PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त ५१ ते ५८

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५१ (उषा सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - उषा : छंद - त्रिष्टुप्


इ॒दमु॒ त्यत्पु॑रु॒तमं॑ पु॒रस्ता॒ज्ज्योति॒स्तम॑सो व॒युना॑वदस्थात् ।
नू॒नं दि॒वो दु॑हि॒तरो॑ विभा॒तीर्गा॒तुं कृ॑णवन्नु॒षसो॒ जना॑य ॥ १ ॥

इदं ऊं इति त्यत् पुरुऽतमं पुरस्ताज् ज्योतिः तमसः वयुनऽवत् अस्थात् ।
नूनं दिवः दुहितरः विऽभातीः गातुं कृणवन् उषसः जनाय ॥ १ ॥

हें तें धर्मज्ञानबोधक महातेज पूर्वदिशेकडे अंधकारांतून उदय पावले आहे. आतां द्यूच्या कन्यका ज्या प्रकाशवती उषा त्या, भक्तजनासाठी धर्माचरणाचा मार्ग सुप्रकाशित करोत. ॥ १ ॥


अस्थु॑रु चि॒त्रा उ॒षसः॑ पु॒रस्ता॑न्मि॒ता इ॑व॒ स्वर॑वोऽध्व॒रेषु॑ ।
व्यू व्र॒जस्य॒ तम॑सो॒ द्वारो॒च्छन्ती॑रव्र॒ञ्छुच॑यः पाव॒काः ॥ २ ॥

अस्थुः ऊं इति चित्राः उषसः पुरस्तान् मिताःऽइव स्वरवः अध्वरेषु ।
वि ऊं इति व्रजस्य तमसः द्वारा उच्छंतीः अव्रन् शुचयः पावकाः ॥ २ ॥

यागमंडपामध्यें लांकडाचे नानाप्रकारचे रंगीत ठोकळे व्यवस्थित बसवून ठेवावे त्याप्रमाणे अद्‍भुत तेजस्विनी उषा पूर्वादिभागीं आरूढ झाल्या आहेत. ह्या तेजःपुंज आणि पापनाशक उषा उदयोन्मुख होऊन त्यांनी ज्ञानधेनूंच्या वसतिस्थानाचीं द्वारें अंधकारानें झांकलेली होती तीं उघडून दिलीं. ॥ २ ॥


उ॒च्छन्ती॑र॒द्य चि॑तयन्त भो॒जान्रा॑धो॒देया॑यो॒षसो॑ म॒घोनीः॑ ।
अ॒चि॒त्रे अ॒न्तः प॒णयः॑ सस॒न्त्वबु॑ध्यमाना॒स्तम॑सो॒ विम॑ध्ये ॥ ३ ॥

उच्छंतीः अद्य चितयंत भोजान् राधःऽदेयाय उषसः मघोनीः ।
अचित्रे अंतरिति पणयः ससंतु अबुध्यमानाः तमसः विऽमध्ये ॥ ३ ॥

ऐश्वर्यवती उषेनें आज उदय पावून आपले कृपाधन अर्पण करण्यासाठी भाग्यवान लोकांना जागृत केलें आहे. परंतु अधार्मिक कृपणलोक जागे न होतां अंधकारामध्यें त्याच्या अगदीं काळ्याकुट्ट गाभ्याच्या आंत तसेच निजून राहोत. ॥ ३ ॥


कु॒वित्स दे॑वीः स॒नयो॒ नवो॑ वा॒ यामो॑ बभू॒यादु॑षसो वो अ॒द्य ।
येना॒ नव॑ग्वे॒ अङ्गि॒॑रे॒ दश॑ग्वे स॒प्तास्ये॑ रेवती रे॒वदू॒ष ॥ ४ ॥

कुवित् सः देवीः सनयः नवः वा यामः बभूयात् उषसः वः अद्य ।
येन नवऽग्वे अं‍गिरे दशऽग्वे सप्तऽआस्ये रेवतीः रेवत् ऊष ॥ ४ ॥

वैभवशालिनी देवींनो, ज्याच्यामध्यें आरोहण करून तुम्ही नवग्वांच्या येथे, अंगिरांच्या येथें किंवा सप्तास्य दशग्वांच्या येथें सर्वांना वैभव विभूषित करण्याकरितां प्रकाशमान झालां, तोच हा पुरातन म्हणा किंवा नूतन म्हणा असा रथ तुमच्यासाठीं आज सज्ज होणार ना ? ॥ ४ ॥


यू॒यं हि दे॑वीर्‌ऋत॒युग्भि॒रश्वैः॑ परिप्रया॒थ भुव॑नानि स॒द्यः ।
प्र॒बो॒धय॑न्तीरुषसः स॒सन्तं॑ द्वि॒पाच्चतु॑ष्पाच्च॒रथा॑य जी॒वम् ॥ ५ ॥

यूयं हि देवीः ऋतयुक्ऽभिः अश्वैः परिऽप्रयाथ भुवनानि सद्यः ।
प्रऽबोधयंतीः उषसः ससंतं द्विऽपात् चतुःऽष्पात् चरथाय जीवं ॥ ५ ॥

कारण हे देवींनो, सनातन नियमानुसार रथास जोडलेल्या अश्वांच्या योगानें तुम्ही क्षणार्धांत सर्व जगाभोंवती परिभ्रमण करतां. हे उषांनो, असे करतांना तुम्ही निद्रावश असलेल्या प्राणिमात्रांना, सर्व द्विपाद चतुष्पाद जीवांना त्यांनी उद्योग व्यापृत राहावें म्हणून जागृत करतां. ॥ ५ ॥


क्व स्विदासां कत॒मा पु॑रा॒णी यया॑ वि॒धाना॑ विद॒धुर्‌ऋ॑भू॒णाम् ।
शुभं॒ यच्छु॒भ्रा उ॒षस॒श्चर॑न्ति॒ न वि ज्ञा॑यन्ते स॒दृशी॑रजु॒र्याः ॥ ६ ॥

क्व स्वित् आसां कतमा पुराणी यया विधाना विऽदधुः ऋभूणां ।
शुभं यत् शुभ्रा: उषसः चरंति न वि ज्ञायंते सऽदृशीः अजुर्याः ॥ ६ ॥

ह्या उषांतून अत्यंत पुरातन की उषा ती कोणती ? जिने ऋभूंची नियत कार्यें ठरवून टाकली आहेत ती उषा यांत कोठें आहे ? ज्या वेळेस ह्या शुभ तेजस्क उषा जगताचें मंगल करण्याकरितां निभतात त्यावेळेस त्या एकसारख्या आणि जरारहित असल्याकारणानें निरनिराळ्या अशा ओळखूं येतच नाहींत. ॥ ६ ॥


ता घा॒ ता भ॒द्रा उ॒षसः॑ पु॒रासु॑रभि॒ष्टिद्यु॑म्ना ऋ॒तजा॑तसत्याः ।
यास्वी॑जा॒नः श॑शमा॒न उ॒क्थै स्तु॒वञ्छंस॒न्द्रवि॑णं स॒द्य आप॑ ॥ ७ ॥

ता घ ताः भद्रा उषसः पुरा आसुः अभिष्टिऽद्युम्नाः ऋतजातऽसत्याः ।
यासु ईजानः शशमानः उक्थैः स्तुवन् शंसन् द्रविणं सद्यः आप ॥ ७ ॥

खरोखरच ह्या ज्या कल्याणप्रद उषादेवी आज आपल्या सन्मुख दिसत आहेत त्या पुरातन काळीं सुद्धां भक्तांना सहाय्यकरणें हेंच आपलें वैभव समजणार्‍या, सद्धर्म प्रभाव आणि सत्यरूप अशाच होत्या. त्यांचा उदय झाला असतां यज्ञ करून तप करणारा आणि सामसूक्तांनी यशोगायन करून ईश स्तवन करणारा जो भक्तजन त्याला त्या काळींही तात्काळ सामर्थ्य संपत्तिचा लाभ होत असे. ॥ ७ ॥


ता आ च॑रन्ति सम॒ना पु॒रस्ता॑त्समा॒नतः॑ सम॒ना प॑प्रथा॒नाः ।
ऋ॒तस्य॑ दे॒वीः सद॑सो बुधा॒ना गवां॒ न सर्गा॑ उ॒षसो॑ जरन्ते ॥ ८ ॥

