सोमः॑ ॥
स्ती॒र्णं ब॒र्हिरा तु श॑क्र॒ प्र या॑हि॒ पिबा॑ नि॒षद्य॒ वि मु॑चा॒ हरी॑ इ॒ह ॥ ४ ॥

अयं यज्ञः देवऽयाः अयं मियेधः इमा ब्रह्माणि अयण् इंद्र सोमः ।
स्तीर्णं बर्हिः आ तु शक्र प्र याहि पिब निऽसद्य वि मुच हरी इति इह ॥ ४ ॥

हा येथें देवमान्य असा यज्ञ सुरू आहे, इंद्रा, हा येथें मेध्य पशु, हीं तुज प्रित्यर्थ प्रार्थना स्तोत्रें, हा सोमरस आणि हे येथें तुजकरितां दर्भासन आंथरलें आहे. तर हे सर्व समर्था, इकडे अगत्य ये, सोमरस ग्रहण करून जरा आराम कर, आणि येथें घोडे सोडून त्यांना विश्रांति दे. ॥ ४ ॥


ओ सुष्टु॑त इंद्र याह्य् अ॒र्वाङ्‌उप॒ ब्रह्मा॑णि मा॒न्यस्य॑ का॒रोः ॥
वि॒द्याम॒ वस्तो॒रव॑सा गृ॒णन्तो॑ वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ५ ॥

ओ इति सुऽस्तुतः इंद्र याहि अर्वाङ्‌ उप ब्रह्माणि मान्यस्य कारोः ।
विद्याम वस्तोः अवसा गृणन्तः विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ५ ॥

हे इंद्रा, तुझें स्तवन यथामति उत्तम रीतीनें झालेले आहे. तर ह्या सन्मान्य कवीच्या प्रार्थना-स्तोत्रांकडे खालीं भूलोकीं ये. सुप्रभाती तुझें स्तवन करणार्‍या आम्हां भक्तांस तुझ्या कृपेनें इच्छित लाभ होवो. आम्हांस तात्काळ फलद्रुप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय प्राप्त होवो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७८ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुभ्


यद्ध॒ स्या त॑ इंद्र श्रु॒ष्टिरस्ति॒ यया॑ ब॒भूथ॑ जरि॒तृभ्य॑ ऊ॒ती ॥
मा नः॒ कामं॑ म॒हय॑न्त॒मा ध॒ग्विश्वा॑ ते अश्यां॒ पर्याप॑ आ॒योः ॥ १ ॥

यत् ह स्या ते इंद्र श्रुष्टिः अस्ति यया बभूथ जरितृऽभ्यः ऊती ।
मा नः कामं महयन्तं आ धक् विश्वा ते अश्यां परि आपः आयोः ॥ १ ॥

हे इंद्रा, आपल्या सज्जनांचे संरक्षण करण्यास ज्याच्यामुळें तूं प्रवृत्त होतोस, अशा प्रकारच्या भक्तांची विनवणी ऐकून घेण्याचा कळवळा तुझ्या मध्यें वसत आहे, म्हणून आम्हीं विनवितो किं आमच्या उच्च मनोवृत्ति तूं जाळून टाकूं नकोस. आणि उपासनानिष्ठ मनुष्यानें करावयाचीं सर्व कर्तव्यें माझ्या हातून तुझ्या प्रित्यर्थ घडतील असें कर. ॥ १ ॥


न घा॒ राजेन्द्र॒ आ द॑भन्नो॒ या नु स्वसा॑रा कृ॒णव॑न्त॒ योनौ॑ ॥
आप॑श्चिदस्मै सु॒तुका॑ अवेष॒न्गम॑न्न॒ इंद्रः॑ स॒ख्या वय॑श्च ॥ २ ॥

न घ राजा इन्द्रः आ दभत् नः या नु स्वसारा कृणवन्त योनौ ।
आपः चित् अस्मै सुऽतुकाः अवेषन् गमत् नः इंद्रः सख्या वयः च ॥ २ ॥

