PREVIOUS
दशमः मंडलः समाप्तः

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १८१ ते १९१

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८१ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - प्रथ वासिष्ठ, सप्रथ भारद्वाज, घर्म सौर्य : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


प्रथ॑श्च॒ यस्य॑ स॒प्रथ॑श्च॒ नामानु॑ष्टुभस्य ह॒विषो॑ ह॒विर्यत् ।
धा॒तुर्द्युता॑नात् सवि॒तुश्च॒ विष्णो॑ रथंत॒रं आ ज॑भारा॒ वसि॑ष्ठः ॥ १॥

प्रथः च यस्य स-प्रथः च नाम आनु-स्तुभस्य हविषः हव् इः यत्
धातुः द्युतानात् सवितुः च विष्णोः रथम्-तरं आ जभार वसिष्ठः ॥ १ ॥

ज्याचे नांव ’प्रथ’ आहे आणि ज्याचे नांव "स्प्रथ" आहे ते आणि ’अनुष्ठुभ्‌’ या नांवाचा ज्या हविरन्नाचा हविर्भाग सिद्ध करता तो, अशा वस्तु, त्याच प्रमाणे, तेजोमय जो जगत्‌स्त्रष्टा सविता आणि व्यापनशील विष्णु, ह्यांच्यापासून रथंतर सामाचे ज्ञान इत्यादि गोष्टी वसिष्ठ ॠषींनी संपादन केल्या १.


अवि॑न्द॒न् ते अति॑हितं॒ यदासी॑द्य॒ज्ञस्य॒ धाम॑ पर॒मं गुहा॒ यत् ।
धा॒तुर्द्युता॑नात् सवि॒तुश्च॒ विष्णो॑र्भ॒रद्वा॑जो बृ॒हदा च॑क्रे अ॒ग्नेः ॥ २ ॥

अविन्दन् ते अति-हितं यत् आसीत् यजस्य धाम परमं गुहा यत्
धातुः द्युतानात् सवितुः च विष्णोः भरत्-वाजः बृहत् आ चक्रे अग्नेः ॥ २ ॥

जे ज्ञान अगदी खोल गूढ होतें तें आणि यज्ञविषयक रहस्य जे अतिशय गुह्य म्हणून ठरले होते तेंहि ॠषींनी संपादन केले; परंतु तेजोमय जगत्‌स्त्रष्टा सविता, व्यापनशील विष्णु आणि अग्नि यांच्यापासून "बृहत्‌" सामाचे ज्ञान भारद्वाज ॠषींनी मात्र अवगत करून घेतले. २


तेऽविन्द॒न् मन॑सा॒ दीध्या॑ना॒ यजु॑ ष्क॒न्नं प्र॑थ॒मं दे॑व॒यान॑म् ।
धा॒तुर्द्युता॑नात् सवि॒तुश्च॒ विष्णो॒रा सूर्या॑दभरन् घ॒र्मं ए॒ते ॥ ३ ॥

ते अविन्दन् मनसा दीध्यानाः यजुः स्कन्नं प्रथमं देव-यानं
धातुः द्युतानात् सवितुः च विष्णोः आ सूर्यात् अभरन् घर्मं एते ॥ ३ ॥

एकाग्र अन्त:करणाने ध्यान करीत असतां हे यज्ञाचे ज्ञान ॠषींना प्राप्त झाले, तसेंच यजु म्हणजे ’निविद्‌ याज्या’ इत्यादिकांचेहि ज्ञान अशाच रीतीने उपलब्ध झाले. इकडे खाली येणारा देवांचा पहिला मार्ग हाच; याप्रमाणे जगत्‌स्त्रष्टा सविता, व्यापनशील विष्णु आणि सूर्य यांच्यापासून या सर्व ॠषींनी धर्मविषयक ज्ञान संपादन केले ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८२ (बृहस्पतिसूक्त)

ऋषी - तपुर्मूर्धन् बार्हस्पत्य : देवता - बृहस्पति : छंद - त्रिष्टुभ्


बृह॒स्पति॑र्नयतु दु॒र्गहा॑ ति॒रः पुन॑र्नेषद॒घशं॑साय॒ मन्म॑ ।
क्षि॒पदश॑स्तिं॒ अप॑ दुर्म॒तिं ह॒न्न् अथा॑ कर॒द्यज॑मानाय॒ शं योः ॥ १॥

