PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त २१ ते ३०

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २१ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ए॒ते धा॑व॒न्तीन्द॑वः॒ सोमा॒ इन्द्रा॑य॒ घृष्व॑यः ।
म॒त्स॒रासः॑ स्व॒र्विदः॑ ॥ १ ॥

एते धावन्ति इन्दवः सोमाः इन्द्राय घृष्वयः मत्सरासः स्वः विदः ॥ १ ॥

शत्रूला घांसून टाकणारे हे आल्हादप्रद सोमबिन्दु इंद्राकडे धांवतच जात आहेत. ते आवेश उत्पन्न करितात आणि दिव्यप्रकाशाचा लाभ घडवितात. १.


प्र॒वृ॒ण्वन्तो॑ अभि॒युजः॒ सुष्व॑ये वरिवो॒विदः॑ ।
स्व॒यं स्तो॒त्रे व॑य॒स्कृतः॑ ॥ २ ॥

प्र वृण्वन्तः अभि युजः सुस्वये वरिवः विदः स्वयं स्तोत्रे वयः कृतः ॥ २ ॥

प्रतिस्पर्ध्यांना ते घेरून टाकतात. जो उत्तम रीतीनें रस पिळतो त्याला पाहिजे तें उत्तम वरदान देतात, आणि आपण होऊन स्तोत्रकर्त्याच्या ठिकाणीं तारुण्याचा जोम उत्पन्न करतात. २.


वृथा॒ क्रीळ॑न्त॒ इन्द॑वः स॒धस्थं॑ अ॒भ्य् एकं॒ इत् ।
सिन्धो॑रू॒र्मा व्य् अक्षरन् ॥ ३ ॥

वृथा क्रीळन्तः इन्दवः सध स्थं अभि एकं इत् सिन्धोः ऊर्मा वि अक्षरन् ॥ ३ ॥

सहजगत्या क्रीडा करीत करीत सोमबिंदू हे आपलें एकच नियमित स्थान म्हणजे नदीप्रवाहाच्या लहरी त्यांत वहात गेले. ३.


ए॒ते विश्वा॑नि॒ वार्या॒ पव॑मानास आशत ।
हि॒ता न सप्त॑यो॒ रथे॑ ॥ ४ ॥

एते विश्वानि वार्या पवमानासः आशत हिताः न सप्तयः रथे ॥ ४ ॥

ह्या पावन सोमरसांनीं रथाला जोडलेल्या अश्वांप्रमाणें भक्तांना सकल उत्तमोत्तम वस्तूंचा लाभ करून दिला. ४.


आस्मि॑न् पि॒शङ्गं॑ इन्दवो॒ दधा॑ता वे॒नं आ॒दिशे॑ ।
यो अ॒स्मभ्यं॒ अरा॑वा ॥ ५ ॥

आ अस्मिन् पिशङ्गं इन्दवः दधात वेनं आदिशे यः अस्मभ्यं अरावा ॥ ५ ॥

आल्हादप्रद बिंदूनों, योग्य मार्ग लागावा म्हणून ह्या आमच्या यज्ञकर्त्या जवळ मनोहर केशरी रंगाचें सुवर्ण ठेवा. कारण तो आम्हांला आतां कांहींच देणगी देऊं शकत नाहीं. ५.


ऋ॒भुर्न रथ्यं॒ नवं॒ दधा॑ता॒ केतं॑ आ॒दिशे॑ ।
शु॒क्राः प॑वध्वं॒ अर्ण॑सा ॥ ६ ॥

ऋभुः न रथ्यं नवं दधात केतं आदिशे शुक्राः पवध्वं अर्णसा ॥ ६ ॥

रथी ज्याप्रमाणें नवीन अश्वाला शिकवितो त्याप्रमाणें योग्य मार्ग लागावा म्हणून ह्या यज्ञकर्त्याच्या ठिकाणीं नवीन धोरण उत्पन्न करा; आणि तेजःपुंज असे तुम्हीं रसकल्लोळ उडवीत कुशपवित्रांतून स्वच्छ प्रवाहानें वहा. ६.


ए॒त उ॒ त्ये अ॑वीवश॒न् काष्ठां॑ वा॒जिनो॑ अक्रत ।
स॒तः प्रासा॑विषुर्म॒तिम् ॥ ७ ॥

एते ओं इति त्ये अवीवशन् काष्ठां वाजिनः अक्रत सतः प्र असाविषुः मतिम् ॥ ७ ॥

नंतर ह्या सोमरसांनीं खळखळ शब्द केला; सत्वसंपन्न सोमरसांनीं आपलें निवासस्थान निश्चित केले, आणि सद्भक्तांमध्यें उत्तम बुध्दी उत्पन्न केली. ७.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २२ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ए॒ते सोमा॑स आ॒शवो॒ रथा॑ इव॒ प्र वा॒जिनः॑ ।
सर्गाः॑ सृ॒ष्टा अ॑हेषत ॥ १ ॥

एते सोमासः आशवः रथाः इव प्र वाजिनः सर्गाः सृष्टाः अहेषत ॥ १ ॥

पहा हे सोमरस कसे शीघ्रव्यापक आहेत. रथाला जोडलेल्या झुंजार अश्वांप्रमाणें त्यांना भरवेगानें सोडल्याबरोबर ते खिंकाळतच गेले. १.


