ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १ ते १०
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १ (अग्नि सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - अग्नि : छंद - गायत्री



अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्‍न॒धात॑मम् ॥ १ ॥
अग्निं ईळे पुरःऽहितं यज्ञस्य देवं ऋत्विजं । होतारं रत्‍नऽधातमम् ॥ १ ॥
अग्नी हा यज्ञाचा अग्रणी आहे. यज्ञाचा प्रमुख देव तोच. यज्ञाचे हविर्भाग त्या त्या देवतांप्रत पोहोंचविणारा सन्मानमीय आचार्यही तोच. रत्‍नांचा अनुपम निधि ह्याचे जवळ आहे. तेव्हां अशा अग्निदेवाचें मी भक्तिपुरःसर स्तवन करतो. ॥ १ ॥


अ॒ग्निः पूर्वे॑भि॒र्ऋषि॑भि॒रीड्यो॒ नूत॑नैरु॒त । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥ २ ॥
अग्निः पूर्वेभिः ऋषिभिः ईड्यः नूतनैः उत । सः देवान् आ इह वक्षति ॥ २ ॥
पूर्वकालीन ऋषींना या अग्नीची स्तुति करण्यांत प्रेम वाटले, व अर्वाचीन ऋषींनाही तो स्तवनास सर्वथैव योग्य वाटतो. आमच्या यज्ञांत हाच अखिल देवांना घेऊन येतो. ॥ २ ॥


अ॒ग्निना॑ र॒यिम॑श्नव॒त्पोष॑मे॒व दि॒वेदि॑वे । य॒शसं॑ वी॒रव॑त्तमम् ॥ ३ ॥
अग्निना रयिं अश्नवत् पोषं एव दिवेऽदिवे । यशसं वीरवत्ऽतमम् ॥ ३ ॥
ह्या अग्नीमुळेच भक्ताला वैभव प्राप्त होते आणि ते वैभवही असें की जे दिवसानुदिवस वृद्धिंगत होत जाते. वीरश्रेष्ठ पुरुषांनाच जी जयश्री माळ घालते तीदेखील या अग्नीच्या कृपेने पूजकास प्राप्त होते. ॥ ३ ॥


अग्ने॒ यं य॒ज्ञम॑ध्व॒रं वि॒श्वतः॑ परि॒भूरसि॑ । स इद्दे॒वेषु॑ गच्छति ॥ ४ ॥
अग्ने यं यज्ञं अध्वरं विश्वतः परिऽभूः असि । सः इत् देवेषु गच्छति ॥ ४ ॥
हे अग्निदेव, ज्या पवित्र यज्ञावर चोहोंकडून तुझी दृष्टी असते, तोच यज्ञ देवांना ग्रहण करण्यास योग्य वाटतो. ॥ ४ ॥


अ॒ग्निर्होता॑ क॒विक्र॑तुः स॒त्यश्चि॒त्रश्र॑वस्तमः । दे॒वो दे॒वेभि॒राऽग॑मत् ॥ ५ ॥
अग्निः होता कविऽक्रतुः सत्यः चित्रश्रवःऽतमः । देवः देवेभिः आ गमत् ॥ ५ ॥
अग्निद्वारेंच सर्व देवांना त्यांचे हविर्भाग प्राप्त होतात. बुद्धिशाली पंडितांना ह्याचे पासून ज्ञानसामर्थ्य प्राप्त होते. ह्याने दिलेले वर निःसंशय सफल व्हावयाचेच व कोणी भक्त कितीही ठिकाणी यास पाचारण करोत, त्यांची प्रार्थना ह्याचे कानावर गेली नाही असें कधी व्हावयाचेंच नाही. असा अग्नि देवसमुदायासह येथें प्राप्त झालेला आहे. ॥ ५ ॥


यद॒ङ्‍ग दा॒शुषे॒ त्वम् अग्ने॑ भ॒द्रं क॑रि॒ष्यसि॑ । तवेत्तत्स॒त्यम॑ङ्‍गिरः ॥ ६ ॥
यत् अङ्‍ग दाशुषे त्वं अग्ने भद्रं करिष्यसि । तव इत् तत् सत्यं अङ्‍गिरः ॥ ६ ॥
हे अग्निदेवा, हे अंगिरसा, उपासकांना तू जे कांही मंगल आशीर्वचन देशील तें सत्य झालंच पाहिजे याबद्दल शंका नाहीं. ॥ ६ ॥


उप॑ त्वाग्ने दि॒वेदि॑वे॒ दोषा॑वस्तर्धि॒या व॒यम् । नमो॒ भर॑न्त॒ एम॑सि ॥ ७ ॥
उप त्वा अग्ने दिवेऽदिवे दोषावस्तः धिया वयं । नमः भरन्तः आ इमसि ॥ ७ ॥
हे अग्ने, प्रत्यही, रात्री व दिवसा, अंतःकरणपूर्वक तुला वंदन करीत तुझ्या चरणाचा आश्रय करतो. ॥ ७ ॥


राज॑न्तमध्व॒राणां॑ गो॒पामृ॒तस्य॒ दीदि॑विम् । वर्ध॑मानं॒ स्वे दमे॑ ॥ ८ ॥
राजन्तं अध्वराणां गोपां ऋतस्य दीदिविं वर्धमानं स्वे दमे ॥ ८ ॥
कारण प्रत्येक पुण्ययज्ञांत तूंच विराजमान होतोस, सर्व विधींचा रक्षणकर्ता तूंच आहेस, तुझें तेज अत्यंत देदीप्यमान आहे, यज्ञांत स्थित असतांना तुझ्या आनंदाला भरती येते. ॥ ८ ॥


स नः॑ पि॒तेव॑ सू॒नवेऽ॑ग्ने सूपाय॒नो भ॑व । सच॑स्वा नः स्व॒स्तये॑ ॥ ९ ॥
सः नः पिताऽइव सूनवे अग्ने सुऽउपायनः भव । सचस्व नः स्वस्तये ॥ ९ ॥
हे अग्निदेव, आम्ही तुझी लेंकरें आहोंत. मायाळु पित्याप्रमाणे आमचे लाड तूं उत्तम तर्‍हेने पुरव. आमच्यापासून दूर जाऊं नको. त्यांतच आमचे क्षेम आहे. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २ ( वायु, इंद्र, मित्रावरुण सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - १ ते ३ वायु; ४ ते ६ इंद्रवायु; ७ ते ९ मित्रावरुण : छंद - गायत्री


वाय॒वा या॑हि दर्शते॒मे सोमा॒ अरं॑कृताः । तेषां॑ पाहि श्रु॒धी हव॑म् ॥ १ ॥
वायो इति आ याहि दर्शत इमे सोमाः अरंऽकृताः । तेषां पाहि श्रुधी हवम् ॥ १ ॥
जनांस आल्हाद देणार्‍या हे वायुदेवा, तुझें आगमन होऊं दे, तुझ्याकरतां या सोमरसांची उत्तम सिद्धता करून ठेविली आहे. त्यांचे सेवन कर. आमची प्रार्थना ऐक. ॥ १ ॥


वाय॑ उ॒क्थेभि॑र्जरन्ते॒ त्वामच्छा॑ जरि॒तारः॑ । सु॒तसो॑मा अह॒र्विदः॑ ॥ २ ॥
वायो इति उक्थेभिः जरन्ते त्वां अच्छ जरितारः । सुतऽसोमाः अहःऽविदः ॥ २ ॥
हे वायुदेवा, यागकालांचे उत्तम ज्ञान असलेले विद्वान स्तोत्र प्रबंधकर्ते, सोमरस सिद्ध करून, सुंदर सुंदर स्तोत्रांनी तुझी महती गात आहेत. ॥ २ ॥


वायो॒ तव॑ प्रपृञ्च॒ती धेना॑ जिगाति दा॒शुषे॑ । उ॒रू॒ची सोम॑पीतये ॥ ३ ॥
वायो इति तव प्रऽपृञ्चती धेना जिगाति दाशुषे । उरूची सोमऽपीतये ॥ ३ ॥
हे वायुदेवा, तुझा शब्द विश्वसंचारी आहे. त्याचें श्रवण म्हणजे सर्व कामना परिपूर्ण होण्याची तयारीच होय. तुला सोमपानाची इच्छा झाली म्हणजे तुझी मनीषा व्यक्त करण्याकरतां, हा तुझा शब्द तुझ्या भक्तांकडे गमन करतो. ॥ ३ ॥


इन्द्र॑वायू इ॒मे सु॒ता उप॒ प्रयो॑भि॒रा ग॑तम् । इन्द॑वो वामु॒शन्ति॒ हि ॥ ४ ॥
इन्द्रवायू इति इमे सुताः उप प्रयःऽभिः आ गतं । इन्दवः वां उशंति हि ॥ ४ ॥
अहो इंद्रवायु, हे येथें सोमरस सिद्ध करून ठेविले आहेत. आपण आम्हांवर प्रसाद करण्याकरितां या. या सोमरसांची अशीच इच्छा आहे कीं आपण त्यांचे सेवन करावें. ॥ ४ ॥