बृहस्पतिः नयतु दुः-गहा तिरः पुनः नेषत् अघ-शंसाय मन्म
क्षिपत् अशस्तिं अप दुः-मतिं हन् अथ करत् यजमानाय शं योः ॥ १ ॥

संकटनाशन बृहस्पति हा आम्हांस दु:खौघाच्या पलीकडे घेऊन जावो. आणि पापाचरणी दुर्जनांचे शासन करण्यासाठी त्यांचेकडे आपले निश्चयी विचार पुन: वळवो; तसेंच तो अमंगलाचे निवारण करो, दुष्टबुद्धीचे उच्चाटन करो आणि यजमानाला हित आणि सुखक्षेम यांचा लाभ होईल असे करो १.


नरा॒शंसो॑ नोऽवतु प्रया॒जे शं नो॑ अस्त्वनुया॒जो हवे॑षु ।
क्षि॒पदश॑स्तिं॒ अप॑ दुर्म॒तिं ह॒न्न् अथा॑ कर॒द्यज॑मानाय॒ शं योः ॥ २ ॥

नराशंसः नः अवतु प्र-याजे शं नः अस्तु अनु-याजः हवेषु
क्षिपत् अशस्तिं अप दुः-मतिं हन् अथ करत् यजमानाय शं योः ॥ २ ॥

’प्रयाज’ कार्याच्या वेळी तसेंच अनुयाजाच्या हवन प्रसंगीहि नराशंस ह्याने आमचेवर अनुग्रह करावा, अमंगलाचे निवारण करावे, दुष्टबुद्धीचा नि:पात करावा आणि यजमानाला हित आणि सुख ह्यांचा लाभ होईल असे करावे हीच प्रार्थना आहे २.


तपु॑र्मूर्धा तपतु र॒क्षसो॒ ये ब्र॑ह्म॒द्विषः॒ शर॑वे॒ हन्त॒वा उ॑ ।
क्षि॒पदश॑स्तिं॒ अप॑ दुर्म॒तिं ह॒न्न् अथा॑ कर॒द्यज॑मानाय॒ शं योः ॥ ३ ॥

तपुः-मूर्धा तपतु रक्षसः ये ब्रह्म-द्विषः शरवे हन्तवै ओं इति
क्षिपत् अशस्तिं अप दुः-मतिं हन् अथ करत् यजमानाय शं योः ॥ ३ ॥

ज्याच्या मस्तकाकडे पाहतांच तपश्चर्येची तप्तता अनुभवास येते असा बृहस्पति वेदज्ञानाचा द्वेष करणारे जे राक्षस त्यांना जाळून भस्म करो; अथवा बाणांच्या प्रहाराने त्यांना ठार करो. तसेच अमंगलाचे निवारण करो आणि दुष्टबुद्धीचा नायनाट करून आणि क्षेम ह्यांचा लाभ यजमानाला होईल असे करो ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८३ (आशीर्वादसूक्त, आयुष्यमंत्र)

ऋषी - प्रजाअत् प्राजापत्य : देवता - १ – यजमान; २ – यजमान पत्नी॥; ३ – होतृ : छंद - त्रुष्टुभ्


अप॑श्यं त्वा॒ मन॑सा॒ चेकि॑तानं॒ तप॑सो जा॒तं तप॑सो॒ विभू॑तम् ।
इ॒ह प्र॒जां इ॒ह र॒यिं ररा॑णः॒ प्र जा॑यस्व प्र॒जया॑ पुत्रकाम ॥ १॥

अपश्यं त्वा मनसा चेकितानं तपसः जातं तपसः वि-भूतं
इह प्र-जां इह रयिं रराणः प्र जायस्व प्र-जया पुत्र-काम ॥ १ ॥

अतिशय लक्ष लावून विचारामध्ये अगदी गुंग असतांना तुला मी (पुष्कळ वेळां) पाहिले आहे. ही तुझी प्रवृत्ति तुझ्या तपश्चर्येमुळे उद्‌भवली आणि तपश्चर्येनेच तिला जोर चढला. तर तूं आतां येथे संततीच्या सुखाचा अनुभव घेणारा हो. तुलाहि पुत्रमुख पाहण्याची इच्छा आहेच; तर तुझी ती इच्छा तूं पूर्ण करून घे १.


