PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ६१ ते ७०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६१ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - नाभानेदिष्ठ मानव : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ


इ॒दं इ॒त्था रौद्रं॑ गू॒र्तव॑चा॒ ब्रह्म॒ क्रत्वा॒ शच्यां॑ अ॒न्तरा॒जौ ।
क्रा॒णा यद॑स्य पि॒तरा॑ मंहने॒ष्ठाः पर्ष॑त् प॒क्थे अह॒न्न् आ स॒प्त होतॄ॑न् ॥ १॥

इदं इत्था रौद्रं गूर्त-वचाः ब्रह्म क्रत्वा शच्यां अन्तः आजौ
क्राणा यत् अस्य पितरा मंहने--स्थाः पर्षत् पक्थे अहन् आ सप्त होताऋन् ॥ १ ॥

याप्रमाणें हे रुद्राला प्रिय असें प्रार्थनासूक्त मधुरभाषी भक्त हा, सत्कार्यामध्ये आणि भर समरामध्ये मोठ्या आवेशाने म्हणणारच. त्याच कारणाने ह्याच्या कार्यव्यापृत आणि स्तुतीसपात्र अशा आईबापांना आणि सप्तहोत्यांना औदार्यशील यजमानाने "पक्थ" समारंभाच्या दिवशी कष्टदायक कार्यांतून पार नेले १.


स इद्दा॒नाय॒ दभ्या॑य व॒न्वञ् च्यवा॑नः॒ सूदै॑रमिमीत॒ वेदि॑म् ।
तूर्व॑याणो गू॒र्तव॑चस्तमः॒ क्षोदो॒ न रेत॑ इ॒तऊ॑ति सिञ्चत् ॥ २ ॥

सः इत् दानाय दभ्याय वन्वन् च्यवानः सूदैः अमिमीत वेदिं
तूवर्याणः गूर्तवचः-तमः क्षोदः न रेतः इतः-ऊति सिचत् ॥ २ ॥

तोच च्यवान, दानासाठी (आणि) शत्रुदमनासाठी आतुर झाला होता. त्याने शिबिजनांकडून यज्ञाची वेदी मोजून घेतली आणि अत्यंत मधुरभाषी जो तूर्वयाण त्याने तेथे जागच्याजागी सहाय करणारे असे बीजोदक प्रवाहाप्रमाणे चोहोंकडे उडविले २.


मनो॒ न येषु॒ हव॑नेषु ति॒ग्मं विपः॒ शच्या॑ वनु॒थो द्रव॑न्ता ।
आ यः शर्या॑भिस्तुविनृ॒म्णो अ॒स्याश्री॑णीता॒दिशं॒ गभ॑स्तौ ॥ ३ ॥

मनः न येषु हवनेषु तिग्मं विपः शच्या वनुथः द्रवन्ता
आ यः शर्याभिः तुवि-नृम्णः अस्य अश्रीणीत आदिशं गभस्तौ ॥ ३ ॥

ज्याच्या हांका मारण्यांत इतकी तीव्रता असते की, तुम्ही मनाप्रमाणे तीव्र वेगवान्‌ असतांही आणि आपल्या सामर्थ्यासह लगबगीने धांवत असतांही त्या (भक्ताच्या) प्रार्थनेमुळे विरून जातां; आणि जो अत्यंत पौरुषशाली असून बाणांच्या योगाने ज्याच्या बाहूंमध्ये ईश्वराची आज्ञाच मिळून मिसळून राहत आहे अशा रीतीने वागतो ३.


कृ॒ष्णा यद्गोष्व् अ॑रु॒णीषु॒ सीद॑द्दि॒वो नपा॑ताश्विना हुवे वाम् ।
वी॒तं मे॑ य॒ज्ञं आ ग॑तं मे॒ अन्नं॑ वव॒न्वांसा॒ नेषं॒ अस्मृ॑तध्रू ॥ ४ ॥

कृष्णा यत् गोषु अरुणीषु सीदत् दिवः नपाता अश्विना हुवे वां
वीतं मे यजं आ गतं मे अन्नं ववन्वांसा न इषं अस्मृतध्रूइत्य् अस्मृत-ध्रू ॥ ४ ॥

कृष्णवर्ण धेनु (जी रात्री) अरुणवर्ण धेनूंच्यामध्ये जाऊन बसली (न बसली) असेल तोंच हे द्युलोकधारक अश्वीहो, मी तुमचा धांवा करीत आहे. तर माझ्या यज्ञावर कृपादृष्टी ठेवा, मजकडे आगमन करा, अन्नाप्रमाणे तुम्हांला मनोत्साहाची आसोशी आहे आणि तुम्हीं भक्तांना कधींही विसरत नाही ४.


प्रथि॑ष्ट॒ यस्य॑ वी॒रक॑र्मं इ॒ष्णदनु॑ष्ठितं॒ नु नर्यो॒ अपौ॑हत् ।
पुन॒स्तदा वृ॑हति॒ यत् क॒नाया॑ दुहि॒तुरा अनु॑भृतं अन॒र्वा ॥ ५ ॥

प्रथिष्ट यस्य वीर-कर्मं इष्णत् अनु-स्थितं नु नर्यः अप औहत्
पुनरिति तत् आ वृहति यत् कनायाः दुहितुः आः अनु-भृतं अनर्वा ॥ ५ ॥

ज्याची बेपर्वा झालेली वीरवृत्ति स्फुरण पावली आहे तो मानवहितकारी वीर कृतकार्य झाल्यावर विराम पावतो आणि जे त्या तरुण कन्येला अनुरूप असते तेंच पुन: तो अप्रतिहत वीर वृद्धिंगत करतो ५.


म॒ध्या यत् कर्त्वं॒ अभ॑वद॒भीके॒ कामं॑ कृण्वा॒ने पि॒तरि॑ युव॒त्याम् ।
म॒ना॒नग् रेतो॑ जहतुर्वि॒यन्ता॒ सानौ॒ निषि॑क्तं सुकृ॒तस्य॒ योनौ॑ ॥ ६ ॥

मध्या यत् कर्त्वं अभवत् अभीके कामं कृण्वाने पितरि युवत्यां
मनानक् रेतः जहतुः वि-यन्ता सानौ नि-सिक्तं सु-कृतस्य योनौ ॥ ६ ॥

जे व्हावयाचे कार्य तें झालें आणि (द्यु) पित्याने पृथ्वीरूप जी एक युवती तिच्याविषयीं इच्छा धरली, तेव्हां उभयतांनी एकत्र हो‍ऊन बीजोदक उच्च शिखरांवर सत्कार्यभूमीच्या जागीं ओतून दिलें ६.


पि॒ता यत् स्वां दु॑हि॒तरं॑ अधि॒ष्कन् क्ष्म॒या रेतः॑ संजग्मा॒नो नि षि॑ञ्चत् ।
स्वा॒ध्योऽजनय॒न् ब्रह्म॑ दे॒वा वास्तो॒ष् पतिं॑ व्रत॒पां निर॑तक्षन् ॥ ७ ॥

पिता यत् स्वां दुहितरं अधि-स्कन् क्ष्मया रेतः सम्-जग्मानः नि स् इचत्
सु-आध्यः अजनयन् ब्रह्म देवाः वास्तोः पतिं व्रत-पां नि ः अतक्षन् ॥ ७ ॥

जेव्हां (आकाशरूप) पित्याने आपल्या कन्येला दूर ढकलून देऊन पृथ्वीसह संगत हो‍ऊन बीजोदकाचा वर्षाव केला, तेव्हां दिव्यविबुधांनी निदिध्यासपूर्वक प्रार्थनासूक्त रचले आणि आज्ञापालनतत्पर अशा वास्तोष्पतीला उत्पन्न केले ७.


स ईं॒ वृषा॒ न फेनं॑ अस्यदा॒जौ स्मदा परै॒दप॑ द॒भ्रचे॑ताः ।
सर॑त् प॒दा न दक्षि॑णा परा॒वृङ् न ता नु मे॑ पृश॒न्यो जगृभ्रे ॥ ८ ॥

सः ईं वृषा न फेनं अस्यत् आजौ स्मत् आ परा ऐत् अप दभ्र-चेताः
सरत् पदा न दक्षिणा परावृक् न ताः नु मे पृशन्यः जगृभ्रे ॥ ८ ॥

वृषभाप्रमाणें त्याच विराने समरांगणांत पाण्याचा फेस फेकला. पण तेवढ्यानेच त्याच्या हतबुद्ध शत्रूने मागे वळून पलायन केले. तो उजवे पाऊल टाकून पुढे सरलाच नाही तर (मागच्या मागे) त्यानें तोंड फिरविले; त्यामुळें आमच्या मृदुकेश धेनूंना तो पकडून ठेऊं शकला नाही ८.


म॒क्षू न वह्निः॑ प्र॒जाया॑ उप॒ब्दिर॒ग्निं न न॒ग्न उप॑ सीद॒दूधः॑ ।
सनि॑ते॒ध्मं सनि॑तो॒त वाजं॒ स ध॒र्ता ज॑ज्ञे॒ सह॑सा यवी॒युत् ॥ ९ ॥

मक्षु न वह्निः प्र-जायाः उपब्दिः अग्निं न नग्नः उप सीदत् ऊधः
सनिता इध्मं सनिता उत वाजं सः धर्ता जजे सहसा यव् इ-युत् ॥ ९ ॥

प्रजेचा निनाद (लोकांची हांक) ही (त्याच्या प्रभावाने) त्वरितगति अश्वाप्रमाणें झटकन्‌ अग्नीकडे गेली. एखादा नग्न मनुष्य कोठेंतरी निवार्‍याच्या जागेमध्ये जाऊन बसतो, त्याप्रमाणे (त्याची हांक अग्नीकडे आश्रयार्थ गेली), असाच भक्त समिधा संपादन करितो, तसेंच सात्त्विक बलही संपादन करितो; त्याप्रमाणें तो बलसंपन्न झाला आहे. आणि आपल्या दरार्‍याने दुष्टांचा नाश करीत आहे ९.


म॒क्षू क॒नायाः॑ स॒ख्यं नव॑ग्वा ऋ॒तं वद॑न्त ऋ॒तयु॑क्तिं अग्मन् ।
द्वि॒बर्ह॑सो॒ य उप॑ गो॒पं आगु॑रदक्षि॒णासो॒ अच्यु॑ता दुदुक्षन् ॥ १० ॥

मक्षु कनायाः सख्यं नव-ग्वाः ऋतं वदन्तः ऋत-युक्तिं अग्मन्
द्वि-बर्हसः ये उप गोपं आ अगुः अदक्षिणासः अच्युता दुदुक्षन् ॥ १० ॥

न्याय्य भाषण करून आणि धर्माला अनुसरून योजना करणार्‍या नवग्वांनी युवतीचे प्रेम तत्काळ संपादन केले. ते जे सव्यसाची नवग्व (जगत्‌) रक्षक देवाकडे गेले, त्यांनी ऐहिक लाभाची आशा न धरतां जे अचल, शाश्वत म्हणून (प्रसिद्ध) होतें, त्याचेंच दोहन केले १०.


म॒क्षू क॒नायाः॑ स॒ख्यं नवी॑यो॒ राधो॒ न रेत॑ ऋ॒तं इत् तु॑रण्यन् ।
शुचि॒ यत् ते॒ रेक्ण॒ आय॑जन्त सब॒र्दुघा॑याः॒ पय॑ उ॒स्रिया॑याः ॥ ११॥

मक्षु कनायाः सख्यं नवीयः राधः न रेतः ऋतं इत् तुरण्यन्
शुचि यत् ते रेक्णः आ अयजन्त सबः-दुघायाः पयः उस्रियायाः ॥ ११ ॥

नित्य नवीन असें न्याय्य भाषण करून आणि न्यायाला अनुसरून योजना करणार्‍या भक्तांनी युवतीचे अपूर्व प्रेम तत्काळ जोडले; आणि अमृत-दुग्ध देणार्‍या तेजोमय धेनूची जी देदीप्यमान्‌ पवित्र देणगी, ती अर्पण करून तुझे यजन केले ११.


प॒श्वा यत् प॒श्चा वियु॑ता बु॒धन्तेति॑ ब्रवीति व॒क्तरी॒ ररा॑णः ।
वसो॑र्वसु॒त्वा का॒रवो॑ऽने॒हा विश्वं॑ विवेष्टि॒ द्रवि॑णं॒ उप॒ क्षु ॥ १२ ॥

पश्वा यत् पश्चा वि-युता ब्धन्त इति ब्रवीति वक्तरि रराणः
वसोः वसु-त्वा कारवः अनेहा विश्वं विवेष्टि द्रविणं उप क्षु ॥ १२ ॥

ताटातूट झालेल्या पशूंशी त्यांची मागाहून भेट होईल असे आनंदित स्तोता बोलला त्याचे कारण असें की निधिरूप जो इंद्र त्याच्या निधिपतित्वाच्या सामर्थ्यामुळे कविजन पापरहितच असतो आणि त्याला यच्चयावत्‌ अविनाशी धन आणि सामर्थ्य ह्यांची प्राप्ति झालेली असते १२.


तदिन् न्व् अस्य परि॒षद्वा॑नो अग्मन् पु॒रू सद॑न्तो नार्ष॒दं बि॑भित्सन् ।
वि शुष्ण॑स्य॒ संग्र॑थितं अन॒र्वा वि॒दत् पु॑रुप्रजा॒तस्य॒ गुहा॒ यत् ॥ १३ ॥

तत् इत् नु अस्य परि-सद्वानः अग्मन् पुरु सदन्तः नार्सदं बिभ् इत्सन्
वि शुष्णस्य सम्-ग्रथितं अनर्वा विदत् पुरु-प्रजातस्य गुहा यत् ॥ १३ ॥

खरोखर तेथेंच ह्याचे परिचारक-त्याच ठिकाणीं राहणारे सेवकजन नार्षदाला ठार मारण्याच्या हेतूने आले होते, तेव्हां ज्याला पुषकळ मुलेंबाळे होती त्या शुष्णाचे द्रव्यभांडार, जे त्याने लपवून ठेवलें होते, ते या अप्रतिहत सामर्थ्यशाली इंद्राला सहज प्राप्त झाले १३.


भर्गो॑ ह॒ नामो॒त यस्य॑ दे॒वाः स्व१र्ण ये त्रि॑षध॒स्थे नि॑षे॒दुः ।
अ॒ग्निर्ह॒ नामो॒त जा॒तवे॑दाः श्रु॒धी नो॑ होतरृ॒तस्य॒ होता॒ध्रुक् ॥ १४ ॥

भर्गः ह नाम उत यस्य देवाः स्वः न ये त्रि-सधस्थे नि-सेदुः
अग्निः ह नाम उत जात-वेदाः श्रुधि नः होतः ऋतस्य होता अध्रुक् ॥ १४ ॥

तेजोराशी हेच त्याचे नांव. तो असा आहे की स्वर्गांत राहिल्याप्रमाणे त्याच्या तीनही स्थानीं दिव्यविबुधांनी वास केला आहे. अग्नि हे त्याचे नांव. तो सर्व वस्तुजात जाणतो. तर हे यज्ञसंपादका अग्ने, आमची प्रार्थना ऐक. सद्धर्माचा शत्रुरहित होता तूंच आहेस १४.


उ॒त त्या मे॒ रौद्रा॑व् अर्चि॒मन्ता॒ नास॑त्याव् इन्द्र गू॒र्तये॒ यज॑ध्यै ।
म॒नु॒ष्वद्वृ॒क्तब॑र्हिषे॒ ररा॑णा म॒न्दू हि॒तप्र॑यसा वि॒क्षु यज्यू॑ ॥ १५ ॥

उत त्या मे रौद्रौ अर्चि-मन्ता नासत्यौ इन्द्र गृतये यजध्यै
मनुष्वत् वृक्त-बर्हिषे रराणा मन्दू इति हित-प्रयसा विक्षु यज्यूइति ॥ १५ ॥

तसेंच हे इंद्रा, माझे तो रुद्रप्रिय, दीप्तिमान्‌ सत्यस्वरूप अश्वीदेव हे प्रशंसेला आणि यजनाला सर्वस्वी योग्य आहेत. वेदीवर कुशासन पसरले असतां मनूप्रमाणे त्यांना संतोष होतो; ते हर्षोत्फुल्ल आहेत, प्रेमानें हित करणारे आणि मानवांमध्ये पूज्य आहेत १५.


अ॒यं स्तु॒तो राजा॑ वन्दि वे॒धा अ॒पश्च॒ विप्र॑स्तरति॒ स्वसे॑तुः ।
स क॒क्षीव॑न्तं रेजय॒त् सो अ॒ग्निं ने॒मिं न च॒क्रं अर्व॑तो रघु॒द्रु ॥ १६ ॥

अयं स्तुतः राजा वन्दि वेधाः अपः च विप्रः तरति स्व-सेतुः
सः कक्षीवन्तं रेजयत् सः अग्निं नेमिं न चक्रं अर्वतः रघु-द्रु ॥ १६ ॥

या सोमराजाचे स्तवन झाले. त्या काव्यकुशलास वंदन केले. तो ज्ञानी कवि आपल्याच कर्तृत्वरूप सेतूने कार्याचा ओघ तरून जातो. त्याने कक्षीवान्‌ ऋषीचे (हृदय) हलवून सोडले. ज्याप्रमाणे अश्वाच्या रथाचे जलद धांवणारे चाक चक्रपरिघाला वेगाने फिरविते, त्याप्रमाणे त्याने अग्नीलाही हलवून सोडले १६.


स द्वि॒बन्धु॑र्वैतर॒णो यष्टा॑ सब॒र्धुं धे॒नुं अ॒स्वं दु॒हध्यै॑ ।
सं यन् मि॒त्रावरु॑णा वृ॒ञ्ज उ॒क्थैर्ज्येष्ठे॑भिरर्य॒मणं॒ वरू॑थैः ॥ १७ ॥

सः द्वि-बन्धुः वैतरणः यष्टा सबः-धुं धेनुं अस्वं दुहध्यै
सं यत् मित्रावरुणा वृजे उक्थैः ज्येष्ठेभिः अर्यमणं वरूथैः ॥ १७ ॥

तो उभय लोकांचा बन्धु आहे. तो वैतरन म्हणजे उद्धार करणारा आहे. अमृत-दुग्ध देणारी धेनू प्रसवली नाही तरीही तिचे दोहन करून तो (दिव्यविभूतीचे) यजन करतो आणि त्या वेळी मित्र वरुण आणि अर्यमा यांना साम-स्तोत्रांनी, मोठमोठ्या भक्तरक्षक स्तवनांनी अलंकृत करतो १७.


तद्ब॑न्धुः सू॒रिर्दि॒वि ते॑ धियं॒धा नाभा॒नेदि॑ष्ठो रपति॒ प्र वेन॑न् ।
सा नो॒ नाभिः॑ पर॒मास्य वा॑ घा॒हं तत् प॒श्चा क॑ति॒थश्चि॑दास ॥ १८ ॥

तत्-बन्धुः सूरिः दिवि ते धियम्-धाः नाभानेदिष्ठः रपति प्र वेनन्
सा नः नाभिः परमा अस्य वा घ अहं तत् पश्चा कतिथः चित् आस ॥ १८ ॥

त्याचाच बंधु सूर्य आकाशांत आहे, तो तुझ्या बुद्धीला स्थिर ठेवो. याप्रमाणे नाभानेदिष्ठ प्रेमळपणांत कांही तरी बडबडतो झाले. तो म्हणतो कीं हीच आमची उत्कृष्ट बन्धनी; अथवा मी त्याचाच आहे. त्याच्यापाठीमागून कितीतरी येऊन गेले १८.


इ॒यं मे॒ नाभि॑रि॒ह मे॑ स॒धस्थं॑ इ॒मे मे॑ दे॒वा अ॒यं अ॑स्मि॒ सर्वः॑ ।
द्वि॒जा अह॑ प्रथम॒जा ऋ॒तस्ये॒दं धे॒नुर॑दुह॒ज् जाय॑माना ॥ १९ ॥

इयं मे नाभिः इह मे सध-स्थं इमे मे देवाः अयं अस्मि सर्वः
द्वि-जाः अह प्रथम-जाः ऋतस्य इदं धेनुः अदुहत् जायमाना ॥ १९ ॥

हीच माझी नाभि(बंधन), इथंच माझा सहवास. हे माझ्ये दिव्यजन, हा मींच सर्व कांही आहे. हा माझा जन्म दुसर्‍याने झाला, पण पाहिले असतां सनातन सत्याचे मी पहिले अपत्य. ही धेनु उत्पन्न होतांच तिनें हेंच (तिच्यापासून) दोहून मला दिले १९.