ए॒ते वाता॑ इवो॒रवः॑ प॒र्जन्य॑स्येव वृ॒ष्टयः॑ ।
अ॒ग्नेरि॑व भ्र॒मा वृथा॑ ॥ २ ॥

एते वाताः इव उरवः पर्जन्यस्य इव वृष्टयः अग्नेः इव भ्रमाः वृथा ॥ २ ॥

हे वायूप्रमाणें प्रभंजन, पर्जन्याच्या वृष्टिप्रमाणें वर्षणशील, आणि अग्नीच्या सहज उडणार्‍या ठिणग्यांप्रमाणें तेजस्वी आहेत. २.


ए॒ते पू॒ता वि॑प॒श्चितः॒ सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ।
वि॒पा व्य् आनशु॒र्धियः॑ ॥ ३ ॥

एते पूताः विपः चितः सोमासः दधि आशिरः विपा वि आनशुः धियः ॥ ३ ॥

घट्ट दुधाशीं मिश्रित झालेल्या ह्या पवित्र आणि ज्ञानशील, सोमरसांनीं स्तुतींच्या योगानें भक्तांच्या बुध्दींना व्याप्त करून टाकलें. ३.


ए॒ते मृ॒ष्टा अम॑र्त्याः ससृ॒वांसो॒ न श॑श्रमुः ।
इय॑क्षन्तः प॒थो रजः॑ ॥ ४ ॥

एते मृष्टाः अमर्त्याः ससृ वांसः न शश्रमुः इयक्षन्तः पथः रजः ॥ ४ ॥

हे स्वच्छ झालेले अमर रस, रजोलोकाचा मार्ग यज्ञानें खुला करणारे हे रसप्रवाह वहात असतांना कधीं दमत नाहींत, एकसारखे वहात असतात. ४.


ए॒ते पृ॒ष्ठानि॒ रोद॑सोर्विप्र॒यन्तो॒ व्य् आनशुः ।
उ॒तेदं उ॑त्त॒मं रजः॑ ॥ ५ ॥

एते पृष्ठानि रोदसोः वि प्रयन्तः वि आनशुः उत इदं उत् तमं रजः ॥ ५ ॥

हे नानाप्रकारानीं वेगानें वहाणारे सोमरस द्यावापृथ्वींच्या पृष्ठभागालाहि व्यापून राहिले, आणि तिथून त्यांनीं अत्युच्च रजोलोकहि व्याप्त करून टाकला. ५.


तन्तुं॑ तन्वा॒नं उ॑त्त॒मं अनु॑ प्र॒वत॑ आशत ।
उ॒तेदं उ॑त्त॒माय्य॑म् ॥ ६ ॥

तन्तुं तन्वानं उत् तमं अनु प्र वतः आशत उत इदं उत्तमाय्यम् ॥ ६ ॥

ते खालीं वहात जातात-आणि उत्कृष्ट जो यज्ञरूप तन्तु तो कांतून त्याचा शेवट गोड करतात. हेंच त्यांचें उत्तमांतील उत्तम कार्य होय. ६.


त्वं सो॑म प॒णिभ्य॒ आ वसु॒ गव्या॑नि धारयः ।
त॒तं तन्तुं॑ अचिक्रदः ॥ ७ ॥

त्वं सोम पणि भ्यः आ वसु गव्यानि धारयः ततं तन्तुं अचिक्रदः ॥ ७ ॥

हे सोमा जे कंजूष आहेत जे दान करीत नाहींत, त्यांच्याकडून गोधन आणि द्रव्य हिसकावून घेऊन आपल्यापाशीं ठेव; यज्ञरूप तन्तु कांतला जाऊन तो पुरा झाला अशी तूंच गर्जना केली नाहींस काय ? ७.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


सोमा॑ असृग्रं आ॒शवो॒ मधो॒र्मद॑स्य॒ धार॑या ।
अ॒भि विश्वा॑नि॒ काव्या॑ ॥ १ ॥

सोमाः असृग्रं आशवः मधोः मदस्य धारया अभि विश्वानि काव्या ॥ १ ॥

शीघ्रव्यापक सोमरस आवेश उत्पन्न करणार्‍या मधुररसाच्या धारेनें सर्व प्रकारच्या काव्यस्फूर्तींचा आदर करून पात्रांत ओतले जातात. १.


अनु॑ प्र॒त्नास॑ आ॒यवः॑ प॒दं नवी॑यो अक्रमुः ।
रु॒चे ज॑नन्त॒ सूर्य॑म् ॥ २ ॥

अनु प्रत्नासः आयवः पदं नवीयः अक्रमुः रुचे जनन्त सूर्यम् ॥ २ ॥

पुरातन आणि आयुष्यवर्धक सोमरसांनीं नवीन वसतिस्थान आक्रमून टाकलें, आणि सूर्यानें प्रकाशित व्हावें म्हणून त्याला प्रकट केलें. २.