अप॑श्यं त्वा॒ मन॑सा॒ दीध्या॑नां॒ स्वायां॑ त॒नू ऋत्व्ये॒ नाध॑मानाम् ।
उप॒ मां उ॒च्चा यु॑व॒तिर्ब॑भूयाः॒ प्र जा॑यस्व प्र॒जया॑ पुत्रकामे ॥ २ ॥

अपश्यं त्वा मनसा दीध्यानां स्वायां तनू इति ऋत्व्ये नाधमानां
उप मां उच्चा युवतिः बभूयाः प्र जायस्व प्र-जया पुत्र-काम ॥ २ ॥

वाहवा ! मी देखील तुला कसल्या तरी चिन्तनांत अगदी निश्चलतेने गढून गेलेली अशी कित्येक वेळां पाहिलेली आहे. इतकेंच काय, पण प्रियकराने तुझ्या तनुमनाचा स्वीकार करावा अशी तुझी आतुरताहि माझ्या दृष्टोत्पत्तीस आली आहे, आणि जर तुला मान्य असेल तर उठ, आणि मला जिचे सतत ध्यान लागलेले आहे, अशी प्रिय तरुणी तूंच आहेस, तर मजजवळ ये; आणि तुलाहि पण पुत्र व्हावा अशी इच्छा आहे, तीही पूर्ण करून घे २.


अ॒हं गर्भं॑ अदधां॒ ओष॑धीष्व् अ॒हं विश्वे॑षु॒ भुव॑नेष्व् अ॒न्तः ।
अ॒हं प्र॒जा अ॑जनयं पृथि॒व्यां अ॒हं जनि॑भ्यो अप॒रीषु॑ पु॒त्रान् ॥ ३ ॥

अहं गर्भं अदधां ओषधीषु अहं विश्वेषु भुवनेषु अन्तरिति
अहं प्र-जाः अजनयं पृथिव्यां अहं जनि-भ्यः अपरीषुपुत्रान् ॥ ३ ॥

पहा, परमपुरुष असे म्हणतो की औषधि वनस्पतीमध्ये फलोत्पत्ति मी करितो. त्याचप्रमाणे सकल भुवनांच्या आंत देखील फलनिष्पत्ति मीच करितो. तसेंच पृथ्वीवर जे जे प्राणी आहेत, ते सर्व मीच उत्पन्न केले आणि पुढच्या काळांतहि स्त्रियांना पुत्रप्राप्ति होईल तीहि माझ्याच कृपेने होईल ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८४ (प्रजावत्‌सूक्त, आयुष्यमंत्र)

ऋषी - त्वष्ट्ट गर्भकर्ता आणि विष्णु प्राजापत्य : देवता - विष्णु आदि देवता : छंद - अनुष्टुभ्


विष्णु॒र्योनिं॑ कल्पयतु॒ त्वष्टा॑ रू॒पाणि॑ पिंशतु ।
आ सि॑ञ्चतु प्र॒जाप॑तिर्धा॒ता गर्भं॑ दधातु ते ॥ १॥

विष्णुः योनिं कल्पयतु त्वष्टा रूपाणि पिंशतु
आ सिचतु प्रजापतिः धाता गर्भं दधातु ते ॥ १ ॥

तुझी कूस विष्णु सुव्यवस्थित ठेवो; आणि तुझ्या गर्भाचे स्वरूप आणि आकार यांची रचना त्वष्टा घडवो, परंतु बीजोदकाचे सिंचन मात्र प्रजापति हा करो, म्हणजे तुझ्या गर्भाची उत्पत्ति (आणि स्थैर्य) ह्यांची व्यवस्था विधाता करील १.