अधा॑सु म॒न्द्रो अ॑र॒तिर्वि॒भावाव॑ स्यति द्विवर्त॒निर्व॑ने॒षाट् ।
ऊ॒र्ध्वा यच् छ्रेणि॒र्न शिशु॒र्दन् म॒क्षू स्थि॒रं शे॑वृ॒धं सू॑त मा॒ता ॥ २० ॥

अध आसु मन्द्रः अरतिः विभावा अव स्यति द्वि-वर्तनिः वनेषाट्
ऊर्ध्वा यत् श्रेणिः न शिशुः दन् मक्षु स्थिरं शे--वृधं सूत माता ॥ २० ॥

याप्रमाणें तो हर्षोत्फुल्ल, दीप्तिमान्‌ अग्रेसर ह्यांच्या ठिकाणी विश्रांति पावतो. तो उभयमार्गगामी अग्नि वनांत धुमाकूळ घालतो आणि लहान अर्भकांच्या दंतपंक्तीप्रमाणे जेव्हां त्याच्या ज्वाला वर दिसूं लागतात, त्याच्यापूर्वीच अरणीमातेने त्या सुखवृद्धिकर विभूतीला जन्म दिलेलाच असतो २०.


अधा॒ गाव॒ उप॑मातिं क॒नाया॒ अनु॑ श्वा॒न्तस्य॒ कस्य॑ चि॒त् परे॑युः ।
श्रु॒धि त्वं सु॑द्रविणो न॒स्त्वं या॑ळ् आश्व॒घ्नस्य॑ वावृधे सू॒नृता॑भिः ॥ २१॥

अध गावः उप-मातिं कनायाः अनु श्वान्तस्य कस्य चित् परा ईयुः
श्रुधि त्वं सु-द्रविणः नः त्वं याट् आश्व-घ्नस्य ववृधे सूनृताभिः ॥ २१ ॥

नंतर प्रकाशधेनु, त्या युवतीच्या प्रियतमाकडे किंवा जो कोणी शान्तदान्त असा असतो त्याच्याकडे चालत्या झाल्या; पण हे अचलवैभवा, तूं आमची प्रार्थना ऐक; तू आश्वघ्नाचा पुरोहित आहेस; तूं (भक्तांच्या) मधुरस्तुतींनी संतुष्ट होतोस २१.


अध॒ त्वं इ॑न्द्र वि॒द्ध्य१स्मान् म॒हो रा॒ये नृ॑पते॒ वज्र॑बाहुः ।
रक्षा॑ च नो म॒घोनः॑ पा॒हि सू॒रीन् अ॑ने॒हस॑स्ते हरिवो अ॒भिष्टौ॑ ॥ २२ ॥

अध त्वं इन्द्र विद्धि अस्मान् महः राये नृ-पते वज्र-बाहुः
रक्ष च नः मघोनः पाहि सूरीन् अनेहसः ते हरि-वः अभिष्टौ ॥ २२ ॥

आतां आम्हीं श्रेष्ठ प्रतीच्या संपत्तीला योग्य आहों असें, हे इंद्रा, तूं आमच्याविषयी लक्षांत आण. हे मानवाधिपते, तूं वज्रधर आहेस. आमच्या उदारधी यजमानांचे रक्षण कर, आमच्या धुरीणांचेही संरक्षण कर, तुझ्या सार्वत्रिक कृपाछत्राखाली, हे हरिदश्वा, ते निषकलंकच रहातील २२.


अध॒ यद्रा॑जाना॒ गवि॑ष्टौ॒ सर॑त् सर॒ण्युः का॒रवे॑ जर॒ण्युः ।
विप्रः॒ प्रेष्ठः॒ स ह्येषां ब॒भूव॒ परा॑ च॒ वक्ष॑दु॒त प॑र्षदेनान् ॥ २३ ॥

अध यत् राजाना गो--इष्टौ सरत् सरण्युः कारवे जरण्युः
विप्रः प्रेष्ठः सः हि एषां बभूव परा च वक्षत् उत पर्षत् एनान् ॥ २३ ॥

तर आतां हे जगत्‌-राजांनो, (हे मित्र वरुणांनो) प्रकाशधेनूंच्या प्राप्तीसाठीं जेव्हां तो धुरंधर, तो कविजनांना प्रशंसनीय असा वीर पुढे सरसावला, तेव्हां तोच ज्ञानी स्तोता ह्या सर्वांचा आवडता ठरला; आतां तोच पुढाकार घेवो, तोच ह्यांना सुरक्षितपणें पार नेवो २३.


अधा॒ न्व् अस्य॒ जेन्य॑स्य पु॒ष्टौ वृथा॒ रेभ॑न्त ईमहे॒ तदू॒ नु ।
स॒र॒ण्युर॑स्य सू॒नुरश्वो॒ विप्र॑श्चासि॒ श्रव॑सश्च सा॒तौ ॥ २४ ॥

अध नु अस्य जेन्यस्य पुष्टौ वृथा रेभन्तः ईमहे तत् ओं इति नु
सरण्युः अस्य सूनुः अश्वः विप्रः च असि श्रवसः च सातौ ॥ २४ ॥

तसेंच आतां ह्या विजयशाली योद्ध्य़ाच्या अभिवृद्धि-कार्यात आम्ही नेहमींच्या स्वराने तुजपाशी हेच मागत आहो; याचा पुत्र "अश्व" हा तर धडाक्याने पुढें सरसावणारा आहे, तूं कवि आहेस आणि सत्कीर्ति संपादनामध्ये सहभागी आहेस २४.


यु॒वोर्यदि॑ स॒ख्याया॒स्मे शर्धा॑य॒ स्तोमं॑ जुजु॒षे नम॑स्वान् ।
वि॒श्वत्र॒ यस्मि॒न्न् आ गिरः॑ समी॒चीः पू॒र्वीव॑ गा॒तुर्दाश॑त् सू॒नृता॑यै ॥ २५ ॥

युवोः यदि सख्याय अस्मे इति शर्धाय स्तोमं जुजुषे नमस्वान्
विश्वत्र यस्मिन् आ गिरः सम्-ईचीः पूर्वी-इव गातुः दाशत् सूनृतायै ॥ २५ ॥

जर तुम्हां उभयतांचे निकट सख्य आमच्याशी होईल आणि बल-संवर्धनासाठी स्तोतृजन (देवापुढे) नम्र हो‍ऊन प्रार्थनासूक्त प्रेमानें म्हणेल, तर ज्यामध्ये सर्व स्तुति चोहोंकडून एकत्रित होतील असा पुरातन भकिमार्ग आम्हांस सत्यमधुर कवनाची स्फूर्ति व्हावी म्हणून तो (परमेश्वर) खचित दाखवील २५.


स गृ॑णा॒नो अ॒द्‌भिर्दे॒ववा॒न् इति॑ सु॒बन्धु॒र्नम॑सा सू॒क्तैः ।
वर्ध॑दु॒क्थैर्वचो॑भि॒रा हि नू॒नं व्यध्वै॑ति॒ पय॑स उ॒स्रिया॑याः ॥ २६ ॥

सः गृणानः अत्-भिः देव-वान् इति सु-बन्धुः नमसा सु-उक्तैः
वर्धत् उक्थैः वचः-भिः आ हि नूनं वि अध्वा एति पयसः उस्रियायाः ॥ २६ ॥

याप्रमाणे त्याचे उदकांनी देखील स्तवन केले. सुबंधु हा प्रणतिने आणि सामसूक्त गायनाने देवसान्निध्य पावला अशी त्याची ख्याती झाली. तसेंच हाही भक्त सामसूक्तानें आणि स्तवनाने उन्नतीला पावो. प्रकाशधेनूच्या दुग्धाचा मार्ग अगदीं मोकळा झाला आहे २६.


त ऊ॒ षु णो॑ म॒हो य॑जत्रा भू॒त दे॑वास ऊ॒तये॑ स॒जोषाः॑ ।
ये वाजाँ॒ अन॑यता वि॒यन्तो॒ ये स्था नि॑चे॒तारो॒ अमू॑राः ॥ २७ ॥

ते ओं इति सु नः महः यजत्राः भूत देवासः ऊतये स-जोषाः ये
वाजान् अनयत वि-यन्तः ये स्थ नि-चेतारः अमूराः ॥ २७ ॥

पूज्य विभूतींनो, हे दिव्यविबुधांनू, तुम्ही प्रेमळ अंत:करणाने आमच्या उत्तम साहाय्यासाठीं उद्युक्त व्हा. तुम्ही असें आहांत कीं निरनिराळ्या मार्गांनी आमच्याकडे ओजस्विता आणलीत; तुम्ही स्वत: विचक्षण आहांतच, पण इतरांनाही चैतन्य आणतां २७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६२ (विश्वेदेवसूक्त, मनु सावर्णि दानस्तुती)

ऋषी - नाभानेदिष्ठ मानव : देवता - १-६ विश्वेदेव अथवा आंगिरस; ८-११ - मनु सावर्णि दानस्तुती
छंद - १-४ - जगती; ५, ८, ९ - अनुष्टुभ्; १० - गायत्री; ११ - य्तिष्टुभ् ; अवशिष्ट - बृहती, सतोबृहती


ये य॒ज्ञेन॒ दक्षि॑णया॒ सम॑क्ता॒ इन्द्र॑स्य स॒ख्यं अ॑मृत॒त्वं आ॑न॒श ।
तेभ्यो॑ भ॒द्रं अ॑ङ्गिरसो वो अस्तु॒ प्रति॑ गृभ्णीत मान॒वं सु॑मेधसः ॥ १॥

ये यजेन दक्षिणया सम्-अक्ताः इन्द्रस्य सख्यं अमृत-त्वं आनश
तेभ्यः भद्रं अङ्गिरसः वः अस्तु प्रति गृभ्णीत मानवं सु-मेधसः ॥ १ ॥

ज्या तुम्ही यज्ञद्वारा दक्षिणाधेनूची प्राप्ति करून घेऊन इंद्राचे (म्हणजे ईश्वराचे) सख्य आणि त्याचबरोबर अमरत्व संपादन केलेंत, अशा हे आंगिरसांनो, तुमचे मंगल असो. हे अत्यंत बुद्धिमन्तांनो, आम्हां मानवांना हातीं धरून (आम्हांस) साहाय्य करा १.


य उ॒दाज॑न् पि॒तरो॑ गो॒मयं॒ वस्व् ऋ॒तेनाभि॑न्दन् परिवत्स॒रे व॒लम् ।
दी॒र्घा॒यु॒त्वं अ॑ङ्गिरसो वो अस्तु॒ प्रति॑ गृभ्णीत मान॒वं सु॑मेधसः ॥ २ ॥

ये उत्-आजन् पितरः गो--मयं वसु ऋतेन अभिन्दन् परि-वत्सरे वलं
दीर्घायु-त्वं अङ्गिरसः वः अस्तु प्रति गृभ्णीत मानवं सु-मेधसः ॥ २ ॥

(मानवांचे) पूर्वज जे तुम्ही आंगिरस त्यांनी प्रकाशधेनूरूप जे (दिव्य) धन तें वर उदयास आणले आणि (पंचवर्षात्मक) युगाच्या दुसर्‍या वर्षीं धर्मप्रेमाच्या बलाने वल राक्षसाच्या चिंधड्या उडविल्या. अशा हे आंगिरसांनो तुम्हांला चिरायुष्य लाभलें, तरी आम्हां मानवांना सहाय्य करण्यासाठीं हे परमबुद्धिमंतांनो आम्हांस हातीं धरा २.


य ऋ॒तेन॒ सूर्यं॒ आरो॑हयन् दि॒व्यप्र॑थयन् पृथि॒वीं मा॒तरं॒ वि ।
सु॒प्र॒जा॒स्त्वं अ॑ङ्गिरसो वो अस्तु॒ प्रति॑ गृभ्णीत मान॒वं सु॑मेधसः ॥ ३ ॥

ये ऋतेन सूर्यं आ अरोहयन् दिवि अप्रथयन् पृथिवीं मातरं वि
सुप्रजाः-त्वं अङ्गिरसः वः अस्तु प्रति गृभ्णीत मानवं सु-मेधसः ॥ ३ ॥

ज्यांनी सत्यधर्माच्या सामर्थ्याने सूर्याला आकाशांत उंच चढवून दिले आणि या भूमातेचा विस्तार केला, अशा हे आंगिरसांनो, तुम्हांला उत्कृष्ट संतानाची प्राप्ति झाली तरी आम्हां मानवांना साहाय्य करण्यासाठींठें हे परम बुद्धिमंतांनो आम्हांस हाती धरा ३.


अ॒यं नाभा॑ वदति व॒ल्गु वो॑ गृ॒हे देव॑पुत्रा ऋषय॒स्तच् छृ॑णोतन ।
सु॒ब्र॒ह्म॒ण्यं अ॑ङ्गिरसो वो अस्तु॒ प्रति॑ गृभ्णीत मान॒वं सु॑मेधसः ॥ ४ ॥

अयं नाभा वदति वल्गु वः गृहे देव-पुत्राः ऋषयः तत् शृणोतन
सु-ब्रह्मण्यं अङ्गिरसः वः अस्तु प्रति गृभ्णीत मानवं सु-मेधसः ॥ ४ ॥

हा नाभनेदिष्ट तुमच्या यज्ञगृहांत मधुर भाषण करीत आहे. हे दिव्यविभूतींच्या पुत्रांनो, ऋषींनो, हे भाषण तुम्ही ऐका. हे आंगिरसांनो तुम्हांला उत्कृष्ट ज्ञानसूक्ताची स्फूर्ति होवो आणि आम्हां मानवांना साहाय्य करण्याकरितां हे परमबुद्धिमंतांनो, आम्हांस हाती धरा ४.


विरू॑पास॒ इदृष॑य॒स्त इद्ग॑म्भी॒रवे॑पसः ।
ते अङ्गि॑रसः सू॒नव॒स्ते अ॒ग्नेः परि॑ जज्ञिरे ॥ ५ ॥

वि-रूपासः इत् ऋषयः ते इत् गम्भीर-वेपसः
ते अङ्गिरसः सूनवः ते अग्नेः परि जजिरे ॥ ५ ॥

हे अंगिरसऋषि, खरोखर नानाप्रकारच्या स्वरूपांत वावरतात, उदात्त विचाराचेहि तेच आहेत. असे ते अंगिराऋषि खरोखर अग्नीचे पुत्र आहेत. त्याच्या पासूनच उत्पन्न झाले ५.


ये अ॒ग्नेः परि॑ जज्ञि॒रे विरू॑पासो दि॒वस्परि॑ ।
नव॑ग्वो॒ नु दश॑ग्वो॒ अङ्गि॑रस्तमो॒ सचा॑ दे॒वेषु॑ मंहते ॥ ६ ॥

ये अग्नेः परि जजिरे वि-रूपासः दिवः परि
नव-ग्वः नु दश-ग्वः अङ्गिरः-तमः सचा देवेषु मंहते ॥ ६ ॥

जे हे नानारूपधारी ऋषि अग्निपासून द्युलोकामध्ये उत्पन्न जाह्ले, त्यांच्यामध्ये नवग्व आणि तसें पाहिले तर दशग्व हा सर्व अंगिरांमध्ये श्रेष्ठ होय. तोच दिव्यविभूतींमध्ये त्यांच्याबरोबर सन्मान पावला आहे ६.


इन्द्रे॑ण यु॒जा निः सृ॑जन्त वा॒घतो॑ व्र॒जं गोम॑न्तं अ॒श्विन॑म् ।
स॒हस्रं॑ मे॒ दद॑तो अष्टक॒र्ण्य१ः श्रवो॑ दे॒वेष्व् अ॑क्रत ॥ ७ ॥

इन्द्रेण युजा निः सृजन्त वाघतः व्रजं गो--मन्तं अश्विनं
सहस्रं मे ददतः अष्ट-कर्ण्यः श्रवः देवेषु अक्रत ॥ ७ ॥

इंद्राच्या बरोबरचे देवसेवक बाहेर पडले आणि धेनू आणि अश्व यांनी प्रचुर असा समूह त्यांनी मोकळा केला. त्यांनी मला अष्टकर्णी धेनू सहस्त्रावधि देऊन दिव्य जनांमध्ये आपले यश स्थापन केले ७.


प्र नू॒नं जा॑यतां अ॒यं मनु॒स्तोक्मे॑व रोहतु ।
यः स॒हस्रं॑ श॒ताश्वं॑ स॒द्यो दा॒नाय॒ मंह॑ते ॥ ८ ॥

प्र नूनं जायतां अयं मनुः तोक्म-इव रोहतु
यः सहस्रं शत-अश्वं सद्यः दानाय मंहते ॥ ८ ॥

हा मनुष्यवंश त्वरित वृद्धिंगत होवो. मोड फुटलेल्या बीजाप्रमाणे तो सत्वर अंकुरित वोहो. पहा जो (मनुवंशीय राजा) तो शेकडोंच काय, पण हजारो अश्व दान देण्यासाठी एकदम आज्ञा करीत आहे ८.


न तं अ॑श्नोति॒ कश्च॒न दि॒व इ॑व॒ सान्व् आ॒रभ॑म् ।
सा॒व॒र्ण्यस्य॒ दक्षि॑णा॒ वि सिन्धु॑रिव पप्रथे ॥ ९ ॥

न तं अश्नोति कः चन दिवः-इव सानु आरभं
सावर्ण्यस्य दक्षिणा वि सिन्धुः-इव पप्रथे ॥ ९ ॥

त्याची बरोबरी कोणीही करूं शकत नाही. पहा, द्युलोकाच्या अत्युच्च शिखरावर कोणी आरोहण करूं शकत नाही. (त्याच प्रमाणें ही गोष्ट अशक्य आहे) ह्या सावर्ण्याराजाच्या देणगीचा प्रवाह सिन्धू नदीप्रमाणें विस्तार पावला आहे ९.


उ॒त दा॒सा प॑रि॒विषे॒ स्मद्दि॑ष्टी॒ गोप॑रीणसा ।
यदु॑स्तु॒र्वश्च॑ मामहे ॥ १० ॥

उत दासा परि-विषे स्मद्दिष्टी इतिस्मत्-दिष्टी गो--परीणसा
यदुः तुर्वः च मामहे ॥ १० ॥

तसेंच सेवा करण्याकरितां दोन आज्ञाधारक दास धेनूंच्या खिल्लारासह यदुराजाने, त्या तुर्वश राजाने (भक्तांस) अर्पण केले १०.


स॒ह॒स्र॒दा ग्रा॑म॒णीर्मा रि॑ष॒न् मनुः॒ सूर्ये॑णास्य॒ यत॑मानैतु॒ दक्षि॑णा ।
साव॑र्णेर्दे॒वाः प्र ति॑र॒न्त्व् आयु॒र्यस्मि॒न्न् अश्रा॑न्ता॒ अस॑नाम॒ वाज॑म् ॥ ११॥

सहस्र-दाः ग्राम-नीः मा रिषत् मनुः सूर्येण अस्य यतमाना एतु दक्षिणा
सावर्णेः देवाः प्र तिरन्तु आयुः यस्मिन् अस्रान्ताः असनाम वाजम् ॥ ११ ॥

म्हणून हा सहस्त्रावधि देणग्या देणारा समाजधुरीण मनुवंश कधी नष्ट होणार नाही. याचा दानधर्मा आपल्या तेजाने सूर्याशी देखील स्पर्था करतो. अशा या सावर्णि राजाचे आयुष्य दिव्यविबुध दीर्घ करोत, म्हणे त्याच्या राज्यांत राहूनच कधीहि न थकतां आम्ही सत्वाचे सामर्थ्य संपादन करूं ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६३ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - गय प्लात : देवता - १-४१, १७ - विश्वेदेव; १५-१६ - पथ्या स्वस्ति
छंद - १-१४ - जगती; १५ त्रिष्टुभ् किंवा जगती; १६-१७ - तिष्टुभ्


प॒रा॒वतो॒ ये दिधि॑षन्त॒ आप्यं॒ मनु॑प्रीतासो॒ जनि॑मा वि॒वस्व॑तः ।
य॒याते॒र्ये न॑हु॒ष्यस्य ब॒र्हिषि॑ दे॒वा आस॑ते॒ ते अधि॑ ब्रुवन्तु नः ॥ १॥

परावतः ये दिधिषन्ते आप्यं मनु-प्रीतासः जनिम विवस्वतः
ययातेः ये नहुष्यस्य बर्हिषि देवाः आसते ते अधि ब्रुवन्तु नः ॥ १ ॥

जे दूरच्या (दिव्य) लोकीं असूनहि तेथून मानवांना प्रिय आहेत आणि जे ययातीच्या किंवा नहुषांच्या यज्ञांत कुशासनावर आरोहण करतात, ते दिव्य जन आम्हांला आशीर्वाद देवोत १.