ताः आ चरंति समना पुरस्तात् समानतः समना पप्रथानाः ।
ऋतस्य देवीः सदसः बुधानाः गवां न सर्गाः उषसः जरंते ॥ ८ ॥

त्या एकमनानें पूर्व दिक्‌प्रांती उदय पावून आणि एक मनानें एकदम चोहोंकडून आपलें तेज पसरून देऊन इकडे आपणांकडेच आगमन करीत आहेत. अंतःकरणांतील सत्यधर्माची बुद्धि जागृत करून धेनूंच्या दुग्धाप्रमाणे शुभ्रतेजस्क अशा उषादेवी पहा भगवत स्तवन करीत आपल्या सन्निध येत आहेत. ॥ ८ ॥


ता इन्न्वे३॑व स॑म॒ना स॑मा॒नीरमी॑तवर्णा उ॒षस॑श्चरन्ति ।
गूह॑न्ती॒रभ्व॒मसि॑तं॒ रुश॑द्‌भिः शु॒क्रास्त॒नूभिः॒ शुच॑यो रुचा॒नाः ॥ ९ ॥

ताः इत् नु एव समना समानीः अमीतऽवर्णाः उषसः चरंति ।
गूहंतीः अभ्वं असितं रुशत्ऽभिः शुक्राः तनूभिः शुचयः रुचानाः ॥ ९ ॥

एकाच अंतःकरणाच्या आणि एकसारख्या स्वरूपाच्या त्या उषादेवी - ज्यांचा देदीप्यमान तजेला कधीही फिक्का पडत नाही त्या उषादेवी - पण आपला मार्ग आक्रमण करीत आहेत. भयंकर स्वरूपाच्या काळ्याकुट्ट अंधकाराला आपल्या चमकदार अंगकांतीनें झांकून टाकून ह्या शुभ्रवर्ण पवित्र आणि दीप्तिमान उषा गमन करीत आहेत. ॥ ९ ॥


र॒यिं दि॑वो दुहितरो विभा॒तीः प्र॒जाव॑न्तं यच्छता॒स्मासु॑ देवीः ।
स्यो॒नादा वः॑ प्रति॒बुध्य॑मानाः सु॒वीर्य॑स्य॒ पत॑यः स्याम ॥ १० ॥

रयिं दिवः दुहितरः विऽभातीः प्रजाऽवंतं यच्छत अस्मासु देवीः ।
स्योनात् आ वः प्रतिऽबुध्यमानाः सुऽवीर्यस्य पतयः स्याम ॥ १० ॥

गगन कन्यकांनो, हे देवींनो, तुम्ही सुप्रकाशित होऊन जें प्रजायुक्त असेल असेंच दिव्यैश्वर्य आम्हाला अर्पण करा; तुमच्या सुखमय विश्रांतिपासून तुम्ही आम्हांला उठविले आहे तर अत्यंत अपूर्व अशा वीर्याचे प्रभु आम्ही होऊं असें करा. ॥ १० ॥


तद्वो॑ दिवो दुहितरो विभा॒तीरुप॑ ब्रुव उषसो य॒ज्ञके॑तुः ।
व॒यं स्या॑म य॒शसो॒ जने॑षु॒ तद्द्यौश्च॑ ध॒त्तां पृ॑थि॒वी च॑ दे॒वी ॥ ११ ॥

तत् वः दिवः दुहितरः विऽभातीः उप ब्रुव उषसः यज्ञऽकेतुः ।
वयं स्याम यशसः जनेषु तत् द्यौः च धत्तां पृथिवी च देवी ॥ ११ ॥

ह्यासाठीं हे गगनकन्यकांनो, हे उषांनो, यज्ञमार्गाचा झेंडा चोहोंकडे मिरविणारा मी भक्त सुप्रकाशित होणार्‍या ज्या तुम्ही त्या तुमची प्रशंसाच करीत आहे. तर सर्व लोकांमध्ये आम्ही पूर्ण यशस्वी होऊं असें करा. आणि ही आमची प्रार्थना द्यू आणि पृथिवी हे सफल करोत. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५२ (उषा सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - उषा : छंद - गायत्री


प्रति॒ ष्या सू॒नरी॒ जनी॑ व्यु॒च्छन्ती॒ परि॒ स्वसुः॑ । दि॒वो अ॑दर्शि दुहि॒ता ॥ १ ॥

प्रति स्या सूनरी जनी विऽउच्छंती परि स्वसुः । दिवः अदर्शि दुहिता ॥ १ ॥

पहा ही लावण्यवती रामा, ही आकाशकन्यका उषा सुप्रकाशित होऊन आपल्या बहिणीच्या पाठोपाठ दृष्टि गोचर झाली आहे. ॥ १ ॥


अश्वे॑व चि॒त्रारु॑षी मा॒ता गवा॑मृ॒ताव॑री । सखा॑भूद॒श्विनो॑रु॒षाः ॥ २ ॥

अश्वाऽइव चित्रा अरुषी माता गवां ऋतऽवरी । सखा अभूत् अश्विनोः उषाः ॥ २ ॥

विद्युल्लतेप्रमाणे अद्‍भुत आणि आरक्तवर्ण अशी ही प्रकाशरूप धेनूंची माता उषादेवी सद्धर्मप्रिय असून अश्विदेवांचीही पण ती प्रियसखीच आहे. ॥ २ ॥


उ॒त सखा॑स्य॒श्विनो॑रु॒त मा॒ता गवा॑मसि । उ॒तोषो॒ वस्व॑ ईशिषे ॥ ३ ॥

उत सखा असि अश्विनोः उत माता गवां असि । उत उषः वस्व ईशिषे ॥ ३ ॥

अश्वीदेवांची तू प्रियसखी आणि तेजोरूप गाईंची जननी होय. हे उषे, अभीष्टधनाची स्वामिनीही तूंच. ॥ ३ ॥


या॒व॒यद्द्वे॑षसं त्वा चिकि॒त्वित्सू॑नृतावरि । प्रति॒ स्तोमै॑रभुत्स्महि ॥ ४ ॥

यावयत्ऽद्वेषसं त्वा चिकित्वित् सूनृताऽवरि । प्रति स्तोमैः अभुत्स्महि ॥ ४ ॥

आमच्याकडे बुद्धिचा उजेड लख्ख पडेल असें करून तूं सज्जन द्वेष्ट्यांची वाताहात करणारी आहेस. हे मंजुभाषिणी देवी मनोहर स्तोत्रांनीच आम्ही तुझें उद्‍बोधन करीत असतो. ॥ ४ ॥


प्रति॑ भ॒द्रा अ॑दृक्षत॒ गवां॒ सर्गा॒ न र॒श्मयः॑ । ओषा अ॑प्रा उ॒रु ज्रयः॑ ॥ ५ ॥

प्रति भद्रा अदृक्षत गवां सर्गाः न रश्मयः । आ उषाः अप्राः उरु ज्रयः ॥ ५ ॥

उषादेवीचे परममंगल किरणजाल धेनूंची दुग्धप्रवाहाप्रमाणे शुभ्रवर्ण दिसत आहे. तिचा रश्मिपुंजही जिकडे तिकडे कोंदाटून भरला आहे. ॥ ५ ॥


आ॒प॒प्रुषी॑ विभावरि॒ व्याव॒र्ज्योति॑षा॒ तमः॑ । उषो॒ अनु॑ स्व॒धाम॑व ॥ ६ ॥

आऽपप्रुषी विभाऽवरि वि आवः ज्योतिषा तमः । उषः अनु स्वधां अव ॥ ६ ॥

हे तेजोमंडिते देवी, तूं सर्वत्र भरून राहून तूं आपल्या प्रकाशानें अंधकाराचें निर्मूलन केलेंच आहेस तर तूं आपल्या स्वभावानुरूप आम्हांस प्रसन्न हो. ॥ ६ ॥


आ द्यां त॑नोषि र॒श्मिभि॒रान्तरि॑क्षमु॒रु प्रि॒यम् । उषः॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॑ ॥ ७ ॥

आ द्यां तनोषि रश्मिऽभिः आंतरिक्षं उरु प्रियं । उषः शुक्रेण शोचिषा ॥ ७ ॥

हे उषे, तूं आपल्या प्रभेने आकाशाला आणि तसेंच ह्या पक्षीगण प्रिय विस्तीर्ण अंतरिक्ष प्रदेशालाही आपल्या शुभ्रवर्ण उज्वल प्रकाशानें घनदाट भरून टाकतेस. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५३ (सवितृ सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - सवितृ : छंद - जगती