गर्भं॑ धेहि सिनीवालि॒ गर्भं॑ धेहि सरस्वति ।
गर्भं॑ ते अ॒श्विनौ॑ दे॒वाव् आ ध॑त्तां॒ पुष्क॑रस्रजा ॥ २ ॥

गर्भं धेहि सिनीवालि गर्भं धेहि सरस्वति
गर्भं ते अश्विनौ देवौ आ धत्तां पुष्कर-स्रजा ॥ २ ॥

हे सिनीवाली, ह्या स्त्रियेमध्ये गर्भाची उत्पत्ति कर, हे सरस्वति, तूंहि तेंच कार्य कर, आणि कमलपुष्पांची माला धारण करणारे विश्वदेव देखील तुझ्यामधे गर्भ स्थिर राहील अशी योजना करोत २.


हि॒र॒ण्ययी॑ अ॒रणी॒ यं नि॒र्मन्थ॑तो अ॒श्विना॑ ।
तं ते॒ गर्भं॑ हवामहे दश॒मे मा॒सि सूत॑वे ॥ ३ ॥

हिरण्ययी इति अरणी इति यं निः-मन्थतः अश्विना
तं ते गर्भं हवामहे दशमे मासि सूतवे ॥ ३ ॥

ह्या अरणी हिरण्मय अविनाशी आहेत म्हणूनच त्या मन्थन करून अश्विदेव ज्याला उत्पन्न करतात, तो तुझा गर्भ वृद्धिंगत हो‍ऊन त्याने दहाव्या महिन्यांत बालकरूपाने निपजावे असे आम्ही त्याला पाचारण करून सांगत आहो ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८५ (आदित्यसूक्त)

ऋषी - सत्यधृणि वारुणि : देवता - आदित्य : छंद - गायत्री


महि॑ त्री॒णां अवो॑ऽस्तु द्यु॒क्षं मि॒त्रस्या॑र्य॒म्णः ।
दु॒रा॒धर्षं॒ वरु॑णस्य ॥ १ ॥

महि त्रीणां अवः अस्तु द्युक्षं मित्रस्य अर्यम्णः
दुः-आधर्षं वरुणस्य ॥ १ ॥

मित्र, अर्यमा आणि वरुण हे जे तीन श्रेष्ठ देव त्या तिघांचा अनुग्रह ज्याला झाला तर हाणून पाडण्याची कोणाचीहि प्राज्ञा नाही, असा उत्तमोत्तम दिव्य अनुग्रह आम्हांवर होवो १.


न॒हि तेषां॑ अ॒मा च॒न नाध्व॑सु वार॒णेषु॑ ।
ईशे॑ रि॒पुर॒घशं॑सः ॥ २ ॥

नहि तेषां अमा चन न अध्व-सु वारणेषु
ईशे रिपुः अघ-शंसः ॥ २ ॥

त्यांच्या भक्तांवर मग ते त्यांच्या स्वत:च्या घरी असोत, मार्गाने प्रवास करीत असोत किंवा परक्या ठिकाणी असोत, त्यांना कोणीहि शत्रु किंवा कोणताहि अधम नीच उपद्रव देऊं शकत नाही २.


यस्मै॑ पु॒त्रासो॒ अदि॑तेः॒ प्र जी॒वसे॒ मर्त्या॑य ।
ज्योति॒र्यच्छ॒न्त्यज॑स्रम् ॥ ३ ॥

यस्मै पुत्रासः अदितेः प्र जीवसे मर्त्याय
ज्योतिः यच्चन्ति अजस्रम् ॥ ३ ॥

पण हे कोणासंबंधाने असे विचाराल तर, हे अदितीचे तिन्ही पुत्र, ज्या मर्त्य भक्तजनांस सुखमय जीवनाचा लाभ व्हावा म्हणून त्याच्यावर आपल्या कृपेच्या प्रकाशांचा अखंड झोत सोडातात, त्या भक्तांची ही गोष्ट ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८६ (वायुसूक्त)

ऋषी - उल वातायन : देवता - वायु : छंद - गायत्री


वात॒ आ वा॑तु भेष॒जं श॒म्भु म॑यो॒भु नो॑ हृ॒दे ।
प्र ण॒ आयूं॑षि तारिषत् ॥ १॥

वातः आ वातु भेषजं शम्-भु मायः-भु नः हृदे
प्र नः आयूंषि तारिषत् ॥ १ ॥

वायुदेवा ! आम्हांवर तुझी औषधियुक्त झुळुक येऊं दे; की जी आमच्या हृदयाला आराम उत्पन्न करून आमचे कल्याण करो आणि आमचे आयुष्य वृद्धिंगत करो १.


