PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त ३१ ते ४०

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३१ (इंद्रः सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - इंद्रः : छंद - गायत्री


कया॑ नश्चि॒त्र आ भु॑वदू॒ती स॒दावृ॑धः॒ सखा॑ । कया॒ शचि॑ष्ठया वृ॒ता ॥ १ ॥

कया नः चित्र आ भुवत् ऊती सदाऽवृधः सखा । कया शचिष्ठया वृता ॥ १ ॥

हा अद्‍भुत तेजस्क, सर्वदा आनंदवर्धन आणि जगन्मित्र भगवान कोणत्या रक्षणसाधनानिशी - कोणत्या अत्यंत बलाढ्य सेनेनिशी - निरंतर आमच्याजवळ राहील ? ॥ १ ॥


कस्त्वा॑ स॒त्यो मदा॑नां॒ मंहि॑ष्ठो मत्स॒दन्ध॑सः । दृ॒ळ्हा चि॑दा॒रुजे॒ वसु॑ ॥ २ ॥

कः त्वा सत्यः मदानां मंहिष्ठः मत्सत् अंधसः । दृळ्हा चित् आऽरुजे वसु ॥ २ ॥

ह्या हर्षकारक सोमामध्ये, ह्या पेयामध्ये, अत्यंत उल्लसित करणारा असा कोणता अस्सल रस भरला आहे कीं त्यामुळें अगदी कडेकोट बंदोबस्तांत ठेवलेल्या अभीष्ट धनाचें भांडार फोडून उघडून देण्याकरितां तुला आनंदाचे भरतें येतें. ॥ २ ॥


अ॒भी षु णः॒ सखी॑नामवि॒ता ज॑रितॄ॒णाम् । श॒तं भ॑वास्यू॒तिभिः॑ ॥ ३ ॥

अभी सु णः सखीनां अविता जरितॄणां । शतं भवासि ऊतिऽभिः ॥ ३ ॥

तूं मित्रांचा आणि स्तोतृजनांचा प्रतिपालक शेकडो संरक्षक साधनांसह आमच्या सन्निध ऐस. ॥ ३ ॥


अ॒भी न॒ आ व॑वृत्स्व च॒क्रं न वृ॒त्तमर्व॑तः । नि॒युद्‍भि॑श्चर्षणी॒नाम् ॥ ४ ॥

अभि नः आ ववृत्स्व चक्रं न वृत्तं अर्वतः । नियुत्ऽभिः चर्षणीनां ॥ ४ ॥

लोकांच्या योजनेमुळें रथाचे चक्र अश्वांच्या मागोमाग सहज फिरते त्याप्रमाणे भक्तांच्या प्रार्थनांच्या योगानें तूं दयाळूपणानें आम्हांकडे वळ. ॥ ४ ॥


प्र॒वता॒ हि क्रतू॑ना॒मा हा॑ प॒देव॒ गच्छ॑सि । अभ॑क्षि॒ सूर्ये॒ सचा॑ ॥ ५ ॥

प्रऽवता हि क्रतूनां आ ह पदाऽइव गच्छसि । अभक्षि सूर्ये सचा ॥ ५ ॥

भूलोकीं येण्याच्या निम्नमार्गानें जेव्हां तूं आपली कर्तृत्वशक्ति दाखवण्याच्या स्थळी प्राप्त होतोस तेव्हां सूर्योदय होतांच तुझी उपासना आमच्या हातून होवो. ॥ ५ ॥


सं यत्त॑ इन्द्र म॒न्यवः॒ सं च॒क्राणि॑ दधन्वि॒रे । अध॒ त्वे अध॒ सूर्ये॑ ॥ ६ ॥

सं यत् ते इंद्र मन्यवः सं चक्राणि दधन्विरे । अध त्वे इति अध सूर्ये ॥ ६ ॥

हे इंद्रा, आमच्या मनोवृत्ति जसजशा तुझ्याकडे जोरानें वाहतात, तसतशी सूर्याच्या रथाची चक्रेंही वेगानें धांवतात, म्हणून तुझ्याकडे आणि सूर्याकडे आमचे लक्ष लागून राहिलें आहे. ॥ ६ ॥


उ॒त स्मा॒ हि त्वामा॒हुरिन्म॒घवा॑नं शचीपते । दाता॑र॒मवि॑दीधयुम् ॥ ७ ॥

उत स्मा हि त्वां आहुः इन् मघऽवानं शचीऽपते । दातारं अविऽदीधयुं ॥ ७ ॥

म्हणूनच हे दिव्य शक्तिच्या नाथा, आढेवेढे न घेतां, विलंब न लावतां, भक्तास अभीष्ट देणारा दाता असे तुला षडैश्वर्यसंपन्नालाच म्हणतात. ॥ ७ ॥


उ॒त स्मा॑ स॒द्य इत्परि॑ शशमा॒नाय॑ सुन्व॒ते । पु॒रू चि॑न्मंहसे॒ वसु॑ ॥ ८ ॥

उत स्म सद्यः इत् परि शशमानाय सुन्वते । पुरु चित् मंहसे वसु ॥ ८ ॥

आणि तुझे संकीर्तन करून सोम अर्पण करणार्‍या भक्ताला इच्छित संपत्ति तूं तात्काळ विपुल देतोस. ॥ ८ ॥


न॒हि ष्मा॑ ते श॒तं च॒न राधो॒ वर॑न्त आ॒मुरः॑ । न च्यौ॒त्नाानि॑ करिष्य॒तः ॥ ९ ॥

नहि स्म ते शतं चन राधः वरंते आऽमुरः । न च्यौत्नामनि करिष्यतः ॥ ९ ॥

कसेही घातकी दुष्ट असले तरी त्यांच्यानें तुझ्या शेंकडो कृपाप्रसादांना प्रतिबंध झाला असें घडलेंच नाही, अथवा भक्तांची अंतःकरणें जागृत करणारे हे कांही महत्पराक्रम तूं करणार आहेस त्यांना जे दुष्ट आहेत ते अडथळा करूं शकतील असेंही नाही. ॥ ९ ॥


अ॒स्माँ अ॑वन्तु ते श॒तम॒स्मान्स॒हस्र॑मू॒तयः॑ । अ॒स्मान्विश्वा॑ अ॒भिष्ट॑यः ॥ १० ॥

अस्मात् अवंतु ते शतं अस्मान् सहस्रं ऊतयः । अस्मान् विश्वा अभिष्टयः ॥ १० ॥

तुझ्या शेंकडो व हजारों संरक्षक शक्ति आमचे परित्राण करोत, तुझी यच्चवत् सहायेंही आमचे प्रतिपालन करोत. ॥ १० ॥


अ॒स्माँ इ॒हा वृ॑णीष्व स॒ख्याय॑ स्व॒स्तये॑ । म॒हो रा॒ये दि॒वित्म॑ते ॥ ११ ॥

अस्मान् इह वृणीष्व सख्याय स्वस्तये । महः राये दिवित्मते ॥ ११ ॥

तूं परमथोर देव मित्रप्रेमासाठी, अत्युच्च मंगलासाठीं, ह्या ठिकाणीं आम्हाला पसंत कर, पारलौकिक संपत्ति देण्यासाठींही तूं आमचीच निवड कर. ॥ ११ ॥


अ॒स्माँ अ॑विड्‌ढि वि॒श्वहेन्द्र॑ रा॒या परी॑णसा । अ॒स्मान्विश्वा॑भिरू॒तिभिः॑ ॥ १२ ॥

अस्मान् अविड्‌ढि विश्वहाऽइंद्र राया परीणसा । अस्मान् विश्वाभिः ऊतिऽभिः ॥ १२ ॥

इंद्रा, अत्यंत समृद्ध अशा ऐश्वर्य दानानें तूं आमच्यावर आपला दयालोभ ठेव आणि आपल्या सकल संरक्षक शक्तींनी आमचा प्रतिपाल कर. ॥ १२ ॥


अ॒स्मभ्यं॒ ताँ अपा॑ वृधि व्र॒जाँ अस्ते॑व॒ गोम॑तः । नवा॑भिरिन्द्रो॒तिभिः॑ ॥ १३ ॥

अस्मभ्यं तान् अप वृधि व्रजान् अस्ताऽइव गोमतः । नवाभिः इंद्र ऊतिऽभिः ॥ १३ ॥

इंद्रा, प्रकाश धेनूचा समूह तूं धनुर्धर योद्ध्याप्रमाणें आपल्या अजब युक्तीनें आमच्याकरितां उघडून खुला करून दे. ॥ १३ ॥


अ॒स्माकं॑ धृष्णु॒या रथो॑ द्यु॒माँ इ॒न्द्रान॑पच्युतः । ग॒व्युर॑श्व॒युरी॑यते ॥ १४ ॥

अस्माकं धृष्णुऽया रथः द्युऽमान् इंद्रानपऽच्युतः । गव्युः अश्वऽयुः ईयते ॥ १४ ॥

म्हणजे मग प्रकाशरूप धेनूंची व बुद्धिरूप अश्वांची आकांक्षा धरणारा आमचा दिव्य मनोरथ सर्वत्र बेधडक अप्रतिहतपणानें संचार करील. ॥ १४ ॥


अ॒स्माक॑मुत्त॒मं कृ॑धि॒ श्रवो॑ दे॒वेषु॑ सूर्य । वर्षि॑ष्ठं॒ द्यामि॑वो॒परि॑ ॥ १५ ॥

अस्माकं उत्ऽतमं कृधि श्रवः देवेषु सूर्य । वर्षिष्ठं द्यांऽइव उपरि ॥ १५ ॥

हे सूर्यरूपा इंद्रा, आमचे यश तूं उज्ज्वल कर; तें आकाशापेक्षां उच्च असल्या प्रमाणें देवांमध्ये उत्कृष्ट ठरेल असे कर. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३२ (इंद्रः सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - इंद्रः : छंद - गायत्री


आ तू न॑ इन्द्र वृत्रहन्न॒स्माक॑म॒र्धमा ग॑हि । म॒हान्म॒हीभि॑रू॒तिभिः॑ ॥ १ ॥

आ तु नः इंद्र वृत्रऽहन् अस्माकं अर्धं आ गहि । महान् महीभिः ऊतिऽभिः ॥ १ ॥

हे वृत्रनाशना इंद्रा, तूं महाथोरच आहेस, तर आपल्या प्रखर आयुधानिशी आमच्या सन्निध ये. ॥ १ ॥


भृमि॑श्चिद्धासि॒ तूतु॑जि॒रा चि॑त्र चि॒त्रिणी॒ष्व् आ । चि॒त्रं कृ॑णोष्यू॒तये॑ ॥ २ ॥

भृमिः चित् घ असि तूतुजिः आ चित्र चित्रिणीषु आ । चित्रं कृणोषि ऊतये ॥ २ ॥

अद्‍भूतरूप इंद्रा, जगताचें पोषण करण्यांत तूं अगदीं व्यापृत झालेला असूनही ह्या नानावेषधारी जनांमध्ये भक्ताकरितांच मोठ्या आवेशानें धांवत येतोस आणि त्यांच्या संरक्षणासाठी अद्‍भूत पराक्रम करतोस. ॥ २ ॥


द॒भ्रेभि॑श्चि॒च्छशी॑यांसं॒ हंसि॒ व्राध॑न्त॒मोज॑सा । सखि॑भि॒र्ये त्वे सचा॑ ॥ ३ ॥

दभ्रेभिः चित् शशीयांसं हंसि व्राधंतं ओजसा । सखिऽभिः ये त्वे इति सचा ॥ ३ ॥

जे तुझ्या सेवेंत तत्पर असतात असे तुझे प्रेमळ मित्र संख्येने थोडे असले तरी त्यांच्या आंगावर तुटून पडणार्‍या मोठ्या धिप्पाड शत्रूंचा सुद्धां तूं त्यांच्या हातून आपल्या तेजस्वितेनें फडशा उडवून देतोस. ॥ ३ ॥


व॒यमि॑न्द्र॒ त्वे सचा॑ व॒यं त्वा॒भि नो॑नुमः । अ॒स्माँअ॑स्माँ॒ इदुद॑व ॥ ४ ॥

वयं इंद्र त्वे इति सचा वयं त्वा अभि नोनुमः । अस्मान्ऽअस्मान् इत् उत् अव ॥ ४ ॥

म्हणून हे इंद्रा आम्ही तुलाच चिकटून राहिलो आहोत आणि सर्वस्वी तुझेच स्तवन करीत असतो. तर आमचा सांभाळ तूं करच. ॥ ४ ॥


स न॑श्चि॒त्राभि॑रद्रिवोऽनव॒द्याभि॑रू॒तिभिः॑ । अना॑धृष्टाभि॒रा ग॑हि ॥ ५ ॥

स नः चित्राभिः अद्रिऽवः अनवद्याभिः ऊतिऽभिः । अनाधृष्टाभिः आ गहि ॥ ५ ॥

हे वज्रयुधा, तुं आपल्या, पूर्ण निर्दोष, अद्‍भूत आणि अप्रतिहत अशा रक्षण साधनांसह आमच्याकडे आगमन कर. ॥ ५ ॥