वाय॒विन्द्र॑श्च चेतथः सु॒तानां॑ वाजिनीवसू । तावा या॑त॒मुप॑ द्र॒वत् ॥ ५ ॥
वायो इति इन्द्रः च चेतथः सुतानां वाजिनीवसू । तौ आ यातं उप द्रवत् ॥ ५ ॥
हे वायुदेवा, वेगसामर्थ्य हे तुझे आणि इंद्राचे वैभव आहे. तर त्वरा करून तुम्ही दोघेही या. कारण सोमरसांची रुचि काय आहे हें तुम्हांस माहितच आहे. ॥ ५ ॥


वाय॒विन्द्र॑श्च सुन्व॒त आ या॑त॒मुप॑ निष्कृ॒तम् । म॒क्ष्वै॒त्था धि॒या न॑रा ॥ ६ ॥
वायो इति इन्द्रः च सुन्वतः आ यातं उप निःऽकृतम् । मक्षु इत्था धिया नरा ॥ ६ ॥
हे वायुदेवा, तुझे व इंद्राचे बल अनुपम आहे, तुम्ही दोघेही सोमरसाची आवड धरून, मी भक्तीने केलेला हा सुंदर सोमरस प्राशन करण्याकरितां सत्वर या. ॥ ६ ॥


मि॒त्रं हु॑वे पू॒तद॑क्षं॒ वरु॑णं च रि॒शाद॑सम् । धियं॑ घृ॒ताचीं॒ साध॑न्ता ॥ ७ ॥
मित्रं हुवे पूतऽदक्षं वरुणं च रिशादसं । धियं घृताचीं साधंता ॥ ७ ॥
पवित्र कार्यास ज्याचे सामर्थ्याचा आधार आहे, अशा मित्रास मी निमंत्रण करतो. दुष्टांचा निःपात करणारा जो वरुण त्यासही मी भक्तीने बोलावतो. या दोघांच्या इच्छेनें पृथ्वीवर पर्जन्यवृष्टि होत असते. ॥ ७ ॥


ऋ॒तेन॑ मित्रावरुणावृतावृधावृतस्पृशा । क्रतुं॑ बृ॒हन्त॑माशाथे ॥ ८ ॥
ऋतेन मित्रावरुणौ ऋतऽवृधौ ऋतऽस्पृशा । क्रतुं बृहंतं आशाथे इति ॥ ८ ॥
मित्रावरुणामुळेच विश्वांतील नियमांचा मान राहतो आणि ते स्वतःही धर्मनियमांचे परिपालन करण्यांत भूषण मानतात, व आपले सामर्थ्यही धर्मनीतीनें विभूषित करीत असतात. ॥ ८ ॥


क॒वी नो॑ मि॒त्रावरु॑णा तुविजा॒ता उ॑रु॒क्षया॑ । दक्षं॑ दधाते अ॒पस॑म् ॥ ९ ॥
कवी इति नः मित्रावरुणा तुविजाता उरुक्षया । दक्षं दधाते अपसम् ॥ ९ ॥
सर्वोपकारी व सर्वव्यापी अशा आमच्या मित्रावरुणांची बुद्धिसंपन्नता अपूर्व आहे, व त्यांचे बल कृतिरूपाने व्यक्त होणारे आहे. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३ ( सरस्वती सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - १ ते ३ अश्विनीकुमार; ४ ते ६ इंद्र; ७ ते ९ विश्वेदेव; १० ते १२ सरस्वती : छंद - गायत्री


अश्वि॑ना॒ यज्व॑री॒रिषो॒ द्रव॑त्पाणी॒ शुभ॑स्पती । पुरु॑भुजा चन॒स्यत॑म् ॥ १ ॥
अश्विना यज्वरीः इषः द्रवत्पाणी इति द्रवत्ऽपाणी शुभः पती इति । पुरुऽभुजा चनस्यतम् ॥ १ ॥
अहो अश्वीहो, दानकर्माने आपले हस्त आर्द्र झालेले आहेत. जगतांत जें शुभ म्हणून आहे, त्याचे स्वामी आपणच आहात. असंख्य भक्तांना आपलाच आधार आहे. आमचे हवी आपण गोड मानून घ्या. ॥ १ ॥


अश्वि॑ना॒ पुरु॑दंससा॒ नरा॒ शवी॑रया धि॒या । धिष्ण्या॒ वन॑तं॒ गिरः॑ ॥ २ ॥
अश्विना पुरुऽदंससा नरा शवीरया धिया । धिष्ण्या वनतं गिरः ॥ २ ॥
अश्वीहो, आपली अनेक अद्‍भुत कृत्यें आम्हांस माहित आहेत. आपले शौर्यही सर्वत्र प्रसिद्धच आहे, व आपले धैर्य अप्रतिम आहे. आमच्या स्तुतीचा आपण कनवाळूपणाने स्वीकार करा. ॥ २ ॥


दस्रा॑ यु॒वाक॑वः सु॒ता नास॑त्या वृ॒क्तब॑र्हिषः । आ या॑तं रुद्रवर्तनी ॥ ३ ॥
दस्रा युवाकवः सुताः नासत्या वृक्तऽबर्हिषः । आ यातं रुद्रवतनि इति रुद्रऽवर्तनी ॥ ३ ॥
हे सत्यस्वरूप अश्वीदेवतांनो, क्लेशपरिहारक म्हणून आपली ख्याति आहे. आपण भीषण पराक्रम करणारे आहांत. आपले आगमन इकडे होऊं द्या. कारण असें पहा, आम्ही सोमरसांत पडलेली दर्भाची अग्रें काढून टाकून व त्यांत स्वादिष्ट पदार्थ मिश्र करून तो तयार करून ठेविला आहे. ॥ ३ ॥


इन्द्रा या॑हि चित्रभानो सु॒ता इ॒मे त्वा॒यवः॑ । अण्वी॑भि॒स्तना॑ पू॒तासः॑ ॥ ४ ॥
इन्द्र आ याहि चित्रभानो इति चित्रऽभानो सुताः इमे त्वाऽयवः । अण्वीभिः तना पूतासः ॥ ४ ॥
हे इंद्रा, तुझी कांति अलौकिक आहे. इकडे ये. हे सोमरस तुझ्याकरतां आम्ही आपल्या करांगुळींनी पिळून ठेवले आहेत. हे नेहमींच शुद्ध आहेत. ॥ ४ ॥


इन्द्रा या॑हि धि॒येषि॒तो विप्र॑जूतः सु॒ताव॑तः । उप॒ ब्रह्मा॑णि वा॒घतः॑ ॥ ५ ॥
इन्द्र आ याहि धिया इषितः विप्रऽजूतः सुतऽवतः । उप ब्रह्माणि वाघतः ॥ ५ ॥
हे इंद्रा, मोठमोठ्या विद्वानांनी तुझे स्तवन केलेले आहे व मीही तुला भक्तीने आळविलें आहे. तर माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करण्याकरतां तूं आपण होऊन इकडे ये. हा सोमरस सिद्ध करून ठेविला आहे. ॥ ५ ॥


इन्द्रा या॑हि॒ तूतु॑जान॒ उप॒ ब्रह्मा॑णि हरिवः । सु॒ते द॑धिष्व न॒श्चनः॑ ॥ ६ ॥
इन्द्र आ याहि तूतुजानः उप ब्रह्माणि हरिऽवः । सुते दधिष्व नः चनः ॥ ६ ॥
पीतवर्ण अश्वावर आरूढ होणार्‍या हे इंद्रदेवा, आमच्या स्तवनांचा अंगिकार करण्याकरितां तूं त्वरेने इकडे ये आणि आमच्या या सोमरसाविषयीं आपले मनांत आवड ठेव. ॥ ६ ॥


ओमा॑सश्चर्षणीधृतो॒ विश्वे॑ देवास॒ आ ग॑त । दा॒श्वांसो॑ दा॒शुषः॑ सु॒तम् ॥ ७ ॥
ओमासः चर्षणीऽधृतः विश्वे देवासः आ गत । दाश्वांसः दाशुषः सुतम् ॥ ७ ॥
हे विश्वदेवहो, आपण जगताचे रक्षणकर्ते आणि अखिल प्राणिमात्रांचे पोषण करणारे आहांत. आपणांस मी हविर्भाग अर्पण करीत आहे. तर आपण इकडे या. आपली औदार्यबुद्धि सर्वप्रसिद्ध आहे. ॥ ७ ॥


विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒प्तुरः॑ सु॒तमा ग॑न्त॒ तूर्ण॑यः । उ॒स्रा इ॑व॒ स्वस॑राणि ॥ ८ ॥
विश्वे देवासः अप्ऽतुरः सुतं आ गन्त तूर्णयः । उस्राःऽइव स्वसराणि ॥ ८ ॥
हे विश्वदेवहो, आपण जगताचे रक्षण करीत असतां. जितक्या उत्सुकतेने धेनु सायंकाळीं घराकडे धांवत सुटतात तितक्या उत्सुकतेनें आमचे सोम ग्रहण करण्याकरितां तुम्ही इकडे या. ॥ ८ ॥


विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒स्रिध॒ एहि॑मायासो अ॒द्रुहः॑ । मेधं॑ जुषन्त॒ वह्न॑यः ॥ ९ ॥
विश्वे देवासः अस्रिधः एहिऽमायासः अद्रुहः । मेधं जुषन्त वह्नयः ॥ ९ ॥
सर्वांची चिंता वाहणार्‍या विश्वदेवांनी आमच्या हवींचा स्वीकार केलेला आहे. त्यांची माया अतर्क्य आहे. ते कोणाचा द्वेष करीत नाहींत, व त्यांचीही अहित करण्यास कोणी समर्थ नाहीत. ॥ ९ ॥


पा॒व॒का नः॒ सर॑स्वती॒ वाजे॑भिर्वा॒जिनी॑वती । य॒ज्ञं व॑ष्टु धि॒याव॑सुः ॥ १० ॥
पावका नः सरस्वती वाजेभिः वाजिनीऽवती । यज्ञं वष्टु धियाऽवसुः ॥ १० ॥
जगतास पावन करणारी सरस्वती, आमच्या यज्ञांतील हविर्भागांची प्रेमानें इच्छा करो. हिचें बुद्धिसामर्थ्य अपार आहे. ॥ १० ॥


चो॒द॒यि॒त्री सू॒नृता॑नां॒ चेत॑न्ती सुमती॒नाम् । य॒ज्ञं द॑धे॒ सर॑स्वती ॥ ११ ॥
चोदयित्री सू॒नृतानां चेतन्ती सुमतीनाम् । यज्ञं दधे सरस्वती ॥ ११ ॥
सत्याची प्रेरणा देणारी, सुबुद्ध जनांची मार्गदर्शक अशा सरस्वतीने आमचा यज्ञ ग्रहण केला आहे. ॥ ११ ॥


म॒हो अर्णः॒ सर॑स्वती॒ प्र चे॑तयति के॒तुना॑ । धियो॒ विश्वा॒ विरा॑जति ॥ १२ ॥
महः अर्णः सरस्वती प्र चेतयति केतुना । धियः विश्वा वि राजति ॥ १२ ॥
स्वप्रकाशाने ज्ञानाच्या महासागराची ती आम्हांस स्पष्ट कल्पना करून देते. या विश्वांत बुद्धि म्हणून जेथें जेथें आढळते तेथें तेथें साम्राज्य करणारी अधिदेवता हीच होय. ॥ १२ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ४ ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - गायत्री


सु॒रू॒प॒कृ॒त्‍नुमू॒तये॑ सु॒दुघा॑मिव गो॒दुहे॑ । जु॒हू॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥ १ ॥
सुरूपऽकृत्‍नुं ऊतये सुदुघांऽइव गोऽदुहे । जुहूमसि द्यविऽद्यवि ॥ १ ॥
उत्तम प्रकार्चे अन्न अर्पण केले असतां ज्याप्रमणे गाय सुप्रसन्न होऊन भरपूर पान्हा देते, त्याप्रमाणे तूं प्रसन्न व्हावेस म्हणून, आम्ही तुला प्रत्यही हवि अर्पण करतो. हे सुंदर विश्व तूंच उत्पन्न केले आहेस. ॥ १ ॥


उप॑ नः॒ सव॒ना ग॑हि॒ सोम॑स्य सोमपाः पिब । गो॒दा इद्रे॒वतो॒ मदः॑ ॥ २ ॥
उप नः सवना गहि सोमस्य सोमऽपाः पिब । गोऽदा इत् रेवतः मदः ॥ २ ॥
तुला सोमाची अत्यंत आवड आहे तेव्हां हे आमचे सोमाचे हवि ग्रहण करण्याकरितां तूं इकडे ये आणि आमचा हा सोमरस प्राशन कर. तुझें वैभव अपार आहे. तूं प्रसन्न झालास म्हणजे गोधनादि ऐश्वर्य सहजच प्राप्त होते. ॥ २ ॥


अथा॑ ते॒ अन्त॑मानां वि॒द्याम॑ सुमती॒नाम् । मा नो॒ अति॑ ख्य॒ आ ग॑हि ॥ ३ ॥
अथ ते अंतमानां विद्याम सुऽमतीनां । मा नः अति ख्य आ गहि ॥ ३ ॥
तुहें अंतःकरण दयाशील तर खरेंच, पण त्या अंतःकरणाच्याही अंतर्भागाची आम्हांस ओळख होऊं दे. आमचा अव्हेर करूं नकोस. तुझे इकडे आगमन होऊं दे. ॥ ३ ॥


परे॑हि॒ विग्र॒मस्तृ॑त॒मिन्द्रं॑ पृच्छा विप॒श्चित॑म् । यस्ते॒ सखि॑भ्य॒ आ वर॑म् ॥ ४ ॥
परा इहि विग्रं अस्तृतं इन्द्रं पृच्छा विपःऽचितं । यः ते सखिऽभ्य आ वरम् ॥ ४ ॥
बुद्धिशाली, अजिंक्य, प्रज्ञावान् असा जो इंद्र - जो तुझ्या अत्यंत जिवलग मित्रांपेक्षांही जो सर्वतोपरी श्रेष्ठ आहे - त्याच्याजवळ जाऊन जें मागणे असेल तें माग; जा. ॥ ४ ॥


उ॒त ब्रु॑वन्तु नो॒ निदो॒ निर॒न्यत॑श्चिदारत । दधा॑ना॒ इन्द्र॒ इद्दुवः॑ ॥ ५ ॥
उत ब्रुवन्तु नः निदः निः अन्यतः चित् आरत । दधानाः इन्द्र इत् दुवः ॥ ५ ॥
इंद्राचीच जर तुम्ही उपासना केली तर कल्याणाच्या इतर मार्गांस मुकाल असें आम्हांस निंदकलोक खुशाल म्हणोत; ॥ ५ ॥


उ॒त नः॑ सु॒भगाँ॑ अ॒रिर्वो॒चेयु॑र्दस्म कृ॒ष्टयः॑ । स्यामेदिन्द्र॑स्य॒ शर्म॑णि ॥ ६ ॥
उत नः सुऽभगान् अरिः वोचेयुः दस्म कृष्टयः । स्याम इत् इन्द्रस्य शर्मणि ॥ ६ ॥
अथवा ह्याच कारणामुळें, "आम्ही मोठे भाग्यवान्" असेंही तुझ्या भक्तांनी आम्हांविषयी उद्‍गार काढलेले असोत, परंतु आमचा एकच निश्चय कीं हें अघटित कृत्य करणार्‍या इंद्रा, आम्ही तुझ्या सौख्यमय आश्रयाखालीच राहणार. ॥ ६ ॥


एमा॒शुमा॒शवे॑ भर यज्ञ॒श्रियं॑ नृ॒माद॑नम् । प॒त॒यन्म॑न्द॒यत्स॑खम् ॥ ७ ॥
आ ईं आशुं आशवे भर यज्ञऽश्रियं नृऽमादनं पतयत् मन्दयत्ऽसखम् ॥ ७ ॥
सर्वव्यापी इंद्रास सोमरस अर्पण करा, हें सोमरसपान सर्व गात्रांच्या ठिकाणी नवा जोम उत्पन्न करणारें आहेत. सोमरसामुळेंच यज्ञाला शोभा आहे. शूरांचा खरा संतोष यांतच आहे. यामुळेंच शरीरांत चैतन्य उत्पन्न होतें, आणि आमच्या परमप्रिय इंद्रास आनंदाचें स्फुरण हाच चढवितो. ॥ ७ ॥


अ॒स्य पी॒त्वा श॑तक्रतो घ॒नो वृ॒त्राणा॑मभवः । प्रावो॒ वाजे॑षु वा॒जिन॑म् ॥ ८ ॥
अस्य पीत्वा शतक्रतो इति शतऽक्रतो घनः वृत्राणां अभवः । प्र आवः वाजेषु वाजिनम् ॥ ८ ॥
याच सोमरसांचे पान करून, हे पराक्रमी इंद्रा, तूं शत्रूंचा उच्छेदक झालास आणि शूरत्वाच्या कृत्यांत तूं शूरांचे रक्षण केलेंस. ॥ ८ ॥


तं त्वा॒ वाजे॑षु वा॒जिनं॑ वा॒जया॑मः शतक्रतो । धना॑नामिन्द्रसा॒तये॑ ॥ ९ ॥
तं त्वा वाजेषु वाजिनं वाजयामः शतक्रतो इति शतऽक्रतो । धनानां इन्द्र सातये ॥ ९ ॥
हे परक्रमी इंद्रा, शौर्याच्या कृत्यांत तूं आपला पराक्रम गाजवतोस. वैभवप्राप्तीच्या इच्छेनें आम्ही तुझ्या यशाचे वर्णन करीत आहोंत. ॥ ९ ॥