तद्दे॒वस्य॑ सवि॒तुर्वार्यं॑ म॒हद्वृ॑णी॒महे॒ असु॑रस्य॒ प्रचे॑तसः ।
छ॒र्दिर्येन॑ दा॒शुषे॒ यच्छ॑ति॒ त्मना॒ तन्नो॑ म॒हाँ उद॑यान्दे॒वो अ॒क्तुभिः॑ ॥ १ ॥

तत् देवस्य सवितुः वार्यं महत् वृणीमहे असुरस्य प्रऽचेतसः ।
छर्दिः येन दाशुषे यच्छति त्मना तन् नः महान् उत् अयान् देवः अक्तुऽभिः ॥ १ ॥

देदीप्यमान परमात्मरूप आणि परमज्ञानवान असा जो जगत्‌प्रेरक सविता देव, त्याच्या श्रेष्ठ आणि अभिलषणीय ऐश्वर्याची जोड आम्हांस मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना करीत असतो. ज्या ऐश्वर्याच्या द्वारानें भगवान भक्तजनांस आपण होऊन आधार देतो, ते ऐश्वर्य हा देव भूलोकाला लावावयाच्या आपल्या प्रकाशरूप अंजनाच्या योगानें आम्हांस देवो. ॥ १ ॥


दि॒वो ध॒र्ता भुव॑नस्य प्र॒जाप॑तिः पि॒शङ्गं॑स द्रा॒पिं प्रति॑ मुञ्चते क॒विः ।
वि॒च॒क्ष॒णः प्र॒थय॑न्नापृ॒णन्नु॒र्वजी॑जनत्सवि॒ता सु॒म्नमु॒क्थ्यम् ॥ २ ॥

दिवः धर्ता भुवनस्य प्रजाऽपतिः पिशङ्गंा द्रापिं प्रति मुंचते कविः ।
विऽचक्षणः प्रथयन् आऽपृणन् उर्व् अजीजनत् सविता सुम्नं उक्थ्यं ॥ २ ॥

हा आकाशाला सांवरून धरणारा आणि जगताचा अधिपति असून ह्या परमप्रज्ञ देवानें सोन्याचें चिलखत अंगावर चढवून दिले आहे. आणि ह्या महाचतुर जगत्‌प्रेरक देवानें आपला प्रकाश जिकडे तिकडे पसरून सर्व विश्व भरून टाकलें व अनिर्वाच्य सुखाचें धाम निर्माण केलें. ॥ २ ॥


आप्रा॒ रजां॑सि दि॒व्यानि॒ पार्थि॑वा॒ श्लोकं॑ दे॒वः कृ॑णुते॒ स्वाय॒ धर्म॑णे ।
प्र बा॒हू अ॑स्राक्सवि॒ता सवी॑मनि निवे॒शय॑न्प्रसु॒वन्न॒क्तुभि॒र्जग॑त् ॥ ३ ॥

आ अप्रा रजांसि दिव्यानि पार्थिवा श्लोकं देवः कृणुते स्वाय धर्मणे ।
प्र बाहू इति अस्राक् सविता सवीमनि निऽवेशयन् प्रऽसुवन् अक्तुऽभिः जगत् ॥ ३ ॥

ह्याने सर्व दिव्यलोक आणि भूलोक व्यापून टाकले आहेत. ह्या देवानें आपल्याच सत्य धर्माच्या उत्कर्षाकरितां प्रार्थनास्तोत्र रचून दिले. आणि अंजनाप्रमाणे कृष्णवर्ण अशा निशिकाली जगाला आणण्याच्या आपल्या उद्योगात गर्क होऊन सवितृदेवानें आपले किरणरूप बाहु पसरून दिले आहेत. ॥ ३ ॥


अदा॑भ्यो॒ भुव॑नानि प्र॒चाक॑शद्व्र॒तानि॑ दे॒वः स॑वि॒ताभि र॑क्षते ।
प्रास्रा॑ग्बा॒हू भुव॑नस्य प्र॒जाभ्यो॑ धृ॒तव्र॑तो म॒हो अज्म॑स्य राजति ॥ ४ ॥

अदाभ्यः भुवनानि प्रऽचाकशत् व्रतानि देवः सविता अभि रक्षते ।
प्र अस्राक् बाहू इति भुवनस्य प्रऽजाभ्यः धृतऽव्रतः महः अज्मस्य राजति ॥ ४ ॥

अप्रतिहत आणि सर्व भुवनांना उज्वल करणारा हा जगत्‌प्रेरक देवच विधिनियमांचे परिपालन करतो. ह्या जगांतील यच्चावत् मानवांकडे त्यानें आपले किरणरूप बाहू अनुग्रहार्थ पुढे केलेले आहेत. व तोच नीतिप्रवर्तक भगवान श्रेष्ठ प्रतीच्या धर्ममार्गाचा राजा होय. ॥ ४ ॥


त्रिर॒न्तरि॑क्षं सवि॒ता म॑हित्व॒ना त्री रजां॑सि परि॒भुस्त्रीणि॑ रोच॒ना ।
ति॒स्रो दिवः॑ पृथि॒वीस्ति॒स्र इ॑न्वति त्रि॒भिर्व्र॒तैर॒भि नो॑ रक्षति॒ त्मना॑ ॥ ५ ॥

त्रिः अंतरिक्षं सविता महित्वना त्री रजांसि परिऽभुः त्रीणि रोचना ।
तिस्रः दिवः पृथिवीः तिस्र इन्वति त्रिऽभिः व्रतैः अभि नः रक्षति त्मना ॥ ५ ॥

अंतरिक्षाला त्रिवार व्यापून हा जगत्‌प्रेरक देव आपल्या महिम्याने तिन्ही रजोलोक आणि तिन्ही तेजोमय लोक ह्यांना वेढून राहतो. तो तीन स्वर्लोक आणि तीनही भूलोक ह्यांना चैतन्य देऊन आपल्या त्रिविध धर्मानें त्यांचे आपण होऊन परिपालन करतो. ॥ ५ ॥


बृ॒हत्सु॑म्नः प्रसवी॒ता नि॒वेश॑नो॒ जग॑त स्था॒तुरु॒भय॑स्य॒ यो व॒शी ।
स नो॑ दे॒वः स॑वि॒ता शर्म॑ यच्छत्व॒स्मे क्षया॑य त्रि॒वरू॑थ॒मंह॑सः ॥ ६ ॥

बृहत्ऽसुम्नः प्रऽसवीता निऽवेशनः जगत स्थातुः उभयस्य यः वशी ।
स नः देवः सविता शर्म यच्छतु अस्मे इति क्षयाय त्रिऽवरूथं अंहसः ॥ ६ ॥

जो श्रेष्ठ सुखाचे धाम, सर्व विश्वाला सचेतन करणारा आणि विश्रांति देणारा, जो सकल चराचराचा नियामक आहे तो हा जगत्‌प्रेरक सविता देव आम्हाला आनंद देवो आणि सर्व पातकांपासून आमचें संरक्षण होण्यासाठी आपल्या कृपेचें तिप्पट मजबून असे चिलखतही देवो. ॥ ६ ॥


आग॑न्दे॒व ऋ॒तुभि॒र्वर्ध॑तु॒ क्षयं॒ दधा॑तु नः सवि॒ता सु॑प्र॒जामिष॑म् ।
स नः॑ क्ष॒पाभि॒रह॑भिश्च जिन्वतु प्र॒जाव॑न्तं र॒यिम॒स्मे समि॑न्वतु ॥ ७ ॥

आ अगन् देवः ऋतुऽभिः वर्धतु क्षयं दधातु नः सविता सुऽप्रजां इषं ।
स नः क्षपाभिः अहऽभिः च जिन्वतु प्रजाऽवंतं रयिं अस्मे इति सं इन्वतु ॥ ७ ॥

हा पहा भगवान यथायोग्य काळीं प्राप्त झाला आहे. तर आमच्या ह्या वसतिस्थानांचा उत्कर्ष होवो. आणि हा सविता देव आम्हाला उत्तम प्रजा आणि मनोत्साह देवो. तो आम्हाला रात्रंदिवस सन्मार्गाकडे प्रवृत्त करून उत्तम प्रजाजन ज्या योग्यानें लाभतात अशा ऐश्वर्याची जोड करून देवो. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५४ (सवितृ सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - सवितृ : छंद - त्रिष्टुप्