भू॒यामो॒ षु त्वाव॑तः॒ सखा॑य इन्द्र॒ गोम॑तः । युजो॒ वाजा॑य॒ घृष्व॑ये ॥ ६ ॥

भूयामो इति सु त्वाऽवतः सखाय इंद्र गोऽमतः । युजः वाजाय घृष्वये ॥ ६ ॥

आम्हांस सत्त्वाढ्यता आणि शांतिसौख्य ह्यांचा लाभ व्हावा म्हणून हे इंद्रा आम्ही तुझ्यासारखा प्रकाशसंपन्नाचेच एकात्मीय जिवलग मित्र व्हावें असें घडो. ॥ ६ ॥


त्वं ह्येक॒ ईशि॑ष॒ इन्द्र॒ वाज॑स्य॒ गोम॑तः । स नो॑ यन्धि म॒हीमिष॑म् ॥ ७ ॥

त्वं हि एकः ईशिषे इंद्र वाजस्य गोऽमतः । सः नः यंधि महीं इषं ॥ ७ ॥

हे इंद्रा, फक्त तूंच एकटा सत्यसामर्थ्याचा आणि प्रकाशबोधनाचा स्वामी आहेस. तर आम्हांमध्यें तो आवेश नेहमींच असूं दे. ॥ ७ ॥


न त्वा॑ वरन्ते अ॒न्यथा॒ यद्दित्स॑सि स्तु॒तो म॒घम् । स्तो॒तृभ्य॑ इन्द्र गिर्वणः ॥ ८ ॥

न त्वा वरंते अन्यथा यत् दित्ससि स्तुतः मघं । स्तोतृऽभ्य इंद्र गिर्वणः ॥ ८ ॥

हे इंद्रा, हे स्तुतिकामुका, तुझें संकीर्तन केलें असतां तूं भक्तांना जें जें वरदान देण्याचें मनांत आणशील त्यामध्यें बदल करून ते खोटे पाडण्यास कोणीही समर्थ नाही. ॥ ८ ॥


अ॒भि त्वा॒ गोत॑मा गि॒रानू॑षत॒ प्र दा॒वने॑ । इन्द्र॒ वाजा॑य॒ घृष्व॑ये ॥ ९ ॥

अभि त्वा गोतमाः गिरा अनूषत प्र दावने । इंद्र वाजाय घृष्वये ॥ ९ ॥

हे इंद्रा, सत्वसामर्थ्य आणि शांतिसौख्य ह्यांची प्राप्ति व्हावी म्हणून आम्ही गोतम कुलोत्पन्न भक्तांनी गुणगायनानें तुझें स्तवन केले आहे. ॥ ९ ॥


प्र ते॑ वोचाम वी॒र्या३॑या म॑न्दसा॒न आरु॑जः । पुरो॒ दासी॑र॒भीत्य॑ ॥ १० ॥

प्र ते वोचाम वीर्या याऽ मंदसानः अरुजः । पुरः दासीः अभिऽइत्य ॥ १० ॥

तूं हर्षनिर्भर होऊन अधर्मिक दस्यूच्या नगरांना वेढा घालून त्यांचा विध्वंस केलास, हे जे तुझे पराक्रम त्यांचेंच वर्णन आम्ही केले. ॥ १० ॥


ता ते॑ गृणन्ति वे॒धसो॒ यानि॑ च॒कर्थ॒ पौंस्या॑ । सु॒तेष्वि॑न्द्र गिर्वणः ॥ ११ ॥

ता ते गृणंति वेधसः यानि चकर्थ पौंस्या । सुतेषु इंद्र गिर्वणः ॥ ११ ॥

स्तवनतुष्ट इंद्रा, तूं जी पौरुषशाली महत्कृत्ये केलींस त्यांचेच वर्णन प्रतिभासंपन्न कवि सोमयागांत करीत असतात. ॥ ११ ॥


अवी॑वृधन्त॒ गोत॑मा॒ इन्द्र॒ त्वे स्तोम॑वाहसः । ऐषु॑ धा वी॒रव॒द्यशः॑ ॥ १२ ॥

अवीवृधंत गोतमाः इंद्र त्वे इति स्तोमऽवाहसः । आ एषु धाः वीरऽवत् यशः ॥ १२ ॥

हे इंद्रा, तुझ्या ठिकाणी स्तुतिकुसुमें अर्पण करणार्‍या गोतमांनी तुझा महिमा विशेंष प्रसृत केला, तर वीर्यशाली शूरांनाच जे प्राप्त होणें योग्य तें यश तूं त्यांना मिळवून दे. ॥ १२ ॥


यच्चि॒द्धि शश्व॑ता॒मसीन्द्र॒ साधा॑रण॒स्त्वम् । तं त्वा॑ व॒यं ह॑वामहे ॥ १३ ॥

यच् चित् हि शश्वतां असि इंद्र साधारणः त्वं । तं त्वा वयं हवामहे ॥ १३ ॥

हे इंद्रा, असंख्य लोकांचा सर्वसाधारण असा अधिपति तूंच आहेस, म्हणून तुलाच आम्ही हांक मारतो. ॥ १३ ॥


अ॒र्वा॒ची॒नो व॑सो भवा॒स्मे सु म॒त्स्वान्ध॑सः । सोमा॑नामिन्द्र सोमपाः ॥ १४ ॥

अर्वाचीनः वसो इति भव अस्मे इति सु मत्स्व ंधसः । सोमानां इंद्र सोमऽपाः ॥ १४ ॥

हे दिव्यनिधे, तूं आमच्याकडे वळ, सोमप्रिय इंद्रा, ह्या सोमपेयाने हर्षनिर्भर हो. ॥ १४ ॥


अ॒स्माकं॑ त्वा मती॒नामा स्तोम॑ इन्द्र यच्छतु । अ॒र्वागा व॑र्तया॒ हरी॑ ॥ १५ ॥

अस्माकं त्वा मतीनां आ स्तोमः इंद्र यच्छतु । अर्वाक् आ वर्तय हरी इति ॥ १५ ॥

हे इंद्रा, आमच्या एकाग्र चिंतनांनी सुचलेले स्तवन तुला थांबवून धरो. देवा, तूं आपले हरिद्वर्ण अश्व इकडे वळव. ॥ १५ ॥


पु॒रो॒ळाशं॑ च नो॒ घसो॑ जो॒षया॑से॒ गिर॑श्च नः । व॒धू॒युरि॑व॒ योष॑णाम् ॥ १६ ॥

पुरोळाशं च नः घसः जोषयासे गिरः च नः । वधूयुःऽइव योषणां ॥ १६ ॥

आमचा पुरोडाश ग्रहण कर आणि कामुक पुरुष तरुण रमणीचा उपभोग घेतो त्याप्रमाणें तूं आमच्या स्तुतींचा उपभोग घे. ॥ १६ ॥


स॒हस्रं॒ व्यती॑नां यु॒क्ताना॒मिन्द्र॑मीमहे । श॒तं सोम॑स्य खा॒र्यः ॥ १७ ॥

सहस्रं व्यतीनां युक्तानां इंद्रं ईमहे । शतं सोमस्य खार्यः ॥ १७ ॥

हे इंद्रा, तीव्रवेग अश्व आम्हांस हजारों पाहिजे आहेत आणि भक्तिरूप सोमरसानें भरलेलीं पात्रें शेंकडोशें हवी आहेत म्हणून त्याकरितां आम्ही तुजपाशी पदर पसरतो. ॥ १७ ॥


स॒हस्रा॑ ते श॒ता व॒यं गवा॒मा च्या॑वयामसि । अ॒स्म॒त्रा राध॑ एतु ते ॥ १८ ॥

सहस्रा ते शता वयं गवां आ च्यवयामसि । अस्मऽत्रा राधः एतु ते ॥ १८ ॥

तुज्या शेंकडोंच काय पण सहस्रवधि प्रकाशरूपी धेनूंना आम्ही आमच्याकडे वळवून आणतो तर हाच तुझा कृपाप्रसाद आम्हांवर निरंतर ठेव. ॥ १८ ।


दश॑ ते क॒लशा॑नां॒ हिर॑ण्यानामधीमहि । भू॒रि॒दा अ॑सि वृत्रहन् ॥ १९ ॥

दश ते कलशानां हिरण्यानां अधीमहि । भूरिऽदाः असि वृत्रऽहन् ॥ १९ ॥

तुझ्या सुवर्णरूप अविनाशी संपत्तीनें भरलेले दहा हांडे आम्हांस मिळालेच आहेत; ह्याप्रमाणें हे वृत्रनाशना तूं फारच सढळ हाताचा दाता आहेस. ॥ १९ ॥


भूरि॑दा॒ भूरि॑ देहि नो॒ मा द॒भ्रं भूर्या भ॑र । भूरि॒ घेदि॑न्द्र दित्ससि ॥ २० ॥

भूरिऽदाः भूरि देहि नः मा दभ्रं भूरि आ भर । भूरि घ इत् इंद्र दित्ससि ॥ २० ॥

तूं अत्यंत उदार, तेव्हां आम्हांस दान देणे तें अतिशयच दे. अल्पस्वल्प नको, उदंड घेऊन ये. इंद्रा भक्तांना वरदान द्यावे अशीच तुझी मनीषा असते. ॥ २० ॥


भू॒रि॒दा ह्यसि॑ श्रु॒तः पु॑रु॒त्रा शू॑र वृत्रहन् । आ नो॑ भजस्व॒ राध॑सि ॥ २१ ॥

भूरिऽदाः हि असि श्रुतः पुरुऽत्रा शूर वृत्रऽहन् । आ नः भजस्व राधसि ॥ २१ ॥

शूरा, वृत्रनाशना, असंख्यजनामध्ये पुष्कळ देणारा तूं अशी तुझी प्रख्याति आहे. तर तुझ्या कृपाधनाचा अंश आम्हांसही दे. ॥ २१ ॥


प्र ते॑ ब॒भ्रू वि॑चक्षण॒ शंसा॑मि गोषणो नपात् । माभ्यां॒ गा अनु॑ शिश्रथः ॥ २२ ॥

प्र ते बभ्रू इति विऽचक्षण शंसामि गोऽसनः नपात् । मा आभ्यां गाः अनु शिश्रथः ॥ २२ ॥

हे चतुरश्रेष्ठा, हे प्रकाशप्रदा, हे भक्तरक्षका, तुझ्या पीतवर्ण अश्वांच्या जोडीची सुद्धां मी प्रशंसा करतो. आमच्या धेनू त्यांच्यामुळे भेदरून मरतील असें करूं नको. ॥ २२ ॥


क॒नी॒न॒केव॑ विद्र॒धे नवे॑ द्रुप॒दे अ॑र्भ॒के । ब॒भ्रू यामे॑षु शोभेते ॥ २३ ॥

कनीनकऽइव विद्रधे नवे द्रुऽपदे अर्भके । बभ्रू इति यामेषु शोभेते इति ॥ २३ ॥

डोळ्यांतील बाहुलीप्रमाणे किंवा एखाद्या ठेंगण्या लांकडी खांबावर बसविलेल्या नवीन कोरीव पुतळ्यांप्रमाणें, हे तुझे पिंगटवर्ण अश्व मार्गामध्ये धांवतांना डौलदार दिसत असतात. ॥ २३ ॥


अरं॑ म उ॒स्रया॒म्णेऽ॑र॒मनु॑स्रयाम्णे । ब॒भ्रू यामे॑ष्व॒स्रिधा॑ ॥ २४ ॥

अरं मे उस्रऽयाम्ने अरं अनुस्रऽयाम्णे । बभ्रू इति यामेषु अस्रिधा ॥ २४ ॥

मी पहाटे प्रवास करीत असो वा नसो, परंतु तुझे पिंगटवर्ण अश्व माझ्याबरोबर एकसारखे असोत. ॥ २४ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३३ (ऋभु सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - ऋभु : छंद - त्रिष्टुप्


प्र ऋ॒भुभ्यो॑ दू॒तमि॑व॒ वाच॑मिष्य उप॒स्तिरे॒ श्वैत॑रीं धे॒नुमी॑ळे ।
ये वात॑जूतास्त॒रणि॑भि॒रेवैः॒ परि॒ द्यां स॒द्यो अ॒पसो॑ बभू॒वुः ॥ १ ॥

प्र ऋभुऽभ्यः दूतंऽइव वाचं इष्ये उपऽस्तिरे श्वैतरीं धेनुं ईळे ।
ये वातऽजूताः तरणिऽभिः एवैः परि द्यां सद्यः अपसः बभूवुः ॥ १ ॥