विश्वा॒ हि वो॑ नम॒स्यानि॒ वन्द्या॒ नामा॑नि देवा उ॒त य॒ज्ञिया॑नि वः ।
ये स्थ जा॒ता अदि॑तेर॒द्‌भ्यस्परि॒ ये पृ॑थि॒व्यास्ते म॑ इ॒ह श्रु॑ता॒ हव॑म् ॥ २ ॥

विश्वा हि वः नमस्यानि वन्द्या नामानि देवाः उत यजियानि वः
ये स्थ जाताः अदितेः अत्-भ्यः परि ये पृथिव्याः ते मे इह श्रुत हवम् ॥ २ ॥

हे दिव्य विबुधांनो, तुमचीं जीं अनेक नांवे आहेत, ती सर्वच नांवे आम्हांला नमस्कारार्ह आहेत, सर्वच वंद्य आहेत. तीं सर्व पूज्यच आहेत. जे तुम्ही अनंत‍अदिती पासून, (अथवा) उदकापासून, उत्पन्न झाला आहांत, ते तुम्ही येथे पृथिवीवर आमची हांक ऐका २.


येभ्यो॑ मा॒ता मधु॑म॒त् पिन्व॑ते॒ पयः॑ पी॒यूषं॒ द्यौरदि॑ति॒रद्रि॑बर्हाः ।
उ॒क्थशु॑ष्मान् वृषभ॒रान् स्वप्न॑स॒स्ताँ आ॑दि॒त्याँ अनु॑ मदा स्व॒स्तये॑ ॥ ३ ॥

येभ्यः माता मधु-मत् पिन्वते पयः पीयूषं द्यौः अदितिः अद्रि-बर्हाः
उक्थ-शुष्मान् वृष-भरान् स्वप्नसः तान् आदित्यान् अनु मद स्वस्तये ॥ ३ ॥

ज्यांच्यासाठी भूमाता मधुर असे उदक तुडुंब भरून सोडते, द्युलोक अमृतमय पर्जन्याचा वर्षाव करतो आणि अनिर्बन्ध असे आकाश मेघरूप पर्वतांनी विशाल दिसूं लागते, जे सामगायनांत सामर्थ्य उत्पन्न करणारे आणि (इच्छिताची) वृष्टि करणारे पुण्यचारित्र्य आदित्त्य, त्यांच्या स्वभावास अनुसरून तूंहि स्वकल्याणासाठी आनंदवृत्ति ठेव ३.


नृ॒चक्ष॑सो॒ अनि॑मिषन्तो अ॒र्हणा॑ बृ॒हद्दे॒वासो॑ अमृत॒त्वं आ॑नशुः ।
ज्यो॒तीर॑था॒ अहि॑माया॒ अना॑गसो दि॒वो व॒र्ष्माणं॑ वसते स्व॒स्तये॑ ॥ ४ ॥

नृ-चक्षसः अनि-मिषन्तः अर्हणा बृहत् देवासः अमृत-त्वं आनशुः
ज्योतिः-रथाः अहि-मायाः अनागसः दिवः वर्ष्माणं वसते स्वस्तये ॥ ४ ॥

जे सर्व मानवांचे निरीक्षण करतात; जे कधींहि निद्रिस्त असत नाहीत, असे दिव्यविबुध आपल्या (स्वाभाविक) योग्यतेने श्रेष्ठ अशा अमरत्वास पावले, त्यांचा रथ प्रकाशमय असतो, ते सर्वांची माया जाणतात, पण स्वत: निष्पाप असून मानवांच्या कल्याणासाठीं आकाशाप्रमाणे (मनाचा) मोठेपणा धारण करतात ४.


स॒म्राजो॒ ये सु॒वृधो॑ य॒ज्ञं आ॑य॒युरप॑रिह्वृता दधि॒रे दि॒वि क्षय॑म् ।
ताँ आ वि॑वास॒ नम॑सा सुवृ॒क्तिभि॑र्म॒हो आ॑दि॒त्याँ अदि॑तिं स्व॒स्तये॑ ॥ ५ ॥

सम्-राजः ये सु-वृधः यजं आययुः अपरि-ह्वृताः दधिरे दिवि क्षयं
तान् आ विवास नमसा सुवृक्ति-भिः महः आदित्यान् अदितिं स्वस्तये ॥ ५ ॥

मानवांवर अधिराज्य चालविणारे, उत्कृष्ट अशी उन्नति घडवून आणणारे श्रेष्ठ आदित्य आमच्या यज्ञाला प्राप्त झाले. त्या दुर्निवार विभूतींनी द्युलोकांतच वास केला. अशा त्या श्रेष्ठ आदित्यांना प्रणिपात करून आपल्या कल्याणासाठी-उत्कृष्ट सूक्तांनी त्यांची सेवा कर ५.


को व॒ स्तोमं॑ राधति॒ यं जुजो॑षथ॒ विश्वे॑ देवासो मनुषो॒ यति॒ ष्ठन॑ ।
को वो॑ऽध्व॒रं तु॑विजाता॒ अरं॑ कर॒द्यो नः॒ पर्ष॒दत्यंहः॑ स्व॒स्तये॑ ॥ ६ ॥

कः वः स्तोमं राधति यं जुजोषथ विश्वे देवासः मनुषः यति स्थन
कः वः अध्वरं तुवि-जाताः अरं करत् यः नः पर्षत् अत् इ अंहः स्वस्तये ॥ ६ ॥

जे स्तुतिसूक्त तुम्हांला प्रिय वाटतें तें (दुसरा) कोणता कवि रचीत आहे बरें ? हे अखिल दिव्य विभूतींनो! हे मानवहितकारी विभूतींनो, तुम्ही जितके आहांत-तितकेच नेहमी आहांत. हे स्वसिद्ध-बलाढ्य देवांनो, तुमचा अध्वर-याग कोणीं अलंकृत केला ? जो अध्वर, आमच्या कल्याणासाठींच आमच्या पातकापासून आमचा उद्धार करतो ६.


येभ्यो॒ होत्रां॑ प्रथ॒मां आ॑ये॒जे मनुः॒ समि॑द्धाग्नि॒र्मन॑सा स॒प्त होतृ॑भिः ।
त आ॑दित्या॒ अभ॑यं॒ शर्म॑ यच्छत सु॒गा नः॑ कर्त सु॒पथा॑ स्व॒स्तये॑ ॥ ७ ॥

येभ्यः होत्रां प्रथमां आयेजे मनुः समिद्ध-अग्निः मनसा सप्त होतृ-भिः
ते आदित्याः अभयं शर्म यच्चत सु-गा नः कर्त सु-पथा स्वस्तये ॥ ७ ॥

ज्या तुम्हांप्रीत्यर्थ मनूने अग्नि प्रज्वलित करून सप्तहोत्यांसह अंत:करणपूर्वक अगदी पहिल्याने हविर्भाग अर्पण केला; हे आदित्यहो, असे तुम्ही आम्हांला निर्भय करील असा आसरा द्या; आणि आमच्या कल्याणासाठी आमचे सन्मार्ग सुगम करा ७.


य ईशि॑रे॒ भुव॑नस्य॒ प्रचे॑तसो॒ विश्व॑स्य स्था॒तुर्जग॑तश्च॒ मन्त॑वः ।
ते नः॑ कृ॒तादकृ॑ता॒देन॑स॒स्पर्य॒द्या दे॑वासः पिपृता स्व॒स्तये॑ ॥ ८ ॥

ये ईशिरे भुवनस्य प्र-चेतसः विश्वस्य स्थातुः जगतः च मन्तवः
ते नः कृतात् अकृतात् एनसः परि अद्य देवासः पिपृत स्वस्तये ॥ ८ ॥

अत्यंत ज्ञानी जे दिव्य विबुध या सर्व भुवनावर आणि सकल स्थावरावर आणि तसेंच गतिमान वस्तूंवरहि सत्ता चालवितात, ते मननयोग्यच आहेत. तर असे तुम्हीं विभूति आम्ही जें काहीं बुद्धिपुरस्सर केले असेल किंवा बुद्धिपुर:सर केलेले नसेल त्या त्या सर्व पातकांपासून आज आमच्या कल्याणासाठी आमचा उद्धार करा ८.


भरे॒ष्व् इन्द्रं॑ सु॒हवं॑ हवामहेऽंहो॒मुचं॑ सु॒कृतं॒ दैव्यं॒ जन॑म् ।
अ॒ग्निं मि॒त्रं वरु॑णं सा॒तये॒ भगं॒ द्यावा॑पृथि॒वी म॒रुतः॑ स्व॒स्तये॑ ॥ ९ ॥

भरेषु इन्द्रं सु-हवं हवामहे अंहः-मुचं सु-कृतं दैव्यं जनं
अग्निं मित्रं वरुणं सातये भगं द्यावापृथिवी इति मरुतः स्वस्तये ॥ ९ ॥

सहज धांवा केला असतांहि जो युद्धप्रसंगी धांवत येतो त्या इंद्राला आम्ही पाचारण करतो. पातकांपासून मुक्त करणारा, सत्कृत्यरत असा जो अग्नि, मित्र, वरुण इत्यादि दिव्य विबुधांचा समूह आहे, त्यालाहि आम्हांला लाभ व्हावा म्हणून आम्ही पाचारण करतो; भाग्यदेव, त्याचप्रमाणे द्यावापृथिवी आणि मरुद्‌गण यांना देखील आमच्या कल्याणार्थ पाचारण करतो ९.


सु॒त्रामा॑णं पृथि॒वीं द्यां अ॑ने॒हसं॑ सु॒शर्मा॑णं॒ अदि॑तिं सु॒प्रणी॑तिम् ।
दैवीं॒ नावं॑ स्वरि॒त्रां अना॑गसं॒ अस्र॑वन्तीं॒ आ रु॑हेमा स्व॒स्तये॑ ॥ १० ॥

सु-त्रामाणं पृथिवीं द्यां अनेहसं सु-शर्माणं अदितिं सु-प्रनीतिं
दैवीं नावं सु-अरित्रां अनागसं अस्रवन्तीं आ रुहेम स्वस्तये ॥ १० ॥

भक्तोद्धारक देव, त्याचप्रमाणें द्यावा पृथिवी यांना आणि निष्कलंक, मंगलाधार आणि सन्मार्गदर्शक जो अनंत(परमेश्वर) त्याचाहि धांवा करतो आणि उत्तम वल्ही असलेले, निर्दोष, कधींहि न गळणारी अशी (भगवत्‌कृपेची) जी एक दिव्य नौका आहे, तिच्यामध्ये आमच्या कल्याणासाठी आम्ही आरूढ होतो १०.


विश्वे॑ यजत्रा॒ अधि॑ वोचतो॒तये॒ त्राय॑ध्वं नो दु॒रेवा॑या अभि॒ह्रुतः॑ ।
स॒त्यया॑ वो दे॒वहू॑त्या हुवेम शृण्व॒तो दे॑वा॒ अव॑से स्व॒स्तये॑ ॥ ११॥

विश्वे यजत्राः अधि वोचत ऊतये त्रायध्वं नः दुः-एवायाः अभि-ह्रुतः
सत्यया वः देव-हूत्या हुवेम शृण्वतः देवाः अवसे स्वस्तये ॥ ११ ॥

हे सकल पूज्य विभूतींनो, आमच्या सहायासाठी आम्हांला उत्तेजन द्या आणि दुष्टविचारमूलक जे अपराध त्यांच्यापासून आमचे रक्षण करा. तुमचा धांवा नेहमी सत्यफलदायी असतो म्हणूनच तो आम्ही करीत आहो. तर दिव्य विबुधांनो, आमच्यावर कृपा करण्यासाठी आणि आमच्या कल्याणासाठी आमची प्रार्थना ऐका ११.


अपामी॑वां॒ अप॒ विश्वां॒ अना॑हुतिं॒ अपारा॑तिं दुर्वि॒दत्रां॑ अघाय॒तः ।
आ॒रे दे॑वा॒ द्वेषो॑ अ॒स्मद्यु॑योतनो॒रु णः॒ शर्म॑ यच्छता स्व॒स्तये॑ ॥ १२ ॥

अप अमीवां अप विश्वां अनाहुतिं अप अरातिं दुः-विदत्रां अघ-यतः
आरे देवाः द्वेषः अस्मत् युयोतन उरु नः शर्म यच्चत स्वस्तये ॥ १२ ॥

कोणताही व्याधि, आणि थट्टेने किंवा अभक्तीने केलेले धार्मिक कृत्य, कंजूषपणा तसेच घातकी दूष्टांचे गुप्त बेत, ही अनिष्टे आम्हांपासून दूर ठेवा. दिव्य विबुधांनो, आमच्या विषयींची द्वेषबुद्धि विलयास न्या, आमच्या कल्याणासाठी आम्हांला तुमचा उत्तम आश्रय अर्पण करा १२.


अरि॑ष्टः॒ स मर्तो॒ विश्व॑ एधते॒ प्र प्र॒जाभि॑र्जायते॒ धर्म॑ण॒स्परि॑ ।
यं आ॑दित्यासो॒ नय॑था सुनी॒तिभि॒रति॒ विश्वा॑नि दुरि॒ता स्व॒स्तये॑ ॥ १३ ॥

अरिष्टः सः मर्तः विश्वः एधते प्र प्र-जाभिः जायते धर्मणः परि
यं आदित्यासः नयथ सुनीति-भिः अति विश्वानि दुः-इता स्वस्तये ॥ १३ ॥

कोणताहि भक्तजन असो, तो निर्धास्तपणें उन्नतीला पावतो. धर्म सांभाळून संततीनेंहि युक्त होतो. असा भक्त कोण म्हणाल तर ज्याला हे आदित्यांनो, तुम्ही नीति न्याय्य मार्गांनी सर्व प्रकारच्या दुष्ट वातावरणातून त्याच्या कल्याणार्थ सुखरूप पार नेतां १३.


यं दे॑वा॒सोऽ॑वथ॒ वाज॑सातौ॒ यं शूर॑साता मरुतो हि॒ते धने॑ ।
प्रा॒त॒र्यावा॑णं॒ रथं॑ इन्द्र सान॒सिं अरि॑ष्यन्तं॒ आ रु॑हेमा स्व॒स्तये॑ ॥ १४ ॥

यं देवासः अवथ वाज-सातौ यं शूर-साता मरुतः हिते धने
प्रातः-यावानं रथं इन्द्र सानसिं अरिष्यन्तं आ रुहेम स्वस्तये ॥ १४ ॥

हे देवांनो, सत्यपूर्ण युद्धांत विजय व्हावा या हेतूने, हे मरुतांनो शौर्यकर्माचीच जेथे आवश्यकता, अशा समरप्रसंगी ज्याला तुम्ही साहाय करितां असा, हे इंद्रा, प्रात:कालींचे भक्तांकडे येणारा जो तुझा विजय रथ, त्या रथावर हे देवा, आम्ही आमच्या कल्याणासाठी आरोहण करूं असे कर १४.


स्व॒स्ति नः॑ प॒थ्यासु॒ धन्व॑सु स्व॒स्त्य१प्सु वृ॒जने॒ स्वर्वति ।
स्व॒स्ति नः॑ पुत्रकृ॒थेषु॒ योनि॑षु स्व॒स्ति रा॒ये म॑रुतो दधातन ॥ १५ ॥

स्वस्ति नः पथ्यासु धन्व-सु स्वस्ति अप्-सु वृजने स्वः-वति
स्वस्ति नः पुत्र-कृथेषु योनिषु स्वस्ति राये मरुतः दधातन ॥ १५ ॥

मार्ग चालत असतां, उदकरहित प्रदेशांत, किंवा उदकमय प्रदेशांत तसेंच दिव्य प्रकाशासाठी आरंभिलेल्या झुंजीत सर्वत्र आमचे कल्याण होवो. ज्यांच्या कुसवा पुत्र प्रसवतात अशा आमच्या स्त्रीजनांचे कुशल असो; हे मरुतांनो आमच्या कल्याणासाठी आम्हांला उत्कृष्ट वैभवाकडे अभिमुख करा १५.


स्व॒स्तिरिद्धि प्रप॑थे॒ श्रेष्ठा॒ रेक्ण॑स्वत्य॒भि या वा॒मं एति॑ ।
सा नो॑ अ॒मा सो अर॑णे॒ नि पा॑तु स्वावे॒शा भ॑वतु दे॒वगो॑पा ॥ १६ ॥

स्वस्तिः इत् हि प्र-पथे श्रेष्ठा रेक्णस्वती अभि या वामं एति
सा नः अमा सो इति अरणे नि पातु सु-आवेशा भवतु देव-गोपा ॥ १६ ॥

ही धनधान्यपरिप्लुत, श्रेष्ठ अशी स्वस्ति देवता आम्हांला उत्तम मार्गाकडे नेवो. जी वस्तु अभिलक्षणीय असेल तिकडेच ती जाते. ती घरी आणि परदेशांतही आमचे रक्षण करो. तिच्यावर देवाची पाखर आहे म्हणून तीच उत्तम आवेश उत्पन्न करो १६.


ए॒वा प्ल॒तेः सू॒नुर॑वीवृधद्वो॒ विश्व॑ आदित्या अदिते मनी॒षी ।
ई॒शा॒नासो॒ नरो॒ अम॑र्त्ये॒नास्ता॑वि॒ जनो॑ दि॒व्यो गये॑न ॥ १७ ॥

एव प्लतेः सूनुः अवीवृधत् वः विश्वे आदित्याः अदिते मनीषी
ईशानासः नरः अमर्त्येन अस्तावि जनः दिव्यः गयेन ॥ १७ ॥

याप्रमाणे मननप्रवीण जो प्लताचा पुत्र त्याने हे आदित्यांनो, हे अनंतरूप अदिते, तुम्हां सर्वांना हर्षाने वृद्धिंगत केले आहे. अमर जो (ईश्वर) त्याच्या सहाय्यानेच मनुष्ये सत्ताधीश होतात, आणि म्हणूनच "गयाने" दिव्य जनाचे स्तवन केले १७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६४ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - गय प्लात : देवता - विश्वेदेव; १५-१६ : छंद - १२, १६, १७ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - जगती;


क॒था दे॒वानां॑ कत॒मस्य॒ याम॑नि सु॒मन्तु॒ नाम॑ शृण्व॒तां म॑नामहे ।
को मृ॑ळाति कत॒मो नो॒ मय॑स्करत् कत॒म ऊ॒ती अ॒भ्या व॑वर्तति ॥ १॥

कथा देवानां कतमस्य यामनि सु-मन्तु नाम शृण्वतां मनामहे
कः मृळाति कतमः नः मयः करत् कतमः ऊती अभि आ ववर्तति ॥ १ ॥

धर्माचा मार्ग आक्रमण करीत असतां भक्तांची हांक ऐकणार्‍या दिव्य विबुधांमध्ये कोणाच्या मननीय नांवाचे आम्हीं चिंतन करावे ? आणि तें कशा रीतीनें करावे ? आमच्यावर कोण दया करील ? आमच्या सहाय्यासाठीं कोण आमच्याकडे वळेल ? १.


क्र॒तू॒यन्ति॒ क्रत॑वो हृ॒त्सु धी॒तयो॒ वेन॑न्ति वे॒नाः प॒तय॒न्त्या दिशः॑ ।
न म॑र्डि॒ता वि॑द्यते अ॒न्य ए॑भ्यो दे॒वेषु॑ मे॒ अधि॒ कामा॑ अयंसत ॥ २ ॥

ऋतु-यन्ति क्रतवः हृत्-सु धीतयः वेनन्ति वेनाः पतयन्ति आ दिशः
न मर्डिता विद्यते अन्यः एभ्यः देवेषु मे अधि कामाः अयंसत ॥ २ ॥

आमच्या कर्तृत्वशक्ति कर्तृत्व दाखविण्यासाठी उतावीळ झाल्या आहेत, अंत:करणांत विचार उचंबळत आहेत, आकांक्षा उत्कंठित झाल्या आहेत, आणि चारी दिशांकडे धांव घेत आहेत. ह्यांच्यामध्ये देवाव्यतिरिक्त दुसरा कोणीहि दयाळू दिसत नाही. म्हणून माझ्या सर्व वासना दिव्य विबुधांमध्येच एकत्रित झाल्या आहेत २.