अभू॑द्दे॒वः स॑वि॒ता वन्द्यो॒ नु न॑ इ॒दानी॒मह्न॑ उप॒वाच्यो॒ नृभिः॑ ।
वि यो रत्ना॒ी भज॑ति मान॒वेभ्यः॒ श्रेष्ठं॑ नो॒ अत्र॒ द्रवि॑णं॒ यथा॒ दध॑त् ॥ १ ॥

अभूत् देवः सविता वंद्यः नु नः इदानीं अह्नः उपऽवाच्यः नृऽभिः ।
वि यः रत्नाभ भजति मानवेभ्यः श्रेष्ठं नः अत्र द्रविणं यथा दधत् ॥ १ ॥

खरोखर जगत्‌प्रेरक देव आम्हाला वंदनीय झाला आहे, आणि आमच्या वीरांनी दिवसा ह्यावेळीं त्याचें स्तवन करावें हेंच त्यांना योग्य. तो मानवांना अनेक प्रकारची रत्‍न संपत्ति देतो तर तो आम्हांलाही सर्वांत श्रेष्ठ अशी सामर्थ्य संपत्ति जेणेंकरून येईल असें घडो. ॥ १ ॥


दे॒वेभ्यो॒ हि प्र॑थ॒मं य॒ज्ञिये॑भ्योऽमृत॒त्वं सु॒वसि॑ भा॒गमु॑त्त॒मम् ।
आदिद्दा॒मानं॑ सवित॒र्व्यूर्णुषेऽनूची॒ना जी॑वि॒ता मानु॑षेभ्यः ॥ २ ॥

देवेभ्यः हि प्रथमं यज्ञियेभ्यः अमृतत्वं सुवसि भागं उत्ऽतमं ।
आत् इत् दामानं सवितः वि ऊर्णुषे अनूचीना जीविता मानुषेभ्यः ॥ २ ॥

सर्वांना पूज्य अशा दिव्य विभूतीकरितां अमरत्व ही जी उत्कृष्ट देणगी ती तूं प्रथम पुढें करतोस आणि नंतर मग, हे जगत्‌प्रेरक देवा, आम्हां मानवांकरितां एकामागून एक क्रमाक्रमानें प्राप्त होणारे आनंदाचे जीवित हा आपला प्रसाद तूं सढळपणें खुला करून देतोस. ॥ २ ॥


अचि॑त्ती॒ यच्च॑कृ॒मा दैव्ये॒ जने॑ दी॒नैर्दक्षैः॒ प्रभू॑ती पूरुष॒त्वता॑ ।
दे॒वेषु॑ च सवित॒र्मानु॑षेषु च॒ त्वं नो॒ अत्र॑ सुवता॒दना॑गसः ॥ ३ ॥

अचित्ती यत् चकृम दैव्ये जने दीनैः दक्षैः प्रऽभूती पूरुषत्वता ।
देवेषु च सवितः मानुषेषु च त्वं नः अत्र सुवतात् अनागसः ॥ ३ ॥

अविचारानें, आमच्य क्षुद्रचातुर्याच्या तोर्‍यानें, अधिकाराच्या मदानें किंवा मनुष्यास स्वाभाविक अशा दौर्बल्यानें आम्ही दिव्य विभूतिंचा जो कांही अपराध केला असेल तो पोटांत घालून, हे जगत्प्रेरक देवा, देवामध्यें आणि मनुष्यामध्यें तूं आज आम्हाला दोषविमुक्त कर. ॥ ३ ॥


न प्र॒मिये॑ सवि॒तुर्दैव्य॑स्य॒ तद्यथा॒ विश्वं॒ भुव॑नं धारयि॒ष्यति॑ ।
यत्पृ॑थि॒व्या वरि॑म॒न्ना स्व॑ङ्गु॒ारिर्वर्ष्म॑न्दि॒वः सु॒वति॑ स॒त्यम॑स्य॒ तत् ॥ ४ ॥

न प्रऽमिये सवितुः दैव्यस्य तत् यथा विश्वं भुवनं धारयिष्यति ।
यत् पृथिव्याः वरिमन् आ सुऽअंगुरिः वर्ष्मन् दिवः सुवति सत्यं अस्य तत् ॥ ४ ॥

ज्या अलौकिक प्रभावानें जगत्‌प्रेरक सविता हे चराचर विश्व आतां धारण करील त्या त्याच्या ईश्वरी प्रभावाला कोणीही अडथळा करूं शकणार नाही. ज्याच्या रश्मिरूप करांगुली फारच शोभायमान दिसतात असा तो भगवान आकाशाच्या अत्युच्च शिखरावर आरोहण करून पृथ्वीच्या विस्तीर्ण पृष्ठभागावरील प्राणिमात्रांना प्रेरणा करतो , हा अबाधित पराक्रम खरोखर त्याचाच. ॥ ४ ॥


इन्द्र॑ज्येष्ठान्बृ॒हद्भ्यः॒ पर्व॑तेभ्यः॒ क्षयाँ॑ एभ्यः सुवसि प॒स्त्यावतः ।
यथा॑यथा प॒तय॑न्तो वियेमि॒र ए॒वैव त॑स्थुः सवितः स॒वाय॑ ते ॥ ५ ॥

इंद्रऽज्येष्ठान् बृहत्ऽ‍भ्यः पर्वतेभ्यः क्षयान् एभ्यः सुवसि पस्त्यऽवतः ।
यथाऽयथा पतयंतः विऽयेमिरे एव एव तस्थुः सवितः सवाय ते ॥ ५ ॥

ज्यांच्यामध्यें इंद्र हाच वरिष्ठ आहे अशा दिव्य विभूतींना मोठ मोठ्या पर्वतांकरितां तूं प्रोत्साह देतोस; आणि घरेंदारें करून राहणार्‍या लोकांस आश्रयाच्या जागा कोणत्या तेंही तूं सुचवून देतोस. म्हणून ते पर्वत व पक्षी वगैरे जिकडे तिकडे उडत असतां जसे जसे थांबवून ठेवले तशाच स्थितीत, हे जगत्‌प्रेरक देवा, ते तुझ्या आज्ञेची वाट पहात राहिले. ॥ ५ ॥


ये ते॒ त्रिरह॑न्सवितः स॒वासो॑ दि॒वेदि॑वे॒ सौभ॑गमासु॒वन्ति॑ ।
इन्द्रो॒ द्यावा॑पृथि॒वी सिन्धु॑र॒द्भििरा॑दि॒त्यैर्नो॒ अदि॑तिः॒ शर्म॑ यंसत् ॥ ६ ॥

ये ते त्रिः अहन् सवितरिति सवासः दिवेऽदिवे सौभगं आऽसुवंति ।
इंद्रः द्यावापृथिवी इति सिंधुः अत्ऽ‍भिः आदित्यैः नः अदितिः शर्म यंसत् ॥ ६ ॥

हे जगत्‌प्रेरका देवा, तुझ्या प्रित्यर्थ जी सोम स्तवनें प्रत्यही त्रिकाळ होतात तीं भक्तांना सद्‍भाग्याचीच जोड करून देतात. तर भगवान इंद्र, द्यावापृथिवी, आपोदेवीसहित आकाशगंगा आणि आदित्यांसह अनाद्यनंत शक्ति हेही मला सुखाचे धाम देवोत. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५५ (विश्वेदेवा सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - विश्वेदेवा छन्द - गायत्री


को व॑स्त्रा॒ता व॑सवः॒ को व॑रू॒ता द्यावा॑भूमी अदिते॒ त्रासी॑थां नः ।
सही॑यसो वरुण मित्र॒ मर्ता॒त्को वो॑ऽध्व॒रे वरि॑वो धाति देवाः ॥ १ ॥

कः वः त्राता वसवः कः वरूता द्यावाभूमी इति अदिते त्रासीथां नः ।
सहीयसः वरुण मित्र मर्तात् कः वः अध्वरे वरिवः धाति देवाः ॥ १ ॥

दिव्य निधींनो, तुम्हांमध्ये भक्तरक्षक कोण आहे ? दीन प्रतिपालक कोण आहे ? हे द्यावापृथिवी, हे अनाद्यनंत शक्ते, हे जगन्मित्र वरुणा, अत्यंत बलाढ्य असा जरी कोणी मनुष्य आला तरी त्याच्यापासून आमचे रक्षण करा. हे देवांनो, यज्ञ यागामध्ये आम्हांला अंतःकरणाचा आराम तुम्हांपैकी कोणाकडून मिळेल ? ॥ १ ॥