उ॒त वा॑त पि॒तासि॑ न उ॒त भ्रातो॒त नः॒ सखा॑ ।
स नो॑ जी॒वात॑वे कृधि ॥ २ ॥

उत वात पिता असि नः उत भ्राता उत नः सखा
सः नः जीवातवे कृधि ॥ २ ॥

हे वायो, तूं आमचा पिता आहेस, भ्राता आणि जिवलग मित्रहि तूंच आहेस; तर आमचे जीवित सुखयम होईल असे कर २.


यद॒दो वा॑त ते गृ॒हेऽ॒मृत॑स्य नि॒धिर्हि॒तः ।
ततो॑ नो देहि जी॒वसे॑ ॥ ३ ॥

यत् अदः वात ते गृहे अमृतस्य निधिः हितः
ततः नः देहि जीवसे ॥ ३ ॥

त्यासाठी हे वायु, तुझ्या मंदिरांत अमृताचा जो सांठा केलेला आहे तोच आमच्या स्वाधीन कर ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८७ (अग्निसूक्त)

ऋषी - वत्स आग्नेय : देवता - अग्नि जातदेवस् : छंद - गायत्री


प्राग्नये॒ वाचं॑ ईरय वृष॒भाय॑ क्षिती॒नाम् ।
स नः॑ पर्ष॒दति॒ द्विषः॑ ॥ १॥

प्र अग्नये वाचं ईरय वृषभाय क्षितीनां
सः नः पर्षत् अति द्व् इषः ॥ १ ॥

अग्नीप्रीत्यर्थ जो पृथ्वीमध्ये वास करणार्‍या सर्व मानवांचा धुरीण आहे, त्या अग्नीप्रीत्यर्थ स्तवन करून त्याला आपली वाणी अर्पण कर, कारण तोच द्वेष्ट्यांच्या कौटाळांतून आम्हां भक्तांना सुखरूप पार नेवो १.


यः पर॑स्याः परा॒वत॑स्ति॒रो धन्वा॑ति॒रोच॑ते ।
स नः॑ पर्ष॒दति॒ द्विषः॑ ॥ २ ॥

यः परस्याः परावतः तिरः धन्व अति-रोचते
सः नः पषर्त् अति द्विषः ॥ २ ॥

जो अग्नि आपल्याला वाटते त्या दूरच्या लोकांपेक्षांहि पलीकडच्या लोकांतून आपला प्रकाश पाहिजे त्या ओसाड प्रदेशांच्याहि अगदी पलीकडे पोहोंचवून देतो, तोच आम्हां भक्तांना द्वेष्ट्याच्या तडाक्यांतून सुरक्षित घेऊन जावो २.


यो रक्षां॑सि नि॒जूर्व॑ति॒ वृषा॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॑ ।
स नः॑ पर्ष॒दति॒ द्विषः॑ ॥ ३ ॥

यः रक्षांसि नि-जूर्वति वृषा शुक्रेण शोचिषा
सः नः पर्षत् अति द्वि षः ॥ ३ ॥

जो वीरपुंगव अग्नि आपल्या शुभ्र ज्वालेने सर्व राक्षसांना पार होरपळून टाकतो, तोच द्वेष्ट्यांच्या टोळीची फळी फोडून आम्हांला पलेकडे घेऊन जावो ३.


यो विश्वा॒भि वि॒पश्य॑ति॒ भुव॑ना॒ सं च॒ पश्य॑ति ।
स नः॑ पर्ष॒दति॒ द्विषः॑ ॥ ४ ॥

यः विश्वा अभि वि-पश्यति भुवना सं च पश्यति
सः नः पषर्त् अति द्विषः ॥ ४ ॥

जो सर्व वस्तूंकडे बारीक लक्ष ठेवून निरीक्षण करितो; इतकेंच काय, पण सर्व भुवनांवरहि दृष्टि फिरवून त्यांची परिस्थिति जाणतो, तोच द्वेष्ट्यांना धुडकावून देऊन त्यांतून आम्हांला पलीकडे नेवो ४.