एखाद्या दूतास पाठवावें त्याप्रमाणें मी आपली स्तवनवाणी ऋभूंकडे त्यांचे स्तवन करण्यासाठी पाठवीत आहे, आणि सोमरसामध्यें दूध मिश्र करून तो रुचिर करण्याकरितां त्या शुभ्रतेजस्क धेनूची विनंती केली पाहिजे म्हणून तीही केली आहे. ऋभू हे वायुवेगी आणि महाचतुर असून त्यांनी आपल्या किरणरूप वेगवान अश्वांच्या योगानें एका क्षणार्धांत सर्व नभोमंडल वेढून टाकलें आहे. ॥ १ ॥


य॒दार॒मक्र॑न्नृ॒भवः॑ पि॒तृभ्यां॒ परि॑विष्टी वे॒षणा॑ दं॒सना॑भिः ।
आदिद्दे॒वाना॒मुप॑ स॒ख्यमा॑य॒न्धीरा॑सः पु॒ष्टिम॑वहन्म॒नायै॑ ॥ २ ॥

यदा अरं अक्रन् ऋभवः पितृऽभ्यां परिऽविष्टी वेषणा दंसनाभिः ।
आत् इत् देवानां उप सख्यं आयन् धीरासः पुष्टिं अवहन् मनायै ॥ २ ॥

ऋभूंनी सतत परिचर्येने, अव्याहत श्रमानें, आणि अद्‍भुत कृत्यांनी आपल्या आईबापांविषयींचे आपलें कर्तव्य उत्तम रीतीनें पाळले तेव्हांच ते देवांच्या जिव्हाळ्याच्या स्नेहास पात्र झाले. याप्रमाणे त्या ज्ञानी ऋभूंनी केवळ भक्तीच्या अभिवृद्धी करितांच आपल्या सामर्थ्याचा परिपोष केला. ॥ २ ॥


पुन॒र्ये च॒क्रुः पि॒तरा॒ युवा॑ना॒ सना॒ यूपे॑व जर॒णा शया॑ना ।
ते वाजो॒ विभ्वाँ॑ ऋ॒भुरिन्द्र॑वन्तो॒ मधु॑प्सरसो नोऽवन्तु य॒ज्ञम् ॥ ३ ॥

पुनः ये चक्रुः पितरा युवाना सना यूपाऽइव जरणा शयाना ।
ते वाजः विऽभ्वा ऋभुः इंद्रऽवंतः मधुऽप्सरसः नः अवंतु यज्ञं ॥ ३ ॥

झिरपून गेलेल्या जुन्या खोडाप्रमाणे एकीकडे पडून राहिलेल्या आपल्या मातापितरांना ज्यांनी पुनः तरुण केले, ते इंद्रभक्त महात्मे-ऋभु, विभ्वा, आणि वाज हे त्रिवर्ग - ते मधुर रस प्राशन करणारे तिन्ही बंधु, आमच्या यज्ञावर प्रेम करोत. ॥ ३ ॥


यत् सं॒वत्स॑मृ॒भवो॒ गामर॑क्ष॒न्यत्सं॒वत्स॑मृ॒भवो॒ मा अपिं॑शन् ।
यत्सं॒वत्स॒मभ॑र॒न्भासो॑ अस्या॒स्ताभिः॒ शमी॑भिरमृत॒त्वमा॑शुः ॥ ४ ॥

यत् संऽवत्सं ऋभवः गां अरक्षन् यत् संऽवत्सं ऋभवः मा अपिंशन् ।
यत् संऽवत्सं अभरन् भासः अस्याः ताभिः शमीभिः अमृतऽत्वं आशुः ॥ ४ ॥

ज्याच्या योगाने ऋभूंनी एक वर्षभर एकसारखी त्या गाईची जोपासना केली, ज्याच्या योगानें ऋभूंनी सतत एक वर्षभर तिचे मासमय स्नायु आकारास आणले, ज्याच्या योगानें त्यांनी तिचे तेज एक वर्षभर श्रम करून वृद्धिंगत केले त्याच अजब कर्तृत्त्वामुळें त्यांन अमरत्वाच्या पदाचा लाभ झाला. ॥ ४ ॥


ज्ये॒ष्ठ आ॑ह चम॒सा द्वा क॒रेति॒ कनी॑या॒न्त्रीन्कृ॑णवा॒मेत्या॑ह ।
क॒नि॒ष्ठ आ॑ह च॒तुर॑स्क॒रेति॒ त्वष्ट॑ ऋभव॒स्तत्प॑नय॒द्वचो॑ वः ॥ ५ ॥

ज्येष्ठः आह चमसा द्वा कर इति कनीयान् त्रीत् कृणवाम इति आह ।
कनिष्ठ आह चतुरः कर इति त्वष्टा ऋभवः तत् पनयत् वचः वः ॥ ५ ॥

देवांचा सोम प्राशन करण्याचा पेला एकच होता. तेव्हां ऋभूंपैकी सर्वांत वडील म्हणाला कीं, "चला आपण एकाचे दोन पेले बनवूं. ",मधला म्हणाला, "दोनच काय, तीन करूं या" आणि धाकटा म्हणाला, "चार करूं, चला". ऋभूंनो, ह्या तुमच्या हिमतीच्या भाषणाची त्वष्ट्यानें फारच वाखाणणी केली. ॥ ५ ॥


स॒त्यमू॑चु॒र्नर॑ ए॒वा हि च॒क्रुरनु॑ स्व॒धामृ॒भवो॑ जग्मुरे॒ताम् ।
वि॒भ्राज॑मानांश्चम॒साँ अहे॒वावे॑न॒त्त्वष्टा॑ च॒तुरो॑ ददृ॒श्वान् ॥ ६ ॥

सत्यं ऊचुः नरः एव हि चक्रुः अनु स्वधां ऋभवः जग्मुः एतां ।
विऽभ्राजमानान् चमसान् अहाऽइव अवेनत् त्वष्टा चतुरः ददृश्वान् ॥ ६ ॥

हे त्या वीरांचे हिमतीचे बोलणें अगदी खरें होते, कारण त्यांनी प्रत्यक्ष तसी कृति करून दाखविली. कृति करणे हा जो त्यांचा स्वभाव त्याप्रमाणें ऋभु वागले, आणि सूर्याप्रमाणे तेजःपुंज असे ते चार चषक पाहिल्याबरोबर त्वष्ट्याला मोह उत्पन्न झाला. ॥ ६ ॥


द्वाद॑श॒ द्यून्यदगो॑ह्यस्याति॒थ्ये रण॑न्नृ॒भवः॑ स॒सन्तः॑ ।
सु॒क्षेत्रा॑कृण्व॒न्नन॑यन्त॒ सिन्धू॒न्धन्वाति॑ष्ठ॒न्नोष॑धीर्नि॒म्नमापः॑ ॥ ७ ॥

द्वादश द्यून् यत् अगोह्यस्य अतिथ्ये रणन् ऋभवः ससंतः ।
सुऽक्षेत्राअकृण्वन् अनयंत सिंधून् धन्व आ अतिष्ठन् ओषधीः निम्नं आपः ॥ ७ ॥

ज्याला लपवूं म्हटले तर अशक्य अशा त्या आदित्याच्या घरीं पाहुणाचार घेत ऋभु हे बारा दिवस आनंदानें स्वस्थ निजून राहतात. त्या ऋतूंत ते शेतें पिकांनी दाट भरून टाकतात, मोठमोठ्या नद्यांना पूर आणतात, रूक्ष प्रदेश लतादिकांनी हिरवे गार बनवितात, आणि जमीनीतील खाचरे पाण्यानें तर्र करून सोडतात. ॥ ७ ॥


रथं॒ ये च॒क्रुः सु॒वृतं॑ नरे॒ष्ठां ये धे॒नुं वि॑श्व॒जुवं॑ वि॒श्वरू॑पाम् ।
त आ त॑क्षन्त्वृ॒भवो॑ र॒यिं नः॒ स्वव॑सः॒ स्वप॑सः सु॒हस्ताः॑ ॥ ८ ॥

रथं ये चक्रुः सुऽवृतं नरेऽस्थां ये धेनुं विश्वऽजुवं विश्वऽरूपां ।
त आ तक्षंतु ऋभवः रयिं नः सुऽअवसः सुऽअपसः सुऽहस्ताः ॥ ८ ॥

ज्यांनी जलद चालणारा व वीरांना आरोहण करण्यास योग्य असा रथ तयार केला; व यच्चावत् वस्तुजाताला चालना देणारी आणि सर्व प्रकारची रूपें धारण करणारी धेनु निर्माण केली ते ऋभु आपल्यासाठीं दिव्य ऐश्वर्यही निर्माण करोत. कारण ते फार, प्रेमळ, कुशल आणि उदारहस्त आहेत. ॥ ८ ॥


अपो॒ ह्येषा॒मजु॑षन्त दे॒वा अ॒भि क्रत्वा॒ मन॑सा॒ दीध्या॑नाः ।
वाजो॑ दे॒वाना॑मभवत्सु॒कर्मेन्द्र॑स्य ऋभु॒क्षा वरु॑णस्य॒ विभ्वा॑ ॥ ९ ॥

अपः हि एषां अजुषंत देवा अभि क्रत्वा मनसा दीध्यानाः ।
वाजः देवानां अभवत् सुऽकर्मा इंद्रस्य ऋभुक्षा वरुणस्य विऽभ्वा ॥ ९ ॥

त्यांच्या चातुर्य कृत्यांचा, देवांनी आपली दैवी कर्तृत्वशक्ति खर्च करून, मनःपूर्वक पूर्ण विचार करून पाहिल्यावर ते देव सुद्धां संतुष्ट झाले. तेव्हां वाज हा देवांचा कार्यकारी झाला, ऋभुक्षा हा इंद्राचा, आणि विभ्वा हा वरुणाचा कार्यकारी झाला. ॥ ९ ॥


ये हरी॑ मे॒धयो॒क्था मद॑न्त॒ इन्द्रा॑य च॒क्रुः सु॒युजा॒ ये अश्वा॑ ।
ते रा॒यस्पोषं॒ द्रवि॑णान्य॒स्मे ध॒त्त ऋ॑भवः क्षेम॒यन्तो॒ न मि॒त्रम् ॥ १० ॥

ये हरी इति मेधया उक्था मदंतः इंद्राय चक्रुः सुऽयुजा ये अश्वा ।
ते रायः पोषं द्रविणानि अस्मे इति धत्त ऋभवः क्षेमऽयंतः न मित्रं ॥ १० ॥

सामगायनानें हृष्टचित्त होऊन ह्या ऋभूंनी आपल्या कल्पकतेने इंद्राकरितां अशी एक घोड्यांची जोडी निर्माण केली कीं ती रथाला आपोआप जोडली जावी. हे ऋभूंनो, तुम्ही दिव्य ऐश्वर्याचा परिपोष करून आमच्या ठिकाणी सामर्थ्यसंपत्ति ठेवा. कारण जगन्मित्र सूर्याप्रमाणें तुम्हीही आमचे कुशलच करीत असतां. ॥ १० ॥


इ॒दाह्नः॑ पी॒तिमु॒त वो॒ मदं॑ धु॒र्न ऋ॒ते श्रा॒न्तस्य॑ स॒ख्याय॑ दे॒वाः ।
ते नू॒नम॒स्मे ऋ॑भवो॒ वसू॑नि तृ॒तीये॑ अ॒स्मिन्सव॑ने दधात ॥ ११ ॥

इदा अह्नः पीतिं उत वः मदं धुः न ऋते श्रांतस्य सख्याय देवाः ।
ते नूनं अस्मे इति ऋभवः वसूनि तृतीये अस्मिन् सवने दधात ॥ ११ ॥

आज तुमच्याकरितां हे आनंदाचें सर्वस्व, हे सोमरसाचें पेय, तुमच्या पुढें सादर केले आहे. मनुष्यांनी श्रम केल्याविना तुम्ही देव मंडळी त्यांच्यावर स्नेहलोभ करण्यास उद्युक्त होतच नाही. म्हणून हे ऋभूंनो, अगदी अभिलषणीय अशी जी संपत्ती असेल ती ह्या तिसर्‍या सवनाचे वेळीं तरी आमच्या प्रित्यर्थ घेऊन या. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३४ (ऋभु सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - ऋभवः : छंद - त्रिष्टुप्


ऋ॒भुर्विभ्वा॒ वाज॒ इन्द्रो॑ नो॒ अच्छे॒मं य॒ज्ञं र॑त्न॒ धेयोप॑ यात ।
इ॒दा हि वो॑ धि॒षणा॑ दे॒व्यह्ना॒मधा॑त्पी॒तिं सं मदा॑ अग्मता वः ॥ १ ॥

ऋभुः विऽभ्वा वाज इंद्रः नः अच्छ इमं यज्ञं रत्नंऽधेया उप यात ।
इदा हि वः धिषणा देवि अह्नां अधात् पीतिं सं मदाः अग्मत वः ॥ १ ॥

ऋभु, विभ्वा, वाज आणि भगवान इंद्र असे सर्व तुम्ही रत्‍नसंपत्तिचे पारितोषक आम्हाला देण्याकरितां ह्या आमच्या यज्ञसमारंभास प्राप्त व्हा. तुमच्या दिव्य बुद्धीनें दिवसा ह्यावेळीं आमच्याच सोमरसाचे पेय प्राशन करण्याचे निश्चित केलें आहे व म्हणून हे आनंदरूप रस तुमच्याकडे चालत आहे आहेत. ॥ १ ॥