नरा॑ वा॒ शंसं॑ पू॒षणं॒ अगो॑ह्यं अ॒ग्निं दे॒वेद्धं॑ अ॒भ्यर्चसे गि॒रा ।
सूर्या॒मासा॑ च॒न्द्रम॑सा य॒मं दि॒वि त्रि॒तं वातं॑ उ॒षसं॑ अ॒क्तुं अ॒श्विना॑ ॥ ३ ॥

नराशंसं वा पूषणं अगोह्यं अग्निं देव-इद्धं अभि अर्चसे गिरा
सूर्यामासा चन्द्रमसा यमं दिवि त्रितं वातं उषसं अक्तुं अश्विना ॥ ३ ॥

नराशंस अथवा ज्याच्यापासून कांही लपविलें जात नाही असा पूषा आणि दिव्यजनांनी प्रज्वलित केलेला अग्नि यांचे मी स्तुतीने अर्चन करतो; सूर्य आणि प्रत्येक महिन्याला येणारा चंद्र असे उभयतां, तद्वतच द्युलोकनिवासी यम; तसाच त्रित, वायु, उषा आणि रात्र आणि अश्वीदेव यांचेंहि स्तवन करतो ३.


क॒था क॒विस्तु॑वी॒रवा॒न् कया॑ गि॒रा बृह॒स्पति॑र्वावृधते सुवृ॒क्तिभिः॑ ।
अ॒ज एक॑पात् सु॒हवे॑भि॒रृक्व॑भि॒रहिः॑ शृणोतु बु॒ध्न्योख्प् हवी॑मनि ॥ ४ ॥

कथा कविः तुवि-रवान् कया गिरा बृहस्पतिः ववृधते सुवृक्ति-भिः
अजः एक-पात् सु-हवेभिः ऋक्व-भिः अहिः शृणोतु बुध्न्यः हवीमनि ॥ ४ ॥

जो आपल्या शब्दघोषाने दणदणाट उडवून देतो, तो ज्ञानी कवि कसा आणि कोणत्या स्तुतीने संतुष्ट होईल ? (प्रार्थना स्तुतींचा प्रभु) बृहस्पति सुंदर सूक्तांनी प्रसन्न होतो. उत्तम हवींनी आणि ऋचांच्या घोषाने ’अज एकपाद’ प्रसन्न होतो. तर तशाच सूक्तांनी पाचारण केलें असतां तो अहिर्बुध्न्यहि आमची हांक ऐकून येवो ४.


दक्ष॑स्य वादिते॒ जन्म॑नि व्र॒ते राजा॑ना मि॒त्रावरु॒णा वि॑वाससि ।
अतू॑र्तपन्थाः पुरु॒रथो॑ अर्य॒मा स॒प्तहो॑ता॒ विषु॑रूपेषु॒ जन्म॑सु ॥ ५ ॥

दक्षस्य वा अदिते जन्मनि व्रते राजाना मित्रावरुणा विवाससि
अतूर्त-पन्थाः पुरु-रथः अर्यमा सप्त-होता विषु-रूपेषु जन्म-सु ॥ ५ ॥

किंवा हे अदिते, कार्यकुशल जो (भक्त) त्याच्या जन्मकाळीं (म्हणजे दिक्षेच्या वेळीं) त्याच्या यज्ञांत जगताचे राजे मित्रावरुण त्यांना तूं सेवेने संतुष्ट करतेस आणि ज्याचा मार निष्कंटक, ज्याचा रथ प्रशस्त असा जो अर्यमा तोहि नाना प्रकारच्या (यज्ञीय) जन्मांच्या प्रसंगी सप्तहोत्यांचे काम करतो ५.


ते नो॒ अर्व॑न्तो हवन॒श्रुतो॒ हवं॒ विश्वे॑ शृण्वन्तु वा॒जिनो॑ मि॒तद्र॑वः ।
स॒ह॒स्र॒सा मे॒धसा॑ताव् इव॒ त्मना॑ म॒हो ये धनं॑ समि॒थेषु॑ जभ्रि॒रे ॥ ६ ॥

ते नः अर्वन्तः हवन-श्रुतः हवं विश्वे शृण्वन्तु वाजिनः मि त-द्रवः
सहस्र-साः मेधसातौ-इव त्मना महः ये धनं सम्-इथेषु जभ्रिरे ॥ ६ ॥

तसेंच ते अश्वारूढ वीर आणि ते भक्तांची हांक ऐकणारे, व्यवस्थित गतीने जाणारे, सर्व सत्त्वबलाढ्य वीर आमची हांक ऐकोत. मेधाजनन यज्ञातल्याप्रमाणे त्यांनी आपण हो‍ऊन सहस्त्रावधि देणग्या दिल्या आहेत आणि संग्रामामध्ये यशोधन संपादन केले आहे ६.


प्र वो॑ वा॒युं र॑थ॒युजं॒ पुरं॑धिं॒ स्तोमैः॑ कृणुध्वं स॒ख्याय॑ पू॒षण॑म् ।
ते हि दे॒वस्य॑ सवि॒तुः सवी॑मनि॒ क्रतुं॒ सच॑न्ते स॒चितः॒ सचे॑तसः ॥ ७ ॥

प्र वः वायुं रथ-युजं पुरम्-धिं स्तोमैः कृणुध्वं सख्याय पूषणं
ते हि देवस्य सवितुः सवीमनि क्रतुं सचन्ते स-चितः स-चेतसः ॥ ७ ॥

तुमच्यासाठी आपला रथ सज्ज करणारा वायु, पुरन्ध्रि आणि पूष्पा यांना सख्यत्त्वाकरितां सूक्तांनी प्रसन्न करा. कारण सृष्टिकर्ता जो सविता त्याच्या सृष्टिकार्यातील कर्त्तृत्वाला ते सारख्याच विचाराचे असल्याने एका विचाराने अनुसरतात ७.


त्रिः स॒प्त स॒स्रा न॒द्यो म॒हीर॒पो वन॒स्पती॒न् पर्व॑ताँ अ॒ग्निं ऊ॒तये॑ ।
कृ॒शानुं॒ अस्तॄ॑न् ति॒ष्यं स॒धस्थ॒ आ रु॒द्रं रु॒द्रेषु॑ रु॒द्रियं॑ हवामहे ॥ ८ ॥

त्रिः सप्त सस्राः नद्यः महीः अपः वनस्पतीन् पर्वतान् अग्निं ऊतये
कृशानुं अस्तॄन् तिष्यं सध-स्थे आ रुद्रं रुद्रेषु रुद्रियं हवामहे ॥ ८ ॥

वेगाने वाहणार्‍या एकवीस नद्या, विस्तीर्ण जलाशय, वनस्पति, पर्वत आणि कृशानु, अस्त्रयोद्धे तसेंच तिष्य आणि त्याच ठिकाणी वास करणारा रुद्र, नांवाला योग्य असा जो रुद्र, त्या रुद्रालाहि आम्ही आमच्या सहाय्यार्थ हांक मारतो ८.


सर॑स्वती स॒रयुः॒ सिन्धु॑रू॒र्मिभि॑र्म॒हो म॒हीरव॒सा य॑न्तु॒ वक्ष॑णीः ।
दे॒वीरापो॑ मा॒तरः॑ सूदयि॒त्न्वो घृ॒तव॒त् पयो॒ मधु॑मन् नो अर्चत ॥ ९ ॥

सरस्वती सरयुः सिन्धुः ऊर्मि-भिः महः महीः अवसा यन्तु वक्षणीः
देवीः आपः मातरः सूदयित्न्वः घृत-वत् पयः मधु-मत् नः अर्चत ॥ ९ ॥

सरस्वति, सरयू आणि कल्लोलांनी विभूषित अशी सिंधु, इत्यादि विशालांतील विशाल अशा सरिता आपल्या कृपाकटाक्षासह आगमन करोत; त्याचप्रमाणे (जगताच्या) माता, (जगाला) प्रोत्साहन देणार्‍या ज्या आपोदेवी त्या घृतमय आणि मधुर वृष्टीने आमचा सन्मान करोत ९.


उ॒त मा॒ता बृ॑हद्दि॒वा शृ॑णोतु न॒स्त्वष्टा॑ दे॒वेभि॒र्जनि॑भिः पि॒ता वचः॑ ।
ऋ॒भु॒क्षा वाजो॒ रथ॒स्पति॒र्भगो॑ र॒ण्वः शंसः॑ शशमा॒नस्य॑ पातु नः ॥ १० ॥

उत माता बृहत्-दिवा शृणोतु नः त्वष्टा देवेभिः जनि-भिः पिता वचः
ऋभुक्षाः वाजः रथः-पतिः भगः रण्वः शंसः शशमानस्य पातु नः ॥ १० ॥

तसेंच जननी बृहत्‌दिवा ही आमची हांक ऐको. त्वष्टा देव आणि देवांगणांसह ("द्यु"रूप) पिता आमची विनंती ऐकून घेवो. ऋभूंचा प्रभु तसाच सत्वमूर्ति "वाज" रथाचा स्वामी असून दर्शनीय भाग्यदाता जो "भग" आणि स्तोत्रजनांचे स्तवन ही सर्व आमचे रक्षण करोत १०.


र॒ण्वः संदृ॑ष्टौ पितु॒माँ इ॑व॒ क्षयो॑ भ॒द्रा रु॒द्राणां॑ म॒रुतां॒ उप॑स्तुतिः ।
गोभिः॑ ष्याम य॒शसो॒ जने॒ष्व् आ सदा॑ देवास॒ इळ॑या सचेमहि ॥ ११॥

रण्वः सम्-दृष्टौ पितुमान्-इव क्षयः भद्रा रुद्राणां मरुतां उप-स्तुतिः
गोभिः स्याम यशसः जनेषु आ सदा देवासः इळया सचेमहि ॥ ११ ॥

धनधान्यांनी भरलेल्या निवासाप्रमाणें भाग्यदाता भग हा दृष्टीला रम्य दिसतो, तशीच रुद्रभक्त जे मरुत्‌ त्यांची स्तुतिहि मंगलप्रदच असते. तर प्रकाशधेनूंच्या योगाने आम्ही लोकांमध्ये यशस्वी हो‍ऊं असे घडो. हे देवांनो, आम्हीं सदैव स्तुतीच्या उत्कंठेने युक्त हो‍ऊं असे करा ११.


यां मे॒ धियं॒ मरु॑त॒ इन्द्र॒ देवा॒ अद॑दात वरुण मित्र यू॒यम् ।
तां पी॑पयत॒ पय॑सेव धे॒नुं कु॒विद्गिरो॒ अधि॒ रथे॒ वहा॑थ ॥ १२ ॥

यं मे धियं मरुतः इन्द्र देवाः अददात वरुण मित्र यूयं
तां पीपयत पयसाइव धेनुं कुवित् गिरः अधि रथे वहाथ ॥ १२ ॥

जी माझी ध्यानोत्सुकता, हे देवांनो, मरुतांनो, दे देवा इंद्रा, वरुणा, मित्रा, तुम्हीं मला दिली आहे, तिला धेनूची कांस दुधाने फुगावी त्याप्रमाणें पुष्ट करा. मी केलेल्या स्तुति तुम्ही आपल्या रथांमध्ये घालूनच जणो घेऊन जात नाही काय ? १२.


कु॒विद॒ङ्ग प्रति॒ यथा॑ चिद॒स्य नः॑ सजा॒त्यस्य मरुतो॒ बुबो॑धथ ।
नाभा॒ यत्र॑ प्रथ॒मं सं॒नसा॑महे॒ तत्र॑ जामि॒त्वं अदि॑तिर्दधातु नः ॥ १३ ॥

कुवित् अङ्ग प्रति यथा चित् अस्य नः स-जात्यस्य मरुतः बुबोधथ
नाभा यत्र प्रथमं सम्-नसामहे तत्र जामि-त्वं अदितिः दधातु नः ॥ १३ ॥

हे मरुतांनो, तुम्ही आमच्या ह्या एकजातीयत्वाची जाणीव करून देणार नाही काय ? या एकाच मध्यवर्ति ठिकाणामध्यें आम्ही सर्वजण एकत्र भेंटतो, तर तेथेच अदितिहि आमच्याशी आप्तपणा धारण करो १३.


ते हि द्यावा॑पृथि॒वी मा॒तरा॑ म॒ही दे॒वी दे॒वाञ् जन्म॑ना य॒ज्ञिये॑ इ॒तः ।
उ॒भे बि॑भृत उ॒भयं॒ भरी॑मभिः पु॒रू रेतां॑सि पि॒तृभि॑श्च सिञ्चतः ॥ १४ ॥

ते हि द्यावापृथिवी इति मातरा मही देवी देवान् जन्मना यजियेइति इतः
उभे इति बिभृतः उभयं भरीम-भिः पुरु रेतांसि पितृ-भिः च सिचतः ॥ १४ ॥

आणि उभयतां द्यावापृथिवी, त्या (जगताच्या) श्रेष्ठ आणि दिव्यजननी जन्मत:च पूज्य अशा दिव्यविबुधांना इकडेच घेऊन येत आहेत. त्या आपल्या पोषक सामर्थ्याने दोन्ही लोकांचे धारण करतात, आणि पितरांसह भूमीवर वृष्ट्युदकाचे सिंचन करतात १४.


वि षा होत्रा॒ विश्वं॑ अश्नोति॒ वार्यं॒ बृह॒स्पति॑र॒रम॑तिः॒ पनी॑यसी ।
ग्रावा॒ यत्र॑ मधु॒षुदु॒च्यते॑ बृ॒हदवी॑वशन्त म॒तिभि॑र्मनी॒षिणः॑ ॥ १५ ॥

वि सा होत्रा विश्वं अश्नोति वार्यं बृहस्पतिः अरमतिः पनीयसी
ग्रावा यत्र मधु-सुत् उच्यते बृहत् अवीवशन्त मति-भिः मनीषिणः ॥ १५ ॥

तीच देवाची विनवणी यच्च्यावत्‌ उत्कृष्ट वस्तू संपादन करून देते, प्रार्थनासूक्तांचा प्रभु बृहस्पति आणि त्याची अरमति म्हणजे अखंड स्तुति अत्यंत आदरणीय होय. अशाच ठिकाणी मधुररसस्त्रावी सोमग्रावा मोठ्याने घोष करतो; आणि मननप्रवीण भक्त मननीय स्तोत्रांनी मंदिर दुमदुमून सोडतात १५.


ए॒वा क॒विस्तु॑वी॒रवा॑ँ ऋत॒ज्ञा द्र॑विण॒स्युर्द्रवि॑णसश्चका॒नः ।
उ॒क्थेभि॒रत्र॑ म॒तिभि॑श्च॒ विप्रोऽ॑पीपय॒द्गयो॑ दि॒व्यानि॒ जन्म॑ ॥ १६ ॥

एव कविः तुवि-रवान् ऋत-जाः द्रविणस्युः द्रविणसः चकानः
उक्थेभिः अत्र मति-भिः च विप्रः अपीपयत् गयः दिव्यानि जन्म ॥ १६ ॥

याप्रमाणें कविजन एकच घोषणा चालवितात; ते अचल संपत्तीची इच्छा धरणारे आणि त्या अचल संपत्तीच्या प्राप्तीची उत्कंठा बाळगणारे आहेत, म्हणूनच सद्धर्माला ते जाणतात. त्यामुळे तेथे स्तवनज्ञ भक्त जो "गय" त्याने सामसूक्तांनी आणि मननांनी दिव्य अवतारांची यथेच्छ स्तुति केली १६.


ए॒वा प्ल॒तेः सू॒नुर॑वीवृधद्वो॒ विश्व॑ आदित्या अदिते मनी॒षी ।
ई॒शा॒नासो॒ नरो॒ अम॑र्त्ये॒नास्ता॑वि॒ जनो॑ दि॒व्यो गये॑न ॥ १७ ॥

एव प्लतेः सूनुः अवीवृधत् वः विश्वे आदित्याः अदिते मनीषी
ईशानासः नरः अमर्त्येन अस्तावि जनः दिव्यः गयेन ॥ १७ ॥

याप्रमाणें मननप्रवीण जो प्लताचा पुत्र त्याने, हे आदित्यांनो, हे अनंत अदिते, तुम्हां सर्वांना हर्षाने वृद्धिंगत केले. अमर जो देव त्याच्या सहाय्यानेंच मनुष्ये सत्ताधीश होतात आणि म्हणूनच "गया"ने दिव्य विभूतींचे स्तवन केले १७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६५ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - वसुकर्ण वासुक्र : देवता - विश्वेदेव : छंद - १५ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - जगती


अ॒ग्निरिन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा वा॒युः पू॒षा सर॑स्वती स॒जोष॑सः ।
आ॒दि॒त्या विष्णु॑र्म॒रुतः॒ स्वर्बृ॒हत् सोमो॑ रु॒द्रो अदि॑ति॒र्ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ ॥ १॥

अग्निः इन्द्रः वरुणः मित्रः आर्यमा वायुः पूषा सरस्वती स-जोषसः
आदित्याः विष्णुः मरुतः स्वः बृहत् सोमः रुद्रः अदितिः ब्रह्मणः पतिः ॥ १ ॥

अग्नि, इंद्र, वरुण मित्र, अर्यमा, वायु, पूषा, सरस्वती, हे सर्व सारखेच भक्तवत्सल आहेत; तसेच आदित्य, विष्णु, मरुतगण, महदाकाश, सोम, रुद्र, अदिति आणि प्रार्थनांचा प्रभु ब्रह्मणस्पति हेहि आहेत १.


इ॒न्द्रा॒ग्नी वृ॑त्र॒हत्ये॑षु॒ सत्प॑ती मि॒थो हि॑न्वा॒ना त॒न्वाख्प् समो॑कसा ।
अ॒न्तरि॑क्षं॒ मह्या प॑प्रु॒रोज॑सा॒ सोमो॑ घृत॒श्रीर्म॑हि॒मानं॑ ई॒रय॑न् ॥ २ ॥

इन्द्राग्नी इति वृत्र-हत्येषु सत्पती इतिसत्-पती मिथः हिन्वाना तन्वा सम्-ओकसा
अन्तरिक्षं महि आ पप्रुः ओजसा सोमः घृत-श्रीः महिमानं ईरयन् ॥ २ ॥

सज्जनप्रतिपालक, एकत्र वास करणारे इंद्राग्नि हे वृत्रयुद्धामधें (भक्तांना) स्वत: परस्परांना प्रेरणा करतात. त्यांनी आणि तसेच घृताप्रमाणे तेज;पुंज सामानेंहि आपला महिमा प्रकट करून आपल्या ओजस्वितेने अन्तरिक्ष भरून टाकले २.


तेषां॒ हि म॒ह्ना म॑ह॒तां अ॑न॒र्वणां॒ स्तोमा॒ँ इय॑र्म्यृत॒ज्ञा ऋ॑ता॒वृधा॑म् ।
ये अ॑प्स॒वं अ॑र्ण॒वं चि॒त्ररा॑धस॒स्ते नो॑ रासन्तां म॒हये॑ सुमि॒त्र्याः ॥ ३ ॥

तेषां हि मह्ना माहतां अनर्वणां स्तोमान् इयर्मि ऋत-जाः ऋत-वृधां
ये अप्सवं अर्णवं चित्र-राधसः ते नः रासन्तां महये सु-मित्र्याः ॥ ३ ॥

ज्यांच्यावर कोणींहि चढाई करूं शकत नाही अशा त्या श्रेष्ठ आणि सद्धर्माने आनंद पाळणार्‍या (इंद्राग्नीं)च्या (कृपा) प्रभावाने मीहि सद्धर्म जाणणारा त्यांचा भक्त त्यांच्याकडे आपले प्रार्थनासूक्त पाठवून देतो. ज्यांचा कृपाप्रसाद अद्‌भुत आहे असे ते भक्तसुहृद इंद्राग्नी, आम्हीं महत्त्वास चढावें म्हणून उदकाने डबडबलेला मेघ आम्हांकडे लोटून देवोत ३.


स्वर्णरं अ॒न्तरि॑क्षाणि रोच॒ना द्यावा॒भूमी॑ पृथि॒वीं स्क॑म्भु॒रोज॑सा ।
पृ॒क्षा इ॑व म॒हय॑न्तः सुरा॒तयो॑ दे॒वा स्त॑वन्ते॒ मनु॑षाय सू॒रयः॑ ॥ ४ ॥

स्वः-नरं अन्तरिक्षाणि रोचना द्यावाभूमी इति पृथिवीं स्कम्भुः ओजसा
पृक्षाः-इव महयन्तः सु-रातयः देवाः स्तवन्ते मनुषाय सूरयः ॥ ४ ॥

दिव्य लोकांचा नायक आणि अन्तरिक्ष प्रदेश, तसाच त्यांतील ज्वलत्‌ गोल, ह्या द्यावा पृथिवी आणि ही भूमि या सर्वांना ज्यांनी आपल्या ओजस्वीतेने सांवरून धरलें आहे, जे आपला प्रभावी स्पर्श केल्याप्रमाणेंच जणों (भक्ताला) महत्त्वास जढवितात; असे दानशूर मानवाचे धुरीण दिव्यविबुध स्तुतीला पावतात ४.