यो रा॒योऽ॒वनि॑र्म॒हान्सु॑पा॒रः सु॑न्व॒तः सखा॑ । तस्मा॒ इन्द्रा॑य गायत ॥ १० ॥
यः रायः अवनिः महान् सुऽपारः सुन्वतः सखा । तस्मै इन्द्राय गायत ॥ १० ॥
जो संपत्तीचा स्वामी आहे, ज्याचे महत्त्व अपार आहे, जो सर्वांस सुलभरीतीनें संकटांतून पार नेतो आणि सोमरस अर्पण करणार्‍या याजकास जो परम सखा आहे त्या इंद्राचें यशोगायन करा. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ५ ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - गायत्री


आ त्वेता॒ नि षी॑द॒तेन्द्र॑म॒भि प्र गा॑यत । सखा॑य॒ स्तोम॑वाहसः ॥ १ ॥
आ तु आ इत नि षीदत इंद्रं अभि प्र गायत । सखायः स्तोमऽवाहसः ॥ १ ॥
अहो स्तोत्रें गाण्यांत कुशल असणार्‍या मित्रांनो, या, बसा, आणि इंद्राला उद्देशून गायन करा. ॥ १ ॥


पु॒रू॒तमं॑ पुरू॒णामीशा॑नं॒ वार्या॑णाम् । इन्द्रं॒ सोमे॒ सचा॑ सु॒ते ॥ २ ॥
पुरूऽतमं पुरूणां ईशानं वार्याणां । इन्द्रं सोमे सचा सुते ॥ २ ॥
सोमरस पिळून तयार केल्यानंतर तुम्हीं इंद्रास पाचारण करा. हा इंद्र श्रेष्ठांचा शिरोमणी व स्पृहणीय संपत्तीचा स्वामी आहे. ॥ २ ॥


स घा॑ नो॒ योग॒ आ भु॑व॒त्स रा॒ये स पुरं॑ध्याम् । गम॒द्वाजे॑भि॒रा स नः॑ ॥ ३ ॥
सः घ नः योगे आ भुवत् सः राये सः पुरंध्यां । गमत् वाजेभिः आ सः नः ॥ ३ ॥
हा आम्हांस वैभव प्राप्त करवून देवो. आमच्या उत्कृष्टा लाभांचे आणि सद्‍भावनांचे ठिकाणीं हाच वास करो. हा आपल्या सर्व सामर्थ्यासह आमचेकडे येवो. ॥ ३ ॥


यस्य॑ सं॒स्थे न वृ॒ण्वते॒ हरी॑ स॒मत्सु॒ शत्र॑वः । तस्मा॒ इन्द्रा॑य गायत ॥ ४ ॥
यस्य संऽस्थे न वृण्वते हरी इति समत्ऽसु शत्रवः । तस्मै इन्द्राय गायत ॥ ४ ॥
ज्याचे अश्व सज्ज होऊन उभे राहिले असतां त्यांचेपुढें सुद्धां शत्रूंना युद्धांत तोंड देववत नाहीं, त्या इंद्राचा महिमा तुम्ही गा. ॥ ४ ॥


सु॒त॒पान्वे॑ सु॒ता इ॒मे शुच॑यो यन्ति वी॒तये॑ । सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ॥ ५ ॥
सुतऽपाव्ने सुताः इमे शुचयः यन्ति वीतये । सोमासः दधिऽआशिरः ॥ ५ ॥
नुकतेंच पिळून ठेविलेले, पवित्र व दहीं मिश्रित केलेले हे सोमरस, इन्द्रानें आपली रुचि घ्यावी या इच्छेने सोमप्रिय इंद्राकडे निघाले आहेत. ॥ ५ ॥


त्वं सु॒तस्य॑ पी॒तये॑ स॒द्यो वृ॒द्धो अ॑जायथाः । इन्द्र॒ ज्यैष्ठ्या॑य सुक्रतो ॥ ६ ॥
त्वं सुतस्य पीतये सद्यः वृद्धः अजायथाः । इन्द्र ज्यैष्ठ्याय सुक्रतो इति सुऽक्रतो ॥ ६ ॥
पराक्रमाने शोभणार्‍या इंद्रा, जगतावर वर्चस्व चालवावें ह्या इच्छेनें तूं सोमपान करण्यासाठीं एकदम प्रगल्भ रूपानेंच प्रकट झालास. ॥ ६ ॥


आ त्वा॑ विशन्त्वा॒शवः॒ सोमा॑स इन्द्र गिर्वणः । शं ते॑ सन्तु॒ प्रचे॑तसे ॥ ७ ॥
आ त्वा विशन्तु आशवः सोमासः इन्द्र गिर्वणः । शं ते सन्तु प्रऽचेतसे ॥ ७ ॥
स्तुतीनें उल्हास पावणार्‍या हे इंद्रा, सर्व गात्रांस प्रमोद देणारे सोमरस तुझ्या मुखांत प्रवेश करोत आणि तुला आनंद देवोत. तूं ज्ञानमंडित आहेस. ॥ ७ ॥


त्वां स्तोमा॑ अवीवृध॒न्त्वामु॒क्था श॑तक्रतो । त्वां व॑र्धन्तु नो॒ गिरः॑ ॥ ८ ॥
त्वां स्तोमाः अवीवृधन् त्वां उक्था शतक्रतो इति शतऽक्रतो । त्वां वर्धन्तु नः गिरः ॥ ८ ॥
हे प्रज्ञाशालि इंद्रा, स्तुतींनीं तुझें महत्त्व वृद्धिंगत झालें स्तवनांनी तुझा महिमा सर्वत्र विदित झाला. आमचीं स्तोत्रेंही तुझी महती वाढवोत. ॥ ८ ॥


अक्षि॑तोतिः सनेदि॒मं वाज॒मिन्द्रः॑ सह॒स्रिण॑म् । यस्मि॒न्विश्वा॑नि॒ पौंस्या॑ ॥ ९ ॥
अक्षितऽऊतिः सनेत् इमं वाजं इन्द्रः सहस्रिणम् । यस्मिन् विश्वानि पौंस्या ॥ ९ ॥
इंद्रानें रक्षण करण्याचे मनांत आणले म्हणजे त्यात खंड पडणें अशक्य आहे. ह्यासाठीं तो आम्हांस असें एकच सामर्थ्य देवो कीं ज्याची बरोबरी दुसर्‍या हजारों सामर्थ्यांनाही न येता त्यायोगें यच्चावत् पराक्रमांची कृत्यें सहज होऊं शकतील. ॥ ९ ॥


मा नो॒ मर्ता॑ अ॒भि द्रु॑हन्त॒नूना॑मिन्द्र गिर्वणः । ईशा॑नो यवया व॒धम् ॥ १० ॥
मा नः मर्ताः अभि द्रुहन् तनूनां इन्द्र गिर्वणः । ईशानः यवय वधम् ॥ १० ॥
हे सर्वस्तुत इंद्रा, कोणीही मर्त्यजन आमच्या देहांस उपद्रव देण्यास समर्थ न होवो. तुझी सत्ता सर्वत्र असल्यामुळें आमचा कोणाकडूनही अकस्मात् रीतीनें वध न होईल असें कर. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ६ ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - १ ते ३ इंद्र; ४ ते ६, ८, ९ मरुत्; ५ ते ७ इंद्रमरुत्; १० - इंद्र : छंद - गायत्री


यु॒ञ्जन्ति॑ ब्र॒ध्नम॑रु॒षं चर॑न्तं॒ परि॑ त॒स्थुषः॑ । रोच॑न्ते रोच॒ना दि॒वि ॥ १ ॥
युञ्जन्ति ब्रध्नं अरुषं चरन्तं परि तस्थुषः । रोचन्ते रोचना दिवि ॥ १ ॥
हे तेजोगोल आकाशामध्यें चमकत आहेत आणि अनुचरांप्रमाणें ते ह्या मध्यवर्ती देवतेची निघण्याची तयारी करीत आहेत. हें मध्यवर्ती तेज सामर्थ्यवान्, उज्ज्वल आणि सर्वसंचारी आहे. ॥ १ ॥


यु॒ञ्जन्त्य॑स्य॒ काम्या॒ हरी॒ विप॑क्षसा॒ रथे॑ । शोणा॑ धृ॒ष्णू नृ॒वाह॑सा ॥ २ ॥
युञ्जन्ति अस्य काम्या हरी इति विऽपक्षसा रथे । शोणा धृष्णू इति नृऽवाहसा ॥ २ ॥
ते परिचारक त्याच्या रथाच्या दोहो बाजूंस अश्व जोडीत आहेत. हे अश्व इतके सुंदर आहेत कीं कोणाच्याही मनामध्यें त्यांचे विषयीं अभिलाषा उत्पन्न होईल. त्यांचा वर्ण किंचित् तांबूस असून ह्या पराक्रमी देवास वाहून नेत असतांना त्यांच्या अंगांतील तेजस्वीपणा दृगोचर होतो. ॥ २ ॥