आ प॑वमान नो भरा॒र्यो अदा॑शुषो॒ गय॑म् ।
कृ॒धि प्र॒जाव॑ती॒रिषः॑ ॥ ३ ॥

आ पवमान नः भर अर्यः अदाशुषः गयं कृधि प्रजावतीः इषः ॥ ३ ॥

हे पावनप्रवाहा रसा, तूं आमचा प्रभु आहेस; तर दानपराङ्‍मुख दुष्टाचा प्रदेश आमच्या स्वाधीन कर आणि आमच्या प्रजेच्या योगानें आमचा उत्साह अलकृंत कर. ३.


अ॒भि सोमा॑स आ॒यवः॒ पव॑न्ते॒ मद्यं॒ मद॑म् ।
अ॒भि कोशं॑ मधु॒श्चुत॑म् ॥ ४ ॥

अभि सोमासः आयवः पवन्ते मद्यं मदं अभि कोशं मधु श्चुतम् ॥ ४ ॥

आयुष्यवर्धक सोमपल्लव आवेश उत्पन्न करणार्‍या आपल्या मधुररसाचा प्रवाह मधानें ओथंबलेल्या एका मोठ्या पात्रांत सोडून देतात. ४.


सोमो॑ अर्षति धर्ण॒सिर्दधा॑न इन्द्रि॒यं रस॑म् ।
सु॒वीरो॑ अभिशस्ति॒पाः ॥ ५ ॥

सोमः अर्षति धर्णसिः दधानः इन्द्रियं रसं सु वीरः अभिशस्ति पाः ॥ ५ ॥

जगध्दारक सोमपल्लव हा इंद्रियांना तरतरी आणणारा जो रस त्याच्यामध्यें असतो तो बाहेर सोडतो; असा हा सोमपल्लव वीर्यशाली आणि अनिष्टनिवारक आहे. ५.


इन्द्रा॑य सोम पवसे दे॒वेभ्यः॑ सध॒माद्यः॑ ।
इन्दो॒ वाजं॑ सिषाससि ॥ ६ ॥

इन्द्राय सोम पवसे देवेभ्यः सध माद्यः इन्दो इति वाजं सिसाससि ॥ ६ ॥

हे सोमा, सर्वांना तूं एकदम आवेश उत्पन्न करतोस; तूं इंद्राप्रीत्यर्थ, दिव्यविबुधांप्रीत्यर्थ रसप्रवाह सोडतोस; आणि हे आल्हादप्रदा, सत्वसामर्थ्याचा लाभ भक्तांना घडवितोस. ६.


अ॒स्य पी॒त्वा मदा॑नां॒ इन्द्रो॑ वृ॒त्राण्य् अ॑प्र॒ति ।
ज॒घान॑ ज॒घन॑च् च॒ नु ॥ ७ ॥

अस्य पीत्वा मदानां इन्द्रः वृत्राणि अप्रति जघान जघनत् च नु ॥ ७ ॥

ह्या सोमपल्लवाचा हर्षकारक रस प्राशन करून इंद्रानें धडाक्यासरशीं वृत्राला ठार केलें आणि पुढेंहि कारण पडेल त्या वेळीं असेंच ठार करील. ७.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्र सोमा॑सो अधन्विषुः॒ पव॑मानास॒ इन्द॑वः ।
श्री॒णा॒ना अ॒प्सु मृ॑ञ्जत ॥ १ ॥

प्र सोमासः अधन्विषुः पवमानासः इन्दवः श्रीणानाः अप् सु मृजत ॥ १ ॥

पवित्रप्रवाही आल्हादप्रद सोमरसबिन्दु उचंबळून राहिले आहेत; आणि दुग्ध मिश्रित होऊन वसतीवरी उदकांत स्वच्छ धुतलेले आहेत. १.


अ॒भि गावो॑ अधन्विषु॒रापो॒ न प्र॒वता॑ य॒तीः ।
पु॒ना॒ना इन्द्रं॑ आशत ॥ २ ॥

अभि गावः अधन्विषुः आपः न प्र वता यतीः पुनानाः इन्द्रं आशत ॥ २ ॥

उतरत्या जागेकडे उदकें वेगानें वहातात त्याप्रमाणें सोमरसाकडे गोदुग्ध उसळून वहात गेलें आणि सोमरसाला अलंकृत करून इंद्राच्या ठिकाणीं जाऊन पोहोंचलें. २.


प्र प॑वमान धन्वसि॒ सोमेन्द्रा॑य॒ पात॑वे ।
नृभि॑र्य॒तो वि नी॑यसे ॥ ३ ॥

प्र पवमान धन्वसि सोम इन्द्राय पातवे नृ भिः यतः वि नीयसे ॥ ३ ॥

पावनप्रवाहा सोमा, इंद्रानें तुजला प्राशन करावें म्हणून तूं उचंबळून वहातोस आणि म्हणूनच शूर ऋत्विजांकडून तूं त्याच्याकडे नेला जातोस. ३.