दोघी बहिणींनी आमच्याकरितां आपआपल्या मर्यादेंत जें जें कांही केलें असेल, त्या विषयीं जगन्नायक इंद्र आमची निराशा न करो. पवित्र वासना उत्पन्न करणारी दिव्य उदकें ज्या ह्या इंद्राला जाऊन मिळाली आहेत, तो हा देव आम्हांला मित्र प्रेम आणि उत्साह पूर्ण असें वय प्राप्त करून देवो. ॥ २ ॥


जेता॒ नृभि॒रिंद्रः॑ पृ॒त्सु शूरः॒ श्रोता॒ हवं॒ नाध॑मानस्य का॒रोः ॥
प्रभ॑र्ता॒ रथं॑ दा॒शुष॑ उपा॒क उद्य॑न्ता॒ गिरो॒ यदि॑ च॒ त्मना॒ भूत् ॥ ३ ॥

जेता नृऽभिः इद्रः पृत्ऽसु शूरः श्रोता हवं नाधमानस्य कारोः ।
प्रऽभर्ता रथं दाशुषः उपाके उत्ऽयंता गिरः यदि च त्मना भूत् ॥ ३ ॥

हा महावीर इंद्र युद्धांत आपल्या शूर सैनिकांसह सदैव विजयी, आणि करुणा भाकणार्‍या प्रत्येक भक्ताची हांक ऐकणारा आहे. तो हवि अर्पण करणार्‍या भक्ताजवळ आपला रथ घेऊन येतो, आणि त्याच्या मनांत आलें म्हणजे (पाहिजे त्याच्या कडून) दिव्य वाणीचा उच्चार करवितो. ॥ ३ ॥


ए॒वा नृभि॒रिंद्रः॑ सुश्रव॒स्या प्र॑खा॒दः पृ॒क्षो अ॒भि मि॒त्रिणो॑ भूत् ॥
स॒म॒र्य इ॒षः स्त॑वते॒ विवा॑चि सत्राक॒रो यज॑मानस्य॒ शंसः॑ ॥ ४ ॥

एव नृऽभिः इद्रः सुऽश्रवस्या प्रऽखादः पृक्षः अभि मित्रिणः भूत् ।
सऽमर्ये इषः स्तवते विऽवाचि सत्राऽकरः यजमानस्य शंसः ॥ ४ ॥

सामर्थ्याचा अलंकार हा इंद्र होय. तो भक्तांचे स्तवन ऐकण्याकरितां आपल्या वीरांसहवर्तमान, आपल्या प्रिय भक्तांच्या जवळ येतो. भर युद्धांत नाना प्रकारच्या आवाजांचा एकच कल्लोळ चालला असतांना सुद्धां यजमानाची सत्यार्थपूर्ण स्तोत्र वाणी (ह्या इंद्राच्या) अवर्णनीय उत्साह शक्तीची प्रशंसाच करीत असते. ॥ ४ ॥


त्वया॑ व॒यं म॑घवन्निंद्र॒ शत्रू॑न॒भि ष्या॑म मह॒तो मन्य॑मानान् ॥
त्वं त्रा॒ता त्वमु॑ नो वृ॒धे भू॑र्वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ ५ ॥

त्वया वयं मघऽवन् इंद्र शत्रून् अभि स्याम महतः मन्यमानान् ।
त्वं त्राता त्वं ऊं इति नः वृधे भूः विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ ५ ॥

हे महैश्वरसंपन्न इंद्रा, आपल्याच मोठेपणाच्या घमेंडीत असणार्‍या पातकी शत्रूंस आम्ही तुझ्या बळावर सहज जिंकून टाकूं. तूं आमचा तारक; तूं आमची उन्नति करणारा हो म्हणजे तात्काळ फलद्रूप होणारा व उत्साहप्रद असा तुझा आश्रय प्राप्त होईल. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १७९ ( इंद्र सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : रतिः - छंद - त्रिष्टुभ्, बृहती