मि॒त्राय॑ शिक्ष॒ वरु॑णाय दा॒शुषे॒ या स॒म्राजा॒ मन॑सा॒ न प्र॒युच्छ॑तः ।
ययो॒र्धाम॒ धर्म॑णा॒ रोच॑ते बृ॒हद्ययो॑रु॒भे रोद॑सी॒ नाध॑सी॒ वृतौ॑ ॥ ५ ॥

मित्राय शिक्ष वरुणाय दाशुषे या सम्-राजा मनसा न प्र-युच्चतः
ययोः धाम धर्मणा रोचते बृहत् ययोः उभे इति रोदसी इति नाधसी इति वृतौ ॥ ५ ॥

तूं मित्राला तसेंच वरुणाला, -जे जगदीश मित्रावरुण हवि अर्पण करणार्‍या भक्ताला आपल्या मनांतून कधींहि दूर करीत नाहीत, त्यांना हवि अर्पण कर. त्या (मित्रावरुणां)चे तेजोमय स्थान त्यांच्या धर्मयोजनेने अतिशय दीप्तिमान असतें, आणि त्यांच्यापुढे भूलोक आणि भुवर्लोक हे दोन्ही बद्धांजली उभे असतात ५.


या गौर्व॑र्त॒निं प॒र्येति॑ निष्कृ॒तं पयो॒ दुहा॑ना व्रत॒नीर॑वा॒रतः॑ ।
सा प्र॑ब्रुवा॒णा वरु॑णाय दा॒शुषे॑ दे॒वेभ्यो॑ दाशद्ध॒विषा॑ वि॒वस्व॑ते ॥ ६ ॥

या गौः वर्तनिं परि-एति निः-कृतं पयः दुहाना व्रत-नीः अवारतः सा
प्र-ब्रुवाणा वरुणाय दाशुषे देवेभ्यः दाशत् हविषा विवस्वते ॥ ६ ॥

जी यज्ञधेनू भरपूर दुग्ध देऊन (भक्तांचे) धर्मपालन-त्याच्याकडून आर्जव करून न घेतांहि तडीस नेते, जी धेनु आपला सुशोभित मार्ग आक्रमण करते, ती भक्ताच्या वतीने वरुणाशी रदबदली करते आणि दिव्य जनांना तसेंच विवस्वानाला (आपले दुग्ध) हविर्दानद्वारा अर्पण करते ६.


दि॒वक्ष॑सो अग्निजि॒ह्वा ऋ॑ता॒वृध॑ ऋ॒तस्य॒ योनिं॑ विमृ॒शन्त॑ आसते ।
द्यां स्क॑भि॒त्व्य१प आ च॑क्रु॒रोज॑सा य॒ज्ञं ज॑नि॒त्वी त॒न्वीख्प् नि मा॑मृजुः ॥ ७ ॥

दिवक्षसः अग्नि-जिह्वाः ऋत-वृधः ऋतस्य योनिं वि-मृशन्तः आसते
द्यां स्कभित्वी अपः आ चक्रुः ओजसा यजं जनित्वी तन्वि नि ममृजुः ॥ ७ ॥

दिव्यलोकनिवासी अग्नि हीच ज्यांची जिव्हा असते ते सद्धर्माची अभिवृद्धि करणारे विवेकशील दिव्यविबुध सद्धर्माच्या स्वस्थानी अधिष्ठित होतात. त्यांनी द्युलोकाला आधार देऊन आपल्या तेजाने उदके निर्मान केली आणि यज्ञ उत्पन्न करून त्या (भक्ता)च्या शरीरांत स्वच्छता आणली ७.


प॒रि॒क्षिता॑ पि॒तरा॑ पूर्व॒जाव॑री ऋ॒तस्य॒ योना॑ क्षयतः॒ समो॑कसा ।
द्यावा॑पृथि॒वी वरु॑णाय॒ सव्र॑ते घृ॒तव॒त् पयो॑ महि॒षाय॑ पिन्वतः ॥ ८ ॥

परि-क्षिता पितरा पूर्वजावरी इतिपूर्व-जावरी ऋतस्य योना क्षयतः सम्-ओकसा
द्यावापृथिवी इति वरुणाय सव्रतेइतिस-व्रते घृत-वत् पयः महिषाय पिन्वतः ॥ ८ ॥

(वेदीच्या) सभोंवती अधिष्ठित होणारे, प्रथमच उत्पन्न झालेले, नेहमी एकत्र राहणारे आणि सर्व प्राण्यांचे आईबाप जे (द्यावापृथिवी) तेही सद्धर्माच्या स्थानी वास करतात. ज्यांचे वर्तन-नियम एकसारखेच आहेत असे ते द्यावापृथिवी महान्‌ वरुणाप्रीत्यर्थ घृताप्रमाणे तेजस्वी उदकाने तुंद भरून जातात ८.


प॒र्जन्या॒वाता॑ वृष॒भा पु॑री॒षिणे॑न्द्रवा॒यू वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
दे॒वाँ आ॑दि॒त्याँ अदि॑तिं हवामहे॒ ये पार्थि॑वासो दि॒व्यासो॑ अ॒प्सु ये ॥ ९ ॥

पर्जन्यावाता वृषभा पुरीषिणा इन्द्रवायू इति वरुणः मित्रः अर्यमा
देवान् आदित्यान् अदितिं हवामहे ये पार्थिवासः दिव्यासः अप्-सु ये ॥ ९ ॥

पर्जन्य आणि वायू, तसेच वृष्टिशाली (आणि) उदकप्रचुर असे इंद्र वायु, (त्याचप्रमाणे) वरुण, मित्र, अर्यमा आदित्य देव आणि अदिति यांना आम्हीं हांक मारीत आहों. तसेंच, जे (विभूति) पृथिविनिवासी (आहेत), जे दिव्य लोकांत किंवा जे उदकांत आहेत त्यांनाहि पाचारण करतो ९.


त्वष्टा॑रं वा॒युं ऋ॑भवो॒ य ओह॑ते॒ दैव्या॒ होता॑रा उ॒षसं॑ स्व॒स्तये॑ ।
बृह॒स्पतिं॑ वृत्रखा॒दं सु॑मे॒धसं॑ इन्द्रि॒यं सोमं॑ धन॒सा उ॑ ईमहे ॥ १० ॥

त्वष्टारं वायुं ऋभवः यः ओहते दैव्या होतारौ उषसं स्वस्तये
बृहस्पतिं वृत्र-खादं सु-मेधसं इन्द्रियं सोमं धन-साः ओं इति ईमहे ॥ १० ॥

त्वष्टा वायु आणि हे ऋभूंनो, जो दिव्य अशा यज्ञ संपादकांविषयी चिन्तन करतो त्याला, तसेच उषेला, तसेंच वृत्राला ठार करणारा अत्यंत प्रज्ञाशाली जो बृहस्पति त्याला आणि इंद्राला प्रिय अशा सोमाला, आम्हीं धनेच्छेने आमच्या कल्याणासाठी विनवीत आहोंत १०.


ब्रह्म॒ गां अश्वं॑ ज॒नय॑न्त॒ ओष॑धी॒र्वन॒स्पती॑न् पृथि॒वीं पर्व॑ताँ अ॒पः ।
सूर्यं॑ दि॒वि रो॒हय॑न्तः सु॒दान॑व॒ आर्या॑ व्र॒ता वि॑सृ॒जन्तो॒ अधि॒ क्षमि॑ ॥ ११ ॥

ब्रह्म गां अश्वं जनयन्तः ओषधीः वनस्पतीन् पृथिवीं पर्वतान् अपः
सूर्य दिवि रोहयन्तः सु-दानवः आर्या व्रता वि-सृजन्तः अधि क्षमि ॥ ११ ॥

(दिव्यविभूति असे आहेत कीं) त्यांनी ज्ञानविषयक सूक्तावलि, (आणि) दिव्य प्रकाश; तसेंच अश्व, औषधी, मोठमोठे वृक्ष, भूप्रदेश, पर्वत आणि उदकें यांना उत्पन्न केले आणि सूर्याला द्युलोकांत आरोहण करावयास लावून त्या महोदार विभूतींनी या पृथ्वीवर आर्यधर्माचा प्रसार केला ११.


भु॒ज्युं अंह॑सः पिपृथो॒ निर॑श्विना॒ श्यावं॑ पु॒त्रं व॑ध्रिम॒त्या अ॑जिन्वतम् ।
क॒म॒द्युवं॑ विम॒दायो॑हथुर्यु॒वं वि॑ष्णा॒प्व१ं विश्व॑का॒याव॑ सृजथः ॥ १२ ॥

भुज्युं अंहसः पिपृथः निः अश्विना श्यावं पुत्रं वध्रि-मत्याः अजिन्वतं
कम-द्युवं वि-मदाय ऊहथुः युवं विष्णाप्वं विश्वकाय अव सृजथः ॥ १२ ॥

हे अश्वीहो, तुम्ही पातकापासून भुज्यूंचे परित्राण केलेंत, वध्रिमतीच्या श्याव नांवाच्या पुत्राला तुम्ही सचेतन केलेंत; विमदासाठी एका सुस्वरूप तरुण कन्यकेला घेऊन आलांत आणि विश्वकाकरितां विष्णापूला मुक्त केलेत १२.


पावी॑रवी तन्य॒तुरेक॑पाद॒जो दि॒वो ध॒र्ता सिन्धु॒रापः॑ समु॒द्रियः॑ ।
विश्वे॑ दे॒वासः॑ शृणव॒न् वचां॑सि मे॒ सर॑स्वती स॒ह धी॒भिः पुरं॑ध्या ॥ १३ ॥

पावीरवी तन्यतुः एक-पात् अजः दिवः धर्ता सिन्धुः आपः समुद्रियः
विश्वे देवासः शृणवन् वचांसि मे सरस्वती सह धीभिः पुरम्-ध्या ॥ १३ ॥

गर्जना करणारी विद्युत्‌, अजएकपात्‌, दिव्य लोकाचा धारक, सिन्धु आणि समुद्रोदकें, तसेंच अखिल दिव्यविबुध आणि सद्‌बुद्धींची आणि अनेकविध ध्यान प्रवृत्तीची प्रेरक सरस्वती माझी स्तवनें ऐकून घेवोत १३.


विश्वे॑ दे॒वाः स॒ह धी॒भिः पुरं॑ध्या॒ मनो॒र्यज॑त्रा अ॒मृता॑ ऋत॒ज्ञाः ।
रा॒ति॒षाचो॑ अभि॒षाचः॑ स्व॒र्विदः॒ स्व१र्गिरो॒ ब्रह्म॑ सू॒क्तं जु॑षेरत ॥ १४ ॥

विश्वे देवाः सह धीभिः पुरम्-ध्या मनोः यजत्राः अमृताः ऋत-जाः
राति-साचः अभि-साचः स्वः-विदः स्वः गिरः ब्रह्म सु-उक्तं जुषेरत ॥ १४ ॥

सद्‌बुद्धींचे आणि अनेकविध ध्यानप्रवृत्तींचे प्रेरक जे अखिल दिव्यविबुध जे मानवाला अत्यंत पूज्य आहेत, जे अमर आणि सनातन धर्म जाणणारे आहेत, जे हविर्भाग ग्रहण करतात, जे भक्तासन्मुख येतात आणि दिव्य लोक प्राप्त करून देतात, ते (दिव्यविबुध) तो दिव्य प्रकाश आणि स्वर्लोक, हे सर्व आमच्या स्तुति, ब्रह्मसूक्त आणि उत्तम स्तोत्र मान्य करून घेऊन संतुष्ट होवोत १४.


दे॒वान् वसि॑ष्ठो अ॒मृता॑न् ववन्दे॒ ये विश्वा॒ भुव॑ना॒भि प्र॑त॒स्थुः ।
ते नो॑ रासन्तां उरुगा॒यं अ॒द्य यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ १५ ॥

देवान् वसिष्ठः अमृतान् ववन्दे ये विश्वा भुवना अभि प्र-तस्थुः
ते नः रासन्तां उरु-गायं अद्य यूयं पात स्वस्ति-भिः सदा नः ॥ १५ ॥

अमर दिव्य विभुतींना वसिष्ठ ऋषीने वंदन केले; ज्यांनी अखिल भुवनांना चोहोंबाजूंनी आपल्या अंकित करून टाकले त्या विभूतींना वन्दन केले; तर असे दिव्य विबुध, आम्हास आज संचार करण्यास विस्तीर्ण प्रदेश देवोत आणि विभूतींनो, तुम्हींहि आपल्या कुशलाशीर्वादांनी सदैव आमचे रक्षण करा १५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६६ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - वसुकर्ण वासुक्र : देवता - विश्वेदेव : छंद - १-१४ - जगती; १५ - त्रिष्टुभ्


दे॒वान् हु॑वे बृ॒हच्छ्र॑वसः स्व॒स्तये॑ ज्योति॒ष्कृतो॑ अध्व॒रस्य॒ प्रचे॑तसः ।
ये वा॑वृ॒धुः प्र॑त॒रं वि॒श्ववे॑दस॒ इन्द्र॑ज्येष्ठासो अ॒मृता॑ ऋता॒वृधः॑ ॥ १॥

देवान् हुवे बृहत्-श्रवसः स्वस्तये ज्योतिः-कृतः अध्वरस्य प्र-चेतसः
ये ववृधुः प्र-तरं विश्व-वेदसः इन्द्र-ज्येष्ठासः अमृताः ऋत-वृधः ॥ १ ॥

ज्यांचे यश अतिशय मोठें अशा दिव्यविबुधांना मी परम मंगलासाठी आदराने पाचारण करतो, ते प्रकाशदाते आहेत; अध्वरयागाच्या ठिकाणी अतिशय चैतन्य उत्पन्न करणारे आहेत. ते सर्वज्ञ देव, ते इंद्रप्रमुख अमर, जे सद्धर्माने हर्षोत्फुल्ल होणारे देव, आनंदाने अतिशय वृद्धिंगत होतात १.


इन्द्र॑प्रसूता॒ वरु॑णप्रशिष्टा॒ ये सूर्य॑स्य॒ ज्योति॑षो भा॒गं आ॑न॒शुः ।
म॒रुद्ग॑णे वृ॒जने॒ मन्म॑ धीमहि॒ माघो॑ने य॒ज्ञं ज॑नयन्त सू॒रयः॑ ॥ २ ॥

इन्द्र-प्रसूताः वरुण-प्रशिष्टाः ये सूर्यस्य ज्योतिषः भागं आनशुः
मरुत्-गणे वृजने मन्म धीमहि माघोने यजं जनयन्त सूरयः ॥ २ ॥

ज्यांना इंद्राने प्रेरणा केली, वरुणाने आज्ञा दिली आणि ज्यांना सूर्याच्या प्रकाशामध्ये योग्य भाग मिळाला, त्या मरुतांप्रीत्यर्थ आम्हीं त्याना योग्य अशा स्तोत्रांचे मनन करतो. भगवान्‌ इंद्राच्या त्या सेवकांसाठी यजमानांनी मुद्दाम यज्ञसमारंभ केला २.


इन्द्रो॒ वसु॑भिः॒ परि॑ पातु नो॒ गयं॑ आदि॒त्यैर्नो॒ अदि॑तिः॒ शर्म॑ यच्छतु ।
रु॒द्रो रु॒द्रेभि॑र्दे॒वो मृ॑ळयाति न॒स्त्वष्टा॑ नो॒ ग्नाभिः॑ सुवि॒ताय॑ जिन्वतु ॥ ३ ॥

इन्द्रः वसु-भिः परि पातु नः गयं आदित्यैः नः अदितिः शर्म यच्चतु
रुद्रः रुद्रेभिः देवः मृळयाति नः त्वष्टा नः ग्नाभिः सुविताय जिन्वतु ॥ ३ ॥

इंद्र हा दिव्यनिधींसह आमच्या वसतिस्थानाचे सर्वतोपरी रक्षण करो; आणि अदिति आदित्यांसह आम्हांला तेथें सुखमय आश्रय देवो. रुद्र हा आपल्या रुद्रांसह आम्हांवर कृपा करो आणि त्वष्टा देवपत्न्यांसह आम्हांला महत्‌ कल्याणाकडे प्रवृत्त करो ३.


अदि॑ति॒र्द्यावा॑पृथि॒वी ऋ॒तं म॒हदिन्द्रा॒विष्णू॑ म॒रुतः॒ स्वर्बृ॒हत् ।
दे॒वाँ आ॑दि॒त्याँ अव॑से हवामहे॒ वसू॑न् रु॒द्रान् स॑वि॒तारं॑ सु॒दंस॑सम् ॥ ४ ॥

अदितिः द्यावापृथिवी इति ऋतं महत् इन्द्राविष्णूइति मरुतः स्वः बृहत्
देवान् आदित्यान् अवसे हवामहे वसून् रुद्रान् सवितारं सु-दंससम् ॥ ४ ॥

अदिति, आकाश, पृथिवी, श्रेष्ठ सद्धर्म, इंद्र, विष्णु, मरुत्‌गण, विशाल दिव्य लोक, आदित्य देव, तसेंच दिव्यनिधिपालक, रुद्र आणि दर्शनीय सवित या सर्वांना मी नम्रभावाने आहुती देऊन पाचारण करतो ४.


सर॑स्वान् धी॒भिर्वरु॑णो धृ॒तव्र॑तः पू॒षा विष्णु॑र्महि॒मा वा॒युर॒श्विना॑ ।
ब्र॒ह्म॒कृतो॑ अ॒मृता॑ वि॒श्ववे॑दसः॒ शर्म॑ नो यंसन् त्रि॒वरू॑थं॒ अंह॑सः ॥ ५ ॥

सरस्वान् धीभिः वरुणः धृत-व्रतः पूषा विष्णुः महिमा वायुः अश्विना
ब्रह्म-कृतः अमृताः विश्व-वेदसः शर्म नः यंसन् त्रि-वरूथं अंहसः ॥ ५ ॥

एकाग्रध्यानवृत्तीने असे होवो की सरस्वान्‌, त्याचप्रमाणे सद्धर्मपालक वरुण, पूषा, वायु, अश्वीदेव, ब्रह्मस्तोत्राची (भक्तांकडून) रचना करविणारे असे अमर आणि सर्वज्ञ विभूति आपल्या महिम्याने आम्हांला असा आश्रय देवोत की तो पातकापासून आमचे तिप्पट सामर्थ्याने रक्षण करील ५.


वृषा॑ य॒ज्ञो वृष॑णः सन्तु य॒ज्ञिया॒ वृष॑णो दे॒वा वृष॑णो हवि॒ष्कृतः॑ ।
वृष॑णा॒ द्यावा॑पृथि॒वी ऋ॒ताव॑री॒ वृषा॑ प॒र्जन्यो॒ वृष॑णो वृष॒स्तुभः॑ ॥ ६ ॥

वृषा यजः वृषणः सन्तु यजियाः वृषणः देवाः वृषणः हविः-कृतः
वृषणा द्यावापृथिवी इति ऋत-वरी इत्य् ऋत-वरी वृषा पर्जन्यः वृषणः वृष-स्तुभः ॥ ६ ॥

यज्ञ हा प्रभावप्रद, पूज्य विभूतिहि प्रभावप्रदच होवोत; दिव्यविबुध हे प्रभावी आणि हवि अर्पण करणारे भक्तहि प्रभावशाली असोत. न्याय धर्माचे प्रतिपालक द्यावा पृथिवी प्रभावी आहेतच, पर्जन्य हाहि प्रभावी आणि प्रभावशालित्वाची प्रशंसा करणारे हेहि प्रभावशाली असतात ६.


अ॒ग्नीषोमा॒ वृष॑णा॒ वाज॑सातये पुरुप्रश॒स्ता वृष॑णा॒ उप॑ ब्रुवे ।
यावी॑जि॒रे वृष॑णो देवय॒ज्यया॒ ता नः॒ शर्म॑ त्रि॒वरू॑थं॒ वि यं॑सतः ॥ ७ ॥

अग्नीषोमा वृषणा वाज-सातये पुरु-प्रशस्ता वृषणौ उप ब्रुवे
यौ ईजिरे वृषणः देव-यज्यया ता नः शर्म त्रि-वरूथं वि यांसतः ॥ ७ ॥

वीर्यशाली अग्निसोमांची, त्या असंख्य-भक्तस्तुत वीर्यशाली देवांची मी सत्त्वसामर्थ्यलाभासाठी विनवणी करीत आहे. ज्यांचे वीर्यशाली भक्तांनी देवयज्ञद्वारा यजन केले, असे ते (अग्निसोम) आम्हांला तिप्पट सामर्थ्याचा आश्रय देवोत ७.