त्वं सो॑म नृ॒माद॑नः॒ पव॑स्व चर्षणी॒सहे॑ ।
सस्नि॒र्यो अ॑नु॒माद्यः॑ ॥ ४ ॥

त्वं सोम नृ मादनः पवस्व चर्षणि सहे सस्निः यः अनु माद्यः ॥ ४ ॥

सोमा, तूं शूरांना आवेश चढविणारा आहेस. हे चराचरांना पादाक्रांत करणार्‍या रसा, तूं वहात रहा. असा तूं वरद आहेस, आणि प्रशंसनीय आहेस. ४.


इन्दो॒ यदद्रि॑भिः सु॒तः प॒वित्रं॑ परि॒धाव॑सि ।
अरं॒ इन्द्र॑स्य॒ धाम्ने॑ ॥ ५ ॥

इन्दो इति यत् अद्रि भिः सुतः पवित्रं परि धावसि अरं इन्द्रस्य धाम्ने ॥ ५ ॥

आल्हादप्रद सोमा, ग्राव्यांनीं तुझा रस पिळतांच तूं कुशपवित्राकडे धांवत जातोस, आणि इंद्राच्या तेजस्वितेला अनुरूपता आणतोस. ५.


पव॑स्व वृत्रहन्तमो॒क्थेभि॑रनु॒माद्यः॑ ।
शुचिः॑ पाव॒को अद्भु॑तः ॥ ६ ॥

पवस्व वृत्रहन् तम उक्थेभिः अनु माद्यः शुचिः पावकः अद्भुतः ॥ ६ ॥

वृत्राचा समूळ नाश करणार्‍या रसा, तुझी स्तुति उक्थ स्तोत्रांनीं करणें योग्यच आहे. तूं स्वतः शुध्द, दुसर्‍यालाहि पवित्र करणारा, आणि अद्भुतरूप आहेस. ६.


शुचिः॑ पाव॒क उ॑च्यते॒ सोमः॑ सु॒तस्य॒ मध्वः॑ ।
दे॒वा॒वीर॑घशंस॒हा ॥ ७ ॥

शुचिः पावकः उच्यते सोमः सुतस्य मध्वः देव अवीः अघशंस हा ॥ ७ ॥

पिळलेल्या मधुर पल्लवाचा तो शुध्द, पावन सोमरस, देवाला प्रसन्न करणारा आणि पापनाशन आहे हेंच सर्वजण सांगतात. ७.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २५ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - दृळ्हच्युत आगस्त्य : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


पव॑स्व दक्ष॒साध॑नो दे॒वेभ्यः॑ पी॒तये॑ हरे ।
म॒रुद्भ्यो॑ वा॒यवे॒ मदः॑ ॥ १ ॥

पवस्व दक्ष साधनः देवेभ्यः पीतये हरे मरुत् भ्यः वायवे मदः ॥ १ ॥

हे चातुर्यबलाच्या साधना, हरिद्वर्णा सोमा, दिव्यविबुधांनीं तुला प्राशन करावें म्हणून तुझा पवित्रप्रवाह वाहूं दे. तूं मरुतांना आणि वायूलाहि हर्षप्रद होतोस. १.


पव॑मान धि॒या हि॒तोऽ॒भि योनिं॒ कनि॑क्रदत् ।
धर्म॑णा वा॒युं आ वि॑श ॥ २ ॥

पवमान धिया हितः अभि योनिं कनिक्रदत् धर्मणा वायुं आ विश ॥ २ ॥

पावनप्रवाहा, भक्तांनीं ध्यानपूर्वक तुला वेदीवर ठेवला म्हणजे तूं गर्जना करतोस, तर आपल्या स्वभावधर्मानुरूप तूं वायूमध्यें प्रवेश कर. २.


सं दे॒वैः शो॑भते॒ वृषा॑ क॒विर्योना॒व् अधि॑ प्रि॒यः ।
वृ॒त्र॒हा दे॑व॒वीत॑मः ॥ ३ ॥

सं देवैः शोभते वृषा कविः योनौ अधि प्रियः वृत्र हा देव वीतमः ॥ ३ ॥

दिव्यविभूतिंसह हा वीरपुंगव सोम फार खुलून दिसतो. वेदीवर अधिष्ठित होणारा, सर्वांना प्रिय असा हा काव्यप्रेरक सोमरस अज्ञानरूप वृत्राचा नाश करणारा, आणि देवाला पूर्णपणें प्रसन्न करणारा आहे. ३.


विश्वा॑ रू॒पाण्य् आ॑वि॒शन् पु॑ना॒नो या॑ति हर्य॒तः ।
यत्रा॒मृता॑स॒ आस॑ते ॥ ४ ॥

विश्वा रूपाणि आ विशन् पुनानः याति हर्यतः यत्र अमृतासः आसते ॥ ४ ॥

तो सर्वप्रिय सोमरस प्रसन्न होऊन, सर्वांच्या शरीरांत भिनून, ज्या ठिकाणीं अमरविभूति वास करतात तेथें गमन करतो. ४.