प्र ये धामा॑नि पू॒र्व्याण्यर्चा॒न्वि यदु॒च्छान्वि॑यो॒तारो॒ अमू॑राः ।
वि॒धा॒तारो॒ वि ते द॑धु॒रज॑स्रा ऋ॒तधी॑तयो रुरुचन्त द॒स्माः ॥ २ ॥

प्र ये धामानि पूर्व्याणि अर्चान् वि यत् उच्छान् विऽयोतारः अमूराः ।
विऽधातारः वि ते दधुः अजस्राः ऋतऽधीतयः रुरुचंत दस्माः ॥ २ ॥

ज्या दिव्य विभूतींनी ही पुरातन दिव्य मंदिरें सुप्रकाशित केली. ज्या अजड विभूतींनी आपलें तेज प्रकट करून प्रत्येक वस्तू निरनिराळीं दृष्टिगोचर केली, सुखदात्या देवांनी सर्व कांही दिलेलेंच आहे तेच हे अविनाशी देव, ज्याची बुद्धि धर्ममय आहे असे हे अद्‍भुत चरित्र्य देव आपल्या दिव्य प्रभेने तळपत आहेत. ॥ २ ॥


प्र प॒स्त्या३॑मदि॑तिं॒ सिन्धु॑म॒र्कैः स्व॒स्तिमी॑ळे स॒ख्याय॑ दे॒वीम् ।
उ॒भे यथा॑ नो॒ अह॑नी नि॒पात॑ उ॒षासा॒नक्ता॑ करता॒मद॑ब्धे ॥ ३ ॥

प्र पस्त्यां अदितिं सिंधुं अर्कैः स्वस्तिं ईळे सख्याय देवीं ।
उभे इति यथा नः अहनी इति निऽपातः उषसानक्ता करतां अदब्धे इति ॥ ३ ॥

गृहस्वामिनीला, अदितीला, आणि सुखकारक अशा सिंधुदेवीला त्यांच्या कृपालोभास्तव मी ’अर्क’ स्तवनांनी प्रसन्न करीत आहे. आणि रात्रंदिवस आमचे संरक्षण होईल अशा रीतीनें उषा आणि रात्र हे उभयतां आम्हांला अजिंक्य करोत. ॥ ३ ॥


व्यर्य॒मा वरु॑णश्चेति॒ पन्था॑मि॒षस्पतिः॑ सुवि॒तं गा॒तुम॒ग्निः ।
इन्द्रा॑विष्णू नृ॒वदु॒ षु स्तवा॑ना॒ शर्म॑ नो यन्त॒मम॑व॒द्वरू॑थम् ॥ ४ ॥

वि अर्यमा वरुणः चेति पंथां इषः पतिः सुवितं गातुं अग्निः ।
इंद्राविष्णू इति नृऽवत् ऊं इति सु स्तवाना शर्म नः यंतं अमऽवत् वरूथं ॥ ४ ॥

अर्यमारूप वरुण हा आमच्या उत्कर्षाचा मार्ग स्पष्टपणे नजरेस आणून देतो. मनोत्साहाचा स्वामी अग्निरूप ईश्वर आम्हाला आनंदपदाची दिशा दाखवून देतो. इंद्रविष्णूहो, वीर्याच्या आवेशांत तुमचें स्तवन होत असते तर आम्हाला अतिशय मजबूत असे चिलखत आणि सुखाचें धाम ही देणगी द्या. ॥ ४ ॥


आ पर्व॑तस्य म॒रुता॒मवां॑सि दे॒वस्य॑ त्रा॒तुर॑व्रि॒ भग॑स्य ।
पात्पति॒र्जन्या॒दंह॑सो नो मि॒त्रो मि॒त्रिया॑दु॒त न॑ उरुष्येत् ॥ ५ ॥

आ पर्वतस्य मरुतां अवांसि देवस्य त्रातुः अव्रि भगस्य ।
पात् पतिः जन्यात् अंहसः नः मित्रः मित्रियात् उत नः उरुष्येत् ॥ ५ ॥

पर्वताजवळ, मरुतांजवळ, आणि भाग्याधिपति सर्वरक्षक देव त्याच्याजवळ कृपेची भिक्षा मी मागितली आहे. तर संत जनांविरुद्ध जें कांही पातक केले असेल त्याच्यापासून सर्वेश्वर प्रभु आमची मुक्तता करो. आणि मित्रा विरुद्ध कांही पातक घडलें असेल त्याच्यापासूनही तो जगन्मित्र आमची सुटका करो. ॥ ५ ॥


नू रो॑दसी॒ अहि॑ना बु॒ध्न्येन स्तुवी॒त दे॑वी॒ अप्ये॑भिरि॒ष्टैः ।
स॒मु॒द्रं न सं॒चर॑णे सनि॒ष्यवो॑ घ॒र्मस्व॑रसो न॒द्यो३॑अप॑ व्रन् ॥ ६ ॥

नु रोदसी अहिना बुध्न्येन स्तुवीत देवी इति अप्येभिः इष्टैः ।
समुद्रं नः संऽचरणे सनिष्यवः घर्मऽस्वरसः नद्यः अप व्रन् ॥ ६ ॥

हे द्यावापृथिवींनो, हे देवींनो, अंतरिक्षरूप वृक्षाचा बुंधा अहिबुध्न्य त्याच्यासहित, आणि तुम्हाला प्रियकर ज्या आपोदेवी त्यांच्यासहित आतां तुमचीच स्तुती होऊं द्या. संपत्ति मिळविण्याची हांव असणारे व्यापारी उष्ण निःश्वास टाकणार्‍या नौकेवर आरूढ होऊन सफर करण्यासाठी समुद्र मार्ग मोकळा करतात त्याप्रमाणें श्रमानें उष्णनिःश्वास सोडणार्‍या तुम्हीं देवांनी नद्यांचे मार्गही खुले केले आहेत. ॥ ६ ॥


दे॒वैर्नो॑ दे॒व्यदि॑ति॒र्नि पा॑तु दे॒वस्त्रा॒ता त्रा॑यता॒मप्र॑युच्छन् ।
न॒हि मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य धा॒सिमर्हा॑मसि प्र॒मियं॒ सान्व॒ग्नेः ॥ ७ ॥

देवैः नः देवी अदितिः नि पातु देवः त्राता त्रायतां अप्रऽयुच्छन् ।
नहि मित्रस्य वरुणस्य धासिं अर्हामसि प्रऽमियं सानु अग्नेः ॥ ७ ॥

चिच्छक्ति अदिति देवांसह आमचे रक्षण करो; जगत्तारक प्रभु ईश्वर आमची हेळसांड न करतां आमचा उद्धार करो. लोकमित्र वरुणाचे स्थान किंवा अग्नीचे उच्चपद, ह्यांचा उपमर्द आमच्याकडून केव्हांही होऊं नये. ॥ ७ ॥


अ॒ग्निरी॑शे वस॒व्यस्या॒ग्निर्म॒हः सौभ॑गस्य । तान्य॒स्मभ्यं॑ रासते ॥ ८ ॥

अग्निः ईशे वसव्यस्य अग्निः महः सौभगस्य । तानि अस्मभ्यं रासते ॥ ८ ॥

जी जी अभिलषणीय वस्तु असेल तिचा प्रभु अग्नि आणि जें जें उत्तम भाग्य आहे त्याचाही स्वामी अग्नि हाच होय, तो ह्या सर्व गोष्टी आम्हांस देतो. ॥ ८ ॥


उषो॑ मघो॒न्या व॑ह॒ सूनृ॑ते॒ वार्या॑ पु॒रु । अ॒स्मभ्यं॑ वाजिनीवति ॥ ९ ॥

उषः मघोनि आ वह सूनृते वार्या पुरु । अस्मभ्यं वाजिनीऽवति ॥ ९ ॥

ऐश्वर्य संपन्ने उषे, हे मंजुवादिनी पवित्र सामर्थ्य स्वामिनी सर्व प्रकारची अभिलषणीय संपत्ति आमच्याकरितां घेऊन ये. ॥ ९ ॥


तत्सु नः॑ सवि॒ता भगो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा । इन्द्रो॑ नो॒ राध॒सा ग॑मत् ॥ १० ॥