वि॒दा॒नासो॒ जन्म॑नो वाजरत्ना उ॒त ऋ॒तुभि॑र्‌ऋभवो मादयध्वम् ।
सं वो॒ मदा॒ अग्म॑त॒ सं पुरं॑धिः सु॒वीरा॑म॒स्मे र॒यिमेर॑यध्वम् ॥ २ ॥

विदानासः जन्मनः वाजऽरत्नां उत ऋतुऽभिः ऋभवः मादयध्वं ।
सं वः मदाः अग्मत सं पुरंऽधिः सुऽवीरां अस्मे इति रयिं आ इरयध्वं ॥ २ ॥

ऋभूंनो, सत्त्वरूप रत्‍नसंपत्ति तुमच्याजवळ भरलेली, व तुम्हाला दिव्यलोकीं जन्म लाभलेला, तेव्हां तुम्ही यथाकाली सोमरस प्राशन करून हर्षमग्न व्हा. हे आनंदरूप सोमरस तुमच्याकडेच लोटले आहेत, भक्तांची शुद्ध बुद्धिही तुमच्या ठिकाणींच जडली आहे, तर वीरपुरुषांनी परिपूर्ण असे ऐश्वर्य आम्हास देण्याची कृपा करा. ॥ २ ॥


अ॒यं वो॑ य॒ज्ञ ऋ॑भवोऽकारि॒ यमा म॑नु॒ष्वत्प्र॒दिवो॑ दधि॒ध्वे ।
प्र वोऽ॑च्छा जुजुषा॒णासो॑ अस्थु॒रभू॑त॒ विश्वे॑ अग्रि॒योत वा॑जाः ॥ ३ ॥

अयं वः यज्ञ ऋभवः अकारि यं आ मनुष्वत् प्रऽदिवः दधिध्वे ।
प्र वः च्छ जुजुषाणासः अस्थुः अभूत विश्वे अग्रिया उत वाजाः ॥ ३ ॥

ऋभूंनो, हा यज्ञ तुमच्या प्रित्यर्थ केला आहे, असाच यज्ञ आम्हां मनुष्यांप्रमाणे तुम्हीही पुरातनकाळीं केलाच असेल. हर्षोत्सुक भक्तजन तुमच्यापुढें केव्हांचे उभे राहिले आहेत, तेव्हां हे सत्त्वाढ्य ऋभूंनो, आम्हामध्ये तुम्ही सर्वच अग्रेसर आहांत. ॥ ३ ॥


अभू॑दु वो विध॒ते र॑त्न॒॒धेय॑मि॒दा न॑रो दा॒शुषे॒ मर्त्या॑य ।
पिब॑त वाजा ऋभवो द॒दे वो॒ महि॑ तृ॒तीयं॒ सव॑नं॒ मदा॑य ॥ ४ ॥

अभूत् ऊं इति वः विधते रत्न ऽधेयं इदा नरः दाशुषे मर्त्याय ।
पिबत वाजाः ऋभवः ददे वः महि तृतीयं सवनं मदाय ॥ ४ ॥

प्रसाद रत्‍नाच्या पारितोषिकाचा लाभ तुमच्या सेवकाला तुम्हांस हवि अर्पण करणार्‍या भाविकालाच होत आला आहे, तर हे सत्त्वाढ्य ऋभूंनो, हा सोमरस प्राशन करा; तिसर्‍या खेपेस सोमरस पिळून अर्पण करण्याचा हा उपक्रम, तुम्हाला आल्हाद व्हावा म्हणून मी आरंभिला आहे. ॥ ४ ॥


आ वा॑जा या॒तोप॑ न ऋभुक्षा म॒हो न॑रो॒ द्रवि॑णसो गृणा॒नाः ।
आ वः॑ पी॒तयो॑ऽभिपि॒त्वे अह्ना॑मि॒मा अस्तं॑ नव॒स्व इव ग्मन् ॥ ५ ॥

आ वाजाः यात उप न ऋभुक्षाः महः नरः द्रविणसः गृणानाः ।
आ वः पीतयः अभिऽपित्वे अह्नां इमाः अस्तं नवस्वःऽइव ग्मन् ॥ ५ ॥

ऋभुप्रभृति सत्त्वसंपन्न देवांनो, आमच्याकडे आगमन करा. वीरांनो, तुमच्या सामर्थ्यसंपत्तीमुळें तुमची कीर्ति चोहोंकडे आहेच आणि तुम्ही सोमरस प्राशन करावा म्हणून आम्ही ज्या विनवण्या केल्या त्या, तुकत्याच प्रसवलेल्या धेनु दिवस अस्तास जाण्याच्या सुमारास आपल्या निवार्‍याच्या जागेकडे लगबगीनें धांवत सुटतात त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत जाऊन थडकल्या आहेत. ॥ ५ ॥


आ न॑पातः शवसो यात॒नोपे॒मं य॒ज्ञं नम॑सा हू॒यमा॑नाः ।
स॒जोष॑सः सूरयो॒ यस्य॑ च॒ स्थ मध्वः॑ पात रत्न॒वधा इन्द्र॑वन्तः ॥ ६ ॥

आ नपातः शवसः यातन उप इमं यज्ञं नमसा हूयमानाः ।
सऽजोषसः सूरयः यस्य च स्थ मध्वः पात रत्न ऽधा इंद्रऽवंतः ॥ ६ ॥

उत्कट बलोत्पन्न ऋभूंनो, तुमच्यापुढें हात जोडून आम्ही विनंति करीत आहोंत. आमच्याकडे आगमन करा बरे ! वीरनायकहो, ज्या मधुर रसावर तुमचे एवढें प्रेम, तो हा रस तुम्ही आज प्राशन करा; तुम्ही इंद्रभक्त आहांत आणि अशी रत्‍नसंपत्तीही तुम्हीच देत असतां. ॥ ६ ॥


स॒जोषा॑ इन्द्र॒ वरु॑णेन॒ सोमं॑ स॒जोषाः॑ पाहि गिर्वणो म॒रुद्भिः॑द ।
अ॒ग्रे॒पाभि॑र्‌ऋतु॒पाभिः॑ स॒जोषा॒ ग्नास्पत्नी॑ भी रत्न॒नधाभिः॑ स॒जोषाः॑ ॥ ७ ॥

सऽजोषा इंद्र वरुणेन सोमं सऽजोषाः पाहि गिर्वणः मरुत्ऽभिः ।
अग्रेऽपाभिः ऋतुऽपाभिः सऽजोषा ग्नाःपत्नी्भिः रत्न‍ऽधाभिः सऽजोषाः ॥ ७ ॥

भगवंता इंद्रा, भक्तप्रेमामुळें तूं वरुणाशी एकरूप होऊन हा सोमरस ग्रहण कर. हे स्तुतिप्रिया, प्रेमळ मनानें मरुतांसह येऊन सोमरसाचा स्वीकार कर. सोमरस यथाकालीं परंतु प्रथम प्राशन करणार्‍या देवतांसह प्रेमांतःकरणानें येथें येऊन, भक्तांना रत्‍नसंपत्ति देणार्‍या देवपत्‍न्यांसह प्रसन्नचित्तानें हा सोमरस प्राशन कर. ॥ ७ ॥


स॒जोष॑स आदि॒त्यैर्मा॑दयध्वं स॒जोष॑स ऋभवः॒ पर्व॑तेभिः ।
स॒जोष॑सो॒ दैव्ये॑ना सवि॒त्रा स॒जोष॑सः॒ सिन्धु॑भी रत्न॒॒धेभिः॑ ॥ ८ ॥

सऽजोषसः आदित्यैः मादयध्वं सऽजोषसः ऋभवः पर्वतेभिः ।
सऽजोषसः दैव्येना सवित्रा सऽजोषसः सिंधुऽभी रत्ननऽधेभिः ॥ ८ ॥

ऋभूंनो, तुम्ही वात्सल्यानें आदित्यांसह, व वात्सल्यानेंच मेघरूप पर्वतांसह आनंदमग्न व्हा. भक्तवात्सल्यामुळेंच, भगवद्‌रूप सविता देव आणि नानाविध रत्‍नें देणार्‍या नद्या ह्यांच्यासह तुम्ही सोमरसानें उल्हसित व्हा. ॥ ८ ॥


ये अ॒श्विना॒ ये पि॒तरा॒ य ऊ॒ती धे॒नुं त॑त॒क्षुर्‌ऋ॒भवो॒ ये अश्वा॑ ।
ये अंस॑त्रा॒ य ऋध॒ग्रोद॑सी॒ ये विभ्वो॒ नरः॑ स्वप॒त्यानि॑ च॒क्रुः ॥ ९ ॥

ये अश्विना ये पितरा य ऊती धेनुं ततक्षुः ऋभवः ये अश्वा ।
ये अंसत्रा य ऋधक् रोदसी इति ये विऽभ्वः नरः सुऽअपत्यानि चक्रुः ॥ ९ ॥

ज्या ऋभूंनी आपल्या कार्यक्षम बलानें अश्वीदेवांना आणि आपल्या आईबापांना संतुष्ट केले, ज्यांनी कामधेनु आणि अश्वांची जोडी निर्माण केली, ज्यांनी देवांचे चिलखत काळजीपूर्वक बनवून दिलें, आकाश व पृथ्वी ह्यांना निरनिराळें स्पष्ट नजरेस आणलें आणि ज्या व्यापक वीरांनी महत्कृत्यें केलीं. ॥ ९ ॥


ये गोम॑न्तं॒ वाज॑वन्तं सु॒वीरं॑ र॒यिं ध॒त्त वसु॑मन्तं पुरु॒क्षुम् ।
ते अ॑ग्रे॒पा ऋ॑भवो मन्दसा॒ना अ॒स्मे ध॑त्त॒ ये च॑ रा॒तिं गृ॒णन्ति॑ ॥ १० ॥

ये गोऽमंतं वाजऽवंतं सुऽवीरं रयिं धत्थ वसुऽमंतं पुरुऽक्षुं ।
ते अग्रेऽपा ऋभवः मंदसानाः अस्मे इति धत्त ये च रातिं गृणंति ॥ १० ॥

ते तुम्ही भक्तांना असे ऐश्वर्य प्राप्त करून देतां कीं ज्ञानगोधन, सत्त्वसामर्थ्य, वीरपुरुष, अभिलषणीय संपत्ति आणि अतुलबल ह्यांनी ते परिपूर्ण असते. तरी हे ऋभूंनो, प्रथम सोमपान करणारे तुम्हीं हर्षोत्फुल्ल होऊन आम्हाला आणि तसेंच जे तुमच्या ज्ञानशूरत्वाची प्रशंसा करतात त्यांनाही ती अमोलिक रत्‍नसंपत्ति प्राप्त होईल असे करा. ॥ १० ॥


नापा॑भूत॒ न वो॑ऽतीतृषा॒मानिः॑शस्ता ऋभवो य॒ज्ञे अ॒स्मिन् ।
समिन्द्रे॑ण॒ मद॑थ॒ सं म॒रुद्भिः्॒ सं राज॑भी रत्न॒॒धेया॑य देवाः ॥ ११ ॥

न अप अभूत न वा अतीतृषाम अनिःऽशस्ताः ऋभवः यज्ञे अस्मिन् ।
सं इंद्रेण मदथ सं मरुत्ऽभिः सं राजऽभिऽ रत्न ऽधेयाय देवाः ॥ ११ ॥

तुम्ही आमच्यापासून कधीं दूर झाला नाही आणि आम्हीही तुम्हाला फार वेळ तृषाकांत ठेवले नाही, तेव्हां हे निष्कलंक ऋभूंनो, तुम्ही आमच्या यज्ञांत इंद्र आणि देदीप्यमान मरुत् ह्यांच्याबरोबर येऊन आम्हाला ती अमोलिक रत्‍नसंपत्ति प्राप्त व्हावी म्हणून उल्हसित करा. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३५ (ऋभु सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - ऋभवः : छंद - त्रिष्टुप्


इ॒होप॑ यात शवसो नपातः॒ सौध॑न्वना ऋभवो॒ माप॑ भूत ।
अ॒स्मिन्हि वः॒ सव॑ने रत्न॒ाधेयं॒ गम॒न्त्विन्द्र॒मनु॑ वो॒ मदा॑सः ॥ १ ॥

इह उप यात शवसः नपातः सौधन्वना ऋभवः मा अप भूत ।
अस्मिन् हि वः सवने रत्नमऽधेयं गमंतु इंद्रं अनु वः मदासः ॥ १ ॥

उत्कट सामर्थ्यापासून प्रकट होणार्‍या ऋभूंनो, येथे आमच्या सन्निध या. सुधन्व्याच्या पुत्रांनो, आम्हांस सोडून जाऊं नका. खरोखर ह्याच सोमसवनाच्या वेळी तुम्ही भक्तांना रत्‍नांचे पारितोषिक देतां, तेव्हां सोमप्राशनाचा आनंद इंद्राच्या मागोमाग तुम्हालाच प्राप्त होईल. ॥ १ ॥