अ॒रु॒षो ज॒नय॒न् गिरः॒ सोमः॑ पवत आयु॒षक् ।
इन्द्रं॒ गच्छ॑न् क॒विक्र॑तुः ॥ ५ ॥

अरुषः जनयन् गिरः सोमः पवते आयुषक् इन्द्रं गच्चन् कवि क्रतुः ॥ ५ ॥

तेजस्वी आणि काव्यस्फूर्ति देणारा सोम, मानवांचें हित करण्यासाठीं इंद्राकडे जाणारा हा अत्यंत प्रतिभावान् सोम, पहा कसा वहात आहे. ५.


आ प॑वस्व मदिन्तम प॒वित्रं॒ धार॑या कवे ।
अ॒र्कस्य॒ योनिं॑ आ॒सद॑म् ॥ ६ ॥

आ पवस्व मदिन् तम पवित्रं धारया कवे अर्कस्य योनिं आसदम् ॥ ६ ॥

हे अत्यंत हर्षप्रदा, हे काव्यप्रेरका, सूर्याचें स्थान जो द्युलोक तेथें अधिष्ठित होण्याकरितां पवित्रांतून धाराप्रवानें एकसारखा वहात रहा. ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २६ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - इध्मवाह दार्ढच्युत : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


तं अ॑मृक्षन्त वा॒जिनं॑ उ॒पस्थे॒ अदि॑ते॒रधि॑ ।
विप्रा॑सो॒ अण्व्या॑ धि॒या ॥ १ ॥

तं अमृक्षन्त वाजिनं उप स्थे अदितेः अधि विप्रासः अण्व्या धिया ॥ १ ॥

त्या सत्वधीर सोमाला अदितीच्या अंकावर बसवून भाविक स्तोत्यांनीं आपल्या सूक्ष्मदर्शी बुध्दिमत्तेनें स्वच्छ केलें. १.


तं गावो॑ अ॒भ्यनूषत स॒हस्र॑धारं॒ अक्षि॑तम् ।
इन्दुं॑ ध॒र्तारं॒ आ दि॒वः ॥ २ ॥

तं गावः अभि अनूषत सहस्र धारं अक्षितं इन्दुं धर्तारं आ दिवः ॥ २ ॥

सहस्त्रावधि धारा सोडणारा, अक्षय्य, आणि द्युलोकाचा धारक जो सोम त्याचें धेनूंनींहि उच्चस्वरानें स्तवन केलें. २.


तं वे॒धां मे॒धया॑ह्य॒न् पव॑मानं॒ अधि॒ द्यवि॑ ।
ध॒र्ण॒सिं भूरि॑धायसम् ॥ ३ ॥

तं वेधां मेधया अह्यन् पवमानं अधि द्यवि धर्णसिं भूरि धायसम् ॥ ३ ॥

रचनाकुशल, पवित्रप्रवाही, जगत्‌धारक, आणि सर्वपोषक अशा सोमाला ऋत्विजांनीं आपल्या भक्तिभावनेनें द्युलोकीं पाठविलें. ३.


तं अ॑ह्यन् भु॒रिजो॑र्धि॒या सं॒वसा॑नं वि॒वस्व॑तः ।
पतिं॑ वा॒चो अदा॑भ्यम् ॥ ४ ॥

तं अह्यन् भुरिजोः धिया सं वसानं विवस्वतः पतिं वाचः अदाभ्यम् ॥ ४ ॥

विवस्वानासह एकत्र राहणारा, वाणीचा अप्रतिहत प्रेरक जो सोम, त्याला काव्यप्रसू बुध्दिमत्तेनें रसप्रवाह वाहावयास लाविलें. ४.


तं साना॒व् अधि॑ जा॒मयो॒ हरिं॑ हिन्व॒न्त्यद्रि॑भिः ।
ह॒र्य॒तं भूरि॑चक्षसम् ॥ ५ ॥

तं सानौ अधि जामयः हरिं हिन्वन्ति अद्रि भिः हर्यतं भूरि चक्षसम् ॥ ५ ॥

त्या हरिद्वर्ण, सर्वप्रिय, सकलदर्शी सोमाला भक्तांच्या हस्ताङ्गुली ग्राव्यांच्या योगानें पिळून उच्च शिखरावर ठेवून तेथून हेलावून देतात. ५.


तं त्वा॑ हिन्वन्ति वे॒धसः॒ पव॑मान गिरा॒वृध॑म् ।
इन्द॒व् इन्द्रा॑य मत्स॒रम् ॥ ६ ॥

तं त्वा हिन्वन्ति वेधसः पवमान गिरावृधं इन्दो इति इन्द्राय मत्सरम् ॥ ६ ॥

म्हणूनच हे पावना, हे आल्हादप्रदा, स्तुतींनीं वृध्दिंगत होणारा आणि हृष्टचित्त करणारा जो तूं त्याला काव्योत्कर्षी भक्त, इंद्राकडे पोहोंचवून देतात. ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २७ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - नृमेध अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ए॒ष क॒विर॒भिष्टु॑तः प॒वित्रे॒ अधि॑ तोशते ।
पु॒ना॒नो घ्नन्न् अप॒ स्रिधः॑ ॥ १ ॥

एषः कविः अभि स्तुतः पवित्रे अधि तोशते पुनानः घ्नन् अप स्रिधः ॥ १ ॥

हा काव्यप्रेरक सोम, देवाचें गुणवर्णन केलें म्हणजे अधार्मिकांचा अगदीं निःपात करून कुशपवित्राकडे वेगानें खळाळत जातो. १.