यो अ॒स्य पा॒रे रज॑सः शु॒क्रो अ॒ग्निरजा॑यत ।
स नः॑ पर्ष॒दति॒ द्विषः॑ ॥ ५ ॥

यः अस्य पारे रजसः शुक्रः अग्निः अजायत
सः नः पर्षत् अत् इ द्विषः ॥ ५ ॥

जो अग्नि ह्या रजोलोकांच्या पलीकडे शुभ्रतेजस्क असा प्रकट झाला, तोच द्वेष्ट्यांना धडक देऊन आम्हांला त्यांच्यांतून धडाडीने पलीकडे घेऊन जावो ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८८ (अग्निसूक्त)

ऋषी - श्येन आग्नेय : देवता - अग्नि जातदेवस् : छंद - गायत्री


प्र नू॒नं जा॒तवे॑दसं॒ अश्वं॑ हिनोत वा॒जिन॑म् ।
इ॒दं नो॑ ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ १॥

प्र नूनं जात-वेदसं अश्वं हिनोत वाजिनं
इदं नः बर्हिः आसदे ॥ १ ॥

ऋत्विजांनो सकल वस्तु-वेत्ता, वेगवान्‌, व्यापनशील सत्त्वसामर्थ्ययुक्त, जो अग्नि त्याला येथे आमच्या ह्या कुशासनावर आरोहण करण्यासाठी सत्वर पाठवून द्या १.


अ॒स्य प्र जा॒तवे॑दसो॒ विप्र॑वीरस्य मी॒ळ्हुषः॑ ।
म॒हीं इ॑यर्मि सुष्टु॒तिम् ॥ २ ॥

अस्य प्र जात-वेदसः विप्र-वीरस्य मीळ्हुषः
महीं इयर्मि सु-स्तुतिम् ॥ २ ॥

जो हा सकल वस्तूंना जाणणारा ज्ञानी, स्तोते ज्याचे वीर, जो भक्तांच्या कामना पूर्ण करितो, अशा अग्नीप्रीत्यर्थ जे मी स्तवन योजून ठेविले आहे ते त्याला मी आतां अर्पण करितो २.


या रुचो॑ जा॒तवे॑दसो देव॒त्रा ह॑व्य॒वाह॑नीः ।
ताभि॑र्नो य॒ज्ञं इ॑न्वतु ॥ ३ ॥

याः रुचः जात-वेदसः देव-त्रा हव्य-वाहनीः
ताभिः नः यजं इन्वतु ॥ ३ ॥

सकल वस्तु जाणणार्‍या अग्नीला ज्या प्रकाशमय ज्वाला, ज्या हविर्भाग देवांकडे देवलोकी पोहोंचवितात, त्या ज्वालांनी अग्नि आमचा यज्ञ यथासांग जुळवून सिद्धीस नेवो ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८९ (सूर्यसूक्त)

ऋषी - अघमर्षण माधुच्छंदस : देवता - सृष्ट्युत्पत्ति : छंद - अनुष्टुभ्


आयं गौः पृश्नि॑रक्रमी॒दस॑दन् मा॒तरं॑ पु॒रः ।
पि॒तरं॑ च प्र॒यन् स्वः ॥ १॥

आ अयं गौः पृश्निः अक्रमीत् असदत् मातरं पुरः
पितरं च प्र-यन् [स्वर् इति]स्वः ॥ १ ॥

अनेक वर्णांच्या रश्मिंनी युक्त असा हा सूर्यरूप वृषभ आपला मार्ग आक्रमण करूं लागला तेव्हां प्रथम तो पृथ्वीमातेच्या समोरच पूर्वभागी उदयाचलावर अधिष्ठित झाला; आणि नंतर स्वर्लोकाला अनुलक्षुन द्यु-पित्याकडे गमन करूं लागला १.