पू॒र्वीर॒हं श॒रदः॑ शश्रमा॒णा दो॒षा वस्तो॑रु॒षसो॑ ज॒रय॑न्तीः ॥
मि॒नाति॒ श्रियं॑ जरि॒मा त॒नूना॒मप्यू॒ नु पत्नी॒िर्वृष॑णो जगम्युः ॥ १ ॥

पूर्वीः अहं शरदः शश्रमाणा दोषाः वस्तोः उषसः जरयन्तीः ।
मिनाति श्रियं जरिमा तनूनां अपि ऊं इति नु पत्‍नीः वृषणः जगम्युः ॥ १ ॥

मी आज पुष्कळ वर्षें रात्रंदिवस एकसारखे कष्ट सोसलेले आहेत. जो जो दिवस उगवतो तो तो वार्धक्य मात्र जवळ आणतो. आणि वृद्धदशा ही तर शरीराचा मोहकपणा पार नाहींसा करीत असते, अशी गोष्ट आहे तरी सुद्धां पुरुषांनी स्वस्त्री समागम सुख अनुभवूं नये काय ? ॥ १ ॥


ये चि॒द्धि पूर्व॑ ऋत॒साप॒ आस॑न्त्सा॒कं दे॒वेभि॒रव॑दन्नृ॒तानि॑ ॥
ते चि॒दवा॑सुर्न॒ह्यन्त॑मा॒पुः समू॒ नु पत्नी॒र्वृष॑भिर्जगम्युः ॥ २ ॥

ये चित् हि पूर्वे ऋतऽसापः आसन् साकं देवेभिः अवदन् ऋतानि ।
ते चित् अव असुः नहि अंतः आपुः सं ऊं इति नु पत्‍नीः वृषऽभिः जगम्युः ॥ २ ॥

पहा प्राचीनकाळीं जे जे म्हणून सत्यपरायण महात्मे होऊन गेले आणि जे जे प्रत्यक्ष देवांची सत्यच भाषण बोलत असत एवढी ज्यांची योग्यता त्यांनासुद्धां हार खावी लागली. पण ब्रह्मचर्यव्रताची अखेर त्यांना साधतां आली नाहीं, तेव्हां सामान्यतः स्त्रियांनीही स्वपति समागमसुख अनुभवावें हेंच योग्य. ॥ २ ॥


न मृषा॑ श्रा॒न्तं यदव॑न्ति दे॒वा विश्वा॒ इत्स्पृधो॑ अ॒भ्यश्नवाव ॥
जया॒वेदत्र॑ श॒तनी॑थमा॒जिं यत्स॒म्यञ्चा॑ मिथु॒नाव॒भ्यजा॑व ॥ ३ ॥

न मृषा श्रान्तं यत् अवन्ति देवाः विश्वाः इत् स्पृधः अभि अश्नश्नवाव ।
जयाव इत् अत्र शतनीऽथं आजिं यत् सम्यंचा मिथुनौ अभि अजाव ॥ ३ ॥

आपण श्रम व्यर्थ केले असें म्हणूं नको. खुद्द देवच आपलें रक्षण करतात आणि आपण सर्व प्रतिस्पर्ध्यांवर जयही मिळविला आहे, मग आणखी काय पाहिजे ? तुम्हीं आम्हीं दोघेजण जर अगदीं एकमतानें वागत आलों आहोंत तर इहलोकीं ज्यापासून शेंकडो लाभ होतात अशा संसाराचा पणही आपण खास जिंकलाच असें समजा. ॥ ३ ॥