तत् सु नः सविता भगः वरुणः मित्रः अर्यमा । इंद्रः नः राधसा गमत् ॥ १० ॥

तर तो जगत्‌प्रेरक देव, भाग्यदाता लोकमित्र वरुण, अर्यमा इंद्र आम्हांकडे आपल्या कृपाप्रसादासहित आगमन करो. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५६ (द्यावापृथिवी सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - द्यावापृथिवी छन्द - त्रिष्टुप्


म॒ही द्यावा॑पृथि॒वी इ॒ह ज्येष्ठे॑ रु॒चा भ॑वतां शु॒चय॑द्भि्र॒र्कैः ।
यत्सीं॒ वरि॑ष्ठे बृह॒ती वि॑मि॒न्वन्रु॒वद्धो॒क्षा प॑प्रथा॒नेभि॒रेवैः॑ ॥ १ ॥

मही इति द्यावापृथिवी इति इह ज्येष्ठे इति रुचा भवतां शुचयत्ऽभिः अर्कैः ।
यत् सीं वरिष्ठे इति बृहती इति विऽमिन्वन् रुवत् ह उक्षा पप्रथानेभिः एवैः ॥ १ ॥

श्रेष्ठ आणि सर्व प्राण्यांपेक्षा वडील अशा द्यावापृथिवी आपल्या कांतीने आणि तेजस्वी प्रभेने येथे आविर्भूत होवोत. ह्या सर्वांत वरिष्ठ आणि महान गोलांची निरनिराळी स्थापना करीत असतांना त्या वृषभरूप इंद्रानें सर्वत्र पसरणार्‍या आपल्या रश्मिरूप अश्वांसहित मोठी गर्जना केली. ॥ १ ॥


दे॒वी दे॒वेभि॑र्यज॒ते यज॑त्रै॒रमि॑नती तस्थतुरु॒क्षमा॑णे ।
ऋ॒ताव॑री अ॒द्रुहा॑ दे॒वपु॑त्रे य॒ज्ञस्य॑ ने॒त्री शु॒चय॑द्भि्र॒र्कैः ॥ २ ॥

देवी इति देवेभिः यजते इति यजत्रैः अमिनती इति तस्थतुः उक्षमाणे इति ।
ऋतावरी इत्यृतवरी अद्रुहा देवपुत्रे इति देवऽपुत्रे यज्ञस्य नेत्री इति शुचयत्ऽभिः अर्कैः ॥ २ ॥

पूज्य देवांसहित ह्या पूज्य आणि अभंग देवी आपल्या तेजःपुंज प्रभेने कृपाजलाचें सिंचन करीत उभ्या राहिल्या आहेत. त्या सद्धर्म प्रिय, द्वेषरहित आहेत, त्या देवाच्या जननी आणि यज्ञाच्या नायिका होत. ॥ २ ॥


स इत्स्वपा॒ भुव॑नेष्वास॒ य इ॒मे द्यावा॑पृथि॒वी ज॒जान॑ ।
उ॒र्वी ग॑भी॒रे रज॑सी सु॒मेके॑ अवं॒शे धीरः॒ शच्या॒ समै॑रत् ॥ ३ ॥

स इत् सुऽअपाः भुवनेषु आस यः इमे इति द्यावापृथिवी इति जजान ।
उर्वी इति गभीरे इति रजसी इति सुमेके इति सुऽमेके अवंशे धीरः शच्या सं ऐरत् ॥ ३ ॥

ज्यानें ह्या द्यावापृथिवींना उत्पन्न केले तोच एक सर्व जगांत महाचतुर देव होय. आणि ह्या विस्तीर्ण सखोल, सुंदर रजोलोकांना निराधार आकाशमंडलांत त्याच बुद्धिमान देवाने आपल्या सामर्थ्याने चालन दिलेले आहे. ॥ ३ ॥


नू रो॑दसी बृ॒हद्भि॑जर्नो॒ वरू॑थैः॒ पत्नी॑रवद्भि रि॒षय॑न्ती स॒जोषाः॑ ।
उ॒रू॒ची विश्वे॑ यज॒ते नि पा॑तं धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ४ ॥

नु रोदसी इति बृहत्ऽभिः नः वरूथैः पत्नीीवत्ऽभिः इषयंती इति सजोषाः ।
उरूची इति विश्वे इति यजते इति नि पातं धिया स्याम रथ्यः सदासाः ॥ ४ ॥

आणि आतां हे द्यावापृथिवीहो, सपत्‍नीक देवांसहित तुम्ही प्रेमळपणानें आम्हांमध्ये मनोत्साह आणतां, तुम्ही विस्तीर्ण विश्वरूप आणि पूज्य आहांत; तर मोठ्या दृढ कवचांनी आमचे रक्षण करा; सद्‍बुद्धीच्या योगानें आम्ही सदैव जयशाली रथी होऊं असे करा. ॥ ४ ॥


प्र वां॒ महि॒ द्यवी॑ अ॒भ्युप॑स्तुतिं भरामहे । शुची॒ उप॒ प्रश॑स्तये ॥ ५ ॥

प्र वां महि द्यवी इति अभि उपऽस्तुतिं भरामहे । शुची इति उप प्रऽशस्तये ॥ ५ ॥

तुम्ही देदीप्यमान, तुम्हाला आम्ही सत्कारपूर्वक स्तोत्र अर्पण करीत आहोंत. तुम्ही पवित्र; तेव्हां स्तवन करण्याकरतां तुमच्याकडेच येत आहोंत. ॥ ५ ॥


पु॒ना॒ने त॒न्वा मि॒थः स्वेन॒ दक्षे॑ण राजथः । ऊ॒ह्याथे॑ स॒नादृ॒तम् ॥ ६ ॥

पुनाने इति तन्वा मिथः स्वेन दक्षेण राजथः । ऊह्याथे इति सनात् ऋतं ॥ ६ ॥

तुम्हीच स्वतः परस्परांना पुनीत करता. तुम्ही आपल्या स्वतःच्याच चातुर्यबलानें प्राण्यांवर अधिकार चालविता आणि पुरातन कालापासून सत्यास अनुसरूनच तुम्ही चालत आहांत. ॥ ६ ॥


म॒ही मि॒त्रस्य॑ साधथ॒स्तर॑न्ती॒ पिप्र॑ती ऋ॒तम् । परि॑ य॒ज्ञं नि षे॑दथुः ॥ ७ ॥

मही इति मित्रस्य साधथः तरंती इति पिप्रती इति ऋतं । परि यज्ञं नि सेदथुः ॥ ७ ॥

भक्तरूप मित्राचें धर्माचरण तडीस नेऊन ते पूर्ण करून तुम्ही कृतार्थ करता, आणि यज्ञ वेदीच्या भोवतालीं विराजमान होता. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५७ (कृषि सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - सीता छन्द - त्रिष्टुप्


क्षेत्र॑स्य॒ पति॑ना व॒यं हि॒तेने॑व जयामसि ।
गामश्वं॑ पोषयि॒त्न्वा स नो॑ मृळाती॒दृशे॑ ॥ १ ॥

क्षेत्रस्य पतिना वयं हितेनऽइव जयामसि ।
गां अश्वं पोषयित्नुज आ स नः मृळाति ईदृशे ॥ १ ॥

हितकर्त्यानें सहाय्य केल्याप्रमाणे क्षेत्रपतीच्या सहाय्यानें आम्ही धेनू आणि अश्व ह्यांना पोषक असेच धन जिंकून आणूं. तो क्षेत्रपति आम्हां सारख्यावरही दया करील. ॥ १ ॥


क्षेत्र॑स्य पते॒ मधु॑मन्तमू॒र्मिं धे॒नुरि॑व॒ पयो॑ अ॒स्मासु॑ धुक्ष्व ।
म॒धु॒श्चुतं॑ घृ॒तमि॑व॒ सुपू॑तमृ॒तस्य॑ नः॒ पत॑यो मृळयन्तु ॥ २ ॥

क्षेत्रस्य पते मधुऽमंतं ऊर्मिं धेनुःऽइव पयः अस्मासु धुक्ष्व ।
मधुऽश्चुतं घृतंऽइव सुऽपूतं ऋतस्य नः पतयः मृळयंतु ॥ २ ॥

हे क्षेत्रपती, धेनु दुग्ध देते त्याप्रमाणे, मधुस्रावी आणि घृताप्रमाणे परमपवित्र असा मधुर रसाचा तरंग तूं आमच्यावर लोट. सद्धर्माचे प्रभु तुम्ही देव आमच्यावर दया करा. ॥ २ ॥