अ॒न्तश्च॑रति रोच॒नास्य प्रा॒णाद॑पान॒ती ।
व्यख्यन् महि॒षो दिव॑म् ॥ २ ॥

अन्तरिति चरति रोचना अस्य प्राणात् अप-अनती
वि अख्यत् महिषः दिवम् ॥ २ ॥

त्याची प्राणभूत जी प्रकाशदीप्ति उषा, ती त्याच्या प्रत्येक श्वासाबरोबर आपलाहि नि:श्वास सोडीत आकाशाच्या अन्तर्भागी चालत असते; आणि अशा रीतीने हा श्रेष्ठ सूर्य द्युलोकाकडे अवलोकन करितो २.


त्रिं॒शद्धाम॒ वि रा॑जति॒ वाक् प॑तं॒गाय॑ धीयते ।
प्रति॒ वस्तो॒रह॒ द्युभिः॑ ॥ ३ ॥

त्रिंशत् धाम वि राजति वाक् पतङ्गाय धीयते
प्रति वस्तोः अह द्यु-भ् इः ॥ ३ ॥

भक्ताची जी स्तवन वाणी ह्या सूर्यरूप पक्ष्याप्रीत्यर्थ प्रत्येक दिवशी सायंकाळी आणि प्रात:काळी एकाग्र ध्यानाने म्हटली जाते, ती स्तुति त्याच्या तीस प्रकारच्या शक्तीला दीप्तींनी सुप्रकाशित करते आणि तेथेच विराजमान होते ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १९० (सृष्टिक्रमसूक्त)

ऋषी - अघमर्षण माधुच्छंदस : देवता - सृष्ट्युत्पत्ति : छंद - ३ – अनुष्टुभ्


ऋ॒तं च॑ स॒त्यं चा॒भीद्धा॒त् तप॒सोऽ॑ध्यजायत ।
ततो॒ रात्र्य॑जायत॒ ततः॑ समु॒द्रो अ॑र्ण॒वः ॥ १॥

ऋतं च सत्यं च अभीद्धात् तपसः अधि अजायत
ततः रात्री अजायत ततः समुद्रः अर्णवः ॥ १ ॥

सृष्टिनिर्मात्याच्या जाज्वल्य तप:सामर्थ्याने प्रथम न्याययुक्त धर्म आणि सृष्टिनियमांमध्ये अनुभवास येणारे असे सत्य उत्पन्न झाले, नंतर अन्ध:काररूप रात्र उत्पन्न झाली; आणि त्यानंतर उदककल्लोळांनी उचंबळणारा समुद्र निर्माण झाला १.


स॒मु॒द्राद॑र्ण॒वादधि॑ संवत्स॒रो अ॑जायत ।
अ॒हो॒रा॒त्राणि॑ वि॒दध॒द्विश्व॑स्य मिष॒तो व॒शी ॥ २ ॥

समुद्रात् अर्णवात् अधि सव्वंत्सरः अजायत
अहोरात्राणि वि-दधत् विश्वस्य मिषतः वशी ॥ २ ॥

उदककल्लोळांनी उचंबळणार्‍या समुद्राच्या उत्पत्ति नंतर कालनिदर्शक जे वर्षमान ते उत्पन्न झाले. आणि नंतर डोळ्यांची उघडझांप करणारे, अर्थात्‌ उद्योग करून विश्रांति घेणारे, जे सर्व प्राणिमात्र ते सृष्टीच्या अधिपतीने घडवून, वर्षाचे विभाग, जे अहोरात्र ते प्रचारांत आणले २.


सू॒र्या॒च॒न्द्र॒मसौ॑ धा॒ता य॑थापू॒र्वं अ॑कल्पयत् ।
दिवं॑ च पृथि॒वीं चा॒न्तरि॑क्षं॒ अथो॒ स्वः ॥ ३ ॥

सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वं अकल्पयत्
दिवं च पृथिवीं च अन्तरिक्षं अथो स्वः ॥ ३ ॥

तथापि पूर्वी ठरविलेल्या योजनेप्रमाणे सृष्टिकर्त्याने रविचन्द्र उत्पन्न केले होते. पण त्यांच्या अगोदर द्युलोक केला; आणि नंतर क्रमाने पृथ्वी, अन्तरीक्ष आणि दिव्यलोक अशी रचना केली ३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १९१ (संज्ञानसूक्त)

ऋषी - संवनन आंगिरस : देवता - १ अग्नि; अवशिष्ट स्ज्ञान : छंद - ३ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - अनुष्टुभ्