के॒तुं कृ॒ण्वन्न॑के॒तवे॒ पेशो॑ मर्या अपे॒शसे॑ । समु॒षद्‍भि॑रजायथाः ॥ ३ ॥
केतुं कृण्वन् अकेतवे पेशः मर्या अपेशसे । सं उषद्ऽभिः अजायथाः ॥ ३ ॥
अहाहा ! अचेतनास चैतन्य देऊन आणि जें आकारहीन होते त्याला साकार करून तूं उषेसहवर्तमान जन्म घेतलास. ॥ ३ ॥


आदह॑ स्व॒धामनु॒ पुन॑र्गर्भ॒त्वमे॑रि॒रे । दधा॑ना॒ नाम॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ४ ॥
आत् अह स्वधां अनु पुनः गर्भऽत्वं आऽईरिरे । दधानाः नाम यज्ञियम् ॥ ४ ॥
यज्ञकर्मांत परिचित असलेले नांव धारण करून ते सृष्ट्यनुक्रमानें पुनः गर्भवास पावले. ॥ ४ ॥


वी॒ळु चि॑दारुज॒त्‍नुभि॒र्गुहा॑ चिदिन्द्र॒ वह्नि॑भिः । अवि॑न्द उ॒स्रिया॒ अनु॑ ॥ ५ ॥
वीळु चित् आरुजत्‍नुऽभिः गुहा चित् इन्द्र वह्निऽभिः । अविन्दः उस्रियाः अनु ॥ ५ ॥
हे इंद्रा, दुर्भेद्य पर्वत भेदणार्‍या अशनीच्या योगाने गुहा फोडून टाकून प्रभारूपी अशा धेनूंचा तूं तपास लावलास. ॥ ५ ॥


दे॒व॒यन्तो॒ यथा॑ म॒तिमच्छा॑ वि॒दद्व॑सुं॒ गिरः॑ । म॒हाम॑नूषत श्रु॒तम् ॥ ६ ॥
देवऽयन्तः यथा मतिं अच्छ विदत्ऽवसुं गिरः । महां अनूषत श्रुतम् ॥ ६ ॥
अभीष्ट वैभव देणार्‍या या इंद्रास उद्देशून भक्तांनी स्तोत्रें केली. त्याचे महत्त्व व यश हीं दोन्ही विश्रुत आहेत. ॥ ६ ॥


इन्द्रे॑ण॒ सं हि दृक्ष॑से सञ्जग्मा॒नो अबि॑भ्युषा । म॒न्दू स॑मा॒नव॑र्चसा ॥ ७ ॥
इन्द्रेण सं हि दृक्षसे संऽजग्मानः अबिभ्युषा । मन्दू इति समानऽवर्चसा ॥ ७ ॥
ज्याचे हृदयास भितीने कधींही स्पर्श केला नाही अशा इंद्राबरोबर तूं संचार करतांना दिसतोस, त्यावेळीं दोघांचेही तेज समान दिसतें व तुम्ही दोघेही आनंदित दिसतां. ॥ ७ ॥


अ॒न॒व॒द्यैर॒भिद्यु॑भिर्म॒खः सह॑स्वदर्चति । ग॒णैरिन्द्र॑स्य॒ काम्यैः॑ ॥ ८ ॥
अनवद्यैः अभिद्युऽभिः मखः सहस्वत् अर्चति । गणैः इन्द्रस्य काम्यैः ॥ ८ ॥
इंद्राचे अनुचर सर्वांना प्रिय आणि अतिशय तेजस्वी असून त्यांचे ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अवगुण मुद्दाम पाहूं गेल्यासही सांपडणार नाहीं. त्यांनी विभूषित असलेल्या ह्या देवाप्रित्यर्थ आम्च्या यज्ञांत उच्च घोषाने अर्चन चाललेले आहे. ॥ ८ ॥


अतः॑ परिज्म॒न्ना ग॑हि दि॒वो वा॑ रोच॒नादधि॑ । सम॑स्मिन्नृञ्जते॒ गिरः॑ ॥ ९ ॥
अतः परिऽज्मन् आ गहि दिवः वा रोचनात् अधि । सं अस्मिन् ऋञ्जते गिरः ॥ ९ ॥
यासाठीं हे सर्वव्यापि देवा, द्युलोकामधून अथवा प्रकाशमान् अंतरिक्षांतून तूं इकडे ये. या यज्ञांत हा मी तुझा दास तुझीं स्तोत्रें गात गात आपली वाणी अलंकृत करीत आहे. ॥ ९ ॥


इ॒तो वा॑ सा॒तिमीम॑हे दि॒वो वा॒ पार्थि॑वा॒दधि॑ । इन्द्रं॑ म॒हो वा॒ रज॑सः ॥ १० ॥
इतः वा सातिं ईमहे दिवः वा पार्थिवात् अधि । इंद्रं महः वा रजसः ॥ १० ॥
आम्हास इंद्र दर्शन हेंच अभीष्ट आहे. तें दिव्यलोकांतून अथवा भूलोकांतून किंवा महान् अंतरिक्षांतून, कोठून तरी आम्हांस प्राप्त होवो. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ७ ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - गायत्री


इन्द्र॒मिद्गा॒थिनो॑ बृ॒हदिन्द्र॑म॒र्केभि॑र॒र्किणः॑ । इन्द्रं॒ वाणी॑रनूषत ॥ १ ॥
इंद्रं इत् गाथिनः बृहत् इंद्रं अर्केभिः अर्किणः । इंद्रं वाणीः अनूषत ॥ १ ॥
गाथा गाणार्‍या ऋषींनी अनेक गाथांनी इंद्राचीच स्तुती केली. अर्कपाठक विद्वानांनीही इंद्राचें अर्चन केले. अशा रीतीने अनेक स्तोत्रांच्या द्वारें इंद्राचे स्तवन झालेले आहे. ॥ १ ॥


इन्द्र॒ इद्धर्योः॒ सचा॒ सम्मि॑श्ल॒ आ व॑चो॒युजा॑ । इन्द्रो॑ व॒ज्री हि॑र॒ण्ययः॑ ॥ २ ॥
इंद्रः इत् हर्योः सचा सऽमिश्लः आ वचःऽयुजा । इंद्रः वज्री हिरण्ययः ॥ २ ॥
पीतवर्ण अश्वांचा स्वामी फक्त इंद्रच आहे. हाच सर्वांस आज्ञा करतो. हा वज्रधारी इंद्र सर्व अविनाशी संपत्तीचा प्रभु आहे. ॥ २ ॥


इन्द्रो॑ दी॒र्घाय॒ चक्ष॑स॒ आसूर्यं॑ रोहयद्दि॒वि । वि गोभि॒रद्रि॑मैरयत् ॥ ३ ॥
इंद्रः दीर्घाय चक्षसे आ सूर्यं रोहयत् दिवि । वि गोभिः अद्रिं ऐरयत् ॥ ३ ॥
सर्वांना पूर्णपणे दृष्टीस पडेल अशा रीतीनें इंद्रानें सूर्याची आकाशांत स्थापना केली. आपल्या अशनीच्या योगानें पर्वतप्राय मेघांस त्यानें हलवून सोडलें. ॥ ३ ॥


इन्द्र॒ वाजे॑षु नोऽव स॒हस्र॑प्रधनेषु च । उ॒ग्र उ॒ग्राभि॑रू॒तिभिः॑ ॥ ४ ॥
इंद्र वाजेषु नः अव सहस्रऽप्रधनेषु च । उग्रः उग्राभिः ऊतिऽभिः ॥ ४ ॥
हे इंद्रा, तूं उग्रस्वरूप आहेस तेव्हां आपल्या उग्र साधनांनी जेथें साहसांची कृत्यें चालली आहेत आणि हजारों वीर जेथे झुंजत आहेत अशा ठिकाणीं आमचे संरक्षण कर. ॥ ४ ॥


इन्द्रं॑ व॒यं म॑हाध॒न इन्द्र॒मर्भे॑ हवामहे । युज॑ं वृ॒त्रेषु॑ व॒ज्रिण॑म् ॥ ५ ॥
इंद्रं वयं महाऽधने इंद्रं अर्भे हवामहे । युजं वृत्रेषु वज्रिणम् ॥ ५ ॥
शत्रु प्राप्त झाले असतां आम्ही इंद्रास हांक मरतो. मोठमोठ्या युद्धांत व लहानसहान लढायांतही आम्ही इंद्राचा धांवा करतो. कारण तोच वज्रधारी व आमचा खरा साह्यकर्ता आहे. ॥ ५ ॥