मधु॑मती॒रोष॑धी॒र्द्याव॒ आपो॒ मधु॑मन्नो भवत्व॒न्तरि॑क्षम् ।
क्षेत्र॑स्य॒ पति॒र्मधु॑मान् नो अ॒स्त्वरि॑ष्यन्तो॒ अन्वे॑नं चरेम ॥ ३ ॥

मधुऽमतीः ओषधीः द्यावः आपः मधुऽमत् नः भवतु अंतरिक्षं ।
क्षेत्रस्य पतिः मधुऽमान् नः अस्तु अरिष्यंतः अनु एनं चरेम ॥ ३ ॥

ओषधी, द्युलोक आणि आपोदेवी ह्या आम्हांस मधुर होवोत. आम्हाला अंतरिक्ष मधुर होवो. क्षेत्रपति ही आमच्याशी गोड वागो; आणि कोणाकडूनही उपद्रव न होतां आम्ही ह्याला अनुसरून वागूं असे घडो. ॥ ३ ॥


शु॒नं वा॒हाः शु॒नं नरः॑ शु॒नं कृ॑षतु॒ लाङ्ग॑रलम् ।
शु॒नं व॑र॒त्रा ब॑ध्यन्तां शु॒नमष्ट्रा॒मुदि॑ङ्गेय ॥ ४ ॥

शुनं वाहाः शुनं नरः शुनं कृषतु लां‍गलं ।
शुनं वरत्राः बध्यंतां शुनं अष्ट्रां उत् इं‍गय ॥ ४ ॥

बैल आनंदानें, लोक मजेनें आणि नांगर सहज रीतीनें जमीन नांगरो. जुंपण्या चांगल्या घट्ट बांधूं द्या, सुखोत्पत्ति होईल अशा रीतीनें आपला आसूड चालीव. ॥ ४ ॥


शुना॑सीरावि॒मां वाचं॑ जुषेथां॒ यद्दि॒वि च॒क्रथुः॒ पयः॑ ।
तेने॒मामुप॑ सिञ्चतम् ॥ ५ ॥

शुनासीराव् इमां वाचं जुषेथां यत् दिवि चक्रथुः पयः ।
तेन इमां उप सिञ्चतं ॥ ५ ॥

शुनासीर हो, कृषिकर्माला सफळ करणार्‍या विभूतींनो, ही आम्ही केलेली स्तुति ग्रहण करा. आकाशमंडलांत जें उदक तुम्ही उत्पन्न केलें आहे त्यानेंच ही जमीन भिजवा. ॥ ५ ॥


अ॒र्वाची॑ सुभगे भव॒ सीते॒ वन्दा॑महे त्वा ।
यथा॑ नः सु॒भगास॑सि॒ यथा॑ नः सु॒फलास॑सि ॥ ६ ॥

अर्वाची सुऽभगे भव सीते वंदामहे त्वा ।
यथा नः सुऽभगा अससि यथा नः सुऽफला अससि ॥ ६ ॥

भाग्यशालिनी सीते, इकडे आगमन कर, तुला आम्ही वंदन करतो. कारण तेणेंकरून तूं आम्हाला भाग्यधात्री होतेस; आम्हाला सफलार्थ करणारी होतेस. ॥ ६ ॥


इन्द्रः॒ सीतां॒ नि गृ॑ह्णातु॒ तां पू॒षानु॑ यच्छतु ।
सा नः॒ पय॑स्वती दुहा॒मुत्त॑रामुत्तरां॒ समा॑म् ॥ ७ ॥

इंद्रः सीतां नि गृह्णातु तां पूषा अनु यच्छतु ।
सा नः पयस्वती दुहां उत्तरांऽउत्तरां समां ॥ ७ ॥

सीतेचा स्वीकार इंद्र करो; तो आमच्याकरितां वर्षानुवर्षे दुग्धानें परिप्लुत होऊन आम्हांस धनधान्यरूप दुग्ध देवो. ॥ ७ ॥


शु॒नं नः॒ फाला॒ वि कृ॑षन्तु॒ भूमिं॑ शु॒नं की॒नाशा॑ अ॒भि य॑न्तु वा॒हैः ।
शु॒नं प॒र्जन्यो॒ मधु॑ना॒ पयो॑भिः॒ शुना॑सीरा शु॒नम॒स्मासु॑ धत्तम् ॥ ८ ॥

शुनं नः फालाः वि कृषंतु भूमिं शुनं कीनाशाः अभि यंतु वाहैः ।
शुनं पर्जन्यः मधुना पयःऽभिः शुनासीरा शुनं अस्मासु धत्तं ॥ ८ ॥

नांगरांचे फाळ सहज जमीन नांगरोत; शेतकरी सहज लीलेनें शेत नांगरीत बैलांसह फिरोत. सर्वांना सुख होईल अशा रीतीनें पर्जन्य मधुररसानेंआणि उदकानें जमीन तर्र करो. हे शुनासिर हो, आमच्या ठिकाणी सुखाचा ठेवा ठेवा. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५८ (अनेक देवता सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - अग्निः, सूर्य, गो, अप छन्द - त्रिष्टुप्


स॒मु॒द्रादू॒र्मिर्मधु॑माँ॒ उदा॑र॒दुपां॒शुना॒ सम॑मृत॒त्वमा॑नट् ।
घृ॒तस्य॒ नाम॒ गुह्यं॒ यदस्ति॑ जि॒ह्वा दे॒वाना॑म॒मृत॑स्य॒ नाभिः॑ ॥ १ ॥

समुद्रात् ऊर्मिः मधुऽमान् उत् आरत् उप अंशुना सं अमृतऽत्वं आनट् ।
घृतस्य नाम गुह्यं यत् अस्ति जिह्वा देवानां अमृतस्य नाभिः ॥ १ ॥

समुद्रापासून मधुर रसाची लाट उसळली ती सोमवल्ली बरोबरच अमृतमय झाली. घृताचे जे एक नांव रूढ आहे, त्यालाच देवांची जिव्हा किंवा अमृताचें सर्वस्व म्हणतात. ॥ १ ॥


व॒यं नाम॒ प्रब्र॑वामा घृ॒तस्या॒स्मिन्य॒ज्ञे धा॑रयामा॒ नमो॑भिः ।
उप॑ ब्र॒ह्मा शृ॑णवच्छ॒स्यमा॑नं॒ चतुः॑शृङ्गोृऽवमीद्गौ॒र ए॒तत् ॥ २ ॥

वयं नाम प्र ब्रवाम घृतस्य अस्मिन् यज्ञे धारयामा नमःऽभिः ।
उप ब्रह्मा शृणवत् शस्यमानं चतुःशृंगः आऽवमीत् गौरः एतत् ॥ २ ॥

दिव्य घृताचा महिमा वर्णन करणें हेंच आम्हांला उचित आहे. म्हणूनच ह्या यज्ञामध्यें त्याचा नाममहिमा आम्हीं शिरसावंद्य समजून मान्य करतो. ह्या घृताचा महिमा आम्ही गात असतांना ब्रह्मा तो श्रवण करो. अशा प्रकारचें दिव्य घृत चार शृंगाच्या गव्यानें उत्पन्न करून बाहेर ओतून दिलें. ॥ २ ॥


च॒त्वारि॒ शृङ्गा॒ त्रयो॑ अस्य॒ पादा॒ द्वे शी॒र्षे स॒प्त हस्ता॑सो अस्य ।
त्रिधा॑ ब॒द्धो वृ॑ष॒भो रो॑रवीति म॒हो दे॒वो मर्त्याँ॒ आ वि॑वेश ॥ ३ ॥

चत्वारि शृङ्गाा त्रयः अस्य पादा द्वे इति शीर्षे इति सप्त हस्तासः अस्य ।
त्रिधा बद्धः वृषभः रोरवीति महः देवः मर्त्यान् आ विवेश ॥ ३ ॥

ह्याला शिंगे चार, पाय तीन, मस्तके दोन व ह्याला सात हात आहेत. ह्या वृषभाला तीन जागीं बांधून टाकलें असून तो मोठ्यानें डुरकण्या फोडीत आहे, व त्याच महान ईश्वरानें आम्हां मानवांच्या अंतःकरणांत वास केला आहे. ॥ ३ ॥