आग॑न्नृभू॒णामि॒ह र॑त्न॒सधेय॒मभू॒त्सोम॑स्य॒ सुषु॑तस्य पी॒तिः ।
सु॒कृ॒त्यया॒ यत्स्व॑प॒स्यया॑ चँ॒ एकं॑ विच॒क्र च॑म॒सं च॑तु॒र्धा ॥ २ ॥

आ अगन् ऋभूणां इह रत्नःऽधेयं अभूत् सोमस्य सुऽसुतस्य पीतिः ।
सुऽकृत्यया यत् सुऽअपस्यया च एकं विऽचक्र चमसं चतुःऽधा ॥ २ ॥

हा पहा ऋभूंच्या रत्‍नसंपत्तीचा ओघ आमच्याकडे वळला. उत्तम रीतीनें तयार केलेल्या सोमरसाचें प्राशन उरकलेंच आहे; आणि हे ऋभूंनो, आपल्या लोकोत्तर कौशल्याच्या जोरावर तुम्ही एका चषकाचे चार चषक केले आहेत. ॥ २ ॥


व्य् अकृणोत चम॒सं च॑तु॒र्धा सखे॒ वि शि॒क्षेत्य॑ब्रवीत ।
अथै॑त वाजा अ॒मृत॑स्य॒ पन्थां॑ ग॒णं दे॒वाना॑मृभवः सुहस्ताः ॥ ३ ॥

वि अकृणोत चमसं चतुःऽधा सखे वि शिक्ष इति अब्रवीत ।
अथैत वाजाः अमृतस्य पंथां गणं देवानां ऋभवः सुऽहस्ताः ॥ ३ ॥

तुम्ही एका चमसाचे निरनिराळ्या तऱ्हेचे चार चमस केलेत आणि म्हणालांत कीं, ’प्रियसुहृदा, आतां भगवंताची खुशाल आराधना कर.’ सत्त्वाढ्य देवांनो, कुशलहस्त ऋभूंनो, सदाचरणानें तुम्ही अमरत्वाच्या मार्गास लागलांत आणि देवांच्या मंडलांत तुम्ही सहज प्रविष्ट झालांत. ॥ ३ ॥


कि॒म्मयः॑ स्विच्चम॒स ए॒ष आ॑स॒ यं काव्ये॑न च॒तुरो॑ विच॒क्र ।
अथा॑ सुनुध्वं॒ सव॑नं॒ मदा॑य पा॒त ऋ॑भवो॒ मधु॑नः सो॒म्यस्य॑ ॥ ४ ॥

किंऽमयः स्वित् चमसः एष आस यं काव्येन चतुरः विऽचक्र ।
अथ सुनुध्वं सवनं मदाय पात ऋभवः मधुनः सोम्यस्य ॥ ४ ॥

ज्या एका पेल्याचे तुम्ही आपल्या अपूर्व कौशल्यानें निरनिराळे चार पेले केलेत तो असला पेला तरी कशाचा होता ? आतां त्यांना आनंद व्हावा म्हणून तुम्हीं सोमरस गाळून चषक भरून तयार करा आणि हे ऋभूंनो, तुम्ही त्या मधुर पेयाचा आस्वाद घ्या. ॥ ४ ॥


शच्या॑कर्त पि॒तरा॒ युवा॑ना॒ शच्या॑कर्त चम॒सं दे॑व॒पान॑म् ।
शच्या॒ हरी॒ धनु॑तरावतष्टेन्द्र॒वाहा॑वृभवो वाजरत्नाःन ॥ ५ ॥

शच्या अकर्त पितरा युवाना शच्या अकर्त चमसं देवऽपानं ।
शच्या हरी इति धनुऽतरौ अतष्ट इंद्रऽवाहौ ऋभवः वाजऽरत्नाः् ॥ ५ ॥

आपल्या लोकोत्तर सामर्थ्यानें तुम्ही आईबापांस पुन्हा तरुण केलेंत, देवांना सोमप्राशन करण्यायोग्य असा सोमचषक तुझी आपल्या असाधारण कर्तबगारीनें बनवून दिलात; आणि सत्त्वरूप रत्‍नांनी अलंकृत असणार्‍या ऋभूंनो, आपल्या अलौकिक शक्तिनेंच तुम्ही, भगवान इंद्राला रथांतून घेऊन जाण्याजोगी अश्वांची एक अत्यंत चलाख जोडी निर्माण केलीत. ॥ ५ ॥


यो वः॑ सु॒नोत्य॑भिपि॒त्वे अह्नां॑ ती॒व्रं वा॑जासः॒ सव॑नं॒ मदा॑य ।
तस्मै॑ र॒यिमृ॑भवः॒ सर्व॑वीर॒मा त॑क्षत वृषणो मन्दसा॒नाः ॥ ६ ॥

यः वः सुनोति अभिऽपित्वे अह्नां तीव्रं वाजासः सवनं मदाय ।
तस्मै रयिं ऋभवः सर्वऽवीरं आ तक्षत वृषणः मंदसानाः ॥ ६ ॥

सत्त्वाढ्य ऋभूंनो, जो भक्त दिवस अस्तास जाण्याच्यावेळी, तुम्ही उल्हसित व्हावे म्हणून तीक्ष्ण असा सोमरस गाळून तयार करतो, त्याच्याकरितां, हे वीरश्रेष्ठ ऋभूंनो, तुम्ही हर्षभरीत होऊन असें ऐश्वर्य घडवा कीं तें सर्वप्रकारच्या शूर पुरुषांनी सुशोभित असेल. ॥ ६ ॥


प्रा॒तः सु॒तम॑पिबो हर्यश्व॒ माध्यं॑दिनं॒ सव॑नं॒ केव॑लं ते ।
समृ॒भुभिः॑ पिबस्व रत्न॒ृधेभिः॒ सखीँ॒ याँ इ॑न्द्र चकृ॒षे सु॑कृ॒त्या ॥ ७ ॥

प्रातरिति सुतं अपिबः हरिऽअश्व माध्यंदिनं सवनं केवलं ते ।
सं ऋभुऽभिः पिबस्व रत्नटऽधेभिः सखीन् यान् इंद्र चकृषे सुऽकृत्या ॥ ७ ॥

पीताश्व देवा, प्रातःकाळीं तूं सोमरस प्राशन केलाच आहेस, तथापि माध्याह्नकाळी गाळून तयार केलेला हा रससुद्धां केवळ तुझ्याचसाठी आहे. तर हे इंद्रा, भक्तांस रत्‍नसंपदा बहाल करणार्‍या ऋभूंसहित - पुण्याचरणामुळेंच ज्यांना तूं आपले जिवलग मित्र म्हटलेंस त्या ऋभूंसहित - तूं ह्या सोमरसाचा आस्वाद घे. ॥ ७ ॥


ये दे॒वासो॒ अभ॑वता सुकृ॒त्या श्ये॒ना इ॒वेदधि॑ दि॒वि नि॑षे॒द ।
ते रत्नं॑ु धात शवसो नपातः॒ सौध॑न्वना॒ अभ॑वता॒मृता॑सः ॥ ८ ॥

ये देवासः अभवत सुऽकृत्या श्येनाऽइव इत् अधि दिवि निऽसेद ।
ते रत्नंि धात शवसः नपातः सौधन्वनाः अभवत अमृतासः ॥ ८ ॥

ऋभूंनो, जे तुम्ही आपल्या सुकृताचरणानें देव बनलांत आणि श्येनपक्ष्याप्रमाणें देवलोकांतच विराजमान झालांत; हे उत्कट सामर्थ्यापासून प्रकट होणार्‍या ऋभूंनो, ते तुम्ही आम्हाला अत्युत्कृष्ट असेल तीच संपत्ति द्या; कारण सुधन्वपुत्रांनो, तुम्ही आतां अजरामर झालां आहांत. ॥ ८ ॥


यत्तृ॒तीयं॒ सव॑नं रत्न॒रधेय॒मकृ॑णुध्वं स्वप॒स्या सु॑हस्ताः ।
तद्‌ऋ॑भवः॒ परि॑षिक्तं व ए॒तत्सं मदे॑भिरिन्द्रि॒येभिः॑ पिबध्वम् ॥ ९ ॥

यत् तृतीयं सवनं रत्नृऽधेयं अकृणुध्वं सुऽअपस्या सुऽहस्ताः ।
तत् ऋभवः परिऽसिक्तं व एतत् सं मदेभिः इंद्रियेभिः पिबध्वं ॥ ९ ॥

उदारहस्त देवांनो, हा सोमार्पणाचा तिसरा प्रसंग तुम्ही आपल्या अनुपम चातुर्याच्या बलानें, रत्‍नांचे पारितोषिक देऊन साजरा केला आहे. हे ऋभूंनो, तरी चषकांत ओतलेला हा रस भगवान इंद्राच्या सान्निध्यामुळे आनंदाने तुम्ही प्राशन करा. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३६ (ऋभु सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - ऋभवः : छंद - त्रिष्टुप्


अ॒न॒श्वो जा॒तो अ॑नभी॒शुरु॒क्थ्यो३॑ रथ॑स्त्रिच॒क्रः परि॑ वर्तते॒ रजः॑ ।
म॒हत्तद्वो॑ दे॒व्यस्य प्र॒वाच॑नं॒ द्यामृ॑भवः पृथि॒वीं यच्च॒ पुष्य॑थ ॥ १ ॥

अनश्वः जातः अनभीशुः उक्थ्यः रथः त्रिऽचक्रः परि वर्तते रजः ।
महत् तत् वः देव्यस्य प्रऽवाचनं द्यां ऋभवः पृथिवीं यच् च पुष्यथ ॥ १ ॥

त्याला घोड्याची जरूर नाही आणि लगामाचीही नाही; परंतु त्याला चाकें मात्र तीन असतात, अशा तऱ्हेचा तुमचा नामांकित अपूर्व रथ उत्पन्न होऊन तो अंतरिक्षांत परिभ्रमण करीत असतो. हे ऋभूंनो, ह्याप्रमाणे आकाश आणि पृथ्वी ह्यांचा उत्कर्षच करतां ही तुमच्या दिव्य सामर्थ्याची एक प्रसिद्धिच होय. ॥ १ ॥


रथं॒ ये च॒क्रुः सु॒वृतं॑ सु॒चेत॒सोऽ॑विह्वरन्तं॒ मन॑स॒स्परि॒ ध्यया॑ ।
ताँ ऊ॒ न्व१स्य सव॑नस्य पी॒तय॒ आ वो॑ वाजा ऋभवो वेदयामसि ॥ २ ॥

रथं ये चक्रुः सुऽवृतं सुऽचेतसः अविऽह्वरंतं मनसः परि ध्यया ।
तान् ऊ इति नु अस्य सवनस्य पीतये आ वः वाजाः ऋभवः वेदयामसि ॥ २ ॥

ज्या तुम्ही महान विभूतींनी आपल्या मनाच्या दृढ संकल्पानें, केंसभरसुद्धां इकडे तिकडे न ढळणारा असा एक सुयंत्र चालणारा उत्तम रथ बनविलांत, हे सत्त्वाढ्य ऋभूंनो, त्या तुम्हालाच हा सोमरस प्राशन करण्यासाठी आम्ही हात जोडून प्रार्थना करीत आहोत. ॥ २ ॥


तद्वो॑ वाजा ऋभवः सुप्रवाच॒नं दे॒वेषु॑ विभ्वो अभवन्महित्व॒नम् ।
जिव्री॒ यत्सन्ता॑ पि॒तरा॑ सना॒जुरा॒ पुन॒र्युवा॑ना च॒रथा॑य॒ तक्ष॑थ ॥ ३ ॥

तत् वः वाजाः ऋभवः सुऽप्रवाचनं देवेषु विऽभ्वः अभवत् महिऽत्वनं ।
जिव्री इति यत् संता पितरा सनाऽजुरा पुनः युवाना चरथाय तक्षथ ॥ ३ ॥

सत्त्वसंपन्न ऋभूंनो, तुमचे नांव देवांमध्ये विख्यात होण्याचे आणखी एक कारण असें आहे की, व्यापकविभूतींनो, तुमचा महिमा अशामुळें प्रकट झाला कीं, आईबाप वृद्ध होऊन बहुतकाळ लोटल्यामुळें क्षीण झाले असतांही त्यांनी आपल्या पायांनी फिरूं लागावें म्हणून त्यांना तुम्ही तारुण्यानें ताजे तवानें केलेंत. ॥ ३ ॥


एकं॒ वि च॑क्र चम॒सं चतु॑र्वयं॒ निश्चर्म॑णो॒ गाम॑रिणीत धी॒तिभिः॑ ।
अथा॑ दे॒वेष्व॑मृत॒त्वमा॑नश श्रु॒ष्टी वा॑जा ऋभव॒स्तद्व॑ उ॒क्थ्यम् ॥ ४ ॥