धृ॒तव्र॑ताः क्ष॒त्रिया॑ यज्ञनि॒ष्कृतो॑ बृहद्दि॒वा अ॑ध्व॒राणां॑ अभि॒श्रियः॑ ।
अ॒ग्निहो॑तार ऋत॒सापो॑ अ॒द्रुहो॑ऽ॒पो अ॑सृज॒न्न् अनु॑ वृत्र॒तूर्ये॑ ॥ ८ ॥

धृत-व्रताः क्षत्रियाः यजनिः-कृतः बृहत्-दिवाः अध्वराणां अभि-श्रि यः
अग्नि-हाओतारः ऋत-सापः अद्रुहः अपः असृजन् अनु वृत्र-तूयेर् ॥ ८ ॥

(दिव्य विभूति असे आहेत कीं) ते सद्धर्माचे रक्षण करतात. ते क्षात्रगुणांनी सम्पन्न असतात; (भक्ताच्या) यज्ञाला आगमनाने शोभा आणतात, अमर्याद दिव्य लोकाला देदीप्यमान करतात आणि अध्वर यागांच्या ठिकाणी विराजमान होतात. त्यांचा अग्नि हाच यज्ञ संपादक असतो. ते सत्य धर्मालाच अनुसरतात अशा त्या द्वेषरहित विबुधांनी वृत्रांशी चालविलेल्या संग्रामात दिव्योदकें पृथ्वीवर सोडून दिले ८.


द्यावा॑पृथि॒वी ज॑नयन्न् अ॒भि व्र॒ताप॒ ओष॑धीर्व॒निना॑नि य॒ज्ञिया॑ ।
अ॒न्तरि॑क्षं॒ स्व१रा प॑प्रुरू॒तये॒ वशं॑ दे॒वास॑स्त॒न्वीख्प् नि मा॑मृजुः ॥ ९ ॥

द्यावापृथिवी इति जनयन् अभि व्रता आपः ओषधीः वनिनानि यजिया
अन्तरिक्षं स्वः आ पप्रुः ऊतये वशं देवासः तन्वि नि ममृजुः ॥ ९ ॥

द्यावा पृथिवी, सत्कर्मे, आणि उदकें त्याचप्रमाणे यज्ञकार्याला अवश्य लागणार्‍या वन्य वनस्पति यांना उत्पन्न करून त्यांनी भक्त सहायासाठी अन्तरिक्ष आणि स्वर्लोक भरून टाकला अशा त्या देवींनी (भक्ताच्या) इच्छेला त्याच्या शरीरामध्येच शुद्ध केले ९.


ध॒र्तारो॑ दि॒व ऋ॒भवः॑ सु॒हस्ता॑ वातापर्ज॒न्या म॑हि॒षस्य॑ तन्य॒तोः ।
आप॒ ओष॑धीः॒ प्र ति॑रन्तु नो॒ गिरो॒ भगो॑ रा॒तिर्वा॒जिनो॑ यन्तु मे॒ हव॑म् ॥ १० ॥

धर्तारः दिवः ऋभवः सु-हस्ताः वातापर्जन्या महिषस्य तन्यतोः
आपः ओषधीः प्र तिरन्तु नः गिरः भगः रातिः वाजिनः यन्तु मे हवम् ॥ १० ॥

द्युलोकाचे धारक, ऋभूरूप, उदार हस्त, विशाल आणि गर्जना करणारे द्युलोकांतील वायु आणि पर्जन्य, त्याचप्रमाणे उदके, औषधि हे आमची कवने विस्तृत करोत आणि भाग्यदाता (भग), त्याची देणगी आणि त्याचे सत्वाढ्य वीर हे माझ्या हांकेसरशी प्राप्त होवोत १०.


स॒मु॒द्रः सिन्धू॒ रजो॑ अ॒न्तरि॑क्षं अ॒ज एक॑पात् तनयि॒त्नुर॑र्ण॒वः ।
अहि॑र्बु॒ध्न्यः शृणव॒द्वचां॑सि मे॒ विश्वे॑ दे॒वास॑ उ॒त सू॒रयो॒ मम॑ ॥ ११॥

समुद्रः सिन्धुः रजः अन्तरिक्षं अजः एक-पात् तनयित्नुः अर्णवः
अहिः बुध्न्यः शृणवत् वचांसि मे विश्वे देवासः उत सूरयः मम ॥ ११ ॥

समुद्र, महानद्या, रजोलोक, अन्तरिक्ष, अजएकपाद्‌ गर्जना करणार्‍या मेघमंडलातील उचंबळणारी जलें, तसेंच अहिर्बुध्य हे माझी स्तवनें ऐकून घेवोत; ते अखिल विभूतिच माझे धुरीण आहेत ११.


स्याम॑ वो॒ मन॑वो दे॒ववी॑तये॒ प्राञ्चं॑ नो य॒ज्ञं प्र ण॑यत साधु॒या ।
आदि॑त्या॒ रुद्रा॒ वस॑वः॒ सुदा॑नव इ॒मा ब्रह्म॑ श॒स्यमा॑नानि जिन्वत ॥ १२ ॥

स्याम वः मनवः देव-वीतये प्राचं नः यजं प्र नयत साधु-या
आदीत्याः रुद्राः वसवः सु-दानवः इमा ब्रह्म शस्यमानानि जिन्वत ॥ १२ ॥

आम्ही मानव तुमच्या सेवेसाठी जिवंत राहूं असे घडो. देवींनो, आमचा यज उत्तम पद्धतीने (सर्वांना) अनुकुल करून तडीस न्या; हे आदित्यांनो, रुद्रांनो, दानशूर वसूंनो, हीं जीं प्रार्थनासूक्तें आम्हीं म्हणत आहोत, त्यामध्ये जिवंतपणा आणा १२.


दैव्या॒ होता॑रा प्रथ॒मा पु॒रोहि॑त ऋ॒तस्य॒ पन्थां॒ अन्व् ए॑मि साधु॒या ।
क्षेत्र॑स्य॒ पतिं॒ प्रति॑वेशं ईमहे॒ विश्वा॑न् दे॒वाँ अ॒मृता॒ँ अप्र॑युच्छतः ॥ १३ ॥

दैव्याः होतारा प्रथमा पुरः-हिता ऋतस्य पन्थां अनु एमि साधु-या
क्षेत्रस्य पतिं प्रति-वेशं ईमहे विश्वान् देवान् अमृतान् अप्र-युच्चतः ॥ १३ ॥

दिव्य यज्ञसंपादक हे आमचे आद्यपुरोहित; म्हणून मीहि सद्धर्माचाच मार्ग नीतीच्या योग्य रीतीने अनुसरत आहे. आमचा निकट असणारा जो भूप्रदेशाचा प्रभु, तसेंच आमची हेळसांड न करणारे जे सकल अमर विभूति ह्यांची मी हात जोडून विनवणी करीत आहे १३.


वसि॑ष्ठासः पितृ॒वद्वाचं॑ अक्रत दे॒वाँ ईळा॑ना ऋषि॒वत् स्व॒स्तये॑ ।
प्री॒ता इ॑व ज्ञा॒तयः॒ कामं॒ एत्या॒स्मे दे॑वा॒सोऽ॑व धूनुता॒ वसु॑ ॥ १४ ॥

वसिष्ठासः पितृ-वत् वाचं अक्रत देवान् ईळानाः ऋषि-वत् स्वस्तये
प्रीताः-इव जातयः कामं आइत्य अस्मे इति देवासः अव धूनुत वसु ॥ १४ ॥

आमच्या पित्याप्रमाणेंच, आम्हीं वसिष्ठ पुत्रांनीहि वसिष्ठ ऋषींप्रमाणेच दिव्य विबुधांची विनवणी करणारे असे कवन कल्याणार्थ म्हटले आहे; तर प्रेम करणार्‍या ज्ञातिबान्धवाप्रमाणें स्वेच्छेनेच येथे येवून देव आमच्यावर (इच्छित) निधींचा वर्षाव करोत १४.


दे॒वान् वसि॑ष्ठो अ॒मृता॑न् ववन्दे॒ ये विश्वा॒ भुव॑ना॒भि प्र॑त॒स्थुः ।
ते नो॑ रासन्तां उरुगा॒यं अ॒द्य यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ १५ ॥

देवान् वसिष्ठः अमृतान् ववन्दे ये विश्वा भुवना अभि प्र-तस्थुः
ते नः रासन्तां उरु-गायं अद्य यूयं पात स्वस्ति-भिः सदा नः ॥ १५ ॥

अमर अशा दिव्य विभूतींनी वसिष्ठ ऋषीने वन्दन केले, ज्यांनी अखिल भुवनांचा चोहोंकडून आपल्या अंकित करून टाकल्या त्या विभूतींना वंदन केले; तरी ते दिव्य विबुध आम्हांला संचार करण्याकरितां आज विस्तीर्ण प्रदेश देवोत, आणि हे दिव्य विभूतींनो, तुम्ही आपल्या कुशल आशीर्वादांनी आमचे सदैव रक्षण करा १५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६७ (बृहस्पतिसूक्त)

ऋषी - अयास्य आंगिरस : देवता - बृहस्पति : छंद - त्रिष्टुभ्


इ॒मां धियं॑ स॒प्तशी॑र्ष्णीं पि॒ता न॑ ऋ॒तप्र॑जातां बृह॒तीं अ॑विन्दत् ।
तु॒रीयं॑ स्विज् जनयद्वि॒श्वज॑न्योऽ॒यास्य॑ उ॒क्थं इन्द्रा॑य॒ शंस॑न् ॥ १॥

इमां धियं सप्त-शीर्ष्णीं पिता नः ऋत-प्रजातां बृहतीं अविन्दत्
तुरीयं स्वित् जनयत् विश्व-जन्यः अयास्यः उक्थं इन्द्राय शंसन् ॥ १ ॥

ही सात मस्तकांनी युक्त (सात प्रकारची) सद्धर्मापासून उत्पन्न झालेली, श्रेष्ठ ध्यान-प्रवणता आमच्या पित्याला प्राप्त झाली. आणि तिच्यांतील चौथें (जे रहस्य आहे तें) तें जगन्मित्र जो अयास्य तो इंद्राप्रीत्यर्थ सामगायन करीत असतांना त्याला उकललें १.


ऋ॒तं शंस॑न्त ऋ॒जु दीध्या॑ना दि॒वस्पु॒त्रासो॒ असु॑रस्य वी॒राः ।
विप्रं॑ प॒दं अङ्गि॑रसो॒ दधा॑ना य॒ज्ञस्य॒ धाम॑ प्रथ॒मं म॑नन्त ॥ २ ॥

ऋतं शंसन्तः ऋजु दीध्यानाः दिवः पुत्रासः असुरस्य वीराः
विप्रं पदं अङ्गिरसः दधानाः यजस्य धाम प्रथमं मनन्त ॥ २ ॥

सत्य धर्माचीच प्रशंसा करणारे, योग्य मार्गाने भगवन्ताचे ध्यान करणारे आणि ईश्वरस्वरूप अशा आकाशाचे वीरपुत्र आंगिरस, त्यांनी "ज्ञान-स्तोत्रज्ञ" ही पदवी धारण करून यज्ञाच्या तेजस्वी सामर्थ्याचे प्रथम मनन केले २.


हं॒सैरि॑व॒ सखि॑भि॒र्वाव॑दद्‌भिरश्म॒न्मया॑नि॒ नह॑ना॒ व्यस्य॑न् ।
बृह॒स्पति॑रभि॒कनि॑क्रद॒द्गा उ॒त प्रास्तौ॒दुच् च॑ वि॒द्वाँ अ॑गायत् ॥ ३ ॥

हंसैः-इव सखि-भिः वावदत्-भिः अश्मन्-मयानि नहना वि-अस्यन्
बृहस्पतिः अभि-कनिक्रदत् गाः उत प्र अस्तौत् उत् च विद्वान् अगायत् ॥ ३ ॥

हंसाप्रमाणें मोठ्याने कलकलाट करणार्‍या आपल्या मित्रांसहवर्तमान (गिरी दुर्गाजवळ) जाऊन आणि तेथील लोखंडी शृंखला तोडून बृहस्पतीने धेनूंना गर्जना करून हांक मारली, त्यांची त्याने प्रशंसाच केली आणि त्या कोठें आहेत ते समजल्यावर त्यांना बाहेर आणले ३.


अ॒वो द्वाभ्यां॑ प॒र एक॑या॒ गा गुहा॒ तिष्ठ॑न्ती॒रनृ॑तस्य॒ सेतौ॑ ।
बृह॒स्पति॒स्तम॑सि॒ ज्योति॑रि॒च्छन्न् उदु॒स्रा आक॒र्वि हि ति॒स्र आवः॑ ॥ ४ ॥

अवः द्वाभ्यां परः एकया गाः गुहा तिष्ठन्तीः अनृतस्य सेतौ
बृहस्पतिः तमसि ज्योतिः इच्चन् उत् उस्राः आ अकः वि हि तिश्रः आवर् इत्य् आवः ॥ ४ ॥

दोघींच्या पोटाखालून आणि एकीच्या वरून अशा रीतीने (भक्कमपणाने) त्या धेनू एका गुप्त ठिकाणी खोटेपणाच्या (=मायामय) साखळदण्डाने बांधून ठेवल्या होत्या. अशा स्थितींत बृहस्पतीने प्रकाश व्हावा अशी इच्छा दर्शवितांच तेथे उज्वलता उत्पन्न झाली, तेव्हां तीन्ही प्रदेशांना त्याने दृग्गोचर होतील असे केले ४.


वि॒भिद्या॒ पुरं॑ श॒यथें॒ अपा॑चीं॒ निस्त्रीणि॑ सा॒कं उ॑द॒धेर॑कृन्तत् ।
बृह॒स्पति॑रु॒षसं॒ सूर्यं॒ गां अ॒र्कं वि॑वेद स्त॒नय॑न्न् इव॒ द्यौः ॥ ५ ॥

वि-भिद्य पुरं शयथा ईं अपाचीं निः त्रीणि साकं उद-धेः अकृन्तत्
बृहस्पतिः उषसं सूर्यं गां अर्कं विवेद स्तनयन्-इव द्यौः ॥ ५ ॥

शत्रुनगराचा विध्वंस करून आणि लपून बसलेल्या भुजग शत्रूला मागच्या मागेंच छाटून टाकलें आणि सागरासह तीन्हीं वस्तु बृहस्पतीने बाहेर आणल्या. त्या वस्तु (कोणत्या तर) उषा, सूर्य, आणि विद्युत्‌रूप धेनु ह्या त्या वस्तू होत; त्याने आकाशाप्रमाणें गर्जना करून "अर्क" स्तोत्र लोकांना शिकविले ५.


इन्द्रो॑ व॒लं र॑क्षि॒तारं॒ दुघा॑नां क॒रेणे॑व॒ वि च॑कर्ता॒ रवे॑ण ।
स्वेदा॑ञ्जिभिरा॒शिरं॑ इ॒च्छमा॒नोऽ॑रोदयत् प॒णिं आ गा अ॑मुष्णात् ॥ ६ ॥

इन्द्रः वलं रक्षितारं दुघानां करेण-इव वि चकर्त रवेण
स्वेदाजि-भिः आशिरं इच्चमानः अरोदयत् पणिं आ गाः अमुष्णात् ॥ ६ ॥

धेनूंना अडकावून ठेवणार्‍या बलाला हाताने कापून टाकावे त्याप्रमाणे इंद्राने नुसत्या (विक्राळ) निनादानेच छाटून टाकले आणि घामाने डबडबल्यामुळे भूषण भूषित दिसणार्‍या मरुतांसह दाट दुधाचे प्राशन करण्याची इच्छा दर्शविली; पण प्रथम अगोदर "पणि" नांवाच्या दुष्टाला रडावयास लावून त्याने अडविलेल्या धेनूंना इंद्र घेऊन गेला ६.


स ईं॑ स॒त्येभिः॒ सखि॑भिः शु॒चद्‌भि॒र्गोधा॑यसं॒ वि ध॑न॒सैर॑दर्दः ।
ब्रह्म॑ण॒स्पति॒र्वृष॑भिर्व॒राहै॑र्घ॒र्मस्वे॑देभि॒र्द्रवि॑णं॒ व्यानट् ॥ ७ ॥

सः ईं सत्येभिः सखि-भिः शुचत्-भिः गो--धायसं वि धन-सैः अदर्दः इति अदर्दः
ब्रह्मणः पतिः वृष-भिः वराहैः घर्म-स्वेदेभिः द्रविणं वि आनट् ॥ ७ ॥

सत्त्यानेच वागणारे आणि यशोधन जिंकणारे अशा देदीप्यमान मरुत्‌ मित्रांसह त्या (इंद्रा)ने धेनूंना दडपून धरणार्‍या दुष्टाला (तत्काळ) भोंसकून मारले. (याप्रमाणे) वराहाप्रमाणे तुरमुण्डी देऊन घुसणार्‍या आणि घामाने न्हालेल्या आपल्या वीरांसह चालत जाऊन बृहस्पतीने अचल (यशो) धन जिंकून घेतले ७.


ते स॒त्येन॒ मन॑सा॒ गोप॑तिं॒ गा इ॑या॒नास॑ इषणयन्त धी॒भिः ।
बृह॒स्पति॑र्मि॒थोअ॑वद्यपेभि॒रुदु॒स्रिया॑ असृजत स्व॒युग्भिः॑ ॥ ८ ॥

ते सत्येन मनसा गो--पतिं गाः इयानासः इषणयन्त धीभिः
बृहस्पतिः मिथः-अवद्यपेभिः उत् उस्रियाः असृजत स्वयुक्-भिः ॥ ८ ॥

त्यांनी आपल्या सत्यनिरत मनाने (प्रकाश) धेनूकडे जाऊन पोहोंचण्याची इच्छा धरून त्या गोप्रतिपालक वीराला आपल्या बुद्धिद्ध्यनुरूप प्रोत्साहन दिले. तेव्हां बृहस्पतीने एकमेकांना अपयशापासून बचावणारे आणि आपोआप एकत्र जुळणारे जे वीर त्यांसह पुढें जाऊन प्रकाश धेनूंना बन्धमुक्त केले ८.


तं व॒र्धय॑न्तो म॒तिभिः॑ शि॒वाभिः॑ सिं॒हं इ॑व॒ नान॑दतं स॒धस्थे॑ ।
बृह॒स्पतिं॒ वृष॑णं॒ शूर॑सातौ॒ भरे॑-भरे॒ अनु॑ मदेम जि॒ष्णुम् ॥ ९ ॥

तं वर्धयन्तः मति-भिः शिवाभिः सिंहम्-इव नानदतं सध-स्थे
बृहस्पतिं वृषणं शूर-सातौ भरे--भरे अनु मदेम जिष्णुम् ॥ ९ ॥

आपल्या निवासस्थानी सिंहाप्रमाणे गर्जना करणार्‍या त्या वीर्यशाली-विजयी बृहस्पतीला प्रत्येक संग्रामामध्ये-शूरांना यशोलाभ प्राप्त होणार्‍या (संग्रामामध्ये) मन:पूर्वक केलेल्या मंगल कवनांनी आम्ही सतत हर्ष उत्पन्न करूं ९.


य॒दा वाजं॒ अस॑नद्वि॒श्वरू॑पं॒ आ द्यां अरु॑क्ष॒दुत्त॑राणि॒ सद्म॑ ।
बृह॒स्पतिं॒ वृष॑णं व॒र्धय॑न्तो॒ नाना॒ सन्तो॒ बिभ्र॑तो॒ ज्योति॑रा॒सा ॥ १० ॥

यदा वाजं असनत् विश्व-रूपं आ द्यां अरुक्षत् उत्-तराणि सद्म
बृहस्पतिं वृषणं वर्धयन्तः नाना सन्तः बिभ्रतः ज्योतिः आसा ॥ १० ॥

जेव्हां नाना प्रकारच्या स्वरूपांत दिसणार्‍या सत्त्वसामर्थ्याचा त्याने आम्हांस लाभ करून दिला आणि जेव्हां तो द्युलोकी (म्हणजे) अत्त्युच्च लोकीं जाऊन तेथे विराजमान झाला, तेव्हां त्या बृहस्पतिला आनंदनिर्भर करून आकाशातील नक्षत्रें आपल्या मुखावर तेजस्विता धारण करून ठिकठिकाणी उभीं राहिली १०.