ए॒ष इन्द्रा॑य वा॒यवे॑ स्व॒र्जित् परि॑ षिच्यते ।
प॒वित्रे॑ दक्ष॒साध॑नः ॥ २ ॥

एषः इन्द्राय वायवे स्वः जित् परि सिच्यते पवित्रे दक्ष साधनः ॥ २ ॥

हा चातुर्यबलदाता, दिव्यप्रकाशाचा जेता सोम, इंद्राप्रीत्यर्थ, वायूप्रीत्यर्थ कुशपवित्रावर ओतला जातो. २.


ए॒ष नृभि॒र्वि नी॑यते दि॒वो मू॒र्धा वृषा॑ सु॒तः ।
सोमो॒ वने॑षु विश्व॒वित् ॥ ३ ॥

एषः नृ भिः वि नीयते दिवः मूर्धा वृषा सुतः सोमः वनेषु विश्व वित् ॥ ३ ॥

हा वीराग्रणी आणि मूळचा वनामध्यें राहणारा सर्वज्ञ आणि वीर्यशाली सोम पिळल्यावर शूर ऋत्विजांकडून द्युलोकाच्या शिखरावर सन्मानानें नेला जातो. ३.


ए॒ष ग॒व्युर॑चिक्रद॒त् पव॑मानो हिरण्य॒युः ।
इन्दुः॑ सत्रा॒जिदस्तृ॑तः ॥ ४ ॥

एषः गव्युः अचिक्रदत् पवमानः हिरण्य युः इन्दुः सत्राजित् अस्तृतः ॥ ४ ॥

ह्या धेनुदानोत्सुक, सुवर्ण दानोत्सुक, आल्हादप्रद, सदा विजयी आणि अपराजित अशा सोमानें पवित्रावर स्वच्छ होतांना गर्जना केली. ४.


ए॒ष सूर्ये॑ण हासते॒ पव॑मानो॒ अधि॒ द्यवि॑ ।
प॒वित्रे॑ मत्स॒रो मदः॑ ॥ ५ ॥

एषः सूर्येण हासते पवमानः अधि द्यवि पवित्रे मत्सरः मदः ॥ ५ ॥

हा आवेश उत्पन्न करणारा, हर्षवर्धन आणि कुशपवित्रावर स्वच्छ होणारा सोम सूर्यानेंच आकाशांतून सोडून दिला आहे कीं काय असें वाटतें. ५.


ए॒ष शु॒ष्म्यसिष्यदद॒न्तरि॑क्षे॒ वृषा॒ हरिः॑ ।
पु॒ना॒न इन्दु॒रिन्द्रं॒ आ ॥ ६ ॥

एषः शुष्मी असिस्यदत् अन्तरिक्षे वृषा हरिः पुनानः इन्दुः इन्द्रं आ ॥ ६ ॥

अशा ह्या प्रतापी, वीराग्रणी, हरिद्वर्ण आणि आल्हादप्रद सोमानें पवित्रांतून स्वच्छ होऊन अंतरिक्षांत इंद्रासन्मुख आपल्या रसाचा वर्षाव केला. ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - प्रियमेध अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ए॒ष वा॒जी हि॒तो नृभि॑र्विश्व॒विन् मन॑स॒स्पतिः॑ ।
अव्यो॒ वारं॒ वि धा॑वति ॥ १ ॥

एषः वाजी हितः नृ भिः विश्व वित् मनसः पतिः अव्यः वारं वि धावति ॥ १ ॥

हा सत्ववीर, सर्वज्ञ, सर्वांचीं मनें मुठींत ठेवणारा सोम, शूर ऋत्विजांनीं लोंकरीच्या वस्त्रावर ठेवला म्हणजे निरनिराळ्या वाटांनीं धांवू लागतो. १.


ए॒ष प॒वित्रे॑ अक्षर॒त् सोमो॑ दे॒वेभ्यः॑ सु॒तः ।
विश्वा॒ धामा॑न्य् आवि॒शन् ॥ २ ॥

एषः पवित्रे अक्षरत् सोमः देवेभ्यः सुतः विश्वा धामानि आ विशन् ॥ २ ॥

हा दिव्यविभूतिसाठीं पिळलेला सोमरस तेजोमय स्थानांत प्रवेश करीत करीत पवित्रांतून कलशांत वाहूं लागला आहे. २.