सं-सं॒ इद्यु॑वसे वृष॒न्न् अग्ने॒ विश्वा॑न्य॒र्य आ ।
इ॒ळस्प॒दे सं इ॑ध्यसे॒ स नो॒ वसू॒न्या भ॑र ॥ १॥

सम्-सं इत् युवसे वृषन् अग्ने विश्वानि अर्यः आ
इळः पदे सं इध्यसे सः नः वसूनि आ भर ॥ १ ॥

हे वीरपुंगवा अग्निदेवा, तूं जो आमचा पूज्य प्रभु, तो तूं यच्चयावत्‌ वस्तूंना एके ठिकाणी जुळवून एकत्र करतोस आणि इळेच्या स्थानी प्रज्वलित होतोस; तर ज्या ज्या वस्तु सर्वोत्कृष्ट असतील, त्या आम्हांस देण्यासाठी घेऊन ये १.


सं ग॑च्छध्वं॒ सं व॑दध्वं॒ सं वो॒ मनां॑सि जानताम् ।
दे॒वा भा॒गं यथा॒ पूर्वे॑ संजाना॒ना उ॒पास॑ते ॥ २ ॥

सं गच्चध्वं सं वदध्वं सं वः मनांसि जानतां
देवाः भागं यथा पूर्वे सम्-जानानाः उप-आसते ॥ २ ॥

ही गोष्ट अग्नीने करावी म्हणून मित्रांनो तुम्ही देखील एकत्र हो‍ऊनच कार्य करा; आणि परस्पर विचारविनिमय करण्यासाठी संवाद करीत जा; आणि पूर्वकाळी देव ज्याप्रमाणे यज्ञमंदिरांत एकत्र येऊनच हविर्भागाचा स्वीकार करीत असत, त्याप्रमाणे तुम्हीहि एकत्र बसून एकमेकांचे विचार समजावून घ्या २.


स॒मा॒नो मन्त्रः॒ समि॑तिः समा॒नी स॑मा॒नं मनः॑ स॒ह चि॒त्तं ए॑षाम् ।
स॒मा॒नं मन्त्रं॑ अ॒भि म॑न्त्रये वः समा॒नेन॑ वो ह॒विषा॑ जुहोमि ॥ ३ ॥

समानः मन्त्रः सम्-इतिः समानी समानं मनः सह चित्तं एषां
समानं मन्त्रं अभि मन्त्रये वः समानेन वो ह॒विषा जुहोमि ॥ ३ ॥

हे जे तुम्ही आर्यजन त्यांचा सर्वांचा मन्त्र, म्हणजे मनांतील उद्देश एकसारखाच असू द्या; तुमचे समिति म्हणजे सभा ही सर्वांची एकाच जागी करीत जा. त्या योगाने तुमचे मन आणि तुमचे चित्त (म्हणजे विचाराने ठरविलेली गोष्ट) हेही एकसारखेच राहतील; म्हणून तुम्हां सर्वांसाठी मी आता एकच मन्त्र, गुरुकिल्ली सांगतो, आणि सर्वांचा मिळून एकच हविर्भाग अग्नीला अर्पण करितो ३.


स॒मा॒नी व॒ आकू॑तिः समा॒ना हृद॑यानि वः ।
स॒मा॒नं अ॑स्तु वो॒ मनो॒ यथा॑ वः॒ सुस॒हास॑ति ॥ ४ ॥

समानी वः आकूतिः समाना हृदयानि वः
समानं अस्तु वः मनः यथा वः सु-सह असति ॥ ४ ॥

ती तत्वाची गोष्ट ही की तुमचा विचार आणि योजना एकच असूं द्या; तुमची अन्त:करणे एकसारखी-एकाच भावनेने परिपूर्ण असू द्या. तसेंच तुमचे मनहि सारखे-एकाच धेयायाकडे लागलेले असू द्या, म्हणजे तुम्हांला पाहिजे असेल ती गोष्ट सहज साध्य होईल ४.


इति दशमं मण्डलं समाप्तम्‌ ॥
॥ समाप्तोयं ऋग्वेदसंहिता ॥
ॐ तत् सत्


GO TOP