स॒त्यां आ॒शिषं॑ कृणुता वयो॒धै की॒रिं चि॒द्ध्यव॑थ॒ स्वेभि॒रेवैः॑ ।
प॒श्चा मृधो॒ अप॑ भवन्तु॒ विश्वा॒स्तद्रो॑दसी शृणुतं विश्वमि॒न्वे ॥ ११ ॥

सत्यां आशिषं कृणुत वयः-धै कीरिं चित् हि अवथ स्वेभिः एवैः
पश्चा मृधः अप भवन्तु विश्वाः तत् रोदसी इति शृणुतं विश्वमिन्वे इतिविश्वम्-इन्वे ॥ ११ ॥

भर तारुण्याचा लाभ होण्यासाठी जो अमोघ आशीर्वाद असेल तो आतां द्या. आपल्या जाण्यायेण्याने स्तोतृजनांचे रक्षण करा; यच्चावत्‌ शत्रू मागच्या मागेंच नाहीसे होवोत आणि ही आमची प्रार्थना सकल प्राण्यांना संतोष देणार्‍या ज्या द्यावापृथिवी त्या ऐकून घेवोत ११.


इन्द्रो॑ म॒ह्ना म॑ह॒तो अ॑र्ण॒वस्य॒ वि मू॒र्धानं॑ अभिनदर्बु॒दस्य॑ ।
अह॒न्न् अहिं॒ अरि॑णात् स॒प्त सिन्धू॑न् दे॒वैर्द्या॑वापृथिवी॒ प्राव॑तं नः ॥ १२ ॥

इन्द्रः मह्ना महतः अर्णवस्य वि मूर्धानं अभिनत् अर्बुदस्य
अहन् अहिं अरिणात् सप्त सिन्धून् देवैः द्यावापृथिवी इति प्र अवतं नः ॥ १२ ॥

समुद्राच्या प्रचंड लाटेचे रूप धारण करणार्‍या अर्बुद राक्षसाचे मस्तक इंद्राने आपल्या प्रभावाने छेदून टाकले, त्याचप्रमाणे त्याने अहिभुजंगाला ठार करून सप्तसिन्धूंना मोकळे केले. अशीच कृपा दिव्य विभूतींसह द्यावापृथिवी आम्हांवर करोत १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६८ (बृहस्पतिसूक्त)

ऋषी - अयास्य आंगिरस : देवता - बृहस्पति : छंद - त्रिष्टुभ्


उ॒द॒प्रुतो॒ न वयो॒ रक्ष॑माणा॒ वाव॑दतो अ॒भ्रिय॑स्येव॒ घोषाः॑ ।
गि॒रि॒भ्रजो॒ नोर्मयो॒ मद॑न्तो॒ बृह॒स्पतिं॑ अ॒भ्य१र्का अ॑नावन् ॥ १॥

उद-प्रुतः न वयः रक्षमाणाः वावदतः अभ्रियस्य-इव घोषाः
गिरि-भ्रजः न ऊर्मयः मदन्तः बृहस्पतिं अभि अर्काः अनावन् ॥ १ ॥

पाण्यांत बुड्या मारून पाणी उडविणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, एकमेकांना हांका मारणार्‍या पाहरेकर्‍याप्रमाणे, मेघांच्या प्रचंड गर्जनेप्रमाणे किंवा पर्वत फोडून धों धों वाहत जाणार्‍या उदकतरंगाप्रमाणें "अर्क" स्तोत्रपाठकांनी बृहस्पतीचे मोठ्याने स्तवन केले १.


सं गोभि॑राङ्गिर॒सो नक्ष॑माणो॒ भग॑ इ॒वेद॑र्य॒मणं॑ निनाय ।
जने॑ मि॒त्रो न दम्प॑ती अनक्ति॒ बृह॑स्पते वा॒जया॒शूँरि॑वा॒जौ ॥ २ ॥

सं गोभिः आङ्गिरसः नक्षमाणः भगः-इव इत् अर्यमणं निनाय
जने मित्रः न दम्पती इतिदम्-पती अनक्ति बृहस्पते वाजय आशून्-इव आजौ ॥ २ ॥

अंगिरऋषि प्रकाशधेनूसह फिरत असतांना भाग्याधिपति भग जसा अर्यमाला घेऊन जातो त्याप्रमाणें त्या (धेनूं)ना तो घेऊन गेला. जगामध्ये मित्राप्रमाणे (भग) हा पतिपत्नींच्या जोडप्याला एकत्र आणतो; हे बृहस्पते, संग्रामामध्ये जलद धांवणार्‍या घोड्यांना घुसवितात त्याप्रमाणे तूंहि तडफदार वीरांना (शत्रूंवर) चढाई करण्यास प्रोत्साहन दे २.


सा॒ध्व॒र्या अ॑ति॒थिनी॑रिषि॒रा स्पा॒र्हाः सु॒वर्णा॑ अनव॒द्यरू॑पाः ।
बृह॒स्पतिः॒ पर्व॑तेभ्यो वि॒तूर्या॒ निर्गा ऊ॑पे॒ यवं॑ इव स्थि॒विभ्यः॑ ॥ ३ ॥

साधु-अर्याः अतिथिनीः इषिराः स्पार्हाः सु-वर्णाः अनवद्य-रूपाः
बृहस्पतिः पर्वतेभ्यः वि-तूर्य निः गाः ऊपे यवम्-इव स्थिवि-भ्यः ॥ ३ ॥

सज्जनांना सहाय्य करणार्‍या, सर्व ठिकाणी इच्छेनुरूप गमन करणार्‍या, उत्साह वाढविणार्‍या आणि ज्यांची कांति स्पृहणीय, ज्यांचा वर्ण मनोहर; ज्यांच्या स्वरूपांत कांही एक व्यंग नाही अशा प्रकाशधेनूंना, -सुपाने धान्य ओतावे त्याप्रमाणे बृहस्पतीने पर्वतांतून जणों बाहेर ओतून दिले ३.


आ॒प्रु॒षा॒यन् मधु॑न ऋ॒तस्य॒ योनिं॑ अवक्षि॒पन्न् अ॒र्क उ॒ल्कां इ॑व॒ द्योः ।
बृह॒स्पति॑रु॒द्धर॒न्न् अश्म॑नो॒ गा भूम्या॑ उ॒द्नेव॒ वि त्वचं॑ बिभेद ॥ ४ ॥

आप्रुषायन् मधुना ऋतस्य योनिं अव-क्षिपन् अर्कः उल्काम्-इव द्योः
बृहस्पतिः उद्धरन् अश्मनः गाः भूम्याः उद्नाइव वि त्वचं बिभेद ॥ ४ ॥

सद्धर्माच्या ठिकाणीं-यज्ञभूमीवर मधुर रसाचे सिंचन करावे किंवा सूर्याने आकाशांतून पृथ्वीवर एक उल्का फेकावी, त्याप्रमाणे बहस्पति हा पर्वताच्या उदरांतून धेनू बाहेर ओढून आणले आणि पाण्याने टंच भरलेली पखाल फोडावी त्याप्रमाणे याने पृथ्वी दुभंग केली ४.


अप॒ ज्योति॑षा॒ तमो॑ अ॒न्तरि॑क्षादु॒द्नः शीपा॑लं इव॒ वात॑ आजत् ।
बृह॒स्पति॑रनु॒मृश्या॑ व॒लस्या॒भ्रं इ॑व॒ वात॒ आ च॑क्र॒ आ गाः ॥ ५ ॥

अप ज्योतिषा तमः अन्तरिक्षात् उद्नः शीपालम्-इव वातः आजत्
बृहस्पतिः अनु-मृश्य वलस्य अभ्रम्-इव वातः आ चक्रे आ गाः ॥ ५ ॥

त्याने आपल्या दीप्तीने अन्तरीक्षातून अन्धकाराला पळवून लावले, वार्‍याने उदकामध्ये कमलनालाला हालवावे त्याप्रमाणे हालविले. अशा रीतीने वलाचेच हे अभ्र आहे असें जाणून मेघाला जसा वायु, त्याप्रमाणे बृहस्पतीने धेनूंना आपल्याकडे आणून एकत्र केल्या ५.


य॒दा व॒लस्य॒ पीय॑तो॒ जसुं॒ भेद्बृह॒स्पति॑रग्नि॒तपो॑भिर॒र्कैः ।
द॒द्‌भिर्न जि॒ह्वा परि॑विष्टं॒ आद॑दा॒विर्नि॒धीँर॑कृणोदु॒स्रिया॑णाम् ॥ ६ ॥

यदा वलस्य पीयतः जसुं भेत् बृहस्पतिः अग्नितपः-भिः अर्कैः
दत्-भिः न जिह्वा परि-विष्टं आदत् आविः निधीन् अकृणोत् उस्रियाणाम् ॥ ६ ॥

वाटेल तो अपशब्द उच्चारणार्‍या वलाचे हत्यार बृहस्पतीने अग्निप्रमाणे जाज्वल्य अशा आपल्या तेजस्वी शस्त्राने जेव्हां तोडले, तेव्हां दातांनी चावलेला पदार्थ जिभेने गिळून टाकावा, त्याप्रमाणे (त्याच्या हत्यारांचाहि) फडशा उडविला; आणि प्रकाश किरणांच्या दिव्य निधींना जगाच्या दृष्टोत्पत्तीस आणले ६.


बृह॒स्पति॒रम॑त॒ हि त्यदा॑सां॒ नाम॑ स्व॒रीणां॒ सद॑ने॒ गुहा॒ यत् ।
आ॒ण्डेव॑ भि॒त्त्वा श॑कु॒नस्य॒ गर्भं॒ उदु॒स्रियाः॒ पर्व॑तस्य॒ त्मना॑जत् ॥ ७ ॥

बृहस्पतिः अमत हि त्यत् आसां नाम स्वरीणां सदने गुहा यत्
आण्डाइव भित्त्वा शकुनस्य गर्भं उत् उस्रियाः पर्वतस्य त्मना आजत् ॥ ७ ॥

त्या हंबरणार्‍या धेनूचे जे एक गुप्त म्हणजे कोणालाहि माहित नाही असे नांव ठेवले होते, ते त्या गुहेतील मंदिरांत बहस्पतीने उच्चारले, त्याबरोबर पक्ष्यांचे आंडे फोडून पिले बाहेर पडावी त्याप्रमाणे प्रकाशधेनूं पर्वताच्या गुहेंतून एकदम बाहेर पडल्या ७.


अश्नापि॑नद्धं॒ मधु॒ पर्य॑पश्य॒न् मत्स्यं॒ न दी॒न उ॒दनि॑ क्षि॒यन्त॑म् ।
निष्टज्ज॑भार चम॒सं न वृ॒क्षाद्बृह॒स्पति॑र्विर॒वेणा॑ वि॒कृत्य॑ ॥ ८ ॥

अश्ना अपि-नद्धं मधु परि अपश्यत् मत्स्यं न दीने उदनि क्षियन्तं
निः तत् जभार चमसं न वृक्षात् बृहस्पतिः वि-रवेण वि-कृत्य ॥ ८ ॥

आटत चाललेल्या पाण्यांत मासा अडकून पडावा त्याप्रमाणे मधुर रसांचा सांठा पाषाणाच्या दडपणाखाली सांपडलेला होता. तो झरा लांकडातून एक चषक कोरून तयार करावा त्याप्रमाणे तोण्डाने निरनिराळे शब्द उच्चारून बृहस्पतीने फोडून मोकळा केला ८.


सोषां अ॑विन्द॒त् स स्व१ः सो अ॒ग्निं सो अ॒र्केण॒ वि ब॑बाधे॒ तमां॑सि ।
बृह॒स्पति॒र्गोव॑पुषो व॒लस्य॒ निर्म॒ज्जानं॒ न पर्व॑णो जभार ॥ ९ ॥

सः उषां अविन्दत् सः स्वर् इति स्वः सः अग्निं सः अर्केण वि बबाधे तमांसि
बृहस्पतिः गो--वपुषः वलस्य निः मज्जानं न पर्वणः जभार ॥ ९ ॥

त्याने उषेला परत आणले. त्याने दिव्य प्रकाश परत आणला, त्याने अग्नीला (भूलोकीं) आणले, सूर्यप्रकाशाने अंधकाराचा नायनाट केला, ह्या सर्व वस्तूंचे स्वरूप धेनू हे असल्याने वल हा धेनुरूपच (जणों) झाला होता; पण हाडांच्या सांध्यांतून मज्जा पिळून काढावी त्याप्रमाणे बहस्पतीने वलास पिळून टाकून त्याच्या जबड्यांतून धेनूंना खेंचून आणले ९.


हि॒मेव॑ प॒र्णा मु॑षि॒ता वना॑नि॒ बृह॒स्पति॑नाकृपयद्व॒लो गाः ।
अ॒ना॒नु॒कृ॒त्यं अ॑पु॒नश्च॑कार॒ यात् सूर्या॒मासा॑ मि॒थ उ॒च्चरा॑तः ॥ १० ॥

हिमाइव पर्णा मुषिता वनानि बृहस्पतिना अकृपयत् वलः गाः
अननु-कृत्यं अपुनरिति चकार यात् सूर्यामासा मिथः उत्-चरातः ॥ १० ॥

हिंवाळ्याने अरण्यवृक्षांची पालवी हिरावून घ्यावी त्याप्रमाणे बृहस्पतीकडून (वलाच्या कचाट्यांतून धेनूंची सुटका झाल्याने) वल हा धेनूंना आंचवला. बृहस्पतीने आणखी एक कृत्य केले की ज्याचे अनुकरण कोणाकडूनहि झाले नाही म्हणजे तसेंच कृत्य पुन: दुसर्‍या कोणीहि केले नाही; ते हे की (आकाशांत) रविचन्द्र एकमेकांस अनुसरून एकसारखे फिरत आहेत १०.


अ॒भि श्या॒वं न कृश॑नेभि॒रश्वं॒ नक्ष॑त्रेभिः पि॒तरो॒ द्यां अ॑पिंशन् ।
रात्र्यां॒ तमो॒ अद॑धु॒र्ज्योति॒रह॒न् बृह॒स्पति॑र्भि॒नदद्रिं॑ वि॒दद्गाः ॥ ११ ॥

अभि श्यावं न कृशनेभिः अश्वं नक्षत्रेभिः पितरः द्यां अपिंशन्
रात्र्यां तमः अदधुः ज्योतिः अहन् बृहस्पतिः भिनत् अद्रिं विदत् गाः ॥ ११ ॥

मौक्तिकालंकारांनी काळ्या घोड्याला सजवावे तसे पितरांनी काळ्या आकाशाला तेजस्वी तारांगणांनी मण्डित केले आहे आणि अन्धाराला रात्री आणि प्रकाशाला दिवसा मोकळीक दिली आहे. कारण इकडे बृहस्पतीने पर्वत छिन्नभिन्न करून प्रकाशधेनू आणल्याच होत्या ११.


इ॒दं अ॑कर्म॒ नमो॑ अभ्रि॒याय॒ यः पू॒र्वीरन्व् आ॒नोन॑वीति ।
बृह॒स्पतिः॒ स हि गोभिः॒ सो अश्वैः॒ स वी॒रेभिः॒ स नृभि॑र्नो॒ वयो॑ धात् ॥ १२ ॥

इदं अकर्म नमः अभ्रियाय यः पूर्वीः अनु आनोनवीति
बृहस्पतिः सः हि गोभिः सः अश्वः सः वीरेभिः सः नृ-भिः नः वयः धात् ॥ १२ ॥

मेघमण्डळाच्या अधिपतीला हा पहा आम्हीं प्रणाम करतो. अनेक प्रकारच्या वाणी तोच एकसारखा गर्जना करून बोलत असतो. तर धेनूंनी युक्त, अश्वांनी युक्त, वीरांनी युक्त आणि सेवकादिकांनी युक्त असे जोमदार वय तोंच आमच्यामध्यें ठेवो १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६९ (अग्निसूक्त)

ऋषी - सुमित्र वाध्र्‍यश्व : देवता - अग्नि : छंद - १-२ - जगती, अवशिष्ट - त्रिष्टुभ्


भ॒द्रा अ॒ग्नेर्व॑ध्र्य॒श्वस्य॑ सं॒दृशो॑ वा॒मी प्रणी॑तिः सु॒रणा॒ उपे॑तयः ।
यदीं॑ सुमि॒त्रा विशो॒ अग्र॑ इ॒न्धते॑ घृ॒तेनाहु॑तो जरते॒ दवि॑द्युतत् ॥ १॥

भद्राः अग्नेः वध्रि-अश्वस्य सम्-दृशः वामी प्र-णीतिः सु-रणाः उप-इतयः
यत् ईं सु-मित्राः विशः अग्रे इन्धते घृतेन आहुतः जरते दविद्युतत् ॥ १ ॥

वध्र्‍यश्वाच्या घरच्या अग्नीचे दर्शन कल्याणप्रद होय, त्याचे नियममार्ग प्रसन्नता आणणारे, त्याचे आगमन प्रोत्साहक आणि प्रयाणहि फार रमणीय म्हणून मज सुमित्राचे बांधववर्ग प्रथम या अग्नीला प्रज्वलित करतात आणि घृताची आहुति दिल्यावर त्या देदीप्यमान देवाचे स्तवन चालू होते १.


घृ॒तं अ॒ग्नेर्व॑ध्र्य॒श्वस्य॒ वर्ध॑नं घृ॒तं अन्नं॑ घृ॒तं व् अ॑स्य॒ मेद॑नम् ।
घृ॒तेनाहु॑त उर्वि॒या वि प॑प्रथे॒ सूर्य॑ इव रोचते स॒र्पिरा॑सुतिः ॥ २ ॥

घृतं अग्नेः वध्रि-अश्वस्य वर्धनं घृतं अन्नं घृतं ओं इति अस्य भेदनं
घृतेन आहुतः उर्विया वि पप्रथे सूर्यः-इव रोचते सर्पिः-आसुतिः ॥ २ ॥

वध्र्‍यश्वाच्या घृताहुतीने अग्नीचे संवर्धन होते; त्याने अर्पण केलेले घृत हेंच त्याचे अन्न आणि घृत हीच त्याची पुष्टता होय. त्याला घृताहुति अर्पण केली म्हणजे त्याचे किरण दूरवर पसरतात आणि तो नवनीतभोक्ता देव सूर्याप्रमाणे तेज:पुंज दिसतो २.


यत् ते॒ मनु॒र्यदनी॑कं सुमि॒त्रः स॑मी॒धे अ॑ग्ने॒ तदि॒दं नवी॑यः ।
स रे॒वच्छो॑च॒ स गिरो॑ जुषस्व॒ स वाजं॑ दर्षि॒ स इ॒ह श्रवो॑ धाः ॥ ३ ॥

यत् ते मनुः यत् अनीकं सु-मित्रः सम्-ईधे अग्ने तत् इदं नवीयः
सः रेवत् शोच सः गिरः जुषस्व सः वाजं दर्षि सः इह श्रवः धाः ॥ ३ ॥

तुझें जें तेजोमय स्वरूप मनूने आणि म्यां सुमित्राने प्रज्वलित केले, तेंच हे असूनहि हे अग्ने, अगदी नूतन दिसते. तर (तुझे भक्त) दिव्यैर्श्वैर्ययुक्त होतील अशा रीतीने प्रकाशमान हो. आमच्या स्तुतींचा स्वीकार प्रसन्नतेने कर; तूं सत्वैश्वर्य उघड करतोसच, तर येथेहि आमची विख्याति कर ३.


यं त्वा॒ पूर्वं॑ ईळि॒तो व॑ध्र्य॒श्वः स॑मी॒धे अ॑ग्ने॒ स इ॒दं जु॑षस्व ।
स न॑ स्ति॒पा उ॒त भ॑वा तनू॒पा दा॒त्रं र॑क्षस्व॒ यदि॒दं ते॑ अ॒स्मे ॥ ४ ॥

यं त्वा पूर्वं ईळितः वध्रि-अश्वः सम्-ईधे अग्ने सः इदं जुषस्व
सः नः स्ति-पाः उत भव तनू-पाः दात्रं रक्षस्व यत् इदं ते अस्मे इति ॥ ४ ॥

ज्या तुजला पूर्वी वध्र्‍यश्वाने स्तवन करून प्रज्वलित केले, हे अग्नि असा तूं ही आमची सेवा ग्रहण कर. जसा तूं आमचा यज्ञग्रहांचा संरक्षक आहेस, तसाच आमच्या शरीराचाहि संरक्षक हो, आणि जें ऐश्वर्य तूं आम्हांस दिले आहेस त्याचेहि रक्षण तूंच कर ४.