न॒दस्य॑ मा रुध॒तः काम॒ आग॑न्नि॒त आजा॑तो अ॒मुतः॒ कुत॑श्चित् ॥
लोपा॑मुद्रा॒ वृष॑णं॒ नी रि॑णाति॒ धीर॒मधी॑रा धयति श्व॒सन्त॑म् ॥ ४ ॥

नदस्य मा रुधतः कामः आ अगन् इतः आऽजातः अमुतः कुतः चित्त् ।
लोपामुद्रा वृषणं निः रिणाति धीरं अधीरा धयति श्वसन्तम् ॥ ४ ॥

एखाद्या महानदाला अडविलें असतां तो जसा अनावर होतो, त्याप्रमाणें मला अनावर उत्कंठा झाली आहे. येथून तेथून सर्व तऱ्हेनें मी उत्कंठित झालो आहे. मी वीर्यवान, मोठा बुद्धिमान, व धैर्यबलशाली आणि ही लोपामुद्रा तर जातीची अबलाच परंतु हिनें मला सर्वस्वी विव्हल करून शुष्क करून टाकलें आहे. ॥ ४ ॥


इ॒मं नु सोम॒मन्ति॑तो हृ॒त्सु पी॒तमुप॑ ब्रुवे ॥
यत्सी॒माग॑श्चकृ॒मा तत्सु मृ॑ळतु पुलु॒कामो॒ हि मर्त्यः॑ ॥ ५ ॥

इमं नु सोमं अन्तितः हृत्ऽसु पीतं उप ब्रुवे ।
यत् सीं आगः चकृम तत् सु मृळतु पुलुऽकामः हि मर्त्यः ॥ ५ ॥

ज्या ह्या सोम रसाच्या तत्त्वाला आम्हीं आमच्या अंतःकरणांत सांठवून ठेविलेलें आहे, त्याच्या पुढें उभा राहून मी प्रार्थना करतों कीं, आम्ही जें कांही पातक केलें असेल, त्याची देव आम्हांस सर्वस्वी क्षमा करो; कारण हा मनुष्यप्राणी असा आहे कीं, त्याला बर्‍या वाईट शेंकडो वासना असणारच. ॥ ५ ॥


अ॒गस्त्यः॒ खन॑मानः ख॒नित्रैः॑ प्र॒जामप॑त्यं॒ बल॑मि॒च्छमा॑नः ॥
उ॒भौ वर्णा॒वृषि॑रु॒ग्रः पु॑पोष स॒त्या दे॒वेष्वा॒शिषो॑ जगाम ॥ ६ ॥

अगस्त्यः खनमानः खनित्रैः प्रऽजां अपत्यं बलं इच्छमानः ।
उभौ वर्णौ ऋषिः उग्रः पुपोष सत्याः देवेषु आऽशिषः जगाम ॥ ६ ॥

अगस्त्य ऋषिंनी स्वतः हातांत कुदळ घेऊन खणल्याप्रमाणें तपश्चर्येचे फार मोठे कष्ट सोसले, त्यांनाही संतति स्वाधिनता आणि अविनाशी बल ह्यांची इच्छा होती व त्यांनी सामर्थ्यवान होऊन दोन्ही वर्णांचा उत्कर्षच केला, तेव्हां ईश्वराच्या सत्य अशा आशिर्वादाचें फल त्यांस देवलोकीं मिळालें. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १८० ( अश्विनौ सूक्त )

ऋषि : अगस्त्य मैत्रावरुणिः - देवता : अश्विनौ - छंद - त्रिष्टुभ्


यु॒वो रजां॑सि सु॒यमा॑सो॒ अश्वा॒ रथो॒ यद्वां॒ पर्यर्णां॑सि॒ दीय॑त् ॥
हि॒र॒ण्यया॑ वां प॒वयः॑ प्रुषाय॒न्मध्वः॒ पिब॑न्ता उ॒षसः॑ सचेथे ॥ १ ॥