एकं वि चक्र चमसं चतुःऽवयं निः चर्मणः गां अरिणीत धीतिऽभिः ।
अथ देवेषु अमृतऽत्वं आनश श्रुष्टी वाजाः ऋभवः तत् व उक्थ्यं ॥ ४ ॥

तुम्ही एका सोमचषकाचे चार चषक निरनिराळ्या प्रकारचे बनवून दिलेत, एक निव्वळ चामडे घेऊन त्याच्यापासून आपल्या बुद्धिसामर्थ्याने जिवंत गाय निर्माण केलीत आणि देवमंडळांत प्रवेश करून अमरत्व संपादन केलेंत, तेव्हां हे सत्त्वमंडित ऋभूंनो, ही तुमची कर्तबगारी खरोखरच वाखाणण्यास अगदी योग्य आहे. ॥ ४ ॥


ऋ॒भु॒तो र॒यिः प्र॑थ॒मश्र॑वस्तमो॒ वाज॑श्रुतासो॒ यमजी॑जन॒न्नरः॑ ।
वि॒भ्व॒त॒ष्टो वि॒दथे॑षु प्र॒वाच्यो॒ यं दे॑वा॒सोऽ॑वथा॒ स विच॑र्षणिः ॥ ५ ॥

ऋभुतः रयिः प्रथमश्रवःऽतमः वाजऽश्रुतासः यं अजीजनन् नरः ।
विभ्वऽतष्टः विदथेषु प्रऽवाच्यः यं देवासः अवथ स विऽचर्षणिः ॥ ५ ॥

ज्याचा महिमा सर्वांच्या अगोदर अगदी खात्रीनें पटतो असे ऐश्वर्य ऋभूंपासून प्राप्त होतें. सत्वसामर्थ्यसंपन्न अशी ज्यांची ख्याती त्या वाजप्रभृति वीरांनी असे ऐश्वर्य भक्तांसाठी घडविलें, आणि ’विभ्वा’ प्रभृतींनी आपल्या विभुत्वानें त्याला सुव्यवस्थित आकार आणला. यज्ञसभेमध्यें अशाच ऐश्वर्याची प्रशंसा होते. एवंच हे देवांनो, ज्या भक्तावर तुम्ही कृपा करतां तोच विचक्षण होतो. ॥ ५ ॥


स वा॒ज्यर्वा॒ स ऋषि॑र्वच॒स्यया॒ स शूरो॒ अस्ता॒ पृत॑नासु दु॒ष्टरः॑ ।
स रा॒यस्पोषं॒ स सु॒वीर्यं॑ दधे॒ यं वाजो॒ विभ्वाँ॑ ऋ॒भवो॒ यम् आवि॑षुः ॥ ६ ॥

सः वाजी अर्वा स ऋषिः वचस्यया सः शूरः अस्ता पृतनासु दुस्तरः ।
स रायः पोषं सः सुऽवीर्यं दधे यं वाजः विऽभ्वा ऋभवः यं आविषुः ॥ ६ ॥

ज्याच्याविषयी वाज, विभ्वा आणि ऋभु ह्यांना कृपेचा पान्हा फुटतो, तोच सत्पुरुष वीर्यशाली व अजिंक्य होतो, आणि वक्तृत्वानें सर्वांना गार करून टाकणारा असा ज्ञानी ऋषिही तोच होतो. तो शूर धनुर्धर शत्रुसैन्याला अनावर होऊन वैभवाच्या उत्कर्षानें व वीर्यसंपत्तीनें विभूषित होतो. ॥ ६ ॥


श्रेष्ठं॑ वः॒ पेशो॒ अधि॑ धायि दर्श॒तं स्तोमो॑ वाजा ऋभव॒स्तं जु॑जुष्टन ।
धीरा॑सो॒ हि ष्ठा क॒वयो॑ विप॒श्चित॒स्तान्व॑ ए॒ना ब्रह्म॒णा वे॑दयामसि ॥ ७ ॥

श्रेष्ठं वः पेशः अधि धायि दर्शतं स्तोमः वाजाः ऋभवः तं जुजुष्टन ।
धीरासः हि स्थ कवयः विपःऽचितः तान् व एना ब्रह्मणा वेदयामसि ॥ ७ ॥

तुमचे सर्वोत्कृष्ट आणि दर्शनीय असें रूप आम्ही आपल्या अंतःकरणांत सांठविलेले आहे. सत्वालंकृत ऋभूंनो, हें तुमचे स्तवन तुम्ही आतां गोड करून घ्या. तुम्ही धीरोदात्त विचक्षण कवि आहांत, तेव्हां ह्या प्रार्थनास्तुतीनें आम्ही तुमचें चित्त आमच्याकडे ओढून घेत आहोंत. ॥ ७ ॥


यू॒यम॒स्मभ्यं॑ धि॒षणा॑भ्य॒स्परि॑ वि॒द्वांसो॒ विश्वा॒ नर्या॑णि॒ भोज॑ना ।
द्यु॒मन्तं॒ वाजं॒ वृष॑शुष्ममुत्त॒ममा नो॑ र॒यिमृ॑भवस्तक्ष॒ता वयः॑ ॥ ८ ॥

यूयं अस्मभ्यं धिषणाभ्यः परि विद्वांसः विश्वा नर्याणि भोजना ।
द्युऽमंतं वाजं वृषऽशुष्मं उत्ऽतमं आ नः रयिं ऋभवः तक्षता वयः ॥ ८ ॥

ऋभूंनो, तुम्ही ज्ञानींच आहांत, तेव्हां आमच्या ध्यानभक्तीनें प्रसन्न होऊन असे करा कीं लोकांना हितावह म्हणून जे जे गुण असतील ते आमच्यामध्यें आणा. आणि तेजस्वी, उत्कृष्ट व वीरश्रीमुळें ज्याचा वचक बसतो असें सत्वसामर्थ्य, दिव्य ऐश्वर्य आणि जवानीचा जोम ह्यांचीही आमच्या ठिकाणी योजना करा. ॥ ८ ॥


इ॒ह प्र॒जामि॒ह र॒यिं ररा॑णा इ॒ह श्रवो॑ वी॒रव॑त्तक्षता नः ।
येन॑ व॒यं चि॒तये॒मात्य॒न्यान्तं वाजं॑ चि॒त्रमृ॑भवो ददा नः ॥ ९ ॥

इह प्रऽजां इह रयिं रराणाः इह श्रवः वीरऽवत् तक्षत नः ।
येन वयं चितयेम अति अन्यान् तं वाजं चित्रं ऋभवः ददा नः ॥ ९ ॥

तुम्ही आनंदांत डुलत राहणारे देव आमच्याकरितां ह्या लोकीं प्रजा, ऐश्वर्य आणि वीरपुरुषांना योग्य अशी कीर्ति ह्यांची योजना करा, आणि ज्याच्यायोगानें इतरांपेक्षां आम्ही विशेष ठळक रीतीनें जगासमोर येऊं असें विलक्षण सामर्थ्य हे ऋभूंनो, आम्हांस कृपा करून द्या. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३७ (ऋभु सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - ऋभवः : छंद - त्रिष्टुप्


उप॑ नो वाजा अध्व॒रमृ॑भुक्षा॒ देवा॑ या॒त प॒थिभि॑र्देव॒यानैः॑ ।
यथा॑ य॒ज्ञं अनु॑षो वि॒क्ष्वा३॑सु द॑धि॒ध्वे र॑ण्वाः सु॒दिने॒ष्वह्ना॑म् ॥ १ ॥

उप नः वाजाः अध्वरं ऋभुक्षाः देवाः यात पथिऽभिः देवऽयानैः ।
यथा यज्ञं मनुषः विक्षु आसु दधिध्वे रण्वाः सुऽदिनेषु अह्नां ॥ १ ॥

सत्वसामर्थ्यमंडित ऋभुप्रभृति देवांनो, दिव्यविभूतींना योग्य अशा मार्गांनी आमच्या यागसमारंभास या. म्हणजे हे आनंदप्रद ऋभूंनो, ह्या मानवलोकीं अशा उत्तम दिवसांत आमच्या ह्या यज्ञाचा तुम्ही पुरस्कार करा. ॥ १ ॥


ते वो॑ हृ॒दे मन॑से सन्तु य॒ज्ञा जुष्टा॑सो अ॒द्य घृ॒तनि॑र्णिजो गुः ।
प्र वः॑ सु॒तासो॑ हरयन्त पू॒र्णाः क्रत्वे॒ दक्षा॑य हर्षयन्त पी॒ताः ॥ २ ॥

ते वः हृदे मनसे संतु यज्ञाः जुष्टासः अद्य घृतऽनिर्निजः गुः ।
प्र वः सुतासः हरयंत पूर्णाः क्रत्वे दक्षाय हर्षयंत पीताः ॥ २ ॥

तुम्ही मान्य करून घेतलेले, आणि घृताहुतींनी अलंकृत होऊन तुम्हाला पोहोंचलेले ते यज्ञ तुमच्या अंतःकरणांत, तुमच्या मनांत भरून राहोत. पात्रांमध्ये कांठोकांठ भरलेल्या सोमरसांनी तुमचे चित्त आकर्षण केलें तेव्हां त्यांचा आस्वाद घेऊन तुम्ही हृष्टचित्त झालां आणि आपले चातुर्य व कर्तबगारी हीं निदर्शनास आणलींत. ॥ २ ॥


त्र्यु॒दा॒यं दे॒वहि॑तं॒ यथा॑ व॒ स्तोमो॑ वाजा ऋभुक्षणो द॒दे वः॑ ।
जु॒ह्वे म॑नु॒ष्वदुप॑रासु वि॒क्षु यु॒ष्मे सचा॑ बृ॒हद्दि॑वेषु॒ सोम॑म् ॥ ३ ॥

त्रिऽउदायं देवऽहितं यथा वः स्तोमः वाजाः ऋभुक्षणः ददे वः ।
जुह्वे मनुष्वत् उपरासु विक्षु युष्मे इति सचा बृहत्ऽदिवेषु सोमं ॥ ३ ॥

तीन वेळां सोमसेवन करण्यास वेदीजवळ जाणें अशी देवांची आज्ञाच आहे. म्हणून वाज-ऋभुप्रभृति विभूतींनो मी हें स्तोत्र तुम्हाला अर्पण केलें आहे, आणि मनूप्रमाणे ह्या अलिकडील पिढींत, थोर दिव्य विभूतींमध्यें तुमच्या प्रित्यर्थ तात्काळ सोमरसाची आहुति देत असतो. ॥ ३ ॥


पीवो॑अश्वाः शु॒चद्र॑था॒ हि भू॒तायः॑ शिप्रा वाजिनः सुनि॒ष्काः ।
इंद्र॑स्य सूनो शवसो नपा॒तोऽ॑नु वश्चेत्यग्रि॒यं मदा॑य ॥ ४ ॥

पीवःऽअश्वाः शुचत्ऽरथाः हि भूत अयःऽशिप्राः वाजिनः सुऽनिष्काः ।
इंद्रस्य सूनो इति शवसः नपातः अनु वः चेति अग्रियं मदाय ॥ ४ ॥

तुमचे अश्व धष्टपुष्ट, रथ देदीप्यमान आणि शिरस्त्राण पोलादी आहे. वीरभूषणें धारण करणारे शूर योद्धे तुम्हीं आहांतच, तर हे इंद्रपुत्रांनो, हे सामर्थ्यपुत्रांनो, हा पहिल्या प्रतीचा सोमरस हर्षोल्लास व्हावा म्हणून तुम्हाला अर्पण होत आहे. ॥ ४ ॥


ऋ॒भुमृ॑भुक्षणो र॒यिं वाजे॑ वा॒जिन्त॑मं॒ युज॑म् ।
इन्द्र॑स्वन्तं हवामहे सदा॒सात॑मम॒श्विन॑म् ॥ ५ ॥

ऋभुं ऋभुक्षणः रयिं वाजे वाजिन्ऽतमं युजं ।
इंद्रस्वंतं हवामहे सदाऽसातमं अश्विनं ॥ ५ ॥

हे ऋभुक्षा, त्या ऐश्वर्यरूप ऋभूला, युद्धांमध्यें अत्यंत झुंझार अशा त्या जिवलग मित्राला, त्या इंद्ररक्षित आणि सर्वदा अत्यंत उदार अशा अश्वारूढ वीराला आम्ही नम्रभावानें पाचारण करतो. ॥ ५ ॥


सेदृ॑भवो॒ यमव॑थ यू॒यमिन्द्र॑श्च॒ मर्त्य॑म् ।
स धी॒भिर॑स्तु॒ सनि॑ता मे॒धसा॑ता॒ सो अर्व॑ता ॥ ६ ॥

सः इत् ऋभवः यं अवथ यूयं इंद्रः च मर्त्यं ।
स धीभिः अस्तु सनिता मेधऽसाता सः अर्वता ॥ ६ ॥