स नो॑ वृषन्न॒मुं च॒रुं सत्रा॑दाव॒न्नपा॑ वृधि । अ॒स्मभ्य॒मप्र॑तिष्कुतः ॥ ६ ॥
सः नः वृषन् अमुं चरुं सत्राऽदावन् अप वृधि । अस्मभ्यं अप्रतिऽस्कुतः ॥ ६ ॥
वृष्टीच्या रूपाने सदोदित औदार्य प्रकट करणार्‍या हे इंद्रदेवा, तूं यत्‍किंचित् सुद्धां अनमान न करतां मेघपटल दूर कर. ॥ ६ ॥


तु॒ञ्जेतु॑ञ्जे॒ य उत्त॑रे॒ स्तोमा॒ इन्द्र॑स्य व॒ज्रिणः॑ । न विं॑धे अस्य सुष्टु॒तिम् ॥ ७ ॥
तुंजेतुंजे य उत्ऽतरे स्तोमाः इंद्रस्य वज्रिणः । न विंधे अस्य सुऽस्तुतिम् ॥ ७ ॥
इंद्राचे पराक्रम वर्णन करणार्‍या ज्या उत्तम उत्तम प्रार्थना आहेत, त्यांतसुद्धां हे इंद्रा तुझ्या योग्यतेस साजेल अशी स्तुति मला सांपडत नाहीं. ॥ ७ ॥


वृषा॑ यू॒थेव॒ वंस॑गः कृ॒ष्टीरि॑य॒र्त्योज॑सा । ईशा॑नो॒ अप्र॑तिष्कुतः ॥ ८ ॥
वृषा यूथाऽइव वंसगः कृष्टीः इयर्ति ओजसा । ईशानः अप्रतिऽस्कुतः ॥ ८ ॥
ज्याची गति डौलदार आहे, असा एखादा महावृषभ ज्याप्रमाणें वृषभ समुदायास मार्गदर्शक होतो त्याप्रमाणें हा जगताचा स्वामी इंद्र सर्व मानवांचा संतोष ठेवून त्यांस आपल्या सामर्थ्यानें पुढें जावयास प्रवृत्त करतो. ॥ ८ ॥


य एक॑श्चर्षणी॒नां वसू॑नामिर॒ज्यति॑ । इन्द्रः॒ पञ्च॑ क्षिती॒नाम् ॥ ९ ॥
यः एकः चर्षणीनां वसूनां इरज्यति । इंद्रः पञ्च क्षितीनाम् ॥ ९ ॥
सर्व जगत्, सर्व संपत्ती आणि पांचही लोक, ह्यांवर इंद्राचें एकट्याचेंच स्वामित्व आहे. ॥ ९ ॥


इन्द्रं॑ वो वि॒श्वत॒स्परि॒ हवा॑महे॒ जने॑भ्यः । अ॒स्माक॑मस्तु॒ केव॑लः ॥ १० ॥
इंद्रं वः विश्वतः परि हवामहे जनेभ्यः । अस्माकं अस्तु केवलः ॥ १० ॥
जनतेच्या हिताकरितां आम्ही प्रत्येक ठिकाणाहून तुमचा जो प्रिय इंद्र त्या पाचारण करतो. तो इंद्र केवळ आमचाच पक्षपाती असो. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ८ ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - गायत्री


एन्द्र॑ सान॒सिं र॒यिं स॒जित्वा॑नं सदा॒सहं॑ । वर्षि॑ष्ठमू॒तये॑ भर ॥ १ ॥
आ इंद्र सानसिं रयिं सऽजित्वानं सदाऽसहं । वर्षिष्ठं ऊतये भर ॥ १ ॥
हे इंद्रा, आमच्या रक्षणाकरितां आम्हांस असें वैभव दे की ज्यायोगें मनास समाधान वाटेल, ज्याच्यायोगाने आम्हांस वर्चस्व प्राप्त होईल, ज्याचा कधीही नाश होणार नाही, व जें सर्व लोकांत उत्कृष्ट ठरेल. ॥ १ ॥


नि येन॑ मुष्टिह॒त्यया॒ नि वृ॒त्रा रु॒णधा॑महै । त्वोता॑सो न्यर्व॑ता ॥ २ ॥
नि येन मुष्टिऽहत्यया नि वृत्रा रुणधामहै । त्वाऽऊतासः निऽअर्वता ॥ २ ॥
ते वैभव असे असावे कीं, तूं अश्वारूढ आमचे संरक्षण करूं लागलास की नुसत्या मुष्टिप्रहारानें आम्हांस पातकी शत्रूंचा नाश करता यावा. ॥ २ ॥


इन्द्र॒ त्वोता॑स॒ आ व॒यं वज्रं॑ घ॒ना द॑दीमहि । जये॑म॒ सं यु॒धि स्पृधः॑ ॥ ३ ॥
इंद्र त्वाऽऊतासः आ वयं वज्रं घना ददीमहि । जयेम सं युधि स्पृधः ॥ ३ ॥
तू रक्षण करीत असतां आम्हीं हातांत घण घेतला तरी त्याचें वज्र बनेल, आणि आम्हांस समरांगणामध्यें शत्रूस जिंकता येईल. ॥ ३ ॥


व॒यं शूरे॑भि॒रस्तृ॑भि॒रिन्द्र॒ त्वया॑ यु॒जा व॒यं । सा॒स॒ह्याम॑ पृतन्य॒तः ॥ ४ ॥
वयं शूरेभिः अस्तृभिः इंद्र त्वया युजा वयं । ससह्याम पृतन्यतः ॥ ४ ॥
तुझे साह्य असल्यावर शत्रू कितीही संग्रामनिपुण असले तथापि शूर अस्त्रवेत्त्यांच्या मदतीने आम्ही त्यांना जेरीस आणूं. ॥ ४ ॥


म॒हाँ इन्द्रः॑ प॒रश्च॒ नु म॑हि॒त्वम् अ॑स्तु व॒ज्रिणे॑ । द्यौर्न प्र॑थि॒ना शवः॑ ॥ ५ ॥
महान् इंद्रः परः च नु मऽहित्वं अस्तु वज्रिणे । द्यौः न प्रथिना शवः ॥ ५ ॥
हा वज्रधारी इंद्र श्रेष्ठ आहे. किंबहुना त्याहूनही अधिक आहे. याचे महत्त्व असेच चिरकालिक असो. त्याचे बल आकाशासारखे अनंत आहे. ॥ ५ ॥


स॒मो॒हे वा॒ य आश॑त॒ नर॑स्तो॒कस्य॒ सनि॑तौ । विप्रा॑सो वा धिया॒यवः॑ ॥ ६ ॥
संऽओहे वा ये आशत नरः तोकस्य सनितौ । विप्रासः वा धियाऽयवः ॥ ६ ॥
शूर पुरुष रणांगणांत जे यश मिळवितात, अपत्यलाभाने मनुष्यांस जे सुख प्राप्त होते, अथवा एकाग्रबुद्धीने स्तवन करणारे विद्वान लोक जे कांही संपादन करतात, ॥ ६ ॥


यः कु॒क्षिः सो॑म॒पात॑मः समु॒द्र इ॑व॒ पिन्व॑ते । उ॒र्वीरापो॒ न का॒कुदः॑ ॥ ७ ॥
यः कुक्षिः सोमऽपातमः समुद्रःऽइव पिन्वते । उर्वीः आपः न काकुदः ॥ ७ ॥
किंवा सोमरसाचे प्रेमाने पान करून भक्तांचे जे उदर सागराप्रमाणे तुडुंब भरलेले दिसतें, अथवा ज्या कंठामधून एखाद्या नदीप्रमाणे सोमरसाचा प्रवाह चाललेला असतो, ॥ ७ ॥


ए॒वा ह्य् अस्य सू॒नृता॑ विर॒प्शी गोम॑ती म॒ही । प॒क्वा शाखा॒ न दा॒शुषे॑ ॥ ८ ॥
एव आ हि अस्य सूनृता विऽरप्शी गोऽमती मही । पक्वा शाखा न दाशुषे ॥ ८ ॥
हा सर्व त्या इंद्राच्या आशीर्वचनांचाच प्रभाव होय. ती तुझी उत्तम आशीर्वचने पक्वफलयुक्त अशा वृक्ष शाखेप्रमाणे तुझ्या दासास फलद्रूप होतात व त्यास गोधनादि संपत्ति व इतर अनेक सुखें प्राप्त करून देतात. ॥ ८ ॥


ए॒वा हि ते॒ विभू॑तय ऊ॒तय॑ इन्द्र॒ माव॑ते । स॒द्यश्चि॒त् सन्ति॑ दा॒शुषे॑ ॥ ९ ॥
एव हि ते विऽभूतयः ऊतय इंद्र माऽवते । सद्यः चित् संति दाशुषे ॥ ९ ॥
हे इंद्रा, ती तुझी सामर्थ्यें व भक्तांचे रक्षण करण्याचे मार्ग माझ्यासारख्या दासाला नेहमीच अनुकुल आहेत. ॥ ९ ॥