युवोः रजांसि सुऽयमासः अश्वाः रथः यत् वां परि अर्णांसि दीयत् ।
हिरण्ययाः वां पवयः प्रुषायन् मध्वः पिबतौ उषसः सचेथे इति ॥ १ ॥

हे अश्वी देव हो, तुमचा रथ अंतरिक्षरूपी रजोमय समुद्राच्या भोंवताली भ्रमण करीत असतांना सुद्धां तुमचे घोडे अगदीं सुयंत्र चाललेले असतात, तुमच्या सुवर्णमय चाकांच्या धावांपासून अमृत तुषार उडत असतात, आणि तुम्हीही मधुर रस प्राशन करून उषांबरोबर इकडे येत असतां. ॥ १ ॥


यु॒वमत्य॒स्याव॑ नक्षथो॒ यद्विप॑त्मनो॒ नर्य॑स्य॒ प्रय॑ज्योः ॥
स्वसा॒ यद्वां॑ विश्वगूर्ती॒ भरा॑ति॒ वाजा॒येट्टे॑ मधुपावि॒षे च॑ ॥ २ ॥

युवं अत्यस्य अव नक्षथः यत् विऽपत्मनः नर्यस्य प्रऽयज्योः ।
स्वसा यत् वां विश्वगूर्ती इति विश्वगूर्ती भराति वाजाय ईट्टे मधुऽपौ इषे च ॥ २ ॥

तुम्ही जेव्हां विशेष गतीनें धांवणारा, लोक हितकर, अति पवित्र व वेगवान अशा सूर्यापूर्वीं येऊन पोहोंचतां, तेव्हां भक्तांचे स्तवन अशा अर्थाचें चाललेलें असतें कीं " हे मधुर रसाभिलाषी आणि सर्व लोकप्रिय अश्वी हो, भगिनी उषा हिनें तुम्हांस घेऊन यावें, आणि आम्हांस दिव्य सामर्थ्य आणि उत्साह ह्याचा लाभ व्हावा". ॥ २ ॥


यु॒वं पय॑ उ॒स्रिया॑यामधत्तं प॒क्वमा॒माया॒मव॒ पूर्व्यं॒ गोः ॥
अ॒न्तर्यद्व॒निनो॑ वामृतप्सू ह्वा॒रो न शुचि॒र्यज॑ते ह॒विष्मा॑न् ॥ ३ ॥

युवं पयः उस्रियायां अधत्तं पक्वं आमायां अव पूर्व्यं गोः ।
अन्तः यत् वनिनः वां ऋतप्सू इति ऋतऽप्सू ह्वारः न शुचिः यजते हविष्मान् ॥ ३ ॥

तुम्हीं दिव्य धेनूच्या अपरिपक्व परंतु प्रकाशमय कांसे मध्यें परिपक्व व उत्कृष्ट असें अमृत तत्त्व ठेविलेलें आहे म्हणून हे सत्य स्वरूप अश्वीहो, अरण्यांत अंतर्भागी वेड्या वांकड्या गतीनें वाहणरा वाराही जसा पवित्र, त्या प्रमाणे पवित्रांतःकरणानें हा तुमचा भक्त तुमची सेवा करीत असतो. ॥ ३ ॥


यु॒वं ह॑ घ॒र्मं मधु॑मन्त॒मत्र॑येऽ॒पो न क्षोदो॑ऽवृणीतमे॒षे ॥
तद्वां॑ नरावश्विना॒ पश्वऽ॑इष्टी॒ रथ्ये॑व च॒क्रा प्रति॑ यन्ति॒ मध्वः॑ ॥ ४ ॥

युवं ह घर्मं मधुऽमन्तं अत्रये अपः न क्षोदः अवृणीतं एषे ।
तत् वां नरौ अश्विना पश्वऽइष्टिः रथ्याऽइव चक्रा प्रति यन्ति मध्वः ॥ ४ ॥