भवा॑ द्यु॒म्नी वा॑ध्र्यश्वो॒त गो॒पा मा त्वा॑ तारीद॒भिमा॑ति॒र्जना॑नाम् ।
शूर॑ इव धृ॒ष्णुश्च्यव॑नः सुमि॒त्रः प्र नु वो॑चं॒ वाध्र्य॑श्वस्य॒ नाम॑ ॥ ५ ॥

भव द्युम्नी वाध्रि-अश्व उत गोपाः मा त्वा तारीत् अभि-मातिः जनानां
शूरः-इव घृष्णुः च्यवनः सु-मित्रः प्र नु वोचं वाध्रि-अश्वस्य नाम ॥ ५ ॥

वध्र्‍यश्वाने प्रज्वलित केलेल्या अग्निदेवा, तूं तेजोवैभव दाता हो. तूं आमचा त्राता आहेसच म्हणून (माझ्याशी लुच्चेगिरी करणार्‍या) लोकांच्या लबाड्या मी तुझ्या कानावर घालीत नाही. मी सुमित्र च्यवनाप्रमाणेच कोणत्याहि शूरासारखाच धाडसी आहे, आणि म्हणून (माझा पूर्वज जो) वध्र्‍यश्व त्याचे नांव मी अभिमानाने सांगतो ५.


सं अ॒ज्र्या पर्व॒त्याख्प् वसू॑नि॒ दासा॑ वृ॒त्राण्यार्या॑ जिगेथ ।
शूर॑ इव धृ॒ष्णुश्च्यव॑नो॒ जना॑नां॒ त्वं अ॑ग्ने पृतना॒यूँर॒भि ष्याः॑ ॥ ६ ॥

सं अज्र्या पर्वत्या वसूनि दासा वृत्राणि आर्या जिगेथ
शूरः-इव घृष्णुः च्यवनः जनानां त्वं अग्ने पृतनायून् अभि स्याः ॥ ६ ॥

मैदानांतील आणि पर्वतांतीलहि उत्कृष्ट वस्तू तूं जिंकून आणल्या आहेस; तसेंच दस्यू आणि आर्य भूमिंतील (आमच्या) शत्रूंना देखील तू जिंकले आहेस. मीहि (आमच्या) लोकांमध्ये च्यवनाप्रमाणे शूर धाडसी आहे, तर हे अग्ने, आमच्यावर हल्ला करणार्‍या दुष्टांना तूं चोहोंबाजूंनी घेरून टाक ६.


दी॒र्घत॑न्तुर्बृ॒हदु॑क्षा॒यं अ॒ग्निः स॒हस्र॑स्तरीः श॒तनी॑थ॒ ऋभ्वा॑ ।
द्यु॒मान् द्यु॒मत्सु॒ नृभि॑र्मृ॒ज्यमा॑नः सुमि॒त्रेषु॑ दीदयो देव॒यत्सु॑ ॥ ७ ॥

दीर्घ-तन्तुः बृहत्-उक्षा अयं अग्निः सहस्र-स्तरीः शत-नीथः ऋभ्वा
द्यु-मान् द्युमत्-सु नृ-भिः मृज्यमानः सु-मित्रेषु दीदयः देवयत्-सु ॥ ७ ॥

हा अग्नि असा आहे की त्याचे यज्ञस्वरूप तंतु फार लांबवर पोहोंचणारे, याचे वीरपुंगव प्रचंड, त्याच्या सेविका हजारों आणि त्याचे नीतिमार्ग शेकडों आहेत. हा बलाढ्य आणि दीप्तिमान्‌ आहे; माझे शूर लोक तुजला अलंकृत करीत आहेत, तर आम्हा सुमित्रांच्या मंडळीत-आम्हां देवभक्तांच्या मंडलांत तू तेजस्वितेने प्रकाशित हो. ७.


त्वे धे॒नुः सु॒दुघा॑ जातवेदोऽस॒श्चते॑व सम॒ना स॑ब॒र्धुक् ।
त्वं नृभि॒र्दक्षि॑णावद्‌भिरग्ने सुमि॒त्रेभि॑रिध्यसे देव॒यद्‌भिः॑ ॥ ८ ॥

त्वे इति धेनुः सु-दुघा जातवेदः असश्चताइव समना सबः-धुक्
त्वं नृ-भिः दक्षिणावत्-भिः अग्ने सु-मित्रेभिः इध्यसे देवयत्-भिः ॥ ८ ॥

हे सर्वज्ञा अग्ने, सहज पान्हवणारी ही अमृत दुग्धदा यज्ञधेनु तुला अगदी चिकटल्याप्रमाणे निरंतर तुजजवळ उभी आहे; अशा समयीं (स्तोतृजनांस) दक्षिणा देणारे जे आम्हीं देवभक्त सुमित्र त्यांच्या हातूनच तूं प्रज्वलित होत असतोस ८.


दे॒वाश्चि॑त् ते अ॒मृता॑ जातवेदो महि॒मानं॑ वाध्र्यश्व॒ प्र वो॑चन् ।
यत् स॒म्पृच्छं॒ मानु॑षी॒र्विश॒ आय॒न् त्वं नृभि॑रजय॒स्त्वावृ॑धेभिः ॥ ९ ॥

देवाः चित् ते अमृताः जात-वेदः महिमानं वाधि-अश्व प्र वोचन्
यत् सम्-पृच्चं मानुषीः विशः आयन् त्वं नृ-भिः अजयः त्वावृधेभिः ॥ ९ ॥

हे सर्वज्ञ, हे वध्र्‍यश्वपूजिता अग्ने, अमर जे दिव्यविबुध त्यांनी देखील तुझा महिमा गाइला आहे. कारण मनुष्यजाति जेव्हां (स्वसंरक्षणासाठी) विनम्र हो‍ऊन तुजकडे आल्या, तेव्हां तूंच वाढविलेल्या शूर मानवांना बरोबर घेऊन तूं शत्रूंना पादाक्रांत केलेस ९.


पि॒तेव॑ पु॒त्रं अ॑बिभरु॒पस्थे॒ त्वां अ॑ग्ने वध्र्य॒श्वः स॑प॒र्यन् ।
जु॒षा॒णो अ॑स्य स॒मिधं॑ यविष्ठो॒त पूर्वा॑ँ अवनो॒र्व्राध॑तश्चित् ॥ १० ॥

पिताइव पुत्रं अभिभः उप-स्थे त्वां अग्ने वध्रि-अश्वः सपर्यन्
जुषाणः अस्य सम्-इधं यविष्ठ उत पूर्वान् अवनोः व्राधतः चित् ॥ १० ॥

हे अग्ने, वध्र्‍यश्व तुझी सेवा करीत असतांना पिता जसा पुत्राला कुरवाळतो त्याप्रमाणें त्याला तू आपल्या जवळ घेतलेंस; आणि यौवनाढ्या देवा, त्याच्या समिधेचा स्वीकार करून त्याचे पूर्वीपासूनचे शत्रू फार बलाढ्य होते तरी देखील त्यांना तूं चीत केलेस १०.


शश्व॑द॒ग्निर्व॑ध्र्य॒श्वस्य॒ शत्रू॒न् नृभि॑र्जिगाय सु॒तसो॑मवद्‌भिः ।
सम॑नं चिददहश्चित्रभा॒नोऽ॑व॒ व्राध॑न्तं अभिनद्वृ॒धश्चि॑त् ॥ ११॥

शश्वत् अग्निः वध्रि-अश्वस्य शत्रून् नृ-भिः जिगाय सुतसोमवत्-भिः
समनं चित् अदहः चित्रभानो इतिचित्र-भानो अव व्राधन्तं अभिनत् वृधः चित् ॥ ११ ॥

अग्नीने वध्र्‍यश्वाच्या शत्रूंना सोम पिळणार्‍या भक्तांच्या हांतून नेहमीच पराजित केले, आणखी शेवटी हे अद्‌भुतदीप्ते देवा, त्यांचा घोळका तू होरपळून टाकलास आणि विशाल रूप घेऊन त्या प्रचंड प्रतिस्पर्ध्यांच्या चिंधड्या उडविल्यास ११.


अ॒यं अ॒ग्निर्व॑ध्र्य॒श्वस्य॑ वृत्र॒हा स॑न॒कात् प्रेद्धो॒ नम॑सोपवा॒क्यः ।
स नो॒ अजा॑मीँरु॒त वा॒ विजा॑मीन् अ॒भि ति॑ष्ठ॒ शर्ध॑तो वाध्र्यश्व ॥ १२ ॥

अयं अग्निः वध्रि-अश्वस्य वृत्र-हा सनकात् प्र-इद्धः नमसा उप-वाक्यः
सः नः अजामीन् उत वा वि-जामीन् अभि तिष्ठ शर्धतः वाध्रि-अश्व ॥ १२ ॥

वध्र्‍यश्वाकडून सेवा घेतलेल्या अग्निने त्याच्या शत्रूंचा नाशच केला आहे, म्हणून पूर्वीपासून त्यालाच आम्ही प्रज्वलित करीत आलो आहो, आणि प्रणिपातपूर्वक (आम्हांकडून) त्याचेंच स्तवन होत असते; असा तू आमचा आहेस, तर हे वध्र्‍यश्वसेविता देवा, जे कोणी आम्हांवर हल्ला चढवितील ते आमचे आप्त असोत किंवा नसोत, त्यांच्या सैन्याला तूं दडपून ठार मार १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७० (आप्रीसूक्त)

ऋषी - सुमित्र वाघ्र्‍यश्व : देवता - अप्री देवतासमूह : छंद - त्रिष्टुभ्


इ॒मां मे॑ अग्ने स॒मिधं॑ जुषस्वे॒ळस्प॒दे प्रति॑ हर्या घृ॒ताची॑म् ।
वर्ष्म॑न् पृथि॒व्याः सु॑दिन॒त्वे अह्नां॑ ऊ॒र्ध्वो भ॑व सुक्रतो देवय॒ज्या ॥ १॥

इमां मे अग्ने सम्-इधं जुषस्व इळः पदे प्रति हर्य घृताचीं
वर्ष्मन् पृथिव्याः सुदिन-त्वे अह्नां ऊर्ध्वः भव सुक्रतो इतिसु-क्रतो देव-यज्या ॥ १ ॥

हे अग्निदेवा, ही माझी समिधा ग्रहण करून संतुष्ट हो. या उत्तरवेदीवर घृतार्द्र समिधा तूं प्रिय मानून घे आणि पृथिवीच्या या अत्त्युच्च प्रदेशी, आजच्या मंगलदिवशीं, हे पुण्यपराक्रमा, देवयज्ञासाठी सज्ज हो १.


आ दे॒वानां॑ अग्र॒यावे॒ह या॑तु॒ नरा॒शंसो॑ वि॒श्वरू॑पेभि॒रश्वैः॑ ।
ऋ॒तस्य॑ प॒था नम॑सा मि॒येधो॑ दे॒वेभ्यो॑ दे॒वत॑मः सुषूदत् ॥ २ ॥

आ देवानां अग्र-यावा इह यातु नराशंसः विश्व-रूपेभिः अश्वैः
ऋतस्य पथा नमसा मियेधः देवेभ्यः देव-तमः सुसूदत् ॥ २ ॥

दिव्यविबुधामध्ये अग्रेसर, शूरांना प्रशंसनीय, असा हा अग्नि आपल्या असंख्यरूपधारी (किरणमय) अश्वांसह येथे येवो. सद्धर्माच्या मार्गाने आणि आमच्या प्रणिपाताने (प्रसन्न हो‍ऊन) तो देवश्रेष्ठ आमचे पवित्र हव्य दिव्य विबुधांकडे पोहोचवून देवो २.


श॒श्व॒त्त॒मं ई॑ळते दू॒त्याय ह॒विष्म॑न्तो मनु॒ष्यासो अ॒ग्निम् ।
वहि॑ष्ठै॒रश्वैः॑ सु॒वृता॒ रथे॒ना दे॒वान् व॑क्षि॒ नि ष॑दे॒ह होता॑ ॥ ३ ॥

शश्वत्-तमं ईळते दूत्याय हविष्मन्तः मनुष्यासः अग्निं
वहिष्ठैः अश्वैः सु-वृता रथेन आ देवान् वक्षि नि सद इह होता ॥ ३ ॥

अत्यंत शाश्वत असा अग्नि त्याने देवांकडे हवि पोहोंचवावे म्हणून मानवजन हे हातांत हविर्द्रव्य धारण करून त्याचे स्तवन करीत असतात; (अग्निदेवा) अतिशय चपल आणि शक्तिमान असे अश्व जोडलेल्या रथांतून तू दिव्य विभूतींना येथे आण, आणि आमचा यज्ञसंपादक हो‍ऊन येथें अधिष्ठित हो ३.


वि प्र॑थतां दे॒वजु॑ष्टं तिर॒श्चा दी॒र्घं द्रा॒घ्मा सु॑र॒भि भू॑त्व॒स्मे ।
अहे॑ळता॒ मन॑सा देव बर्हि॒रिन्द्र॑ज्येष्ठाँ उश॒तो य॑क्षि दे॒वान् ॥ ४ ॥

वि प्रथतां देव-जुष्टं तिरश्चा दीर्घं द्राघ्मा सुरभि भूतु अस्मे इति
अहेळत मनसा देव बर्हिः इन्द्र-ज्येष्ठान् उशतः यक्षि देवान् ॥ ४ ॥

देवांना प्रिय असे विस्तीर्ण कुशासन लांब रुंद पसरले जावो. ते आमच्यासाठीं सुगंधित केलेले असो आणि हे देवा मनांत कांही एक रोष न धरतां यज्ञोत्सुक अशा इंद्र प्रमुख देवांना तू या यज्ञाकडे घेऊन ये ४.


दि॒वो वा॒ सानु॑ स्पृ॒शता॒ वरी॑यः पृथि॒व्या वा॒ मात्र॑या॒ वि श्र॑यध्वम् ।
उ॒श॒तीर्द्वा॑रो महि॒ना म॒हद्‌भि॑र्दे॒वं रथं॑ रथ॒युर्धा॑रयध्वम् ॥ ५ ॥

दिवः वा सानु स्पृशत वरीयः पृथिव्या वा मात्रया वि श्रयध्वं
उशतीः द्वारः महिना महत्-भिः देवं रथं रथ-युः धारयध्वम् ॥ ५ ॥

(यज्ञमंदिराच्या द्वारांनो) तुम्हीं आकाशाच्या अत्त्युच्च शिखराला स्पर्श करा, किंवा पृथिवीच्या विस्तीर्णतेचा आश्रय करा. हे द्वारांनो, तुम्हींहि आपल्या महिम्याने महान्‌ विभूतींसह यज्ञोत्सुक आहांत, रथदर्शोत्सुक आहांत, तर देवाचा दिव्य रथ आतां आंत (यज्ञमंदिरांत) घ्या ५.


दे॒वी दि॒वो दु॑हि॒तरा॑ सुशि॒ल्पे उ॒षासा॒नक्ता॑ सदतां॒ नि योनौ॑ ।
आ वां॑ दे॒वास॑ उशती उ॒शन्त॑ उ॒रौ सी॑दन्तु सुभगे उ॒पस्थे॑ ॥ ६ ॥

देवी इति दिवः दुहितरा सुशिल्पे इतिसु-शिल्पे उषसानक्ता सदतां नि योनौ
आ वां देवासः उशती इति उशन्तः उरौ सीदन्तु सुभगेइतिसु-भगे उप-स्थे ॥ ६ ॥

द्युलोकाच्या दिव्य आणि सुस्वरूप दुहिता ज्या रात्र आणि उषा, त्या यज्ञस्थानी आरोहण करोत. हे उत्सुक देवींनो, दिव्यविबुधहि तुमच्यासाठी उत्कंठित झाले आहेत. तर तेहि या उत्तम शृंगारलेल्या आसनांवर आरोहण करोत ६.


ऊ॒र्ध्वो ग्रावा॑ बृ॒हद॒ग्निः समि॑द्धः प्रि॒या धामा॒न्यदि॑तेरु॒पस्थे॑ ।
पु॒रोहि॑तौ ऋत्विजा य॒ज्ञे अ॒स्मिन् वि॒दुष्ट॑रा॒ द्रवि॑णं॒ आ य॑जेथाम् ॥ ७ ॥

ऊर्ध्वः ग्रावा बृहत् अग्निः सम्-इद्धः प्रिया धामानि अदितेः उप-स्थे
पुरः-हितौ ऋत्विजा यजे अस्मिन् विदुः-तरा द्रविणं आ यजेथाम् ॥ ७ ॥

सोमरस पिळण्याचा ग्रावा सज्ज झाला, बृहत्‌ सामाचे गायनहि चालू झाले, अग्नि प्रज्वलित झाला आणि अदितीच्या जवळ तिला प्रिय अशी तेजस्वी स्थाने व्यवस्थित दिसू लागली आणि आता हे ऋत्विजांनो, पुरोहितांनो, तुम्ही सुज्ञच आहांत; तर या यज्ञामध्यें (अचल) धनासाठी यजन करा ७.


तिस्रो॑ देवीर्ब॒र्हिरि॒दं वरी॑य॒ आ सी॑दत चकृ॒मा वः॑ स्यो॒नम् ।
म॒नु॒ष्वद्य॒ज्ञं सुधि॑ता ह॒वींषीळा॑ दे॒वी घृ॒तप॑दी जुषन्त ॥ ८ ॥

तिस्रः देवीः बर्हिः इदं वरीयः आ सीदत चकृम वः स्योनं
मनुष्वत् यजं सु-धिता हवींषि इळा देवी घृत-पदी जुषन्त ॥ ८ ॥

तीनहि दिव्य देवता या विस्तीर्ण कुशासनावर आरोहण करोत. (हे देवींनो) तुम्हांला संतोष होईल असेंच आम्ही करूं. मनूप्रमाणेंच हा आमचा यज्ञ आहे. हविर्द्रव्येंहि व्यवस्थित ठेवली आहेत; तर इळा, देवी आणि घृताप्रमाणे मृदु चरणांची सरस्वति त्याचे सेवन करोत ८.


देव॑ त्वष्ट॒र्यद्ध॑ चारु॒त्वं आन॒ड् यदङ्गि॑रसां॒ अभ॑वः सचा॒भूः ।
स दे॒वानां॒ पाथ॒ उप॒ प्र वि॒द्वाँ उ॒शन् य॑क्षि द्रविणोदः सु॒रत्नः॑ ॥ ९ ॥

देव त्वष्टः यत् ह चारु-त्वं आनट् यत् अङ्गिरसां अभवः सचाभूः
सः देवानां पाथः उप प्र विद्वान् उशन् यक्षि द्रविणः-दः सु-रत्नः ॥ ९ ॥

त्वष्ट्र देवा, तूं येथे सौंदर्यच सौंदर्य भरून टाकले आहेस. तूं निरंतर आंगिरसांच्या सन्निध राहून त्यांचे रक्षण केले आहेस. दिव्यजनांचा हविर्भाग कोणता हे तूंच चांगले जाणतोस, तर हे (अचल) धनदात्या, रत्नसंपन्न असा तूं उत्सुकतेने यजन कर ९.


वन॑स्पते रश॒नया॑ नि॒यूया॑ दे॒वानां॒ पाथ॒ उप॑ वक्षि वि॒द्वान् ।
स्वदा॑ति दे॒वः कृ॒णव॑द्ध॒वींष्यव॑तां॒ द्यावा॑पृथि॒वी हवं॑ मे ॥ १० ॥

वनस्पते रशनया नि-यूय देवानां पाथः उप वक्षि विद्वान्
स्वदाति देवः कृणवत् हवींषि अवतां द्यावापृथिवी इति हवं मे ॥ १० ॥

वृक्षराजा यूपा, तूं आपल्याशी हविर्भाग रज्जूने बांधून घेऊन तो देवांचा हविर्भाग ज्यांचा त्यांच्याकडे पोहोंचीव. स्वत: देवच हविर्भाग अर्पण करो आणि त्याला रुचि आणो, आणि ही आमची हांक द्यावापृथिवी कृपा करून ऐकून घेवोत १०.


आग्ने॑ वह॒ वरु॑णं इ॒ष्टये॑ न॒ इन्द्रं॑ दि॒वो म॒रुतो॑ अ॒न्तरि॑क्षात् ।
सीद॑न्तु ब॒र्हिर्विश्व॒ आ यज॑त्राः॒ स्वाहा॑ दे॒वा अ॒मृता॑ मादयन्ताम् ॥ ११॥

आ अग्ने वह वरुणं इष्टये नः इन्द्रं दिवः मरुतः अन्तरिक्षात्
सीदन्तु बर्हिः विश्वे आ यजत्राः स्वाहा देवाः अमृताः मादयन्ताम् ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, तूं आमच्या दृष्टीसाठी, वरुणाला, इंद्राला, द्युलोकांतून आणि मरुतांना अन्तरिक्षांतून घेऊन ये. हे सर्व पवित्र दिव्य विभूति ह्य कुशासनावर आरोहण करोत आणि अमर असे दिव्य गण "स्वाहा" प्रयुक्त हवींच्या अर्पणाने आनंद पावोत ११.


ॐ तत् सत्


GO TOP