ए॒वा ह्य् अस्य॒ काम्या॒ स्तोम॑ उ॒क्थं च॒ शंस्या॑ । इन्द्रा॑य॒ सोम॑पीतये ॥ १० ॥
एव हि अस्य काम्या स्तोमः उक्थं च शंस्या । इंद्राय सोमऽपीतये ॥ १० ॥
अशी ही इंद्राची स्पृहणीय व प्रशंसनीय स्तुतिस्तोत्रें सोमपानाला इंद्रास प्रवृत्त करोत. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९ ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - गायत्री


इन्द्रेहि॒ मत्स्यन्ध॑सो॒ विश्वे॑भिः सोम॒पर्व॑भिः । म॒हाँ अ॑भि॒ष्टिरोज॑सा ॥ १ ॥
इंद्र आ इहि मत्सि अंधसः विश्वेभिः सोमपर्वऽभिः । महान् अभिष्टिः ओजसा ॥ १ ॥
हे इंद्रा ये, आणि जेव्हां जेव्हां आमचे हातून सोमयाग होतील तेव्हां तेव्हां आमचे हवि गोड मानून घे. आपल्या सामर्थ्याने तूंच आमचा संरक्षणकर्ता झाला आहेस. ॥ १ ॥


एमे॑नं सृजता सु॒ते म॒न्दिमिन्द्रा॑य म॒न्दिने॑ । चक्रिं॒ विश्वा॑नि॒ चक्र॑ये ॥ २ ॥
आ ईं एनं सृजत सुते मंदिं इंद्राय मंदिने । चक्रिं विश्वानि चक्रये ॥ २ ॥
या आनंदी इंद्राला हा आनंददायक सोमरस तयार होतांच अर्पण करा; ह्या विश्वकर्त्याला हा आनंदकारक सोमरस द्या. ॥ २ ॥


मत्स्वा॑ सुशिप्र म॒न्दिभि॒ स्तोमे॑भिर्विश्वचर्षणे । सचै॒षु सव॑ने॒ष्वा ॥ ३ ॥
मत्स्व सुऽशिप्र मंदिऽभि स्तोमेभिः विश्वऽचर्षणे । सचा एषु सवनेषु आ ॥ ३ ॥
हे दिव्यमुकुट धारण करणार्‍या इंद्रा, हे सर्वद्रष्ट्या देवा, या प्रमोददायक स्तवनांनी तूं आनंदित हो, आणि आम्ही हवि अर्पण करीत असतांना तेथे तुझे वास्तव्य असूं दे. ॥ ३ ॥


असृ॑ग्रमिन्द्र ते॒ गिरः॒ प्रति॒ त्वामुद॑हासत । अजो॑षा वृष॒भं पति॑म् ॥ ४ ॥
असृग्रं इंद्र ते गिरः प्रति त्वां उत् अहासत । अजोषाः वृषभं पतिम् ॥ ४ ॥
हे इंद्रा, तुला उद्देशून मी स्तवनोक्तींचा उच्चार केला, परंतु तत्पूर्वींच त्या अधीर मनाने तुजकडे चालत्या झाल्या. तूं त्यांचा नाथ व त्यांच्या कामना परिपूर्ण करणारा स्वामी आहेस. ॥ ४ ॥


सं चो॑दय चि॒त्रम॒र्वाग्राध॑ इन्द्र॒ वरे॑ण्यं । अस॒दित्ते॑ वि॒भु प्र॒भु ॥ ५ ॥
सं चोदय चित्रं अर्वाक् राधः इंद्र वरेण्यं । असत् इत् ते विऽभु प्रऽभु ॥ ५ ॥
हे इंद्रा, अप्रतिम आणि स्पृहणीय असे धन आम्हांला पाठवून दे. खरोखर तुझे जवळ अत्यंत उत्कृष्ट आणि विपुल धन आहे. ॥ ५ ॥


अ॒स्मान्सु तत्र॑ चोद॒येन्द्र॑ रा॒ये रभ॑स्वतः । तुवि॑द्युम्न॒ यश॑स्वतः ॥ ६ ॥
अस्मान् सु तत्र चोदय इन्द्र राये रभस्वतः । तुविऽद्युम्न यशस्वतः ॥ ६ ॥
हे सहस्रकांति इंद्रा, आम्हांस वैभव प्राप्त व्हावे म्हणून धनार्जनाकरितां आम्हांस प्रवृत्त कर; त्याबद्दल आम्हांकडून मनःपूर्वक प्रयत्‍न होऊं दे, व त्यांत आम्हांस यश येईल असे कर. ॥ ६ ॥


सं गोम॑दिन्द्र॒ वाज॑वद॒स्मे पृ॒थु श्रवो॑ बृ॒हत् । वि॒श्वायु॑र्धे॒ह्यक्षि॑तम् ॥ ७ ॥
सं गोमत् इंद्र वाजऽवत् अस्मे पृथु श्रवः बृहत् । विश्वऽआयुः धेहि अक्षितम् ॥ ७ ॥
हे इंद्रा, गोधनादि वैभव आमचेजवळ पुष्कळच आहे, आमचे सामर्थ्य मोठे आहे; आम्ही दीर्घायुषी आहोंत अशी आमची कीर्ति सर्वत्र प्रसार पावो व तींत कधीही खंड न पडो. ॥ ७ ॥


अ॒स्मे धे॑हि॒ श्रवो॑ बृ॒हद्‍द्यु॒म्नं स॑हस्र॒सात॑मं । इंद्र॒ ता र॒थिनी॒रिषः॑ ॥ ८ ॥
अस्मे धेहि श्रवः बृहत् द्युम्नं सहस्रऽसातमं । इंद्र ताः रथिनीः इषः ॥ ८ ॥
हे इंद्रा आमची कीर्ति पुष्कळ वाढीव. आम्हांस अपार वैभव दे आणि आम्हांस रथ प्राप्त होतील अशी कृपा आम्हांवर कर. ॥ ८ ॥


वसो॒रिन्द्रं॒ वसु॑पतिं गी॒र्भिर्गृ॒णन्त॑ ऋ॒ग्मियं॑ । होम॒ गन्ता॑रमू॒तये॑ ॥ ९ ॥
वसोः इंद्रं वसुऽपतिं गीःऽभिः गृणन्तः ऋग्मियं । होम गंतारं ऊतये ॥ ९ ॥
अनेक प्रकारच्या स्तुतींनी आळवून आपण आपल्या संरक्षणार्थ इंद्रास पाचारण करूं या. हा वैभवाचा राजा आहे. हा छंदोबद्ध कवितांनी वर्णन करण्यासारखा आहे. त्यास कोठेंही हांक मारण्याचा अवकाश, कीं तो तेथे उभा आहेच. ॥ ९ ॥


सु॒तेसु॑ते॒ न्योकसे बृ॒हद्बृ॑ह॒त एद॒रिः । इन्द्रा॑य शू॒षम॑र्चति ॥ १० ॥
सुतेऽसुते निऽओकसे बृहत् बृहत आ इत् अरिः । इंद्राय शूषं अर्चति ॥ १० ॥
प्रत्येक सोमयागाच्या ठिकाणीं वास्तव्य करणार्‍या या श्रेष्ठ इंद्राप्रित्यर्थ हा त्याचा भक्त, उच्चस्वराने व मनाची तृप्ति होईपर्यंत स्तोत्रें अर्पण करीत आहे. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १० ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - अनुष्टुप्


गाय॑न्ति त्वा गाय॒त्रिणोऽ॑र्चन्त्य॒र्कम॒र्किणः॑ ।
ब्र॒ह्माण॑स्त्वा शतक्रत॒ उद्वं॒शमि॑व येमिरे ॥ १ ॥
गायन्ति त्वा गायत्रिणः अर्चन्ति अर्कं अर्किणः ।
ब्रह्माणः त्वा शतक्रतो इति शतऽक्रतो उत् वंशंऽइव येमिरे ॥ १ ॥
गायत्रीवृत्त म्हणणारे उपासक तुझे यश गातात. आणि अर्कनामक स्तोत्रें रचणारे तुझी अर्कांनी अर्चना करतात. हे बलशाली इंद्रा, ज्याप्रमाण ध्वजाची यष्टि उंच उभी करावी त्याप्रमाणे विद्वान लोकांनी तुला अतिशय उच्चत्व दिलेले आहे. ॥ १ ॥


यत्सानोः॒ सानु॒मारु॑ह॒द्भूर्यस्प॑ष्ट॒ कर्त्व॑म् ।
तदिन्द्रो॒ अर्थं॑ चेतति यू॒थेन॑ वृ॒ष्णिरे॑जति ॥ २ ॥
यत् सानोः सानुं आ अरुहत् भूरि अस्पष्ट कर्त्वं ।
तत् इंद्रः अर्थं चेतति यूथेन वृष्णिः एजति ॥ २ ॥
जेव्हां इंद्राच्या भक्ताने एका पर्वत शिखरावरून दुसर्‍या पर्वत शिखरावर याप्रमाणे आरोहण करून इंद्राचे अगाध कर्तृत्व अवलोकन केलें, तेव्हां पर्जन्याधिपति इंद्रही त्याचे मनांतील भाव समजला, आणि आपला सर्व लवाजमा घेऊन येण्यास तो सिद्ध झाला. ॥ २ ॥


यु॒क्ष्वा हि के॒शिना॒ हरी॒ वृष॑णा कक्ष्य॒प्रा ।
अथा॑ न इन्द्र सोमपा गि॒रामुप॑श्रुतिं चर ॥ ३ ॥
युक्ष्व हि केशिना हरी वृषणा कक्ष्यऽप्रा ।
अथ नः इंद्र सोमऽपाः गिरां उपऽश्रुतिं चर ॥ ३ ॥
हे इंद्रा, तुझे अश्व वृष्टि उत्पन्न करणारे आहेत. त्यांची आयाळ दीर्घ आहे. आणि त्यांच्या पुष्ट देहामुळे त्यांच्या बंधनरज्जु तंग झालेल्या आहेत. हे सोमप्रिय देवा, त्यांस आपल्या रथास जोड आणि आमची प्रार्थना तुला ऐकूं येईल इतका आमच्या सन्निध ये. ॥ ३ ॥


एहि॒ स्तोमा॑ँ अ॒भि स्व॑रा॒भि गृ॑णी॒ह्या रु॑व ।
ब्रह्म॑ च नो वसो॒ सचेन्द्र॑ य॒ज्ञं च॑ वर्धय ॥ ४ ॥
आ इहि स्तोमान् अभि स्वर अभि गृणीहि आ रुव ।
ब्रह्म च नः वसो इति सचा इंद्र यज्ञं च वर्धय ॥ ४ ॥
हे संपत्तिरूप इंद्रा, इकडे ये, आमच्या प्रार्थनांची वाखाणणी कर, त्यांस चांगले म्हण, त्यांच्याबद्दल प्रशंसापर उद्‍गार काढ. आमच्या प्रार्थनेचा स्वीकार कर, आणि आमचे यज्ञ कामप्रद होतील असे कर. ॥ ४ ॥


उ॒क्थमिन्द्रा॑य॒ शंस्यं॒ वर्ध॑नं पुरुनि॒ष्षिधे॑ ।
श॒क्रो यथा॑ सु॒तेषु॑ णो रा॒रण॑त्स॒ख्येषु॑ च ॥ ५ ॥
उक्थं इंद्राय शंस्यं वर्धनं पुरुनिःऽसिधे ।
शक्रः यथा सुतेषु नः ररणत् सख्येषु च ॥ ५ ॥
सर्वार्थपरिपूरक इंद्रास उद्देशून उत्कृष्ट असे स्तोत्र गाइले पाहिजे. असे केले असतां आमच्या पुत्रपौत्रांवर व आमच्या इष्टमित्रांवर इंद्र आपली कृपादृष्टी ठेवील. ॥ ५ ॥


तमित्स॑खि॒त्व ई॑महे॒ तं रा॒ये तं सु॒वीर्ये॑ ।
स श॒क्र उ॒त नः॑ शक॒दिन्द्रो॒ वसु॒ दय॑मानः ॥ ६ ॥
तं इत् सखिऽत्वे ईमहे तं राये तं सुऽवीर्ये ।
सः शक्र उत नः शकत् इंद्रः वसु दयमानः ॥ ६ ॥
त्याच्याच प्रेमाची वाञ्छा धरून आम्ही त्याच्याजवळ जातो, संपत्तीसाठींही आम्ही त्यासच शरण जातो. आणि आम्हांस शौर्य प्राप्ति होण्याकरितां आम्ही त्याचाच आश्रय करतो. तेव्हां तोच इंद्र आम्हांस वैभव देऊन आमचे अंगी कर्तृत्वशक्ति उत्पन्न करो. ॥ ६ ॥


सु॒वि॒वृतं॑ सुनि॒रज॒मिन्द्र॒ त्वादा॑त॒मिद्यशः॑ ।
गवा॒मप॑ व्र॒जं वृ॑धि कृणु॒ष्व राधो॑ अद्रिवः ॥ ७ ॥
सुऽविवृतं सुनिःअजं इंद्र त्वाऽदातं इत् यशः ।
गवां अप व्रजं वृधि कृणुष्व राधः अद्रिऽवः ॥ ७ ॥
हे इंद्रा, तुझा कृपेमुळें प्राप्त झालेली कीर्तिच सर्वत्र पसरते. तीस फार प्रयासही पडत नाहींत. हे वज्रधर देवा, धेनूंचा समुदाय बंधनांतून मुक्त कर आणि आम्हांवर प्रसाद कर. ॥ ७ ॥


न॒हि त्वा॒ रोद॑सी उ॒भे ऋ॑घा॒यमा॑ण॒मिन्व॑तः ।
जेषः॒ स्वर्वतीर॒पः सं गा अ॒स्मभ्यं॑ धूनुहि ॥ ८ ॥
नहि त्वा रोदसी इति उभे इति ऋघायमाणं इन्वतः ।
जेषः स्वःऽर्वतीः अपः सं गाः अस्मभ्यं धूनुहि ॥ ८ ॥
तुला कोप आला असतां भूलोक व द्युलोक हे दोन्हीही तुला शांत करण्यास धजणार नाहींत. स्वर्गांतील उदकावर स्वामित्व स्थापन करून धेनूंना आमचेकडे पाठवून दे. ॥ ८ ॥


आश्रु॑त्कर्ण श्रु॒धी हवं॒ नू चि॑द्दधिष्व मे॒ गिरः॑ ।
इन्द्र॒ स्तोम॑मि॒मम् मम॑ कृ॒ष्वा यु॒जश्चि॒दन्त॑रम् ॥ ९ ॥
आश्रुत्ऽकर्ण श्रुधी हवं नू चित् दधिष्व मे गिरः ।
इंद्र स्तोमं इमं मम कृष्व युजः चित् अन्तरम् ॥ ९ ॥
हे इंद्रा तुझा कान चहूंकडे आहे. माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या स्तुतींचा सत्वर स्वीकार कर. तूं माझा मित्र आहेस. तुझ्या अंतःकरणांत हे माझे स्तवन सांठवून ठेव. ॥ ९ ॥


वि॒द्मा हि त्वा॒ वृष॑न्तमं॒ वाजे॑षु हवन॒श्रुत॑म् ।
वृष॑न्तमस्य हूमह ऊ॒तिं स॑हस्र॒सात॑माम् ॥ १० ॥
विद्मा हि त्वा वृषन्ऽतमं वाजेषु हवनऽश्रुतं ।
वृषन्ऽतमस्य हूमहे ऊतिं सहस्रऽसातमाम् ॥ १० ॥
कामना परिपूर्ण करणार्‍या देवतांमध्यें तूं श्रेष्ठ आहेस हें आम्हांस माहीत आहे. तूंच प्रार्थना लवकर ऐकतोस हेंही आम्ही जाणतो. पर्जन्यवृष्टीवर तुझा अधिकार चालत असल्याकारणाने तुझ्या कृपेची आम्ही याचना करतो. त्या कृपेची योग्यता इतरांपेक्षां सहस्रपटीने अधिक आहे. ॥ १० ॥


आ तू न॑ इन्द्र कौशिक मन्दसा॒नः सु॒तं पि॑ब ।
नव्य॒मायुः॒ प्र सू ति॑र कृ॒धी स॑हस्र॒सामृषि॑म् ॥ ११ ॥
आ तू नः इंद्र कौशिक मंदसानः सुतं पिब ।
नव्यं आयुः प्र सु तिर कृधी सहस्रसां ऋषिम् ॥ ११ ॥
हे इंद्रा, हे कौशिका, सुप्रसन्न होऊन आमच्या सोमरसाचा सत्वर स्वीकार कर. आमच्या आयुर्मर्यादेंत नवीन भर घाल, आणि मला इतरांहून सहस्रपटीने श्रेष्ठ असें ऋषित्व अर्पण कर. ॥ ११ ॥


परि॑त्वा गिर्वणो॒ गिर॑ इ॒मा भ॑वन्तु वि॒श्वतः॑ ।
वृ॒द्धायु॒मनु॒ वृद्ध॑यो॒ जुष्टा॑ भवन्तु॒ जुष्ट॑यः ॥ १२ ॥
परि त्वा गिर्वणः गिरः इमाः भवंतु विश्वतः ।
वृद्धऽआयुं अनु वृद्धयः जुष्टा भवंतु जुष्टयः ॥ १२ ॥
हे सर्वस्तुत इंद्रा, ही माझी स्तोत्रें सर्वस्वी तुझेंच स्तवन करोत. ही स्वीकार करण्यास योग्य आहेत. तुझ्या हांतून त्यांचा योग्य आदर होवो व तुझ्या अनंत आयुष्याप्रमाणें हीं स्तोत्रेंही चिरकाल टिकोत. ॥ १२ ॥


ॐ तत् सत्


GO TOP