तुम्ही अत्रि ऋषीकरितां त्यांच्या प्रार्थनेवरून प्रखर उष्णतेला पाण्याच्या प्रवाहाप्रमाणें शीतल व मधुर रसयुक्त करून टाकलेंत, म्हणून हे शूर अश्वी देवहो, तुमच्या प्रित्यर्थ पशु यज्ञ होत असतो आणि मधुर रस आम्हांकडे रथाच्या चक्रा प्रमाणें झर झर धांवत येत असतात. ॥ ४ ॥


आ वां॑ दा॒नाय॑ ववृतीय दस्रा॒ गोरोहे॑ण तौ॒ग्र्यो न जिव्रिः॑ ॥
अ॒पः क्षो॒णी स॑चते॒ माहि॑ना वां जू॒र्णो वा॒मक्षु॒रंह॑सो यजत्रा ॥ ५ ॥

आ वां दानाय ववृतीय दस्रा गोः ओहेन तौग्र्यः न जिव्रिः ।
अपः क्षोणी इति सचते माहिना वां जूर्णः वां अक्षुः अंहसः यजत्रा ॥ ५ ॥

हे अद्‍भुत कर्मकारी अश्वीहो, वृद्ध झालेल्या तुग्र पुत्रानें तुम्हांस आपणांकडे वळविले त्या प्रमाणें तुम्हीं वरदान द्यावें म्हणून घृताहुतीनें तुम्हाला मी आपल्याकडे वळवीन असें करा. तुमच्या महिम्यानें आकाश आणि पृथ्वी हीं दोन्ही व्यापून टाकली आहेत. हे पूज्य देवांनों, पातकांचे जाल तुमच्यापुढें पार फाटून त्याच्या चिंधड्या होऊन जातात. ॥ ५ ॥


नि यद्यु॒वेथे॑ नि॒युतः॑ सुदानू॒ उप॑ स्व॒धाभिः॑ सृजथः॒ पुरं॑धिम् ॥
प्रेष॒द्वेष॒द्वातो॒ न सू॒रिरा म॒हे द॑दे सुव्र॒तो न वाज॑म् ॥ ६ ॥

नि यत् युवेथे इति निऽयुतः सुदानू इति सुऽदानू उप स्वधाभिः सृजथः पुरंऽधिम् ।
प्रेषत् वेषत् वातः न सूरिः आ महे ददे सुऽव्रतः न वाजम् ॥ ६ ॥

हे अत्युदार अश्वीहो, तुम्हीं भक्तांकडे येण्याकरितां घोडे जोडतां तेव्हांच तुम्हीं आपल्या प्रभावानें भक्तामध्यें बुद्धिमत्ता उत्पन्न करतां. मग त्या बुद्धिमंत भक्तानें तुम्हाला प्रसन्न करून घेऊन वार्‍याप्रमाणें पहिजे तिकडे संचार करावा. पण तो भक्त असतो सत्कर्मरत; तेव्हां त्याचें महत्त्व वाढावें, म्हणून त्याला पवित्र सामर्थ्याचाही लाभ होतो. ॥ ६ ॥


व॒यं चि॒द्धि वां॑ जरि॒तारः॑ स॒त्या वि॑प॒न्याम॑हे॒ वि प॒णिर्हि॒तावा॑न् ॥
अधा॑ चि॒द्धि ष्मा॑श्विनावनिंद्या पा॒थो हि ष्मा॑ वृषणा॒वन्ति॑देवम् ॥ ७ ॥

वयं चित् हि वां जरितारः सत्याः विपन्यामहे वि पणिः हितऽवान् ।
अध चित् हि स्म अश्विनौ अनिंद्या पाथः हि स्म वृषणौ अंन्तिऽदेवम् ॥ ७ ॥