ए॒ष दे॒वः शु॑भाय॒ते॑ऽधि॒ योना॒व् अम॑र्त्यः ।
वृ॒त्र॒हा दे॑व॒वीत॑मः ॥ ३ ॥

एषः देवः शुभायते अधि योनौ अमर्त्यः वृत्र हा देव वीतमः ॥ ३ ॥

हा दिव्यसोम वेदीवर कसा सुशोभित दिसत आहे ! तो वृत्राचा नाश करतो, तो अमर आहे आणि देवाला अत्यंत प्रिय आहे. ३.


ए॒ष वृषा॒ कनि॑क्रदद्द॒शभि॑र्जा॒मिभि॑र्य॒तः ।
अ॒भि द्रोणा॑नि धावति ॥ ४ ॥

एषः वृषा कनिक्रदत् दश भिः जामि भिः यतः अभि द्रोणानि धावति ॥ ४ ॥

हा वीरपुंगव रस, अंगुलीरूप दहा भगिनींनीं स्वच्छ केल्याबरोबर गर्जना करतो आणि द्रोणकलशाकडे धांवतो. ४.


ए॒ष सूर्यं॑ अरोचय॒त् पव॑मानो॒ विच॑र्षणिः ।
विश्वा॒ धामा॑नि विश्व॒वित् ॥ ५ ॥

एषः सूर्यं अरोचयत् पवमानः वि चर्षणिः विश्वा धामानि विश्व वित् ॥ ५ ॥

भक्तपावन आणि अत्यंत सूक्ष्मदर्शी सोमानें सूर्याला दीप्तिमान् केलें; तसेंच सर्व भवनांनाहि प्रकाशित केलें. ५.


ए॒ष शु॒ष्म्यदा॑भ्यः॒ सोमः॑ पुना॒नो अ॑र्षति ।
दे॒वा॒वीर॑घशंस॒हा ॥ ६ ॥

एषः शुष्मी अदाभ्यः सोमः पुनानः अर्षति देव अवीः अघशंस हा ॥ ६ ॥

हा प्रतापी, अजिंक्य सोमरस स्वच्छ होऊन वहात आहे. तसाच तो देवाला प्रसन्न करणारा आणि पातकी विचारांचा नाश करणारा आहे. ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - नृमेध अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्रास्य॒ धारा॑ अक्षर॒न् वृष्णः॑ सु॒तस्यौज॑सा ।
दे॒वाँ अनु॑ प्र॒भूष॑तः ॥ १ ॥

प्र अस्य धाराः अक्षरन् वृष्णः सुतस्य ओजसा देवान् अनु प्र भूषतः ॥ १ ॥

पहा ह्या पिळून ठेवलेल्या, सोमाच्या, कामनावर्षक आणि दिव्यविबुधांच्या सहवासांत राहणार्‍या ह्या सोमाच्या धारा आपल्या ओजस्वितेनें वाहून राहिल्या आहेत. १.


सप्तिं॑ मृजन्ति वे॒धसो॑ गृ॒णन्तः॑ का॒रवो॑ गि॒रा ।
ज्योति॑र्जज्ञा॒नं उ॒क्थ्यम् ॥ २ ॥

सप्तिं मृजन्ति वेधसः गृणन्तः कारवः गिरा ज्योतिः जजानं उक्थ्यम् ॥ २ ॥

सर्वसंचारी अशा सोमरूप अश्वाला, सूक्तें करणारे आणि संकीर्तन करणारे भक्तजन आपल्या वाणींनीं अलंकृत करतात; दिव्यप्रकाश प्रकट करणार्‍या प्रशंसनीय सोमाचें स्तवन करून त्याला स्वच्छ करतात. २.


सु॒षहा॑ सोम॒ तानि॑ ते पुना॒नाय॑ प्रभूवसो ।
वर्धा॑ समु॒द्रं उ॒क्थ्यम् ॥ ३ ॥

सु सहा सोम तानि ते पुनानाय प्रभुवसो इतिप्रभु वसो वर्ध समुद्रं उक्थ्यम् ॥ ३ ॥

हे सोमा, तुझी ती तेजस्विता खरोखर रमणीय असते. हे अपार-ऐश्वर्या सोमा, तुजला गाळून स्वच्छ करणार्‍या भक्ताचा प्रशंसनीय हर्षोदधि तूं ओतप्रोत भरून सोड. ३.


विश्वा॒ वसू॑नि सं॒जय॒न् पव॑स्व सोम॒ धार॑या ।
इ॒नु द्वेषां॑सि स॒ध्र्यक् ॥ ४ ॥

विश्वा वसूनि सं जयन् पवस्व सोम धारया इनु द्वेषांसि सध्र्यक् ॥ ४ ॥

हे सोमा, यच्चावत् उत्कृष्ट वस्तु भक्तांच्या हस्तगत करून देऊन, आणि द्वेष्ट्यांची द्वेषबुध्दि तत्काळ विलयास नेऊन तूं स्वच्छ धाराप्रवाहानें वहात रहा. ४.