त्रिधा॑ हि॒तं प॒णिभि॑र्गु॒ह्यमा॑नं॒ गवि॑ दे॒वासो॑ घृ॒तमन्व॑विन्दन् ।
इन्द्र॒ एकं॒ सूर्य॒ एकं॑ जजान वे॒नादेकं॑ स्व॒धया॒ निष्ट॑तक्षुः ॥ ४ ॥

त्रिधा हितं पणिऽभिः गुह्यमानं गवि देवासः घृतं अनु अविंदन् ।
इंद्र एकं सूर्यः एकं जजान वेनात् एकं स्वधया निः ततक्षुः ॥ ४ ॥

पणि नामक अधर्मिकांनी दाबून ठेवलेलें व तीन प्रकारचे बनलेले दिव्य घृत देवांना प्रकाश धेनूच्या ठिकाणीं सांपडले. एक प्रकार इंद्राने, दुसरा प्रकार सूर्यानें उत्पन्न केला, आणि तिसरा आत्मसामर्थ्यानें देवांनी बनविला. ॥ ४ ॥


ए॒ता अ॑र्षन्ति॒ हृद्या॑त्समु॒द्राच्छ॒तव्र॑जा रि॒पुणा॒ नाव॒चक्षे॑ ।
घृ॒तस्य॒ धारा॑ अ॒भि चा॑कशीमि हिर॒ण्ययो॑ वेत॒सो मध्य॑ आसाम् ॥ ५ ॥

एताः अर्षंति हृद्यात् समुद्रात् शतऽव्रजाः रिपुणा न अवऽचक्षे ।
घृतस्य धाराः अभि चाकशीमि हिरण्ययः वेतसः मध्य आसां ॥ ५ ॥

ह्या दिव्य घृताच्या धारांचे शेंकडो झोतच्या झोत शत्रूच्या दृष्टोत्पत्तीस न येतां त्या रम्य अंतिरिक्ष समुद्रापासून कोसळून खाली येतात; त्यांना आतां चांगलेंच पहावयास मला सांपडत आहे. पहा तो त्यांच्या मध्यभागीं एक सोन्याचा वेत (विद्युल्लता) दिसत आहे. ॥ ५ ॥


स॒म्यक्स्र॑वन्ति स॒रितो॒ न धेना॑ अ॒न्तर्हृ॒दा मन॑सा पू॒यमा॑नाः ।
ए॒ते अ॑र्षन्त्यू॒र्मयो॑ घृ॒तस्य॑ मृ॒गा इ॑व क्षिप॒णोरीष॑माणाः ॥ ६ ॥

सम्यक् स्रवंति सरितः न धेनाः अंतः हृदा मनसा पूयमानाः ।
एते अर्षंति ऊर्मयः घृतस्य मृगाःऽइव क्षिपणोः ईषमाणाः ॥ ६ ॥

अंतःकरणानें आणि मनानें अंतरंगीं पवित्र असणार्‍या ह्या दिव्य घृताच्या लाटा दुधाच्या नद्यांप्रमाणें फारच मजेदार रीतीनें एकत्र वहात आहेत. घृताचे हे कल्लोल पारधी पाठीस लागल्यामुळें त्याच्यापासुन धूम ठोकणार्‍या सावजाप्रमाणे वेगानें धांवत चालले आहेत. ॥ ६ ॥


सिन्धो॑रिव प्राध्व॒ने शू॑घ॒नासो॒ वात॑प्रमियः पतयन्ति य॒ह्वाः ।
घृ॒तस्य॒ धारा॑ अरु॒षो न वा॒जी काष्ठा॑ भि॒न्दन्नू॒र्मिभिः॒ पिन्व॑मानः ॥ ७ ॥

सिंधोःऽइव प्रऽअध्वने शूघनासः वातऽप्रमियः पतयंति यह्वाः ।
घृतस्य धाराः अरुषः न वाजी काष्ठाः भिंदन् ऊर्मिऽभिः पिन्वमानः ॥ ७ ॥

उतरत्या प्रदेशांत नदीच्या वाहणार्‍या लोंढ्याप्रमाणें वा वायुपेक्षांही जलद वाहणार्‍या दिव्य घृताच्या अविरत धारा एकसारख्या चालूच आहेत. आणि आंगाच्या गुर्मीनें फोंफावलेला व आवेशानें लाल दिसणारा घोडेस्वार मेंढे कोट फोडून जातो त्याप्रमाणें त्या धाराही उभाड्यानें वहात जात आहेत. ॥ ७ ॥


अ॒भि प्र॑वन्त॒ सम॑नेव॒ योषाः॑ कल्या॒ण्य१स्मय॑मानासो अ॒ग्निम् ।
घृ॒तस्य॒ धाराः॑ स॒मिधो॑ नसन्त॒ ता जु॑षा॒णो ह॑र्यति जा॒तवे॑दाः ॥ ८ ॥

अभि प्रवंत समनाऽइव योषाः कल्याण्यः स्मयमानासः अग्निं ।
घृतस्य धाराः संऽइधः नसंत ता जुषाणः हर्यति जातऽवेदाः ॥ ८ ॥

लावण्यवती हंसतमुख आणि संकेतस्थळी जाणार्‍या रमणींप्रमाणें अग्नीकडेच त्या चालल्या आहेत. घृताच्या त्या देदीप्यमान धारा समिधांशी संलग्न झाल्या, आणि अग्नीही त्यांचा उपभोग घेऊन संतुष्ट झाला. ॥ ८ ॥


क॒न्या इव वह॒तुमेत॒वा उ॑ अ॒ञ्ज्यञ्जा॒ना अ॒भि चा॑कशीमि ।
यत्र॒ सोमः॑ सू॒यते॒ यत्र॑ य॒ज्ञो घृ॒तस्य॒ धारा॑ अ॒भि तत्प॑वन्ते ॥ ९ ॥

कन्याःऽइव वहतुं एतवा ऊं इति अंजि अंजानाः अभि चाकशीमि ।
यत्र सोमः सूयते यत्र यज्ञः घृतस्य धाराः अभि तत् पवंते ॥ ९ ॥

सुंदर आभरणांनी नटून विवाहास निघालेल्या कन्यकेप्रमाणेंच त्या मला दिसतात. जेथें सोमरस पिळून सिद्ध करतात, जेथें यज्ञ समारंभ साजरा करतात, तिकडेच ह्या घृताच्या धारा धांवत जातात. ॥ ९ ॥


अ॒भ्यर्षत सुष्टु॒तिं गव्य॑मा॒जिम॒स्मासु॑ भ॒द्रा द्रवि॑णानि धत्त ।
इ॒मं य॒ज्ञं न॑यत दे॒वता॑ नो घृ॒तस्य॒ धारा॒ मधु॑मत्पवन्ते ॥ १० ॥

अभि अर्षत सुऽस्तुतिं गव्यं आजिं अस्मासु भद्रा द्रविणानि धत्त ।
इमं यज्ञं नयत देवता नः घृतस्य धाराः मधुऽमत् पवंते ॥ १० ॥

हे देवांनो, आमच्या मनोहर स्तुतींकडे धांवत या. प्रकाशाचे सार, ऐन आणीबाणीच्या वेळीं जय आणि कल्याणकारक सामर्थ्यसंपत्ति अशी देणगी आम्हांस द्या. दिव्य विभूतींकडे हा आमचा यज्ञ पावेल असें करा. पहा ह्या घृताच्या धारा आपल्या माधुर्य भरानें वहात आहेत. ॥ १० ॥


धाम॑न्ते॒ विश्वं॒ भुव॑न॒मधि॑ श्रि॒तम॒न्तः स॑मु॒द्रे हृ॒द्य१न्तरायु॑षि ।
अ॒पामनी॑के समि॒थे य आभृ॑त॒स्तम॑श्याम॒मधु॑मन्तं त ऊ॒र्मिम् ॥ ११ ॥

धामन् ते विश्वं भुवनं अधि श्रितं अंतरिति समुद्रे हृदि अंतः आयुषि ।
अपां अनीके संऽइथे य आऽभृतः तं अश्याम मधुऽमंतं त ऊर्मिं ॥ ११ ॥

हे अखिल जगत् तुमच्या सत्तेवर अवलंबून राहिलें आहे. तर समुद्राच्या आंत, हृदयांत, जीवनाच्या अंतरंगी, जलौघांत आणि जन समाजांत तो तरंग संकलित झाला आहे त्या तुझ्या मधुर तरंगाचा उपभोग आम्हांस घडो. ॥ ११ ॥


॥ चवथे मण्डळ समाप्त ॥
ॐ तत् सत्


GO TOP