आम्हीं स्तोतेजन हेच तुमचे इमानी सेवक. तुमचे नाना प्रकारें गुण संकिर्तन करतों, परंतु धनाढ्य व धर्म विमुख कंजुष मनुष्य तसाच एकीकडे पडलेला आहे त्याची आम्हीं पर्वाही करीत नाहीं. म्हणूनच हे निष्कलंक व वीर्यवान अश्वीहो, देवाला निरंतर हृदयांत वागविणार्‍या आम्हां भक्तांचे रक्षण करीत असतां. ॥ ७ ॥


यु॒वां चि॒द् धि ष्मा॑श्विना॒व् अनु॒ द्यून् विरु॑द्रस्य प्र॒स्रव॑णस्य सा॒तौ ॥
अ॒गस्त्यो॑ न॒रां नृषु॒ प्रश॑स्तः॒ कारा॑धुनीव चितयत्स॒हस्रैः॑ ॥ ८ ॥

युवां चित् हि स्म अश्विनौ अनु द्यून् विऽरुद्रस्य प्रऽस्रवणस्य सातौ ।
अगस्त्यः नरां नृषु प्रऽशस्तः काराधुनीऽइव चितयत् सहस्रैः ॥ ८ ॥

हे अश्वीदेवहो. ज्ञान जलाचा प्रचंड ओघ आपलासा व्हावा म्हणून थोर पुरुषांमध्यें श्रेष्ठ असा अगस्त्य ऋषि दररोज प्रातःकाळीं तुम्हांस जागृत करतो, त्यावेळीं काराधुनी नामक मंजुल वाद्याच्या ध्वनी प्रमाणें मनोहर अशा हजारों स्तवनांनी तो तुम्हांला आळवीत असतो. ॥ ८ ॥


प्र यद्वहे॑थे महि॒ना रथ॑स्य॒ प्र स्य॑न्द्रा याथो॒ मनु॑षो॒ न होता॑ ॥
ध॒त्तं सू॒रिभ्य॑ उ॒त वा॒ स्वश्व्यं॒ नास॑त्या रयि॒षाचः॑ स्याम ॥ ९ ॥

प्र यत् वहेथे इति महिना रथस्य प्र स्यन्द्रा याथः मनुषः न होता ।
धत्तं सूरिऽभ्यः उत वा सुऽअश्व्यं नासत्या रयिऽसाचः स्याम ॥ ९ ॥

सर्व संचारी देवहो, तुम्हीं आपल्या स्वर्गगामी रथाच्या जोरावर पाहिजे तिकडे जातां, पण आमचेकडे येतां ते मात्र कोणातरी एखाद्या मनुष्याच्या होत्या प्रमाणे (रूप घेऊन) येत असतां. तर आमच्या यजमानांना बुद्धिचापल्यरूप उत्तम अश्व द्या, म्हणजे हे नासत्यहो, आम्हींही त्यांच्या ऐश्वर्याचे विभागी होऊं. ॥ ९ ॥


तं वां॒ रथं॑ व॒यम॒द्या हु॑वेम॒ स्तोमै॑रश्विना सुवि॒ताय॒ नव्य॑म् ॥
अरि॑ष्टनेमिं॒ परि॒ द्यामि॑या॒नं वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम् ॥ १० ॥

तं वां रथं वयं अद्य हुवेम स्तोमैः अश्विना सुविताय नव्यम् ।
अरिष्टऽनेमिं परि द्यां इयानं विद्याम एषं वृजनं जीरदानुम् ॥ १० ॥

अश्वीदेवहो, ज्याच्या धांवा कधींही मोडत नाहींत व जो नक्षत्र लोकाभोंवती भ्रमण करीत असतो असा तुमचा नामांकित रथ, त्याला स्तोत्राच्या योगानें आम्हीं कल्याणाकरितां आज इकडे प्रार्थना करून आणवितो, म्हणजे तात्काळ फलद्रुप होणारा व उत्साहप्रद असा तुमचा आश्रय आम्हांस प्राप्त होईल. ॥ १० ॥


ॐ तत् सत्


GO TOP