रक्षा॒ सु नो॒ अर॑रुषः स्व॒नात् स॑मस्य॒ कस्य॑ चित् ।
नि॒दो यत्र॑ मुमु॒च्महे॑ ॥ ५ ॥

रक्ष सु नः अररुषः स्वनात् समस्य कस्य चित् निदः यत्र मुमुच्महे ॥ ५ ॥

अधार्मिकांच्या बडबडीपासून आणि तसल्याच सर्व लोकांच्या निंदेपासून आमचा बचाव कर, म्हणजे त्या वावटळींत राहिलों तरी आम्हीं मोकळेच राहूं. ५.


एन्दो॒ पार्थि॑वं र॒यिं दि॒व्यं प॑वस्व॒ धार॑या ।
द्यु॒मन्तं॒ शुष्मं॒ आ भ॑र ॥ ६ ॥

आ इन्दो इति पार्थिवं रयिं दिव्यं पवस्व धारया द्यु मन्तं शुष्मं आ भर ॥ ६ ॥

हे आल्हादप्रदा सोमा, इहलोकींच्या आणि दिव्यलोकींच्या अशा दोन्ही प्रकारच्या ऐश्वर्याचा प्रवाह आम्हांवर वाहूं दे, आणि तेजानें तळपणारा असा प्रताप भक्तामध्यें ठेव. ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - बिंदू अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्र धारा॑ अस्य शु॒ष्मिणो॒ वृथा॑ प॒वित्रे॑ अक्षरन् ।
पु॒ना॒नो वाचं॑ इष्यति ॥ १ ॥

प्र धाराः अस्य शुष्मिणः वृथा पवित्रे अक्षरन् पुनानः वाचं इष्यति ॥ १ ॥

ह्या प्रतापी सोमरसाच्या धारा पवित्रांतून सहज लीलेनें वहात राहिल्या आहेत. तो वाणीला पवित्र करून प्रेरणाहि करितो. १.


इन्दु॑र्हिया॒नः सो॒तृभि॑र्मृ॒ज्यमा॑नः॒ कनि॑क्रदत् ।
इय॑र्ति व॒ग्नुं इ॑न्द्रि॒यम् ॥ २ ॥

इन्दुः हियानः सोतृ भिः मृज्यमानः कनिक्रदत् इयर्ति वग्नुं इन्द्रियम् ॥ २ ॥

रस पिळणार्‍या भक्तजनांनीं स्वच्छ करून त्याला पात्रांत ओतला म्हणजे तो आल्हादप्रद रस गर्जना करतो आणि इंद्रविषयक भजन करण्याचीहि प्रेरणा करितो. २.


आ नः॒ शुष्मं॑ नृ॒षाह्यं॑ वी॒रव॑न्तं पुरु॒स्पृह॑म् ।
पव॑स्व सोम॒ धार॑या ॥ ३ ॥

आ नः शुष्मं नृ सह्यं वीर वन्तं पुरु स्पृहं पवस्व सोम धारया ॥ ३ ॥

तर शूरांनीं आक्रमण करण्याला योग्य, वीरांनीं युक्त, आणि सर्वांना स्पृहणीय असें प्रतापी ऐश्वर्य, हे सोमा, तूं आपल्या पवित्र धारेनें आम्हांकडे वहात आण. ३.


प्र सोमो॒ अति॒ धार॑या॒ पव॑मानो असिष्यदत् ।
अ॒भि द्रोणा॑न्य् आ॒सद॑म् ॥ ४ ॥

प्र सोमः अति धारया पवमानः असिस्यदत् अभि द्रोणानि आसदम् ॥ ४ ॥

पहा, हा सोमरस द्रोणपात्रांत अधिष्ठित होण्याकरितां स्वच्छ होऊन धारेनें वहात राहिला आहे. ४.


अ॒प्सु त्वा॒ मधु॑मत्तमं॒ हरिं॑ हिन्व॒न्त्यद्रि॑भिः ।
इन्द॒व् इन्द्रा॑य पी॒तये॑ ॥ ५ ॥

अप् सु त्वा मधुमत् तमं हरिं हिन्वन्ति अद्रि भिः इन्दो इति इन्द्राय पीतये ॥ ५ ॥

तुला, अत्यंत मधुर अशा हरिद्वर्ण वनस्पतीला ग्राव्यांनीं पिळून, आल्हादप्रदरसा, तुजला इंद्रानें प्राशन करावें यासाठीं वसतीवरी उदकांत मिसळून देतात. ५.


सु॒नोता॒ मधु॑मत्तमं॒ सोमं॒ इन्द्रा॑य व॒ज्रिणे॑ ।
चारुं॒ शर्धा॑य मत्स॒रम् ॥ ६ ॥

सुनोत मधुमत् तमं सोमं इन्द्राय वज्रिणे चारुं शर्धाय मत्सरम् ॥ ६ ॥

तर हे भक्तांनों, मधुरांत अत्यंत मधुर, मनोहर आणि आवेश उत्पन्न करणारा असा सोमरस, तुम्हीं वज्रधर इंद्रासाठीं पिळून सिध्द ठेवा. ६.


ॐ तत् सत्


GO TOP