ऋभूंनो, तुम्ही आणि इंद्र असे ज्या दीन मानवावर कृपा कराल तोच बुद्धिवैभवानें संपन्न होवो, यज्ञकार्यामध्येंही तो चापल्ययुक्त होऊन मोठा दाता होवो. ॥ ६ ॥


वि नो॑ वाजा ऋभुक्षणः प॒थश्चि॑तन॒ यष्ट॑वे ।
अ॒स्मभ्यं॑ सूरय स्तु॒ता विश्वा॒ आशा॑स्तरी॒षणि॑ ॥ ७ ॥

वि नः वाजा ऋभुक्षणः पथः चितन यष्टवे ।
अस्मभ्यं सूरयः स्तुताः विश्वाः आशाः तरीषणि ॥ ७ ॥

सत्त्वाढ्य ऋभूंनो, यज्ञ करतां यावा म्हणून आमचा मार्ग सुप्रकाशित करा, म्हणजे हे संतधुरीणहो, तुमचें स्तवन केल्यानें सर्व आशा पाश तरून जाण्याच्या कामी आम्हास सहाय्य होईल. ॥ ७ ॥


तं नो॑ वाजा ऋभुक्षण॒ इन्द्र॒ नास॑त्या र॒यिम् ।
समश्वं॑ चर्ष॒णिभ्य॒ आ पु॒रु श॑स्त म॒घत्त॑ये ॥ ८ ॥

तं नः वाजाः ऋभुक्षणः इंद्र नासत्या रयिं ।
सं अश्वं चर्षणिऽभ्यः आ पुरु शस्त मघत्तये ॥ ८ ॥

सत्वविभूषित ऋभूंनो, भगवंता इंद्रा, हे नासत्यहो, दिव्य ऐश्वर्य आणि व्यापक बुद्धिसामर्थ्य हा वरलाभ आम्हा मानवांस मिळवितां यावा असा आम्हांस वारंवार आशीर्वाद द्या. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३८ (दधिक्रावन् सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - दधिक्रावन् : छंद - त्रिष्टुप्


उ॒तो हि वां॑ दा॒त्रा सन्ति॒ पूर्वा॒ या पू॒रुभ्य॑स्त्र॒सद॑स्युर्नितो॒शे ।
क्षे॒त्रा॒सां द॑दथुरुर्वरा॒सां घ॒नं दस्यु॑भ्यो अ॒भिभू॑तिमु॒ग्रम् ॥ १ ॥

उतो इति हि वां दात्रा संति पूर्वा या पूरुऽभ्यः त्रसदस्युः निऽतोशे ।
क्षेत्रऽसां ददथुः उर्वराऽसां घनं दस्युऽभ्यः अभिऽभूतिं उग्रं ॥ १ ॥

त्रसदस्यु राजानें पूर्वीं आपल्या मनुष्यांना ज्या देणग्या पाण्यासारख्या देऊन टाकल्या त्या तुमच्याच होत; कारण त्या देणग्यांतच सुपीक जमीनी संपादन करणारा, सर्व तऱ्हेच्या धान्यांनी समृद्ध असे भूमिगत हस्तगत करून देणारा, घोर पराक्रमी आणी दस्यूंना चेंचून टाकणारा जणों घणच अशा दधिक्रा महावीर तुम्ही दिलात. ॥ १ ॥


उ॒त वा॒जिनं॑ पुरुनि॒ष्षिध्वा॑नं दधि॒क्रामु॑ ददथुर्वि॒श्वकृ॑ष्टिम् ।
ऋ॒जि॒प्यं श्ये॒नं प्रु॑षि॒तप्सु॑मा॒शुं च॒र्कृत्य॑म॒र्यो नृ॒पतिं॒ न शूर॑म् ॥ २ ॥

उत वाजिनं पुरुनिःऽसिध्वानं दधिऽक्रां ऊं इति ददथुः विश्वऽकृष्टिं ।
ऋजिप्यं श्येनं प्रुषितऽप्सुं आशुं चर्कृत्यं अर्यः नृऽपतिं न शूरं ॥ २ ॥

बलाढ्य योद्धा, सर्वांपेक्षां वरचढ, सकल जनांचा शास्ता अशा प्रतिपालक वीर तुम्ही उभयतांनी दिलात तो जोरानें सरळ उड्डाण करणारा व आपला चित्रविचित्र पिसारा पसरून वेगानें भरारी मारणारा श्येनच किंवा संभावित आर्यजनांना माननीय शूर राजाच कीं काय असा होता. ॥ २ ॥


यं सी॒मनु॑ प्र॒वते॑व॒ द्रव॑न्तं॒ विश्वः॑ पू॒रुर्मद॑ति॒ हर्ष॑माणः ।
प॒ड्‌भिर्गृध्य॑न्तं मेध॒युं न शूरं॑ रथ॒तुरं॒ वात॑मिव॒ ध्रज॑न्तम् ॥ ३ ॥

यं सीं अनु प्रवताऽइव द्रवंतं विश्वः पूरुः मदति हर्षमाणः ।
पट्ऽभिः गृध्यंतं मेधऽयुं न शूरं रथऽतुरं वातंऽइव ध्रजंतं ॥ ३ ॥

उतरणीवरून खाली कोसळावें त्याप्रमाणे जो भर वेगानें घांवून दुष्टांना पायाखाली दाबून ठेवतो, पिळदार शरीरी मल्लाप्रमाणे शूर महारथी आणि प्रभंजनाप्रमाणें धुमश्चक्री उडवून देणारा जो हा योद्धा त्याला सर्वच लोक स्वतः हर्षभरीत होऊन आनंदित करतात. ॥ ३ ॥


यः स्मा॑रुन्धा॒नो गध्या॑ स॒मत्सु॒ सनु॑तर॒श्चर॑ति॒ गोषु॒ गच्छ॑न् ।
आ॒विर्‌ऋ॑जीको वि॒दथा॑ नि॒चिक्य॑त्ति॒रो अ॑र॒तिं पर्याप॑ आ॒योः ॥ ४ ॥

यः स्म आऽरुंधानः गध्या समत्ऽसु सनुऽतरः चरति गोषु गच्छन् ।
आविःऽऋजीकः विदथा निऽचिक्यत् तिरः अरतिं परि आपः आयोः ॥ ४ ॥

जो युद्धांमध्ये नाना तऱ्हेची लूट आटोक्यांत आणून देतो व ती अगदीं जिंकून घेऊन वीर पुरुषमंडलांत शिरून खुशाल फिरतो, ज्याची साधनसंपत्ती स्पष्टपणे दृगोचर होते, असा तो योद्धा अधार्मिकांस वगळून यज्ञसमारंभ आणि भाविकांची सत्कर्में ह्याच्याकडे कृपादृष्टीनें पाहतो. ॥ ४ ॥


उ॒त स्मै॑नं वस्त्र॒मथिं॒ न ता॒युमनु॑ क्रोशन्ति क्षि॒तयो॒ भरे॑षु ।
नी॒चाय॑मानं॒ जसु॑रिं॒ न श्ये॒नं श्रव॒श्चाच्छा॑ पशु॒मच्च॑ यू॒थम् ॥ ५ ॥

उत स्म एनं वस्त्रऽमथिं न तायुं अनु क्रोशंति क्षितयः भरेषु ।
नीचा अयमानं जसुरिं न श्येनं श्रवः च अच्छ पशुऽमत् च यूथं ॥ ५ ॥

वस्त्रें हिरावून घेणार्‍या जबरदस्तास पाहून जसे सुखवस्तु लोक घाबरून ओरडतात, अथवा एकदम झडप घालणार्‍या बुभुक्षित ससाण्यास पाहून जसे पक्षी एकच कल्लोळ मांडतात त्याप्रमाणे हा वीर युद्धांत कीर्ति संपादन करण्यासाठीं किंवा पशुसमूह जिंकून आणण्यासाठी निघाला म्हणजे रणांगणावर त्याला पाहून शत्रु भयानें ओरडत सुटतात. ॥ ५ ॥


उ॒त स्मा॑सु प्रथ॒मः स॑रि॒ष्यन्नि वे॑वेति॒ श्रेणि॑भी॒ रथा॑नाम् ।
स्रजं॑ कृण्वा॒नो जन्यो॒ न शुभ्वा॑ रे॒णुं रेरि॑हत्कि॒रणं॑ दद॒श्वान् ॥ ६ ॥

उत स्म आसु प्रथमः सरिष्यन् नि वेवेति श्रेणिऽभिः रथानां ।
स्रजं कृण्वानः जन्यः न शुभ्वा रेणुं रेरिहत् किरणं ददश्वान् ॥ ६ ॥

आणि हा महायोद्धाही पुढे चालून जाण्याच्या ईर्ष्येने रथांच्या मालिकेच्या आघडीस होऊन शत्रुसैन्यांत घुसतो व एखादा जातिवंत साज घातलेला घोडा टापांनी धूळ उडवून, लगाम कडकडून चावून तुटून पडतो त्याप्रमाणे दधिक्रा वीरही हल्ला चढवितो. ॥ ६ ॥


उ॒त स्य वा॒जी सहु॑रिर्‌ऋ॒तावा॒ शुश्रू॑षमाणस्त॒न्वा सम॒र्ये ।
तुरं॑ य॒तीषु॑ तु॒रय॑न्नृजि॒प्योऽ॑धि भ्रु॒वोः कि॑रते रे॒णुमृ॒ञ्जन् ॥ ७ ॥

उत स्यः वाजी सहुरिः ऋतऽवा शुश्रूषमाणः तन्वा सऽमर्ये ।
तुरं यतीषु तुरयत् ऋजिप्यः अधि भ्रुवोः किरते रेणुं ऋंजन् ॥ ७ ॥

शिवाय हा बलाढ्य योद्धा जगज्जेता परंतु धर्मप्रिय आहे. समरामध्ये तो स्वतः जातीनिशी झटून लढतो व झापाट्यानें धांवणार्‍या सैन्यामध्यें तुरमुंडी देऊन चढाई करतो, तेव्हां हातघाईस येऊन व धुरळा उडवून तो सर्वांच्याच भिवया वर विखरून देतो. ॥ ७ ॥


उ॒त स्मा॑स्य तन्य॒तोरि॑व॒ द्योर्‌ऋ॑घाय॒तो अ॑भि॒युजो॑ भयन्ते ।
य॒दा स॒हस्र॑म॒भि षी॒मयो॑धीद्दु॒र्वर्तुः॑ स्मा भवति भी॒म ऋ॒ञ्जन् ॥ ८ ॥

उत स्म अस्य तन्यतोःऽइव द्योः ऋघायतः अभिऽयुजः भयंते ।
यदा सहस्रं अभि सीं अयोधीत् दुःऽवर्तुः स्म भवति भीमः ऋंजन् ॥ ८ ॥

आकाशांतील मेघगर्जनेप्रमाणें सिंहनाद करून हल्ला करणार्‍या त्या योद्ध्यासन्मुख चाल करून आलेले शत्रु भयानें घाबरून जातात. आणि एकदां तो हजारो सैनिकांशी लढूं लागला म्हणजे त्यांतच गर्क होतो व अनिवार होऊन भयंकर दिसतो. ॥ ८ ॥


उ॒त स्मा॑स्य पनयन्ति॒ जना॑ जू॒तिं कृ॑ष्टि॒प्रो अ॒भिभू॑तिमा॒शोः ।
उ॒तैन॑माहुः समि॒थे वि॒यन्तः॒ परा॑ दधि॒क्रा अ॑सरत्स॒हस्रैः॑ ॥ ९ ॥

उत स्म अस्य पनयंति जना जूतिं कृष्टिऽप्रः अभिऽभूतिं आशोः ।
उत एनं आहुः संऽइथे विऽयंतः परा दधिऽक्रा असरत् सहस्रैः ॥ ९ ॥

मानवांचा प्रतिपाल करणार्‍या त्या महावेगवान वीराची तडफ व पराक्रम यांची सर्व जन स्तुतिच करतात आणि युद्धांमध्ये शत्रु त्याच्याविषयीं असे उद्गार काढतात कीं, "हा दधिक्रा आपल्या हजारो सैनिकानिशी येथून परत गेला म्हणजे आम्ही निभावलों." ॥ ९ ॥


आ द॑धि॒क्राः शव॑सा॒ पञ्च॑ कृ॒ष्टीः सूर्य॑ इव॒ ज्योति॑षा॒पस्त॑तान ।
स॒ह॒स्र॒साः श॑त॒सा वा॒ज्यर्वा॑ पृ॒णक्तु॒ मध्वा॒ समि॒मा वचां॑सि ॥ १० ॥

आ दधिऽक्राः शवसा पंच कृष्टीः सूर्यःऽइव ज्योतिषा अपः ततान ।
सहस्रऽसाः शतऽसा वाजी अर्वा पृणक्तु मध्वा सं इमा वचांसि ॥ १० ॥

सूर्य आपल्या प्रखर तेजानें आकाशांत जिकडे तिकडे बाष्प पसरून देतो त्याप्रमाणे आपल्या उफाळ बळानें दधिक्रावीर पांचही मानवजातींना सर्व पृथ्वीवर पसरून देतो. तो शेंकडोंच काय पण हजारो विजय संपादन करणारा आहे, तर असा तो शीघ्रसंचारी वीर ह्या आमच्या प्रार्थनांना माधुर्यानें भरून टाको. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३९ (दधिक्रावन् सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - दधिक्रा : छंद - त्रिष्टुप्


आ॒शुं द॑धि॒क्रां तमु॒ नु ष्ट॑वाम दि॒वस्पृ॑थि॒व्या उ॒त च॑र्किराम ।
उ॒च्छन्ती॒र्मामु॒षसः॑ सूदय॒न्त्वति॒ विश्वा॑नि दुरि॒तानि॑ पर्षन् ॥ १ ॥

आशुं दधिऽक्रां तं ऊं इति नु स्तवाम दिवः पृथिव्याः उत चर्किराम ।
उच्छंतीः मां उषसः सूदयंतु अति विश्वानि दुःऽइतानि पर्षन् ॥ १ ॥

त्या शीघ्रसंचारी दधिक्रा वीराची आणखी प्रशंसा करूं, व तशीच आकाश आणि पृथ्वी ह्यांचीही महती वर्णन करूं. आपल्या उज्वल प्रभेने प्रकाशित होणारी उषा मला ह्या कार्यांत उत्तेजन देऊन सर्व संकटांच्या पार नेवो. ॥ १ ॥


म॒हश्च॑र्क॒र्म्यर्व॑तः क्रतु॒प्रा द॑धि॒क्राव्णः॑ पुरु॒वार॑स्य॒ वृष्णः॑ ।
यं पू॒रुभ्यो॑ दीदि॒वांसं॒ नाग्निं द॒दथु॑र्मित्रावरुणा॒ ततु॑रिम् ॥ २ ॥

महः चर्कर्मि अर्वतः क्रतुऽप्राः दधिऽक्राव्णः पुरुऽवारस्य वृष्णः ।
यं पूरुऽभ्यः दीदिऽवांसं न अग्निं ददथुः मित्रावरुणा ततुरिं ॥ २ ॥

कर्तृत्वशक्ति ज्याच्या अंतरंगात भरून राहिली आहे तो थोर अजिंक्य योद्धा, तो सर्वजनप्रिय व कामनावर्षक दधिक्रा वीर, त्याचें गुणवर्णन आम्ही करीत आहोंत. मित्रावरुणांनो मनुष्यांना तुम्ही तेजःपुंज अग्नीचा जसा लाभ करून दिलात त्याप्रमाणे ह्या वीराचाही करून दिला आहांत. ॥ २ ॥


यो अश्व॑स्य दधि॒क्राव्णो॒ अका॑री॒त्समि॑द्धे अ॒ग्ना उ॒षसो॒ व्युष्टौ ।
अना॑गसं॒ तमदि॑तिः कृणोतु॒ स मि॒त्रेण॒ वरु॑णेना स॒जोषाः॑ ॥ ३ ॥

यः अश्वस्य दधिऽक्राव्णः अकारीत् संऽइद्धे अग्नौ उषसः विऽउउष्टौ ।
अनागसं तं अदितिः कृणोतु स मित्रेण वरुणेन सऽजोषाः ॥ ३ ॥

उषा जवळून अग्नि प्रज्वलित झाल असतांना त्याच्या सन्निध जो भक्त व्यापक अशा दधिक्रा वीराची स्तुति करतो त्याला अनाद्यनंत शक्ति पापनुर्मुक्त करो; तो जगन्मित्र वरुणाशी आनंदानें सायुज्य पावो. ॥ ३ ॥


द॒धि॒क्राव्ण॑ इ॒ष ऊ॒र्जो म॒हो यदम॑न्महि म॒रुतां॒ नाम॑ भ॒द्रम् ।
स्व॒स्तये॒ वरु॑णं मि॒त्रम॒ग्निं हवा॑मह॒ इन्द्रं॒ वज्र॑बाहुम् ॥ ४ ॥

दधिऽक्राव्ण इष ऊर्जः महः यत् अमन्महि मरुतां नाम भद्रं ।
स्वस्तये वरुणं मित्रं अग्निं हवामहे इंद्रं वज्रऽबाहुं ॥ ४ ॥

दधिक्रा वीराचा उत्साह, ओजस्विता, आणि तेज चिंतन जेव्हां जेव्हां आम्ही केलें तेव्हां तेव्हां मरुतांच्या मंगल नामाचेंही त्याच्याबरोबर स्मरण केलेले आहे. ॥ ४ ॥


इन्द्र॑मि॒वेदु॒भये॒ वि ह्व॑यन्त उ॒दीरा॑णा य॒ज्ञमु॑पप्र॒यन्तः॑ ।
द॒धि॒क्रामु॒ सूद॑नं॒ मर्त्या॑य द॒दथु॑र्मित्रावरुणा नो॒ अश्व॑म् ॥ ५ ॥

इंद्रंऽइव इत् उभये वि ह्वयंते उत्ऽईराणाः यज्ञं उपऽप्रयंतः ।
दधिऽक्रां ऊं इति सूदनं मर्त्याय ददथुः मित्रावरुणा नः अश्वं ॥ ५ ॥

यज्ञ करण्यास उद्युक्त झालेले आणि त्याला प्रारंभ केलेले असे दोन्ही प्रकारचे भक्तजन इंद्राप्रमाणें त्या दधिक्रा वीरालाही आपआपल्या परीनें विनंति करीत असतात. मित्रावरुणांनो, सत्कार्योत्तेजक व व्यापक वीर दधिक्रा तो जो आम्हाला मनुष्य हितार्थ तुम्हीच दिला आहांत. ॥ ५ ॥


द॒धि॒क्राव्णो॑ अकारिषं जि॒ष्णोरश्व॑स्य वा॒जिनः॑ ।
सु॒र॒भि नो॒ मुखा॑ कर॒त्प्र ण॒ आयूं॑षि तारिषत् ॥ ६ ॥

दधिऽक्राव्णः अकारिषं जिष्णोः अश्वस्य वाजिनः ।
सुरभि नः मुखा करत् प्र नः आयूंषि तारिषत् ॥ ६ ॥

जगज्जेता, सर्वत्रगति आणि सत्वाढ्य योद्धा दधिक्रा, त्याची महती ह्याप्रमाणे मी वर्णन केली. तो आमच्या मुखांना सुवासित करो आणि आमचीं आयुष्यें वृद्धिंगत करो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४० (दधिक्रावन् सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - दधिक्रावन् : छंद - त्रिष्टुप्


द॒धि॒क्राव्ण॒ इदु॒ नु च॑र्किराम॒ विश्वा॒ इन्मामु॒षसः॑ सूदयन्तु ।
अ॒पाम॒ग्नेरु॒षसः॒ सूर्य॑स्य॒ बृह॒स्पते॑राङ्गि र॒सस्य॑ जि॒ष्णोः ॥ १ ॥

दधिऽक्राव्ण इत् ऊं इति नु चर्किराम विश्वा इत् मां उषसः सूदयंतु ।
अपां अग्नेः उषसः सूर्यस्य बृहस्पतेः आंगिरसस्य जिष्णोः ॥ १ ॥

आतां दधिक्रा वीराचेंच आम्ही संकीर्तन करूं आणि ह्या कार्यांत सर्व उषःकाल मला स्फूर्ति देवोत. ही केवळ दधिक्राचीच प्रशंसा नव्हे तर आपोदेवी, अग्नि, उषा, सूर्य, बृहस्पति आणि अंगिराकुलोत्पन्न जो जयशाली वीर त्याचीही ती स्तुति होय. ॥ १ ॥


सत्वा॑ भरि॒षो ग॑वि॒षो दु॑वन्य॒सच्छ्र॑व॒स्यादि॒ष उ॒षस॑स्तुरण्य॒सत् ।
स॒त्यो द्र॒वो द्र॑व॒रः प॑तंग॒रो द॑धि॒क्रावेष॒मूर्जं॒ स्वर्जनत् ॥ २ ॥

सत्वा भरिषः गोऽइषः दुवन्यऽसत् श्रवस्यात् इष उषसः तुरण्यऽसत् ।
सत्यः द्रवः द्रवरः पतंगरः दधिऽक्रावा इषं ऊर्जं स्वः जनत् ॥ २ ॥

तो कसलेला, युद्धोत्सुक आणि प्रकाश-गोधन हस्तगत करून घेणारा आहे. तो भाविक आणि त्वरित उद्योग करणार्‍या भक्तमंडळांतच सर्वकाळ राहतो, तेव्हां तो आजचे उषःकालीन, औत्सुक्यस्फुरित स्तवन ऐकण्याची इच्छा करो. तो सत्य आहे, भक्तीनें द्रवणारा - अतिशय द्रवणारा आहे. तर असा तो तीव्रवेग दधिक्रा उत्साह, ओज आणि दिव्य तेज हीं आमच्यामध्यें उत्पन्न करो. ॥ २ ॥


उ॒त स्मा॑स्य॒ द्रव॑तस्तुरण्य॒तः प॒र्णं न वेरनु॑ वाति प्रग॒र्धिनः॑ ।
श्ये॒नस्ये॑व॒ ध्रज॑तो अङ्क्॒सं परि॑ दधि॒क्राव्णः॑ स॒होर्जा तरि॑त्रतः ॥ ३ ॥

उत स्म अस्य द्रवतः तुरण्यतः पर्णं न वेः अनु वाति प्रऽगर्धिनः ।
श्येनस्यऽइव ध्रजतः अं‍कसं परि दधिऽक्राव्णः सह ऊर्जा तरित्रतः ॥ ३ ॥

हा चपल आणि सत्कार्याची हांव धरणारा दधिक्रा वीर वेगानें धांवून, आपल्या ओजस्वितेनें सैन्यांतून फळी फोडून जात असतांना त्याचा समला पक्ष्याच्या पिसार्‍याप्रमाणें - झपाट्यानें उडणार्‍या श्येन पक्ष्याच्या पिसार्‍याप्रमाणे - ज्याच्या कुशीच्या बाजूस फडफडत असतो. ॥ ३ ॥


उ॒त स्य वा॒जी क्षि॑प॒णिं तु॑रण्यति ग्री॒वायां॑ ब॒द्धो अ॑पिक॒क्ष आ॒सनि॑ ।
क्रतुं॑ दधि॒क्रा अनु॑ सं॒तवी॑त्वत्प॒थामङ्कां॒ःस्यन्वा॒पनी॑फणत् ॥ ४ ॥

उत स्यः वाजी क्षिपणिं तुरण्यति ग्रीवायां बद्धः अपिऽकक्षे आसनि ।
क्रतुं दधिऽक्रा अनु संऽतवीत्वत् पथां अं‍कांसि अनु आऽपनीफणत् ॥ ४ ॥

तो जोरदार धीर जसा एखादा अश्व माषेंत, खांद्यात आणि तोंडात (लगाम, तंग वगैरेनी) जखडला असून चौखुर उड्या मारीत जोरानें दौडत जावा त्याप्रमाणे वेगानें धांवून जातो. तो दधिक्रा वीर आपल्या कर्तृत्वशक्तीस साजेल अशा रीतीनें आंग आवरून धरून कितीही वळणें असली तरी त्या वळणांच्या धोरणानें ताड ताड उड्या मारीत आपल्या मार्गानें जातो. ॥ ४ ॥


हं॒सः शु॑चि॒षद्वसु॑रन्तरिक्ष॒सद्धोता॑ वेदि॒षदति॑थिर् दुरोण॒सत् ।
नृ॒षद्व॑र॒सदृ॑त॒सद्व्यो॑म॒सद॒ब्जा गो॒जा ऋ॑त॒जा अ॑द्रि॒जा ऋ॒तम् ॥ ५ ॥

हंसः शुचिऽसत् वसुः अंतरिक्षऽसत् धोता वेदिऽसत् अतिथिः दुरोणऽसत् ।
नृऽसत् वरऽसत् ऋतऽसत् व्योमऽसत् अप्ऽजाः गोऽजाः ऋतऽजाः अद्रिऽजाः ऋतं ॥ ५ ॥

हा निष्कलंक तेजाच्या ठिकाणी अधिष्टित होणारा हंस आहे, अंतरिक्षांत विराजमान होणारा दिव्यनिधि आहे. वेदीवर आरोहण करणारा अग्निरूप होता आहे, आणि यजमानाच्या घरी वास करणारा अतिघि आहे. हा शूरांच्या समाजांत वावरतो, अत्युच्च लोकीं नांदत असतो आणि सद्धर्मांत भरून राहून पुनः आकाशांतही स्थानापन्न होतो. तो दिव्योदकांत प्रकट होतो, प्रकाशापासून आविर्भूत होतो, व सद्धर्मापासून आणि पर्वतापासूनही प्रकट होतो. तो धर्मरूप आहे. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP